पणजी,दि.४(प्रतिनिधी): बेकायदा गुटखा व्यवहाराच्या विरोधातील आपली मोहीम अधिक तीव्र करताना राज्य अन्न व औषध प्रशासनालयाने आज फोंडा येथे छापा टाकून सुमारे ९.५ लाखांचा गुटखा जप्त केला. या कारवाईत बेतोडा येथील रवींद्र मठकर यांच्याविरोधात पाचव्यांदा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती संचालक सलीम वेलजी यांनी दिली.
आज पहाटे ७ वाजता प्रशासनातर्फे हा छापा टाकण्यात आला. बेतोडा येथील रवींद्र मठकर यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या टेंपो व जीप गाडीत हा माल ठेवण्यात आला होता. ही दोन्ही वाहने मठकर यांच्या मालकीची असल्याची माहितीही त्यांनी दिली. मठकर यांच्याविरोधात यापूर्वी गुटखा बाळगल्याप्रकरणी चार गुन्हे नोंद झाले आहेत; तरीही त्यांना आज पुन्हा एकदा या प्रकरणी पकडण्यात आले आहे.
रवींद्र मठकर हे राज्यातील गुटख्याचे मुख्य व्यापारी असल्याने त्यांच्यावर प्रशासनालयाच्या अधिकार्यांची बारीक नजर होती. त्यांनी पुन्हा एकदा गुटख्याचा साठा आणल्याची माहिती मिळताच हा छापा टाकण्यात आला. गोवा सार्वजनिक आरोग्य कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रवींद्र मठकर यांच्या पत्नी रोहिणी यांच्या विरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत अधिकार्यांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत. यावेळी जीपगाडीचा आवश्यक परवाना नसल्याचे उघडकीस आल्याने हे प्रकरण वाहतूक खात्याकडे सोपवण्यात आल्याची माहितीही श्री. वेलजी यांनी दिली.
Sunday, 5 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment