Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday, 8 June 2011

म्हापशातील जिल्हा इस्पितळ रखडण्यास कोण जबाबदार?

खंडपीठाने सरकारला खडसावले
पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) : आदेश देऊनही म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ का सुरू झाले नाही याची कारणे सरकारने द्यावीत, तसेच, हे इस्पितळ लोकांसाठी उपलब्ध होण्यास उशीर का होतो आणि त्याला कोण जबाबदार, त्या व्यक्तीच्या नावासकट प्रतिज्ञापत्र उद्या सकाळपर्यंत सादर करण्याचे आदेश एम्युकस क्युरी ऍड. सरेश लोटलीकर यांना देण्यात आले आहे. सदर आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेत.
जिल्हा इस्पितळ सुरू न होण्यास कोण जबाबदार आहे त्या व्यक्तीचे नाव सांगा असे न्यायाधीशाने सांगितल्यावर आरोग्य सचिवांना खंडपीठात येण्यास सांगितले जाईल, असे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी खंडपीठाला सांगितले. ‘तुम्ही त्यांनी बोलवा पण, न्यायालयाने आरोग्य सचिवांना हजर राहण्यास सांगितलेले नाही’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे सरकार आरोग्य सचिवांना पुढे करून यावर पडदा टाकण्याचा केलेला प्रयत्न विफल ठरला.
दि. ३० मेपर्यंत जिल्हा इस्पितळ सुरू केले जाणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने दिले होते. मात्र, इस्पितळाचा शुभारंभ झाला नाही. आज हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता खाजगी कंपनीला इस्पितळ चालवायला देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आलेली आहे. मात्र, पहिल्या निविदेच्या वेळी एकच कंपनी आल्याने पुन्हा नव्याने निवीदा काढण्यात आले. त्यावेळी तीन कंपन्यांनी अर्ज केले असल्याची माहिती ऍड. कंटक यांनी खंडपीठाला दिली.
ही सर्व माहिती प्रतिज्ञापूर्वक लेखी स्वरूपात सादर करा असे आदेश सरकारला दिले. तर, कोणत्या व्यक्तीमुळे हे काम पुढे जात नाही त्याच्या नावासह प्रतिज्ञापत्र सादर करा, असे या खटल्यात विशेष नियुक्त केलेले ऍड. सरेश लोटलीकर यांना खंडपीठाने सांगितले. उद्या पुन्हा हे प्रकरण सुनावणीस येणार असून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या कारवाईला सरकारला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No comments: