Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 30 May 2009

आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली शरीरविक्रय

मुंबईच्या तरुणीला सापळा रचून अटक
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - गोव्यातील एका इंग्रजी दैनिकात "आयुर्वेदिक मसाज' करण्याची जाहिरात देऊन वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी एका तरुणीला पणजी पोलिसांनी काल मध्यरात्री पणजी कदंब बसस्थानकाच्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. अटक केलेल्या तरुणीचे नाव कविता पांडिलकर (२९) असे असून ती मूळ मीरा रोड, ठाणे मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी दिली.
फेब्रुवारी २००९ पासून मेरशी येथे एका भाड्याच्या खोलीत राहून ती हा व्यवसाय करीत होती. गेल्या एका महिन्यापासून पोलिस तिच्या मागावर होते. प्राप्त माहितीनुसार इंग्रजी दैनिकातील छोट्या जाहिराती येणाऱ्या पानावर आयुर्वेदिक मसाज करण्याची जाहिरात देऊन तिने आपला व्यवसाय जोमाने चालवला होता. दिवसाला शंभर रुपये भरून ही जाहिरात दिली जायची. त्या जाहिरातीच्या खाली "श्रेया' असे नाव देऊन मोबाईल क्रमांकही देण्यात आला होता. ही बाब काही पत्रकारांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा सापळा रचला. गेल्या काही दिवसापासून ते या तरुणीच्या संपर्कात होते. गेल्या पंधरा दिवसापासून ती पोलिसांना झुलवत होती. मात्र काल मध्यरात्री ती पणजी कदंब बसस्थानकावर आली असता तिला महिला पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.

जनतेवर आता करांचा बोजा

जगायचे कसे, हाच सामान्यांपुढील यक्षप्रश्न

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - एकीकडे महागाई कडाडलेली असतानाच जगायचे कसे असा प्रश्न सामान्यांपुढे उभा राहिलेला असतानाच विद्यमान कॉंग्रेस सरकारने करवाढीचे सूतोवाच केले आहे. राज्याची आर्थिक तूट भरून काढण्यासाठी नव्या महसूलप्राप्तीचे मार्ग शोधून काढणे अपरिहार्य आहे. पुढील आठवड्यात खास अधिसूचना जारी करून या करांची शिफारस वित्त खात्यातर्फे करण्यात येईल,असे सूतोवाच वित्त सचिव उदीप्त रे यांनी केले. आर्थिक तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारला कडक पावले उचलावी लागणार आहेत व त्याची झळ काही प्रमाणात जनतेला पोहोचेल अशी कबुलीही त्यांनी यावेळी दिली.
गोवा विधानसभा वित्त खात्याच्या अस्थायी समितीसमोर ते बोलत होते. भाजप विधिमंडळ गटाचे उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांनी, आर्थिक तूट भरून काढण्यासाठी सरकारने कोणत्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली होती. यावेळी समितीचे सदस्य आमदार दिलीप परूळेकर हजर होते. आमदार श्री. डिसोझा, मयेचे आमदार अनंत शेट तसेच अनेक नागरिकांनी या बैठकीत भाग घेतला. देशात सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्याने राज्य सरकारला अंतरिम अर्थसंकल्प सादर करणे भाग पडले होते. या अर्थसंकल्पात महसूल प्राप्तीसाठी लादण्यात येणाऱ्या करांची घोषणा करणे शक्य नव्हते त्यामुळे येत्या विधानसभा अधिवेशनात पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात येईल,अशी माहितीही श्री. रे यांनी दिली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सुमारे ३३९.५७ कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प गेल्या २३ मार्च रोजी विधानसभेत सादर केला होता. ५१९६.७५ कोटी रुपये उत्पन्न व ५९३९.३२ कोटी खर्च, त्यामुळे ही तूट ७४२.५७ कोटी रुपयांवर येत होती. त्यात केंद्र सरकारकडून आर्थिक साहाय्याच्या रूपाने ४०३ कोटी रुपये मिळणार असल्याने अंतिमतः एकूण ३३९.५७ कोटी रुपयांची महसुली तूट राज्यावर ओढवली आहे. मुळात राज्यावरील सरकारी कर्जांचा आकडा वाढत चालला आहे. हा आकडा सध्याच्या परिस्थितीत सुमारे ५ हजार कोटी रुपयांवर पोहचला आहे.जागतिक आर्थिक मंदी,मुंबई दहशतवादी हल्ला,सहावा वेतन आयोग आदींमुळे राज्याचा आर्थिक डोलारा काहीसा अस्थिर बनला आहे.कॉंग्रेस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० केल्याने यावर्षी सुमारे एक हजार कर्मचारी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी सुमारे ७४१ कोटी रुपये निवृत्ती वेतनासाठी लागणार आहेत.सहाव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजाही वाढला आहे.सहाव्या वेतन आयोगामुळे पगारासाठी वर्षाकाठी २५ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येणार आहे व त्यात थकबाकीसाठीही अतिरिक्त पैशांची गरज सरकारला भासणार आहे.राज्याच्या आर्थिक नियोजनावर सरकारचे अजिबात नियंत्रण राहिले नाही. येत्या वर्षाकाठी आर्थिक तुटीचा हा आकडा एक हजार कोटी रुपयांवर पोहोचेल, अशी भीती विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी अर्थसंकल्पावेळी व्यक्त केली होती.
कर लादणार, पण लोकांवर बोजा नाही ः मुख्यमंत्री
सहावा वेतन आयोग व अन्य काही कारणांमुळे निर्माण झालेली महसूल तूट भरून काढण्याासाठी अतिरिक्त कर लादणे अपरिहार्य जरी असले तरी या करांचा बोजा राज्यातील सामान्य जनतेला बसणार नाही,याची काळजी आपण घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. महसूलप्राप्तीसाठी विविध योजनांची घोषणा पुढील अधिवेशनात सादर करण्यात होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पावेळी केल्या जातील,असेही ते म्हणाले. गेल्यावेळी केवळ चार महिन्यांसाठीचे लेखानुदान सादर करण्यात आल्याचेही ते म्हणाले.सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आल्याने सरकारी तिजोरीवर अतिरिक्त बोजा वाढला आहे.हा बोजा भरून काढण्यासाठी निश्चित महसूल प्राप्तीचे नवे स्त्रोत्र शोधून काढणे गरजेचे आहे व त्याचा शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.सहाव्या आयोगामुळे थेट २५ कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विक्री कर व मूल्यवर्धित कराच्या रूपाने अतिरिक्त प्राप्ती झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचेही ते म्हणाले.

म्हार्दोळच्या डोंगरात "तिचा' गळा आवळला

महानंदने दिली पंधराव्या खुनाची कबुली

फोंडा, दि. २९ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने पंधराव्या खुनाची कबुली दिली आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी आज (दि.२९) दिली आहे.
कुंकळ्ये म्हार्दोळ येथे डोंगराळ भागात डिसेंबर २००५ मध्ये एका युवतीचा आपण खून केलेला आहे. त्या युवतीचे नाव आपणाला आता आठवत नाही, अशी माहिती क्रूरकर्मा महानंद नाईक याने दिली आहे. या माहितीची पोलिसांनी शहानिशी केली असता ३० डिसेंबर २००५ मध्ये कुंकळ्ये म्हार्दोळ येथे डोंगरावर एका युवतीचा मृतदेह सापडला होता.
खून करण्यात आलेली युवतीचे हातुर्ली मठाजवळ घर आहे, असे तिने आपणाला सांगितले होते. सदर युवती मडगाव येथून तयार कपडे आणून विकण्याचा व्यवसाय करीत होती, असेही महानंद याने पोलिसांना सांगितले आहे. सदर युवती फोंडा भागात कपडे विकण्याचे काम करीत असताना तिच्याशी आपला परिचय झाला. महानंदने तिचा आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून तिला कुंकळ्ये म्हार्दोळ येथे डोंगरावर नेऊन तिचा गळा आवळून खून केला.
सदर युवतींच्या अंगावर क्रिम रंगाचा चुडीदार सापडलेला आहे.
महानंदाच्या जबानीप्रमाणे चौकशी केली असता "त्या' ठिकाणी कुजलेला मृतदेह पोलिसांना २००५ सालात आढळून आलेला आहे. मृतदेह सापडलेल्या युवतीचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे दरम्यान आहे. सदर मृतदेहाची ओळख पटलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर मृत्यू प्रकरणाची फाईलबंद केली. आता पुन्हा एकदा सदर फाईल उघडून युवतीसंबंधी माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. महानंद याने खून केलेल्या पंधराव्या युवतीचे नाव अद्याप उघड झालेले नाही. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार तपास काम हाती घेण्यात आले असून खून करण्यात आलेल्या युवतीच्या घराचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल.पाटील तपास करीत आहेत.
दरम्यान , रिवण येथील कु. निर्मला आमोलकर खून प्रकरणी महानंद नाईक याची कसून चौकशी करण्यात आली. क्रूरकर्मा महानंद नाईक याला आज सकाळी वेर्णा येथे घटनास्थळी नेण्यात आला होता. क्रूरकर्मा महानंद नाईक प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालल्याने ह्या खुनाची मालिका कधी खंडित होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने हाताळून महानंद याला कठोर शिक्षा देऊन खून करण्यात आलेल्या युवतींच्या कुटुंबीयांना दिलासा द्यावा, अशी लोकांची मागणी आहे.

मनोहर पर्रीकर यांना आयसीयूतून डिस्चार्ज

मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी) - गेल्या मंगळवारी येथील अपोलो व्हिक्टर हॉस्पितळात अँजियोप्लास्टी केलेले विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना आज अतिदक्षता विभागातून पहिल्या मजल्यावरील खोलीत हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झालेली असली तरी लोकांना त्यांची भेट घेण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. इस्पितळाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवून त्यांना रविवारी घरी जाऊ दिले जाईल, अशी शक्यता आहे.
आजही पर्रीकरांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी अपोलोत गर्दी उसळली होती. त्यांत राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक, मयेचे आमदार अनंत शेट, माजी आमदार नरहरी हळदणकर, फातिमा डिसा, महिला कॉंग्रेस अध्यक्षा मोनिका डायस आदींंचा समावेश होता.

"कदंब'प्रश्नी तोडग्यासाठी सरकारला १२ पर्यंत मुदत

पणजी, दि.२९ (प्रतिनिधी) - कदंब वाहतूक महामंडळ नफ्यात आणण्यासाठी कर्मचारी संघटनेकडून कोणत्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत, याची सर्वांत पहिल्यांदा आपल्याला माहिती हवी. केवळ सहावा वेतन आयोग लागू करण्याची एकमेव मागणी घेऊन आंदोलन छेडणे अयोग्य आहे. या मागणीबाबत निर्णय घेण्यासाठी आपल्याला एका महिन्याची मुदत हवी,असे स्पष्ट मत वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले. तथापि, हा विषय येत्या १२ जूनपर्यंत सुटला नाही तर पुढील परिणामांना सरकार जबाबदार ठरेल,असे प्रतिआव्हान देत कदंब महामंडळ कर्मचारी संघटनेकडून आज सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना लागू करण्याची मागणी करीत या कर्मचारी संघटनेतर्फे गेल्या काही महिन्यांपासून तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून त्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते व यासंबंधी कामगार आयुक्तांसमोर बैठकाही सुरू झाल्या होत्या. आता लोकसभा निकाल झाल्यानंतर सरकारकडून या मागण्या पूर्ण करण्याबाबत हयगय केली जात असल्याने हे कर्मचारी संतप्त बनले आहेत. काल कामगार आयुक्तांसमोरील बोलणी फिसकटल्याने संघटनेचे सदस्य वैतागले व त्यांनी तात्काळ पणजी कदंब बसस्थानकावर एकत्र होण्याचा निर्णय घेतला. आज त्यांनी थेट पर्वरी येथील महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, संघटनेचे अध्यक्ष जोकीम फर्नांडिस व इतर पदाधिकारी हजर होते. यावेळी त्यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस.व्ही.नाईक यांची भेट घेतली. त्यानंतर संघटनेचे एक शिष्टमंडळ वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या भेटीसाठी विधानसभेत पोहचले. ढवळीकर यांनी याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी एक महिन्याची मुदत मागितली. यावेळी श्री.फोन्सेका यांनी केवळ १२ जूनपर्यंत सरकारला मुदत देत असल्याचे सांगून अन्यथा होणाऱ्या परिणामांना राज्य सरकार जबाबदार असेल,असा इशारा दिला.

पूजा नाईक विरोधात वातावरण तापू लागले

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - "सीरियल किलर' महानंद नाईक याच्या पापकर्मात पत्नी पूजा नाईक हिचा सहभाग असल्याचे उघड होत चालल्याने तिच्याविरोधात महिलावर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
पैसे आणि सोन्याच्या लोभापायी मुलींची हत्या करण्यासाठी सावज हेरून ते आपल्या पतीला पुरवणे हे अत्यंत नीच कृत्य पूजा करीत असल्याच्या संशयावरून तिला त्वरित अटक करून चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, फोंडा परिसरात गेल्या वर्षभरात तरुणींनी केलेल्या आत्महत्या प्रकरणांची चौकशी पुन्हा नव्याने करण्याची मागणी करण्यात येत आहे. बेपत्ता होणाऱ्या तरुणींच्या हत्येमागे महानंद नाईक असल्याचे स्पष्ट झाल्याने फोंडा तालुक्यात गेल्या वर्षभरात तरुणींनी केलेल्या आत्महत्ये मागील "ती' व्यक्ती कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी महिलांनी केली आहे. महानंदसारखाच तरुणींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा आणखी कोणी नराधम तेथे वावरत नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षभरात फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत अनेक तरुणींनी आत्महत्या केली आहे. त्यातच एका सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या तरुणीने केलेली आत्महत्या "गाजली' होती. फोंडा परिसरातील काही महिलांनी या आत्महत्येमागे काळेबेरे असल्याची शक्यता व्यक्त करून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. मात्र त्यावेळी फोंडा पोलिस स्थानकाच्या संबंधित निरीक्षकांनी मुख्य संशयिताला उजळ माथ्याने फिरण्यासाठी रान मोकळे करून दिले होते. बेपत्ता होणाऱ्या आणि तरुणींचा मृतदेह सापडल्यानंतर अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून फाइली बंद केल्या गेल्या. त्याचप्रकारे तरुणींनी केलेल्या आत्महत्यांच्याही फाईली बंद करण्यात आल्या आहेत. तथापि, सौंदर्य स्पर्धेत भाग घेतलेल्या तरुणीने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण जोर धरू लागल्याने ते गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले होते. यावेळी तपासाची जबाबदारी गुन्हा अन्वेषण विभागाच्या महिला निरीक्षक सुनिता सावंत यांच्याकडे सोपवण्यात आली होता. हा तपास सुरू असताना पोलिसांच्या हाती त्या तरुणीचे विचित्र अवस्थेतील छायाचित्रही लागले होते. तथापि, ते छायाचित्र कोणी काढले होते, याचा तपास झालाच नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची मागणी होत आहे.

बस्स झाली, सरकारकडून कलाकारांची उपेक्षा

पुरस्कार देऊन जबाबदारी झटकू नका - किशोरी आमोणकर

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) ः परदेशात जाऊन पैसे कमावण्याची पाळी भारतीय कलाकारांवर यावी ही लाजिरवाणी बाब आहे. मायदेशी त्यांना सरकारी मदत मिळत नाही म्हणून ते परदेशात जातात. सरकारने "भारतरत्न' किंवा "पद्मभूषण' पुरस्कार दिले म्हणून कलाकाराच्या विवंचना मिटल्या असे होत नाही, असे सडेतोड मत आज गान सरस्वती पद्मभूषण किशोरी आमोणकर यांनी व्यक्त केले. उद्या दि. ३० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता कला अकादमीत होणाऱ्या "ऍन इव्हनिंग वुईथ मास्टर्स' या कार्यक्रमाच्या निमित्त "एसएनके'या कार्यक्रम आयोजन संस्थेने आयोजिलेल्या पत्रपरिषदेत त्या बोलत होत्या.
पद्मभूषण पुरस्कारप्राप्त कलाकारांना विमानतळावरही सूट नाही. मात्र चित्रपटातील कलाकारांना थेट जाण्यासाठी वेगळा मार्ग उपलब्ध करून दिला जातो. प्रतिभावंत कलाकारांनी भारताचे नाव केले आहे की, या फिल्मी तारकांनी, असा मूलभूत प्रश्नही यावेळी किशोरी आमोणकर यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांच्याबरोबर कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराजा कॅसिनोचे जॉन स्नोबॉल, सिदाद द गोवा चे केविन रॉड्रिगीस, बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक राजीव फणसे व "एसएनके'च्या सुमेधा देसाई उपस्थित होत्या.
किशोरी आमोणकर म्हणाल्या की, संगीत हे युद्धासाठी किंवा स्पर्धेसाठी नाही. सध्या जे चालले आहे ते आत्मा रिझवरणारे संगीत नसून ते केवळ मनोरंजनाचे साधन बनले आहे. या स्पर्धा म्हणजे अळवावरचे पाणी आहे. गंगाजलाचा एक छोटा चमू देव्हाऱ्यात ठेवून आमच्याकडे गंगा आहे, असे म्हणण्याचा हा प्रकार. ज्यांना सागराची अथांगता अनुभवायची आहे त्यांनी शास्त्रीय संगीताकडे वळावे. प्रामुख्याने नवोदित गायकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी.
साधना म्हणजे रियाज नाही. मी माझे गाणे बदलले. मात्र या बदलाची चाहून घेण्यासाठी एकही गोमंतकीय विद्यार्थी पुढे आला नाही याची मला खंत वाटते. योग्य पद्धतीने शिकवले जाता नाही, म्हणून एकही कलाकार मोठा होत नाही. संगीताचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी याचा विचार करावा. अनेक मोठ मोठ्या कलाकारांनी परदेशात अकादमी सुरू केली आहे. तथापि, विदेशात कोणी उत्तम प्रकारे शास्त्रीय संगीत गातो, असे दिसत नाही, असे त्या म्हणाल्या.
संगीतात काळानुसार बदल होणार. मात्र ज्या हेतूने भारतीय संगीत जन्माला आले आहे, तेच बदलले तर परंपरा राहणार नाही. भारतीय शास्त्र, कला जपण्यासाठी याचा विचार झाला पाहिजे. शब्द हा विश्वव्यापी नसून ध्वनी विश्वव्यापी आहे. राग हा शब्दांचा नसतो तर, तो स्वरांचा होतो. मात्र गेल्या काही काळात स्वरांना शब्दांची गुलामगिरी पत्करावी लागली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
"ऍन इव्हनिंग वुईथ मास्टर्स' या कार्यक्रमाची मूळ संकल्पनाच किशोरी आमोणकर यांना नजरेसमोर ठेवून उदयास आली. चांगले गाणे गोमंतकीयांसमोर ठेवण्याचा विचार होता. पूर्वीचे कार्यक्रम जलसारुपी असायचे. त्यावेळी मैफल म्हणजे काय, हे लक्षात यायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गोव्यात दीड तासाचे एक सत्र अशा पद्धतीने कलाकार गात असल्याने मैफलीची परंपरा मोडीत निघाली आहे. म्हणून ही संकल्पना पुढे ठेवून कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सौ. देसाई म्हणाल्या.
स्थानिक संस्कृतीला, संगीताला प्रोत्साहन देणे ही आमची आवड असून ती आमची जबाबदारीही आहे, असे महाराजा कॅसिनोचे जॉन स्नोबॉल म्हणाले.

Friday, 29 May 2009

निर्मला, भागूचा खुनी महानंदच!

पत्नीचाही सहभाग
१४ खुनांची कबुली
संख्या वाढत चालली
राय येथील खुनांतही
महानंदचा हात?


फोंडा, दि.२८ (प्रतिनिधी) - रिवण येथील निर्मला रामू आमोणकर (३२) हिचा २००८ सालात आणि सातपाल साकोर्डा तांबडीसुर्ला येथील कु. भागू उपसकर (३५) हिचा २००७ सालात खून केल्याची कबुली क्रूरकर्मा महानंद नाईक याने आज (दि. २८ रोजी) दिली आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक शेराफीन डायस यांनी दिली आहे. सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने केलेल्या युवतींच्या खुनाची संख्या आता १४ झाली असून ही संख्या वाढतच जात आहे.
निर्मला आमोणकर हिचा खून २००८ सालात वेर्णा पोलिस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आला होता. निर्मला हिचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह वेर्णा पोलिसांना सापडलेला असून त्या मृतदेहाची ओळख सुद्धा त्याच वेळी पटविण्यात आलेली आहे. घरातून जाताना ती सोन्याचे दागिने घेऊन गेली होती, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. निर्मला लग्नाला जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. मात्र, निर्मला लग्नाला गेलेली नाही, असे समजताच नातेवाइकांनी केपे पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चार दिवसांनी वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत तिचा मृतदेह आढळून आला होता. निर्मला हिच्या कुटुंबीयांकडून महानंदवर संशय घेतला जात होता. निर्मला हिला आपले एक दुकान असल्याची माहिती त्याने दिली होती. निर्मला बेपत्ता झाल्यानंतर निर्मलाच्या भावाने त्यांना दाखविण्यात आलेल्या दुकानावर जाऊन चौकशी केली असता सदर दुकाने दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे आढळून आले होते.
सातपाल साकोर्डा तांबडीसुर्ला येथील भागू उपसकर हिचा २००७ सालात खून केल्याचे महानंद नाईक याने उघड केले आहे. भागू बेपत्ता झाल्याची माहिती फोंडा पोलिसांना २७ मे ०९ रोजी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून सत्य उजेडात आणले आहे. भागू हिचा केपे येथे एका शेत बागायतीच्या बाजूला खून करण्यात आला होता. भागू हिचा खून केलेली जागा महानंद याने पोलिसांना नकाशा काढून दाखविली असून तेथूनच एका अनोळखी युवतीचा मृतदेह केपे पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. भागू ही फोंडा येथे घरकामाला होती, त्याच भागात क्रूरकर्मा महानंद नाईक वावरत होता. भागूला सुद्धा त्याने आपल्या जाळ्यात ओढले होते, घरातून जाताना ती सोन्याचे दागिने घेऊन गेली होती. यासंबंधी सविस्तर माहिती मिळविण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. भागू बेपत्ता प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केपे पोलिसांनी मयताची ओळख न पटल्याने अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करून फाईल बंद केली होती, अशी माहिती मिळाली आहे.
सीरियल किलर महानंद नाईक याने खून केलेल्या युवतीची संख्या वाढत चालली असून केवळ महिनाभराच्या तपासाच्या काळात १४ खुनांची प्रकरणे उघड झाली आहेत. याचबरोबर एका युवतीवरील बलात्काराचे प्रकरण तसेच अन्य एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून लुबाडण्याचे एक प्रकरणही उघड झाले आहे. क्रूरकर्मा महानंद नाईक खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीची योग्य पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. क्रूरकर्मा महानंद याने सुरुवातीला खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांपासून खरी माहिती जास्त काळ लपवून ठेवू शकला नाही. क्रूरकर्मा महानंद याने लग्नाचे आमिष दाखविल्याने गरीब कुटुंबातील युवती सुखी संसाराची स्वप्ने रंगवत घरातील सोने घेऊन क्रूरकर्मा महानंद नाईक याच्या समवेत जात होत्या.
क्रूरकर्मा महानंद नाईक याला एका चोरी प्रकरणात २००२ सालात फोंडा पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी संशयिताच्या भावांनी तक्रारदारावर दबाव आणून तक्रारीतून अंग काढून घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे सदर प्रकरणातून महानंद सुटला होता. याच वेळी पोलिसांनी महानंद याची कसून चौकशी केली असत तर एवढे मोठे युवतींचे हत्याकांड घडले नसते. मडकई येथील वासंती गावडे बेपत्ता प्रकरणाच्या वेळी सुद्धा पोलिसांनी महानंदची योग्य चौकशी केली नाही, अशी चर्चा लोकांत सुरू आहे. पोलिसांच्या योग्य तपासाच्या अभावामुळे क्रूरकर्मा महानंद निर्ढावला. आता या प्रकरणातून क्रूरकर्मा महानंद सुटू नये म्हणून कसून तपास करण्याची मागणी लोकांकडून केली जात आहे.
सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या युवतींचे गळे आवळून महानंद त्यांची शोकांतिका करून टाकत होता. क्रूरकर्मा महानंद गरीब घराण्यातील मुलींची शोधून निवड करायचा, असे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, लक्षी आमोणकर, तुकाराम चव्हाण, निखिल पालेकर, संजय पाटील, सचिन लोकरे, सचिन पन्हाळकर, हेडकॉन्स्टेबल प्रताप परब तपास करीत आहेत.




दीपाली प्रकरणी गुन्हा नोंदीचे आदेश



मडगाव, दि.२८ (प्रतिनिधी): रुमडामळ दवर्ली येथून २००७ मध्ये बेपत्ता झालेल्या दीपाली जोतकर प्रकरणी सीरियल किलर महानंद नाईक विरुद्ध अपहरण व खुनाचा (कलम ३६४ व ३०२) गुन्हा नोंदविण्याचा आदेश आज दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी मायणा कुडतरी पोलिसांना दिला. तसेच दीपालीची बहीण पल्लवी हिच्या बेपत्ता प्रकरणी नव्याने तपास सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, राय येथे अशाच अवस्थेत सापडलेल्या तरुणीचा मृतदेह हासुद्धा खुनाचाच प्रकार असावा व त्यात महानंदचा हात असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. महानंदला येथे आणल्यावर या प्रकरणाचाही उलगडा होईल अशी आशा पोलिस बाळगून आहेत.
महानंद याने परवा फोंडा पोलिसांना दीपाली प्रकरणी दिलेल्या जबानीवरून त्याने तिचा माड्डेमळ फातर्पा येथे खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्या जबानीची त्या दिवसात त्या परिसरांत मिळालेल्या मानवी सांगाड्याच्या अहवालाशी सांगड घालून अधीक्षक डिसा यांनी हा आदेश दिला आहे.
जानेवारी २००७ मध्ये दीपालीचा अर्धनग्न अवस्थेतील सांगाडा मिळालेला असला तरी कपडे सोडल्यास ओळख पटविणारी दुसरी कोणतीच बाब नसल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद करून ते प्रकरण उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून दिले होते. एवढेच नव्हे तर पोलिसांनी नंतर काहीच ओळख मिळत नसल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विनंतीही केली होती असे आता उघड झाले आहे.
दीपाली घरातून रोख ८० हजार व लाखभराचे दागिने घेऊन गेली होती. तिने मित्राबरोबर जात असल्याची चिठ्ठी ठेवल्याने पोलिसांनीही त्यावेळी त्या प्रकरणाचा पाठपुरावा केला नव्हता. कुंकळ्ळी पोलिसांनीही मिळालेल्या मृतदेहाचे कोडे सोडविण्याची तसदी घेतली नाही. एवढेच नव्हे तर मृतदेहाचा व्हिसेरा चिकित्सेसाठी पाठविल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याचा अहवाल कोठे आहे याबद्दल माहिती देण्याच्या मनःस्थितीत कोणीच नाही.
दुसरीकडे दीपाली जरी दवर्लीतून बेपत्ता झालेली असली तरी तिचा मृतदेह फातर्पा येथे सापडल्यामुळे या प्रकरणाचा तपास मायणा कुडतरी की कुंकळ्ळी पोलिसांनी करावा याबाबत निर्माण झालेला प्रश्न पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण मायणा कुडतरी पोलिसांकडे सुपूर्द करून सोडविला आहे.
महानंदला फोंडा पोलिसांकडून ताब्यात घेऊन येथे आणून या प्रकरणाचे कोडे सोडविले जाईल व तपास केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
दुसरीकडे दीपालीची बहीण पल्लवी हिच्या बेपत्ता होण्याशीही महानंदचाच हात असण्याची जी शक्यता "बायलांचो एकवट'च्या आवडा व्हिएगश यांनी व्यक्त केली आहे त्या प्रकरणी तपास करण्याची सूचना पोलिस अधीक्षकांनी मायणा कुडतरी पोलिसांना दिली आहे.

महानंदला "सावजा'चा "पुरवठा' पूजाकडूनच!

प्रीतेश देसाई
पणजी, दि. २८ - पूजा नाईक ऊर्फ पूजा कामत हीच "सीरियल किलर' असलेला आपला नवरा महानंदला नाईक याला खून करण्यासाठी "सावज' पुरवत होती, याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून दिपाली जोतकरच्या घरी जाऊन घरातील लोकांचा विश्वास संपादन करण्याचे काम पूजा करीत होती, अशी माहिती मिळाली आहे. पूजा ही दिपालीच्या घरी गेल्याचे छायाचित्र मिळाले असून आपल्या मुलीच्या खुनात सहआरोपी म्हणून पूजालाही अटक करावी, अशी मागणी दिपालीची आई रेश्मा जोतकर यांनी केली आहे.
छायाचित्रात केशरी साडी नेसलेली पूजा नाईक स्पष्ट दिसत असून तिच्या मांडीवर डोके ठेवून झोपलेली व्यक्ती म्हणजे दिपालीचे वडील आहेत. तसेच मध्यभागी बसलेला तरुण हा दिपालीचा भाऊ भुपेंद्र असून त्याला टेकून बसलेली व्यक्ती म्हणजेच महानंद नाईक.
"पूजा अनेकदा आमच्याकडे आली आहे. आपण सरकारी नोकरीत असल्याचे तिने सांगितले होते. माझ्या मुलीच्या ओळखीने ती पहिल्यांदा आमच्या घरात आली. मी तेव्हा कामानिमित्त परदेशी होते. २००४ मधे मी गोव्यात आले, त्यावेळी माझा मुलगा भुपेंद्र याच्या वाढदिवसालाही ती आमच्याकडे आली होती. त्यावेळी हे छायाचित्र काढण्यात आले होते' अशी माहिती सौ. रेश्मा यांनी दिली.
मी विदेशातून येताना कमावलेली काही रक्कम घेऊन आले होते. त्यावेळी मी सोन्याचे दागिने केले होते, याची माहिती पूजा व महानंदला होती. २००५ मध्ये पल्लवी ही दिपालीची मोठी बहीण बेपत्ता झाली. त्यानंतर पूजा आणि महानंद आमच्याकडे येण्याचे एकाएकी बंद झाले. त्यानंतर वर्षभराने दिपाली बेपत्ता झाली. या एका वर्षाच्या काळात महानंद दिपालीला कामाच्या ठिकाणी येऊन भेटतच होता. पूजाचाही या प्रकरणात हात असून तिला पोलिसांनी ताब्यात घेऊन माझी मोठी मुलगी पल्लवी कुठे आहे, याची चौकशी करावी, अशी मागणी रेश्मा हिने केली आहे.

मनमोहन सिंग यांच्या "जम्बो' मंत्रिमंडळाचा शपथविधी

नवी दिल्ली, दि. २८ - पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, गेल्या काही दिवसांपासून या ना त्या कारणाने टळत असलेल्या नव्या मंत्रिमंडळाचा अखेर गुरुवारी पहिला विस्तार केला. त्यात ५९ खासदारांनी शपथ घेतली. त्यात १४ कॅबिनेट, सात स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि ३८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनाच्या अशोका सभागृहात राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सर्वप्रथम हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग आणि त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शपथ घेतली. नव्या ५९ सदस्यांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर पंतप्रधानांसह एकूण मंत्र्यांची संख्या ७९ अशी "जम्बो' झाली आहे. राज्यघटनेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळात अधिकाधिक ८१ सदस्य राहू शकतात हे विशेष. त्यामुळेच भविष्यातील शक्यता गृहित धरून दोन कॅबिनेट मंत्रिपदे रिक्त ठेवण्यात आली आहेत.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांच्यात बैठकीच्या अनेक फैरी झडल्या. त्यानंतरच मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी अंतिम यादी राष्ट्राध्यक्षांकडे पाठविण्यात आली. यावेळी उत्तर प्रदेशच्या वाट्याला एकही कॅबिनेट मंत्रिपद येऊ शकले नाही. केवळ सलमान खुर्शीद व श्रीप्रकाश जयस्वाल यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपद मिळाले आहे. तेथेच जितिन प्रसाद, आरपीएन सिंग आणि प्रदीप जैन यांच्याकडे राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्र सरकारमध्ये दिल्लीतून प्रथमच तीन मंत्र्यांना स्थान मिळाले आहे. खासदार कृष्णा तीरथ यांना स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्रिपद तर अजय माकन यांना राज्यमंत्रिपद मिळाले आहे. कपिल सिब्बल यांनी यापूर्वीच कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हरयाणा येथील कुमारी शैलजा यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. पूर्वीच्या संपुआ सरकारमध्ये त्या स्वतंत्र प्रभार असलेल्या राज्यमंत्री होत्या. उत्तराखंड येथून एकट्या हरीश रावत यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. पंजाबातून एम.एस.गिल यांना पदोन्नती देऊन राज्यमंत्री बनविण्यात आले आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अंबिका सोनी यांना पूर्वीच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. चंदीगड येथील खासदार पवन कुमार बंसल यांनाही पदोन्नती देऊन कॅबिनेट मंत्री बनविण्यात आले आहे.


कॅबिनेट मंत्री
वीरभद्र सिंग - पोलाद
फारूक अब्दुल्ला - अपारंपारिक ऊर्जा
विलासराव देशमुख - अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
गुलाम नबी आझाद - आरोग्य आणि कुटुंब कल्याण
सुशीलकुमार शिंदे - ऊर्जा
वीरप्पा मोईली - कायदा व न्याय
एस. जयपाल रेड्डी - नगर विकास
कमल नाथ - रस्ते वाहतूक आणि महामार्ग
वायलर रवी - परराष्ट्र भारतीय कामकाज
मीरा कुमार - जलसंपदा
अंबिका सोनी - माहिती आणि प्रसारण
दयानिधी मारन - वस्त्रोद्योग
ए. राजा - दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान
मल्लिकार्जून खडगे - कामगार आणि स्वयंरोजगार
कुमारी शैलजा - गृहनिर्माण आणि दारिद्र्‌य निर्मूलन, पर्यटन
सुबोध कांत सहाय - अन्न प्रक्रिया उद्योग
एम. एस. गिल - युवा आणि क्रीडा
जी. के. वासन - जहाजबांधणी
पवनकुमार बन्सल - संसदीय कामकाज
मुकूल वासनिक - सामाजिक न्याय
कांतिलाल भुरिया - आदिवासी विकास
एम . के . अझागिरी - रसायने आणि खते
कपिल सिब्बल - मनुष्यबळ विकास
बी. के. हंडिके - खनिज, उत्तर पूर्व विकास
आनंद शर्मा - व्यापार आणि उद्योग
सी. पी. जोशी - ग्रामविकास आणि पंचायत राज

स्वतंत्र खात्याचे राज्यमंत्री
प्रफुल्ल पटेल - हवाई वाहतूक
पृथ्वीराज चव्हाण - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पंतप्रधान कार्यालय, पेन्शन, संसदीय कामकाज
श्रीप्रकाश जैसवाल - कोळसा
सलमान खुर्शिद - अल्पसंख्याक मंत्री
दिनशा पटेल - लघु आणि मध्यम एंटरप्रायझेस
जयराम रमेश - पर्यावरण आणि वन
कृष्णा तीर्थ - महिला आणि बालविकास

राज्यमंत्री
श्रीकांत जेना - रसायन आणि खते
मलपल्ली रामचंद्रन - गृह
अजय माकन - गृह
ई . अहमद - रेल्वे
के . एच . मुनियप्पा - रेल्वे
नामो नरेन मिना - अर्थ
एस . पालनीमनीकम - अर्थ
व्ही . नारायणस्वामी - योजना आणि संसदीय कामकाज
ज्योतिरादित्य शिंदे - वाणिज्य आणि उद्योग
डी . पुरंदेश्वरी - मनुष्यबळ विकास
प्रंबका लक्ष्मी - वस्त्रोद्योग
एम . एम . पल्लम राजू - संरक्षण
सुगाता राय - नगर विकास
जतीन प्रसाद - पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
ए . साई प्रताप - पोलाद
प्रनीत कौर - परराष्ट्र व्यवहार
शशी थरूर - परराष्ट्र व्यवहार
गुरुदास कामत - दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान
सचिन पायलट - दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान
हरिश रावत - कामगार आणि स्वयंरोजगार
प्रा . के . व्ही . थॉमस - कृषी , ग्राहक कल्याण , अन्न आणि नागरी पुरवठा
भारतसिंह सोळंकी - ऊर्जा
महादेव खंडेल - रस्ते आणि महामार्ग
आर . पी . एन . सिंग - रस्ते आणि महामार्ग
दिनेश त्रिवेदी - आरोग्य आणि कुटुंब कल्याण
एस . गांधीसेल्वम - आरोग्य आणि कुटुंब कल्याण
सिसिर अधिकारी - ग्रामविकास
सुलतान अहमद - पर्यटन
मुकुल रॉय - जहाजबांधणी
मोहन जटुआ - माहिती आणि प्रसारण
डॉ . एस . जगतरक्षकन - माहिती आणि प्रसारण
डी . नापोलीन - सामाजिक न्याय
तुषारभाई चौधरी - आदिवसी कामकाज
अरुण यादव - युवा कल्याण आणि क्रीडा
प्रतीक पाटील - अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम
विन्सेट पाला - जलसंपदा
प्रदीप जैन - ग्रामविकास
अगाता संगमा - ग्रामविकास

जामीन अर्ज फेटाळताच निलंबित पोलिसास अटक

पेडणे वेश्याव्यवसाय प्रकरण

अनेकांचे धाबे दणाणले..

पेडणे, दि.२८ (प्रतिनिधी) - पेडण्यातील कथित वेश्या व्यवसायात गुंतल्याप्रकरणी अलीकडेच निलंबित केलेला पोलिस शिपाई राजेश सावंत याने पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज आज फेटाळण्यात आल्यावर पेडणे पोलिसांनी त्याला लगेचच भारतीय दंड संहितेच्या ३८४,३६६ व ३७६ कलमाखाली अटक केली. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
राजेश सावंतच्या अटकेमुळे या प्रकरणातील टोळीचा छडा पोलिस कोणत्या प्रकारे लावतात याकडेच आता लोकांचे लक्ष लागले आहे. खुद्द पोलिसच गुंतल्याचा संशय असलेल्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या या भागात सुरू आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार गेल्या ६ मे रोजी म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी घातलेल्या छाप्यात अटक केलेल्या एका मुलीने राजेश सावंत याचे नाव घेतले होते.याबाबत उत्तर गोवा पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी सावंतला तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला होता.या प्रकारानंतर गेले दोन आठवडे राजेश सावंत हा बेपत्ता होता. याप्रकरणी अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याने पणजीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जावरील सुनावणी दोनदा पुढे ढकलल्यानंतर आज अखेर हा अर्ज फेटाळण्यात आला. तेव्हा तेथेच हजर असलेल्या राजेश सावंत याला तात्काळ पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले. बळजबरीने पैसे उकळणे,अपहरण करणे व बलात्कार अशा कलमाखाली त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पेडणे पोलिसांनी दिली.
धाबे दणाणले...
राजेश सावंत याच्या अटकेमुळे या प्रकरणी गुंतल्याची शक्यता असलेल्या अनेकांचे सध्या धाबे दणाणले आहेत.याप्रकरणी या भागातील एक टोळीच कार्यरत आहे व यात अनेक पोलिसही सामील असल्याची जोरदार चर्चा या भागांत सुरू आहे.काहीही काम न करता मोठमोठी वाहने व बंगले उभारलेल्या या लोकांचा हा काळा धंदा उघड व्हायलाच हवा,असा सुर या भागातील लोकांकडून व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी काही स्थानिक पंचसदस्य तथा सरपंचही सहभागी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. केवळ वेश्या व्यवसायच नव्हे तर या भागातील लोकांकडून बेकायदेशीर कामांसाठी हप्ते गोळा करणे,जुगारी अड्डेवाल्यांकडून हप्ते वसूल करणे आदी प्रकारही या टोळीकडून सुरू होते,अशीही माहिती प्राप्त झाली आहे.पेडणे पोलिस स्थानकावरच शिपाई म्हणून सेवा बजावत असलेल्या राजेश सावंत याला आता खुद्द पेडणे पोलिस स्थानकाच्या कोठडीत ठेवण्याची वेळ पेडणे पोलिसांवर ओढवल्याने पोलिसांच्या प्रतिष्ठेला हादरा बसला आहे.

मिरची पूड फेकून ३ लाख पळविले


नावेली येथील प्रकार


मडगाव, दि.२८ (प्रतिनिधी) : नावेली येथील बॅंक ऑफ बडोदा शाखेमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेल्या येथील एका व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून व सुरीहल्ला करून त्याच्याकडील ३ लाखांची रक्कम असलेली बॅग पळविण्याचा थरारक प्रकार आज भर दुपारी घडला. शहरातील गजबजलेल्या भागात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ माजली. या प्रकरणी मडगाव पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून सायंकाळपर्यंत विशेष असे कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकले नव्हते.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाश्कॉल पिरीस यांचे लुदनिक अपार्टमेंटमध्ये घाऊक दारू विक्रीचे दुकान आहे. ग्राहकांकडून आलेली सुमारे ३ लाखांची रक्कम व काही चेक असलेली बॅग घेऊन ते जीए-०२-सी-५२९१ ही मोटारसायकल घेऊन दुपारी २-३० वाजता नावेली चर्चजवळील बडोदा बॅंकेच्या शाखेत आले होते. मोटरसायकल स्टॅंडवर उभी करून बॅग घेऊन बॅंकेकडे येत असतानाच काळी पॅंट व काळा टी शर्ट घातलेला एक पंचविशीचा तरुण समोरून त्यांच्या समोर आला. त्याने चटदिशी मिरचीची पूड त्यांच्या तोंडाच्या दिशेने फेकली. पण डोळ्यावर गॉगल असल्याने ती डोळ्यात गेली नाही, तेव्हा त्या तरुणाने त्यांच्यावर सुरी उगारली व बॅग हिसकावून बाहेर पळ काढला. बाहेर आणखी एक तरुण एका हिरो होंडा दुचाकीवर बसून त्याची वाट पाहत होता. काळ्या कपड्यातील व्यक्ती बॅग घेऊन पळत येत असल्याचे पाहून त्याने मोटरसायकल सुरू केली व दोघेही रावणफोंडच्या दिशेने पळाले.
यावेळी शेजारी असलेल्या थॉमस कुतिन्हो व प्रमिला रेडकर यांनी आरडा ओरडा केला. परंतु, तोपर्यंत ते दोघेही घटनास्थळावरून पसार झाले होते. दोघांपैकी कोणीही बोलण्यासाठी तोंड उघडले नाही, त्यामुळे त्यांची भाषा ही कळू शकलेली नाही. नंतर या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली गेली.
पिरीस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बॅगेत रोख ३ लाख व काही धनादेश होते. बोरकर स्टोअरकडून आलेले २७ हजार, शंकर बांदेकर यांनी दिलेले १८ हजार, १४ हजारांचा एक चेक अशी मोठी रक्कम त्यात होती, अशी माहिती त्यांनी दिली. नावेली परिसरात अशा प्रकारे पडलेला हा पहिलाच धाडसी दरोडा मानला जातो.

म्हापशात पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरी

फ्लॅट फोडून १.८१ लाखांचे दागिने लंपास

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - म्हापसा येथे आज दिवसभरात अज्ञात चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडून १ लाख ८१ हजार रुपयांची चोरी केली. म्हापसा पोलिस स्थानकापासून केवळ दहा मीटर अंतरावर असलेल्या शिल्पा कामत यांच्या मालकीच्या फ्लॅटमधे दुपारी २.३० ते ५.१० याच्या दरम्यान चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडून ९६ हजारांचे सोने पळवले तर, खोर्ली येथील कायतान पॉल रेसिडेन्सी मधे संजय आनंद कवळेकर यांच्या फ्लॅटमधे प्रवेश करून ७७ हजार रुपयांचे दागिने व ८ हजार रुपयांची रोकड लांबवली. ही चोरी सकाळी १० ते १ च्या दरम्यान केल्याचे तक्रारदार संजय कवळेकर यांनी म्हटले आहे. या दोन्ही चोऱ्यांचा तपास म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक उदय गावडे व उपनिरीक्षक हरिष भट्टा करीत आहेत.

Thursday, 28 May 2009

मिकी पाशेकोंविरुध्द आरोपपत्र

वीज अभियंत्याला मारहाणप्रकरण
मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी)- समाजकार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगिस यांनी मुख्य सचिवांना पाठविलेल्या कायदेशीर नोटिशीची मात्रा अचूक लागू पडली असून कोलवा पोलिसांनी पर्यटनमंत्री मिकी पाशेकोंविरुध्द २००६ मध्ये दाखल झालेल्या सरकारी कामावर असताना वीज अभियंत्याला केलेल्या मारहाण तक्रारीबाबत येथील प्रथम श्रेणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पर्यटन मंत्र्यांविरुध्द यापूर्वीच त्यांच्या पत्नी सारा यांनी कौटुंबिक छळवणूक प्रकरणी दाखल केलेल्या खटल्याचे प्रकरण चालू आहे व त्यात आता या नव्या खटल्याची भर पडली आहे.
या आरोपपत्रांत पोलिसांनी मिकींवर कनिष्ठ वीज अभियंता कपील नाटेकर हा सरकारी ड्युटीवर स्वतःच्या कार्यालयात असताना त्याला मारहाण केल्याबद्दल भा. दं. च्या कलम ३५३ खाली आरोप ठेवला आहे.तसेच ३४२ व ५०४ कलमाखालीही आरोप ठेवले आहेत.
नाटेकर हा वीजखात्याच्या उपविभाग ३ मधील वेर्णा सबस्टेशनाशी संलग्न अभियंता असून त्याच्या तक्रारीप्रमाणे जुलै २००६ मध्ये मंत्र्यांनी त्याला त्यांच्या निवासस्थानी पाचारण केले व मारहाण केली.नंतर या प्रकरणावरून वादळ उठले होते व थंडही झाले होते.
आयरीश रॉड्रगिस यांनी आरोग्यमंत्री विश्र्वजीत यांच्याविरुध्द आपण नोंदविलेल्या धमकीप्रकरणी पोलिस आरोपपत्र दाखल करण्यात वेळकाढू धोरण अवलंबिल्याप्रकरणी कोर्टात धाव घेतली असता न्यायालयाने पोलिस खात्यावर ठपका ठेवला होता. त्यानंतर आयरीश यांनी आपला मोर्चा या अभियंता मारहाणीकडे वळवून कोलवा पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यायासाठी दहा दिवसांची मुदत दिली व पोलिसांनी कोर्टाकडून वस्त्रहरण होण्यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्याचा शहाणपणा दाखवला.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तक्रारदार हा सरकारी कर्मचारी असल्याने आरोपपत्र ३५३ कलमाखाली गुदरावे की काय याबाबत कायदेशीर सल्ला मागविला होता तो मिळण्यास विलंब झाला व त्यामुळे आरोपपत्रासही विलंब झाला अशी सारवासारव पोलिसांनी चालविली आहे.
दरम्यान, पर्यटन मंत्र्यांनी असे आरोपपत्र दाखल झाल्याने मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्याची शक्यता फेटाळली आहे. आपले प्रकरण व दयानंद नार्वेकर यांचे तिकिट घोटाळा प्रकरण वेगळे आहे व त्यामुळे तो निकष येथे लावता येणार नाही . शिवाय नार्वेकर हे कॉंग्रेसचे होते तर आपण राष्ट्रवादीचा आहे व त्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीला घ्यावा लागेल, असे त्यांनी सांगितले.

पर्रीकर यांना आज आयसीयूतून डिसचार्ज

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी)ः काल येथील अपोलो व्हिक्टर इस्पितळात अँजियोप्लास्टी करण्यात आलेले विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे व त्यामुळे उद्या त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर हलविण्यात येणार असल्याचे हॉस्पितळ सूत्रांनी सांगितले. आज काही वेळेसाठी त्यांना बाहेर आणण्यात आले होते. अजूनही त्यांना थकवा जाणवत असला तरी तो काळजी करण्यासारखा नसल्याचे सांगण्यात आले.
आजही समाजाच्या विविध थरांतील लोकांची पर्रीकर यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी "अपोलो'कडे रीघ लागून होती. त्यांत आमदार विजय पै खोत, वासुदेव मेंग गावकर , मडगावचे नितीन नायक यांचा समावेश होता. दरम्यान काल सायंकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अपोलोमध्ये येऊन पर्रीकर यांच्या प्रकृतीची चौकशी केली व नंतर डॉक्टरांकडून त्यांच्यावरील शस्त्रक्रियेबाबत माहिती करून घेतली.

लाहोरमध्ये अतिरेकी हल्ल्यात ४५ ठार, शेकडो जखमी

तालिबानचा हात असल्याचा संशय

लाहोर, दि. २७ ः पाकिस्तानात तालिबान्यांची हिंमत वाढतच असून, आज त्यांनी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या लाहोर येथील मुख्यालयाला लक्ष्य बनवून भीषण आत्मघाती हल्ला केला. त्यात ४५ लोक ठार झाले असून शेकडो जखमी आहेत. या परिसरात उच्च न्यायालयाची इमारतही असून तेथे मुंबई हल्लाप्रकरणी अटकेत असणाऱ्या अतिरेक्याची सुनावणी होणार होती. त्याला सोडविण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याची शक्यताही पाकिस्तानी पोलिसांद्वारे वर्तविली जात आहे. भारतासह जगभरातील सर्व देशांनी या हल्ल्याचा निषेध केला असून, पाकिस्तानने दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करावा, अशी गरज प्रतिपादन केली आहे.
लाहोर शहरातील सिव्हील लाईन्स परिसरात गजबजलेल्या मॉल रोडजवळ हा स्फोट झाला. आयएसआयच्या इमारतीजवळ उभारण्यात आलेल्या अडथळ्यांवर स्फोटकांनी भरलेला एक ट्रक आदळवून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. यावेळी झालेल्या स्फोटामुळे जवळच असलेली पोलिस मुख्यालयाची इमारत जमीनदोस्त झाली. या ढिगाऱ्याखाली अनेक पोलिस कर्मचारी अडकून पडले असून, आजूबाजूच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
अतिरेक्यांनी आणलेल्या गाडीत सुमारे १०० किलो स्फोटके असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुळात, अतिरेक्यांना ही गाडी उच्च न्यायालय किंवा आयएसआयचे मुख्यालय येथे धडकवायची होती. पण, त्यापूर्वीच अडथळ्यांवर ती आदळली असावी, असा अंदाज आहे. बॉम्बस्फोटानंतर पांढऱ्या धुराचे लोळ उठले आणि लगेचच गोळीबाराचा आवाज झाला. काही प्रत्यक्षदर्शींनी स्फोटापूर्वी आणि नंतरही गोळीबार झाल्याचे सांगितले. मात्र, तो गोळीबार नेमका कोणी केला हे समजू शकलेले नाही. अद्याप कोणत्याही अतिरेकी संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही.
पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील खेळाडूंवर गेल्या ३ मार्चला झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील काही संशयितांना अटक करण्यात आली होती. आज हल्ला झाला तेव्हा ते आयएसआयच्या कार्यालयात होते. जवळच लाहोर उच्च न्यायालयाची इमारत असून मुंबईतील अतिरेकी हल्ल्यासंदर्भात ताब्यात घेण्यात आलेल्या जमात-उद्-दावा या संघटनेचा प्रमुख हफीज सईद याला आजच न्यायालयात हजर करण्यात येणार होते.
या हल्ल्यात किमान १८ पोलिस कर्मचारी ठार झाल्याचे अधिकृत वृत्त आहे. मृतांचा एकूण आकडा कमी सांगितला जात असला तरी तो बराच मोठा असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चौकशीचे आदेश
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या हल्लाप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी झळकविले आहे.
पाकिस्तानी सरकारने स्वात, दिर आणि वायव्य प्रांतात जी लष्करी कारवाई सुरू केली आहे, त्याचा परिणाम म्हणून तालिबानने हा स्फोट घडवून आणला असावा, अशी शक्यता पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी व्यक्त केली आहे. अतिरेक्यांनी पाकी प्रशासनाचे मनोबल खच्ची करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी देशविरोधी शक्तींना थारा दिला जाणार नाही, असा इशाराही मलिक यांनी दिला.
लाहोर शहरात गेल्या दोन वर्षात अनेक बॉम्बहल्ले झाले आहेत. गेल्या ३० मार्चला अतिरेक्यांनी लाहोरपासून जवळच असणाऱ्या मनवाना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर हल्ला केला होता. त्यात १० जण मृत्यूमुखी पडले होते. त्यापूर्वी ३ मार्चला श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर हल्ला झाला होता. त्यात सहा पोलिसांसह आठ जण ठार झाले होते तर काही क्रिकेटपटू जखमी झाले होते.
भारतातर्फे निषेध
लाहोरमधील भीषण आत्मघाती स्फोटाची भारताने निंदा केली असून, अशा प्रत्येक संकटाच्या वेळी भारत पाकिस्तानी प्रशासनाच्या सोबत असेल, अशी भावना नवे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.एम.कृष्णा यांनी व्यक्त केली आहे.
आज पत्रकारांशी बोलताना कृष्णा म्हणाले की, लाहोरमध्ये स्फोटानंतर उद्भवलेल्या स्थितीवर भारताचे बारीक लक्ष आहे. प्रत्येक घडामोडीकडे भारत लक्ष ठेवून आहे. या भीषण हल्ल्याचे आम्हाला तीव्र दु:ख आहे. यात मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो आणि आगामी काळात दहशतवादाचा पूर्ण नायनाट होवो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मुंबई हल्ल्यातील अतिरेक्याला सोडविणे हे लक्ष्य?
लाहोरच्या गजबजलेल्या मॉल रोड परिसरात झालेल्या हल्ल्यामागे जमात-उद्-दावा या संघटनेचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबई हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेला जमातचा प्रमुख हाफिज सईद याला सोडविण्यासाठी संघटनेने हा हल्ला केला असावा. लाहोर उच्च न्यायालयाजवळ सकाळी सव्वादहाच्या सुमारास हे भीषण स्फोट झाले. त्याच दरम्यान हाफिज सईद याची ११ वाजता उच्च न्यायालयात सुनावणी होती. त्यापूर्वीच स्फोट घडवून सईद याला सोडविण्याचा कट अतिरेक्यांनी रचला होता, असे पाकिस्तानी पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर स्फोटके, बुलेटप्रुफ जॅकेटही सापडल्याचे समजते.

महानंदचा पणजीतही प्रताप!

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - "सीरियल किलर' महानंद नाईक याचे ""कारनामे'' फोंडा तालुक्यापर्यंत मर्यादित नसून पणजीतही त्याने महिलेला फसवल्याचे उघड झाले आहे. महानंदने आपण लग्न करणार असल्याचे सांगून आपल्या हातातील बांगड्या आणि गळ्यातील सोनसाखळी लांबवल्याची पोलिस तक्रार चिंबल येथील एका ४० वर्षीय अविवाहित महिलेने आज पणजी पोलिस स्थानकात दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची खातरजमा व प्राथमिक चौकशी करून महानंद नाईक याच्याविरोधात पणजी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला असल्याची माहिती निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार सुमन (नाव बदलण्यात आले आहे) आजारी असल्याचे दि. १ ऑक्टोबर २००७ मध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रक्त चाचणी करण्यासाठी गेली होती. याठिकाणी महानंदाची सुमन हिच्याशी गाठ पडली. कोणताही ओळख नसताना महानंद आपल्याशी बोलायला लागला. पहिल्यांदा त्याने माझे नाव विचारले. सुमन असे मी माझे नाव सांगून फार्मसीत निघून गेले. काही मिनिटांतच महानंद माझ्या पाठोपाठ फार्मसीत आला आणि खाली पडलेले दहा रुपये काढून मला दिले. यावेळी त्याने माझ्याशी पुन्हा बोलायला सुरुवात केली. बोलण्याच्या ओघात त्याने माझा मोबाईल क्रमांकही मागून घेतला. त्यानंतर मी घरी निघून गेले.
दुसऱ्या दिवशी दि २ ऑक्टोबर रोजी सकाळी महानंदने मला दूरध्वनी केला. मला तू आवडलेली असून पणजी येथील महालक्ष्मी मंदिराकडे भेटायला ये, असे सांगितले. पण मी त्याला स्पष्ट नकार दिला आणि मोबाईल बंद केला. त्यानंतर दि. ३ ऑक्टोबर रोजी त्याने पुन्हा दूरध्वनी केली. मी तुझ्याशी लग्न करायला तयार असून माझे वडील तुला पाहण्यासाठी महालक्ष्मीच्या मंदिरात आले आहेत, असे सांगितले. त्यामुळे त्यादिवशी मी आणि माझी आई असे दोघीही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. यावेळी त्याने माझ्या आईला मंदिरात बसण्याची विनंती केली आणि माझ्याशी काही बोलायचे आहे, असे सांगून जवळच असलेल्या एका इमारतीत घेऊन गेला. यावेळी त्याने माझ्या गळ्यात असलेली सोनसाखळी बनावटी दिसते, असे सांगून काढून घेतली. त्यानंतर जबरदस्तीने हातातील बांगड्याही काढून घेतल्या. यावेळी त्याने मला मारण्याची धमकी दिल्याने मी गडबड केली नाही, याची संधी घेऊन त्याने पोबारा केला. मी घडलेली हकिकत येऊन आईला सांगितली, परंतु, समाजात लाज जाईल म्हणून त्यावेळी पोलिस तक्रार दिली नसल्याचे त्या तरुणीने सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून महानंदचे वर्तमानपत्रावर छायाचित्र प्रसिद्ध होत असल्याने त्याची ओळख पटली, असेही सुमन हिने सांगितले.
पोलिसांनी महानंदच्या विरोधात चोरीचा आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून याविषयीचा अधिक तपास निरीक्षक नॉलास्को रापोझ करीत आहे.

आणखी दोन युवतींच्या खुनाची महानंदची कबुली

फोंडा, दि.२७ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याने आणखी दोन युवतींच्या खुनांची कबुली दिली असून महानंद नाईकने केलेल्या खुनांची संख्या आता १२ झाली आहे. केरी फोंडा येथील कु. भागी सतरकर हिचा २००५ सालात आणि दवर्ली मडगाव येथील दीपाली जोतकर हिचा २००७ सालात खून केल्याची कबुली संशयित महानंद नाईक याने दिली आहे.
नाळ्ळे केरी येथील कु. भागी सतरकर ही २००५ सालापासून बेपत्ता आहे. कु.भागी हिचा बोरी येथे डोंगराळ भागात खून केल्याची कबुली महानंद याने दिली असून बोरी येथे "त्या' काळात एक अनोळखी मृतदेह सापडला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कु. भागी सतरकर ही घरातून जाताना सोन्याचे दागिने घेऊन गेलेली होती. त्यामुळे ह्या बेपत्ता प्रकरणामध्ये महानंद याचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. कु. भागी बेपत्ता प्रकरणी पोलीस स्टेशनवर तक्रार करण्यात आलेली नव्हती. कु. भागी हिची विवाहित बहीण निर्मला हिने फोंडा पोलिसांशी संपर्क साधून यासंबंधीची माहिती दिली. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. कु. भागी घरातून जाताना दोन सोन्याची काकणे, एक सोन्याचा हार, सोनसाखळी, रिंग आदी वस्तू घेऊन गेली होती. कु. भागी हिच्या वडिलांचे बेपत्ता होण्यापूर्वी निधन झाले होते. तर आईचे बेपत्ता झाल्यानंतर पाच सहा महिन्यांनी निधन झाले. तिला भाऊ व पाच बहिणी आहेत. कु. भागी ही फोंड्यात ये-जा करीत होती. वरचा बाजार फोंडा येथे महानंद नाईक याचा वावर असल्याने त्याच्या संपर्कात आली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मडगाव येथील कु. दीपाली जोतकर हिचा २००७ सालात फातर्पे कुंक्कळी भागात खून करून मृतदेह रेल्वे बोगद्याच्या बाजूला टाकला होता, अशी कबुली महानंद नाईक याने दिली आहे. २००७ सालात कुंकळ्ळी पोलिसांनी एक अनोळखी मृतदेह सापडला आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
श्री. जोतकर यांच्या घराच्या विस्तारीत भागाच्या बांधकामाचा ठेका महानंद नाईक याने घेतला होता. यावेळी महानंद नाईक हिची दीपाली हिच्याशी ओळख झाली. महानंद याला फोंडा पोलिसांनी युवतीच्या खून प्रकरणी अटक केल्यानंतर दीपालीच्या आईने फोंडा पोलिस स्टेशनवर येऊन संशयित महानंद नाईक याला ओळखले आणि त्याच्यावर एक थप्पड सुध्दा मारलेले आहे. दीपाली घरातून जाताना सुमारे रोख ८० हजार रुपये तसेच सत्तर - एैशी हजार रुपयांचे दागिने घेऊन गेली होती. या प्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल. पाटील, उपनिरीक्षक संजय दळवी, दीपक पेडणेकर व इतर तपास करीत आहेत. कु. भागी व कु. दीपाली यांच्या खुनासंबंधी सविस्तर माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार

विलासराव देशमुख, फारूख अब्दुल्ला कॅबिनेट मंत्री

सचिन पायलट,शशी थरूर,ज्योतिरादित्य राज्यमंत्री


नवी दिल्ली, दि.२७ ः मनमोहन मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारासाठी ५९ मंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मंत्रिमंडळात कित्येक पक्ष व समीकरणांना एकत्र साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.नव्य कॅबिनेट मंत्र्यांमध्ये विलासराव देशमुख व फारूख अब्दुल्ला यांचाही समावेश आहे. प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्रीपद (स्वतंत्र) देण्यात आले आहे, तर सचिन पायलट, शशी थरूर, जतिन प्रसाद, ज्योतिरादित्य शिंदे यांनाही राज्यमंत्रिपदे देऊन युवानेत्यांना प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे.
गुरुवारी १४ कॅबिनेट आणि ४५ राज्य मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे. पहिल्या विस्ताराबरोबरच मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या वाढून ७८ होणार आहे. यामध्ये ३३ कॅबिनेट आणि ४५ राज्यमंत्र्यांचा समावेश असेल. गेल्या शुक्रवारी १९ कॅबिनेट मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती.
या मंत्रिमंडळात तीन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे ते असे - वीरभद्र सिंह (हिमाचल प्रदेश), विलासराव देशमुख (महाराष्ट्र) आणि फारूख अब्दुल्ला (जम्मू-काश्मिर). डीएमकेचे तीन खासदार दयानिधी मारन, ए. राजा आणि एम. के. अझागिरी कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील होतील.
अन्य मंत्र्यांमध्ये कॉंग्रेसचे मल्लिकार्जुन खडगे, कुमारी शैलजा, सुबोध कांत सहाय, एम.एस.गिल, जी. के. वासन, पवन कुमार बंसल, मुकल वासनिक आणि कांतिलाल भुरिया यांचा समावेश आहे.
प्रफुल्ल पटेल, पृथ्वीराज चौहान, श्रीप्रकाश जयसवाल, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, कृष्णा तीरथ आणि दिनशा पटेल यांना स्वतंत्र प्रभार देण्यात आला आहे.
अन्य ३७ राज्य मंत्री पुढीलप्रमाणे आहेत - ई अहमद, वी नारायण स्वामी, श्रीकांत जेना, मुलापली रामचंद्रन, डी. पुरंदेश्वरी, पनाबाका लक्ष्मी, अजय माक्कन, के. एच. मुन्नीअप्पा, नामो नारायण मीना, ज्योतिराज्य सिंधिया, जितिन प्रसाद, ए. साई प्रताप, गुरूदास कामत, एम.एम.पलाम राजु, महादेव खण्डेला, हरीश रावत, के.वी.थॉमस, साउगता रॉय, दिनेश त्रिवेदी, श्रीश्रर अधिकारी, सुल्तान अहमद, मुकुल राय, मोहन जातुआ, पालानीमनीक्कम, डी. नेपोलियन, एस. जगतरक्षकम, एस. गांधीसेलवन, परनीत कौर, सचिन पायलट, शशि थरूर, भरतसिंह सोलंकी, तुषार भाई चौधरी, अरूण यादव, प्रतीक प्रकाश बापू पाटील, आर. पी. एन. सिंह, विनसेन्ट पाल आणि प्रदीप जैन.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा
विस्तार आज गुरुवारी होत आहे. त्यांनंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ७८ एवढी होईल.
यात ३३ कॅबिनेट मंत्री, ७ राज्यमंत्री-स्वतंत्र कारभार, ३८ राज्यमंत्री असतील.
तयार झालेले नवे मंत्रिमंडळ

पंतप्रधान
डॉ. मनमोहन सिंग

कॅबिनेट मंत्री
प्रणव मुखर्जी : वित्त
शरद पवार : कृषी, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक कल्याण व सार्वजनिक वितरण
ए. के. ऍण्टनी : संरक्षण
पी. चिदम्बरम् : गृह
ममता बॅनर्जी : रेल्वे
एस. एम. कृष्णा : परराष्ट्र व्यवहार
(आज शपथ घेणारे कॅबिनेट मंत्री)
गुलाम नबी आझाद
सुशीलकुमार शिंदे
एम. वीरप्पा मोईली
एस. जयपाल रेड्डी
कमलनाथ
वायलर नवी
मीरा कुमार
मुरली देवरा
कपिल सिब्बल
अंबिका सोनी
बी. के. हांडिक
आनंद शर्मा
सी. पी. जोशी
वीरभद्र सिंग
विलासराव देशमुख
फारुख अब्दुल्ला
दयानिधी मारन
ए. राजा
मल्लिकार्जुन खारगे
कुमारी शैलजा
सुबोध कांत सहाय
एम. एस. गिल
जी. के. वासन
पवनकुमार बंसल
मुकुल वासनिक
कांतिलाल भुरिया
एम. के. अझागिरी

राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार)
प्रफुल्ल पटेल
पृथ्वीराज चौहान
श्रीप्रकाश जायस्वाल
सलमान खुर्शिद
दिनशा पटेल
जयराम रमेश
कृष्णा तीरथ

राज्यमंत्री
ई. अहमद
व्ही. नारायणस्वामी
श्रीकांत जेना
मुलापल्ली रामचंद्रन
डी. पुरंदेश्वरी
पानाबाका लक्ष्मी
अजय माकन
के. एच. मुनप्पा
नमो नारायण मीणा
ज्योतिरादित्य शिंदे
जितिन प्रसाद
ए. साई प्रताप
गुरुदास कामत
एम. ए. पल्लम राजू
महादेव खंडेला
हरीश रावत
के. व्ही. थॉमस
सौगता रॉय
दिनेश त्रिवेदी
शिशिर अधिकारी
सुलतान अहमद
मुकुल रॉय
मोहन जतुआ
एस. एस. पलामनिक्कम
डी. नेपोलियन
एस. जगथरक्षकन
एस. गांधीसेल्वन
परणित कौर
सचिन पायलट
शशी थिरूर
भरतसिंग सोळंकी
तुषारभाई चौधरी
अरुण यादव
प्रतीक प्रकाशबापू पाटील
आर. पी. एन. सिंग
विन्सेन्ट पाला
प्रदीप जैन
अगाथा संगमा

Wednesday, 27 May 2009

चार जणांना फाशी

नांदोस हत्याकांड
हरिश्चंद्र पवार
सावंतवाडी, दि. २६ (प्रतिनिधी)ः महाराष्ट्र राज्याला हादरवणाऱ्या नांदोस (मालवण) येथील दहा जणांच्या हत्याकांड प्रकरणी प्रमुख आरोपी संतोष मनोहर चव्हाण, अमित अशोक चव्हाण, योगेश मधुकर चव्हाण, महेश धनाजी शिंदे यांना सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. एन. शानभाग यांनी दोषी ठरविले असून या हत्याकांडातील अन्य चार आरोपी तुकाराम श्रीधर गावडे, सूर्यकांत कोरगावकर, चंद्रकांत व तानाजी सीताराम गावडे, वसंत मसुरकर यांना पुराव्याअभावी दोष मुक्त केले आहे.
तब्बल तीन वर्षे सुरू असलेल्या या नांदोस हत्याकांडात प्रमुख आरोपी संतोष चव्हाण याने आपल्या साथीदाराच्या मदतीने पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुंबई वाई येथील तब्बल दहा जणाची नांदोस डोंगराच्या ठिकाणी आणून बंदूक, रिव्हॉल्वर तसेच लोखंडी रॉडच्या साहाय्याने निघृण हत्या केली. मालवण पोलिस अंमलदार माधवराव प्रभुखानोलकर यांच्या सहकाऱ्यांनी एका डायरी व ७ः१२ उताऱ्यावरून या हत्याकांडाचा तपास लावला.
या आरोपींपैकी प्रमुख आरोपी संतोष चव्हाण (रा. हुमरमळा, कुडाळ) अमित अशोक शिंदे (दहीसर, मुंबई) महेश धनाजी शिंदे (बोरिवली, मुंबई) व योगेश मधुकर चव्हाण (बोरिवली, मुंबई) या चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष वकील ऍड. अजित भणगे, साहाय्यक वकील ऍड. प्रेमानंद नार्वेकर व गौरव पडते यांनी काम पाहिले. नांदोस हत्याकांड प्रकरण हे अंधश्रद्धेतून घडले असून या प्रकरणात मुख्य आरोपी संतोष चव्हाण याने पैशाचा पाऊस पाडणारा संतोषबाबा नांदोस डोंगरावर असल्याचे सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेरील दहा जणांना नांदोस डोंगरावर आणून त्यांचा मुडदा पाडला व दुप्पट करण्यासाठी


प्रसार माध्यमावर न्यायालय नाराज
नांदोस हत्याकांड प्रकरणात आठपैकी सहा आरोपींना दोषी ठरविल्याचे वृत्तपत्रांनी ("गोवादूत'नव्हे) प्रसिध्द केल्याबद्दल न्यायाधीश शानभाग यांनी नाराजी व्यक्त केली. काल दिलेल्या निकालात आपण चार जणांना दोषी ठरविले होते, असे सांगून ते पत्रकारांवर भडकले.

मंत्रिमंडळ विस्तार उद्या होण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. २६ - करुणानिधी यांच्या द्रमुक पक्षाने सरकारमध्ये सहभागी होण्याचे मान्य करताच मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. पण, आज होणारा विस्तार दोन दिवस लांबणीवर पडला असून, गुरुवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आणि १९ कॅबिनेट मंत्र्याचा शपथविधी पार पडला. दुसऱ्या टप्प्यात द्रमुकची सहमती आवश्यक होती. ती मिळाल्यानंतर आता खातेवाटपाच्या मुद्यावर काही निर्णय व्हायचे आहेत. याशिवाय, ममता बॅनर्जी यांनी आता आपली मंत्रिपदाची भूक वाढविली असून तृणमूलला सातऐवजी आठ मंत्रालये मिळावे, असा आग्रह धरला आहे. त्यांना सात मंत्रिपदे देण्याचे आश्वासन संपुआने दिले आहे. आता आणखी एक मंत्रालय कोणते दिले जाईल, यावर खल सुरू असल्याचे समजते. पण, कॉंग्रेसच्या सूत्रांनी असा कोणताही मुद्दा विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी नागरी उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेश निश्चित असून त्यांची उड्डयन मंत्री म्हणून दुसरी इनिंग सुरू होणार आहे. याशिवाय, राष्ट्रवादीतर्फे पी.ए.संगमा यांची कन्या अगाथा संगमा यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याचे वृत्त आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावर सोमवारी पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास चार तासपर्यंत प्रदीर्घ चर्चा झाली. त्याचे निष्कर्ष उद्यापर्यंत समोर येतील, असे मानले जात आहे.
चौकट
राज्यमंत्री नाराज
संपुआ सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याचे कारण कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह असल्याचे मानले जात आहे. घटक पक्षांना खुश ठेवण्याच्या नादात कॉंग्रेसने आपल्या पक्षातील काही नेत्यांची उपेक्षा केल्याचे बोलले जात आहे. त्यातल्या त्यात यापूर्वीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असणाऱ्यांना यावेळी कॅबिनेट दर्जा मिळण्याची आशा होती. त्यांची यावेळी निराशा होताना दिसत असल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचे काम सध्या पंतप्रधान आणि सोनिया गांधी करीत आहेत. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दहावीचा निकाल ७७ टक्के

लुईस शॅरेल राज्यात पहिली

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च ते एप्रिल महिन्यात घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ७७.१२ टक्के लागला. राज्यात पहिल्या क्रमांकावर नावेली येथील कु. लुईस मेलिसा शॅरेल (९४.६७ टक्के दामोदर विद्यालय), दुसऱ्या क्रमांकावर श्रवणी देवीदास गुरव (९४ टक्के, सर्वोदय एज्युकेशनल सोसायटी माध्यमिक विद्यालय, कुडचडे), तिसऱ्या क्रमांकावर विदूला उदय पेडणेकर (९३.५ टक्के फातीमा कॉनव्हेंट माध्यमिक विद्यालय, मडगाव) तर, मुलांमधे पहिल्या क्रमांकावर मडगाव येथील कु. अत्रेय अरुण शेणवी नाडकर्णी (९३.३ टक्के) व सुयश अनंत तिरोडकर (९३.३टक्के) यांनी बाजी मारली आहे. गेल्या पाच वर्षाचा तुलनेत यावर्षी सर्वांत जास्त टक्के निकाल लागला. २००८ साली ६९.९४ टक्के तर, २००७ साली ७३.६३ टक्के निकाल लागला होता.
या परीक्षेत उत्तीर्ण मुलांच्या टक्केवारीचे प्रमाण ७१.८४ टक्के तर उत्तीर्ण मुलींच्या टक्केवारीचे प्रमाण ७१.८२ टक्के आहे. राज्यात मुलीने पहिल्या क्रमांकावर येण्याचा मान पटकावला तरी, उतीर्ण होण्याच्या टक्केवारीत मुलींपेक्षा मुलांनी बाजी मारली आहे.
पहिला क्रमांक पटकावलेल्या कु. मेलिसाने ६०० पैकी ५६८ गुण मिळवले. मुलांमध्ये प्रथम आलेल्या अत्रेय व सुयशने ६०० पैकी ५६० गुण मिळवले आहेत. या परीक्षेत तेरा विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला, तर सेंट ऍन्थनी माध्यमिक विद्यालय असोल्णा, या विद्यालयांचा निकाल सर्वांत कमी म्हणजे १५ पैकी एकच विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.
या परीक्षेला १५,१९५ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेल्यांपैकी एकूण १५,१७१ विद्यार्थी बसले होते. त्यातील ११,७०० विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. परीक्षेला बसलेल्या ८,५५० मुलांपैकी ६,१४२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. ८,६८० मुलींपैकी ६,२२३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्यात. फेरपरीक्षेला बसलेल्या २ हजार ५९ विद्यार्थ्यांपैकी ६७६ जण उत्तीर्ण झाले आहेत. फेरपरीक्षेचा निकाल ३२.८३ टक्के लागला आहे.
डॉ. के. बी. हेडगेवार विद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्केचा मान राखून ठेवला.
उत्तर पत्रिकेच्या फोटो प्रतीसाठी शेवटची मुदत ९ जून आहे, तर फेरतपासणीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जून आहे, अशी माहिती शालांत मंडळाचे अध्यक्ष मॅवरिन डिसोझा यांनी दिली.
दहावीची परीक्षा घेण्यात आलेल्या २३ केंद्रांमध्ये फोंडा केंद्राने बाजी मारली आहे. फोंडा केंद्राचा ८७.४६ टक्के निकाल लागला आहे. तसेच पणजी ८०.०३, मडगाव ८२.४८, म्हापसा ७५.२४, वास्को ८१.०५, डिचोली ७५.५४, काणकोण ६९.४५, कुंकळ्ळी ६६.१८, कुडचडे ६८.७२, केपे ६८.१८, माशेल ७१.७०, मंगेशी ७९.३२, पेडणे ६९.४४, पिलार ६९.९३, सांगे ६१.६२, साखळी ६७.५८, शिरोडा ६४.५८, शिवोली ६८.३६, तिस्क धारबांदोडा ५७.४७, वाळपई ६८.७२, नावेली ८७.४०, पर्वरी ६२.७५ ,तर मांद्रे केंद्राचा ८०.४३ टक्के निकाल लागला.


शंभर टक्के निकाल लागलेली विद्यालये...
डॉ. के. बी. हेडगेवार विद्यालय, पणजी
श्री दामोदर विद्यालय, मडगाव
माइ दी देऊस माध्यमिक विद्यालय, र्खोजुवे
अमीनीया माध्यमिक विद्यालय, बायणा वास्को
विस्कांत ऑफ पेडणे माध्यमिक विद्यालय, पेडणे
नीव इंग्लिश माध्यमिक विद्यालय, केरी तळवाडा पेडणे
आवर लेडी ऑफ माउंट कार्मेल माध्यमिक विद्यालय, हरमल पेडणे
सेंट. मेरी माध्यमिक विद्यालय, फोंडा
महानंद जी. नाईक मेमोरियल माध्यमिक विद्यालय, भोम फोंडा
फातिमा कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, मडगाव
भाटीकर इंग्लिश माध्यमिक विद्यालय, घोगळ मडगाव
प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय मडगाव
आवर लेडी ऑफ सुकूर माध्यमिक विद्यालय, वेर्णा मडगाव

मनोहर पर्रीकर इस्पितळात

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी) : विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना आज अस्वस्थ वाटू लागल्याने येथील अपोलो व्हिक्टर इस्पितळात दाखल करण्यात आले व नंतर तातडीने कॉरोनरी अँजिओग्रफी करून आवश्यकता भासल्याने त्यांच्यावर नंतर लगेच यशस्वी अँजिओेप्लास्टीही करण्यात आली.
पर्रीकर यांना अपोलोत दाखल करण्यात आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. काही वृत्तवाहिन्यांनी ते वृत्त फ्लॅश केले. पर्रीकर यांच्या हितचिंतकांची तसेच चाहत्यांची व विविध नेत्यांची इस्पितळाकडे एकच गर्दी उसळली.
अपोलो व्हिक्टरचे संचालक तथा नामवंत ह्दयरोगतज्ज्ञ डॉ. उदय खानोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्रीकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सकाळी इस्पितळात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीतून निघालेल्या निष्कर्षांतून लगेच तातडीने ऍंजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांना २ ते ३ दिवस रहावे लागेल व त्यानंतर आठवडाभर निरीक्षणाखाली ठेवले जाईल. नंतर ३ ते ४ आठवड्यांनी त्यांना आपले नियमित व्यवहार हाताळता येतील असे डॉ. खानोलकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
पर्रीकर यांना सकाळी किंचित अस्वस्थ वाटू लागल्याने जवळचे मित्र संजय वालावलकर यांच्यासह ते आपले स्नेही तसेच कौटुंबिक डॉक्टर श्याम भंडारे यांच्याकडे तपासणीसाठी गेले होते. डॉ. भांडारे यांनी त्यांना तपासल्यानंतर लगेच स्वतः पर्रीकरांना घेऊन ते तातडीने अपोलोमध्ये आले व त्यामुळे लगेच पुढील तपासण्या व उपचार झटपट करता आले. अपोलोचे संचालक तथा नामवंत ह्दयरोगतज्ज्ञ डॉ. खानोलकर यांनी स्वतःच्या देखरेखाली पर्रीकरांच्या सर्व चाचण्या घेतल्या. डॉ.भांडारे हे सायंकाळपर्यंत "अपोलो'तच होते.
पर्रीकर यांना अपोलोत दाखल केल्याचे कळताच गोव्याच्या सर्व भागातील त्यांच्या चाहत्यांनी तेथे धाव घेतली. सर्वप्रथम दाखल झालेल्यात आमदार दामू नाईक, शर्मद रायतूरकर, रुपेश महात्मे, डॉ. देश प्रभूदेसाई, ऍड. नरेंद्र सावईकर, सिध्दनाथ बुयांव यांचा समावेश होता. सायंकाळी भाजप अध्यक्ष व खासदार श्रीपाद नाईक, मंत्री बाबूश मॉन्सेरात व मिकी पाशेको, आमदार निळकंठ हळर्णकर व आग्नेल फर्नांडिस, चर्चिल आलेमाव, गोविंद पर्वतकर, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस विजय सरदेसाई यांनीही इस्पितळात जाऊन पर्रीकर यांचे बंधू अवधूत पर्रीकर व पुत्र अभिजात यांच्याशी त्यांच्या प्रकृतीसंदर्भात चौकशी केली.

दहा लाखांचे दागिने सोनाराकडून हस्तगत

महानंद प्रकरण

फोंडा, दि.२६ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याच्याकडील चोरीचे सोन्याचे दागिने विकत घेतल्याच्या आरोपावरून फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या उल्हास रिवणकर या सोनाराकडून सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचे पाऊण किलो सोने हस्तगत करण्यात पोलिसांना आज (दि.२६) यश आले आहे. दरम्यान, येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने उल्हास रिवणकर याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.
सिरीयल किलर महानंद नाईक याने आपल्या जबानीत खून करण्यात आलेल्या युवतींच्या अंगावरील चोरण्यात आलेले सोन्याचे दागिने काझीवाडा फोंडा येथील रिवणकर ज्वेलर्सना विकल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे फोंडा पोलिसांनी रिवणकर ज्वेलर्सचे मालक उल्हास रिवणकर याला सोमवार २५ मे ०९ रोजी संध्याकाळी अटक केली होती.
येथील पोलिसांनी उल्हास रेवणकर यांना २५ रोजी अटक केल्यानंतर त्यांच्यावतीने येथील प्रथम श्रेणी न्यायालयात जामिनासाठी त्याच दिवशी रात्री आठ वाजता अर्ज करण्यात आला होता. सदर जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. आज (दि.२६) रोजी पोलिसांनी याप्रकरणी तपास काम करून महानंद नाईक याने विकलेले सोने हस्तगत केले. सुमारे पाऊण किलो सोने ताब्यात घेण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १० लाख ५० हजार रुपये एवढी होत आहे. दरम्यान, संशयित उल्हास रिवणकर यांनी येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. याप्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस, पोलिस निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी पंचनामा केला.
दरम्यान, सीरियल किलर महानंद नाईक याने केलेल्या युवतींच्या खून प्रकरणाची चौकशी अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. संशयित महानंद नाईक याने दिलेल्या जबानीची पडताळणी केली जात आहे. त्यांच्याकडून आणखी काही नवीन माहिती मिळविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Tuesday, 26 May 2009

पंजाबात रेलगाड्या पेटवल्या

लष्कर, पोलिसांच्या गोळीबारात दोन ठार

जालंधर, चंडीगढ, दि. २५ - डेरा सचखंडच्या नेत्याची व्हिएन्नामधील गुरूद्वारात रविवारी हत्या करण्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या पंजाब बंद दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रेल्वे डबे आणि बसगाड्यांना आगी लावून आपला संताप प्रकट केला, तर लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे ठार झाले. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांचा अनेक ठिकाणी संघर्ष झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही जिल्हे वगळता पंजाब बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
जालंधर, लुधियाना, फगवाडा आणि होशियारपूर या चार जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या चारही शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आंदोलकांनी या चार जिल्ह्यात अनेक ठिकाणी सरकारी आणि खाजगी संपत्तीची मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली. पोलिस ठघण्यांमध्ये ठेवलेल्या गाड्यांनाही त्यांनी आगी लावल्या. जालंधर जिल्ह्यातील लांब्रा गावात लष्कराने केलेल्या गोळीबारात एकजण तर जालंधर रेल्वे स्थानकाबाहेर हिंसक जमावावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आणखी एक असे दोघे ठार झाले.
जालंधर, फगवाडा, होशियारपूर, नवांशहर, बांगा, लुधियाना आणि मोगा या जिल्ह्यात रेल्वे डब्यांना, बसगाड्यांना आणि अन्य वाहनांना आगी लावण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या. दिल्ली-लाहोर ही बससेवा लुधियाना येथेच थांबविण्यात आली आहे. अंबालात बसगाड्यांचे मोठे नुकसान करण्यात आले तर अंबाला-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग तीन तासांसाठी बंद करण्यात आला होता. पोलिसांनी बळाचा वापर करून हा मार्ग मोकळा केला. आजच्या पंजाब बंदचे आवाहन शिरोमणी अकाली दलानेही केले होते. जनतेने राज्यात शांतता आणि सदभाव कायम राखावा असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी केले आहे.
लांबा येथे आंदोलनकर्त्यांनी पोलिस महानिरीक्षक संजीव कालरा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला चढविला आणि पोलिस अधीक्षक सरबजीतसिंग यांच्या वाहनाला आग लावली. कालरा यांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबाराच्या २० फैरी झाडून जमावाला पांगविले.
जालंधर येथे जम्मू - कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेसच्या सहा डब्यांना आगी लावण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी आधी सर्व प्रवाशांना गाडी रिकामी करण्यास सांगितले आणि नंतर डब्यांना आग लावली. फगवाडा येथे सोनेपूर-जम्मू एक्सप्रेसच्या चालकाच्या डोक्यावर तलवार ठेवून त्याला इंजिनबाहेर खेचण्यात आले आणि नंतर डब्यांना आगी लावण्यात आल्या. गाडीचे इंजिन वेळीच वेगळे केल्याने निदान इंजिन तरी वाचले.
फगवाडा जिल्ह्यात संतप्त जमावाने अनेक ठिकाणी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांवर अनेक ठिकाणी दगडफेक केली. जवानांनी लाठीमार करून त्यांना पिटाळले. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-अंबाला, जालंधर-जम्मू आणि जालंधर -चंडीगढ या तिन्ही राष्ट्रीय महामार्गांवर ट्रकांना आगी लावून तसेच अडथळे निर्माण केल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी येथेही आंदोलकांवर लाठीमार केला. पंजाबात पतियाळा, लुधियाना, जालंधर, अमृतसर, होशियारपूर, फगवाडा तर हरयाणातील अंबाला मिळून २० बसगाड्या जाळण्यात आल्या. फगवाडा येथे स्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले.
संपूर्ण जालंधर शहरात संचारबंदी असल्यामुळे शासकीय कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने आणि शिक्षणसंस्था बंद होत्या. लष्कर आणि पोलिसांनी या शहरात फ्लॅग मार्च केला. जमावाने मकसूदन पोलिस ठाण्यावर हल्ला चढवून ठाण्यात ठेवलेल्या वाहनांना आगी लावल्या. पोलिसांनी यावेळी जमावावर जबर लाठीहल्ला करून त्यांना पांगविले आणि काही लोकांना अटक केली. जमावाने जालंधरमधील राम नगर रेल्वे क्रॉसिंगसमोर ठिय्या आंदोलन केल्यामुळे रेल्वेगाड्या आधीच्या स्थानकावर थांबविण्यात आल्या. आंदोलनकर्त्यांनी काही ठिकाणी पत्रकार आणि वृत्तछायाचित्रकारांवरही हल्ले केले. नूरमहल या गावात १०० टक्के बंद पाळण्यात आला. येथे २८ मे रोजी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.


शांतता आणि सद्भाव
कायम राखा : पंतप्रधान


नवी दिल्ली, दि. २५ - व्हिएन्ना येथे डेरा सचखंडच्या नेत्याच्या हत्येवरून पंजाबात उसळलेल्या हिंसाचाराबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी अतिशय दु:ख व्यक्त केले असून, जनतेने शांतता आणि सद्भाव कायम राखावा, असे आवाहन केले आहे.
व्हिएन्नात जे काही घडले, त्यामुळे जनतेचा संताप अनावर होऊ शकतो, पण समाजाच्या सर्व समुदायातील लोकांनी शांतता आणि सद्भाव कायम राखणे हेही महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. शीख धर्म आम्हाला संयम आणि एकोप्याची शिकवण देतो. आमच्या सर्वच गुरूंनी समानतेची मूल्ये, बंधुभाव आणि सद्भावाची शिकवण दिली आहे आणि आपण त्याचे पालन केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
ज्या भागात संचारबंदी लावली गेली आहे, त्या भागातील जनतेने आपापल्या घरीच रहावे आणि सुरक्षा दलांना कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यास मदत करावी, हिंसाचाराला कोणताही थारा देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दागिने खरेदी केलेल्या सोनाराला अटक

फोंडा, दि.२५ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याने युवतीचे खून चोरून आणलेले सोन्याचे दागिने खरेदी करीत असल्याच्या आरोपावरून फोंडा पोलिसांनी काझीवाडा फोंडा येथील काझी बिल्डिंग मधील मे. रिवणकर ज्वेलर्स दुकानाचे मालक उल्हास रिवणकर याला आज (दि.२५) संध्याकाळी अटक केली. महानंद नाईक प्रकरणात सोनाराला अटक करण्यात आल्याने फोंड्यात खळबळ माजली आहे. आत्तापर्यंतच्या दहापैकी सात प्रकरणांचा उलगडा झाला असून तीन युवतींच्या खुनांच्या नेमक्या जागांचा शोध घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, निरंकाल येथील ज्या दोन युवती महानंदच्या तावडीतून सुटल्या होत्या, त्यांची जबानी पोलिसांनी आज नोंदवून घेतली आहे.
संशयित महानंद नाईक हा युवतींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना घरातून येताना सोन्याचे दागिने घालून येण्याची अट घालीत होता. त्या युवतीचे खून करून त्यांच्या अंगावरील दागिन्यांची चोरी करीत होता, असे स्पष्ट झाले आहे. युवतीचे खून केल्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिन्याचे काय केले? कुठे विकले? अशी विचारणा पोलीस अधिकाऱ्यांनी केल्यानंतर संशयित महानंद नाईक याने दागिने फोंड्यातील एका सोनाराला विकल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी महानंद नाईक याने काझीवाडा फोंडा येथील मे. रेवणकर ज्वेलर्स या दुकानात सोन्याच्या दागिन्याची विक्री केल्याचे सांगितले. तसेच पोलिसांना नेऊन दुकान सुध्दा दाखविले. महानंद नाईक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दागिने खरेदी करणारे सोनार उल्हास रेवणकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. महानंद नाईक हा चोऱ्या करीत असल्याचे सोनाराला माहीत होते. तरी त्याने पोलिसांना माहिती दिलेली नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
संशयित महानंद नाईक हा पोलिसांना सुरुवातीला चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीची सखोल चौकशी करीत असल्याने महानंद बऱ्याच बाबी उघड करीत नसल्याचे पोलिसांना आढळून आले. युवतीचे खून केल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्यात, नदीत टाकत असल्याचे सांगून वेळ निभावून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खरी माहिती जास्त काळ पोलिसापासून लपवून ठेवू शकला नाही. दहा युवतीचे खून केल्याची कबुली महानंद याने दिली आहे. युवतीच्या खुनांची ठिकाणे पूर्वी सांगितलेल्या माहितीपेक्षा वेगळी असल्याचे उघड झाले आहे.
आत्तापर्यंत महानंद नाईक याने कबुली दिलेल्या दहा खुनांपैकी सात युवतीच्या खून प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. कु. योगिता, कु. दर्शना, कु. केसर, कु. नयन, कु.सुरत, कु. सुशीला, कु.अंजनी या सात प्रकरणाचा पूर्ण छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या सातही युवतीचे मृतदेह किंवा त्यांचे हाडांचे अवशेष सापडले आहेत. तीन प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्या युवतीच्या खुनाची ठिकाणे सुध्दा बदललेली आहेत. सुनिता गावकर हिचा आमोणा येथे खून केल्याचे महानंद याने सांगितले आहे. वासंती गावडे हिचा बेतोडा आणि निर्मला घाडी हिचा बोरी येथे खून केल्याची कबुली दिली आहेत. सुनिता गांवकर हिचा आमोणा येथे खून केला. तर केरये खांडेपार येथे सापडलेली हाडे कुणाची ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण केरये खांडेपार येथे सुनिता गांवकर हिचा खून केल्याची कबुली दिली होती. या संबंधी चौकशी सुरू असून "ती' हाडे कुणाची ही माहिती सुध्दा उघड होईल, असे उपअधीक्षक शेराफीन डायस यांनी सांगितले. या प्रकरणी निरीक्षक सी.एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक संजय दळवी आदी तपास करीत आहेत.

जोतकर भगिनी जिवंत?

अज्ञाताचा दूरध्वनीवरून दावा

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी) - मडगाव येथून बेपत्ता असलेली दीपाली जोतकर व तिची मोठी बहीण या दोघीही जिवंत असल्याचे निनावी दूरध्वनी येत असल्याने फोंडा पोलिसांची तारांबळ उडाली आहे. हे दूरध्वनी बायलांचो एकवोट या महिला संघटनेच्या प्रमुख आवडा व्हिएगस यांनाही येत असल्याची माहिती मिळाली. मात्र हे दूरध्वनी कुठून येतात व कोण करतो, याची कोणतीही माहिती फोंडा पोलिसांकडे उपलब्ध नाही.
सीरियल किलर महानंद नाईक याचा फोटो वर्तमानपत्रावर प्रसिद्ध आल्यानंतर दीपाली जोतकर हिच्या आईने महानंदनेच आपल्याही मुलीला फुस लावून मारल्याची तक्रार मायणा कुडतरी पोलिस स्थानकात केली होती. परंतु, १० मुलीचे गळा घोटल्याची कबुली देणाऱ्या महानंदने अद्याप या दोघा बहिणीविषयी कोणताही माहिती पोलिसांनी दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या बेपत्ता होण्यामागील गूढ अद्याप कायम आहे.
"या दोघी बहिणी जिवंत असून त्यांना आपण पाहिलेले आहे' अशी माहिती दूरध्वनी करून बोलणारा व्यक्ती देत असल्याची माहिती आवडा व्हिएगस यांनी दिली. या दूरध्वनीविषयी "गोवादूत'ने चौकशी केली असता येणारे सर्व दूरध्वनी उजगाव तिस्क या परिसरातून येत असल्याची माहिती मिळाली. दि. २३ मे रोजी पहिला दूरध्वनी आला. हा दूरध्वनी (०८३२-२३४५६६७) या क्रमांकावरून आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की "मी दिपाली ज्योतकर हिला पाहिले आहे. एक बहीण बेळगाव येथे असते तर, दुसरी सावंतवाडी येते' एवढे बोलून त्याने दूरध्वनी ठेवला.
दुसऱ्या दिवशी दि. २४ रोजी (०८३२-२३४५६६७) या क्रमांकावरून पुन्हा दूरध्वनी आला. यावेळी त्याने त्या दोघी आता पनवेल येथे राहत असल्याची माहिती श्रीमती व्हिएगस यांना दिली. यापेक्षा अधिक काहीच ती व्यक्ती बोलली नाही. त्यानंतर पुन्हा ९९७०१२४५५२ या क्रमांकावरून व्हिएगस यांच्या मोबाईलवर दूरध्वनी करून "त्या दोघी बहिणी बेळगाव येथे आहेत. त्या तुमच्या नातेवाईक लागतात का' असा प्रश्न करून "मी त्यांना तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो', असे सांगितले. हा दूरध्वनी तिस्क ताक येथून आल्याची माहिती "गोवादूत'ला मिळाली आहे.

"त्या' निलंबित पोलिसाच्या जामीनअर्जावर आज सुनावणी

पेडणे वेश्याव्यवसाय प्रकरण

पणजी, दि.२५ (प्रतिनिधी) - पेडणे येथे तथाकथित वेश्या व्यवसायात गुंतल्याप्रकरणी पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलेला पोलिस शिपाई राजेश सावंत याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या २६ रोजी पणजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. राजेश सावंत हा सध्या गायब आहे. उद्या जामिनावरील सुनावणीवेळी तो हजर राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पेडणे तालुक्यातील अनेक बडे धेंडेही सामील असल्याची चर्चा असून राजेश सावंत याची जबानी महत्त्वाची ठरणार असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची पूर्ण तयारी केली आहे.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी राजेश सावंत याच्या निलंबनाचा आदेश जारी केला होता. याप्रकरणी पद्धतशीरपणे चौकशी सुरू असून यात कोणताही राजकीय दबाव नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणात आणखीही काही पोलिस व स्थानिकांचा सहभाग असल्याची चर्चा या भागात सुरू असल्याने राजेश सावंत याच्या जबानीनंतरच हे स्पष्ट होईल,असेही यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिसांची प्रतिष्ठाच धुळीस मिळाल्याने या प्रकरणावर पांघरूण घालण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पेडणे भागातील काही स्थानिक पंचायत सदस्यही यात सामील असल्याने आपल्या राजकीय सूत्रांच्या साहाय्याने हे प्रकरण मिटवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
पेडणेचे आमदार दयानंद सोपटे यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या गोवा विधानसभा गृह खाते अस्थायी समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला होता. पोलिस याप्रकरणी हयगय करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. राजेश सावंत याच्या गायब होण्यामागे पोलिसांचाच हात असल्याची टीका या भागातील लोकांकडून केली जाते. म्हापसा पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी युवतीची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात करण्यात आली खरी परंतु ही मुलगी या संपूर्ण प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असतानाही तिची जबानी मात्र अद्याप नोंदवली नसल्याचे कळते. या मुलीला चक्क सुधारगृहातून पलायन करण्यास मदत करून या प्रकरणालाच पूर्णविराम देण्याचे प्रयत्नही सुरू होते,अशीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

अंजुणे परिसरात सापडले वाघांच्या पायाचे ठसे

कथित हत्याप्रकरणाला नवे वळण

पणजी, दि.२५ (प्रतिनिधी) - वन खात्याच्या विशेष पथकाने केलेल्या पाहणीत अंजुणे धरण परिसरात एक वाघीण व तिच्या बछड्याच्या पायाचे स्पष्ट ठसे सापडल्याने या परिसरात वाघाच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्य वनपाल डॉ.शशीकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या ताज्या घडामोडीमुळे केरी सत्तरी येथे घडलेल्या तथाकथित पट्टेरी वाघाच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण प्राप्त झाले असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वन खात्याने कंबर कसली आहे.
केरी सत्तरी येथे पट्टेरी वाघाची हत्या झाल्याचा प्रकार पर्यावरणप्रेमी प्रा.राजेंद्र केरकर यांनी उघडकीस आणला होता. या संदर्भात त्यांनी हत्या झालेल्या वाघाचे मोबाईलवरील एक छायाचित्रही वन खात्याला दिले होते. या परिसरात वाघाचे अस्तित्व नसल्याने प्रा.केरकर यांच्या या दाव्याला वन खात्याकडून विशेष महत्त्व देण्यात आले नाही. दरम्यान, प्रा.केरकर हे स्वतः केरी गावात राहतात. या वाघाच्या हत्या प्रकरणात केरी गावातीलच काही लोक सामील असल्याने या लोकांचा रोष सध्या त्यांना पत्करावा लागत आहे. वन खात्याकडून या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली असून मृत वाघाचे कोणतेही अवशेष मिळाले नाहीत,अशी माहिती शशीकुमार यांनी दिली. दरम्यान,प्रा.केरकर यांना वन खात्याकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबतही अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.एकतर यापूर्वी येथील पर्यावरणप्रेमींकडून या परिसरात वाघाच्या अस्तित्वाबाबतची माहिती दिली होती पण वन खाते याबाबत काहीच करू शकले नाहीत. आता वन खात्याच्या विशेष पथकाने केलेल्या पाहणीत अंजूणे परिसरात वाघाच्या छाव्यांचे ठसे प्राप्त झाल्याने प्रा.केरकर यांनी दिलेल्या माहितीत तथ्य असल्याचे सिद्ध झाले आहे. आता हे जनावर येथीलच आहे की इतर राज्यातून भटकत इथे स्थलांतरित झाले आहे, हे मात्र कळण्यास मार्ग नाही, असेही डॉ.शशीकुमार यांनी मान्य केले. त्यात आता वाघाच्या हत्येचा विषय समोर आल्याने वन खाते तोंडघशी पडले आहे. केरी गावातील काही संशयित लोकांनी येथील एका राजकारण्याला धरून हे प्रकरण मिटवण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या ठिकाणी कोणतेही अवशेष सापडले नसल्याने आता केवळ मोबाईलवरील छायाचित्र हा एकमेव पुरावा या संपूर्ण प्रकरणांत महत्त्वाचा ठरला आहे. मुळात मोबाईलवरील या छायाचित्राची तज्ज्ञांकडून तपासणी केली असती तर या छायाचित्राचे मूळ सहज सापडू शकले असते परंतु तसे न करता वन खात्याकडून प्रा.केरकर यांना लक्ष्य बनवण्याचे सत्र सुरू असल्याची टीका होत आहे. आपल्याच गावात घडलेल्या या प्रकाराबाबत उघडपणे वन खात्याला माहिती देऊनही अखेर आरोपींची नावेही त्यांनी सांगावी,अशा आविर्भावात वन खात्याचे अधिकारी वावरत असल्याने प्रा.केरकर यांच्याविरोधात येथील स्थानिकांचा रोष वाढावा यासाठीच ही शक्कल लढवली जात असल्याचेही काही लोकांचे म्हणणे आहे.
वाघाची हत्या करणे हा मोठा गुन्हा आहे व याप्रकरणी वन्य संरक्षण कायद्याअंतर्गत गंभीर सजेचीही तरतूद आहे. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून वारंवार जबान्या बदलल्या जात असल्याचे डॉ.शशीकुमार म्हणाले. दरम्यान,आज खास चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेल्या भिवा वामन गांवस व अंकुश माजीन यांनी आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मुळात या संपूर्ण प्रकरणात प्रमुख संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या गोपाळ येसो माजिक यांनी दिलेल्या जबानीवरून या लोकांना चौकशीसाठी पाचारण केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान,हत्या झालेल्या वाघाचे मोबाईल छायाचित्र सुरुवातीस भिवा गांवस याच्याकडून मिळाल्याचा संशय होता, परंतु आपला मोबाईल गहाळ झाल्याची माहिती त्याने आज वनाधिकाऱ्यांना दिली. याबाबत पोलिस तक्रार केली आहे काय,असे विचारले असता मोबाईल गहाळ झाल्यास तक्रार करतात हे आपल्याला ठाऊक नाही,असे उत्तर त्याने दिल्याचे डॉ.शशीकुमार म्हणाले.
वनाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा
दरम्यान,दुचाकीवरून अपघात झाल्याचे सांगून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या सूर्यकांत माजीक याने आज अचानक आपल्याला वनाधिकाऱ्यांकडून मारहाण झाल्याचा दावा खुद्द डॉ.शशीकुमार यांच्याकडे केला.. मुळात सूर्यकांत हा येथील गृहरक्षक विभागात कामाला आहे. एका सरकारी सेवकाला अन्य सरकारी खात्यातील अधिकाऱ्यांकडून मारहाण होण्याचा हा प्रकार कितपत सत्य आहे याबाबत मात्र अद्याप कोणताही सबळ पुरावा हाती मिळाला नाही. सूर्यकांत याने गोमेकॉत दाखल होतानाही अशी कोणतीही माहिती डॉक्टरांना दिली नाही,अथवा पोलिस तक्रार केली नाही. केवळ डॉ.शशीकुमार यांनी त्याची भेट घेतली असता त्याने हा दावा केला आहे.याप्रकरणी त्याने श्री.शेटगांवकर व परेश परब या अधिकाऱ्यांची नावे घेतली आहेत.सूर्यकांत माजिक याचीही वाघ हत्याप्रकरणी चौकशी सुरू असल्याने जाणीवपूर्वक वन खात्याला बदनाम करण्यासाठी त्याने हा दावा केला जाण्याची शक्यता डॉ.शशीकुमार यांनी फेटाळला नाही.

Monday, 25 May 2009

तीन कॅबिनेट मंत्रिपदावर द्रमुक राजी होणे शक्य

चेन्नई, दि. २४ - संपुआ सरकारमध्ये द्रमुक सहभागी होण्याबाबतचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून करुणानिधी यांनी रविवारी कॅबिनेट व राज्यमंत्री पदांसाठी उमेदवारांचे नाव निश्चित केले. त्यात टी.आर.बालू यांचा समावेश नसल्याची माहिती द्रमुकच्या विश्वसनीय सूत्राने दिली.
द्रमुक अध्यक्ष एम.करुणानिधी यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत रविवारी झालेल्या सामूहिक व खाजगी बैठकीबाबत अधिकृतपणे काहीच सांगण्यात आले नाही. मात्र त्यांचे पुत्र एम.के.अझगिरी, दयानिधी मारन आणि ए.राजा यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून सरकारमध्ये समावेश राहू शकतो. तेथेच द्रमुकच्या राज्यसभा सदस्य आणि करुणानिधी यांच्या कन्या कानिमोझी स्वतंत्र प्रभार असलेल्या केंद्रीय मंत्रिपरिषदेत स्थान मिळवू शकतात. त्याचप्रमाणे पक्षाच्या अन्य तीन नेत्यांना राज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये स्थान मिळू शकते, अशी जोरदार चर्चा आहे.
द्रमुक संपुआ सरकारमध्ये सहभागी होणार नाही, अशी चर्चा सुरू असतानाच कानिमोझी यांनी मी सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला नाही, असे पत्रकारांना सांगितले. राजा यांना माहिती व तंत्रज्ञान, अझगिरी यांना रसायने व खते आणि मारन यांना वस्त्रोद्योग मंत्रालय मिळू शकते अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून या तिढ्यावर सोमवारी सकाळपर्यंत तोडगा निघेल अशी शक्यता द्रमुकच्या सूत्राने वर्तविली. पंतप्रधान मनमोहन सिंग मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असून त्यात द्रमुकच्या आणखी काही मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो अशी शक्यताही सूत्राने वर्तविली.
बालू १९९९ पासून कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. त्यांना वाजपेयी सरकारमध्ये पर्यावरण आणि वन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. देवेगौडा मंत्रिमंडळातही ते पेट्रोलियम राज्यमंत्री राहीले. त्यानंतर यापूर्वीच्या संपुआ सरकारमध्ये ते भूतल परिवहन व जहाज वाहतूक मंत्री राहिले. परंतु यावेळी मात्र करुणानिधी यांच्या कौटुंबिक भांडणात बालू यांच्या हाती काहीच लागणार नाही असे सध्यातरी वाटत आहे. करुणानिधी यांनी रविवारी द्रमुकच्या वरिष्ठ नेत्यांसोबत व्यक्तिगत व सामूहिकपणे सुमारे तीन तास चर्चा केली. असे असले तरी अंतिम निर्णय अद्याप व्हायचा असून त्याबाबत सोमवारी सकाळी घोषणा होऊ शकते.
मंत्रालयांच्या वाटपाचा कॉंग्रेसचा फॉर्म्युला आपल्याला स्वीकार नसल्याचे सांगून द्रमुकने मंगळवारी संपुआ सरकारमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. तडजोडीनंतर येत्या काही दिवसांत द्रमुक संपुआ सरकारमध्ये सहभागी होईल, अशी आशा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी व्यक्त केली होती.

"कदंब' बसखाली चिरडून कोपार्डे येथे कामगार ठार

वाळपई, दि. २४ (प्रतिनिधी) - कोपार्डे-सत्तरी येथे शनिवारी रात्री ११.२० च्या सुमारास कदंब बसखाली चिरडून एक कामगार जागीच ठार झाला. यमुनप्पा हरिजनप्पा मेलवत्तर (३२ वर्षे) असे त्याचे नाव असून, तो कर्नाटकातील आहे.
जीए-०१ एक्स ०२७७ या क्रमांकाची कदंब बस कोपार्डे गावात जात होती. त्यावेळीच कोपार्डे गावात केबल घालण्याचे काम करणारा यमुनप्पा चालत होता. त्याला मागून बसने धडक दिली. त्यात तो बसखाली चिरडून ठार झाला. कदंबचा चालक कमलाकांत हळदणकर याला वाळपई पोलिसांनी अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. यमुनप्पा याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळीस पाठविण्यात आला. पंचनामा उपनिरीक्षक चंद्रकांत नाईक यांनी पंचमाना केला.

आझम खान सपामधून सहा वर्षासाठी निलंबित

लखनौ, दि. २४ - गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेले आझम खान यांना समाजवादी पार्टीने सहा वर्षांसाठी निलंबित केले असून पाठोपाठ आझम खान यांनीही विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंग यादव यांनी ही माहिती दिली. भाजपाचे माजी नेते कल्याण सिंग यांचे सपाशी जुळलेले संबंध आणि अभिनेत्री जयप्रदा यांना रामपूरमधील उमेदवारी देणे, या दोन मुद्यांवरून आझम खान यांचे पक्षासोबत मतभेद सुरू होते. पक्षाचे महासचिव अमरसिंग यांच्याशीही त्यांचे प्रचंड वाद झाले. मुलायमसिंग यांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविण्याचा प्रयत्नही केला होता. पण, त्यांना यश आले नाही.
जयप्रदा यांना रामपूरमधून पाडण्याचेही प्रयत्न आझम खान यांनी केले. पक्षविरोधी कारवायांचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. आझम खान हे विधानसभेत पक्षाचे उपनेते आहेत. त्यांनी विधानसभेतील सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचे समजते.
समाजवादी पार्टीच्या जडण-घडणीत आझम खान यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून त्यांना पक्षातील कारभार पटत नव्हता. अमरसिंग यांच्यासोबतचे मतभेद तर विकोपाला गेले होते. आज अखेर त्याचे पर्यवसान आझम खान यांच्यावरील कारवाईत झाले.

तालिबानने स्वातमध्ये
२०० शाळा पेटविल्या

लंडन, दि. २४ ः तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रचंड धुडगूस घातला असून या काळात त्यांनी खोऱ्यातील २०० हून अधिक शाळा पेटवून दिल्या आहेत. या माध्यमातून आणि शिक्षेची घोषणा करून बालिकांना शिक्षणापासून रोखण्यासाठी तालिबानने सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत.
"संडे टाईम्स'ने स्वातची राजधानी मिंगोरा येथून प्रकाशित केलेल्या बातमीत याचा उल्लेख केला आहे. तालिबानी नेते खोऱ्यात जाहीरपणे सांगतात की, जे लोक सच्चे मुसलमान आहेत, त्यांनी आपल्या मुलींना शाळेत जाण्यापासून थांबविले पाहिजे. "संडे टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, दररोेेेेेज सायंकाळी तालिबानी नेता मौलाना फजलुल्ला हा रेडिओवर अशा मुलींची नावे जाहीर करतो, ज्यांना शाळेत जाण्यापासून थांबविण्यात आले आहे. तो त्या मुलींची नावे घेऊन त्यांचे जाहीर अभिनंदन करतो. त्यानंतर तो लोकांना ताकीद देतो की, जे लोक शिक्षण घेणे सुरूच ठेवतील ते नरकात जातील.
मौलाना फजलुल्ला हा तालिबानचा कमांडर आहे. गेल्या दोन वर्षात त्याच्या सांगण्यावरून स्वात खोऱ्यात २०० हून अधिक शाळा पेटविण्यात आल्या आहेत. स्वात खोऱ्यात तालिबानने किती थैमान घातले आहे, याचे शब्दांकन एका मेडिकलच्या विद्यार्थ्याने केले आहे. शाळा जाळणे, प्रेत चौकात टांगणे, भर चौकात हंटर मारणे हे प्रकार होतातच. कापून ठेवलेले शिर लटकविले जातात आणि त्यावर लिहिलेले असते की, आमच्याशी गद्दारी करून शत्रूसाठी हेरगिरी करणाऱ्यांना हीच शिक्षा मिळते.
एक मध्यमवयीन महिला बाजारात खरेदीसाठी गेली असता तिला एका धाडधिप्पाड व्यक्तीने हटकले. दरडावून म्हटले की, तुला कोणी सांगितले नाही का की, बायकांना बाजारात येण्यास मज्जाव आहे. यापुढे दिसलीस तर ठार करू. मुली आणि बायकांना प्रचंड निर्बंधांमध्ये ठेवण्याची तालिबानची तऱ्हा आहे.

...तर ३ जूनपासून कामगार संपावर

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम खाते पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागातील कामगारांनी पुकारलेला बेमुदत संप स्थगित ठेवल्याची माहिती कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिली. कामगार आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर येत्या २ जूनपर्यंत सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास ३ जूनपासून स्थगित ठेवलेला संप पुकारला जाणार असल्याचे श्री. फोन्सेका यांनी म्हटले आहे.
या दोन्ही विभागात सुमारे १ हजार ६०६ कामगार असून दि. २५ मे ०९ पासून त्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर दि. २२ मे रोजी कामगार उपआयुक्त फातिमा रॉड्रिगीस तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर झालेल्या बैठकीत सरकारशी चर्चा करून कामगारांच्या मागण्यावर तोडगा काढला जाणार असल्याची हमी देण्यात आली. त्याचप्रमाणे २५ मे पासून पुकारलेला संप तोपर्यंत स्थगित ठेवण्याची विनंती केल्याने आणि लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरता संप स्थगित स्थगित ठेवण्यात आल्याचे श्री. फोन्सेका यांनी सांगितले.

वेर्णा येथे औषध उद्योगात युवक ठार

वास्को, दि. २५ (प्रतिनिधी)- वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील "लुपीन लिमिटेड' उद्योगामध्ये काम करत असताना २४ वर्षीय लिथून सुपोय वरान्ते हा युवक अडीच मीटरच्या उंचीवरून घसरून पडून नंतर मरण पावला. ओरिसा येथील रहिवासी असलेला लिथून गेल्या काही काळापासून गोव्यामध्ये काम करत असल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगून गंभीर अवस्थेत त्यास गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर उपचार घेत असताना त्याचे निधन झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ८.३० च्या सुमारास सदर घटना घडली."लुपीन औषधाच्या उद्योगामध्ये काम करीत असताना त्याचा अचानक पाय घसरून तो सुमारे अडीच मीटरच्या उंचीवरून खाली जमिनीवर कोसळला. सदर घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे वेर्णा पोलिसांनी सांगितले.त्यास तातडीने उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दरम्यान दुपारी १२.३० च्या सुमारास उपचार घेत असताना त्याचे इस्पितळात निधन झाले.
वेर्णा पोलिसांनी या वेळी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या शवागृहात पाठवून दिला आहे. २४ वर्षीय मयत लिथूनचे कुटुंबीय गोव्यात आल्यानंतर त्याच्या मृतदेहाची शवचिकित्सा करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अभिषेक गोम्स यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

"सीरियल किलर'ला नाट्यमय वळण

खून केल्याची ठिकाणे बदलली
मानवी हाडे व कपडेही हस्तगत


फोंडा. दि. २४ ( प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याने दहा युवतींच्या खुनाची कबुली दिलेली असली तरी त्याने पोलिस तपासकामात दिलेली माहिती चुकीची होती हे आता उघड झाले झाले आहे. महानंदने आपण केलेल्या युवतींच्या खुनाची जी ठिकाणे दाखवली होती ती पूर्णपणे चुकीची होती हे आता पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे महानंद प्रकरणाला आता वेगळेच वळण लागण्याची चिन्हे उत्पन्न झाली आहेत.
यासंदर्भात राय आणि बांबोळी येथून आज पोलिसांनी मानवी हाडे हस्तगत केली आहेत.
महानंदने अंजनी गावकर हिचा खून आपण ओपा - कोडार या डोंगराळ भागात केल्याची कबुली सुरुवातीस दिली होती; मात्र आता अंजनीचा खून राय भागात केल्याचे त्याने उघड करून खून करण्यात आलेली जागाही दाखवली. त्या जागेतून पेलिसांनी एक मानवी सांगाडा व कपडेही ताब्यात घेतली आहेत.
कुडका येथील सुशीला फातर्पेकर हिचा रायबंदर येथे खून केल्याचे महानंदने सुरुवातीच्या पोलिस चौकशीत सांगितले होते; मात्र सुशीलाचा खून रायबंदरला झाला नसून बांबोळी पठारावर झाल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात बांबोळी पठारावरून पोलिसांनी मानवे हाडे ताब्यात घेतली आहेत.
तसेच महानंदने सुरुवातीला आपण सुरत गावकर या तरुणीचा खून बोरी येथे केल्याचे मान्य केले होते. मात्र आता त्याने सुरतचा खून पारोडा - चंद्रेश्वर भूतनाथ या भागात केल्याचे मान्य केले आहे. केसर हिचा खून सावर्डे येथे करून तिचा मृतदेह नदीत फेकल्याचे त्याने सुरुवातीला सांगितले होते; मात्र आता त्याने कबूल केल्याप्रणाणे तो खून रिवण येथे केला गेला होता. त्यावेळी स्थानिक पोलिसांना रिवण येथे मानवी हाडेही सापडली होती.
महानंदने आपण नयन गावकर हिचा खून सावर्डे भागात केला होता असे प्राथमिक चौकशीत पोलिसांना सांगितले होते; मात्र आता त्याने कबुली दिल्याप्रमाणे तो खून फातोर्डा - मडगाव येथील एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी त्याने केला होता.
दरम्यान, योगिता नाईक आणि दर्शना नाईक यांच्या मृतदेहांची ओळख यापूर्वीच पटलेली आहे. तसेच सुनिता गावकर हिची खून केलेल्या भागातून हाडेही यापूर्वीच पोलिसांनी हस्तगत केली आहेत. याशिवाय आणखी तीन प्रकरणातही आपण यापूर्वी दिलेली माहिती चुकीची होती परंतु, त्यांचा तपशील पोलिसांनी अद्याप दिलेला नाही. उद्या तोही मिळण्याची शक्यता आहे.
महानंदच्या या गाजलेल्या खून प्रकरणात उपअधीक्षक शेराफीन डायस, पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, लक्षी आमोणकर, निखील पालेकर व हेड कॉन्स्टेबल सावळो नाईक आणि प्रताप परब अधिक तपास करीत आहेत.

Sunday, 24 May 2009

परराष्ट्र मंत्रिपदी एस.एम.कृष्णा

चिदंबरम गृहमंत्रिपदी कायम
प्रणव मुखर्जीना अर्थ
ममतांकडे रेल्वे
पवारांना पुन्हा कृषी
ऍन्टनींकडे संरक्षण खाते कायम

नवी दिल्ली, दि. २३ - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कॅबिनेटमधील १९ पैकी ६ मंत्र्यांना शनिवारी खातेवाटप करण्यात आले. आश्चर्यजनकरित्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या एस.एम. कृष्णा यांना विदेश मंत्री बनविण्यात आले असून, पी. चिदंबरम यांच्याकडे गृहमंत्रालयाचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे. माजी विदेशमंत्री प्रणव मुखर्जी यांना यावेळी अर्थमंत्रालयाचा ताबा देण्यात आला आहे. ए. के. ऍन्टनी यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची व शरद पवार यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना अपेक्षेनुसार रेल्वे मंत्रालय मिळाले आहे. उर्वरित खात्यांचे वाटत डीएमकेसोबतचा तिढा सुटल्यानंतर अथवा येत्या तीन-चार (मंगळवारपर्यंत) दिवसांत होणार आहे.
शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या डावाची सुरुवात करणाऱ्या मनमोहनसिंग यांनी शनिवारी कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रपरिषदेत गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी १ ते ९ जून या कालावधीत नव्या संसदेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्याचा कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली.
४ जूनपासून राज्यसभेचे अधिवेशन बोलाविण्याचा निर्णय झाला असल्याचेही चिदंबरम यांनी सांगितले. ३१ जुलैपूर्वी सरकार अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करेल. यासाठी सर्वच पक्षांसोबत चर्चा केली जाणार आहे. मंदीचा सामना करण्याला सरकार प्राधान्य देणार असून निवडणुकीदरम्यान कॉंग्रेसने दिलेल्या आश्वासने प्रामाणिकपणे पाळण्याचाही सरकार कसोशीने प्रयत्न करेल. या बैठकीत शुक्रवारी पंतप्रधानांसोबत शपथ घेणारे सर्व १९ मंत्री सहभागी झाले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

लोकसभेचे पहिले अधिवेशन १ जूनपासून

३ जून रोजी लोकसभा सभापतींची निवड

नवी दिल्ली, दि. २३ ः शुक्रवारी पंतप्रधानांसह त्यांच्या मंत्रिमंडळाने शपथ घेतल्यानंतर आज शनिवारी डॉ. मनमोहन सिंग यांनी शनिवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. यात पंधराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन १ जूनपासून बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. हे अधिवेशन ९ जूनपर्यंत चालणार आहे. तसेच ३१ जुलैपर्यंत अर्थसंकल्प सादर केला जाईल, अशी आशाही बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे.
१ व २ जून रोजी नवे खासदार शपथ घेतील. ३ जून रोजी लोकसभा सभापती व उपसभापतींची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ जून रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (लोकसभा व राज्यसभा) संयुक्त अधिवेशन होणार असून, यात परंपरेनुसार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे अभिभाषण होईल. ५ जूनपासून राष्ट्रपतींच्या भाषणावर चर्चा सुरू होईल. संसदेचे पहिले अधिवेशन ९ जून रोजी संपणार आहे.

जीपच्या धडकेने आगशीत दोघे दुचाकीस्वार ठार

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - आगशी पोलिस स्थानकाजवळ महेंद्रा जीप आणि डियो दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार साव्हियो फर्नांडिस (३०, मार्जोडा) व झेव्हियर कार्दोज (२९, वेर्णा) यांचे निधन झाले. पोलिसांनी करमळी येथे राहणारा २५ वर्षीय जीपचालक विकास कुट्टीकर याच्या विरोधात भा.दं.सं. २७९ व ३०४ (अ) कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आज सकाळी ५.३० वाजता हा अपघात झाला. मृत झालेला साव्हियो हा बेकरी चालवत असून आज सकाळी आपला कामगार झेव्हियर याच्यासह पावांची विक्री करण्यासाठी कुठ्ठाळी येथे जात होता, अशी माहिती आगशी पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जीए ०१ टी ६२५४ क्रमांकाची महेंद्रा जीप मडगाव येथून पणजीच्या दिशेने येत होती तर, डियो क्रमांक जीए ०८ एच ०४६२ ही गोवा वेल्हा येथून कुठ्ठाळीला जात होती. यावेळी जीप चालकाचा ताबा गेल्याने चुकीच्या दिशेने येऊन दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर त्यांना फरफटत नेऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांब्याला धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यावेळी जखमींना तातडीने उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु, वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. शवचिकित्सा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. तर, अपघातस्थळी पंचनामा करून जीप ताब्यात घेऊन चालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास आगशी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक शामराव चव्हाण करीत आहे.

तनुजा नाईकचे खरे खुनी पकडण्याची मागणी

"तपास सीबीआयकडे द्या'
फोंडा, दि.२३ (प्रतिनिधी) - पारंपई मडकई येथील कु. तनुजा नाईक खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी केलेली बनवेगिरी न्यायालयात उघड झाली आहे. कु. तनुजा खून प्रकरणात स्थानिक युवक गुंतलेला असून त्याला ताबडतोब अटक करावी आणि या खून प्रकरणाचे तपासकाम सीबीआयकडे द्यावे, या मागणी पुनरुच्चार तनुजा नाईक मृत्यू कृती समितीचे अध्यक्ष शशी पणजीकर यांनी आज (दि.२३) संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत बोलताना येथे केली आहे.
यावेळी कु. तनुजा नाईक हिचे वडील काशिनाथ नाईक आणि भाऊ उपस्थित होता. तनुजा नाईक हिच्या खून प्रकरणात गावातील युवक गुंतलेला आहे, असा दावा श्री. पणजीकर यांनी यावेळी बोलताना केला. केवळ राजकीय दबावामुळे संशयित युवकाला अटक करण्यासाठी पोलिस पुढे येत नाहीत. कु. तनुजा नाईक हिच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी एकाला अटक केल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आपण फोंडा पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अटक करण्यात आलेला संशयित निर्दोष असल्याचे सांगितले होते. केवळ लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी हे अटक नाट्य करण्यात आल्याचा दावा आपण केला होता. आपण त्यावेळी केलेला सदर दावा अखेर खरा ठरला आहे, असेही श्री. पणजीकर यांनी सांगितले.
तनुजा नाईक खून प्रकरणाचे तपास काम सीबीआयकडे द्यावे, ही आमची मागणी कायम आहे. तनुजा खून प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेल्या अधिकाऱ्यांची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी श्री. पणजीकर यांनी केली. या प्रकरणात गुंतलेल्या संशयित युवकाचे नाव यापूर्वीच फोंडा पोलिसांना दिलेले आहे. मात्र, त्याची कसून चौकशी करण्यात आलेली नाही. या खून प्रकरणाचे तपास काम सीबीआयकडे द्यावे, या मागणीसाठी आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावेळी तपास काम योग्य दिशेने सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या खून प्रकरणी दोघांना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. पोलिसांचा तपास योग्य दिशेने नसल्याचे उघड झाले आहे. आता समितीतर्फे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व गृहमंत्र्याना निवेदने सादर करून खुनाचे तपासकाम सीबीआयकडे देण्याची मागणी केली जाणार आहे. सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली जाणार आहे, असेही श्री. पणजीकर यांनी सांगितले.
कु. तनुजा हिच्या मारेकऱ्याला शिक्षा व्हावी यासाठी वृद्धापकाळात सुध्दा आपण प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने निर्दोष ठरविल्याने अजून आम्हांला न्याय मिळालेला नाही. आम्हांला न्याय देण्यासाठी सरकारने हे खुनाचे प्रकरण सीबीआय कडे सोपवावे आणि आम्हांला न्याय द्यावा, अशी मागणी कु. तनुजा नाईक हिचे वडील काशिनाथ नाईक यांनी केली. आम्ही एका संशयिताचे नाव पोलिसांना दिले होते. मात्र, पोलिसांनी संशयिताची योग्य चौकशी केलेली नाही, असा दावा काशिनाथ नाईक यांनी केली आहे.