Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday 31 July, 2011

WWW.GOADOOT.IN

Please visit our new website
www.goadoot.in









THANK YOU

जिल्हा इस्पितळ की हायवे?

इस्पितळाचा इच्छा प्रस्ताव म्हणजे
महामार्ग चौपदरीकरण ‘कॉपी पेस्ट’

विश्‍वजित राणेंच्या अध्यक्षतेखालीच सल्लागार कंपनीची निवड
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळ ‘पीपीपी’च्या धर्तीवर चालवण्यासाठी आर्थिक सल्लागार निवडताना आरोग्य खात्याकडून संकेतस्थळावर उपलब्ध केलेला ‘आरएफपी’ अर्थात इच्छा प्रस्ताव दस्तऐवज हा चक्क राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण इच्छा प्रस्तावाची ‘कॉपी पेस्ट’ आहे, हे आता ढळढळीतपणे स्पष्ट झाले आहे. सल्लागार निवड समितीचे अध्यक्षपद आरोग्य सचिवांकडे असताना आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनीच बैठकांचे नेतृत्व करून सल्लागार कंपनीची निवड केली, याचाही उलगडा झाल्याने या एकूणच व्यवहारात विश्‍वजित राणे यांचे हित असल्याचे बिंग फुटले आहे.
म्हापसा जिल्हा इस्पितळाचे ‘पीपीपी’करण सर्वसामान्य व गरीब लोकांना चांगली व अद्ययावत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी होते आहे, हा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचा दावा धादांत खोटा व दिशाभूल करणारा ठरला आहे. सध्याचे जीर्ण अवस्थेतील आझिलो इस्पितळ जनतेच्या खिशातून शेकडो कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पेडे येथील नव्या जिल्हा इस्पितळ इमारतीत स्थलांतर करण्याची निकड असताना विश्‍वजित राणे यांना मात्र ‘पीपीपी’ने पछाडले आहे. आपल्या मर्जीतील खासगी कंपनीकडे या इमारतीचा ताबा देऊन ‘पीपीपी’ पद्धतीवर हे इस्पितळ चालवण्याचा त्यांचा आग्रह म्हणजे छुपे ‘डीलिंग’ असल्याचा उघड आरोप विरोधक करू लागले आहेत.
जिल्हा इस्पितळासाठी मागवलेला ‘आरएफपी’ प्रत्यक्षात चौपदरी महामार्गाचा दस्तऐवज आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी गत विधानसभा अधिवेशनातकेला होता. या आरोपांतील सत्यता पडताळून पाहण्यासाठी सरकारी संकेतस्थळावरून हा दस्तऐवज मिळवला असता पर्रीकरांचे आरोप शंभर टक्के खरे ठरले आहेत. १४३ पानांचा हा भला मोठा दस्तऐवज महामार्ग चौपदरीकरणाचा आहे. या दस्तऐवजात ‘हायवे’चे नाव बदलून तिथे ‘जिल्हा इस्पितळ’ हे नाव टाकण्याची करामत आरोग्य खात्याने केली आहे. ही दुरुस्ती करताना अनेक ठिकाणी ‘हायवे’चे नाव तसेच राहून गेल्याने अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणाचा पोलखोल झाला आहे.
सल्लागार निवडसमितीचे अध्यक्ष कोण?
पेडे येथील ३०० खाटांचे हे इस्पितळ ‘पीपीपी’ धर्तीवर चालवण्यासाठी सल्लागार नेमणुकीसाठी हा इच्छाप्रस्ताव मागवला होता. सल्लागार नेमणूक समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य सचिवांची नेमणूक करून इतर सदस्यांच्या नियुक्तीचा ‘नोट’ त्यांनी १३ ऑगस्ट २०१० रोजी तयार केला. याच दिवशी समितीची पहिली बैठक झाली पण विशेष म्हणजे या समितीशी काहीही संबंध नसताना या बैठकीच्या इतिवृत्तावर आरोग्यमंत्र्यांची सही सापडली आहे. याचाच अर्थ या बैठकीवर राणे यांचा वरचष्मा होता हे गुपित उघड झाले आहे. तदनंतर २३ व २५ ऑगस्ट २०१० रोजी प्रत्यक्ष सल्लागार कंपनीची निवड करण्यासाठी झालेल्या बैठकांचे अध्यक्षपद विश्‍वजित राणे यांनीच भूषवून आरोग्य सचिवांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याची कृती केली. अनधिकृतरीत्या सल्लागार निवड समितीचे अध्यक्षपद भूषवून सल्लागार कंपनीची निवड करण्याचा हा प्रकार विश्‍वजित राणे यांच्या स्वार्थी हेतूचे दर्शन घडवणारा ठरला आहे.
‘आरएफपी’चा घोळ
एकतर चौपदरी हायवेचा ‘आरएफपी’ दस्तऐवज जिल्हा इस्पितळासाठी जशास तसा वापरण्याची करामत आरोग्य खात्याने केली. या दस्तऐवजात ‘हायवे’चे नाव बदलून जिल्हा इस्पितळाचे नाव टाकण्यातही हलगर्जीपणा झाल्याने आरोग्य खात्याने स्वतःचे जाहीर हसेच करून घेतले आहे. ‘आरएफपी’ संबंधी स्पष्टीकरण किंवा हरकती मांडण्यासाठी २९ जुलै २०१० ही शेवटची तारीख दिली होती व निविदा सादर करण्याची अंतिम मुदत ३० जुलै २०१० होती. एखाद्या कंपनीने २९ रोजी हा दस्तऐवज मिळवला असेल तर त्यांना हरकती मांडण्याची अजिबात संधी या प्रक्रियेत मिळाली नसल्याचेच यावरून स्पष्ट होते. सुमारे १४३ पानी हा दस्तऐवज निविदेत सहभागी झालेल्या कंपन्यांकडूनही नजरेखाली घालण्यात आला नसल्याचीच जास्त शक्यता आहे. या दस्तऐवजात अनेक ठिकाणी ‘हायवे’चा उल्लेख तसाच राहिला आहे व राज्य आरोग्य खात्याचे मुख्यालय दिल्लीत असल्याची नोंद झाली आहे. हायवे अधिकारिणीचे कार्यालय दिल्लीत असल्याने तो उल्लेख तसाच राहिल्याचे यातून स्पष्ट झाले. पान क्रमांक ११० वरील तांत्रिक प्रस्ताव अर्जावरील सल्लागाराची नेमणूक चौपदरी हायवेसाठी होत असल्याचा उल्लेखही तसाच राहून गेला आहे. या दस्तऐवजातील पान ११५च्या पुढील भागांत इस्पितळाचा उल्लेख कुठेच दिसत नाही. अशा परिस्थितीत ‘आयमॅक्स सेंट्रम कॅपिटल लि.’ या कंपनीची ४२ लाख ५९ हजार २३५ रुपयांची बोली राज्य सरकारने सल्लागारपदासाठी मंजूर केली आहे.

मातृभाषाप्रेमींच्या सभेवरून विश्‍वजित राणेंचा जळफळाट

उपस्थितांची यादी तयार करण्याचे फर्मान
वाळपई, दि. ३० (प्रतिनिधी): भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे वाळपई येथे आयोजित जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचा जळफळाट सुरू आहे. या सभेमुळे धाबे दणाणलेल्या विश्‍वजितनी वाळपई परिसरातील आपल्या समर्थक पंच सदस्यांना व इतर म्होरक्यांना पाचारण करून सभेला कोणकोण हजर होते, त्यांच्या नावांची यादीच तयार करण्याचे फर्मान सोडल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
भाषा माध्यमप्रश्‍नी इंग्रजी माध्यमाला अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुळात मातृभाषा समर्थक मंत्र्यांचे नेतृत्व करून आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे हे या प्रस्तावाला विरोध करतील, अशी येथील लोकांची धारणा होती. विश्‍वजित राणे यांनी मात्र मुकाट्याने या प्रस्तावाला मान्यता दिल्याने सत्तरीवासीय बरेच खवळले आहेत. एरवी सरकारात आपले वजन व दरारा असल्याचा टेंभा मिरवणारे आरोग्यमंत्री या निर्णयावेळी तोंडात बोळा घालून गप्प का बसले, असा सवाल येथील मातृभाषाप्रेमींनी केला आहे. विश्‍वजित राणे यांच्यावर आयकर खात्याचे छापे टाकून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांचे तोंड कायमचे बंद केले की काय, अशीही जोरदार चर्चा या भागात सुरू आहे.
दरम्यान, भाषा माध्यम निर्णयाचा कोणताही परिणाम सत्तरीत होणार नाही, अशा गूर्मीत वावरणार्‍या विश्‍वजित राणेंचा लवकरच भ्रमनिरास होईल, असे भाकीत वाळपईतील भाजपचे नेते देमू गांवकर यांनी केले. २४ रोजी वाळपईतील निषेध सभेला मिळालेला प्रतिसाद हे त्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचेही ते म्हणाले. मंत्रिमंडळ बैठकीवेळी मौन धारण केलेल्या विश्‍वजित राणे यांनी निदान आता तरी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनात भाग घ्यावा व हा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले. वाळपईतील जाहीर सभेला हजर राहिलेल्या मातृभाषाप्रेमींना अद्दल घडवण्याची भाषा ते करीत असतील तर बंडांचा इतिहास असलेले सत्तरीवासीय त्यांच्या विरोधात बंड करण्यासही मागे राहणार नाही याची याद त्यांनी राखावी, असा इशाराही त्यांनी दिला.

उपनिरीक्षक वैभव नाईक याची कसून चौकशी

बनावट नोटा प्रकरण
वास्को, दि. ३० (प्रतिनिधी): कॅसिनोत बनावट नोटा घेऊन खेळण्यासाठी आलेल्या ‘त्या’ युवकांना वास्को पोलिस स्थानकातील उपनिरीक्षक वैभव नाईक याच्याकडूनच सदर नोटा देण्यात आल्याचे उघड झाल्याने सतत दोन दिवस त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. बनावट नोटांच्या प्रकरणात अटक केलेल्या आदित्य यादव याला उपनिरीक्षक वैभव नाईक याने याच महिन्यात ३ लाखांच्या बनावट नोटा दिल्या होत्या, अशी माहिती तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बनावट नोटा प्रकरणात गोवा पोलिसांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. समोर येत असलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी दोन पोलिसांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. उपनिरीक्षक वैभव नाईकची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून दोन दिवस सतत चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढला आहे. आज वैभव नाईक याला तपासासाठी कळंगुट पोलिस स्थानकावरही नेण्यात आले होते, असे समजते. तेथे निरीक्षक मंजूनाथ देसाई यांनी त्याची चौकशी केली. मात्र कळंगुट पोलिसांनी याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, जुलै महिन्यात आदित्य याला पोलिस स्थानकावर बोलवून वैभव नाईकने सदर नोटा त्याला दिल्या अशी माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.

.. तर आंदोलनाची गरज ‘उटाला’ भासणार नाही : पर्रीकर

काणकोण, दि. ३० (प्रतिनिधी): भाजप सरकार सत्तेवर आल्यास ‘उटा’च्या बहुतेक मागण्या मान्य केल्या जातील व त्यामुळे या समाजाला आंदोलन करण्याची गरजच भासणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले. आज खोतीगाव पंचायतीच्या मैदानावर आदर्श युवा संघ आयोजित अनुसूचित जमात अन्याय निषेध सभेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काणकोणचे आमदार विजय पै खोत, पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, माजी मंत्री प्रकाश वेळीप, सरपंच तेजस्विनी दैयकर, ऍड. बाबुसो गावकर, माजी सरपंच विशांत गावकर, पंच उमेश वेळीप आदी मान्यवर उपस्थित होते.
आत्तापर्यंत अनुसूचित जमातींसाठी २५०० नोकर्‍या द्यायच्या राहून गेल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिलेल्या अकराशे नोकर्‍या, तसेच आरोग्य खात्यातील ४१६ जागांपैकी बहुतेक जागा अनुसूचित जमातींतील उमेदवारांतूनच भरल्या जाव्यात. आदिवासासींना त्यांचे हक्क मिळावे, यासाठी भाजप न्यायालयीन लढाई पुकारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
अनिर्बंध खाण व्यवसायामुळे आदिवासींच्या मुलांवर मोठे संकट कोसळणार आहे. असे सांगतानाच सध्याचे शैक्षणिक धोरण जर असेच राहिले तर ‘गाकुवेध’ समाजाची मुले शिक्षणात मागे राहतील असेही पर्रीकर म्हणाले.
उमेश गावकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. विजय पै खोत, रमेश तवडकर आदींची यावेळी समयोचित भाषणे झाली. संजय तवडकर यांनी आभार मानले. या सभेला सुमारे एक हजार आदिवासी बांधवांची उपस्थिती लाभली होती.