Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 26 December, 2009

तेलंगणातील १३ मंत्र्यांचे राजीनामे

हिंसाचार जारीच, सोनिया गांधी यांना पाठविले फॅक्स
हैदराबाद, दि. २५ : आंध्रातील तेलंगणा विभागातील सर्वच्या सर्व म्हणजे १३ ही मंत्र्यांनी आज कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फॅक्सद्वारे एक सामूहिक पत्र पाठविले असून त्यात स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावर आपण आपापल्या पदाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतला आहे, असे कळविले आहे. या तेराही मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री रोसय्या यांची येथील सचिवालयात भेट घेऊन त्यांना आपल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. नंतर पी. लक्ष्मय्या, सविता रेड्डी, डी. श्रीधर बाबू व इतर मंत्र्यांनी सांगितले की, आम्ही केंेद्र सरकारला आवाहन केले आहे की, स्वतंत्र तेलंगणा निर्मितीसंदर्भात एक स्पष्ट कालमर्यादा आखून देण्यात यावी.
केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी २३ डिसेंबर रोजी तेलंगणासंदर्भात जे नवे वक्तव्य केले आहे त्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून त्यामुळेच राज्यात पुन्हा आगडोंब उसळला आहे, याकडे या मंत्र्यांनी लक्ष वेधले आहे. सोनिया गांधींची लवकरात लवकर भेट मिळावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही या मंत्र्यांनी सांगितले.
हिंसाचार जारीच
आंध्रातील तेलंगणा भागात तेलंगणा समर्थकांचा हिंसाचार जारीच असल्याने स्थिती गंभीरच आहे. तेलंगणा समर्थक ठिकठिकाणी निषेध व्यक्त करीत आहेत, रास्ता रोको करत आहेत. विशेष म्हणजे ख्रिस्मसकडे बघता तेलंगणा राष्ट्रीय समितीने बंदचे आवाहन मागे घेतल्यानंतरही हा हिंसाचार जारी आहे. तेलंगणा संयुक्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी नागरी पुरवठा विभागाच्या गोदामांवर हल्ला केला तसेच मेहबूबनगर येथे काही वाहनांना आग लावून दिली.
वारंगल शहरात समितीच्या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाचे मंत्री पी. लक्ष्मय्या यांच्या घरावर दगडफेक केली. यानंतर लक्ष्मय्या यांनीही मंत्रिमंडळातील आपल्या १२ सहकाऱ्यांप्रमाणेच मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मंत्र्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला पोलिसांनी रोखले. वारंगलमधील काकातिया विद्यापीठासमोर हजारो तेलंगणासमर्थक विद्यार्थ्यांनी रॅली काढली व घोषणाबाजी केली.
आदिलाबाद जिल्ह्यातही तेलंगणासमर्थकांनी रॅली काढल्या, रास्ता रोको केले तसेच तेलंगणाविरोधक नेत्यांचे पुतळे जाळले. करीमनगर येथे आंदोलनकर्त्यांनी आठ ट्रकचे नुकसान केले तसेच गोदावरीखानी येथे एका कारला तसेच जीपला आग लावून दिली, असे पोलिसांनी सांगितले. काल उशिरा रात्री राघवपूर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेची सिग्नल केबिन जाळून टाकली. तेलंगणा आंदोलनाला समर्थन म्हणून सिंगारानी कोळसाखाणीतील मजुरांनी आज सामूहिक रजा आंदोलन केले, तर मस्ताबाद पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या पोथुगल खेड्यात असलेला इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला काही अनोळखी तत्त्वांनी क्षती पोेचवली. मेडक जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको, धरणे व पुतळे जाळण्यात आले. तामीळ अभिनेता मोहन बाबूचेही पुतळे आंदोलनकर्त्यांनी अनेक जागी जाळले. मोहनबाबू अखंड आंध्र मोहिमेत स्वत:ला सामावून घेतले आहे.

भाजपच्या सहकार्याने सरकार स्थापन करणार

झामुमोचा दावा
रांची, दि. २५ : शिबू सोरेन यांच्या नेतृत्वात आणि भाजप व एजेएसयु यांच्या सहकार्याने आम्ही झारखंडमध्ये सरकार स्थापन करणार, असा दावा झारखंड मुक्ती मोर्चातर्फे करण्यात आला आहे. भाजप व एजेएसयू यांनी झामुमोला समर्थन देण्याचे मान्य केले आहे, असे पक्षाचे उपाध्यक्ष हेमलाल मुरमू यांनी आज सोरेन यांच्या निवासस्थानी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.
नुकत्याच झारखंडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने १८ तर त्यांच्यासोबत निवडणूक पूर्व आघाडी करणाऱ्या जदयुने २ जागा जिंकल्या आहेत. झामुमोने १८ जागांवर विजय मिळविला असून एजेएसयुने पाच जागा पटकाविल्या आहेत. ही नवी आघाडी झाल्यास ८१ सदस्यीय सभागृहात त्यांची संख्या ४३ होते आणि ही संख्या सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या आकड्यांसाठी पुरेशी आहे.
भाजपची रविवारी बैठक
झारखंड विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी भाजपची उद्या रांची येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, झारखंडमध्ये सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने भाजप नेत्यांनी आज चर्चा केली असल्याची माहिती आहे. निवडणूक निकालानंतर राज्य विधानसभेत निर्माण झालेल्या त्रिशंकू पार्श्वभूमीवर भाजपच्या आज झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, प्रदेश अध्यक्ष रघुबर दास, ज्येष्ठ नेते यशवंत सिंग आणि इतर नेत्यांसोबत झारखंडमधील पक्षाचे प्रभारी उपाध्यक्ष करुणा शुक्ला उपस्थित होते.
उद्या होणाऱ्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडीसह सरकार स्थापन करण्याबाबतही विचारविमर्श केला जाणार आहे. या बैठकीला भाजपचे केंद्रीय निरीक्षक म्हणून शुक्ला यांच्यासह अनंत कुमार हेही उपस्थित राहणार आहेत. अन्य एका वृत्तानुसार माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग हे सुद्धा बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दिल्ली येथे पत्रकारांसोबत बोलताना राजनाथसिंग म्हणाले की, आम्ही जर झारखंडमध्ये सरकार स्थापन केले तर आम्ही राज्यातील जनतेला चांगले आणि स्थिर शासन देऊ.

रशियन युवतीवर हणजूण अतिप्रसंग

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): कोलवा येथे एका रशियन तरुणीवर झालेल्या बलात्काराचे वादळ शमते ना शमते तोच आज सकाळी हणजूण येथे एका टॅक्सी चालकाने आपल्याला धमकी देऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची पोलिस तक्रार हणजूण पोलिस स्थानकात दाखल झाली आहे. ही तक्रार ऑल्गा त्यारिना (२९) व इरना बाबयान (२५) यांनी दिली आहे. ही घटना काल मध्यरात्री २ च्या दरम्यान ग्रेंडपेढे हणजूण येथे घडली. पोलिसांनी या तक्रारीची त्वरित दखल घेऊन सदर टॅक्सी चालक प्रशांत शिरोडकर याच्याविरुद्ध भा. दं. सं. ५०६, ५०९ व ३२३ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
अधिक माहितीनुसार ऑल्गा आणि तिची मैत्रीण इरना बाबयान या दोघी बागा येथील हॉटेल हिलटोनमध्ये उतरल्या असून काल रात्री त्या साळगाव येथील "वेस्ट एंड' या पबमध्ये पार्टीत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. मध्यरात्री २ च्या दरम्यान पुन्हा बागा येथे जाण्यासाठी त्यांनी ३०० रुपयांत जीए ०१ सी ९६१३ ही टॅक्सी भाड्याने ठरवली. सदर टॅक्सी चालकाने वाटेत वाहन थांबवून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तसेच पायावर बेसबॉल बॅटने प्रहार केला, असे त्या रशियन तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. चालकाने आपल्या अन्य एका मित्राला बोलावण्यासाठी दूरध्वनी केला, तो व्यस्त असल्याचे पाहून आम्ही दोघांनी वाहनातून पळ काढला, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. तसेच, सकाळी सात वाजेपर्यंत एका झाडाच्या मागे लपून रात्र घालवल्याचे त्यांनी म्हटले आहे. सकाळ होताच त्या दोघा रशियन तरुणींनी पोलिस स्थानक गाठून या विषयीची पोलिस तक्रार केली.
वाहन चालक शिरोडकर याने आम्हाला अश्लील भाषेत शिवीगाळ करून आपल्याबरोबर घरी येण्यासाठी दबाव टाकला. तसेच न आल्यास जिवे मारण्याचीही धमकीही दिली, असा दावा त्या दोघा तरुणींनी केला आहे. सदर या घटनेची नोंद करून वाहन चालकाचा शोध घेतला जात असल्याचे या प्रकरणाचे तपास अधिकारी साहाय्यक उपनिरीक्षक श्याम नाईक यांनी सांगितले.
--------------------------------------------------------------------
कळंगुट, बागा आणि हणजूण भागात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पार्ट्या सुरू असून त्यावर अंकुश ठेवण्यास पोलिसांना अपयश आले आहे. राजरोसपणे अमली पदार्थाचे सेवन होत असून त्याकडे अमली पदार्थ विरोधी पथकानेही कानाडोळा केला आहे. काही दिवसांपूर्वी "वेस्ट एंड' पबमध्ये सकाळच्या वेळी पोलिसांनी छापा टाकला होता, त्याच रात्री त्याच पबमध्ये जोरदार ड्रग्जची पार्टी झाल्याचे माहिती मिळाली आहे.
-------------------------------------------------------------------
या घटनेमुळे साळगाव येथील "वेस्ट एंड'मध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी तसेच देशी पर्यटक मद्याच्या नशेत धुंद होतात. तसेच अमली पदार्थाच्या पार्ट्याही याठिकाणी झाडल्या जातात. उद्या शनिवारी आणि रविवारी अमली पदार्थाच्या पार्टीचे आयोजन करण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. सदर पिडीत तरुणी याच "वेस्ट एंड'मध्ये काल रात्री पार्टी करून परत निघताना तिच्यावर अतिप्रसंग होण्याची घटना घडली आहे.

रोझ गार्डनच्या प्राचार्यांची 'त्या' पालकाविरुद्ध तक्रार

संस्थेच्या अध्यक्षांचेही घूमजाव
पणजी, दि. २५(प्रतिनिधी): पर्वरी येथील रोझ गार्डन प्राथमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. चोडणकर यांच्याकडून कु. श्रेयश कळंगुटकर या विद्यार्थ्यावर छळाचे प्रकरण चिघळत चालले आहे. या प्रकरणी प्राचार्य श्री. चोडणकर यांनी आज सदर मुलाचे वडील शिवाजी कळंगुटकर यांच्याविरोधात खोटे आरोप करून बनावट तक्रार केल्याचा ठपका ठेवला आहे. यासंबंधी त्यांनी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे कालच सांगितलेल्या धर्मराज भोसले यांनीही घूमजाव करून आपण राजीनामा दिलाच नाही, अशी भूमिका घेत प्राचार्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न चालवले आहेत.
या प्रकरणी प्राचार्य श्री. चोडणकर यांच्याविरोधात बालहक्क कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून घेतल्याने त्यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. येत्या २ जानेवारी २०१० रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. आता हे आरोप खोडून टाकण्यासाठी प्राचार्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असून कु. श्रेयश याचे वडील शिवाजी कळंगुटकर यांनी संस्थेची बदनामी करण्यासाठी आपल्याविरोधात खोटी तक्रार दिल्याचे म्हटले आहे. दरम्यान, श्री. चोडणकर यांनी आपल्या तक्रारीत कु. श्रेयश या तिसरीतील मुलावर आक्षेपार्ह आरोप केले असून या तक्रारीवरून ते आणखी अधिक या प्रकरणांत गोवले जाण्याची शक्यता आहे. कु. श्रेयश याच्या कॅलेंडरवर मारलेल्या शेऱ्यांसाठी वापरलेली भाषा योग्य होती काय, असा सवाल केला असता या विद्यार्थ्याला समजावण्याचा प्रयत्न केला तरी तो समजून घेत नाही व यामुळेच ही परिस्थिती उद्भवली, असे लंगडे समर्थन सदर प्राचार्य करीत आहे. या तक्रारीत शिवाजी कळंगुटकर यांनी केलेले सगळे आरोप प्राचार्य श्री. चोडणकर यांनी फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष धर्मराज भोसले यांच्याशी काल प्रत्यक्ष मोबाईलवर संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली असता त्यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा संस्थेच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. आज मात्र त्यांनी अचानक घूमजाव केले व लेखी पत्र पाठवून आपण "तसे बोललोच नाही' अशी भूमिका घेतली आहे. संस्थेत कोणताही गैरप्रकार सुरू नाही असा दावा करून शिवाजी कळंगुटकर यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. कु. श्रेयश याच्या वागणुकीबाबत १७ डिसेंबर रोजी शिक्षण खात्याला पत्र पाठवून जाणीव करून दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आता ही तक्रार १५ रोजी दाखल झाल्यानंतर १७ रोजी शिक्षण खात्याला पत्र पाठवण्याची कृती कितपत ग्राह्य ठरते हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, त्यांनी पाठवलेल्या पत्रामागची सत्यता पडताळून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याचे टाळले.

पाच वर्षांत ९२४३ जणांना सरकारी नोकऱ्यांची खिरापत

खर्चकपात व आर्थिक सुधारणांना ठेंगा
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): राज्याची बिकट आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वित्त खात्याने जारी केलेल्या आदेशांची उघडपणे पायमल्ली करून कॉंग्रेस आघाडी सरकारने गेल्या पाच वर्षांत बेसुमार नोकर भरती केल्याचा आकडा समोर आला आहे. माहिती हक्क कायद्याखाली प्राप्त झालेल्या या माहितीनुसार राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारने नोकरभरती हा एककलमी कार्यक्रम राबवून गेल्या पाच वर्षांत सुमारे ९२४३ जणांना नोकरभरतीची खिरापत वाटल्याची माहिती उघड झाली आहे. सरकारी नोकऱ्या फुकटात मिळणे दुरापास्त, त्यामुळे या एकूण भरतीत किती कोटींचा व्यवहार झाला असावा याचेच कोडे अनेकांना पडले आहे.
माहिती हक्क कायद्याखाली प्राप्त झालेला गेल्या पाच वर्षांतील सरकारी नोकर भरतीचा आकडा धक्कादायकच ठरला आहे. राज्याचा आर्थिक डोलारा सुधारण्यासाठी वित्त खात्याने काही आर्थिक उपाययोजना सुचवणारा आदेश २० नोव्हेंबर २००६ रोजी जारी केला होता. या आदेशाद्वारे १ मार्च २००७ पासून नवी भरती करू नये, असे स्पष्ट करण्यात आले होते; पण हे आदेश धुडकावून लावत सरकारने आपल्या मर्जीप्रमाणे नोकर भरती केली. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारी तिजोरीवर पडलेला ताण कमी करण्याचे सोडून त्यात अधिकाधिक भर घालण्याची कृती होत असल्याने सरकार कर्जबाजारी होण्याचीच जास्त शक्यता उद्भवली आहे. गेल्या पाच वर्षांत विविध सरकारी खात्यात ७९३४ व सरकारी अनुदानित संस्थांत १३०९ जणांची नव्या पेन्शन योजनेखाली भरती केली आहे. सरकारी नोकरांचा आकडा ४५ हजारांवर पोहोचला असता या एकूण संख्येतील २० टक्के भार हा गेल्या पाच वर्षातच भरती करण्यात आल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
कामत सरकारच्या गेल्या २००८ - ०९ च्या कालावधीत सुमारे २८०२ जणांची भरती झाली आहे. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या काळातच ही ९२४३ जणांची भरती झाली आहे. कामत सरकारच्या गेल्या अडीच वर्षांच्या कालखंडातच ६१९७ जणांची नव्या पेन्शन योजनेअंतर्गत भरती करण्यात आली. सहाव्या वेतन आयोगामुळे सरकारी नोकरांच्या पगारावर राज्य सरकारला अतिरिक्त २५ कोटी रुपये खर्च येत असतानाही या ऑक्टोबर अखेरपर्यंत १३३१ जणांची भरती झाली आहे. राज्य सरकारच्या अनुदानित संस्थांकडून वारंवार सरकारकडे आर्थिक मदत मागितली जाते पण त्यांच्याकडूनही नोकर भरती सुरूच आहे. यावर्षी सुमारे ८० जणांची भरती या संस्थांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वांत जास्त भरती पोलिस खात्यात झाली आहे. या पाच वर्षांत १६३७ जणांची भरती करूनही पोलिस खात्याला अजूनही मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.
विश्वजित राणे यांच्याकडे असलेल्या आरोग्य खात्यात १०३९ जणांची भरती झाली आहे व त्यात गोमेकॉत ४४६ तर दंत महाविद्यालयात ८ जणांचा समावेश आहे. या पाठोपाठ वीज खाते (९८१), सार्वजनिक बांधकाम खाते (८९७), शिक्षण खाते (४१२), उत्तर व दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालय (३२०), जलस्रोत खाते (२५३), अग्निशमन दल (१८३), भूनोंदणी खाते (१२४) व कृषी (१३५) यांचा समावेश आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती झाली असली तरी सर्वसामान्य लोकांना मात्र अजूनही सरकारी खात्यात खेपा माराव्या लागतात. सा. बां. खाते, वीज खाते, आरोग्य खाते किंवा शिक्षण खात्यात या कामगारांसाठी जागाही अपुरी पडत असल्याचे दिसून येते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करून रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींना मात्र अजूनही ताटकळत ठेवण्यात आले आहे. कंत्राटी कामगार नोकर भरती सोसायटीच्या कामगारांनाही घरी पाठवण्यात आले आहे. खाजगी क्षेत्रात कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली असताना नोकर भरती करून आपली व्होटबॅंक घट्ट करण्याचेच प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

आंध्रचे राज्यपाल सेक्स स्कॅंडलमध्ये?

हैदराबाद, दि. २५ : तेलंगणा मुद्यावरून आंध्र प्रदेश तापले असताना आज आणखी एका "गरमागरम' बातमीमुळे उष्णता वाढली. कथितरित्या राज्यपाल एन. डी. तिवारी यांची तीन महिलांसोबत आक्षेपार्ह स्थितीतील चित्रण असणारी एक व्हिडिओ क्लिप एका स्थानिक टीव्ही चॅनेलवर दाखविण्यात येत होती. मात्र, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने ही क्लिप तातडीने थांबविण्याचे आदेश दिले.
८५ वर्षीय श्री. तिवारी यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती बेडवर नग्न पहुडली असून त्यांच्यासोबत तीन महिला असल्याचे या क्लिपमधून दाखविले जात होते. या महिला देहविक्रेत्या असाव्यात असा अंदाज आहे. या चॅनेलने आज सकाळी या क्लिपिंगमधली छायाचित्रे दाखविल्यानंतर त्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. महिला संघटनांनी राजभवनासमोर धरणेच धरले, त्यांनी आत शिरण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखून धरले.
दरम्यान, या घटनेचे राजकीय पडसादही उमटायला सुरुवात झाली आहे. तेलगू देसमचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे फोटो म्हणजे नैतिक मूल्ये घसरल्याचे द्योतक असून त्यामुळेच राज्यपालांनी राजीनामा द्यावा असे नायडू म्हणाले. राष्ट्रपतींनी राज्यपालांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली.

संमेलनातून बंधुभाव वाढतो : डॉ. रामाणी

जागतिक बोरीकर संमेलनाचे उद्घाटन
फोंडा, दि.२५ (प्रतिनिधी): बोरी गावाशी नाते असलेल्या विविध भागातील मान्यवर जागतिक संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले असून त्यांच्या ज्ञानाचा बोरी गावाच्या विकासासाठी हातभार लागू शकतो. गावातील बांधवाच्या संमेलनातून बंधुत्वाची भावना वाढीस लागते, असे प्रतिपादन डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी केले.
बोरी येथील श्री नवदुर्गा देवालयाच्या प्रांगणात आयोजित जागतिक बोरीकर संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या हस्ते आज (दि.२५) दुपारी दिमाखात करण्यात आले. यावेळी बोरीचे सरपंच सुनील सावकार, उदय भेंब्रे, कै.बा. भ. बोरकर यांचे जावई डी. एस. वज्रन, दिलीप बोरकर, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. नितीन बोरकर, कार्याध्यक्ष सागर भट, सचिव देविदास देवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
माहिती तंत्रज्ञानाच्या विकासामुळे जग जवळ आले असून आधुनिक शिक्षण घेण्याची नितांत गरज आहे. युवा पिढीच्या आरोग्य व शिक्षणाकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. धन संस्कृतीच्या आजच्या युगात ज्ञान संस्कृतीचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन डॉ. रामाणी यांनी केले.
आजच्या युवा पिढीला आदर्श व्यक्तिमत्त्वाची माहिती करून देण्याची गरज आहे. समाजात अनेक आदर्श व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. त्यात कविवर्य बा. भ. बोरकर यांचा समावेश होत आहे, असे सांगून उदय भेंब्रे म्हणाले की, बाकीबाब यांना आपली मातृभूमी, संस्कृती यांचा अभिमान होता. एक मनुष्य म्हणून बाकीबाब बोरकर मोठे होते. त्यांच्या विविध गुणांचे दर्शन युवा पिढीला घडविले पाहिजे. जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त त्यांचे योग्य स्मारक व्हावे, अशी तमाम गोमंतकीयांची इच्छा आहे, असेही श्री. भेंब्रे यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यात जन्म शताब्दी वर्षानिमित्त पद्मश्री बा. भ. बोरकर, डॉ. म्हाबळू बोरकर आणि शंकर केशव बोरकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. संमेलनाच्या प्रमुख व्यासपीठाला बा. भ. बोरकर यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी सुनील सावकार, दिलीप बोरकर यांनी विचार मांडले.
मनिला बोरकर हिने सादर केलेल्या गणेश स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बोरी गावांची महती सांगणारे गीत गौरीश तळवलकर यांनी सादर केले. कार्याध्यक्ष सागर भट यांनी स्वागत केले. देविदास देवारी यांनी ओळख केली. आग्नेल फर्नांडिस यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवर बोरकरांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिलीप बोरकर, गुलाब वेर्णेकर, श्री. वज्रन यांच्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब वेर्णेकर, मुग्धा बोरकर यांनी केले.
या संमेलनानिमित्त देऊळवाडा येथे उभारण्यात आलेल्या पद्मश्री बाळकृष्ण ऊर्फ बा.भ. बोरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गुरुदेव प्रसन्न आवेडेकर समाजातर्फे "शिमगा' ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. ह्या जागतिक संमेलनानिमित्त बोरी गावात विविध कार्यक्रमाची रेलचेल सुरू झाली आहे.विदेशात कार्यरत असलेल्या काही बोरकर सुद्धा संमेलनासाठी हजर झाले आहे.

जिल्हा पंचायत निवडणूक ७ मार्चला?

राज्य निवडणूक आयोगाची शिफारस
मडगाव, दि. २५ (प्रतिनिधी): मतदारसंघांची पुनर्रचना व जागांचे आरक्षण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता राज्य निवडणूक आयोगाने दक्षिण व उत्तर जिल्हा पंचायतींच्या निवडणुका ७ मार्च २०१० रोजी घेण्याची शिफारस सरकारकडे केली आहे. उभय जिल्हा पंचायतींच्या जागांच्या संख्येत मात्र कोणताच बदल करण्यात आलेला नाही. राज्य निवडणूक आयुक्त पी. एम. बोरकर यांनी यापूर्वीच निवडणुकीचे वेळापत्रक अंतिम मंजुरीसाठी सरकारला पाठवून दिले आहे, अशी माहिती मिळाली आहे.
विद्यमान जिल्हा पंचायतींचा कार्यकाल येत्या मार्च अखेरीस संपत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने नव्याने निवडणुका घेण्यासाठी कंबर कसली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयोगाने निवडणुकांसाठी ७ मार्च ही अंदाजित तारीख निश्र्चित केलेली आहे, त्या बाबीचा तपशील सरकारला पाठवून दिलेला आहे.
मतदारसंघाची पुनर्रचना व राखीव जागांचे काम पूर्ण झालेले असून त्यामुळे उभय पंचायतींमधील जागांच्या संख्येत कोणताच बदल झालेला नाही. सध्या उत्तर गोवा जिल्हा पंचायतीत ३० तर दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत २० मतदारसंघ आहेत, ते तसेच ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, जिल्हा पंचायतीच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय नेते व पक्षांना निष्ठा वाहिलेले विविध गट सक्रिय झाले असून निवडणुका लढविण्यासाठी पॅनल स्थापन करण्याच्या कामांना जोर आला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष क्लिओफासियू डायस हे आलेमाव बंधूंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात, त्यांनी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली पॅनल बनविण्यास पुढाकार घेतलेला आहे. मात्र पक्षनेते पक्षाच्या झेंड्याखाली असे पॅनल स्थापण्यास राजी होतील किंवा गत निवडणुकांप्रमाणे व्यक्तिगत स्तरावर आपल्या उमेदवारांना उभे करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सासष्टीतील राजकीय गणिते वेगळ्याच प्रकारची असल्याने अशा पॅनलची स्थापना करावयाची झाल्यास त्या पक्षाला विविध गोष्टी व त्यांच्या परिणामांचा विचार करावा लागेल, असे जाणकारांचे मत आहे.

Friday, 25 December, 2009

भारताला जगात 'नंबर वन' करण्याचा निर्धार : नितीन गडकरी

* राष्ट्रवाद हीच भाजपाची विचारधारा.
* दहशतवाद व नक्षलवादाला संपूर्ण विरोध.
* सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी कटिबद्ध
* तीन वर्षांत पक्षसंघटना मजबूत करणार
* शेवटच्या घटकाचा विकास हे अंतिम उद्दिष्ट
* सेवा आणि विकासाची कामे करणार
* पक्षाच्या कामात संघाचा कधीही हस्तक्षेप नाही.
* योग्यतेनुसार काम देऊन कार्यक्षम "टीम' तयार करणार.

नवी दिल्ली, दि. २४ (गजानन निमदेव): 'राष्ट्रवाद' हीच भाजपाी विचारधारा होती, आहे आणि राहील. पक्षासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी राष्ट्रवाद हीच प्रेरणा आहे आणि याच आधारे काम करताना भारताला जगात "नंबर वन'चे स्थान प्राप्त करून देऊ, असा निर्धार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आज येथे प्रथमच आयोजित भरगच्च पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जात, पात, धर्म, पंथ, भाषा या आधारावर भेदभाव करणे भाजपला मान्य नाही. भाजप शेवटपर्यंत सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
"भारत सर्वांचा आणि सर्व भारताचे' ही भाजपाची धारणा आहे. त्यामुळे मतपेटीचे राजकारण करणाऱ्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेला भाजपात स्थान नाही, असेही त्यांनी सांगितले.
दहशतवाद आणि नक्षलवाद भाजपला मान्य नाही. कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला भाजपचा संपूर्ण विरोध आहे. या समस्येचा मुकाबला करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे स्पष्ट करताना गडकरी म्हणाले की, दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणेतील सर्व त्रुटी संपूर्णत: दूर केल्या पाहिजे.
अतिशय लहान वयात पक्षाने माझ्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे, ही फार मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी मी संपूर्ण क्षमतेने पार पाडीन आणि पुढील तीन वर्षांत पक्षसंघटना मजबूत करीन, असा विश्वासही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्षात अनेक दिग्गज नेते असताना राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्याने काम करताना आपल्यावर प्रचंड दबाव राहील का, या प्रश्नाच्या उत्तरात गडकरी म्हणाले, माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. लालकृष्ण अडवाणी, राजनाथसिंह यांच्यासारख्या नेत्यांचा मला पूर्ण पाठिंबा आहे आणि अटलजींचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे कोणत्याही दबावाशिवाय मी काम करीन.
अध्यक्षपद तर आपण स्वीकारले, आता "टीम गडकरी' केव्हा, कशी आणि कधी तयार करणार, असे विचारले असता ते म्हणाले की, नवी टीम तयार करण्यासंदर्भात चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांची योग्यता आहे त्यांना योग्य पद दिले जाईल. नवी टीम अतिशय कार्यक्षम असेल, "परफॉर्मन्स ऑडिट'च्या आधारे सहकाऱ्यांना टीममध्ये स्थान मिळेल.
सेवा आणि विकासाचे राजकारण करताना समाजातील अगदी शेवटच्या घटकाला न्याय मिळेल, याकडे आम्ही लक्ष ठेवणार आहोत. "राष्ट्रवाद अब हमारी प्रेरणा है, सुशासनद्वारा विकास हमारा साधन है और अंत्योदय हमारा अंतिम उद्देश है,' असेही गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हस्तक्षेप करीत असल्याचा गडकरी यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. पक्षात काही सगळेच संघाचे स्वयंसेवक नाहीत. माझ्यासारखे जे आहेत, त्यांची जीवननिष्ठाच संघविचारांवर आधारित आहे. संघाने कधीही आम्हाला निर्देश दिले नाहीत की आदेश दिले नाहीत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
तरुण पिढी भाजपकडे आकर्षित व्हावी यासाठी काय करणार, असे विचारले असता गडकरी म्हणाले की, विकास आणि विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, गरिबी दूर करून दरडोई उत्पन्न वाढवू आणि या माध्यमातून मोठ्या संख्येत तरुण-तरुणींना पक्षाशी जोडू.
समाजाच्या ज्या क्षेत्रात आम्ही पोहोचलो नाही, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. पुढल्या शंभर वर्षांचा विचार करून विकास व समाजोन्नतीची धोरणे आखू. दलित, आदिवासी, अल्पसंख्यक या सर्वांच्या मनात विश्वास निर्माण करू. अशा प्रकारे पक्षाला मजबुती प्राप्त करून देऊ आणि पर्यायाने देशालाही ताकद देऊ, असे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
शिस्त हे भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट्य आहे. पुढल्या काळात हे वैशिष्ट्य आणखी काटेकोरपणे जपले जाईल. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असल्याने कुठल्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपाला मजबुती प्रदान करण्याबरोबरच "चाटुगिरी' बंद केली जाईल, जे प्रामाणिकपणे काम करतील त्यांना न्याय दिला जाईल, असे स्पष्ट करतानाच गडकरी म्हणाले की, रालोआला बळकटी देण्यासाठीही आपण प्रयत्न करू. आजच मी जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेतली आणि पुढील काही दिवसात शरद यादव यांच्यासह अन्य नेत्यांच्या भेटी घेणार आहे. रालोआ बळकट करणे ही देशासाठी आवश्यक बाब आहे.
मुंडे, गडकरी आणि जावडेकर असे नेते दिल्लीत आल्याने महाराष्ट्र भाजपा "नेतृत्वहीन' झाल्याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले, भाजपात अनेक चांगले कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत, जे पक्षाला दमदार नेतृत्व देऊ शकतील. ही एक प्रक्रिया आहे आणि चालूच राहणार आहे.
पक्षात काम करताना आपण कधी-कधी जिद्दीपणा करता, याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, कोणतीही चूक मी एकदा सहन करतो. तीच ती चूक करण्याचा खोडसाळपणा कोणी केला तर ते मी खपवून घेत नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय मी एकटा घेत नाही. सर्वसंमतीने निर्णय घेण्यावर माझा विश्वास आहे.
समान नागरी कायदा, कलम ३७० आणि राम मंदिर या मुद्यांवर भाजपाची जी भूमिका आधीपासून राहिली आहे, त्यात कोणताही बदल झाला नसल्याचे आणि होणार नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आणि राजीव प्रताप रुडी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------
तडाखेबंद...!
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर गुरुवारी देशाची राजधानी नवी दिल्लीत झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत तडाखेबंद फलंदाजी केली.
देश-विदेशातील वर्तमानपत्रे, वृत्तसंस्था आणि दूरचित्रवाहिन्यांचे तीनशेवर प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. प्रत्येक प्रश्नाला गडकरी यांनी हिंदी-इंग्रजीत समर्पक उत्तरे दिली. प्रश्नांची उत्तरे देताना मधूनच त्यांनी विनोदही केले.
भाजपच्या सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्षांची पहिलीच पत्रकार परिषद असल्याने राजधानीच्या पत्रकार वर्तुळात प्रचंड उत्सुकता होती. गडकरी हे राष्ट्रीय राजकारणात अगदीच नवखे आहेत, त्यामुळे ते कसे बोलतात, प्रश्नांची उत्तरे कशी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गडकरी यांच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्वास जाणवत होता. गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणात असल्यासारखी आत्मविश्वासपूर्ण उत्तरे देऊन गडकरी यांनी दिल्लीच्या "मीडिया'वर छाप पाडली.

रोझ गार्डन संस्थेच्या अध्यक्षांचा राजीनामा

पिडीत विद्यार्थ्यांची जबानी नोंदवली
रोझ गार्डन विद्यार्थी छळवणूक प्रकरण

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): पर्वरी येथील "रोझ गार्डन' प्राथमिक विद्यालयाच्या प्राचार्यांकडून पालक शिक्षक संघाच्या माजी अध्यक्षांच्या मुलाचा छळ होत असल्याचे प्रकरण आता अधिक चिघळत चालले आहे. या प्रकरणामुळे संस्थेचे अध्यक्ष धर्मराज भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द केला.
दरम्यान,सदर तक्रारप्रकरणी आज बालहक्क कायद्याअंतर्गत "स्कॅनइंडिया' या बिगर सरकारी संस्थेच्या साहाय्याने कु.श्रेयस कळंगुटकर याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली.
"रोझ गार्डन प्राथमिक विद्यालया'तील या प्रकरणामुळे राज्यातील विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या विद्यालयातील प्राचार्य एस.जी.चोडणकर यांच्याविरोधातील तक्रार कु. श्रेयश याचे वडील शिवाजी कळंगुटकर यांनी शिक्षण खात्यालाही दिली होती. याबाबत खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा केली असता त्यांनी अद्याप तक्रार आपल्यापर्यंत पोहचली नसल्याचे सांगितले. प्राथमिक विद्यालयात "प्राचार्यपद'असते का, असा सवाल केला असता विनाअनुदानित संस्थेला याबाबतीत काहीही बंधने नाहीत,असेही ते म्हणाले. ही तक्रार विद्यार्थ्याच्या छळवणुकीची आहे व त्यामुळे पोलिस खातेच याबाबत कारवाई करील, असेही ते म्हणाले.
विद्यालयातील या प्रकाराबाबत संस्थेचे अध्यक्ष या नात्याने आपल्याकडे सदर पालकाची तक्रार आली होती. आपण प्राचार्यांकडे लेखी खुलासा मागितला होता पण त्याबाबत काहीच उत्तर आले नाही. याप्रकरणी पोलिस तक्रार दाखल झाल्यानंतर पालक व प्राचार्य यांच्यात चर्चेव्दारे समेट घडवून आणण्याचेही प्रयत्न केले पण एवढे करूनही त्याचा उपयोग झाला नाही, त्यामुळेच आपण राजीनामा दिला,असे धर्मराज भोसले यांनी सांगितले.
दरम्यान,संस्थेच्या अध्यक्षांनीच आपल्या पदाचा या प्रकरणावरून राजीनामा दिल्याने आता प्राचार्य अधिक गोत्यात येण्याची शक्यता आहे. हे प्राचार्यच सध्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे संघटनेच्या आपल्या मर्जीतील काही पालकांना पुढे करून तक्रारदार पालकाविरोधात वातावरण तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. येत्या २ जानेवारी रोजी त्यांनी सादर केलेल्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार असून या निकालानंतरच पुढील दिशा ठरेल,असे पोलिसांनी सांगितले.

२६/११ च्या थराराचे पणजीत प्रदर्शन

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : मुंबईवर झालेल्या २६ / ११ च्या दहशतवादी हल्ल्याप्रसंगीचा थरार, त्यानंतरचे महत्त्वाचे क्षण आपला जीव धोक्यात घालून कॅमेराबंद केलेल्या छायापत्रकारांच्या धाडसी छायाचित्रांचे अनोखे प्रदर्शन येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात भरवण्यात आले आहे. ठाणे जिल्हा प्रेस क्लबचा हा उपक्रम आहे. गोवा राज्य मराठी पत्रकार संघ, मिनेझिस ब्रागांझा संस्था व रवींद्र भवन, मडगाव यांनी संयुक्तरीत्या या छायाचित्रांचे पणजी व मडगाव येथे प्रदर्शन भरवले आहे.
आज पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात माहिती व प्रसिद्धी सचिव नरेंद्रकुमार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर, माहिती संचालक मिनिन पेरीस, सतीश सोनक, गोव्यातील वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष बेर्नाबे सापेको, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू नायक, संघाचे विभागीय सचिव प्रभाकर ढगे व ठाणे जिल्हा प्रेस क्बलचे अध्यक्ष दीपक जोशी हजर होते.२४ व २५ रोजी पणजी तर २७ व २८ रोजी रवींद्र भवन मडगाव येथे हे प्रदर्शन भरणार आहे.या छायाचित्रांच्या माध्यमाने मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा तो क्षण व पोलिस,अग्निशमन दल,राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे जवान व प्रत्यक्ष नागरिक यांची या हल्ल्यावेळी सुरू असलेली धडपड या छायाचित्रांमधून दिसून येते. हे क्षण टिपताना वृत्तपत्र छायाचित्रकारांनी घेतलेली जोखीम व त्यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला "कसाब' आपल्या जबानीत "तो मी नव्हेच' असे म्हणतो; पण हाच कसाब हातात बंदूक घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होता याचा पुरावा देणारे छायाचित्रही या प्रदर्शनात आहे.
छायाचित्रकार हे प्रत्यक्ष घटनेचे खरे साक्षीदार असतात, त्यामुळे समाजापर्यंत सत्य पोहचवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे,असे उद्गार शशिकलाताई यांनी काढले."पेज थ्री' च्या जमान्यात जीव धोक्यात घालून धाडसी छायाचित्रीकरण करणारेही लोक आहेत, हे यावरून दिसून येते, असेही त्या म्हणाल्या. माहिती व प्रसिद्धी सचिव नरेंद्र कुमार यांनी सांगितले की जीवन म्हणजे केवळ पुढे जात राहणे. अशावेळी आपण केवळ मागे वळून पाहू शकतो पण माघार घेऊ शकत नाही. जीवनात मागे वळून पाहताना छायाचित्रांचा मोठा वापर होतो.
मुंबई दहशतवादी हल्ल्यात बलिदान दिलेले हेमंत करकरे यांचे जॅकेट कचरा पेटीत सापडणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कालांतराने या धाडसी अधिकाऱ्यांचे बलिदानही आपण आठवणींच्या कचऱ्यात टाकणार की काय, असा सवाल करून या घटना ताज्या राहाव्यात यासाठी अशा प्रदर्शनांची गरज आहे, असे सतीश सोनक म्हणाले.
सुमारे साठ वृत्तपत्र छायाचित्रकारांचे ७५ फोटो त्यात प्रदर्शित करण्यात आले असल्याची माहिती दीपक जोशी यांनी दिली. मुळात हे फोटो सव्वादोनशे असून जागेअभावी त्यांचे प्रदर्शन करणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. गोव्यानंतर हे प्रदर्शन अहमदाबाद, दिल्ली, राजस्थान अशा पद्धतीने संपूर्ण देशात भरवण्याचा संकल्प ठाणे जिल्हा प्रेस क्लबने सोडला आहे,असेही ते म्हणाले. यावेळी ऍड.अविनाश भोसले,बेर्नाबे सापेको, प्रसाद पानकर आदींची भाषणे झाली. अनिल पाटील यांनी आभार मानले.

ख्रिस्ती धर्मीयांना नाताळनिमित्त 'गोवादूत'च्या शुभेच्छा

प्रमुख नेत्यांकडून नाताळच्या शुभेच्छा
पणजी, दि. २४ : जगभराप्रमाणेच गोव्यातील ख्रिस्ती बांधव आपला प्रमुख नाताळ सण दरवर्षाप्रमाणेच यंदाही उत्साहात साजरा करण्याच्या तयारीला लागले असून त्यांना आपण मनःपूर्वक शुभेच्छा देत असल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. राज्यपाल एस.एस, सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
गोव्यातील हिंदू ख्रिश्चन मधील ऐक्य व दृढ बंधूभावाचे उदाहरण सर्व जगाने अनुकरण करण्याजोगे असल्याचे पर्रीकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, नाताळ हा सण सर्व ख्रिस्ती बांधवांचा प्रमुख सण असून यानिमित्त गोव्यातील सर्व ख्रिस्ती बांधवांना गोवा राज्य शिवसेनेतर्फे गोवा राज्य प्रमुख उपेंद्र गावकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

पाच वर्षात एजी कंटक यांचे शुल्क ४ कोटी २० लाख!

पणजी, दि. २४ ः गोव्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांना राज्य सरकारने जून २००५ ते जुलै २००९ या पाच वर्षांच्या कालावधीत चार कोटी २० लाख १८ हजार सातशे पन्नास रुपये शुल्कापोटी फेडले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी माहिती हक्क कायद्याखाली कायदा खात्याकडून ही अधिकृत माहिती मिळविली आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २००९ या महिन्यांच्या शुल्काचा या रकमेत समावेश नाही. महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात सारख्या मोठ्या राज्यांच्या ऍडव्होकेट जनरलना सरासरी दरमहा ५० हजार रुपयांपेक्षा अधिक शुल्क दिले जात नाही, मात्र गोव्यासारख्या राज्यात हे महागडे सल्लागार सरकारने का नेमले आहेत,असा प्रश्न ऍड. रॉड्रीगीस यांनी विचारला आहे.
कॉंग्रेस विधिमंडळ गट, भाजप, शिवसेना, युजीडीपी, सेव्ह गोवा फ्रंट तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी वेळोवेळी एजींना देण्यात येणाऱ्या अवाढव्य शुल्काबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे, शिवाय त्याबद्दल विधानसभा अधिवेशनातही चिंता व्यक्त करण्यात आली होती,याकडे ऍड. रॉड्रीगीस यांनी लक्ष वेधले आहे.

Thursday, 24 December, 2009

भीषण आर्थिक संकटाची चाहूल

खर्चकपातीच्या शिफारशींची उघडपणे पायमल्ली
पणजी, दि.२३ (प्रतिनिधी): गोवा वित्तीय हमी व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा, २००६ अंतर्गत राज्याच्या आर्थिक नियोजनाला योग्य दिशा प्राप्त करून देण्यासाठी व अर्थसंकल्पातील वित्तीय तूट कमी करून राज्याचा आर्थिक डोलारा भक्कम करण्यासाठी वित्त खात्याने सुचवलेल्या शिफारशींकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. या प्रकरणी गेल्या तीन वर्षांपूर्वी वित्त खात्याने सर्व खातेप्रमुखांना जारी केलेल्या या संबंधीच्या आदेशाची धुळधाण सुरू आहे. आर्थिक नियोजनाला काहीही दिशा राहिलेली नसल्याने हा भरकटत चाललेला डोलारा सांभाळण्याचे मोठे आव्हान वित्त खात्यासमोर असून हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात राज्यासमोर भीषण आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
अलीकडेच विधानसभा अधिवेशनात हळदोण्याचे आमदार तथा माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर यांनी वित्त खात्याकडे या संबंधी प्रश्न विचारला होता. खर्चकपातीच्या बाबतीत राज्य सरकारने काही उपाययोजना आखल्या आहेत काय, असा सवाल त्यांनी केला होता. वित्तमंत्री या नात्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात वित्त खात्याने खर्चकपात व अर्थनियोजनाबाबत जारी केलेल्या आर्थिक उपाययोजनांच्या शिफारशींची माहिती दिली आहे. हा आदेश माजी वित्त सचिव रमेश नेगी यांनी २० नोव्हेंबर २००६ रोजी जारी केला होता. राज्याच्या आर्थिक व्यवहारांचे योग्य पद्धतीने नियोजन करणे व खर्च तथा उत्पन्नाची योग्य पद्धतीने सांगड घालणे यासाठीच गोवा वित्तीय हमी व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा २००६ तयार करण्यात आला होता. काही अनावश्यक खर्चावर नियंत्रण घालताना सरकारनेच काही गोष्टींवर स्वतःचे नियंत्रण ठेवण्यासाठीच या कायद्याचे बंधन घालून घेणे आवश्यक होते; परंतु वित्त खात्याने सुचवलेल्या सर्व शिफारशींना मंत्रिमंडळाने वाटण्याच्या अक्षता लावल्याने खर्चाला काहीही पारावार राहिलेला नाही.
वित्त खात्याने केलेल्या शिफारशींचा आढावा घेतला असता त्यात १ मार्च २००७ पासून एकही नोकर भरती करण्यावर निर्बंध घालण्याची शिफारस केली होती. प्राप्त माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत विविध सरकारी खात्यांत नियमित, हंगामी व कंत्राटी पद्धतीवर सुमारे दहा हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीत वाढ देण्यावरही बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले होते पण या आदेशानंतरही काही नेत्यांनी आपल्या मर्जीनुसार काही अधिकाऱ्यांना वेतनवाढ दिल्याचेही सांगितले जाते. पोलिस, मंत्री व प्रशासकीय सचिव यांच्या व्यतिरिक्त नवीन वाहन खरेदीवरही बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याचबरोबर मंत्र्यांसाठी यापूर्वी ७५ हजार किलोमीटरची असलेली मर्यादा ५० हजार किलोमीटरवर आणली होती, त्याचीही अंमलबजावणी झाली नाही, अशी खबर आहे.
अभ्यास दौरे, परिषदा, अधिवेशन, कार्यशाळा आदींसाठी विदेश व देशांतर्गत दौऱ्यांवरही निर्बंध घालण्याची गरज असल्याचे वित्त खात्याने सुचवले होते. असा दौरा असल्यास त्यासाठी वित्त खात्याची परवानगी घेणे तसेच एका विदेश दौऱ्यानंतर तीन महिने अन्य विदेशी दौरा न करण्याचीही शिफारस केली होती. स्वस्त विमान प्रवास व सरकारी खात्यातील चतुर्थश्रेणी कामगारांसाठी बाहेरील संस्थांना नेमण्याचीही शिफारस केली होती; पण या सर्व शिफारशींचा काहीही उपयोग झाला नसून या आदेशातील एकाही शिफारशीची पूर्तता झाली नाही, अशी माहिती वित्त खात्यातील सूत्रांनी दिली.
सध्या विविध खात्यांचे प्रस्ताव वित्त खात्याकडे पडून आहेत. संबंधित खात्यांचे मंत्री थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे बोट दाखवत असल्याने वित्तमंत्री या नात्याने त्यांच्यासमोरही जबरदस्त आव्हान उभे ठाकले आहे. सायबरएज, शिक्षकांसाठी लॅपटॉप आदी योजना वित्त खात्याकडे धूळ खात पडल्या आहेत. विविध विकासकामांची घोषणा सरकारकडून करण्यात आली खरी; पण त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली नसल्याने ही विकासकामेही अर्धवट स्थितीत राहण्याची शक्यता आहे. या एकूण परिस्थितीत वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांची सध्या बरीच पंचाईत झाली आहे. वित्त सचिव उदीप्त रे हे पुढील वर्षी सेवामुक्त होत असल्याची खबरही सचिवालयात पसरली आहे. राज्याचा ढासळलेला आर्थिक डोलारा कोण सांभाळणार असा सवाल करून आता या खात्यातील अधिकाऱ्यांनीही हात वर केले आहेत, असेही बोलले जात आहे.

कस्टम कार्यालयावर सीबीआयचा छापा

दोन अधिकाऱ्यांची चौकशी
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): मुरगाव अबकारी खात्याच्या कार्यालयात काल उशिरा रात्री केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून दोन कस्टम अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परंतु, हा छापा कशासाठी टाकण्यात आला आहे, याची अधिकृत माहिती देण्याचे अधिकाऱ्याने टाळले, मात्र छापा टाकल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. या कारवाईसाठी दिल्ली येथून सीबीआयचा एक उच्च अधिकारीही गोव्यात दाखल झाला आहे.
गोव्यातून विदेशात अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणातील मुख्य सूत्रधार नॉर्मन आझावेदो याला काही दिवसांपूर्वी कस्टम अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने हा छापा टाकल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. टपाल खात्याचा वापर करून सुरू असलेली तस्करी ही आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचा एक भाग आहे. परंतु, सीबीआयने हा छापा कोणत्या कारणासाठी टाकला आहे, याला उत्तर देण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.
या तस्करीची पाळेमुळे विदेशातही पसरलेली आहेत. विदेशात केटामाईन आणि ओएग्रा या औषधी पदार्थांवर बंदी असून ती केवळ भारतात डॉक्टरच्या दाखल्यावरूनच दिली जातात. या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात नशा येण्यासाठी केला जातो. त्यामुळे भारतातून विदेशात या औषधांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. डिओडरंट व परफ्युमच्या बाटल्या, टेडीबेअर अशा विविध वस्तूंमध्ये लपवून ही तस्करी टपाल खात्यामार्फत केली जाते.
केटामाईनचा वापर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी गुंगी देण्यासाठी केला जातो. हे औषध डॉक्टरच्या प्रिस्कीप्शनशिवाय कोणालाही उपलब्ध करून देणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच क्षमतेपेक्षा या औषधांचा साठा फार्मसीत करून ठेवता येत नाही, अशी माहिती खास सूत्रांनी दिली.
दरम्यान, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नॉर्मन यात गुंतलेला असण्याची शक्यता कस्टम अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. या पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची पाळेमुळे खोलवर आणि बरीच दूरवर पसरलेली असल्याने तसेच कस्टम अधिकाऱ्यांच्या या छाप्यानंतर काही दिवसांतच सीबीआयने मुरगाव येथील कस्टम अधिकाऱ्यांवर छापा टाकल्याने याचा उलगडा होणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.

पर्वरीत प्राचार्यांकडून विद्यार्थ्याची सतावणूक

बालहक्क कायद्याखाली पर्वरी पोलिसांत गुन्हा नोंद
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): पर्वरी येथील "रोझ गार्डन प्राथमिक विद्यालया'चे प्राचार्य एस. जी. चोडणकर यांच्याकडून आपल्या तिसरीत शिकणाऱ्या मुलाचा शारीरिक तथा मानसिक छळ सुरू असल्याची शिवाजी कळंगुटकर यांनी केलेली तक्रार पर्वरी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. पालक - शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कारभारातील काही त्रुटी तथा शिकवणीतील काही चुका प्राचार्यांच्या नजरेस आणून दिल्या होत्या. याचा वचपा काढण्यासाठीच सदर प्राचार्यांकडून आपल्या मुलाची सतावणूक होत असल्याचे श्री. कळंगुटकर यांनी म्हटले आहे. या तक्रारीचे एकूण गांभीर्य पाहता या प्राचार्यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे व त्यामुळे सदर प्राचार्य अटकपूर्व जामिनासाठी धडपडत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार पर्वरी येथे गोविंद स्मृती शैक्षणिक संस्थेचे "रोझ गार्डन प्राथमिक विद्यालय' सुरू आहे. ही संस्था विनाअनुदानित आहे, त्यामुळे शिक्षण खात्याच्या नियमानुसार जरी कारभार सुरू असला तरी या संस्थेत अनेक गैरप्रकार सुरू आहेत, हे आता या घटनेच्या निमित्ताने उघड झाले आहे. पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग इथे चालतात. दरम्यान, विद्यालयाचा दैनंदिन कारभार व येथील विद्यार्थ्यांच्या समस्या तथा अडचणींबाबत पालक -शिक्षक संघटनेच्या निमित्ताने चर्चा होणे व या गोष्टी व्यवस्थापनाच्या नजरेस आणून देणे ही जबाबदारी पालकांची आहे. त्याचा पाठपुरावा करत असल्यामुळेच गेले दोन महिने हा निंदनीय प्रकार सुरू आहे, असे श्री.कळंगुटकर यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना लघवीला जाण्यावर बंदी घालण्यात आली. याबाबत जाब विचारला तर लघवीला जाण्यासाठी डॉक्टरांकडून सर्टीफिकेट आणण्याचे आदेश देण्यात आले. या विद्यालयातील एका गणित शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने शिकवले जात होते. सदर शिक्षिकेला त्याची योग्य पद्धतीने जाणीव करून दिल्यानंतर त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने ही गोष्ट प्राचार्याच्या नजरेस आणून दिली. प्राचार्यांकडूनही कानाडोळा झाल्याने हा एकूण प्रकार संस्थेचे अध्यक्ष धर्मराज भोसले यांना कळवला. संस्थेच्या अध्यक्षांकडे हा प्रकार नेल्याचे निमित्त करूनच सदर प्राचार्यांकडून तिसरीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला लक्ष्य बनवण्यात येत असल्याची तक्रार श्री. कळंगुटकर यांनी केली.
आपला मुलगा श्रेयस कळंगुटकर याची आत्तापर्यंतची कामगिरी अत्यंत प्रभावी राहिलेली आहे. पहिली व दुसरीत त्याने पहिला नंबर पटकावला आहे व आता तिसरीत पहिल्या दोन परीक्षेत त्याने ९९ व ९४ टक्के गुण मिळवले आहेत. गेल्या अडीच वर्षांत त्याच्या कॅलेंडरवर एकही तक्रारीचा शेरा नाही; पण आता गेले दोन महिने आपल्यावरील राग काढण्यासाठी सदर प्राचार्याने त्याचे संपूर्ण कॅलेंडर तक्रारींनी भरले आहे. त्यात कहर म्हणून की काय याच कॅलेंडरवर आपल्याला उद्देशून एक पत्रही लिहिले आहे व त्यात अत्यंत घाणेरडी भाषा वापरण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार करताना काय भाषा वापरावी याचे भानही या प्राचार्यांनी ठेवले नसल्याचे यावरून आढळून आले आहे. या सातत्याने घडणाऱ्या प्रकारामुळे आपला मुलगा सध्या जबरदस्त मानसिक तणावाखाली वावरत असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनेची शिक्षण खात्याकडेही तक्रार केल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलिस तक्रार नोंद
पर्वरी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीची काल २२ रोजी नोंद करण्यात आली. बालहक्क कायद्याच्या कलम ८ अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राचार्य श्री. चोडणकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्याबाबत २ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे, अशी माहिती पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड यांनी दिली. गेल्या १५ डिसेंबर रोजी ही तक्रार दाखल केली होती. यानंतर सदर प्राचार्यांना पर्वरी पोलिस निरीक्षकांनी बरेच सुनावले होते व या तक्रारीचे गांभीर्य सांगितले होते पण त्याचा काहीही फायदा झाला नसल्याने आता हे प्रकरण न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता आहे.

शशिकलाताईंचा ७ रोजी अमृतमहोत्सवी सत्कार

पवार, स्वराज यांना आमंत्रण
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कन्या तथा माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार घडवून आणण्याचा निर्णय आज पणजी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या श्रीमती सुषमा स्वराज यांना या निमित्ताने आमंत्रित करण्याचेही या बैठकीत ठरवण्यात आले.
आज पणजी येथे साहित्य सेवक मंडळ सभागृहात ही खास बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत ताईंचे असंख्य हितचिंतक व समर्थक हजर होते. यावेळी शशिकलाताई काकोडकर अमृतमहोत्सव सत्कार समिती स्थापन करण्यात आली. मगोचे नेते तथा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांची या समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, खासदार श्रीपाद नाईक, माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, मगोचे अध्यक्ष पांडुरंग राऊत, आमदार दीपक ढवळीकर आदींची निवड करण्यात आली. मुख्य सचिवपदी ऍड. नारायण सावंत, सहसचिव मोहन वेरेकर, खजिनदार लवू मामलेकर व सहखजिनदार परेश रायकर आदींचा यात समावेश आहे. या समितीवर अन्यही अनेकांची नावे असून प्रत्यक्ष त्यांची मान्यता घेतल्यानंतरच ती जाहीर केली जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.
येत्या ७ जानेवारी रोजी हा सत्कार सोहळा कांपाल मैदानावर आयोजित करण्याची समितीची योजना असून येत्या काळात समितीच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. बैठकीचे समन्वयक म्हणून पत्रकार सागर जावडेकर यांनी काम पाहिले.

त्या खास महिला सदस्यावर पलटवार

इफ्फीचे कवित्व
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवरील काही सदस्यांची राजकीय नेमणूक झाली आहे असे हिणवून या समितीचीच फेररचना करावी, अशी अवाजवी शिफारस करणारी सदर महिला सदस्य ही स्वतः राजकीय हितसंबंधामुळेच प्रशासकीय समितीवर विराजमान झाली आहे. त्यामुळे विनाकारण दुसऱ्यांवर आरोप करून आपल्या राजकीय हितसंबंधांना जपण्याचा प्रयत्न करू नये, असा सज्जड सल्ला आता या महिला सदस्यावर नाराज बनलेल्या प्रशासकीय समितीवरील काही सदस्यांनी दिला आहे.
सरकारकडून एखादी समिती किंवा महामंडळावर नेमलेली प्रत्येकी व्यक्ती ही राजकीय नेमणूकच ठरते. सरकारातील मंत्री किंवा सत्ताधारी पक्षातील एखाद्या आमदाराकडून आपल्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीची अशा समितीवर किंवा अन्य एखाद्या महामंडळावर शिफारस करणे व सदर व्यक्तीने आपल्या कामाद्वारे आपली निवड पात्र ठरवणे स्वाभाविक आहे. ही देखील राजकीय नेमणूकच ठरते; पण या नेमणुकीचा खऱ्या अर्थाने या पदाला फायदा होतो तेव्हा ही निवड सार्थ ठरते, असे मत प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा सरकारचे प्रसारमाध्यम सल्लागार विष्णू वाघ यांनी व्यक्त केले.
दरम्यान, राजकीय नेमणुकीलाही काही अपवाद आहेत. काही नेते केवळ आपल्या मर्जीतील लोकांना खूष करण्यासाठी प्रत्यक्ष त्या व्यक्तीची, ज्या समिती किंवा महामंडळावर त्याची नेमणूक झालेली असते त्याचा काहीही संबंध नसतानाही, नेमणूक करतात. अशा नेमणुका मात्र खऱ्या अर्थाने सदर महिला सदस्याला अभिप्रेत असलेल्या नेमणुका असाव्यात असा संशय व्यक्त करण्यात आला. प्रशासकीय समितीवरील सदर महिला सदस्याची नेमणूक ही या पद्धतीने कशावरून झाली नसावी, असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. कला अकादमी, राजीव कला मंदिर व रवींद्र भवन आदी संस्थांवर आपली निवड झाली आहे हे जरी खरे असले तरी प्रत्यक्षात कला, संस्कृती व साहित्य क्षेत्रात आपला यापूर्वी वावर होता व आहे. या पार्श्वभूमीमुळेच आपली निवड झाली अशी पुष्टी श्री. वाघ यांनी जोडली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत एखादी महिला सरळ प्रशासकीय समितीवरील सदस्यांवर राजकीय नेमणुकीचा ठपका ठेवून समितीची फेररचना करण्याची शिफारस करते यावरून सदर महिला सदस्य किती वजनदार आहे, याची प्रचितीच येते, अशी प्रतिक्रिया भाजपने व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत "इफ्फी' महोत्सव हॉटेलबाबत केलेल्या आरोपांना त्यावेळी उत्तर देण्याचे सोडून आता अधिवेशन संपल्यावर प्रसारमाध्यमांकडे हे आरोप निरर्थक असल्याचा दावा करणे कितपत योग्य आहे, असे भाजपचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी सांगितले. प्रशासकीय समितीवर विरोधी भाजपला अजिबात प्रतिनिधित्व देण्यात आले नाही, यावरून सरकारचा याबाबतीत साफ दृष्टिकोन नाही, असा टोलाही यावेळी पर्वतकर यांनी हाणला.
दरम्यान, "इफ्फी' आयोजनाच्या बाबतीत थेट लाभार्थी असलेल्या व्यक्तींचीच प्रशासकीय समितीवर नेमणूक करणे कितपत योग्य आहे, असा सवालही यावेळी करण्यात येत आहे. दरम्यान, काही सदस्य केवळ आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच समितीवर आहेत व त्यामुळे प्रत्येकवेळी आपले हित बघूनच निर्णय देण्याची वृत्ती बळावल्याने त्याचा थेट परिणाम "इफ्फी' आयोजनाच्या गोंधळात रूपांतरित झाल्याचा टोलाही यावेळी हाणला गेला.

Wednesday, 23 December, 2009

महिला सदस्याचा थयथयाट, मुख्यमंत्री पुन्हा एकदा चाट!

'इफ्फी'ची खलबते उघड झाल्याने अस्वस्थता!
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवरील एका खास महिला सदस्याकडून संपूर्ण समितीलाच वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे, अशी जोरदार चर्चा सध्या मनोरंजन संस्थेत सुरू आहे. काल सुमारे तीन तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत सदर खास महिला सदस्य व इतर काही सदस्यांत "इफ्फी'संबंधी व्यवहारांची माहिती वृत्तपत्रांत छापून येत असल्याच्या विषयावरून बरीच जुंपली. सदर महिला सदस्य ही खास मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मर्जीतील असल्याने यावेळीही त्यांनाच हस्तक्षेप करावा लागला व त्यात त्यांची बरीच दमछाक झाल्याची खबर संस्थेच्या अधिकाऱ्यांत सध्या बऱ्याच चवीने चर्चिली जात आहे.
यंदाच्या ४० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली खरी; परंतु या महोत्सवाचे कवित्व मात्र आता बरेच दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत काल २१ रोजीच्या बैठकीनंतर मिळाले. अलीकडेच विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी यंदाच्या "इफ्फी' महोत्सवासाठी हॉटेल ठरवण्याबाबतचा निर्णय हा एकतर्फी झाल्याचा आरोप केला होता. हा निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली बैठक ही प्रत्यक्षात झालीच नाही, असा आरोप करून पर्रीकर यांनी या घटनेचा पर्दाफाश केला होता. पर्रीकरांनी भर विधानसभेत केलेल्या या आरोपांमुळे मुख्यमंत्री कामत त्रिफळाचित झाले व त्यांना या आरोपांचे खंडनही करता आले नाही. कालच्या बैठकीत मात्र पर्रीकरांच्या या आरोपांबाबत सखोल चर्चा झाली, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. हे आरोप होताना विधानसभेत गप्प बसलेले मुख्यमंत्री काल मात्र याविषयावरून उघडपणे प्रसारमाध्यमांकडे बोलले व पर्रीकरांनी केलेल्या आरोपांत काहीही तथ्य नाही, असाही दावा त्यांनी केला. महोत्सव हॉटेल निवडीचा निर्णय पूर्णपणे कायदेशीर व नियमांना धरूनच होता, याबाबत त्यांनी ठाम भूमिका घेतली. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत पर्रीकरांचे आरोप फेटाळण्याबाबत नेमकी काय खलबते झाली याची माहिती आता हळूहळू समोर यायला लागली आहे.
दरम्यान, "इफ्फी'संबंधी मनोरंजन संस्थेच्या बैठकीत होणारी चर्चा व विविध निर्णय यांची इत्थंभूत माहिती वृत्तपत्रांवर छापून येते, असे सांगून प्रशासकीय समितीवरील एका बड्या महिला सदस्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय समितीवरील राजकीय आश्रयाने स्थान मिळवलेल्यांकडूनच ही माहिती वृत्तपत्रांना दिली जाते, असा शेराही या महिला सदस्याने हाणल्याने या बैठकीत वातावरण बरेच गरम झाले. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री कामत यांनी संपूर्ण प्रशासकीय समितीचीच फेररचना करावी, असा सल्लाही या महिला सदस्याने दिल्याने बाकी सदस्य मात्र भडकले. सदर महिला सदस्याने सरसकट हा आरोप केल्याने इतर अनेक सदस्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. जलस्रोतमंत्री तथा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष फिलिप नेरी रॉड्रिगीस यांनी तर थेट या आरोपांबाबत नाराजी व्यक्त करून आपल्या राजीनाम्याचीच तयारी दर्शवली, असेही कळते. समितीच्या इतरही काही सदस्यांनी हा आरोप निश्चित असावा व अशा सदस्यांची नावे जाहीर व्हावीत असे सुचवले. सरसकट आरोप करून सर्वांनाच त्यात गोवण्याचे प्रयत्न केले जाणे ठीक नाही, असेही अनेकांनी सांगितले.
मुळात प्रसिद्ध उद्योजक असलेल्या व प्रत्यक्ष या महोत्सव व्यवहाराचा एक भाग असलेल्या सदर महिला सदस्य याच मुळी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील असल्याने राजकीय आश्रयाने समितीवर नियुक्त झालेल्या आहेत. या महिला सदस्याकडूनच असे वाऱ्यावर आरोप केले जाणे कितपत योग्य, असेही काही सदस्यांचे म्हणणे होते. या एकूण प्रकरणात मुख्यमंत्र्यांची मात्र परिस्थिती दोलायमान बनली असून नेमकी कुणाची बाजू उचलून धरावी अशा विवंचनेत ते सापडले आहेत.

वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या महिलेला अटक

वास्कोत अल्पवयीन मुलीची सुटका
मोठे रॅकेट असण्याची शक्यता

वास्को, दि. २२ (प्रतिनिधी): एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेश्या व्यवसायासाठी रेल्वेतून आंध्र प्रदेश येथे घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पार्वती नामक महिलेला वास्को रेल्वे पोलिसांनी आज ताब्यात घेतले. सदर अल्पवयीन मुलगी मूळ कोलकाता येथील असल्याचे उघडकीस आले असून सुमारे चार महिन्यांपूर्वी तिला येथे आणून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचे समजते. सदर युवतीला अपना घरमध्ये पाठवण्यात आले असून या प्रकरणात आणखी युवतींना गोवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आज सकाळी वास्को रेल्वे स्थानकावरून आंध्र प्रदेश येथे जाण्यास निघालेल्या "हावडा एक्सप्रेस' गाडीतून एका अल्पवयीन युवतीला उपासनगर येथील पार्वती पल्लूर नामक महिला वेश्याव्यवसायासाठी घेऊन जात असल्याची माहिती वास्को रेल्वे पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक वीरेंद्र वेळुस्कर तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी येथे दाखल होऊन सदर मुलीला आपल्या ताब्यात घेऊन पोलिस स्थानकावर आणले. यानंतर पोलिसांनी एका बिगर सरकारी संस्थेच्या तारा केरकर यांना पोलिस स्थानकावर बोलावून या प्रकाराबाबत चौकशी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पार्वती या महिलेने सदर युवतीला सुमारे चार महिन्यांपूर्वी कोलकाता येथून गोव्यात वेश्या व्यवसाय करण्यासाठी आणल्याचे उघडकीस आले. कळंगुट, बोगमाळो अशा वेगवेगळ्या भागात तिला या व्यवसायासाठी पाठवल्याचे तारा केरकर यांनी "गोवादूत'च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दरम्यान, सदर युवतीने सुमारे दोन महिन्यांपूर्वी आणखीन एका युवतीबरोबर पार्वती व तिच्या साथीदारांच्या तावडीतून सुटून मुंबई येथे पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. यातील दुसऱ्या युवतीला पळून जाण्यात यश आले, मात्र सदर युवती पुन्हा त्यांच्या तावडीत सापडली. तिला जबर मारहाण करून पुन्हा एकदा गोव्यात वेश्या व्यवसायासाठी आणण्यात आले, अशी माहिती तारा केरकर यांनी दिली. वेश्या व्यवसायाचे मोठे रॅकेट असून यात आणखी युवती फसल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान या प्रकाराबाबत पोलिस उपनिरीक्षक वेळुस्कर यांना संपर्क केला असता पार्वती ही महिला उपासनगर, झुआरी येथील असून तिला यापूर्वी अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी बायणा येथील इस्माईल शेख या इसमाला याच प्रकरणी अटक केली असून आणखी एका इसमाचा शोध सुरू आहे.

शिर्डीत साकारणार 'गोवा साईभक्त भवन'

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): शिर्डी येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री साईबाबांच्या दर्शनाला गोव्यातून जाणाऱ्या भक्तगणांच्या वाढत्या संख्येची दखल घेऊन शिर्डी संस्थेतर्फे येथील भक्तांच्या खास निवासी सेवेसाठी 'गोवा साईभक्त भवन' उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशी घोषणा श्री साई संस्थानचे विश्वस्त अशोक खांबेकर यांनी केली.
श्री साईबाबांच्या चावडी शताब्दी महोत्सवाच्या समारोप समारंभाला मुख्यमंत्री दिगंबर कामत व साई सेवा भक्तमंडळ, गोव्याचे अध्यक्ष उद्योजक अनिल खवंटे यांचा सत्कार होणार होता; परंतु या दोघांनाही काही कामानिमित्त तिथे उपस्थित राहणे शक्य झाले नाही. आज शिर्डी येथील श्री साई संस्थानतर्फे खास इथे येऊन मुख्यमंत्री कामत व श्री. खवंटे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त अशोक खांबेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि साईबाबांची प्रतिमा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी हा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री कामत यांचा आल्तिनो येथील त्यांच्या निवासस्थानी तर अनिल खवंटे यांचा त्यांच्या हॉटेलातील सभागृहात पिंगुळीचे स्वामी अण्णामहाराज यांच्या खास उपस्थितीत सत्काराचा कार्यक्रम घडवून आणला गेला.
दरम्यान, गोव्यातील साईभक्तांना शिर्डी येथील तीर्थक्षेत्राची माहिती व तिथे जाण्यासाठी सहकार्य देण्याच्या उद्देशाने माहिती केंद्र उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माहिती केंद्रासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री कामत यांनी दिल्याचेही श्री. खांबेकर यावेळी म्हणाले. श्री साईबाबांच्या चावडी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबांचा पादुका दर्शन सोहळा गेल्या २२ फेब्रुवारी २००९ रोजी आयोजित केला होता. हा सोहळा आयोजित करण्याचा हिला मान गोव्याला प्राप्त झाला होता व त्यात गोव्यातील सुमारे एक लाख भक्तगणांनी साई पादुकांचे दर्शन घेतले होते. या सोहळ्याला राज्यात मिळालेल्या प्रतिसादाबाबत शिर्डी संस्थानालाही समाधान वाटले व त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री तसेच साई भक्त सेवामंडळ, गोव्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सत्कार शिर्डी येथे चावडी शताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळ्याला करण्याचे निश्चित केले होते. या प्रसंगी गोवा प्रदेश साईभक्त समितीचे पदाधिकारी विवेक पार्सेकर, वृशाली पार्सेकर, रवी नायडू, प्रकाश कित्तूर, पी. एस. मक्कड, महेश नाईक आदी मंडळी उपस्थित होती.

सूरत गावकरच्या खुनाचा आरोप महानंदने फेटाळला

२ जानेवारी रोजी निकाल
मडगाव, दि. २२ (प्रतिनिधी): पंचवाडी येथील गाजलेल्या सूरत गावकर खूनप्रकरणी आज येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सीरियल किलर क्रूरकर्मा महानंद नाईक याची महत्त्वपूर्ण साक्ष झाली. या साक्षीबरोबरच महानंदच्या कारनाम्यांतील एका खटल्याचे कामकाज पूर्ण झाले आहे. आता या खटल्याचा निकाल २ जानेवारी रोजी होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डेस्मंड डिकॉस्ता यांनी सांगितले. यामुळे महानंदवरील पहिला खटला पूर्ण होणार आहे. दरम्यान, महानंद वास्को येथील कोठडीत असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे नोंदवलेल्या या साक्षीत त्याने आपल्यावर ठेवलेले सर्व आरोप फेटाळताना आपल्याला या खटल्यात विनाकारण गोवले आहे, अशी भूमिका घेतली.
काल या प्रकरणी केप्याचे तपास अधिकारी नीलेश राणे यांची साक्ष झाली होती. तसेच सूरत व महानंद यांना पारोडा येथे आपल्या टेम्पोतून लिफ्ट दिल्याची साक्ष टेम्पोचालक गुरुदास नाईक याने दिली होती. याशिवाय सुरतची आई सखू गावकर हिची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
मार्च २००६ मध्ये अर्धनग्न अवस्थेतील एक मृतदेह पर्वत-पारोडा येथे सापडला होता, त्याची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांनी सदर फाईल बंद केली होती. पंचवाडी येथील सूरत याच दिवसांत घरातून बेपत्ता झाली होती, त्यासंबंधीची तक्रार घरच्यांनी नोंदवली होती. यावेळी तिच्याकडे रोख रक्कम व दागिने मिळून एकूण ३५ हजारांचा ऐवज असल्याचे यात नमूद करण्यात आले होते. महानंदची अनेक प्रकरणे उजेडात आल्यानंतर सूरतप्रकरणाशी त्याचे साम्य दिसून आल्याने घरच्या लोकांनी पुन्हा तक्रार नोंदवली. पोलिसांनी या दिशेने तपास करून दागिन्यांच्या आमिषाने खून करणे व पुरावा नष्ट करणे असे भा. दं. सं.च्या ३०२ ,३९२ व २०१ कलमाखाली महानंदवर आरोपपत्र दाखल केले होते. लग्न करण्याचे आमिष दाखवून महानंदने तिला दागिने घेऊन बोलावले होते, नंतर पर्वतावर नेऊन तिचा गळा आवळून खून केला होता, असे आरोपपत्रात म्हटले होते. महानंदच्या वतीने ऍड. जी. आंताव तर सरकारच्या वतीने ऍड. आशा आर्सेकर यांनी काम पाहिले.

तिघा स्थानिकांविरुद्ध 'सनातन'ची तक्रार

बांदोडा आश्रमावर बाटल्या, दगडफेक
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी): रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमावर रात्रीच्यावेळी सोडा बाटल्या व दगडफेक तसेच आश्रमस्थानी येऊन अश्लील हावभाव आणि शिवीगाळ करणाऱ्या तिघा व्यक्तींविरुद्ध फोंडा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर संस्थेतर्फे रीतसर तक्रार सादर करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरापासून हे प्रकार होत आहेत. तर, आठ दिवसांपासून यात वाढ झाली असल्याने ही तक्रार करण्यात आली असल्याचे आज संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी, सदाशिव धोंड व मराप्रसचे रमेश नाईक उपस्थित होते. यावेळी येथील काही स्थानिक लोक कशा पद्धतीने दगडफेक करतात आणि अश्लील हावभाव करून शिवीगाळ करतात याचे चित्रीकरण करून त्याची सीडी आज पत्रकारांना दाखवण्यात आली. जनजागृती मंच बांदोडाचे अध्यक्ष वसंत भट, संकेत नार्वेकर व जितेंद्र सावंत यांच्या विरुद्ध सदर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
येथील काही स्थानिक लोकांनी मडगाव येथे झालेल्या जिलेटिन स्फोटाचा ठपका संस्थेवर ठेवून संस्था बंद करण्याची मागणी केली आहे. तेव्हापासून संस्थेच्या इमारतीवर दगडफेक केली जात आहे. आश्रमात राहणाऱ्या साधकांना त्रास होईल अशी कृत्ये केली जात आहेत. चार वेळा सोडाच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या, महिला साधक राहत असलेल्या खोल्यांवर दगडफेक करण्यात आली. १९ डिसेंबर या दिवशी अनेकवेळा दगडफेक झाली. अशा पद्धतीने दहशत निर्माण केली जात आहे, असे श्री. मराठे यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी रामनाथी येथे झालेल्या एका सभेत श्री रामनाथ देवस्थानचे पुजारी आणि जनजागृती मंचाचे अध्यक्ष वसंत भट आणि पंच गोविंद गावडे यांनी "कायदा हातात घेण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही, संताप आला तर सनातनचा आश्रम आम्ही जाळून टाकू' अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली होती, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. आश्रमावर होणाऱ्या हल्ल्यांची फोंडा पोलिसांना माहिती दिली होती परंतु, अपुरे मनुष्यबळ असल्याचे सांगून संरक्षण पुरवू शकत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या तक्रारीचा विचार केला असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
एका प्रश्नाला उत्तर देताना श्री. मराठे म्हणाले की, सनातन संस्थेची शिकवण चुकीची असती तर, आश्रमावर दगडफेक करणाऱ्या लोकांना त्याच पद्धतीने विरोध झाला असता. संस्थेत थांबून चुकीची कृत्ये करणाऱ्या व्यक्तीला यापुढे आश्रमात धारा दिला जाणार नाही, आणि याची सूचना आमच्या सर्व प्रमुख साधकांना आणि आश्रम प्रमुखांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

झारखंडमध्ये आज मतमोजणी

रांची, दि. २२ : ८१ सदस्यीय झारखंड विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणी उद्या २३ रोजी होणार असून, त्यात १४८९ उमेदवारांचे भाग्य उघड होणार आहे.
२५ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान पाच टप्प्यात झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. हा प्रदेश नक्षलग्रस्त असल्याने तेथे संपूर्ण निवडणुकीच्या काळात निमलष्करी दल तैनात होते. या निवडणुकीत भाजपा-जदयू, कॉंग्रेस-झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) आणि राजद, लोेजपा, माकप आणि माओवादी समन्वय समिती या तीन मुख्य आघाड्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाने मात्र कोणाशीही युती केलेली नसून, सर्वाधिक ७९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
भारतीय जनता पार्टी ६७, कॉंग्रेस ६१, बहुजन समाज पार्टी ७८, राष्ट्रीय जनता दल ५४, तृणमूल ३७ जागांवर लढले. कॉंग्रेसने माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चासोबत युती केली. २००५ च्या निवडणुकीत मरांडी भाजपात होते. पण, २००६ मध्येच त्यांनी भाजपा सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला होता.
२००५ च्या निवडणुकीत भाजपाला ३० जागा मिळाल्या होत्या तर सहकारी जदयूला सहा जागांवर समाधान मानावे लागले. अपात्रता आणि राजीनाम्यामुळे विधानसभा बरखास्त झाली तेव्हा भाजपाचे २१ आणि जदयुचे ३ आमदार उरले होते.
या निवडणुकीत मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडाही रिंगणात आहेत. पतीच्या अनुपस्थितीत त्यांनी प्रचाराचीही धुरा सांभाळली होती. त्यांना कितपत यश मिळेल, हे उद्याच्या निकालावरून समजू शकणार आहे.

Tuesday, 22 December, 2009

अमली पदार्थांची 'टपाला'द्वारे तस्करी

१४ लाखाच्या मालासह एकास अटक
पणजी व वास्को, दि. २१ (प्रतिनिधी): टपाल कार्यालयाचा वापर करून "पार्सल'द्वारे अमली पदार्थाची विदेशात तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेला लाइफ केअर औषधालयाचा मालक नॉर्मन आझावेदो याला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या अमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १४ लाख ४४ हजार ९७० रुपये एवढी होते तर, देशात त्याची २ लाख ७३ हजार ३५० रुपये आहे. "पार्सल'मधील सर्व अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून आझावेदो याला न्यायालयात हजार करून १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. आझावेदो याने विदेशातील पत्त्यावर पाठवलेली "पार्सल' मुंबई येथे पकडण्यात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्याला गोव्यात सापळा रचून अटक करण्यात आली. या छाप्यात एक किलो पेक्षा जास्त केटामाईन, १२० रीस्टल टॅबलेट व अन्य धुंदी चढणाऱ्या टॅबलेट आदी जप्त करण्यात आले आहे. तर, मुंबई येथे सुमारे ४० "पार्सल' जप्त केली आहेत.
गेल्या २ ते ३ वर्षांपासून ही तस्करी सुरू असल्याची दावा कस्टम अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका, इंग्लंड, नेदरलॅंड तसेच युरोपातील अन्य देशातही "पार्सल' पाठवण्यात येत असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्याने दिली. या घटनेमुळे किनारी भागातील पोस्ट कार्यालयांचा वापर मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी केला जात असल्याचे उघड झाले आहे.
अधिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी गोव्यातून विदेशात पाठवल्या जाणाऱ्या "पार्सल'मध्ये अमली पदार्थ असल्याचे आढळून आले होते. ही "पार्सल' म्हापसा येथील पोस्ट कार्यालयातून पाठवण्यात येत असल्याची माहिती गोव्यातील कस्टम अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार म्हापसा कार्यालयावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. दि. १६ रोजी बेनी फर्नांडिस नामक इसम त्याच पद्धतीचे "पार्सल' पाठवण्यासाठी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याने सदर "पार्सल' नॉर्मन आझावेदो याने आपल्याला टपाल करण्यासाठी दिली असल्याचे सांगून आपण त्याचा वाहनाचा चालक असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. त्या माहितीच्या आधारे आझावेदो याच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी त्याच्या घरातही केटामाईन आणि धुंदी चढणाऱ्या टॅबलेट सापडले. तसेच १ लाख ७० हजार रुपयांची रोकडही त्यांना सापडली. हे सर्व जप्त करण्यात आल्याची माहिती कस्टम खात्याचे साहाय्यक अधीक्षक प्रकाश मळीक यांनी दिली.
-------------------------------------------------------------------------
या प्रकरणात पकडण्यात आलेल्या आझावेदो याची कळंगुट परिसरात तीन औषधालये (फार्मसी) तसेच बागा येथे नॉर्म या नावाचा एक डिस्को बारही आहे. तसेच हुबळी येथे औषध निर्मिती केंद्र असल्याची माहिती कस्टम खात्याला मिळाली असून त्याठिकाणी छापा टाकण्याची सूचना हुबळी येथील कस्टम अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.
-------------------------------------------------------------------------
यापूर्वीही गोव्यातील टपाल कार्यालयातून अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. परंतु, येथील टपाल कार्यालयात संशयास्पद "पार्सल' तपासण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. एखाद्या "पार्सल'विषयी संशय आल्यास त्याची माहिती उच्च अधिकाऱ्यांना देऊन ते फोडून पाहता येते. परंतु अशा प्रकारचे धाडस कोणताही पोस्ट मास्तर करीत नाही.
-------------------------------------------------------------------------
डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन व आइसलॅंड या देशांत भारत, जर्मनी व स्पेन या राष्ट्रांतून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पाठवले जातो. भारतातून होणारी ही तस्करी गोव्यातील टपाल यंत्रणेचा गैरवापर करून केला जात असल्याचा दावा यापूर्वी जोन्स कार्लसन या स्वीडिश कस्टम अधिकाऱ्याने केला आहे. या अमली पदार्थांची मागणी इंटरनेटच्या माध्यमातून केली जाते. मागणीनुसार अमली पदार्थ टपाल खात्याच्या खाकी रंगाच्या पाकिटात बंद करून पाठवला जातो.
-------------------------------------------------------------------------

आरोग्यमंत्र्यांची चौकशी कुठे भरकटली!

राज्यातील किनारी भागांत मोठ्या प्रमाणात 'केटामाईन' या गुंगीच्या औषधांची अनधिकृत विक्री होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळूनही त्यांनी सुरू केलेली चौकशी थंड का पडली, अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात या खात्याने उत्तर गोव्यातील पाच औषधालयांवर छापे टाकून मोठा साठा जप्त केला होता. कळंगुट येथील "लाइफ केअर मेडी सेंटर' औषधालयाचा परवाना स्थगित ठेवून अन्य औषधालयांची चौकशीही सुरू होती. खुद्द आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या बाबतीत गंभीर दखल घेऊनही या अनधिकृत व्यवहाराला पर्दाफाश करण्यात हे खाते सपशेल अपयशी ठरल्याचे या प्रकरणावरून उघड झाले आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गेल्या १० ऑगस्ट रोजी पणजी येथे भर पत्रकार परिषदेत "केटामाईन' प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. या औषधांचा वापर अमलीपदार्थ सेवनाप्रमाणे गुंगी येण्यासाठी केला जातो. त्याचे विदेशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व त्यामुळेच राज्यातील किनारी भागांत विविध औषधालयांकडून उघडपणे त्याची विक्री होत असल्याचेही आढळून आले होते. दरम्यान, या भागातील अनेक विद्यार्थी या औषधांना बळी पडत असल्याने अनेक पालकांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रारी दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली होती. हे औषध शीतपेयाबरोबर घेतले जाते व त्यामुळे गुंगी येते. या भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्ट्यांतही या औषधांचा सर्रासपणे वापर होतो, असेही आरोग्यमंत्री म्हणाले होते.
विशेष करून कळंगुट, कांदोळी, शिवोली, साळगाव आदी भागांत औषधालयांकडून या औषधांची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जाते. "साजरो मेडिकल स्टोअर्स', "वॉलसन ऍण्ड वॉलसन मेडिकल्स', "श्री शांतादुर्गा मेडिकल स्टोअर्स' आदींवर छापे टाकून प्रथम दर्शनी त्यांची चौकशी सुरू केली होती. दरम्यान, या एकूण प्रकरणात एक बडी टोळीच कार्यरत असल्याचे सांगून त्या दृष्टीने चौकशी सुरू असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले होते. दरम्यान, नॉर्मन आझावेदो याच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून २००४ साली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याची सुनावणी न्यायालयात सुरू असल्याचीही माहिती देण्यात आली होती. परवाना नसताना या औषधांची विक्री करणाऱ्या सर्व औषधालयांवर कठोर कारवाई करून प्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जाईल, अशी घोषणा होऊनही गेले चार महिने खात्याला यामागील टोळीचा पर्दाफाश करता आला नाही, याचा नेमका अर्थ काय, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

कळणेतील खनिजावर हसापूर येथे प्रक्रिया

यंत्रणेची जाणीवपूर्वक डोळेझाक
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यातील हसापूर येथे एका खाजगी जागेत महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररीत्या खनिज मालाचा साठा केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी कच्चा खनिज माल साठवून त्यावर प्रक्रिया केली जाते व त्यानंतर हा माल चढ्या दराने विकला जातो, अशीही खबर आहे. दरम्यान, हसापूर गावात एवढ्या मोठ्या जागेत उघडपणे हा बेकायदा व्यवहार सुरू असताना स्थानिक पंचायत, खाण खाते, पोलिस खाते व गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ अनभिज्ञ कसे काय, असा सवाल येथील ग्रामस्थ करीत आहेत. या व्यवहाराला राजकीय आशीर्वाद असल्याचा संशयही व्यक्त होत आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पेडणे तालुक्यातील धारगळ येथे हसापूर गावात गेल्या एका वर्षापासून मोठ्या प्रमाणात खनिज मालाची साठवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा खनिज माल शेजारील दोडामार्ग तालुक्यात सुरू झालेल्या खाणींवरून आणला जात असल्याचा संशय आहे. अलीकडेच दोडामार्ग येथील कळणे येथे खाणी सुरू झाल्याने तेथील खनिजाची मोठ्या प्रमाणात गोव्यात वाहतूक केली जाते. दरम्यान, ही जागा काहीशी अडगळीत असल्याने व तिथे घरे नसल्याने रात्रीचा या ठिकाणी माल आणून टाकला जातो व या मालावर प्रक्रिया करून नंतर तो विकला जातो.
या प्रकरणी हसापूरचे सरपंच संतोष मळीक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर जागा गावातीलच धनंजय मळीक नामक एका व्यक्तीची असल्याची माहिती दिली. धनंजय मळीक यांनी ही जागा अन्य कुणाला तरी भाडेपट्टीवर दिली आहे. गेल्या वर्षी पंचायतीतर्फे सदर व्यक्तीला सुनावण्यात आले होते व हा व्यवहार बंद करण्याचे आदेशही दिले होते. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असेही ते म्हणाले. ग्रामस्थांचा या व्यवहाराला विरोध असल्याची माहितीही त्यांनी दिली. पंचायतीकडून या व्यवहाराला कोणताही दाखला किंवा परवाना देण्यात आला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या बाबतीत अन्य काही ग्रामस्थांशी संपर्क साधून माहिती मिळवली असता, ही जागा दिलेल्या कुटुंबातील एक महिला पंचायत सदस्य असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे पंचायतीकडून या बेकायदा व्यवहारावर कारवाई होण्याची शक्यता फारच कमी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या व्यवहाराला पाठिंबा मिळवून देण्यासाठी या व्यवहाराशी संबंधित काही लोकांनी सदर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडून देवस्थानच्या नावे पैसे मिळवून संपूर्ण गावातील लोकांची बोलतीच बंद करण्याचे प्रयत्नही सुरू असल्याची खात्रीलायक खबर मिळाली आहे.

पायाभूत विकास अनुदान कायम ठेवीत शैक्षणिक खाते पाठवणार संस्थांना नोटिसा?

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): राज्यातील शैक्षणिक संस्थांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या आर्थिक साह्यता योजनेचा गैरवापर होत असल्यावरून विधानसभा अधिवेशनात मांद्र्याचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रश्न उपस्थित केल्याने आता शिक्षण खाते खडबडून जागे झाले आहे. या योजनेचा लाभ मिळवलेल्या सुमारे ३६ संस्थांनी प्रत्यक्षात पैशांचा वापर न करता ही रक्कम कायम ठेवीत जमा केल्याची खबर आहे. या संस्थांना शिक्षण खात्यातर्फे नोटिसा जारी करून ही रक्कम परत का घेण्यात येऊ नये, अशी जाब विचारण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
राज्यातील सर्व अनुदानित शैक्षणिक संस्थांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना भाजप सरकारने २००२ साली तयार केली व त्याला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. या अभिनव योजनेअंतर्गत सुमारे १७४ संस्थांनी आर्थिक लाभ घेतला. सुमारे ४० कोटी रुपये याअंतर्गत संमत करण्यात आले असून ३२.५५ कोटी रुपये वितरित करण्यात आले. दरम्यान, या योजनेचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करण्यात विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार मात्र सपशेल अपयशी ठरले आहे. विविध ठिकाणी असलेल्या शाळा, विद्यालयांत सुविधांची गैरसोय दूर करून सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त शैक्षणिक संस्था बनवण्यासाठी या योजनेचा योग्य वापर होण्याची गरज होती. दरम्यान, विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने या योजनेचे तीन तेराच वाजवले आहेत. या योजनेअंतर्गत आर्थिक साहाय्य मिळवून खऱ्या अर्थाने या पैशांचा वापर केलेल्या सुमारे आठ संस्था उर्वरित कामासाठी दुसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत, पण त्यांना देण्यासाठी सरकारकडे मात्र पैसे नाहीत. दरम्यान, ही मदत घेतलेल्या १७४ संस्थांपैकी १३८ संस्थांनी प्रत्यक्ष या पैशांचा वापर केला. त्यात ३६ संस्थांनी या पैशांचा वापर न करता ती बॅंकेत कायमठेवी रूपात जमा करून ठेवल्याची खबर आहे. एकीकडे या पैशांचा वापर करून हाती घेण्यात आलेले काम पूर्ण करण्यासाठी काही संस्था निधीची प्रतीक्षा करीत असताना सरकारी पैसा कायम ठेवीत ठेवून व्याज मिळवणाऱ्या संस्थांवर काहीही कारवाई होत नसल्याने या योजनेचा बोजवाराच उडाला आहे. मांद्र्याचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून वेळोवेळी हा विषय विधानसभेत उपस्थित केला जातो. दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या संस्थेत हरमल पंचक्रोशी (हरमल), पेडणे तालुका विकास परिषद (मांद्रे), श्री शांतादुर्गा शिक्षण संस्था (सांकवाळ), सेंट झेवियर्स हायस्कूल (मयडे-बार्देश), श्री नवदुर्गा शिक्षण संस्कृती संस्था (मडकई), मांद्रे हायस्कूल (मांद्रे), श्री सातेरी विद्याप्रसारक मंडळ (इब्रामपूर) व श्री शांतादुर्गा ज्ञानज्योती मंडळ (कारापूर, सत्तरी) आदींचा समावेश आहे.

'त्या' ट्रॉलरचे मालक रत्नागिरीला रवाना

नुकसानीचा आकडा साडेतीन कोटी
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): रत्नागिरी समुद्रकिनारी बुडालेल्या अवस्थेत आढळलेल्या गोव्यातील ट्रॉलर्सचे वृत्त धडकताच बेती येथील मांडवी मच्छीमार मार्केटिंग सोसायटीचे एक पथक रत्नागिरीला रवाना झाले आहे. या प्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर ट्रॉलर बेती येथील तुळशीदास सावंत यांच्या मालकीचा आहे, असेही समजल्याने ट्रॉलर मालकाचे बंधू व त्याच्याबरोबर अन्य दोन साथीदार रवाना झाल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मेनिनो आफोन्सो यांनी दिली.
कोकण व गोव्यातील समुद्रकिनाऱ्याला फयान वादळाने गेल्या ११ नोव्हेंबर रोजी बराच मोठा तडाखा दिला होता. या वादळात अनेक मच्छीमार बंधूंची मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. गोव्यालाही या वादळाचा मोठा फटका बसला व त्यात ६७ मच्छीमारबांधव बेपत्ता झाले होते. राज्य सरकारने तात्काळ या बेपत्ता मच्छीमारांना प्रत्येकी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. परंतु हा केवळ फार्स ठरला आहे. ही मदत देण्यासाठी मृत्यूचा दाखला हवा, असे कारण पुढे करून या बाबतीत सरकारकडून चालढकल केली जात आहे. प्रत्यक्षात या ६७ मच्छीमारांपैकी केवळ दोनच मच्छीमार गोमंतकीय असून उर्वरित सर्वजण बिगरगोमंतकीय कामगार आहेत. या मच्छीमारांना विमा कंपनीकडूनही मदत मिळण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी अलीकडेच झालेल्या अधिवेशनात हा विषय मांडला होता. सरकारने त्वरित हस्तक्षेप करून या मच्छीमारांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून द्यावी, असेही त्यांनी सरकारला सुचवले होते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना होती. यापूर्वी कोकण किनारी भागात गोव्यातील ट्रॉलर्स किंवा मच्छीमारांचे मृतदेह सापडल्याची वृत्ते तिथून प्रसिद्ध झाली असली तरी त्याची दखल येथील मच्छीमार सोसायटींनीही घेतली नसल्याची माहिती मिळाली आहे. मुळात ट्रॉलरवर कोण मच्छीमार होते याची माहिती ट्रॉलर मालकांना नव्हती व वादळात सापडलेल्या बहुतेक ट्रॉलरवरील सर्व मच्छीमार बेपत्ता असल्याने कुणाचाही थांगपत्ता कुणाला नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मच्छीमारांच्या मृतदेहांवर हक्क सांगितल्यास त्यांचे कुटुंबीय मदतीसाठी रेटा लावणार या भीतीने ट्रॉलर मालकांनीही या बाबतीत पुढाकार घेतला नाही. यासाठी मृत मच्छीमारांबाबत कुणीच दावा केला नसल्याचीही खबर मिळाली आहे.
सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा दावा
फयान वादळाने गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना दिलेल्या तडाख्यात झालेल्या नुकसानीचा आकडा सुमारे साडेतीन कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बेती व कुठबण जेटीवरील ट्रॉलरांना या वादळाचा फटका बसल्याने त्यांनी मच्छीमार खात्याकडे सादर केलेल्या अहवालानुसार नुकसानीचा आकडा साडेतीन कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे रत्नागिरी येथे काल सापडलेला ट्रॉलर हा बेती येथील तुळशीदास सावंत यांचा असल्याचे सांगितले जाते. खात्याकडे नुकसानीबाबत सादर करण्यात आलेल्या अहवालात सर्वांत जास्त नुकसान हे तुळशीदास सावंत यांनाच झाल्याचा दावा करण्यात आला असून त्यांनी ५१ लाख १५ हजार रुपये नुकसानी झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, रत्नागिरीत सापडलेल्या या ट्रॉलरसह सहा मच्छीमारांचे मृतदेह सापडल्याचीही खबर असून त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

जॉन फर्नांडिसविरुद्ध 'लूकआउट' नोटीस

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): रशियन तरुणीवरील बलात्कारप्रकरणातील फरारी संशयित जॉन फर्नांडिसचा शोध घेण्यासाठी "लूकआउट' नोटीस जारी करण्यात आली असून त्याची गोव्यातील तसेच अन्य राज्यातील पोलिस स्थानकावरही फोटोसह माहिती पुरवण्यात आली आहे. जॉनविषयी कोणतीही माहिती त्वरित गुन्हा अन्वेषण विभागाला पुरवण्याचीही सूचना करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांना आज सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जॉन याला मिळालेला अटकपूर्व जामीन अर्ज रद्द केल्यानंतर आणि तो निवाडा सर्वोच्च न्यायालयाने अबाधित ठेवल्यानंतर जॉन फरार झाला होता.
अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तसेच, पिडीत तरुणीला तक्रार मागे घेण्यासाठी १५ लाख रुपये देऊ केल्याची कोणतीही लेखी तक्रार गुन्हा अन्वेषण विभागाकडे आली असल्याचेही श्री. देशपांडे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
जॉन फर्नांडिस याचा पासपोर्ट यापूर्वीच पोलिसांनी जप्त केला असल्याने तो देशाबाहेर पळून जाणे शक्य नसल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी पीडित तरुणीची बलात्काराची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने कोलवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांची खात्याअंतर्गत प्राथमिक चौकशी सुरू झाली असल्याचेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.

हॉटेलचे कंत्राट नियमांना धरूनच

मुख्यमंत्र्यांचा दावा
ईएसजीची मॅरेथॉन बैठक

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेच्या (ईएसजी) प्रशासकीय समितीची तीन तास मॅरेथॉन बैठक होऊन त्यात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केलेल्या आरोपांवर सखोल चर्चा करण्यात आली. तीन तासांच्या बैठकीअंती मुख्यमंत्री कामत यांनी "इफ्फी'प्रकरणी हॉटेल सिदाद दी गोवाला अधिकृत हॉटेलाची मान्यता देण्याच्या कंत्राटात काहीही बेकायदा व्यवहार झाला नसल्याचे व हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर व नियमांना धरून होता, असे सांगितले. पर्रीकरांच्या आरोपांत काहीही तथ्य नाही, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी घेतली.
आज येथील मॅकनीज पॅलेस येथे संध्याकाळी ४ वाजता ही बैठक सुरू झाली. मुख्यमंत्री कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपाध्यक्ष जलस्रोतमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस, सभापती प्रतापसिंह राणे, अंजू तिंबले, रंजना साळगावकर, विष्णू वाघ, राजेंद्र तालक, मांगिरीश पै रायकर, विशाल पै काकोडे, तोमाझिन कार्दोझ आदी हजर होते. संध्याकाळी उशिरा मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, वित्त सचिव उदीप्त रे व ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक हे देखील या बैठकीत सामील झाले. दरम्यान, अलीकडेच झालेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी चित्रपट महोत्सवाच्या अधिकृत हॉटेलची निवड मनोरंजन संस्थेच्या निविदा उपसमितीच्या बैठकीत झाल्याचे दाखवण्यात आलेले असताना प्रत्यक्षात ही बैठकच झाली नसल्याचा आरोप केला होता. खाण, माहिती व प्रसिद्धी आणि अबकारी खात्यांवरून आधीच अडचणीत आलेल्या मुख्यमंत्र्यांवर गोवा मनोरंजन संस्थेच्या व्यवहारांबाबतही आरोप झाल्याने त्यांची बरीच नाचक्की झाली होती.
दरम्यान, यंदाचा इफ्फीचा खर्च हा सात कोटी रुपयांच्या घरात निश्चित होईल, असे आजच्या बैठकीअंती स्पष्ट झाले. दहा ते बारा कोटी रुपयांवरून हा खर्च सात कोटींवर कमी करण्यात यश मिळाल्याने यावेळी सर्व सदस्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयानेही राज्य सरकारने खर्च कपातीचा हा प्रयोग यशस्वी केल्याने समाधान व्यक्त केल्याचीही खबर देण्यात आली. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी सर्व व्यवहारांची कागदपत्रे सादर केल्याचीही खबर मिळाली आहे. मनोज श्रीवास्तव यांची मनोरंजन संस्थेवरून हकालपट्टी होण्याबाबत केवळ अफवा पसरल्या आहेत व त्यात काहीही खरे नाही, असेही मुख्यमंत्री कामत म्हणाले.
दरम्यान, ही बैठक नेमकी तीन तास का लांबली व शेवटी ऍडव्होकेट जनरल यांना पाचारण करण्याएवढे नेमके काय घडले, याबाबत मात्र संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्रीकरांच्या आरोपांबाबत चर्चा करून त्यात काहीही तथ्य नाही, अशी भूमिका घेण्यासाठी नेमकी काय कृती करण्यात आली हे मात्र कळू शकले नाही.

Monday, 21 December, 2009

आता गोव्याला गरज "सेझमुक्ती संग्रामा'ची

मेधा पाटकर यांचे मत

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - गोमंतकीयांनी पोर्तुगिजांना हाकलवण्यासाठी गोवा मुक्ती संग्राम घडवला तसेच "सेझ'ला हद्दपार करण्यासाठी "सेझमुक्ती संग्राम'ची गरज आहे. गोव्याला "स्पेशल इकॉनॉमिक झोन'ची कोणतीही गरज नसून "स्पेशल इकोलॉजी झोन'ची आवश्यकता आहे, असे उद्गार काढून येत्या दि. १९ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेनंतर गोव्यात तसेच राष्ट्रीय स्तरावर "सेझ' विरोधात छेडल्या जाणाऱ्या लढ्याची दिशा ठरवली जाणार असल्याचे आज नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी येथे सांगितले. तर, भूखंड विक्रीत प्रचंड प्रमाणात घोटाळा केल्याने येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि ते करणाऱ्या नेत्यांवर गुन्हेगारी दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले पाहिजे, असे परखड मत यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे वकील प्रशांत भूषण यांनी व्यक्त केले. ते विशेष आर्थिक विभाग(सेझ) संबंधी पणजी घेतलेल्या जनता दरबारानंतर पत्रकार परिषदेत बोलता होते.
"सेझ' हे राज्य सरकारसाठी "क न्सेशन' आणि "कमिशन' आहे. या सेझ कंपन्या राजकीय पक्षांना निवडणुका लढवण्यासाठी पैसे मोजतात. त्यामुळे गोव्यात निवडणुका एका महिन्याच्या तोंडावर असताना सेझसाठी जागा देण्यात आली, असे मेधा पाटकर म्हणाल्या. "वादग्रस्त प्रादेशिक आराखडा' आणि "सेझ' रद्द करण्यासाठी गोवेकरांनी जो एकत्रित लढा उभारला आणि यशस्वी केला त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. चार राज्यानंतर गोव्यात आज "सेझ' विषयावर घेण्यात आलेल्या जनता दरबारात वेर्णा, बेतुल नाकेरी येथील लोकांनी आपली मते मांडली. तसेच, कशा प्रकारे सरकारने शुल्लक किमतीत भूखंड सेझ कंपनींना दिलेल्या आहेत, याची माहितीही करून दिली.
या सेझ कंपन्यांना भूखंड लाटताना कोणतेही कायदे आणि नियम पाळण्यात आलेले नाहीत. गोव्यातील कोमुनिदादचीही जागा देण्यात आली आहे. १९९१ साली ताब्यात घेतलेली जागा आता "सेझ'साठी वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सार्वजनिक कामासाठी सरकारकडून ३ ते ५ रुपये चौरस मीटर दरात जागा घेऊन ती खाजगी कंपन्यांना विकण्याचे काम सरकारने केले आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले असल्याचे या जनता दरबारानंतर उघडकीस आले असल्याचे केंद्र सरकारातील माजी आरोग्य सचिव के बी. सक्सेना यांनी सांगितले. ते श्रीमती पाटकर यांच्याबरोबर आलेल्या पथकात सहभागी होते.
"सेझ' साठी भूखंड देण्यापूर्वी सरकारने कोणतेही नियोजन केलेले नाही. कुठे कंपन्या उभाराव्यात याचाही विचार नाही. प्रत्येक राज्यांचे मुख्यमंत्री हे भूखंड वितरक बनलेले आहेत, असे मत यावेळी विकल शर्मा यांनी व्यक्त केले. संपूर्ण भारतात आता पर्यंत १ हजार ४६ सेझ प्रस्ताव आले आहेत. त्यासाठी १० दशलक्ष चौरस मीटर जागा या सेझ कंपन्यांच्या ताब्यात दिली आहे. तर, एका महाराष्ट्रात २८६ सेझ कंपन्यांना मान्यता दिली आहे. यातील केवळ एका पुणे जिल्ह्यात ५५ "सेझ' असल्याची माहिती संपद काळे यांनी दिली.

साखळीत सिलिंडरच्या स्फोटाने बारा ते पंधरा लाखांचे नुकसान

आगीत विजेच्या उपकरणांसह रोख रक्कम जळाली

पाळी, दि. २० (वार्ताहर) - साखळी गोकुळवाडी येथील मूळ मालक केशव भट यांनी भाडेकरूंसाठी बांधलेल्या चाळवजा घरात आज (दि.२०) सकाळी ८.३० च्या दरम्यान गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात भाडेकरू कल्याणी गुरू प्रियोळकर यांचा संसार पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यामुळे सौ. प्रियोळकर यांच्या अंगावरील कपड्यांशिवाय त्यांच्याकडे बाकी काहीच शिल्लक राहिले नाही.
काल १९ रोजी माशेल येथे आपल्या नातेवाइकाकडे मुक्कामाला असलेल्या सौ. प्रियोळकर आज सकाळी आपल्या घरी साखळीत आल्या. चहा करून त्या बसस्थानकावर गेल्या व मागोमाग पंधरा मिनिटांनी ही घटना घडली. यात फ्रीज, वॉशिंग मशीन, लाकडी कपाट, भांडी, खाट, कपडे तसेच रोख रक्कमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात अंदाजे १२ ते १५ लाखांचे नुकसान झाले.
सौ. प्रियोळकर ह्या साखळीच्या कॅनेरा बॅंकेत असून तीन वर्षांपासून येथे रहात आहेत. सोबत त्यांचा १४ वर्षांचा मुलगा राहतो. त्यांचे पती पळसकाटो मोले येथे आपल्या मूळ गावी राहतात. सकाळी चहा करून त्या आपल्या मॅडमना भेटण्यासाठी जवळच असलेल्या कदंब बसस्थानकावर गेल्या व मागे ही घटना घडली.
अचानक झालेल्या या स्फोटाने घराची कौले उडून गेली. घराचे वासे व कांबी यांनी पेट घेतला. घरापासून २०० मीटरवर उभ्या असलेल्या निकीकुमारी सिंग यांच्या डोक्यावर कौलाचा तुकडा पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या डोक्याला तीन टाके पडले आहेत. सौ. प्रियोळकर यांचा आज वाढदिवस होता. तसेच नवीन घर घेण्यासाठी त्यांनी जमवलेली सुमारे साडे सात ते आठ लाख रुपयेही आगीत जळून खाक झाले.
सौ. प्रियोळकर यांच्या घराला लागून असलेल्या सौ. दिलशाद किल्ले यांच्या घरातील फ्रीज, टीव्ही तसेच कपाट, भांडी यांचेही मोठे नुकसान झाले. यात सौ. किल्ले यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले.
घटनेची खबर मिळताच नगराध्यक्ष सौ. सुनिता वेरेकर व नगरसेवक रियाज खान घटनास्थळी आले. मामलेदार प्रमोद भट, उपजिल्हाधिकारी केनवडेकर, पोलिस अधिकारी तसेच पाळीचे आमदार प्रताप गावस यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच गॅस सिलिंडरचे सर्वे इन्स्पेक्टर श्री. शेट व सुरज कुलकर्णी यांनी भेट दिली.

त्यांचे घराचे स्वप्न अधुरेच राहिले!

वयस्कर दांपत्याचा नदीत बुडून मृत्यू

काणकोण, दि. २० (प्रतिनिधी)- साळेरी खोला येथील एक वयस्कर दांपत्य साळेरी नदीत बुडाल्याची घटना आज उघडकीस आली.
तिळू शाणू पागी(७०) व सुकांती पागी(५५) अशी बुडालेल्यांची नावे असून, आपले घरकुल बांधण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिल्याने या घटनेबद्दल आगोंद व खोल भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तिळू व सुकांती या दांपत्याला इंदिरा आवास योजनेखाली २० हजार रुपये मंजूर झाले होते. घराच्या बांधकामासाठी ही दोघे साहित्य जमा करण्यात या दिवसांत मग्न होती. काल संध्याकाळी तिळू हे आपल्या भावाची होडी घेऊन, जमा केलेली रेती आणण्यासाठी पत्नीसमवेत गेले होते, मात्र रात्रीपर्यंत ही दोघे परतली नाहीत. आज सकाळी काही नागरिकांना साळेरी पुलाखाली तिळू यांचा मृतदेह तरंगताना दिसला. शोधाशोध केल्यावर घोटणीवाडा येथे काही अंतरावर होडीजवळच सुकांती हिचाही मृतदेह सापडला. तेथेच रेतीची सात पोती मिळाली. या दुर्दैवी दांपत्याचे घराचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.
काणकोण व आगोंद येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले व मडगाव येथील शवागारात पाठविले. उद्या शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

लवाद ही वेळकाढू प्रक्रिया

म्हादईप्रश्न चर्चेने सोडवा - मेधा पाटकर

पणजी, दि. २० (प्रतिनिधी)- म्हादईप्रश्न मिटवण्यासाठी लवादची गरज नसून त्यासाठी राज्याराज्यांदरम्यान आणि त्या लोकांमध्ये चर्चेची गरज आहे. लवादावर नेमण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांना केवळ सरकारचीच भाषा कळते. लोकांच्या भावना ते जाणून घेत नाहीत. त्यामुळे हा प्रश्न चर्चेतूनच सोडवावा, असे मत आज नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी आज पणजीत बोलताना सांगितले. नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या तंट्याच्यावेळी जे घडले तसे गोव्याच्या बाबतीत होऊ नये. लवाद नेमल्यानंतर तब्बल दहा वर्षे तो प्रश्न तसाच रेंगाळत राहिला. त्यानंतर जो निकाल लागला तोही सामान्य लोकांच्या हिताचा नव्हता, असे त्या म्हणाल्या.
पाणी, हवा, पाऊस यांना राजकीय सीमा लागत नाही. पाण्याचे नियोजन न करताच मोठ्या नद्यांवर धरणे बांधून खालच्यांचा जीव घेतला जातो, असेही त्या म्हणाल्या.
म्हादईप्रश्नी गोवा सरकारने केलेल्या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या १० डिसेंबर रोजी हा वाद मिटवण्यासाठी लवाद नेमण्याचा निर्णय घेतला तसेच त्यासाठी अध्यक्ष व दोन सदस्य नेमण्याचे अधिकार सरन्यायाधीशांना देण्यात आले आहेत. गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचे पाणी वळवण्यासाठी कळसा-भंडूरा प्रकल्पाच्या कामाला कर्नाटक सरकारने सुरुवात केली आहे. गोवा सरकारने यासंबंधी आंतरराज्य नदी जल वाद कायदा १९५६ अंतर्गत सुरुवातीला जुलै २००२ साली केंद्राकडे जल लवाद नेमण्याची विनंती केली होती.

Sunday, 20 December, 2009

भाजप अध्यक्षपदाची सूत्रे गडकरींनी स्वीकारली

अटलजी, अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले
नवी दिल्ली, दि. १९ : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन जयराम गडकरी यांची आज एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याची घोषणा मावळते अध्यक्ष राजनाथसिंग यांनी केली. भाजप संसदीय पक्षाच्या दुपारी झालेल्या बैठकीत गडकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राजनाथसिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि नंतर गडकरी यांच्या उपस्थितीतच नवे अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली. गडकरी हे सर्वात कमी वयाचे भाजपचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत.
येथील भाजपच्या मुख्यालयात राजनाथसिंग यांनी ५२ वर्षीय नितीन गडकरी यांच्या नावाची घोषणा केली त्यावेळी ज्येष्ठनेते आणि संसदीय पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षेनेते अरुण जेटली, ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू आदी उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे, माजी खासदार किरीट सोमय्या, स्मृती इराणी यांच्यासह महाराष्ट्रातील पक्षाचे अनेक नेते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
गडकरी यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राजनाथसिंग यांनी पुष्पहार घालून गडकरी यांची स्वागत करातानाच त्यांना पक्षाध्यक्षपदाचा कार्यभारही सोपविला. त्यानंतर ज्येष्ठनेते लाालकृष्ण अडवाणी यांनी पुष्पहार घालून गडकरी यांचे स्वागत केले. गडकरी यांनी या दोन्ही नेत्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू यांनीही गडकरी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले, त्यावेळी गडकरी भारावून गेले होते.
नितीन गडकरी यांना पदभार सोपविल्यानंतर स्वत: राजनाथसिंग यांनी त्यांना अध्यक्षांच्या आसनावर स्थानापन्न केले. अतिशय भावपूर्ण झालेल्या या पदग्रहण सोहळ्यात राजनाथसिंग, लालकृष्ण अडवाणी आणि नूतन अध्यक्ष गडकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गडकरींच्या नावाची घोषणा होताच पक्षाच्या मुख्यालयाबाहेर अशोका रोडवर कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून फटाके फोडत जल्लोष केला.
नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी आज निवड होणार हे आधीच निश्चित झाल्याने आणि गडकरींना तसे कळविण्यात आल्याने ते आज दुपारी नागपूरहून येथे पोहोचले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमान तळावर त्यांचे आगमन झाले असता भाजपाच्या हजारो कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या निनादात आणि फटाके फोडत गडकरी यांचे दणदणीत स्वागत केले.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम पक्षाचे ज्येष्ठनेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वात घेतले. त्यानंतर गडकरी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचेही आशीर्वाद घेतले.

गडकरींमुळे भाजप भरारी घेईल: अडवणी

नवी दिल्ली, दि. १९ : नितीन गडकरी यांच्या रुपाने पक्षाला लाभलेल्या नव्या नेतृत्वाला आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या नेतृत्वात पक्षासोबतच देेशाच्या विकासालाही बळ मिळेल, असा विश्वास पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केला आहे.
गडकरी यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेच ते पत्रकारांशी बोलत होते. अडवाणी म्हणाले, गडकरींचे नेतृत्व विकासाभिमुख आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे त्याचे उत्तम उदाहरण आहे. हा हायवे आणि त्याच्या सडका या नेहमीसाठी
त्यांच्या कामाचे प्रतीक म्हणून नोंदल्या गेल्या आहेत. आज सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशाचा सर्वांगीण विकास आणि त्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची उभारणी. आम्हाला जेव्हा आमची राज्ये हायवे, एक्सप्रेसवे बनवण्याचा प्रस्ताव द्यायचे तेव्हा आम्ही त्यांना सांगत असू, गडकरींची मदत घ्या.
मी १९४३ साली पहिल्यांदा संघाच्या ओटीसी प्रशिक्षणासाठी आलो, तेव्हा नागपूर केवळ दोनच गोष्टींसाठी प्रसिद्ध होेते. एक म्हणजे संत्रा आणि दुसरे म्हणजे आरएसएस. आज संपूर्ण नागपूरचा चेहरामोहरा बदलून गेला आहे. गडकरींचे नेतृत्व आणि मागदर्शनामुळेच हे शक्य झाले. गडकरींच्या नेतृत्वात आमचे सरकार आले तर आम्ही जनतेला उत्तम शासन देऊ आणि विकास करू, असे अडवाणी म्हणाले.

मळा येथे घरातून दीड लाखांची चोरी

पणजी, दि.१९ (प्रतिनिधी): पणजी मळा येथे एका राहत्या घरात काल रात्री चोरी झाली व सुमारे दीड लाख रुपये किमतीचा ऐवज व रोख रक्कम पळवल्याची तक्रार पोलिस स्थानकांत नोंद झाली आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश मगनलाल नाईक हे काल आपल्या माशेल येथे गावी कुटुंबीयांसह जत्रेसाठी गेले होते.आज सकाळी आपल्या मळा येथील राहत्या घरी आले असता घरांत चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी तात्काळ पणजी पोलिस स्थानकांत यासंबंधी तक्रार नोंद केली. ही चोरी काल रात्री ९ ते पहाटे ६ या दरम्यान, झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तक्रारदार श्री.नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरीला गेल्याचे ते म्हणाले.आज पोलिसांनी सकाळी तिघांना संशयास्पदरीत्या फिरत असल्याने ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे या चोरीबाबत चौकशी केली असता काहीही सापडू शकले नाही.

मेधा पाटकर आज पणजीत

पणजी, दि.१९(प्रतिनिधी): नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांचे उद्या २० रोजी पणजीत आगमन होणार आहे. विशेष आर्थिक विभाग(सेझ) संबंधी खास जनता दरबार भरवण्यात येणार असून यावेळी त्या आंदोलकांना मार्गदर्शन करणार आहेत.
"सेझ विरोधी मंच' तर्फे उद्या २० रोजी सकाळी १० वाजता पणजी येथील कारीतास सभागृहात "सेझ'संबंधी खास जनता दरबार भरवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पूर्ण दिवस चालणार असून त्यात देशातील विविध ठिकाणाहून आलेल्या बिगर सरकारी संस्था, पर्यावरणीय संस्था, तथा विविध क्षेत्रातील नेते उपस्थित राहणातील."सेझ' आंदोलक तथा शेतकऱ्यांना श्रीमती पाटकर मार्गदर्शन करणार आहेत. ही माहिती संस्थेचे नेते प्रवीण सबनीस यांनी दिली.

मयेत विजेच्या उच्च दाबाने घबराट २० लाखांची हानी; टीव्ही, फ्रीज जळाले

डिचोली, दि. १९ (प्रतिनिधी): मये पंचायतक्षेत्रातील हळदणवाडी प्रभागात विजेच्या उच्च दाबामुळे या प्रभागातील सुमारे पन्नास घरातील टीव्ही आणि फ्रीज जळाले असून बहुतेक घरातील ट्युबलाईट आणि बल्ब जळून गेले आहेत. या कहरामुळे ग्रामस्थांचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असून वीज खात्याने सर्व नुकसानग्रस्तांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा या खात्याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मये भूविमोचन समितीचे अध्यक्ष काशिनाथ मयेकर, यंग स्टारचे अध्यक्ष संदीप माईणकर आणि अन्य ग्रामस्थांनी दिला आहे.
आज शनिवार रोजी सकाळी ११ च्या दरम्यान चिमुलवाडा, पाटो आणि कारभाट येथील घरातील विजेचे दिवे अत्यंत प्रखर बनले. हा प्रकाश वाढतच गेला. सर्व दिव्यातून धूर निघू लागला आणि दिवे मोठा आवाज करून फुटू लागले. तसेच टिव्ही आणि फ्रिजांचाही मोठा आवाज होऊन ते बंद पडले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे घरातील महिला मुलांना घेऊन बाहेर आल्या. घरात जळाल्याचा दर्प येऊ लागला. काहींनी त्वरित विजेची बटणे बंद केली. पंखे खूप वेगाने फिरू लागले, अशी माहिती वृंदा मयेकर या महिलेने पत्रकारांना दिली.
याबाबत लाईनमन मुकुंद परब यांना कळवताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित घटनेची माहिती आपल्या अधिकाऱ्यांना दिली. साहाय्यक अभियंते पार्सेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित दुरुस्तीचे काम हाती घेतले.
वरील घटनेमुळे बहुतेक घरातील टिव्ही आणि फ्रीज जळाले आहेत. भंडारवाडा, चिमुलवाडा, पाटो आणि कारभाट या वाड्यांसाठी एकच ट्रान्सफॉर्मर समोर असून घरे जास्त असल्याने या ट्रान्सफॉर्मरवर अधिक ताण पडतो. यासंबंधी वारंवार वीज खात्याला कळवूनसुद्धा खाते त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यांवरील पथदीप लागत नाहीत. रात्री विजेचा दाब कमी असल्याने ट्युब लाईट पेटत नाहीत. पाटो आणि कारभाट भागासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर घालावा, अशी आग्रही मागणी करूनसुद्धा वीज खात्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज ग्रामस्थांना लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे मयेकर आणि माईणकर यांनी सांगितले.
या घटनेची वीज खात्याने त्वरित दखल घेऊन नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरी भेट देऊन अहवाल तयार करून सर्व नुकसानग्रस्तांना ताबडतोब भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

'खाण धोरणाची घोषणा ही निव्वळ बकवासच'

गोवा खाणग्रस्त महासंघाचे पणजीत उपोषण
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): खाणविरोधी टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी जानेवारी २०१० पर्यंत खाण धोरण निश्चित करणार असल्याचे जे विधान केले आहे ते म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाच्या हातात चॉकलेट देऊन गप्प करण्याचा बालिश प्रकार आहे, अशी खरमरीत टीका सॅबस्तीयन रॉड्रिगीस यांनी केली. राज्यात खाणींनी सर्वत्र उच्छाद मांडला असून हा उद्योग खरोखरच या प्रदेशाला परवडणारा आहे का, याचा आता गांभीर्याने विचार होण्याची नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले.
गोवा खाणग्रस्त महासंघातर्फे आज गोवा मुक्तीदिनानिमित्त पणजीतील आझाद मैदानावर एकदिवसीय उपोषणाचा कार्यक्रम झाला. खाणी असलेल्या भागांतील नागरिक या उपोषणात सहभागी झाले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सॅबस्तीयन रॉड्रिगीस म्हणाले, १९ डिसेंबर १९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. आज मुक्तिची ४८ वर्षे पूर्ण झाली; पण राज्यात सालाझाराच्या भूमिकेत खाण मालक वावरत असून त्यांनी विविध भागांत वसाहतवादच चालवला आहे. या भागातील स्थानिक लोकांना त्यांच्या भूमीतून हुसकावून लावण्याचे प्रकार सर्रास सुरू असताना राज्यकर्तेही त्यांची री ओढीत आहेत. खाण धोरण जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा नेमकी या खाणग्रस्त लोकांना कोणत्या पद्धतीने दिलासा देईल. या खाण धोरणाचा कच्चा मसुदा वाचला व त्याबाबत सरकारला सूचना व हरकतीही पाठवल्या आहेत. खाण मालकांनी आपल्या इच्छेनुसार तयार केलेला हा मसुदा असून तो मंजूर होणे शक्य नाही.
भाजपने विधानसभेत खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत प्राधिकरण नेमण्याचा खाजगी ठराव सरकारने फेटाळून लावला. निवृत्त न्यायाधीशामार्फत तयार होणार अहवाल हा सरकारला थप्पड लगावणारा ठरला असता. न्यायाधीशांवर दबाव टाकून आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याची कृतीही सरकारला करणे शक्य नव्हते त्यामुळे तो ठराव सरकारकडून मंजूर होण्याची अपेक्षाच ठेवणे मूर्खपणा आहे, असेही यावेळी सॅबस्तीयन यांनी सांगितले.
मुळात गोव्यात सध्या सुरू असलेला खाण उद्योग खरोखरच या राज्याला परवडणारा आहे का, याबाबत निवृत्त न्यायाधीशांमार्फत आयोग स्थापून सर्वेक्षण करण्याचा ठराव विधानसभेत मांडावा. विविध ठिकाणी लोकप्रतिनिधींवर दबाव टाकून या ठरावाला पाठिंबा मिळवून देण्यासाठी संघटना काम करेल, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
सध्या वर्षाला सुमारे अडीच हजार कोटी रुपये खनिज निर्यातीतून खाण कंपन्या कमावत आहेत. १९९२ साली केवळ १२४ बार्जेस होत्या. हा आकडा २००८ साली ३०० वर पोहचला. १९९२ साली गोव्यातून ११०,९७६ टन खनिज निर्यात व्हायची; तर २००८ साली हा आकडा ४९४,१७९ टनवर पोहचला यावरून हा उद्योग झपाट्याने वाढतो आहे याचे विदारक चित्रच समोर येते. खाण कंपनी पोलिसांची मदत घेऊन स्थानिकांना दटावण्याचे व सतावण्याचे कृत्य करीत असून विद्यमान सरकार जनतेला संरक्षण देते की खाण उद्योजकांना हेच कळेनासे झाले आहे. हा प्रकार असाच चालू राहिल्यास भविष्यात हीच जनता अस्तित्वासाठी पेटून उठेल, असा कडक इशारा त्यांनी दिला.

त्या '५२' शिक्षकांना नियुक्तीपत्रे

शिक्षणमंत्री मोन्सेरात यांची वाढदिनी भेट
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): गोवा लोकसेवा आयोगाने सरकारी उच्च माध्यमिक व भागशिक्षणाधिकारीपदांसाठी निवडलेल्या "त्या' ५२ शिक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे. सरकारी नेमणूकपत्रे मिळून हे शिक्षक विविध ठिकाणी आपल्या सेवेत रुजू झाले आहेत. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा उद्या २० रोजी वाढदिवस असल्याने या शिक्षकांसाठी बाबूश यांनी दिलेली ही वाढदिवसाची भेटच ठरली आहे.
राज्यातील विविध सरकारी उच्च माध्यमिक व भागशिक्षणाधिकारीपदांसाठी गोवा लोकसेवा आयोगाने एकूण ५२ शिक्षकांची निवड केली होती. ही निवड यादी सरकारला पाठवल्यानंतर ती मान्य करण्यावरून सरकारात मतभेद निर्माण झाल्याने ती रखडली. या निवडप्रक्रियेला याच महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर निवडलेल्या या शिक्षकांनी सरकारकडे अनेकवेळा विनंत्या, अर्ज करून थकल्यानंतर निर्वाणीचा इशारा देत आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. या शिक्षकांना सर्व थरांतून पाठिंबा मिळत गेल्याने व सरकारची याप्रकरणी बदनामी झाल्याने अखेर सरकारही ही यादी मान्य करणे भाग पडले.
या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यात शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बाबूश यांनी सुरुवातीपासूनच या यादीला पाठिंबा दिला होता. गोवा लोकसेवा आयोगाने निवडलेल्या यादीत सर्व शिक्षक पात्रच असतील,असे ठामपणे सांगून त्यांनी या शिक्षकांना न्याय देण्याचे आश्वासनही दिले होते.मध्यंतरी सरकारातीलच काही नेत्यांकडून मुख्यमंत्री कामत यांच्यावर दबाव वाढल्याने ही यादी रद्द करून फेरनिवड करण्यापर्यंत सरकारची मजल गेली होती.
शेवटी अखेर मुख्यमंत्र्यांनीही या यादीला हिरवा कंदील दाखवला. गोवा मुक्तीदिन व त्यात शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा वाढदिवस या पार्श्वभूमीवर या शिक्षकांना नेमणूकपत्रे देऊन त्यांना विविध ठिकाणी रिक्त पदांवर नेमण्यातही आले आहे. या शिक्षकांचा नेमणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देणाऱ्या दोन याचिका सादर झाल्या आहेत. न्यायालयाने या याचिका दाखल करून घेतल्या असल्या तरी या निवडीला स्थगिती देण्यास मात्र नकार दिला आहे. लोकसेवा आयोगाला आता न्यायालयात ही निवड कायदेशीर व आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झाल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.