Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 11 June 2011

इंग्रजीकरणाचे परिपत्रक अखेर जारी

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राज्यातील विविध सरकारी व सरकारी अनुदानप्राप्त शाळांत प्राथमिक वर्ग इंग्रजी माध्यमात सुरू करण्याची परवानगी देणारे परिपत्रक आज शिक्षण खात्यातर्फे जारी करण्यात आले. पालकांकडून माध्यम निवडीसंबंधी लेखी पत्र स्वीकारण्याचे आदेश या परिपत्रकात देण्यात आले आहेत. अनुदानविरहित संस्थांकडे अपेक्षित पायाभूत सुविधा, मराठी किंवा कोकणी विषय सक्तीचा बनवणे व पालकांकडून शुल्क न आकारण्याची तयारी दर्शवल्यास त्यांच्यासाठी अनुदानाचा मार्ग खुला करण्याची तयारीही या परिपत्रकात दर्शवण्यात आली आहे.
शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे शिक्षण खात्यातर्फे आज इंग्रजी माध्यमाला मान्यता देण्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले. राज्यातील सर्व अनुदानप्राप्त प्राथमिक शाळांना इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याची परवानगी या परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. या परिपत्रकासोबत पालकांकडून घेण्यात येणार्‍या लेखी विनंती पत्राचा मसुदाही पाठवण्यात आला आहे. या मसुद्यानुसार पालकांनी स्वयंखुशीने आपल्या पाल्यांसाठी प्राथमिक माध्यम निवडीचे हे पत्र शाळेकडे सुपूर्द करावे लागेल. दरम्यान, नवीन वर्ग सुरू करण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची शिक्षण कायद्यानुसार आवश्यकता असते. इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यासाठी या पंटसख्येच्या गरजेखातर मराठी व कोकणी माध्यमातून शिक्षण घेणार्‍या पालकांवर इंग्रजी माध्यमाची गळ घालण्याचे प्रकार सुरू होतील व त्यामुळे मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या आपोआप कमी होऊन संपूर्ण इंग्रजीकरणाचा डाव साध्य होईल, अशी प्रतिक्रिया भाषाप्रेमींनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या शाळांना कोकणी किंवा मराठी यांपैकी एक विषय सक्तीचा बनवण्याचे आदेशही या परिपत्रकात देण्यात आले आहेत. विविध सरकारी प्राथमिक शाळांतही पालकांची मागणी असल्यास इंग्रजी माध्यमाचे वेगळे वर्ग सुरू करण्यास या परिपत्रकात मान्यता दिली आहे.
२३ जूनपर्यंतची मुदत
शिक्षण खात्याचे हे परिपत्रक पोहोचल्यानंतर तात्काळ पालकांकडून माध्यम निवडीचे पत्र घेऊन इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव २३ जूनपर्यंत पाठवण्याची मुदत शाळांना दिली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने तात्काळ पालकांनी आपल्या पाल्यांच्या माध्यमाची निवड करावी व हे वर्ग लवकर सुरू करता यावे यासाठीच ही लगबग केल्याची माहिती शिक्षण खात्यातील सूत्रांनी दिली. हे परिपत्रक राज्यातील सर्व सरकारी, सरकारी अनुदानप्राप्त व खाजगी शाळा प्रमुखांना पाठवण्यात आले आहे.

No comments: