Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 23 April, 2011

आता ‘चॅलेंज’ देऊन मायकल पसार!

गृहखात्याची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर
पोलिसांसाठी ठरली २२ तारीख अशुभ

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांत दरोडे, वाटमारी, लूटमारी आदी विविध गुन्ह्यांत सामील असलेला कुख्यात गुन्हेगार मायकल फर्नांडिस आज पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जसे चित्रपटांत घडते तसे, यावेळी त्याने आपण पसार होणार असे पोलिसांना सरळसरळ ‘चॅलेंज’ देऊन पोबारा केला आहे. दरम्यान, मायकलचे शुक्लकाष्ठ काही पोलिसांच्या मागून सुटता सुटत नसून या प्रकरणाने राज्य गृहखात्याची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली आहेत.
यापूर्वी २२ फेब्रुवारी २०११ रोजी तो पोलिस व्हॅनमधून उडी टाकून पळाला होता. आज बरोबर २२ एप्रिल रोजी तो पुन्हा पसार झाल्याने पोलिसांसाठी २२ तारीख भलतीच अशुभ ठरली आहे.
याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अनेक राज्यांतील पोलिसांच्या ‘हिटलिस्ट’ वर असलेला मायकल फर्नांडिस याला आज बांबोळी येथे मानसोपचार केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी आणले जात असताना अचानक पोलिसांची नजर चकवून तो पसार झाला. त्याचा साथीदार दीपक केरकर याला पकडण्यात मात्र पोलिसांना यश मिळाले. मायकलला जेव्हा पकडले होते तेव्हा, आपण जास्त दिवस तुरुंगात राहणार नाही, अशी दर्पोक्ती त्याने पोलिसांसमोर केली होती. त्याबरहुकूम आज पळ काढून त्याने ती खरीही ठरवली. मायकल फर्नांडिसच्या पलायनाची वार्ता पसरताच सर्व पोलिस स्थानके तसेच तपासनाके तथा रेल्वेस्थानकांवरील पोलिसांना दक्षतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतु, उशिरापर्यंत तो सापडू शकला नव्हता.
गोव्याचे गृहमंत्री रवी नाईक व त्यांच्या पुत्रांची सुपारी जो बॉय याच्याकडून मायकल फर्नांडिस याला दिल्याच्या घटनेमुळे बरेच वादळ उठले होते व त्यामुळे गोवा पोलिस त्याच्या मागावर होते. या पूर्वी २२ फेब्रुवारी २०११ रोजी मायकलला पणजी न्यायालयातून सडा वास्को येथील तुरुंगात नेत असताना वाटेत चिखली येथे मायकलने पोलिस व्हॅनमधून उडी टाकून पळून जाण्याचे धाडस केले होते. यानंतर ११ एप्रिल २०११ रोजी पणजीचे उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्या नेतृत्वाखालील तब्बल २६ पोलिसांच्या पथकाने मायकल याला बेतूल - खोला जंगलातून शिताफीने अटक केली होती. त्याने जंगलात लपवलेले एक गावठी पिस्तूल व ६ जिवंत काडतुसे जप्त करण्यातही पोलिसांना यश मिळाले होते. १२ रोजी न्यायालयात उभे केले असता त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी फर्मावण्यात आली होती. गोव्यातील त्याच्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्याला कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार होते.
मात्र, त्यापूर्वीच मायकलने गोवा पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा सिद्ध करताना त्यांना गुंगारा देण्यात यश मिळवले. या एकूणच गृह खात्याची नाचक्कीच झाली आहे. एखाद्या गुन्हेगाराकडून पोलिसांना ‘चॅलेंज’ देऊन पलायन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने पोलिस खात्याच्या एकूण कारभारावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

मोपा विमानतळ भूसंपादनात शेतकर्‍यांची घोर फसवणूक

धोरण जाहीर करण्याची विठू मोरजकरांची मागणी
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): सरकारी अथवा सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात येणार्‍या जमीनधारकांना बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई देणे, तसेच जमिनीच्या बदल्यात रोजगार देणे आदी महत्त्वाची तरतूद असलेले राज्य भूसंपादन धोरण अंतिम टप्प्यात आहे. परंतु, हे धोरण तयार होत असताना नियोजित मोपा विमानतळासाठी घाईगडबडीत कवडीमोल दराने लाखो चौरसमीटर जमीन लाटण्याचा डाव कॉंग्रेस आघाडी सरकारकडून सुरू आहे, असा सनसनाटी आरोप धारगळचे भाजप नेते विठू मोरजकर यांनी केला आहे.
पेडणे तालुक्यात मोपा येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहणार आहे. या विमानतळासाठी एकूण ७४ लाख ९९ हजार ४४० चौरसमीटर जमीन संपादीत होणार आहे. येत्या ३० एप्रिलपर्यंत ‘ऍवार्डस’ तयार होतील, असे आश्‍वासन सरकारने दिले असून या विमानतळासाठी मोपा - २३, ६४, ०६५, चांदेल- ८,५८, ३१०, वारखंड - २२,१४,४७९, कासारवर्णे- १३,२३,९२६, उगवे - ४,५०,९३५ व अमेरे - २,८७,७२५ (सरकारी जमीन) या प्रमाणात जमीन संपादीत होईल. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार या जमिनीसाठी ४० ते ४५ रुपये प्रतिचौरस मीटर दर देण्याचे ठरले आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेल्या माहितीत कुळाच्या जमिनीला २५ रुपये प्रती चौरसमीटर व बिनकुळाच्या जमिनीला ४० ते ४५ रुपये प्रतीचौरसमीटर दर निश्‍चित केले आहेत. एकदा निर्णय घेतलेल्या या भूसंपादन दरांत कोणताही बदल होणार नाही, असेही मुख्यमंत्री कामत यांनी ठामपणे स्पष्ट करून त्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही म्हटले आहे. एकीकडे राज्य भूसंपादन धोरण निश्‍चित होत असताना मोपा विमानतळ भूसंपादनाची घाई सरकारला का लागली आहे, असा सवाल श्री. मोरजकर यांनी केला. या प्रकरणी निश्‍चितच काहीतरी गौडबंगाल असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. पेडणेवासीयांची घोर फसवणूक करण्याचा हा डाव कदापि साध्य होऊ देणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
पेडणेतील या भागांतील बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह हा शेती व बागायतींवरच अवलंबून आहे. अशा परिस्थितीत सरकार त्यांची वडिलोपार्जित जमीन संपादन करून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधनच हिरावून घेणार आहे. या जमिनीच्या बदल्यात मिळणार्‍या कवडीमोल दरात पुढील पिढ्यांची कोणती तरतूद ते करणार आहेत, असा सवाल विठू मोरजकर यांनी केला. मोपा विमानतळासाठी गरिबांच्या जमिनी कवडीमोल दराने संपादीत केल्या जात आहेत. भविष्यात या विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर इथल्या जमिनींना लाखो रुपयांचे भाव मिळणार आहेत. अशावेळी कवडीमोल दरांत आपल्या जमिनी सार्वजनिक प्रकल्पासाठी दिलेल्या शेतकर्‍यांनीच फटका का म्हणून सहन करावा? या गावांतील शेकडो कुटुंबीयांच्या भावी पिढीचा एकमेव आधार असलेल्या जमिनी संपादीत करावयाच्याच असतील तर त्यांना योग्य तो भाव व प्रकल्पात रोजगाराची हमी मिळायलाच हवी, अशी मागणीही विठू मोरजकर यांनी केली आहे. या गावांतील लोकांवर अजिबात अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे सांगून आपण या लोकांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार असल्याचेही ते म्हणाले.
पालकमंत्र्यांची बोलती बंद का?
पेडणेचे पालकमंत्री तथा धारगळचे प्रतिनिधित्व करणारे पंचायतमंत्री बाबू आजगावकर या प्रकरणी तोंड बंद करून का आहेत, असा सवाल विठू मोरजकर यांनी केला. मोपा विमानतळासाठी भूसंपादन करताना या लोकांना ४० ते ४५ रुपये प्रतिचौरस मीटर दर देण्याच्या निर्णयाला बाबू आजगावकर यांनी आक्षेप का घेतला नाही. क्रीडानगरी व मोपा विमानतळासाठी पेडणे तालुक्यातील गरिबांच्या जमीन कवडीमोल दराने हडप करण्याचाच हा डाव असून लोकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे, असेही श्री. मोरजकर म्हणाले. मोपा विमानतळामुळे पेडणेवासीयांना रोजगार मिळेल, अशी आश्‍वासने देणारे बाबू आजगांवकर तशी लेखी हमी या लोकांना देतील काय, असाही प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. केवळ सत्तेचा वापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न बाबू आजगावकर यांनी करू नये, असा टोला विठू मोरजकर यांनी हाणला.

गोव्यातून बेकायदा मद्यार्क मोठ्या प्रमाणात कर्नाटकात

कर्नाटक अबकारी मंत्र्यांचे मुख्यमंत्री कामत यांना पत्र
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोव्यात परराज्यांतून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यार्क आयात होते यात आंतरराज्य टोळीच कार्यरत असून खुद्द अबकारी खात्यातीलच अधिकार्‍यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा सरकारी महसूल बुडवला जातो, असा गौप्यस्फोट करून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी अबकारी घोटाळा उघड केला होता. आता कर्नाटकचे अबकारी मंत्री रेणुकाचार्य यांनी गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पत्र पाठवून गोव्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यार्काची कर्नाटकात वाहतूक होत असल्याचा संशय व्यक्त करणारे पत्र पाठवल्याने पर्रीकरांच्या आरोपांना अधिकच बळकटी मिळाली आहे.
कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूचे अड्डे तयार झाल्याने त्याची गंभीर दखल तेथील अबकारी मंत्र्यांनी घेतली आहे. या अड्यांवर छापा टाकण्याचे सत्र कर्नाटक सरकारने सुरू केले असून तीन महिन्यांत बनावट दारूचे संपूर्ण जाळेच नष्ट करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या प्रकरणी केलेल्या चौकशीत आंध्रप्रदेश तथा गोव्याच्या सीमेला लागून असलेल्या ठिकाणीच जादातर अड्डे उभे राहिल्याचेही त्यांच्या लक्षात आले आहे. गोवा, महाराष्ट्र व आंध्रप्रदेशातून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यार्क कर्नाटकात आणला जातो, असेही त्यांना आढळून आल्याने हे जाळेच नष्ट करण्यासाठी कर्नाटक सरकारने या राज्यांकडे सहकार्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पुराव्यांसहित बेकायदा मद्यार्क आयात घोटाळा सभागृहात उघड केला होता व यात आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याने त्याची चौकशी ‘सीबीआय’ किंवा स्वतंत्र चौकशी समितीमार्फत करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावली व या प्रकरणाची वित्त सचिवांमार्फत चौकशीचे आदेश दिले. माजी वित्त सचिव राजीव यदुवंशी यांनी यासंबंधी तयार केलेल्या चौकशी अहवालात बेकायदा मद्यार्क व्यवहार होत असल्याचे मान्य करून पर्रीकरांच्या आरोपांना पुष्टीच दिली आहे. अबकारी खात्यातील अधिकारीच या घोटाळ्यात गुंतल्याचे यदुवंशी यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. आता कर्नाटक अबकारी मंत्र्यांनी केलेल्या पत्रव्यवहारामुळे या घोटाळ्याचे जाळे कर्नाटकपर्यंत पोचल्याचे उघड झाल्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत या प्रकरणी कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल.
यदुवंशी अहवाल निव्वळ सोपस्कार !
माजी वित्त सचिव राजीव यदुवंशी यांनी अबकारी घोटाळ्यासंबंधी तयार केलेला अहवाल हा निव्वळ सोपस्कार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री कामत यांनी सभागृहात दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता झाल्याचे भासवण्यासाठीच हा खटाटोप केला. मुळातच या प्रकरणाची कोणतीही चौकशी न करता माजी अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांच्याकडून स्पष्टीकरण मागवून हा अहवाल तयार केला आहे. या प्रकरणी अबकारी आयुक्तालयातील अधिकारीच गुंतल्याचा ठपका असताना इतर कुणाही अधिकारी किंवा कर्मचार्‍यांची जबानी या अहवालात नोंदवण्यात आलेली नाही. अबकारी खात्याच्या वास्को कार्यालयात टाकलेल्या छाप्यात मिळालेल्या संशयास्पद पुराव्यांचाही या अहवालात समावेश नाही. अबकारी घोटाळ्याला पुष्टी देतानाच संदीप जॅकीस यांना ‘क्लीनचीट’ देणे एवढ्या हेतूनेच हा अहवाल तयार झाला नसावा ना, असाही संशय आता व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या अहवालाच्या आधारे फौजदारी खटला दाखल करण्याची तयारी चालवली आहे. तसे झाल्यास या घोटाळ्यातील आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश होणे शक्य असून अबकारी खात्यातील भ्रष्ट अधिकारी व त्यांना पाठीशी घालणार्‍यांचेही बिंग फुटण्याची शक्यता त्यातून वर्तविली जाते.

मसुदा समितीवर राहायचे की नाही, हेगडेंचा निर्णय आज

बंगलोर, दि. २२ : कर्नाटकचे लोकायुक्त संतोष हेगडे यांनी लोकपाल मसुदा समितीवरून राजीनामा देऊ नये, यासाठी त्यांच्या समर्थकांकडून दबाव वाढत असतानाच, या समितीवर कायम राहायचे की नाही, याबाबतचा निर्णय आपण उद्या शनिवारी जाहीर करणार असल्याचे हेगडे यांनी आज स्पष्ट केले.
मसुदा समितीवर असलेल्या सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांविरोधात राजकीय मंडळींनी चालविलेल्या अपप्रचारामुळे आपण व्यथित झालो असून, या समितीवर कायम राहण्याची आता आपली मुळीच इच्छा नाही, असे काल हेगडे यांनी सांगितले होते. त्यानंतर आज सकाळपासूनच हेगडे यांच्या समर्थकांनी त्यांची मनवळवणी करण्याची मोहीमच हाती घेतली. हेगडे यांनी राजीनामा देऊ नये, अशी विनंती त्यांच्या समर्थकांनी केली आहे.
याच मुद्यावर बोलताना हेगडे यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना, ‘‘आपला निर्णय आपण उद्या जाहीर करू,’’ असे सांगितले. मी उद्या दिल्लीला जात आहे. तिथे मी माझ्या सहकार्‍यांशी चर्चा करेन आणि अंतिम निर्णय घेईन, असे ते म्हणाले.
माझ्या वक्तव्यामुळे आपल्या भावना दुखावल्या असतील, तर मी खेद व्यक्त करतो, या कॉंगे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांचे वक्तव्य मी अद्याप वाचलेले नाही, एवढेच त्यांनी सांगितले.

मेस्तवाडा-कुर्टी शाळेला आग

दीड लाखांचे सामान खाक - गुणपत्रिका सलामत
फोंडा, दि. २२ (प्रतिनिधी): मेस्तवाडा कुर्टी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या इमारतीला आज (दि. २२) संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागल्याने अंदाजे दीड लाख रुपयांची हानी झाली.
या आगीची माहिती संध्याकाळी पावणे सहा वाजता फोंडा अग्निशामक दलाला मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे अंदाजे चार ते पाच लाख रुपयांची मालमत्ता वाचली. आगीचे निश्‍चित कारण मात्र समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, या आगीत शाळेतील एक संगणक, टेबल, पंखा, खुर्च्या व इतर वस्तू खाक झाल्या आहेत. शाळेच्या एका खोलीचे छप्पर पूर्णपणे जळाले आहे. आतील कपाटेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. विद्यार्थ्यांचे वार्षिक निकालाच्या गुणपत्रिका असलेले एक कपाट आगीतून बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश मिळाले आहे. या शाळेच्या इमारतीतील एका भागात सर्व शिक्षा अभियानाचे सामान ठेवण्यात आले होते. सदर सामान वाचविण्यातही अग्निशामक दलाला यश प्राप्त झाले आहे.
दलाचे विभागीय अधिकारी पी. एम. परब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र अधिकारी मारुती गावकर, वरिष्ठ जवान सी. आर. म्हाळशेकर, एम. के. शेट, मनोज नाईक, जी. व्ही. सावंत, एस. एस. मोरजकर, एस. के. गावकर, व्ही. आर. गावकर, जी. डी. पावणे यांनी आग विझविण्याचे काम केले. येथील शिक्षणाधिकारी जी. एन. नाईक यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे.

जपानच्या जहाजांना पाणी सोडण्यास बंदी

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): किरणोत्सर्गाचा धोका लक्षात घेऊन गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘एमपीटी’ व पणजी बंदरात जपानमधून आलेल्या जहाजांना बलास्ट पाणी समुद्रात न सोडण्याचे आदेश जारी केल्याची माहिती मिळाली आहे. या आदेशावरून जपानमधून आलेल्या जहाजाला बंदरापासून दूरवर नांगर टाकण्यास सांगितल्याचेही कळते.
जपान बंदरातून निघालेली दोन जहाजे गोव्यात दाखल होणार असल्याची माहिती मिळताच राज्य विज्ञान व पर्यावरण खात्याने तात्काळ आदेश जारी करून गोव्यातील दोन्ही महत्त्वाच्या बंदरांना सतर्कता बाळगण्यास सांगितले. जपानात किरणोत्सर्गाचा प्रभाव वाढल्याने त्याचा परिणाम गोव्यात होण्याची शक्यता गृहीत धरूनच ही काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे किरणोत्सर्गाच्या पाण्याची तपासणी करण्याची यंत्रणा नाही व त्यामुळे केवळ सावधानी बाळगणेच हाती असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या जहाजांमुळे किरणोत्सर्गाचा धोका नाही अशा आशयाचे आंतरराष्ट्रीय मरीटाइम संघटनेकडून मिळवलेले पत्रच सदर जहाजांनी मंडळाला सादर केले असून भीती बाळगण्याचे कारण नाही, असे स्पष्ट केले आहे. या जहाजातील बलास्ट पाणी यापूर्वी सिंगापूर येथे सोडण्यात आले होते व गोव्यात नव्याने पाणी भरण्यात आल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

...तर नेस्तनाबूत होईल बॉलीवूड!

विकिलिक्सचा नवा बॉंबगोळा
मुंबई, दि. २२ : दररोज नवनवे खुलासे करून जगभरात खळबळ माजविणार्‍या विकिलिक्सने आता भारतीय चित्रपटसृष्टीबाबतही अशीच खळबळजनक माहिती समोर आणली आहे. मोठ्या बजेटचे चित्रपट, कलावंतांचे गलेलठ्ठ मानधन, त्या तुलनेत चित्रपटातून होणारी कमी कमाई आणि गुन्हेगारी जगताशी असणारे त्यांचे संबंध यामुळे आगामी काळात बॉलीवूड नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही, असा खुलासा विकिलिक्सने केला आहे.
अमेरिकी मुत्सद्यांनी बॉलीवूडबाबत केलेल्या समीक्षेच्या दस्तावेजांवरून ही माहिती मिळाल्याचे विकिलिक्सचे म्हणणे आहे. ङ्गेब्रुवारी २०१० मध्ये मुंबईतील अमेरिकी दूतावासाने पाठविलेल्या दस्तावेजांद्वारे ही माहिती त्यांना प्राप्त झाली. यात बॉलीवूडविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांची जगातील इतर बाजारांमध्ये वाढती रुची आणि हॉलीवूडसोबत काम करण्याच्या मुद्यांचाही यात उल्लेख आहे.
बॉलीवूड आणि हॉलीवूड चित्रपट निर्मात्यांचे संबंध सध्या चांगले नाहीत. भारतीय चित्रपट जगताने नेहमीच हॉलीवूडकडे साशंक नजरेने पाहिले आहे आणि आपले प्रतिस्पर्धी मानले आहे. दुसरीकडे, जगभरात सर्वाधिक पैसा कमावणार्‍या हॉलीवूडची नजर बॉलीवूडकडे आहे. पण, जेव्हाही त्यांनी बॉलीवूडसोबत काम केले तेव्हा त्यांना अपयशच हाती आले. भारतीय चित्रपटसृष्टीत हॉलीवूडचा प्रवेश इतका सहज-सोपा नसल्याचेही विकिलिक्सने म्हटले आहे.
बॉलीवूडमधील निर्माते चित्रपटावर प्रचंड पैसा खर्च करतात. त्या तुलनेत त्यांना ङ्गायदा मिळत नाही. तरीही निर्मितीवरील खर्च कायमच आहे. त्यातही या एकूण खर्चातील ५०टक्के रक्कम मुख्य कलावंतांच्या मानधनात खर्च होते. यात घट झाली नाही तर कर्जाच्या ओझ्याखाली बॉलीवूड दबून जाईल.
गुन्हेगारी जगताशी असणारे बॉलीवूडचे संबंध हेदेखील याच्या वाताहतीचे कारण ठरू शकते, असे विकिलिक्सने म्हटले आहे.

Friday 22 April, 2011

तोतया पोलिसांचा हैदोस

• ३ महिलांकडील लाखोंचे दागिने लुटले
• मडगाव, म्हापसा व वास्कोतील घटना

मडगाव, म्हापसा व वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): गोव्यातील अस्सल पोलिस यंत्रणा निष्क्रिय बनल्यामुळे तोतया पोलिसांच्या कारवायांना ऊत आला आहे. आपण पोलिस असल्याची बतावणी करणार्‍या भामट्यांनी आज (गुरुवारी) मडगाव, म्हापसा व वास्कोतील तीन महिलांना लाखो रुपयांच्या दागिन्यांना गंडा घातला. त्यामुळे खर्‍या पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
मडगावात लाखभराला गंडा
आके येथे आज सकाळी भामट्यांनी पोलिस असल्याची बतावणी करत एका महिलेच्या साधारण लाखभराच्या पाटल्या घेऊन पळ काढल्याची घटना घडली. पोलिस असल्याची बतावणी करून एकट्या असणार्‍या महिलांना फसविण्याचे प्रकार मडगावात पुन्हा सुरू झालेले असून त्यामुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामागे एखादी टोळी असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. असा प्रकार गेल्या आठवड्यातही घडला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहिनी चोडणकर ही महिला आके येथे चालत जात
असताना दोन इसम तिच्याजवळ आले. तिला थांबवून आपण पोलिस असल्याचे त्यांनी सांगितले व या दिवसांत सर्वत्र चोर्‍या होत असताना हातात घातलेल्या तिच्या पाटल्यांकडे अंगुली निर्देश करून त्या अशा प्रकारे हातात घालून फिरणे बरे नव्हे असे सांगितले. त्यांनी तिच्या हातातील पाटल्या काढायला लावून स्वतःकडील कागदात गुंडाळून तिला परत केल्या व घरी जाऊन त्या काढून ठेव, हातात परत घालू नकोस असे बजावले.
त्यांनी दिलेले पुडके घेऊन ती महिला घरी गेली व पाटल्या कपाटात ठेवण्यासाठी कागदाचे पुडके सोडविले असता आत रिकामी खोके आढळले. तिने लगेच पोलिसांत तक्रार नोंदविली पण तिने केलेल्या वर्णनाचे कोणीही इसम पोलिसांनी आढळले नाहीत. सोन्याचे कडाडलेले दर पाहता दोन पाटल्यांची किंमत लाखावर होते. पोलिसांनी गुन्हा नोंदविलेला आहे.
वास्कोत ६० हजारांना लुटले
वास्को बोगदा येथे राहणार्‍या सुलक्षणा मोरजे (६०) या महिलेच्या अंगावरील सोन्याच्या बांगड्या व सोन्याची साखळी काढून घेत तिला ६० हजार रुपयांना लुबाडण्याचा प्रकार आज घडला.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२.३० च्या सुमारास सदर प्रकार घडला. बोगदा येथील गणपती मंदिरासमोर राहणारी सुलक्षणा मोरजे ही महिला बाजार केल्यानंतर घरी परतण्यासाठी बसस्थानकावर येऊन उभी राहिली होती. त्यावेळी तेथे तिला एक अज्ञात इसमाने शहरात सुरक्षा ढासळल्याचे सांगत तिच्या गळ्यातील सोनसाखळी व हातातील दोन सोन्याच्या बांगड्या काढून पिशवीत घालायला लावल्या. सुलक्षणाने त्याप्रमाणे आपल्या अंगावरील सोन्याचे ऐवज काढून त्याच्या हातात दिले. यानंतर त्या इसमाने सदर सोन्याचे ऐवज एका पिशवीत घालून तिच्या ‘बॅगेत’ घातले व नंतर तो येथून निघाला. काही वेळाने बोगदा येथे जाणार्‍या बसमध्ये सुलक्षणा चढून आपली ‘बॅग’ तपासली असता तिचे सोन्याचे ऐवज गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले.
सदर अज्ञाताने आपल्याला फसवल्याचे तिला समजताच तिने त्वरित वास्को पोलिसांना ह्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण शहरात अज्ञाताचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्याच्याविरुद्ध वास्को पोलिसांनी भा. दं. सं. ३७९ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वास्कोचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक फिलोमिना कॉस्ता पुढील तपास करीत आहेत.
म्हापशात दागिने लांबवले
म्हापसा कोर्टजवळ बसची वाट पहात थांबलेल्या शशिकला मसूरकर (७०) या महिलेला आपण पोलिस असल्याचे सांगत तिच्याकडील सुमारे ५५ हजार रुपयांचे सोने हस्तगत केले. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माऊसवाडा पेडणे येथील शशिकला ही महिला शेट्येवाडा धुळेर येथील आपल्या मुलीकडे आली होती. आज ती घरी परत जाण्यासाठी दुपारी सुमारे तीनच्या सुमारास पेडणे बसची वाट पहात कोर्टजवळील वाहतूक बेटाजवळ उभी होती. तेथे सुमारे ३० ते ३५ वयोगटातील दोन तरुण तिच्याजवळ गेले. त्यांनी तिला आपण पोलिस असल्याचे सांगितले. यावेळी सध्या या भागात चोर्‍या होत असल्याने आम्हांला खास ड्युटीवर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे तुझ्या हातातील, गळ्यातील दागिने पिशवीत काढून ठेव असे सांगितले. यावेळी शशिकला हिने आपल्या हातातील दोन पाटल्या व गळ्यातील सोनसाखळी काढून त्या तरुणांच्या हातात दिली. चोरट्यांनी त्या एका कागदात गुंडाळून पिशवीत घालून दिल्या व आपण तेथून पोबारा केला.
बस येण्यास उशीर असून आपणास उघडे उघडे दिसत असल्याने शशिकला हिने दागिने अंगावर घालण्यासाठी पिशवीतील कागद उघडला तर आत तिला तीन दगड व एक डबी सापडली. यावेळी तिला आपल्याला फसवल्याचे समजले. तिने याबाबत म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल केली. यात ५५ हजार रुपयांना आपल्याला लुटल्याचे तिने नमूद केले आहे. म्हापसा पोलिस तपास करत आहेत.
-----------------------------------------------------------
११ एप्रिलची पुनरावृत्ती
यापूर्वी चालू महिन्याच्या ११ तारखेला अशाच पद्धतीने पणजीतील सांतिनेज येथे शकुंतला नाईक या महिलेकडील सुमारे ५५ हजारांचे दागिने तोतया पोलिसांनी लुटले होते. तसेच म्हापशातील कवळेकर टॉवर येथे दिवसाढवळ्या दोघा भामट्यांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करत उर्मिला विजय नाईक या महिलेकडील दागिने हातोहात लांबवले होते हे वाचकांना आठवत असेलच.

भ्रष्टाचार व कॉंग्रेस एकाच नाण्याच्या बाजू

• स्मृती इराणी यांची कॉंग्रेसवर खरमरीत टीका
पणजीत भाजप महिला मोर्चाचा भव्य मेळावा
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): भ्रष्टाचार व कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून भ्रष्टाचारामुळे महागाई वाढते आणि महागाईची झळ महिलांनाच जास्त लागते. त्यामुळे महागाई वाढवणार्‍या कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करा. गोव्यातील कॉंग्रेसचे भ्रष्टाचारी सरकार येत्या निवडणुकीत उलथून टाकण्यासाठी आत्तापासूनच कार्याला लागा असे आवाहन भाजपच्या केंद्रीय महिला मोर्चा अध्यक्षा स्मृती इराणी यांनी आज येथे बोलताना केले.
पणजी येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात प्रदेश भाजप महिला मोर्चातर्फे आयोजित भव्य महिला मेळाव्याला मार्गदर्शन करताना श्रीमती इराणी बोलत होत्या. या प्रसंगी खासदार श्रीपाद नाईक, प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर इतर भाजप आमदार, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा चोडणकर, गोवा प्रभारी शिल्पा पटवर्धन, कमलिनी पैंगीणकर, मुक्ता नाईक, वैदेही नाईक, नीना नाईक तसेच विविध समित्यांच्या पदाधिकारी, नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होत्या.
या मेळाव्याला उपस्थित महिलांनी सभागृह खचाखच भरून गेले होते. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना श्रीमती इराणी पुढे म्हणाल्या की, देशावर सर्वांत जास्त वर्षे राज्य करणार्‍या कॉंग्रेसने खुनी, दरोडेखोर, घोटाळेबाज, भ्रष्टाचारी, गुंड, गुन्हेगार यांना नेहमीच आश्रय दिला आहे. त्यामुळेच दररोज एकेक घोटाळा जाहीर होत जगभरात देशाची नाचक्की होत आहे. हे सारे बदलून देशाला वैभवशाली व स्वाभिमानी करतानाच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यासाठी महिलांनी पुढे यावे व गोव्यात तसेच केंद्रात भाजपचे सरकार यावे यासाठी कार्य करावे असे आवाहन श्रीमती इराणी यांनी यावेळी केले. महागाई, घोटाळे, आणि भ्रष्टाचार यांचा कॉंग्रेस पक्ष जनक असून देशाचे ‘कमजोर‘ पंतप्रधान या सर्वांना पाठीशी घालत आहेत. प्रत्येक वेळी स्वतः ‘मजबूर’ आहे असे सांगणारे पंतप्रधान देशहित साधू शकत नाहीत. म्हणून भाजपच्या महिला सदस्यांनी राज्यातूनच नव्हे तर देशातून कॉंग्रेसला हद्दपार करण्यासाठी कंबर कसावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.महिला आरक्षणाला सर्वांत प्रथम भाजपनेच समर्थन दिले आहे. भाजप महिलांचा आदर करणारा पक्ष आहे असे सांगून मुलींचे गर्भ मारण्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली. तसेच केंद्रातील व राज्यातील ‘निकम्म्या’ कॉंग्रेस पक्षामुळेच गोव्याची बदनामी करणारे चित्रपट निघत आहेत. ‘दम मारो दम’ चित्रपटावरील बंदीसाठी कॉंग्रेस उदास असल्याचे प्रतिपादन केले. आपल्या ओघवत्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारचे विविध घोटाळे उघड केले.
भाजप महिलांची शक्ती वाढली : पटवर्धन
या प्रसंगी बोलताना गोवा प्रभारी शिल्पा पटवर्धन यांनी सांगितले की गोव्यात २५ हजार महिला भाजपच्या सदस्य झाल्या आहेत. या सर्व महिलांनी येत्या निवडणुकीत कॉंग्रेसला पराभूत करून राज्यात सुशासन आणण्यासाठी पोटतिडकीने कार्य करावे व भाजपला सत्तेवर आणावे असे आवाहन केले.
महिलांवरील अत्याचार वाढले : श्रीपाद नाईक
गोव्यात मंदिरे सुरक्षित नाहीत. महिलांवरील अत्याचारात तर दिवसेंदिवस वाढ होत आहे. भ्रष्टाचार तर कॉंग्रेसचा नित्यनेम होऊन बसला आहे. ड्रग्ज व्यवहारामुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम होत आहे. अशा या काळ्या व्यवहारी कॉंग्रेसला येत्या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी गोव्यातील महिलांनी दुर्गेचे रूप धारण करावे असे आवाहन खासदार श्रीपाद नाईक यांनी यावेळी केले.
महिलांना सन्मानाने वागवणारा पक्ष : पर्रीकर
सध्या देशात व गोव्यात मुलींचे प्रमाण घटत आहे ही चिंतेची बाब असून आपल्या कारकिर्दीत गर्भात मुलींची हत्या होऊ नये व मुलींचे प्रमाण वाढावे यासाठी आपण विशेष प्रयत्न केले होते असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या प्रसंगी बोलताना केले. महिलांना सन्मान देण्यासाठी भाजपने विविध योजना आखल्याचे सांगून महिलांचा आत्मसन्मान राखणारा पक्ष म्हणजेच भाजप असल्याचे सांगितले.
स्वच्छ राजकारणासाठी महिलांनी पुढे यावे : पार्सेकर
गोव्याच्या उज्वल भवितव्यासाठी गोव्यातील बरबटलेले राजकारण स्वच्छ करणे गरजेचे आहे. व त्यासाठी भ्रष्ट कॉंग्रेस व भ्रष्ट कॉंग्रेस नेत्यांना मांडवीत बुडवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या प्रसंगी बोलताना केले.
प्रा. गोविंद पर्वतकर, वैदेही नाईक, शुभदा सावईकर, उल्का गावस, मनीषा नाईक आदींनी आपले विचार व्यक्त केले.
स्मृती इराणी यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी भाजपच्या पणजीतील महिला नगरसेविका व विविध मतदारसंघाच्या महिला पदाधिकारी यांचा गुलाबपुष्प देऊन इराणी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. उत्तर गोवा अध्यक्षा स्वाती जोशी व दक्षिण गोवा अध्यक्षा कृष्णी वाळके यांनी जिल्हा समित्यांची यावेळी घोषणा केली. स्वागत कुंदा चोडणकर यांनी केले. देवबाला भिसे यांनी सूत्रनिवेदन केले. तर शिल्पा नाईक यांनी आभार व्यक्त केले.

गोमेकॉतील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाची चौकशी होणार

प्रसूतीवेळी अर्भकांना गंभीर इजा
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) काल दि.२० रोजी प्रसूतीवेळी शस्त्रक्रिया करताना तीन बालके शस्त्रे लागून जखमी झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार असून सदर घटनेचा अहवाल ४८ तासांत देण्याचे आदेश गोमेकॉचे अधीक्षक डॉ. राजन कुंकळ्येकर यांनी प्रसूती विभाग शस्त्रक्रिया प्रमुखांना बजावले आहेत. या प्रकारामुळे गोमेकॉसह सर्वत्र हलकल्लोळ माजला असून निष्काळजीपणे शस्त्रक्रिया करून तीन बालकांना जखमी करणार्‍या डॉक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या बाबत सविस्तर हकिगत अशी की, काल दुपारी ३ व ५ वाजता आणि सकाळी ११ वाजता या वेळेत तीन महिला प्रसूत झाल्या. यावेळी तिन्ही महिलांच्या शस्त्रक्रिया करत प्रसूती करावी लागली. मात्र या शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरच्या निष्काळजीमुळे जन्मलेली ही तिन्ही बालके (मुली) शस्त्र लागून जखमी झाली. एका बालकाच्या तर उजव्या हाताची तीन बोटेच छाटली गेली. दुसर्‍याच्या गालाला जखम झाली तर तिसर्‍या बालकाची पाठ कापली गेली.
याबाबत गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजन कुंकळ्येकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी प्रसूती केंद्राच्या शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. सविता चंद्रा यांना या घटनेची सविस्तर माहिती त्या बालकांच्या सर्व कागदपत्रांसह ४८ तासांत आपणाकडे सुपूर्त करण्याचा आदेश दिल्याचे सांगितले. सदर कागदपत्रे हाती येताच गोमेकॉचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल यांच्याशी विचारविनिमय करून याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येणार आहे. सध्या ती तिन्ही बालके सुखरूप असल्याचे डॉ. कुंकळ्येकर यांनी सांगितले.
शस्त्रक्रिया करते वेळी सदर डॉक्टरने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाल्यास त्याला कोणती शिक्षा होईल असे विचारले असता डॉ. कुंकळ्येकर यांनी, अशी घटना पहिल्यांदाच गोमेकॉत घडली असून जर निष्काळजीपणा सिद्ध झाला तर आवश्यक ती कारवाई सदर डॉक्टरवर नक्कीच होईल असे डॉ. कुंकळ्येकर यांनी सांगितले. मात्र अमुकच कारवाई करावी असा कोणताही कायदा नसल्याचे ते म्हणाले. तसेच वरील तिन्ही महिलांवर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर एकदम नवोदित नव्हते तर या पूर्वी त्यांनी प्रसूती शस्त्रक्रिया केली होती असे डॉ. कुंकळ्येकर पुढे म्हणाले. जोपर्यंत आपल्या हातात सदर घटनेची कागदपत्रे येत नाहीत तोपर्यंत आपण या बाबत ठोस काहीही सांगू शकत नाही असे ते शेवटी म्हणाले.
आरोग्यमंत्र्यांकडून दखल नाही
गोमेकॉत एवढी गंभीर घटना घडूनही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज दुपारपर्यंत या घटनेची दखल घेतली नव्हती. यामुळे अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत असून गोमेकॉची बदनामी टाळण्यासाठी सदर गंभीर घटना वरिष्ठ पातळीवरून दाबण्याचे प्रकार सुरू असल्याचे कळते.
या गंभीर घटनेत वास्को येथील प्राप्ती प्रकाश कांबळी या महिलेच्या मुलीच्या उजव्या हाताची तीन बोटे कापण्यात आली होती. त्यातील एक बोट जोडण्यात आले आहे. श्री. कांबळी हे या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करणार असल्याचे बोलले जात होते मात्र आज दि.२१ रोजी संध्याकाळपर्यंत या प्रकरणी त्यांनी तशी तक्रार केली नव्हती.
गोमेकॉतील या गंभीर घटनेची दखल अनेक स्वयंसेवी संस्था व जागृत नागरिकांनी घेतली असून या घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कावरेत खाणवाहतूक रोखली

कुडचडे,दि. २१ (प्रतिनिधी): ट्रकचालकांच्या मनमानीनंतर सुमारे आठवडाभर बंद ठेवण्यात आलेली खनिज वाहतूक रिवण भागातून पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने आज सुमारे १०० पेक्षा जास्त कावरे नागरिकांनी संपूर्ण खाण मालवाहतूक रोखली.
आज सकाळी खाण मालवाहतुकीसाठी माल भरून रांगेत उभ्या असलेल्या ट्रकांना कावरेवासीयांनी अडवून वाहतूक करण्यास मनाई केली. यापूर्वी ट्रक चालकांनी बरीच मनमानी केल्यामुळे ग्रामस्थांच्या मनात उद्रेक झाला होता. त्यामुळे आठवडाभर खाण वाहतूक रोखून ठेवली होती. त्यामुळे मालवाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आज सदर स्थिती पुन्हा उद्भवल्याने येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे उपजिल्हाधिकारी आग्नेल फर्नांडिस, मामलेदार सुदिन नातू, उपअधीक्षक रोहिदास पत्रे, पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर, भानुदास देसाई, राजू राऊत घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी सर्व ट्रक खाण कंपनीत पुन्हा माघारी पाठवले. त्यामुळे तणाव निवळला.

क्रीडागुणांचा लाभ देणे हा आमचा अधिकारच

गोवा हायकिंग असोसिएशनची माहिती
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): गोवा सरकारतर्फे क्रीडा धोरणांतर्गत देण्यात येणार्‍या क्रीडागुणांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देणे हा आमचा अधिकार आहे. गेले ३१ वर्षे आम्ही विविध पदभ्रमण मोहिमा आयोजित करत असून गोवा क्रीडा प्राधिकरणाचे आम्हाला याकामी सहकार्य मिळत आहे. पदभ्रमण मोहीम वाटते तेवढी सोपी नसते. त्यात तुमचा शारीरिक व मानसिक कस लागतो, अशी माहिती गोवा हायकिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली. ते आज येथे पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष विश्‍वास कदम, सचिव मंगिरिष पै व मान्यवर उपस्थित होते.
आजच एका दैनिकात (‘गोवादूत’ नव्हे) पदभ्रमण करून १५ गुण मिळवा अशी उपहासात्मक बातमी प्रसिद्ध झाली आहे. यामागे जी मंडळळी आहेत, त्यांनी आधी क्रीडा धोरणाचा अभ्यास करावा, आम्ही आयोजित केलेल्या पदभ्रमण मोहिमेत भाग घ्यावा आणि मगच टीका करावी असे श्री. कामत म्हणाले. यंदा पदभ्रमण मोहिमेत सहभागी होऊन यशस्वी झालेल्या २३० विद्यार्थ्यांना १५ क्रीडा गुणांचा लाभ झाला आहे. ज्यांना हा लाभ मिळाला नाही, त्यांचे प्रतिनिधी या विरोधात आवाज उठवत आहे. आम्ही आयोजित केलेले पदभ्रमण शिबिरे ‘कठीण’ या सदरात मोडणारी आहेत. रॉक क्लायंबिंग, रोप स्केपिंग, रिव्हर क्रॉसिंग यासह विविध आव्हानात्मक प्रकारांचा यात समावेश आहे. क्रीडा धोरणात राज्य पातळीवरील ‘खेळ’ या प्रकारासाठी १५ गुण दिले जातात. आमची शिबिरे याच सदरातील आहेत. त्यामुळे १५ गुण दिले म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याची गरज नाही, असेही श्री. कामत म्हणाले. येत्या १ मे रोजी मेगळगंज येथे राष्ट्रीय पदभ्रमण मोहीम आणि ९ व १० रोजी हिमालयात पदभ्रमण मोहीम आयोजिण्यात आली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
अनेक माध्यमिक विद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना आमच्यातर्फे देण्यात आलेल्या प्रशस्तीपत्रकाच्या आधारे क्रीडागुण दिले आहेत. मात्र काही मोजक्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांनी विद्यार्थ्यांना याचा लाभ दिला नाही. त्या विद्यालयांनी क्रीडा धोरणाचा लाभ घ्यावा. आमच्या खेळ प्रकाराला गोवा क्रीडा प्राधिकरणाची मान्यता लाभली आहे, असेही श्री. कामत यांनी स्पष्ट केले.

Thursday 21 April, 2011

बससंघटनेच्या अचानक बंदने पणजीत शेकडो प्रवासी वेठीस

सुदीप ताम्हणकरांसह १६जणांना अटक
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): वाहतूक खात्याने काल ३४४ बसेसना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्याने आणि ५० बसेसचे तात्पुरते असलेले परवाने रद्द केल्याने आज अचानक अखिल गोवा प्रवासी बस मालक संघटनेने सुमारे अर्धा तास बसेस बंद ठेवतप्रवाशांना वेठीस धरले. त्यामुळे आज सायंकाळी पणजी बसस्थानकावर शेकडो प्रवासी अडकून पडले. प्रवाशांना वेठीस धरून बसस्थानकावर गदारोळ माजवल्याने संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर यांच्यासह १५ बसचालकांना अटक करण्यात आली. तर, पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रवाशांना घेऊन जाण्यास तयार असलेल्या बसेस पोलिस पहार्‍याने सोडण्यात आल्या. यावेळी पणजी बस स्थानकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर व पोलिस निरीक्षक रमेश गावकर हे बस चालकांना जबरदस्तीने बसमध्ये चढून प्रवाशांना घेऊन जाण्यास भाग पाडत होते.
दरम्यान, वाहतूक संचालक अरुण देसाई यांना घेराव घालण्यासाठी गेलेल्या प्रवासी बस मालक संघटनेच्या सदस्यांनी वर्तमानपत्राच्या छायाचित्रकारांना शिवीगाळ केल्याने सुदीप ताम्हणकर यांच्यासह अन्य सदस्यांवर पोलिस तक्रार करण्यात आली आहे. रात्री या सर्वांना अटक करुन वैद्यकीय चाचणीसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले होते. अटक केलेल्यांवर पत्रकारांना शिवीगाळ, वाहतूक संचालकांना धमकी व प्रवाशांना आपल्या मागण्यांसाठी वेठीस धरण्याचा गुन्हे नोंद केले आहेत.
बसमालक-पत्रकारांत ‘तू तू मै मै’
‘एस्मा कायदा’ लागू असतानाही बस मालक संघटनेने बंद पाळल्याने काल रस्ता वाहतूक प्राधिकरणाने संपात सहभागी झालेल्या ३४४ बसेसना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. तर, ५० बसेसचा परवाना रद्द केला होता. याकारवाईने भेदरलेल्या बस संघटनेच्या नेत्यांनी आज दि.२० रोजी अचानक दुपारी ३.२० च्या सुमारास वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्या कार्यालयात घुसत त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी विशेषतः छायाचित्रकारांनी या प्रसंगाची छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दि.१५ रोजीच्या बंदच्या बातम्या देताना वर्तमानपत्रांनी पक्षपाती भूमिका घेतली असा आरोप करत काही बसमालकांनी पत्रकारांना दुरुत्तरे केली. त्याचवेळी तेथे पोलिस दाखल झाले. या प्रसंगी वाहतूक संचालकांनी बसमालकांना एका तासाने भेटण्यास बोलावले. तेवढ्यात तेथे आणखी काही पत्रकार आले. यावेळी बसमालक व पत्रकारांत बराच वेळ ‘तू तू मै मै’ झाली. पत्रकारांनी गुजचे अध्यक्ष प्रकाश कामत यांच्यासह वाहतूक संचालकांची भेट घेऊन त्यांना बसमालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली. तर श्री. ताम्हणकर व अन्य बस मालकांनी श्री. देसाई यांच्याकडे या नोटिसा मागे घेण्याची मागणी केली. परंतु, त्या नोटिसा रस्ता वाहतूक प्राधिकरणाने बजावल्याने आपण काहीच करू शकत नसल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संतापलेल्या बस मालकांनी अचानक बसेसची वाहतूक बंद केली. कार्यालय सुटण्याच्यावेळी बसेसची वाहतूक बंद झाल्याने प्रवाशांचे बरेच हाल झाले.

अनिल अंबानी, पवारही गोत्यात?

२ जीस्पेक्ट्रम घोटाळा
नवी दिल्ली, दि. २० (रवींद्र दाणी): २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात आज अनिल धीरुभाई अंबानी समूहाच्या तिघा तर डीबी रियालिटीच्या दुसर्‍या अधिकार्‍यास अटक झाल्यानंतर अनिल अंबानी व केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरद पवार यांच्याभोवतालचा ङ्गास आवळला जाऊ लागला असल्याचे मानले जात आहे.
स्पेक्ट्रम घोटाळ्यात प्रथमच अंबानी समूहाच्या अधिकार्‍यांना अटक झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अनिल अंबानी यांनाही चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात बोलविण्यात आले होते. या समूहाच्या तिघा अधिकार्‍यांना आज अटक झाल्यानंतर अनिल अंबानी यांच्या समस्या वाढण्याची शक्यता असल्याचे मानले जाते.
दुसरीकडे डीबी रियालिटीचे विनोद गोयंका यांची अटक पवार यांच्यासाठी धोक्याचा इशारा मानला जातो. स्पेक्ट्रम घोटाळ्यात अटक होणारे गोयंका हे पवार यांचे दुसरे मित्र आहेत. डीबी रियालिटीचे शाहिद बलवा यांना यापूर्वीच अटक झाली असून ते तिहार कारागृहात आहेत.
मुंबईतील डीबी रियालिटी या कंपनीशी शरद पवार यांचे ङ्गार जवळचे संबंध असल्याची माहिती टाटा समूहाच्या लॉबिस्ट नीरा राडिया यांनी सीबीआयला दिली आहे. या माहितीचा वापर सीबीआयने न्यायालयात केला आहे.
दिल्लीतील एका स्थानिक न्यायालयाने आज डीबी रियालिटीचे विनोद गोयंका यांना अटक केल्यानंतर, पवार यांची संकटे वाढतील असे मानले जाते. या घोटाळ्याशी द्रमुक नेते करुणानिधी व शरद पवार यांचा ङ्गार जवळचा संबंध असल्याचे सीबीआयला वाटत आहे.
तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने सीबीआयला करुणानिधींची मुलगी कानीमोझीविरुध्द कारवाई करण्याची परवानगी दिली नव्हती. तेथील निवडणुका आटोपताच कानीमोझीविरुद्धकारवाई होईल, असे मानले जाते.
डीबी रियालिटीविरुद्ध कारवाई सुरू करून सीबीआयने पवार यांना योग्य तो संकेत दिला आहे. पवार यांच्याविरुद्धही कारवाई सुरू होईल काय, याचे उत्तर योग्य वेळी मिळेल असे सीबीआयमधून सांगितले जात आहे.
आरोपींना१४ दिवसांची कोठडी
नवी दिल्ली, दि. २० : टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी आज विशेष न्यायालयाने विनोद गोएंकांसह पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष सीबीआय न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी हे आदेश दिले. या पाच जणांनी जामीन अर्ज दाखल केला होता. तो ङ्गेटाळून लावत न्यायाधीशांनी त्यांना कोठडीत पाठविले.
स्वान टेलिकॉमचे संचालक विनोद गोएंका, युनिटेकचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा, अनिल धीरूभाई अंबानी समूहातील गौतम दोशी, हरी नायर आणि सुरेंद्र पिपारा यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सर्वांची तिहार कारागृहात रवानगी केली जाणार आहे.
टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी सीबीआयने तयार केलेल्या ८० हजार पानांच्या आरोपपत्रामध्ये या पाच जणांची नावे आहेत. पण, त्यांना आजवर अटक झाली नव्हती. आता कोर्टाने अर्ज ङ्गेटाळल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
आता हायकोर्टात धाव
सीबीआय कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींनी या निर्णयाला लगेचच दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.
सीबीआय कोर्टाने या पाचही जणांना जामीन न देण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना अटक करून तिहार कारागृहात पाठविण्यात आले. दरम्यान, त्यांच्या जामीनाचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल झाला आहे. न्या. विक्रमजीत सेन आणि सिद्धार्थ मृदूल यांच्या न्यायासनासमोर हा अर्ज दाखल झाला. उद्या यावर सुनावणी होणार आहे.

जि. प. सदस्य अधिकारप्रकरणी सरकारविरोधात याचिका दाखल करणार

विकासनिधी वाढवण्याचे श्रीपाद नाईक यांचे आश्‍वासन
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): जिल्हा पंच सदस्यांना अधिकार देण्यास राज्य सरकार चालढकल करीत असल्याने सरकारच्या विरोधात अवमान याचिका सादर केली जाणार असल्याची माहिती आज जिल्हा पंचायत समितीचे अध्यक्ष पांडुरंग परब यांनी दिली.येत्या मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ही अवमान याचिका सादर करण्याचा निर्णय आज सचिवालयात झालेल्या जिल्हा पंच सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी सर्व मतदारसंघातील जिल्हा पंच सदस्यांना खासदार निधीतून शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यासाठी १४ ते १५ लाख रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यास निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.
जिल्हा पंचायत सदस्य अधिकारांबाबत बोलताना बैठकीनंतर पत्रकारांना अध्यक्ष श्री. परब यांनी सांगितले की, जिल्हा पंचायत समिती स्थापन झाल्यापासून राज्य सरकारने त्यांची फसवणूक केली आहे. अधिकार असूनही त्यांना ते बहाल केले जात नाहीत. गेल्यावेळी सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जिल्हा पंचायत समितीच्या मागणीवर विधानसभेत चर्चा करून त्यांना अधिकार बहाल करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, या विधानसभेत सरकारने या पंच सदस्यांना अधिकार देण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याने सरकारच्या विरोधात न्यायालयात अवमान याचिका केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उत्तर व दक्षिण गोव्याच्या जिल्हा पंच सदस्यांनी विधानसभेवर मोर्चा काढून आपल्या विविध मागण्या मान्य करण्याचे निवेदन सागर केले होते, त्यावरही सरकारने अद्याप निर्णय घेतला नसल्याने त्याही विषयावर चर्चा करण्यात आली.
खासदार नाईक यांनी सदर शैक्षणिक प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवण्याची सूचना सर्व पंच सदस्यांना केली. तसेच, मतदार जिल्हा पंच सदस्यांकडूनही विकासकामाची अपेक्षा बाळगत असल्याने सरकारने त्यांना किमान ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यासाठी आपणही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्र लिहून शिफारस करणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले.
पहिल्यांदाच एका खासदाराने जिल्हा पंच सदस्यांच्या बैठकीत उपस्थित राहून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिल्याने यावेेळी खासदार नाईक यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रत्येक पंचसदस्यांना विकासासाठी सरकारकडून केवळ १३ लाख ५० हजार रुपये उपलब्ध करून दिले जातात. यावेळी हा निधी १८ लाख रुपये देण्यात आला आहे. परंतु, एवढ्या तुटपुंज्या निधीत कोणतेही विकासकाम हाती घेता येत नसल्याची अडचण यावेळी पंचसदस्यांनी मांडली.

प्रदूषणामुळे साळ नदीचे पाणी ‘काळे’

• साफसफाईसाठी पंधरवड्याची मुदत
मडगाव, दि. २० (प्रतिनिधी): केवळ मडगाव -नावेलीचीच नव्हे तर संपूर्ण सासष्टीची जीवन वाहिनी मानल्या जाणार्‍या साळ नदीतील वाढत्या प्रदूषणाची झळ पोहोचलेल्या सिकेटी-नावेलीतील लोकांनी आज सकाळी येथे साळ नदीच्या पात्राची विविध भागात जाऊन पाहणी केली व तेथील असह्य प्रदूषणाची सद्यःस्थिती पत्रकारांना दाखवली. या प्रदूषणामुळे नदीकाठावरील लोकांना राहणे अशक्य झाल्याचे सांगून नदीतील साफसफाईसाठी पंधरा दिवसांची मुदत दिली. या मुदतीत नदीचे पात्र साफ न केल्यास मडगाव शहरातून सांडपाणी घेऊन येणारा नाला नावेलीच्या वेशीवर अडविण्याचा इशारा मुख्य सचिवांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
पूर्वी या नदीच्या पात्रातील पाण्याचा वापर केवळ मासेमारीसाठीच नव्हे तर कृषीलागवड,
मीठ उत्पादन यासाठीही केला जात होता. पण गेल्या काही वर्षांत मडगाव शहर व परिसरातील सांडपाणी व मैला तसेच इमारती व हॉटेलातील कचरा नदीत टाकला जाऊ लागला. आज त्याचे प्रमाण इतके वाढले आहे की ते मर्यादेबाहेर पोहोचले आहे. पूर्वी खारेबांधला टाकला जाणारा हा कचरा आता तेथून २ कि. मी. वर असलेल्या सिकेटी-नावेलीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तेथे नदीचे पाणी काळे बनले असून त्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. बाणावली पुलाचे काम करताना नदीच्या पात्रात केलेल्या अडथळ्यामुळे तेथे गाळ साचून पात्र उथळ बनले आहे. त्या गाळावर प्लास्टिक कचरा व अन्य वस्तू येऊन अडकल्याने पाण्याचा प्रवाह अडखळला असून त्याची परिणती जलप्रदूषणात झालेली आहे. सदर ठिकाणी प्रथम स्थानिक लोक कपडे धूत होते. तसेच आंघोळही करीत होते परंतु या प्रदूषणामुळे लोकांनी तेथे कपडे धुणे व आंघोळ करणेही बंद केले आहे. तसेच त्यांनी संबंधित सरकारी यंत्रणांनाही त्याची कल्पना दिली आहे पण अजून त्याची कोणीच दखल न घेतल्याने ग्रामस्थ खवळले असून त्यांनी प्रत्यक्ष कृतीचा इशारा दिला आहे.
ग्रामस्थांनी मडगावची भूमिगत मलनिस्सारण योजना सपशेल फसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते तिची आखणी व कार्यवाही सदोष आहे. त्यामुळे त्या वाहिनीत जमिनीतील पाणी घुसून वाहिनी फुटते. त्यामुळे सर्व घाण बाहेर येऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन परिसरातील शेतीत, जलस्रोतात व शेवटी नदीत जाते असे म्हटले आहे.
सदर प्रकल्पाची क्षमता ७.५ एमएलडीची आहे पण गेली अनेक वर्षे त्याला २.५ एमएलडी कच्चा सीवेजच पुरविला जातो. याचाच अर्थ उरलेला सीवेज वेगवेगळ्या मार्गाने साळ नदीत जातो हे उघड आहे असे निदर्शनास आणून दिले आहे व सरकारी यंत्रणेचा हा निष्काळजीपणा असल्याचा ठपका ठेवला आहे.
सध्या अस्तित्वात मलनिस्सारण प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे टाळून संबंधित त्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या निमित्ताने नावेलीतील आणखी ३ लाख चौ. मी. शेतजमीन संपादन करण्याचा सरकारचा डाव हा नवनवीन कंत्राटे बहाल करून सरकारी निधीचा अपव्यय करण्यासाठीच असल्याचा आरोप सदर निवेदनात करण्यात आला आहे.

खारीवाडावासीयांच्या मागण्यांचे केंद्रीय उद्योगमंत्र्यांना निवेदन

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): खारीवाड्यावरील लोकांच्या मागण्या घेऊन गेलेल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळाने आज केंद्रीय जहाज व उद्योगमंत्री मुकूल वासनीक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी आपण आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे आश्‍वासन यावेळी केंद्रीय मंत्री वासनीक यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला दिले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्त्वाखाली पर्यटन मंत्री नीळकंठ हळर्णकर, विरोधी पक्षाचे उपनेते फ्रान्सिस डिसोझा, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक व दक्षिण गोवा खासदार फ्रान्सिस सार्दीन यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
खारीवाड्यावरील लोकांच्या घरांना संरक्षण देऊन ती घरे त्यांच्या नावावर करुन द्यावीत. तसेच, घरे असलेली जमीन ही ‘एमपीटी’ची नाही, असा दावा या सर्वपक्षीय दलाने करुन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी ‘एमपीटी’चे अध्यक्ष पी. मारा पंडियन हेही चर्चेच्यावेळी उपस्थित होते. खारीवाड्यावरील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष गोव्याला भेट देण्याचेही निमंत्रण यावेळी श्री. वासनीक यांना देण्यात आले अशी माहिती सूत्रांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशानंतर खारीवाड्यावरील काही घरे पाडण्यात आली आहे. तर, काही घरांनी प्रशासकीय न्यायालयात जाऊन त्यावर स्थगिती मिळवलेली आहे. येथील लोकांनी या कारवाईच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडलेले आहे.

तबरेजचा मृतदेह नातेवाईकांनी स्वीकारला

• रत्नागिरीत संचारबंदी
रत्नागिरी, दि. २० : रत्नागिरी - जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलनावेळी पोलिस गोळीबारात मृत्युमुखी पडलेला तरूण तबरेज अब्दुल्ला सेहकर याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी आज (बुधवारी) स्वीकारला. तबरेजच्या नातेवाईकांच्या तीन मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य झाल्याने त्याच्या कुटुंबियांना हा निर्णय घेतला.
सोमवारी आंदोलनावेळी तबरेजचा मृत्यू झाला होता. यानंतर याचे पडसाद उमटत मंगळवारी त्याच्या शव विच्छेदनावेळी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाची तोडफोड करून त्याच्या नातेवाईकांनी शव ताब्यात घेण्यास नकार दर्शविला होता. आज अखेर सेहकर कुटुंबियांनी त्याचा मृतदेह स्वीकारण्यास तयारी दर्शविली. या घटनेमुळे रत्नागिरीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

टीव्हीप्रकरणी राज्यपालांच्या वाहनचालकांना हटवले

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): पणजी महापालिका निवडणुकीच्या काळात बाबूश मोन्सेरात यांच्या गटाकडून दूरदर्शन संच घेतल्याप्रकरणी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांचे वाहन चालक व साहाय्यक वाहन चालक या दोघांनाही चालक पदावरून हटवण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी काही दिवसांपूर्वीच या विषयी राज्यपालांकडे तक्रार केली होती. यावरून राज्यपालांनी पोलिस अधीक्षक बास्को जॉर्ज यांच्याकडे या चौकशीची सूत्रे दिली होती. हे दोन्ही चालक प्रथमदर्शनी या प्रकरणात दोषी आढळले असून चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना या पदावरून हटवण्यात आले आहे. हा विषय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजला होता. त्यावेळी मोन्सेरात यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे राज्यपालांपर्यंत पोहोचल्याचा आरोप श्री. पर्रीकर यांनी केला होता. त्यामुळे या आरोपाला पुष्टी मिळाली असून राज्यपालांनी याबाबत पावले उचलत ही कारवाई केल्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजते.

Wednesday 20 April, 2011

जैतापूर पेटले..

• शिवसैनिकांचा ‘राडा’
• अनेक बसेस फोडल्या
• न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी
• रत्नागिरीमध्ये जमावबंदी
• शहरातील बाजारपेठा बंद
• सर्वत्र कडेकोट बंदोबस्त


जैतापूर, दि. १९ : शिवसेनेने पुकारलेल्या रत्नागिरी ‘बंद’च्या निमित्ताने सुरू असलेली दगडङ्गेक, वाहतूकबंदी, व्यवहार ठप्प अशा पार्श्‍वभूमीवर कलम १४४ अनुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. फ्रान्समधील ‘डाऊ’ कंपनीच्या सहकार्याने जैतापूर येथे होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील तबरेज सेजकर नामक आंदोलकाचा सोमवारी मत्यू झाल्यावर आज शिवसेनेने रत्नागिरी शहरात ‘राडा’ सुरू केला आहे. दरम्यान, न्यायदंडाधिकार्‍यांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली.
रत्नागिरी ‘बंद’च्या समर्थनासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. शहरात अनेक बसेसच्या काचा ङ्गोडण्यात आल्या. रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावर टायर पेटवण्यात आले. शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केली आहे.
संतापलेल्या आंदोलकांनी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही ‘राडा’ करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी पोलिसांच्या गोळीबारात तबरेज या आंदोलकाचा मृत्यू झाला होता. मात्र आंदोलकांनी आज रुग्णालयात गोंधळ घालून त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ दिले नाही. तरबेज याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आंदोलकांनी काही मागण्या केल्या आहेत त्यात शवविच्छेदनाचे व्हिडीओ शूटिंग व्हावे, याप्रसंगी मानवाधिकार संघटनेचा प्रतिनिधी हजर रहावा, तबरेज याच्यावर एकच गोळी झाडली गेली तर आता त्या दोन कशा सांगितल्या जात आहेत, याचे स्पष्टीकरण केले जावे, गोळीबाराचे आदेश देणारे प्रांताधिकारी अजित पवार यांना निलंबित करा यांचा समावेश आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाचा परिसर बंद करण्यात आला आहे.
दंडाधिकार्‍यांमार्फत चौकशी होणार
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या मच्छिमारांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची दंडाधिकार्‍यांमार्ङ्गत चौकशी करण्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानसभेत केली. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते का, याचीही चौकशी केली जाईल असे गृहमंत्री म्हणाले.
जैतापूरमध्ये संतप्त मच्छिमारांनी साखरीनाटे गावातील पोलिस ठाण्यावर काल हल्ला केला. गावकर्‍यांनी पोलिस चौकी पेटवून दिली, तसेच कागदपत्रांची नासधूस केली. तेव्हा आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात तबरेज सेजकर या मच्छिमाराचा मृत्यू झाला. त्यामुळे जैतापूरमधील संघर्ष आणखीच चिघळला आहे.
अपेक्षेप्रमाणे जैतापूर गोळीबार प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळातही उमटले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली.
जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलनात शिवसेनेने जोरदार भाग घेतला आहे. तबरेजच्या बलिदानाची किंमत सरकारला चुकवावी लागेल, असा इशारा देतानाच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन घरी जावे, असे जळजळीत वक्तव्य शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

संपात सहभागी झालेल्या ५० बसेसचे परवाने रद्द

• ३४४ बसेसना कारणे दाखवा नोटीस
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): एस्मा धुडकावून संपावर गेलेल्या ५० बसेसचे तात्पुरते परवाने रद्द केले आहेत.तर ३४४ बसेसना आज वाहतूक खात्याने कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. एकूण ३९४ बसेसवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आज वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक अशोक भोसले यांनी दिली.
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने गेल्या १५ एप्रिल रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बंद पुकारला होता. हा बंद मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने एस्मा कायदा लावला होता. परंतु, ‘एस्मा’ला न जुमानता संघटनेने बंद पाळला होता. या बंदमध्ये सहभागी झालेल्या बसेसवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे पुन्हा एकदा बस मालक संघटना आणि वाहतूक खाते यांच्यामधील वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारतर्फे लागू केलेला एस्मा आम्हांला लागत नसल्याचा दावा बस मालक संघटनेने केला आहे.
वाहतूक अधिकारी श्री. भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हापसा येथील ३५, वास्को ३२, केपे ५, फोंडा ८६, डिचोली ४५, पणजी ९० व मडगाव येथील १०१ बस मालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्या आहेत. तर, यातील ५० बसेसचा परवाना रद्द केला आहे. येत्या आठ दिवसात त्यांना या कारणे दाखवा नोटिसांवर उत्तर देण्याचे आदेश दिले असून बस मालकांकडून सादर होणार्‍या उत्तरावर सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती श्री. भोसले यांनी दिली. ही सुनावणी रस्ता वाहतूक प्राधिकरणासमोर घेतली जाणार आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष हे उपजिल्हाधिकारी तर, सदस्य सचिव म्हणून वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक असल्याचीही त्यांनी सांगितले.
या रस्ता वाहतूक प्राधिकरणावर यापूर्वीच संघटनेने आक्षेप घेतला आहे. या प्राधिकरणावर बस मालक संघटनेचा एकही सदस्य नसल्याने या प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची कोणतीही माहिती मिळत नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच, प्राधिकरण निर्णय घेताना बस मालकांना विश्‍वासात घेत नाही. त्यामुळे या प्राधिकरणाच्या समितीवर संघटनेच्या एका पदाधिकार्‍याची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘दम मारो दम’ चित्रपटावर लखनौमध्ये याचिका दाखल

• गोवा सरकारची समितीच गायब
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवर्‍यात सापडलेला ‘दम मारो दम’ हा चित्रपट मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातून सहीसलामत सुटूनही आतालखनौ उच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडला आहे. ‘दम मारो दम’ हा चित्रपट अमली पदार्थाच्या सेवनाला प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा करून आता लखनौ येथील दोन तरुणांनी याचिका सादर केली आहे. येथील दोन तरुणांनी केलेल्या या याचिकेची दखल घेत लखनौ उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. तसेच, या नोटिशीवर येत्या तीन आठवड्यात उत्तर देण्याची मुदत दिली आहे.
दरम्यान, प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट पाहून त्यावर अहवाल सादर करणारी गोवा राज्य सरकारची समितीच गायब झाली आहे. दि. १८ रोजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी स्थापन केलेली समिती हा चित्रपट पाहून त्यावर आपला अहवाल सादर करणार होती. परंतु, या समितीचे अध्यक्ष तथा माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव राजीव वर्मा राज्याबाहेर असल्याने हा चित्रपट पाहू शकत नसल्याचे माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक मिनीन पिरीस यांनी सांगितले. तसेच, या चित्रपटाच्या ट्रेलरला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हिरवा कंदील दाखवल्याने तो चित्रपट पाहण्याचा प्रश्‍न येत नसल्याचे श्री. पिरीस यांनी म्हटले आहे.
तसेच, या चित्रपटाच्या वितरणाचे काम पाहणार्‍या फॉक्स स्टार स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड यांनी समितीचे सर्व सदस्य असतानाच चित्रपट दाखवणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विविध स्तरावरून विरोध होऊनही येत्या २२ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
लखनौ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एफ. रिबेलो व न्यायाधीश देवेंद्रकुमार अरोरा यांच्या खंडपीठासमोर रोहित त्रिपाठी व त्रिपुरेश त्रिपाठी यांनी ही याचिका सादर केली आहे. या चित्रपटाचे नाव बदल्याचीही सूचना चित्रपटाच्या निर्मात्यांनी करावी, अशी मागणी या याचिकादारांनी केली आहे.

झुआरीनगरप्रकरणी कसून तपास सुरू

वास्को, दि. १९(प्रतिनिधी): झुआरीनगर येथे काल झालेल्या भीषण स्फोटाबाबत मुरगावचे उपजिल्हाधिकारी कसून तपास करीत आहेत. कालच्या स्फोटात एकूण ४० वाहने खाक झाल्याचे उघड झाले असून यात गंभीर जखमी झालेल्या तिघांचीही स्थती तशीच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काल (दि.१८) ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड’च्या बाहेर घडलेल्या भीषण घटनेची आज वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांकडून जोरात चौकशी चालू आहे. बिर्ला, झुआरीनगर येथे असलेल्या ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड’ च्या बाहेरील खुल्या जागेत दाभाळ ते ‘झुआरी ऍग्रो’ पर्यंत जमिनीखालून नवीन गॅस वाहिनी घालण्यासाठी जे.सी.बी मशीनद्वारे खोदकाम चालू असताना येथे असलेली अंतर्गत नाफ्ताची वाहिनी फुटल्याने भयंकर असा स्फोट झाला होता. मुरगावचे उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांच्याशी आज सदर प्रकाराबाबत संपर्क साधला असता त्यांनी काल घडलेल्या ह्या भयंकर घटनेची तपशीलवार चौकशी चालू असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसांत ह्या घटनेचे मूळ कारण उघड होणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अजूनपर्यंतच्या तपासात निष्काळजीपणाने सदर घटना घडल्याचे दिसून आले असून मूळ चूक कोणाची हे तपासानंतर कळणार असल्याचे ते म्हणाले.
पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी यावेळी ह्या प्रकरणाचा तपास चालू असल्याचे सांगितले. कालच्या घटनेत आगीत होरपळलेल्या त्या तिन्ही इसमांची प्रकृती अजून गंभीर असून अजूनपर्यंत त्यांच्या जबान्या नोंद करण्यात आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या जबान्यांनंतर घटनेबाबत अनेक गुपीते उघडी होतील अशी शक्यता श्री. दळवी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘झुआरी ऍग्रो’चे जनसंपर्क अधिकारी आनंद राज्याध्यक्ष यांनी सदर घटनेबाबत पूर्ण तपासणी चालू असल्याची माहिती दिली. काल घडलेल्या घटनेत झालेल्या नुकसानीचा आकडा अजूनपर्यंत स्पष्ट झालेला नसून हा आकडा दोन कोटींच्या आसपास पोहोचेल अशी माहिती त्यांनी दिली.
वास्कोत भीतीचे वातावरण
काल खोदकाम चालू असताना नाफ्ताची अंतर्गत वाहिनी फुटल्याने झालेल्या अपघातानंतर या भागात भीतीचे वातावरणपसरले आहे. ‘टाईम बॉंब’वर असलेल्या मुरगाव तालुक्यात आता ‘गॅसची आणखी एक अंतर्गत वाहिनी येत असल्याने येत्या काळात येथील जनतेला धोका तर होणार नाही ना असा सवाल सध्या ह्या भागात केला जात आहे. सदर वाहिनी ह्या भागातील लोकवस्तीतून येत असल्याची चर्चा सुरू असून लोकांच्या सुरक्षेवर जास्त लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

उसगाव खूनप्रकरणाचा छडा एकास अटक

फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी): कसलये तिस्क उसगाव येथे खून करण्यात आलेल्या शंकर गणपत देसाई (२८) याच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यास फोंडा पोलिसांना यश आले असून या खूनप्रकरणी शंकर याचा मित्र श्रीकांत सखाराम नाईक (२८, तिस्क उसगाव) याला आज (दि.१९) दुपारी अटक करण्यात आली आहे.
शंकर देसाई हा मूळचा कुवेशी कॅसररॉक कर्नाटक येथील रहिवासी असून एका लग्न समारंभानिमित्त १६ एप्रिल रोजी तिस्क उसगाव येथे आला होता. रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी शंकर याचा मृतदेह साईबाग कसलये तिस्क येथे आढळून आला होता. ह्या खून प्रकरणाच्या तपासासाठी फोंडा पोलिसांचे पथक सोमवारी कुवेशी कॅसररॉक कर्नाटक येथे रवाना झाले होते. त्याठिकाणी पोलिसांनी मयत शंकर याची पत्नी व इतरांच्या जबान्या नोंदवून घेतल्या. मात्र, खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी काहीच माहिती न मिळाल्याने पोलिसांनी तिस्क उसगाव येथे चौकशीला सुरुवात केली. १६ एप्रिल रोजी तिस्क उसगाव येथे लग्न समारंभात शंकर याला तिस्क उसगाव परिसरात राहणारे मूळचे कुवेशी कॅसररॉक येथील त्याचे पाच मित्र भेटले. त्यामुळे त्यांनी संध्याकाळी एक पार्टी करण्याचे ठरविले. ह्या पार्टीत मवेत गंगाराम लक्ष्मण देसाई, महेश प्रभाकर शिरोडकर, रोहिदास दाजी नाईक, मनोहर नकुल शिरोडकर, श्रीकांत सखाराम नाईक सहभागी झाले. तिस्क उसगाव येथील एका दारूच्या दुकानात संध्याकाळी ७ ते रात्री ९.३० यावेळेत सर्वांनी नशापान केले. त्यानंतर गंगाराम देसाई आपल्या खोलीवर निघून गेला. पाचही जण महेश यांच्या खोलीवर गेले. त्याठिकाणी महेश, रोहिदास व मनोहर थांबले. शंकर व श्रीकांत आपल्या निवासस्थानी जात असताना अवंतीनगर येथील एका दारूच्या दुकानात दोघेही पुन्हा घुसले व त्याठिकाणी रात्री साडेअकरापर्यंत नशापान केले. नशापान करून घरी जात असताना साईबाग कसलये येथे एका मैदानाजवळ दोघांमध्ये वादावादी झाली. वादावादीचे रूपांतर झटापटीत झाले. त्यात शंकर खाली कोसळला व गतप्राण झाला. त्यानंतर श्रीकांतने शंकरच्या तोंडावर व अंगावर माती टाकून तोे आपल्या खोलीवर निघून गेला, अशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी दिली. कसलये येथे रविवारी एक मृतदेह सापडला त्यावेळी श्रीकांत त्याठिकाणी हजर होता. मात्र, त्याने याप्रकरणी काहीच माहिती दिली नाही. तसेच शंकर याच्या अंत्यसंस्कारालाही कुवेशी गावात गेला होता, असेही निरीक्षक श्री. म्हार्दोळकर यांनी सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात मुळचे कुवेशी (कर्नाटक) गावातील सध्या तिस्क उसगाव परिसरात राहणारे पाच जण पार्टीत सहभागी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पार्टीत सहभागी झालेल्या प्रत्येकाशी संपर्क साधून ह्याप्रकरणी चौकशी करून जबाब नोंदवून घेण्यात आले. १६ एप्रिल रोजी मध्यरात्री शेवटी शंकर व श्रीकांत हे दोघेच एकत्र होते, असे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी श्रीकांत याच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यावेळी त्याने खुनाची कबुली दिली आहे. प्रथम दर्शनी दारूच्या नशेत भांडण होऊन हा खुनाचा प्रकार घडला असावा असे वाटत आहे. ह्या खुनाचे निश्‍चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपासात खुनाचे निश्‍चित कारण बाहेर येऊ शकते, असे निरीक्षक श्री. म्हार्दोळकर यांनी सांगितले. याप्रकरणी अटक केलेल्या श्रीकांत याला बुधवार २० एप्रिल रोजी येथील न्यायालयात उभा करण्यात येणार आहे. तो गेल्या कित्येक वर्षापासून तिस्क येथील एका गॅरेजमध्ये मॅकॅनिक म्हणून कामाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी निरीक्षक श्री. म्हार्दोळकर, उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर, हवालदार सावळो नाईक ऊर्फ एमआरएफ, राजेश नाईक, सतीश पिल्ले यांनी परिश्रम घेतले. उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक श्री. म्हार्दोळकर तपास करीत आहेत.

स्मृती इराणी उद्या गोव्यात

पणजी, दि. १९ : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष स्मृती इराणी गुरुवार दि. २१ एप्रिल रोजी गोवा भेटीवर येत आहेत. राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर इराणी यांचा हा पहिलाच गोवा दौरा आहे. यानिमित्ताने गुरुवार २१ रोजी दुपारी ३ वा. गोमंतक मराठा समाज सभागृह पणजीत गोवा महिला मोर्चा मंडल समिती तसेच भाजप महिला कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, प्रदेश सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा कुंदा चोडणकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात सध्याची राजकीय स्थिती, महिलांच्या समस्या, पक्ष संघटना मजबूत करणे, आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चोडणकर यांनी केले आहे.

जुने गोवे येथे ७ लाखांची चोरी

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): कार्लवाडो जुने गोवे येथे बंद घरात घुसून चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली. याविषयीची पोलिस तक्रार मारिया सिक्वेरा (६५) यांनी जुने गोवे पोलिस स्थानकात नोंद केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
अधिक माहितीनुसार दि. १५ एप्रिल रोजी मारिया यांचे वृद्ध पती आजारी झाल्याने त्यांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे दोन दिवस घर बंद असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरांनी घरातील कपाट फोडून १ मंगळसूत्र, १ हिर्‍याची बांगडी, २ नेकलेस, पोवळे, १४ लहान अंगठ्या, १७ मोठ्या अंगठ्या, १ कॅमेरा व कामीयो सेट असा एकूण सुमारे ७ लाख १४ हजार ८०० रुपयांचा माल चोरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चोरीस गेलेले दागिने मारिया यांच्या विवाहित मुलीचे असून मुलगी विदेशात असते. त्यामुळे मुलीने आपले सर्व दागिने आपल्या आईच्या घरी ठेवले होते अशी माहिती पोलिसांनी दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. याविषयीचा अधिक तपास जुने गोवे पोलिस करीत आहेत.
आकेत अडीच लाखांची चोरी
मडगाव, (प्रतिनिधी): आके विद्युत भवनजवळील मशिदीजवळ प्रसाद नाईक यांचा फ्लॅट फोडून २.५ लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने व रोख रक्कम पळवली. आज सकाळी घरातील मंडळी बाहेर गेली होती. ती संध्याकाळी उशिरा घरी परतली असता सदर घटना उघडकीस आली. सोनसाखळी, लॉकेट, कर्णफुले, मास्केट आदी वस्तू चोरीस गेल्या असून लगेच याबाबत मडगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. अधिक तपास सुरू आहे.

३३२० कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर

गोव्याला २०० कोटींचे जादा पॅकेज
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): नवी दिल्लीत आज झालेल्या नियोजन आयोगाच्या बैठकीत गोव्याच्या ३,३२० कोटी रुपये खर्चाच्या वार्षिक आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. गत वर्षीच्या तुलनेत राज्याच्या वार्षिक योजनेत २२.५१ टक्के वाढ झाली आहे. आयोगाने ६० कोटी रुपयांचे केंद्रीय अर्थसाह्य घोषित करतानाच विशिष्ट प्रकल्पांसाठी राज्यासाठी २०० कोटींचे अतिरिक्त पॅकेजही जाहीर केले आहे.
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यात झालेल्या बैठकीप्रसंगी २०११-१२ या वित्तीय वर्षासाठीचा आराखडा निश्‍चित करण्यात आला. गोवा नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकारी तसेच नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, सौमित्र चौधरी आदी या बैठकीला उपस्थित होते.
अहलुवालिया यांनी या बैठकीत गोव्याच्या एकंदर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना राज्याचा सामाजिक क्षेत्राचा विकासदर राष्ट्रीय विकासदरापेक्षाही सरस असल्याचे मत मांडले. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खाजगी क्षेत्राला विकास प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याच्या राज्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. गोव्याला पर्यटन व तत्संबंधी क्षेत्रात खूप काही करता येण्यासारखे आहे. मात्र त्यासाठी माहिती तंत्रज्ञान व वाहतूक क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी खाजगी भागीदारीला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सर्वांगीण विकासावर अधिक भर देण्याची गरजही अहलुवालिया यांनी व्यक्त केली. कृषी व इतर क्षेत्रांवर विशेष लक्ष देतानाच या क्षेत्रातील सकल घरगुती उत्पादनात घट होत चालली आहे याकडेही त्यांनी अंगुलिनिर्देश केला. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासाच्या प्रयत्नाबद्दल त्यांनी या बैठकीत समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री कामत म्हणाले, हा आराखडा करताना विकासाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवून खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने सामाजिक सुविधा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणे व पर्यटन तसेच अन्य सुविधांचा विकास करण्यावरही भर दिला गेला आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी किनारा व्यवस्थापन पद्धती सक्षम करणे व जीवरक्षकांची नियुक्ती करून पर्यटकांना अधिक सुरक्षा पुरविण्याचा विचार सरकार करत आहे.

Tuesday 19 April, 2011

झुआरीनगरात नाफ्ताचा भडका

३८ वाहने भस्मसात, ५ जखमींपैकी ३ गंभीर; २ कोटींची हानी
वास्को, दि. १८ (प्रतिनिधी): ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड’च्या बाहेर आज सकाळी ‘गॅस ऍथोरिटी ऑफ इंडिया’कडून दाभाळ ते झुआरीपर्यंत अंतर्गत गॅस वाहिनी घालण्यासाठी जेसीबीद्वारे खोदकाम चालू असताना येथून जाणारी नाफ्ता वाहिनी फुटल्याने ह्या भागात भीषण स्फोट झाला. सदर स्फोटात पाच जण गंभीर जखमी झाले असून ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड’च्या बाहेर शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या २८ दुचाक्या, ३ ट्रक, १ टेंपो, ६ चारचाकी व जेसीबी मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोट झाल्यानंतर नाफ्ताच्या वाहिनीत असलेल्या तेलाची गळती चालूच राहिल्याने आग आटोक्यात आणणे कठीण होत असल्याचे दिसून आले तरी सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सदर आगीवर नियंत्रण आणण्यास यश प्राप्त झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सदर वाहिनी बंद असल्याने येथे होणारा संभाव्य अनर्थ टळला आहे.
आज सकाळी ११.२५ च्या सुमारास सदर भीषण स्फोट व आगीची घटना घडली. बिर्ला, झुआरीनगर येथे असलेल्या ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेड’च्या बाहेरील खुल्या जागेत दाभाळ ते ‘झुआरी ऍग्रो’पर्यर्ंंत जमिनीखालून गॅस वाहिनी घालण्यासाठी जेसीबीद्वारे खोदकाम चालू होते. यावेळी जमिनीखालून जाणारी ‘नाफ्ताची’ वाहिनी फुटली. यामुळे प्रचंड स्फोट होऊन सुमारे २५ मीटरव्यासापर्यंत आगीचे लोण पसरले. हा स्फोट झाला तेव्हा तेथील पाच जण आगीत भाजल्याने त्यांना इस्पितळात उपचारासाठी त्वरित दाखल करण्यात आले. यातील दोघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. तर रमाकांत गावकर (४७, रा. केपे), सावियो डिकॉस्ता (रा. शिरोडा) व कैलाश राम (३८, मूळ बिहार) हे या आगीत होरपळल्याने ते गंभीर आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
‘झुआरी ऍग्रो केमिकल्स’ची वाहने उभी करून ठेवलेल्या शेडमध्ये ही आग पोहोचली. यात एकूण ३८ वाहने व जेसीबी मशीन जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच वास्को, वेर्णा, ओल्ड गोवा, मडगाव, पणजी व अग्निशामक दलाच्या मुख्यालयांतून एकूण सात बंब घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्वरित या आगीवर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली. तसेच ‘झुआरी ऍग्रोच्याही बंबांनी धाव घेत आगीवर नियंत्रण आणण्यास प्रारंभ केला. वास्को, वेर्णा पोलिस स्थानकाच्या जवानांनी व दक्षिण गोव्यातून चार पोलिस पटलून व पोलिस अधिकारी पोहोचले.
नाफ्ता वाहिनी फुटल्याने सुरू झालेली गळती थांबवण्यासाठी अग्निशामक दलाच्या एकूण ५९ जवानांनी दलाचे गोवा प्रमुख अशोक मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे पाच तास अथक प्रयत्न केले व शेवटी आगीवर नियंत्रण आणण्यास यश मिळवले. स्फोटानंतर सदर भागात गवत असल्याने आग सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचली. यावेळी दलाच्या जवानांनी ह्या आगीवरही नियंत्रण आणण्यास सुरुवात करत झुआरी ऍग्रोचे कर्मचारी तसेच इतर शेकडो लोकांना ह्या भागातून सुमारे ५०० मीटर दूर पाठवले. या भीषण अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टीन्स, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे तसेच ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स’चे उपाध्यक्ष तथा सी.एफ.ओ विनायक दत्ता, कुठ्ठाळीचे आमदार माविन गुदिन्हो, मुरगावचे मामलेदार, पोलिस उपअधीक्षक तसेच इतर अधिकार्‍यांनी जवानांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, सदर घटनेबाबत अग्निशामक दलाचे राजेंद्र हळदणकर यांच्याशी संपर्क साधला असता पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर नाफ्ता वाहिनी सुमारे दोन महिन्यांपासून बंद असल्याने पुढचा संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगितले. नाफ्ताची वाहिनी बंद असली तरी यात सुमारे ५० टन एवढा नाफ्ता असल्याची माहिती श्री. हळदणकर यांनी दिली. गळती सतत चालू असल्याने आगीच्या भडक्यावर नियंत्रण आणण्यास वेळ लागल्याचे सांगितले. नुकसानाचा नक्की आकडा अजून स्पष्ट झालेला नसला तरी हा आकडा दोन कोटींहून जास्त असल्याची शक्यता श्री. हळदणकर यांनी व्यक्त केली. मुरगावचे उपजिल्हाधिकारी श्री. मार्टीन्स यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांकडून या घटनेची पूर्ण तपासणी करण्याचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती दिली. स्फोट व त्यानंतर लागलेली आग कोणाच्या हलगर्जीपणामुळे लागली याबाबत चौकशी करण्याचे आदेश श्री. मार्टीन्स यांनी वेर्णा पोलिसांना दिले आहेत. आग लागल्याचे वृत्त समजताच आपण दाबोळी विमानतळाला सुरक्षा बाळगण्याबाबत माहिती दिल्याचे श्री. मार्टीन्स यांनी सांगितले. ‘झुआरी इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेड’ ते ‘झुआरी ऍग्रो केमिकल्स’पर्यंत येणार्‍या ह्या नाफ्ता वाहिनीचे अडीच किलोमीटर अंतर असल्याचे श्री. मार्टीन्स यांनी सांगितले. साठा बंद असला तरी नाफ्ताच्या वाहिनीत मोठ्या प्रमाणात नाफ्ता होता. त्याची गळती चालूच राहिल्याने आग आटोक्यात आणण्यास सुमारे पाच तास लागल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण तपासणीनंतरच आगीच्या मागील कारण स्पष्ट होईल असे श्री. मार्टीन्स यांनी सांगितले.
‘झुआरी ऍग्रो केमिकल्स’चे जनसंपर्क अधिकारी आनंद राजाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क ‘गॅस ऍथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’चे खोदकाम चालू असताना स्फोट झाला व आग लागल्याची माहिती त्यांनी दिली. संपूर्ण तपासणीनंतरच नुकसानीचा अंदाज येईल. या प्रक्रियेला दोन ते तीन दिवस लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाहिनीत नाफ्ताचा साठा असल्याने हा स्फोट घडल्याचा अंदाज असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
दरम्यान, वेर्णा पोलिसांनी जेसीबी चालक, कॉन्ट्रॅक्टर ऑफ गॅस ऍथोरिटी इंडिया लिमि. व झुआरी इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापनावर भा. दं. सं. ३३७ व ३३८ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

अखेर मलेरिया सर्वेक्षकांना न्याय

• ७६ कर्मचार्‍यांना सेवेत कायम करणार
• मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांचे आश्‍वासन

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): गेली पंधरा वर्षे आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून सेवा बजावणार्‍या ७६ कर्मचार्‍यांना अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर आज न्याय मिळाला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज दि.१८ रोजी आपल्या बंगल्यावर घेतलेल्या बैठकीत या कर्मचार्‍यांना सर्व सोपस्कार पूर्ण करून जुलैमध्ये सेवेत कायम करण्याचे ठोस आश्‍वासन दिले. त्यामुळे पणजी येथील आरोग्य संचालनालयासमोर गेले १२ दिवस आमरण उपोषणास बसलेल्या कर्मचार्‍यांनी आपले उपोषण मागे घेतले. या निर्णयामुळे या ७६ कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.
आज आल्तिनो येथील मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, रेजिनाल्ड लॉरेन्स, आरोग्य खात्याचे प्रशासकीय संचालक डेरीक नाटो, डॉ. दत्ताराम सरदेसाई, मलेरिया कर्मचार्‍यांचे कायदा सल्लागार ऍड. सुभाष सावंत, निमंत्रक सुदेश कळंगुटकर, कर्मचारी प्रमुख प्रेमदास गावकर, गणपत गोलतकर आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राणे यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्या कर्मचार्‍यांना लिंबू सरबत देऊन उपोषण समाप्त केले. या वेळी श्री. गावकर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आभार मानले. आजच्या बैठकीत ठरल्यानुसार या ७६ कर्मचार्‍यांना सध्या संपलेले कंत्राट वाढवून सेवेत घेण्यात येईल व जुलैमध्ये सर्वांना सेवेत कायम करण्यात येणार असून त्यांना सरकारी कर्मचार्‍यांइतका पगार लागू होणार आहे.
आंदोलनानंतर दबणारे सरकार
दरम्यान गेले १२ दिवस या कर्मचार्‍यांच्या उपोषणामुळे सरकारवर बराच दबाव आला होता. खरेतर सरकारने विशेषतः आरोग्यमंत्र्यांनी या उपोषणकर्त्याकडे दुर्लक्षच केले होते. मात्र शेवटी त्यानांही झुकावे लागले. या सरकारच्या कारकिर्दीत आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळत नाही ही गोष्ट आज पुन्हा एकदा सिद्ध झाली. आंदोलनानंतर दबणारे सरकार म्हणून कामत सरकारची प्रसिद्धी होत आहे हे मात्र खरे.

चर्चिल आलेमांव विरोधात मिकींची पोलिस तक्रार

• पंधरा दिवसांत तिसर्‍या मंत्र्याविरोधात तक्रार
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): माजी पर्यटनमंत्री तथा आमदार मिकी पाशेको यांनीआज सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या विरोधात करोडो रुपयांचा घोटाळा केल्याची पोलिस तक्रार दोनापावला येथील गुन्हा अन्वेषण विभागात केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत मंत्रीमंडळातील तिसर्‍या मंत्र्यावर भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरूपाची तक्रार नोंद झाली आहे. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात व महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्याविरुद्ध तक्रारी नोंद झालेल्या आहेत. भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १६६, १६७, १७० भा. दं. सं. ४०९, ४१८, ४२०, ४६५, ४६८ कलमानुसार श्री. आलेमाव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करावा, अशी मागणी श्री. पाशेको यांनी केली आहे.
गेल्या चार वषार्ंपासून चर्चिल आलेमाव यांचा हा घोटाळा सुरू असून त्याचे कागदोपत्री पुरावेही सीआयडीला देण्यात आले आहेत. श्री. आलेमाव यांनी केंद्रीय दक्षता आयुक्तालय तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियमांचे उल्लंघन करून २००७ पासून सरकारी तिजोरावर डल्ला मारला असल्याचा आरोप श्री. पाशेको यांनी केली आहे.
या घोटाळ्याची तक्रार पुराव्यासह पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्यास पुढे काय करायचे आहे त्याचे पर्याय आपल्यासमोर उघडे आहेत आणि त्या पर्यायांचा आपण योग्य वेळी उपयोग करू, अशी माहिती यावेळी श्री. पाशेको यांनी तक्रार सादर केल्यानंतर बाहेर जमलेल्या पत्रकारांना दिली.
‘२००७ साली बेकायदा काढलेल्या परिपत्रकाच्या आधारे सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल यांनी करोडो रुपयांचा हा घोटाळा केला आहे. प्रथमदर्शनी हा सुमारे दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा दिसून येतो. परंतु, ही रक्कम त्याहीपेक्षा जास्त कोटी रुपये असू शकते. बांधकाम खात्याच्या निविदा काढण्यासाठी या बेकायदा काढण्यात आलेल्या परिपत्रकाचा श्री. आलेमाव वापर करीत आहेत’ असाही आरोप पाशेको यांनी यावेळी केला.
सरकारी नियम धाब्यावर बसवत चर्चिल यांनी आपल्यासाठी करोडो रुपये कमवून ठेवलेले आहेत. प्रशासकीय तसेच वित्त खात्याचे नियम त्यांनी मोडलेले आहेत, असा दावा करून त्यांनी केलेल्या बेकायदा घोटाळ्यांच्या फाईलवर मुख्यमंत्री दिगंबर कामत, तत्कालीन वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर आणि माजी मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी मारलेल्या शेर्‍यांच्या झेरॉक्स प्रतीही तक्रारीबरोबर जोडलेल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या दिवसापासून मंत्री आलेमाव यांनी ते बेकायदा काढलेले परिपत्रक दक्षता विभागाच्या सचिवांचा विरोध असतानाही अमलात आणले. त्या परिपत्रकाद्वारे त्यांनी कमीशन देणार्‍या कंत्राटदारांना हाताशी धरून हा करोडो रुपयांचा घोटाळा केला असल्याचे श्री. पाशेको यांनी पुढे सांगितले.

झुवारी नदीकाठच्या बेकायदा शिपयार्डवर कारवाईचे आदेश

• सरकारला चार महिन्यांची मुदत
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): लोटली येथील झुुवारी नदीच्या काठावर असलेल्या बेकायदा शिपयार्डवर येत्या ४ महिन्यात कारवाई करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत. न्यायालयाने सदर आदेश गोवा किनारपट्टी विभाग व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. सदर शिपयार्डवर कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने सहा महिन्यांचा कालावधी मागितला होता. परंतु, ती मागणी फेटाळून लावत चार महिन्यांच्या आत बेकायदा म्हणून नोटीस बजावलेल्या सर्व शिपयार्डवर कारवाई करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
झुवारी नदीच्या काठावर अनेक बेकायदा शिपयार्ड उभी राहिल्याने नदीला आणि येथील पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याचा दावा करून फ्रँकी मोन्तेरो यांनी गोवा खंडपीठात जनहित याचिका सादर केली होती. या शिपयार्डना योग्य ते परवाने नसल्याने राज्य सरकारने तसेच राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्या आहेत. परंतु, आजवर या शिपयार्डवर कोणतीही कारवाई होत नाही, असा युक्तिवाद याचिकादाराच्या वतीने ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी केला. झुवारी नदीच्या काठावर सुमारे १४ शिपयार्ड उभी राहिली आहेत. त्यामुळे नदीच्या काठाला धोका निर्माण झाला आहे. तसेच, याठिकाणी स्थलांतरित पक्षी येण्याची जागा असल्याने त्यांनाही धोका निर्माण झाला आहे, असेही मत त्यांनी यावेळी मांडले. त्यामुळे या ठिकाणी उभी राहिलेली बेकायदा कार्यशाळा, यार्ड, जेटी आणि अन्य बांधकामे मोडण्याचे आदेश दिले जावेत, अशी याचना ऍड. आल्वारीस यांनी केली.
पर्यावरणाला धोका निर्माण होण्यास या जहाज व बोटींचे बांधकाम करणार्‍या कंपन्या जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा खटलाही भरला जावा, अशीही मागणी करण्यात आली. या बांधकामांना गोवा राज्य किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाची, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय तसेच, स्थानिक पंचायतीकडून ना हरकत दाखला किंवा अन्य कोणताही परवाना मिळालेला नाही.
यातील अनेक शिपयार्ड हे २००१च्या प्रादेशिक आराखड्यामध्ये हरीत क्षेत्रात दाखवलेल्या भागात उभारण्यात आलेली आहेत. यातील काहींना लोटली पंचायतीने बेकायदा ना हरकत दाखलेही दिलेले आहेत, असाही दावा याचिकादाराने आपल्या याचिकेत केला आहे.

खारीवाडावसीयांचा अपेक्षाभंग

• इतिवृत्तात फेरबदल झाल्याने पुन्हा आंदोलनाचा इशारा
वास्को, दि. १८ (प्रतिनिधी): ‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स समिती’ने सरकारसमोर ठेवलेल्या मागण्यांपैकी दोन मागण्या वगळता इतर मागण्यांत मोठ्या प्रमाणात फेरबदल केल्याचे इतिवृत्तावरून स्पष्ट दिसत आहे. दि. २१ रोजी आम्ही मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासोबत बैठकीची मागणी केली आहे. मात्र आमच्या मागण्या मान्य न केल्यास पुन्हा एकदा आंदोलन छेडणार असून नंतर आम्हाला गुन्हेगार ठरवू नये असा इशारा फादर बिस्मार्क डायस यांनी दिला आहे.
सुमारे २० दिवसांपूर्वी खारीवाडा येथील ६६ घरे पाडण्यात आल्यानंतर उर्वरित २९४ घरांवर कारवाई होऊ नये यासाठी खारीवाडावासीयांनी सतत दोन दिवस ‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स समिती’च्या मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडले. ह्या आंदोलनामुळे दोन दिवस ‘एम.पी.टी’चा जलवाहतुकीद्वारे होणारा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला होता. तर दुसर्‍या दिवशी वास्को बंद पुकारल्याने वास्को शहर ठप्प झाले होते. यानंतर यांनी ‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स समिती’ बैठक बोलवून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे ठरवल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. बैठकीच्या दरम्यान झालेल्या चर्चेचे इतिवृत्त आज समितीला देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा खारीवाडा भागात संतापाचे वातावरण पसरलेले असून सरकारने सादर केलेल्या इतिवृत्तात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज उशिरा संध्याकाळी खारीवाडा येथे समितीतर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत येथे उपस्थित असलेल्या शेकडो खारीवाडावासीयांना फादर बिस्मार्क यांनी सदर माहिती देऊन येथील लोकांवर अन्याय करण्यात आल्याचे सांगितले. समितीने ठेवलेल्या मागण्यांपैकी राष्ट्रीय सुरक्षा औद्योगिक दलाचे जवान हटवण्याची व आंदोलनाच्या दरम्यान ज्यांच्यावर तक्रार नोंद झालेली आहे ती मागे घेण्याची आश्‍वासने वगळता इतर मागण्यांत बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कामत यांच्याशी आपण संपर्क करून याबाबत चर्चा केली असल्याची माहिती फादर डायस यांनी दिली. २१ रोजी होणार्‍या बैठकीत जर मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा एक दा आंदोलन छेडण्यास तयार रहा असे आवाहन त्यांनी खारीवाडावासीयांना केले. सदर इतिवृत्त महसूल खात्याने तयार केले असून मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्यावरही आरोप करण्यात आले.
दरम्यान, समितीतर्फे निवडण्यात आलेले वकील ऍड. अतिश नाईक यांनी सरकार फक्त ड्रग माफियांचे, कॅसीनो व अशाच प्रकारचे असून ते गरिबांचे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सदर बैठकीला उपस्थित असलेले ‘पिलेरना सिटीझन फोरम’चे प्रकाश बांदोडकर यांनी खारीवाडा येथील लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आमचा पाठिंबा असल्याचे सांगून पुन्हा आंदोलन छेडल्यास आपण काणकोण ते पेडणेपर्यंत लोक आणून संपूर्ण गोमंतकीय एक असल्याचे दाखविणार असल्याचे सांगितले.

Monday 18 April, 2011

केंद्राची प्रामाणिकता थेट कृतीनेच दिसेल

अडवाणी यांचे प्रतिपादन
वी दिल्ली, दि. १७ : ‘टूजी स्पेक्ट्रम’ व ‘राष्ट्रकुल’सारख्या घोटाळ्यांबाबत सरकार कशा स्वरूपाची कारवाई करते यावरून भ्रष्टाचाराच्या विरोधात ‘संपुआ’ सरकार किती प्रामाणिक आहे हे दिसून येईल, असे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले आहे.
येत्या पावसाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराविरोधात असलेले लोकपाल विधेयक मंजूर झाले तरी सरकारच्या प्रामाणिकतेची खरी कसोटी तेव्हाच लागेल जेव्हा संपुआ सरकार, २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा व आदर्श गृहनिर्माण सोसायटीचा घोटाळा याविरोधात कोणती कठोर कारवाई करते. देशात घडणार्‍या या लक्षावधी कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या घटनांवर जनता खरोखर अत्यंत संतप्त झाली आहे, असे सांगून अडवाणी पुढे म्हणाले, भ्रष्टाचाराला वेसण घालणारे कायदे अस्तित्वात नाहीत म्हणून भ्रष्टाचार ङ्गोङ्गावत आहे असे नाही; तर भ्रष्टाचार्‍यांच्या विरोधात कठोर पाऊले उचलून त्यांना कठोर शासन करण्यात प्रशासकीय यंत्रणाच अपयशी ठरत आहे. परदेशातील बँकांत ठासून भरलेला काळा पैसा देशात परत आणण्यासाठी केंद्रातील संपुआ सरकार ङ्गार काही करताना दिसत नाही, असा आरोप करून अडवाणी पुढे म्हणाले, अमेरिका व जर्मनीसारखे देश स्वीस बँकांत असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करताना दिसून येत असताना आपले सरकार मात्र ढिम्म आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने २००४ मध्ये मंजूर केलेल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या करारावरही आपल्या सरकारने अद्याप स्वाक्षरी केलेली नाही, याकडे अडवाणी यांनी लक्ष वेधले. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. तथापि, केंद्र सरकार अजूनही त्याबद्दल फारसे गंभीर नसल्याबद्दल अडवाणी यांनी चिंता व्यक्त केली आहे. विदेशी बँकांत असलेला भारतातील बड्या धेंडांचा काळा पैसा देशात परत आणण्याबद्दल काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारचे कान उपटले होते.

ज्येष्ठ विनोदी साहित्यिक वि. आ. बुवा निवर्तले

कल्याण, दि. १७ : आपल्या खुसखुशीत हास्यकथांनी मराठी माणसाला खळाळून हसवलेलेे ज्येष्ठ विनोदी साहित्यिक वि. आ. बुवा यांचे आज (रविवारी) पहाटे कल्याणमध्ये वार्धक्याने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
खुमासदार शैली, प्रासंगिक विनोदावर भर देत, दैनंदिन जीवनाशी निगडीत असे सहजसुंदर लिखाण ही बुवा यांच्या साहित्याची मुख्य वैशिष्ट्ये म्हटली पाहिजेत. बुवा यांच्या लेखनातून साहित्याच्या विविध प्रवाहांचा व्यासंग प्रतीत होतो. मराठीबरोबरंच त्यांचा संस्कृत भाषेचाही दांडगा अभ्यास होता. सातत्याने लिखाण करणार्‍या बुवा यांची आतापर्यंत दीडशे पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
बुवा यांची गाजलेली पुस्तके
‘पसंत आहे’, ‘बायकोला कसेजिंकावे’, ‘डोंबलाचं सर्वेक्षण’, ‘रेकॉर्डब्रेक १२५’ ‘लेखणी आणि पाणी’, ‘शब्दखेळ’, ‘मराठी बोली’, ‘नवर्‍यांवर पीएचडी’, ‘असं झालं तर’, ‘ङ्गजितीचा सुवर्णमहोत्सव’, ‘माझ्याविषयी मी’,
‘विद्वान सर्वत्र’ ‘श्वास आणि उच्छवास’.

मलेरिया सर्वेक्षकांचा आज फैसला?

• सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन
• उपोषणाचे आज ‘बारा’ दिवस

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गेली पंधरा वर्षे आरोग्य खात्यात मलेरिया सर्वेक्षक म्हणून काम करणार्‍या ५९ कर्मचार्‍यांना उद्या दि. १८ रोजी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सेवेत कायम करण्यात येण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या पूर्वीच या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र प्रशासकीय सोपस्कार पूर्ण न झाल्यामुळे अजूनपर्यंत या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे पत्र देण्यात आले नाही अशी कबुली परवा खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आपल्या बंगल्यावर दिली. त्यामुळे आपणास सेवेत कायम करावे म्हणून दि. ७ एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसलेल्या या सर्व ५९ कर्मचार्‍यांना उद्याच्या बैठकीत सेवेत कायम करण्याची ‘ऑर्डर ’निघण्याची शक्यता आहे.
गेली १२ ते १५ वर्षे हे मलेरिया सर्वेक्षक कंत्राटावर अल्प रोजंदारीवर काम करत आहेत. त्यांनी आपणास सरकारी सेवेत कायम करावे म्हणून गेली अनेक वर्षे प्रयत्न चालवले असून एकूण तीन वेळा सहकुटुंब उपोषण केले आहे. दोन वर्षापूर्वी कस्टम हाउसजवळील पहिल्या आमरण उपोषणाच्या वेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तिसर्‍या दिवशी या कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले, मात्र त्यांनी तेव्हा आपले आश्‍वासन पाळले नाही. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी हे कर्मचारी आरोग्य संचालनालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषणाला बसले असता दुसर्‍या दिवशी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ‘आपण कुणाला आश्‍वासन देत नाही आणि दिले तर ते पाळतोच’ असे सांगून सेवेत कायम करण्याचे आश्‍वासन देऊन उपोषण मागे घेण्यास लावले. मात्र धाकट्या ‘खाशांनी‘ही आपले आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे या त्रस्त कर्मचार्‍यांना पुन्हा दि.७ एप्रिलपासून आमरण उपोषणास बसावे लागले आहे. यावेळी मात्र सेवेत कायम करण्याचे पत्र (ऑर्डर) हातात पडेपर्यंत उठायचे नाही असा निर्धार या कर्मचार्‍यांनी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परवा दिलेले आश्‍वासन व उपोषण मागे घण्याचे केलेले आवाहन न पाळता हे कर्मचारी गेले ११ दिवस कांपाल पणजी येथील आरोग्य संचालनालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दि.१४ एप्रिल रोजी आपल्या बंगल्यावर या कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाला दिलेल्या आश्‍वासनानुसार उद्या दि.१८ रोजी मंत्रीस्तरावरील बैठकीत चर्चा होऊन या सर्व कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्याची ऑर्डर काढण्यात येणार आहे. आज या कर्मचार्‍यांची भेट घेतली असता उद्या होणार्‍या बैठकीत आपणास सेवेत कायम करण्याची ऑर्डर नक्कीच निघेल असा विश्वास कर्मचार्‍यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी आपले आश्‍वासन उशिरा का होईना पाळावे अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच उद्या हनुमान जयंती असून श्री हनुमान आम्हांला पावेल अशी भावना ११ दिवस उपोषण करून कृश झालेल्या या कर्मचार्‍यांनी बोलून दाखवली. दरम्यान या कर्मचार्‍यांपैकी सदानंद महाले यांची तब्येत आज बिघडल्यामुळे रुग्णवाहिकेला बोलवावे लागले. आत्तापर्यंत १० जणांना रुग्णवाहिकेतून हलवण्यात आले आहे.

भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे २७ रोजी जिल्हास्तरीय बैठका

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गोव्यातील प्राथमिक शिक्षणाच्या बाबत सुरू असलेल्या घोळावर निचारविनिमय करून तोडगा काढण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच गोवातर्फे दि. २७ व २८ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. शशीकला काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंचाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार गोव्यातील शिक्षण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि सक्रिय सदस्य, मुख्याध्यापक व प्राचार्य, पूर्वप्राथमिक, उच्च माध्यमिक अशा प्रत्येक स्तरावरील पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष, सचिव आणि तीन ते चार सक्रिय प्रतिनिधी अशांची प्रातिनिधिक स्वरूपाची स्वतंत्र बैठक जिल्हास्तरावर बोलावण्यात आली आहे.
उत्तर गोव्यातील तिसवाडी, बार्देश, पेडणे, डिचोली व सत्तरी या पाच तालुक्यांसाठीची बैठक बुधवार २७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सारस्वत कॉलेज खोर्ली म्हापसा येथे होणार आहे. तर दक्षिण गोव्यातील फोंडा, सासष्टी, मुरगाव, सांगे, केपे, काणकोण व धारबांदोडा अशा सात तालुक्यांसाठीची बैठक गुरुवार दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता महिला नूतन हायस्कूल सभागृह कोंब मडगाव येथे होणार आहे.
तरी प्रत्येक शिक्षण संस्थेने भारतीय भाषांच्या व संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्व स्तरावरील अपेक्षित प्रतिनिधींना या बैठकांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंचाच्या निमंत्रक श्रीमती काकोडकर यांनी केले आहे.

व्यवस्थित आरक्षण नसल्याने खेळाडूंचे रेल्वेप्रवासात हाल

• मुंबई-छत्तीसगड प्रवास उभ्याने
• अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा
• आजपासून आंतरराज्य स्पर्धा

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): छत्तीसगड येथे होणार्‍या आंतरराज्य क्रीडा स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे संबंधित अधिकार्‍यांनी व्यवस्थित आरक्षण न केल्याने त्यांना मुंबई ते छत्तीसगड हा रेल्वेप्रवास उभ्याने करावा लागला.
व्यायामाचे खेळ, बास्केटबॉल, हॉकी आणि बॅडमिंटन खेळण्यास सुमारे ७२ विद्यार्थी गोव्यातून छत्तीसगड येथे उद्यापासून सुरू होणार्‍या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांना कालची रात्र मुंबई रेल्वे स्थानकावर बसून काढावी लागली. त्यानंतर, मुंबई ते छत्तीसगड हा रेल्वेप्रवास उभ्याने करावा लागला.
हे विद्यार्थी काल दि. १६ एप्रिल रोजी मडगाव येथून मांडवी एक्सप्रेसने मुंबईला निघाले होते. त्या रेल्वेत त्यांना बसण्यासाठी व्यवस्थित आसने मिळाली होती. आज दि. १७ रोजी त्यांना मुंबई येथून गीतांजली एक्सप्रेसने छत्तीसगड येथे जायचे होते.
‘आम्ही अनेकजण असून केवळ काही जणांचीच तिकिटे आरक्षित झाली आहेत. त्यामुळे आम्हांला उभ्याने प्रवास करावा लागत आहे. काही जण सामानावर बसलेले आहेत’ अशी माहिती या रेल्वेने प्रवास करणार्‍या जोशूवा जॉर्ज या खेळाडूने दिली. एक रात्र रेल्वेस्थानकावर काढून आणि मुंबई ते छत्तीसगड असा प्रवास उभ्याने करून थकलेल्या या खेळाडूंना उद्यापासून सुरू होणार्‍या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. हे विद्यार्थी आज रात्री १० वाजता छत्तीसगड येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
या विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ७२ पैकी केवळ ६ विद्यार्थ्यांची गीतांजली एक्सप्रेसची तिकिटे आरक्षित झाली आहेत. ही तिकिटे तत्काळ कोट्यातून आरक्षित करण्यात आली होती. त्यामुळे ती आरक्षित होतील असा विश्‍वास आम्हांला होता, असे या खेळाडूंबरोबर गेलेल्या राज्य क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षकांनी सांगितले. आरक्षण नसल्याने हे विद्यार्थी तीन बोगीत विखुरलेले आहेत. सुट्टीचे दिवस असल्याने बोगी प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे, असेही एका विद्यार्थ्याने सांगितले.
या विषयी राज्य क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई यांना विचारले असता त्यांनी, ही तिकिटे केंद्र सरकारी संघटना नेहरू युवा केंद्राने आरक्षित केली होती, असे सांगितले. ७२ विद्यार्थ्यांसाठी ४२ (बर्थ) आरक्षित केले होते. हे आरक्षण मुख्यमंत्री आणि खासदार कोट्यातून केले जाते, अशीही माहिती त्यांनी दिली. मात्र, या खेळाडूंवर हा प्रसंग कशामुळे ओढवला याची आम्ही चौकशी करणार असल्याचे श्री. प्रभुदेसाई यांनी शेवटी सांगितले.

पोलिस स्थानक हल्लाप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): पणजी पोलिस स्थानक हल्ला प्रकरणावरील सुनावणी गोव्यात की मुंबईत घेतली जावी, यावर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पोलिस स्थानकावर हल्ला करत पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यावरील सुनावणी ही गोव्यात न घेता मुंबईत कोणत्याही न्यायालयात घेतली जावी, अशी मागणी या प्रकरणाचे तपास करणाचे केंद्रीय गुन्हा अन्वेषणने (सीबीआय) न्यायालयाकडे केली आहे.
बाबूश मोन्सेरात हे राज्यात प्रभावी असल्याने ते या खटल्यातील साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात. त्यामुळे या खटल्याच्या सुनावणीला बाधा होऊ येऊ शकते. सदर सुनावणीच्यावेळी त्यांनी यापूर्वी अनेक अडचणी निर्माण केलेल्या आहेत, असा दावा करून सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केला आहे. त्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

तिस्क उसगावात युवकाचा खून

फोंडा, दि.१७ (प्रतिनिधी): कुवेशी केसरलॉक कर्नाटक येथील शंकर गणपत देसाई (२८) या तरुणाचा तिस्क उसगाव येथे खून करण्यात आला असून मातीने माखलेला शंकर देसाई याचा मृतदेह साईबाग गावठण कसलये तिस्क येथे आज (दि.१७) सकाळी आढळून आला आहे.
ही खुनाची घटना १६ एप्रिल रोजी मध्यरात्री घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कसलये तिस्क येथे एक मृतदेह असल्याची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशीला सुरुवात केली. ‘त्या’ मृत व्यक्तीच्या तोंडावरील माती हटविण्यात आल्यानंतर मृत व्यक्तीची ओळख प्रमोद बळीराम चंदगडकर यांनी पटविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शंकर देसाई याचा मृतदेह मातीने माखलेला होता. त्याच्या अंगावर व गुप्त भागावरसुद्धा मारहाणीच्या खुणा आहेत, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. शंकर देसाई हा नातेवाइकांच्या एका लग्न समारंभानिमित्त दोन दिवसांपूर्वी तिस्क उसगाव येथे आपले मेहुणे प्रमोद चंदगडकर यांच्याकडे आला होता. ह्या खुनाच्या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. ह्या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या खून प्रकरणाच्या चौकशीसाठी एका जीप चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. प्रभारी निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर तपास करीत आहेत.

दोन गटातील चकमकीत मडगावात एक गंभीर

तिघे हल्लेखोर फरारी
मडगाव, दि.१८ (प्रतिनिधी): गोव्याची व्यापारी राजधानी तथा मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या मडगावात आता वाढत्या घरफोड्यांबरोबरच गँगवॉर सुरू झाले असून त्यामुळे नागरिकांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दुपारी सिने लताजवळ उसळलेल्या एका टोळीयुद्धात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला हातपाय मोडलेल्या अवस्थेत हॉस्पिसियुत दाखल करण्यात आले आहे तर यात सामील असलेले तिघेही आरोपी फरारी आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ ही एकच टोळी होती व इतरांवर ती वर्चस्व गाजवत आलेली आहे. पण हल्लीच ती फुटून तिच्यात दोन गट पडले. त्यातूनच ही वैरभावना पसरून आजचा प्रकार घडला. क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणाचे टोळीयुद्धात रूपांतर झाले व त्यात नागेश बसुराज मडवळ हा गंभीर जखमी झाला. त्याला जबर मारहाण केली गेली व त्यात त्याचे हातपाय मोडल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी महादेव व पुंडलिक तलवार व शिवराम लातूर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी नंतर त्यांचा सर्वत्र शोध केला असता ते फरारी असल्याचे आढळून आले. यापूर्वी परप्रांतीयांचा बालेकिल्ला असलेल्या मोतीडोंगरावर गत नगरपालिका निवडणुकांनंतर असा कलह निर्माण होऊन त्याचे पर्यवसान टोळीयुद्धात झाले होते नंतर राजकीय हस्तक्षेपानंतर ते प्रकरण शांत होते तोच हे टोळीयुद्ध भडकले आहे.

शिवोली तार अपघातात सायकलस्वार वृद्ध ठार

म्हापसा, दि. १७ (प्रतिनिधी): शिवोली येथे एका सायकलस्वाराला कारने मागून येत धक्का दिल्याने सायकलस्वार रमेश रामा बांदेकर (कामुर्ली) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.१७) सकाळी साडेनऊच्यादरम्यान घडली. सविस्तर माहितीनुसार कामुर्ली येथून बांदेकर हे शिवोली तार येथे सायकलने आले असता मागून येणार्‍या कारने(जीए ०७ ई ०६३०) त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सायकलला धडक बसून बांदेकर हे खाली जमिनीवर कोसळले. त्यांना त्वरित १०८ रुग्णवाहिकेने बांबोळी येथे गोमेकॉत उपचारासाठी पाठवले असता दुपारी ११च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विश्‍वजित चोडणकर यांनी पंचनामा करत कार चालक शरीफ घोडामती रा. आगशी याला अटक केली असून सदर कारही ताब्यात घेतली आहे.

जगण्याशीच झुंज देणारे दत्ताराम नाईक

शैलेश तिवरेकर
जीवन म्हणजे एक संघर्ष असून या संघर्षाला खंबीरपणे तोंड देऊन जो पुढे जात राहतो तो जीवनात नक्कीच यशस्वी होतो. आपल्या पुढ्यात काय आहे हे पाहत बघण्यापेक्षा पुढ्यातील काट्यांना बाजूला सारून त्याच्यातून मार्ग काढणारी माणसे आजही या दुनियेत आहेत. कामुर्ले दरबारवाडा येथील दत्ताराम शंकर नाईक हे त्यातीलच एक अवलिया. भर तारुण्यात अपघाताने दोन्ही पाय अधू झालेले. शारीरिक अडचणीमुळे व्यवसायावर परिणाम झाला किंबहुना तो बंदच झाला. तरीसुद्धा हा माणूस डोक्यावर हात घेऊन न बसता येणार्‍या संकटांना दोन हात करत स्वकर्तृत्वावर आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत स्वाभिमानाने जगत राहिला. झालेल्या गोष्टींना उगाळत न बसता प्रत्येकवेळी नव्या व्यवसायाला शून्यातून सुरू करून जीवनाशी नव्या दमाने झुंज देत राहिला. इतकेच नव्हे तर आज कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता सुमारे २ लाख रुपये खर्च करत जुन्या घराची पुनर्बांधणी केली.तसेच नव्याने चालत असलेल्या व्यवसायासाठी नवीन फायबर होडीही खरेदिली आहे. आज आपले कष्ट हेच आपले सुख आणि आराम म्हणत आपल्या कुटुंबासोबत दत्ताराम हे जीवनाचा आनंद घेत आहे.
देव देतो त्याला छप्पर फाडून देतो आणि ज्याचे घ्यायचे असेल त्याचा जीवही घेण्याचा प्रयत्न करतो. अशीच कथा या दत्ताराम नाईकची आहे. दरवेळी शून्यातून वर येण्याचा प्रयत्न करणार्‍या या अवलियाला काळाने मात्र प्रत्येकवेळी चिरडण्याचाच प्रयत्न केला. इतकेच नव्हे त्याला झालेल्या दोन मुलींपैकी एक मुलगी मतिमंद त्यामुळे आधीच काळाशी झुंजणार्‍या दत्तारामला जीवनातही मानसिक ताण सोसावा लागत आहे. परंतु या स्थितीतही त्यांनी आपला धीर सोडला नाही. काळालाही नमते घ्यायला लावणार्‍या या माणसाने अखेर बाजी मारून काही प्रमाणात का असेना डोके वर काढण्याचा प्रयत्न केलाच आणि त्यात तो यशस्वी पण झाला. स्वतःच्या कर्तृत्वावर प्रचंड विश्‍वास असणार्‍या या माणसाचा आज छोट्या प्रमाणात खुबे आणि कालवांचा व्यवसाय बर्‍यापैकी चालत आहे. आपल्या अपंगत्वावर पूर्णपणे मात करणारा हा माणूस भल्या पहाटे आपल्या होडीच्या साहाय्याने नदीत प्रवेश करतो आणि खुबे कालवे घेऊन येतो. गोव्यात खुबे आणि कालवांना चांगल्या प्रमाणात मागणी असल्याने त्यांना आपला माल विकण्यासाठी घरातून बाहेर जावे लागत नाही. घरीच त्यांची पत्नी ते काम करते. या त्यांच्या छोटेखानी पण स्वाभिमान शाबूत ठेवणार्‍या व्यवसायासंदर्भात विचारले असता दत्ताराम म्हणाले की, आपण शून्यातून विश्‍व निर्माण केले आहे. इतरांसाठी हे लहान असेल पण माझ्यासाठी हे माझे विश्‍व आहे. आपल्या कर्तृत्वावर प्रचंड आत्मविश्‍वास असणारे दत्ताराम हे मोठ्या अभिमानाने सांगत होते. आज आपले वय ६१ वर्षे असून बालपणापासूनच आपण जीवनाशी विविध माध्यमातून झुंज देत आलो आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी जे माझ्या हाती आले ते माझे पण जे गेले त्याचा कधीच विचार केला नाही. म्हपशाला आपण मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. काही काळ दुचाकी गाडीने भाडे मारण्याचे काम केले. नंतर बेकरीचा व्यवसाय सुरू केला परंतु या दरम्यान काळाने घाव घातला आणि मी कायमचा अपंग झालो. जीवनाशी झुंजत झुंंजत जगणे म्हणजेच खरे जीवन आहे. आजही आपण अपंग असताना १६ हात पाण्यात बुडू शकतो. आता तर दर दिवशी पाण्यात बुडून कालवां काढणे हाच माझा व्यवसाय आहे. मतिमंद असलेली मुलगी वारली. एक मुलगी आहे ती निमसरकारी कंपनीत नोकरी करते आणि व्यवसायही चांगल्याप्रमाणे चालतो त्यामुळे तसा आरामात जीवन जगत आहे. मुलीचे लग्न केले आणि पत्नीसाठी काही तजबीज करून ठेवली की माझ्याएवढा सुखी मीच असेन.
माणूस शरीराने अपंग झाला तरी मनोबलावर तो काय करू शकतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दत्ताराम नाईक. त्यांच्या पुढील जीवनात आनंदाचा प्रकाश पडो हीच शुभेच्छा!

वास्कोतील सर्व कामकाज सुरळीत

• आज चर्चेचा इतिवृत्तांत मिळणार
• फेरबदल झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

वास्को, दि. १७ (प्रतिनिधी): खारीवाडावासीयांनी सतत दोन दिवस छेडलेल्या आंदोलनानंतर सरकारने येथील घरे वाचवण्याचे तसेच ‘खारीवाडा अफेक्टेड पीपल्स’ समितीच्या इतर चारही मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्याने सदर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याने वास्को शहरातील सर्व कामकाज आज सुरळीतरित्या चालू झाले. काल झालेल्या बैठकीत सरकारने आश्‍वासन दिल्यानंतर मध्यरात्रीच ‘एम.पी.टी’च्या हद्दीत नांगरून ठेवलेले सर्व मासेमारी ट्रॉॅलर्स व नौका हटवून जलवाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र सरकारने दिलेल्या आश्‍वासनात फेरबदल केल्यास तात्पुरते मागे घेतलेले आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे उद्याचा (सोमवार) दिवस एकदम महत्त्वाचा असल्याचे मानण्यात येत आहे.
सुमारे २० दिवसांपूर्वी न्यायालयीन आदेशानुसार खारीवाडा येथील ६६ घरे पाडण्यात आल्यानंतर या ठिकाणी संतापाची लाट उसळली होती. यामुळे दि.१५ पासून समुद्री वाहतूक रोखण्यात आली होती. तसेच येथील मासेमारीही ठप्प केली होती. तर काल (दि.१६) वास्को बंद पुकारण्यात आला होता. यामुळेे एम.पी.टी तसेच बार्ज मालकांना कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. काल संध्याकाळी समितीला सचिवालयात बोलवून मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच इतर मंत्री व सरकारी अधिकार्‍यांनी उर्वरित २९४ घरांवर कारवाई होणार नसल्याचे आश्‍वासन देण्यात आले. सरकारने खारीवाडा येथील त्या २९४ घरांना वाचवण्याकरिता न्यायालयात धाव घेण्याचे दिलेले आश्‍वासन, समिती व सरकार यांच्याशी झालेल्या बैठकीचा इतिवृत्तांत उद्या (सोमवारी) त्यांना देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. काल सरकारकडून आश्‍वासन मिळाल्यानंतर मध्यरात्रीच ‘एम.पी.टी’ची जलवाहतूक मोकळी करण्यात आली.
आज ‘गोवा फिशिग बॉल मालक संघटनेचे’ अध्यक्ष सायमन परेरा यांच्याशी संपर्क साधला असता आंदोलन मागे घेतल्यानंतर आज सर्व मच्छीमारांनी आपला व्यवसाय सुरू केल्याचे सांगितले. सरकारने आम्हांला जे आश्‍वासन दिलेले आहे त्यात थोडाही बदल झाल्यास सदर आंदोलन पुन्हा छेडण्यात येणार असल्याचा इशारा श्री. परेरा यांनी दिला. तर संघटनेचे सल्लागार रोनी डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता मासेमारी व्यवसाय सुरू झाला असून मासेमारी मार्केटही उघडे करण्यात आले आहे. ‘एम.पी.टी’ची जलवाहतूक सुरू केल्यानंतर आज मासेमारी नौका तसेच टॉलर्स खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday 17 April, 2011

जलमार्ग खुला करण्याचा आदेश

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): खारीवाड्यावरील घरे पाडल्याने त्याच्या निषेधार्थ बार्ज, मच्छीमारी नौका उभ्या करून जलवाहतूक अडवल्याने ‘त्या’ जहाजांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा न्यायदंडाधिकारी प्रसन्न आचार्य यांनी दिले आहेत. कालपासून मुरगाव पोर्ट ट्रस्टमधून निघणार्‍या सर्व जहाजांचा मार्ग शंभर मच्छीमारी नौका, २० बार्ज आणि ४० ते ४५ होड्या उभ्या करून अडवण्यात आला होता. यामुळे जलवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
काल दुपारी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व अन्य अधिकार्‍यांनी यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊन चर्चा केली. परंतु, त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे तटरक्षक दलाच्या मदतीने जलवाहतूक अडवलेल्या सर्व जहाजांवर कारवाई करण्याचे आदेश दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक व वास्को पोलिस निरीक्षकाला देण्यात आले. दरम्यान, आज सायंकाळी उशिरापर्यंत या नौकांवर कोणताही कारवाई करण्यात आली नव्हती. गेल्या दोन दिवसापासून जल वाहतूक ठप्प झाल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा ‘एमपीटी’ने केला आहे.

मुख्यमंत्र्यांची सचिवालयात भेट

पर्वरी, दि. १६ (प्रतिनिधी): खारीवाडा येथील ‘ती’ बांधकामे वाचवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘खारीवाडा इफेक्टेड पीपल्स’च्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची पर्वरी येथील सचिवालयात भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.
फादर बिस्मार्क डायस, मच्छीमार बोटमालक संघटनेचे अध्यक्ष सायमन परेरा यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात रॉनी डिसोझा, सुकूर इस्तेबेरो, फ्रान्सिस्को डायस, लिया डिसोझा, स्वाती केरकर, जॉसिंतो डिसोझा, सेबी डिसोझा, साजिद शेख, आंतोनियो मोंतेरो, कस्टोडियो डिसोझा यांच्यासह खारीवाडा येथील अन्य रहिवाशांचा समावेश होता. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव अनेकांना सचिवालयाच्या प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. यानंतर कडक पोलिस बंदोबस्तात शिष्टमंडळातील काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडली.

जहाजावर दगड, बाटल्या फेकल्या
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): मांडवी नदीतील जलवाहतूक रोखल्याने आग्वादच्या खाडीत अडकलेल्या सेझा गोवा कंपनीच्या जहाजावर काल उशिरा रात्री बिअरच्या वाटल्या तसेच दगडफेक झाली. मच्छीमारी नौकेतून आलेल्या सुमारे तीस जणांच्या गटाने हा हल्ला करून जहाजाचे नुकसान केले असल्याची तक्रार सेझा गोवा कंपनीने केली आहे. सदर घटना कळंगुटच्या हद्दीत घडली असून पणजी पोलिसांनी संबंधित पोलिस स्थानकात तक्रार करण्याची सूचना तक्रारदाराला दिली असल्याची माहिती पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर यांनी दिली.

मलेरिया सर्वेक्षकांच्या उपोषणाचा दहावा दिवस

सर्व उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
पणजी, दि.१६ (प्रतिनिधी): मलेरिया सर्वेक्षकांचे उपोषण आज (शनिवारी) सलग दहाव्या दिवशीही सुरूच असून त्यापैकी बहुतांश उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. विशेष म्हणजे त्यांची तातडीने दखल घेणे राहिले दूरच; उलट हे उपोषण समाप्त करावे यासाठी त्यांच्यावर उच्च पातळीवरून दबाव आणला जात असल्याचे समजते.
विद्यमान सरकारच्या कारकिर्दीत विक्रमी आंदोलने झाली आहेत. मात्र एवढा दीर्घ काळ आपल्या न्याय्य मागणीसाठी लांबलेले हे पहिलेच आंदोलन ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी या कर्मचार्‍यांची भेट घेतली; तथापि त्यांना सेवेत कायम करण्याचे ठोस आश्‍वासन ते देऊ शकले नाहीत. सोमवार दि .१८ एप्रिल रोजी याबाबत चर्चा करू, असे गुळमुळीत आश्‍वासन या कर्मचार्‍यांना देण्यात आले आहे. सदर आश्‍वासनाबद्दल खात्री वाटत नसल्यामुळे सोमवारी चर्चा होऊन सेवेत कायम केल्याचे पत्र हाती येईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या कर्मचार्‍यांची भेट घेतली असता त्यांच्यात बोलण्याचेही त्राण उरले नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. ते कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याच्या मनःस्थितीत नाहीत.मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन पाळावे व आम्हाला सेवेत कायम करावे अशी विनवणी या मंडळींनी केली. दरम्यान, या उपोषणमुळे सरकारची नाचक्की होत असल्याने ते मागे घ्यावे यासाठी सदर कर्मचार्‍यांवर उच्च पातळीवरुन दबाब आणला जात असल्याचे कळते.

आयुक्त एल्विस गोम्स अचानक दीर्घ रजेवर!

महापालिकेतील अनेक काम रखडली
पणजी, दि.१६ (प्रतिनिधी): नियमावर बोट ठेवून वागणारे व प्रामाणिक असा लौकिक असलेले पणजी महापालिकेचे आयुक्त एल्विस गोम्स हे अचानक दीर्घ रजेवर गेल्यामुळे महापालिकेत खळबळ माजली असून पणजीतील कचरा उचलण्यासह विविध कामे रखडली आहेत.
श्री. गोम्स हे कोणत्या कारणास्तव रजेवर गेले की तसे करणे त्यांना भाग पाडण्यात आले या अनुषंगाने राजधानीत चर्चेला उत आला आहे. गोम्स यांच्या पदाचा ताबा दौलतराव हवालदार यांच्याकडे देण्यात आला आहे. तथापि, वैयक्तिक कारणास्तव त्यांनीही अजून या पदाचा ताबा स्वीकारलेला नाही.
आयुक्त आणि महापौर यांच्यात वाद सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे. याची प्रचिती अर्थसंकल्प बैठकीवेळी सर्वांना आली. तेव्हा महापौर यतीन पारेख आणि आयुक्त गोम्स यांच्यात बरीच जुंपली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांना रजेवर जाण्यास भाग पाडल्याचे सांगितले जात आहे. आयुक्तच रजेवर गेल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पणजीतील कचरा उचलणेही बंद झाले आहे. परिणामी अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महापौरांशी
संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अन्य नगरसेवकांकडून अशी माहिती मिळाली की, पहिल्या दिवसांपासूच महापौर आणि आयुक्त यांच्यात जुंपली होती.
गोम्स हे नियमांवर बोट ठेवून वागणारे प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. महापालिकेच्या अर्थसंकल्प बैठकीत मिरामार येथे टपाल कार्यालय सुरू करण्यावरून महापौर व विरोधी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांच्यात वाद झाला होता. तेव्हा महापौर व आयुक्त यांच्यातही एका प्रश्‍नावरून वादावादी झाली होती. हा वाद हेच गोम्स यांनी रजेवर जाण्याचे कारण ठरल्याचे सांगितले जात आहे.
सत्ताधारी पक्षातील दोघा ज्येष्ठ नगरसेवकांनी आपल्या ‘बॉस’ला सांगून भ्रष्टाचाराला विरोध करणार्‍या आयुक्तांची उचलबांगडी करण्याची जोरदार मोहीम राबवली आरंभल्याचे कळते.
या जाचाला कंटाळून आयुक्तांनी रजेवर जाणे पसंत केल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यामुळे प्रशासकीय आणि अन्य कामे रखडली आहेत. या धेडगुजर्‍या कारभाराला जबाबदार कोण, असा प्रश्‍न आता लोकांतून विचारला जात आहे.

पावसाळी अधिवेशनातच लोकपाल विधेयक मांडणार

समितीच्या पहिल्या बैठकीत जनप्रतिनिधींकडून विश्‍वास व्यक्त
नवी दिल्ली, द. १६ : लोकपाल विधेयकाचा नवा मसुदा निश्‍चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त मसुदा समितीची पहिली बैठक आज येथे अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. हे विधेयक संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनातच मांडले जाईल, असा विश्‍वास सरकार आणि जनप्रतिनिधींनी बैठकीनंतर व्यक्त केला आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष व केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी आणि सहअध्यक्ष व माजी केंद्रीय विधिमंत्री शांती भूषण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही बैठक सुमारे दीड तास चालली. मसुदा समितीच्या बैठकीची सर्वसामान्य जनतेला माहिती व्हावी यासाठी कार्यवाहीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याची जनप्रतिनिधींची मागणी सरकारने आज मान्य केली नाही. याऐवजी कार्यवाहीचे ध्वनिमुद्रण करण्यात आले. जुलै महिन्याच्या प्रारंभी सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच हे नवे विधेयक मांडले जावे, अशीच सरकार आणि जनप्रतिनिधींची इच्छा आहे, असे समितीचे सदस्य व केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. दहा सदस्यीय मसुदा समितीची पुढील बैठक येत्या दोन मे रोजी होणार आहे.
जनप्रतिनिधींनी तयार केलेला लोकपाल विधेयकाचा मसुदा आणि संसदेच्या स्थायी समितीने तयार केलेल्या मसुद्याचे आजच्या बैठकीत आदानप्रदान करण्यात आले. जनप्रतिनिधींनी सादर केलेल्या नव्या मसुद्यात लोकपाल आणि इतर सदस्यांची निवड करण्याच्या तरतुदीत बदल करण्यात आला आहे. नव्या प्रस्तावानुसार यासाठी लोकसभेच्या सभापती व राज्यसभेचे अध्यक्ष यांच्याऐवजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्याचा समावेश करण्यात आला आहे. जनप्रतिनिधींनी नव्याने सादर केलेला मसुदा याआधीच्या मसुद्यापेक्षा जास्त चांगला आहे, असे समितीचे सदस्य असलेल्या आणखी एका मंत्र्याने सांगितले.
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यवाहीचे ध्वनिमुद्रण सार्वजनिक करण्यास सरकारने नकार दिला आहे. मात्र, त्याऐवजी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती प्रसार माध्यमांच्या मदतीने जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत बैठकीत एकमत झाले आहे, असे जनप्रतिनिधींचे समिती सदस्य प्रशांत भूषण यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. वेबसाइट आणि इतर माध्यमांद्वारे मसुद्यासंबंधी सर्व संबंधित संघटनांचे मत जाणून घेतले जाईल. मसुद्याचे नेमके स्वरूप पुढील बैठकीत निश्‍चित करण्यात येईल, असेही प्रशांत भूषण यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्र संघाने संमत केलेल्या भ्रष्टाचारविरोधी करारावर भारताने स्वाक्षरी केली असली तरी त्या कराराला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. या करारानुसार एक स्वतंत्र लोकपालाची नियुक्ती आवश्यक असून, सखोल चर्चा केल्यानंतर एक ठोस विधेयक तयार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुढील बैठकीत मसुद्याची मूलभूत तत्त्वे निश्‍चित करण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक आठवड्यात एक बैठक किंवा गरज पडल्यास एकापेक्षा जास्त बैठका घेण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती भूषण यांनी दिली. मसुदा समिती स्थापन होण्यासाठी कारणीभूत असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आजच्या बैठकीवर समाधान व्यक्त केले आहे.

१.९७ लाखांची नावेलीत चोरी

मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी): रावोरा नावेली येथील श्रीमती आरती मिझीया फर्नांडिस यांचे घर फोडून १.९७ लाख रुपयाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. काल रात्री चोरांनी पुढच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला व कपाटातील सोन्याच्या साखळ्या, बांगड्या, नेकलेस, कर्णफुले आदी दागिने चोरून नेले.े याची किंमत १.९० लाख रुपयांच्या आसपास असून रोख रक्कम ७ हजार चोरीस गेल्याची तक्रार श्रीमती फर्नांडिस यांनी मडगाव पोलिस स्टेशनवर नोंदवली आहे.

‘स्वरांजली’ने रसिक थरारले..

सप्तसुरात न्हाली संध्याकाळ
पणजी, दि. १६ (सांस्कृतिक प्रतिनिधी): गोव्यातील नामवंत उद्योजक स्व. मोहन काकुलो यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काकुलो बंधूंतर्फे कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर मंदिरात आयोजिलेल्या ‘स्वरांजली २’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यात प्रामुख्याने संतूर, तबला, आणि पखवाज यांच्या जुगलबंदीने सर्वांनाच रोमांचित झाले.
दीपप्रज्वलन करून व मोहनबाब काकुलो यांच्या तसबिरीला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. स्व. काकुलो यांचे सुपुत्र मनोज व सूरज तसेच कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई आणि डॉ. राजीव महात्मे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मोहन काकुलो संगीत विद्यालयातर्फे ईशस्तवन सादर करण्यात आले. यशस्वी साठे-सरपोतदार (मुंबई) शास्त्रीय गायनाने मैफलीला शानदार आरंभ झाला. त्यांनी ठुमरी आणि अभंग सादर केले. गोमंतकातील ज्येष्ठ तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर (तबला) आणि सुभाष फातार्पेकर संवादिनी यांनी त्यांना सुरेख साथ केली. कार्यक्रमाच्या दुसर्‍या टप्प्यात पं. सतीश व्यास (संतूर) पं. भवानी शंकर (पखवाज) आणि पं. विजय घाटे (तबला) यांचा जुगलबंदीने रसिकांना वेगळ्याच संगीतविश्‍वात नेले. आपल्या वादनाला सुरुवात करण्या अगोदर पं. व्यास म्हणाले, एखाद्या कलाकाराला जसे पाहिजे तसे पोषक कला संकुल म्हणजे गोव्यातील कला अकादमी. येथील रसिकही जाणकार आणि सुजाण आहेत. त्यामुळे गोव्यात कार्यक्रम करायला मला खूप आवडते.
पं. व्यास यांनी पुरिया राग आरंभी आळवला. मग उत्तरोत्तर ही मैफल रंगत गेली. कार्यक्रमाच्या तिसर्‍या टप्प्यात इंदूरच्या कल्पना झोकारकर व मुंबईचे डॉ. रामा देशपांडे यांनी नाट्यगीतांचा अनोखा आविष्कार घडवला. त्यांना दया कोसंबे (तबला) व राया कोरगावकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. खुमासदार शैलीत डॉ. अजय वैद्य यांनी निवेदन केले.

सरकारच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित

वास्कोत कडकडीत बंद
वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): ‘खारीवाडा ऍफेक्टेड पीपल्स’ने केलेल्या आवाहनाला अनुसरून खारीवाडावासीयांच्या समर्थनार्थ वास्कोतील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरातील व्यवहार आज पूर्णपणे ठप्प होते. तसेच, मुरगाव बंदराजवळ जलमार्ग अडवण्यात आल्याने एमपीटीला आजही कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. दरम्यान, संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या समितीच्या पाचही मागण्या सरकारने मान्य केल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. तथापि, सरकारने दिलेले आश्‍वासन पाळले नाही तर यापेक्षा मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा संध्याकाळी येथे घेण्यात आलेल्या सभेत देण्यात आला.
न्यायालयीन आदेशानुसार खारीवाडा येथील ६६ घरे पाडण्यात आल्यानंतर या ठिकाणी संतापाची लाट उसळली होती. यामुळे १४ रोजी मध्यरात्रीपासून समुद्री वाहतूक रोखून धरण्यात आली होती. यानंतर आज १६ रोजी वास्को बंदचे आवाहन करण्यात आले होते. जलमार्गावर नांगरून ठेवलेल्या शेकडो नौकांमुळे एमपीटीमध्ये होणारी वाहतूक आजही ठप्प होती. यामुळे एमपीटीला कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले. जिल्हाधिकार्‍यांनी जलमार्गावरील नौका हटवण्याचे आदेश जारी करूनही किनारा रक्षक दल तसेच नौदलातर्फे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे, कालपासून अडकून पडलेल्या खनिजवाहू बार्जेस त्याचठिकाणी नांगरून ठेवण्यात आल्या होत्या.
खारीवाडावासीयांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वास्कोमधील सर्व दुकाने बंद राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यात मासळी मार्केट, भाजी मार्केटचा समावेश होता. तसेच, खारीवाडा येथील आपद्ग्रस्तांनी आजही येथील पालिका इमारतीसमोरील धरणे आंदोलन करून सरकारी कृतीचा निषेध केला. यात महिलांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले. आजच्या आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान, संध्याकाळी ‘खारीवाडा ऍफेक्टेड पीपल्स’चे शिष्टमंडळ, एमपीटीचे अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन समितीच्या पाचही मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले. खारीवाडा येथील घरांना पूर्णपणे संरक्षण देण्यासाठी दिल्लीत चर्चा करण्याचे आश्‍वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
पर्वरी येथे झालेल्या बैठकीनंतर खारीवाडा येथे घेण्यात आलेल्या सभेत फादर बिस्मार्क डायस यांनी हा जनतेचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. या आंदोलनाला कोणत्याच मंत्र्याचा पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळे जनशक्तीचे खरे दर्शन घडल्याचे या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांना संबोधित करताना ते म्हणाले. खारीवाडा येथील घरांवर कारवाई होणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली असून येथील ६६ घरे जमीनदोस्त केल्यानंतर ठेवण्यात आलेले राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना उद्यापासून हटवण्यात येईल तसेच एमपीटीच्या कार्यक्षेत्राबाबत केंद्र सरकारशी बोलणी करणार असल्याचे राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. परंतु, सरकारने आश्‍वासन पाळले नाही तर पुन्हा आंदोलन उभारण्याची तयारी असल्याचे जाहीर करण्यात आले. सर्व धर्मीयांच्या प्रार्थना सादर करून बैठकीची सांगता करण्यात आली.