Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 11 October, 2008

शिक्षेच्या अंमलबजावणीस होणारा विलंब चिंताजनक: उज्ज्वल निकम


दै. गोवा दूतचे संपादक श्री. राजेंद्र देसाई, उद्योजक गुरुदास नाटेकर, गोवा दूतच्या सरव्यवस्थापक व संचालक सौ. ज्योती धोंड, प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल व पत्नी सौ. ज्योती निकम दिसत आहे. (छायाः प्रीतेश देसाई)

'गोवादूत'ला सदिच्छा भेट
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): 'टाडा' अथवा 'पोटा'सारख्या कायद्यांचा गैरवापर अधिक झाला, मात्र न्यायालयाने गुन्हेगाराला शिक्षा ठोठावल्यानंतरही शिक्षेच्या कार्यवाहीला होणारा विलंब अधिक चिंताजनक आहे, असे मनोगत नामवंत फौजदारी वकील ऍड.उज्ज्वल निकम यांनी "गोवादूत'कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी व्यक्त केले. राष्ट्रपतींकडे केले जाणारे दयेचे अनेक अर्ज निर्णयाविना अद्याप पडून असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयीन कामकाजावर प्रसारमाध्यमांनी अवश्य लक्ष ठेवावे, मात्र बातम्या देताना जबाबदारीनेलेखन करावे. असे केल्यास अवमानाचा प्रश्नच उद्भवणार नाही, असे ते म्हणाले.
चुकीच्या जागी चुकीची व्यक्ती न्यायदानास बसली तर अन्याय होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी वकिलांचे कौशल्यही असफल होते, असे सांगून त्यांनी आपण आतापर्यंत लढविलेल्या खटल्यात आलेले रोमांचकारी अनुभव कथन केले. वकिलाने खटल्यातील बारकावे लक्षात घेऊन तयारी केल्यास गुन्हेगारांना शिक्षा होतेच, असे सांगून मुंबई बॉम्बस्फोट खटला, संजय दत्त प्रकरण, खैरलांजी हत्या प्रकरण आदी देशात गाजलेल्या प्रकरणांत आपण नेहमीच सत्याची बाजू मांडली आणि त्यात संबंधितांना न्याय मिळवून दिला,असे ऍड. निकम म्हणाले. वकिलांना धमक्या मिळण्याचे प्रकार आपल्याला नवे नाहीत. तथापि, अशा प्रकारांचा गाजावाजा करणे योग्य नाही. आपले सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध असला तरी राजकारणात पडण्याचा विचार नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
"गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक ज्योती धोंड यांनी पुष्पगुच्छ देऊन ऍड.निकम यांचे स्वागत केले. विद्या नाईक यांनी सौ. निकम यांना पुष्पगुच्छ दिला. वृत्तसंपादक सुनील डोळे यांनी आभार मानले. यावेळी संचालक सागर अग्नी व अन्य कर्मचारी उपस्थित होते. उद्योजक गुरुदास नाटेकर हेही यावेळी उपस्थित होते.

नोव्हेंबरपासून वाढीव वेतनश्रेणी वेतन आयोग कार्यवाहीची अधिसूचना लागू

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): सहाव्या वेतन आयोगाने प्रत्यक्षात शिफारस केलेली वाढीव वेतनश्रेणी नोव्हेंबर ०८ च्या वेतनापासून लागू होणार असली तरी त्यासंबंधीची अधिसूचना जारी करून सरकारने आयोगाच्या अंमलबजावणीचा मार्ग अखेर खुला केला आहे. सचिवालय तथा अन्य कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने वेतनश्रेणीत देण्यात आलेली वाढ रद्द करण्यात आली आहे. तसेच रजेच्या बदल्यात मिळणारी रोख रक्कम सुविधा बंद करण्याचा निर्णयही या अधिसूचनेत जाहीर करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या वित्त खात्याचे सचिव उदीप्त रे यांनी आज सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली. त्याचबरोबर या आयोगाच्या शिफारशी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने लागू करायच्या याबाबत माहिती देणारी एक पुस्तिकाही वितरित करण्यात आली आहे. आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २००६ पासून सरकारी तथा अनुदानप्राप्त कर्मचाऱ्यांना लागू होतील. प्रत्यक्षात वाढीव वेतनश्रेणी नोव्हेंबरच्या पगारात देण्यात येईल. सचिवालय तथा अन्य कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत करण्यात आलेली वाढ रद्द करून अशा कर्मचाऱ्यांच्या फाईल्स एका आठवड्यात वित्त खात्याकडे पाठवून देण्याचे आदेशही खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. या आयोगाच्या शिफारशी "युजीसी' व "एआयसीटीई'वेतनश्रेणी लागू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाहीत, असे स्पष्टीकरणही करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडून नवी वेतनश्रेणी लागू करताना हमीपत्र घेण्यात येईल.सध्या लागू असलेल्या व सहाव्या वेतन आयोगाने कायम ठेवलेल्या इतर सुविधाच सुरूच ठेवण्यात येणार आहेत. तसेच सरकारी वाहतुकीची सोय केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रवास भत्ता आता नसेल.
दरम्यान, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा थकबाकीचा महत्त्वाचा भाग अद्यापही स्पष्ट झालेला नाही. १ जानेवारी २००६ ते ३१ ऑक्टोबर २००८ पर्यंतची थकबाकीचा हिशेब लेखा संचालनालयाकडून तयार करण्यात येणार आहे. हा अहवाल ३१ डिसेंबर २००८पर्यंत वित्त खात्याला सादर होईल,असे सांगण्यात आले आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर ०८ ची थकबाकी पुरवण्या मागण्या संमत झाल्यानंतर रोख देण्यात येईल. तसेच १-१-०६ ते ३१-०८-०८ ची थकबाकी तीन हप्त्यांनी भविष्यनिर्वाह निधीत जमा करून तीन वर्षांसाठी ती काढण्यावर निर्बंध असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान,याप्रकरणी वेगळा आदेश काढण्यात येणार असल्याचेही अधिसूचनेत म्हटले आहे.ऑगस्ट २००५ नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेगळे खाते उघडून ही रक्कम त्यात जमा केली जाईल व ठरावीक काळानंतर ती त्यांना देण्यात येईल. निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातही १ जानेवारी २००६ पासून बदल होणार आहे,त्याबाबतची नवी निवृत्तश्रेणी तसेच थकबाकीबाबत लेखा संचालनालयाला ३१ डिसेंबर २००८ पूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना सुचवण्यात आलेली वाढीव तथा पुनर्रचित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत केंद्रीय वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचना न स्वीकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अधिसूचनेच्या शेवटी रजेच्या बदल्यात रोख रक्कम देण्याबाबत ३० मार्च २००७ रोजी काढण्यात आलेला अध्यादेश मागे घेण्याचा निर्णयही या अधिसुचनेव्दारे कळवण्यात आला आहे.
दरम्यान,सहाव्या वेतन आयोगाच्या या शिफारशी केवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत. विविध निमसरकारी तथा महामंडळांना याबाबत स्वतंत्र ठराव बैठकीत घ्यावा लागणार आहे. या महामंडळांना सरकारकडून विकासकामांसाठी अर्थसंकल्पात तजवीज केली जाते. तथापि या पैशांचा वापर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सर्रासपणे वापरण्याची अलिखित परंपरा सुरू झाली आहे. या महामंडळांनी आपल्या कामांव्दारे कर्मचाऱ्यांच्या पगाराचा खर्च उचलावा,असे असूनही विविध महामंडळे तोट्यात असल्याने सरकारचा पैसा केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतो,असेही सांगण्यात आले.

भावोजीकडून मेव्हण्याचा खून डिचोली जोगीवाडा येथील घटना

डिचोली, दि.१० (प्रतिनिधी): दररोजच्या वादंगातून जोगीवाडा -डिचोली येथे काल रात्री १०.१५ च्या सुमारास राजू नारायण शिर्के या भावोजीने आपला मेहुणा संजय नारायण पवार (४०) याचा सुऱ्याने भोसकून खून केला असून या प्रकरणी संशयित शिर्के (४४) यास अटक करण्यात आली आहे. ही माहिती डिचोलीचे पोलिस निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांनी दिली.
काल रात्री सव्वा दहाच्या सुमारास संजय पवार हा जेवून तोंड धुण्यासाठी बाहेर आला असता ही खुनाची घटना घडली. राजू शिर्के व संजय पवार हे गेल्या सुमारे १५ वर्षांपासून एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यांत राहात होते.भावोजी व मेहुणा यांना दारूचे व्यसन होते व रोज रात्री त्यांचे मद्यपान चालत असे.काल रात्रीही राजू मद्यपान करीत खोली बाहेर बसला होता. दारूच्या नशेत त्यांचे नेहमी वाद होत असत.
काल रात्री संजय जेवण करून तोंड धुण्यासाठी बाहेर आला असता राजूने त्याच्या पोटात सुरा खुपसला.जखमी अवस्थेत त्याला येथील सरकारी इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजू शिर्के याने नेहमी होणाऱ्या तंट्यातून हा खून केल्याची कबुली दिली असून हे एके दिवशी होणारच होते असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.
संजय पवारच्या पोटात सुरा खुपसल्यानंतर आरडोओरडा केला. त्यानंतर घरातील मंडळी बाहेर आली व त्यांनी संजयला इस्पितळात दाखल केले.
दरम्यानच्या काळात राजू याने तेथून पळ काढला व तो लपूनन बसला.खुनाची घटना घडली तेव्हा घरात संजयची आई सावित्री, राजूची पत्नी मीलन व संजयची अविवाहित बहीण रेवती होती. खुनाचा संशय आल्यावर डिचोली पोलिसांनी या तिघांना पोलिस ठाण्यात पाचारण केले. सुरुवातीला त्यांनी वस्तुस्थिती सांगण्यास नकार दिला. मात्र त्यांची स्वतंत्र जबानी घेतल्यानंतर धाकट्या बहिणीने(रेवतीने) सत्यस्थिती पोलिसांसमोर उघड केली.
खून झाल्यानंतर राजूने पलायन केले. मात्र पहाटे पाचच्या सुमारास तो आपल्या घरी आला असता त्याला पोलिसांनी अटक केली. नंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दहा दिवसांचा रिमांड देण्यात आला.खुनासाठी वापरलेला अकरा इंच लांब सुरा जप्त करण्यात आला असून राजूच्या विरोधात भा.दं.संहितेच्या ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिवाळीपर्यंत सोने १५ हजारांपर्यंत?

नवी दिल्ली, दि. १० : एकीकडे जगभरातील सर्व शेअर बाजारांची घसरण सुरू असताना सोन्याचे भाव मात्र वरवर चढताहेत. आज दिल्लीतील सोने बाजारात प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव १४,२०० रुपये इतका होता आणि दिवाळीपर्यंत हा दर १५ हजारांवर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
याबाबत माहितगारांनी सांगितले की, दसऱ्यापर्यंत जर सोने १४ हजारांवर जाऊ शकते तर दिवाळीत याचा भाव १५ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या देशात धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्वसामान्य लोकांचाही थोड्या प्रमाणात का होईना पण, सोने खरेदीकडे कल असतो. या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी वाढून किंमतही वाढण्याची शक्यता आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, जगभरातील शेअर बाजारांची स्थिती पाहता आता गुंतवणूकदार शेअर्सऐवजी सोन्यामध्ये पैसा गुंतविणे पसंत करू लागले आहेत. मंदीच्या या काळात सोन्यातील गुंतवणूक पुरेशी सुरक्षित असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनीही सोन्यातील गुंतवणुकीकडे मोर्चा वळविला आहे.
-----------------------------------------------------
शेअर बाजार जगभरात गडगडले
लंडन, दि. १० : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेतील मंदी अजूनही जगभरातील बाजारांचा पिच्छा पुरवित असून आज या मंदीमुळे युरोपसह संपूर्ण आशियाई बाजार अक्षरश: गडगडले. भारतीय शेअर बाजारातील निर्देशांक आणि निफ्टीत विक्रमी घसरण होऊन त्यांनी निचतम स्तर गाठला. ही स्थिती सुधारण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने घाईगर्दीत सीआरआरमध्ये कपातीचा निर्णय जाहीर केला. पण, हा उपाय गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यास साफ अपयशी ठरला आणि बाजाराला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले. या नुकसानीमुळे बावचळलेले अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी सर्व आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी एका दक्षता समितीच्या स्थापनेची घोषणा करून टाकली आहे.
अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मंदीने केवळ बुश प्रशासनाचीच नव्हे तर जगभरातील अर्थमंत्र्यांची झोप उडविली आहे. ब्रिटनमधील एफटीएसई हा निर्देशांक आठ टक्क्यांनी कोसळला. गेल्या पाच वर्षात प्रथमच या निर्देशांकाने ४००० हून खालचा स्तर पाहिला. फ्रान्समधील शेअर बाजार ८.४ टक्के, जर्मनीतील बाजार ९.१ टक्के तर टोक्योतील शेअर बाजारात तब्बल २४ टक्क्यांची प्रचंड मोठी घसरण झाली. जपानचा निकेई ९.६ टक्क्यांनी घसरून गेल्या पाच वर्षातील आपल्या सर्वात खालच्या स्तरापर्यंत आला. या सततच्या अनिश्चिततेमुळे मॉस्को आणि जकार्ता येथील शेअर बाजारातील कामकाजच थांबविण्यात आले आहे.
आशियाई बाजारातही हाहाकार
अमेरिकी अर्थव्यवस्थेतील मंदीचा फटका आशियाई बाजारांनाही बसला. जपानचा निर्देशांक मे २००३ पासून आज प्रथमच मोठ्या प्रमाणात कोसळला. त्यापाठोपाठ भारतातील बाजारातही प्रचंड मंदीचा माहौल होता.
भारतीय बाजारांमध्ये आज दिवसाच्या सुरुवातीपासूनच चिंतेचे सावट दिसत होते. जागतिक स्तरावरील मंदीने गुंतवणूकदार प्रचंड धास्तावले होते. त्यामुळे त्यांनी अतिशय सावध पवित्रा घेण्याच्या उद्देशाने मोठ्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीला काढले. पण, सर्वच गुंतवणूकदारांनी असा पवित्रा घेतल्याने दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकात सुमारे ८००.५१ अंकांची मोठी घसरण झाली. गेल्या दोन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण असल्याचे मानले जात आहे.
३० शेअर्सवर आधारित निर्देशांक आज १० टक्क्यांनी कोसळून १०,५२८ वर बंद झाला. ३० पैकी १३ क्षेत्रातील कंपन्या आज तोट्यात होत्या. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज २३३.७० अंकांची घसरण होऊन तो ३२८० वर बंद झाला.
वास्तविक, आज शेअर बाजाराच्या दृष्टीने दोन चांगल्या घटना घडल्या होत्या. एकतर रिझर्व्ह बॅंकेने सीआरआरमध्ये कपात केली आणि दुसरे म्हणजे महागाईचा दरही खाली आला होता. एरवी या घटनांचा शेअर बाजारांवर सकारात्मक परिणाम व्हायला हवा होता. पण, आज जागतिक मंदीपुढे या घटना निष्प्रभ ठरल्या. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करू, असे अर्थमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतरही गुंतवणूकदारांची मानसिकता बदलली नाही आणि पर्यायाने शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
आज रियालिटी क्षेत्रातील कंपन्यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स ११.३० टक्क्यांनी खाली घसरले. त्यापाठोपाठ ग्राहकी वस्तूंचे शेअर्सही सुमारे १०.११ टक्क्यांनी खाली आले होते.
आज इन्फोसिसने दुसऱ्या तिमाहीतील नफ्याचा अहवाल जारी केला. पण, याचा फारसा सकारात्मक परिणाम बाजारांवर होऊ शकला नाही. सीआरआर कपातीच्या घोषणेचे बॅंकिंग क्षेत्राने भरभरून स्वागत केले. त्यामुळे बॅंकांचे शेअर्स फार मोठ्या प्रमाणात कोसळले नाही. पण, उर्वरित सर्व महत्त्वाच्या क्षेत्रातील कंपन्यांना आज जागतिक मंदीने पछाडले.
घाबरू नका, रिझर्व्ह बॅंक तयारीत : अर्थमंत्री
अमेरिकी मंदीच्या पार्श्वभूमीवर देशातील बाजारांमध्ये माजलेला हाहाकार पाहता अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी गुंतवणूकदारांना आश्वस्त केले असून या परिस्थितीत आवश्यक ती पाऊले उचलण्यास रिझर्व्ह बॅंकेनेही तयार दर्शविल्याचे म्हटले आहे.
आज एका मुलाखतीत बोलताना अर्थमंत्री म्हणाले की, मंदीची अशी लाट बरेचदा आर्थिक जगताला सतावते. पण, त्याचा प्रभाव फार काळ राहिलच असे नाही. भारतावर याचा दूरगामी परिणाम होणार नाही, याची दक्षता आमचे सरकार घेईलच. सोबतच रिझर्व्ह बॅंकेनेही आपल्या पतधोरणाचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. आवश्यकता वाटल्यास योग्य ती पाऊले उचलली जातील. गुंतवणूकदारांचे हित जपणे, हे सरकारसाठी सर्वोपरी असल्याचेही ते म्हणाले.
ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनी तो काही प्रमाणात खर्च तर काही प्रमाणात जमा करावा. बॅंकांमधील सेव्हिंग सर्वाधिक सुरक्षित आहेत. शिवाय आपल्या देशातील बॅंकाची कार्यपद्धती पुरेशी सक्षम आणि पारदर्शक आहे. त्यामुळे पैसा बुडण्याची शक्यता नाही, असा सल्लाही चिदम्बरम यांनी दिला.
सोबतच यापुढे आर्थिक घडामोडींकडे लक्ष ठेवण्यासाठी एका दक्षता समितीची आपण स्थापना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
दूरगामी उपाययोजना व्हायला हवी; भाजपाची मागणी
देशातील सध्याचे आर्थिक संकट पाहता दीर्घकालीन उपाययोजना केल्या पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीने व्यक्त केले आहे.
वरिष्ठ भाजपा नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा म्हणाले की, आर्थिक संकटातून देशाला सावरण्यासाठी सीआरआरमध्ये कपात करण्यासारख्या अल्पकाळासाठीच्या योजना फारशा प्रभावी ठरणार नाहीत. त्यापेक्षा सरकारने वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन आर्थिक क्षेत्रातील रिझर्व्ह बॅंक आणि सेबीसारख्या सर्वोच्च कार्यकारिणींसोबत चर्चा केली पाहिजे. बाजारात रोख रक्कम नसणे, बॅंकांजवळ रोख नसणे, ही अतिशय काळजीची बाब आहे. शेअर बाजारांचे संकट तर प्रासंगिक आहे पण, ही देशावरील आर्थिक समस्येची नांदी आहे आणि हे सर्व संपुआ सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच घडले असल्याचेही सिन्हा म्हणाले.

सीआरआरमध्ये एक टक्क्याने कपात, गृहकर्ज स्वस्त होणार

मुंबई, दि.१० : रिझर्व्ह बॅंकेने बाजारातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी रोख राखीव निधीत (सीआरआर) आणखी एक टक्क्याने कपात केली. यापूर्वी बॅंकेने अर्ध्या टक्क्याने कपात केली होती. आता ही एकूण दीड टक्क्यांची कपात झाली आहे.
सध्या अमेरिकेतील मोठ्या कंपन्या आर्थिक संकटात सापडल्याने त्याचा परिणाम जगभरातील बाजारांवर झाला आहे. अमेरिकेतील आर्थिक मंदीचा भारतालाही मोठा फटका बसला आहे. जगातील आणि भारतातील सध्याची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बॅंकेने रोख राखीव निधीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंकेच्या या निर्णयामुळे साठ हजार कोटी रुपये बॅंकांकडे उपलब्ध होणार आहेत. बाजारातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठीही याचा फायदा होईल. रोख राखीव निधीत आतापर्यंत एकूण दीड टक्क्याने कपात करण्यात आली आहे. शनिवारपासून ही कपात अंमलात येणार आहे. कपातीनंतर आता सीआरआरचा नवा दर साडे सात टक्के राहणार आहे.
रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या कपातीमुळे आता गृहकर्ज स्वस्त होणार आहे. सोबतच बाजारात ६० हजार कोटी रुपये येतील.

आणखी कॅसिनोंना मान्यता कशासाठी?

नार्वेकरांचा सरकारला खडा सवाल
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राज्यात सर्वत्र कॅसिनोविरोधात संतापाचा भडका उडालेला असतानाचा आणखी कॅसिनोंना मान्यता कशी दिली जाते,असा खडा सवाल करून माजी वित्तमंत्री ऍड.दयानंद नार्वेकर यांनी पुन्हा एकदा आपल्याच कामत सरकारला कात्रीत पकडले आहे.
बेती, बिठ्ठोण आदी भागांचा गेल्या काही दिवसांपूर्वी दौरा केला असता मांडवी नदीतील या महाकाय जहाजांच्या वाहतुकीमुळे तेथील मच्छीमार कुटुंबीयांवर परिणाम होऊ लागला आहे. या जहाजांमुळे मासे पकडण्याच्या व्यवसायावरच गदा आल्याने त्याबाबत तेथील लोकांत तीव्र संताप व्यक्त होत असल्याचेही नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले आहे. दरम्यान,यापूर्वी एका मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालीन सरकारने परवाना दिलेल्या पाच कॅसिनोंना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याबाबत पुढे काहीच झाले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. कॅसिनोबाबत मुख्यमंत्र्यांनी लोकभावनांचा आदर करून सध्या सुरू असलेले दोन कॅसिनो वगळता अन्य कॅसिनो अजिबात नको,अशी भूमिका नार्वेकर मांडली आहे.मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी ताबडतोब सरकारचे म्हणणे स्पष्ट करावे,अशी मागणीही त्यांनी केली.
राज्य मंत्रिमंडळातून नार्वेकरांना वित्तमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्याजागी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची मंत्रिमंडळात वर्णी लावली होती. त्यानंतर नार्वेकर यांच्या समर्थकांनी म्हापसा येथे एका विराट निषेध सभेचे आयोजन केले होते. नार्वेकरांना देण्यात आलेल्या वागणुकीचा निषेध त्या सभेत झाला होता. तेव्हाच "गोवा डेमोक्रेटीक फ्रंट' ची स्थापना करून या झेंड्याखाली विविध विषय हाताळण्याची घोषणाही करण्यात आली होती. या जाहीर सभेत नार्वेकर यांनी बेकायदा खाण उद्योगावर टीका केली होती तसेच विविध ठराव संमत करून ते सरकारला पाठवले होते. आज त्यांनी मुख्यमंत्री कामत यांना पाठवलेल्या पत्रात विविध ठरावांबाबत सरकारने काय निर्णय घेतला, याचा जाब विचारला आहे. "सीएमझेड'अधिसूचनेला राज्य सरकारने विरोध दर्शवला आहे व या भूमिकेशी सरकार चिकटून राहील, अशी अपेक्षा बाळगून इतर ठरावांसंबंधी राज्य सरकारने कोणते उपाय योजले, असा सवाल त्यांनी केला आहे.

Friday, 10 October, 2008


झाडे आडवी टाकून संतप्त कुंकळ्ळीवासीयांनी रास्तोरोको केला.

कुंकळ्ळीत तणाव, दसऱ्यादिवशीच आजोबादेव घुमटीची मोडतोड


मोडतोड करण्यात आलेली आजोबादेवाची घुमटी.

- संतप्त नागरिकांचा रास्तारोको
- कुंकळ्ळीत कडकडीत "बंद'
- विटंबना प्रकरण 'सीआयडी'कडे देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

कुंकळ्ळी, दि. ९ (प्रतिनिधी): ऐन दसऱ्यादिवशीच कुंकळ्ळी उसकीणीबांध येथील प्राचीन आजोबादेव घुमटीची आज काही अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आल्याने संतप्त कुंकळ्ळीवासीयांनी रास्तारोको केला आणि संपूर्ण बाजार बंद ठेवून निषेध नोंदवला. अखेर खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घटनास्थळी दाखल होऊन हे प्रकरण तपासासाठी गुन्हे अन्वेषण शाखेकडे (सीआयडी) सोपवण्याचे आश्वासन दिल्यानंतरच रास्तोरोको मागे घेण्यात आला. तसेच यासंदर्भात संबंधितांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार कुंकळ्ळीवासीयांनी केला आहे.
काही अज्ञातांनी या घुमटीतील आसन, समई व बाहेरील फलक तोडून अस्ताव्यस्त फेकून दिला आहे. आज सकाळी नित्याप्रमाणे पूजेसाठी आलेले सेवेकरी प्रेमानंद देसाई यांच्या नजरेस ही घटना पडताच त्यांनी त्वरीत त्याची माहिती कुंकळ्ळी पोलिस स्थानकाला दिली. मात्र त्यापूर्वीच ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नारिकांनी आजोबांच्या घुमटीवरील हा हल्ला म्हणजे कुंकळ्ळीकरांच्या अस्मितेवरील आघात असून त्यास चोख उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
नागरिकांनी उस्कीणीजवळ झाडे आडवी टाकली. तसेच भाटे चार रस्ता व बाजारात रस्त्यावर दगड, झाडे टाकून रस्ता रोखून धरण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हाधिकारी गोकुळदास नाईक त्वरेने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेचा आढावा घेतला. सामाजिक शांतता बिघडवण्याचा व समाजात फूट पाडण्याचा काही विघ्नसंतोषी लोकांचा हा कट असू शकतो, असे ते म्हणाले. यावेळी कुंकळ्ळीचे आमदार तथा नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव व पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर आपल्या फौजफाट्यासह दाखल घटनास्थळी दाखल झाले. अपराध्यांना चोवीस तासात अटक करतो, रस्ता मोकळा करा, असे आवाहन त्यांनी केले. मात्र लोकांनी त्यांना दाद दिली न देता मुख्यमंत्र्यांना बोलवा, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास खुद्द मुख्यमंत्र्यानी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. नंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र आतापर्यंत हिंदू देवस्थानांवर झालेल्या किती हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले याची माहिती आम्हाला द्या, असा धोशा लोकांनी लावला. त्यावर अशा घटना घडू नयेत म्हणून उत्तर व दक्षिण गोव्यात जादा पोलिस दल तैनात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नागरिकांना त्यांचा हा खुलासा पटला नाही. त्यामुळे चोवीस तासांत अपराध्यांना पकडा, अन्यथा पुढील परिणामांची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशी भूमिका लोकांनी घेतली.
मग मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण त्वरेने सीआयडीकडे सोपवण्याचे आश्वासन दिले. तसेच
उद्या (शुक्रवारी) सकाळीच पोलिसांचे पथक घटनास्थळाला भेट देऊन ताबडतोब चौकशी सुरू करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या विटंबना प्रकरणाच्या निषेधार्थ स्थानिक दुकानदारांनी आज संपूर्ण बाजारबंद ठेवला. त्यामुळे बाजारातील स्थिती तणावपूर्ण, पण नियंत्रणात होती.
दरम्यान, उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता मार्डीकट्टा येथील समाजगृहात पोलिसांचे खास पथक आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

बजरंग दलावर बंदी घालून दाखवाच

राष्ट्रीय निमंत्रक प्रकाश शर्मा यांचे केंद्राला आव्हान
नवी दिल्ली, दि. ९ : बजरंग दलावर बंदी घालून दाखवाच आणि खरोखरच बंदी घातल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा जळजळीत इशारा या संघटनेने केंद्र सरकारला दिला आहे. दलावर बंदी घातल्यास आम्ही त्याविरुद्ध लढा देऊ व जनतेच्या दरबारात जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागू. सार्वत्रिक निवडणूक जवळ येत असून सरकारला दलावरील बंदी महागात पडेल, असे या दलाचे राष्ट्रीय निमंत्रक प्रकाश शर्मा यांनी म्हटले आहे.
ओरिसा आणि कर्नाटकात ख्रिश्चनांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भात बजरंग दलावर ठपका ठेवून दलावर बंदी घालण्याची चाल केंद्र सरकार खेळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाने सरकारला हे आव्हान दिले आहे.
बजरंग दलाचा हिंसेवर विश्वास नाही, हिंदूंची बाजू घेत लोकनियुक्त सरकारवर लोकशाही मार्गाने दडपण आणणे हीच आमची कार्यपद्धत आहे. ओरिसातील ३५ ख्रिश्चनांच्या मृत्युमागे बजरंग दलाचा हात असल्याचा त्यांनी इन्कार केला. प्रसारमाध्यमे बजरंग दलाबद्दल चुकीची माहिती प्रसिद्ध करीत असून सत्याचा विपर्यास केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

पाकमधील हल्ल्यांत १६ ठार; १० जखमी

इस्लामाबाद, दि. ९ ः "मेरियट'हॉटेलवर २० सप्टेंबर रोजी हल्ला झाल्यानंतर तीन आठवड्यांतच आज अतिरेक्यांनी पुन्हा एकदा इस्लामाबादमधील कडेकोट बंदोबस्त असलेल्या खास विभागात मानवी बॉंबचा स्फोट केला, त्याचप्रमाणे वायव्य सरहद्द प्रांतात कैद्याच्या वाहनावर हल्ला केला. या दोन्ही घटनांत १६ जण ठार झाले, तर दहा जण जखमी झाले.
इस्लामाबादमधील हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या जास्त नाही. कारण दहशतवादविरोधी पथकाच्या कार्यालयातील बहुतेक सुरक्षा सैनिक या हल्ल्यावेळी गस्तीवर गेले होते. संसदेच्या संयुक्त अधिवेशनासंबंधात बंदोबस्ताची योजना यावेळी ठरवण्यात येत होती. तेथे आठ जण ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पहिले चार्टर विमान गोव्यात दाखल, पर्यटन मोसमात येणार ७०० विमाने


दाबोळी विमानतळावर उतरलेल्या पर्यटकांचे स्वागत करताना पर्यटन खात्याचे कर्मचारी (छाया: पंकज शेट्ये)

वास्को, दि. ९ (प्रतिनिधी): राज्याच्या पर्यटन मोसमातील पहिली दोन विदेशी चार्टर विमाने आज दाबोळी विमानतळावर उतरली. जर्मनी येथून २२८ प्रवाशांना घेऊन आलेल्या "कोंडोर एअरलाईन्स' या पहिल्या विमानाच्या आगमनानंतर काही वेळातच १५० रशियन पर्यटकांना घेऊन आलेले दुसरे चार्टर विमान गोमंतभूमीत दाखल झाले.
गोव्याच्या पर्यटन मोसमातील पहिले विमान आज येणार असल्याची माहिती मिळाल्याने दाबोळी विमानतळाचे संचालन पॉल मणिक्कम, पर्यटन खात्याचे कर्मचारी तसेच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी पहाटेच विमानतळावर दाखल झाले होते. सकाळी ४.३० च्या सुमारास युरोपच्या पर्यटकांना घेऊन आलेले फ्रॅंकफर्ट येथील पहिले विमान दाबोळी येथे दाखल झाले. विमानतळावर उतरलेल्या २२८ प्रवाशांचे यावेळी पर्यटन खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. पोलिस खात्याचे वाद्य पथक व एक खासगी बॅंड येथे पर्यटकांच्या स्वागतासाठी उपस्थित होता.
कोंडोर एअरलाईन्सचे विमान प्रतिनिधी जुआंव (बुश) झेव्हियर मिरांडा यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की यंदाच्या पर्यटन मोसमात कोंडोरची ५४ विमाने पर्यटकांना घेऊन गोव्यात येणार आहेत. पर्यटकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, देशातील दहशतवादी कृत्यांमुळे पर्यटन व्यवसायावर कोणताच फरक पडणार नसल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्कार्लेट हत्या प्रकरणामुळे काही फरक पडला का या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यांत अशा घटना घडत असतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गेल्या पंचवीस वर्षांपासून गोव्यात येणाऱ्या मातायस व एंजेलिका या पर्यटकांनी "वी लव गोवा' अशी आरोळी ठोकली. दहशतवाद्यांना देव सद्बुद्धी देवो, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. रशियन प्रवाशांना घेऊन आलेले दुसरे विमान ११ वाजण्याच्या सुमारास गोव्यात दाखल झाले.
---------------------------------------------------------------------------
पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळावर ३०० रक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पॉल मणिक्कम यांनी दिली. यंदाच्या मोसमात ७०० चार्टर विमाने गोव्यात येणार असून यात वाढ होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. गेल्या वर्षी ७३५ चार्टर विमाने गोव्यात दाखल झाली होती. परंतु, वीज पुरवठा व इतर गोष्टींमुळे विमानतळावर असुविधा निर्माण झाली होती. यंदा अनेक सोयी पुरवण्याचे आश्वासन सरकारने दिल्याचे श्री. मणिक्कम यांनी शेवटी सांगितले.

Thursday, 9 October, 2008

नेहा करमरकरला विजयी करण्यासाठी..


नेहा करमकरला शुभेच्छा व्यक्त करताना आमदार दामोदर नाईक, भाजप नेते नरेंद्र सावईकर व पंकज सराफ आणि नेहाचे आजोबा डॉ.करमरकर

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : "झी मराठी'वाहिनेतर्फे आयोजित सारेगम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचलेली एकमेव गोमंतकीय गायिका नेहा करमकर हिला शुभेच्छा व्यक्त करताना, भाजपचे आमदार दामोदर नाईक व अन्य पदाधिकाऱ्यांनी तिला मोठ्या संख्येने एसएमएस पाठविण्याचे आवाहन गोमंतकीयांना केले आहे.
शुक्रवार दि. १० रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत आलेल्या एसएमएसचा विचार केला जाणार आहे. दूरध्वनी व एसएमएसद्वारा तिच्या विजयात सहभागी व्हा, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

सर्व पालिकांना ४ आठवड्यांची अंतिम मुदत अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना कोर्टापुढे उभे करणार

कचरा विल्हेवाट प्रकल्प
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : कचरा विल्हेवाट प्रकल्प खटल्यात प्रतिवादी असलेल्या मुरगाव पालिकेने सर्व अटी पूर्ण केल्याने त्यांना या खटल्यातून वगळण्यात आले आहे. मात्र, अन्य पालिकांना या अटी पूर्ण करण्यासाठी चार आठवड्यांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत या अटी पूर्ण न झाल्यास संबंधित पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. तसेच या अटी पूर्ण का झाल्या नाहीत, याचेही स्पष्टीकरणही प्रतिज्ञापत्राद्वारेसादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदाच्या ९ जुलै रोजी न्यायालयाने सुचवलेल्या अटी पूर्ण करण्यासाठी सर्व पालिकांना ३० दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र, मुरगाव पालिका सोडल्यास अन्य कोणत्याही पालिकेने या अटी पूर्ण न केल्याने याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे. वाळपई पालिका परिसरात केवळ ८ हजार लोकसंख्या असल्याने तेथे दोन कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारी जागा कलम ४ लावून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती खंडपीठास देण्यात आली. तसेच तेथे १२ वॉर्डमधील कचरा गोळा करण्यासाठी केवळ ५ कर्मचारी असल्याने अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. पालिकेच्या आसपास चार गावे असल्याने त्याठिकाणी प्लॅस्टिक कचऱ्याची मोठी समस्या नाही. हे दोन्ही प्रकल्प उभे राहिल्यानंतर येत्या दोन महिन्यांत कचऱ्याची समस्या राहणार नसल्याची हमी वाळपई पालिकेने खंडपीठाला दिली. फोंडा पालिकेने दारात जाऊन कचरा गोळा करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती देण्यात आली.

भुमिपूत्रांना लाथ; परप्रांतियांना साथ

कॉंग्रेस आघाडी सरकारची संतापजनक कृती
पणजी, दि. ८(प्रतिनिधी) : गोव्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीतांची संख्या वाढत असून येथे भुमिपूत्रच पोरके होऊ घातले आहेत. या पार्श्वभूमीवर, विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारकडून गोमंतकीयांच्या पोटावर लाथ मारून बिगरगोमंतकीयांचे चोचले पुरवण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
आत्तापर्यंत गोमंतकीयांना रोजगार देण्याच्या निमित्ताने स्थापन करण्यात आलेल्या उद्योगांत येथील स्थानिकांना डावलण्याचे प्रकार ताजे असताना आता खुद्द सरकारकडूनच स्थानिकांच्या पोटावर नांगर फिरवण्याची हीन कृती सुरू आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी स्थापन केलेल्या गोवा कंत्राटी कामगार भरती सोसायटीअंतर्गत विविध सरकारी खात्यांत चतुर्थश्रेणी कंत्राटी कामगारांना कामावरून काढले जात आहे. त्याचबरोबर ही कंत्राटे आपल्या मर्जीतील खाजगी नोकर भरती संस्थांना देण्याचा सपाटा सुरू आहे. या खाजगी संस्थांकडून सर्वत्र बिगर गोमंतकीयांची कामगारांची भरती सुरू असून या लोकांचा हाती नाममात्रपगार ठेवून उर्वरित पैशांची दलाली उकळण्याचा नवा उद्योग राज्यात फोफावला आहे.
गोव्यातील स्थानिक बेरोजगार युवक-युवती केवळ पांढरपेशी नोकरी शोधतात व चतुर्थश्रेणीचे काम करण्यास राजी होत नाही, हा केवळ गैरसमज आहे. किमान वेतन व इतर सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास ही कामे करण्यास असंख्य स्थानिक बेरोजगार तयार आहेत, हे पर्रीकर यांनी या सोसायटीमार्फत सिद्ध केले होते.गेल्या २००१ साली स्थापन करण्यात आलेल्या या सोसायटीत भरती केलेल्या एकूण १३२२ कामगारांची संख्या आता ५७१ वर आली आहे. कोणत्याही सरकारी खात्यात रोजंदारी किंवा कंत्राटी पद्धतीवर सेवेची गरज भासल्यास ही भरती सोसायटीअंतर्गत करण्याचे तात्कालीन भाजप सरकारने काढलेल्या आदेशाला कचरा पेटी दाखवून आता ही भरती खुल्या पद्धतीने करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.
दरम्यान,सध्या स्थानिक व बिगरगोमंतकीय अशा वादाचे संकेत मिळाल्याने गेल्या वेळी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने नव्याने कंत्राटी किंवा पर्यायी नोकर भरतीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय ताजा असताना गेल्या १ ऑक्टोबर रोजी मानसोपचार केंद्रातील सुमारे २९ स्थानिक झाडूवाल्यांना कामावरून खाली करण्याचे आदेश काढून सरकारने आपल्याच निर्णयाला हरताळ फासण्याचा प्रकार घडला आहे.
सोसायटीअंतर्गत नेमण्यात आलेल्या कामगारांना किमान वेतन,बोनस व इतर सुविधा पुरवण्यात येतात. पर्वरी सचिवालय तथा गोवा आरोग्य महाविद्यालयात स्थानिक सुरक्षा रक्षकांना घरी पाठवून बिगरगोमंतकीयांची भरती करण्यात आल्याचे उदाहरण ताजे असून या सरकारचा "नीज गोंयकारां'विरोधात छुपा अजेंडा असल्याची टीका सुरू झाली आहे.

विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून ३१ ऑगस्ट २००७ पासून सोसायटीअंतर्गत विविध खात्यांतून कमी आलेल्या कामगारांचा तपशील असा :
-गोवा राज्य बाल आयोग-३
-तंत्रिकशिक्षण संचालनालय-१२
-जलसंसाधन खाते,पाजीमळ-सांगे-९
-वास्को नगरपालिका-२
-गोवा पुनर्वसन मंडळ-४
-गोवा तंत्रशिक्षण,आल्तीनो-१८
-गोवा राज्य मागासवर्गीय मंडळ-१
-गोवा राज्य महिला आयोग-१
-गोवा राज्य समाज कल्याण मंडळ-१
-शिक्षण संचालनालय-१
-लेखा संचालनालय-२
-एनसीएओआर,हेडलॅण्ड सडा वास्को-१
-वाहतूक संचालनालय-१८
-खाण संचालनालय-५
-विक्री कर आयोग-२
-वीज खाते-१०७
-गोवा राज्य फलोत्पादन महामंडळ-१
-कामगार रोजगार आयोग-१
-सरकारी तंत्रनिकेतन,मये-१६
-उत्तर गोवा जिल्हाधिकारी-८
-मामलतदार,मडगाव-१
-उद्योग संचालनालय-१
-वन खाते-९
-आरोग्य खाते-१
-गोवा शिपयार्ड,वास्को-२
-उत्तर गोवा जिल्हा पंचायत-१
-दक्षिण गोवा जिल्हाधिकारी-१३
-सरकारी कला,वाणिज्य महाविद्यालय,खांडोळा-२
-प्रोव्हेदोरीया खाते-१

-मडगाव पालिका-३
-गोवा वस्तुसंग्रहालय-३७
-उच्च शिक्षण संचालनालय-३
-हॉस्पिसियू,मडगाव-९
-कदंब महामंडळ-३
-संजीवनी साखर कारखाना-१६
-गोवा शिक्षण विकास महामंडळ-७
-गोवा लेखा भवन,पर्वरी-२
-गोवा विद्यापीठ,ताळगाव-८
-मानसोपचार केंद्र,बांबोळी-३०
-सार्वजनिक बांधकाम खाते-७
-मामलतदार,सासष्टी-७
-हस्तकारागिर प्रशिक्षण खाते-४
-मामलेदार,मुरगाव-१
-गोवा हस्तकला महामंडळ-४
-सरकारी कला व वाणिज्य महाविद्यालय-६
-गोवा औद्योगिक विकास महामंडळ-१४
-सरकारी मुद्रणालय-१

संपुआ-सपाच्या बैठकीत जामिया चकमक गाजणार

अमरसिंगांची न्यायालयीन चौकशी मागणी
नवी दिल्ली, दि. ८ : समाजवादी पार्टीचे नेते अमरसिंग यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन जामिया नगर येथे झालेल्या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र, या संदर्भात अमरसिंग यांना पंतप्रधानांनी कोणतेही आश्वासन दिले नाही.
ही सर्व माहिती स्वत: अमरसिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या बाहेर पत्रकारांना दिली. मी पंतप्रधानांकडे या चकमकीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही किंवा कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे आता आमच्या पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव या चकमक प्रकरणाची चर्चा संपुआ व सपा यांच्यात होणाऱ्या बैठकीत करणार आहेत. ही बैठक येत्या १४ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे, असेही अमरसिंग म्हणाले.
जामिया नगर येथे झालेल्या चकमकीनंतर अल्पसंख्यकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे सपाला वाटत आहे. आसामात मुसलमानांवर होत असलेले हल्ले आणि महाराष्ट्रात त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना यामुळे ही भावना निर्माण होत आहे, असेही अमरसिंग म्हणाले.
पंतप्रधानांसोबत अमरसिंग यांनी सुमारे एक तास चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन उपस्थित होते. या बैठकीत अल्पसंख्यक समुदायावर होत असलेले हल्ले आणि भारत-अमेरिका अणुकरार या दोन मुद्यांवर चर्चा झाली, अशी माहितीही अमरसिंग यांनी दिली.

आणखी एका महिलेला तोतया पोलिसांचा गंडा ७० हजारांचे दागिने हातोहात लांबवले

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : तोतया पोलिस बनून महिलेचे दागिने हातोहात लांबवल्याची घटना ताजी असतानाच पणजीत आज पुन्हा एका ज्येष्ठ महिलेचे ७० हजारांचे दागिने लुबाडण्यात आले.
या तोतया पोलिसांना अटक करण्यात खऱ्या पोलिसांना अजून यश आलेले नाही. काल मडगाव व पणजी कदंब बसस्थानकावर अशाच प्रकारची घडलेल्या घटनेस २४ तासही पूर्ण होतात न होतात तोच आणखी एक महिला अशा प्रकाराची बळी ठरली आहे.
आज सकाळी 'वेलोफेलो' इमारतीत असलेल्या इंडियन इन्शुरन्स लिमिटेडमध्ये नोकरीला असलेल्या पेडण्याच्या शुभांगी शांताराम नाईक (५७) सदर इमारतीखाली उभ्या होत्या. यावेळी दोघे हिंदी भाषक त्यांच्याकडे आले. पणजीत चोऱ्या वाढल्या असून तुम्ही सोने अंगावर घालून फिरू नका, ते काढून तुमच्या पर्समधे ठेवा, असे सांगून हातातील बांगड्या काढण्यास त्यांनीच नाईक यांना मदत केली. त्यानंतर सोनसाखळी व बांगड्या हातात घेऊन त्यांच्या पर्समधे ठेवण्याची हातचलाखी करून पसार झाले. पुढे गेल्यावर नाईक यांनी पर्समधे पाहिले असता, दागिने लंपास झाल्याचे दिसून आल्यावर त्यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तोतया पोलिसांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याविषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक प्रवीण पवार करत आहेत.

Wednesday, 8 October, 2008

स्मार्टकार्ड नव्हे 'स्मार्टफ्रॉड'

१८ कोटींच्या घोटाळ्याची शक्यता
वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकरांचे
दक्षता खात्यास चौकशीचे आदेश

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : वाहतूक खात्यातर्फे राबवण्यात येणारी "स्मार्ट कार्ड'वितरण योजना खऱ्या अर्थाने वाहनचालकांना गंडवणारी 'स्मार्ट फ्रॉड'योजनाच ठरल्याचे उघड झाले आहे. या योजनेमार्फत सुमारे १८ कोटी रुपयांचा घोटाळा होण्याचा संशय व्यक्त करून विद्यमान वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी या संपूर्ण कंत्राटाची चौकशी दक्षता खात्यामार्फत सुरू करण्याचे आदेश आज जारी केल्याने प्रचंड खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार माजी वाहतूकमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्या कार्यकाळात गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी ही योजना लागू केली होती. या योजनेअंतर्गत वाहन चालक परवाना "स्मार्ट कार्ड'रूपात वितरित करण्याचे ठरले व हे कंत्राट "गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड"(जीईएल) कंपनीला बहाल करण्यात आले. या कार्डात एक बारीक "चीप'असते व त्यात चालकाची संपूर्ण माहिती साठवलेली असते. सध्या राज्यात वाहतूक खात्यातर्फे सुमारे ९ लाख वाहन चालक परवाने वितरित झाले आहेत तसेच प्रत्येक दिवशी किमान पाचशे वाहन चालक परवाने दिले जातात.सध्या नवे परवाने "स्मार्ट कार्ड' रूपातच देण्यात येतात व जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करताना त्यांना "स्मार्ट कार्डा'ची सक्ती करण्यात येते. या कार्डासाठी वाहतूक खात्यातर्फे वाहन चालकांकडून दोनशे रुपये शुल्क आकारले जातात. त्यात १६० रुपये कंपनीचे शुल्क तर ४० रुपये वाहतूक खात्याची "फी'म्हणून आकारली जाते. दरम्यान,अलीकडेच दिल्ली येथे ६ ऑगस्ट रोजी देशातील वाहतूक खात्यांच्या सर्व मंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीत गोवा सरकारकडून "स्मार्ट कार्ड'योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यासाठी वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबत केंद्रीय जल तथा रस्ता वाहतूकमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त केल्याचे श्री. ढवळीकर म्हणाले. या संपूर्ण कार्डाची मूळ किंमत किमान ६० ते जास्तीत जास्त ७२ रुपये होते ही गोष्ट त्यांनी लक्षात आणून दिले. याचा अर्थ सरकारकडून प्रत्येक कार्डावर सुमारे शंभर रुपये अतिरिक्त आकारले जातात हे उघड झाले आहे. या योजनेबाबत गेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनात विरोधी आमदारांनीही घोटाळा असल्याची टीका केली होती. वाहतूक खात्याकडेही यासंबंधी अनेक तक्रारी दाखल झाल्याचे सांगून काही लोकांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचाही इशारा दिला होता.
दरम्यान, या संपूर्ण निविदा व कंत्राटाची खात्याअंतर्गतही सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही मंत्री म्हणाले. हे कंत्राट देताना कोणत्याही आर्थिक गोष्टींचा विचार करण्यात आला नाही तसेच हे कंत्राट देताना कंपनीकडून कोणते आर्थिक निकष दिले होते त्याचाही तपास केला जाणार आहे. हे कंत्राट १५ वर्षांसाठी करण्यात आल्याने त्याव्दारे सुमारे १८ कोटी रुपये गोळा करण्याची ही "स्मार्ट योजना'च असल्याचा आरोपही ढवळीकर यांनी केला. दक्षता खात्याने या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करताना "जीईएल'कंपनीच्या अधिकाऱ्यांची उलटतपासणी करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

बुद्धदेव हरले; मोदी जिंकले टाटांची 'नॅनो' गुजरातेत दाखल

अहमदाबाद, दि. ७ : टाटांच्या एक लाख रुपये किमतीच्या नॅनो कारच्या शर्यतीत प. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव हरले असून, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मात्र ही शर्यत जिंकली आहे. नॅनो कारचा प्रकल्प गुजरातमधील साणंद येथे प्रारंभ करावयाचा निर्णय रतन टाटा यांनी घेतला व तशा आशयाच्या करारावर आज अहमदाबाद येथे मुख्यमंत्री मोदी व टाटा कंपनीचे अध्यक्ष रतन टाटा यांनी एका करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यासंदर्भातील घोषणा आज संध्याकाळी येथे एका संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व रतन टाटा यांनी केली.
प. बंगालमधील सिंगूर येथे टाटांच्या नॅनो प्रकल्पाला जोरदार विरोध होत होता. हा विरोध कमी व्हावा यासाठी टाटांनी तसेच मुख्यमंत्री बुद्धदेव यांनी बरेच प्रयत्न केले. परंतु, त्याला यश न आल्याने अखेर मागील आठवड्यात रतन टाटा यांनी नॅनो प्रकल्प सिंगूर येथून हटविण्याची घोषणा केली आणि मुख्यमंत्री बुद्धदेव एक लढाई हरले.
टाटांनी सिंगूरमधून माघार घेत असल्याची घोषणा करताच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व उत्तरांचल या राज्यांनी टाटांनी आपला नॅनो कारचा प्रकल्प आपल्या राज्यात सुरू करावा यासाठी त्यांना आमंत्रण दिले. टाटा कंपनीने यासाठी कर्नाटक व आंध्र प्रदेशची पाहणीही केली. परंतु अखेर गुजरात सरकारने दिलेला प्रस्ताव त्यांना मान्य झाला व अहमदाबादपासून २५ किमी अंतरावरील साणंद येथे नॅनो कारचा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय टाटा कंपनीने घेतला.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज सातवा वर्धापन दिन आहे. गुजरात सरकार अहमदाबादपासून २५ किमी अंतरावरील आणंद कृषी विद्यालयाच्या साणंद येथील २२०० एकर जमिनीपैकी ११०० एकर जमीन टाटा कंपनीला या प्रकल्पासाठी देणार असून इतरही आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देणार आहे. आपण गुजरातची निवड का केली असे संयुक्त पत्रकार परिषदेत टाटांना विचारले असता ते म्हणाले की, आमच्या या प्रकल्पासाठी आम्ही ज्या राज्यांशी बोलणी केली व आमच्या मागण्या समोर मांडल्या, त्यात गुजरात सरकारने सर्वप्रथम होकार दिला. आमच्याजवळ वेळही फार कमी होता. गुजरातने आम्हाला सर्वात आधी रुकारच दिला नाही, तर योेग्य स्थळ व जमीन उपलब्ध करून दिल्यानेच आम्ही गुजरातची निवड केली. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज सात वर्ष पूर्ण होत आहेत व अशाप्रसंगी हा करार होत आहे यामुळे मला आनंद होत आहे. गुजराती लोकांची व्यावसायिक प्रतिभा व येथील कामगारांचे अथक परिश्रम याचा लाभ आम्हाला होईल. या प्रकल्पांतर्गत १० हजार लोकांना रोजगार प्राप्त होईल.
नॅनो कार आता मार्चच्या अखेरपर्यंत रस्त्यावर धावू लागेल. पहिली खेप ही पुणे येथील प्रकल्पातून बाहेर पडणार असली तरी नंतर येथील प्रकल्प पूर्ण झाला की येथून प्रारंभी २.५ लाख कारची निर्मिती व होईल नंतर त्यात वाढ होत जाईल, असे टाटा यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, टाटा कंपनीचे प्रमुख रतन टाटा यांच्या निर्णयामुळे गुजरात राज्याच्या विकासाला गती मिळेल. नॅनो कारचा प्रकल्प गुजरातमध्ये स्थापन करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे आपल्याला आनंद झाला आहे. मोदी पुढे म्हणाले की, सिंगूर येथील वाद सुरू असताना मला असे कळले की टाटांचा प्रकल्प विदेशातही जाऊ शकतो. हा प्रकल्प देशातील कोणत्याही राज्यात गेला असता तर मला वाईट वाटले नसते. परंतु तो विदेशात जाणार म्हणून आपण व्यथित झालो. त्याच वेळी आपण असा निर्णय घेतला की इतर कोणत्या देशात हा प्रकल्प आपण जाऊ द्यावयाचा नाही; जाऊ देणार नाही. माझे व माझ्या राज्यातील जनतेचे हे सौभाग्य आहे की हा प्रकल्प आता गुजरातमध्येे होणार आहे.

वेतन आयोग कार्यवाही; अधिसूचना आज जारी

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : केवळ काही मंत्र्यांच्या शिफारशीवरून वाढीव वेतनश्रेणीचा लाभ उठवणाऱ्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांना "चिमटा' काढून ही वाढ रद्द करण्याबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या नोव्हेंबर महिन्याच्या पगारापासून सहावा वेतन आयोग लागू करण्यासंबंधीची अधिसूचना उद्या (बुधवारी) दसऱ्याच्या पूर्वसंध्येला जारी होणार आहे.
यासंबंधी सरकारी सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सहावा वेतन आयोग लागू करण्यासंबंधी मार्गदर्शन तत्त्वे तथा महत्त्वाच्या माहिती पुस्तिकेसह उद्या जारी होणारी अधिसूचना सर्व सरकारी खात्यांना पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग सप्टेंबर महिन्यापासून लागू केला जाणार असला तरी सुधारीत वेतनश्रेणी नोव्हेंबर महिन्याच्या पगारापासून लागू केली जाईल. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याची थकबाकी पुढील आर्थिक वर्षात रोख देण्याची ग्वाही सरकारने देऊ केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, २००६ पासूनच्या थकबाकीबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबतचे आदेश वेगळ्या अधिसूचनेव्दारे काढले जातील, अशी माहिती वित्त खात्यातील सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान, काही सरकारी कर्मचाऱ्यांना केवळ काही मंत्र्यांच्या शिफारशीवरून वाढीव वेतनश्रेणी देण्यात आली होती. ही वाढीव वेतनश्रेणी सर्व कर्मचाऱ्यांना लागू करून वेतनश्रेणीत समानता आणण्याची मागणी सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली होती. हा प्रस्ताव सरकारला परवडणारा नसल्याने आता ही वाढीव वेतनश्रेणी रद्द करून सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्ववत वेतनश्रेणीवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करताना त्यांची पूर्वीची वेतनश्रेणी लागू केली जाणार असल्याने वाढीव वेतनश्रेणीच्या जोरावर आयोगाचा लाभ उठवण्याचे त्यांचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा सरकारने निर्णय जाहीर करून आता उद्या अधिसूचना जरी करण्यात येत असली तरी अद्याप यासाठी लागणारे आठशे कोटी रुपये कसे उभारले जातील याबाबत निश्चित धोरण ठरलेले नाही.

गुन्ह्यातील सहभागाच्या संशयावरूनही आरोप निर्धारित होऊ शकतात

नवी दिल्ली, ७ ऑक्टोबर: आरोपीच्या गुन्ह्यातील सहभागाबाबत साशंकता असली तसेच त्याच्या विरूद्घ सबळ पुरावे उपलब्ध नसले तरिही त्याचेविरूद्ध आरोपांचे निर्धारण करता येवू शकते असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अशा स्थितीत सदर अरोपी हा दोषी सिद्ध होण्याच्या शक्यतेचा व त्यास काय शिक्षा होवू शकते याचा विचार करण्याची आवश्यकता नाही असे न्यायाधीश अरिजीत पसायत व मुकुंदकम शर्मा यांच्या खंडपिठाने म्हटले आहे.
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या धोकेबाजी व विश्वासघाताच्या प्रकरणात काही आरोपींना मुक्त करण्याच्या एका निर्णया विरूद्ध सर्वोच्च न्यायालयाने आपले वरील मत नोंदविले आहे.

दहशतविरोधी व काश्मीर धोरणात बदल नाही : पाक

इस्लामाबाद, दि. ७ ः दहशतवाद विरोधी कारवाई साठी परकीय फौजांना पकिस्तानी भूमीचा वापर करू देण्याचा इरादा नसल्याचे स्पष्ट करत आपल्या काश्मारविषयक धोरणात काहीही बदल झाला नसल्याचा पुनरूच्चार आज पाकने केला.
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दहशतवादविरोधी कारवाईसाठी अमेरिका वा मित्र राष्टाच्या फौजांना पाकिस्तानच्या भूमीवर कारवाई करण्यास कुठल्याच प्रकारची परवानगी दिली नसल्याचे व याबाबत तसेच काश्मार मुद्याबाबत आंतराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानच्या भूमिकेशी विसंगत व विपर्यस्त विधाने केल्याचे पाकिस्तानच्या माहिती व प्रसारण मंत्री शेरी रहमान यांनी म्हटले आहे.
काश्मिरी जनतेला पाक सरकारचा नैतिक तसेच राजकीय पाठिंबा असल्याचे अपले जुनेच तुणतुणे त्यांनी परत वाजवले आहे.

जपानच्या दोघांना नोबेल पुरस्कार

स्टॉकहोम, दि. ७ : जपानच्या दोन नागरिकांसह एका अमेरिकीची २००८ च्या नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या तिघांची फिजिक्स क्षेत्रातील कामाबद्दल निवड झाली असून आरोग्य क्षेत्रातही काम करणाऱ्या फ्रान्सच्या दोन व जर्मनीच्या एका शास्त्रज्ञांचाही हा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाचे योचिरो नाम्बू, तसेच जपानचे माकोटो काबायाशी व तोशिहिदे मास्कावा हे ते मानकरी आहेत. या तिघांनी फिजिक्स क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे होणाऱ्या समारंभात या तिन्ही पुरस्कार विजेत्यांना १.४ मिलियन अमेरिकी डॉलरची राशी विभागून दिली जाणार आहे.
याशिवाय आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जर्मनीच्या हेराल्ड जुर हॉसन यांच्यासह फ्रान्सच्या लुक मोंटेननियर व फ्रान्सकोईस बार-सिनाऊसी यांची २००८ च्या नोबेल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. फ्रान्सच्या या दोन्ही शास्त्रज्ञांनी एड्सच्या, तर अमेरिकेच्या हॉसन यांनी कर्करोगाच्या व्हायरसचा शोध लावला म्हणून त्यांची ही निवड करण्यात आली आहे. या तिन्ही शास्त्रज्ञांना १४ लाख डॉलरची राशी पुरस्कारादाखल दिली जाणार आहे.

सेझऐवजी अन्यत्र जागा देण्याचे आश्वासन

कमलनाथ यांच्या कृतीचा सेझविरोधकांतर्फे निषेध
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी): केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या तीनही "सेझ'प्रकल्पांचे काम जनआंदोलनानंतर बंद पडल्याने आता या कंपनीकडून गोव्यात अन्यत्र भूखंड देण्याची मागणी होत आहे. या प्रस्तावाबाबत विचार करण्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री कमलनाथ यांनी दिलेले आश्वासन ही जनतेची प्रतारणा असल्याचा आरोप करून "सेझ विरोधी गोमंतकीय चळवळ'संघटनेतर्फे या कृतीचा जाहीर निषेध करण्यात आला.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे निमंत्रक माथानी साल्ढाणा यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी माजी मंत्री सौ. निर्मला सावंत, शिवसेना गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर आदी हजर होते. सिंगूर येथील जनतेला प्रकल्प नको,या मताचा आदर करून गुंतवणूक करूनही टाटांनी हा प्रकल्प हलवण्याचा निर्णय घेतला. गोव्यात "सेझ'स्थापन करू इच्छिणाऱ्या उद्योजकांनी टाटांचा आदर्श ठेवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या लोकांना इथे उद्योगाच्या निमित्ताने केवळ भूखंड हवे आहेत, हे आता या प्रस्तावामुळे सिद्ध झाल्याचेही श्री. माथानी म्हणाले. "सेझ'विरोधी आंदोलन पेटल्यानंतर राज्य सरकारने "सेझ'रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी गेले एक वर्ष हा विषय या ना त्या कारणांवरून अद्याप कोणत्या कारणासाठी लटकत ठेवला जात आहे,असा सवालही यावेळी करण्यात आला. गोवा सरकारने अद्याप "सेझ'अधिसूचना मागे घेतली नसल्याने सरकारच्या हेतूबाबत संशय घेण्यास वाव असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गोव्यातील जनता "सेझ'कुठल्याही स्वरूपात स्वीकारणार नाही हे राज्य सरकारने ध्यानात ठेवावे असा इशारा यावेळी व्यक्त देण्यात आला.
रोजगार मिळवून देण्यासाठी राज्यात उद्योग आणण्याची भाषा राज्य सरकार करत असले तरी सध्याच्या औद्योगिक वसाहतींत विविध आस्थापनांत किती गोमंतकीय नोकरी करतात याचा आकडा सरकारने पहिल्यांदा उघड करावा. या राज्यात कोणीही विकासाच्या आड येणार नाही. मात्र विकासाच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकू पाहणाऱ्या नेत्यांना विरोध केला जाईल, असे माथानी यांनी स्पष्ट केले.

पोलिस असल्याचे सांगून ६० हजारांना लुबाडले

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : गेल्या महिन्यात राय येथे एका महिलेला पोलिस असल्याचे सांगून ७० हजारांना लुबाडण्याच्या प्रकाराची पुनरावृत्ती आज सायंकाळी ६ च्या सुमारास गजबजलेल्या मडगाव पालिका इमारतीमागील चौकात घडली.
गोवा पोलिस असल्याचे हिंदीतून सांगणाऱ्या व पांढरा वेश धारण केलेल्या एकाने व त्याच्या चौघा सहकाऱ्यांनी खारेबांध येथील शशिकांत शेल्डेकर नामक ६० वर्षीय व्यक्तीला चक्क ६० हजारांना ठकवले.
सदर शशिकांत हे पालिका इमारती मागील जुन्या मासळी मार्केटातून पारोडकर यांच्या दुकानाकडे जात असताना पांढरा वेश केलेल्या एका इसमाने त्यांना अडविले व आपण गोवा पोलिस असल्याचे सांगून आपले कार्डही काढून दाखविले .या दिवसात रस्त्यावर अडवून चोऱ्या होत असल्याने गळ्यात , हातात , बोटात सोन्याच्या काही वस्तू ठेवू नका असल्यास त्या काठा आपण त्या कागदात गुंडाळून तुमच्या खिशात घालतो, असे सांगितले. तो ते सांगत असतानाच आणखी तिघे त्यांच्या दिशेने येतात ते पाहून शेल्डेकर गर्भगळीत झाले व त्यांनी गळ्यातील साखळी काढून त्याच्या हातात दिली. बोटातील अंगठी हाती येत नसताना ती त्याने खेचून काढली व त्या दोन्ही कागदात गुंडाळल्यासारखे केले. नंतर त्याची पुरचुंडी त्यांच्या शर्टात घातली व तो निघून गेला.
शेल्डेकर हे बाजारातील सर्व कामे आटोपून घरी गेले व त्यांनी तेथे ती पुचुंडी उघडली तर तीत काहीच नव्हते. त्यांनी लगेच पोलिसात तक्रार नोंदवली . पोलिसांनी शहरातील सर्व हॉटेल तपासण्याची मोहीम त्यानंतर हाती घेतली . मात्र उशिरापर्यंत काहीच हाती लागले नव्हते.

Tuesday, 7 October, 2008

२० सुशिक्षित अतिरेक्यांना मुंबई पोलिसांनी पकडले

नवरात्रोत्सवात होणारे बॉंबस्फोट टाळले
मुंबई, दि. ६ : सध्या अतिशय उत्साहात मुंबईत सुरू असलेल्या नवरात्रोत्सवात बॉंबस्फोट घडवून रंगाचा बेरंग करण्याचा आणि लोकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा अतिरेक्यांचा डाव मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. पुणे, सुरत, हैदराबाद आणि अन्य अनेक ठिकाणी छापे घालून आणि २० अतिरेक्यांना अटक करून मुंबई पोलिसांनी - मुंबई ही अतिरेक्यांच्या बापाची नाही - हा संदेश जगभर पाठवला आहे. बॉंबस्फोटांपूर्वी सर्व न्यूज चॅनल्सना स्फोटांबद्दल माहिती देणारे ई-मेल पाठविण्याचे काम करणाऱ्या चौघा अतिरेक्यांचा यात समावेश आहे.
पोलिस आयुक्त हसन गफूर, सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी पकडलेले आतंकवादी उच्चशिक्षित असल्याचे आज भरगच्च पत्रकार परिषदेत मुद्दामहून निदर्शनास आणून दिले.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेला मन्सूर पीरभाई हा संगणक अभियंता आहे. मोहमम्द शेख हा शिक्षक असून कॉल सेंटरमध्येही फावल्या वेळात तो काम करीत असतो. ईमेल बनविणे, पाठविणे हे त्याचे काम असते. असिफ शेख हा यांत्रिकी अभियंता असून ईमेलद्वारा विशिष्ट लोकांना धमक्या देण्याचे गांभीर्यपूर्वक काम त्याच्यावर सोपविण्यात आले होते. अनिस सय्यद याने सुरत, हैदराबाद येथे बॉंब ठेवण्याचे कर्तृत्व दाखविले होते. अकबर चौधरी याने हेच काम सुरत आणि हैदराबादमध्ये केले होते. फैजल रेहमान दुराणी उपाख्य सलाउद्दीन बॉंब बनवीत असे. मोहम्मद असिफ हा देखील संगणक अभियंता असून तो बॉंबचे टायमर सिद्ध करून ते बॉंबवर बसविण्याचे काम करीत असे.
हे सर्व आतंकवादी नवरात्र उत्सवात जागोजागी बॉंबस्फोट घडवून आणण्याची सिद्धता करीत असताना आम्हाला वेळीच माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे तातडीने धावपळ करून मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळविले आहे असे हसन गफूर यांनी सांगितले.
हे पकडलेले आतंकवादी जर उच्चशिक्षित आणि सुस्थापित असतील तर मुसलमान मागास, अशिक्षित आणि दरिद्री असल्यामुळे आतंकवादाकडे वळतात हा युक्तिवाद तात्पुरता बाजूला ठेवून आतंकवादाच्या मूळ कारणाकडे आपण वळले पाहिजे अशी प्रतिक्रिया हिंदू मानवाधिकार मंचचे धर्मेंद्र मुदलियार यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या निर्मितीचे कारस्थान लंडनमध्ये सुशिक्षित मुसलमानांनी रचले होते. हे माहीत होऊनही त्यापासून योग्य तो बोध घेण्याचे बौद्धिक आळसामुळे हिंदूंनी टाळले. ती चूक आता सुधारली नाही तर दुसऱ्या फाळणीचे दायित्व हिंदूंवरच येईल असे म्हणणे चूक ठरेल काय, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

मेगा प्रकल्पांना विरोधाची धार तीव्र होत चालली...


'गाव घर राखण मंच' व अन्य संघटनांतर्फे पणजीत मेगा प्रकल्पांविरुद्ध काढण्यात आलेला मोर्चा. (छाया: सुनील नाईक)

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) ः मुख्यमंत्री दिगंबर कामत हे वारंवार आपले सरकार "आम आदमी'चे असल्याची शेखी मिरवतात; परंतु त्यांच्या सरकारकडून "आम आदमी' चे खच्चीकरण सुरू आहे. या सरकारातील काही नेत्यांनी गोवा जणू विक्रीस काढला असून ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास आपणच या भूमीत पोरके होऊ, अशी भीती "गाव घर राखण मंच' या संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली.
राज्याच्या विविध भागांत सुरू असलेले मेगा प्रकल्प, जमीनविक्री, बेकायदा खाण उद्योग आदींविरोधात निषेध मोर्चा या संघटनेने आज पणजीत मोर्चा काढला होता. नंतर येथील आझाद मैदानावर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. या जाहीर सभेत राज्यातील सुमारे पंचवीस विविध बिगर सरकारी संस्था तथा नागरिक मंचाचे मिळून पाचशेवर लोक सहभागी झाले होते. "गोवा प्रादेशिक आराखडा २०२१' संमत होईपर्यंत राज्यातील सर्व वादग्रस्त व्यावसायिक प्रकल्प तथा मेगा प्रकल्प त्वरित स्थगित ठेवावेत,असा ठराव सभेत संमत करण्यात आला. वादग्रस्त प्रादेशिक आराखडा २०११ रद्द केला खरा; परंतु या आराखड्याअंतर्गत सुरू झालेल्या प्रकल्पांची कामे जोमाने सुरू आहेत, असा आरोप सभेत करण्यात आला. सरकारकडून सामान्यांच्या डोळ्यांत धूळफेक केली जात आहे. येथील भूमीपुत्रांवरच घाला घालण्याचे षड्यंत्र काही राजकीय नेत्यांनी रचले असून ही स्थिती अशीच कायम राहिल्यास गोमंतकीय पेटून उठेल, हे सरकारने ध्यानात ठेवावे,असा इशारा या सभेत देण्यात आला.
अँथनी डिसिल्वा यांनी गोव्यातील विविध भूखंड विक्रीसाठी संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर विक्रीस असल्याच्या जाहिरातींचा मारा सुरू असल्याचे सांगितले. दिल्ली येथे अलीकडेच एका बड्या वृत्तपत्र कंपनीकडून गोव्यातील जमिनींच्या विक्रीचे प्रदर्शनच घडवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यास प्रसिद्ध गोमंतकीय फॅशन डिझायनर व्हेंडल रॉड्रिगीस यांनी नकार देऊन गोव्याबाबत असलेले प्रेम प्रकट केले, असेही ते म्हणाले.
मडगावचे नगरसेवक ऍथल लोबो यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सरकार जनतेच्या भावनांशी खेळ करीत आहे. अजूनपर्यंत लोक शांततामय मार्गाने निषेध नोंदवत आहेत. तरीसुद्धा सरकार याकडे दुर्लक्ष करू लागले तर पुढील परिणामांना तेच जबाबदार ठरेल,असा इशाराही लोबो यांनी दिला. यावेळी संघटनेतर्फे नगर व नियोजन खाते तथा पंचायत संचालनालयास निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचे वाचन संघटनेच्या निमंत्रक जेराल्डीन फर्नांडिस व सॉर्टर डिसोझा यांनी केले.
---------------------------------------------------
ज्येष्ठ महिलाही संतापल्या
या सभेत मडगाव व बाणावली येथील दोन ज्येष्ठ महिलांनी व्यासपीठावर उभे राहून यापुढे मतांची मागणी करण्यासाठी येणाऱ्या राजकारण्यांच्या आमिषांना अजिबात बळी पडू नका, असे आवाहन केले.

मिकींना मंत्रिमंडळातून ताबडतोब डच्चू द्यावा

डॉ. विली डिसोझा यांची मागणी
कारवाईसाठी पक्षश्रेष्ठींना दोन आठवड्यांची मुदत

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) : पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री व आघाडीतील एका आमदाराविरुद्ध अपात्रता याचिका दाखल केल्याने मिकी यांना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची प्रदेश तथा देशपातळीवर बदनामी झाली आहे. मिकी यांच्या या पक्षविरोधी कारवायांनी आता परिसीमा गाठली असून येत्या दोन आठवड्यांत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कारवाई न केल्यास प्रदेश राष्ट्रवादीला कठोर निर्णय घेणे भाग पडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनी दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षातील दरी रुंदावत चालली आहे. मिकी यांच्या अपात्रता याचिकेमुळे नवा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. डॉ.विलींनी आज या याचिकेच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कार्यकारिणीची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे तिन्ही आमदार तथा महत्त्वाचे पदाधिकारी गैरहजर होते.
डॉ. विली यांनी बोलावलेल्या या बैठकीककडे माजी मंत्री श्रीमती फातिमा डिसा, सरचिटणीस सुरेंद्र फुर्तादो, माजी मंत्री प्रकाश फडते,माजी मंत्री संगीता परब यांचा अपवाद वगळता अन्य पदाधिकाऱ्यांनी पाठच फिरवली. प्रा. सुरेंद्र सिरसाट, माजी मंत्री कार्मो पेगादो हेदेखील गैरहजर होते. दरम्यान, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा हे बायणा रवींद्र भवन प्रकरणामुळे बैठकीत व्यस्त होते तर थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर अन्य एका कामासाठी गेल्याने ते येऊ शकले नाहीत,असा खुलासा डॉ. विली यांनी केला.
मिकी पाशेको यांच्या या कृत्यामुळे विद्यमान आघाडी सरकारचे लोकांत हसे झाले आहे. एखादा मंत्री अशी कृती करीत असताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मौन धारण करणे त्यांना अजिबात शोभत नाही. मुख्यमंत्र्यांनी मिकी यांना तात्काळ मंत्रिमंडळातून वगळायला हवे होते,असेही डॉ.विली म्हणाले. गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे तिसरी आघाडी या नात्याने जनता पाहत असताना श्रेष्ठींकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दलही डॉ. विली यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय समन्वय समितीची बैठक गेल्या आठ महिन्यापूर्वी झाली होती. त्यानंतर अनेक विषय प्रलंबित असतानाही ही बैठक बोलावण्याची तसदी कोणीच घेत नसल्याने ते नाराज झाले. मिकींच्या कारवायांमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असे ते म्हणाले.
श्रेष्ठींच्या सल्ल्यानुसार वागेनः मिकी
आपण अपात्रता याचिका दाखल करण्याचा घेतलेला निर्णय हा प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या व्यापक हिताचाच आहे, असे मिकी पाशेको यांनी म्हटले आहे. श्रेष्ठींच्या सल्ल्याचे तंतोतंत पालन करण्यास आपण वचनबद्ध आहोत. मात्र, डॉ.विली यांनी केलेल्या टीकाटिप्पणीबाबत आपल्याला प्रतिक्रिया द्यायची नाही,असे ते म्हणाले.

Monday, 6 October, 2008

काश्मिरातील कट्टरवादी हे अतिरेकीच - झरदारी

"भारताकडून पाकला धोका नाही'
न्यूयॉर्क, दि. ५ ः काश्मिरात विविध दहशतवादी संघटनांकडून होणाऱ्या कारवाया अतिरेकी असल्याचे वक्तव्य प्रथमच देताना पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी पाकला भारताकडून कोणताही धोका असल्याचे आपल्याला वाटत नाही, असे म्हटले आहे.काश्मीरमध्ये कारवाया करणारे "अतिरेकीच' असल्याचे वक्तव्यही झरदारी यांनी दिले. यापूर्वीचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ काश्मिरातील अतिरेक्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणत असत, हे येथे उल्लेखनीय.
"वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत झरदारी म्हणाले की, भारत हा कधीही पाककरिता धोकादायक नव्हता. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर जी प्रतिमा आहे त्यामुळे आम्हाला कधीही असुरक्षित वाटले नाही. हे केवळ माझे वैयक्तिक मत नसून आमच्या संपूर्ण सरकारचेच मत आहे. जोवर पाकला भारताच्या बरोबरीत समजले जात आहे तोवर भारत-अमेरिका अणुकरारावर आम्हाला कोणतीही हरकत नाही. या दोन देशांची मैत्री आमच्यासाठी चिंतेची बाब होण्याचे कारणच नाही. कारण यापैकी एक देश म्हणजे, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि दुसरा देश म्हणजे सर्वात जुनी लोकशाही आहे. अशा दोन देशांच्या मैत्रीने आमचा जळफळाट होण्याचे काहीच कारण नाही, असे झरदारी म्हणाले.
भारतसोबत आम्हीही मुक्त व्यापारास सुरुवात करणार आहोत. असे झाले तर हा निर्णय स्वागतार्ह, आश्चर्यकारक आणि तितकाच ऐतिहासिकही ठरेल. भारतासोबतचे आमचे संबंध सुधारण्याचाच आमचा प्रयत्न राहणार आहे. आमच्यासारख्या देशांना आर्थिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही, असेही झरदारी म्हणाले.

शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे?

मुंबई, दि. ५ - पुढील वर्षी होऊ घातलेल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती विजयी झाली आणि शिवसेनेच्या आमदारांची संख्या भाजपपेक्षा जास्त असली तर, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.
शिवसेनेने आज हा संकेत दिला. सेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी एका खाजगी वाहिनीशी बोलताना याचे सूतोवाच केले.
९ ऑक्टोबरला होणा-या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हेच आमचे मुख्यमंत्री असतील. कारण, ते महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत !
शिवसैनिकांच्या मनात तर उद्धवजींचे मुख्यमंत्रिपद आहेच. पण राज्यातील इतर जनतेच्या मनातही ते आहे, असे सांगताना राऊत म्हणाले की, त्यांनी ठिकठिकाणी प्रचंड जाहीर सभा घेऊन राज्य पिंजून काढले आहे. त्यामुळे शेतक-यांपसून शिवसैनिकांपर्यंत सा-यांनाच त्यांच्याविषयी आदर वाटत आहे.
अर्थात, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा दसरा मेळाव्यातच होण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे यावेळी प्रथमच भाषण होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीवरही शिक्कामोर्तब केले जाईल, असे मानले जाते. तसे झाले तर ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी होण्यासाठी मैदानात उतरेल. असे कोणतेही पद न घेऊन बाळासाहेबांनी गेली ४३ वर्षे शिवसेनेचे व स्वत:चे वैशिष्ट्‌य जपले आहे.
परंतु यावेळी, राज ठाकरे यांनी उभ्या केलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी हा उपाय योजला जाईल, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. मराठीचा मुद्दा राज ठाकरे यांनी शिवसेनेकडून जवळजवळ पळविला आहे. याशिवाय, ते आपल्या चुलत भावावर आणि त्यांच्याभोवतालच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आजही त्यांनी, शिवसेना बाळासाहेब चालवत नाहीत, तसेच सामनामधील अग्रलेखही ते लिहीत नाहीत, असे विधान एका मुलाखतीत केले आहे. या वारंवारच्या हल्ल्‌यांना तोंड देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आत्ताच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले जाऊ शकते.
ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असे सूत्र भाजप-शिवसेना युतीमध्ये आधीच ठरलेले आहे. शिवसेना जास्त जागा लढवत (२८८ पैकी १७१) असल्याने त्यांचाच नेता मुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक असते. मात्र, यावेळी ११७ पेक्षा थोड्‌या जास्त जागा मागण्याची तयारी भाजपने केली असल्याचे कळते. तरीही शिवसेना आपले वर्चस्व कायम ठेवूनच युती करेल. त्या स्थितीत युती जिंकल्यास उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी प्राप्त होऊ शकते.

मडगाव स्टेशनरोडवरील चोरबाजार भाजप कार्यकर्त्यांनी उधळला

पोलिसी निष्क्रियतेविरुद्ध जोरदार आघाडी
मडगाव, दि.५(प्रतिनिधी) - मडगाव पोलिसांच्या निष्क्रियतेचा पर्दाफाश करताना मडगाव भाजप मंडल व भाजयुमो कार्यकर्त्यांनी आज भल्या पहाटे बाहेर पडून येथील स्टेशनरोडवर प्रत्येक रविवारी पोलिस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून भरणारा चोरबाजार उधळून लावला . पोलिसांनी नंतर कारवाईचा फार्स करताना या बाजारातील २० विक्रेत्यांविरुद्ध कलम ३५ खाली गुन्हा नोंदविला, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी मुद्देमालासह पकडून दिलेल्या एका गडगडा चालविणाऱ्याला तासभराच्या आतच सोडून दिले.
सदर चोर बाजार आज कालचा नव्हे तर गेली १५ वर्षें राजकारणी व पोलिस यंत्रणेच्या आशीर्वादाने चालत आला आहे. मध्यंतरी सुरेश पिळर्णकर नामक खमके अधिकारी उपविभागीय अधिकारी असताना तो बाजार बंद करण्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते , दोन रविवारी त्यांनी आपल्या अधिकारात पहाटेपासून पोलिस कुमक तैनात करून हा बाजार उधळून लावला होता. पण या बाजारवाल्यांचे हात इतके वरपर्यंत पोचलेले की, तिसरा रविवार येण्यापूर्वीच पिळर्णकर यांची बदली झाली , अन या चोर बाजाराला पूर्ववत चांगले दिवस आले.
या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे पहाटे ४-३० वा. तो सुरु होतो तो सायंकाळपर्यंत चालतो सकाळी १० वाजेपर्यंत त्याला खरा जोर असतो. तेथे सर्व प्रकारच्या व ग्राहकांच्या खिशाला परवडतील अशा सर्व दराच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात, तूर्त ती नसली तरी अवघ्याच वेळेच्या आत ती उपलब्ध करण्याची तयारी विक्रेते दर्शवतात, इतके बेमालूम संपर्क जाळे त्यांनी विणलेले आहे.
भाजप मंडलाचे नवीन रायकर व युवा मोर्चाचे शर्मद रायतूरकर व राजेंद्र सतरकर हे त्यांच्या जवळपास ३० कार्यकर्त्यांसह पहाटे ४-३० वा . स्टेशनरोड परिसरांत हजर झाले व वेगवेगळ्या जागी थांबून त्यांनी सर्वांवर नजर ठेवली. विक्रेते व त्यांच्या जोडीने गडगडावाल्यांनी येऊन पथाऱ्या पसरविण्यास सुरुवात करताच त्यांनी मडगाव पोलिस स्टेशनवर जाऊन तेथे असलेले उपनिरीक्षक नवलेश देसाई यांना एकंदर परिस्थितीची कल्पना दिली व लगेच जाऊन त्यांना ताब्यात घेण्यास सांगितले असता त्यांनी वेळकाढू धोरण अवलंबिल्यावर भाजप कार्यकर्त्यंानी त्यांना पोलिसांनी कारवाई न केल्यास आम्ही जातो व त्यांना उचलून येथे आणतो अशी धमकी देताच ते पोलिस कुमक घेऊन निघाले व स्टेशनरोड वर जाऊन संबंधितांना अटक करून गुन्हा नोंदविण्याऐवजी विक्रेत्यांना पिटाळून लावण्यास प्रारंभ करताच या कार्यकर्त्यांनी त्याला हरकत घेतली तोपर्यंत बऱ्याच विक्रेत्यांनी तसेच गडगडेवाल्यांनीही आपले चंबूगवाळे आवरले होते. कार्यकर्त्यांनी तेथील एका दुकानात जाऊन बसलेल्या लड्डू नामक इसमाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले व तो गडगडा जुगार चालवीत होता असे सांगून जुगाराचा व साहित्याचा पंचनामा करण्याची मागणी केली . पण ते काहीही न करता पोलिस त्याला घेऊन गेले व तासाभरातच त्याला सोडून दिले असा आरोप भाजपने केला.
दरम्यान भाजपची ही मोहीम आता यापुढे नियमित चालू राहील व पोलिसांनी हा बाजार बंद पाडण्यास पुढाकार न घेतल्यास भाजप संबंधितांना पकडण्यासाठी पुढाकार घेईल असा इशारा शर्मद पै रायतूरकर यांनी दिला आहे.

पाळीचा कॉंग्रेस उमेदवार स्थानिक नेतेच ठरविणार

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)- पाळी मतदारसंघासाठी उमेदवार ठरविण्याबाबत "हायकमांड' कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नसून ती संपूर्ण जबाबदारी गोवा प्रदेशाध्यक्ष व स्थानिक नेत्यांवर सोपवण्यात आल्याचे आज कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोव्याचे प्रभारी बी.के.हरिप्रसाद यांनी सांगितले. पाळीतील उमेदवाराच्या निवडीबाबत आज सकाळी बोलावण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेश अध्यक्ष सुभाष शिरोडकर तसेच अन्य नेते पक्ष कार्यालयात उपस्थित होते. या मतदारसंघाचे आमदार गुरुदास गावस यांचे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे. येत्या काही दिवसांत या मतदारसंघात निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार असल्याने राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू झाली आहे.
"मला स्थानिक आखाड्याची माहिती नसल्याने हा निर्णय पूर्णपणे मुख्यमंत्री कामत व प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर घेणार आहेत,' असे श्री. हरिप्रसाद म्हणाले. स्थानिक तसेच पक्षाच्या अन्य नेत्यांची मते अजमावून घेण्यासाठीच ही बैठक असून अद्याप कोणत्याच नावावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नसल्याने उमेदवाराच्या नावावर आताच बोलणे योग्य नसून यानंतर अनेक बैठका घेतल्या जाणार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु, या मतदारसंघासाठी कॉंग्रेस पक्षाला उमेदवाराची निवड करताना कॉंग्रेस सरकारात असलेल्या आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना काट्याची टक्कर द्यावी लागणार आहे. सध्या मंत्री राणे यांनी आपली पत्नी सौ. दिव्या राणे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र त्या कॉंग्रेसच्या तिकिटावर उतरणार की, अपक्ष म्हणून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कॉंग्रेस पक्षासमोर गंभीर प्रश्न उभा ठाकल्याचे सूत्रांनी सांगितले.
आज झालेल्या या बैठकीत मात्र काही मंडळ अध्यक्षांनी प्रकाश गावस यांची तर काहींनी माजी आमदार सदानंद मळीक यांच्या नावावर जोर दिला असल्याची माहिती मिळाली असून सौ. राणे यांचेही नाव उमेदवारीसाठी पुढे करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयीच मुख्यमंत्री कामत यांना विचारले असता, ते म्हणाले, उमेदवारीसाठी अनेक नावाची शिफारस झालेली असून योग्यवेळी उमेदवाराचे नाव जाहीर केले जाणार आहे.

दिल्लीतील नाट्यस्पर्धेत मडगावचे "आदित्य चक्षू' पहिले

१९ पैकी १७ पुरस्कार गोव्याच्या नाटकांना
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - दिल्ली महाराष्ट्रीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेतर्फे आयोजित ३७ व्या बृहन्महाराष्ट्र मराठी नाट्य परिषदेत गोव्याच्या नाटकांनी यशोध्वजा रोवली. "गद्य' प्रकारात मडगाव येथील रंगधार निर्मित "आदित्य चक्षू' हे नाटक पहिले आले. तर "पद्य' विभागात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सांगली निर्मित "सं. ययाती - देवयानी' या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. "आदित्य चक्षू' नाटकासाठी जयेंद्रनाथ हळदणकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.
"गद्य' नाटकांत एकूण १९ पुरस्कारांपैकी १७ पुरस्कार गोव्यातील नाटकांना तर दोन पुरस्कार अहमदाबादमधील नाट्य संस्थांना मिळाले. यंदा महाराष्ट्र, गोवा, सुरत, इंदूर, देवास येथील नाट्य संस्थांची नाटके या स्पर्धेत सहभागी झाली होती. "पद्य' नाट्यात ८ आणि गद्य नाट्यात ८ अशा १६ नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. मडगाव येथील रंगधार निर्मित "आदित्य चक्षू' या नाटकाला उत्कृष्ट नाट्य प्रयोगासोबतच उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकाचाही पुरस्कार मिळाला.
संगीत नाट्य प्रकारात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली निर्मित "संगीत ययाती -देवयानी' नाटकाला उत्कृष्ट संगीत नाट्य दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. या कार्यक्रमात दिग्दर्शन, अभिनय, गायन या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नागेश फडके यांना "नाट्यतपस्वी' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १८ दिवस चाललेल्या या नाट्य स्पर्धेसाठी योगेश सोमण, मधुकर पाठक, डॉ. राजेंद्र जहागीरदार, उषा पाठक आणि सुप्रिया मालेगावकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गेले १८ दिवस सुरू असलेल्या या नाट्य स्पर्धेचा आज (रविवारी) समारोप झाला. पहाडगंज येथील महाराष्ट्र रंगायतनच्या सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. योजना आयोगाचे सदस्य भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

Sunday, 5 October, 2008

विश्वासराव चौगुले कालवश

आधुनिक गोव्याचे शिल्पकार; मान्यवरांची आदरांजली
पणजी व वास्को, दि. ४ (प्रतिनिधी) - गोव्याच्या औद्योगिक विश्वाचे शिल्पकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात नेहमीच आघाडीवर राहून सामान्यांशी आपली नाळ कायम जोडून ठेवलेले आदरणीय उद्योगपती श्रीमान विश्वासराव दत्ताजीराव चौगुले यांचे आज सकाळी ८.४५ वाजता बायणा वास्को येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने देहावसान झाले. आपल्या अजोड कर्तृत्वाने एकेकाळी "देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती' म्हणून संसदेत गौरवले गेलेले श्रीमान चौगुले निधनसमयी ९४ वर्षांचे होते. केवळ गोव्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या बळावर चौगुले यांनी नावलौकीक मिळवला होता. श्रीमान चौगुले यांच्या निधनाबद्दल समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले असून एक उत्तुंग व्यक्तीमत्व व अभिमानास्पद पर्व अस्ताला गेल्याचे उद्गार त्यांनी काढले.
आज संध्याकाळी बायणा येथील त्यांच्या निवासस्थानाहुन शेकडो वाहनांच्या उपस्थितीत त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. गादेगाळ बिर्ला येथील चौगुले परिवाराच्या कौटुंबीक स्मशानभूमीत त्यांचे पुत्र उमाजी चौगुले यांनी त्यांना अग्नी दिला. श्रीमान चौगुले यांच्या पश्चात पुत्र विजय,अशोक व उमाजी तर कन्या सरिता,रोहीणी व पद्मा यांचा समावेश आहे. श्रीमान विश्वासराव चौगुले यांच्या देहावसानाची वार्ता राज्यांत व राज्याबाहेरही सर्वत्र पसरताच त्यांच्या असंख्य चाहत्यांनी तसेच चौगुले उद्योगासमूहासह इतर अनेक प्रख्यात उद्योग समूह, शैक्षणिक, राजकीय,व्यवसायिक आदी क्षेत्रातील प्रतिनिधींनी अंत्यदर्शनासाठी उपस्थिती लावली. राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सकाळी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण केले.विश्वासराव चौगुले यांच्या जाण्याने गोव्याने थोर पुत्राला गमावल्याचे उद्गार काढून गोवा हे देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वांत उच्च राज्य बनावे हे त्यांचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावून श्रीमान विश्वासराव यांना श्रद्धांजली वाहीली. त्यामध्ये उद्योगपती शिवानंद साळगावकर, धेंपो उद्योग समूहाचे श्रीनिवास धेंपो,आमदार अनिल साळगावकर,सभापती प्रतापसिंह राणे,माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर, माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड.रमाकांत खलप, भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर,दक्षिण गोवा भाजप उपाध्यक्ष दिगंबर आमोणकर,मुरगावचे आमदार मिलिंद नाईक,उद्योजक नगीनभाई ठक्कर,वसंतराव ऊर्फ अण्णा जोशी, परेश जोशी आदी मंडळी उपस्थीत होती.
समाजाभिमुख उद्योगपती
गोवा मुक्तीपूर्व खाण व्यवसायाचा पाया रचून लोह खनिजाची आयात-निर्यात करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. खाण व्यवसायाबरोबर इतर व्यवसायातही त्यांनी उडी घेण्याचे धाडस करताना त्यातही त्यांनी निर्भेळ यश संपादन केले. राज्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना वृत्तपत्र व्यवसायातही प्रवेश करून "गोमन्तक' वर्तमानपत्र सुरू केले. आपल्या व्यवसायिक मार्गक्रमणात त्यांनी समाजाकडेही तेवढेच लक्ष देत समाजाप्रती आपले कर्तव्य बजावल्यानेच ते समाजाभिमुख उद्योगपती बनले.
गोवा मुक्त झाल्यावर येथील उद्योगांना योग्य दीशा व नियोजनाची गरज होती. त्यासाठी त्यांनी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजचा पाया रचला. त्यांनी आपला उद्योग गोव्यासह महाराष्ट्र,गुजरात आणि कर्नाटकातही पसरवून तिथेही आपला पाया रचला. शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. गोवा मुक्तीनंतर त्यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीने गोव्यात पहिले कॉलेज स्थापन केले. प्राथमिक,उच्च माध्यमिक शाळांबरोबर जहाजबांधणीलाही त्यांनी चालना दिली. या क्षेत्रात त्यांनी जबरदस्त नाव कमावले.
हजारोंचा पोशिंदा
सध्या चौगुले उद्योग समूहात सुमारे सहा हजार लोक कामाला आहेत. श्रीमान विश्वासराव चौगुले यांनी पाया रचलेल्या विविध उद्योगांमार्फत राज्यात सुमारे ५० हजार लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. यावरून त्यांच्या अचाट कर्तृत्वाची ओळख पटते.

श्रीपाद नाईक यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - उत्तर गोव्याचे खासदार व भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेश अध्यक्ष श्रीपाद नाईक यांच्या आजच्या वाढदिनी त्यांच्या सांपेद्र येथील निवासस्थानी त्यांचे असंख्य चाहते, हितचिंतक, मित्रपरिवार, कार्यकर्ते व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
श्री. नाईक यांच्या वाढदिनानिमित्ताने भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे तसेच अखिल गोवा पातळीवरील भजन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. सकाळी घेतलेल्या रक्तदान शिबिरात साठ दात्यांनी रक्तदान केले. तसेच संध्याकाळी रंगलेल्या भजन स्पर्धेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भजन स्पर्धेत अकरा पथकांनी भाग घेतला होता. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांची त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी होती.
राजकारणातील अजातशत्रू म्हणून परिचित असलेल्या श्री.नाईक यांना प्रत्यक्षदर्शी शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच त्यांच्या घरी त्यांच्या चाहत्यांची रिघ लागली होती. यात सामाजिक, राजकीय, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांचा समोवश होता. प्रत्यक्ष भेटू न शकलेल्या अनेकांनी आवर्जून दूरध्वनी करून राजकारणातील भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला वर्गही होता.
माजी मंत्री प्रकाश वेळीप, भाजप अल्पसंख्य मोर्चाचे अध्यक्ष शेख इब्राहीम मुसा, आमदार अनंत शेट, दामोदर नाईक, राजेश पाटणेकर, दयानंद सोपटे, लक्ष्मीकांत पार्सेकर, महादेव नाईक, माजी आमदार व मंत्री डॉ. सुरेश आमोणकर, डॉ. विल्फ्रेड मिस्किता, सदानंद तानावडे, माजी खासदार रमाकांत आंगले, कॉंग्रसेचे आमदार पांडुरंग मडकईकर, लेखक व साहित्यिक एन. शिवदास, मधुकर पोकू नाईक, प्राचाय४ सुभाष वेलिंगकर, फोंड्याच्या नगरसेविका राधिका नाईक, माजी सभापती विश्वास सतरकर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, भाजप महिला मोर्चाच्या सौ. कुंदा चोडणकर तसेच अनेक सरकारी अधिकारी, उत्तर व दक्षिण गोव्यातील सरपंच, पंच, जिल्हा पंचायत सदस्य आदींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. राजकारणातील आपल्या मित्रपरिवारासमवेत श्री. नाईक यांनी बराच वेळ गप्पागोष्टीही केल्या.

राष्ट्रपती राजवटीची ओरिसात शक्यता

नवी दिल्ली, दि. ४ - ओरिसात सुरू असलेल्या हिंसाचाराची तेथील राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतलेली दिसून येत नाही, तसेच आवश्यक ती कारवाई पण केेलेली दिसत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी म्हटले आहे. ओरिसात सुरू असलेल्या हिंसाचारावर एनडीटीव्हीशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ओरिसात सुरू असलेल्या हिंसाचारासंदर्भात तेथील सरकारला आतापर्यंत सहा वेळा इशारा देण्यात आलेला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी तेथील सरकारने कोणत्याही प्रकारची ठोस कृती न करणे म्हणजे हा घटनेचा भंग करणे होय. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी अशी मागणी चहूबाजूने होत आहे, असे शिवराज पाटील म्हणाले. ओरिसातील स्थिती आता आणखीनच खराब झाल्यास राष्ट्रपती राजवटीची मागणी सरकार मान्य करू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
ओरिसातील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राकडून पोलिस व इतर साधनसामग्री पुरविण्यात आली आहे, असे सांगून शिवराज पाटील पुढे म्हणाले की, ओरिसाकडे आम्ही सीमा सुरक्षा दलाच्या तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ७७ तुकड्या रवाना केलेल्या आहेत. राज्यातील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ठोस अशी कृती केली नाही म्हणून केंद्रीय गृहमंत्री पाटील यांनी काल पटनायक यांना चांगलेच फटकारले. वारंवार काही दिवसांच्या कालखंडानंतर पुन्हा पुन्हा केंद्राकडे अतिरिक्त दलांच्या तुकड्यांची मागणी करणे हा यावर उपाय नव्हे, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री पाटील पुढे म्हणाले की, राज्यात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी तेथील सरकारने एकू णच आपले सर्व धोरण बदलविले पाहिजे. दोन महिन्यांपूर्वी विहिंप नेत्याच्या हत्येनंतर ओरिसातील कंधमाल येथे हिंसेला प्रारंभ झाला. या हत्येनंतर राज्यातील ख्रिश्चन समुदायावर हल्ले होण्यास प्रारंभ झाला. कालही केेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओरिसातील हिंसाचारावर चिंता व्यक्त करण्यात आली व राज्याला सहकार्य म्हणून आणखी ५ हजार निमलष्करी जवान रवान करण्यात आले.

दोघा सुरक्षा रक्षकांचा काकोडा येथे खून

संशयितांना काही तासांतच पकडले
कुडचडे, दि. ४ (प्रतिनिधी)- काकोडा औद्योगिक वसाहतीतील "मोरपिर्ला प्रायव्हेट लिमिटेड युनिट २' या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या चंदन चौधरी (वय २५) व मनोजकुमार राय (वय २०) या मुळच्या झारखंडचे रहिवासी असलेल्या दोघा सुरक्षा रक्षकांचा खून झाला आहे. याप्रकरणी संशयित म्हणून याच कंपनीमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक गुमूरसिंग व दिमाशय ब्रह्मा (मुळचे रा. आसाम) यांना काही तासांतच कुडचडे पोलिसांनी सोलये काकोडा येथे पकडले.
दोन्ही संशयितांनी खुनाची कबुली दिली. चंदन व मनोजकुमार यांच्याकडून होणाऱ्या सतावणुकीला कंटाळून आम्ही हे कृत्य केले, असे गुमूर व दिमाशय यांनी पोलिसांना सांगितले.
आज सकाळी संबंधित कंपनीतील एक कर्मचारी सकाळी कामाला आला असता फॅक्टरीच्या प्रवेशद्वारासमोर चंदन चौधरीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. नंतर कंपनीकडून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला असता मयताच्या डोक्यावर लोखंडी पाईपचा प्रहार करून ठार केल्याचे आढळून आले. यानंतर पुढील तपास करण्यासाठी पोलिस सुरक्षा रक्षक राहात असलेल्या माधेगाळ काकोडा या घटनास्थळाहून सुमारे दीड किमी दूर असलेल्या भाड्याच्या खोलीत गेले असता मनोज कुमार राय याचा मृतदेह आत खोलीत आढळून आला. त्याचा झोपलेल्या अवस्थेत निर्घृण खून झाल्याचे पोलिसांनी आढळून आले व त्याच्यावर दंडुक्याने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मयत सुरक्षा रक्षक व अटक करण्यात आलेले संशयित खुनी हे चौघेही जणे बॉम्बे इंटिलिजंट सिक्युरिटी लिमिटेड या कंपनीसाठी काम करीत होते. याच कंपनीतर्फे मोरपोल कंपनीला हे चार सुरक्षा रक्षक पुरविण्यात आले होते. सुरक्षा कंपनीने माधेगाळ काकोडा येथे सुरक्षा रक्षकांना राहण्यासाठी भाड्याच्या खोलीची व्यवस्था केली होती.
खून झालेले दोघेही सुमारे अडीच महिन्यापूर्वी, तर दोघेही संशयित दोघेही दीड महिन्यापूर्वीच येथे सुरक्षा रक्षक म्हणून भरती झाल्यानंतर खोलीत राहात होते.
पोलिसांनी "अलिशा' या श्वानपथकाची तसेच ठसे तज्ज्ञाची मदत घेतली. यावेळी "अलिशा' या श्वानाने घटनास्थळाचा सुगावा घेत सुमारे दीड किलो मीटरचा पल्ला गाठून माधेगाळ येथील भाड्याच्या खोलीपर्यंत अचूक मार्ग दाखविल्यामुळे फरारी असलेले दोघे सुरक्षा रक्षकांबद्दलचा संशय आणखी बळावला. तपास सुरू असताना पोलिसांना दूरध्वनी फोनवरून सोलये काकोडा येथे दोघे अनोळखी व्यक्ती फिरत असल्याचे कळून येताच पोलिसांनी सोलये येथे दोघांना ताब्यात घेतले. तेव्हा फरारी असलेले हेच ते दोघे सुरक्षा रक्षक असे स्पष्ट झाले. यावेळी दोघा संशयितांची कसून चौकशी केली असता चंदन चौधरी याला गुमूर सिंग याने प्रवेशद्वाराजवळ लोखंडी पाईपच्या प्रहाराने तर मनोज कुमार याचा दिमाशय ब्रह्मा याने भाड्याच्या खोलीत लाकडी दंडुक्याने डोक्यावर प्रहार करून खून केल्याचे उघड झाले. यावेळी मनोज कुमार रात्री ९.३० वाजता भाडेपट्टीवर राहणाऱ्या मालकाच्या घरातून टिव्ही बघून गेला होता. खुनानंतर दोन्ही संशयित फरारी होते. पोलिसांनी ३०२ कलमान्वये दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
नागरिकांनी आज घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, मडगावचे उपअधीक्षक उमेश गावकर, केप्याचे उपअधीक्षक रोहिदास पत्रे, कुडचडेचे पोलिस निरीक्षक नीलेश राणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.