अध्यादेशावर बाबा ठाम - उपोषण सुरूच
नवी दिल्ली, दि. ४ : केंद्र सरकारने बाबा रामदेव यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे पत्र आज शनिवारी रात्री उशिरा त्यांना पाठवले. मात्र, यासंदर्भात जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील, असा पवित्रा बाबा रामदेव यांनी घेतला आहे. दरम्यान, अध्यादेशासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचा पवित्रा केंद्र सरकारने घेतल्यामुळे रामदेव बाबांसह त्यांच्या लाखो अनुयायांनी आरंभलेले हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, केंद्र सरकार खोटारडे असून आपल्या नीतीवरच प्रश्नचिन्ह लावण्याचा घाणेरडा खेळ त्यांच्याकडून खेळला जात आहे, असा आरोप रामदेव बाबा यांनी केला आहे. सरकारकडे आपण कोणताही करार केला नव्हता. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन द्या व त्यानुसार अध्यादेश काढा असे आपण त्यांना बजावले होते. तसेच केले जाईल, असेही केंद्राने आपल्याला सांगितले होते. आता मात्र या आंदोलनाची दिशा बदलण्याचाच त्यांचा प्रयत्न असून हा डाव उधळून लावला जाईल, असेही बाबा म्हणाले.
केंद्र सरकारवर आपला अजिबात विश्वास नाही. काल, शुक्रवारी काही मुद्यांवर सरकारशी आपले एकमत झाले होते. मात्र जोपर्यंत शंभर टक्के एकमत होत नाही, तोपर्यंत काळ्या धनाविरोधातील हे आंदोलन सुरूच राहील अशी घोषणाही बाबा रामदेव यांनी केली आहे.
विदेशी बँकांत लपवलेले काळे धन भारतात आणले जावे व त्यासाठी ठोस कायदा केला जावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज शनिवारी योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या लाखो अनुयायांसह येथील रामलीला मैदानावर उपोषणाला प्रारंभ केला. या आंदोलनाला नागरिकांचा मिळत असलेला पाठिंबा पाहून धास्तावलेल्या केंद्र सरकारच्या वतीने संध्याकाळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदेव बाबा यांच्या सर्व प्रमुख मागण्या सरकारने मान्य केले असल्याची घोषणा केली. तथापि, बाबा रामदेव यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी दीर्घ चर्चा झाली होती. त्यांच्या मागण्यांसंदर्भात येत्या दोन दिवसांत लिखित आश्वासन दिले जाईल, असे सरकारतर्ङ्गे या बैठकीत सांगण्यात आले होते. त्यानुसार आपण शनिवारी सकाळी उपोषण समाप्तीची घोषणा करू, असे लेखी आश्वासन बाबा रामदेव यांनी सरकारला दिले असल्याचेही श्री. सिब्बल यांनी सांगितले व बाबांच्या आंदोलनाला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न केला.
Sunday, 5 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment