Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 9 June 2011

सिंघल, स्वराज यांनी घेतली रामदेव बाबांची भेट

हरिद्वार,दि.८ : विश्‍व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल, भाजपाच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी आज योगगुरू बाबा रामदेव यांची भेट घेतली आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला. बाबांच्या मागण्या देशहितात असल्याने सरकारने त्या तात्काळ मान्य करायला हव्या, असे आवाहन यावेळी सिंघल यांनी केले.
भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी आणि स्वच्छ व पारदर्शक राज्य कारभारासाठी अतिशय कठोर कायद्याची गरज आहे, लोकांच्या कल्याणासाठी योग्य व्यवस्था आवश्यक आहे. आपलेच लोक आपल्याच देशाला लुटत असून, हा प्रकार थांबवायलाच हवा, असे सिंघल यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. सिंघल यांच्यासोबत विहिंपचे काही वरिष्ठ नेतेही बाबांच्या भेटीला आले होते.
बाबा रामदेव यांना ‘ठग’ संबोधणारे कॉंगे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांचा सिंघल यांनी खरपूस समाचार घेतला. हे कॉंगे्रसी लोक ओसामा बिन लादेनसारख्या कुख्यात दहशतवाद्याला ओसामाजी असे संबोधतात आणि साधू-संतांना ठग म्हणतात. यातूनच कॉंगे्रसचा खरा चेहरा दिसून येतो, अशी टीका त्यांनी केली.
भाजपच्या वरिष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनीही बाबा रामदेव यांची भेट घेतली. बाबांची प्रकृती काहिशी खालावली असली तरी; त्यांचे इरादे मात्र बुलंद आहेत. भाजपचा त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. या देशातून भ्रष्टाचार नष्ट व्हावा, हीच सर्वसामान्य जनतेचीही आज अपेक्षा आहे, असे स्वराज यांनी सांगितले.
रामदेव बाबा उभारणार लष्कर
दिल्लीतील रामलीला मैदानावर पोलिसांनी दडपशाही केल्यानंतर भविष्यात पोलिसांचा मुकाबला करण्यासाठी तसेच भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अडथळे आणणार्‍या समाजकंटकांना निपटण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव यांनी आपल्या सुमारे ११ हजार तरुण समर्थकांचे लष्कर उभारण्याचा निर्णय आज जाहीर केला.
‘‘प्रत्येक जिल्ह्यातील किमान २० तरुणांनी हरिद्वार येथे यावे. येथे मी त्यांना शास्त्र आणि शस्त्र दोहोंचेही प्रशिक्षण देईन,’’ असे बाबा रामदेव यांनी आपल्या पतंजली आश्रमात उपस्थित असलेल्या हजारो समर्थकांना संबोधित करताना सांगितले. माझे हे लष्कर कुणावर हल्ला करण्यासाठी नसून, स्वरक्षणासाठी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बाबा रामदेव यांचे उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच असून, त्यांची प्रकृती खालावली असल्याने डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला आहे.
कायदाच कारवाई करेल : चिदम्बरम्
११ हजार तरुणांचे लष्कर उभे करण्याच्या बाबा रामदेव यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत, बाबांनी आपली ङ्गौज उभी करावी, त्यांच्याविरुद्ध कायदा स्वत:हूनच योग्य ती कारवाई करेल, असा इशारा गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनी दिला.

No comments: