Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 28 February, 2009

आर्थिक विकासाचा दर फक्त ५.३ टक्के, २००३ नंतर प्रथमच निचतम पातळी

संपुआचे आर्थिक क्षेत्रातील अपयश उघडकीस
नवी दिल्ली, दि. २७ : चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत देशातील आर्थिक विकासाचा दर ५.३ टक्के इतका घसरला.याचाच अर्थ केंद्र सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक विकास मंदावला. मागील वर्षी याच कालावधीत विकासाचा दर ८.९ टक्के होता. २००३ नंतर प्रथमच विकास दराने इतकी खालची पातळी गाठली आहे.
आर्थिक विकासाचा दर हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा निदर्शक मानला जातो. यापूर्वी चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत हा दर ७.९ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७.६ टक्के होता. पण, तिसऱ्या तिमाहीत तो घसरून ५.३ टक्क्यांवर आला. अर्थात, तज्ज्ञ मंडळी हा दर घसरण्यासाठी जागतिक मंदी कारणीभूत असल्याचे म्हणत आहेत. पण, या दराने रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकारचे दावेही निष्प्रभ ठरविले आहेत. यापूर्वी सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेने चालू आर्थिक वर्षात विकास दर सात टक्के किंवा त्याच्या वर राहण्याची आशा व्यक्त केली होती. पण, त्यांची आशा फोल ठरली आहे.
तिसऱ्या तिमाहीत कृषी क्षेत्रातील विकास दरात २.२ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. या तिमाहीत खाण उद्योग ५.३ टक्के, हॉस्पिटॅलिटी, परिवहन, दळणवळण ६.८ टक्के, बॅंक, विमा आणि रिऍलिटी ९.५ टक्के आणि सरकारी सेवा १७.३ टक्के अशा समाधानकारक आकड्यांवर राहिले. कृषी क्षेत्रातील नकारात्मक विकास हा एकूणच आर्थिक विकासावर परिणामकारक ठरल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.
शेअरबाजारात निरुत्साह
चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील जाहीर झालेल्या विकास दर ५.३ टक्के इतक्या खालच्या स्तरापर्यंत आल्याने आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना उत्साह मावळला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक ६३ अंकांची घसरण दाखवून बंद झाला. ३० शेअर्सवर आधारित निर्देशांक आज दिवसभरात २२७ अंकांनी खाली आला होता. दिवसाच्या मधल्या टप्प्यात तो उसळला आणि दिवसअखेर मात्र त्यात ६३.२५ अंकांची घसरण नोंदविण्यात आली. आज तो ८८९१.६१ वर बंद झाला.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज २२ अंकांची घट नोंदविण्यात आली. आज निफ्टी २७६३.६५ वर बंद झाला. जागतिक मंदीचा फार मोठा परिणाम आतापर्यंत भारतावर पहायला मिळाला नव्हता. पण, आज जाहीर झालेल्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक विकास दराने जागतिक मंदीचा परिणाम दाखवून दिला. देशाच्या विकास दराने गेल्या पाच वर्षातील निचतम पातळी गाठल्याने आज शेअर बाजारांवरही परिणाम दिसून आला. निर्देशांक आणि निफ्टी दोन्हींमध्ये घसरण नोंदविण्यात आली.
आज फायद्यात राहिलेल्या शेअर्समध्ये बॅंकिंग क्षेत्राचा पहिला क्रमांक लागतो. या क्षेत्रातील शेअर्समध्ये १.३१ टक्क्याची वाढ झाली. आयसीआयसीआय बॅंक, एसबीआय, एचडीएफसी यांच्या शेअर्सच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली. आज रुपयाच्या किंमतीत झालेली घसरणही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम करणारी ठरली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्स आज ०.६९ टक्क्यांनी खाली आले. सॉफ्टवेअर क्षेत्रातील इन्फोसिस आणि विप्रो या आघाडीच्या कंपन्यांना आज मोठे नुकसान सहन करावे लागले.रिऍलिटी क्षेत्र आज सर्वाधिक तोट्यात राहिले. तेल आणि नैसर्गिक वायू, तंत्रज्ञान, ग्राहकी वस्तू, ऑटो, भांडवली वस्तू, आरोग्य आणि ऊर्जा या सर्वच क्षेत्रातील शेअर्स आज विक्रीच्या दबावाखाली होते. आज बॅंक व्यतिरिक्त औषध आणि धातू क्षेत्र फायद्यात राहिले.

लक्ष्मी सोनू राऊळ मुलापाठोपाठ मातेचाही मृत्यू, तळर्ण पेडणे भागावर शोककळा

मोरजी, दि. २७ (वार्ताहर): कुलदीपक जन्माला आला नाहीच; शिवाय घरची लक्ष्मीही जगाचा निरोप घेऊन अनंताच्या यात्रेला निघून गेली. त्यामुळे तळर्ण-पेडणे भागावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मी सोनू राऊळ या महिलेची ही विदारक कहाणी. काल पहाटे तीनच्या सुमारास पेडणे येथील आझिलो इस्पितळात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
पर्ये सत्तरी येथील लक्ष्मी यांचा विवाह वर्षभरापूर्वी तळर्णच्या सोनू राऊळ यांच्याशी झाला होता. लग्नाला अजून वर्षही पूर्ण झालेले नव्हते. बाळंतपणासाठी त्यांना आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले असता तीन दिवसांपूर्वी त्यांनी मृत मुलाला जन्म दिला. तेव्हा ऑपरेशन करावे लागले होते. तथापि, अतिरक्तस्त्रावामुळे काल पहाटे पहाटे तीनच्या सुमारास त्यांच्यावर दैवाने घाला घातला. त्यांच्या मृत्यूचे वृत्त येऊन थडकताच अनेकांना हुंदका अनावर झाला होता. अत्यंत मनमिळाऊ आणि सालस म्हणून त्या तळर्ण भागात परिचित होत्या.राऊळ परिवारावर तर त्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मी यांच्या सासूबाईंना कसे बोलते करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गृहलक्ष्मीच आता पुन्हा कधीही दिसणार नाही, ही कल्पनाच त्यांना सहन करणे अशक्य झाले आहे. अहोरात्र त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आहेत. त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्याची अवस्था तशीच झाली आहे. लक्ष्मी यांच्यावर आज (२७ रोजी) अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा सर्वचजण सद्गदीत झाले होते. या मृत्यूप्रकरणी पेडणे पोलिस तपास करत आहेत.
---------------------------------------------------------------------------------
राऊळ टीचर कोठे गेल्या?
थर्मास तळर्ण येथे लक्ष्मी राऊळ ह्या के. जी.च्या मुलांना शिक्षण देत असत. आपल्याला प्रेमाने शिकवणाऱ्या राऊळ टीचर कोठे गेल्या, असा प्रश्न या लहानग्यांना पडला असून लक्ष्मी यांच्याबद्दल आपल्या पालकांकडे हे निष्पाप चिमुरडे विचारणा करत आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे हे पालकांनाही सुचेनासे झाले आहे.

कसाब समुद्रमार्गाने भारतात आला नाही पाकी नौदल प्रमुखांचा दावा

'मुंबई हल्ल्यामागे भारतीय नौदलाचा नाकर्तेपणा'
इस्लामाबाद, दि. २७ : मुंबईवर हल्ला करणाऱ्यांपैकी पकडण्यात आलेला एकमेव जिंवत आरोपी कसाब हा पाकिस्तानातून समुद्रमार्गाने भारतात आल्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे नसून भारतीय नौदल आपल्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले. ते आपल्या अपयशाचे खापर पाकवर फोडू पाहात असल्याचा उलट आरोप पाकिस्तानचे नौदल प्रमुख ऍडमिरल नौमान बशीर यांनी केला आहे.
नेहमीप्रमाणे आपले दोष झाकून पाकने पुन्हा एकदा भारतावरच दोषारोपण केले आहे. एका पत्रपरिषेदत बोलताना पाकचे नौदल प्रमुख म्हणाले की, कसाब मुंबईवर हल्ला करण्यासाठी समुद्र मार्गाने आल्याचा दावा भारताने केला आहे. अगदी हल्ल्याच्या दिवशीपासून भारत असेच म्हणत आहे. पण, प्रत्यक्षात तो पाकमधून समुद्र मार्गाने भारतात शिरल्याचा कोेणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. आपल्या देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी नौदलाची असते. भारतीय नौदल आपल्या सागरी सीमांचे रक्षण करू शकले नाही. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच मुंबई हल्ला घडून आला, असेही ऍडमिरल नौमान बशीर म्हणाले.
जर अतिरेकी समुद्र मार्गाने आले यात तथ्य असेल तर भारतीय नौदल काय करीत होते, हा मोठा प्रश्न उभा राहतो. भारतीय नौदल तर आमच्या नौदलाहून १२ पटीने मोठे आहे. असे असताना त्यांच्या नजरेतून इतकी मोठी बाब कशी सुटली, असा सवालही त्यांनी केला.
हे सर्व पाहता भारताने आमच्यावर आरोप करू नये. यावर आता आम्ही जास्त काहीच बोलणार नाही. भारताने आपले आरोप सुरूच ठेवले तर समुद्र मार्गाने अतिरेकी शिरत असताना भारतीय नौदल काय करीत होते, या प्रश्नाचेही उत्तर भारताला द्यावे लागेल, असे पाकी नौदलप्रमुख म्हणाले.
भारताने आरोप फेटाळले
कसाब पाकिस्तानातून समुद्र मार्गाने भारतात आला असल्याचे पुरावे नसल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी नौदल प्रमुखांचे सर्व आरोप भारताने फेटाळले असून पाकिस्तानने आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा दिलेल्या पुराव्यांवर कारवाई करावी, असा सल्लाही दिला आहे.
गृहमंत्री पी.चिदम्बरम यांनी आज पाकिस्तानी नौदल प्रमुख ऍडमिरल नौमान बशीर यांच्या आरोपांना ताबडतोब रोखठोक उत्तर दिले. पाकी नौदल प्रमुखांनी कसाब पाकिस्तानातून समुद्रमार्गे आला नसल्याचे म्हटले. याला ताबडतोब उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आम्ही पाकिस्तानला मुंबई हल्ल्याच्या संदर्भात सर्व सबळ पुरावे दिलेले आहेत. पाकने या पुराव्यांच्या अनुषंगाने कारवाई करणे अपेक्षित आहे. आता तर मुंबई हल्ल्यातील आरोपपत्रही दाखल झाले आहे. साडेअकरा हजार पानांच्या या आरोपपत्रात पाकिस्तानच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. त्यामुळे आता आम्ही पाकला काहीही स्पष्टीकरण देणार नाही. त्यांनी आपली उत्तरे या आरोपपत्राच्या माध्यमातून शोधावी आणि दिलेल्या पुराव्यांच्या आधारे कारवाई करावी, एवढीच आमची अपेक्षा राहील. भारतावर उलटपक्षी आरोप करणे आता पाकने बंद केले पाहिजे, अशी तंबीही चिदम्बरम यांनी दिली आहे.
सुरक्षा दल सज्ज
मुंबई हल्ल्यानंतर आता देश अधिक जागरूक आणि शस्त्रसज्ज झाला आहे. आता देशावरील कोणत्याही संकटाचा निकराने मुकाबला करण्यास भारतीय लष्कर सज्ज असल्याचे गृहमंत्री म्हणाले.
जेव्हा गरज पडेल तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा संघटनांना तातडीने ३० ते ४० मिनिटांत विमान आणि हेलिकॉप्टर्स उपलब्ध करून दिले जातील, अशी ग्वाहीदेखील चिदम्बरम यांनी दिली.

आपल्याला तुरुंगात पाठविण्याचा केंद्र सरकारचा इरादा: मुलायमसिंग

इटावा, दि. २७ : आम्ही कोणालाही विरोध केलेला नाही, तरीही आमच्यासोबत भेदभावपूर्ण व्यवहार केला जात आहे. ज्या सरकारला आम्ही पतनापासून रोखले तेच सरकार आज आम्हाला तुरुंगात पाठविण्याची तयारी करीत आहे, असा आरोप करीत समाजवादी पार्टीचे प्रमुख व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी आज संपुआ सरकारवर ताशेरे ओढले.
आम्हाला अडकविण्यासाठी हे सरकार सीबीआयचा आधार घेत आहे. सीबीआय आमच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करीत आहे. आमच्या समाजवादी पार्टीचे महासचिव अमरसिंग यांनी सीबीआयच्या चुका त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवून दिल्या आहेत. दुसऱ्या लोकांची संपत्ती माझ्या नावावर दाखविण्यात येत आहे, असेही मुलायमसिंग म्हणाले.
येथील सैफईस्थित चौधरी चरणसिंग पीजीआय कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभाला मुलायमसिंग उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, भारत कृषीप्रधान देश आहे. तरीही या देशात शेतकऱ्यंाची उपेक्षा होत आहे. पुरेशा सोईसुविधा उपलब्ध नसल्यामुळे कृषी उत्पादनाच्याबाबतीत आपला देश माघारला आहे.
आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर कोठे आहोत, हे आम्हाला आज बघायला हवे, असेही यादव म्हणाले.

मेहुण्याच्या खूनप्रकरणी अहमद अलीला जन्मठेप

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): मेहुण्याचा खून केल्याप्रकरणी उत्तर गोव्याचे मुख्य सत्र न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांनी आपेव्हाळ, प्रियोळ येथील अहमद अली (५५) याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २३ नोव्हेंबर २००५ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही खुनाची घटना घडली होती.
सरकारी वकील सुभाष देसाई यानी एकूण २२ साक्षीदारांच्या जबान्या घेतल्या. आरोपी आपल्या बायको मुलांसह मयत नियाझुद्दीन शेख यांच्या वडिलोपार्जित घरात राहत होता. पती पत्नीमध्ये वाद सुरू असता नियाझुद्दीनने आरोपीला ताकीद दिली असता आरोपीने रागाच्या भरात त्याच्या छातीत सुरा खुपसला होता. नियाझुद्दीन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला, फोंडा आरोग्य अधिकारी डॉ. विकास कुवेलकर यांनी तो मरण पावल्याचा दाखला दिला होता.
आरोपीच्या पत्नीने तसेच मुलीने सुनावणीवेळी साक्ष बदलली होती तर मयताच्या पत्नीने घटना पाहिली होती व तिने साक्ष दिली. फोंड्याचे निरीक्षक व या प्रकरणाचे तपास अधिकारी वाय. एन. देसाई यांनी २४ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. तेव्हापासून आरोपी कोठडीत होता.
आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने कलम ३०२ खाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी शिफारस सरकारी वकील सुभाष देसाई यांनी केली. आरोपीला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दंड न भरल्यास वाढीव एक वर्ष कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

Friday, 27 February, 2009

"रॉयल कॅसिनो'च्या परवान्यासाठी उच्चस्तरीय हस्तक्षेप

कस्टम आयुक्तांची कबुली

पणजी, दि. २६ (विशेष प्रतिनिधी) - मांडवी नदीत दाखल झालेल्या वादग्रस्त "रॉयल कॅसिनो'ला तातडीने परवाना द्यावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तसेच मुख्य सचिवांकडूनही आपणास दूरध्वनी येत होते, अशी कबुली केंद्रीय जकात आणि अबकारी आयुक्त सी. माथूर यांनी आज येथे एका भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. या वादग्रस्त आणि बेकायदा जहाज कॅसिनोला परवानी देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तसेच मुख्य सचिवांकडूनही जकात आणि अबकारी आयुक्तांवर दबाव आणला जात होता असा सनसनाटी आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी कालच एका पत्रपरिषदेत केला होता व या आरोपांना दुजोरा देणारी कागदपत्रेही सादर केली होती.
आज पाटो येथील जकात आणि अबकारी आयुक्तालयात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत आयुक्त माथूर यांनी या प्रकरणी सारवासारवा करण्याचा बराच प्रयत्न केला परंतु पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करून त्यांना अक्षरशः निरूत्तर केले. पर्रीकर यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या बातम्या आज राज्यातील सगळ्याच दैनिकांत प्रसिध्द होताच कस्टम हाऊसमध्ये एकच खळबळ माजली. याप्रकरणी खुद्द आयुक्तांनी केलेल्या नोंदींची अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पर्रीकर यांच्या हाती लागलीच कशी, यावरून बरेच वादंग माजले. आयुक्तांनी अनेकांना याप्रकरणी फैलावर घेतले व एकंदर प्रकाराची खातेनिहाय चौकशीही सुरू केली. नंतर पत्रकारांसमोर येताना, ही महत्त्वाची कागदपत्रे मुळात पत्रकारांना मिळालीच कशी आणि पत्रकारांनी आपणास न विचारता ती छापलीच कशी, अशा तोऱ्यात त्यांनी पत्रकार परिषद सुरू केली. तथापि, उपस्थित पत्रकारांनी एकूणच कस्टम खात्याचा खरपूस समाचार घेताना, माथूर यांच्यावरही प्रश्नांचा असा भडिमार केला की, पत्रकारांना फैलावर घ्यायचे सोडून प्रश्नांच्या सरबत्तीतून स्वतःचा बचाव कसा करायचा अशा विवंचनेत ते सापडले. जकात खात्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य कसे मिळत नाही आणि खुद्द आयुक्तच पत्रकारांच्या दूरध्वनीकडे कसे दुर्लक्ष करतात, हे पत्रकारांनी त्यांना सुनावले.
रॉयल कॅसिनोच्या परवान्यासंदर्भात, विचारलेल्या काही खोचक प्रश्नांना उत्तर देताना, या कॅसिनोच्या परवान्याची प्रक्रिया तत्परतेने करण्याच्या सूचना करणारे दूरध्वनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपणास येत होते, परंतु हे फोन कोणाचे होते व कोण त्यांना आदेश देत होते हे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले. केंद्रीय जकात आणि अबकारी आयुक्तालय हे केंद्र सरकारच्या अख्यत्यारितील एक प्राधिकरण त्यामुळे स्थानिक सरकारचे आदेश या कार्यालयाला येणे असा शिष्टाचार असतो का, या प्रश्नालाही "मला ते माहीत नाही' असे त्रोटक उत्तर त्यांनी दिले. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांच्या कार्यालयांतून येणाऱ्या दूरध्वनींचा उल्लेख आपण आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांना हे काम त्वरीत झाले पाहिजे असा आदेश मुळात कसे काढू शकता, आणि त्यासाठी केवळ दीन तासांच्या वेळेचीही मर्यादा कशी काय गाळू शकता, या पत्रकारांच्या प्रश्नामुळे तर ते पुरते गांगरले.
दरम्यान, रॉयल कॅसिनोकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा दावा माथूर यांनी यावेळी केला. केवळ त्याचसाठी आम्ही इतक्या कमी वेळेत त्याला परवाना मंजूर केला असे गुळमुळीत उत्तर त्यांनी दिले. इतरांनाही तुम्ही हाच तत्परतेचा नियम लावता का, या प्रश्नावर त्यांनी "हो' असे उत्तर दिले. मी कोणत्याही दबावाखाली ते केलेले नाही आणि माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. जकात आणि अबकारी खाते हे अत्यंत स्वतंत्र खाते असून ते कोणाच्या दबावाखाली येत नाही. केवळ त्यामुळे २००७ - ०८ या वर्षा खात्याने १८६९ कोटी रूपयांचा विविध प्रकारचा महसूल गोळा करू शकलो असा निर्वाळाही त्यांनी दिला. कामे लवकर व्हावीत म्हणून आमच्याकडे केल्या जाणाऱ्या विनंत्यांना कायद्याच्या चौकटीतच आम्ही तत्परतेने न्याय देतो असा दावाही त्यांनी केला.

पत्रकारितेत विवेकबुद्धी महत्त्वाची - राजदीप

डी. डी. कोसंबी कल्पकता महोत्सव

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) ः सध्याच्या युगात प्रसारमाध्यमांनी आपल्या विवेकबुध्दीचा नव्याने शोध घेऊन पत्रकारिता केल्यास भविष्यात प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त होईल, असे प्रतिपादन करताना ज्येष्ठ पत्रकार व "सीएनएन-आयबीएन' वाहिनीचे संपादक तथा गोमंतकीय सुपुत्र राजदीप सरदेसाई यांनी, अन्यथा प्रसारमाध्यमे प्रेक्षक किंवा वाचकांप्रतीचा आपला आदर व विश्वासार्हता गमावून बसतील, असा धोक्याचा इशारा आज येथे दिला.
येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या थोर विचारवंत "दामोदर धर्मानंद कोसंबी कल्पकता महोत्सवाती'ल व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. चार दिवसांच्या या व्याख्यानमालेचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याहस्ते उद्घाटन झाले. उद्घाटन सत्रानंतर सरदेसाई यांनी "प्रसारमाध्यमांचा विस्फोट व त्याचे परिणाम' या विषयावर पहिले पुष्प गुंफले.
चौदा वर्षांपूर्वी दूरचित्रवाहिनीच्या क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. साधारणतः १९९५ नंतर या क्षेत्रात अमाप दूरचित्रवाहिन्यांचे पीक आले व त्यामुळे सरकारची या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत निघाली. आज देशात नोंदणीकृत असे ४६० चॅनल आहेत. त्याशिवाय कित्येक भागात विविध प्रादेशिक वाहिन्याही आहेत. १९९५ आधी सरकारमान्य बातम्याच दूरदर्शनवर दाखविल्या जायच्या. आज तसे चित्र राहिलेले नाही. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमे महत्त्वाची भूमिका बजावत असली तरी बातम्यांच्या गुणवत्तेबाबत आवश्यक ती दक्षता घेतली जात नाही, असा टोला त्यांनी हाणला.
१९८४ सालचे दिल्लीतील शीख हत्याकांडावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमांची चलती नव्हती. त्यावेळी छपाई प्रसारमाध्यमांच्या एक दोन छायाचित्रावरून घटनेची गंभीरता सारे जग पडताळत होते. आता ती स्थिती राहिलेली नाही. २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यांचे थेट वृत्तांकन साऱ्या जगाला पाहाता आले ते केवळ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमुळेच असे ते म्हणाले. मात्र प्रत्येक जण सर्वांत आधी ब्रेकिंग न्यूज देण्याच्या स्पर्धेत बातम्यांची गुणवत्ता घालवू लागले आहेत. सॅटेलाईट तंत्रज्ञानामुळे सारे जग आता जवळ आले आहे. अशावेळी बातम्यांची गुणवत्ता व विश्वासार्हता जर आपण गमावली तर ते भविष्यात धोकादायक ठरेल असे ते म्हणाले.
दूरचित्रवाहिन्या या खरे तर सरकारचा प्रथम दर्शनी अहवाल (एफआयआर) बनल्या आहेत. त्यांच्यामुळे लोकप्रतिनिधीही अधिक जबाबदार झाले आहेत. मात्र लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्थेच्या जबाबदारीबद्दल सवाल करणाऱ्या प्रसारमाध्यमांनीच आपली जबाबदारी सोडली तर ते कितपत योग्य ठरेल, अशी विचारणाही त्यांनी केली.
अनेक वाहिन्या स्पर्धेच्या नादात आपला दर्जा सांभाळत नसून अनेकवेळा गैर वृत्ते देतात. त्यामुळे देशाने एक स्वायत्त नियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्याची गरज निर्माण झाल्याचे सरदेसाई म्हणाले. चुकीच्या वार्तांकनाविरुद्ध कारवाई म्हणून त्या वाहिनीच्या प्रसारणावर बंदी लादली जाईपर्यंत इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा दर्जा सुधारणे कठीण असल्याचे मत त्यांनी मांडले.
या व्याख्यानमालेच्या उद्घाटन झाल्याचे जाहीर करताना मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की, ही व्याख्यानमाला ही थोर विचारांचा ठाव घेणारी असून अशा व्याख्यानमालेतील विचारांच्या एकत्रित चिंतनाची प्रक्रिया पुढे नेता येते. कला अकादमीचे अध्यक्ष व सभापती प्रतापसिंह राणे यावेळी उपस्थित होते. खचाखच भरलेल्या मंगशकर सभागृहात सरदेसाईंच्या व्याख्यानानंतर त्यांच्याशी थेट प्रश्नोत्तराचे सत्र झाले. आपल्या पत्रकारितेच्या शैलीदार वक्तृत्वाने सरदेसाई यांनी कार्यक्रमात रंग भरला.
दूरचित्रवाहिन्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला आहे का, या प्रश्नावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले व जोपर्यंत बड्या धेंडांना पकडले जात नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराची किड नष्ट होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, सुप्रसिध्द उद्योजक श्रीनिवास धेंपे आदी मान्यवरांनीही या व्याख्यानाला उपस्थिती लावली होती. "गोमन्तक टाइम्स'चे संपादक डेरेक आल्मेदा यांनी सूत्रसंचालन केले. "सुनापरान्त'चे संपादक अनंत साळकर यांनी सरदेसाई यांची ओळख करून दिली.

कामत व राणे प्रामाणिक राजकारणी!

व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना राजदीप सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांवर आपले नियंत्रण मिळविण्यासाठी काही राजकारण्यांनी स्वतःच्या वाहिन्या सुरू केल्याची माहिती दिली. कामत व राणे यांनी तसा प्रयत्न करू नये असा उपरोधिक सल्ला देत मला ते तसे करणार नाहीत याची खात्री आहे असे नमूद करतान ते प्रामाणिक राजकारणी आहेत, असा टोला हाणला. त्यांच्या या टोल्याने खचाखच भरलेले सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

काकोडा येथे ट्रक अपघातात सांगेचा तरुण जागीच ठार

कुडचडे, दि.२६ (प्रतिनिधी) - खनिजवाहू ट्रकांच्या बेदरकार वाहतुकीने काल किर्लपाल-दाभाळ येथे दोन विद्यार्थ्यांचे बळी घेऊन एक दिवसही उलटला नाही तोच, आज काकोडा येथे तंत्रनिकेतनच्या समोर सकाळी सव्वाआठच्या सुमारास ट्रकने एका तरुणाचा बळी घेतल्याने या परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. विलियण सांगे भाटी येथील रामा किडू गावकर (३६) आज ट्रकखाली चिरडून ठार झाला. रात्री उशिरा ट्रकचालक ऍन्थनी पेद्रुपाल रॉड्रिगीस याला वालकिणी कॉलनी येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.
सांगेहून सुटलेल्या "रियाना' या बसच्या मागून आपल्या स्कूटर क्रमांक जीए०१-बी-९७०९ वरून रामा गावकर कुडचडेच्या दिशेने जात होता. यावेळी नेहमीप्रमाणे ट्रकांची वर्दळ सुरूच होती. काकोडा तंत्रनिकेतनजवळ बसने वेग कमी केल्यावर रामा गावकरने आपली स्कूटर पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याची धडक बसल्याने तो खाली पडला व त्याचवेळी समोरून भरवेगाने येणारा ट्रक (क्रमांक जीए-०२-टी ९६०२)त्याच्यावरून गेला. त्याचे तेथेच निधन झाले. ट्रक तेथे न थांबताच गेला तर बस काही वेळ थांबून पुढे गेली. पोलिसांनी कुडचडेहून मडगावला निघालेल्या बसचालकाला घटनास्थळी आणले, त्यावेळी बसला स्कूटरची धडक बसली असल्याचे स्पष्ट झाले. दिवसभर पोलिसांनी ट्रकचालकाचा शोध घेऊन रात्री उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी त्याला वालकिणी येथे ताब्यात घेतले.
आजच्या या अपघातात ठार झालेला दुर्दैवी रामा गावकर हा गरीब कुटुंबातील असून, तो पानपट्टीचे छोटे दुकान चालवित होता.त्याच्या याच उत्पन्नावर पत्नी, रोहन (११) व राहुल (७) यांचा उदरनिर्वाह चालत असे. त्याच्या अकाली मृत्यूमुळे गावकर कुटुंबावर संकट कोसळले आहे. कर्ताच गमावल्याने त्या कुटुंबाची हलाखीची स्थिती झाली आहे. बाराजण येथे दोन दिवसांनी नाटक असल्याने रामा कुडचडे येथे खरेदीसाठी चालला होता, असे समजले.
खाण व्यवसायातील बेफाम ट्कवाहतूक अशा प्रकारे सामान्य माणसाची कर्नदकाळ ठरली असल्याची संतप्त प्रतिक्रिया या परिसरात व्यक्त होत आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

कदंब कर्मचाऱ्यांचा निर्धार

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - सहावा वेतन आयोग कंदब कर्मचाऱ्यांना लागू करण्यासंदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसून २ मार्चपर्यंत त्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. तथापि, आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत कालपासून सुरू केलेले धरणे आंदोलन यापुढेही असेच सुरू ठेवण्याचा निर्धार कदंब कर्मचारी संघटनेने घेतला आहे.
येथील "श्रमशक्ती भवना'त आज दुपारी कामगार आयुक्त व्ही. बी. एन. रायकर यांच्यासोबत कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. नाईक यांची बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाचे कार्मिक (पर्सोनेल) व्यवस्थापक टी. के. पावसे, "आयटक'चे मुख्य सचिव ख्रिस्तोफर फोन्सेका, सचिव राजू मंगेशकर, कदंब चालक आणि वाहक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ज्योकिम फर्नांडिस, उपाध्यक्ष गजानन नाईक याच्यासह संघटनेचे अन्य पदाधिकारी मिळून एकूण ४१ जण उपस्थित होते. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सूचनेनुसार महामंडळाचे संचालक व वित्त सचिव यांची बैठक पार पडली. यामध्ये अद्याप कोणताही निर्णय झाला नसून येत्या २ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता पुन्हा चर्चा करण्यात येणार आहे.
संघटनेने मात्र आज सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरकार विनाकारण विलंब करत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आज सरकारच्या विरोधात निदर्शने करत घोषणा दिल्या. यामध्ये महामंडळाचे सुमारे ७०० कर्मचारी सहभागी झाले होते.

१२ मार्चपासून राज्यात ठिकठिकाणी शिमगोत्सव

पणजी, दि.२६ (प्रतिनिधी) - पर्यटन खात्याने शिमगोत्सवाचे राज्यात आयोजन करण्यासाठी आज मिरामार रेसिडेन्सीमध्ये बैठक घेऊन, १२ मार्चपासून ठिकठिकाणी शिमगोत्सव साजरा करण्याचे ठरविले. गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष श्याम सातार्डेकर व उपाध्यक्ष लिंडन मोंतेरो याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला १४ केंद्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
१२ मार्च रोजी फोंडा, १३ रोजी कुडचडे, १४ रोजी पणजी, १५ रोजी म्हापसा, १६ रोजी वास्को, १७ रोजी डिचोली, १८ रोजी साखळी, १९ रोजी वाळपई, २० रोजी पेडणे, २१ रोजी केपे, २२ रोजी मडगाव, २३ रोजी सांगे, २४ रोजी कुंकळ्ळी व २५ रोजी काणकोण येथे शिमगोत्सव होईल.

Thursday, 26 February, 2009

कॅसिनो महाघोटाळ्यात मंत्री, अधिकाऱ्यांचा हात, पर्रीकरांनी दंड थोपटले; रॉयल कॅसिनो हटविण्याची मागणी

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): कॅसिनो परवाना भ्रष्टाचार प्रकरणाचे पोल आज एका भरगच्च पत्रकार परिषदेत खोलताना विरोधी मनोहर पर्रीकर यांनी या भ्रष्टाचार प्रकरणात केवळ सरकारातील मंत्रीच नव्हे तर मुख्य सचिवांसारखे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचेही हात बरबटले असल्याचा घणाघाती आरोप पुराव्यांनिशी केला. "रॉयल कॅसिनो'सारख्या बेकायदा तरंगत्या कॅसिनोला तात्काळ हटवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांची मान्यता नसताना या विदेशी कॅसिनोला अत्यंत भ्रष्ट पध्दतीने परवाना देण्यासाठी मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिवांच्या कार्यालयातून जकात आयुक्तांवर दबाव आणल्याचेही त्यांनी यावेळी कागदोपत्री आधारानिशी सांगितले. या संदर्भात संबंधित कॅसिनो तसेच परवाना देण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा तसेच न्यायालयात जनहित याचिकाही सादर करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
कॅसिनो भ्रष्टाचार प्रकरणाचे स्वरूप व्यापक असून त्याची "सीबीआय' चौकशी करण्याची हमी सरकार देत असल्यास त्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे आपण उपलब्ध करून देण्यास तयार आहोत, असे आश्वासनही त्यांनी दिले.
येथील हॉटेल "नोवा गोवा'त आयोजित पत्रकार परिषदेत पर्रीकरांनी कॅसिनोंबाबतच्या गैरकृत्यांचा पाढा वाचताना, तसेच या कृत्यात सहभागी लोकांचा संबंध उघड करताना कागदोपत्री पुराव्यांचा संचच पत्रकारांसमोर ठेवला. आपण सादर करत असलेले सर्व पुरावे हे माहिती हक्क कायद्यांतर्गत मिळालेले सरकारी दस्तऐवज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अशा पध्दतीने रोज एक याप्रमाणे आपण अनेक कॅसिनो परवाना प्रकरणाचा पर्दाफाश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कॅसिनो रॉयल हे हाय क्रूझ स्ट्रीट अँड एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीचे एक विदेशी क्रूझ जहाज आहे. ८८८ प्रवासी व आठ कर्मचारी ही या जहाजाची क्षमता आहे. राष्ट्रीय क्रूझ शिपिंग धोरणानुसार अशा प्रकारच्या या क्रूझ बोटी भारतीय समुद्रातही प्रवाशांना घेऊन जलसफरी करू शकतात. देशाच्या कोणत्याही बंदरात या क्रूझ बोटी तात्पुरत्या नांगरून आतील प्रवाशांना त्या त्या भागांची पर्यटन सफर घडवून आणू शकतात. हे करण्यासाठी अशा क्रूझ बोटींना डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांच्या परवान्याची आवश्यकता नसते. अशा बोटी केवळ क्रूझ शिप म्हणूनच वावरू शकतात. कायद्यानुसार त्यात कॅसिनो असू शकत नाही. क्रूझ बोट ही फिरती बोट असल्यामुळे ती थोड्या काळासाठी बंदरात नांगरता येते; परंतु एखाद्या जहाजात कॅसिनो चालविण्यासाठी मात्र खास परवाना लागतो. हा परवाना व्हेसल या व्याख्येली डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांनीच द्यावा लागतो. ज्या जहाजाला डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगचा व्हेसल असण्याचा परवाना नसतो त्यात कॅसिनो सुरू करताच येत नाही. रॉयल कॅसिनोच्या बाबतीत येथील राजकर्त्यांनी प्रशानाला हाताशी धरून क्रूझ बोटीलाच कॅसिनोसाठी परवानगी दिली आहे. हे करताना मोठा भ्रष्टाचार झाला असून त्यात अनेकांनी आपले हात ओले करून घेतले असल्याचा आरोप पर्रीकरांनी केला.
पर्रीकर यांनी कागदोपत्रांचा आधार घेत, रॉयल कॅसिनोला बेकायदा दिलेला परवानाही १८ फेब्रुवारी रोजी संपल्याचा सांगितले. मात्र परवाना संपूनही हा कॅसिनो बिनदिक्कत मांडवीत ठाण मांडून व्यवसाय चालवत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत कॅसिनो संदर्भात केलेल्या विधानांचा त्यांनी यावेळी खरपूस समाचार घेतला. मुख्यमंत्री म्हणतात, "खोल समुद्रात नेल्यास गोव्यात आणखीही कॅसिनो चालू शकतील'. हे विधान म्हणजे मुख्यमंत्र्यांचा उन्माद असून गोमंतकीय असे कॅसिनो येथे कदापि खपवून घेणार नसल्याचे पर्रीकर म्हणाले. कॅसिनोंसंदर्भात ज्या मंत्रिमंडळ बैठकीचा निर्वाळा देतात ते असत्य असून मंत्रिमंडळातील मिकी पाशेको, सुदिन ढवळीकर यांसारखे मंत्री तसेच अन्य बऱ्याच जणांचा या कॅसिनोंना विरोध आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकी अत्यंत बेजबाबदारपणे घेतल्या जात, या बैठकांना अनेक मंत्री गैरहजर असतात, विषयसूची योग्यरीत्या दिली जात नाही आणि तोंडी मान्यता घेऊन विषयांची वासलात लावली जाते. अशा मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्र्यांनी हवाला न दिलेलाच बरा. मंत्रिमंडळाचे निर्णय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आपल्या सोयीनुसार घेतात,असा आरोपही पर्रीकरांनी केला.
रॉयल कॅसिनोचे गौडबंगाल उघड करताना, या कॅसिनोकडून १६ ऑक्टोबर २००८ रोजी ५ कोटी रुपयाचे परवाना शुल्क घेण्यात आले; मात्र १७ ऑक्टोबर रोजी डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगने क्रूझ शिपला आपल्या परवान्याची गरज नसल्याचे कळवले. अशा वेळी कॅसिनोंसाठी आदल्या दिवशी ५ कोटी रुपयांचा संबंधितांकडून भरणा करून घेण्याचे कारणच काय, असा सवालही पर्रीकर यांनी केला. यातून सरकार व रॉयल कॅसिनो यांच्यातील हातमिळवणी उघड होत असल्याचे पर्रीकरांनी पत्रकारांच्या निदर्शनाला आणून दिले.

बंदर कप्तानच 'अपात्र'

राज्याचे विद्यमान बंदर कप्तान ए. पी. मास्कारेन्हास हे (कॅप्टन ऑफ पोर्ट) हे त्या पदास पूर्णपणे अपात्र असून ८९ पासून ते हे पद बळकावून आहेत. सरकारला त्यांच्या अपात्रतेची पूर्ण जाणीव असूनही केवळ आपल्या स्वार्थासाठी सोयीनुसार ते त्यांचा वापर करीत आहेत, असा आरोपही मनोहर पर्रीकर यांनी केला. मास्कोरेन्हास यांच्या हाती गोव्याचा किनारा पूर्णपणे असुरक्षित असून अधिक काळ त्यांना या पदावर राहू दिले तर गोव्याचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले.
मास्कारेन्हास यांची २५ जानेवारी ७९ रोजी हंगामी तत्त्वावर बंदर कप्तान म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे मर्चंट शिपिंग कायद्यांतर्गत आवश्यक असलेली मास्टर्स पदवी होती. ही पदवी त्यांनी ७७ साली घेतली होती. नंतर ८९ साली ते बंदर कप्तानचे काम सांभाळू लागले. मात्र या कामासाठी त्यांची शैक्षणिक पात्रता पुरेशी नव्हती. कारण ७८ साली बंदर कप्तानच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधीची आवश्यकता एसटीसीडब्ल्यु ७८ (स्टॅंडर्ड ऑफ ट्रेनिंग सर्टिफिकेशन अँड वॉच कीप) नुसार बदलली होती. भारत सरकारने २८ एप्रिल ८४ साली ती अंगिकारली मात्र मास्कारेन्हास यांनी गरजेनुसार आपली शैक्षणिक पात्रता वाढविली नाही. असे असतानाही ९१ साली तत्कालिन सरकारने त्यांना पूर्णस्वरूपी बंदर कप्तान केले. त्यानंतर आजतागायत गेली अठरा वर्षे बेकायदा ते या पदाचा आणि त्यानुसार येणाऱ्या अनेक सुविधांचा लाभ घेत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला.

'खनिज मालक संघटनेचे मौलिक कार्य', चौपदरी उसगाव पुलाचे लोकार्पण, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन


उसगाव येथे चौपदरी पुलाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री दिगंबर कामत. बाजूला गृहमंत्री रवी नाईक, सभापती प्रतापसिंह राणे, उद्योगपती शिवानंद साळगावकर, मंत्री विश्वजित राणे, मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार प्रताप गावस. (छाया: प्रमोद ठाकूर)

तिस्क उसगाव,दि.२५ (प्रतिनिधी): खनिज खाण मालक संघटनेने उसगावमध्ये चौपदरी पूल उभारून राज्यात सामाजिक कार्याचा उत्तुंग आदर्श निर्माण केला आहे.राज्यातील हा पहिलाच चौपदरी पूल आहे.साधनसुविधेच्या बाबतीत गोवा राज्याने भरारी मारली असून गोवा सरकार व खाण मालक संघटना हातात हात घालून आणखीही विकासकामे करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज सायंकाळी उसगाव येथील "द मिनरल ब्रिज ऑफ उसगाव'च्या लोकार्पण समारंभात उद्घाटक या नात्याने केले.
खनिज खाण आस्थापनांवर नेहमी टीका केली जाते. त्यांचे सामाजिक कार्य पाहिले जात नाही. समाजासाठी नेहमी खनिज खाण मालक संघटना योगदान देत असते. मडगाव ते बोरी हा रस्ता चौपदरी करण्याचे काम सुरू आहे. खनिज वाहतुकीसाठी बगलमार्ग ही करण्यात येणार आहेत, असे ते पुढे म्हणाले. त्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच पुलाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
उसगावचा जुना पूल पोर्तुगीजकालीन आहे. गोवा मुक्तिनंतर त्यांची एकदा दुरुस्ती केली आहे. गोव्याच्या विकासात जुन्या उसगाव पुलाचे योगदान भरपूर आहे. याच पुलावरून मोठ्या प्रमाणात खनिज वाहतूक झाली. खाण मालकांनी हा नवीन पूल बांधल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. शिल्लक राहिलेले जोडरस्ते सरकार बांधणार आहे. गोव्याच्या विकासासाठी आता चार व सहापदरी रस्त्यांची गरज आहे. खाण व्यवसायामुळे परकीय चलन मिळते. चौपदरी रस्ते बांधकाम करताना रस्त्यालगत असलेली घरे, दुकाने मोडण्यात येतील. चौपदरी रस्त्यामुळे खनिज वाहतुकीचे दळणवळण सोपे होईल. खाण कल्याण निधीतून गोव्यासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे यावेळी प्रतापसिंग राणे म्हणाले.
जुन्या अरुंद पुलामुळे विद्यार्थी वर्ग आणि लोकांना सहन करावे लागणार त्रास कमी होणार आहेत. उसगाव तिस्क भागातील लोकांना खनिज ट्रक वाहतुकीमुळे सहन करावा लागणारा त्रास व धूळ प्रदूषणातून वाचविण्यासाठी उसगाव मारवासडा तिस्क असा बगल रस्ता करण्याची योजना असून ह्या रस्त्यासाठी जमीन संपादन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, असे गृहमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.
यावेळी सर्व खनिज खाण आस्थापनांच्या प्रतिनिधीचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, ऊर्जा आणि पर्यावरण मंत्री आलेक्स सिकेरा, मुख्य सचिव जे.पी. सिंग, आरोग्य मंत्री विश्वजित राणे, आमदार प्रताप गावस यांचीही भाषणे झाली. यावेळी उसगावच्या सरपंच सौ. प्रगती गावडे, पाळीच्या सरपंच सौ. शुभेच्छा गावस व्यासपीठावर उपस्थित होत्या.
उसगाव जुन्या पुलाची दुरुस्ती करून प्रवासी बसेस व कार वाहनासाठी खुला करण्यात येईल, असे बांधकाम मंत्री चर्चील आलेमाव म्हणाले.
स्वागत, प्रास्ताविक खाण मालक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद साळगावकर यांनी केले. सूत्रसंचालन पराग रांगणेकर, ग्लेन कलंपरा यांनी केले. आभार प्रदर्शन पी. के. मुखर्जी यांनी केले. उद्या २६ फेब्रुवारीपासून या पुलावरून सर्व प्रकारची वाहतूक सुरू होणार आहे.

पोलिसांच्या साक्षीने आत्मदहनाचा प्रयत्न, कोलव्यात बेकायदा बांधकाम पाडताना तणाव

मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी): कोलवा पंचायतीतील बेकायदा बांधकाम पाडण्यास गेलेल्या सरकारी अधिकारी व पोलिस पथकाला संबंधित बांधकामकर्त्याने स्वतःस पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि त्यातून तेथे मोठा जमाव जमल्यामुळे तणाव निर्माण झाला. तथापि, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त घेऊन गेलेल्या विशेष पथकाने अर्धेअधिक बांधकाम त्यापूर्वीच जमीनदोस्त केले होते.
या कारवाईसाठी बुलडोझरचाही वापर झाला.शिवाय अग्निशामक दलही सज्ज ठेवले होते. मान्युएल फर्नांडिस यांचे हे बांधकाम असून ते पाडण्याचा आदेश पंचायत संचालकांनी गेल्या १८ फेब्रुवारी रोजी दिला होता. तशी नोटिस त्यांना गेल्या रविवारी दिली होती. नोटिस मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी पंचायत संचालकांच्या निवाड्याविरुध्द उच्च न्यायालयात याचिका गुदरली असली तरी त्याबाबतची माहिती पंचायत वा गटविकास अधिकारी यांना दिली नाही.
त्यामुळे आज सरकारी अधिकाऱ्यांचे पथक सर्व तयारीनिशी त्याने केलेले विस्तारीत बांधकाम पाडण्यासाठी आल्यावर त्यांनी कारवाईस विरोध केला. आपण न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावरील सुनावणी होईपर्यंत थांबा व नंतर कारवाई करा, अशी विनंती काहींनी अधिकाऱ्यांना केली. जवळचे रहिवासीही या कारवाईविरुध्द उभे ठाकले. तथापि, कडक पोलिस बंदोबस्तामुळे त्यांचे काहीच चालले नाही. सदर बांधकामात कच्च्या तसेच पक्क्या बांधकामाचा समावेश होता. त्यातील निम्मे बांधकाम पाडले गेले असता सदर मान्युएल पळत आले व सोबत आणलेले केरोसीन अंगावर ओतून आपली पत्नी मारिया हिला कोलीत आणून आपल्याला लाव असे सांगू लागले. त्यामुळे गडबडलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
त्याचवेळी तेथील काहींनी चुडत व कचऱ्याला आग लावल्याने स्थिती आणखी चिघळून नये म्हणून संबंधितांनी कारवाई रहीत केली.
सहावा वेतन आयोग लागू न केल्यास तीव्र आंदोलन
२०० नव्या गाड्या सेवेत रुजू करण्याची मागणी
कामगार आयुक्तांसोबत आज ११.३० वाजता चर्चा

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): राज्यातील कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी आज येथील कदंब बसस्थानकासमोर ३५० कर्मचाऱ्यांनी धरणे धरले. दोन दिवसांत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि कॉंग्रेसला येत्या लोकसभा निवडणुकीत त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा कडक इशारा कदंब कामगार संघटनेने यावेळी दिला आहे. याविषयी उद्या दि. २६ रोजी सकाळी ११.३० वाजता येथील श्रमशक्ती भवनातील कामगार आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीनंतर संघटना आंदोलनाची पुढील दिशा ठरवेल, अशी माहिती कदंब कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्योकिम फर्नांडिस यांनी दिली.
आज सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू असलेल्या या धरणे आंदोलनात आळीपाळीने कर्मचारी सहभागी झाले होते. सुमारे ३५० च्या संख्येने हे कर्मचारी उपस्थित होते. हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत दररोज सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू राहील. मात्र या आंदोलनाचा सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. पाचव्या वेतन आयोगापर्यंत केंद्र सरकारचा वेतन आयोग येथील कदंब महामंडळाला लागू होत नव्हते. परंतु पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी सरकारबरोबर झालेल्या करारानुसार केंद्र सरकारचा प्रत्येक वेतन आयोग महामंडळाला लागू करण्याची शिफारस होती. या कारणास्तव सहावा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना लागू कराव व २०० नवीन गाड्या महामंडळाच्या ताफ्यात भरती कराव्यात, या मागण्यांसाठी गेले काही महिन्यांपासून कदंब कर्मचारी आंदोलन करत आहे. त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला आयटकनेही पाठिंबा दिला आहे. महामंडळाचे अध्यक्ष आमदार ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले होते. परंतु त्याच्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. तसेच महामंडळाने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही निवेदनाद्वारे विनंती केली होती. याबाबत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन कामत यांनी दिले होते. त्यानंतर दोन वेळा कामगार आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आली, परंतु ती बैठक यशस्वी झाली नाही. आता उद्या सकाळी तिसऱ्यांदा बैठक होणार आहे. यामध्ये अंतिम निर्णय न झाल्यास कर्मचारी आंदोलन तीव्र करतील, असा इशारा अध्यक्ष फर्नांडिस यांनी दिला आहे.
यासंदर्भात ज्योकिम फर्नांडिस म्हणाले की, सरकारने पुढे कोणतेही कारण न देता आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा कदंब महामंडळात दोन हजार कर्मचारी आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील पाच याप्रमाणे धरल्यास १० हजार मतदार होतात. अन्यथा कॉंग्रेसला याचा फटका येत्या लोकसभा निवडणुकीत बसेल.

खनिज वाहतुकीविरोधात उद्रेक


धारबांदोडा-कुडचडे मार्गावरील वाहतूक संतप्त जमावाने रोखली


कुडचडे, दि. २५ प्रतिनिधी : बेफाम खनिज वाहतूक प्रकरणी तोडगा काढण्यासाठी केप्याचे उपजिल्हाधिकारी किर्लपाल दाभाळ पंचायतीत दुपारी ३ वाजता बोलावलेली बैठक पंचायतीला नोटीस पाठवून ऐनवेळी रद्द करून ती केपे जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावल्याने संतप्त झालेल्या सुमारे ६०० जणांच्या जमावाने धारबांदोडा दाभाळ कुडचडे मुख्य रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद केली. उपजिल्हाधिकारी व सरकारी अधिकारी लोकांशी चर्चा करेपर्यंत यापुढेही रस्तारोको करण्याचे लोकांनी ठरवले आहे. संतप्त जमावाने रस्त्यावर दगड व झाडे कापून आणि टायरना आग लावली. तसेच अनेक वाहने पंक्चर केली.
काल दुपारी सुमारे दीड वाजता सावरगाळ येथील सोमनाथ इंग्लिश हायस्कूलचे इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकणारे संगम शिवराम बांदेकर व विशेष ऊर्फ मयूर दामोदर गावकर हे १४ वर्षीय विद्यार्थी भरवेगाने येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले होते. त्यांच्यासोबत दुचाकी चालवणारा विनोद वासू चणेकर हा त्यांचा सहकारी जखमी झाला होता. आज त्याच्या प्रकृतीमध्ये थोडी सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर, दाभाळ भागातून बेफामपणे हाकल्या जाणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध घालून योग्य कारवाई केल्याशिवाय मृतांना घटनास्थळपासून हलवू देणार नसल्याचे जमावाकडून सांगताच केप्याचे पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी सांग्याचे मामलेदार पराग नगसेकर यांच्यासह आज दि. २५ रोजी दुपारी ३ वाजता केपे उपजिल्हाधिकाऱ्यांसहकिर्लपाल दाभाळ पंचायतीत बैठक आयोजिली होती.
ऐनवेळी बैठक रद्द
त्यानुसार सुमारे ६०० ग्रामस्थ पंचायतीत हजर झाले होते. तथापि, दुपारी १.३० च्या सुमारास केपे मामलेदारांनी उपजिल्हाधिकारी कार्यालयातून नोटीस पाठवून सदर नियोजित बैठक रद्द करून दुपारी ३ वाजता ती केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे लोक संतापले.
उपजिल्हाधिकारी पंचायतीत येऊन जनतेशी चर्चा करेपर्यंत संपूर्ण वाहतूक बंद करून रास्ता रोको करण्याचा निर्णय लोकांनी घेतला. या रास्तारोकोत भाग घेण्यासाठी किर्लपाल दाभाळ पंचायतीसमोर कोडली तिस्क, दाभाळ, सांतोण, कळसई, तळप, वाघोण, सादगाळ, कामरखंड, भांडोळ, करमणे आदी भागातील शेकडो लोकांसोबतसरपंच रामा गावकर, सावर्डे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप देसाई, पंच सुकांती गावकर, रमेश वेळगेकर, मोहन गावकर, प्रकाश नाईक, सोमनाथ इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक गिरीश तेंडुलकर, "पीपल फॉर नेचर केअर'चे अध्यक्ष राजेश गावकर आदी उपस्थित होते.
त्यानंतर अवघ्या काही तासांपूर्वीच ताबा घेतलेल्या केपे उपजिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर यांनी जमावाला शांत करत धारबांदोडा दाभाळ ते कुडचडे मुख्य रस्त्यावर सकाळी ७ ते ८ व दुपारी १ ते २ दरम्यान संपूर्ण मालवाहतूक ट्रक खाणीच्या आत रोखून ठेवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. यामुळे आता दाभाळ कुडचडे मुख्य रस्त्यावर कोणत्याच प्रकारचे ट्रक दुपारच्या वेळेला उभे करण्यात येणार नसून याचे कटाक्षाने पालन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पहाटे ४ पासून सुरू होणारी मालवाहतुकीवर लवकरच निर्बंध घालण्यासाठी येत्या ८ दिवसांत ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जमावाने सारी वाहतूक रोखल्याने जनशक्तीपुढे अखेर शासनाला नमावे लागले. दरम्यान
उपजिल्हाधिकारी शिरोडकर, सांगे मामलेदार पराग नगर्सेकर, संयुक्त मामलेदार आशुतोष आपटे, रोहिदास पत्रे, कुडचडेचे पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई, फौजफाट्यासह तसेच कुडचडे अग्निशामक दलाचे जवान हजर झाले. त्यांना जमावाने घेराव घातला.
काल दुर्घटनेनंतर पत्रे यांनी सर्व जमावाच्या उपस्थितीत किर्लपाल दाभाळ पंचायतीत बैठक घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, आज संध्याकाळी सभा रद्द केल्यामुळे जमावाने त्यांना जाब विचारताच आपण बैठकीसंबंधी कोणाशीच बोललो नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे जमाव संतप्त झाला.
उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली
कालच्या दुर्घटनदरम्यान केपे उपजिल्हाधिकारी ताबा घेतलेल्या शबरी मांजरेकर यांची आज दुपारी १२ वाजता तातडीने दुसरीकडे बदली करण्यात आली व गेल्या १५ दिवसापूर्वीच मडगावात पंचायत उपसंचालकपदाचा ताबा दिलेले प्रशांत शिरोडकर यांची केपे उपजिल्हाधिकारी पदी नेमणूक करण्यात आली. यावेळी शिरोडकर यांनी काही तासांतच या पदाचा ताबा घेऊन थेट दाभाळ येथे जमावाला भेट दिली.
आजच्या या घटनेला खाण लॉबीच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, मंगळवारी दुपारी ट्रकाखाली चिरडून घटनास्थळीच ठार झालेल्या संगम बांदेकर व विशेष ऊर्फ मयूर यांच्यावर वाघोण गावात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Wednesday, 25 February, 2009

बेफाम खनिज वाहतुकीचे किर्लपाल येथे दोन बळी, तिसरा विद्यार्थी गंभीर जखमी

कुडचडे व सावर्डे, दि. २४ (प्रतिनिधी): किर्लपाल येथील मुख्य रस्त्यावर आज दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या ट्रक-मोटरसायकल यांच्यातील भीषण अपघातात दोघे विद्यार्थी जागीच ठार झाले असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे खवळलेल्या जमावाने सुमारे दोन तास खनिज वाहतूक रोखून धरली. त्यानंतर सरकारी अधिकारी तेथे दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या अपघातामुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे.
सावरगाव येथील सोमनाथ हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची नावे संगम शिवराम बांदेकर व विशेष उर्फ मयूर दामोदर गावकर अशी असून दोघेही ट्रकखाली चिरडून जागीच मरण पावले. विनोद वासू चणेकर हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला मडगावातील हॉस्पिसियू इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हे तिघेही परस्परांचे घनिष्ट मित्र होते.
शाळा सुटल्यानंतर हे तिघे स्टार सिटी या (जीए ०९ बी १८८४) मोटरसायकलवरून घरी निघाले होते. किर्लपाल येथील उतरणीवर ते पोहोचले असता समोरून येणाऱ्या टिपर ट्रकने (जीए ०९ यू १७२) त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे संगम आणि विशेष ट्रकखाली चिरडले जाऊन जागीच गतप्राण झाले. ही घटना तेथील एका दुकानदाराने पाहिली व त्याने तातडीने रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. तथापि, त्यापूर्वीच दोन्ही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. सांग्याचा तात्पुरता ताबा असलेले पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व विच्छेदनासाठी मृतदेह हॉस्पिसियूमध्ये पाठवून दिले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच लोक बिथरले. सुमारे पाचशे जणांच्या जमावाने घटनास्थळी धाव घेऊन दोन तास वाहतूक रोखून धरली. संबंधित ट्रक चालकाला अटक केल्याशिवाय मृतदेहांना हात लावू देणार नाही, अशी भूमिका जमावाने घेतली. त्यानंतर सांग्याचे मामलेदार पराग नगर्सेकर, सावर्ड्याचे जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप देसाई, शिवसेनेचे राज्य उपप्रमुख नामदेव नाईक, केप्याचे पोलिस उपअधीक्षक तेथे धावून गेले. त्यांनी लोकांची समजूत काढल्यानंतर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली.
आज जाहीर सभा
दरम्यान, सोमनाथ इंग्लिश हायस्कूलचे मुख्याध्यापक गिरीश तेंडुलकर यांनी या बेफाम खनिज वाहतुकीसंदर्भात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. जोपर्यंत या वाहतुकीवर कठोर निर्बंध घातले जात नाहीत तोपर्यंत ती चालू दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले. यासंदर्भात उद्या दुपारी तीन वाजता दाभाळ किर्लपाल पंचायतीत ट्रक मालक संघटना, मामलेदार व किर्लपाल ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात आल्याचे केपे उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कळवण्यात आले आहे.
दाभाळचे माजी सरपंच अशोक पाटील यांनी सांगितले की, सरकारच्या आशीर्वादानेच ही खनिज वाहतूक बेदरकारपणे सुरू आहे. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही ती अव्याहतपणे सुरूच आहे.
दरम्यान, या अपघातानंतर तेथून पोबारा केलेला ट्रक चालक बिलियम एक्का याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रकही जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई पुढील तपास करत आहेत.

कॅसिनोंची जागा बदलण्याचा निर्णय अखेर सरकार नमले

पणजी, दि. २४ (विशेष प्रतिनिधी): मांडवी नदीतील वाढत्या कॅसिनोंमुळे पणजीत होणाऱ्या गोंगाट व गोंधळाला जनतेकडून कडाडून होणारा विरोध आणि सत्ताधारी तसेच विरोधी आमदारांनी घेतलेल्या तीव्र आक्षेपामुळे अखेर राज्य सरकारने नमते घेऊन पणजी शहरातील कॅसिनोंची जागा बदलण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला.
मात्र नदीच्या काठापासून किती दूर अंतरावर त्या बोटी नांगरून ठेवाव्यात याबद्दल ठोस निर्णय मंत्रिमंडळाने घेतला नाही. तसेच जहाज बांधणी महासंचालकांनी कॅसिनोसंबंधी उपस्थित केलेल्या अनेक गैरप्रकारांबाबत सरकार कोणती पावले उचलणार यासंबंधी मंत्रिमंडळाने मौन धारण केले.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षक व तत्सम केडरमधील शिक्षकांना सुधारीत वेतनश्रेणी लागू करणे, घन कचरा व्यवस्थापन महामंडळ आणि गोवा राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य सचिव जे.पी.सिंग व माहिती संचालक मिनीन पिरीस उपस्थित होते.
ठरवण्यात आलेल्या क्षेत्रात कॅसिनोंवरील बंदी १५ दिवसांत लागू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली.मंत्रिमंडळाने नवीन "गेमिंग' विधेयक व "गेमिंग कमिशनर'ची नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आल्याचे श्री. कामत यांनी सांगितले.
मांडवी नदीत पणजीतील किनाऱ्यास लागून कॅसिनो असल्याने हा प्रश्न उपस्थित झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जर कॅसिनो समुद्रात पाच सागरी मैल दूर नांगरले तर त्यावर कोणाचाही आक्षेप राहणार नसल्याचे ते म्हणाले.या कॅसिनोपासून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरवर्षी मिळणाऱ्या १० लाख रुपये प्रोसेसिंग फीबरोबरच रु.५ ते ७ कोटी परवाना महसूल प्राप्त होतो.यामुळे सहाव्या वेतन आयोगामुळे निर्माण झालेले आर्थिकओझे हलके होण्यास मदत होणार असल्याचे कामत म्हणाले.
कारावेल्हासह सर्व कॅसिनोंना कला अकादमी ते मांडवी पुलापर्यंतच्या शहर मर्यादेतील जागा खाली करण्यासंबंधी नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. मात्र त्यांना नक्की किती दूर अंतरावर नांगरण्याची परवानगी देण्यात येईल हे मुख्यमंत्री सांगू शकले नाही.मात्र ऑफ शोअर कॅसिनोंना १ ते ५ सागरी मैलदरम्यान कोणत्याची जागेत राहण्याची मुभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही कॅसिनोला पणजी शहराच्या अखत्यारीत राहण्यास परवानगी देण्यात येणार नसून केवळ इंधन भरण्यासाठी किंवा नेहमीच्या गरजेच्या वस्तूंचा साठा करण्यासच मांडवी नदीत पणजी शहरानजीक नांगरण्याची त्यांना मुभा असेल.कॅसिनोंना शहराबाहेर काढून विधान सभागृहास दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याचा त्यांनी दावा केला.
विरोधी व सत्ताधारी आमदारांनी वाढत्या कॅसिनोवरुन मांडवी नदीत निर्माण झालेली परिस्थिती, परवाना नसलेले कॅसिनो, नदीत होणारी जलवाहतूकीची कोंडी,व बोटींमुळे नदीत होणारे प्रदुषण तसेच यामुळे शहरातील डी.बी. बांदोडकर मार्गावर होणाऱ्या वाहतूकीच्या कोंडींसंबंधी सरकारला विधानसभेत चांगलेच धारेवर धरले होते. नवीन गेमिंग कायदा हा हॉडेल व कॅसिनोवर चालणाऱ्या गेमिंग व्यापाऱ्यावर लक्ष ठेवणार असून, गेमिंग कमिशनर अशा प्रकारच्या सर्व कृतींवर लक्ष ठेवणार असल्याचे ते म्हणाले. नवीन गेमिंग कायदा पुढील तीन महिन्यात लागू होईल असे ते म्हणाले.

सुखराम यांना आज शिक्षा सुनावणार

नवी दिल्ली, दि. २४ : माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुखराम यांच्याविरुद्धच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शिक्षेचा निर्णय न्यायालयाने उद्यापर्यंत राखून ठेवला आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सुखराम यांना आधीच दोषी ठरविले आहे. न्यायालयात आज शिक्षेची सुनावणी होणार होती. सीबीआयने न्यायालयाकडे सुखराम यांना जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा देण्याचा आग्रह केला होता. सीबीआयचे विशेष वकील गुरुदयाल सिंग यांनी सीबीआयचे विशेष न्यायाधीश व्ही.के.माहेश्वरी यांच्यापुढे बाजू मांडताना सांगितले की, भारत सरकारचे मंत्री म्हणून कार्यरत असताना सुखराम यांनी सर्व माया जमविली होती. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी.
यावर ८२ वर्षीय सुखराम यांचे वकील एस.पी.मिनोचा यांनी केंद्रीय मंत्र्यांचे वय, आरोग्य, मंत्री तसेच राजकारणी असतानाची चांगली प्रतिमा आदी बाबी लक्षात घेऊन शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी शिक्षेच्या अवधीवरील आपला निर्णय राखून ठेवला. आता बुधवारी यावर सुनावणी होणार आहे.
सुखराम यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सीबीआय न्यायालयाने त्यांना या प्रकरणी आरोपीही सिद्ध केले आहे.
--------------------------------------------------------------------
संसदेतही दुमदुमले 'जय हो'
नवी दिल्ली, दि. २४ : मुंबईच्या धारावी झोपडपट्टीवर आधारित असलेल्या "स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटाला आणि त्यातील योगदानासाठी गुलजार, ए.आर.रहमान आणि रसुल पुकुट्टी यांना मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारांचा जयघोष आज संसदेच्या दोन्ही सभागृहात दुमदुमला. संसदेने सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
लोकसभेत बोलताना सभापती सोमनाथ चॅटर्जी म्हणाले की, या तीन भारतीय कलाकारांचे यश प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्साह भरणारे ठरले आहे. देशाला त्यांच्या यशावर गर्व आहे. त्यांच्याइतकाच आनंद "स्माईल पिंकी' या लघुपटाच्या यशाचाही आहे. या शुभेच्छा संदेशांचा शेवट सोमनाथदांनी "जय हो' अशा जयकाराने केला.
राज्यसभेतही अध्यक्ष हामिद अन्सारी यांनी सभागृहाच्या वतीने सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.
--------------------------------------------------------------------

चिंचोणे येथे बिबट्या जेरबंद


शांतिवाडी चिंचोणे भागात जेरबंद करण्यात आलेला बिबट्या. (छाया: शांतम रेगे)

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी): शांतिवाडी -चिंचोणे भागात दहशत माजवून तेथील कोंबड्या व कुत्रे फस्त करण्यास चटावलेल्या आणखी एका बिबट्याला महिनाभरात जेरबंद करण्यात आले आहे. यापूर्वी गेल्या २८ जानेवारी रोजी अशाच प्रकारे एका बिबट्याला पकडून नंतर खोतीगाव अभयारण्यात पाठवण्यात आले होते.
आज पकडलेला बिबट्या कोवळा आहे व अजून त्याची पुरती वाढ झालेली नाही. एक मादी व तिचे हे दोघे बछडे यांना या भागात भटकताना लोकांनी पाहिले होते . नंतर त्यांनी पाळीव जनावरांना त्रास देण्यास सुरवात केल्यावर वन खात्याने तेथे पिंजरे लावले व गेल्या २८ जानेवारी रोजी त्यात एक बिबट्या सापडला. त्याला खोतीगावात नेऊन सोडल्यावर गेल्या ३१ जानेवारी पासून पुन्हा पिंजरा लावला. बिबट्याला लालूच दाखविण्यासाठी तेथे वेगवेगळे प्राणी ठेवले जात होते, पण इतके दिवस न फिरकलेला बिबट्या काल त्या बाजूने गेला व नेमका पिंजऱ्यात अडकला.
त्याला पकडण्यत येथील ज्युलिया क्वाद्रोस यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. गेल्या वेळीही त्यांनीच पिंजरा लावला होता. दोन्ही बछडे जरी जेरबंद झालेले असले तरी त्यांची आई अजून मोकळीच आहे व तिला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान उपवनपाल एम. के. बिडी यांनी सलग दोन बिबटे पकडून दिल्याबद्दल ज्युलियो क्वाद्रूश यांचे अभिनंदन केले आहे. सायंकाळी उशिरा या बिबट्याची रवानगी खोतीगावकडे करण्यात आली.

शिवसेनेशी युतीत अडचण नाही : अडवाणी, मुंबई भाजपातर्फे साडेअकरा कोटी रुपयांची थैली प्रदान

विशेष प्रतिनिधी
मुंबई, दि. २४ : शिवसेनेसह रालोआच्या सर्वच घटकपक्षांसोबत पुन्हा आघाडी होण्यात भाजपला काहीही समस्या नाही. उलट, रालोआ आणखी मजबूत होत आहे, असा निर्वाळा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज दिला.
मुंबई भाजपतर्फे आयोजित सत्कार व थैली अर्पण समारंभात माटुंग्याच्या प्रसिद्ध षण्मुखानंद सभागृहात ते बोलत होते. "हमे कोई प्रॉब्लेम नही' अशा शब्दांत त्यांनी वादाच्या वावड्‌या निकालात काढल्या. पत्रकारांनी बातम्या देण्याचे आपले काम करीत राहावे, असा टोलाही त्यांनी हाणला.
ते म्हणाले की, युती-आघाडीबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्यांचे मूळ मतदारसंघांच्या फेररचनेत आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठे बदल होऊन तेथील राजकीय परिस्थितीत फरक पडला. परिणामी नवे गणित मांडावे लागत आहे. पण त्यात काही फार समस्या येणार नाहीत. जुने मित्र तर राहतीलच; काही नवेही होतील.
प्रगतीसाठी रालोआ
देशाने सर्व क्षेत्रांत प्रगती करावी असे वाटत असेल तर केंद्रात रालोआचे सरकार निवडून द्या, असे मतदारांना आवाहन करताना अडवाणी म्हणाले की, भाजपा कार्यकर्त्यांनीही भारतमातेच्या विजयाचा संकल्प करून कामाला लागावे. कारण, भाजपा जितेगा तो भारत जितेगा, हीच आमची भावना आहे.
विद्यमान संपुआ सरकारने आपल्या काळात सांगण्यासारखे एकही काम केलेले नाही. एवढे निष्क्रिय सरकार प्रथमच देशात झाले, असा आरोप करून ते म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात त्यांना काहीही करता आलेले नाही. सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे, तर दारिद्रयरेषेखालील लोकांची परिस्थिती सुधारण्याऐवजी त्यांच्यात गेल्या ५ वर्षांत आणखी ५ कोटींची भर पडली आहे!
असे सरकार पुन्हा दिल्लीत येऊ नये यासाठी १९७७ सारख्या पराभवाचा धडा त्यांना शिकवा, असे आवाहन करताना अडवाणी म्हणाले की, अर्थकारण, सुरक्षा, भ्रष्टाचार या महत्त्वाच्या आघाड्‌यांवर सरकार पूर्णपणे अपयशी झाले आहे. एकही काम ते नीट करू शकलेले नाही.
अर्धवेळ अर्थमंत्री!
देशावर मंदीचे सावट असताना अर्धवेळ अर्थमंत्र्याकडून कामकाज चालविले जात आहे, याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून ते म्हणाले की, प्रणव मुखर्जी नसते तर या सरकारचे काय झाले असते! ते परराष्ट्र मंत्री आहेत, लोकसभेचे नेते आहेत, कितीतरी मंत्रिगटांचे अध्यक्ष आहेत आणि अर्धवेळ अर्थमंत्रिपदही सांभाळत आहेत. हे काय सुरू आहे?
सरकार वाचविण्यासाठी खासदारांची खुलेआम खरेदी-विक्री करण्याचा लज्जास्पद प्रकार या सरकारच्या काळातच घडला आणि भ्रष्टाचाराने कहर केला, असा आरोप करताना अडवाणी म्हणाले की, वाढता निवडणूक खर्च हे भ्रष्टाचाराचे महत्त्वाचे मूळ आहे. त्यामुळेच, जनतेच्या निधीतून निवडणूक लढण्याची तरतूद आणण्याचा आम्ही गंभीरपणे विचार करणार आहोत.
त्या विचारातूनच भाजपाने निवडणुकीसाठी निधिसंकलनाची मोहीम देशभर राबविली आहे. त्याअंतर्गत आज मिळालेल्या निधीच्या आकड्‌यापेक्षा त्यात योगदान देणारे ४० हजार लोक आणि तो गोळा करण्यासाठी झटणारे ८ हजार कार्यकर्ते मला जास्त महत्त्वाचे वाटतात, असे सांगत त्यांनी, निधीचे ११ कोटींचे लक्ष्य ओलांडल्याबद्दल सर्व संबंधितांविषयी गौरवोद्गार काढले.
मतांचेच राजकारण
दहशतवादाच्या संदर्भात संपुआ सरकार व कॉंग्रेस पक्ष मतपेटीचे राजकारण खेळत आहे, असा आरोप करून अडवाणी म्हणाले की, अफझल गुरूला अजून फाशी न देण्यामागे हेच कारण आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्‌याशी संबंधित पुरेसे सुगावे असतानाही प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही, याचेही कारण तेच.
रामपूर येथील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्‌यातील एका आरोपीने मुंबई हल्ल्‌याचा सुगावा दिला होता. तसेच, हल्ल्‌याच्या १४ दिवस आधी स्वत: पंतप्रधानांनीच संसदेत, समुद्री मार्गाने मुंबईवर ह?ा होण्याची भीती व्यक्त केली होती. तरीही काही कारवाई न होता मुंबईवर ह?ा झालाच, याकडे त्यांनी यासंदर्भात लक्ष वेधले.
सुशासन, सुरक्षा व लोककल्याण हे भाजपाचे लक्ष्य आहे. त्यासाठी आमचे सरकार प्राधान्याने शिक्षण, स्वास्थ्य, प्राथमिक सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देईल, असे सांगून आडवाणी म्हणाले की, राजकीय नेत्यांची प्रतिमा बदलविणे, हेही भाजपाचे एक लक्ष्य आहे. त्यादृष्टीने जनतेला प्रशिक्षित करण्याची संधी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत घेतली पाहिजे.
अडवाणींच्या पंतप्रधानपदासाठी...
रालोआ-भाजपाला केंद्रात सत्तेवर येण्यापासून आणि अडवाणींना पंतप्रधान बनण्यापासून आता कोणीही रोकू शकत नाही. तेव्हा कार्यकर्त्यांनी सर्वस्व झोकून कामाला लागावे, असे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी यावेळी बोलताना केले.
ते म्हणाले की, गेल्या लोकसभेत आम्ही महाराष्ट्रातून १३ खासदार (भाजपाचे) पाठविले होते, यावेळी १८ खासदार नक्की पाठवू. तसेच, केंद्रात सत्तेवर येताच अफझल गुरूला फासावर लटकवू.
अडवाणींना पंतप्रधान करण्याचे ध्येय ठेवूनच भाजपा कार्यकर्त्यांनी यावेळी प्रचारकार्य अधिक जोमाने करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार गोपाळ शेट्टी यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी मानपत्राचे वाचन केले. महिला आघाडी प्रमुख प्रा. मनीषा कायंदे यांनी शेवटी आभार मानले. प्रारंभी अडवाणींच्या हस्ते भाजपाच्या मुंबईतील ६ जिल्हाध्यक्षांचा, आ. शेट्टी व प्रा. कायंदे यांचा, तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक विनय सहस्रबुद्धे यांचा पीएच. डी. मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सभाचित्रे-
* स्लमडॉग मिलिनेयर सिनेमाच्या ऑस्कर यशाबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन करताना आडवाणी म्हणाले की, अ डॉग हॅज कम टू द टॉप! याने जगात आपली मान उंचावली. विशेष असे की, अडवाणींचा सत्कार केला जात असताना पार्श्वभूमीवर याच स्लमडॉगमधील "जय हो' हे गाणे वाजविले जात होते.
* आजच्या मुंबईच्या रकमेसह नागपूरचे ४ कोटी आणि जळगावचे १ कोटी, असा एकूण १६ कोटी रुपयांचा निधी भाजपाला महाराष्ट्रातून आतापर्यंत मिळाला आहे आणि त्याचा योग्य विनियोग केला जाईल, अशी ग्वाही अडवाणींनी दिली.
* विमानतळ ते माटुंगा प्रवासादरम्यान पोलिस एस्कॉर्टचे वाहन बंद पडल्याने अडवाणींना सभास्थळी पोहोचायला बराच उशीर झाला. याबद्दल गडकरी व शेट्टी यांनी राज्य सरकारची चांगली हजेरी घेतली.
* गोपीनाथ मुंडे यांनी काढलेल्या "शेतकरी संघर्ष अभियान' संबंधीच्या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशन अडवाणींच्या हस्ते करण्यात आले. डॉ. राजेंद्र फडके लिखित "बूथ प्रमुख कार्यकर्ता' पुस्तिकेचे प्रकाशन, तसेच मुंबई भाजयुमोच्या वेबसाईटचे उदघाटनही अडवाणींनी केले.
* या कार्यक्रमासाठी षण्मुखानंद सभागृह खचाखच भरले होते. त्यातही, विणलेल्या सुती टोप्या घातलेले मुस्लिम बांधव मोठ्‌या संख्येत दिसत होते. भाजपाच्या ध्वजाच्या रंगातील साडी-ब्लाऊज परिधान केलेल्या अनेक महिला कार्यकर्त्याही लक्ष वेधून घेत होत्या.
--------------------------------------------------------------------------------
शहीद तुकाराम ओंबळेंना सभागृहाचे अभिवादन
मुंबई हल्ल्‌यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी करकरे, कामटे, साळस्कर, उन्नीकृष्णन अशी नावे घेताघेता शहीद तुकाराम ओंबळे यांचे नाव आले, तेव्हा क्षणभर थांबत अडवाणी गहिवरले. म्हणाले- सबसे जादा तुकारामको... कारण, फिदायीन (आत्मघातकी) दहशतवादी अद्याप जिवंत सापडलेला नाही. ते शौर्य तुकारामने स्वत:च्या जिवाची बाजी लावून दाखविले आहे.
यावर दाद देत संपूर्ण सभागृहाने टाळ्‌यांचा कडकडाट केला आणि सर्वांनी उभे राहून शहीद ओंबळेंना श्रद्धांजली अर्पण केली.
-------------------------------------------------------------------------------

Tuesday, 24 February, 2009

'स्लमडॉग...'ला आठ ऑस्कर

-देशभरात आनंदाची लाट
-रहमानला दोन ऑस्कर
-गुलजारही मानकरी
-राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून अभिनंदन
-'स्माईल पिंकी'ही पुरस्कृत

लॉस एंजिलीस, दि. २३ : मुंबईतील पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या "स्लमडॉग मिलेनिअर' या चित्रपटाने पुरस्कार मिळविण्याचा सपाटा कायम ठेवीत चित्रसृष्टीतील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ऑस्करमध्ये बक्षिसे अक्षरश: लुटली. लॉस एंजिलीस येथे आज झालेल्या समारंभात दोन ऑस्कर पटकावून संगीतकार ए.आर. रहमान आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, संवेदनशील आणि कल्पक गीतकार गुलजार यांनी "जय हो' गाण्यासाठी पहिला ऑस्कर मिळविला आहे. दहा नामांकने मिळालेल्या "स्लमडॉग...'ने त्यापैकी आठ श्रेणीतील पुरस्कार पटकाविले आणि सर्वाधिक ऑस्कर मिळविणारा चित्रपट म्हणून सर्वत्र कौतुकाची थाप मिळविली आहे. विशेष म्हणजे, हा जगज्जेता चित्रपट विकास स्वरूप या भारतीय लेखकाच्या लेखणीतून साकारलेल्या "क्यू ऍण्ड ए' या पुस्तकावर आधारित आहे.

सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस, विश्वजितकडून आयरिशना धमकी प्रकरण

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधात पुरावे नसल्याचे कारण पुढे करून चौकशी बंद करण्यात आल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली; तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यात आल्याची माहिती याचिकादार ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी दिली. तसेच जुने गोवे पोलिस स्थानकावर विश्वजित राणेंविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची चौकशी कोणत्या आधारे बंद करण्यात आली, याचाही संपूर्ण अहवाल सादर करा, असा आदेश राज्य सरकारला देण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सौ. दिव्या राणे यांना न्यायालयात उभी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय होत नाही, तोपर्यंत या सुनावणीला स्थगिती दिली जावी अशी याचना याचिकादाराने केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत पणजी प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे, अशी माहिती याचिकादाराने दिली. दिव्या राणे या प्रकरणात मुख्य साक्षीदार असल्याने त्यांची जबानी घेण्यासाठी त्यांना न्यायालयात पाचारण करावे, अशी मागणी ऍड. आयरिश यांनी केली होती. त्यावेळी त्यांची मागणी टाळून लावण्यात आली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागण्यात आली होती. तेथेही याचिका निकालात काढून मागणी फेटाळून लावण्यात आली होती. त्यामुळे याचिकादाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. हे प्रकरण गोवा खंडपीठात सरू असताना सरकारी वकिलांनी मंत्री राणे यांच्याविरुद्ध चौकशी सुरू असून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचा दावा केला होता. तथापि, पोलिसांनी अद्याप आरोपपत्र दाखल केले नसल्याचा दावा ऍड.आयरिश यांनी केला आहे. हा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही ऍड. आयरिश यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये तालिबान वरचढ

इस्लामाबाद, दि. २३ : पाकिस्तान आणि तालिबानी यांच्यात शांती समझोता झाला असला तरीही तालिबानी अतिरेक्यांनी एका पाकिस्तानी अधिका-याचे अपहरण केले. दोन खतरनाक अतिरेक्यांची सुटका करुन घेतल्यानंतरच या पाक अधिका-याला तालिबानींनी सोडले.
जिल्हा समन्वय अधिकारी कुशल खान असे या पाक अधिका-याचे नाव आहे. तो आणि त्याच्या सहा सुरक्षारक्षकांचे मिंगोरा येथून रविवारी अपहरण करण्यात आले होते. गेल्याच आठवड्यात पेशावरमध्ये अटक केलेल्या दोन तालिबानी अतिरेक्यांची सोडल्यानंतर पाक अधिका-याला सोडून देण्यात आले, अशी माहिती तालिबानचे प्रवक्ते मुस्लिम खान यांनी दिली.
अलिकडेच पाक सरकार आणि कट्टर तालिबानी यांच्यात शांती करार झाला होता. परंतु आमच्या माणसांना पेशावरमध्ये अटक करुन आणि एकाला दिरमध्ये ठार करुन पाक सरकारने करार मोडला. त्यामुळे आम्हाला अपहरण करावे लागले, असे खान यांनी सांगितले. मात्र तालिबानचा हा दावा पाक सरकार फेटाळत आहे. शांती करार फक्त मलाकंद भागासाठी लागू आहे. पेशावरमध्ये कुणाला तरी अटक केल्याने कराराचा भंग कसा होऊ शकतो, असा उलट सवाल पाक सरकारने केला आहे.

तमिळ वाघांच्या हल्ल्यात २१ ठार

कोलंबो, दि. २३ : सिंहलींचे प्राबल्य असलेल्या पूर्व श्रीलंकेतील किरिमेतिया गावावर रविवारी तमिळ बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात २१ ठार तर २० जण जखमी झाले. कापणी करणाऱ्या ग्रामस्थांवर त्यांनी अंदाधुंद गोळ्या झाडल्या. कोलंबोच्या हवाई दलाच्या तळावर शुक्रवारी रात्री बंडखोरांनी आत्मघातकी हल्ला केला होता. त्यानंतरचा हा दुसरा मोठा हल्ला आहे.

Monday, 23 February, 2009

धनदांडग्या कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करा
घणाघाती भाषणात नरेंद्र मोदी यांचे आवाहन
म्हापसा, दि. २२ (प्रतिनिधी) -कॉंग्रेसकडे धनबळ व सत्ताबळ आहे, याचा वापर करून या धनदांडग्यांनी ६० वर्षे सत्ता भोगली. हा पक्ष सत्ताभ्रष्ट करण्याची वेळ आता आली आहे. कॉंग्रेसच्या धनशक्तीला भाजपची संघटनशक्ती हेच उत्तर आहे. भाजपची संघटनशक्ती, कार्यकर्त्यांवर विश्वास, सत्तेचा अथवा सत्तेच्या बळाचा गैरवापर न करणे, देशाची अखंडता व सुरक्षितता राखणे या मुद्यांमुळे "पार्टी वुईथ डिफरन्स' म्हणून भाजप देशात ओळखली जाते, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी म्हापशाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या संमेलनात केले.
आपल्या दीड तासाच्या भाषणात गुजरात राज्याचा विकास, निवडणूक शास्त्र,देशाची सुरक्षा,कॉंग्रेसचे बोटचेपे धोरण यावर मोदी यांनी घणाघाती प्रहार करून कार्यकर्त्यांमध्येे विश्वासाची लाट निर्माण केली.
कार्यकर्त्यांना त्यांनी यावेळी निवडणुकीचे शास्त्र सांगताना निवडणूक कशी जिंकता येते, याबाबत कार्यकर्त्यांकडे संवाद साधला. निवडणूक केवळ धनाने जिंकता येते अशा भ्रमात कॉंग्रेस पक्ष आहे. त्याविरुद्ध लढाई जिंकण्यासाठी संघटन शक्ती, आत्मविश्वास, देशाची एकता व सुरक्षा याला प्रथम प्राधान्य देणारा भाजप ठामपणे उभा आहे. बूथ हा पक्षाचा किल्ला आहे व या किल्ल्याचे सरदार मजबूत असतील तर निवडणूक जिंकता येते. आपण प्रत्येक बूथ जिंकला तरच पार्टी वुईथ डिफरन्स म्हणून आपण म्हणवून घेऊ शकतो. आपला पक्ष "दल से बडा देश' यावर जास्त विश्वास ठेवणारा पक्ष आहे. आपण कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर उभा आहे, गुजरात राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नाही, असे सांगून त्यांनी सभेत चैतन्य निर्माण केले. कॉंग्रेसचे सत्तेचे राजकारण थांबवा म्हणून सांगण्याची पाळी आली आहे. ती संधी तुम्ही दवडू नका, अशी हाक त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिली.
आपल्या संघटनशक्तीपुढे धननीती टिकू शकत नाही.
मोदी यांनी आपल्या भाषणात गुजरात राज्याच्या विकासाचा आढावा घेतला. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्या आधुनिक सुखसोयी उपलब्ध नसतील, त्यापेक्षाही गुजरातच्या प्रत्येक गावात आज अधिक उपलब्ध आहे. आज गुजरातचा शेतकरी या साधनांचा वापर करून व्हिडिओ कॅमेराचा वापर करून शेतीविषयी शास्त्रीय माहिती मिळवू शकतो, इतकेच नव्हे, तर शिकागोमधील आपल्या मुलांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा बोलू शकतो. गुजरातमध्ये आज २४ तास थ्रीफेज वीज गावांतील लोकांना विनाखंडीत मिळते. मच्छीमार लोकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमाद्वारे समुद्रात केव्हा जायचे व मासळी कुठे उपलब्ध आहे याचे मार्गदर्शन मिळते. प्रत्येक गावात ब्रॉडबॅण्ड कनेक्शन आहे म्हणून आज देशातील इतर राज्य "गुजरात मॉडेल' हा शब्द प्रयोग वापरतात. गौहत्तीला बांगलादेशाची भीती वाटे तर गुजरात पाकिस्तानजवळ आहे पण मोदींना पाकिस्तान भिते. परंतु भारताचे संरक्षणमंत्री अमेरिकेत जाऊन पाकिस्तानला आवरा म्हणून सांगतात ही शरमेची गोष्टी आहे.
देशाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचा उल्लेख त्यांनी थ्री इन वन असा केला. अर्थमंत्री हंगामी पंतप्रधान असून पाच लाख लोकांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार असे सांगताना त्यांना काहीच कसे वाटत नाही. उलट गुजरातमध्ये २५ लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत ही किमया फक्त आधुनिक व वैज्ञानिक संसाधनाचा वापर केल्यामुळे झाली.
आरंभी उत्तर गोवा खासदार व पक्षाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी दीपप्रज्वलन करून या संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी व्यासपीठावर भाजपचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य, आमदार विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर उपस्थित होते. प्रारंभी पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी स्वागत केले. नंतर मांद्रे मतदारसंघाचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सीस डिसौझा, मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक यांचे यावेळी भाषण झाले. बूथ संमेलनात तीन ते चार हजार कार्यकर्ते उपस्थित होते. मोदी बैठकस्थळी येताच सुवासिनीने त्यांची ओवाळणी करून त्यांना संमेलनस्थळी आणले. माजी आमदार सदानंद शेट तानावडे यांनी सूत्रसंचालन केले. युवा अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी आभार मानले.

कळसा भंडुरा नाल्याच्या बांधकामाचा अहवाल सादर करा - सर्वोच्च न्यायालय

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - कर्नाटक राज्यातर्फे सुरू असलेल्या कळसा-भंडुरा नाल्याच्या बांधकामाची पाहणी करून तीन आठवड्यांत संपूर्ण अहवाल न्यायालयात सादर करण्यात आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालय तसेच कर्नाटक राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती आज म्हादई बजाव अभियानाच्या अध्यक्ष निर्मला सावंत यांनी दिली.
या आदेशामुळे अभियानाला दिलासा मिळाला आहे. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सौ. सावंत बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत प्रा. राजेंद्र केरकर, डॉ. नंदकुमार कामत व प्रजल साखरदांडे उपस्थित होते."सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी'ने सदर प्रकल्प सह्याद्रीच्या माथ्यावर अतिसंवेदनशील ठिकाणी असून त्यांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा मान्यतेचा परवाना मिळालेला नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सरन्यायाधीश के जी. बालकृष्णन, हरिजीत पसायत आणि न्या. कापाडिया यांच्या खंडपीठाने वरील निर्णय दिल्याचे सौ. सावंत यांनी सांगितले. सदर प्रकल्प शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त नसल्याने पर्यावरण मंत्रालयाच्या परवान्याची गरज नसल्याचा दावा यावेळी कर्नाटक राज्याने आपली बाजू मांडताना केला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कर्नाटकमधील २५८ हेक्टर वन क्षेत्रात हा प्रकल्प साकारला जात असून त्यांनी वनसंवर्धन कायदा १९८०चे उल्लंघन केला असल्याचाही दावा सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे. दि. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळी म्हादई बजाव अभियानातर्फे ऍड.भवानी शंकर यांनी तर कर्नाटक राज्याच्यावतीने ऍड. फलिल नरिमन यांनी युक्तिवाद केले.
पर्यावरण कायद्याचे उल्लंघन करून नदी वळवण्याचा प्रकल्प कर्नाटक राज्यातर्फे करण्यात येत असल्याचा दावा करून म्हादई बचाव अभियानाने दुसरी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीच्यावेळी समितीला पाहणी करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
यापूर्वी न्यायालयाने पाणी वळवण्यास सक्त मनाई केली असताना कर्नाटक सरकारकडून कळसा-भंडुरा नाल्याचे बांधकाम जोरात सुरू असल्याने गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरून कर्नाटक राज्याला नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीलाही तीन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

पाकला"जशास तसे'उत्तर का दिले नाही?

मुंबई हल्लाप्रकरणी सरकारवर ठपका
मडगाव, दि.२२ (प्रतिनिधी) - मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हे पाकिस्तानने भारताविरुद्ध पुकारलेले युध्दच होते, त्याला त्याच पद्धतीने उत्तर देण्याचे सोडून आपले सरकार मदतीसाठी धावा करीत अमेरिकेकडे धावले, अशा भेकडांच्या हाती पुन्हा राज्यकारभार द्यावयाचा की काय याचा गांभीर्याने विचार या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने जनतेने करायला हवा असा सल्ला देताना या प्रकरणी " ईटका जवाब पत्थरसेही देनेका' (जशास तसे)अशी भाजपची स्पष्ट भूमिका आहे कारण अशा लोकांना दुसरी भाषा कळत नाही, आपण ते गुजरातमध्ये करून दाखविले असे सुस्पष्ट प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
येथील कॉश्ता मैदानावर दक्षिण गोव्यातील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केंद्रातील संपुआ सरकारवर त्यांची चौफेर हल्ला केला व सांगितले की या सरकारने दहशतवादाचा कर्दनकाळ ठरलेला "पोटा' कायदा मागे घेण्याखेरीज दुसरे काहीच केलेले नाही. आज गुजरात वगळता साऱ्या देशभर जो दहशतवाद बोकाळलेला आहे त्याचे कारण सरकारमध्ये नसलेली धमक व मागे घेतलेला पोटा होय. गुजरातमध्ये दहशतवादी कृत्य झाल्यावर आपल्या सरकारने त्याच्याशी संबंधित सर्व दहशतवाद्यांना लगेच जेरबंद केले व त्यातून देशभरातील सुरक्षादलांमध्ये चर्चा सुरू झाली होती याचा किस्सा त्यांनी सांगितला. कॉंग्रेस सरकारे ते करू शकत नाहीत कारण त्यांना देशाच्या अखंडता व सुरक्षेपेक्षाही मतपेटीची जास्त चिंता असते.
केंद्राच्या गहू आयात निर्णयावर टीका करताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवरच आरोप ठेवला व वाजपेयींच्या राजवटीत ज्या देशात धान्याची कोठारे भरून वाहत होती, धान्य साठवायला जागा पुरत नव्हती त्या देशावर आज गहू आयात करण्याची पाळी का यावी असा सवाल केला व तो करताना स्वदेशांतील शेतकऱ्यांकडून ८००रु. क्विंटल तर बाहेरील देशांतून खरिदलेल्या गव्हाला रु.१६०० क्विंटल असा दर का दिला गेला,या व्यवहारातील दिल्लीतील दलाल कोण ते जाहीर करण्याची मागणी केली.
सरकारच्या अशा या दिशाहीन धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या करतात. महाराष्ट्र,आंध्र प्रदेश या कॉंग्रेसप्रणीत राज्यात ते प्रकार चालू आहेत पण अभिमानाची गोष्ट म्हणजे गुजरातेत अजून एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही . तेथे २००२ मध्ये २३ लाख गासड्या कापूस पिकला होता, तर यंदा ते प्रमाण १.२३ कोटी वर गेले आहे. तेथील ८० टक्के कापूस चीन व जपानात निर्यात होतो व तसा तो व्हावा याची खबरदारी सरकार घेते, ते म्हणाले.
त्यांनी नुकतेच लोकसभेत सादर केला गेलेला अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे प्रतिपादिले. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिलेल्या आकडेवारीवरून सरकारने गेली पाच वर्षे देशाला फसविण्याखेरीज दुसरे काहीच केलेले नाही हे दिसून येते असे सांगितले. जागतिक आर्थिक मंदीमुळे आत्तापर्यंत ५ लाख तरुण बेकार झालेले आहेत व हे प्रमाण चालूच राहणार आहे ही मुखर्जी यांची कबुली म्हणजे सरकारचा एकप्रकारे नालायकपणा असून, सरकारने काहीच केलेले नाही याचा पुरावा आहे असे सांगून ते म्हणाले, आपण त्या उलट गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय गुजरात विकास शिखर परिषद बोलावली, तिला ५० देशांतील प्रतिनिधी सहभागी झाले व त्यातून १२ लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणूक विषयक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यातून राज्यात २५लाख रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत,जे गुजरातला शक्य झाले ते केंद्राला का शक्य होऊ नये असा सवाल त्यांनी केला व याचा खुलासा कॉंग्रेसकडे मागा असे आवाहन केले.
येत्या निवडणुकीत देशातील जनताच या लोकांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून अडवाणी प्रधानमंत्री व्हावेत ही वाजपेयींची इच्छा आहे, ती साकार करण्यासाठी भाजपला सत्तास्थानी न्या व त्यासाठी गोव्यातील दोन्ही जागा भाजपच्या पारड्यात टाका,असे आवाहन त्यांनी केले.

लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रीसाई पादुकांचे दर्शन

आज दुपारी आरतीनंतर श्रीपादुकांचे प्रस्थान
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - साईबाबांच्या चावडी पूजनाच्या शताब्दीनिमित्त आज येथील काम्पाल मैदानावर आयोजित सोहळ्यात गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे १ लाख भाविकांनी अतिशय श्रद्धापूर्वक साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेतले. या पादुका उद्या दुपारपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात आल्या असून, दुपारी १२ वाजता आरतीनंतर त्यांचे पुढे प्रस्थान होईल.
काल मध्यरात्रीपासूनच श्रीपादुका दर्शनासाठी साईभक्तांच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. पहाटेच्या काकड आरतीने या सोहळ्यास प्रारंभ झाला. या काकड आरतीच्या वेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सपत्नीक श्रीपादुकांची विधिवत पूजा केली. या आरतीला उद्योजक श्रीनिवास धेंपे व आरोग्यमंत्री विश्वजीत राणे सपत्नीक उपस्थित होते. तसेच उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, आमदार पांडुरंग मडकईकर, बाल भवनच्या अध्यक्ष विजयादेवी राणे, आयोजन समिती व शिर्डी संस्थानचे पदाधिकारी, सदस्य व अन्य स्वयंसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यानंतर श्रीस्तवन मंजिरी व साई चरित्रातील ३७ व्या अध्यायाचे वाचन झाले. दुपारी १२.३० वाजल्यापासून महाप्रसादाला प्रारंभ झाला. अंदाजे ७० हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी घरी नेण्यासाठी शिर्डी येथून एक लाडू व उदीची व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळच्या सत्रात झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सकाळी चिन्मय मिशन ग्रुपच्या निरीक्षा पै काणे यांनी स्वागत गीत म्हटले. या स्वागतपर कार्यक्रमात किरण आणि रितू कित्तूर यांनी नृत्य सादर केले. अभिषेक बांदेकर यांनी भजन सादर केले. भक्तीसंगीत कार्यक्रमात रजनी ठाकूर व स्थानिक गोमंतकीय कलाकारांनी आपली कला सादर केली. दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती झाली.
शिर्डीत खास निवासस्थान
सायंकाळच्या सत्रात झालेल्या साईभक्ती संमेलनात मुख्यमंत्री श्री. कामत व शिर्डी संस्थानचे विश्वस्त तथा कॉंग्रेसचे स्थानिक आमदार जयंत ससाणे यांची भाषणे झाली. श्री. ससाणे यांनी शिर्डी येथे गोमंतकीय साईभक्तांसाठी निवासस्थान उभारण्याची अनुकूलता दर्शविली व देशातील विविध राज्यांतून संस्थानाचे माहिती केंद्रे उभारणार असल्याची माहिती दिली. यावेळी श्री. कामत यांनी, लवकरच गोमंतकात माहिती केंद्र उभारण्यावर कार्यवाही करण्याच आश्वासन दिले. या संमेलनात त्यांच्यासोबत व्यासपीठावर पिंगुळी येथील संत प.पू. अण्णा राऊळ महाराज, गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, माजी केंद्रीयमंत्री ऍड्. रमाकांत खलप, श्रीसाई संस्थान शिर्डीचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंडकर, सुरेश वाबळे व अशोक खांबेकर, शैलेश कुंटे, शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा सौ. राजश्री ससाणे, दर्शन सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल खवंटे, रवी नायडू, सचिव प्रदीप पालयेकर, खजिनदार विवेक पार्सेकर, पणजी पालिका महापौर टोनी रॉड्रिगिस, मुस्तफा कादर, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर गोव्यातील दर्शन सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा श्रीसाई संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत श्रीसाई नामाची शाल, श्रीफळ व साई प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला. तर श्रीसाई पादुका गोमंतकीयांच्या दर्शनासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. कामत यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफल व विशेष भेटवस्तू देऊन सन्मान केला. शिर्डीच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री श्री. कामत यांचा विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते श्री. अमन वर्मा व डॉ. अजय वैद्य यांनी केले. या संमेलनात श्री. खवंटे यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी व्यासपीठावरील इतर मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी समितीचे खजिनदार श्री. पालयेकर यांनी आभार मानले.
सायं. ६ च्या धूप आरतीनंतर "भजन संध्या'मध्ये प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, प्रसिद्ध पार्श्वगायक मनोहर उधास, अनुपम देशपांडे व श्री. प्रमोद मेधी यांनी भक्तीगीते सादर करुन श्रोत्यांची मने भारावून टाकली. प्रसिद्ध अभिनेते श्री. सुधीर दळवी व अमन वर्मा यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. १९७७ साली "शिर्डी के साईबाबा' या हिंदी चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारणारे श्री. दळवी यांनी त्या भूमिकेनंतर त्यांच्यात झालेल्या बदलाविषयी श्रोत्यांना माहिती दिली. त्यानंतर रात्री ९ वाजता पं. सदानंद नयमपल्ली यांचा संगीत कार्यक्रम झाला. १० वाजता बाबांची सेज आरती झाली. त्यानंतर रात्रौ ११ वाजता अंतरराष्ट्रीय कलाकार सच्चिदानंद अप्पा यांनी आपली कला सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

मधुचंद्राची शोकांतिका; पतीचा मृत्यू, पत्नी सुखरुप

मडगाव, दि. २२(प्रतिनिधी) : विवाहानंतर मधुचंद्रासाठी नवी दिल्लीहून गोव्यात आलेल्या एका तरुण दांपत्यासाठी कोलवा किनाऱ्यावरील जलक्रीडा त्यांचे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करणारी ठरली आहे. तेथील "बनाना बोटी'तून जलक्रीडेसाठी हे जोडपे गेले असता ती बोट उलटून झालेल्या अपघातात या जोडप्यातील तरुण समुद्रात बुडाला, तर त्याची पत्नी सुदैवाने बचावली. तिला हॉस्पिसियू इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
योगेश अगरवाल (२७) व नेहा (२२) यांचा आठवडाभरापूर्वींच विवाह झाला होता. नंतर ते मधुचंद्रासाठी गोव्यात आले व उत्तर गोव्यातील एका हॉटेलात उतरले. आज सकाळी कोलवा किनाऱ्यावर भटकंती करायची व सायंकाळी मडगावचा कार्निव्हल पाहून परत फिरायचे असा त्यांचा बेत होता. दुपारी किनाऱ्यावर फिरताना या "बनाना बोटींतून' ती जलक्रीडेला गेली असता बोट पाण्यात उलटली व तिच्याखाली सापडल्यामुळे योगेश मरण पावला आणि नेहा बचावली.
कोलवा पोलिसांनी याप्रकरणी संबंधित बोटीचा चालक व त्याच्या साहाय्यकाविरुद्ध बेदरकारपणाबद्दल गुन्हा नोंदवला आहे. पोलिस निरीक्षक एडविन कुलासो तपास करीत आहेत. मृतदेह हॉस्पिसियूच्या शवागरात ठेवला असून उद्या शवचिकित्सा केली जाईल.
यापूर्वी याच किनाऱ्यावर बनाना बोट उलटून तिचा चालकच बोटीखाली अडकून मरण पावला होता. त्यानंतर तशाच प्रकारचा हा दुसरा अपघात आहे.

Sunday, 22 February, 2009

कार्निव्हलचा जल्लोष सुरू

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): ठेका धरायला लावणारे संगीत, दिलखेचक नृत्ये, आकर्षक चित्ररथ, व्हिवा कार्निव्हलचा जल्लोष, पर्यटक व स्थानिकांची प्रचंड गर्दी अशा भारलेल्या वातावरणात आज मांडवीच्या तीरी पणजी कार्निव्हल महोत्सवाला सुरुवात झाली.
"खा प्या मजा करा" असा संदेश देणाऱ्या "किंग मोमो' ची "राजवट' आता सुरू झाली असून पर्यटन विभागातर्फे आयोजित पणजी कार्निव्हलमध्ये ७७ चित्ररथांनी सहभाग घेतला.
राज्यपाल एस एस. सिद्धू व मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कार्निव्हल उत्सवाच्या चित्ररथ मिरवणुकीचे बावटा दाखवून उद्घाटन केले. यावेळी पर्यटनमंत्री मिकी पाशेको, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष श्याम सातर्डेकर, महापौर टोनी रॉड्रिगीस, यंदाचे "किंग मोमो" आयव्हर अँथनी ब्रागांझा उपस्थित होते.
यंदाच्या चित्ररथ मिरवणुकीत अश्लीलतेला कात्री लावल्याचे प्रामुख्याने जाणवले. गेल्यावेळी ब्राझिलीयन "सांबा" नृत्याचा आस्वाद घेतलेली अनेक मंडळी तशा नृत्याचा शोध घेत होती. तथापि, त्यावर जोरदार टीका झाल्यामुळे यंदा तशा स्वरूपाचे नृत्य दिसून आले नाही.
विविध संदेश देणारे व रंगीबेरंगी चित्ररथ पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.
"खा प्या मजा करा' या किंग मोमोच्या संदेशाच्या पुरेपूर फायदा उठवत काही मद्यालयांनी रस्त्यावरच टेबल्स टाकून बीअरची विक्री केली. त्यामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला, पण वाहतूक पोलिसांनी त्याची फारशी दखल न घेतल्याने लोकांना धड चालणेही कठीण बनले होते.
या महोत्सवात अनेक पारंपरिक, व्यावसायिक, सास्कृंतिक चित्ररथ तथा नृत्य गटांनी भाग घेतला. कर्णकर्कश विदेशी संगीताच्या तालावर थिरकणारी युवापिढी व अनेक मुखवट्याव्दारे मनोरंजन करणारे कलाकार यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले.
यात युवा वर्गाची संख्या प्रकर्षाने जाणवत होती. गर्दीत काही मोजके विदेशी पर्यटक सोडल्यास देशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात हजेरी होती. या महोत्सवाला अश्लीलतेचे गालबोट लागणार नाही याची सरकारने गंभीर दखल घेतल्याचे प्रामुख्याने जाणवले. कारण त्याबाबत अनेक सामाजिक संघटनांनी हरकती घेतल्या होत्या. परिणामी काही तुरळक प्रकार वगळता अनेक कलाकारांनी आपला "ड्रेस कोड" कमी जास्त प्रमाणात सांभाळल्याचे दिसत होते. कार्निव्हल चित्ररथ मिरवणुका उद्यापासून राज्यात मडगावसह अन्य महत्त्वाच्या शहरांत काढण्यात येणार आहेत.

दाबोळीचे अस्तित्व टिकून राहणार प्रफुल्ल पटेल

विमानतळाच्या विस्तारीकरणाचा कोनशिला समारंभ
वास्को, दि.२१ (प्रतिनिधी): भारतीय विमान उड्डाण क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेल्या प्रगतीमुळे भविष्यात अतिरिक्त विमानतळांची गरज भासणार आहे. यासाठी सरकारकडून भविष्यकाळात पन्नास हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. गोव्यात मोपा विमानतळ येणारच मात्र दाबोळी विमानतळाचे अस्तित्व टिकून राहणार असे स्पष्टीकरण देताना राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल करू नका, असा इशारा केंद्रीय हवाई वाहतूक राज्य मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आज दिला.
आज सकाळी चिखली येथे क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा कोनशिला समारंभ प्रमुख पाहुणे श्री. पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, पर्यटन मंत्री मिकी पाशेको, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, उपसभापती माविन गुदिन्हो, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दीन, महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा, बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव,डॉ. विल्फ्रेड डिसोझा, राज्यसभा खासदार शांताराम नाईक, मुख्यसचिव जे. पी. सिंग, आमदार नीळकंठ हळर्णकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विमानतळांवर पडणारा अतिरिक्त ताण पाहता दाबोळी येथील विमानतळ बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केल्यावर ते म्हणाले की, २००४ मधील ४५ विमानतळ आणि ११० विमानांच्या तुलनेत आज ८५ विमानतळांवरून ५०० विमाने वाहतूक करत आहेत. साल २०२० पर्यंत देशातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी किमान ४०० विमानतळांची आवश्यकता भासेल.
स्वस्त दरात चांगल्या साधन सुविधा उपलब्ध होत असल्याने विमानतळाची स्थिती एकंदरीत बस स्थानकासारखी झाल्याचे सांगून येणाऱ्या १० वर्षांत या क्षेत्राद्वारे युवा पिढीला एक मोठे रोजगारसंधी उपलब्ध होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजच्या या समारंभानंतर दाबोळीचा विकास हा भारत सरकारचा हेतू असल्याचे स्पष्ट झाले असून सरकारच्या वतीने दाबोळी विमानतळ बंद केले जाणार नाही, असेही श्री. पटेल यांनी सांगितले.
मुख्यमंत्री कामत यांनी आपल्या भाषणात आजचा दिवस संपूर्ण गोव्यासाठी मुख्य करून दक्षिण गोव्यासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. जनतेने दाबोळी विमानतळाच्या अस्तित्वाविषयी चिंता करणे सोडून द्यावे, असेही ते म्हणाले. दाबोळी विमानतळावरून उशिरा रात्री गोवा मुंबई विमान सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांकडे केली.
यावेळी दक्षिण गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, उत्तर गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्दीन व राज्य सभा खासदार शांताराम नाईक यांची भाषणे झाली. प्रारंभी विमान प्राधिकरणाचे अधिकारी एस. सी. चाटवाल यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तसेच त्यांच्या हस्ते मान्यवरांना भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. दाबोळी विमानतळासाठी उभारण्यात येणाऱ्या एकत्रित टर्मिनल इमारतीमध्ये कोणत्या प्रकारच्या साधनसुविधा असणार याबाबत माहिती देण्यात आली. दाबोळी विमानतळाचे संचालक पॉल मणिक्कम या कार्यक्रमाला उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------
गोव्यात असलेले कॉंग्रेस सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळेच आहे, अन्यथा कॉंग्रेस सत्तेवर येणे कठीण बनले असते. कॉंग्रेस नेत्यांना ज्याप्रमाणे विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातात त्याच पद्धतीने येथील राष्ट्रवादी नेत्यांनाही विश्वासात घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले. कार्यक्रमातील आपल्या भाषणात श्री. पटेल यांनी राष्ट्रवादीचे नेते राज्यातील सरकारचा हिस्सा असल्याची आठवण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना करून दिली. विकासकामे करतेवेळी राष्ट्रवादी नेत्यांची मर्जी जाणून घ्यावी, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
-------------------------------------------------------------------------
आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरू होताच चर्चिल आलेमाव यांनी व्यासपीठावर येऊन आपले विचार व्यक्त करावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली. परंतु, साबांखा मंत्री आलेमाव यांना बोलण्याची संधी न देता कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. "दाबोळी विमानतळ आपल्या प्रयत्नामुळे बचावला' असे जनतेला दाखवून देण्यासाठी त्यांचा हा स्टंट होता, असा सूर यावेळी उपस्थितांमधून ऐकावयास मिळाला.
--------------------------------------------------------------------------------]
दाबोळीच्या विस्तारीत टर्मिनल इमारतीची उभारणी कांच आणि पोलादाच्या साहाय्याने ६१,९५७ चौ.मी. क्षेत्रामध्ये केली जाणार आहे. याद्वारे प्रवाशांसाठी सामान हाताळण्याची व्यवस्था, मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रणा, एस्कालेटर्स, सार्वजनिक ध्वनिवर्धक व्यवस्था, उड्डाणाबाबत माहिती देणारी यंत्रणा, देखरेखीसाठी क्लोज्ड सर्कीट टीव्ही इ. सुविधांचा समावेश असेल. विस्तार काम पूर्ण झाल्यानंतर ताशी २७५० प्रवासी हाताळण्याची क्षमता या विमानतळावर उपलब्ध होणार आहे.

मोदी यांचे गोव्यात अभूतपूर्व स्वागत

वास्को, दि.२१ (प्रतिनिधी): गुजरातचे मुख्यमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी यांचे आज संध्याकाळी ७.३० च्या सुमारास दाबोळी विमानतळावर आगमन झाले. गोव्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आलेल्या श्री. मोदी यांचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री अविनाश कोळी व असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी विमानतळावर आदरपूर्वक स्वागत केले.नंतर श्री. मोदी हे कडक सुरक्षाव्यवस्थेत पणजीला जाण्यासाठी रवाना झाले.
श्रीपाद नाईक व श्री. पर्रीकर यांनी मोदी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तेव्हा मोदी यांच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. याप्रसंगी मुरगावचे आमदार श्री मिलिंद नाईक, भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर, दक्षिण गोव्याचे विधानसभा भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर, मुरगावचे माजी नगराध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक कृष्णा (दाजी) साळकर व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गोव्यात आगमन होताच श्री. मोदी यांनी श्रीपाद नाईक व मनोहर पर्रीकर यांना "गोव्यामध्ये काय चालले आहे,' असा पहिला प्रश्न केला. यानंतर विमानतळाच्या अतिमहनिय गृहात काही वेळ श्री. पर्रीकर यांच्याशी श्री. मोदी यांनी त्यांच्या गोव्याच्या भेटीबाबत चर्चा करून नंतर येथून पणजीकडे ते रवाना झाले.
यावेळी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.श्री. मोदी एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर आलेले असून उद्या संध्याकाळी ते गोव्याहून रवाना होणार आहेत.

साईबाबा पादुकांचे गोव्यात भव्य स्वागत

पादुका दर्शन ः आजचे कार्यक्रम
सकाळी ६ वाजता दर्शनसोहळा
दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती
दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद भंडारा
सायं. ७ वाजता धूप आरती
रात्री १० वाजता भजन व आरती
दरम्यान, सकाळी ९ ते रात्रौ १० वाजेपर्यंत विख्यात कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम.

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): श्रद्धा व सबुरीची दिव्य शिकवण देऊन समाजाचा उद्धार करणारे थोर संत श्रीसाईबाबा यांच्या शिर्डीस्थित पादुकांचे आज गोवा-महाराष्ट्र सीमेवर अतिशय उत्साही व भावपूर्ण वातावरणात गोमंतकीयांनी स्वागत केले. सीमेवर पत्रादेवी येथे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी, तर पणजीत जुन्या पाटो पुलावर विरोधी पक्षनेते तथा स्थानिक आमदार मनोहर पर्रीकर व महापौर टोनी रॉड्रिगीस यांनी या पवित्र पादुकांचे दर्शन घेऊन त्यांचे स्वागत केले.
श्रीसाईबाबांच्या चावडी पूजनाच्या शताब्दीनिमित्ताने श्रीसाई शिर्डी संस्थानातर्फे येथील कांपाल मैदानावर भाविकांच्या दर्शनासाठी या पादुका आणण्यात आल्या आहेत. या दुर्मीळ पादुकांचे रथातून पत्रादेवी ते येथील कांपाल मैदानावर नियोजित स्थळापर्यंत भव्य मिरवणुकीद्वारे आगमन झाले. ही मिरवणूक मार्गक्रमण करत असताना गोमंतकीयांच्या आदरातिथ्याचे उत्कृष्ट दर्शन घडले. ठिकठिकाणी अनेक भक्त, भाविक तथा राजकीय नेत्यांनी साई पादुकांचे विनम्रपूर्वक दर्शन घेऊन स्वागत केले. यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीत भारतीय संस्कृतीला शोभणारी वेशभूषा करून महिला सहभागी झाल्या होत्या. या दिंडीत दादा महाराज सहभागी झाले होते. पुढे मालपे जंक्शनवर आमदार दयानंद सोपटे व लक्ष्मीकांत पार्सेकर, धारगळ महाद्वारावर पंचायतमंत्री बाबू आजगावकर, कोलवाळ पुलावर आमदार नीळकंठ हळर्णकर, करासवाडा जंक्शनवर आमदार फ्रान्सिस डिसोझा व नगराध्यक्ष रुपा भक्ता, ग्रीन पार्क जंक्शनवर आमदार दिलीप परुळेकर, पर्वरी आझाद भवनाजवळ आमदार दयानंद नार्वेकर यांनी "श्रीं'च्या पादुकांचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. रात्री ११ च्या सुमारास या पादुकांचे पणजीत जुन्या पाटो पुलावर आगमन झाल्यावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व महापौर टोनी रॉड्रिगिस यांनीही विधिवत पूजन करून दर्शन घेतले. त्यानंतर हा पादुका रथ जुन्या सचिवालयाजवळून पुढे चर्च चौक, महालक्ष्मी मंदिर, जुंता हाऊस, पोलिस ट्राफिक सेलजवळून डी. बी. मार्गावरून नियोजित स्थळी पोहोचला. पत्रादेवी येथे आज दुपारी २ वाजता हा पादुका रथ पोहोचल्यावर तेथे भक्तांचा महाप्रसाद व भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. कामत यांनी पादुकांचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूलमंत्री जुझे फिलिप डिसौझा, पंचायतमंत्री बाबू आजगावकर, खासदार फ्रान्सिस सार्दीन, माजी केंद्रीयमंत्री ऍड्. रमाकांत खलप, माजी आमदार जितेंद्र देशप्रभू, विश्वस्त मंडळाचे डॉ. एकनाथ गोंडकर, अशोक खांबेकर, सुरेश वाबळे, शैलेश कुटे, उद्योगपती विश्वासराव धेंपे, आयोजन समितीचे अध्यक्ष अनिल खवंटे, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार जयंत ससाणे, सावंतवाडीचे शाहू महाराज, प्रा. अनिल सामंत, भंडारी समाजाचे मधुकर नाईक, गोवा ऍन्टिबायोटिक्स उद्योगाचे संचालक सूर्यकांत तोरस्कर, कदंब महामंडळाचे संचालक दशरथ महाले, प्रार्थना मोटे, जिल्हा पंचायत सदस्य सुप्रिया महाले, प्रदीप पालयेकर आधी मान्यवर उपस्थित होते. या पूजनानंतर पादुका रथाचे मार्गक्रमण सुरू झाले.