Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 18 April 2009

मतांची टक्केवारी वाढून दक्षिणेत विजय निश्चित

पर्रीकर यांना विश्वास
मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या मतांत ४ ते ५ टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वेळी येथे भाजपला ३२-३३ टक्के मते मिळाली होती. हे प्रमाण यावेळी ४० ते ४५ टक्क्यांवर जाईल व भाजपचे उमेदवार ऍड. नरेंद्र सावईकर निश्चितपणे निवडून येतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत व्यक्त केला. आमदार दामोदर नाईक व पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे निमंत्रक सिद्धनाथ बुयांव यावेळी उपस्थित होते.
रमाकांत आंगले निवडून आले होते तेव्हा भाजपला एकूण मतदानापैकी ४० टक्के मते प्राप्त झाली होती. तेव्हापासून दक्षिण गोव्यात व प्रामुख्याने सासष्टीत भाजपला मिळणाऱ्या मतांचे प्रमाण सतत वाढतच असल्याचे श्री. पर्रीकर यांनी सांगितले. एका प्रश्र्नावर, सालसेत मिशन हे वृत्तपत्रांनी तयार केलेला "स्टंट' असून भाजपने प्रत्यक्षात अशी मोहीम हाती घेतलीच नव्हती असे त्यांनी स्पष्ट केले. काही निवडणुकांत मतदान जरी कमी झालेले असले तरी भाजपची मते वाढलेली आहेत. यंदा लोकांकडून मिळत असलेला प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे सांगून उशिरा तसेच रात्र झालेली असली तरीही लोक प्रतीक्षा करत असल्याची उदाहरणे त्यांनी दिली.
सीआरझेड प्रकरणी भाजपने विधानसभेत आधीच आवाज उठवला होता पण सरकारने त्यावेळी तो विषय गांभीर्याने घेतला नव्हता, त्याला काही प्रमाणात ऍडव्होकेट जनरलही जबाबदार असल्याचे श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
युगोडेपा हा गोव्यात तरी भाजपपेक्षाही जुना व लोकांपर्यंत पोहोचलेला पक्ष असल्याचे सांगताना कॉंग्रेसविरोधी मते वळविण्यासाठी भाजपनेच त्याला निवडणूक आखाड्यात उतरवल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले. या पक्षाकडे जाणारी कॉंग्रेसविरोधी मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यात प्रचार शिगेला पोचलेला असून भाजपने आजवर हजाराहून अधिक कोपरा सभा घेतल्याचे तसेच ऍड. सावईकर नवा चेहरा असला तरी त्यांची उमेदवारी आधीच जाहीर झाल्याने मतदारसंघातील कोपरा न कोपरा त्यांनी पालथा घातला आहे. यामुळे ते सर्वपरिचित झाल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
देशांतील अंतर्गत सुरक्षा, गगनाला भिडलेली महागाई, ढासळलेली आर्थिक व्यवस्था याबद्दल श्री. पर्रीकर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. केंद्रातील संपुआ सरकारचा कोणावरही वचक नाही हेच यावरून सिद्ध होत आहे. गोव्यातील बंद पडू लागलेले कारखाने व त्यातून निर्माण होत असलेली बेरोजगारी याचाही त्यांनी या संदर्भात उल्लेख केला. पहिल्या टप्प्यातील मतदानात झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख करून यावेळचे लक्ष्य मतदार नव्हे तर निवडणूक अधिकारी व सुरक्षा दले होते व ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांनी अफजल गुरु बाबत तत्कालीन वाजपेयी सरकारवर ठपका ठेवण्याच्या कृतीला त्यांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाने साडेतीन वर्षांपूर्वी त्याला फाशीची शिक्षा देण्यावर शिक्कामोर्तब केले त्यावेळी केंद्रात संपुआ सरकार सत्तेवर होते. याची आठवण त्यांनी करून दिली.
"सिदाद दी गोवा' प्रकरणी आपली भूमिका सुस्पष्ट आहे असे सांगताना अशा प्रकरणात आपण जात पात मानत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याचे हितसंबंध सर्वांत महत्त्वाचे असतात असे सांगून राधाराव ग्रासियस यांनी केलेला आरोप श्री. पर्रीकर यांनी फेटाळला.

मुख्यमंत्र्यांकडील असेही मतदार

मुख्यमंत्र्यांच्या मालभाट निवासस्थानाकडे गेलो तर ते पाकिस्तानी पंतप्रधानांचे निवासस्थान आहे की काय, असा भास होत असल्याची टिप्पणी युगोडेपाचे राधाराव ग्रासियस यांनी केली होती. यावर लक्ष वेधताना पर्रीकर यांनी याहून गंभीर प्रकाराचा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांच्या "त्या' निवासस्थानाच्या पत्त्यावर नोंदणी झालेल्या ७ मतदारांची नावे तपासली तर हा काय प्रकार आहे, असाच प्रश्र्न तुम्हाला पडेल, असे ते म्हणाले. या नावांबाबत आक्षेप घेऊन केलेला अर्ज सासष्टी मामलेदारांनी फेटाळून लावला आहे व यावरून मतांसाठी कोणकोणते प्रकार सुरू आहेत, मुख्यमंत्र्यांच्या निवासात कोण कोण राहतात ते स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना या प्रकरणी पत्रकारांनी छेडले असता, आपल्या घरी गेली १५ वर्षे काम करणारी मोलकरीण व तिच्या कुटुंबीयांची असल्याचे सांगितले. आपल्या निवासाच्या वरच्या मजल्यावर आपल्याच मालकीच्या फ्लॅटमध्ये हे लोक राहतात व आपल्या घरची सर्व कामे करतात. त्यांनी कायद्यानुसारच मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे, असेही ते म्हणाले.

कबुलीजबाबावरून कसाबचे घुमजाव


म्हणे तेव्हा मी "बच्चा' होतो!


मुंबई, दि. १७ - मुंबईवर हल्ला करून निष्पाप जिवांचे बळी घेणाऱ्या अजमल आमीर कसाब याने आता आपले खरे रूप दाखवणे सुरू केले आहे. आजपासून कसाबचा खटला न्यायालयापुढे सुरू झाला आहे. आपण याआधी दिलेला कबुलीजबाब खोटा असून, तो पोलिसांच्या दबावाखाली दिला आहे, असे न्यायालयापुढे सांगून त्याने खळबळ उडवून दिली. मुंबईवर हल्ला झाला तेव्हा आपण "बच्चा' होतो, १८ वर्षांच्या खाली होतो, त्यामुळे हा खटला बाल गुन्हे न्यायालयात चालवला जावा, अशी मागणीही कसाबने आपले नवनियुक्त वकील अब्बास काझमी यांच्यामार्फत केली. मात्र, न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावीत खटल्याचे कामकाज सुरू केले.
आज शुक्रवारपासून ऑर्थर रोड कारागृहातच तयार करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात न्या. ताहिलियानी यांच्यापुढे हा खटला सुरू झाला आहे. अंजली वाघमारे यांना आधी कसाबचे वकीलपत्र देण्यात आले होते. नंतर त्या याच घटनेतील अन्य एका साक्षीदाराचीही केस लढवीत असल्यामुळे त्यांच्याकडून हे वकीलपत्र काढून घेण्यात आले होते. आता नवीन वकील अब्बास काझमी हे कसाबची बाजू मांडणार आहेत. कसाब आणि अन्य दोघांवर भारताविरुद्ध युद्ध पुकारणे, हत्या आणि हत्येचा प्रयत्न, कटकारस्थान रचणे आदी आरोप आहेत.
आधी कसाबने आपला खटला बाल न्यायालयात चालवण्याची मागणी केली. त्यावेळी न्यायालयाने त्याला जन्मतारीख काय, असे विचारले असता त्याचे वकील म्हणाले की, तो "अनपढ-गवार' आहे. त्यामुळे त्याला जन्मतारीख माहीत नाही. तो १७ वर्षांचा आहे. मात्र, त्याने पोलिसांना दिलेल्या कबुलीनाम्यात आपली जन्मतारीख १३ सप्टेंबर १९८७ असल्याची नोंद केली आहे. म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी त्याने मुंबईवर हल्ला केला तेव्हा तो २१ वर्षे २ महिने वयाचा होता, असे सरकारी वकील ऍड. निकम यांनी सांगितले. ऑर्थर रोड कारागृहाच्या प्रवेश नोंदणी पुस्तकातही कसाबने हीच जन्मतारीख लिहिली आहे. कसाबचे वकील तो १७ वर्षांचा असल्याचे सिद्ध करू शकले नाही. तेव्हा न्यायाधीशांनी कसाबला उभे राहण्यास सांगितले. माझ्यासमोर उभा असलेला युवक हा सज्ञानी असल्याचे दिसून येत आहे, असेही ते म्हणाले. अखेर, या कबुलीनाम्यानुसारच कसाब २१ वर्षांचा असल्याचे सिद्ध होत असल्यामुळे न्यायालयाने त्याची मागणी फेटाळून लावली आणि खटला पुढे सुरू करण्याचे आदेश दिले.
कसाबने पोलिसांपुढे दिलेला कबुलीजबाब हा खटल्यातील महत्त्वाचा धागा आहे. मात्र, आज कसाबने हा कबुलीजबाबच फेटाळून लावत साऱ्यांना धक्का दिला आहे. आपल्याला पोलिसांनी मारहाण करून, शारीरिक छळ करून बळजबरीने हा कबुलीजबाब लिहून घेतला. त्यामुळे तो ग्राह्य मानला जाऊ नये, असेही कसाबने न्यायालयापुढे म्हटले आहे. या खटल्यात प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकारची बाजू मांडत आहेत.
सकाळी कामकाज सुरू झाले तेव्हा ऍड. निकम यांनी कबुलीनामा वाचून दाखविला. पाकिस्तानात जग्गू उर रहमान याने कसाब आणि त्याच्या साथीदारांना मुंबई हल्ल्यासाठी प्रशिक्षण दिले. जम्मू-काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी भारताची ताकद असलेल्या मुंबईवर हल्ला करायला हवा, असे या प्रशिक्षणादरम्यान त्याच्या मनावर बिंबवण्यात आले होते. या हल्ल्यात प्रामुख्याने विदेशी नागरिकांना, विशेष करून अमेरिकी व इस्रायली नागरिकांना लक्ष्य करा, असेही त्यांना सांगण्यात आले होते. म्हणूनच लिओपाल्ड, ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊस या जागा निवडल्या होत्या, आदी मुद्यांचा समावेश असलेला कसाबचा कबुलीजबाब ऍड. निकम यांनी न्यायालयापुढे सादर केला. कसाबच्या कबुलीजबाबावरील घुमजावमुळे आता या खटल्यात काय होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कसाबसह फहीम अन्सारी आणि सबाउद्दिन अहमद यांच्याविरुद्धच्या खटल्याचीही आजपासून सुनावणी सुरू झाली. या सर्वांवर २६/११ मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात १८३ जण मारले होते. यात अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश होता. या तिन्ही आरोपींवर १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

....असेही प्रशिक्षण
अतिरेकी हल्ला, स्फोटके व शस्त्रास्त्र हाताळणे, अत्याधुनिक साधनसामुग्रीचा उपयोग याच्यासह न्यायालयात कसे घुमजाव करावे, याचेही कसाबला प्रशिक्षण दिले असावे, असेच आजच्या प्रकारावरून दिसून येते. कसाब केवळ चार वर्ग उत्तीर्ण झालेला आहे. मात्र, आज त्याने आपली जी बाजू मांडली त्यावरून तो हुशार असल्याचे दिसून येते. भारतीय कायद्याचा अभ्यास करूनच त्याला हे प्रशिक्षण दिले असावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. स्वत:विषयी सहानुभूती मिळवणे आणि पोलिस व सरकारी यंत्रणेबाबत अविश्वास निर्माण करणे हा त्याचा दुहेरी उद्देश असावा, असे दिसून येत आहे.
कसाबची आजची भूमिका बघता मीडियाने कसाबविषयी सहानुभूती निर्माण होईल, असे चित्रण करू नये, असे आवाहन एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने केले आहे.

मतिमंद मुलीवर बलात्कार आरोपीला दहा वर्षे कारावास

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी राजेश बीन (२०) याला आज बाल कायदा २००३ कलम २ (४) व ८ (२) नुसार दोषी धरून बाल न्यायालयाने दहा वर्षांची कैद व २ लाख रुपयांचा दंड ठोठावला. सदर दंडाची रक्कम भरल्यास ती पिडीत मुलीला देण्यात यावी, अन्यथा आरोपीच्या शिक्षेत सहा महिन्याने वाढ केली जावी, असेही न्यायालयाने नमूद केले.
पिडीत मुलगी मतिमंद आणि अल्पवयीन असल्याने आरोपीला कठोर शिक्षा देण्याचा युक्तिवाद यावेळी सरकारी वकील पूनम भरणे यांनी केला. तर, आरोपीचा पहिलाच गुन्हा असल्याने आणि त्याचे वय केवळ २० वर्षे असल्याने त्याला सौम्य शिक्षा देण्यात यावी, अशी याचना यावेळी आरोपीच्या वकिलाने केली. आरोपी राजेश बीन याने आपल्या शेजारी राहणाऱ्या मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपासात सिद्ध झाल्याने त्याला दि. १३ एप्रिल ०९ रोजी न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज त्याला शिक्षा ठोठावण्यात आली.
२ एप्रिल ०८ रोजी दुपारी १.५० च्या दरम्यान आरोपी राजेश बीन याने आपल्या राहत्या खोलीत १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. आरोपीने आपल्या बचावासाठी पिडीत मुलीच्या वडिलाने आपल्याकडून पाच हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, ते परत मागत असल्याने आपल्यावर खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याची भूमिका घेतली होती. परंतु, सर्व पुरावे आरोपीच्या विरोधात गेल्याने आणि वैद्यकीय अहवालात आरोपीनेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्याचा हा युक्तिवाद फेटाळून लावला होता.
पिडीत मुलीची आई आपल्या घरात जेवण करण्यात व्यस्त असताना आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला आपल्या खोलीत बोलावून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला होता.

रेईश मागूश पंच सदस्य हल्ला प्रकरणी दोघांना अटक

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)- रेईश मागूशचे पंच सदस्य फ्रान्सिस सेरांव यांच्यावर तलवार व रॉडने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या दोघा संशयितांना काल रात्री गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. दि. ५ फेब्रुवारी ०९ रोजी सकाळी श्री. सेरांव हे शाळेत जात असताना वाटेत अडवून हल्लेखोरांनी त्यांना गंभीर जखमी केले होते. त्या घटनेपासून म्हणजेच गेल्या दोन महिन्यांपासून हल्लेखोर फरार होते. काल रात्री पोलिसांनी सापळा रचून दीपक शर्मा (रा. बेती वेरे) व साल्वादोर फर्नांडिस ऊर्फ गालू (रा. ताळगाव) यांना अटक केली. आज दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे करून सात दिवसाची पोलिस कोठडी मिळवण्यात आल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी दिली.
या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार कळंगुटचे आमदार व फ्रान्सिस कुलासो असल्याचा आरोप रेईश मागूशचे सरपंच तसेच अन्य पंच सदस्यांनी केला होता. त्याचप्रमाणे आरोपींना पकडण्यासाठी कळंगुट पोलिस स्थानकावर मोर्चाही काढण्यात आला होता. परंतु, कळंगुट पोलिसांना आरोपींना अटक करण्यात अपयश आल्याने सदर प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून या विभागाचे पोलिस त्यांच्या मागावर होते. काल रात्री दीपक व गालू
घरी आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.
"सुपारी' घेऊन हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पकडण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असल्याचे या विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पंच सदस्य सेरांव नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या "डिओ' दुचाकीवरून शाळेत निघाले असता तोंडावर बुरखा परिधान करून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. हा हल्ला पूर्वनियोजित असून रेईश मागूश पंचायत ताब्यात घेण्यासाठी पंच सदस्यांना अशा प्रकारे धमकावले जात असल्याचा दावा उपसरपंच वीरेंद्र शिरोडकर यांनी केला होता. त्याचप्रमाणे हल्लेखोरांची संख्या एकूण चार असल्याची माहिती त्यांनी त्यावेळी पोलिसांनी दिली होती. त्यानुसार पोलिस अन्य संशयितांचा शोध घेत आहेत.

चलो, वायंगिणी किनारी

"गोवा बचाव अभियाना' ची अनोखी सहल

पणजी, दि.१७ (प्रतिनिधी)- सामाजिक विषयांबाबत नेहमीच सतर्क असलेल्या "गोवा बचाव अभियान' संघटनेकडून प्रथमच एखाद्या विषयावर अनोख्या पद्धतीने जनतेचे लक्ष वेधण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. एरवी केवळ कोणत्या ना कोणत्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करणाऱ्या "गोवा बचाव अभियाना'तर्फे सर्व गोमंतकीयांना चक्क सहलीचे आमंत्रण देण्यात आले आहे. येत्या रविवार दि. १९ रोजी संध्याकाळी ५ वाजता ही सहल "सिदाद दी गोवा' हॉटेलच्या ताब्यात असलेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सर्वसामान्य जनतेसाठी खुल्या झालेल्या वायंगिणी किनाऱ्यावर आयोजित करण्यात आली आहे.
दोनापावला येथे सार्वजनिक वापरासाठी निश्चित केलेल्या जागेवर हॉटेल "सिदाद दी गोवा'कडून बांधकाम करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकारला करावयाची होती, परंतु राज्य सरकारने मात्र भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करणारा वटहुकूम जारी करून या हॉटेलच्या तथाकथित बांधकामाला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या विषयावरून "गोवा बचाव अभियान' संघटनेतर्फे सरकारचा जाहीर निषेधही करण्यात आला होता. हा वटहुकूम विधानसभेत सरकारने बहुमताच्या जोरावर मान्य करून घेतल्याने तो काळा दिवस म्हणून पाळण्यात आला होता. खुद्द सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून सरकारकडून धनिकांचे हित जपले जाते, असा आरोप करून सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मात्र सरकारकडून अजिबात तत्परता दाखवली जात नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली होती.
सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालात २० एप्रिलपर्यंत सदर बांधकाम पाडण्याचे आदेश सरकारला दिले होते. आता सरकारने वटहुकूम जारी करून ही कारवाई टाळली असली तरी या आदेशाची अंतिम मुदत संपण्यापूर्वी हा सहलीचा कार्यक्रम येथे आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आत्तापर्यंत या हॉटेलकडून आपली खाजगी मालमत्ता असल्यागत वापरला जाणारा वायंगिणी किनारा जनतेसाठी खुला झाल्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा, हा या सहलीमागचा उद्देश असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान, या सहलीनिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर केले जाणार आहे. यात "सॅटर्डे इव्हनींग क्विझ क्लब'तर्फे प्रश्नमंजूषा स्पर्धा, आंतोनियो कॉस्ता यांच्यातर्फे चित्रकला कार्यशाळा, "द मस्टर्ड सीड कंपनी'तर्फे नाट्य कार्यशाळा तसेच संगीत, विविध मनोरंजनपर खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार सुबोध केरकर यांच्यातर्फे या किनाऱ्यावर खास कलाकृतींचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.
ही सहल नेहमीची नसून जनतेची थट्टा चालवलेल्या सरकारच्या पक्षपाती व भ्रष्ट कारभाराचा एका अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचाच प्रकार असेल. जनतेने सुरू केलेल्या एखाद्या लढ्याला न्याय मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी ही सहल आहे. या सहलीवेळी भाषणबाजी किंवा तत्सम प्रकार अजिबात असणार नाहीत. या सहलीला लोकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे व एरवी आपल्यासोबत सहलीला न्यायचे सामान व खाण्यापिण्याचे प्रकारही सोबत घ्यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे. उपस्थितांना सहलीचा आनंद मोकळेपणाने घेता येईल, अशी माहिती अभियानाच्या सचिव रिबोनी शहा यांनी दिली आहे.

Friday, 17 April 2009

कॉंग्रेस सरकारच्या राजवटीत कामगारांची जबर पिळवणूक


आता "गोवा फॉर्म्युलेशन'चे कामगारही रस्त्यावर

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - गोव्यातील भूमिपुत्रांना कामावरून कमी करून बिगरगोमंतकीयांची भरती करण्याचे सत्र विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरूच आहे. सत्तरी तालुक्यातील होंडास्थित "गोवा फॉर्म्युलेशन लिमिटेड' या कंपनीत कामावर असलेल्या सुमारे १७५ स्थानिक कामगारांना घरी पाठवून ही कंपनी अनधिकृतरीत्या गेल्या डिसेंबर महिन्यात बंद करण्यात आली होती. आता ओरिसा, बिहार, कर्नाटक व महाराष्ट्रातील कामगारांना भरती करून ही कंपनी पुन्हा सुरू करण्यात आल्याने आज या कामगारांनी पाटो येथील श्रमशक्ती भवनासमोर बेमुदत धरणे धरले आहे.
या औषध उत्पादन करणाऱ्या कंपनीतील कामगारांना प्राथमिक सुविधाही पुरवण्यात आल्या नव्हत्या. आठवड्याची सुट्टी, रजा तसेच इतर सार्वजनिक सुट्ट्या यांचाही लाभ त्यांना मिळत नव्हता. भविष्य निर्वाह निधी, ईएसआय तथा कामगार कल्याण निधीपासूनही या कामगारांना वंचित ठेवण्यात आले होते. या कामगारांत महिला कामगारांचाही समावेश होता; त्यांनाही आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या नव्हत्या, अशी माहिती या कामगारांनी दिली. दरम्यान, कामगारांनी व्यवस्थापनाला पत्र पाठवून या सुविधा पुरवण्याची विनंती केली होती. या पत्रानंतर लगेच व्यवस्थापनाने २२ डिसेंबर रोजी या सर्व १७५ कामगारांना कामावरून अचानक कमी करून त्यांना घरी पाठवले होते. मुळात शंभरावर कामगार असलेली कंपनी बंद करण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तथापि, येथे सर्व कायदे धाब्यावर बसवून या कामगारांना घरी पाठवण्यात आल्याचा आरोप या कामगारांनी केला. याप्रकरणी कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असली तरी सरकार मूग गिळून गप्प असल्याची टीका आयटकचे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला आहे.
विशेष म्हणजे एवढे करूनही आता सदर कंपनीच्या मालकाने येत्या १ एप्रिल २००९ पासून ही कंपनी पुन्हा सुरू केली आहे. यावेळी इतर विविध राज्यांतून कामगारांची भरती करण्यात आल्याने भूमिपुत्रांना रस्त्यावर आणण्याच्या या कृतीचा कामगारांनी आज जाहीर निषेध केला.
जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार
एकीकडे खाजगी पातळीवरील कामगारांचे खुलेआम शोषण सुरू असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत उतरलेले उमेदवार युवकांना रोजगार पुरवण्याचे गाजर पुढे करीत आहेत. ही कृती आमच्या जखमांवर मीठ चोळणारी ठरल्याची संतप्त प्रतिक्रिया या कामगारांनी व्यक्त केली. एका खाजगी हॉटेलच्या कामगारांचे हित जपण्यासाठी सरकारकडून खास वटहुकूम काढला जातो; परंतु येथे कुणाचीही तमा न बाळगता थेट कामगारांना घरी पाठवणाऱ्या मालकाला मात्र सरकारकडून अभय मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने कामगार वर्गाची थट्टाच चालवली असून कॉंग्रेस राजवटीत खाजगी व असंघटित कामगारांना कुणीही वाली नाही, असा आरोप कामगार नेते श्री. फोन्सेका यांनी केला.
बांधकाम कामगारांचे आंदोलन सुरूच
सार्वजनिक बांधकाम खात्यातील कंत्राटी कामगार सोसायटीच्या कामगारांनी आज सलग दुसऱ्या दिवशी आपला धरणे कार्यक्रम सुरूच ठेवला. खात्यात विविध पदांवर गेली १५ ते २० वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या सुमारे १८०० कामगारांची पिळवणूक सरकारने सुरू केली आहे. या कामगारांना आहे तेथेच ठेवून आपल्या मर्जीतील कामगारांची थेट भरती केली जाते, कंत्राटी कामगारांना वंचित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किमान वेतनापासूनही या कामगारांना वंचित ठेवण्यात येत असल्याने सरकार या कामगारांप्रति अमानुषपणे वागत असल्याचा आरोप या कामगारांनी केला. दरम्यान, या कामगारांनी आज संध्याकाळी श्रमशक्ती भवनातील कामगार आयुक्तालयात प्रवेश करून तिथे ठाण मांडले. न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असा निर्धारही या कामगारांनी व्यक्त केला.

वरुण गांधी यांची पॅरोलवर सुटका

नवी दिल्ली, दि. १६ - "रासुका'अंतर्गत अटकेत असणाऱ्या वरुण गांधी यांची आज सर्वोच्च न्यायालयाने पॅरोलवर सुटका केली. दोन आठवड्यांसाठी वरुण गांधी यांना तुरुंगातून मुक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडून यापुढे प्रक्षोभक भाषण देणार नाही, असे शपथपत्र लिहून घेतले आहे.
२९ मार्चपासून वरुण गांधी एटा कारागृहात होते. तेथूनच त्यांनी यापुढे प्रक्षोभक भाषण करणार नाही, असे शपथपत्र लिहून दिले होते. सरन्यायाधीश के.जी.बालकृष्णन यांच्या नेतृत्वातील न्यायासनाने हे शपथपत्र देण्याविषयी एटा कारागृह प्रशासनाला सांगितले होते. सुटकेनंतर वरुण गांधी यांना असेच शपथपत्र सर्वोच्च न्यायालयातही द्यावे लागणार आहे.
मुस्लिम समुदायाविषयी प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी उत्तरप्रदेश प्रशासनाने वरुण गांधी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली होती. उत्तरप्रदेश सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका वरुण गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रक्षोभक भाषणे देणार नाही, असे शपथपत्र दिले तर सुटकेबाबत विचार केला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार आज न्यायालयाने वरुण गांधी यांची दोन आठवड्यांच्या पॅरोलवर सुटका केली.
पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज
सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता का होईना पण, पॅरोलचा दोन आठवड्यांचा दिलासा मिळाल्यानंतर वरुण गांधी पुढील आठवड्यात आपला उमेदवारी अर्ज सादर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पिलीभीत येथून भाजपचे उमेदवार असणारे वरुण गांधी सोमवारी किंवा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता भाजपाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. वरुणची आई मनेका गांधी या उत्तरप्रदेशातील औनला येथून शनिवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज कधी दाखल करायचा याविषयी दोघांनीही वैयक्तिक स्तरावर निर्णय घेतला असून पक्षाने याबाबत कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचे समजते.
मात्र, भाजपने दोन आठवड्यांच्या पॅरोलच्या काळात वरुण गांधी यांना प्रचारासाठी उतरविण्याचे संकेत दिले आहेत.

पाच राज्यांमध्ये हिंसाचारात १७ ठार

पहिल्याच दिवशी मतदान रोखण्याचा नक्षलवाद्यांचा प्रयत्न

..राजनांदगावमध्ये पाच निवडणूक अधिकारी ठार
..लतिहारमध्ये सात बीएसएफ जवान शहीद
..ओरिसात मतदान केंद्र व "इव्हीएम' जाळल्या


रांची, लतिहार, गया, भुवनेश्वर, दि. १६ - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरू होताच देशाच्या विविध भागात नक्षलवादीही सक्रीय झाले असून निवडणूक प्रक्रियेत अडथळे आणण्याच्या प्रयत्नांतर्गत त्यांनी महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि ओरिसात बॉम्ब व शस्त्रांनी भीषण हल्ला चढविला. यात पाच निवडणूक अधिकारी आणि सुरक्षा दलाच्या दहा जवानांसह १७ जण ठार तर अनेक जण जखमी झालेत. नक्षलवाद्यांनी काही ठिकाणी मतदानयंत्रे पळवून नेली तर काही मतदान केंद्रांना आग लावली.
झारखंडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात सात जवान शहीद झाले असून छत्तीसगडमधील हल्ल्यात पाच निवडणूक अधिकारी ठार झाले आहेत.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील मिसगाव येथे नक्षलवाद्यांनी निवडणूक प्रक्रिया उधळून लावण्यासाठी मतदान केंद्रावर हल्ला चढविला. भीषण गोळीबार करीत पुढे सरकत असलेल्या नक्षलवाद्यांवर तुटून पडताना सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी त्यांना मागे पिटाळले. तब्बल अर्धा तास पोलिस व नक्षवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. अखेर पोलिसांच्या सामर्थ्यापुढे आपल्याला येथे टीकाव धरणे शक्य नाही असे ध्यानात येताच डिटोनेटर्स आणि निवडणूक विरोधी साहित्य तेथेच टाकून नक्षलवाद्यांनी पळ काढला. पोलिसांनी स्फोटके व शस्त्रांचा हा साठा जप्त केला आहे.
छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात निवडणूक अधिकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला नक्षलवाद्यांनी शक्तिशाली स्फोटकांनी उडवले. या हल्ल्यात पाच निवडणूक अधिकारी जागीच मारले गेले तर अन्य दोघे जखमी झाले. राज्यातील दंतेवाडा व नारायणपूर क्षेत्रातील मतदान केंद्रांवरही नक्षल्यांनी हल्ला चढवला व सुरक्षा दलांवर गोळ्या झाडल्या. दंतेवाडा जिल्ह्यातील मारूकी येथे नक्षवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एका सीआरपीएफ जवानाचा नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र यात नक्षलवाद्यांना नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
नक्षवाद्यांनी छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यातील नरनार, सोनापाल आणि करमारी तसेच दंतेवाडा जिल्ह्यातील मंगनार व जंगामपाल गावांवर हल्ला चढवल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक गिरधारी नायक यांनी दिली.
सीआरपीएफवर हल्ला चढविल्यानंतर एका दिवसाने माओवाद्यांनी झारखंड राज्याच्या लतिहार जिल्ह्यात सकाळी ७.३० वाजता बीएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या बसला शक्तिशाली भूसुरुंग पेरून स्फोटकांद्वारे उडवले. यात सीमा सुरक्षा दलाचे सात जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात बसचा असैनिक चालक व मदतनीसही मारला गेला. शिवाय अन्य काही जवान जखमी झाले. रांची येथून १२५ कि.मी.अंतरावर असलेल्या तालिहार जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा गढ असलेल्या लाधुप येथून गस्त घालून बीएसएफ जवान आराहकडे परत येत होते. मार्गात नक्षल्यांनी स्फोट घडवून त्यांचे वाहन उडवले. मदत व बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती तालिहारचे पोलिस उपायुक्त सर्वेन्दु तथागत यांनी दिली.
तिकडे बिहारच्या गया जिल्ह्यातील बांके बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंहपूर गावात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मतदान केंद्रावर तैनात गृहरक्षक दलाचा जवान व एक पोलिस असे दोघे प्रतिकार करताना शहीद झाले तर अन्य दोन पोलिस बेपत्ता आहेत.
ओरिसातील मलकानगिरी जिल्ह्यात नक्षल्यांनी तीन मतदान केंद्रांना आग लावली. यात "इव्हीएम' यंत्र (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) आणि निवडणूक साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे येथील मतदान प्रक्रियेवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. नागरिकांमध्ये दहशत पसरल्यामुळे ते मतदान करण्यासाठी घराबाहेर निघण्यालाही घाबरत होते. लोकसभा निवडणुकीच्या बहिष्काराचे आवाहन करणाऱ्या नक्षलवाद्यांनी चित्रकोंडा भागातील अंध्राल येथे हल्ला चढविला. निवडणूक अधिकाऱ्यांचे हात व पाय बांधून साहित्य पोचवणारे वाहन व दोन "इव्हीएम'ला आग लावल्याची माहिती मलकानगिरीचे जिल्हाधिकारी नितीन भानुदास जावळे यांनी दिली. या हल्ल्यांमुळे येथील मतदान केंद्रांवर मतदानच झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कालिमेला पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सलिमरीकोंडा तसेच एमव्ही ७३ क्षेत्रात माओवाद्यांनी दोन मतदान केंद्रांना आगीच्या हवाली केले. "इव्हीएम' बाहेर आणून त्यांनाही आग लावली. माओवाद्यांनी जिल्ह्यातील माथिली क्षेत्रात निवडणूक अधिकारी व मतदारांना मतदानापासून रोखण्यासाठी मोठे वृक्ष कापून रस्त्यांवर आडवे पाडले. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मोठे खडक रस्त्यांवर पाडल्यामुळे मार्गात अथळा निर्माण झाला. माओवाद्यांच्या धमकीमुळे कालिमेला भागातील बादिगाटा मतदान केंद्रावर मतदानाच्या प्रारंभिक दोन तासात मतदारच फिरकले नाहीत. दिवसभरात येथे एकही मत पडले नाही. जिल्ह्यातील अन्य भागातही मतदानाची टक्केवारी फारच कमी राहिली. विशेषत: चित्रकोंडा व मलकानगिरी मतदारसंघात फारच कमी टक्केवारी राहिल्याचे पोलिस अधीक्षक सत्यव्रत भोई यांनी सांगितले.

हरिप्रसाद यांच्याविरुद्ध भाजपची तक्रार दाखल

पणजी, दि.१६ (प्रतिनिधी)- गोवा प्रदेश भाजपच्यावतीने आज कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी तथा गोव्याचे निरीक्षक बी. के. हरिप्रसाद यांच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हरिप्रसाद यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी व सध्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना अरबी समुद्रात बुडवा, असे प्रक्षोभक वक्तव्य केले होते. हरिप्रसाद यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्ते व या दोन्ही नेत्यांवर श्रद्धा असलेल्या समस्त जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप विधिमंडळ गटाचे उपनेते तथा म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी ही माहिती दिली. यावेळी मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. पत्रकारांशी बोलताना श्री. डिसोझा पुढे म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा देशाच्या राजकारणासाठी वाहिला आहे. भारतीय राजकारणात त्यांनी दिलेल्या योगदानाची कदर न करता हरिप्रसाद यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुळात भाजपचे युवा नेते वरुण गांधी यांच्यावर जर "राष्ट्रीय सुरक्षा कायदा' लागू होतो तर हरिप्रसाद यांच्यावरही हा कायदा लागू करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या तक्रारीसोबत हरिप्रसाद यांच्या या तथाकथित वक्तव्याबाबतच्या बातम्यांची कात्रणेही जोडलेली आहेत.
वाजपेयींबाबत आकस का?
माजी पंतप्रधान तथा भाजपचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी हे सध्या आजारी आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ते सहभागी झाले नाहीत. त्यांनी या काळात कॉंग्रेस किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांवर टीकाही केल्याचे कोठेच ऐकिवात नाही. अशावेळी विनाकारण वाजपेयी यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका करण्याइतपत आकस हरिप्रसाद यांना का, असा सवाल आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. हरिप्रसाद यांना राष्ट्रीय राजकारणाची जाणीव नसल्यानेच त्यांच्याकडून हे बेजबाबदारपणाचे वक्तव्य करण्यात आले. त्यांचा राजकारणाचा अभ्यास कच्चा असेल तर त्यांनी मूग गिळून गप्प राहणेच उचित असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी हाणला.

फोंड्यात एक लाखांच्या बनावट नोटा जप्त

फोंडा, दि.१६ (प्रतिनिधी) - अनैतिक धंद्यात गुंतलेल्या हल्ल्याळ, अळणावर या भागातील चार संशयितांना फोंडा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एक हजार रुपयांच्या एक लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
कुर्टी येथील एका हॉटेलजवळ भांडण करणाऱ्या चार जणांना फोंडा पोलिसांनी बुधवार दि. १५ रोजी संध्याकाळी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे एक लाख रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. या प्रकरणी अटक केलेल्या शिवानंद नागप्पा दुपादल (२५) हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात हल्ल्याळ पोलिस स्थानकावर काही गुन्हे नोंद आहेत. सदर संशयित एका राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. चार संशयितांना अकरा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने आज (दि.१६) दिला आहे.
विजय कैलास अय्यर (३३ वर्षे, रा.जामखंडी), सय्यद दस्तगीरसाब कोपड (३० वर्षे, रा. मुडाल), शिवानंद नागप्पा दुपादल (२५ वर्षे, रा. अळणावर) आणि फिरोज कादरसाब बिजापूर (२५ वर्षे, रा. अळणावर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.
बनावट नोटांची देवाण घेवाण करण्यासाठी संशयित फोंडा भागात आले होते. त्यातील शिवानंद व फिरोज हे दोघे मोटर सायकलने (केए २५ डब्ल्यू १८०९)तर विजय व सय्यद हे बसगाडीने गोव्यात आले होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. १५ रोजी संध्याकाळी कुर्टी येथे त्यांच्यात बनावट नोटांच्या विषयावरून खटका उडाला. यावेळी तेथील लोकांनी पोलिसांना त्यांच्यात झालेल्या मारामारीची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन चौघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू असताना पोलिसांना चुकीची माहिती देऊन फसवण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. एक व्यक्तीने आपण राजकीय नेत्याचा सेक्रेटरी बोलत असल्याचे पोलिसांना सांगून त्यांच्या नातेवाइकाला सोडून देण्याची मागणी केली. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी सदर व्यक्तीच्या बोलण्यावर विश्र्वास न ठेवता त्याला सोडून देण्यास नकार दिला व फोन करणाऱ्याला पोलिस स्टेशनवर येण्याची सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांची कसून चौकशी केली असता बनावट नोटा व एक कागदाचे पुडके आढळून आले. सदर पुडक्यात पावती पुस्तके बांधण्यात आली होती. बनावट नोटांसाठी देण्यात येणाऱ्या पैशांच्या पुडक्यात पावती पुस्तके असल्याचे आढळून येताच त्यांच्यात भांडण झाले.
संशयित शिवानंद यांच्या विरोधात हल्ल्याळ पोलिस स्टेशनवर गुन्हे नोंद असून हल्ल्याळ पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी फोंड्यात आले होते. मात्र, संशयिताविरुद्ध फोंड्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्याला कर्नाटक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला नाही. याप्रकरणी निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल पालेकर तपास करत आहेत.

दोषींवर कायदेशीर कारवाईचा ठराव

फोंडा पालिका मंडळ बैठक

फोंडा, दि.१६ (प्रतिनिधी) - फोंडा पालिकेत प्रशासकाच्या राजवटीत २००६-०७ आणि २००७ -०८ या वर्षात झालेल्या ४०.७७ लाख रुपयांच्या अफरातफर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव पालिका मंडळाच्या आज (दि.१६) सकाळी घेण्यात आलेल्या खास बैठकीत संमत करण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक होते. यावेळी उपनगराध्यक्ष ऍड. वंदना जोग, नगरसेविका राधिका नाईक, रुक्मा डांगी, दिनकर मुंड्ये, शिवानंद सावंत, व्हिसेंट फर्नांडिस, संजय नाईक, दामोदर नाईक, किशोर नाईक, शैलेंद्र शिंक्रे, प्रदीप नाईक, दीक्षा नाईक, मुख्याधिकारी श्रीमती बिजू नाईक, पालिका अधीक्षक लुईस पिरीश, कायदा सल्लागार ऍड. जी. व्ही. नाईक आदी उपस्थित होते.
या बैठकीत पालिका कार्यालयात घडलेल्या कथित अफरातफर प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या अफरातफर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. लाखो रुपयांच्या अफरातफरीचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून संबंधितांविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अफरातफर झालेल्या या काळात पालिकेचा "कॅश बुक' योग्य प्रकारे लिहिला नाही. "म्युनिसिपल अकाऊंट कोड'चे योग्य प्रकारे पालन करण्यात आले नाही. पालिका लेखा अधिकाऱ्यांना बैठकीत पाचारण करून त्यांच्याकडून यासंबंधी माहिती जाणून घेण्यात आली. कॅशिअर आपल्याकडे कॅशबुक सादर करत नव्हता. यासंबंधी वरिष्ठांना वेळच्या वेळी माहिती देण्यात आली. मात्र, वरिष्ठांनी कोणतीही कारवाई केली नाही, असे लेखा अधिकाऱ्याने बैठकीत सांगितले.
हे अफरातफरीचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून यापूर्वीच्या काळात सुद्धा पालिकेत अफरातफर झालेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यापूर्वीच्या काळाचे सुद्धा लेखा परीक्षण पुन्हा करून घ्यावे, अशी मागणी संजय नाईक यांनी केली. दामोदर नाईक यांनी याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली.
यापुढे पालिकेत अशा प्रकारचे प्रकरण घडू नये यासाठी "म्युनिसिपल अकांऊंट कोड'चे पालन करण्याची गरज आहे. पालिकेचा कॅशबुक संगणकाच्या माध्यमातून लिहिला जातो तो यापुढे सदर कॅश बुक हाताने सुद्धा लिहावा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅश बुकची नियमित तपासणी करावी, धनादेशाचा भरणा वेळेवर बॅंकेत करावा, मुख्याधिकाऱ्यांनी लेखा विभागाला योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत राधिका नाईक, ऍड. वंदना जोग, दिनकर मुंडये आदींनी भाग घेतला.
पालिकेतील २००५ सालातील कथित फर्निचर प्रकरणावर बैठकीत चर्चा झाली. पालिकेने फर्निचरचे बिल न फेडल्याने संबंधिताने न्यायालयात खटला दाखल केला आहे. गेली काही वर्षे याप्रकरणी खटला सुरू आहे. आता सदर प्रकरण लोक अदालतीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. फर्निचरचे बिल अठरा टक्के व्याजाने द्यावे लागणार आहे. हा प्रश्न असाच ठेवल्यास पालिकेचा निधी नाहक खर्च होणार आहे. आत्तापर्यंत ह्या खटल्यावर पालिकेच्या तिजोरीतील सुमारे लाखभर रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. फर्निचर बिलाचे व्याज दर कमी करून सदर प्रकरण मिटवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या फर्निचर खरेदी प्रकरणाची दक्षता खात्याकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरूच ठेवून संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे यावेळी ठरवण्यात आले.

Thursday, 16 April 2009

खास दर्जा, 'सीआरझेड'वर विचाराअंती निर्णय : सोनिया गांधी


मडगाव येथील प्रचारसभेत बोलताना सोनिया गांधी. अपेक्षेपेक्षा कमी लोक उपस्थित असल्याने अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या.

मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी) : कॉंग्रेसने नेहमीच गोव्याच्या प्रश्र्नांना सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे व यापुढेही दिले जाईल, असे आश्र्वासन देतानाच "सीआरझेड' व राज्याला खास दर्जा देण्याच्या मागणीचाही सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची ग्वाही कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज येथील फातोर्डा सराव मैदानावर आयोजित कॉंग्रेसच्या प्रचार सभेत बोलताना दिली.
"सीआरझेड'मुळे सर्वसामान्यांसमोर महासंकट उद्भवल्याची कल्पना सरकारला आहे, त्यांच्या हितरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजले जातील. येथील जनता पर्यावरणाच्या जतनाबद्दल किती दक्ष आहे त्याचे प्रत्यंतर सेझविरोधी चळवळीतून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा सेझ रद्द करण्याचा प्रस्ताव आणला तेव्हा कॉंग्रेसने तो तत्परतेने उचलून धरला असे सांगून अशा प्रकारच्या दक्षतेबद्दल त्यांनी गोमंतकीयांचे अभिनंदन केले. भविष्यातही ही जागरूकता कायम ठेवा असे आवाहनही त्यांनी केले. गोमंतकीयांच्या आशा आकांक्षांचा कॉंग्रेस पक्ष सदैव आदरच करत आला आहे. जनमत कौल, वेगळा प्रदेश, कोकणीला घटनेची मान्यता, राजभाषा व घटकराज्य आदी मागण्यांची पूर्ती कॉंग्रेसनेच केल्याचे त्यांनी सांगितले.
आपण दोन वर्षांपूर्वी केलेल्या आवाहनाला गोमंतकीयांनी मान दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले व येत्या निवडणुकीतही ती जागरूकता कायम ठेवण्याचा सल्ला दिला. बेरोजगारी दूर करण्यापासून ते महिलांना पंचायतीत आरक्षण देण्यापर्यंत कॉंग्रेसने बजावलेल्या कामगिरीचा त्यांनी आपल्या २५ मिनिटांच्या भाषणात आढावा घेतला. सरकारला विविध आघाड्यांवर काम करण्यास भाजपच अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशासमोरील मुख्य प्रश्र्न दहशतवाद व जातीयवाद असल्याचे त्यांनी नमूद केले. दहशतवादाशी मुकाबला करण्याचे काम सुरक्षा दल करत आहेत पण जातीयवादाचे विष मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपच पसरवत असल्याचा आरोप केला. याचा फटका सर्व आघाड्यांवर बसतो व प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. दहशतवादाइतकीच ही भयंकर स्थिती असून ती दूर करण्यासाठी भक्कम व स्थिर सरकाराची गरज आहे, ती क्षमता फक्त कॉंग्रेसपाशीच आहे.
कॉंग्रेसच्या आजवरच्या सिद्धींचा आढावा घेताना सर्व राजकीय पक्षांत कोण उजवे आहे ते ठरवण्याचे काम लोकांवरच सोपवले. त्या म्हणाल्या की कॉंग्रेसला एक संस्कृती आहे, परंपरा आहे जी इतर पक्षांत ते नाही. कॉंग्रेस नेत्यांनी देशासाठी दिलेल्या आत्मबलिदानाचाही त्यांनी उल्लेख केला व अन्य पक्षांत तसे कोणी आहेत का, असा सवाल केला.
प्रथम प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचेही भाषण झाले. व्यासपीठावर सोनिया गांधी व्यतिरिक्त मुख्यमंत्री, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, डॉ. विल्फ्रेड डिसोझा व बी. के. हरिप्रसाद होते. शेवटी कॉंग्रेस उमेदवार फ्रान्सिस्क सार्दिन यांनाही व्यासपीठावर आणण्यात आले. सभेला मंत्री बाबूश मोन्सेरात व आमदार आग्नेल फर्नांडिस वगळता बहुतेक सर्व कॉंग्रेस मंत्री व आमदार हजर होते. यात माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो व माजी मंत्री रमाकांत खलप यांचाही समावेश होता.
मुख्यमंत्र्यांसमवेत सोनिया गांधींचे दाबोेळीहून हेलिकॉप्टरने आगमन झाले व सभा आटोपल्यानंतर तेच हेलिकॉप्टर दाबोळीकडे रवाना झाले.
-------------------------------------------------------------------
फ्रान्सिस्क सार्दिन यांची कुचंबणा!
आज फातोर्डा मैदानावर आयोजित प्रचार सभेत कॉंग्रेसचे दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार फ्रान्सिस्क सार्दिन यांची भलतीच कुचंबणा झाली. या घटनेमागे कॉंग्रेसमधील काही शक्तींचा हात आहे व त्यांनी हा प्रकार मुद्दा जाणून बुजून घडवून आणल्याची प्रतिक्रिया जाणकारांनी दिली.
या सभेसाठी घातलेल्या उंच व्यासपीठावर वास्तविक इतरांबरोबरच या सभेचे उत्सवमूर्ती असलेले सार्दिन यांना स्थान असायला हवे होते. त्यानुसार ते सोनिया गांधी व इतरांबरोबर तेथे निघालेही होते पण त्यांना व्यासपीठाच्या पायऱ्यांजवळच अडवण्यात आले. यामुळे ते बेचैन होऊन परत फिरले व आपले हात वर करून त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. खास प्रेक्षक वर्गाकडे जाऊन येरझाऱ्या टाकणाऱ्या सार्दिन यांची मनःस्थिती नेमकी लुईझीन फालेरो यांनी ओळखली व त्यांची समजूत घातली. यानंतर स्वतः दोन खुर्च्या आणून त्यावर बसण्याचा सार्दिन यांना आग्रह केला. पण सार्दिन यांची अस्वस्थता कायम होती. दोन - तीनवेळा त्यांनी मुख्यमंत्र्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला खरा त्यांचा आवाज मात्र पोचला नाही. मुख्यमंत्री बोलण्यासाठी उठले व सार्दिन खुर्चीवर बसले पण त्यांच्या मनांतील चुळबुळ दुरूनही जाणवत होती.
अखेर मुख्यमंत्री बसले व मॅडमचे भाषण सुरू झाले. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील तणाव कमी झाल्याचे पाहून लुईझीन यांनी मोबाईलवरून सार्दिनप्रति घडलेला प्रकार कळवल्यानंतर त्यांनी सार्दिन यांना वर बोलावून घेतले. परंतु, तेथे खुर्ची रिकामी नसल्याने उभे राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.
दुसरी नोंद घेण्याची बाब म्हणजे ही सभा कॉंग्रेसच्या प्रचाराची असताना कुठेच सार्दिन यांच्या प्रचाराचा फलक आढळला नाही की कुठल्याही वक्त्यांनी, खुद्द सोनिया गांधी यांनी देखील त्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. हा सर्व योगायोग की ते जाणीवपूर्वक घडले याबाबत दबक्या आवाजात चर्चा मात्र झाली.

क्लाईव्ह ऍलन्सला जन्मठेप

वास्को, दि. १५ (प्रतिनिधी): स्वतःच्याच मित्राचा खून केलेल्या मांगोरहिल वास्को येथे राहणाऱ्या क्लाईव्ह ऍलन्स याला आज मडगावच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. संशयित आरोपी क्लाईव्ह ऍलन्स याच्या घरी पार्टी सुरू असताना पूर्वीच्या एका विषयावरून वाद निर्माण झाल्यानंतर व्हॅलेंटाईन डायस (रा. शांतिनगर, वास्को) घरी जाण्यासाठी इमारतीतून खाली उतरला असता क्लाईव्हने सुरा भोसकून त्याचा खून केला होता.
१८ ऑक्टोबर २००७ रोजी ही घटना घडली होती. खून घडलेल्या संध्याकाळी क्लाईव्हची बहीण गोव्यामध्ये परतल्याने त्यांच्या मित्रामध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, यात व्हॅलेंटाईन सहभागी झाला होता. क्लाईव्ह व व्हॅलेंटाईन यांच्यात पूर्ववैमनस्य होते. त्यावरून वाद निर्माण झाल्याने अन्य एक मित्र सिद्धेश बांदोडकर याच्यासह घरी जाण्यासाठी निघालेल्या व्हॅलेंटाईनला क्लाईव्हने सुरा भोसकून गंभीर जखमी केले. घटनेनंतर व्हॅलेंटाईनला बायणा येथील खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. घटनेची माहिती वास्को पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करून क्लाईव्हला अटक केली व तपास कार्यास सुरुवात केली होती.
आज ह्या प्रकरणाची शेवटची सुनावणी झाली असता मडगावच्या न्यायालयाने क्लाईव्ह यास व्हॅलेंटाईनच्या खूनप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच प्रमाणे त्यास पाच हजाराचा दंड देण्यात आला असून तो न भरल्यास दोन महिन्यांची अतिरिक्त शिक्षा देण्यात येईल.
या काळात वास्को पोलिस स्थानकावर असलेले तत्कालीन पोलिस निरीक्षक सॅमी तावारीस (आता पोलिस उपअधीक्षक) यांच्याशी संपर्क साधला असता न्यायालयाने या प्रकरणातील साक्षीदार सिद्धेश बांदोडकर मिळून एकूण २२ जणांची जबानी नोंद केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. २५ वर्षीय क्लाईव्ह व २९ वर्षीय व्हॅलेंटाईन चांगले मित्र होते व क्लाईव्हच्या छोट्या बहिणीवरून निर्माण झालेल्या एका विषयावरून हा खून घडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारी वकील ऍड. आशा आरसेकर यांनी ह्या खून प्रकरणात सरकारची बाजू मांडली . तत्कालीन पोलिस निरीक्षक सॅमी तावारीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय दळवी, पोलिस उपनिरीक्षक रवी देसाई हवालदार दिलीप गावकर व इतरांनी या खून प्रकरणाचा तपास केला.

फोंडा पालिका अफरातफर मंडळाची आज खास बैठक

फोंडा, दि.१५ (प्रतिनिधी) : येथील फोंडा नगरपालिकेत प्रशासक पी. के. पटिदार यांच्या राजवटीत झालेल्या लाखो रुपयांच्या अफरातफर प्रकरणावर चर्चा करण्यासाठी पालिका मंडळाची खास बैठक गुरुवार १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पालिका सभागृहात बोलावण्यात आली आहे.
पालिकेत प्रशासकाच्या राजवटीत झालेल्या ४०.७७ लाख रुपयांच्या अफरातफर प्रकरणामुळे नागरिकांत खळबळ माजली असून नागरिकांकडून पालिका प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
अफरातफरप्रकरणी पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा करून याप्रकरणी पुढील कार्यवाही निश्चित केली जाणार आहे. सरकारी निधीचा गैरवापर ही गंभीर स्वरूपाची घटना असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी पालिका मंडळाची खास बैठक घेतली जात आहे, असे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी सांगितले.
प्रशासकाच्या राजवटीतील पालिकेचा भोंगळ कारभार या अफरातफर प्रकरणामुळे उघड झाला आहे. पालिकेतील अनेक वादग्रस्त प्रकरणांना दै. गोवादूतने वाचा फोडलेली आहे. त्यात आणखी एका प्रकरणाची आता भर पडली आहे. प्रशासकाच्या राजवटीत साल ०७-०८ या कालावधीत पालिकेच्या कॅशिअरवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे बेशिस्त कारभाराला प्रोत्साहन मिळाले. पालिकेतील लाखो रुपयांच्या अफरातफरीबाबत नागरिकांत आज दिवसभर चर्चा सुरू होती.या प्रकरणी आता कोणावर कारवाई होते, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. पालिकेच्या सत्ताधारी गटाने हा अफरातफरीचा विषय गांभीर्याने घेतला असून त्याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची गुन्हा अन्वेषण विभागातर्फे चौकशी करण्याची गरज आहे, असे मत लोकांकडून व्यक्त केले जात आहे.
या पालिकेतील कथित फर्निचर खरेदी प्रकरणावर ह्याच बैठकीत चर्चा केली जाणार आहे. फर्निचर प्रकरणी संबंधिताचे बिल चुकते करण्यात न आल्याने त्याने न्यायालयात धाव घेतली आहे, अशी माहिती मिळाली आहे.

बिहार, झारखंडमध्ये नक्षल्यांचा हैदोस, पाच माओवाद्यांना कंठस्नान, एक जवान शहीद

लतिहार/सासाराम, दि. १५ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला केवळ एक दिवस शिल्लक असताना आणि या मतदानासाठी प्रचारतोफा थंडावल्या असताना बिहार आणि झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमकीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सुरक्षा रक्षकांनी पाच माओवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत सीआरपीएफचा जवान शहीद झाला असून अपहरण करण्यात आलेल्या बसचा चालक व वाहक या दोघांना नक्षलवाद्यांनी ठार मारले. या संपूर्ण घटनेत सात जण जखमी झाले आहेत.
झारखंडमध्ये रांचीपासून सुमारे १२५ किमी दूर असणाऱ्या लतिहार या नक्षलप्रभावीत भागातील पलामू क्षेत्रात गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष मतदान केंद्राकडे जाणाऱ्या एका रिकाम्या बसला भूसुरुंग स्फोटात उडवून देण्यात आल्यामुळे बसमधील चालक व वाहक जागीच ठार झाले. या स्फोटानंतर लगेच सीआरपीएफच्या ८० जवानांनी घटनास्थळाची मोर्चेबांधणी केली आणि नक्षलवाद्यांवर हल्ला केला, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक एस. एन. प्रधान यांनी दिली.
नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा कॉन्स्टेबल धर्मेंद्र यादव शहीद झाला, तर पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सीआरपीएफचे जवान यशस्वी झाले, असेही त्यांनी सांगितले. या घटनेत सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले असल्याचेही ते म्हणाले.
अन्य एका घटनेत बिहार राज्यातील रोहतास जिल्ह्यातील ७० जवान व अधिकाऱ्यांच्या एका शिबिरावर सुमारे दोनशे नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला. निवडणुकीतील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने हे शिबिर उभे करण्यात आले होते. या घटनेत एक जवान जखमी झाला असल्याची माहिती पाटणापासून २०० किमी दूर अंतरावर असलेल्या सासाराम येथे पोलिस अधीक्षक विकास वैभव यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करणाऱ्या नक्षलवादी संघटनेच्या हल्लेखोरांनी मध्यरात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास धांसा घाटातील रोहतासगढ किल्ल्याजवळ बीएसएफच्या शिबिराला घेरून त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्युत्तरात बीएसएफ जवानांनी गोळीबार केला. ही चकमक सुमारे साडेतीन तास चालली, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक नीलमणी यांनी पाटणा येथे सांगितले.
या घटनेत जखमी झालेल्या बीएसएफ जवानाला पाटणा मेडिकल कॉलेज येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे. या जवानाची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असेही त्यांनी सांगितले.
या घटनेत काही नक्षलवादीही जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना ओढून नेण्यात आले असल्याचे आढळून आल्यामुळेच हे लक्षात आले. या घटनेत कोणाचाही मृतदेह हाती लागला नसल्यामुळे घटनेत कोणीही ठार झाले नसावे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत यंदा प्रथमच बुधुआ आणि रोहतासगढ किल्याजवळील धांसा येथे विशेष मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरातील लोकांना मतदान करणे सोयीचे व्हावे म्हणून दोन्ही ठिकाणी हे तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले आहे, असे कळते.

मुंबई हल्ला प्रकरण: ऍड. अंजली वाघमारे यांची नियुक्ती रद्द, कसाबकडून पाकी वकिलाची मागणी

मुंबई, दि. १५ : मुंबई हल्ल्यातील आरोपी मोहम्मद अजमल आमीर कसाब याच्या बाजूने खटला लढण्यासाठी तयारी दर्शवणाऱ्या ऍड. अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द झाली असून पुन्हा कसाबसाठी वकील नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. उद्या, गुरुवारी नव्या वकिलाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
ऍड. अंजली वाघमारे यांची कसाबच्या वकील म्हणून नियुक्ती होण्यापूर्वीच त्यांनी मुंबई हल्ल्यातील एका पीडिताचे वकीलपत्र घेतले होते. कसाबच्या वकील म्हणून वकीलपत्र स्वीकारण्यापूर्वी त्यांनी न्यायालयाला याची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. पण, त्यांनी असे केले नाही. त्यांनी ही बाब न्यायालयापासून लपवून ठेवली. त्यामुळे व्यवसायिक मूल्यांशी प्रतारणा केल्याप्रकरणी ऍड. वाघमारे यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका ऍड. के. लाम यांनी विशेष न्यायालयात दाखल केली होती.
त्यावर सुनावणी करताना आज विशेष न्यायाधीश एम. एल. ताहिलियानी यांनी ऍड. वाघमारे यांच्यावर ताशेरे ओढत कसाबच्या वकील म्हणून त्यांची नियुक्ती रद्द केली. ऍड. वाघमारे यांनी न्यायालयाला उपरोक्त बाबीची पूर्वकल्पना द्यायला हवी होती. कसाबच्या वकील म्हणून तुमची नियुक्ती रद्द झाली असली तरी न्यायालयातील तुमच्या उपस्थितीवर कोणतेही प्रतिबंध नाहीत, असा शेराही न्यायाधीशांनी मारला. आता कसाबसाठी पुन्हा नव्या वकिलाचा शोध सुरू झाला आहे.
पाकिस्तानी वकील हवा : कसाब
दरम्यान, ऍड. वाघमारे यांची नियुक्ती रद्द झाल्यानंतर कसाबने आपल्यासाठी पाकिस्तानी वकिलाची मागणी केली. न्यायाधीशांनी त्याची ही मागणी फेटाळून लावली. भारतीय कायद्यानुसार हे शक्य नाही, असे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. त्यावर कसाबने पुन्हा पाकिस्तानी सरकारला पत्र लिहून वकील देण्याची विनंती करण्याची परवानगी मागितली. न्यायाधीशांनी त्याला ही परवानगी बहाल करतानाच पाकिस्तानी वकील भारतीय वकिलांचे सहाय्यक म्हणून काम पाहू शकतात, असेही सांगितले. या प्रकरणी उद्या सुनावणी होणार आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था
आज प्रथमच कसाबला विशेष न्यायालयात सादर करण्यात येणार होते. त्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रचंड सुरक्षा ठेवण्यात आली होती. सुरक्षेच्या बंदोबस्तातच आज कसाबला न्यायालयात सादर करण्यात आले.

पहिल्या टप्प्यातील मतदान आज

नवी दिल्ली, दि. १५ : लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात २४ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण १२४ जागांसाठी मतदान घेतले जात असून त्यात अनेक दिग्गजांच्या भाग्याचा निर्णय गुरुवारी मशीनबंद होणार आहे.
भाजप नेते डॉ. मुरली मनोहर जोशी, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, तेलंगण राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव, केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी, विलास मुत्तेमवार, एन.टी.रामाराव यांची कन्या डी. पुरंदेश्वरी आणि माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय हे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मुख्य उमेदवार आहेत. या टप्प्यात महाराष्ट्रातील ४८ पैकी १३ जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. याशिवाय केरळमध्ये सर्व २० जागा, छत्तीसगड ११, उत्तरप्रदेश १६, आंध्रप्रदेश २२, झारखंड १४, बिहार १३, ओरिसा १०, आसाम ३, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय २, मणिपूर तसेच जम्मू-काश्मिरातील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल. अंदमान-निकोबार, लक्षद्वीप, मिझोरम आणि नागालॅण्ड येथेही एका जागेसाठी गुरुवारीच मतदान घेतले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात मतदान करणाऱ्यांना निकालासाठी एक महिन्याची वाट पाहावी लागणार आहे कारण मतांची मोजणी १६ मे रोजी होणार आहे. आंध्रप्रदेश आणि ओरिसा येथे विधानसभेसाठीही मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राज्यांमध्ये निमलष्करी दलासह राज्य सुरक्षा दलाचे जवानही सुरक्षेसाठी तैनात आहेत. गुन्हेगारी कारवायांना खीळ बसावी आणि दारूच्या विक्रीवर नियंत्रण असावे यासाठी राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. या पुढील टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी होणार आहे.

कॉंग्रेसचे नामोनिशाण मिटवा - मोदी

डिचोली, दि. १५ (प्रतिनिधी)- भारताला विकसीत राष्ट्र बनवण्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. गेली साठ वर्षे भारताला व्होटबॅंकच्या गलिच्छ राजकारणात डुंबवणाऱ्या कॉंग्रेसचे नामोनिशाण मिटवताना देशाच्या विकासासाठी भाजपला सत्तेवर आणण्याचे आवाहन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानावर भाजपचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार खा. श्रीपाद नाईक यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार राजेश पाटणेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर, अनंत शेट, दयानंद मांद्रेकर, फ्रान्सिस डिसोझा तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे स्टार प्रचारक मोदी यांचे घणाघाती भाषण ऐकण्याच्या उद्देशाने मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
आज देशात दहशतवाद, भ्रष्टाचार, खून, बलात्कार, चोऱ्या आदी प्रकारांत प्रचंड वाढ झाली आहे. येथील सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग हे दुर्बळ पंतप्रधान असून देशाला लालकृष्ण अडवाणींसारख्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे. देशाच्या संपत्तीवर येथील सामान्य नागरिकाचा हक्क आहे. सामान्य नागरिक कोणत्याही जातिधर्माचा का असेना, भाजप त्याला त्याचा हक्क प्राप्त करून देणारच, असे आश्वासन मोदी यांनी यावेळी दिले. आसामात व्होटबॅंकच्या आधारे बांगलादेशींची घुसखोरी सुरू आहे. गुजरातप्रमाणे देशभक्ती असलेले सरकारच दहशतवाद्यांना रोखू शकते असे सांगून मोदी यांनी देशाच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.
मुंबईवरील हल्ल्यानंतर मदतीसाठी अमेरिकेकडे भीक मागणारे मनमोहनसिंग अर्थमंत्री असताना हर्षद मेहता घोटाळा प्रकरण झाले. आता ते पंतप्रधान असताना सत्यम घोटाळा उघडकीस आला. हे घोटाळे नियोजित पद्धतीने झाल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला. २००७/२००८ आर्थिक वर्षातील "कॅग'च्या अहवालानुसार केंद्र सरकारच्या खजिन्यातून ५० हजार कोटी रुपयांचा हिशोब मिळत नसून हे पैसे कुठे गेले त्याचे उत्तर पंतप्रधानांनी देशवासीयांना द्यावे, असे आव्हान मोदी यांनी दिले.
गुजरातचा आर्थिक विकास दर, तसेच कृषी प्रगती ही आशियात प्रथम क्रमांकावर असून गुजरातप्रमाणेच भाजप केंद्रात सत्तेवर आल्यानंतर संपूर्ण देशाचा झपाट्याने विकास होईल. तसेच देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या जाहीरनाम्यात तीन रुपये किलो दराने गहू देण्याचे आश्वासन कॉंग्रेसने दिले आहे. गेली पाच वर्षे सरकारला हे काम का जमले नाही, असा प्रश्न विचारून गुजरातमध्ये गेली सात वर्षे आपले सरकार दोन रुपये दराने गहू देत आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या दीड तासाच्या घणाघाती भाषणात भाषणात मोदी यांनी पंतप्रधान डॉ. सिंग, श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली.
सेझ, खास दर्जा आदींबाबत आता कॉंग्रेस नेते आश्वासनांची खैरात करीत आहेत, गेल्या चारपाच वर्षांत हे करणे कॉंग्रेस सरकारला का जमले नाही, आता आश्वासने देत जनतेची दिशाभूल केली जात आहे, असे यावेळी बोलताना मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. मोदी यांच्या भाषणापूर्वी खासदार श्रीपाद नाईक, नगराध्यक्ष सतीश गावकर व अन्य नेत्यांची भाषणे झाली.


क्षणचित्रे...
- नरेंद्र मोदींचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या जयजयकाराने
छत्रपती शिवाजी महाराज मैदान दणाणून गेले.
- व्यासपीठ आकर्षकरीत्या फुलांनी सजवण्यात आले होते.
- ही सभा आत्तापर्यंतची सर्वांत भव्य व ऐतिहासिक ठरली.
- मैदान खचाखच भरल्यामुळे बाहेरही लोक मोदींचे भाषण
कान देऊन ऐकत असल्याचे चित्र दिसत होते.
- मोदी यांच्या भाषणापूर्वी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, नगराध्यक्ष सतीश गावकर व अन्य नेत्यांची भाषणे झाली.
- आमदार राजेश पाटणेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
- या सभेसाठी पार्किंग व वाहतूकव्यवस्था चोख होती.

गुजराती समाजातर्फे मोदींचा सत्कार
पणजी दि. १५ (प्रतिनिधी) ः गुजरातचे "व्हायब्रंट' मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा आज पणजी गुजरात मंडळाने शाल, श्रीफळ, पगडी व तलवार देऊन सत्कार केला. टोंक पणजी येथील "ग्रीन एकर' येथे या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
डिचोली येथे आपली सभा गाजवून येथे दाखल झालेल्या मोदींचे गुजराती समाजाने जोरदार स्वागत केले. मोदी बोलण्यासाठी उभे राहिले असता पोलिसांनी आचारसंहितेमुळे ध्वनी प्रक्षेपण बंद केले. त्यामुळे त्यांनी त्वरित सर्व लोकांना आपल्या जवळ बोलावले आणि गुजरातमध्ये केलेल्या विकासाचा पाढाच वाचून दाखवला. एखाद्या घरातल्या व्यक्तीशी संवाद साधावा त्याप्रमाणे त्यांनी उपस्थित लोकांशी वार्तालाप केला. त्यांच्या या कृतीने उपस्थित लोक भारावून गेले. यावेळी विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांचाही गौरव करण्यात आला.

Wednesday, 15 April 2009

गोव्याला खास दर्जा देणार, भाजपचे जाहीरनाम्यात वचन

पणजी, दि.१४ (प्रतिनिधी): गोव्याची सांस्कृतिक अस्मिता अबाधित राखण्याच्या दृष्टीने या राज्याला पूर्वांचल राज्यांप्रमाणे विशेष दर्जा प्राप्त करून देण्यासाठी भाजप अथक प्रयत्न करेल, असे वचन गोवा प्रदेश भाजपने प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. गोवा हे छोटे राज्य असल्याने येथे स्थलांतरितांचा लोंढा सामावून घेणे शक्य नाही, त्यामुळे उत्तरपूर्व राज्यांप्रमाणे घटनेच्या ३७१ व्या कलमानुसार व देशाच्या एकात्मतेला बाधा न पोचता या राज्याची स्वतंत्र अस्मिता टिकून राहण्यासाठी हा दर्जा मिळायलाच हवा, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.
आज पणजी येथे गोवा प्रदेश भाजपतर्फे निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष, खासदार तथा उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे उमेदवार ऍड. नरेंद्र सावईकर, आमदार दामोदर नाईक, फ्रान्सिस डिसोझा, लक्ष्मीकांत पार्सेकर, रमेश तवडकर, माजी आमदार विनय तेंडुलकर, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष तथा माजीमंत्री विल्फ्रेड मिस्कीता व उपाध्यक्ष सुभाष साळकर आदी हजर होते.
कोकणी, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषेत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचे सर्वच पातळीवरील अपयश व स्थानिक कॉंग्रेस आघाडी सरकारचा सावळा गोंधळ यामुळे गोव्यातील जनता कॉंग्रेसला कंटाळली आहे. यावेळी निश्चितच राज्यात १९९९ ची पुनरावृत्ती होईल व लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपला मिळतील, असा दृढ विश्वासही पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील बेकायदा खाणी बंद करून पर्यावरणाचे संरक्षण करणे, विशेष आर्थिक विभाग (सेझ) रद्द करून यासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी स्थानिक लघू उद्योजकांना उपलब्ध करून देणे आदी महत्त्वाची आश्वासनेही या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना डाक व टेलिग्राफ यांच्यासहित केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व नोकऱ्यांसाठी गोव्यात भरती केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याचेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.
म्हादईप्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केंद्रीय पातळीवर या विषयाचा तोडगा काढण्यासाठी लवादाची स्थापना करणे गरजेचे आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यास त्याचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कॅसिनो हा स्थानिक विषय आहे त्यामुळे तो विधानसभा पातळीवर सोडवण्यात येईल, असे स्पष्टीकरणही पर्रीकर यांनी यावेळी दिले.
जाहीरनाम्यातील काही ठळक मुद्दे ः-
शिक्षण- गोव्याला शैक्षणिक चळवळीचे केंद्र बनवणे, रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षण देणे, सर्व शिक्षा अभियान योजनेच्या निधीचा सम्यक विनियोग करणे, आरोग्य पातळीवर फिरत्या दवाखान्यांद्वारे मागासवर्गीय भागांत परवडण्याजोग्या योजना उपलब्ध करून देणे.
कृषी व जलसिंचन - बंधारे, धरणे, जलसंधारण इ. सुविधा केंद्र सरकारच्या योजनांद्वारे निर्माण करणे, गोमंतकीय युवकांनी कृषी व्यवसाय चिरस्थायी उत्पन्नाचे साधन म्हणून स्वीकारावा याकरिता सकारात्मक धोरण अवलंबणे, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी - उपकरणे, यंत्रे पुरवण्यासाठी आर्थिक साहाय्य देणे.
रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक - जुवारी नदीवर नवीन समांतर पूल बांधण्यास प्राधान्य, खाजगी मालमत्तेचे नुकसान शक्यतो टाळून राष्ट्रीय महामार्ग १७ चे चौपदरीकरण हाती घेणे, गालजीबाग - तळपण पूल, कुडचडे, मोले तसेच काणकोण येथील वनखात्याच्या गेटकडील बगलमार्गांचे बांधकाम, वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी म्हापसा, पणजी, मडगाव पट्ट्यात जलद बस सेवा योजना राबवणे, कोकण रेल्वेसाठी अतिरिक्त समांतर रेल्वे रुळांचे बांधकाम करणे तसेच कोकण रेल्वे मार्गावर स्थानिक किफायतशीर रेल्वेगाड्या सुरू करणे.
विमानतळ व बंदर - दाबोळी विमानतळाचा जागतिक दर्जाच्या सुविधांसह विस्तार, मोपा येथील ग्रीनफिल्ड विमानतळाला चालना, एमपीटी बंदर सीमा मर्यादित करून तसेच मच्छीमारांसाठी जेटीची समस्या सोडवून गोमंतकीयांचे हितरक्षण.
उद्योग - अवैध खाण व्यवसाय बंद करून गोमंतकीय पर्यावरणाचे संरक्षण, सेझ रद्द करून औद्योगिक जमिनी गोमंतकीय उद्योजकांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडे सुपूर्द करणे, गोव्यातील केंद्रीय अबकारी आणि जकात, कर्मचारी राज्य विमा तसेच भविष्य निर्वाह निधी इत्यादींची स्थापना करणे, नव्याने स्थापन झालेल्या लघू उद्योग कंपन्यांना आयकर तसेच विक्री कर लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू, राज्यात केंद्रीय कामगार न्यायालय स्थापन करणे, गोमंतकीय युवकांना सर्वाधिक रोजगार देऊ शकणाऱ्या पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूल उद्योगांची स्थापना करणे, सत्तरी, सांगे, काणकोण इत्यादी भागात औद्योगिक वसाहतींना प्रोत्साहन देणे.
संपर्क - डाक, दूरध्वनी, मोबाईल, ब्रॉडबॅंड इत्यादी सुविधांचा गोव्यातील कानाकोपऱ्यापर्यंत विस्तार.
पर्यटन - केंद्र सरकारच्या वाढीव निधीसह गोवा हे एक विशेष पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे, गोवा राज्याचा सुरक्षित आणि निरोगी कौटुंबिक पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे, वारसा पर्यटनाला चालना देणे.
सामाजिक सबलीकरण - धनगर समाजाचा अनुसूचित जमाती वर्गामध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्न, जनजाती वन कायद्याची अंमलबजावणी, वनक्षेत्रातील जमिनींच्या हक्कांबाबत कुमेरी शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करून त्यांचे हितरक्षण, प्रस्तावित वन्यजीव अभयारण्यांमुळे बाधित स्थानिकांच्या हिताचे रक्षण तसेच त्यांचे सुयोग्य पुनर्वसन.
रोजगार - केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये स्थानिक युवकांना प्राधान्य, पोस्ट व टेलिग्राफ यांच्यासहित केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व नोकऱ्यांसाठी गोव्यात भरती केंद्राची स्थापना.
-----------------------------------------------------------
हरिप्रसाद यांच्याविरुद्ध तक्रार
कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रदेश निरीक्षक बी. के. हरिप्रसाद यांनी "भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांना अरबी समुद्रात बुडवायला हवे' असे बेजबाबदारपणे वक्तव्य केल्याने गोवा प्रदेश भाजपने त्याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रक्षोभक वक्तव्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच याविरोधात पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी तथा पोलिस अधीक्षकांनी या तक्रारीवर त्वरित चौकशी करून हरिप्रसाद यांच्यावर कारवाई करावी,अशी मागणी भाजपचे सरचिटणीस प्रा. सुभाष साळकर यांनी केली आहे.

बाळ्ळीतील अपघातात पतीपत्नीसह तिघे ठार


बाळ्ळी पाटे येथील भीषण अपघातात सापडलेली बस व ट्रक. (छाया : गोवादूत सेवा)

कुंकळ्ळी, दि. १४ (प्रतिनिधी) : केपे तालुक्यातील बाळ्ळी पाटे येथे आज संध्याकाळी सव्वासहाच्या दरम्यान घडलेल्या बस व ट्रक यांच्यातील भीषण अपघातात वंटे फातर्पा येथील अजय ऊर्फ यशवंत फळदेसाई (वय ४४) व त्यांची पत्नी सौ. सुनिता (वय ३८) जागीच ठार झाले. तसेच ट्रकचालक सुरूद्रे हाही मरण पावला आणि बसमधील दहा जण जखमी झाले.
जीए ०२ एच ७९१० या क्रमांकाच्या स्कूटरवरून अजय व सुनिता हे वंटे फातर्पा येथील आपल्या मूळ घरातून काणकोण येथे बिऱ्हाडी निघाले होते. बाळ्ळी पाटे येथे पोहोचताच कर्नाटकहून येणाऱ्या केए ३१ एफ १०१६ या क्रमांकाच्या बसने बाळ्ळीहून कारवारकडे निघालेल्या ट्रकला (केए ३० ए ९८९९) जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रक सुमारे वीस मीटर मागे आला. त्याच्या चाकाखाली सापडून अजय व सुनिता हे जागीच ठार झाले.
ट्रकचा चालक सुरूद्रे हाही या अपघातात मरण पावला. तो ट्रकच्या केबिनमध्ये अडकला होता. केबिन कापून बाहेर काढेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. बसच्या चालकाला फ्रॅक्चर झाल्याने मडगाव येथील हॉस्पिसियू इस्पितळात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. बसमधील जखमी झालेल्या नऊ जणांपैकी आठ जणांना प्राथमिक उपचारानंतर जाऊ देण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. निरीक्षक संतोष चोडणकर पुढील तपास करत आहेत.
----------------------------------------------------------------------
विदारक दृश्य
अपघातग्रस्त ट्रक, बस आणि स्कूटर हे दृश्य विदारक दिसत होते. या भयंकर अपघातात ठार झालेले अजय फळदेसाई हे काणकोण येथे कृषी खात्यात कामाला होते. त्यांची पत्नी सुनिता या प्राथमिक शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे. अपघातग्रस्त ट्रकच्या केबिनमधून चालकाचा मृतदेह बाहेर काढताना मदत पथकाला प्रचंड कसरत करावी लागली.

गुजरात दंगलप्रकरणी सरकारला 'क्लीन चीट'

सुप्रीम कोर्टात राघवन यांचा अहवाल
नवी दिल्ली, दि. १४ : गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि काही गैरसकारी संघटनांनी गुजरात सरकारविरुद्ध खोटे आरोप असणाऱ्या तक्रारी दाखल केल्या आणि खटले उभे केल्याचा खळबळजनक खुलासा नुकताच सर्वोच्च न्यायालयासमोर करण्यात आला.
गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी सीबीआयचे माजी संचालक आर. के. राघवन यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष चौकशी पथकाचे गठन केले. राघवन यांनी चौकशी अहवाल सादर केला. याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरिजित पसायत, पी. सदाशिवम आणि आफताब आलम यांच्या न्यायासनासमोर सुरू आहे. या प्रकरणी युक्तिवाद करताना गुजरात सरकारचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, गुजरात दंगलीत पीडितांचे वकीलपत्र घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि अन्य काही गैरसरकारी संघटनांनी न घडलेल्या प्रकारांनाही खटल्यात स्थान दिले. अशा प्रकारांची यादीच रोहतगी यांनी आपल्या युक्तिवादासोबत सादर केली.
खालील काही घटनांचा तिस्ताबाई आणि गैरसरकारी संघटनांनी केलेला उल्लेख साफ चुकीचा आहे...
- कौसर बानू या गर्भवती मुस्लिम महिलेवर एका जमावाने सामूहिक बलात्कार केला आणि धारदार शस्त्राने तिच्या पोटातील गर्भावर वार केले.
-नरोडा पटिया येथे दंगल करणाऱ्यांनी पीडितांचे मृतदेह परिसरातील विहिरींमध्ये फेकून दिले.
-दंगलीच्या काळात गुजरात भेटीवर आलेले काही ब्रिटिश पर्यटक दंगलीत सापडले आणि मारले गेले. त्यांच्याविषयीच्या तक्रारी आणि चौकशी अहवाल पोलिसांनी दडपून टाकला.
रोहतगी यांचे म्हणणे आहे की, उपरोक्त घटना घडलेल्याच नाही. तत्कालीन पोलिस प्रमुख पी.सी.पांडे यांच्यावरील आरोपही निराधार आहेत. गुलबर्ग सोसायटी येथे दंगलीदरम्यान लोकांना वाचविण्याच्या उपाययोजना करण्याचे सोडून पांडे दंगलखोर जमावाला मदत करीत होते, असा आरोप तिस्ता सेटलवाड यांनी दाखल केलेल्या खटल्यात करण्यात आला होता. मुळात, त्यावेळी पांडे हे पोलिस बंदोबस्तात आणि दंगल पीडितांना रुग्णालयात दाखल करण्याच्या कामात व्यस्त होते.
या सर्व प्रकारांच्या पार्श्वभूमीवर गुजरात दंगलीतील प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी विशेष न्यायालयांमध्ये याची सुनावणी व्हावी, अशी मागणी गुजरात सरकारच्या वतीने रोहतगी यांनी केली.

पहिल्या टप्प्यातील प्रचार थांबला, उद्या मतदान

१७१५ उमेदवार अजमावत आहे भाग्य
नवी दिल्ली, दि. १४ : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थांबला. येत्या १६ एप्रिल रोजी १७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील १२४ लोकसभा मतदारसंघांमध्ये या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहेत. विदर्भातील लोकसभेच्या दहाही मतदारसंघात जाहीर प्रचार आज संपला.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेते, गुन्हेगारी क्षेत्रात दबदबा असणारे आणि काही चित्रपट कलावंत यांचे भाग्य मशीनबंद होणार आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी १७१५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यात भाजपच्या १०२, कॉंग्रेसच्या १११ आणि बसपच्या १११ उमेदवारांचा समावेश आहे. या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत प्रामुख्याने कॉंग्रेस आणि भाजप या दोनच राष्ट्रीय पक्षांमध्ये मुकाबला दिसून येणार आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, भाजपचे डॉ. मुरली मनोहर जोशी, तेलंगणा पार्टीचे चंद्रशेखर राव, कॉंग्रेसच्या रेणुका चौधरी, अभिनेत्री विजयशांती, अभिनेता मनोज तिवारी, एनटीआरची कन्या पी. पुरंदेश्वरी, माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्या भाग्याचा निर्णय या पहिल्या टप्प्यातील मतदानावरच अवलंबून राहणार आहे.
महाराष्ट्रातील ४८ पैकी १३ मतदारसंघांमध्ये येत्या १६ एप्रिल रोजी मतदान होणार असल्यामुळे या सर्वच ठिकाणचा प्रचार आज संपला. यात विदर्भातील सर्वच्या सर्व म्हणजे दहाही जागांचा समावेश आहे.
महाराष्ट्राशिवाय छत्तीसगडमधील ११, बिहारमधील १३, केरळमधील २०, आंध्र प्रदेशात २२, उत्तर प्रदेशात १६, ओरिसातील १० आणि झारखंडमधील ६ जागांवर १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

फोंडा नगरपालिकेत लाखोंची अफरातफर

प्रशासकांच्या काळातील गोलमाल
फोंडा, दि.१४ (प्रतिनिधी) : येथील फोंडा पालिकेत तत्कालीन प्रशासक पी. के. पटिदार यांच्या कालावधीत वर्ष २००६ -०७ आणि २००७ -०८ या दोन वर्षांच्या काळात सुमारे ४०.७७ लाखांची अफरातफर झाल्याचे वार्षिक लेखा परीक्षणात आढळून आले असून याप्रकरणी पालिका प्रशासन कोणती कारवाई करणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता; मात्र तेव्हा गृहमंत्र्यांनी थातूरमातूर उत्तर देत वेळ निभावून नेली होती. आता प्रत्यक्षात हा गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, २००६ -०७ या वर्षात १८,१५,८१८ रुपये तर २००७ -०८ या वर्षात २२,६१,०३१ रुपयांची अफरातफर झाली आहे. या दोन्ही वर्षांतील "कॅश बुक' योग्य प्रकारे लिहिण्यात आले नसल्याचे तपासणीत आढळून आले आहे. पालिकेचे "कॅश बुक' संगणकाच्या माध्यमातून तयार करण्यात येत होते. त्यातील नोंदी "प्रिंट आउट'च्या माध्यमातून काढून "कॅश बुक' म्हणून ठेवण्यात येत होत्या. २००७ -०८ सालात या संगणकावरील "कॅश बुक'च्या "प्रिंट आउट' रोज काढण्यात आल्या नसल्याचे उघड झाले आहे. ०२.०४.०७ ते १८.०५.०७ या काळातील नोंदींचे "प्रिंट' २७.०७.२००७ रोजी काढण्यात आले, इतर काही दिवसांचे "प्रिंट'सुद्धा उशिरा काढण्यात काढण्यात आले आहे, असे हिशेब तपासनिसांनी अहवालात म्हटले आहे.
गोवा दमण आणि दीव पालिका अकाऊंट कोड १९७२ च्या कलम ४४ (१) अनुसार पालिका मुख्याधिकाऱ्यांनी "कॅश बुक'ची दररोज तपासणी करून त्यावर सही करण्याचे बंधन आहे. तसेच महिना संपल्यानंतर "कॅश बुक' आणि "पासबुक'याची जुळवाजुळव करून जमा व खर्चाचा आढावा घेतला पाहिजे. वर्ष २००६ -०७ मध्ये खजिनदार, लेखाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनी "कॅश बुक'वर सही केलेली आहे. वर्ष २००७ -०८ मध्ये "कॅश बुक'वर एकाही दिवशी वरिष्ठांनी सही केलेली नाही. वरिष्ठांकडे तपासणीसाठी "कॅश बुक' पाठवण्यात आलेला नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जानेवारी २००७ आणि मार्च २००८ मध्ये "कॅश बुक'मध्ये चुकीच्या नोंदी केल्याचे आढळून आल्या आहेत. यात जानेवारी २००७ मध्ये १ लाख ५१ हजार ४७६ रुपयांच्या नोंदी "कॅश बुक'मध्ये करण्यात आल्या असून प्रत्यक्षात ४४ हजार ३२९ रुपयांचा भरणा बॅंकेत करण्यात आला. मार्च २००८ मध्ये २ लाख ४३ हजार ५४० रुपयांच्या नोंदी "कॅश बुक'वर करण्यात आल्या तर प्रत्यक्षात बॅंकेत ४० हजार ७२५ रुपयांचा भरणा करण्यात आला, असे आढळून आले. यात "कॅश बुक'मध्ये जानेवारी ०७ मध्ये १,०७,१४७ आणि मार्च २००८ मध्ये २,०२,८२४ रुपयांच्या बोगस नोंदी आढळून आल्या. पालिकेच्या "कॅश बुक'ची योग्य प्रकारे नोंदणी करण्यात न आल्याने दोन वर्षांत ४०,७६,८५० रुपयांची अफरातफर झाली आहे. २००७-०८ वर्षातील पालिकेच्या "कॅश बुक'वर कोणीही सही केलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी "कॅश बुक'ची वेळच्यावेळी तपासणी करायला हवी होती, असे अहवालात म्हटले आहे.
पालिकेच्या खात्यातून काढण्यात येणाऱ्या पैशांचा हिशेब योग्य प्रकारे ठेवण्यात आलेला नाही. "सेल्फ चेक'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढण्यात आली असून पालिकेकडून वसूल करण्यात येणारे धनादेश, डीडी वेळेवर बॅंकेमध्ये जमा करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कायद्यानुसार वसूल करण्यात येणारा धनादेश, डीडी दुसऱ्या दिवशी बॅंकेत जमा करायला हवा. मात्र, संबंधितांकडून त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची नोंद ठेवण्यात येत नव्हती. ४.४.०७ रोजी "कॅश बुक'मध्ये बांधकाम परवान्यासाठी ८,२६,४३९ रुपयांचा धनादेश प्राप्त झाल्याची नोंद करण्यात आली. हा धनादेश बॅंकेत जमा केल्याची पावती सापडली नाही; तसेच बॅंकेतील पालिकेच्या खात्यात जमा झाल्याची नोंद सापडली नाही. १७.८.०७ रोजी बॅंकेत ८६०११२ रुपयांचा धनादेश भरल्याची पावती सापडली. मात्र, "कॅश बुक'ची तपासणी केली असताना १.८.०७ ते १६.८.०७ या काळात या रकमेचा धनादेश वसूल केल्याची नोंद कुठेही सापडली नाही. पालिकेच्या मुदत ठेवीची मुदत पूर्ण न होताच ठेव बंद करण्यात आल्याने सुमारे ६७ १२२ रुपयांचा फटका पालिकेला बसला आहे, असेही अहवालात म्हटले आहे. पालिकेच्या वरिष्ठांनी महत्त्वपूर्ण अशा महसूल विभागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने ही अफरातफर झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी महसूल विभागाकडे लक्ष देऊन योग्य प्रकारे तपासणी केली असताना एवढा मोठा घोटाळा घडला नसता, असे अहवालात म्हटले आहे. लेखा परीक्षकांचा अहवाल फोंडा पालिकेला प्राप्त झाला असून यासंदर्भात पालिका प्रशासन कोणता निर्णय घेणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

नरेंद्र मोदींची आज डिचोली येथे सभा

डिचोली, दि. १४ (प्रतिनिधी): गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा उद्या डिचोली येथील छत्रपती शिवाजी मैदानावर होणार आहे. भाजपचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार श्रीपाद नाईक यांच्या प्रचारानिमित्त संध्याकाळी ५.३० या सभेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यावेळी खा. श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजपचे स्थानिक आमदार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले असून अवजड वाहने औद्योगिक वसाहतीत, चारचाकी वाहने शेट्ये रेसिडेन्सी व हजरत पीर तर दुचाकी वाहनांसाठी कदंब स्थानकाच्या मागच्या बाजूला व्यवस्था करण्यात आली आहे.

सोनिया गांधींची आज मडगावात

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी) : कॉंग्रेसचे द. गोवा लोकसभा उमेदवार फ्रांसिस्क सार्दिन यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी उद्या येथे येत असून सायंकाळी ४ वा. त्यांची फातोर्डा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. श्रीमती गांधी बेळगावहून दुपारी ३.३० वा.खास विमानाने दाबोळी विमानतळावर उतरतील व तेथून हेलिकॉप्टरने मडगावकडे रवाना होती.
फातोर्डा मैदान सुमारे २० हजार प्रेक्षक क्षमतेचे आहे. तेवढे समर्थक यावेत यासाठी कॉंग्रेसने आपले आमदार व जेथे आमदार नाहीत तेथील पक्षनेत्यांना प्रेक्षक आणण्याचा कोटा ठरवून दिलेला आहे. चर्चिल आलेमाव व रेजिनाल्ड यांनी या कल्पनेला अजिबात प्रतिसाद दिलेला नसल्याने प्रेक्षक संख्येबाबत पक्षनेते चिंतीत आहेत व त्यासाठी शेजारच्या कर्नाटकातून काही समर्थक आणण्याचीही व्यवस्था करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
या समर्थकांसाठी वापरल्या जाणाऱ्या कदंब वा खासगी बसेसवर निवडणूक निरीक्षकांचे लक्ष राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोनिया गांधी यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था असल्याने सभास्थानी तसेच हेलिपॅड परिसर कडक सुरक्षा व्यवस्थेने वेढलेला आहे. मैदानाच्या सर्व प्रवेश द्वारांवर मेटल डिटेक्टर बसविण्यात आलेले आहेत व मैदानाचा ताबा कमांडोंकडे देण्यात आला आहे.

Tuesday, 14 April 2009

सत्यम्ला केले महिंद्राने "टेक ओव्हर'

२,९०० कोटी रुपये मोजून घेतले ५१ टक्के शेअर्स
मुंबई, दि. १३ : सत्यम् ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी आज सकाळी झालेल्या लिलावात लार्सन अँड टुब्रो या कंपनीला मागे टाकत "टेक महिंद्रा'ने सर्वाधिक बोली लावत सत्यम् कंपनीचे ५१ टक्के शेअर्स विकत घेण्यासाठी २९०० कोटी रुपये मोजले. सत्यम्च्या शेअर्सची ५८ रुपये प्रती शेअर अशी बोली लावून सत्यम् कंपनी विकत घेतली आहे. लार्सन अँड टुब्रोनेही प्रती शेअर ४५.९० रुपये मोजण्याची तयारी दर्शविली होती, तर अमेरिकन कंपनी विल्बर रॉस या कंपनीने प्रती शेअर २० रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, अखेर ५८ रुपये मोजून टेक महिंद्राने सत्यम् कंपनी आपल्या ताब्यात घेतली आहे.
ऑक्टोबर २००८ मध्ये सत्यम् कॉम्प्युटर्समध्ये ६००० कोटी रुपयांचा घोटाळा करून सत्यम्चे मालक रामलिंग राजूने भारतीय कॉर्पोरेट जगताला हादरवून सोडले होते. या घोटाळ्यातून सावरण्यासाठी केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने किरण कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली एक नवे मंडळ स्थापन केले होेते. कर्णिक व दीपक पारेख यांच्या पुढाकारानेच गेले तीन महिने सत्यम्चा मालक शोधण्याची प्रक्रिया सुरू होती.
आज सकाळी ९ वाजता सुरू झालेल्या सत्यम्च्या लिलाव प्रक्रियेत तीन प्रमुख दावेदार होते. त्यांपैकी टेक महिंद्रा व लार्सन अँड टुब्रो हे दोन प्रमुख दावेदार ठरले. लार्सन ऍण्ड टुब्रोने प्रती शेअर ४५.९० रुपये बोली लावली. लिलावाच्या प्रक्रियेतील प्राथमिक अटींनुसार पहिल्या व दुसऱ्या बोलीमध्ये जर दहा टक्क्यांपेक्षा कमी अंतर असेल तरच दुसरी बोली लावणाऱ्याला पुन्हा संधी देण्यात येणार होती. पण, टेक महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रो यांच्यातील बोलींमधील अंतर ११ टक्क्यांहून अधिक निघाल्याने टेक महिंद्रा सत्यम्चे नवे मालक ठरले. टेक महिंद्राने केलेल्या या खरेदीमुळे आता टेक महिंद्रा भारतातील चौथी सर्वांत मोठी आयटी कंपनी होणार आहे.

वरुणच्या याचिकेवर १६ रोजी सुनावणी

नवी दिल्ली, दि. १३ : पिलिभीतमध्ये भडकावू भाषण दिल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत तुरुंगात असलेले भाजप नेता वरुण गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोणत्याही प्रकारचे भडकावू भाषण देणार नाही, अशा आशयाचे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयास देण्यास राजी झाले आहेत.
वरुण गांधींचा जामीन मंजूर झाला तर त्यांना "कोणत्याही प्रकारचे भडकावू भाषण देणार नाही', अशा आशयाचे शपथपत्र द्यावे लागेल, असा सल्ला मुख्य न्यायाधीश के. जी. बाळकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने दिला आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या वकिलांनी या सल्ल्याबाबत सहमती व्यक्त केली असून याप्रकरणी सुनावणी १६ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
पिलिभीतमध्ये भडकावू भाषण देणे आणि आत्मसमर्पणाच्या वेळी तेथील लोकव्यवस्था भंग होण्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे लागू राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचे कलम ३-२ रद्द करण्यासाठी वरुण गांधी सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
मात्र, राज्य सरकारने वरुण गांधींचे आरोप नाकारले होते. ३५ पानी आपल्या उत्तरात सरकारने सांगितले होते की सांप्रदायिक भाषण करणे आणि २८ मार्चला पिलिभीतमध्ये आत्मसमर्पणाच्या दिवशी लोक व्यवस्था भंग करण्याप्रकरणी त्यांच्या विरोधात रासुका लावण्यात आला. सरकारने न्यायालयाला सांगितले होते की वरुणने ज्याप्रमाणे भडकावू भाषण दिले आणि २८ मार्चला आत्मसमर्पणाच्या दिवशी लोकव्यवस्था भंग केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात रासुका लावणे आवश्यक झाले होते.

...तर पाकमध्ये सैन्य घुसवणार राजनाथसिंग यांची ग्वाही

नवी दिल्ली, दि. १३ : भाजप सत्तेवर आल्यास आंतराष्ट्रीय मान्यतेनंतर पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवून तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्वस्त करू, अशी आक्रमक भूमिका आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंग यांनी घेतली.
पाकिस्तानमधील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी भारतीय लष्कराची गरज आहे का, अशी विचारणा भाजप त्या देशाला करील, त्या देशाने होकार दिला नाही, तर आंतराष्ट्रीय समुदायाशी संपर्क साधून भारतीय सेना त्या देशात पाठविली जाईल, असे त्यांनी बिहारमध्ये आयरू या गावात बोलताना सांगितले. पाकने आपल्या देशातील दहशतवाद स्वतःहून संपुष्टात आणावा, अशी भाजपची अपेक्षा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यमान सरकार दहशतवादाला सामोरे जाण्यास असमर्थ असल्याचे मुंबईतील घटनेने दाखवून दिले आहे, अशी टीका त्यांनी केली. देशांतर्गत सुरक्षेबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात मनमोहन सिंग सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले. सीमेचे रक्षण आणि जनतेला सुरक्षा याबाबत भाजपने स्पष्ट शब्दांत ग्वाही दिली आहे. याबाबत पोखरण-२ आणि कारगिल ही उदाहरणे देशासमोर आहेत, असे सिंग यांनी सांगितले.

'सेझ' घोटाळ्यात सहभागी अधिकाऱ्यांना निलंबित करा

'सेझ विरोधी मंचा'ची मागणी
पणजी, दि.१३ (प्रतिनिधी): गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडून विशेष आर्थिक विभागांसाठी (सेझ) भूखंड वितरण करताना घोटाळा झाल्याचे महालेखापालांनी आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या संपूर्ण संशयास्पद व्यवहारामुळे सुमारे १०२.६४ कोटी रुपयांचा सरकारी महसूल बुडाला असून "सेझ' भूखंड वितरणात सहभागी असलेल्या महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा व भूखंड घोटाळ्याची चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा द्या, असे आवाहन "सेझ विरोधी मंचा'तर्फे करण्यात आले आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे निमंत्रक चाल्सर्‌ फर्नांडिस यांनी ही मागणी केली. यावेळी प्रवीण सबनीस, रामकृष्ण जल्मी, अरविंद भाटीकर व फादर मॅवरीक फर्नांडिस आदी पदाधिकारी हजर होते. गोव्यात "सेझ' हवे असे जाहीर विधान करून "सेझ'ला विरोध करणाऱ्या संघटनांवर दोषारोप करणाऱ्या "गोवा चेंबर ऑफ कॉमर्स'चे अध्यक्ष नितीन कुंकळ्ळीकर यांच्या विधानांचा आज मंचातर्फे चांगलाच समाचार घेण्यात आला. श्री. कुंकळ्ळीकर हे औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंड घोटाळ्याचे भागीदार आहेत. गोव्यातील बेरोजगारी मिटवण्यासाठी "सेझ' तथा अतिरिक्त औद्योगिक वसाहतींची गरज आहे, असे विधान करणाऱ्या श्री. कुंकळ्ळीकर यांनी पहिल्यांदा सध्याच्या औद्योगिक वसाहतीत किती प्रमाणात गोमंतकीय काम करतात याची आकडेवारी सादर करावी, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
"सेझ'मुळे रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा आभास निर्माण करणाऱ्यांनी राज्यात अस्तित्वात असलेल्या २२ औद्योगिक वसाहतीत किती गोमंतकीय कामगार काम करतात याची आकडेवारी द्यावी. कंत्राटी कामगार पद्धतीमुळे येथील कामगारांचे उद्योजकांकडून सुरू असलेले शोषण बंद करण्यासाठी श्री. कुंकळ्ळीकर यांनी पुढाकार घ्यावा व या सर्व औद्योगिक वसाहतीत किमान वेतन कायदा कडकपणे लागू व्हावा यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडून विशेष आर्थिक विभागांना (सेझ) दिलेल्या भूखंड वितरणात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे खुद्द महालेखापालांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. याविरोधात दीड वर्षापूर्वी वेर्णा पोलिस स्थानकात सबळ पुराव्यासहित पोलिस तक्रार करण्यात आली होती. परंतु, ही तक्रार अद्याप नोंदही करून घेण्यात आली नाही. महालेखापालांच्या अहवालामुळे हा घोटाळा जगजाहीर झाल्याने आता ही तक्रार नोंद करून घेण्यास दिरंगाई झाल्यास पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडून राज्यातील २२ औद्योगिक वसाहतींसाठी किती भूखंड संपादीत केले याचा हिशेब सादर करून त्यातील किती जागा गोमंतकीय उद्योजकांना वितरित केली हे स्पष्ट करण्याचे आवाहनही श्री. फर्नांडिस यांनी केले.१९९६ साली वेर्णा येथील तिसऱ्या विभागातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना चौथ्या विभागाअंतर्गत ३० लाख चौरस मीटर जागा संपादन करण्याची घाई नेमकी कशासाठी करण्यात आली, याचाही खुलासा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

डॉ. शैला कामत यांच्या पुस्तकाचे १७ ला प्रकाशन

'प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स ऑफ मेकॅनिकल व्हेंटिलेशन'
पणजी,दि. १३ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील भूलशास्त्र (ऍनिस्थेशिओलॉजी) विभागाच्या संलग्न प्राध्यापिका डॉ. शैला शोधन कामत यांच्या "प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स ऑफ मेकॅनिकल व्हेंटिलेशन' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार १७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता "गोमेकॉ'तील ग्रंथालय सभागृहात आयोजिण्यात आला आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सोसायटी व भूलशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रामुख्याने तांत्रिक "व्हेंटिलेशन' चा अभ्यास करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तक प्रकाशनास प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. भारती देसाई, तर "गोमेकॉ'चे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूलशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका आणि हसतमुख व सकारात्मक विचारांचा सळसळता झरा अशी ओळख असलेल्या डॉ. कामत यांच्या या पुस्तकाचे स्वागत या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, हीतचिंतक, मित्रमंडळी तथा विद्यार्थी विभागाकडून होत आहे. पदव्युत्तर विद्यार्थी तसेच इतर डॉक्टरांकडून कृत्रिम श्वासोच्छ्वासाला मदत करणाऱ्या व्हेंटिलेटर्ससंबंधी सखोल व प्रात्यक्षिकांची माहिती देणारे पुस्तक उपलब्ध नसल्याने निर्माण होणाऱ्या अडचणी आपल्यापर्यंत पोहोचल्या. त्यानंतरच हा विषय हाताळण्याचे व त्याबाबत उपयुक्त ठरणारे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून या पुस्तकाच्या लेखनास प्रारंभ झाला, असे डॉ.कामत या पुस्तक लेखनामागील उद्देश स्पष्ट करताना म्हणाल्या. "व्हेंटिलेटर्स'वर अनेक पुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध आहेत. तरीही "व्हेंटिलेटर्स' आणि प्रामुख्याने अति दक्षता रुग्णांवरील उपचारप्रसंगी त्याचा वापर, यावर सदर पुस्तकात मौलिक माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ते जणू वरदानच ठरावे. या पुस्तकात सिद्धांत आणि प्रात्यक्षिकांचा योग्य मिलाफ झाल्याने ते मार्गदर्शक ठरणारे आहे, असा विश्वासही डॉ.कामत यांनी व्यक्त केला. भूलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या युवा निवासी डॉक्टर्स, तसेच प्रथमच अति दक्षता विभागात तांत्रिक "व्हेंटिलेशन'चा शस्त्रक्रियेत वापर करण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच हे पुस्तक लिहिण्यात आले, असेही त्या म्हणाल्या. या पुस्तकात श्वासोच्छ्वासाच्या प्राथमिक शरीरविज्ञानशास्त्राची अचूक माहिती, त्याचा उपयोग यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. व्हेंटिलेटरी व्यवस्थापनासंबंधी विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या एकूण ४३ पाठांचा समावेश या पुस्तकात आहे.

पेटेर करमळीत स्लॅब कोसळून कामगार ठार


पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) : पेटेर-करमळी येथे बांधकाम सुरू असलेल्या दुमजली इमारतीचा स्लॅब आज दुपारी चारच्या सुमारास कोसळल्याने राजू अलीसाब तहसीलदार (२३) या कर्नाटकातील कामगाराचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर, पेडणे येथील अंकुश कांबळी (३५) हा कामगार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी "गोमेकॉ'त दाखल करण्यात आले आहे.
इमारतीच्या पायऱ्यांचे बांधकाम सुरू असताना ही घटना घडली. तळमजल्यावर उभारलेला बिम स्लॅबचे वजन पेलू न शकल्याने संपूर्ण स्लॅब खाली आला. यावेळी कामगार जाण्याच्या तयारीत असल्याने मोठी जीवितहानी टळली, अशी माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. पोलिसांनी भा.दं.सं.च्या १७४ कलमानुसार अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
दुपारी या दुमजली इमारतीचा स्लॅब घालण्याचे काम सुरू होते. ते काम पूर्ण होऊन कामगार जाण्याच्या तयारीत होते. दरम्यानच्या काळात कमकुवत असलेला बिम स्लॅबचे वजन पेलू न शकल्याने तो स्लॅबसह कोसळला. यावेळी स्लॅबखाली असलेले राजू व अंकुश त्याखाली चिरडले गेले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच जुने गोवे पोलिसांसह अग्निशमन दलाचा बंब व पोलिस क्रेन घटनास्थळी दाखल झाली. दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर अंकुश याला बाहेर काढले तर, राजू याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती पोलिस निरीक्षक गुरुदास गावडे यांनी दिली. पोलिसांनी संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला असून याविषयीचा अधिक तपास निरीक्षक गुरुदास गावडे करीत आहेत.

Monday, 13 April 2009

चर्चिल ही कॉंग्रेससाठी डोकेदुखी

हरिप्रसाद यांची कबुली

भेट निष्फळ ठरल्याचे उघड

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) : चर्चिल आलेमांव हे जरी एक अनुभवी व ज्येष्ठ नेते असले तरी सद्यःस्थितीत ते कॉंग्रेससाठी डोकेदुखी ठरलेले आहेत, अशी कबुली अ. भा. कॉंग्रेसचे सरचिटणीस हरिप्रसाद यांनी आज येथे दिली. चर्चिलसंबंधी काहीही वाद नसल्याचे भासवणाऱ्या हरिप्रसाद यांच्यावर झालेल्या प्रश्नांच्या भडिमारानंतर ही कबुली देत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. चर्चिल यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आलेले हरिप्रसाद यांची ही भेट निष्फळ ठरल्याचेही यानिमित्ताने उघड झाले.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चिल यांच्या पवित्र्यामुळे पक्षासमोर जी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे ती दूर करण्याच्या मोहिमेवर आलेल्या हरिप्रसाद यांना आज येथील "नानू टेल'मध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्र्नांच्या सरबत्तीला तोंड देताना त्रेधातिरपीट उडाली.
कन्या वालंकाला न मिळालेले तिकीट व त्यातच अपात्रता याचिकेचे संकट यामुळे खवळलेल्या चर्चिल यांनी पक्षनेतृत्वासमोर ठेवलेल्या अटींबाबत काय झाले असे विचारले असता हरिप्रसाद यांनी जणू काहीच झालेले नाही, वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तात काहीच तथ्य नाही अशी जेव्हा भूमिका घेतली तेव्हा त्यांच्यावर उलटसुलट प्रश्र्नांचा भडिमार केला गेला व त्यात ते पुरते गोंधळले. त्यावेळी त्यांनी चर्चिल ही पक्षासाठी डोकेदुखी ठरल्याचे मान्य केले.
त्यांनी सेव्ह गोवा फ्रंट कॉंग्रेसमध्ये विलीन करताना कोणतीही अट घातली नव्हती मात्र त्याच्या काही समस्या होत्या, त्या सोडवून त्या पक्षाचे विलीनीकरण करण्यात आले. वालंकाला तिकीट देण्याचा प्रश्र्न तर विचारासाठी देखील पुढे आला नव्हता. कॉंग्रेस हा वचनाचा पक्का आहे व त्यांना जर तसे वचन दिले गेले असते तर त्याचे खात्रीने पालन झाले असते असे सांगून एकप्रकारे चर्चिलच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे अप्रत्यक्षपणे सुचविले.
वालंकाचा पत्ता कापण्यात मुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षांचा हात असल्याचा जो जाहीर आरोप चर्चिल यांनी केला आहे त्याबाबत विचारता त्या उभयतांचे काम फक्त शिफारस करण्याचे असते, उमेदवाराची निवड ही सरतेशेवटी श्रेष्ठी पर्यायाने सोनिया गांधी करतात व ती करताना विविध निकष लावले जातात त्यात सर्वांत महत्त्वाचा म्हणजे निवडून येण्याची क्षमता अजमावली जाते असे त्यांनी सांगितले.
चर्चिल यांनी सभापतींसमोर असलेल्या अपात्रता याचिकेबाबत घातलेल्या अटीबाबत विचारता तो प्रश्र्न सभापतींच्या अखत्यारीत असल्याचे सांगून त्यावर काहीही बोलण्याचे त्यांनी टाळले. मात्र काही ज्येष्ठ कॉंग्रेस नेतेच मिकी पाशेकोमार्फत हे अपात्रता प्रकरण खदखदत ठेवत आहेत असा जो आरोप चर्चिल यांनी केला आहे त्याबाबत आपणाला काहीच माहीत नाही असे सांगून अधिक बोलण्याचे टाळले मात्र राष्ट्रवादी हा मित्रपक्ष आहे व उभय पक्षांची समन्वय समिती एकत्र बसून ही समस्या सोडविल, असे त्यांनी सांगितले.
चर्चिल समर्थकांनी पंधरा दिवसांपूर्वी मडगावात घेतलेल्या जाहीर सभेत हायकमांडचा राजकीय सल्लागार म्हणून उपस्थित असलेल्या कोणा एन. के. शर्मा यांच्याबाबत विचारलेले प्रश्र्न हरिप्रसाद यांना अस्वस्थ करून गेले, हा शर्मा कोण, त्याचा कॉंग्रेसशी संबंध काय या प्रश्र्नावर त्यांनी सदर शर्माचा कॉंग्रेसशी काहीच संबंध नाही असे सांगितले मात्र तसे असेल तर राज्यातील एका मंत्र्यांने घेतलेल्या सभेत त्याची तशी ओळख कशी करून दिली गेली तसेच पक्ष प्रवक्त्याने त्याच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन कसे काय केले, या प्रश्र्नावर त्यांनी मौन स्वीकारले व पत्रकार परिषद आटोपती घेतली.

"ती जबाबदारी मुख्यमंत्र्यांची'

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील कॉंग्रेसमध्ये कोणतेच मतभेद नाहीत, तो संपूर्णतः एक जिनसी आहे अशी ग्वाही कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनी दिली मात्र त्याचबरोबर कोणी मंत्री वा आमदार पक्षीय उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होत नसेल तर त्याला प्रचारासाठी कार्यप्रवण करण्याची व पक्षाला विजयाप्रत नेण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे, असे सांगून टाकले.
आज येथील "नानूटेल'मध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सादिर्र्न यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष एकाकीपणे जात असतात याकडे लक्ष वेधले असता त्यांनी एकप्रकारे विजयाची जबाबदारी त्या उभयतांवर ढकलल्यासारखे केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पण हरिप्रसाद यांनी त्यांना बोलू दिले नाही.
एका प्रश्र्नावर बोलताना चर्चिल यांची कोणतीच समस्या उरलेली नाही व निवडणूक प्रचारात उतरण्याचे आश्र्वासन त्यांनी दिले आहे असे त्यांनी सांगितले. काल त्याच्या समर्थकांनी आपली भेट घेऊन चर्चा केली व ते समाधानाने परतले असेही त्यांनी सांगितले.
आणखी एका प्रश्र्नावर बोलताना, चर्चिल यांनी आडमुठे धोरण कायम ठेवले तरी त्याचा पक्षाच्या निवडणूक भवितव्यावर काहीच परिणाम होणार नाही. कोणत्याही पेचप्रसंगाचे संधीमध्ये रुपांतर करण्याची किमया कॉंग्रेसकडे आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी या निवडणूक प्रचारासाठी १५ रोजी गोव्यात येत असून त्यांच्या प्रचारसभेच्या तयारीसाठी आपण गोव्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सभेस सर्व आमदार सहभागी होतील, ते म्हणाले. सोनियांची सभा फक्त दक्षिणेतच ठेवली गेली उत्तरेत का नाही, असे विचारता दक्षिणेतच कॉंग्रेसचा उमेदवार आहे शिवाय हा भाग मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघालगत येतो, असे ते उत्तरले.
तत्पूर्वी प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी प्रचाराची पहिली फेरी आटोपलेली असून या फेरीत १५० ते१७५ कोपरा सभा आपण व मुख्यमंत्र्यांनी मिळून घेतल्याचे सांगितले. प्रचाराचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरु होत असून आतापर्यंत मिळत असलेल्या प्रतिसादावरून सार्दिन यांना ५० ते ६० हजारांचे मताधिक्य मिळेल असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी इतरांबरोबर नगरविकास मंत्री जोकीम आलेमांव व उपसभापती माविन गुदिन्हो हेही हजर होते.

वास्को शहरात चार फ्लॅट फोडले

तीन लाखांचा ऐवज लंपास

वास्को, दि. १२ (प्रतिनिधी)- वास्कोत दुकाने फोडून चोरी होण्याची अनेक प्रकरणे चर्चेत असताना आज शहरातील एकाच इमारतीतील दोन फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचा माल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. एफ.एल गोम्स मार्गावर असलेल्या "रोझ' अपार्टमेंटमधील एकूण चार फ्लॅट चोरट्यांनी फोडले; त्यातील दोन फ्लॅटमध्ये त्यांच्या हाती माल लागला.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना शुक्रवारी दुपारी १ ते शनिवारी रात्री ११.१५ च्या दरम्यान घडली. "रोझ अपार्टमेंटमध्ये नेवरोन मिनिनो फर्नांडिस हा तिसऱ्या मजल्यावरील गृहस्थ शुक्रवारी आपल्या कुटुंबासोबत गावी गेले होते. काल रात्री मित्रांनी संपर्क करून त्यांना बाजूला असलेल्या शेजाऱ्याचा फ्लॅट उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते आपल्या गावाकडून घरी परतले तेव्हा त्यांच्या व बाजूच्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे त्यांना दिसले. फर्नांडिस याच्या बाजूला राहणारे एस. एन. कुडाळकर हेही काही दिवसांपासून घराबाहेर असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. फर्नांडिस यांच्या घरातील अडीच लाखाचे सोन्याचे दागिने, व्हीसीडी प्लेअर व तीन हजारांची रोकड आणि कुडाळकर यांच्या घरातून पाच हजारांची रोकड व पन्नास हजारांचे इतर सामान चोरट्यांनी लंपास केले. त्याचप्रमाणे याच इमारतीतील इतर दोन बंद फ्लॅटमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला. तथापि, तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी काल रात्री पंचनामा केला; तसेच आज संध्याकाळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना तेथे पाचारण केले. त्याचा फारसा फायदा झाला नाही. तीन दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही चोरी झाल्याने वास्को पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी गस्ती वाढवूनसुद्धा चोरीचे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे लोकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. हे सराईत टोळीचेच काम असावे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक रजाक शेख यांनी "गोवादूत'ला दिली. या प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रजाक शेख तपास करीत आहेत.

धर्म रक्षणासाठी संस्कृत शिका - ब्रह्मेशानंदाचार्य

फोंडा, दि.१२ (प्रतिनिधी) - धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संस्कृत भाषा शिकणे आवश्यक आहे. ही भाषा म्हणजे ज्ञानाचा महासागर असून या महासागरातील ज्ञान ग्रहण करण्यासाठी तिचे अध्ययन करणे आवश्यक आहे. प.पू. श्री पद्मनाभ शिष्य संप्रदाय संचालित श्री ब्रह्मानंद संस्कृती प्रबोधिनीतर्फे गावोगावी संस्कृत भाषेच्या शिक्षणासाठी पाठशाळा सुरू करण्यात आलेल्या असून या पाठशाळांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. ब्रहेशानंद स्वामी यांनी आज(दि.१२) संध्याकाळी तपोभूमी कुंडई येथे संस्कृत महासंमेलनाच्या सांगता सोहळ्यात बोलताना केले आहे.
या संस्कृत महासंमेलनाच्या सांगता सोहळ्याला शिक्षण खात्याचे उपसंचालक अनिल पवार, नागराज होन्नेकेरी, उद्योजक सोमकांत नाणूसकर, आचार्य भवानी शंकर पटेल, आचार्य प्रसाद द्विवेदी, आचार्य नवराज भट्ट, संप्रदायाचे अध्यक्ष गुरूदास शिरोडकर, ब्रह्मानंद संस्कृत प्रबोधिनीचे अध्यक्ष उल्हास शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्कृत भाषेच्या अभ्यासामुळे मनुष्याचे आचरण सुसंस्कृत होऊ शकते. संस्कृत भाषा ही ज्ञानाचा महासागर आहे. त्या भाषेतील दडलेले ज्ञान आत्मसात करण्यासाठी संस्कृत भाषेचे अध्ययन आवश्यक आहे, असे सांगून स्वामी ब्रह्मेशानंद म्हणाले की, प्रत्येक घराघरात संस्कृत भाषा पोहोचली पाहिजे. तपोभूमी ही आध्यात्मिक ज्ञानाचे मार्गदर्शन करणारी भूमी आहे. या ठिकाणी ब्रह्मानंद, सच्चिदानंद दडलेले असून त्याचा उपयोग घ्या व आनंदाने जीवन जगा, असेही स्वामींनी सांगितले.
संस्कृत भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन ब्रह्मीभूत ब्रह्मानंद स्वामींनी संस्कृत गंगोत्री गावो गावी आणि घरोघरी पोहोचविण्यासाठी पाठशाळा सुरू केल्या. संस्कृत भाषा ही सोपी भाषा आहे. या संस्कृत भाषेसंबंधी सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी एक पुस्तिका सुध्दा तयार करण्यात आलेली आहे. संस्कृत आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सर्वांनी कटिबद्ध झाले पाहिजे, असेही स्वामींनी सांगितले.
संस्कृत ही देवभाषा आहे. संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी ब्रह्मानंद प्रबोधिनीने सुरू केलेले कार्य कौस्तुकास्पद असून संस्कृत भाषेच्या संवर्धन व शिक्षणासाठी शिक्षण खात्याकडून प्रयत्न केले जातील, असे शिक्षण खात्याचे उपसंचालक अनिल पवार यांनी सांगितले. संस्कृत ही सर्व भाषांची जननी असली तरी ह्या भाषेला इतर भाषा एवढी मान्यता मिळाली नाही. धार्मिक कार्यामुळे ही भाषा टिकून राहिलेली आहे. या संस्कृत भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे. संस्कृत भाषेच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने संस्कृत भाषा शिकणे आवश्यक आहे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
देश आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी संस्कृत भाषेचे संवर्धन आवश्यक आहे. संभाषण शिबिरे व इतर माध्यमातून ह्या भाषेचे संवर्धन होऊ शकते, असे शिक्षण उपसंचालक नागराज होन्नकेरी यांनी सांगितले. तरुणांनी स्वाभिमान व संस्कृत भाषा रक्षणाचा निश्चय करून काम केले पाहिजे, असे उद्योजक सोमकांत नाणूसकर यांनी सांगितले.
उल्हास शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. गुरूदास शिरोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रबोधिनीच्या विविध पाठशाळांत विद्यादान करणारे शिक्षक व शिक्षिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. "दिव्या गिर्वाणभारती' या पुस्तिकेचे प्रकाशन गुरूदास शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. शेवटी सावळो नाईक यांनी आभार मानले. सूत्रसंचालन बहु श्री सतीश वर्मा व कु. प्रतिमा गावडे यांनी केले. पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.
या महासंमेलाचा शुभारंभ सकाळी १०.३० वाजता प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी यांच्या उपस्थितीत विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आला. या संमेलनाच्या सकाळ व संध्याकाळच्या सत्रात संस्कृत पाठशाळेच्या मुलांनी विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रम संस्कृत भाषेतून सादर केले. या संमेलनात संस्कृत प्रबोधिनीच्या पाठशाळांतील विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.

भाजपला सत्तेवर आणल्यास अनुसूचित जातींचे कल्याण

पर्रीकर यांचे ठोस आश्वासन

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - अनुसूचित जातींना सरकारी नोकरीत तसेच उच्च शिक्षणात राखीवतेची गरज होती तेव्हा कॉंग्रेस सरकारने १५ टक्के असलेली राखीवता कमी करून २ टक्के केली. केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेस सरकारने नेहमीच मागासवर्गीयांवर अन्याय केला आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास मागासवर्गीयांना कोणत्याही मदतीसाठी शासनाकडे याचना करावी लागणार नाही, असे कार्य केले जाईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली. ते आज पर्वरीतील आझाद भवनात भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे आयोजित सभेत बोलत होते.
व्यासपीठावर पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष विठू मोरजकर व प्रेमानंद तळवडकर उपस्थित होते. यावेळी संमत केलेल्या ठरावाची प्रत माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सुर्पूत करण्यात आली.
केवळ निवडणुकीपुरता आयोजलेला हा कार्यक्रम नसून मागासवर्गांच्या उद्धारासाठी भाजप सतत कार्यरत असून यापुढेही या समाजासाठी असलेल्या योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी जागृती मोहीम चालवली जाणार आहे. कॉंग्रेसने या योजनांचे वाटोळे केले आहे. त्यामुळे केंद्राकडून येणारा लाखोंचा निधी वापराविना परत जात आहे. मागासवर्गीय अशिक्षित होते त्यावेळी उच्च शिक्षण घेण्यासाठी १५ टक्के राखीवता होती. आज या समाजातील तरुणाईने शिक्षण घेतले आहे. त्यांना नोकरीची गरज आहे. अशा वेळी कॉंग्रेस सरकारने राखीवतेत कपात करून ती १५ टक्क्यांवरून थेट २ टक्क्यावर आणली असल्याची टीका पर्रीकर केली. भाजप सत्तेवर येताच पुन्हा त्यात वाढ केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कॉंग्रेस सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मानहानी केली आहे. विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षासह अन्य पक्षांनी मागणी केल्यानंतर डॉ.आंबेडकरांना "भारतरत्न' पुरस्कार बहाल करण्यात आला. ज्या महान व्यक्तीने भारताची घटना बनवली अशा विभूतीला त्याकाळी कॉंग्रेस पक्षाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास विरोध केला, याची आठवण राजेंद्र आर्लेकर यांनी करून दिली. सध्या कॉंग्रेस सरकारने अनुसूचित जाती राखीवतेत मुसलमान व ख्रिश्चनांना राखीवता देण्याचा प्रयत्न करीत आहे. तसे झाल्यास अनुसूचित जातीला नोकऱ्याच मिळणार नाही. यावेळी मतदान करताना आम्ही पुन्हा चूक केल्यास हेच नालायक कॉंग्रेस सरकार आमच्या डोक्यावर बसणार असल्याचे आर्लेकर यांनी निक्षून सांगितले. पर्रीकरांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सरकारने डॉ. आंबेडकरांच्या नावाने सुरू केली "आवास योजने'ला या कॉंग्रेस सरकारने कचऱ्याची टोपली दाखवली. कॉंग्रेसला यापुढे सहन करणे कठीण आहे. सामाजिक सुरक्षेबरोबर आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा पाहिजे. ती केवळ लालकृष्ण अडवाणीच देऊ शकतात. त्यासाठी उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक व दक्षिण गोव्यातून ऍड. नरेंद्र सावईकर यांना विजयी करा, असे आवाहन आर्लेकर यांनी केले.
अनुसूचित जातीच्या अनेक समस्या आहेत. कॉंग्रेस सरकारच्या दुर्लक्षामुळेच हा समाज मागास राहिला आहे. प्रत्येक महामंडळात या समाजासाठी आरक्षण असले पाहिजे. कॉंग्रेस सरकार केवळ मतांचे राजकारण करत असल्याची टीका विठू मोरजकर यांनी स्वागतपर भाषणात केली. यावेळी उत्तर गोव्यातील समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नीळकंठ मोरजकर यांनी केले. प्रेमानंद तळवडकर यांनी आभार मानले.

ठरावातील मुद्दे ः
उच्च शिक्षणात पुन्हा ८ टक्के वाढ देण्याची मागणी.
सरकारी खात्यात असलेली सर्व राखीव जागा त्वरित भराव्यात.
सरकारी महामंडळातर्फे जागेचे वाटप करताना तसेच या महामंडळात नोकरीत अनुसूचित जातीसाठी आरक्षण ठेवावे.
उच्च शिक्षणासाठी व्याजमुक्त कर्ज तसेच बांधकामासाठी कमी व्याजात कर्ज द्यावे.
अनुसूचित जाती व जमातींसाठी वेगळे महामंडळ असावे.
पंच व नगरसेवकांमार्फत पुन्हा मागासवर्गीयांचे सर्वेक्षण केले जावे.
सर्व सरकारी इस्पितळात आयुर्वेदिक व होमिओपॅथिक केंद्र सुरू करून त्यात डॉक्टरांची नेमणूक केली जावी.
"भारतरत्न' डॉ. बाबासाहेब यांच्या नावाने मागासवर्गींयासाठी पर्वरी येथे भवनाची उभारणी केली जावी.

Sunday, 12 April 2009

पोलिस यंत्रणेच्या गैरवापरास बंदी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना दैनंदिन माहिती देऊ नका, निवडणूक आयोगाचा आदेश

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणूक काळात सरकारपक्षाकडून पोलिस यंत्रणेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्यानुसार पोलिस महासंचालक तथा गुप्तचर यंत्रणेकडून मुख्यमंत्री वा गृहमंत्र्यांना दैनंदिन माहिती देण्याची पद्धत तात्काळ बंद करा असे आदेश आज आयोगाने देऊन या प्रकारालाच प्रभावीरीत्या लगाम घातला आहे.
याप्रकरणी आयोगाने जारी केलेल्या आदेशात पोलिस महासंचालक आणि गुप्तचर यंत्रणेस मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना थेट माहिती पुरवण्याला बंदी घातली आहे.पोलिस महासंचालकांनी जाहीर पत्रकार परिषद घेणे टाळावे व तशीच निकड भासल्यास माहिती व प्रसिद्धी खात्यामार्फत प्रसिद्धीपत्रक जारी करून ते माध्यमांना द्यावे, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, निवडणूक काळात पोलिस गुप्तचर यंत्रणेचा वापर विरोधकांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तसेच विरोधी गटातील गुप्त माहिती गोळा करण्यासाठी केली जाते, अशा अनेक तक्रारी आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असतानाही पोलिस महासंचालक तथा गुप्तचर यंत्रणेचा दैनंदिन माहिती मिळवण्यासाठी वापर करण्याची पद्धत अयोग्य असल्याने आयोगाने हे निर्बंध लादले आहेत.
आयोगाने हे अधिकार काढून घेताना त्यासाठी अन्य मार्ग चोखाळण्याची सुचनाही सरकारला केली आहे. जर एखादवेळी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना द्यायचीच असेल तर पोलिस महासंचालक तथा गुप्तचर विभागाने ती गृह सचिव किंवा मुख्य सचिवांकडे द्यावी व नंतर मुख्य सचिवांनी ही माहिती संबंधितांकडे पोहोवावी असा मार्ग सुचवला आहे. याप्रसंगी पोलिस अधिकारी किंवा अन्य वरिष्ठ अधिकारी हजर राहण्याची आवश्यकता असेल तर मुख्य सचिवांनी त्यांना तसा आदेश जारी करावा,असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

बनावट नोटा प्रकरणी मुख्य संशयितास अटक

वास्को, दि. ११ (प्रतिनिधी): वास्कोत गेल्या सप्टेंबरमध्ये सापडलेल्या ३ लाखांच्या बनावट नोटांप्रकरणी प्रमुख संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात वास्को पोलिस यशस्वी ठरले आहेत. त्याचे नाव अन्वर हुसेन (बादल) असे असून त्याला आज वास्को पोलिसांचे पथक पश्चिम बंगालमधील माल्डा येथून ताब्यात घेऊन गोव्यात परतले.
याप्रकरणी यापूर्वी सैफुल्ला शेख व ताहीर अली (दोघेही रा. पश्चिम बंगाल) या दोघांना वास्को पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी अन्वर हा या प्रकरणातील म्होरक्या असल्याचे चौकशीत उघड केले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.उपनिरीक्षक एस.एल कांबळी यांच्या मार्गदर्शनाखाली दोघे पोलिस शिपाई आठवड्यापूर्वी गोव्यातून माल्डाला रवाना झाले होते. वास्कोत बनावट नोटा वितरित करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी सप्टेंबर २००८ मध्ये सैफुल्ला शेख व ताहीर अली यांना अटक केली होती. यानंतर चौकशीत तीन लाखांच्या बनावट नोटा त्यांच्याकडे सापडल्या. या नोटा त्यांना हुसेनने दिल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांना तेथे जाऊनही हुसेन सापडला नाही.
दरम्यान बनावट नोटांच्या इतर तीन प्रकरणांत पश्चिम बंगालमध्ये हुसेन आरोपी असून तो तेथेे न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती मिळताच गेल्या आठवड्यात वास्को पोलिस तेथे रवाना झाले आणि आज संध्याकाळी त्याला "अमरावती एक्सप्रेस'द्वारे गोव्यात घेऊन आले.
निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्याशी संपर्क केला असता न्यायालयीन कोठडीत असलेल्या हुसेन याला "प्रॉडक्शन वॉरंट'वर बनावट नोटांप्रकरणी तपासासाठी आणल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान सैफुल्ला व ताहीर हे संशयित आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हुसेन याच्याकडून आणखी माहिती मिळाल्यास पुरवणी आरोपपत्र म्हणून ते मुख्य आरोपपत्राला जोडण्यात येणार आहे. हुसेन याला संध्याकाळी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात उभे करून नंतर त्यास अटक करण्यात आली. निरीक्षक मिनेझीस याप्रकरणी तपास करत आहेत.

'सत्यम'च्या माघारीमुळे '१०८' सेवा मृत्यूशय्येवर

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) : राज्यात लोकप्रिय ठरलेल्या "१०८' रुग्णवाहिका सेवेतून "सत्यम' कंपनीने अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने ही सेवाच "मृत्यूशय्येवर'कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. गोव्यात ही सेवा आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे कारण कंपनीच्या सूत्रांनी दिले आहे. दरम्यान, या सेवेवर राज्य सरकार ९५ टक्के खर्च करते व सत्यमचा त्यातील वाटा केवळ ५ टक्के आहे. त्यामुळे ही सेवा यापुढे राज्य सरकारला सुरू ठेवणे कठीण नाही. "सत्यम' च्या माघारीचा कोणताही परिणाम या सेवेवर होणार नाही, असा विश्वास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशीे बोलताना व्यक्त केला.
"आपत्कालीन व्यवस्थापन संशोधन संस्था'(इएमआरआय) ही "सत्यम कंप्युटर्स' चा घटक असलेल्या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा कंपनीशी राज्य सरकारने १४ जून २००८ रोजी सामंजस्य करार केला होता. ५ सप्टेंबर २००८ रोजी एकूण १८ रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरवून या योजनेचे थाटात उद्घाटनही करण्यात आले. या रुग्णवाहिका सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात व प्रामुख्याने अपघातग्रस्तांना तात्काळ उपचारासाठी इस्पितळात पोचवण्यात यश मिळाल्याने ही सेवा लोकप्रिय ठरली..
दरम्यान,"सत्यम' कंपनीच घोटाळ्याच्या चक्रात सापडल्याने देशाला हादरा बसला. परिणामी या रुग्णवाहिका सेवेचे भवितव्यही संशयात सापडले. "इएमआरआय' या संस्थेचे प्रवर्तक तथा गुंतवणूकदार रामलिंग राजू हे सध्या "सत्यम' घोटाळाप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहेत. गोव्याबरोबर इतरही काही राज्यांत सुरू असलेल्या या सेवेतही कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्याने या सेवेचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. या सेवाक्षेत्रावर देशभरात सुमारे १२ हजार तर गोव्यात एकूण १४० कामगार अवलंबून आहेत. दरम्यान,याप्रकरणी "अँब्युलन्स ऍक्सेस फाऊंडेशन ऑफ इंडिया' (एएएफआय) आणि "ट्रान्स्परन्सी इन कॉंट्रॅक्ट्स' (टीआसी) या दोन कंपन्यांनी "इएमआरआय' विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. २४ ऑक्टोबर २००८ रोजी दाखल केलेल्या जनहित याचिकेत त्यांनी ही सेवा स्वीकारलेल्या आठ राज्यांनाही प्रतिवादी केले आहे. त्यात गोव्यासह आंध्रप्रदेश, गुजरात, उत्तराखंड, तमीळनाडू, राजस्थान, कर्नाटक व आसाम यांचा समावेश आहे. या सर्व राज्यांनी कोट्यवधींची ही सेवा कायदेशीर निविदा न मागवता थेट स्वीकारल्याचा ठपका या याचिकेत ठेवला आहे. मुळात विविध ठिकाणी या सेवेच्या निमित्ताने पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या नावाखाली भूखंड हडप करण्याचा या कंपनीचा डाव असून असा आरोप करून हा सुमारे ५६०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा संशय या याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे. "सार्वजनिक, खाजगी भागीदारी'(पीपीपी) तत्त्वावर ही सेवा कार्यरत आहे. या सेवेचा ९५ टक्के खर्चाचा भार हा राज्य सरकार तर ५ टक्के भार कंपनीकडून उठवला जातो.
प्रत्येक राज्य सरकारने सुरुवातीला सुमारे १० कोटी रुपये या योजनेवर गुंतवले आहेत. मुळात या योजनेसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून "राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन' अंतर्गत निधी पुरवल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही सेवा कार्यरत करण्यासाठी लागणारे "सॉफ्टवेअर' हे "सत्यम'ने विकसित केले आहे व त्याची किंमतच १० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, हे "सॉफ्टवेअर' कंपनीकडून मोफत पुरस्कृत करण्यात आल्याची माहिती गोवा विभाग प्रमुख राजेश वाघमारे यांनी पत्रकारांना दिली. "सत्यम'कंपनी ही केवळ तांत्रिक भागीदार असल्याने या कंपनीने माघार घेतल्याने त्याचा कोणताही परिणाम या सेवेवर होणार नाही,असा दावाही वाघमारे यांनी केला आहे.
गोव्यात सुरू असलेल्या या सेवाक्षेत्रात एकूण १४० लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यात स्थानिक व बिगरगोमंतकीयांचाही समावेश आहे. या कामगारांना देण्यात येणाऱ्या पगारात मात्र तफावत असून स्थानिकांपेक्षा बिगरगोमंतकीयांना जास्त पगार देण्यात येतो, अशी तक्रार काही कामगारांनी केली आहे.
सरकार नव्या भागीदाराच्या शोधात
या योजनेचा आर्थिक भार जरी राज्य सरकार सहन करीत असले तरी संपूर्ण व्यवस्थापन कंपनीकडून केले जाते. आता "सत्यम'ने माघार घेतल्याने या योजनेचे व्यवस्थापनच कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नवा भागीदार शोधण्याचे काम सुरू झाले आहे. सरकारशी यासंदर्भात अनेकांनी यापूर्वी संपर्क साधला होता त्याचा पाठपुरावा करून नव्या भागीदाराचा शोध लावला जाईल,अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

उमेदवारांत खुली चर्चा व्हावी : अडवाणी

बालाघाट, दि. ११ : देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. अशा स्थितीत जनतेच्या उपस्थितीत निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांत खुली चर्चा व्हावयास हवी, असे मत भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले. अशा खुल्या चर्चेमुळे लोकशाही मजबूत होईल, जनता शहाणी होईल व तिच्या निर्णय क्षमतेत वाढ होईल. बालाघाट येथील भाजपाचे उमेदवार के. डी. देशमुख यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत अडवाणी बोलत होते.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत ज्याप्रमाणे उमेदवारांत खुली चर्चा होत असते तशीच चर्चा आपल्या येेथेही व्हावी, असे मत व्यक्त करून अडवाणी यांनी पुढे सांगितले की, म्हणूनच मी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही चर्चेचे निमंत्रण दिले होते. खुल्या चर्चेत तुम्हाला सहभागी व्हावयाचे नसेल तर पंतप्रधानपदाची सूत्रे सांभाळण्याची ज्याच्यात क्षमता आहे अशा कोणत्याही उमेदवाराला चर्चेला पाठवा, असे आवाहनही त्यांना केले होते.
कोेण जिंकेल व कोणाचे सरकार स्थापन होईल हे निवडणुकीच्या माध्यमातून सिध्द होत असते, असे सांगून अडवाणी पुढे म्हणाले, याबरोबर लोकशाही प्रणालीही मजबूत होत असते. एवढेच नाही तर सर्वसामान्य जनतेत जाऊन आपल्या योजनांचा खुलासा करता येतो. जनतेत जाऊन राजकीय शिक्षण देण्याचे कार्यच कॉंगे्रस पक्षाने सोडून दिलेले आहे. या पक्षाचे लक्ष आता केवळ जातपात व पैशाच्या आधारावर लोकांची मते प्राप्त करणे यावरच केंद्रित झाले आहे, असे अडवाणी यांनी सांगितले.
निवडणुका जिंकून सत्ता प्राप्त करणे एवढाच भाजपा व त्याच्या सहयोगी पक्षांचा उद्देश नाही तर देशाचा विकास व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आम्ही राजकारणात आलेलो आहोत. याचे उदाहरण मध्य प्रदेशचे देता येईल. येथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी समाजातील सर्व वर्गांसाठी कल्याणकारी योजना बनविल्या. त्यांची "लाडली लक्ष्मी योजना' मुलींसाठी वरदान ठरली आहे. मध्यप्रदेशप्रमाणेच देशात लाडली लक्ष्मी योजना लागू केली जाईल, असे अडवाणी यांनी सांगितले. केंद्रात जर रालोआचे सरकार आले तर २१ वे शतक हे भारतीयांचे राहील. यावेळच्या निवडणुका देशाचा इतिहास बदलविणाऱ्या ठरतील, असे अडवाणी म्हणाले.

अमेरिकन नागरिकाला पिस्तुलासह अटक

मुंबई, दि. ११ : एका अमेरिकन नागरिकाला आज येथील विमानतळावर रिवॉल्व्हर व सात जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या ४५ वर्ष वयाच्या व्यक्तीचे नाव हेन्री हान असे आहे. त्याला आज येथील स्थानिक न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेन्री इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून काल रात्री येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या व्यक्तीच्या सामानाची तपासणी केली असता त्यात सात जिवंत काडतुसे व एक रिवॉल्व्हर आढळून आले. आज सकाळी त्याला सहार पोलिसांच्या हवाली करण्यात आले असता तेथे त्याला अटक करण्यात आली व बेकायदशीरपणे शस्त्रे बाळगल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.