Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 28 June, 2008

अमरनाथ यात्रेचा मुद्दा चिघळला गुलाम नबी आझाद सरकार अल्पमतात

नवी दिल्ली, दि. २८ : अमरनाथ यात्रेकरुंसाठी जम्मू काश्मीर सरकारने दिलेल्या ४० हेक्टर भूमीवरुन गेले कित्येक दिवस पेटलेल्या राजकीय वादंगाला आज वेगळे आणि महत्त्वपूर्ण वळण मिळाले. जम्मू काश्मिरमध्ये कॉंग्रेस आणि प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक पार्टी यांचे संयुक्त सरकार आहे. ही भूमी सरकारने परत घ्यावी अशी मागणी पीडीपीने लावून धरली होती. तथापि, आज मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काही नाजूक आणि राजकीय कारणांमुळे ही मागणी मान्य करता येणार नाही असे स्पष्ट केले. त्यामुळे पीडीपीने मंत्रिमंडळातून बाहेर पडायचे ठरवले आणि पीडीपीच्या सर्व मंत्र्यांनी नवे राज्यपाल एन. एन. व्होरा यांच्याकडे आपली राजीनामापत्रे पाठविली. ही माहिती पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी वार्ताहरांना दिली. परिणामी आझाद यांचे सरकार अल्पमतात आले आहे.
अमरनाथ यात्रा १७ जूनला सुरु झाली. आतापर्यंत तीनवेळा यात्रा खंडीत झाली तरीसुद्धा ३ लाख लोकांनी चार हजार फुटांवरील बफाच्छादित शिवलिंगाचे दर्शन घेतले असून अजून दोन महिने ही यात्रा चालणार आहे. काल श्रीनगरमध्ये एक लाखाहून अधिक सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांनी हिरवे झेंडे फडकावले आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत या भूमी हस्तांतरणाविरुद्ध अत्यंत प्रक्षोभक निदर्शने केली. पोलीसांना शांतता प्रस्थापित करता आली नाही. एकंदर परिस्थिती पाहता केंद्र सरकार अत्यंत चिंतेत आहे. जम्मू काश्मिरमधील हिंदू मुस्लिम संघर्ष अधिक चिघळू नये आणि त्याचे पडसाद भारताच्या अन्य भागात पसरुन संपूर्ण देश होरपळून निघू नये म्हणून हिंदू आणि मुसलमान समाजातील प्रभावशाली आणि आदरणीय व्यक्तींची संयुक्त बैठक दिल्लीत बोलावून त्यांच्या वतीने दोन्ही समाजातील लोकांना शांत राहण्याचे आवाहन करण्याचा विचार केंद्रातील शिवराज पाटील प्रभृती ज्येष्ठ मंत्र्यांनी सुचविला आहे.
दरम्यान जम्मू काश्मीर मुख्यमंत्र्यांच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले की अमरनाथ यात्रेसाठी भूमी देण्यामध्ये कोणताही बेकायदा, आक्षेपार्ह किंवा जम्मू काश्मिरच्या विशिष्ट स्थानाला धोका पोहोचेल असा व्यवहार झालेला नाही.

जमावबंदीला आणखी २४ तासांची मुदतवाढ

हॉस्पिसियूत २ पेट्रोलबॉंबचा स्फोट; १ निकामी
मडगाव, दि. २८ (प्रतिनिधी) : कालच्या हिंसक घटनानंतर आज मडगाव व परिसरातील स्थिती संपूर्णतः नियंत्रणाखाली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून येथील जमावबंदीच्या आदेशाची मुदत उद्या रात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच कालच्या घटनांसंदर्भात आज आणखी दोघांना अटक करण्यात आली. त्यामुळे याबाबत अटक केलेल्यांची एकूण संख्या १७ झाली आहे. दुसरीकडे बजरंग दलाचे कार्यकर्ते जयेश नाईक व इतरांना हॉस्पिसियूतील ज्या वार्डमध्ये पोलिस पहाऱ्यात ठेवले गेले होते तेथे अज्ञातांनी तीन पेट्रोलबॉंब फेकल्याने आज शहरात तो चर्चेचा विषय ठरला.
जमावबंदी आदेशाच्या विस्ताराची घोषणा मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी आज पत्ररिषदेत केली. सायंकाळी त्यांनी समाजात शांतता घडवून आणण्याच्या दृष्टीने विविध समाजातील नेत्यांची व प्रतिनिधींची एक बैठक घेऊन चर्चा केली पुन्हा अशी बैठक ९ जुलै रोजी होणार आहे. ही समिती विविध भागात जाऊन लोकांशी संपर्क साधणार आहे.
हॉस्पिटलमधील घटना
हॉस्पिसियूत बजरंग दलाचे जयेश नाईक व इतर ज्या वॉर्डात उपचारासाठी होते तेथे मध्यरात्री तीनच्या सुमारास ३ पेट्रोलबॉंब फेकण्यात आले. त्यातील दोन फुटले. तिसरा निकामी झाला. मात्र, याचा दुपारपर्यंत पंचनामा झाला नाही, अशी तक्रार संबंधितांनी केली. या लोकांना रात्री उशिरा अटक होऊन तेथे पोलिस बंदोबस्त असताना हे स्फोट कसे झाले याबद्दल आश्र्चर्यच व्यक्त होत आहे. भाजप नेते शर्मद रायतूरकर व त्यांचे सहकारी रात्री २ वाजेपर्यंत तेथे होते. त्यंाना पोलिसांनी तेथून घालवले व नंतर हा प्रकार घडला.
हॉस्पिटलांत दाखल केलेल्या ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. तथापि, चिंतेचे कारण नसल्याचे सूत्रांनी सांगितले. या जखमीची काळजी घेण्यासाठी मडगाव भाजप मंडळाचे पदाधिकारी जातीने वावरत होते. आमदार विजय पै खोत , सौ. छाया पै खोत, सौ. सुचेता मळकर्णेकर व इतर नेते आज दिवसभर हॉस्पिटलमध्येच होते.
पोलिसांचे अटकसत्र
पोलिसांनी काल सुरू केलेले अटकसत्र आजही सुरूच होते. काल रात्री उशिरा त्यांनी नगरसेवक राजू शिरोडकर यांना काही कामासाठी म्हणून बोलावून आणले व नंतर अटक केली. आज सकाळी मडगाव भाजप मंडळाचे पदाधिकारी देविदास बोरकर हे स्वतःच्या दुकानासमोर उभे असताना त्यांना पकडून आणले व कोठडीत टाकण्यात आले. नंतर उभयतांच्या अटकेविरुद्ध खासदार श्रीपाद नाईक यांनी प्रशासनाला खणखणीत इशारा दिला .
पोलिसांनी आज कालच्या घटनेसंदर्भात नन्ही शेख व महमद रफीक या आणखी दोघांना अटक केल्यामुळे अटक केलेल्यांची एकूण संख्या १७ झाली आहे. त्यातही मंतेश रागी याचे घर व दुकान फोडल्याच्या घटनेसंदर्भात ५ जणांना, तर बाकीच्या घटनांसंदर्भात १२ जणांना अटक करण्यात आली.
दरम्यान आके येथे मुकद्दर नामक एका परप्रांतीय व्यापाऱ्याचे लाकडी फर्निचरचे दुकान काल उत्तररात्री आगीत खाक झाले. आगीचे कारण कळू शकले नाही.
दरम्यान काल अटक केलेल्या १५ जणांची एका दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

भाजप होणार "हायटेक' : प्रद्युत बोरा

पणजी,दि.२८(प्रतिनिधी) : सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे असून राजकीय पक्ष या नात्याने बदलत्या काळानुरूप सज्ज राहणे आपले कर्तव्य आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर पक्ष संघटनेत करून घेण्याचा पहिला मान मिळवलेला भारतीय जनता पक्ष आता लवकरच "हायटेक' होणार असल्याची घोषणा भारतीय जनता पक्ष माहिती तंत्रज्ञान विभागाचे राष्ट्रीय निमंत्रक प्रद्युत बोरा यांनी केली.
राष्ट्रीय भाजप माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अखिल भारतीय पातळीवरील दुसऱ्या मेळाव्याचे आज प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी या विभागाचे राष्ट्रीय निमंत्रक प्रद्युत बोरा, विभागाचे राष्ट्रीय सदस्य सुनील पाल, राज्य विभाग प्रमुख राजू नाईक, भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात माहिती तंत्रज्ञान विषयावर सखोल माहिती देण्यात येणार असून या निमित्ताने विविध जगविख्यात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खास आमंत्रित करून माहिती तंत्रज्ञानाबाबत देशाची कोणत्या दिशेने वाटचाल सुरू आहे व त्यात काय बदल अपेक्षित आहेत, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानाबाबत भाजपचे धोरण काय असेल व केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या विभागात नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबतचा मसुदा या निमित्ताने तयार केला जाणार असल्याचे श्री. बोरा म्हणाले.
भाजपच्या या अनोख्या योजनेची माहिती देण्यासाठी पणजी येथील मुख्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री.बोरा यांनी हा तपशील दिला. देशात सर्वांत प्रथम १९९६ साली भाजपने आपले संकेतस्थळ खुले केले. त्यानंतर गेल्या जुलै २००७ महिन्यात पक्षाचा खास माहिती तंत्रज्ञान विभाग स्थापन करण्यात आला. देशात मोबाईल-टेलिफोनिक क्रांती घडवल्यानंतर आता यापुढे संगणक क्रांती घडवण्याचे लक्ष्य भाजपने आपल्या डोळ्यांसमोर ठेवले आहे. माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित दर्जेदार वस्तू कमी किमतीत देशातील सामान्य जनतेला मिळवून देऊन त्यांना या बदलत्या ओघात सामील करून घेण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आल्याचे बोरा यांनी सांगितले.
सध्या भाजपचे दिल्ली येथील मुख्यालय पूर्णपणे हायटेक बनवण्यात आले आहे. येत्या ६० दिवसांत गोव्यातील मुख्यालयही पूर्णपणे माहिती तंत्रज्ञानयुक्त बनवण्यात येणार असल्याने येथून थेट दिल्ली येथे संपर्क व इतर माध्यमांव्दारे जोडले जाणार आहे. दिल्ली येथील मुख्यालय देशातील सर्व प्रदेशांना जोडून भाजपची समांतर संपर्क नेटवर्किंग बनवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देत हे काम येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या प्रत्येक सक्रिय कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र संगणक तथा आयफोनची व्यवस्था केली जाणार असून सर्व संघटनात्मक व्यवहार हे माध्यमाने हाताळले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. देशपातळीवर अशी यंत्रणा उभारण्यासाठी पायाभूत साधनसुविधा उभारण्यात येणार असून भाजप हा देशातील पहिला "हायटेक' राजकीय पक्ष बनणार आहे असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा : सोनिया

नवी दिल्ली, दि. २८ : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करून निवडणुकीच्या प्रचारात भाजपने आघाडी घेतल्यानंतर धास्तावलेल्या कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही आज आपल्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. देशातील सर्वच राज्यांमध्ये पक्षाला पुनरुज्जीवित करण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रम आणि रणनीती तयार करण्याचे निर्देश त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना दिले आहेत.
काल भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी केंद्रातील कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारवर प्रखर प्रहार करीत कानपूर येथे पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला होता. त्याच्या दोन दिवस आधीच पक्षाने अडवाणी यांच्यासह सहा उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली होती. यामुळे कॉंगे्रस पक्षात कमालीची अस्वस्थतता निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने आज त्यांनी पक्षाच्या सरचिटणीसांना आणि प्रदेशाध्यक्षांना भेटीला बोलावले. याच वर्षी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच स्तरांवर, प्रत्येक ठिकाणी पक्षाला नवजीवन देण्याची जबाबदारी सोनियांनी सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्षांवर सोपविली.
निवडणुकीत कॉंगे्रसचे धोरण आणि कार्यक्रम कोणते राहायला हवेत याबाबतची योजना प्रत्येकालाच तयार करायची आहे. यासाठी प्रत्येकाने आतापासूनच तयारीला लागायला हवे. पुढील बैठकीत प्रत्येकांनी आपल्या योजना माझ्याकडे सादर करायच्या आहेत, असे सोनिया गांधी यांनी सांगितले असल्याचे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. देशपातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी सोनिया गांधी यांनी उपस्थित प्रत्येक नेत्याला वेळापत्रकच दिले आहे.
पक्षाने वरिष्ठ नेत्यांकडे जे कार्यक्रम सोपविले होते त्यांची अंमलबजावणी कुठपर्यंत आली याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. तथापि, लोकसभेची निवडणूक ठरल्याप्रमाणे पुढील वर्षीच होणार की, मध्यावधी घेण्यात येईल या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही.
विशेष म्हणजे, सरकारला अडचणीत आणण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अणुकरारावर सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. पक्ष कार्यकारिणीच्या दोन बैठकांमध्ये या मुद्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. शिवाय, आजची ही बैठक निवडणुकीकरिता पक्षाला तयार करणारी होती, असे एका नेत्याने सांगितले.

मेघना मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): मुंबई येथून बेपत्ता झालेली सॉफ्टवेअर अभियंता मेघना सुभेदार (२९) हिच्या कांदोळी येथे सापडलेल्या संशयास्पद मृतदेहाबाबतचा चिकित्सा अहवाल राखीव ठेवण्यात आला असला तरी तिच्या मृत्यूसंदर्भात या अहवालात घातपाताची शक्यता वर्तवण्यात आल्याने कळंगुट पोलिस स्थानकात आज या प्रकरणाची नोंद खून म्हणून करण्यात आली. उपनिरीक्षक राहुल परब यांनी यासंबंधी कसून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली.
११ एप्रिल ०८ पासून मयत मेघना ही मुंबई येथील सीएसटी रेल्वेस्थानकावरून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली होती. त्यानंतर ती गोव्यात असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. गेल्या १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान तिने मडगाव येथील एका "एटीएम' मधून पैसे काढल्याची नोंद सापडल्याने व त्यासंबंधी "सीसी टीव्हीत' पोलिसांना ती आढळून आल्याने तिचा शोध घेणे चालू होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना कळंगूट येथील दोघा मुसलमान व्यक्तींकडे तिचा नोकीयाचा "एन७४' मोबाईल सापडला व कळुंगट पोलिसांनी मौला अल्लाबक्श व महबूब मौलासाब या दोघांनाही चौकशी करून सोडून दिले होते. दरम्यान, या दोघांकडे हा मोबाईल कसा आला याची चौकशी करणे पोलिसांना आवश्यक वाटले नाही काय, असा सवाल केला जात आहे. आपल्या मुलीचे अपहरण झाले असून तिचा गोवा पोलिस व्यवस्थित शोध घेत नसल्याने तिचे वडील डॉ. सुभेदार यानी पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार व पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
मोरजी दि. २८ (वार्ताहर): पेडणे तालुक्यातील इब्रामपूर भागात काल २७ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल झालेल्या हत्तींनी गंगाधर गवस, सतीश नाईक व अशोक धाऊस्कर यांच्या ऊसाच्या मळ्याची व बागायतींची मोठ्या प्रमाणात नासाडी केली.
४ हत्तींचा कळप इब्रामपूर शेत बागायतीत काल सकाळी पाहिल्याची माहिती तेथील शेतकरी सुधीर धाऊसकर, प्रसाद सावंत व शैलेश हळर्णकर यांनी दिली.
इब्रामपूर बागायतीत हत्ती आल्याची माहिती वनखात्याच्या अधिकाऱ्यांना मिळताच विभागीय वन अधिकारी एस्. आर. प्रभू यांच्या नेतृत्वाखाली हत्तींना पिटाळून लावण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासून रानात मोहीम सुरू झाली होती.
हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजवणे, फटाके आदींचा वापर रानात केला जात होता. घनदाट जंगलात गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर फटाक्यांचा आवाज गावात ऐकायला येत होता. ढोल वाजवत वाजवत हत्तींना पिटाळण्यात येत असल्याची माहिती ा साहाय्यक वन अधिकारी अनिल शेटगावकर यांनी दिली.
स्थानिकांचा सहभाग
"गोवादूत'चा वार्ताहर व सुधीर धाऊसकर, प्रसाद सावंत आणि शैलेश हळदणकर हे चौघेजण हत्तींचा माग होता त्या वाटेने दाट जंगलात अर्ध्यावर पोहोचले. काही काळानंतर ढोल, फटाक्यांचा आवाज बंद झाला. मात्र, हत्ती काही क्षणापूर्वीच त्या भागातून गेल्याचा माग स्पष्ट दिसत होता. फटाके बंद झाले व वन अधिकारी कुठल्या दिशेने गेले त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिकांनी आवाज केला, परंतु पलिकडून प्रतिसाद न मिळाल्याने स्थानिकही घाबरले. मग शेटगावकर यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी आपण गावात रस्त्याच्या बाजूला असल्याचे सांगून हत्तींवर नजर ठेवून आहोत असे स्पष्ट केले.
तुम्ही माघारी फिरा, जोखीम पत्करू नका. हत्ती जवळपास असतील, हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही जंगलातून परत माघारी फिरा असे शेटगावकर यांनी सांगितल्यानंतर स्थानिक युवक माघारी फिरले.
हत्तींना पिटाळण्यासाठी विभागीय वन अधिकारी एस्. आर. प्रभू यांच्या नेतृत्वाखाली वन कर्मचारी महानंद पर्येकर, दत्ता बोरकर, सत्यवान गावस, सुभाष आरोंदेकर व इतर १५ कर्मचारी रानत गेले असल्याची शेटगावकर यांनी माहिती दिली.
रानातून हत्तींना पिटाळण्यासाठी गेलेल्या वन अधिकाऱ्यांकडे बारा बोअरची बंदूक व इतर सामुग्री देण्यात आली आहे.
या मोहिमेसाठी स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शेटगावकर यांनी केले आहे.गावात पुन्हा हत्ती येऊन नयेत म्हणून वन खाते कार्यरत आहेत. त्यासाठी रात्री स्थानिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगायला हवी. बागायतीत व शेतात जे शेतकरी जातात त्यांनी संध्याकाळ होण्यापूर्वी घरी परतावे.
गोवा व महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने हत्तीविरोधी मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. हत्तींना ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातील घनदाट जंगलात त्यांची रवानगी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांच्या शेती व बागायतीची नुकसानी हत्तींनी केली, त्याची पाहणी व पंचनामे पेडणेचे मामलेदार भूषण सावईकर यांनी केले.

Friday, 27 June, 2008

जातीय संघर्षामुळे मडगावात तणाव १४४ कलम लागू, पोलिसांची निष्क्रियता उघड

मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): गेल्या वर्षीप्रमाणेच एका मुलीच्या छेडछाड प्रकरणातून मडगावात आज जातीय दंगलीचा भडका उडाला व त्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे स्थिती अधिकच चिघळली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याची लक्षणे दिसू लागताच सायंकाळी ५-३० वाजता जिल्हा प्रशासनाने १४४ कलम लागू केले.
संपूर्ण दक्षिण गोव्यातील पोलिस यंत्रणा मडगावात तैनात करण्यात आलेली आहे. सायंकाळी उत्तर गोव्यातूनही जादा पोलिस कुमक मडगावात दाखल झाली. त्यापाठोपाठ पोलिस महानिरीक्षक किशनकुमार मडगावात दाखल झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघाला एखाद्या पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. सर्व वरिष्ठ मुलकी व पोलिस अधिकारी मडगावात तळ ठोकून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
पोलिस अधिकारी तिघांना अटक केल्याचे सांगत असले तरी उपलब्ध माहितीनुसार २९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील बहुसंख्य बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत.
पोलिसांनी गांधी मार्केट येथे जमा झालेल्या जमावावर लाठीमार केला. यातून एका दैनिकाचा छायाचित्रकारही सुटला नाही. तसेच या गडबडीत आपली दुकाने बंद करणारे दुकानदारही सुटू शकले नाहीत. त्यामुळे दुकानदारांच्या एका शिष्टमंडळाने पोलिसांच्या या लाठीमाराचा निषेध केला. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन दंडाधिकाऱ्यांनी आदेश न देताच झालेल्या या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. त्यात व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे नेते व भाजपचे नेतेदेखील होते. ही मंडळी रात्री उशिरापर्यंत तेथेच ठाण मांडून होती.
अशी झाली सुरवात
रुमडामळ -दवर्ली येथे वास्तविक गेले अनेक दिवस हे प्रकरण खदखदत होते. काल त्याचा स्फोट होता होता टळला. एका हिंदू युवतीला मुस्मिम तरुण सतावत होता. काल ती कॉलेजमध्ये जात असताना त्या बसमध्ये शिरून त्याने तिची छेड काढली. त्यामुळे आज सदर मुलीच्या मित्राने त्या तरुणाला जाब विचारला. उभयतांत बाचाबाची झाली असता पंच निसार किल्लेदार व दामोदर वाकोडे यांनी त्यात मध्यस्थीचा प्रयत्न केला. त्यातच आज दुपारी पंच निस्सार याच्या गाडीत तो तरुण असल्याचे पाहून मंतेश रागी नामक त्या तरुणाने ती गाडी अडवली व जाब विचारला. तेव्हा पंचाने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तथापि, संतापलेल्या मंतेशने त्याच्या गाडीवर लाथा हाणल्या. निस्सार गाडी घेऊन तसाच गेला व साधारण दीडच्या सुमारास एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी येऊन मंतेश याचे घर व त्याला टेकून असलेल्या दुकानावर हल्ला केला व नासधूस केली.
कोणी तरी हे वृत्त पोलिसांना कळवले. मंतेश हा बजरंगदलाचा कार्यकर्ता असल्याने हे प्रकरण चिघळणार हे ओळखून लगेचच पोलिस दवर्लीत दाखल झाले. त्यांनी निस्सार, दामोदर, मंतेश व तो तरुण यांना नेले. मात्र ते कोठे आहेत ते सांगण्याचे टाळले. सर्व मोक्याच्या जागी पोलिस तैनात करण्यात आले होते. बजरंग दलाचे कार्यकर्ते गटागटाने एकत्र जमून चर्चा करीत होते ते पोलिसांना पाहून पांगले व समर्थगडावर एकत्र आले. हे समजताच पोलिस सायरन वाजवत तेथे आले व त्यांनी मठाभोवती वेढा घालून त्यांची कोंडी केली. पोलिस बाहेर पडू देणार नाहीत हे ओळखून ते हळूहळू तेथून बाहेर पडले व मडगाव बाजारात येऊन त्यांनी घडलेल्या घटनेविरुद्ध "मडगाव बंद'ची हाक दिली. रुमडामळ दवर्लीतील बाजार दुपारच्या घटनेनंतर लगेच बंद झाला होता.
पोलिसांचा अतिरेक
बजरंग दल समर्थक आपल्या हातून निसटल्याचे समजताच पोलिस मडगावात धावत आले. तथापि, तोपर्यंत नवा बाजार पूर्णतः बंद झाला होता .बंदचे आवाहन करणारे पिंपळकट्टा परिसरात होते. तेथे राखीव पोलिस त्यांच्यावर तुटून पडले. त्याचीच पुनरावृत्ती गांधी मार्केटात झाली. तेथे पोलिसांनी दुकान बंद करणाऱ्या दुकानदारांना व त्याचे छायाचित्रण करणाऱ्या वृत्तपत्र छायाचित्रकारासही ठोकून काढले. घटना प्रत्यक्ष पाहाणाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना देता लाठीमार सुरू केला. त्यामुळे सर्वांचीच पळापळ झाली. लाठीमाराचा आदेश देण्यासाठी कोणीही दंडाधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हता, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
बाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची विशेषतः महिलांची या घटनेने तारांबळ उडाली. दुपारच्या सुट्टीनंतरचा बाजार पुन्हा खुला होतो न होतो तोच हा प्रकार घडला. अफवांचे पिक पसरले. कोणतीच कल्पना नसताना धडाधड शटर्स बंद झाली. त्यामुळे भयभीत झालेल्यांना दिलासा देण्यासाठी वा मार्गदर्शन करणारा कुणीच नसल्याने प्रत्येकाने घरी पळ काढण्यास प्रारंभ केला. कार्यालयेही त्यामुळे लवकर सोडली गेल्याने सर्व बसथांबे व मोक्याच्या जागी प्रचंड गर्दी झाली. कुठे काय झाले ते कुणालाच माहीत नसल्याने सर्वत्र गोंधळचे वातावरण होते.
१४४ कलमाचा अंमल
जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी सायंकाळी साडेसहा वाजता पत्रकारांना बोलावून मडगाव परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू केल्याची घोषणा केली. मात्र नेमके प्रकरण काय याबाबत स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत. तसेच सादर केलेली नावे व तक्रारकर्ता कोण याचीही कोणतीच माहिती त्यांच्याकडे नव्हती. वादाचे संकेत सकाळी मिळत असताना खबरदारीचे उपाय घेण्यास विलंब का झाला, किती जणांना या प्रकरणी अटक केली गेली या बाबतची माहिती त्यांच्याकडे नव्हती .अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रसन्न आचार्य व पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई त्यांच्या बाजूला होते, पण तेही काही तपशील देऊ शकले नाहीत. सायंकाळी ७ च्या सुमारास पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांनी मडगावला भेट देऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशीरा पोलिसांशी संपर्क साधला असता परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणाखाली असल्याचे सांगण्यात आले.

फिल्डमार्शल सॅम माणेकशॉं अनंतात विलीन

मुंबई, दि.२७ : शत्रूवर मात करण्यासाठी जीवावर उदार होऊन लढण्याची प्रत्येक सैनिकाला प्रेरणा देणारे अत्यंत दुर्मीळ असे स्वतंत्र भारतातील फिल्डमार्शल सॅम होरमुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशहा नावाचे एक तेजस्वी व्यक्तिमत्व गुरुवारी मध्यरात्रीनंतर अनंतात विलीन झाले आहे. फुफ्फुसाच्या विकाराने फिल्डमार्शल गेले काही दिवस तामिळनाडूच्या वेलिंग्टन रुग्णालयात उपचार घेत होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली, त्यावेळी त्यांचे जवळचे सर्व नातेवाईक त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित होेते. अंत्यसमयी ९४ वर्षे वय असलेले फिल्डमार्शल माणेकशॉं सैनिकांच्या दृष्टीने शेवटपर्यंत तरुण होते. ते त्यांना सॅम बहाद्दूर या नावाने ओळखीत.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, निवृत्त सेनादल प्रमुख आणि सर्व थरातील सर्व मान्यवर नेते यांनी अत्यंत आदराने आणि नम्रपणे या महानायकाला श्रद्धांजली वाहिली आहे. सर्वसामान्य माणसाला बोलता येत नाही पण त्याच्या मनात फिल्डमार्शलांविषयी जी भावना आहे ती धीरोदात्त आणि कर्तव्यकठोर नायकाविषयी देशभक्त नागरिकांची जी असते तशीच आहे.
निवृत्त झाल्यावर पुण्यात सारसबागेत बोलताना माणेकशॉं म्हणाले होते की, आज मी जो काही आहे, भारतीय सैन्य जे काही आहे आणि भारत देश जो काही आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकरांची कृपा आहे. ते त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे आणि त्यांचे श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.
धीरगंभीर वातावरणात भारताच्या या विजिगीषू धैर्यधराचा अंत्यसंस्कार तामीळनाडूतील वेलिंग्टन येथून १९ किलोमीटर अंतरावरील दफनभूमीत संध्याकाळी पारशी पद्धतीने केला गेला. त्यापूर्वी लष्करी इतमामाने तो दफनभूमीपर्यंत नेण्यात आला मात्र आत फक्त नातेवाईकांनाच प्रवेश देण्यात आला.

रसिकांच्या काळजाला भिडणारे चित्रपट तयार व्हावेत: पूजा भट

'सॅफ' चित्रपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन
पणजी, ता. २७ (सांस्कृतिक प्रतिनिधी): रसिकांच्या काळजाचा ठाव घेतील असे चित्रपट तयार होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन चित्रपट निर्माती तथा अभिनेत्री पूजा भट हिने आज येथे "सॅफ' चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.दक्षिण आशियाई फाऊंडेशन, गोवा कला अकादमी व गोवा मनोरंजन संस्था यांनी संयुक्तरीत्या या महोत्सवाचे आयोजन कला अकादमीच्या मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात केले आहे.
चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते पारंपरिक दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी विधानसभेचे सभापती प्रतापसिंह राणे, सुधीर मिश्रा, पाकिस्तानची अभिनेत्री झेबा बख्तियार, लतीफ अहमदी, सोनल चव्हाण, प्रख्यात चित्रपट निर्माता मधुर भांडारकर, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव, कला अकादमीचे उपाध्यक्ष जितेंद्र देशप्रभू, अभिनेता रणधीर कपूर, जिग्ने वांगचुक, अफगाणी अभिनेत्री खादेरा युसुफी, सॅफचे महासचिव राहुल बरुआ आदी मान्यवर उपस्थित होते.
दक्षिण आशियाई देशांतील मतभेदांचे मळभ दूर होऊन बंधूभाव निर्माण व्हावा आणि मानवतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा हा हेतू समोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठीच "विसर्जन सीमांचे' हे बोधवाक्य त्यास देण्यात आले आहे. पूजा भट म्हणाली, करमणुकीच्या माध्यमातून सीमांचा पडदा धुसर करण्याचे काम चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीरीत्या साकारता येईल.
या महोत्सवामुळे आशियातील उत्तमोत्तम चित्रपट पाहण्याची संधी गोवेकरांना मिळाली आहे. तिचा लाभ या भूमीतील रसिकांनी घ्यावा, असे आवाहन रणधीर कपूर याने केले. गोव्यात असे महोत्सव आयोजिल्यामुळे येथील युवकांना त्याचा मोठाच लाभ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले. प्रतापसिंह राणे यांनी गोवा हे अशा स्वरूपाच्या चित्रपट महोत्सवांचे कायमस्वरूपी केंद्र व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मनोज श्रीवास्तव यांनी प्रास्ताविक केले, तर जितेंद्र देशप्रभू यांनी आभार मानले.
चित्रपटक्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल याप्रसंगी भांडारकर, पूजा भट, सुधीर मिश्रा, झेबा बख्तियार, खादेरा युसुफी, लतीफ अहमदी, जिग्मे वांग्चुक, सोनल चव्हाण आधींचा श्री. कामत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

मेघना सुभेदारचा मृतदेह सापडला

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): मुंबईहून बेपत्ता झालेली सॉफ्टवेअर अभियंता मेघना सुभेदार (२९) हिचा अत्यंत कुजलेला मृतदेह आज कांदोळी येथे पोलिसांच्या हाती लागला. वडील डॉ. मोहन सुभेदार यांनी तिची ओळख पटवली. डॉ. सुभेदार यांनी याप्रकरणी खुनाचा संशय व्यक्त केला असून त्याविषयीचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे.
११ एप्रिल ०८ पासून मेघना ही मुंबई येथील सीएसटी रेल्वेस्थानकावरून बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान तिने मडगावातील "एटीएम' मधून पैसे काढले होते. तेव्हा तेथे लावलेल्या "सीसी टीव्हीत' ती पोलिसांच्या दृष्टीस पडली. त्यानंतर कळंगुट येथील दोघा मुस्लिमांकडे तिचा नोकिया कंपनीचा "एन७४' मोबाईल सापडला होता. मग कळंगुट पोलिसांनी मौला अल्लाबक्श व मेहबूब मौलासाब याची चौकशी करुन सोडून दिले होते. त्यांच्याकडे हा मोबाईल कोठून आला, याचा शोधही पोलिसांनी घेतला नाही. आपल्या मुलीचे अपहरण झाले असून तिचा गोवा पोलिस व्यवस्थित शोध घेत नसल्याने तिचे वडील डॉ. सुभेदार यानी पोलिस महासंचालक बी. एस. ब्रार व पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
गेल्या काही दिवसापासून तिचे वडील आपल्या मुलीच्या शोधात गोव्यात तळ ठोकून होते. आज अचानक मेघनाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सा करण्यासाठी मृतदेह गोमेकॉमध्ये पाठवला आहे. कळंगुटचे उपनिरीक्षक चिमुलकर विषयी तपास करीत आहेत.

Thursday, 26 June, 2008

भाजपचा दे धक्का! लोकसभा निवडणूक : उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली, दि. २६ : भारतीय जनता पक्षाने बेसावध कॉंग्रेसला जोरदार धक्का देताना आज आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक, नवज्योतसिंग सिद्धू, विनोद खन्ना, अनुराग ठाकूर व टी. पी. एस. रावत यांचा समावेश आहे.
श्री. अडवाणी गुजरातमधील गांधीनगरमधून, श्रीपाद नाईक उत्तर गोव्यातून, सिद्धू अमृतसरहून, विनोद खन्ना पंजाबमधील गुरुदासपूरहून, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे पुत्र ठाकूर हमीरपूरहून तर निवृत्त लेफ्टनंट जनरल रावत हे उत्तराखंडमधील पौरी गढवाल मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ही माहिती आज येथे भाजपचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी पत्रकारांना दिली तेव्हा माध्यमांच्या प्रतिनिधींवरही चकित होण्याची पाळी आली. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका अजून काही महिने लांबणीवर आहेत हे आम्ही जाणून आहोत. तथापि, आम्ही त्याची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखाली येथे आज झालेल्या खास बैठकीत या मुद्यावर गंभीरपणे चर्चा झाली. त्यानंतरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या ऑगस्टपर्यंत उमेदवारी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
आजच्या बैठकीला श्री. अडवाणी यांच्यासह व्यंकय्या नायडू, डॉ. मुरलीमनोहर जोशी, विनय कटियार, अनंतकुमार, सुषमा स्वराज तसेच भाजपचे पंजाब, गुजरात, हिमाचल प्रदेश व गोवा या राज्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. यदाकदाचित केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार गडगडलेच तर प्राप्त परिस्थितीत कोणती भूमिका घ्यायची यावरही आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरम्यान, पक्षाने आदेश दिला तर आपणही निवडणूक रिंगणात उतरण्यास उत्सुक आहोत, असे पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले. भाजपच्या या अफलातून कृतीमुळे खिंडीत सापडलेल्या कॉंग्रेसला जोरदार दणका बसला आहे. आता डाव्यांशी बैठका करायच्या की, निवडणुकांवर विचार करायचा की भाजपला रोखण्यासाठी व्यूहरचना आखायची, असा तिहेरी पेच कॉंग्रेससमोर निर्माण झाला आहे.

राजीवप्रताप रुडी यांची राज्यसभेवर निवड

पणजी, दि. २६ : माजी केंद्रीय मंत्री व गोवा प्रदेश भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांची आज राज्यसभेवर निवड झाली. ते बिहारमधून निवडून आले आहेत.
श्री. रुडी हे प्रथम बिहार विधानसभेवर निवडून जाणारे सर्वात तरुण नेते (२५ वर्षे) होते, त्यानंतर ते लोकसभेवर निवडून आले होते. रुडी यांची गोवा प्रदेशाचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांचा गोव्यातील भाजपच्या कार्यात सदैव सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या आजच्या निवडीबद्दल गोवा प्रदेश समितीने आनंद व्यक्त केला असून, गोव्याशी संबंधित प्रश्नांसंदर्भात या निवडीचा लाभ होणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे. गोवा भाजपच्या सांस्कृतिक विभागाचे निमंत्रक सिद्धनाथ बुयांव यांनी रुडी यांचे अभिनंदन केले आहे.

'सॅफ' चित्रोत्सव आजपासून गाजलेल्या चित्रपटांचा समावेश

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): दक्षिण आशियाई देशांतर्गत असलेले सर्व मतभेद दूर सारून बंधुत्वाचे अतूट नाते निर्माण व्हावे व मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवावा या उद्देशाने "विसर्जन सीमांचे' या बोधवाक्याने उद्या २७ रोजी गोव्यात प्रथमच दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवाचे ("सॅफ'चे) थाटात उद्घाटन होणार आहे. ३० रोजी महोत्सवाचा समारोप होईल.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष तथा कला अकादमीचे उपाध्यक्ष जितेंद्र देशप्रभू, सभापती प्रतापसिंग राणे, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक महेश भट, अभिनेत्री झेबा बख्तियार, अफगाणी अभिनेत्री खादेरा युसुफी, "सॅफ'चे महासचिव राहुल बारूआ, गोवा मनोरंजन संस्थेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव उपस्थित होते.
दक्षिण आशियाई फाउंडेशन, गोवा कला अकादमी व मनोरंजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात उद्या संध्याकाळी ५ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्यानंतर अफगाणी चित्रपट "ओसामा' प्रदर्शित केला जाईल. याप्रसंगी चित्रपट उद्योगातील अनेक महनीय व्यक्ती उपस्थित राहणार असून त्यात महेश भट, पूजा भट, मधुर भांडारकर,सुधीर मिश्रा, रणधीर कपूर, "हिना'या गाजलेल्या चित्रपटाची नायिका व प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियार तसेच दक्षिण आशियाई चित्रपट उद्योगातील चित्रपट निर्माते व कलाकार हजर राहणार आहेत.
२७ ते ३० जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात दक्षिण आशियाई देशातील एकूण ४५ चित्रपट प्रदर्शित केले जातील. या महोत्सवात अफगाणिस्तान, बंगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाल, पाकिस्तान व श्रीलंका या देशातील चित्रपटांचा समावेश आहे.
गोव्यात चित्रपट संस्कृती रुजविण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग नक्कीच होणार आहे. या महोत्सवानिमित्ताने विविध चित्रपट दिग्दर्शक तथा कलाकार यांच्याबरोबर संवाद व चर्चासत्राचा कार्यक्रम २८ रोजी होणार आहे. चित्रपट उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञान,सर्जनशीलता,तसेच इतर गोष्टींबाबत आदानप्रदान व देवाणघेवाणही यानिमित्ताने केली जाणार आहे. मॅकनिझ पॅलेस व कला अकादमीच्या सिनेमागृहात हे चित्रपट प्रदर्शित केले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी "उनादीत्य' या बांगलादेशी चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. "साक्षी' व 'मरेपर्यंत फाशी' या चित्रपटाचे खास प्रदर्शन या महोत्सवानिमित्ताने होईल. महोत्सवात भाग घेण्यासाठी "प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी' या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. काही जागा आरक्षित असतील.

पार्किंग शुल्क वसुली प्रकरण मक्तुमला अटक, पैशाच्या पावत्या जप्त

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): बेकायदा पार्किंग शुल्क वसुली प्रकरणातील संशयित नगरसेवक नागेश करिशेट्टी याने हे शुल्क जमा करण्यासाठी "मॅनेजर' म्हणून नियुक्त केलेला मक्तुम अन्नगिरी (रा. भाटले) याचा अटकपूर्व जामीन अर्ज आज फेटाळल्यानंतर त्याला पोलिसांनी न्यायालयाबाहेर ताब्यात घेतले. दरम्यान, करिशेट्टी याची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याची चार दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली. करिशेट्टीने तिसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज दाखल केला असून उद्या त्यावर सुनावणी होणार आहे.
करिशेट्टीच्या बॅंक खात्यावर जमा केलेल्या पैशाच्या पावत्या मक्तुमकडे सापडल्या असून पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांनी काही कागदपत्रांची मागणी पालिकेकडे केली आहे. याकामी पोलिसांना पालिकेकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या प्रकरणात मेरशी येथील सिल्वेस्टर मोंतेरोचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. करिशेट्टीच्या अटकेनंतर मोंतेरो हा फरारी झाला होता. करिशेट्टीने त्यालाही टोल आकारण्यासाठी नेमले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आतापर्यंत या प्रकरणात पाच व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Wednesday, 25 June, 2008

संपुआ व डाव्यांकडून आजचे मरण उद्यावर!

मुद्दा अणुकराराचा
नवी दिल्ली, दि. 25 - अणुकराराच्या महत्त्वपूर्ण मुद्यावर कोणताही ठोस निर्णय न घेता संयुक्त पुरोगमी आघाडी व डावे पक्ष यांनी आजचे मरण उद्यावर ढकलले आहे. उभय पक्षांत आज चर्चा झाली, पण त्यात काहीही निर्णायक घडले नाही. "या मुद्यावर नंतर लवकरच भेटू', असे दोन्हीकडील नेत्यांनी परस्परांना सांगत बैठक आवरती घेतली.
या बैठकीत कोणता निर्णय होतो याकडे केवळ देशवासीयांचेच नव्हे, तर अमेरिकेचेही डोळे लागले होते. तथापि, अणुकराराचा विविध दृष्टिकोनातून आढावा घेतल्यानंतर जेव्हा मोक्याची वेळ आली तेव्हा दोन्ही पक्षांनी पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरवले. त्यामुळे डाव्यांना दणका देऊन केंद्र सरकार पुढचे पाऊल उचलणार काय, या मूलभूत प्रश्नाचे उत्तर अजून गुलदस्त्यातच राहिले आहे.विविध वाहिन्यांनी जणू केंद्रातील सरकार आजच कोसळणार, डावे पक्ष केंद्राचा पाठिंबा काढून घेणार, परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी व पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट व चर्चा निर्णायक ठरणार, असे वातावरण निर्माण केले होते. प्रत्यक्षात यापैकी काहीच घडले नाही.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांची भेट घेतल्यानंतर या प्रश्नासंबंधीच्या घडामोडींना गती आली होती. जणू तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेची प्राथमिक बोलणी सुरू झाल्यासारखे दृश्य निर्माण केले गेले. मात्र, प्रत्यक्षात डावे पक्ष आणि "संपुआ'तील घटक पक्ष यांनी तूर्त सबुरीचे धोरण अवलंबले आहे. आज झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला अर्थमंत्री पी. चिदंबरम, संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री कपिल सिब्बल, नौकानयन मंत्री टी. आर. बालू यांच्याखेरीज डाव्या पक्षांचे नेते प्रकाश करात, ए. बी. वर्धन, डी. राजा, सीताराम येच्युरी, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे नेते टी. जे. चंद्रचूडन, फॉरवर्ड ब्लॉकचे देवव्रत विश्वास उपस्थित होते. 1983 मधील भारतीय क्रिकेट संघाच्या सत्कारासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार सध्या लंडनमध्ये असल्यामुळे ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

"सेझ' बांधकामांवरील बंदी सरकारने उठवली

कंपन्यांना नव्याने "कारणे दाखवा' नोटीसा बजावणार
पणजी, दि. 25 (प्रतिनिधी) - सेझ प्रकल्पांतर्गत कंपन्यांना नव्याने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या जाणार असून तूर्तास सेझ बांधकामांवरील बंदी उठवली जात असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात सांगितल्याने मुबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंटपीठाने के. रहेजा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड व पेन्सुला या कंपन्यांच्या याचिका आज निकाली काढल्या. सरकारने न्यायालयात घेतलेल्या या भुमिकेमुळे मात्र सेझ विरोधी आंदोलकांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. दरम्यान, बांधकामांवरील बंदी उठवण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे सेझ प्रकल्पांना स्वतःच्या जबाबदारीवर काही काळापुरते तरी रान मोकळे झाले आहे.
आम्हाला आमच्या प्रकल्पाचे बांधकाम करायचे आहे, असे रहेजा कंपनीने न्यायालयात सांगितले असता, तुम्ही तुमच्या जोखमीवर बांधकाम करू शकता, परंतु मूळ याचिकेच्या अंतिम निवाड्यावर त्या बांधकामाचे भवितव्य अवलंबून असेल असेही खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.
राज्य सरकारने आम्हाला "कारणे दाखवा' नोटीस न बजावताच थेट काम बंद ठेवण्याचा आदेश देण्यात दिल्याचा मुद्दा संबंधित कंपन्यांनी न्यायालयात मांडला. त्यावेळी सरकारने आम्ही 26 डिसेंबर 07 रोजी प्रादेशिक आराखडा बैठकीवेळी या सर्व कंपन्यांना बोलावले होते. त्यावेळी त्यांना गोव्यात सेझ प्रकल्पांना जनतेचा विरोध होत असल्याने या प्रकल्पांना दिलेली परवानगी मागे घेत असल्याचे सांगितले होते, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.
त्यानंतर 10 जानेवारी 08 रोजी गोवा सरकारने के. रहेजा व पेन्सुला या अधिसूचित करण्यात आलेल्या सेझ प्रकल्पांना बांधकाम बंद ठेवण्याची नोटीस बजावली होती. तेव्हा राज्य सरकारला तसा अधिकार नसल्याचा दावा करून सरकारच्या विरोधात या दोन्ही कंपन्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सेझप्रश्नी केवळ केंद्र सरकार निर्णय घेऊ शकते आणि यापूर्वी केंद्रानेचे सेझ प्रकल्प अधिसूचित केले असल्याने राज्य सरकार आम्हाला बांधकाम करण्यापासून अडवू शकत नसल्याचा दावा यावेळी सेझ कंपन्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.
सेझ प्रकल्पासाठी लागणाऱ्या जागा राज्य सरकार उपलब्ध करून देते तर , त्या अधिसूचित केंद्र सरकार करते. त्यामुळे या प्रकल्पांना देण्यात आलेली जागा अजूनही राज्य सरकारच्या ताब्यात आहेत. त्याचप्रमाणे 12 मे 08 रोजी केंद्र सरकारने मेटाटॅब, पेन्सुला, के. रहेजा हे अधिसूचित करण्यात आलेले सेझ प्रकल्प रद्द करता येणार नसल्याचा निर्णय अंतिम नाही, असा युक्तिवाद यावेळी सरकारचे वकील रणजीत कुमार यांनी केला.
दरम्यान, औद्योगिक विकास महामंडळातर्फे सर्व सात सेझ प्रकल्पांना दिलेले भूखंड पुन्हा ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली होती. या नोटिसांना केवळ के. रहेजा कंपनीने उत्तर न देता, नोटीसीला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. महामंडळाच्या त्या नोटिशीला आज न्यायालयाने स्थगिती दिली. यावेळी रहेजा या कंपनीने बांधकाम सुरु करण्याची परवानगी मागितली असता, तुम्ही तुमच्या जोखमीवर बांधकाम सुरू करू शकता, असे न्यायालयाने नमूद केले आहे. या विषयीची पुढील सुनावणी येत्या 18 जुलै रोजी होईल.

हत्तींना रोखण्यासाठी कायमस्वरूपी योजना

पणजी, दि. 25 (प्रतिनिधी)- गोव्यात रानटी हत्तींनी मांडलेला उच्छाद थोपवण्यासाठी वन खात्यातर्फे कायमस्वरूपी योजना आखण्यात येत आहे. मूळ कर्नाटकातील हत्ती महाराष्ट्रामार्गे गोव्यात दाखल होत असल्याने त्यांना परत कर्नाटकात पाठवण्यासाठी महाराष्ट्र व गोव्याने एकत्रित मोहीम हाती घेण्याचा निर्णय केल्याची माहिती कार्यवाहू मुख्य वनसंरक्षक सी. ए. रेड्डी यांनी दिली.
गोव्याचे मुख्य वनसंरक्षक ओंकारसिंग यांची बदली झाल्याने या महिन्याच्या 16 तारखेला कार्यवाहू म्हणून ताबा घेतलेले श्री. रेड्डी हे यापूर्वी रानटी हत्तींचा संचार असलेल्या भागात काम करून आलेले अधिकारी आहेत. त्यामुळे या विषयातील दांडगा अनुभव व कार्यशैली सरकारला उपयुक्त ठरणार आहे. वन खात्याच्या पूर्व अनुभवानुसार आता हत्तींना परतवण्यासाठी नवी आखणी करण्यात आली आहे. हत्तींच्या हालचालींची व त्यांच्या वागणुकीची पूर्ण जाणीव असलेले तसेच हत्तींचा वास, आवाज, पावलांच्या खुणा आदींवरून हत्तींचा मागोवा घेणारे "कवाडी' कर्नाटकातून मागवण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत तीन ते चार "कवाडी' गोव्यात दाखल होणार असल्याचे श्री. रेड्डी म्हणाले. कर्नाटकातील जंगली भागात ही जमात राहते. हत्तींच्या बंदोबस्तासाठी कर्नाटक सरकारने त्यांना सरकारी सेवेत सामील करून घेण्यात आले आहे. हे कवाडी हत्तींचा मागोवा घेणार असून हत्ती नक्की कुठे असतात याचा शोध ते घेणार आहेत. त्यानंतर काही खास माहुतही मागवण्यात येणार आहेत.
हत्तींच्या हालचालींवर वनरक्षकांचे कायमस्वरूपी लक्ष असून चोवीस तास हे लोक कामावर आहेत. गोव्यातील हत्तींच्या प्रकरणाचा सखोल अभ्यास रेड्डी यांनी केला आहे. त्यांनी वनरक्षक व वनाधिकारी यांच्या धाडसाचे कौतुक केले. गोव्यात रानटी हत्ती हा नवीन अनुभव असल्याने हत्तींमुळे हैराण झालेल्या लोकांनी याबाबत वन खात्याला दोषी ठरवून हे खाते निष्क्रिय किंवा हतबल झाल्याचा समज करून घेऊ नये. हत्तींचा सामना करण्यासाठी कोणतेही हत्यार किंवा तत्सम वस्तू हातात घेऊन हत्तींना जिवंत मारता येत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हत्ती हा अतिशय चतुर व ताकदवान प्राणी आहे. एकदा जर माणूस त्याच्या वाटेला गेला तर त्याचा माग धरून त्या माणसाला इजा करण्याची या प्राण्याला सवय आहे. हळर्ण येथे घडलेली घटना व त्यात वनरक्षक राजेंद्र भगत याचा प्राण गेला ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे सांगून त्या दिवशी स्थानिक लोकांनी वनरक्षकांवर बाहेर पडण्याचे दडपण आणल्याने त्यांना तिथे जाणे भाग पडल्याचे रेड्डी म्हणाले.
एकदा का हत्ती चवताळला तर तो बेफामपणे मागे धावतो व त्यात कोणाचा जीव जाईल याचा पत्ता लागणे कठीण असते. स्थानिक लोक खास करून महिला व लहान मुले ज्याप्रमाणे वनअधिकाऱ्यांना आपली सेवा बजावताना त्रास करतात त्यावर स्थानिक पंचायत सदस्यांनी नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शेवटी हत्ती हे प्राणी असल्याने त्यांच्याकडून हल्ला झाल्यास मुळात हत्तीपेक्षा या लोकांना वाचवणे कठीण बनण्याची परिस्थिती उद्भवत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पुढील महिन्यात गोवा व महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याची वरिष्ठ पातळीवर बोलणी होणार आहे. गोव्यातील एकूण परिस्थिती व हत्तींमुळे उद्भवलेली परिस्थिती याबाबत केंद्रीय वन खात्यालाही पत्र पाठवण्यात आले असून जीवितहानी टाळण्यासाठी काही उपाययोजना हाती घेण्याची परवानगी मागवली आहे. दरम्यान, हत्तींना सीमेवर रोखण्यासाठी "इपीटी' (एलिफंट प्रूफ ट्रेन्च) व (सोलर फेन्सींग) आदींबाबतही विचार सुरू आहे. महाराष्ट्रातून नक्की कोणत्या मार्गाने हत्ती गोव्यात दाखल होतात या ठिकाणांचा शोध लावून या ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यापुढे हत्ती महाराष्ट्रात पाठवले तरी ते नक्की महाराष्ट्रात कुठे आहेत व गोव्यात प्रवेश करण्याची शक्यता आहे की काय याचा मागोवा नियमित घेण्यासाठी त्या भागातही वनरक्षकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली.
तात्काळ भरपाई देणार
हत्तींनी मांडलेल्या उच्छादामुळे शेतकऱ्यांना झालेले नुकसान ताबडतोब देण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती रेड्डी यांनी दिली. गेल्या काही वर्षापूर्वीची प्रलंबित नुकसान भरपाई पुढील आठवड्यापर्यंत लोकांना वितरित केली जाणार आहे. यात बार्देश तालुक्यातील एकूण 25 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या अर्जांची रक्कम मुळात 67,700 रुपये होत असली तरी वन खात्यातर्फे सुधारीत रकमेचा फायदा या लोकांना देण्यासाठी अतिरिक्त 85,900 रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. सरकारकडे आत्तापर्यंत एकूण 153 अर्ज सादर झाले आहेत व त्यांची छाननी सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत हत्तींना परत पाठवण्यापासून ते लोकांना नुकसानभरपाई देण्यावर सुमारे 16 लाख रुपये खर्च झाल्याची माहितीही रेड्डी यांनी दिली.

सेवेसाठी तत्पर
हत्तींचा संचार सुरू असलेल्या भागातील लोकांनी सबुरीने वागावे, असे आवाहन वन खात्याने केले आहे. हत्तींचा मागोवा विनाकारण घेतल्यास, तेथे गर्दी केल्यास वा त्यांना निष्कारण त्रास दिल्यास ते चवताळू शकतात. एखाद्या भागात हत्ती आल्यास किंवा त्यांना कोणी पाहिल्यास ताबडतोब त्याबाबतची माहिती उपवनसंरक्षक एम. के. शंभू (9422437137), साहाय्यक वनसंरक्षक अनिल शेटगावकर(9822587607) साहाय्यक वनसंरक्षक श्री. हेन्रीक (9822137445 व 9423061700) यांना द्यावी.

Tuesday, 24 June, 2008

'अणुकरार' की 'मध्यावधी' निर्णय लवकरच

नवी दिल्लीत वेगवान राजकीय घडामोडी
डावे पक्ष व संपुआ यांची आज बैठक

नवी दिल्ली, दि.२४ : अमेरिकेचा दबाव आणि डाव्यांचा विरोध यात अडकलेल्या अणुकराराचे भवितव्य ठरविणारी डावे आणि संपुआच्या समन्वय समितीची "आर-पार'ची बैठक उद्या बुधवारी होत आहे. डाव्यांचा विरोध झुगारून अणुकरार करायचा किंवा राजीनामा देऊन लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्यायच्या हा एकमेव पर्याय सध्या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापुढे उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत पंतप्रधान काय निर्णय घेतात याकडे भारतासोबतच अमेरिकेचेही लक्ष लागले आहे.
सरकारने कराराच्या दिशेने एक पाऊल जरी पुढे टाकले तरी त्याचक्षणी पाठिंबा काढण्यात येईल, असा डाव्यांचा इशारा असल्याने कराराच्या दिशेने वाटचाल करण्याचे धाडस सरकार अजूनही दाखवू शकले नाही. पण, हीच बाब पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची झोप उडविणारी ठरली आहे. कारण, त्यांनी या करारात आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आता तर त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी केली आहे.
उद्या डावे-संपुआ यांच्यातील बैठक निर्णायक आणि कदाचित शेवटचीही ठरण्याची शक्यता आहे. याच बैठकीत "सरकार की करार' हा निर्णय होणार आहे. तथापि, तो लगेच जाहीर करण्यात येणार नाही.
समाजवादी पार्टीशी जवळीक साधण्याचे कॉंगे्रसचेे प्रयत्न असले तरी आठ प्रादेशिक पक्षांच्या आघाडीच्या मंजुरीशिवाय सपाला कुठलाच निर्णय घेणे शक्य नाही. सपा आणि डावे पक्ष एकत्र येऊन देशात तिसरी आघाडी स्थापन करण्याच्याही प्रयत्नात आहेत. लोकसभा निवडणूक जवळच असताना कॉंगे्रस की डावे यात निवड करणे देखील सपाला जड जात आहे. एकूणच, सरकारची संपूर्ण मदार सध्यातरी डाव्यांवरच आहे. त्यांचा अनादर करून जर सरकारने अणुकराराच्या दिशेने पाऊल उचलले तर सरकार जाणार याची जाणीव कॉंगे्रसला पुरती झालेली आहे.
माकपचे ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांनी तर कॉंगे्रसला अतिशय कडक शब्दात बजावले आहे. महागाईने १३ वर्षांतील विक्रम मोडित काढला असताना सरकार अडचणीत आणण्याचा शहाणपणा कशासाठी करायचा? अमेरिकेविषयी इतकेच प्रेम असेल तर सत्तेचा मोह सोडा, असे बसू यांनी कळविले आहे.
करार आणि डावे दोघेही हवे
दरम्यान, कॉंगे्रसने मात्र आम्हाला करारही हवा आणि डाव्यांची मैत्रीही हवी असल्याचे म्हटले आहे. गेल्या चार वर्षांपासून आमचे सरकार डाव्यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे त्यांची मैत्री आम्हाला तोडायची नाही. पण, करारालाही मुकायचे नाही. तेव्हा डाव्यांनी आमची अपरिहार्यता समजून घ्यावी आणि विरोधी भूमिका मागे घ्यावी, असे कॉंगे्रसचे मत आहे.

'हिंदूनी रस्त्यावर उतरण्याची गरज'

मूर्ती नासधूसप्रकरणी निषेध सभेत सूर
कुडचडे, दि.२४ (प्रतिनिधी): गोव्यातील सर्व देवस्थानांनी एकत्रित येऊन हिंदू देवळांच्या अन्यायाविरुद्ध चळवळ सुरू करण्याचे प्रतिपादन फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांनी केले.
शिरवई केपे येथील सोमेश्वर मंदिरातील मूर्त्यांची तोडफोड केल्याप्रकरणी आज (दि.२४) संध्याकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदू जनजागृती समितीने एकत्रित येऊन चळवळ सुरू करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार नाईक यांनी यावेळी केले. यावेळी सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर यांनी सांगितले की, हिंदू देवालयाच्या संरक्षणासाठी हिंदू समाजाने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. मूर्तीची नासधूस ही जाणून बुजून केली जात असून त्यावर सरकारने तोडगा काढणे गरजेचे आहे. केपेचे माजी आमदार प्रकाश वेळीप यांनी दुष्ट शक्ती फक्त हिंदूवरच अत्याचार करत असून अन्य धर्मीयांना मात्र काहीच केले जात नसल्याने हिंदूनी आता एकत्र येण्याची गरज आहे असे सांगितले.
गोविंद पर्वतकर यांनी सांगितले की, याप्रकरणी आता संपूर्ण गोवा बंद ठेवण्याची गरज आहे. झारंखडमधून येऊन काहीजण येथील स्थानिकांची मने बदलवू पाहत आहेत. आता कृती समिती काढून हा प्रश्न पुढे नेण्याची गरज आहे. यावेळी पर्वतकर यांनी मुख्यमंत्री कामत यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची मागणी केली.
बजरंग दलाचे जयेश नाईक यांनी सांगितले की, सरकार हिंदू धर्मीयांची थट्टा करत आहे. लोकांनी कायदा हातात घेतल्यानंतरच सरकारला जाग येणार का असा सवाल करून त्यांनी प्रत्येकाने आपापली देवस्थानांचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. राजीव वेलिंगकर यांनी गोव्यात इतर राज्यासारखी परिस्थिती उद्भवत असल्याचे सांगितले. शिवसेनेचे नामदेव नाईक यांनी जनतेने आता कायदा हातात घेतल्यास त्याला पोलिस व सरकारी यंत्रणा जबाबदार राहील असे म्हटले.
याप्रसंगी नेत्रावळीचे सरपंच शशिकांत गावकर, सुप्रज तारी, सुनिता देविदास, हेमंत देव, दिनेश नाईक, सुभाष वेळीप, सनातन प्रभातच्या रेखा देसाई, लक्ष्मण बोरकर यांनी आपले विचार मांडले.
यापूर्वी अशी १४ प्रकरणे घडली आहेत. पोलिस वा सरकार यापैकी कोणत्याच प्रकरणाचा शोध घेण्यात अपयशी ठरल्याने सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती समिती या संघटनेच्या सदस्यांनी आपले विचार मांडले.

कॅंटरखाली चिरडून विद्यार्थी जागीच ठार

मडगावात वातावरण तंग; वाहन पेटवले
मडगाव, दि.२४ (प्रतिनिधी): मडगावातील बेदरकार वाहतूक व्यवस्थेत आज आर्लेम फातोर्डा येथे आणखी एका शाळकरी मुलाचा बळी गेला. प्रथमेश प्रकाश नाईक (वय १०) असे या मुलाचे नाव असून तो होली स्पिरीट इन्स्टिट्यूटमध्ये पाचवीत शिकत होता. त्यामुळे खवळलेल्या जमावाने या अपघातास कारणीभूत ठरलेल्या मालवाहू कॅंटरला आग लावली. अग्निशामक दल व पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करून ती विझविली. तथापि, वातावरण तणावपूर्ण असल्याने तेथे रात्री उशिरापर्यंत सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी कॅंटर चालकशेख इम्तियाज याला अटक केली आहे.
नेहमीप्रमाणे दुपारी १-१५ वाजता वर्ग सुटल्यावर प्रथमेश "जानकी' या (जीए ०२ टी ४७४३ ) बसने घरी निघाला. सदर मिनीबसमध्ये होली स्पिरीटचीच जास्त मुले असतात. मुलांना उतरवत ती बस आर्लेम नाक्यावरून टाटा शोरूम रस्त्यावर वळली व चंद्रावाडो रस्त्यावर थांबली. तेथे प्रथमेशसह एकूण ६ मुले उतरली. प्रथमेशचे घर उजवीकडे असल्याने तो थांबलेल्या बससमोरून गेला व मागून एखादे वाहन येते की काय ते पाहाण्यासाठी त्याने आपले डोके पुढे काढले तोच मागून भरधाव आलेल्या मालवाहू कॅंटरची (जीए ०१-डब्ल्यू ६२८१) ठोकर त्याच्या डोक्याला बसून तो उसळला आणि सुमारे ६ मीटरपर्यंत फरफटत गेला. मागच्या चाकाखाली सापडल्याने तो जागीच मरण पावला.
या अपघातानंतर लगेच तेथे लोक जमले ते पाहून कॅंटरचा चालक पळून गेला .जमावाने कॅंटरमधील सामानाच्या पेट्या बाहेर काढून त्या कॅंटरखाली ठेवून पेटवल्या. ती आग कॅंटरला लागेपर्यंत कोणीतरी पोलिस व अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. त्यांनी येऊन आग विझविली, पण संतप्त जमावाला शांत करणे त्यांना शक्य झाले नाही .
दरम्यानच्या काळात तेथे गर्दी वाढू लागली व स्थिती स्फोटक बनत चालल्याचे पाहून पोलिस निरीक्षक धर्मेश आंगले यांनी वरिष्ठांना माहिती दिली. निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई तेथे दाखल झाले. मात्र त्यामुळे फरक पडला नाही. त्यामुळे मामलेदार परेश फळदेसाई, उपजिल्हाधिकारी दीपक देसाई तेथे दाखल झाले. तसेच तमाम वाहतूक पोलिसांसह जादा पोलिस कुमक तेथे तैनात करण्यात आली.
या भीषण अपघातामुळे मडगावातील बेशिस्त व बेदरकार वाहतुकीचा प्रश्र्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षी याच दिवसात अशाच एका अपघातात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर मिनीबस उलटून आठवीत शिकणारा लॉयोला हायस्कूलचा विद्यार्थी मरण पावला होता. त्याशिवाय लहान मोठे अपघात ही नित्याचीच बाब झालेली आहे. ज्यांनी वाहतुकीत शिस्त आणावी अशी अपेक्षा असते ते वाहतूक पोलिस महामार्गावर किवा रात्रीच्या वेळी नाक्यावर राहून परप्रांतीय मालवाहू वाहनांना सतावण्यात धन्यता मानतात. त्यामुळे शहरातील बेदरकार वाहतुकीवर नियंत्रण ठेवायचे कोणी, असा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. आजचा अपघात हा याच मालिकेतील एक भाग मानला जातो.
-------------------------------------------------------------------
बेभान वाहन चालकांना कोण रोखणार?
मुले जेव्हा शाळा सुटल्यावर रस्ता ओलांडून घराकडे जात असतात तेव्हा अन्य वाहनचालकांनी याची दखल घेणे गरजेचे असते. मात्र, त्याची फिकीर न करता काही अपवाद वगळता बहुतांश वाहन चालक भरधाव वाहने हाकतात. या वाहन चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी पालकांतून केली जात आहे. दरम्यान, दहा वर्षांच्या कोवळ्या प्रथमेशचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातस्थळी उपस्थित असलेले लोक त्यामुळे गलबलले.

करिशेट्टीची कसून चौकशी दोन दिवसांची पोलिस कोठडी

बेकायदा पार्किंग शुल्क प्रकरण
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): बेकायदा पाकिर्ंग शुल्क प्रकरणात अटक करण्यात आलेला पणजीचा सत्ताधारी गटातील नगरसेवक नागेश करिशेट्टी याला आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करून दोन दिवसाची पोलिस कोठडी घेण्यात आली; तर या प्रकरणी मुक्तुम अन्निगरी (३५ रा. भाटले) याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यावर २६ जून रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी मक्तुम याला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
पणजीत मांडवी पुलाखाली टोल आकारण्याचे काम मक्तुम पाहत होता. महापालिकेच्या नावाने पावत्या छापायचे कामही तोच पाहत असे, अशी माहिती करिशेट्टी याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस त्याला अटक करण्याच्या प्रयत्नात होते. १६ जून रोजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यापासून मक्तुम फरारी होता.
प्राप्त माहितीनुसार, करिशेट्टी याच्या आदेशानुसार आपण टोल घेत होतो, त्यानेच मला कामावर नेले होते. त्यासाठी तो मला दरमहा वेतन देत होता. टोल वसुलीचे हे काम बेकायदा असल्याची आपल्याला अजिबात माहिती नव्हती. त्यामुळे या प्रकरणात आपला कोणताही थेट सहभाग नाही, असे मक्तुम याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे.
करिशेट्टी याने ज्या अन्य दोघा तरुणांना टोल गोळा जमा करण्यासाठी ठेवले होते त्यांच्या हाताखाली मक्तुम काम करत होता. त्या दोघा तरुणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
सध्या पणजी पोलिस करिशेट्टीची कसून चौकशी करीत आहे. या विषयीचा तपास उपनिरीक्षक तुषार लोटलीकर करत आहेत.

कर्मचारी संघटनेची आज महत्त्वाची बैठक

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): गोवा सरकारी कर्मचारी संघटना व राज्यातील इतर सरकारी कर्मचारी संघटनेच्या ११ सदस्यीय समितीची बैठक उद्या २५ रोजी पाटो येथील कार्यालयात संध्याकाळी ५.४५ वाजता होणार आहे. संघटनेने घोषित केलेल्या लेखणी बंद आंदोलनाची पुढील कृती ठरवण्यासाठी तसेच सरकारला नवा प्रस्ताव सादर करण्यासंबंधी महत्त्वाची चर्चा यावेळी होणार आहे. ही माहिती संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी दिली.
काल विविध सरकारी कर्मचारी संघटनांची संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यात सरकार दरबारी चर्चा करण्यासाठी ११ सदस्यीय समितीची निवड करण्यात आली. या समितीकडून पुन्हा एक पाच सदस्यीय शिष्टमंडळ समिती नेमण्यात आली. त्यात मंगलदास शेटकर, सरचिटणीस गणेश चोडणकर, उपाध्यक्ष अरुण तळावलीकर, "आयटक'चे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका व राजू मंगेशकर यांचा समावेश आहे. यावेळी झालेल्या चर्चेत बढती वेतनवाढ १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २००५ पर्यंत मागण्याचे ठरवण्यात आले आहे. लेखणी बंद आंदोलन अद्याप मागे घेण्यात आले नसून हे आंदोलन केवळ स्थगित ठेवण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या हुद्यानुसार समान वेतन मिळणे हा त्यांचा हक्क असून सरकारला केवळ आपल्या मर्जीतील लोकांना वाढीव वेतन देऊन त्यांचे लाड करता येणार नाहीत, असे शेटकर यांनी सांगितले.

Monday, 23 June, 2008

हळर्ण येथे हत्तीने घेतला बळी वनरक्षकास पाय ठेवून चिरडले

मोरजी, दि. २३ (वार्ताहर) : राज्यातील काही भागात गेले वर्षभर हत्तींनी हैदोस घालून शेती व बागायतींची मोठ्या प्रमाणात हानी केल्यानंतरही निष्क्रिय बनलेल्या सरकारच्या बेफिकिरीने आज एका उमद्या कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले. वन खात्याचे कर्मचारी राजेंद्र कृष्णा भगत यांना काल मध्यरात्री हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले. त्यामुळे आठवड्याभरात वनखात्याचे दोन बळी गेले आहेत.
रविवार २२ रोजी रात्री एक वाजता हळर्ण-तळर्ण भागात बागायतीत हत्ती आल्याची माहिती वनखात्याला मिळताच वनरक्षक राजेंद्र भगत अन्य कर्मचाऱ्यांसमवेत बागायतीत गेले असता त्यांना हत्ती नदीतून येत असल्याचे दिसून आले. भगत गावात परतले व लोकांना जमवून हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पुन्हा बागायतीत गेले. त्यावेळी तीन हत्ती नुकतेच नदीतून वर येताना लोकांनी पाहिले. जो समोर हत्ती होता त्याने आपली सोंड वर करून चीत्कार केला. त्याचे डोळे लालबुंद होते. त्याचवेळी वनरक्षकाने त्या हत्तीवर टॉर्च मारली असता तो जोरदार आवाज करीत लोकांवर चाल करून आला, त्यावेळी लोक भयभीत होऊन वाट मिळेल त्या वाटेने पळत सुटले. त्यावेळी वनरक्षक राजेंद्र भगत खाली जमिनीवर पडल्याने त्यांच्यावरून हत्ती गेला व ते तेथेच चिरडून ठार झाले.
वनरक्षक राजेंद्र भगत हे ४२ वर्षीय कर्मचारी मानसीवाडा धारगळ पेडणे येथे राहत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ते मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यामुळे गावात त्यांच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.
शोकाकुल वातावरणात अंत्यविधी
वनरक्षक श्री. भगत यांच्यावर मानसीवाडा धारगळ येथे २३ रोजी दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यावेळी पंचायतमंत्री बाबू आजगावकर, माजी आमदार परशुराम कोटकर, पेडणे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर, धारगळचे सरपंच भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, कदंब महामंडळाचे संचालक दशरथ महाले, माजी सरपंच संतोष मळीक, मनोहर नाईक, रमेश मळीक, सुभाष डिचोलीकर, रामा नाईक, कालीस रॉड्रीग्स, सायमन डिकुन्हा, संतोष अमरे, दया गावस आदींनी भगत यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून दुःख व्यक्त केले.
अशी घडली दुर्घटना
हळर्ण भागात २२ रोजी हत्ती आल्याची कुणकुण वनखात्याला लागली होती, त्यानुसार त्यांच्या बंदोबस्तासाठी वनरक्षक राजेंद्र भगत यांच्या नेतृत्वाखाली इतर सहा कर्मचारी त्या भागात गेले असता त्यांना हत्ती येत असल्याचे दिसले. ग्रामस्थांना घेऊन वनकर्मचारी बागायतीत गेले. तेथे हत्ती समोरून आपल्याच दिशेने येत असल्याचे पाहताच सर्वांनी धूम ठोकली. ग्रामस्थ व कर्मचारी गावात आल्यानंतर कोणकोण बागायतीत गेले होते, त्याची चौकशी आपसात करीत होते. आपल्यापैकी सर्वजण आले की नाही, याची चौकशी करता राजेंद्र भगत आले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळानंतर पुन्हा ग्रामस्थ व वनकर्मचारी हातात टॉर्च व उजेडासाठी मशाली घेऊन बागायतीत गेले असता वनरक्षक भगत जमिनीवर पालथे निपचित पडलेले दिसले. हत्तीने त्यांना पायाखाली चिरडून ठार मारले होते.
श्री. भगत यांचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या भागाचा पोलिसांनी पंचनामा केला नाही. बांबोळी येथे मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला नाही. बांबोळी येथे मृतदेहाचा पंचनामा केला. भगत यांचे तोंड जमिनीवर टेकून होते. तोंडातून रक्त आले होते. या घटनेची माहिती पेडणे पोलिसांना रात्री २ नंतर देण्यात आली. त्याअगोदर ग्रामस्थांनी व कर्मचाऱ्यांनी बागायतीतील मृतदेह गावात आणला होता.

वनखात्याचा दुसरा बळी
दि. १७ रोजी धारगळ येथे जो भीषण अपघात घडला होता त्या अपघातात पेडणेचे वनअधिकारी काशिनाथ शेट्ये हे जागीच ठार झाले होते. त्यानंतर सहा दिवसांच्या फरकाने २२ रोजी रात्री हळर्ण येथे हत्तीने पायाखाली चिरडून वनरक्षक राजेंद्र भगत यांना ठार केल्याने पेडणे वनखात्याचा दुसरा बळी गेला आहे. त्यामुळे खात्याला जबरदस्त धक्का लागला.

आजचे मरण उद्यावर
दि. १७ रोजी धारगळ येथे जो भीषण अपघात होऊन वनअधिकारी काशीनाथ शेट्ये मृत्युमुखी पडले, त्याच वाहनातून वनरक्षक राजेंद्र भगत जाणार होते, परंतु त्यांना काही महत्त्वाचे काम पडल्याने ते गाडीतून धारगळ येथे उतरले. म्हणूनच ते त्याचवेळी बचावले. परंतु काळाने त्यांच्यावर २२ रोजी झडप घातली.

हजारोंचे नुकसान
दि. २२ रोजी हत्तींनी जो हळर्ण बागायतीत धुमाकूळ घातला त्यात केळी, सुपाऱ्यांच्या पोफळी, कवाथे यांचे जवळजवळ १ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात लक्ष्मण सावंत, पांडुरंग गरड, गणेश गरड, मुकुंद नारायण परब, रत्नाकांत परब, बापू परब, आना परब व भूषण परब आदींचे नुकसान केले आहे.
दरम्यान, बागायतीत हत्ती आल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांसोबत स्थानिक ग्रामस्थ रत्नाकांत परब, हौसराज परब, ज्ञानेश्वर परब, मयूर परब, मकरंद परब, प्रशांत परब, खाजू परब, अभय परब, गोपी परब, आना परब, कृष्णा परब, महेश परब, मिलिंद परब, भूषण नाईक, सुभाष परब गेले होते.
तीन हत्तींचा कळप
हळर्ण भागात २३ रोजी सकाळी साडे नऊ वाजता तीन हत्तींचा कळप ग्रामस्थांनी पाहिल्याची माहिती दिली. गेले वर्षभर हत्ती बागायतींची नासाडी करत आहे. आता मात्र माणसांचेही बळी घेण्याचे काम हत्ती करू लागल्याने न्याय कुणाकडे मागावा, अशी केविलवाणी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. आता कितीही हत्ती आले तरी त्यांना पिटाळून लावण्यासाठी आम्ही जाणार नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पर्रीकर असते तर...
राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर असते तर त्यांनी त्वरित धाव घेतली असती व शेतकऱ्यांना दिलासा दिला असता, सामान्य शेतकऱ्यांचे दुःख पर्रीकरांना माहीत होते. तेच आम्हाला न्याय देऊ शकले असते, असे मत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या भागाचे आमदार तथा पंचायत मंत्री बाबू आजगावकर यांनी आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांची नुकसानी झाली आहे त्याची साधी विचारपूस केली नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला.
-------------------------------------------------------------
वनखात्याकडे सामग्री नाही
हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याने कर्मचारी व वनरक्षकाला केवळ हातबॉम्ब फटाके व टॉर्च एवढेच साहित्य देऊन मोहिमेवर पाठवले जाते. पिसाळलेल्या हत्तींनी जर असेच वनरक्षकांचे बळी घेतले तर सरकार काय करेल, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
-------------------------------------------------------------

सोमेश्वर देवस्थानात मूर्तींची नासधूस

केपे, दि.२३ (वार्ताहर) : शिरवई केपे येथील सोमेश्वर देवस्थानातील नवग्रह मूर्ती, तसेच तुळशी वृंदावन आणि देवळातील नंदीची मोडतोड केल्याने येथील लोकांत संतापाची लाट उसळली आहे. सदर देऊळ रस्त्याशेजारी आहे. मंदिरात दोन्ही बाजूंनी आत प्रवेश करता येतो. याचा फायदा घेत अज्ञाताने ही कृती केली असावी असे बोलले जाते. काही दिवसांपूर्वी या मंदिरातील फंडपेटी चोरून नेण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी मंदिराच्या समितीला सुरक्षा रक्षक नेमण्याची सूचना केली होती. यावेळी पोलिसांनी अज्ञाताचा शोध घेण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांची मदत घेतली. पण ठसे घेता न आल्याने ते माघारी परतले. तसेच श्वान मागवा घेत जात असताना पुढे जात असताना घसरून पडल्याने जखमी झाले. त्याचा परिणाम यावर झाला. केपेचे उप अधीक्षक रोहिदास पत्रे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

खाणसमर्थक नेत्यांना हटविल्यासच बेकायदा खाणी बंद होतील : पर्रीकर

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)ः गोव्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा खाण उद्योग सुरू आहे व या उद्योगात विद्यमान सरकारातील एकूण दहा सदस्य सामील आहेत. केवळ आंदोलन किंवा निषेध नोंदवून हा बेकायदा खाण उद्योग बंद होणार नाही तर त्यासाठी खाण उद्योगाच्या पाठीराख्या राजकीय नेत्यांना हटवण्याची गरज आहे. गोव्यातील विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार खाली खेचाल तरच या बेकायदा खाण उद्योगापासून सुटका होईल, असे विधान विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले.
आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिवालयात गृह खात्याच्या अस्थायी समितीच्या बैठकीत खाण विरोधी आंदोलनात काही नक्षलवादी संघटनेच्या सदस्यांनी प्रवेश केल्याचा मुद्दा उपस्थित होऊन सुरक्षा व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आपण सुचवले होते. देशातील विविध भागांत "सिमी' संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली असता त्यांच्या चौकशीत गोव्यातही त्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे व तशी माहिती इंटरनेटच्या विविध वृत्तांतही प्रसिद्ध झाल्याचे ते म्हणाले. राज्याच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही हयगय परवडणारी नाही, त्यामुळे गोव्यात नक्षलवादी संघटना खाण विरोधी आंदोलनात सामील झाल्याचा अर्थ सगळेच नक्षलवादी आहेत, असा अजिबात होत नाही असे पर्रीकर यांनी सांगितले. या नेत्यांकडून वेळोवेळी लोकांना देण्यात येणाऱ्या भाषणांत कायदा, न्यायालय यांच्यावरील लोकांचा विश्वास उडावा अशी भडक वक्तव्ये केली गेली आहेत. हत्यारांचा वापर करून पोलिसांवर कशा पद्धतीने हल्ला करावा याचीही माहिती देण्यात येत असल्याचे उघडकीस आल्याने या सर्व गोष्टींवर पोलिसांची नजर आहे हे त्यांनी मान्य केल्याचे स्पष्टीकरण पर्रीकर यांनी केले.
विविध स्वयंसेवी संस्थांचे व्यवहारही पारदर्शक असावेत, अशी मागणी करून या संस्थांचे आर्थिक व्यवहार जनतेसाठी खुले व्हावेत, असे मत पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केले. राजकीय पक्षांचे सर्व व्यवहार जसे माहिती हक्क कायद्याखाली आणण्यात आले आहेत त्याच प्रकारे या संस्थांचे व्यवहारही जनतेसाठी खुले होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्याच्या सुरक्षिततेकडे कोणतीही तडजोड अजिबात परवडणारी नाही. गोव्यात बेकायदा खाण उद्योगामुळे आपल्या हक्कांसाठी स्थानिकांनी पुकारलेला लढा समर्थनीय आहेच परंतु केवळ या लढ्यांना फुस लावून लोकशाही पद्धतीच्या लढ्याला हिंसेचे वळण देण्याचा प्रकार घातक असल्याने अशा घटकांवर पोलिसांनी बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. गोव्यात काही नक्षलवादी संघटनेचे सदस्य अशा आंदोलनात सहभागी आहेत याची पोलिसांनाही कल्पना आहे, त्यामुळे आपण खाणविरोधी आंदोलकांना नक्षलवादी संबोधल्याची जी आवई सुरू आहे ती निरर्थक असल्याची टीका पर्रीकर यांनी केली.
------------------------------------------------------------
'सगळेच नक्षलवादी नाहीत'
गोव्यात नक्षलवादी संघटना खाणविरोधी आंदोलनात सामील झाल्याचा अर्थ सगळेच नक्षलवादी आहेत, असा अजिबात होत नाही असे पर्रीकर यांनी सांगितले. विनाकारण आपल्या विधानाचा काही लोकांकडून विपर्यास केला जात असल्याचे ते म्हणाले. खाण व पर्यावरणाचा विषय हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या काही बिगरसरकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याविरोधात चालवलेली आगपाखड अर्थहीन असल्याचे सांगून त्यांचा जर अशा प्रकरणात सहभाग नाही तर त्यांना चिंता करण्याची गरजच काय,असा सवालही पर्रीकर यांनी उपस्थित केला.

बांदोडकर प्रतिष्ठान प्रकल्पाच्या राखीव जागेची अखेर विभागणी?

कोमुनिदादची अर्धी जमीन कॉंग्रेसला!
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नावाने प्रकल्प उभारण्यासाठी सेरूला कोमुनिदादने पर्वरी येथे बहाल केलेली सुमारे २०५० चौरसमीटर जागा भाऊसाहेब प्रतिष्ठानला देण्याचा १० ऑगष्ट २००८ रोजी महसूल खात्याने काढलेला आदेश आता याच सरकारने फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल खात्याच्या सदर आदेशाला स्थगिती देऊन आता या जागेची विभागणी करून त्यातील अर्धी जागा कॉंग्रेस भवनसाठी हडप करण्याचा डाव सरकार दरबारी घाटत आहे.
महसूल खात्याने काढलेल्या आदेशाला वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांनी आक्षेप घेऊन मुख्यमंत्री कामत यांच्याकरवी या आदेशाला स्थगिती मिळवली होती. आता नार्वेकर यांच्याच दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी या जागेची विभागणी करण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती वरिष्ठ सरकारी सूत्रांनी दिली. याबाबत राज्यातील भाऊप्रेमीत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रतिष्ठानचे नेते हे कॉंग्रेस पक्षात असूनही केवळ नार्वेकर यांच्या हट्टामुळे या जागेची विभागणी होत असताना त्यांची बोलतीच बंद पडली आहे. विद्यमान मगोचे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही या प्रकरणाकडे कानाडोळा चालवला असून ते प्रतिष्ठानचे सदस्यही नसल्याने "मला काय त्याचे'अशी भूमिका त्यांनी घेतल्याने ही जागा हातातून जाण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्याकडे कायदा खाते असल्याने त्यांनी हा प्रस्ताव अडकवून ठेवला होता. नार्वेकर यांचे खास सेवा अधिकारी अशोक भर्तू यांनी २३ फेब्रुवारी २००७ रोजी महसूल खात्याचे अवर सचिव, उत्तर गोवा कोमुनिदादचे प्रशासक व सेरूला ऍटर्नी यांना एक पत्र पाठवून ही जागा प्रतिष्ठानच्या हवाली न करण्याचे आदेश दिले होते. प्रतिष्ठानातील काही राजकीय नेते भाऊंच्या नावाने हा भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, स्व.भाऊसाहेब यांच्या कुटुंबीयांकडूनही हा भूखंड प्रतिष्ठानला देण्यास विरोध असल्याची खोटी माहितीही या पत्रात दिल्याचे उघड झाले आहे.
महसूल खात्याने गेल्या १० एप्रिल २००८ रोजी यासंबंधीचे आदेश सेरूला कोमुनिदादला दिला असता उत्तर गोवा कोमुनिदादचे प्रशासक एन. एम. गाड यांनी १६ एप्रिल २००८ रोजी ही जागा प्रतिष्ठानला देण्याचा आदेशवजा निर्णय सेरूला कोमुनिदाद व प्रतिष्ठानचे सचिव धर्मा चोडणकर यांना कळवला होता. पेन्ह द फ्रान्स पंचायत क्षेत्रातील सेरूला कोमुनिदादच्या सर्व्हे क्रमांक-१०६/१, भूखंड क्रमांक-१३ यातील २०५० चौरस मीटर जागा १७/११/एसइआर/२००४-आरडी दि.१७/०१/०५ या आदेशाप्रमाणे कै.भाऊसाहेब बांदोडकर प्रतिष्ठानला दिली होती. दरम्यान, काही कारणांस्तव ही जागा ताब्यात घेण्यास विलंब झाला. सध्याच्या सुधारित दराप्रमाणे वार्षिक लीजची रक्कम ७६, ८७५ रुपये होते. सेरूला कोमुनिदाने हे पैसे स्वीकारण्यास विरोध केल्याने अखेर प्रतिष्ठानने हे पैसे डिमांड ड्राफ्टव्दारे कोमुनिदादला पाठवण्याचेही नाट्य घडले होते. शेवटी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या कार्यालयातून आलेल्या आदेशावरून हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला होता.
भाऊसाहेबांच्या बाबतीत विद्यमान कॉंग्रेस सरकारातील काही नेत्यांनी आरंभलेल्या या कृतीचा निषेध करून हा भाऊंचा अपमान असल्याची टीका "ऊठ गोंयकारा'चे प्रवक्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी केली. "सेझ' सारख्या गोवा विरोधी प्रकल्पांना लाखो चौरसमीटर जागा देणाऱ्या सरकारला गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब यांच्यासाठी देण्यास भूखंड नाही ही शरमेची गोष्ट असल्याची टीका करून येत्या १४ ऑगष्ट रोजी भाऊंची पुण्यतिथी असल्याने त्यापूर्वी हा भूखंड प्रतिष्ठानच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली आहे.

बेकायदा पार्किंग शुल्कप्रकरणी नगरसेवक करिशेट्टी गजाआड

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) : पणजी पाटो आणि दोन्ही मांडवी पुलाखाली बेकायदेशीर महापालिकेच्या नावावर "पाकिर्ंग शुल्क' आकारायच्या प्रकरणात पणजी महापालिकेचा सत्ताधारी गटातील नगरसेवक नागेश करिशेट्टी याला आज अटक करण्यात आली. आज सकाळी श्री. करशेट्टी पोलिस स्थानकात शरण आल्यानंतरही अटक करण्यात आली. दुपारी जामीन मिळवण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जामीन अर्ज सादर ेला असता, तो फेटाळून लावण्यात आला. या प्रकरणात जनतेच्या पैशांचा प्रश्न असल्याने पोलिसांना योग्य तो तपास करायला मिळाला पाहिजे, असे यावेळी न्यायालयाने नमूद केले. उद्या सकाळी श्री. करिशेट्टी याला पोलिस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून पणजी पोलिस त्याच्या मागावर होते.
या प्रकरणाचा भाजपच्या नगरसेवकांनी गौप्यस्फोट केल्यानंतर पालिका आयुक्तांकडे पणजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी बेती पणजी येथील दोघा तरुणांना अटक केली होती. त्या दोघा संशयितांनी आपण नागेश करिशेट्टी याच्या सांगण्यावरून याठिकाणी "टोल' घेत असल्याचा कबुलीजबाब पोलिसांना दिला होता. त्यावरून करिशेट्टी याला अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम उघडली होती. परंतु आज स्वतःच तो पोलिसांना शरण आला.
पुलाखाली वाहने उभी करून ठेवण्यासाठी एका तासाला एका वाहनांकडून १० ते २० रुपये आकारले जात होते. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली असून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तुषार लोटलीकर करीत आहे.

Sunday, 22 June, 2008

आकार म्हार्दोळ येथे पिकांची नासधूस

चर्च समितीविरुद्ध शेतकऱ्यांची तक्रार
फोंडा, दि.22 (प्रतिनिधी) - आकार म्हार्दोळ येथील डोंगराळ भागात सर्व्हे क्र. 60/ 0, 79/ 0 मध्ये गेली कित्येक वर्षे पावसाळी पिकांच्या मळ्याची लागवड करण्यात येणाऱ्या काही जमिनीवर म्हार्दोळ येथील चर्चच्या समितीने दावा केला. आज (22 जून) सकाळी "त्या' जागेत लागवड करण्यात आलेल्या पावसाळी मळ्यातील पिकांची सदर समितीकडून नासधूस झाल्याने सुमारे पंचवीस ते तीस शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यासंदर्भात शेतकऱ्यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अनेक वर्षांपासून आकार म्हार्दोळ येथील शेतकरी पावसाळ्यात डोंगराळ भागात काकडी, दोडके, भोपळा, कार्ली, भेंडी आदींचे पीक घेतात. गेल्या मे महिन्यापासून शेतकरी मळे तयार करण्याचे काम करीत आहेत. सदर जागा चर्च समितीची होती तर त्यांनी त्याच वेळी शेतकऱ्यांना अडवून जागेसंबंधी माहिती दिली असती तर कुणीही त्यांच्या जागेत मळे तयार केले नसते. चर्चच्या लोकांकडून मळ्याची नासधूस झाल्यानेे प्रत्येक शेतकऱ्याचे चार ते पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. सदर जागा ही प्रियोळ कोमुनिदादची असल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या जागेचे सर्वेक्षण करून या प्रकरणी तोडगा काढण्याची मागणी प्रियोळचे माजी आमदार विश्र्वास सतरकर यांनी केली असून श्री. सतरकर यांनी आकार म्हार्दोळ येथे जाऊन नासधूस करण्यात आलेल्या मळ्यांची पाहणी केली. चर्च समितीने मळ्याची नासधूस करण्यापेक्षा सर्व मळेवाल्यांची बैठक घेऊन त्यांच्यासमोर हा जमिनीचा विषय मांडून पुढील कार्यवाही केली असती तर पंचवीस ते तीस शेतकऱ्यांची हानी झाली नसती. शेतकरी सदर जागा कोमुनिदादची असल्याचा दावा करून गेली कित्येक वर्षे तेथे पावसाळी पिकांची लागवड करून उदरनिर्वाह करीत आहेत, असेही श्री. सतरकर यांनी सांगितले.
गेली 25 वर्षे आपण त्या ठिकाणी पावसाळी मळ्याची लागवड करीत आहोत. प्रियोळ कोमुनिदाद किंवा महालसा देवस्थानाने त्याला आक्षेप घेतलेला नाही. 22 जून रोजी सकाळी 9 च्या सुमारास चर्च समितीचे पदाधिकारी सदर मळ्यात घुसून त्यांनी त्याठिकाणच्या रोपट्यांची नासधूस केली आहे. तसेच खत ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या लहान झोपड्यांना आग लावली. मळ्याच्या सभोवताली उभारण्यात आलेल्या कुंपणाची नासधूस केली, असे शेतकऱ्यांनी पोलिस स्थानकावर केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
शेतकऱ्यांची अनेक कुटुंबे या मळ्यावर आपला वर्षाचा उदरनिर्वाह करतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पोलिसांच्या उपस्थितीत मळ्याची नासधूस करण्यात आल्याने लोकांत संतापाची लाट पसरली आहे.
उपलब्ध माहितीनुसार म्हार्दोळ चर्चच्या फादरनी आपल्या मालकीच्या जागेत अज्ञात व्यक्तीकडून झाडांची कत्तल झाल्याची तक्रार वन खात्याकडे केली होती. या तक्रारीची प्रत फोंडा पोलिसांना देण्यात आली होती. वन खात्याने यासंबंधी चौकशी केली. त्यानंतर चर्च समितीने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे वादग्रस्त जागेत 22 रोजी सकाळी वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असे कळविले होते. त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. चर्चमधील प्रार्थना संपल्यानंतर सर्वांनी त्याजागेत जाऊन लागवड केलेली रोपटी काढून टाकली आणि तेथे काही ठिकाणी झाडे लावली. स्थानिक शेतकऱ्यांनी सामंजस्यांची भूमिका घेतल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
विश्र्वास सतरकर, पंच सतीश मडकईकर, शिवदास गावडे आणि शेतकऱ्यांनी फोंडा पोलिस स्थानकावर जाऊन तक्रार दाखल केली. श्री. सतरकर यांनी निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. या प्रकरणी त्वरित तोडगा काढण्याचे आश्र्वासन श्री. देसाई यांनी दिले आहे.

वार्का ग्रामसभाही आक्रमक

मडगाव, दि.22(प्रतिनिधी) - सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमांव यांचे निवासस्थान ज्या वार्का पंचायतीत आहे त्या पंचायतीच्या आज बोलावलेल्या खास ग्रामसभेने पंचायत कक्षेत कोणताही मेगा गृह प्रकल्प होऊ न देण्याचा एकमुखी ठराव आज संमत केला आणि चर्चिल यांनाही या ठरावाबाजूने उभे राहणे क्रमप्राप्त झाले.
सरपंच व्हिन्सेंतीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेने मंत्री चर्चिल यांनीच मेगा हाउसिंग प्रकल्प पंचायत कक्षेत येऊ नयेत म्हणून एक परिपूर्ण विधेयक विधानसभेत मांडावे अशी मागणीही करण्यात आली. चर्चिल यांनी या सूचनेला तत्वतः तयारी दर्शविताना त्यासाठी असे ठराव अधिक पंचायतींनी संमत करण्याची गरज प्रतिपादली.
आजची ग्रामसभा शांततापूर्ण वातावरणात पार पडली . सभेत अधिक चर्चा जरी मेगा प्रकल्पावरच केंद्रीभूत राहिलेली असली तरी त्यात कुठेच वादविवाद झाला नाही. पंचायतीने एकाही अशा मेगा प्रकल्पाला परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी करताच सरपंचांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केलेली फाईल असेल तर ती अडवून ठेवता येत नाही व तशी अडवणूक केलीच तर बिल्डर सरळ पंचायत उपसंचालकांकडे जाऊन परवानगी मिळवतात असे स्पष्टीकरण सरपंचांनी सांगताच तसे प्रकार घडल्यास लगेच बैठक बोलावून ग्रामस्थांच्या नजरेस तो प्रकार आणून द्यावा असे त्यांना सांगण्यात आले.
मेगा प्रकल्प उभे राहिले तर गावचे वेगळेपण नष्ट होईल,आज जी साखवाळ, वास्कोची दैना झालेली आहे तशी आमच्या गावची होऊ द्यायला नको असेल तर मेगा प्रकल्पांना गावच्या वेशीवरच अडवून ठेवावे लागेल, अशी हाक या ग्रामसभेने दिली.
बाणावली, कोलवा, करमणे, नुवे, लोटली पाठोपाठ आता नावेली मतदारसंघांतील वार्कातही मेगा प्रकल्पविरोधी लोण पोचल्याचे आजच्या सभेवरून दिसून आले.

बाह्यविकास आराखडा रद्द करा

मडगाव नावेलीतील बैठकीत मागणी
मडगाव, दि. 22 (प्रतिनिधी) - मडगावच्या वादग्रस्त ठरलेल्या बाह्यविकास आराखड्यासंदर्भात (ओडीपी) नावेली नागरिक व ग्राहक मंचाने आज तेथे आयोजित केलेल्या एका बैठकीत या नव्या आराखड्यात केलेले बहुतेक बदल आक्षेपार्ह असल्याचे तसेच नावेलीचा विनाश घडविणारे असल्याचे प्रतिपादन करून हा नवा आराखडा पूर्णतः रद्द करण्याची आणि नावेली भागात मेगा प्रकल्पांना मान्यता न देण्याची मागणी करण्यात आली.
नावेली चर्चमागील शेती व अन्य परिसराचे रुपांतर करण्यासही बैठकीत तीव्र विरोध दिसून आला. तो भाग व्यापारी विभागात टाकून तेथे मेगा प्रकल्प आणण्याचा तो छुपा अजेंडा असण्याची भीतीही काहींनी व्यक्त केली.
या आराखड्यातील बदल अधिक विस्तृतपणे येथील लोकांना कळून यावेत यासाठी येत्या 26 जून रोजी एक जाहीर सभा सायंकाळी 5 वाजता रोझरी सभागृहात बोलावण्याचा व त्या दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून हा वादग्रस्त आराखडा लोकांच्या माहितीसाठी तेथे प्रदर्शित करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला.
या बैठकीसाठी मडगाव-फातोर्डा नागरिक कल्याण समितीचे अध्यक्ष सॅव्हिओ डायस, सरचिटणीस संजीव रायतूरकर, ऍथेल लोबो, करमणे सिटिझन्स फोरमचे रोलॅंड मार्टिन्स, ओर्लांद डिसिल्वा आदी हजर होते. त्यांनी "ओडीपी'संदर्भातील अनेक कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. या बैठकीला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला व त्यातून "ओडीपी'बाबत लोकांत जागृती होत असल्याचे स्पष्ट झाले.
ओडीपी संदर्भात कलम 26 चा अवलंब करावा जेणेकरून लोकांच्या हरकती व सूचना नोंदविण्याचा मार्ग मोकळा होईल, असे प्रतिपादन करताना विद्यमान आराखड्याबाबत त्याचा अवलंब न करता तो घाईघाईत का तयार करण्यात आला, असा सवाल केला गेला. नावेली चर्च ते रावणफोंड जंक्शनपर्यंतचा रस्ता 30 मी . रुंद करण्याच्या प्रस्तावासही बैठकीने विरोध दर्शवताना तो रस्ता आहे तसाच ठेवावा, त्या रस्त्या बाजूचा भाग निवासी विभागातच ठेवावा अशी मागणी करून तो व्यापारी पट्ट्यात टाकण्यास तीव्र विरोध दर्शवला. तसेच पूर्व बगलरस्ता नावेली चौकातून न नेता तो नावेलीला वगळून त्याबाहेरून न्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
नावेली चर्च ते कोकण रेल्वे स्टेशनपर्यंतचा भाग आराखड्यात आहे तसाच ठेवावा, त्यात कोणताही बदल केला जाऊ नये असेही प्रतिपादण्यात आले. याच भागात नव्या "ओडीपी'त मुस्लिम स्मशानभूमीसाठी तरतूद केली होती; पण आजच्या बैठकीत दफनभूमीला नाव न घेता विरोध असल्याचे स्पष्ट झाले.
येत्या 26 जून रोजी बोलावलेल्या जाहीर सभेला लोकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे व नवा आराखडा कसा अन्यायकारक आहे ते प्रत्यक्ष पाहावे असे आवाहन मंचने केले.

ताळगावात मेगा प्रकल्प उभारण्यास तीव्र विरोध

बचाव अभियानकडून घोषणा
पणजी, दि. 22 (प्रतिनिधी) - आमदार बाबूश मोन्सेरात यांनी ताळगाव पंचायत वेठीला धरल्याचा आरोप करून ताळगावात येणारे "मेगा प्रकल्प' आणि बाह्यविकास आराखड्याला तीव्र विरोध करण्याचा निर्धार आज "ताळगाव बचाव अभियान'तर्फे घेण्यात आलेल्या सभेत व्यक्त करण्यात आला. बाह्यविकास आराखडा निश्चित झालेला नसतानाही आराखड्याच्या नावाने गावात मेगा प्रकल्पांचे बांधकाम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यासाठी लोकांची शेतजमीन बळकावण्यात आली आहे. डोंगराची कत्तल करण्यात आली आहे. याला विरोध करीत या प्रकल्पांविरोधात तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. तसेच आमदार व पंचायत सदस्यांचा याप्रसंगी निषेध करण्यात आला. सी ए. आल्मेदा, रीना डिसोझा, स्टिफन डायस, कॉलीन क्युरी, शांती आल्मेदा, पुंडलीक रायकर व आनंद मडगावकर यांनी यावेळी आपले विचार मांडले.
या सभेत ताळगाव येथील प्रत्येक वॉर्डामध्ये एका समितीची स्थापना करण्याचे ठरवण्यात आले. या बाह्यविकास आराखड्याचा आणि मेगा प्रकल्पांचा ताळगाववर कोणता परिणाम होईल यावर चर्चा करण्यासाठी या खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणेलोकांना ग्रामसभेत प्रश्न विचारण्यासाठी व ग्रामसभेच्या कामकाजाचे आकलन होण्यासाठी खास प्रशिक्षण देऊन ग्रामस्थांना जागरूक करण्याची जबाबदारी या समितीने घेतली आहे.
यावेळी ताळगाव परिसरात सुरू असलेेल्या प्रकल्पांसंबंधी जोरदार टीका करण्यात आली. आमदार बाबूश यांनी पंचायतीचा "रिमोट' आपल्या हातात ठेवला असून ते हवा तसा त्याचा वापर करतात, अशी जोरदार टीका यावेळी करण्यात आली. रहिवासी क्षेत्राचे रूपांतर व्यावसायिक क्षेत्रात करून बहुमजली इमारती उभारल्या जातात. ताळगावात होऊ घातलेल्या प्रकल्पांना कोणत्याही प्राथमिक सुविधा न पुरवताच त्यांना परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे गावातील जलस्रोतांवर व अन्य नैसर्गिक उपलब्धीवर विपरित परिणाम होण्याची भीती अनेकांनी व्यक्त केली. मोठ्या प्रमाणात शेत जमिनीचे व्यावसायिक क्षेत्र म्हणून रूपांतर करण्यात आल्याचे यावेळी उघड करण्यात आले.

अणुकराराच्या प्रश्नावरून डाव्या नेत्यांना हत्येचे ईमेल

नवी दिल्ली, दि. 22 - भारत-अमेरिका यांच्यातील अणुकरारास विरोध केला तर तुमची हत्या केली जाईल, असे धमकावणारा ईमेल डाव्या पक्षाच्या चौघा ज्येष्ठ नेत्यांना पाठवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात, खासदार सीताराम येच्युरी, ए. बी. वर्धन व डी. राजा अशी या नेत्यांची नावे आहेत. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची मानखंडना थांबवा; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जा, अशा आशयाचे हे ईमेल मुंबईहून अज्ञाताने पाठवले आहेत. तसेच मोडक्यातोडक्या इंग्रजीतून विनय कटारी नामक व्यक्तीने या नेत्यांना धमकीची पत्रेही पाठवली आहेत. तुमचे वर्तन दहशतवाद्यांसारखे आहे. देशहितावर तुम्ही निखारे ठेवले आहेत. गेल्या साडेचार वर्षांपासून अमेरिकाविरोधी कीडे तुमच्या डोक्यात वळवळत आहेत. लोकांनी आतापर्यंत तुम्हाला सहन केले. आता हे पुरे झाले, असे या पत्रांचे स्वरूप आहे.