Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 November, 2009

राज्यात तीन ट्रॉलरसह ६८ खलाशी बेपत्ता

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): मालिम वेरे जेटीवरील दोन ट्रॉलरसह ३९ खलाशांचा तिसऱ्या दिवशीही कोणताच थांगपत्ता लागला नसल्याने कर्नाटक आणि केरळ येथून त्यांचे नातेवाईक आज मालिमच्या जेटीवर दाखल झाले आहे. ज्याबोटीवर त्यांचे नातेवाईक गेले होते त्या बोटीच्या मालकाने बेपत्ता असलेल्या खलाशांचा शोध घेण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नसल्याचा या लोकांचा आरोप आहे. राज्यभरातून एकूण ६८ खलाशी, ३ ट्रॉलर आणि १ होडी बेपत्ता असल्याची माहिती सरकारने उघड केली आहे.
खलाशांच्या नातेवाईकांनी आज सायंकाळी मांडवी फिशरीज को ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष मिनिनो आफान्सो यांच्या कार्यालयात घुसून शेवटचा शोध घेण्यासाठी समुद्रात बोटी पाठवण्याची मागणी केली. यावेळी जमलेल्या प्रत्येक खलाशांच्या डोळ्यात आसवे दाटली होती. कर्नाटक आणि केरळ येथून आलेल्या या बेपत्ता खलाशांच्या नातेवाइकांचा रुद्रावतार पाहून उद्या सकाळी त्यांच्या शोधासाठी दहा बोटी समुद्रात पाठवणार असल्याचे श्री. आफान्सो यांनी "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
मालिम जेटीवरील "जीवन १' व "सेंट फ्रान्सिस झेव्हीयर' या दोन्ही ट्रॉलर पाण्यात बुडाल्या असून "जीवन १' या ट्रॉलरवरील सहा जणांना वाचवण्यात मुंबई तटरक्षक दलाला यश आले. मात्र या बोटीवरील मुख्य तांडेलसह २३ खलाशांचा अजुनीही कोणताही पत्ता नाही. तर, "जिजस मेरी' या बोटीवर १० खलाशी व "बाय सिम्रन' या बोटीवरील ६ खलाशी होते. या दोन्हीही बोटी अजूनही बेपत्ता असल्याचे श्री. आफान्सो यांनी माहिती दिली.
खलाशांचा समुद्रात जाण्यास विरोध:
मालिम जेटीवर ३१५ ट्रॉलरस् असून गेल्या दोन दिवसापासून एकही बोट मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली नाही. काल सकाळी काही ट्रॉलरच्या मालकांनी मच्छीमारीसाठी ट्रॉलर सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्या ट्रॉलरवर एकही खलाशी चढला नसल्याने आजही मच्छीमारीसाठी ट्रॉलर समुद्रात गेली नसल्याची माहिती मिळाली आहे. समुद्रात बेपत्ता झालेल्या खलाशांचा शोध घेतला जात नाही तोवर समुद्रात न जाण्याचा निर्णय जेटीवरील खलाशांनी घेतला आहे. परंतु, काही ट्रॉलरचे मालक या खलाशांचे मनोधारणा करण्याच्या प्रयत्नात लागले आहेत.
ट्रॉलरचे मालक लपून!
ज्या ट्रॉलरवरील खलाशी बेपत्ता आहेत त्या ट्रॉलरचे मालक आम्ही केलेला दूरध्वनी उचलत नाही. ज्यावेळी मासळी घेऊन येतो तेव्हा लगेच धावत - धावत येतात, अशा आरोप यावेळी जेटीवरील खलाशांनी को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या अध्यक्षांकडे केली. त्याबरोबर बेपत्ता असलेल्या दोन्ही बोटीच्या मालकांना जेटीवर बोलावून घेण्यात आले.
पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ट्रॉलरवरील खलाशांना ओळखपत्र देण्याचे काम गोवा पोलिस खात्याने हाती घेतले होते. परंतु, ती मोहिम अर्धवटच राहिली आहे. आज सकाळीपासून जेटीवरील खलाशांच्या ओळखपत्रासाठी अर्ज भरुन घेतला जात होता. मच्छिमाराशी खोल समुद्रात जाणाऱ्या खलाशांना तेथे कोणताही सुरक्षा नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
मासळी बाजार ओस...
गेल्या तीन दिवसांपासून मच्छीमारीसाठी एकही ट्रॉलर समुद्रात गेला नसल्याने आजही पणजी तसेच म्हापसाच्या मासळी बाजार ओस पडले होते. आणखी दोन दिवस ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ते परतले मृत्युच्या दाढेतून...!

पणजी, दि. १३ (प्रीतेश देसाई): ट्रॉलर चक्रीवादळात सापडल्यानंतर २९ पैकी आम्ही केवळ सात जण वर आलो होतो. त्यावेळी २३ वर्षीय रोहिदासही आमच्या बरोबरच होता. पण काही तासांत आम्ही त्याचा मृत्यू समोर होताना पाहिला, असे २३ तास पाण्यात तग धरुन सुखरूप परत आलेल्या "जीवन १' नौकेवरील विनोद चौडू यांनेअश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगितले. हे सहाही खलाशी मृत्यूच्या जबड्यातून चक्रीवादळाचा सामना करून परतले आहेत. या सहा पैकी एकाची तब्येत आज दुपारी अधिक बिघडल्याने त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
आम्ही दि. ८ नोव्हेंबर रोजी मालीम जेटीवरून सुटल्यानंतर दि. ११ रोजी सकाळी ८ वाजता रत्नागिरीतील जयगडच्या समुद्राच्या आत जाण्यासाठी निघालो होतो. पुढे आमच्या नशिबात काय होते याची पुसटशीही आम्हाला कल्पना नव्हती. "जीवन १' या नौकेत आम्ही मुख्य तांडेलासह २९ जण होतो. समुद्र बराच खवळलेला होता. सकाळी ९ वाजता अचानक चारही बाजूने तुफान वाऱ्यासह एकच लाट उसळली आणि आमची नौका पलटी झाली. आम्ही सात जण कसे बसे वर आलो. चारही बाजूने समुद्रातील पाण्याशिवाय काहीच दिसत नव्हते. तेवढ्यात आम्हाला जाळ्यांना बांधण्यात येणारे छोटे छोटे "प्लॅस्टिकचे बॉल' आमच्या हाताला लागले. ते आम्ही दोन - दोन बॉल दोन्ही खाकेत घालून सुमारे २३ तास पाण्यात तरंगत थांबलो, असे विनोद याने पुढे सांगितले.
सकाळी ९ वाजता ही दुर्घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे एक बोट बऱ्याच लांबून येत असल्याचे दिसताच नसलेला जोर एकवटून जोरात शिट्टी वाजवली. त्याबरोबर त्या बोटीच्या कॅप्टनने आमच्या दिशेने प्रकाशाचा झोत टाकला. हळूहळू ती बोट आमच्या दिशेने आली. त्यांनी आम्हाला पूर्ण एक फेरी घातल्यानंतर सकाळी सहा वाजता आमच्या एकदम जवळ आली आणि आम्हांस सहा जणांना त्यांनी वर काढले. मुंबई येथून आलेली ही किनारा रक्षक दलाची बोट होती. त्यांनी आम्हाला वास्को येथे आणून सोडले. मात्र, ट्रॉलरवरून परत येईपर्यंत रोहिदास आणि आमच्या ट्रॉलरवरील अन्य २३ जण शेवटपर्यंत आम्हाला दिसले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
या ट्रॉलरमधे असलेल्या साहाय्यक तांडेल विनोद चौडू (३२ राहणारा कुंमठा) यांच्यासह गोविंद किप्पया आंबीक (२४ राहणारा कुंमठा), दिनेश प्रधान (२२ राहणारा छत्तीसगड), जितेंद्र साई (२० छत्तीसगड), भास्कर सुब्राय आंबीक (२६ कुमठा) या सहा जणांनी जिवंत मृत्यू अनुभवला. तर, मृत पावलेल्याचे नाव रोहीदास राम आंबीक (२३ राहणारा कु मठा) असे असल्याचे विनोद यांने सांगितले.
--------------------------------------------------------------------
जहाजात असलेले बिनतारी संदेश यंत्र नेहमी सुरू असते. किनारा रक्षक दलाने किंवा सरकारच्या कोणत्याही यंत्रणेने आम्हाला चक्रीवादळाची पूर्वमाहिती बिनतारी संदेशाद्वारे दिली नाही. काही मिनिटांपूर्वी सुद्धा आम्हाला हा संदेश मिळाला असता तर आम्ही सर्व या चक्रीवादळाच्या तडाख्यातून वाचू शकलो असतो, असे विनोद यांनी सांगितले. मात्र ट्रॉलरच्या मालकाने या दुर्घटनेच्या दोन मिनिटांपूर्वी मोबाइलवर संपर्क साधून परत येण्यास सांगितले होते. त्याला उत्तर देऊन मोबाईल बंद करण्याच्यावेळीच आम्हाला चक्रीवादळाने वेढले.

धोक्याचा इशारा २४ तासांनंतर वितरित!

तर अनेक खलाशी वाचले असते...
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): नैसर्गिक आपत्तीकाळातजीवित व मालमत्तेची हानी कमीतकमी व्हावी या उद्देशाने राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाची रचना करण्यात आली. पण या प्राधिकरणाची सरकारी मानसिकता या प्राधिकरणाच्या मुळावरच आली आहे. परवा राज्यातील किनारी भागाला "फयान' वादळाने जो तडाखा दिला त्याबाबत हवामान खात्याने राज्य सरकारी यंत्रणेला पहिला सतर्कतेचा संदेश दिल्यानंतर तब्बल २४ तासानंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि हा संदेश वितरित झाला,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार अरबी समुद्रातील या संभावित वादळाबाबतची पूर्वसूचना हवामान खात्याने दिली होती पण ही माहिती तात्काळ मच्छीमार लोकांना देण्यास सरकारी यंत्रणांकडून झालेली दिरंगाई अनेक खलाशांंच्या जिवावर बेतण्यास कारणीभूत ठरली. मांडवी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आल्फोन्सो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. संभावित हवामानातील बदलाची माहिती योग्य वेळी मिळाली असती तर त्याबाबत बिनतारी संदेशाव्दारे खोल समुद्रात असलेल्या खलाशांना सतर्क करता आले असते. त्यांना तात्काळ तेथील कुठेही एका काठावर सुरक्षितस्थळी आसरा घेण्याची सूचना देता येणे शक्य होते,अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
हवामान खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी संभावित वादळाच्या शक्यतेची वार्ता सर्व संबंधित सरकारी खात्यांना व मुख्य सचिवांना ९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता दिली होती. हा संदेश ७ वाजता पोहचूनही सरकारी यंत्रणा मात्र तातडीने कामाला लागण्यात अपयशी ठरली. हवामान खात्याने सतर्कतेचा आदेश देणारा संदेश रेडियोव्दारे दुसऱ्यादिवशी १० रोजी सकाळी ७ वाजता प्रसारित केला. दुसऱ्या बाजूने किनारा रक्षक दलाकडूनही राज्य सरकारी यंत्रणांना या हवामानातील बदलाची पूर्वसूचना ९ रोजी रात्री १० वाजता दिल्याची खबर मिळाली आहे.त्यानंतर हवामान खात्याने हा संदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना रात्री २ वाजता दिला. जेव्हा प्रत्यक्षात मच्छीमार खात्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती मच्छीमारांना देण्यासाठी तब्बल २४ तासांचा अवधी लागल्याचेही स्पष्ट झाले आहे. दक्षिण गोव्यात "मॉकड्रील' च्या नावाखाली सरकारी यंत्रणांकडून खाजगी प्रसारमाध्यमांचा वापर करून घेतल्याने एकीकडे टीका होत असताना आता प्रत्यक्षात आपत्ती ओढवली असता याच प्रसारमाध्यमांची तात्काळ मदत घेऊन मच्छीमार लोकांना सतर्क करण्याचे भान मात्र या अधिकाऱ्यांना राहिले नाही व यामुळेच ते टीकेचे लक्ष्य बनले आहेत. या काळात मुख्यमंत्री दिगंबर कामत राज्यात नव्हते. ते दिल्लीत होते व तिथून ते १० रोजी थेट मुंबई येथे गेले. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव हे देखील १० रोजी मुंबईला रवाना झाले. राज्यातील आपत्कालीन यंत्रणेला खऱ्या अर्थाने सतर्कता बाळगण्याची गरज होती व त्यावेळी मुख्यमंत्री व मुख्य सचिव मुंबई येथे "इफ्फी' निमित्ताने आयोजित केलेल्या "जलसा'कार्यक्रमात व्यस्त होते.एकीकडे प्रशासकीय सेवेचे प्रमुख तर दुसरीकडे लोकनियुक्त सरकारचे प्रमुख दोघेही राज्याबाहेर होते व इथे मात्र प्रशासकीय यंत्रणा आपल्या नेहमीच्या बिनधास्त आविर्भावातच वागत होती. सरकारने वेळीच उपाययोजना हाती घेतली असती तर नक्कीच या वादळात वाहून गेलेल्या काही खलाशांचा तरी प्राण वाचवता आला असता.

बेफाम खनिज वाहतुकीने उसगाव परिसरात कोंडी

फोंडा, दि.१३ (प्रतिनिधी): खनिज मालाच्या वाहतुकीच्या जोरदार प्रारंभ झाल्याने उसगाव, तिस्क, भामई आदी भागात टिप्पर ट्रकाच्या वर्दळीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खनिजवाहू टिप्पर ट्रकाच्या वाढत्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. त्यातच कोठंबी, वागूस येथील खनिज मालाचे वजन करणाऱ्या काट्यामुळे भामई, पाळी, उसगाव भागातील वाहतूक कोंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिक व इतर वाहन चालक त्रस्त बनले आहेत.
उसगाव येथील म्हादई नदीवर नवीन पूल नव्हता त्यावेळी उसगाव, भामई भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. ही समस्या सोडविण्यासाठी गतवर्षी म्हादई नदीवरील चौपदरी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. तरीही आजही भामई, उसगाव भागात टिप्पर ट्रकाच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
पावसाळ्यानंतर खनिज उत्खननाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून सांगे तालुक्यातील अनेक भागातील खनिज खाणीवरील खनिज माल धारबांदोडा, उसगाव, भामईमार्गे डिचोली तालुक्यातील मायणा, कोठंबी व इतर ठिकाणी नेण्यात येत आहे. ह्या खनिज वाहतुकीमुळे धारबांदोडा, उसगाव, तिस्क, भामई या भागातील टिप्पर ट्रकाच्या वर्दळीत वाढ झाली आहे. खनिज वाहतूक करणारे टिप्पर ट्रक जादा फेऱ्या मारण्यासाठी भरधाव वेगाने आणि बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे.
उसगाव येथील म्हादई नदीवरील नवीन चौपदरी पुलामुळे ह्या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असा दावा केला जात होता. मात्र, सध्या भामई, उसगाव भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे हा दावा फोल ठरला आहे. आता पुलामुळे वाहतूक कोंडी होत नाही. तर कोठंबी भागातील खनिज मालाच्या वजन काट्यामुळे वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. खनिज मालाचे वजन करण्यासाठी खनिजवाहू टिप्पर ट्रक थांबविण्यात येत असल्याने त्या ठिकाणी ट्रकांची रांग लागले. शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी खनिजवाहू ट्रकांची रांग उसगाव - तिस्कपर्यत पोहोचली होती. त्यामुळे भामई, उसगाव ह्या मार्गावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाल्याने मार्गावरील वाहतूक करणाऱ्या इतर वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुध्दा त्रास सहन करावा लागला. ह्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपस्थित नव्हते. वाहन चालकांना आपली वाहने घेऊन वाहतूक कोंडीतून वाट काढावी लागत होती. पोलीस खात्याच्या बेजबाबदार कारभाराबद्दल लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.
धारबांदोडा, तिस्क उसगाव, भामई या भागातील धूळ प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अद्याप उपाय योजना हाती घेण्यात न आल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी वाहन चालकाला वरील भागातून वाहन चालविणे धूळ प्रदूषणामुळे कठीण बनले आहे. ह्या धूळ प्रदूषणामुळे लोकांना आरोग्याची समस्या संभवते.

Friday, 13 November, 2009

सावर्डे अर्बन अफरातफरप्रकरणी अखेर तीन कर्मचाऱ्यांना अटक

सावर्डे, दि. १२ (प्रतिनिधी): सावर्डे येथील सावर्डे अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंक अफरातफर प्रकरणी कुडचडे पोलिसांनी आज या बॅंकेचे कर्मचारी वंदेश तामसेे, शीतल नाईक व रणजीत नाईक यांना अटक केली.
कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावर्डे अर्बन को ऑपरेटीव्ह सोसायटीमध्ये २००३-२००५ दरम्यान १७,३०,३३६ रुपयांची अफरातफर झाल्याचे दिसून आले असून, त्यात सुषमा तामसे, तुळशीदास नाईक, रणजीत नाईक (सर्व पिग्मी एजंट) व शीतल नाईक यांच्याविरोधात दक्षिण गोवा सोसायटी सिनियर रजिस्ट्रारांतर्फे तक्रार नोंद करण्यात आली होती. या सहा संशयितांपैकी सुषमा तामसे व तुळशीदास नाईक यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते.पोलिस अन्य संशयितांच्या मागावर होते. आज सकाळी पोलिसांनी रणजीत नाईक व शीतल नाईक यांना कुडचड्यात अटक केली तर तिसरा संशयित वदेश तामसे याला मडगावला अटक करण्यात आली. वदेश तामसे हा अन्य एका प्रकरणात ४० लाखांच्या अफरातफरीच्या आरोपाखाली चौदा दिवस पोलिस कोठडीत होता. त्याला आज जामीन मिळतात कुडचडे पोलिसांनी त्याला मडगाव येथे न्यायालयाबाहेर पाळत ठेवून अटक केली.
सर्व संशयित आरोपींनी ग्राहकांकडून रक्कम वसुल करताना, त्यांना पैसे बॅंकेत भरल्याचे भासवले, मात्र प्रत्यक्षात रक्कम जमा केली नाही, असे रजिस्ट्रारानी तक्रारीत म्हटले आहे. सावर्डे अर्बन को ऑपरेटीव्ह बॅंकेचे संचालक मंडळ यापूर्वीचे बरखास्त करण्यात आले असून, प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. या बॅंकेत अनेक कायम ठेवी असून, त्याबद्दल ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता संबंधित संशयितांना अटक करण्यात आल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, या चौघानी जामीनासाठी केलेले अर्ज आज फेटाळण्यात आले. या सर्वांना उद्या न्यायालयाकडून कोठडी घेण्यात येणार आहे. निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक पाटील तपास करीत आहेत.

चार नौका अद्याप बेपत्ता ५९ खलाशांचा शोध जारी

...२९ नौकांचा शोध लागला
...किनारा रक्षक दल व नौदलाची कामगिरी

वास्को, दि. १२ (प्रतिनिधी): 'फयान' चक्रीवादळामुळे गोव्यातील बेपत्ता झालेल्या ३३ मच्छीमार नौकांपैकी आत्तापर्यंत २९ नौकांचा शोध लावण्यात आलेला आहे. २४ तासांपूर्वी झालेल्या तुफानामध्ये आत्तापर्यंत मच्छीमार नौकांवरील ५९ खलाशी पाण्यामध्ये बेपत्ता असून त्यामध्ये आज संध्याकाळी वाचविलेल्यांचा अपवाद वगळता "जीवन'वरील अन्य २३ जणांचा समावेश आहे. त्या सर्वांचा शोध चालू असल्याची माहिती गोवा किनारा रक्षक दलाचे प्रमुख एम.एस. डांगी यांनी आज संध्याकाळी दिली.
आज संध्याकाळी गोवा तटरक्षक दलाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी श्री. डांगी यांनी माहिती देताना सांगितले की २४ तासांपूर्वी झालेल्या "फयान' चक्रीवादळामुळे गोव्यातील किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात नुकसानी सोसावी लागली. ११ नोंव्हेबर रोजी गोव्यातील वेगवेगळ्या भागांमधील ३३ मच्छीमार नौका खोल समुद्रात भरकटल्याची माहिती मिळताच किनारा रक्षक दल व नौदलाने मिळून शोध मोहिमेस सुरुवात केल्याची माहिती श्री डांगी यांनी देऊन यासाठी नौदलातर्फे दोन व किनारा रक्षक दलातर्फे एक हेलिकॉप्टर उत्तर गोव्यातील किनारी भागामध्ये पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे सहा तास संकटात असलेल्या नौकांचा शोध घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर शोध मोहिमेच्या दरम्यान नौदलाला खोल समुद्रामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या नौकांवरून प्रथम सात खलाशी व एका अल्पवयीन मुलाला वाचविण्यात यश आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संकटामध्ये असलेल्या गोव्यातील नौकांना मदत करण्यासाठी एक जहाज कर्नाटक व दक्षिण गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये तैनात करण्यात आले होते अशी माहिती श्री.डांगी यांनी यावेळी देऊन दुसरे जहाज उत्तर गोवा व दक्षिण महाराष्ट्र भागामध्ये ठेवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज पहाटे ५.३० च्या सुमारास तटरक्षक दलाच्या "संग्राम' नावाच्या जहाजाला गोव्यातील अन्य एका मच्छीमार नौकेला शोधण्यात यश आल्याचे डांगी यांनी सांगितले. त्यावर असलेल्या सहा जणांना सुखरूपरीत्या किनाऱ्यावर आणण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले. "जीवन-१' असे या नौकेचे नाव असल्याची माहिती श्री. डांगी यांनी देऊन ती रत्नागिरी भागाच्या समुद्रामध्ये बुडत होती व यावेळी "संग्राम' जहाजावरील तटरक्षक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून या चार जणांना वाचवल्याचे ते यावेळी म्हणाले. सदर नौकेवर एकूण २९ खलाशी असल्याची माहिती उपलब्ध झाल्याचे श्री.डांगी यांनी यावेळी सांगितले. त्या खलाशांबाबत अद्याप सविस्तर माहिती मिळाली नसल्याचे ते यावेळी म्हणाले.
गोव्यापासून १४० सागरी मैल अंतरावरून चक्रीवादल ११ नोव्हेंबर रोजी पहाटे पोहोचले होते. यावेळी जोरदार वारे वाहत होते आणि समुद्र खवळला होता. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा भारतीय तटरक्षक दलाकडून मच्छीमार संचालनालयामार्फत देण्यात आला होता. ११ नोव्हेंबरच्या सकाळी अनेक होड्या समुद्रात अडकून पडल्याचे वृत्त तटरक्षक दलाला मिळाले, यानंतर दुपारी ३३ होड्या आणि त्यावरील खलाशी वादळात सापडल्याचे निश्चित झाले. त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्यात येत होता. या होड्यांवरील खलाशी भ्रमणध्वनीद्वारे आपल्या मालकांच्या संपर्कात होते. ११ रोजी दुपारपर्यंत भरकटलेल्या बहुतेक होड्यांनी महाराष्ट्रातील लहानसहान बंदरांवर आश्रय घेतला, अशी माहिती किनारा रक्षक दलाने दिली आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास "एनर्फोड' नावाच्या अन्य एका नौकेचा शोध लावण्यात तटरक्षक दलाच्या जहाजाला यश आल्याची माहिती श्री. डांगी यांनी यावेळी देऊन चार खलाशांना वाचवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उपलब्ध माहितीनुसार गोव्यातील आणखीन चार नौका अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्री. डांगी यांनी देऊन सुमारे ३६ खलाशांचा जीव धोक्यात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा शोध चालू असल्याची माहिती त्यांनी दिली. जो पर्यंत बेपत्ता असलेल्या बाबत पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत ही शोध मोहीम चालूच राहणार असे श्री. डांगी यांनी शेवटी सांगितले.

गोवा बचाव अभियानकडून मुख्य वनपाल धारेवर

उच्च न्यायालयाचे आदेश 'डीएलएफ'साठी धाब्यावर?
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): मुरगांव तालुक्यातील दाबोळी येथे "डीएलएफ' कंपनीतर्फे बांधण्यात येणाऱ्या मेगा रहिवासी प्रकल्पासाठी वन खात्याकडून सर्व कायदे धाब्यावर बसवून वृक्षतोडीची परवानगी दिल्याचा आरोप गोवा बचाव अभियानाने केला आहे. ही परवानगी तात्काळ मागे घेण्याची मागणी आज अभियानातर्फे मुख्य वनपाल शशीकुमार यांच्याकडे केली आहे.
गोवा बचाव अभियानाच्या सहनिमंत्रक सॅबीना मार्टिन्स यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज येथे मुख्य वनपाल शशीकुमार यांची भेट घेतली. वन खात्याकडून कोणत्या पद्धतीने दाबोळी येथील या तथाकथित प्रकल्पाठिकाणी वृक्षतोडीला परवाना दिला याचा जाब त्यांना विचारण्यात आला. यावेळी अभियानाच्या सचिव रिबोनी शहा, मिंगेल फर्नांडिस, अरविंद भाटीकर, क्लॉड आल्वारीस, माजी जिल्हा पंचायत सदस्य नीलम नाईक आदी हजर होते. दाबोळी येथील सर्वे क्रमांक ४३/१- अ, या जागेत वन खात्याने वृक्षतोडीसाठी परवाना दिला आहे. या ठिकाणी "डीएलएफ' कंपनीचा एक मेगा रहिवासी प्रकल्प उभा राहत आहे. हा भाग उंचावर असून तिथे घनदाट जंगल आहे व डोंगराची दरी सुमारे ३० अंश आहे, त्यामुळे अशा ठिकाणी बांधकामे हाती घेण्यास मज्जाव असतानाही या कंपनीला संबंधित सरकारी खात्यांनी परवाना दिला आहे. हा भाग बहुतांश झाड्यांनी वेढला आहे व त्यामुळे ते वन क्षेत्र ठरते.अशा ठिकाणी वन खात्याच्या मान्यतेशिवाय विकासकामे हाती घेण्यास उच्च न्यायालयानेही मज्जाव केला आहे. आता वन खात्याची परवानगी नसताना इतर संबंधित खात्यांनी या बांधकामाला परवानगी दिलीच कशी,असा सवालही यावेळी करण्यात आला. वन खात्याने वृक्षतोडीची परवानगी देताना ही जागा बांधकामासाठी वापरण्यात येईल,असे नमूद केल्याचे यावेळी मुख्य वनपालांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.अशा उंच व जादा उतरती असलेल्या डोंगरावर विकासकामांना परवाना देऊ नये,असे स्पष्ट निर्देश असतानाही वन खात्याकडून मात्र इथे वृक्षतोडींसाठी परवानगी देण्यात येते हे कसे काय, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. दरम्यान, सदर जमीन मालक व वन खाते यांच्यात वृक्षतोडीसंबंधी करण्यात आलेल्या कराराचेही उघडपणे उल्लंघन होत आहे याची माहितीही यावेळी मुख्य वनपालांना करून देण्यात आली.उच्च न्यायालयात सरकारकडून देण्यात आलेली हमी व प्रत्यक्षात वन खात्याची भूमिका यात तफावत असल्याने ही परवानगी तात्काळ मागे घेण्यात यावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करून देण्यात आलेल्या या परवानगीमुळे भविष्यात त्याचे गंभीर परिणाम येथील स्थानिकांना भोगावे लागणार आहेत,असा इशाराही यावेळी देण्यात आला.

'सर्व शिक्षा अभियाना'चे शिक्षकही आता आक्रमक

पणजी,दि.१२ (प्रतिनिधी): सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत राज्य सरकारने विविध प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांत नेमलेल्या सुमारे ३३७ शिक्षकांनी "गोवा शिक्षा अभियाना' अंतर्गत आपल्यावरील अन्यायाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने २००६ साली या शिक्षकांची नेमणूक केली होती व गेली तीन वर्षे हे शिक्षक विद्यादान करीत आहेत. सरकारने या शिक्षकांची सेवा नियमित करून योग्य वेतन द्यावे,अशी मागणी त्यांनी केली आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या या शिक्षकांनी आज पणजीत बैठक घेतली व आपल्यावरील अन्यायाविरोधात लढण्यासाठी "गोवा शिक्षा अभियान' नावाची संघटना स्थापन केली. यावेळी एकूण २२ शिक्षकांची व्यवस्थापकीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या निमंत्रकपदी अविला फर्नांडिस,विश्रांती पळ,रूपा नाईक,रागिणी कुलकर्णी,दिनीशा देसाई, विनोद देसाई, मनीशा नाईक आदींची निवड करण्यात आली. या बैठकीत हा लढा कसा उभारावा याबाबत विचारविनिमय करण्यात आला. राज्य सरकारने अचानक या शिक्षकांची सेवा रद्द केल्याने या शिक्षकांवर सध्या उपासमारीची वेळ ओढवली आहे. हे सर्व ३३७ शिक्षक पदवीधर आहेत.सुमारे ४० टक्के शिक्षक पदव्युत्तर व प्रशिक्षित शिक्षक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. गेले बारा महिने हे शिक्षक आपल्या नेमणुकीसाठी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, उच्च शिक्षण संचालक व इतर अधिकाऱ्यांकडे खेपा मारीत आहेत पण त्यांना अद्याप कोणताही दिलासा मिळाला नाही,असेही त्यांचे म्हणणे आहे. सरकारने या शिक्षकांना "बी.एड' व "डी.एड' पदवी मिळवण्यासाठीही मदत करावी,असेही त्यांचे म्हणणे आहे.
या शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरोधातील या लढ्यात विविध संघटना, सामाजिक संस्था,कामगार संघटना व सामाजिक नेत्यांनी पाठिंबा द्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.

५२ शिक्षकांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): त्या "५२' शिक्षकांना भरती करून घेणाऱ्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल झाली आहे. सदर याचिका आज सुनावणीसाठी आली असता यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देत या सर्व "५२' शिक्षकांचे भवितव्य याचिकेच्या अंतिम निवाड्यावर अवलंबून राहणार असल्याचा आदेश यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. मात्र सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याची याचिकादाराची मागणी यावेळी खंडपीठाने फेटाळून लावली. ही निवड यादी रद्द करून पुन्हा नव्याने या जागांसाठी अर्ज मागवण्यात यावे तसेच सरकारच्या निर्णयाला न्यायालयाने स्थगिती द्यावी, अशी याचना याचिकादाराने आपल्या याचिकेत केली आहे.
उपोषणाचे दबाव तंत्र वापरून आणि कायदा खात्याने ही प्रक्रिया बेकायदा असल्याचे मत केलेले असतानाही या शिक्षकांची भरती केली असल्याचा दावा याचिकादार अल्दिना आंतेनियो हेन्रीकेता लोबो यांनी आपल्या याचिकेत केली आहे. यात त्यांनी राज्य सरकार, शिक्षण खाते तसेच गोवा लोक सेवा आयोगाला प्रतिवादी करून घेतले आहे. सदर याचिकादार हा या पदासाठी घेतलेल्या मुलाखतीत नापास झालेला आहे, याची माहिती त्याला यापूर्वी मिळाली होती. तरीही त्याने या ५२ शिक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर त्या निर्णयाला आव्हान दिले असल्याने सदर याचिका दाखल करून घेऊ नये, असा युक्तिवाद यावेळी आयोगाच्या वकिलाने न्यायालयात केला.
दि. १२ जून रोजी शेवटची मुलाखत घेण्यात आली होती. त्यानंतर २७ ऑक्टोबर पासून मुलाखतीनंतर निवड झालेले उमेदवार उपोषणाला बसले. त्यावेळी कायदा खात्यातर्फे ऍडव्होकेट जनरल यांनी ही भरती योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते, असे याचिकादाराने म्हटले आहे.
लोक सेवा आयोगाने तोंडी परीक्षेला ६५ टक्के गुण मिळाले त्यांचीच निवड केली आहे. परंतु, लेखी परीक्षेत ज्यांना चांगले गुण मिळाले आहेत, त्याचे गुण ग्राह्य धरण्यात आलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
दि. ५ नोव्हेंबर रोजी सरकारने या "५२" शिक्षकांना नियुक्त करण्यासाठी घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आणि घटनाबाह्य आहे तसेच लोक सेवा आयोगाने कोणतीही लेखी परीक्षा न घेता त्यांची निवड यादी जाहीर केली आहे.उमेदवारांना शैक्षणिक परीक्षांत मिळालेल्या गुणातील केवळ ३५ टक्के गुण ग्रहीत धरले आहेत. तर, ६५ टक्के गुण हे तोंडी परीक्षेत मिळालेले ग्राह्य धरले आहे, अशी माहिती याचिकेत देण्यात आली आहे.

किमान वेतन १५० नव्हे, २७५ रु.द्या

कामगार संघटनांची एकमुखी मागणी
पणजी, दि.१२ (प्रतिनिधी): कामगारमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी १५० रूपये प्रतिदिन किमान वेतनाचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे अव्यवहार्य आहे. या निर्णयाला वैज्ञानिक आधार तर नाहीच पण सध्याचा जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीचीही या निर्णयाशी सांगड घालता येणार नाही. वाढती महागाईच्या अनुषंगाने किमान वेतन ठरवावे असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने घालून दिले आहेत व त्यानुसार २७५ रुपये प्रतिदिन किमान वेतन मिळायलाच हवे,असा निर्धार कामगार संघटनांनी केला आहे. राज्य सरकारने तात्काळ आपला निर्णय बदलावा अन्यथा सरकारला कामगारशक्तीचा हिसका दाखवू,असा इशारा आज संयुक्त कामगार परिषदेने दिला.
गोवा संयुक्त कामगार परिषदेतर्फे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी ही माहिती दिली. यावेळी पुतु गांवकर,ऍड. गणेश कुबल, ऍड. ह्रदयनाथ शिरोडकर, अजितसिंग राणे, केशव प्रभू, ऍड. ताल्मन परेरा, ऍड. कृष्णा नाईक व ऍड. सुहास नाईक आदी हजर होते. किमान वेतन ठरवताना अन्न, वस्त्र व निवारा या जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्टींचा विचार व्हायला हवा, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत पण देशातील सर्वांत जास्त दरडोई उत्पन्न असलेले व उंच जीवनमान असलेले राज्य असलेल्या गोव्यात सर्वांत कमी किमान वेतन मिळावे हे दुर्दैव असल्याचे श्री.फोन्सेका म्हणाले. खरेतर गोव्यासारख्या प्रगत राज्याने आदर्श किमान वेतनाचा पाठ बाकी राज्यांना घालून देणे अपेक्षित आहे,अशी सुचनाही त्यांनी केली. १५ फेब्रुवारी २००७ रोजी राज्य सरकारने किमान वेतन १०३ रूपये ठरवले होते.आता तीन वर्षात महागाई ज्या गतीने वाढली आहे, त्यानुसार किनान वेतनात वाढ होणे सहाजिक आहे पण केवळ भांडवलदार व उद्योजकांचे चोचले पुरवणारे सरकार कामगारांची पिळवणूक करण्याचा अधिकार त्यांना बहाल करीत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. किमान वेतन ठरवण्यासाठी सरकारने नेमलेल्या मंडळावर गोवा विद्यापीठातील एका अर्थतज्ज्ञाचीही सरकारने निवड केली होती. सदर अर्थतज्ज्ञाने केलेल्या शिफारशीनुसार किमान वेतन १८८ रूपये प्रतीदिन असावे,असे सुचवण्यात आले होते पण त्याकडेही सरकारने दुर्लक्ष केले. उद्योजक मंडळीनी १२३ रूपयांची शिफारस केली होती व कामगार संघटनांनी २७५ रूपये सुचवले होते पण सरकारने मात्र एखादी वस्तू विकत घेताना बाजारात ग्राहक ज्यापद्धतीने तडजोड करतो,त्याप्रमाणे " तुका नाका, माका नका घाल ...'याप्रमाणे १५० रूपये प्रतिदिन असे किमान वेतन ठरवून सामान्य कामगारवर्गाची थट्टाच केली आहे,असेही यावेळी श्री.फान्सेको म्हणाले.
देशात बहुतेक राज्यात किमान वेतन हे महागाईवर निर्भर असते पण गोव्यात मात्र तसे नाही, असे का,असा सवाल पुतु गांवकर यांनी केला. १५० रूपये किमान वेतन ठरवण्याची सरकारची कृती हा लोकशाहीचा बेबनाव असून तो अजिबात सहन करणार नाही,असे सांगून कामगारांचा हा हक्क मिळवण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल व सरकारने ही मागणी पूर्ण केली नाही तर कामगारांसमोर या सरकारला झुकवण्यास भाग पाडू,असेही ते म्हणाले.

रशियात जन्मले पावणेसात किलोचे बालक!

मॉस्को, दि. १२ : एरवी कोणाकडे मूल जन्माला आल्यानंतर ते किती पौंडाचे, अशी विचारणा केली जाते. एका रशियन मातेच्या पोटी इतके बलदंड बाळ जन्माला आले की, त्याच्याकडे पाहून किती किलोचे, असे विचारण्याची वेळ आली आहे. हे बाळ सुमारे पावणे सात किलो वजनाचे आणि ६२ सेंटीमीटर उंच आहे.
इतके वजनी आणि उंच अर्भक यापूर्वी कधीच पाहिले नसल्याची प्रतिक्रिया सामारा येथील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. रशियातील या बालकाला स्वेतलाना तगन्सेताव या २८ वर्षीय महिलेने जन्म दिला आहे. तिचे हे तिसरे अपत्त आहे. यापूर्वीचीही तिची अपत्ये ४.२ किलो आणि ५.२ किलो वजनाची होती. तिसरे बाळ जन्माला घालण्यासाठी ती ज्या रुग्णालयात दाखल झाली, त्याची ख्याती कमी वजनाची बाळे जन्माला येेणारे रुग्णालय, अशी आहे. वर्षभरात या रुग्णालयात जन्मलेल्या बाळांचे वजन अत्यंत कमी आहे. मात्र, स्वेतलानाने जणू वर्षभरातील ही कमतरता आपल्या एका बालकात पूर्ण करून टाकली.
गिनीज रेकॉर्ड
इंडोनेशियात सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या बालकाचे वजन सर्वसाधारण अर्भकाच्या तिप्पट होते. त्याचीही उंची ६२ सेंटीमीटर होती. ते बालक ८.७ किलो वजनाचे होते. गिनीज बुकात झालेल्या नोंदीनुसार, सर्वाधिक वजनी बालक अमेरिकेत १८६९ मध्ये जन्मले. त्याचे वजन १०.४ किलो होते. पण, या बालकाचे आयुष्य अवघे ११ तासांचेच ठरले. १९५५ मध्ये इटलीत आणि १९८२ मध्ये दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या अर्भकांचे वजन १०.२ किलो होते. साधारण बालकाचे वजन तीन ते सव्व तीन किलो असते.

Thursday, 12 November, 2009

गोव्याच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा

२४ ट्रॉलर्सशी संपर्क..१० ट्रॉलर्स बेपत्ता
पेडणे, बेतुल, कोलवा, पाळोळे, बांबोळी किनाऱ्यांना सर्वाधिक फटका
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर "फयान' चक्रीवादळात झाले असून या चक्रीवादळाचा धोका गोव्यापुरता टळला असला तरी खोल समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छीमार बांधवांना याचा जबर तडाखा बसला आहे. सुमारे ३४ ट्रॉलरवरील २०० मच्छिबांधव बेपत्ता असून रात्री उशिरा पर्यंत यातील २४ ट्रॉलरशी संपर्क साधण्यात यश आले होते. तर, १० ट्रॉलरचा कोणताच थांगपत्ता लागत नसल्याची माहिती मच्छीमार खात्याचे मंत्री ज्योकीम आलेमाव यांनी दिली. या चक्रीवादळामुळे लोकांचे नेमके किती नुकसान झाले हे आत्ताच सांगता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक ट्रॉलरवर ६ जणाचा गट असून, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सुसाट वाऱ्यामुळे गोव्याच्या समुद्रातून हे मच्छीमार मालवणला पोहोचले असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. भारतीय किनारी सुरक्षा दल जे हरवलेल्या मच्छीमारांचा शोध घेत आहे, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वादळामुळे त्यांच्या कामात व्यत्यय येत असून, गेले दोन दिवस सतत त्यांच्याकडे हरवलेल्या व्यक्तींच्या तक्रारी येत आहेत. हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी एका एअरक्राफ्टची सोयही करण्यात आली असल्याचे भारतीय किनारी सुरक्षा दलाचे अधिकारी ए. के. सक्सेना यांनी सांगितले. मालिम बेती जेटीसह दक्षिणेतील कुटबण आणि बेतुल जेटीवरील ट्रॉलर्सही बेपत्ता असल्याचे सांगितले जाते.
बेपत्ता ट्रॉलर आणि मच्छिबांधवांचा शोध घेण्यासाठी कोचीन येथून खास जहाज आणल्याची माहिती श्री. आलेमाव यांनी दिली. मालिम बेती जेटीवरून मच्छीमारी करण्यासाठी सुटलेल्या किती ट्रॉलर बेपत्ता आहेत, याचा नक्की आकडा प्रशासनाकडे रात्री उशिरापर्यंत उपलब्ध नव्हता. तर, वास्को येथून चार आणि बेतुल येथील २ बोटींशी कोणताच संपर्क होत नसल्याचे श्री. आलेमाव यांनी सांगितले.
काल मध्यरात्री १.२० च्या दरम्यान पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्याने गोव्याच्या किनारपट्टीवर धडक दिली. किनाऱ्यापासून पाच किमी. अंतरावर ट्रॉलर घेऊन मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या ट्रॉलरना याचा जोरदार तडाखा बसला. यातील अनेक ट्रॉलर भरकटून रत्नागिरी, देवगडच्या दिशेने गेल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या दिशेने या ट्रॉलर गेल्यास त्यांना अधिक प्रमाणात धोका संभवत आहे. कारण या चक्रीवादळाचा प्रभाव या भागात अधिक प्रमाणात जाणवल्याचे मच्छीमार खात्याचे म्हणणे आहे.
दरम्यान, काकरा बांबोळी येथील पाच मच्छिमाऱ्यांच्या छोट्या होड्या रात्रीच्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दगडावर आपटून फुटल्या तर, अनेकांच्या जाळ्यांची नासाडी झाली. वादळामुळे समुद्राची पातळीही वाढली होती. मासेमारीसाठी दोन महिन्यांपूर्वी उतरलेले व नांगरून ठेवलेले ट्रॉलर्स नांगर तुटून किनाऱ्यावर आले होते. अनेक होड्या दगडावर आपटून फुटल्या, तर वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या मोडून घरांवर पडल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी मार्ग बंद झाले होते. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे काही भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी अनभिज्ञ!
चक्रीवादळामुळे किती मच्छीमार बांधव आणि त्यांचे ट्रॉलर बेपत्ता आहेत, याची कोणतीही माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांना सायंकाळपर्यंत नव्हती. याविषयी त्यांना विचारले असता,"मला यातले काहीही माहीत नाही, तुम्ही मच्छीमारी खात्यात संपर्क साधा', असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात आले. आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख असलेले श्री. वर्धन यांना याची कोणतीच माहिती नसल्याने कशा पद्धतीने राज्याचे आपत्कालीन व्यवस्थापन चालते याचा प्रत्यय काल पत्रकारांना आला.
-------------------------------------------------------------------------
नौका मालवणकडे?
गोव्यातील मच्छीमार बोटी जर मालवणच्या दिशेने भरकटल्या असतील तर स्थिती अधिक गंभीर असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण, सिंधुदुर्ग किनारपट्टीला काल (बुधवारी) पहाटे वादळाचा जबरदस्त फटका बसला. बेपत्ता ट्रॉलर्समध्ये किती मच्छीमार आहेत, याचा नेमका आकडा उशिरापर्यंत समजला नव्हता. बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाहीची मदत घेतली जात आहे.

मोरजीत समुद्राचा रौद्र्रावतार

..किनारी भागात लाखोंची हानी
..अनेक शॅक्सची मोडतोड
..पलंगांसह सामान वाहून गेले

पेडणे,दि. ११ ( प्रतिनिधी): अचानक आलेल्या वादळामुळे व जोरदार वारा व पावसाच्या सरीने मोरजी समुद्रकिनारी भागातील शॅक्स व्यावसायिकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
११ रोजी पहाटे ३.३० वाजता अचानक शांत समुद्रात वादळ निर्माण होऊन थेट लाटा किनारी भागावर धडकल्या, ज्यामुळे तेथील शॅक्स, पलंग व होड्या तसेच पर्यटकांना आकर्षित करणारे पदपूलही वाहून गेले.
मोरजी समुद्रकिनारी भागात अद्याप पर्यटक खात्याने लॉटरीद्वारे शॅक्स घालण्यासाठी परवाने दिलेले नाहीत, त्या लोकांनी अजून शॅक्स घातले नव्हते. त्यामुळे त्यांची हानी वाचली व परंतु खाजगी जमिनीत शॅक्स, रेस्टॉरन्ट घातले होते व पर्यटकांसाठी सुर्यस्नान व समुद्रस्नान करून आराम करण्यासाठी लाकडी पलंग तयार करून किनाऱ्यावर ठेवले होते. त्यातील गोपाळ शेटगांवकर (१० पलंग व गाद्या), आग्नेल डिसौजा, (१५ पलंग व गाद्या) सचिन (१० पलंग व गाद्या), सुरेश शेटगांवकर (३ पलंग व गाद्या), सद्गुरू हरमलकर (५ पलंग व गाद्या), चंद्रकांत हरमलकर (५ पलंग व गाद्या), सुदेश दाभोलकर (५ पलंग व गाद्या) येस्टू (१० पलंग व गाद्या) त्याचबरोबरच रामा नामक व्यक्तीने किनाऱ्यावर तयार कपड्यांचा स्टॉल घातला होता, तो कपड्यासह वाहून गेल्याने त्याला चाळीस हजार रुपयांचे नुकसान सोसावे लागले तर गावडेवाडा येथील विनायक राजाराम हरमलकर व चंद्रकांत हरमलकर यांच्या मासेमारीच्या जाळी वाहून गेल्याने किमान एक लाख रुपये नुकसान त्यांना सोसावे लागणार आहे.
होडीचे दोन तुकडे
गावडेवाडा किनारी भागात पर्यटकांना जलसफर करण्यासाठी एक होडी पार्क करून ठेवली होती, त्या होडीवर सतत समुद्राच्या लाटा आपटून त्या होडीचे दोन तुकडे झाले.
पदपूल कोसळले
किनारी भागात शॅक्स जवळच आकर्षक लाकडी पदपूल उभारले होते, ते कोसळून समुद्रात वाहून गेले, त्यामुळे लोकांना आर्थिक फटका बसला.
पहाटे ३.३० वाजता अचानक समुद्राचे पाणी वाढल्याची जाणीव शॅक्स व्यावसायिकांना होताच आपापले सामान वाचवण्यासाठी त्यांची सकाळी ६ पर्यंत धावपळ सुरू होती. वाहून गेलेले पलंग कुठे मिळतात की काय याचा शोध घेतला जात होता. परंतु काहीच पत्ता लागत नव्हता. त्यामुळे व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर नुकसानीची मुद्रा दिसत होती. येथील व्यावसायिक सुदेश दाभोलकर, आग्नेल, इनास यांच्याशी संपर्क साधला असता, पहाटे ३.३० नंतर अचानक वादळ व जोरदार पाऊस पडत असतानाच समुद्राचे पाणी अचानक वाढल्याने व किनारी भागात लाकडी पलंग ठेवले होते, ते काढायला वेळच मिळाला नाही असे त्यांनी सांगितले.
तेंबवाडा मोरजी येथील पारंपरिक मच्छीमारी व्यावसायिकांनाही नुकसानी सोसावी लागणार आहे.
हरमल समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी ओहोळापर्यंत गेले. काही घरांनाही धोका निर्माण झाला, तीन ठिकाणी नारळाची झाडे कोसळली व साक्रू फर्नांडिस यांच्या होडीचीही दहा हजार रुपयांची हानी झाली आहे. हरमल किनारी भागात समुद्राचे पाणी घरापर्यंत पोचले, मात्र धोका टळला. या भागात पेडणे व हरमल पोलिस, अग्निशमन दलाचे जवान मदत कार्यात पहाटेपासून कार्यरत होते.
हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसौजा यांनी आपल्या परिसरांतील नैसर्गिक आपत्तीची माहिती पहाटे ४ वाजता पोलीस व अग्निशामक दलाला दिली.
तेंबाला धोका
मोरजीत वाळूचे तेंब आहे. त्याठिकाणी धोका कमी निर्माण झाला मात्र वाळूचे तेंब सपाटीकरण करून त्या ठिकाणी हटस् शॅक्स घातले होते. तिथपर्यंत पाणी येऊन त्या त्या व्यावसायिकांना नुकसान सोसावे लागले.
पावसाळ्यात वादळ नव्हते
पावसाळ्यात समुद्राचे पाणी एवढे वाढले नव्हते परंतु नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात वादळाने पाण्याची पातळी वाढवून निसर्गाने आपला प्रताप दाखवला. ज्याने वाळूचे तेंब सपाटीकरण केले. त्या भागात पाण्याच्या प्रवाहाने माती कातरून वाहत गेली. पुढच्या दोन दिवसांत जर अशीच परिस्थिती राहिली तर तेंब सपाट होऊन, शॅक्स कोसळल्याशिवाय राहणार नाही.
गवताची नुकसानी
भाताची मळणी करून शेतकऱ्यांनी गाईगुरांना लागणारे गवत शेतात ठेवलेले होते. पावसाने ते भिजून टाकले व शेतात पावसाचे पाणी साचल्याने नुकसानी शेतकऱ्यांना सोसावी लागली.

मांद्रे,हरमलला चक्रीवादळाचा तडाखा; एक कोटीची हानी

पेडणे, दि. ११ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यात रात्री १ वाजता मोरजी किनारपट्टीवर समुद्राने तडाखा दिल्यानंतर चक्रीवादळाने मांद्रे व हरमल या किनारी भागात दुपारी १ च्या सुमारास अचानक गिरकरवाडा, मधलावाडा या हरमल व जुनासवाडा मांद्रे येथे जोरदार दणका दिल्याने किमान एक कोटी रुपयांची हानी झाली.मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
आज दुपारी १ वाजता चक्रीवादळाने हरमल गावाला तडाखा दिल्याने झाडांच्या फांद्या, भली मोठी झाडे, नारळाची झाडे तर काही नारळाची झाडे वरच्यावर मोडून घरांवर पडली. कौलारू घरे, पत्रे यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी मांद्रे मतदारसंघाचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सरपंच डॅनियल डिसौझा, पेडणेचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर, संयुक्त मामलेदार वर्षा मांद्रेकर, कृषी अधिकारी जोकिम रॉड्रिगीस, हरमलचे तलाठी संतोष रेडकर आदींनी पाहणी केली.
पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी गोपाळ शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जवान अडथळे दूर करण्यासाठी अविरत झटत होते.
चक्रीवादळाने हरमल गावाला इतका जबरदस्त तडाखा बसला की काही घरांचे पत्रे दूरवर उडाले.घरांवर माड कोसळून पडले मात्र मनुष्यहानी झाली नाही.
मधलावाडा हरमल येथील अरुण काशिराम गावडे यांच्या घरावर भले मोठे आंब्याचे झाड कोसळल्याने घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले व वीजवाहिन्यांवर झाडे कोसळून वीजप्रवाह खंडीत झाला. सद्गुरू गावडे यांच्या घराची कौले वाऱ्याने उडून गेली. त्यांच्या घरात ठेवलेल्या टीव्हीवर पाणी पडून टीव्ही निकामी झाला.
आगोस्तीन डिमेलो, साल्वादोर डिमेलो, नेल्सन डिमेलो, मॉरिस डिमेलो, नेव्हीस फर्नांडिस, मार्टीन डिमेलो, विजय गावडे, गजानन कोरगांवकर, ब्रम्हानंद परब सुनिल गावडे, सुरेश हरमलकर यांच्या घरावर लहान मोठी झाडे पडून लाखोंची नुकसानी झाली.
हरमल गावात किमान एक कोटी रुपयांची नुकसानी झाली आहे.
मांद्रेत विद्यार्थी जखमी
मांद्रे हायस्कूलचा इयत्ता ३ रीत शिकणारा विद्यार्थी बाबल नाना शेटगांवकर हा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना श्री भगवती मंदिरासमोर वीज वाहिनीची अर्थिंग तुटून पडली होती. तिला प्रमुख वीजवाहिनी चिकटली होती. ती तुटून शाळेच्या वाटेवरच पडली होती. त्यावेळी कोरगांव येथील उमेश च्यारी हा युवक आपल्या मुलाला न्यायला आला होेता. त्यावेळी एक मुलगा पडल्याचे त्याला दिसला.त्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही थोडा झटका लागला.त्याने धाडस करून त्या मुलाला आपल्याजवळ खेचले, तो बेशुद्ध पडला.त्याला त्वरित उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
घटनास्थळी आमदार प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर, सरपंच महेश कोनाडकर,पंच नीलेश आसोलकर, विश्वनाथ शिरोडकर,पंच रमेश शेट मांद्रेकर आदी नागरिकांनी त्वरित धाव घेतली.यावेळी कनिष्ठ अभियंते श्री. कानोळकर हजर होते.
वीज खात्याच्या हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी धाडसाने कोरगांव येथील त्या युवकाने आपला जीव धोक्यात घालून त्या मुलाचे प्राण वाचविले.आमदार पार्सेकर यांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले.
मोरजीत पुन्हा तडाखा
पहाटे चक्रीवादळाने गावडेवाडा, विठ्ठलदासवाडा येथे पुन्हा तडाखा देऊन जुझे डिसौजा, डिकुन्हा आंतोन फ्रान्सिस, रामदास मोरजे,कृष्णा परब आदी पारंपरिक मच्छीमार व्यावसायिकांची ठेवलेली जाळी समुद्रात वाहून गेली. त्यामुळे किमान तीन लाख रुपये त्यांना नुकसानी सोसावी लागली.तर पहाटे गावडेवाडा व इतर परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने पलंग वाहून गेले.
अंडी स्थलांतरित
तेंबवाडा मोरजी येथे कासव संवर्धन मोहिमेअंतर्गत दोन ठिकाणी कासवांनी अंडी घातली होती. एका ठिकाणी ती सुरक्षित होती. मात्र दुसऱ्या ठिकाणची अंडी खड्ड्यातून काढून ती पाण्यापासून दूर ठिकाणी सुरक्षित स्थळी हलविण्यात आली.

'इफ्फी'च्या 'जलशा'ला दिग्गजांचा ठेंगा!

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): हिंदी सिने जगतातील चॉकलेट हिरो देव आनंद यांचा अपवाद नव्या जमानातील हिंदी तारेतारकांबरोबरच "ट्वेंटी ट्वेंटी' भारतीय चित्रपट स्पर्धेच्या दिग्दर्शक व टीकाकारांच्या परीक्षक मंडळावरील अनेक सदस्यांनीही "इफ्फी'च्या बहुचर्चित "जलशा'कडे पाठ फिरविल्याने आयोजकांवर हिरमुसले होऊन आज गोव्यात परतण्याची पाळी आली. गोवा मनोरंजन संस्थेने मुंबई येथे "बॉलिवूड'च्या तारे तारकांसाठी काल रात्री आयोजिलेला "जलसा' कार्यक्रम हा दिग्गज तारेतारका, दिग्दर्शक, निर्मात्यांच्या अनुपस्थितीमुळे फारसा रंगला नाही.
गोव्यात येत्या २३ नोव्हेंबरपासून होऊ घातलेल्या दहा दिवसांच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी बॉलिवूडच्या तारे-तारकांना निमंत्रण देण्यासाठी मनोरंजन संस्थेने या जलशाचे मुंबईत आयोजन केले होते. जुहूतील हॉटेल "जे डब्ल्यू मेरियट'मधील "सॉल्ट लेक' पूलवर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला हिंदी चित्रसृष्टीतील नामांकित तारेतारका हजेरी लावतील अशी अपेक्षा होती; कारण बहुसंख्य तारे तारका, दिग्दर्शक, निर्माते इत्यादींना या कार्यक्रमाची निमंत्रणे देण्यात आली होती.
या जलशात "वीस वीस भारतीय चित्रपट' स्पर्धेचा शुभारंभ सन्माननीय अतिथी देवानंद यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे प्रमुख पाहुणे होते. मनोरंजन संस्थेने नेमलेल्या "कन्सेप्ट' या जनसंपर्क कंपनीच्या अधिकारी पूजा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्वेंटी ट्वेंटी भारतीय चित्रपटांच्या दिग्दर्शकांच्या परीक्षक मंडळावरील मधूर भांडारकर, राहुल ढोलकीया, विशाल भारद्वाज यांच्यासह टीकाकारांच्या परीक्षक मंडळावरील अनुपमा चोप्रा या जलशा कार्यक्रमाकडे फिरकल्याच नाहीत. दिग्दर्शक मंडळावरील गजेंद्र अहिरे यांच्याबाबत विचारणा केली असता त्या कोणतीही ठोस माहिती देऊ शकल्या नाहीत.
उपलब्ध माहितीनुसार अहिरे हे दिग्दर्शकांच्या परीक्षक मंडळाचे सदस्य असूनही या कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत. ज्या निमंत्रितांची या कार्यक्रमाला हजेरी लागली त्यात अभिनेत्री दिव्या दत्ता, विनोदी अभिनेता जगदीप, खलनायक रणजीत यांच्यासह स्मिता वसिष्ठ, दिग्दर्शकांमध्ये अनंत महादेवन, जगमोहन, टिनू आनंद, नागेश कुकनूर, रितूपर्णा घोष, अंजन श्रीवास्तव व तसेच अन्वर अली आदींचा समावेश होता.
गोव्यातून या जलशासाठी गेलेल्या मनोरंजन संस्थेच्या शिष्टमंडळात स्वतः संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव, आमदार चंद्रकांत कवळेकर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव, पत्रकार राजू नायक, मांगिरिश पै रायकर, राजेंद्र तालक, विशाल पै काकोडे आदींचा समावेश होता. अखेर या साऱ्या मंडळींनी मुंबईत पंचतारांकित सुविधांचा उपभोग घेतला व नंतरच ती गोव्याकडे परतली. त्यामुळे हाही येथे चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, मनोरंजन संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मांगिरीश पै रायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कालचा कार्यक्रम हा केवळ वीस भारतीय चित्रपट स्पर्धेचा शुभारंभ जाहीर करण्यासाठी आयोजित केला होता, अशी माहिती दिली. या स्पर्धेत संकेतस्थळावर शंभरेक भारतीय चित्रपटांची यादी घालण्यात आली असून तेथे लोकांचा मिळणारा प्रतिसाद व परिक्षक मंडळाचा निर्णय यातून सर्वोत्तम वीस भारतीय चित्रपट निवडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कुर्टी वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने समस्या

..दक्षिण गोव्यावर परिणाम
..सोमवारपासून सुरळीत पुरवठा

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): राज्यात काल पावसामुळे झालेल्या विजेच्या गडगडाटामुळे कुर्टी उपवीज केंद्रात मोठा बिघाड झाला आहे. या घटनेमुळे येथील शंभर मेगावॉटचा एक ट्रान्स्फॉर्मर बिघडल्याने त्याचे परिणाम दक्षिण गोव्यातील औद्योगिक वसाहतींवर झाला आहे. येत्या सोमवारपर्यंत ही परिस्थिती पूर्ववत होईल,अशी माहिती वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी दिली.
आज पर्वरी मंत्रालयातील आपल्या दालनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी वीज खात्याचे मुख्य अभियंता निर्मल ब्रागांझा उपस्थित होते.कर्नाटक व महाराष्ट्रातून होणारा वीज पुरवठा कुर्टी उपविज केंद्राव्दारे घेतला जातो व इथून तो राज्यातील विविध भागांत सोडण्यात येतो. सुमारे ३०० मेगावॉट विजेच्या या उपकेंद्रात एकूण तीन ट्रान्स्फॉर्मर्स आहेत. त्यात एक बदलण्यासाठी पाठवण्यात असून दुसऱ्यात हा बिघाड तयार झाला आहे.सध्या केवळ एकच ट्रान्स्फॉर्मर इथे कार्यन्वित आहे. या उपविज केंद्रात झालेल्या बिघाडामुळे दक्षिण गोव्यातील बहुतेक औद्योगिक वसाहतीमध्ये मर्यादित वीज पुरवठा सुरू आहे. प्रत्यक्ष या घटनेचा सामान्य लोकांना होणाऱ्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला नाही पण औद्योगिक वसाहतीमधील पुरवठ्यावर परिणाम जाणवला आहे. अशा प्रकारची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचेही यावेळी श्री.सिकेरा म्हणाले. पॉवर ग्रीडच्या मदतीने ही स्थिती पूर्ववत करण्यात येणार आहे. मुळात कुर्टी येथील हे ट्रान्स्फार्मर फार जुने असल्याने ते बदलण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याची वीज क्षमता सध्या ४०० मेगावॉट आहे व केवळ रात्रीच्या वेळी राज्याला विजेची कमतरता भासते.दिवसा अतिरिक्त वीज असते.२०१२ पर्यंत राज्याला ७२१ मेगावॉट विजेची गरज भासणार आहे,अशी माहितीही यावेळी श्री.सिकेरा यांनी दिली.

कोलवा-बेताळभाटी किनाऱ्याची मोठी झीज

मडगाव, दि.११ (प्रतिनिधी): अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आलेल्या सागरी उधाणामुळे कोलवा ते बेताळभाटी दरम्यानच्या समुद्र किनाऱ्याची महाभयानक झीज होऊन साधारण दोन मीटर ऊंचीने वाळू वाहून जाऊन भगदाड पडले आहे. तेथील नारळाची लागवड त्यामुळे संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली असून किनारी रहिवाशांत घबराट माजली आहे. किनाऱ्यावरील जीवरक्षकांचे मनोरेही वाहून गेले आहेत.
वादळी हवामानामुळे पडलेला पाऊस व काल रात्रीपासून सुटलेले सोसाट्याचे वारे वगळता दक्षिणेत मोठी नुकसानी झाली नाही. पण आपत्कालीन व्यवस्थापन सज्ज होते. या वादळात अगोदरच वाळू वाहून गेल्यामुळे दोलायमान अवस्थेत असलेले बेताळभाटी किनाऱ्यावरील जीवरक्षकांसाठीचे मनोरेही वाहून गेले आहेत.
संपूर्ण सासष्टीची किनारपट्टी काल रात्रीपासून डोळ्यात तेल घालून सतर्क राहिली होती. हवामानखात्याच्या इशाऱ्यामुळे काल सायंकाळी एकही मच्छिमारी नैाका मोहीमेवर गेली नाही पण परवा गेलेले ट्रॉलर मात्र परतलेले नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
मडगाव परिसरात या वादळामुळे काही झाडे कोसळली व त्यामुळे मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाला व सकाळच्या प्रहरात वीज पुरवठा खंडित राहिला.
नावेली बांध-असोेळणा येथे आंतोनियु सिकेरा यांच्या घरावर माड पडून सुमारे ५ हजारांचे नुकसान झाले तर नावेली सिकेटी येथे एक झाड तर कालात माजोर्डा येथे माड पडून वाहतूक खोळंबली . फातीमा कॉन्वेंटजवळ घरावर कलंडलेला माड अग्नीशामक दलाने धाव घेऊन कापून काढला.

Wednesday, 11 November, 2009

साखर झाली कडू!

तब्बल ४० रु. किलो
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): कडधान्ये, भाज्या व कांदे, बटाटे यांच्या वाढलेल्या किमतीमुळे सध्या सर्वसामान्य जनता जेरीस आलेली असतानाच आता साखरेचेही दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे गरीब जनतेवर मधुमेही रुग्णासारखी बिनसाखरेचा चहा घेण्याची पाळी आली आहे.
राजधानी पणजी शहरातील विविध भुसारी दुकानावर सध्या साखर प्रति किलो ४० रुपये या भावाने विकली जात आहे. मात्र गोवा बागायतदार संस्थेच्या विविध केंद्रांवर साखर पस्तीस ते साडे पस्तीस रुपये किलो या दराने विकली जात आहे. गोवा बागायतदार संस्था व खाजगी दुकानामधून विकल्या जाणाऱ्या साखरेच्या दरात प्रचंड तफावत जाणवत असून खाजगी दुकानवाले दामदुप्पट दर आकारत असल्याचे दिसून येत आहे. तूरडाळीच्या गगनाला भिडलेल्या दराने शतक ओलांडले होते, ते दर मध्यंतरी कमी झाल्याचे सांगितले जात होते, आता बाजारात तूरडाळीचे दर पुन्हा १०० ते ११० रुपये सांगितले जात आहेत. चणादाळीनेही नव्वदी ओलांडली असून, या डाळीचे खुल्या बाजारातील दर ९५ च्या वर गेले आहेत. गोवा बागायतदार संघाच्या विक्री केंद्रांत ते ८३ ते ९२ रु. असे आहेत. गुळानेही मागेच चाळीशी गाठली आहे. या वाढत्या महागाईवर "दर नियंत्रण विभाग' असलेल्या नागरी पुरवठा खात्याचे काहीच नियंत्रण नसल्याचे वारंवार दिसून आले आहे. या दरांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी मात्र सर्वसामान्य जनता कृत्रिम महागाईच्या ओझ्याखाली दबून जात असताना मूग गिळून गप्प आहेत हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया सामान्य माणूस व्यक्त करीत आहे. ज्या नियमित वेतन मिळते, महागाई भत्ता मिळतो, वेतन आयोगानुसार पगार मिळतो, त्यांचा अपवाद वगळल्यास अन्य हजारो कुटुंबे या महागाईने संकटात सापडली आहेत. सरकारी पातळीवर मात्र याची कोणतीच दखल घेतली जात नाही. "कॉंग्रेसचा हात गरिबांच्या साथ' असा नारा देणाऱ्या संपुआ सरकारच्या राजवटीत सतत महागाई वाढत चालली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आणखी दोनतीन महिने कळ सोसा, असा साळसूद सल्ला दिला आहे! गेली अनेक वर्ष ते पद सांभाळताना जे त्यांना जमले नाही, ते तीन महिन्यानंतर अशी कोणती जादूची कांडी फिरविणार आहेत, याबद्दल जनतेमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पाणी दरवाढ मागे

अखेर सरकार नमले : उत्तरेतील गळती बंद झाल्यावर दरवाढ
मडगाव, दि.१० (प्रतिनिधी): भाजपने केलेला कडाडून विरोध व त्या अनुषंगाने निर्माण झालेला तीव्र सामाजिक असंतोष यापुढे नमते घेऊन, घाईघाईत केलेली पाणी दरवाढ मागे घेण्याची नामुष्की आज सरकारवर ओढवली. सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना साळसुदपणाचा आव आणत उत्तर गोव्यातील पाण्याची गळती अजून बंद न झाल्याने पाण्याचे दर वाढवण्याबाबची अधिसूचना मागे घेत असल्याचे सांगितले.
या दरवाढीविरुद्ध भाजपने रस्त्यावर उतरण्याचा दिलेला इशारा व सामाजिक असंतोष तसेच तांत्रिक कारणास्तव ही अधिसूचना बेकायदा ठरण्याची निर्माण झालेली शक्यता यामुळेच ही नामुष्की सरकारवर ओढवल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण विकास खात्यातर्फे आयोजित सरस प्रदर्शनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद आटोपल्यावर पत्रकारांनी चर्चिल यांना पाण्याच्या दरवाढीबाबत छेडले असता त्यांनी मुख्य मुद्याला बगल देत आपल्याकडे हे खाते आल्यापासून राज्यातील पाणीपुरवठ्यात कशी सुधारणा झाली ते तपशिलाने सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना परत मुख्य विषयावर आणून पाण्याच्या दरवाढीचे काय, असा स्पष्ट सवाल केला असता त्याबाबत जारी केलेली अधिसूचना मागे घेण्यात येत असल्याचे व आपण त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणी केल्याचे त्यांनी जाहीर केले.
ते म्हणाले की, पाण्याचे दर वाढविण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली होती, परवा नियोजन मंडळाच्या बैठकीतही हा विषय चर्चेत आला होता. कोणीच त्यावेळी विरोध दर्शवलेला नसल्याने त्यावर आधारून अधिसूचना तयार करण्याची सूचना देण्यात आली होती. ती जारी करण्यापूर्वी आपल्याला दाखविण्याची सूचना आपण प्रधान मुख्य अभियंत्यांना केली होती. मात्र त्यांनी ती आपणास न दाखवता जारी केली व त्यातून हा घोळ निर्माण झाला.
दरवाढीची अधिसूचना जारी झाल्यामुळे ती मागे घेण्यासही काही सोपस्कार आवश्यक आहेत. ते लगेच करून ही दरवाढ मागे घेतली जाईल. अर्थात, आज ना उद्या ही वाढ करावी लागेल, ती अपरिहार्य आहे. दक्षिण गोव्यातील पाणीगळती पूर्णतः बंद झाली आहे. आपण उद्यापासून उत्तर गोव्यातील पाणीगळती बंद करण्याच्या मोहिमेवर जात आहोत. ती गळती बंद केली गेली की नवे दर अंमलात आणले जातील असे संकेत त्यांनी दिले.
एका प्रश्नावर ते म्हणाले, दक्षिण गोव्यातील ५२ टक्के पाणी पूर्वी सार्वजनिक नळांमुळे वाया जात होते . ते नळ बंद करून सदर पाण्याची बचत करण्यात आली आहे. उत्तरेतील गळती प्रक्रिया प्रकल्पांतील त्रुटींमुळे निर्माण झाली आहे. या त्रुटी दूर करून गळती थोपविली जाईल. पोर्तुगीजकालीन जलवाहिन्या हेही गळतीचे मुख्य कारण आहे. शक्य तेथे त्या बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
जर कोठे सांडपाण्याची गळती होत असेल, मग ती खासगी आस्थापने असली तरी ते खात्याच्या लक्षात आणून दिल्यास ते दोष तीन दिवसांत दूर केले जातील. नवीन बांधकामांना मलनिस्सारण जोडण्यांची सक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------------
विभाजन कशासाठी
पाणी दरवाढ,मलनिस्सारण गळती यासारख्या मुद्दांचे भांडवल करून आपल्या कडील सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभाजन केले जाण्याची शक्यता चर्चिल यांनी फेटाळून लावली. साळावली जलवाहिनीची नेहमीची डोकेदुखी दूर करून दक्षिण गोव्यातील पाणी समस्या आपण कायमची सोडवली असा दावा करून आता विभाजन कशासाठी, असा सवाल त्यांनी केला.
---------------------------------------------------------------------------
'पीसीं'नी चर्चिलना डावलले?
पाणी दर वाढविण्याची अधिसूचना जारी करताना प्रधान मुख्य अभियंत्यांनी (पीसी) खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाच डावलण्याचा प्रकार घडला आहे. चर्चिल यांनीच हा किस्सा आज येथे पत्रकारांना सांगितला अन सारेच चक्रावले. चर्चिल यांना चकवणे म्हणजे साधी बाब नव्हती; पण तो प्रकार घडलाच तसा. मंत्रिमंडळ बैठकीत या दरवाढीवर चर्चा झाली असली तरी निर्णय झाला नव्हता. त्या चर्चेच्या आधारे दरवाढीच्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यास सांगण्यात आले होते. चर्चिल यांनी, ती अधिसूचना जारी करण्यापूर्वी आपणास दाखविण्याची सूचना पीसींना केली होती. प्रत्यक्षात पीसींनी ती चर्चिल यांना न दाखवताच जारी केली व सरकारला धर्मसंकटात लोटले."पीसीं'च्या वयोमानामुळे कदाचित त्यांना आपल्या सूचनेचा विसर पडला असावा असे चर्चिल म्हणाले.

दीराकडून भावजयीचा खून

मालमत्तेवरून वाद, तोरसावाडा नागोवा येथील घटना
वास्को, दि. १० (प्रतिनिधी): तोरसावाडा, नागोवा (वेर्णे) येथे राहणाऱ्या युजिनीयो रीबेलो (वय ३५) याने आपल्या फाऊस्तीना रीबेलो या ४२ वर्षीय भावजयीवर कोयत्यानेे वार करून तिचा खून केल्याची घटना काल रात्री घडली. युजिनीयो याला फोंड्यात अटक करून त्याच्याकडून खुनासाठी वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. हा प्रकार मालमत्तेच्या वादातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फाऊस्तीना रात्री आठच्या सुमारास घरी परतत असताना युजिनीयोने घराबाहेरच तिच्या मानेवर कोयत्याने वार केले. नंतर रक्तबंबाळ अवस्थेत तिने तेथील दुकानासमोर जाऊन मदतीचा हात मागितल्यानंतर तिला इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
खुनाच्या या प्रकारामुळे तोरसावाडो नागोवा भागात भीतीचे वातवरण पसरले आहे. दोन वर्षांपूर्वी फाऊस्तीनाने, आपल्या सासूला छोट्या दिराकडून (युजिनीयो) मारहाण झाल्याची तक्रार केली होती. त्या रागातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. फाऊस्तीना हिची मोठी मुलगी लविना आंघोळीला गेल्याची संधी साधून सदर खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी युजिनीयो त्याची बायको, मुलगी व मुलगा तसेच फाऊस्तीना, तिची मोठी मुलगी लवीना व लोरीना हे सारे एकाच घरात राहत होते. काल रात्री युजिनीयो याने घराला बाहेरून कडी लावली व फाऊस्तीना घरी परतत असताना तिच्या मानेवर कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे रक्ताच्या धारा अंगावरून वाहात असलेल्या अवस्थेत फाऊस्तीनाने मदतीसाठी तेथे असलेल्या मिस्किता नावाच्या दुकानासमोर धाव घेतली. तेथेच ती बेशुद्ध पडली.
घरात असलेल्या लवीनाला किंकाळीचा आवाज आल्याने तिने घराबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र तेव्हा दरवाजाला
बाहेरून कडी लावण्यात आली होती. यानंतर काही वेळीने युजिनीयोच्या पत्नीने दरवाजाची कडी उघडली असता लवीनाने घराबाहेर येऊन तिला ऐकायला आलेली किंकाळी कोणाची आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला तिची आई रक्ताच्या थरात मिस्किता नावाच्या दुकानासमोर पडल्याचे दिसले. तेव्हा तेथे मोठी गर्दी उसळली होती. फाऊस्तीनाला त्वरित उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले असता येथे ती मृत झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली.
वेर्णा पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच त्यांनी उशिरा रात्री खून करून पोबारा केलेल्या युजिनीयो याला फोडा येथून ताब्यात घेतले आणि नंतर त्याला अटक केली. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फाऊस्तीनाचा पती परदेशात कामाला आहे.
खुनासाठी वापरलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

मुसळधार पावसाची शक्यता, वादळाची भीती

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राज्यात दोन दिवसांपासून विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, आगामी काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता पणजी वेधशाळेचे प्रमुख के व्ही सिंग यांनी व्यक्त केली आहे. आज तिसऱ्या दिवशीही सकाळपासून पावसाची रिपरिप विविध भागात सुरूच होती. रात्री मात्र पावसाच्या अनेक सरी बरसल्यात. येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता गोव्यातील काही भागात कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अवेळीच्या पासामुळे शेतीची नासाडी होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोकण किनारपट्टीवर जवळपास सर्वच ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे.
चक्रीवादाळाची भीती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यांचा गोव्याला तडाखा बसण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. अचानक बदललेल्या या हवामानाचा किनारपट्टीवरील प्रदेशांना अधिक धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्याने सध्या वादळी वारे ५५ ते ६५ किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहत आहेत. त्यांचा वेग वाढण्याची शक्यता असून उद्या दुपारपर्यंत वादळ महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटकपर्यंत येण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

Tuesday, 10 November, 2009

गोव्यात येणारे तिळारीचे पाणी अडविण्याचा इशारा

बेरोजगार संघर्ष समिती आक्रमक
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): उत्तर गोव्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून तिळारीच्या पाण्याचा वापर करण्याची भाषा सुरू असतानाच तिकडे महाराष्ट्रात तिळारी धरणग्रस्त बेरोजगारांनी महाराष्ट्र सरकारविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकून तिळारी धरणाचे गोव्यात येणारे पाणी अडवण्याचा इशारा दिला आहे. तिळारी धरणग्रस्तांना सरकारी नोकऱ्यांत प्राधान्य देण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने दिले होते पण त्याची पूर्तता न झाल्याने याठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचा निर्धारही या लोकांनी केला आहे.
तिळारी धरणग्रस्त बेरोजगार संघर्ष समितीने आयनोडे येथील मंदिराच्या प्रांगणात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. समितीचे सचिव संजय नाईक यांनी "गोवादूत' शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली. तिळारी प्रकल्पामुळे येथील एकूण आठ गाव पाण्याखाली आले. या गावातील विस्थापित लोकांना दिलेल्या आश्वासनांबाबत मात्र सरकार मूग गिळून गप्प असल्याची टीका श्री.नाईक यांनी केली. या प्रकल्पाला आता ३० ते ३२ वर्षे झाली व लोकांच्या दोन पिढ्या संपल्या. सुमारे १२०० कुटुंबीयांचे स्थलांतर सरकारने केले व प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला पूर्णपणे हरताळ फासण्यात आल्याचा ठपकाही श्री.नाईक यांनी ठेवला. यासंबंधी औरंगाबाद न्यायालयाच्या खंडपीठाने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला आदेश देऊनही त्याची पूर्तता होत नसल्याची खंत या लोकांनी व्यक्त केली आहे. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी ३० सप्टेंबर २००९ ची तारीख देण्यात आली होती व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडून नोकऱ्यांबाबत काहीही प्रयत्न केले नाहीत,अशी तक्रारही या लोकांनी केली आहे. दरम्यान,आता शेवटचा प्रयत्न म्हणून समितीतर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री,आमदार दीपक केसरकर आदींची भेट घेणार असून त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाले नाही तर या प्रकल्पाव्दारे गोव्याला होणारा पाणीपुरवठा अडवून आमरण उपोषणाला बसणार असे संकेतही धरणग्रस्तांनी दिले आहेत.

मोले अपघातात दोघे युवक ठार

बेदरकार खनिज वाहतुकीचे बळी
मोले, दि.९ (वार्ताहर): गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर कासावली मोले येथे रविवारी ८ नोव्हेंबर ०९ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास खनिजवाहू टिप्पर ट्रक (केए २२ ए ६६३०) आणि हिरो होंडा मोटर सायकल (जीए ०९- बी - ०५१३) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघे युवक जागीच ठार झाले. झारखंडच्या बेदरकार ट्रकचालकाने अपघातानंतर ट्रकसह पलायन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, स्थानिक युवकांनी पाठलाग करून ट्रक चालकाला पकडण्यात यश मिळवले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
भागो श्याम वरक (२० वर्षे, कोपर्डे सत्तरी) आणि बापू बोमू खरवत (३८ वर्षे, पळसकाटा मोले) अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत. सदर मोटरसायकल भागो वरक चालवत होता. बापू खरवत त्याच्यामागे बसला होता. कासावली मोले येथे ख्रिस्ती दफनभूमीजवळील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. मळपण साकोर्डा येथील एका फुगडी स्पर्धेचा कार्यक्रम आटोपून भागो वरक हा आपला मित्र बापू खरवत याच्यासमवेत मोलेमार्गे पळसकाटा येथे निघाला होता. त्याचवेळी तिस्क धारबांदोडा येथून मोलेला जाणाऱ्या खनिजवाहू टिप्पर ट्रक व मोटरसायकर यांची टक्कर झाली. त्यामुळे मोटरसायकलवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले. पळसकाटा गावातील काही युवकांनी ट्रकचा पाठलाग केल्याने घाबरलेल्या ट्रक चालकाने मोले तपासणी नाक्याजवळ एका झाडाला धडक दिली. युवकांनी ट्रक चालक कारू रावल भुयाल (३२ वर्षे, झारखंड) याला पकडून त्याला चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या हवाली केले.
निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण गावस, हवालदार शिवा गावस यांनी पंचनामा केला.
अपघातामुळे पळसकटा मोले गावावर शोककळा पसरली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकांना पहिला अर्धा तास तात्काळ मदत न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू ओढवला, असे ग्रामस्थांनी सांगितले. अपघातानंतर स्थानिकांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, ही १०८ रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध झाली नाही. अखेर ग्रामस्थांनी मोले पोलिसांशी संपर्क साधला. वेळीच उपचार मिळाले असत तर बापू वाचला असता, असा दावा ग्रामस्थांनी केला.
----------------------------------------------------------------------
बापूचे स्वप्न अधुरेच...
मळपण साकोर्डा येथील फुगडी स्पर्धेत पळसकटा मोलेच्या महिलांनी पहिले बक्षीस पटकावले होते. या महिला मंडळाचे पळसकटा गावात जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोले येथे आपल्या मित्राबरोबर चहाही न घेता बापू खरवत फटाके घेऊन महिला मंडळाला घेऊन जाणाऱ्या वाहनांपाठोपाठ जाताना कासावली येथे त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. त्यात बापू खरवत याला प्राण गमवावे लागले. फटाके वाजवून महिला मंडळाचे गावात स्वागत करण्याचे बापूचे स्वप्न अखेर अधुरेच उरले.

ऑक्टोबरच्या वेतनाचा प्रश्न सुटला; पुढे काय?

आज कदंब महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक
पणजी, दि.९ (प्रतिनिधी): आर्थिक पेचप्रसंगात सापडलेल्या कदंब महामंडळाच्या "ब्रेकडाऊन' झालेल्या गाडीला सरकारने पुन्हा एकदा अर्थसाहाय्य करून "ढकलस्टार्ट' मारली आहे. महामंडळ कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासाठी अडीच कोटी रुपयांच्या मंजुरीला वित्त खात्याने आज अखेर संमती दिली व त्यामुळे गेल्या महिन्याचे रखडलेले वेतन येत्या दोन दिवसांत वितरित होणार आहे. दरम्यान, महामंडळाच्या आर्थिक दिवाळखोरीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक उद्या १० रोजी महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी येथे महामंडळाच्या मुख्यालयात होईल.
कदंब महामंडळाची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. सरकारचे अनुदान व भागभांडवल मिळूनही महामंडळ किमान आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्याएवढेही उत्पन्न मिळवू शकत नसल्याने सरकारसाठी हे महामंडळ पांढरा हत्ती बनत चालले आहे. यावेळी महामंडळाची तिजोरी खाली झाल्याने गेल्या ऑक्टोबर महिन्याचे वेतन देण्याचीही परिस्थिती राहिली नसल्याने महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून थेट याबाबत परिपत्रकच जारी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी तात्काळ यासंबंधी अडीच कोटी रुपयांची मदत महामंडळाला देण्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावाला वित्त खात्याने मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या महिन्याचे वेतन दोन दिवसांत वितरित होईल खरे पण आता पुढील महिन्यात हीच परिस्थिती महामंडळावर ओढवणार असल्याने आर्थिक दिवाळखोरीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या हालचालींना गती मिळवून देण्याचे ठरले आहे. महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्याशी संपर्क साधला असता आपण गोव्याबाहेर होतो व कालच गोव्यात पोहचलो, त्यामुळे उद्या १० रोजी याबाबत चर्चा करूनच वक्तव्य करू, असे सांगितले.
दरम्यान, महामंडळातील भ्रष्टाचारावर सरकारचा अजिबात अंकुश नाही व महामंडळाच्या कारभारात राजकीय ढवळाढवळ वाढल्यानेच ही परिस्थिती उद्भवली, असा आरोप कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे. महामंडळाच्या या परिस्थितीला वाहतूक खाते जबाबदार असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला. वाहतूक खात्याकडून खाजगी प्रवासी वाहतुकीला झुकते माप देण्यात येते व जिथे प्रवासी नसतात किंवा केवळ काही ठरावीक लोकांसाठी प्रवासाची सोय करण्याची वेळ असते तिथे कदंब गाड्या सोडल्या जातात. नदी परिवहन खाते आत्तापर्यंत कधी नफ्यात आले नाही मग त्यांच्या पगाराचा प्रश्न का उद्भवत नाही,असा सवाल श्री.फोन्सेका यांनी केला.राष्ट्रीयीकरण केलेल्या वास्को ते टायटन या मार्गावर खाजगी बसेस कशा काय धावतात,असा प्रश्नही श्री.फोन्सेका यांनी केला. सरकारने कदंब महामंडळाला खऱ्या अर्थाने करमुक्त करावे व तेव्हाच हे महामंडळ स्वावलंबी बनेल,अशी सूचनाही त्यांनी मांडली.

अबु आझमीचे थोबाड रंगविले

..महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ
..मनसेचे चार आमदार निलंबित
..कोकणासह सर्वत्र प्रतिक्रिया

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र विधानसभेत सोमवारी सकाळी अबु आझमी हिंदीतून आमदारकीची शपथ घेत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी घोषणाबाजी करत शपथ प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. राज्याची अधिकृत भाषा असलेल्या मराठीतच सर्व नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घ्यायला हवी, असा आग्रह मनसेने धरला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तसे आवाहन करणारे पत्र सर्वच आमदारांना पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर आपण हिंदीतच शपथ घेऊ, असे सांगणाऱ्या आणि त्याप्रमाणे आज पहिल्या दिवशी हिंदीतून शपथ घेत असताना मनसेच्या आमदारांनी त्यांचा ध्वनिक्षेपक हिसकावून घेऊन धक्काबुक्की केली. या गदारोळात आझमी यांच्या थोबाडीतही मारण्यात आले.
या गदारोळानंतर संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मनसेच्या आमदारांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. त्यावर मतदान होऊन तो बहुमताने मंजूर करण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे निलंबित आमदारांना चार वर्षासाठी मुंबई आणि नागपूर विधीमंडळात प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. राम कदम, शिशिर शिंदे, रमेश वांजळे आणि वसंत गिते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रश्न मराठी किंवा हिंदीचा नसून विधानसभेतील विरोध प्रकट करण्याच्या पद्धतीबाबतचा आहे, असे सांगितले. विरोध करण्यासाठी मनसेने वापरलेली पद्धत आक्षेपार्ह असल्यामुळेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे ते म्हणाले.
राज्यभर प्रतिक्रिया
मराठी भाषेत शपथ घेतली नाही म्हणून अबू आझमी यांना विधानसभेत धक्काबुक्की करणाऱ्या मनसेच्या चौघा आमदारांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्यानंतर, आता विधानसभेतला राडा रस्त्यावर पोहोचला आहे. मनसेच्या तसेच सपाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
विधानसभेत गोंधळ घातल्याबद्दल मनसेचे शिशिर शिंदे, राम कदम, वसंत गीते व रमेश वांजळे या चौघा आमदारांना पुढच्या चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभरात निदर्शने केली. मनसेच्या या आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले. खडकवासला येथील आमदार रमेश वांजळे यांच्या समर्थकांनी पीएमटीच्या ११ बसगाड्यांवर दगडफेक करून आपला राग व्यक्त केला. ठाणे, नाशिक, पुणे भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी अबू आझमींच्या प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे दहन केले.
दरम्यान, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आसिम आझमी यांच्या कार्यकर्त्यांनीही मनसेच्या निषेधार्थ भिवंडी तसेच नागपूर भागात निदर्शने केली. भिवंडीमध्ये आझमी समर्थकांनी एसटी बसच्या काचा फोडल्या. तर नागपूरमध्ये रास्ता रोको करण्यात आला. भिवंडीत सुमारे २० सपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.
कोकणातही पडसाद
कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आदी प्रमुख ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी फटाके बाजवून आपल्या चार आमदारांच्या कृतीचे समर्थन केले. या आमदारांना निलंबित करण्याच्या कारवाईचा जोरदार निषेध करण्यात आला. घोषणा देणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सावंतवाडीचे ऍड. अनिल केसरकर यांच्यासह अनेकांना नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले.

गोमतंकीय कलाकारांची बोळवण!

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): 'इफ्फी'अंतर्गत साजरे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम यंदा रद्द केल्यामुळे नाराज झालेल्या स्थानिक गोमंतकीय कलाकारांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी द्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी या कलाकारांना इफ्फीनंतर फेब्रुवारी किंवा मार्च दरम्यान खास संगीत महोत्सव आयोजित करण्याचे आश्वासन देऊन त्यांची बोळवणच केली .
गोव्यात २००४ सालापासून इफ्फी रंग भरत आला आहे. इफ्फीच्या या रंगात कॉर्निश वा इतर तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या स्थानिक कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आपले रंग भरताना इफ्फीची रंगत अधिकच खुलवली होती. मात्र यंदा इफ्फीच्या आवाराबाहेरील हे कार्यक्रम रद्द केल्याने हे कलाकार नाराज झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री कामत यांना भेटून हे कार्यक्रम दरवर्षी प्रमाणेच यंदाही कायम ठेवण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाव्दारे केली आहे.
तथापि मुख्यमंत्री कामत यांनी निवेदन घेऊन गेलेल्या कलाकारांच्या या शिष्टमंडळाला इफ्फीनंतर त्यांचे खास कार्यक्रम आयोजित करू असे आश्वासन दिले आहे. हे कार्यक्रम इफ्फी होऊन गेल्यावर दोन तीन महिन्यांनी आयोजित केले जाणार असल्याने गोव्याची कला साता समुद्रापारच्या प्रसिध्दीला मुकणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव असल्याने या महोत्सवात सहभागी होणाऱ्या देशी तसेच विदेशी प्रतिनिधींनाही त्यांची कला न्याहाळण्याची संधी मिळत होती. मात्र यावेळी त्यांचे कार्यक्रमच नसल्याने विदेशी प्रतिनिधींना ती संधी यावर्षी मिळणार नाही हे मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने स्पष्ट झाले आहे.
गोव्यात संगीत महोत्सवाचे खास कार्यक्रम सरकार कधीही आयोजीत करू शकते. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील महोत्सवादरम्यान येथील कलाकारांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली असती तर गोमंतकीय कलेला एक वेगळी उंची मिळाली असती. परंतु नेमकी हीच संधी राज्य सरकारने गमावली असून त्यामुळे नाखूष झालेल्या या कलाकारांनी इफ्फी काळात पदपथांवर गोवा मनोरंजन संस्थेने कोणतेही कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी मागणी केली आहे.
संस्थेने यावेळी पदपथांवर पाश्चात्त्य संगीत वाद्यवृंद समूहाचे कार्यक्रम ठेवण्याची तयारी केली असून संस्थेच्या कार्यकारिणीवरील एका सदस्यालाच त्याचे कंत्राट बहाल करण्यात आले आहे. मनोरंजन संस्थेला वर्षपध्दतीनुसार आमचे कार्यक्रम ठेवायचे नसतील तर त्यांनी अन्य संगीत कार्यक्रमही आयोजित करू नयेत अशी मागणी करणाऱ्या या कलाकारांनी अन्य संगीत कार्यक्रम आयोजित केल्यास तो आमचा अपमान ठरेल,असा गर्भित इशाराही दिला आहे.
अनिलकुमार, सिद्धनाथ बुयांव, डेल्टन कार्दोज, कॉनी एम., पूर्णानंद च्यारी, सी. डी. सिल्वा, राजेंद्र तेलगू, शेरॉन माझारेलो, प्रवीण गावकर, योगराज बोरकर, देवानंद मालवणकर, विष्णू शिरोडकर, अन्नपूर्णा साखरदांडे, विल्सन माझारेलो, सत्यवान नाईक व इतर मिळून एकूण तेहत्तीस कलाकारांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आज सकाळी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मडगाव येथील निवासस्थानी देण्यात आले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात अनील कुमार, सिध्दनाथ बुयांव, डेल्टन कार्दोज, कॉनी एम., पूर्णानंद च्यारी, सी. डी. सिल्वा, राजेंद्र तेलगू, शेरॉन माझारेलो व इतरांचा समावेश होता.

Monday, 9 November, 2009

अमोनिया गळतीच्या वृत्ताने दक्षिण गोव्यात हलकल्लोळ

उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती केवळ मॉकड्रिल!
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): झुआरी ऍग्रो केमिकल फॅक्टरीतून अमोनियाची गळती लागल्याचे वृत्त एक खासगी वृत्तसंदेश पाठवणारी संस्था आणि एफएम रेडिओवर आज दुपारी प्रसारित झाल्याने दक्षिण गोव्यात एकच हल्लकल्लोळ माजला. लोकांमध्ये घबराट निर्माण होऊन, आपल्या नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या काळजीने वेढलेल्यांनी सदर कंपनीच्या आवारात एकच गोंधळ घातला. आपत्कालीन सेवेची कृत्रिम तालीम म्हणून हा संदेश एका खासगी फोन एसएमएसद्वारे वृत्त पुरवणाऱ्या संस्थेद्वारे प्रसारित करण्यात आला होता. संदेशात असे म्हटले होते की झुआरी ऍग्रो केमिकलच्या फॅक्टरीतून अमोनिया गॅसची गळती सुरू झाली असून, ही गळती चालूच राहिली आहे. वायू वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये स्थलांतरित करताना सदर घटना घडल्याचे सांगण्यात आले. तर या वायुगळतीचा परिणाम झालेल्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात स्थलांतरित करण्यात आल्याचे संदेशात स्पष्ट करण्यात आले होते. हे वृत्त कळताच एकच गोंधळ निर्माण झाला. झुआरी ऍग्रो केमिकल फॅक्टरी झुआरी नगरच्या झोपडपट्टीजवळच असून, दाबोळी विमानतळ, मुरगाव पोर्ट ट्रस्ट हे भागही या फॅक्टरीपासून विशेष लांब नाहीत. एका मित्राकडून हे वृत्त कळताच मी वेर्णातील माझ्या नातेवाइकांना त्वरित फोन लावला. भीतीने आमची पुरती गाळण उडाली. काय करावे? कसे करावे ते कळेनासे झाले. सर्वत्र एकच गोंधळ उडाला होता, असे वास्कोत वास्तव्य करून असलेल्या विवेक नाईक यांनी सांगितले.
विभागीय अधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांनी सांगितल्याप्रमाणे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट (एनडीएसए)नुसार त्यांनी केवळ कायद्याचे पालन करत आपण एसएमएस सेवेला आणि एफएम रेडिओला याबाबत सुचित्त केले. स्थलांतर करताना एखादी घटना घडू नये म्हणून त्याविषयी लोकांना सावध करणे हे आमचे कर्तव्य होते. २०० लोकांना इस्पितळात दाखल करणे हा केवळ सरावाचा भाग होता. सर्व ठिकाणचे अग्निशमन दलाचे जवानही याठिकाणी एकत्र झाले होते, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे लोकांना शांतता पाळण्याचे आणि तो एक कृत्रिम स्थिती असेल हे स्पष्ट करणारे दुसरे वृत्त लगेच प्रसारित करण्यात आले होते. ते केवळ शोधकाम होते, धोक्याची घंटा वाजवण्यासारखे काही नसून, त्यामुळे लोकांनी घाबरून न जाण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र ते वृत्त लोकांना मिळाले नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सरकारवर ताशेरे ओढत आपल्या वृत्तसंस्थेचा अशाप्रकारे गैरवापर करून एका कृत्रिम घटनेसाठी अशाप्रकारे वृत्तसंस्थेचा वापर करणे किळसवाणा प्रकार असल्याचे एसएसएम सेवा पुरविणाऱ्या व्यक्तीने सांगितले. कृत्रिम तालीम ठरावीक स्तरापर्यंत मर्यादित ठेवली गेली पाहिजे असेही त्याने यावेळी सांगितले. हा केवळ "लांडगा आला रे आला...' असा प्रकार असून ज्यावेळी खरोखरच अशा प्रकारची एखादी घटना घडेल त्यावेळी कदाचित लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे यावर त्वरित कारवाई होण्याची आवश्यकता लोकांनी व्यक्त केली आहे.

कर्नाटकात 'बंडोबा झाले थंडोबा'

नवी दिल्ली, दि. ८ : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात तिघा भाजप मंत्र्यांनी पुकारलेल्या बंडामुळे कर्नाटक सरकारमध्ये निर्माण झालेला पेचप्रसंग आता सुटला आहे. तडजोडीच्या फॉर्म्युल्यानुसार, आता समन्वय समितीची स्थापना केली जाणार आहे. एका महिला मंत्र्याला वगळण्यात येणार असून, विधानसभा अध्यक्षांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत कर्नाटकातील वाद मिटल्याची घोषणा केली. ८३ व्या वर्षात पदार्पण करणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना हे बर्थ डे गिफ्ट असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री व बंडखोर मंत्री जी. जनार्दन रेड्डी यांच्यामध्ये आता कोणतेही गैरसमज उरलेले नाहीत, असे स्वराज यांनी यावेळी जाहीर केले.
कर्नाटकमध्ये जी समन्वय समिती नेमली जाणारी आहे, त्या समितीचे प्रमुखपद सुषमा स्वराज यांच्याकडे असेल, अशी चर्चा आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते अनंतकुमार, प्रदेशाध्यक्ष सदानंद गौडा आणि जी. करूणाकरा रेड्डी यांचाही त्या समितीत समावेश असणार आहे.

सावर्डे येथे १६ पासून 'रास्ता रोको'आंदोलन

अरुंद रस्त्यांवरील बेबंद खनिज वाहतुकीचा निषेध
सावर्डे, दि. ८ (प्रतिनिधी): पोर्तुगीजकालीन अरुंद रस्ते आणि त्यात आता दिवसेंदिवस वाढत चाललेली खनिज वाहतूक यामुळे त्रस्त झालेल्या सावर्डेवासीयांनी आजच्या विशेष ग्रामसभेत १६ नोव्हेंबरपासून या भागात बेमुदत "रास्ता रोको' करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले जात नाही, तोपर्यंत या भागातील वाहतूक बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
सावर्डे पंचायत सभागृहात झालेल्या आजच्या ग्रामसभेत या भागातील वाढती वाहतूक, त्यामुळे होणारी कोंडी, वेळेचे बंधन , ध्वनिप्रदूषण या विषयांवर जोरदार चर्चा होऊन सरकारच्या अनास्थेच्या निषेधार्थ रास्ता रोकोचा निर्णय घेण्यात आला. त्यासंबंधी ठराव संमत करून त्याच्या प्रती मुख्यमंत्र्यांना सादर करण्याचे ठरविण्यात आले. ग्रामसभेस सरपंच स्वप्नाली देसाई, उपसरपंच नामदेव पालेकर, पंच मिलन नाईक, उल्हास भंडारी, गोकुळदास नाईक, सुगम नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप देसाई व निरीक्षक म्हणून गट विकास अधिकारी उपस्थित होते. आजच्या ग्रामसभेला उपस्थित असलेल्यांनी जोरदारपणे मुद्दे मांडून खनिज वाहतुकीच्या समस्येवर भर दिला. सावर्डे भागात सकाळी ५ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत खनिज वाहतूक सुरू असते. याबद्दल उपस्थितांनी आक्षेप घेऊन ही वेळ सकाळी ७ ते रात्री ७ अशी करावी व त्यासंबंधी सर्व खनिज कंपन्यांना पत्रे लिहावीत असे ठरविण्यात आले. दिवसभर खनिज वाहतूक चालू असल्याने दुचाकी तसेच चारचाकी वाहने आणि विद्यार्थ्यांची बरीच कुचंबणा होत असते याकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधले. याबाबत प्रत्येकांना हा अनुभव घेतल्याने सर्वाच्या बोलण्यात राग व्यक्त होत होता. स्थानिक आमदार याबाबत साधी विचारपूसही करीत नाहीत अथवा जनतेच्या व्यथा जाणून घेत नाहीत, याबद्दल उपस्थितांनी चीड व्यक्त केली. दिवाळीनिमित्त गावातील प्रत्येक प्रभागांमध्ये काही जणांना भेट पाठविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी जनतेशी संपर्क ठेवावा आणि अशा भेटी लोकांनी स्वीकारू नयेत, असे विचार उपस्थितांनी व्यक्त केले. १६ रोजीपासून सुरू होणारा रास्ता रोको यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घरातील एखाद्या व्यक्तीने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सरपंचसहित सर्व पंचसदस्यांनी १६ रोजीच्या बंदला पाठिंबा व्यक्त केला.

'१०८'च्या कर्मचाऱ्याचा म्हादईत बुडून मृत्यू

अंकित रायकर ठरला दुर्दैवी
वाळपई, दि. ८ (प्रतिनिधी): पणजी येथील मुख्य कार्यालयातील "१०८' चे काही कर्मचारी आज रविवारच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सोनाळ सत्तरी येथील म्हादई नदीच्या म्होवाचो गुणो या नदीत सहलीसाठी सकाळी गेले होते. त्यात अंकित अजित नाईक रायकर (२२) हा सांतिनेज पणजीचा कर्मचारी बुडून मृत्यू पावला, तर प्रसाद प्रकाश आजगावकर रा. मोरगाव दोडामार्ग हा कर्मचारी सुदैवाने वाचला. त्याच्यासोबत एकूण १५ कर्मचारी होते. त्यात सागर बन्सीलाल सांगेलकर रा. सांगली, हरिष पांडुरंग मांद्रेकर, विशाल वसंत काणकोणकर, जितेंद्रभाय, तुळशीदासभाय, सुनीलकुमार, अनिल जाधव, कृष्णा काशीनाथ वदरकर, प्रवीण रत्नाकर सिरसाट, नकाक्ष सोनू धायकर, रवि सखाराम बाला, प्रसाद पडवळ, समीर गुरुदास शेट, राजेंद्र महादेव भोसले, रुपेश पाटेकर, अनुप अमरनाथ चव्हाण, सुशांत नाईक असे एकूण १७ कर्मचारी सहलीसाठी गेले होते. पण अंकित याची ही सहल शेवटची ठरली. आंघोळीसाठी या नदीच्या तीरावर आपले बस्तान ठोकले. पण अंकित याला पोहता येत नव्हते. तो काठावर गेला असता पाय घसरून नदीत पडला. त्याच्या मागोमाग प्रसाद आजगावकर हाही पाय घसरून पडला. अचानक झालेल्या प्रसंगामुळे इतर कर्मचारी भयभीत झाले. लगेच त्यांनी गावातील लोकांना सांगितले. त्यावेळी वेळ होती ११.४५ ची. लगेच त्यांनी अग्निशामक व पोलिस स्थानकात संपर्क केला. १२.३० पर्यंत अग्निशामक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनी या नदीची खोली सुमारे ३ ते ४ माड ( २० ते २५ मीटर) खोल असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिक सुरेश गावकर यांनी धाडसाने नदीत उडी घेतली तसेच इतर लोक व अग्निशामक दलचे जवानही पाण्यात उतरले. सुदैवाने प्रसाद आजगावकर हा कर्मचारी वाचला पण अंकित काही केल्या सापडेना. जवळजवळ २ तास पाण्यात तळाशी जाऊन शोध घेतला गेला. अखेर २.३० वाजता अंकित याचा मृतदेह सुरेश गावकर यांच्या हाती लागला. त्यावेळी तो अगदी तळाशी होता.
मोठ्या कौशल्याने गावकरने अंकित याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळविले. सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथे पाठविण्यात आहे. पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत नाईक, पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर, हवालदार सदानंद महेंद्र च्यारी, सूर्यकांत मोरजकर, कणकुबकर, लक्ष्मण परब यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राप्त माहितीनुसार ही जागा अतिशय वाईट अशी समजली जाते. याआधीही अशा अनेक घटना याठिकाणी घडल्या आहेत.

इफ्फी गोव्यात, तर मुंबईत 'जलसा'!

आयोजनावर लाखोंची उधळपट्टी
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी): जागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेले खर्च कपातीचे सर्व निर्देश पायदळी तुडवून गोवा मनोरंजन संस्थेने इफ्फीनिमित्त मुंबईत परवा एका "जलशा'चे आयोजन केले आहे. दोन ऑक्टोबरच्या जलप्रकोपानंतर काणकोणमधील रहिवासी हवालदिल झालेले असताना व केंद्राकडून खर्च कपातीची सूचना आल्यानंतरही "जलसा' आयोजित करण्यात आल्याने त्यावर तीव्र टीका होऊ लागली आहे.
मंगळवार १० नोव्हेंबर रोजी जुहू मुंबईतील जे डब्ल्यू मेरियट हॉटेलमधील सॉल्ट वॉटर पूलमध्ये या जलशाचे आयोजन करण्यात आले असून संस्थेने नेमलेली "कन्सेप्ट' ही जनसंपर्क कंपनी त्याच्या आयोजनाचे काम पाहणार आहे. निविदा प्रक्रिया व्यवस्थितपणे न पाळता जनसंपर्क कंपनी म्हणून केलेली "कन्सेप्ट' ची निवड सध्या वादात अडकली असून त्याच कंपनीच्या प्रस्तावास अनुसरून "वीस वीस भारतीय चित्रपट' स्पर्धेच्या संकेतस्थळाचाही शुभारंभ मुख्यमंत्र्यांहस्ते या जलशावेळी केला जाणार आहे.
या जलशासाठी स्वतः संस्थेचे अध्यक्ष असलेले गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, राज्याचे मुख्य सचिव, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांचा हवाई प्रवास, आरामदायी निवास व भोजनावर मिळून भरमसाठ खर्च अपेक्षित आहे. काणकोणातील पूरग्रस्तांना सध्या मिळेल ती मदत कमी अशी स्थिती असताना मात्र इप्फीनिमित्ताने सरकारचा लवाजमा सध्या "जलशा'त रमू लागला आहे.
या जलशाला नामांकित अभिनेते व अभिनेत्रींना निमंत्रित करण्यात आले असून तेथे आगामी इफ्फीसाठी त्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आमंत्रण दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या कलाकारांचा पुढील तीन तीन चार चार महिन्यांचा कार्यक्रम हा अगोदरच निश्चित झालेला असतो. तथापि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना इफ्फीला अवघेच दिवस उरले असताना या सेलेब्रिटीजना निमंत्रित करण्याची बऱ्याच उशिरा आठवण झाली आहे.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनीच या कार्यक्रमाची संकल्पना आखली असून लाखो रुपयांची उधळपट्टी त्यावर होणार आहे. मुंबईत हा जलसा आयोजित करणे व बॉलिवूडशी संबंधितांनाच निमंत्रणे दिल्याने इतर व्यावसायिक कलाकारांच्या मनात आपल्याला दुय्यम लेखले गेल्याची भावना निर्माण होणार असून निमंत्रणे देताना झालेल्या भेदभावामुळे अनेक आघाडीचे कलाकार यंदा इफ्फीकडे पाठ फिरविण्याचीच जास्त शक्यता दिसत आहे.
गेल्यावर्षी इफ्फी काळात अख्ख्या देशाला हादरवून सोडणारा दहशतवादी हल्ला मुंबईत झाला होता व इप्फी होऊन अवघे दोन दिवस उलटले असताना माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला असतानाही संस्थेने श्रमपरिहार कार्यक्रम घडवून आणला होता. मात्र पत्रकारांना त्याची कुणकुण लागताच स्वखर्चाने हा कार्यक्रम आखल्याचे स्पष्टीकरण संस्थेचे अधिकारी श्रीवास्तव यांनी केले होते.
दरम्यान, संस्थेचे बरेच सदस्य केवळ ऐषआरामाच्या सुविधांचा लाभ उठविण्यासाठीच असल्याची टीका सिने सृष्टीशी संबंधित काही लोकांनी केली आहे. त्यामुळेच केंद्र सरकारचे खर्च कपातीचे निर्देश झुगारून हे लोक जलशाचे आयोजन करण्यास पुढे सरसावल्याचे सांगून राज्याचे मनोरंजन धोरण ठरविण्याची जबाबदारी मात्र ते पूर्णपणे विसरल्याचा टोलाही या मंडळीने हाणला आहे.

Sunday, 8 November, 2009

'कदंब'ची तिजोरी रिकामी

वेळेवर पगार मिळणे महाकठीण; कर्मचाऱ्यांत प्रचंड खळबळ
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): "कदंब' वाहतूक महामंडळाची आर्थिक स्थिती दयनीय बनल्याने या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचा पगार वेळेवर मिळणे महाकठीण झाले असून त्यामुळे कर्मचाऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली आहे.
महामंडळाच्या तिजोरीचा जणू खुळखुळा झाल्याने ही दारूण परिस्थिती ओढवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून येनकेन प्रकारे वेतनाची कशीबशी तजवीज करणाऱ्या या महामंडळाची गाडी आता मात्र पुरती ब्रेकडाऊन झाली आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून आर्थिक पेचाच्या कारणास्तव यावेळचे वेतन वितरण वेळेवर होऊ शकणार नाही, असे परिपत्रकच जारी केल्याने महामंडळाचे कर्मचारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार कदंबच्या वाहतूक सेवेची अवस्था सध्या अत्यंत बिकट बनली आहे.महामंडळाचे कर्मचारी एकीकडे सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीचा तगादा सरकारकडे लावत असताना नेहमीचा पगार देण्याची क्षमतादेखील हे महामंडळ हरवून बसले आहे. सध्या सुमारे १९५० कर्मचारी कदंबच्या सेवेत आहेत. या बिकट आर्थिक स्थितीमुळे या कर्मचाऱ्यांवर संकट ओढवले आहे. यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. व्यवस्थापकीय संचालकांशीही संपर्क होऊ शकला नाही. महामंडळाच्या अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून याबाबत चौकशी केली असता त्याने आपल्याला अधिकृत वक्तव्य करण्याचा अधिकार नसल्याचे सांगून अधिक माहिती देण्याचे टाळले. महामंडळ आर्थिक विवंचनेत आहे, यावृत्ताला मात्र त्याने दुजोरा दिला.
सध्या कदंब कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते. ती रक्कम दरमहा सुमारे अडीच कोटी रुपये होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. गेल्या ऑगस्टमध्येच महामंडळासमोर आर्थिक चणचण निर्माण झाली होती. गणेश चतुर्थीकाळात अखेरच्या क्षणी कसाबसा तोडगा काढून कर्मचाऱ्यांना वेतनाचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर जून, जुलै व ऑगस्टमध्ये महामंडळाने सरकारी अनुदानाचा वापर वेतनासाठी केला. आता हा निधी संपल्याने महामंडळासमोर पुन्हा वेतनासाठी निधी उभारण्याचे जबर आव्हान निर्माण झाले आहे.
सरकारचे सहकार्य नाही
सरकारकडून महामंडळाला योग्य सहकार्य मिळत नाही,असे महामंडळाचे म्हणणे आहे.
महामंडळाला भ्रष्टाचाराने पूर्ण पोखरले आहे. महालेखापालांनी आपल्या अहवालात महामंडळातील अनेक गैरकारभार उघडकीस आणूनही त्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सरकारकडून टाळले जाते. आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी महामंडळाचा ताबा घेतल्यापासून हा कारभार सुधारण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. महामंडळाची गाडी रुळावर आणण्यासाठी खास पॅकेजची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त करून जोपर्यंत जुन्या बसगाड्या भंगारात काढून नव्या बसगाड्या खरेदी करणार नाही तोपर्यंत हीच स्थिती राहील,असे काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्पष्ट केले होते.महामंडळ व वाहतूक खाते यांच्यातही समन्वय नसल्याने त्याचा थेट परिणाम महामंडळाच्या कारभारावर होत असतो.
कामगार संघटना चिंतेत
महामंडळासमोरील आर्थिक पेचप्रसंगामुळे महामंडळ कामगारांसमोर चिंता निर्माण झाली असून त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.कामगार संघटनेचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी याबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अवगत केले आहे. पगार देण्यासाठी कदंबकडे पुरेसा पैसा नसावा हे गंभीर व दुर्दैवी असल्याचे आपण कामत यांना सांगितल्याचे फोन्सेका यांनी "गोवादूत'शी बोलताना स्पष्ट केले. महामंडळाचे गोवा राज्य सहकारी बॅंकेत थकीत कर्ज आहे. त्यामुळे पुन्हा नवे कर्ज घेऊन कारभार सुधारण्याची शक्यताही कमी असल्याने या संकटावर मात करण्यासाठी सरकार नेमका कसा तोडगा काढणार, याकडे आता या कामगारांचे लक्ष लागले आहे.

धारबांदोडा अपघातात दोघे ठार, सात जखमी

फोंडा, दि.७ (प्रतिनिधी): धारबांदोडा येथे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास टॅंकर (जीए ०१ डब्लू ९९७९) आणि "तावेरा' मोटारी (केए ०१ एमपी ३) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार, तर सात जण जखमी झाले.
मृतांमध्ये मोटारीच्या चालकाचा समावेश असून त्याचे नाव हसन मियॉं शेख (३२) असेआहे. तो अपघाताच्या ठिकाणीच ठार झाला. मृत आणि जखमी व्यक्ती वास्को परिसरातील रहिवासी असून मांगुरहिल भागावर शोककळा पसरली आहे. जखमींवर बांबोळी येथील सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत.मोटारीमधील अब्दुल हमीद बदानी याचा बांबोळी सरकारी इस्पितळात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
तावेरा मोटार कर्नाटकातून धारबांदोडामार्गे वास्कोला निघाली होती तर टॅंकर धारबांदोडा येथून मोलेला जात असताना हा अपघात झाला. दोन्ही वाहनांची जोरदार टक्कर झाल्याने मोटारीच्या दर्शनी भागाचा पार चुराडा झाला. झहिदा शिरवानी (५५), रमझा सय्यद (१९), महमद बदानी (२७), मेहबूबी (८०), दुलान बी दोड्डीमणी (५५), दिलशाद बदानी (५०), मेहक बदानी (५) अशी जखमींची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. टॅंकर चालक गोकुळदास सतरकर (मोले) सुदैवाने बचावला आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्षी आमोणकर यांनी पंचनामा केला.