Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 15 January, 2011

ही तर आदिवासींची थट्टाच..

‘उटा’ च्या निदर्शनाने सरकार उघडे

- आदिवासी कल्याण खाते हा निव्वळ फार्स
- आदिवासी आयोगाची ‘फाईल’ धूळ खात
- आदिवासी खात्यात कर्मचारी भरती नाही
- अधिकार्‍यांकडे अतिरिक्त ताबा
- कार्यरत न झाल्यास पणजीत पुन्हा धडक


पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
सांतइनेज येथे सरकारी निवासी गाळ्यात खोलण्यात आलेले आदिवासी कल्याण खाते म्हणजे ‘एसटी’ समाजाची कॉंग्रेस आघाडी सरकारने केलेली निव्वळ थट्टाच आहे, याची प्रचिती आज ‘उटा’ संघटनेला आली. एकदम अडगळीच्या जागेत कोणत्याही कर्मचार्‍यांविना व पूर्णवेळ संचालकांविना हे खाते काय कामाचे, असा सवाल यावेळी संघटनेतर्फे करण्यात आला. सरकार ‘एसटी’ समाजाच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील व पुढील परिणामांना पूर्णतः सरकारच जबाबदार ठरेल, असा इशारा ‘उटा’चे निमंत्रक प्रकाश वेळीप यांनी दिला.
‘युनायटेड ट्रायबल अलायन्स असोसिएशन’तर्फे (उटा) आज सांतइनेज येथे नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या आदिवासी कल्याण खात्यासमोर निदर्शने करण्यात आली. या खात्याच्या संचालकपदाचा आजच ताबा घेतलेले सनदी अधिकारी टी. एस. टग्गू व साहाय्यक संचालक सांतान फर्नांडिस हजर होते. दरम्यान, श्री. टग्गू यांच्याकडे पाच खात्यांचा ताबा असून श्री. फर्नांडिस हे समाज कल्याण खात्याचे साहाय्यक संचालक आहेत. या खात्यासाठी आपणदिवसातून फक्त दोन ते तीन तास वेळ देऊ शकतो, अशी कबुली श्री. टग्गू यांनी मोर्चेकरांना दिली. अरुणाचल प्रदेशातील अनुसूचित जमातीचेच घटक असलेले सनदी अधिकारी श्री. टग्गू यांनी यावेळी मोेर्चकरांना आपण या खात्याचा कारभार कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. सरकारी प्रक्रियेला निश्‍चितच वेळ लागतो पण ‘उटा’ संघटनेच्या भावनांची आपण कदर करतो व हा लढा त्यांच्या न्याय्य हक्कांचाच आहे, अशी कबुलीही त्यांनी दिली.
दरम्यान, ‘एसटी’ समाजातील सुमारे चार हजार शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज सरकारकडे पडून आहेत. जातीचा दाखला मिळवण्यासाठीचे अर्जही अद्याप निकालात काढले जात नाहीत, अशी तक्रार यावेळी गोविंद गावडे यांनी केली. जातीचे दाखले देण्याचा अधिकार संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडे आहे व त्यांनी या प्रक्रियेला गती मिळवून द्यावी, असेही श्री. टग्गू यांनी यावेळी सांगितले.
या खात्यासाठी कार्मिक खात्याकडून तात्पुरत्या पद्धतीवर कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सुमारे १८ कर्मचारी या खात्यासाठी मंजूर झालेले आहेत. या गाळ्यात १८ कर्मचारी बसू शकतील काय, असा सवाल केला असता मात्र ते गप्पच राहिले. कर्मचार्‍यांची क्षमता जाणून घेतल्यानंतरच त्यांच्याकडे कामाची जबाबदारी सोपवता येईल व त्यासाठी आपल्याला काही अवधी लागेल, असे श्री. टग्गू म्हणाले. केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या ‘एसटी सबप्लान’प्रमाणे प्रत्येक सरकारी खात्याने आपल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील १२ टक्के निधी ‘एसटी’ समाजासाठी खर्च करण्याची गरज आहे. एकूण अर्थसंकल्पातील १२ टक्के निधी आदिवासी कल्याण खात्याकडे वळवून त्यामार्फत या घटकासाठी योजना राबवल्या तर अत्यंत चांगले होईल व या योजनांचे एकसुत्रिकरण होईल, असेही यावेळी श्री.टग्गू यांनी मान्य केले.

‘एसटी’ आयोगाचे काम जैसे थे
‘एसटी’ आयोग स्थापन करण्यासंबंधी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेले आश्‍वासन फोल ठरले आहेच परंतु सरकार दरबारी ही फाईल अजिबात पुढे सरकत नसल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. या आयोगाबाबत अद्याप काहीच माहिती सरकारकडून मिळालेली नाही, असे खुद्द श्री. फर्नांडिस यांनी मान्य केले. दरम्यान, आमदार रमेश तवडकर यांनी सरकारच्या या बेपर्वाईचा निषेध करून सरकार या समाजाची थट्टामस्करी करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पणजीत न भूतो असा मोर्चा आणून या समाजाने आपली ताकद दाखवली आहेच परंतु एवढे करूनही जर सरकार या समाजाकडे दुर्लक्ष करीत असेल तर मात्र यापुढे या आदिवासी लोकांना शस्त्रे धारण करूनच रत्यावर उतरण्यास सरकार भाग पडेल व यातून होणार्‍या रक्तपाताला पूर्णतः सरकार जबाबदार ठरेल, असा इशाराही श्री. तवडकर यांनी दिला.

महापालिकेत ‘एसटी’ आरक्षणासाठी वटहुकूम जारी करा - उटाची मागणी

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
पणजी महापालिका निवडणुकीत आदिवासी घटकांसाठी १२ टक्के जागा राखीव असणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. राज्य सरकारने पणजी महापालिका कायदा, २००२ च्या १० व्या कलमात दुरुस्ती करून या राखीवतेसंबंधी ताबडतोब वटहुकूम जारी करावा, अशी आग्रही मागणी ‘ट्रायब्स ऑफ गोवा’ संघटनेचे प्रवक्ते ऍड. गुरू शिरोडकर यांनी केली. आज ‘उटा’ संघटनेचे निमंत्रक प्रकाश वेळीप व आमदार रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिका संचालक तथा राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन तशीच मागणी केली.
पणजी महानगरपालिका कायदा, २००२ साली अधिसूचित करण्यात आला. या काळात अनुसूचित जमात राखीवतेची अधिसूचना जारी करण्यात आली नव्हती व त्यामुळे या घटकाचा समावेश इतर मागासवर्गीयांत धरूनच २७ टक्के राखीवता ‘ओबीसी’साठी ठेवण्यात आली होती. केंद्र सरकारने ९ जाने. २००३ रोजी अनुसुचित जमाती राखीवतेबाबत अधिसूचना जारी केली व त्यामुळे विद्यमान राज्य सरकारने यानुसार महापालिका कायद्यात आवश्यक दुरुस्ती करून ही राखीवता लागू करण्याची गरज होती. एखाद्या हॉटेलच्या संरक्षणार्थ जर वटहुकूम जारी केला जाऊ शकतो तर ‘एसटी’ समाजाला राखीवता मिळवून देण्यासाठी देखील वटहुकूम जारी करणे शक्य आहे, असेही पर्रीकर म्हणाले.
दरम्यान, ‘उटा’ संघटनेच्या शिष्टमंडळाने आज पालिका संचालक दौलत हवालदार व राज्य निवडणूक आयोगाचे सचिव श्री.परब यांची भेट घेतली. पालिका कायद्यात ‘एसटी’साठी वेगळी राखीवतेची तरतूद नसल्याने ही राखीवता जाहीर झाली नाही, असे कारण सचिवांनी दिले. यावेळी शिष्टमंडळाचे नेते रमेश तवडकर यांनी राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदास्सीर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शिष्टमंडळाला पुढील आठवड्यात चर्चेसाठी पाचारण केले असून त्यावेळी याविषयावर सखोल चर्चा करून तोडगा काढला जाईल, अशी माहिती आमदार तवडकर यांनी दिली.
पणजी महापालिकेच्या एकूण तीस प्रभागांपैकी १२ टक्के आरक्षणानुसार ४ प्रभाग ‘एसटी’साठी राखीव ठेवावे लागणार आहेत. आता ही राखीवता लागू झाली तर पुन्हा एकदा आपले पॅनल यापूर्वीच जाहीर केलेल्या बाबूश मोन्सेरात यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. ताळगावात मोठ्या प्रमाणात ‘एसटी’ समाजाचे लोक राहत असल्याने या आरक्षणाला विरोध करणे बाबूश यांना अजिबात परवडणारे नाही. या आरक्षणाचा विषयही या निवडणूक काळात बराच गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे आरक्षण लागू करण्यासाठी वटहुकूमच जारी करणे सरकारला भाग आह.

येत्या अधिवेशनात सरकारच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल करूः पर्रीकर

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
राज्यातील विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार पूर्णतः भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. येत्या विधानसभा अधिवेशनाच्या निमित्ताने विविध खात्यांतील मिळून सुमारे ९०० प्रश्‍न दाखल करण्यात आले असून त्याद्वारे सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा पोलखोलच करू, अशी डरकाळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी फोडली. जनतेचे संरक्षण व कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेले पोलिसच सुपारी घेतात की काय, अशी भयावह परिस्थिती राज्यावर ओढवली असून त्याला गृहमंत्री रवी नाईक यांच्यासह मुख्यमंत्री दिगंबर कामत तेवढेच कारणीभूत आहेत अशी टीकाही पर्रीकर यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. पर्रीकर बोलत होते. येत्या ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०११ पर्यंत हिवाळी अधिवेशन भरणार आहे. राज्यपालांचे अभिभाषण व खाजगी कामकाज वगळता केवळ तीन दिवस सरकारी कामकाज चालेल. अधिवेशनाचा अल्प कालावधी म्हणजेच या सरकारला सभागृहाला सामोरे जाण्याचे धाडस नाही व हे सरकार पळपुटे असल्याचे दर्शवते. या प्रकारातून सरकारच्या अलोकशाही वृत्तीचेच दर्शन घडते असेही पर्रीकर म्हणाले. ३१ डिसेंबरपूर्वी भूसंपादन धोरण जाहीर करू, अशी घोषणा केलेल्या मुख्यमंत्र्यांना या घोषणेची आठवण तरी असेल की कोण जाणे. केवळ वारेमाप आश्‍वासने देऊन जनतेला फसवणारे हे निष्क्रिय सरकार ठरले आहे, असा घणाघाती आरोपही पर्रीकर यांनी केला. मागील अधिवेशनानंतरच्या गेल्या सहा महिन्यांतील सरकारच्या असंख्य भानगडी बाहेर काढण्यासाठी किमान पाच हजार प्रश्‍न विचारावे लागतील, अशी मल्लिनाथीही पर्रीकर यांनी केली.
खुद्द गृहमंत्र्यांच्या पुत्रावरच ड्रग प्रकरणी संशय घेतला जातो. विविध गुन्हेगारी प्रकरणांत पोलिसांचाच सहभाग असल्याची प्रकरणे उघडकीस येत असल्याने पोलिस खात्याची विश्‍वासार्हताच लोप पावली आहे. विशेष कामगिरी न केलेल्या किंवा अनेक प्रकरणे दाबून ठेवण्यात पटाईत असलेल्या अधिकार्‍यांना मुख्यमंत्री पदके बहाल केली जात असतील तर गुडलर किंवा अरुण देसाई यांच्यासारखी मनोवृत्ती तयार होणार नाही तर काय, असाही शेराही पर्रीकर यांनी मारला. गृह खात्याच्या या खच्चीकरणाला गृहमंत्री व मुख्यमंत्री जबाबदार आहेत व त्यांना जरातरी शरम वाटत असेल तर त्यांनी राजीनामा देणेच योग्य ठरेल, अशी पुस्तीही पर्रीकर यांनी जोडली. याप्रकरणी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेणार आहे. राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात राज्यातील ड्रग प्रकरणाची दखल घ्यावी, अशी विनंती त्यांना केली जाईल, असेही पर्रीकर म्हणाले.

लोकायुक्त विधेयक मंजूर करा
भ्रष्टाचारावर आळा बसायचा असेल तर लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळायलाच हवी. दक्षता खाते हे पूर्णतः सरकारच्या आधिपत्याखाली येते व ते सरकारकडून ‘मॅनेज’ केले जाते. येत्या विधानसभेत सरकारच्या विविध खात्यांतील भ्रष्टाचारांचे पाढेच वाचले जातील, असेही पर्रीकर म्हणाले. ‘सेझ’ भूखंड वितरणात कोट्यवधी रुपयांची दलाली घेण्यात आली आहे व त्याचा सोक्षमोक्ष लोक लेखा समितीसमोर लवकरच लागेल, असेही पर्रीकर म्हणाले. महागाईवर सरकारचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नसल्याने सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. सरकारचे नागरी पुरवठा खाते निष्क्रिय ठरले आहेच पण फलोत्पादन महामंडळाचा प्रयत्नही अपुरा पडला आहे, अशी नाराजीही पर्रीकर यांनी व्यक्त केली.

पोलिसच सुपारी घेतात की काय?
उच्चसुरक्षा क्रमांकपट्टी प्रकरणी बनावट क्रमांकपट्टी तयार करीत असल्याची एक तक्रार नोंद झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांना दिल्लीत पकडून विमानातून गोव्यात आणले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून हा गुन्हा फेटाळण्यात आला आहे व पोलिसांवर दंडात्मक कारवाई सुचवली आहे. संशयितांना विमानातून आणण्याचा खर्च पोलिस खात्याने केला नाही व त्यामुळे संबंधित कंपनीकडूनच पोलिसांना हाताशी धरून प्रतिस्पर्धी कंपनीवर कारवाई करण्याचा हा प्रकार पोलिसांनीच सुपारी घेण्यासारखा आहे, असे पर्रीकर म्हणाले. पोलिसांवर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्यानेच ही दारुण अवस्था पसरली आहे व त्याला गृहमंत्री व मुख्यमंत्री कारणीभूत आहेत, असा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला.

‘एनएसयुआय’च्या मागणीला पाठिंबा
ड्रग प्रकरण ‘सीबीआय’कडे सोपवण्याची मागणी करणारी एक याचिका ‘एनएसयुआय’ या कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण ‘सीबीआय’ कडेच सोपवावे ही भाजपचीही मागणी असल्याने या मागणीला भाजपचा पाठिंबा राहणार असल्याचे पर्रीकर म्हणाले. भाजपतर्फे याप्रकरणी वेगळी याचिका सादर करण्याची तयारी सुरू असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, निष्क्रिय रवी नाईक यांचे गृह खाते काढून घेण्याची मागणी खुद्द कॉंग्रेसचाच एक घटक करीत आहे ही सरकारसाठी लाजिरवाणीच गोष्ट आहे, असे ते म्हणाले. ड्रग प्रकरणी चौकशीसाठी ‘विशेष चौकशी पथक’ स्थापन करणे हा केवळ फार्स असून ‘सीबीआय’ चौकशी ओढवू नये म्हणूनच हा खटाटोप असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. मूर्तिभंजन प्रकरणी स्थापन केलेल्या ‘एसआयटी’ चे काय झाले, असा सवाल करून त्यांनी गृह खात्याची फिरकीही घेतली.

सासोली घाटीत स्ङ्गोटकांचा साठा जप्त

गोव्यातील मंत्र्याच्या खाणीसाठीचा माल
सावंतवाडी, दि. १४ (प्रतिनिधी)
सावंतवाडी - सिंधुदुर्ग पोलिसांनी आज सकाळी सावंतवाडी दोडामार्ग रस्त्यावरील सासोली घाटीत (ता. दोडामार्ग) स्ङ्गोटकांचा मोठा साठा पकडला. ही स्ङ्गोटके गोव्यातील एका मंत्र्याच्या खाणीसाठी पुरवली जाणार होती, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी राजकीय दबावाखाली पकडलेल्या संशयीतांची जबानी फिरवून ती वाळपईतील स्टोन क्रशरसाठी पुरविली जात होती, असे भासवण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो (एम. एच. ०७ बी. ४२४२) जप्त केला असून यातील चालकासह दोघांना अटक केली आहे. या स्फोटक साठ्यात १५०० डिटोनेटर, जिलेटिनच्या प्रत्येकी ५०० किलोच्या १५ पिशव्या, अमोनिअम नायट्रेट आदी मालाचा समावेश आहे. अशा पद्धतीची स्ङ्गोटके नेली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक प्रभाकर भागवत आणि दोडामार्गचे निरीक्षक अविनाश काळदाते यांना मिळाली होती. ते बरेच दिवस या स्फोटक वाहतूकीच्या मागावर होते. अशा पद्धतीचा साठा घेऊन टेम्पो निघाल्याची खबर मिळताच त्यांनी सोसोली घाटी येथे सापळा रचून ही कारवाई केली. साधारण एक तालुका बेचिराख होईल, इतक्या क्षमतेची ही स्ङ्गोटके असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यात अटक केलेल्यांमध्ये अनिल जगन्नाथ धोपेश्‍वर (५०) व प्रेमलाल धनाजी जाट (३७) या आकेरी ता. कुडाळ यांचा समावेश आहे. दरम्यान, ही स्फोटके पकडताच वाहनातील एका व्यक्तीकडून गोव्यातील एका मंत्र्यांच्या खाणीसाठी ती नेली जात असल्याचे कारण पुढे करून संशयीतांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला होता, अशीही खबर आहे. आता ही स्फोटके नक्की कुठल्या मंत्र्यांच्या खाणीवर नेली जात होती याची माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला असला तरी त्यात उत्तर गोव्यातील एका कॉंग्रेस नेत्याच्या नावाची चर्चा आहे, अशीही खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

आयाला व झरिनाचेही ड्रग माफियांशी संबंध

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)
ड्रग माफिया ‘दुदू’ याची बहीण ‘आयाला’ व प्रेयसी ‘झरिना’ कशा पद्धतीने गोव्यात ड्रग व्यवसायात गुंतलेल्या आहेत, याचा भांडाफोड झाला असून दुदू आणि अन्य ड्रग डिलरबरोबर झोडत असलेल्या पार्टीची छायाचित्रे हाती लागली आहेत.
हणजूण येथे दुदू राहत असलेल्या भाड्याच्या घरात अनेक ड्रग डिलर्ससोबत अमली पदार्थाच्या पार्टीची ही छायाचित्रे आहेत. अमली पदार्थ विभागाने आपल्या भावाला खोट्या प्रकरणात गुंतवल्याचा दावा करणार्‍या आयाला व दुदूच्या प्रेयसीचे पितळ उघडे पडले आहे. नुकतेच गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी घेतलेल्या जबानीत आम्ही केवळ उपनिरीक्षक सुनील गुडलर याचे स्टिंग ऑपरेशन करण्यासाठीच खास गोव्यात आलो होतो, असेही त्यांनी आपल्या जबानीत म्हटले होते.
हाती लागलेल्या या छायाचित्रांमुळे आयाला आणि दुदू याची प्रेयसी २००९ साली हणजूण येथे झालेल्या अमली पदार्थाच्या पार्टीत उपस्थित असल्याचे हे पुरावे उघड झाले आहेत. यात अनेक ड्रग डिलरही सहभागी झाल्याचे दिसत आहे. या पार्टीत बिनधास्तपणे गांजा आणि चरसचे सेवन केले जात असून समोरच्या टेबलवर ‘चिलीम’ आणि मद्याच्या बाटल्या स्पष्टपणे दिसत आहेत.
छायाचित्रात सोफ्यावर बसलेले‘ऍलन’ आणि ‘बाकूशा’ हे ड्रग डिलरही या पार्टीत सामील झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऍलन हा दुदू याचा साथीदार असून बाकूशा याला मनाली पोलिसांनी अमली पदार्थाच्या एका मोठ्या साठ्यासह अटक केली आहे. अलीरन हाही मोठा ड्रग डिलर या पार्टीत उपस्थित होता. एका ड्रग प्रकरणात इस्रायली पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर १९९९ ते २००२ पर्यत त्याला तीन वर्षांची शिक्षाही झाली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी गोव्यात प्रवेश केला असून सध्या तो हणजूण येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. तो सध्या किनारी भागात अमली पदार्थाच्या विक्रीचा जोरदार व्यवसाय करत असल्याचीही माहिती मिळाली आहे.
‘दुदू’ याला या ड्रग प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी सध्या आयाला आणि झरिना यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी एका पोलिस कार्यक्रमात गोव्यात एकही ड्रग माफिया नाही, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यामागील उद्देशही आता जनतेच्या लक्षात यायला लागला आहे.

विदेशी बँकांतील ठेवीदारांची नावे गुप्त कशासाठी?

-सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्‍न
नवी दिल्ली, दि. १४ - स्विस व जर्मन बँकांमध्ये पैसे ठेवलेल्या भारतीय नागरिकांची नावे जाहीर करण्यात सरकारला नेमकी कसली अडचण आहे, असा प्रश्‍न आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला. न्या. बी. सुदर्शन रेड्डी व न्या. एस.एस.निज्जर यांच्या खंडपीठाने ही माहिती का दडविली जाते अशी विचारणा केली.
परदेशात पैसे ठेवणे हा करासंबंधीचा मामला नाही. तो गंभीर प्रकार आहे. अन्य सर्व बाबी बाजूला ठेवून जर्मन अधिकार्‍यांनी गुंतवणुकीसंबंधी दिलेल्या माहितीवर विचार करुया, असे न्यायमूर्तींनी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रह्मण्यम यांना उद्देशून म्हटले. सरकारकडे नावे नसतील, तर ती वेगळी गोष्ट आहे, असे म्हणताना, नावे असतील तर ती का उघड केली जात नाहीत, असा न्यायालयाच्या प्रश्‍नाचा रोख होता. यावर बोलताना, सरकारकडून निर्देश घेऊनच पुढील सुनावणीत बोलेन, असे सांगून सुब्रह्मण्यम यांनी सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली. येत्या बुधवारी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. याचिकादार राम जेठमलानी यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अनिल दिवाण यांनी बाजू मांडताना, सरकार हेतूपुरस्सर नावे उघड करीत नसल्याचा आरोप केला. भारत व जर्मनी या देशांमधील दुहेरी कर कराराचा चुकीचा उपयोग केला जात आहे, असे सांगून दिवाण यांनी हा सारा मामला काळ्या पैशांशी संबंधित असल्याचा युक्तिवाद केला.
जर्मनीत लिसन्संटमध्ये असलेल्या भारतीयांच्या खात्यांसंबंधात माहिती देण्याची तयारी जर्मन सरकारने दाखविल्याच्या वृत्तानंतर जेठमलानी यांनी याचिका सादर करून केंद्र सरकारने त्या दिशेने प्रयत्न करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती केली आहे. गैरमार्गाने जर्मनीत गेलेले भारतीयांचा १५० अब्ज डॉलर्स परत आणण्याचा आदेश न्यायालयाने सरकारला द्यावा, अशी मागणी जेठमलानींनी केली आहे. २६ करदात्यांच्या १२ संस्थांतर्फे स्विस व जर्मन बँकांमध्ये गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती यापूर्वी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मागच्या सुनावणीवेळी दिली होती. लिसन्संटमधील १५ बॅकांपैकी सात बँका स्विस आहेत. १६० किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे ठिकाण स्वित्झर्लंड व ऑस्ट्रिया या देशांनी वेढले असून, त्याची लोकसंख्या सुमारे ६५,००० एवढी आहे.

Friday, 14 January, 2011

जीवनाच्या रंगमंचावरून प्रभाकरपंतांची ‘एक्झिट’

पुणे, दि. १३
‘तो मी नव्हेच’मधला लखोबा लोखंडे, ‘इथे ओशाळला मृत्यू’मधला शहेनशहा औरंगजेब, ‘अश्रूंची झाली फुले’मधला प्रा. विद्यानंद आदी भूमिका आपल्या समर्थ अभिनय कौशल्याने अजरामर करणारे ज्येष्ठ रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांचे गुरुवारी पुण्यात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
गेल्या काही दिवसांपासून प्रभाकर पणशीकर यांच्यावर दीनानाथ मंगेशकर इस्पितळात उपचार सुरू होते. त्यांच्या हृदयाच्या कार्यात अडथळे येत होते. वय जास्त असल्याने अवयवांची कार्यक्षमताही कमी झाली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, हळूहळू त्यांच्याकडून औषधोपचाराला मिळणारा प्रतिसाद कमी कमी होत गेला आणि आज संध्याकाळी या नटश्रेष्ठाने जीवनाच्या रंगमंचावरून ‘एक्झिट’ घेतली. उद्या शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आपल्या दमदार आवाजाने आणि अस्खलित वाणीतील शब्दङ्गेकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे ‘नटसम्राट’ म्हणजे प्रभाकर पणशीकर ऊर्ङ्ग पंत. वेदशास्त्रसंपन्न घराण्यात जन्माला आलेल्या पंतांनी नाटक या ‘पंचम वेदा’ची आराधना करून रंगभूमीची सेवा तर केलीच पण, त्याचबरोबरीने रसिकांना गेली पंचावन्न वर्षे अपार आनंद दिला.
वेदशास्त्रसंपन्न चतुर्वेदी दशग्रंथी विष्णूशास्त्री पणशीकर यांच्या घरामध्ये १४ मार्च १९३१ रोजी प्रभाकर पणशीकर यांचा जन्म झाला. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले खरे पण, महाविद्यालयात जाण्याचा योग काही आलाच नाही. शाळेत असतानाच नाटकाचे वेड असलेल्या प्रभाकरपंतांनी वेगवेगळ्या कंपन्यांची नाटके पाहिली. नंतर ठाकूरद्वारच्या गणपती उत्सवात ती नाटके बसविणे आणि त्यामध्ये काम करणे हा त्यांचा छंदच बनला. या वेडापायी त्यांनी घर सोडले. मुंबईच्या रेल्वे कल्चरल ग्रुपतर्ङ्गे नाटक बसवत असताना एका बड्या अधिकार्‍याकडून त्यांना रेल्वेत नोकरी करण्याची विचारणा झाली. परंतु, नाट्यवेडापायी त्यांनी ती संधी नाकारली. याच काळात १३ मार्च १९५५ रोजी ‘राणीचा बाग’ या नाटकात भूमिका करताना त्यांनी प्रथम चेहर्‍यास रंग लावला. अनंत अडचणी, विरोधांना तोंड देत आणि बेकारीचे चटके सोसत वयाच्या पंचविशीत त्यांनी मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेमध्ये प्रवेश मिळविला. ‘भटाला दिली ओसरी’ या नाटकातील नवकवीची भूमिका त्यांनी सङ्गाईने आणि ताकदीने उभी करून भविष्यातील उत्तम नट आहोत याची नांदी दिली.
खरे म्हणजे १३ मार्च १९५५ या दिवशी नारायणराव बालगंधर्वांनी रंगभूमीचा निरोप घेतला आणि त्याच दिवशी प्रभाकर पणशीकर या तरुणाने व्यावसायिक नाटकात पदार्पण केले, हा योगायोगच म्हणावा लागेल. कारण, बालगंधर्वांनी आपल्या अभियनसामर्थ्याने मराठी रसिकांवर जसे गारुड केले होते, तसेच पुढे प्रभाकर पणशीकर या अवलियानेही रसिक मनावर अधिराज्य गाजवले. आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग १९६२ साली झाला आणि त्यात प्रभाकर पणशीकरांनी साकारलेल्या पाच खणखणीत भूमिकांनी तमाम रसिकांना अक्षरशः वेड लावले. ‘हिच्चि गुंडु वारिमुंडु संकट कुंडु महादेवा’ म्हणत त्यातला लखोबा लोखंडे सर्वप्रथम महाराष्ट्रीय जनतेसमोर हात जोडून उभा राहिला, तेव्हा सगळ्यांनीच पणशीकरांसमोर हात टेकले. मराठी रंगभूमीवरील एका देदीप्यमान कालखंडाची ती सुरुवात होती.

गृह खात्याच्या निष्क्रियतेमुळे राज्याच्या प्रतिमेला तडा - प्रा. पार्सेकर

पणजी, दि. १३ (विशेष प्रतिनिधी)
गोव्याला निसर्गसंपन्न व शांतताप्रिय राज्य म्हणून आजवर ओळखले जात होते. परंतु, अलीकडे राज्यात होत असलेल्या चोर्‍या, खून, मंदिरातील मूर्तिभंजनाचे प्रकार व बलात्कारासारख्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांनी राज्याच्या या प्रतिमेला तडा दिला आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा साफ बोजवारा उडाला असून ज्यांच्या हाती सुरक्षेची दोरी, त्याच गृहखात्याचे पोलिस अमली पदार्थांच्या व्यवहारात बरबटले आहेत. त्यामुळे सध्याच्या सरकारच्या हाती गोवा सुरक्षित राहिलेला नाही हेच यातून सिद्ध होत असल्याची टीका मांद्रेचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे केली.
दै.‘गोवा दूत’शी बोलताना पार्सेकर यांनी, राज्याची जी प्रतिमा सत्ताधारी सरकारने उभी केली आहे ती अत्यंत धोकादायक असून भविष्यात या राज्याकडे पर्यटक फिरकतील की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत असल्याचे नमूद केले. गोवा हा एरवी शांतताप्रिय प्रदेश म्हणून गणला जात होता. मात्र अलीकडच्या काही घटना पाहता गोव्याची ही ओळख अकार्यक्षम सरकारमुळे पुसली गेल्याचे ते म्हणाले.
लोखंडाला जोपर्यंत गंज चढलेला नसतो तोपर्यंत ते मजबूत असते. पण एकदा का गंज चढला की मग मात्र त्याचे काही खरे नसते, ते कधीही मोडून पडू शकते. अशीच अवस्था विद्यमान सरकारच्या गृह खात्याची झाली असल्याचे सांगून पार्सेकर यांनी गृह खात्यावर हल्लाबोल केला. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी जरी पोलिस खात्यावर असली तरी या खात्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम गृह खात्याच्या अखत्यारीत येते. तथापि, हे खातेच पुरते गंजून गेले असून त्याचा डोलारा पूर्णपणे कोसळला आहे. या खात्याचे मंत्री रवी नाईक जरी उडवाउडवीची उत्तरे देत असले तरी मंदिरातील चोर्‍या व तोडफोडीच्या वाढत्या प्रकरणांमुळे जनतेच्या भावनांना फार मोठा धक्का पोचल्याची टीका पार्सेकर यांनी यावेळी केली.
राज्यातील गुन्हेगारी घटना या गोमंतकीयांच्या मनावर विपरीत परिणाम करणार्‍या ठरल्या असून दूरगामी विचार करता ही स्थिती राज्यासाठी धोकादायक आहे. सामान्यांचे जीवनच धोक्यात आल्यासारखी परिस्थिती आज उद्भवली असून आम आदमीचे सरकार म्हणून टेंभा मिरविणार्‍यांचा आम आदमीसाठीचा नाटकी कळवळा यातून उघड होत असल्याचा टोला पार्सेकर यांनी हाणला. गोव्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचा आरोप करून या राज्यात सरकार नावाची गोष्ट तरी अस्तित्वात आहे का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
गुन्हेगारी स्वरूपाची जी प्रकरणे नोंद होतात त्याहीपेक्षा कितीतरी अधिक गुन्हे राज्यात घडत असतात. तथापि, ती नोंद केल्यास गुन्ह्यांची संख्या फुगेल व राज्यातील कायदा - सुव्यवस्था अबाधित असल्याचा निर्माण केलेला फुगा फुटेल म्हणूनच त्यांपैकी बर्‍याच प्रकरणांचा बाहेरच्या बाहेर निकाल लावला जातो असा आरोपही पार्सेकर यांनी केला. सामान्यांच्या या सरकारकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नसून सरकाराप्रति त्यांचा संताप आंदोलने, निदर्शने, मोर्चे याव्दारे गेल्या काही वर्षांपासून सतत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्याची ही डागाळलेली प्रतिमा बदलणे ही काळाची गरज बनली आहे. अर्थात त्याला राजकीय परिवर्तन हाच पर्याय असल्याचे सांगताना ते म्हणाले की, जनतेप्रति वेगळा दृष्टिकोन बाळगणारे संवेदनशील सरकार सत्तेवर यायला हवे. विद्यमान सरकारची ‘कार्यक्षमता’ एव्हाना गोमंतकीयांना पुरती कळून चुकली असल्याने सत्तेच्या गादीवर पहुडलेल्यांनी मोठमोठी स्वप्ने पाहू नयेत, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
गोव्यात कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रात सध्या जे अराजक माजले आहे, त्याला सर्वस्वी गृहमंत्री रवी नाईक हेच जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला. गृह खात्याचा कारभार सांभाळण्याचे काम त्यांना समर्थपणे पेलता आलेले नाही. त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांचे नातेवाईकही नको तेवढे सक्रिय झाल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

भूमिपुत्रांची घोर उपेक्षा ‘उटा’चे आज राजधानीत धरणे

पणजी, दि. १३(प्रतिनिधी)
राज्य सरकारकडून अनुसूचित जमातीची घोर उपेक्षा सुरू आहे. अनुसूचित जमाती कल्याण खाते व अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्याबाबत सरकारने दिलेले आश्‍वासन हवेतच विरल्याने आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या समाजाच्या नेत्यांनी घेतला आहे. ‘युनायटेड ट्रायबल अलायन्स असोसिएशन’ (उटा)तर्फे सरकारच्या या बेफिकीर वृत्तीचा निषेध करण्यात आला असून उद्या १४ रोजी धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारने ‘एसटी’ समाजाची फसवणूक चालवली आहे. केंद्र सरकारने आदेश देऊनही अद्याप ‘एसटी’ आयोग व ‘एसटी’ कल्याण खाते कार्यरत करणे राज्य सरकारला जमत नाही यावरून सरकारची या समाजाप्रति असलेली असंवेदनशील वृत्तीच दिसून येते, अशी प्रतिक्रिया संघटनेचे निमंत्रक माजी मंत्री प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केली. यापूर्वी एकदा विधानसभेवर मोर्चा आणून संघटनेने आपली ताकद दाखवली होती. सरकारने त्यावेळी दिलेले लेखी आश्‍वासन पूर्ण केले नाही. त्यानंतर डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्णय संघटनेतर्फे घेण्यात आला असता मुख्यमंत्री कामत यांनी ‘उटा’च्या प्रतिनिधींना खास आमंत्रित करून नव्याने आश्‍वासन दिले होते. पण ते देखील हवेतच विरले. आता मात्र भूमिपुत्रांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून या सरकारला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते हे यावरून स्पष्ट झाल्याचे श्री. वेळीप म्हणाले.
सांतइनेज येथील एका सरकारी वसाहतीच्या खोलीत ‘एसटी’ कल्याण खात उघडण्यात आले आहे. अत्यंत अडगळीच्या या जागेत एका खोलीबाहेर नुसता फलक लावला म्हणजे खाते सुरू झाले, असे भासवून सरकार भूमिपुत्रांना मूर्ख बनवते आहे काय, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सरकारच्या या बेपर्वा वृत्तीविरोधात या समाजात प्रचंड असंतोष पसरला असून पुन्हा एकदा सरकारला जागे करण्यासाठी उद्या १४ रोजी संघटनेचे काही निवडक पदाधिकारी राजधानीत धरणे धरणार आहेत. हे धरणे धरूनही सरकारला जाग येत नसेल तर मात्र राज्यातील संपूर्ण समाजच रस्त्यावर उतरेल हे सरकारने ओळखून असावे, असा इशाराही यावेळी श्री. वेळीप यांनी दिला. गोवा आपल्या मुक्तीचा सुवर्णवर्षी महोत्सव साजरा करीत असताना इथल्या भूमिपुत्रांवरच असा अन्याय होत असेल तर तो कदापि खपवून घेतला जाणार नाही, असेही ते म्हणाले. विविध सरकारी खात्यांत मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू आहे; पण या समाजासाठी राखीव असलेला अनुशेष मात्र अजूनही भरला जात नाही. केवळ राजकीय भाषणांतून या समाजाचा उदोउदो करणार्‍या सरकारच्या पोकळ घोषणांमागील कारस्थान समाजाच्या चांगल्याच लक्षात आले आहे व त्यामुळे यापुढे या समाजाला मूर्ख समजणार्‍यांनी सावध राहावे, असा इशाराही त्यांनी दिला. सरकार जाणीवपूर्वक या समाजाची गळचेपी करीत असून त्यामुळे निर्माण होणार्‍या उद्रेकाला पूर्णतः सरकार जबाबदार ठरेल, असेही यावेळी श्री. वेळीप यांनी बजावले आहे.

विकलांग पुरस्कारातही घोटाळा?

सुदिन ढवळीकर यांच्या विरोधात तक्रार

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) ः राज्य विकलांगतेचा पुरस्कार देताना सरकारने मोठा अन्याय तथा घोटाळा केला असल्याचा दावा करून राज्य विकलांग हक्क संस्थेने समाजकल्याण मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या विरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार सादर केली आहे.
संस्थेचे अध्यक्ष आवेलिनो डीसा यांनी ही तक्रार केली सादर केली असून नियमात बसत नसलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आला असल्याचा आरोप सदर तक्रारीत करण्यात आला आहे. त्याप्रमाणे हा पुरस्कार मागे घेण्यासाठी समाज कल्याण खात्याचे सचिव राजीव वर्मा यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आल्याची माहितीही श्री. डीसा यांनी दिली. दरम्यान, प्रथमदर्शनी ही तक्रार दखलपात्र वाटत नसली तरीही तिचा अभ्यास केला जात आहे, असे पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी सांगितले.
५० टक्के अपंग असलेला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जलतरणपटू मंगेश कुट्टीकर याला डावलून केवळ ३६ टक्के विकलांग असलेल्या हर्षा जोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला असल्याचा दावा श्री. डीसा यांनी यावेळी केला. माहिती हक्क कायद्याखाली माहिती मिळवल्यानंतरच ही धक्कादायक बाब उघडकीस आली असल्याचे ते म्हणाले. अपंग व्यक्तींना देण्यात येणार्‍या पुरस्कारातही राजकीय व्यक्ती अनावश्यक ढवळाढवळ करीत असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
विकलांग असूनही उत्तम कामगिरी बजावणार्‍या व्यक्तीला दरवर्षी राज्य विकलांग पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारात २५ हजार रुपयांचे मानधन आणि प्रशस्तिपत्र दिले जाते. राज्य विकलांग कायदा १९९५नुसार जी व्यक्ती ४० टक्के अपंग असेल अशीच व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरते. मात्र हा नियम डावलून ३६ टक्के विकलांग असलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन मंगेश कुट्टीकर याच्यावर घोर अन्याय करण्यात आला असल्याचा दावा श्री. डीसा यांनी केला.
मंगेश कुट्टीकर याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले असून सध्या तो मुरगाव पोर्ट ट्रस्टमध्ये वरिष्ठ कारकून म्हणून नोकरी करीत आहे. तसेच उत्तम जलतरणपटू म्हणून त्याने अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. हात बांधून मिरामार ते रायबंदर पर्यंत १० किलोमीटर पोहून जाणारा तो भारतातील पहिला विकलांग असल्याचा दावा कुट्टीकर यांनी यावेळी केला. तरीही त्याला या पुरस्कारातून डावलून त्याच्यावर घोर अन्याय केला असल्याचे ते शेवटी म्हणाले.

महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ‘अज्ञातवासा’तील नगरसेवक अचानक प्रकटू लागलेत...

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
पणजी महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून विद्यमान सत्ताधारी मंडळातील काही नगरसेवकांनी विविध कामांचे निमित्त काढून लोकांच्या डोळ्यांसमोर झळकण्याची मोहीमच चालवल्याने पणजीत सध्या हा थट्टेचा विषय बनला आहे. गेली साडेचार वर्षे ‘अज्ञातवासा’त गेलेले हे नगरसेवक आता अचानकपणे प्रकट होऊ लागल्याने ही सारी मतदारांवर छाप टाकण्याची क्लृप्ती असल्याची टीका भाजपतर्फे करण्यात आली आहे.
पणजी महापालिकेची निवडणूक येत्या मार्च महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्याने त्यासाठीची जोरदार तयारी विविध राजकीय पक्षांनी चालवली आहे. ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी यापूर्वीच आपले पॅनल जाहीर करून त्यात काही विद्यमान सत्ताधारी नगरसेवकांचाही भरणा केला आहे. सध्या राजधानीत सर्वत्र महापालिका वाहनांची रेलचेल तसेच जागोजागी पालिकेचे कामगार दिसायला लागले आहेत. विविध ठिकाणी साफसफाईच्या तसेच अन्य बारीकसारीक कामांच्या निमित्ताने उमेदवारी प्राप्त झालेले नगरसेवक तथा बाबूश पॅनलात स्थान मिळवलेले उमेदवार झळकू लागले आहेत. गेल्या साडेचार वर्षांत पणजीकडे कानाडोळा केलेल्या सत्ताधारी मंडळाला आत्ताच कुठे जाग आली आहे व त्यामुळे साडेचार वर्षांतील कामे एका महिन्यात उरकून टाकण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. मुळात हा प्रकार म्हणजे स्वतःचे हसे करून घेण्याचाच प्रकार असून पणजीवासीय हे नाटक न समजण्याइतके मूर्ख नाहीत, असा टोला माजी महापौर अशोक नाईक यांनी हाणला.
सध्या आल्तिनो भागांत रस्त्याच्या दुतर्फा साफसफाई तसेच रस्त्याच्या आड येणारी झुडपे हटवण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना महापौर कॅरोलीना पो स्वतः हजर राहत आहेत. आज सांतइनेज येथे मच्छर प्रतिबंधक धुराची फवारणी करण्यात आली व तिथे चक्क उपमहापौर यतीन पारेख उपस्थित होते. कोणत्याही प्रकारे सतत जनतेच्या नजरेसमोर राहा, असे आदेश या सर्व उमेदवारांना बाबूश यांच्याकडून मिळाल्याचीही खात्रीलायक खबर मिळाली आहे. दरम्यान, नागेश करिशेट्टी यांची उमेदवारी काढून घेतल्यानंतर बाबूश गोटात अधिकच धुसफुस सुरू झाली आहे. कलंकित उमेदवारांना डावलायचेच असेल तर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले उर्वरित नगरसेवक बाबूश यांना कसे काय चालतात, असाही सवाल आता त्यांचे समर्थक करीत आहेत. बाबूश यांनी पूर्णतः नवीन लोकांना संधी द्यावी व निवडून आणावे, अशीही त्यांच्या काही समर्थकांची मागणी असल्याची खबर आहे. येत्या काही दिवसांत बाबूश पॅनलातील अन्य काहीजणांची गच्छंती होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

उपनिरीक्षक गुडलर अखेर निलंबित

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी)
पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलर ड्रग विक्री करीत असल्याचे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाल्याने अखेर आज त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून गुडलर याला वाचवण्यासाठी काही ‘आयपीएस’ अधिकार्‍यांनी धडपड सुरू केली होती. मात्र, काल सायंकाळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गृहमंत्री रवी नाईक आणि पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांच्याबरोबर तातडीची बैठक घेतल्यानंतर अखेर आज गृह खात्याला त्याला निलंबित करणे भाग पडले. त्यामुळे आता गुडलरला ड्रग विक्री प्रकरणात कोणत्याही क्षणी अटक होण्याचीही शक्यता निर्माण आहे. या प्रकरणाची गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत ड्रग प्रकरणात एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक, एक पोलिस हवालदार व सहा पोलिस शिपाई असे एकूण ९ पोलिस निलंबित झाले आहेत. त्यामुळे रवी नाईक यांचे गृहखाते अडचणीत आले आहे.
गृहमंत्री नाईक यांनी गृह खात्याचा ताबा घेतल्यानंतर राज्यात कोण कोण अमली पदार्थाच्या व्यवहारात गुंतले आहेत त्यांची आपल्याला संपूर्ण माहिती असल्याचा दावा केला होता. तसेच, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण पोलिसांना ‘‘ङ्ग्री हँड’’ दिल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, या ‘ङ्ग्री हँड’चा पोलिस अधिकार्‍यांनी वेगळाच अर्थ लावल्याचे चित्र सध्या दिसते आहे. तसेच, गोव्यात अमली पदार्थ नसल्याचा दावा करणार्‍या रवी नाईक यांना पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे. दरम्यान, ड्रग व्यवहारत सामील असलेल्या दोन्ही पोलिस प्रकरणांत मुख्यमंत्री कामत यांनी लक्ष घातल्यानंतरच कारवाई झाली आहे. त्यामुळे रवी नाईक यांची गृह खात्यावरील पकड ढिली होत चालली आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे.

पोलिस - ड्रग माफिया प्रकरणी याचिका सादर

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) - पोलिस - ड्रग माफिया प्रकरणाचा तपास ठप्प झालेला आहे. त्यातच ड्रग विक्री करीत असलेल्या पोलिस अधिकार्‍याची आणि पोलिस शिपायाची नवी प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे ही सर्व प्रकरणे केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे दिली जावीत, अशी विनंती करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर झाली आहे. सदर याचिका उद्या सुनावणीला येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पोलिस - ड्रग माफिया प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु, ती मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली होती. यातच उपनिरीक्षक सुनील गुडलर याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यामुळे आता न्यायालयातच या सर्व प्रकरणांचे भविष्य ठरणार आहे.

महागाईचा विळखा कायमच..

केंद्राकडून केवळ आश्‍वासनांची खैरात
नवी दिल्ली, दि. १३
सर्वसामान्यांना घाम ङ्गोडणार्‍या महागाईचा स्तर किंचित घसरल्याचा दावा केंद्र सरकारने केला असला तरी
जीवनावश्यक वस्तूंच्या विशेषत: कांदा आणि टोमॅटोचे भाव अजूनही आकाशाला भिडलेले आहेत. त्यामुळे हे दर केव्हा खाली येणार, असा जीवनमरणाचा प्रश्‍न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे. कारण सरकारकडून सातत्याने फक्त घोषणांची खैरात आणि महागाई कमी करण्याचे वायदे केले जात आहेत.
म्हणे १ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाईचा स्तर १८.३२ टक्क्यांवरून १६.९१ टक्क्यांपर्यंत खाली आला. पण, बाजारात अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत मात्र कुठलीही घसरण झाली नाही. उलट भाजीपाल्याच्या किमती ३.८४ टक्क्यांनी वाढल्या आहेत. कांद्याच्या किमती १.७३ टक्क्यांनी वाढल्या असल्यामुळे जनतेच्या डोळ्यांत वेगळ्याच अर्थाने पाणी तरळते आहे. दरम्यान, महागाई हाताबाहेर गेल्यामुळे सरकार आणि रिझव़्र्ह बँकेला अधिक कठोर पावले उचलणे भाग पडणार असल्याचे संकेत अधिकृत सूत्रांनी दिले आहेत.
वाढत्या महागाईला वेसण घालण्यासाठी सरकार येत्या एक-दोन दिवसांतच आणखीही ठोस उपाय जाहीर करणार असल्याची माहिती अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज दिली.
महागाई रोखण्यासाठी कोणती पावले उचलायला हवी, हे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले आहे. तशी घोषणा करणे हेच फक्त बाकी आहे, असे मुखर्जी म्हणाले.महागाईचा भस्मासूर रोखण्यात सरकार सक्षम आहे काय, असे विचारले असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले! कांदा, दूध, अंडी आणि मांस यासह अन्य भाजीपाल्याच्या किमती सामान्यांना परवडतील अशा स्तरापर्यंत खाली आणण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. महागाई वाढीमागे कुठली कारणे जबाबदार ठरत आहेत, याचा विचार करून महागाई रोखण्यासाठी कोणती पावले उचलायला हवी, याबाबतही निर्णय घेण्यात आले होते.

Thursday, 13 January, 2011

संपुआ सरकारने देशाला लुटले गडकरींचा घणाघाती आरोप

राष्ट्रीय एकता यात्रेचा दणदणीत शुभारंभ
कोलकाता, द. १२ : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजपने आज कॉंगे्रसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर पुन्हा एकदा शरसंधान साधले. हे सरकार देशाचा खजिना लुटत आहे. भ्रष्टाचार ही कॉंग्रेसची संस्कृतीच बनलेली आहे, असा आरोप करीत, बोङ्गोर्स घोटाळ्यातील आरोपी ओत्ताविओ क्वात्रोची यांचे कॉंगे्रस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी निकटचे संबंध असल्याचा दावा भाजपने केला आहे.
‘‘देशाला पूर्णपणे लुटण्याची मोहीमच कॉंगे्रस पक्षाने हाती घेतली आहे. २-जी स्पेक्ट्रम घोटाळा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या घोटाळ्यात २.५ लाख कोटी रुपयांचा चुराडा झालेला आहे. देशावर सुमारे ५६ वर्षे सत्ता गाजविणार्‍या कॉंगे्रसने प्रत्येकच निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी ‘गरिबी हटाव’ हाच नारा दिला आहे; पण, गरीबी आजही पूर्वी होती तिथेच आहे. किंबहुना, गरिबांच्या संख्येत आणखी वाढ झालेली आहे, श्रीमंत अधिकच श्रीमंत झालेले आहेत. या प्रश्‍नाचे उत्तर कॉंगे्रस पक्षाला द्यावेच लागेल,’’ असे स्पष्ट प्रतिपादन भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे केले.
श्रीनगरमधील लाल चौकात येत्या २६ जानेवारी रोजी तिरंगा ङ्गडकविण्याचा निर्धार करून ‘राष्ट्रीय एकता यात्रा’ आज श्रीनगरकडे रवाना झाली. नितीन गडकरी यांनीच झेंडा दाखवून या यात्रेचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना गडकरी यांनी कॉंगे्रस आणि कॉंगे्रसप्रणित संपुआ सरकारवर घणाघाती टीका केली.
बोङ्गोर्स व्यवहारात कोट्यवधी रुपयांची दलाली घेणारे इटालियन व्यावसायिक क्वात्रोची यांचा १० जनपथशी अगदी जवळचा संबंध होता. क्वात्रोची यांनी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी आत्तापर्यंत २७ वेळा भेट दिलेली आहे, अशी कबुली क्वात्रोचींच्या ड्रायव्हरनेच सीबीआयला चौकशीत दिलेली आहे, असा आरोप करून या प्रकरणी सोनियांनी आपली भूमिका शक्य तितक्या लवकर स्पष्ट करायलाच हवी, अशी मागणीही गडकरी यांनी केली.
जनसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यात, त्यांना दिलासा देण्यात संपुआ सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या देशातील सुमारे ५० टक्के लोकांचे दरदिवसाचे उत्पन्न देश स्वातंत्र्यापासून आजही केवळ २० रुपये इतकेच आहे आणि आज त्यांच्यावर ८० रुपये किलो दराने कांदा विकत घेण्याची वेळ आलेली आहे. केवळ कांदाच नव्हे तर अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही त्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, या भीषणतेकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.
एकीकडे गोरगरीब जनता महागाईने त्रस्त झाली असताना कॉंगे्रस मात्र त्याकडे दुर्लक्ष करून व्होट बँकेचेच राजकारण करीत आहे. या राजकारणामुळेच शेजारील बांगलादेशातून घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे, असा आरोपही गडकरी यांनी केला.
यात्रेच्या या शुभारंभप्रसंगी डाव्यांचे राज्य असलेल्या पश्‍चिम बंगालच्या राजधानी कोलकाता येथे भाजयुमोने आपले शक्तिप्रदर्शन घडविले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या युवकांना भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही संबोधित केले.

गृहमंत्री, पोलिस महासंचालकांशी मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): हवालदार अरुण देसाई प्रकरणासोबतच उपनिरीक्षक (गुडलर) करत असलेली ड्रग विक्री आणि सिप्रियानो याचा पोलिस कोठडीत झालेला मृत्यू या प्रकरणांवर उद्या (दि. १३) सायंकाळपर्यंत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले आहेत. या सर्वप्रकरणांच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री रवी नाईक व पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांच्याबरोबर आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतली.
या विविध प्रकरणी आपण गृहखात्यातील उच्च अधिकार्‍यांशीही चर्चा केली. पोलिस कोठडीत मृत झालेल्या ३९ वर्षीय सिप्रियानो फर्नांडिस याच्या निधनाबद्दलचाही अहवाल मागवून घेतला आहे. मयडे गावातील काही लोकांनी आपली याप्रकरणी भेट घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.
ड्रग विक्री करताना कॅमेर्‍यात बंद झालेला उपनिरीक्षक सुनील गुडलर याच्यावर कारवाई करण्याचीही तयारी मुख्यमंत्र्यांनी चालवली आहे. याबद्दल पोलिस महासंचालक बस्सी यांना विचारले असता, गुन्हा अन्वेषण विभागाकडून संपूर्ण अहवाल आल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. गुन्हा अन्वेषण अजूनही या प्रकरणाचा तपास करीत आहे. येत्या काही दिवसांत ते अहवाल सादर करणार आहेत, असे ते म्हणाले. मात्र, काल सीआयडीने सादर केलेल्या अहवालाबद्दल कोणतेही वक्तव्य करणास त्यांनी नकार दिला.
अटाला याला ताब्यात घेण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न करीत आहोत. तसेच, तो कशा पद्धतीने गोव्यातून फरार झाला याचाही तपास केला जाणार असल्याचे श्री. बस्सी यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

पोलिस हवालदार अरुण देसाई निलंबित

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी): बेळगाव पोलिसांनी काल लोंढा येथे जप्त केलेल्या २६ लाखांच्या हशीश प्रकरणात अटक करण्यात आलेला मडगाव पोलिस स्थानकावरील हवालदार अरुण नागप्पा देसाई याला आज दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डीसा यांनी निलंबित केले व या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिस उपअधीक्षक महेश गावकर यांची नियुक्ती केली. बेळगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अमली द्रव्य विक्रीचा गुन्हा नोंदविला आहे.
आज बुधवारी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना डीसा यांनी सांगितले की अरुण देसाई हा येथील पोलिस कँटीनचा इनचार्ज होता; त्या पूर्वी तो जिल्हाधिकार्‍यांचा सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होता. नंतर त्याची बदली मडगाव पोलिस स्थानकावर झाली होती. डीसा यांनी या एकंदर प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त केली व पोलिस खात्याला काळिमा फासणारा हा प्रकार असल्याचे मान्य केले.
बेळगाव पोलिसांकडून या संदर्भात आलेल्या अहवालानंतर अरुण देसाई याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची त्वरित अंमलबजावणी केली गेली. महेश गावकर यांना प्राथमिक चौकशी करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती डीसा यांनी यावेळी दिली.
यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, अरुण देसाई हा पोलिस सेवेत असताना पूर्वीपासूनच फावल्या वेळेत मोटरसायकल भाडी मारत होता व त्यातून नंतर त्याने मोटारही घेतली होती. त्यानंतर त्याने त्या मोटारीतून भाडी मारणे सुरू केले होते. काल त्याच व्हॅनमधून चार नेपाळींना घेऊन जात असताना बेळगाव पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली होती.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार देसाई हा बेळगाव नजीकचाच रहिवासी असून हल्लीच्या काळात त्याने तेथे प्रचंड प्रमाणात शेती व उसाचे मळे फुलविले होते व त्याच्या या गुंतवणुकीकडे सगळेच संशयाने पाहत होते. काल त्याला हशीश प्रकरणात अटक झाल्यावर त्याच्या या गुंतवणुकीचे इंगित सर्वांना कळून चुकले. मात्र सेवा निवृत्तीस अवघीच वर्षे उरलेली असताना त्याला गजाआड जावे लागले.
गोवा पोलिस व अमली पदार्थ तस्कर यांच्यातील अभद्र संबंधांतून पोलिस उपनिरीक्षक सुनील गुडलरचे अमली द्रव्य विक्री प्रकरण गाजत असतानाच अशा विक्री प्रकरणात अरुण देसाईला अटक झाली असल्याने पोलिस खात्याची उरलीसुरली अब्रूही वेशीवर टांगली गेली आहे. त्याचबरोबर या व्यवसायाची पाळेमुळे थेट कर्नाटकापर्यंत पोहोचल्याचेही सिद्ध झाले आहे.
कर्नाटक पोलिसांच्या अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला पूर्वीपासूनच अरुण देसाई याच्यावर संशय होता. त्या विभागाच्या अधीक्षकपदी नव्याने आलेल्या संदीप पाटील यांनी हा सापळा रचला व त्यात अरुण देसाई व त्याचे चौघे साथीदार अलगद सापडले. त्याची मारुती व्हॅन (जीए ०२-एस-२४१९) जप्त करण्यात आली आहे व पाच मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहेत.

बांदेकर खाण कंपनीविरोधात शिरगावात तीव्र असंतोष

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): शिरगाव कोमुनिदादचे अध्यक्ष प्रकाश गावकर व ऍटर्नी अच्युत गावकर यांनी प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक नोटिशीची गंभीर दखल ‘राजाराम बांदेकर (शिरगाव) माईन्स प्रा. लि.’ने घेतली असून या नोटिशीत कंपनीची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आल्याने नुकसान भरपाईचा खटला दाखल करण्याचा इशारा सदर कंपनीने दिला आहे. त्यामुळे या कंपनीविरोधात शिरगावात तीव्र असंतोष उफाळून आला आहे.
शिरगाव कोमुनिदादतर्फे गेल्या ४ जानेवारी २०११ रोजी एक जाहीर नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीत ‘मेसर्स राजाराम बांदेकर (शिरगाव) माईन्स प्रा.ली.’ व ‘मेसर्स चौगुले ऍण्ड कंपनी प्रा. ली.’ या कंपन्यांना खाण खात्यातर्फे परवाना स्वरूपात देण्यात आलेली ४/४९ व ५/४९ ही जागा जुन्या कॅडेस्ट्रल सर्वे क्रमांक ९५ नुसार शिरगाव कोमुनिदादच्या मालकीची असल्याचा दावा केला होता. हे खाण परवाने सध्याच्या सर्वे क्रमांक ६/०, ९३/१, ८२/०, ८३/०, ८४/०, ८५/० या अंतर्गत येतात. या उभय खाण कंपन्यांकडून कोमुनिदादला ‘भू हक्क’ कायद्यानुसार शुल्क अदा करण्यात आले नाहीत, असे म्हणून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहितीही कोमुनिदादच्या नोटिशीत देण्यात आली होती. या दोन्ही खाण परवान्यांतील जागांबाबत कुणीही सदर कंपन्यांकडे करार किंवा व्यवहार करू नयेत, असे बजावून तसे झाल्यास त्याला पूर्णतः तेच जबाबदार ठरतील, असा इशाराही देण्यात आला होता.
दरम्यान, या नोटिशीला राजाराम बांदेकर खाण कंपनीतर्फे तीव्र हरकत घेण्यात आली आहे. या नोटिशीमार्फत शिरगाव कोमुनिदादकडून कंपनीची बदनामी केल्याचा दावा करून त्यांच्याविरोधात नुकसान भरपाईचा दावा ठोकण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. राजाराम बांदेकर खाण कंपनीच्या या पवित्र्यामुळे शिरगावातील वातावरण बरेच तापले आहे. मुळातच शिरगाव कोमुनिदादची जागा या खाण कंपनीच्या नावे लागल्याने याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली आहे.
आता तरी डोळे उघडा
शिरगावातील खाण उद्योगाविरोधात लढा उभारलेल्या ग्रामस्थांची हेटाळणी करून खाण कंपन्यांची तळी उचलून धरणार्‍या लोकांचे या प्रकारानंतर डोळे उघडतील काय, असा सवाल सुरेश बाबनी गावकर यांनी केला आहे. शिरगाव कोमुनिदादची जागा हडप करून ती आपल्या नावे लावण्याच्या प्रकाराविरोधात यापूर्वीच महसूल खात्याकडे तक्रार करण्यात आली आहे व त्याबाबतची सुनावणी उच्च न्यायालयातही सुरू आहे. खाण कंपनी गावात फूट पाडून आपला स्वार्थ साधत आहे, असा आरोप सातत्याने केला असता गावातीलच काही लोक त्याची खिल्ली उडवत होते. आता या घटनेनंतर या खाण कंपनीने आपले खायचे दात दाखवले आहेत; त्यामुळे निदान आता तरी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने या खाण कंपन्यांचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन आनंद कृष्णा गावकर यांनी केले आहे.
शिरगावातील कोमुनिदाद घटकांनी देणग्या घेतल्या असा आरोप खाण कंपनी करते. या देणग्या दिल्या म्हणजे शिरगाववासीयांवर उपकार केले असा समज कंपनीने करून घेऊ नये. या खाण कंपन्यांकडून शिरगावची जी वाताहत झाली आहे ती कधीही भरून काढता येणार नाही. देणग्या दिल्या म्हणजे शिरगाववासीयांना विकत घेतले असे या कंपनीला म्हणायचे आहे काय, असा खडा सवालही श्री. गावकर यांनी केला. एकीकडे शिरगाव उध्वस्त करण्यासाठी पुढे सरसावलेल्या या खाण कंपन्यांकडून असा पवित्रा घेतला जात असेल तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी शिरगाववासीयांनी आता एकत्रित लढा उभारून या सर्व खाण कंपन्यांना शिरगावातून हुसकावून लावण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही यावेळी श्री. गावकर म्हणाले.

सिप्रियानोचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): पोलिसांच्या अमानुष मारहाणीत ठार झालेल्या सिप्रियानो मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश जोपर्यंत दिला जात नाही, तोवर त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्याच्या नातेवाइकांनी घेतली आहे. तसेच, मृतदेहाची पुन्हा शवचिकित्सा करण्याची मागणी मयत सिप्रियानोच्या नातेवाइकांनी केली आहे.
आज सकाळी मयडे व नास्नोडा गावातील लोकांनी ‘उठ गोयकारा’ संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, मुख्यसचिव संजय श्रीवास्तव व आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांना निवेदन सादर केले. दि. ७ जानेवारी रोजी सिप्रियानो याला अटक केल्यानंतर त्याला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. यात तो अत्यवस्थ झाल्यानंतर त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर पोलिस शिपाई संदीप शिरवईकर यांनी तक्रारदार महिलेच्या घरी जाऊन तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप ‘उठ गोयकारा’ संघटनेचे उपाध्यक्ष ऍड. जतीन नाईक यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. सिप्रियानो याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या समितीद्वारे त्याच्या मृतदेहाची पुन्हा शवचिकित्सा केली जावी, असे ऍड. नाईक यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात मयत सिप्रियानोचा मृतदेह पाहण्यात आला होता त्यावेळी त्याच्या हाताच्या बोटांतून रक्त येत असल्याचे आढळून आले होते. याचे एका मोबाईलद्वारे चित्रीकरणही करण्यात आले होते. तसेच, त्याच्या तोंडालाही सूज आली होती, असा दावा नाईक यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास तिसवाडी तालुक्याचे उपजिल्हाधिकारी साबाजी शेटये करीत आहे.
सिप्रियानोच्या ‘व्हिसेरा’ चाचणीचा अहवाल जोवर येत नाही आणि त्याच्या मृत्यूचे नेमके कारण जोवर स्पष्ट होत नाही तोवर चौकशीचा अहवाल पूर्ण होणार नाही. त्यामुळे अहवाल सादर करण्यास एका महिन्याचा कालावधी लागू शकतो. उद्यापर्यंत त्याचा ‘व्हिसेरा’ वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे श्री. शेटये यांनी सांगितले.
-------------------------------------------------------------------
पोलिसांचा खोटारडेपणा
सिप्रियानो याला अटक केल्यानंतर त्याला पणजी पोलिसांनी आपल्यासमोर हजर केलेच नव्हते, अशी माहिती आज तिसवाडी तालुका न्यायदंडाधिकारी साबाजी शेटये यांनी दिली. त्यामुळे पोलिसांचा खोटारडेपणे सपशेल उघड झाला आहे. सिप्रियानो याला रीतसर न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करून जामिनावर सोडण्यात आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता, अशा दावा पोलिस खात्याचे प्रवक्ते आत्माराम देशपांडे व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी केला होता.

जेव्हा मद्यधुंद पोलिस दुचाकीला धडक देतो..

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): एरवी दारू पिऊन वाहन हाकणार्‍यांच्या बखोटीला पकडून त्यांना जबर दंड आकारणार्‍या वाहतूक पोलिस विभागालाच आज शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना घडली. या विभागाच्या वाहनचालकाने भर दुपारी मद्यधुंद अवस्थेत आज पणजीत एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. सदर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, पोलिस टेंपो चालक मिनीनो डीसा (३५) हा दुपारी पोलिस खात्याच्या वाहन विभागात मद्यधुंद अवस्थेत जात होता. कॅफे अरोरा येथे तो पोहोचला असता समोरून जाणार्‍या डीओे क्रमांक जीए ०७ डी ४३३१ या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक मोहम्मद युसूफ हा किरकोळ जखमी झाला. यावेळी घटनास्थळी जमलेल्या लोकांनीच शंभर क्रमांकावर फोन करून मद्यधुंद असलेल्या सदर पोलिसाची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिस त्याला आपल्या वाहनातून घेऊन गेले. या प्रकरणी पणजी पोलिस स्थानकातमोटर वाहन कायदा कलम १८४ व १८५ कलमानुसार मिनीनो याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ११.४५ वाजता हा अपघात घडला असल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.

माविन कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष?

मिकी प्रकरणी निकाल दोन दिवसांत
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारसमोर मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशावरून वाद सुरू असतानाच आता प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदासाठीची जोरदार चुरसही सुरू झाली आहे. या पदासाठी कॉंग्रेस पक्षात अनेक इच्छुक तयार झाले असून त्यांचे दिल्लीत जबरदस्त ‘लॉबींग’ सुरू असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. या पदासाठी उपसभापती मावीन गुदिन्हो यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
कॉंग्रेस पक्षाच्या विविध राज्यांतील प्रदेश अध्यक्षांची निवड काही काळापूर्वी जाहीर करण्यात आली होती. या यादीत गोवा व महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षांची निवड अद्याप जाहीर झालेली नाही. गोवा प्रदेशाध्यक्षपदाची निवड लवकरच होण्याची शक्यता असून त्यासाठी दिल्लीत कॉंग्रेस नेत्यांनी ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील एक गट विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना कायम ठेवण्याच्या बाजूने असला तरी काही नेत्यांकडून मावीनच्या नावाची या पदासाठी शिफारस केली गेल्याची माहिती मिळाली आहे. सुभाष शिरोडकर हे सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री दिगंबर कामत, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव हे दिल्लीत याच संदर्भात गेले होते, असेही कळते.
मिकी नकोच...!
दरम्यान, मिकी पाशेको यांचा कोणत्याही परिस्थितीत मंत्रिमंडळात समावेश न करण्याच्या मताशी कॉंग्रेस ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. दिल्लीत कॉंग्रेस व राष्ट्रवादीत महागाईवरून सुंदोपसुंदी सुरू असल्याने या वादात मिकी पाशेको यांचा विषय हरवल्याचेही सांगण्यात येते. येत्या आठवड्यात या विषयीचा निकाल नक्कीच लागेल, असा विश्‍वास प्रदेश राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. उद्या १३ रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व प्रफुल्ल पटेल ऍड. गुरुनाथ कुलकर्णी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. दोन दिवस या नेत्यांचे वास्तव्य मुंबईत राहणार असल्याने या दरम्यान पक्षाचे गोवा प्रभारी प्रकाश बिनसाळे यांच्यामार्फत हा विषय चर्चेला येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाचे प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी मिकी पाशेको प्रश्‍नी गोवा प्रदेश कॉंग्रेस विधिमंडळ गटाने घेतलेल्या निर्णयाचा अहवाल सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना सुपूर्द केल्याची खबर सूत्रांनी दिली. गोवा प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हे देखील अहमद पटेल व सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.

अग्रगण्य उद्योगपतींची गुजरातात १.८० लाख कोटींची गुंतवणूक

गांधीनगर, दि. १२ : गुजरातमधील नरेंद्र मोदी सरकारची कार्यक्षमता आणि धडाडी लक्षात घेऊन देशातील सर्वच अग्रगण्य उद्योगपतींनी त्या राज्यात एकूण १,८०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची आज ग्वाही दिली.
महात्मा मंदिरात आयोजित उद्योगपतींच्या बैठकीत अहमदाबादमधील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या अदानी समूहाने बंदरे, वीजनिर्मिती व पायाभूत सुविधा या क्षेत्रांत ८०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. दहेज व मुंद्रा येथील बंदरांचा विस्तार आणि विकास करण्यात येत असून २०१५ पर्यंत या बंदरातील उलाढाल २०० दशलक्ष टनांवर जाईल, असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले.
रिलायन्स समूहाचे अनील अंबानी यांनी येत्या ५ - ७ वर्षांत वीज व सिमेंट उत्पादनात ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल, अशी घोषणा केली. कच्छ, पोरबंदर व जुनागढ येथील सिमेंट कारखान्याचा मोठा विस्तार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये एस्सार समूह ३०,००० कोटी, लार्सन ऍन्ड टुब्रो १५,००० कोटी, महिंद्राचे ३,००० कोटी, हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी १,२०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ‘व्हायब्रंट गुजरात’ ही उद्योगपतींची दोन दिवसांची परिषद गांधीनगर येथे सुरू असून, पहिल्याच दिवशी प्रचंड गुंतवणुकीची घोषणा अनेक उद्योगपतींनी आज केली.
--------------------------------------------------------------------
रिलायन्स समूहाचे अनिल अंबानी यांनी भाषण करताना, आदरणीय रतन टाटा असा प्रथम उल्लेख केला, नंतर, ‘माझे थोरले बंधू मुकेश’असे त्यांनी म्हटल्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर हे अंबानी बंधू गुजरातमध्ये एकत्र आले आहेत.

Wednesday, 12 January, 2011

महागाईवर तोडगा नाहीच!

उच्चस्तरीय बैठक निर्णयाविना ‘आटोपली’
‘संपुआ’ सरकार लोकांप्रति उदासीनच
नवी दिल्ली, दि. ११ : सर्वसामान्यांना हैराण करून सोडलेल्या महागाईसंदर्भात तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज येथे बोलावलेली उच्चस्तरीय बैठक अखेर निष्फळ ठरली. त्यामुळे केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार लोकांप्रति कसे उदासीन बनले आहे यावर झगझगीत प्रकाश पडला आहे.
कांदे, भाजीपाला, दूध, अंडी आणि धान्यांच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला भिडत चालल्या आहेत. त्यावर नियंत्रण आणणे केंद्र सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे जनतेत असंतोष वाढत चालला आहे. त्याची उशिरा का होईना दखल घेऊन पंतप्रधानांनी या बैठकीचे आयोजन केले होते. सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री पी. चिदंबरम, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया, कॅबिनेट सचिव के. एम. चंद्रशेखर व अर्थमंत्र्यांचे सल्लागार कौशिक बसू उपस्थित होते. या मंडळींनी भरपूर चर्चा केली. मात्र त्यांना कोणताही तोडगा काढता आला नाही. साठेबाज आणि काळाबाजारवाले यांना निदान इशारा देण्याची हिंमतसुद्धा या मंडळींनी दाखवली नाही हे येथे उल्लेखनीय.
सध्या खाद्यान्न महागाईचा निर्देशांक १८.३२ अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईचाच हा परिपाक ठरला आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो ५५ ते ६० रुपये झाला असून भाजीपाला व अन्नधान्याचे दर प्रचंड प्रमाणात वाढत चालले आहेत. त्यांना पायबंद घालणे सरकारला महाकठीण बनले आहे. दारिद्य्ररेषेवरील लोकांना वितरित केल्या जाणार्‍या गव्हाच्या आणि तांदळाच्या आधारभूत किमतीत ४० टक्के वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला, असे सांगितले जात आहे. साखर कारखान्यांना सुमारे पाच लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाली. कारण साखरेच्या किमती पुन्हा वाढत चालल्या आहेत.
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या गटाची नियुक्ती केली आहे. संभाव्य धान्य सुरक्षा विधेयकाच्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या शिफारशींवरही सदर बैठकीत चर्चा झाली. मात्र त्याबाबत या बैठकीत कोणतीही अधिकृत घोषणा करण्याचे टाळण्यात आले. आता यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचे तर ‘डोंगर पोखरून उंदीर’ असेच या बैठकीचे वर्णन करता येईल. जीवघेण्या महागाईवर नेमका कसा तोडगा काढावा हा प्रश्‍न त्यामुळे अनुत्तरितच राहिला आहे.

रामनगरीत मुंडकेविरहित पुरुषाचा विवस्त्र मृतदेह

खुनाचा प्रकार ० ओळख पटेना ० पोलिस संभ्रमात
मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या रामनगरीलगत मुख्य रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर आज सकाळी एक मुंडकेविरहित मृतदेह आढळून आला व त्यामुळे या भागात एकच खळबळ माजली.
मायणा कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ३५ ते ४० वर्षे वयोगटांतील असून त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते तसेच तो पूर्णपणे विवस्त्र होता. त्याच्या शरीरावर जागोजागी भोसकल्याच्या खुणा होत्या. कमरेला लाल रंगाची मुंज व तावीज असलेल्या सदर मयताच्या शरीरातून रक्तस्राव होत नसल्याने त्याची हत्या १२ ते १४ तासांपूर्वी झालेली असावी, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
अंगावर शहारे आणणार्‍या या घटनेचे वृत्त मिळताच पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर व मायणा कुडतरीचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली व तपासकामात मार्गदर्शन केले. पोलिसांनी श्‍वान पथकाचीही मदत घेतली पण कुत्री चांदर - मायणामार्गे कारगील पायवाटेपर्यंत गेली. मयत दणकट शरीरयष्टीचा असून अन्यत्र कुठेतरी खून करून त्याला येथे आणून टाकले असावे, असा कयास केला जात आहे. त्याच्या कपड्यांचे तुकडे त्या परिसरात टाकलेले पोलिसांना नंतर आढळून आले.
दरम्यान, मोतीडोंगरावरील दोघेजण बेपत्ता असल्याची जोरदार चर्चा आज मडगाव परिसरात सुरू होती, पण पोलिसांशी संपर्क साधला असता तशी कोेणतीच तक्रार नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.

सिप्रियानो मृत्युप्रकरण पणजी पोलिसांवर शेकणार

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): मयडे - म्हापसा येथील सिप्रियानो फर्नांडिस याचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याने हे प्रकरण पणजी पोलिसांवर शेकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सिप्रियानो याला मारहाण करण्यात सामील असलेल्या दोन पोलिसांसह पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांना निलंबित करण्याची मागणी आज ‘उठ गोयकारा’ या संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
न्यायालयीन चौकशीचे आदेश न दिल्यास येत्या काही दिवसांत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली जाणार असल्याचे या संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. जतीन नाईक यांनी सांगितले. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत सिप्रियानो याच्या विरोधात तक्रार करणारी महिला तसेच सिप्रियानोचे चुलत भाऊ उपस्थित होते.
‘सिप्रियानोला पणजी पोलिसांनी मरेपर्यंत मारहाण केली. माझ्या डोळ्यांदेखत त्याला पोलिस वाहनातच बडवण्यात आले. जुन्या सचिवालयाजवळ आम्ही पोहोचेपर्यंत तो अर्धमेला झाला होता. पोलिस स्थानकात तर त्याला धड चालताही येत नव्हते. त्यानंतरही त्याला फरफटत ओढून आत नेण्यात आले व पुन्हा मारहाण करण्यात आली. मला पोलिस स्थानकात बाहेर असलेल्या प्रतीक्षा कक्षात बसवून ठेवण्यात आले. आतमध्ये त्याला फटके मारण्यात येत असल्याचा आवाज मी बाहेर बसून ऐकत होते’’, अशी सनसनाटी माहिती मयत सिप्रियानो याच्या विरुद्ध पोलिस तक्रार करणार्‍या महिलेने यावेळी पत्रकार परिषदेत दिली. सिप्रियानो याला मारहाण करण्यासाठी आपण पोलिस तक्रार केली नव्हती तर तो आपल्या घरी येऊन शिवीगाळ करीत असल्याने त्याला तेथून हाकलण्यासाठी आणि समज देण्यासाठीच ही तक्रार आपण नोंदवली होती, असेही सदर महिलेने सांगितले. सदर तक्रारदार महिला ही सिप्रियानोची मैत्रीण असून त्यांनी काही महिने विदेशात एकाच जहाजावर कामही केले होते. ‘‘पोलिसांनी ज्यावेळी मला दूरध्वनी करून सिप्रियानोच्या निधनाची माहिती दिली तेव्हा मी थक्कच झाले’’, असेही तिने सांगितले. आपले नाव मात्र प्रसिद्ध न करण्याची गळ तिने पत्रकारांना घातली.
पोलिसांनी सिप्रियानो याला अटक केल्याची कोणतीच माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली नाही, असा दावा त्याचा चुलत भाऊ कॉस्मी फर्नांडिस यांनी यावेळी केला. ज्यावेळी आम्ही जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थित सिप्रियानो याचा मृतदेह पाहण्यासाठी गोमेकॉत गेलो त्यावेळी त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्या. त्याचे तोंडही सुजलेले होते. त्याच्या गुप्त भागावरही सूज दिसत होती व एका हाताच्या नखातून रक्त आले होते. मनगटालाही सूज आल्याचे आम्हांला आढळून आले, असेही कॉस्मी फर्नांडिस यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणामुळे पणजी पोलिस विलक्षण अडचणीत सापडले आहेत. तसेच, आरोपीला पकडण्यासाठी पोलिस तक्रारदारालाच रात्रीच्या वेळी पोलिस वाहनात घेऊन जात असल्याच्या प्रकारावरही प्रश्‍न निर्माण झाला आहे.सिप्रियानो याचा पोलिस कोठडीत मृत्यू झालाच नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद केली आहे. या विषयीचा अधिक तपास उपविभागीय न्यायदंडाधिकारी साबाजी शेटये करीत असल्याची माहिती आज पोलिस प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली.
मात्र, आज सायंकाळी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, विभागीय उपअधीक्षक देऊ बाणावलीकर व उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांना पोलिस महासंचालकांनी तातडीने बोलावून घेतल्याने हे प्रकरण बरेच गाजणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-------------------------------------------------------------------
उठ गोयकारा संघटनेचा दावा
- अटक केल्यानंतर सिप्रियानोची २४ तासांत वैद्यकीय चाचणी केली नाही.
- नियमांना फाटा देत न्यायाधीशांसमोर हजर केले नाही.
- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अटक केल्याची माहिती २४ तासांत त्याच्या नातेवाइकांना देणे बंधनकारक आहे. त्याला फाटा देत पोलिसांनी सिप्रियानोच्या नातेवाइकांना कोणतीही माहिती दिली नाही.

..हा ‘अनाकलनीय प्रामाणिकपणा’!

भाजपकडून पंतप्रधानांवर शरसंधान
नवी दिल्ली, दि. ११ : ‘‘लोक म्हणतात की, मनमोहनसिंग हे व्यक्ती म्हणून अतिशय प्रामाणिक आहेत; परंतु, ते १९४७पासूनच्या देशाच्या इतिहासातील सर्वांत भ्रष्ट सरकारचे नेतृत्व करत आहेत हा ‘अनाकलनीय प्रामाणिकपणा’ आहे’’, असा टोला राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी लगावला.
कॉंग्रेसप्रणित सत्ताधारी संपुआ सरकारवर विरोधी भाजपकडून सुरू असलेली टीकेची धार आज अधिकच वाढली.स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ‘सर्वांत भ्रष्ट’ सरकारचे नेतृत्व डॉ. मनमोहनसिंग करत असून या सरकारकडे देशात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या विविध समस्यांवर कसा तोडगा काढावा याची कोणतीही ठोस उपाययोजना नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली.
संपुआ सरकार देशाची सर्वच बाबतीत दिशाभूल करत आहे. भाजपने पी. जे. थॉमस यांच्या दक्षता खात्याच्या आयुक्तपदी नियुक्तीला जोरदार आक्षेप घेतला होता. मात्र कॉंग्रेसने तरीही त्यांची त्या पदी नियुक्ती केली. आता हीच नियुक्ती त्यांच्या घशात अडकलेले हाड बनली आहे. थॉमस पायउतार झाले तर सरकारची थोडी अब्रू वाचणार आहे; अन्यथा पंतप्रधान देशात भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत, असाच त्याचा अर्थ होईल, असा युक्तिवाद जेटली यांनी केला.
यावेळी बोफोर्स संदर्भात झालेला भ्रष्टाचार, २-जी स्पेक्ट्रम घोटाळा आदींवरूनही जेटली यांनी कॉंग्रेसवर जोरदार तोफ डागली. बोफोर्स भ्रष्टाचार प्रकरणाचे सर्व धागेदोरे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दाराशीच जाऊन थांबत आहेत. तेव्हा झालेला २४ वर्षांचा करार अजूनही कॉंग्रेस नेत्यांची पाठ सोडायला तयार नाही याचे कारण देशाच्या इतिहासातील हे पहिलेच प्रकरण आहे की ज्याची नाळ थेट पंतप्रधानांशी जोडली गेली आहे, असे जेटली म्हणाले. अल्पवयीन रुचिका आणि आरुषी यांना सीबीआय न्याय मिळवून देऊ शकली नाही याचे कारण त्यांची सर्व शक्ती सरकारकडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरली जात होती, असा घणाघाती आरोपही जेटली यांनी केला.
देशात सध्या अनेक समस्यांनी सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. नक्षलवाद, महागाई, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती अशा अनेक प्रश्‍नांनी जनतेला वेठीस धरले आहे. मात्र या समस्यांवर मात करण्यासाठी कॉंग्रेस सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. कांदा आणि टोमॅटो यांचे दर कमी होत नाहीत. स्वतः अर्थतज्ज्ञ असलेल्या भारताच्या विद्यमान पंतप्रधानांना गेली तीन वर्षे यावर तोडगा काढता येऊ नये, ही दुर्दैवाची बाब असल्याची टीका जेटली यांनी केली.
जेव्हा तुम्ही रंगांचा विचार कराल तेव्हा आमचा विचार करा, असे एका जाहिरातीचे घोषवाक्य आहे; त्याच धर्तीवर ‘जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा विचार कराल तेव्हा आमचाच विचार करा’, असे कॉंग्रेसचे घोषवाक्य बनले आहे, असा सणसणीत टोलाही जेटली यांनी शेवटी लगावला.

Tuesday, 11 January, 2011

...तर सरकारचा पाठिंबा काढणार

राष्ट्रवादीने कॉंग्रेसविरुद्ध दंड थोपटले
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेसश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयांची कार्यवाही करण्याबाबत कॉंग्रेसकडून असाच आडमुठेपणा सुरू राहिल्यास प्रसंगी या सरकारचा पाठिंबा काढून घेणेच उचित ठरेल, असा एकमुखी ठराव आज प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने संमत केला. जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि मिकी पाशेको यांची तात्काळ मंत्रिपदी वर्णी लावावी, अशी मागणी करणारा ठरावही या बैठकीत समंत करण्यात आला.
प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक पक्षाचे अध्यक्ष प्रा.सुरेंद्र सिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी जुझे व हळर्णकर हे साहजिकच गैरहजर राहिले तर मिकी पाशेको जातीने बैठकीला उपस्थित होते.
जुझे यांचे बंधू पाश्कोल डिसोझा हेदेखील बैठकीला हजर नव्हते. राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रेष्ठींच्या आदेशाची मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्वरित कार्यवाही करावी; तसेच सभापती प्रतापसिंग राणे यांनी श्रेष्ठींनी पाठवलेल्या पत्रानुसार जुझे यांच्याकडील विधिमंडळ नेतेपद व नीळकंठ हळर्णकर यांच्याकडील मुख्य प्रतोदपद काढून घ्यावे आणि पाशेकोंकडे ते सोपवावे, असेही एका ठरावात म्हटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अंतर्गत मामल्यात नाक खुपसून पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करण्याबाबत कॉंग्रेस चालढकल करीत असेल तर राष्ट्रवादीला स्वतंत्र विचार करावा लागेल. पुढील विधानसभा निवडणूकीत ४० मतदारसंघातून निवडणूक लढवून राष्ट्रवादीची खरी ताकद दाखवावी लागेल, अशी भावनाही अनेक पदाधिकार्‍यांनी बोलून दाखवली.
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी आपल्या गैरहजेरीबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. त्यांच्या गैरहजेरीचे कारण जाणून घेतल्यानंतरच पुढील कारवाईबाबत विचार करू, असे प्रदेशाध्यक्ष प्रा. सिरसाट म्हणाले. उभय मंत्र्यांनी सध्या पक्षाशी संपर्कच तोडल्याची बातमी खरी आहे, हेही त्यांनी मान्य केले.
दरम्यान, आजच्या बैठकीत समितीच्या विविध सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावना व संमत केलेल्या ठरावांची माहिती पक्षश्रेष्ठींंना देण्यात येणार असून लवकरच त्याबाबत दिल्लीत चर्चा केली जाईल. येत्या आठवडाभरात यासंदर्भात काहीतरी ठोस निर्णय होण्याची शक्यताही प्रा. सिरसाट यांनी वर्तविली.
जुझे व हळर्णकर यांच्याविरोधात पक्षविरोधी कारवाई करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. हा निर्णय पूर्ण विचारांती व कायदेशीर बाबी लक्षात घेऊनच करावा लागेल,असे ते म्हणाले.
मिकी पाशेको गरजले
विविध गुन्हेगारी प्रकरणांत शिक्षा भोगलेले व सध्या विविध प्रकरणांत चौकशी सुरू असलेल्या कॉंग्रेस नेत्यांकडून आपणावर गुन्हेगारीचा ठपका ठेवण्याचा प्रकारच मुळी हास्यास्पद आहे. स्वतः स्वच्छ असल्याचा आव आणून माझ्या मंत्रिपदाला विरोध करण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही, असा दावा मिकी पाशेको यांनी केला. गुन्हेगारीचा एवढाच बाऊ मुख्यमंत्री दिगंबर कामत करत असतील तर त्यांना अर्धे मंत्रिमंडळ रिक्त करावे लागेल, असा टोलाही यावेळी मिकी पाशेको यांनी लगावला.

पणजी महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रावादी कॉंग्रेसही पूर्ण ताकदीनिशी उतरणार

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): पणजी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या तीस प्रभागांत स्वतंत्र उमेदवार उतरवण्याबरोबरच काही प्रभागांतील चांगल्या व स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी दिली.
आज प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या मुख्यालयात झाली. या बैठकीत पणजी महापालिका निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. या महापालिका निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी माजीमंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर पक्षाचे सरचिटणीस तथा पणजी महापालिकेचे नगरसेवक ऍड. अविनाश भोसले, सलीम सय्यद, राष्ट्रवादीच्या युवक शाखेचे अध्यक्ष तन्वीर खतीब, व्यंकटेश प्रभू मोने यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती लवकरच विविध प्रभागांतील उमेदवारांबाबत निर्णय घेईल.
दरम्यान, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी अलीकडेच चर्चिल आलेमाव यांच्या साथीत मिकी पाशेका यांच्या मंत्रिपदाला विरोध केल्यानेच त्यांना अद्दल घडवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पणजी महापालिका निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे बाबूश यांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. बाबूश मोन्सेरात यांनी जाहीर केलेल्या पॅनलबाबत अनेकांत नाराजी पसरली आहे.
महापालिकेसाठी उमेदवार निवडताना बाबूूश यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेतले नाही,अशी तक्रार त्यांचे समर्थक करीत असून या नाराजीचा लाभ राष्ट्रवादी उठवण्याच्या तयारीत आहे, अशीही माहिती मिळाली आहे.

सेझ : खंडपीठाच्या निवाड्याला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

पणजी, दि.१०(प्रतिनिधी): गोव्यातील ‘सेझ’ प्रवर्तकांकडून भूखंड परत घेण्याबाबतच्या निर्णयाला आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्याला स्थगिती देऊन ‘जैसे थे’ स्थिती ठेवण्याचा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. यासंबंधी केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच गोवा औद्योगिक विकास महामंडळाला नोटिसा पाठवण्यात आल्याने पुन्हा एकदा ‘सेझ’चा विषय पेटणार आहे.
अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निवाड्यात राज्य सरकारने ‘सेझ’ साठी दिलेले भूखंड परत घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले होते. ‘जीआयडीसी’ तर्फे हे भूखंड वितरित करताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला होता. दरम्यान, भूखंड रद्द करण्याचा निर्णय उचलून धरतानाच सदर ‘सेझ’ प्रवर्तकांना नव्याने भूखंडासाठी अर्ज दाखल करण्याची संधीही न्यायालयाने दिली होती. उच्च न्यायालयाच्या या निवाड्याला ‘सेझ’ प्रवर्तकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते व त्या अनुषंगानेच सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीवेळी हा आदेश दिला.
दरम्यान, केवळ लोकक्षोभामुळे भूखंड परत घेण्याची नामुष्की ओढवलेल्या राज्य सरकारकडून कायदेशीर प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणात बेफिकिरी केली असून त्याचाच लाभ उठवून आता ‘सेझ’ प्रवर्तकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘सेझ’ धोरण केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे व त्यानुसारच हे भूखंड कायदेशीररीत्या मिळवले होते, पण राज्य सरकारने ऐनवेळी ‘सेझ’ रद्द करून हे भूखंड परत घेण्याचा निर्णय बेकायदा आहे, अशी भूमिका ‘सेझ’ प्रवर्तकांनी घेतली आहे.
याप्रकरणी के.रहेजा, पेनिन्सुला फार्मा रिसर्च सेंटर, प्लॅनेटव्ह्यू मर्कंटाइल कंपनी, आयनॉक्स मर्कंटाइल कंपनी व पॅराडिगम लॉजिस्टिक अँड डिस्ट्रिब्युशन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.‘सेझ’ प्रवर्तकांकडून सादर केलेल्या भूखंडांसाठीच्या अर्जात कोणताही बेकायदा प्रकार नाही,असा दावाही या कंपन्यांनी केला आहे.दरम्यान, सरकारने दिलेल्या मान्यतेमुळेच कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अचानक हे भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा मोठा फटका बसल्याचा दावाही या कंपन्यांनी केला आहे. रहेजा कंपनीने तर चक्क १९० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगण्यात आले आहे. ‘सेझ’ रद्द करण्याचा निर्णय पूर्ण मंत्रिमंडळाने घेतलेला नाही, असा दावा करून राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे केंद्रीय कायद्याचा अवमान ठरला आहे, असेही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे निवेदन सादर केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा ‘सेझ’ विषय पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारकडून अधिसूचित ‘सेझ’ रद्द करण्यासाठी सुरू असलेला चालढकलपणा तसेच राज्य सरकारकडून ‘सेझ’ भूखंड परत घेण्याबाबत कायदेशीर प्रक्रियांतील गलथानपणा पाहता सरकारातील काही लोकांची ‘सेझ’ कंपन्यांना फूस असल्याचा आरोप ‘सेझ’ विरोधकांकडून होत आहे.‘सेझ’ कंपन्या व सरकारातील काही लोकांचे साटेलोटे असून सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन हे भूखंड परत मिळवण्याचा घाट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मुदास्सीर यांना गोवा सेवेत सामावून घेणार!

पणजी,दि.१०(प्रतिनिधी): राज्य प्रशासनातील सनदी अधिकारी तथा शिक्षण सचिव व राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदास्सीर यांनी सादर केलेला स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाने स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्ती स्वीकारलेल्या मुदास्सीर यांना गोवा प्रशासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांच्याकडे राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पूर्णवेळ ताबा देण्याचा घाट घातला जात आहे असेही खात्रीलायक सूत्रांकडून समजते.
राज्य प्रशासनातील एक वरिष्ठ सनदी अधिकारी असलेले मुदास्सीर यांच्याकडे सध्या शिक्षण खात्याच्या सचिवपदाचा ताबा आहे. माजी सनदी अधिकारी राजीव यदुवंशी यांच्याप्रमाणेच मुदास्सीर हेदेखील गोव्यात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत. या अनुषंगानेच त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली असल्याचे कळते. त्यांना गोवा प्रशासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी पूर्णवेळ वर्णी लावण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे.

संशयास्पद मृत्युमुळे पणजी पोलिस पेचात

पणजी, दि. १० (प्रतिनिधी): संशयावरून पणजी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या क्रिपरेईन फर्नांडिस (३९) याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने पणजी पोलिस अडचणीत सापडले असून क्रिपरेईन याचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेला नाही, असा दावा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी केला आहे.
७ जानेवारी रोजी पणजी पोलिसांनी फर्नांडिस याला पर्वरी येथील त्याच्या एका नातेवाइकाच्या घरातून ताब्यात घेतले होते. क्रिपरेईने आपल्याला चाकू घेऊन मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पणजी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी रात्री १० वाजता ताब्यात घेतले होते. क्रिपरेईन याला अटक केल्याची माहिती दुसर्‍या दिवशी म्हणजे ८ जानेवारीला ३ वाजता त्याच्या चुलतभावाला देण्यात आली. त्याच्या काही तासानंतर म्हणजे रात्री ७ वाजता पुन्हा पोलिसांनी संपर्क साधून क्रिपरेईन याला ‘फिटस्’ आल्याने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर दि. ९ रोजी दूरध्वनी करून त्याचे निधन झाल्याचे कळवण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणात उठ गोयकारा या संघटनेने काहीतरी काळेबेरे असल्याचा दावा केला आहे. मात्र आपण क्रिपरेईन याला मारहाण केली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याला दारू पिण्याची सवय होती, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास पणजी पोलिस करीत आहेत.

पर्यटन मंत्री हळर्णकरांवर २४ तासांत गुन्हा नोंदवा

जागा ‘गोलमाल’प्रकरणी न्यायालयाचा आदेश
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राज्याचे पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्यावर येत्या २४ तासांत भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचेे आदेश आज प्रथम वर्ग न्यादंडाधिकार्‍यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाला दिले. तसेच, गुन्हा नोंद केल्यानंतर पंधरा दिवसांत या प्रकरणाच्या तपासकामाचा अहवाल सादर करण्याचा आदेश या विभागाला देण्यात आला आहे. त्यामुळे हळर्णकर हे पुन्हा अडचणीत सापडले आहेत. न्यायाधीश शबनम शेख यांनी हा आदेश आज दिला. सदर गुन्हा दखलपात्र असतानाही पोलिसांनी त्याची दखल घेऊन गुन्हा नोंदवला नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे.
कोलवाळे हाऊसिंग बोर्डची जागा बाजारदरापेक्षा कमी दरात स्वतःच्या ट्रस्टला दिल्याने हळर्णकर यांच्या विरोधीत काशिनाथ शट्ये व अन्य १२ जणांनी २२ नोव्हेंबर २०१० रोजी भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे तक्रार केली होती. सदर पथकाने या तक्रारीची दखलच घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावरील युक्तिवाद संपल्यानंतर भारतीय दंड संहितेनुसार हळर्णकर यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश आज दुपारी देण्यात आले.
हळर्णकर हे कोलवाळे हाऊसिंग बोर्डचे अध्यक्ष असून आपल्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत त्यांनी नीळकंठ हळर्णकर ट्रस्टसाठी प्रचंड जागा एकदम अल्पदरात विकत घेतली असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीला ५७ लाख रुपयांचा फटका बसल्याचा दावा तक्रारदार शेट्ये यांनी केला आहे. हळर्णकर यांनी बेकायदा ही जागा ताब्यात घेतली; तसेच त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असल्याचाही दावा तक्रारदाराने केला आहे.
याखेरीज हळर्णकर यांनी २३ हजार चौरस मीटर जागा बाजारात ४ हजार ५०० रुपये दर सुरू असताना केवळ १ हजार रुपये चौरस मीटर दराने एका हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयासाठी दिली. मात्र या महाविद्यालयाचा मालक कोण हे जागा देताना स्पष्ट करण्यात आले नाही. ही जागा मंत्री हळर्णकर यांनी जेथे हाऊसिंग प्रकल्पासाठी ताब्यात घेतली त्याच्या नजीकच ही जागा असल्याचेही तक्रारदाराने म्हटले आहे. या जागेच्या विक्रीमुळे सरकारी तिजोरीला ७ कोटी ३६ लाख रुपयांचा फटका बसला असल्याचा दावा याचिकादाराने केला आहे. यातून मंत्री हळर्णकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे
निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. ज्यावेळी या भूखंडविक्रीची फाईल मागवण्यात आली, तेव्हा सदर फाईल सापडत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या भूखंड विक्रीचा गैरप्रकार लपवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ती फाईल गायब केल्याचा संशय येतो, असे तक्रारीत म्हटले आहे.
२९ ऑक्टोबर २०१०मध्ये गोवा हाऊसिंग बोर्डने हळर्णकर यांना ३०० चौरस मीटर जागा दिली. याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेले वृत्तही तक्रारीसोबत जोडण्यात आले होते. तरीही पोलिसांनी त्याची दखल घेतील नाही, असे शेटये यांनी म्हटले आहे.
‘दहशतवादाला संघात थारा नाही’
नागपूर, दि. १० : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये दहशतवादी प्रवृत्तीला स्थान नाही, असे स्पष्ट करताना सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी संघातील अशा प्रवृत्तीना संघाने बाहेरचा रस्ता दाखवल्याचे स्पष्ट केले. कॉंग्रेसकडून संघावर होणारे दहशतवादाचे आरोप हे कटकारस्थान असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांच्यावर सध्या दहशतवादाच्या तक्रारी आहेत ते कोणत्याही प्रकारे संघाशी संबंधित नसल्याचे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.
विमानअपघाताचे इराणात ७७ बळी
तेहरान, दि. १० : वायव्य इराणमध्ये रविवारी रात्री झालेल्या विमान अपघातातील बळींची संख्या आता ७७ च्या घरात गेली आहे. आकस्मिक लँडिग करीत असताना या विमानाला अचानक अपघात कसा घडला, यामागील कारणांचा शोध तपास अधिकारी घेत आहेत. विमानात आणखी कुणी अडकले आहेत काय, याचा शोध घेण्यासाठी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू असले तरी दाट धुक्यामुळे मदत कार्य प्रभावित होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाकिस्तानी नागरिकाला अटक
अजमेर, दि. १० : भारतात कोणतेही वैध दस्तावेज नसताना वास्तव्य करणार्‍या एका पाकिस्तानी नागरिकाला आज अटक करण्यात आली. रमजात असे या पाकी नागरिकाचे नाव आहे. तो मूळचा कराचीचा असून रेल्वेगाडीने तो आपल्या मित्रासोबत भारतात आला होता. त्याच्या मित्राचा पत्ता मात्र अद्याप लागलेला नाही. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
दिल्लीत स्ङ्गोटात चार मुले जखमी
नवी दिल्ली, दि. १० : राजधानीत आज रसायनाने भरलेल्या एका ड्रमला आग लागून स्ङ्गोट झाला. त्यात चार मुले जखमी झाल्याचे वृत्त आहे. कडाक्याच्या थंडीमुळे या मुलांनी एका प्रिंटिंग प्रेसच्या बाहेर असणारा कचरा जाळला. तेथेच एका ड्रममध्ये काही रसायने होती. आगीमुळे त्यात स्ङ्गोट झाला. चारही जखमींना सङ्गदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाबरीप्रकरणी जलद सुनावणीची मागणी
लखनौ, दि. १० : बाबरी विद्धंस प्रकरणाची रायबरेली कोर्टातील सुनावणी जलदगतीने होऊन त्याचा लवकरात लवकर निकाल लागावा, अशी मागणी करण्याचा निर्णय ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने घेतला आहे. त्यासाठी ते लवकरच केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचे समजते. यापूर्वीही लॉ बोर्डाने केंद्राला या प्रकरणी पत्र पाठविले होते. पण, त्यावर काहीही हालचाली न झाल्याने बोर्डाने पुन्हा पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवा भाजपच्या निवडणूक प्रभारीपदी गोपीनाथ मुंडे

पणजी, दि. १० : गोव्यात होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी यासंबंधीची घोषणा केली.
सध्या गोव्यात भाजपचे १४ आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. श्री. मुंडे यांच्यासाठी गोवा नवा नाही. यापूर्वी स्व. प्रमोद महाजन हे गोवा भाजपचे प्रभारी असताना पक्ष वाढवण्यासाठी श्री. मुंडे यांनी मोलाचे योगदान दिले होते. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन श्री. मुंडे यांच्यावर केंद्रीय नेत्यांकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. श्री. मुंडे यांना राजकीय अनुभव आणि त्यांचे संघटन कौशल्य याचा गोवा भाजपला निश्‍चितच लाभ होईल, असेही श्री. पार्सेकर यांनी नमूद केले.

राजधानी तब्बल ३ तास अंधारात

पणजी, दि. १० : एका इमारत बांधकाम व्यावसायिकाच्या ‘करामती’मुळे राजधानी पणजी तब्बल तीन तास अंधारात राहिल्याने लोकांची प्रचंड तारांबळ उडाली. संध्याकाळी ७ ते रात्री दहा या वेळेत हा सावळागोंधळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाटो पणजी येथे सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी खोदाई सुरू असताना भूमिगत वीजवाहिनीलाच दणका बसला. त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला. हा नेमका काय प्रकार घडला हेच वीज खात्याच्या अभियंत्यांना कळले नाही. तांत्रिक दोष शोधण्यातच त्यांचा बहुतांश वेळ वाया गेला. संबंधित बांधकाम व्यावसायिकानेही यासंदर्भात गुप्तता पाळल्याचे कळते. अखेर जेव्हा तांत्रिक दोष सापडला तेव्हा वीज खात्याने हालचाली करून रात्री दहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले.
दरम्यानच्या काळात लोक सातत्याने वीज खात्याशी संपर्क साधून चौकशी करत होते. तथापि, वीज खात्याकडून नेमका खुलासा केला जात नव्हता. रात्री साडेनऊच्या सुमारास असे सांगण्यात आले की, आणखी पंधरा ते वीस मिनिटांत वीज सुरळीत होईल. त्यानंतर पुन्हा काही काळ वीज खंडित झाली. सुदैवाने सध्या थंडीचे दिवस असल्याने लोकांनी कसाबसा हा त्रास सहन केला. आता त्या बांधकाम व्यावसायिकाबद्दल काय, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे.

Monday, 10 January, 2011

विहिंपने फुंकले.. राममंदिर उभारणीचे रणशिंग

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - भारत स्वतंत्र झाला असला तरी, हा देश धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अद्याप गुलाम आहे. त्यासाठीच रामजन्मभूमीवरच श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर निर्माण होणार आहे. तेव्हाच या देशातील हिंदू मान वर करून जगतील. अयोध्येतील त्या संपूर्ण भूखंडावर प्रभू रामचंद्राचेच मंदिर उभारले जाणार आहे. बाबरी मशीद अयोध्येतच नव्हे तर संपूर्ण भारतात कुठहीे उभारायला देणार नसल्याचे प्रतिपादन करीत मंदिर उभारणीचे रणशिंग आज विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आशोकजी सिंघल यांनी फुंकले.
‘राम मंदिर हे दान आणि दयेने नको, ते हिंदूंच्या मनगटाच्या बळावर उभारले जाईल. भव्य मंदिर हेच सर्व जिहादी विचारांना सडेतोड उत्तर असेल’ असे वक्तव्य डॉ. प्रवीण तोगाडीया यांनी यावेळी केले. तर, ‘हनुमत शक्ती जागृत करून एकाही मंदिरात मूर्तिभंजन होणार नाही याची जबाबदारी घेऊया, असे प. पू ब्रम्हेशानंद स्वामी यांनी उपस्थित तरुणांना उद्देशून सांगितले.
विहिंपचे ज्येष्ठ नेते आज फर्मागूडी फोंडा येथील मैदानावर परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारणी बैठकीनंतर श्री हनुमत शक्ती जागरण मंचाच्या जाहीर सभेत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री डॉ. प्रवीण तोगाडीया, तपोभूमी पीठाचे ब्रम्हेशानंद स्वामी, आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष एस. वेतांत्मजी, दिनेशचंद्रजी (महामंत्री संघटन), देवकीनंदन जिंदाल, मधुकरराव दीक्षित (सहसेवा प्रमुख), दीपक गायकवाड (कोकणप्रांत सहमंत्री), सुभाष भास्कर वेलिंगकर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोवा विभागप्रमुख), अवधूत कामत (गोवा विभाग सहकार्यवाह) व शिवोलीचे मुकूंदराज महाराज उपस्थित होते. या विशाल मेळाव्याला हजारोंच्या संख्येने हिंदू उपस्थित होते.
मंदिर उभारणीचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. माजी पंतप्रधान नरसिंह राव हे पक्के हिंदू होते, अन्यथा वादग्रस्त ‘ढाचा’ पाडून मंदिर निर्माणाचे काम सुरू झाले नसते. त्यावेळचे केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील कल्याणसिंग यांच्या सरकारांची उत्तम युती झाल्यानेच संपूर्ण ‘ढाचा’ खाली आला, असे श्री. सिंघल यांनी सांगितले.
अयोध्येतील वादग्रस्त जागेत उत्खननावेळी मंदिराचे अवशेष आढळून आल्यास ती संपूर्ण जागा हिंदूंच्या ताब्यात दिली जाईल, असे शपथपत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिले होते. त्या शपथपत्राची पूर्तता केंद्र सरकारने करावी, अन्यथा संपूर्ण भारतात आंदोलन होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
भारतातील आणि पाकिस्तानातील अनेक मुस्लिमाना शांती पाहिजे आहे. मात्र त्यांचे आज या समाजात काहीही स्थान नाही. कारण इस्लाम धर्म आज जिहादी लोकांनी हातात घेतला असल्याचा दावा त्यांनी केला. ‘पोप’चे कार्य पूर्ण करण्यासाठी एक महिला भारतात आली असल्याचे सांगत ओरिसात वनवासी लोकांमध्ये काम करणार्‍या लक्ष्मणानंद स्वामींना मारण्यासाठी ख्रिश्‍चन चर्चने बैठक घेऊन ही हत्या केली असल्याचा दावा यावेळी श्री. सिंघल यांनी केला. ज्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला त्या बैठकीचा इतिवृत्तात आणि कोणी कोणी त्यावर सही केली आहे हे आपण पाहिले आहे, असे त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे नेते दिग्विजयसिंग यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले की, भारतापेक्षा सहनशील देश अन्य कुठेच नाही. या लोकांना हिंदू धर्माची आणि साधुसंतांची भिती वाटायला लागली असल्यानेच हिंदू दहशतवादाचे तुणतुणे वाजवत आहेत, असेही ते म्हणाले. राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेले प.पू ब्रम्हानंद स्वामींची यावेळी श्री. सिंघल यांनी आठवण काढून त्यांच्या आंदोलनाच्या सहभागाची माहिती दिली.
‘आजही हिंदू मंदिरातील धन लुटण्यासाठी मंदिरातील मूर्तीभंजन आणि चोर्‍या केल्या जात आहेत. बाबर हा आक्रमक आणि लुटारू होता. अयोध्येतील राम मंदिर हे बाबरने तोफेद्वारे पाडले होते. बाबरच्या बाजूने उभा राहणारा प्रत्येक व्यक्ती हा या देशाचा शत्रू आहे’, असे मत प्रवीण तोगाडीया यांनी यावेळी व्यक्त केले. एकही हिंदूला दहशतवादी कारवाईसाठी शिक्षा झालेली नाही, त्यामुळे हिंदू धर्माला बदनाम करू नये. उत्तर प्रदेश येथील पांडे बंधू या कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी विमान अपहरण केले होते. त्यासाठी त्यांना शिक्षाही झाली होती. त्यामुळे कॉंग्रेसही ‘हाईजॅकर’ची पार्टी आहे असे आम्ही म्हणू शकतो का, असा सवाल श्री. तोगाडिया यांनी यावेळी उपस्थित केला.
‘राम मंदिर नको असलेल्या लोकांना ‘हेऽऽऽ... राऽऽऽम’ म्हणण्यास भाग पाडले पाहिजे, असे पू. ब्रम्हेशानंद स्वामिना उपस्थितांना सांगितले. भव्य मंदिराची उभारणी होत नाही तोवर कोणीही शांत बसू नये.आमच्या जिव्हारी येईल तोवर थांबणे योग्य नाही, असेही ब्रम्हेशानंद स्वामी म्हणाले. आपण ज्या मंदिरात जाऊन वाकतो त्या मंदिरातील मूर्तींचेे भंजन होत आहे हे लज्जास्पद आहे. सुरक्षा आपण तयार केली पाहिजे म्हणून सरकार सांगते. राजकीय लोकांना केवळ आमच्या मतांचीच गरज आहे. आमच्या अध्यात्माच्या मतांची त्यांना गरज नाही. आध्यात्मिक वृत्ती पायाखाली घालून आम्हाला मतीभ्रष्ट करून टाकले आहे. या सरकारला सर्व मंदिराला सुरक्षा देण्यास भाग पाडले पाहिजे, असे स्वामी पुढे म्हणाले.
‘कॉंग्रेसने हा गोवा बार, बारबाला आणि कॅसिनो भरून टाकला आहे. कार्निव्हल, कॅसिनो आणि ड्रग्स माफियांची भूमी केली आहे. येथे प्रशासन नाही, सुरक्षा नाही. केवळ पैसे खाण्यातच दंग आहेत. त्यामुळे हिंदू जीवनमूल्ये पुन्हा सक्रिय केली पाहिजेत’ असे मत प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी व्यक्त केले. शहराला दिलेले वास्को दगामा हे एका लुटारूचे नाव आहे. या वर्षभरात पोर्तुगीज नावे बदलण्याची शपथ घेतली पाहिजे, असे श्री. वेलिंगकर म्हणाले. सध्या गोव्यात विकृत पोर्तुजीगधार्जीणेपणाला उधाण आले आहे. त्याला येथील सरकार समर्थन देत आहे. नुकत्याच आलेल्या ‘‘सांग्रेस’’ या पोर्तुगीज जहाजावर जाणारा खासदार फ्रान्सिस सार्दिन हे गद्दार असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. मोतीडोंगर येथे ट्रकात सापडलेल्या तलवार प्रकरणात अद्याप आरोपपत्र सादर होत नाही. विजापूर, हुबळी, पाकव्यक्त काश्मीर येथून येणारे मुस्लिम बेकायदेशीर दर्गे उभारत आहे. याच बेकायदेशीर दर्ग्यावरून सावर्डे येथे दंगल उसळली होती, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.
जाहीर महासभेचे सूत्रसंचालन राजू वेलिंगकर यांनी केले तर, आभार आनंद शिरोडकर यांनी व्यक्त केले. पसायदानाने सभेचा समारोप करण्यात आला.

ड्रग माफिया अटालाला इस्त्रायलमध्ये अटक

-गोव्यात आणण्याचे प्रयत्न
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) ः गोव्यातील अमली पदार्थ व्यवहाराबाबत पोलिसांना हवा असलेला ड्रग माफिया यानीव बेनाईम उर्फ अटाला याला इस्त्रायलमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती इंटरपोलने दिली आहे, असे आज पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी सांगितले. अटालाच्या अटकेसंदर्भात इंटपोलकडून फॅक्स मिळाल्याचे त्यांनी सांगितले. इंटरपोल गेले पाच महिने त्याच्या शोधासाठी जंगजंग पछाडत होते. अमली पदार्थविक्रीत आणि जप्त केलेले अमलीपदार्थ लंपास करून ते ग्राहकांपर्यंत पोचविण्यात पोलिस सक्रिय असल्याचे अटाला व त्याची मैत्रिण लकी फार्महाऊस हिने उघड करताना, गृहमंत्री रवी नाईक यांच्या मुलाचाही यात सहभाग असल्याचा आरोप तिने संकेतस्थळावरून केला होता.
गोव्याच्या किनारी भागात मोठ्या प्रमाणात चाललेल्या अमली पदार्थ व्यवहारात पोलिस व ड्रग माफियाचे साटेलोटे असल्याच्यासंबंधात अटाला हा मुख्य दुवा असून, त्याने दिलेल्या निवेदनावरून सात पोलिसांना अटकही झाली होती. अटालाला इस्त्रायलमध्ये अटक झाली असल्याने त्याला आता भारतात आणण्याच्या हालचाली सुरू होतील, असे यादव यांनी आज सांगितले. ७ ऑगस्ट २०१० रोजी अटाला याची जबानी नोंदविली जाणार होती, तथापि तो २३ जुलैपासूनच बेपत्ता झाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी त्यावेळी दिली होती. तो परदेशात गेल्याचेही त्यावेळी उघड झाले होते. पोलिसांनी २५ ऑगस्ट रोजी लूकआऊट नोटिस जारी केली होती.
अटाला याची मैत्रिण लकी फार्महाऊस हिने अटालाचे पोलिसांशी साटेलोटे असल्याची टेप उघड केल्यानंतर अटाला याला ११ मार्च रोजी अटक झाली होती. मालखान्यातून अमली पदार्थाची विक्री पोलिसच करतात अशी धक्कादायक माहिती नंतर एका संकेतस्थळावरही प्रसारित झाली होती. अटाला याला जामीन मिळाल्यानंतर त्याने देशातून पलायन केले होते. लकीच्या माहितीनुसार, गोव्यातील एका मंत्र्याच्या मुलाचेही यासंबंधात हणजुण येथे तिच्याकडे येणेजाणे होते. अटालाच्या जबानीनंतर अमलीपदार्थविरोधी पथकाचा प्रमुख आशिष शिरोडकर यालाही अटक झाली होती.

पणजीत अद्यापही कांदे ७० रु. किलो

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)
केंद्र व राज्य सरकार कांद्याचे दर खाली येणार म्हणून कितीही आश्‍वासने देत असले तरी कांदे आपला दर कमी करून घ्यायला तयार नाहीत! हीच परिस्थिती सध्या बाजारातील कांद्यांचा दर पाहिल्यास जाणवते.
आज दि. ९ रोजी पणजी बाजारात कंादे ७० रु. प्रतिकिलो दराने विकले जात होते. इतर महाग भाज्यांच्या दरात कोणताही फरक नव्हता. त्यामुळे खायचे काय, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. तथापि, सरकारला त्याचे कसलेच सोयरसुतक नाही.
महामंडळाची भाजी, कांदे अपुरे
गोवा सरकारच्या फलोत्पादन महामंडळातर्फे राज्याच्या विविध भागांत गाड्यांवर बाजारदरापेक्षा कमी दरात भाजीविक्री केली जाते. मात्र या गाड्यावर महामंडळाकडून मर्यादित भाजीपुरवठा करण्यात येत असल्याने दुपारनंतर लोकांना भाजी मिळत नाही. त्यातच कांदे एक किंवा दोन किलोच दिले जातात. जास्त मिळत नाहीत. त्यामुळे लोकांना बाजारातील महाग भाजी खरेदी करण्यावाचून पर्याय उरलेला नाही. साहजिकच भाजी व कांद्याच्या या वाढलेल्या दरामुळे सामान्य माणूस संतापला आहे. बाजारातील भाज्यांचे दर कमी कधी होणार, असा प्रश्‍न लोक भाजीविक्रेत्यांना विचारताना दिसत आहेत.

दक्षिण गोव्यात अपघातांत दोन ठार

वास्को, कुडचडे , दि. ९ (प्रतिनिधी) ः कुडचडे येथे खनिजवाहू ट्रकने (क्र. जीडीझेड-५७४१) आज एका अज्ञात पादचार्‍याला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याला ओळखणे कठीण बनले. हा अपघात संध्याकाळी पावणेपाचच्या दरम्यान घडला. वास्को येथे आज दुपारच्या वेळी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणार्‍या बसने महम्मद राजासाब नायकोडे या ४५ वर्षीय कामगाराला धडक दिल्याने त्याचे निधन झाले.
आज दुपारी वास्कोच्या स्टेट बँक ऑफ इंडियासमोर सदर घटना घडल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून बसचालक अजय तुकाराम नाईक याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यास अटक केली
आज दुपारी २.१५ च्या सुमारास सदर अपघात घडला. खासगी बस (क्रः जीए ०२ व्ही ४६६४) ने त्यास धडक दिल्याने महम्मद हा रस्त्यावर फेकला गेला. बस ची धडक बसून महम्मद गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेनेे त्वरित घटनास्थळावर दाखल होत त्यास उपचारासाठी चिखलीच्या कुटीर रुग्णालयात नेला. इस्पितळात आणण्यापूर्वीच महम्मद याचा मृत्यू झाल्याचे चिकित्सकांकडून घोषित करण्यात आल्याची माहिती वास्को पोलिसांनी दिली. डोक्याला गंभीर इजा झाल्यानेच त्याला मृत्यु आल्याचे वास्को पोलिस उपनिरीक्षक एफ.कॉस्ता यांनी सांगितले. बस चालक अजय तुकाराम नाईक याच्या विरुद्ध भा.द.स २७९ व ३०४ (ए) कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे.

बोफोर्समुळे देशाची नाचक्की - अडवाणी

गुवाहाटी, दि. ९
बोङ्गोर्स व्यवहारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमेला तडे जात असल्याने सर्वसामान्य माणसाला या व्यवहारातील सत्य समजलेच पाहिजे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज येथे सांगितले. बोङ्गोर्स तोङ्ग खरेदीत झालेल्या घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचाच सरकारने प्रयत्न केला, हे आयकर लवादाने दिलेल्या निर्णयानंतर पुरेसे स्पष्ट झाले आहे, असेही अडवाणी यावेळी म्हणाले.
विदेशी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पडून असलेले काळे धन देशात परत आणण्यात संपुआ सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका लालकृष्ण अडवाणी यांनी आज केली. काळा पैशांमध्ये सरकारच्या काही मंत्र्यांचा तर सहभाग नाही ना, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.
‘विदेशी बँकांमध्ये पडून असलेला काळा पैसा देशात परत का आणला जात नाही? विदेशी बँकांमध्ये काळे धन जमा करण्यात सरकारमधील काही लोक आणि त्यांचे काही मित्र सहभागी असल्यामुळे तर असे होत नाही ना?’ असा सवाल लालकृष्ण अडवाणी यांनी आज भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीची सांगता झाल्यानंतर आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना केला.
‘‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ३०० लाख कोटींपेक्षा जास्त काळा पैसा विदेशी बँकांमध्ये जमा करण्यात आला आहे. मी आणि अन्य भाजपा नेत्यांनी आमच्या स्वाक्षर्‍या असलेले पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पाठवून, हा काळा पैसा देशात परत आणून त्याचा उपयोग देशाच्या विकासासाठी करण्याची विनंती केली होती,’’असेही अडवाणी यांनी यावेळी सांगितले.
‘‘देशातील नागरिकांना वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी, रुग्णालये, शाळा व महाविद्यालये इत्यादी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडे मर्यादित स्त्रोत आहेत आणि म्हणूनच या क्षेत्राचा विकास करण्यासाठी काळा पैसा परत आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे. इच्छाशक्ती असल्यास मर्यादित स्त्रोतांमध्येही विकासाच्या अनेक गोष्टी करता येतात, हे भाजपाशासित मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले आहे,’’असेही अडवाणी यावेळी म्हणाले.
देशभरात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि गगनाला गवसणी घालत असलेली महागाई या मुद्यांवरही अडवाणी यांनी यावेळी संपुआ सरकारवर जोरदार टीका केली.
सोनियांचे क्वात्रोशीचे निकटचे संबंध
बोङ्गोर्स तोङ्ग खरेदी व्यवहारातील व्यापारी ओट्टाव्हिओ क्वात्रोची आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निकटचे संबंध होते आणि क्वात्रोची नियमितपणे सोनियांच्या निवासस्थानी भेट देत असे, असा आरोपही अडवाणी यांनी यावेळी केला. हे सांगत असताना मी कुणावरही आरोप करत नाही, असे ते म्हणाले.

चिनी लष्कराची भारतात घुसखोरी

लेह/श्रीनगर, द. ९
गेेले वर्षभर शांत राहिल्यानंतर २०१० हे वर्ष सरतासरता चिनी लष्कराने आग्नेय लद्दाख भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करून त्याठिकाणी प्रवासी थांबा उभारत असलेल्या ठेकेदाराला धमकावून जबरदस्ती काम थांबविण्यास भाग पाडल्याचे वृत्त आहे.
चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या मोटारसायकलवर आलेल्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या धेमचोक प्रांतातील गोंबिर भागातील भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने मंजूर केल्याप्रमाणे प्रवासी निवारा उभारण्याचे काम करत असलेल्या मजुरांना धमकावले, असे वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. लेह जिल्ह्याच्या मुख्यालयापासून आग्नेय दिशेला ३०० किमी अंतरावर असलेल्या गावात गेल्या वर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही घटना घडली होती. नागरी प्रशासन, लष्कर, केंद्रीय सुरक्षा संस्था आणि इंडो-तिबेटीयन पोलिसांच्या संयुक्त बैठकीत या गंभीर घटनेबाबत एक अधिकृत अहवाल तयार करण्यात आला.
गृहमंत्रालयाच्या सीमावर्ती विकास प्रकल्पाअंतर्गत सुमारे दोन लाख रुपये खर्च करून गोंबिर गावातील ‘टी’ पॉईंटवर हा प्रवासी निवारा उभारण्यात येत होता. चिनी लष्कराच्या जवानांनी याठिकाणी येऊन निवार्‍याचे काम थांबविले, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. चिनी लष्कराच्या जवानांना बघताच मजुरांमध्ये अस्वस्थता पसरली आणि ते ताबडतोब मदतीसाठी भारतीय लष्कराच्या चौकीकडे धावले होते, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. यावेळी चिनी जवानांनी काही घोषणाही दिल्या. परंतु, ते नेमके काय म्हणाले हे समजून घेता आले नाही.
भारतीय लष्कराने या घटनेची त्वरित दखल घेतली आणि परिसरात जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. यापुढे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या ५० किमी अंतरापर्यंत कुठलेही कार्य हाती घेताना लष्कराकडून त्याची परवानगी घेतल्याशिवाय कार्य सुरू करू नये, असे निर्देश लष्करातर्ङ्गे देण्यात आले आहेत. लेहस्थित १४ व्या कॉर्पचे अधिकृत प्रवक्ते लेफ्ट. कर्नल जे. एस. ब्रार यांनी या घटनेबाबत कुठलेही भाष्य करण्यास नकार दिला.

लिफ्ट कोसळून पाच जण ठार

मुंबई, दि. ९
माटुंग्यात रुईया कॉलेजसमोर रुस्तुमजी टॉवर येथे बांधकाम सुरू असताना सर्व्हिस लिफ्ट कोसळली. आज (रविवारी) सकाळी झालेल्या या दुर्घटनेत पाच मजूर ठार आणि एकजण जखमी झाला आहे. जखमी मजुराला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व्हिस लिफ्ट २१ व्या मजल्यावरुन खाली येत होती. मात्र ११ व्या मजल्यावर शाफ्ट तुटल्याने लिफ्ट खाली कोसळून जमीनीवर आपटली.

जम्मू हायवे
अजून बंदच
जम्मू, दि. ९
प्रचंड हिमवर्षावामुळे आज सलग दुसर्‍या दिवशीही जम्मू-श्रीनगर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. जवाहर बोगदा आणि पतनीटॉप नजीक प्रचंड हिमवर्षाव सुरू आहे. त्यामुळे कालपासूनच येथे दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. वाहतूक ठप्प झ्राल्याने सुमारे एक हजारावर वाहने अडकून आहेत. त्यामुळे लोकांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल होऊ लागले आहेत.

धुक्यामुळे दिल्लीत
विमानसेवा ठप्प
नवी दिल्ली, दि. ९
दाट धुक्यामुळे आज राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा ठप्प झाली. एका विदेशी विमानासह सहा देशांतर्गत विमानांना इतरत्र वळवावे लागले. तसेच दोन उड्डाणे रद्द करावी लागली. बंगलोर आणि मुंबईची उड्डाणे रद्द करण्यात आली. न्यूयॉर्क, शिकागो आणि टोरॅन्टो येथे जाणार्‍या उड्डाणांचे वेळापत्रकही धुक्यामुळे बदलवावे लागले.

दिल्ली पोलिस
बनले सुसज्ज..
नवी दिल्ली, दि. ९
दिल्ली पोलिसांनी सरत्या वर्षात कोट्यवधींचे अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरणांची खरेदी केली. राजधानीतील पोलिसांनी ५८६ अत्याधुनिक वाहने सुमारे ९.३२ कोटी रुपयांना खरेदी केली. सोबतच ग्लॉक पिस्तूल आणि स्निपर रायङ्गल्सचीही खरेदी केली. अत्याधुनिक वाहनांमध्ये बचाव कार्यासाठी, विशेष कारवाईसाठी, दंगल रोखण्यासाठी आदी प्रकारांचा समावेश आहे. हल्ले करणार्‍या अतिरेक्यांजवळ अत्याधुनिक शस्त्रे आणि उपकरण असतात. त्या तुलनेत सुरक्षेसाठी तैनात पोलिसांजवळ कोणतेही सक्षम साधन नसते. ही बाब लक्षात घेऊन ही खरेदी करण्यात आल्याचे समजते.

Sunday, 9 January, 2011

सत्ताधारी नगरसेवकांनी जारी केलेल्या निविदांना हरकत

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेतील भाजप समर्थक नगरसेवकांचे प्रभाग वगळून केवळ आपल्याच प्रभागांच्या विविध कामांची सुमारे दोन कोटी रुपयांची कामे करण्यासाठी सत्ताधारी मंडळाने जारी केलेल्या निविदांना तीव्र हरकत घेण्यात आली आहे. एकीकडे विकासकामांसाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे सांगितले जात असताना आता अचानक या निविदा जारी करण्यात आल्याने त्या तात्काळ रद्द करण्यात याव्यात, असे निवेदन भाजप समर्थक नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना सादर केले आहे.
याप्रकरणी नगरसेवक संदीप कुंडईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिकेतील सत्ताधारी मंडळाने आत्तापर्यंत नेहमीच विरोधी नगरसेवकांच्या विकासकामांकडे दुर्लक्ष केले आहे. आता महापालिकेची निवडणूक नजरेसमोर ठेवून आपल्या प्रभागांतील प्रलंबित कामांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांच्या निविदा जारी केल्या आहेत. महापालिकेकडे सध्या कामगारांना वेतन देण्यासाठीही निधी उपलब्ध नाही. यापूर्वी एकाच कामाच्या विविध निविदा जारी करून महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याची प्रकरणे दक्षता खात्याकडे तपासासाठी आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लेखा अधिकार्‍यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याबरोबर महापालिका निधीचा गैरवापर झाल्याचीही अनेक प्रकरणे आहेत. अनेक गैरकारभार व भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करूनही त्याची चौकशी होत नसल्यानेही या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व घोटाळ्यांच्या पार्श्‍वभूमीवर नव्याने जारी करण्यात आलेल्या निविदा स्थगित ठेवण्यात याव्यात व महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतरच ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणीही त्यांनी आयुक्तांना केलेल्या निवेदनात स्पष्ट केली आहे.

‘कलावंत जन्मावा लागतो’

शरद पोंक्षे यांची ‘गोवादूत’ला सदिच्छा भेट

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
कलाकार जन्माला यावा लागतो. अभिनयाचे शिक्षण घेऊन वा पदव्या घेऊन कलाकार होता येत नाही, असे प्रतिपादन विख्यात नाट्यचित्र कलाकार शरद पोंक्षे यांनी आज येथे केले. गोवादूतच्या कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली तेव्हा त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग व पर्वरी येथील शारदा व्याख्यानमालेनिमित्त श्री. पोंक्षे गोव्यात आले आहेत. राष्ट्रप्रेमी विचारांचे कलाकार व जाज्वल्य सावरकरप्रेमी अशी त्यांची ख्याती आहे. ‘गोवादूत’चे संपादक गंगाराम म्हांबरे यांनी त्यांचे स्वागत केले. संचालक सागर अग्नी यांनी ‘गोवादूत’च्या कार्याची माहिती त्यांनी दिली. या वेळी अभिनव पब्लिकेशनचे चेअरमन राजेंद्र भोबे, संचालिका ज्योती धोंड, कार्यकारी संपादक सुनील डोळे व गोवादूत परिवारातील कर्मचारी, मणिपाल गोवा इस्पितळातील डॉ. पंकज म्हात्रे व सौ. म्हात्रे उपस्थित होत्या.
नाटक, चित्रपट व मालिका यात फारसा फरक नसतो. मात्र नाटकात प्रेक्षकांसमोर थेट अभिनय करावा लागतो. आर्ट फिल्म व कमर्शियल फिल्म असला काहीही प्रकार नसतो, असेही ते म्हणाले.
मालिकांमधून नकारात्मक विचार प्रक्षेपित होतात का, या ज्योती धोंड यांनी विचारलेल्या प्रश्‍नावर श्री. पोंक्षे यांनी नकारात्मक भूमिकेशिवाय नाट्य रंगत नाही म्हणून नकारत्मक विचारांचे एखादे पात्र त्यात असावेच लागत. मात्र लोक शहाणे असल्याने ते चांगले तेच घेतात, असे उत्तर त्यांनी दिले.
संघर्षाशिवाय नाट्य घडत नाही असे सांगून श्री पोंक्षे यांनी एका चाहत्याने, सावरकरांना कैदी म्हणून ठेवलेल्या अंदमानच्या कारागृहातील वाळू आपल्याला भेट दिली तो माझा खरा सन्मान व मिळालेला खास पुरस्कार होता असे ते म्हणाले. माझ्या कलेच्या क्षेत्रातील सर्वोच्च आनंदाचा तो क्षण होता असे सांगून माझी नथुरामची भूमिका मला फार आवडल्याचे त्यांनी सांगितले.
इतर कलावंत भूमिकातून जगत असतील, पण मी भूमिकांमधून जगत नाही तर त्या केवळ साकारतो. ज्यादिवशी भूमिकांतून मला जगावे लागेल त्यादिवशी मी संपेन असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुतांश वर्तमानपत्रे विकाऊ
सध्याच्या वृत्तसृष्टीबद्दल बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, आजची ९० टक्के वर्तमानपत्रे विकाऊ झाली असून कुणा उद्योगपतीच्या हातातील बाहुले बनली आहेत. ताठ कण्याची पत्रकारिता केव्हाच लोप पावली आहे. वृत्तवाहिन्यांबाबत तर विचारूच नका. ते टाइमपासचे साधन झाल्याची टीका त्यांनी केली. मात्र मुद्रित माध्यमांनी (प्रिंट मीडिया) अजून निदान काही प्रमाणात तरी विश्‍वासार्हता जपली आहे ही त्यातल्यात्यात समाधानाची बाब म्हटली पाहिजे.

कारची धडक बसून वास्कोत एक ठार

वास्को, दि. ८ (प्रतिनिधी)
रस्त्याच्या बाजूला स्कूटर उभी करून ५५ वर्षीय मेडे जॉर्ज हा इसम त्याच्यावर बसून सामना पाहत असताना भरवेगाने आलेल्या कारनेे त्याच्या स्कूटला जबर धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर अपघातात कारचालक व त्याचे दोघे मित्रही जखमी झाले आहेत. आपल्या इतर दोन मित्रांसह बोगमाळो समुद्र किनार्‍यावर गेलेला १८ वर्षीय रोहित पांडे हा भरवेगाने परतीच्या वाटेवर असताना दाबोळी जंक्शनच्या आधी असलेल्या रस्त्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर भीषण अपघात आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला.
गाळींत, बोगमाळो येथे राहणारा मेडे जॉर्ज हा आपल्या मुलीला आणण्यासाठी दुचाकीवर (क्रः जीए ०२ सी ५३४८) शाळेत जाण्यासाठी निघाला. शाळा सुटायला काही वेळ असल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने दाबोळी रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर आपली दुचाकी थांबवून येथील मैदानावर सुरू असलेला सामना पाहण्यास पसंतकेले. त्याचवेळी त्याला ‘गेट्झ’(क्रः जीए ६ डी २६८०)या कारने मागच्या बाजूने जबर धडक दिली. त्यामुळे स्कूटर व जॉर्ज घटनास्थळापासून सुमारे १५ मीटर फरफटत पुढे जाऊन पडले. नंतर कारने तेथे असलेल्या कुंपणाला धडक दिली. अपघातात स्कूटरचा चक्काचूर झाला असून कारचीही प्रचंड हानी झाली.
अपघाताची माहिती मिळताच १०८ च्या रुग्णवाहिकेने त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन गंभीर जखमी झालेल्या जॉर्ज यास चिखलीच्या कुटीर रुग्णालयात नेले असता येथे आणण्यापूर्वीच तो मरण पावल्याचे घोषित करण्यात आले. सदर अपघातात कारचालक रोहित पांडे (वय १८, राः आल्त - चिखली), त्याचे मित्र राऊल मोहांडी (वय १८, राः आदर्शनगर चिखली) व विनायक वेर्णेकर (वय १८, ः मेस्तावाडा) जखमी झाले.
कारचालक रोहित व त्याचे दोन्ही मित्र एमइएस महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. नंतर मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियोे इस्पितळात पाठवून दिला.
कारचालक रोहित याच्याविरुद्ध भा.द.स.च्या २७९ व ३०४ (ए) कलमांखाली गुन्हा नोंद करून त्यास पोलिसांनी अटक केली आहे. आज झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेला जॉर्ज हा कंत्राटदार होता. त्याच्या मृत्युमुळे गाळींत, बोगमाळो भागावर शोककळा पसरली आहे. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.

पन्नास टक्के प्रभाग राखीव

महिलांसाठी ७, ओबीसींसाठी ५
६ मार्च किंवा १२ मार्चला निवडणूक घेण्याचा प्रस्ताव

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)
पणजी महापालिकेच्या निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी पालिका संचालनालयाच्या निर्देशानुसार गोवा निवडणूक आयोगाने पणजी महापालिकेतील राखीव प्रभागांची घोषणा केली आहे. त्यानुसार ३० प्रभागांपैकी १५ प्रभाग राखीव होणार आहेत. त्यातील ७ प्रभाग महिलांसाठी राखीव असून ५ प्रभाग ओबीसींसाठी राखीव आहेत. विशेष म्हणजे अनुसूचित जमाती व अनुसूचित जातींसाठी एकही प्रभाग राखीव नाही.
दरम्यान या निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्रांद्वारे मतदान होणार आहे. त्यासाठी ५० यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. २००६ च्या निवडणुकीत ३४ यंत्रांचा वापर करण्यात आला होता. यावेळी मतदार वाढल्याने ४५ ते ५० यंत्रांचा वापर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने गोवा निवडणूक आयोगाला ६ किवा १२ मार्च रोजी मतदान घेण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

‘लोकोत्सव २०११’चा दिमाखदार समारोप..

काणकोण, दि. ८ (प्रतिनिधी)
आपल्या शक्तीचे विराट रूप दाखविल्यानंतरच आपले महत्त्व दुसर्‍याला कळते. आमदार रमेश तवडकर म्हणूनच खरोखर अभिनंदनास पात्र ठरतात. त्यांच्या प्रयत्नातून एक आदर्श काम झाले आहे. गोव्यातील नागरिक विविध कारणांनी वैतागले आहेत. १५ वर्षांपूर्वीची मानसिकता आज राहिलेली नाही. (५ रुपयांनी कांदा वाढला व सरकार गडगडले) आज याही स्थितीत आमोणा पैेंगीणीत आशेचा किरण दिसतो आहे. गोव्यातील लोकजीवन व इथल्या लोकसंस्कृतीचे दर्शन प्रत्यक्ष या आदर्श बलराम ग्रामात दिसेल, असे भावपूर्व विचार विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केले. आमोणा पैंगीण येथे बलराम विकास संस्था व आदर्श युवा संघ आयोजित १० वा लोकोत्सव २०११ च्या समारोप सोहळ्यात आज रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्राचार्य सुभाष वेलिंगकर अध्यक्षस्थानी होते. आमदार रमेश तवडकर, आमदार महादेव नाईक, आमदार वासुदेव मेंग गावकर, जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप, सत्कारमूर्ती स्थानिक नगराध्यक्ष रत्नाकर धुरी, लोकगीत गायक सुलक्षा वेळीप, शिक्षणतज्ज्ञ डॉ. उदय गावकर, पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, संघाचे अध्यक्ष मंगेश गावकर, सचिव जानू तवडकर हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
या सरकारला अधिवेशनाला सामोरे जावे लागते म्हणून प्रत्येक वेळी कामकाजाचे दिवस कमी - कमी केले जात आहेत. काणकोणात ही मायनिंगसाठी प्रयत्न चालू आहेत. मात्र काम सुरू झालेले नाही. मायनिंगमुळे दक्षिण गोव्याला पाणी पुरवणारा सांगे खाणीमुळे त्रस्त आहे. असे प्रमुख पाहुणे पर्रीकर शेवटी म्हणाले.
संघाचे अध्यक्ष मंगेश गावकर यांनी स्वागत केले. आदर्श युवक संघाच्या वाटचालीची माहिती त्यांनी देतानाच काणकोण मागास भाग असला तरी आपल्या कामाने आपण त्याचा कायापालट घडवून आणणार आहोत, असा मनोदय व्यक्त केला.
संघाचे पदाधिकारी श्रीकांत तवडकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. वर्षा गावकर, कामिनी गावकर, सजल गावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सचिव जानू तवडकर यांनी अहवाल वाचन केले. सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अर्जुन गावकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष रत्नाकर यशवंत धुरी,
पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. उदय गावकर, लोकगीत गायक सौ. सुलक्षा शा. वेळीप या सत्कारमूर्तींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच वनवासी कल्याण आश्रम पुणे - अध्यक्षांच्या यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य कृष्णा वेळीप यांनी विचार व्यक्त केले. प्राचार्य वेलिंगकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. विविध स्पर्धांतील विजेत्यांना याप्रसंगी बक्षिसे प्रदान करण्यात आली. सूत्रसंचालन तुकाराम वेळीप यांनी केले. आभार दया गावकर यांनी मानले.

‘जेपीसी’च्या मुद्यावर आडमुठेपणा कॉंग्रेसला फारच महागात पडेल

भाजपाध्यक्ष गडकरींचा
खणखणीत इशारा
गुवाहाटी, दि. ८
२-जी स्पेक्ट्रमच्या परवाना वाटपात झालेला महाघोटाळा हा इतर सर्व घोटाळ्यांची जननी आहे, असा घणाघाती आरोप भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला असून, या घोटाळ्याची जेपीसीमार्ङ्गत चौकशी करण्याची विरोधी पक्षांची न्याय्य मागणी मान्य न करता आडमुठे धोरण स्वीकारले तर ते सरकारला महागात पडू शकते, असा इशारा दिला आहे.
‘या सगळ्या घोटाळ्यात आपण निर्दोष आहोत असा पंतप्रधानांना आत्मविश्‍वास असेल तर विरोधकांच्या जेपीसीच्या मागणीबाबत ते आडमुठी भूमिका का घेत आहेत. सरकारच्या या आडमुठेपणामुळे आम्हाला देशात आणिबाणी लागू करण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण होत आहे. सरकारच्या या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो,’ असेही गडकरी म्हणाले. आजपासून येथे सुरू झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना नितीन गडकरी बोलत होते. २-जी स्पेक्ट्रमच्या महाघोटाळ्यामुळे सरकारचा किती महसूल बुडाला हे कॅगने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. या घोटाळ्यामुळे झालेले नुकसान हे काही राज्यांच्या अंदाजपत्रकाएवढे आहे. त्यामुळे सरकारने याबाबतीत आपला आडमुठेपणा सोडला नाही तर संपुआ सरकारला त्याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा गडकरी यांनी यावेळी दिला.
भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर केलेल्या पंचसूत्रीवरही गडकरी यांनी यावेळी प्रखर टीका केली. स्व:तच नियुक्त केलेल्या राजकीय नेत्यांना असे आवाहन केल्याने त्याचा काहीही परिणाम होणार नाही. बोकाळलेला भ्रष्टाचार ही आज देशासमोरील सगळ्यात मोठी समस्या असून, संपुआचे दुसरे सरकार म्हणजे ‘भ्रष्टाचार्‍यांचे राज्य’ आहे, असा आरोपही गडकरी यांनी यावेळी केला.
२-जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक असल्याने भ्रष्टाचार हाच मुद्दा या बैठकीच्या केंद्रस्थानी असल्याचे गडकरींच्या भाषणावरून पुरते स्पष्ट झाले आहे. कॅगने काढलेला नुकसानीचा आकडा चुकीचा असल्याच्या केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांच्या विधानानंतर जेपीसीची आपली मागणी भाजपा आणखी जोरकसपणे लावून धरण्याची शक्यता आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन व राष्ट्रीय पुनर्निर्माण करण्यासाठी एकजूट होऊन आम्हाला कार्य करायचे आहे, असा कानमंत्र गडकरी यांनी यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. आज देशातील जनता भाजपा आणि रालोआकडे मोठ्या अपेक्षेने बघत आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या अपेक्षांचे ओझे वाहण्याची जबाबदारी आम्हाला पार पाडायची आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तीस वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर उभे राहून अंधाराला दूर सारून प्रकाश आणण्याचा आणि कमळ ङ्गुलविण्याचा निर्धार केला होता. ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ या अटलजींच्या प्रेरणादायी शब्दांची आठवण करत मार्गक्रमण करायचे आहे, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
आसाममध्ये होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान करून असे सरकार स्थापन करा की जेणेकरून आम्हा सगळ्यांना शपथग्रहण समारंभासाठी पुन्हा गुवाहाटीला यावे लागेल, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले. दोन दिवस चालणार्‍या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू, नजमा हेपतुल्ला, महिल्या मोर्चाच्या अध्यक्षा स्मृती इराणी, युवा नेते वरुण गांधी यांच्यासह सुमारे ३५० पदाधिकारी उपस्थित आहेत.