Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 5 September, 2008

बीएमडब्ल्यू कांड संजीव नंदाला पाच वर्षांची शिक्षा

दोन दोषींना सहा महिन्यांची शिक्षा चौथ्या दोषीला १ वर्षाची शिक्षा
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली, दि. ५ : बहुप्रतीक्षित बीएमडब्ल्यू प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने आज दोषींना शिक्षा ठोठावली. या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला धनिकपुत्र संजीव नंदा याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. दोषी ठरविण्यात आलेल्या दोन जणांना प्रत्येकी सहा महिन्यांच्या कारावासाची, तर चौथा दोषी राजीव गुप्ता याला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
बीएमडब्ल्यू प्रकरणी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेला संजीव नंदा हा शस्त्रास्त्र व्यापारी सुरेश नंदा यांचा मुलगा आहे,तर माजी नौदलप्रमुख ऍडमिरल एस. एम. नंदा यांचा नातू आहे. आज शिक्षा ठोठावण्यात आलेल्या या चौघांनाही २ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने दोषी ठरविताना शिक्षेचे स्वरूप राखून ठेवले होते. तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. १० जानेवारी १९९९ रोजी संजीव नंदाने आपली बीएमडब्ल्यू ही आलिशान कार बेदरकारपणे चालवत दक्षिण दिल्लीच्या लोधी कॉलनीत सहा जणांना चिरडले होते. या घटनेच्या वेळी संजीव नंदासोबत त्याच्या कारमध्ये त्याचा मित्र माणिक कपूर हा देखील होता. मात्र, त्याची या प्रकरणातून न्यायालयाने यापूर्वीच निर्दोष म्हणून सुटका केलेली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद कुमार यांनी संजीव नंदा याला कलम ३०४ (२)अंतर्गत (जीव घेण्याचा उद्देश नसलेला)दोषी ठरविले. या कलमात गुन्ह्यासाठी १० वर्षांच्या कमाल शिक्षेची तरतूद आहे.
एखाद्या आरोपीला कलम ३०४ (२)अंतर्गत दोषी ठरविण्याचे बहुदा हे पहिलेच प्रकरण आहे. अशा प्रकारच्या बहुतांश प्रकरणांमध्ये कलम ३०४ (१)नुसारच निर्णय सुनावला जातो. बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यू ओढवणे, असे स्वरूप या कलमात येणाऱ्या प्रकरणांचे असते. यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.
या प्रकरणी अन्य आरोपी व्यापारी राजीव गुप्ता आणि त्याच्याकडे घरकामासाठी असलेले दोन नोकर भोलानाथ आणि शाम सिंग यांना पुरावे नष्ट केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आहे. घटना घडली तेव्हा राजीव गुप्ताचा मुलगा सिद्धार्थ हा देखील अपघाताच्या वेळी कारमध्येच होता. त्याची या प्रकरणातून ऑगस्ट १९९९ मध्येच निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे.

पोलिस असल्याची बतावणी करून लुबाडले

मडगाव, दि.५ (प्रतिनिधी): मडगावातील दुकाने व घरे फोडून लाखोंचा ऐवज पळविण्याचे प्रकार चालू असतानाच आज सकाळी राय येथे महामार्गावर पोलिस असल्याची बतावणी करून एका कष्टकरी महिलेकडील साधारणपणे ७६ हजारांचे दागिने पळविण्याचा प्रकार घडला व शहरातील गुन्ह्याप्रकरणात एका नव्या प्रकाराची नोंद झाली.
मायणा कुडतरी पोलिसांत नोंद झालेल्या तक्रारीनुसार उजवाडो -राय येथील पुष्पा गावकर ही महिला सकाळी उठून शिरोडा बाजाराला गेली होती, तेथून ती परत येऊन राय येथील बसथांब्यावर उतरून पायी घरी परतत असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी तिला आपण पोलिस आहोत, पुढे वाटेवरच खून झालेला आहे व त्यामुळे गडबड उडालेली आहे,तेव्हा तू सांभाळून जा,अंगावर दागिने ठेवू नकोस ,त्याऐवजी सगळे काढ व रुमालात गुंडाळून पिशवीत घाल व गुपचूप घरी जा असा सल्ला दिला.
छक्केपंंजे माहित नसलेल्या साध्याभोळ्या महिलेला ते खरेच वाटले, तिने त्यांच्या समक्षच गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, साखळी , बांगड्या, कानातली वगैरे काढली व त्यांची पुरचुंडी करून ती जवळच्या पिशवीत ठेवण्यापूर्वीच त्यापैकी एकाने ती हिसकावली व पोबारा केला. तिने आरडाओरडा केला पण त्यावेळी रस्त्यावर जवळपास कोणीच नव्हते , त्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.
मायणा कुडतरी पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला पण सायंकाळपर्यंत काहीच तपास लागला नव्हता.अशा प्रकारची ही या भागातील ही नवी घटना असून त्यामुळे पोलिस अधिकारी चक्रावले आहेत.
दरम्यान, गणेेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भर दिवसा मडगावातील गजबजलेल्या आबादे फारिय या रस्त्यावरील एक घर भर दुपारी फोडून आतून जो १.८० लाखांचा ऐवज लंपास केला गेला होता, त्याप्रकरणीही अजून कोणताच धागादोरा हाती लागलेला नाही . त्यावरून शहरात जरी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला गेलेला असला तरी त्याचा चोरट्यांवर काहीच परिणाम झालेला नाही हेच स्पष्ट झालेले आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांची माहिती देण्याबाबत 'एसएमएस'

सीबीआयची अशीही मोहीम
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) : भ्रष्टाचाराची कीड देशाला पोखरत असताना, आता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने त्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याने कोणत्याही प्रकारची लाच मागितल्यास त्याची थेट माहिती देण्याचे आवाहन करणारा"एसएमएस' केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनेच(सीबीआय)नागरिकांना पाठवल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
आज दुपारी अनेकांच्या मोबाईलवर "एसएमएस' रिंगटोन वाजली... प्रत्येकाने आपला मोबाईल पाहिला... तो "एसएमएस' सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला. कारण एसएमएस त्यांच्या आप्तस्वकीयांकडूनही नव्हता, की मोबाईल कंपनीकडूनही नव्हता. तो सीबीआयकडून आवाहन करणारा एसएमस होता. प्रत्येक बीएसएनएलधारकांच्या तोंडी आज या एसएमएसचीच चर्चा होती.
राजकीय नेत्यांसह सरकारी कार्यालयातही भ्रष्टाचाराची पाळेमुळे अगदी खोलवर गेली आहेत. सरकारी कार्यालयात एखादे काम करून घेण्यासाठी लोकांना अगदी खालपासून वरपर्यंत "हात गरम' करावे लागतात. मात्र आता अशा "हातां'मध्ये बेड्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण सीबीआयने अशा लोकांची माहिती त्वरित उपलब्ध करण्याचे आवाहन सर्वसामान्यांना केले आहे. केंद्र सरकारचा एखादा कर्मचारी जर "लाच' घेत असेल, मागत असेल वा घेताना आढळला तर त्याबाबत त्वरित ९४२३८८४१०० किंवा २४३४७१० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सीबीआयने मोबाईल ग्राहकांना केले आहे. इतकेच नव्हे तर सीबीआयच्या spacgoa@cbi.gov.in. या वेबसाइटवरही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण दिवसात बीएसएनएलच्या प्रत्येक मोबाईलधारकास हा मोबाईल संदेश पाठवण्यात आला. हा एसएमएस वाचून विविध प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.

नोकरीचे आमिष दाखवून विनयभंग केल्याची तक्रार 'टूर्स'च्या मालकाला अटक

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) : काम शिकवतो म्हणून टूर्स ऍंड ट्रॅव्हलच्या कार्यालयात बोलवून १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग आणि अतिप्रसंग केल्याने सान्तिनेज येथील एस.के. ट्रॅव्हल ऍंड टूर्सचा मालक सतिशकुमार काजोल (४५) याला आज पणजी पोलिसांनी अटक केली. दि. ३ सप्टेंबर रोजी चतुर्थीच्या दिवशी कार्यालयात कोणीच नसल्याची संधी साधून संशयित काजोल याने "त्या' तरुणीला बोलावून दुपारी १ ते ३ पर्यंत कार्यालयात कोंडून ठेवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आज त्या तरुणीने आपल्या अन्य मैत्रिणींना घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर दुपारी त्याच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक राहुल परब यांनी त्याला तीन तासांच्या आत अटक केली.
प्राप्त माहितीनुसार पाटो प्लाझा येथे नवीनच सुरू झालेल्या एका हॉटेलने एस.के. टूर्स ऍंड ट्रॅव्हल्स या कंपनीकडे आपल्या ग्राहकांसाठी वाहने व बसेस उपलब्ध करून देण्याचा करार केला आहे. त्यामुळे त्यासाठी एक काऊंटर त्या हॉटेलमध्ये सुरू करण्यात आले असून त्याठिकाणी काम करण्यासाठी एका मुलीच्या शोधात संशयित काजोल होता. त्यानंतर त्याच हॉटेलमध्येे काम करणाऱ्या एका तरुणीने आपल्या मैत्रिणीला याठिकाणी नोकरी असल्याचे सांगितले. त्यानुसार त्या हॉटेलच्या लॉबीतच या तरुणीची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर काम शिकण्यासाठी काही दिवस आपल्या सान्तिनेज येथील कार्यालयात यावे लागणार असल्याचे सांगून त्या तरुणीला संशयित काजोल याने तिला दि. ३ रोजी कार्यालयात बोलावले. दुपारी १ वाजल्यानंतर काजोल याने अचानक कार्यालयाचा दरवाजा बंद करून आपल्यावर अतिप्रसंग आणि विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, असे त्या तरुणीने दिलेल्या पोलिस तक्रारीत म्हटले आहे.
आज सकाळी त्या तरुणीने घडलेली सर्व हकिकत आपल्या त्या हॉटेलमधील मैत्रिणीला सांगितले. यावेळी त्यांनी याविषयी काजोल याला विचारले असता तो तेथून पळाल्याने त्यांनी याविषयीची रीतसर पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.द.स ३४२, ३५४, ५०९, ५०४ आणि ३२३ कलमानुसार गुन्हा नोंद करून काजोल याला अटक केली. संशयित काजोल हा मूळ हरियाणा येथे राहणारा असून गोव्यात तो पर्वरी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याविषयाची अधिक तपास उपनिरीक्षक राहुल परब करीत आहे.

Thursday, 4 September, 2008

अणुकरारप्रश्नी देशाची दिशाभूल

संसदेच्या विशेष अधिवेशनाची भाजपची मागणी
अध्यक्ष बुश यांच्या पत्राने
उघड केला दुटप्पीपणा

नवी दिल्ली, दि.४ : भारताने अणुचाचणी केल्यास त्यांना केला जाणारा अणुइंधनाचा पुरवठा तात्काळ रोखला जाईल, असे बुश यांनी अमेरिकी कॉंग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटलेले आहे. हे पत्र त्यांनी जानेवारी महिन्यात लिहिले होते. या पत्रातील माहिती त्यांनी भारत सरकारला दिलेली होती. याचाच अर्थ असा की, आपल्याच पंतप्रधानांनी संसदेची दिशाभूल केलेली आहे, असा आरोप आज भाजपने करून संसदेच्या खास अधिवेशनाची मागणी केली.
अमेरिकेशी नागरी अणुऊर्जा सहकार्य करणाऱ्या केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने देशाची तसेच संसदेची दिशाभूल केलेली आहे. यामुळे त्यांना आता यापुढे सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. मनमोहनसिंग सरकारने राजीनामा देऊन पायउतार व्हावे, अशी मागणी भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केली.
""अणुकरारामुळे भारताच्या अणुचाचणीच्या अधिकारांवर कोणतेही निर्बंध येणार नाहीत. आवश्यकता भासल्यास भारत अणुचाचण्या घेऊ शकतो. अणुकराराशी अणुचाचण्यांचा कसलाही संबंध नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आतापर्यंत सांगत होते. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या गोपनीय पत्राचा उलगडा झाल्याने मनमोहनसिंग यांनी देशाची दिशाभूल कशी केली, हे आता उघड झालेले आहे. याप्रश्नी दिशाभूल करून संसदेच्या दोन्ही सभागृहांचा पंतप्रधानांनी केलेला हा मोठा व गंभीर असा हक्कभंग आहे. या मुद्यावरून संसदेचे तात्काळ विशेष अधिवेशन आयोजित करावे व संपुआ सरकारने सत्तेतून पायउतार व्हावे. त्यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार पूर्णत: गमावलेला आहे,''असे यशवंत सिन्हा यावेळी म्हणाले.
संसदेत सरकारने केलेले वक्तव्य आणि अमेरिकेच्या अध्यक्षांनी अमेरिकी कॉंग्रेसला दिलेली माहिती ही परस्परांशी पूर्णत: विसंगत आहे. परस्परांशी निगडीत असलेल्या एकाच विषयांवर अमेरिका वेगळ्याच दिशेने विचार करीत आहे, तर भारत वेगळ्य़ाच दिशेने! अणुकराराच्या अंमलबजावणीला प्रारंभालाच असे गंभीर स्वरूपाचे मुद्दे समोर आल्याने भविष्यात काय होणार? कोणत्या समस्या उद्भवणार, आदी प्रश्नेही उपस्थित झालेले आहेत. आम्हाला जी भीती होती; ती खरी ठरलेली आहे. भारताला अणुतंत्रज्ञान देण्यास तसेच अणुइंधनासाठी सूट देण्यास अमेरिका इच्छूक नाही. भारताच्या अणुचाचण्यांविषयी अमेरिकेच्या मनात नेमके काय खदखदत आहे, हे बुश यांच्या पत्राने उघडकीस आलेले आहे, असे सिन्हा म्हणाले. अमेरिकेच्या "हाईड ऍक्ट'विषयी बोलताना सिन्हा म्हणाले की, अमेरिकेच्या या हाईड ऍक्टचा अणुकराराशी केवळ संबंधच नाही; तर कराराला बांधून ठेवणारा हा कायदा आहे. दोन्ही देशांवर हाईड ऍक्ट बंधनकारकच राहणार आहे. हाईड ऍक्टमधून भारताची सुटका नाहीच, असेही सिन्हा यावेळी म्हणाले.

गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण, अपघातात बालकाचे निधन

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): कुंडई औद्योगिक वसाहतीजवळ एका मारुती कारचा अचानक ताबा गेल्याने सुमारे सात ते आठ मीटर गाडी खाली कोसळून झालेल्या अपघातात गाडीतील सहा महिन्याचा बालक ठार झाला तर अन्य तिघे जखमी होण्याची घटना काल रात्री घडली.
याप्रकरणी फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री सुमारे पावणे दहाच्या सुमारास हा अपघात घडला. मडगाव येथील हे कुटुंबीय शिरगावहून आपल्या घरी परतत असताना मारुती गाडी क्रमांक जीए-०५-बी-०५०२ अचानक रस्त्याच्या बाजूला गेली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगडी कठड्याला धडक देऊन ही गाडी सुमारे सात ते आठ मीटर खाली कोसळली, अशी माहिती देण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना गोवा आरोग्य महाविद्यालयात दाखल केले. यावेळी कु.समर्थ जयेश नाईक या सहा महिन्याच्या जखमी बालकाचे प्राण वाचवणे शक्य न झाल्याने त्याचा अंत झाला. जखमींपैकी जयेश रघुनाथ नाईक(३२),नितीन गुरूदास बिचोलकर(३२) व विणा राजेश नाईक (६) यांच्यावर बांबोळी येथे उपचार सुरू आहेत तर शुभा जयेश नाईक(३०),विनोदकुमार(२२),ओम जयेश नाईक(५) यांना घरी पाठवण्यात आले. अपघाताचा पंचनामा हवालदार शिवाजी मेरवा यांनी केला तर पोलिस उपनिरीक्षक आमोणकर पुढील तपास करीत आहे.

म्हापसा येथे अपघातात दुचाकी चालक ठार

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): म्हापसा गणेशपुरी येथील शिवोलीमार्गे जाणाऱ्या उतरणीवर आज सकाळी दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालक महादेव वासुदेव खडजी (४२) हे ठार झाले. त्यांच्याबरोबर दुचाकीवर बसलेल्या त्यांच्या पत्नी पार्वती या जखमी झाल्याने त्यांना आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले असून यावेळी दुचाकीवर स्वार असलेली त्यांची तीन मुले मात्र सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी साडे दहाच्या सुमारास महादेव खडजी आपली पत्नी पार्वती खडजी व मुले कु. रेशा(९), कु. नवमी (३) व कु. तुषार (२) यांना घेऊन मोरजी येथे आपल्या गावी गणेश चतुर्थीला जात होते. म्हापसा गणेशपुरी येथील धोकादायक उतरणीवर ते आपली कायनेटिक होंडा क्रमांक जीए-०३-एम-५५३४ या दुचाकीवरून जात असता म्हापसामार्गे येणारी मारूती झेन क्रमांक जीए-०१-एस-१८१४ ही दिसताच त्यांचा दुचाकीवरील ताबा गेला. वेळीच ब्रेक न लागल्याने रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर दुचाकीचा धक्का बसल्याने त्यांच्या डोक्याला बराच मार बसला. हा धक्का एवढा जबरदस्त होता की हेल्मेटचे देखील तुकडे झाले. दुचाकीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी व तीनही मुले बाजुला फेकली गेली. यावेळी त्यांना तात्काळ म्हापसा आझिलो इस्पितळात दाखल केले असता तिथे त्यांना मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्या पत्नी पार्वती या जखमी झाल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले असून तीनही मुलांना सुदैवाने कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी मोरजी येथील खडजी कुटुंबीयांवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे या गावातील लोक हळहळ व्यक्त करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा आरोग्य महाविद्यालयात पाठवला असून त्यांच्यावर उद्या अंतीमसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पंचनामा साहाय्यक उपनिरीक्षक श्माम नाईक यांनी केला तर उपनिरीक्षक बसवानी पुढील तपास करीत आहेत.

अणुसहकार्य करारावर केंद्राचा दुटप्पीपणा उघड सरकारचे 'वस्त्रहरण'!

नवी दिल्ली, दि.४ (रवींद्र दाणी): वॉशिंग्टनने आण्विक करारात भारताचे अण्वस्त्रहरण केले तर वॉशिंग्टन पोस्टने मनमोहनसिंग सरकारचे वस्त्रहरण केले. ज्या मनमोहनसिंगांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची हिंमत विरोधकानांही होत नव्हती, त्याच मनमोहनसिंगांच्या शब्दावर विश्वास ठेवणे आता सरकारमधील त्यांच्या सहकाऱ्यानांही जड जात आहे.
बुश प्रशासनाने अमेरिकन कॉंग्रेसच्या समितीला पाठविलेले २६ पृष्ठांचे अति गोपनीय पत्र प्रसिध्द झाल्यानंतर मनमोहनसिंग यांच्या विश्वसनीयतेला जबर तडा गेला आहे.
काकोडकर यांचा दुजोरा
विशेष म्हणजे वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिध्द झालेल्या या पत्राला भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी दुजोरा दिला आहे. या पत्राची मलाही माहिती होती. ते प्रश्नोत्तराच्या स्वरुपात आहे हेही मला माहित होते असे डॉ. काकोडकर यांनी आज एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या पत्राची माहिती डॉ.काकोडकर यांना होती, याचा अर्थ ती पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनाही होती. मनमोहनसिंग यांनी ती देशाच्या संसदेपासून दडवून ठेवली हे सरकारी गोटात मानले जात आहे.
अमेरिकेचे भारतातील राजदूत डेव्हिड मेलफोर्ड यांनीही या पत्रातील माहितीला दुजोरा दिला आहे. पत्रात नवे काहीच नाही, पत्रात जे काही आहे ते सारे भारत सरकारला सांगण्यात आहे आहे, असे मेलफार्ड यांनी म्हटले आहे. डॉ.काकोडकर व मेलफोर्ड या दोघांनीही या पत्राचे अस्तित्व मान्य केले आहे. मात्र भारताच्या संसदेत या करारावर अनेकदा चर्चा होत असताना सरकारने या पत्रात नमूद असलेल्या अटींच्या नेमकी विरुध्द माहिती संसदेला दिली. आणि प्रत्येक वेळी हे काम खुद्द पंतप्रधानांनी केले.
काकोडकर यांचा खुलासा
डॉ.काकोडकर यांच्या या मुलाखतीचे वृत्त बाहेर येताच सरकार हादरले. कारण काकोडकर यांनी या पत्राची आपल्याला माहिती होती, असे सांगून सरकार व पंतप्रधान यांना अडचणीत आणले होते. मग काकेडकर यांना खुलासा करण्यास सांगण्यात आले. आपल्याला पत्राची माहिती होती, पण पत्रात काय आहे हे आपल्याला माहित नव्हते, असा नवा खुलासा काकेडकर यांनी नंतर केला. पण काकोडकर यांच्या या खुलाशाला सरकारचे वस्त्रहरण रोखण्याची एक केविलवाणी धडपड मानली जाते. कारण, एका चॅनेलाला त्यांनी या पत्रातील माहितीची आपल्याला माहिती होती, असे सांगितले आहे तर दुसऱ्या एका चॅनेलला त्यांनी आपल्याला फक्त पत्राची माहिती होती, असे सांगितले आहे.

राज्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) : राज्यातील दीड दिवसांच्या गणपतींचे आज थाटात विसर्जन करण्यात आले. घुमट आरतींची साथ व फटाक्यांची आतषबाजी यांच्या जोडीने व पुढील वर्षी लवकर येण्याची प्रार्थना करीत श्रींना निरोप देण्यात आला.
राजधानी पणजीत मिरामार येथील समुद्र किनाऱ्यावर तसेच बेती फेरीबोट धक्क्यावर विसर्जनासाठी लोकांनी मोठ्याप्रमाणात उपस्थिती लावली होती. गोव्यात दीड,पाच,सात,नऊ,अकरा व एकवीस दिवसांचा गणेश चतुर्थी उत्सव साजरा केला जातो. राज्यातील शहरी भागांतील लोक जादाकरून दीड दिवसांचा उत्सव साजरा करतात तर विविध ग्रामीण भागांत मात्र जादाकरून पाच दिवसांचा उत्सव साजरा केला जातो.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राजधानी पणजीत शांतता पसरली असली तरी विविध गावांत मात्र उत्सवाला उधाण आले आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांना खऱ्या अर्थाने सुरुवात होत असते. नोकरी व्यवसायानिमित्ताने शहरात राहणारे लोक या उत्सवानिमित्ताने आपल्या मूळ गावी जात असल्याने शहरात सामसूम पसरली आहे.

Tuesday, 2 September, 2008

आता ब्रम्हपुत्रेचाही कहर आसामात महापूर

गुवाहाटी, दि. २ : कोसी नदीच्या महापुराने बिहारमध्ये लाखो लोक विस्थापित झाले असून अजूनही तेथे पुनर्वसन आणि मदत कार्य सुरू आहे. त्यातच आता आसामामध्येही पुराने थैमान घातले आहे. जवळपास दहा लाख लोक बेघर झाले आहेत. आतापर्यत १५ जणांचा पुराने बळी घेतला असून लष्कराचे जवान पूरग्रस्तांच्या मदतकार्यात गुंतले आहेत. लोकांना वाचविण्यासाठी जवानांचे भगीरथ प्रयत्न सुरू आहेत. तसेच वायुदलाची हेलिकॉप्टर्सही मदतकार्यासाठी पाचारण करण्यात आली आहेत.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुत्रेच्या पात्राचे २० ही भराव पुराने फुटल्याने आसामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यातील २७ जिल्ह्यांपैकी १६ जिल्ह्यांना पुराचा जबर तडाखा बसला असून सुमारे तीन लाख हेक्टर जमीन पुराखाली आली आहे. या महापुराच्या हाहाःकाराने १३४६ गावे होत्याची नव्हती झाली आहेत. महापुरातील हजारो विस्थपित लोक सध्या तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत राहत आहेत.
दरम्यान, यापूर्वी सन २००४ मध्ये आसाममध्ये आलेल्या महापुरात सुमारे २०० हून अधिक लोकंाचा बळी गेला होता.

आज विघ्नहर्त्याचे आगमन

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): 'मंगलदिन हा सोनियाचा मंगलमूर्ती मोरया, श्री गणेशा मोरया मंगलमूर्ती ये घरा' दुःख हरण करून सर्वत्र सुखाची बरसात करणारी विद्येची देवता श्री गणरायाचे स्वागत करण्यासाठी गोमंतकातील समस्त हिंदू लोक सज्ज झाले आहेत. गणेश चतुर्थी निमित्ताने उद्या श्रींच्या मूर्तींची घरोघरी व सार्वजनिक ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.आज गौरीच्या पूजेने घरांतील गणेशोत्सवास आरंभ झाला असून नवविवाहितांसाठी हा उत्सव महत्त्वाचा मानला जातो.
आज दिवसभर चतुर्थीच्या खरेदीसाठी राजधानी पणजी, मडगाव अन्य शहरांत एकच गर्दी लोटली होती. त्यात खास करून चाकरमानी लोकांचा जास्त समावेश होता. सरकारी तथा खाजगी कर्मचाऱ्यांना काल पगार झाल्याने सामान खरेदीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आज बाजारात गर्दी केली होती. गोव्यात शहरी भागात स्थायिक झालेले लोक गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या मूळ गावी जात असल्याने दिवसभरात बसगाड्यांत प्रवाशांची झुंबड उडाली होती. रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट जाणवत होते. विविध सरकारी कार्यालये आज उघडी जरी असली तरी बहुतेक कर्मचारी हे खरेदीत व्यस्त असल्याने काही प्रमाणात या कार्यालयांतही उत्सवाचे वातावरण होते. महागाईमुळे खरेदी करताना सर्वसामान्य लोकांची मात्र बरीच त्रेधातिरपीट उडल्याचे स्पष्टपणे दिसत होते. एरवी पणजीत मांडवी नदीच्या तीरावरील फुटपाथवर माटोळीचे सामान विक्रीसाठी घेऊन बसणारे विक्रेते नाहीसे झाले आहेत. जुन्या भाजी बाजाराच्या जागेत फटाक्यांची तात्पुरती दुकाने उभारण्यात आली आहेत. कडधान्ये व इतर आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या असताना भाजी,फळे व फुलांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य लोकांना खरेदीचा मोठा फटका बसला आहे. काही सरकारी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता हातात मिळणारा पगार व बाजारातील वाढत्या किमती यांचा ताळमेळ घालणेच शक्य नसल्याने यावेळी "कर्ज काढून सण साजरा'करण्याची वेळ आल्याची माहिती देण्यात आली. गोव्यात मटका जुगार खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे परंतु ऐन चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा व्यवसायही बंद झाल्याने अनेकांची निराशा झाली आहे. दरम्यान, महागाईचा झळ सोसूनही लोकांच्या उत्साहावर मात्र किंचितही परिणाम झाला नाही, अशा प्रतिक्रिया व्यापारी वर्गांकडून मिळाल्या. महागाई वाढल्याने लोकांकडून निराशा व्यक्त केली जात असली तरी जे हवे ते खरेदी करण्यासही कुणी मागे राहत नाही,अशी माहिती देण्यात आली.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महागाईने फटाके व रोषणाईला यंदा कमी मागणी होती. चतुर्थीच्या निमित्ताने एरवी जी अन्य खरेदी केली जात होती तीही कमी प्रमाणात झाली. सरकारी मालकीच्या कदंब परिवहन महामंडळाने कारवार, बेळगाव,मंगळूर, हुबळी या मार्गावर जादा बसेस सोडल्या. सर्वाधिक बसेस कारवार मार्गावर सोडल्याचे कदंबच्या सूत्रांनी सांगितले. कोकण रेल्वेच्या मंगळूर गाडीवर तर प्रचंड गर्दी झाली . त्यांची डिझेल कारही कधी नव्हे ती या दिवसात भरून जात असल्याचे कोकण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

मडगावात भरदिवसा घरफोडीत १.८० लाखांचे दागिने पळविले

मडगाव, दि. २ (प्रतिनिधी): लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने जरी मडगावात केंद्रीय सुरक्षा दलाची गस्त कालपासून तैनात केलेली असली तरी त्या सर्वांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी गणेेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भर दिवसा मडगावातील गजबजलेल्या आबाद फारिया या रस्त्यावरील एक घर भर दुपारी फोडून आतून १.८० लाख रूपयांचा ऐवज लंपास केला अन् चतुर्थीसाठी येथील घर बंद करून गावात कसे जावे अशी जी चिंता नोकरी व काम धंद्यानिमित्त गोव्याची व्यापारी राजधानी गणल्या जाणाऱ्या या शहरात वास्तव्य क रून असलेल्या हजारो लोकांना लागून राहिली होती ती सार्थ ठरविली
आज दुपारी आबाद फारिया या रस्त्याला लागून असलेल्या मारिया नरोन्हा या महिलेच्या घरात ही चोरी झाली. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारी वरून ती दुपारी ११ ते १२-३० दरम्यान घरबंद करून बाजारात गेली होती व त्या दरम्यान हा प्रकार घडला.
चोरटे तळमजल्यावरील बाथरुममधील खिडकीचे ग्रील्स काढून घरात शिरले व त्यांनी बेडरूममधील तीन कपाटे खाटेवरील उशीखाली असलेल्या चाव्यांनी उघडली. आतील कपडे इतस्ततः फेकले व आतून सोन्याच्या ९ बांगड्या, ३ हार, २ बे्रसलेटस, ३साखळ्या, ८ कर्णफुले व ६ अंगठ्या व रोख चार हजार मिळून साधारण १.८० लाखाचा ऐवज पळविला.
पोलिसांनी लगेच धाव घेऊन श्र्वानपथक आणून तपास केला तसेच रेल्वे स्टेशन व सीमा नाक्यांना सतर्क केले पण गुन्हेगारांचा कोणताच थांगपत्ता लागला नाही. चोरटे जाताना छपरावरून गेले . शेजारच्या लोकांनी तो आवाज ऐकला. सदर मारीया हिने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून दोघे परत परत फेऱ्या टाकत होते कदाचित त्यांचेच हे काम असावे.आठवड्यात तर सलग तीन दिवसात चार धाडसी चोऱ्या प्रकार चोरांनी करून दाखवला आहे .दवंदे , मुंगुल , भारत संचार निगमचे ग्राहक सेवा केंद्र व घोगळ गृहनिर्माण वसाहतींत मिळून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज पळविला आहे.

राजकीय अस्थैर्य कायम, गणेशोत्सवानंतर राजकीय हालचालींना वेग

पणजी, दि.२ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सभागृहात विनियोग विधेयकाला मंजुरी मिळवण्यात यश मिळवले असले तरी त्यांच्या सरकारवरील टांगती तलवार मात्र अद्याप दूर झालेली नाही. गणेश चतुर्थीनंतर कुंभारजुवेचे आमदार तथा विद्यमान सरकार पक्षातील अनुसूचित जमातीचे एकमेव नेते पांडुरंग मडकईकर यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वर्णी लावली जाईल, असा ठाम निर्णय पक्षाचे केंद्रीय निरीक्षक बी.के.हरिप्रसाद यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्याने सध्या आघाडीत अस्वस्थता पसरली आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात गणेश चतुर्थीचे वेध लागल्याने जनता जरी उत्सवात तल्लीन झाली असली तरी राजकीय पटलावर मात्र वातावरण शांत झालेले नाही. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारवर सासष्टी तालुक्याचा जो वरचष्मा प्राप्त झाला आहे तो आता आघाडी पक्षातील नेत्यांनाच बोचत असल्याने मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालटाचे वारे सध्या घोंगावत आहे. मडकईकर यांच्यासाठी ज्योकीम आलेमाव यांचे मंत्रिपद जाणार असल्याने आलेमाव बंधू अस्वस्थ झाले आहेत. मंत्रिमंडळात दोन बंधू असताना अन्य नेत्यांवर अन्याय झाल्याची भावनाही काही नेत्यांत बनल्याने याबाबत सामंजस्य तोडगा काढण्याचे श्री.हरिप्रसाद यांनी मान्य केले आहे. पुढील आठवड्यात ते गोवा भेटीवर येणार असून याच काळात श्री.मडकईकर यांचा शपथविधी होण्याचेही संकेत मिळत आहेत.
माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आल्याने त्यांनी सध्या जो सरकारवर हल्लाबोल चालवला आहे त्याबाबत मात्र मुख्यमंत्री चिंतित नाहीत, भाजपकडूनही नार्वेकर यांना जवळ करण्याची शक्यता नसल्याचे ओळखूनच त्यांना हटवण्यात आल्याचे एका मंत्र्याने सांगितले. दरम्यान, भाजपने जर नार्वेकर यांना जवळ करण्याचे प्रयत्न केले तर त्याचा जास्त फटका त्यांनाच होणार असल्याने नार्वेकर यांची परिस्थिती "इकडे आड तिकडे विहीर'अशीच बनली आहे. नार्वेकर यांनी स्थापन केलेल्या नव्या आघाडी अंतर्गत सरकारविरोधात जोरदार मोहीम उघडण्याची तयारी चालवली असून सरकारच्या अनेक भानगडींची यादीच तयार करण्यात येत असल्याची माहिती त्यांच्या सूत्रांनी दिली. उत्तर गोव्यातील प्रत्येक मतदारसंघात जाहीर सभांचे आयोजन करून सरकारच्या या भानगडींचा पर्दाफाश करण्याचेही नियोजन सुरू आहे. नार्वेकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची विनंती केल्याचीही खबर आहे. दरम्यान, पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मात्र या प्रस्तावास विरोध केला असून तसे झाल्यास पक्षाची सूत्रे पूर्णपणे त्यांच्या हाती जाण्याची भिती त्यांनी वाटत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीनंतर गोव्यातील राजकीय नाट्याला नव्याने कलाटणी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

टाटांचा सिंगूरला रामराम

नवी दिल्ली, दि. २ : नॅनो कारचा सिंगूरमधील प्रकल्प जमिनीच्या वादामुळे ठप्प पडल्याने तेथून आता माघार घेण्याचा निर्णय टाटा कंपनीने घेतला आहे. यासंबंधातील घोषणा मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली. पश्चिम बंगालने एक महत्वपूर्ण प्रकल्प यामुळे गमावला आहे.
एकीकडे पाच दिवसांपासून टाटा मोटर्सचे काम बंद असताना तृणमूलचे आज आंदोलन आज दहाव्या दिवशीही सुरूच होते. काल आंदोलनकर्त्यांनी दुर्गापूर एक्सप्रेस हायवे रोखून धरल्याने हजारो वाहने अडकून होती. पण, काल रात्रीपासून आंदोलनकर्त्यांनी हा मार्ग मोकळा केल्याने वाहने पुढे जाऊ शकली.
दरम्यान, सिंगूर प्रकरणी चर्चेसाठी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काल चर्चेसाठी तयारी दर्शविली. त्यामुळे लवकरच यातून काहीतरी समाधानकारक तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली होती पण आता कंपनीनेच तेथून स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.

Monday, 1 September, 2008

बाणावलीत तणाव पंचायत मंडळाच्या राजीनाम्याची मागणी; पंचायतमंत्र्यांचा निषेध

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): काल ग्रामसभा असतानाही तिकडे न फिरकलेले पंचायत मंडळ, त्यानंतर पोलिसांनी गावात सुरू केलेले धमकावणी सत्र व विधानसभेत पंचायतमंत्र्यांनी मेगा प्रकल्प विरोधकांबद्दल काढलेले अनुद्गार यामुळे आज सकाळी बाणावलीत तणाव निर्माण झाला होता. तथापि, यंत्रणेने ही स्थिती संयमाने हाताळल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.
काल ग्रामसभा असतानाही सरपंचांसह पंचायत मंडळच तिकडे न फिरकल्याने संतप्त नागरिकांनी आज सकाळी पंचायतीत जमून संबंधितांना जाब विचारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार लोकांना मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहनही केले होते. मात्र, काल रात्री पोलिसांनी सर्वत्र फिरून लोकांना आज पंचायतीत न जाण्याबाबत धमकावले, असा आरोप आज करण्यात आला. त्या धमकीला भीक न घालता लोक आज मोठ्या संख्येने जमले, परंतु सरपंच, उपसरपंच वा एकही पंच ग्रामसभेकडे न फिरकल्यामुळे लोक खवळले व त्यांनी संपूर्ण पंचायत मंडळाने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यास प्रारंभ केला. परिणामी तणाव वाढल्याचे पाहून पोलिसांनी जमावाभोवती कडे केले. त्यामुळे लोक अधिकच चवताळले.
यावेळी सिरियाका बार्रेटो, सेबी फर्नांडिस , बॅनी फर्नांडिस यांनी लोकांना मार्गगदर्शन केले. त्यांनी पोलिसी दडपशाहीला विरोध दर्शवला व असा प्रकार सहन केली जाणार नाही, असे बजावले. लोकांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करून पंचायतीच्या तमाम कारभाराचा तपशील मागण्याचे ठरवले. लोकांना सामोरे जाण्याचे धाडस नसलेल्या पंचायत मंडळाने सामूहिक राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. त्याचबरोबर याप्रकरणी गणेश चतुर्थीनंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात चर्चेसाठी येत्या ८ रोजी एक बैठक बोलावण्यात आली आहे. पंचायतमंत्र्यांनी यांनी मेगा प्रकल्पविरोधकांना उद्देशून काढलेल्या उद्गारांबद्दल त्यांचाही आज निषेध करण्यात आला .

बिहारसाठी गोव्याचे एक कोटी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद

पणजी,दि.१(प्रतिनिधी) : पुराने उच्छाद मांडलेल्या बिहारातील आपद्ग्रस्तांसाठी गोवा सरकारने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बिहारातील या परिस्थितीसंदर्भात पर्वरी सचिवालयात आघाडीतील घटक पक्षांची एक बैठक घेतली. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग व कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनी बिहार राज्याला भेट दिल्यानंतर येथील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व राज्यांकडे बिहार राज्याला मदत करण्याचे आवाहन केले होते. देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गोवा सरकारने आपल्या मदतीचा हात पुढे केला आहे. आज आपल्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री कामत यांनी ही माहिती दिली. सर्व मंत्रिमंडळ सदस्य,आमदार तथा सरकारी कर्मचाऱ्यांना एका दिवसाचा पगार बिहार पंतप्रधानांच्या मदतनिधीत जमा करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. गोव्यातर्फे शक्य होईल तेवढी मदत बिहारला दिली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, बिहारातील पूरग्रस्तांसाठी गोव्याकडून अत्यावश्यक औषधांचा एक ट्रक पाठवण्याची विनंती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपणास केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ही मदत तात्काळ पाठवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सशयित आरोपी कोर्टातूनच पळाला

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) : हातातील हजारो रुपयांची रोकड घेऊन पळ काढताना अटक केलेला संशयित आरोपी सलीक जाफर हा आज दुपारी पोलिसांच्या तावडीतून फरारी झाला. २५ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी मिळवण्यासाठी आज त्याला पणजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात घेऊन गेले होते. न्यायालयामध्ये बेड्या घालण्यास परवानगी नसल्याने त्याला बेड्या न घालताच पोलिस घेऊन गेले होते. तेव्हा दुपारी न्यायालयात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन तेथील पोलिसांना धक्का देऊन जाफर पळून गेला. त्याचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत लागला नव्हता. गेल्या महिन्यात पणजी कदंब बसस्थानकावरून कारवार पोलिसाच्या तावडीतून एक अट्टल चोर पळाला होता. त्याला पंधरा दिवसाच्या आत म्हापसा बस स्थानकावर अटक करण्यात पणजी पोलिसांना यश आले होते.
सलीक जाफर (३०) सडपातळ असून वर्ण गोरा आहे. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट तर काळ्या रंगाची पॅंट परिधान केली आहे. तो मुळचा सांगली महाराष्ट्र येथे राहणारा आहे. या वर्णनाशी मिळतीजुळती व्यक्ती दिसल्यास तिची पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याप्रकरणी त्याच्याविरोधात २२४ कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२५ ऑगस्ट रोजी पणजीतील बॅंक ऑफ इंडियामध्ये भगवान पांडे (७०) यांच्या हातातील ४० हजार रुपये घेऊन पळून जाताना जाफर याला अटक झाली होती. पैसे मोजून देतो असे सांगून या वृद्धाला लुटण्याचा त्याने प्रयत्न केला होता. याविषयीची पोलिस तक्रार मंगेशी म्हार्दोळला राहणारे श्री. पांडे यांनी पणजी पोलिस स्थानकात केली होती. याविषयाची तपास उपनिरीक्षक योगेश पेडणेकर करीत होते. जाफर फरारी झालेल्या घटनेचा तपास उपनिरीक्षक तुषार लोटलीकर करत आहेत.

पणजी पालिकेचे पैसे उकळल्याप्रकरणी पाल पतीपत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) : राज्य प्रशासनात वादग्रस्त ठरलेले नगरविकास खात्याचे सचिव आर. पी. पाल (आयएएस), त्यांची पत्नी पुतूल व पणजी महापालिकेच्या अज्ञात कर्मचाऱ्यांविरोधात पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका बनावट कर्मचाऱ्यांच्या नावाने पुतूल पाल ही पणजी महापालिकेचे रोजंदारीवरील कामगार म्हणून रोज १४७ रुपये लाटत असल्याची तक्रार 'ऊठ गोंयकारा' संघटनेचे प्रवक्ते ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी केली होती. त्यावर झालेल्या प्राथमिक चौकशीत तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे आज सायंकाळी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ४२०, ४६८ व ४०६ कलमांखाली गुन्हा नोंदवला. त्याचप्रमाणे पालिकेचे कर्मचारी दत्ताराम बालेकर, जॅरी व तुळशीदास सावंत यांच्या जबान्याही नोंदवण्यात आल्या.
हे कर्मचारी आल्तिनो येथील पाल यांच्या सरकारी निवासस्थानी जाऊन एका पाकिटातून पैसे देत असल्याचे तपासाअंती उघड झाले आहे.
राकेशश्र्वरी हन्नूर या महिलेच्या नावावर हे पैसे श्रीमती. पाल ही उकळत असल्याची तक्रार गेल्या २९ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती. राकेशश्र्वरी हन्नूर हे नाव रोजंदारीच्या कामगारांच्या यादीत पालिकेचे अभियंते विवेक पार्सेकर यांनी घालण्यासाठी सांगितले होते, अशीही माहिती उघड झाली आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा दावा करून श्रीमती पाल यांनी पालिकेचे घेतलेले सर्व पैसे परत करावे, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
प्राप्त माहितीनुसार श्री. पाल हे ३१ ऑगस्ट ०८ रोजी गोवा प्रशासनातून मोकळे झाले असून त्याची लक्षद्वीप येथे बदली झाली आहे. मात्र त्यांच्या या "पराक्रमा'ची माहिती लक्षद्वीपपर्यंत पोहोचल्याने त्यांना येथील प्रशासनाने सेवेत रुजू करून घेण्यास मज्जाव केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे याबाबतची एक तक्रार केंद्र प्रशासनाकडेही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचातपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक नारायण चिमुलकर करीत आहेत.

पाणीमिश्रित डिझेलचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत 'कदंब'ची पोलिसांत तक्रार; प्रवाशांची गैरसोय

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) : कदंब महामंडळाला पुरवठा झालेल्या डिझेलचे नमुने आज "आयओसी' या कंपनीने तपासणीसाठी आपल्या प्रयोगशाळेत नेले. काल कदंब महामंडळाने पाणीमिश्रित डिझेलचा पुरवठा झाल्याची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकात नोंदवताना हे डिझेल वास्कोतील "आयओसी' कंपनीने पुरवल्याचे नमूद केले होते.
आज "आयओसी'च्या अधिकाऱ्यांची जबानी पोलिसांनी नोंदवली. या डिझेलमधे कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र अद्याप त्या टॅंकरचा चालक व क्लीनर पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. हे पाणी नक्की कुठे मिसळण्यात आले, याचा शोध सध्या पोलिस घेत असून कंपनीने तपासणीसाठी नेलेल्या नमुन्यांचा अहवाल उद्यापर्यंत पोलिसांना उपलब्ध होणार आहे.
या पाणीमिश्रित डिझेलमुळे काल एकाच दिवशी १६ ठिकाणी वेगवेगळ्या मार्गांवर कदंबाच्या बसेस बंद पडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता. या पार्श्वभूमीवर पेडणे भागात कदंबाच्या बसेस न आल्यामुळे या बसेसवर अवलंबून राहिलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याविषयीचा तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक अशोक बावकर करीत आहेत.

Sunday, 31 August, 2008

दयानंद नार्वेकर यांनी स्थापन केला "गोवा डेमोक्रॅटिक फ्रंट'

माजी मंत्री बंडाच्या पवित्र्यात
.. खाणमालकांनी घेतला बळी
..बहुजन समाजावर अन्याय
. .कॅसिनो, सीएमझेडला विरोध
.. शेतजमीन रूपांतरास विरोध

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - गोवा विधानसभेच्या अखेरच्या दिवशी सरकारच्या कारभाराविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केलेले माजी अर्थमंत्री दयानंद नार्वेकर यांनी आज म्हापसा येथे सुमारे एक हजार समर्थकांच्या उपस्थितीत गोवा डेमोक्रॅटिक फ्रंटची स्थापना करून राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. आज म्हापसा येथे झालेल्या एका बैठकीत ऍड. नार्वेकर यांनी या विषयीची घोषणा केली. त्यामुळे येणाऱ्या काळात कॉंग्रेस पक्षाला हा फ्रंट जड जाण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. आज सायंकाळी म्हापसा येथे झालेल्या या फ्रंटच्या बैठकीत शेती व फळझाडांना उपयुक्त जमीन विकण्यास विरोध करणारा ठराव घेण्यात आला. त्याचप्रमाणे "सीएमझेड', प्रादेशिक आराखडा २०२१, राज्याचे खाण धोरण, तसेच कॅसिनोंना देण्यात आलेल्या परवान्यांना विरोध करणारे ठराव यावेळी संमत करण्यात आले.
आपल्याला मंत्रिमंडळातून वगळण्यामागे गोव्यातील खाण लॉबीचा हात असल्याच दावा यावेळी ऍड. नार्वेकर यांनी केला. गोव्याचे प्रभारी कमलनाथ यांनी मला पक्षात घेतले होते, त्यावेळी माझ्यावर आरोपपत्र दाखल होते. मग आताच त्यांना त्या आरोपपत्रांची आठवण का आली, असा सवाल त्यांनी केला. बहुजन समाजावर अत्याचार करणारी कृती असून या समाजावर हा अन्याय आहे, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी वाहतूक मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्यावर कोणतेही आरोपपत्र दाखल झाले नव्हते, मग त्यांना कशाला वगळण्यात आले, असा खडा प्रश्न ऍड. नार्वेकर यांनी बोलताना उपस्थित केला.
गोव्यातील शेतजमीन व फळझाडांसाठी उपयुक्त जमीन बिगरगोमंतकीयांना विकण्यास प्रतिबंधित करण्यासाठी राज्य सरकारने कर्नाटक सरकारने बनवलेल्या कायद्याच्या आधारावर गोव्यातही कायदा अमलात आणावा असा ठराव यावेळी स्वातंत्र्यसैनिक सुबोध शेटये यांनी मांडला. दि. १ मे २००८ रोजी सरकारने अधिसूचित केलेला "सीएमझेड' धोरणाला विरोध करणारा ठराव यावेळी घेण्यात आला. या धोरणामुळे गोव्यातील मच्छीमारी करणाऱ्या लोकांवर संक्रांत येणार असल्याचे यावेळी क्षत्रिय मराठा समाजाचे सरचिटणीस कृष्णकांत भोसले म्हणाले.
प्रादेशिक आराखडा २०२१ साठी स्थापन करण्यात आलेला "टास्कफोर्स' हा केवळ पंचायत आणि पालिकांचे अधिकार कमी करण्यासाठी बनवण्यात आला असल्याचा गौप्यस्फोट यावेळी करण्यात आला. आराखडा तयार करून त्यानुसार विकास करण्याची जबाबदारी ही पंचायत आणि पालिकांची असून ती राज्य सरकारची नाही. प्रादेशिक आराखडा २०२१ हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार असून गोव्यातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे यावेळी प्रा. एडवर्ड डिलिमा यांनी केला.
राज्यात सध्या खाण मालक पंचायतीकडून " ना हरकत दाखला' न घेताच खाणी चालवत आहेत. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर व्यवस्थित कारवाई करीत नाही. त्यामुळे पर्यावरणाला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. खाण व्यवसाय सरकारच्या तिजोरीत दरवर्षी केवळ २५ कोटी रुपयांची भर घालते, तर हा व्यवसाय दर वर्षाला ५ हजार कोटी रुपयांची कमाई करीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गोव्यात अजून खाणींना परवानगी दिल्यास गोव्यात लोकांना राहण्यास कठीण होणार आहे. तसेच कुशावती, साळावली व म्हादई नदीला धोका निर्माण होणार असल्याचा दावा यावेळी डॉ. बबन परुळेकर यांनी ठराव मांडताना केला.
यावेळी ओरिसा राज्यात स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची गोळ्या घालून करण्यात आलेला घटनेचा तसेच अल्पसंख्यांकावर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला.

गोव्यात बहुजन समाजावर मोठा अन्याय- रवी नाईक

स्वाभिमान जागवून न्याय मिळविण्याचे आवाहन
फोंडा, दि.३१ (प्रतिनिधी) - गोव्यात बहुजन समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय सुरू असून बहुजन समाजातील लोकांत जोपर्यंत स्वाभिमान, अभिमान जागृत होत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणे कठीण आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री रवी नाईक यांनी आज संध्याकाळी फर्मागुडी फोंडा येथे केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने फर्मागुडी येथील श्री गोपाळ गणपती सभागृहात आयोजित प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर गृहमंत्री रवी नाईक बोलत होते. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. कैलास कमोद, परिषदेचे गोव्यातील प्रमुख संयोजक आमदार नीळकंठ हळर्णकर, प्रा. हरी नरके, माजी मंत्री सुभाष शिरोडकर, फोंड्याचे नगराध्यक्ष संजय नाईक, कुडचडेचे नगराध्यक्ष अभय खांडेकर, संयोजक रामचंद्र मुळे, गुरूदास सावळ, उल्हास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
बहुजन समाजातील लोकांना काही जणांनी पैशांच्या जोरावर लाचार बनविल्याने त्यांच्यातील स्वाभिमान, अभिमान नष्ट झाला आहे. त्यामुळे गोव्यात आज बहुजन समाजाला अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे, असे सांगून गृहमंत्री श्री. नाईक म्हणाले की, प्रत्येक मनुष्याने आपल्या जाती धर्माबाबत स्वाभिमान बाळगला पाहिजे. समानता नसल्याने श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत चालली आहे. बहुजन समाजातील शिक्षित लोकांनी आपल्या समाज बांधवाच्या उद्धारासाठी पुढे येण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यातील राजकारणात बहुजन समाजावर अन्याय सुरू असल्याची तक्रार माजी मंत्री सुभाष शिरोडकर यांनी आपल्या भाषणात केली. बहुजन समाज एकसंध नसल्याने काही राजकारणी आपली पोळी भाजून घेत आहेत. बहुजन समाजाने ताठ मानेने जगण्याची गरज आहे. शिक्षणातून बहुजन समाजाचा विकास होऊ शकतो, असेही श्री. शिरोडकर यांनी सांगितले.
ओबीसी समाज आपल्या हक्कासाठी झगडण्यात उदासीनता दाखवत असल्याने या समाजाला राखीवतेचा लाभ पन्नास वर्षानंतर मिळाला आहे. ह्या समाजाचे राखीवता हक्क डावलण्याचा प्रयत्न होत असून हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ह्या समाजाने समता परिषदेच्या माध्यमातून एकजूट होऊन लढण्याची गरज आहे, असे प्रा. हरी नरके यांनी सांगितले.
डॉ. कैलास कोमद यांनी परिषदेच्या कार्याची माहिती दिली. आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी स्वागत केले. उल्हास नाईक यांनी प्रास्ताविक केले. संदीप नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रामचंद्र मुळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सुभाष महाले यांनी केले.

राजेंद्र वेलिंगकर, विनायक च्यारींच्या अटकेमुळे खवळलेल्या श्रीकृष्णभक्तांचा पर्वरी पोलिस स्टेशनवर मोर्चा

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी पामेला हेन्री डिसोझा हिच्याविरोधात तक्रार करूनही तिला अटक न करता, तिच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या राजेंद्र वेलिंगकर व विनायक च्यारी यांना आज सकाळी अटक करण्यात आली. त्यामुळे सायंकाळी संतप्त हिंदूंनी पर्वरी पोलिस स्थानकावर मोठा मोर्चा काढून या अटकेचा निषेध केला. त्याचप्रमाणे श्रीमती पालेमा हिने हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी उद्या १ सप्टेंबर रोजी सायंकाळपर्यंत समस्त गोमंतकीयांची लेखी माफी न मागितल्यास त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यभर उमटतील, असा इशारा मंदिर सुरक्षा समितीचे निमंत्रक राजेंद्र वेलिंगकर यांनी दिला आहे.
पोलिस केवळ एकाच घटकावर कारवाई करून गोव्यात धार्मिक तणाव निर्माण करीत असल्याचाही आरोपही यावेळी करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाला शिव्या देऊन धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पामेलावर कारवाई होत नाही, तोपर्यंत तिच्या तक्रारीत नावे असलेल्या एकाही हिंदूला अटक करू देणार नाही, असे यावेळी जाहीर करण्यात आले. पर्वरी पोलिस या परिसरातील एका माजी मंत्र्याच्या दबावाखाली येऊन काम करीत आहेत. तसेच त्या माजी मंत्र्याने आपल्या "लेटरहेड'वर पोलिसांना पत्र पाठवून त्याठिकाणी गोकुळाअष्टमी दिवशी वडाची पूजेसाठी गेलेल्यांवर त्वरित कारवाई करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मोर्चा घेऊन आलेल्या हिंदूंनी त्या माजी मंत्र्याविरोधात जोरदार घोषणा देऊन त्याचा धिक्कार केला. या मोर्चात शेकडो कृष्णभक्त सामील झाले होते.
आज सकाळी १० वाजता राजेंद्र वेलिंगकर व बजरंग दलाचे गोवा प्रमुख विनायक चारी यांना पर्वरी पोलिस स्थानकावर चौकशीसाठी म्हणून बोलावून त्यांना अटक करण्यात आली. नंतर त्यांची प्रत्येकी पंधरा हजारांच्या हमीवर सुटका करण्यात आली. या अटकेची माहिती मिळताच दुपारी चारपर्यंत पेडणे, म्हापसा, फोंडा, पणजी व पर्वरी परिसरातील हिंदू बांधव पर्वरीत जमा झाले. हिंदूच्या देवांना शिव्या देणाऱ्या महिलेवर कारवाई नाही आणि वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्यांवर कारवाई केल्याने संतप्त हिंदूंनी पर्वरी पोलिस स्थानकावर मोर्चा काढून याचा जाब विचारला. त्यावेळी आम्ही त्या महिलेवर "चॅप्टर केस' उद्या नोंदवणार असल्याचे निरीक्षक देवेंद्र गाड यांनी सांगितले. अपशब्द वापरून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या महिलेवर गेल्या आठ दिवसांत कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी धार्मिक तणावाला खतपाणी घातल्याचा ठपका यावेळी पोलिसांवर ठेवण्यात आला.
मंत्र्याच्या पत्रामुळे व पामेलाने उठवलेल्या अफवेमुळे आज सकाळी घाईगडबडीत वेलिंगकर व च्यारी यांना अटक करण्यात आली. एका दिवसात हिंदू याठिकाणी श्रीकृष्णाचे मंदिर उभारणार असल्याचे काल रात्री श्रीमती पामेलाने पोलिसांना सांगितल्याने आज पुन्हा एकदा साईनगर येथील कृष्णवडाच्या ठिकाणाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी सकाळी ताबडतोब वेलिंगकर व च्यारी यांना दूरध्वनी करून बोलावून घेतले आणि अटक केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत वडाच्या ठिकाणी फौजफाटा तैनात करण्यात आला. सदर जागा कोणाच्या नावावर आहे याचा छडा पोलिसांनी अद्याप लावलेला नाही. पामेला हिचा त्या जागेवर कोणताही अधिकार नाही, ती जाग मोकळी आहे, असे यावेळी श्री. वेलिंगकर यांनी सांगितले. तिच्याकडे त्या जागेची कागदपत्रेच नसताना तेथे ती तणाव निर्माण करीत असल्याचा दावा पोलिसांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाने केला.
२३ ऑगस्ट रोजी साईनगर येथे शेकडो भाविक वर्ष पद्धतीनुसार श्रीकृष्णवडाची पूजा करण्यासाठी गेले होते. यावेळी त्या परिसरात राहत असलेल्या पामेला व के. के. रेड्डी यांनी त्या महिलांना विरोध करून भगवान श्रीकृष्णाला अपशब्द व शिव्या दिल्या होत्या. त्यामुळे त्याठिकाणी प्रचंड तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या झटापटीत पामेला हिने विनायक च्यारी यांच्या हाताचा चावा घेतला होता, तसेच त्यांच्या दिशेने मोठा दगड उगारला होता. याविषयाची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकावर करण्यात आली होती. हिंदूंना कृष्णवडाची पूजा करण्यास मज्जाव करण्यात आल्याची तसेच हिंदू देवतांना शिव्या देऊन धार्मिक तणाव निर्माण केल्याचीही तक्रार देण्यात आली होती. त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
दरम्यान, आज (रविवारी) सायंकाळी काढलेल्या मोर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी मामलेदार गौरीश शंखवाळकर, म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकारी एस. आर . गोलतेकर, हणजूण पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर, निरीक्षक देवेंद्र गाड उपस्थित होते.

अमरनाथचा तिढा सुटला

संघर्ष समिती व काश्मिर सरकार यांच्यात समझोता
नवी दिल्ली, दि. ३१ - अमरनाथ संघर्ष समिती आणि जम्मू-काश्मिर सरकार यांच्यात अमरनाथ भूमी हस्तांतराच्या मुद्यावर आज सकाळी झालेल्या एका करारावर सह्या झाल्या व त्यामुळे गेले अनेक दिवस सुरू असलेल्या अमरनाथ जागा प्रकरणाचा तिढा सुटला आहे.
जम्मू काश्मिरचे राज्यपाल एन.एन.व्होरा यांनी नियुक्त केलेली चार सदस्यीय समिती आणि अमरनाथ संघर्ष समितीच्या सदस्यांच्या दरम्यान काल रात्री ९ वाजल्यापासून सुरू झालेली चर्चेची चौथी फेरी आज पहाटे ५ वाजता आटोपली. चर्चेेनंतर संघर्ष समिती आणि राज्यपालांनी नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा राज्यपालांचे सल्लागार डॉ. एस.एस. ब्लोइरिया यांच्यात झालेल्या करारानुसार अमरनाथ यात्रा काळात "बालताल' येथील ८०० कनाल जमीन अमरनाथ मंदिर संस्थानला देण्यात येणार असून याकरिता संस्थानकडून वनजमीन वापरण्याच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचे भाडे आकारण्यात येणार नसल्याचे या करारात मान्य करण्यात आले .
असे असताना जमिनीच्या मालकीबाबत कोणताही बदल न करण्यावर दोन्ही पक्षांत मतैक्य झाले.
या करारानुसार यात्रा आयोजनाची जबाबदारी राज्यसरकारच्या मदतीने अमरनाथ संस्थानकडेच राहणार असल्याचे मान्य करण्यात आले.
६० दिवसांच्या आंदोलनानंतर संघर्ष समितीने आंदोलन थांबवण्यात आल्याची घेाषणा क रत आजची चर्चा यशस्वी झाल्याचे सांगितले व जम्मूतील लोकांसाठी चर्चेेेची ही फेरी लाभदायक ठरल्याचे सांगितले आहे.
बैठकीनंतर संघर्ष समितीचे अध्यक्ष लिलाकरण शर्मा म्हणाले की, आम्ही आंदोलन थांबवलेले नाही. अजूनही आमच्या काही मागण्या मान्य झालेल्या नाहीत त्यापूर्ण होई पर्यंत आंदोलन पूर्ण बंद होणार नाही. दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर अमरनाथ भूमी हस्तंातरणाच्या मुद्यावर पहिल्यांदा शांततापूर्ण तोडगा काढण्यात यश आले आहे.
यापूर्वी २३ ऑगस्ट रोजी संघर्ष समिती व जम्मू-काश्मिर सरकार यांच्यात चर्चेची तिसरी फेरी झाली.
राज्यसरकारच्या समितीत जम्मू विधापीठाचे कुलगुरू प्रा.अमिताभ मट्टो, जम्मू काश्मिरच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जी. डी. शर्मा आणि राज्याचे मुख्य सचिव बी.बी.व्यास यांचा समावेश आहे.
संघर्ष समितीत तीलकराज शर्मा, ब्रिगेडीअर सुचेत सिंग, नरेंद्र सिंह आणि पवन कोहली यांचा समावेश आहे.

सासष्टीतील तीन ग्रामसभा नागरिकांच्या आक्षेपांमुळे तहकूब

मडगाव, दि. ३१ (प्रतिनिधी) - सासष्टीतील ग्रामसभा म्हणजे मेगा प्रकल्पांसंबंधी वादंग असे समीकरण होऊन बसले आहे, त्यामुळे गेले काही महिने अशा ग्रामसभांतील बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणेची लगबग सुरू असते. आज बाणावली, कोलवा व राय अशा तीन ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा होत्या, त्या तिन्ही सभा वेगवेगळ्या कारणांसाठी तहकूब करण्याचा प्रकार घडला तर बाणावलीमधील नागरिकांनी उद्या सकाळी पंचायत क्षेत्रातील लोकांची खास बैठक बोलावली आहे.
बाणावली पंचायत गेले काही महिने तेथील मेगा प्रकल्पांमुळे गाजत आहे. तेथील ग्रामसभा आज ठरलेली होती. पण तेथील पंचायत सचिव अल्लाउद्दीन हा शुक्रवारपासून रजेवर असल्याने पंचायत मंडळाने ग्रामसभाच पुढे ढकलली व तशी नोटिस काढली. ग्रामसभेचे इतिवृत्त लिहावयाचे पुस्तक व अन्य सर्व कागदपत्रे कुलूपबंद असल्याने व सचिव रजेवर असल्याने ग्रामसभा घेऊन काय उपयोग असा विचार करून ती पुढे ढकलल्याचे काल सरपंच कार्मेलीन यांनी सांगितले.
पण आज सकाळी पंचायत सचिव हजर झाला, गावकरीही जमले परंतु संपूर्ण पंचायत मंडळच न आल्याने ग्रामसभा पुढे ढकलणे भाग पडले . आता ही ग्रामसभा २८ सप्टेंबर रोजी घेण्याचे ठरले तर जमलेल्या लोकांनी उद्या सकाळी ९-३० वा . एक व्यापक बैठक घेऊन पंचायतीच्या कारभारावर चर्चा करण्याचे ठरविले आहे.
दरम्यान, पंचायत सचिव अल्लाद्दीन याने सांगितले की आपण शुक्रवार व शनिवार असे दोनच दिवस रजेवर होतो. त्यांनी आपल्या कामाचा ताबाही कुणाकडे दिला नव्हता. आणखी एका वृत्तानुसार एका राजकारण्यानेच पंचायत सचिवाला आज बळजबरीने पाठविले. पंचायत मंडळाची कोंडी करणे हाच यामागील त्याचा उद्देश हेाता.
महिला पंचाविरुद्ध तक्रार
राय पंचायतीच्या ग्रामसभेत तेथील सरपंचांच्या पत्नी असलेल्या महिला पंचसदस्याने व्यासपीठावरून खाली उडी टाकून एकाच्या बखोटीला पकडल्यामुळे सभेत गदारोळ माजला व त्याची परिणती ग्रामसभा तहकूब करण्यात झाली. ग्रामविकास मुद्यावर समिती नियुक्त करण्याबाबत एक गावकरी सरपंच नाझारेथ गोम्स याच्याशी हुज्जत घालू लागल्याने पंच असलेल्या एज्मिराल्द संतप्त झाल्या व त्यांनी खाली उडी टाकून रेमो ब्लाजा याला ढकलले व बकोटीला पकडले, अशी तक्रार त्याने केली आहे. सरपंचांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करूनही गदारोळ शांत होत नाही असे पाहून मग सभाच तहकूब केली गेली. ती आता १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
दुसरीकडे सरपंचांनी एजमिराल्दा यांनी सदर व्यक्तीच्या बखोटीला धरल्याचे मान्य केले पण मारहाण केल्याचा इन्कार केला आहे. दुसरीकडे गावकऱ्यांनी एज्मिराल्डा यांनी पंचसदस्यत्वाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वर्तनाबद्दल पंचायत संचालकांकडे तक्रार करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
कोलवातही सभा तहकूब
कोलवा पंचायतीची ग्रामसभा तहकूब केली गेली ती वेगळ्याच कारणासाठी. सरपंच व पंचायतमंडळ पूर्ण तयारीनिशी आलेले नाही त्यामुळे त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे वा खुलासे मिळत नाहीत, असा आरोप करून पूर्ण तयारीनिशी येण्यासाठी सभेची तारीख २८ ऑगस्ट मुक्रर करण्यात आली. सरपंच सुझी फर्नांडिस यांनी ती मान्य केल्यामुळे अनुचित प्रकाराविना ग्रामसभा पार पडली.