Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 20 December, 2008

जाहीरपणे चूक मान्य करण्याची अंतुलेंना पक्षश्रेष्ठींची समज

अंतुले नरमले, पण पंतप्रधानांची नाराजी कायम
नवी दिल्ली, दि. १९ - महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त विधान केल्याबद्दल पंतप्रधान मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या भेटीत आपली चूक मान्य करणारे केन्द्रीय मंत्री अद्बुल रहमान अंतुले यांनी जाहिरपणे आपली चूक मान्य करावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे. दरम्यान, अंतुले यंानी आज आपल्या आधीच्या विधानात थोडा बदल करताना म्हटले आहे की, करकरे यांना पाकिस्तानी अतिरेक्यांपुढे नेण्यासाठी कोण जबाबदार आहे, याची चौकशी झाली पाहिजे.
अंतुले यांनी त्यांच्या आधीच्या विधानात शंका व्यक्त केली होती की, दहशतवादाच्या या खेळात कुणीतरी करकरे यांच्यावर मालेगावच्या बॉम्बस्फोटाच्या चौकशीबाबतचा वचपा काढला. करकरे यांची हत्या पाकिस्तानी अतिरेक्यांनीच केली हे खरे आहे पण करकरे यांना कुणीतरी अतिरेक्यांच्या हातांपर्यंत पोहचविले होते.
पाकिस्तान आपल्या बचावासाठी अंतुले यांच्या विधानाचा वापर करेल, अशी भीती सरकारला वाटत असतानाच कॉंग्रेसमधील एक गट अंतुले यांच्या विधानामुळे कॉंग्रेसला राजकीय फायदा मिळू शकेल, अशी अटकळ लावत आहे. संसदेच्या केन्द्रीय कक्षात दोन कॅबिनेट व एक राज्यमंत्री आपसात बोलताना म्हणत होते की, अंतुले यांनी एक अतिशय योग्य प्रश्न चुकीच्या वेळी उचलला आहे! कसेही करून पुन्हा एकदा मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास हा विषय प्रसारमाध्यमात चर्चेत यावा, असा कॉंग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.
०००००००

कसाब पाकिस्तानीच : नवाज शरीफ

"फरीदकोटची नाकेबंदी का?'

पाकला आत्मपरीक्षणाची गरज; झरदारींवर टीका

इस्लामाबाद, दि. १९ - मुंबई हल्ला प्रकरणी अटकेत असणारा अतिरेकी कसाब हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिवासी असल्याचे सांगून माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी झरदारी यांनी हे सत्य नाकारल्याप्रकरणी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच कसाबविषयीच्या झरदारींंच्या दाव्याला आव्हान दिले आहे.
जिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत नवाज शरीफ म्हणाले की, मुंबई हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेला अतिरेकी अजमल कसाब हा पाकिस्तानचा रहिवासी नाही, असे झरदारी वारंवार म्हणत आहेत. भारताकडे कसाब पाकिस्तानी असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. मी स्वत: पंजाब प्रांतातील कसाबच्या निवासस्थानी शहानिशा केली. कसाब हा पाकिस्तानीच असून त्याच्या घराभोवती झरदारींनी सुरक्षा जवान तैनात करून ठैवले आहेत. ते कोणालाही कसाबच्या कुटुंबीयांशी बोलू किंवा भेटू देत नाहीय. हे सर्व प्रकार झरदारी का करताहेत, हेच आपल्याला समजत नसल्याचे शरीफ म्हणाले.
पंजाब प्रांतातील फरीदकोट येथे कसाबचे कुटुंबीय राहत असल्याची पुष्टी बीबीसी आणि अन्य काही वृत्तसंस्थांनी केली आहे. असे सगळे स्पष्ट चित्र दिसूनही झरदारी मात्र हे सत्य अजूनही नाकारत आहेत. फरीदकोटची नाकाबंदी करून झरदारी पाकविषयी संशयाचे धुके निर्माण करीत आहेत. कसाबचे वास्तव साऱ्या जगासमोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याच्या कुटुंबीयांपर्यंत प्रसार माध्यमांना पोहोचू देण्यात काहीही हरकत नाही. त्याच्या कुटुंबीयांना नजरकैदेत ठेवल्यासारखे करून झरदारी काय साध्य करताहेत, असा सवालही शरीफ यांनी केला.
ते म्हणाले की, आता पाकिस्तानात लोकशाही पद्धतीचे सरकार आहे. पण, झरदारींचे वक्तव्य आणि त्यांचे एकूण वागणे जागतिक स्तरावर पाकची प्रतिमा खराब करीत आहे. प्रत्येकवेळी दहशतवादी हल्ल्यानंतर त्यासाठी पाकलाच जबाबदार का धरले जावे, याचा विचार करण्याची गरज आहे. किंबहुना, पाकने आता आत्मविश्लेषण, आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तान हे एक "अपयशी राष्ट्र' म्हणून जगासमोर आणण्याचे काम झरदारी करीत असल्याचा आरोपही शरीफ यांनी केला.

स्वामी नरेंद्राचार्य महाराजांच्या आश्रमाचे २३ रोजी उद्घाटन

फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी) - जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या गोवा आश्रमाची स्थापना येत्या २३ ते २५ डिसेंबर दरम्यान ओल्ड गोवा येथे होत आहे.
जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ - क्षेत्र गोवा, पणजी फोंडा बायपास रोड, वेस्ट कोस्ट आईस फॅक्टरीमागे ओल्ड गोवा, सनशाईन शाळेजवळ, तिसवाडी पणजी (गोवा) येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आश्रमाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे दक्षिणेकडून वैष्णव पीठ गोव्यामध्ये स्थापन होत आहे. या पीठाचा पीठारोहण सोहळा २५ डिसेंबर २००८ रोजी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
येत्या २३ डिसेंबरपासून पीठारोहण सोहळ्याचे विधी सुरू होत असून २५ डिसेंबर हा प्रमुख दिवस असेल. या दिवशी विधिवत जगद्गुरूंच्या पादुका प्राणप्रतिष्ठा विधीने स्थापन केल्या जाणार आहेत. सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या पीठामुळे गोवा राज्याला आध्यात्मिकदृष्ट्या फारच अनन्य साधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. कारण दक्षिणेकडे प्रथमच वैष्णव पीठाची स्थापना होत आहे.
तरी सखल हिंदू बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीजधाम येथून काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे. दररोज भजन, पूजन, नामजागर तसेच भक्ती संगीत आणि अखंड महाप्रसाद सुरू राहणार आहे. यावेळी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तरी गोमंतकीयांनी सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाला भेट देऊन जगद्गुरूंचा आशीर्वाद घ्यावा, असे गोवा राज्य सेवा समितीच्यावतीने कळवण्यात आले आहे.

दूरदर्शनने विश्वासार्हता राखली - शर्मा

पणजी केंद्रावरून लवकरच कोकणी बातमीपत्र

अतिरिक्त स्टुडिओ सेवेचे उद्घाटन

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - प्रसारणाच्या क्षेत्रात व्यावसायिक दूरचित्रवाहिन्यांची मोठी रेलचेल असतानाही दूरदर्शनने त्या स्पर्धेत केवळ विश्वासार्हतेच्या बळावर आपले स्थान टिकवून ठेवले असून ग्रामीण भागात सुरू असलेल्या विविध आघाड्यांवरील मूकक्रांतीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य केल्याचे गौरवोद्गार केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री आनंद शर्मा यांनी आज येथे काढले.
आल्तिनो येथील पणजी दूरदर्शन केंद्राच्या अतिरिक्त स्टुडिओ सेवेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री दिगंबर कामत होते. खास निमंत्रित म्हणून खासदार श्रीपाद नाईक व राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बलजितसिंग लाली व पणजी दूरदर्शन केंद्राचे संचालक चंद्रकांत बर्वे व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या सभोवताली काय घडते त्याबद्दल माहिती जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. गेल्या दीड दशकात भारताने विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असून भारताच्या या समृध्द सांस्कृतिक वारसा व परंपरा, सामाजिक व आर्थिक विकासाची माहिती जनतेला देण्याचे काम दूरदर्शनने केल्याचे ते म्हणाले.
पणजी दूरदर्शन केंद्र आता इतर राजधानी शहरांच्या दूरदर्शन केंद्रांच्या पंक्तीत बसले असून त्यांच्याकडून मनोरंजन तसेच माहितीपर कार्यक्रमांच्या प्रसारणाची अपेक्षा असल्याचे सांगून कोकणी भाषेतून बातम्या देण्याचीही व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना आपण दिल्याचे त्यांनी सांगितले.
पणजी दूरदर्शन केंद्रावर आजपर्यंत केवळ कार्यक्रम निर्मितीची सुविधा होती. मात्र आज या नव्या सुविधेमुळे हे केंद्र इतर केंद्राच्या तोडीचे बनले असून या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी गोमंतकीयांना दर्जेदर कार्यक्रम देण्याची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी असे आवाहन याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री कामत यांनी केले. गोवा हे भारतातील समृध्द व विकसनशील राज्य म्हणून ओळखले जात असले तरी त्याची ही ओळख जागतिक पातळीवर व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
गोव्यात परिपूर्ण दूरदर्शन केंद्र व्हावे ही गोव्याची जुनी मागणी होती. राज्यात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रम होतात. मात्र आपल्या दूरदर्शन केंद्राकडे कार्यक्रमनिर्मिती सोडल्यास प्रसारणाची सुविधा नव्हती. त्यामुळे कार्यक्रम जनतेपर्यंत पोचविणे शक्य होत नव्हते. गोवा जरी लहान असला तरी येथील संस्कृती व परंपरा समृध्द आहे. दूरदर्शन केंद्र आता अधिक सुसज्ज बनल्याने गोमतंकीयांना आता दर्जेदार कार्यक्रम पाहाण्याची संधी मिळेल असा विश्वास खासदार श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला.
गोव्याला परिपूर्ण केंद्राचा दर्जा मिळावा म्हणून गेली काही वर्षे शासकीय दरबारी सातत्याने पाठपुरावा होत होता. राजधानी शहरात परिपूर्ण दूरदर्शन केंद्र असावे असे केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याचे धोरण असतानाही गोव्याला मात्र एवढी वर्षे केंद्राकडून केवळ सापत्नभावाचीच वागणूक मिळाल्याची जोरदार टीका शांताराम नाईक यांनी केली.
पणजी दूरदर्शन केंद्रावरून लवकरच कोकणी भाषेतून बातमीपत्र प्रसारित करण्याबाबत योग्य ती पावले उचलण्यात येतील अशी ग्वाही प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बलजीतसिंग लाली यांनी दिली. स्वागतपर भाषणात त्यांनी पणजी दूरदर्शन केंद्राला परिपूर्ण केंद्राचा दर्जा मिळाल्याने गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याचे सांगितले.
आरंभी फित कापून व नंतर समई प्रज्वलित करून केंद्रीय मंत्री शर्मा यांनी दूरदर्शन केंद्राच्या अद्ययावत स्टुडीयो केंद्राचे औपचारिक उद्घाटन केले. सूत्रसंचालन तपन आचार्य व रूचिका दावर यांनी केले. कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. चंद्रकांत बर्वे यांनी आभार मानले.

"इएसआय' इस्पितळाचा दर्जा उंचावण्यासाठी ४४ कोटी मंजूर

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारने मडगावातील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या "इएसआय' इस्पितळाचा दर्जा सुधारण्यासाठी ४४ कोटींचा निधी मंजूर केला असून केंद्राच्या या निर्णयामुळे लवकरच या इस्पितळाला नवसंजीवनी प्राप्त होणार आहे.
गोव्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे वेगवेगळ्या ठिकाणी दवाखाने असून मडगावात एक इस्पितळही आहे. तथापि, अद्ययावत सेवांअभावी या इस्पितळात उपचारासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत बेताचीच राहिली आहे. किंबहुना ती फारच रोडावली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केंद्राने मंजूर केलेल्या अर्थसाह्यामुळे हे इस्पितळ आता सर्व सुविधांनी सुसज्ज बनेल.
केंद्रीय मजूर मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांनी गोवा सरकारला निधीच्या मंजुरीबाबत माहिती दिली असून लवकरच या इस्पितळाचा दर्जा सुधारण्याचे काम हातात घेतले जाईल. केंद्र सरकारने शिक्षण व आरोग्य क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित केले असून या इस्पितळाचा दर्जा सुधारण्याची मागणी गेली काही वर्षे सातत्याने होत होती. विविध कर्मचाऱ्यांच्या वेतनात कर्मचारी राज्य विम्यासाठी रक्कम कापली जात असली तरी अद्ययावत सेवासुविधांच्या अभावी त्यांना खाजगी किंवा बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचारासाठी धाव घ्यावी लागत होती.
पुढील वर्ष ते दीड वर्षात इस्पितळाच्या दर्जा सुधारणीचे हे काम पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर दक्षिण गोव्यातील लोकांच्या सेवेसाठी हेअद्ययावत सुविधायुक्त इस्पितळ सज्ज होईल.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून नववर्ष व नाताळानिमित्त केंद्राची ही गोमंतकीयांना भेट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्राने मंजूर केलेल्या निधीतून दक्षिण गोव्यात एक परिपूर्ण सुपर स्पेशालिटी इस्पितळ साकारणार असल्याचे म्हटले आहे. केंद्राने गोवा सरकारला इस्पितळाच्या दर्जा सुधारणांचा तपशीलवार कार्यक्रमही पाठवला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Friday, 19 December, 2008

भारतीय सीमेवर 'हाय अलर्ट'

नवी दिल्ली, दि. १८ : मुंबईतील भीषण अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानलगत असणाऱ्या सीमेवर सुरक्षा वाढवित सीमा सुरक्षा दलाला "हाय अलर्ट' जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
आज संरक्षणमंत्री ए.के.ऍन्टोनी यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांशी चर्चा केली. एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक एम.एल.कुमावत यांनी सांगितले की, पाकिस्तान आणि बांगलादेशलगत असणाऱ्या सीमेवर "हाय अलर्ट' जारी करण्यात आले आहेत. या परिसरात आम्ही तैनाती आणि सतर्कता वाढविली आहे. त्यामुळे आज आम्ही पूर्वीच्या तुलनेत अधिक सतर्क असल्याचे आश्वासन देशाला देऊ शकतो.
सीमा सुरक्षा दल भारत-बांगलादेशच्या ४०९६ किलोमीटर आणि पाकलगतच्या ३२६८ किलोमीटर लांब सीमेचे संरक्षण करतात. पाकिस्तानलगतच्या ३२६८ किलोमीटरच्या सीमेत २५२६ किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमा आणि ७४२ किलोमीटर नियंत्रण रेषा समाविष्ट आहे. मुंबई हल्ल्यानंतर पाकसोबतच्या संबंधात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सुरक्षा दलाची कुमक सीमेवर वाढविली आहे. सध्या पाक सीमेलगत भारताचे ४५ हजार जवान तैनात आहेत.
गेल्या काही दिवसात पाक आणि बांगलादेशी सीमेतून घुसखोरीचे प्रमाण वाढल्याच्या वृत्ताचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. ते म्हणाले की, मी या वृत्ताशी अजिबात सहमत नाही. दोन्ही सीमांवर सुरक्षा दलाची तैनाती कायम आहे. घुसखोरीला आळा घालण्यासाठी सुरक्षा दल आवश्यक ते सर्व उपाय करीत असल्याचेही महासंचालकांनी सांगितले.
संरक्षणमंत्र्यांची लष्करप्रमुखांशी चर्चा
संरक्षणमंत्री ए.के.ऍन्टोनी यांनी आज तिन्ही दलाच्या प्रमुखांशी चर्चा केली.
याबाबत माहिती देताना संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले की, संरक्षणमंत्र्यांनी तिन्ही दलाच्या प्रमुखांसह संरक्षण सचिवांशीही चर्चा केली. यात त्यांनी देशाच्या सर्व सीमा अधिक बळकट करण्याविषयीच्या सूचना दिल्या. सोबतच सध्याच्या स्थितीचा आढावा घेतला. सुरक्षा दलाला अत्याधुनिक हत्यारे आणि उपकरणे देण्याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
देशाच्या सागरी सीमांवर अधिक बारकाईने लक्ष देण्याचेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भातील चर्चेसाठी संरक्षणमंत्र्यांनी येत्या शनिवारी पुन्हा बैठक बोलाविल्याचे समजते.

अखेर पाक दौरा रद्द, जनतेतून स्वागत; 'पीसीबी' ला जबरदस्त आर्थिक फटका

नवी दिल्ली, दि. १८ : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पाकिस्तानातील अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारा पाकिस्तान दौरा अधिकृतरीत्या रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी') सुमारे २० दशलक्ष डॉलर्सचा फटका बसणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
पाकिस्तानचा दौरा रद्द करण्यासंदर्भात केंद्र सरकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला गुरुवारी दुपारी निर्देश दिले आहेत. दोन्ही देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, भारत आणि पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या मालिकांसाठी आमच्याकडून बऱ्यापैकी पैसा खर्च झाला आहे. तो सर्व वाया जाईलच शिवाय दूरचित्रवाहिन्यांबरोबर होणाऱ्या प्रक्षेपणाच्या करारावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे "चीफ ऑपरेटिंग ऑफिसर' अलीम अल्ताफ म्हणाले की ,"मोठमोठे दौरे रद्द झाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळ याआधीच आर्थिक अडचणीत सापडले आहे, त्यात भारताने दौरा रद्द केल्यामुळे तर आमची अवस्था फारच वाईट होईल.'
सध्याच्या परिस्थितीत भारताने पाकिस्तानचा क्रिकेटदौरा करूच नये, अशी जोरदार मागणी क्रिकेटप्रेमींतूनही केली जात होती. कारण, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हे हल्ले झाल्यानंतरही पाकिस्तान सरकारची भूमिका अत्यंत वादग्रस्त ठरली आहे. त्यामुळे देशातील जनमत सध्या पाकिस्तानच्या विरोधात तप्त झाले आहे. त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. जर सरकारने सूचना केली तर आम्ही भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर पाठवणार नाही, असे क्रिकेट नियामक मंडळानेही यापूर्वीच स्पष्ट केले होते. आता त्यावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमीच नव्हे तर आम जनतेतूनही सरकारच्या या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे. सद्यस्थितीत पाकिस्तान या नावाबद्दलच लोकांमध्ये विलक्षण तिटकारा निर्माण झाला आहे.

जागा ८ व अर्ज ६००, मुलाखतींचा 'फार्स' सुरू

पणजी, दि.१८(प्रतिनिधी): राज्याच्या शिक्षण खात्यात शिपायांच्या आठ जागांसाठी सुमारे सहाशे अर्ज आले असून त्यामुळे गोव्यात रोजगारीची समस्या कशी भीषण बनली आहे यावर झगझगीत प्रकाश पडला आहे. शिवाय ही पदे कशी भरायची हे आधीच ठरून गेल्याने सध्या मुलाखतींचा फार्स सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
विविध सरकारी खात्यातील पदे ही केवळ राजकीय वशिलेबाजीने भरली जातात हे अमान्य करण्याचे धाडस कुणीही करणार नाही. या वशिलेबाजीला कायदेशीर स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी राज्यातील बेरोजगारांची जी फजिती केली जाते त्यामुळे सरकारी "सिस्टीम' कशी नाटकी आहे याची प्रचिती नागरीकांना पावलोपावली येत आहे.
शिक्षण खात्यातर्फे गेल्याच महिन्यात सुमारे ११० शिक्षकांची भरती करण्यात आली. या यादीत निवड झालेले उमेदवार हे आपल्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा राजकीय वजनाच्या बळावर जास्त पात्र ठरले आहेत. आता खात्यातर्फे ८ शिपायांची पदे जाहीर झाली आहेत. या पदांसाठी कमी शिक्षणाची गरज असल्याने व या गटातील उमेदवारांना अन्य ठिकाणी नोकरी मिळणे कठीण असल्याने या आठ पदांसाठी खात्याकडे सुमारे ६०० अर्ज सादर झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.सरकारी खात्यात सर्वांत कमी शिक्षणासाठी असलेला हा एकमेव पर्याय त्यामुळे राज्यभरातील कमी शिक्षित गटातील बेरोजगारांनी या पदांसाठी अर्ज केले आहेत. मुळात या ८ पदांवर कोणाची निवड होणार याची नावे संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना यापूर्वीच कळली असतील; परंतु तरीही ही निवड किती पारदर्शकतेने केली जाते व पात्रतेच्या निकषावरच ही निवड होते हे भासवण्यासाठी या असंख्य बेरोजगारांचा छळच जणू सरकारकडून सुरू आहे. या उमेदवारांना केवळ निमित्तमात्र प्रश्न विचारून अधिकारी आपली जबाबदारी पार पाडीत असले तरी या मुलाखतींना सामोरे जाणारे बिचारे उमेदवार आपल्याला नोकरी मिळेल, अशी वेडी आशा लावून बसले आहेत.
राज्यातील अशा कमी शिक्षण घेतलेल्या स्थानिक बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कंत्राटी कामगार भरती सोसायटीची स्थापना केली होती व मोठ्या संख्येतील या घटकाला विविध संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. गोमंतकीय युवकांना योग्य मोबदला व व्यवस्थित काम दिल्यास कोणतेही काम करण्याची त्यांची तयारी असते हे या सोसायटीने सिद्ध करून दाखवले होते. झाडूवाली व सुरक्षा रक्षकाची कामेही गोमंतकीय करू शकतात हे यावरून सिद्धही झाले होते; परंतु केवळ राजकीय आकसापोटी पर्रीकरांच्या विरोधकांनी या सोसायटीला वाऱ्यावर सोडले व असंख्य गोमंतकीयांच्या पोटावर नांगर फिरवून त्यांच्या ठिकाणी बिगर गोमंतकीयांची भरती केली. सरकारी खात्यातील नोकर भरतीबाबत सुरू असलेली ही प्रक्रिया खरोखरच सुधारण्याची गरज असून ही प्रक्रिया म्हणजे निव्वळ फजिती असल्याने ती तात्काळ बंद होण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

रोहित मोन्सेरातप्रकरणी पोलिस तपास पक्षपाती, वकिलांकडून प्रतिज्ञापत्रात ठपका, पुढील सुनावणी ६ जानेवारी रोजी

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): जर्मन अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी पोलिसांनी हेतूपूर्वक पक्षपाती भूमिका घेतली असून बाबूश मोन्सेरात यांच्यावर सूड उगवण्याच्या दृष्टीनेच या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचा ठपकाही रोहित मोन्सेरात यांचे वकील ऍड.आत्माराम नाडकर्णी यांनी आज सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ठेवला. याबाबत पुढील सुनावणी येत्या ६ जानेवारी २००९ रोजी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात या प्रकरणाची आज सुनावणी झाली. रोहितला मिळालेला जामीन रद्द करता येत नसल्याचा दावा करीत सात दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आश्वासन गेल्या १० डिसेंबर रोजी दिलेल्या ऍड.नाडकर्णी यांनी तसे प्रतिज्ञापत्र आज न्यायालयाला सादर केले. रोहित मोन्सेरात याचे वडील बाबूश मोन्सेरात यांना विनाकारण या प्रकरणात गोवले गेल्याचे सांगून केवळ रोहितकडील मोबाईल त्यांच्या नावावर असल्याने ते गुन्हेगार ठरू शकत नाहीत,असा युक्तिवादही ऍड.नाडकर्णी यांनी केला.
पोलिस पूर्णपणे कायद्याची बाजू राखूनच या प्रकरणाची चौकशी करीत असून प्रतिवादी वकिलांनी केलेले दावे ऍड.जनरल सुबोध कंटक यांनी फेटाळून लावले.प्रतिवादी वकिलांनी न्यायालयाला सादर केलेले प्रतिनिधित्व आपल्याला कालच मिळाल्याने त्याबाबत युक्तिवाद करण्यासाठी आपल्याला अवधी हवा,अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सरकारकडून यापूर्वी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात काही सुधारणा व बदल करण्यात आ आले असून तसा अर्ज आज ऍड.जनरल यांनी न्यायालयासमोर ठेवला. मूळ याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वी या अर्जाबाबत युक्तिवाद हवा,अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अंतुलेंच्या हकालपट्टीची संसदेत जोरदार मागणी, करकरेप्रकरणी खळबळजनक वक्तव्याचे पडसाद

नवी दिल्ली, दि. १८ : मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांविषयी केंद्रीय अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री ए.आर.अंतुले यांनी नुकतेच खळबळजनक वक्तव्य केेले हेाते. अपेक्षेनुसार त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहात जोरदार आवाज उठवित अंतुले यांची पदावरून हकालपट्टी करावी आणि त्यांच्या वक्तव्यासंदर्भात पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे खासदार संतोष गंगवार यांनी आज गुरूवारी सभागृहात शुन्यप्रहराचे कामकाज प्रारंभ होताच अंतुले यांच्या कथित वक्तव्याप्रकरणी जोरदार आवाज उठविला. त्यांच्या पक्षाच्या तसेच शिवसेना सदस्यांनी पाठिंबा दर्शवित सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी स्वतः अंंतुलेही सदनात उपस्थित होते, परंतु त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला नाही.
अंतुले यांचे कथित वक्तव्य अत्ंयत बेजबाबदारपणाचे असल्याचे नमूद करीत गंगवार म्हणाले की, एकीकडे दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी कठोर कायदा निर्माण करावा यासंदर्भात लोकसभेत सविस्तर चर्चा सुरू असताना अंतुले यांनी शहीद करकरे आणि त्यांचे सहकारी यांच्या मृत्युविषयी प्रश्नचिन्ह उभे करणे ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. या प्रकरणी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी अंतुले यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करावी आणि सदनासमोर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही गंगवार यांनी यावेळी केली.
सभागृहात विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभाध्यक्षांनी काही काळ कामकाज तहकूब केले. त्यानंतर कामकाज सुरू होताच अंतुले यांच्या वक्तव्याचा तपशील पाहून त्याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आले.
मात्र अंतुले यांच्या वक्तव्यावरून राज्यभर उमटलेले तीव्र पडसाद पाहता पक्षश्रेष्ठींकडून त्यांची कानउघडणी होईल अशी शक्यता राजकीय वर्तृळात व्यक्त केली जात आहे.

पेडणे किनारी भागात रेव्ह पार्ट्या, ध्वनी प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


किनारी भागात आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांचे संग्रहित छायाचित्र. (छाया: निवृत्ती शिरोडकर)

मोरजी, दि. १८ (वार्ताहर): पेडणे तालुक्यातील हरमल, आश्वे - मांद्रे व मोरजी या किनारी भागात बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवसांत रेव्ह पार्ट्यांचे छुप्या मार्गाने आयोजन केले जात आहे. कर्णकर्कश संगीत लावून या पार्ट्यांचे आयोजन होत असताना पोलिस तसेच पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या भागातील शॅक्स, रेस्टॉरंट व्यावसायिकांनी पेडणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संगीत वाजण्याचे परवाने घेतले आहेत. याद्वारे विदेशी पर्यटकांचे वाढदिवस तसेच इतर समारंभांचे निमित्त करून किनारी भागात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यामुळे स्थानिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. पार्टी आयोजकाकडे तक्रारदाराचे नाव उघड होण्याच्या भीतीने स्थानिक पोलिसांकडे तक्रार करणे टाळत आहेत.
किनारी भागातील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ध्वनी प्रदूषण देखरेख समिती निवडण्यात आली आहे. पेडणे तालुक्यासाठी निवृत्ती शिरोडकर व ऍड. प्रसाद शहापूरकर या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुक्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्यरत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याच प्रकारच्या ध्वनी प्रक्षेपणास कायद्याने बंदी असली तरी किनारी भागात याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. संगीत वाजण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत मर्यादा असून परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मर्यादेचे पालन होते की नाही याची पडताळणी करण्यासाठी कोणतीच कृती होत नाही. विदेशी नागरिकाचे वैयक्तिक समारंभ हे पार्ट्यांचे कारण कसे होऊ शकते, असा सवाल उपस्थित होत आहे. परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी येथून होत आहे. तसेच परवाना देताना भेदाभेद होत असल्याचा आरोप एका शॅक व्यावसायिकाने केला आहे. ध्वनी प्रक्षेपण करण्यासाठी तीन वेळा अर्ज करूनही अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचे या व्यावसायिकाचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी ध्वनी प्रदूषणाच्या चार तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. परंतु,यंदा कायद्याचे उल्लंघन होत असूनही एकही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. हरमल, मोरजी, आश्वे - मांद्रे येथे सर्रासपणे सुरू असलेल्या पार्ट्यांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.
गृह मंत्रालयाने या प्रकाराची त्वरित दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी येथून होत आहे.

Wednesday, 17 December, 2008

आंबावलीवासीय खवळले

धूळ प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
खाणींविरोधात उद्रेक...
- दोघे पोलिस व अनेक
आंदोलक जखमी
- पोलिसांचा लाठीमार
- सात जणांना अटक
- बेदरकार ट्रक वाहतूक
आंदोलकांनी रोखली


कुंकळ्ळी, दि. १७ (प्रतिनिधी) - गेल्या अनेक महिन्यापासून आंबावलीतून होत असलेल्या बेदरकार ट्रक वाहतुकीमुळे होत असलेल्या धूळ प्रदूषणाने हैराण झालेल्या कपेलाभाट आंबावली नागरिकांनी आज पुकारलेल्या शांततामय ट्रकरोको आंदोलनाला हिंसक वळण लागून झालेल्या दगडफेकीत व लाठीमारात दोघा पोलिसांसह इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या कॅमेरामनसह अनेक नागरिक जखमी झाले. यावेळी पोलिसांनी बेकायदा रस्ता अडवणे, पोलिसांच्या कामात अडथळा आणणे आदी कलमांखाली दोन महिलांसह एकूण सात जणांना अटक केली. आंदोलनविषयक परिस्थिती केप्याचे पोलिस निरीक्षक संतोष देसाई, उपजिल्हाधिकारी बॅनोन्सियो फुर्तादो व मामलेदार सुदिन नातू यांनी हाताळली.
आंदोलनाचे नेते विल्यम फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ नोव्हेंबर ०८ रोजी खाणमाल वाहतुकीमुळे निर्माण होत असलेल्या समस्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले होते. त्यानंतर २४ रोजी पाठवलेल्या स्मरणपत्राचाही फायदा झाला नाही. सरकारकडून आवश्यक कृती न झाल्यास २७ नोव्हेंबर रोजी आंदोलक रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्या स्मरणपत्राद्वारे सरकारला देण्यात आला होता.मात्र आश्वासनापलीकडे लोकांच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे लोकांना आंदोलनाखेरीज पर्याय उरला नाही.
आज सकाळी साडेआठ वाजता विल्यम फर्नांडिस व ऍड. जॉन फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली कपेलभाट येथील शेकडो नागरिकांनी खनिज ट्रक आंबावली तीनरस्ता येथे रोखून धरले. त्यामुळे काही काळ या रस्त्यावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली. मात्र काही वेळाने खाण ट्रक सोडून इतर सर्व वाहतूक मोकळी करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच केप्याचे पोलिस निरीक्षक संतोष देसाई आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने मामलेदार श्री. नातू त्या ठिकाणी पोहोचले.मात्र आंदोलकांशी झालेल्या चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेर पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, रोखून धरलेले ट्रक सोडण्याचा प्रयत्न केला असता आंदोलनाच्या नेत्यांनी त्यास विरोध केला. त्यामुळे या नेत्यांना अटक करण्यात आली आणि तेथेच आंदोलनकर्ते बिथरले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच उपजिल्हाधिकाऱ्यांनी सौम्य लाठीहल्ल्याचा हुकूम सोडला. त्यात अनेक नागरिक जखमी झाले.प्रत्युत्तरादाखल नागरिकांकडूनही पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. त्यात पोलिस शिपाई सुरेंद्र नाईक व अन्य एक पोलिस, प्रुडंट मीडियाचे रमेश राऊत नाईक किरकोळ जखमी झाले.यासंबंधी केपे पोलिस स्थानकाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधला असता ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची चौकशी पूर्ण झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

"संभवामि'ची दुसरी मालिका आजपासून

फोंडा, दि.१७ (प्रतिनिधी) - श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळनिर्मित "संभवामि युगे युगे...' या श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्याच्या दुसऱ्या मालिकेचा शुभारंभ उद्या गुरुवारी १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात येणार आहे.
या दुसऱ्या मालिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात येणार असून ही मालिका २१ डिसेंबर २००८ पर्यत चालणार आहे. या दुसऱ्या मालिकेची तयारी पूर्ण झाली असून महानाट्यात अनेक सुधारणांसह दुसरी मालिका होत असल्याने ह्या मालिकेलाही रसिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असा दावा संयोजकांनी केला आहे.
या दुसऱ्या मालिकेची रंगीत तालीम गेले दोन दिवस फर्मागुडी येथे सुरू असून कलाकारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. ही दुसरी मालिका यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहे. महानाट्याला येणाऱ्या रसिकांना वाहने ठेवण्यासाठी पूर्वी प्रमाणे योग्य सोय करण्यात आली आहे. सर्व रसिकांना नाट्याचा आनंद लुटता यावा म्हणून प्रेक्षागृहात मातीचा भराव घालून जमिनीला उंची देण्यात आली आहे. ध्वनी आणि प्रकाश योजनेसाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर या मालिकेसाठी पहिल्यांदाच केला जात आहे.
"संभवामि'चे गोव्यात लगेचच आणखी प्रयोग होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ज्या नाट्यरसिकांनी हे महानाट्य पाहिलेले नाही त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

राष्ट्रीय चौकशी संस्था स्थापना विधेयक मंजूर

लोकसभेत राष्ट्रीय एकजुटीचे सुखद दर्शन
नवी दिल्ली, दि. १७ - वाढत्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी लोकसभेने आज राष्ट्रीय चौकशी संस्था स्थापन करण्यासंबंधीच्या विधेयकाला राष्ट्रीय एकजुटीचे सुखद दर्शन घडवत मंजुरी दिली, त्याचप्रमाणे दहशतविरोधी कायदा कडक करण्यासाठी दहशतवादविरोधी कायदा व "बेकायदा कारवाया प्रतिबंधककायदा, २००८' संमत केला.
यासंबंधीची दोन विधेयके गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी मंगळवारी लोकसभेत मांडली होती. ही दोन्ही विधेयके सर्वसंमतीने मंजूर व्हावीत असे आवाहन करताना चिदंबरम यांनी, या कायद्यांत काही त्रुटी आढळल्यास त्या फेब्रुवारीमध्ये पुढील अधिवेशनात दुरुस्त केल्या जातील, अशी ग्वाही दिली.
कोणत्याही अतिरेक्याला जात, धर्म नसतो. तो कोणत्याही जातीचा, धर्माचा असला तरी तो गुन्हेगार असतो. वैयक्तिक कायद्यांचा अपवाद सोडल्यास सर्वच कायदे हे धर्मनिरपेक्ष आहेत, त्यामुळे दहशतवादविरोधी कायद्यांकडे जातीयवादाच्या चष्म्यातून पाहू नका, असे आवाहन चिदंबरम यांनी यावेळी केले. या विधेयकांना सभागृहात भरघोस पाठिंबा मिळाला. डाव्या पक्षाच्या एका सदस्याने सुचविलेली दुरुस्ती फेटाळत, सभागृहाने ही विधेयके आवाजी मतदानाने संमत केली. आता ती राज्यसभेत मान्यतेसाठी पाठविली जातील.
दहशतवादी प्रकरणांमध्ये तपास करण्याचा राज्यांना निश्चितच अधिकार आहे, याकामी केंद्र सरकारही राज्य सरकारांना सहकार्य करील, असे आश्वासन गृहमंत्र्यांनी दिले. केंद्र सरकार व राज्य सरकारांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे, असे ते म्हणाले. जामीन नाकारण्याबाबत कडक तरतूद करण्यात आली असली तरी काही बाबतीत न्यायालयाने गांभीर्य जाणून घेऊन त्यासंबंधी निर्णय घेण्याची मुभाही राहील, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय संस्था स्थापन करण्यात येणार असली तरी राज्य सरकारांना दहशतवादसंबंधी प्रकरणांमध्ये चौकशीचा अधिकार राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आपण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक ६ जानेवारीस बोलावल्याचे सांगून त्यावेळी दहशतवादविरोधी उपायांवर ठोस निर्णय घेतले जातील, असे चिदंबरम यांनी सांगितले.

कसाबला "सीएसटी'पुढेच फाशी द्या!

शिवसेनाप्रमुखांची मागणी
मुंबई, दि. १७ - मोहम्मद अजमल कसाब या पाकिस्तानी अतिरेक्याच्या खटल्याचा घोळ कसला घालता ? ज्या सीएसटी स्थानकावर बेधुंद गोळीबार करून त्याने माणसे मारली, त्याच सीएसटीसमोर त्याला जाहीरपणे फासावर लटकवा, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र "सामना' च्या अग्रलेखातून आज त्यांनी हे विचार व्यक्त केले. खटल्याचे तर सोडाच, पण कसाबच्या चौकशीचीही गरज नाही. कारण, सीएसटीवर गोळीबार करताना सा-या जगाने त्याला टीव्हीवर पाहिलेले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
चौकशांचे फार्स करीत राहाल तर कसाबच्या सुटकेची मागणी करण्यासाठी उद्या एखाद्या विमानाचे अपहरण केले जाईल, असा इशारा देताना बाळासाहेब म्हणाले की, मसूद अझरच्या सुटकेसाठी पाकड्‌यांनी असाच डाव रचला होता आणि तो यशस्वीही झाला होता. कसाबच्या बाबतीतही तसेच घडू नये यासाठी त्याला लगेच फासावर लटकवणे आवश्यक आहे.
कसाबचे वकीलपत्र घेऊ इछिणा-या "मानवतावादी' वकिलांचा समाचार घेताना शिवसेनाप्रमुख म्हणतात की- अशी हिंमत करणारे बेईमान आपल्या मातीतच जन्मू शकतात. कसाबचा पुळका आलेल्या या वकिलांनी आपले प्रियजन कसाबच्या हवाली करावे आणि मग पाहावे. दुस-याचे रक्त सांडले की हळहळ व्यक्त करणे सोपे आहे. त्यांच्यासाठी मानवता वगैरे फडतूस गोष्टी बोलायला काही जात नाही. पण, दहशतवादी हल्ल्‌यात आपलेच प्रियजन मारले गेले तर-? आठवेल का मानवता ?
तेव्हा, कसाबसारख्या नराधमाचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये. एखाद्याने घेतलेच तर त्याच्याविरुद्ध जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना तर हा प्रकार मुळीच खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
मुंबईवरील हल्ल्‌याची जबाबदारी ठेवून राज्य सरकारचा बळी देण्यात आला. पण, त्याच सरकारचे पोलिस महासंचालक अनामी रॉय, गृह खात्याच्या सचिव चित्कला झुत्शी आदी वरिष्ठ अधिका-यांच्या बेजबाबदार वागण्यावर काहीच कारवाई का झाली नाही, असा सवालही शिवसेनाप्रमुखांनी केला आहे.

करकरेंना अतिरेक्यांनीच मारले काय? - अंतुले

नवी दिल्ली, दि. १७ ः दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मुंबईत मृत्यू झाला हे निश्चित असले तरी त्यांना अतिरेक्यांनीच मारले का, अशी शंका माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री ए. आर. अंतुले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.
अनेकजण मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी त्यांच्या चौकशीमुळे नाराज होते. त्यामुळे करकरेंसारखा अधिकारी या हल्ल्यात इतक्या सहजपणे मृत्युमुखी पडतो, ही साधी गोष्ट नाही. त्यांचा मृत्यू अतिरेक्यांनी केला की आणखी कशामुळे झाला याबाबत शंका निर्माण होऊ शकते, असे अंतुले यांनी सांगितले.
करकरे हे अत्यंत शूर आणि धाडसी अधिकारी होते. मालेगाव स्फोटाची चौकशी करकरे करत होते, त्यात मुस्लिमेतर अतिरेकी असल्याच्या शक्यतेचा ते शोध घेत होते. यातच त्यांची हत्या होणे, हे संशयास्पदच आहे. नाहीतर ताज आणि ऑबेरॉय येथे गोळीबार सुरु असताना करकरे कामा हॉस्पिटलजवळ कशाला गेले असा प्रश्न पडतो, असे अंतुले म्हणाले.
कॉंग्रेसची भंबेरी
दरम्यान, अंतुले यांच्या या विधानामुळे कॉंग्रेस पक्ष कमालीचा अडचणीत आला असून पक्ष प्रवक्ते अभिषेक मनू संघवी यांनी अंतुले यांचे ते वैयक्तिक मत आहे, पक्षाचे नव्हे असे सांगत पक्षाची बाजू कशीबशी सावरून नेली.

"रिव्हर प्रिन्सेस' विरोधात कडकडीत बंद व रास्तारोको

पावसाळ्यापूर्वी जहाज हटवा, सरकारला कडक इशारा
म्हापसा व वेर्ला काणका, दि. १७ (प्रतिनिधी) - कांदोळी सिकेरी समुद्रात रुतलेले "रिव्हर प्रिन्सेस' हे तेलवाहू जहाज यंदाच्या पावसाळ्यापूर्वी न हटवल्यास लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा कांदोळी येथील "रिव्हर प्रिन्सेस हटाओ मंच' ने आज आयोजिलेल्या "कांदोळी बंद' आंदोलनप्रसंगी दिला. याप्रसंगी तेथे सुमारे सहा हजारांचा जनसमुदाय उपस्थित होता. कडकडीत बंद व रास्तारोको यामुळे कांदोळीतील जनजीवन दुपारी एक वाजेपर्यंत पूर्णतः विस्कळित झाले होते. आता यासंदर्भात येत्या २६ डिसेंबरला पुढील बैठक घेण्यात येणार आहे.
कांदोळी गावातील जाणारे सर्व रस्ते आज तीन ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. नेरुल पूल, शाळपे व कळंगुट कांदोळी सीमेवर अशा तीन ठिकाणी कांदोळीला जाणारे रस्ते रोखण्यात आले होते. त्यामुळे बेतीवेरेहून नेरुल पुलावरुन येणारी वाहने अडविण्यात आली, तर पिळर्णमार्गे कांदोळीला येणारा रस्ता शाळपे येथे अडविण्यात आला. तसेच कळंगुटहून कांदोळीला जाणारा रस्ता कांदोळी कळंगुट सीमेजवळ जांबळेश्वर देवळापाशी रोखण्यात आला. मंचचे निमंत्रक फर्मिनो फर्नांडिस यांनी सांगितले की, गेल्या जुलै महिन्यात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कांदोळीला भेट देऊन आपण सप्टेंबर महिन्यापूर्वी याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले, परंतु आता सहा महिने होऊन गेले तरी कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याने आम्हाला कांदोळी भागाची "नाकेबंदी' करावी लागत आहे.
कळंगुटचे आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी आंदोलकांच्या एका तुकडीचे नेतृत्व केले, तर नेरुल पुलाजवळ जमलेल्या आंदोलनकर्त्यांचे नेतृत्व कांदोळीचे सरपंच रामकृष्ण केरकर यांनी केले. मंचचे निमंत्रक फर्मिनो फर्नांडिस यांनीही एका तुकडीचे नेतृत्व केले. त्यामुळे संपूर्ण कांदोळीमध्ये कडकडीत बंद होता. सकाळी ९ वाजता रास्ता रोको करण्यास सुरवात झाली. दुपारी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास उपजिल्हाधिकारी कांदोळीला पोहचले व त्यांनी आंदोलकांना तुम्हाला वाहतुकीचा रस्ता अडविता येणार नाही. म्हणून आम्हाला अटक करावी लागेल, असे सुनावले. त्यामुळे लोक आणखी चवताळले.
या जहाजचे मालक व संबंधित कंपनी यांच्याविरोधात आंदोलकांनी घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. निषेधाचे फलक हातात घेऊन कांदोळी, सिकेरी, नेरुलचे लोक बंदमध्ये सामील झाले होते. हा बंद अत्यंत उत्स्फूर्त असल्याचे दिसून आले. कारण एवढ्या मोठ्या संख्येने लोक प्रथमच रस्त्यावर उतरले होते.
लोकांचे म्हणणे सरकार ऐकून घेत नाही. आमच्या गावचा समुद्रकिनारा दूषित झाला असून गावातील विहिरींचे पाणीदेखील दूषित झाले आहे. पर्यटन व्यवसायावरही परिणाम झाला आहे. सरकारने आतापर्यंत दोन कंपन्यांना हे जहाज हटवण्याचे कंत्राट दिले. तथापि, दोन्ही कंपन्या असमर्थ ठरल्या. ते काम अर्धवट सोडून त्या गेल्या. त्यामुळे ही परिस्थिती पर्यावरण व सुरक्षा यादृष्टीने घातक आहे. हे जहाज म्हणजे पर्यावरण आपत्ती आहे. त्याकरता ते त्वरित हटवावे, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली. अखेर दुपारी १ वाजता हा बंद संपला.
दरम्यान पर्यटन खात्याचे वरिष्ठ अधिकारीही याठिकाणी आले व त्यांनी पाहणी केली. कळंगुटचे पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर उपअधीक्षक गुंडू नाईक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
विदेशी पर्यटकांचाही सहभाग
या बंदमध्ये विदेशी नागरिक पर्यटकही सहभागी झाले होते. त्यातील एकाने उपजिल्हाधिकाऱ्यांना सुनावले की, तुम्ही जर आम्हाला अटक करत असाल तर मी प्रथम अटक करवून घेतो. आम्ही गेली आठ वर्षे पर्यटक म्हणून येत आहोत व हे जहाज तेथेच रुतल्याचे पाहात आहोत, असे या पर्यटकाने सांगितले. त्यामुळे उपजिल्हाधिकारी व पोलिस उपअधीक्षक गुंडू नाईक हताश होऊन त्याच्याकडे पाहातच राहिले.

"त्या' जखमा आजही ओल्या

ताळगाव हल्ल्याची "वर्षपूर्ती'
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - "आम्ही सारे संकल्प आमोणकर यांच्या पाठीशी आहोत, गरज पडल्यास ताळगावात पुन्हा मोर्चा काढला जाईल, बाबूश मोन्सेरात यांची किती हिंमत आहे तेच बघू" ही डरकाळी हवेतच विरून गेली. कॉंग्रेस सरकारच्या राज्यात त्यांच्याच युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या ताळगावात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्यात केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचलेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगावर अजूनही ही घटना आठवली की काटा उभा राहतो. हल्लेखोरांवर कारवाई करण्याचे सोडूनच द्या; उलट या हल्ल्याला जबाबदार असलेल्या लोकांच्या आश्रयानेच आज आपले सरकार सत्तेची फळे चाखताना पाहिल्यावर "राजकारणा' ची खरी ओळख पटली, अशी प्रतिक्रीया युवक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
दोनापावला येथील नियोजित राजीव गांधी "आयटी हॅबिटेट" प्रकल्पाला पाठिंबा दर्शवण्यासाठी या प्रकल्पाला विरोध करणारे ताळगावाचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या नाकावर टिच्चून मोर्चा काढण्याचे आव्हान स्वीकारलेल्या युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीला उद्या १८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ताळगावात झालेल्या त्या हल्ल्यात युवक कॉंग्रेसचा सचिव चिदंबरम चणेकर जबर जखमी झाला होता. त्याखेरीज जखमी झालेल्यांत माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांचे पुत्र आश्विन खलप, जितेश कामत, नारायण रेडकर व अन्य पंधरा कार्यकर्त्यांचाही समावेश होता. युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश चढ्ढा व गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात, पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस, नगरसेवक उदय मडकईकर, दया कारापूरकर, नागेश करशेट्टी, सरपंच जानू रुझारीयो, टोनी बार्रेटो तसेच अन्य लोकांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल केली होती. आता मोन्सेरात हे सरकारात शिक्षणमंत्री आहेत, तर आयटी पार्कचे समर्थन करणारे तत्कालीन माहिती तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर हे मंत्रिमंडळा बाहेर.
संकल्प आमोणकर यांनी जाब द्यावा
युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला होता व यावेळी झालेल्या हल्ला प्रकरणी ते तक्रारदार आहेत. त्या तक्रारीचे काय झाले याचा जाब त्यांनी द्यावा,अशी विचारणा चिदंबर यांनी केली. बाकी उर्वरीत काही पदाधिकारी व नेत्यांना याबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देणेच टाळले.
खुद्द संकल्प आमोणकर यांच्या फोर्ड गाडीवर त्यावेळी जोरदार दगडफेक करून त्याची गाडी उलथून टाकली होती. यावेळी अन्य चार वाहनांवर दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. सुमारे २०० लोकांच्या जमावाने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळेल त्या दिशेने जीव वाचवण्यासाठी धावायची पाळी आली होती याचे सचित्र वृत्त वर्तमानपत्रांत तथा वृत्तवाहिन्यांकडून प्रसारीत करण्यात आले होते मात्र "डोळे असूनही आंधळ्याचे सोंग' घेतल्याप्रमाणे आपलेच सरकार वागत आहे याचे दुखःही या घटनेचे साक्षीदार असलेले काही कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

"कंत्राटी कामगार पद्धत रद्द करा'

कामगार संघटनेची उद्या पणजीत महारॅली
पणजी,दि.१७(प्रतिनिधी)ः गोव्यात असंघटित कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक सुरू आहे. कंत्राटी नेमणुकीच्या नावाखाली कामगारांचे शोषण सुरू असून खुद्द राज्य सरकारही त्याला अपवाद नाही. ही कंत्राटी पद्धत बंद होण्याची नितांत गरज असून येत्या १९ रोजी गोवा मुक्तिदिनानिमित्त कामगार संघटनेकडून काढण्यात येणाऱ्या महारॅलीत "राज्यातील कंत्राटी कामगारांना मुक्त करा' अशी घोषणा दिली जाणार आहे.
आज पणजी येथील "आयटक' कार्यालयात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे सचिव राजू मंगेशकर यांनी ही माहिती दिली. यावेळी या रॅलीचे सहआयोजक असलेल्या कामगार संघटनेच्या युवा शाखेचे अध्यक्ष ऍड. सुहास नाईक व सचिव जॉन क्लार्क उपस्थित होते. पणजी येथील कदंब बसस्थानकावरून ही रॅली सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे व तदनंतर आझाद मैदानावर त्याचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे. कामगारमंत्री ज्योकीम आलेमाव यांनी काही दिवसांपूर्वी रोजंदारी वेतनात रु. ११० वरून रु. १५० पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली होती व त्यासाठी गेल्या १२ डिसेंबर रोजी बैठकही बोलावली होती. काही उद्योजकांनी दबाव आणल्याने ही बैठक रद्द करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. गोव्यात कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांना केवळ कामानिमित्त वापरून वस्तू बाहेर फेकल्याप्रमाणे कामावरून कमी केले जाते, अशी टीकाही यावेळी श्री. मंगेशकर यांनी केली. खासगी पातळीवर अशा पद्धतीने कामगारांचे शोषण सुरू आहेच परंतु प्रशासकीय पातळीवर सरकारी खात्यात दहा ते पंधरा वर्षे नियमित कामासाठी कंत्राटी कामगार वापरून सरकारच त्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. कंत्राटी कामगारांनाही कायद्याप्रमाणे काही आर्थिक संरक्षण बहाल करण्यात आले आहे. त्याची विविध उद्योजकांकडून अंमलबजावणी होत नाही व कामगार खाते डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे, असा घणाघाती आरोपही यावेळी करण्यात आला. राज्यातील विविध औद्योगिक वसाहतीत ८० टक्के कामगार कंत्राटी पद्धतीवर काम करीत असून त्यांना कोणतेही संरक्षण नसल्याने रोजगाराच्या बाता मारणाऱ्या सरकारकडून त्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा आरोपही यावेळी श्री. मंगेशकर यांनी केला.
विविध कामगारांच्या समस्या, अडचणी व सत्य परिस्थितीचे दर्शन १९ रोजीच्या महारॅलीत प्रतिबिंबित होणार आहे. सध्या आर्थिक मंदीच्या निमित्ताने विविध आस्थापनांकडून व उद्योजकांकडून कामगारांना कमी करण्याचा सपाटा सुरू आहे. यावेळी अनेकजण कारण नसताना या परिस्थितीचा फायदा उठवून नियमित कामगारांना कमी करण्यात गुंतले असून सरकारने त्याची दखल घेण्याची गरज असल्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

युवा संघटनेतर्फे १९ रोजी जठा
अखिल भारतीय युवा फेडरेशनतर्फे जठा (वाहन यात्रा) आयोजित करण्यात आली असून त्याचा शुभारंभ १९ रोजी कदंब बसस्थानकावर होणार आहे. वाढती महागाई, अमेरिका अणुकरार, जातीयवाद, दहशतवाद व कंत्राटी कामगार पद्धत याविरोधात या यात्रेत जनजागृती करण्यात येईल. यानिमित्त कम्युनिस्ट पक्षाचे खासदार डी. राजा व पश्चिम बंगालच्या नागरी सुरक्षा खात्याचे राज्यमंत्री डॉ. श्रीकुमार मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. ही रॅली दक्षिणेतील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू व केरळ येथपर्यंत जाणार आहे.

पर्यटनावरील सावट दूर होण्याचे संकेत

नाताळ, नववर्षानिमित्त पर्यटकांचा ओघ सुरू
पणजी,दि.१७(प्रतिनिधी)ः नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील पर्यटकांची संख्या वाढत चालल्याने व पर्यटन उद्योगाला नव्याने उभारी मिळाल्याने गोवा ट्रॅव्हल अँड टूरीझम उद्योग समूहाने आनंद व्यक्त केला आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गोवा ट्रॅव्हल अँड टूरीझम प्राधिकरणाचे अध्यक्ष राल्फ डिसोझा, पर्यटन खात्याचे संचालक एल्वीस गोम्स व चार्ल्स बोनाफिसायो आदी पदाधिकारी हजर होते. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला व जागतिक मंदीचा फटका गोव्याच्या पर्यटन मोसमावर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मुंबई हल्ल्यामुळे तर अनेक बुकिंगही रद्द झाल्याने यंदा पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, सुदैवाने परिस्थिती सुधारत असून पुन्हा एकदा पर्यटकांचा ओघ सुरू होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दहशतवादी हल्ल्यापेक्षा आर्थिक मंदीमुळे विदेशी पर्यटकांची संख्या रोडावल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोवा सरकारने सुरक्षेच्याबाबतीत कडक उपाययोजना आखल्या आहेत तर विविध हॉटेलांनीही आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेखातर आवश्यक उपाययोजना आखल्याने गोवा हे सुरक्षित पर्यटनस्थळ असल्याचा संदेश पसरण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नाताळ व नववर्षानिमित्ताने आयोजित नृत्य रजनी व संगीताचे कार्यक्रम यंदाही त्याच जोशात होणार आहेत. या काळात किनारी भागातील हॉटेल्स बंद असतील अशी अफवा पसरली असून त्यात तथ्य नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यंदा हॉटेलच्या दरातही किंचित बदल झाला असून काही प्रमाणात दर कमी झाल्याचेही सांगण्यात आले. पर्यटकांसाठी विविध पॅकेज तयार करण्यात आल्याने हेच पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे. अलीकडेच ब्रिटनच्या महाराणी येथे फिरण्यासाठी आल्या होत्या व त्यांनी गोव्याच्या सुरक्षित पर्यटनाचे कौतुक केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी सिदाद दी गोवाच्या निता सेन यांनी सांगितले की यंदा चार्टर विमान रद्द झाल्याची एकही घटना घडली नाही. सध्याच्या परिस्थितीत ८० टक्के बुकिंग सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. देशी पर्यटकांच्या संख्येत काही प्रमाणात घट झाल्याचे विनय आल्बूकर्क म्हणाले तर इतरांनी पर्यटन मोसम पुन्हा सक्रिय होत असल्याचे समाधान व्यक्त केले.सतीश प्रभू यांनी दहशतवादापेक्षा जागतिक मंदीचा फटका जास्त बसल्याचे सांगितले.

दहशतवादविरोधी कायदा अधिक कडक करणार

लोकसभेत दोन विधेयके सादर
संशयिताचा रिमांड अवधी १८० दिवस
राष्ट्रीय चौकशी संस्था स्थापणार
भाजपचे समर्थन, डावे विरोधात

दिल्ली, दि. १६ : दहशतवादाचा अत्यंत कठोर व परिणामकारकपणे सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी राष्ट्रीय चौकशी संस्थेची(नॅशनल प्रोब एजन्सी) स्थापना व दहशतवाद विरोधी कायद्याला सशक्त बनविण्यासंदर्भातील दोन विधेयके लोकसभेत सादर केली. नव्या कायद्यांतर्गत आतंकवादाच्या परिभाषेतही बदल केला जाणार असून राष्ट्रीय सुरक्षा कायद्यात दुरुस्ती करून गुन्हेगारांचा रिमांड अवधी वाढवून १८० दिवस केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा व बेकायदेशीर कारवाया निरोधक कायदा (१९६७) विधेयक दुरुस्तीसाठी सभागृहापुढे मांडण्यात आले असून आतंकवादाशी निगडित प्रकरणांची जलदगतीने चौकशी व सुनावणी करणे हाच यामागील उद्देश आहे. या माध्यमातून कायद्याच्या संभाव्य दुरुपयोगाला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्य विरोधी पक्ष भाजप सरकारच्या प्रस्तावाचे समर्थन करीत आहे हीच केंद्र सरकारसाठी समाधानाची बाब म्हणता येईल. कारण डाव्यांसह काही प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय चौकशी एजन्सी (एनआयए) स्थापन करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत आहेत.
सरकारद्वारे सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय चौकशी संस्थेच्या स्थापनेसंदर्भातील विधेयकाच्या आधारे केंद्रीय स्तरावर (फेडरल) एका चौकशी संस्थेची स्थापना केली जाणार आहे. संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या किंवा देशाच्या सुरक्षेला प्रभावित करणाऱ्या आतंकवाद आणि अन्य गुन्हेगारी प्रकरणांची कोणत्याही अडथळ्याशिवाय चौकशी करण्याचा अधिकार या संस्थेला राहील.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करणारी आतंकवाद विरोधी संस्था असावी असा विचार पुढे आला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे ठेवला होता. संमती मिळाल्यानंतर मंगळवारी ही दोन्ही विधेयके केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी लोकसभेच्या पटलावर ठेवली.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातील दुरुस्तीअंतर्गत पोलिसांपुढे दिलेले बयाण न्यायालयाला मान्य राहील. सरकार चौकशी एजन्सीसोबतच एक उच्चाधिकार प्राप्त समिती स्थापन करणार आहे. कोणत्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय चौकशी एजन्सीमार्फत करायची हे ठरविण्याचे काम ही समिती करेल. मुंबईवरील हल्ल्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेडरल चौकशी एजन्सीची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली होती.
कायदा व सुव्यवस्था ही राज्यांच्या अखत्यारीतील बाब असल्यामुळे राज्यांकडून होत असलेला विरोध बघता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यांचे मत जाणून घेतले होते.

पणजीत १० जानेवारीला मंदिर रक्षण महासंमेलन

विविध पीठाधीशांची उपस्थिती, दीड लाख लोक उपस्थित राहणार
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) : अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीने आता आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील विविध हिंदू देवतांची मंदिरे ही समाजातील ज्ञान व शक्तिपीठे बनावीत यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली असून त्याअनुषंगाने या अभिनव योजनेची घोषणा करण्यासाठी येत्या १० जानेवारी रोजी पणजीत भव्य मंदिर संरक्षण महासंमेलन भरवण्यात येणार असल्याची घोषणा आज करण्यात आली.
आज पणजी येथे पत्रपरिषदेत अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीचे राज्य समन्वयक राजेंद्र वेलिंगकर यांनी ही घोषणा केली. यावेळी सुदेश नाईक, जयेश थळी, विनायक च्यारी, प्रा.सुभाष वेलिंगकर, रामदास सराफ, ऍड. महेश बांदेकर आदी पदाधिकारी व मार्गदर्शक उपस्थित होते. पणजी कांपाल येथे खुल्या मैदानावर संध्याकाळी ३.३० वाजता होणाऱ्या या महासंमेलनासाठी विविध हिंदू पीठाधीश उपस्थित राहणार असून सुमारे दीड लाख हिंदू लोक या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचा विश्वासही यावेळी श्री.वेलिंगकर यांनी व्यक्त केला. यानिमित्त उपस्थित राहणार असलेल्यांत श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती स्वामी(करवीर पीठाधीश),श्री आचार्य धर्मेंद्रजी स्वामी महाराज(पंचपीठाधिश,राजस्थान),श्री विश्वेशतीर्थ स्वामी(पेजावर पीठाधीश,उडपी),श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी(श्री क्षेत्र तपोभूमी कुंडई),श्री. खेमचंद्रजी शर्मा (अखिल भारतीय मठ मंदिर संपर्क प्रमुख,दिल्ली) व श्री.शरदराव ढोले (क्षेत्रीय धर्मजागरण प्रमुख) आदींची उपस्थिती लाभणार आहे.
गोव्यातील हिंदू देवतांच्या मंदिरांची समाजातील भूमिका अधिक विकसित करण्याच्या दृष्टीने काय करता येईल,याबाबत आत्तापर्यंत विविध बैठक व विचारमंथन करण्यात आले. यावेळी ही मंदिरे समाजातील मुख्य शक्तीस्थळे व ज्ञानपीठे बनण्यासाठी पाच सूत्रीय नियोजनाची आखणी करण्यात आली आहे. त्यात सुरक्षा,सेवा,संस्कार,संस्कृत व योग यांचा समावेश आहे. गोव्यात गेल्या ५ वर्षांत हिंदू देवतांच्या मंदिरांची तोडफोड व मूर्तिभंजनाची एकूण २३ घटना घडल्या आहेत. राज्यातील हिंदू लोकांनी दाखवलेला संयम व प्रशासनावरील विश्वासाला तडा जाण्या इतपत परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना जागे करण्यासाठी गेल्या २३ ऑक्टोबर रोजी अत्यंत शांत व लोकशाही मार्गाने गोवा बंद यशस्वी करण्यात आला. राज्यातील हिंदू लोकांच्या भावना भडकावण्यासाठी व त्यांच्या धर्मनिष्ठेला आव्हान देण्यासाठी सुरू असलेल्या या प्रकरणांचा तपास लावण्यात स्थानिक सरकार व पोलिस यंत्रणाही निष्काम ठरली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून अजूनही सरकार याबाबत निःपक्षपाती चौकशी करून गुन्हेगारांना ताब्यात घेईल,असाही विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नियोजित महासंमेलनाच्या आयोजनाची तयारी करण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी येत्या १९ डिसेंबरपासून तालुका स्तरावर कार्यकर्ता सभा,बैठकांचे आयोजन केले आहे. त्यात १९ रोजी मुरगाव तालुक्यात संध्या. ५ वाजता (विठ्ठल रखूमाई मंदिर,ब्रह्मस्थळ), २१ रोजी फोंडा तालुका संध्या. ३ वाजता (विश्व हिंदू परिषद सभागृह,खडपाबांध),२१ रोजी काणकोण तालुका सकाळी १० वाजता(श्री दत्त मंदिर,नगरसे),२४ रोजी पणजी शहर संध्या.५ वाजता(डॉ.हेडगेवार प्रा.विद्यालय,पणजी),२५ रोजी तिसवाडी तालुका सकाळी ९.३० वाजता (वनदेवी,खोर्ली),२५ रोजी केपे तालुका सकाळी ९.३० वाजता(चंद्रेश्वर देवस्थान,कट्टा,अमोणा),२१ रोजी पेडणे तालुका संध्या.५ वाजता (रवळनाथ मंदिर,हरमल),२३ रोजी संध्या.५ वाजता वंसेश्वर मंदिर,नागझर,२५ रोजी डिचोली तालुका संध्या.५ वाजता(दिनदयाळ सभागृह, डिचोली),२५ रोजी सत्तरी तालुका दुपारी ३.३० वाजता(रवळनाथ मंदिर,वेळूस) आदी ठिकाणी बैठका होणार आहेत.

वास्कोत मदरशावर छापा, ८८ विद्यार्थिनींना ताब्यात घेतल्यावर पुन्हा मदरशात रवानगी, मदरसा प्रमुखांकडून पोलिसांच्या कारवाईचा निषेध

वास्को, दि. १६ (प्रतिनिधी) : दहशतवादापासून सतर्क राहण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेंतर्गत वास्को पोलिसांनी येथील एका मदरशावर छापा घालून आज ८८ विद्यार्थिनींना ओळख तपासणीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे मुस्लिम नेत्यांनी पोलिसांच्या या कारवाईचा निषेध केला. नंतर पोलिसांना संबंधित मदरशाच्या चालकांकडून आवश्यक सहकार्य देण्यात आल्यामुळे पोलिसांनी या विद्यार्थ्यांच्या अटकेची कारवाई टाळली.
या ८८ विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेले पडताळणी अर्ज आठवड्यापूर्वी सूचना देऊनही न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. मात्र विद्यार्थ्यांना पोलिस स्थानकावर आणल्यावर वास्को पोलिसांनी त्यांना जेथून आणले तेथेच पुन्हा नेले.पोलिस स्थानकावर केली जाणारी त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया मदरशात पार पाडण्यात आल्यामुळे लोकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज सकाळी ११.३०च्या सुमारास वास्कोच्या प्रवासी इमारतीत असलेल्या "जामीया अहल्ले सुन्नीत आशरालिया ऍन्ड अश्रफूल बन्नत' या मदरशात पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिसांनी छापा मारून ८८ विद्यार्थिनी (९ ते २० वयोगटातील) व ६ शिक्षिकांना ताब्यात घेतले. नंतर त्यांना वास्को पोलिस स्थानकावर आणण्यात आले. सुमारे १० दिवसांपूर्वी पोलिसांनी या मदरशात असलेल्यांचे पडताळणी अर्ज भरण्याची सूचना केली होती. त्याची कार्यवाही न झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मदरशातून एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याने संतप्त झालेले मदरशाचे अध्यक्ष ताहीर दाऊद तसेच प्रमुख शेख अब्दुल मुनाफ यांनी या कारवाईचा पोलिस स्थानकात येऊन निषेध केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून दरमहा आम्ही पोलिस स्थानकात या मदरशाबाबत पूर्ण माहिती देतो. तरीही आज पोलिसांनी अचानक कारवाई करून विद्यार्थ्यांची सतावणूक केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
४ डिसेंबरला पोलिसांनी येथील विद्यार्थ्यांचे व इतरांचे पडताळणी अर्ज उपलब्ध करून देण्यास सांगितले होते हे त्यांनी यावेळी मान्य केले. मात्र ईदच्या सुट्टीमुळे काही विद्यार्थी गोव्यात नव्हते. त्यामुळे सर्व अर्ज एकत्र द्यायचे, असा आमचा विचार होता. त्यादरम्यानच ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांनी छापा घातला तेव्हा त्यांची सतावणूक केल्याचे मुनाफ व ताहीर दाऊद यांनी सांगून ८८ विद्यार्थिनी व ६ महिला शिक्षिकांना नेण्याकरिता केवळ दोनच महिला पोलिस व इतर पुरुष आले होते असे ते म्हणाले.दरम्यान ताब्यात घेतलेल्या सर्व जणांचे पडताळणी अर्ज भरण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
यासंबंधी वास्कोचे पोलिस निरीक्षक हरीष मडकईकर यांच्याशी संपर्क साधला असता, ४ डिसेंबर रोजी त्यांचे पडताळणी अर्ज भरण्यासंबंधी सूचना देऊन नंतर दोन तीन वेळा त्यांना आठवणही करून दिल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. पोलिसांनी त्यांची सतावणूक केली नसून उलट आमचे कर्तव्य आम्ही पार पाडले, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या विद्यार्थिनी व शिक्षिकांना परत मदरशात नेऊन त्यांचे पडताळणी अर्ज भरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला हे खरे आहे काय, या प्रश्नाला निरीक्षक मडकईकर यांनी बगल दिली.
मदरशातून विद्यार्थी आणि शिक्षिका यांना ताब्यात घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने त्यांना नंतर मदरशात नेऊन त्यांचे अर्ज भरण्याची केलेली कारवाई पोलिसांनी आधीच केली असती तर काय बिघडले असते, असा सवाल आपण पोलिसांना केल्याचे मदरसा प्रमुख शेख अब्दुल मुनाफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुनाफ यांनी "गोवादूत'ला सांगितले की, वास्को पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर आमच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वास्को पोलिस स्थानकाच्या वरिष्ठांना अशी सूचना केली की, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थिनी व शिक्षिका यांची मदरशात परतपाठवणी करावी. त्यानंतर पोलिसांनी काहीशी नरमाईची भूमिका स्वीकारली, असे शेख यांनी स्पष्ट केले.
--------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांचा पोलिसांशी संपर्क
यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर यांच्याशी संपर्क साधला असता, मुख्यमंत्र्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र कारवाईचा तपशील जाणून घेण्यासाठी हा संपर्क साधण्यात आल्याची पुस्ती त्यांनी जोडली. या मदरशात एक काश्मिरी असल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.संध्याकाळी उशिरा भरण्यात आलेल्या पडताळणी अर्जांपैकी एक दोन वगळता इतर सर्व अर्ज बिगरगोमंतकीयांचे असल्याचे त्यांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्यांना आम्ही अटक करणार होतो; तथापि, त्यांनी आवश्यक सहकार्य दिल्याने ते पाऊल उचलण्यात आले नाही, असे बाणावलीकर यांनी स्पष्ट केले.

दहशतवादविरोधी कायदा अधिक कडक करणार

लोकसभेत दोन विधेयके सादर
संशयिताचा रिमांड अवधी १८० दिवस
राष्ट्रीय चौकशी संस्था स्थापणार
भाजपचे समर्थन, डावे विरोधात

दिल्ली, दि. १६ : दहशतवादाचा अत्यंत कठोर व परिणामकारकपणे सामना करण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी राष्ट्रीय चौकशी संस्थेची(नॅशनल प्रोब एजन्सी) स्थापना व दहशतवाद विरोधी कायद्याला सशक्त बनविण्यासंदर्भातील दोन विधेयके लोकसभेत सादर केली. नव्या कायद्यांतर्गत आतंकवादाच्या परिभाषेतही बदल केला जाणार असून राष्ट्रीय सुरक्षा कायद्यात दुरुस्ती करून गुन्हेगारांचा रिमांड अवधी वाढवून १८० दिवस केला जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा व बेकायदेशीर कारवाया निरोधक कायदा (१९६७) विधेयक दुरुस्तीसाठी सभागृहापुढे मांडण्यात आले असून आतंकवादाशी निगडित प्रकरणांची जलदगतीने चौकशी व सुनावणी करणे हाच यामागील उद्देश आहे. या माध्यमातून कायद्याच्या संभाव्य दुरुपयोगाला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुख्य विरोधी पक्ष भाजप सरकारच्या प्रस्तावाचे समर्थन करीत आहे हीच केंद्र सरकारसाठी समाधानाची बाब म्हणता येईल. कारण डाव्यांसह काही प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय चौकशी एजन्सी (एनआयए) स्थापन करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत आहेत.
सरकारद्वारे सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय चौकशी संस्थेच्या स्थापनेसंदर्भातील विधेयकाच्या आधारे केंद्रीय स्तरावर (फेडरल) एका चौकशी संस्थेची स्थापना केली जाणार आहे. संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या किंवा देशाच्या सुरक्षेला प्रभावित करणाऱ्या आतंकवाद आणि अन्य गुन्हेगारी प्रकरणांची कोणत्याही अडथळ्याशिवाय चौकशी करण्याचा अधिकार या संस्थेला राहील.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करणारी आतंकवाद विरोधी संस्था असावी असा विचार पुढे आला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रिमंडळापुढे ठेवला होता. संमती मिळाल्यानंतर मंगळवारी ही दोन्ही विधेयके केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी लोकसभेच्या पटलावर ठेवली.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्यातील दुरुस्तीअंतर्गत पोलिसांपुढे दिलेले बयाण न्यायालयाला मान्य राहील. सरकार चौकशी एजन्सीसोबतच एक उच्चाधिकार प्राप्त समिती स्थापन करणार आहे. कोणत्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय चौकशी एजन्सीमार्फत करायची हे ठरविण्याचे काम ही समिती करेल. मुंबईवरील हल्ल्यानंतर राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फेडरल चौकशी एजन्सीची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली होती.
कायदा व सुव्यवस्था ही राज्यांच्या अखत्यारीतील बाब असल्यामुळे राज्यांकडून होत असलेला विरोध बघता सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून त्यांचे मत जाणून घेतले होते.

रूपा भक्ता म्हापशाच्या नगराध्यक्ष


म्हापसा दि. १६, (प्रतिनिधी): म्हापसा नगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सौ. रूपा (रेणूका) गुरुदत्त भक्ता यांनी चित्रा मणेरीकर याचा ८ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. नगराध्यक्ष स्नेहा भोबे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
माजी नगराध्यक्ष स्नेहा भोबे यांच्या विरुद्ध त्यांनी अविश्वासाचा ठराव आणला असता तेव्हा आजारी असल्याचे सांगून त्या गैरहजर राहिल्याने अविश्वासाचा ठराव बारगळला होता. तसेच दुसऱ्यांदा त्यांनी उपस्थित राहूनही मतदान न केल्याने स्नेहा भोबे यांच्या विरोधातील अविश्वासाचा ठराव बारगळला होता.
रूपा भक्ता यांनी उमेदवारी अर्ज भरला होता व तीन नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारी अर्जाला सूचक म्हणून मान्यता दिली होती यात स्नेहा भोबे, वैशाली फळारी व उपनगराध्यक्ष ऑस्कर डिसोझा यांनी सूचक म्हणून सह्या केल्या होत्या. रूपा भक्ता यांच्या गटातील नगरसेवक मिलिंद अणवेकर, रोहन कवळेकर, वैशाली फळारी, ऑस्कर डिसोझा, उज्वला कांदोळकर, रायन ब्रागांझा व स्नेहा भोबे यांनी उपस्थित राहून मतदान केले. तर चित्रा मणेरीकर यांचा गटातील ऍड. सुभाष नार्वेकर, सुभाष कळंगुटकर, विनोद (बाळू) फडके, आनंद माईणकर, कॅरोल कारास्को व आशिष शिरोडकर यांनी मतदान केले. निर्वाचन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी महेश खोर्जुवेकर यांनी काम पाहिले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना रूपा भक्ता यांनी सांगितले की, आपण सरकारच्या साहाय्याने विकासकामांना प्राधान्य देणार आहे. शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम आपण हाती घेणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. रूपा भक्ता या म्हापसा सहकारी संस्थेच्या संचालकपदी निवडून आल्या आहेत.

अनुसूचित जमातीतर्फे आजपासून सह्यांची मोहीम

राष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांना निवेदन सादर करणार आंदोलनाचा दुसरा टप्पा
मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी): अनुसूचित जमातीचा दर्जा मिळून ५ वर्षे उलटली तरी सर्व घटनात्मक मागण्यांची पूर्तता करण्यास गोवा सरकारने स्वीकारलेल्या वेळकाढू धोरणाच्या निषेधार्थ आपल्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात उद्यापासून महिनाभर सह्यांची मोहीम राबविण्याची घोषणा संयुक्त अनुसूचित जमाती संघटनांच्या आघाडीने आज येथे केली. या महिनाभराच्या कालावधीत दीड लाखांवर सह्या गोळा करून त्या राष्ट्रपती व प्रधानमंत्र्यांना सादर केल्या जातील. गोवा सरकारद्वारे या जमातीला न्याय्य व सनदशीर मागण्यांपासून वंचित ठेवण्यात आल्याचे याद्वारे पटवून दिले जाईल, असे या आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप व जनजागृती यात्रेचे निमंत्रक आमदार रमेश तवडकर यांनी आज येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत सांगितले.
आंदोलन शांततापूर्ण व सनदशीर मार्गाने चालणार याची ग्वाही देताना तवडकर यांनी संपूर्ण गोव्यात मिळून नऊ दिवस चाललेल्या जागृती यात्रेचे उदाहरण दिले. हजारोंच्या संख्येने जमाव होऊनही कुठेच अनुचित प्रकार झालेला नाही वा कुठेच पोलिस संरक्षणाची गरज भासली नाही. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यांत गोव्यातील तीन खासदार व ४० आमदारांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती पटवून दिली जाणार आहे.
यावेळी बोलताना वेळीप यांनी सांगितले की, गावडा कुणबी व वेळीप यांना २००३ साली अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालेला असला तरी अजूनही ही जमात घटनादत्त अधिकारांपासून वंचित आहे. गेल्या ७ वर्षांत राज्यात सत्तेवर आलेल्या एकाही सरकारला हा विषय गांभीर्याने हाताळला नाही. यासाठी बिगर राजकीय संघटनेच्या झेंड्याखाली ही जमात एकत्रित झाली आहे. जानेवारी २००७ मध्ये जमातीचा एक प्रचंड मेळावा पणजीत आयोजित केला गेला, मात्र सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. त्यापुढच्या टप्प्यात राज्यात जमातीची लोकसंख्या असलेल्या गावात जनजागृती यात्रा काढली गेली व तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातून आत्मविश्र्वास मिळूनच आता आंदोलनाचा पुढील पवित्रा स्वीकारला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
तवडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सरकारी पातळीवर सर्व प्रकारचे प्रयत्न झाले. पण सरकारकडे इच्छाच नसावी असे दिसून येत आहे. अन्यथा सरकारने या जमातीसाठीचे आर्थिक विकास महा मंडळ मृतावस्थेत टाकले नसते. या महामंडळाकडे आत्तापर्यंत १५ कोटींच्या मागणीचे अर्ज पडून आहेत, सरकारी खात्यांतील १६६२ राखीव जागा न भरता पडून आहेत तर बढतीच्या ५०० वर जागा तशाच पडून आहेत.
गोव्यात या जमातीचे वास्तव्य असलेले २०० वर वाडे आहेत पण सरकार ते अधिसूचित करीत नसल्याने त्या भागांचा विकास खोळंबून आहे, अशी माहिती तवडकर यांनी दिली. अनुसूचित जमातीची जमीन बिगर अनुसूचित जमातीला विकण्यास बंदी घालणे, जमातीचा दाखला मिळण्याचे सोपस्कार सुटसुटीत करणे, विकास प्राधिकरणे स्थापणे, जमात आयोग स्थापन करणे आदी मिळून १२ प्रमुख मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले. १२ टक्के राखीव निधी या जमातीच्या विकासासाठी खर्च केला तर त्याने सुद्धा बरेच काही साध्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या जमातीच्या विकासासाठी असलेल्या केंद्रीय योजनाही सरकारने लागू केलेल्या नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला. या योजना काटेकोरपणे राबविल्या तर वास्तविक अन्य खास योजनांची देखील गरज पडणार नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
वेळीप यांनी धनगर समाजाचाही या जमातींत अंतर्भाव केल्यास त्याचे स्वागतच होईल, असे सांगितले. जमातीमध्ये कोणतीच फूट नाही तर संपूर्णतः एकजूट आहे असे सांगताना आंतोन गावकर यांचे सहकार्य असल्याचे त्यांनी नमूद केले. आपली चळवळ ही बिगर राजकीय असून यात सर्व पक्षांचे लोक असल्याचे स्पष्ट केले. प्रमाण तारखेपेक्षा मागण्यांवर जास्त भर देण्यात आला आहे पण ही तारीख १९६८ धरली गेली तर ते उत्तमच होईल. जमातीचे नव्याने सर्वेक्षण सुरू झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गोविंद गावडे व विश्र्वास गावडे यावेळी उपस्थित होते.

शिक्षकांचे निवृत्तीवय ५८ करण्याचा प्रस्ताव नाही

पणजी,दि.१६ : शिक्षकांचे निवृत्तीवय सध्याच्या ६० वरून पुन्हा ५८ वर आणण्याचा सध्या तरी कोणताही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नसल्याचा खुलासा सरकारने केला आहे.
एकूण ३३ वर्षांचा सेवाकाळ पूर्ण होताच शिक्षकांना निवृत्त करण्याचा कोणताही विचार नसल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.गेले कित्येक दिवस यासंबंधात उलटसुलट बातम्या व पत्रे वृत्तपत्रात प्रसिद्ध होत होती.त्या संबंधात हे स्पष्टीकरण करण्यात आले असून शिक्षकांनी विचलित न होता अध्यापनकार्य चालू ठेवावे असा दिलासा दिला आहे.

अजयकुमार पाटील यांची आत्महत्या


वाळपई, दि. १६ : नाणूस वाळपई येथील पाटील फार्ममधील आपल्या राहत्या घरात अजयकुमार शंकरराव पाटील (वय ४०) यांनी स्वतःवर बंदुकीची गोळी झाडून आत्महत्या केली. ते सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते विजयकुमार पाटील यांचे बंधू होते.
अजयकुमार पाटील यांना पाच वर्षांपूर्वी कार अपघात झाल्याने ते आजारी होते. आयुष्याला कंटाळून आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी रायफल बंदुकीची गोळी स्वतःच्या डोक्यात घालून घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वाळपई पोलिस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी पोलिस फाट्यासह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथे पाठवण्यात आला असून अजयकुमार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता अंतिम संस्कार करण्यात येईल.

पेडणे किनारी भागात रेव्ह पार्ट्या, ध्वनी प्रदूषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष


किनारी भागात आयोजित करण्यात येणाऱ्या पार्ट्यांचे संग्रहित छायाचित्र.(छाया: निवृत्ती शिरोडकर)

मोरजी, दि. १८ (वार्ताहर): पेडणे तालुक्यातील हरमल, आश्वे - मांद्रे व मोरजी या किनारी भागात बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवसांत रेव्ह पार्ट्यांचे छुप्या मार्गाने आयोजन केले जात आहे. कर्णकर्कश संगीत लावून या पार्ट्यांचे आयोजन होत असताना पोलिस तसेच पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या भागातील शॅक्स, रेस्टॉरंट व्यावसायिकांनी पेडणे जिल्हाधिकाऱ्यांकडून संगीत वाजण्याचे परवाने घेतले आहेत. याद्वारे विदेशी पर्यटकांचे वाढदिवस तसेच इतर समारंभांचे निमित्त करून किनारी भागात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. यामुळे स्थानिकांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. पार्टी आयोजकाकडे तक्रारदाराचे नाव उघड होण्याच्या भीतीने स्थानिक पोलिसांकडे तक्रार करणे टाळत आहेत.
किनारी भागातील ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली ध्वनी प्रदूषण देखरेख समिती निवडण्यात आली आहे. पेडणे तालुक्यासाठी निवृत्ती शिरोडकर व ऍड. प्रसाद शहापूरकर या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून तालुक्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्यरत आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यानंतर कोणत्याच प्रकारच्या ध्वनी प्रक्षेपणास कायद्याने बंदी असली तरी किनारी भागात याचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. संगीत वाजण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत मर्यादा असून परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मर्यादेचे पालन होते की नाही याची पडताळणी करण्यासाठी कोणतीच कृती होत नाही. विदेशी नागरिकाचे वैयक्तिक समारंभ हे पार्ट्यांचे कारण कसे होऊ शकते, असा सवाल उपस्थित होत आहे. परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी येथून होत आहे. तसेच परवाना देताना भेदाभेद होत असल्याचा आरोप एका शॅक व्यावसायिकाने केला आहे. ध्वनी प्रक्षेपण करण्यासाठी तीन वेळा अर्ज करूनही अद्याप परवानगी मिळालेली नसल्याचे या व्यावसायिकाचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी ध्वनी प्रदूषणाच्या चार तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. परंतु,यंदा कायद्याचे उल्लंघन होत असूनही एकही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही. हरमल, मोरजी, आश्वे - मांद्रे येथे सर्रासपणे सुरू असलेल्या पार्ट्यांवर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही.
गृह मंत्रालयाने या प्रकाराची त्वरित दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी येथून होत आहे.

पेट्रोल, डिझेल आणखी स्वस्त होणार

नवी दिल्ली, दि. १६ : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण सुरूच असल्याने आगामी काही दिवसात देशात पेट्रोल, डिझेलचे दर आणखी कमी होण्याचे संकेत आज केंद्र सरकारने दिले.
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. चिदम्बरम हे सध्या पंतप्रधानांना अर्थमंत्रालय सांभाळण्यातही मदत करीत आहेत. ते म्हणाले की, इंधनाच्या किंमती कमी करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. समाजातील सर्व स्तरातून ही मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वीच सरकारने पेट्रोल ५, तर डिझेल २ रुपयांनी स्वस्त केले. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने सरकारला हा निर्णय घेणे सोपे झाले. अजूनही जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच आहे.
काही दिवसांपूर्वी देशातील तेल कंपन्यांना एक लिटर पेट्रोलमागे केवळ ९.९८ रुपये इतका तर एक लिटर डिझेलमागे १.३ रुपये इतका फायदा होत होता. आता कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने त्यांचा नफा प्रत्येकी ११.४८ रुपये पेट्रोलमागे तर २.९२ रुपये एक लिटर डिझेलमागे इतका झाला आहे. त्यांना केरोसीन आणि घरगुती सिलेंडरमागे प्रत्येकी १७.२६ रुपये आणि १४८.३८ रुपये इतके नुकसान सहन करावे लागत आहे. या सर्व घडामोडींकडे सरकारचे सतत लक्ष आहे. कच्च्या तेलाच्या किंमती आणखी कमी झाल्या तर देशांतर्गत पेट्रोल, डिझेल आणि अन्य इंधनांचे भाव कमी करण्याचाही सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे चिदम्बरम म्हणाले.

Tuesday, 16 December, 2008

भारत 'जिंकला'

चेन्नई , दि. १५ : 'असाध्य ते साध्य, करिता सायास' ही उक्ती "टीम इंडिया'ने आज चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सार्थ ठरवली . वीरेंद्र सेहवाग - गौतम गंभीर या सलामीवीरांनी रचलेल्या पायावर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांनी कळस चढवला. इंग्लंडचे ३८७ धावांचेआव्हान अशक्य नसले, तरी कठीण नक्कीच होते. पण भारताच्या रथी - महारथींनी ते पार करून दाखवले. ग्रॅमी स्वॅनच्या चेंडूवर पॅडल स्वीप करत सचिन तेंडुलकरने भारताचा विजय साकारला आणि कसोटी क्रिकेटमधले स्वतःचे ४१ वे शतकही साजरे केले . हे सारे पाहून, क्या से क्या हो गया असे गुणगुणत पीटरसन अँड कंपनीने कपाळावर हात मारून घेतला. भारताचा हा विजय म्हणजे टीम वर्क असले, तरी वीरेंद्र सेहवागने केलेल्या तडाखेबंद खेळीमुळेच, जिंकण्यासाठी खेळण्याची प्रेरणा टीम इंडियाला मिळाली होती . त्यामुळेच ६८ चेंडूत ८३ धावांची झंझावाती खेळी करणाऱ्या 'वीरू'ला मॅन ऑफ द मॅच किताबाने गौरविण्यात आले. अँड्र्यु स्ट्रॉसची दोन्ही डावातील शतकी खेळी व्यर्थच ठरली. खेळपट्टीची साथ नसतानाही, सचिन तेंडुलकर आणि युवराज सिंग यांनी १६३ धावांची भागीदारी रचून इंग्लंडचे सगळे मनसुबे उधळून लावले . इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यामुळे कसोटी मालिकेतही भारताचे पारडे जड होते. पण चेन्नई कसोटीचे पहिले साडेतीन दिवस सगळे उलटच घडत होते. अँड्र्यु स्ट्रॉसच्या शतकाच्या जोरावर पाहुण्याची ३१६ धावांपर्यंत मजल मारली होती. टीम इंडियाचा फॉर्म पाहता , ३१६ धावा म्हणजे अगदीच सोप्या होत्या. पण , महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंगचा अपवाद वगळता , धोनीचे सारे धुरंधर पहिल्या डावात अपयशी ठरले. २४१ धावांतच भारताचा डाव आटोपला आणि सगळे चित्रच पालटून गेले .

गृहकर्जावरील व्याजदरात कपात, ५ लाखांपर्यंत ८.५ टक्के व्याज

मुंबई, दि. १५ : इंडियन बॅंक असोसिएशनने आज २० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाच्या व्याजदरात कपात जाहीर केली आहे.
याविषयीची माहिती भारतीय स्टेट बॅंकेचे अध्यक्ष ओ.पी. भट्ट यांनी दिली. या नव्या निर्णयानुसार पाच लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजाचे दर ८.५० टक्के तर पाच लाख ते वीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदर ९.२५ टक्के राहतील. त्याबरोबरच कर्जमंजुरीसाठी कोणतेही प्रक्रियाशुल्क आकारले जाणार नसून वीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जांना मोफत विमा संरक्षण देण्यात येणार आहे.
व्याजदर कपातीचा निर्णय फक्त राष्ट्रीयकृत बॅंकांपुरताच मर्यादित असला तरी स्पर्धेमुळे खाजगी बॅंकांनाही व्याजदर कमी करावेच लागतील, असा अर्थमंत्रालयाचा अंदाज आहे. ही योजना ३० जून २००९ पर्यंतच्या कर्जांसाठी लागू राहणार आहे.
व्याजदर कमी करण्याच्या मोबदल्यात जोखीम दर आणि निव्वळ व्याजाचा फरक (नेट इंटरेस्ट मार्जिन) पाच लाखांपर्यंतच्या कर्जांवर १० टक्के आणि त्यापुढील २० लाखांपर्यंतच्या कर्जावर १५ टक्के इतके कमी करण्यात आले आहेत. वीस लाखांपर्यंतच्या गृहकर्जांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा, राष्ट्रीय गृहनिर्माण बॅंकेस (एनएचबी) चार हजार कोटी रुपयांचा पुनर्वित्तपुरवठा असे निर्णय सरकारने यापूर्वीच घेतले आहेत.
जागतिक स्तरावरील आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी केंद्राने एकापाठोपाठ अनेक पॅकेजच्या घोषणा केल्या आहेत. रोजगारनिर्मितीची सर्वाधिक क्षमता असलेल्या गृहबांधणी उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलले आहे.

नराधम बापाला सक्तमजुरीची शिक्षा

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बाल न्यायालयाने आरोपी बापाला आज २ वर्षांची सक्त मजुरी व १ लाख रुपये दंडाची शिक्षा फर्मावली. दंड न भरल्यास आणखी सहा महिने सक्तमजुरी वाढवण्याचे आदेशही देण्यात आले.
गेल्या १२ रोजी यासंबंधी बाल न्यायालयात सुनावणीवेळी त्याला दोषी धरण्यात आल्याने "मी दोषी नाही, मी आत्महत्या करेन. मुलीने आणि पत्नीने मला फसवले आहे,' असे म्हणत सदर आरोपी बापाने न्यायालयाच्या आवारातच धारदार ब्लेडने आपल्या गळ्यावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
१४ जुलै ०८ रोजी संशयिताला वास्को पोलिसांनी आपल्याच अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता ही घटना संशयिताच्या राहत्याच घरात घडल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्याची १५ वर्षाची मुलगी खोलीत झोपली असताना तसेच आई काही कामाच्या निमित्ताने घराच्या बाहेर असताना आरोपीने दारूच्या नशेत खोलीत झोपलेल्या आपल्या मुलीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले होते. सदर मुलीने आरडाओरडा करताच बाहेर असलेली तिची आई धावत घरात आली व तिने घडलेला प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचेही जबानीत सांगितले होते. वैद्यकीय चाचणीत त्या मुलीवर अतिप्रसंग झाल्याचे व मुलीच्या अल्पवयीन वयाबाबतही पुरावे सिद्ध झाले होते. यावेळी आरोप आपल्या बचावादाखल कोणतेही पुरावे सादर करून न शकल्याने बाल न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सदर आरोपीची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असून महाराष्ट्रातही त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

बनावट दागिने विकणारे त्रिकुट पोलिसांच्या ताब्यात, दोघे गुजरातचे, तर महिला पुण्याची

पणजी, दि.१५ (प्रतिनिधी) : खोदाई करताना सोने सापडल्याचे सांगून आर्थिक गरजेमुळे ते कमी किमतीत विकण्याच्या निमित्ताने बनावट दागिन्यांच्या विक्रीद्वारे सुमारे एक लाख रुपयांना गंडवण्याच्या तयारीत असलेल्या तिघा भामट्यांना आज पणजी पोलिसांनी एका सतर्क नागरिकामुळे सापळा रचून ताब्यात घेतले. त्यापैकी दोघे गुजरात येथील चुलत बंधू आहेत तर एक पुणे येथील महिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पणजी पोलिसांनी शिरगाव डिचोली येथील नागरिक सदानंद गावकर यांच्या मदतीने कदंब बसस्थानकावर सापळा रचून तिघा भामट्यांना ताब्यात घेतले. यात राजू किशनलाल प्रजापती(२५), बाबूलाल भालचंद्र प्रजापती(२२ रा. बाबुभाई चौक ठक्करनगर अहमदाबाद) व श्रीमती देवीबाय रवी चौहान(५० रा. झोपडपट्टी, शिवाजीनगर पुणे) यांचा समावेश आहे. या तिघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून उद्या १६ रोजी त्यांना रिमांडसाठी न्यायालयापुढे सादर केले जाणार आहे.
प्राप्त माहितीनुसार कळंगुट किनाऱ्यावर दुकान असलेले सदानंद गावकर यांच्याकडे गेल्या शुक्रवारी म्हणजेच १२ डिसेंबरला हे तिघेआले होते. गावात जमीन खोदताना आपल्याला काही सोन्याचे दागिने मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या आपल्याला पैशांची नितांत गरज आहे, त्यामुळे हे सर्व दागिने केवळ १ लाख १० हजार रुपयांना देतो,असा प्रस्ताव त्यांनी गावकर यांच्यासमोर ठेवला. याप्रकरणी १५ रोजी पैसे घेऊन पणजी येथील कदंब बसस्थानकावर भेटण्याचे व हा माल घेऊन जाण्याचे आमिषही त्यांनी दाखवले. गावकर यांनी त्यांचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला व नियोजित ठिकाणी येण्याचा शब्द त्यांना दिला. या तीनही लोकांच्या बोलण्यावरून तसेच एकूण त्यांच्या हावभावांवरून यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बळावल्याने गावकर यांनी तशी माहिती आज सकाळी पणजी पोलिसांना दिली. यावेळी आपण कदंब बसस्थानकावर उभा राहतो व त्यावेळी हा माल घेऊन येणाऱ्या तिघांनाही ताब्यात घ्या,असे सुचवून त्यांच्या सांगण्यानुसार सापळा रचण्यात आला. पणजीचे उपनिरीक्षक राहुल परब व तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली काही पोलिस साध्या वेषांत या ठिकाणी उपस्थित राहिले. यावेळी सदर तीनही व्यक्तींना गावकर आल्याचे कळताच त्यांनी त्यांच्या हातात या दागिन्यांची थैली ठेवली व पैशांची मागणी केली. त्यावेळीच पोलिस पथकाने या तिघांनाही वेढा घालून ताब्यात घेतले.
पोलिसांनी सदर दागिन्यांची चौकशी केली असता ते सर्व पितळीचे बनावट दागिने असल्याचे आढळून आले व त्याचे वजन २.२६ ग्रॅम असल्याची माहितीही देण्यात आली. दरम्यान, या कारवाईत उपनिरीक्षक परब व लोटलीकर यांच्याबरोबर पोलिस शिपाई शिरीष साळगावकर,चिंदराज म्हामल,विठ्ठलदास कुट्टीकर,विनय श्रीवास्तव,वासू केसरकर, आदींनी भाग घेतला.

इराकमध्ये बुश यांच्यावर पत्रकाराने जोडे भिरकावले

बगदाद, दि. १५ : इराकची राजधानी बगदाद येथील पत्रपरिषदेत एका पत्रकाराने आर्थिक महाशक्ती व सामर्थ्यशाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यावर रागाने आपल्या पायातील दोन्ही जोडे काढून भिरकावले. अनपेक्षितपणे घडलेल्या या घटनेमुळे तेथे उपस्थित सर्वच जण स्तंभित झाले. जोडे भिरकावताना इराकी पत्रकाराने अरबी भाषेत "हे तुमच्यासारख्या कुत्र्याला निरोपाचे चुंबन आहे' अशी शिवी हासडली.
मात्र, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर याचा कोणताही परिणाम झाला नाही. झाल्या प्रकारावर त्यांनी आपल्या विनोदी शैलीने पांघरूण घालून वेळ निभावून नेली. इराकी वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने पहिला जोडा भिरकावला त्यावेळी त्यांनी स्वत:च खाली वाकून तो हुकविला. दुसरा जोडा भिरकावला त्यावेळी मात्र ते वाकले नाहीत. तो जोडा अगदी त्यांच्या डोक्याच्या वरून अमेरिकेच्या राष्ट्रध्वजावर आदळला. यावरून इराकमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांबद्दल किती द्वेष खदखदत आहे तेच आपल्या लक्षात येईल. संपूर्ण जगभरातच या घटनेची चर्चा सुरू असून त्यामुळे आता अनेक प्रश्नांना तोंड फुटणार आहे.
बुश यांनी चिंता करण्यासारखे फारसे काहीच घडले नाही अशा आविर्भावात अमेरिकेत सुरू असलेल्या राजकीय विरोध आंदोलनाशी या प्रकाराची तुलना केली आहे. ते म्हणाले, सहकारी पत्रकाराने माझ्यावर जोडे भिरकावले त्याला आपण काय करू शकतो. आणि काहीसे हसून तसे बघाल तर हा जोडा १० नंबरचा होता असा विनोदही त्यांनी केला.
जानेवारी महिन्यात बुश यांचा कार्यकाळ संपत आहे आणि बगदाद येथील शेवटच्या भेटीदरम्यान आपला असा अपमान होईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. ही घटना घडली त्यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इराकचे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्यासह एका संयुक्त पत्रपरिषदेला संबोधित करीत होते. दोघेही हस्तांदोलन करणार तेवढ्यात त्यांच्यापासून २० फूट अंतरावर बसलेल्या पत्रकाराने दोन्ही पायातील जोडे काढून बुश यांच्या डोक्याच्या दिशेने ते भिरकावले. मात्र नेम चुकल्यामुळे भिंतीवर लावण्यात आलेल्या अमेरिकन राष्ट्रध्वजावर ते जाऊन आदळले. हल्ला करणाऱ्याचे नाव मुंतदार अल जिदी असे असून तो इजिप्तची राजधानी काहिरा येथील वृत्त वाहिनी अल बगदादियामध्ये समालोचक आहे. घटनेनंतर कक्षात गोंधळ उडाला. त्यावेळी बुश यांनी हाती माईक घेऊन सर्वांनी शांत राहावे, चिंता करू नये असे आवाहन केले. तोपर्यंत पत्रकार व अधिकाऱ्यांनी जिदीला घेरले होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला लगेच जमिनीवर पाडले व तेथून बाहेर नेले. यामुळे हा पत्रकार जखमी झाला. कारण गालिच्यावर रक्ताचे डाग दिसून आले. इराकी संस्कृतीत जोडे फेकून मारणे म्हणजे घोर अपमान समजला जातो. २००३ मध्ये अमेरिकन लष्कराने फिर्दोस चौकात सद्दाम हुसेनच्या पुतळ्याला जमीनदोस्त केले त्यावेळीही इराकी जनतेने पुतळ्यावर जोडे भिरकावले होते.

Monday, 15 December, 2008


अपघातात चक्काचूर झालेली देशप्रभूंची गाडी (छायाः सूर्यकांत दिवकर)

कुणाल देशप्रभू याचा कार अपघातात मृत्यू, देशप्रभू घराण्यावर आघात, पेडण्यात शोककळा


मोरजी, दि. १४ (वार्ताहर):पेडणेचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांचा एकुलता एक मुलगा कुणाल देशप्रभू याचे आज पहाटे साळगाव-सांगोल्डा येथे झालेल्या भीषण मोटर अपघातात जागीच निधन झाले. कुणाल देशप्रभू (२३) हा आपला मित्र आशिष याच्यासोबत पहाटे आपली स्वीफ्ट मारुती गाडी क्र. जीए-०१ - ९९९१ या वाहनाने पेडणेच्या दिशेने जात होता. सांगोल्डा बार्देश येथे सुरुवातीस एका झाडाला व नंतर दगडी कुंपणाला जबरदस्त धडक दिल्याने त्याच्या मेंदूला जबर मार लागला व त्याचमुळे त्याचे लगेच निधन झाल्याचे डॉक्टरी अहवालात म्हटले आहे. कुणाल याचा मित्र आशिष याला गंभीर जखमी अवस्थेत बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजात उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्याची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती मिळाली.
जितेंद्र देशप्रभू यांच्या मुलाच्या अपघाती निधनाची वार्ता आज सकाळीच पेडण्यात वाऱ्यासारखी पसरल्याने मोठ्याप्रमाणात लोकांनी त्यांच्या राजवाड्यावर धाव घेतली. केवळ माजी आमदार म्हणूनच नव्हे तर पेडणेतील देशप्रभू घराणे या तालुक्यातील एक प्रतिष्ठित जमीनदार घराणे असल्याने अनेक गावांत पूर्वापारपासूनचे त्यांचे एक विशिष्ट नाते आहे. त्यामुळे या दुर्घटनेच्या वार्तेने आज संपूर्ण पेडणे तालुक्यालाच एक प्रकारचा हादरा बसला. राज्यपाल एस.एस.सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत तसेच मंत्रिमंडळातील इतर सदस्य, आमदार, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विरोधी आमदारांनीही याप्रसंगी पेडणे येथे त्यांच्या राजवाड्यावर प्रत्यक्ष जाऊन देशप्रभू यांचे सांत्वन केले.
जितेंद्र देशप्रभू यांचे पुत्र कुणाल देशप्रभू हे २३ वर्षांचे होते. त्यांचे प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पणजी येथे झाले तर उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथे प्रवेश मिळविला होता. त्याने बी कॉम. पदवी प्राप्त केली होती.
देशप्रभू व कुणाल यांच्यातील वडील पुत्राच्या नात्याचे अनेक किस्से यावेळी लोकांच्या चर्चेत होते. वडिल-पूत्र नात्यापेक्षा ते एकमेकांशी मित्रांप्रमाणे थेट संवाद साधून एकमेकांची मस्करी करीत असत. त्यांच्या या प्रेमळ नात्याची अनेक चित्रे यावेळी राजवाड्यात पाहायला मिळत होती. दरम्यान मागच्या विधानसभा निवडणुकीत कुणाल देशप्रभू हे जितेंद्र देशप्रभू यांच्या प्रचारात उतरले होते. घरोघरी जाऊन कॉंग्रेस पक्षाचा प्रचार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.
दत्ताची पालखी
दत्तजयंतीच्या निमित्ताने राजवाड्यात असलेल्या दत्तमंदिरात मोठ्या उत्साहात दत्तजयंती साजरी केली जाते. यंदा प्रथमच कुणाल देशप्रभू यांनी दत्त सोहळ्याची पालखी आपल्या खांद्यावर घेतली होती, अशी माहिती नगरसेवक सुधीर देशप्रभू यांनी दिली. त्याचा खेळकरी व मुक्त स्वभाव हाच या परिसराचा प्राण होता,असे सांगताना त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
बाजार पेठा बंद
माजी आमदार तथा पेडणेचे एक प्रतिष्ठित जमीनदार जितेंद्र देशप्रभू यांच्या मुलाचे अपघातात निधन झाल्याची वार्ता पेडणे शहरातील बाजारातील लहान मोठ्या व्यावसायिकांना कळताच त्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवली. यावेळी ९० टक्के बाजारातील व्यवहार बंद होता,अशी माहितीही मिळाली आहे.
राजवाड्यावर एकच गर्दी
कुणाल देशप्रभू याच्या अपघाताची वार्ता कळताच पेडणेतील देशप्रभू राजवाड्यावर एकच गर्दी लोटली. यावेळी त्यांची भेट घेतलेल्यांत माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर,पक्षाध्यक्ष सुभाष शिरोडकर,आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस,शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात, क्रीडामंत्री बाबू आजगांवकर, माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप, माजी शिक्षणमंत्री संगीता परब, पेडणेचे आमदार दयानंद सोपटे, मांद्रेचे आमदार प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी सभापती प्रा. सुरेंद्र सिरसाट, मुख्य सचिव जे. पी. सिंग, अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन, जिल्हासदस्य दीपक कळंगुटकर, श्रीधर मांजरेकर, प्रदीप पटेकर, क्रीडा संचालक व्ही. एम. प्रभूदेसाई, गुरुदत्त भक्ता, बाबी बागकर, प्रमेश मयेकर, माजी मुख्यमंत्री विल्फ्रेड डिसोझा, दै. "गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई, संचालक सागर अग्नी, तिसवाडी उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये, बार्देशचे मामलेदार गौरीश शंखवाळकर, दशरथ राणे, नगराध्यक्ष इजिदोर फर्नांडिस, पेडणे अग्निशमन दलाचे अधिकारी हरिश्चंद्र नाईक, सचिन घोडगे, मंगलदास मांद्रेकर, राजमोहन शेट्ये, नगरसेवक नारायण मयेकर, प्रदीप देशप्रभू, सुधीर देशप्रभू, पोलिस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई, पोलिस अधीक्षक रोहिदास पत्रे, सुभाष गोलतेकर, चंद्रकांत साळगांवकर, संसदीय सचिव नीळकंठ हळर्णकर, गोवा ऍन्टिबायोटिक्स कंपनीचे संचालक सूर्यकांत तोरस्कर, कदंब महामंडळाचे संचालक दशरथ महाले, रामा सावळ देसाई, बाबी तिरोडकर, यशवंत तळावणेकर, ट्रोजन डिमेलो, गिरीश चोडणकर, विजय सरदेसाई, डॉ. आल्तीन गोम्स, डॉ. उल्हास परब, ऍड. सुभाष नार्वेकर, कृषी अधिकारी राजू जोशी, तुये सरपंच विजयालक्ष्मी नाईक, विर्नोडा सरपंच विभक्ती गावडे, फ्रान्सिस डिसौझा, वनविभागीय अधिकारी एस. आर. प्रभू संचालक आबा तळेकर, वीज अभियंते, सार्वजनिक बांधकाम अभियंते, विविध हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोलिस कर्मचारी, समाजसेवक व असंख्य सर्व सामान्य कार्यकर्ते हजर होते.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
कुणाल देशप्रभू यांच्यावर नानेरवाडा येथे हजारो संख्येच्या उपस्थितीत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे राजवाड्यावर दुःखाची छाया पसरली असून संपूर्ण पेडणे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

परप्रांतियांकडून फातोर्ड्यात खून आरोपी फरारी; चौघांविरुद्ध गुन्हा

मडगाव, दि. १४ (प्रतिनिधी) : परप्रांतिय स्थलांतरीतांनी केलेल्या जबर मारहाणीत आज चंद्रावाडो -फातोर्डा येथे पावलू परेरा (वय ६७) या भूमिपुत्राचा मृत्यू ओढवला. त्यामुळे तेथे अशा स्थलांतरीत कामगारांविरुद्ध असंतोषात भर पडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवला असून ते गुन्हेगारांच्या शोधात आहेत. तथापि, उपलब्ध माहितीनुसार या घटनेनंतर लगेच ते तेथून फरारी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रावाडो येथे आज सकाळी हा प्रकार घडला. तेथील पावलू परेरा व कोसेसांव परेरा या दोन भावांत वैमनस्य होते. कोसेसांव याने आपल्या घराजवळ खोल्या बांधून त्या परप्रांतिय कामगारांना भाड्याने दिल्या आहेत. पावलू हा त्यांची वाट अडवणे, वाटेत गटाराचे पाणी सोडणे अशा उचापती करीत असे व त्यामुळे तेही त्याच्यावर डूख धरून होते.
आज ते कामगार बाहेर निघाले असता सकाळी पावलू हा त्यांच्या वाटेवर पाण्याची बादली घेऊन उभा राहिला. त्यातून कृष्णा यादव (सिवान-बिहार) व पावलू यांच्यात वाद झाला. प्रकरण हातघाईवर आले. वाद ऐकून पावलूची मुलगी शेरॉन बाहेर आली असता यादव हा तिच्या अंगावरही धावून गेला. त्यावेळी पावलू मध्ये पडला असता यादवने त्याला उचलून जमिनीवर आपटले. त्यामुळे तो तेथेच कोसळला. ते पाहून यादव व त्याचे साथीदार पळून गेले. पावलूला नंतर इस्पितळात आणले असता मृत घोषित करण्यात आले. हे वृत्त पोलिसांना कळवल्यावर त्यांनी पंचनामा करून खुनाचा गुन्हा नोंदवला. पावलूची उद्या शवचिकित्सा केली जाईल .
दरम्यान संशयित आरोपी व त्याच्या साथीदारांचा शोध केला असता ते फरारी झाल्याचे आढळू आले. त्यांची छायाचित्रे व अन्य माहिती मिळाली आहे. कृष्णा यादवखेरीज शमशाद, अमजाद व अरविंदसिंग यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून त्यांचा शोध सुरू आहे.
दरम्यान आजच्या या प्रकारामुळे फातोर्डा भागातील स्थलांतरीतां विरुध्दच्या आंदोलनाला नवी चालना मिळाली आहे. आजच अशा लोकांना घालवून देण्यासाठी संबंधितावर अनेकांनी दबाव आणला .

पाद्रीला जीवे मारण्याच्या धमकीने कुठ्ठाळीत तणाव, आमदारासह पाचशे जणांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा

पणजी,दि.१४ (प्रतिनिधी): आगशी-कुठ्ठाळी येथील सेंट लॉरेन्स चर्चचे फादर क्रिस्तव्हाव काल्देरा यांना याच भागातील फ्रान्सिस गोन्साल्विस ऊर्फ पाकूल या गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमाकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने या भागात वातावरण बरेच तापले. पोलिसांनी सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असली तरी पाकूल याच्या दहशतीचे सावट कायमस्वरूपी दूर होण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त करावा,अशी मागणी करीत सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या नेतृत्वाखाली आज सुमारे पाचशे लोकांनी आगशी पोलिस स्थानकावर मोर्चा नेल्याने पोलिसांची मात्र बरीच भंबेरी उडाली.
याप्रकरणी फादर काल्देरा यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार गेल्या शुक्रवारी रात्री ११ वाजता फादर काल्देेरा हे झोपले होते, यावेळी त्यांचे साहाय्यक मारियान ट्रेवासो यांनी त्यांना उठवले व पाकूल त्यांना शोधीत असून त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती फादरला देण्यात आली. दुसऱ्या दिवशीही पाकूल फादरचा पाठलाग करीत असल्याची माहिती मिळाल्याने व त्यांनी फादरला जीवे मारण्यासंबंधी अनेकांकडे वाच्यता केल्याने अखेर आगशी पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्याचे फादरने ठरवले. पाकूलने दिलेली धमकी तो नेहमीच पूर्ण करतो,अशी त्याची ख्याती असल्याने फादरने आपल्या खोलीतून बाहेर पडणे बंद केले. गेल्या शनिवारी फादर आपल्या खोलीत असता पाकूल चर्चेच्या आवारात फिरत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली, यानंतर फादरने आगशी पोलिस स्थानकात रीतसर तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान,पाकूल याला यापूर्वी खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती व अलीकडेच तो शिक्षा भोगून सुटला असल्याची माहिती येथील काही लोकांनी दिली. यापूर्वी एका प्रकरणी फादर काल्देरा यांनी त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीबाबत साक्ष दिल्यानेच त्याने धमकी दिली असावी,असा कयासही काही लोक व्यक्त करीत आहेत. दरम्यान,यापूर्वी पाकूल याने केलेल्या खुनाची प्रकरणेही थरारक असल्याचे येथील लोकांनी सांगितले. त्याची मानसिक अवस्था ठीक नसल्याचे लोकांचे म्हणणे असले तरी आपणाला लोक वेडा समजतात,अशी भावना त्याने केल्याने आपण वेडा नाही,असे फादरने आठवड्याच्या प्रार्थनेवेळी लोकांना सांगावे,अशी विनंती करण्यासाठी आपण फादरला भेटायला पाहत होतो,अशी जबानी त्याने पोलिसांना दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

एम. जे. अकबर यांची बीबीसीवर सडकून टीका


मुंबई, दि. १४ : खात्रीलायक बातम्या देण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या "बीबीसी' म्हणजेच ब्रिटिश बॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या न्यूज चॅनेलवर ज्येष्ठ भारतीय पत्रकार एम. जे. अकबर यांनी कडाडून टीका केली आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचे वृत्त देताना या वाहिनेनी वापरलेली भाषा खूपच आक्षेपार्ह आणि एकांगी असल्याने अकबर यांनी बीबीसीकडे निषेधपत्र पाठवले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या कथित प्रतिष्ठेचा टेंभा सदोदित मिरवणाऱ्या या वाहिनीला मुलाखत देण्याचेही त्यांनी सपशेल नाकारले.
मुंबईवर झालेल्या हल्ल्यांचे वृत्त देताना या वाहिनीवरून हल्लेखोरांचा उल्लेख बंदुकधारी किंवा बंडखोर (मिलिटंट्स वा गनमेन) असा करण्यात येत होता. त्यामुळे अकबर यांचे भारतीय रक्त उसळून उठले. वास्तविक या हल्लेखोरांचा उल्लेख दहशतवादी (टेररिस्ट) असाच व्हायला पाहिजे होता. मात्र बीबीसीने तसे करणे जाणिवपूर्वक टाळले, असा अकबर यांचा आक्षेप आहे. ब्रिटनचे संसद सदस्य स्टीव्ह पाऊंड यांनीसुद्धा हा मुद्दा बीबीसीच्या व्यवस्थापनाकडे पोटतिडकीने मांडून या वाहिनीला एकप्रकारे घरचा आहेरच दिला आहे. याप्रकरणी बीबीसीच्या वृत्त विभागाचे प्रमुख रिचर्ड पोर्टर यांना अकबर यांनी खरमरीत इमेल पाठवला आहे. त्यात अकबर म्हणतात, जर तुमच्या देशात बाहेरील शक्तींनी हल्ला केला तर त्यांचा उल्लेख तुम्ही सातत्याने दहशतवादी असाच करता; मात्र भारतावर हल्ला होऊन त्यात दोनशे लोक ठार व चारशे लोक जखमी झाले; तरीसुद्धा भाषेच्या बाबतीत बीबीसीने हात आखडता घेतला हे दुर्दैव म्हटले पाहिजे. आशियाई देशांबद्दलचा तुमचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन यातून स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे.
मात्र, बीबीसीने आपल्या नेहमीच्या सवयीनुसार यासंदर्भात थातुरमातूर खुलासा करून या विषयाला बगल देण्याचा दुबळा प्रयत्न केला आहे.

पुण्यातील व्यावसायिक सुरेश अलूरकर यांची हत्या

पुणे, दि. १४ : येथील अलूरकर म्युझिक कंपनीचे मालक सुरेश अलूरकर यांची त्यांच्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. दुपारी घराचा दरवाजा अर्धा उघडा असल्यामुळे शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिले तेव्हा अलूरकरांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडलेला आढळला.
कर्वे रोडवरील स्वप्ननगरी सोसायटीमध्ये सुरेश अलूरकर एकटेच राहत होते. या सोसायटीच्या समोरच त्यांचे दुकान होते. पण आज सकाळपासून त्यांचे दुकान बंद होते आणि ते घराबाहेरही आले नाहीत म्हणून शेजारी त्यांची विचारपूस करण्यासाठी घरी गेले. घरात अलूरकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडले होते आणि त्यांचे हातपाय वायरने बांधले होते. तात्काळ शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून खून केव्हा व कसा झाला याबाबत अजून काहीच स्पष्ट झाले नाही.

Sunday, 14 December, 2008

भारत - पाक यांच्यात "युद्ध नको' करार व्हावा

नवाज शरीफ यांचा प्रस्ताव
इस्लामाबाद, दि. १३ - भारत व पाकिस्तान यांच्यात "युद्ध नको' करार व्हावा असा प्रस्ताव पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सुचवला आहे. पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या साह्याने वा अण्वस्त्रांच्या साह्याने आम्ही प्रथम हल्ला करणार नाही असा करार या दोन्ही राष्ट्रांनी करावा. दोन्ही देशांच्या दृष्टीनेही असे करणे उत्तम राहील, असे शरीफ म्हणाले.
एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुंबई अतिरेकी हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला अतिरेकी अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक आहे, यासंदर्भात वृत्तपत्रांत आलेल्या वृत्ताच्या अनुषंगाने शरीफ आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.
कसाब संदर्भातील वृत्त जर खरे असेल तर पाकिस्तानने याची गंभीरपणे नोंद घेणे आवश्यक आहे. केवळ दखलच घेऊ नये तर याबाबत गंभीरपणे कारवाईसुध्दा केली जावी, असे शरीफ म्हणाले. दरम्यान, जमात-उद्-दावा या संघटनेच्या व तिच्या नेत्याविरुध्द पाकिस्तान सरकारने जी कारवाई प्रारंभ केली आहे त्यावर पाकिस्तानी प्रसिध्दी माध्यमांनी सर्वसाधारणपणे समाधान व्यक्त केले आहेे. तर काहींनी सरकारने आणखी काही पावले उचलणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले आहे.
पाकची मानसिकताच
संशयास्पद : मुखर्जी
दिल्ली, दि. १३ ः पाकिस्तान त्यांच्या भूमीवर दहशतवादी शिबिरे चालविणाऱ्या संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करेलच याची भारताला खात्री नसून आजवरचा अनुभव बघता भारताला पाकच्या मानसिकतेवर संशय असल्याचे रोखठोक प्रतिपादन परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी केले आहे.
यापूर्वीही पाकच्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी उपयोग करणाऱ्या घटकांविरुद्ध अगदीच नगण्य कारवाई करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात हा देश तरबेज असून देखावा करण्यातही पटाईत आहे. त्यामुळेच या देशाने लष्करविरुद्ध चालविलेल्या कारवाईत खरेच दम आहे की नाही याबद्दल आपण साशंक असल्याचे मुखर्जी म्हणाले.
मुंबई हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांविरुद्ध पाकने पुरावे मागितल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, भारत पुरावे देण्यास तयार आहे. परंतु सध्याच असे करता येणार नाही कारण चौकशी सुरू आहे.
जे पुरावे आमच्याकडे आहेत ते सर्वच आम्ही पाकिस्तानपुढे ठेवू. सध्या पुराव्यांबाबत चौकशी सुरू आहे. तत्काळ ते पाकिस्तानच्या हाती सोपविणे घाईचे ठरेल असे सांगून शेजारी देशात सध्या सुरू असलेल्या अभियानाबद्दल त्यांनी सीएनएन-आयबीएन वाहिनीवरील "डेव्हिल्स ऍडव्होकेट' कार्यक्रमात बोलण्याचे टाळले.
१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतरही पाकने दाखवण्यासाठी अशीच कारवाई केली होती. आतंकवादी संघटनांच्या काही प्रमुखांना अटक करण्यात आली. कालांतराने वातावरण शांत झाल्यानंतर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले. यावेळी मात्र पाकिस्तान खरेच गांभीर्याने दहशतवादी संघटनांविरुद्ध पाश आवळतो की नाही तेच सध्या आपण लक्षपूर्वक बघत आहोत असे मुखर्जी म्हणाले.
दहशतवादाचे केंद्र पाकिस्तानात असून आंतरराष्ट्रीय समुदायाला कठोर व परिणामकारक उपायांसह याचा सामना करण्यासाठी तयार राहावे लागेल असे आवाहन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गुरुवारी केले होते. याकडे लक्ष वेधले असता प्रणव मुखर्जी यांनी सांगितले की, पाकिस्तान वारंवार त्यांच्या सीमेपलीकडील घटकांचा भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये हात असल्याची ओरड करीत असतो. परंतु, खरे तर हे घटक त्यांच्याच सीमेच्या आत राहून आतंकवादाचे सूत्रसंचालन करीत असतात. म्हणूनच मी वारंवार पाकिस्तानी घटकांचे नाव घेत असतो. हे एक असे विशेषण आहे ज्याचे मी नेहमीच सावधपणे उच्चारण केले आहे असे स्पष्ट करून, भारतीय गुप्तचर संस्था यासंदर्भात अंतिम निष्कर्ष देण्यापूर्वी मी देखील सविस्तर बोलू इच्छित नाही असे ते म्हणाले.
पाकने जमात-उद-दावाविरुद्ध मोहीम उघडल्यानंतर मुखर्जी यांनी हे वक्तव्य केले आहे. जमात ही लष्करची प्रमुख संघटना असून या दहशतवादी संघटनेवर नुकतीच युनोने बंदी घातली आहे.
भारतात गुन्हा केल्यानंतर जे पाकच्या आश्रयाला गेले आहेत असे आणि पाकचे नागरिक असून जे भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये लिप्त आहेत अशा दोन प्रकारच्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी असलेले एक विरोधपत्र भारताने पाकिस्तानला पाठविले असून उत्तरात पाक एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ भारतात पाठविण्याची योजना आखत असल्याची माहिती मुखर्जी यांनी दिली.
दाऊद इब्राहिमसारख्या काही गुन्हेगारांनी भारतात गुन्हा केल्यानंतर पळून पाकमध्ये आश्रय घेतला. अशा समाजकंटकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करता यावी म्हणून त्यांना पाकने भारताला सोपवावे अशी आम्ही मागणी केली. परंतु पाकने सरळ नकार दिला आहे. मसूद अझहरसारख्यांना भारताला सोपविण्यात पाकला कोणती अडचण आहे तेच आपल्याला कळत नाही. त्याला भारतात अटक झाली होती. परंतु कंधारमध्ये भारतीय विमानाच्या अपहरणकर्त्यांनी त्याची मागणी केल्यानंतर प्रवाशांच्या बदल्यात त्याला सोडण्यात आले होते. तो सध्या पाकमध्ये असून तेथील टीव्ही वाहिन्यांवरही सतत दिसत असतो. त्याला भारताकडे सोपविण्याची पाकची इच्छा नसेल तर मग त्याला नजरकैदेत ठेवण्याचा अर्थच काय तेही आपल्याला कळत नसल्याचे संरक्षण मंत्र्यांनी मत व्यक्त केले.
मुंबई हल्ल्यांचा एकमेव जीवित आरोपी अजमल कसाबसोबत पाकने वाणिज्य दूतावास स्तरावर संपर्क साधण्याची इच्छा व्यक्त केली होती काय, असे विचारले असता पाकने अधिकृतपणे अशी विनंती केली असल्याची माहिती आपल्याला नसल्याचे मुखर्जी यांनी सांगितले.
भारत देशाच्या अखंडतेसाठी सर्व उपाय करण्यास तत्पर आहे. परंतु युद्ध कोणत्याही समस्येवरील तोडगा असूच शकत नाही असेही त्यांनी सांगितले. यावर भारत आणखी किती वेळ वाट बघणार असे विचारले असता पाकिस्तान किती लवकर उत्तर देतो किंवा उत्तर देतही नाही यावर सर्वकाही अवलंबून असल्याचे मुखर्जी म्हणाले.

"आत्मभान लाभलेली स्त्रीच साकारायची आहे"

अभिनेत्री मृणाल देव - कुलकर्णी यांचे मनोगत
सचिन वेटे
पणजी,दि. १३ - नशिबाला दोष देत केवळ रडत राहणाऱ्या व्यक्तिरेखा साकारायला आपल्याला कधीच आवडत नाहीत, असे स्पष्ट मत अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी यांनी प्रकट केले. आत्मभान लाभलेली स्त्रीच आपल्याला साकारायची आहे व आपल्या भूमिकांतून समर्थ अशी स्त्रीच प्रेक्षकांपुढे आणावयाचा आपला नेहमी प्रयत्न असतो, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.
सौंदर्य, प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा मनोज्ञ असा त्रिवेणी संगम म्हणजे अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी."स्वामी' या ऐतिहासिक टीव्ही मालिकेतील "रमाबाई'या पहिल्याच भूमिकेतून प्रकाशझोतात आलेल्या व त्यानंतर कधीच मागे वळून न पाहणाऱ्या मृणाल कुलकर्णी आज मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात भरभरून बोलल्या. या मेळाव्यानिमित्त त्यांची खास प्रकट मुलाखत ज्योती कुंकळ्ळीकर व मयुरेश वाटवे यांनी घेतली.
"माहेरची साडी' या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका केवळ अशा नकारात्मक व्यक्तिरेखेमुळे आपण नाकारली. काही गोष्टी या कुंडलीतच लिहिलेल्या असतात."स्वामी' मालिकेतील रमाबाई ही आपल्या कुंडलीतच लिहिली होती व अगदी अनपेक्षितपणे ही भूमिका आपल्याला मिळाली. शुटींगचे काही दिवस विलक्षण तणावाचे गेले; पण पहिला भाग पाहिल्यावर कॅमेरा या माध्यमाची ताकद आपल्याला समजली.आज आपण जे काही आहोत त्याचे बरेचसे श्रेय "स्वामी' या टीव्ही मालिकेला जाते, असे त्या म्हणाल्या.
एखाद्या कलाकाराला प्रत्यक्ष नावाने न ओळखता व्यक्तिरेखेच्या नावाने ओळखले जाते,तेव्हा कसे काय वाटते असा प्रश्न केला असता त्या म्हणाल्या की रसिकांनी आपल्या अभिनयाला ती दिलेली दाद असते व त्यामुळे आनंदच होतो. आपण साकारत असलेली भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहचली याचा तो एकार्थाने पुरावाच म्हणावा, असे त्या म्हणाल्या. "स्वामी'मालिकेतील रमाबाईची भूमिका केल्यानंतर तशाच प्रकारच्या भूमिका कराव्या लागतील,अशी भिती वाटली का,यावर त्या लगेच "नाही' म्हणून उत्तरल्या. तुमच्याकडे अभिनयक्षमता व भूमिकेनुसार स्वतःच्या दिसण्यातला वेगळेपणा साकारता येत असेल तर तुम्ही कुठलीही भूमिका करू शकता,असे त्या म्हणाल्या. आपण द्रौपदी सारख्या पौराणिक,रमा-जीजाबाई सारख्या ऐतिहासिक,अवंतिकासारख्या प्रचलित व सोनपरीसारख्या "फॅन्टसी'अंगाने जाणाऱ्या भूमिका यशस्वीपणे करू शकल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती सोनिया गांधी यांची व्यक्तिरेखा साकारायला आवडेल का,या प्रेक्षकांमधून आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्स्फूर्तपणे "नक्कीच'अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. एखादी स्त्री सर्वस्वी अनोळखी वातावरणात स्वतःला कशी मुरवून घेऊ शकते आणि परिस्थितीने दिलेल्या आव्हानांचा मुकाबला कशी समर्थपणे पेलू शकते याचे उदाहरण म्हणजे सोनिया गांधी असे त्या म्हणाल्या. एक राजकारणी म्हणून नव्हे तर स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून सोनियांची व्यक्तिरेखा साकारायला आवडेल,असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
आपण समाजात राहत असल्याने समाजाचे ऋण फेडणे हे आपले कर्तव्य ठरते व त्यामुळे समाजसेवा ही करावीच असे त्या म्हणाल्या. आजच्या स्त्रीला जर सक्षम व्हायचे असेल तर त्यांनी आपल्या घरातील पुरुषांना आधी घडवलं पाहिजे,असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. आजच्या स्त्रीने आपल्या रोजच्या व्यापातून निदान एक तास जरी स्वतःला दिला तरी स्त्री खूप मोठा पल्ला गाठू शकते,असेही त्या म्हणाल्या. "करिअर'आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांची सांगड योग्यरितीने घालता आली पाहिजे.आपण कुटुंबाला किती वेळ देतो यापेक्षा तो कसा देतो याला महत्त्व असल्याचेही त्या म्हणाल्या. गोमंतकातही आता चांगली चित्रपट निर्मिती होत असल्याचे समाधान तिने व्यक्त केले. एखादी चांगली व्यक्तिरेखा गोमंतकीय निर्मात्यांनी आणली तर गोमंतकीय चित्रपटातून भूमिका करायला नक्कीच आवडेल,असेही मृणाल यांनी माधवी देसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी मृणाल यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाला भारावून माधवी देसाई यांनी पुढील गोमंतकीय चित्रपटातील नायिका मृणाल कुलकर्णी अशी घोषणा केली व हा बहारदार कार्यक्रम कधी संपला हे कोणाला कळलेच नाही.

मारहाण केल्याप्रकरणी पोलिस शिपाई निलंबित

यथेच्छ खाऊन फूट सेंटरमध्ये धुडगूस
मडगाव, दि.१३ (प्रतिनिधी) - मडगाव येथील जुन्या बाजारातील कोर्टजवळ काल रात्री उशिरा "मानुषा फास्ट फूड सेंटर'मध्ये भरपेट खाल्ल्यानंतर तेथील मालक व वेटरशी भांडण करून त्यांच्यावर बाटली मारल्याप्रकरणी महेश कुराडे या पोलिस शिपायाला रात्री अटक करण्यात आली. आज (शनिवारी) त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले. तसा आदेश पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी दिला. सदर सेंटरचा मालक मशुद्दीन खान यालाही रात्री उशिरापर्यंत दुकान उघडे ठेवल्याबद्दल अटक करण्यात आली. सदर कुराडे हा आपल्या अन्य सहकाऱ्यांसमवेत रात्री मानुषा सेंटरमध्ये गेला होता. नंतर त्याने बिलावरून तेथे भांडण उकरून काढले. त्यावेळी त्याने वेटरवर बाटली फेकून मारली. यावेळी त्याच्यासोबत इतर पोलिस उपस्थित होते की नाही हे कळू शकले नाही.

हत्तीच्या उच्छादानंतरही लोकप्रतिनिधी ढिम्मच

चांदेलवासीय खवळले
मोरजी, दि. १३ (वार्ताहर) - पेडणे तालुक्यातील चांदेल परिसरात गेल्या १० दिवसांपासून हत्तीने उच्छाद मांडूनही लोकप्रतिनिधींनी त्या भागाला साधी भेटही देण्याचे सौजन्य न दाखवल्याने चांदेलवासीय खवळले आहेत.
हत्तीने बागायतीची मोठ्या प्रमाणात नुकसानी केल्यावर आता तो लोकवस्तीत घुसत आहे. त्या हत्तीचा जर बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी संताप्त प्रतिक्रिया लोकांतून व्यक्त होत आहे.
हत्ती चांदेल भागात येऊन केळी, कवाथे व अंगणात ठेवलेल्या भाताची उडवी फस्त करत आहे. त्यामुळे लाखों रुपयांची नुकसानी झाली व होत आहे. तरीसुद्धा आजपर्यंत या भागाचे आमदार तथा पंचायतमंत्री व पालकमंत्री बाबू आजगावकर यांनी हानीग्रस्त भागाला का भेट दिली नाही, असा सवाल चांदेल कुंभारवाड्यावरील शेतकऱ्यांनी केला आहे. निवडणुकीवेळी वारंवार घिरट्या घालणारे उमेदवार व आमदार निवडून आल्यानंतर का पाठ फिरवतात, हे कळत नाही. निदान या बाबतीत तरी त्यांनी पक्षीय राजकारण करू नये. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याची दखल घेऊन शेतकऱ्यांना हत्तींपासून सुरक्षा दिली नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. हत्तीचा शासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कुंभारवाडा चांदेल येथील शेतकऱ्यांनी सांगितले की, हत्ती आता लोकवस्तीत घुसत असल्याने तो लोकांचे बळी गेल्यास त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर सरकारने द्यावे.
दरम्यान, तुये विभागीय वनाधिकारी एस्. आर. प्रभू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारसमोर एक योजना मांडली आहे. त्या योजनेला केंद्र सरकारची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. तसे झाल्यास पुढील कार्यवाही तातडीने करता येईल. या हत्तीला गुंगी देऊन क्रेनद्वारे ट्रकात घालून अभयारण्यात नेण्याची ही तिला केंद्राकडून मंजुरी मिळाल्याशिवाय वनखातेही काहीच करू शकत नाही.
चांदेल भागातील स्थानिक लोक हत्ती आल्यानंतर गर्दी करतात, खात असताना जर हत्तीला अडथळा आणला तर तो अंगावर धावून येतो. लोकांनी आता हत्तीच्या मागे मागे पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे प्रभू यांनी आवाहन केले व हत्तींची जबाबदारी वनखात्यावर सोपवावी असे म्हटले आहे.
हत्तीला पकडून न्या ः मळीक
गेले दहा दिवस हत्ती चांदेल परिसरात नुकसान करत करत आता लोकवस्तीतही मोर्चा वळवत असल्याने भविष्यात लोकांच्या घरात घुसून दुर्घटना घडण्यापूर्वी हत्तीला पकडून सरकारने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी चांदेलचे माजी सरपंच संतोष मळीक व कदंब महामंडळाचे संचालक दशरथ महाले यांनी केली आहे. चांदेल येथील प्रकाश च्यारी व श्री. गवस यांनी हत्तींची एवढी धास्ती घेतली आहे की ते रात्री आपल्या घरात न झोपता नातेवाइकांकडे दूरच्या ठिकाणी जाऊन झोपतात.

नेपाळी इसमाला वास्कोत अटक

वास्को,दि.१३ (प्रतिनिधी) - वास्को येथे दाबोळी विमानतळाच्या आवारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका नेपाळी इसमाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी आज ताब्यात घेऊन वास्को पोलिसांच्या हवाली केले. संध्याकाळी त्याच इसमाशी मिळता जुळता चेहरा असलेले एक पाकिस्तानी प्रमाणपत्र विमानतळ सुरक्षा रक्षकांना सापडल्याने एकच खळबळ उडाली. सदर इसमाची चौकशी करून वास्को पोलिसांनी त्याला सोडून दिले होते; परंतु विमानतळ रक्षकांनी सादर केलेल्या या प्रमाणपत्रामुळे हादरलेल्या पोलिसांनी अखेर त्याला पुन्हा ताब्यात मिळवण्यात यश मिळवले असून रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती,अशी माहिती मिळाली आहे.
आज सकाळी विमानतळ आवारात एक इसम लोकांना येथील हॉटेल व इतर जागांची माहिती विचारताना पाहिल्यावर विमानतळावरील सुरक्षा जवानांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले व वास्को पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर वास्को पोलिसांनी सदर इसमाची चौकशी केली असता तो नेपाळी असल्याचे कळले. त्याचे नाव सुकिंग हर्ष बज्राचार्य असल्याचे आढळून आले. तो काठमांडूचा रहिवासी असून तो दिल्ली-मुंबई मार्गे गोव्यात आल्याचेही पोलिस चौकशीत आढळले. पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडले खरे; परंतु संध्याकाळी विमानतळावर एक पाकिस्तानी प्रमाणपत्र सापडले व त्यावरील फोटो हा सदर नेपाळी इसमाच्या चेहऱ्याशी मिळताजुळता असल्याने विमानतळ सुरक्षा रक्षकांची धावपळ उडाली. त्यांनी संध्याकाळी लगेच वास्को पोलिस स्थानकात धाव घेऊन याबाबत माहिती दिली. वास्को पोलिसांनी सोडून दिलेल्या या इसमाला पुन्हा शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले. यावेळी पोलिस स्थानकातील गुन्हा विभागाच्या एका पोलिस शिपायाकडे हॉटेलची चौकशी सदर इसमाने केली होती व पोलिस शिपायाने त्याला वास्कोतील एका हॉटेलची माहिती दिली होती. पोलिसांनी तात्काळ त्या हॉटेलात भेट दिली असता तो इसम तिथे मिळाला. रात्री पोलिसांनी पुन्हा एकदा सदर इसमाला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी सुरू केली.