Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 26 February, 2011

‘सीबीआय’ चौकशीचा पर्दाफाश करणार


पर्रीकरांचा कॉंग्रेसला इशारा

‘इफ्फी-०४’ चे व्यवहार पारदर्शकच


पणजी, दि.२५ (प्रतिनिधी)
आपल्या विरोधातील ‘सीबीआय’ तक्रार कॉंग्रेस पक्षाच्या तत्कालीन प्रभारी मार्गारेट आल्वा व इतर काही नेत्यांनी रचलेले षड्यंत्रच होते. या षड्यंत्रात महालेखापाल कार्यालय व ‘सीबीआय’ चा गैरवापर करण्यात आला. यासंबंधीचे पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्याचा योग्य वेळी पर्दाफाश केला जाईल, असा खुलासा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज केला. ‘इफ्फी-०४’ च्या पूर्ण व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यात आली होती व त्यामुळे या प्रकरणात आपण निर्दोष सुटणार याची पूर्वीच खात्री होती, असेही ते म्हणाले. आता आपण ‘आयनॉक्स’ सिनेमागृहात जाण्यास मोकळे झालो, असे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
राज्यसभेत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी एका प्रश्‍नावर दिलेल्या उत्तरात पर्रीकर यांच्याविरोधातील ‘सीबीआय’ चौकशीत काहीही आढळून आले नसल्याने ही चौकशी बंद करण्याची शिफारस केल्याचा खुलासा केला होता. ‘सीबीआय’ कडून ‘क्लीनचीट’ मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी ही माहिती दिली. मुळातच ज्या महालेखापालांच्या अहवालाचा आधार घेऊन आपल्याविरोधात ‘सीबीआय’ चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला त्या अहवालात कुणाचेच नाव घेण्यात आले नव्हते. सुरुवातीला खुद्द तत्कालीन माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ‘इफ्फी-०४’ च्या व्यवहारांची चौकशी करण्याची शिफारस ‘सीबीआय’कडे केली होती. ‘सीबीआय’ ने केलेल्या प्राथमिक चौकशीत काहीही आढळून आले नाही. या प्रकरणी ‘सीबीआय’कडून आपल्याला क्लीनचीट मिळाल्यास कॉंग्रेसची नाचक्की होणार यामुळे तत्कालीन कॉंग्रेसच्या प्रभारी मार्गारेट आल्वा यांनी काही स्थानिक नेत्यांना हाताशी धरून नव्याने ‘सीबीआय’ चौकशीचे षड्यंत्र रचले. माजी वीजमंत्री माविन गुदिन्हो यांनी यासंबंधी महालेखापालांच्या अहवालाच्या आधारावर आपल्याविरोधात पणजी पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली व या तक्रारीवर ‘एफआयआर’ दाखल झाल्यानंतर तो ‘सीबीआय’ कडे पाठवण्यात आला. या कटात महालेखापाल व ‘सीबीआय’ यंत्रणेचाही गैरवापर झाला. यासंबंधी माहिती हक्क कायद्यानुसार माहिती देण्यास ‘सीबीआय’कडून नकार देण्यात आल्याने त्याला केंद्रीय माहिती आयोगाकडे दाद मागितल्याचेही त्यांनी सांगितले.

‘आयनॉक्स’ ची मालकी सरकारकडेच
एकूणच ‘इफ्फी-०४’ च्या पायाभूत सुविधांवर करण्यात आलेल्या खर्चाचे खोटे आकडे नाचवून काही नेते जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांच्याकडून सरकारी जमीन विकल्याचा जो आरोप झाला त्याचा खरपूस समाचार घेताना इथे कोणतीही जमीन विकली नसल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. ‘आयनॉक्स’ हे सरकारी मालकीचे सिनेमागृह आहे व त्याची मालकी माहिती व प्रसिद्धी खात्याकडे आहे. सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा हा एकमेव प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे राज्य सरकारला ३१ लाख रुपये भाडे व वर्षाकाठी ३० ते ४० लाख रुपये मनोरंजन कर प्राप्त होतो, अशी माहितीही त्यांनी दिली. उर्वरित पायाभूत सुविधांवर सगळाच खर्च सुमारे ८० कोटी रुपयांच्या आसपास झाला. आयनॉक्स सिनेमागृहाला आता सहा वर्षे झाली व या सिनेमागृह इमारतीचा दर्जा कायम आहे. ही सर्व कामे दर्जात्मकच होती. अलीकडेच सरकारने उभारलेल्या मॅकनिज पॅलेसची परिस्थिती काय बनली आहे त्यावरून आपल्या व विद्यमान सरकारच्या कामांचा दर्जा पडताळून पाहा, असे आवाहनही त्यांनी केले. कला अकादमीवर झालेल्या खर्चाचा विनाकारण बाऊ केला जातो. कला अकादमीवर झालेल्या २१ कोटी रुपये खर्चात १७ कोटी रुपये खर्चून संपूर्ण यंत्रणाच बदलण्यात आली होती याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.

‘आयनॉक्स’ सिनेमागृहात जाण्यास मोकळे
जोपर्यंत ‘सीबीआय’ चौकशीतून निर्दोष मुक्त होत नाही तोपर्यंत आयनॉक्स सिनेमागृहात जाणार नाही, असा निर्धार आपण केला होता. फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी एकदाच आपण तिथे गेलो होतो. आता आयनॉक्स सिनेमागृहात जाण्यास आपण मोकळा झालो आहे. एखादा चांगला चित्रपट प्रदर्शित झाला तर अवश्य जाईन असेही त्यांनी घोषित केले.

एकूण ९२ उमेदवार रिंगणात

पणजी महापालिका निवडणूक

९ दुरंगी, १३ तिरंगी, ६ चौरंगी, १ पंचरंगी व १ सहारंगी लढती

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी येत्या १३ मार्च २०११ रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी एकूण ९२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५२ उमेदवारांपैकी ६० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. एकूण ३० प्रभागांसाठी होणार्‍या या निवडणुकीत ९ प्रभागांत दुरंगी, १३ प्रभागांत तिरंगी, ६ प्रभागांत चौरंगी, १ पंचरंगी व एका प्रभागात सहा उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अखेरच्या चित्राअंती ही लढत बाबूशसमर्थक पॅनल पणजी विकास आघाडी, भाजप समर्थक पणजी फर्स्ट आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांतच होणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी एकच रांग लागली होती. त्यात तब्बल ६० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने प्रभागांचे चित्र स्पष्टच झाले.दरम्यान, जादा उमेदवार रिंगणात उतरल्यास मतांचे विभाजन होण्याची शक्यता होती. कोणत्याही पद्धतीत पणजी महापालिकेत यंदा चांगले उमेदवार निवडून यावेत अशी इच्छा बहुतांश इच्छुकांनी व्यक्त करून आपले अर्ज मागे घेतल्याचे दिसून आले. पणजी मतदारसंघावर आपली पकड मिळवण्यासाठी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेचीच बनवली आहे. पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी मात्र पणजीतील मतदार सूज्ञ आहेत, तेव्हा महापालिका निवडणूकीद्वारे या सुंदर शहराचे भवितव्य ते योग्य पद्धतीने ठरवणार आहेत, असा विश्‍वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे समर्थन लाभलेल्या उमेदवारांनी मात्र बाबूश पॅनलसमोर जोरदार आव्हान उभे करून त्यांना दणका देण्याचीच व्यूहरचना आखल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या अंतिम प्रभागांतील उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.
दुरंगी लढत
प्रभाग-४ः प्रभाकर डोंगरीकर व कॅरोलिना पो, प्रभाग-५ः शीतल नाईक व शुभदा शिरगावकर, प्रभाग-७ः मारिया आल्मेदा व श्‍वेता लोटलीकर, प्रभाग-१२ः प्रसाद आमोणकर व वैदही नाईक, प्रभाग-१५ः शेखर डेगवेकर व मंगलदास नाईक, प्रभाग-२२ः हेमा चोपडेकर व माया तळकर, प्रभाग-२५ः शुभदा धोंड व नमिता नार्वेकर, प्रभाग-२७ः शुभम चोडणकर व सुरज कांदोळकर, प्रभाग-२८ः निवेदिता नाईक चोपडेकर व सुजाता हळदणकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
तिरंगी लढत
प्रभाग-१ः लोबो डिसोझा, नॅटी पो व किरण जांबावलीकर, प्रभाग-६ः आलेक्स फेलिझादो, बेंटो सिल्वेस्टर व अनंत शेणई गायतोंडे, प्रभाग-८ः तुकाराम चिनावर, दुर्गा केळुस्कर व टोनी रॉड्रिगीस, प्रभाग-९ः सुरेंद्र फुर्तादो, सुदिन कामत व डॉम्नीक रॉड्रिगीस, प्रभाग-१०ः रूथ फुर्तादो, माया जोशी व तोशा खुराडे, प्रभाग-११ः मनोज पाटील, मखिजा पिंटो व ऍश्‍ली रोझारीयो, प्रभाग-१३ः भारती हेबळे, मंगला कारापुरकर व सिमा पेडणेकर, प्रभाग-१९ः अशोक नाईक, यतीन पारेख व प्रसाद सुर्लेकर, प्रभाग-१६ः पास्कॉला मास्कारेन्हास, सतिशा शिरोडकर व निना सिलीमखान, प्रभाग-१७ः नीलेश खांडेपारकर, उदय मडकईकर व प्रजोत वायंगणकर, प्रभाग-२१ः महेश चांदेकर, गंगाराम काळे, केदार शिरगांवकर, प्रभाग-२३ः रूद्रेश चोडणकर, शैलेश उगाडेकर व सत्चीत वायंगणकर, प्रभाग-२९ः वनिता फर्नांडिस, प्रतिमा होबळे व याधव नाईक यांच्यात लढत होणार आहे.
चौरंगी लढत
प्रभाग-३ः सॅबेस्तीयानो बर्रोटो, मार्गारिटा कोएलो, रोझारीया पो, ग्लोरीया पो, प्रभाग-१९ः डियोदिता डीक्रुझ, नीता गायतोंडे, विरा नूनीस, मारिया पॅरेरा, प्रभाग-२०ः अविनाश भोसले, सुरज कांदे, विरेन महाले व कृष्णा शिरोडकर, प्रभाग-२४ः जितेंद्र केणी, दिक्षा माईणकर, मोहनलाल सरमळकर व मंदा शेटये, प्रभाग-२६ः ऑस्कर कुन्हा, रूई फेरेरा, एडवर्ड डेनीस व प्रेमानंद नाईक, प्रभाग-३०ः रूपेश हळर्णकर, श्यामसुंदर कामत, विविना नास्नोडकर व आयरिश रॉड्रिगीस यांच्यात लढत होईल.
पंचरंगी लढत
प्रभाग-१४ः समीर च्यारी, रत्नाकर फातर्पेकर, लक्ष्मण खराडे, रविश खराडे व सीताराम नाईक हे भिडणार आहेत. सहारंगी लढत
एकमेव प्रभाग-२ः नाझारेथ काब्राल, नेल्सन काब्राल, इव्हारीस्टो फर्नांडिस, रवींद्र कुर्टीकर, राजू मार्टीन्स व महेश शिरोडकर हे सहा उमेदवार रिंगणात आहेत.

अपना घरमधून दोन मुलांचे पलायन

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
अपना घर येथून दोन मुलांनी आज पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकट्याला पकडण्यात येथील कर्मचार्‍यांनी यश मिळवले तर दुसरा पळ काढण्यात यशस्वी ठरला. पकडण्यात आलेल्या मुलाला रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे.
मडगाव येथे एका घरफोडी प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोन मुलांनी आज अपना घरमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात एकटा निसटला तर त्याचा दुसरा साथीदार मात्र पळून जाण्यास अपयशी ठरला. त्याला वेळीच येथील कर्मचार्‍यांनी पकडण्यात यश मिळवले. अपना घर मधून पळून जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी वाढले होते. अलीकडे हे प्रमाण कमी झाले असतानाच आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा या प्रकाराला उजाळा मिळाला आहे. पकडण्यात आलेल्या मुलाला उद्या रिमांडसाठी हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सावरकर साहित्य संमेलन आज

कुंकळ्ळीकरीणीच्या सान्निध्यात सुरू
मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई व गोव्याचे कला व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जनसेवा मंडळ केपे आयोजित सावरकर साहित्य संमेलन उद्यापासून सुरू होत आहे. सदर संमेलन २४ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या दशकपूर्ती वर्धापनदिनानिमित्त फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण साहित्य नगरीतील खंडराय सभागृहात सुरू होत आहे.
सकाळी ९-३० वा. ग्रंथदिंडी निघेल व १०-३० वा. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते संमेलनाचे होईल. संमेलनाचे अध्यक्ष तथा मुंबईतील सव्यसाची पत्रकार अरविंद कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती राहील. नंतर मुंबईतील खासदार तथा पत्रकार भरतकुमार राऊत यांचे हिंदू राष्ट्रवाद व अल्पसंख्याकांची मानसिकता या विषयावर व्याख्यान होईल.
दुपारच्या सत्रांत डॉ. अशोक मणगुतकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. दिलीप बेतकीकर यांचे ‘सावरकरांचा राष्ट्रवाद व गोमंतकीय ’या विषयावर तर नंतर ‘गोमंतकांतील मराठीची सद्यःस्थिती आणि भवितव्य’ या विषयावर प्रा. अनिल सामंत यांची व्याख्याने होतील.
सायंकाळी ४ वा. लोकनृत्यस्पर्धा व नंतर ७ वा. सावरकर विषयक गीतांचा कार्यक्रम बिंदिया वस्तू व सहकारी सादर करतील.
रविवारी २७ रोजी सकाळी ९-३० वा. विद्यार्थ्यासाठी प्राथमिक गटात वेशभूषा तर माध्यमिक गटात देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा घेतल्या जातील. ११-३० वा. शंकर दत्तात्रेय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश प्रभुणे यांचे ‘सामाजिक समरसता व सावरकर’ या विषयावर तर नंतर प्रभाकर अनंत संत यांच्या अध्यक्षतेखाली गिरीश दाबके हे ‘सावरकर विचारांपुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्याने होतील.
दुपारी २-३० वा. मुंबईतील हौशी महिला कलाकार मंचातर्फे ‘अग्निकुंड’ हा सावरकरांच्या जीवनावरील सांस्कृतिक कार्यक्रम तर ४ वा. ‘झिंजिर झिंजिर सांज’ हे विष्णू सूर्या वाघ यांचे कविता सादरीकरण होईल.
त्यानंतर सायंकाळी ५ वा. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत समारोप सोहळा होईल. संमेलनाच्या जागृतीसाठी बुधवारी संपूर्ण केपे तालुक्यात काढलेल्या जागृती यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणार्‍या शिक्षकांना शिक्षण खात्याने खास परवानगी देताना त्या दिवसातील त्यांची शाळांतील अनुपस्थिती ही कामावरील हजेरी मानावी असे परिपत्रक जारी केल्यामुळे बरेच शिक्षक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

चिखली अपघातात तीन गंभीर जखमी


स्थानिकांकडून टँकरची नासधूस

वास्को, दि. २५(प्रतिनिधी)
आज (दि.२५) रात्री उशिरा चिखली येथे टँकर व दोन मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जोडपे व एक युवक गंभीररित्या जखमी झाले. वाडे येथे राहणारा नरेंद्र सिंग (४८) व त्यांची पत्नी इंदू (४२) घरी परतत असताना टँकरने त्यांना मागून धडक दिली. त्यानंतर समोरून येणार्‍या मडगाव येथील जोझेफ कॉस्ता (२३) याच्या दुचाकीला जबर धडक दिली. सदर अपघातानंतर येथे असलेल्या संतप्त जमावाने टँकर चालकाची धुलाई करून टँकरची नासधूस केली.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज रात्री ८.३० च्या सुमारास सदर अपघात घडला. नरेंद्र सिंग व त्यांची पत्नी ही दोघेही ‘स्प्लेंडर दुचाकीने (जीए ०८ एल १८७०) घरी येत असताना चिखली जंक्शनच्या पूर्वी असलेल्या रस्त्यावर ते पोहोचले असता मागून येणार्‍या टँकरने (जीए ०१ झेड २७१५) त्यांना जबर धडक दिली. त्यामुळे उभयता रस्त्यावर कोसळली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. सिंग यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर पुढच्या बाजूने येणार्‍या जोझेफ कॉस्ता यांच्या ‘एफ. झी’ दुचाकीला (जीए ०६ सी ४१२८) सदर टँकरने जबर धडक दिली. सदर भीषण अपघातात एक जोडपे व जोझेफ हा युवक गंभीर जखमी झाली. हे वृत्त कळताच स्थानिकांनी तिघांनाही त्वरित चिखलीच्या एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर स्थानिकांनी प्रथम टँकरची नासधूस केली. त्यानंतर टँकरचालक अनिल कुमार सिंग याचीही धुलाई केली.
वास्को पोलिसांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. त्यांनी नंतर टँकर चालकाला ताब्यात घेतले. वास्को पोलिसांच्या माहितीनुसार तिघा जखमींची प्रकृती गंभीर आहेत. वास्को पोलिस सदर अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.

ममतांचे ‘बंगाल’मयरेल्वेअंदाजपत्रक

• ऑनलाईन एसी तिकीट बुकिंग २० ऐवजी १० रुपयांत
• ५६ नवीन एक्सप्रेसतर १३ नवीन पॅसेंजर गाड्या
• गोव्यासाठी नवीन दोन रेल्वे

नवी दिल्ली, दि. २५
मागील दोन रेल्वे अंदाजपत्रकांप्रमाणेच यंदाही रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोणतीही प्रवासी वा मालवाहतूक भाड्यात दरवाढ केली नाही. मात्र, दरवाढ न करण्याच्या मखमली शालजोडीखाली त्यांनी उर्वरित देशाच्या तोंडाला पाने पुसत पश्‍चिम बंगालच्या पारड्यात मात्र भरभरून गाड्या आणि प्रकल्पांचे दान टाकले. मात्र गोव्यासाठी वास्को - वालंकनी आणि पोरबंदर - कोझिकोड या दोन नवीन रेल्वे वगळता तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील ठाकुर्ली येथे एका वीजप्रकल्पाची योजना त्यांनी दिली. पण, प्रत्यक्षात मागील अंदाजपत्रकातील आश्‍वासने पूर्ण न करता पश्‍चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी तोट्यातील रेल्वेचे ‘बंगाल’मय अंदाजपत्रक आज लोकसभेत सादर केले.
दरवर्षीप्रमाणे यंदा मात्र विरोधी पक्षांनी अन्य राज्यांशी होत असलेला हा पक्षपात सहन केला नाही आणि ममतांच्या या ‘विशेष बंगाल प्रेमा’वर तीव्र आक्षेप घेत काहीवेळासाठी अंदाजपत्रकाचे भाषण त्यांनी बंद पाडले. संपुआ सरकारमधील रेल्वेमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचे हे तिसरे अंदाजपत्रक होते. आज सकाळी अंदाजपत्रकाच्या शबनम बॅगसह त्या लोकसभेत दाखल झाल्या तेव्हा यावर्षी तोट्यातील रेल्वेचा उद्धार त्या कसा करतात, याकडे सार्‍यांचेच लक्ष लागले होते.
पश्‍चिम बंगालला एरवीही झुकते माप देणार्‍या दीदींनी तेथील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन यंदाचे अंदाजपत्रक तयार केल्याचे स्पष्ट दिसून आले. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी पश्‍चिम बंगालबाबत अनेक नव्या योजनांची घोषणा केली. पश्‍चिम बंगालच्या सिंगूरनजीक मेट्रो कोच ङ्गक्टरी उभारली जाणार आहे. राज्यातील उलूबेरिया येथे ट्रॅक मशीन उद्योगाची स्थापना केली जाणार असून, दार्जिलिंगमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेन्टचे काम सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील ठाकुर्ली येथे ७०० मेगावॅट गॅसआधारित वीजप्रकल्पाची स्थापना केली जाणार असल्याचीही घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.
यंदा सामान्यांवर कोणताही बोजा टाकणार नाही, असे ममतांनी यापूर्वीच म्हटले होते. त्यानुसार त्यांनी २०११-१२ या वर्षासाठी कोणतीही ठोस तिकीट दरवाढ सुचविलेली नाही. यापुढे रेल्वेच्या सर्व योजना पंतप्रधान रेल्वे विकास योजनेंतर्गत संचालित होणार आहेत. विशेष म्हणजे, रेल्वेमध्ये अडचणी न आणणार्‍या राज्यांना अतिरिक्त दोन रेल्वे योजना आणि दोन रेल्वेगाड्या दिल्या जाणार असल्याचीही आगळी-वेगळी घोषणा ममतादीदींनी केली.
५६ नव्या एक्सप्रेस गाड्यांसह ९ दूरान्तो आणि ३ शताब्दी एक्सप्रेसचीही घोषणा यंदाच्या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. याशिवाय तिकीट दरातील सवलतीसाठीची वयोमर्यादा महिलांसाठी दोन वर्षांनी कमी करण्यात आली आहे. आता ५८ वर्षांच्या महिलांनाही तिकीटदरात ज्येष्ठ नागरिकांसाठीची सूट मिळू शकणार आहे. तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात देण्यात येणारी सूट ३० टक्क्यांहून ४० टक्के करण्यात आली आहे. यापुढे कीर्ती आणि शौर्यचक्रविजेते तसेच अपंगांना राजधानी आणि शताब्दीतही सवलत मिळू शकणार आहे. एवढेच नव्हे तर अशोकचक्र आणि परमवीरचक्र विजेत्या अविवाहित शहिदांच्या माता-पित्यांना प्रवासासाठी विशेष पास दिला जाणार आहे. लष्करातील सुमारे १६ हजार माजी सैनिकांना मार्चपासून रेल्वेत सामावून घेण्याचीही घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली.

गोव्याला वाटाण्याच्या अक्षता ः आर्लेकर
वास्को, (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वषार्ंपासून वास्कोतील बहुतेक नागरिकांची वास्को मिरज मार्गावर तीन ते चार रेल्वे सुरू करण्याची मागणी आहे, मात्र यंदाही ती पूर्ण झाली नाही. वास्को रेल्वे स्थानकावरून आठवड्यात फक्त एकदा वालंकनीसाठी (केरळ) रेल्वे सुरू करून केंद्र सरकारने स्थानिक जनतेच्या मागणीला वाटाण्याची अक्षता लावल्याची टीका भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी केली आहे.
रेल्वे मंत्रालयाने ह्या वर्षाचा अर्थसंकल्पात जाहीर केल्यानंतर वास्कोवासीयांना पुन्हा एकदा रेल्वे मंत्रालयाने मागे ठेवल्याची प्रतिक्रिया श्री. आर्लेकर यांनी दिली. मिरज रेल्वेच्या मागणीकडे दुर्लक्ष का केले असा सवाल श्री. आर्लेकर यांनी केला आहे. रेल्वे मार्ग रुंदीकरणापूर्वी (ब्रॉडगेज) वास्को रेल्वे स्थानकावरुन मीरजच्या बाजूने दिवसाला तीन ते चार रेल्वे जात होत्या मात्र आता वास्कोतून दिवसाला एकच (गोवा एक्सप्रेस) रेल्वे मिरजच्या बाजूने जात असल्याने येथील जनतेची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे श्री. आर्लेकर यांनी सांगितले. वास्कोतील जनतेची मागणी ओळखून वास्को मिरज रेल्वे सुरू करावी अशी मागणी श्री. आर्लेकर यांनी केली आहे.


गोमंतकीयांची नवीन
रेल्वेमुळे सोय ः मुख्यमंत्री
पणजी, दि. २५
वास्को रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढवून ते आदर्श केले जाईल असे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेल्या घोषणेबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. वास्को ते वालंकणी साप्ताहिक रेल्वेमुळे तसेच पोरबंदर ते कोझिकोडे या दोन रेल्वेंमुळे गोमंतकीयांची मोठी सोय झाली आहे असे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. प्रवासी आणि भाडे यात वाढ न करता महसुलात वृद्धीच्या रेल्वेमंत्र्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी यामुळे उतारुंना दिलासा मिळेल असे म्हटले आहे.

‘अर्थसंकल्प गोव्यासाठी निराशाजनक’
आज (दि.२५) केंद्राने जाहीर केलेल्या केल्वे अर्थसंकल्प हा गोव्यासाठी अतिशय निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया मडगाव सीनियर सिटीझनचे तुळशीदास मळकर्णेकर यांनी व्यक्त केली आहे.
श्री. मळकर्णेकर यांनी या अर्थसंकल्पाबाबत बोलताना पुढे सांगितले की, बंगालमध्ये येत्या काळात होणारी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र याचवेळी त्यांनी कोणत्याही प्रकारे तिकीटदरवाढ न केल्याने सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ व्यक्तींसाठी तिकीटांमध्ये ४० टक्के तर ५८ वर्षांच्या महिलांनाही आता प्रवासात सवलत केली आहेत. त्याबाबत श्री. मळकर्णेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकांच्या जिवाशी खेळ नको


‘पीएसी’ बैठकीत अधिकार्‍यांना खडसावले

खनिज वाहतूकीविरोधातील कारवाईवर
नजर ठेवण्यासाठी उपसमिती स्थापन


पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
राज्यातील बेकायदा खाणींमुळे खनिज वाहतुकीवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. सांगे, कुडचडे, सावर्डे आदी भागांत स्थानिक लोकांचे जगणेच हैराण बनले आहे. या परिस्थितीत सरकारी यंत्रणेकडून कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणे गरजेचे बनले आहे. लोकांच्या जिवाशी खेळ मांडू नका, अन्यथा त्याचा उद्रेक होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देत लोकलेखा समितीने खाण, वाहतूक, पोलिस व जिल्हाधिकारी अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले आहे.
आज लोकलेखा समितीची (पीएसी) बैठक विधानसभा संकुलात झाली. या बैठकीला खाण, वाहतूक, पोलिस खात्याचे अधिकारी तसेच दोन्ही जिल्हाधिकार्‍यांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी विविध भागात बेफाम खनिज वाहतुकीविरोधात जनतेच्या उठावाचा विषय चर्चेस घेण्यात आला. खनिज वाहतुकीचा ताण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की येथील स्थानिक लोकांना श्‍वास घेणेही कठीण बनले आहे. रस्त्याची रुंदी व त्यात ट्रकांची वाढती संख्या लक्षात घेता परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक बनले आहे. खाण तथा वाहतूक कायद्यात अनेक तरतुदी असून त्याचा योग्य पद्धतीने उपयोग करून या परिस्थितीवर काबू ठेवणे गरजेचे आहे व त्यासाठी जिल्हाधिकारी तसेच पोलिसांची मदत घेता येईल, अशी सूचना समितीकडून करण्यात आली. २००३-०५ या काळातील महालेखापाल अहवालात सुमारे एक कोटी टन खनिजावरील रॉयल्टीचा हिशेब मिळाला नसल्याची नोंद झाली होती व त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. मुळातच खाण खात्याला कायदेशीर खाणींवर नियमन घालणे शक्य झालेले नाही व त्यामुळेच बेकायदा खाणींचा उद्रेक सुरू आहे. राज्यातील कायदेशीर खाणींची ओळख पटवल्यानंतरच बेकायदा खाणी आपोआपच उघड होतील, असा सल्लाही समितीचे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी दिला. खाण कायद्यात आवश्यक तरतुदी असून त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होण्याची गरज आहे. बहुतांश ट्रक चालकांकडे वाहन चालक परवाना नसल्याचे आढळून आले आहे. विविध खाण प्रभावित भागांत हे ट्रक यमदूत बनूनच धावतात व त्यामुळे पहिल्यांदा विनापरवाना चालकांवर कारवाई होण्याची गरज आहे. काही ठिकाणी दिवसाकाठी १५ हजार ट्रक धावतात, असे आढळून आले आहे. दरम्यान, सुरुवातीला काही निवडक भागांत खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची पद्धत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात सांगे, रेवण, किर्लपाल आदी भागांचा समावेश आहे. यासंबंधी सुरू होणार्‍या कार्यपद्धतीवर नजर ठेवण्यासाठी फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपसमिती नेमण्याचाही निर्णय झाला आहे. खनिज वाहतुकीचा हा विषय हाताळण्यासाठी विशेष पोलिस उपअधीक्षकांची नेमणूक करण्याचीही शिफारस समितीने केली आहे.

Friday, 25 February, 2011

‘इफ्फी २००४’ प्रकरणी पर्रीकर निर्दोष

सीबीआयकडून फाईल बंद
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): ‘इफ्फी २००४’प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या विरोधातील ‘सीबीआय’ चौकशी पूर्ण झाली आहे. याप्रकरणी पर्रीकरांच्या विरोधात कोणतेही सबळ पुरावे आढळून आले नाहीत व त्यामुळे हे प्रकरण बंद करण्याची शिफारस गृह मंत्रालयाने केल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी राज्यसभेत दिली. गत विधानसभा अधिवेशनात ‘पीएसी’ अर्थात लोकलेखा समितीने सादर केलेल्या अहवालात श्री. पर्रीकर यांना ‘क्लीनचीट’ मिळाल्यानंतर आता ‘सीबीआय’ चौकशीतही त्यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब झाल्याने या प्रकरणाचा बाऊ करून पर्रीकरांना लक्ष्य करू पाहणारे कॉंग्रेस नेते सपशेल तोंडघशी पडले आहेत.
राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी यासंबंधीचा प्रश्‍न विचारला असता केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी ही माहिती दिली. ‘सीबीआय’ने या संबंधीची चौकशी पूर्ण केली असून सबळ पुराव्याअभावी याप्रकरणी फौजदारी खटला दाखल करणे शक्य नसल्यानेच हे प्रकरण बंद करण्याचा अहवाल दिल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. राज्यात २००४ साली पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. तत्कालीन भाजप सरकारचे नेतृत्व करणारे मनोहर पर्रीकर यांनी विक्रमी काळात पायाभूत सुविधा उभारून सर्वांचीच वाहवा मिळवली होती. दरम्यान, या पायाभूत सुविधांच्या व्यवहारांबाबत महालेखापालांनी आपल्या अहवालात काही आक्षेपार्ह नोंदी केल्या होत्या. या अहवालाचे निमित्त साधून माजी वीजमंत्री मावीन गुदिन्हो यांनी पर्रीकर यांच्या विरोधात ‘सीबीआय’कडे तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला या तक्रारीची चौकशी करण्यास ‘सीबीआय’कडून नकार दर्शवण्यात आला परंतु त्यानंतर माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारने २००७ सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नव्याने ‘सीबीआय’कडे सोपवले होते. गेली तीन वर्षे या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडून सुरू होती. २००४ साली ‘इफ्फी’संबंधी स्थापन करण्यात आलेल्या १२ सदस्यीय ‘कोअर’ समितीच्या सर्व सदस्यांची जबानी ‘सीबीआय’तर्फे नोंदवण्यात आली होती. एकूण ३५ जणांची चौकशी करण्यात येत असल्याचे ‘सीबीआय’ने सांगितले होते.
मुळातच ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा आरोप पर्रीकर यांनी केला होता. ‘इफ्फी’ २००४ च्या सर्व पायाभूत सुविधांबाबतचे निर्णय मंत्रिमंडळाने घेतले होते व या सर्व कामांत संपूर्ण पारदर्शकता अवलंबिण्यात आली होती, असेही त्यांनी म्हटले होते. या चौकशीला पूर्ण सहकार्य देण्याची तयारी दर्शवून ‘सीबीआय’कडून या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, आपण या प्रकरणातून सहीसलामत सुटणार ही पर्रीकरांची भविष्यवाणी अखेर खरी ठरली आहे. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्या उत्तराने शांताराम नाईक यांचे मात्र समाधान झाले नसून त्यांनी या निर्णयाला विरोध करण्याचे ठरवले आहे.
सत्यमेव जयतेः राजेंद्र आर्लेकर
‘सीबीआय’ चौकशीत मनोहर पर्रीकर यांच्या निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब झाल्याने सत्याचाच विजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी दिली. मुळातच २००४ साली ‘इफ्फी’चे आयोजन करण्यासाठी पर्रीकरांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांची राज्यभरात तसेच राष्ट्रीय पातळीवरही स्तुती झाली होती. याच सुविधांच्या आधारे अजूनही गोव्यात ‘इफ्फी’चे आयोजन केले जाते हे देखील तेवढेच खरे आहे. पर्रीकरांविरोधात ‘सीबीआय’ तक्रार दाखल करून त्यांना लक्ष्य बनवण्याचा कॉंग्रेस नेत्यांचा हा डाव आता सपशेल फोल ठरल्याने ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित होती याचा पर्दाफाश झाल्याचेच उघड झाले, असेही श्री. आर्लेकर म्हणाले. भाजप सरकारच्या काळात श्री. पर्रीकर यांनी भ्रष्ट कॉंग्रेस नेत्यांविरोधात जोरदार मोहीम उघडून काही नेत्यांना तुरुंगाची हवा खायला भाग पाडले होते. याचा वचपा काढण्यासाठीच त्यांच्या मागे हा ‘सीबीआय’चा ससेमिरा लावण्यात आला. श्री. पर्रीकर यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणांत ‘सीबीआय’ चौकशीला पूर्णपणे सहकार्य दिले व आपल्या लढवय्या वृत्तीचे दर्शन घडवले, असेही ते म्हणाले.

कॅसिनोंची महाविद्यालयातही ‘घुसखोरी’

साळगावकर कॉलेज विद्यार्थी मंडळाकडून
रॉयल कॅसिनोची जोरदार जाहिरातबाजी

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाने कला अकादमीत ‘तत्त्व’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे दोन दिवस आयोजन केले असून हा कार्यक्रम रॉयल कॅसिनोने पुरस्कृत केला आहे. काल (दि.२३) व आज (दि.२४) असे दोन दिवस हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींनी रॉयल कॅसिनोची ‘टी शर्ट’ परिधान करून कॅसिनोची जाहिरात करत आहेत. त्यामुळे आजची तरुण पिढी नक्की कोणत्या दिशेने जात आहे याचा प्रत्ययच त्यामुळे आला आहे. गोमंतकीय देशप्रेमी नागरिकांनी या प्रकारावर कडक ताशेरे ओढत हा प्रकार म्हणजे येथील गोमंतकीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.
कॅसिनोला गोमंतकातील सुजाण नागरिकांकडून जोरदार विरोध होत असताना सरकारच्या आशीर्वादाने या कॅसिनोच्या बोटींनी मांडवीत आपले बस्तान मांडून मांडवीच्या सौंदर्यावर काळा डाग लावलेला आहे. शिवाय त्याचसोबत गोव्यात येणारे पर्यटक आणि गोमंकीयांना अधोगतीकडे नेण्याचे कामही करत आहेत.
कालांतराने लोकांना वस्तुस्थितीची जाणीव होऊन यदाकदाचित कॅसिनोंचा बाजार बंद करावा लागेल म्हणूनच आपली पाळे गोमंतक भूमीत घट्ट करण्याचा प्रयत्न कॅसिनोकडून होत आहे. त्यातीलच हा प्रकार आहे. त्यासाठी कॅसिनो पुरस्कृत गजलसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमांना भरपूर आर्थिक मदत करणे असे उपाय योजले जात आहेत. परंतु पैसे घेणार्‍या विद्यार्थ्यांना किंवा त्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनाही कॅसिनोच्या बाबतीत जाण नाही काय? असा प्रश्‍न सदर नागरिकांनी उपस्थित केला आहे. आज जागे नाही झालो तर उद्या रडण्याची वेळ येईल कारण उद्याच्या वाईट दिवसांचे आज मिळणारे हे संकेत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे चांगली गोष्ट असली तरी त्या कार्यक्रमातून समाजाला चांगला संदेश जातील याचे भान नको का? कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे अजाण तर नक्कीच नाहीत मग त्यांनी अशी दुर्बुद्धी का सुचावी याचा विचार होणे आवश्यक आहे.

मांडोप नावेलीत स्फोट

• बंद सदनिकेतील प्रकार • ५ लाखांचे नुकसान
मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी): मांडोप नावेली येथील एका बंद सदनिकेत आज पहाटे अडीचच्या सुमारास शक्तिशाली स्फोट होऊन आतील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू खाक झाल्या. त्यामुळे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले. मात्र हा स्फोट नेमका कसा झाला ते कारण उघड होऊ शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सय्यद नौशाद यांची सदर सदनिका असून ते बंगलोरमध्ये गेलेले असल्याने सध्या ती बंद आहे. पहाटे झालेल्या शक्तीशाली स्फोटाने परिसर हादरला व तेथील रहिवाशांमध्ये घबराट माजली. स्फोटानंतर तेथे आग लागली व लोकांनी अग्निशामक दलाला कळविल्यानंतर त्यांनी त्वरित दाखल होऊन ती विझविली.
आगीत टीव्ही, फर्निचर व अन्य वस्तू जळाल्या आहेत तर भिंतींना तडे गेलेले आहेत व त्यावरून स्फोटाची तीव्रता लक्षात येते. सदनिकेत गॅस सिलींडर होता पण तो सुस्थितीत असल्याने त्याची गळती होऊन त्यातून गळती होऊन स्फोट झाल्याची शक्यता नसल्याचे दलाच्या सूत्रांनी सांगितले. अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन व सहसंचालक प्रकाश परब यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पहाणी केली व तपासकामात मार्गदर्शन केले.
मडगाव पोलिसांनीही याप्रकरणी तपास सुरु केला आहे व त्यासाठी बॉंब विल्हेवाट पथक तसेच स्फोटक शोधासाठी आणलेल्या खास उपकरणाची मदत घेऊन तपासणी केली. मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार घडला तेव्हा मडगाव पोलिस स्थानकावरील उपनिरीक्षक नीलेश धायमोडकर हे तेथून जवळच असलेल्या एका मंदिराकडे गस्तीवर गेले होते व तेथे असतानाच त्यांना या स्फोटाची वर्दी मिळाली. त्यांनी त्वरित तेथे धाव घेतली व आज दिवसभर त्यांनी तेथेच थांबून तपास केला.
सदनिकेतील बैठकीच्या खोलीचीच स्फोटाने जास्त दुर्दशा झालेली आहे. स्वयंपाकघरात असलेल्या सिलींडरचा रेग्युलेटर चालू होता व त्यामुळे गॅसची गळती झाली व तो बैठकीच्या खोलीत पसरून स्फोट झाला असावा असा एक संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी असाच एक प्रकार मिरामार येथे व दुसरा रिवण येथे झाला होता. मात्र नौशाद हे बंगलोरहून परतल्यावरच याबाबत नक्की माहिती मिळेल.
मांडोप नावेली येथील हा प्रकार म्हणजे बॉंबस्फोट असल्याची भीती प्रथम व्यक्त केली जात होती पण पोलिसांनी ती फेटाळून लावलेली आहे व आजच्या तपासणीत या संशयाला पुष्टी देणारे काहीच सापडले नसल्याचे सांगितले.

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उच्च न्यायालयाचा अवमान

सेझा गोवा पीग आयर्न प्रकल्प विस्तारीकरणाच्या जनसुनावणीस हरकत
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): आमोणे येथील सेझा गोवा कंपनीच्या पीग आयर्न प्रकल्पाच्या विस्तारीकरणासंबंधी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून येत्या २८ फेब्रुवारी २०११ रोजी घाईगडबडीत आयोजित केलेली सार्वजनिक जनसुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे अवमान करणारीच ठरली आहे. त्यामुळे ती तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी तक्रार रामकृष्ण कामत यांनी केली आहे. जोपर्यंत प्रादेशिक आराखडा निश्‍चित होत नाही तोपर्यंत कोणतेही विस्तारीकरण, दुरुस्ती अथवा स्थलांतराबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात यावा तसेच त्यासंबंधीची माहिती ऍमीकस क्यूरी असलेल्या नॉर्मा आल्वारीस यांनाही देण्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सेझा गोवा कंपनी आमोणे येथील आपल्या पीग आयर्न प्रकल्पाचे २९२,००० टीपीए वरून ५००,००० टीपीए क्षमता वाढवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, सुरुवातीला मंडळातर्फे २७ जानेवारी २०११ रोजी जनसुनावणीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ही जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी एक महिना अगोदर पर्यावरण प्रभाव आढावा अहवाल स्थानिक पंचायतीला देणे गरजेचे असते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ही सुनावणी आता पुढे ढकलून ती २८ फेब्रुवारी २०११ रोजी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांत अशा विस्तारीकरणासंबंधी न्यायालयाची परवानगी घेण्यास सांगितले आहे. सध्याच्या जनसुनावणीची कोणतीही माहिती उच्च न्यायालयाला दिली नाही तसेच यासंबंधी नॉर्मा आल्वारीस यांनाही कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचे श्री. कामत यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निवाड्यात सरकारी तथा कोमुनिदाद जमिनींच्या संरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोव्यात सेझा गोवातर्फे विस्तारीकरण करीत असलेली जागा ही कोमुनिदादची असल्याने याची दखल घेऊन कोमुनिदादकडूनही या जनसुनावणीला हरकत घेण्यात आल्याची खबर आहे. या विस्तारीकरणामुळे आमोणे भागातील लोकांना प्रदूषणाच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे व त्याचा धोका लक्षात घेऊनच येथील लोकांचा या विस्तारीकरणाला विरोध आहे. सेझा गोवा कंपनीकडून काही स्थानिक लोकांना या प्रकल्पाचे समर्थन करणारे पत्रके वाटण्यात येत असून त्यावर स्थानिकांच्या सह्या घेऊन ही पत्रके प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दिली जात असल्याचीही खबर मिळाली आहे. सरकारने यासंबंधी जनतेला विश्‍वासात न घेता अजिबात पुढे जाता कामा नये, अन्यथा येथील लोकांना रस्त्यावर उतरणे भाग पडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

आणखी एका वित्तीय कंपनीचा गंडा

‘जीई’ कंपनी’ची मध्यस्थी
वकिलांना महागात

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): ‘जीई मनी फायनान्शिअल सव्हिर्र्सेस लि’ या खाजगी वित्तीय कंपनीच्यावतीने आपल्या थकबाकीदारांना कर्जासंबंधी समेट घडवून आणण्यासाठी ऍड. रविराज चोडणकर यांच्या कार्यालयात आज बोलावले असता उपस्थित लोकांनी कंपनीच्या खोटारडेपणाचे पाढेच वाचून दाखवले. त्यामुळे ऍड. चोडणकर यांनाच भंडावून सोडण्याचा प्रकार इथे घडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की ‘जीई मनी फायनान्शिअल सर्व्हिसेस लि’ या दिल्लीस्थीत एका खाजगी वित्तीय गुंतवणूक व पतसंस्थेने (ज्या कंपनीची गोव्यातील सर्व कार्यालये सध्या बंद करण्यात आली आहेत) १० वर्षापूर्वी गोमंतकीयांना मोठ्या प्रमाणात ‘विना जामीन’ विविध वस्तू खरेदी करण्यासाठी सहजपणे कर्जे उपलब्ध करून दिली. कंपनीच्या या भूलभुलैयेला बळी पडत अनेकांनी विना जामीन १० हजार ते ३० हजार रुपयांपर्यंतची कर्जे घेत फ्रिज, टीव्ही, दुचाकी आदी वस्तू खरेदी केल्या. विविध वस्तूंच्या शोरूममध्येही या कंपनीचे प्रतिनिधी कर्ज देण्यासाठी बसले होते. दरम्यान, या कर्जाच्या वसुलीसाठी तेवढ्याच रकमेचे धनादेश कंपनीकडून घेण्यात आले होते. बहुतांश ग्राहकांच्या बँक खात्यातून हे सर्व धनादेश वठले असताना सुमारे ४०० लोकांना अचानक नोटिसा पाठवून थकबाकी वसुलीसाठी ऍड. चोडणकर यांच्याशी समेटासाठी बोलावण्याचा प्रकार घडल्याने हे ग्राहक बरेच संतापले आहेत. या नोटिसा ‘लिगम असोसिएट्स’ नामक कंपनीतर्फे ऍड. राजीव नारायणन् यांच्या नावे पाठवण्यात आल्याचे आढळून आले. या कंपनीचे मुख्य कार्यालय पणजीत ‘आयसीआयसीआय’ बँकेमागे होते परंतु गेले काही महिने झाले ते बंद करण्यात आले आहे. आता या कंपनीचे एकही कार्यालय गोव्यात नसून या कंपनीतर्फे एका वेगळ्याच कंपनीला वसुलीचे कंत्राट दिल्याची खबर आहे.
आज या नोटिसा मिळालेल्या सुमारे १२० जणांच्या जमावाने ऍड. चोडणकर यांच्या कार्यालयावर धडक दिली. ऍड. चोडणकर हे कार्यालयात अनुपस्थित होते परंतु सदर कंपनीचा प्रतिनिधी महादेव अनचाटे व ऍड. चोडणकर यांच्या साहाय्यकांवर ग्राहकांनी प्रश्‍नांचा भडिमार सुरू केला. कर्जाच्या वसुलीसाठी दिलेले सर्व धनादेश वठले असताना १० हजारांच्या कर्जावर २ लाख रुपये भरण्याची नोटीस पाठवलीच कशी? असा सवाल करून काहींनी त्यांना चांगलेच फैलावर घेतले. यावेळी ग्राहकांनी ऍड. चोडणकर यांना बोलावून घेतले. ऍड. चोडणकर यांच्याकडे समेटासाठी चर्चा करण्याची जबाबदारी वसुली करणार्‍या कंपनीकडून दिली गेली असली तरी मूळ कंपनीबाबत ऍड. चोडणकर यांना कोणतीच माहिती नसल्याचे यावेळी दिसून आले. सदर वित्त कंपनीचे कार्यालय पणजीत आहे असे म्हणणार्‍या ऍड. चोडणकर यांचा दावा कंपनीचे प्रतिनिधी श्री. अनचाटे यांनी खोडून टाकल्याने बराच गोंधळ उडाला. या कंपनीशी झालेल्या व्यवहारांबाबत कोणती कागदपत्रे आहेत, असा प्रश्‍न केला असता यावेळी ऍड. चोडणकर मात्र अनुत्तरित बनले.
कर्ज न काढताच थकबाकीच्या नोटिसा
या बाबत चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे ज्या सुमारे ४०० लोकांना लाखो रुपयांची थकबाकी भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे त्यात अनेकांनी कर्जेच काढलेली नसल्याचे दिसून आले आहे. कर्ज न काढता मिळालेल्या या नोटिशीमुळे हे लोक बरेच आक्रमक बनले होते. याठिकाणी एका इसमाने कंपनीकडून ३० हजार रुपयांचे कर्ज घेऊन प्रत्येकी १८०० याप्रमाणे ३० धनादेश दिले होते. ही सगळी रक्कम फेडली असताना आता त्यांना आणखी ५० हजार रुपये भरण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस मिळालेल्या ग्राहकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले.
वकिलांच्या भूमिकेवर संशय
यावेळी लोकांनी उपस्थित केलेले मुद्दे खोडून टाकण्यासाठी धडपड करणारे ऍड. चोडणकर यांच्या भूमिकेवरच उपस्थित ग्राहकांनी संशय व्यक्त केला आहे. कंपनीच्या कर्जांसंबंधी समेट घडवून आणण्याचा अधिकार ऍड. चोडणकर यांना कुणी दिला व त्यासंबंधीचे पत्र दाखवा असा हट्ट धरला असता ते अनुत्तरित ठरले. दरम्यान, ऍड. चोडणकर यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला असता त्यांनी यासंबंधी पंधरा दिवसांत खुलासा करावा व सर्वांना एकत्रितपणे बोलवावे, असे लिहून घेण्यात आले. अन्यथा याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्याचा इशाराही या लोकांनी दिला आहे.

‘जेपीसी’ स्थापन

१९९८ पासूच्या दूरसंचार धोरणाची चौकशी होणार
३० सदस्यांचा समावेश

नवी दिल्ली, २४ ङ्गेबु्रवारी : २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने आज संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) गठित केली. याबाबतचा प्रस्ताव अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज लोकसभेत सादर केला. ही समिती १९९८ ते २००९ या कालावधीतील दूरसंचार धोरणांची सखोल चौकशी करणार आहे. या समितीत लोकसभेतील २० आणि राज्यसभेतील दहा अशा ३० सदस्यांचा समावेश राहणार आहे. ‘जेपीसी’च्या स्थापनेसाठी मुखर्जी प्रस्ताव सादर करीत असताना सरकार आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात देशाच्या तिजोरीला १.७६ लाख कोटी रुपयांचा ङ्गटका बसल्याचा अहवाल ‘कॅग’ने सादर केल्यानंतर देशभरात वादळ उठले होते. या घोटाळ्याचे सर्वेसर्वा ए. राजा यांना दूरसंचार मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक करून तिहार कारागृहात पाठविले. या घोटाळ्यातील सत्य बाहेर आणण्यासाठी भाजप आणि अन्य विरोधी पक्षांनी ‘जेपीसी’चाच आग्रह धरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची कोंडी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचीही कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेत अखेर सरकारने नमते घेत ‘जेपीसी’ गठित करण्यास सहमती दर्शविली.
ही समिती गठित करण्याबाबतचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी सादर केला. १९९८ पासून तर २००९ या कालावधीत दूरसंचार धोरण कसे होते, दूरसंचार परवाने आणि स्पेक्ट्रमचे वाटप तसेच शुल्क आकारणीची पद्धत काय होती आणि यात कोणत्या प्रकारचे गैरव्यवहार झाले, हा संपूर्ण तपास ‘जेपीसी’मार्ङ्गत करण्यात येणार आहे. ही समिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरीस आपला अहवाल सादर करणार आहे. टेलिकॉम परवान्यांचे वाटप आणि शुल्क आकारणीसाठी सरकारने जे निकष ठरवून दिले आहेत, त्याची योग्य अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत काही महत्त्वाच्या सूचना ही समिती सरकारला करणार आहे.
या समितीत एकूण ३० सदस्य राहणार असून, यात लोकसभेतील २० आणि राज्यसभेतील १० सदस्यांचा समावेश राहील. या समितीच्या स्थापनेमुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला सरकार आणि विरोधक यांच्यातील कोंडी कायमची सुटली आहे.
‘जेपीसी’च्या स्थापनेवरील चर्चेत मात्र सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. मुखर्जी यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी त्यांच्यावर पलटवार केला. सरकार विरोधकांना माओवादी समजून वागवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘जेपीसी’चे सदस्य
या ३० सदस्य ‘जेपीसी’मध्ये लोकसभेतील व्ही. किशोरचंद्र एस. देव, पवनसिंग घाटोवार, जयप्रकाश अग्रवाल, दीपेंद्रसिंग हुडा, पी. सी. चाको, मनीष तिवारी, निर्मल खत्री, अधिररंजन चौधरी, टी. आर. बालू, कल्याण बॅनर्जी, जसवंतसिंग, यशवंत सिन्हा, हरेन पाठक, गोपीनाथ मुंडे, शरद यादव, दारासिंग चौहान, अखिलेश यादव, गुरुदास दासगुप्ता, अर्जुनचरण चेठी आणि एम. थंबीदुराई या २० सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. संपुआ सरकार मे २००४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर प्रथमच ‘जेपीसी’चे गठन करण्यात आले असून, आजवर स्थापन झालेली ही पाचवी ‘जेपीसी’ आहे.
शिवसेनेने जागा नाकारली
दरम्यान, जेपीसीत एक जागा देण्याचा भाजपाचा प्रस्ताव शिवसेनेने नम्रपणे नाकारला. स्पेक्ट्रम घोटाळ्यात ज्यांना लाभ झाला आहे त्यातील एक व्यक्ती आमची राज्यसभेतील सदस्य असल्याने आम्ही जेपीसीत राहणे योग्य नाही, असे शिवसेनेने कळविले. व्हिडीओकॉन कम्युनिकेशन ही कंपनी स्पेक्ट्रम परवाना वाटपात लाभार्थी असून, आमचे खासदार राजकुमार धूत या कंपनीचे भागीदार असल्याचे शिवसेनेने म्हटले असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले.

Thursday, 24 February, 2011

वास्कोतील चार पोलिस निलंबित

मायकल फर्नांडिस पलायन व ‘आइस्क्रीम’ प्रकरण भोवले
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): तब्बल २२ खटले नावावर असलेला मायकल फर्नांडिस हा कैदी काल (दि.२२) पोलिस व्हॅनच्या खिडकीतून उडी मारत पलायन केल्याचे तीव्र पडसाद उमटले असून या संदर्भात वास्कोतील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अन्य एका प्रकरणी सध्या सडा उपकारागृहात कैद भोगणारा बालेश देसाई याला वैद्यकीय चाचणीसाठी नेताना वाटेत ‘आइस्क्रीम पार्लर’वर थांबा घेतल्याचा प्रकार एका वृत्तवाहिनीने उघडकीस आणल्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रदीप पाटील व सुरज गावकर या दोन्ही पोलिस शिपायांनाही निलंबित करण्यात आले आहे.
गृहमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रॉय नाईक यांची दोन कोटी रुपयांना सुपारी घेतल्याची जबानी दिलेला अट्टल गुन्हेगार मायकल फर्नांडिस पोलिस व्हॅनमधून फरारी झाल्याने गोवा पोलिसांची झोपच उडाली आहे. याचाच परिपाक म्हणून मायकल याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलिस शिपाई गौरेश पेडणेकर व सदानंद मळीक यांच्या निलंबनाचा आदेश आज जारी करण्यात आला.
आज पोलिस मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना पोलिस प्रवक्ते तथा विशेष विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी ही माहिती दिली. मायकल फर्नांडिस याचे फरार होणे यात पोलिसांचे सोटलोटे असण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. तूर्त प्राथमिक अंदाजानुसार यात पोलिसांचा निष्काळजीपणाच दिसून येतो, असे सांगत चौकशीअंती सत्य उघड होईल, असे ते म्हणाले. मायकल फर्नांडिस हा फरारी झाल्याने पुन्हा एकदा गृहमंत्र्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा प्रदान करण्यात येईल काय, असा सवाल केला असता त्याबाबत वरिष्ठ अधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
सडा उपकारागृहात कैदेत असलेला बालेश देसाई याला वैद्यकीय चाचणीसाठी चिखली येथील कुटीर इस्पितळात नेले होते. या दरम्यान वाटेत एका आइस्क्रीम पार्लरमधील आइस्क्रीमवर ताव मारताना या पोलिस शिपायांना वृत्तवाहिनी तथा वृत्तपत्र छायाचित्रकारांनी हेरल्याने व हे वृत्त प्रसिद्ध झाल्याने पोलिसांची बरीच नाचक्की झाली आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिस शिपाई प्रदीप पाटील व व सुरज गावकर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. वास्को पोलिस स्थानकातील एकाच वेळी चार पोलिस शिपाई निलंबित होण्याची ही पहिलीच घटना घडली आहे.
दरम्यान, मायकल फर्नांडिस याला नेणार्‍या पोलिस व्हॅन गाडीत अन्य सात कैदी होते व त्यांच्याबरोबर चालकासह १५ पोलिस शिपाई होते, अशीही माहिती मिळाली आहे. ही व्हॅन कैद्यांना नेणारी नव्हती व त्यामुळे खिडकीजवळ बसलेल्या मायकलने संधी साधून चालत्या वाहनातून उडी घेतली. या व्हॅनच्या मागोमाग येणार्‍या दुचाकीवरून त्याने पळ काढल्याने त्याने सुनियोजितपणेच पलायन केल्याचेही उघड झाले आहे. मायकल याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचेही यावेळी श्री. देशपांडे यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------
हुमाणे चोरीत मायकल ?
काणकोण, दि. २३ (प्रतिनिधी): हुमाणे आगोंद येथून काल (दि.२२) रात्री १०.३० च्या दरम्यान एक विदेशी महिला रिक्षाने जात असताना मागून येणार्‍या दोन दुचाकीवरील चार व्यक्तींनी रिक्षा अडवली. यावेळी त्यांनी रिक्षाचालकाला कळण्याअगोदरच सदर महिलेची पर्स लंपास केली. सदर पर्समध्ये एक डिजिटल कॅमेरा, रोख रु. ३००० व अन्य वस्तू मिळून एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी पोलिस तक्रार केली असता काणकोणचे पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी सदर महिलेला संशयित चोरट्यांची छायाचित्रे दाखवली. त्यावेळी त्यात मायकल फर्नांडिस याचेही छायाचित्र होते. सदर महिलेने मायकलचे छायाचित्र ओळखून हीच व्यक्ती आपली पर्स घेऊन गेल्याचे सांगितले. कालच मायकल याने पोलिस व्हॅनमधून पलायन केले व लगेचच त्याने ही चोरी केली त्यामुळे मायकल हा किती सराईत गुन्हेगार आहे याची प्रचिती येते असे यावेळी सूत्रांनी सांगितले.

..अन्यथा दुकानांना ‘सील’ ठोकणार

थकबाकी वसुलीसाठी मुरगाव पालिकेचा इशारा
• दुकानदारांना ४ मार्चपर्यंत मुदत
वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): शहरातील पालिका मार्केटमधील दुकान मालकांनी गेल्या काही वर्षांपासूनची थकबाकी ४ मार्चपर्यंत पालिकेच्या तिजोरीत जमा न केल्यास ह्या दुकानांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुरगाव नगरपालिकेची थकबाकी चार कोटींच्या आसपास पोहोचलेली असून दिलेल्या मुदतीत ही रक्कम न भरल्यास सदर दुकानांवर ७ मार्चपासून ‘सील’ ठोकण्यात येईल असा इशारा मुरगावच्या नगराध्यक्षा सौ. सुचिता शिरोडकर यांनी दिला आहे.
मुरगाव नगरपालिकेच्या भाजी मार्केट, पालिका मार्केट इत्यादींमध्ये असलेल्या दुकानांपैकी बहुतेक दुकान मालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून भाडे देणे बंद केले आहे. त्यामुळे पालिकेची चार कोटींपर्यंत थकबाकी अडकून राहिली आहे. पालिकेने ही थकबाकी वसूल करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न केले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले आहे. सदर थकबाकी वसूल करण्यासाठी पालिका मंडळाने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतलेला असून आज नगराध्यक्षा सौ. शिरोडकर, मुख्याधिकारी गोपाळ पार्सेकर तसेच पालिकेच्या इतर काही कर्मचार्‍यांनी मार्केटात भेट दिली. त्यांनी सदर थकबाकी ४ मार्चपर्यंत न भरल्यास दुकानांना सील ठोकण्याचा इशारा दिला. यावेळी काही दुकानदारांनी बोलणी करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र तो फेटाळून लावण्यात आला. यापूर्वी पालिका मंडळाने बोलणी व चर्चेसाठीच पाच वर्षांहून अधिक काळ गमावला असून त्यासाठी अधिक वेळ देण्यात येणार नसल्याचे नगराध्यक्षा सौ. शिरोडकर यांनी निक्षून सांगितले.
अधिक माहितीसाठी नगराध्यक्षा सौ. शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर दुकानदारांना ४ मार्चपर्यंत थकबाकी भरण्यास मुदत दिली असून शुक्रवार २५ रोजी भाजी मार्केटमधील दुकानदारांना याबाबत इशारा देण्यात येणार असल्याचे सांगितले. पालिकेची थकबाकी ४ कोटीहून जास्त असून ती वसूल करण्यासाठी येत्या काही दिवसांत कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे सौ. शिरोडकर यांनी सांगितले.

मला मंत्रिपदाची इच्छाच नाही!

मिकी पाशेको यांची कोलांटी उडी
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून सामूहिक राजीनामा देण्याची काल-परवापर्यंत धमकी देणारे मिकी पाशेको यांचे आज (दि.२३) दिल्लीत श्रेष्ठींबरोबर झालेल्या अंतिम चर्चेअंती अचानक परिवर्तन झाले. आपल्याला मुळी मंत्रिपदाची इच्छाच नाही, अशी भूमिका त्यांनी आज घेत थेट गोव्याचा रस्ता धरला. आपण पक्षासाठी निरपेक्ष भावनेने काम करीत राहणार असा सूरही त्यांनी आळवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात घडलेल्या या परिवर्तनाची रसाळ चर्चा राजकीय गोटात सुरू झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आपल्या काही समर्थक प्रदेश राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांबरोबर दिल्लीत तळ ठोकून बसलेले मिकी पाशेको आज संध्याकाळी गोव्यात दाखल झाले. काल २२ रोजी झालेल्या चर्चेत मिकी पाशेको यांच्यासाठी श्रेष्ठींनी प्रसंगी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचीही तयारी दर्शवली होती, असे सांगण्यात आले होते परंतु आजच्या चर्चेअंती सरकारचा पाठिंबा काढून घेण्यावर चर्चा झाली नाहीच तर खुद्द मिकी पाशेको यांनीही मंत्रिपद मिळवण्याची आपली इच्छाही सोडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळात मिकी पाशेको यांच्यात घडलेल्या या परिवर्तनाबाबत मात्र राजकीय गोटात चर्चा रंगली आहे. दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींकडून मिकी पाशेको यांच्या विविध कारनाम्यांची यादीच राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना सादर करण्यात आल्याचे कॉंग्रेस गोटात बोलले जात आहे. ही ‘फाईल’ बघितल्यानंतर श्रेष्ठींकडूनच आपल्या भूमिकेत बदल करण्यात आला व मिकी पाशेको यांची समजूत काढून सध्याच्या परिस्थितीत शांत राहण्यातच भले आहे, असा सल्लाच त्यांना दिल्याचे सांगण्यात येते.
‘मला माझ्या श्रेष्ठींवर पूर्ण विश्‍वास आहे व मला गोव्यात पक्षासाठी काम करावयाचे आहे’ असे वक्तव्य करून मिकी पाशेको यांनी अखेर नमतेच घेतले आहे. राज्यात कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी पक्षाला मिळत असलेली दुय्यम वागणुकीची त्यांनी तक्रार श्रेष्ठींकडे केली व याबाबतीत कॉंग्रेस श्रेष्ठींकडे चर्चा करून योग्य तो तोडगा काढू, असे त्यांना सुनावण्यात आल्याचेही कळते. दिल्लीतील या घडामोडीमुळे आता जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांच्या मंत्रिपदावर आलेले शुक्लकाष्ठ तूर्त दूर झाल्याचे सांगण्यात येते. मिकी पाशेको यांची साथ दिलेले प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी मात्र या एकूण घटनेमुळे तोंडघशीच पडले आहेत. दिल्लीहून परतलेल्या या पदाधिकार्‍यांनी आपले ‘मोबाईल’ बंद ठेवल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

एका गटाकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव व आमिषे

पणजी महापालिका निवडणूक
उद्या ठरणार उमेदवारांची संख्या

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेच्या रविवार दि. १३ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी ३० प्रभागांतून १५२ उमेदवार उभे राहिले असून दि. २५ हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे दि. २५ रोजी किती जण आपले अर्ज मागे घेतात यावरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. यामुळे अनेकांच्या नजरा दि. २५ रोजी मागे घेणार्‍या अर्जांकडे व मागे राहणार्‍या उमेदवारांच्या संख्येकडे लागल्या आहेत. दरम्यान, काही जणांवर दडपण आणून उमेदवारी मागे घेण्यास लावण्याचे प्रयत्न एका गटाने चालविल्याची चर्चा सुरू आहे.
पणजी महापालिकेच्या सर्व ३० प्रभागासाठी दि. १३ मार्च रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राद्वारे मतदान घेण्यात येणार असून पूर्वीच्या ३० केंद्रावरच काही ठिकाणी जादा केंद्रे सुरू करण्यात येणार असून त्यासाठी एकूण ५० मतदान यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. दि. १३ मार्च रोजी मतदान होताच त्याच दिवशी रात्री ८ वाजल्यापासून फार्मसी कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या दिवशीच मतमोजणी होणे हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. दि. २२ व २३ हे दिवस उमेदवारी अर्ज छाननीचे होते. मात्र दि. २२ रोजीच सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाल्याने आज दि. २३ रोजी निवडणूक अधिकारी साबाजी शेट्येे यांचे कार्यालय शांत होते.
दि. २२ रोजी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर प्रभाग २२ मध्ये दुरंगी लढत होणार
असल्याचे स्पष्ट झाले असून प्रभाग ५, १५ व २८ मध्ये प्रत्येकी तीन उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग २ व १८ मध्ये सर्वांत जास्त प्रत्येकी ८ उमेदवार आहेत.
दरम्यान, दि. २५ हा दिवस अर्ज मागे घेण्याचा असल्याने निवडणुकीत उतरलेला एक गट दबाव घालण्यात व आमिषे दाखवण्यात प्रसिद्ध असलेल्या आपल्या बलवान नेत्याच्या माध्यमातून अर्ज भरलेल्या काही अपक्ष उमेदवारांना आमिषे व धाक दाखवत आहे. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन आपल्या पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा म्हणून सदर गट प्रयत्नरत असल्याची चर्चा असून यापूर्वी सदर नेत्याने केलेल्या विविध करामती लक्षात घेता सदर चर्चेत सत्यता असल्याचे कळते.

बेदरकार खनिज वाहतुकीविरोधात आजपासून व्यापक कारवाई

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): वाहतूक खात्याने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खनिज मालाची वाहतूक करणार्‍या व सुरक्षित अंतर नियमांचे उल्लंघन करणार्‍या खनिज वाहतूक ट्रकांवर उद्या २४ पासून व्यापक कारवाई सुरू होणार आहे. पोलिस व जिल्हाधिकार्‍यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात येणार असून त्यात खनिज वाहतूक ट्रक जप्त करण्याची तयारीही सरकारी यंत्रणेने ठेवली आहे.
राज्यात खनिज वाहतुकीमुळे रस्ता सुरक्षा व धूळ प्रदूषणाचा मुद्दा प्रकर्षाने उभा राहिला आहे. विविध ठिकाणी स्थानिक जनता खनिज वाहतूकविरोधात बंडाचा झेंडा रोवून उभी ठाकल्याने सरकारसमोर पेच उभा राहिला आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता ओळखून तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्भवण्याचा धोका ओळखून वाहतूक खात्याने खाण, पोलिस व जिल्हाधिकार्‍यांच्या मदतीने खनिज वाहतुकीला शिस्त आणण्याची जोरदार मोहीम सुरू करण्याचा संकल्प सोडला आहे. खनिज वाहतुकीच्या बेदरकारपणाचे तीव्र पडसाद लोकलेखा समितीच्या बैठकीत उमटल्याने संबंधित अधिकार्‍यांना समितीकडून चांगलेच खडसावण्यात आल्याचीही खबर आहे. सध्या तूर्त अल्पकालीन कृती आराखडा तयार करून या वाहतुकीला आटोक्यात आणावे व तदनंतर सरकारने खनिज वाहतुकीबाबत दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा, अशी शिफारसही समितीने केल्याची खबर आहे.
उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
खनिज वाहतुकीच्या जटिल बनलेल्या या प्रश्‍नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी २५ रोजी खाण मालक तथा खनिज वाहतूकदारांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीला वाहतूक, खाण, पोलिस व जिल्हाधिकारीही हजर राहणार आहेत. या बैठकीत खनिज वाहतुकीमुळे उद्भवणार्‍या विविध प्रश्‍नांवर सखोल चर्चा केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. खनिज वाहतुकीला योग्य पद्धतीने शिस्त लागावी व अन्य वाहन चालकांच्या मनातील सुरक्षेबाबतची भीती दूर व्हावी यासाठी या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कलमाडी यांचे सहकारी भानोत, वर्मा यांना अटक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा
नवी दिल्ली, दि. २३ : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजन समितीचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचे निकटचे सहकारी ललित भानोत आणि राष्ट्रकुलचे अधिकारी व्ही. के. वर्मा या दोघांनाही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात सीबीआयने आज अटक केली. अटक करण्यापूर्वी या दोघांचीही सीबीआयने तब्बल सात तास कसून चौकशी केली. तथापि, तपासात या दोघांनीही सहकार्य न केल्याचा ठपका ठेवत सीबीआयने त्यांना अखेर अटक केली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्वित्झर्लंडस्थित ‘स्वीस टायमिंग लिमिटेड’ या कंपनीला कंत्राट देण्याचा व्यवहार झाला होता. याच सौद्यात १०७ कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप आहे. भानोत आणि वर्मा यांच्या अटकेमुळे सुरेश कलमाडी यांच्याभोवतीचा ङ्गास अधिकच आवळला गेला अाहे. त्यामुळे कलमाडी यांनाही लवकरच अटक केली जाईल, अशी दाट शक्यता आहे.
भानोत आणि वर्मा हे दोघेही आज सकाळी सीबीआय मुख्यालयात उपस्थित झाले. विविध कलमांतर्गत या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्याही विविध कलमांतर्गंत या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या दोघांसोबतच करार करण्यात आलेल्या ‘स्वीस टायमिंग लिमिटेड’ व अन्य अज्ञात व्यक्तींविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सीबीआयने गतवर्षी राजधानी दिल्लीच्या परिसरात भानोत आणि वर्मा यांच्या निवासस्थानांसह एकूण ११ ठिकाणी छापे घातले होते. या कारवाईत काही आक्षेपार्ह व प्रचंड तङ्गावत असणारे दस्तावेज हाती लागल्याचा दावा सीबीआयने केला होता.

‘बाई मी दगुड फोडते’ प्रथम

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत
• आठ वैयक्तिक बक्षिसे

पणजी, दि. २३ (सांस्कृतिक प्रतिनिधी): पन्नासाव्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत भार्गवी थिएटर गोवा या संस्थेने सादर केलेल्या ‘बाई मी दगुड फोडते’ या नाटकाने आठ वैयक्तिक बक्षिसांबरोबरच स्पर्धेतील १ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत नवरंग सांस्कृतिक कला मंच सांगली यांच्या व्हाईट लायर्स या नाटकासाठी रू. ५०,००० चे द्वितीय तर बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई या संस्थेच्या ‘परिमाण’ या नाटकाला रू. २५ हजाराचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट स्पोर्ट क्लब मुंबई या संस्थेच्या परिभाषा या नाटकास रू. १५,००० चे चतुर्थ व दिशा केंद्र या संस्थेच्या ‘उंच माझा झोपाळा’ या नाटकास रू. १०,००० चे पाचवे बक्षीस प्राप्त झाले.
गोवा कला अकादमीच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवून भार्गवी थिएटरच्या ‘बाई मी...’ या नाटकाने मुंबई येथे होणार्‍या अंतिम फेरीत धडक मारली होती. विष्णू सूर्या वाघ लिखित या नाटकास दिग्दर्शन ः प्रथम (जयेंद्रनाथ हळदणकर) नेपथ्य ः द्वितीय (राजा खेडेकर), प्रकाश योजना ः द्वितीय (धनंजय फाळकर), पार्श्‍वसंगीत ः तृतीय (विकास चोपडेकर), उत्कृष्ट अभिनय ः रौप्यपदक ज्योती पांचाळ, माधुरी शेटकर, तुकाराम गावस यांना तर अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र संजय मापारे यांना वैयक्तिक बक्षिसांसहित नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.
दि. १७ जानेवारी ते २२ फेबु्रवारी या कालावधीत अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत विविध केंद्रावरून निवड झालेल्या एकूण १६ नाटकांनी आपले प्रयोग सादर केले होते. भार्गवी थिएटरच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Wednesday, 23 February, 2011

गोध्राकांड हे कारस्थानच!

• ३१ आरोपी दोषी • ६३ जणांची मुक्तता
• शिक्षेची सुनावणी शुक्रवारी

अहमदाबाद, दि. २२ : ५९ कारसेवकांचे बळी घेणार्‍या आणि गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींचे कारण ठरलेल्या गोध्रा हत्याकांड प्रकरणी आज तब्बल ९ वर्षांनी निकाल लागला. या प्रकरणी साबरमती विशेष न्यायालयाने ३१ जणांना दोषी ठरविले, तर मुख्य आरोपी मौलाना हुसैन उमरची अन्य ६३ जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. दोषींच्या शिक्षेची सुनावणी शुक्रवारी केली जाणार आहे. या निकालाविषयी भारतीय जनता पक्षाने समाधान व्यक्त केले असून, केंद्र सरकारने मात्र याविषयी कोणतीही ठोस प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
साबरमतीच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी झाली. गोध्रा जळीतकांड हा पूर्वनियोजित असल्याचे साबरमती विशेष न्यायालयाने म्हटले आहे. अहमदाबादच्या मध्यवर्ती कारागृहात स्थापन झालेल्या विशेष न्यायालयात न्या. पी. आर. पटेल यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे, या प्रकरणातील मुख्य आरोपी मौलाना हुसैन उमरची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यासंदर्भातील शिक्षेची सुनावणी येत्या २५ तारखेला शुक्रवारी केली जाणार आहे.
अशी घडली घटना..
२७ ङ्गेब्रुवारी २००२ रोजी गोधरा स्टेशनजवळ साबरमती एक्सप्रेसच्या एस-६ डब्याला पेटवून देण्यात आले होते. त्या दिवशी साबरमती एक्सप्रेस गोध्राच्या प्लॅटङ्गॉर्म क्रमांक एकवर सुमारे पाच तास उशिराने पोहोचली. बिहारमधील दरभंगा येथून अहमदाबादकडे जाणार्‍या साबरमती एक्सप्रेसमध्ये मोठ्या संख्येने अयोध्येतील यज्ञ समारंभातून येणारे कारसेवक होते. गाडी थांबली असताना काही कारसेवकांचे स्टेशनवरील मुस्लिम विक्रेत्यांशी भांडण झाले. हे भांडण केवळ निमित्त ठरले. त्यानंतर चेन ओढून दोनदा गाडी थांबविण्यात आली आणि एस-६ या डब्याला आग लावण्यात आली. या जळीतकांडात ५९ लोकांचा बळी गेला होता. आग लावण्याचा हा कट गोध्रा रेल्वे स्थानकाजवळच्या सिंगल ङ्गडिया या परिसरात राहणार्‍या मौलाना हुसैन उमरजी याने रचला होता. यासाठी मौलानाने बिलाल हाजी, ङ्गारुख भाणा, रज्जाक कुरकुर आणि सलीम पानवाला अशा चार साथीदारांना सामील करून घेतले होते. यातील रज्जाक कुरकुरच्या अमन गेस्ट हाऊसमध्ये २६ ङ्गेब्रुवारीच्या रात्री ४० लीटर पेट्रोल जमा केले होते. या पेट्रोलच्या साहाय्याने नंतर रेल्वेचा डबा जाळण्यात आला, असे कोर्टापुढे मांडण्यात आले. डब्यात पेट्रोल टाकल्यानंतर बाहेरून आगीची मशाल टाकण्यात आली. मृतांमध्ये २३ पुरुष, १५ महिला आणि २० लहान मुलांचा समावेश होता. या घटनेनंतर गुजरातमध्ये प्रचंड मोठा जातीय हिंसाचार उङ्गाळला. त्यात १२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता.
सुरुवातीला गोध्रा हत्याकांडाच्या खटल्यात १०७ आरोपी होते. त्यापैकी पाच जणांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. २५३ साक्षीदार आणि १५०० दस्तावेजांवरून हा निकाल सुनावण्यात आला.
ही बॅनर्जी समितीला चपराक!
भाजपकडून स्वागत

नवी दिल्ली, दि. २२ : गोध्रा जळीतकांड प्रकरणी गुजरातमधील साबरमती विशेष न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे भारतीय जनता पार्टीने स्वागत केले असून, हे प्रकरण दाबण्याचा संपुआ सरकारचा प्रयत्न अखेर विङ्गल ठरल्याचेही म्हटले आहे.
भाजपाचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद म्हणाले की, संपुआ सरकारने यापूर्वी या प्रकरणाच्या चौकशीसाठी बॅनर्जी समिती स्थापन केली होती. त्यावेळी लालूप्रसाद रेल्वेमंत्री होते. बॅनर्जी समितीने गोध्रा जळीतकांडातील आग हा निव्वळ अपघात असल्याचे म्हटले होते. त्यावेळी २००५ च्या निवडणुका तोंडावर आल्या होत्या. त्यामुळे तो अहवाल सादर करण्यात आला. पण, त्यातील वास्तविकता आता पुरती समोर आली.
आजचा निकाल स्वागतार्हच आहे. आता दोषींना कठोर शासन झाले पाहिजे, अशी आमची अपेक्षा राहील. असे असले तरी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मौलाना उमरजीला सोडण्यामागेही काहीतरी कारस्थान असल्याचे प्रसाद यांनी म्हटले आहे.
केंद्राची सावध भूमिका
गोध्रा जळीतकांड प्रकरणी निकाल देण्याचे आपले काम कायद्याने केले. आता यावर कदाचित हायकोर्टातही याचिका दाखल होऊ शकते, अशी सावध प्रतिक्रिया केंद्र सरकारने आजच्या निकालावर व्यक्त केली.तर चिदम्बरम यांनीही पूर्ण निकाल पाहिल्याशिवाय याविषयी काहीही बोलण्यास नकार दिला. अल्पसंख्यकमंत्री सलमान खुर्शीद यांनी देखील यावर प्रतिक्रिया देणे टाळले.
एसआयटी आव्हान देणार
गोध्रा हत्याकांड प्रकरणी विशेष न्यायालयाकडून ६२ जणांची मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्याचे संकेत विशेष चौकशी पथक अर्थात एसआयटीने दिले आहेत.याबाबत बोलताना एसआयटीचे प्रमुख आर. के. राघवन म्हणाले की, या प्रकरणात मुख्य आरोपी मौलवी उमरजीसह ६३ जणांच्या मुक्ततेच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत, हे सध्याच सांगता येणार नाही. पण, या ६३ जणांविरुद्ध असणार्‍या पुराव्यांबाबत ङ्गेरविचार नक्कीच केला जाईल.
सर्वोच्च न्यायालयानेच या प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे सोपविली होती.

पणजी जेटीवर दातांनी ओढल्या बोटी

• कृष्ण श्रीवास्तव व बबीता मिश्रा यांची करामत
• ‘गिनीज बुक’मध्ये नोंद होणार

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): ‘हनुमनजीकी कृपा’ म्हणत पणजी जेटीवर मध्यप्रदेश येथील गेली अनेक पराक्रम करणारे पहेलवान कृष्ण श्रीवास्तव व पेशाने शिक्षिका असलेल्या बबिता मिश्रा यांनी आज (दि.२२) दातांनी दोन बोटी ओढून या पूर्वीचे आपलेच विक्रम तोडले व विश्वविक्रम करून लिम्का रेकॉर्ड बुक व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या जागतिक विक्रमांच्या पुस्तकात आपली नावे नोंद केली.
पणजी जेटीवर आयोजित केलेल्या या रोमांचकारी कार्यक्रमात प्रथम कृष्ण गोपाळ श्रीवास्तव यांनी ५१० टनाची ‘प्रिन्सेस दी गोवा’ ही बोट साडेचार मीटरपर्यंत ओढली. त्यांनी या पूर्वी आपणच केलेला ३५० टनाची बोट ओढण्याचा विक्रम मोडला. तर पेशाने शिक्षिका असलेल्या श्रीमती मिश्रा यांनी १३० टन वजनाची ‘रॉयल क्रुझ’ ही बोट चार मीटरपर्यंत ओढली. यापूर्वी त्यांनी भरलेला ट्रक ओढण्याचा पराक्रम केला होता. यावेळी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संचालिका डॉ. सुझान डिसोजा, माजी मंत्री निर्मला सावंत व इतर बरेच मान्यवर उपस्थित होते. डॉ. डिसोझा यांनी श्री. श्रीवास्तव व श्रीमती मिश्रा यांचा चषक व भेटवस्तू देऊन गौरव केला.
हा विक्रम केल्यानंतर बोलताना श्री. श्रीवास्तव यांनी सांगितले की, गोवा सरकार व मध्यप्रदेश सरकारमार्फत हा विक्रम गिनीज बुक ऑफ बर्ल्ड रीकार्ड समितीकडे जाणार आहे. यापूर्वी उभे असलेले बोइंग विमान दाताने ओढलेले श्रीवास्तव यांनी पुढील काळात गोव्यातच चालते हेलिकॉप्टर व चालती रेल्वे दाताने रोखण्याची व कोचीन ते कोलंबो असा प्रवास करणारे ६००० टनाचे जहाज दाताने ओढण्याची मनीषा व्यक्त केली. तर श्रीमती मिश्रा यांनी जगात स्त्रीने दाताने बोट ओढण्याचे काम कधीच केलेले नाही. आपण त्याला अपवाद असल्याचे सांगून यापेक्षा जास्त मोठे पराक्रम करण्याचे ध्येय आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पणजी महापालिका निवडणूक, एकूण १५२ उमेदवार रिंगणात

दोन उमेदवार अपात्र
२६ रोजी चिन्हांचे वाटप

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेसाठी दि. १३ मार्च रोजी होणार्‍या ३० प्रभागासाठीच्या निवडणुकीसाठी एकूण १५४ उमेदवारांनी २७२ उमेदवारी अर्ज भरले होते. आज झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत त्यातील दोन उमेदवार अपात्र ठरले आहेत. त्यामुळे आज उमेदवारी अर्जांची छाननी संपल्यानंतर आता १५२ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य झाले आहेत. दि. २५ हा अर्ज मागे घेण्याचा दिवस असून निवडणुकीच्या रिंगणात नक्की किती उमेदवार राहणार आहेत ते दि. २५ रोजीच स्पष्ट होणार आहे. मात्र प्रभाग २२ मध्ये दोनच उमेदवार असल्याने तेथे दुरंगी लढतीची शक्यता आहे.
आज निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली
पणजी महापालिकेच्या दि. १३ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. त्यातील प्रभाग २२ मधील श्रीमती दुर्गा च्यारी यांचा अर्ज त्या आपल्या अर्जासोबत ‘इतर मागासवर्गीय’ म्हणून दाखला लावू शकल्या नाहीत म्हणून फेटाळण्यात आला. कारण प्रभाग २२ हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे या प्रभागात आता माया तळकर व हेमा चोपडेकर यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. तर प्रभाग २८ मधील अश्‍विनी नाईक चोपडेकर यांचा अर्ज फेटाळण्यात आला. या निवडणुकीसाठी उमेदवाराला २१ वर्षे पूर्ण होण्याची गरज आहे. अश्‍विनी नाईक यांना २१ वे वर्षे सुरू आहे. या प्रभागात आता तीन उमेदवार रिंगणात मागे राहिले आहेत.
शुक्रवार दि. २५ हा दिवस अर्ज मागे घेण्याचा असून १५२ पैकी अनेक उमेदवार आपले अर्ज या दिवशी मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीचे नक्की चित्र दि. २५ रोजीच स्पष्ट होणार आहे. दि. २६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून कांपाल येथील बालभवनमध्ये निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. या निवडणुकीत भाजप समर्थक पणजी फर्स्ट, कॉंग्रेस समर्थक पणजी महापालिका विकास आघाडी व राष्ट्रवादी पक्ष समर्थक टुगेदर फॉर पणजी ही तीन पॅनल्स व इतर अनेक अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
आज अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर विविध प्रभागात ग्राह्य झालेले अर्ज पुढीलप्रमाणे- (प्रभाग १) ४, (२) ८, (३) ६, (४) ४, (५) ३, (६) ५, (७) ४, (८) ६, (९) ५, (१०) ५, (११) ५, (१२) ४, (१३) ५, (१४) ६, (१५) ३, (१६) ५, (१७) ५, (१८) ८, (१९) ६, (२०) ७, (२१) ५, (२२) २, (२३) ६, (२४) ६, (२५) ४, (२६) ६, (२७) ५, (२८) ३, (२९) ५ व (३०) ६.

आघाडीतून बाहेर पडण्याचे राष्ट्रवादीचे संकेत सुंठीवाचून खोकला गेला : कॉंग्रेस

आज दिल्लीत अंतिम निर्णय होणार
पणजी, दि.२२(प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे नेते मिकी पाशेको यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लावण्यास कॉंग्रेसकडून होत असलेली दिरंगाई आक्षेपार्ह असून त्यासाठी एकवेळ आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. आज यासंबंधी प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाकडे चर्चा केल्यानंतर उद्या २३ रोजी अंतिम निर्णय जाहीर करण्याची हमी त्यांनी या शिष्टमंडळाला दिली आहे.
याप्रकरणी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकारी मंडळ दिल्लीत गेले आहे. या एकूण प्रकरणी अंतिम निर्णय घेण्यासाठी उद्या २३ रोजी सकाळी ११ वाजता दिल्लीत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती मिकी पाशेको यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आघाडीचा पाठिंबा काढून घेतला तरीही सरकारच्या स्थिरतेवर मात्र त्याचा कोणताच परिणाम होणार नाही. राष्ट्रवादीचे तीन आमदार वगळल्यास आघाडीची सदस्य संख्या २२ वर पोहोचणार असल्याने त्यांच्याकडे बहुमत राहणार आहे.
दरम्यान, दिल्लीत पोहोचलेल्या प्रदेश राष्ट्रवादी कार्यकारिणीच्या सदस्यांनी श्री. पाशेको यांच्यामागे ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने श्रेष्ठींसमोरही पेच निर्माण झाला आहे. यासंबंधी राष्ट्रवादी श्रेष्ठींनी कॉंग्रेस श्रेष्ठींकडे चर्चा करून तोडगा काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केल्याचीही खबर मिळाली आहे. राज्यात राष्ट्रवादीचा संघटनात्मक विस्तार व इतर महत्त्वाच्या विषयांवरही उद्याच्या बैठकीत ऊहापोह होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते ए. पी. संगमा, निवेदिता माने हे या बैठकीला हजर होते. गोव्यातर्फे प्रदेश सरचिटणीस व्यंटकेश प्रभू मोने, प्रकाश फडते, सचिव आर्विन सुवारीस, अनिल जोलापुरे व लिंडन मोंतेरो आदी उपस्थित होते. येत्या १६ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून यामुळेच राष्ट्रवादीकडून कॉंग्रेसवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीकडून पाठिंबा काढून घेतला तर कॉंग्रेसला अन्य दोन आमदारांना मंत्रिपद देण्याची आयतीच संधी प्राप्त होणार आहे व त्यामुळे सरकार अधिकच मजबूत होईल. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा आघाडीला पूर्ण पाठिंबा आहे व त्यामुळे या दबावाला काहीही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या नेत्यांकडून मिळते. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीकडून पाठिंबा काढून घेतल्यास ‘सुंठीवाचून खोकला गेला’ असेच म्हणावे लागेल, असाही टोला या नेत्यांनी लगावला आहे.

शिरसईवासीयांनी खाणवाहतूक रोखली

खाणमालकांचा महामार्ग रोखण्याचा इशारा
म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी): शिरसई येथून बेदरकारपणे होणारी खाणवाहतूक आज (दि.२२) आज शिरसई रेल्वे स्थानकाजवळ स्थानिकांनी रोखली. यावेळी स्थानिकांनी या खाणवाहतुकीचा आपल्याला अतोनात त्रास होत असून या मार्गाने होणारी वाहतूक बंद करून दुसर्‍या मार्गाने वळवावी मात्र या रस्त्याने ती कोणत्याही परिस्थितीत होता नये अन्यथा पुन्हा असे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा ऍड. श्रीधर कामत यांनी दिला. यावेळी यापुढे असे ट्रक अडवल्यास मुंबई महामार्ग म्हापसा वाळपई मार्गावरील वाहतूक अडवण्याचा इशारा खाणमालकांनी दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रेडी शिरोडा भागातून येणारे खनिजमाल घेऊन येणारे ट्रक आज सकाळी शिरसई येथील रेल्वे स्थानकाजवळ रोखले. यात ऍड. श्रीधर कामत, ऍड. विनायक परब, उपसरपंच आनंद तेमकर, ऍड. महेंद्र आनोर्णेकर, ऍड. वीरेंद्र कामत यांच्या नेतृत्वाखाली अडवण्यात आले. ही घटना कळताच उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, मामलेदार गौरीश शंखवाळकर, म्हापसा पोलिस निरीक्षक राजेशकुमार पोलिस फौजफाट्यासह उपस्थित झाले. यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. रेडकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ही वाहतूक पूर्णपणे बंद केल्याशिवाय कोणतीच चर्चा करण्यात येणार नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. दुपारी तीन वाजल्यापासून शिरसई येथून वाहतूक सुरू केली. मात्र त्यावेळी स्थानिकांनी अडवलेल्या तीन ट्रकांचे टायर पंक्चर केले.
ट्रक पंक्चर केल्याचे ट्रकमालकांना कळताच सुमारे शंभर ट्रक मालक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी स्थानिकांनी तेथून पळ काढला. त्यामुळे ट्रकमालकांनी आपला मोर्चा शिरसईकरांना जाब विचारण्यासाठी वळवला. यावेळी प्रकरण हातघाईवर आले होते. त्यामुळे येथील वातावरण काही काळ तंग बनले. यावेळी म्हापसा पोलिसांनी मध्यस्थी करून हा प्रकार रोखला व प्रकरण चिघळू दिले नाही.
यावेळी सदर ट्रकमालकांनीही म्हापसा वाळपई रस्त्यावरील वाहतूक अडवली. दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिसांच्या विनंतीनुसार अडवलेली वाहतूक सोडण्यात आली. यानंतर ट्रकमालकांनी थिवी येथे बैठक घेत यापुढे असे ट्रक अडवल्यास म्हापसा-वाळपई व मुंबई महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा इशारा दिला.

खनिज ट्रक वाहतूकदारांना ४८ तासांची मुदत

• अटींचे पालन करण्याचा निर्वाणीचा इशारा
• उद्यापासून बेशिस्त ट्रकांवर जप्तीची कारवाई
• २५ रोजी मुख्यमंत्र्यांची बैठक

पणजी, दि. २२(प्रतिनिधी): राज्यातील सर्व खनिज वाहतूक ट्रकांना ‘ओव्हरलोडींग’ व एकमेकांतील अंतराबाबत घालून दिलेल्या अटींचे पालन करण्यासाठी वाहतूक खात्यातर्फे ४८ तासांची मुदत दिली आहे. या अटींचे पालन न झाल्यास गुरुवार २४ पासून पोलिसांच्या मदतीने खनिजवाहू ट्रक जप्त करण्याची मोहीम सुरू करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी दिली.
आज लोक लेखा समिती (पीएसी) समोर हजर राहिलेल्या खाण, वाहतूक, जिल्हाधिकारी व पोलिस अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेण्यात आल्याची खबर मिळाली आहे. या चारही खात्यांचे कोणतेही नियंत्रण खनिज वाहतुकीवर राहिले नसल्याने राज्यात विविध ठिकाणी लोकांत तीव्र असंतोष पसरला आहे. ही परिस्थिती वेळीच आटोक्यात आणली नाही तर जनतेच्या सहनशीलतेचा भडकाच उडेल व त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्‍न उद्भवण्याची भीती समितीकडून व्यक्त करण्यात आली. आजच्या बैठकीला सांगे तालुक्यातील रेवण येथील काही लोक हजर होते व त्यांनीही खनिज वाहतुकीच्या भयाण परिस्थितीची माहिती समितीसमोर ठेवली. दरम्यान, या बैठकीत समितीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी खनिज वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना आखण्याचे आदेश या अधिकार्‍यांना दिले आहेत. येत्या शुक्रवार २५ रोजी प्रत्यक्ष कृती आराखडाच तयार करून आणण्याची ताकीदही त्यांनी देण्यात आल्याची खबर मिळाली आहे. या आराखड्यावरून येत्या तीन महिन्यांसाठी खनिज वाहतुकीला शिस्त आणण्यासाठीच्या उपाययोजनांची कार्यवाही करण्याचे आदेश समितीकडून देण्यात येणार आहेत व तदनंतर मे महिन्यात सरकारने यासंबंधी दीर्घकालीन कृती आराखडा तयार करावा, अशी शिफारसही समितीने केल्याची खबर आहे.
‘पीएसी’ने फैलावर घेतल्यानंतर तात्काळ वाहतूक खात्याने राज्यातील सर्व खनिज ट्रक वाहतूकदारांना नोटिसा बजावून ‘ओव्हरलोडींग’ व अंतराबाबत घालून दिलेल्या अटींचे पालन करण्याचे आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे पालन करण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात येणार असून तरीही त्याची पूर्तता होत नसेल तर मात्र जिल्हाधिकारी व पोलिसांच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करणारे ट्रकच जप्त करण्यात येतील, अशी माहिती श्री. देसाई यांनी दिली. खनिज वाहतुकीसंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती व त्यावेळी वाहतूक खात्यातर्फे खनिज ट्रक वाहतूकदारांना काही नियम तयार करून देण्यात आले होते. मुळात खाण मालक व खनिज ट्रक वाहतूकदारांतील बैठकीत ट्रक वाहतूकदारांना वाढीव दर देण्याचे मान्य होऊनही त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहणीत आढळून आल्याचे श्री. देसाई म्हणाले. गेल्या जानेवारी महिन्यातच एकूण २०० ट्रकांना दंड ठोठावण्यात आला, असेही ते म्हणाले. खनिज वाहतुकीसाठीच्या ट्रकांना खाण खात्याकडून ना हरकत दाखला देण्यात यावा तसेच खनिज ट्रक चालकांची नोंदणीही खाण खात्याने करून घ्यावी, अशा सूचनाही लोक लेखा समितीसमोर करण्यात आलेल्या आहेत.
वाहतूक खात्याने घालून दिलेल्या आदेशांनुसार ६ चाकी ट्रकांना १०.५ टन तर दहा चाकी ट्रकांना १५ टन खनिज वाहतूक करण्याची परवानगी आहे. या अटींचे बहुतांश ट्रकांकडून उल्लंघन करण्यात येते व मर्यादेपेक्षा जास्त खनिज वाहतूक केली जात असल्याचे वाहतूक खात्याच्या निदर्शनास आले आहे, असेही श्री. देसाई म्हणाले. याप्रकरणी श्री. देसाई यांनी अनेक प्रमुख खाण मालकांशी चर्चा करून त्यांच्या नजरेस या गोष्टी आणून दिल्या आहेत व त्यांनी वाहतूक खात्याला पूर्ण सहकार्य देण्याचेही मान्य केल्याची माहिती त्यांनी दिली.
२५ रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा
या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शुक्रवार २५ रोजी खाण मालक व ट्रक वाहतूकदारांची संयुक्त बैठक बोलावली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून या निर्णयाची माहिती त्यांना देण्यात येणार आहे.
अधिभार वसुली सक्तीची
कळणे व रेडी येथील ट्रकांकडून धारगळ व दोडामार्ग चेकपोस्टवर अधिभार वसुली योग्य पद्धतीने केली जाते व त्यामुळे वाहतूक खात्याकडून कर वसुलीत बेफिकीरपणा केला जातो ही तक्रार निराधार असल्याचे स्पष्टीकरण श्री. देसाई यांनी केले. काही ट्रक चेकपोस्टवर थांबा घेत नसल्याने काही लोकांच्या मनात हा संशय उपस्थित झाला असणे शक्य आहे. पण काही ट्रकांकडून हा अधिभार पूर्वीच भरला जात असल्याने हे ट्रक थांबा घेत नसल्याचे ते म्हणाले.

पाणी टाकी वितरण योजनेला मंत्रिमंडळाची गुपचूप मान्यता

दामोदर नाईक यांच्या आरोपांमुळे सरकारची खबरदारी
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी मंत्रिमंडळाची मान्यता न मिळवताच विशेषाधिकाराचा वापर करून लोकांना मोफत पाण्याच्या टाक्या वितरित करण्याच्या योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत मागील तारखेपासून मान्यता देण्यात आली आहे. फातोर्ड्यांचे आमदार दामोदर नाईक यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल सरकारला घेणे अखेर भाग पडल्याचेच यावरून स्पष्ट झाले आहे.
सा. बां. खात्याचे मंत्री चर्चिल यांनी सुमारे एक कोटी रुपये खर्चून दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघातील लोकांना पाण्याच्या टाक्यांचे वाटप करण्याचा सपाटाच लावला होता. या प्रकरणाचे तीव्र पडसाद गेल्या हिवाळी अधिवेशनात उमटले. आमदार श्री. नाईक यांनी हा घोटाळा विधानसभेत उघड करून चर्चिल यांना चांगलेच फैलावर घेतले होते. या पाण्याच्या टाक्या वितरित करण्यासाठी सरकारतर्फे कोणतीही योजना तयार करण्यात आली नाही तसेच या टाक्या देण्याच्या बहाण्याने काही कॉंग्रेस पक्षातील नेते आपला राजकीय प्रचार करीत असल्याचा ठपकाही आमदार नाईक यांनी ठेवला होता. या टाक्या वितरणांत कोणताही घोटाळा नसल्याचा दावा करून प्रसंगी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची तयारी चर्चिल आलेमाव यांनी दाखवली असली तरी ही पद्धत चुकीची असून त्यामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता ओळखून अखेर या योजनेला मागील तारखेची मान्यता देऊन सरकारने पुढील धोका टाळला आहे. या योजनेला राज्य मंत्रिमंडळाची अथवा वित्त खात्याचीही मंजुरी मिळाली नसल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट करून दिले असता मुख्यमंत्री कामत यांनीही ते मान्य केले होते. दरम्यान, या योजनेसाठी कोणतेही पात्रता निकष तयार करण्यात आले नसल्याचेही आता समोर आले आहे. विविध भागांत पाणी टंचाईमुळे लोकांना पाणी साठवून ठेवण्यास मदत व्हावी यासाठीच ही योजना तयार करण्यात आल्याचे चर्चिल यांच्याकडून सांगण्यात आले होते. परंतु सरकारी पैसा खर्च करताना त्यासाठी योग्य पद्धतीने योजना तयार करून त्यासाठी आवश्यक निकष तयार करावे लागतात व त्यानुसारच ही योजना राबवावी लागते. इथे मात्र मंत्री आपल्या मर्जीप्रमाणे सरकारी पैशांचा वापर करीत असल्याने हा एक घोटाळाच ठरतो, असे मत आमदार नाईक यांनी व्यक्त केले होते.

खून प्रकरणातील कैदी चिखलीतून निसटला

मडगाव, दि. २२(प्रतिनिधी): एका खूनप्रकरणी सडा तुरुंगात असलेला व तपासणीसाठी गोमेकॉत नेलेला मायकल फर्नांडिस हा कैदी आज सुरक्षा कर्मचार्‍यांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचा प्रकार घडला. मायकल फर्नांडिस या संशयिताला सडा तुरुंगातून तपासणीसाठी गोमेकॉत नेले होते. तेथे तपासणी करून परत सडा येथे नेले जात असताना चिखली येथे पोहोचताच वाहनाचा वेग कमी झाल्याची संधी साधून त्याने चालत्या वाहनातून बाहेर उडी टाकली. तेथे त्याची प्रतीक्षा करणार्‍या एका मोटरसायकलवरून तो पळून गेला व त्यावरून तो पूर्वनियोजित बेत शिजलेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. नंतर त्याच्या शोधासाठी सर्व भाग पिंजून काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते.

उमेदवारांच्या संख्या आज निश्‍चित होणार

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेच्या ३० प्रभागांच्या दि. १३ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा उद्या दि. २५ हा दिवस असून उमेदवारी भरलेल्या १५२ उमेदवारांमधील किती उमेदवार गळतात व किती मागे राहून महापालिकेच्या रणसंग्रामात लढतात हे उद्या संध्याकाळी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत भाजाप समर्थक ‘पणजी फर्स्ट’, कॉंग्रेस (बाबूश) समर्थक ‘पणजी विकास आघाडी’ व राष्ट्रवादी कॉंग्रेस समर्थक ‘टुगेदर टू पणजी’ ही तीन पॅनल्स व अनेक अपक्ष निवडणुकीत उतरले आहेत. तीन पॅनल्स व बलवान अपक्षांमुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान अर्ज मागे घेण्याचा उद्या दि. २५ हा दिवस असल्याने एका बड्या वजनदार मंत्र्याने काही उमेदवारांशी संपर्क साधून त्यांनी उमेदवारी मागे घेऊन आपल्या पॅनलच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा म्हणून कालपासून सुरू केलेले प्रयत्न आजही रात्रौ उशिरापर्यंत चालू ठेवले असून त्यासाठी आमिष व दबाव ही हत्यारे वापरली जात असल्याचे कळते.

Tuesday, 22 February, 2011

कसाबची शिक्षा कायम

• उच्चन्यायालयाचे शिक्कामोर्तब
• ङ्गहीम, सबाउद्दीन निर्दोष

मुंबई, दि. २१ : संपूर्ण जगाला हादरवून टाकणार्‍या २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्लाप्रकरणात आरोपी असणार्‍या अजमल कसाबला विशेष न्यायालयाने दिलेली ङ्गाशीची शिक्षा आज मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवत त्यावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाने मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांसह थेट केंद्र सरकारपर्यंत सार्‍यांनीच समाधान व्यक्त केले. मात्र, या प्रकरणातील सहआरोपी ङ्गहीम अन्सारी आणि सबाउद्दीन अहमद यांच्या सुटकेला आव्हान देणारी महाराष्ट्र शासनाची याचिका मात्र न्यायालयाने ङ्गेटाळून लावली आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई आणि न्या. रणजीत मोरे यांच्या न्यायासनाने आज हे दोन्ही महत्त्वपूर्ण निकाल दिले. कसाबवरील सर्व सिद्ध आरोप उच्च न्यायालयानेही मान्य केले आहेत. त्यात असंख्य लोकांची हत्या, त्याचे कारस्थान रचणे आणि देशविरोधी युद्ध अशा आरोपांचा समावेश आहे. ङ्गाशीची शिक्षा कायम ठेवल्याचा निर्णय कसाबने ऐकल्यानंतर नेहमीप्रमाणेच हसत न्यायमूर्तींना ‘शुक्रिया’ म्हणाला. मुंबईवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक पोलिसांना आपले प्राण गमवावे लागले. आपण त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले नाही तर ही आपल्या कर्तव्यात ङ्गार मोठी कसूर ठरेल, असेही न्यायमूर्तींनी आपल्या निकालात म्हटले आहे. आज कसाबविषयीचा निकाल जाहीर झाला आणि त्याच्या ङ्गाशीवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने सार्‍यांचाच जीव भांड्यात पडला.
मुंबई हल्ल्यादरम्यान पाकमधून एकूण दहा अतिरेकी आले होते. त्यातील ९ अतिरेकी पोलिसांसोबतच्या चकमकीत मारले गेले. केवळ कसाबला जिवंत पकडणे शक्य झाले होते. त्याला २६ नोव्हेंबर रोजी गिरगाव चौपाटी येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर यापूर्वी विशेष न्यायालयात खटला चालविण्यात आला होता. तेथे न्या. ताहिलीयानी यांच्या न्यायासनाने ६ मे २०१० रोजी त्याला ङ्गाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज उच्च न्यायालयाने आपल्या संमतीची मोहोर उमटवली.

३०० कोटींच्या जमिनीवर केंद्र सरकारचा दावा

• मिरामार मत्स्यालयाबाबत राज्य सरकार अंधारात
• संशयाची सुई सचिवस्तरावरील अधिकार्‍यांवर

पणजी, दि. २१(प्रतिनिधी): मिरामार येथे समुद्र किनार्‍यालगत जागतिक कीर्तीचे मत्स्यालय उभारण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली व सध्याच्या बाजारभावानुसार सुमारे ३०० कोटी रुपयांची किंमत असलेली ३१,३३२ चौरसमीटर जमीन राज्य सरकारच्या नकळत आपल्या ताब्यात घेण्याचे जोरदार प्रयत्न केंद्राकडून सुरू आहेत. केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयातर्फे याठिकाणी मत्स्यालय उभारण्यासाठी सल्लागार मंडळाच्या निवडीसाठी आंतरराष्ट्रीय इच्छा प्रस्ताव निविदा जारी केली आहे. मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उघडकीस आणलेल्या या प्रकरणामुळे प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा व मुख्यमंत्री दिगंबर कामत या द्वयींनी या एकूण प्रकाराबाबत अनभिज्ञता व्यक्त केल्याने नोकरशहांच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे.
केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयाच्या समुद्र विकास विभागातर्फे २२ नोव्हेंबर २०१० रोजी यासंबंधी इच्छा प्रस्ताव निविदा जारी करण्यात आली होती. यासंबंधी प्रकल्प व्यवस्थापन समितीकडून प्रस्ताव तयार करून त्याला मान्यताही दिल्याची खबर आहे. या मत्स्यालयात असणार्‍या जलचरांचीही यादी तयार करून या प्रकल्पासाठी मिळालेल्या प्रतिसादावरून तांत्रिक व वित्तीय प्रस्ताव निश्‍चित केल्याची माहितीही विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या ताब्यात असलेली ही जमीन केंद्राला हस्तांतरण करण्याबाबत अद्याप कोणताच व्यवहार झाला नसताना केंद्रांकडून सुरू झालेल्या प्रक्रियेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी आपल्याकडे कोणतीच माहिती पोहोचलेली नाही, असा खुलासा पर्यावरणमंत्री श्री. सिक्वेरा यांनी केला. पर्यावरणमंत्री या नात्याने आपण याबाबत कोणताही प्रस्ताव पाहिलेला नाही तसेच याबाबतीत कोणत्याही कागदोपत्री व्यवहारावर सही केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार पार्सेकर यांनी गत विधानसभा अधिवेशनात शून्य प्रहरावेळी हा विषय उपस्थित केला होता व त्यावेळीही पर्यावरणमंत्र्यांनी आपली हीच भूमिका स्पष्ट केली होती. मुख्यमंत्री कामत यांनीही याप्रकरणी अधिक स्पष्टीकरण करताना आपणही याबाबतीत अनभिज्ञ असल्याचे सांगितले होते. राज्य सरकारला कोणतीच कल्पना नसताना केंद्राकडून एवढ्या मोठ्या प्रकल्पाची तयारी केली जाणे ही गोष्टच मुळी धक्कादायक ठरली आहे.
दरम्यान, या एकूण प्रकरणाबाबत सचिव पातळीवरील नोकरशहांच्या कारभारावर संशयाची सुई उपस्थित झाली आहे. प्रशासकीय पातळीवर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यावाचून केंद्र सरकार याठिकाणी जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्याची तयारीच करू शकत नाही, असा सूर अनेक जाणकार व्यक्त करतात. दरम्यान, मिरामार येथील किनार्‍याला टेकून असलेल्या या जागेची किंमत सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ३०० कोटी रुपयांच्या आसपास असेल व त्यामुळे या एकूण व्यवहाराबाबतच संशय निर्माण झाला आहे.
जमीन हडप करण्याचा डाव फसला
दरम्यान, मिरामार येथील ही सरकारी जमीन हडप करण्याचा डाव विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी उघडकीस आणून हाणून पाडला होता. या जागेवर बेकायदा अतिक्रमण करून या जागेची साफसफाई करण्याचे काम जोरात सुरू असल्याचा प्रकार पर्रीकरांनी उघड करताच सरकार खडबडून जागे झाले होते. पणजी पोलिसांत याप्रकरणी श्याम लुथ्रीया व व्हेर्नार व्हेलो यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही जमीन बेकायदा विक्री केल्यावरून अन्य ११ जणांचा शोध पणजी पोलिस घेत असले तरी त्यांना अद्याप यश मिळाले नसल्याचीही खबर आहे. ही जमीन तूर्त सरकारने आपल्या ताब्यात घेतली आहे. १९९८ साली तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी याठिकाणी जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी बुम पद्धतीवर ‘स्टुडिओ सी’ या ऑस्ट्रेलियन कंपनीकडे करारही केला होता परंतु काही कारणात्सव हा करार रद्द झाल्याने ही जमीन अजूनही विनावापर पडून आहे.

भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यालाप्राधान्य

संसदेत राष्ट्रपतींची ग्वाही
नवी दिल्ली, दि. २१ : वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच सार्वजनिक जीवनात बोकाळलेल्या भ्रष्टाचारासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सरकार प्राधान्य देणार आहे. आज सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठता व अखंडतेेच्या उणिवेमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या प्रामुख्याने सोडविण्याचे सरकारचे प्रयत्न राहणार आहे, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे. संसदेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचा प्रारंभ आज झाला. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्राध्यक्षा संबोधित होत्या.
वाढत्या महागाईपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करण्याला सरकारचे प्राधान्य आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, काळ्या पैशाने सरकारही चिंतित असून ही समस्याही समाप्त करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. काळा पैसा, विशेषकरून विदेशी बँकांतील काळ्या पैशासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या येत आहेत त्याने सरकार चिंतित आहे.
समाजातील गरीब, वंचित व दुर्बल घटकांची आर्थिक विकासातील भागीदारी निश्‍चित करण्याबरोबरच आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवण्याला सरकार महत्त्व देत आहे असे त्या म्हणाल्या. आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त करीत महागाईवर नियंत्रण ठेवण्याला सरकार प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक जीवनात बोकाळलेला भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी तसेच संसदीय तसेच सरकारी प्रशासकीय कारभारात पारदर्शिकता आणण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतील, यावर एक मंत्रिगट विचारविनिमय करीत आहे. यात वेळ पडल्यास मंत्र्यांचे अधिकार मर्यादित करण्याच्या उपाययोजनाही आहेत.
दहशतवाद, जातीय तसेच माओवादी हिंसाचार आज देशासमोर आव्हाने निर्माण करत आहेत, हे मान्य करून राष्ट्राध्यक्षा पुढे म्हणतात, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने सुरक्षा यंत्रणेत मोठे बदल केेले आहेत. समुद्रकिनार्‍यावरील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारांना अधिकाधिक आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त भागातील पोलिस भरतीवर अधिक जोर देत पोलिस दलात वाढ करण्यात आली आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.
अलिकडेच इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीचा उल्लेख करत तेथे झालेल्या बदलाचे स्वागत केले आहे. लोकशाहीच्या स्थापनेसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान संबंधांवर बोलताना त्या म्हणाल्या, या दोन्ही शेजारी देशांमधील संबंध चांगले व्हावेत हे आम्हालाही वाटते परंतु त्यासाठी पाकिस्तानने आधी आपल्या भूमीवरून भारतविरोधी कारवाया करणार्‍या दहशतवादी संघटनांची पाळेमुळे उखडून ङ्गेकली पाहिजेत.
निवडणूक सुधारणांसंदर्भात बोलताना राष्ट्राध्यक्षा म्हणाल्या, निवडणूक कायद्यांत सुधारणा व्हाव्यात असे सर्वच राजकीय पक्षांना वाटत असल्याने ते यासाठी एकत्र येऊन बदल घडवून आणतील, अशी मला आशा आहे. यासाठी केंद्र सरकारने यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. राज्य सरकारांबरोबर चर्चा करून यावर्षाच्या एप्रिलमहिन्यापर्यंत यासंदर्भात एक राष्ट्रीय परिषदही आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. न्यायव्यवस्था, त्यातील सुधारणांची अपेक्षा, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न यावरही त्यांनी मते व्यक्त केली. महिला आरक्षण विधेयकावर बोलताना त्या म्हणाल्या मला आशाही की लोकसभेत हे विधेयक मंजूर केले जाईल. हे विधेयक राज्यसभेने याआधीच मंजूर केलेले आहे, हे येथे उल्लेखनीय.
तेलंगणा समर्थकांच्या घोषणा
राष्ट्रपतींचे अभिमाषण संपायला आले असताना आंध्र प्रदेशातील काही कॉंग्रेस समर्थक सदस्यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने काही काळ राष्ट्राध्यक्षांच्या अभिभाषणात अडथळा आला. ‘जय तेलंगणा’, ‘आम्हाला स्वतंत्र तेलंगणाच हवा’ अशा घोषणा देत कॉंगे्रस सदस्य तेलंगणासमर्थनाचे ङ्गलक ङ्गडकवीत होते. परंतु उपराष्ट्रपती अन्सारी ज्यावेळी बोलण्यास उभे राहिले त्यावेळी या सदस्य आपापल्या जागी बसलेले होते.

पणजी महापालिका निवडणूक

शेवटच्या दिवशी ९३ अर्ज
• एकूण २७२ अर्ज दाखल • आज छाननी,
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेच्या दि. १३ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी आज (दि. २१) शेवटच्या दिवशी ९३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांचा समावेश आहे. आजच्या ९३ अर्जासह पणजी महापालिकेच्या ३० जागांच्या निवडणुकीसाठी एकूण २७२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या दि. २२ रोजी सर्व अर्जांची छाननी होणार असून परवा दि. २३ फेब्रुवारी हा अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे.
या निवडणुकीत पणजी फर्स्ट, पणजी महापालिका विकास आघाडी व टुगेदर टू पणजी अशी तीन पॅनल उतरली असून त्यांना राज्यातील प्रमुख तीन पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आज उमेदवारी भरलेल्या उमेदवारांत (प्रभाग १)मार्गरीदा फर्नांडिस, किरण जांबावलीकर व लोबो अन्ना रोझा डिसोझा (दोन अर्ज), (२) राजू रामा मार्टीन्स, डेवीड फर्नांडिस, नेल्सन काब्राल व अर्चेंजेला काब्राल, (३) फेरेरोेज रोझारीय बेंजामीन पो व कॅरोलिना पो, (४) डॅनियल फर्नांडिस व कॅरोलिना पो, (५) शीतल नाईक व शीतल डोंगरीकर, (६) रुपेश शिरगावकर व अनंत गायतोंडे, (७) रुबेर्तीना आल्मेदा व श्‍वेता लोटलीकर, (८) संदीप वेळूस्कर व मारिया कार्व्हालो, (९) सुदिन कामत (दोन अर्ज), डॉमनिक रॉड्रिगीज व इडगार गास्पार, (१०) माया जोशी, निमा नाईक, तोषा कुराडे, (दोन अर्ज) व सुनिता शेट्टी, (११) ऍशीली रुझारीयो, मखीजास कबीर पिंटो, मखीजा सुर्या पिंटो, मनोज पाटील, अनिरुद्ध वालावलकर व ऍशीली रिझारीयो, (१२) वैदेही नाईक, प्रसाद आमोणकर व शहीद नारो, (१३) भारती हेबळे व सुवर्णा माशेलकर, (१४) आदम शेख, फैधल खान व यतीन पारेख, (१५) शेखर डेगवेकर व शशिकांत नाईक, (१६) निना सिलीमखान, सतीशा उदय शिरोडकर व तेरेझा मास्कारेन्हस, (१७) नीलेश खांडेपारकर, (१८) रत्नाकर फातर्पेकर, गजानन नाईक, रवीश खराडे व समीर च्यारी, (१९) सुषमा मडकईकर, निता गायतोंडे, सोफीया फर्नांडिस व विरा नुनीस, (२०) सुरज कांदे, वीरेन महाले, कृष्णा शिरोेडकर व पवन अर्गेकर, (२१) महेश चांदेकर (तीन अर्ज), संतोष वळवईकर (दोन अर्ज), गंगाराम काळेव, नरेश काळे,(२२) माया तळकर व दुर्गा च्यारी, (२३) शैलेश उगाडेकर, संजय पेडणेकर, राजेश सळगावकर व सुरज कांदोळकर, (२४) दीक्षा मयेकर, सिडनी डिसोझा व मोहनलाल सरमळकर, (२५) शुभदा धोंड व भावना फोंडेकर, (२६) रुई परेरा (तीन अर्ज), प्रेमानंद नाईक व डेनीस जॉर्ज, (२७) शुभम चोडणकर, राजेश साळगावकर व रुद्रेश चोडणकर, (२८) निवेदिता चोपडेकर, सेसीलिया डायस व सुजाता हळदणकर, (२९) मारिया फर्नांडिस, (३०) श्यामसुंदर कामत व रुपेश हळणर्र्कर यांचा समावेश आहे.
पणजी फर्स्टचा शिस्तबद्ध प्रचार
पणजी महापिलकेत या वेळी सत्ता बदल करायचाच! या ईर्षेने पणजीतील विविध स्तरावरील अनेक मान्यवर एकत्र आले असून त्यांनी ‘पणजी फर्स्ट’ हे पॅनल उभे केले आहे. या पॅनलला भाजपने पाठिंबा दिलेला असून माजी महापौर अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखालील या पॅनलचा प्रचार खुद्द विरोधी पक्षनेते मनोहर परीर्र्कर तसेच अशोक नाईक व इतर मान्यवर शिस्तबद्ध करत असून आता पर्यंत अनेक प्रभागात प्रचाराची पहिली फेरी समाप्त झाली आहे. पणजी फर्स्टचे नेते व उमेदवारांनी घरोघरी प्रचारावर भर दिलेला असून विविध माध्यमांतून मतदारांकडे जाण्याचे त्यांनी ठरवले आहे. विश्वचषक क्रिकेटचा मोका साधून यास्पर्धेचे वेळापत्रक लोकांपर्यंत पोहोचवून आपल्या पॅनलचा प्रचार करण्याची त्यांची युक्ती सर्वानाच भावलेली आहे. विद्यमान सत्ताधारी मंडळाने केलेला भ्रष्टाचार सर्व पणजीकरांनी अनुभवला असून निःस्वार्थीपणे विकास करण्यासाठी पणजी फर्स्ट पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन पणजी फर्स्टचे नेते व उमेदवार घरोघरी जाऊन करताना दिसत आहेत.

पेडणे व सांग्यावर मृत्यूची छाया

• जन्मदरापेक्षा मृत्यूदराचे प्रमाण दुप्पट
पणजी, दि. २१(प्रतिनिधी): राज्यातील पेडणे व सांगे तालुक्यावर मृत्यूची काळी छाया पसरल्याचे भयाण चित्र निर्माण झाले आहे, त्यामुळे राज्य सरकारवर आता याबाबतीत गांभीर्याने विचार करण्याची वेळ ओढवली आहे. राज्यातील अन्य सर्व तालुक्यांत जन्माचे प्रमाण कितीतरी पटीने अधिक असता या दोन तालुक्यांत मात्र मृत्यूचे प्रमाण जन्मप्रमाणापेक्षा कमालीचे वाढल्याचे राज्य नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन खात्याकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २००६ ते २००९ या चार वर्षांची आकडेवारी पाहता पेडणेत केवळ ९४९ जन्म नोंदवले गेले तर मृतांची संख्या मात्र २०६२ नोंद झाली आहे. सांगे तालुक्यातही तशीच परिस्थिती असून ८०७ जन्मनोंदणीच्या प्रमाणात १५४६ मृत्यू नोंद झाले आहेत.
फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी गत विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना विचारलेल्या एका तारांकित प्रश्‍नावरील उत्तरातून ही भयानक परिस्थिती उघड झाली आहे. पेडणे व सांगे हे दोन्ही तालुके अजूनही विकासापासून वंचित आहेत. वैद्यकीय सुविधांबाबतही या तालुक्यांची परिस्थिती अजूनही चांगली नाही. त्यात वाढती व्यसनाधीनता व सांगे तालुक्यातील अमर्याद खाण व्यवसायाच्या प्रदूषणाचा विषय या संकटाला कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्षही काढला जात आहे. डिचोली, मुरगांव व काणकोण तालुक्यांतील परिस्थिती सध्या आटोक्यात असली तरी चिंता करण्याजोगीच आहे. या आकडेवारीमुळे या परिस्थितीच्या मुळाशी जाऊन संबंधित तालुक्यांतील वाढत्या मृत्यूप्रमाणाची कारणमीमांसा शोधणे आता सरकारसाठी अनिवार्य ठरले आहे. बार्देश, तिसवाडी, सासष्टी, फोंडा, केपे तालुक्यांतील परिस्थिती मात्र त्यामानाने समाधानकारक आहे.
राज्य नियोजन, सांख्यिकी व मूल्यांकन खात्याकडून ही आकडेवारी तयार करण्यात आली असली तरी त्याची कोणतीच दखल अद्याप सरकारने घेतली नाही. पेडणे व सांगे तालुक्यांवर ओढवलेल्या या भीषण परिस्थितीवर कुणाचेच लक्ष नसून एकूणच राज्यासाठी ही शरमेची व चिंतनीयबाब ठरली आहे.
२००६ ते २००९ पर्यंत तालुकानिहाय जन्म- मृत्यूची नोंदणी
तालुका- जन्म- मृत्यू
पेडणे- ९४९- २०६२
बार्देश- १६१७८- ६७७२
तिसवाडी- २६९४३- १४२२८
डिचोली- ३८११- २३९६
सत्तरी- २२६६- १४११
मुरगाव- ७७५३- ३२४९
फोंडा- ७७९२- ३५८२
सासष्टी- २२८७६- ९९५७
केपे- ४४७३- १८१०
सांगे- ८०७- १५४६
काणकोण- १८२७- १२०७
-----------------
एकूण- ९५६७५- ४८२२०
----------------------------
२०१० (सप्टेंबरपर्यंत)ची आकडेवारी
तालुका - जन्म- मृत्यू
पेडणे- ११५- ३६४
बार्देश- ८०८- ८७१
तिसवाडी- ४८१६- २७१९
डिचोली- ५८३- ४१३
सत्तरी- ३६६- २६६
मुरगाव- १३८१- ६००
फोंडा- १३०१- ७०४
सासष्टी- ४१९२- १८७२
केपे- ७१२- ३७६
सांगे- १४०- २८३
काणकोण- ३१०- २०४
-----------------
एकूण- १४७२४- ८६७२

आग्वाद येथे बार्ज बुडाली

एक बेपत्ता, ६ जणांना वाचवले
पणजी, दि.२१(प्रतिनिधी): वास्को येथील ‘एम. व्ही. नूर ४’ ही खनिजवाहू बार्ज काल २० रोजी रात्री आग्वाद सिकेरी येथील समुद्रात बुडाल्याची घटना घडली. या बार्जमधील एक खलाशी कामगार बेपत्ता असून इतर सहा ६ खलाशांना इतर बार्जवरील खलाशांनी वाचवण्यात यश मिळवले.
बंदर कप्तान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही खनिजवाहू बार्ज समुद्रातील जहाजावर माल उतरवत असताना ही घटना घडली. गौरंगा मोडांल(२४) हा खलाशी अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. या बुडालेल्या बार्जमुळे समुद्रात वाहतूक करणार्‍या सर्व प्रकारच्या जहाजांना व बार्ज मालकांना बंदर कप्तान खात्याकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून कोणताही अडथळा निर्माण झाला किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ खात्याला कल्पना देण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, ही घटना घडली तेव्हा ताबडतोब इतर बार्जवरील खलाशांनी या बुडत्या बार्जवरील खलाशांना मदतीचा हात दिला. त्यात गौरंगा हा आधीच पाण्यात पडल्याने त्याचा पत्ता लागू शकला नाही. या घटनेची माहिती मिळताच बंदर कप्तान व नौदलाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत बेपत्ता गौरंगाचा पत्ता लागू शकला नसल्याचे सांगण्यात आले.
वेळसांव येथे मृतदेह आढळला
संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास वेळसांव येथे किनार्‍यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळण्याची माहिती मिळाली आहे. हा मृतदेह बार्ज अपघातात बेपत्ता झालेल्या गौरंगाचा आहे काय, याची शहानिशी केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Monday, 21 February, 2011

जेपीसीची घोषणा उद्या?

नवी दिल्ली, दि.२० : हिवाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीत होण्याची चिन्हे लोकसभा सभापती मीराकुमार यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर दिसू लागली आहेत. २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची जेपीसी चौकशी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, याची अधिकृत घोषणा अधिवेशनाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या पहिल्या दिवशी म्हणजे येत्या मंगळवारी करण्यात येईल, असे आश्‍वासन सभागृहाचे नेते व अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी विरोधी नेत्यांना दिल्यानंतर अधिवेशन काळात सभागृहातील कामकाज सुरळीतपणे चालण्याचे संकेत सर्वच पक्षांकडून मिळाले आहेत.
उद्यापासून सुरू होत असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीपणे पार पडण्यासोबतच ङ्गलदायीदेखील ठरेल अशी आशा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली असून, विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्यावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे म्हटले आहे.
‘या अधिवेशनात अंदाजपत्रक पारित करण्यासह इतरही महत्त्वाचे संसदीय कामकाज पार पाडायचे आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जेपीसी स्थापन करण्याच्या विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर आजच्या बैठकीबद्दल आपण समाधानी आहात का, असे विचारले असता ‘मी कायम समाधानी असतो’ असे पंतप्रधान म्हणाले. याबाबतही मी आशावादी आहे, असेही डॉ. सिंग पुढे म्हणाले.

महापालिका निवडणूक तिरंगी

• नेते जाहीरनाम्यात व्यस्त
• आयरिश यांचा वेगळा जाहीरनामा

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): पणजी महापालिकेची दि. १३ मार्च रोजी होणारी निवडणूक तिरंगी व अटीतटीची होण्याची शक्यता आत्तापर्यंतच्या उमेदवारी अर्जांवरून दिसत आहे. सोमवार दि. २१ रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आज रविवार असल्याने कुणीही अर्ज भरला नाही, मात्र दि.१९ पर्यंत भरलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या (१८०) पाहता सत्तेसाठी बरीच चढाओढ होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण या निवडणुकीत राज्यातील प्रमुख तिन्ही पक्षांचे समर्थक पॅनल निवडणुकीत उतरलेली आहेत. कॉंग्रेस मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पाठिंब्याने सत्ता पुन्हा आपल्याचकडे राखण्यासाठी निवडणुकीत उतरलेली विद्यमान सत्ताधारी मंडळाची ‘पणजी विकास आघाडी’, भाजपच्या पाठिंब्याबरोबरच पणजीतील सर्वपक्षीय मान्यवर लोकांच्या पाठिंब्यावर पणजीच्या विकासासाठी सत्ता बदल हवाच, या उद्देशाने रिंगणात उतरलेले ‘ पणजी फर्स्ट’ व दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ म्हणत विद्यमान सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाचा साथीदार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ‘टुगेदर फॉर पणजी’ अशी तीन पॅनल्स मैदानात उतरले आहेत. पणजी विकास आघाडीला बाबूश मोन्सेरात यांचे, पणजी फर्स्टला मनोहर पर्रीकर यांचे तर टुगेदर फॉर पणजीला प्रा. सुरेंद्र सिरसाट व मिकी पाशेको यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सध्या या तीनही पॅनलचे नेते आपापल्या पॅनलचा जाहीरनामा (काहीजण त्याला वचननामा म्हणतात) तयार करण्यात गुंतलेले आहेत. सदर जाहीरनामे प्रसिद्ध होताच कोण कोण कसली मनमोहक आश्‍वासने देतो ते कळेल.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाच्या पाठिंब्याने प्रभाग ३० रायबंदर या प्रभागातून महापालिका निवडणुकीत उतरलेले समाजसेवक ऍड. आयरिश रॉड्रिगीज यांनी प्रभाग ३० साठी आपला वेगळा जाहीरनामा जाहीर करणार असल्याची माहिती आज प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. गेल्या अनेक वर्षात पणजीपासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या प्रभाग ३० रायबंदर या भागाला सावत्रपणाचीच वागणूक देण्यात आली असून या पुढे ती कदापि सहन केली जाणार नाही असेहीे ऍड. आयरिश यांनी या पत्रकात म्हटले आहे.
फुर्तादो-मडकईकरांचे बळ प्रभागापुरते
या निवडणुकीत वरील तिन्ही पॅनल व्यतिरिक्त सुरेंद्र फुर्तादो व उदय मडकईकर हे दोन ज्येष्ठ नगरसेवक या निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले आहेत. या पैकी श्री. फुर्तादो यांचा दबदबा त्यांच्या प्रभाग ९ व प्रभाग १० पुरता मर्यादित आहे. तर श्री. मडकईकर यांना विद्यमान सत्ताधारी मंडळातून मंत्री बाबूश यांनी वगळल्याने बाबूश यांना धडा शिकवण्याच्या इराद्यानेच ते निवडणुकीत उतरले आहेत. त्यांचा दबदबा भाटले येथील त्यांच्या प्रभागाबरोबरच पणजीच्या इतर भागात बराच आहे. त्यामुळे त्यांची भूमिका पणजी विकास आघाडीच्या यश अपयशात महत्त्वाची ठरणार आहे हे निश्‍चित!

केळ्यांचा व्यावसायिक ते पंच

- नोकरीवर लाथ मारणार्‍या एका अवलियाचा प्रवास
पणजी, दि. २० (शैलेश तिवरेकर): भारत हा शेतीप्रधान देश असूनही एकेकाळी शेतीला मिळणारे प्राधान्य स्वातंत्र्यानंतर झपाट्याने काळ बदलत गेल्याने शेतीव्यवसाय मागे पडत गेला. ही स्थिती जशी देशाबरोबरच गोव्यातही आहे. केळी, माड, पोफळींनी डवरलेली बागायती आणि तिला संजीवनी देणारे डोंगरातून झुळझुळ वाहणारे झरे म्हणजे या परशुरामाच्या भूमीची शान होती. म्हणूनच तर कविवर्य बा. भ. बोरकर यांनी म्हटले होते,
हिरवळ आणिक पाणी
तेथेे स्फुरतील मजला गाणी
निळींतुनी पाखरे पांढरी
किलबिलती थव्यांनी
आज मात्र गोमंतकाची परिस्थिती वेगळीच आहे. चोहोबाजूंनी नजर फिरवल्यास सगळीकडे धूळ आणि खाणी, मग कुठून येणार पाणी आणि कशी स्फुरतील गाणी? अशी स्थिती आहे. गोव्यातील शेतीव्यवसाय कमी होण्याचे हेही एक मुख्य कारण आहे. शिवाय कालानुरूप युवकांची मानसिकता बदलत गेली. आजचा युवक सरकारी नोकरीच्या मागे लागलेला दिसतो. मात्र प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. त्यानुसार समोर येणार्‍या प्रत्येक गोष्टीवर खंबीरपणे मात करून, आहे त्या परिस्थितीत शेतीव्यवसायाला प्राधान्य देणारे सुशिक्षित युवक आजही कमी प्रमाणात का असेनात परंतु आहेत. त्यातील एक म्हणजे इब्रामपूरचे अशोक धाऊस्कर.
बालपणापासूनच स्वभाव धाडसी, देशभक्तीची ओढ असलेले अशोक शिक्षण पूर्ण करून देशासाठी आपण काही तरी करावे या उद्देशाने सीमासुरक्षा दलात भरती झाले. त्यांचे वडिलही माजी सैनिक. उतारवयातील आपल्या आईवडिलांना सोडून केवळ पैसा मिळवण्यासाठीच हजारो किलोमीटर दूर येऊन ही नोकरी करण्यापेक्षा घरी राहून आपण दुप्पट पैसा कमावू शकतो असा विचार करत अशोक हे अवघ्या दोन वर्षांच्या काळात सीमासुरक्षा दलाची नोकरी सोडून घरी परतले. घरी आल्यावर वेगवेगळे विचार मनात थैमान घालू लागले. कारण सरकारी व तीसुद्धा सैन्यातील सोडून आल्यामुळे लोक आपल्याला काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शेतीचा व्यवसाय करायचा आणि आपली धमक गावासमोर मांडायची, असे ठरवून टाकले.
मग शेतीव्यवसायात सर्वस्व ओतून सुमारे १५ वर्षार्ंपूर्वी स्वतःच्या जमिनीत केवळ २०० मंडोळी केळीची लागवड करून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर दरवर्षी किमान पाच हजार केळींची लागवड करत अशोक यांनी व्यवसाय वाढवला. केवळ केळीच नव्हे तर सुमारे २००० काजू कलमांचीही लागवड केली. अशा तर्‍हेने गेल्या १५ वर्षांपासून शेती व्यवसाय चढत्या क्रमांकावर ठेवून साळ, हेदूस या शेजारच्या गावात करारावर जमिनी घेऊन मोठ्या प्रमाणात केळींची लागवड त्यांनी केली. केळीचा व्यवसाय सुरू असतानाच दोन ट्रक (टिप्पर) खरेदी करून नव्या व्यवसायाची सुरुवात त्यांनी केली. आपल्या व्यवसायाबरोबरच विविध क्षेत्रांतील समाजसेवेचे काम त्यांनी सुरूच ठेवले. कराटेचे प्रशिक्षणही घेतले आणि आज इब्रामपूर हणखणेचे पंच सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.
आजच्या यशाबद्दल सांगताना अशोक म्हणतात, राजकारण हे आमच्यासारख्या माणसांचे काम नव्हे. म्हणूनच समाजसेवेचे व्रत अंगीकारले व राजकारणापासून चार हात दूर राहणे आपण पसंत केले. राजकारणात सुक्याबरोबर ओलेही जळते. राजकारण हा भ्रष्टाचारी लोकांचा तलाव बनला असून आपण कितीही टाहो फोडला तरी लोक भ्रष्टाचारी म्हणूनच बोट दाखवतात. आता राजकारण नको. क्लब किंवा इतर संस्थांच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी मिळते तेच चांगले. आपण करत असलेल्या चांगल्या वाईट गोष्टींचे मोजमाप समाज करत असतो. त्यामुळे समाजासाठी जगणे हेच योग्य.

३ लाखांचे संगणक जप्त

• पणजी पोलिसांची कारवाई
पणजी, दि. २० (प्रतिनिधी): सांताक्रुज येथील संगणक विक्री दुकानातून लॅपटॉप आणि अन्य वस्तू घेऊन पोबारा केलेल्या चोरट्याकडून पणजी पोलिसांनी ३ लाख रुपयांचे संगणक जप्त केले. कर्नाटक येथील सागर येथे गेलेल्या पणजी पोलिसांच्या पथकाने त्याच्या राहत्या घरातून हा ऐवज जप्त केला. ईस्माईल कासीम कुंजी मोहमद (२३)याला या प्रकरणी अटक झाली असून त्याला पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे.
अधिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी सांताक्रूज येथे संगणक विक्रीचे दुकान असलेल्या हैदर शेख यांनी आपल्या दुकानातून दहा संगणक चोरीला गेल्याची तक्रार केली होती. त्यावरून संशयिताला ताब्यात घेतले होते. सांतिनेज येथे राहणार्‍या ईस्माईल याच्याकडून तीन लॅपटॉप जप्त करण्यात आले. तर, अन्य संगणक आणि लॅपटॉप त्यांनी आपण कर्नाटक सागर येथील तीन दुकानात विकल्याचे सांगितले. त्या माहितीवरून पणजी पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षक रामनाथ कळंगुटकर यांनी आपल्या पथकासह त्याठिकाणी जाऊन छापा टाकला. सदर दुकानातून संगणक ताब्यात घेतले तसेच, मूळ घरी ठेवण्यात आलेलेही संगणक जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही महिन्यापासून ईस्माईल याने आपण नोकरी करत असलेल्या दुकानातून संगणकाची आणि लॅपटॉपची चोरी करण्याचे सत्र सुरू केले होते. आर्थिक वर्ष अखेरीस दुकानातील सर्व संगणकांची चाचपणी करण्यात आली तेव्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या कारवाईत पोलिस निरीक्षक रमेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री. कळंगुटकर यांच्यासह पोलिस हवालदार डी. के. नाईक, उल्हास खोत, श्रीराम साळगावकर, नितेश हळर्णकर, विजय पाळणी व गिरीश राऊळ यांनी सहभाग घेतला. याविषयीचा अधिक तपास श्री. कळंगुटकर करीत आहेत.

फर्मागुडीत पार्क केलेल्या पाच गाड्यांना आग

फोंडा, दि.२० (प्रतिनिधी): फर्मागुडी येथे एका कार्यक्रम स्थळी पार्किंग करून ठेवलेल्या पाच गाड्यांना आज (दि.२०) संध्याकाळी ४ च्या सुमारास आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
फर्मागुडी येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांनी वाळलेले गवत असलेल्या मैदानावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली होती. त्यातील मध्यभागी असलेल्या पाच गाड्यांना आग लागली. फोंडा अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने बरेच नुकसान टळले आहे. आग लागलेल्या गाड्यामध्ये बॉलेरो, मार्टीझ, मारुती व्हॅन, मारुती झेन आणि मारुती एसएक्सएफ या पाच गाड्यांचा समावेश आहे. या आगीत वरील पाचही गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, असे अग्निशामक दलाच्या सूत्रांनी सांगितले.फोंडा केंद्राचे उपअधिकारी राहुल देसाई यांच्या मागदर्शनाखाली जवानांनी आग विझविण्याचे काम केले.

‘स्वतंत्र देशात मानसिक परिवर्तन गरजेचे’

‘छळाकडून बळाकडे ...’ विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन
पणजी, दि.२० (सांस्कृतिक प्रतिनिधी): स्वतंत्र देशात किंवा राज्यात केवळ शासकीय परिवर्तन होऊन चालत नाही तर मानसिक परिवर्तनही होणे आवश्यक आहे. आज याचीच कमतरता असल्याने अराष्ट्रीयकरणाचे प्रमाण वाढत आहे परंतु त्याचबरोबर राष्ट्रीकरणही होत असल्याने घाबरण्याचे कारण नाही. असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी यांनी सांगितले. सांस्कृतिक वार्तापत्र व प्रेरणा आर्ट गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गोमंतकाच्या संघर्षमय इतिहासाचा वेध घेणार्‍या ‘छळाकडून बळाकडे ः गोवा मुक्ती ५०’ व स्व. श्रीराम कामत संपादित विश्‍वचरित्रकोषाच्या सहाव्या खंडाचे प्रकाशन तसेच गोवा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण गोव्यात होणार्‍या विविध कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून फादर बेंटो रॉड्रिग्स (फादर आग्नेल आश्रमाचे प्रमुख दिल्ली), जयराम कामत, प्रेरणा ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर, सांस्कृतिक वार्तापत्राचे शैलेंद्र बोरकर, विशेषकंाचे अतिथी संपादक वल्लभ केळकर, वर्षभर होणार्‍या कार्यक्रमाचे राज्य संयोजक आनंद शिरोडकर, सुरेश देशपांडे, कोशाध्यक्ष राजेंद्र भोबे, सचिव सुभाष देसाई आणि सत्कारमूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. हरीजी पुढे म्हणाले की, अराष्ट्रीयकरणाचा प्रकार हा गेल्या अनेक सालांपासून सुरू असून ज्या देशाचा भाग गुलाम होतो तिथे अराष्ट्रीयकरण होणे स्वाभाविक आहे, असेही ते म्हणाले. भारत गुलाम व्हायला मुख्य कारण म्हणजे ‘सद्गुणविकृती’ समोरून येणार्‍या माणसाला ओळखणे आणि स्वतःला ओळखणे जमले पाहिजे, जे भारतीयांना जमले नाही. परंतु जपान, चिन या देशांना ते चांगले जमले. असे सांगताना त्यांनी पुराणातील राम व कृष्ण यांची उदाहरणे दिली. आजसुद्धा विरोधी शक्ती खुल्लम खुल्ला रूप घेऊन येऊ शकते. त्यांना ओळखता येणे गरजेचे आहे. म्हणूनच आजच्या पिढीने सद्गुण विकृतीला फसून न जाता जागृत होणे महत्त्वाचे आहे. स्वतःबद्दल विचार करण्यास सक्षम असल्यास आम्ही खर्‍या अर्थाने स्वतंत्र आहोत असे म्हणता येईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आजच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्याला एक अनोखा अनुभव मिळाल्याचे स्पष्ट केले.
स्वतंत्र गोव्यात अराष्ट्रीयकरणाचे प्रकार वाढत असून आज काही गोमंतकीयांचा आत्मा भ्रष्ट झाला आहे. त्यासाठी ‘छळाकडून बळाकडे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण गोव्यात वर्षभर जागरण करणारा हा उपक्रम असल्याचे श्री. वेलिंगकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. यावेळी फादर रॉड्रिगीस यांच्या हस्ते ‘छळाकडून बळाकडे ः गोवा मुक्ती ५०’ विशेषांक तसेच विश्‍वचरित्रकोषाच्या ६ व्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले. तर श्री. हरीजी यांच्या हस्ते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर सिनारी, नागेश करमली, डॉ. व्हेरीसिनो कुतिन्हा, मधुकर मोर्डेकर, चंद्रकांत केंकरे आणि फ्लावीयन डायस यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी फादर रॉड्रिगीस म्हणाले की, जो धर्म माणसामाणसांत विभागणी करतो तो धर्मच नव्हे. स्वातंत्र्य हे प्रत्येकाला हवे असते परंतु ते टिकवण्यासाठी एकजुटीने वावरणे आवश्यक आहे. देश सेवा ही देवाची सेवा आहे असेही त्यांनी सांगितले. या वेळी सुरेश देशपांडे यांनी मनेागत व्यक्त केले तर श्री. केळकर आणि शैलेंद्र बोरकर यांनी विशेषांकाविषयी भाषण केले. सत्कारमूर्तींच्या वतीने श्री. डायस यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुभाष देसाई यांनी स्वागत व परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा.अनिल सामंत यांनी केले. राजेंद्र भोबे यांनी आभार मानले.

सरकारकडून लोकांची दिशाभूल : नार्वेकर

• कळंगुट बागा येथे पीपीपीविरोधात बैठक
म्हापसा, दि. २० (प्रतिनिधी): सरकारचा पीपीपीचा डाव हाणून पाडण्यासाठी कळंगुट- बागातील लोकांनी संघटित व्हावे. विद्यमान सरकारने गोवा विकायला काढलेला आहे. सरकारला खनिजवाल्यांनी विकत घेतले आहे. वविध धोरणांच्या नावाखाली सरकारने लोकांची दिशाभूल चालवली असून ही लोकशाही नव्हे तर राजेशाही, हुकूमशाही आहे. असा आरोप यावेळी श्री. नार्वेकर यांनी केला.अशावेळी आपल्या सुरक्षेसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल असे आवाहन हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर यांनी केले. बागा समुद्र किनार्‍यालगत इको टुरिझमच्या नावाखाली पीपीपीच्या धर्तीवर हॉटेल सुरू करण्याच्या विरोधात कळंगुट बागा येथील नागरिकांनी आज (दि.२०) एका जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत ऍड. नार्वेकर हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत रापणकारांचो एकवोटचे माथानी साल्ढाणा, म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर,जिल्हा पंचायत सदस्य आबेलिना मिनेझिस, अँथनी मिनेझिस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना श्री. नार्वेकर यांनी सांगितले की, आज गोव्यात अनेक अनैतिक घटना वाढत असल्याने पर्यटकांसाठी गोवा असुरक्षित बनला आहे. विद्यमान सरकारमधील तीन मंत्री तर केवळ पैसा कसा कमवावा यातच मग्न आहेत अशी टीका केली. विद्यमान सरकारचा कारभार पाहता पुढील निवडणुकीत हे सरकार सत्तेवर येणार नाही. सरकारचे विविध कुटील डाव आम्ही हाणून पाडले नाहीत तर पुढील पिढी आम्हांला माफ करणार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री गोव्याला सध्या ‘दिगंबर’ करायला निघाले आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.
गोवा राखून ठेवण्याची जबाबदारी स्थानिकांवर व गोमंतकीयांवरच आहे. मात्र सरकार गोमंतकीयांना वेडे समजत आहे अशी टीका यावेळी श्री. साल्ढाणा यांनी केली. गोव्याच्या हितासाठी गोमंतकीयांनी आत्तापासूनच जात-पात, धर्म-भाषा विसरण्याची वेळ आल्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी श्री. डिसोझा यांनी पीपीपीला विरोध करत हे सरकार एकदम भ्रष्ट असल्याचा आरोप केला. यावेळी मायकल लोबो, प्रकाश बांदोडकर, ऍड. यतिश नायक यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन गोरख मांद्रेकर यांनी केले.

Sunday, 20 February, 2011

नोकर्‍या वाटून मतांचा जोगवा!


साडेतीन वर्षांत ८०८१ सरकारी नोकर्‍या

२८०० नव्या पदांची अधिसूचनापणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
सामान्य जनतेला भेडसावणार्‍या विविध प्रश्‍नांवरून राज्यात सरकारविरोधात जबरदस्त वातावरण तापत आहे. त्याचा
कोणताच परिणाम सध्या सरकारवर दिसून येत नसला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणात नोकर भरती करून आपली ‘वोटबँक’ भक्कम करण्याची जय्यत तयारी सरकारने आरंभली आहे. याप्रकरणी प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार जानेवारी २०१० ते आत्तापर्यंत एकूण २८०० पदे घोषित करण्यात आली असून त्यांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
राज्यात सरकारी नोकर भरतीसाठी मुलाखती व लेखी परीक्षा म्हणजे फार्स बनला आहे. प्रत्येक मंत्री आपल्या मर्जीनुसार भरती करीत असल्याने बेरोजगार युवकांत प्रचंड नैराश्य पसरले आहे. सध्याच्या परिस्थितीत ‘एलडीसी’ पदासाठी दोन लाख रुपये दर सुरू असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे दरम्यान, नोकर भरतीमुळे राजकीय नेत्यांना पैसा कमावण्याची आयतीच संधी प्राप्त झाली असून नोकरी दिल्याने त्याचा उपयोग मतपेढी भक्कम करण्यासाठीही होऊ लागला आहे.
मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी गेल्या विधानसभेत विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देताना सरकारने सादर केलेली आकडेवारी धक्कादायक ठरली आहे. जून २००७ ते आत्तापर्यंत सरकारतर्फे ५६०७ पदांची भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विविध खात्यांत एकूण २४७४ कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर सेवा बजावत आहेत. त्यांना नियमित करण्यासाठी किंवा कामगार कायद्याप्रमाणे इतर सुविधा मिळवून देण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. शिवाय जानेवारी २०१० ते आत्तापर्यंत विविध खात्यांत मिळून एकूण २८०० पदांची घोषणा केली असून त्यांची भरती प्रक्रिया जोरात सुरू आहे.
कंत्राट भरतीत वीज खाते आघाडीवर आहे. या खात्यात एकूण ८५९ कर्मचारी कंत्राटी सेवेत आहेत. त्यापाठोपाठ आरोग्य खाते-३७०, कारागीर प्रशिक्षण खाते-२८३, उच्च शिक्षण संचालनालय-२४७, गोवा वैद्यकीय महाविद्यालय-२२५, क्रीडा खाते-१२८ आदींचा समावेश आहे.
दरम्यान, जून २००७ पासून विविध खात्यांत केलेल्या नोकर भरतीनुसार सर्वाधिक भरती गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाली आहे. त्यात ६५९ कर्मचार्‍यांचा समावेश आहे. पाठोपाठ पोलिस -६५४, वीज खाते -५८८, आरोग्य खाते -५४९, जलस्त्रोत्र खाते -२३५, कृषी खाते -१२५, कामगार खाते -१३१, कला व संस्कृती खाते -१०८, पंचायत -११८ आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
निवडणुकीच्या तोंडावर ही नोकरी भरती करून विरोधकांना कोंडीत पकडण्याची ही क्लुप्ती सरकारने आखल्याचे कळते. अनेक खात्यांत अर्ज स्वीकारून ठेवले आहेत. अद्याप निवड करण्यात आली नसून ती निवडणुका जवळ येताच केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंबंधी सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितानुसार सर्वांत जास्त भरती पर्यटन खाते-५००, उद्योग खाते-५००, जलस्त्रोत्र खाते-३४१, खाण खाते-२३८, पोलिस-२३६, व्यापारी कर आयुक्तालय-१३८, वाहतूक-१५७, कामगार खाते-१०८ वीज खाते-१११, शिक्षण खाते-९१ आदींचा उल्लेख करता येईल. या नव्या नोकर भरतीमुळे राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडणार आहे. शिक्षण तथा इतर अनेक खात्यांत यावर्षी मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्या जागा भरण्याची तयारी सुरू असल्याचे कळते.