Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 June 2011

चर्चिलनी रस्ते दुरुस्तीकडेच लक्ष द्यावे : ताम्हणकर

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) : भारतीय भाषा सुरक्षा मंचाने पुकारलेल्या ‘गोवा बंद’मध्ये सहभागी झाल्याने खाजगी बसवाल्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी इशारे देऊ नयेत. त्यांनी अगोदर रस्ते दुरुस्त करण्याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला आज (दि.९) बस मालक संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर यांनी दिला आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना बस वाहतुकीचे परवाने रद्द करण्याचे अधिकार कोणी दिले आहेत, असा प्रश्‍न श्री. ताम्हणकर यांनी केला आहे.
काल सार्वजनिक बाधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी मडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन खाजगी बस माल संघटनेवर जोरदार टीका केली होती. तसेच, या बसवाल्यांचे परवानेही रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्यावर श्री. ताम्हणकर यांनी चर्चिल यांना पहिल्याच पावसात वाहून गेलेले रस्ते दुरुस्त करण्याकडेच आणि त्यांचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला दिला.
बसवल्यांचीही मुले शाळेत शिकायला जातात. त्यांनाही मातृभाषेतून शिक्षण हवे. त्यामुळे मंचाच्या या बंदच्या हाकेला बसवाल्यांना पाठिंबा देऊन ते या बंदात सहभागी झाले होते, असे श्री. ताम्हणकर यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘मोती डोंगरावर असलेल्या सर्किट हाउसमध्ये बसून तुम्हांला वाहन परवाना रद्द करता येणार नाही. आम्ही हे वाहन परवाने कायद्यानेच मिळवलेले आहेत’ असेही श्री. ताम्हणकर यांनी यावेळी सुनावले.

No comments: