Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 11 June 2011

कामत सरकार असंवेदनशील : आर्लेकर

पणजीत भाजपची धिक्कार सभा
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): लोकभावनांचा कदर न करता फक्त स्वार्थ साधून गोव्याची लूट करणारे दिगंबर कामत यांचे सरकार दिशाहीन बनले असून या सरकारची संवेदना नष्ट झाली आहे. अशा या सरकारची चौथी वर्षपूर्ती त्यांचा धिक्कार करूनच साजरी करावी असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांनी आज येथे बोलताना केले. पणजी येथील बसस्थानकावर श्री मारुती मंदिरासमोर आयोजित केलेल्या भाजप धिक्कार सभेत श्री. आर्लेकर बोलत होते. या प्रसंगी पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, भाजप पणजी मतदारसंघ अध्यक्ष पुंडलीक राऊत देसाई, नगरसेविका वैदेही नाईक, श्‍वेता लोटलीकर, माया तळकर, नगरसेवक शुभम चोडणकर, शेखर डेगवेकर, पणजी महिला अध्यक्ष प्रीती शेट्ये, संजय म्हापसेकर, माजी नगरसेविका ज्योती मसुरकर, प्रशिला कळंगुटकर, विवेक नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना वैदेही नाईक म्हणाल्या की, दिगंबर कामत सरकार लोकांच्या प्रश्‍नांची उत्तरे देऊ शकत नसल्याने मुख्यमंत्री लोकांना घाबरत आहेत. लोकांच्या भीतीपोटी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की कामत सरकारवर आली असून हा विरोधकांचा नैतिक विजयच आहे. अशोक नाईक यांनीही कामत सरकारचा तीव्र शब्दात धिक्कार केला व चार वर्षे राज्य करून कामत सरकारने लोकांना पिळल्याचा आरोप केला. इतरांचीही समयोचित भाषणे झाली. सूत्रनिवेदन दीपक म्हापसेकर यांनी केले. यावेळी या धिक्कार सभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

No comments: