Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 30 October, 2010

कर्नाटक : बंडखोर आमदार अपात्रच

सभापतींच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब
बंगलोर, दि. २९ : कर्नाटकातील ११ बंडखोर भाजप आमदारांना अपात्र ठरविण्याच्या विधानसभा सभापतींच्या निर्णयावर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले असून, या निर्णयामुळे येडियुरप्पा यांच्या नेतृत्वातील सरकारला फार मोठा दिलासा मिळाला आहे.
मागच्या सुनावणीच्यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वातील खंडपीठात मतभेद निर्माण झाल्यानंतर हे प्रकरण न्या. व्ही. जी. संभाहित यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. या ११ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याचा विधानसभा सभापती के. जी. बोपय्या यांचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा न्या. संभाहित यांनी आज दिला आहे. पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत घटनेच्या दहाव्या प्रकरणातील कलम २ (१) (अ) नुसार बोपय्या यांनी दिलेला निर्णय योग्य आहे, असे न्या. संभाहित यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे.
याआधी तीन सदस्यीय खंडपीठात या प्रकरणी मतभेद निर्माण झाले होते. यांपैकी एका न्यायाधीशांनी बोपय्या यांचा निर्णय योग्य ठरवला होता. तर, दुसरे न्यायाधीश एन. कुमार यांनी अध्यक्षांचा निर्णय रद्दबातल ठरवला होता. त्यामुळे ही याचिका तिसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आली होती. न्या. संभाहित यांनी आज या याचिकेवरचा आपला निर्णय दिला आणि औपचारिक आदेश देण्यासाठी हा निर्णय खंडपीठाकडे पाठवला.
कर्नाटक उच्च न्यायालयाचा आजचा निर्णय हा राज्य सरकारसाठी फार मोठा विजय मानला जात आहे. ११ बंडखोर भाजप आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे कर्नाटक सरकार अडचणीत आले होते. मात्र, त्यानंतर १४ आणि १६ ऑक्टोबरला सरकारने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले होते.
निर्णयाचे येडियुरप्पांकडून स्वागत
११ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आनंद व्यक्त केला असून, पक्षांतर करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्याच्या दृष्टीने आजचा निर्णय म्हणजे नव्या युगाची सुरुवात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आपल्या स्वार्थासाठी पक्षांतर करून सरकारला अडचणीत आणणाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा निर्णय धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे पक्षांतर रोखण्यात आजचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी मला आशा आहे, असे येडियुरप्पा यांनी निर्णयानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

चार ठिकाणी चोऱ्या

ब्रह्माकरमळीत फंडपेटी फोडली कळंगुटमधून ८० हजार चोरले
शेल्डे येथे २.७ लाखांचे दागिने लंपास काणकोणात ४ दुकाने फोडली

म्हापसा, वाळपई, कुडचडे व काणकोण, दि. २९ (प्रतिनिधी): 'सागर कवच' मोहिमेत व्यस्त असलेल्या सुरक्षा यंत्रणेला जबर आव्हान देत चोरट्यांनी कळंगुट येथील डायसेशियन सोसायटी, ब्रह्माकरमळी येथील मंदिर, शेल्डे येथील घर व
काणकोण भागातील ४ दुकाने फोडली. कळंगुट, शेल्डे व काणकोण येथून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरीस गेला असून ब्रह्माकरमळी मंदिरातून किती रक्कम चोरीस गेली, याची माहिती मिळालेली नाही.
नायकवाडा कळंगुट येथील बोवा वेगा कपेलाशेजारी असलेल्या डायसेशियन सोसायटीच्या गोदामातून सुमारे ८० हजारांचा ऐवज पळवल्याची तक्रार झेव्हियर डिसोझा यांनी कळंगुट पोलिस स्थानकात नोंदवली आहे. उपनिरीक्षक हरीष गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, नायकवाडा येथील कपेलाच्या शेजारी असलेला गोदाम गेल्या काही दिवसांपासून बंद होता. आज तो उघडण्यात आला असता दोन मातीच्या मूर्ती, सात चांदीचे मुकुट, एक चांदीचा क्रूस, स्टीलची ताटे मिळून ८० हजारांचा ऐवज गायब झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील चौकशी सुरू आहे.
ब्रह्माकरमळी येथील सुप्रसिद्ध ब्रह्मदेव मंदिरात काल रात्री अज्ञातांनी गर्भागृहाचे कुलूप तोडून आतील फंडपेटीतील रक्कम लंपास केली. या घटनेमुळे या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वाळपई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराची नित्य साफसफाई करणारे आनंद शेळपकर सकाळी १० वाजता मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी या प्रकाराची माहिती पुजारी संदीप केळकर यांना दिली. दोघांनी शोधाशोध केली असता देवस्थानच्या स्वयंपाकघरात फंडपेटी तर नदीकडे जाणाऱ्या वाटेवर दरवाजाचे कुलूप सापडले. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. उपनिरीक्षक यशवंत गावस यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा करण्यात आला. चोरीस गेलेली रक्कम नेमकी किती आहे, याबद्दल माहिती मिळालेली नाही.
कामणसाय शेल्डे येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरीत सुमारे २.७० लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान ही घटना घडली. यावेळी घरात कोणीच नसल्याचे पाहून चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन कपाटे फोडून सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील साखळी व इतर साहित्य मिळून सुमारे २.७० लाखांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अनिता प्रशांत गावस देसाई यांनी तक्रार नोंदवली आहे. सकाळी त्यांची दोन मुले शाळेत गेली होती तर पती आपल्या कामावर गेले होते. अनिता नजीकच्या घरात गेल्या असता ही घटना घडली. या भागात तीन व्यक्ती हेल्मेट घालून फिरत होत्या, त्यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या महिन्यातही धामडवाडा येथे अशाच प्रकारे रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात चोरी करण्यात आली होती. यासंबंधी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नगर्से काणकोण येथे राष्ट्रीय महामार्गाला लागून नगर्से तसेच कदंब बसस्थानकाजवळील ओंकार इमारतीमधील एकूण ४ दुकाने एकाच रात्री फोडण्यात आली. यात नगर्से येथील एजंसिया रियलची दोन दुकाने, बाबाजी गावकर यांच्या मालकीचे वाईन स्टोअर्स व जनरल स्टोअर्स तर ओंकार इमारतीमधील डिसिल्वा फार्मसी आदी दुकानांचे शटर वाकवून अज्ञातांनी चोरी केली. यावेळी चोरट्यांच्या हाती मोठी रक्कम लागलेली नसली तरी एकाच वेळी चार दुकाने फोडण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणेचे अपयश स्पष्ट होत असल्याच्या प्रतिक्रिया येथून ऐकू येत होत्या. काणकोण पोलिसांनी श्वानपथकाच्या साह्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप कोणतेच धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

वाहतूक निरीक्षकाला जेव्हा अटक होते...

म्हापसा, दि. २९ (प्रतिनिधी): वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करताना दृष्टीस पडणाऱ्या वाहतूक अधिकाऱ्यालाच नियम व मर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे म्हापसा पोलिसांकडून अटक होण्याची पाळी आली. मडगाव येथील वाहतूक कार्यालयात सेवा बजावणारे सडये शिवोली येथील वाहतूक निरीक्षक भालचंद्र वायंगणकर यांनी आज म्हापसा येथे वाहतूक पोलिसाच्या थोबाडीत मारल्याने त्यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागली. वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी या संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे. तर, पोलिस खाते उद्या आपला अहवाल सादर करणार आहेत.
अधिक माहितीनुसार वाहतूक निरीक्षक भालचंद्र वायंगणकर यांनी म्हापसा येथे आपली कार रस्त्याच्या मधोमध आडवी घालून एका वाहनचालकाला अडवले. आपल्या जीए ०३ सी १४६९ क्रमांकाच्या आल्टो कारला सदर कारने धडक दिली, अशी त्याची तक्रार होती. म्हापशातील मारुती मंदिरासमोर त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या मधोमध उभी केली व त्या वाहनचालकाला गाडीतून बाहेर उतरण्यास ते सांगू लागले. यासाठी त्यांनी त्या गाडीवर ठोसेही लगावले. कार मधोमध उभी केल्याने मागे वाहनांची रांग लागली. म्हापसा पोलिसांना ही बातमी समजताच वाहतूक पोलिस हवालदार श्रीवल्लभ पेडणेकर तिथे अन्य एका पोलिसासह दाखल झाले. त्यांनी वायंगणकर यांना आपली गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र वायंगणकर यांनी त्यांच्याशीही हुज्जत घातली व त्यांच्या थोबाडीत लावली.
यावेळी वाहतूक पोलिस ज्ञानेश्वर सावंत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यामुळे याबाबतची तक्रार म्हापसा पोलिसांत नोंदवण्यात आली. म्हापसा पोलिसांनी वाहतूक निरीक्षक वायंगणकर यांच्याविरुद्ध भा. दं. सं. ३५३/३४१ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली व त्यांची कारही ताब्यात घेतली. यानंतर संध्याकाळी ५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली.
दरम्यान, आपल्या सेवेत असलेल्या एका साध्या वेशातील अधिकाऱ्याने ड्युटीवर असलेल्या पोलिसांशी केलेल्या या गैरवर्तनाची वाहतूक खाते कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमित शहा यांची जामिनावर सुटका

अहमदाबाद, दि. २९ : सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी सीबीआयच्या अटकेनंतर तब्बल तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यावर आज अखेर गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री अमित शहा यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
न्या. आर. एच. शुक्ला यांनी ४६ वर्षीय अमित शहा यांना १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा सशर्त जामीन दिला. त्यांना सुटकेनंतर दर महिन्यात मुंबईतील सीबीआय कार्यालयात हजेरी लावावी लागणार असल्याची अट जामीन देताना ठेवण्यात आली आहे. सोहराबुद्दीन प्रकरणी सीबीआयने मुंबईत खटला दाखल केल्याने त्यांना मुंबईत यावे लागणार असल्याचे समजते.
यापूर्वी सीबीआय कोर्टाने शहा यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. उच्च न्यायालयातही वारंवार जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली जात होती. सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी शहा यांना सीबीआयने २५ जुलै रोजी अटक केली होती. गेल्या तीन महिन्यांपासून ते साबरमती कारागृहात बंद होते.
यापूर्वी ८ ऑक्टोबर रोजी शहा यांना सीबीआय कोर्टाने जामीन नाकारला होता. जर शहा यांना जामिनावर सोडले तर ते बाहेर जाऊन सत्ताबळाचा वापर करून खटला प्रभावित करतील, अशी सबब सीबीआय कोर्टाने सांगितली होती. गेल्या तीन महिन्यांच्या या कायदेशीर लढ्यात शहा यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी बाजू सांभाळली आणि सीबीआयच्या वतीने के. टी. एस. तुलसी यांनी काम पाहिले.

महामार्ग फेरबदल समितीचा २ रोजी विराट मोर्चा

पणजी, दि.२९ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणानिमित्त लोकांनी उपस्थित केलेल्या हरकतींकडे राज्य सरकारकडून पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सरकारच्या या आडमुठ्या धोरणामुळे येत्या २ नोव्हेंबर २०१० रोजी पणजीतील आझाद मैदानावर विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. दुपारी ३ वाजता आझाद मैदानावरून हा मोर्चा पर्वरी विधानसभा संकुलावर नेण्यात येणार आहे. निवेदने व बैठकांतून मांडलेली भूमिका सरकारला समजत नाही व त्यामुळेच आता रस्त्यावर उतरून आपली भूमिका मांडण्याची वेळ समितीवर ओढवली आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी दिली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजीमंत्री फातिमा डिसा, व्यंकटेश प्रभू मोनी, पॅट्रिशिया पिंटो, श्री. वाघेला, अशोक प्रभू व राजाराम पारकर आदी पदाधिकारी हजर होते. केंद्रीय रस्ता परिवहन व महामार्गमंत्री कमलनाथ यांच्याकडून लोकांना हवा तसाच महामार्ग बनेल, असे स्पष्ट करण्यात आलेले असतानाही मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांना मोठ्या प्रमाणात वाताहत लावणारा हा आराखडा राबवण्याची नेमकी कोणती घाई झाली आहे? असा खडा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. समितीचा राष्ट्रीय महामार्गाला अजिबात विरोध नाही; परंतु त्यासाठी वेगळा आराखडा तयार करण्यात यावा, असे स्पष्टीकरण श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
"एनएचएआय' व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सत्यस्थितीचा विपर्यास करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. यामुळे शेकडो लोकांना विस्थापित करून व विविध भागांची प्रत्यक्ष फाळणी करून हा महामार्ग उभारून सरकार नेमके कोणाचे हित जपत आहे, याचा खुलासा राज्य सरकारने करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती समिती स्थापन करून मोठा गाजावाजा करून प्रादेशिक आराखडा २०२१ तयार करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्गाबाबत या आराखड्यात केलेल्या तरतुदीला फाटा देऊन आपल्या मर्जीप्रमाणेच महामार्ग तयार केला जात असेल तर आराखडा मुळात तयारच का केला जातो? तो कचऱ्याच्या टोपलीतच टाका, असा सल्ला पॅट्रिशिया पिंटो यांनी दिला. किनारी भागात आधीच वाहतुकीची कोंडी होते. त्यात राष्ट्रीय महामार्गच किनारी भागातून नेला जात असल्याने तिथे अधिक गोंधळ होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरून आंतरराज्य व अवजड वाहतूक होणार आहे. यामुळे हा महामार्ग प्रत्यक्ष लोकवस्ती नसलेल्या जागेतूनच न्यावा, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गामुळे काही घरांवर गंडांतर येणार आहे व त्यांचाच या प्रकल्पाला विरोध आहे, असा समज कोणीही करू नये. या प्रकल्पाचा फटका प्रत्येक गोमंतकीयाला बसणार असून पुढील तीस वर्षे "टोल' भरावा लागणार आहे, अशी माहिती अशोक प्रभू यांनी दिली.
२ रोजीच्या मोर्चात गोव्यातील समस्त नागरिकांनी सहभागी व्हावे व सध्याच्या महामार्ग आराखड्याला विरोध दर्शवून सरकारला भानावर आणावे, असे आवाहन फातिमा डिसा यांनी केले.

अस्मिता माळगावकर यांनाच निवडून द्या

मनोहर पर्रीकर यांचे आवाहन
डिचोली, दि. २९ (प्रतिनिधी): डिचोली पालिकेच्या प्रभाग क्रमांक १ साठी भाजपच्या अधिकृत उमेदवार अस्मिता अर्जुन माळगावकर असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते अर्जुन माळगावकर यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांना समाजसेवेची आवड असल्याने त्या खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करू शकतील, असा विश्वास श्री. पर्रीकर यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या प्रभागातील मतदारांची भेट घेतली व पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अस्मिता माळगावकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले. अर्जुन माळगावकर हे गेली कित्येक वर्षे डिचोलीत भाजपचे कार्य करीत आहेत. एक संयमी व विनम्र कार्यकर्ते म्हणूनही ते या परिसरात परिचित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांनी अस्मिता माळगावकर यांच्या विजयासाठी पूर्णपणे कंबर कसली आहे. आमदार राजेश पाटणेकर, डॉ. शेखर साळकर, वल्लभ साळकर, नितीन माळगावकर, डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास गावकर, श्याम म्हार्दोळकर, अरुण नाईक, प्रदीप तिरोडकर आदींनीही अस्मिता माळगावकर यांच्यामागे आपली ताकद उभी केली आहे, अशी माहिती भाजप नेत्यांनी दिली.

पालिका निवडणुकांची तयारी पूर्ण

मुरगावातील ८ मतदानकेंद्रे अतिसंवेदनशील
पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): राज्यातील ११ नगरपालिकांच्या १३४ प्रभागांसाठी रविवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून मुरगाव पालिका क्षेत्रातील ८ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील आहेत व त्यामुळे सदर केंद्रावर कडक पहारा ठेवण्यात येणार आहे. या वेळी गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाकडे कुठल्याही उमेदवाराने तक्रार केलेली नाही, अशी माहिती गोवा निवडणूक आयुक्त एम. मुदास्सीर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव एस. वाय. परब उपस्थित होते.
मिरामार रेसीडेन्सी येथे पत्रकारांशी बोलताना श्री. मुदस्सीर पुढे म्हणाले की, मुरगाव पालिका क्षेत्रात हल्लीच दोन आमदारांत घडलेल्या मारहाण प्रकरणाव्यतिरिक्त कोणताही अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाही. तसेच मुरगावचे सदर प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत आलेले नाही. मुरगावातील ५५ मतदानकेंद्रांपैकी ८ मतदानकेंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली असून तेथे तसेच राज्याच्या सर्वच पालिका क्षेत्रात कडक पहारा ठेवण्यात येणार आहे. मुरगावात दोन निवडणूक निरीक्षक व इतर पालिका क्षेत्रांत प्रत्येकी एक निरीक्षक ठेवण्यात येणार आहे. राज्यातील १३ पालिकांपैकी साखळी व फोंडा वगळून ११ पालिकांतील १३४ प्रभागातून ५९४ उमेदवार उभे आहेत. सर्वांत जास्त उमेदवार (प्रभागाच्या मानाने) काणकोण येथे ३२ (१० प्रभाग) आहेत. सर्वांत जास्त मतदार मडगाव ६२ हजार (२० प्रभाग) व मुरगाव ६० हजार (१९ प्रभाग १ बिनविरोध एकूण २०) असून सर्वांत कमी मतदार पेडणे ३,३०७ (१० प्रभाग) आहेत. राज्यातील एकूण २,२६,२८१ मतदार (११४५३४ पुरुष, १११७४७ महिला) मतदानात भाग घेणार आहेत. मुरगाव व मडगावात बोगस मतदान होऊ शकते व त्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे असे श्री. मुदास्सीर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. १८१३ अधिकारी व कर्मचारी या निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून दि. १ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

'सीआरझेड'ला प्राणपणाने विरोध करू!

राज्यात मच्छीमार संघटनांची कडकडीत निदर्शने
पणजी व म्हापसा, दि.२९ (प्रतिनिधी): किनारी नियमन कायदा हा किनारपट्टी भागातील नागरिकांना देशोधडीला लावणारा असून शेकडो वर्षे किनारी भागांत राहणाऱ्या भूमिपुत्रांना घराबाहेर काढून धनिकांच्या घशात समुद्रकिनारे घालण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न गोव्यातील मच्छीमार व मच्छीविक्रेते कदापि सफल होऊ देणार नाहीत; रापणकारांचो एकवट, बोटमालक संघटना व इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने गोवेकरांच्या मुळावर येणाऱ्या या कायद्याला प्राणपणाने विरोध करण्यात येईल, असा इशारा आज माजी मंत्री माथानी सालढाणा यांनी दिला.
केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या किनारी नियमन कायद्याला (सीआरझेड) विरोध करण्यासाठी संपूर्ण भारतभर आज मच्छीमार संघटनांनी समविचारी संघटनांच्या सहकार्याने आयोजित धरणे आंदोलनाअंतर्गत आज गोव्यातील मच्छीमार, मासे विक्रेते, बोटमालक संघटना, गोयच्या रापणकारांचो एकवट व किनारपट्टी लोक संघटना यांनी संयुक्तपणे राज्यात धरणे आंदोलन केले. पणजी व म्हापशातील टपाल खात्याच्या मुख्य इमारतींसमोर ही निदर्शने करण्यात आली. दोन्ही ठिकाणी माथानींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पणजीतील आंदोलनाला आयटक नेते ऍड. राजू मंगेशकर, प्रसन्ना उट्टगी, मांडवी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष मिनीन आफोन्सो यांच्यासह शेकडो निदर्शक उपस्थित होते.
माथानींनी यावेळी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली व लोकशाहीत लोकांना जे हवे तेच व्हायला हवे असे सांगून पर्यावरणाचा ऱ्हास होणारे प्रकल्प गोव्याच्या माथी मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी सीआरझेड मागे घेण्यासाठी केंद्रावर दबाव आणावा असे प्रतिपादन केले. आयटकचे नेते ऍड. राजू मंगेशकर यांनी किनारपट्टी भागातील लोकांना हाकलून बिगर गोमंतकीयांना पंचतारांकित हॉटेले व इमारती बांधण्यासाठी रचलेले हे षड्यंत्र असल्याचे सांगून सर्वसामान्यांच्या हिताआड येणारा हा कायदा परत घ्यावा असे आवाहन केले. आयटक नेते प्रसन्ना उट्टगी, मांडवी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष मिनीन आफोन्सो व इतर नेत्यांनी "सीआरझेड'ला विरोध करून हा कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे प्रतिपादन केले. या वेळी "सीआरझेड नको नको! गरीब विरोधी सरकारचा निषेध असो !' अशा जोरदार घोषणा देऊन निदर्शकांनी परिसर दणाणून सोडला.
म्हापशातही निदर्शने
दरम्यान, म्हापशातील मच्छीमार बांधवांनीही मासळी मार्केट बंद ठेवून आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मासळी मार्केटमधून सरळ चालत जाऊन त्यांनी टपाल कार्यालयासमोर धरणे धरले. यावेळी सुमारे ५००हून अधिक लोकांची उपस्थिती होती.
ऊठ गोयकाराचे उपाध्यक्ष ऍड. जतीन नाईक यांचे यावेळी मार्गदर्शनपर भाषण झाले. त्यानंतर माथानी सालढाणा यांनीही येथे येऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दर्यासंगमावर पर्यटन प्रदर्शन सुरू

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): भारतातील सर्वच राज्ये पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर आहेत; या सर्व राज्यांना पर्यटकांनी भेटी द्याव्यात यासाठी सर्वांनी समन्वय साधून पर्यटन योजनांची आखणी करावी व एकमेकांच्या सहकार्याने पर्यटन संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न करावा, असा सूर आज कला अकादमीच्या दर्यासंगमावर आयोजित पर्यटन प्रदर्शनावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
दर्यासंगमावर दि. ३१ पर्यंत चालणाऱ्या या "पर्यटन प्रदर्शनाला' आज सुरुवात झाली. गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर व छत्तीसगड या राज्यांच्या पर्यटन खात्यातर्फे आपापल्या राज्यात प्रसिद्ध असलेल्या व पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या स्थळांची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाचे आकर्षकरीत्या आयोजन केले आहे.
यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना हिमाचल प्रदेश पर्यटन महामंडळाचे उपसरव्यवस्थापक मनोज शर्मा व एम. एस. राणा, गुजरात पर्यटन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक सनातन पांचोली, राजस्थान पर्यटन महामंडळाचे उपसंचालक आनंद त्रिपाठी, छत्तीसगड पर्यटन महामंडळाचे अधिकारी एन. के. झा यांनी आपापल्या राज्यातील पर्यटन महामंडळातर्फे पर्यटकांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची व सुविधांची माहिती दिली. तसेच प्रसिद्ध पर्यटनस्थळांची माहिती दिली. या सर्वांनी गोवा एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ असल्याने सांगून त्यामुळेच येथील पर्यटकांना इतर राज्याकडे आकर्षित करण्यासाठीच या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

Friday 29 October, 2010

गोव्यातील महामार्गाचा घोटाळा राष्ट्रकुलप्रमाणेच

मनोहर पर्रीकर यांची सडकून टीका

आराखड्याला भाजपचा विरोध


पणजी, दि.२८ (प्रतिनिधी)- केंद्रीय रस्ता परिवहन व महामार्गमंत्री कमलनाथ तसेच मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव हे राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनाप्रमाणे घोळात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. राष्ट्रीय महामार्गासाठी तयार केलेला सध्याचा आराखडा भाजपला अजिबात मान्य नाही, त्यात बदल करण्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल, असा विश्वास यावेळी श्री. पर्रीकर यांनी व्यक्त केला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी "सेझ'साठी दिलेली लाखो चौरसमीटर जमीन व आता राष्ट्रीय महामार्गासाठीचे भूसंपादन पाहता कमलनाथ हे गोव्याच्या जमिनीला लागलेले ग्रहणच आहे, असा ठपकाही त्यांनी ठेवला. राष्ट्रीय महामार्गासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वात ६० मीटर रुंदीची कुठेच आवश्यकता नाही. यामुळे या गोष्टीचा बाऊ हा निव्वळ खोटारडेपणा आहे. हा रस्ता ३० ते ३५ मीटरमध्ये तयार होऊ शकतो व राज्य सरकारतर्फेही ते काम करणे शक्य आहे. स्थानिक वाहनांच्या आकडेवारीवरूनच खाजगी कंपन्यांकडून टोल आकारणीचे हिशेब तयार करण्यात आले असून महामार्गाच्या नावाने गोमंतकीयांना लुटण्याचा हा डाव भाजप अजिबात साध्य होऊ देणार नाही,असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
म्हापसा ते पणजी या रस्त्याची रुंदी १६ मीटर आहे व ती ३० मीटरपर्यंत नेल्यास पुरेपूर रस्ता बनू शकतो. फोंडा ते पणजी या मार्गावरील वाहनचालकांना महिन्याला २१०० रुपये टोल भरणा करावा लागणार असल्याचे खुद्द सा.बां.खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचा विषय सोडवण्यासाठी सभागृह समितीची स्थापना करण्यात आली आहे. तथापि, या समितीची एकही बैठक बोलावण्यात आलेली नाही. सभागृह समितीला अंधारात ठेवून हा विषय पुढे नेता येणार नाही. यासंबंधी सभापतींना पत्र पाठवले असून सरकारने चालवलेल्या घिसाडघाईचे उत्तर विधानसभेत द्यावे लागेल, असेही श्री. पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
मुंबई ते कोची अशा संपूर्ण पट्ट्याला जोडणारा हा महामार्ग उर्वरित भागात कसा असेल? तिथे टोलनाके असतील काय? याची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. ज्या पद्धतीने या विषयाकडे दुर्लक्ष करून सरकारची घाई सुरू आहे त्यावरून या प्रकल्पात कुणाचा फायदा आहे, याची माहिती मिळायलाच हवी, अशी मागणीही पर्रीकर यांनी केली.

"महसूलमंत्र्यांची ती कृती यंत्रणेवरील अविश्वासच'

पणजी, दि.२८(प्रतिनिधी)- सरकारात मंत्री असलेले जुझे फिलिप डिसोझा यांनी आपल्या समर्थकांकरवी ज्या पद्धतीने आपले सहकारी तथा माजीमंत्री मिकी पाशेको यांना धक्काबुक्की केली व हॉटेलातील सामानाची नासधूस केली यावरून त्यांना आपल्याच सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही हे उघड होत आहे. मिकी पाशेको मतदारांना पैशांचे आमिष दाखवण्यासाठी तिथे आले होते याची खात्री जुझे फिलिप यांना होती तर त्यांनी पोलिस किंवा निवडणूक आयुक्तांकडे तक्रार का केली नाही? असा सवाल मनोहर पर्रीकर यांनी केला.
महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व मिकी पाशेको यांच्यात झालेल्या झटापटीच्या घटनेबाबत बोलताना श्री. पर्रीकर यांनी हे विधान केले. महसूलमंत्रीच जेव्हा कायदा हातात घेतात तेव्हा सामान्य लोकांची छळवणूक करण्याचा पोलिसांना अधिकार तो कोणता पोहोचतो? पोलिसांकडून या घटनेबाबत कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया का येत नाही? असे प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केले. सरकारी मंत्र्याने घटनेच्या मर्यादेत राहून वागण्याची गरज असते; परंतु जुझे फिलिप डिसोझा यांच्या कृतीवरून त्यांनी या सर्व मर्यादांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत असल्याने अशा मंत्र्याला मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळात ठेवणार काय? याचा जबाब मुख्यमंत्र्यांनी द्यावा,असे ते म्हणाले.
राज्यपालांनी या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती बनली आहे त्याचे हे ज्वलंत उदाहरण ठरत असल्याने घटनेच्या ३५६ कलमाखाली कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार राज्यपालांना आहेत, असे श्री. पर्रीकर यावेळी म्हणाले.

स्वच्छ व क्रियाशील उमेदवारांनाच निवडा
येत्या ३१ रोजी होणाऱ्या पालिका निवडणुकीत मतदारांनी स्वच्छ व क्रियाशील उमेदवारांनाच निवडून आणावे,असे आवाहन श्री. पर्रीकर यांनी केले. विविध पालिकांतील महत्त्वाचे विषय अजूनही सोडवले गेले नाहीत. कचरा विल्हेवाट प्रश्न तथा विविध पालिकांतील अत्यावश्यक पायाभूत सुविधांचा अभाव या गोष्टींचा प्रामुख्याने विचार झाला पाहिजे. हे विषय सोडवण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच निवडून आणून पैसा व इतर आमिषे दाखवून मतदारांना भुलविणाऱ्यांना घरी बसवण्याचे आवाहन त्यांनी केले.

ऑपरेशन सागर कवचचा विचका
सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पोलिसांतर्फे राबवण्यात आलेले ऑपरेशन सागर कवच हा निव्वळ विचका ठरला, असा ठपका श्री. पर्रीकर यांनी ठेवला. विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने सर्वांचीच गैरसोय झाली. सुरक्षेच्या समस्येवेळी परिस्थिती हाताळण्यास पोलिस सपशेल अपयशी ठरल्याचाच हा पुरावा आहे. या मोहिमेवेळी पोलिसांमध्ये अजिबात गांभीर्य दिसून येत नव्हते व त्यांना वाहतूक कोंडी सोडवण्यातही रस नव्हता, याचा अनुभव लोकांनी घेतला. कदाचित अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुंबई भेटीच्या अनुषंगानेच ही मोहीम राबवण्यात आली असावी, अशी शक्यता व्यक्त करताना गोवा पोलिसांच्या या सुरक्षा व्यवस्थेवर कितपत विश्वास ठेवावा, याचा विचार ओबामा यांना करावा लागेल, असा टोलाही त्यांनी हाणला.

गोमंतकीय विद्यार्थ्यावर ऑस्ट्रेलियामध्ये हल्ला

डोळ्याला गंभीर दुखापत, कुटुंबीय धास्तावले

मेलबर्न, दि. २८ - ऑस्ट्रेलियात भारतीयांवर वर्णद्वेषातून हल्ले होण्याचे प्रकार सुरूच असून गोव्यातील एका १२ वर्षीय मुलांवर मुलावर हल्ला करण्यातआला आहे. यात त्याच्या डोळ्याला गंभीर जखमी झाली असून त्याची दृष्टी जाण्याची धोका व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्याच्यावर उपचार सुरू असून त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे त्याचे कुटुंबीय धास्तावले असून त्यांनी गोव्यात परतण्याची तयारी चालवली आहे.
ऑस्ट्रेलियात आतापर्यंत भारतीय तरुणांवर हल्ले होत होते. आता लहान मुलांवरही हल्ले सुरू झाल्यामुळे भारतीय कुटुंबे हादरली आहेत. १८ ऑक्टोबर रोजी शाळेतून घरी परतत असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्या दोघांनाही हल्लोखर तरुणांना आपण ओळखत नव्हतो, असे त्या विद्यार्थ्याने सांगितले. त्यांच्याशी कोणताच संबंध नसतानाही त्यांनी मला धक्काबुक्की केली. मी विरोध केला असता त्यातील एकाने माझ्या डोळ्यावर जोरदार ठोसा मारला, असे सदर मुलाने सांगितले. वर्णद्वेषातूनच हा हल्ला झाल्याचे मेलबर्न पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, भारतीयांचे ऑस्ट्रेलियातील नेते ग्लॅन एरा यांनी तेथील सरकारकडे भारतीय विद्यार्थ्यांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

...आणखी एक तिकीट घोटाळा?

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)- पावसामुळे धुऊन गेलेल्या भारत वि. ऑस्ट्रेलिया सामान्याच्या तिकिटांचे पैसे घेण्यासाठी आलेल्यांमध्ये अडीच हजारांच्या एकाच क्रमांकाच्या दोन तिकीट मिळाल्याने "न झालेल्या सामन्याच्या तिकिटांचा घोटाळा' झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकारावर अधिक प्रकाशझोत टाकण्यासाठी गोवा क्रिकेट संघटनेने या सामन्याचे तिकीट छापलेल्या छापखान्याच्या मालकाला समन्स पाठवून बोलावून घेतले आहे. तिकिटांचे पैसे परत घेण्यासाठी एकाच क्रमांकाची दोन तिकिटे बॅंकेत आल्याने हा प्रकार उघडकीस आला.
अडीच हजार रुपयांची तिकीट आणि फुकटात देण्यात आलेल्या "विशेष पास'चा एकच क्रमांक असल्याचे उघडकीस आले आहे. दक्षिणेकडच्या वरच्या स्टॅंडमधील तिकीट क्रमांक ०९१७३ ही अडीच हजार रुपयांची तिकीट ही एफ - ००२८ या आसन क्रमांकाची आहे. तर हाच आसन क्रमांक छापलेला विशेष पासही असल्याचे लक्षात आले आहे. त्याचप्रमाणे,विशेष पास क्रमांक ३२६३९ हा आसन क्रमांक एफ -०००४ यावर दाखवण्यात आला आहे. तर, या आसन क्रमांकाची अडीच हजार रुपयांची तिकीट आढळून आली आहे.
दोन तिकिटांमुळे बोगस तिकीट छापण्यात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या विषयी गोवा क्रिकेट संघटनेचे सचिव प्रसाद फातर्पेकर यांना विचारले असता, ही तिकिटे छापताना चूक झाली असेल, आम्ही अधिक चौकशीसाठी पुणे येथील तिकिटे छापलेल्या छापखान्याच्या मालकाला चौकशीसाठी बोलावले आहे, असे सांगितले. सामना पाहण्यासाठी २२ हजार ५३६ प्रेक्षकांनी प्रवेश घेतला होता. त्यातील १४ हजार ३२० प्रेक्षक विशेष पासधारक होते. तर, ९ हजार १८० प्रेक्षक हे तिकिटावर आले होते. यात छापखान्याची चूक आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, आम्ही अद्याप त्याला पूर्ण पैसे दिलेले नाही, असेही श्री. फातर्पेकर यांनी स्पष्ट केले.

मोदींच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा

गुजरात अव्वल क्रमांकावर
२० कलमी कार्यक्रम
योजनेची कार्यवाही


नवी दिल्ली, दि. २८ - केंद्र सरकारच्या वीस कलमी कार्यक्रम योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारने पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि ईशान्येकडील राज्यांनी याबाबतीत "तळ' गाठला आहे.
कॉंग्रेसेतर पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनी यासंदर्भात पहिले दहा क्रमांक पटकावले आहेत. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे आज येथे ही माहिती देण्यात आली. या वीस कलमी कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने गरिबी निर्मूलन आणि ग्रामीण विकास यावर प्रामुख्याने भर दिला जातो. ५१ गुणांसह गुजरात पहिल्या स्थानावर असून कर्नाटकने दुसरा तर झारखंडने तिसरा क्रमांक पटकावला आहे. पंजाब व उत्तर प्रदेश यांचा क्रमांक त्यानंतर लागतो. केरळ, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनीही चांगली कामगिरी बजावली आहे. यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांनी विकासाचा धडाका लावल्याचे दिसून येते. कॉंग्रेसला ही वस्तुस्थिती स्वीकारणे फारच कठीण बनल्यामुळे त्या पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी ही यादी सदोष असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. विशेष म्हणजे केंद्रात कॉंग्रेसचेच सरकार सत्तेवर असून त्यांनीच ही यादी तयार केली आहे!
महाराष्ट्र, ईशान्येकडील राज्ये, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल यांची कामगिरी अत्यंत सुमार असल्याचे अहवालात म्हटले आहे. समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी घरांची बांधणी करणे, त्यांना आरोग्य, शैक्षणिक, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यांसारख्या सुविधा नाममात्र दरांत उपलब्ध करून देणे असे या २० कलमी कार्यक्रम योजनेचे स्वरूप आहे. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांच्या सरकारने १९७५ साली ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. आता त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत बाजी मारली आहे ती गुजरातने. त्याबद्दल केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांनी गुजरात सरकारचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांना त्यांनी विकासकामांचा वेग वाढवावा, अशी सूचना केली आहे.

पुन्हा "सागर कवच'मुळे खोळंबा!

पणजी व मडगाव, दि. २८ (प्रतिनिधी)- गोव्याचा किनारी भाग किती सुरक्षित आहे, याचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी सहा वाजल्यापासून "सागर कवच' मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यात नाकाबंदी करण्यात आली होती. समुद्रमार्गे राज्यात दहशतवादी घुसले असून त्यांचा शोध घेण्याचे आदेश सर्व पोलिस स्थानकाच्या पोलिसांना देण्यात आला. यासाठी रस्ते तसेच रेल्वे स्थानकांवर नाकाबंदी करण्यात आली होती. यामुळे सकाळपासूनच राज्यातील प्रमुख शहरात वाहनांची कोंडी झाली होती, याचा सरकारी कार्यालयात जाणारे कर्मचारी तसेच परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसला. नौदल, तटरक्षक आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही मोहीम हाती घेतली होती.
""मुंबईवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर समुद्रमार्गे घुसल्याने आता राज्यातील किनारे किती सुरक्षित आहेत, हे पाहण्यासाठी अशा प्रकारचे "मॉक ड्रिल' वेळोवेळी केले जात आहे. हा त्याचाच एक भाग असून उद्याही असाच सराव केला जाणार आहे,''असे पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले. समुद्राच्या आंतरराष्ट्रीय सीमांवर नौदल, समुद्राच्या किनाऱ्यावर तटरक्षक दल आणि मरीन पोलिस तर, भूभागावर पोलिस या "मॉक ड्रिल'अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेत होते. गेल्यावेळी घेतलेल्या "मॉक ड्रिल'वेळी ज्या चुका झाल्या होत्या त्या यावेळी भरून काढण्याचा सर्वांनी प्रयत्न केला असल्याचेही प्रवक्ता देशपांडे यांनी सांगितले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुंबई भेटीवर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा आढावा घेतला जात आहे का? असा प्रश्न केला असता, ""त्याच्या सुरक्षेचा आणि या "मॉक ड्रिल'चा कोणताही संबंध नाही. गेल्या एका वर्षात अशा प्रकारचे तीन "मॉक ड्रिल' घेण्यात आले आहेत,'' असे ते म्हणाले.
आज सकाळी ६ वाजता पोलिस नियंत्रण कक्षातून सर्व पोलिस स्थानकांना दहशतवादी घुसल्याचा संदेश देण्यात आला. यात पणजीत चार दहशतवादी घुसल्याचे पणजी पोलिसांना सांगण्यात आले. त्याबरोबर या दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे सत्र सुरू झाले. सकाळी ८ वाजता "डमि' म्हणून पाठवण्यात आलेल्या दहशतवाद्यांना हॉटेल "सिदाद द गोवा'च्या आवारात ताब्यात घेण्यात यश आले. तर, दुपारी २.३० वाजता "आयनॉक्स' सिनेमागृहाच्या सुरक्षा रक्षकांनी दोन "डमि' दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन याची माहिती पोलिसांना दिली.
दोन ते तीन तासांनी अशा प्रकारचे दहशतवादी घुसल्याची संदेश देऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले जात होते. त्यावेळी पणजी स्थानकातील पोलिस गाड्या घेऊन भरधाव वेगाने पळत असताना पाहायला मिळत होते. तसेच, शहरावर अशा प्रकारचे संकट आल्यास पोलिस स्थानकावर कोणती काळजी घेतली पाहिजे, याचाही विचार यावेळी करण्यात आला होता. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस स्थानकाच्या बाहेर दोन टेबले टाकून विशेष कक्ष स्थापन करण्यात आला होता.
दरम्यान, दहशतवादी हल्ल्याचा प्रतिकार कसा करावा व लोकांनी सतर्क कसे राहावे, याबाबत केंद्र सरकारच्या आदेशानुसार "सागर कवच'चे प्रात्यक्षिक आज सकाळपासून कोकण रेल्वेच्या मडगाव स्टेशनवर पार पडले. सर्वत्र सशस्त्र पोलिस बंदोबस्त, श्वानपथक, गुपचूप चाललेले तपासकाम व स्टेशनवर जाणारी सर्व फाटके बंद केल्याने प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. रेल्वे स्टेशनवरील पोलिसांनाही सागर कवच प्रात्यक्षिकाची जाणीव दिली गेली नाही. कोणत्या तरी एका पार्सलमध्ये दोन बॉंब ठेवल्याची सूचना आल्याचे सांगून सुरू केलेले हे प्रात्यक्षिक शेवटी दुपारी २ वा. या संपले व लोकांनी तसेच प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
तत्पूर्वी, सकाळपासून प्रवाशांचे सामान, खिसे, स्थानकावरील सर्व दुकाने यांची तपासणी करण्यात आली. स्टेशनवर दाखल झालेल्या रेल्वे गाड्यांची व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात आली. श्वानपथकाच्या साह्याने सुरू असलेली कारवाई पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी या प्रात्यक्षिकासाठी डॉक्टर, परिचारिका व औषधासहित रुग्णवाहिका, अग्निशामक दल व सर्व अत्याधुनिक यंत्रणेची व्यवस्था केलेली होती. यामुळे काही तरी घडले असावे असेच सर्वसामान्यांना वाटत होते, त्याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता.

Thursday 28 October, 2010

जुझे फिलिप डिसोझांसह ८७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद

मिकी मारहाणप्रकरण
वास्को, दि. २७ (प्रतिनिधी)ः येथील एका हॉटेलमध्ये आमदार मिकी पाशेको यांना झालेल्या मारहाणप्रकरणी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्यासह अन्य ८७ जणांविरुद्ध मारहाण केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माजी पर्यटन मंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांना मारहाण झाल्याचे वैद्यकीय तपासणी अहवालात सिद्ध झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी दिली.
मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास मिकी पाशेको आपल्या मित्रांसोबत येथील एका नामवंत हॉटेलमध्ये जेवण घेण्यासाठी आले असता मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी त्या ठिकाणी येऊन पाशेको यांच्याशी हुज्जत घालून मारहाण केली. यानंतर जुझे फिलिप यांच्या समर्थकांनी मिकींच्या मित्राच्या गाडीची नासधूस केली. घटनेनंतर मंत्री जुझे फिलिप यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह वास्को पोलिस स्थानकावर मोर्चा नेला. पालिका निवडणुकीत आपल्या समर्थकांना पाडण्यासाठी मिकी यांनी पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला. बाळकृष्ण साळगावकर व अन्य काही कार्यकर्त्यांनी वास्को पोलिस स्थानकावर आपली लेखी तक्रार दिल्यानंतर वास्को पोलिसांनी मिकी यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी दिली.
मिकी यांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच त्यांचे शेकडो समर्थक उशिरा रात्री वास्को पोलिस स्थानकाजवळ दाखल झाले. यावेळी पोलिस स्थानकाबाहेर कडक सुरक्षा बंदोबस्तही करण्यात आला होता.
आज पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांना संपर्क केला असता, मिकी पाशेको यांना मारहाण व त्यांच्या मित्राच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी ८८ जणांवर भा.दं.सं. १४२, १४७, ३२३, ५०४ कलमाखाली गुन्हा नोंद केल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांच्याबरोबर अँथनी फर्नांडिस, क्रीतेश गावकर, पाशांव मोंतेरो, बाबू नानोस्कर, बाळू साळगावकर, वहीद शेख, सलीम अट्ल्या व अन्य ८० अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मिकींना मारहाण केल्याची तक्रार घटनेच्या वेळी मिकींबरोबर असलेल्या सायमन परेरा, एडविन कार्व्हालो, मारियान फर्नांडिस व डायगो परेरा यांनी सादर केली. मिकी ज्या गाडीत आले होते ती गाडी डायगो परेरा यांची असल्याने तिची तोडफोड केल्याबाबत त्यांनी वेगळी तक्रार दिली आहे.
दरम्यान, मिकी वास्कोच्या त्या हॉटेलमध्ये पैसे वाटण्यासाठी आल्याची तक्रार जुझे फिलिप यांच्या काही कार्यकर्त्यांनी केल्याने त्याबाबत अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याच्या प्रती संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे उपअधीक्षक पत्रे यांनी शेवटी सांगितले.

"सीआरझेड' अधिसूचनेविरोधात उद्या मच्छीमार व्यवसाय बंद

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयातर्फे जारी केलेल्या किनारी नियमन विभाग "सीआरझेड' अधिसूचनेला विरोध करण्यासाठी २९ रोजी देशातील सर्व किनारी भागात आंदोलन छेडले जाणार आहे. गोव्यातील आंदोलनात या दिवशी सर्व मच्छीमार बांधव सहभागी होणार असून राज्यात मासळी विक्री बंद राहणार आहे. या आंदोलनात पारंपरिक रापणकार, ट्रॉलरमालक व मत्स्यव्यवसायातील सर्व एजंट सहभागी होणार आहेत. सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत केंद्र सरकारच्या डाक मुख्यालयासमोर धरणे धरले जाईल, अशी घोषणा राष्ट्रीय मच्छीमार कामगार मंचाचे अध्यक्ष व माजीमंत्री माथानी साल्ढाणा यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंचाचे सरचिटणीस रमेश धुरी हजर होते."सीआरझेड' अधिसूचनेमुळे देशातील सर्व मच्छीमार बांधव देशोधडीला लागतील, याचे स्पष्ट चित्र रेखाटण्यात आले असून या बाबतीत देशातील विविध मच्छीमार संघटना व समाज संघटनांच्या हरकतींना कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली, असा आरोप यावेळी श्री. साल्ढाणा यांनी केला. या अधिसूचनेवर एकूण १० वेळा बैठका झाल्या व त्यातील पाच बैठकांमध्ये खुद्द केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश सहभागी झाले होते. या प्रकरणी केंद्र सरकारने डॉ.स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालाचाही विचार झाला नाही. सीआरझेड कायदा १९९१ च्या मसुद्यात काही फेरबदल करून किनारी भागांवर अतिक्रमण करण्यासाठी विविध उद्योजकांना रान मोकळे करून दिल्याची टीका श्री. साल्ढाणा यांनी केली. आत्तापर्यंत "सीआरझेड' कायद्यात किनारी भागात बांधकामांवर निर्बंध लादण्यात आले होते; पण आता तर चक्क समुद्रातील ७ किलोमीटरच्या टापूत बांधकामांना परवानगी देण्याचा घाट घातला जात आहे. "सीआरझेड' क्षेत्रात रस्त्यांची कामे, पोलिस स्थानकांचे बांधकाम तसेच प्रत्येक २७ किलोमीटर अंतरावर बंदर उभारण्याचीही योजना असल्याने स्वाभाविकपणे अशा परिस्थितीत किनारी भागात वास्तव्य करणारे मच्छीमार बांधव विस्थापित होतील, यात अजिबात शंका नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रसंगी उपस्थित रमेश धुरी यांनी महाराष्ट्रातील मालवण, वेंगुर्ला व देवगड तालुक्यांवर ओढवणाऱ्या धोक्यांची माहिती दिली. मालवण तालुक्यात तर संपूर्णपणे वाताहत होणार आहे. गेली कित्येक वर्षे परंपरागत मच्छीमारी करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणारे लोक आपल्या भूमीपासून हिरावले जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. सुमारे ९ राज्यांतील किनारी भागातील लोकांवर थेट परिणाम करणारी ही अधिसूचना रद्द करण्यास भाग पाडले जाईल, असाही संकल्प यावेळी सोडण्यात आला.

गोवा वाचवण्यासाठी साहित्यिक चळवळ हवी - प्रा. राजेंद्र केरकर

"गोवादूत'च्या "दीपावली २०१०'चे प्रकाशन


पणजी, दि.२७ ( सांस्कृतिक प्रतिनिधी)- आज गोव्यात खाणींचे साम्राज्य वाढत चाललेले असून परकीयांना जमिनी विकण्याचा सपाटा सुरूच आहे. यामुळे गोवा नष्ट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गोवा वाचवण्यासाठी साहित्यिक चळवळ उभारून साहित्याच्या माध्यमातून जागृती होणे आवश्यक आहे. या कामात राजकारण्यांनाही सामील करून घेण्याची गरज आहे. राजकारणी साहित्य चळवळीत नाममात्र सहभाग दाखवत असतात. गोवा वाचवायचा असेल तर राजकारण्यांना चाप घालणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र केरकर यांनी केले.
गेल्या सात वर्षांपासून दर्जेदार दिवाळी अंकाचा नजराणा सर्वांच्या आधी वाचकांसाठी उपलब्ध करण्याचा बाणा कायम राखणाऱ्या "गोवादूत'च्या "दीपावली २०१०' अंकाचे प्रकाशन आज प्रमुख पाहुणे निसर्गतज्ज्ञ प्रा.राजेंद्र केरकर व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या "गोवादूत' कार्यालयात करण्यात आले. यावेळी "गोवादूत दिवाळी अंक कथालेखन स्पर्धे'चे विजेते, कर्मचारी तसेच हितचिंतक उपस्थित होते.
गोव्याचे रक्षण करत असता गलितगात्र झालेल्यांना वर्तमानपत्राचा आधार असतो, "गोवादूत'ने ही भूमिका चोखपणे पार पाडली आहे, असे सांगून प्रा. केरकर यांनी "गोवादूत'ला शुभेच्छा व्यक्त केल्या.
तलवारीचा घाव कुठे घातला जातो हे मनगटावर किंवा तलवारीच्या धारेवर अवलंबून नसते तर ते मनावर अवलंबून असते. यामुळे मन भ्रष्ट झालेल्यांना श्रद्धास्थान वगैरे काही दिसत नाही, त्यांना केवळ आपला फायदा दिसत असतो. अशा एखाददुसऱ्या माणसाला ठेचून काढणे मोठे अवघड नसते; परंतु त्यांना सहकार्य करणारे हे सर्वसामान्य लोकच असतात, असे मनोहर पर्रीकर यांनी यावेळी सांगितले.
येणाऱ्या पिढीचा विचार करून गोव्याचा सांभाळ करणे आज प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अन्यथा, आमची मुलेबाळे "आमच्यासाठी तुम्ही काय ठेवले' असा प्रश्न विचारून आम्हाला लाथाडायला मागेपुढे पाहणार नाहीत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते कथा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यात प्रथम साईदास आपटे, द्वितीय वर्षा धुपकर, तृतीय वेदिका जोशी तसेच इतर उत्तेजनार्थ विजेत्यांचा समावेश होता.
साईदास आपटे यांनी आपले विचार मांडताना, वास्तवातील गोष्टी साहित्यात प्रतिबिंबित झाल्यास साहित्य जिवंत वाटते, असे सांगितले.
संपादक राजेंद्र देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून अंकाच्या निर्मितीप्रक्रियेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्मिक व्यवस्थापक विलास कामत तसेच नितू कळगुटकर यांनी पाहुण्यांना पुष्प गुच्छ प्रदान केले. सूत्रसंचालन "दीपावली २०१०' अंकाचे संपादक अशोक नाईक तुयेकर ऊर्फ पुष्पाग्रज यांनी केले. कार्यकारी संपादक गंगाराम म्हांबरे यांनी आभार मानले.

मिरची पूड फेकून साखळी चोरणाऱ्याला पकडले

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- आझाद मैदानाच्या समोरील नागवेकर ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरलेल्या तरुणाने दुकानमालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ६० हजार रुपयांची सोनसाखळी घेऊन पळ काढला. मात्र, दुकानाच्या बाहेर असलेल्या लोकांनी दुचाकीवरून पळालेल्या या चोराचा पाठलाग करून बसस्थानकाजवळील रुची हॉटेलसमोर त्याला जेरबंद केले. यावेळी त्याच्याकडून चोरून नेलेली २५.६२० ग्रॅमची सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
या विषयीची पोलिस तक्रार दुकानाचे मालक संजय ऊर्फ विनायक बाळकृष्ण नागवेकर यांनी दाखल केली आहे. पोलिसांनी भा.दं.सं. ३८० व ३९२ खाली कन्नूर केरळ येथील शांद के.टी व मुदासीर या दोघांना अटक केली आहे. चोरी करणारी टोळीच गोव्यात दाखल झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
अधिक माहितीनुसार आज दुपारी ४.३५ वाजता शांद हा सोनसाखळी घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरला. यावेळी त्याने संजय याला सोनसाखळी दाखवण्यास सांगितले. एक सोनसाखळी त्याने पसंत केली व ती गळ्यात घालून कशी दिसते हे पाहण्यासाठी गळ्यातही घातली. त्याबरोबर खिशात ठेवलेली मिरची पूड काढून समोर असलेल्या संजय याच्या डोळ्यात फेकली. यावेळी संजय गडबडल्याने त्याच संधीचा फायदा उठवत तो दुकानाबाहेर पळाला. यावेळी बाहेर त्याचा दुसरा साथीदार भाड्याची दुचाकी जीए ०१ टी ९४३२ घेऊन थांबला होता. दुचाकीवर बसून दोघांनीही पळ काढला. मात्र, वेळीच संजय याने दुकानाच्या बाहेर असलेल्या लोकांना याची कल्पना दिल्याने लोकांनी त्या चोरांचा पाठलाग सुरू केला. या दरम्यान १०० क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांनीही माहिती देण्यात आली. शेवटी पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा चोरट्यांना पोलिसांनी व लोकांनी हॉटेल रुचीच्या समोर पकडले.
या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक रत्नाकर कळंगुटकर करीत आहे.

न्यायालयीन कोठडीत अश्पाक बेंग्रेवर प्राणघातक हल्ला

पणजी व म्हापसा, दि. २७ (प्रतिनिधी)- कुविख्यात गुंड अश्पाक बेंग्रे याला आज सकाळी ९ वाजता न्यायालयात नेण्यात येत असता अन्य एका कैद्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात अश्पाक याच्या डोळ्याला तसेच कानाला जखम झाल्याने त्याच्यावर म्हापसा येथील आझिलो इस्पितळात उपचार करून पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. याच म्हापसा न्यायालयीन कोठडीत खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेल्या अमोल नाईकने अश्पाक याच्यावर हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेची रात्री पर्यंत कोणतीही तक्रार नोंद झाली नव्हती. हल्ला तलवारीच्या साहाय्याने करण्यात आला असून अश्पाकच्या नाकाला, डोळ्याखाली, कानाला आणि कंबरेखाली मार लागला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज सकाळी गुंड अश्पाक बेंग्रे व अमोल नाईक या दोघांना न्यायालयात नेण्यासाठी कोठडीबाहेर नेण्यात आले होते. यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची सुरू झाली, याच गोंधळात अमोलने अश्पाकवर जोरदार हल्ला चढवला. हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार अमोल याला न्यायालयीन कोठडीत कुठून मिळाले, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या अनेक घटनांत म्हापसा न्यायालयीन कोठडीत कोणतीही सुरक्षा नसल्याचेच उघड झाले आहे. न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांकडे मोबाईल सापडणे, त्यांना अमली पदार्थ उपलब्ध होणे, चिकन, मटण, बिर्याणी वगैरे कैद्यांना तुरुंग रक्षकाकडून मिळत असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी बेंग्रे याने तुरुंगातून सुपारी देऊन आपल्याविरुद्ध जबानी देण्यासाठी न्यायालयात येणाऱ्या एका व्यक्तीवर पणजी सत्र न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला घडवून आणला होता. बेंग्रे व अमोल नाईक हे दोघेही एकमेकांचे पक्के वैरी असून यापूर्वीही त्यांच्या कोठडीत मारहाणीचे प्रकार घडले असल्याची माहिती न्यायदंडाधिकारी तथा म्हापशाचे उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांनी दिली. याची माहिती देणारे एक निवेदनही मुख्य तुरुंग महानिरीक्षकांना पाठवण्यात आले असून त्यात या दोघांपैकी एकाला या तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हालवण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

"त्या' महिलेकडून ५० लाखांचा गंडा!

फोंडा, दि.२७ (प्रतिनिधी)- येथील फोंडा पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केलेल्या सुरेखा अनंत प्रभुगावकर हिने २००६ सालापासून लोकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडविण्यास सुरुवात केली होती, गोव्यातील विविध भागातील लोकांना सुमारे पन्नास लाखांना गंडवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
सुरेखा प्रभुगावकर ही मूळची तिवरे माशेल येथील रहिवासी आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तिस्क फोंडा येथे ती राहत होती. तिच्या विरोधात फोंडा प्रथम श्रेणी न्यायालयाने पकड वॉरंट जारी केल्याने गेले वर्षभर ती वझरी पेडणे भागात राहत होती. गेल्या २१ ऑक्टोबर २०१० रोजी फोंडा पोलिसांनी म्हापसा येथे सुरेखा हिला ताब्यात घेण्यात यश मिळविले. सुरेखा हिने २००६ सालापासून सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडविण्यास प्रारंभ केला होता. त्यापूर्वी तिने फोंड्यातील एका शिक्षण संस्थेत शिक्षिकेची नोकरी केली होती, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. तिचे कुठल्याही बॅंकेत खाते नाही, लोकांना गंडवून मिळणारा सर्व पैसा मडगाव येथील एका व्यावसायिकाला दिला आहे, अशी माहिती तिने जबानीत दिली आहे.
सुरेखा प्रभुगावकर हिला २००८ सालात पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी तळसाय धारबांदोडा येथील रमेश गावकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिने गंडविलेल्या अनेकांनी फोंडा पोलिसांशी संपर्क साधून फसवणुकीसंबंधी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावेळी फसवणुकीची रक्कम २५ लाख रुपयांपर्यंत गेली होती. गेल्या २१ ऑक्टोबर २०१० रोजी सुरेखा हिला फोंडा पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेकांनी फोंडा पोलिसांशी संपर्क साधून फसवणुकीसंबंधी नवीन तक्रारी दाखल केल्या आहेत. सुरेखा हिच्या विरोधात लोकांच्या तक्रारी सुरूच आहेत. लोकांना विविध सरकारी खात्यात नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले जात होते, अशी माहिती मिळाली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षक गोकुळदास मळीक तपास करीत आहेत.

Wednesday 27 October, 2010

मिकींची वास्कोत धुलाई

पैसे वाटल्याचा जुझे फिलिप यांचा आरोप
वास्को, दि. २६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पक्षाअंतर्गत असलेला वाद आता नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आला असून, मुरगाव पालिका निवडणुकीत उतरलेली महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांची पत्नी व भाऊ यांचा पाडाव करण्यासाठी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी पैसे वाटल्याचा आरोप करत संतप्त जमावाने त्यांची येथे यथेच्छ धुलाई केली. मिकी पाशेको मोठ्या प्रमाणात पैसे वाटण्यासाठी येथे आले होते, असा दावा करत मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी शेकडो समर्थकांसह वास्को पोलिस स्थानकावर मोर्चा नेला.
वास्को शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलबाहेर आज संध्याकाळी हा प्रकार घडल्याने शहरात सर्वत्र चर्चेचा विषय बनला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महसूलमंत्री डिसोझा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसोबत वास्को पोलिस स्थानकावर मोर्चा नेऊन मिकींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपल्याच मतदारसंघात येऊन आपल्या कार्यकर्त्यांना पैशांचे आमिष दाखवण्याचा प्रयत्न मिकी यांनी केल्याचे ते म्हणाले. आपली पत्नी नॅनी व भाऊ पाश्कॉल यांच्याविरोधात काम करण्यासाठी कार्यकर्त्यांना रकमेचे आमिष दाखवल्याने ते चवताळले. कार्यकर्त्यांनी मिकींना विरोध करून आम्ही स्थानिक आमदारांसोबत असल्याचे सांगितल्याने मिकीसमर्थक व जुझे फिलिप समर्थक यांच्यात तू तू मै मै सुरू झाली. यावेळी मिकी यांची चांगलीच धुलाई करण्यात आली, तर त्यांच्या गाडीवरही दगडफेक करून मोडतोड करण्यात आल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच मंत्री जुझे फिलिप घटनास्थळी दाखल झाले, तोपर्यंत मिकींनी तेथून काढता पाय घेतला होता.
दरम्यान, मिकी यांच्या या कृतीची पुराव्यानिशी माहिती हायकमांडला देणार असून वास्को पोलिस स्थानकात तक्रार नोंदवणार असल्याची माहिती मंत्री जुझे फिलिप यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत काही सरकारी अधिकारी तसेच विरोधी उमेदवार होते असा दावा करताना, पालिका निवडणुकीसाठी पैशाचे आमिष दाखवण्याच्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी जुझे फिलिप यांनी केली. दरम्यान, सदर हॉटेलबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिस कोणती कारवाई करणार याबाबत कुतूहल वाढले आहे.
------------------------------------------------------
पैसे कुठून देणार? मिकींचा प्रतिप्रश्न
वास्को येथील हॉटेलमध्ये आपण आपल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी आपल्यासोबत कोणतेच उमेदवार नव्हते. जुझे फिलिप यांनी आपल्या समर्थकांसह सदर हॉटेलमध्ये प्रवेश करून आपल्या मतदारसंघात कशासाठी आला आहात, असा सवाल केला. आपण केवळ जेवण करण्यासाठी आलो आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी आपल्याला धक्काबुक्की करून हॉटेलच्या बाहेर नेले. यावेळी आपल्या शर्टाचे बटण तुटल्याचा दावा मिकी यांनी केला. गेल्या ५ महिन्यांपासून आपली खाती गोठवलेल्या स्थितीत असताना आपण पैसे कसे काय वाटणार? असा सवाल त्यांनी केला.
आपण आपल्या मित्रासोबत त्याच्या जीए ०८ एफ १८५४ या वाहनातून आलो होतो. या वाहनावर येथील प्रभाग २० चे उमेदवार क्रीतेश गावकर यांनी दगडफेक करून मोडतोड केली. जुझे फिलिप आपल्याच पक्षातील असले तरी सध्या ते वैफल्यग्रस्त बनले असून त्यातूनच त्यांनी ही कृती केली आहे. आपण या प्रकाराची माहिती शरद पवार यांना देणार असून जुझे फिलिप यांना योग्य प्रत्युत्तर देईन. दरम्यान, सदर प्रकारापासून वास्कोवासीयांनी बोध घ्यावा व जुझे फिलिप यांच्या पॅनेलला अजिबात थारा देऊ नये. अन्यथा, पुढील पाच वर्षांत वास्कोत "गुंडाराज' माजेल, असे त्यांनी सांगितले.

सर्वमान्य तोडग्यानंतरच महामार्गांचे रुंदीकरण

कमलनाथ यांची ग्वाही
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): देश झपाट्याने प्रगती करत असताना पायाभूत सुविधांची कमतरता भरून काढणे ही काळाची गरज आहे. देशात सर्वत्र सुरक्षित व समाधानकारक रस्ते झालेच पाहिजे, त्या दृष्टीनेच गोव्यातही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण हाती घेण्यात येणार आहे. लोकांची घरे पाडून महामार्गाचे काम पुढे नेण्याची केंद्राची अजिबात इच्छा नाही. यामुळे जनतेच्या हरकती सोडवूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही केंद्रीय रस्ता परिवहन व महामार्गमंत्री कमलनाथ यांनी दिली.
माजी केंद्रीयमंत्री तथा अनिवासी भारतीय आयुक्त एदुआर्द फालेरो यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त ताळगावातील समाजगृहात त्यांच्या सत्काराचा भव्य कार्यक्रम गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना कमलनाथ यांनी गोमंतकीयांना हे वचन दिले. देशात वाहन निर्मिती क्षेत्राची वाढ ३७ टक्क्यांनी होत असताना त्यासाठी रस्ते तयार झाले नाही तर काय परिस्थिती होणार याचा विचार करा, असेही कमलनाथ यांनी सुचवले.
या प्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती एदुआर्द फालेरो, मुख्यमंत्री दिगंबर कामत, सभापती प्रतापसिंह राणे, सत्कार समितीचे निमंत्रक माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सिझर मिनेझीस, उद्योजक नाना बांदेकर, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका व गोवा चेंबरचे उपाध्यक्ष मांगिरीश पै रायकर हजर होते. यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र व रौप्यतबक प्रदान करून कमलनाथ यांच्या हस्ते श्री. फालेरो यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांच्या तैलचित्राचेही अनावरण करण्यात आले.
या सत्कार सोहळ्याला संबोधित करताना कमलनाथ यांनी स्वतःहूनच थेट महामार्गाच्या विषयाला हात घातला. रस्ते बांधकामावरून मतभेद होता कामा नयेत व त्यामुळे महामार्गाच्या नियोजित आराखड्याला विरोध करणाऱ्यांच्या हरकतींवर सर्वसमावेशक तोडगा काढला जाईल, असे ते म्हणाले. केंद्र सरकार गोव्याच्या विकासाला पूर्णपणे सहकार्य करेल व त्यात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आपल्याकडूनही पूर्ण पाठिंबा मिळेल, असा शब्द त्यांनी दिला. एदुआर्द फालेरो हे लोकनेते आहेत व त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळात आपण काम केल्याने त्यांची क्षमता व कार्यपद्धती जवळून पाहण्याचा योग आपल्याला प्राप्त झाला. जागतिक तापमानवाढीच्या परिषदेवेळी ब्राझील देशाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपण खास एदुआर्द फालेरो यांना पाचारण केले होते, अशी माहितीही कमलनाथ यांनी दिली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी, एदुआर्द अनेक वर्षे केंद्रात राहिले पण त्यांना गोव्याचा कधीच विसर पडला नसल्याचे सांगितले. फालेरो यांच्या यशात त्यांच्या दिवंगत पत्नीचाही मोठा वाटा आहे व या प्रसंगी त्याची आठवण करून देणे महत्त्वाचे ठरेल,असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग म्हणून जुवारी नदीवर खास पुल उभारण्याच्या प्रस्तावाला कमलनाथ यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. हा पुल गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवी पुल म्हणून ओळखला जाणार आहे. महामार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होताच गालजीबाग व तळपण पुलांचे काम प्राधान्यक्रमाने हाती घेतले जाईल,असे वचनही त्यांनी दिल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या प्रसंगी सभापती प्रतापसिंह राणे, ऍड. रमाकांत खलप, सुभाष शिरोडकर आदींचीही समयोचित भाषणे झाली. सिझर मिनेझीस यांनी स्वागत तर मांगिरीश पै रायकर यांनी आभार मानले. पॅट्रिशिया परेरा सेठी यांनी मानपत्राचे वाचन केले. तत्पूर्वी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कला अकादमीतर्फे काणकोण भागातील लोककलाकारांनी विविधांगी लोकनृत्य व लोककलांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. या कार्यक्रमाला पोर्तुगालचे राजदूत तथा दूतावास यांची विशेष उपस्थिती होती. राजकीय, सामाजिक तथा उद्योग समूहातील मान्यवर तथा सामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

जमीन विक्रीवर निर्बंध आवश्यक : एदुआर्द

घटनेच्या ३७१ व्या कलमातील तरतुदीनुसार गोव्याबाहेरील लोकांना इथे जमीन खरेदी करण्यास निर्बंध घालण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राने तात्काळ मान्यता द्यावी, असे आवाहन सत्कारमूर्ती एदुआर्द फालेरो यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले. गोव्यातील जमिनींचे दर वाढत चालल्याने येथील भूमिपुत्रच भूमिहीन बनण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे इतर काही राज्यांप्रमाणे गोव्यातही बाहेरील लोकांना जमीन विक्रीवर निर्बंध घालायला हवे, असे ते म्हणाले. गोव्याचा विकास करताना पुढील २५ वर्षांच्या विचार करूनच नियोजन व्हावे. पर्यटन धोरण निश्चित करून त्या दृष्टीने पर्यटनाचा विस्तार झाला पाहिजे. तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेच गोव्यातील युवा पिढीला नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे व त्याचा गांभीर्याने विचार व्हावा,असेही ते म्हणाले.

'ऑक्टोपस बाबा'चे निधन

म्युनिच, दि. २६ : दक्षिण आफ्रिकेतील फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये विविध खेळाडू आणि पॉप गायिका शकिराइतकाच लोकप्रिय ठरलेला भविष्यवेत्ता पॉल ऑक्टोपस बाबाचे जर्मनीत निधन झाले.
ऍक्वेरियममध्येच ऑक्टोपसला नैसर्गिक मृत्यू आल्याचे सांगितले जात आहे. फुटबॉल सामन्यातील अंतिम फेरीसह सर्व विजेत्यांच्या नावांविषयी तंतोतंत भविष्यवाणी केल्याने हे हा अनोखा ऑक्टोपस फुटबॉलप्रेमींसह जगभरातील लोकांसाठी चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे फुटबॉल स्पर्धेच्या काळात ऑक्टोपस बाबा हा एखाद्या स्टार खेळाडूप्रमाणे प्रसार माध्यम आणि लोकांच्या मनावर अधिराज्य करीत होता. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेन जिंकेल असे ऑक्टोपस बाबाने भविष्य वर्तविले होते. आपल्या ऍक्वेरियममध्ये त्याने स्पेनचा झेंडा निवडला होता. ही भविष्यवाणी खरी होताच सारे जग त्याच्यासाठी अक्षरश: वेडे झाले होते. त्यातही स्पेनमधील जनता तर त्याच्या प्रतिमेची पूजा करायला लागली होती. स्पेनच्या एका ऍक्वेरियमने ऑक्टोपसला आपल्या शहरात नेण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पण, जर्मनीच्या ओबरहॉसन समुद्र जीव केंद्राने त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. अन्य संघांच्या विरोधात भविष्य वर्तविल्यामुळे पॉल बाबाला जीवे मारून टाकण्याच्याही धमक्या मिळाल्या होत्या.
या पॉल ऑक्टोपसचा जन्म दक्षिण इंग्लंडमधील एका ऍक्वेरियममध्ये झाला होता. नंतर त्याला जर्मनीतील केंद्राला विकण्यात आले. फुटबॉल स्पर्धेनंतर इंग्लंडने पॉल ऑक्टोपसला आपल्या विशेष मोहिमेसाठी निवडले होते. आता इंग्लंड २०१८ च्या वर्ल्ड कपसाठी यजमानपदाचा दावा सादर करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी त्यांनी ऑक्टोपसला ब्रॅण्ड ऍम्बसेडर बनविले होते.

सव्वा लाखाची मूर्ती म्हापशातून पळवली

म्हापसा, दि. २६ (प्रतिनिधी): बान्सिओवाडा गिरी येथील श्री भूमिका सातेरी रवळनाथ मंदिरातील खिडकीचे गज वाकवून अज्ञातांनी आतील १० किलो २०० ग्रॅम वजनाची सव्वा लाख किमतीची मूर्ती पळवली. मंदिराचे अध्यक्ष प्रणय शिरोडकर यांनी म्हापसा पोलिसांत याबाबतची तक्रार नोंदवली आहे.
सदर मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच निरीक्षक राजेशकुमार व उपनिरीक्षक मिलिंद भुईबर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या खिडकीतून आत प्रवेश करून अज्ञातांनी गर्भकुडीत प्रवेश केला. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडली असावी असा अंदाज आहे. सकाळी ९ वाजता पुजारी पूजा करण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वानपथकांचे साहाय्य घेतले परंतु, कोणताच सुगावा लागला नाही. म्हापसा पोलिस अधिक तपास करत आहेत.

अरुंधती व गिलानींच्या अटकेची भाजपची मागणी

नवी दिल्ली, दि. २६ : काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी करणारे हुरियत कॉन्फरन्सच्या कट्टरतावादी गटाचे नेते सईद अली शाह गिलानी तसेच या मागणीला आपला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय यांना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली असून केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली यांनीही या दोघांना चांगलेच झापले आहे. पण, मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचाही त्यांनी पुनरुच्चार केल्याने केंद्राची तूर्तास तरी मूक भूमिकाच दिसून येते.
काश्मिरी लोकांनी केलेल्या स्वातंत्र्याच्या मागणीला आपण जो पाठिंबा दिला आहे, त्याचे अरुंधती रॉय यांनी पुन्हा एकदा समर्थन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात दररोज लाखो लोक जी मागणी करत आहेत त्याकडे मी लक्ष वेधले आहे एवढेच, असे त्या म्हणाल्या. या दोघांविरोधात काय कारवाई करणार यासंदर्भात कोणताही खुलासा न करता कायदा मंत्री मोईली म्हणाले की, या दोघांनी जी काय वक्तव्ये केली आहेत, ती अतिशय दुर्दैवी आहेत. पण, आपल्या देशात मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्याने लोकांच्या राष्ट्रीय भावनांना यामुळे धक्का पोचू शकत नाही.
राष्ट्रविरोधी भावनांना धक्का पोचविणाऱ्या या दोघांच्या प्रक्षोभक वक्तव्यानंतरही सरकार अद्यापही मूकदर्शक बनलेले आहे, असा आरोप करून भाजपने म्हटले आहे की, या प्रकरणात कोणत्याही प्रकारे राजकारण आणू नये. राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली या दोघांविरोधात गुन्हा नोंदविला जाऊ शकतो का, अशी विनंती गृहमंत्रालयाने आपल्या मंत्रालयाकडे केली आहे का असे विचारले असता कायदा मंत्री म्हणाले की, गेल्या तीन दिवसांपासून आपण मंत्रालयापासून दूर असल्याने या काळात आपण कोणतीही फाईल बघितलेली नाही.
काश्मीर हा कधीच भारताचा अविभाज्य भाग नव्हता. हे ऐतिहासिक सत्य आहे. इतकेच नाही तर भारत सरकारनेही हे मान्य केलेले आहे, असे विधान वादग्रस्त लेखिका अरुंधती रॉय यांनी केलेले आहे. तर दुसरीकडे दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या "आझादी-द ओन्ली वे' या कार्यक्रमात गिलानी यांच्यासोबत अरुंधती रॉय तसेच माओवादीसमर्थक नेते वरा वरा राव हेही व्यासपीठावर उपस्थित होते. याच कार्यक्रमात भारतविरोधी वक्तव्य करणाऱ्या गिलानींच्या विरोधात एका गटाने घोषणा केल्या होत्या तसेच एकाने त्यांच्या दिशेने जोडाही भिरकावला होता.
श्रीनगर येथून जारी केलेल्या एका निवेदनात रॉय यांनी आपला आवाज दाबण्याच्या प्रयत्नांचा जोरदार विरोध करीत म्हटले आहे की, आपले विचार व्यक्त करू न देणाऱ्या देशाची आपल्याला कीव येते. स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांना तुरुंगात पाठविले जाते; परंतु जातीयवादी हिंसाचार करणाऱ्यांना, सामूहिक हत्याकांड घडवून आणणाऱ्यांना, कंपन्यांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना, बलात्कार, लुटालूट करणाऱ्यांना सरकार हात लावत नाही, याकडे रॉय यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे. रॉय यांनी गेल्या काही दिवसांत दिल्ली व श्रीनगर येथे दोन भाषणे केली. या दोन्ही भाषणांत त्यांनी काश्मीर भारतापासून स्वतंत्र करण्यावरच जोर दिला होता. राष्ट्रद्रोही वक्तव्ये केली म्हणून आपल्याला अटक करण्यात यावी, असे मी वृत्तपत्रात वाचले असे सांगून त्या पुढे म्हणतात, काश्मीर खोऱ्यातील लोक दररोज जे काय म्हणतात तेच मी सांगितले. इतर वक्त्यांनी व लेखकांनी गेल्या अनेक वर्षांपासून जे काय लिहिले आहे व आपले विचार व्यक्त केले आहेत तेच मीही व्यक्त केले आहेत.

Tuesday 26 October, 2010

राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीला फेरसर्वेक्षण अहवाल अमान्य

मर्यादित रुंदीकरणाच्या बाता निव्वळ धूळफेक
पणजी, दि.२५(प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी ६० मीटरची सक्ती असतानाही ती कमी करून काही ठिकाणी ४५, ३५ व ३० मीटरपर्यंत मर्यादित ठेवून लोकांच्या घरांना संरक्षण देणार, ही सार्वजनिक बांधकाम खात्याची ग्वाही निव्वळ धूळफेक आहे. यामुळे फेरसर्वेक्षण अहवाल अजिबात मान्य नसल्याची घोषणा राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीने केली आहे.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक सुनील देसाई यांनी ही माहिती दिली. या प्रसंगी माजीमंत्री फातिमा डिसा, डॉ. चोडणकर, दिनेश वागळे, अशोक प्रभू, राजाराम पारकर व ए. गोम्स हजर होते. राष्ट्रीय महामार्ग ४ (अ) च्या संदर्भात सा.बां.खाते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सल्लागार कंपनी विल्बर स्मिथ यांनी फेरसर्वेक्षण अहवालाचे सादरीकरण समितीसमोर केले. या सादरीकरणानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कुणीही समर्पक उत्तरे दिली नाहीत. या फेरसर्वेक्षणानुसार ५६९ प्रभावित बांधकामांची आकडेवारी १६८ बांधकामावर आणली गेली. त्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी केल्याचे सांगण्यात आले. परंतु "एनएचएआय'च्या धोरणांत हे बसते काय? याचा जबाब प्रकल्प कार्यवाह अधिकारी श्री. दोड्डामणी यांना मात्र देता आला नाही. रुंदी मर्यादित करण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव केंद्राकडे आलेला नाही व तो सादर झाल्यास तो मान्य होईलच असेही ठामपणे सांगता येणार नाही, असे उत्तर देण्यात आल्याने या प्रकरणी जनतेची धूळफेक करण्याचा हा प्रकार उघडकीस आला असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.
या फेरसर्वेक्षणात घरांवरील कारवाई टळेल असे सांगण्यात आले असले तरी हा महामार्ग अनेकांच्या दारातून जाणार आहे. यामुळे या लोकांना आपल्या घरात राहणेच कठीण बनेल. केंद्रीय महामार्गमंत्री कमलनाथ यांनी राज्य सरकारला ३० ऑक्टोबर २०१० पूर्वी भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले आहे व त्यामुळे अत्यंत घिसाडघाईने काम उरकले जात आहे. लोकांना विस्थापित करणाऱ्या या प्रकल्पाबाबत अशा पद्धतीची घाई केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशाराही यावेळी श्री. देसाई यांनी दिला.
एनएच-१७ बाबत तयार केलेल्या फेरसर्वेक्षणासंदर्भात लोकांनी नाराजी व्यक्त करून या अहवालालाही विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी राज्य सरकारने सभागृह समिती स्थापन करूनही अद्याप एकही बैठक बोलावली नाही. यावरून सरकार या बाबतीत गंभीर नसल्याचेच दिसून येते. राष्ट्रीय महामार्ग सर्वांनाच हवा आहे, पण त्यासाठी लोकांच्या घरांवर नांगर न फिरवता, कुणालाही विस्थापित न करता हा महामार्ग आखता येणे शक्य आहे. या संदर्भात तीन पर्याय राज्य सरकारला देण्यात आले आहेत. या एकाही पर्यायाबाबत राज्य सरकार का विचार करीत नाही? असा सवाल यावेळी अशोक प्रभू यांनी केला. लोकांची घरे पाडून त्यांच्या हातात फुटकी कवडी ठेवून सरकार त्यांना देशोधडीला लावू पाहत आहे काय? असा सवाल फातिमा डिसा यांनी केला. या लोकांना पर्यायी घरांची व्यवस्था किंवा जागा देण्याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. शेकडो कुटुंबांच्या संसारावर नांगर फिरवून त्यांना रस्त्यावर फेकून देण्याच्या या कृतीमुळे जनता पेटून उठल्यास त्याला आवर घालणे सरकारला शक्य होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
----------------------------------------------------
कमलनाथ 'गोवा भूविक्री दलाल'च!
यापूर्वी गोव्यात अमर्याद विशेष आर्थिक विभागांना मंजुरी देताना केंद्रीय वाणिज्यमंत्रीपदी कमलनाथ हेच होते. कमलनाथ यांनीच, गोमंतकीय जनतेला नको असतील तर केंद्र सरकार "सेझ' लादणार नाही, असा शब्द दिला होता; पण अधिसूचित "सेझ' रद्द करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. गोवा सरकारने "सेझ' रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊनही अद्याप "सेझ'साठी दिलेल्या जमिनी राज्य सरकारच्या ताब्यात येत नाहीत. यामुळे लाखो चौरसमीटर जमिनीचे भवितव्य अधांतरी आहे. आता राष्ट्रीय महामार्गाच्या निमित्ताने भूसंपादनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे आणि त्यामुळे शेकडो घरांवर नांगर फिरणार आहे. या भूसंपादनाबाबत केंद्रीय मंत्रालयाकडून कोणतीच माहिती स्थानिक जनतेला देण्यात येत नाही. जनसुनावणीवेळी खोटी माहिती पुरवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. कमलनाथ यांच्या खात्याअंतर्गतच गोव्यात भूसंपादनाचा हा घोळ घातला जात असल्याने त्यांना "भूविक्री दलाल' ही उपाधी योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
-------------------------------------------------------
कमलनाथ भेटतील काय?
केंद्रीय रस्ता परिवहन आणि महामार्गमंत्री कमलनाथ हे माजी केंद्रीयमंत्री तथा अनिवासी भारतीय आयुक्त एदुआर्द फालेरो यांच्या उद्या २६ रोजी होणाऱ्या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग फेरबदल कृती समितीतर्फे त्यांची भेट घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालवले आहेत पण ही भेट निश्चित होत नसल्याची माहिती श्री. देसाई यांनी दिली. श्री. फालेरो यांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा अजिबात इरादा नाही. यामुळे केंद्रीयमंत्री कमलनाथ यांनी समितीला वेळ देऊन त्यांच्याशी या प्रकरणी चर्चा करावी, असे आवाहन श्री. देसाई यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमाने केले आहे. त्यांच्या नियोजित गोवा भेटीबाबत कुणीच व्यवस्थित माहिती देत नाही व त्यामुळे अधिकृत भेट घेण्याचे प्रयत्नही फोल ठरल्याचे ते म्हणाले.

काश्मीरप्रश्नी 'भाजयुमो' करणार युवकांत जागृती : अनुराग ठाकूर

आज 'काश्मीर विलीनीकरण दिवस'
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): काश्मीर प्रश्नाबाबत केंद्राने घेतलेली भूमिका गुळमुळीत आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यात गांर्भीयाने लक्ष घालण्याची नितांत गरज आहे. हे काम केंद्रातील युपीए सरकारकडून होत नाही. त्यामुळेच "इंडिया फर्स्ट' कार्यक्रमांर्तगत देशभरातील तरुणांना काश्मीरप्रश्नी जागृत करण्याची जबाबदारी भारतीय जनता युवा मोर्चाने घेतल्याचे आज भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार तथा "भाजयुमो'चे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
देशभरात हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. १९९४ मध्ये देशाच्या संसदेत घेण्यात आलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी त्याच्या माध्यमातून केंद्र सरकारवर दबाव आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते आज पणजीतील भाजप कार्यालयात पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपयुमोचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत व सचिव सिद्धेश नाईक उपस्थित होते.
पाकव्याप्त काश्मीर आणि त्याचा उत्तरेकडील भाग हा हिंदुस्थानाचाच भाग असून तो पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असा ठराव १९९४ मध्ये बहुमताने घेण्यात आला होता. त्याची कार्यवाही व्हावी, यासाठी केंद्र सरकारवर भाजपयुमो दबाव आणणार असल्याचे श्री. ठाकूर यांनी सांगितले.
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू आणि काश्मीरचा गुंता वाढवून ठेवला आणि आता त्याचीच री कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी ओढत असल्याची टीका श्री. ठाकूर यांनी केली. २६ ऑक्टोबर १९४७ साली काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले होते. मात्र, हे सत्य दडपण्याचा प्रयत्न करून फुटीरतावादी गट आपली पोळी भाजण्याची चाल खेळत आहेत. याबाबत केंद्र सरकार ढिम्म आहे. त्यामुळे उद्या २६ ऑक्टोबर हा "काश्मीर विलीनीकरण दिवस' म्हणून पाळला जाणार आहे. तसेच, देशभर जागृती कार्यक्रम हाती घेऊन तरुणांना काश्मीर विषयाची माहिती करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षण, आरोग्य तसेच भ्रष्टाचार हे विषय सध्या देशाला भेडसावत असले तरी, काश्मीरचा विषय हा ज्वलंत आहे. गेल्या वर्षभरात दीड हजार वेळा तेथे दगडफेक झाली. त्यात ११० जणांचा मृत्यू झाला. तेथील ओमर अब्दुल्ला यांचे सरकार या समस्येवर तोडगा काढण्यास पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.जवाहरलाल नेहरूंनी काश्मीरला बहाल केलेले ३७०वे कलम रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली.
अभिव्यक्तीच्या नावाखाली देश तोडण्याची जाहीर वक्तव्ये केली जातात. म्हणूनच, या देशाचे सरकार निष्क्रिय बनल्याचे आम्ही देशातील तरुणांना पटवून देणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.
-----------------------------------------------------------
'मीडिया'नेच बनविले राहुल गांधींना 'हिरो'
कॉंग्रेसचे राहुल गांधी यांना केवळ देशातील प्रसारमाध्यमांनी "हिरो' बनवले असल्याची टिपण्णी आज भारतीय जनता पक्षाचे युवा खासदार तथा भाजपयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी केली. राहुल यांचा करिष्मा कोठेच दिसलेला नाही. खुद्द दिल्लीत राहुल यांना दिल्ली विद्यापीठातील निवडणुका जिंकता आल्या नाहीत. चारपैकी तीन उमेदवार हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विजयी झाले. त्यामुळे देशातील तरुण कोणाबरोबर आहेत ते स्पष्ट झाले आहे. तसेच, डेहराडून, राजस्थान, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड विद्यापीठातही "अभाविप' निवडून आली आहे, असे ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

महानंद चौथ्यांदा निर्दोष

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): सीरियल किलर महानंद नाईक आज आणखी एका खून प्रकरणातून पुराव्याअभावी दोषमुक्त झाला. याविषयीचा आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी दिला. आत्तापर्यंत १६ पैकी ३ प्रकरणात महानंद नाईक हा दोषमुक्त झाला आहे तर, बलात्कार प्रकरणात त्याला सात वर्षाची कैद झालेली आहे.
३५ वर्षीय शकुंतला कवठणकर या तरुणीचा खून केल्याचा आरोप महानंद याच्यावर होता. २००५ साली शकुंतला हिचा खून झाला होता. मात्र, महानंद हाच या खुनामागे असल्याचे पुरावे फोंडा पोलिस न्यायालयात सादर करू न शकल्याने आज त्याला दोषमुक्त करण्यात आले. शकुंतला हिचा खून कुंकळ्ळी पठारावर करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मयत शकुंतला ही मये डिचोली येथे राहत होती, ती "सेल्स गर्ल' म्हणून नोकरी करीत होती. महानंद याने तिच्याशी मैत्री करून कुंकळ्ळी येथील डोंगरावर तिचा ३० डिसेंबर २००५ रोजी गळा आवळून खून केला असल्याचे पोलिसांनी महानंदच्या विरोधात सादर केलेल्या आरोपपत्रात म्हटले होते.
दरम्यान, १६ पैकी ४ खून प्रकरणात महानंद नाईक हा दोषमुक्त झाल्याने पोलिसांनी केलेल्या तपासकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सी. एल. पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड केला होता. तसेच, एका बलात्कार प्रकरणावरून सीरियल किलर महानंद नाईक याला उघडकीस आणले होते. परंतु, एका मागून एक अशा चार खटल्यात महानंद नाईक याची पुराव्याअभावी सुटका होत असल्याने नेमके हे खून कोणी केले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खाण-ट्रकमालकांमध्ये संघर्ष

वाढीव दरासाठी ९ नोव्हेंबरपर्यंत मुदत
पणजी, दि.२५ (प्रतिनिधी): उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार खनिजमालाची वाहतूक करणे गोव्यातील कुठल्याही ट्रक मालकाला परवडणारे नाही. ट्रक मालकांना त्रासदायक ठरणारे उच्च न्यायालयाचे निर्बंध उठवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. तसेच खाणमालकांवर दबाव टाकून त्यांना ट्रकमालकांना चार पटीने दरवाढ देण्याचे निर्देश सरकारने देण्याची मागणी अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने केली आहे. आपल्या मागण्या दि. ९ नोव्हेंबर पर्यंत मान्य न झाल्यास त्याच दिवसापासून संपूर्ण गोव्यातील ट्रक बंद ठेवले जातील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस यांनी येथे दिला.
या वेळी दक्षिण गोवा संघटना सचिव सत्यवान गावकर व इतर ट्रक मालक उपस्थित होते. उच्च न्यायालयाने खनिजमालाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर वेळेचे बंधन तसेच क्षमतेपेक्षा जास्त खनिजमालाची वाहतूक करण्यावर निर्बंध घातले आहेत. यामुळे दिवसरात्र वाहतूक करण्याबरोबरच क्षमतेपेक्षा जादा माल नेण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. या निर्बंधामुळे ट्रक मालकांना नुकसान सोसावे लागत असल्याचा दावा ट्रक मालकांनी केला आहे. याबाबत सरकार दरबारी आपली मागणी मांडण्यासाठी अखिल गोवा खाण ट्रक मालकांनी अध्यक्ष नीळकंठ गावस व दक्षिण गोवा संघटना सचिव सत्यवान गावकर यांच्या नेतृत्वाखाली आज वाहतूक संचालक अरुण देसाई, वाहतूक वित्त सचिव अनुपम किशोर व वाहतूक खात्याचे उपसंचालक श्री. भोसले यांच्या सह विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत पणजी येथे वाहतूक खात्याच्या कक्षात बैठक घेतली. बैठकीनंतर माहिती देताना नीळकंठ गावस यांनी वरील इशारा दिला. आपल्या मागण्यांसाठी सरकारने खाण मालकांवर दबाव टाकण्याची मागणी संघटनेने केली असून बहुतेक खाणमालकांच्या प्रतिनिधींनी दरवाढ देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे दि. ९ नोव्हेंबर रोजी पुन्हा होणाऱ्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला नाही खाण ट्रकमालक संपावर जातील, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, या बाबत वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी हे प्रकरण खाणमालक व ट्रकमालक यांच्यातील असून सरकार खाणमालकांवर दर वाढवण्यासाठी दबाव घालू शकत नसल्याचे स्पष्ट केले. ट्रकमालक व खाणमालक यांनी मिळून समंजसपणे तोडगा काढावा, असेही त्यांनी सांगितले.

'बीच रिसोर्ट' ची अट आली चांगलीच अंगलट

नव्या निविदेला 'हॉटेल ताज विवांता' चाच प्रस्ताव
पणजी, दि.२५(प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवरील एका हॉटेल उद्योजकावर मेहेरनजर करण्यासाठी "इफ्फी' महोत्सव हॉटेलसाठी "बीच रिसोर्ट' ची तथाकथित अट सरकारच्या चांगलीच अंगलट आली आहे. महोत्सव हॉटेलसाठी नव्याने मागवण्यात आलेल्या निविदेसंदर्भात पुन्हा एकदा केवळ हॉटेल "ताज विवांता'कडून एकमेव प्रस्ताव सादर झाल्याने मनोरंजन संस्थेची खूपच पंचाईत झाली आहे. हॉटेल निविदा कंत्राटातील गौडबंगाल चव्हाट्यावर आल्याने प्रशासकीय समितीवर हॉटेल उद्योजकांनी सावध भूमिका पत्करून निविदा सादर करण्याचे धाडस केले नाहीच; परंतु आत्तापर्यंत ताटकळट ठेवण्यात आलेल्या "ताज विवांता'नेही यासंदर्भात तात्काळ निर्णय झाला नाही तर माघार घेऊ, असा निर्वाणीचा इशारा दिल्याने सरकार कात्रीत सापडले आहे.
"इफ्फी'ला केवळ एक महिना बाकी असताना विविध कंत्राटे मिळवण्यासाठी कमालीची चढाओढ
मनोरंजन संस्थेच्या वेगवेगळ्या समित्यांवरील पदाधिकाऱ्यांतच लागली आहे. त्यामुळे एकाही बाबतीत निर्णय होत नसल्याने आयोजन कोलमडण्याचीच शक्यता वर्तवली जात आहे.यंदाच्या महोत्सवासाठी हॉटेल्स निश्चित करण्याकरता गेल्या सप्टेंबरमध्ये "इएसजी'कडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. यावेळी केवळ ताज विवांता हॉटेलकडून एकमेव बोली लावण्यात आली. ही तांत्रिक बोली मंजूरही करण्यात आली. मध्यंतरी अचानक महोत्सवासाठी केवळ "बीच रिसोर्ट'च हवे अशी नवी अट लादण्यात आली व केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने तशी सक्ती सामंजस्य करारात केल्याचे सांगण्यात आले. मुळातच "इएसजी'च्या प्रशासकीय समितीवरील एक हॉटेल उद्योजकावर मेहेरनजर करण्यासाठीच ही अट लादण्यात आल्याची वार्ता पसरल्याने "इएसजी' वादात सापडली. संस्थेकडून नव्याने किनारी हॉटेलसाठी निविदा मागवण्यात आल्या खऱ्या; पण त्यासाठी केवळ हॉटेल ताज विवांताकडूनच प्रस्ताव सादर करण्यात आले. या निविदा माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव नरेंद्रकुमार व वित्त सचिव कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली उघडण्यात आल्या.
दरम्यान, ताज विवांता हे किनारी हॉटेल नसूनही त्यांच्याकडून कसा काय प्रस्ताव सादर करण्यात आला, याबाबतीत चौकशी केली असता "बीच रिसोर्ट' ही व्याख्याच अधांतरी असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून हॉटेलांना केवळ तारांकित दर्जा देण्यात येतो व त्यात किनारी हॉटेलचा वेगळा दर्जा देण्यात येत नाही,अशी माहिती हॉटेल उद्योगातील काही सूत्रांनी दिली. गोवा मनोरंजन संस्थेकडून ही अट लादण्यात आली तेव्हा या तांत्रिक गोष्टीचा अजिबात विचार करण्यात आला नाही, असा खुलासाही यावेळी करण्यात आला.
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत हॉटेल ताज विवांताच्या सूत्रांनी सरकारला तात्काळ निर्णय कळविण्याचा इशाराच दिल्याचीही खबर आहे. यापूर्वी हॉटेल ताज विवांताकडून प्रस्ताव सादर होऊनही त्यांना ताटकळत ठेवण्यात आले. नव्याने निविदा मागवण्यात आल्या. राज्यात पर्यटन हंगामास आरंभ झाल्याने यापुढे ताटकळत राहणे हॉटेलला परवडणारे नसल्याने प्रस्ताव मान्य करायचे असल्यास तात्काळ कळवा, अन्यथा हमी देता येणार नाही, असेही त्यांनी बजावल्याची खबर आहे.
सावध पवित्रा
गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवरील एक महिला सदस्य एका बीच रिसॉर्टच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत व बहुतांश "इफ्फी' महोत्सवासाठी हेच हॉटेल निवडण्यात आले आहे. गेल्यावर्षी या हॉटेलची निवड करण्यासाठी निविदा समितीच्या इतिवृतांतात एनवेळी बदल करून गौडबंगाल करण्यात आल्याचा आरोप झाला होता. हे प्रकरण सध्या माहिती आयोगाकडे सुनावणीसाठी सुरू आहे. यंदाच्या हॉटेल निविदेत सदर हॉटेलकडून प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. गोवा मनोरंजन संस्थेकडून मात्र ऐनवेळी "बीच रिसोर्ट' ची अट लादून निविदा न मागवताच या हॉटेलची निवड करण्याचा डाव आखला. या गोष्टीचा भांडाफोड झाल्याने व त्यावरून गदारोळ झाला. नव्या "बीच रिसोर्ट'साठी निविदा मागवूनही त्यासाठी अर्ज करण्याचे धारिष्ट सदर हॉटेल उद्योजक महिला सदस्याने दाखवले नाही. एकतर निविदेसाठी प्रस्ताव सादर करून ती मंजूर झाली असती तर जाणीवपूर्वक हे कंत्राट दिल्याचा आरोप झाला असता व कंत्राट मिळवण्यासाठी हॉटेल ताज विवांताकडून सादर करण्यात आलेल्या बोलीपेक्षा कमी दराची बोली लावावी लागली असती. आता कमी बोली लावली असती तर गेल्यावेळच्या दरांची तुलना झाली असती व त्यात गेल्यावेळी कशा प्रकारे जादा बोली लावून चैन केली गेली याचाही भांडाफोड झाला असता,अशी माहिती सूत्रांनी दिली.

राहुल गांधींविरुद्ध फौजदारी तक्रार नोंद

रांची, दि. २५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना दहशतवादी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "सिमी'शी केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांच्या विरोधात येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आशिषकुमार सिंह यांनी फौजदारी तक्रार नोंदवली आहे.
राहुल गांधी यांनी ६ ऑक्टोबर रोजी भोपाळ येथे एका कार्यक्रमात संघ आणि सिमी यांच्यात आपण फारसा फरक करत नाही, असे विधान करून सनसनाटी माजवली होती. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा सदर तक्रारीत करण्यात आला आहे. सिंह हे आधी पोलिस स्थानकात ही तक्रार नोंदवण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यासच नकार दिला. त्यामुळे सिंह यांनी न्यायालयातच तक्रार नोंदवण्याचा मार्ग अवलंबला. "सिमी' ही दहशतवादी संघटना असून खुद्द केंद्र सरकारनेच या संघटनेवर बंदी घातली आहे.

आता आयकर खात्यामार्फत कर्नाटकच्या मंत्र्यांवर छापे

भाजप आमदारही लक्ष्य
बंगलोर, दि. २५ : प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज (सोमवार) कर्नाटकमध्ये सुमारे ६० ठिकाणी छापे टाकले. यात कर्नाटक सरकारमधील मंत्री रेड्डी बंधूंसह त्यांच्याशी जवळीक असलेले आरोग्यमंत्री बी. श्रीरामलू यांचा समावेश आहे.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बंगलोर आणि बेल्लारी येथील सुमारे ६० ते ६५ ठिकाणी छापे टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. या छाप्यात सुमारे १०० अधिकारी सहभागी झाले होते. पर्यटनमंत्री जी. जनार्दन रेड्डी व त्यांचे बंधू महसूलमंत्री के. करुणाकर रेड्डी तसेच बी. नागेंद्र, टी. एच. सुरेश बाबू यांच्यासह ७ भाजप आमदारांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या छाप्यावेळी कोणती कागदपत्रे जप्त करण्यात आली याबाबत माहिती देणे मात्र अधिकाऱ्यांनी टाळले.
कर्नाटकमधील काही भाजप नेत्यांनी दोन दिवसांपूर्वीच, राज्यातील भाजपच्या सरकारला रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली होती. याबाबत बोलताना माजी केंद्रीय मंत्री आणि कर्नाटक सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी व्ही. धनंजय यांनी "आमचा अंदाज खरा ठरला' अशी प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेसने मात्र याचे खंडन केले.

Monday 25 October, 2010

गोमंतकीयांची घोर निराशा

ओलसर मैदानामुळे क्रिकेट सामना रद्द

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - पावसाने कृपा करूनही बाह्यमैदान सुकवण्यात अपयश आल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम झटपट आंतरराष्ट्रीय सामना आज अखेर रद्द करण्यात आला व त्यामुळे गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा झाली. यजमानांनी ही "पावसाळलेली' मालिका १-० अशी जिंकली हाच काय तो रसिकांना मिळालेला एकमेव दिलासा.
फातोर्डा मडगाव येथील नेहरू स्टेडियमचा परिसर पहाटेपासून फुलून गेला होता. स्टेडियममध्ये प्रवेशासाठी लांबचलांब रांगा लागल्या होत्या. कधी एकदा स्टेडियममध्ये प्रवेश मिळतोय, असे प्रेक्षकांना झाले होते. मात्र आसनावर स्थानापन्न झाल्यानंतर पहिली उद्घोषणा झाली ती अकरा वाजता मैदानाची पाहणी करण्याची. तरीसुद्धा मेक्सिकन वेव्हज तयार करून रसिकांना आपला उत्साह कायम ठेवला होता. त्यानंतर सव्वाबारा वाजता दुसरी पाहणी केली जाईल, अशी घोषणा झाली. तेव्हा मात्र प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
अधिकृत घोषणेला अक्षम्य विलंब
दरम्यानच्या काळात, समालोचन कक्षात बसलेले सुनील गावस्कर, रवी शास्त्री, , अरुणलाल, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मायकेल बेव्हन, ब्रॅड हॉग या मंडळींनी काढता पाय घेतला तेव्हाच सामना रद्द झाल्याची चाहूल प्रेक्षकांना लागली होती. तथापि, आयोजकांकडून बराच वेळ झाला तरी तशी अधिकृत घोषणा करण्यास विलंब करण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यांनी मग आपला राग तेथील आसनांवर काढला. निदान वीस षटकांचा तरी सामना होईल, अशी "छोटीसी आशा' प्रेक्षक बाळगून होते. त्यांच्या पदरी अंतिमतः पडली ती घोर निराशा. त्यांचा प्रचंड हिरमोड झाला आणि सुन्न मनाने त्यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या नावाचा उद्धार करत घरची वाट धरली.
सकाळी मैदानाबाहेर आणि प्रत्यक्ष मैदानातही प्रचंड उत्साह दिसून आला. मैदानाबाहेर तिरंग्यांची धडाक्यात विक्री सुरू होती. त्यांना प्रेक्षकांकडून प्रतिसादही उत्तम मिळत होता. काही जण चेहऱ्यावर तिरंगा रंगवून आले होते, तर कोल्हापूरसारख्या भागातून आलेल्या अनेकांनी भगवा फेटा परिधान करून या सामन्यात रंग भरण्याचा प्रयत्न आपल्या परीने केला. गोव्याबाहेरून आलेल्या अनेकांनी मैदानाच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात निवारा तयार करून त्यात मुक्काम ठोकला होता. त्यांच्या साऱ्या परिश्रमांवर पाणी फेरले गेले.
चिकन बिर्याणी "फक्त' १०० रुपयांत!
प्रेक्षक म्हणजे अशा सामन्यांच्या वेळी असाहाय्य बकरेच बनलेले असतात. त्याचा विदारक प्रत्यय या लढतीच्या वेळीदेखील आला. स्टेडियममध्ये एकदा प्रवेश केला की, बाहेर पडायची सोयच नसते. या सुवर्णसंधीचा फायदा उठवून केटरिंगवाले आपले उखळ पांढरे करून घेतात. आजच्या लढतीवेळी या मंडळींनी छोट्या बॉक्समधील चिकन बिर्याणीचा दर चक्क शंभर रुपये ठेवला होता. व्हेज बिर्याणी ८० रुपयांना मिळत होती. शीतपेयाचा एक ग्लास वीस रुपये तर पंधरा रुपयांची पाण्याची बाटली वीस रुपयांना विकली जात होती. व्हेज रोल चाळीस रुपयांना तर व्हेज पॅटिसची किंमत होती २० रुपये. प्रेक्षकांपैकी अनेकांनी या लूटमारीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. पण करणार काय, पोटात भूकेचा आगडोंब उसळल्यावर पैशाचा विचार सुचतो कोणाला, अशी संतप्त प्रतिक्रिया बहुतांश क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.पैसे परत मिळणार
या लढतीसाठी तिकीटे काढलेल्या सर्व प्रेक्षकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. त्यासाठी येत्या २८ तारखेनंतर प्रेक्षकांनी फेडरल बॅंकेच्या कोणत्याही शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन गोवा क्रिकेट असोसिएशनने केले आहे. निदान त्यामुळे तरी क्रिकेटप्रेमींना हायसे वाटले असेल यात शंका नाही.

..आणि साईटस्क्रीन कोसळला
सामना सुरू होणार की नाही याबद्दल ठोस माहिती मिळत नसल्यामुळे प्रेक्षक काहीसे चिडचीडे झाले होते. दुसरीकडे ढोल ताशांचा गजर सुरूच होता. त्याचवेळी पावणेबाराच्या ठोक्याला मीडिया बॉक्ससमोर "कर्रऽऽ' असा प्रचंड आवाज करत भलामोठा साईटस्क्रीन अचानकपणे कोसळला. त्यामुळे सर्वत्र गोंधळ माजला. सुदैवाने तेव्हा तेथे ग्राऊंड स्टाफ किंवा अन्य मंडळींची गर्दी नव्हती. अन्यथा मोठाच अनर्थ ओढवला असता. सामना सुरू असताना अशी आफत ओढवली असती तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नव्हती. प्रेक्षकांनी मग गॅलरीतून या धारातीर्थी पडलेल्या साईटस्क्रीनचे "दर्शन' घेतले. नंतर मोठ्या दोरखंडांचा आधार देऊन हा साईटस्क्रीन उभा करण्यात आला आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला.. मात्र त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनच्या आयोजनातील ढिसाळपणाचा प्रत्यय देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले पाहुणे आणि पत्रकारांसह सर्वांनाच आला.

फातोर्डा स्टेडियमवर पाकिटमारांची चांदी!

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी) - भारत -ऑस्ट्रलियामधील एक दिवसीय झटपट लढतीतील येथील फातोर्डा नेहरू स्टेडियमवरील सामना जरी काल पडलेल्या पावसामुळे होऊ शकलेला नसला तरी सामना होईल या आशेने आलेल्या अनेकांना आपले लक्ष्य बनविण्याचे काम मात्र तेथे त्याच हेतूने आलेल्या पाकिटमारांच्या टोळीने केले. मडगाव पोलिसात या प्रकरणी १५ ते १६ तक्रारी नोंदल्या गेलेल्या असल्या तरी नोंद न झालेल्यांचे प्रमाण कितीतरी पटीने असावे असा कयास आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीस गेलेल्यात भ्रमणध्वनींची संख्या अधिक आहे. सुमारे १४ भ्रमणध्वनी चोरीस गेल्याच्या तक्रारी नोंदल्या गेलेल्या आहेत, त्यात एका डॉक्टराने दोन दिवसांपूर्वीच खरेदी केलेल्या भ्रमणध्वनीचा समावेश असून त्याची किंमत १५ हजार रु. आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅंटीनमध्ये गेल्यावेळी कुणीतरी त्याच्यावर कलंडल्यासारखे झाले व नंतर काही वेळाने भ्रमणध्वनी नसल्याचे लक्षात आले.
दवर्ली येथील प्रसाद नाईक याचा असाच २८ हजारांचा मोबाईल तर दिकरपाली येथील डी.जी.नाईक या बांधकाम ठेकेदाराचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड, वाहतूक परवाना व अंगठीसाठी घेतलेले सुवर्ण नाणे व २८ हजार रोकड असलेले पाकीट व मोबाईल चोरीस गेला आहे. त्याशिवाय असंख्यांची पाकिटे पळविली गेलेली असून पोलिसांचा ससेमिरा नको, म्हणून ते पोेलिस तक्रारीच्या फंदांत पडलेले नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय सामन्याच्यावेळी सर्रास असे प्रकार चालतात व फातोर्डा येथील या पूर्वींच्या सामन्यांच्या वेळीही सर्रास असे प्रकार झाले होते. परराज्यांतून या मोहिमेवर खास टोळ्या येतात व काम आटोपून लगेच पसार होतात.
पण यंदाचे आश्र्चर्य म्हणजे बहुतेक सर्व चोऱ्या स्टेडियममध्ये झालेल्या आहेत व त्यावरून चोरटे वा पाकिटमार तिकिटे काढून आतमध्ये गेले होत, हेच सिद्ध होते.
सर्व पोलिस बंदोबस्त स्टेडियमबाहेर कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी असेल हे हेरून चोरट्यांनी नवी शक्कल लढविली व आतमध्ये जेथे जास्त झुंबड उडते त्या जागा हेरून आपले काम साधले असे दिसते. भारत ऑस्ट्रेलियामधील लढत पाहण्यासाठी आलेल्यांवर मात्र सामना नाही तो नाही उलट आर्थिक फटका बसला, असे म्हणण्याची पाळी आली.

सुरांवर केले ते निस्सीम प्रेम व भक्ती... सुरांवर केले ते निस्सीम प्रेम व भक्ती...

पं.तुळशीदास बोरकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी) - आपण फार काही केले नाही, केली ती सुरांवर भक्ती, वेड्यासारखे त्यांच्यावर प्रेम केले व त्यांच्या मागे धावत राहिलो पण त्याचे मोल आपणास आज कळले, असे भावोद्गार ज्येष्ठ हार्मोनियम कलाकार पं. तुळशीदास बोरकर यांनी आज येथे त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित सत्काराला उत्तर देताना काढले.
यावेळी अमृतमहोत्सव सत्कार समितीतर्फे पं. बोरकर यांचा मुख्यमंत्री दिगंबर कामत हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व समई अर्पण करून सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पं. बोरकर व मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त सत्कार समितीचे अध्यक्ष व समाजकल्याणमंत्री सुदिन ढवळीकर, नाट्यकर्मी भिकू पै आंगले, पं. रशिद खॉं उपस्थित होते. पं. बोरकर यांचा साडेसात वर्षें वयाचा शिष्य उन्मेश खैरे याचाही मुख्यमंत्र्यांहस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना पं. बोरकर म्हणाले की, आईने दिलेली शिक्षा ही सर्वांत मोठी होती, हेही आजच कळले, आईचा व माता नवदुर्गेचा आशीर्वाद हाच आपणास सर्वश्रेष्ठ ठरला त्या बळावरच आज आपण उभा आहे. त्याकाळी पैशाला महत्त्व नव्हते, कलेची हेटाळणी केली जात होती, पण आपण सारा भरवसा नवदुर्गेवर टाकला व ती आपणाला पावली. तिने भरभरून आपणाला दिले, जे आपण आपल्या दोन्ही हातांतही पेलू शकत नाही व म्हणून आजच्या या सत्काराचे. आपणाला मिळालेल्या कीर्तीचे सारे श्रेय तिलाच आहे व ते सारे आपण तिच्याचचरणी अर्पण करतो, असे ते सद्गदित होऊन उत्तरले.
आपणाला मिळालेल्या गौरवाचे बरेचसे श्रेय शिष्यांनाही जाते असे मनमोकळेपणाने सांगताना त्यांनी " बाळा होऊ कशी उतराई, तुझ्याचमुळे मी झाले आई' ही काव्यपंक्ती उद्धृत केली व सांगितले की आपणाला सत्पात्र शिष्य मिळाले व आपणातील गुरूचे चीज झाले. आपल्या यशाचे बरेचसे श्रेय त्यांनी सर्वप्रसंगात साथ दिलेल्या धर्मपत्नीला सौ. प्रतिभा यांनाही दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपणाहस्ते बोरकर गुरुजींचा सत्कार होतो आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. कलाकार हा मुडी असतो या कल्पनेला बोरकर यांनी छेद दिल्याचे सांगून त्यांनी कितीही कीर्ती व मानसन्मान मिळाले तरी आपले पाय अजूनही जमिनीवर खिळवून ठेवले आहेत, त्यावरून ते सिद्ध होत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अशा कलाकारांना मान व सन्मान मिळवून देण्यासाठी गोवा सरकारने योजलेल्या उपायांचीही माहिती दिली व सांगितले की, त्यामुळे वृद्धापकाळात कलाकारांच्या वाट्याला लाचारीचे जिणे येणार नाही.
यावेळी बोलताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आजचा कार्यक्रम हा एक आनंद सोहळा असल्याचे व बोरकर यांचे योगदान केवळ गोव्यापुरते सीमित राहिलेले नाही तर संपूर्ण देशभर विस्तारल्याचे सांगितले. असे गुरु मिळणे कठीण असे सांगून ते शिष्यांना शिकवीत असतानाही स्वतःही शिकत गेले असे नमूद केलेे.
यावेळी पं.रशिद खॉं व नाट्यकर्मी भिकू पै आंगले यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अजय वैद्य यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात नांदीने झाली. नंतर पं. बोरकर यांचे साडेसात वर्षे वयाचे शिष्य उन्मेष खैरे याच्या हार्मोनियम वादनाचा कार्यक्रम सर्वांकडून टाळ्या घेऊन गेला. नंतर बोरकरांच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिग्गज कलाकारांनी दिलेले संदेश पडद्यावरून प्रसारित करण्यात आले. यावेळी बोरकर रजत आसनावर बसवून त्यांना ओवाळले गेले व मंत्रघोष करण्यात आला. नंतर रशीद खॉं यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.
रवींद्र भवनाच्या वातानुकूलित परिषदगारात झालेल्या या कार्यक्रमास पं. बोरकर यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काश्मीरप्रश्नी पाकचा सहभाग आवश्यक

पाडगावकरांच्या मतामुळे खळबळ

नवी दिल्ली, दि. २४ - काश्मीरात सुरु असलेला हिंसाचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचे निमंत्रक व ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांनी, काश्मीरप्रश्नी तोडगा काढायचा असेल तर पाकिस्तानलाही चर्चेत सहभागी करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केल्याने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केंद्र सरकारवर कठोर टीका केली आहे. पंतप्रधानांनी दिलीप पाडगावकर यांनी व्यक्त केलेल्या मतासंबंधी आपले धोरण स्पष्ट करावे, अशी जोरदार मागणी आज भाजपने केली. भाजपच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.
काश्मीरात मागील अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्राने सर्व पक्षांशी चर्चा करण्यासाठी ही समिती स्थापन केली आहे. त्या समितीचे निमंत्रक असलेल्या पाडगावकरांनी आपण पाकसंबंधी बोलून नवे काहीच सांगितलेले नाही, अशी भूमिका घेतली आहे. काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग असताना, तेथील शांतता प्रक्रियेत पाकला सहभागी करण्याची सूचना म्हणजे या प्रश्नाचे विनाकारण आंतरराष्ट्रीयीकरण असल्याची टीका त्यांनी केली. पाडगावकर यांनी व्यक्त केलेले मत हे हुरियतच्या मागणीला पुष्टी देणारे आहे, अशीही टीका त्यांनी केली. दरम्यान, पाडगावकर यांनी यासंबंधी बोलताना, पंतप्रधान अथवा गृहमंत्र्यांनी आपल्या कामाबाबत कोणत्याही सूचना केलेल्या नसल्याचे सांगताना आपण काश्मीरमधील घटना व त्यावरील उपाय याबाबत स्वतंत्र वृत्तीने अभ्यास करीत असल्याचे सांगितले.

मुंबईतील तरुण पाळोळ्यात बुडाला

काणकोण, दि. २४ (प्रतिनिधी)- पाळोळे किनाऱ्यावर पर्यटन मोसमाच्या सुरुवातीलाच आज स्नानासाठी उतरलेल्या तिघा मित्रांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याने येथील पर्यटन व्यावसायिकांना धक्का बसला आहे. पाळोळे येथे काल रोजी मीलन रोहित ठाकरे (वय २५) हा विलेपार्ले, मुंबई येथील युवक आपल्या प्रकाश पटेल व हर्ष शहा या मित्रांसमवेत पाळोळ्यात आला होता. काल संध्याकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आज पहाटे ते तिघे समुद्रस्नानासाठी उतरले. समुद्राला भरती असल्याने तिघेही कमी पाण्यात किनाऱ्यापाशी मौजमजा करीत असता मीलन अचानक पाण्यात ओढला गेला. तो बुडत असताना त्याच्या दोन्ही मित्रांनी त्याला पाण्याबाहेर आणण्यात यश मिळविले, असे एक स्थानिक अनिल पागी यांनी सांगितले. त्याला किनाऱ्यावर आणताच जवळच असलेल्या जीवरक्षकांकरवी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला १०८ गाडीतून काणकोण सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सध्या त्याचे शव मडगाव येथे शवागारात ठेवण्यात आले आहे. मीलनच्या वडिलांना ही खबर देण्यात आली आहे. उद्या शवविच्छेदनानंतर मीलनचा मृतदेह मुंबईला रवाना करण्यात येणार आहे. साहाय्यक उपनिरीक्षक सावंत पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या घटनेसंबंधी माहितीसाठी संपर्क साधला असता जीवरक्षकांनी माहिती देण्यास टाळाटाळ करून पत्रकारांशी हुज्जत घातली तसेच स्थानिकांशीही उद्धटपणाची वर्तणूक केली. या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून भविष्यात अशा प्रसंगी सहकार्य करण्याबद्दल जीवरक्षकांना समज देण्यात यावी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

वार्ताकारांना न भेटण्याचा निर्णय

श्रीनगर, दि. २४ - काश्मीर समस्या प्रलंबित ठेवण्याचाच प्रयत्न केंद्र सरकारने चालवला असल्याचा आरोप करत, जम्मू-काश्मिरात पाठविलेल्या वार्ताकारांशी चर्चा न करण्याचा निर्णय हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाने आज घेतला आहे.
वार्ताकारांच्या पथकाला वैयक्तिक स्तरावर आमचा काहीही विरोध नाही. मात्र, काश्मीर समस्या प्रलंबित ठेवण्याचाच हा सरकारचा प्रयत्न असल्याची आमची भावना आहे. त्यामुळे या पथकाशी चर्चा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे हुर्रियतच्या मवाळ गटाचे नेते मिरवाईझ उमर फारूक यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. काश्मिरी जनतेचा संदेश स्पष्ट असून, आमच्या मनात याप्रकरणी कुठलाही संभ्रम नाही. आम्हाला स्वयंनिर्णयाचा अधिकार हवा आहे आणि गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही त्यासाठीच लढत आहोत, असेही मिरवाईझ यांनी सांगितले. हुर्रियतने याआधी भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा केलेली असल्याने नव्याने वार्ताकारांची नियुक्ती करण्याची काय गरज होती, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Sunday 24 October, 2010

आज रंगणार भारत-कांगारू झुंज

वरुणराजाने विश्रांती घेतल्यामुळे सामन्याची शक्यता वाढली
वास्को, दि. २३ (प्रतिनिधी): गेले दोन दिवस वरुणराजाने आपला हिसका दाखवल्यानंतर आज दिवसभर विश्रांती घेतल्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व या मालिकेतील अंतिम झटपट आंतरराष्ट्रीय सामना होण्याची शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी सुखावले असून फातोर्डा मैदानावर होणारी ही लढत कधी एकदा डोळे भरू पाहतोय, असे क्रिकेटप्रेमींना झाले आहे.
या सामन्याबाबत सर्वांच्यात मनात धाकधूक निर्माण झाली होती.
मात्र आज सकाळपासून वरुणराजाने विश्रांती घेतल्याने क्रिकेटप्रेमी उद्याच्या दिवसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. आज सकाळपासून फातोर्डा मैदानाच्या परिसरात पाऊस झाला नसल्याने सामना होण्याची शक्यता बळावली आहे.
काल दुपारी फातोर्डा मैदानाच्या परिसरात काळे ढग दाटून आल्यामुळे
आयोजकांनी खेळपट्टीच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली. पाऊस थांबला नाही तर सामना होणार नाही हे ठरलेलेच आहे. त्यामुळे हा मामला सर्वांनी
देवावरच सोडून दिल्याचे दिसून आले. काल उशिरा रात्रीपर्यंत पाऊस पडल्यानंतर आज सकाळी वरुणराजाने विश्रांती घेतली. साहजिकच मैदानावरील कर्मचाऱ्यांचा उत्साहदेखील वाढला. त्यांनी आपल्या कामाची गती वाढवली. आज दिवसभर मैदानाच्या परिसरात लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सामना होणार असल्याची आशा निर्माण झाल्याने तो पाहण्याकरिता पास अथवा तिकीट मिळवण्याची धडपड करताना क्रिकेटप्रेमी दिसून आले. त्यांच्यापैकी काही जणांना त्यात यशही आले. उद्याच्या सामन्यापूर्वी आज सकाळी प्रथम येथे भारतीय क्रिकेट संघाचा सराव निश्चित करण्यात आला होता व नंतर ऑस्ट्रेलियन संघ सराव करणार होता. मात्र, काल उशिरा रात्रीपर्यंत पाऊस पडल्याने दोन्ही संघांनी आज दुपारी मैदानावर उपस्थिती लावून सराव केला.
दरम्यान सामन्याच्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री दिगंबर कामत, गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दयानंद नार्वेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी घेतला. तसेच त्यांनी फातोर्डा मैदानावर उपस्थिती लावून सर्व गोष्टींची पाहणी केली. मैदानाबरोबर दक्षिण गोव्यातील बहुतेक भागांत उद्याच्या सामन्याबद्दल आज प्रचंड उत्साह दिसला.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोवा पोलिसांनी मैदानाच्या सर्व भागांत
कडक बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले. वाहतूक नियंत्रणात ठेवण्याकरिता सर्व तयारी पूर्ण झाल्याचे दिसून आले. उद्या सकाळी सामना होणार असला तरी आज (शनिवारी) संध्याकाळीच काही क्रिकेटप्रेमींनी फातोर्डा मैदानाबाहेरच आपले घर केल्याचे दिसून आले. यात महाराष्ट्रातील व कर्नाटक येथील शेकडो क्रिकेटप्रेमींचा समावेश होता. संध्याकाळी गोव्याच्या इतर काही भागात पाऊस पडल्याची माहिती पसरताच क्रिकेटप्रेमींत पुन्हा एकदा निराशेचे वातावरण पसरले. मात्र हा सामना चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी वरुणराजा आपली कृपादृष्टी दाखवत असल्याचे दिसून आले. गोव्यातील क्रिकेटप्रेमींची नजर आता घड्याळाच्या काट्यांवर स्थिरावली असून हा सामना यशस्वीरीत्या पार पडावा अशीच त्यांची ईश्वराच्या चरणी विनंती असेल.
चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा!
उद्या रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी आज भारत तसेच ऑस्ट्रेलिया संघाने फातोर्डा मैदानावर आपला सराव करून ते पुन्हा हॉटेलात जाण्यासाठी बाहेर निघाले तेव्हा मैदानाच्या परिसरात शेकडो क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती लावून त्यांचे "दर्शन' घेतले. कर्णधार महेंद्रसिंग धोनी, युवराजसिंग, विराट कोहली इत्यादी खेळाडू सरावानंतर मैदानाच्या बाहेर आले तेव्हा रसिकांनी त्यांना उद्याच्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या!

भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर आज गोव्यात

पणजी,दि.२३(प्रतिनिधी): भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर यांचे उद्या २४ रोजी गोव्यात आगमन होत आहे. ते सोमवार २५ रोजी सकाळी १० वाजता भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित गोवा प्रदेश भाजयुमो कार्यकर्त्यांना "इंडिया फर्स्ट' कार्यक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करणार आहेत. सर्व युवा कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन भाजयुमोचे अध्यक्ष डॉ.प्रमोद सावंत यांनी केले आहे.

'इफ्फी'च्या पाहुण्यांसाठी किनारी हॉटेलच कशाला?

आर्नोल्ड डिकॉस्टा यांची सडकून टीका
पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) निमित्ताने गोव्यात येणारे पाहुणे चित्रपट पाहण्यासाठी येतात की किनारी हॉटेलांचा पाहुणचार झोडण्यासाठी येतात, असा कळीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. कारण, चित्रपट महोत्सव संचालनालयाने यंदा सामंजस्य करारात पाहुण्यांना केवळ किनारी हॉटेलच हवे अशी अट लादून नेमकी कुणावर मेहेरनजर करण्याचा घाट घातला आहे, असा खडा सवाल "फेडरेशन ऑफ फिल्म फ्रॅटर्निटी ऑफ गोवा' चे अध्यक्ष आर्नोल्ड डिकॉस्टा यांनी केला आहे.
संघटनेतर्फे आज जारी केलेल्या पत्रकांत आर्नोल्ड डिकॉस्टा यांनी गोवा मनोरंजन संस्थेच्या भोंगळ कारभाराचा समाचार घेताना काही महाभागांनी "इफ्फी' महोत्सवाचा व्यापारच मांडला आहे, असा गंभीर आरोप केला. यापूर्वी दिल्ली,बंगळूर, हैदराबाद येथे "इफ्फी' महोत्सव आयोजिण्यात आला होता; पण तिथे किनारी हॉटेलांची कुणालाच गरज भासली नाही. मग यंदा "इफ्फी'साठी येणाऱ्या पाहुण्यांना किनारी हॉटेलच हवे,अशी अट लादून कुणाची भर केली जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवर अनेक हॉटेल उद्योजक आहेत व यापूर्वी महोत्सवाच्या हॉटेलाचे कंत्राटही त्यांनाच देण्यात आले होते.यंदा सुरुवातीला काढण्यात आलेल्या हॉटेल निविदेत "इफ्फी' आयोजन स्थळापासून जवळ असलेल्या हॉटेल "ताज विवांता'कडून एकमेव कमी बोली लावण्यात आली होती. आता मात्र अचानक किनारी हॉटेलाची अट लादून या हॉटेलला दूर सारण्याचा प्रयत्न केला जात आहे.केवळ प्रशासकीय समितीवर काही हॉटेल उद्योजक सदस्यांना कंत्राट मिळवून देण्यासाठीचा हा खटाटोप सुरू आहे, असा संशय यावेळी श्री.डिकॉस्टा यांनी व्यक्त केला.
गोवा मनोरंजन संस्थेच्या प्रशासकीय समितीवर थेट चित्रपट उद्योगातील लोकांना डावलून उद्योजकांची निवड करण्यात आली आहे व हे उद्योजक "इफ्फी' आयोजनाची कंत्राटे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असल्याची टीका यावेळी करण्यात आली.चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून "इफ्फी'शी दुरान्वयानेही देणेघेणे नसलेल्या अवाजवी मागण्या पुढे रेटल्या जात आहेत. त्यामुळे राज्य सरकारने वेळीच या मागण्या फेटाळून लावाव्यात, अशी विनंतीही सदर पत्रकात करण्यात आली आहे.

ज्ञातीचा न्यूनगंड बाळगू नका : सुशीलकुमार शिंदे

षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त शंभू भाऊ बांदेकरांचा ह्रद्य सत्कार
पणजी, दि.२३ (सांस्कृतिक प्रतिनिधी): आपण दलित समाजात जन्मलो याचा न्यूनगंड बाळगून ते उगाळत राहण्यापेक्षा जे आहे ते स्वीकारून अंधारावर मात करत प्रकाशाकडे जाणे यातच खरे कर्तृत्व आहे. धोका पत्करल्याशिवाय जीवनात काहीही मिळत नाही. धोका पत्करणे म्हणजेच जीवन, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे केले.
कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात भव्य स्वरूपात झालेल्या शंभू भाऊ बांदेकर षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, उद्योगपती श्रीनिवास धेंपे, साहित्यिक विष्णू सूर्या वाघ, सत्कारमूर्ती शंभू भाऊ बांदेकर, सौ. शुभांगी बांदेकर, सत्कार समितीचे सरचिटणीस सुरेश वाळवे, समितीचे अध्यक्ष ऍंड. रमाकांत खलप, खजिनदार गुरूदास नाटेकर, गंगाराम मोरजकर उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले, आम्हीच स्वतःला कमी लेखतो. उघड्या डोळ्यांनी पाहिले तर आमच्यापेक्षा उपेक्षित लोक जगाच्या कानाकोपऱ्यांत दिसून येतील.कधी काळी गुलामीचे जिणे नशिबी आलेल्या कृष्णवर्णीयांनी केलेली प्रगती डोळे दीपवणारी आहे. सामाजिक क्षेत्रात धडाडीने काम केलेल्या मंडळींना समाज कधीच विसरत नाही.
ते म्हणाले, कवी हळव्या मनाचा असतो. शंभू भाऊ बांदेकर हे त्यापैकीच एक होत. त्यामुळे राजकारणात ते जास्त काळ टिकू शकले नाहीत. कदाचित सध्याच्या राजकारणातील गोंधळ त्यांच्या संवेदनशील मनाला रुचला नसावा. आजकाल जे राजकारणात चालले आहे ते भयंकर आहे. कवी मनाला त्यामुळे किती दुःख, वेदना होत असतील याची कल्पना मी करू शकतो. अर्थात, जीवनात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. त्यासाठी कडवा संघर्ष करावा लागतो. असा संघर्ष करण्याची उमेद बाळगणारेच या रणांगणात टिकून राहतात.
शंभू भाऊ बांदेकरांना हार्दिक शुभेेच्छा व्यक्त करून गोव्याच्या माणसाशी संवाद साधायला मला आवडते असे सांगतानाच यापूर्वी आपण बा. द. सातोस्करांच्या पुस्तक प्रकाशनासाठी गोमंतभूमीत आल्याच्या आठवणींना श्री. शिंदे यांनी उजाळा दिला.
श्री. शिंदे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पहार घालून श्री. बांदेकर यांचा सत्कार करण्यात आला; तर श्रीनिवास धेंपे यांनी बांदेकर यांना नॅनो मोटार भेट दिली. सौ. चित्रा क्षीरसागर यांनी सौ. बांदेकर यांची खणानारळाने ओटी भरली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शंभू भाऊ गौरव ग्रंथ "स्वयंभू' व श्री. शिंदे यांच्या हस्ते "दलितांची डायरी' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विष्णू वाघ म्हणाले, बांदेकर हे वेगळेच रसायन आहे. शब्दांमध्ये न पकडता येणारी ती वल्ली आहे. ते नेहमी माणसे जोडत राहिले. मैत्री करणे हा त्यांचा छंद. त्यांच्याशी मैत्री केलेली माणसे कधीच त्यांच्यापासून तुटली नाहीत.
श्री. धेंपे यांनीही बांदेकरांचा उचित गौरव केला. बांदेकर आपल्या कुटुंबाशी बांदेकरांचा गेल्या तीन पिढ्यांचा संबंध असला तरी आजपर्यंत ते कधीही स्वतःचे काम घेऊन किंवा स्वतःसाठी काही मागण्याकरिता आले माझ्याकडे आले नाहीत याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. मुख्यमंत्री कामत यांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितले, चांगुलपणाने अनेक गोष्टी माणसाला जीवनात साध्य होऊ शकतात. म्हणून जीवनात शंभू भाऊ बांदेकर यांच्यासारखा चांगला माणूस होणे आवश्यक आहे.
सत्काराला उत्तर देताना शंभू भाऊ बांदेकर यांनी या ह्रद्य सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ६० वर्षांच्या कालावधीत सर्व हितचिंतकांनी सत्काराच्या स्वरूपात नव्याने दिलेली ऊर्जा आपण समाज कार्यासाठी उपयोगात आणायची असे ठरवले आहे.
स्वागत व प्रास्ताविक ऍड. खलप यांनी केले. सुदेश आर्लेकर यांनी गौरवपत्राचे वाचन केले. श्री. शिंदे यांना याप्रसंगी गोव्याचे भूषण असलेली समई प्रदान करण्यात आली. सुरेश वाळवे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले.

खोऱ्यातील संचारबंदी उठवली

श्रीनगर, दि. २३ : फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सच्या जहाल गटाने केलेल्या बंदच्या आवाहनानंतरही परिस्थिती आटोक्यात असल्याने काश्मीर खोऱ्याच्या अनेक भागांमध्ये लागू असलेली संचारबंदी प्रशासनाने आज पूर्णपणे उठवली आहे.
आज सकाळपासूनच खोऱ्यातील जनजीवन पूर्णपणे सुरळीत असून, अजूनपर्यंत कुठलीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नाही, असे पोलिस खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. असे असले तरी श्रीनगर शहराचा मध्यवर्ती परिसर असलेल्या लाल चौक भागातील सर्व दुकाने आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. खोऱ्याच्या इतर भागातील आर्थिक व्यवहार सामान्यपणे होत आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सयद अली शाह गिलानी यांच्या जहाल गटाने आंदोलनाच्या दहा दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतरही अनेक खाजगी आणि सरकारी वाहने खोऱ्यातून ये जा करत आहेत. सार्वजनिक परिवहन सेवेच्या गाड्या मात्र आज रस्तावर उतरलेल्या नाहीत, असेही सूत्रांनी सांगितले.