Sunday, 5 June 2011
‘एका शब्दा’ने केला अनेकांचा हिरमोड!
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): चौथ्या गोवा चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन शुक्रवारी झाले, त्या दिवशी रसिकांनी प्रचंड गर्दी करून ‘बालगंधर्व’चे उत्स्फूर्त स्वागत केले. हा उद्घाटन सोहळा कला अकादमीमध्ये झाला खरा, पण दुसर्या दिवशी ‘एका शब्दात सांगतो’चा प्रीमियर शो मात्र मॅकेनीझ पॅलेस-१ मध्ये ठेवण्यात आल्याने असंख्य रसिकांचा हिरमोड झाला. या छोट्या सभागृहाची क्षमता अवघी ३०० असून, त्यांपैकी सुमारे ५० जागा या चित्रपट कलाकार आणि महनीय व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रेक्षकांसाठी सुमारे २५० जागा उपलब्ध झाल्या. ३०० रुपये देऊन या महोत्सवाचे पूर्ण तिकीट काढलेल्या असंख्य प्रेक्षकांना निराश होऊन परतावे लागले. हातात तिकीट आहे, पण सभागृहात जागाच नाही, असे चित्र पाहून अनेक रसिक संतापले. त्यांनी आयोजकांशी वाद घातला. क्षमता नसेल तर कशाला तिकिटे विकता? क्षमतेनुसार प्रत्येक चित्रपटासाठी वेगळी तिकिटे ठेवून प्रेक्षकांची गैरसोय टाळता आली नसती का, असा भडिमार अनेकांनी केला. मॅकेनीझ पॅलेसच्या बाहेर सुमारे शंभरसव्वाशे रसिक खोळंबले होते. त्यांपैकी काही जण मडगाव, फोंडा तसेच म्हापशाहून आले होते. हा ‘प्रीमियर’ कला अकादमीमध्ये का ठेवण्यात आला नाही, याचे उत्तर कोणाजवळही नव्हते. पैसे देऊनही अशी अवस्था झाल्याने रसिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. लवकर येऊन जागा का अडवली नाही, इतर चित्रपट पाहिले ना, दुसरीकडे कार्यक्रमास जा, अशी दुरुत्तरे आयोजक हातात तिकिटे घेऊन उभ्या असलेल्या प्रेक्षकांना देत होते. सकाळी मॅकेनीझ पॅलेस-२ या छोटेखानी सभागृहात ‘ मी सिंधुताई सपकाळ’ चित्रपटावेळीही अनेक रसिकांना जागेअभावी परतावे लागले, अशी माहिती मिळाली. आयोजकांनी सुमारे एक हजार तिकिटे विकल्याची माहिती देण्यात आली. आसनव्यवस्था अवघी तीनशे आणि तिकीटविक्री मात्र एक हजार अशी स्थिती निर्माण झाल्याने हा गोंधळ निर्माण झाला,असे दिसून आले. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणार्या राज्य सरकारला या महोत्सवासाठी ‘आयनॉक्स’ घेता आले नाही. प्रादेशिक भाषा दुय्यम मानण्याचे सरकारचे धोरण यानिमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment