पणजी, दि.९ (प्रतिनिधी): राज्य सरकारने प्राथमिक माध्यम धोरणात बदल करून इंग्रजी माध्यमाला मान्यता देण्यासंबंधीचे परिपत्रक उद्या १० रोजी जारी केले जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केली. हे धोरण राबवण्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे ३० जूनपर्यंत जारी केली जाणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
आज इथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत उच्च शिक्षण खात्याचे संचालक भास्कर नायक व शिक्षण खात्याचे उपसंचालक अनिल पवार हजर होते. इंग्रजी प्राथमिक संस्थांना सरकारी अनुदान देण्यासंबंधीचे परिपत्रक उद्या ताबडतोब जारी केले जाणार असल्याचे बाबूश म्हणाले. इंग्रजी माध्यमामुळे मराठी व कोकणी यापैकी एक विषय सक्तीचा बनवला जाणार आहे व त्यामुळे पर्यायी विषय निवडण्यावर निर्बंध आले आहेत. या समस्येबाबत तोडगा काढण्यासाठी तसेच प्राथमिक माध्यमाच्या अंमलबजावणीसंबंधी चार सदस्यीय समिती स्थापन केल्याचेही बाबूश यांनी सांगितले. आपण विधानसभेत आश्वासन दिल्यानुसार प्रत्येक सरकारी प्राथमिक शाळेत एक इंग्रजी शिक्षक यंदापासून नेमणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. बारावी निकालातील घोळासंबंधी शिक्षण सचिवांच्या अहवालाची वाट पाहत असून या घोळाला जबाबदार असलेल्या अधिकार्यांवर निश्चितच कारवाई केली जाईल,असेही ते म्हणाले.
शिक्षण खात्याने अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गियांसाठी उच्च माध्यमिक विद्यालयांत व महाविद्यालयांत आरक्षण देण्यासंबंधीच्या सूचनांची पायमल्ली करणार्या संस्थांचे अनुदान रद्द करण्याचा इशारा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिला. यंदा शालांत व बारावीचा निकाल चांगला लागल्याने उच्च माध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांना अतिरिक्त वर्ग सुरू करण्यासाठी तात्काळ परवानगी देण्याचा शब्दही त्यांनी दिला. उच्च शिक्षण व महाविद्यालयांत अनुसूचित जमातींसाठी १२ तर इतर मागासवर्गीयांसाठी १९ टक्के आरक्षण ठेवणे सक्तीचे आहे.
अतिरिक्त विभाग सुरू केल्यानंतर सुरुवातीला एका वर्षासाठी कंत्राटी पद्धतीवर शिक्षकांच्या नेमणुकीसाठी मान्यता दिली जाईल. मडगाव येथे एका उच्च माध्यमिक विद्यालयाकडून देणगीची सक्ती करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याचे सांगतानाच यासंबंधी पालकांकडून लेखी तक्रार आल्यास ताबडतोब कारवाई करण्याचेही आदेश दिल्याचे बाबूश म्हणाले.
Friday, 10 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment