Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 29 May, 2010

नक्षल्यांनी 'ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस' उडवली

- ७५ ठार, २०० हून अधिक जखमी
- १३ डबे घसरले, मालगाडीचीही धडक
- पीसीपीएने जबाबदारी स्वीकारली

झारग्राम (प.बंगाल), दि. २८ : मुंबईच्या दिशेने निघालेल्या हावडा-कुर्ला ज्ञानेश्वरी एक्सप्रेसला माओवाद्यांनी काल मध्यरात्री झारग्रामजवळ रूळाखाली दडविलेल्या सुरूंगांचा स्फोट घडवून ७५ निष्पाप प्रवाशांचे प्राण घेतले. या स्फोटामुळे आठ डबे घसरून कलंडले. त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणारी मालगाडी कलंडलेल्या डब्यांवर आदळल्याने पाच डबे अक्षरश: चक्काचूर झाले. त्यामुळे या अपघाताची भीषणता अधिकच वाढल्याने मृतकांचा आकडाही वाढला. या अपघातात २०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. पीपल्स कमेटी अगेन्स्ट पोलिस ऍट्रॉसिटीज (पीसीपीए) या माओवादी समर्थित संघटनेने या घातपाताची जबाबदारी घेतली आहे. तशी पत्रकेही घटनास्थळी सापडली आहेत. पश्चिम बंगालच्या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात हा अपघात घडला. मध्यरात्रीनंतर दीड वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस खेमासोली आणि सारदिया स्थानकादरम्यान धावत असताना नक्षल्यांनी हा स्फोट घडवून आणला. जखमींना विविध ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये माओवाद्यांचा निषेध सप्ताह सुरू आहे. त्याच कालावधीत हा घातपात घडविण्यात आला आहे.
मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे एकच हाहाकार माजला. रात्रीची वेळ असल्यामुळे मदत कार्यातही अडथळे येत होते. काही प्रवासी तर चक्काचूर झालेल्या डब्यांच्या खाली असे काही अडकले होते की, त्यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. सकाळ उजाडल्यावरच डबे कापून त्यांना बाहेर काढण्यात आले.
लष्कराची मदत
घटनेची तीव्रता लक्षात घेता तातडीने लष्कराला पाचारण करण्यात आले. तसेच वायुदलाचे हेलिकॉप्टर्सही मदतीसाठी पाठविण्यात आले. गंभीर जखमींना उपचारासाठी हलविण्याचे काम या हेलिकॉप्टर्सनी केले. अपघाताचे वृत्त समजताच रेल्वेने वायुदलप्रमुखांशी संपर्क साधला आणि मदतीची विनंती केली. त्यांनी मदतकार्यासाठी तत्काळ होकार दिला. याशिवाय विशेष वैद्यकीय पथकेही रवाना करण्यात आली.
पीसीपीएने घेतली जबाबादारी
हा घातपात घडवून आणणाऱ्या पीसीपीए या संघटनेने म्हटले आहे की, आम्ही यापूर्वीही जंगलमहल परिसरातून संयुक्त सुरक्षा पथक हटविण्याची मागणी केली होती. पण, आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे पाऊल उचलल्याचे पत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तथापि, या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी यामागे आमचा हात नसल्याचे म्हटले आहे.
मागील वर्षी २७ ऑक्टोबर रोजी पीसीपीएने "बंद'दरम्यान राजधानी एक्सप्रेस अडविली होती.
योजनाबद्ध कारवाई
ज्ञानेश्वरी एक्सप्रेस ज्या मार्गावरून जाणार, त्याचवेळी विरूद्ध दिशेने मालगाडी येण्याची वेळ हेरून नक्षल्यांनी हा घातपात घडवून आणला. अधिकाधिक संख्येत प्रवासी मारले जावेत, या निर्दयी उद्देशाने त्यांनी हे निर्घृण कृत्य केले. त्यांनी आधी ज्ञानेश्वरी जेथून जाणार, त्या ठिकाणी रूळाखाली बॉम्ब पेरून ठेवले आणि गाडी येताच त्याचा स्फोट घडवून आणला. यामुळे सुमारे दोन फुटाचा रूळ तुटून पडला आणि डबा त्यावरून जाताच तो उसळून अन्य आठ डबे रूळावरून घसरले आणि कलंडले. त्याचवेळी आलेल्या मालगाडीचे डबे या कलंडलेल्या डब्यांवर जाऊन आदळले आणि त्यात ७५ प्रवाशांचे प्राण गेले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, रूळ तीन फूट उंच उडून वाकले.
ममता बॅनर्जींची घटनास्थळी भेट
घटनेची माहिती मिळताच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी बोलताना रेल्वेमंत्री म्हणाल्या की, हावडा-कुर्ला गाडीचा घातपात स्फोटाने घडवून आणण्यात आला. घातपाताच्या ठिकाणी टीएनटी स्फोटके आणि जिलेटीनच्या कांड्याही सापडल्या आहेत. टीएनटी दारूगोळा हा रणगाड्यांमधून सोडण्यात येणाऱ्या बॉम्बसाठी वापरण्यात येतो, हे येथे उल्लेखनीय. माओवाद्यांच्या या घातपातामुळे अनेक निरपराधांना आपले प्राण गमवावे लागतात, ही अतिशय दु:खद बाब आहे. निष्पाप लोकांच्या जिवाशी असा खेळ व्हायला नको, अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी घटनेबाबत खेद व्यक्त केला.
मृतांच्या आप्तांना रेल्वेतर्फे
पाच लाखाची मदत, रोजगाराची हमी

या अपघातात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जखमींना १ लाख रुपये दिले जाणार आहेत. शिवाय, मृतांच्या कुटुंबीयांपैकी एकाला रेल्वेतर्फे रोजगाराचेही आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आहे.
या घटनेनंतर सर्व रेल्वेमार्गांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

लोगो-अमली पदार्थ प्रकरण सीबीआयकडे चौकशी देण्यास सरकार तयार नसल्याचे स्पष्ट

उच्च न्यायालयाची २ जूनपर्यंत मुदत
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): पोलिसांच्या ड्रग माफियांशी असलेल्या संबंधाचे तपासकाम अद्याप "सीबीआय'कडे देण्याचा कोणताही विचार नसल्याचे आज राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला कळवले. गरज भासल्यास आम्ही तपास अधिकारी बदलू, असेही सांगितले. मात्र न्यायालयाने यावर ठोस वक्तव्य करण्याची सूचना सरकारला केली असून त्यासाठी येत्या बुधवार म्हणजे २ जून पर्यत वेळ सरकारला दिला आहे. दरम्यान, आशिष शिरोडकर याने केलेल्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून येत्या बुधवारी न्यायालय निवाडा जाहीर करण्याची शक्यता आहे.
सध्या या प्रकरणाची "सीआयडी' विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांमार्फत चौकशी केली जात आहे. ज्या अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी केली जाते त्याच्या हाताखाली यापूर्वी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर यांनी काम केले असल्याचेही निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. तसा प्रश्नही न्यायालयाने युक्तीवादाच्यावेळी सरकारी वकिलाला केला. यावेळी गरज भासल्यास सरकार तपास अधिकारी बदलून वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यास तयार असल्याचे उत्तर न्यायालयाला देण्यात आले.
हे प्रकरण सीबीआयला द्यावे की नाही हा निर्णय न्यायालयाला कळवण्यासाठी काल उशिरापर्यंत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या निवासस्थानी गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकाची बैठक झाली होती. त्यात हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यासाठी गृहखात्याने जोरदार विरोध केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस अधिकारीच या प्रकरणात गुंतलेले असल्याने त्याची गोवा पोलिसातर्फे चौकशी केली जात असल्याने न्यायालयाने तपासकामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आज सरकारने दिलेल्या उत्तराने न्यायालयाचे समाधान झाले नसल्याने येत्या बुधवारपर्यंत सरकारला न्यायालयात ठोस उत्तर देण्यास सांगितले आहे.
या प्रकरणात सात पोलिस सध्या तुरुंगात आहेत. दि. ८ फेब्रुवारी रोजी निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर आणि रामचंद्र काणकोणकर ऊर्फ "बिल्डर' या दोघांमध्ये मोबाईलवर झालेल्या संभाषणाची "केसडायरी' सादर करण्याचे आदेश आज पोलिसांना देण्यात आले आहेत. आशिष शिरोडकर हा "अटाला' आणि "दुदू' या ड्रग माफियांकडून हप्ते घेत होता, असा दावाही पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्यावर तुम्ही काय कारवाई त्याच्यावर केली आहे, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यावेळी याच प्रकरणात त्याला निलंबित करून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली.
--------------------------------------------------------
कोण ही प्रीती वायंगणकर...
निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर वापरत असलेल्या मोबाईल क्रमांक ....९७५ हा प्रीती वायंगणकर या तरुणीच्या नावावर असल्याची माहिती उघडकीस आली आहे. मात्र ही तरुणी बेपत्ता असून तिचा शोध लागत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आशिष शिरोडकर हा बनावट नावाने घेतलेले 'सिम कार्ड' वापरत होता का, या दृष्टीने पोलिसांनी तपास काम सुरू केले आहे. तसेच, बरेच पोलिस अधिकारी बनावट नावाने किंवा भलत्याच व्यक्तीच्या नावावर घेतलेले 'सिमकार्ड' वापरत असल्याचे उघडकीस आले आहे.

पाकमध्ये मशिदींवर हल्ल्यात ७० ठार

लाहोर, दि. २८ : पाकिस्तानमध्ये आत्मघाती अतिरेक्यांनी दोन मशिदींवर केलेल्या हल्ल्यात किमान ७० जण ठार झाले असून, अनेक जखमी झाले आहेत.
आज शुक्रवार असल्याने या दोन्ही मशिदींमध्ये दुपारचा नमाज अदा करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. नेमकी हीच बाब हेरून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि ग्रेनेड असलेले अतिरेक्यांचे दोन गट आज दुपारी १.४५ च्या सुमारास दोन वेगवेगळ्या मशिदींमध्ये घुसले आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. लाहोरच्या अतिशय गर्दीचा भाग असलेल्या गरही शाहू आणि मॉडेल टाऊन भागातील या मशिदींवर अतिरेक्यांनी हा हल्ला केला.
या अतिरेकी हल्ल्यात आतापर्यंत ७० जण ठार झाले असून, इतर अनेक जण जखमी झाले . जखमी झालेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे सरकारी मदत पथकाचे प्रवक्ते फहीम जहॉसाहेब यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. या दोन्ही मशिदी अहमदी समुदायाच्या असून, सुन्नी समुदायाच्या कट्टरपंथीयांनी यापूर्वीदेखील या मशिदींवर हल्ले केले आहेत. हल्ला झाल्यानंतर मशिदींमधून गोळीबार आणि स्फोटाचे आवाज ऐकू येत होते. या दोन्ही मशिदींना सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे.
मॉडेल टाऊन परिसरातील मशिदीतील परिस्थिती आता बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आली आहे. मात्र, गरही शाहू परिसरातील मशिदीत अनेक अतिरेकी लपून बसले असून, त्यांनी अनेक जणांना बंधक बनवले आहे, अशी माहिती पंजाब प्रांताचे पोलिस प्रमुख सलिम डोगर यांनी दिली आहे.
जिओ टीव्ही या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सात सशस्त्र अतिरेक्यांनी मॉडेल टाऊन भागातील मशिदीवर हल्ला केला. त्यापैकी ५ जणांना सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळ्या घालून ठार केले, तर एका जणाला जिवंत पकडले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या २८ जणांना उपचारासाठी जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.
हातात अत्याधुनिक बंदुका आणि शस्त्रास्त्रे आणि आत्मघाती हल्ल्यासाठी वापरण्यात येणारे कपडे घातलेले अनेक युवक गरही शाहू परिसरातील मशिदीत घुसताना पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मशिदीत प्रवेश करताना त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि ग्रेनेड्स फेकले, असेही सांगण्यात आले आहे.

साहित्याद्वारेच भारतीय भाषांची ताकद सिद्ध करणे गरजेचेः डॉ. नूर

पुंडलिक नायक यांना 'गोमंत शारदा'पुरस्कार प्रदान
पणजी, दि.२८ (सांस्कृतिक प्रतिनिधी): इतर भाषांपेक्षा भारतीय भाषेत दर्जेदार चांगल्या प्रमाणात साहित्याची निर्मिती होत आहे. परंतु त्याचा अनुवाद जेवढ्या प्रमाणात व्हायला हवा, तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत नाही. जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेचा दबदबा असल्याने त्या भाषेतील साहित्याला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळते, त्याकरिता भारतीय भाषांतून निर्माण होणाऱ्या साहित्याच्या जोरावर भारतीय भाषांची ताकद सिध्द करणे आवश्यक आहे, असे पंजाबी भाषेतील सुप्रसिध्द लेखक कवी आणि राष्ट्रीय साहित्यिक केंद्राचे उपाध्यक्ष डॉ.एस.एस. नूर यांनी सांगितले. कला अकादमीने आयोजित केलेल्या गोमंत शारदा पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावर्षीचे पुरस्काराचे मानकरी गोमंतकीय ज्येष्ठ लेखक नाटककार आणि कवी पुंडलिक नायक यांना यावेळी शारदा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर अकादमीचे उपाध्यक्ष परेश जोशी, सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई उपस्थित होते.
डॉ. नूर यांनी कला अकादमीतील वातावरण आणि निसर्गाची मुक्तकंठाने प्रशंसा करत पुढे सांगितले की, प्रत्येक भाषेमागे संस्कृती असते आणि त्यातूनच राष्ट्रीय संस्कृती तयार होत असते त्यामुळे कोणती भाषा किंवा संस्कृती नगण्य मानता येणार नाही. आज भारतातील जवळजवळ सर्वच विद्यापीठांतून इंग्रजी साहित्याचा तुलनात्मक साहित्य म्हणून वापर होत असतो, परंतु तसे न होता भारतीय साहित्याचा तुलनात्मक साहित्य म्हणून प्रत्येक विद्यापीठात अभ्यास होणे नितांत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. आज जगात १५० कोटी लोक चिनी, ५१ कोटी इंग्रजी तर ४८ कोटी लोक हिंदी भाषा बोलतात तरीही जगात इंग्रजी भाषेचाच दबदबा जास्त आहे. दर्जेदार साहित्य आणि भाषेची ताकद सिध्द करण्याकरिता भाषेतील लिपी निश्चित होणे गरजेचे आहे. कारण कोणतेही साहित्य त्या भाषेतील लिपीत वाचल्यास त्याच प्रभाव चांगला पडतो म्हणूनच भाषेची लिपी जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत भाषेची ताकद निश्चित होत नाही, असेही ते म्हणाले. कुठल्याही लेखकाने कोणत्याही भाषेत लेखन करायला हरकत नाही, परंतु त्या भाषेतील लिपीत लिहिणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पुरस्काराचा स्वीकार केल्यावर बोलताना पुंडलिक नायक यांनी कला अकादमीचे आभार मानले. लेखकाने कसे असावे हे सांगताना त्यांनी म्हटले की लेखकाने स्वतःला लेखक म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे. तसे केल्यास त्याची संवेदना तीक्ष्ण होते. लेखकाकडे केवळ प्रतिभाच नसते तर प्रज्ञा असतेे कारण तो समाजाचा प्रतिनिधी असतो.कोणतीही घटना घटताना प्रत्येक माध्यम आपापले कार्य करत असतात परंतु लेखक म्हणून लेखकाने आपले कार्य करणे आवश्यक आहे. घटना घडून गेल्यावर त्यावर लिहून काहीच उपयोग नाही. घटना घडताना त्यात लेखकाचा भाग असणे गरजेच आहे. शेवटी त्यांनी या पुरस्काराप्रमाणे ललित कला आणि संगीत नाटक यांनाही असाच पुरस्कार जाहीर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात गोमंतकातील नामवंत गायिका प्रचला आमोणकर यांनी ईशस्तवन सादर करून केली. परेश जोशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर डॉ. फळदेसाई यांनी मानपत्राचे वाचन केले.
आपल्या निरंतर साहित्यसेवेद्वारे साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान करून गोव्याच्या कीर्तीत बहुमूल्य भर घालणाऱ्या गोमंतकीय साहित्यिकांसाठी देण्यात येणारा हा पुरस्कार या अगोदर बा.द. सातोस्कर, रवींद्र केळेकर, डॉ. मनोहर सरदेसाई आणि मनोहर ह. सरदेसाई, शंकर रामाणी, चंद्रकांत केणी, लॅंबर्ट मास्कारेन्हस यांना देण्यात आला होता. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह, मानचिन्ह आणि रू. एक लाखाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ साकोर्डेकर यांनी केले तर डॉ. फळदेसाई यांनी आभार मानले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

८४ 'ज्येष्ठ' शिक्षकांना प्रतिबंधात्मक अटक

उपोषणाचा सरकारला धसका
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): वंचित निवृत्त शिक्षकांनी आपल्या मागण्यांप्रीत्यर्थ आज पणजीत काढलेल्या मोर्चावेळी पोलिसांनी तात्काळ प्रतिबंधात्मक अटक करून या शिक्षकांचा बेत फोल ठरवला. चर्चचौकावरून थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी मोर्चा काढून नंतर तिथे साखळी उपोषणाला बसण्याचा त्यांचा इरादा होता. चर्चचौक ते मुख्यमंत्री निवासस्थान या भागांत १४४ कलम लागू करण्यात आले होते व त्यामुळेच ही अटक करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली.
वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त झालेल्या सुमारे १०१६ शिक्षकांनी आपल्याला दोन वर्षांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे लावून धरली आहे. ते निवृत्त झाल्यानंतर लगेच सरकारने निवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षे केल्याने दोन वर्षांच्या वेतनाला ते मुकले, अशी त्यांची तक्रार आहे. आपल्या मागण्यांबाबत त्यांनी कृती करण्यासाठी सरकारला पंधरा दिवसांची नोटीस जारी केली होती पण या काळात काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्याची घोषणा केली होती. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात १४४ कलम लागू करण्याचा आदेश जारी केला. सकाळी १० वाजता इथे शिक्षक मोर्चा काढण्यासाठी जमले असता त्यांना तात्काळ भा.दं.सं १५१ कलमाअंतर्गत प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली. सुमारे ८४ शिक्षकांना ताब्यात घेऊन दुपारी त्यांची सुटका करण्यात आली. या परिसरात १४४ कलम ३ जूनपर्यंत कायम ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
अलीकडे मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर येऊन मोर्चा किंवा निषेध करण्याचे प्रकार वाढल्याने पहिल्यांदाच या परिसरात १४४ कलम लागू करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर घेण्यात आला. दरम्यान, वंचित निवृत्त शिक्षक मंचतर्फे मात्र सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. सरकारच्या चुकीमुळेच या शिक्षकांना रस्त्यावर येणे भाग पडले. बहुतांश सर्व शिक्षक हे ज्येष्ठ नागरिक असतानाही त्यांना अशा पद्धतीने अटक करण्याची ही कृती निषेधार्ह आहे,असा आरोपही यावेळी करण्यात आला.

चिमुरडीने पार केली मांडवी!

५ वर्षीय नताशाचा पराक्रम
पणजी, दि. २८(क्रीडा प्रतिनिधी): मडगाव येथील मनोविकास विद्यालयात "के.जी.दोन'मध्ये शिकणाऱ्या नताशा फर्नांडिस या ५ वर्षाच्या चिमुकलीने बेती जेटी ते मांडवी जेटी हे जवळपास ७०० ते ८०० मीटर्सचे अंतर लीलया पार करत आपल्या क्षमतेचे दर्शन घडविले. इनास रापोस यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिने जलतरणाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने हा पराक्रम केला आहे. तिला या कामगिरीसाठी केवळ २० मिनिटांचा कालावधी लागला. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव खास उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते तिला प्रशस्तिपत्र व करंडक देऊन गौरविण्यात आले. " नताशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास कोणतीही गोष्ट कठीण नाही याची शिकवण या चिमुरडीने समस्त गोव्यातील मुलांना घालून दिली आहे. दुधाचे दातही न पडलेल्या या मुलीने केलेली कामगिरी आणि तिच्या पालकांनी तिला केलेले साहाय्य हे कौतुकास्पद असल्याचे चर्चिल आलेमाव यांनी तिचे तोंडभरून कौतुक करताना सांगितले. ते पुढे म्हणाले की आमच्या वेळेस पालक आपल्या मुलांना व्हरांड्यातदेखील एकटे खेळायला सोडत नव्हते परंतु, अनिता व रुझारियो या फर्नांडिस दांपत्याने आपल्या चिमुरडीला जलतरणासारख्या धाडसी क्षेत्रात उतरण्यासाठी प्रोत्साहन दिले. या फर्नांडिस दांपत्याप्रमाणेच इतरांनी आपल्या मुलांना विविध क्रीडा क्षेत्रांत नाव कमावण्यासाठी व कारकीर्द घडविण्यासाठी सतत प्रोत्साहन दिल्यास गोवा राज्य कुठल्याही क्षेत्रात मागे राहणार नाही मग ते कला, क्रीडा असो वा अन्य कोणतेही, असेही श्री. आलेमाव यांनी यावेळी सांगितले.याच क्षेत्रात या मुलीचे भवितव्य उज्ज्वल असून तिने आपल्या शिक्षणा बरोबरच या क्रीडा प्रकाराचा सराव चालूच ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. सततची मेहनत व सरावाच्या जोरावर तिने हे यश संपादन केल्याचे तिची आई अनिता यांनी आनंदाने सांगितले.

Friday, 28 May, 2010

दहावीचा ८३.५० टक्के विक्रमी निकाल

नंदन पै काकोडे राज्यात पहिला
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च ते एप्रिल महिन्यात २३ केंद्रांतून घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल यंदा ८३.५० टक्के लागला असून गेल्या सात वर्षाच्या तुलनेत ही सर्वांत जास्त टक्केवारी आहे. परीक्षेला बसलेल्या १५ हजार ८०८ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार २०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलांनी बाजी मारली असून ७९.४१ टक्के विद्यार्थी तर, ७८.२४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचा निकाल जास्त लागला असला तरी विशेष श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांत मुलीच पुढे असल्याचे दिसून आले आहे. ९७९ मुली तर, ७१३ मुले विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी राज्यात पहिल्या क्रमांकावर नंदन नागेश पै काकोडे (९५.५० टक्के, महिला नुतन इंग्लिश विद्यालय, मडगाव), दुसऱ्या क्रमांकावर नेहा दरोचा (९५.१६ टक्के, दोना लियोनोर्र माध्य. विद्यालय, पर्वरी), तिसऱ्या क्रमांकावर ऐश्वर्या उगम उजगावकर (९४.६६ टक्के मुष्टिफंड माध्यमिक विद्यालय, पणजी) यांनी बाजी मारली आहे. २००४ साली ६३.५३ टक्के, २००५ मध्ये ५९ टक्के, २००६ साली ६९.५१ टक्के, २००७ मध्ये ७३.६३ टक्के, २००८ साली ६९.९४ टक्के तर, २००९ साली ७७.११ टक्के निकाल लागला होता. या परीक्षेत वीस विद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला, तर दोन विद्यालयांचा शून्य टक्के निकाल लागला आहे.
या परीक्षेला १५,८२४ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेल्यांपैकी एकूण १५,८०८ विद्यार्थी बसले होते. त्यातील १३,२०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या ९ हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ८ हजार ७२६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. फेरपरीक्षेला बसलेल्या १ हजार ९८४ विद्यार्थ्यांपैकी ८२६ जण उत्तीर्ण झाले आहेत. फेरपरीक्षेचा निकाल ४१.६३ टक्के लागला आहे.
उत्तर पत्रिकेच्या फोटो प्रतीसाठी शेवटची मुदत २४ जून आहे, तर फेरतपासणीसाठी लागणारा विनंती अर्ज शालान्त मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थी तो तेथून डाऊनलोड करून घेऊ शकतात. मात्र तो अर्ज विद्यालयाच्या प्रमुखांच्या सहीसह पर्वरी येथील मंडळाच्या कार्यालयात द्यावा लागणार आहे, अशी माहिती शालान्त मंडळाचे अध्यक्ष मॅवरिन डिसोझा यांनी दिली.
दहावीची परीक्षा घेण्यात आलेल्या २३ केंद्रांमध्ये फोंडा केंद्राने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर पर्वरी केंद्र आहे. फोंडा केंद्राचा ९१.६६ टक्के निकाल लागला आहे. तर, पर्वरी ९०.३२ टक्के निकाल लागला आहे. तसेच पणजी ८५.६३, मडगाव ८५.२३, म्हापसा ८६.६७, वास्को ८५.५०, डिचोली ८१.९१, काणकोण ७२,४, कुंकळ्ळी ७५.१४, कुडचडे ८१.९३, केपे ८३.६४, माशेल ८५.११, मंगेशी ८५.५५, पेडणे ६७.०९, पिलार ८०.८९, सांगे ७९.६७, साखळी ७६.८८, शिरोडा ७०.९०, शिवोली ७९.६२, तिस्क धारबांदोडा ७०.६६, वाळपई ७१.४७, नावेली ९३.०१, तर मांद्रे केंद्राचा ७८.९३ टक्के निकाल लागला.
-----------------------------------------------------------
या वर्षापासून श्रेणी पद्धती...
२०११ सालापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी पद्धती लागू केली जाणार आहे. त्यामुळे "डिस्टिंक्शन',"फर्स्ट क्लास', "सेकंड क्लास' असे वर्ग नसतील. याविषयीची मान्यता राज्य सरकारने दिली असून दोन दिवसांपूर्वीच या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे श्री. डिसोझा यांनी सांगितले. "ए' ते "आय' पर्यंत ही श्रेणी असणार आहे. "ए' ते "जी' पर्यंत श्रेणी मिळवणारे विद्यार्थीच उत्तीर्ण होणार आहेत तर, उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात ३० टक्के गूण मिळवणे गरजेचे आहे. यापूर्वी उत्तीर्ण होण्यासाठी ३५ टक्के गूण मिळणे महत्त्वाचे होते. तसेच, विद्यालयात होणाऱ्या परीक्षा विद्यार्थी गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात आल्यानेही त्या परीक्षांचे गुण तसेच, विविध प्रकल्प व उपक्रमाचे असे २० टक्के गूण अंतिम परीक्षेत ग्राह्य धरले जाणार आहेत.
--------------------------------
क्रीडा धोरणाचा ११३ विद्यार्थ्यांना लाभ
राज्य सरकारने लागू केलेल्या क्रीडा धोरणाचा ११३ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यात २७ विद्यार्थिनींचाही समावेश आहे.
---------------------------------------
सरकारी विद्यालयांची विशेष कामगिरी...
राज्यातील वीस विद्यालयांनी शंभर टक्के निकाल लावण्याचा मान मिळवला असून त्यांचे मंडळातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या वीस विद्यालयांमध्ये चक्क सात सरकारी माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे बोरी येथील मतिमंद मुलांसाठी असलेल्या विद्यालयाचाही निकाल शंभर टक्के लागला आहे. याचे श्रेय शालान्त मंडळाने त्या विद्यालयातील शिक्षकांना दिले आहे.
----------------------------------
शून्य टक्के निकाल...
शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यात दोन विद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. चंद्रनाथ एज्युकेशन सोसायटी असोल्डा, चांदर या विद्यालयातील ४ पैकी ३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सेंट ऍन्थनी विद्यालय असोल्णा, सासष्टी या विद्यालयातील ९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील एकाच विद्यार्थ्याला "एटीकेटी' मिळाली.
------------------------------------------------
शंभर टक्के निकाल लागलेली विद्यालये...
शिवाजी राजे माध्यमिक विद्यालय, खोलपावाडी साळ
सरकारी माध्यमिक विद्यालय, गवळ- खोला, काणकोण
सेंट तेरेझा माध्यमिक विद्यालय, वास्को
लोकमान्य टिळक विद्यालय, कवळे-फोंडा
सेंट मेरी माध्यमिक विद्यालय, फोंडा
डॉ. सखाराम गुडे विद्यालय, वजनगाळ शिरोडा
सरकारी माध्यमिक विद्यालय, गांजे -उजगाव
श्री नवदुर्गा एज्युकेशन व कल्चरल सोसायटी विद्यालय
लोकविश्वास प्रतिष्ठान मिडल विद्यालय ढवळी, फोंडा
सरकारी माध्यमिक विद्यालय, शेल्डे केपे
सरकारी माध्यमिक विद्यालय मायणा, केपे
सरकारी माध्यमिक विद्यालय आंबावली, केपे
फातिमा कॉन्व्हेंट माध्य. विद्यालय, मडगाव
श्री दामोदर विद्यालय, मडगाव
प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट माध्यमिक विद्यालय, मडगाव
अवर लेडी ऑफ सुकूर माध्यमिक विद्यालय, वेर्णा मडगाव
असुमप्ता कॉन्व्हेंट माध्य. विद्यालय, सारझोर- चिंचीणी सासष्टी
सरकारी माध्य. विद्यालय नेत्रावळी, सांगे
सरकारी माध्य. विद्यालय, शेळप- सत्तरी
अवर लेडी ऑफ रोझरी विद्यालय करंझाळे, दोनापावला
------------------------------------------
दोन विषयात नापास विद्यार्थ्यांना 'एटीकेटी'
या वर्षीपासून पहिल्यांदाच दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना "एटीकेटी' देण्यात आली आहे. त्यामुळे दोन विषयांत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे. परंतु, त्यांना ऑक्टोबर किंवा मार्च महिन्यात त्या दोन विषयांत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, अन्यथा त्यांना बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही. एका विषयात नापास झालेल्या ४२७ विद्यार्थ्यांना "एटीकेटी' तर दोन विषयांत नापास झालेल्या ५८६ विद्यार्थ्यांना "एटीकेटी'चा लाभ मिळाला आहे.

साडेतीन लाखांचा चरस डिचोली छाप्यात जप्त

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): डिचोली येथील शानभाग हॉटेलच्याबाहेर काल मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने साडेतीन लाख रुपयांचा ३ किलो ५१० ग्राम चरस जप्त केला. यात मूळ नेपाळ येथे राहणारे रामपाल वासुदेव पटेल व विश्वनाथ शीतल प्रसाद या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वरील अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आज या दोघांना सायंकाळी डिचोली प्रथम वर्ग न्यायालयात हजर करून ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. दोन्ही संशयित अट्टल गुन्हेगार असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांच्याविरोधात अन्य राज्यात पोलिस स्थानकांत किंवा गोव्यात गुन्हे नोंद आहेत का, याची पाहणी केली जात असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार डिचोली येथे अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहक बनवून या दोघांना ताब्यात घेण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार त्या दोघांकडे अमली पदार्थाची मागणी करून त्यांना काल भेटण्यासाठी बोलावले होते. मध्यरात्री रामपाल व विश्वनाथ ठरल्यानुसार चरस घेऊन विक्रीसाठी आले असता आधीच दबा धरून बसलेल्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दोघांची झडती घेतली असता रामपाल याच्याकडे १ किलो ५४५ ग्राम तर विश्वनाथ याच्याकडे १ किलो ९६५ ग्राम चरस सापडला, अशी माहिती या पथकाचे पोलिस अधीक्षक वेनू बन्सल यांनी दिली.
सदर छापा श्री. बन्सल व उपअधीक्षक नरेश म्हामल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गुडलर, पोलिस शिपाई ईमय्या गुरय्या, श्रीनीवासदो पिदूगो, नागेश पार्सेकर, समीर वारखंडेकर व सदाशिव गावडे यांनी टाकला. या विषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक गुडलर करीत आहेत.

८० संगणक शिक्षक सेवेत नियमित

उर्वरित शिक्षकांची अधिसूचना लवकरच
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): शिक्षण खात्यातर्फे सरकारी विद्यालयांतील ८० संगणक शिक्षकांना सेवेत नियमित करण्यासंबंधीची अधिसूचना आज सरकारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिलेल्या आश्वासनाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून उर्वरित शिक्षकांना सेवेत नियमित करण्याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
गेली कित्येक वर्षे सरकारी सेवेत कंत्राटी पद्धतीवर सेवा बजावत असलेल्या सुमारे ५२० संगणक शिक्षकांना सेवेत नियमित करण्याची मागणी प्रलंबित होती. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी या शिक्षकांच्या मागणीसंबंधी विचार करून त्यांना टप्प्याटप्प्याने सेवेत नियमित करून घेण्याचे आश्वासन विधानसभेत दिले होते. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी या शिक्षकांना सेवेत नियमित करण्याचे आदेश जारी करण्यात येतील, अशी शक्यता होती. आज सरकारने जारी केलेल्या सरकारी राजपत्रात विविध सरकारी विद्यालयांतील ८० शिक्षकांना सेवेत नियमित करण्यासंबंधीची अधिसूचना प्रसिद्ध करून या शिक्षकांच्या पहिल्या तुकडीला दिलासा दिला. उर्वरित अनुदानप्राप्त विद्यालयांतील संगणक शिक्षकांना सेवेत नियमित करण्यासंबंधीचे आदेश लवकरच जारी करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
सरकारच्या या अधिसूचनेचे स्वागत करून अखिल गोवा संगणक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांपासून सेवेत नियमित होण्याच्या आशेवर असलेल्या या शिक्षकांचे परिश्रम फळाला लागल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

झी मराठीच्या 'सारेगमप'साठी गोव्याच्या चौघांची निवड

पणजी, दि. २७ (सांस्कृतिक प्रतिनिधी): झी मराठी चॅनलच्या "सारेगमप' या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमासाठी प्रथमच गोव्याच्या चौघा मुलांची निवड झाली असून त्यामुळे कलाकारांची खाण असलेल्या गोमंतभूमीतील रसिकांना सुखद धक्का बसला. रीशप साठे, केदार डिचोलकर, शैलेश पेंडसे व संजना देसाई अशी या गोड गळ्याच्या गायकांची नावे आहेत.
कला अकादमी संकुलात झालेल्या निवड चाचणीत एकूण नऊ मुलांची निवड करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून झी मराठीवरील गाजत असलेल्या "सारेगमप' कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून मुलांची निवड करण्यात येते. गोव्यात प्रथमच झालेल्या या निवड चाचणीत गोवा, सावंतवाडी, कोल्हापूर, वेंगुर्ला, बेळगाव, कारवार आणि इतर जवळपासच्या ठिकाणाहून सुमारे १३५ मुलांनी भाग घेतला होता. त्यात मुग्धा सौदागर (सावंतवाडी) राज बिच्चू (बेळगाव) अमृता पेडणेकर (वेंगुर्ला), प्रणव अभ्यंकर (बेळगाव), अभिजीत चव्हाण (कोल्हापूर) या अन्य स्पर्धकांची निवड करण्यात आली. सकाळपासून सुरू झालेल्या या निवड चाचणीसाठी मुलाबरोबर त्यांच्या पालकांचीही अकादमीत गर्दी झाली होती.
या प्रतिनिधीशी बोलताना झी मराठी चॅनेलचे कार्यक्रम निर्माते म्हणाले की, झी मराठीचे हे पर्व गेली चार वर्षे जोमाने सुरू आहे. त्यास लोकांचा तुफानी प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत झी मराठीने महाराष्ट्राच्या विविध भागांतून मुलांची या कार्यक्रमासाठी निवड केली. आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम करत आहोत. गोवा हे तर कलेचे माहेरघर. येथील मुलांना या कार्यक्रमात संधी मिळावी आणि त्यांच्यातील कलेला वाव मिळावा यासाठी गोव्याची निवड आम्ही केली. गोव्याहून इतर ठिकाणी जाऊन चाचणी द्यायची म्हणजे प्रवास आणि खर्चाच्या दृष्टीने महाग असल्यामुळे झी मराठीने येथील मुलांपर्यंत पोहोचण्याचे ठरवले. या निवड चाचणीला गोव्यातून झकास प्रतिसाद मिळाला. चाचणीत सहभागी झालेली सर्वच मुलांना संगीताची चांगलीच जाण असल्याने ही निवड चाचणी उत्कृष्ट दर्जाची ठरली, असेही त्यांनी नमूद केले.

पोलिस व ड्रग माफिया प्रकरणाचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): 'पोलिस व ड्रग माफिया प्रकरण' केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयीचा निर्णय घेण्यासाठी आज (गुरुवारी) सायंकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी गृहमंत्री रवी नाईक, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांची बैठक सुरू होती. उद्या (शुक्रवारी) सकाळी हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवणार की नाही, याबद्दल न्यायालयाला नेमकी माहिती द्यावयाची असल्याने आज रात्रीच त्यावर निर्णय होईल अशी शक्यता आहे.
याविषयी आज दुपारी मुख्यमंत्री कामत यांना विचारले असता, "मी अद्याप या प्रकरणाची फाईल पाहिलेली नाही. आज सायंकाळी या विषयीची फाईल माझ्यापर्यंत येणार आहे' असे ते म्हणाले. मात्र रात्री उशिरा या प्रश्नी सरकारने कोणता निर्णय घेतला ते कळू शकले नाही.
ड्रग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित झालेला पोलिस निरीक्षक आशिष शिरोडकर याने केलेला जामीन अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीसाठी आला होता. या प्रकरणात पोलिस अधिकारी गुंतले आहेत आणि त्याचा तपास त्याच राज्यातील पोलिस करतात असे निदर्शनाला आल्यानंतर राज्य सरकारचा हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्याचा विचार आहे का, अशी विचारणा खंडपीठाने केली होती. तसेच यासंदर्भात नेमके काय करणार याबाबत दि. २८ पर्यंत कळवण्याची सूचना खंडपीठाने केली होती. त्यामुळे याविषयीचा निर्णय उद्या न्यायालयात कळवला जाणार आहे.

Thursday, 27 May, 2010

निलंबित पोलिसांची चौकशी सीबीआयला सोपवणार का?

उच्च न्यायालयाची विचारणा
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): ड्रग प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप झालेले असूनही त्यांची स्थानिक पोलिसांद्वारेच चौकशी केली जात असल्याचे लक्षात येताच हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे का, असा सवाल करून येत्या शुक्रवार दि. २८ मे पर्यंत उत्तर देण्याचा आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. न्यायालयीन कोठडीत असलेला निलंबित निरीक्षक आशिष शिरोडकर यांनी जामिनासाठी केलेल्या अर्जाच्या सुनावणीवेळी न्यायालयाने ही विचारणा केली.
स्थानिक पोलिसांच्याच विरोधात गंभीर आरोप असल्याने त्याची त्या राज्याच्याच पोलिसांनी चौकशी करण्याने पक्षपात होण्याची शक्यता असते. अशा वेळी त्याची चौकशी स्वतंत्र यंत्रणेद्वारे केली जावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे. याचा दाखला देत यापूर्वी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीही हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्याची मागणी केली होती. तेव्हाच याचा योग्य प्रकारे तपास होऊ शकेल, असे म्हटले होते.
या प्रकरणाची व्याप्ती बरीच खोलपर्यंत गेल्याचे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या लक्षात येताच न्यायालयानेही हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यासाठी राज्य सरकार तयार आहे का, याची माहिती मागितली. तर, आशिष शिरोडकर याच्या वकिलाने आपल्या अशिलाना पोलिसांनी विनाकरण या प्रकरणात गुंतवल्याचा युक्तिवाद केला.
-----------------------------------------------------------------------
वरिष्ठ अधिकाऱ्यांची जबानी
मालखान्यातील अमली पदार्थ गायब असल्याने न्यायालयाने यावर गुन्हा अन्वेषण विभागाला स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याने अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवून घेण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळी पोलिस उपअधीक्षक नरेश म्हामल, उपनिरीक्षक सुनील गुडलर यांचा जबानी नोंद करून घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बदली झाल्यानंतर आम्ही मालखान्याचा ताबा स्वाधीन केला होता त्यावेळी सर्व अमलीपदार्थ व्यवस्थित होता, असा दावा अटकेत असलेला पोलिस उपनिरीक्षक पुनाजी गावस यांनी आपल्या जबाबात केला आहे.

मला लवकर फासावर चढवा अफझल गुरूही कोठडीला कंटाळला

नवी दिल्ली, दि. २६ : फाशीची शिक्षा जाहीर झाल्यानंतर दयेचा अर्ज दाखल करून चार वर्षे उलटून गेली तरी त्यावर काही निर्णय न झाल्याने संसद हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू कंटाळला आहे. त्याने आपला अर्ज लवकर निकालात काढावा, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
अफझल गुरूचे वकील एन. डी. पांचोली यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, गुरू सध्या कारावासाला प्रचंड कंटाळला आहे. त्याने फाशीची शिक्षा रद्द करण्याबाबत दयेचा अर्ज दाखल केला होता. पण, त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने तो कंटाळला आहे. त्याचे म्हणणे आहे की, सध्याचे कारावासातील दिवस हे मरणाहून भयानक आहेत. यापेक्षा फाशीवर चढविलेले बरे, अशी त्याची भावना आहे. त्यामुळे अर्जावर लवकर निर्णय व्हावा, असे वाटू लागले आहे.
साधारणत: फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला त्याच्या अर्जावर जितका उशीर होत असेल तितके चांगलेच असते. पण, गुरूला हे दिवस जास्त कठीण वाटत आहेत. अर्जावरील निर्णय लांबत असल्याने तो नाखुश आहे. याविषयीचा निर्णयच आपल्याला मदतनीस ठरू शकेल, असे त्याला सध्या वाटत आहे.
शिवाय, त्याने जम्मू-काश्मिरातील कारागृहात आपल्याला स्थानांतरित करण्यात यावे, अशीही विनंती केली आहे. तिथे राहिला तर त्याचे कुटुंबीय त्याला भेटू शकतील, अशी त्याची भावना आहे.
सध्या त्याच्या दयेचा अर्ज दिल्लीच्या नायब राज्यपालांपर्यंत आला आहे. दिल्ली कोर्टाने त्याला १८ डिसेंबर २००२ रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबर २००३ ला शिक्कामोर्तब केले. मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली होती. सत्र न्यायालयाने तर त्याच्या फाशीची तारीखही जाहीर केली होती. पण, दरम्यानच्या काळात त्याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला. तो त्यांनी गृहमंत्रालयाकडे शेरा मारण्यासाठी पाठविला.

जया बच्चन यांना सपाची उमेदवारी

लखनौ, दि. २६ : उत्तरप्रदेशातून राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता समाजवादी पक्षाने जया बच्चन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयाबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. येत्या १० जून रोजी राज्यात राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. जया बच्चन यांच्यासह राशीद मसूद यांनाही उमेदवारी देण्याचा निर्णय समाजवादी पार्टीने घेतला आहे. उत्तरप्रदेश विधानसभेत सपाची सदस्यसंख्या कमी झाल्याने केवळ दोनच नेते राज्यसभेवर जाऊ शकणार आहेत. राज्यातील ७ विद्यमान खासदार यंदा जुलैत निवृत्त होत आहेत. त्यात जया बच्चन यांचाही समावेश आहे. अमरसिंग यांच्या हकालपट्टीनंतर आता जया बच्चन यांना पक्षातर्फे दुसऱ्यांदा उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच, असे मानले जात होते. कारण जया बच्चन या अमरसिंगांमुळेच सपात आल्या होत्या. पण, सपाने त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सध्या सपाचे राज्यसभेत ११ खासदार आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षातर्फे तीन उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात बलराम यादव, रामसुंदर दास आणि रामनरेश यादव यांचा समावेश आहे. सध्या विधानपरिषदेत सपाचे पाच आमदार आहेत.

टेंपोच्या जबर धडकेने विद्यार्थी जागीच ठार

कासावली येथील दुर्घटना
वास्को, दि. २६ (प्रतिनिधी): नुकत्याच झालेल्या बारावी परीक्षेत प्रथम वर्गात उर्त्तीण झालेल्या शेरिफ जेरिको डीमेलो या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा आज कासावली येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. वेळसांव येथील शेरीफ आपल्या दुचाकीवरून जात असताना मागून त्यास टेंपोने जबर धडक दिली. त्यात तो दुचाकीवरून खाली पडून टेंपोखाली सापडला.
आज सकाळी ८.५० च्या सुमारास सदर अपघात घडला. १८ वर्षीय शेरिफ हा आपल्या "डीओ' दुचाकीवरून (क्रः जीए ०६ एच १३४७) कासावली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून निघाला होता. त्यावेळी त्याला मागून येणाऱ्या "मॅटॅडोर' टेंपोने (क्रः जीए ०२ व्ही ५७५९) जबर धडक दिली. त्यामुळे शेरिफ दुचाकीवरून उसळून रस्त्यावर पडला व टेंपोखाली सापडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला त्वरित बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले असता तेथे त्यास मृत घोषित करण्यात आले. घटनास्थळी जाऊन वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. टेंपोचालकजेरोनी फर्नांडिस (वय ४५, राः कासावली) याच्या विरुद्ध भा.द.स २७९ व ३०४(ए) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे. शवचिकित्सेनंतर शेरिफचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
मुरगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसांत अपघातात मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुशांत गावस तपास करीत आहेत.

वीज खात्याच्या भूखंडांचे दस्तऐवजीकरण करणार

वीजमंत्र्यांनी दिलेली माहिती
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): वीज खात्याच्या ताब्यात असलेल्या भूखंडांचे सर्वेक्षण करून त्याचे व्यवस्थित दस्तऐवजीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी घेतला आहे. सरकारी छापखान्याचे संचालक एन. डी. अगरवाल यांची याकामी प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मंत्री सिक्वेरा यांनी ही माहिती दिली. वीज खात्याची राज्यात विविध ठिकाणी जमीन असून तिची योग्य निगा राखणे व त्या जागेवरील अतिक्रमणे टाळण्यासाठी ही योजना आखण्यात आल्याचे ते म्हणाले. सध्या सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची उदाहरणे असून त्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल टाकण्यात येत आहे. वीज खात्याच्या विभाग - १५ व्दारे या कामावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. वीज खात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनीबाबतच्या दस्तऐवजांचे संग्रहीकरण करण्यात येणार आहे. मुळात या जागांचे सर्वेक्षण करून त्याला योग्य पद्धतीने कुंपण घालून त्या जागेचे संरक्षण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी जागा प्रत्यक्ष वीज खात्याच्या ताब्यात असली तरी प्रत्यक्षात खात्याचे नाव एक चौदाच्या उताऱ्यावर आलेले नाही. काही ठिकाणी जागेचे म्युटेशन झाले नसल्याने अतिक्रमण केलेल्यांना बाहेर काढताना त्याचे कायदेशीर परिणाम खात्याला भोगावे लागतील, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
खात्याकडे असलेल्या सर्व भूखंडांचे योग्य पद्धतीने दस्तऐवजीकरण ही जागा अतिक्रमणांपासून सुरक्षित ठेवण्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचेही सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

Wednesday, 26 May, 2010

राठोडच्या शिक्षेत एक वर्षाची वाढ

रुचिका आत्महत्या प्रकरण
चंदीगड, दि. २५ : वीस वर्षांपूर्वी १४ वर्षाच्या रुचिका गेहरोत्रा या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा आरोप असलेला हरियाणाचा माजी पोलिस महासंचालक एस. पी. एस. राठोड याच्या शिक्षेत आज येथील सत्र न्यायालयाने एक वर्षाची वाढ केली आहे.
याआधी ठोठावण्यात आलेल्या सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षेला राठोड याने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. आज झालेल्या सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गुरबिर सिंग यांनी राठोड याची याचिका फेटाळून लावली. राठोड याच्या शिक्षेत वाढ करण्याची सीबीआय आणि रुचिकाच्या कुटुंबीयांनी केलेली मागणी मान्य करत राठोडची शिक्षा सहा महिन्यांवरून दीड वर्ष करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
राठोड याची याचिका फेटाळून लावण्यात आली असल्याने त्याची ताबडतोब स्थानिक कारागृहात रवानगी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर सीबीआयने राठोडला आपल्या ताब्यात घेतले. आज शिक्षा सुनावल्यानंतर राठोडच्या चेहेऱ्यावर नैराश्याचे भाव असले तरी "मी हसतच राहीन' असे त्याने न्यायालयाबाहेर उपस्थित असलेल्या पत्रकारांना उद्देशून सांगितले.
राठोडने विनयभंग केल्यानंतर रुचिकाच्या मनावर त्याचा विपरित परिणाम झाला. त्यानंतर काही दिवसातच तिने आत्महत्या केली.

सरकारी बंगलेच बनलेत मंत्रालय!

पर्वरीचे सचिवालय ओस पडले
पणजी, दि. २५ (किशोर नाईक गावकर): पर्वरी येथील मंत्रालयात काही अपवाद वगळता बहुतेक मंत्री नित्यनेमाने फिरकत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मंत्र्यांच्या भेटीसाठी दुरून येणाऱ्या जनतेची तीव्र हेळसांड सुरू असून या प्रकाराबाबत जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत व वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा हेच मंत्रालयात नियमितपणे येतात. उर्वरित मंत्री आपल्या मर्जीप्रमाणे मंत्रालयात फिरकतात व आपल्या आल्तिनोे येथील सरकारी बंगल्यांवरून कारभार हाकतात अशीही खबर आहे. मंत्र्यांच्या या अशा कार्यपद्धतीमुळे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनाही वारंवार त्यांच्या बंगल्यांच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याने तेही बरेच नाखूश आहेत, अशीही चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडी सरकारला पुढील महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. जनतेच्या अपेक्षा व आकांक्षांना या सरकारने पूर्णपणे पाने पुसली असून कामत यांचे आपल्या मंत्रिमंडळ सहकाऱ्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याची टीका विरोधकांकडून सुरू आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत हे केवळ आपल्या खुर्चीला चिकटून बसण्यासाठी आपल्या मंत्र्यांचे थेर मुकाट्याने सहन करीत असल्याचा आरोपही विरोधी पक्षाने केला आहे. विद्यमान मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याने आठवड्यातील एक किंवा दोन दिवस मंत्रालयात येण्याचे निश्चित केले होते. सोमवारचा दिवस हा मुख्यमंत्र्यांनी जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी मग्रूर केला आहे व त्याप्रमाणे ते या दिवशी मंत्रालयात हजर असतात.वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा हे बहुतांश वेळ मंत्रालयात घालवतात व त्यामुळे ते जनतेला सहजपणे उपलब्ध होतात. बाकी उर्वरित एकही मंत्री निश्चित दिवशी मंत्रालयात हजर नसल्याने त्यांच्या भेटीसाठी आलेल्या लोकांना ताटकळत राहणे भाग पडते. मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळाने मंत्रालयच उकिरड्यावर टाकले आहे की काय,अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. प्रत्येक मंत्री आपल्या सरकारी बंगल्यावरून खात्याचा कारभार हाकतो. सगळ्या फाईल्स व संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बंगल्यांवर पाचारण केले जाते व त्यामुळे या अधिकाऱ्यांची खात्यातील कामे अडकून पडतात.अनेकवेळी संध्याकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आलेल्या लोकांनाही भेट होत नसल्याने त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त केली जाते.केवळ मंत्रालयच नव्हे तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी खुद्द कॉंग्रेस भवनाकडेही पाठ फिरवली आहे. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी पक्षाच्या प्रत्येक मंत्र्याला आठवड्याचा एक दिवस कॉंग्रेस भवनात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी निश्चित केला होता. पण या वेळापत्रकाला या नेत्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्तेही या कारभाराला कंटाळले आहेत."जी-७' गटाचे राजकारण फुसका बार ठरल्यानंतर या गटातील एकही नेता मंत्रालयात दिसत नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या कार्यकर्त्यांचीच व मतदारसंघातील लोकांची जास्त गर्दी मंत्रालयात होत होती पण अलीकडे हे लोकही गायब झाल्याचे कळते.
सरकार कुठे आहे, असा सवाल जनतेकडून होतो आहे त्याचे मूळ कारण हेच आहे,अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे. जनतेला सामोरे जाण्याचे धारिष्ट एकाही मंत्र्यांत नाही व त्यामुळेच ते मंत्रालयात जनतेची भेट घेण्यास कचरतात.आपल्या स्वतंत्र बंगल्यांवर सगळ्या प्रकारचे "व्यवहार' करणे शक्य होते व त्यामुळे त्यांनी आपले सरकारी बंगलेच स्वतंत्र मंत्रालय बनवल्याचा टोलाही त्यांनी हाणला आहे. बाकी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हे मात्र नेहमी व नित्यनेमाने आपल्या विरोधी पक्ष नेत्याच्या कक्षात हजर असतात. मंत्र्यांच्या भेटीला आलेले लोक वाट बघून कंटाळतात व नंतर विरोधी पक्ष नेत्यांच्या कक्षात जाऊन तिथे या मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा पंचनामा करतात, त्यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीचा लेखाजोगा करण्याची आयतीच संधी विरोधी पक्षालाही प्राप्त होते.

'एअर इंडिया'चे २० हजार कर्मचारी संपावर

१० उड्डाणे रद्द
मुंबई, दि.२५ : एअर इंडियाचा ग्राऊंड स्टाफ अचानक संपावर गेला आहे. त्यात २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश असून इंजीनियरिंग स्टाफही सहभागी आहे.
वेतन न मिळाल्यामुळे हे सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. प्रसार माध्यमांशी या विषयावर बोलल्याप्रकरणी एअर इंडियाच्या इंजीनियरिंग स्टाफला "कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली होती. याच्या विरोधात आणि पगारवढीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हा देशव्यापी संप पुकारला आहे. एअर इंडियाच्या सर्व कर्मचारी संघटनांना व्यवस्थापनाने नोटीस जारी करून आपल्या समस्या प्रसार माध्यमांसमोर आणू नये, असे सांगितले होते. तसेच मे महिन्याचे वेतनही उशिरा देण्यात आले. वेतनेतर मागण्यांनाही व्यवस्थापनाने नकारघंटा दिली होती. या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी १५ मे रोजी संपाची नोटीस व्यवस्थापनाला दिली होती. पण, त्यात ३१ मेपासून संपावर जाणार असल्याचे नमूद होते. संघटना मात्र तत्पूर्वीच संपावर गेल्या आहेत. हा संप अनिश्चितकालीन असल्याचे संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे.
एअर इंडियाचे देशाबाहेरील कर्मचारी यात सहभागी झालेले नाही. आपल्या विविध मागण्यांसाठी एअर इंडियाचा ग्राऊंड तसेच क्रु स्टाफ संपावर गेला आहे.
अर्थात, या संपाचा एअर इंडियाच्या विमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे प्रवक्त्यांनी म्हटले आहे.
१० उड्डाणे रद्द
एअर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या संपाचा हवाई वाहतूकीवर परिणाम होणार नाही, हा व्यवस्थापनाचा दावा फोल ठरला असून त्यांना लगेचच १० उड्डाणे रद्द करावी लागली आहेत.
कोलकाता आणि मुंबईच्या प्रत्येकी तीन आणि दिल्लीच्या चार उड्डाणांना रद्द करण्यात आले आहे. अभियंते आणि अन्य कर्मचारी संपावर असल्याने व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागला. या स्थितीचा आढावा घेऊन संपावर तोडगा काढण्यासाठी नागरी उड्डयन मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी एअर इंडियाचे सीएमडी अरविंद जाधव यांची भेट घेतली.

आंघोळीसाठी गेलेला विद्यार्थी समुद्रात बुडाला

वास्को, दि. २६ (प्रतिनिधी): आपल्या पाच मित्रासोबत सडा येथील "जापनीज गार्डन' खाली असलेल्या समुद्रात आंघोळीसाठी गेलेला १४ वर्षीय आलेक्स पोल हा विद्यार्थी बुडाला असून रात्री उशिरापर्यंत त्याचा पत्ता लागला नव्हता.
सहा मित्रांच्या या गटातील चौघेजण आंघोळ करून वर आले. तथापि, त्यांना त्यांचे इतर दोन मित्र बुडत असल्याचे नजरेस येताच रजय रामदास शेट १५ वर्षीय मुलाने रनजील मोरजकर यास समुद्रातून बाहेर काढले. मात्र आलेक्सला वाचवण्यात त्याला यश आले नाही.
आज संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली. सडा येथील एमपीटी वसाहतीत राहणारे आलेक्स पोल (वय १४), रनजील मोरजकर (वय १७), रजय शेट (वय १५) पृथ्वीराज देसाई (वय १६), प्रतीश वीर (वय १३) व प्रसिद्ध बिलिया (वय १३) हे मित्र आज दुपारी समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. सुमारे दीड तास आंघोळ केल्यानंतर पाण्याचा वेग वाढल्याचे लक्षात येताच चार मित्र पाण्याबाहेर आले. त्यांनी पाण्यात असलेल्या इतर दोन मित्रांना वर येण्यासाठी हाक मारली असता त्यांना ते पाण्यात बुडत असल्याचे दिसले. आलेक्स व रनजील हे पाण्यामध्ये बुडत असल्याचे रजयच्या नजरेस येताच त्याने पुन्हा पाण्यात जाऊन अथक प्रयत्नानंतर रनजीलला वाचवले. पुन्हा तो आलेक्सला वाचवण्यासाठी परतला तेव्हा त्यास तो पाण्यात बेपत्ता झाल्याचे समजले. याबाबत मुरगाव पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी अग्निशामक दल व जीवरक्षकांच्या मदतीने आलेक्सचा शोध सुरू केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही. रात्र उशिरापर्यंत आलेक्सचा शोध सुरू होता, असे उपनिरीक्षक प्रशल देसाई यांनी सांगितले.
आलेक्स हा सडा येथील दीपविहार उच्चमाध्यमिक विद्यालयात शिकत होता. नुकताच तो दहावीत पोहोचला होता.
आपला मुलगा बुडून बेपत्ता झाल्याचे वडील ए.के.पोल यांना समजताच त्यांनीही त्याचा शोध घेतला. आलेक्स त्याच्या मित्रमंडळींत अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या पश्चात आई - वडील व दोघे भावंडे असा परिवार आहे.
मुरगाव पोलिसांनी किनारारक्षक दलाला सदर घटनेची माहिती दिली. मात्र सदर दलाचे जवान तेथे पोहोचू शकले नाहीत, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. उपनिरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

पेडणे व थिवी येथे अपघातांत दोन ठार

पेडणे, म्हापसा, दि. २५ (प्रतिनिधी): कोंडलवाडा पेडणे येथे आज दुपारी दुचाकी वाहनाला धडक देऊन अज्ञात मारुती व्हॅनने धडक दिल्याने सुरेश विठ्ठल तेली हे ४६ वर्षीय उगवे येथील रहिवासी जागीच ठार झाले. तर दुसरा जखमी झाला, तर कान्सा-थिवी येथे काल रात्री दोन मोटारसायकलस्वारांची टक्कर होऊन त्यात डिमेटीस आथाईद (२७) हा तरूण ठार झाला.
पेडणे तालुक्यात २४ रोजी दोन भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा २५ रोजी दुपारी २.३० वाजता अपघात होऊन श्री. तेली यांना जीव गमवावा लागला. वाहनचालकाने डोक्याला हेल्मेट घातले होते म्हणून पाठीमागे बसलेल्या नागरिकाचा जीव गेला.
सविस्तर माहितीनुसार उगवे पेडणे येथील माऊली बेकरीवर कामाला असलेले नारायण महाले हे वाहनचालक मोटरसायकल पल्सर क्र. जी. ए . ०३ बी. २६७५ या मोटरसायकलने उगवेमार्गे पेडण्याला पाव घेऊन जात होते. मोटरसायकलमागे सुरेश विठ्ठल तेली हा नागरिक बसला होता. कोंडलवाडा येथील धोकादायक वळणावर मागच्या बाजूने एका मारुती व्हॅनने धडक दिली व घटना स्थळावरून पोबारा केला. वाहनांचा तपास अजून लागलेला नाही. जखमी नारायण महाले यांनी वाहनाने मागून धडक दिल्याचे म्हटले आहे. जखमी अवस्थेत खाजगी वाहनाने दोघांनाही तुये इस्पितळात नेले असता, उपचार करण्यापूर्वीच सुरेश विठ्ठल तेली हा मरण पावला तर नारायण महाले यांच्यावर उपचार चालू आहेत. पल्सर दुचाकी नारायण महाले चालवत होते.
हेल्मेटने जीव वाचला
वाहनचालक नारायण महाले यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते. अज्ञात वाहनाने पाठीमागून एवढी जबरदस्त धडक दिली की दोन्ही मोटरसायकलस्वार रस्त्याचा बाजूला जे धोकादायक दगड आहेत, त्यावर आदळले.धडक एवढी जबरदस्त होती की नारायण महाले यांनी डोक्याला घातलेले हेल्मेट फुटून गेले. मात्र सुरेश विठ्ठल तेली यांचे डोके दगडाला आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. पल्सर वाहनाची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. मोटरसायकलचा पुढचा भाग चक्काचूर झाला. डोंगर कठड्यावर धडक बसल्याने मोटरसायकलचा पुढचा टायर पंक्चर झाला. अपघात घडला त्याठिकाणी सर्वत्र पाव पडले होते.
मयत सुरेश विठ्ठल तेली हा उगवे येथील माउली बेकरीत कामाला होता. तो एकटाच आपल्या घरी राहायचा. अपघाताची वार्ता पेडणे पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह बांबोळी येथे चिकित्सेसाठी पाठवण्यात आला.
थिवीत अपघात
म्हापसा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक उदय गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसारस बुलेट मोटारसायकलचालक दिमेटीस आथाईद हा जीए-०१ डी ८२१४ क्रमांकाच्या बुलेटने म्हापशाकडे येत होता तर दिनेश गावकर आपल्या जीए-०४ ए ९७६७ क्रमांकाच्या बुलेटने म्हापशाहून शिरगावकडे चालला होता. दोन्ही वाहनांची टक्कर होऊन दोघेही वाहनचालक दूर फेकले गेले. त्यांना आझिलो इस्पितळात आणले असता डॉक्टरांनी आथाईद याला मृत घोषित केले. त्याचा मृतदेह बांबोळी येथे पाठविण्यात आला आहे.

कळंगुट पोलिसावर प्राणघातक हल्ला

-ड्रग माफिया आक्रमक
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): ओमतावाडो कळंगुट येथे "शामरॉक' या पबच्या बाहेर "कुकी' या तरुणाने अमलीपदार्थ विरोधी पथकाच्या शिपायांवर प्राणघातक हल्ला करण्याची घटना घडली. त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
या हल्ल्यात पोलिस शिपाई महाबळेश्र्वर सावंत हा पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यावर अवजड हत्याराने वार केल्याने डोक्याला १७ टाके पडले आहेत. तसेच नाकाचे हाड मोडले असल्याची माहिती मिळाली आहे. काल मध्यरात्री १२.१० वाजता त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. ड्रग माफिया आणि "पेडलर'च्या विरोधात अमलीपदार्थ विरोधी पथकाने कंबर कसल्याने पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्याचे सत्र सुरू झाले आहे.
पोलिस शिपायांवर प्राणघातक हल्ला करूनही संशयित "कुकी' याच्यावर कळंगुट पोलिसांनी केवळ प्रतिबंधक भा.दं.सं ३४१ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे. खुद्द पोलिसांवर हल्ला करणाऱ्या संशयितांना कळंगुट पोलिसांकडून संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच आज सायंकाळी उशिरा पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी तपास अधिकाऱ्याला बरेच फैलावर घेतल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, रात्री उशिरापर्यंत संशयित "कुकी' व त्याचे अन्य साथीदार यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ला केल्याचे कलमही लावण्यात आले नव्हते तसेच ते पोलिसांच्या हातीही लागले नव्हते.
अधिक माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचा शिपाई माहिती देणाऱ्या गुप्तहेरासह कळंगुट या भागात पेट्रोलिंगसाठी गेला होता. अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने तो "शामरॉक' या पबच्या बाहेर जाऊन उभा राहिला होता. यावेळी अचानक "कुकी' व त्याच्या अन्य साथीदाराने महाबळेश्र्वर सावंत व त्याच्याबरोबर असलेल्या तरुणांवर हल्ला चढवला. कुकी हा या पबमध्ये कामाला असतो अशी माहिती मिळाली आहे. हॉकी स्टिक व अन्य अवजड हत्याराने हा हल्ला करण्यात आला असल्याचे सूत्राने सांगितले. हल्ल्यात जखमी झालेल्या सावंत याने मोबाईल वरून आपल्या वरिष्ठांना माहिती देताच अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी त्याठिकाणी दाखल झाले. यावेळी त्वरित जखमी सावंत याला गोमेकॉत दाखल केले.
सरकारी ड्युटीवर असताना हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची तक्रार श्री. सावंत यांनी कळंगुट पोलिस स्थानकात सादर केली आहे. आज रात्रीपर्यंत संशयित कळंगुट पोलिसांना सापडले नव्हते. याविषयीचा अधिक तपास कळंगुट पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक शरीफ जॅकिस करीत आहे.

श्री ब्रह्मानंद स्वामींची आज अष्टम पुण्यतिथी

फोंडा, दि. २५ : प.पू.पद्मनाभ शिष्य संप्रदाय श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठ आयोजित श्री ब्रह्मानंद स्वामी महाराजांचा अष्ठम पुण्यतिथी महोत्सव विद्यमान पीठाधीश सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांच्या पावन उपस्थितीत बुधवार दि. २६ मे रोजी तपोभूमी येथे साजरा होणार आहे.
पहाटे श्रीदत्तमाला मंत्र व श्रीब्रह्मानंद गुरूदेवाय नमः या मंत्रजपाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यावेळी श्रीब्रह्मानंद स्वामी समाधी मंदिरात व श्रीदत्त मंदिरात सद्गुरू महापूजा होणार आहे. सकाळी ९ वाजता शिष्य संप्रदायाचे अध्यक्ष रामचंद्र गंगाराम नाईक यांच्या यजमानपदाखाली श्रीसद्गुरू कृपा यज्ञ होणार आहे. दुपारी १ वाजता पूर्णाहुती झाल्यानंतर आरती, दर्शन व महाप्रसादाने सकाळच्या सत्राची सांगता होईल.
संध्याकाळी प्रगट कार्यक्रमात पू.श्री ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या आगमनानंतर सांप्रदायिक प्रार्थना होईल. त्यानंतर वृंदावन इस्पितळ व रिसर्च सेंटर, वैद्य सौ. सरिता अर्जुन सांडव, रमणशास्त्री जोशी, सुरेश कामत या मान्यवरांचा सत्कार होणार आहे.
यावेळी श्रीब्रह्मेशानंद स्वामी जन्माष्टमी सीडी प्रकाशन सोहळा, प्रधान मंडळ सेवा गौरवपत्र वितरण सोहळा व अमृताभिषेक भाग-२ पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. संप्रदायातील वकील, शिक्षक, इंजिनियर, डॉक्टर यांचा सत्कार यावेळी होणार आहे. गृहमंत्री रवी नाईक, वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, आमदार पांडुरंग मडकईकर, भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर व श्रीब्रह्मेशानंद स्वामींचे ज्येष्ठ सुपुत्र प्रकाश केदार यांची विशेष उपस्थिती यावेळी असेल. सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून बोधामृताचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tuesday, 25 May, 2010

एकाच कुटुंबातील चार जण ठार; तोरसे येथे डंपर-फोर्ड टक्कर

पेडणे, दि. २४ (प्रतिनिधी): तोरसे - पेडणे येथे मंदिराजवळ आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे जण ठार झाले. तोरसे राष्ट्रीय मार्गावर झालेल्या (एमएच -०८ यू-३६४५) या फोर्ड वाहनाने सरळ ट्रक (जीए-०३ सी ९३०५) याला धडक दिल्याने चार जण ठार झाले
रत्नागिरी येथील शेट्टी कुटुंबीय बंगळूर येथून पेडणेमार्गे सावंतवाडीच्या दिशेने फोर्ड (एम.एच.०८ यू-३६४५) या वाहनातून जात होते. त्यात योगेश शेट्टी, दिनेश शेट्टी, सुरेश शेट्टी व रत्ना ही त्यांची आई असे चौघे जण होते. हे कुटुंब रत्नागिरीस जात होते. विरुद्ध दिशेने खनिजवाहू डंपर (जीए-०३.सी-९३०५)पत्रादेवीमार्गे पेडण्याला येत असतानाच फोर्ड गाडीला त्याची समोरून धडक बसली. त्यात योगेश शेट्टी व रत्ना शेट्टी (५५) ही जागीच ठार झाले तर हॉस्पिटलमध्ये दिनेश शेट्टी व सुरेश शेट्टी यांना उपचारासाठी नेले असता त्यांनाही मरण आले.
अपघाताची घटना घडताच स्थानिक लोकांनी काही वेळ स्थानिकांनी खनिजाचे ट्रक अडवून धरले.
घटनास्थळी पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई पोलिस फौजफाट्यासहित हजर झाले व वाहतुकीची झालेली कोंडी काही वेळानंतर सोडवली. अपघातानंतर डंपरचालक फरारी झाला, तर मुंबई-गोवा रस्ता दीड तास बंद राहिला. काही खनिज ट्रकांवर दगड मारण्याचा प्रकार घडला मात्र कुणाला इजा झाली नाही.
शेट्टी कुटुंबीय हे बंगळूर येथून रत्नागिरीला आपल्या गावी जात होते, अशी माहिती पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिली. या अपघातात योगेश हा जागीच ठार झाला तर जखमींपैकी रत्नाही हॉस्पिटलमध्ये मरण पावली व त्यानंतर अन्य दोघांनाही मरण आले.
मृतदेह हलवले
पेडणे पालिकेच्या खास गाडीतून तोरसे येथील अपघातातील मृतदेह बांबोळीला हलवण्यात आले.
मागच्यावर्षी याच राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊन चार जण ठार झाले होते. या रस्त्यावरून हल्ली खनिज वाहतूक वाढलेली असून अपघाताला आमंत्रण मिळत आहे.

खाजगी बसमालकांचा आजचा संप स्थगित

१५ दिवसांत तोडग्याचे सरकारकडून आश्वासन
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): खाजगी बस मालकांनी डिझेल दरवाढीमुळे प्रवासी तिकीट दरांत मागितलेली वाढ न्याय्य आहे व सरकार त्यादृष्टीने येत्या १५ दिवसांत योग्य निर्णय घेईल, असे ठोस आश्वासन वाहतूक संचालक स्वप्निल नाईक यांनी दिल्याने उद्याचा (दि. २५ रोजीचा) नियोजित संप अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेकडून तात्पुरता स्थगित ठेवण्यात आला आहे.
खाजगी बसमालकांच्या या संपाची गंभीर दखल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी घेतली व हा संप कोणत्याही स्थितीत होता कामा नये, असेच वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांना सुनावले,अशी खबर आहे. मंत्री ढवळीकर यांनी मात्र संपाच्या या निर्णयाला प्रतिआव्हान देण्याची जय्यत तयारी केली होती. हा संप मोडून काढण्यासाठी फोंडा व इतर तालुक्यातील काही खाजगी बस मालकांना हाताशी धरून या संपात त्यांना सहभागी न होण्याची आदेश त्यांनी दिले होते. खाजगी बस मालक संघटनेचा उद्याचा संप फुसका बार ठरवण्याचीही त्यांची योजना होती; परंतु मुख्यमंत्री कामत यांनी संघटनेच्या मागण्यांबाबत विचार करण्याचे ठोस आश्वासन दिल्याने वाहतूकमंत्र्यांचा बेत फसला. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या आदेशांवरून वाहतूकमंत्र्यांनी वाहतूक खात्याचे संचालक स्वप्निल नाईक यांना खाजगी बस मालक संघटनेशी चर्चा करण्याचे आदेश दिले.
संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर व त्यांचे काही सहकारी यांनी वाहतूक संचालकांची भेट घेतली. वाहतूक संचालकांनी तिकीट दरवाढीच्या निर्णयाबाबत अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. आपण या पदाचा ताबा अलीकडेच घेतल्याने काही काळ संघटनेने कळ सोसावी, अशी विनंती करून त्यांनी संपाचा निर्णय मागे घेण्यास संघटनेला सांगितले. प्रवाशांना विनाकारण सतावणे किंवा वेठीस धरणे संघटनेलाही अजिबात मान्य नाही. सरकार जर खरोखरच संघटनेच्या मागण्यांबाबत गंभीरपणे विचार करीत असेल तर हा संप तूर्त स्थगित ठेवणे संघटनेला मान्य आहे,असे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले. खाजगी बस मालक संघटना, वाहतूक खात्याचे अधिकारी, कदंब महामंडळ व प्रवासी संघटना यांची संयुक्त समिती स्थापन करून प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर तोडगा काढणे शक्य आहे, असे ताम्हणकर यांनी वाहतूक संचालकांना सांगितले.

राजकीय कार्यक्रमांपासून आधी पत्नीला दूर ठेवा

भाजप महिला मोर्चाचा मुख्यमंत्र्यांना 'सल्ला'
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): महिलांनी राजकारणापासून अलिप्त राहावे, असा सल्ला देणाऱ्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पहिल्यांदा आपल्या पत्नीला राजकीय कार्यक्रमांपासून अलिप्त ठेवावे व मगच आम महिलांना सल्ला द्यावा, असा टोमणा भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने हाणला आहे. हे वादग्रस्त वक्तव्य करण्यापूर्वी कामत यांनी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची संमती घेतली होती काय, असाही सवाल यावेळी करण्यात आला. कामत यांनी या बेजबाबदार वक्तव्याबाबत एकतर माफी मागावी किंवा आपल्या पदाचा राजीनामा तरी द्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
भाजप महिला मोर्चातर्फे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. याप्रसंगी गोवा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा मुक्ता नाईक, सरचिटणीस वैदेही नाईक, प्रदेश भाजप सचिव नीना नाईक व जिल्हा पंचायत सदस्य तथा प्रदेश भाजप सचिव शिल्पा नाईक हजर होत्या. कामत यांच्या म्हणण्यानुसार महिला समाज बदलू शकतात तर राजकारण का बदलू शकत नाहीत,असा सवाल मुक्ता नाईक यांनी केला. महिलांबाबत मुख्यमंत्र्यांच्या संकुचित मानसिकतेमुळेच विधानसभेतील एकमेव महिला आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांना मंत्रिपद मिळाले नाही काय, असा सवालही उपस्थित करण्यात आला. केवळ राजकीय घराणेशाहीतील महिलांनी राजकारणात यावे व इतर सामान्य महिलांनी दूर राहावे, हे चूक आहे. आपल्या कर्तृत्वावर अनेक महिला राजकारणात आल्या आहेत. त्यांनी आपली वेगळी छाप भारतीय राजकारणावर उमटवली आहे, असे नीना नाईक म्हणाल्या. कामत यांच्या पत्नीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात वावरण्यास भाजप महिला मोर्चाचा अजिबात आक्षेप नाही; पण स्वतःच्या पत्नीला मोकळीक देऊन अन्य महिलांना राजकारणात प्रवेश न करण्याचा सल्ला देणे हे चुकीचे आहे, असे त्या म्हणाल्या.
गेल्या आठवड्यात विविध मागण्यांचे निवेदन घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या महिला शिष्टमंडळाला "तुमच्या मतांची आपल्याला गरज नाही', असे सुनावून त्यांनी अपमानीत केले होते. आता महिलांच्या मतांचीही आपल्याला गरज नाही, असेच त्यांना म्हणायचे आहे काय, असा सवाल नगरसेविका वैदेही नाईक यांनी केला. शशिकलाताई काकोडकर यांनी समर्थपणे मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळून महिलांची राजकारणातील ताकद सिद्ध करून दाखवली आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीचे बेजबाबदार वक्तव्य करणे त्यांना अजिबात शोभत नाही, असेही श्रीमती नाईक म्हणाल्या.
महिलांचा राजकीय प्रवेश कामत यांना मान्य नाही याचाच अर्थ ते ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात आहेत, असाच होतो. कामत यांच्या या वक्तव्याबाबत महिलावर्गात जागृती करून विद्यमान सरकार कशा पद्धतीने महिलांबाबत विचार करते,हे पटवून दिले जाणार आहे, असे जिल्हा पंचायत सदस्य व भाजपच्या प्रदेश सचिव शिल्पा नाईक यांनी सांगितले.

हरमल येथे एक ठार

हरमल पार्सेकरवाडा येथे टाटा टिपर (जीए-०३-टी-१०७९) व मोटरसायकल (जीए-०३-एम-६४०३) यांच्यात अपघात होऊन मोटरसायकल चालक सुहास सूर्यकांत नाईक (३५) हा देऊळवाडा-हरमलचा रहिवासी मरण पावला.
हरमल येथे चिरे घेऊन जाणारा टाटा टिपर क्र. जीए ०३-टी १०७९ हा ट्रक कोरगावमार्गे हरमलला येत होता तर त्याच्याविरूद्ध दिशेने मोटरसायकल (जीए ०३ एम ६४०३) जात असताना भीषण अपघात होऊन ३४ वर्षीय सुहास सूर्यकांत नाईक हा ठार झाला. जखमी अवस्थेत त्याला बांबोळी येथे उपचारासाठी नेले असता त्याचे निधन झाले.

डिचोलीत युवक जागीच ठार

डिचोली, दि. २४ (प्रतिनिधी): बोर्डे-डिचोली येथे आज रात्री ९च्या सुमारास झालेल्या एका मोटरसायकल अपघातात रणजीत उर्फ प्रसाद भिकाजी नाईक (वय२७) हा लाडफे डिचोली येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डिचोली पोलिसांनी दिली आहे. जीए ०४ व्ही २५६३ या क्रमांकाच्या "पल्सर' मोटरसायकलने तो डिचोलीला येत असताना बोर्डे येथे हमरस्त्यावर हा अपघात घडला. सदर युवकाचे डोके दगडावर आपटल्याने गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उपनिरीक्षक तुकाराम वाळके यांनी पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी बांबोळी येथे पाठविण्यात आला आहे. रणजीतच्या मृत्यूने लाडफे गावावर शोककळा पसरली आहे. त्याच्यासमवेत असलेली एक युवती अपघातात किरकोळ जखमी झाली आहे.

कदंबच्या धडकेने युवक जागीच ठार

माटवे-दाबोळी येथील दुर्घटना
वास्को, दि. २४ (प्रतिनिधी): ओव्हरटेकच्या प्रयत्नात कदंब बसची दुचाकीला धडक बसून दुचाकीच्या मागे बसलेला महेश सुभाष चलवादी (वय २२ रा. बागलकोट) हा युवक बसच्या मागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. माटवे - दाबोळी येथे आज सकाळी ९.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नातेवाइकाच्या विवाहासाठी महेश काही दिवसांपूर्वी गोव्यात आला होता.
वास्कोहून हार्बरमार्गे पणजीला निघालेली कदंब बस (जीए ०१ एक्स ०३४८) माटवे दाबोळी येथे पोचली असता चालकाने समोरील "स्प्लेंडर' दुचाकीला (क्रः जीए ०६ सी ७१५०) वेगाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बसने दुचाकीच्या "हॅंडलला' ठोकरल्याने दुचाकी चालक रवींद्र दोड्डामणी (वय ३०, राः झरीत, साकवाळ) व मागे बसलेला महेश चलवादी रस्त्यावर फेकले गेले. त्यावेळी महेश हा बसच्या मागच्या चाकाखाली (डाव्या बाजूच्या) सापडून जागीच ठार झाला. वेर्णा पोलिसांनी त्वरित घटनास्थळावर जाऊन जखमी झालेल्या रवींद्र यास उपचारासाठी इस्पितळात दाखल केले. महेश याच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियोत पाठवून दिला.सुदैवाने रवींद्र हा सुखरूप आहे.
महेश हा दुचाकी चालक रवींद्र याचा मेहुणा होता.
या अपघात प्रकरणी कदंब बसचालक वासुदेव नाईक (वय ५२) याच्या विरुद्ध वेर्णा पोलिसांनी भा.द.स. २७९ व ३०४ (ए) कलमांखाली गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आगशी येथे सापडली चामुंडेश्वरीची मूर्ती

पणजी, दि. २४ : सुलाभाट-आगशी येथील तळ्याच्या विकासासाठी खोदकाम करताना आज दुर्गादेवीची पुरातन पाषाण मूर्ती सापडली. चामुंडेश्वरी किंवा महिषासूरमर्दिनी म्हणूनही दूर्गादेवीची पूजा करण्यात येते. जलस्रोत खात्यातर्फे सुलाभाट तळ्याच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले असून सापडलेली मूर्ती दोन हजार वर्षापूर्वीची असल्याचे सरकारी पत्रकात म्हटले आहे. तळ्याच्या एक कोपऱ्यात शॉव्हेलद्वारा गाळ उपसताना दीड फूट उंचीची ही मूर्ती दृष्टीस पडली. दरम्यान, गावात चामुंडेश्वरी देवीचे मंदिर बांधकाम सुरू आहे. सध्या ही मूर्ती श्रीरवळनाथ मंदिरात ठेवण्यात आली आहे.

सोरेन सरकार अल्पमतात, भाजपने पाठिंबा काढला

रांची, दि. २४ : झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत गेल्या महिनाभरापासून निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या नाट्यावर पडदा टाकत आज अखेर भारतीय जनता पक्षाने शिबू सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घेतला. यामुळे झारखंडमधील"गुरुजीं'चे सरकार अल्पमतात आले आहे. पाठिंबा काढल्यानंतर नवीन सरकार स्थापन होईस्तोवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपा नेते आणि झारखंडचे उपमुख्यमंत्री रघुवीरदास यांनी आज राज्यपाल एम. ओ. एच. फारूक यांची राजभवन येथे भेट घेतली आणि सोरेन सरकारचा पाठिंबा मागे घेत असल्याचे अधिकृत पत्र त्यांना दिलेे.
"" पाठिंबा मागे घेण्याबाबतचे पत्र सादर केल्यानंतर राज्यपालांनी आमदारांच्या स्वाक्षऱ्यांबाबत माझ्याकडे विचारणा केली. उद्यापर्यंत मी सगळ्या आमदारांच्या सह्या घेऊन तसे पत्र आपणाकडे सादर करतो, असे मी राज्यपाल महोदयांना सांगितले आहे,'' अशी माहिती रघुवीर दास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
"भाजपाने सादर केलेल्या पत्राचा अभ्यास केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल,' असे राजभवनच्या सूूूत्रांनी नंतर सांगितले. झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत झारखंड मुक्ती मोर्चाबरोबर भाजपाने एक करार केला होता. त्यानुसार, झामुमोने भाजपाच्या नेतृत्वातील सरकारला विनाअट पाठिंबा देण्याचे घोषित केले होते. परंतु याबाबत मुख्यमंत्री रोज वेगवेगळी विधाने करीत होते. कधी मीच मुख्यमंत्रिपदी कायम राहाणार, आमच्यात आळीपाळीने मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय झाला आहे, केंद्रीय मंत्रिपदाचा प्रस्ताव माझ्याकडे प्रलंबित आहे, तर कधी मी कॉंगे्रसच्या संपर्कात आहे, अशी वेगवेगळी संभ्रम निर्माण करणारी उलटसुलट विधाने शिबू सोरेन करत होते. कालही त्यांनी अशाचप्रकारचे विधान केल्यानंतर अखेर शिबू सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय भाजपाने घेतला आणि आज त्याची अंमलबजावणी केली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान रालोआने मांडलेल्या कपात प्रस्तावावर झालेल्या मतदानाच्यावेळी शिबू सोरेन यांनी संपुआच्या बाजूने मतदान केल्यानंतर नाराज झालेल्या भाजपाने शिबू सोरेन सरकारचा पाठिंबा काढण्याची घोषणा केली होती. परंतु, झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते आणि शिबू सोरेन यांचे पुत्र हेमंत सोरेन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना एक पत्र लिहून झामुमो राज्यात भाजपा सरकारला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर भाजपाने शिबू सोरेन यांना पायउतार होण्यासाठी २५ मेपर्यंतची मुदत दिली होती. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे भाजपाने आज त्यांच्या सरकारचा पाठिंबा काढला.

Monday, 24 May, 2010

विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला

मंगलोर, दि. २३ - संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या मंगलोर विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स तपास यंत्रणेच्या हाती लागला असून यातून विमानाच्या अपघाताचे नेमके कारण कळू शकणार आहे.
अपघात होऊन तब्बल ३४ ते ३८ तास उलटून गेल्यानंतर हा ब्लॅक बॉक्स मिळाला. विमानाच्या संपूर्ण प्रवासात काय झाले, याचा रेकॉर्ड या ब्लॅक बॉक्समधून मिळेल. एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी ) आणि वैमानिक यांच्यात कशाप्रकारे संदेशांची देवाण-घेवाण झाली याची माहिती आता समोर येणार आहे. त्यामुळे या अपघाताला नेमके कोण जबाबदार आहे, हेही समोर येईल
शनिवारी मंगलोर येथे घडलेला विमान अपघात हा देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासातील भयंकर प्रकार होता. एअर इंडियाचे विमान सकाळी साडेसहाच्या सुमारास विमानतळावर उतरत असताना दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की, यात विमानाचे दोन तुकडे झाले.
मृतांची डीएनए चाचणी
मंगलोर विमान अपघातातील मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी होणार असून त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक येथे दाखल झाले आहे.
न्यायसहायक प्रयोगशाळेतील चमूकडून डीएनए चाचणी झाल्यानंतरच मृत प्रवाशांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यातील १२८ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. पण, अजूनही बऱ्याच मृतदेहांची ओळख पटलेली नाही. मृतांचे नातेवाईकही अद्याप आपल्या आप्तांचे मृतदेह न मिळाल्याने संतप्त झाले आहेत. त्यांनी डीएनए चाचणीची मागणी करून तातडीने आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वाधीन करण्याची मागणी केली. या चाचणीला वेळ लागणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. पण, अपघातग्रस्तांच्या मृतदेहांची स्थिती इतकी भयंकर आहे की, ते ओळखण्याच्या पलीकडे आहेत. अशास्थितीत डीएनए चाचणीशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे ही चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही चाचणी पूर्ण झाल्यावरच मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केले जातील, असे समजते.
दरम्यान, आपल्या आप्तांचे मृतदेह नेण्यासाठी दुबई, कर्नाटक आणि अन्य ठिकाणांहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने शेकडो लोक मंगलोरमध्ये आले आहेत.
चौकशीसाठी अमेरिकी तज्ज्ञांची मदत
एअर इंडिया एक्सप्रेसच्या बोईंग ६३७-८०० या दुबईवरून येणाऱ्या विमानाला मंगलोर येथे झालेल्या अपघाताच्या चौकशीसाठी भारतीयांच्या पथकाला अमेरिकी तज्ज्ञ मंडळी मदत करणार आहेत.
अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्स्पोर्टेशन सेफ्टी बोर्डाने या चौकशीसाठी तज्ज्ञांचे पथक भारतात पाठविण्याचे जाहीर केले असून हे पथक मंगळवारी भारतात येणार असल्याचे समजते. भारत सरकारने केलेल्या विनंतीवरूनच या बोर्डाचे पथक पाठविले जाणार आहे. यात विमानशास्त्रातील विविध तज्ज्ञांचा समावेश आहे.

विमान अपघात : अहलुवालिया, तेजलचा मृतदेह मुंबईत आणले

मुंबई, दि. २३ - एअर इंडियाच्या विमानाला काल मंगलोर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेले विमानाचे सहवैमानिक एच. एस. अहलुवालिया आणि हवाई सुंदरी तेजल कामूलकर या दोघांचे मृतदेह आज दुपारी मुंबईत आणण्यात आले.
अहलुवालियांचे निवासस्थान अंधेरी येेथे आहे, तर तेजल कामूरकर ही ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे राहात होती. अंधेरी येथेच राहात असलेली आणि या अपघातात मरण पावलेली हवाई सुंदरी सुजाता सूरवासेचा मृतदेह अद्याप मुंबईत आणण्यात आलेला नाही.
विमानतळावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी ५.३० च्या सुमारास अहलुवालिया आणि सुजाताचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. तेजलने चारच महिन्यांपूर्वी एअर इंडियामध्ये नोकरीला सुरुवात केली होती. तर दुसरीकडे अहलुवालिया गेल्या पंधरा वर्षांपासून सहवैमानिक म्हणून कार्यरत होते.
मृतकांच्या निकटवर्तीयांना १० लाखांची अंतरिम भरपाई
मंगलोर, दि. २३ ः काल मंगलोर येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या १२ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या प्रवाशांच्या निकटवर्तीयांना एअर इंडियातर्फे प्रत्येकी दहा लाखांची अंतरिम भरपाई देण्यात येणार आहे. आज प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेले एअर इंडियाचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक अरविंद जाधव यांनी येथे एका पत्रकारपरिषदेत ही घोषणा केली.
कालच्या दुर्दैवी अपघातात १५८ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते. मृतकांच्या निकटवर्तीयांना ही भरपाई ताबडतोब देण्यात येईल, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.
ज्या प्रवाशांंचे वय १२ पेक्षा जास्त होते त्यांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी दहा लाख आणि १२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या प्रवाशांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी पाच लाखांची भरपाई देण्यात येईल. याशिवाय अपघातातील जखमींना अंतरिम भरपाई म्हणून प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही जाधव यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान डॉ. मनमोहसिंग आणि राज्यसरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या मदतीव्यतिरिक्त ही भरपाई देण्यात येईल, असेही जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. मृतकांना विम्याची रक्कम मिळावी यासाठी एअर इंडिया रिलायन्स आणि इतर सार्वजनिक विमा कंपन्यांच्या संपर्कात आहे, असेही त्यांनी सांगितले.
काल झालेल्या अपघाताता मृत्यूमुखी पडलेल्या १५८ जणांपैकी १२८ मृतदेहांची ओळख पटली असून हे सर्व मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत, अशी माहिती जाधव यांनी यावेळी दिली. कालच्या अपघाताच्या कारणांबद्दल प्रसार माध्यमांनी विनाकारण तर्कवितर्क करू नये, असे आवाहन जाधव यांनी यावेळी केले. असे केल्याने मृतकांच्या हितास बाधा पोहोचण्याची शक्यता आहे. हे विमान आंतरराष्ट्रीय उड्डाणावर होते. त्यामुळे यासंबंधी वेगवेगळे तर्कवितर्क केल्यास त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर विपरित परिणात होऊ शकतात, असेही जाधव म्हणाले.

बसदरवाढीवर चर्चेस सरकार अनुत्सुक

उद्याचा संप अटळ?

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. वाहतूक मंत्री चर्चा करण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भेटीस संमती दिल्यास त्यांच्याशी चर्चा करू,अन्यथा दि. २५ मे रोजी सर्व प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाणार असून त्याबाबत आम्ही ठाम असल्याचे अखिल गोवा बस मालक संघटनेचे पदाधिकारी सुदेश कळंगुटकर यांनी सांगितले. आमच्या संपामुळे लोकांना फटका बसू नये, यासाठी आम्ही उद्या मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी शेवटचा प्रयत्न करणार आहोत, असेही ते म्हणाले.
खाजगी प्रवासी बसमालक संघटनेने सरकारला दिलेली संपाची मुदत दि. २५ रोजी संपत असून त्यानंतर एका दिवसाचा संप पुकारला जाणार आहे. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांना बसमालकांचे कोणतेही प्रश्न सोडवायचे नाहीत. आहे ते प्रश्न अजून जटिल करण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो. याचा प्रत्यय गेल्या वर्षभरात आम्हाला आलेला आहे, असे श्री. कळंगुटकर पुढे म्हणाले.
डिझेल दरवाढ झाल्याने तिकीट वाढ देणे गरजेचे आहे. अन्यथा या महागाईत आम्हालाही हा व्यवसाय करणे कठीण होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. हा एकच व्यवसाय गोवेकरांच्या हातात असून त्यालाही हे सरकार संरक्षण देत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने महिला संघटना खवळल्या

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)- "राजकारणात महिला आल्यास समाजावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे', या मुख्यमंत्र्याच्या वक्तव्यावर महिला संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. महिला राजकारणात आल्यास पुरुष राजकीय नेत्यांची शक्ती कमी होत असल्यानेच त्यांना महिला आमदार बनू नये, असे वाटते, अशी टीका "बायलांचो साद' या संघटनेने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल पणजीतील एका महिला मेळाव्यात बोलताना सदर वक्तव्य केले होते.
महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष प्रमोद साळगावकर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले आहे. अर्थात, मुख्यमंत्र्यांनी सहज म्हणून ही सूचना केली होती, अशीही सारवासारव त्यांनी केली.
ज्या कॉंग्रेस पक्षाची धुरा एक महिला सांभाळते त्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचे उद्गार काढणे योग्य नसल्याचे "बायलांचो साद'च्या श्रीमती सबिना मार्टिन म्हणाल्या. काल पणजीतील एका महिला मेळाव्यात मुख्यमंत्री कामत यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंबंधीच्या विधेयकाबाबतची त्यांनी संदिग्ध भूमिका घेतल्याने त्यांचे भाषण हाच मुळी या मेळाव्यात चर्चेचा विषय बनला होता. महिलांनी ३३ टक्के आरक्षणाच्या आमिषाला बळी पडू नये, राजकारणात माणूस वेड्यासारखा गुंतून जातो. समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य महिलांत असते व त्यामुळे पुढील पिढी चांगली बनायची असेल तर महिलांनी राजकारणापासून अलिप्त राहणेच उचित ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले होते.

मडगाव होली स्पिरीट चर्चचे पुरुमेत फेस्त उत्साहात साजरे

मडगाव, दि. २३ (प्रतिनिधी) : येथील जुन्या बाजारातील होली स्पिरीट चर्चचे वार्षिक पुरुमेताचे फेस्त आज भक्तिभावाने साजरे झाले. त्यानिमित्त सकाळी चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाल्या. त्यात मडगाव परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दक्षिण गोव्यातील या वर्षांतील हे शेवटचे सर्वांत मोठे फेस्त मानले जाते. पावसाळ्याची बेगमी करणारे म्हणूनही ते ओळखले जाते. त्यामुळे मडगावात पुरुमेताची तयारी करणारी मोठी फेरी भरली आहे. सुक्या मासळीपासून सर्व संसारोपयोगी वस्तू ते बैलजोडीपर्यंतच्या वस्तूंनी ती भरली आहे .
मागे या फेरीमुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक खोळंबत असल्याने कोणा एका बिगरसरकारी संघटनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याने पालिकेने सारी फेरी "एसजीपीडीए'च्या प्रदर्शन मैदानावर हलवली होती. तथापि, नंतर फेरीवाले व नगरसेवक यांच्या संगनमताने ती पुन्हा रस्त्यावरच आणली आहे. त्यामुळे कोलवा सर्कलजवळ वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.
हे फेस्त जरी पुरुमेताचे म्हणून ओळखले जात असले तरी एकंदर फेरीचा आढावा घेतला तर पुरुमेंताच्या वस्तूंपेक्षा तयार कपडे, प्लास्टीक वस्तू व होजियरी यांचेच स्टॉल अधिक आहेत. आठवडाभर ते तसेच राहतात. पुरुमेताच्या वस्तूंचे विक्रेते हे स्थानिक असून ते तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक काळ राहात नाहीत. मात्र रेडीमेड वस्तूंची फेरी आठवडाभर उरते. या काळात वाहतुकीची बट्ट्याबोळ उडाल्याचे पाहायला मिळते.

Sunday, 23 May, 2010

मंगलोर येथे भीषण विमान अपघातात १५८ जण ठार

मंगलोर, दि. २२ - एअर इंडिया एक्सप्रेस या एअर इंडियाच्या सहविमान कंपनीचे दुबईहून येथे आलेले विमान उतरल्यानंतर धावपट्टीवर न थांबता विमानतळाच्या बाजूच्या दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात किमान १५८ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
आयएक्स-८१२ हे एअर इंडिया एक्सप्रेसचे ७३७-८०० जातीचे बोईंग विमान आज पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास मंगलोर येथील बाजपी विमानतळावरील धावपट्टीवर उतरले. परंतु, उतरल्यानंतर विमान धावपट्टीवर न थांबता नजीकच्या दरीत जाऊन कोसळले. दरीत कोसळल्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातग्रस्त दुर्देवी विमानात एकूण १६६ जण होते. त्यापैकी १६० प्रवासी आणि चालक दलाच्या ६ सदस्यांचा समावेश हाता.
"मला मिळालेल्या माहितीप्रमाणे विमानातील १६० जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. काही प्रवाशांना जखमी अवस्थेत नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे', असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येदीयुरप्पा यांनी अपघाताबद्दल बंगलोर येथे पत्रकारांना माहिती देताना सांगितले. या अपघातात फक्त ५ ते ६ प्रवाशांचे प्राण वाचले असावे. हे विमान धावपट्टीवर उतरताना हा अपघात झ्राला आणि विमानाने लगेच पेट घेतला, असे कर्नाटकचे गृहमंत्री व्ही. एस. आचार्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
हे विमान पाच वर्ष जुने होते. अपघाताच्यावेळी त्या परिसरात दाट धुके पसरले होते. या दुर्देवी अपघातानंतर मंगलोर विमानतळ बंद करण्यात आले आहे. विमान धावपट्टी ओलांडून संरक्षक भिंतीवर जाऊन धडकले आणि त्यानंतर बाजूच्या दरीत कोसळले, असे हवाई वाहतूक़ तज्ज्ञांनी सांगितले आहे. हे विमान धावपट्टीवर उतरत असताना एका टेकडीच्या टोकाला धडकल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिक कॅप्टन झेड. ग्लुसिका यांनी विमानाचे पुन्हा उड्डाण करण्याचा प्रयत्न केला, असेही काही तज्ज्ञानी म्हटले आहे.
विमानाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त समजताच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे(सीआयएसएफ) सुमारे १५० जवान, विमानतळावरील उच्च अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. अपघातानंतर अवघ्या काही वेळातच मदतकार्य सुरू झाले. मात्र, विमानाला मोठी आग लागलेली असल्याने त्या परिसरात धुर पसरला होता. त्यामुळे मदत कार्यात अडथळे निर्माण होत होते. विमानाला लागलेली आग विझवल्यानंतर त्या परिसरात असलेले दृष्य हृृदयद्रावक होते. जिकडे तिकडे जळालेले मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी जाऊन आपापल्या परीने शक्य तेवढी मदत केली.


त्या ८ जणांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती
एअर इंडियाच्या दुबईहून येथे आलेल्या विमानाला आज पहाटे झालेल्या भीषण अपघातातून ८ प्रवासी चमत्कारिकरित्या बचावले असून, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीची त्यांना खरोखर प्रचिती आली.
विमानाला अपघात झाल्यानंतर या विमानाचे दोन तुकडे झाले. यावेळी काही प्रवाशांनी विमानातून बाहेर उड्या घेतल्या आणि आपला जीव वाचवला. आणखी काही प्रवाशांनी विमानाला आग लागल्यानंतर आगीपासून बचाव करण्यासाठी बाजूच्या खड्ड्यात उड्या मारल्या. विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातून जात असलेल्या ऑटोरिक्षा चालकांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे प्राण वाचविण्यात मोलाची मदत केली.
"मी अजूनही जिवंत आहे यावर माझा विश्वासच बसत नाही', अशी प्रतिक्रिया या दुर्देवी विमानातून प्रवास करत असलेल्या प्रदीप नावाच्या प्रवाशाने व्यक्त केली. विमान धावपट्टीवर उतरण्यापूर्वी विमानाला हादरे बसले आणि उतरल्यानंतर लगेच दरीत कोसळून त्याचे तुकडे झाले. दरीत कोसळल्यानंतर सगळीकडे धुर पसरला होता आणि अवघ्या दहा मिनिटातच त्याठिकाणी भीषण स्फोट झाला, असेही प्रदीपने सांगितले. इंधनाच्या टाकीपासून विमानाचे दोन तुकडे झाले, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
विमान धावपट्टीवर उतरत असताना त्याचे एक चाक फुटले आणि त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले, असे उमर फारूख या विमानातील आणखी एका प्रवाशाने सांगितले.

"गोवादूत'वर शुभेच्छांचा वर्षाव

पाचवा वर्धापनदिन थाटात साजरा..

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - वाचक, जाहिरातदार, विक्रेते आणि हितचिंतक यांनी दिलेल्या शुभेच्छांच्या वर्षावात न्हाऊन निघालेल्या शानदार समारंभाने आज दैनिक "गोवादूत'चा पाचवा वर्धापनदिन अपूर्व उत्साहात पार पडला.
त्यानिमित्त गोमंतक मराठा समाज बिल्डिंगमधील "गोवादूत'च्या मुख्य कार्यालयात सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजेचे यजमानपद राजू पवार आणि सौ. नीशा पवार यांनी भूषवले. श्रीधर भटजी यांनी पौराहित्य केले. त्यानंतर चोडण येथील भजनी मंडळातर्फे भजनाचा रसाळ कार्यक्रम पार पडला. त्यामुळे सारे वातावरण मंगलमय बनले होते. त्यानंतर सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी "गोवादूत' कार्यालयाला भेट दिलेल्या विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांचे आणि हितचिंतकांचे स्वागत "गोवादूत' परिवारातर्फे करण्यात आले. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत या दैनिकाने घेतलेल्या भरारीबद्दल वाचकांनी गौरवोद्गार काढले. (गोवादूतला शुभेच्छा व्यक्त केलेल्या मान्यवरांची नावे पान ७ वर)

तमांग हत्या प्रकरणी ४५ जणांना अटक

गोजमोचा युवा नेता हत्येचा मास्टरमाईंड

सिलिगुडी, दि. २२ - ऑल इंडिया गोरखा लीगचे नेते मदन तमांग यांच्या हत्येप्रकरणी ४५ जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येचा मास्टरमाईंड गोरखा जनमुक्ती मोर्चाचा (गोजमो) युवा नेता असून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली.
गोजमोच्या युवा शाखेचा प्रमुख असलेल्या दिनेश गुरुंग यानेच तमांग यांच्या दार्जिलिंगमधील हत्येची योजना आखली होती आणि काल ही योजना प्रत्यक्षात साकारण्यात आली, अशी माहिती पश्चिम बंगालचे पोलिस महानिरीक्षक के. एल. तमता यांनी दिली.
पोलिस सध्या गुरुंग आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांनी पर्वतीय परिसरात गस्त वाढविली असून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
दार्जिलिंग येथे गोरखांच्या दोन गटांत काल चकमक उडाल्यानंतर काही अज्ञात हल्लेखोरांनी तमांग यांची खुखरीने हत्या केली होती. तेव्हापासून पश्चिम बंगालमध्ये आणि इतरही भागात तमांग यांच्या समर्थकांनी गोंधळ घालणे सुरू केले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

बसमालकांचा मंगळवारी संप

तिकीट दरवाढीला सरकारचा ठेंगा
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - डिझेल दरवाढीमुळे प्रवासी तिकीट दरांत वाढ करण्याच्या मागणीबाबत राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने येत्या २५ मे रोजी खाजगी प्रवासी बसमालक संघटनेतर्फे एक दिवसीय संपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारला १५ दिवसांची मुदत देणारी नोटीस देण्यात आली होती. या नोटिशीबाबत चर्चेची तयारी सोडाच; पण कोणताही प्रतिसाद सरकारकडून मिळाला नसल्याने संपाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे भाग पडत असल्याचे ते म्हणाले. तिकीट दरवाढीचा विषय हाताळताना खाजगी बस मालकांचे इतर विषय पुढे केले जातात. खाजगी बसवाल्यांची मनमानी, प्रवाशांशी उद्धटपणाची वागणूक इत्यादी विषय या प्रकरणी घुसडवले जात आहेत. या सर्व विषयांबाबत तोडगा काढण्यासाठी यापूर्वीच वाहतूकमंत्री व वाहतूक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याची तयारी संघटनेकडून ठेवण्यात आली आहे पण सरकारलाच या समस्या सुटलेल्या नको आहेत, अशा शब्दांत ताम्हणकर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. खाजगी बसवाल्यांत शिस्त आणली गेली तर वाहतूक पोलिस व वाहतूक अधिकाऱ्यांचे हप्ते व दंडात्मक महसुलावर पाणी सोडावे लागेल, याची चिंता त्यांना वाटते, अशी बोचरी टीकाही यावेळी त्यांनी केली. डिझेल दरवाढीमुळेच तिकीट दरवाढीची मागणी केली आहे व ही मागणी व्यावहारिक व अपरिहार्य आहे. डिझेल दरवाढीचे ओझे खाजगी बसमालकांनी आपल्या डोक्यावर पेलावे, असे जर सरकारला वाटत असेल त्यांनी त्याची सूट इतर कर आकारणीत द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.