Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 19 June, 2010

पोर्तुगीजांच्या खुणा समूळ नष्ट न केल्यास पुन्हा लढा

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमलींचा इशारा

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केलेल्या पोर्तुगीज राजवटीतून मुक्तता मिळवण्यासाठी अनेकांनी हालअपेष्टा व अत्याचार सहन केले तर काही जणांनी आपल्या प्राणांचीही आहुती दिली. आज त्याच राज्यात पोर्तुगीज राजवटीचा उदोउदो केला जाणे ही अत्यंत शरमेची व दुर्दैवाची गोष्ट आहे. येत्या १९ डिसेंबर २०१० रोजी गोवा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत असताना राज्यातील पोर्तुगीज राजवटीच्या जुन्या खुणा समूळ नष्ट न केल्यास पुन्हा एकदा नवा लढा सुरू करणे भाग पडेल, असा असा सज्जड इशारा गोवा दमण व दीव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी दिला.
आज गोवा क्रांतिदिनाच्या निमित्ताने येथील आझाद मैदानावर आयोजित राज्य पातळीवरील कार्यक्रमांत बोलताना श्री.करमली यांनी हा इशारा दिला. यावेळी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत, समाज कल्याणमंत्री सुदिन ढवळीकर, सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, राज्य प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी व अनेक नागरिक व विद्यार्थी हजर होते. एकीकडे राज्याच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाची आखणी सुरू असताना काही लोक पोर्तुगिजांनी गोवा सोडल्याची ५०० वर्षे साजरा करण्याच्या तयारीत आहेत. गोवा मुक्तीलढ्यात प्राणार्पण केलेल्यांची ही क्रूर चेष्टा थांबवणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही श्री.करमली म्हणाले. राजधानीत अजूनही अनेक मार्गांना पोर्तुगिज साम्राज्यवाद्यांची नावे बहाल करण्यात आली आहेत.ज्या लोकांनी गोमंतकीयांवर निष्ठुर अत्याचार केले त्या लोकांची नावे मुक्त गोव्यात अशी मिरवली जाणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून येत्या १९ डिसेंबरपर्यंत ही नावे हटवण्यासाठी सरकार व पणजी महापालिकेने कृती केली नाही तर स्वातंत्र्यसैनिकांना पुन्हा एकदा गोवा मुक्ती लढा उभारावा लागणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी दिले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या भाषणांत स्वातंत्र्यसैनिकांच्या मुख्य मागणीलाच हात घातला.येत्या १९ डिसेंबर २०१० पूर्वी रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल व गोवा सुवर्णमहोत्सवापूर्वी संघटनेची एकही मागणी प्रलंबित राहणार नाही, असे ठोस आश्वासन दिले. राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू यांनी गोवा मुक्ती लढ्याच्या गतस्मृतींना उजाळा दिला. देशबांधवांनी गोवेकरांच्या पाठीमागे ठाम राहून दिलेला लढा अजिबात विसरता कामा नये, असे सांगून महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील हुतात्म्यानांही आदरांजली वाहणे गरजेचे आहे,असेही ते म्हणाले.
गोवा स्वातंत्र्यसैनिक संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत केंकरे यांनी आपल्या भाषणात कॅसिनो संस्कृती रुजवून गोव्याचे माकांव करू नका,असा सल्ला सरकारला दिला. मुख्यमंत्री कामत यांचे आम आदमीचे सरकार असेल तर विविध योजना या लोकांपर्यंत का पोहचत नाही, याचा शोध लावा,अशी सूचना त्यांनी दिली. वेळकाढू सरकारी प्रक्रियेमुळे सर्वसामान्य लोकांची दमछाक होते, त्यामुळे ही प्रक्रिया सुटसुटीत होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. सुरुवातीला सर्व महनीय व्यक्तींनी हुतात्मा व स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी मुख्यमंत्री व राज्यपालांच्याहस्ते शाल,श्रीफळ व हुतात्मा स्मारकाची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह बहाल करून १४ स्वातंत्र्यसैनिकांचा हयात व मरणोत्तर सत्कार करण्यात आला. बाल भवनच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दयानंद राव यांनी केले.

म्हापशाच्या मासेविक्रेत्यांची पालिकेवर अचानक धडक

मार्केटच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष

म्हापसा, दि. १८ (प्रतिनिधी) - म्हापसा मासळी मार्केटची समस्या पावसाळा सुरू झाला तरी न सुटल्याने मासे विक्री करण्याचा व्यवसाय बंद करून असंख्य मासे विक्रेत्यांनी आज सकाळी म्हापसा नगरपालिकेवर धडक मोर्चा नेला. नगराध्यक्ष रूपा भक्ता, मुख्याधिकारी दशरथ रेडकर यांना घेराव घालून मार्केटची ही समस्या का सोडविली जात नाही, त्याची कारणे सांगा असा प्रश्नांचा भडिमार या विक्रेत्या महिलांनी केला. मार्केटची स्थिती सुधारेपर्यंत "सोपो' देणार नसल्याचे या महिलांनी यावेळी पालिकेला बजावले.
मार्केटच्या प्रश्न पावसाळ्यापूर्वी सोडवावा अशी मागणी करूनही पालिकेने दिरंगाई केल्यामुळे पावसात भिजून मासळी विक्री करावी लागत असल्याने आज सकाळी म्हापसा मार्केटमध्ये मासे विक्रेत्यांच्या संघटनेने एक बैठक घेतली. म्हापसा नगरपालिका मार्केटचा प्रश्न सोडविण्यासाठी बराच विलंब लावत आहे. म्हापसा मार्केट बांधण्याबाबत विक्रेत्या संघटनेने नगरपालिकेला अनेक निवेदने दिली, अनेक मोर्चे काढले पण नगराध्यक्षांनी आजउद्या करीत वेळ मारून नेली व हा प्रश्न आहे तसाच ठेवला आहे, त्यामुळे म्हापसा मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या सर्व मासळी विक्रेत्यांना सध्या भिजत मासे विकावे लागत आहेत. पावसाच्या पाण्याने एखादी मासळी विक्रेती आजारी पडली तर याला कोण जबाबदार, असा प्रश्नही मासळी विक्रेत्यांनी केला. मासळी मार्केटवर छप्पर नाही, मोडलेल्या छप्पराचे कॉंक्रिटचे तुकडे विक्रेत्यांवर पडून त्या जखमी होत आहेत, याला जबाबदार कोण, मासळी मार्केटमध्ये बसणारे सर्व विक्रेते नगरपालिकेला सोपो कर देतात, तो महसूल कुठे जातो, आमच्यामुळेच तुम्ही नगरपालिकेतील खुर्चीवर बसता आणि आमच्यामुळेच तुम्ही मोठे होता, असे टीकास्त्र नगरसेवकांवर या महिलांनी सोडले. आमच्या मागण्या कधी पुऱ्या होणार, ते सांगा असा हट्ट धरून अध्यक्ष रूपा भक्ता यांना मासळी विक्रेत्यांनी हैराण करून सोडले. नगराध्यक्ष उत्तर देण्याचा प्रयत्न करीत असता विक्रेत्यांनी नगराध्यक्षाची एकही बाब ऐकून घेतली नाही. मोर्चाचे स्वरूप वाढत जाईल यांची कल्पना लागताच म्हापसा पोलिसांनी जादा फौजफाटा मागवून तैनात केला. यावेळी सुमारे अर्धा तास वाहतूक रोखली गेली. पालिकेजवळ वाहनांची कोंडी झाल्याने अनेक वाहने त्या ठिकाणी अडकून पडली.
जोपर्यंत मासळी मार्केट तयार होणार नाही तोपर्यंत नगरपालिकेला सोपो कर देणार नाही असा स्पष्ट इशारा संघटनेने पालिकेला दिला.
मार्केट प्रकल्प बांधकामाचे काम "सुडा' संस्थेकडे सोपवण्यात आले आहे, त्यांना आगाऊ रक्कमही दिली आहे. पण सुडा कंपनी नक्की केव्हा काम सुरू करणार यांची कल्पना नसली तरी येत्या ऑगस्टमध्ये बांधकाम करण्यास सुरुवात होईल, असे मुख्याधिकारी दशरथ रेडकर यांनी यावेळी सांगितले. उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांच्या उत्तराने संघटनेचे समाधान झाले नसल्याने विक्रेत्यांचंी कुजबुज बरीच वाढली त्यावेळी नगरसेवक मिलिंद अणवेकर यांनी विक्रेत्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत न्यावा व तेथे या मार्केटविषयी चर्चा करू, चर्चा झाल्यानंतर ंकाय तो निर्णय घेऊ अशी सूचना मिलिंद अणवेकर यांनी केली, त्यानुसार म्हापसा मासळी विक्रेत्या संघटनेने मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तारीख निश्चित करण्यात येईल, असे ठरविण्यात आले.

...आणि उदयला मृत्यूने गाठले !

वास्कोत भीषण अपघात

वास्को, दि. १८ (प्रतिनिधी) - आपल्या मुलाचा दुसरा वाढदिवस उद्या असल्याने घरी जात असलेला ३९ वर्षीय उदय बुधाजी परब हा दहाचाकी ट्रकखाली सापडून झालेल्या अपघातात जागीच ठार झाला. आज सकाळी ९.१५ च्या सुमारास चालू असलेल्या मुसळधार पावसाच्या वेळी परब हा आपल्या दुचाकीवरून जात असताना तो पावसाच्या पाण्यावर घसरून ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडला, त्यामुळे त्याच्या डोक्याचा यावेळी चेंदामेंदा झाला.
वारखंड (ता.पेडणे) येथील उदय परब हा आज सकाळी मुरगाव, सडा येथून आपल्या "पॅशन' दुचाकीवरून (क्रः जीए ०३ इ ००९१) वास्कोच्या एफ.एल. गोम्स मार्गावरून घरी जात असताना तो सेंट अँन्ड्रु चर्चजवळ काही अंतरावर पोचला असता येथे तो पावसाच्या पाण्यावर घसरून त्याच बाजूने जात असलेल्या ट्रकच्या (क्रः केए २२ ए ३८४७) मागच्या चाकाखाली सापडला. आपल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली एक इसम दुचाकीवरून पडल्याची जाणीव नसल्यामुळे सदर ट्रक चालकाने आपला ट्रक यावेळी थांबविला नाही, त्यामुळे त्या ट्रकची मागची चाके उदयच्या डोक्यावरून गेली.
अपघात होऊन एक वाहनचालक मरण पावल्याची माहिती वास्को पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन ट्रकखाली सापडलेला उदयचा मृतदेह बाहेर काढून तो मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळाच्या शवागारात पाठवून दिला. सदर अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली.
मयत उदय याच्या मुलाचा उद्या दुसरा वाढदिवस असल्याने तो पेडणे येथे आपल्या घरी जात होता, अशी माहिती वास्को पोलीसांनी दिली. कामासाठी तो सडा भागात राहत असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात डोळ्यांसमोर पाहिलेली एक महिला तेथे बेशुद्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज गोवा क्रांतिदिन असल्याने गोव्यासाठी शहीद झालेल्या थोर स्वतंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हुतात्मा चौक (अपघात स्थळापासून सुमारे २० मीटर) येथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या लक्षात हा अपघात येताच त्यांनी त्वरित मदत कार्यासाठी त्या ठिकाणी धाव घेतली, मात्र दुर्दैवी उदय त्यापूर्वीच मरण पावला होता. वास्कोचे आमदार जुझे फिलीप डिसोझा यांनी अपघातस्थळी भेट दिली.
पोलीस हवालदार संजय कुडवाळकर यांनी या अपघाताचा पंचनामा केला असून ट्रक चालक सिद्धप्पा कुरी (वय ३९, राः बेळगांव) याच्या विरुद्ध भा.दं.सं २७९ व ३०४(ए) कलमाखाली तसेच वाहतूक कायद्याच्या १३४ (बी) कलमाखाली गुन्हा नोंदवून त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान मयत उदय याच्या मृतदेहावर शवचिकित्सा करण्यात आल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक फिलोमीना कॉस्ता सदर अपघाताबाबत पुढील तपास करीत आहेत.
पेडणे व सड्यावर
दुःखाची छाया
आज सकाळी वास्को शहरात झालेल्या भीषण अपघातात उदय परब यास मरण आल्याने पेडणे व सडा भागात दुःखाचे वातावरण पसरले आहे. ३९ वर्षीय मयत उदय याचे तीन वर्षापूर्वी लग्न झाल्याची माहिती मिळाली. उद्या त्याच्या पहिल्या मुलाचा दुसरा वाढदिवस असल्याने आज तो सुट्टी घेऊन घरी जात असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला. उदय हा अपघातात मरण पावल्याची माहिती सडा भागात कळताच येथे राहणाऱ्या त्याच्या नातेवाइकांमध्ये हाहाकाराचे वातावरण पसरले. उदय याच्या परिवाराला मदत करण्यासाठी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी हॉस्पिसियोे इस्पितळात संपर्क साधल्याचे सूत्रांनी सांगितले.

दाबोळी येथे प्रवाशाकडून ५१ लाखांचे सोने जप्त

वास्को, दि. १८ (प्रतिनिधी)- आज पहाटे दाबोळी विमानतळावर "कतार एअरलाईन्स'च्या विमानातून दुबईहून आलेला सय्यद महम्मद नावाचा ४० वर्षीय प्रवाशाकडून जकात अधिकाऱ्यांनी ५१ लाख रुपये किमतीचे ३ किलो ८०५ ग्राम सोने जप्त केले.
सईद मुस्बा महम्मद हा विमानतळावरून संशयास्पदरीत्या सटकण्याचा प्रयत्न करत असल्याचे तेथील जकात अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच सईदला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे उघड झाले. दोन्ही गुडघ्यांवर बनावट वाट्या बसवून त्याने त्यात सोने लपविले होते, असे दिसून आले.
आज पहाटे ३.३० च्या सुमारास दाबोळी विमानतळावर दुबई - दोहा येथून आलेल्या "कतार एअरलाइन्स'च्या विमानातील सईद नामक प्रवासी दाबोळी विमानतळावर उतरला. त्याने कुठल्याच प्रकारचे "क्लिअरन्स'न करता "ग्रीन एरिया'वरुन सटकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तो तपासणीसाठी "रेड एरिया' वर आला नसल्याचे तेथील गिरिश लोटलीकर नावाच्या जकात अधिकाऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी सईदला अडवून त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ ३ किलो ८०० ग्राम बेकायदा सोने असल्याचे आढळून आले.
दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर संशयित सईद यास कस्टमने वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयात उपस्थित केला असता त्यास सात दिवस जकात खात्याच्या ताब्यात घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. भटकलच्या या इसमाचे कुठेकुठे संबंध आहेत याबाबत लवकरच तपास करण्यात येणार असून सध्या त्याला सडा येथील उप कारागृहात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. जकात अधीक्षक जी.डी.लोटलीकर, जितेंद्र कुमार, ऍन्थनी सौझा, एडविन ब्रागांझा, ए.व्ही.एस.एन.डायस, जी.एम.मलिक या अधिकाऱ्यांनी जकातचे अतिरिक्त आयुक्त पी.व्ही.एन. सुरेश बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

मिकी व लिंडनच्या अर्जांवर सुनावणीस न्या.ब्रिटोंचा नकार

आता खंडपीठ की मूख्य न्यायमूर्ती?

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) - नादिया तोरादो मृत्युप्रकरणातील मुख्य संशयित माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको व त्यांचे सहकारी लिंडन मोंतेरो यांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीस घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती नेल्सन ब्रिटो यांनी आज नकार दिल्याने दोघांना चांगलाच धक्का बसला आहे. न्यायमूर्ती ब्रिटो यांनी "नॉट बिफोर मी' असा शेरा मारून हे दोन्ही अर्ज परतवल्याने आता जामिनासाठी त्यांना नव्याने प्रयत्न करणे क्रमप्राप्त ठरले आहे.
न्यायमूर्ती नेल्सन ब्रिटो यांनी दिलेल्या या निवाड्यामुळे आता मिकी व लिंडन यांच्या कायदेतज्ज्ञ मंडळाने पुढील मार्ग चोखाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडे खास अर्ज सादर केला जाईल. जामिनासाठीचा हा अर्ज सुनावणीस घेण्यासाठी खंडपीठाची नियुक्ती करणे किंवा त्यांनी स्वतः मुंबईत हा अर्ज सुनावणीस घेणे, अशी विनंती केली जाईल, अशी माहिती मिकी पाशेको यांचे वकील ऍड. अमित पालेकर यांनी दिली.
दरम्यान, न्यायाच्या हिताच्या दृष्टीने सदर दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीस न घेण्याची विनंती करण्याचा आपण निर्णय घेतला होता,अशी माहिती ऍड. रॉड्रिगीस यांनी दिली. नादिया तोरादो प्रकरणाचा "साधे प्रकरण' म्हणून केलेला उल्लेख तसेच या प्रकरणाची विलक्षणता व वास्तवता पहिल्यानंतर न्यायमूर्ती ब्रिटो यांनी सदर खटल्यापासून स्वतःला बाजूला ठेवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत ऍड.रॉड्रिगीस यांनी दिले. न्याय मिळाला असे म्हणून होत नाही तर तो न्याय स्पष्टपणे दिसणे गरजेचे आहे,अशी पुष्टीही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना जोडली.
मिकी पाशेको मडगावातच ?
गेल्या ५ जूनपासून बेपत्ता असलेले मिकी पाशेको नेमके कुठे दडून बसले आहेत, याबाबत अनेक चर्वितचर्वणे सुरू असली तरी ते गोव्यातच आहेत किंवा काही दिवसांपूर्वी होते हे आज त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राव्दारे स्पष्ट झाले आहे. मिकी पाशेको यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मडगावचे नोटरी ज्यो रॉड्रिगीस यांच्यासमोर १४ रोजी शपथबद्ध केल्याचे उघड झाले. ज्यो रॉड्रिगीस हे दक्षिण गोवा जिल्हा पंचायत सदस्य श्रीमती नेली रॉड्रिगीस यांचे पती असून मिकी पाशेको यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. लिंडन मोंतेरो यांनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई येथे १५ जून रोजी शपथबद्ध केल्याचेही उघड झाले आहे. मिकी पाशेको यांनी मडगाव येथील नोटरीसमोर आपला अर्ज शपथबद्ध करून एकार्थाने गुन्हा विभागालाच आव्हान दिले आहे, असेही आता बोलले जात आहे. मिकी पाशेको यांच्या शोधासाठी आकाशपाताळ एक करीत असल्याचा आभास निर्माण करणाऱ्या पोलिसांना मिकी पाशेको खुद्द मडगावात असतानाही सापडत नाहीत, असेच यावरून उघड झाल्याने पोलिस चौकशीच्या नावाने थट्टा तर करीत नाही ना, असाही सवाल केला जात आहे.

Friday, 18 June, 2010

म्हापसा, मडगाव व फोंड्यात 'हानिकारक' आंबे जप्त

विविध ठिकाणी आणखी छापे
वास्को, दि. १७ (प्रतिनिधी): आंबे पिकवण्यासाठी "कॅल्शियम कार्बाइड' रसायनाच्या पावडरचा वापर करण्यात येत असल्याचे काल वास्को शहरातील तीन गोदामांमध्ये छापा टाकल्यावर उघडकीस येताच आज पुन्हा अन्न व औषध विभागाने म्हापसा, फोंडा व मडगाव या तीन अन्य शहरांत छापे टाकले असता येथेही असा प्रकार होत असल्याचे उघड झाले असून १३ टन आंबे जप्त करण्यात आले आहेत.
या गैरप्रकारांत सामील असलेल्या चार इसमांना ताब्यात घेण्यात आलेले असून येणाऱ्या काळात अशा प्रकारे अन्य ठिकाणी छापे टाकण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध विभागाचे संचालक सलीम वेलजी यांनी दिली.
वास्को शहरात विकण्यात येत असलेले नीलम आंबे पिकवण्या करिता "कॅल्शियम कार्बाइड' या जिवाला हानिकारक असलेल्या रसायनाच्या पावडरचा वापर करण्यात येत असल्याची माहिती मिळताच मुरगावचे उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांनी अन्न व औषध, आरोग्य खाते व पोलिसांच्या मदतीने खारीवाडा येथील तीन गोदामांवर छापे टाकून अशा प्रकारचे १२ टन आंबे जप्त करून तीन लोकांना ताब्यात घेतले होते. आज पुन्हा अन्न व औषध विभागाने म्हापसा व फोंडा या भागातील काही ठिकाणांवर छापे टाकले असता त्यांना या रसायनाचा वापर करून आंबे पिकवण्यात येत असल्याचे नजरेस आले, त्यावेळी त्यांनी त्वरित कारवाई करून म्हापसा येथून एक टन आंबे तर फोंडा येथून १० टन आंबे जप्त केले. ही माहिती सलीम वेलजी यांनी दिली.
मडगाव येथे असेच छापे टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू असल्याची माहिती वेलजी यांनी दिली. याबाबत सर्व काही उघड होणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हापसा येथील काही भागात छापे टाकले असता येथे एका टन आंब्यात ३६३ ग्राम" कॅल्शियम कार्बाइड' हे आंबे पिकवण्याकरिता वापरण्यात आल्याचे उघड झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. फोंडा येथील तीन गोदामांमध्ये छापे टाकून अशा प्रकारे पिकवण्यात येत असलेल्या व जप्त केलेल्या दहा टन आंब्यात ६०० ग्राम "कॅल्शियम कार्बाइड' रसायनाची पावडर वापरण्यात आल्याचे दिसून आल्याची माहिती श्री वेलजी यांनी दिली.
दरम्यान, सदर प्रकारात गुंतलेल्या चार जणांना (म्हापशातून एक व फोंड्यातून तीन) ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती श्री वेलजी यांनी पुढे देऊन सदर प्रकाराचा अधिक तपास चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
काल वास्कोतील तीन गोदामांतून जप्त केलेले १२ टन आंबे व ते पिकवण्याकरिता वापरण्यात आलेली पावडर अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेली असून हे आंबे व पावडर जिवाला किती हानिकारक आहे, याबाबत अहवाल मिळणार असल्याचे श्री वेलजी यांनी सांगितले. सदर कृत्य करणाऱ्यांवर न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी पुराव्याची गरज असते अशी माहिती वेलजी यांनी दिली व त्या दिशेने तयारी सुरू असल्याचे सांगितले.

व्यंकय्या, रुडी, जेठमलानी, विजय मल्ल्या राज्यसभेवर

नवी दिल्ली, दि. १७ : नामवंत फौजदारी वकील राम जेठमलानी, 'ग्लॅमरस' उद्योगपती विजय मल्ल्या यांच्यासारखे अपक्ष रिंगणात असल्याने देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, अपेक्षेनुसार या दोघांनी भाजपच्या पाठिंब्यावर बाजी मारलीच, शिवाय ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू व पक्षप्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनीही निवडणूक जिंकून भाजपला घवघवीत यश मिळवून दिले. अन्य विजेत्यांमध्ये लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देश पातळीवरील राजकारणापासून दूर असलेले पासवान आता राज्यसभेत पोचले आहेत.
बिहारमधील राज्यसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, राजीव प्रताप रूडी यांच्यासह राज्यातील सत्ताधारी रालोआ आणि राजद-लोजपा आघाडीचे उमेदवार विजयी झाले.या निवडणुकीत रिंगणात असलेले बंगलोरस्थित उद्योगपती बी. जी. उदय यांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे. कर्नाटकमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत किंगफिशर एअरलाईन्सचे मालक असलेले ख्यातनाम उद्योगपती विजय मल्ल्या यांचाही विजय झाला आहे. या निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. त्यांना भाजप आणि जनता दल (निधर्मी) यांचा पाठिंबा मिळाला. कर्नाटकमधून कॉंग्रेसचे ऑस्कर फर्नांडिस यांनी विजय मिळविला.
राज्यसभा निवडणुकीत बिहारमध्ये पाच जागा होत्या. यामध्ये राष्ट्रीय जनता दल- लोकजनशक्ती पार्टी आघाडीचे उमेदवार रामविलास पासवान आणि रामकृपाल यादव हे निवडून आले.. भाजप उमेदवार राजीवप्रताप रूडी आणि संयुक्त जनता दलाचे आर. सी. पी. सिंग आणि उपेंद्र प्रसाद कुशवाहा यांचाही विजय झाला. बंगलोरस्थित उद्योगपती उदय यांना मात्र पराभूत व्हावे लागले.
"मी पराभव स्वीकारलेला आहे. मी येथील राजकारणात तग धरू शकणार नाही. त्यामुळे मी आता बंगलोरला परत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे,'अशी प्रतिक्रिया उद्योगपती उदय यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी त्यांनी या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदनही केले. या निवडणुकीत बसपाच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यांच्या पाच आमदारांना पक्षाने कोणालाही मतदान करण्याची मुभा दिली होती. तीन आमदार असलेल्या भाकपाने रामविलास पासवान यांना पाठिंबा जाहीर केला होता.

मिकी व लिंडन यांचे नव्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

आज सुनावणी होणार
पणजी, दि.१७ (प्रतिनिधी): माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको व त्यांचे सहकारी लिंडन मोंतेरो या दोघानींही नव्याने अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केल्याने त्यांची सुनावणी उद्या १८ रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. लिंडन मोंतेरो यांनी यापूर्वी सादर केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जात तांत्रिक चुका असल्याचे ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी दाखवून दिल्यानंतर हा अर्ज मागे घेण्यात आला होता. यापूर्वी उच्च न्यायालयाने या अर्जावरील सुनावणीवेळी लिंडन यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेशही जारी केले होते.
आता पुन्हा एकदा नव्याने लिंडन मोंतेरो व मिकी पाशेको यांनी अटकपूर्व अर्ज सादर केल्याने ते उद्या १८ रोजी सुनावणीसाठी येणार आहेत. मिकी पाशेको यांनी केलेल्या अर्जात आपल्याला विनाकारण या प्रकरणांत गोवण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे. राज्यात पोलिस व ड्रग माफिया प्रकरणी एका राजकीय नेत्याचा मुलगा सहभागी असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी आपण केली होती व त्याचमुळे आपल्याला या प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न पोलिस करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नादिया तोरादो मृत्युप्रकरणी मिकी व लिंडन हे दोघेही गुन्हा अन्वेषण विभागाला चौकशीसाठी हवे आहेत. पोलिसांनी यापूर्वी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करून या दोघांच्याही कोठडी चौकशीची गरज असल्याचा युक्तिवाद केला होता. गेल्या ५ जूनपासून बेपत्ता असलेले मिकी पाशेको व त्याचे सहकारी लिंडन मोंतेरो यांची हजेरी उद्या अटकपूर्व जामिनावरील अर्जाच्या सुनावणीनंतर स्पष्ट होईल.

दिल्लीतून लोकायुक्त विधेयक परत

- अनेक त्रुटींमुळे मंजुरीस विलंब
- नियुक्ती रेंगाळल्याने प्रशासन सुस्त

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): राज्यात प्रशासकीय व सार्वजनिक पातळीवरील भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी २००५ साली विधानसभेत मंजूर झालेले व राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आलेले लोकायुक्त विधेयक परत मागवण्याची पाळी गोवा सरकारवर ओढवली आहे.
लोकायुक्तांची नेमणूक लांबणीवर पडेल, या वार्तेने प्रशासकीय पातळीवर समाधान व्यक्त केले जात असले तरी वाढत्या भ्रष्टाचाराला विटलेल्या जनतेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी आणखी काही दिवस कळ सोसावी लागणार आहे. राज्यात भाजप सरकारच्या राजवटीत २००३ साली लोकायुक्त विधेयक विधानसभेसमोर ठेवण्यात आले होते. पुढे कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात २००७ साली या विधेयकाला मंजुरी मिळाली. नंतर २००७ साली हे विधेयक राज्यपालांच्या मंजुरीने राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले होते. गेली अडीच वर्षे हे विधेयक अजूनही दिल्लीतच लटकत आहे.
आता या विधेयकाबाबत केंद्रीय कायदा व न्याय तसेच कार्मिक प्रशिक्षण मंत्रालयाने काही आक्षेप घेतले आहे व त्यात दुरुस्ती करण्याची मागणी राज्य सरकारला केली आहे. विधेयकाच्या कलम १९ नुसार लोकायुक्तांना अवमान अधिकार बहाल करण्यात आले आहेत. भारतीय घटनेच्या कलम २१५ व १२९ नुसार अवमानाचे अधिकार हे उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाला बहाल करण्यात आल्याने हे अधिकार लोकायुक्तांना बहाल करणे योग्य ठरणार नाही, अशी हरकत घेण्यात आली आहे.
लोकायुक्तांकडे सादर केलेले पुरावे हे गोपनीय असतील व ते कुणालाही देता येणार नाहीत, अशीही तरतूद या कायद्यात आहे. हा प्रकार माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन ठरत असल्याचेही यावेळी केंद्राने राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले आहे. कार्मिक व प्रशिक्षण संचालनालयाने आणखी एका गोष्टीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. लोकायुक्त व राज्य दक्षता आयोग यांची सांगड कशी घालणार, असा सवाल उपस्थित झाला होता. दरम्यान, गोव्यासारख्या छोट्या राज्यात भ्रष्टाचारप्रतिबंधासाठी केवळ एकच संस्था पुरेशी असल्याने लोकायुक्तांची नियुक्ती झाल्यानंतर राज्य दक्षता आयोग गुंडाळण्यावर सरकारचे एकमत झाले आहे. केंद्राने केलेल्या या सर्व सूचना राज्याने मान्य करण्याचे ठरवले आहे व त्यामुळे हे विधेयक परत मागवण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाल्याचीही खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, हे विधेयक परत मागवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत सदर निर्णय अपेक्षित असल्याचीही माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय राज्यपालांना कळवल्यानंतर राज्यपाल हे विधेयक राष्ट्रपती कार्यालयाकडून परत मागवतील. हे विधेयक परत आल्यानंतर राज्यपाल ते सभापतींकडे पाठवतील. सभापतींकडून तेकायदा खात्याकडे पाठवण्यात येईल. मग आवश्यक दुरुस्तीनंतर ते पुन्हा सभागृहासमोर मंजुरीसाठी येईल व ते पुन्हा राज्यपालांकरवी राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्याची संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे.
येत्या जुलैत विधानसभा अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याने लोकायुक्त दुरुस्ती विधेयक या अधिवेशन काळात मंजूर करायचे असेल तर ही प्रक्रिया आत्तापासूनच सुरू करावी लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. सरकार याबाबत कितपत गंभीर आहे हे याच प्रक्रियेवरून सिद्ध होणार आहे. लोकायुक्त विधेयकाला राष्ट्रपतींची मान्यता मिळाल्यानंतर राज्यात लोकायुक्त व उपलोकायुक्तांची नेमणूक करून स्वतंत्र कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी व प्रशासकीय भ्रष्टाचाराची सगळी प्रकरणे लोकायुक्तांसमोर येणार असून त्याबाबतची चौकशी व सजा सुनावण्याचे अधिकार लोकायुक्तांना असतील.

'रेप कॅपिटल' ही गोव्याची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न

नीळकंठ हळर्णकर यांनी स्वीकारला पर्यटन खात्याचा ताबा
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): वाढती गुन्हेगारी आणि बलात्काराचे प्रकार यामुळे गोवा हे "रेप कॅपिटल' असल्याची प्रतिमा जगात पसरत असल्याबद्दल अस्वस्थ असलेल्या नेत्यांपैकी नीळकंठ हळर्णकर यांना नुकतेच पर्यटन खाते मिळाल्याने ते गोव्याची ही प्रतिमा बदलण्याला प्राधान्य देतील, असे आज त्यांच्या खात्यातील पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले. गोवा हे पर्यटकांसाठी नेहमीच सुरक्षित व आकर्षणाचे स्थान राहील हा संदेश देश - विदेशांत पोहचवणे व राज्याची प्रतिमा उंचावणे हे आपल्यासमोरील सर्वांत पहिले उद्दिष्ट असेल, असे प्रतिपादन नवे पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आज केले. एका सामान्यातील सामान्य कुटुंबातून काबाडकष्ट करून आपण इथपर्यंत पोहचलो आहे व त्यामुळे आपल्याकडील खात्याचा उपयोग राज्यातील सामान्य जनतेला करून देणे ही आपली प्राथमिकता असेल, असेही यावेळी श्री. हळर्णकर म्हणाले.
नीळकंठ हळर्णकर यांनी आज सकाळी पर्वरी मंत्रालयात आपल्या दालनाचा ताबा घेतला. याप्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. सरकार ही नियमित प्रक्रिया असते व त्यामुळे माजी मंत्र्यांनी घेतलेले सगळेच निर्णय बदलणे व नव्याने निर्णय घेणे हे योग्य नाही. जे निर्णय राज्याच्या हिताचे असतील ते कायम राहतील व जे निर्णय राज्याच्या हितासाठी बदलावे लागतील त्यात अवश्य बदल करू, असे प्रांजळपणे त्यांनी मान्य केले. किनारी भागातील पर्यटकांची सुरक्षा व पर्यटन उद्योगासमोरील रिव्हर प्रिन्सेसचा अडसर दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. रेव्ह पार्टी किंवा अंमलीपदार्थ व्यवहार यांना आपला सक्त विरोध असेल पण हे प्रकार रोखणे ही गृह खात्याची जबाबदारी आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. आपण या खुर्चीवर बसलो म्हणजे लगेच चमत्कार होईल,अशी अपेक्षा कुणीही करू नये. आपल्यासमोर केवळ दीड वर्षांचा कालावधी आहे व त्यामुळे या दीड वर्षांत हाती घेण्यात येणाऱ्या कामांचे प्राधान्य ठरवावे लागेल,अशी माहितीही त्यांनी दिली. आपले श्रेष्ठी व मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खात्याचा कारभार हाकेन, अशी माहितीही त्यांनी दिली. पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना लवकरच करण्यात येणार असून संपूर्ण पर्यटन खात्याच्या कारभारात सुसूत्रता व व्यावसायिकता आणली जाईल, असेही ते म्हणाले.

पेडणे पोलिसांविरुद्ध तक्रारींचा तपास दक्षता खात्यातर्फे सुरू

- तथ्य आढळल्यास महासचांलकामार्फत चौकशी
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): पेडणे पोलिसांवर ड्रग व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करण्याचा आरोप करून दक्षता खात्याकडे दाखल झालेल्या तक्रारींचा तपास सुरू झाला आहे. या तक्रारी दक्षता खात्याच्या सचिवांकडे पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यात खरोखरच दखल घेण्यालायक गोष्ट असेल तर त्यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात येतील,अशी माहिती दक्षता खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी दिली.
पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई तसेच अन्य एक उपनिरीक्षक व दोन शिपाई हे हरमल येथे ड्रग व्यावसायिकांना संरक्षण देतात व त्यांच्याकडून हप्ते गोळा करतात, असा आरोप या लेखी तक्रारीत करण्यात आला आहे. एक स्थानिक व एक बिगरगोमंतकीय नागरिकाने यासंबंधी दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
दरम्यान, या तक्रारी कायद्याच्या दृष्टीने कितपत ग्राह्य मानता येतील, यासंबंधीचा निर्णय दक्षता खात्याचे सचिव घेणार आहेत. हे प्रकरण खरोखरच गंभीर दखल घेण्यालायक असेल तर त्याची चौकशी करण्यासाठी पोलिस महासंचालकांकडे पत्र पाठवण्यात येईल व त्यानंतरच या पोलिसांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येईल, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. कोणताही आधार किंवा पुरावा नसताना लेखी तक्रार करण्यात काहीही अर्थ नसतो. लेखी तक्रारीला आवश्यक पुराव्यांची साथ किंवा इतर आवश्यक पाठबळ असेल तर त्याची खरोखरच चौकशी करून दोषींवर कारवाई करणे शक्य असते,अशी माहितीही यावेळी देण्यात आली. दरम्यान, या तक्रारी व हरमल येथील "सनी' नामक पोलिस खबऱ्याच्या संशयास्पद मृत्यूचा काहीही संबंध नाही असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

औषधांचे 'गैरव्यवहार' धक्कादायक!

सतीश जुटेकर,
आल्त आके, मडगाव
ता. सासष्टी

...............
सध्या गोव्यात अनेक स्वरूपाची गुन्हेगारी प्रकरणे उघडकीस येत आहेत. चोरी, मारामारी, अमली पदार्थ, हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार वगैरे बऱ्याच घटनांमध्ये राजकारणी लोकांचाही सहभाग असल्याचे आढळून येत आहे. सीरियल किलर महानंद, ब्रिटिश युवती स्कार्लेटचा खून, मोन्सेरात पुत्राचे कथित बलात्काराच्या आरोपाचे प्रकरण, अताहा डूडू या ड्रग माफियांचे पोलिस आणि राजकारणी लोकांशी असलेले संबंध अन् नुकतेच बाहेर पडलेले वादग्रस्त मंत्री मिकी पाशेकोंचे नादिया मृत्युप्रकरण. रोजचे वर्तमानपत्र हातात घ्यावे तर क्षणभर आपण निसर्गरम्य शांत अशा गोव्यात आहोत की उत्तर प्रदेश, बिहारसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राज्यांत असा प्रश्न मनात उद्भवतो.
गोव्यामध्ये सध्या बरेच उ. प्र., बिहारी अन् इतर परप्रांतीय स्थायिक होऊ लागलेले आहेत. नुकतेच काही बिहारी व्यक्तींसंबंधी एक बातमी हाती गवसली.
काही महिन्यांपूर्वी उत्तर गोव्यातील किनारी भागातील फार्मसीवर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन विनाऔषधे विकण्याच्या कारणामुळे ड्रग कंट्रोलर्सनी कारवाई केली होती. प्रामुख्याने नशा करण्यासाठी अशा औषधांचा उपयोग केला जातो. झोपेच्या गोळ्या, अरप्राझोहॅमसारख्या अँटीडिप्रेसंंंट गोळ्या मॉर्फिन (अफूतील मुख्य आलकॉईड) वगैरे विविध प्रकारच्या औषधांचा किनारी भागात टुरिस्ट सीझनमध्ये बेसुमार खप होत असतो. ही औषधे पोस्टाने किंवा कुरिअरनेही नियमित विदेशी पाठविण्याचे प्रकारही उघडकीस आलेले आहेत.
औषध विक्रीक्षेत्राशी संबंध असल्यामुळे असे आढळून आले आहे की औषध विक्रेते विविध औषध कंपन्यांचे विक्री प्रतिनिधी यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने औषधे मोठ्या प्रमाणात परराज्यांमध्ये विक्रीसाठी पाठविली जातात. त्याचबरोबर बऱ्याच औषध कंपन्या आपल्या प्रतिनिधींना डॉक्टर किंवा औषध दुकानदार यांना वाटण्यांसाठी गिफ्टस, फ्री सॅम्पलस इत्यादी देत असतात पण यांची देखील विक्री केली जाते. या सर्व व्यवहारांसाठी या उ.प्र., बिहारी एजंटसची एक साखळीच कार्यरत असते. आज गोव्यामध्ये कामासाठी तरुण विक्री प्रतिनिधींची मोठी वानवा आहे. गोवेकर तरुण हे काम करण्यासाठी नाखूश असतात, त्यामुळे औषध कंपन्या, उ.प्र., बिहार, कर्नाटक वगैरे परराज्यातील तरुणांना आयात करतात. तेव्हा हे एजंटस् पणजी (गोवा मेडिकल कॉलेज), मडगाव, म्हापसा अशा निवडक ठिकाणी जेथे ठोक औषध विके्रते, विक्री प्रतिनिधी यांचा वावर असतो, तेथे आपल्या बऱ्याच कंपन्यांचे फ्री सॅम्पल्स् यांमध्ये अँटिबायोटिक्स, इंजक्शनस, टॉनिक, खोकल्यांचे औषध, विविध आजारांवरील गोळ्या, औषधे त्यांच्या बाजारातील किमतीपेक्षा अल्प दरांमध्ये रोख खरेदी केले जातात. यातून त्या विक्री प्रतिनिधी या व्यवहारातून चार ते पाच हजार रुपयाहून अधिक अतिरिक्त पैसा मिळू शकतो. याची एकदा चटक लागली की तो प्रतिनिधी पुन्हा असा व्यवहार करण्यास राजी होतो. अशाप्रकारे सात-आठ जणांकडून खरेदी केलेली औषधे नंतर आपल्या इच्छित ठिकाणी ट्रान्सपोर्टने पाठविली जातात. उ.प्र., बिहार वा इतर मागासलेल्या राज्यांमध्ये हीच औषधे ठराविक डॉक्टर, दुकानदार यांना चढ्या भावात विकली जातात. आग्रा, दिल्ली येथील दवा बाजार तर या व्यवहारांसाठी कुप्रसिद्धच आहेत अशीही माहिती उघडकीस आलेली आहे. जेथून ही औषधे पार देशाबाहेर देखील पाठविण्यात येत असण्याची शक्यता आहे. असा हा कोट्यवधी रुपयांचा व्यवहार असून यामध्ये एजंट्स अन् व्यापाऱ्यांची एक साखळीच कार्यरत आहे. हा एक छुपा औषध स्मगलिंगचा घातक व्यवसाय असून गेली काही वर्षे हा व्यवहार गोव्यासारख्या छोट्या राज्यात देखील बिनदिक्कत चालू आहे. बऱ्याच वेळा अशा प्रकारे गोळा केलेला औषधांचा साठा हा एखाद्या ट्रस्ट किंवा धर्मादाय संस्थेसाठी पाठविण्यात येत असल्याचे भासवून ड्रग कंट्रोलर्सच्या डोळ्यांत धूळ फेकण्यात येत असते. काही कंपन्या हॉस्पिटल किंवा मोठ्या इस्पितळांना पुरवठा करण्यासाठी वेगळे डीलर नेमतात. त्यांना या कंपन्या कमी दरामध्ये औषधांचा पुरवठा करतात, पण हॉस्पिटलांना पुरवल्याची खोटी बिले दाखवून ही औषधे पुन्हा एजंट मंडळ चढ्या भावामध्ये बाजारात ग्राहकांना विकतात. याचप्रमाणे डॉक्टर्सना आपल्या कंपनीची औषधे लिहिण्यासाठी गिफ्टस, कॉक्टेल पार्टी, विदेश प्रवास, कमिशन अशीही आमिषे दाखविण्याच्या प्रमाणात बरीच वाढ होत आहे.
गोवा राज्यांतील काही डॉक्टर्स, फार्मसीज, स्टॉकिस्ट या क्षेत्रात कार्यरत असणारे पॅरामेडिकल स्टाफ जसे नर्सेस, औषधांची ऑर्डर्स देणारे, त्याशिवाय विविध कंपन्यांचे औषध विक्री प्रतिनिधी, त्यांचे मॅनेजर्स अशा सर्वांनाच याबद्दल थोड्याबहुत प्रमाणात माहिती आहे. पण गोवा राज्यातील ड्रग कंट्रोलर्स, ड्रग इन्स्पेक्टर याचा सखोल शोध लावतील का ? हा प्रश्न राज्यातील अन्न आणि औषधे प्रशासन यांच्याही अखत्यारीत येतो.

Thursday, 17 June, 2010

'कॅल्शियम कार्बाइड' चा वापर वास्कोत तीन गोदामांवर छाप्यात बारा टन 'हानिकारक' आंबे जप्त

वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): वास्कोच्या बाजारात विकण्यात येत असलेले आंबे पिकवण्याकरिता त्यात "कॅल्शियम कार्बाइड' रसायनाची पावडर वापरण्यात येत असल्याचे उघडकीस येताच आज खारीवाडा येथील तीन गोदामांवर छापे टाकून सुमारे बारा टन आंबे जप्त करण्यात आले. मुरगावचे उपजिल्हाधिकारी लेविन्सन मार्टिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली सदर छापा टाकण्यात आला असता जप्त करण्यात आलेल्या आंब्यांमध्ये रसायनाचा वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले.
या रसायनाचा वापर करण्यात येत असल्यामुळे कर्करोग, दमा आदी आजार होणे शक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे असून, संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
वास्को शहरात विकण्यात येत असलेले नीलम आंबे पिकवण्याकरिता त्यात जिवाला हानिकारक असलेल्या रसायनाचा वापर करून ते पिकवण्यात येत असल्याची माहिती मुरगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी आज सकाळी याबाबत कारवाई करून अशा प्रकारचे सुमारे दहा टन आंबे जप्त केले. आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उपजिल्हाधिकारी श्री.लेविन्सन मार्टिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिस पथक, मुरगाव मामलेदार, आरोग्य खात्याचे विकास कुवेलकर इत्यादींनी खारीवाडा येथे असलेले महम्मद नारंगी, अब्दुल वाहब अशा ठोक व्यापाऱ्यांच्या तसेच हजरत माकबोलिया फ्रूटस् नावाच्या एका गोदामावर छापे मारले असता त्यांना येथे सापडलेल्या शेकडो आंब्यांना पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड' नावाचे रसायन असलेली पावडर वापरण्यात येत असल्याचे दिसून येताच त्यांनी अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती देऊन नंतर त्यांच्या उपस्थितीत सदर गोष्टीची चाचणी घेतली. सदर चाचणीच्या दरम्यान खरोखरच या रसायनाचा वापर होत असल्याचे सिद्ध झाले असून रसायनाची पावडर कागदाच्या पुडीत बांधून (मोठ्या संख्येने) आंब्याच्या मधोमध ठेवण्यात येत असल्याचे उघड झाले. यानंतर कारवाईला सुरुवात करून १० टन आंबे तसेच काही मोसंब्या जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, या प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे विकास कुवेलकर यांच्याशी संपर्क साधला असता वास्को शहरात विकण्यात येत असलेले नीलम आंबे २४ तासांच्या आत पिकवण्याकरिता रसायन पावडर वापरण्यात येत असल्याचे कळताच आम्ही आज खारीवाडा येथील तीन गोदामांवर छापे टाकले, त्यावेळी सत्य उघडकीस आले, असे ते म्हणाले.
हे रसायन अतिशय धोकादायक असल्याची माहिती कुवेलकर यांनी दिली. सदर रसायन आंब्यात वापरण्यासाठी वेगवेगळ्या "हार्डवेअर' दुकानातून खरेदी केले जाते, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे, असे कुवेलकर म्हणाले. वास्कोबरोबरच गोव्याच्या अन्य काही भागांमध्ये आंबे व इतर फळे पिकवण्याकरिता या रसायनाचा वापर होत असल्याची माहिती प्राप्त झाल्याचे कुवेलकर यांनी सांगितले. आत्तापर्यंत महम्मद नारंगी, अब्दुल वाहब व रियाज अहमद यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी देऊन अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्या आणखी लोकांनाही त्वरित ताब्यात घेण्यात येईल, असे ते म्हणाले. हे आरोपी सध्या अन्न व औषध खात्याच्या ताब्यात असून, उद्या त्यांना न्यायालयात रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे.
आंब्याबरोबरच इतर काही फळांमध्येही या रसायनांचा वापर करण्यात येत असल्याचे समजल्याचे कुवेलकर व राजाराम पाटील यांनी सांगितले. याबाबतही कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आज सकाळी प्रथम दोन गोदामावर छापे मारण्यात आल्यानंतर तिसऱ्या गोदामावर सदर पथक पोचले असता येथे कोणीही नसल्याचे आढळून आले, मात्र गोदामाचा बाजूचा दरवाजा उघडा होता. छापा पडणार असल्याचा सुगावा लागलेल्यांनी तेथून पळ काढल्याचा अंदाज आहे. े उपजिल्हाधिकारी श्री. मार्टिन्स यांनी आज छापे टाकले, त्यावेळी मामलेदार राजेश आजगावकर, वास्को पोलिस उपअधीक्षक महेश गावकर, पोलीस निरीक्षक ब्राज मिनेझीस, अन्न व औषध विभागाचे निरीक्षक राजीव कोरडे, आरोग्य खात्याचे विकास कुवेलकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

वीज खाते बनले मौत का सौदागर!

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): वीज खात्याच्या हलगर्जीपणामुळे मुक्या जनावरांबरोबर आता मनुष्यांचेही हकनाक बळी जाण्याचे प्रकार पेडणे तालुक्यात वाढीस लागले आहेत. या घटनांमुळे आता वीज खात्याची तुलना "मौत का सौदागर' अशीच होऊ लागल्याचे पेडणेवासीयांत बोलते जात आहे. मांद्रे या गावात सावंतवाड्यावरील सौ. सविता ऊर्फ प्रतीक्षा पांडुरंग सावंत या महिलेचा हकनाक बळी गेला. नुकसान भरपाईच्या नावाने काही लाख रुपयांची घोषणा करून व बळी गेलेल्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सरकार जनतेच्या जीविताचा जाहीर लिलाव करू पाहते आहे का, असा खडा सवाल सावंतवाड्यावरील ग्रामस्थांनी केला आहे.
वीज पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांसाठी खात्याकडून वीज बिलांमार्फत प्रत्येक ग्राहकाकडून अतिरिक्त कर आकारला जातो. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा कर लागू केल्याने कोट्यवधी रुपयांचा हा पैसा सरकारकडून केवळ वीज पुरवठा सुविधा उभारण्यासाठी व वीज पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खर्च केला जाईल, अशीही घोषणा केली होती. पेडणे तालुक्यातील बहुतांश भागात मात्र कित्येक वर्षांपूर्वीच्या वाहिन्या व वीज खांब अजूनही तिथेच आहेत. ते बदलण्यासाठी इथल्या ग्रामस्थांच्या बळीची वाट तर सरकार पाहत नाही ना, असा सवाल मांद्रे सिटीजन फोरमतर्फे करण्यात आला. यापूर्वी अशाच प्रकारे मोरजी येथे पिता- पुत्राचा नाहक बळी गेला होता. या घटनेच्या स्मृती ताज्या असतानाच दोन लहान मुलांची आई असलेल्या सौ.सविता हिचा बळी गेला. राज्यात मान्सून सुरू झाल्याने वीज खात्याची जबाबदारी वाढते हे ठाऊक असूनही वीजमंत्री आलेक्स सिकेरा हे मात्र युरोप दौऱ्यात व्यस्त आहेत. वीज खात्यातील बहुतांश वरिष्ठ पदांवरील अधिकारी हे राजकीय आश्रयाने सेवावाढीवर आहेत व त्यामुळे त्यांच्याकडून केवळ वीजमंत्र्यांची हुजरेगिरी सुरू असून वीज खात्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी कुणीच प्रयत्न करीत नाही, अशीही संतप्त भावना वीज खात्यातील काही कर्मचाऱ्यांचीही बनली आहे. ग्राहकांकडून जमा करण्यात आलेला पैसा केवळ आपल्या ठरावीक मतदारसंघातच खर्च करून तिथे भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याची कंत्राटे दिली आहेत तर अन्य ठिकाणी मात्र विजेच्या सुविधांचा बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात आणखीनही बळींचे खापर सरकारच्या माथी फुटण्याचीच जास्त शक्यता आहे.
गावातील विजेच्या उपकरणांच्या या परिस्थितीबाबत स्थानिक पंचायतीकडूनही खात्याकडे पाठपुरावा केला जात नाही, याबाबतही काही लोकांनी नाराजी व्यक्त केली. मांद्रेचे आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गेल्या विधानसभा अधिवेशनात पेडणे तालुक्यातील व विशेषतः मांद्रे मतदारसंघातील वीज वाहिन्या व खांबांच्या जीर्ण अवस्थेबाबत विषय उपस्थित केला असता त्यांना मंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळाले होते पण खाते याप्रकरणी अजिबात गंभीर नसल्यानेच हे प्रकार यापुढे बंद होतीलच याबाबत खात्रीपूर्वक सांगणे कठीण आहे,अशी प्रतिक्रिया प्रा.पार्सेकर यांनी दिली.
----------------------------------------------------------
मंत्री फिरकलेच नाहीत!
कुठे तरी गणपतीची मूर्ती सापडल्याची वार्ता समजताच मुख्यमंत्री दिगंबर कामत हे सरकारचा सर्व कारभार बाजूला टाकून तिथे धाव घेतात, पण आपल्या सरकारच्या निष्क्रियतेमुळे एका महिलेचा जीव गेला तर तिथे भेट देण्याची गरज त्यांना वाटत नाही, हे जनतेचे दुर्दैव आहे, अशी कडवट प्रतिक्रिया येथील काही ग्रामस्थांनी व्यक्त केली. कामत यांच्या अजोड भक्तीपुढे देवांनीही आता जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ त्यांची खुर्ची वाचवण्यासाठीच आपली ताकद पणाला तर लावली नाही ना, अशीही भावना काही लोकांनी प्रकट केली.

गुरुदास पेडणेकर यांचे निधन

पणजी, दि.१६ (प्रतिनिधी): ज्येष्ठ पत्रकार गुरूदास पेडणेकर यांचे आज सकाळी सुमारे पावणे आठ वाजता ताळगाव येथील त्यांच्या राहत्या घरात अल्प आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. दै. "नवप्रभा'त त्यांनी अनेक वर्षे मुख्य प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. १९९१ साली त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर काही काळ त्यांनी मुक्त पत्रकारिता केली.
विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी शेवटपर्यंत लिखाण केले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असा परिवार आहे. आज संध्याकाळी ५.३० वाजता सांतिइनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोवा श्रमिक पत्रकार संघटनेचे (गुज) ते सदस्य होते.

'पंचवाडी खाण प्रकल्पाची आपणास माहितीच नाही'

मुख्यमंत्र्यांच्या अजब पवित्र्याने पंचवाडीवासीय चक्रावले
पणजी, दि.१६ (प्रतिनिधी): पंचवाडीतील नियोजित खनिज प्रकल्पाबाबत आपल्याला कसलीच माहिती नाही, असा पवित्रा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतल्याने पंचवाडीवासीय आज अक्षरक्षः चक्रावूनच गेले. पंचवाडीतील नियोजित खनिज प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी पंचवाडी बचाव समितीचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेण्यासाठी गेले असता कामत यांनी हे उद्गार काढले. पंचवाडीवासीयांना नको असेल तर अशा प्रकारचा प्रकल्प गावात अजिबात होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिल्याने समितीने समाधान व्यक्त केले आहे.
पंचवाडी बचाव समितीतर्फे आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी भेट घेण्यात आली. समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्टा, नाझारेथ गुदिन्हो तसेच पंचवाडीचे धर्मगुरू फादर लॉरेन्स रॉड्रिगीस व शिरोड्याचे आमदार महादेव नाईक आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. या शिष्टमंडळातर्फे पहिल्यांदाच पंचवाडी गावात विजर खाजन येथे सेझा गोवा कंपनीच्या नियोजित खनिज प्रकल्पाचा विषय उपस्थित झाला. यावेळी कामत यांनी या प्रकल्पाबाबत पूर्णपणे अनभिज्ञता व्यक्त करून शिष्टमंडळालाच पेचात टाकले. खाण मंत्री असूनही या प्रकल्पाची माहिती कामत यांना नसावी ही गोष्ट न पटणारीच होती. त्यामुळे समितीच्या सदस्यांनी या प्रकल्पाची थोडक्यात माहिती कामत यांना दिली. सेझा गोवा कंपनीच्या या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात शेतजमीन व जैविक समृद्धीने संपन्न असलेला भाग नष्ट होणार आहे. खुद्द सरकारकडूनच सार्वजनिक हिताचे कारण पुढे करून या प्रकल्पासाठी भूसंपादन केल्याचीही गोष्ट त्यांच्या नजरेस आणून दिली. त्यावर, स्थानिकांना नको असल्यास हा प्रकल्प अजिबात होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, या शिष्टमंडळात सामील झालेले व या आंदोलनामागे ठामपणे उभे राहिलेले पंचवाडीचे धर्मगुरू फादर लॉरेन्स रॉड्रिगीस यांनी मुख्यमंत्री कामत यांना पंचवाडी गावात भेट देऊन ही जागा पाहण्याची विनंती केली व कामत यांनी ती मान्य करून आपण पंचवाडीला भेट देण्याचे मान्य केले.
पंचवाडी हा गाव नैसर्गिक संपत्तीने नटला आहे. शेती व बागायती हा इथल्या भूमिपुत्रांचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. या गावातील बहुतांश लोक हे अनुसूचित जमातीचे घटक असून इथली नैसर्गिक संपत्ती नष्ट झाल्यास या लोकांवर देशोधडीला लागण्याची वेळ ओढवेल, अशी माहिती आमदार महादेव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
काही राजकीय नेते व कंपनीचे अधिकारी गावातील लोकांना विविध आमिषे दाखवून त्यांच्यात फूट घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक लोकप्रतिनिधी या नात्याने सत्याची कास धरून पंचवाडी गावचे हित जपणे व या लोकांना या लढ्यात पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य ठरते. त्यामुळे आपला या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याचे आमदार नाईक म्हणाले.
पंचवाडी गावातील शेतकऱ्यांसाठी म्हैसाळ धरणाची निर्मिती करण्यात आली. असे असताना केवळ एका खाजगी खाण कंपनीच्या स्वार्थासाठी या गावचा बळी देण्याचा प्रयत्न केला तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा क्रिस्टो डिकॉस्टा व नाझारेश गुदिन्हो यांनी दिला. पंचवाडीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावू, असे प्रतिपादन त्यांनी केले.
दरम्यान, या नियोजित प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट होणार असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प हानिकारक ठरणार असल्याचेही सांगण्यात आले.

मडगाव स्फोटांत 'सनातन'चा प्रत्यक्ष सहभाग नाही : 'एनआयए'चा युक्तीवाद

मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी): दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात झालेल्या स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने सादर केलेल्या आरोपपत्रासंदर्भात आरोप निश्चित करण्यापूर्वीचे युक्तीवाद आज येथील मुख्य सत्र न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांच्यासमोर सुरु झाले असता खास सरकारी वकिलांनी या स्फोटाशी सनातन संस्थेचा प्रत्यक्ष सहभाग नाही या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
हे युक्तीवाद परवा शुक्रवारी पुढे चालू रहातील व त्यानंतर सध्या या संस्थेच्या ताब्यात असलेले सनातन संस्थेचे साधक विनय तळेकर, विनायक पाटील व दिलीप माणगावकर यांनी आपली जामिनावर सुटका व्हावी म्हणून केलेल्या अर्जावर न्यायाधीश निवाडा देतील. गेल्या आठवड्यात व्हावयाची ही सुनावणी आजपर्यंत पुढे ढकलण्यात आली हेाती.
आज सकाळी खास सरकारी वकिल ए. फारिया यांनी आपले युक्तिवाद सुरु करताना नरकासूर स्पर्धेला असलेल्या विरोधातून मालगोंडा पाटील व योगेश नाईक हे या कटातील मुख्य संशयित होते, त्यांना रुद्रा पाटील, सारंग अंकलकर व इतरांनी मदत केली,असे सांगितले. १६ ऑक्टोबर २००९ च्या या कटात सनातन संस्थेचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी तिचे साधक गुंतलेले आहेत,असे त्यांनी यावेळी प्रतिपादिले.
राष्ट्रीय तपास संस्थेच्यावतीने त्यांनी यापूर्वी गेल्या १७ मे रोजी ३० पानी आरोपपत्र दाखल केलेले असून त्याला सुमारे चार हजार कागदपत्र आधारादाखल जोडलेले आहेत. या प्रकरणी २५० साक्षीदार नोंदले गेलेले आहेत.
ऍड. फारीया यांचे युक्तीवाद आज अपूर्ण राहिले, नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण विनय तळेकर व अन्य दोघांनी जामिनासाठी केलेल्या अर्जाला विरोध केल्याचे सांगितले. तर बचाव पक्षाचे वकिल वकिल संजीव पुनाळेकर यांनी सनातन साधकांना या प्रकरणात मुद्दाम गोवण्यात आल्याचा आरोप केला. त्यापैकी कोणीही फरारी नव्हते तर प्रसारमाध्ममांनी त्यांना लक्ष्य करण्याची मोहीम चालविल्याने ते पुढे येत नव्हते, असे सांगितले.
राष्ट्रीय तपास संस्थेने या प्रकरणी गेल्या १७ मे रोजी सत्र न्यायालयात ११ जणांविरुध्द आरोपपत्र गुदरलेले आहे. त्यातील मालगोंडा पाटील व योगेश नाईक स्फोटात ठार झालेले आहेत तर धनंजय अष्टेकर, जयप्रकाश अण्णा रुद्रा पाटील, सारंग अंकलकर व प्रशांत जुवेकर अजून फरारी आहेत. पाचवा फरारी प्रशांत अष्टेकर यापूर्वीच न्यायालयाला शरण आला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. सुरूवातीस हे प्रकरण प्रथम पोलिसांनी नंतर गुन्हा अन्वेषण विभागाने व त्यानंतर खास तपास पथकाने तपास केला होेता. आता केंद्राच्या निर्णयानुसार ते प्रकरण राष्ट्रीय तपास संस्था हाताळत आहे.

बरेच आढेवेढे घेतल्यावर मंत्री हळर्णकर यांच्याकडे पाशेकोंचीच सर्व खाती

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): शेवटच्या क्षणापर्यंत आढेवेढे घेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राष्ट्रवादीचे नवनियुक्त मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना महत्त्वाच्या पर्यटन खात्यासह बंदर कप्तान, गृह निर्माण आदी माजीमंत्री मिकी पाशेको यांच्याकडील सर्व पदे बहाल करून हा विषय अखेर निकालात काढला. गृह निर्माण महामंडळाचे अध्यक्षपदही हळर्णकर यांच्याचकडे ठेवण्यात आले. यासंबंधीची अधिसूचना रात्री उशिरा जारी करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
नादिया तोरादो मृत्युप्रकरणी मुख्य संशयित म्हणून घोषित झालेले मिकी पाशेको यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने त्याजागी राष्ट्रवादीचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांची वर्णी लागली होती. श्री. हळर्णकर यांना ८ जून रोजी शपथ देऊनही अद्याप खाती बहाल करण्यात आली नसल्याने काही प्रमाणात सरकाराअंतर्गत धुसफूस सुरू झाली होती. मुळातच मिकी यांच्याकडील पर्यटन खात्यावर मुख्यमंत्री कामत यांच्यासह अनेकांची नजर होती. हे खाते प्राप्त करून श्री. हळर्णकर यांना अन्य कुठले तरी पद देण्याचीही चाचपणी कामत यांनी केल्याची खबर आहे. शेवटी खातेबदलाचा हा प्रयोग आपल्याच अंगलट येईल, याची खात्री पटल्यामुळे त्यांनी पाशेको यांच्याकडील सगळी खाती नीळकंठ हळर्णकर यांच्या पदरात टाकून दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशांचे पालन केले.
हळर्णकर यांना खातेवाटप करताना महामंडळाच्या अध्यक्षपदांबाबत काही फेरफार करण्याचाही निर्णय सरकार दरबारी झाल्याचे ऐकिवात येते. नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद होते. अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे हे पद कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांना देण्याचे ठरले आहे. रेजिनाल्ड हे कदंब महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असून हे पद वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांचे बंधू तथा प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांना मिळण्याची शक्यता आहे. वाहतूक खाते व कदंब महामंडळ यांच्यावर ही ढवळीकर बंधूंकडे येणार असल्याने त्याचा कितपत फायदा महामंडळाला होतो हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
या महामंडळ वाटपात मुख्यमंत्र्यांनी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संकल्प आमोणकर यांचीही सोय लावली आहे. आमोणकर यांच्याकडे गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात येणार आहे. यापूर्वी हे पद माजी युवाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडेही होते. आमोणकर यांना गृह निर्माण महामंडळाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते; पण त्यास हळर्णकर यांनी हरकत घेतल्याने अखेर फलोत्पादनावरच समाधान मानणे युवा कॉंग्रेससाठी अनिवार्य ठरले.
--------------------------------------------------------
पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त!
माजी मंत्री मिकी पाशेको यांनी नियुक्त केलेल्या पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या महामंडळाचे अध्यक्षपद मात्र कुडचडेचे आमदार श्याम सातार्डेकर यांच्याकडेच राहणार आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्याने लिंडन मोंतेरो यांच्याकडील उपाध्यक्षपद रद्द झाले आहे. आता या पदावर राष्ट्रवादीच्या अन्य एका नेत्याची नियुक्ती होईल, अशी माहिती हाती आली आहे. या पदासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत जोरदार चढाओढ असल्याचेही सांगितले जात आहे.

Wednesday, 16 June, 2010

जिवंत वाहिन्या कोसळून मांद्रेत महिला मृत्युमुखी

वीज खात्याच्या बेपर्वाईचा कळस
पेडणे, दि. १५ (प्रतिनिधी): वीज खात्याच्या हलगर्जीपणामुळे जीर्णावस्थेतील दोन जिवंत वीजवाहिन्या कोसळून सावंतवाडा मांद्रे येथील सौ. सविता उर्फ प्रतीक्षा पांडुरंग सावंत (वय ३३) या विवाहितेला आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास
आपला जीव गमवावा लागला.
वीज खात्याच्या हलगर्जीपणाचा हा जणू कळसच ठरला आहे. गेल्या वर्षी गेल्या वर्षी मोरजी येथे याच प्रकारे जिवंत वीजवाहिन्या कोसळून पिता-पुत्राचा दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर ही दुसरी गंभीर घटना घडली आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी घातलेल्या वीजवाहिन्या अत्यंत जुनाट झाल्या होत्या. ठिकठिकाणी त्या जोडण्यात आल्या आहेत.
सावंतवाडा येथील जीर्ण वीजवाहिन्या बदलाव्यात म्हणून कित्येक वर्षांपासून लोक मागणी करत आहेत; तथापि, आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. याच बेपर्वाईचाच बळी ठरल्या त्या सविता सावंत. लोकांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारींचे कागदसुद्धा असेच जीर्ण झाले आहेत.
तब्ब्ल पाच तासांनी मृतदेह हलवला
वीज खात्याच्या या भोंगळ कारभारामुळे खवळलेल्या नागरिकांनी जोपर्यंत मंत्री, वीज अभियंते यांनी येथे येऊन ठोस आश्वासन देईपर्यंत सविता यांचा मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका घेतली. पहाटे ५.३० वा. सविता मरण पावली व तिचा मृतदेह सकाळी १० वाजता हलवण्यात आला. सविता ही पहाटे घराच्या बाजूलाच आपल्या दैनदिन कामासाठी पहाटे ५.३० वाजता गेली असता तेथे दोन जिवंत वीजवाहिन्या तुटून विहीरीच्या बाजूला पडल्या होत्या. त्याचा तिला स्पर्श झाला. एका वीज वाहिनीने तर तिच्या शरीरालाच विळखा घातला होता.
त्या धक्क्याने सविता एवढ्या मोठ्याने किंचाळली की, सारा वाडाच जागा झाला. तिचे पती पांडुंरग धावतच घटनास्थळी गेले आणि तिला पकडणार तेव्हा जवळच्या लोकांनी त्यांना खेचून त्वरित बाजूला नेले. अन्यथा भयंकर दुर्घटना घडली असती.
या घटनेची माहिती तातडीने पेडणे पोलिसांना देण्यात आली. मात्र ते दोन तासांनी तेथे पोहोचले. स्थानिक वीज कर्मचाऱ्यांचा तर पत्ताच नव्हता. तब्बल तीन तासांनी वीज अभियंता श्री. शिरूर, म्हापशाचे अभियंते उल्हास केरकर घटनास्थळी हजर झाले. त्यापूर्वी संतप्त जमावाने श्री. म्हापसेकर या वीज हेल्परला मारहाण केली. एवढेच नव्हे तर तेथील संतप्त जमावाने वीज अभियंते व पोलिसांनाही फैलावर घेतले. वीज कर्मचारी मांद्रे विभागात ग्राहकांचा फोनही घेत नाही. ते स्कूटरने येतात व रस्त्यावरून वीजवाहिन्या बघतात. गाडीवरून उतरण्याची तसदीही घेत नाहीत. पूर्वीचे लाईनमन वेळेवर यायचे व काम करायचे. आता लाईनमनच नव्हे तर केवळ हेल्परच असतात अशी लोकांची तक्रार आहे.
संतप्त नागरिकांनी जोपर्यंत अभियंते ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही. किमान दहा लाख रुपये नुकसानी किंवा दोन लाख नुकसान भरपाई व तिच्या नवऱ्याला शासकीय नोकरीत सामावून घ्या अशा मागण्या केल्या. मात्र कोणत्याच मागणीवर अभियंत्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले नाही.
मिलिंद देसाईंना आणा
मांद्रे वीज विभागात मांद्रे येथील कर्तव्यदक्ष कनिष्ठ अभियंते मिलिंद देसाई यांना या भागात त्वरित आणा अशी मागणी लोकांनी केली आहे. तुटलेल्या वीजवाहिन्यांवर कोणतेही झाड किंवा फांदी पडली नव्हती. आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले की, वीज खात्याच्या हलगर्जीपणामुळे पूर्वी जनावरे मरायची. आता माणसे वीज वाहिन्याला स्पर्श होऊन मरू लागतात. तरीही वीजमंत्र्यांना जाग येत नाही. आपण या घटनेचा वीज खात्याच्या तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत. सदर कुटुंबाला कमाल शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
वीज अभियंता शिरूर यांनी सावंतवाडा मांद्रेे येथील ज्या जीर्ण वीजवाहिन्या तातडीने बदलण्याचे आश्वासन देताना आजपासून कामाला सुरुवात करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, घटनास्थळी कायदा सुव्यस्था बिघडू नये म्हणून पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक दत्ताराम राऊत आपल्या फौजफाट्यासह हजर होते.
सरपंच महेश कोनाडकर, पंच राघोबा गावडे, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीधर मांजरेकर, देऊ सावंत, नामदेव सावंत, आबा सावंत आदींनी सावंत कुटुंबीयांचे सांत्वन केले. पाच तासांनंतर मृतदेह बांबोळी येथे चिकित्सेसाठी पाठवण्यात आला.
-------------------------------------------------------
'आई आता कधीच परत येणार नाही'
एक मुलगा व एक मुलगी या दोन दोन छकुल्यांना पोरके करून सविता पांडुरंग सावंत देवाघरी गेल्या. "आता आपली आई कधीच परत येणार नाही,' हे या चिमुकल्यांना कोण सांगणार? त्यांच्या कुटुंबावर आणि या परिसरावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. सावंतवाड्यात तर सविताचा असा हकनाक मृत्यू झाल्याचे वृत्त कानी पडताच अनेक महिलांनी हंबरडा फोडला.

स्मृती इराणी भाजपच्या महिला शाखा अध्यक्ष

नवी दिल्ली, दि. १५ : "क्योंकी सास भी...' या अत्यंत गाजलेल्या मालिकेमुळे जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या अभिनेत्री तथा राजकीय नेत्या सौ. स्मृती इराणी यांनी निवड भारती जनता पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांचे सुपुत्र तथा खासदार अनुराग ठाकूर यांची नियुक्ती भाजपच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे भरगच्च पत्रपरिषदेत याविषयीच्या घोषणा केल्या.
वीस सदस्यीय केंद्रीय निवडणूक समिती, पाच सदस्यांची शिस्तपालन समिती आणि अल्पसंख्याक, किसान, अनुसूचित जाती व जमाती या पक्षातील अन्य विभागांचे प्रमुख या नावांच्या घोषणाही श्री. गडकरी यांनी केल्या. सौ. इराणी यांनी आपण पक्षकार्यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन आपल्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे अनुराग ठाकूर यांनीही हिमाचल प्रदेशात विकासकामांचा धडाका लावून आदर्शवत काम केले आहे. त्यांनी सांगितले की, पक्षाच्या युवा शाखेत नवचैतन्य आणण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत.

तोतया 'सीआयडी'ना साथ 'तोतया' पत्रकाराची!

टोळीच्या कारवायांचा पर्दाफाश
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधिकारी असल्याचे सांगून गोव्यातील लोकांना लुटणाऱ्या दोन तोतयांना गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या दोन आठवड्यांपूर्वी अटक केली असतानाच आता या टोळीचा सूत्रधार म्हणून वावरत असलेल्या एका तोतया पत्रकारालाही अटक करून पोलिसांनी या टोळीचाच पर्दाफाश केला आहे.
आपण एका राष्ट्रीय वृत्तपत्राचे पत्रकार आहोत असे सांगून अनेकांशी संबंध जोडणे व तोतया केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांकरवी त्यांना गंडवणे असाच धंदा या टोळीचा होता, अशीही माहिती मिळाली आहे. तोतया अधिकाऱ्यांच्या चौकशीत पोलिसांना या तोतया पत्रकाराची माहिती मिळाली व त्यानुसार आज संध्याकाळी पोलिसांनी शापोरा येथे सदर तोतया पत्रकाराच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. सदर तोतया पत्रकाराचे नाव उमेश सातार्डेकर असल्याची माहितीही पोलिस सूत्रांनी दिली असून तो स्थानिक आहे, अशीही खबर मिळाली आहे. दरम्यान, गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या दोन आठवड्यांपूर्वी तोतया अधिकाऱ्यांना म्हापसा येथे सापळा रचून पकडले होते व त्यावेळी हा तोतया पत्रकार त्यावेळी तिथे हजर होता, असे पोलिसांच्या आता लक्षात आले आहे.
मोहमद शकील व हित्तगिरी हे सध्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या ताब्यात असून ते दोघेही कोल्हापूर इचलकरंजी येथे राहणारे आहेत. या छाप्यात पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त, उपनिरीक्षक निनाद देऊलकर आदींचा समावेश होता.

नगरगावातील महिलांची पुरवठा खात्यावर धडक

'एपीएल' कार्डधारकांना फक्त दीड किलो तांदूळ
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या "आम आदमी' च्या राजवटीत सामान्य जनता आता अन्नालाही मोताद झाली आहे. दारिद्र्‌यरेषेवरील रेशनकार्डधारकांना ("एपीएल' - अबाव पॉवर्टी लाईन) प्रति रेशनकार्ड दहा किलो तांदूळ देण्याची तरतूद असतानाही केवळ दीड किलो तांदूळ देऊन त्यांची परवड सुरू असल्याची लेखी तक्रार नगरगाव पंचायत क्षेत्रातील महिलांनी नागरी पुरवठा संचालकांकडे केली आहे.
सत्तरी तालुक्यातील नगरगाव पंचायत क्षेत्रातील महिलांच्या एका शिष्टमंडळाने आज नागरी पुरवठा संचालक श्री. पिळर्णकर यांची भेट घेतली. नगरगाव पंचायतीत "एपीएल' कार्डधारकांना केवळ दीड किलो तांदूळ मिळतात. याप्रकरणी इथल्या स्वस्त धान्य दुकानदारांना जाब विचारला तर कोटा पोहोचला नाही, असे कारण सांगून लोकांना परत पाठवले जाते, अशी तक्रार या महिलांनी केली आहे. तेथील ग्रामस्थ "एपीएल' गटात जरी असले तरी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्यामुळे दीड किलो तांदूळ हे त्यांना एका दिवसासाठीही पुरणारे नाहीत,अशी प्रतिक्रिया राजश्री राघोबा शेळापकर यांनी व्यक्त केली.
"एपीएल' कार्डधारकांना मिळणारा कोटा म्हणजे जणू जनतेची चेष्टाच ठरला आहे. त्याद्वारे कुटुंबाच्या जेवणाची गरज भागू शकत नाही. प्रति कार्डधारकांना १० किलो ऐवजी ३५ किलो तांदूळ प्रति महिना मिळायलाच हवा. हा तांदूळ ९ रुपये प्रतिकिलो ऐवजी किमान ६ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध करावेत, असेही त्या म्हणाल्या.
हा प्रकार केवळ नगरगावच नव्हे तर संपूर्ण सत्तरी तालुक्यात चालतो.आपल्यावरील अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे धाडसच सत्तरीवासीय घालवून बसले आहेत. "एपीएल' कार्डधारकाला प्रतिमहिना १० किलो तांदूळ मिळणे हा त्यांचा हक्क आहे पण तो हिरावून घेतला जात आहे. नगरगाववासीयांनी उघडपणे या अन्यायाला वाचा फोडण्याचे धाडस केले. राज्यातील इतर भागातही अशाच प्रकारचा अन्याय सुरू असल्याने या लोकांनीही नगरगाववासीयांना पाठिंबा द्यावा व स्वतःला आम आदमीचे सरकार म्हणवून मिरवणाऱ्या या सरकारला जाब विचारावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राजधानीत मोठमोठ्या कलाकारांबरोबर महोत्सव साजरे करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या व अडचणी समजून घेण्यासाठीही आपला थोडा वेळ खर्ची घालावा. महोत्सवाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळण करताना जनतेला कमी दरात अन्नधान्य देण्यासाठीही काही पैसे शिल्लक ठेवाल तर लोक दुवा देतील, असा टोलाही लोकांनी हाणला.

भाजपप्रवेशासाठी जसवंतसिंग सज्ज

नवी दिल्ली, दि. १५ : पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांच्यावर आपल्या पुस्तकात स्तुतिसुमने उधळल्याबद्दल भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेले जसवंतसिंह हे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत.
जसवंतसिंह यांच्या भाजपप्रवेशासाठी पक्षनेतृत्व गांभीर्याने विचार करीत आहे. याविषयीचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.
गेल्या आठवड्यात पाटणा येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहायला रवाना होण्यापूर्वी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी जसवंतसिंह यांची भेट घेतली होती. जसवंतसिंह यांच्या भाजप पुनर्प्रवेशाविषयी पक्षाच्या अन्य नेत्यांशी चर्चा करता यावी, यासाठीच गडकरी यांनी ही भेट घेतली होती. "भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपल्याला भाजपमध्ये पुन्हा प्रवेश घेण्याची इच्छा आहे,'अशी इच्छा जसवंतसिंह यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवरच गडकरी यांनी त्यांची भेट घेतली होती. "जसवंतसिंह यांचा भाजपप्रवेश कोणत्याही क्षणी होऊ शकतो,'असेही भाजपच्या सूत्रांनी सांगितले.

केपेजवळ कॅंटरवर धाडसी दरोडा मिरची पूड टाकून दीड लाख पळविले

मडगाव, दि. १५ (प्रतिनिधी): दक्षिण गोव्यात या दिवसात चोऱ्यांचे प्रकार वाढत असताना आज भरदिवसा केपेजवळ आंबावली येथे एक मालवाहू कॅंटरवर दरोडा घालण्याचा प्रकार घडला. दोन मोटरसायकलवरून आलेल्या पाच जणांनी कॅंटर अडवून त्यातील चालक व सेल्समनच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्याकडील दीड लाखाची रक्कम असलेली बॅग पळविली व त्यामुळे या भागात खळबळ माजली, पोलिसांचीही धावपळ उडाली.
केपेचे पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे नावेली येथील पॅरीस पाश्कॉल यांच्या मालकीच्या ग्रेसी इंटरप्राईझेसचा जीए ०८ यू १९५८ हा कॅंटर नेहमीप्रमाणे आपला माल वितरकांना देऊन त्यांच्याकडून वसुली करून परतत असताना शेळपे आकामळ, आंबावली येथील गतिरोधकाजवळ हा प्रकार घडला. या कॅंटरमध्ये चालक अँथनी जुजे लोबो(पेडे -लोलये), सेल्समन अमर अनंत गावकर (गुडी पारोडा ) व रमेश महादेव गावकर व अशोक कुष्टा वेळीप हे दोघे लोडर होते.
माल देऊन त्यांची वसुली करून साधारण दीड लाखाची रक्कम घेऊन ते परतत होते. वाटेत सेंट पोप जॉन पॉल हायस्कूलकडे एक पिवळी रंगाची करिझ्मा मोटरसायकल घेऊन कोणीतरी उभे असलेले त्यांनी पाहिले. नंतर ते कॅंटरमागून येऊ लागले व शेळपे आकामळ येथील गतीरोधकाजवळ ते कॅंटरला मागे टाकून पुढे गेले व त्या पुढच्या गतिरोधकाजवळ त्यांनी मोटरसायकल रस्त्यात आडवी घातली व कॅंटर अडविला . इतक्यात एका पल्सरमोटरसायकल वरुून आणखी तिघे तरुण तेथे आले ते कोकणी मिश्रीत हिंदी बोलत होते. त्यांनी कॅंटरचे दार उघडून मिरची पावडर आंतील चालक व सेल्समनच्या डोळ्यात फेकली व त्याच्याकडूील पैशांची बॅग हिसकावून ते निघून गेले.
तो भाग निर्जन असून नंतर त्यांनी केपे पोलिसांत येऊन हा प्रकार विदीत केल्यावर पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला पण कोणीच सापडलेले नाही. पोलिसांनी त्या चौघांची तक्रार नोंदवून घेऊन त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे. या भागांतील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान गेल्यावर्षी नावेली येथील याच एजंटाची बॅंकेत भरण्यास आणलेली साधारण दोन लाखांची रक्कम बॅंकेच्या दारांतून अशीच पळविली गेली होती.
दक्षिण गोव्यात नाकाबंदी
दरम्यान, या दिवसात वाढू लागलेल्या चोऱ्यांच्या प्रकारांची गंभीर दखल घेऊन पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी रात्रौ ९ ते १ दरम्यान नाकाबंदी करण्याचे आदेश दक्षिण गोव्यातील सर्व पोलिस स्टेशनांना जारी केले आहेत.

Tuesday, 15 June, 2010

हळर्णकर अद्याप बिनखात्याचे मंत्री!

राष्ट्रवादीमध्ये तीव्र असंतोष
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - मिकी पाशेको यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेसचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना देण्यात आले आहे. मंत्रिपद बहाल केले खरे पण आता पाशेकोंकडील खाती देण्यावरून मात्र मुख्यमंत्री दिगंबर कामत काहीसे हात आखडते घेत असल्याची भावना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बनली आहे.
नीळकंठ हळर्णकर यांना गेल्या मंगळवार ८ जून रोजी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. दोन दिवसांत खाती देऊ, असे सांगणारे मुख्यमंत्री आता सहा दिवस झाले तरी अद्याप खाते वाटपाबाबत निर्णय घेत नाहीत, यामुळे राष्ट्रवादीत कमालीची नाराजी पसरली आहे. मिकी पाशेको यांच्याकडील खातीच राष्ट्रवादीला देण्याचे स्पष्ट संकेत दिल्लीतील राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी दिले आहेत. आता असे असतानाही मुख्यमंत्री हा विषय नेमका कोणत्या कारणांसाठी पुढे रेटीत आहेत, याबाबत मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे. मिकी पाशेको यांच्याकडील पर्यटन खात्यावर खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचीच नजर आहे, असेही आता उघडपणे बोलले जाते. कला व संस्कृती खात्याप्रमाणे पर्यटन खात्यातही महोत्सव वा अन्य उत्सवांना वाव आहे. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ आहे व त्यामुळे या खात्यात काम करण्यासारखे बरेच काही आहे. केवळ राजकीय अपरिहार्यता म्हणून हे खाते मिकी पाशेको यांना देणे भाग पडले होते. कामत यांच्याकडे हे खाते आल्यास कलाकारांबरोबर त्यांना पर्यटन उद्योजकांतही आपली प्रतिमा उंचावण्याची नामी संधी प्राप्त होणार आहे. दरम्यान, नीळकंठ हळर्णकर यांनी खात्यांचा भार हा पूर्णपणे श्रेष्ठींच्या हवाली केला असून श्रेष्ठी सांगतील ते आपल्याला मान्य आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रदेश राष्ट्रवादीने यापूर्वीच मिकी पाशेको यांच्याकडील सर्व पदे नीळकंठ हळर्णकर यांना देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, गृह निर्माण खाते नीळकंठ हळर्णकर यांच्याकडे देण्यात येणार असले तरी गृह निर्माण महामंडळाच्या अध्यक्षपदी युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांची नेमणूक करावी,असा प्रस्तावही मुख्यमंत्री कामत यांच्यासमोर असल्याची खात्रीलायक खबर आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदासाठीही युवा कॉंग्रेसच्या एखाद्या पदाधिकाऱ्याची नेमणूक करावी,असाही आग्रह आहे. या पदासाठी राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी इच्छुक असल्याने हा गुंता कायम राहण्याचीच शक्यता अधिक आहे.
दरम्यान, पर्यटन खाते आपल्याकडे ठेवले तर नीळकंठ यांना कुठले खाते द्यावे असा प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उभा राहिला असून सध्या त्यांच्याकडे असलेली खाण, नगर नियोजन, कायदा, माहिती तंत्रज्ञान,कला व संस्कृती आदी खाती देण्यासही ते राजी नाहीत.पर्यटन खाते मिळवण्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळाचे खातेपालट करण्याचाही त्यांचा विचार होता पण त्यामुळे अधिक घोळ होईल, या भीतीने ते व्यथित झाले आहेत. कामत हे जाणीवपूर्वक खाते वाटपासंदर्भात वेळकाढू धोरण अवलंबून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिजवण्याचा तर प्रयत्न करीत नसतील ना,असाही सवाल या पक्षाचे पदाधिकारी करू लागले आहेत.

वास्कोत जुन्या घराची भिंत कोसळून तरुण गंभीर जखमी

वास्को, दि. १४ (प्रतिनिधी) - वास्कोत पडलेल्या मुसळधार पावसामुळे आज दुपारी सव्वाचारच्या सुमारास वेळी देस्तेरोवाडा येथे असलेल्या "एलमॉंत थिएटर'मागील डोंगराळ भागात एका घरावर अन्य एका बंद घराची भिंत कोसळल्याने सुनील विनायक साखळकर हा (३५) तरुण गंभीर जखमी झाला. डोंगरी भागातील सदर जुन्या घराची भिंत कोसळून ती स्व. रजनीकांत साखळकर यांच्या घराच्या खोलीवर कोसळून सदर खोलीचे छप्पर खाली आले. यात सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भिंत कोसळली तेव्हा खोलीत सुनील साखळकर हा सदर खोलीतील पलंगावर झोपला होता. त्याच्या अंगावर सदर खोलीचे छप्पर व मोठे दगड कोसळले. या दुर्घटनेत सुनीलच्या उजव्या पायाचे हाड तुटले असून त्यास अन्य जखमा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला उपचारासाठी त्वरित १०८ च्या रुग्ण वाहिनीने बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. भिंत कोसळलेले घर जुने होते व तेथे कोणीही राहात नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
वास्को अग्निशामक दलाने तेथील ढिगारे दूर करतानाच सुमारे ३० हजाराची मालमत्ता वाचवली. या दुर्घटनेत साखळकर यांच्या घरातील धुलाई यंत्र, पंखे व फर्निचर आदी सामानाची हानी झाली.
साखळकर यांच्या घरात आठ जण राहत असून ज्यावेळी भिंत त्यांच्या खोलीवर कोसळली तेव्हा सुनील वगळता इतर सर्वजाण दुसऱ्या खोलीत होते. घरातील दोन लहान मुले शिकवणीला गेल्याने मोठा अनर्थ टळला. ही माहिती साखळकर यांच्या परिवारातील एका सदस्याने दिली. सुनील यांच्या उजव्या पायाला आज दुखापत झाली व या पायावर यापूर्वी चार वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी त्याची खबर अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्याने दिली. नंतर दलाच्या जवानांनी तेथे पोहोचून मदतकार्य केले. मुरगाव पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून उपनिरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

"इंग्रजी प्राथमिक'साठी आता मासिक ८०० रु. शुल्क !

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - इंग्रजी प्राथमिक विद्यालयांसाठी प्रती महिना १३५० रुपये प्रवेश शुल्काबाबत शिक्षण खात्याने जारी केलेले परिपत्रक अखेर मागे घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले. सरकारी अनुदानविरहित संस्थांनी पहिली ते चौथीसाठी प्रतिमहिना केवळ ८०० रुपये शुल्क आकारावे, असे नवे परिपत्रक लवकरच जारी केले जाईल, असा शब्दही त्यांनी मुष्टिफंड विद्यालयाच्या संतप्त पालकांना दिला.
राज्यातील इंग्रजीतून प्राथमिक शिक्षण देणाऱ्या विविध संस्थांनी यंदा अचानकपणे आपल्या शुल्कदरात वाढ केल्याने पालकांत तीव्र संतापाची लाट पसरली.
शिक्षण खात्याकडून प्राथमिक शिक्षकांना सरकारी नियमाप्रमाणे वेतन द्यावे तसेच या संस्थांसाठी शुल्क आकारणी तक्ताही देण्यात आला होता. या नव्या शुल्क रचनेनुसार प्रती महिना १३५० रुपये शुल्क प्राथमिक विद्यार्थ्यांना लागू करण्याचे परिपत्रकही जारी केले होते. राज्यातील खाजगी संस्थांनी तात्काळ या परिपत्रकाची अंमलबजावणी केल्याने पालकांसाठी ही वाढ धक्कादायकच ठरली. येथील मुष्टिफंड संस्थेच्या पालकांनी याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली. याविषयी पालकांनी स्थापन केलेल्या समितीने आज पर्वरी मंत्रालयात शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांची भेट घेतली व याविषयावर सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी शिक्षण संचालिका डॉ. सेल्सा पिंटो या देखील हजर होत्या. शुल्क दरवाढ ही अन्यायकारक आहे व त्यामुळे सर्वसामान्य पालकांसाठी ती परवडणार नसल्याने सरकारने त्याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी पालकांनी केली. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पालकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यानंतर शिक्षण खात्यातर्फे जारी करण्यात आलेले परिपत्रक मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. यासंबंधी त्यांनी सर्व अनुदानविरहित संस्थांना वर्गवार विद्यार्थी संख्येबाबतचा अहवाल खात्याकडे सादर करण्याचे आदेश जारी केले आहेत. ही शुल्कवाढ केवळ ८०० रुपये प्रतिमहिना करण्याचेही यावेळी ठरवण्यात आले. यासंबंधीचे नवे परिपत्रक लवकरच जारी केले जाईल, असेही त्यांनी यावेळी पालकांना सांगितले.

लिंडन यांनी सुनावणीस प्रत्यक्ष हजर राहावे

उच्च न्यायालयाचा आदेश

अर्ज मागे घेण्यासंबंधात
आज सुनावणी होणार


पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - नादिया तोरादो मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित तथा माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांचे विशेष सेवा अधिकारी लिंडन मोंतेरो हे आपल्या अटकपूर्व जामीन अर्जावरून आता चांगलेच अडचणीत आले आहेत. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीवेळी १७ रोजी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती यू. डी. साळवी यांनी आज दिले. लिंडन यांच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेण्यासाठी पत्र सादर केले असता त्यावरील सुनावणी उद्या १५ रोजी होणार आहे.
मडगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लिंडन मोंतेरो यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज हा अर्ज सुनावणीस आला असता न्यायमूर्ती श्री. साळवी यांनी प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्याने लिंडन यांना आता पोलिसांना शरण येणे भाग पडेल. माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ सदोष मनुष्यवध व कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) असे आरोप ठेवण्यात आले आहेत तर लिंडन मोंतेरो यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न याअंतर्गत कलम २०१ अन्वये आरोप ठेवण्यात आले आहेत. हे दोघेही सध्या भूमिगत असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
आज हा अर्ज न्यायालयासमोर सुनावणीस आला असता तो चुकीच्या पद्धतीने सादर करून न्यायालयाची फसवणूक करण्याचा हा प्रकार असल्याचा युक्तिवाद ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी केला. लिंडन मोंतेरो यांचा जामीन अर्ज त्यांच्या आईच्यावतीने सादर करण्यात आला आहे याकडेही ऍड.रॉड्रिगीस यांनी लक्ष्य वेधले. फोैजदारी दंड संहितेच्या कलम ४३८ नुसार ज्या व्यक्तीला अटक होण्याची शक्यता असते तीच व्यक्ती अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर करू शकते. उच्च न्यायालयाच्या नियमावलीनुसारही हे बंधनकारक आहे, असा दावा ऍड. रॉड्रिगीस यांनी केला. एखादी व्यक्ती कोठडीत असल्यास आरोपीच्या वतीने कुटुंबीय किंवा मित्र फौजदारी दंड संहितेच्या कलम ४३९ अंतर्गत अर्ज सादर करू शकतात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अटकपूर्व जामिनासाठी फक्त संशयित आरोपीच अर्ज करू शकतो, हे पटवून देण्यासाठी ऍड. रॉड्रिगीस यांनी ११ डिसेंबर १९८६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गुस्ताव फिलीप कुटो यांनी दिलेला निकाल पुराव्यादाखल सादर केला.
ऍड. रॉड्रिगीस यांनी केलेल्या युक्तिवादाचे मुद्दे उचलून धरून न्यायमूर्ती श्री.साळवी यांनी हा अर्ज कायद्याला धरून नसल्याचे लिंडन मोंतेरो यांच्या वकिलाला सांगितले. दरम्यान, सदर जामीन अर्ज मागे घ्यावा की नाही यावर आपण सल्लामसलत करूनच पुढे सांगू असे त्यांच्या वकिलांनी सांगितले असता या अर्जावरील पुढील सुनावणीस १७ रोजी लिंडन मोंतेरो यांनी स्वतः हजर राहावे,असे आदेश न्यायमूर्तीनी दिले.

हप्तेखोरांची चौकशी दक्षता खात्याकडून

वरिष्ठ पोलिसांची कोलांटी
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)- पेडणे पोलिस स्थानकातील हप्तेखोर पोलिसांची खात्याअंतर्गत चौकशी होईल, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून काल देण्यात आले, तोच आज अचानक याविषयावरून पोलिसांनी कोलांटी घेण्याचा अजब प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती नाही, कदाचित दक्षता खात्यामार्फत ही चौकशी सुरू असावी, अशी काहीशी संभ्रमित प्रतिक्रिया पोलिस खात्याचे जनसंपर्क अधिकारी तथा गुन्हा विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी व्यक्त करून सर्वांनाच पेचात टाकले आहे.
"हप्तेखोर पेडणे पोलिसांच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या "गोवादूत' च्या वृत्ताने आज संपूर्ण पोलिस खातेच दणाणून गेले. पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी हे आदेश जारी केल्याचे कालपर्यंत पोलिस सूत्रांकडून सांगितले जात होते. आज पोलिस खात्याचे अधिकृत जनसंपर्क अधिकारी आत्माराम देशपांडे यांनी मात्र ही चौकशी दक्षता खात्यातर्फे सुरू आहे, असे सांगून खात्यांंतर्गत चौकशीच्या वृत्ताला बगल देण्याचाच प्रकार घडला. पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अजित उमर्ये व दोन पोलिस शिपाई हे ड्रग व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करीत असल्याच्या तक्रारी पोलिस खात्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वीच दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पेडणे पोलिस हरमल येथील सनी नामक "खबऱ्या' च्या संशयास्पद मृत्यू प्रकरणावरूनही अडचणीत आले आहेत. ड्रग्स व्यवसायाशी संबंधित असलेल्या या व्यक्तीचा पूर्ण परिचय असूनही त्याच्या मृत्यूची नोंद अज्ञात व्यक्ती अशी करून पेडणे पोलिसांनी उघडपणे हे प्रकरण दडपण्याचाच प्रयत्न केला, असाही आरोप आता होऊ लागला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असूनही या घटनेच्या चौकशीचे आदेश निघत नाहीत, यावरून वरिष्ठ पातळीवर समझोता करून यावर पडदा टाकण्याचाच प्रयत्न सुरू आहे, अशीही चर्चा सुरू आहे.
या प्रकाराबाबत वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्यासही तयारी दर्शवली नाही. रात्री ९ वाजता आत्माराम देशपांडे व पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी फोन उचलण्याचे टाळले. पोलिसांच्या हप्ते प्रकरणाची खात्याअंतर्गत चौकशी होणेच शक्य नाही, अशी माहिती पोलिस खात्यातीलच काही गुप्त सूत्रांनी दिली. प्रत्येक पोलिस स्थानकावरील हप्त्यांचा वाटा हा वरिष्ठांपर्यंत पोहचत असतो व त्यामुळे त्याची चौकशी करण्याचा आदेश हाच मुळी एक विनोद आहे, असे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पेडणे पोलिस स्थानकात केवळ ड्रग्स व्यावसायिकांकडूनच नव्हे तर पत्रादेवी चेकनाका, जुगार व वेश्याव्यवसायाचेही लाखो रुपयांचे हप्ते पोलिसांकडूनच गोळा केले जातात, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. हरमल येथील सनी नामक या खबऱ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास पोलिस व ड्रग्स व्यावसायिकांच्या संबंधाचे आणखी एक रॅकेट उघडकीस येईल व त्यामुळेच हे प्रकरण पडद्याआड टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. नादिया तोरादो मृत्यू प्रकरणामुळे पोलिसांना आपल्या ड्रग्स प्रकरणावरून प्रसारमाध्यमांचे लक्ष्य विचलित करण्याची आयतीच संधी प्राप्त झाल्याने पेडणे पोलिसांच्या या दोन्ही प्रकरणांवर पडदा टाकण्याचीच धडपड सुरू असल्याचीही खबर मिळाली आहे.

Monday, 14 June, 2010

हप्तेखोर पेडणे पोलिसांच्या खात्यांंतर्गत चौकशीचे आदेश

"उदय परब ते उत्तम राऊत देसाई
तेरा वर्षांच्या ड्ग्स हप्तेगिरीचा प्रवास'


पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई व इतरांकडून ड्रग्स व्यावसायिकांना सरंक्षण देण्यासाठी हप्ते गोळा केले जात असल्याच्या तक्रारीची गंभीर दखल पोलिस उपमहानिरीक्षक रविंद्र यादव यांनी घेतली आहे. या प्रकरणाच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश जारी केल्याने पोलिसांचे धाबेच दणाणले आहेत. पोलिस खात्यावरच झालेल्या या आरोपांमुळे खात्याची संपूर्ण विश्वासार्हताच संशयात सापडली असून गेल्या तेरा वर्षांपूर्वीच्या कटू गतस्मृतींना नव्याने उजाळाही मिळाला आहे. उदय परब ते उत्तम राऊत देसाई असा हा पेडणे पोलिसांच्या हप्तेगिरीचा प्रवासच यानिमित्ताने सर्वांसमोर उभा राहिला आहे.
तेरा वर्षांपूर्वी म्हणजे १९९७ साली पेडणे पोलिस स्थानकाचे तत्कालीन प्रभारी उपनिरीक्षक उदय परब व दोन पोलिस शिपाई यांना विदेशी पर्यटकांकडून पैसे उकळण्याच्या आरोपांवरून निलंबित करण्यात आले होते. विदेशी पर्यटकांना अडवून त्यांच्या खिशात स्वतःहूनच अमलीपदार्थ टाकायचे व अमलीपदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचे, असले धंदे हे पोलिस करीत होते असा ठपका त्यांच्यावर होता. याप्रकरणी काही विदेशी पर्यटकांनी थेट आपल्या दूतावासाकडेच तक्रार नोंद केली व तेव्हाच हा प्रकार उघडकीस आला. तत्कालीन पोलिस महानिरीक्षक पी. एस. आर. ब्रार यांनी तात्काळ खात्यांंतर्गत चौकशी करून उदय परब व अन्य दोन पोलिस शिपायांना निलंबित केले होते. कालांतराने प्रकरण निवळले व हे सर्व पोलिस पुन्हा सेवेत रुजूही झाले. उदय परब यांना त्यानंतर निरीक्षकपदी बढतीही मिळाली. या घटनेचा मागोवा घेताना या गुन्ह्यासाठी संबंधित पोलिसांवर कडक कारवाई झाली असती तर निदान आता तेरा वर्षांनंतर पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती टाळता आली असती. पेडणेचे विद्यमान पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अजित उमर्ये, व अन्य दोघे पोलिस शिपाई ड्रग व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करतात, अशा दोन लेखी तक्रारी गेल्या सहा महिन्यांपूर्वी पोलिस खात्यात व गृह खात्याकडे दाखल झाल्या. या तक्रारींकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष जरी झाले असले तरी प्रसारमाध्यमांच्या पाठपुराव्यामुळे पोलिस उपमहानिरीक्षक रविंद्र यादव यांनी या प्रकरणाच्या खात्याअंतर्गत चौकशीचे आदेश जारी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. सध्या अशाच एका प्रकरणावरून एक निरीक्षक, उपनिरीक्षक व पाच पोलिस शिपाई आपली नोकरी गमावून बसले आहेत. आता या प्रकरणी पेडणे पोलिस स्थानकातील या हप्तेखोरांचीही त्यात भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
"खबऱ्या'चा केला घात !
हरमल येथील पोलिसांचा "खबऱ्या' म्हणून परिचित असलेला सनी ऊर्फ संदीप याचा संशयास्पद मृत्यू होऊनही अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची नोंद करून पेडणे पोलिसांनी कहरच करून टाकला. सनीच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांची संशयास्पद भूमिका उघड झाली आहे. निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांना यासंबंधी विचारले असता मयत सनी ऊर्फ संदीप हा आपला खबऱ्या नव्हता, असा दावा त्यांनी सुरुवातीला केला. त्याला गावात पैसे मागण्याची सवय होती व अनेकवेळा माहिती देतो असे म्हणून आपल्याकडूनही पैसे नेल्याचेही ते मान्य करतात व त्यामुळे उत्तम राऊत देसाई यांनी नकळतपणे सनी याचा परिचय उघड केला आहे. एवढे असूनही त्याच्या मृत्यूची नोंद अज्ञात व्यक्ती अशी करून पोलिस नेमके काय लपवण्याचा प्रयत्न करीत होते, असाही सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, सनी नामक ही व्यक्ती विदेशी नागरिकांना ड्रग पुरवठा करायची व त्याचबरोबर पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही तो वावरत होता, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. सनी याला या परिसरात ड्रग व्यवसायाशी संबंधित संपूर्ण माहिती होती. हरमल किनारी भागातील ड्ग्स व्यावसायिकांचा तो पर्दाफाश करील म्हणूनच कुणी तरी त्याचा काटा काढला व त्यातूनच त्याची हत्या झाली असावी, असाही संशय व्यक्त होऊ लागला आहे. सनी मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित लवेश ऊर्फ लक्ष्मण लुडू नाईक हा पेडणे पोलिसांना शरण आला असून सनी याच्या मृत्यूनंतर पाच दिवस उलटले तरी, त्याला ताब्यात घेण्यात पेडणे पोलिसांना अपयश आले होते. सनी मृत्यू प्रकरणाचा पाठपुरावा करून प्रसारमाध्यमांनी पेडणे पोलिसांवर शरसंधान केल्यानेच या प्रकरणाची चौकशी करणे पोलिसांना भाग पडले आहे.

कुणाच्या फायद्यासाठी ती घटना दडपली?

महेश पारकर, शिरोडा
(तालुकाः फोंडा)
नागरिक बातमीदार स्पर्धा

साधारणतः दोन महिन्यांपूर्वी ही घटना घडली होती. घटनेची चर्चा गावातील आम जनतेमध्ये आजही चालू आहे. परंतु सदर घटना बातमी रूपांत किंवा अन्य स्वरूपात गोव्यातील वर्तमानपत्रात किंवा नियतकालिकांत छापून आलेली नाही. कारण घटना जिथे घडली होती, ती संस्था गोव्यातील एक उच्च पदस्थ राजकीय व्यक्तीच्या मालकीची आहे ! तसेच सदर घटनेचा बोभाटा झाल्यास त्या संस्थेवरती होऊ शकणाऱ्या परिणामाबरोबर त्या उच्च राजकीय व्यक्तींच्या भविष्यावर दूरगामी परिणाम करणारी, यामुळेच ती घटना कसोशीने दडपली गेली आहे.
त्यादिवशी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू झाले. विद्यार्थी वर्ग कर्मचारी वर्ग आपापल्या कामामध्ये दंग अन् इथे स्टाफरूम मध्ये एक प्राध्यापक काहीतरी काळेकृत्य करण्याच्या पावित्र्यात येरझारा टाकीत होते. शिरोड्यातील मध्यवर्ती भागातील ही संस्था. त्यामुळे भोवतालच्या पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी तिथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. तारुण्याच्या उंबरठ्यावरील विद्यार्थिनी त्या खरे म्हणजे प्राध्यापकाला भगिनी किंवा त्यांच्या स्वतःच्या मुलींसारख्या. परंतु आजची सामाजिक स्थिती विचित्र बनलेली आहे. सरळ सांगायचे म्हटल्यास टीव्हीच्या प्रभावामुळे, शारीरिक ओढीला आजकाल कसलाच ताळतंत्र राहिलेला नाही. त्याचाच परिणाम म्हणून असेल सदर प्राध्यापक महोदयांनाही तो मोह आवरला नसावा.
त्या मागची कारण मीमांसा आज लोक अनेक प्रकारे बोलून दाखवितात. कुणी म्हणतात, ती विशिष्ट विद्यार्थिनी परीक्षेला नापास होणार हे निश्चित होते. अशा तिच्या अगतिकतेच्या फायदा घेऊन तिला पास करायचे आमिष सदर प्रोफेसरांनी दाखविले. अन् संस्थेच्या भव्य अशा इमारतीच्या निर्मनुष्य ठिकाणी तिला नेऊन अतिप्रसंग केला. तो प्रत्यक्ष केला की प्रयत्न केला, याबद्दलही सर्वत्र साशंकाच आहे. कुणी म्हणतात की, या प्रोफेसराविरूद्ध आजवर अनेक तक्रारी दाखल झालेल्या असून, केवळ उच्चपदस्थांच्या आशीर्वादामुळे हा नामानिराळा राहू शकलेला आहे ! म्हणून हा कट अन्य शिक्षक वर्गानेच जाणून बुजून करविला असेही बोलले जाते.
खर खोटं देवास ठाऊक किंवा त्या प्रोफेसरला किंवा बदनाम झालेल्या मुलीला! परंतु घटनेनंतर लगेच त्या मुलीच्या सांगण्यावरून तिच्या भावाने तसेच अन्य कुटुंबीयांनी या उच्चशिक्षित प्रोफसराची भरपूर धुलाई केली. हे सगळ्या गावाने पाहिलं आहे. एरवी कृतिशील, थोेडासा प्रसिद्धी लोलूप अशी ही व्यक्ती, स्वतःच्या पेशाला काळिमा फासणारं कृत्य करायला कशी प्रवृत्त झाली? संस्थेचा प्रारंभापासून ही व्यक्ती म्हणजे अविभाज्य घटक! शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकून समाजात स्थिर झालेले आहेत. स्वतःच्या पेशाची पंचविशी पूर्ण करीत आलेल्या या व्यक्तीला ही अवदसा का आठवली असावी? अशा अचंब्याने लोकांच्या भुवया विस्तारल्या जात आहेत.
ती व्यक्ती जिथे त्याच्या कुटुंबीयांसह रहात होती तिथे ती सध्या नाही. कुणी म्हणतात, गोवा सोडून ती व्यक्ती अज्ञात स्थळी गेली असावी. तर कुणी म्हणतात, त्याला तसे करण्यास भाग पाडून संस्थेतील ही घाण दूर झाली हे बरेच झाले! संस्थेच्या व्यापक भविष्याच्या दृष्टीने त्याचा काटा काढला गेला असावा!
एवढी मोठी घटना घडून ही ती वर्तमानपत्रामधून लोकासमोर का आली नाही? ज्या घटनेचे चर्वितचर्वण सामान्य लोकांमध्ये होऊन ही एखाद्या वार्ताहराला त्याचा वास लागलाच नाही असे म्हणता येईल? संस्थेच्या हिताच्या दृष्टीने सदर घटनेकडे पाहिल्यामुळे ती बातमी सर्वच वर्तमानपत्रांनी टाळली? असं असेल तर मग हे प्रोफेसरमहाशय अन्य ठिकाणी जाऊन तसलेच रंग उधळायला मोकळे! आणखी एखादे दुसऱ्या विद्यार्थिनीचा बळी द्यायला आपण त्याला परवाना दिल्यासारखं होणार नाही का!
वाचकहो, आपणही या स्पर्धेत भाग घेऊ शकता. आपल्या परिसरातील एखादी घटना अथवा समस्या, संस्था यांच्याविषयी सुमारे ५०० शब्दांत बातमी पाठवून बक्षीस जिंका. पणजी, फोंडा, म्हापसा, काणकोण, वास्को, कुडचडे अथवा मडगाव कार्यालयात बातमी देऊन या स्पर्धेत भाग घ्या. अंतिम तारीख २५ जून २०१०

प्रेमभंगातून तरुणीचा भोसकून खून

मडगावातील घटनाः हल्लेखोर तरुणास लागलीच अटक

मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी) - प्रेमभंगाने व्यथित झालेल्या एका तरुणाने आज येथील जुन्या बसस्थानकाजवळ आपल्या प्रेयसीचाच सुऱ्याने भोसकून खून करण्याचा प्रकार घडला. सदर तरुणीने रक्ताच्या थारोळ्यात तेथेच प्राण सोडला तर त्या तरुणाला तेथील लोकांनी पकडून नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्या अंगावर एकूण २० जखमा आढळून आल्या आहेत.
मयत तरुणी मुस्कान उर्फ मोसुफिया निजाम शेख (२६) ही कारगिल -कुडतरी येथील असून पोलिसांनी पंचनामा करून तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी हॉस्पिसियोत पाठवून दिला. मिळालेल्या माहितीनुसार बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेली मुस्कान व अभिजित पाटील(२५) हा मूळ इचलकरंजीमधील व सध्या रावणफोंड येथे राहणारा तरुण ही येथील एका तारांकित हॉटेलात काम करत होती. तेथे असतानाच त्यांचे सूत जुळले होते व गेली चार वर्षे त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या.
पण दोन तीन महिन्यांपूर्वी त्यांचे बिनसले व तिने दुसऱ्या कोणाबरोबर तरी मैत्री केली असावी, असा त्याला संशय होता. त्यातून अभिजितची मनःस्थिती बिघडली व त्याला त्या हॉटेलमधून कमी केले गेले होते.
आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सदर तरुणी बाजारातून पावसाळी सामान खरेदी करून घरी जाण्यासाठी जुन्या बसस्थानकावर जात असताना केणी पेट्रोल पंपसमोरील "फ्रॅंकी गोवन स्वीट' जवळ पोचली असता आरोपीने तिला पाहिले व तो धावत तिच्यासमोर गेला व आपणाकडील संबंध तोडल्याबद्दल तिला जाब विचारला. यावेळी तिनेही त्याला दुरुत्तरे केली, त्यातून उभयतांत बाचाबाची झाली व पाटीलने खिशांतून चाकू काढून तिच्या पोटात खुपसला. त्याने तिचा गळा, मान आदी भागात वार केले. ती किंकाळी फोडून रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली व मरण पावली.
तेथील लोकांना हा काय प्रकार काय ते कळायला उशीर झाला. ती तरुणी किंकाळी फोडून खाली कोसळल्यावर ते भानावर आले व त्यांनी सदर तरुणास पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो चाकू घेऊन तो त्यांच्या अंगावर चालून आला पण तेथील लोकांनी त्याला शिताफीने पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी त्वरित घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेतले. नंतर पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनीही घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.
अभिजित याने अजून पोलिसांसमोर तोंड उघडलेले नाही. मोसुफियाच्या मृत्यूच्या वार्तेने तिची आईही आजारी पडली असून तिलाही हॉस्पिसियोत दाखल करण्यात आले आहे. मुस्कान ही बारावी शिकलेली होती. त्या दोन बहिणी व एक भाऊ . तिचे वडील पूर्वी आखाती देशात कामाला होते ते आता हयात नाहीत व ती भाऊ व आई एकत्र रहात होती.
मडगावातील अशा प्रकारचे व सर्वांदेखत खुनी हल्ला करण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. गेल्या महिन्यात कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत अशाच प्रेमप्रकरणातून मेल्बा नामक तरुणीचा बंदुकीची गोळी झाडून खून झाला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलेली आहे तर लक्कीसिंह हा मुख्य आरोपी अजून फरारी आहे.ज्या बंदुकीने हा खून झाला होता ती साळावली कालव्यालगत झुडपात टाकून दिलेल्या अवस्थेत सापडली होती.

आता मिकीसमर्थकांच्या घरांवरही छापे

मडगाव, दि. १३ (प्रतिनिधी) - नादिया तोरादो मृत्यूप्रकरणी भूमिगत झालेले माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या मागे हात धुऊन लागलेल्या गुन्हा अन्वेषण विभाग व कोलवा पोलिसांनी आज सतत तिसऱ्या दिवशी माजोर्डा येथील काही मिकी समर्थकांच्या घरांवर व आस्थापनांवर छापे टाकून त्यांचा काही ठावठिकाणा लागतो की काय याचा तपास केला. मिकी यांचा शोध लावण्यात अपयशी ठरलेले पोलिस ज्याअर्थी त्यांच्या समर्थकांत दहशतीचे वातावरण पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत ते पाहता या चौकशीतून मिकी यांचे राजकीय भवितव्य संपवण्याचा डाव साधला जात असल्याची आता उघड चर्चा सुरू झाली आहे.
मिकी पाशेको यांच्याविरोधात काही ठोस पुरावे सापडले आहेत काय, याबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला. पोलिसांच्या पथकांनी काल सासष्टीतील तीन वेगवेगळ्या भागांत छापे टाकून चौकशी केल्याने मिकी समर्थक बिथरलेले आहेत. गेल्या शुक्रवारी बेताळभाटी येथे मिकींच्या निवासालगत त्यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेण्यात आल्याने यापुढे तसे धाडस कुणीही करू नये यासाठीच मिकी समर्थकांत भिती पसरवण्याच्या हेतूने हे छापा सत्र सुरू असल्याची टीकाही होऊ लागली आहे. ड्रग प्रकरणी बदनाम झालेले पोलिस मिकी प्रकरणाचा बाऊ करून आपली इज्जत लपवण्यासाठीच धडपडत असल्याचाही आरोप केला जात आहे.
गेल्या शुक्रवारी मिकी पाशेको यांच्या बेताळभाटी येथील घरावर छापा टाकून त्यांच्या कार्यालयातून अनेक संगणक, हार्ड डिस्क व काही महत्त्वाच्या फायली ताब्यात घेतल्या होत्या. मात्र पोलिस यंत्रणा ज्या पद्धतीने कार्यरत झाली आहे ते पाहता त्यांनी हे प्रकरण जास्तच गांभीर्याने घेतल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मिकी पाशेको हे भूमिगत असल्याने त्याबाबत लोकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू आहे. काहींच्या मते ते अजूनही गोव्यात व विशेषतः मडगावातच आहेत तर एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या दाव्याप्रमाणे कॉंग्रेसमधील एक गट त्यांची पाठराखण करीत असल्याचीही चर्चा आहे.

ऍंडरसनच्या पलायनास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी

भाजपचा ठराव

पाटणा, दि. १३ - हजारे निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या भोपाळ वायुगळती प्रकरणातील मुख्य आरोपी वॉरेन ऍण्डरसन याच्या पलायनास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असा एकमुखी ठराव भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या येथे आयोजित बैठकीत आज पारित करण्यात आला.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत या आशयाचा ठराव मांडला. याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी चौहान यांनी कायदे तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. कुठल्याही भारतीयाचे जीवन हे अमेरिका किंवा इतर देशाच्या नागरिकाच्या तुलनेत स्वस्त नाही. या दुर्घटनेतील पीडितांनी ज्या यातना भोगल्या त्याची योग्य दखल घेतली गेलीच पाहिजे. या पीडितांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलावी, असेही या ठरावात पुढे म्हटले आहे.
आत्मसन्मानाशी तडजोड नाही
- भाजपचा जदयुला इशारा
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात नीतीशकुमार हात घालून असल्याची जाहिरात काल प्रकाशित झाल्यानंतर निर्माण झालेल्या मतभेदांबाबत पक्षाने परिपक्वतेची भूमिका घेतली असली तरी, आत्मसन्मानाशी कुठलीही तडजोड करणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने आज जदयुला दिला आहे.
परिपक्व नेतृत्व असलेला आमचा पक्ष आहे आणि कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्याची ताकद आमच्यात आहे. त्यामुळे आमचा आत्मसन्मान आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे आणि या मुद्यावर आम्ही कुठलीही तडजोड करणार नाही, असे भाजपाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जदयूची नरमाईची भूमिका
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातात हात घालून असल्याची जाहिरात काल बिहारमधील अनेक वृत्तपत्रात झळकल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर आज जदयुने नरमाईची भूमिका घेतली असून, भाजपाशी असलेली आघाडी आणि संबंध अतिशय जुने असल्याचा निर्वाळा दिला आहे.
काल घडलेली घटना अतिशय दुर्देवी होती. भाजपाशी आमची आघाडी गेल्या पंधरा वर्षांपासून आहे आणि ती टिकवून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे जदयुचे अध्यक्ष शरद यादव यांनी आज वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. एखाद्या जाहिरातीत पंतप्रधान अथवा कुठल्याही मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र किंवा नाव प्रसिद्ध करायचे असल्यास त्यांची किंवा त्यांच्या कार्यालयाची रीतसर परवानगी घेणे गरजेचे असते. ही जाहिरात प्रकाशित करण्यापूर्वी जदयुशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नसल्याने आम्ही त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, ही जाहिरात पक्षाने प्रकाशित केली नसल्याचा खुलासा भाजपाने केल्यानंतर हे प्रकरण जास्त ताणून न धरण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच, ही जाहिरात कुणी व कशी प्रकाशित केली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही शरद यादव यांनी सांगितले.

अटकपूर्व जामिनासाठी मिकींचा अर्ज आज उच्च न्यायालयात?

मिकी निरपराध - व्हायोलाची ठाम खात्री

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)- नादिया तोरादो मृत्यू प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून घोषित केलेले व आठ दिवस बेपत्ता असलेले माजी पर्यटनमंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार मिकी पाशेको हे उद्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची दाट शक्यता आहे. मडगाव सत्र न्यायालयाने मिकी पाशेको यांचा जामीन फेटाळल्यानंतर आता उच्च न्यायालयात धाव घेणे त्यांना भाग पडले आहे. मिकी यांचे साथीदार तथा या प्रकरणातील अन्य एक मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी जाहीर केलेले लिंडन मोंतेरो यांच्या अटकपूर्व जामिनावरही उद्या १४ रोजी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणी होणार आहे.
दरम्यान, नादिया जिवंत असती तर खुद्द तिनेच मिकी पाशेकोंची पाठराखण केली असती व सत्य परिस्थिती पोलिसांसमोर ठेवली असती. ती वाचू शकली नाही हेच खरे दुर्दैव आहे,अशी प्रतिक्रिया मिकी यांच्या पत्नी व्हायोला हिने व्यक्त केली. मिकी खुनी असूच शकत नाहीत. त्यांच्याकडून कुणालाच इजा होणे शक्य नाही, असा ठाम विश्वास तिने मिकींप्रति व्यक्त केला. नादिया तोरादो हिने रेटॉल प्राशन केले त्यावेळी आपण मुंबईत खरेदीला गेले होते. तिथे ठाणे इस्पितळात आपण तिची विचारपूस करण्यासाठी पोहचले होते व तिच्या आईशी आपला संवाद झाला. तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याने तिच्याशी आपल्याला संवाद साधता आला नाही, अशी माहिती व्हायोला हिने आपल्या जबानीत दिल्याची खबर आहे.
काल सुमारे सहा तास गुन्हा विभागाकडून मिकी यांच्या सध्याच्या पत्नी व्हायोला हिची जबानी नोंदवण्यात आली. जबानी नोंदवल्यानंतर काही पत्रकारांनी तिची भेट घेतली असता तिने ही माहिती दिली आहे. व्हायोला ही मिकी यांना लहानपणापासून ओळखते.मिकी पाशेको यांच्या तीन मुलांची आई असलेल्या व्हायोला हिने याप्रकरणी मिकी यांना गोवले जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मिकी पाशेको यांनी आपल्याशी ४ जून रोजी संपर्क साधून सगळं काही ठीक होईल व चिंता करण्याची अजिबात गरज नाही, असा धीर दिल्याचेही त्या म्हणाल्या. १५ मे रोजी आपण दुपारी १.१५ वाजता मुंबईला जाण्यासाठी विमान पकडले. मिकी यांनीच आपल्याला विमानतळावर पोहचवले. आपण मुंबईत पोहचल्यानंतर त्यांनीच फोनवरून आपल्याला नादियाने रेटॉल घेतल्याची माहिती दिली. नादिया हिला ठाणे येथे इस्पितळात दाखल करणार असे सांगितल्यानंतर आपण तिथे पोहचले. नादियाच्या आईची भेट घेतल्यानंतर तिने चुकून रेटॉल प्राशन केल्याची माहिती आपल्याला दिली, असेही व्हायोला हिने सांगितले. आपल्याला या प्रकरणी आणखी काहीही माहिती नाही,असेही तिने स्पष्ट केले. पाशेको यांच्या टूर्स ऍण्ड ट्रॅवल कंपनीत व्हायोला हिची काय भूमिका आहे,याबाबत प्रश्न विचारला असता ती कंपनीच्या नोकरभरती विभागात संचालक असल्याचीही माहिती मिळाली आहे. नादिया व व्हायोला या दोघीही कार्मेल मुलींच्या कॉलेजात एकत्र शिकत होत्या. ती मिकी पाशेको यांची कौटुंबिक मैत्रीण असल्याचे आपल्या नंतर लक्षात आले. ती पाशेको यांच्या कंपनीत सल्लागार म्हणून काम करीत होती. यंदा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील सामने एकत्रितपणे पाहण्याचे आम्ही ठरवले होते,असेही त्या म्हणाल्या.

"चांगल्या मराठी चित्रपटांना आता रसिकांनी साथ द्यावी'

परिसंवादातील सूर
पणजी, दि. १३ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - मराठी चित्रपटांना आज चांगले दिवस आले आहेत. ज्वलंत आणि वेगळ्या चित्रपटांची लाट निघाली असून त्याला रसिकांनी साथ देणे आवश्यक आहे. असा सूर "प्रादेशिक चित्रपट अपेक्षा आणि वास्तव' या चर्चासत्रात निघाला.
मध्यंतरीच्या काळात मराठी चित्रपटांचा दर्जा खालावत गेल्याने रसिक प्रेक्षक मराठी चित्रपटापासून दूर झाला होता त्यामुळे मराठी चित्रपट सृष्टीचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु आज पुन्हा मराठी चित्रपटांची निर्मिती दर्जेदार होत असल्याने मराठी चित्रपटसृष्टी नवी उंची गाठेल यात शंकाच नाही. आज तरुण दिग्दर्शक नव्या जोमाने वैचारिक पातळीवरील उच्चस्तरीय चित्रपट तयार करत असून ही नव्याने आलेली लाट टिकून राहण्याकरिता मराठी प्रेक्षकांनी पाठिंबा देणे नितांत गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्त झाले.
विन्सन ग्राफिक्सने दोन दिवस आयोजित केलेल्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात आज "प्रादेशिक चित्रपट अपेक्षा आणि वास्तव' या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्रख्यात अभिनेते मोहन आगाशे, निरोप चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर, विहीर चे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, पांगीराचे दिग्दर्शक राजू पाटील, अभिनेता आणि दिग्दर्शक नंदू माधव, गोव्यातील दिग्दर्शक ज्ञानेश्र्वर गोवेकर, दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर यांनी भाग घेतला होता.यावेळी प्रेक्षकातूनही अनेक प्रश्न विचारण्यात आले. चर्चासत्राचे संयोजन श्रृती पंडित यांनी केले होते. यावेळी सचिन कुंडलकर म्हणाले की कित्येक वेळा अपेक्षा काहींवेगळ्या असतात आणि वास्तव काहींवेगळे असते अपेक्षा आणि वास्तव यात दुरी असणे आवश्यक आहे कारण दिग्दर्शक किंवा निर्माता आपली आवड म्हणून चित्रपट तयार करत असतात. अपेक्षा पूर्ततेसाठी प्रेक्षकांनी तक्रारी कराव्यात अस वाटते. आज मराठी चित्रपट सृष्टीत झालेला बदल हा एकट्यामुळे किंवा एका चित्रपटामुळे झालेला नाही आणि तसे होणे शक्य नाही, असे उमेश कुलकर्णी यांनी सांगितले. नव्या दमाचे आणि नवे विचार घेऊन पुढे सरसावलेल्या तरुण दिग्दर्शकांना मनापासून जे करायचे आहेे ते करण्यासाठी पोषक वातावरण आहे, असेही ते म्हणाले. सिनेमाला कोणत्याही भाषेचे बंधन असू नये, कारण दिग्दर्शक सिनेमाच्या भाषेतून अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतो. मोहन आगाशे म्हणाले की केवळ चित्रपट तयार करायचा म्हणून करायचा असे करून आज वर्षाला सुमारे १६७ मराठी चित्रपट तयार होणे हा भयंकर अतिरेक होत आहे, त्यामुळे चांगल्या चित्रपटांना योग्य जागा मिळत नाही. अशा परिस्थितीत प्रेक्षक चांगल्या चित्रपटांकडे वळत नाही. तरी सुध्दा चांगले चित्रपट राहतील आणि चालतीलही. आज लोकांकडे पर्याय खूप आहेत परंतु वेळ आणि पैसा कमी आहे, असे मिस्कीलपणे ते म्हणाले.नंदू माधव आणि महेश मांजरेकर यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, की चित्रपटांचा होणाऱ्या अतिरेकामुळे प्रेक्षक दूर जात होते आणि आता पुन्हा तोच प्रकार घडण्याच्या मार्गावर जात आहे. त्यामुळे सरकारकडून चित्रपट निर्मितीसाठी मिळणाऱ्या सवलती वरदानाबरोबरच शापही ठरतात त्या चित्रपटांना मोठा धोका म्हणजे वेळेअभावी तयार होणाऱ्या डी.व्ही.डी. याचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे. शेवटी श्रृती पंडित यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Sunday, 13 June, 2010

सीबीआयच्या गैरवापराची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करा

भारतीय जनता पक्षाची मागणी

पाटणा, दि. १२ - सीबीआयचा सध्या राजकीय स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे, अशी चौफेर टीका देशातील या सर्वात मोठ्या तपास यंत्रणेवर होत असल्यामुळे या साऱ्या प्रकाराचे पोस्टमार्टम करण्यासाठी संयुक्त सांसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आली आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकविण्यासाठी, तसेच राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांना आपल्या बाजूने ओढून घेण्यासाठी सत्तारूढ कॉंग्रेस व संपुआ सरकारने सीबीआयचा अनेक वेळा गैरवापर केला आहे, असा आरोपही भाजपातर्फे लावण्यात आला आहे.
१६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पाटणा येथे आज शनिवारीपासून सुरू झालेल्या भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी ही मागणी केली आहे. सीबीआय हे आज लोकांना धमकाविण्याचे आणि कोणत्याही प्रकरणात अडकविण्याचे एक आयुध झालेले आहे. याचे एक ताजे उदाहरण म्हणजे भोपाळ वायुगळती प्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्याने उघड केलेले रहस्य आहे. या वायुगळती कांडातील मुख्य आरोपी वॉरेन ऍण्डरसन याला देशातून पळवून लावण्यासाठी सीबीआयचा कसा गैरवापर करण्यात आला, याचा खुलासा सीबीआय अधिकाऱ्यातर्फे नुकताच करण्यात आलेला आहे.
गडकरी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जाहीर केलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीला जे संबोधन केले त्याची माहिती नंतर एका पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रवक्ता रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना दिली. गुजरातमध्ये आज एकापेक्षा एक धाडसी पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआयचा गैरवापर केला जात आहे. एवढेच नव्हे तर गुजरातमधील भाजपाशासित सरकारलाही सीबीआयच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. एकीकडे उत्तर प्रदेशात बनावटी चकमकीच्या अनेक घटना घडत असताना तेथे मात्र काहीच केले जात नाही आणि दुसरीकडे गुजरातला मात्र याच प्रकरणी उगाचच लक्ष्य केले जात आहे, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
कॉंग्रेस पक्ष देशात आपल्या विरोधकांना दाबण्यासाठी आणि क्वात्रोची व ऍण्डरसनसारख्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी सीबीआयचा खुलेआमपणे दुरुपयोग करीत आहे. यावरून हे स्पष्ट होते की, कॉंग्रेसची प्रतिबद्धता ही देशवासीयांप्रती नाही, असेही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. त्यामुळेच सीबीआयच्या कामकाजाचे पोस्टमार्टम करण्यासाठी या विभागाच्या गैरवापराची चौकशी करण्यासाठी जेपीसीची त्वरित स्थापना करावी, अशी मागणीही गडकरी यांनी केली आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्या नेतृत्वात "बिमारू बिहार'ला "जुझारू बिहार'मध्ये परिवर्तित केल्यामुळे राज्यातील जनतेने येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा याच नेतृत्वाच्या हाती पुढील पाच वर्षांसाठी सत्ता सोपवावी, असे आवाहनही गडकरी यांनी राज्यातील जनतेला केले आहे. भाजपा-जदयुच्या शासन काळात राज्यात विकासाचा झंझावात सुरू झालेला आहे. हा झंझावात सुरू ठेवण्यासाठी आणि अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्यासाठी या युतीला पुन्हा निवडून द्या, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. राज्यात प्रथमच एक असे सरकार आले आहे की जे जनतेला अनुरूप काम करीत चांगले परिणाम देत आहे, असेही गडकरी म्हणाले.
गेल्या शासन काळात बिहारला केवळ निंदाच सहन करावी लागली होती. आता मात्र रालोच्या युती शासन काळानंतर राज्यातील विकास कामांमुळे जनतेचीही मानही उंचावली आहे. बिहारचा विकास दर ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि हे एक आश्चर्य आहे, असेही गडकरी यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले.

मिकी अद्याप बेपत्ताच!

पत्नीची जबानी नोंद

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - नादिया तोरादो मृत्यू प्रकरणी मुख्य संशयित म्हणून घोषित झालेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे अद्याप बेपत्ताच आहेत. गुन्हा विभागाकडून प्रत्यक्षात त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याचे अजिबात जाणवत नाही परंतु मिकी पाशेको यांच्या मर्जीतल्यांना मात्र जबानीसाठी पाचारण करून त्यांना घाम काढण्याचे सत्र मात्र या विभागाकडून सुरूच आहे.नादिया तोरादोे हिच्या मृत्यूचा छडा लावण्यापेक्षा मिकी पाशेको यांची राजकीय कारकीर्द धुळीस मिळवून त्यांना कायमस्वरूपी देशोधडीला लावण्याचाच हा प्रकार आहे व त्यात कायद्यापेक्षा राजकीय हेतूच अधिक प्रमाणात दिसून येतो,अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मिकी पाशेको यांच्या दुसऱ्या पत्नी वायोला हिला आज गुन्हा विभागाच्या दोनापावला येथील कार्यालयात जबानीसाठी पाचारण करण्यात आले होते.आज सकाळी कार्यालयात हजार झालेल्या वायोला हिची संध्याकाळपर्यंत चौकशी करण्यात आली असून दुपारी केवळ एक तास तिला जेवणासाठी वेळ देण्यात आला. तिचे वकील यतीश नाईक हे तिच्यासोबत आले होते पण जबानीच्या वेळी पोलिसांनी मात्र वकिलांना तिच्यासोबत राहण्यास विरोध केला. या प्रकरणी अधिकृत अर्ज करूनही तो नाकारण्यात आला, असेही ते म्हणाले. मिकी पाशेको व नादिया हिच्या संबंधांबाबतीतच्या अनेक प्रश्नांचा भडिमार वायोला हिच्यावर करण्यात आला, अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान, मिकी पाशेको यांचा मात्र अद्याप पत्ताच नसून त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हा विभाग विशेष प्रयत्न करीत नसल्याचेच स्पष्टपणे जाणवत आहे. या प्रकरणाचे निमित्त करून पाशेको यांच्या मर्जीतल्यांना जेरीस आणून त्यांची पूर्ण छबीच बदनाम करण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत सुरू आहे, अशीही टीका आता होऊ लागली आहे.

आता "सरकारी बाबू' विदेश दौऱ्यावर!

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्र्यांचे विदेश दौरे हा वादाचा मुद्दा बनला असतानाच या परिस्थितीत उद्या १३ रोजी पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांच्या नेतृत्वाखाली गोवा नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ युरोप वारीवर जात असल्याने सचिवालयात तो चर्चेचा विषय बनला आहे. युरोपीय देशांतील विविध जगप्रसिद्ध प्रकल्पांची पाहणी करून त्याचा नेमका उपयोग राज्य सरकारने घोषित केलेल्या प्रकल्पांसाठी करता येणे शक्य आहे का, याचा अभ्यास हे शिष्टमंडळ करणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सध्या संपूर्ण राज्याची धुरा आपल्या खाद्यांवर घेतली आहे. मंत्रिमंडळातील त्यांचे बहुतेक सहकारी विदेश वाऱ्यांतच व्यस्त असून सरकारचे काम जवळजवळ ठप्प झाले आहे. आता प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनाही विदेश वाऱ्यांवर घेऊन जाण्याचे नवे फॅड झाले आहे. पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पंधरा दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी उद्या १३ रोजी प्रयाण करीत आहे. या शिष्टमंडळात मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, विज्ञान,तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्याचे संचालक मायकल डिसोझा व कार्मिक खात्याचे संयुक्त सचिव यतींद्र मराळकर यांचा समावेश आहे, अशी खबर आहे. स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी अशा विविध युरोपीय राष्ट्रांचे भ्रमण हे शिष्टमंडळ करणार आहे. पोर्तुगालमधील लिस्बन तसेच फ्रान्समधील पेरीस आदी शहरांनाही हे शिष्टमंडळ भेट देणार असून तेथील जगप्रसिद्ध प्रकल्पांची पाहणी करून त्याचा उपयोग इथल्या नियोजित प्रकल्पांसाठी काही करता येईल का, याची पाहणी व अभ्यास हे शिष्टमंडळ करेल. कला आणि विज्ञानासंबंधी विविध जगप्रसिद्ध प्रकल्प या देशांत उभारण्यात आले आहेत.मायकल डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपण या दौऱ्यात प्रामुख्याने दोन उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून जात असल्याचे सांगितले.गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने इथे जागतिक दर्जाचे मत्स्यालय व तारांगण प्रकल्प उभारण्याची राज्य सरकारची योजना आहे.मत्स्यालयासाठी मिरामार येथे सुमारे ३३ हजार चौरसमीटर जमीन संपादनही करून ठेवली आहे. लिस्बन येथे अशाच प्रकारे केवळ १५ हजार चौरस मीटर जागेत जगप्रसिद्ध मत्स्यालय उभारण्यात आले असून त्याची नेमकी काय संकल्पना आहे हे आपण जाणून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.गोव्यात तारांगण प्रकल्प उभारण्याचाही विषय असल्याने त्याचीही माहिती जाणून घेणार,असे ते म्हणाले.जुन्या सचिवालयात आर्ट गॅलरी स्थापन करण्यात येणार आहे व त्या अनुषंगाने कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर हे तेथील अद्ययावत व कलात्मक पद्धतीने उभारलेल्या कला दालनांची पाहणी करणार आहेत.जर्मनी येथे अनेक तंत्रज्ञानयुक्त थिएटर उभारण्यात आली असून त्यात लाइट्स व संगीत तंत्रज्ञानाची नवी संकल्पना वापरण्यात आली आहे व त्यामुळे त्याची पाहणी करून येथील कला मंदिरांना या तंत्रज्ञानाचा काही वापर करता येईल का, हे पाहिले जाईल,असेही ते म्हणाले.
पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांना युरोप देशांचा अनुभव असल्याने व ते या भागांशी परिचित असल्याने ते या शिष्टमंडळाबरोबर जाणार असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.
दरम्यान, सरकारी सेवेतील काही ठरावीक अधिकारी हे विदेश वाऱ्यांसाठीच परिचित आहेत व त्यांनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मंत्र्यांबरोबर अनेक विदेश दौरे झोडले आहेत. मायकल डिसोझा, यतींद्र मराळकर आदी गोवा नागरी सेवेतील काही मोजकेच अधिकारी हे अत्यंत कार्यक्षम व प्रामाणिक म्हणून परिचित आहेत.या दौऱ्यामुळे सरकारचा नेमका हेतू काय हे जरी स्पष्ट झाले नसले तरी या अधिकाऱ्यांनाही विदेश दौरा करून इतर अधिकाऱ्यांच्या गणतीत आणून त्यांनाही मंत्र्यांच्या उपकारांत गुंतून ठेवण्याचाच हा डाव असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.

परदेशी गुन्हेगारांबाबत कॉंग्रेसचे नरमाईचे धोरण; भाजपची टीका

अर्जुनसिंग यांची प्रतिमा जाळली

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - भारतात गुन्हे करणाऱ्या परदेशी गुन्हेगारांविषयी कॉंग्रेस पक्ष सदोदित नरमाईची भूमिका घेते असा आरोप करून भोपाळ विषारी वायुगळती दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी आज केली. या घटनेसंबंधी २५ वर्षांनंतर लागलेला निवाडा पाहता या दुर्घटनेला जबाबदार लोकांना केवळ दोन वर्षांची सजा फर्मावली जाणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित वॉरन ऍंडरसन याला देशाबाहेर निसटण्यासाठी तत्कालीन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुनसिंग व पंतप्रधान राजीव गांधी यांनी साहाय्य केल्याचा ठपका असून त्याचा तपास लागलाच पाहिजे, असेही श्री.आर्लेकर म्हणाले.
गोवा प्रदेश भाजपतर्फे आज मुख्यालयाजवळ भोपाळ वायू गळती दुर्घटनेबाबत निषेध धरणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संशयाच्या घेऱ्यात सापडलेले माजी मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांच्या पुतळ्याचे दहन करून भाजप कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा निषेध केला. याप्रसंगी श्री.आर्लेकर बोलत होते.
भोपाळ येथे १९८४ साली वीज हजार लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युनियन कार्बाइडचा तत्कालीन अध्यक्ष वॉरन ऍंडरसन हा दुर्घटना घडताच देशाबाहेर निसटलाच कसा,असा सवाल श्री.आर्लेकर यांनी केला. त्याच्या निसटण्यास अर्जुनसिंग व राजीव गांधी हेच जबाबदार असल्याचे उघड होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे सरचिटणीस प्रा.गोविंद पर्वतकर यांनी आपल्या भाषणांत भोपाळ वायू गळती दुर्घटनेची चौकशी करण्यास जवळजवळ २५ वर्षे लागली व शिक्षा मात्र २ वर्षे हा निकाल असमाधानकारक असून एक प्रकारे समस्त भारतीयांचा अवमान असल्याचे उद्गार काढले. ऍंडरसन याला निसटण्यासाठी सरकारी सुरक्षा कवच कोणी प्रदान केले, त्याला दिल्लीला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय कुणी केली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समस्त देशवासीयांना मिळालीच पाहिजेत, अशी मागणीही यावेळी प्रा.पर्वतकर यांनी केली.
या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष केशव प्रभू, सचिव सदानंद शेट तानावडे, आमदार दिलीप परूळेकर, रूपेश कामत, वैदही नाईक, रूपेश हळर्णकर, विठू मोरजकर, ज्योती मसुरकर, भगवान हरमलकर, प्रमोद कामत, विजय चोडणकर, दिना बांदोडकर, प्रसाद प्रभुगावकर, आत्माराम बर्वे, सिद्धेश नाईक, अखिल पर्रीकर आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पणजी मंडळ अध्यक्ष पुंडलिक राऊत देसाई यांनी केले.

इंधनाचा वापर वाढला, दरवाढही परवडेल!

केंद्रीय पेट्रोलियम सचिवांचे तर्कट

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- पेट्रोलजन्य पदार्थांवरील वाढत्या किमतीमुळे पेट्रोल कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे व त्यामुळे केंद्राकडून अनुदानरूपी देण्यात येणाऱ्या भरपाईचा उच्चांक वाढत आहे. पेट्रोलजन्य पदार्थांच्या वापराचा चढता आलेख पाहता काही ठरावीक अपवाद वगळता लोकांना ती परवडणारी आहे, असे सांगून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव एस.सुदरेशन यांनी अप्रत्यक्षरीत्या पेट्रोल दरवाढीचे स्पष्ट संकेत दिले. गोकाक ते गोवा दरम्यानच्या गॅस पाइपलाइनची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या दोन वर्षांत गोव्याला गॅस पुरवठा होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पेट्रोल व डिझेलच्या दरांत वाढ होऊनही वापराचे चढते प्रमाण पाहता वाढीव दरही लोकांना परवडतील, असा टोलाही त्यांनी हाणला. पेट्रोल व डिझेलचे दर वाढले तरच लोक कमी बचतीचा गंभीरपणे विचार करू शकतील,अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.
तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या बेतुल येथील आरोग्य व पर्यावरण सुरक्षा प्रशिक्षण केंद्रात भेट देण्यासाठी गोवा दौऱ्यावर आलेले श्री.सुंदरेशन यांनी आज पत्रकारांची भेट घेतली.याप्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी खात्यासंबंधी विविध विषयांवर भाष्य केले. गोव्यात पेट्रोलच्या वापरात १४ टक्के, डिझेल-६ ते ७ टक्के व घरगुती गॅसच्या वापरात १० टक्के वाढ झाली आहे. वाहन खरेदीचे प्रमाण वाढल्याने ही वाढ होणे क्रमप्राप्त आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वांत जास्त गॅस जोडणी असलेले एकमेव राज्य म्हणूनही गोवाचा क्रमांक लागतो,असेही ते म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलवर प्रत्येक डिझेलमागे ३.५० रुपये, डिझेल - ३. ४० रुपये, केरोसीन - १८ रुपये व घरगुती गॅसवर प्रती सिलिंडर - २८० रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. पेट्रोल दरवाढीचा निर्णय हा केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दाबोळ ते बंगळूर गॅस पाइपलाइन गोकाकमार्गे गोव्याला देण्यात येणार असून सुमारे शंभर किलोमीटरच्या या गॅस पाइपलाइनवर ४०० कोटी रुपये गुंतवण्यात येणार आहेत. या गॅस पाइपलाइनचा उपयोग उद्योगांसाठी होणार आहे. या प्रकल्पामुळे उद्योगांना प्रोत्साहन मिळेलच पण घरगुती वापरासाठीही त्याचा वापर करता येणे शक्य होणार आहे. याप्रसंगी तेल व नैसर्गिक वायू महामंडळाच्या बेतुल येथील प्रकल्पाचे प्रमुख श्री.हजारिका तसेच विविध पेट्रोलियम कंपनींचे प्रतिनिधी हजर होते.