Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 14 August, 2010

"शेतकऱ्यांचा राजा'

जेम्स लेनच्या चौथ्या प्रकरणाचे शीर्षक The Patriot : Political Readings of Hindu Identity in the Tales of Shivaji 1869-2001 असे आहे. हा काळ शिवाजी महाराजांचे आधुनिक स्वरूपात चरित्रलेखन करण्याचा आहे. या दरम्यान महाराष्ट्रातील संशोधकांच्या चार पिढ्यांनी तसेच भारतातील इतर प्रांतांमधील अनेक संशोधकांनी आपल्या परिश्रमांनी शिवचरित्र आधुनिक संशोधनाच्या कार्यपद्धतीवर तोलून लिहिण्याचे प्रयत्न केले. त्यांनी घेतलेले श्रम, छानून काढलेले पुरावे, अनेक पूर्वीच्या गोष्टींना आधार न मिळाल्याने त्यांना वगळून अत्यंत वास्तव असणाऱ्या आधारांना घेऊन लिहिलेली शिवचरित्रे त्याने अर्ध्या वाक्यात मोडीत काढली आहेत. त्यांना तो राजकीय दृष्टिकोनातून सांगितलेल्या गोष्टी (Tales) म्हणतो. म्हणजे मराठी इतिहासकारांनी लिहिलेल्या त्या गप्पागोष्टी आणि जेम्स लिहील तो इतिहास - विश्वसनीय इतिहास - असा अर्थ होतो.
आधुनिक काळात म्हणजे तो नमूद करतो त्या १८६९ - २००१ च्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या शिवचरित्रांना (retelling असे तो लिहितो) पाश्चात्य संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. Thus from the early nineteenth century to the present, any retelling of the tales of Shivaji would reflect some awareness of European Culture and power, just as previous accounts reflect an Islamicate context,..... so the regional hero Shivaji began to be portrayed as a national hero well before the British handed over control of the sub-continent to an independent India and Pakistan (पृ. ६३)
लेनने इतिहास लेखन आणि इतिहास मिमांसा यात पूर्वी दिल्याप्रमाणे गल्लत केली आहे. तो म. ज्योतिबा फुलेंनी १८६९ मध्ये लिहिलेल्या पोवाड्यापासून सुरुवात करतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे शिवचरित्र लिखाणामागचा इतिहासकार आणि समिक्षकांचा हेतू ब्रिटीश राज्याविरुद्ध प्रतिकार उभा करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या रुपात राष्ट्रीय नेत्याचे अथवा देशभक्ताचे चित्र रंगविणे व त्यातून लोकांना प्रेरणा देणे हा होता. म. फुलेंनी शिवाजी महाराजांना बहुजन समाजाचा नायक या स्वरूपात पाहिले - 'It is important to keep in mind the context of nineteenth century caste politics while reading Phule's portrayal of Shivaji as a low-cast hero. (पृ. ६५). छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात इतकी विविध कामे केली, इतक्या प्रकारच्या समाजांसाठी चांगली कामे केली की त्या त्या समाज घटकांना ते आपलेसे वाटले तर नवल वाटायला नको. लेन त्याच्या पुस्तकातच शेतकरी आंदोलनामुळे प्रसिद्धीस आलेल्या शरद जोशी, अनिल गोटे आणि राजीव बसेर्गकर यांच्या १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या "शेतकऱ्यांचा राजा शिवाजी'चा संदर्भ देतो. साहजिकच आहे; महाराजांनी शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्याबाबत, जंगल संपत्ती वाचविण्याबाबत तसेच मोहिमेदरम्यान रयतेचे धान्य इतर सुलतानी फौजांप्रमाणे लुटून न घेता पैसे देऊन विकत घेण्याचे आदेश दिले. तत्कालीन रयतेला त्यातून स्वस्थता आणि शाश्वती मिळाली. आधुनिक भारत आणि इन्डिया यात झालेल्या फरकामुळे काही वर्षांपूर्वी शेतकरी नेते श्री शरद जोशी, अनिल गोटे इत्यादींनी शेतमालाच्या भावाविषयी आंदोलन उभारताना शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्यांविषयीच्या उदार धोरणांना समोर ठेऊन त्यांना "शेतकऱ्यांचा राजा' स्वरूपात पाहिले, म्हणजे इतिहास बदलला नाही तर त्यातील एक उपेक्षित दृष्टिकोन समोर आला असेच म्हणता येईल.
या पुढची पायरी म्हणजे मुसलमान समाजाने शिवाजी महाराजांना त्यांचा नेता, त्यांचा रक्षणकर्ता या दृष्टिने पाहणे. सध्याचे व्होटबॅंकेचे राजकारण पाहता अफजलखान हा काही मुसलमानांना जवळचा वाटतो. त्याच्या व शिवाजी महाराजांच्या भेटीच्या चित्रावरून सांगलीत दंगल उसळते. मात्र पुढे जाऊन शिवाजी महाराजांच्या नावे मते मिळणार असतील तर तेही मुस्लिम लोक महाराजांना आदर्श सर्वधर्मसमभावी आणि सेक्युलर राजा मानण्यास पुढे येतील.

शेकडो टन स्फोटकांचे ६१ ट्रक मार्गातच गायब

भोपाळ, दि. १३ : राजस्थानातील धौलपूर येथून मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात स्फोटके घेऊन जाणारे तब्बल ६१ सरकारी ट्रक मार्गातच बेपत्ता झाल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा हादरल्या आहेत. यात सुमारे ६०० टन स्फोटके होती. यामागे माओवाद्यांचा हात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे व या स्फोटकांच्या माध्यमातून ते आगामी काही दिवसांत काही मोठा घातपात घडवून आणणार की काय, या विचाराने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
सागरचे पोलिस महानिरीक्षक अन्वेष मंगलम् यांनी आज एका वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्फोटके नेणारे हे ट्रक राजस्थानातून निघाले होते. तेथील धौलपूर येथील "राजस्थान एक्स्प्लोसिव्हज ऍण्ड केमिकल्स' या कारखान्यातून सागरमधील गणेश मॅगझीन या व्यापारी संस्थेला एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात ही स्फोटके पाठविण्यात आली होती. त्यांची एकूण किंमत १ कोटी ३० लाख रुपये इतकी होती.
यातील शेवटचा माल चार दिवसांपूर्वी संस्थेत पोहोचणे अपेक्षित होते. पण, आजपर्यंत या बेपत्ता ट्रक्सचा तसेच त्यातील स्फोटकांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. ही स्फोटके माओवादी किंवा समाज विघातक शक्तींच्या हाती लागली असण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
मध्यप्रदेश सरकारकडून दखल
देशात सध्या नक्षलवाद बोकाळला आहे. अशा स्थितीत हा प्रकार होणे अतिशय चिंताजनक बाब असल्याचे मध्यप्रदेश सरकारने म्हटले आहे. हे प्रकरण गंभीर असून हरवलेले ट्रक शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. पोलिसांची चार पथके राजस्थान, आंध्र आणि महाराष्ट्रात पाठविण्यात आल्याची माहिती मध्यप्रदेशचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी दिली.
यापूर्वी अशा घटना नक्षलग्रस्त राज्यांमध्ये बऱ्याचदा घडल्या आहे. तसेच नक्षलवाद्यांनी सरकारी स्फोटके आणि शस्त्रास्त्रे लुटण्याचेही प्रकार वरचेवर घडत असतात. त्यामुळे या घटनेमागे नक्षली असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमोण्यातील महिला खांडोळा अपघातात ठार

फोंडा, दि. १३ (प्रतिनिधी): जाईडवाडा - खांडोळा, माशेल येथे आज (दि. १३) सकाळी सव्वा सातच्या सुमारास मारुती व्हॅनने (जीए ०१ ई १४३८) अक्टिव्हा स्कूटरला (जीए ०४ बी ४२३७) धडक दिल्याने ऍक्टिव्हा स्कूटरवर मागे बसलेल्या गौरीशा गोपाळ सावंत (३३) या आमोणा येथील महिलेचे निधन झाले.
जाईडवाडा - खांडोळा येथील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. मारुती व्हॅन माशेल येथून आमोणा येथे येत होती तर स्कूटर आमोणा येथून माशेलला जात होती. मयत गौरीशा या स्कूटरवरून लिफ्ट घेऊन माशेल येथे जात होत्या.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निष्काळजीपणे वाहन चालवल्यामुळे मारुती व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निखिल पालेकर तपास करत आहेत. व्हॅनचालक धनंजय गोपीनाथ गावकर याला अटक करण्यात आली आहे.

श्रीराम हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक!

श्री हनुमत् शक्ती जागरण समितीतर्फे श्रीराम मंदिर अभियानाला सुरुवात
पणजी,दि. १३ (प्रतिनिधी): श्रीराम हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असून ६ डिसेंबर १९९२ साली अयोध्येत श्रीराम जन्मस्थळी कारसेवा केलेल्या ठिकाणी भव्य श्रीराम मंदिर उभारणे हा तमाम हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. या लोकभावनेच्या पूर्ततेसाठी श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी श्री हनुमत् शक्ती जागरण समिती पुढे सरसावली आहे, असे प्रतिपादन श्री हनुमत् शक्ती जागरण समितीचे राष्ट्रीय आयोजन सचिव प्रशांत हरताळकर (मुंबई) यांनी केले.
आज पणजी येथील सिद्धार्थ बांदोडकर भवनातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. हरताळकर बोलत होते. श्री हनुमत् शक्ती जागरण समिती गोमंतक, कोंकण प्रांतातर्फे आयोजित सदर पत्रकार परिषदेला समिती संयोजक राजेंद्र वेलिंगकर, उपाध्यक्ष ऍड. महेश बांदेकर व सह संयोजक आनंद शिरोडकर उपस्थित होते.
रामभक्तांनी कारसेवा केलेल्या जागीच राममंदिर होते हे भारतीय पुरातत्त्व खात्याने १९९५मध्ये के लेल्या भू- रडार सर्वेक्षणात सिद्ध झालेले आहे. जगातील समस्त हिंदूंच्या भावना, ऐतिहासिक दस्तावेज व पुरातत्त्व खात्याचे संशोधन या सर्वांमधून श्रीराम मंदिर जागेबाबत असलेली संदिग्धता दूर झाली असून, न्यायालयाचा निकालही हिंदूंच्याच बाजूने लागेल, असा विश्वास श्री. हरताळकर यांनी यावेळी व्यक्त केला. यंदा हरिद्वार येथे झालेल्या संतांच्या सभेत श्रीरामांच्या जन्मस्थळी भव्य मंदिर उभारण्याचा संकल्प सोडण्यात आला असून श्री हनुमत् शक्ती जागरण समितीतर्फे देशभर जागृती करून हा संकल्प पुरा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी समितीच्या गोव्यातील कार्याबाबत गोवा संयोजक राजेंद्र वेलिंगकर यांनी माहिती दिली. यापूर्वी राममंदिर आंदोलनाच्या वेळी गोमंतकीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. दि.१५ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात समितीतर्फे गावागावांतील मंदिरांत ६३८ अनुष्ठान व "श्री हनुमान चालिसा'चे पठण केले जाईल. दुसऱ्या टप्प्यात तालुकावार महायज्ञ, बैठका, सभा, जनजागृती व हस्ताक्षर अभियान राबवण्यात येईल. हिंदूच्या ४५ ते ५० हजार सह्यांचे निवेदन"रामबाण प्रस्ताव' म्हणून राष्ट्रपतींना सादर केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले व गोमंतकीय जनतेने समितीच्या कार्यात सहभागी होऊन भव्य श्रीराम मंदिर उभारणीचे समस्त हिंदूंचे स्वप्न सत्यात उतरवावे, असे आवाहन केले. हे कार्य तडीस नेण्यास प्रसिद्धी माध्यमांनीही समितीला सहकार्य करावे असे ते म्हणाले.
श्री हनुमत् शक्ती जागरण समितीचे हे कार्य "श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण हेतू श्री हनुमत् शक्ती जागरण अनुष्ठान' या नावाने पुढे नेण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

रिव्हर प्रिन्सेस हटवण्याचे कंत्राट हा महाघोटाळा

सुरेश परुळेकर यांचा आरोप
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): कांदोळी समुद्रात गेल्या दहा वर्षांपासून रुतून बसलेले रिव्हर प्रिन्सेस जहाज हटवण्यासाठी "टायटन मॅरिटाईम प्रा. लि.' या कंपनीला १२८.२४ कोटी रुपयांना कंत्राट देण्याची राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने सरकारकडे केलेली शिफारस म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेच्या घोटाळ्यापेक्षाही महाभयंकर घोटाळा आहे, असा सनसनाटी आरोप माजी उद्योगमंत्री सुरेश परुळेकर यांनी केला. "मढ्याच्या टाळूवरील लोणी चाखण्या'चा हा प्रकार असून हे बेकायदा कंत्राट तात्काळ रद्द केले नाही, तर प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेणार अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या खास पत्रकार परिषदेत सुरेश परुळेकर यांनी रिव्हर प्रिन्सेस हटवण्याबाबतच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्वरित या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करीत राज्याला लुटण्याचा हा प्रकार दिल्लीत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत नेणार असल्याचेही ते म्हणाले. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेले अनिल मडगावकर व कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनीच संगनमत करून हे कंत्राट "टायटन मॅरिटाईम प्रा.लि.' या कंपनीला मिळवून देण्याचा घाट घातला, असा गंभीर आरोपही यावेळी श्री.परुळेकर यांनी केला. मुळातच स्वतः आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य असताना अनिल मडगावकर यांनी आपल्या मडगावकर सेल्वेज कंपनीचा प्रस्ताव कसा काय सादर केला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणत्याही निविदेसाठी प्रस्ताव सादर करताना ठरावीक रक्कम बॅंक हमी देण्याचा नियम आहे पण इथे मात्र एकाही कंपनीकडून ही हमी घेण्यात आली नाही, असाही खुलासा यावेळी सुरेश परुळेकर यांनी केला. आपण दोन वेळा कळंगुट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. रिव्हर प्रिन्सेस हे आपल्या मतदारसंघाच्या डोक्यावर गेली दहा वर्षे टांगती तलवार बनले आहे व हे जहाज हटवणे काळाची गरज आहे. परंतु, याचा अर्थ या जहाजाच्या नावाने राज्याची तिजोरी लुटण्याचा कुणालाच अधिकार नाही, असेही यावेळी श्री. परुळेकर यांनी बजावले. या घोटाळ्याचा पर्दाफाश करूनही हे कंत्राट रद्द करण्यासाठी आपल्याला कॉंग्रेस पक्षाकडून साथ मिळाली नाही तर प्रसंगी आपण विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांच्याकडे मदत मागण्यासही मागे राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे ९ एप्रिल २००९ च्या राजपत्रात राज्य आपत्ती व्यवस्थापन सल्लागार समितीची घोषणा केली. कालांतराने रिव्हर प्रिन्सेस जहाज हटवण्यासाठी निविदा मागवण्याचा निर्णय या समितीने घेतला व या निविदा ठरवण्यासाठी एक उपसमिती नेमण्यात आली. या उपसमितीतर्फे बोलावण्यात आलेल्या बैठकांचे इतिवृत्त पाहिल्यास संशय घेण्यास बराच वाव असल्याचेही श्री. परुळेकर म्हणाले. मुळातच अनिल मडगावकर हे उपसमितीचे सदस्य असतानाही त्यांनी आपल्या कंपनीतर्फे निविदा कशी काय सादर केली? अनिल मडगावकर हे निवडणूक काळात आग्नेल फर्नांडिस यांच्या प्रचारार्थ जाहीरपणे व्यासपीठावर भाषणे देत होते व रिव्हर प्रिन्सेस हटवण्यासाठी आग्नेल फर्नांडिस यांचीच निवड करण्याचे आवाहन लोकांना करीत होते, अशी माहितीही यावेळी त्यांनी उघड केली. हे जहाज हटवण्यासाठी १२ कंपन्यांचे प्रस्ताव सादर झाले होते. हे प्रस्ताव सादर करताना स्मित सेल्वेजचे प्रतिनिधित्व करणारे चंद्रन हे अचानक या कंत्राटासाठी निवड झालेल्या टायटन कंपनीचे प्रतिनिधित्व कसे काय करतात, असाही सवाल त्यांनी यावेळी केला. मडगावकर सेल्वेज कंपनीतर्फे १९०.५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता व टायटन कंपनीतर्फे प्रत्यक्ष आकडा सादर न करता हे जहाज हटवण्यासाठीची कालमर्यादा व कामगार यांचा आधार घेत अस्पष्ट प्रस्ताव सादर केला. उपसमितीने कंपनीला स्पष्ट आकडा सादर करण्याची सूचना देताना मडगावकर कंपनीच्या आकड्याची जाणीव असलेल्या या कंपनीने अखेर १२८.२४ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला व उपसमितीने हा प्रस्ताव मान्य करून तो स्वीकारण्याची शिफारस सरकारला केली.
५.५० कोटी ते १२८.२४ कोटींचा प्रवास
२००७ साली सरकारने जैसु कंपनीला हे जहाज हटवण्यासाठी ५.५० कोटी रुपयांना कंत्राट दिले होते व आता हा आकडा १२८.२४ कोटी रुपयांवर पोहोचला. हा प्रकार राष्ट्रकुल स्पर्धेप्रमाणेच फुगला, असा टोला यावेळी श्री. परुळेकर यांनी हाणला. खुद्द या जहाजाचे मालक अनिल साळगावकर यांनी मोफत जहाज हटवण्याचा प्रस्ताव या समितीने का फेटाळला, असा सवाल करून अवजड जहाज व्यवसायात प्रतिष्ठेचे स्थान असलेल्या साळगावकर यांना दूर सारून हे जहाज हटवण्याच्या निमित्ताने आपले उखळ पांढरे करून घेण्याचाच हा प्रकार असल्याचा घणाघाती आरोपही सुरेश परुळेकर यांनी यावेळी केला.

'म्हापसा अर्बन'च्या निवडणुकीला आव्हान

आपा तेली व यशवंत गवंडळकर
यांची सहकार निबंधकांकडे याचिका

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची १८ जुलै २०१० रोजी झालेली निवडणूक हा केवळ फार्स होता. या निवडणुकीत सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून संचालक मंडळाची बिनविरोध निवड करण्यात आली व त्यामुळे ही निवडणूक बेकायदा ठरवून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी याचिका आपा तेली व यशवंत गवंडळकर यांनी सहकार निबंधकांकडे आज दाखल केली.
म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची दि. १८ जुलै २०१० रोजी निवडणूक झाली असता ऍड. रमाकांत खलप यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या ऍड. खलप यांच्या विरोधी गटातील सर्व उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते व त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली होती. या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले निवडणूक अधिकारी आर. एन. देसाई यांच्या भूमिकेवरच याचिकादारांनी संशय व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी लादण्यात आलेल्या अटी व नियम केवळ आपल्या मर्जीतील उमेदवारांना पूरक ठराव्यात व विरोधकांचे अर्ज फेटाळण्यात यावेत या उद्देशानेच तयार करण्यात आले, असेही या याचिकेत म्हटले आहे.
मुळात १८ रोजीच्या निवडणुकीसाठीचे अर्ज वितरित करण्याची प्रक्रिया १६ रोजी सुरू करण्यात आली. या अर्जासोबत अमर्याद माहिती मागवण्यात आल्याने अर्ज सादर करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली. पण ऍड. खलप यांच्या गटाला मात्र मुदतीपूर्वीच अर्ज बहाल करण्यात आल्याचा संशयही या याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे. संचालक मंडळासाठी दाखल झालेल्या २२ अर्जांपैकी १३ अर्ज पडताळणी करण्यापूर्वीच फेटाळण्यात आले व ऍड. खलप यांचे संपूर्ण पॅनल बिनविरोध निवडून आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच "हायजॅक' करण्यात आली व त्यातूनच विद्यमान अध्यक्ष ऍड. खलप यांनी आपले पॅनल बिनविरोध निवडून आणले, असा आरोपही या याचिकेत करण्यात आला आहे.
दरम्यान, संचालक मंडळासाठी सादर करण्यात आलेले १३ अर्ज कोणत्या निकषांवर फेटाळण्यात आले, याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागवली असता त्याला अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. निवडून आलेल्या संचालकांनी कोणती कागदपत्रे सादर केली याचा तपशील मागवला असता त्यासाठी अधिक वेळ लागेल, असे सांगण्यात आल्याने व या निवडणुकीला आव्हान देण्याची मुदत संपत असल्याने ही अतिरिक्त माहिती कालांतराने या याचिकेला जोडण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. या निवडणुकीची संपूर्ण कागदपत्रे मागवण्यात यावीत. तत्पूर्वी, विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून बॅंकेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात यावी व नव्याने संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी, अशी याचना यावेळी करण्यात आली आहे. याचिकादारांच्यावतीने ऍड. देवेंद्र गवंडळकर व ऍड. निनाद कामत यांनी वकालतनामा सादर केला आहे.

केरोसीन काळ्याबाजारापुढे नागरी पुरवठा खाते हतबल

नवीन रेशनकार्डधारक अजूनही वंचित
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): राज्यात एकीकडे मोठ्या प्रमाणात केरोसीनचा काळाबाजार सुरू असताना दुसरीकडे केरोसीनची खरोखरच निकड असलेल्या सामान्य रेशनकार्डधारकांना मात्र केरोसीन मिळत नाही, अशा वाढत्या तक्रारी नागरी पुरवठा खात्याकडे येत आहेत.
नागरी पुरवठा खात्यातर्फे गेल्या ऑगस्ट २००९ महिन्यात एका परिपत्रकाव्दारे केरोसीनसाठी रेशनकार्डधारकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. मात्र दोन महिन्यांत केरोसीन पुरवठा करू, असे सांगणाऱ्या खात्याकडून आता वर्ष उलटले तरी अद्याप एक थेंबही केरोसीन मिळालेले नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नागरी पुरवठा खात्यातर्फे २००९च्या ऑगस्ट महिन्यात एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. रेशनकार्डधारकांनी केरोसीन लाभ मिळवण्यासाठी स्थानिक तलाठ्यांमार्फत आपले नाव जवळच्या केरोसीन विक्रेत्यांकडे नोंद करावे, असे आवाहन त्यात करण्यात आले होते. या आवाहनाला अनुसरून हजारो लोकांनी आपली नावे स्थानिक पंचायतीत तलाठ्यांकडे नोंद केली. या लोकांना दोन महिन्यांत केरोसीन पुरवठा करू, असेही सांगण्यात आले होते. पण आता वर्ष उलटले तरी हा पुरवठा केला नसल्याची माहिती उघड झाली आहे. रेशनकार्डधारक मात्र आपल्या केरोसीन विक्रेत्यांकडे वेळोवेळी चौकशी करतात, पण त्यांचा कोटाच पाठवण्यात आला नसल्याचे उत्तर त्यांना ऐकावे लागते. दरम्यान, यासंबंधी काही नागरिकांनी नागरी पुरवठा खात्याकडे चौकशी केली असता या पुरवठ्याबाबत निश्चित असे काहीही सांगता येणे शक्य नाही, अशी सबब पुढे करून त्यांची बोळवण केली जाते, अशाही तक्रारी समोर आल्या आहेत.
हातगाडेवाल्यांकडून काळाबाजार
राज्यात मोठ्या प्रमाणात खात्यातर्फे केरोसीन हातगाडेवाल्यांची नोंदणी करण्यात आली आहे. या प्रत्येक हातगाडेवाल्याला १८० लीटर केरोसीन दिले जाते. त्यांना प्रत्येक लीटरमागे केवळ ४५ पैसे मिळतात व त्यामुळे ते उघडपणे या केरोसीनची विक्री काळ्याबाजारात करतात, अशीही खबर आहे. काही टॅंकरवाल्यांकडून तर अशा हातगाडेवाल्यांना २५ रुपये लीटर दराने पैसे मोजले जातात व त्यांच्या नावाचा केरोसीन कोटा मिश्रणासाठी वापरला जातो, अशी खबरही मिळत आहे. दरम्यान, काही लोकांनी आपले वास्तव्य बदलल्यानंतर केरोसीन विक्रेत्यांकडची नोंदणीही अधिकृतपणे बदलली आहे; पण त्यांना नवीन ठिकाणी अद्याप केरोसीन पुरवठा होत नसल्याची माहिती समोर आली आहे. नवीन विक्रेता कोटा आला नाही, अशी भाषा करतो तर जुना विक्रेता नाव रद्द केल्याने आपण केरोसीन देऊ शकत नाही, असा सूर लावतो. खात्याकडे यासंबंधी केलेल्या चौकशीअंती हा कोटा जुन्या केरोसीन विक्रेत्यांकडे पोहोचत असल्याची माहिती त्यांनी दिली. याचा अर्थ नावे रद्द होऊनही आलेल्या या केरोसीन कोट्याची काळ्याबाजारात विक्री होत असण्याचीही शक्यता वाढली आहे.
दरम्यान, केरोसीनच्या काळ्याबाजाराचा हा विषय विधानसभेत विरोधकांनी वारंवार उपस्थित करून नागरी पुरवठामंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना धारेवर धरले होते. हा काळाबाजार संपुष्टात आणणार, असा दावा ते करीत असले तरी अद्याप त्यांना त्यात यश मिळालेले नाही. केरोसीनचा काळाबाजार करणारे हे लोक सरकारलाही जुमानत नसल्याने केरोसीनच्या नावे कोट्यवधी रुपयांच्या सरकारी अनुदानाचा अपव्यय होत असल्याचेही या निमित्ताने उघड झाले आहे.

शिवरायांचा राष्ट्रवाद सामान्यापर्यंत पोचवण्यासाठी शिवचरित्र नव्याने लिहितोय..

आज शिवशाहिरांचे नव्वदीत पदार्पण
पुणे, दि. १३ : श्रीमद्भगवद्गीतेचा आशय "ये हृदयीचे ते हृदयी ' या ब्रीदाने श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्र्वरीतून पोहोचविला, त्या पद्धतीने शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील राष्ट्रनिर्मितीचा आशय सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण शिवचरित्र पुन्हा नव्याने लिहायला घेत आहोत. हे शिवचरित्र तीन हजार पानांचे असेल. तो एकत्रही मोठा ग्रंथ असेल व एक एक प्रकरणे अशी स्वतंत्र पुस्तकेही असतील, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करण्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
शिवाजी महाराजांनी येथे प्रथम राष्ट्रवाद हा विषय मांडला. कदाचित त्यांनी तो तीन हजार पानाच्या ग्रंथातून लिहिला नसेल; पण नंतर स्वामी विवेकानंद, न्या. रानडे, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. हेडगेवार यांनी तो पुढे चालवला. हा मूळचाच विषय अधिक स्पष्टपणे मांडण्यात येणार आहे. मुलांना एवढे मोठे चरित्र चालणार नसेल व तानाजी, अफजलखान, शाहिस्तेखान असे विषय आवडणार असतील तर तीही पुस्तके तयार असतील किंवा मोठे पुस्तकही तयार असेल. आजपर्यंत मी लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती' पुस्तकांच्या नऊ लाख प्रती गेल्या साठ वर्षात वाचकांच्या हातात आहेत. नवे पुस्तकही वाचकांना अधिक आवडेल.
"पण हे पुस्तक लिहिण्यास एक अडचण आहे, असे सांगताना ते म्हणाले, गेली अनेक वर्षे माझ्यावर प्रेमाचा अत्याचार सुरू आहे. तो थांबला तर आणि तरच हे काम होईल. तो अत्याचार म्हणजे निरनिराळ्या लोकांच्या सत्कारापासून ते प्रकाशन समारंभांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे. अशा कार्यक्रमातून एक एक दिवस जातो. परगावी असेल तर प्रवासाचा वेळ आणि श्रमही मोजावे लागतात. त्या ऐवजी जर माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मित्रांनी जर माझे ऐकून घेतले तर हे चरित्र निश्र्चित लवकरात लवकर तयार होईल.
सध्या सुरू असलेल्या बाजीराव मस्तानी या मालिकेबाबत तुमचे मत काय, असे विचारता ते म्हणाले, ती चांगल्या अभ्यासाने तयार केली आहे. मला जाणवलेली बाब म्हणजे मूळ इतिहासात मस्तानीवर बाजीराव पेशवे यांची पत्नी काशी ही जिवापाड प्रेम करते आणि हे मस्तानीला माहीत असते. वरील मालिकेत काशी ही मस्तानीचा सवतीमत्सर करताना दिसते. पण काही मुद्दे हे असे चालायचेच.
बाबासाहेबांच्या पर्वती पायथ्याला असलेल्या पुरंदरे वाड्यात आज सायंकाळी उद्याच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. बाबासाहेबांच्या अमृतमहोत्सवाच्या म्हणजे पंचाहत्तरीच्या वेळेस बाबासाहेबांना सख्खा भाऊ मानणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दिलेली महालक्ष्मीची अडीच किलोची चांदीची मूर्ती उद्या मुख्य महालात ठेवून त्याची पूजा करण्यात येणार आहे. त्या पूजेची तयारी सुरू होती.
नव्वदाव्या वर्षात पदार्पण करताना मानसिक स्थिती कशी आहे, असे विचारता ते म्हणाले, व्यक्तिगत पातळीवर म्हणाल तर अतिशय समाधानी वाटते आहे. जे मनाशी ठरविले ते या महाराष्ट्रातील जनतेने गोड करून घेतले. या मातीला राष्ट्रवादाचा पीळ देणाऱ्या त्या महापुरुषाचे चरित्र उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी व प्रत्येक व्यक्तीपर्यंत पुस्तकाच्या स्वरूपात पोहोचविण्याचे ध्येय तरुणपणातच कधी तरी उराशी बांधले गेले. आयुष्यातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक कण मी त्यासाठीच दिला. "जाणता राजा' हा कार्यक्रमही तो संदेश पोहोचविण्याच्या दृष्टिकोनाचाच भाग होता. त्याचेही स्वागत चांगले झाले. पण समाजाची स्थिती म्हणाल तर मन विषण्ण होते. काल परवाच आसामची मंडळी आली होती. तेथे जिहादी, नक्षली, माओवादी आणि मिशनरी यांनी ज्या पद्धतीने आक्रमण सुरू केले आहे, त्यामुळे तेथे सामान्य माणसाला सुरक्षित राहणे अशक्य झाले आहे. यापूर्वी इजिप्त, बॅबिलॉन, तुर्कस्तान, इराण या देशांतील स्थानिक संस्कृती पूर्णपणे नष्टप्राय झाल्या. आपलीही तशीच गत होईल काय असे वाटू लागले आहे; कारण ज्या राज्यकर्त्यांनी त्याबाबत अतिआवश्यक सावधगिरी पाळावयाची ते सारे काहीच न करताना दिसत आहेत. त्या विचाराने रात्र रात्र झोप नसते. त्यासाठी अजूनही काही जमले तर करण्याचा विचार आहे.

Friday, 13 August, 2010

जेम्सची इतिहास आणि साहित्यातील गल्लत

जॉर्ज वाशिंग्टनच्या संदर्भात काही कहाण्या stories त्यावेळी प्रसृत झाल्या होत्या. त्या त्याच्या स्वभावाचे आणि गुणांचे उन्नयन करणाऱ्या आणि त्याच्या लौकिकाला साजेशा होत्या. त्या ऐतिहासिक अभ्यासाच्या पातळीवर टिकत नाहीत अशी कबुली जॉर्ज वाशिंग्टनचे आधुनिक चरित्रकार देतात. त्याचे एक उदाहरण देतो. जोसफ एलिसने (Joseph Ellis) लिहिलेले जॉर्ज वाशिंग्टनचे चरित्र इ. स. २००४ साली प्रकाशित झाले. त्यातून खालील अवतरण घेतले आहे. जॉर्ज वॉशिंग्टनने तिसऱ्या वेळी अध्यक्षपदासाठी उभे राहण्यास नकार दिला. त्याच्या जागी ऍडम्सची निवड झाली.
The last days were spent hosting dinners and dances in his honor. The ceremonials culminated with the Adams inaguration, where somewhat to Adams irritation, more attention was paid to the outgoing than incoming president. Adams reported to Abigail that he thought he heard Washington murmuring under his breath at the end of the ceremony; Ay! I am fairly out and you fairly in! see which of us will be the happiest." But this story is apocryphal' (His Exellency George Washington by Joseph Eillis पृ. २३९ -४०३.) महीपतींच्या साहित्यातील कथा तशाच apocryphal होत्या. याचे भान आधुनिक इतिहास संशोधकांनी ठेवले आहे.
लेनने महीपतीच्या साहित्याबाबत एक मुद्दा मांडला आहे - That the very kernel of the story is obvios, but what is important to note is the fact that muslim opponents are no longer portrayed as Adil Shahis or Mughals (or Nizam Shahis or Qutb Shahis or Siddis), they are simply 'Pathans'. "representing a single block of Islamic opposition to the Hindu community" (पृ ५८)
इतर सर्व भारूड देत बसण्याऐवजी लेनने या फरकाची नोंद घेऊन त्याची कारणमीमांसा केली असती तर ते अधिक सयुक्तिक दिसले असते. महीपतींचा काळ इस. १७१५ ते १७९० असा आहे. ते तारुण्यात असताना ज्या मुसलमान अंमलदाराकडे नोकरीला होते ती नोकरी त्यांनी बाणेदारपणे सोडली होती. त्या दरम्यान पेशव्यांनी दिल्लीच्या बादशहाला नावापुरते ठेवून संपूर्ण मुघल साम्राज्याचा कारभार हाती घेतला होता. अटकेपासून तो आसामपर्यंत त्यांचे सरदार आपले वर्चस्व ठेवून होते. त्यावेळी त्रास देणारा मुख्य शत्रू अहमदशहा अब्दाली आणि नजिबखान रोहिला इ. होते. हे सर्व अफगाणी - पठाण होते. इ. स. १७६१ मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले. त्याचा परिणाम मराठी राज्यावर घडला. त्यावेळी मराठ्यांचा मुख्य शत्रू अहमदशहा अब्दाली हा पठाणच होता. त्यामुळे हिंदूच्या शत्रूच्या जागी स्थानिक मुस्लिमशाह्यांची नावे न येता "पठाण' आले अशी मीमांसा लेनला करता आली असती.
लेनच्या मते "His (Shivaji) battles are not those of one Maratha chieftain among many, weighing his interests in allying with the namerorous competing Hindu and Muslim powers of the Deccan, but rather the battles of indigenous Hindus opposing an oppressing foreign rule and those collaborators who value their own local power more than their religion and their feedom. ( पृ. ५८)
हे शिवाजी महाराजांचे मूल्यमापन अठराव्या शतकातील उदात्तीकरण आहे. या पूर्वी त्याने लिहिलेच आहे. Thus any portrait of seventeenth - century Maharashtra that pictures Shivaji leading a band of united Hindu liberationists against united Islamic oppressor must be rejected as a gross misrepresentaion. There were many local powers, and local leaders carefully calculated their own interests casting their lot with whatever empire offered them the most wealth and security and upward mobility.' (पृ. ४३)
वरील दोन्ही उतारे एकत्र केले असता लेनला शिवाजी महाराजांचे चित्र उभे करायचे ते म्हणजे एका स्वार्थी, स्वतःचा मानमरातब आणि सामाजिक प्रतिष्ठा उंचाविण्यासाठी कोणत्याही पक्षाची बाजू घेणाऱ्या संधिसाधू लढवय्याचे. त्याला रोहिरेश्वराची शपथ आठवत नाही, ""हे तो श्रींची इच्छा'' जाणवत नाही, त्याला मिर्झा राजा जयसिंगाला पाठविलेले diplomatic letter (प.४१) आठवत नाही, फारसी दूर करून संस्कृताधारीत भाषा, पदव्या देण्याचे धोरण आठवत नाही. तो त्यांचा फक्त उल्लेख करतो. लेन नर्मदेच्या पाण्यात वीस वर्षे बुडून कोरडा राहिलेला गोटा आहे.

भाटलेतील सटी भवानी, बेतीतील शांतादुर्गा मंदिरे फोडली...

एकाच रात्री चोऱ्या; साडेतीन लाखांचा ऐवज पळवला

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - श्रावण महिन्याच्या प्रारंभीच आपला इंगा दाखवताना चोरट्यांनी एकाच रात्री भाटले - पणजी येथील श्री सटी भवानी मंदिरातील २.३३ लाखांचा तर बेती येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील १.७५ लाखांचा ऐवज लंपास केला. या दोन्ही घटनांमुळे पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूने पोलिसांकडून गस्तीत वाढ केल्याचा दावा केला जात असतानाच दुसऱ्या बाजूने चोऱ्यांच्या प्रकरणांतही वाढ होत असल्याने या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे.
भाटले येथील श्री सटी भवानी मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची दोन कर्णफुले, सोन्याची नथ, चांदीची प्रभावळ व चांदीचा मुकुट चोरांनी लंपास केल्याची तक्रार देवस्थान समितीचे अध्यक्ष महादेव आरोंदेकर यांनी पणजी पोलिस स्थानकात दिली आहे. तर, बेती येथील शांतादुर्गा मंदिरातील चांदीची प्रभावळ चोरट्यांनी पळवल्याची तक्रार देवस्थान समितीच्या अध्यक्ष शीतल चोडणकर यांनी पर्वरी पोलिस स्थानकात नोंदवली आहे.
काल रात्री पहाटेच्या सुमारास या चोऱ्या झाल्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सटी भवानी मंदिराच्या बाजूलाच देवस्थानाचे श्रीधर भटजी राहतात. चोरी करण्यापूर्वी चोरांनी त्यांच्या खोलीच्या मुख्य दरवाजाला कडी घातली. त्यानंतर मंदिराच्या गर्भकुडीच्या दरवाजाची कडी पद्धतशीरपणे तोडून आतमध्ये प्रवेश केला. पहाटे ५.३० वाजता भटजींना जाग आली तेव्हा आपल्या खोलीच्या दरवाजाला बाहेरून कडी घातल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी खिडकीतून बाहेर येऊन त्यांनी कडी काढली व मंदिरात पाहणी केली असता चोरीचा प्रकार त्यांना समजला. त्यांनी लगेच देवस्थान समितीच्या अध्यक्षांना बोलावून याची माहिती दिली.
दरम्यान, एकाच रात्री दोन ठिकाणी धाडसी चोऱ्या करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मंदिरफोडीची प्रकरणे बरीच वाढली आहेत. मात्र अद्याप कोणालाच या प्रकरणात अटक करण्यात आलेले नाही. रात्रीच्या वेळी शहरात सर्वत्र कडक पोलिस गस्त असते, असा दावा पोलिस करीत असले तरी मुख्य रस्ता सोडल्यास अन्य ठिकाणी पोलिस फिरकतही नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या दोन्ही घटनांची चौकशी पणजी व पर्वरी पोलिस करीत आहेत.

दरोडेखोरांची टोळी पकडली

राय व केपे दरोड्यांचा छडा - चोरीचा माल हस्तगत

मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) - गेल्या २२ जुलै रोजी राय येथे झालेल्या १.२० लाखांच्या धाडसी चोरी प्रकरणातील म्होरक्यासह पाच जणांना मायणा - कुडतरी पोलिसांनी तर एकाला मडगाव पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आणखी तिघे सामील असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दरोडा म्हणून नोंद केली आहे.
दरम्यान, याच टोळीचा दोन महिन्यांपूर्वी आक्रामळ - केपे येथे एका पिकअप व्हॅनवर घातलेल्या दरोड्यात हात असल्याचेही त्यातून उघडकीस आले आहे. त्यातील इतरांचा माग लागला असून त्यांना कोणत्याही क्षणी जेरबंद केले जाईल, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक ऍलन डीसा यांनी आज येथे दिली.
पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर व मायणा- कुडतरीचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या उपस्थितीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या कामगिरीचे संपूर्ण श्रेय उमेश गावकर यांचे मार्गदर्शन आणि सिद्धांत शिरोडकर व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक नवलेश देसाई व सूरज सामंत यांना दिले. त्यांनी दिवसरात्र घेतलेल्या अविरत परिश्रमांमुळेच ही टोळी जेरबंद झाल्याचे ते म्हणाले.
राय दरोडा प्रकरणी अटक केलेल्यांत मुख्य आरोपी व्हॅली डिकॉस्ता (तिळामळ, केपे), जॉन्सन वर्गीस (गोठणीमड्डी, केपे), नरेंद्र पाटील व अलीम कित्तूर (बाबूनगरी, मडगाव) व नागराज कलगटकर (मूळ बेळगाव व सध्या मुक्काम केपे) यांचा समावेश आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. नागराज हा व्यवसायाने सोनार आहे. मडगाव पोलिसांनी मांडोप - नावेली येथे अटक केलेल्याचे नाव सुलेमान हजरत नडार असे आहे.
आंतोनेत कार्दोज यांच्या दमण - राय येथील घरात सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा प्रकार घडला होता. त्यावेळी घरात ती व तिची विवाहित मुलगी मारीया जुझे पेद्रू फर्नांडिस होती. चौघे अनोळखी इसम बळजबरीने घरात घुसले. आगंतुकांनी पिस्तूल व सुरीचा धाक घालून आंतोनेतकडून कपाटाच्या किल्ल्या मिळविल्या व नंतर तिला एका खोलीत बंद करून साधारण १.२० लाखाचा ऐवज लुटला होता. नंतर आंघोळ करत असलेली मारीया बाहेर आली त्यावेळी तिलाही खोलीत बंद केले होते व ते पसार झाले होते.
या प्रकरणी पोलिसांनी लगेच तपास सुरू केला असता त्यांचाच दूरचा नातेवाईक असलेला व्हॅली डिकॉस्ता ही घटना घडली त्या दिवशी त्या परिसरात असल्याचे आढळून आले होते. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली. त्यानेच दिलेल्या माहितीनुसार बाकीच्या चौघांना ताब्यात घेतले गेले. एवढेच नव्हे तर चोरीचा बहुतेक मालही वितळवलेल्या स्थितीत जप्त करण्यात आला आहे, असे ऍलन डीसा यांनी सांगितले.
पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राय येथील सदर महिलांनी चौघे घरात शिरल्याची माहिती दिल्यावरून या प्रकरणाची नोंद चोरी म्हणून केली गेली होती. पण ताब्यात घेतलेल्यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार या प्रकरणात सहा जण सहभागी होते व त्यामुळेच आता हे प्रकरण दरोडा म्हणून नोंदवले गेले आहे. चौघे घरात शिरले होते, एकटा रस्त्यावर गाडीत बसून होता तर दुसरा दरवाजाजवळ थांबून बाहेर लक्ष ठेवून होता. ते गाडी घेऊनच आले होते व गाडीतूनच पसार झाले. गाडीचा क्रमांक उघडकीस आलेला असून तो सर्वत्र कळविण्यात आला आहे. मुख्य म्होरक्या व्हॅली यानेच दरोड्याची आखणी केली व इतरांनी जमवाजमव केली. पण सदर महिला ओळखेल म्हणून तो घरात शिरला नाही तर गाडीतच बसून राहिला. त्यांनी दरोड्यासाठी वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला, पण अजून पिस्तूल हाती लागलेले नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
या दरोड्यात सामील झालेल्या अन्य दोघांना जरी अजून पकडलेले नसले तरी त्यांच्या मागावर पोलिस आहेत असे सांगून त्यांची नावे सांगण्याचे मात्र त्यांनी टाळले. सर्वजण २० ते २५ वयोगटांतील आहेत.
या आरोपींचा तपास चालू असतानाच १५ जून रोजी तिळामळ - केपे येथे सायंकाळी ४.३० वा. नावेलीतील एक मद्यविक्री कॅंटर ट्रक अडवून झालेल्या लुटीत याच टोळीचा हात असल्याचे आढळून आले व त्यांनी त्या कामासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या. ती वाटमारी करणारे सहा जण होते अशी तक्रार पिकअप चालकाने केली होती. त्यांनी सुरीचाच धाक घालून व आतील लोकांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ती वाटमारी केली होती व दोन लाखांची रक्कम पळविली होती. प्रत्यक्षात जरी ही घटना सायंकाळी ४.३० वा. घडलेली असली तरी त्याची तक्रार ६ वा. नोंद झाली होती. या दरोड्यात गुंतलेलेच राय दरोड्यात असावेत व परिसरातील अशा प्रकारच्या प्रकरणांतही त्यांचा हात असावा, असा पोलिसांचा कयास असून त्या दृष्टीने तपास चालू आहे असे त्यांनी सांगितले. याच मद्य विक्रेत्याला गेल्या वर्षी नावेली येथे बॅंकेच्या दारातच लुटले गेले होते. त्यातही हीच टोळी असू शकते काय, असे विचारता त्या दृष्टीने तपास चालू असल्याचे ते म्हणाले.
मायणा - कुडतरी पोलिसांनी गेल्या जून-जुलै दरम्यान चांगली कामगिरी बजावताना अनेक गुन्हेगारांना गजाआड केल्याचे प्रशस्तिपत्र त्यांनी दिले.

जेनिफर मोन्सेरात विरोधात मोडतोड व चोरीची तक्रार

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - ताळगाव पंचायतीच्या सरपंच जेनिफर मोन्सेरात यांच्या विरुद्ध बेकायदा पद्धतीने बंगला पाडल्याची तक्रार प्रसिद्ध फॅशन डिझायनर नियोल आंद्रे यांनी पणजी पोलिस स्थानकात दाखल केली आहे. तसेच मोन्सेरात यांनी आपल्या बंगल्यातील पाच लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप, गॉगल, बूट व अर्मानी पर्फ्यूम चोरून नेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी त्यांनी जेनिफर मोन्सेरात यांच्यासह उपसरपंच प्रकाश रुझारियो, कॉलिन करी, सेबी व सिडनी बार्रेटो यांच्या विरुद्धही तक्रार दाखल केली आहे. आपल्या बंगल्याचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान केले असल्याचा दावा आंद्रे यांनी या तक्रारीत केला आहे.
नियोल आंद्रे यांच्या म्हणण्यानुसार, आपण "एचआयव्ही पॉझिटिव्ह' असल्याने आपली सतावणूक केली जात आहे. तसेच, सरपंच जेनिफर मोन्सेरात यांनी आपल्याला कोणतीही आगाऊ नोटीस न देता आपल्या बंगल्यात घुसून त्याची नासधूस केली आहे. आंद्रे हे प्रख्यात फॅशन डिझायनर असून दोना पावला येथे त्यांचा बंगला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते मुंबई येथे गेले होते. सरपंचांनी आपण नसल्याचा मोका साधून ही बेकायदा कारवाई केली असल्याचे आंद्रे यांनी म्हटले आहे.
बंगल्याची मोडतोड करण्यासाठी स्वतः जेनिफर मोन्सेरात उपस्थित होत्या. तसेच उपसरपंचांनी आपल्या बंगल्यात घुसून ही नासधूस केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी बंगल्यातील लाखो रुपयांची चोरीही केली असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भा. दं. सं १६६, ४२७, ४४७ व ५०६ कलमांखाली गुन्हा नोंद करण्याची मागणी त्यांनी पणजी पोलिस स्थानकात केली आहे.
या तक्रारीची एक प्रत राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत, पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी, पंचायत संचालनालयाचे संचालक मिनीन डिसोझा यांना देण्यात आली आहे. सिडनी बार्रेटो हे ताळगाव पंचायतीचे पंच सदस्य असून त्यांच्याकडून आपण बंगल्याच्या बांधकामासाठी कच्चा माल घेतला होता. तेही यांच्याबरोबर यावेळी असल्याचे आंद्रे यांनी सांगितले. पणजी पोलिसांनी अद्याप या तक्रारीची नोंद करून घेतलेली नाही.

मोरजी येथे होडी उलटली काका बेपत्ता, पुतण्या सुखरूप

पेडणे, दि. १२ (प्रतिनिधी) - शापोरा नदीच्या पात्रात आज (दि. १२) पहाटे होडी घेऊन मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तेंबवाडा - मोरजी येथील मोहन अंकुश मोरजे (४५) व अंकुश मोरजे (२५) या काका - पुतण्याची होडी उलटली असता मोहन मोरजे समुद्रात खेचले जाऊन बेपत्ता झाले तर तर अंकुश याने पोहून किनारा गाठत आपला जीव वाचवला.
सविस्तर माहितीनुसार, आज पहाटे ५.३० वा. पावसाळ्यानंतर प्रथमच मोहन मोरजे व त्यांचा पुतण्या अंकुश मोरजे हे होडी घेऊन मासेमारी करण्यासाठी शापोरा नदीच्या पात्रात उतरले होते. ज्या ठिकाणी शापोरा नदी अरबी समुद्राला तेंबवाडा येथे मिळते त्या ठिकाणी त्यांची होडी पोहोचली असता आलेल्या प्रचंड लाटेने ती उलटली. पाण्यात फेकल्या गेलेल्या काका - पुतण्याने किमान १० मिनिटे उलटलेल्या होडीला पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जोराने आरडाओरडही केली. परंतु, आजूबाजूला कुणीही नसल्याने त्यांचा आवाज कुणाला ऐकू आला नाही. समुद्र खवळलेला असल्याने जोरदार लाटा उठत होत्या. त्यामुळे काका - पुतण्याची होडीवरील पकड सुटली. गटांगळ्या खाणाऱ्या काकाला आधार देण्यासाठी अंकुशने त्यांचा हातही पकडला. मात्र एका मोठ्या लाटेच्या तडाख्याने तो सुटला. त्यामुळे मोहन मोरजे अरबी समुद्राच्या जोरदार प्रवाहात वाहवत गेले. मात्र अंकुश याने मोठ्या मुश्किलीने पोहून सुखरूपपणे किनारा गाठला.
दरम्यान, उलटलेली होडी विठ्ठलदासवाडा येथे वाहवत गेली. समुद्र खवळलेला असल्याने तिला किनाऱ्यावर आणण्यासाठी जीव रक्षकांना पाच तास झुंज द्यावी लागली. यात जीवरक्षक अमित शिंदे, पराग कांबळी व अन्य दोघांनी विशेष कामगिरी बजावली.
दरम्यान, मोहन मोरजे यांचा शोध घेण्यासाठी जीवरक्षकांचे संध्याकाळी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात आली. मात्र अद्याप त्यांचा थांगपत्ता लागू शकला नव्हता.
या घटनेमुळे तेंबवाडा परिसरातच नव्हे तर मोरजी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहन मोरजे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिचित होते. मासेमारी करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. घरातील कर्ता पुरुष नाहीसा झाल्याने पत्नी मोहिनी मोरजे व एकुलती मुलगी मीनल (१७) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गोवा राज्य शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

खंडणी प्रकरण भोवले
पणजी, दि. १२ (प्रतिनिधी)- गोवा राज्य शिवसेनेचे राज्य प्रमुख उपेंद्र गांवकर व उप राज्यप्रमुख उमेश साळगावकर यांना खंडणीप्रकरणी पोलिसांनी अटक करण्याचा अश्लाघ्य प्रकार घडल्याने त्याची गंभीर दखल शिवसेनेने घेतली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य शिवसेना कार्यकारिणीच बरखास्त करून उमेश साळगावकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार हा आदेश जारी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी फॅक्सद्वारे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या आदेशात म्हटल्याप्रमाणे राज्यातील शिवसेना संघटनेचे कामकाज पाहण्यासाठी अस्थायी समिती जाहीर करण्यात आली आहे. या अस्थायी समितीचे निमंत्रक म्हणून माजी गोवा राज्य शिवसेना प्रमुख रमेश नाईक असतील. दक्षिण गोवा शिवसेना प्रमुख दामू नाईक, संदीप वेंगुर्लेकर, फिलिप डिसोझा, राजेश मराठे, शांताराम पराडकर हे या अस्थायी समितीचे सदस्य असतील, असेही या आदेशात कळवण्यात आले आहे.
पर्वरी येथील हॉटेल मॅजेस्टिकच्या व्यवस्थापनाकडून खंडणी वसूल करण्यासाठी गेलेल्या उमेश साळगावकर यांना सीसी कॅमेऱ्यात खंडणी वसूल करताना पकडण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी गोवा राज्य शिवसेना प्रमुख उपेंद्र गावकर यांनाही पाचारण करून त्यांच्या सहमतीनेच ही खंडणी वसूल केली जात होती, याचाही उलगडा झाल्याने या दोघांनाही अटक करण्यात आली होती. दरम्यान, या दोघांनाही सशर्त जामीन मंजूर झाला असला तरी या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातही उमटल्याने त्याची गंभीर दखल शिवसेना प्रमुखांना घेणे भाग पडले व त्याचे पर्यवसान म्हणूनच संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, उपेंद्र गांवकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत हा प्रकार आपल्या विरोधकांनी रचलेल्या राजकीय कुभांडाचा भाग असल्याचे म्हटले आहे. राज्यातील ड्रग व्यवहाराची "सीबीआय' चौकशी व्हावी, अशी मागणी केल्याने आपल्याला फसवण्यासाठीही हा कट रचला जाणे शक्य असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, यासंबंधी शिवसेनेचे गोवा राज्य संपर्क प्रमुख मिलिंद तुळसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपला मोबाईल बंद ठेवल्याचे जाणवले. या आदेशात उमेश साळगावकर यांच्या हकालपट्टीचा थेट उल्लेख करण्यात आला असला तरी उपेंद्र गावकर यांची राज्य प्रमुख पदावरून हकालपट्टी किंवा त्यांना शिवसेनेतून काढून टाकल्याचा कोणताही उल्लेख या आदेशात नसल्याने त्याबाबत मात्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

व्यावसायिक गैरवर्तणूक प्रकरणी ऍड. सुबोध कंटक यांना बार कौन्सिलची नोटीस

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - व्यावसायिक गैरवर्तणूक केल्याप्रकरणी गोव्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांना आज महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला त्यांनी पंधरा दिवसांत उत्तर द्यायचे आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलकडे तक्रार केली होती. सदर तक्रारीची गंभीर दखल कौन्सिलने घेतली आहे.
माजी मंत्री तथा आमदार दयानंद नार्वेकर, उपसभापती माविन गुदिन्हो व सोमनाथ जुवारकर यांच्या विरोधातील फौजदारी खटला हाताळणाऱ्या विशेष सरकारी वकील ए पी. कार्दोज व व्ही पी. थळी यांची सेवा खंडित करण्याची शिफारस करणारी टिपणी ऍडव्होकेट जनरल कंटक यांनी १५ जुलै २००५ रोजी केली होती. ऍड. कंटक हे ऍडव्होकेट जनरल होण्यापूर्वी या मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या खटल्यांत बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहत होते. या ठळक बाबीकडे ऍड.आरयिश यांनी बार कौन्सिलला सादर केलेल्या तक्रारीत लक्ष वेधले आहे.
कंटक हे ऍडव्होकेट जनरल होण्यापूर्वी माजी मंत्री दयानंद नार्व्हेकर, मावीन गुदिनो व सोमनाथ जुवारकर याच्या बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहत असल्याने आपल्या मंत्री अशिलांच्या फायद्यासाठी त्यांनी अशा प्रकारची टिपणी पाठवणे अयोग्य असल्याचे मत ऍड. आयरिश यांनी तक्रारीत मांडले आहे. ज्या मंत्र्याच्या वतीने फौजदारी खटल्यांत सुबोध कंटक हे बाजू मांडत होते, त्याच मंत्र्यांच्या खटल्यांत कंटक यांनी ऍडव्होकेट जनरल म्हणून विशेष सरकारी वकील बदलण्याची शिफारस केली होती, ही बाब माहिती हक्क कायद्याखाली आयरिश यांना मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाली आहे.
ऍड. कंटक यांनी ६ जुलै २००६ रोजी एका टिपणीद्वारे आपले अशील असलेल्या माजी मंत्र्यांची बचावार्थ गोवा सरकारने मुंबई येथील ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांची सेवा प्रत्येक सुनावणीस १ लाख ३५ हजार रुपयांच्या शुल्कावर घेण्याची शिफारस केली होती. माजी मंत्र्यांच्या संदर्भातील या खटल्यात सरकारच्या डावपेचासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी ऍड.कंटक यांनी ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांच्यासमवेत ३ जुलै ०६ रोजी मिरामार येथील मेरियट हॉटेलमधील खोली क्रमांक १२५ मध्ये एक गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही ऍड. आयरिश यांनी तक्रारीत केला आहे.

केजरीवाल यांच्या व्याख्यानप्रसंगी सरकारी कारभाराचे वाभाडे

पणजी, दि. १२ ( प्रतिनिधी) - "मॅगासेसे' पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल यांच्या "माहिती हक्क कायदा' या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमानंतर झालेल्या प्रश्नोत्तराच्या वेळी प्रेक्षकांनी माहिती हक्क कायद्याच्या संदर्भात सरकारी कारभाराचे वाभाडेच काढले. या कार्यक्रमात उपस्थित असलेले ऍड. रमाकांत खलप हेही लोकांनी झाडलेल्या प्रश्नांच्या फैरीतून सुटले नाहीत.
कला आणि संस्कृती संचालनालयाने कार्मिक खाते, कला अकादमी आणि भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी सोहळा समिती यांच्या सहकार्याने "माहिती हक्क कायदा' या विषयावर श्री. केजरीवाल यांचे व्याख्यान आज कला अकादमीच्या कृष्ण कक्षात आयोजित केले होते.
एकाच अधिकाऱ्याकडे अनेक पदांचा ताबा दिला गेल्याने प्रशासकीय कामकाजाचा अक्षरशः बोजवारा उडालेला आहे. यामुळेच माहिती हक्क कायद्याचीही कशी खिल्ली उडवली जाते याचा उपस्थितांनी केजरीवाल यांच्यासमोर पाढाच वाचला. श्री. केजरीवाल यांनी व्याख्यानप्रसंगी गोव्यात माहिती हक्क कायद्याची काय परिस्थिती आहे, असा सवाल करताच उपस्थितांमधून "व्हर्स व्हर्स' असा एकच घोष उमटला. त्यामुळे गोव्यातील जनतेला माहिती हक्क कायद्यासंदर्भात माहिती मिळावी म्हणून आयोजित केलेल्या या व्याख्यानाचा नूरच पालटून गेला. करायला गेलो एक आणि झाले भलतेच असाच अनुभव यावेळी आयोजकांना आल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
तत्पूर्वी आपल्या व्याख्यानात श्री. केजरीवाल यांनी माहिती हक्क कायद्यासंदर्भात बोलताना सांगितले की, आज देशात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात माजला असून दक्षता खाते व पोलिस खात्यांचे धागेदोरेही त्यात गुंतले असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे.
यामुळेच "तेरी भी चूप आणि मेरी भी चूप' असाच प्रकार होतो आहे. पूर्वी माहिती हक्क कायद्याखाली माहिती मिळवून एखाद्या विषयाला तोंड फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्याला धमकावून किंवा आवश्यक माहिती देण्यास विलंब लावून ताटकळत ठेवले जायचे. त्यामुळे या प्रकारांना कंटाळून माहिती मागवणारा गप्प बसायचा. आज मात्र भ्रष्टाचाराला वाचा फोडू पाहणाऱ्याला सरळ नामशेषच केले जाते.
तुलनेने इतर राज्यांपेक्षा गोव्यातील नागरिक अधिक जागरूक असल्याने गोवेकरांनी "सेझ'सारख्या प्रकल्पाला कडाडून विरोध करून तो बंद पाडला. माहिती आयुक्त हा पारदर्शकच असला पाहिजे; त्याच्यावर कोणताही दबाव येता कामा नये. म्हणूनच त्याची नियुक्ती पारदर्शक प्रक्रिया पार पाडूनच करणे आवश्यक असल्याचे ते पुढे म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांच्या स्वागताने कार्यक्रम सुरू झाला. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केले. गोव्यातील विविध क्षेत्रांतील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकादमीचा कृष्ण कक्ष भरल्याने उपस्थितांसाठी कक्षाबाहेर स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात आली होती.

Thursday, 12 August, 2010

इतिहास समजून न घेणारा जेम्स

लेखमाला २०

पृष्ठ क्रमांक ५२ वर खालच्या परिच्छेदात जेम्स लेन, शिवाजी महाराज आणि त्यांचे तंजावरचे सावत्र बंधू श्री व्यंकोजी महाराज या दोघांनीही समर्थ रामदासांना काही सनदा दान दिल्याचे लिहितोे - It apears likely that Ramdas may have sought and received the patronage of both kings, and given that the two brothers were rivals and followed very different agendas, it is even more doubtful that Ramdas played a major role in Shivaji`s life. (पृ ५२)
व्यंकोजी राजे तंजावरला होते. समर्थांचा मठ त्याचवेळी तंजावरला होता. सज्जनगडावरील श्रीरामाच्या मूर्ती तंजावरच्या कारागिराने तयार केल्या होत्या. समर्थांचे तेथे जाणे येणे होत असे. त्यामुळे या दोन्ही भावांचा संबंध समर्थांशी होता अशी शक्यता तो वर्तवतो. पण त्या दोघांमधील संबध एकमेकांच्या विरोधी होते. दोघांमध्ये चुरस होती (rivals) हे मात्र धांदात चुकीचे आहे. राज्याभिषेक होईपर्यंत महाराजांना दक्षिणेकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे तोपर्यंत त्या दोन्ही भावांचे संबंध बिघडण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांच्यात चुरस कसली असेल? महाराज मार्च १६७७ च्या सुमारास जिंनी तंजावर भागात पोहचले. तेव्हा दोघांमध्ये वितुष्ट आले. सहा महिन्यांतच दोघांमध्ये सख्यही झाले. शिवसमर्थ संबंध त्या पूर्वीपासूनचे होते. त्यामुळे लेनचे विधान वस्तुस्थितीला धरून नाही. या उलट संभाजीराजे मोगलांना मिळून नंतर परत आले, त्यावेळी महाराजांनी त्यांना सज्जनगडावर समर्थांच्या सहवासात राहण्यासाठी पाठविले होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. समर्थांच्या सहवासाने संभाजी महाराजांच्या मनातील काहूर शमेल हा विश्वास महाराजांना वाटणे यातच त्या दोघांमधील जीवाभावाच्या संबंधाचे दर्शन घडते.
महीपतिंचे संत साहित्य व इतिहास मिमांसा-
लेनने पृ. ५३ ते ५८ पाने महीपति यांनी लिहिलेल्या शिवसमर्थ चारित्र्यावर खर्ची घातली आहेत. ते लिहिताना महीपतिंनी जणू इतिहास लिहिला आणि तो चुकीचा आहे असे त्याचे प्रतिपादन आहे.
ज्याला मराठ्यांची इतिहास मिमांसा करायची आहे, त्याने "जसे रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकातील पात्रांवरून अथवा श्रीमान योगी या कादंबरीतील वर्णनावरून निष्कर्ष काढायला नकोत. तसेच महीपतिंच्या साहित्यावरूनही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. खरेतर महीपतिंचे संत साहित्य हा या पुस्तकाचा विषयच होऊ शकत नाही. महीपतिंच्या साहित्यात संतांच्या गोष्टी आहेत. त्या साहित्याविषयी मराठीतून अभ्यासकांनी काय लिहिले आहे हे पाहणे हे उद्बोधक ठरेल. मराठी विश्वचरित्र कोशातील नोंदीत महीपतींच्या साहित्याविषयी लिहिले आहेः "त्यांची लेखन' शैली रसाळ व प्रसादिक असून चरित्रनायकाच्या रम्याद्भूत कहाण्या त्यांनी प्रकर्षाने दिल्या आहेत. त्यामुळे त्यात चिकित्सा व ऐतिहासिक वास्तवता त्यांना अपेक्षित नसावी. असे असूनही चरित्रे भक्त मनोभावे वाचतात. (भारतीय चरित्र कोश खंड ३ पृ ६९६ संपादक श्रीराम पां. कामत, पर्वरी गोवा इ. स. २००५)
त्यापूर्वी संकलीत केल्या गेलेल्या भारतीय संस्कृती कोशातही असेच मत नोंदविले गेले आहे. "विभूतीपूजक वृत्तीनेच सर्व संतांचे महात्म्य सारख्याच भक्तीभावाने ते वर्णितात. चमत्कारांचे भाकड सांगून त्या त्या व्यक्तीभोवती दैवी वलय त्यांनी निर्माण केले आहे. स्थलकाल परिस्थिती वगैरेच्या माहितीबाबतचा बारकावा महानुभावांच्या चरित्रगं्रथाप्रमाणे महीपतिंच्या ग्रंथात सापडत नाही' (भारतीय संस्कृती कोश खं. ७ पृ २६० संपादक पं. महादेवशास्त्री जोशी इ. स. १९७२)
महीपतिंच्या साहित्याबाबत लेन लिहतो. The stories are vaguely situated formulaic, and clearly written for ideological purpose other than those of preserving an accurale portroyal of Shivaji (पृ 53) इतके लिहून त्याने तो विषय सोडून दिला असता तर योग्य होते. कोणत्याही आधुनिक इतिहासकाराने महीपतिबुवांच्या कथा इतिहासाची साधने म्हणून विचारात घेतल्या नाहीत. त्यात अतिशयोक्ती आहेच.
ही अतिशयोक्ती अमेरिकेत आणि पाश्चात्य राष्ट्रातही होते. आपण जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या गोष्टीची नोंद पूर्वी घेतलीच आहे. तशीच अतिशयोक्ती दुसरी महान व्यक्ती थॉमस जेफर्सन यांच्या संदर्भात ही केली गेली. थॉमस जेफर्सनहा समलैंगिक होता. तसेच स्वतः जरी स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असला तरी त्याच्या मालकीचे दिड-दोनशे गुलाम होते. त्याने जी अमेरिकेची घटना लिहली ती स्थानिक आदिवासी जमातींच्या इरोकींच्या (Iroguois) सहा राज्यांच्या एकत्रित घटनेवर आधारलेली. त्याचा संदर्भ टाळला जातो. थॉमस जेफर्सनच्या विद्वत्तेबाबत शंकाच नाही. त्याला अनेक विषयात गती होती. त्याच्या जणू सर्वज्ञ असण्याचे पुरावे देणाऱ्या घटना अमेरिकेत प्रसृत आहेत. त्यात अतिशयोक्ती असते. तोच प्रकार त्याच्या पूर्वी शंभर वर्षे होऊन गेलेल्या शिवाजी महाराजांच्या बाबतीत महीपतिंच्या वाङ्मयात घडले एवढेच म्हणता येईल.

ऍन्डरसन भारताबाहेर जाण्यास नरसिंह राव हेच जबाबदार!

अर्जुनसिंग यांचे खळबळजनक विधान
नवी दिल्ली, दि. ११ : भोपाळ दुर्घटनेनंतर भारतातून पलायन केलेले युनियन कार्बाईडचे अध्यक्ष वॉरन ऍन्डरसन यांना तत्कालीन गृहमंत्री नरसिंह राव यांच्या सूचनेवरूनच जाऊ देण्यात आले असावे, असे वक्तव्य आज मध्य प्रदेशचे त्यावेळचे (१९८४) मुख्यमंत्री व विद्यमान केंद्रीय मंत्री अर्जुनसिंग यांनी केले आहे. या बाबतीत प्रथमच अर्जुनसिंग यांनी आज राज्यसभेत मौन सोडले.मात्र, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना या प्रकरणात त्यांनी "क्लीन चीट' दिली आहे.
आज राज्यसभेत भोपाळ दुर्घटनेवरील चर्चेच्या वेळी अर्जुनसिंग यांनी सविस्तर निवेदन करताना नरसिंह राव यांच्यावरच सारे खापर फोडले. त्यावेळी दिल्ली येथून गृहमंत्रालयाकडून वारंवार सूचना येत होत्या व त्यात ऍन्डरसन यांना जामीन मिळण्यावर भर देण्यात येत होता असे आपल्याला मुख्य सचिवांनी त्यावेळी सांगितले होते, असे अर्जुनसिंग म्हणाले. अर्थात त्यांचा रोख नरसिंह राव यांच्यावरच होता.
नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास मंत्री असताना अर्जुनसिंग यांचे त्यांच्याशी चांगले संबंध नव्हते. या पार्श्वभूमीवर बोलताना अर्जुनसिंग यांनी पुढे सांगितले की, ऍन्डरसन यांना अटक करून त्याची जबानी नोंद करण्याचा आदेश आपण दिला होता; कारण गरज पडल्यास त्यांना न्यायालयासमोर उपस्थित करता आले असते. ६ डिसेंबर १९८४ रोजी ऍन्डरसन यांना अटक करून आपण यासंबंधात राजीव गांधी यांना माहितीही दिली होती. तथापि, त्यानंतर दोन दिवस ते यासंबंधात काहीच बोलले नाहीत. त्यांनी ऍन्डरसनची किंवा त्यांच्या विरोधात बाजूही घेतली नाही. त्या पदावरील व्यक्तीबद्दल कोणताही संशय घेणे अयोग्य ठरेल, अशी पुस्ती अर्जुनसिंग यांनी जोडली.
भोपाळमधील वायू दुर्घटनाप्रकरणी काही अधिकाऱ्यांना अलीकडे सौम्य शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर ऍन्डरसन यांनी सुटकेनंतर देशातून कसे पलायन केले, याबद्दल चर्चा सुरू झाली आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचा त्यात हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. भोपाळ दुर्घटनेला ऍन्डरसनच पूर्णपणे जबाबदार असून त्यांना भारतात आणण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत, त्यासाठी ओबामा यांच्या आगामी भारत भेटीत पंतप्रधान डॉ. सिंग यांनी त्यांच्या प्रत्यार्पणासाठी आणि नुकसानभरपाईसाठी विशेष प्रयत्न करायला हवेत, असेही अर्जुनसिंग यांनी सांगितले.
३ डिसेंबर १९८४ रोजी वायुगळती झाल्यानंतर ऍन्डरसनना अटक झाली, त्यावेळी राजीव गांधी मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात होते, असे सांगून दिल्लीहून गृहमंत्रालयाकडून वारंवार सूचना यायला लागल्या त्यावेळी मी मुख्य सचिवांना सांगितले की, तुम्हांला योग्य वाटेल ते करा, पण ऍन्डरसन यांना अटक करून त्यांची जबानी नोंदवा.
ऍन्डरसन स्वतः या दुर्घटनेस जबाबदार असूनही भोपाळमध्ये आले, त्यामुळे त्यांना अटक होऊन सुटका केल्यावर जनरोषापासून वाचविण्यासाठी सारे उपाय करणे माझे कर्तव्यच होते, असे अर्जुनसिंग यांनी सांगितले. या प्रकरणी मला दोष दिला जात असल्याने मी हे निवेदन करीत असून, अधिक कटुता टाळण्यासाठी तपशील सांगू इच्छित नाही. आता सरकारनेच प्रयत्न करून ऍन्डरसन यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
अर्जुनसिंग यांचे वक्तव्य संशय निर्माण करणारे : जेटली
अर्जुनसिंग यांच्या निवेदनावर समाधानी न झालेले विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणाले की, हयात नसलेले तत्कालीन गृहमंत्री व मुख्यसचिव यांच्यावर ठपका ठेवण्यात येत आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना ऍन्डरसनबद्दल सहानुभूती नव्हती, तर त्यांनी गृहमंत्रालयाचे का ऐकले? अर्जुनसिंग यांचे निवेदन अधिक संशय निर्माण करणारे आहे.

खाणींच्या विळख्यामुळे गोव्याचे तीनतेरा

पर्यावरणाकडे राज्यकर्त्यांचे सपशेल दुर्लक्ष : डॉ. सुभाष भेंडे
पणजी, दि. ११ (सांस्कृतिक प्रतिनिधी)ः खाण व्यवसायामुळे गोव्याचा काही प्रमाणात विकास झाला तरी त्यासाठी गोव्याला फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. येथील पर्यावरणाचे तीनतेरा वाजले आणि आजही तोच प्रकार सुरू आहे. एका बाजूने गोव्याची भरभराट होत आहे, तर दुसऱ्या बाजूने पर्यावरणाचा नाश होत आहे. आजचे राज्यकर्ते राज्याचा विकास करताना या महत्त्वाच्या मुद्याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने भविष्यात गोमंतकीयांना भयानक परिणामांना सामोरे जावे लागणार आहे, असा जळजळीत इशारा
अर्थतज्ज्ञ आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांनी दिला.
हा तथाकथित विकास कालांतराने विघातक ठरेल अशा गोष्टींना वेळीच आवर घालणे काळाची गरज आहे. त्याकरता राज्यकर्त्यांनी वेळीच या मुद्याकडे लक्ष दिले नाही तर
गोवेकरांवर विपरीत परिणामांना सामोरे जाण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत डॉ. भेंडे यांनी खंत व्यक्त केली.
अखिल गोवा भाऊसाहेब बांदोडकर जन्मशताब्दी समारोह समितीने गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजिलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत समितीचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप, कार्याध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट, सचिव धर्मा चोडणकर, उपाध्यक्ष अनुप प्रियोळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
आज मुंबईसारख्या ठिकाणी जी स्थिती आहे तशीच गोव्याची अवस्था व्हायला फार वेळ लागणार नाही. कारण विविध कामांच्या निमित्ताने गोव्यात येणारे परप्रांतीय येथेच ठिय्या मारत आहेत. तसेच गोव्याच्या समुद्र ठिकाणी स्वतःचे घर असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात असल्याने धनाढ्य परप्रांतीय गोव्यात मोठ्या प्रमाणावर जमिनी घेऊन मोठमोठ्या इमारतींचे जाळेच उभारत चालले आहेत. गोव्यातील प्रमुख शहरातील जास्तीत जास्त व्यवसाय हे परप्रांतीय चालवत असल्याचे चित्र मेाठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळे कालांतराने गोव्यात गोमंतकीय किती प्रमाणात राहणार ही विचार करण्याची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.
आज जगाच्या नकाशावर गोव्याचे विपर्यस्त चित्र रेखाटले जात आहे. केवळ वर्तमानच नव्हे तर गोव्याच्या इतिहासाविषयीही चुकीची माहिती दिली जात आहे. कारण संपूर्ण गोव्यावर पोर्तुगीजांनी ४५० वर्षे राज्य केल्याचे सांगितले जाते; परंतु पोर्तुगीजांनी गोव्याच्या काही भागावरच ४५० वर्षे राज्य केले आणि काही भागावर २०० वर्षे राज्य केले. त्याचे पुरावेही उपलब्ध असल्याची माहिती डॉ. भेंडे यांनी दिली.
सध्याचे स्वार्थाने बरबटलेले राजकारण आणि भाऊंचे राजकारण यात जमीन - आसमानाचा फरक दिसून येतो. भाऊंच्या १७ वर्षांच्या संपन्न काळात गोमंतकाने २ मुख्यमंत्री पाहिले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे नंतरच्या केवळ २० वर्षांत १७ मुख्यमंत्री गोमंतकीयांच्या नशिबी आले. आज राजकारणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. राज्यकर्ते केवळ खुर्ची उबवण्यात मग्न आहेत. खरी सूत्रे भलतीच मंडळी हलवत आहेत.
ते म्हणाले, आज आम आदमीच्या विकासासंदर्भात फक्त फुकाच्या वल्गना केल्या जातात. तथापि, उपेक्षितांविषयी कणव आणि दानशूरपणा भाऊंमध्ये पूर्वीपासून होता. देशाचे पहिलेे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या विश्वासाला दणका देणारे आणि कॉंग्रेस पक्षाचे पानिपत करून विमुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री बनलेल्या भाऊसाहेबांनी गोव्यात शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा पाया घातला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच गोव्यात आजही शिक्षणाची गंगा वाहताना दिसते आहे. असे मुख्यमंत्री आणखी दहा वर्षे गोव्याला लाभले असते तर गोव्याचे चित्र वेगळेच दिसले असते.
प्रा. सिरसाट यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. ते म्हणाले, भाऊंचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवावे या हेतूने गोव्यात विविध ठिकाणी अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
याप्रसंगी रश्मी हळर्णकर प्रथम, रेणुका रेडकर द्वितीय, समीता तांबोसकर तृतीय, प्रीती शेट्ये आणि दक्षा सावंत (उत्तेजनार्थ) या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाली. डी.एड.च्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. डॉ. सोमनाथ कोमरपंत यांनी डॉ. भेंडे यांची ओळख करून दिली. ऍड. खलप यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. भाऊसाहेबांबरोबर कायम असणारे बाळकृष्ण शिवा आंगले यांचा शाल, श्रीफळ आणि भाऊंची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. धर्मा चोडणकर यांनी आभार मानले.

राष्ट्रीय महामार्गांचे पुनःसर्वेक्षण होणार

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग १७ व महामार्ग - ४ अ यांच्या विस्तारीकरणामुळे लोकांची घरे आणि अन्य बांधकामे मोठ्या प्रमाणात पाडावी लागणार असल्याने भूसंपादनाला ठिकठिकाणी विरोध होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने या महामार्गांच्या विस्तारीकरणासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अहवाल येत्या २० दिवसांत म्हणजे दि. ३१ ऑगस्ट रोजी सादर करण्याचे आदेशही स्थापन करण्यात आलेल्या एका विशेष समितीला देण्यात आले आहेत, अशी माहिती आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
या संदर्भात आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव उपस्थित होते.
पुनःसर्वेक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूसंपादन तसेच भूसर्वेक्षण अधिकाऱ्यांचा सहभाग असून या सर्वेक्षणाचा अहवाल ते सादर करणार आहेत. अहवाल सादर होईपर्यंत भूसंपादनाचे काम बंद करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या वेळी स्थानिक आमदारांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे, असे श्री. कामत यांनी सांगितले.
ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही तेथे ४५ मीटर तर लोकवस्ती आहे तेथे ३५ मीटर भूसंपादन करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे नक्की किती घरे आणि अन्य बांधकामे मोडावी लागतील, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर तो अहवाल केंद्रीय मंत्र्यांना पाठवून दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. महामार्गावर टोल आकारला जाणार असल्याने त्यालाही विरोध होत आहे. स्थानिक लोकांना महामार्गाचा वापर करण्यासाठी काही प्रमाणात कशा प्रकारे सवलत देण्यात यावी, याचाही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महामार्गासाठी रस्त्याच्या कडेची ६० मीटर जागा ताब्यात घेण्याचा पूर्वीचा प्रस्ताव रद्द झाला आहे. ६० मीटर भूसंपादनामुळे सुमारे आठशेच्या आसपास बांधकामे मोडावी लागणार होती. आता ४५ आणि ३५ मीटर अशी जागा ताब्यात घेतली जाणार असल्याने कमीत कमी बांधकामे पाडावी लागणार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच, पर्वरी येथे उड्डाणपूल, मांडवी आणि जुवारी नदीवर आणखी दोन पूल उभारले जाणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.
-----------------------------------------------------------------
या महामार्गामुळे उठलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी आज सभागृह समितीची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र यावेळी मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांचा फौजफाटाच उपस्थित असल्याने तिथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसत होते. या गोंधळात सखोल चर्चा शक्य नसल्यामुळे तसेच त्यातून तोडगा काढणे शक्य नसल्याने आपण बैठकीतून उठून निघून गेल्याचे यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. केवळ रस्त्याचा विस्तार कमी करून या समस्येवर तोडगा निघणार नाही तर जिथे लोकांची घरे वाचवण्याची गरज आहे तिथे प्रसंगी मार्गही वळवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आपला पक्ष याच मागणीवर जोर देणार असल्याचेही ते पुढे म्हणाले.

अबकारी खात्याचा छाप्यात ७० हजारांचा मद्यसाठा जप्त

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): गोव्यातून महाराष्ट्रात तस्करी करता यावी यासाठी पर्वरी येथील एका फ्लॅटमध्ये साठवून ठेवलेल्या मद्य साठ्यावर अबकारी खात्याने आज छापा टाकून सुमारे ७० हजार रुपयांचे मद्य जप्त केले. येथे गोव्यात उत्पादित होणाऱ्या दारूचे खोके बदलून त्याची महाराष्ट्रातील विविध भागांत तस्करी केली जात होती, अशी माहिती मिळाली आहे. हे खोके बदलण्याच्या कामाला असलेल्या तीन कामगारांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले तर, ही तस्करी करणारा मुकेश सचदेव याच्यावर अबकारी खात्याने गुन्हा नोंद केला आहे.
मुकेश सचदेव याचा पणजी बाजारात "सीडी' विकण्याचा व्यवसाय असून तो पर्वरी येथे एका इमारतीत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. याच ठिकाणी त्याने हा मद्याचा साठा करून ठेवला होता. गोव्यात बनणाऱ्या व्हिस्की आणि ब्रॅंडीचे १२० खोके या ठिकाणी आढळून आले. तसेच, बिस्कीट व चॉकलेटचे रिकामे खोकेही निरीक्षकांना मिळाले आहेत. या रिकाम्या खोक्यांत या दारूच्या बाटल्या भरून त्यांची तस्करी केली जात होती, असे सूत्रांनी सांगितले. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून हा धंदा सुरू होता, अशी माहिती हाती आली आहे.
याचा मुख्य सूत्रधार अबकारी खात्याच्या हाती आलेला नाही. मुकेश सचदेव हा बाहेरगावी असल्याने तो गोव्यात येताच त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले. सदर छापा बार्देश तालुक्यातील अबकारी निरीक्षक रमण फातर्पेकर व निरीक्षक महेश कोरगावकर यांनी टाकल्याची माहिती मिळाली आहे.

पर्वरी येथे नवविवाहित दांपत्याची आत्महत्या

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): शांतीनगर - पर्वरी येथील एका फ्लॅटमध्ये नवविवाहित जोडप्याचे मृतदेह आढळून आले असून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सदर दांपत्य केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील असून दिलीप कुमार (३०) व सिम्जा कुमार (२७) अशी त्यांची नावे आहेत.
या घटनेचा पर्वरी पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवून दिले आहेत. जोडपे नवविवाहित असल्याने हे प्रकरण विभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. आज सायंकाळी ५.४५वाजता ही घटना उघडकीस आली. दिलीप याचा मृतदेह फ्लॅटच्या हॉलमधील पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत होता तर सिम्जा हिचा मृतदेह बेडरुममध्ये होता. मृतदेहाच्या शेजारी मल्ल्याळम भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ""आम्ही आयुष्याला कंटाळल्याने जीवन संपवीत आहोत'' असा आशय त्यात असल्याची माहिती पर्वरी पोलिसांनी दिली.
अधिक माहितीनुसार दिलीप हा पर्वरी येथील एचसीएल या संगणक कंपनीत नोकरीला होता. काही महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्यामुळे पर्वरी येथे त्याने भाड्याने एक फ्लॅट घेतला होता. कालच ती दोघेही कन्नूर केरळ येथील आपल्या गावी जाऊन परतली होती. तो आज कामावर रुजू होणार होता. आज कामाला न आल्याने त्याचे काही मित्र त्याला भेटण्यासाठी फ्लॅटवर आले. दरवाजाला कुलूप असल्याने त्यांनी बाल्कनीतून आतमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिलीपचा मृतदेह पंख्याला लोंबकळत असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. याची माहिती त्वरित पोलिसांनी दिली असता पोलिसांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये कुठेही झटापट झाल्याचे दिसून आले नसल्याचे पर्वरी पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती केरळ येथील दिलीप याच्या नातेवाइकांना देण्यात आली आहे. या विषयीचा अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड करीत आहेत.

मिकींच्या पासपोर्ट अर्जास गुन्हा अन्वेषणाचा तीव्र विरोध

मडगाव, दि.११ (प्रतिनिधी): माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी येथील सत्र न्यायालयात आपला पासपोर्ट परत मिळावा व आपणाला अमेरिकेत जाण्यास परवानगी मिळावी म्हणून दाखल केलेल्या अर्जाला नादिया तोरादो मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हा अन्वेषण विभागाने तीव्र विरोध केला आहे.
जप्त केलेला आपला पासपोर्ट परत मिळावा तसेच आपणास गोव्याबाहेर जाण्यास अनुमती मिळावी, अशी विनंती करणारा अर्ज मिकी यांच्या वतीने त्यांचे वकील आनाक्लात व्हिएगश यांनी काल येथील सत्र न्यायालयात दाखल केल्यावर आज गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने सरकारी वकिलांनी आपले म्हणणे मांडणारा अर्ज न्यायालयाला सादर केला. त्यात अर्जदारावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत व त्या प्रकरणांचा तपास अद्याप सुरू असताना त्याचा पासपोर्ट परत करणे व त्याला विदेशात जाण्यास अनुमती देणे संपूर्णतः अनुचित ठरेल; त्याने अशा परवानगीचा गैरफायदा घेऊन दडी मारली तर या प्रकरणाचे काय? त्याला परत कसे आणणार? असे सवाल अर्जांत करण्यात आले असून जामिनावर त्याला मुक्त करताना न्यायालयाने घातलेल्या अटींमागे विशिष्ट हेतू तसेच अर्जदाराची पार्श्र्वभूमीही होती याकडे लक्ष वेधले आहे.
न्या. बी. पी. देशपांडे यांनी या प्रकरणाच्या युक्तिवादासाठी उद्याची तारीख निश्र्चित केली आहे. नादिया तोरादो मृत्युप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने गोठविलेली सर्व बॅंक खाती खुली करण्याचा आदेश प्रथमश्रेणी न्यायाधीशांनी दिल्यानंतर मिकींच्या वतीने हा पासपोर्ट व विदेशवारीची अनुमती मागणारा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

Wednesday, 11 August, 2010

साहित्यिक पुरावे नाकारणारा जेम्स

प्रथम बखरीत दिलेल्या भाषणासंबंधाने विचार करता येईल. पाश्चात्य राष्ट्रांच्या इतिहासातही अनेक सेनापतींची रणांगणावर दिलेली भाषणे प्रसिद्ध आहेत. रणांगणाच्या धुमाळीत ती तशीच्या तशी लिहून घेण्यास काय तेव्हा लेखनीस लेखण्या सरसावून तयार होते. ती भाषणे इतिहासात शिकवली जातातच ना? मग चिटणीस बखरीतील भाषणाचे वावडे का असावे. ते भाषण अर्थातच कोणी संशोधक पुरावा म्हणून सादर करत नाही. आतापर्यंत वाचलेल्या शिवाजी महाराजांच्या चरित्रांमधून त्यांनी शाहिस्तेखानाच्या छावणीकडे निघण्यापूर्वी महाराजांनी प्रेरणादायी भारून टाकणारे, घणाघाती इ. विशेषणयुक्त भाषण दिल्याचा उल्लेख कोणीही केलेला नाही. तो या भोट संशोधकाने तारे तोडण्यासाठी केला.
भारतीय जनमानसाला उपभोगशून्य स्वामीच्या व्यक्तीत्वाचे आकर्षण प्राचीन काळापासून आहे. राजा रंतिदेव, राजर्षि जनक, श्रीराम, हर्षवर्धन इ. पासून तो शिवाजी महाराजांपर्यंत असे अनेक राजे भारतवर्षात झालेत. स्वत: महाराज त्याला अपवाद नव्हते.
हा लोकविलक्षण राजा वयाच्या १८ व्या वर्षी "हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे', असे पत्रात लिहितो, त्याची इश्वरेच्छेला आत्मसर्मण करण्याची भावना त्याच वयात आहे. तो प्रतापगडावर श्री भवानीच्या मूर्ती स्थापनेच्या वेळी भोपेपण स्वीकारतो आणि श्री शैलमच्या दर्शनाच्या वेळी स्वत:चे शिरकमल अर्पण करण्याची त्याला उर्मी येते. असा हा उपभोगशून्य स्वामी आहे. त्याच्या तोंडी चरित्र लेखकाने फकिरी स्वीकारल्याचे वाक्य घातले तर ते वावगे ठरू नये. लेन म्हणतो, he assumes a temporary but meaningful role of the renouncer (पृ ५१) सन्यस्त वृत्तीत जगणारे ते व्यक्तिमत्व होतेच. Here the story is chose to history असेच म्हणता येईल.
शिवाजी महाराज, तुकाराम महाराज व समर्थ रामदास
या विषयावर बरेच लिहून झाले आहे. लेनच्या बाबतीत त्याचे अर्धवट आकलन त्याने पृ. ५२ वर दिलेल्या दोन पूर्ण परिच्छेदांवरून लक्षात येते.
तुकाराम महाराज इ.स. १६४९ मध्ये निर्वाण पावले. त्यावेळी महाराजांचे वय २१-२२ चे होते. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. महाराजांचे निवासस्थान पुष्यासच होते. त्यांची नजर त्या मुलखात सर्वदूर फिरत होती. त्यांच्या स्वभावात उपजतच धार्मिकता होती. अशावेळी लाल महालापासून तास दीड तासाच्या घोडदौडीच्या अंतरावर असलेल्या देहू गावात वारकऱ्यांना आपल्या अमृतमय वाणीने, रसाळ अभंगांनी भारून टाकणारा हा महात्मा त्यांच्या नजरेतून सुटला असेल असे होणेच शक्य नाही. फार नियमितपणे नव्हे पण कधी कधी तरी तरूण शिवाजी राजानी तुकाराम महाराजांचे दर्शन घेतलेच असावे. भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे काठी देऊ माथा। असा अध्यात्माचा अर्थ लावणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तरूण शिवाजी महाराजांच्या मनातील कल्पना स्पष्ट करण्यास कारणीभूत ठरले असतील असेच म्हणावे लागते. अर्थातच स्वराज्याचा विस्तार मर्यादित होता त्यामुळे सनदा, पत्रे इ. लिहिण्याची वेळ नव्हती. शिवाय पुणे, देहू अंतर घर आंगणासारखे होते. त्यामुळे राजे काही तासांत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन येऊ शकत होते. ती भेट त्याकाळी नोंदण्यालायक घटना ठरली नव्हती. त्यामुळे या दोन श्रेष्ठ व्यक्तींची भेट झालीच नव्हती असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
शिवसमर्थ भेटीच्या संदर्भात विजय देशमुख यांनी दिलेला पर्याय स्वीकारार्ह वाटतो. त्यांच्या मते २१ एप्रिल १६५९ रोजी शिवसमर्थ भेट झाली. (शककर्ते शिवराय, खं १ पृ ३२२) लेनने या चरित्राचा उल्लेखच केलेला नाही. तो जर पुण्याला अनेकदा आला असेल आणि २००३ पूर्वी २० वर्षे म्ह. १९८३ पासून शिवचरित्राचा अभ्यास करत असेल तर विजय देशमुख यांच्या १९८० साली प्रसिद्ध झालेल्या द्विखंडात्मक शककर्ते शिवराय पाहिल्याशिवाय त्याचा अभ्यास अर्धवटच राहिला असे म्हणता येते. त्या पुस्तकाचा निर्देश संदर्भ ग्रंथ सूचितही नाही.
जेम्स लेनने एक धडधडीत खोटे विधान केले आहे. तो लिहितो No literary text of seventeenth century associates Shivaji with either of these saints, although Ramdas writes passages that seem to be written as advice to the king (दासबोध १८.६ ) some scholars produce letters and deeds to show that the king patronised Ramdas and /or accepted him as his guru'.
(पृ ५२) एका फटक्यात त्याने इतिहास संशोधकंानी स्विकारलेल्या सनदा कागदपत्रे नाकारली आहेत. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांच्या भेटींच्या संदर्भात ते का असू शकत नाहीत याचे विवेचन या पूर्वी केलेले आहे. समर्थांच्या बाबतीत तसे लिहिणे म्हणजे त्याने जाणून बुजून केलेला तर्कदृष्टपणा आहे. समर्थांनी महाराजांना अनुक्षुन लिहिलेले "निच्छयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू ।। त्यात स्पष्ट उल्लेख आहे की "तुमचे देसी वास्तव्य केले। परंन्तु वर्तमान नाही घेतले।' ही ओवीतर समर्थांनी शिवाजी महाराजांना उद्देशूनच लिहिली आहे.
समर्थांनी शिवाजी महाराजांना श्रीमन्त योगी, शिवकल्याण राजा अशा विशेषणांनी संबोधले आहे. आणि महाराजांच्या महानिर्वाणानंतर शंभू राजांना पाठविलेल्या त्या सुप्रसिध्द पत्रात शिवरायाचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप। शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी।। असे वर्णन त्या दोघांमध्ये अंतरंगीचे प्रेम असल्याशिवायच वर्णन केले गेले? हे सर्व साहित्यिक पुरावे लेन एका फटक्यात खोटे ठरवितो, नाकारतो.
क्रमशः

अस्नोड्यात भीषण अपघात


ट्रक चालक गंभीर, २०पेक्षा अधिक प्रवासी जखमी


म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी) - अस्नोडा येथील सेंट क्लारा हायस्कूलजवळ आज संध्याकाळी पावणे पाचच्या दरम्यान मिनी बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या टकरीत ट्रकच्या चालकासह मिनी बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून ट्रक चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जीए - ०४ - टी - २४१५ ही कपिला नामक मिनी बस म्हापशाहून वाळपईला जात होती तर एमएच - १४ - एएच - ९४३३ हा मालवाहू ट्रक अस्नोडामार्गे म्हापशाच्या दिशेने येत होता. अस्नोडा येथील सेंट क्लारा हायस्कूलजवळील वळणावर (बांयकडे) मिनी बसने उलट्या दिशेला जाऊन ट्रकला समोरासमोर धडक दिली. त्यामुळे ही दोन्ही वाहने चिन्ना कुट्टी मॅथ्यू यांच्या घराच्या संरक्षक कठड्याला जाऊन आदळली. या अपघातात मिनी बसचा चालक अशोक सुरेश गावकर (वय ४२. रा. ठाणे- सत्तरी) याच्या डोक्याला व हाताला बरीच दुखापत झाली तर बसची धडक थेट ट्रकच्या केबिनलाच बसल्याने ट्रक चालक विजय मंडारे केबिनमध्येच अडकून पडला. अग्निशामक दलाच्या जवानांनी केबिनचा पत्रा कापून त्याला बाहेर काढला. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर इजा झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अपघात झाल्यानंतर तेथून जाणाऱ्या लोकांनी ताबडतोब मदतकार्याला सुरुवात करून बसमध्ये अडकून पडलेल्या अनेक जखमी प्रवाशांना बाहेर काढले. त्यांनीच पोलिसांना पाचारण केले. काही प्रवाशांना १०८ रुग्णवाहिकेतून तर काहींनी आपल्या खाजगी वाहनांतून जखमींना उपचारांसाठी आझिलो इस्पितळात दाखल केले. या अपघातात वीसपेक्षा अधिक प्रवाशांना इजा झाली असून काहींना उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले. सहा प्रवासी बांबोळी येथील गोमेकॉत तर चार प्रवासी आझिलो इस्पितळात उपचार घेत आहेत.
उपचार घेत असलेले प्रवासी ः ट्रक चालक विजय मंडारे, आयेशा पटेल, शनम पटेल, तेजस्विनी हिरेमठ (डिचोली), जीझस जोजफ चाको (अस्नोडा), आनंद देऊस्कर (पर्रा) हे बांबोळी येथे उपचार घेत आहेत; तर सुरत चोडणकर, सालू पेडणेकर (अस्नोडा), पुरन दरेवाल (होंडा), सागर गिमोणकर (पिळगाव) यांच्यावर आझिलोत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मिनी बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करत आहेत.

खाजगी बसवाल्यांची मनमानी रोखा
दरम्यान, या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सदर अपघाताचे स्वरूप अतिशय भीषण असेच होते. संरक्षक कठडा नसता तर सदर वाहने थेट मॅथ्यू यांच्या घरालाच धडकली असती व त्यामुळे जीवितहानी होण्याचाही संभव होता असे काहींनी सांगितले. या अपघातात सुसाट वेगाने जाणाऱ्या बस चालकाचीच चूक असल्याची प्रतिक्रियाही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली. या मार्गांवरून जाणाऱ्या प्रवासी बसेसमध्ये विलक्षण चढाओढ सुरू असते व त्यामुळे या अरुंद व वळणदार रस्त्यावर तुरळक अपघात होतच असतात. बसवाल्यांच्या मनमानी कारभाराला वेळीच लगाम घातला नाही तर याहीपेक्षा मोठा अपघात होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

अनमोड घाटात भीषण अपघात; दोघे ठार

फोंडा, दि. १० (प्रतिनिधी)- मोले तपासणी नाक्यापासून अंदाजे सहा किलो मीटर अंतरावर अनमोड घाटातील धोकादायक वळणावर आज (दि. १०) दुपारी १.३० च्या सुमारास मालवाहू ट्रक आणि मोटर सायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटर सायकलवरील दोघे जण ठार झाले.
या अपघातात ठार झालेले दोघेही कर्नाटकातील रहिवासी आहेत. डेव्हीड जॉन बायला (४४) असे एका मृताचे नाव आहे. तो मूळचा दांडेली - कारवार येथील रहिवासी असून बोगमाळो - वास्को येथे राहत होता. तो गोव्यातील एका खासगी सुरक्षा रक्षक कंपनीत कामाला होता. दुसऱ्या मृताचे नाव समजू शकले नाही. त्यांच्याजवळ एक कार्ड सापडले असून त्याच्या आधारे ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. केए - २२ - ए - ९१०४ हा मालवाहू ट्रक मोले येथून लोंढा येथे जात होता तर मोटर सायकल जीए - ०६ - बी - ५९१५ ही कर्नाटकातून मोलेला येत होती.
अपघाताची माहिती मिळताच मोले पोलिस चौकीवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोघाही गंभीर जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून फोंडा येथे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात येत असताना दोघांचेही वाटेतच निधन झाले. या अपघात प्रकरणी ट्रक चालक ऍन्थनी कायतान डिसोझा (लोंढा) याला पोलिसांनी अटक केली आहे. कुळे पोलिस स्थानकाचे निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण गावस तपास करीत आहेत.

वजन आणि मापे खात्याचा मळा येथे दुकानावर छापा

७० हजारांचा माल जप्त
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - वजन आणि मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी आज मळा पणजी येथील राजेश्वरी एजन्सी या दुकानावर छापा टाकून ७० हजार रुपयांचा बेकायदा माल जप्त केला. यात वॉटर फिल्टर, जी. गंगा प्रेशर कुकर, सूर्य सुरक्षा एलपीजी रबर ट्यूब, एलपीजी गॅस स्टोव्ह, मिक्सर, निर्लोन नॉन स्टिक तवा, एलपीजी ऍडाप्टर गॅस लाईटर इत्यादी सुमारे ३२१पेक्षा अधिक उत्पादनांचा समावेश असल्याची माहिती वजन आणि मापे खात्याचे नियंत्रक एम. एन. नाईक यांनी दिली.
आज सकाळी वजन आणि मापे कार्यालयाचे नियंत्रक एम. एन. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक नियंत्रक प्रसाद शिरोडकर आणि निरीक्षक पंकज नाईक यांनी ही कारवाई केली. छाप्यात पकडण्यात आलेल्या उत्पादनांवर वजन आणि मापे १९७७ कायद्यानुसार उत्पादनाचा दर, ते तयार करणाऱ्या कंपनीचे नाव व पत्ता, त्यांच्या निर्मितीची तारीख आणि वर्ष तसेच अन्य आवश्यक बाबी छापल्या गेल्या नसल्याचे आढळल्याने कायदेशीर कारवाई करून सदर उत्पादनांची विक्री बंद करण्याची ताकीद देण्यात आली. तसेच काही जुन्या उत्पादनांवर नवीन दरांची लेबले चिकटवल्याचे निदर्शनास आले, अशी माहितीही त्यांनी दिली.
गोव्यात बोगस माल विकण्याचे प्रकार परप्रांतीय विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात होत असून आज पकडण्यात आलेला राजेश्वरी एजन्सीचा मालक हा मूळ राजस्थानचा असून तो गोव्यात कित्येक वर्षे असा बेकायदा व्यापार करत आहे. असा बनावट माल विकणाऱ्यांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
नियंत्रक नाईक यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वजन आणि मापे खात्याच्या अधिकाऱ्यांनी एप्रिल २००९ ते जून २०१० या काळात विविध प्रकारची एकूण ४७० प्रकरणे हाताळली असून दंड स्वरूपात ८०३३०० एवढी रक्कम गोळा करण्यात आली आहे; तसेच याच काळात ३४५६२५१ एवढा महसूल गोळा करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आता "पीएचडी'साठी प्रवेश परीक्षा सक्तीची

कौन्सिलच्या मान्यतेनंतरच क्रीडा धोरण लागू होणार

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी क्रेडिट पद्धत


पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - गोवा विद्यापीठात "पीएचडी'साठी प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना आता दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे, अशी माहिती आज गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. दिलीप देवबागकर यांनी दिली. गोवा विद्यापीठाने येत्या २०११ वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाला "क्रेडिट' पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व महाविद्यालयांना व विद्यापीठासाठीही ऍकॅडेमिक कौन्सिलच्या मान्यतेनंतरच क्रीडा धोरण लागू केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
विद्यापीठातील विभागप्रमुखांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते विद्यापीठाच्या सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर कुलसचिव डॉ. एम. एस. सांगोडकर, प्रो. के. एस. भट. प्रो. पी. व्ही. देसाई व प्रो. जे. ए. ई. डीसा उपस्थित होते.
"पीएचडी' उमेदवारांसाठी आता प्रवेश परीक्षा सक्तीची केली आहे. या परीक्षेला शंभर गुणांचे दोन पेपर असतील. "नेट' परीक्षेप्रमाणेच या परीक्षेचा दर्जा असणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्याच उमेदवारालाच थेट मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. ज्या उमेदवाराने "नेट' परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्याला ही प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक असणार नाही, असे प्रो. पी. व्ही. देसाई यांनी यावेळी सांगितले.
या परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे. तसेच, ही परीक्षा "ऑनलाईन' पद्धतीने घेतली जाणार आहे. "पीएचडी'च्या उमेदवारांना किमान दोन प्रबंध सादर करावे लागणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे प्रबंध विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) पाठवले जाणार असून ते आयोगाद्वारे संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याचीही माहिती यावेळी प्रो. देसाई यांनी दिली.
"यूजीसी'च्या सूचनेनुसार विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी "क्रेडिट' पद्धत सुरू केली जात आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. अभ्यासक्रमांच्या दोन्ही वर्षाला मिळून विद्यार्थ्यांना किमान ८० क्रेडिट गुण मिळवावे लागणार आहेत. कोणत्याही विषयात कमी गुण प्राप्त झाल्यास अंतिम परीक्षेच्या आधी त्या विषयाची पुन्हा परीक्षा विद्यार्थी देऊ शकतो, अशी माहिती प्रो. देवबागकर यांनी यावेळी दिली. तसेच विज्ञान, कला, वाणिज्य वा अन्य कोणत्याही शाखेचे विद्यार्थी आपल्या आवडीचे विषय घेऊ शकतील. म्हणजेच विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना एखादा संगीताचा विषयही घेण्याची मुभा असणार आहे, असे प्रो. देवबागकर यांनी सांगितले.
गोवा विद्यापीठात येत्या वर्षापासून हॉटेल व्यवस्थापन व पर्यटन या दोन विषयांसाठी "एमबीए' अभ्यासक्रम सुरू होणार आहे. तसेच, भूविज्ञान व मनुष्यबळ विकास हा पदविका अभ्यासक्रमही सुरू होणार आहे. त्याच्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. पदविका अभ्यासक्रम हा बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
गोवा विद्यापीठाला पाच वर्षासाठी मिळणाऱ्या निधीत प्रचंड वाढ करण्यात आली असून यावर्षी १५ कोटी रुपये "यूजीसी'द्वारे देण्यात आले आहेत. सुरुवातीला ही रक्कम केवळ ३.४ कोटी अशी देण्यात आली होती. या निधीद्वारे विद्यार्थिनींसाठी सुसज्ज असे वसतिगृह, नवीन विभागाची तसेच प्रयोगशाळेची बांधणी केली जाणार असल्याचे प्रो. देवबागकर यांनी सांगितले.

गोवा संगीत महाविद्यालयाला गोवा विद्यापीठाच्या विभागाचा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या काही महिन्यांत त्याला यश येईल,असे गोवा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. दिलीप देवबागकर यांनी सांगितले. कला महाविद्यालयासाठीही अशाच प्रकारचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, एआयसीटी यांच्या मान्यतेनुसार महाविद्यालये सुरू असून त्यांची परवानगी घेतल्याविना या महाविद्यालयांना विद्यापीठ क्रीडा धोरण लागू करू शकत नाही. त्यामुळे या विषयी अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना केली असून अहवाल येताच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तो अहवाल ऍकॅडेमिक कौन्सिलसमोर ठेवला जाणार आहे. त्यानंतर कुलगुरूंची मान्यता मिळवली जाणार आहे व तेव्हाच राज्य सरकारचे क्रीडा धोरण लागू करणे शक्य होणार असल्याचे प्रो. देवबागकर यांनी आज स्पष्ट केले.

म्हापशात फ्लॅट फोडून पन्नास हजारांची चोरी

पोलिस गस्त वाढविण्याचे सरकारी आश्वासन हवेतच

म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी) - म्हापशात पोलिसांची गस्त वाढवली जाईल हे सरकारने दिलेले आश्वासन ताजे असतानाच आज (दि. १०) फेअर आल्त येथील "फिनिक्स प्लाझा' इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारे दिलीप चोडणकर यांचा फ्लॅट दिवसाढवळ्या फोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजारांचा ऐवज पळवला. त्यामुळे म्हापसावासीयांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे म्हापसा भागात सुरू असलेल्या चोऱ्या व घरफोड्यांबाबत स्थानिक आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती.
आज सकाळी ९ वाजता फ्लॅटला कुलूप ठोकून चोडणकर कुटुंबीय बाहेर गेले होते. दुपारी सव्वा एकच्या दरम्यान ते परत आले असता त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा असलेला दिसला. फ्लॅटच्या दरवाजाची कडी कापून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला होता. घरमालकांनी आत जाऊन पाहिले असता घरातील कपाटे उघडी असलेली त्यांना दिसली. त्यातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. त्यानंतर घरातील वस्तूंची पाहणी केली असता सोन्याची व हिऱ्याची अंगठी, चांदीचे पेले, मूर्ती आणि साडेसात हजारांची रोकड लांबवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या ऐवजाची किंमत सुमारे ४८ हजार रुपये असल्याची माहिती देण्यात आली.
पोलिसांना चोरीची कल्पना दिल्यावर ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाच्या साह्याने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो फोल ठरला. पोलिस निरीक्षक राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करत आहेत.
स्थानिक आमदारांनी म्हापशातील सुरक्षेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर गृहखात्याने म्हापशात अलीकडच्या काळात एखाद दुसरेच चोरीचे प्रकरण झाले असल्याची माहिती देत पोलिस गस्त वाढवण्यात येईल असे आश्वासनही दिले होते. त्या आश्वासनाला आठवडाही लोटलेला नसतानाच चोरट्यांनी पुन्हा आपला हिसका दाखवत गृहखाते व पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

उपेंद्र गावकर यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हा नोंद

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - पर्वरी येथील हॉटेल मॅजेस्टिक व्यवस्थापनाकडे २५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेना राज्य प्रमुख उपेंद्र गावकर यांच्यासह उमेश साळगावकर याच्यावर पर्वरी पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या विषयीची पोलिस तक्रार हॉटेल मॅजेस्टिकचे व्यावसायिक सल्लागार श्रीनिवास नाईक यांनी केली आहे. हॉटेल बेकायदा असल्याने व येथे कॅसिनो चालत असल्याने त्याच्याविरुद्ध आवाज न उठवण्यासाठी ही खंडणी मागण्यात येत होती, असे श्री. नाईक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तक्रारीवरून उमेश साळगावकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहितीनुसार, दि. ४ ऑगस्ट २०१० रोजी उमेश साळगावकर हा हॉटेलमध्ये आला होता. यावेळी त्याने आपण शिवसेनेचा पदाधिकारी असल्याचे सांगून आपला मोबाईल क्रमांक स्वागत कक्षात ठेवला होता. तसेच हॉटेलच्या व्यवस्थापकाला आपल्याला मोबाईलवर संपर्क साधण्यासही सांगितले होते. यावेळी कॅसिनोच्या व्यवस्थापकाने दि. ८ रोजी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता त्याने त्याच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास मोर्चा आणून आंदोलन छेडले जाणार असल्याचाही इशारा देण्यात आला होता, अशी माहिती श्री. नाईक यांनी पोलिसांना दिली. २५ लाख रुपये देणे शक्य नसल्याने वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा १५ लाख देण्यास सांगितले गेले. तेही शक्य नसल्याने ३ लाख रुपये देण्याचे ठरले.
या ३ लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील ५० हजार रुपये नेण्यासाठी आज सायंकाळी उमेश याला बोलावण्यात आले होते. तो संध्याकाळी ५ वाजता सदर हॉटेलमध्ये आला. यावेळी त्याने मोबाईलवर संपर्क साधून उपेंद्र गावकर यांनाही बोलावून घेतले. हे पन्नास हजार रुपये उपेंद्र गावकर यांनी स्वीकारले असून ते "पार्टी फंड'साठी मागितले जात आहेत, असे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या विषयीचा अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड करीत आहेत.

Tuesday, 10 August, 2010

लेनचा चरित्रात जोडलेल्या बाबींवर भर

दादाजी नरसप्रभु देशभांडे, रोहिरखोरे यांना १७ एप्रिल १६४५ साली लिहिलेल्या पत्रात शिवाजीराजे लिहितात "श्री रोहिरेश्वर खोरियातील तुमचे आदिकुलदेव. तुमचा डोंगरमाथा पठारावरील शेन्द्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हांस यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिन्दवी स्वराज्य करून पुरविणार आहे... हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे. (शि.पत्र सार संग्रह खं १ पृ १०८ पत्र क्र.५०४) अगदी पहिल्या दिवसापासून महाराजांचे हिन्दवी स्वराज्य होते.
आपल्या आयुष्यातील ध्येयाची इतकी सुस्पष्टता, त्या विषयीचा निर्धार आणि त्याला ईश्वरी कृपेचे पाठबळ आहेच याची शाश्वती केवळ १७-१८ व्या वर्षी असलेल्या तरुण शिवाजीने काय Pusedosecular राज्य स्थापन करण्याची ईर्षा बाळगली होती? एकनाथांच्यापासून महाराष्ट्रातील संतमहात्मे देवतांना "बया दार उघड' असे साकडे घालत होते. हिन्दूंचे जिणे मुसलमानी अंमलाखाली दुष्कर झाले होते. तेव्हा त्याचे रक्षण करणे, त्यांना अभय देणे हे जर महाराजांचे अगदी पहिल्या दिवसापासूनचे धोरण असेल तर त्यात वावगे काय होते? शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे मोजक्याच पण अत्यंत योग्य शब्दांत वर्णन महाकवी भूषणाने केले. काशी, मथुरा इत्यादी ठिकाणी देवळांच्या जागी मशिदी तयार झाल्यास "शिवाजी न होता तो सुनती होती सबकी' हे धार्मिक विधानच आहे. स्वराज्याची स्थापना झाल्यावर थोडा निवांतपणा आणि जीवन सुसह्य होण्याची स्थिती आल्यावर समर्थांनी जे वर्णन केले ते नाकारणारे फक्त आजचे Psuedosecularist असतील कारण त्यांना मुसलमानांची मते पाहिजे आहेत.
समर्थ म्हणतात "बुडाला औरंग्या पापी! म्लेंच्छ संहार जाहला। मोडीली मांडिली क्षेत्रे। आनंदवन भुवनी।।' या ओवीत म्लेंच्छ या शब्दाचा अर्थ जे मुस्लीम आपल्याशिवाय इतरांना काफिर ठरवून एकतर धर्मांतराचा किंवा शिरच्छेदाचाच पर्याय देण्याची मानसिकता ठेवतात असाच आहे.
शिवचरित्राचे उदात्तीकरण करतात त्यात समाविष्ट झालेल्या शिवाजी महाराजांच्या बालपणातील घटनेचा उल्लेख लेन करतो. ते विजापूरला शहाजी राजांबरोबर गेले असता गाईचा वध करणाऱ्या एका खाटिकाचा त्यांनी हात कापल्याची ती गोष्ट आहे. ही गोष्ट आधुनिक इतिहासकारांनी त्यांच्या लेखनात समाविष्ट केलेली नसते. कोणत्याही मोठ्या चरित्रनायकाच्या नंतर लिहिल्या गेलेल्या मनोरंजक चरित्रामधून अशा कथा प्रसृत होतात.
जे स्थान शिवाजी महाराजांचे भारतात आहे, लेनच्या अमेरिकेत तेच स्थान अमेरिकेचे स्वातंत्र्यसेनानी व संस्थापक अध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन यांना आहे. त्यांच्याही चरित्रात अशा गोष्टींची सरमिसळ झाली. जॉर्ज वाशिंग्टनच्या संदर्भात आवर्जून सांगितली जाणारी गोष्ट त्याच्या लहानपणी घडलेली आहे. त्याच्या हातात कुऱ्हाड मिळताच त्याने जे कापायचे नव्हते ते ही झाड कापून टाकले. नंतर काहीही आढेवेढे न घेता त्याची कुबली दिली. ही गोष्ट अमेरिकेत सर्वांना माहिती असते. पण ती खरी नाही. त्याच्या संदर्भात ती कुणातरी जवळच्या नातेवाईकाने जोडून दिली असल्याचे नंतर लक्षात आले. तिची सत्यासत्यता पडताळून पाहण्यात आली. काही दशके मात्र ती जॉर्ज वाशिंग्टनच्या चरित्राचा भाग होती. अशीच गोष्ट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या गोष्टीविषयीही आहे. तिला धरून मराठीत एक सुप्रसिद्ध भावगीतही लिहिले गेलेः "अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती। आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती।' ते ध्वनिमुद्रीत होऊन कित्येकांना पाठही होते. महानायकांच्या चरित्रात असे प्रसंग जोडले जातात. मात्र तो इतिहास असत नाही. ते प्रसंग त्यांच्या चरित्राला पूरक ठरतात आणि त्यातून जनसामान्यांना मार्गदर्शन मिळते व जनसामान्यांतील त्याची प्रतिमा कळते.
पूर्वीच्या काळी चरित्रनायकांच्या चरित्रात त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचे बेमालूम मीलन झालेले असे. चरित्र लिहणाऱ्याची स्वत:ची स्वभावप्रकृती त्यात दिसून येई. चरित्रलेखन हेही गुणगानात्मक असे. लेन चिटणीस बखरीतील पाचव्या अध्यायातील आग्रा भेटीचे उदाहरण देतो. बखरीतील मजकुराप्रमाणे महाराज यात्रेला गेले होते. येताना त्यांनी काशी, अयोध्या इ. तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन पुण्य संपादन केले. पुढे जाऊन बखरीतील एका उताऱ्याचे भाषांतर लेन देतो. त्यात शाईस्तेखानाच्या गोटात शिरण्यापूर्वीचे महाराजांचे भाषण म्हणून दिलेला मजकूर आहे. त्यात महाराज स्वत:ला फकीर म्हणवून घेतात आणि जे एकनिष्ठ आहेत त्यांना आपल्याबरोबर निघण्याचे आवाहन करतात. त्या कथित भाषणाला धरून लेनने तारे तोडले आहेत. त्याच्या मते अठराव्या शतकातील लेखकांनी who transforms Shivaji from the martial hero violently protecting the core of Hinduism (gods, brahmins, and cows) into a character who embodies the core valves of an essentialized universalistic religion (renunciation, contemplation, devotion) (पृ ५१)

तेलगळतीमुळे सागरी महासंकट!

दर तासाला तीन टन तेल समुद्रात पंतप्रधानांनी अहवाल मागविला
तूर्तास मासे न खाण्याचे आवाहन जहाज मालकांविरोधात कारवाई

मुंबई, दि. ९ : कुलाबा समुद्रकिनाऱ्यालगत झालेल्या दोन व्यापारी जहाजांच्या धडकीत एक जहाज जवळपास बुडाले असून त्यातून झालेल्या तेलगळतीचा धोका मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला निर्माण झाला आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज यासंदर्भात जल वाहतूक मंत्रालयाकडून अहवाल मागविला आहे.
एमएससी चित्रा व खलिजा या दोन जहाजांत धडक झाल्याने यांपैकी एका जहाजातून तेलगळतीला सुरुवात झाली आहे व त्याचे भीषण परिणाम दिसू लागले आहेत. टक्कर झालेल्या "चित्रा' या बोटीमधील तेल झपाट्याने पसरत चालले असून त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका उत्पन्न झाला आहे. दर तासाला तीन टन तेल समुद्रात पसरते आहे. माशांसह समुद्री जलचरांना धोका पोहोचवणारा हा तेलाचा तवंग मुंबईसह एलिफंटा बेट तसेच अलिबागच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचला आहे.
सोडियम हायड्रॉक्साईड या रसायनांमुळे प्रदूषित झालेल्या या पाण्याचा वापर करू नये, असा इशारा तटरक्षक दलाने "बीएआरसी'ला दिला आहे. या तेल गळतीमुळे परिसरातील खारफुटीलाही धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. तेल गळतीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हवाई पाहणी केली.
दरम्यान या बोटींच्या टकरीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जहाज मंत्रालयाकडून अहवाल मागविला आहे. या प्रकरणी राज्यसभेत आज आवाज उठवण्यात आला. पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी दोन्ही जहाज मालकांच्या विरोधात चौकशीला सुरुवात झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाने याप्रकरणी दोन्ही जहाज मालकांविरोधात न्यायालयीन कारवाईला सुरुवात केली असल्याचे रमेश यांनी सांगितले.
तेल गळतीनंतर राज्य सरकार आणि सागरी खात्याने मासेमारीवर बंदी घातली आहे. या तेल गळतीमुळे माशांच्या प्रजोत्पादनावर परिणाम होऊन त्याचा फटका छोट्या मच्छीमारांना बसणार आहे. त्यामुळे नुकसानभरपाई देण्याची मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे. सध्या मासे खाऊ नयेत, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. परिणामी मच्छीमारांना आणखी मोठा फटका बसणार आहे. तेल गळतीमुळे मच्छीमारांचे काम ठप्प झाले असून याकरता सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असे महाराष्ट्र मच्छीमार असोसिएशनचे प्रमुख दामोदर तांडेल यांनी सांगितले. या तेल गळतीचा मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला फटका बसला आहे.
कॉन्स्टेबल बुडाला
गेल्या शनिवारी दुसऱ्या एका जहाजाबरोबर झालेल्या धडकीनंतर एमएससी चित्रा या बुडणाऱ्या जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई शहर पोलिस दलाच्या समुद्री शाखेच्या पोलिसांबरोबर समुद्रात गस्त घालणाऱ्या स्पीड बोटीतील एका पोलिस कॉन्स्टेबलला समुद्रात पडून जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बुडालेल्या कॉन्स्टेबलचे नाव रमेश तुकाराम मोरे (वय ४५) असे आहे. मोरेसह चार कॉन्स्टेबल या जहाजावर स्पीड बोटीतून लक्ष ठेवून होते. ही घटना आज पहाटे चित्रा व्यापारी जहाजाजवळच घडली. मोरेचा मृतदेह नंतर हाती लागला व तो जे. जे. इस्पितळात पाठविण्यात आला.

'पे पार्किंग' केल्यास रस्त्यावर उतरू!

पणजी महापालिका बाजार टेनंट संघटनेचा इशारा
पणजी, दि. ९ : तिसवाडी तालुक्यातील सर्वांत मोठ्या बाजारपेठेच्या परिसरातील रस्त्यावर "पे पार्किंग' करण्याचा महापालिकेच्या निर्णयाला पणजी महापालिका बाजार टेनंट संघटनेने जोरदार विरोध केला आहे. याविषयीचे एक निवेदन आज उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांना सादर करण्यात आले असून पालिकेने या ठिकाणी "पे पार्किंग' केल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा या संघटनेने दिला आहे.
या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री दिगंबर कामत, पणजी मतदारसंघाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, नगरविकास मंत्री ज्योकीम आलेमाव तसेच पालिकेचे आयुक्त एल्विस गोम्स यांना यांनाही देण्यात आले आहे. पालिकेने हा निर्णय घेण्यापूर्वी पालिका बाजार संघटनेने याला विरोध करणारे एक पत्र पालिकेला दिले होते. परंतु, त्या पत्राची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पणजी बाजारात असलेले रस्ते हे सार्वजनिक वापरासाठी आहेत. तसेच त्यांचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे. त्यामुळे या रस्त्यांवर "पे पार्किंग' करून महापालिका पैसे आकारू शकत नाही, असे मत संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धामस्कर यांनी व्यक्त केले. वाहन विकत घेणारा प्रत्येक व्यक्ती हा रस्ता वापरण्यासाठी "रोड टॅक्स' भरतो. पालिका लोकांना सुरक्षित अशी "पे पार्किंग'ची जागा उपलब्ध करू शकत नसल्याने सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करणाऱ्यांकडून पैसे आकारून आपली तिजोरी भरू पाहत असल्याचा आरोप यावेळी श्री. धामस्कर यांनी केला. तसेच या ठिकाणी रस्त्यांवर "पे पार्किंग' केल्यास बाजारहाट करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी कमी होणार, असाही दावा त्यांनी यावेळी केला.
पालिकेने लोकांना सुरक्षित अशी जागा "पे पार्किंग'साठी द्यावी. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पालिकेने उचित ठिकाणीच हे "पे पार्किंग' करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. तरीही पालिकेने जबरदस्तीने या ठिकाणी "पे पार्किंग' केल्यास सर्व व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरून पालिकेच्या या निर्णयाला विरोध करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असे संघटनेचे सचिव धर्मेंद्र भगत यांनी सांगितले. पणजी बाजार संकुलाच्या आसपास उभ्या राहिलेल्या इमारतींनी पार्किंगसाठी जागा न सोडल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणारी वाहने उभी करून ठेवण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. या इमारतींकडे स्वतःची पार्किंगची जागा आहे की नाही हे पाहणे किंवा त्याचे बांधकाम सुरू असताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही पालिकेची आहे. परंतु, पालिकेने अशा प्रकारची कोणतीही काळजी घेतली नसल्याने आणि मिळेल त्या पद्धतीने नव्या इमारतींना ना हरकत दाखले दिल्याने ही समस्या निर्माण झाली आहे, असे मत अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

मळा येथे कामगाराचा खून

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): राज्यात सुरू असलेल्या खुनांची मालिका सुरूच असून आज पणजी येथील चार खांब - मळा (मानस) येथे असलेल्या पुष्पराज सॉ मिलमध्ये काम करणाऱ्या शांताराम गावकर (४७) या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून खून करण्यात आला. मयत शांताराम हा मूळ केसरलॉक - कर्नाटक येथे राहणारा असून संशयित आरोपी गोविंद गिरी (३६) याच्यावर भा. दं. सं ३०२ कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
संशयित आरोपी काल रात्रीपासून गायब झाला असल्याने त्याच्यावर प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. गोविंद हा मूळ नेपाळ येथील रहिवासी आहे. तो पहाटे चारपर्यंत याच मिलमध्ये बसून होता, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.
सॉ मिलचे मालक पराग करमली यांनी आज सकाळी मयत शांताराम याच्या खोलीच्या बाहेर रक्त सांडल्याचे पाहिल्यावर याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी येऊन शांताराम याच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडले असता आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शांतारामचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात पाठवला. घटनास्थळावरून पोलिसांनी काही पुरावेही जप्त केले आहेत.
अधिक माहितीनुसार, शांताराम आणि गोविंद हे दोघेही या सॉ मिलवर कामाला होते. दि. ७ ऑगस्ट रोजी सर्व कामगारांना वेतन मिळाले होते. त्यामुळे मिलवरील काही कामगार गावी गेले होते तर शांताराम व गोविंद हे दोघेच थांबले होते. या मिलच्या मागच्या बाजूलाच दोघांचीही राहण्याची खोली आहे. सायंकाळी ४ वाजता या दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. काल रात्री दोघेही दारूच्या नशेत होते. त्यानंतर रात्री ९ वाजता दोघांचेही कडाक्याचे भांडण सुरू होते हे त्या मिलवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने पाहिले होते. भांडण हातघाईवर आल्याने याची माहिती त्यांनी रात्रीच मिलचे मालक पराग यांना दिली होती. आज सकाळी पराग मिलवर आला असता त्याला शांताराम याच्या खोलीच्या दरवाजाला बाहेर कुलूप असल्याचे आढळून आले. खोलीच्या बाहेर रक्ताचे शिंतोडेही दिसल्याने त्यांनी त्वरित पणजी पोलिसांना अवगत केले. गोविंद हा शांताराम राहत असलेल्या बाजूच्या खोलीत राहत होता. दिवसा या मिलवर तो काम करायचा तर रात्रीच्या वेळी कांपाल येथील एका "एटीएम'मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत होता.
मयत शांताराम याच्या डोक्याला गंभीर जखमा झालेल्या असून त्याला जमिनीवर आपटून मारण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच मृतदेहाच्या बाजूला एक चाकूही पोलिसांना आढळून आला आहे. पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. परंतु, त्याचा अधिक उपयोग झाला नाही. मात्र पोलिसी श्वान काल रात्री दोघेही ज्या बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते तिथपर्यंत गेल्याचे सूत्रांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहेत.

थिवी अपघातात दुचाकीस्वार ठार

म्हापसा, दि. ९ (प्रतिनिधी): थिवी बंगल्याजवळ आज सकाळी ७.४५ वा. मिनी बस व दोन दुचाक्यांत झालेल्या विचित्र अपघातात ब्रिटोवाडा - पर्रा येथील विलास मुकुंद मातोंडकर (६०) यांचा मृत्यू झाला.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी मयत विलास मातोंडकर अस्नोड्याला जाण्यासाठी आपल्या जीए - ०३ - जे - ४६१० या डिओ दुचाकीने निघाले होते. त्यांच्या पुढे जीए - ०१ - व्ही - २७२२ ही मिनी बस चालली होती. थिवी बंगल्याजवळ विलास यांनी मिनिबसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता समोरून म्हापशाच्या दिशेने येत असलेल्या जीए- ०३ - जे - ३७१० या हिरो होंडा दुचाकीला त्यांची धडक बसली. यावेळी विलास रस्त्यावर फेकले गेले व त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना त्वरित आझिलो इस्पितळात दाखल केले गेले व तेथून बांबोळीला पाठवण्यात आले. तेथे उपचार घेत असताना दुपारी १२.३० वा. त्यांचे निधन झाले. म्हापसा पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्वाईन फ्लूच्या रुग्णांची राज्यात झपाट्याने वाढ

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): मलेरिया बरोबरच "स्वाईन फ्लू' या संसर्गजन्य तापाची लागण झालेल्या रुग्णांची राज्यात झपाट्याने वाढ होत असून आणखी दहा जणांना या तापाची लागण झाली आहे. दरम्यान, केवळ ऑगस्ट महिन्यातच १६ जणांना या ज्वराची लागण झाली असल्याची माहिती आरोग्य खात्यातून उपलब्ध झाली आहे.
जानेवारी ते ऑगस्टपर्यंत २२ जणांना स्वाईन फ्लू तापाची लागण झाली आहे. त्यांतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर आणखी संशयित रुग्णही आढळून आले आहेत. त्यांच्या थुंकीचे नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. जुझे डीसा यांनी दिली. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत संसर्गजन्य रोगाचा फैलाव जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे लोकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. "स्वाईन फ्यू' या तापाने आपल्या देशात आणि राज्यातही प्रवेश केला आहे व या रोगाचा फैलाव अतिशय वेगाने होत असल्याचेही ते म्हणाले. या रोगाचा राज्यात होणारा फैलाव लक्षात घेऊन मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून येत्या १३ ऑगस्ट रोजी समितीची बैठक होणार आहे.
गेल्या वर्षी ५२ जणांना "स्वाईन फ्लू' तापाची लागण झाली होती. त्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यावेळी सहा महिन्यांत १२ जणांना या तापाची लाग झाली आहे तर गेल्या काही दिवसांत १४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. गेल्या वर्षी स्वाईन फ्लूने गोव्यात प्रमथच प्रवेश केला होता. २००९च्या जून महिन्यात या तापाची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर राज्य सरकारने वास्को - दाबोळी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक पथक तैनात करून विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली होती. त्यावेळी हजारो रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र या वर्षी या रोगाचे जिवाणू येथेच आढळून आले असल्याने विमानतळावर कोणतीही विशेष दक्षता घेतली जात नाही, अशी माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली.
दक्षिण गोव्यात अधिक लोकांना या तापाची लागण झाली आहे. सासष्टी, मुरगाव व तिसवाडी तालुक्यातील स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. खबरदारी म्हणून प्रत्येक विद्यालयात पोस्टर लावण्यात आले आहेत. तसेच विद्यालयात कोणत्याही विद्यार्थ्याला ताप येत असल्यास त्याला त्वरित घरी पाठवून त्या भागातील आरोग्य अधिकाऱ्याला त्याची माहिती देण्याची सूचना विद्यालय प्रशासनाला देण्यात आली आहे. तसेच सतत हात स्वच्छ धुण्याची सूचनाही लोकांना देण्यात आली आहे, असे डॉ. डिसा यांनी सांगितले.
----------------------------------------------------------------
स्वाईन फ्लूची लागण होणाऱ्या रुग्णांच्या सतत संपर्कात येणाऱ्या सरकारी तसेच खाजगी डॉक्टरांना व पॅरा मेडिकलच्या सहा हजार रुग्णांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. ही लस केंद्र सरकारने उपलब्ध केली आहे. मात्र सर्वसामान्य जनतेला ही लस टोचून घ्यावयाची असल्यास ती खाजगी औषधालयात उपलब्ध आहे, अशी माहिती डॉ. डीसा यांनी दिली.

बेकायदा आर्किटेक्चर महाविद्यालयावर 'सीबीआय'चा छापा

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): 'ऑल इंडिया कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर'चे अध्यक्ष डॉ. विजयकृष्ण साहनी हे गोव्यात बेकायदा रीतीने चालवत असलेल्या "ए. आय. डी. आय' या आर्किटेक्चर महाविद्यालयावर दिल्ली येथील केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) विभागाने आज छापा टाकून महाविद्यालयाला टाळे ठोकले. तसेच डॉ. साहनी यांच्या बाणावली येथील घरावरही छापा टाकून अनेक महत्त्वाचे दस्तऐवजही जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. डॉ. साहनी मडगाव - फोंडा रस्त्यावर हे महाविद्यालय गेल्या २००५ सालापासून चालवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खुद्द "ऑल इंडिया कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर'च्या अध्यक्षांनीच सरकारी नियम धाब्यावर बसवून गोव्यात सुरू केलेल्या या महाविद्यालयावर अखेर आज कारवाई करण्यात आली. गोवा सरकारलाही याची माहिती असूनही त्यांना हे महाविद्यालय बंद करण्यास अपयश आले होते. त्यामुळे हा विषय मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातही पोहोचला होता. त्यावेळी आपल्याकडे सर्व कागदपत्रे व सरकारी दाखले असल्याचा दावा या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने खंडपीठात केला होता.
डॉ. साहनी यांचे हे गोव्यातील महाविद्यालय केंद्र सरकारने तसेच "यूजीसी'ने काळ्या यादीत टाकले होते. तरीही २००५पासून हे महाविद्यालय गोव्यात दिमाखात सुरूच होते. दिल्ली येथून आलेल्या "सीबीआय'च्या विशेष पथकाने हा छापा टाकला तर त्याला गोव्यातील 'सीबीआय'च्या शाखेने मदत केली.
दरम्यान, देशभरात अशा बेकायदा महाविद्यालयांवर छापा टाकण्याचे सत्र सुरू झाले असून त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. डॉ. साहनी यांना अद्याप अटक झालेली नसली तरी, अधिक चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती देण्यात आली.

नेसाय येथे भरदिवसा घरफोडी सुमारे १० लाखांचा ऐवज पळविला

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): सासष्टीतील ग्रामीण भागांत या दिवसांत दिवसाढवळ्या घरे फोडून चोऱ्या करण्याचे प्रकार बरेच वाढलेले असून आज सकाळी नेसाय - इगर्जीवाडा येथील एक घर फोडून चोरट्यांनी सुमारे दहा लाखांचा ऐवज पळविला. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्र्वानपथकाला आणून संशयितांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण सायंकाळपर्यंत त्यांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नव्हते.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅटरीना डिकॉस्ता यांनी मायणा - कुडतरी पोलिसांत तक्रार नोंदविलेली असून सकाळी ९ ते १०.३० दरम्यान ही घटना घडल्याचे म्हटले आहे. त्या घर बंद करून बकऱ्यांना घेऊन बाहेर गेल्या होत्या. तासाभराने परत आल्या तेव्हा घराचा दर्शनी दरवाजा फोडला गेल्याचे त्यांच्या दृष्टीस पडले. आत जाऊन पाहता चोरट्यांनी आतील कपाट फोडून दागिने व अन्य किमती वस्तू पळविल्याचे आढळून आले. त्यात २ मंगळसूत्रे, १६ बांगड्या, ४ ब्रेसलेट, १० अंगठ्या, ३ हार, ६ साखळ्या व ९ कर्णफुले यांचा समावेश होता. विदेशात असलेल्या कॅटरीना हिच्या बहिणीने आपले दागिने तिच्याकडे ठेवले होते. नेमके तेच पळवले गेले आहेत
लगेच त्यांनी मायणा - कुडतरी पोलिसांना कळविल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला; तसेच श्र्वानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलावून काही सुगावा लागतो का ते पाहिले. परंतु, चोरांचा कोणताच थांगपत्ता लागू शकला नाही. कुत्री घराच्या परिसरात घुटमळली व रेल्वेमार्गापर्यंत जाऊन परत फिरली. त्यामुळे कोणी तरी माहितगारानेच पाळत ठेवून हे काम केले असावे, असा तर्क लावला जात आहे. अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, सासष्टीतील ग्रामीण भागांत अशा प्रकारच्या चोऱ्यांचे सत्रच सुरू झाले असून त्यामागे एखादी टोळी कार्यरत आहे की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्यात फातोर्डा येथे भर वस्तीतील मदेरा एन्क्लेव्ह इमारतीतील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी साधारण १.३६ लाखांचा ऐवज लंपास केला होता. फातिमा सेक्राफेमेलिया ही महिला आपल्या मुलीला घेऊन आर्लेम येथे राहणाऱ्या आईकडे गेली होती व दुपारी परतल्यावर तिला चोरीचा प्रकार कळून चुकला होता.
त्यापूर्वी २९ जुलै रोजी चांदर येथे अशाच प्रकारे दिवसाढवळ्या घर फोडून रोकड व दागिने मिळून लाखोंचा ऐवज पळविला गेला होता. सदर प्रकरणीही एका महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविली होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर पडली तिच्यानंतर घरी असलेला तिचा सासराही घर बंद करून बाहेर पडला व काही वेळाने परतला असता चोरीचा प्रकार उघडकीस आला होता.

Monday, 9 August, 2010

बाजीरावांचा अप्रस्तुत उल्लेख

पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात (पृ ४५ ते ६२) जेम्सने खास करून १७८० ते १८१० हा कालखंड दिला आहे. त्याने इतर संदर्भ साहित्याबरोबर महिपती बुवांच्या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या संबंधी गोेष्टींचा प्रामुख्याने उल्लेख केला असून त्यातून रंगविलेली शिवाजी महाराजांची प्रतिमा ही एका वीर पुरूषाच्या भूमिकेतून धार्मिक राजाच्या प्रतिमेत कशी बदलली गेली याचे विश्लेषण करण्याचा आव आणला आहे.
थोरल्या बाजीरावांच्या संदर्भात वा.गो. गोखले यांनी केलेल्या वर्णनानंतर जेम्स लेनने दिलेला त्या बाबतचा शेरा त्याची मनोवृत्ती दाखवितो." Few Maharashtrians today know the details of Bajirao's illustrous militory career and his role in transforing Pune from a market town into a grand city, but most would know of his illegitimate afair with the muslim dancing girl Mastani ( पृ ४७)
बरोबर आहे. हा मनुष्यस्वभाव आहे. दुसऱ्याची प्रकरणे चघळणे ही प्रवृत्ती सर्वच समाजात असते. जेम्स लेनच्या अमेरिकेतही ते चालते. जॉन एफ. केनेडीनी क्युबा संबंधात झालेल्या संघर्षाची अमेरिकन नागरिकांना विशेष माहिती नसते. मात्र त्यांनी मेरिलीन मन्रोबरोबर केलेल्या लफड्याची नेमकी माहिती असते. जॉन केनेडीसाठी सुंदर मुलीची ने आण करण्यासाठी लष्करातील विमान वापरताना किती खर्च झाला यावरील पुस्तके तिथे हातोहात खपतात. बिल क्लिंटनने त्याच्या कारकिर्दीत ज्या आर्थिक धोरणांना राबविले ती धोरणे तर विस्मृतीत गेली आहेत. बिल क्लिंटन म्हणताच मोनिका लेविन्स्किची आठवण अमेरिकेतील लोकांनाच नव्हे तर अमेरिका बाहेरच्या लोकांनाही आपसुकच होते.
वरील प्रकारचा शेरा देण्यात लेनने काय मोठी इतिहास मिमांसा केली ते कळण्यास मार्ग नाही. जाताजाता बाजीराव मस्तानीचे अप्रस्तुत प्रकरण चघळण्याचा मोह त्याला टाळता आला नाही हे नक्की.
अठराव्या शतकातील शिवछत्रपतीवरील लिखाणाचा उल्लेख करताना लेनने सभासदबरबरीच्या रघुनाथ यादवाने केलेल्या पुनर्लिखाणाबरोबरच चित्रगुप्त आणि चिटणीसवखरींचा उल्लेख आहे.
शतकभरात शिवाजी महाराजांच्या चरित्राचा विस्तार होऊ लागला आणि अनेक आख्यायिका त्यात जोडल्या गेल्या. त्यात हिन्दुत्वाची जोड दिली गेली असे लेन म्हणतो.Even if we restrict ourselves to the tales known in Shivaji's own times we see traces of a religious hero fighting a religious war and these trace are elaborated in the eighteenth centary to articulate the Hindu dimension of Shivaji's legendary identity. (पृ. ४९)
एकीकडे समजातील किंबहूना हिन्दु-मुस्लिम संबंधामधील गुंतागुतीचा त्याच पानावर उल्लेख करणारा लेन (पृ ४९) स्वत: मात्र ठोकळेबाज आणि भोळसटपणाची विधाने कशी करतो ते वर दिलेल्या अवतरणावरून दिसते आहे. त्याला शिवाजी महाराज हे एका जाहागिरदारदाचे पुत्र केवळ स्वतंत्र राज्य स्थापन करणारे झाले. त्यामागे देश, धर्म इत्यादीची काही प्रेरणा नव्हती हे सिद्ध करायचे आहे असाच सूर ४०-५० वर्षापूर्वी हिन्दू शब्दांचेच वावडे असलेल्या साम्यवादी विचारवंतांनी (?) लावला होता. त्याची येथे आठवण होते. हिन्दूचे स्वराज्य जे मुसल्यान राज्यकर्त्यांपासून स्वतंत्र असेल जेथे हिन्दूंना कुठल्याही छळावळाशिवाय, भिती शिवाय सुखेनैव राहता येईल. तसेच जेथे इतर धार्मियांनाही त्यांच्या धर्माचे पालन करून स्वदेशप्रीती मनात जागृत ठेवून राहता येईल. अशा राज्याची स्थापना महाराजांना अगदी स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीपासून अभिप्रेत होती. (क्रमशः)

मागण्या पूर्ण न झाल्यास २७ रोजी उपोषणाचा इशारा

आरोग्यसेवेविषयी काणकोणवासीय आक्रमक

काणकोण, दि. ८ (प्रतिनिधी)- काणकोण सामाजिक इस्पितळासंबंधीच्या प्रमुख मागण्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध २७ ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने काणकोणवासीय उपोषणाला बसतील, असा इशारा आज काणकोण आरोग्य कल्याण समिती व आरोग्यासंबंधी जागरूक काणकोणच्या नागरिकांनी चावडी - काणकोण येथे दिला.
यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश तवडकर, आरोग्य कल्याण समिती अध्यक्ष डायगो डिसिल्वा, ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा बी. देसाई, संजय कोमरपंत आदी उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानांवरून बोलताना रमेश तवडकर म्हणाले, की २८ जून रोजी "काणकोण बंद' हा राजकारणविरहित कार्यक्रम होता. जनतेच्या एका मूलभूत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व जनतेच्या भावना निद्रिस्त सरकारच्या कानी पोहोचविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकमुखी घेतलेला तो निर्णय होता. मात्र २७ तारखेला सरकारतर्फे व अन्य काहींनी आंदोलन चिरडण्यासाठी डाव रचला. काही लोकप्रतिनिधींनी यावेळी सरकारकडून आश्वासने प्राप्त करून घेतली. त्यावेळीही आम्ही अशा आश्वासनांवर विश्वास नसल्याचे सांगून आंदोलन यशस्वीच केले. आज सरकारकडून आश्वासने पाळली गेली नसल्याने आम्ही त्याचा निषेध करत आहोेत. आज समितीच्या प्रयत्नामुळे तथा संघर्षामुळेच थोड्याफार सुविधा उपलब्ध आहेत. परंतु पूर्ण दर्जात्मक इस्पितळाची मागणी करण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असे तवडकर शेवटी म्हणाले.
इस्पितळातील ट्रोमा युनिट सुरू केलेले नाही, रुग्णवाहिका सेवा नाही, पुरेशी डॉक्टरसेवा नाही. फक्त चार डॉक्टर्सवर जास्त ताण येत असून रुग्णांना संध्याकाळपर्यंत थांबावे लागत आहे. गेल्या मुक्तीनंतरच्या ५० वर्षात काणकोणकरांना आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा व कला या सुविधा पुरविण्यात सरकार पूर्ण अपयशी ठरले असून सगळेच काणकोणवासी खाजगी इलाज करू शकत नसल्याचे समिती अध्यक्ष डिसिल्वा म्हणाले.
या सरकारविरुद्ध जनहित याचिका दाखल का करू नये,असा सवाल यावेळी करण्यात आला. खाजगी डॉक्टरांचा गल्ला वाढविण्यासाठी मंत्र्यांना हाताशी धरून हा खेळ खेळण्यात येण्याची शक्यता काही वक्त्यांनी व्यक्त केली. काणकोणचे पंचायत ते विधानसभेपर्यंतचे लोकप्रतिनिधी काणकोणच्या नागरिकांच्या आरोग्यासंबंधी सोयरसुतक नसल्याप्रमाणे वागत असल्याचे व अशांना येत्या निवडणुकीत जनताच घरचा रस्ता दाखविल, असा सूर वक्त्यांनी व्यक्त केला.
आरोग्यमंत्री विदेश दौऱ्यात मग्न असून त्यांचे काणकोणकडे अजिबात लक्ष नाही, ३०० दिवस ते गोव्याबाहेर राहत असल्याने जर काणकोणकरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असाल तर करमलघाटाखाली त्यांना प्रवेशही बंद जनता करेल असे कृष्णा बी. देसाई म्हणाले. तत्पूर्वी समिती सचिव संजय कोमरपंत यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. यावेळी संपूर्ण महिनाभराच्या घटनेचा उल्लेख त्यांनी केला.
यावेळी वालेरियान व्हिएगस, आगोंदचे गोईश, ओनाराद फनार्ंंडिस, राणे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
शेवटी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यानंतर सचिव संजय कोमरपंत यांनी आभार व्यक्त केले.
आज घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय
१. काणकोण सामाजिक इस्पितळाचा दर्जा वाढवावा, २. आवश्यक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती १५ ऑगस्ट पूर्वी करावी, ३. औषधालयात उचित मात्रेत औषधे पुरवावी, ४.ट्रोमा युनिट सुरू करावे, ५. किडणी युनिटमध्ये सुरळीतपणा आणावा. अन्यथा २७ रोजी उपोषण सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
तत्पूर्वी १३ ऑगस्ट रोजी इस्पितळाला सकाळी ११ वाजता समिती भेट देईल. १४ रोजी पहिली आढावा बैठक होईल. अंतिम आढावा बैठक २३ ऑगस्ट रोजी घेतली जाईल व सरकारने दुर्लक्ष केल्यास यावेळी पूर्ण ताकदीनिशी आंदोलनात उतरू, असा इशारा यावेळी देण्यात आला.