Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 4 September, 2010

नरेश दोरादोच्या खुन्यास अटक

वास्को, दि. ०३ (प्रतिनिधी): एका महिन्यापूर्वी चिखली येथील भावाच्या फ्लॅटवर राहण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय नरेश दोरादो या युवकाचा निर्घृणरित्या खून केल्याच्या आरोपाखाली वास्को पोलिसांनी आज दुपारी तीन वाजता नोनमोंन, खारीवाडा येथे राहणारा १९ वर्षीय स्नेहल विन्सेंट डायस या युवकाला अटक केली. हा संशयित वास्कोतील दोन दुचाकी चोरी प्रकरणात सामील असल्याचे त्यांनी सांगितले.
"फेंडशिप डे'अर्थात एक ऑगस्ट रोजी रात्री वास्कोतील नरेश दोरादो या युवकाचा निर्घृणरित्या खून करण्यात आल्याचे दुसऱ्या दिवशी उघड होताच संपूर्ण वास्को शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. चिखली येथील "शेलोम क्रेस्ट' या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर विदेशात असलेल्या भावाच्या फ्लॅटवर राहण्यासाठी गेलेला नरेश दुसऱ्या दिवशी कामावर पोचला नसल्याने त्याचे वडील तेथे गेले असता आपल्या मुलाचा निर्घृणरित्या खून करण्यात आल्याचे त्यांना दिसले. दोरादो याचा पाच सुऱ्यांचा वापर करुन खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. मानेवर, छातीत अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून सतरा ठिकाणी त्याला भोसकण्यात आले होते. खुन्याने सुमारे ४५ वार केल्याचे यावेळी उघड झाले होते. चिखली येथील फ्लॅटवर खून केल्यानंतर सदर आरोपीने दोरादोची नव्याने घेतलेली "शेरवॉलेट स्पार्क' चारचाकी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला होता, तसेच त्याने दोरादोचा मोबाईल व लॅपटॉपही लंपास केला होता. यानंतर काही दिवसांनी नरेश दोरादोची चारचाकी पोलिसांना पणजीजवळ आराडीबांध-ताळगाव येथे सापडली होती. वास्को पोलिसांनी दोरादोच्या अनेक मित्रांना तसेच इतरांना तपासासाठी बोलावून चौकशी करण्यास सुरवात केली असता, अखेरीस ते आरोपीपर्यंत पोचण्यात यशस्वी ठरले. सदर प्रकाराबाबत अधिक माहिती देताना दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक एलन डिसा यांनी आज नरेश दोरादोच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव स्नेहल विन्सेंट डायस असल्याचे सांगून तो १९ वर्षीचा असल्याची माहिती दिली. नोनमोंन, खारीवाडा येथे राहणारा स्नेहल हा अटक करण्यापूर्वी न्यायालयीन कोठडीत सडा येथे होता असे डिसा यांनी सांगितले. सारे पुरावे मिळताच आज त्याला अटक करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. स्नेहलने आपण दोरादोचा खून केल्याची कबुली केली असल्याची माहिती डिसा यांनी दिली. सध्या सदर प्रकरणाचा तपास प्राथमिक पातळीवर असल्याचे सांगून खुनामागचे कारण लवकरच उघड होईल,असे सांगितले. स्नेहल हा संशयित वास्कोतील दोन दुचाकी चोरी प्रकरणात गुंतला आहे. "डिओ' दुचाकी चोरीच्या प्रकरणात त्याला १६ ऑगस्ट २०१० रोजी पणजी येथे गजाआड केल्यानंतर १८ रोजी वास्को पोलिसानी अटक केली होती.
दरम्यान, वास्को पोलिसांनी आज दुपारी स्नेहलला सदर खून प्रकरणात भा.दं.सं. ४४९, ४५०, ३९७ व ३०२ कलमाखाली अटक केल्यानंतर त्यास तपासणीसाठी मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात पाठवून दिले आहे. नरेश दोरादोच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेला स्नेहल हा युवक वास्कोतील बहुतेकांना सुपरिचित असलेले विन्सेंट डायस यांचा मुलगा असल्याची बातमी आज संध्याकाळी शहरात पसरताच सर्वांत हा चर्चेचा विषय बनला. स्नेहलचे वडील पूर्वी गोवा शिपर्यांडमध्ये कामाला होते व ते एका युनियनचे नेते होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
-------------------------------------------------------------------
वास्को पोलिसांचे अभिनंदन
मानेवर तीन ठिकाणी, छातीत, पायात अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून १७ जाग्यांवर भोसकून व सुमारे ४५ वार करून (पाच सुऱ्यांचा वापर करून) वास्कोतील २५ वर्षीय नरेश दोरादो या युवकाचा खून केलेल्या संशयित आरोपीला आज शेवटी एका महिन्यानंतर वास्को पोलिसांनी अटक केल्याने सध्या त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. नरेश दोरादोचा विदेशात असलेला भाऊ दीपक याने आपल्या भावाच्या खून प्रकरणातील आरोपीला पकडण्यात आल्याने मोबाईलवर पोलिस निरीक्षक ब्राज मिनेझीस यांना संदेश पाठवून अभिनंदन केले.

नगरपालिका राखीव प्रभाग घोषणेबाबत वेळकाढूपणा

मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): नगरपालिका निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली, प्रभागकक्षांबाबतच्या अधिसूचनाही जारी झाल्या पण कॉंग्रेसमधील अंतर्गत भांडणे व हेवेदावे यांमुळे प्रभाग आरक्षणाची घोषणा मात्र अजून केली गेलेली नाही असे वृत्त आहे.
पालिका निवडणुकीच्या तारखेची घोषणा होऊन दीड महिना उलटून गेलेला असून त्यानंतर प्रभागांची कक्षा अधिसूचित केली गेली पण मागास जाती, जमाती व अन्यमागासवर्गीय यांच्यासाठी कोणते प्रभाग आरक्षित असतील ते जाहीर करण्याबाबत सरकारातच एकवाक्यता नाही व त्यामुळे दी दिरंगाई केली जात आहे असे कळते.
खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मोडणाऱ्या मडगाव नगरपालिकेत या आरक्षणाबाबत सरकारात एकवाक्यता नाही.कॉंग्रेसमधील काही मंडळी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना संपविण्यासाठी अमुकच प्रभाग आरक्षित करा, असा घोशा लावत आहे. गेल्या वेळी आपणाला नको असलेल्यांचे प्रभाग महिलांसाठी राखीव करून त्यांचा काटा काढण्यात आला होता पण तसे करूनही त्या प्रभागांतून आपला उमेदवार संबंधितांना निवडून आणता आला नव्हता तर पूर्वीच्या नगरसेवकाने उभ्या केलेल्या महिला उमेदवारालाच विजय मिळाला होता. शेवटी सत्ताधाऱ्यांनी तिला आपल्या गोटात ओढले होते पण तेथील मतदारांना ओढणे शक्य न झाल्याने तशा प्रकारचे काही प्रभाग राखीव करण्याचे राजकारण मागे सुरू होते, पण सत्ताधाऱ्यांना सर्वच ठिकाणी तसे करणे शक्य नाही व त्यामुळेच आरक्षण घेाषणेस विलंब लावला जात असल्याचे समजते.
निवडणुकीस आता अवघेच दिवस उरल्याने राखीव प्रभागांची घोषणा लवकर केल्यास इच्छुक उमेदवारांना तेथे काम करणे सोपे होणार आहे .

अटालाचा जामीन प्रकाश मैत्रला म्हापसा न्यायालयाचा समन्स

अटालाविरुद्धही वॉरंट जारी
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): गोव्यात अवैधरित्या वास्तव केल्याप्रकरणी "अटाला' याला जामीन थांबलेला प्रकाश मैत्र याला उद्या सकाळी म्हापसा न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा आदेश गुन्हा अन्वेषण विभागाला देण्यात आला असून न्यायालयाने बजावलेली नोटीस श्री. मैत्र याला देण्यात आल्याची माहिती सूत्राने दिली.
जामिनावर सुटलेला "अटाला' याला न्यायालयाने अजामिनपात्र वॉरंट बजावले असून त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचेही आदेश "सीआयडी' विभागाला देण्यात आले आहेत. मात्र अद्याप तरी पोलिसांना "अटाला' याचा शोध लागलेला नाही. परंतु, पोलिसांनी "अटाला'याच्या संपर्कात असलेल्या काही लोकांना ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जामिनावर सुटलेल्या "अटाला' याच्याशी काही व्यक्ती सतत संपर्कात होते, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.
उद्या न्यायालयात मैत्र याच्या जबानीत बरेच काही स्पष्ट होण्याची शक्यता आहे. "मैत्र' हा पोलिसांचा खास "पंच' असल्याने "अटाला' याला जामीन राहण्यासाठी मैत्र याला कोणी बोलावले होते, असाही प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

रिव्हर प्रिन्सेस निविदाप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा

परुळेकर यांची मुख्य सचिवांना नोटीस
पणजी,दि.३(प्रतिनिधी): सिकेरी येथील समुद्र किनाऱ्यावर गेली दहा वर्षे रुतून बसलेले रिव्हर प्रिन्सेस जहाज हटवण्याबाबत पर्यटन खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला आहे. या निविदेत अवैध पद्धतीने जहाज हटवण्याचे कंत्राट बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हे कंत्राट ताबडतोब रद्द झाले नाही तर न्यायालयात जाणे भाग पडेल, असा इशारा माजी मंत्री सुरेश परूळेकर यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांना पाठवलेल्या नोटिशीत दिला आहे.
रिव्हर प्रिन्सेस हटवण्यासाठी विविध कंपन्यांकडून सादर करण्यात आलेले प्रस्ताव राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी साटेलोटे करून सादर करण्यात आले आहे. या समितीचे एक सदस्य आनंद मडगावकर यांनी स्वतः आपला प्रस्ताव सादर करण्याची घटनाही बेकायदा असल्याचा दावा सुरेश परूळेकर यांनी या नोटिशीत केला आहे. टायटन सेल्वेज कंपनीला हे कंत्राट देण्याची शिफारस समितीने केली असली तरी त्यात मिलीभगत असल्याचा सनसनाटी आरोप या नोटिशीत करण्यात आला आहे. या कंत्राटात कोट्यवधी रुपयांच्या सरकारी निधीचा अपव्यय केला जाणार असल्याने त्याबाबत वेळीच सरकारने हस्तक्षेप करून हे कंत्राट रद्द केले नाही तर याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंद करून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी या नोटिशीत नमूद केले आहे. मुळात राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने या निविदा प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका वठवली आहे. या समितीवर मुख्यमंत्री, मुख्य सचिव तथा कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस हे सदस्य असल्याने या घोटाळ्याला अप्रत्यक्ष ते सुद्धा जबाबदार ठरतील,असेही यावेळी श्री.परूळेकर यांनी म्हटले आहे. या जहाजाचे मालक मेसर्स साळगावकर खाण उद्योग कंपनीतर्फे विनाशुल्क हे जहाज हटवण्याची तयारी दर्शवली असताना कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याची सरकारने दर्शवलेली तयारी हा सरकारी निधीचा गैरवापरच ठरतो,असेही या नोटिशीत श्री.परूळेकर यांनी म्हटले आहे.

अप्पासाहेब देशपांडे यांचे पुण्यात निधन

कोल्हापूर, दि. ३ : नूतनगंधर्व या नावाने ओळखले जाणारे ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि भजनशिरोमणी विनायकराव ऊर्फ अप्पासाहेब देशपांडे यांचे आज निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
गेल्या काही महिन्यांपासून ते आजारीच होते. आज पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आजच पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या मागे पत्नी शांताबाई, मुलगा कृष्णा, तीन मुली, सून, नातवंडं असा आप्तपरिवार आहे. नूतनगंधर्वांचा जन्म बेळगावमधील संकेश्वर येथे २८ जानेवारी १९२५ रोजी झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. ग्रामोफोन ऐकून ते मोठमोठ्या गायकांची गाणी हुबेहूब म्हणत असत. अतिशय प्रतिकूल स्थितीतही त्यांनी जयपूर, आग्रा, किराना या घराण्यांची गायकी आत्मसात केली. संकेश्वर येथे त्यांनी कै. शंकरराव पेंटर यांच्याकडे संगीताचे प्राथमिक धडे गिरविले. गानसम्राट अल्लादियॉं खॉंसाहेब यांचे सुपुत्र भुर्जीखॉंसाहेब यांच्याकडे गंडाबंधन करून त्यांनी शागिर्दी पत्करली. बालगंधर्वांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी नाट्यसंगीताचा अभ्यास केला. भजन गाण्यात तर त्यांचा हातखंडा होता. त्यामुळे ते भजनशिरोमणी म्हणून ओळखले जायचे.
खुद्द महात्मा गांधींनी त्यांचे गाणे ऐकून त्यांना स्वत: कातलेल्या सुताचा हार आणि हरिजन साप्ताहिकाचा अंक देऊन गौरविले होते. संकेश्वराच्या शंकराचार्यांनी त्यांना "नूतनगंधर्व' ही उपाधी दिली होती.

'क्वीन बॅटन' च्या सुरक्षेसाठी एक हजार पोलिस

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या संदर्भात काढण्यात येणारी ""क्वीन बॅटन रॅली'' येत्या ७ सप्टेंबर रोजी कारवार मधून गोव्यात येत आहे. दरम्यान, अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेने भारतात तसेच गोव्यात जाणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. या राष्ट्रकुल स्पर्धेच्या काळात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी आपल्या नागरिकांना उद्देशून काढलेल्या आदेशात म्हटले आहे. या अनुषंगाने गोवा पोलिसांनी या "रॅली'ला सुरक्षा पुरवण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. सुमारे एक हजार पोलिस या रॅलीला सुरक्षा देण्यासाठी तैनात केले जाणार असल्याची माहिती सुरक्षेच्या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून नेमलेले पोलिस अधीक्षक डी. के. सावंत यांनी दिली. गोव्यावर कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे.
कारवार येथून दि. ७ रोजी ही रॅली पाळे कोणकोण येथे दाखव होणार आहे. याठिकाणी मुख्यमंत्री तसेच सर्व मंत्रिमंडळ या रॅलीचे स्वागत करण्यासाठी हजर राहणार आहेत. त्यानंतर काणकोण येथील ही रॅली मडगाव येथे येणार आहे. तेथून फोंडामार्गे ती जुने गोवे येथे आल्यानंतर मांडवी नदीतून ही रॅली पणजी शहरात सायंकाळी पोचणार आहे. पणजी रात्री मुख्य मशाल कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये ठेवली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हापसामार्गे रॅली पत्रादेवी येथून सावंतवाडी येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोव्यात या रॅलीच्या प्रवासात कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे अधीक्षक, उपअधीक्षक तसेच एक हजार पोलिस शिपाई तैनात असणार असल्याची माहिती श्री. सावंत यांनी दिली. या "क्वीन बेटन रॅली'ची सुरुवात २९ ऑक्टोबर २००९ मध्ये लंडन येथून सुरुवात झाली आहे. ही रेली २८ राज्यातील २०० शहरात आणि हजारो शहरात फिरणार आहे. खेळाडू, अभिनेते, उद्योजक आणि सामान्य व्यक्ती असे पाच हजार पेक्षा जास्त लोक सहभागी होणार आहेत.

Friday, 3 September, 2010

कळंगुट येथे बंदुकीच्या धाकाने जोडप्याला लुटले

९५ हजारांचा ऐवज व स्कूटरली पळवली
म्हापसा दि. २ (प्रतिनिधी): कळंगुट येथे काल रात्री बंदुकीचा धाक दाखवून पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या एका जोडप्याला काल रात्री ९५ हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. याविषयीची पोलिस तक्रार कळंगुट पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलिसांचे पथक या लुटारूंचा शोध घेत आहे. पुणे येथील प्रीतेश महिंद्रे यांनी ही तक्रार सादर केली आहे. गेल्या महिन्यातील ही अशा स्वरूपाची दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी दोघा विदेशी पर्यटकांना बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले होते.
काल रात्री दीडच्या सुमारास प्रीतेश आपल्या पत्नीसह ऍक्टिवा दुचाकीवरून हॉटेलवर परतत होता. ब्रिटो रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण झाल्यानंतर "मॅगी ये' हॉटेलवर तो आपल्या पत्नीसह निघाला होते. यावेळी कळंगुट कांदोळी रस्त्यावर दोघे तरुण रस्त्याच्या बाजूला उभे होते. त्यांनी हातवारे करून त्यांना अडवले व बंदुकीचा धाक दाखवून रोकड, मोबाईल तसेच त्यांच्याकडील दुचाकी घेऊन सदर भामट्यांनी पळ काढला. दोघेही तरुण इंग्रजीत बोलत होते, असे तक्रारदाराने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
सदर स्कूटर प्रीतेश याने गोव्यात फिरण्यासाठी भाड्याने घेतली होती. पर्यटन मौसमाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारे पर्यटकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याने पर्यटन खात्याने चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी या लुटारूंना ताब्यात घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. याविषयीचा अधिक तपास कळंगुट पोलिस करीत आहेत.

प्लॅस्टिक गोदामाला आग लागून दोन कोटींची हानी

फोंडा, दि.२ (प्रतिनिधी): कुंडई औद्योगिक वसाहतीतील ओरिएंटल कन्टेनर प्रायव्हेट लिमिटेड या प्लॅस्टिक उत्पादक करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आज (दि.२) सकाळी ८ च्या सुमारास आग लागल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. गोदामात साठवून ठेवलेले तयार प्लॅस्टिक सामान आणि इमारतीच्या छप्पराचे मिळून सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या कंपनीच्या गोदामाला लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या कंपनीच्या इमारतीच्या वरच्या दुसऱ्या मजल्यावर तयार सामान साठवून ठेवण्याचे गोदाम आहे. त्यात कंपनीत बनविलेले प्लॅस्टिक "कॅप्स' बॉक्समध्ये भरून साठवून ठेवण्यात आले होते. या कंपनीच्या गोदामाला आग लागल्याची माहिती कुंडई अग्निशामक दलाला सकाळी ८.२० वाजता मिळाली. गोदामाला लागलेली आग भीषण असल्याने फोंडा, ओल्ड गोवा, पणजी येथील अग्निशामक दलाच्या जवानांची आग विझविण्यासाठी मदत घेण्यात आली. दुपारी १.३० च्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांनी सामानाला लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात यश प्राप्त केले. प्लॅस्टिक सामानाने पेट घेतल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे प्लॅस्टिक सामानाबरोबर गोदामाच्या छप्पराची सुध्दा हानी झाली आहे.
अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून अडीच कोटी रुपयांची मालमत्ता आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविली असून सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा कंपनीने केला आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या विभागीय अधिकारी डी.डी. रेडकर यांनी दिली. फोंडा, पणजी, ओल्ड गोवा आणि कुंडई येथील दलाच्या पंचवीस जवानांनी पाच अग्निशामक बंबाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. तसेच फोंडा अग्निशामक दलाकडे असलेल्या फोंडा पालिकेच्या वीस कामगारांनी सुध्दा आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. कुंडई केंद्राचे प्रमुख श्रीपाद गावंस, फोंडा केंद्राचे अधिकारी फ्रान्सिस मेंडिस, ओल्ड गोवा केंद्राचे अधिकारी मायकल ब्रागांझा आणि पणजी येथील अधिकारी अजित कामत यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे काम केले. अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत आगीच्या कारणाचा थांगपत्ता लागू शकलेला नाही.

दोन चोरी प्रकरणात संशयित गजाआड

चौघा सोनारांनाही अटक
वास्को, दि.२ (प्रतिनिधी): चार दिवसांपूर्वी कर्नाटक येथील आग्नेल सालगट्टी या ३२ वर्षीय इसमाला वेर्णा पोलिसांनी उतोर्डा येथील एका बंगल्यात केलेल्या चोरी प्रकरणात अटक करून त्याच्याशी चौकशी केली असता या इसमाने एकूण दोन बंगल्यात चोरी केल्याचे उघड झाले आहे.
आग्नेलने उतोर्डा येथील एस्लिंडा ब्रागांझा व फ्रान्सिस परेरा यांच्या बंगल्यातून चोरी केलेले सोन्याचे ऐवज यल्लापूर येथील चार सोनारांना विकल्याचे वेर्णा पोलिसांना समजताच त्यांनी त्या सोनारांच्या दुकानांवर छापा मारून चोरीस गेलेले एक लाख साठ हजार रुपयांचे दागिने जप्त केले असून त्या चार सोनारांना अटक करण्यात आली आहे.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीने उतोर्डा येथील फ्रांसिस परेरा यांच्या बंगल्यात (दोन लाखांची मालमत्ता) ११ मे २०१० रोजी चोरी केल्याचे उघड झाले. फ्रांसिस व एस्लिंडा यांच्या बंगल्यातून चोरी केलेले सोन्याचे ऐवज कुठे आहेत, याची चौकशी करण्यास सुरुवात केली असता, यल्लापूर, कर्नाटक येथील चार सोनारांना विकल्याचे उघड झाले. यल्लापूर येथील नारायण रिवणकर, सदानंद रायकर, प्रकाश शेट व राजेंद्र शेट यांना चोरीचा माल विकल्याचे समजताच त्यांच्या दुकानावर छापे मारले असता चोरीला गेलेल्या दोन सोन्याच्या साखळ्या, एक जोड कर्णफुले व वितळविण्यात आलेले सोने मिळून एक लाख साठ हजारांची मालमत्ता सापडल्याची माहिती त्यांनी दिली.दक्षिण गोव्याचे अधीक्षक एलन डिसा यांच्या मार्गदर्शनामुळेच सदर दोन्ही प्रकरणातील आग्नेल या संशयिताला गजाआड करण्यास आम्हाला मोठी मदत मिळाल्याचे दळवी यांनी सांगितले.

वास्कोत दोन लाखांचे मोबाईल लंपास

वास्को, दि. २ (प्रतिनिधी): येथील सेंट अँन्ड्रू चर्चसमोर राहणाऱ्या मोदाराम पुरोहित यांच्या फ्लॅटमध्ये काल रात्री २.३० ते पहाटे ५.३० यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी घुसून तेथील १ लाख ९० हजार रुपयांचे सुमारे १०० मोबाईल लंपास केले.
पुरोहित यांची वास्कोत मोबाइल विकण्याची रामदेव इलेक्ट्रॉनिक्स या नावाची दोन दुकाने आहेत. सदर मोबाईल त्या दुकानांत विकण्यासाठी त्यांनी आणून ठेवले होते. फ्लॅटवर चोरी झाल्याची तक्रार त्यांनी वास्को पोलिसांत नोंदवली. अज्ञात चोरट्यांनी पुरोहित परिवार झोपेत असल्याची संधी साधून ही चोरी केली. सेंट अँन्ड्रु चर्च समोर असलेल्या "सनफ्लावर' इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या पुरोहित याच्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी "बाल्कनीतून' प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. "बाल्कनीचा' दरवाजा त्यांनी व्हेंटिलेटरमधून हात घालून उघडल्याचे तपासात दिसून आले. "नोकिया', "स्पाईस' व "मायक्रोमेक्स' या कंपन्यांचे हे मोबाईल होते. पुरोहित यांनी दोन बॅगमध्ये ते ठेवले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक वैभव नाईक यांनी
श्वानपथक व ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पंचनामा केला. याप्रकरणी ४५७ व ३८० कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदासाठी श्रीनिवास धेंपो रिंगणात उतरणार

साळगावकर, चर्चिल यांच्या पाठिंब्यामुळे दावा भक्कम
पणजी, दि. २ (प्रतिनिधी): धेंपो स्पोटर्‌स क्लबचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपो पुढील महिन्यात होणाऱ्या गोवा फुटबॉल संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असून त्यांना चर्चिल ब्रदर्स व साळगावकर फुटबॉल क्लब हे गोव्यातील दोन नामांकित क्लब तसेच अन्य संघटनांचा पाठिंबा लाभला आहे.
आज येथील मांडवी हॉटेलच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्रीनिवास धेंपो यांनी पत्रकारांना माहिती दिली. या वेळी नगरविकास मंत्री तथा चर्चिल ब्रदर्सचे प्रमुख तसेच गोवा फुटबॉल संघटनेचे विद्यमान अध्यक्ष ज्योकिम आलेमाव व साळगावकर फुटबॉल क्लबचे अध्यक्ष उद्योगपती शिवानंद साळगावकर उपस्थित होते.
गेली अनेक वर्षे आपण फुटबॉलची सेवा केली आहे. यापूर्वी अनेक वेळा निवडणुकीत उतरण्याचा आग्रह झाला होता पण त्यावेळी माझी मानसिक तयारी झाली नव्हती. यावेळी मात्र पूर्ण तयारीनिशी गोवा व भारतातील फुटबॉलच्या सेवेकरता आपण निवडणुकीत उतरणार असून गोव्यातील दोन नामांकित संघ साळगावकर व चर्चिल ब्रदर्ससह आणखी अनेक फुटबॉल संस्था, फुटबॉलपटू तसेच फुटबॉलप्रेमींचा पाठिंबा मिळत असल्याने आपला अध्यक्ष बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे, असे श्री. धेंपो यांनी सांगितले. आपण अध्यक्ष झाल्यास गोवा फुटबॉल संघटनेच्या मालकीचे फुटबॉल स्टेडियम बांधणे, संघटनेसाठी पूर्णवेळ सचिव नेमून संघटनेचे कार्य गोव्यातील प्रत्येक गावात नेऊन फुटबॉलचा विकास करणे, याबरोबरच पायाभूत सुविधा निर्माण करून गोवा फुटबॉल संघटना, अखिल भारतील फुटबॉल संघटना व फिफाच्या सहकार्याने फुटबॉलच्या विकासासाठी आपल्या अनुभवाचा उपयोग करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उपस्थित गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष ज्योकिम आलेमाव यांनी धेंपो परिवाराने गोव्याच्या व फुटबॉलच्या विकासासाठी गेली अनेक वर्षे भरपूर कार्य केल्याचे सांगितले. फुटबॉलसाठी त्यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. श्रीनिवास धेंपो गोवा फुटबॉलची प्रगती जास्त चांगल्या रीतीने करू शकतील, असे सांगताना आजवरच्या त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्यांना निवडून देण्याचे आवाहन श्री. आलेमाव यांनी केले. उद्योगपती शिवानंद साळगावकर यांनी श्रीनिवास धेंपो यांना पाठिंबा जाहीर करताना सांगितले की, धेंपो यांचे एकूणच फुटबॉलसाठी योगदान मोठे आहे. ते अध्यक्ष बनणे गोव्याच्या फुटबॉलच्या हिताचे आहे. दरम्यान, गोव्यातील तीन दिग्गज व जुने असे धेंपो, साळगावकर व चर्चिल फुटबॉल क्लब एकत्र आल्यामुळे श्रीनिवास धेंपो यांचे पारडे बरेच जड बनल्याची चर्चा गोव्याच्या फुटबॉल वर्तुळात सुरू झाली आहे. गोव्यातील फुटबॉलचे एकूण १५७ क्लब मतदानात भाग घेणार आहेत.

Thursday, 2 September, 2010

...असे फसले कथित अपहरण नाट्य!

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): मडगाव परिसरातील अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची प्रकरणे वाढत असताना आज अशाच एका प्रकरणाची माहिती एका अज्ञाताने दिल्याने पोलिसांची धावपळ उडाली. पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन संपूर्ण शहरात नाकेबंदी केली. दोन तासांच्या आत अपहरणकर्त्याला अटक करून नंतर नावेली येथे लपवून ठेवलेल्या त्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना या अपहरणाची कल्पना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मिळाली. यावेळी मडगाव-पोळे दरम्यान "क्वीन्स बॅटन'साठी सुरक्षेच्या रंगीत तालमीसाठी गेलेली पोलिस कुमक मडगावात पोचली होती, या अपहरणप्रकरणी कारवाईसाठी याच पोलिसांची मदत घेताना संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. दुपारी अडीचच्या सुमारास अपहरणकर्त्याला कदंब बसस्थानकाजवळ स्कूटरवरून जाताना ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडून त्याने खंडणीपोटी घेतलेली २० लाखांची रक्कमही जप्त करण्यात आली.
प्रत्यक्षात हे अपहरण सकाळी १०.३० वाजता झाले होते. सदर अल्पवयीन मुलगी येथील एका उच्चमाध्यमिक विद्यालयात अकरावीत शिकत आहे. तर, सदर अल्पवयीन तरुण अकरावी अनुत्तीर्ण असून तो गृहनिर्माण वसाहतीत राहतो. सदर मुलगी सकाळी संगणकवर्गाला जाण्यासाठी बाहेर पडली. सकाळी १०.३० वाजता मुलीच्याच भ्रमणध्वनीवरून तिच्या आईशी संपर्क साधून मुलीचे अपहरण केले असून तिच्या सुटकेसाठी २० लाखांची खंडणी मागण्यात आली. रक्कम घेऊन अमुक गाडीने अमुक ठिकाणी येण्याची सूचना यावेळी देण्यात आली. सदर मुलीचे वडील हयात नसल्याने तिच्या आईने कशीबशी तेवढी रक्कम जमा केली. मुलीच्या सुटकेसाठी मिळालेल्या सूचनांप्रमाणे प्रथम रवींद्र भवन व व नंतर जागा बदलल्याने जिल्हा न्यायालय, दवर्ली, बोर्डा अशा ठिकाणी धाव घेतली. तोपर्यंत कोणीतरी पोलिसांना कल्पना दिल्यावर त्यांनी मुलीच्या आईला येणारे भ्रमणध्वनीचे कॉल्स टॅप केले. पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. शेवटी अपहरणकर्त्याने आईला कदंब बसस्थानकावर पैसे घेऊन बोलावले. तिच्याकडील पैशांची बॅग घेऊन तो कदंबच्या आतील रस्त्यावरून सुनयना हॉटेलच्या दिशेने गेला. तेथे आडोशाला थांबून त्याने हेल्मेट व जॅकेट फेकून दिले व बॅग उघडून त्यातील रक्कम एव्हीएटर स्कूटरच्या डिक्कीत घालून आता आपणाला कोणी ओळखणार नाही या विचारात असतानाच पोलिसांनी त्याला गराडा घालून "सिनेस्टाईल'मध्ये अटक केली.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तोही अल्पवयीन असल्याचे आढळून आले. नंतर त्याने मुलीला कुठे लपवून ठेवले होते ते शोधून काढले व नावेली येथून तिची सुटका करण्यात आली. तोपर्यंत या अपहरणाची तक्रार कोणाकडूनही नोंद झाली नव्हती. पण दुपारी तब्बल तीन तास पोलिसांना धावपळ करावी लागल्याने याबाबत तक्रार नोंद करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक ऍलन डिसा यांनी दिला. यानंतर सदर मुलीच्या आईने तक्रार नोंद केली. सदर मुलगा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

वेळसाव किनाऱ्यावर तेलतवंगाचा विस्तार

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): कोलवा-बेताळभाटी किनाऱ्यावरील तेल तवंगाचे गोळे आज वेळसाव किनाऱ्यापर्यंत पोचल्याने त्या भागात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे पर्यटन खात्याने आज तेल तवंग गोळा करून किनारा साफ करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याचे दिसून आले.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळपासून या किनाऱ्यावर तवंग पसरून ओहोटीच्या वेळी किनारा काळा झाल्याचे दिसून आले. यानंतर स्थानिक पंचायतीने हा प्रकार संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. यानंतर साफसफाईचे काम सुरू झाले. आज सुमारे ३५ कामगार या मोहिमेवर होते व त्यांनी अर्धाअधिक किनारा साफ केला.
दुसरीकडे कोलवा व बेताळभाटी किनाऱ्यावरील साफसफाई अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, तेलतवंग पसरण्यामागचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

कोरगाव खाणप्रकरणी केंद्राला निवेदन पाठवणार

आमदार दयानंद सोपटे आक्रमक
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्याकडून गोव्यात कॉंग्रेस आघाडी सरकारच्या आशीर्वादाने कशा पद्धतीने बेकायदा खाण व्यवसाय सुरू आहे, याची माहिती देणारे निवेदन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश व केंद्रीय खाणमंत्री बी. के. हंडीक यांना पाठवण्यात येईल, अशी माहिती पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी दिली. विविध राज्यांतील बेकायदा खाण व्यवसायाचा विषय केंद्राने गांभीर्याने घेतलेला असताना गोव्याचे खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत हे बेकायदा खाण व्यवसायाला उत्तेजन देत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.
भाईड कोरगाव येथील जितेंद्र देशप्रभू यांच्या बेकायदा खाणीवरून पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे आक्रमक बनले आहेत. राज्य पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी अलीकडे विविध बेकायदा खाण उद्योगांना नोटिसा पाठवल्या आहेत. कोरगाव येथील ही खाण पूर्णपणे बेकायदा आहे. या खाणीसाठी जल किंवा वायू प्रदूषणासंबंधी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणताही परवाना घेण्यात आला नसल्याने या खाण मालकावरही कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमदार सोपटे यांनी या प्रकरणी खाण खात्याला चांगलेच खडसावल्याने व मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनीही या खाण प्रकरणी सखोल चौकशी अहवाल मागवल्याने खाण खात्यातील अधिकाऱ्यांची दाणादाण उडाली आहे. खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी आपल्या खात्यातील एका पथकाला मायणा, न्हावेली येथे पाठवून कोरगाव येथील बेकायदा खाणीवरून किती खनिज माल तिथे पोचला याचा तपशील तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत. सध्या या बेकायदा खाणीवरील मशिनरी मुख्य रस्त्याच्या कडेला आणून ठेवण्यात आली असली तरी ती मशिनरी जप्त करण्यासाठी खाण खात्याकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची टीका यावेळी स्थानिकांनी केली. ही मशिनरी बेकायदा खाण उत्खननासाठी वापरण्यात येत होती, याची माहिती खाण खात्याला असताना ती जप्त का करण्यात आली नाही, असा सवाल कोरगाव जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांनी केला आहे. दरम्यान, खाण खात्याकडून जप्त करण्यात आलेला एक ट्रक सध्या पेडणे पोलिस स्थानकावर पडून आहे. हा ट्रक सोडवण्यासाठी अद्याप कोणीही खाण खात्याकडे संपर्क साधला नाही, अशी माहिती मिळाली आहे. हा ट्रक पूर्णपणे खनिज मालाने भरलेला आहे व त्यामुळे या खाणीवरून बेकायदा खनिजाची वाहतूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खाण संचालक अरविंद लोलयेकर यांच्याकडे संपर्क साधला असता सदर फाईल सरकारला पाठवण्यात आली असून सरकारच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे ते म्हणाले.

महाबळेश्र्वर बोरकर यांचे निधन

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी): येथील एक प्रमुख समाजसेवक, माया बुक स्टोअर्सचे मालक, बाल साहित्याचे लेखक, स्पष्टवक्ते व उमदे व्यक्तिमत्त्व असलेले महाबळेश्वर राघोबा शेणवी बोरकर यांचे आज पहाटे दु:खद निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते.
आज दुपारी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र दामोदर यांनी चितेला अग्नी दिला. त्यांच्या पश्चात पत्नी माया, पुत्र दामोदर, विवाहित कन्या माधवी व ममता तसेच नातवंडे असा परिवार आहे. दै. सुनापरान्तचे क्रीडा वृत्त संपादक मंगेश बोरकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
काल रात्री १२.३० पर्यंत त्यांनी विविध संस्थांच्या हिशेबाचे काम पूर्ण केले व त्याचवेळी त्यांच्या छातीत कळा येऊ लागल्या व श्र्वास घेण्यास त्रास होऊ लागला. लगेच शेजाऱ्यांनी डॉक्टरांना पाचारण केले. परंतु, इस्पितळात नेताना वाटेतच त्यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त कळताच अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ लागली. त्यात समाजातील सर्व थरातील लोकांचा तसेच आमदार दामोदर नाईक यांचा समावेश होता.
पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव, कोकणी भाषा मंडळ, मडगाव लायन्स क्लब, मडगाव ऍम्ब्युलन्स ट्रस्ट, मडगाव सम्राट क्लब, रामनाथ व वामनेश्र्वर देवस्थान, गोवा सारस्वत समाज आदी संघटनांसाठी बोरकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्या संस्थांचे पदाधिकारी आज जातीने उपस्थित होते. मडगावातील व्यापारी वर्गही मोठ्या संख्येने स्मशानभूमीत उपस्थित होता. रामनाथ देवस्थानचे ते खजिनदार होते.

माडकरबंधूंचे मंत्र्याला प्रतिआव्हान

होंड्यात वातावरण तापण्याची चिन्हे
साखळी, दि. २ (प्रतिनिधी): सत्तरी तालुक्याचे आपणच अनभिषिक्त सम्राट आहोत अशा भ्रमात वावरणारे काही राजकीय नेते या भागातील सामान्य कार्यकर्त्यांची लोकप्रियता अजिबात खपवून घेऊ शकत नाहीत. पर्ये मतदारसंघात तुल्यबळ राजकीय प्रतिस्पर्धी बनण्याच्या दृष्टीने आपली घोडदौड पाहून काही नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. माडकरबंधूंची होंडातून हकालपट्टी करण्याची भाषा करणाऱ्यांचे आव्हान स्वीकारत आहे, असे सणसणीत प्रतिआव्हान होंडाचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सुरेश माडकर यांनी दिले. यामुळे होंड्यात वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
होंडाचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सुरेश माडकर, साखळीचे नगरसेवक यशवंत माडकर, शिवदास माडकर, मयेचे माजी सरपंच सुभाष किनळेकर व न्हावेलीचे सागर नाईक यांच्याविरोधात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या नेतृत्वाखाली हरवळेतील काही लोकांनी खंडणी वसूल करीत असल्याची तक्रार मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे करण्याच्या घटनेचे तीव्र पडसाद या भागात उमटले आहे. अशा प्रकारचे निराधार व खोटे आरोप करून या भागातील गावांतील शांतता बिघडवण्याचे हे कटकारस्थान असल्याची टीका यावेळी सुरेश माडकर यांनी केली. सत्तेचा माज चढलेले नेतेच दुसऱ्यांना संपवण्याची भाषा करू शकतात, असा टोलाही त्यांनी हाणला. साखळी हरवळेतील काही लोकांना काल ३१ ऑगस्ट रोजी दोन बसगाड्यांत बसवून थेट मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी नेण्याचा प्रकार घडला. तिथे नथ्रुमल खाणीवरील खनिज वाहतूकदारांकडून, वरील पाच व्यक्तींकडून खंडणी वसूल केली जाते असा आरोप करण्यात आला. सत्तरीतील एका भ्रष्टाचारी राजकारण्याचाच यामागे हात असल्याची टीका या लोकांनी केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदर मंत्र्याने हरवळेतील दर्शन मळीक याला पुढे करून आम्हांवर केलेले आरोप निराधार आहेत. माडकरबंधूंची होंडातून हकालपट्टी करू, असे आव्हान या नेत्याने दिले आहे व हे आव्हान स्वीकारत असल्याचेही सुरेश माडकर म्हणाले. साखळीचे नगरसेवक यशवंत माडकर यांनीही या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. हरवळेतील लोकांना भडकावून या भागातील एक सत्ताधारी नेता आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहे. पाळीचे आमदार प्रताप गावस यांना ही गोष्ट माहिती आहे, असे ते म्हणाले. सागर नाईक म्हणाले की, सत्तरीत आपल्याला कुणीही आव्हान देणारा असू नये, या गुर्मीत वावरणाऱ्या एका मंत्र्याने आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच हा खटाटोप चालवला आहे. दशरथ मळीक यांनी १८ रोजी आपल्याविरोधात मारहाणप्रकरणी खोटी तक्रार करून गावकऱ्यांना एकत्र केले. यावेळी सुभाष देसाई व यशवंत माडकर यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते. आता जाणीवपूर्वक हे प्रकरण उरकून काढण्यामागे याच नेत्याचा हात असल्याचा आरोप सागर नाईक यांनी केला.
हरवळेवासीयांशी आपली चांगली ओळख आहे व त्यामुळे आपल्याला खंडणी प्रकरणात गोवून बदनामी करण्याचा कितीही खटाटोप केला तरी त्याला हरवळेवासीय अजिबात भीक घालणार नाहीत, असा विश्वास शिवदास माडकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पाळीचे आमदार प्रताप गावस यांनी खंडणीप्रकरणी आपल्याला काहीच माहिती नाही, अशी भूमिका घेत आरोग्यमंत्र्यांवरच अप्रत्यक्ष हे प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न केला. हरवळेवासीयांच्या पंचायत व पालिका या वादावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आपण मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली, असेही ते म्हणाले. शिवदास माडकर, यशवंत माडकर व सुरेश माडकर यांच्याशी आपले घनिष्ठ संबंध आहेत व त्यांच्याबाबत आपल्याकडे कोणतीच तक्रार नाही, असे सांगून त्यांनी माडकरबधूंना "क्लीन चीट'च दिली आहे. नथ्रुमल खाण कंपनीचे मालक हरीष मेलवानी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याला या प्रकरणाशी काहीही देणेघेणे नाही व आपल्याला काहीही बोलायचे नाही, असा पवित्रा घेतला. तर, दशरथ ऊर्फ दर्शन मळीक यांनी मात्र नथ्रुमल खाण कंपनीकडूनच पणजीला जाण्यासाठी बसगाड्यांची सोय केल्याचे स्पष्ट केले. माडकरबंधूंची दादागिरी बंद करून त्यांना होंडातून हाकलून लावण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले असून या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांना गृहमंत्री रवी नाईक यांचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

अमेठीतून नवीन जिल्ह्याला मंजुरी

सुप्रीम कोर्टाकडून अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द
नवी दिल्ली, दि. १ : कॉंग्रेसचे युवा खासदार राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या उत्तरप्रदेशातील अमेठी जिल्ह्याचे विभाजन करून छत्रपती शाहूजी महाराज यांच्या नावाने नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाली आहे. याविषयी यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेला निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केलेला आहे. दलितांचे कैवारी राहिलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याने मायावती यांचा हा मोठा राजकीय विजय असल्याचे मानले जात आहे.
गांधी-नेहरू घराण्याशी नाळ जुळलेल्या तसेच कॉंग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या अमेठीचे नामकरण करून "छत्रपती शाहूजी महाराज नगर' या नावाने जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या निर्णयाला यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने एका अंतरिम आदेशान्वये स्थगिती दिली होती. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठानेच ११ ऑगस्ट रोजी मायावती सरकारच्या अमेठीतून वेगळ्या जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. याच आधारावर आज सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मायावतींच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याच्या निर्णयाला रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन आणि न्यायमूर्ती एच. एल. गोखले यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
मायावती सरकारच्या अमेठीतून वेगळ्या जिल्ह्याची निर्मिती करण्याच्या निर्णयाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. मात्र, ११ ऑगस्ट रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयानेच मायावती सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे एकाच मुद्यावर दोन वेगवेगळ्या भूमिका घेता येऊ शकणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ११ ऑगस्ट रोजीचा निर्णय बरोबर होता, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले.
१८ ऑगस्ट रोजी लखनौ खंडपीठाने अंतरिम स्थगिती देण्याचा निर्णय देताना ३१ मार्चपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत मायावती सरकारला नवीन जिल्ह्याची निर्मिती करता येणार नाही, असे म्हटले होते. या नंतर मायावती सरकारने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

'क्वीन बॅटन'च्या सुरक्षिततेची पोळे-मडगाव 'रंगीत तालीम'

मडगाव व काणकोण दि. १ (प्रतिनिधी): दिल्लीत होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांचे प्रतीक गणली गेलेली व ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ यांनी प्रज्वलित करून पाठवलेली क्रीडाज्योत सध्या भारतभ्रमंतीवर असून ती येत्या मंगळवारी ७ सप्टेंबर रोजी पोळेमार्गे गोव्यात प्रवेश करून ८ रोजी पत्रादेवीमार्गे महाराष्ट्राकडे रवाना होईल. ही मशाल मिरवणुक उधळून लावण्याची धमकी अतिरेकी संघटनांनी दिल्यामुळे तिला चिरेबंदी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची जबाबदारी गोवा पोलिसांवर आली आहे. त्या सुरक्षाव्यवस्थेची रंगीत तालीम आज पोळे ते मडगाव या ६२ किमीदरम्यान घेण्यात आली.
"क्वीन बॅटन' नामक ही मिरवणूक असून ती दुपारी १२-५० वा. पोळे सीमेवरून आत प्रवेश करती झाली असे मानून तिला कडेकोट सुरक्षाबंदोबस्तात मडगावपर्यंत नेण्यात आले अशा स्वरूपाची ही रंगीत तालीम होती. पोलिस व वाहतूक खात्यासह विविध सरकारी विभागांची तब्बल ३५ वाहने त्यात सहभागी झाली होती. क्रीडा संचालक सुझान डिसोझा, पोलिस अधीक्षक ऍलन डिसा, उपअधीक्षक उमेश गावकर काणकोणचे निरीक्षक राजू राऊत देसाई यांचाही त्यात समावेश होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मिरवणुकीत प्रमुख क्रीडापटूंचा समावेश असून ते प्रत्येक गावातील मोक्याच्या जागी थांबून तेथे प्रात्यक्षिके करतील. त्यामुळे कुठेच वाहतूक खोळंबली जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. मंगळवारी त्यासाठी या महामार्गावरील अवजड वाहतूक रोखून धरली जाण्याची शक्यता आहे. आज मडगाव ते पोळे या महामार्गावर या प्रात्यक्षिकासाठी जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लोकांना मात्र या प्रात्यक्षिकाची कोणतीच कल्पना नव्हती. त्यामुळे जागोजागी तैनात केलेले पोलिस व सकाळपासून सुरू असलेली पेलिस व अन्य सरकारी वाहनांची रहदारी पाहून कोणीतरी राष्ट्रीय नेताच येत असावा अशी चर्चा सर्वत्र होती. दुपारी सायरन वाजवत एकामागोमाग एक अशा गाड्या धावत असल्याचे पाहून त्यांना आपलाच अंदाज खरा वाटला. यावरून सदर क्रीडा ज्योतीबाबत सरकारने आम आदमीला विश्र्वासात घेतलेले नाही असे दिसून आले. तसे असेल तर खेळाडूंनी प्रात्यक्षिके नेमकी कुणासाठी करावी, असा सवाल काहींनी केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मशाल मिरवणुकीतील खेळाडू मडगावात नगरपालिका इमारतीसमोर व नंतर रवींद्र भवनात प्रात्यक्षिके करतील. नंतर या मिरवणुकीला ८ रोजी पत्रादेवी नाक्यावर भव्य निरोप दिला जाईल.

'नाटक' ही स्वतंत्र व सुंदर कला : शहनाज पटेल

पणजी, दि.१ (शैलेश तिवरेकर): शहनाज पटेल म्हणजे दिलखुलास अभिनेत्री. संजय लीला भन्साळीच्या "ब्लॅक'मध्ये चमकल्यापासून ती आपले बस्तान चित्रसृष्टीत बसवण्याच्या प्रयत्नात आहे. तिच्याशी दिलखुलास गप्पा मारताना याचा प्रत्यय वारंवार येत होता. नाटक ही स्वतंत्र व सुंदर कला आहे. केवळ पडद्यावर येण्याचे माध्यम म्हणून नाटकाची कास धरू नये. तद्वतच पडद्यावर प्रसिद्धी मिळाल्यावर भरपूर नाटकेमिळतील अशा भ्रमात कोणीच राहू नये, अशा मोजक्या शब्दांत तिने आपला आजवरचा अनुभव कथन केला.
आज प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा दिसून येते. चित्रसृष्टीही त्याला अपवाद नाही. म्हणूनच या क्षेत्रात निभाव लागायचा असेल नशिबाची साथ लागतेच, पण त्याचबरोबर पुरेसे प्रयत्न करणे हे सर्वांत महत्त्वाचे. आजसुद्धा मी भूमिका निवड चाचणीला जात असते. त्या चाचणीत यशस्वी ठरल्यास आपल्याला काम मिळते. "ब्लॅक' चित्रपटही त्याच पद्धतीने मिळाला होता, असे तिने सांगितले. राजेंद्र तालक यांच्या "ओ मारिया' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती गोव्यात आली आहे.
रंगमंच, कॅमेरा आणि मॉडेलिंग ही तिन्ही क्षेत्र वेगवेगळी असून तिन्ही क्षेत्रात बस्तान बसवायचे असेल तर भरपूर मेहनत करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर काही प्रमाणात दैवी देणगी असणे आवश्यक असल्याचे निरीक्षण तिने नोंदवले.
कुठल्याही भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आरशासमोर उभे राहून तो करावा हे आपणास मान्य नाही. कारण आरशासमोर राहून भूमिकेचा अभ्यास करताना समोरचे पात्र कसा प्रतिसाद देईल याचा अंदाज येणेच कठीण. त्यामुळे आरशासमोर उभे राहून केलेली तयारी आणि प्रत्यक्ष अभिनय करतानाचा प्रसंग या परस्परभिन्न बाबी आहेत, असेही तिने सांगितले.
भूमिकेचा अभ्यास निश्चित करावा. आपल्याला मिळालेल्या पात्रावर चिंतन करावे, त्यासंदर्भात वाचन करावे किंवा तशी व्यक्ती असल्यास तिला भेटावे. रंगमंचावर वावरताना आपला अभिनय व संवाद प्रेक्षकांपर्यंत पोचावे याचे भान कलाकाराने ठेवणे गरजेचे आहे. आधुनिक काळात संवादाकरिता माध्यम उपलब्ध आहे. पण कलाकार या नात्याने अभिनय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपणच प्रयत्न केला पाहिजे, असे ती म्हणाली.
गोव्याचे सौंदर्य आणि निसर्गाविषयी भरभरून बोलताना ती म्हणाली,
गोव्यात माझा भाऊ असतो. त्यामुळे गोवा माझ्यासाठी नवा नाही.
केवळ चित्रीकरणासाठी नव्हे तर सुट्टीची मजा लुटण्यासाठीसुद्धा मी गोव्यालाच सर्वाधिक पसंती देते. येथील वातावरण, निसर्गसौंदर्य, संस्कृती रसिक मनाला भुरळ घालणारी आहे. म्हणूनच गोवा जगाच्या नकाशावर प्रसिद्ध आहे.
गोव्यात नाट्यविद्यालय आहे. त्यात कित्येक विद्यार्थी अभिनयाचे प्रशिक्षण घेतात. मात्र केवळ प्रशिक्षण घेऊन उद्देश साध्य होत नाही. त्यासाठी प्रादेशिक भाषेत जास्तीत जास्त चित्रपट तयार होणे आवश्यक आहे. कारण या क्षेत्रात करिअर करणे म्हणजे कातळाशी टक्कर देणे.
सर्वांनाच मुंबईला जाऊन ते करणे शक्य होणार नाही. जे जातील त्यातील किती जण यशस्वी होतील हे सांगता येत नाही. म्हणून गोव्यातच अधिकाधिक चित्रपट तयार झाल्यास आपल्या भूमीत राहून प्रत्येकाला आपले नशीब अजमावता येईल. चित्रसृष्टीत पोचण्याचे स्वप्नही साकार होईल. मात्र चित्रसृष्टीत पोचलेल्या कलाकाराने नाटकाकडे पाठ फिरवू नये, सांगून तिने गोवेकरांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

Wednesday, 1 September, 2010

गरिबांना मोफत धान्य देण्याचाच आदेश होता!

कृषिमंत्री शरद पवारांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
संसदेतही उमटले संतप्त पडसाद
नवी दिल्ली, दि. ३१ : देशभरातील गोदामांमध्ये धान्य सडत आहे. मात्र, गरीब जनतेला त्याचे वाटप केले जात नसल्याने सर्वोच्च न्यायालय आज पुन्हा एकदा संतप्त झाले आहे. ""गरिबांना मोफत धान्य देण्याचा न्यायालयाने आदेशच दिला होता; सल्ला नव्हे'' अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना आज फटकारले. "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांविषयी चुकीची वक्तव्ये करण्याचे शरद पवारांनी टाळावे,' असेही सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांना सुनावले आहे. धान्य सडण्याच्या मुद्यावरून संसदेमध्येही आज गदारोळ झाला.
"गोदामांमध्ये गहू सडण्याऐवजी भुकेने तडफडत असलेल्या गरीब जनतेला त्याचे मोफत वितरण करण्यात यावे,' असे सर्वोच्च न्यायालयाने १२ ऑगस्ट रोजी आपल्या आदेशामध्ये म्हटले होते. या आदेशांवर कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, "सुप्रीम कोर्टाचा गरिबांना मोफत धान्य देण्याचा सल्ला आहे आणि प्रत्येक सल्ल्याची अंमलबजावणी करणे शक्य नाही,' असे सांगून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला सहजपणे घेतले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दलवीर भंडारी आणि न्या. दीपक वर्मा यांच्या पीठाने आज या प्रकरणी सुनावणी करताना कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर संताप व्यक्त करताना त्यांना फटकारले. "गरिबांना मोफत धान्य देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेशच दिला होता; सल्ला नव्हे. या आदेशाचे पालन व्हावे,' असे सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटले.
""गरिबांना मोफत धान्य देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला नव्हे; आदेशच दिला होता. तुम्ही तुमच्या मंत्र्यांना हे सांगून द्या,'' या शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या वकिलांना फटकारले. "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवर अशा प्रकारची चुकीची वक्तव्ये करण्याचे शरद पवार यांनी टाळावे,' अशीही फटकार न्यायालयाने पवारांना दिली आहे.
"सरकारने बीपीएल, एपीएल आणि अंत्योदय अन्न योजनेतील पात्र कुटुंबांच्या २०१० च्या आकडेवारीच्या आधारे सर्वेक्षण करावे. दहा वर्षांपूर्वीच्या जुन्या आकडेवारीच्या आधारावर सरकार अशा प्रकारची सूट देऊ शकत नाही, असे आदेश न्यायालयाने आज दिले. "सरकारी गोदामांमधील धान्याच्या सुरक्षेसाठी सरकारने काही सक्तीच्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून धान्य सडणार नाही,' असेही न्यायालयाने आपल्या आदेशांमध्ये आज स्पष्ट केले.
सरकारी गोदामांमध्ये धान्य सडण्याच्या प्रकरणाचे पडसाद आज संसदेमध्येही उमटले. या मुद्यावर विरोधी पक्षांनी सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. ""देशातील जनता भुकेने व्याकुळली आहे. सरकारी गोदामांमध्ये धान्य सडत आहे. परंतु त्याचे वितरण गरिबांना केले पाहिजे, एवढा सुज्ञपणा सरकारने दाखविलेला नाही. आत्तापर्यंत ३ लाख टन गहू सडून गेलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही गरिबांना मोफत धान्य देण्याचे आदेश सरकारला दिलेले आहेत, मात्र सरकारचे डोळे अद्यापही उघडलेले नाहीत,'' अशा शब्दांत भाजप, अकाली दल आणि बिजू जनता दलाच्या सदस्यांनी सरकारवर तोफ डागली. लोकसभेत भाजप सदस्य नवज्योतसिंग सिद्धू या मुद्यावर खूपच आक्रमक झाले. परंतु काही सदस्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने ते शांत झाले. यानंतर लालू यादव यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र, गदारोळामुळे ते बोलू शकले नाहीत. गदारोळामुळे लोकसभा उपाध्यक्ष करिया मुंडा यांनी कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब केले.

फातोर्ड्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट

दीडशे घरांतील उपकरणे खाक
मडगाव, दि. ३१ (प्रतिनिधी): आज दुपारी विजेच्या दाबात अचानकपणे वाढ होऊन डोंगरवाडा-फातोर्डा येथील सुमारे दीडशे घरांतील विजेची उपकरणे जळून लाखोंची हानी झाली. यामुळे संतप्त नागरिकांनी वीज खात्याचे साहाय्यक कार्यकारी अभियंता यांना घेराव घालून जाब विचारला.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपासून मडगाव परिसरात विजेचा दाब कमी जास्त होणे सुरू होते. या दरम्यान फातोर्डा येथे अचानक विजेचा दाब वाढल्याने तेथील ट्रान्स्फॉर्मरचा स्फोट झाला. यावेळी त्या केंद्राशी संलग्न सुमारे दीडशे घरांतील विजेची उपकरणे जळली. यात टीव्ही, एसी, पंखे तसेच शिलाई यंत्रे यांचा समावेश होता. या प्रकाराचा फटका मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या येथे राहणाऱ्या एका जवळच्या नातेवाइकाला बसला. त्यांच्या निवासस्थानांतील सुमारे दीड लाखाची विजेची उपकरणे निकामी झाल्याचे सांगण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल या ट्रान्स्फॉर्मर केंद्रावर दुरुस्तीकाम सुरू होते. संध्याकाळपर्यंत काम पूर्ण न झाल्याने ते अर्धवटच ठेवण्यात आले होते, आजही ते पूर्ण करण्यात आले नाही. यामुळेच दुपारच्या वेळी स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की काहीजण घाबरून घराबाहेर धावले तर काहींनी अग्निशामक दलाकडे संपर्क साधून चौकशी केली.

देशप्रभूंविरुद्ध चोवीस तासांत तक्रार दाखल करा

अन्यथा, कोरगाव खाणप्रकरणी
आमदार सोपटे यांचा इशारा

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): भाईड कोरगाव येथील बेकायदा खाणीचे मालक जितेंद्र देशप्रभू यांच्या विरोधात चोवीस तासांच्या आत पोलिस तक्रार दाखल झाली नाही तर या बेकायदा खनिज वाहतुकीमुळे येथील रस्त्यावर साचलेला चिखल थेट खाण खात्याच्या कार्यालयात आणून टाकला जाईल, असा गर्भित इशारा पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी दिला. देशप्रभू यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी भाषा करून खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर पेडणेवासीयांना खुळे बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बेकायदा खाण तात्काळ बंद झाली नाही तर हेच पेडणेवासीय त्यांच्या तोंडाला काळे फासण्यास कमी पडणार नाहीत, अशी तंबी यावेळी आमदार सोपटे यांनी दिली.
भाईड कोरगाव येथील बेकायदा खाणीबाबत खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी "गोवादूत'ला दिलेल्या माहितीमुळे या भागातील लोकांत संतापाची लाट उसळली आहे. येथील बेकायदा खाणीवरील खनिजाची रात्री अपरात्री वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळूनही याकडे कानाडोळा करणाऱ्या खाण खात्यालाच लक्ष्य बनवण्याचा निर्णय या भागातील संतप्त नागरिकांनी घेतला आहे. बेकायदा खाणींबाबत सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीत खाण संचालक या नात्याने अरविंद लोलयेकर हे सदस्य आहेत. त्यांनी स्वतः या खाणीला भेट देऊन येथील दृश्य पाहिले आहे, पण त्याचवेळी या बेकायदा खाणीचे मालक जितेंद्र देशप्रभू यांच्या विरोधात पोलिस तक्रार का दाखल केली नाही, असा सवाल आमदार सोपटे यांनी यावेळी केला. अरविंद लोलयेकर यांच्यासारखे वरिष्ठ सरकारी अधिकारीही राजकीय नेत्यांच्या हातचे बाहुले बनून पोरकटपणाची भाषा करायला लागले तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी जनतेलाच पुढाकार घेणे भाग पडेल, असे स्पष्ट संकेत आमदार सोपटे यांनी दिले.
जितेंद्र देशप्रभू यांनी खाण खात्याकडे पाठवलेल्या पत्रात या ठिकाणी आंब्याची कलमे लावण्यासाठी खोदकाम करीत असल्याचे कारण दिले आहे, त्यावर खाण खाते गप्प बसले आहे.जनतेच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. बेकायदा खनिज उत्खनन करून खुलेआम खनिजाची वाहतूक होत असल्याचे डोळ्यांदेखत पाहत असलेल्या लोकांना अशी पोरकटपणाची वक्तव्ये ऐकावी लागली तर काय परिस्थिती होणार, असा प्रश्न यावेळी आमदार सोपटे यांनी केला. खाण संचालकांनी वातानुकूलित केबिनमध्ये बसून अशी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत. त्यांना खरोखरच जनतेची काळजी असेल आणि आपले खाते कशा पद्धतीने बेकायदा गोष्टींना आश्रय देते हे पाहावयाचे असेल तर त्यांनी स्वतः भाईड कोरगाव येथील खाणीची पाहणी करावी, असा सल्लाही यावेळी देण्यात आला. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी या बेकायदा खाणीबाबत संचालकांकडे अहवाल मागितला असून खाणमंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडेही ही तक्रार पोचल्याची माहिती मिळाली आहे.

अटाला अद्याप बेपत्ताच

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): पोलिस ड्रगमाफिया साटेलोटे प्रकरणातील जामिनावर सुटलेला मुख्य सूत्रधार अटाला हा बेपत्ता होऊन २५ दिवस उलटले तरी "लुक आउट' नोटीस जारी करण्याव्यतिरिक्त त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोणतीच धडपड केलेली नाही. त्याचप्रमाणे, त्याचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते परंतु, हा अर्ज दाखल झाला की नाही, याची माहितीही देण्यास गुन्हा अन्वेषण विभाग टाळाटाळ करत आहे.
याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी "सीआयडी' विभागाचे पोलिस अधीक्षक मंगलदास देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार देऊन दूरध्वनी खाली ठेवून दिला. सदर प्रकरण गंभीर असल्याने आणि अंगलट येण्याची दाट शक्यता असल्याने या विभागातील पोलिस अधिकाऱ्यांनी "मौन' पाळण्यातच धन्यता मानली आहे.
अटाला गेला कुठे, असाच प्रश्न सध्या सर्वांना पडलेला असताना गेल्या काही दिवसांपासून पोलिस वर्तुळात अटाला हयात आहे की नाही, यावरच शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अटाला याचा शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. ऑगस्ट महिना संपला तरी, स्विडन येथे लकी फार्महाऊस हिचा जबानी नोंद करण्यासाठी जाण्यास गोवा पोलिसांच्या पथकाला अद्याप परवानगी मिळालेली नाही.

किनाऱ्यांच्या सफाईसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

तेलतवंगाची सरकारकडून गंभीर दखल
पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): समुद्रातील मोठ्या प्रमाणात तेलतवंग पसरल्याने राज्यातील किनारे विद्रूप होण्याच्या घटनेची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. या घटनेचा मुंबईतील जहाज अपघाताशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण देताना समुद्र किनारे साफ करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी दिली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ याबाबतीत पर्यटन खात्याला साहाय्य करणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही या घटनेची दखल घेऊन या घटनेमागचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी "नीरी' ची मदत घेण्याचे ठरवले आहे, अशी माहितीही यावेळी श्री. सिकेरा यांनी दिली.
पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा व पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत किनाऱ्यांची पाहणी केली. संपूर्ण किनारी भाग काळ्या डांबरसदृष्य गोळ्यांनी कालवंडल्याचेही त्यांच्या पाहणीत आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचे नमुने गोळा केले आहे. आज संध्याकाळी मंत्रालयात राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या (एनआयओ) पथकाबरोबर बैठकीचेही आयोजन करून याविषयावर सखोल चर्चा करण्यात आली. "एनआयओ' कडून याबाबतीत राज्य सरकारला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन मिळाल्याचेही श्री. सिकेरा म्हणाले.
दरम्यान, किनाऱ्यांची सफाई करताना या तेलतवंगाची योग्य प्रक्रिया करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ घातक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेची निवड करणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, हा प्रकार गोव्यासह संपूर्ण कोकणपट्टीतील किनाऱ्यांवरही निर्माण होत असल्याने त्याची दखल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. तटरक्षक दल, नौदल व डी. जी. शिपिंग आदींची मदत घेऊन गेल्या ७२ तासांत खोल समुद्रात कुठली जहाजे होते, याची माहिती मिळवून या घटनेला कोण जबाबदार आहे, याचा शोध लावला जाणार आहे. गोव्याला हा प्रकार नवा नाही. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकार नियमित प्रमाणात होत असल्याने हवामानातील व समुद्रातील बदलत्या वातावरणानंतर अशा प्रकारचे तेलतवंग पसरण्याचे प्रकार घडले आहेत.
स्वच्छतेसाठी लागणार ७० तास
मडगाव, (प्रतिनिधी) : तेलतवंगामुळे काळेठिक्कर पडलेले कोलवा ते बाणावली दरम्यानचे समुद्र किनारे साफ करण्याचे काम सरकारने युद्धपातळीवर हाती घेतलेले असले तरी ते संपूर्णतः साफ होण्यास किमान ७० तास म्हणजेच तीन दिवस लागतील अशी माहिती पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी आज मडगावात पत्रकारांशी बोलताना दिली.
दक्षिण गोव्यातील कोलवा ते बाणावली या तेलतवंगामुळे विद्रूप झालेल्या किनारपट्टीची पाहणी केल्यावर ते बोलत होते. त्यांच्या समवेत पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटन संचालक स्वप्निल नाईक, विज्ञान तंत्रज्ञान संचालक मायकल फर्नांडिस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य यांच्यासमवेत जाऊन पाहणी केली. यावेळी वालंका आलेमांव याही त्यांच्या समवेत होत्या.
पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले की, सदर तेलतवंग नेमका कुठून व कसा आला त्याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी सदर गोळे एकत्रित करून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तो अहवाल येताच कारणे स्पष्ट होतील. परंतु सध्या खात्यासमोर आव्हान आहे ते लवकरात लवकर किनारे स्वच्छ करण्याचे व ते काम यापूर्वीच सुरू झाले आहे.
मुंबईत झालेल्या दोन जहाजांमधील टक्करीतून झालेल्या तेलगळतीचीच ही परिणती आहे की काय ते सांगणे शक्य नाही. कारण वाऱ्यांची दिशा उलटी आहे. त्यामुळे तो तेलतवंग गोव्याकडे येणे कठीण होते. पण सागरगामी बोटी जळालेले तेल समुद्रातच सोडतात व त्याचे असे तवंग किनारपट्टीकडे येणे नाकारता येत नाही असे सांगून सरकार लवकरात लवकर किनारे स्वच्छ करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला. किनारपट्टीतील एकाही पंचायतीने या तवंगाबाबत सरकारला कळविले नाही याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली व वालंकामुळे हा प्रकार सरकारच्या लक्षात आल्याचे स्पष्ट केले.

सर्व सात दोषींना सुप्रीम कोर्टाची नोटीस

भोपाळ वायुगळती
सीबीआयच्या सुधारित याचिकेची दखल

नवी दिल्ली, दि. ३१ : संपूर्ण देशाला हादरविणाऱ्या १९८४ सालच्या भोपाळ वायुगळती प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या युनियन कार्बाईडचे माजी अध्यक्ष केशुब महिंद्र यांच्यासह सर्व सात जणांना सर्वोच्च न्यायालयाने आज नोटिसा बजावल्या. "भोपाळ प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,' अशा आशयाची सुधारित याचिका सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सीबीआयच्या या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने सर्व दोषींना आज नोटिसा बजावल्या असून, त्यांना "तुमच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अ ऐवजी ३०४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये,' अशी विचारणा करीत उत्तर मागितले आहे. दोषींना बजावण्यात आलेल्या या नोटिसांमुळे सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा या प्रकरणाची फाईल उघडली गेलेली आहे.
सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया, न्यायमूर्ती अल्तमस कबीर आणि न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांच्या खंडपीठाने बंदद्वार सुनावणी करताना सीबीआयने दाखल केलेल्या सुधारित याचिकेवरून सर्व सात दोषींना नोटिसा बजावल्या असून त्यांना उत्तर मागितले आहे.
भोपाळमध्ये २६ वर्षांपूर्वी घडलेल्या या भीषण घटनेप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने जून महिन्यामध्ये निर्णय देताना आरोपींना अत्यल्प शिक्षा आणि दंड ठोठावला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयानंतरच सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सुधारित याचिका दाखल केली होती.
सीबीआयने २ ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या सुधारित याचिकेत दोषींविरुद्ध कलम ३०४ (२) लावण्याची मागणी केली होती. या कलमांतर्गत दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास १० वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
भोपाळ वायुगळतीत दोषी ठरलेले युनियन कार्बाईडचे तत्कालीन भारतीय अध्यक्ष केशव महिंद्र, प्रबंध संचालक विजय गोखले, उपाध्यक्ष किशोर कामदार, कार्य प्रबंधक जे. एन. मुकुंद , उत्पादन प्रबंधक एस. पी. चौधरी आणि कारखाना प्रबंधक एस. आय. कुरेशी या सर्वांना सर्वोच्च न्यायालयाने आज नोटीस बजावताना "तुमच्याविरुद्ध कलम ३०४ (२) का लावण्यात येऊ नये, याचे उत्तर द्या,' अशी विचारणा केली आहे. कनिष्ठ न्यायालयाने ७ जून रोजी या प्रकरणी सर्व सातही आरोपींना दोषी ठरवून त्यांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, या सर्व सातही दोषींना न्यायालयाकडून तात्काळ जामीनही मिळाला होता. यांपैकी कोणालाही एक दिवसही कारागृहात काढावा लागला नव्हता.
या प्रकरणी सीबीआयच्या सुधारित याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सर्व सात दोषींना आज नोटीस बजावून २३ सप्टेंबर १९९६ रोजी दिलेल्या आपल्याच आदेशांविरुद्ध पाऊल टाकलेले आहे. सातही दोषींना नोटीस बजावल्यामुळे भोपाळ वायुगळतीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा उघडले गेले आहे.
या सर्व सातही दोषींना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावल्यामुळे भोपाळ वायुगळती पीडितांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे.

Monday, 30 August, 2010

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ११ हजार चिनी लष्कर

भारत-अमेरिकेसाठी धोक्याची सूचना
न्यूयॉर्क, दि. २९ - पाकव्याप्त काश्मीरमधील डावपेचांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चीनने ११ हजार लष्करी जवान तैनात केलेले आहेत. लष्करीदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या व पाकिस्तानी शासनाविरुद्ध बंडाचे झेंडे रोवल्या गेलेल्या या प्रदेशावर प्रत्यक्ष नियंत्रण मिळविण्याच्या हेतूने तसेच भारताने सुरू केलेल्या लष्करी हालचालींच्या पार्श्वभूमीवर चीनने ही लष्कर तैनातीची कारवाई केलेली आहे.
"गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये अत्यंत महत्त्वाच्या दोन नवीन घडामोडी घडलेल्या आहेत. या परिसरामध्ये पाकिस्तानी शासनाविरुद्ध बंडाचा सूर उमटत आहे तसेच या परिसरामध्ये चीनच्या "पीपल्स लिबरेशन आर्मी'चे ७ हजार ते ११ हजार जवान तैनात केले जात आहे,' असे वृत्त "न्यूयॉर्क टाईम्स'ने प्रकाशित केलेले आहे.
नेमका उद्देश काय?
पाकव्याप्त काश्मिरात सध्या शासनविरोधी कारवायांचा जोर वाढतो आहे. अशा स्थितीत येथे नियंत्रण मिळवून काश्मीरचा हा भाग नेहमीसाठीच ताब्यात घेऊन पाकला सोपविण्याचा ड्रॅगनचा डाव असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक गिलगिट-बाल्टिस्तान हे सामान्य नागरिकांसाठी प्रतिबंधित क्षेत्र आहेत. येथे सहजासहजी कोणालाही प्रवेश मिळू शकत नाही. पण, युद्धाच्या दृष्टीने चीन योजनाबद्ध तयारी करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्याने या प्रदेशात आपले सैनिक तैनात करून टाकले आहेत. युद्ध हे मर्यादित कालावधीत संपेलही. पण, नंतर नेहमीसाठी आखाती देशांसोबत संपर्क स्थापित व्हावा यासाठी या परिसरात चांगले रस्ते आणि रेल्वेलाईनचेही काम चीनने सुरू केले आहे. यामुळे आखाती देशात असणारे पाकी नौदलाचे अड्डे ग्वादार आणि बलूचिस्तानच्या ओरमारापर्यंत पूर्व चीनमध्ये कार्गो तसेच तेलाचे टॅंकर पोहोचण्यास केवळ ४८ तास लागणार आहेत. यासाठीच येथे रस्ते आणि रेल्वेलाईनचे काम अतिशय वेगाने हाती घेतले जात आहे. चीनच्या जियांग प्रांताला पाकशी जोडणाऱ्या कराकोरम महामार्गाचाही विस्तार केला जात आहे. एवढेच नव्हे तर एक्सप्रेस हायवे आणि इतर योजनांवरही प्रभावीपणे अंमलबजावणी करीत आहेत.
आतापर्यंत चिनी लष्कर अस्थायी शिबिर उभारून आपले काम पूर्ण करून परतत होते. पण, आता ते येथे रहिवासी गाळे तयार करीत आहेत. याचाच अर्थ या ठिकाणी दीर्घकाळपर्यंत वास्तव्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो.
"पाकिस्तानमार्गे आखाताला रस्ते आणि रेल्वेने जोडण्याची हमी देऊन धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाच्या या प्रदेशावर ताबा मिळविण्याचा चीनचा डाव आहे. चीनने हा हेतू पूर्ण करण्याच्या दिशेने वेगवान रेल्वे आणि रस्ते बांधणीच्या कामाला प्रारंभ केलेला आहे,' असेही न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात पुढे म्हटले आहे.
अमेरिकेसाठीही धोक्याचा इशारा
चीनच्या या सर्व हालचाली केवळ भारतच नव्हे तर अमेरिकेसाठीही धोक्याचा इशारा ठरत आहेत. तालिबानला समर्थन देणाऱ्या पाकने चीनला आखातापर्यंत पोहोचविण्यात मदत करणे ही बाब अतिशय धोकादायक आहेत. चीनचे अमेरिकेसोबतचे शत्रूत्व जगजाहीर आहे. अशास्थितीत पाकने चीनला मदत करणे म्हणजे पाकिस्तान अमेरिकेचा खरा मित्र नसल्याचे द्योतक आहे, अशा शब्दात न्यूयॉर्क टाईम्सने अमेरिकी प्रशासनाला धोक्याची सूचना दिली आहे. तिबेटप्रमाणेच चीनला काश्मीरही गिळंकृत करायचे आहे, असा स्पष्ट हेतू तो बाळगून असल्याचेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

खाणी सुरू करण्यासाठी सत्तरीमध्ये गुप्त बैठका

वाळपई, दि. २९ (प्रतिनिधी) - सत्तरी तालुक्यात वेळगे, सोनाळ व सावर्डेत खनिज खाणी सुरू करण्यासाठी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू झाले असून, गुप्त बैठका घेऊन ग्रामस्थांची तोंडे बंद करण्यासाठी मोठ्या रकमेची लालूच दाखविली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खाणविरोधी संभाव्य आंदोलन मोडून काढण्यासाठी काही राजकीय नेते गावागावांत मोर्चेबांधणी करीत असल्याचे वृत्त आहे.
पश्चिम घाट परिसरात पर्यावरणाला धोकादायक ठरणाऱ्या सुमारे ५८ खाणी पर्यावरण खात्याने बंद केल्या आहेत. गेल्या दोनतीन वर्षात एका राजकीय नेत्याने या खाणी सुरू करण्याच्या दृष्टीने स्थानिक लोकांना आमिषे दाखवून मिंधे बनविण्याचे सत्र आरंभले आहे. स्थानिकांचा विरोध मावळला की, बेकायदा खाणी सुरू करण्याचा हेतू यामागे आहे. वेळगे व सावर्डे भागात या नेत्याने कोट्यवधींची गुंतवणूक केल्याची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी खाणी सुरू करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी सावर्डे खाणविरोधी समितीने आंदोलन छेडले होते.एका बाजूला म्हादई नदी तर दुसऱ्या बाजूस वनक्षेत्र असा हा परिसर बळकावण्याचा प्रयत्न सुरू असून खनिजामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम लोकांच्या लक्षात येत नसल्याने या राजकीय नेत्याचे फावले आहे. सत्तेच्या जोरावर आर्थिक दृष्ट्या लोकांवर दडपण आणण्याची खेळी खेळली जात आहे. वेळगे, खोतोडे, खडकी आदी भागांवर खाणींचे संकट कोसळण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत, कारण याच मार्गाने खनिज वाहतूक सुरू होणार आहे.

कारवार गोव्याला जोडा - चर्चिल

मडगाव, दि. २९ (प्रतिनिधी) - कारवार हा कर्नाटकातील कोकणी भाषिक प्रदेश गोव्याला जोडून विशाल कोकणी राज्य तयार करण्याच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमांव यांनी केला आहे.
काल येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की , ज्ञानपीठकार रवींद्र केळेकर यांचेच असे विशाल कोकणी राज्य बनविण्याचे स्वप्न होते व ते साकार करणे हीच त्या साहित्यसम्राटाला खरी श्रद्धांजली ठरेल. गोव्यातील कोकणी चळवळीतील अध्वर्यूंनी त्या दृष्टीने पावले उचलावीत व कर्नाटकातील कारवार, सुपा, हल्याळ हे प्रदेश गोव्याला जोडण्याच्या दृष्टीने पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.
ते म्हणाले की, आपला विशाल गोमंतकाला विरेाध आहे पण कोकणी भाषिक प्रदेश गोव्याला जोडण्याच्या केळेकर यांच्या प्रस्तावाशी आपण सहमत आहोत, मात्र कर्नाटकाप्रमाणे शेजारी महाराष्ट्रातील कोकणी प्रदेश गोव्याला जोडण्यास त्यांचा विरोध दिसून आला. त्यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील प्रदेश जोडला म्हणून गोवा व गोवेकरांना काहीच लाभ होणार नाही उलट कर्नाटकाचा प्रदेश जोडला तर मोठा भूप्रदेश गोव्याच्या वाट्याला येईल त्याचबरोबर कैगा, सीबर्ड सारखे प्रकल्प येतील त्यामुळे गोव्याची वीजसमस्या सुटू शकेल तसेच दाबोळीतील नौदल तळ सी बर्डवर हलवून दाबोळी मोकळा करणे शक्य होईल.
कर्नाटकाच्या या प्रदेशातील संस्कृती गोव्याशी मिळतीजुळती आहे तशी महाराष्ट्रातील नाही. कर्नाटकाच्या या भागातील लोक मूळचे गोवेकरच असून येथून ते तेथे स्थलांतरित झालेले आहेत असा इतिहास सांगतो व म्हणून हे प्रदेश गोव्याला जोडणे भावी पिढीसाठी वरदान ठरणे शक्य आहे. आज गोव्याचे क्षेत्रफळ ३७५० चौ. कि. मी. आहे. तर कारवार जिल्ह्याचे ३६०० चौ. कि. मी. असून तेथील कोकणी भाषिकांची संख्या तीन लाख आहे. गोव्याला एकंदरीत ही बाब अनेक अर्थांनी फायद्याची ठरणार आहे, ते म्हणाले.
वर्षभरापूर्वी कारवार येथे एका कार्यक्रमात चर्चिल यांनी असेच विचार व्यक्त केले होते व त्यातून गोव्यात नवा वाद उसळला होता. त्यानंतर घूमजाव करताना चर्चिल यांनी आपण तसे म्हटलेच नव्हते, प्रसारमाध्यमांनी ती वाक्ये आपल्या तोंडात घातली असा खुलासा केला होता. मात्र आता पुन्हा चर्चिल यांना कर्नाटकातील या कोकणी भाषिक प्रदेशाची आठवण का झाली ते कळू शकले नाही. काहींच्या कयासाप्रमाणे शुक्रवारी ज्ञानपीठ पुरस्कारविजेते रवींद्र केळेकर यांचे देहावसान झाल्यावर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा चर्चिल यांचे नावेलाीतील प्रतिस्पर्धी लुईझिन फालेरो यांनी प्रियोळला धाव घेतल्याचे छायाचित्र ठळकपणे प्रसिध्द झाल्याने बांधकाम मंत्र्यांचे पित्त खवळले व त्यातून कोकणीसंदर्भात "हम भी कम नही' च्या पवित्र्यात हे निवेदन केले असे मानले जात आहे.

धनवंत उमेदवारांना लगाम घालण्यावर उहापोह होणार

आजपासून पणजीत पश्चिम क्षेत्र परिषद
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) - निवडणूक काळात उमेदवारांकडून पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. तसेच मतदारांना पैशांची आमिषे दाखवली जातात. या समस्यांना सामोरे जाणे आणि
त्यावर ठोस उपाययोजना आखण्यासाठी गोव्यात पश्चिम क्षेत्राची उद्यापासून (सोमवारपासून) दोन दिवसीय परिषद "मॅकनिज' पॅलेस येथे आयोजिण्यात आली आहे. राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त डॉ. एस वाय. कुरेशी व आयुक्त इ एस. संपत यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद होईल.
या परिषदेत गोवा, महाराष्ट्र, गुजरात, दादर व नगर हवेली, दमण व दीव तसेच मध्यप्रदेशचे निवडणूक आयुक्त, १८ जिल्हाधिकारी व ७ जिल्हा पोलिस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ही माहिती आज राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे महासंचालक अक्षय राऊत यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे निवडणूक आयुक्त गणेश कोयू उपस्थित होते.
या परिषदेत, निवडणूक आयोजनावेळी व निवडणुकीच्या काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. प्रामुख्याने, उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पैशांच्या वापरावर अंकुश आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याबाबतही ऊहापोह केला जाईल. यात विविध राज्यांतील निवडणूक कार्यालयांचे व अन्य प्रशासकीय अधिकारीही सहभागी होणार आहेत.
परिषदेच्या आरंभी "भारत आणि निवडणुका' या विषयावर भरवल्या जणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. कुरेशी यांच्या हस्ते होईल. भारतातील लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या निवडणुकांना ६० वर्षे पूर्ण झाल्याने हे हीरकमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. या अनुषंगाने गेल्या ६० वर्षातील दुर्मीळ छायाचित्रे या प्रदर्शनात मांडली जाणार आहेत. दिल्लीत या प्रदर्शनाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले होते व त्यानंतर अनेक राज्यांमध्ये हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यातील गोवा हे तेरावे राज्य ठरले आहे.
बदलत्या काळानुसार निवडणुकांच्या आयोजनासाठी एक उत्तम आराखडा तयार करणे हा या परिषदेमागील उद्देश आहे. निवडणुका सुरळीत होण्यासाठी विविध राज्यांतील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक कोणती महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचेही सादरीकरण यावेळी होणार आहे. त्यामुळे याचाही फायदा अन्य राज्यांना होईल, असे मत श्री. राऊत यांनी व्यक्त केले.

दाबोळी येथे अपघातात वाडेचा दुचाकीस्वार ठार

वास्को, दि. २९ (प्रतिनिधी)- आपल्या "बजाज चेतक' दुचाकीवरून रात्रीच्या वेळी घरी येत असताना एका अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने वाडे-वास्को येथे राहणारे ५६ वर्षीय विनायक डी. केरकर हे जागीच ठार झाले. केरकर यांना कुठल्या वाहनाने ठोकर दिली, याबाबत वास्को पोलिसांना अद्यापर्यंत माहिती मिळाली नसून याबाबत तपास चालू आहे.
वास्कोचे उपनिरीक्षक वैभव नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना काल (दि २९) रात्री १२.०५ च्या सुमारास घडली. वास्कोच्या नागरी आरोग्य केंद्रात काम करणारे विनायक केरकर (पंचनाम्यानुसार) हे आपल्या दुचाकीवरून (क्रः जीए ०२ एफ ८१४४) कुठ्ठाळीहून वास्कोच्या दिशेने येत असताना ते माटवे - दाबोळी (रिमा बारसमोर) येथे पोचले असता त्यांना त्याच दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने ठोकर देऊन पोबारा केला. केरकर गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसल्याने स्थानिकांनी वास्को पोलिसांना माहिती दिली. वास्को पोलिसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन जखमी विनायकला चिखलीच्या कुटीर रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याचे निधन झाल्याचे घोषित करण्यात आले. मयत विनायक हे विवाहित असून त्यांना दोन मुले असल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली.निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव नाईक पुढील तपास करीत आहेत.

कामगार खूनप्रकरणी संशयितास अटक

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी) ः दोनापावला येथे कामगाराचा गळा चिरून खून केलेल्या खुन्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पणजी पोलिसांनी केला असून आज त्याला न्यायाधीशांसमोर उभे करून १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
शामसुंदर अंच्चन यांनी काल सिद्धनाथ अलुरे या कामगाराचा धारदार हत्याराने गळी चिरून खून केला होता. तर, तिची पत्नी राजश्री हिला गंभीर जखमी केले होते. सिद्धनाथ याचा खून करण्यासाठी वापरण्यात आलेल्या त्या हत्याराचा अद्याप शोध लागला नसल्याची माहिती पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. खुनाच्या काही अवधीनंतर अंच्चन याला पोलिसांनी कंपाल येथून ताब्यात घेतले होते. अंच्चन याच्यावर जुने गोवे येथे खून केल्याचाही आरोप असून २००४ साली तो दोषमुक्त झाला होता.
दरम्यान, मळा येथे "सॉमिल'वरील कामगाराचा करण्यात आलेल्या कामगाराच्या खुन्याचा अद्याप शोध लागलेला नाही. एक नेपाळी तरुणाने हा खून केल्याचा संशय असून सध्या तो फरार आहे. या दोन्ही प्रकरणाचे तपासकाम निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहे.

पाक क्रिकेटपटूंचे स्पॉटफिक्सिंग

जाणीवपूर्वक नोबॉल टाकल्याचे उघडकीस

लंडन, दि. २९ - मॅच फिक्सिंग प्रकरणी पाकिस्तानच्या अनेक स्टार क्रिकेटपटूंवर कारवाई होऊनही पाक खेळाडूंची पैशाची हाव अजून संपलेली नाही. इंग्लंडविरूद्ध नुकत्याच झालेल्या लॉर्डस टेस्टमध्ये पाक गोलंदाजांनी जाणीवपूर्वक नो बॉल टाकून फिक्सिंग केल्याचे उजेडात आले असून, याप्रकरणी स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाक टीमचा कर्णधार सलमान बट हाच फिक्सिंग प्रकरणातील मुख्य रिंगमास्टर असल्याची कबुली एका बुकीने दिल्याचे समजते. इंग्लंडमधील "न्यूज ऑफ द वर्ल्ड' या वृत्तपत्राने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाक खेळाडूंनी केलेल्या मॅच फिक्सिंगचा पर्दाफाश केला आहे. लॉर्डस टेस्टमध्ये नो बॉल टाकण्यासाठी मोहम्मद आमिर आणि मोहंमद आसिफ या दोन्ही पाकिस्तानी गोलंदाजांना बुकीकडून सुमारे दीड लाख पौंड देण्यात आले, असा आरोप वृत्तपत्राने केला आहे. या आरोपांची गंभीर दखल घेत स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. पाक खेळाडूंच्या हॉटेलवर जाऊन स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी कर्णधार सलमान बट, यष्टिरक्षक कामरान अकमल, गोलंदाज मोहम्मद आमिर आणि मोहम्मद आसिफ या चौघा क्रिकेटपटूंची चौकशी केली. याप्रकरणी लंडन पोलिसांनी मझर मजीद नावाच्या एका ३५ वर्षीय बुकीला अटक केली आहे. बुकीने या खेळाडूंना दीड लाख पौंड दिल्याची बाब स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाली. कर्णधार सलमान बट हाच या मॅच फिक्सिंगचा रिंगमास्टर होता, अशी कबुली मझर मजीदने पोलिसांना दिल्याचे समजते. या आरोपांची दखल घेत पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक यावर सईद यांनी चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. चौथी व अंतिम कसोटी सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर यावर सईद यांनी आपण या इंग्लंड दौऱ्यानंतर राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता प्रकरणाला वेगळेच वळण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी खेळाडूंच्या खोलीवर छापा टाकला तेव्हा त्यांना तेथे पैसे सापडले या आरोपाचा यावर सईद यांनी इन्कार केला आहे. पोलिसांनी खेळाडूंचे लॅपटॉप आणि मोबॉईल फोन जप्त केले आहेत. पोलिसांनी छापा मारल्यानंतर त्यांना आवश्यक ती माहिती मिळाली असल्याचे सूत्राने सांगितले. सामना संपल्यानंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेला न थांबता पाकिस्तानचे खेळाडू लगेचच हॉटेलकडे रवाना होत असे, असेही या सूत्राने सांगितले.

विद्यमान अध्यक्षांचे पॅनेल पुन्हा विजयी

मराठी अकादमी कार्यकारिणी निवडणूक

पणजी, दि.२९ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यकारिणी निवडणुकीत अकादमीचे विद्यमान अध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांचे पॅनेल निवडून आले. ही निवडणूक शिक्षण, साहित्यिक व कला क्षेत्रातील रिक्त जागांसाठी घेण्यात आली. एकूण ६० सदस्यांपैकी ५३ सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात ४ मते बाद झाली तर एकूण ४९ मते ग्राह्य धरण्यात आली.
मतदानाच्या सुरुवातीस सदस्यांच्या नावांत घोळ असल्याने सुरेश नाईक, परेश प्रभू यांनी निवडणुकीवर आक्षेप घेतला आणि तसे निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
अकादमीच्या कार्यपद्धतीमुळे वादग्रस्त ठरलेल्या या निवडणुकीकडे मराठीप्रेमींचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे ही निवडणूक रंगणार असे दिसताना अध्यक्षांच्या पॅनेलने ४३ मते मिळवून निवडणुकीचे चित्रच बदलून टाकले.
इतिवृत्त वाचून मागील हिशेब तपासणी मंजुरी देण्यात आली. तसेच चिटणीसांच्या अहवालास मान्यता दिल्यावर निवडणुकीला आरंभ झाला. मतपत्रिकेतील नावांच्या क्रमवारीला काही सदस्यांनी आक्षेप घेतल्याने निवडणूक स्थळावर गोंधळ निर्माण झाला होता. निवडणूक अधिकारी द. वा. तळवणेकर यांनी हस्तक्षेप करून सदर यादीतील नावे अकादमीच्या घटनेनुसार असल्याचे स्पष्ट केले. मग निवडणूक प्रक्रिया पुढे सुरू करण्यात आली. आज सकाळी १० ते ३.३० या कालावधीत, विविध क्षेत्रांतील रिक्त जागांसाठी घेतलेल्या निवडणुकीत विजेते ठरलेले, गट क्र.१- गोव्यातील विद्यालयीन प्रतिनिधी ः शामसुंदर कवठणकर आणि सुरेश कोरगावकर. गट क्र.७ मराठी साहित्य आणि कला ः नरेंद्र आजगावकर, शेखर नागडे. कार्यकारिणी सदस्य ः आनंद मयेकर, भारत बागकर. गट क्र.३- गोव्यातील मराठी साहित्यिक ः उदय ताम्हणकर, सुरेश भंडारी, अशोक घाडी, ध्रुव कुडाळकर, मुरारी जिवाजी, दामोदर दाभोळकर, उल्हास प्रभुदेसाई. निवडणुकीत निर्वाचन अधिकारी म्हणून द. वा. तळवणेकर यांनी, तर सदस्य रंगनाथ वेळुस्कर आणि नारायण धारगळकर यांनी काम पाहिले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ सदस्यांच्या प्रतिक्रिया -
शंभू भाऊ बांदेकर ः गोमंतक मराठी अकादमीच्या कारभाराचा ऱ्हास झाला असून अकादमीची वाटचाल भलत्याच दिशेने सुरू आहे. साहित्याशी दुरान्वयानेही संबंध नसलेली मंडळी निवडून येत आहेत. राजकारण्यांप्रमाणे केवळ बहुमताने निवडून येणे हाच येथील स्थायिभाव बनला आहे.
अवधूत कुडतरकर ः सध्याची अकादमी म्हणजे खोगीरभरती करण्याचे व्यासपीठ बनले आहे. कारण ज्याच्या नावे एकही पुस्तक नाही तो निवडणूक जिंकतो यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. अर्थात, आपण गोमंतकातील मराठी साहित्यातील चळवळ चालूच ठेवणार आहोत.

Sunday, 29 August, 2010

अनेकांचा हुंदका दाटला, डोळे पाणावले, शोकाकूल वातावरणात केळेकरांवर अंत्यसंस्कार

फोंडा, दि. २८ (प्रतिनिधी): ज्ञानपीठ, पद्मभूषण पुरस्कार विजेते, गांधीवादी विचारवंत, साहित्यिक स्व. रवींद्र केळेकर यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात, साश्रू नयनांनी प्रियोळ येथील स्थानिक स्मशानभूमीत आज (दि.२८) दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
यावेळी "रवींद्र केळेकर अमर रहे' अशी घोषणा देण्यात आल्या. रवींद्र केळेकर यांचे सुपुत्र गिरीश केळेकर यांनी मंत्राग्नी दिला. यावेळी राजकीय, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारतर्फे गोवा पोलिसांच्या पथकाने मानवंदना दिली. मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर, माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर व इतरांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. राज्यपाल आणि गोवा पोलिस यांच्यातर्फे पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
रवींद्र केळेकर यांचे शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी मडगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये देहावसान झाले होते. त्यानंतर रवींद्र केळेकर यांचे पार्थिव त्याचदिवशी संध्याकाळी त्यांच्या प्रियोळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. शुक्रवार संध्याकाळपासून केळेकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राजकीय, सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर स्थानिक नागरिकांची रीघ लागली होती. शनिवार २८ रोजी दुपारपर्यंत हजारो लोकांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. त्यात फातोर्डाचे आमदार दामू नाईक, आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, आमदार महादेव नाईक, माजी सभापती विश्र्वास सतरकर, संजीव देसाई, सुनील देसाई, प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर, माजी मंत्री सुभाष शिरोडकर, पंचायत मंत्री मनोहर आजगावकर, वीज मंत्री आलेक्स सिक्वेरा, सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव, नगरविकास मंत्री ज्योकिम आलेमांव, आमदार बाबू कवळेकर, सौ. निर्मला सावंत, वेलिंग प्रियोळ पंचायतीचे पंच सदस्य सतीश मडकईकर, स्वातंत्र्य सैनिक गुरूनाथ केळेकर, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर, साहित्यिक पुंडलिक नारायण नाईक, सौ. हेमा नाईक, रमेश वेळुस्कर, तानाजी हर्ळणकर, एन. शिवदास, पांडुरंग नाडकर्णी, श्रीधर कामत बांबोळकर, माजी मंत्री ज्योईल्द आगियार, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेखा, राजू मंगेशकर, आयरिश रॉड्रिगीस, रोहिदास शिरोडकर, उपेंद्र बांबोळकर, विजयकांत नमशीकर, दिलीप बोरकर आदींचा समावेश होता.

आमशेकर सरांचा आज गौरव सोहळा

साकोर्डे, दि. २८ : निगर्वी शिक्षकतथा निःस्वार्थी समाजसेवक विनायक गणेश आमशेकर यांचा अमृतमहोत्सवी गौरव येथील हिराबाई तळावलीकर हायस्कूलच्या सभागृहात आज (रविवारी) सकाळी दहा वाजता त्यांचे चाहते, नागरिक आणि विद्यार्थ्यांतर्फे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते या नात्याने प्राचार्य सुभाष वेलिंगकर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी सौजन्यमूर्ती आमशेकर सरांना सरस्वतीची चांदीची मूर्ती प्रदान करण्यात येणार असून सौ. कुमुद वहिनींचाही सौभाग्यलेणे देऊन सन्मान केला जाणार आहे. साकोर्डेवासीयांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सत्कार समितीने केले आहे.

वरचावाडा मोरजीतील दुर्घटना घराला आग लागून महिला मृत्युमुखी

पेडणे दि. २८ (प्रतिनिधी): वरचावाडा मोरजी येथील ७८ वर्षीय सीता बाबनगो खोत ही महीला तिच्या घराला लागलेल्या आगीत होरपळून आज (शनिवारी) सकाळी मरण पावली.
सविस्तर माहितीनुसार २८ रोजी सकाळी ८ च्या सुमारास चुलीवर चहा करत असताना तिच्या पदराने नकळत पेट घेतला. काही वेळातच ही आग सर्वत्र पसरली. त्या खोलीतच तिने जळावू लाकडांचा साठा केला होता. या लाकडांनी पेट घेतला व त्यामुळे घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
सदर महिला एकटीच त्या घरात राहात होती. तिला एक विवाहित मुलगी आहे. घराच्या छपराने पेट घेतल्यानंतर शेजाऱ्यांचे लक्ष गेले. तेथील पंच सदस्य तथा उपसरपंच धनंजय शेटगावकर यांनी याची माहिती अग्निशामक दल व पेडणे पोलिसांना दिली.
लगेच दलाचे अधिकारी गोपाळ शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता. सारे घर जळालेच, त्याचबरोबर सदर महिलेसही आपला जीव गमवावा लागला.आग आटोक्यात आणल्यानंतर साता खोत यांचा मृतदेह जळाल्याचे दिसून आले.
पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नार्वेकर यांनी पंचनामा केला.
मृतदेह पालिकेच्या शववाहिनीतून बांबोळी येथे सरकारी इस्पितळात पाठवण्यात आला आहे.
सीता खोत ही मनमिळावू होती. शेजारी कामधंदा करून ती आपला उदरनिर्वाह चालवत असे. तिला सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मासिक पेन्शन मिळत होती. आगीचा भडका असा जबर होता की सारे घरच त्यात भस्मसात झाले.
सरपंच अर्जुन शेटगावकर, उपसरपंच धनंजय शेटगावकर, संतोष शेटगावकर, व नागरिकांनी भेट घटनास्थळी भेट देऊन सीताच्या मृत्युबद्दल हळहळ व्यक्त केली. अलीकडे सीता हिला तब्येतीच्या तक्रारी भेडसावत होत्या, असे शेजाऱ्यांनी सांगितले.

अबकारी आणि ड्रगप्रकरणी सरकारातच 'छुपा'समझोता

भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकरांचा सनसनाटी आरोप
पणजी, दि. २८(प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडील अबकारी खात्यात कोट्यवधी रुपयांचा बेकायदा मद्यार्क घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी रोखण्यासाठीच ड्रग प्रकरण "सीबीआय' कडे सोपवण्यास ते धजत नसावेत, असा खळबळजनक आरोप भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर यांनी "गोवादूत'शी बोलताना केला. अबकारी घोटाळ्याचा पुराव्यासह पर्दाफाश करूनही त्याची "सीबीआय' चौकशी टाळणारे मुख्यमंत्री गृहखात्याकडील ड्रग प्रकरणाच्या "सीबीआय' चौकशी शिफारस कशाच्या आधारे करणार? या दोन्ही प्रकरणांत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यात छुपा समझोता झाल्याचा आरोपही श्री. आर्लेकर यांनी केला.
बेकायदा खाण व्यवसाय व अबकारी खात्यातील कथित घोटाळा यामुळे मुख्यमंत्री अडचणीत आले आहेत. गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडील ड्रग प्रकरणाची चौकशी "सीबीआय' कडे देणे त्यांना अजिबात परवडणारे नसल्यानेच "तेरी भी चूप व मेरी भी चूप' या न्यायाने हे नेते जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोपही श्री.आर्लेकर यांनी केला.
राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यार्क आयात सुरू आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत कागदपत्रांसह हा घोटाळा उघड केला आहे. एवढे घडूनही अबकारी खाते विविध ठिकाणी बेकायदा मद्य व्यवहारांवर छापे टाकून बेकायदा मद्यार्कही जप्त करीत आहे. गेल्या मे महिन्यात पत्रादेवी येथे २० लाख रुपयांचे मद्यार्क पकडले व आत्ता अशाच पद्धतीने बेकायदा मद्यार्क घेऊन गोव्यात येणारा टॅंकर इन्सुली चेकनाक्यावर सिंधुदुर्ग अबकारी विभागाने पकडण्याची घटना घडली. या घटनांकडे पाहता हे बेकायदा व्यवहार अजूनही तेजीत सुरू असल्याचेच स्पष्ट होते. मध्यप्रदेश, पंजाब आदी राज्यांतून अशा पद्धतीने बेकायदा मद्यार्काची आयात सुरू असल्याने या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचे कोणतेच प्रयत्न सरकारकडून होत नाहीत. अबकारी खात्याने कारवाई केल्याने दोन टॅंकर पकडण्यात आले खरे; परंतु चेकनाक्यावरील अधिकाऱ्यांना चकवून अनेक टॅंकर्सना राज्यात प्रवेश करणेही शक्य आहे, असा संशय श्री. आर्लेकर यांनी व्यक्त केला.
अबकारी घोटाळ्याची चौकशी वित्त सचिवांमार्फत करण्याची घोषणा करून मुख्यमंत्री कामत यांनी पद्धतशीरपणे प्रकरणी बनवाबनवी केल्याचा आरोप श्री.आर्लेकर यांनी केला. राज्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल चुकवून हे व्यवहार सुरू आहेत. मात्र मुख्यमंत्री याप्रकरणी गंभीरपणे चौकशीला तयार होत नाहीत, यामागील नेमके कारण काय, असा सवालही श्री.आर्लेकर यांनी केला.
दरम्यान, अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी या खात्याचा ताबा घेतल्यानंतर लगेच मे महिन्यात वास्को अबकारी कार्यालयावर छापा टाकून तिथे काही संगणक व इतर वस्तू जप्त केल्या होत्या. या छाप्यात संगणकावर अबकारी घोटाळ्याशी संबंधित व्यवहाराचेही पुरावे जप्त करण्यात आले होते, तथापि, एवढी महत्त्वाची माहिती मिळूनही या प्रकरणी पुढे काहीही तपास झालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण जाणीवपूर्वक दडपले जात असल्याचेच स्पष्ट होते. या संपूर्ण व्यवहारात सरकारची भूमिका संशयास्पद असल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या घोटाळ्याची चौकशी "सीबीआय' मार्फत करावी, असेही श्री. आर्लेकर म्हणाले.

कोरगाव ते न्हावेली व्हाया मालपे सरकारी आशीर्वादानेच खनिजाची चोरी

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यातील भाईड कोरगाव येथे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या बेकायदा खाणीवरील खनिजाची सध्या सरकारी आशीर्वादानेच चोरटी वाहतूक सुरू आहे. सरकारकडून जप्त केलेला हा माल उचलून मालपे येथे साठवला जातो व तिथून हा माल थेट राष्ट्रीय महामार्गावरून म्हापसा, पणजी ते माशेलमार्गे मायणा न्हावेली येथे नेला जातो, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. खाण संचालक अरविंद लोलयेकर यांनी खात्यातर्फे पथक पाठवण्यात आल्याची माहिती "गोवादूत' ला दिली, तथापि, हे पथक खरोखरच घटनास्थळी पोहचल्याची कोणतीही खबर मिळाली नाही.
दरम्यान, बेकायदा खनिज उचलण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांना "सेटल' करून केवळ माती नेली जात असल्याचे लोकांना भासवले जात आहे, असा आरोप पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी केला. बेकायदा उत्खनन केलेल्या या खाणीवर ५२ ग्रेड प्रतीचे अठरा हजार मेट्रिक टन लोह खनिज आहे. बेकायदा खनिज व्यवसायाची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीने आपल्या अहवालात इथे अठरा हजार मेट्रिक टन खनिज असल्याचे म्हटले आहे. हे कमी दर्जाचे खनिज असले तरीही त्याची सध्याची किमत कोट्यवधींच्या घरात पोहचते, अशी माहितीही प्राप्त झाली आहे.
कोरगाव खाणीचे हे प्रकरण म्हणजे "कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार' आहे. एकीकडे राज्यात गेल्या तीन वर्षांत चार हजार कोटी रुपयांचे बेकायदा खनिज निर्यात झाल्याचा आकडा समोर आला आहे. मुख्यमंत्री कामत यांनी यांपैकी पै न पै वसूल करण्याची घोषणा करूनही इथे मात्र खुद्द मुख्यमंत्रीच खनिज चोरीला अभय देत असल्याचा आरोप आमदार सोपटे यांनी केला. ही सगळी चोरटी वाहतूक रात्री साडेअकरा वाजल्यापासून सुरू होते. खनिज मातीने भरलेले हे ट्रक म्हापसा, पणजी मार्गे माशेल ते मायणा न्हावेली असा प्रवास करतात. मालपे येथे राष्ट्रीय महामार्गाच्या लगतच एका जागेत हा माल साठवण्यात येतो व तिथून तो उचलला जातो. या वाहतुकीमुळे याठिकाणी भर रस्त्यावर चिखल झाल्याने वाहनचालकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
पोलिसांनी ट्रक रिकामे पाठवले
पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्याकडे याप्रकरणी स्थानिकांनी तक्रार करताच त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून तेथील सगळे ट्रक रिकामी पाठवल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी राजकीय दबाव असला तरी या खनिज वाहतुकीमुळे स्थानिकांत तीव्र असंतोष पसरल्याने कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला. पेडणे निरीक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही. खाण संचालक अरविंद लोलयेकर यांनी पोलिसांना ट्रक जप्त करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले याबाबत पोलिसांकडून मात्र कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. एकीकडे राजकीय दबाव व दुसरीकडे लोकांचा दबाव, यामुळे पोलिस या प्रकरणी कात्रीत सापडले आहेत.

दोनापावल येथे कामगाराचा खून पत्नीही गंभीर जखमी

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): दोनापावला येथील "लिलिया गेस्ट हाऊस' वरील सिद्धनाथ अलुरे (२०) या कामगाराचा गळा चिरून खून झाल्याची घटना आज दुपारी घडली. सदर कामगाराची पत्नी राजश्री (२०) हिलाही गंभीररीत्या जखमी करण्यात आले. तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या खून प्रकरणी याच गेस्ट हाउसमधून काही महिन्यापूर्वी कामावरून काढून टाकलेल्या श्यामसुंदर अंच्चन (२७) याला पोलिसांनी तात्काळ कांपाल येथून ताब्यात घेतले.
प्राप्त माहितीनुसार सिद्धनाथ अलुरे हा मूळ सोलापुर येथील या गेस्ट हाऊसवर रूम बॉय म्हणून कामाला होता. गेली पाच वर्षे तो इथे कामाला असून आपल्या पत्नीसोबत तो याच गेस्ट हाऊसवरील एका खोलीत राहत होता. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास श्यामसुंदर याने गेस्ट हाऊसमधील सिद्धनाथ याच्या पत्नीला फोनवरून खाली स्वागत कक्षाकडे बोलावले. ती खाली येत असल्याचे पाहून तो त्याच्या खोलीत गेला व तिथे त्याने सिद्धनाथ याच्यावर हल्ला करून त्याला खाली पाडले. खाली कुणीही नसल्याने राजश्री आपल्या खोलीत परत गेली असता तिथे सिद्धनाथ रक्ताच्या थारोळ्यात तिला दिसला. यावेळी श्यामसुंदर याने राजश्रीवरही हल्ला केला. तिचा गळा दाबल्याने ती बेशुद्ध झाली व खाली पडली. ती देखील मृत झाल्याचे समजून श्यामसुदंर याने तिथून पळ काढला. या घटनेची माहिती पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली व लगेच कांपाल येथून श्यामसुदंर याला ताब्यात घेतले.
श्यामसुदंर हा याच गेस्ट हाऊसवर व्यवस्थापक म्हणून कामाला होता. इथे एका कामगाराच्या पत्नीला मोबाईलवरून "एसएमएस' करतो, अशी तक्रार त्याच्यावर दाखल झाल्याने त्याला २९ जून रोजी अटकही झाली होती. यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. श्यामसुदंर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यापूर्वी त्याला साडेतीन वर्षे न्यायालयीन कोठडी झाली होती,अशी माहितीही पोलिसांनी दिली.आपल्याला कामावरून काढून टाकण्यामागे सिद्धनाथ व त्याची पत्नी जबाबदार आहे, या समजीतून त्याने सिद्धनाथचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

बनावट सही करून १.६४ कोटी काढले

म्हापसा, दि. २८ (प्रतिनिधी): फर्नांडिसवाडा शिवोली येथील फामाफा रेसिडन्सीमध्ये गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या कॉस्मिक कलेक्शन रिसॉर्ट प्रा. लि. या कंपनीच्या तिघा भागधारकांनी बनावट सही करून अन्य भागधारकाच्या एक्सिस बॅंकेतील खात्यातून १.६४ कोटी रुपये काढल्याप्रकरणी मोंतेरोवाडा हणजूण येथील गुरुदास उत्तम गोवेकर (४०) याला हणजूण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अन्य दोन संशयित फरारी आहेत.
हणजूण पोलिस स्थानकचे निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्जी सारीचव, एलेक्झॅंडर मामोदव (दोघेही रशियन) व गुरुदास उत्तम गोवेकर (हणजूण) या तीन भागधारकांनी कॉस्मिक कलेक्शन रिसॉर्ट प्रा. लि. या नावाने कंपनी सुरू केली. या कंपनीचा मुख्य सूत्रधार सर्जी सारीचव आपला कारभार अन्य दोन भागधारकांच्या स्वाधीन करून रशियाला निघून गेला. कामात व्यस्त असल्याने तो फोनवरून माहिती घेत होता. परंतु, २००८ सालापासून गोव्यातील भागधारक त्याचा फोन घेण्याचे टाळू लागल्यामुळे सर्जी याने ऍना रेजोस्टिका या महिलेला "पॉवर ऑफ ऍटर्नी' देऊन या व्यवहाराची माहिती घेण्यासाठी गोव्यात पाठवले.
या दरम्यान, एलेक्झॅंडर मामोदव व गुरुदास गोवेकर यांनी सर्जी सारीचव याच्या नावाने बनावट सहीचा राजीनामा करून त्याच्याऐवजी अनास्थासिया त्रिविक या रशियन महिलेला भागधारक म्हणून सामावून घेतले. या तिघांनी मिळून सर्जीच्या खात्यातील रक्कमही काढली. हा प्रकार लक्षात येताच ऍना रेजोस्टिका हिने पणजी नोंदणी कार्यालय तसेच हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंद करून गुरुदास याला अटक केली. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

संतांच्या सानिध्यात राहून जीवनाचे सोने करा

प. पू. सदानंदाचार्य पुण्यतिथी महोत्सवात ब्रह्मेशानंदाचार्यांचे ओजस्वी निरुपण
सावंतवाडी, दि. २८ (प्रतिनिधी): सद्गुरूच शिष्यांचे कल्याण करू शकतो. संतांच्या सानिध्यात राहून जीवनाचे सोने करा. कारण सद्गुरूंशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही, असे प्रतिपादन तपोभूमी कुंडईचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांनी परमधाम गुळदुवे येथे आज केले.
ब्रह्मीभूत सद्गुरू सदानंदाचार्य स्वामी मूर्ती प्रतिष्ठापना तथा ७४ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या आजच्या समारोपदिनी संप्रदायाच्या बंधूभगिनींसमोर आशीर्वचनपर बोलत होते. स्वामीजी म्हणाले, सदानंदाचार्य स्वामी हे सद्गुरू आहेत. त्यांच्या गुळदुवे येथील मठाच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. ही वास्तू एक परमरमणीय आध्यात्मिकस्थळ म्हणून प्रसिद्धीला पावली आहे. त्यामुळे आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. गुरू-शिष्याचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी भक्तांनी सकारात्मक संसारी जीवन, सद्गुणांचे आचरण, नीतिमूल्यांची जोपासना, सद्गुरूभक्ती हे आगळे अलंकार परिधान करावेत. आज अशा अलंकारांचीच समाजाला जास्त गरज आहे.
यावेळी व्यासपीठावर पूज्य आचार्यस्वामी, प. पू. धर्मेंद्रजी महाराज (पंचखंड पीठाधीश्वर - जयपूर राजस्थान), पुण्यातील स्वरूप योग प्रतिष्ठानाचे प. पू. माधवानंदाचार्य, गुळदुव्याच्या सरपंच जयश्री घोगळे, सुरेश शेट्ये, पोलिस निरीक्षक जगदीश शिंदे, दादासाहेब परुळेकर, माजी सभापती अशोक दळवी, बळवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सिद्धीविनायक सेवा ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष सुभाष मयेकर यांचा सत्कार प. पूज्य ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. केवळ शब्दांच्या बुडबुड्यांनी ज्ञानाची प्राप्ती होत नाही. त्यासाठी सद्गुरूंचा शोध घ्या. कारण सद्गुरूंखेरीज अस्सल ज्ञानप्राप्ती होणे कठीण असते, असे ओजस्वी विचार प. पू. माधवानंदाचार्य यांनी मांडले. या समारंभाला संप्रदायाचे पदाधिकारी सोमकांत नाणोस्कर, अध्यक्ष रामचंद्र नाईक, सचिव दिगंबर कालापूरकर यांच्यासह गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील असंख्य भाविक उपस्थित होते. संप्रदायाचे पदाधिकारी रमेश फडते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बागा समुद्रात बुडून मेरशीच्या तरुणचा मृत्यू

म्हापसा, दि. २८ (प्रतिनिधी): वाडी मेरशी येथील सुकूर डिसा (वय २५) हा आंघोळीसाठी आज बागा समुद्रात उतरला असता बुडून मरण पावला.
कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकूर हा आपल्या भावंडांसह बागा समुद्रावर आला होता. स्नानासाठी तो समुद्रात उतरला. मात्र जोरदार लाटांच्या प्रवाहांमुळे तो गटांगळ्या खाऊ लागला. तेथील जीव रक्षकांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तथापि तो निष्फळ ठरला. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास जीव रक्षकांनी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनेचा पंचनामा कळंगुट पोलिसांनी केला आहे. मृतदेह चिकित्सेसाठी बांबोळी येथे "गोमेकॉ'त पाठवण्यात आला आहे.