Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 10 October, 2009

तिसऱ्यादा यचिका फेटाळली


(रस्त्यांचे नामकरणप्रकरण)

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)ः राजधानीतील रस्त्यांची पोर्तुगीज नावे बदलल्याप्रकरणी मुख्याध्यापक विलास सतरकर, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली व दत्ता पालेकर यांना दोनवेळा न्यायालयाने दोषमुक्त ठरवूनही समाधान न झालेल्या पणजी महापालिकेने तिसऱ्यांदा सादर केलेले आरोपपत्र दाखल करून घेण्यापूर्वीच फेटाळण्यात आले. आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांनी हे आरोपपत्र फेटाळून लावताना तिघांना तिसऱ्यांदा दोषमुक्त ठरवले. यापूर्वी ६ फेब्रुवारी ०८ रोजी तत्कालीन न्यायमूर्ती शेखर परब यांनी या प्रकरणातील संशयितांना पुराव्या अभावी दोषमुक्त केले होते. त्यावेळी सरकारने या निवाड्याला ३० नोव्हेंबर रोजी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तेथेही सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती नूतन सरदेसाई यांनी न्या. परब यांचा निवाडा उचलून धरत सरकारचा आव्हान अर्ज फेटाळून लावला होता. यावेळी पुन्हा एकदा पणजी महापालिकेच्या तक्रारीवरून विलास सतरकर, नागेश करमली व दत्ता पालेकर यांच्याविरुद्ध नव्याने आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दोनवेळा न्यायालयाने दोषमुक्त ठरवले असताना पुन्हा एकदा नव्याने आरोपपत्र सादर करून खटला गुदरणे ही सतावणूक असल्याने सदर आरोपपत्राला आव्हान देणारा अर्ज सादर करण्यात आला होता. न्यायालयाने आरोपपत्र दाखल करून घेण्यापूर्वी या अर्जावर सुनावणी सुरू केली होती. यावेळी ऍड. प्रवीण फळदेसाई यांनी कशा प्रकारे एकाच प्रकरणात पुन्हा पुन्हा आरोपपत्र दाखल करून सतावणूक केली जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत सदर आरोपपत्र दाखल करून घेण्यापूर्वीच फेटाळून लावले.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी आजच्या न्यायालयीन निवाड्यासंबंधी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, पूर्वी पोर्तुगिजांविरुद्ध लढलो आता त्यांच्या अराष्ट्रीय पिलावळीविरुद्ध झगडावे लागत आहे. गोव्यातील जनतेचे अराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न काहींनी चालवलेला आहे, तो प्रयत्न हाणून पाडू, असा इशारा करमली यांनी दिला.
१८ जून २००६ पणजी मळा येथील रस्त्यांची पोर्तुगीज नावे बदलण्यासाठी देशप्रेमी नागरिक समितीने आंदोलन केले होते. त्यावेळी जमावाने पोर्तुगिजांच्या गुलामगिरीची आठवण करून देणाऱ्या दोन रस्त्याची नावे बदलून त्यांचे नव्याने नामकरण करण्यात आले होते.

व्यावसायिक कर लादल्यास भाजपचा प्रखर विरोध - पर्रीकर

महागाई रोखण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांची चेष्टा

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी)- राज्यातील कॉंग्रेस सरकारने अतिरिक्त महसूलप्राप्तीसाठी व्यावसायिक कराच्या नावाने सर्वसामान्य लोकांच्या खिशालाच हात घालण्याचा घाणेरडा प्रयत्न चालवला आहे. या जाचक कराचा थेट फटका सुमारे अडीच लाख लोकांना बसणार असून हा कर लादण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, अशा इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला. भारतीय जनता पक्षाने व्यावसायिक कराचा वारंवार विरोध केला आहे व आताही हा कर लादण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असेही ते म्हणाले.
भाजप विधिमंडळ गटाची बैठक आज पर्वरी येथे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या दालनात झाली. यावेळी काणकोण भागातील पूरस्थितीबरोबर इतरही अनेक महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. पणजी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. व्यावसायिक कराचा फटका प्रतिमहिना दहा हजार रुपये पगार मिळवणाऱ्या सगळ्यांनाच बसणार आहे. व्यावसायिक, पगारदार व सरकारी नोकरही या कराच्या कक्षेत येणार असल्याने एकार्थाने आयकर भरण्यासारखाच हा प्रकार होईल. आयकराच्या कक्षेत येणाऱ्यांसाठी सुद्धा किमान साडेतेरा हजार रुपये पगार असावा लागतो. परंतु येथे दहा हजार रुपये पगार असलेले नोकरदारही व्यावसायिक कराच्या संकटात सापडतील. सरकारच्या वित्त खात्याकडून याबाबत अधिसूचनाही जारी करण्याची जोरदार तयारी सुरू आहे, त्यामुळे कॉंग्रेस सरकारला पाठिंबा देणाऱ्या घटक पक्षांनीही त्याबाबत जरूर विचार करावा. आघाडी सरकार या नात्याने घटक पक्षसुद्धा सरकारच्या या निर्णयाला जबाबदार ठरतील. "हाय सिक्युरिटी नंबरप्लेट सक्ती'च्या वेळी हात झटकण्याचे प्रयत्न झाले, तसा प्रकार यावेळी अजिबात सहन केला जाणार नाही, अशी तंबीही पर्रीकर यांनी यावेळी दिली.
प्रशासनातील महसूलगळती व भ्रष्टाचार थांबवल्यास वर्षाकाठी किमान दीडशे कोटी रुपये वाचवणे शक्य असल्याचे सांगून आपण मुख्यमंत्री असताना महसूलप्राप्तीसाठी केलेल्या उपाययोजनांची आठवणही त्यांनी करून दिली. प्रत्यक्ष कर कमी करूनही उत्पन्न वाढवणे शक्य असल्याचे ते म्हणाले. गोवा हे देशातील सर्वांत जास्त दरडोई उत्पन्न असलेले राज्य आहे. इथे महसुलाचे अनेक मार्ग अप्रत्यक्षरीत्या उत्पन्नात भर घालत असतात. या गोष्टींचे योग्य नियोजन केल्यास व प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी केल्यास राज्याला महसूलाचा तुटवडा अजिबात भासणार नाही. महसुलातील गळती, कर आकारणी प्रक्रियेतील बेशिस्तपणा व प्रत्यक्ष जनतेकडून कर आकारूनही सरकारी खात्यात जमा न करण्याची खोटारडी वृत्ती या परिस्थितीला कारणीभूत असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
महागाई नियंत्रणाच्या नावाखाली सामान्यांची चेष्टा
दरम्यान, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात झालेली भाववाढ आटोक्यात आणण्याच्या नावाने सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे सर्वसामान्य जनतेची चेष्टाच असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. परतीच्या पावसाने सर्वत्र थैमान घातल्याने पुन्हा महागाई भडकली आहे. अन्नधान्याबरोबर फळभाज्या व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडले असून सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. सरकारी योजनेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे दर बाजारभावांप्रमाणेच बदलत असतात, त्यामुळे एकार्थाने आधीच महागाईमुळे भरडणाऱ्या लोकांची चेष्टा करण्याचाच हा प्रकार असल्याची टीकाही पर्रीकर यांनी यावेळी केली.

धर्मापूर अपघातात पिता - पुत्र ठार

दोन ट्रकांमध्ये सापडून
होंडा सिटीचा चक्काचूर


मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): मडगावहून सुमारे २ किमी अंतरावर धर्मापूर येथील जाकनीबांध पुलालगत नावेलीच्या बाजूने आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पितापुत्र जागीच ठार होण्याची हृदयद्रावक घटना घडली. भरवेगाने निघालेल्या दोन ट्रकांची जोरदार धडक बसून होंडा सिटीचा चेंदामेंदा झाला व त्यात असलेले गोमेंडीस पितापुत्र ठार झाले.
जॉनी गोमेंडीस (४५) व गास्पर गोमेंडीस (१७) अशी त्यांची नावे असून मुशीर - नावेली येथील रहिवासी आहेत.
सफेद रंगाच्या जीए ०७ सी ०९१६ क्रमांकांच्या होंडा सिटी गाडीतून गोमेंडीस पितापुत्र मडगावच्या दिशेने येत होते. यावेळी समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या जीए ०८ यू २४७१ क्रमांकाच्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. त्यासरशी कार मागे ढकलली गेली आणि मागून येणाऱ्या केए २२ - ७०२८ या ट्रकावर आदळली. भरवेगात वेगात असलेल्या या दोन्ही ट्रकांमध्ये गाडी चिरडली गेली व त्यात पितापुत्र चिरडून जागीच जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडक ेने गाडीचा चेंदामेंदा झाला व तिचे दरवाजे रस्त्यावर विखुरून पडले होते आणि पितापुत्राची ओळख पटण्यापलीकडे होती.
अपघाताचा कानठळ्या बसणारा आवाज ऐकून जवळपासचे लोक धावून आले व आतील पितापुत्राला त्याच स्थितीतही बाहेर काढले. त्यांना इस्पितळात हालवले असता तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा क रून तिन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. मडगाव पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
नावेली ते धर्मापूर पर्यंतचा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनत चाललेला आहे. आजवर येथील अपघातांनी अनेकांचे बळी घेतलेले असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. धर्मापूर पुलाच्या दोन्ही बाजूंना परप्रांतीयांनी दुकाने थाटलेली असून दुसऱ्या बाजूला बांधकाम सामान व सिमेंटच्या वस्तू विकणारी दुकाने रस्त्यालगत थाटलेली आहेत. तशातच एका माजी राजकारण्याने तेथे जवळच प्रार्थनास्थळ तयार केलेले असून तेथे दर शुक्रवारी लोकांची व वाहनांची गर्दी उसळत असून त्यामुळे येथे वाहतूकीची कोंडी होत असते.

नागरी पुरवठा खात्यात ३ लाखांची अफरातफर


प्रभारी कारकुनास अटक


फोंडा, दि.९ (प्रतिनिधी)- बेतोडा फोंडा येथील नागरी पुरवठा खात्याच्या गोदामातील सुमारे ३ लाख १ हजार ९८६ रुपयांच्या धान्याचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी गोदामाचा प्रभारी कारकून विशाल गोवेकर (अवंतीनगर - उसगाव) याला आज (दि.९) संध्याकाळी अटक केली आहे.
यासंबंधी नागरी पुरवठा खात्याचे संचालक सुनील मसूरकर यांनी फोंडा पोलिस स्टेशनवर तक्रार दाखल केली आहे. २८ एप्रिल २००८ ते ११ सप्टेंबर २००९ या काळात गोदामातील तांदूळ, गहू आदी धान्याचा गैरव्यवहार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या नागरी पुरवठा खात्याच्या बेतोडा फोंडा येथील गोदामातील व्यवहाराची वरिष्ठांनी अचानक गेल्या महिन्यात तपासणी केली असता गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. गैरव्यवहारप्रकरणी सरकारी पातळीवर कारवाईसाठी प्रयत्न सुरू असताना सदर प्रकरण दडपण्यासाठी राजकीय पातळीवरून प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, ह्या प्रयत्नांना यश आले नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
बेतोडा येथील नागरी पुरवठा खात्याच्या धान्य गोदामात यापूर्वी गैरव्यवहाराच्या घटना घडलेल्या आहेत. गोदामातील लाखो रुपयांचा गहू सुद्धा परस्पर बेतोडा येथील एका पीठ तयार करणाऱ्या कंपनीला विकण्यात आला होता. प्रियोळ म्हार्दोळ भागातील एका सोसायटीच्या कर्मचाऱ्याने सुद्धा स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा गैरव्यवहार केल्याचे उघड झालेले आहे.
या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर फोंडा पोलिसांनी संशयित विशाल गोवेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण तपास करीत आहेत.

काणकोण पूरग्रस्तांना मदत करुया...

१९६५ साली काणकोण पोलिस ठाण्याचा स्वतंत्र ताबा देत माझी तेथे नियुक्ती करण्यात आली. जनतेचे सहकार्य, प्रेम, पाठबळ आणि मदतीस धावून येण्याची वृत्ती यामुळे मी त्या भागात कायदा व सुव्यवस्था आणि तपासकार्यात यशस्वी ठरलो. त्याच दरम्यान गुजरातमधील कच्छ भुज भागातील चक्री वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या जहाजावरील दुर्दैवी (२१ मृत) खलाशांवर अंतिमसंस्कार व तातडीची मदत, कुटुंबीयांची निवासाची सोय करणे, नातलगांना वायरलेसवरून सतत माहिती देणे, जखमी खलाशांना सरकारी इस्पितळात दाखल करणे, लोकांच्या सहकार्याने त्यांच्या जेवणाची सोय करणे, अशी कामे तत्परतेने करावी लागली. त्यावेळचे मडगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रभाकर सिनारी यांनी माझ्या कामाची प्रशंसा करून सरकार दरबारी दखल घ्यायला लावली. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याहस्ते कांपाल येथे गोवा मुक्तिदिनी माझा जाहीर सत्कार करण्यात आला. अर्थात याचे श्रेय काणकोणला विशेषतः पोळे ते खोल-आगोंद खणगिणी या किनारपट्टीच्या लोकांच्या सक्रिय सहभागाला द्यावे लागेल. दुर्दैवाने हेच लोक आज नैसर्गिक कोपाचे बळी ठरले आहेत. त्यांचे संसार, घरदार व बागायती, उत्पन्नाची साधने यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे उद्ध्वस्त झालेले जीवन पाहून अतीव दुःख, वेदना होत आहेत. अशा संकटात सापडलेल्या दुर्दैवी बांधवांसाठी मी फुल ना फुलाची पाकळी समजून पाच हजार रुपये (५,०००) आर्थिक मदत "गोवादूत'शी सुपूर्द करीत आहे.
ज्या काणकोणवासीयांनी माझी पहिली कारकीर्द यशस्वी करण्यासाठी योगदान दिले त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आहे. काणकोणमध्ये नोकरी केलेले माझ्यासारखे जे कोणी सरकारी निवृत्त अधिकारी असतील, त्यांनीही या निधीला हातभार लावावा, अशी कळकळीची विनंती आहे.
आपला नम्र,
विष्णुदास वामन वेर्णेकर,
निवृत्त पोलिस अधीक्षक (गोवा)

Friday 9 October, 2009

नक्षल्यांच्या हल्ल्यात अठरा पोलिस शहीद

गडचिरोली जिल्ह्यातील लाहिरी येथील थरारक घटना

गडचिरोली, दि. ८ - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी नक्षलवाद्यांना भामरागड तालुक्यातील लाहिरी येथे "सी-६०' या विशेष पोलिस दलातील जवानांना गाठून त्यांच्यावर केलेल्या तुफाना गोळीबारात १८ पोलिस शहीद झाले. त्यामुळे राज्य सरकारला जबर धक्का बसला आहे.
लाहिरीनजिक राणी कोटूर येथे आदिवासी नेता बोगामी यांची समाधी आहे. या समाधीजवळच सुमारे ५०० सशस्त्र नक्षलवाद्यांनी ४० पोलिसांनी चारही बाजूंनी कडे करून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांमध्ये उपनिरीक्षक डी. एस. देशमुख यांचाही समावेश आहे. नक्षल्यांनी घेरल्यामुळे पोलिसांना आपली सुटका करवून घेण्याची संधीच मिळाली नाही. त्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शस्त्रांद्वारे नक्षल्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, तथापि नक्षली मोठ्या संख्येने असल्यामुळे पोलिसांची मात्रा चालली नाही. जेथे हल्ला झाला तेथील दृश्य करुण दिसत होते. सर्वत्र रक्त आणि मांसाचा सडा पडला होता. या भयंकर घटनेमुळे सारा गडचिरोली जिल्हा थरारून गेला आहे.
शहीद पोलिसांचे मृतदेह लाहिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले असून , ते गडचिरोलीला आणण्यासाठी भामरागड येथून ट्रॅक्टर पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान , गडचिरोली जिल्ह्यातच कोरची तालुक्यात नक्षलवाद्यांनी सुरेश खलानी याला ठार मारले.तसेच रामगड ग्रामपंचायत कार्यालय आणि तहसील कार्यालय जाळून टाकले.
याच वर्षी जानेवारी महिन्यात धानोरा पोलिस ठाण्यापासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर जंगलात सशस्त्र नक्षलवाद्यांनी १६ पोलिसांना ठार केले होते. त्यात ५ महिला शिपायांचा समावेश होता.
राज्याचे पोलिस महासंचालक (निवडणूक व्यवस्था) अनामी रॉय यांनी बुधवारी नागपूरमध्ये वार्ताहर परिषदेत शेजारच्या राज्यांमधून नक्षलवादी राज्यात आल्याचे आणि ते दहशतवादी कारवाया करण्याची शक्यता असल्याचे सांगितले होते. पोलिसांनीही मतदान लक्षात घेता भक्कम बंदोबस्त केला आहे, त्यादृष्टीने केंदीय राखीव पोलिस दलाची आणि अन्य पोलिस दलांची मदत घेण्यात आली आहे, असे रॉय यांनी सांगितले.
रॉय गेल्या तीन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथे निवडणूक व्यवस्थेचा तसेच कायदा सुव्यवस्थेबाबतच्या उपायांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक तीन टप्प्यात झाली होती. त्यामुळे पुरेसे मनुष्यबळ मिळू शकले. मात्र विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत आहे. मतदानात अडथळे येऊ नयेत म्हणून गडचिरोलीत विशेष काळजी घेण्यात येत आहे. तेथे बुलेटप्रूफ वाहने देण्यात आली आहेत. गतवेळच्या मतदानाच्या वाढत्या टक्केवारीमुळे नक्षलवाद्यांमध्ये अस्वस्थता आहे, असे ते म्हणाले.
राज्यभरात ५२,७०० जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. ४७, ६१६ परवाना शस्त्रे आणि २९५ बिगरपरवाना शस्त्रे जमा करण्यात आली. तर ४२ हजार जणांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.
रॉय यांची उलटसुलट विधाने
अलीकडे नक्षलवाद्यांकडून काही जणांना ठार मारण्याचे प्रकार झाले आहेत. या स्थितीत काही नक्षलवाद्यांना पकडण्यात आले आहे, काहीजण पोलिसांकडून मारण्यात आले. मात्र, किती नक्षलवादी पकडण्यात आले वा किती पोलिसांकडून ठार करण्यात आले, याची माहिती नसल्याचे रॉय म्हणाले. त्याचप्रमाणे रॉय यांनी गडचिरोलीतील मतदान शांततेत व्हावे म्हणून हेलिकॉप्टर देण्यात आली आहेत का, याबाबत नेमके उत्तर दिले नाही. मात्र, नंतर चार हेलिकॉप्टर देण्यात आली आहेत, असे सांगितले. निवडणूक आयोगाच्या सक्त निर्बंधांमुळे कोणत्या ठिकाणी किती पोलिस बळ पुरवण्यात आले आहे, याचा तपशील देता येत नसल्याचे ते म्हणाले.
चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकांनी पोलिस बंदोबस्ताचा तपशील वार्ताहरांना दिला तर राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून आपण का माहिती देऊ शकत नाही, यावर रॉय यांनी पोलिस अधीक्षकांनी दिलेली माहिती चुकीची (इनकरेक्ट) असल्याचे सांगितले.

२५ लाखांचे कोकेन जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- ""कुठे आहे अमली पदार्थ...छे, असले काहीच नाही येथे'', असा गृहमंत्र्यांनी कालच केलेला दावा फोल ठरवत अमली पदार्थ विरोधी पथकाने आज सकाळी एका नायजेरीयन तरुणाकडून ८६५ ग्राम कोकेन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत २५ लाख ८० हजार रुपये होते. पर्यटन मोसमास नुकतीच सुरुवात झालेली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आल्याने राज्यात अमली पदार्थाचा सुळसुळाट सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक केलेल्या तरुणाचे नाव फ्रायडे ओनयेचोलॅम (२९) असे असून आजच सकाळीच तो मुंबई येथून गोव्यात दाखल झाला होता, अशी माहिती पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी दिली. या विभागाचे पोलिस अधीक्षक वेणू बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. हल्लीच मोठ्या प्रमाणात फेरबदल करून नव्याने नियुक्त केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमुळे गेल्या एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोकेन पकडण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पथकाचे कौतुक केले आहे. संशयित फ्रायडे याला एनडीपीएस कायदा १९८५ कलम २१(सी)नुसार अटक केली असून त्याच्याकडून रोख रक्कम ९ हजार रुपये, दोन मोबाईल संच व पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ९.३० ही कारवाई करण्यात आली. या पथकाचे उपनिरीक्षक सुनील गुडलर व अन्य तिघे पोलिस शिपाई हे आज सकाळी म्हापसा पर्रा या परिसरात गस्तीवर असताना या संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले. "हॉटेल नवतारा'नजीक पाठीवर कॉलेज बॅग लावून संशयास्पद फिरणाऱ्या तरुणावर संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. पोलिसांना आपल्यावर संशय आल्याची चाहूल लागताच पळत सुटलेल्या फ्रायडे याला उपनिरीक्षक गुडलर यांच्यासह पोलिस शिपाई नागेश पार्सेकर, महादेव नाईक व श्रीनिवास पिडगो यांनी सुमारे शंभर मीटर पाठलाग करून ताब्यात घेतले. या दोन्ही शिपायांना बक्षीस देण्याची शिफारस उपमहानिरीक्षक यादव यांनी केली आहे. फ्रायडे याच्या बॅगमध्ये एका चादरीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत पोलिसांना कोकेन सदृश पदार्थ दिसल्याने त्वरित त्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरा पर्यंत त्याला अटक करण्याची कारवाई सुरू होती. पोलिस कोठडी मिळवण्यासाठी उद्या सकाळी त्याला न्यायालयात उभे केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अटक करून पोलिस स्थानकात आणल्यानंतर पथकाचे उपअधीक्षक नरेश म्हामल जातीने उपस्थित राहून तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. या विषयीचा अधिक तपास उपनिरीक्षक सुनील गुडलर करीत आहेत.

आणखी दोन घरे कोसळली

आगोंद, दि. ८ (वार्ताहर)- काणकोण येथील पूरग्रस्त भागाचे सर्वेक्षण एकूण ९३ घरे जमीनदोस्त झाल्याचा अहवाल तयार झालेला असतानाच आता खोतीगाव पंचायतक्षेत्रातच काल व आज मिळून एकूण दोन घरे कोसळली आहेत. याशिवाय धोकादायक स्थितीत असलेली आणखी दोन घरे केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पावसाच्या तडाख्याने कमकुवत झालेली घरे आता हळूहळू कोसळण्यास सुरूवात झाल्याने वास्तविक नुकसान आणि अहवाल यांच्यात तफावत आढळून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खोतीगाव पंचायतक्षेत्रातील दाबेल या वाड्यावर चंद्रकांत पुरसो वेळीप व धाकलो झरो वरक या दोघांची घरे जमीनदोस्त झाली. आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास धाकलो झरो वेळीप यांचे घर जमीनदोस्त झाल्यानंतर त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांना मदत करताना जखमी होऊन त्यांच्या हाताचे हाड मोडल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. याशिवाय चिम्मी वरक व गंगी वरक यांची घरे धोकादायक स्थितीत असल्याने ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
पुनर्वसन प्रक्रियेत शासकीय यंत्रणेचे अपयश पुसून काढण्यासाठी स्वयंसेवी संघटना जोमाने कार्यरत असून दात्यांकडूनही सढळहस्ते मदत केली जात आहे. परंतु, प्रत्यक्षात घरे उभी राहणे तेवढेच महत्त्वाचे असून त्यासाठी सिमेंट, रेती, चिरे, वासे, लाकडी दारे या वस्तूंची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया पैंगीण म्हालवाडा येथील प्रभुगावकर कुटुंबातर्फे देण्यात आली.

शेतीचे सर्वेक्षण अजून नाही
काणकोणातील शेतीच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात आल्याचा दावा सरकार करत असले तरीही पैंगीणमधील काही भागातील शेतीच्या नुकसानीचा आढावाच घेण्यात आलेला नाही, असे स्पष्ट झाले आहे. काणकोण आलेल्या प्रलयामुळे सुमारे १७०० शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल आहे. पारयेमळ येथील मानेलीबाग, साकळागाळ येथील शेती पुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त झाली आहे. उभे पीक नष्ट झाल्यामुळे कारेगाळ येथील गोपाळ वेळीप, चिमट वेळीप, पुरसो वेळीप, मोहन वेळीप यांच्यावर उपासमारीची पाळी येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपद्ग्रस्तांनी तलाठ्यांशी तब्बल तीन वेळी संपर्क साधला असला आहे. परंतु, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करून शेती व बागायतीची साधी पाहणीसुद्धा करण्यात आलेली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या लोकांनी आज खोला ग्रामपंचायतीत येऊन आपले गाऱ्हाणे मांडले. कृषी खात्याने या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी येथून होत आहे.

राज्यभरात १३१ कोटी अधिकृत नुकसानी

पणजी, दि.८ (प्रतिनिधी)- राज्यात व प्रामुख्याने काणकोण भागात पावसाच्या तडाख्यामुळे झालेल्या हानीचा सरकारी अधिकृत आकडा १३१ कोटी रुपये झाल्याची घोषणा आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, पूरग्रस्त भागातील केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत असलेली कमकुवत घरे, शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात होत असलेली चालढकल तसेच या तडाख्याचे भविष्यात स्पष्ट होणारे परिणाम लक्षात घेता हा आकडा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आज पर्वरी मंत्रालयातील परिषदगृहात विशेष मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्री कामत यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना राज्यातील पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती करून दिली. परतीच्या पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढलेच पण काणकोणात मात्र कहरच ओढवला. प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी भरवस्तीत लोटून आले व त्यामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त झाली तर काहींचे संसारच वाहून गेले. या आपत्तीत दोन व्यक्तींना आपला जीवही गमवावा लागला. अलीकडच्या काळातील हा भीषण प्रसंग होता. काणकोणवासीयांना आधाराची गरज आहे व त्यासाठी निश्चित कार्यक्रम आखून या लोकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री कामत म्हणाले.
दरम्यान, या नुकसानीचा खातेनिहाय तपशीलवार अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात घरे व इतर जीवनावश्यक वस्तू-१९.८० कोटी, उद्योग-३.३० कोटी, कृषी-१७.८५ कोटी, रस्ते-३० कोटी, पाणी पुरवठा-२ कोटी, वन-१.८५ कोटी, जलसंसाधन खाते-४८ कोटी, आरोग्य-२.३५ कोटी, वीज-५ कोटी व इतर जीवनावश्यक वस्तू-४०.३४ लाख अशी अधिकृत आकडेवारी नोंद करण्यात आली आहे. काणकोणवासीयांसाठी मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्याने आपले दोन महिन्यांचे वेतन मुख्यमंत्री मदतनिधीसाठी देण्याचे मान्य केले आहे. याबरोबर राज्यातील उद्योजक, समाजसुधारक, कॉर्पोरेट्स व इतरांना सढळहस्ते मदत करण्याचे आवाहन केल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, "सीआयआय', खनिज निर्यातदार संघटना व कंत्राटदार संघटनेकडे चर्चा करून पुनर्वसनाच्या कामात त्यांची मदत घेण्याबाबतही विचारविनिमय केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या हानीचा संपूर्ण तपशील केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना उद्या ९ रोजी सादर करण्यात येईल. पंतप्रधान व कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांनाही या नुकसानीचा तपशील सादर करू, अशी माहिती मुख्यमंत्री कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सरकारने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे ९३ घरे पूर्णपणे कोसळली आहेत तर सुमारे शंभर घरांची मोडतोड झाली आहे. घर कोसळलेल्या प्रत्येक कुटुंबाकडे जाऊन त्यांच्या घराचे क्षेत्रफळ व घर कसे हवे याची माहिती मिळवून त्याप्रमाणे पुढील नियोजन केले जाईल, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी दिली . आंध्रप्रदेश व कर्नाटकात भीषण पूरस्थिती उद्भवली आहे. या राज्यांना पत्र पाठवून त्यांना धीर देण्यात आला असून कोणतीही मदत पाहिजे असल्यास तात्काळ पुरवण्याची तयारीही गोव्याने दर्शवली आहे.
चौकशी समितीची स्थापना
काणकोणात उद्भवलेल्या भीषण जलप्रलयाची नेमकी कारणे शोधून काढण्यासाठी राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सतीश शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीवर प्रा. सुलोचना गाडगीळ,डॉ. डी. शंकर, हवामान खात्याचे संचालक के. व्ही. सिंग,जलसंसाधन खात्याचे संचालक संदीप नाडकर्णी, अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन यांची नियुक्ती करण्यात आली असून विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण खात्याचे संचालक मायकल डिसोझा हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

Thursday 8 October, 2009

मिलाग्रीस अर्बनमध्ये ३२ लाखांची अफरातफर


व्यवस्थापकास अटक


पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - गोवा वेल्हा येथील अवर लेडी ऑफ मिलाग्रीस अर्बन क्रेडिट सोसायटीत ३२ लाख ५० हजार रुपयांची अफरातफर केल्याप्रकरणी आज शाखेचे व्यवस्थापक श्रीकांत सखाराम विलोगी यांना आज आगशी पोलिसांनी भा.दं.सं. ४०९ कलमाखाली अटक केली. या प्रकरणाची पोलिस तक्रार क्रेडिट सोसायटीचे प्रशासकीय व्यवस्थापक फिलीप एन. कारनियनो यांनी सादर केल्यानंतर निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी संशयित विलोगी याला अटक केली.
प्राप्त माहितीनुसार गोवा वेल्हा येथे असलेल्या या के्रडिट सोसायटीच्या लेखा नोंद वहीत एप्रिल ०९ पर्यंत अनेक घोटाळे करण्यात आले आहेत. हा प्रकार एप्रिल महिन्यात उघडकीस येताच त्याची बॅंकेतर्फे चौकशी करण्यात आली. यात शाखेच्या व्यवस्थापकाचा गलथानपणा आणि या प्रकारासाठी दोषी असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार सादर करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी शाखेच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सुमारे ३२ लाख ५० हजार रुपयांचा हा घोटाळा असल्याने खातेधारकांमध्येही आज भीती पसरली आहे.
याविषयीचा अधिक तपास आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे करीत आहेत.

मूळ भारतीय शास्त्रज्ञ रामकृष्णन यांना नोबेल

स्टॉकहोम, दि. ७ - मूळ भारतीय आणि सध्या इंग्लंडमध्ये कार्यरत असणारे शास्त्रज्ञ व्यंकटरमण रामकृष्णन यांना यंदाचा सर्वोच्च मानाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. रसायनशास्त्रातील हा पुरस्कार त्यांना अमेरिकेचे थॉमस स्टिट्झ आणि इस्रायलच्या अदा योनाथ यांच्यासह संयुक्तपणे दिला जाणार आहे.
व्यंकटरमण रामकृष्णन यांचा जन्म १९५२ मध्ये तामिळनाडूतील चिदंबरम गावात झाला. त्यांनी बडोद्याच्या विद्यापीठातून बी. एस्सी. आणि ओहियो विद्यापीठातून एम. एस्सी. केले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. सध्या ते इंग्लंडमधील केंब्रिज शहरातील एमआयसी मोलेक्युलर प्रयोगशाळेत संशोधनाचे कार्य करीत आहेत. काही काळ त्यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात सॅन दिएगो येथे विद्यार्थ्यांना शिकविले. तसेच बायोकेमीस्ट्रीच्या क्षेत्रात डॉ. एम. मॉटल यांच्यासह संशोधन केले.
पेशींमधील प्रथिन निर्मिती प्रक्रियेच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हे कार्य त्यांनी थॉमस स्टिट्झ आणि अदा योनाथ यांच्यासह केले. क्रिस्टलोग्राफी शास्त्राच्या मदतीने पेशींमधील प्रथिन निर्मिती प्रक्रियेबाबत संशोधन केले. त्रिमिती चित्रांद्वारे त्यांनी प्रथिन निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखविली. त्यामुळे कोणते प्रतिजैविक शरीरात पेशींच्या संपर्कात आल्यावर काय परिणाम होतो, ही बाब पुरती स्पष्ट झाली आहे. या संशोधनामुळे आणखी प्रभावी प्रतिजैविकांची निर्मिती करणे शक्य होणार आहे.

"गौरी'चा व्हिसेरा अद्याप पोलिस स्थानकातच पडून

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - मेरशी येथील अपनाघरमध्ये निधन झालेल्या "गौरी' या ४० दिवसांच्या बालिकेचे "डीएनए' चाचणीसाठी ठेवलेला "व्हिसेरा' अद्याप हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला नसल्याने, पोलिस या प्रकरणातील आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. हे नमुने ७२ तासात हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पोचणे अत्यंत महत्त्वाचे होते. तरीही जुने गोवे पोलिसांनी हे नमुने आपल्याजवळ ठेवल्याने या नमुन्यांचा आता "डीएनए' चाचणीसाठी कितपत उपयोग होईल याबाबत शंका निर्माण झाली आहे.
"डीएनए' चाचणीसाठी मृत व्यक्तीचे नमुने चोवीस तासात संबंधित प्रयोगशाळेत पोहोचणे वैद्यकीय दृष्ट्या महत्त्वाचे असते. प्रयोगशाळेत त्या नमुन्यांवर योग्य रासायनिक प्रक्रिया करून ते टिकवून ठेवले जातात. "डीएनए' चाचणीसाठी घेतलेले गौरीचे नमुने गेल्या दहा दिवसांपासून जुने गोवे पोलिस स्थानकात चाचणीच्या प्रतीक्षेत पडलेले असून, यातूनच पोलिसांना हे प्रकरण हाताळण्यात किती स्वारस्य आहे, हे उघड होत आहे.
"गौरी'चा बाप कोण, तिच्या आईचे कोणाशी शारीरिक संबंध होते, याचा तपास करण्यासाठी विभागीय न्यायदंडाधिकारी साबाजी शेट्ये यांनी "डीएनए' चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार डॉक्टरांनी "गौरी'च्या शरीरातील काही नमुने टिकवून ठेवले होते. परंतु पोलिसांनी तिच्या वडिलांचा शोध घेतलेला नाहीच, शिवाय संशयित म्हणूनही अद्याप कुणालाच ताब्यात घेण्यात आलेले नाही. "गौरी'ची अविवाहित माता पोलिसांच्या ताब्यात असून, तिच्या बाबतीत नेमके काय घडले? कोणी तिचा गैरवापर केला? कोणी तिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवले? तसेच तिच्यावर विवाहापूर्वीच मातृत्व लादणारी "ती' व्यक्ती कोण याचा शोध घेण्यातही पोलिस दिरंगाई करत आहेत. "सीरियल किलर महानंद नाईक'सारख्या प्रकरणाने मुळातच मलीन झालेली पोलिसांची प्रतिमा यामुळे अधिक डागाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण पोलिसांच्या अशाच गलथानपणामुळे आणि बेजबाबदार वृत्तीमुळे फोंडा शहरात महानंदसारखा क्रूरकर्मा अनेक निष्पाप मुलींसाठी कर्दनकाळ ठरला. दीपाली ज्योतकर या तरुणीचा मृतदेह मिळाला त्यावेळी तिचाही "व्हिसेरा' अनेक वर्षे पोलिस स्थानकात खितपत पडला होता. याबाबत गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी जोरदार आवाज उठवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी केली होती. त्या अधिकाऱ्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. संशयित मृत्युप्रकरणी मृतदेहाचे नमुने घेतले जातात ते पोलिस स्थानकात कुजत पडतात आणि आरोपी मात्र उजळ माथ्याने दुसरा गुन्हा करण्यासाठी सावज शोधत फिरतात.

चोरट्यांचा पोलिसांनाच हिसका

निरीक्षकाच्याच घरात चोरी

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात गेल्या दोन वर्षात चोऱ्या करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या चोरट्यांनी आता चक्क पोलिस निरीक्षकाच्याच घरात चोरी करून राज्यातील तपास यंत्रणेला उघड आव्हान दिले आहे. काल रात्री नुवे येथे पोलिस निरीक्षक ऍडविन कुलासो यांच्या घरात घुसून चोरट्यांनी आत झोपलेल्या त्याच्या वडिलांच्या गळ्यातून सोनसाखळी खेचून पळ काढला.
काल भरदिवसा कोंबवाड्यावरील एका घरातून मोबाईल पळविण्याची घटना ताजी असताना चोवीस तासातील घडलेली ही दुसरी घटना आहे. चोरांना पोलिस निरीक्षकाच्याच घरात चोरी केल्याने मडगाव पोलिसांच्या तोंडाचे पाणीच पळाले आहे. या घटनेची आज पोलिस मुख्यालयातही जोरदार चर्चा सुरू होती.
कोलवा पोलिस स्टेशनवरील निरीक्षक ऍडविन कुलासो यांच्या नुवे येथील घरी हा प्रकार घडला असून ऍडविन हे जुने गोवे येथे राहतात तर त्यांचे आईवडील व बंधू नुवे येथील या घरात राहतात. काल रात्री नेहमीप्रमाणे ही मंडळी झोपलेली असताना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मागील दार उघडून आत प्रवेश केला. इतकेच नव्हे तर त्यांनी निरीक्षकांच्या वडिलांच्या गळ्यांतील साखळी खेचून पोबारा केला. या प्रकरणी पोलिस तक्रार नोंदविली गेली आहे. पोलिसांनी आज श्र्वानपथक आणून तपास केला पण श्वान तेथेच घुटमळत असल्याचे दिसून आले.
गेल्या दोन वर्षात चोरट्यांनी दक्षिण गोव्यात खास करून मडगाव शहरात धुमाकूळ माजवला आहे. परंतु, चोरांच्या एकाही टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. पोलिस दक्ष नसल्याने चोरट्यांचे फावते, अशी चर्चा सामान्यतः नागरिकांत सुरू असते, आता तर चक्क पोलिसांच्याच तोंडून घास पळवण्याचा प्रकार घडल्याने गृहखाते याचे खापर कोणावर फोडणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून चोरांनी दिलेले आव्हान पोलिस खाते स्वीकारते की नाही, हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.

धनादेश वितरणातही "गोंधळ'

आगोंद, दि. ७ (वार्ताहर)- काणकोण येथील जलप्रकोप झालेल्या भागात मदत पोचवण्याच्या कार्यात शासकीय यंत्रणा सपशेल अपयशी ठरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आज संध्याकाळपर्यंत महालवाडा येथील वत्सला पागी व अन्य पाच कुटुंबांना सरकारतर्फे १० हजारांचा धनादेश व दोन हजार रोख रक्कम मिळाली नव्हती. यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात विचारपूस केली असता उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला तयार असलेले दोन धनादेश त्वरित सुपूर्द करण्याचे आदेश दिले. उर्वरित चार कुटुंबांना मडगाव येथून धनादेश आल्यावर दिले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच पाणयेफोंड येथील विनायक सज्जगी या पूरग्रस्तालाही अद्याप मदत धनादेश मिळालेला नसल्याचे स्पष्ट झाले.
काणकोणात शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असतानाच स्वयंसेवी संघटना व भाजपतर्फे मदतकार्य जोरात सुरू असल्याचे चित्र आज अनेक ठिकाणी दिसले. किंदळे, पाणयेफोंड, पैंगीण, मयक, पर्तगाळ, भाटपाल, पासेल, मोर्खड, इडदर, तामणे भागात प्रत्यक्ष पुनर्वसनाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पूरग्रस्त भागात केवळ जेवणाची पाकिटे तसेच काही प्रमाणात कपडे लत्ते पुरवण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. ललित रिसॉर्ट या पंचतारांकित हॉटेलतर्फे दररोज सुमारे २ हजार जेवणाची पाकिटे पुरवली जात आहेत. भाजपतर्फे आज पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यासाठी परिस्थितीची जाण असलेले संबंधित भागाची इत्थंभूत माहिती असलेल्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी आपद्ग्रस्तांना अन्नधान्याचे वितरण केले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आर्थिक साह्य उपलब्ध करण्यासाठी निधी संकलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाणयेफोंड मणगण येथील पंता सोमा पागी (७०) या वयोवृद्धाचे घर अन्य सात कुटुंबीयांच्या घरांसह जमीनदोस्त झाले होते. आज स्वयंसेवी संघटनांनी त्यांना मदत दिल्याने त्यांनी खुषी व्यक्त केली. पंता पागी आपल्या देविदास पागी या मुलासोबत राहत होते. घराच्या पायऱ्यांशिवाय अन्य कोणतीच खूण येथे अस्तित्वात नाही. शेगडी मिळालेली असली तरी इंधन नसल्याने अन्न कसे शिजवायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झालेला आहे.

विहिंपतर्फे शालेय साहित्याचे वितरण
विश्व हिंदू परिषदेतर्फे आज शालेय विद्यार्थ्यांसाठी १०० स्कूल बॅग्ज, वह्या व अन्य शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रभात वेर्णेकर, मिलाताई कळंगुटकर पैंगीण भागातील आपद्ग्रस्तांना साहित्याचे वितरण केले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज संध्याकाळी ६ वाजता काणकोणातील परिस्थितीचा फेरआढावा घेतला. यानंतर त्यांनी आपला मोर्चा पैंगीण येथे वळवला. दरम्यान, सरकारतर्फे वितरित करण्यात येणारी मदत स्वतःच्या पक्षाची असल्याप्रमाणे भासवत कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून अक्षरशः उधळपट्टी सुरू असल्याची खंत येथील एक व्यापारी कृष्णा देसाई यांनी व्यक्त केली. गैरसरकारी संघटनांकडून दिली जाणारी मदत त्या त्या संघटनेने स्वतः जाऊन वितरित करावी, असे आवाहन त्यांनी केले.
क्रीडामंत्री बाबू आजगावकर, कॉंग्रेसचे विजय सरदेसाई, माजीमंत्री इजिदोर फर्नांडिस यांनी आज दुपारी महालवाडा पैंगीण येथे भेट दिली असली तरी अद्याप सरकारतर्फे या भागात कोणीच फिरकले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. आज या मंत्र्यांनी या भागाला भेट दिली खरी परंतु आश्वासनाखेरीज आपद्ग्रस्तांच्या पदरी काहीच पडले नाही, असे सांगण्यात आले.
काणकोणचे नगराध्यक्ष श्यामसुंदर देसाई यांनी लवकरच मदत निधी उभारण्याचे संकेत दिले. यात पालिका कर्मचारी आपला दोन दिवसांचा पगार तसेच नगरसेवकही आपले योगदान देणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

५० लाखांचे पॅकेज जाहीर
नगरविकासमंत्री ज्योकिम आलेमाव यांनी काणकोण पालिकेने जाहीर केलेला पाच लाख रुपयांचा निधी चेकस्वरुपात संबंधितांना दिला. संपूर्ण जमीनदोस्त झालेल्या घरांचे सर्वेक्षण करून प्रत्येक घराच्या पुनर्निमितीसाठी ५० लाखांचे पॅकेज पाणयेफोंड मणगण येथे घोषित केले.
दरम्यान, गोवा पुनर्वसन महामंडळाचे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गोवा रेंदेर संघटनेचे अध्यक्ष व पुनर्वसन महामंडळाचे सदस्य सायमन डिसोझा, आरनॉल्ड रेगो, हनुमंत कोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गावकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी पाणयेफोंडच्या पूरग्रस्तांना मदत वितरित केली.

आयत्या बिळात नागोबा
मडगाव, (प्रतिनिधी): मडगाव नगरपालिकेने काल रस्त्यावर अतिक्रमण करून वाहतुकीत व्यत्यय आणल्याच्या आरोपाखाली जप्त केलेल्या चार फळगाड्यांवरील सर्व फळे आज काणकोण पूर पीडितांना पाठवून दिली व फुकटचे श्रेय उपटण्याचे काम केले. मिळालेल्या माहिती प्रमाणे अशा प्रकारे जप्त केलेल्या वस्तू दंड वसूल करून संबंधितांना परत केल्या जातात. मुख्याधिकाऱ्यांनीही प्रत्येकी एक हजार रु. दंड वसूल करून ही फळे मालकांना परत करावी असा शेरा मारला होता. त्यामुळे ते गाडे पालिकेच्या जागेत ठेवले होते. परंतु आज सकाळी आलेल्या नगराध्यक्षांनी ती फळे काणकोण येथील पूरग्रस्तांना पाठवून देण्याचे फर्मान सोडले व त्यामुळे नगरपालिकेने या फळांचे श्रेय फुकटचे लाटल्याची चर्चा आज पालिकेतच सुरू होती.

Wednesday 7 October, 2009

नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक!

वास्को, दि. ६ (प्रतिनिधी): विमानतळावर चांगली नोकरी मिळवून देतो, पैसे दुप्पट करवून देतो अशा स्वरूपाची आमिषे दाखवून, अनुसूचित जातीजमातींच्या गोव्यातील सुमारे ८०० जणांना फसवून कोट्यवधी रुपयांना वास्कोतील एका व्यक्तीने गंडा घातल्याचे आज उघडकीस येताच शहरात प्रचंड खळबळ माजली. ज्यांना गंडा घालण्यात आला अशांमध्ये केपे, सांगे, काणकोण अशा वेगवेगळ्या भागांतील लोकांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी शेकडो लोकांनी सदर इसमाच्या कार्यालयावर जाऊन याप्रकरणी जोरदार आवाज उठवल्यावर या प्रकरणाला तोंड फुटले.
आज दुपारी वास्कोतील एफ. एल. गोम्स मार्गावर असलेल्या एका कार्यालयात काणकोण, केपे अशा वेगवेगळ्या भागातील पुरुष व महिलांनी हंगामा घालण्यास सुरुवात केल्याने स्थानिक लोकांमध्ये काय घडले याबाबत उत्सुकता निर्माण झाली. नंतर घडाळ्याचा काटा पुढे सरकू लागताच वातावरण तापत गेले. त्यामुळे वास्को पोलिसांना पाचारण केले असता वास्कोमध्ये राहणाऱ्या एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याने सुमारे ८०० लोकांना काम देण्याचे आश्वासन तसेच इतर काही आश्वासने देऊन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. सुमारे वर्षापूर्वी काणकोण, केपे, सांगे अशा वेगवेगळ्या भागांतील (सुमारे २५ गावांतील लोकांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले) लोकांकडून चाळीस हजार, साठ हजार, दीड लाख अशी वेगवेगळी रक्कम घेऊन त्यांना दाबोळी विमानतळावर नोकरीस देतो,अशी आश्वासने देऊन त्यांचे पैसे गूल केल्याने आज यापैकी काही संतप्त लोक येथे जमा झाले व आपल्या पैशासाठी हुज्जत घालू लागले. वास्को पोलिसांना हे वृत्त समजताच पोलिसांनी मध्यस्थी करून सर्वांनाच वास्को पोलीस स्थानकावर नेले. दरम्यान, सदर प्रकाराबाबत "गोवादूत' च्या प्रतिनिधीने हुज्जत घालत असलेल्या काही जणांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता बिंदिया वेळीप या महिलेने आपल्याकडून ६० हजार घेतल्याचे सांगून फसवल्याची माहिती दिली. सुविक्षा वेळीप या महिलेला विचारले असता तिनेही ६० हजार दिल्याचे सांगून कामाला लावल्याचे दाखवण्यासाठी दोन महिने आपल्याला आठ-आठ हजार देऊन फसविल्याची माहिती दिली. बेलाबाई, वास्को येथे राहणाऱ्या सदर इसमाने एका ट्रस्टची स्थापना करून अनुसूचित जमातीच्या बेरोजगार लोकांना कामाला लावण्याच्या नावाखाली शेकडो लोकांना फसविल्याची माहिती काही जणांनी दिली. पुरुषांप्रमाणेच मोठ्या प्रमाणात महिलांनाही फसवण्यात आल्याची माहिती मिळाली. हा सगळा आर्थिक घोटाळा असल्याचे समजताच अनेकांनी आपल्या पैशांची मागणी करण्यास सुरवात केली, त्यावेळी या इसमाने त्यांना धनादेश दिल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, याबाबत वास्को पोलिसांना संपर्क साधला असता आज घडलेल्या प्रकाराची आपणास माहिती आहे, मात्र यासंदर्भात तक्रार नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले. सासमोळे बायणा येथील अन्य एका महिलेचा या फसवणुकीत हात असल्याचे उघडकीस आल्याची माहिती मिळाली. ६ कोटींच्या आसपास हा घोटाळा असण्याचा संशय वास्को पोलिस सूत्रांनी व्यक्त केला. आज आलेल्या लोकांना आपण पैसे परत करण्याचे तोंडी आश्वासन पोलिस स्थानकावर देण्यात आल्याने त्यांनी आपली तक्रार नोंदविली नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, हा घोटाळा करणारा इसम केंद्र सरकारचा एक कर्मचारी असून त्यांची कोट्यवधींची मालमत्ता असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरू आहे. त्याच्याकडे हा पैसा कुठून आला आहे, याबाबत संबंधित खाते का तपासणी करत नाही, असा प्रश्न लोकांतून विचारला जात आहे. लोकांना गंडा घालता यासाठी सदर इसमाने दाबोळी येथे कार्यालय उघडले होते, अशी माहितीही उपलब्ध झाली आहे.

सरकारी वकीलही वेतनाविना

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): सरकारतर्फे न्यायालयात खटले लढवणाऱ्या वकिलांना गेल्या ९ महिन्यांपासून अनियमित वेतन दिले जात असल्याचे आज उघड झाले. या प्रश्नाकडे आज न्यायालयाचे लक्ष वेधले असता, येत्या शुक्रवार दि. ९ ऑक्टोबर पर्यंत याचे कारण स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ऍड. जे ए. लोबो यांनी याविषयीची याचिका दाखल केली आहे.
अनेक सरकारी वकिलांना (पी.पी) नऊ महिन्यांपासून एक रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही. सरकारतर्फे गुन्हेगारी स्वरूपाचे खटले न्यायालयात लढवण्याचे काम "पब्लिक प्रोसीक्युटर'ना दिले जाते. मात्र त्यांचे वेतन देण्याची वेळ येते त्यावेळी ते मिळत नाही, असे याचिकादारातर्फे युक्तिवाद करताना ऍड. महेश सोनक यांनी न्यायालयात मांडले. याची दखल घेऊन येत्या दोन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.
वेतन देण्यास उशीर का लागतो, असे का होते? याची कारणे आम्ही शोधून काढू, असे आश्वासन यावेळी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी खंडपीठाला दिले. खटला संपल्यानंतर त्या संबंधित वकिलाला बिल सादर करण्यास सांगितले जाते. त्यावेळी ती बिले व्यवस्थित लावलेली नसल्यास, त्यावर हरकत घेऊन ती स्थगित ठेवली जातात, त्यामुळे त्याला उशीर होत असल्याचे यावेळी ऍड. कंटक यांनी सरकारची बाजू मांडताना सांगितले.

राज्यात बनावट नोटांचा सुळसुळाट

पणजी व मडगाव, दि. ६ (प्रतिनिधी): आयसीआयसीआय बॅंकेच्या पणजी शाखेत १३ हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा जमा झाल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात सादर झाली आहे. याविषयीची तक्रार शाखेच्या व्यवस्थापक सुरेखा सिक्वेरा यांनी दिली आहे. दोन महिन्याच्या कालावधीत नोंद झालेली ही दुसरी तक्रार आहे.
पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली असून सदर नोटा तपासणीसाठी पुणे येथील फोरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले जाणार असल्याचे माहिती पोलिसांनी दिली. ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीत ही रक्कम जमा झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यात १ हजाराच्या चार, ५०० रुपयाच्या एकोणीस तर १०० रुपयांच्या दोन नोटा आढळून आल्या आहेत. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तुषार लोटलीकर करीत आहेत.
दरम्यान, मडगाव येथील आयसीआयसीआय बॅंकेत पुन्हा बनावट नोटा सापडण्याचा प्रकार घडला असून त्यामुळे पोलिसही पुन्हा चक्रावले आहेत. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
काल नोंदविलेल्या तक्रारीनुसार एकूण १७,६०० रुपयांच्या या नोटा असून त्यात हजाराच्या २ तर पाचशे रुपयांच्या ३२ व शंभराची एक नोट आहे. आयसीआयसीआय बॅंकेत अशाप्रकारे बनावट नोटा सापडण्याची ही तिसरी वेळ आहे. दोन महिन्यापूर्वी उघडकीस आलेले प्रकरण पोलिसांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपविलेले असतानाच हा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

न्यायालयाने घेतला धसका!

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): बनावट नोटांचा प्रसार करणाऱ्या माफियांनी देशाच्या विविध भागांसोबत आता गोव्यातही थैमान घातले आहे. न्यायव्यवस्थेनेही बनावट नोटांचा धसका घेतला असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा प्रशासन विभागही त्याला अपवाद नाही. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याला न्यायालयाने दिलेल्या दंडाची रोख रक्कम जमा करून घेण्यास नकार देताना, ही रक्कम धनादेशाद्वारे किंवा "डीडी'द्वारे भरण्याची सूचना न्यायालय प्रशासनातील अधिकाऱ्याने केली आहे. आज केंद्रीय मंत्रालयाचे ऍडव्होकेट एटर्नी कार्लुस फरेरा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देताच, रजिस्ट्रारला न्यायालयात बोलावून या विषयीची चौकशी करण्यात आली. तेव्हा बनावट नोटांच्या भीतीपोटी रोख रक्कम जमा करून घेतली जात नसल्याचा प्रकार उघडकीस आला.
या घटनेने आणखी एक गोष्ट प्रकाशात आणली आणि ती म्हणजे एखादी मोठी रक्कम न्यायालयात आल्यास त्याची छाननी करण्याची कोणतीही यंत्रणा जिल्हास्तरीय तसेच अन्य न्यायालयांकडे नाही. नोटा बनावट असल्याचे आढळून आल्यास त्याची पोलिस तक्रार करावी लागते अन्यथा भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे मिळत नाही. त्यामुळे या अशा सर्व वाटाघाटींना फाटा देण्यासाठी धनादेश किंवा "डीडी'लाच प्राधान्य देण्याचा निर्णय न्यायालय प्रशासनाने घेतला आहे. या घटनेमुळे बनावट नोटांचा किती सुळसुळाट झाला आहे, याची प्रचिती न्यायालयाला नक्कीच आली असावी.
दरम्यान, सरकारी वनक्षेत्रात खाण व्यवसाय सुरू असल्याचा दावा करून ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. अनेक वेळा आदेश देऊनही प्रतिज्ञापत्र सादर केले जात नसल्याचे लक्षात येताच मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून गेल्या १४ ऑगस्ट ०९ रोजी गोवा खंडपीठाने १० हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले होते. तसेच ही रक्कम ५ ऑक्टोबरपूर्वी जमा करण्याचेही आदेश दिले होते. सदर रक्कम आज सकाळपर्यंत जमा झाली नसल्याचे न्यायालयाच्या लक्षात येताच त्यामागील नेमके कारण उघडकीस आले. या संपूर्ण घटनेनंतर सदर दहा हजार रुपयांचा धनादेश दुपारी जमा करण्यात आला.

पूरग्रस्तांसाठी केंद्राकडून गोव्याला फक्त ५ कोटी!

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): राज्यातील पूरस्थितीची विशेष करून काणकोण तालुक्यावर ओढवलेल्या भीषण आपत्तीची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना देण्यासाठी दिल्लीला गेलेल्या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना केंद्राकडून केवळ ५ कोटी रुपयांची तातडीची मदत देण्याचे आश्वासन मिळाले आहे. या पूरस्थितीबाबत सविस्तर अहवाल पाठवल्यावर "पुढील मदतीबाबत बघू', असे सांगत एक प्रकारे गोवा सरकारच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. त्यामुळे काणकोणवासीयांच्या पुनर्वसनाचे आव्हान राज्य सरकारलाच पेलावे लागेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेतली व राज्यातील विविध भागांत २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची जाणीव करून दिली. दरम्यान, या परिस्थितीवर मात करण्यासाठी तातडीची मदत म्हणून केंद्राने ५ कोटी रुपये राज्य सरकारला देण्याचे ठरवले आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातील पुराचा सविस्तर अहवाल गृहमंत्रालयाला पाठवा,अशी सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.या अहवालाचा अभ्यास करून केंद्रातर्फे एक पथक गोव्यात पाठवण्यात येणार असून ते पूरस्थितीचा आढावा घेईल. काणकोण तालुक्यावर ओढवलेली स्थिती "राज्य आपत्ती' म्हणून जाहीर करण्यात आल्याने तात्काळ ५ कोटी देण्याचे मान्य करून नंतर आणखी मदतीचे पाहू, एवढेच केंद्राकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले.
दरम्यान, कामत यांनी केंद्रीय कृषी सचिव नंदाकुमार यांची भेट घेतली व त्यांना कृषी उत्पन्नाच्या हानीची माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व मुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव यदुवंशी हजर होते.
पिकांची हानी ११ कोटींची
काणकोण तालुक्याच्या विविध भागात आलेल्या भातशेती तसेच फळबागायतींची मोठी नुकसानी झाली आहे. राज्याच्या कृषी खात्यातील २२ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामाला लावून यासंबंधीचा अहवाल तयार करण्याचे काम जोरात सुरू असल्याची माहिती देण्यात आली.प्राथमिक अहवालानुसार सुमारे १७०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यात ८०० हेक्टर क्षेत्रातील पिकाची हानी झाल्याचा अंदाज आहे.या पिकाची हानी अंदाजे २ कोटी रुपये तर त्याबरोबर पंपसेट,जलवाहिनी,पंप हाउस,कुंपणाची भिंत,नाले व इतर कृषी अवजारे व यंत्रणांची सुमारे ५ कोटी रुपयांची नुकसानी झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.पूरस्थितीमुळे राज्यातील सुमारे २७०० हेक्टर भातशेती पाण्याखाली गेली आहे. एकूण हानी ११ कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. दरम्यान,शेतकऱ्यांना भरपाईसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली.

खंडणीतून मुलाचे अपहरण काणकोणात तिघांना अटक

मडगाव, दि. ६(प्रतिनिधी): १६ सप्टेंबर रोजी मोती डोंगर येथून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केले व त्याला पाटणे काणकोण येथे नेऊन डांबले, त्याच्यावर अत्याचार केले व अखेर त्याच्यावर एअर गनने गोळीबार केल्याप्रकरणी काणकोण पोलिसांनी आज एकूण तिघांना अटक केली व नंतर त्यांना मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यातील दोघे पाटणे काणकोण येथील तर तिसरा शिरोडा येथील आहे. एकंदर प्रकरण पहाता हे खंडणी वसुलीचे प्रकरण असल्याचे दिसते.
सदर मुलाचे नाव हसन कुरेशी असे असून त्याचे मोतीडोंगरावर अपहरण करून मडगावातच ठेवले होते, नंतर २४ रोजी त्याला मोटारीतून काणकोणात पाटणे येथे नेऊन एका खोलीत ठेवले.
तेथे त्याला मारहाण केली गेली तर २८ रोजी एअर गनने त्याच्यावर ५ गोळ्या झाडल्या गेल्या. त्यातील दोन चुकल्या तर तीन छरे त्याच्या पाय, हात व डोक्याला लागले. तो जखमी अवस्थेत तसाच राहिला व काल संधी मिळताच त्या खोलीतून निसटला व आज पोलिसात जाऊन त्याने एकंदर प्रकार विदित केला. त्यावरून पोलिसांनी लगेच कारवाई करून कमरुद्दीन जसानी (पाटणे) व रिचर्ड रॉड्रगिस (शिरोडा) तसेच सर्वेश धुरी (पाटणे) यांना अटक केली व त्याच्या अपहरणासाठी वापरलेली जीए०८ यू ०३०६ ही गाडी ताब्यात घेतली आहे.
हे अपहरण मडगाव पोलिसांच्या कक्षेत घडलेले असल्याने तिघाही आरोपींना मडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अधिक तपास चालू आहे.

'आग रामेश्र्वरी अन् बंब सोमेश्र्वरी'

काणकोणात प्रत्यंतर
मडगाव, दि.६(प्रतिनिधी): काणकोणमधील प्रलयकारी महापुराचा राजकीय लाभ उपटण्यासाठी सध्या सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये अहमहमिका लागलेली असून त्याचे प्रत्यंतर दिवसागणिक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहे. यात पूर निवारण कामावर भर देण्याऐवजी या कामाचा आपल्याला राजकीय लाभ कसा घेता येईल याचीच शक्कल लढविताना ते दिसत आहेत. सरकारी अधिकारीसुद्धा या कामी त्यांना मदत करताना आढळून येत आहेत.
शुक्रवारी दुपारी आलेल्या या प्रलयाला आज पाच दिवस उलटलेले असले तरी पूर निवारण कामात सरकारी यंत्रणेपेक्षा स्वयंसेवी संस्थांनीच अधिक आघाडी घेतलेली दिसून येत आहे. खोतीगाव, मणे सारख्या भागात अजूनही सरकारी मदत पोहोचलेली नाही, अशी तक्रार तेथील आपद्ग्रस्तांनी आज त्या भागात गेलेल्या पत्रकारांकडे केली. सरकारी मदत मग ती आर्थिक असो वा वस्तूरुपांतील असो ती दळणवळणाची सोय असलेल्या भागापुरती आहे. पण ज्या भागात पाय तुडवत जावे लागते असे भाग अजूनही मदतीविना आहेत. परंतु सरकारी यंत्रणा मात्र सर्व भागात मदत पोचल्याचे दावे करत आहे. प्रत्यक्षात आपद्ग्रस्तांच्या हाल अपेष्टा सुरूच आहेत.
ज्यांची घरे वाहून गेली आहेत त्यांना धान्य मिळाले पण ते शिजविण्यासाठी भांडी नाहीत, स्टोव्ह मिळाले पण त्यात घालण्यासाठी केरोसीन कोठून आणणार अशी येथील परिस्थिती आहे. अखेर आज एका सहृदयी व्यापाऱ्याने प्रसंग ओळखून केरोसीन साठा उपलब्ध करून दिला. ही अवस्था एका वाड्याची नाही तर पैंगीण, लोलये व श्रीस्थळ पंचायतीच्या कक्षेतील गालजीबाग व तळपण नदीच्या तीरावर असलेल्या प्रत्येक वस्तीची आहे.
रविवारी मुख्यमंत्र्यांनी दहा हजारांचा धनादेश व दोन हजार रोकड अशी मदत वितरित केली पण ही मदत करताना देखील येथे राजकारण केले गेले. यात आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून असलेली सत्ताधारी पक्षांतील मंडळी असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. या पुराचा फटका दक्षिण काणकोणला सर्वाधिक बसला आहे. त्यामानाने उत्तर काणकोणला कमी प्रमाणात फटका बसल्याची साक्ष कोसळलेली व वाहून गेलेली घरेच देत आहेत. असे असताना रविवारी दिलेल्या धनादेशांत पैंगीण पंचायतीतील रहिवाशांसाठी एकही धनादेश नव्हता. वास्तविक सर्वाधिक फटका या पंचायतीला बसलेला असताना असा हा प्रकार घडावा यातून पुराचा राजकीय फायदा घेण्याचा डाव उघड होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आपद्ग्रस्तांची नाव नोंदणीच नव्हे तर नुकसानभरपाईचा आकडा ठरविण्यापर्यंत या मंडळीचा तेथे हस्त क्षेप सुरू असून अधिकारी त्यांच्या दडपणाला बळी पडत आहेत. त्यामुळे आपद्ग्रस्तांमध्ये असंतोष माजलेला असून त्यात खरे आपद्ग्रस्त बाजूला पडून भलतेच लोणी खाऊन मोकळे होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या भागाला भेट देणारे मुख्यमंत्री वा अन्य मंत्र्यांनी कुठे जावे कुठे जाऊ नये हे देखील हीच मंडळी ठरवते. यामुळे 'आग रामेश्र्वरी अन् बंब सोमेश्र्वरी ' असा प्रत्यय काणकोणात येऊ लागलेला आहे.

Tuesday 6 October, 2009

सरकारी यंत्रणा सपशेल 'फेल' तात्काळ मदत द्या; पर्रीकर कडाडले

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): काणकोण तालुक्यातील उघड्यावर पडलेल्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यात प्रशासकीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. ही घटना शुक्रवारी घडली असताना गांधी जयंती धरून तीन दिवसांच्या सुट्टीवर असलेल्या प्रशासकीय यंत्रणेचे कुठेच अस्तित्व जाणवत नव्हते. केंद्राकडून मदतनिधी मिळेल व त्यानंतर या लोकांचे पुनर्वसन केले जाईल हे अजिबात चालणार नाही. आपद्ग्रस्तांना योग्य पद्धतीने व पुरेशा प्रमाणात तात्काळ मदत मिळायलाच हवी, अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज पणजी येथे पत्रपरिषदेत ते बोलत होते. मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यावेळी उपस्थित होते. पुरामुळे भयाण प्रसंग काणकोणवासीयांवर ओढवला आहे. तसेच राज्यातील इतर भागांतही शेतीची प्रचंड नासाडी झाली आहे, त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार या आपत्तीचा आकडा शंभर कोटी रुपयांवर जाईल, अशी शक्यता श्री. पर्रीकर यांनी व्यक्त केली.
काणकोण भागांत शेकडो लोकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेकांच्या घरांत पाणी शिरून चिखल साचला आहे. मुख्यमंत्री व इतर मंत्री या भागाला भेट देतात. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा त्यांच्याभोवतीच घिरट्या घालत आहे. सरकारी मदत सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी सुनियोजनाची गरज आहे. सगळा संसारच वाहून गेलेल्या लोकांना सुरुवातीला प्राधान्यक्रमाने पिण्याचे पाणी, कपडे, स्टोव्ह, केरोसीन, गॅस आदींची सोय करून देणे गरजेचे आहे. पहिले दोन दिवस सरकारी यंत्रणेचे अस्तित्वच दिसले नाही. या काळात येथील केशव सेवा साधना संस्थेतर्फे सुमारे ६०० ते ७०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. भाजयुमोतर्फे तात्काळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. काही लोकांच्या घरात चिखल साचला असून अग्निशमन दलाच्या मदतीने हा चिखल हटवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. तसे घडलेले दिसत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक भागांत या कामांत झोकून दिले आहे. मुख्यमंत्री कामत यांनी पीडितांच्या हाती धनादेश ठेवले; पण त्या बदल्यात बॅंकेच्या साहाय्याने रोख रक्कम दिली असती तर त्याचा जादा फायदा झाला असता. बॅंकेत हे धनादेश वठण्यास दोन दिवस गेले. पैसे मिळाले तरी वस्तू विकत घेण्यासाठी दुकाने हवीत. तीदेखील पुरात वाहून गेल्याने मडगाव शहरातून काही प्रमाणात जीवनावश्यक वस्तू या लोकांना विकत घेण्यासाठी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे का, याचाही विचार व्हायला हवा. काणकोणात ही दारूण परिस्थिती ओढवली असताना राज्यात मोफत सिलिंडर वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाअंतर्गत देण्यात आलेले सिलिंडर काणकोण भागाकडे वळवण्याची सुबुद्धीही कुणालाच सुचली नाही हे दुर्दैवच, असेही पर्रीकर म्हणाले.
सुरुवातीला आपद्ग्रस्तांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री कामत हे स्थानिक आमदार विजय पै खोत यांना बरोबर घेऊन फिरले; परंतु धनादेशाचे वाटप करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना डावलून भलत्याच लोकांना सोबत घेण्याची त्यांची कृती अशोभनीय असल्याचा टोला पर्रीकर यांनी हाणला. आमदार विजय पै खोत व रमेश तवडकर यांच्याकडून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्यांना मदत करण्यासाठी धडपड सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. सुरुवातीला या भागांत सरकारने पाठवलेल्या तलाठ्यांच्या गटाकडून कोऱ्या कागदावर पूरग्रस्तांच्या सह्या घेण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिल्याचे पर्रीकर म्हणाले. मुळात सदर तलाठ्यांनी नुकसानीचा तपशील लिहून घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच हानीचा नेमका तपशील मिळू शकेल,असे पर्रीकर म्हणाले.
-------------------------------------------------------------
भाजपतर्फे मदतनिधी
भाजपतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतनिधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून पक्षातर्फे १ लाख रुपये घोषित केले आहेत. भाजप विधिमंडळ गटाकडून १ लाख रुपये या मदतनिधीत जमा करण्यात आले आहेत. पक्षाचे कार्यकर्ते सर्वत्र फिरून मदतनिधी गोळा करणार असल्याने त्यांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. पक्षाला मोठ्या प्रमाणात मदत करणाऱ्यांना करसवलतही प्राप्त होणार आहे. एखाद्या दात्याला भाजपनिधीमार्फत पूरग्रस्तांना मदत पोहचवायची असले तर त्यांनी भाजप मदत निधीच्या नावाने धनादेश किंवा रोख रक्कम पक्षाच्या मुख्यालयात पाठवावेत, असेही याप्रसंगी सांगण्यात आले.

वस्तुस्थितीपासून सरकार दूरच!

काणकोण, दि. ५ (सागर अग्नी): भरले संसार आणि घरे पुराच्या तडाख्यात वाहून गेल्यानंतर काणकोणवासीयांना प्रत्यक्षात अन्नधान्य, कपडालत्ता व निवाऱ्याची गरज आहे. मात्र, या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करीत दिगंबर कामत यांच्या तथाकथित आम आदमीच्या सरकारने धनादेशरूपी कागदाचे तुकडे वाटून आपण वस्तुस्थितीपासून किती दूर गेलो आहोत हेच दाखवून दिले आहे, अशी सर्रास प्रतिक्रिया आज संपूर्ण काणकोण तालुक्यात उमटल्याचे पाहायला मिळाले. कहर म्हणजे आधीच संकटात सापडलेल्या या लोकांना प्रशासकीय उपचारांनुसार सरकारने सवयीप्रमाणे धनादेश नेण्यासाठी मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे घालायला लावले. हा प्रकार किळसवाणा तर होताच त्याचबरोबर आम आदमीच्या कल्याणाच्या बाता मारणाऱ्या सरकारची त्यांच्या विषयीची आत्मीयता आणि जिव्हाळा स्पष्ट करणारा होता, अशीही प्रतिक्रिया आज सर्रास ऐकायला मिळाली.
त्या भयाण घटनेनंतर मुख्यमंत्री, सरकारचे कितीतरी मंत्री व सत्ताधारी गटाचे आमदार त्या भागाचा दौरा करीत होते. आपद्ग्रस्त भागाची पाहणी करून केवळ दिलासाच देण्याचे ते काम करीत होते. गावकरी पावसात भिजत भिजत उरलेल्या घराच्या मातीच्या ढिगाऱ्यातही काही मिळेल या भोळ्या आशेपायी सतत चाचपडत कशाचा तरी शोध घेत होते. मात्र मंत्री पावसात भिजू नयेत म्हणून सरकारी लवाजमा छत्र्या घेऊन मंत्र्यांचीच काळजी वाहताना दिसत होता. सतत दोन दिवस सरकारचे कितीतरी मंत्री, आमदार त्या भागांना भेटी देऊन गेले परंतु एखादा अपवाद वगळता इतरांना त्यांना तात्काळ मदत करण्याची गरज कोणालाच वाटली नाही ही वस्तुस्थिती आहे.
काणकोण तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काल मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, माजीमंत्री संजय बांदेकर, इजिदोर फर्नांडिस यांच्या उपस्थितीत मदतीचे दहा दहा हजारांचे धनादेश वाटले. त्यातूनच सरकारचा सामान्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट झाला. काणकोण मतदारसंघातील मणगण, देळे, किंदळे, पाणयेफोंड तर पैंगीण मतदारसंघातील सादोळशे, मुठाळ, इडदर, मैक, बाबरे, खोतीगाव हे तालुक्याच्या मुख्यालयापासून फार दूर असलेले गाव. येथील लोकांना धनादेशांचे वितरण करण्यासाठी मुख्यमंत्री येतात, तुम्ही या असा निरोप त्यांना देण्यात आला. पहिल्या टप्प्यात सुमारे २९० लोकांना हे धनादेश प्राथमिक मदत म्हणून वाटण्यात आले. हलाखीच्या स्थितीतील आम आदमीला केवळ धनादेश नेण्यासाठी तालुक्याच्या मुख्यालयापर्यंत यायला भाग पाडणे योग्य होते का, असा सवाल आता लोक विचारू लागले आहे. खरे तर मदतीचे हे धनादेश मामलेदार कार्यालयातील अधिकारी व कर्मचारिवर्गामार्फत सरकार त्यांच्यापर्यंत पोचवू शकले असते. पण तसे न करता नासधूस झालेल्या घरांची आवराआवर करणाऱ्या आणि त्या घरांच्या भग्नावशेषातही काही मिळेल का, या भाबड्या अपेक्षेने सतत शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना संकट काळातही सरकारने दिलेले कष्ट संकटग्रस्त नागरिक कदापि विसरणार नाहीत, अशी परिस्थिती आहे. यातील चीड आणणारी गोष्ट ती अशी की , हे धनादेश दिले तेही रविवारच्या दिवशी. त्यादिवशी बॅंका बंद असल्याने त्यांना तात्काळ ते वटवणेही शक्य होणार नव्हते. काहींची तर बॅंक खातीही नाहीत अशांना बॅंक खाते उघडल्याशिवाय ते वटविता येणार नाहीत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुराच्या प्रवाहात सर्व काही गेल्याने हलाखीचे जगणे जगणाऱ्या या निष्पाप लोकांकडे खाते उघडायला पै देखील शिल्लक राहिलेली नाही.
आज ज्यांच्यावर संकट कोसळले आहे, ज्यांना तात्काळ मदतीची गरज आहे त्यांना चार दिवसानंतर सरकारची मदत मिळणार आहे. आजारी रुग्णावर त्वरित उपचार करण्याचे सोडून त्यांना मृत्यूच्या खाईत लोटण्यासारखाच हा प्रकार होता अशा प्रतिक्रियाही सध्या येथे व्यक्त होत आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांनाही तातडीची मदत द्या : पार्सेकर

पणजी, दि.५ (प्रतिनिधी): काणकोण तालुक्यात पुराने हाहाकार माजवला आहेच परंतु पावसाचा परिणाम काणकोणसह राज्याच्या इतर भागांतील शेती व्यवसायावरही झाला आहे. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी तात्काळ राज्यातील सर्व भागातील पिकांच्या नासाडीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत पुरवण्याची गरज आहे; पण त्याबाबत सरकारला काहीच पडून गेलेले नाही, असा आरोप करून शेतकऱ्यांबाबत सरकारकडून दुर्लक्ष करण्याच्या कृतीचा जाहीर निषेध भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केला.
आज भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते खास शेतकऱ्यांच्या विषयावर बोलत होते. मुळातच राज्यात शेतीचे प्रमाण घटत आहे. सुमारे ७५ टक्के शेती पडीक आहे व त्यात २५ टक्के लोकांनी घाम गाळून उभे केलेले पीक या पावसामुळे आडवे झाले आहे. काही ठिकाणी कापणी करून पीक शेतात ठेवले होते, ते देखील वाहून गेले आहे. राज्यात अधिकतर नदी शेजारी असलेल्या खाजन शेतीचे पीक पावसाच्या पाण्यामुळे नष्ट झाले असून या शेतकऱ्यांची दखल सरकारने घ्यायलाच हवी, असे पार्सेकर म्हणाले. विद्यमान सरकारच्या राज्यात शेतकऱ्यांना एकामागोमाग एक तडाखे बसत आहेत. गेल्या मार्च २००८ महिन्यात राज्यात आलेल्या अवेळी पावसामुळे मिरची, काजू, केळी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याच काळात अधिवेशन सुरू होते, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देण्याची घोषणाही केली. विविध ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण केले व नुकसानीचा आकडा सव्वा नऊ कोटी रुपये असल्याचा अहवाल सादर केला. या शेतकऱ्यांना अद्याप सव्वा रुपयादेखील मदत मिळाली नाही. आंबा व काजूचे पीकही यावेळी कमी झाले, त्यात आता कापणीसाठी तयार असलेल्या पिकाचीच नासाडी झाली आहे, असे पार्सेकर म्हणाले. सुपारीच्या पिकावरही या पावसाचा परिणाम जाणवत असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे, अशी मागणी पार्सेकर यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची नितांत गरज आहे, अन्यथा काही प्रमाणात शिल्लक राहिलेली शेतीही कालबाह्य होण्याचा धोका संभवत असल्याची शक्यता श्री. पार्सेकर यांनी व्यक्त केली.

खासदार सार्दिन गेले कुठे?

आगोंद, दि.५ ( वार्ताहर): काणकोणातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सारी सरकारी यंत्रणा कामाला लागली असल्याचे चित्र दिसत असले तरी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी मात्र अजूनही याठिकाणी भेट दिलेली नाही. या प्रकारामुळे काणकोणवासीयांनी नाराजी व्यक्त केलीच आहे, शिवाय खुद्द कॉंग्रेसचे पदाधिकारी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रचार करताना, आपण मतदारांपर्यंत जाणार नाही तर जनतेने आपल्या समस्या घेऊन मडगाव येथे यावे व आपली भेट घ्यावी, असे वक्तव्य खासदार सार्दिन यांनी केले होते हे उल्लेखनीय!
यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना उत्तर गोव्यातील एक ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आर्सिनियो डिसिल्वा म्हणाले की, पुराच्या संकटात सापडलेले १०० टक्के लोक हे भूमिपुत्र असून सरकारने कोणताही भेदभाव न बाळगता त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे. फक्त लाल दिव्यांच्या गाड्या घेऊन फिरण्याऐवजी स्थानिक पातळीवरील कामांना वेग दिला पाहिजे. दक्षिण गोव्यातून खासदार म्हणून निवडून आलेले खासदार सार्दिन यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून तरी याठिकाणी येणे जरुरीचे होते, अशा शब्दात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काल संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांच्या काणकोण भेटीदरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.
सरकारी पातळीवरून आपद्ग्रस्तांना ज्या वेगाने मदत मिळणे गरजेचे होते तसा वेग याठिकाणी दिसत नसून, शासकीय अधिकारी नियोजनबद्धरीत्या काम करताना कमी पडत असल्याची प्रतिक्रिया लोलये येथील समाज कार्यकर्ते मोहनदास लोलयेकर यांनी व्यक्त केली.
पाण्याचा प्रवाह आणि पूर यांचा अभ्यास केल्यास हा महापूर केवळ पावसाच्या पाण्यामुळे नव्हे तर नैसर्गिक घडामोडी व ढगफुटीसारख्या प्रकारामुळे आला असल्याची शंका ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार कमलाकर म्हाळशी यांनी व्यक्त केली. भर दुपारी हा पूर आल्याने अधिक जीवितहानी टळल्याचे सांगून रात्रीच्या वेळी हा प्रकार घडला असता तर काय घडले असते त्याचा विचार भयावह आहे, असे ते म्हणाले.
दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी घेण्यासाठी पहुडलो असता जमिनीखालून बुडबुड्यांचा असा आवाज ऐकू आला व क्षणात पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. सगळीकडेच पाणीच पाणी दिसू लागले. खोतीगाव परिसरातील डोंगरावरून विचित्र प्रकारचे झरे वाहताना दिसले. या अपवादात्मक घटनेमागचे रहस्य उघड होणे गरजेचे असल्याचे मत खोतीगावचे ज्येष्ठ समाज कार्यकर्ते एस. के. गावकर यांनी व्यक्त केले.
२ ऑक्टोबर या दिवशी सकाळी पक्ष्यांचा मोठा थवा समुद्रावरून जमिनीच्या दिशेने येत असल्याचे काहींनी गालजीबाग तळपण याठिकाणी पाहिले असल्याचे येथील स्थानिकांनी प्रतिनिधीला सांगितले.
एकूणच विविध भागांतील स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतले असता मुख्यमंत्र्यांनी काणकोणातील या पुरासंबंधी कारण मीमांसा करण्यासाठी सागर विज्ञान संशोधन केंद्राचे संचालक सतीश शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने त्वरित कामाला लागून पुराचे रहस्य जनतेसमोर आणणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

राज्यात डेंग्यूचे १२ तर चिकुनगुनीयाचे ३४ रुग्ण

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): गोव्यातील जनता स्वाईन फ्ल्यूशी लढा देत असतानाच केपे आणि शिरोडा या भागात डेंग्यू व चिकुनगुनीया या साथीच्या तापाने थैमान घातले आहे. गेल्या चोवीस तासात या दोन्ही भागातून १२ रुग्ण डेंग्यूचे तर, ३४ चिकुनगुनीयाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती आज आरोग्य खात्यातून उपलब्ध झाली आहे. दरम्यान, स्वाईन फ्ल्यूचे तीन संशयित रुग्ण आढळून आल्याने त्यांच्या लाळेचे नमुने नवी दिल्लीतील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून डेंग्यू रोगासंदर्भात ३६ रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यातील १२ जणांना डेंग्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्याचप्रमाणे ३४ जणांना चिकुनगुनीयाची लागणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मारहाणीच्या जाचातून त्या लहानग्याची सुटका

महिलेस अटक, नवरा फरारी
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) : खोर्जुवे येथील एका अल्पवयीन मुलाचा छळ होत असल्याच्या "गोवादूत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी आज दुपारी कुशे येथे त्या कुटुंबाच्या बिऱ्हाडावर धडक दिली. पोलिसांनी मेलीस फर्नांडिस हिला अटक केली असून तिचा अल्पवयीन भाऊ मिंगेल याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, "गोवादूत'मधील वृत्ताच्या अनुषंगाने पणजी येथील "चिल्ड्रन्स राइट्स इन गोवा' या संघटनेच्या सुषमा, आशिष व सरिता यांनी म्हापसा पोलिसांशी संपर्क साधला व या वृत्तासंबंधात कोणती कारवाई करणार आहात, अशी विचारणा केली. म्हापसा पोलिसांनी लगेच हालचाल करून कुशे खोर्जुवे येथे जाऊन तपास केला असता, मारहाण करणाऱ्यांपैकी मेलीस हिचा नवरा लपून राहिला असल्याचे त्यांना समजले. पण, त्या ठिकाणी मिंगेल हा मारहाणीमुळे त्रस्त असलेला तिचा भाऊ सापडला. त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने दिलेल्या माहितीनुसार मेलिसा हिला अटक करण्यात आली. मिंगेल याच्या तपासणीत त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा असल्याचे तसेच लोखंडी तारेचे व्रण व सिगरेटचे चटके लावल्याचे दिसून आले. त्याला बराच मुका मार बसल्याचेही आढळले, अशी माहिती पोलिसांनी दिली. वैद्यकीय तपासणीत मिंगेल याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बालहक्क कायद्यानुसार मेलिसा व तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फरारी नवऱ्याचा शोध घेतला जात आहे, असे पोलिसांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात एका निनावी फोनवरून या प्रकारासंबंधी पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावेळी म्हापसा पोलिसांनी संबंधित जोडप्याला बालहक्क कायद्याची जाणीव करून दिली होती तसेच परिणामांचीही कल्पना दिली होती, असे पोलिसांनी सांगितले. मिंगेल याचा या दांपत्याने छळ केल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची वैद्यकीय तपासणी करून, पुढील कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी निरीक्षक मंजुनाथ देसाई अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, मेलिसा हिने आपल्या घरी न सांगताच आपला भाऊ मिंगेल याला पळवून आणले होते व त्याला खोर्जुवे येथे बिऱ्हाडात ठेवून त्याचा छळ केला जात होता, अशी माहिती मिळाली. आज "गोवादूत'मधील मिंगेलचा फोटो पाहून त्याचा पत्ता मिळाल्याने त्याच्या आईवडिलांनी खोर्जुवे येथे धाव घेतली व त्याला घरी नेण्याची तयारी दर्शविली. तथापि, आता पोलिस कारवाईनंतरच त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मेलिसा व तिच्या नवऱ्याविरुद्ध दक्षिण गोव्यात काही तक्रारी नोंद झाल्या असल्याने पोलिसांचा ससेमिरा वाचविण्यासाठी हे दाम्पत्य या खेडेगावात राहायला आले असावे, असा अंदाज आहे.

'इफ्फी' खर्च कपातीच्या प्रस्तावाचे तिनतेरा

'विजक्राफ्ट'तर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाला राज्य सरकारची मूकसंमती
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): काणकोण तालुक्यावर भीषण नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले असताना या लोकांच्या पुनर्वसनासाठी सरकारसमोर आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आहे; पण आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ताने (इफ्फी) होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, याची अप्रत्यक्ष ग्वाहीच राज्य सरकारने दिल्ली येथे झालेल्या बैठकीत दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अंबिका सोनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला केंद्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक एस. एम. खान, खात्याचे संयुक्त सचिव व्ही. बी. प्यारेलाल, गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव, गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज श्रीवास्तव, माहिती खात्याचे सचिव नरेंद्र कुमार तसेच गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मांगिरीश पै रायकर व अंजू तिंबलो आदी हजर होते. आगामी "इफ्फी'तील सांस्कृतिक कार्यक्रमांची जबाबदारी "विजक्राफ्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी'कडे देण्याचे जवळजवळ या बैठकीत निश्चित झाल्याने तो खर्च १ कोटी रुपयांवर पोहोचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. "इफ्फी'काळात पंचतारांकित हॉटेल सुविधा व मेजवान्यांवरील खर्चात कपात करण्याबाबतही राज्य सरकारने कोणतीही हरकत घेतली नसल्याने यावर्षीही अनेकांची "इफ्फी' निमित्ताने चांदी होणार आहे, हे देखील यावरून स्पष्ट झाले आहे. मुळात गोवा मनोरंजन संस्थेच्या सर्जनशील समितीच्या बैठकीत "विजक्राफ्ट' कंपनीकडून सादर करण्यात आलेला प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. "इफ्फी'ला जोडून सांस्कृतिक कार्यक्रमांचा होणारा खर्च केंद्र सरकार किंवा चित्रपट महोत्सव संचालनालयाने उचलावा, असे मत व्यक्त करण्यात आले होते. आता प्रत्यक्षात दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला असता समितीच्या अध्यक्ष अंजू तिंबलो उपस्थित राहूनही त्यांनी "विजक्राफ्ट'च्या प्रस्तावाबाबत कोणतीही हरकत घेतली नाही, असे सूत्रांकडून कळते. याबाबत प्रत्यक्ष श्री. खान यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. "इफ्फी' हा आंतरराष्ट्रीय महोत्सव असल्याने तो धूमधडाक्यातच साजरा होणार, या महोत्सवाला आपत्कालीन घटनांचा संबंध लावणे योग्य नसून ते वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, अशी माहिती श्री. खान यांनी दिली.
दरम्यान, याप्रकरणी दिल्लीत बैठकीसाठी उपस्थित राहिलेले समितीचे सदस्य मांगिरीश पै रायकर यांच्याशी संपर्क साधला असता या बैठकीत केवळ आढावा घेण्यात आल्याचे म्हणाले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी अलीकडेच "इफ्फी'वरील वायफळ खर्च काणकोण आपद्ग्रस्तांसाठी खर्च करण्याची मागणी केली होती. गोव्यातील चित्रपट निर्माता संघटना (फिल्म मेकर्स) यांनीही अलीकडेच महोत्सवादरम्यान पंचतारांकित सुविधा, विमानप्रवास व मेजवान्यांचा भार केंद्रीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने उचलावा, अशी मागणी केली होती.
दरम्यान, दिल्ली येथील बैठकीला उपस्थित राहिलेल्या गोवा मनोरंजन संस्थेच्या कार्यकारी समितीच्या दोन सदस्यांपैकी एकाचा थेट हॉटेल व्यवसायाशी संबंध आहे तर अन्य एका सदस्याने अलीकडेच यंदाच्या "इफ्फी'साठी सजावटीचा प्रस्ताव सादर केला आहे, अशी माहिती मिळाली आहे. सदर दोन्ही सदस्य प्रत्यक्ष या महोत्सवाचे लाभार्थी असल्याने त्यांनाच दिल्ली येथील बैठकीला नेण्यामागे नेमके काय राजकारण आहे, हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आज झालेल्या या बैठकीत मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव यांनी गोव्यातील तयारीबाबतचे सादरीकरण केले. चित्रपट महोत्सवाचे संचालक एस. एम. खान यांनी आपल्या खात्याची माहिती दिली तर मनोज श्रीवास्तव यांनी गोवा मनोरंजन संस्थेच्या तयारीचा आढावा घेतला, असेही सांगण्यात आले.

प्लॅस्टिक कचरा विल्हेवाट यंत्रदोनच पंचायतींकडे

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) : राज्यातील २६ किनारी पंचायतींपैकी केवळ बाणावली आणि माजोर्डा पंचायतींकडेच प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणारे यंत्र (श्रडर) उपलब्ध असून तेही वापराविना पडून असल्याचे उघड झाले आहे.
किनारपट्टी क्षेत्रातील जैविक कचरा विल्हेवाट लावण्यासाठी किती पंचायतींकडे कायमस्वरूपी जागा आहे? नसल्यास ती मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत? त्याचप्रमाणे प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावणारे यंत्र (श्रडर)किती पंचायतींकडे आहे? असल्यास त्याचा उपयोग केला जातो की नाही? त्यांची स्थिती कशी आहे, याबाबतचा संपूर्ण अहवाल येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिले.
त्याचप्रमाणे जैविक कचऱ्याची कशा पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे, याविषयी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश २६ किनारी पंचायतीना देण्यात आले आहेत.
यासंदर्भातील कार्यवाहीसाठी न्यायालयाने सदर पंचायतींना अनेकदा मुदतवाढ दिली आहे. तरीसुद्धा या पंचायतींकडे कचरा विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा नाही. तसेच प्लॅस्टिक कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी यंत्र पुरवण्यात आले होते तर, काहींना पैसे देण्यात आले होते. परंतु, कोणत्याही पंचायतीकडे हे यंत्र नसल्याचे या खटल्यातील अमॅक्युस क्युरी नॉर्मा आल्वारिस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
गेल्यावेळी न्यायालयाने, या पंचायती महिन्यातून कितीदा प्लॅस्टिक कचरा उचलतात तसेच कचरा विल्हेवाट लावण्यासाठी त्यांच्याकडे कायमस्वरूपी जागा आहे की नाही, याची पाहणी करून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सदर अहवाल आज सादर करण्यात आला. चिखली, वेळसांव पाळे, कासावली, सांकवाळ, चिकोळणा व माजोर्डा उत्तोर्डा या पंचायतींनी अद्याप कायमस्वरूपी जागा मिळवण्यासाठी कोणताही प्रक्रिया सुरू केली नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.
सरकारने हे यंत्र घेण्यासाठी पैसे दिले होते. ते यंत्र कोणत्याच पंचायतीकडे नाही. त्यामुळे ते पैसे कुठे गेले, याचीही चौकशी केली व्हावी, अशी मागणी यावेळी ऍड. आल्वारिस यांनी केली. याविषयीची पुढील सुनावणी येत्या १६ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.

Sunday 4 October, 2009

...आता सामना महासंकटाशी

पूर ओसरला, आपद्ग्रस्त सैरभैर; सरकारी यंत्रणा कोलमडली
आगोंद, काणकोण व मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): अनेकांचे संसार डोळ्यादेखत बुडालेले, खायची भ्रांत, प्यायला पाणी नाही, घालायला कपडे नाहीत, झोपायचे कोठे हा यक्षप्रश्न आ वासून उभा, सारे भवितव्य अंधकारमय, सुस्त सरकारी यंत्रणा अशी दारुण वेळ काणकोण भागातील आपद्ग्रस्तांवर ओढवली आहे. या महासंकटाशी कसा सामना करायचा हेच त्यांना समजेनासे झाले आहे. सरकारी पातळीवर मदतकार्य जोरात सुरू असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात लोकांपर्यंत फारशी मदत पोहोचलेली नाही, हेच विदारक चित्र आज अनेक ठिकाणी दिसून आले.
काणकोण तालुक्यात हाहाकार माजवणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली असली तरी शुक्रवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सुमारे १०० हून अधिक घरे कोसळली तर ३०० हून अधिक घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, काल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले पैंगीण येथील बाबुली महाले यांचा मृतदेह सापडला असून संदीप पैंगीणकर यांचा शोध सुरू आहे. भाटपाल येथून बेपत्ता झालेला सुनील पागी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला.
दक्षिण गोव्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी आज नुकसान भरपाईचा अंदाज घेण्याच्या कार्यात मग्न होते. सर्व तलाठ्यांनी गावागावात जाऊन नुकसानीचा अंदाज घेतला. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी गोकुळदास नाईक यांनी आज काणकोण मामलेदार कार्यालयात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पावसाचे पाणी घरात घुसल्याने त्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याचे प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केले. किंदळे भागात ७००, श्रीस्थळ भागात १००, पैंगीण, इतर आदी भागात मिळून एकूण २००० बेघर लोकांची खाण्यापिण्याची व राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. नाईक यांनी दिली. काणकोणवासीय जोपर्यंत मानसिक धक्क्यातून सावरत नाहीत व परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत सरकारची व्यवस्था सुरूच राहील, अशी माहिती त्यांनी दिली. नुकसानीचा आकडा सध्या १५ कोटीच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. निश्चित आकडा उद्या स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शासकीय लवाजम्यासह आज पूरग्रस्त भागांना भेट दिली आणि आपद्ग्रस्तांना मदतीचेही आश्वासन दिले. तसेच लोकांना ताबडतोब मदत करा, असे आदेशही त्यांनी शासकीय यंत्रणेला दिले. मात्र, या परिस्थितीत आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष मदतीचीच लोकांना खरी गरज असल्याचे या भागाला भेट दिल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. ही वेळ राजकारण करण्याची नसून सर्वस्व गमावलेल्या आपद्ग्रस्तांना धीर व मदत देण्याची आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्यावर सरकारने भर दिल्यास ते अधिक उपकारक ठरेल, असेही त्यांनी बोलून दाखवले.
दरम्यान, पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार श्रीपाद नाईक यांनी याच मुद्यावर भर दिला.
तळपण व गालजीबाग नदीने आजही रुद्रावतार धारण केला, जवळजवळ दीड कोटीच्या घरात हानी झाल्याचे मामलेदार कार्यालयातून सांगण्यात आले. गावडोंगरी व खोतीगावातील अनेक वाड्यांवरील संपर्क तुटला आहे. मणे खोतीगाव येथे सर्व घरांत पावसाचे पाणी शिरले तर तामणमळ, खोतीगाव येथील काही घरांत पाणी शिरले. बाबरे लोलये येथील दोन्ही पुलांचे कठडे कोसळले असून दाभले पुलाचा कठडा कोसळला आहे. बाबरे येथील नागरिकांना सावधगिरीचा उपाय म्हणून इतरत्र हालवण्यात आले आहे. तालुक्यातील दूरध्वनी आणि वीजपुरवठा अनेक ठिकाणी खंडित झालेला आहे.
पैंगीण येथील सावट, वाळशी, अर्धफोंड, महालवाडा, पर्तगाळ येथील २५ हून अधिक घरे कोसळली असून घरातील भांडी कुंडी, सिलिंडर आदी वस्तू वाहून गेल्या आहेत. मोर्खड येथील चार घरांत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
काणकोण पालिका क्षेत्रातील पाणयेफोंड येथील अनंत पागी, पंता पागी, मंजुळा मोर्खडकर, उल्हास पागी, प्रेमानंद पागी, हरिश्चंद्र पागी, मुड्डो पागी, धनंजय पागी यांची घरे जमीनदोस्त झाली.
देळे काणकोण येथे एकूण सात घरांत रेतीमिश्रीत पाणी घुसल्याने घरातील सामान नष्ट झाले. या सातही घरांतील नागरिकांनी जवळचे नातेवाईक तसेच निराकार देवालयाच्या सभागृहात आश्रय घेतला आहे. पाण्याच्या प्रवाहात त्यांचे सर्व सामान वाहून गेले असून भरण्यासाठी ठेवण्यात आलेले गॅस सिलिंडर वाहून गेले आहेत, अशी माहिती कृष्णा गावकर यांनी "गोवादूत'ला दिली.
याठिकाणी शेखर गावकर, श्रीकांत गावकर, नारायण गावकर, पंढरी गावकर, बाळकृष्ण गावकर यांचे बरेच नुकसान झाले. भाटपाल येथे दिनेश देसाई यांचे घर पाण्याखाली गेले असून अजूनही पाण्याचा प्रवाह जोरदार आहे. माशे येथे निराकार देवालयाच्या चाळीवर मोठा दगड कोसळल्याने बरेच नुकसान झाले आहे. सादोळशे येथे पंच विपिन यांच्या घरात पाणी शिरल्याने पलंग पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले.
बोकडेमळ येथील वीज ट्रान्सफॉर्मर पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळला असून वीजखात्याचे बरेच नुकसान झाल्याची माहिती वीज अभियंता विनायक माशेलकर यांनी दिली. वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी अन्य अधिकाऱ्यांसोबत येथे येऊन पाहणी केली.
अर्धफोंड येथे अवर लेडी ऑफ फातिमा कपेलातील सर्व विद्युत उपकरणे तसेच बसण्याचे लाकडी बाग जळीस्थळी पडल्याचे आढळून आले. जवळच असलेल्या क्रीडा संकुलातील साहित्य तसेच सुमारे १०० खुर्च्या वाहून गेल्याची माहिती पेरीशचे सदस्य श्री. फर्नांडिस यांनी सांगितले.
दाबेल येथे चंद्रकांत वेळीप यांचे घर जमीनदोस्त झाले असून इतर ३-४ घरांत पाणी घुसल्याने नुकसान झाले. अर्धफोंड येथे जयवंत नाईक, चंद्रकांत नाईक, विनोद नाईक यांच्या घरांसह एकूण ४ घरे वाहून गेली. पाण्याचा प्रवाह एवढा जबरदस्त होता की पत्नी आणि मुलीचा जीव वाचवण्यासाठी घराच्या मागील दारातून ढकलून देऊन येथून पळ काढला, अशी माहिती जयवंत नाईक यांनी दिली. आगोंद देसाईवाडा येथील जुवाझीन फर्नांडिस यांचे घर जमीनदोस्त झाले तर अन्य तीन घरांत रेतीमिश्रीत पाणी गेल्याने नुकसान झाले. येथील सहा कुटुंबांना बॅरेलवर बांबू बसवून पाण्याबाहेर काढण्यात आले.
पैंगीण राष्ट्रीय महामार्गावर मोठे भगदाड पडल्याने मडगाव - कारवार मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आज संध्याकाळी पाइप घालून भगदाड बुजवण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. संध्याकाळपर्यंत मोठ्या गाड्यांची वर्दळ सुरू झाली. भाटपाल येथे राष्ट्रीय महामार्गावर लांबलचक रांगा लागून राहिल्या होत्या. काल याच ठिकाणी एक कार व एक व्हॅन पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली होती, नंतर दोरीच्या साह्याने बांधून ठेवून वाहने वाचवण्यात आली होती. या ठिकाणी असलेले बार पूर्णपणे वाहून गेले.
भाटपाल येथील डॉ. संजय कुराडे यांची अळंबी पैदास करण्याची फॅक्टरी पूर्णपणे वाहून गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. खोतीगाव भागातील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. कोकण रेल्वेची वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
दरम्यान, काल २ ऑक्टोबर रोजी तालुक्यात एकूण १४ इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता गोपीनाथ देसाई यांनी दिली.
परीक्षा रद्द, बाजारपेठेत सामसूम
काल काणकोण तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याने आज सहामाहीच्या सुरू असलेल्या परीक्षा बहुतेक शाळांनी रद्द करून सुट्टी जाहीर करण्यात आली. कालच्या पावसाचा परिणाम बाजारपेठेवर दिसून आला. आठवड्याचा बाजार असूनही आज सर्वत्र सामसूम दिसून आली.
मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, खासदार फ्रान्सिस सार्दिन, साबांमंत्री चर्चिल आलेमाव, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, माजी आमदार इजिदोर फर्नांडिस आदींनी पावसाचा तडाखा बसलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. गृहमंत्र्यांनी गालजीबाग, तळपण, खोतीगाव आदी भागांना भेट दिली. शासनातर्फे योग्य मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरस्थिती नियंत्रण कक्षांची स्थापना
राज्यात विविध भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालय, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालय व सचिवालय पर्वरी येथे नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. कुणालाही या कार्यालयांशी संपर्क साधायचा असल्यास उत्तर गोवा - २४२६१४८, दक्षिण गोवा - २७१४८९८ तर सचिवालय कार्यालय - २४१९५५ ० - २४१९७६७ (सुरक्षा रक्षक) फॅक्स - २४१९४७७ असा आहे.
------------------------------------------------------------------
मदतकार्याचा वेग वाढवण्याची गरज : पर्रीकर
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज संध्याकाळी आपद्ग्रस्त भागाला भेट दिली. विविध भागांतील पूरपरिस्थितीची पाहणी करून त्यांनी लोकांना धीर देताना सरकारी पातळीवर सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. येथील परिस्थिती लक्षात घेता सरकारी यंत्रणेने आपले कार्य अधिक जोरात सुरू करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. मदत कार्य धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार विजय पै खोत, आमदार दामोदर नाईक उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक यांनी उशिरा संध्याकाळी याठिकाणी भेट देऊन मदतीचे आश्वासन दिले. यावेळी आमदार रमेश तवडकर, भाजयुमोचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, रुपेश महात्मे आदी हजर होते. काणकोण येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन मदतकार्य सुरू असून काही ठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
------------------------------------------------------------------
काणकोणच्या पुनर्वसनासाठी आमदार
विजय पै खोत यांच्याकडून १०० कोटींची मागणी

काणकोण परिसरात पावसाने रुद्रावतार धारण केल्याने शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरे जमीनदोस्त झालेली असून संततधार पावसामुळे भिजलेली घरे येत्या काही दिवसांत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरातील वस्तू, टीव्ही, फ्रीज आदी उपकरणे, लाकडी सामान, भांडी कुंडी तसेच वह्यापुस्तके व कागदपत्रे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. या परिसरातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. खोतीगाव - गुळे भागातील बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता असून काणकोणवासीयांना त्वरित मदत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी काणकोणच्या पुनर्वसनासाठी राज्यसरकारने केंद्राकडे किमान १०० कोटी रुपयांची मागणी केली पाहिजे, असे काणकोणचे आमदार विजय पै खोत यांनी " गोवादूत' शी बोलताना सांगितले. सरकारने वेळ न दवडता त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.

अस्नोड्यात ४० घरांना पुराचा तडाखा

म्हापसा, (प्रतिनिधी) व हरमल (वार्ताहर) दि. ३ : सततच्या पावसामुळे अस्नोडा येथील पार नदीला काल रात्री पूर आल्यामुळे सुमारे चाळीस घरांना पुराचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच अस्नोडा पुलावर पाणी आले. त्यामुळे पार नदीच्या पाण्याची पातळी वाढत गेली. आरंभी लोकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र रात्री दीडच्या सुमारास काठ ओलांडून नदीचे पाणी ग्रामस्थांच्या घरात घुसले. त्यामुळे त्यांची विलक्षण तारांबळ उडाली. यामुळे घाबरलेल्या लोकांना काय करावे हे सुचेनासे झाले. मग वेळीच सावध होऊन त्यांनी याची माहिती म्हापसा पोलिस व अग्निशामक दलाला दिली. पोलिस व दलाचे जवान तेथे ताबडतोब दाखल झाले. त्यांनी गावातील युवाशक्तीच्या मदतीने या ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी नेण्याचे कार्य सुरू केले.
रात्रभर धडाधडा कोसळणाऱ्या पावसाचा धडका सकाळी आठच्या सुमारास थोडा कमी झाला. त्यावेळी मयते येथील ग्रामस्थांनी आपल्या घरांची पाहणी केली. त्यात श्रीमती वैशाली मेस्त्री यांच्या घराची भिंत कोसळल्याचे दिसून आले. नरसिंह नागवेकर यांच्या घरासभोवतालचे ५० मीटर कुंपण मोडले होते. वनदेवी मंडपातील साऊंड सिस्टम व अन्य वस्तू सैरभैर झाल्या. अनेक घरांतील संसारोपयोगी वस्तू, घरांचे वऱ्हांडे, शेती, बागायती यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. गणेशनगर अस्नोडा येथील सरस्वती अस्नोडकर यांचे जुने घर प्रभावती शिरोडकर यांच्या भिंतीवर कोसळून सरस्वती अस्नोडकर व प्रेमावती शिरोडकर यांचे पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, मोखराय वाडा कोलवाळ येथे नामदेव गोपाळ मयेकर यांच्या घरावर पाठीमागील दरड कोसळून भिंत कोसळली व त्यामुळे त्यांचे सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले; तर नादोडा येथे मारिया डिसोझा यांच्या घरावर दरड कोसळून त्यांचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
सकाळी अकराच्या सुमारास खासदार श्रीपाद नाईक, उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, मामलेदार गौरेश शंखवाळकर, माजी आमदार सदानंद शेट तानावडे, गावचे सरपंच उल्हास मापारी, प्रदीप चोडणकर, विद्याधर चोडणकर, पंच प्रदीप पेडणेकर, माजी पंच आलेक्स त्रिनिदाद आदींनी या भागाला भेट दिली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर हानीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक संदीप केसरकर, विजय राणे, चंद्रकांत गावस, सुशांत चोपडेकर हे रात्री एक वाजता तेथे पोहोचलेले पोलिस पथक व अग्निशामक दलाचे जवान दुपारपर्यंत गावातच तळ ठोकून होते. सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे श्री. तानावडे यांनी पूरग्रस्तांना सांगितले.

आपत्कालीन यंत्रणा पणाला लावा : श्रीपाद नाईक

'इफ्फी' खर्चात कपात करा, वायफळ खर्च आवरा
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी): गेल्या तीन दिवसांपासून राज्याला झोडपून काढलेल्या पावसामुळे काणकोण तालुक्याची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे. तालुक्याच्या आपत्तीची भीषणता पाहिल्यास सुमारे दीडशे कोटी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने नियोजित "इफ्फी' वरील खर्चात कपात करावी तसेच इतर वायफळ खर्चाला कात्री लावून या लोकांच्या पुनर्वसनासाठी आपली सारी यंत्रणा पणाला लावावी, अशी मागणी उत्तर गोव्याचे खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी केली.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सरचिटणीस प्रा. गोविंद पर्वतकर उपस्थित होते. अशा प्रकारची भीषण आपत्ती पहिल्यांदाच काणकोण तालुक्यावर ओढवली आहे. या आपत्तीत शेकडो कुटुंबे बेघर झाली असून अनेकांची घरे जमीनदोस्त झाली तर इतरांची घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. तीन व्यक्ती वाहून गेल्याचा संशय असून जनावरांचाही पत्ता नाही. शेती, बागायती, उसाचे मळे आदी पाण्यासोबत लोटून गेल्याने या भागातील शेकडो लोकांचे संसारच उघड्यावर पडले आहेत. राज्य प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेने आपली सारी ताकद पणाला लावली आहे, त्यामुळे विनाकारण सरकारवर टीका करणे ठीक नसून त्यात सातत्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही खासदार श्री. नाईक यांनी केली.
या भागातील भाजपचे आमदार रमेश तवडकर व विजय पै खोत हे आपल्या लोकांच्या मदतकार्यात पूर्णपणे सक्रिय आहेत. प्रदेश भाजपनेही या लोकांसाठी मदतकार्याला प्रारंभ केला आहे. भाजयुमोतर्फे आज तात्काळ काणकोण तालुक्यात जीवनावश्यक वस्तू पाठवण्याचे काम सुरू झाले आहे. याठिकाणी पुरात सापडलेल्या सुमारे सातशे ते आठशे लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. विविध मदतशिबिरांत स्थलांतरित करण्यात आलेल्या पूरग्रस्त लोकांसाठी ५ हजार किलो तांदूळ, अडीच हजार किलो साखर, दोनशे किलो चहा पावडर, दोनशे किलो कांदे, बटाटे आदी साहित्य पाठवण्यात आले आहे. काणकोणातील या लोकांच्या पुनर्वसनासाठी मदतनिधी उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेणार, असेही श्री. नाईक म्हणाले. पैंगीण तथा इतर काही भागांत ज्या गतीने पाण्याची पातळी वाढली ते पावसामुळे शक्य नसून एखाद्या डोंगरमाथ्यावर ढगफुटी झाल्याची शक्यता या भागातील काही जाणते लोक व्यक्त करतात,असे श्री.नाईक म्हणाले.
अस्नोडा भागाचा दौरा
दरम्यान, आज मयते अस्नोडा भागातही पाणी भरल्याने ३० ते ४० लोकांची घरे पाण्याखाली गेल्याची घटना घडली. खासदार श्रीपाद नाईक यांनी या भागाचा दौरा करून स्थितीची पाहणी केली. आमठाणे धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने व पाणी अडवून ठेवण्याची यंत्रणा कोलमडल्याने हे पाणी भरल्याचे सांगण्यात येते. येथील ६ कुटुंबीयांना इतरत्र स्थलांतरित करण्यात आले असून दोन घरे जमीनदोस्त झाल्याचीही घटना घडली आहे,असेही श्री. नाईक म्हणाले.
वाढदिवसानिमित्ताचे कार्यक्रम रद्द
आपल्या वाढदिवसानिमित्त मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे उद्या ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम या आपत्तीमुळे रद्द करण्याची विनंती आपण केल्याचे श्री. नाईक यांनी यावेळी जाहीर केले. सकाळी १० वाजता भाजयुमोतर्फे होणारे रक्तदान शिबिर हा एकच कार्यक्रम होईल, उर्वरित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने होणारा खर्च काणकोण पूरग्रस्तांसाठी देण्याची इच्छा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानने व्यक्त केल्याचेही ते म्हणाले.

कोकण रेल्वे पूर्ववत

मडगाव, (प्रतिनिधी): काल पावसाने माजवलेल्या थैमानामुळे कर्नाटकात अनेक भागात लोहमार्ग पाण्याखाली गेल्यानंतर रद्द केलेली रेल्वे वाहतूक कोकण रेल्वेने आज पूर्ववत सुरू केली. मंगळूर, तिरुवनंतपूरम आदी भागातून सुटणाऱ्या गाड्या आज नेहमीच्या वेळी रवाना झाल्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी लोलये येथे लोहमार्गावर दरड कोसळली होती. दुपारपर्यंत ती हटवण्यात आली; पण तोपर्यंत कर्नाटकातील विविध भागांत अतिवृष्टीमुळे लोहमार्ग बुडाले. त्यामुळे रेलवाहतूक विस्कळित झाली. कोकण रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या म्हणजेच नेत्रावती एक्सप्रेस अस्नोटी येथे, भटकळ येथे राजधानी एक्सप्रेस तर कुंदापूर येथे मुंबईकडे जाणारी गाडी रोखून धरण्यात आली. बाकीच्या काही गाड्या मडगावात थांबवून ठेवण्यात आल्या. काही गाड्या परस्पर वळवण्यात आल्या. रात्री उशिरा लोहमार्गावरील पाणी उतरले व नंतर आज सकाळपासून वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग काणकोण येथे वाहून गेला. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. हा महामार्ग आज सायंकाळपासून सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. बंगलोर, हुबळीकडे काणकोणमार्गे जाणाऱ्या बसेस सकाळी अनमोडमार्गे सोडण्यात आल्या.
दरम्यान कालच्या मुसळधार पावसाचा प्रभाव आजही मडगावच्या काही भागात जाणवला. काल रात्री पाण्याखाली गेलेल्या रावणफोंड -मांडोप भागातील पाणी आज सकाळी उतरले. खारेबांध -मालभाट भागात काल भरलेले पाणी आज उतरले. आज सकाळी असलेला पावसाचा जोर सायंकाळी कमी झाला. त्यामुळे लोकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला.आके मारुती मंदिराजवळ बगलरस्त्याजवळ तुंबलेले पाणी जाण्यास वाट करण्यासाठी सरकारी खात्याला जेसीबीचा वापर करावा लागला.
आज सासष्टीच्या विविध भागांत मिळून एकूण ३५ झाडे पडली, पण विशेष नुकसानी झाली नाही. असोळणा येथे एक झाड घरावर पडले व दहा हजारांची हानी झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली.

हरमल अपघातात दुचाकीस्वार ठार

पेडणे, दि. ३ (प्रतिनिधी): केपकरवाडा हरमल येथे मोटरसायकल व मिनी बस यांच्या झालेल्या अपघातात खालचावाडा हरमल येथील मार्सेलीन फिलीप डिसोझा (४८) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
आज सकाळी १०.३० च्या सुमारास ही घटना घडली. गंगा (जीए ०१ झेड ६३७३) ही प्रवासी बस मांद्रेमार्गे हरमल येथे जात असता पल्सर मोटारसायकलने (जीए ०३ एफ ८४५६) विरुद्ध दिशेने येऊन बसला जोरदार धडक दिली. यावेळी चालक मार्सेलीन गाडीवरून उसळून डाव्या बाजूला असलेल्या झाडाला आदळला, त्याचे जागीच निधन झाले.
अपघातानंतर म्हापसा येथून शववाहिकेने मृतदेह बांबोळी येथे नेण्यात आला. शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. मिनीबसचालक पेद्रू पावलू सिमॉईश याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून पेडणे पोलिसांनी बस ताब्यात घेतली आहे. पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन नार्वेकर पुढील तपास करत आहेत.