Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 February, 2010

"चक्र व्ह्यू' रद्द झाल्याने आयोजकांची दाणादाण

पैसे परत मिळवण्यासाठी पर्यटकांचा लागला तगादा

पणजी, काणकोण दि. ५ (प्रतिनिधी) - आगोंदच्या राखीव जंगलात आयोजित करण्यात आलेली "चक्र व्ह्यू' ही पार्टी रद्द झाल्याने स्थानिकांनी आणि विविध संघटनांनी सुटकेचा निःश्वास सोडला खरा; परंतु या पार्टीत सहभागी होण्यासाठी ज्या तरुण-तरुणींनी तसेच अन्य विदेशी पर्यटकांनी प्रवेश शुल्कापोटी पैसे भरले होते ते परत मिळवण्यासाठी त्यांनी आयोजकांच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे आयोजकांची दाणादाण उडाली आहे.
आज दिवसभर पार्टीचे आयोजक या लोकांना "कटवण्यासाठी' वेगवेगळी माहिती व पर्याय पुरवत होते. आता ही पार्टी उत्तर गोव्यातील एका निर्जनस्थळी हालवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. या पार्टीत सहभागी होण्यासाठी गोव्यात आलेल्या पर्यटकांना हणजूण येथे बोलावले जात होते. पार्टीत सहभागी होण्यासाठी आकारले जाणारे तीन हजार रुपयांचे शुल्क भरल्यानंतर पार्टीच्या आयोजनाचे स्थळ सांगितले जाईल, अशी माहिती आयोजकांकडून दिली जात होती. तसेच, ही पार्टी गोकर्ण येथे होणार, अशीही माहिती पुरवली जात होती. मात्र याविषयी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना विचारले असता, "आम्हाला या पार्टीविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही', असे त्यांनी सांगितले.
आज (दि. ५ रोजी) सकाळी सहा वाजल्यापासून ही पार्टी सुरू होणार होती. मात्र यासंदर्भात झालेल्या विरोधानंतर कालच आयोजकांनी सदर पार्टी रद्द झाल्याचा संदेश "इंटरनेटवर' टाकला होता. ज्यांना हा संदेश मिळाला नाही असा तरुण - तरुणींचा गट मात्र गोव्यात दाखल झाला होता. तसेच, या पार्टीत सहभागी होण्यासाठी आलेले विदेशी पर्यटक नंतर विरस होऊन मोरजी येथे जाण्यासाठी निघाले होते.
तथापि, आगोंद येथे होणार असलेल्या या पार्टीच्या ठिकाणी आज सकाळपासूनच पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यात गोवा राखीव पोलिस दलाच्या जवानांचाही समावेश होता. हे पोलिस सायंकाळी ५ वाजेपर्यंत तेथे होते. ते माघारी गेल्यानंतर स्थानिक पोलिसांचा एक गट त्या ठिकाणी पार्टी होऊ नये यासाठी पहारा देत होता. दरम्यान, या ठिकाणी जाण्यासाठी असलेले दोन्ही मार्ग अडथळे टाकून बंद करण्यात आले होते.

खोतोडे खाण - मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरले?

वाळपई, दि. ५ (प्रतिनिधी) - सध्या सत्तरी तालुक्याला खाण व्यवसायाने पुन्हा एकदा आपला अभद्र वेढा द्यायला सुरुवात केली असून वाळपई - फोंडा या महामार्गावरून हल्लीच नवीनच खोतोडे - गावणे येथे सुरू झालेल्या खाणींचे ट्रक रोरावत आहेत. यामुळे गेल्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिलेल्या, "गोव्यात कोणत्याही नवीन खाणी सुरू करायला परवानगी दिली जाणार नाही', या आश्वासनाची पायमल्ली झाली असून आपल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे की आपले पद शाबूत राखण्यासाठी मागील दाराने ते जाणीवपूर्वक या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत याविषयी या भागात उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
यासंबंधी आज (दि. ४) दै. "गोवादूत' खोतोडे - गावणे येथील बेकायदा खाणीसंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच आज सर्वत्र याविषयीच चर्चा होती. या भागात बंद पाडण्यात आलेली खाण पुन्हा सुरू करून गेल्या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला गेला आहे. सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदारसंघातील खोतोडे - गावणे येथे एका कंपनीने लोकांचा विरोध डावलून बेकायदा खाण सुरू केली आहे. गेल्या वर्षी येथील खाणीचा विषय बराच गाजला होता. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या मुद्याचा पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांना चांगलेच घेरले होते. स्थानिकांनी उभारलेले आंदोलन आणि विधानसभेत होत असलेली कोंडी यामुळे शेवटी त्यांना या खाणीसंदर्भात होऊ घातलेली सुनावणी रद्द करावी लागली होती. यावेळी त्यांनी राज्यात कोणत्याही नव्या खाणींना परवाना दिला जाणार नाही असे आश्वासन दिले होते. यात विशेषतः पश्चिम घाटातील खाणी व वनक्षेत्रांतील खाणींचा समावेश होता. या आश्वासनाला पुरते एक वर्षही उलटले नाही तोच खोतोडे भागात पुन्हा खनिज उत्खनन सुरू करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे येथील लोकांनी बोलून दाखवले आहे.
दरम्यान, प्राप्त झालेल्या माहितीनुसार विद्यमान सरकारातील एक "बडा' मंत्रीच सरकारवर दबाव आणून या व्यवसायाला छत्रछाया पुरवत आहे. त्यासाठी संबंधित गावातील लोकांना व खास करून युवकांना रोजगाराची व पैशांची आमिषे दाखवण्यात येत असल्याची चर्चा आहे. विकासाच्या नावावर लोकांचे मतपरिवर्तन घडवून आपला स्वार्थ साधण्याचे कुटील कारस्थान रचले जात असल्याचे बोलले जात आहे. खोतोडेनंतर खडकी, वेळगे, सोनाळ, धावे व ब्रह्माकरमळी या गावातही खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे.
दरम्यान, येथील पर्यावरणवादी आणि सुज्ञ नागरिकांनी या नेत्याचा आणि पर्यायाने सरकारचा हा डाव हाणून पाडण्याचा निश्चय केला असून येत्या अधिवेशनात विरोधकांच्या माध्यमातून हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचे सूचित केले आहे. या संपूर्ण व्यवसायाचा पर्दाफाश करण्याचे येथील युवकांनी ठरवले असून केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याचेही निश्चित केले गेले आहे. या खाणीविरोधात एका मंचाची स्थापना करण्याचेही ठरवण्यात आले आहे. येथील नागरिक यासंदर्भात लवकरच विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेणार असल्याचे व त्यांना ही खाण बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन सादर करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पंचवाडीच्या रक्षणासाठी खनिज प्रकल्पविरोधी ठराव संमत करा

पंचवाडी बचाव समितीचे आवाहन

उद्याची ग्रामसभा वादळी ठरणार

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)- पंचवाडी गावातील सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित खनिज रस्ता व बंदर प्रकल्पाला कडाडून विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. उद्या दि. ७ रोजी या विषयावरून विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली असून पंचवाडीचे अस्तित्व राखायचे असेल तर बहुसंख्य ग्रामस्थांनी ग्रामसभेला उपस्थित राहून या प्रकल्पाच्या विरोधात ठराव संमत करून घ्यावा, असे आवाहन पंचवाडी बचाव समितीने केले आहे. दरम्यान, कंपनीकडूनही या प्रकल्पाच्या समर्थनार्थ लोकांची जमवाजमव सुरू केल्याने गावातील वातावरण बरेच तणावग्रस्त बनले आहे.
शिरोड्यातील पंचवाडी या निसर्गसुंदर व शेतीप्रधान गावावर सध्या सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित प्रकल्पाची पडछाया पसरली आहे. सेझा गोवाच्या कोडली खाणीवरून खनिजाची वाहतूक मोकळेपणाने करण्यासाठी कोडली ते पंचवाडी असा खास खनिज रस्ता व पंचवाडी येथे खनिज हाताळणी प्रकल्पाची आखणी केली आहे. राज्य सरकारने खाजगी कंपनीसाठी सुमारे ५ लाख ५४ हजार चौरस मीटर जागा सार्वजनिक हितासाठीचे कलम लावून संपादित केली आहे. पाणोई, नवेभाट, मुशेर, मालेतळी व विजरभाट या मार्गाने हा रस्ता पंचवाडीत येणार असल्याने त्यामुळे या गावचा ऱ्हास हा निश्चित असल्याचे समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता यांनी सांगितले. सावर्डे व कुडचडेसारख्या भागांची खनिज वाहतुकीमुळे काय दुर्दशा झाली आहे हे लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे पंचवाडीवासीय आपला गाव या खाजगी कंपनीला आपल्या घशात घालू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंचवाडी गावातील सर्व लोकांनी एकत्रितरीत्या हा डाव हाणून पाडावा, असे आवाहनही त्यांनी केले. गावाबाहेर स्थायिक झालेले व प्रत्यक्ष जमीन नसलेले लोकच या प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. कंपनीच्या सांगण्यावरून फोंड्यात एका अलिशान हॉटेलात पत्रकार परिषद घेऊन या नियोजित प्रकल्पाचे समर्थन करणारे आगोस्तिन डिकॉस्ता यांनी आपल्यासोबत ७० लोक असल्याचा दावा केला आहे. मात्र केवळ ७० लोक म्हणजे पंचवाडी गाव नव्हे; उर्वरित हजारो लोक या प्रकल्पाच्या विरोधात आहे हे त्यांनी ध्यानात ठेवावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, राज्य सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली असून शेतकऱ्यांना पैसे वाटण्यासाठी लगबगही सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे नेमण्यात आलेल्या भूसंपादन अधिकारी उपासना माजगांवकर यांनी भूसंपादनाचा आदेश जारी केला आहे. पण त्यात नियोजित ५ लाख ५४ हजार चौरस मीटरपैकी केवळ ३,९३,३११ चौरस मीटर जागाच संपादित केल्याचे म्हटले आहे. कोडली, म्हैसाळ व कामरखंड या भागांतील १,६१,४०९ चौरस मीटर जागा सोडण्यात आली आहे. आता कोडली ते पंचवाडी अशा या प्रकल्पासाठी केवळ पंचवाडीवासीयांचीच जागा संपादन करून सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. या एकूण प्रकरणी सरकार पूर्णपणे कंपनीच्या हितासाठी वावरत असून पंचवाडीवासीयांना सरकारने पूर्णपणे वाऱ्यावर सोडले आहे. अशा वेळी पंचवाडीवासीयांनी खबरदारी घेतली नाही तर भविष्यात त्यांना आपल्या गावाला मुकावे लागेल, असाही खबरदारीचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
दरम्यान, ७ रोजीची ग्रामसभा खुल्या जागेत घेण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने पोलिस संरक्षणाचीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कार्निव्हलपूर्वीच पणजीत "कार्निव्हल'

विविध प्रकारच्या कंत्राटांवरून महापौर- नगरसेवकात खडाजंगी

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - "कार्निव्हल'च्या मुद्यावरून महापौर आणि एका नगरसेवकात दोन दिवसांपूर्वी महापौरांच्या केबीनमध्ये बरीच जुंपली होती, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे. कार्निव्हलच्या पूर्वीच महापालिकेत "कार्निव्हल' झाल्याने अखेर महापालिकेचे सूत्रधार तथा ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी दोघांनाही आपल्या बंगल्यावर बोलावून तंबी दिली.
हा वाद कार्निव्हलच्या वेळी पणजी शहरात विविध ठिकाणी उभारण्यात येणारे मंच, शामियाना आणि सर्व ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या संरक्षण विभाजकांवरून झाला. या सर्वांचे कंत्राट कोणाला द्यायचे, हा मुख्य मुद्दा होता. कार्निव्हलच्या आधी पाच दिवसांपासूनच संरक्षक विभाजक आणि मंच उभारण्याचे काम सुरू करण्यात येते. त्याच्या भाड्याची रक्कम जवळ जवळ १० ते १२ लाखापर्यंत जाते. या कामाचे कंत्राट आणि रकमेचे बिल फेडण्यासाठी महापौरांची सही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांना आधीच विश्वासात घेणे या नगरसेवकासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. परंतु, त्या नगरसेवकाने ठेवलेल्या अटी आणि त्याच्या विविध मागण्या मान्य करण्यास महापौर तयार नसल्याने या दोघांमध्ये बरीच खडाजंगी झाली. यावेळी त्या नगरसेवकाने रागाच्या भरात आपला मोबाईल संचही जमिनीवर फेकून त्याचे तुकडे केले, अशीही माहिती सूत्रांनी पुरवली. या भांडणाचा भडका एवढा प्रचंड होता की हे शाब्दिक भांडण आता हातघाईवरच येणार की काय, असे त्यादिवशी महापौराच्या केबीनच्या बाहेर असलेल्यांपैकी अनेकांना वाटले. परंतु, एकाने वेळीच मध्ये हस्तक्षेप करून त्यावर तात्पुरता पडदा टाकला. मात्र याची माहिती श्री. मोन्सेरात यांना लागताच त्यांनी दोघांनी आपल्या बंगल्यावर बोलावून कडक शब्दांत सुनावल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, या भांडणामुळे आणि महापौर नगरसेवकांच्या मागण्या व अटी मान्य करीत नसल्यामुळे महापौरांची माळ अन्य एखाद्याच्या गळ्यात घालण्यासाठी काही नगरसेवक तयारीलाही लागल्याची माहिती मिळाली आहे.

Friday 5 February, 2010

"चक्र व्ह्यू' रेव्ह पार्टी अखेर रद्द

उपजिल्हाधिकांऱ्यांकडून परवाने मागे
"गोवादूत'चा दणका


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - आगोंद येथील जंगलात बुधवारपासून होऊ घातलेल्या "चक्र व्ह्यू' या रेव्ह पार्टीच्या आयोजनाविरुद्ध "गोवादूत' ने आवाज उठवल्यानंतर आज उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका खास आदेशाने या पार्टीसाठी देण्यात आलेले परवाने मागे घेतल्याने आता ही वादग्रस्त पार्टी रद्द करण्यात आली आहे. "गोवादूत'ने प्रथम यासंंबंधीचे वृत्त २ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या काणकोणवासीयांनी आणि तेथील संघटनांनीही या पार्टीला जोरदार विरोध केला होता. हिंदू जनजागृती समितीनेही यासंबंधी उपजिल्हाधिकारी दीपक देसाई यांना निवेदन देऊन जोरदार विरोध दर्शविला होता.
आगोंद येथील जंगलात या पार्टीचे आयोजन करण्यात आले तर त्यामुळे वनसंपत्तीची हानी तर होईलच; शिवाय रेव्ह पार्टीत सर्रास उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या अमली पदार्थांमुळे परदेशींबरोबरच स्थानिक युवापिढीही बरबाद होईल, अशी शक्यता "गोवादूत'ने व्यक्त केली होती. स्थानिक आमदार विजय पै खोत आणि रमेश तवडकर यांनीही यासंबंधी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून या पार्टीला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
आज जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून पोलिस अहवालानुसार रेव्ह पार्टीसाठी २८ जानेवारी रोजी देण्यात आलेला ध्वनिक्षेपक वापरासाठीचा परवाना रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. वृत्तपत्रातील बातम्यांनुसार या पार्टीमध्ये अमली पदार्थांची रेलचेल असेल तसेच अन्य गैरप्रकार घडतील, याची शक्यता पडताळून पाहाण्याचा आदेश काणकोण पोलिस निरीक्षकांना देण्यात आला, तसेच आयोजकांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. पोलिस अहवालातील शिफारशीनुसार बंगलोर येथील "स्पायरल प्रॉडक्शन'चे संतोष कद्री यांना देण्यात आलेला परवाना रद्द करण्यात आला असल्याचे उपजिल्हाधिकारी दीपक देसाई यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
पोलिसांनी सादर केलेला अहवाल, वृत्तपत्रांतील बातम्या, जनता आणि संघटनांनी व्यक्त केलेली विरोधी प्रतिक्रिया, आयोजकांनी पाठविलेले उत्तर आणि हिंदू जनजागृती समितीने दिलेले निवेदन याचा विचार करूनच या पार्टीला देण्यात आलेला परवाना रद्द करण्यात येत आहे, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी पुढे म्हटले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या पार्टीमुळे शांतता आणि सुव्यवस्थेचा भंग होण्याची शक्यता आहेच; शिवाय वेगवेगळ्या देशांतून मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे ध्वनिप्रदूषण आणि त्याचबरोबर अमली पदार्थ आणि मद्याचा अमर्याद वापर होण्याची शक्यता असल्याने यावर नियंत्रण ठेवणे पोलिस अथवा प्रशासकीय यंत्रणेला शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन पार्टीसाठी देण्यात आलेले परवाने मागे घेत असल्याचे श्री. देसाई यांनी आपल्या आदेशात पुढे म्हटले आहे.

१० फेब्रुवारीपासून दूध २ रुपयांनी महाग


गोवा डेअरीतर्फेदरवाढ जाहीर


फोंडा, दि. ४ (प्रतिनिधी) - कुर्टी फोंडा येथील गोवा राज्य दूध उत्पादक संघाच्या (गोवा डेअरी) संचालक मंडळाच्या आज (दि.४) दुपारी घेण्यात आलेल्या बैठकीत दुधाच्या विक्री आणि खरेदी दरात प्रतिलीटर २ रुपये दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी दिली आहे.
गेल्या सहा महिन्यांत दुधाच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांत नाराजी पसरली आहे. यापूर्वी १ सप्टेंबर ०९ पासून दुधाच्या दरात दोन रुपये दरवाढ करण्यात आली होती. महाराष्ट्रात दुधाच्या दरात १ फेब्रुवारी २०१० पासून प्रतिलीटर २ रुपये वाढ झाल्याने गोव्यातही दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता होती. महाराष्ट्रात दुधाच्या दरात वाढ झाल्याने गोवा डेअरीलाही दराच्या विक्री आणि खरेदी दरांत वाढ करावी लागली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गोवा डेअरीच्या दुधाच्या विक्री दरात येत्या १० फेब्रुवारी २०१०पासून दोन रुपये प्रतिलीटर अशी वाढ केली जाणार आहे तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर २ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना १ फेब्रुवारी २०१०पासून दूध दरवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ह्यापूर्वी दूध उत्पादकांना १६ ऑगस्ट २००९ रोजी दूध दरात वाढ केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नवी दिल्ली येथे दूध दरवाढीचे सूतोवाच केल्यानंतर ताबडतोब देशभरात दूध दरवाढ करण्यात आली. महाराष्ट्र व इतर भागांत दुधाच्या दरात वाढ झाल्याने गोव्यातही दुधाच्या दरात वाढ होणे अपरिहार्य बनले होते. गोव्यात मुबलक प्रमाणात दुधाचे उत्पादन होत नसल्याने गोवा डेअरीला महाराष्ट्र व इतर भागांतून दूध आणावे लागते. बाहेर दुधाच्या दरात १ फेब्रुवारी २०१० पासून वाढ झाल्याने गोवा डेअरीला जादा दराने दुधाची खरेदी करावी लागत होती. ह्यामुळे गोवा डेअरीसमोर आर्थिक संकट उभे ठाकले होते. त्यामुळे येत्या १० फेब्रुवारीपासून जादा फॅट दुधाचा दर ३० रुपये प्रतिलीटर वरून ३२ रुपये प्रतिलीटर आणि प्रमाणित दुधाचा २६ रुपये प्रतिलीटर वरून २८ रुपये प्रतिलीटर असा दर होणार आहे.

जेम्सच्या गूढ मृत्यू प्रकरणी प्रसंगी न्यायालयातही जाणार

कुळे नागरिक समितीचा निर्धार

कुळे, दि. ४ (प्रतिनिधी) - कुळे येथे एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या जेम्स आल्मेदा यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी कुळे पोलिसांनी चौकशीला आरंभ केला असला तरी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी अधिक तातडी दाखवण्याची गरज असल्याचे कुळे नागरिक समितीचे अध्यक्ष संतोष मसुरकर यांनी आज "गोवादूत'शी बोलताना सांगितले.
जेम्स हा मूळ मंगलोरचा असला तरी गेली अनेक वर्षे तो गावात होता. त्याच्या अचानक मृत्युमुळे सध्या अनेक तर्कवितर्क केले जात असून त्याच्या मृत्युची वस्तुस्थिती लोकांना कळलीच पाहिजे, असे ते म्हणाले. ज्या पंचायत सचिवाने डॉक्टर म्हणवणाऱ्या एका इसमाच्या दाखल्यावरून जेम्सच्या मृत्युचा दाखला दिला त्याच्याविरुद्धही पंचायत संचालनालय तसेच कुळे पोलिसांत तक्रार दाखल केली जाणार असल्याचे मसुरकर यांनी सांगितले.
दरम्यान, पंचायतीने दिलेल्या दाखल्याच्या आधारे ज्या दफनभूमीत जेम्सचा दफनविधी पार पाडण्यात आले, त्या चर्चच्या फादरची भेट घेऊन कुळ्याचे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी आज चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बार मालकाने जेम्स हा गेली चार - पाच वर्षे आपल्याकडे कामाला होता व आता त्याच्या मृत्युनंतर त्याला कोणीच नसल्याने आपण त्याचे अंत्यसंस्कार करत असल्याचे लेखी स्वरूपात सांगितल्याचे समजते.
महत्त्वाचे म्हणजे जेम्स याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाला हे स्पष्ट करणारा कोणताही पुरावा सदर बारच्या मालकाकडे उपलब्ध नसून त्याचे शवविच्छेदनही करण्यात आलेले नाही. नागरिक समितीने हाच मुद्दा उचलून धरताना या संशयास्पद प्रकरणाच्या कसून चौकशीची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार जेम्सचे कुटुंबीय त्याच्या कोडी मंगलोर या गावी आहेत. त्यांचाही शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे नागरिक समितीचे म्हणणे आहे.
केप्याचे विभागीय दंडाधिकारी उद्या (शुक्रवारी) सकाळी कुळ्यात दाखल होण्याची शक्यता असल्याचे नागरिक समितीच्या पदाधिकायांनी सांगितले. दरम्यान, आपण डॉक्टर असल्याच्या थाटात जेम्सच्या नैसर्गिक मृत्युचा दाखला दिलेल्या इसमाला त्या दाखल्यानुसार त्याच्या मृत्युचा रीतसर दाखला देणाऱ्या कुळे पंचायतीच्या सचिवाला उद्यापर्यंत चौकशीसाठी पोलिसात पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. मात्र हे प्रकरण इतके गंभीर असूनही पोलिसांनी त्यासंदर्भात अद्याप गुन्हा नोंदवला नसल्याने कुळे मागरिक समितीने नाराजी व्यक्त केली आहे. प्रसंगी कोणत्याही क्षणी न्यायालयात धाव घेण्याची आमची तयारी असल्याचेही श्री. मसुरकर यांनी सांगितले. खरेतर पोलिसांनी एव्हाना पंचायतीकडून मृत्यूच्या दाखल्याची पुस्तिका तसेच संबंधित दस्तऐवज ताब्यात घेण्याची गरज होती, परंतु पोलिसांना या घटनेचे अद्याप गांभीर्य कळले की नाही हे कळण्यास मार्ग नाही, असेही मसूरकर म्हणाले.
एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होतो, तो नेमका कोणत्या कारणावरून मृत पावला हे जाहीर केले जात नाही, डॉक्टर म्हणवणाऱ्या एका इसमाकडून तो नैसर्गिकरीत्या मृत्यू पावल्याचा दाखला घेतला जातो, नंतर तो दाखला पंचायतीला सादर केला जातो, आधी किमान दोन प्रसंगी पंचायतीने त्या कथित डॉक्टराचा दाखला अधिकृत ठरत नसल्याचे स्पष्ट केलेले असते; परंतु यावेळी तो स्वीकारून जेम्सच्या मृत्यूचा दाखला दिला जातो आणि त्या आधारे जेम्सच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते, हा सगळा प्रकारच गंभीर आहे. पोलिसांना त्याचे गांभीर्य कितपत समजले, हेच कळण्यास मार्ग नसल्याचे श्री. मसुरकर म्हणाले.

पंचवाडीच्या ग्रामसभेला पोलिस बंदोबस्ताची मागणी


पंचवाडी बचाव समितीचे पोलिस महासंचालकांना पत्र

लढा पंचवाडीच्या अस्तित्वाचा


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)- फोंडा तालुक्यातील पंचवाडी ग्रामपंचायतीच्या येत्या ७ रोजी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पावरून वादळी चर्चा होणार आहे. पंचवाडीचा नायनाट करू पाहणाऱ्या या प्रकल्पाला अजिबात थारा देणार नाही, अशी सडेतोड भूमिका पंचवाडी बचाव समितीने घेतली आहे. दरम्यान, या प्रकल्पाचे समर्थन करणारा एक गटही कार्यरत झाला असून त्यांनी ग्रामसभेत येन केन प्रकारेण या प्रकल्पाला मान्यता देणारा ठराव संमत करून घेण्यासाठी जोरदार व्यूहरचना आखली आहे. या संपूर्ण परिस्थितीत ग्रामसभेच्या दिवशी गावात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून पंचवाडी बचाव समितीने यामुळे ग्रामसभेला कडेकोट पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र पोलिस महासंचालकांना देण्याचे ठरवले आहे.
कोडली खाण ते पंचवाडी या सेझा गोवा खाण कंपनीच्या नियोजित खनिज वाहतूक रस्ता व विजर खाजन येथील नियोजित खनिज हाताळणी बंदर या प्रकल्पावरून सध्या संपूर्ण पंचवाडी गाव ढवळून निघाला आहे. शिरोडा मतदारसंघ हा अजूनपर्यंत तरी खाण व्यवसायापासून मुक्त आहे. आता या नियोजित प्रकल्पाच्या मदतीने या सुलतानी संकटाला आमंत्रण दिले तर भविष्यात हा गाव पूर्णपणे खाणीच्या विळख्यात जाईल व राज्यातील इतर खाणग्रस्त भागांप्रमाणेच या निसर्गसुंदर गावाची दुर्दशा होईल, अशी भीती पंचवाडी बचाव समितीचे नेते क्रिस्टो डिकॉस्ता यांनी व्यक्त केली. केवळ व्यवसाय व रोजगाराच्या आमिषांना बळी पडून संपूर्ण गावावरच हे संकट ओढवण्यास मदत केली तर पुढील पिढी आपल्याला कदापि माफ करणार नाही. खाण कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा करार किंवा आश्वासने दिली गेली तरी त्याचा काहीही उपयोग नाही. आज राज्यभरात सर्वत्र खाणग्रस्त भागांतील लोक खाण व्यवसायाच्या दुष्परिणामांमुळे बाधित झाले असताना पंचवाडीवासीयांनी या संकटाला स्वतःहून आमंत्रण देणे हा आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याचाच प्रकार ठरेल, असेही क्रिस्टो म्हणाले. कंपनीच्या आमिषांना बळी पडू नका व एकजुटीने या प्रकल्पाविरोधात लढण्यास सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कंपनीला खुद्द राज्य सरकारची व काही राजकीय नेत्यांचीच फूस आहे. या राजकीय नेत्यांचे हित या नियोजित प्रकल्पांत दडले असून त्यांना विविध कंत्राटे मिळवून देण्याची आश्वासने देण्यात आली आहेत. गावातील शेतजमिनीला काहीही महत्त्व नाही, असे चित्र निर्माण करून लोकांना पैशांचे आमिष दाखवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. अशा अवस्थेत किमान गावातील युवकांनी तरी पुढाकार घेऊन हा गाव कंपनीच्या घशात जाण्यापासून रोखावा; ७ राजी होणाऱ्या ग्रामसभेला गावातील सर्व नागरिकांनी जातीने उपस्थित राहावे व या प्रकल्पाविरोधात आपली ताकद सिद्ध करावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Thursday 4 February, 2010

"विश्वकल्याणासाठी हिंदुत्वच!'

पणजीतील प्रकट बौद्धिकात मोहनजी भागवत यांचे उद्गार
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)- देशात व पर्यायाने संपूर्ण विश्वात शांततेचे व सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावयाचे असेल तर त्यासाठी हिंदुत्व हा एकमेव पर्याय आहे. भारताला लाभलेली उच्च जीवन संस्कृतीच या जगाला तारू शकते याची ओळख आता संपूर्ण जगालाही पटू लागली आहे. विविधेतून एकता साधायची असेल तर त्याला केवळ हिंदुत्व हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले.
आज कांपाल येथील स्व. भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ते व नागरिकांच्या विराट सभेला प्रकट बौद्धिकांतर्गत प्रबोधन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उत्तर गोवा संघचालक राजाभाऊ सुकेरकर, दक्षिण गोवा संघचालक रामदास सराफ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर व कोंकण विभागाचे संघचालक बापूसाहेब मोकाशी उपस्थित होते.
अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्त्व लाभलेल्या श्री. भागवत यांनी आपल्या ओघवत्या व प्रखर भाषणांत भारताच्या भवितव्याचा चौफेर आढावा घेतला. देशाच्या सुरक्षेपेक्षा मतपेढीचे राजकारण जेव्हा वरचढ ठरू लागते तेव्हा देशावर संकटांची गडद छाया पसरू लागते. आज बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात घुसखोर भारतात दाखल झाले आहेत. आसाम राज्यावर त्यांनी केलेले अतिक्रमण पाहता हे राज्य भारतात राहील की नाही याबाबतच संशय घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्यातही हे घुसखोर शिरले आहेत. त्यांना हेरून, रेशनकार्डे व मतदार यादीतून त्यांची नावे वगळून त्यांना परत त्यांच्या देशात पाठवणे हेच सर्वांच्या हिताचे होईल, असेही ते म्हणाले. आपण मुत्सद्देगिरी सोडून केवळ शांततेच्या बाता मारीत बसलो आहोत तर तिथे चीन अत्यंत नियोजनपूर्वक आपल्या साम्राज्याचा विस्तार करतो आहे. युद्ध सोडाच पण निदान मुत्सद्देगिरीच्या बळावर तरी त्याचा हा डाव हाणून पाडण्याकडे लक्ष द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी केला. एकीकडे भावनात्मक राष्ट्रीय एकात्मतेच्या गोष्टी करणे व दुसरीकडे मात्र संविधानाला अमान्य असलेली धार्मिक राखीवता राबवून मतांचे राजकारण करणे हे देशाला घातक ठरेल, असे स्पष्ट मतही त्यांनी वेळी जाहीर केले.
देशात हिंदूंची संख्या रोडावत चालल्याने एकामागोमाग एक समस्या उद्भवत आहेत. सगळ्यांना सामावून घेणारे एकच सूत्र म्हणजे हिंदुत्व. याच हिंदुत्वामुळे विश्वभरात भारत देशाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. आज देशभरात संघाच्या सुमारे चाळीस हजार शाखा आहेत. संघ हा नेहमीच देशाचा विचार करतो व त्या अनुषंगानेच वावरतो. संघाच्या वर्णनावर जाऊ नका, त्यात गफलत होऊ शकेल पण प्रत्यक्ष अनुभव घेतला तरच संघाच्या कार्याची ओळख पटेल. संघाच्या शाखेत सहा महिने किंवा वर्षभर सहभागी व्हा. इथे काहीही छुपेपणाने चालत नाही तर सर्व व्यवहार पारदर्शकपणे चालतो. संघाचा अनुभव घेऊन मगच खात्री करा व नंतर संघात राहायचे की नाही हे ठरवा. संघाचे सहयोगी कार्यकर्ता म्हणूनही देशकार्यात भाग घेण्याची मोकळीक आहे व देशबांधणीस त्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आपला देश वाचवायचा असेल तर समाजाला सक्रिय करण्याशिवाय अन्य पर्याय नाही, असा निर्वाणीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सुरुवातीस प्रास्ताविक केले. गोव्यात संघाची स्थापना होऊन ४८ वर्षे झाली. गोवा राज्य संघाला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना येथील प्रत्येक शाखा बळकट, गुणात्मक, मजबूत बनवण्याकडेच कल असेल, असेही त्यांनी सांगितले. त्यांनीच शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

"चक्र व्ह्यू'चे सर्व दाखले मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

वरिष्ठांना अंधारात ठेवूनच आयोजन.
शॅक व टॅक्सी मालकही एकवटले.
मुख्य सूत्रधार बंगळूरमधील.
अनेक स्टॉल्स पाकव्याप्त काश्मिरींकडे.
एका स्टॉलसाठी पाच लाख रुपये.



पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - आगोंद येथे होऊ घातलेल्या "चक्र व्ह्यू' या रेव्ह पार्टीच्या आयोजनासंदर्भात दै. गोवा दूत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनी काणकोण तालुक्याबरोबरच सरकारही खडबडून जागे झाले असून, त्याचीच परिणती आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी एक तातडीची बैठक घेऊन या पार्टीच्या आयोजनासंदर्भात ताबडतोब चौकशी करण्याचे आदेश देण्यात झाली. आणि त्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेल्या चौकशी अंती आगोंद पंचायतीचे सरपंच जॉव्ही फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी दीपक देसाई आणि काणकोण पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज हळर्णकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवूनच या पार्टीच्या आयोजनाला ना हरकत दाखला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे सर्व दाखले मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री कामत यांनी आज सायंकाळी दिले. निरीक्षक हळर्णकर यांनी पार्टीला ना हरकत दाखला देताना पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे तर, उपजिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली नव्हती, असे या चौकशी आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत दि. ५ रोजी ही रेव्ह पार्टी या ठिकाणी झाल्यास पोलिस स्थानकावर मोर्चा नेला जाणार असल्याचा इशारा आज काणकोण मतदारसंघाचे आमदार विजय पै खोत यांनी दिला. मुख्यमंत्री कामत यांना या पार्टीविषयीची सर्व माहिती देण्यात आली असून सदर पार्टीला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याची कल्पनाही त्यांना देण्यात आली आहे. तरीही येथील पोलिसांनी ही पार्टी होण्यास मार्ग मोकळा केल्यास त्याचे तीव्र विरोध केला जाणार असल्याचे आमदार विजय पै खोत यांनी सांगितले. पर्यावरणविषयक "इकॉलॉजिकल पार्टी' असे नाव देऊन रात्रीच्या वेळी हे कसल्या पार्ट्या आयोजित करतात, असा संतप्त सवालही श्री. पै खोत यांनी केला.
"चक्र व्ह्यू' या रेव्ह पार्टीच्या विरोधात काणकोणमधील शॅक मालक संघटना व टॅक्सी मालक संघटना पेटून उठली असून ही पार्टी बंद पाडण्यासाठी उद्या सकाळी पोलिस स्थानकात त्यांच्यातर्फे निवेदन सादर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचप्रमाणे, या पार्टीच्या परिसरात भरणारी अनेक स्टॉल्स ही पाकव्याप्त काश्मिरी लोकांनी घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळेही या पार्टीला कडाडून विरोध केला जात आहे.
उत्तर गोव्यानंतर आता दक्षिण गोव्याचा सुंदर किनाऱ्याला बदनाम करण्यासाठी अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याचा दावा काणकोण शॅक मालक आणि टॅक्सी मालक संघटनेने केला असून या पार्टीला जोरदार विरोध केला जाणार असल्याचे शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष जॅक फर्नांडिस यांनी सांगितले.
या पार्टीचे मुख्य सूत्रधार बंगळूर येथील असल्याची माहिती हाती आली आहे. तसेच या पार्टीच्या परिसरात ५० ते ६० स्टॉल्स टाकले जाणार असून एका स्टॉलसाठी पाच लाख रुपये आकारले जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ही पाच लाखाची रक्कम केवळ तीन दिवसांसाठी आहे.
दरम्यान, सदर वृत्त दै."गोवा दूत' ने प्रसिद्ध करून या छुप्या पार्टीचे बिंग फोडल्याने पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. तोपर्यंत याविषयीची कोणतीही माहिती पोलिसांना नव्हती, असे खुद्द पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी सांगितले आहे. परंतु, स्थानिक पंचायत आणि उपजिल्हाधिकारी दीपक देसाई यांच्याकडून या पार्टीसाठी आयोजकांनी ना हरकत दाखला प्राप्त करण्यास यश मिळवलेले आहे.
ज्या ठिकाणी या पार्टीचे आयोजन केले आहे ती जागा श्री. पांटा नामक व्यक्तीच्या मालकीची असून त्या ठिकाणी त्याचे एक रिसॉर्टही असल्याची माहिती मिळाली आहे.
"ते' सूर्यनमस्कारही घालणार!

सदर पार्टी पर्यावरणविषयक आहे. येथे लोक पर्यावरणाचा आस्वाद लुटण्यासाठी येणार. तसेच ते सूर्यनमस्कारही घालणार, असा दावा आज "चक्र व्ह्यू उत्सव २०१०' या पार्टीच्या आयोजकांनी केला आहे.

शंभर रुपयांनी गॅस वाढणार!


केरोसीन, पेट्रोल दरवाढीचीही
पारिख समितीची शिफारस


नवी दिल्ली, दि.३ - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरील सरकारी नियंत्रण हटविण्यात यावे, तसेच केरोसीनच्या दरात प्रतिलिटर ६ रूपये व एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात यावी, अशी शिफारस यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने केली आहे.
पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती ठरवण्यासंदर्भात सरकारचे सध्याचे धोरण दीर्घकाळ टिकाव धरू शकणारे नाही, असे समितीचे प्रमुख किरीट पारिख यांनी आपला अहवाल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांना सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर सरकारचे नियंत्रण नसल्यास पेट्रोलचे दर लिटरमागे ४.७२ रुपयांनी, तर डिझेलचे दर २.३३ रुपयांनी वाढू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत आंतरराष्ट्रीय दरानुसार आपले दर ठरविण्याची परवानगी सरकारी तेल कंपन्यांना नाही व सरकार सांगेल त्याप्रमाणे सरकारी कंपन्या हे दर ठरवत असतात. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीनुसार दर ठरविण्याची मुभा सरकारी तेल कंपन्यांना देण्यात यावी. मात्र, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दिले जाणारे केरोसीन व एलपीजी गॅस सिलेंडरवर देण्यात येणारे अनुदान आणखी काही क़ाळ सुरू ठेवण्यात यावे, अशीही शिफारस या समितीने केली आहे.
हा अहवाल एका आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल व त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पेट्रोलियममंत्री मुरली देवरा यांनी याबाबत बोलताना सांगितले.

जेम्स मृत्यूप्रकरणाने कुळे भागात खळबळ


उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार
घाईत अंत्यविधी उरकणाऱ्यांची पळापळ


कुळे दि. ३ (प्रतिनिधी) - येथील एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या जेम्स आल्मेदा याच्या अचानक झालेल्या गूढ मृत्यमुळे कुळे परिसरात सध्या प्रचंड खळबळ माजली आहे. आधी जेम्सचा अचानकपणे झालेला मृत्यू आणि नंतर कुटुंबीयांविना घिसाडघाईने उरकण्यात आलेला त्याचा अंत्यविधी याची आता उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान कुळे नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) सायंकाळी कुळ्याचे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी केली.
कुंदापूर कोडी मंगलोर येथील मूळ रहिवासी असलेला जेम्स गेली काही वर्षे येथील गोकुळ बार अँड रेस्टारंटमध्ये काम करीत होता. २३ रोजी अचानकपणे त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवून कोणालाही कल्पना न देता त्याचा दफनविधीही करण्यात आला. त्यासाठी जेम्स याचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचा दाखला एका अनधिकृत व्यक्तीकडून घेण्यात आला. ही व्यक्ती गावात रूग्णांना तात्पुरते दवापाणी करण्याचे काम करते.
यापूर्वी अनधिकृतपणे दिलेल्या दाखल्यापायी रोहिदास नाईक नावाचा हा इसम किमान दोन वेळा अडचणीत आला होता. त्याला यापूर्वी अटक झाल्याचेही सांगितले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्थानिक पंचायतीला या गोष्टीची स्पष्ट कल्पना असतानाही त्याने दिलेल्या दाखल्याच्या आधारे पंचायत सचिवांनी त्याच्या मृत्यूचा दाखला संबंधित रेस्टॉरंटच्या मालकाला दिला. हा दाखला स्थानिक चर्चला सादर केल्यानंतर कुळे येथे ख्रिस्ती दफनभूमीत जेम्सचे अंत्यविधी उरकण्यात आले.
जेम्स याचा मृत्यूची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कुळे परिसरात सुरू होती. त्याचा मृत्यू नैसर्गिक नसावा असा नागरिकांना संशय आहे. ज्या प्रकारे शवविच्छेदन न करता व त्याच्या कुटुंबीयांनाही कसलीही कल्पना न देता दफनविधी उरकण्यात आला तो प्रकार कोणाच्याही मनात शंका निर्माण करणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
"गोवादूत'च्या ३ फेब्रुवारीच्या अंकात हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झाल्यानंतर आधीच्या दबक्या आवाजातील चर्चेचे रूपांतर जाहीर चर्चेत झाले आहे. कुळे नागरिक समितीनेच काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जेम्सच्या मृत्यूची कसून चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानंतर सदर वृत्त प्रसिध्द होताच समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कुळे पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. तत्पूर्वी चौकशीच्या मागणीचे निवेदन दक्षिण उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनाही देण्यात आले. निवेदनाची हीच प्रत त्यांनी निरीक्षकांनाही दिली. परिणामी या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, असे आश्वासन निरीक्षक श्री. म्हार्दोळकर यांनी नागरिक समितीला दिले आहे. दरम्यान, उद्या (गुरुवारी) स्वतः उपजिल्हाधिकारी कुळेला भेट देऊन या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, जेम्सच्या मृत्यूचा दाखला दिलेला त्या इसमाने दबाव आल्यामुळेच आपण तो दाखला दिला असल्याचे काहींना सांगितल्याचे समजते.

मडगाव हरीमंदिरात चोरी

फंडपेटी फोडली; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
मडगाव, दि. ३ (प्रतिनिधी): मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मालभाट - मडगाव येथील निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुप्रसिद्ध अशा श्रीहरीमंदिरात काल रात्री चोरट्यांनी प्रवेश करून फंडफेटी फोडून आतील साधारण ५० ते ५५ हजार एवढी रक्कम पळविल्याने मडगावातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे दक्षिण गोव्यातील मंदिरांकडे चोरट्यांनी पुन्हा आपला मोर्चा वळवला असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
हरीमंदिराच्या छपराची कौले काढून चोरटे आत शिरले व आतील लाकडी आच्छादन तोडून ते खाली उतरले. तेथील पोलादी फंडपेटी तोडून त्यांनी आतली रोकड पळविली व आल्या वाटेने ते बाहेर पडले. आतील अन्य कोणत्याच वस्तूला त्यांनी हात लावला नाही. फंडपेटीतीलही केवळ नोटा व जादा मूल्यांची नाणी त्यांनी नेली. अन्य चिल्लर नाणी तशीच सोडलेली दिसली.
पोलिसांच्या अंदाजानुसार लाकडी छतावरून ते दोरीच्या साह्याने खाली उतरले व त्याच आधारे परत गेले असावेत. तसेच फंडपेटी फोडण्यासाठी हलक्या अवजारांचा त्यांनी वापर केला असावा, कारण हरीमंदिर मंदिराशेजारच्या चाळीतील रहिवाशांनाही या चोरीचा थांगपत्ता लागला नाही. सकाळी पुजाऱ्याने नेहमीप्रमाणे पूजेसाठी दार उघडले तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला व त्यानंतर एकच खळबळ माजली.
मंदिराचे पदाधिकारी मनोहर बोरकर, किशोर कांदे, साईश राजाध्यक्ष, रुपेश महात्मे आदी मंडळी सदर ठिकाणी त्वरित दाखल झाली व त्यांनी पोलिसांना कळविल्यावर पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी धाव घेऊन पाहणी केली. नंतर आमदार दामू नाईक, शर्मद रायतूरकर, नगरसेवक राजेंद्र आजगावकर व राजू शिरोडकर यांनीही मंदिराला भेट देऊन पाहणी केली.
एव्हाना चोरीची खबर सर्वत्र पसरली व मंदिर परिसरात एकच गर्दी उसळली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी साडे दहाच्या सुमारास मंदिरात येऊन एकंदर प्रकार पाहिला व पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांना तपास कामाबाबत काही सूचनाही दिल्या. त्यांनी मंदिर पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली व फंडपेटी इतके दिवस न उघडता का ठेवली अशी विचारणा केली. दर आठवड्याला फंडपेट्या उघडण्याचा सल्ला सरकारने सर्व संस्थांना दिलेला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, मंदिर व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार जी फंडपेटी फोडली गेली आहे ती गेल्या जुलै महिन्यापासून उघडली गेली नव्हती. तिची किल्ली हरवली होती व नवी किल्ली बनवून सर्वांसमक्ष ती उघडण्याचे तसेच राहून गेले होते.
पोलिसांनी श्वानपथक आणून शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते पथक मंदिरामागील आवारात घुटमळले व मागे फिरले. त्यामुळे त्याचा विशेष लाभ होऊ शकला नाही.

सरकार निष्क्रिय - दामू
आमदार दामू नाईक यांनी हरीमंदिरातील चोरी म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरील सरकारचे नियंत्रण उडाल्याचे उदाहरण आहे असा दावा केला आहे. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत कित्येक देवालयांत झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यात प्रशासनाला आलेल्या अपयशाचाच हा परिपाक आहे. प्रशासनाची निष्क्रियता व सुस्तपणा याचे हे ज्वलंत उदाहरण असून मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात व ते राहत असलेल्या भागांतच अशी चोरी व्हावी यावरून राज्यातील सुरक्षा व्यवस्था कशी ढासळलेली आहे ते दिसून येते असेही त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी मालभाटात मुख्यमंत्री राहत असलेल्या शेजारील इमारतीत एक विद्युत सामानाचे दुकान फोडून चोरट्यांनी लाखभराचा माल पळविला होता.

Wednesday 3 February, 2010

"चक्र व्ह्यू' रेव्ह पार्टीच्या निमंत्रण पत्रिकाही वितरित

अहवाल सादर करण्याचे वरिष्ठांचे पोलिसांना आदेश
पणजी, काणकोण, दि. २ (प्रतिनिधी) - "चक्र व्ह्यू - द फर्स्ट इकोलॉजिकल फेस्टिव्हल' या रेव्ह पार्टीची निमंत्रण पत्रिका पाळोळे, होंवरे, आगोंद व अन्य काही भागांतील निवडक व्यक्तींना प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे. यासंबंधी दै. "गोवादूत'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर पोलिस खाते खडबडून जागे झाले असून या संपूर्ण प्रकाराची त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आज पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी काणकोण पोलिसांना दिले आहेत. मात्र, काणकोण उपविभागीय पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी आपल्याला अद्याप या पार्टीविषयीची कोणतीच माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे काणकोण परिसरात खळबळ माजली आहे. वितरित करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत इस्राईल, बेल्जियम, रशिया, इटली, हंगेरी, युनायटेड किंगडम अशा ठिकाणांहून पर्यटक येणार असल्याचे म्हटले गेले आहे.
"आगोंदच्या जंगलात रंगणार रेव्ह पार्टी' या मथळ्याखाली आज (दि.२) दै. "गोवा दूत'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून आज काणकोणात सर्वत्र या वृत्ताचीच चर्चा होती. निसर्गरम्य काणकोण येथे रंगणाऱ्या या रेव्ह पार्टीची जोरदार जाहिरातबाजी इंटरनेटवर होत असून या पार्टीसंबंधीचा सर्व तपशील विदेशी संकेतस्थळावर देण्यात आला आहे. या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे, या पार्टीसाठी निवडलेले राखीव जंगल आगोंद पंचायत क्षेत्रातील "बटरफ्लाय बीच'जवळ असून या ठिकाणी फारशी वर्दळ नसते. इथे एक "इकोलॉजिकल फार्म' असून जवळपास केवळ दोन तीनच घरे आहेत. बाकी लोकवस्ती विरळ आहे. मात्र हल्ली या ठिकाणाकडे विदेशी पर्यटकांचे थवे सतत ये जा करत असतात असे सूत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या दोन तीन दिवसांत आगोंद भागात गोव्याबाहेरील वाहने मोठ्या प्रमाणात फिरत असल्याचेही आढळून आले आहे. अधिक चौकशी करता पार्टीसाठी येणाऱ्या लोकांच्या निवासाची सोय करण्यासाठी हे लोक जागा शोधत होते. लहान मोठ्या झोपड्या उभारून येथे येणाऱ्या लोकांची राहण्याचीही सोय करण्यात आली आहे.
निर्जन स्थळी असलेल्या राखीव जंगलात या पार्टीचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे यामागे नक्कीच काहीतरी काळेबेरे असणार, असा संशय बऱ्याच जणांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या रेव्ह पार्ट्यांत मद्याचा महापूर, अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात व्यवहार व अन्य अनैतिक प्रकार सर्रासपणे होत असल्याने शासनाने या प्रकारात गंभीरपणे लक्ष घालावे व त्वरित उपाययोजना करून या विकृत प्रकाराला वेळीच आवर घालावा, अशी मागणी संपूर्ण काणकोण मतदारसंघातून केली जात आहे.
दरम्यान, या ठिकाणी सदर पार्टी आयोजित करण्यासाठी आयोजकांना स्थानिक ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला प्राप्त झाला असल्याची माहितीही मिळाली आहे. अशा पार्ट्यांना स्थानिक पंचायतीने ना हरकत दाखला दिल्याने गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या विषयी आगोंद पंचायतीचे सरपंच जोव्ही फर्नांडिस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी कोणतीही माहिती देण्याचे टाळले. ""तुम्ही मला पंचायतीत येऊन भेटा'' असे उद्धट उत्तर त्यांनी यावेळी दिले. पार्टीविषयी एक चकार शब्दही बोलण्यास त्यांनी दिलेला नकार या पार्टीच्या आयोजनात अनेक बड्या धेंडांचे हात गुंतल्याचे सिद्ध करत आहे.

सरसंघचालक गोव्यात आज प्रकट बौद्धिक

वास्को, दि. २ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे गौहत्ती (आसाम) हून आज संध्याकाळी ५.३० वाजता दाबोळी विमानतळावर आगमन झाले, त्यावेळी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर, कार्यवाह संजय वालावलकर, प्रा. रत्नाकर लेले व अन्य स्वयंसेवकांनी त्यांचे स्वागत केले.
मार्च २००९ मध्ये सरसंघचालकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रथमच श्री. भागवत गोव्यात आले आहेत. बुधवारी सकाळी आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून ते अभिवादन करतील, नंतर पर्वरी येथे निमंत्रितांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करतील. रा. स्व. संघातर्फे पणजीत बुधवारी संध्याकाळी ४.१५ वाजता दोन पथसंचलनांचे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदानावरून उत्तर गोव्यातील स्वयंसेवकांचे तर परेड ग्राऊंडवरून दक्षिण गोव्यातील स्वयंसेवकांचे संचलन निघणार असून सांतीनेझ चौकातून एकत्रितपणे हे संचलन पणजी जिमखाना मैदानावर जाईल. तेथे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे ६ वाजता प्रकट बौद्धिक होणार आहे. गुरुवारी ते हुबळीला प्रयाण करतील.

एकसंध पंचवाडीवासीयांत फूट पाडण्यासाठी जोरदार हालचाली


विजर खाजन बंदर प्रकल्पाविरोधात लोक आक्रमक


पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी येथील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन येथील बंदर प्रकल्प याबाबतचा विरोध अधिकाधिक आक्रमक होत चालला आहे. गावाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी एकसंधपणे हा डाव हाणून पाडायचे ठरवल्याने सेझा गोवा कंपनीच्या शेपटीवरच पाय पडला आहे. लोकांच्या आक्रमकतेमुळे बिथरलेल्या विरोधकांनी आता या ग्रामस्थांतच कलह निर्माण करण्याचे प्रयत्न चालवल्याने या विषयावरून भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या प्रकल्पाला पाठिंबा देणारे काही राजकीय नेते कंपनीच्या संगनमताने ग्रामस्थांच्या एका गटाला पुढे करून त्यांना या प्रकल्पाच्या समर्थनार्थ उभे करण्याचे षडयंत्रही रचत असल्याची खबर आहे. पंचवाडी गावातीलच काही लोकांना पुढे करून या प्रकल्पाला जाहीर पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न सुरू असून हा प्रकल्प उभारण्याचा ठाम निर्धार कंपनीकडूनही व्यक्त झाला आहे. सदर कंपनीकडून सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांना हाताशी धरून हा प्रकल्प पुढे रेटण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. काही लोकांना ट्रक व्यवसाय व काहींना रोजगाराची संधी मिळेल, असे सांगून फूस लावली जात आहे.
या पार्श्वभूमीवर पंचवाडी येथील विजर खाजन बंदर प्रकल्पाविरोधात येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या नियोजित प्रकल्पामुळे पंचवाडी गावावर धूळ प्रदूषणाचे संकट तर ओढवणार आहेच, शिवाय येथील शेती, बागायतीही नष्ट होणार आहेत. सेझा गोवा खाण कंपनीच्या हितासाठी सरकार सुमारे ५ लाख ५४ हजार शेत, बागायती व ओलीत क्षेत्रातील जमीन खनिज रस्त्यासाठी व कंपनीच्या खाण मालाची हाताळणी करण्यासाठी देत आहे.
पंचवाडीतील संपूर्ण परिसर हा हिरव्यागार शालीसारखा आहे. शेती, बागायती ही येथील लोकांच्या उदरनिर्वाहाची साधने आहेत. असे असताना पंचवाडीवासीयांना देशोधडीला लावून खाण कंपनीची तळी उचलून धरणारे हे सरकार गोमंतकीयांच्या मुळावरच उठले आहे की काय, असा रोकडा सवालही यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, या नियोजित बंदर प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाचे वृत्त दै."गोवादूत'मधून सातत्याने प्रसिद्ध होत असल्याने सरकार व संबंधित कंपनीचे धाबे दणाणले आहेत. पंचवाडीतील लोकांत मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे व या प्रकल्पाच्या विरोधात जनमत बनत चालले आहे. पंचवाडीचा नाश कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. सरकार व कंपनीकडून पंचवाडीवासीयांना कितीही आमिषे किंवा लालूच दाखवली गेली तरी पंचवाडीचे रक्षण करण्यास येथील ग्रामस्थ समर्थ आहेत, याची जाणीव सरकारला करून देणार अशा इशाराही यावेळी पंचवाडीवासीयांनी दिला.

पेडणे जत्रोत्सवातील जुगाराची सीडी उपमहानिरीक्षकांना सुपूर्द

- अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना चौकशीचे आदेश
- ...अन्यथा "सीडी' उच्च न्यायालयात पाठवणार

पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यात कुठलीही भीडमुर्वत न बाळगता सर्रासपणे सुरू असलेल्या सार्वजनिक जुगाराविरोधात येथील युवकांनी आघाडीच उघडली आहे. हरमल व केरी येथील जत्रोत्सवांत जो बिनधास्तपणे जुगाराचा बाजार मांडण्यात आला होता त्याची "सीडी' च आता पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांना सुपूर्द करण्यात आली आहे. श्री. यादव यांनी ही "सीडी' उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्याकडे पाठवून त्यांना तात्काळ चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
पेडणे तालुक्यातील जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांत सुरू असलेल्या जुगाराला सर्वत्र तीव्र विरोध सुरू आहे. "मांद्रे सिटिझन फोरम' तर्फे यासंबंधी मोठ्या प्रमाणात जनजागृती सुरू असून सह्यांची मोहीमही राबवण्यात येत आहे. कायदा आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनीही यासंबंधी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवून पेडण्यातील या जुगारावर कडक कारवाई करण्याची शिफारस केली आहे. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी जुगाराविरोधात कडक धोरण अवलंबिण्याचे आदेश जारी केले असतानाही पेडण्याचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी मात्र जुगाराला पूर्णपणे अभय देण्याची भूमिका स्वीकारल्याने ते रोषाला पात्र ठरले आहेत. हा जुगार बंद करण्यासाठी जनतेला साथ देण्याचे सोडून पोलिसांनी थेट जुगारवाल्यांचीच तळी उचलून धरल्याने तालुक्यात सर्वत्र पोलिसांच्या विरोधात तीव्र असंतोष पसरला आहे.
दरम्यान, या जुगाराबाबत ठोस पुरावे दिल्यास संबंधित पोलिस निरीक्षकांना जबाबदार धरू, असे वक्तव्य उपमहानिरीक्षकांनी केल्याने तालुक्यातील काही युवकांनी हे आव्हान स्वीकारले आहे. हरमल गावातील काही युवकांनी येथील जत्रोत्सवाची "सीडी'च तयार केली आहे. ही "सीडी' "गोवादूत' ला मिळाल्यानंतर ती लगेच पोलिस महानिरीक्षकांना सुपूर्द करण्यात आली. यावेळी श्री. यादव यांनी अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांना चौकशीचे आदेश जारी केले आहेत. आता या "सीडी' ची चौकशी कितपत प्रामाणिकपणे होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. उत्तम राऊत देसाई हे बॉस्को जॉर्ज यांच्या खास मर्जीतील निरीक्षक म्हणून परिचित आहेत, तसेच ते एकाच बॅचचे सहकारी असल्याने ते हे प्रकरण कितपत गंभीरपणे घेतात, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी हयगय केली तर ही "सीडी' थेट उच्च न्यायालयात पाठवण्याची तयारीही या आंदोलनात सहभागी झालेल्या युवकांनी सुरू केली आहे.
बड्या नेत्याची निरीक्षकांना "उत्तम' साथ
पेडण्यातील जुगाराविरोधात कारवाई करू नये, असे आदेश जारी करून तालुक्यातील एका बड्या नेत्याने निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांना "उत्तम' साथ दिली असल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. सदर निरीक्षकांनी या नेत्यासमोर पूर्णपणे लोटांगण घातले आहे व या नेत्याच्या इशाऱ्यांवरच पोलिस वागत असतात, अशीही माहिती मिळाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे या निरीक्षकांविरोधात कितीही पुरावे पोहोचवले तरी त्यांना या पदावरून हटवणे शक्य नाही, अशी फुशारकीच या नेत्याचे काही कार्यकर्ते मारत असल्याचीही खबर आहे. उपमहानिरीक्षक रवींद्र यादव याप्रकरणी कितपत आपला अधिकार वापरू शकतील हा संशयाचा विषय असल्याने अखेर ही "सीडी' न्यायालयात सादर करून जुगाराविरोधात जनहित याचिका सादर करण्याचीही जय्यत तयारी येथील काही सुशिक्षित युवकांनी चालवली आहे.

मुंबईच्या डबेवाल्यांची कीर्ती सातामुद्रपार..

बंगलोर, दि. २ - कोणालाही खूष करण्याचा मार्ग पोटातून जातो, असे म्हटले जाते. मुंबईतील डबेवाले तर त्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनोख्या "नेटवर्क'ने आता अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूललादेखील भुरळ पाडली असून त्यामुळे या डबा संस्कृतीची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे.
रोज हे पाच हजार डबेवाले मुंबानगरीत तब्बल दोन लाख जेवणाच्या डब्यांचे वितरण कसे करतात, त्यांच्याकडून डबे देताना आणि जमा करताना एकही चूक कशी होत नाही, मुंबईसारख्या इतक्या दाट लोकवस्तीच्या महानगरात या मंडळींनी हा चमत्कार वर्षानुवर्षे कसा करून दाखवला, याचे कौतुकमिश्रित कोडे हार्वर्ड स्कूलमधील तज्ज्ञांनाही सुटलेले नाही. त्यांनी या डबेवाल्यांवर खास अहवाल तयार केला असून त्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे. पुढील आठवड्यात मुंबईच्या डबेवाल्यांकडून त्यास मूर्त स्वरूप दिले जाईल आणि येत्या मार्चमध्ये हा अहवाल हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यासासाठी उपलब्ध केला जाणार आहे. सध्या बंगलोर भेटीवर असलेल्या मनिष त्रिपाठी या डबेवाल्याने ही माहिती पत्रकारांना दिली.
त्याचे असे झाले की, नऊ महिन्यांपूर्वी बोस्टनहून हार्वर्डचे एक प्राध्यापक खास या मोहिमेवरच मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर तेथील आणखी दोघे प्राध्यापकांचे विशेष संशोधनासाठी वरळीतील संशोधन केंद्रात आगमन झाले. या तिघांनी मिळून हा सर्वंकष अहवाल तयार केला आहे. या कालावधीत हार्वर्डच्या सदर तिन्ही प्राध्यापकांनी डबेवाल्यांबरोबर मुंबईभर पायपिट केली. त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या आणि या डबे संस्कृतीतील बारकावे जाणून घेतले. मानवी बळाचा खुबीने वापर करून ही एवढी मोठी कामगिरी एकही चूक किंवा त्रुटी न राहता बिनबोभाट पार पाडली जाते हे पाहून बोस्टनचे तिन्ही सॅम अंकल चाटच पडले. त्यांचा पंचवीस पानांचा अहवाल याच सूत्राभोवती गुंफला गेला आहे. यातील कौतुकाचा पुढील टप्पा म्हणजे हार्वर्डने या अहवालाची जगभरातील विविध संस्थांना विक्री करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेतील अनेक औषध कंपन्यांनी भारतीय आयुर्वेदाचा तपशीलवार अभ्यास करून उच्च दर्जाची औषधनिर्मिती केली आहे. त्यातून ते कोट्यवधी डॉलर्स कमावत आहेत. आता हार्वर्ड स्कूलवाल्यांनी या डबेवाल्यांच्या कार्यसंस्कृतीतून डॉलर्स जमा करायचे ठरवले आहे. दुर्दैवाची बाब अशी की, आपल्या महाकाय देशातील एकाही बिझनेस स्कूलला यासारखे "जरा हटके' विषय घेऊन त्यावर संशोधन करावे, असे वाटले नाही. यालाच म्हणतात पिकते तिथे विकत नाही! अर्थात, मुंबईच्या या डबेवाल्यांची कीर्ती यानिमित्ताने सातासमुद्रापार पोहोचली हे काय कमी झाले..

चार्ल्सकडूनही कौतुकाचा वर्षाव
मध्यंतरी ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी जेव्हा मुंबईला भेट दिली तेव्हा तेथील अनोखी डबा संस्कृती पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. नंतर जेव्हा कॅमेला पार्कर बोल्स यांच्याशी चार्ल्स यांचे शुभमंगल पक्के झाले तेव्हा त्यांनी या डबेवाल्यांना खास आमंत्रण दिले होते. डबेवाल्यांनीदेखील त्यांच्या या प्रेमळ विनंतीला मान देऊन त्यांना मराठमोळी भेट पाठवून दिली होती हे वाचकांना आठवत असेलच..
सध्या फक्त मुंबईच
बंगलोरच नव्हे तर तूर्त देशातील अन्य कोणत्याही अन्य शहरात आम्ही जेवणाचे डबे पुरवू शकत नाही. कारण तेथे मुंबईसारखी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. मुंबईतील गल्लोबोळसुद्धा आम्हाला आता पाठ झाले आहेत. बंगलोरमधील भौगोलिक रचना डबेवाल्यांच्या अंगवळणी पडण्यासाठी बराच काळ जावा लागेल, असेही मनिष त्रिपाठी याने सांगितले.

Tuesday 2 February, 2010

आगोंदच्या जंगलात "रंगणार' रेव्ह पार्टी!

५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान आयोजन
जगभरातील "डिजें'ना खास पाचारण
इंटरनेटवरून जोरदार जाहिरातबाजी
रेव्ह पार्ट्यांचे लोण दक्षिण गोव्यातही


पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - "चक्रव्यूह उत्सव २०१०' या नावाने आगोंद काणकोण येथील घनदाट जंगलात येत्या ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान तीन दिवसांच्या "रेव्ह पार्टी'चे आयोजन करण्यात आल्याची धक्कादायक माहिती "गोवादूत'च्या हाती लागली आहे. या पार्टीत जगभरातील तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांची नावनोंदणी करण्यासाठी "इंटरनेटवर' जोरदार जाहिरातबाजी केली जात आहे. एका विदेशी संकेतस्थळावर सदर पार्टीविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
नावनोंदणीसाठी दोन मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहे. मात्र, या पार्टीचे आयोजक कोण याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. तेथेच "फ्ली मार्केट'ही भरवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. ५ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता ही पार्टी सुरू होणार असून ती ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता संपेल. यात कर्णकर्कश संगीताच्या तालावर मोठ्या प्रमाणात मद्याच्या नद्या वाहणार असून अमली पदार्थांचेही मोठ्या प्रमाणावर सेवन तथा विक्री केली जाणार आहे. त्यासाठी देश विदेशातील "ड्रग्ज पॅडलर'नी गोव्याची वाट धरल्याची माहिती मिळाली आहे.
एरवी कळंगुट, बागा या किनारी भागांत होणाऱ्या रेव्ह पार्ट्यांचे लोण आता दक्षिण गोव्यातील काणकोणसारख्या निसर्गरम्य परिसरात पोहोचले आहे. चक्क राखीव जंगलात या पार्टीचे आयोजन करण्यात आल्यामुळे राज्याचे गृह खाते आणि वन खाते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्टीसाठी जगभरातील ४५ "डिजें'ना पाचारण करण्यात आले आहे. याची माहितीही संबंधितांनी संकेतस्थळावर दिली आहे. तसेच, पार्टी सुरू असलेल्या ठिकाणी "हुक्का बार' आणि "चाय मामा' अशी टोपण नावे देऊन त्याचीही व्यवस्था असल्याचे सूचित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही पार्टी तीन दिवसांवर येऊन ठेपली असली तरी त्यासंदर्भात कसलीच माहिती पोलिसांकडे उपलब्ध नाही.
नववर्षाच्या स्वागतासाठी "सनर्बन' ने आयोजिलेल्या "ड्रग्ज पार्टी'त बंगळूर येथील एक तरुणीने अमली पदार्थाचे अतिसेवन केल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी गोव्यात अमली पदार्थांचा व्यापारच होत नसल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर, आता काणकोणच्या आगोंद या राखीव जंगलात या रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यात रशिया, इस्रायल, बेल्जियम, इराण, इटली, फ्रान्स तसेच गोव्यातीलही "डिजें'ना पाचारण करण्यात आले आहे.

पेट्रोल व डीझेलची दरवाढ लवकरच

नवी दिल्ली, दि. १ - पेट्रोल व डीझेलवरील नियंत्रण उठविण्याचा निर्णय या आठवड्याअखेरीस घेतला जाईल,असे संकेत आज केंद्र सरकारने दिल्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलीटर ५ रुपये व डीझेलचे दर २ रुपयांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तज्ज्ञांचा अहवाल मिळाल्यावर यासंबंधी निर्णय घेतला जाईल,असे सांगण्यात आले.
पेट्रोल व डीझेलची किंमत संबंधित कंपन्यांनी ठरविण्याला केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी अनुकूल आहेत, तथापि दरवाढ न करण्याचे अटोकाट प्रयत्न करीत असल्याचे पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी म्हटले आहे. ते आज मुखर्जी यांची यासंदर्भात भेट घेणार आहेत. आठवड्याअखेरीस पारेख समितीच्या अहवालावर निर्णय घेतला जाईल,असे सांगून तेल कंपन्यांना होणारी प्रचंड हानी यापुढे भरून काढण्याची क्षमता सरकारमध्ये नसल्याची कबुली देवरा यांनी दिली. स्वयंपाकाचा गॅस व केरोसीनचा बोजा सरकार पेलेल,अशी ग्वाही त्यांनी दिली.

सरसंघचालक आज गोव्यात

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येत असून उद्या (मंगळवारी) सायंकाळी त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी कांपाल मैदानावर संघाच्या गोवा विभागातर्फे आयोजित जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहून ते मार्गदर्शन करणार आहेत.
संघाचे सर्वोच्चपद म्हणजेच मा. सरसंघचालक म्हणून डॉ. भागवत यांनी पदभार सांभाळल्यानंतर देशभरात प्रत्येक राज्यातील संघ कार्यकर्तांच्या भेटी घेणे या अनुषंगाने त्यांचा प्रवास सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते गोव्यात येत आहेत.
३ फेब्रुवारी रोजी ते सकाळी १०.१५ वाजता आझाद मैदानावर असलेल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर ते पर्वरी येथे गोव्याच्या विविध क्षेत्रातील खास निमंत्रितांना मार्गदर्शन करणार आहेत. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या जाहीर कार्यक्रमात उपस्थित स्वयंसेवकांना आणि जनसमुदायाला ते मार्गदर्शन करतील. त्यापूर्वी ४.१५ वाजता पूर्ण गणवेशधारी संघ स्वयंसेवकांचे पथसंचलन पणजी शहरात नियोजित मार्गावरून काढण्यात येणार आहे. वाद्यांवर आधारित पथसंचलन हे संघाचे मुख्य आकर्षण असून ३५०० हून अधिक गणवेशधारी स्वयंसेवक यात सहभागी होणार आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून निघणारी ही पथके सान्तिनेज चौकात एकत्रित होतील. तेथून हॉटेल "विव्हांता'समोर डॉ. भागवत हे या संचलनाची पाहणी करणार आहेत.

पंचवाडीतील तो प्रकल्प जनहितार्थ कसा?


- संतप्त ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल

- पर्यावरणवादी व सामाजिक संस्थांकडे मदतीसाठी हाक



पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी गावात खनिज वाहतूक रस्ता व नियोजित विजर खाजन बंदर हे प्रकल्प खरोखरच जनहितार्थ आहेत हे खुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पंचवाडी गावात येऊन लोकांना पटवून द्यावे, असे जाहीर आव्हान पंचवाडीवासीयांनी दिले आहे. हा प्रकल्प जनतेच्या हिताचा आहे हे जनतेला पटवून देण्याचे आव्हान मुख्यमंत्री कामत स्वीकारतील काय व येथील लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करतील काय, असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सेझा गोवा खाण कंपनीला आपल्या कोडली खाणीवरून खनिजाची वाहतूक करण्याची मोकळीक मिळावी या एकमेव उद्देशाने या नियोजित प्रकल्पाची आखणी करण्यात आल्याचा आरोप पंचवाडीवासीयांनी केला आहे. भूसंपादन करताना लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी या प्रकल्पाला जनहितार्थाचे लेबल लावण्यात आले आहे. पंचवाडीतील गरीब शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या पोटावर पाय ठेवून बड्या खाण कंपनीचे लाड पुरवण्यासाठी सरकारने अशा प्रकारे पायघड्या घालणे म्हणजे या लोकांच्या जिवावरच उदार होण्याची कृती आहे. स्वतःला आम आदमीचे मुख्यमंत्री म्हणवून घेण्याची पात्रता या प्रकरणामुळे कामत यांना राहणार नाही, अशा कडक शब्दांत या लोकांनी सरकारच्या या जनताविरोधी कृतीचा समाचार घेतला आहे. पंचवाडी पंचक्रोशीतील पॅरीश चर्चचे फादर लॉरेन्स रॉड्रिगीस यांनी यानिमित्ताने लोकांचे मार्गदर्शन सुरू केले असले तरी हे प्रकरण आता थेट आर्च बिशपपर्यंत जाण्याची शक्यता आहे. विजर पंचवाडी येथील श्री सातेरी देवस्थान समितीनेही या प्रकल्पाविरोधात दंड थोपटल्याने त्यांनीही याप्रकरणी जनजागृतीला प्रारंभ केला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यासाठी ५३ लाख रुपयांची तरतूदही केली आहे. या पैशांचे वाटप लवकरात लवकर करून लोकांत फूट
पाडण्याचा डाव आखण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. एकदा का जमीन संपादनाचे पैसे वाटण्यास सुरुवात झाली की या लोकांना या प्रकल्पाच्या विरोधी आंदोलनात भाग घेऊ नका, असे सांगितले जाईल व हे आंदोलन चिरडून टाकण्याचेही प्रयत्न होतील, अशी भितीही व्यक्त करण्यात येत आहे.
पर्यावरणवादी व कृषितज्ज्ञांना मदतीचे आवाहन
पंचवाडीवासीयांवर ओढवलेल्या या संकटसमयी त्यांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी राज्यातील पर्यावरणवादी व कृषितज्ज्ञांना आवाहन केले आहे. या गावात बहुतांश लोक गरीब व कष्टकरी आहेत. काही सुशिक्षित लोक राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले बनून याप्रकरणी गप्प आहेत तर काही लोकांना या प्रकल्पामुळे ट्रक व्यवसायाचे गाजर दाखवून गप्प करण्यात आले आहे. पंचवाडी हा शेतीप्रधान व पूर्णपणे नैसर्गिक संपत्तीने बहरलेला गाव आहे. अशा या गावावर केवळ कुणा एका खाण कंपनीचे चोचले पुरवण्यासाठी खनिजाची धूळ माखवून येथील लोकांच्या उदरनिर्वाहाच्या साधनांवर नांगर फिरवण्याची कृती निषेधार्ह असल्याची टीकाही या लोकांनी केली आहे. राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी व खाणीच्या विळख्यातून गोव्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या सामाजिक संस्थांना पंचवाडीवासीयांनी मदतीसाठी हाक दिली आहे.

विविध रस्ता अपघातांत उत्तर गोव्यात दोघे ठार

म्हापसा, पेडणे दि. १ (प्रतिनिधी) - आज उत्तर गोव्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ता अपघातांत दोघांना आपले प्राण गमवावे लागले. पर्वरी येथे आज सकाळी झालेल्या एका अपघातात जखमी झालेल्या पर्वरी येथील दुचाकीस्वाराचे गोमेकॉत उपचार घेत असता निधन झाले तर आज संध्याकाळी ५.३० वा. धारगळ - दोनखांब येथे एका टॅंकरने जबर धडक देऊन एका शिक्षकाचा जीव घेतला.
आज सकाळी ९.४० वा. पर्वरी बाजार येथील किशोर वसंत गाड केरकर हा फोंडा येथे आपल्या जीए-०३-एम ६५६८ या दुचाकीवरून कामानिमित्त जात असता पर्वरी वडाजवळ येथील चढावावर एका बसने त्याला जबर धडक दिली. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जमलेल्या लोकांनी पर्वरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सुमारे २५ मिनिटांनी ते घटनास्थळी पोहोचले व सदर इसमाला एका खाजगी गाडीतून गोमेकॉत उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आज संध्याकाळी उपचार घेत असतानाच सदर इसमाचे निधन झाले असल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली.
दरम्यान, पोलिसांनी हा "सेल्फ' अपघात असल्याचे सांगून याप्रकरणी कुठलीही तक्रार नोंद झाली नसल्याचे सांगितले.

धारगळ अपघातात
शिक्षकाचे निधन

दरम्यान, आज संध्याकाळी ५.३० वा. धारगळ - दोन खांब येथे प्रवासी बसच्या प्रतीक्षेत असलेले खरी - शिरगाळ येथील शिक्षक वासुदेव वि. आरोलकर (४५) यांना कॅंटरने ठोकरल्याने त्यात त्यांचे निधन झाले.
सविस्तर माहितीनुसार, आज संध्याकाळी धारगळ - दोनखांब येथे प्रवासी बसची प्रतीक्षा करत थांबलेल्या वासुदेव आरोलकर यांना जीए ०३ के १७५६ या धारगळहून कोलवाळमार्गे जात असलेल्या कॅंटरने ठोकरले. यात आरोलकर यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना जखमी अवस्थेत म्हापसा येथील आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
दरम्यान, अपघात घडताच वाहनचालक वाहन सोडून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्री. परब यांनी पंचनामा केला व वाहनचालकाविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला.
खरी - शिरगाळ येथील रहिवासी असलेले मयत वासुदेव आरोलकर हे पेशाने शिक्षक असून ते अविवाहित होते. साखळी येथील शांतादुर्गा हायस्कूलमध्ये ते विद्यादानाचे काम करत होते. त्यांच्या पश्चात आई व तीन बहिणी असा परिवार आहे.
दरम्यान, मुशीर कोलवाळ येथे ३ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रवींद्रनाथ विश्वास (५२) या मूळ पश्चिम बंगाल येथील इसमाचे आज उपचार घेत असताना निधन झाले.

आता जुगारवाल्यांकडून श्री देव आजोबाही वेठीस

"जुगारविरोधी लोकांचे तळपट कर रे महाराजा'

हिंदू धर्मगुरूंनी जुगाराविरोधात उभे राहावे


पणजी, दि. १ (प्रतिनिधी)- केरी जत्रोत्सवाला जुगार बंद करू पाहणाऱ्या जागृत नागरिकांत धार्मिक दहशत पसरवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. केरी येथील श्री देव आजोबाला केळीचे घड अर्पण करून जुगाराला विरोध करणाऱ्यांचे "तळपट' करण्याचे गाऱ्हाणे घालण्यात आल्याची चर्चा या भागात सुरू आहे. जुगाराला विरोध करणाऱ्यांना श्री देव आजोबा बघून घेईल, असा धाक दाखवून व त्यासाठी या जागृत देवस्थानची अपकीर्ती पसरवून जुगाराचे जाहीर उदात्तीकरण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांना जुगाराचा बाजार मांडून तिथली धार्मिक पवित्रता नष्ट करण्याचे काम सुरू आहेच पण आता विविध जागृत देवस्थानांची अपकीर्ती पसरवण्याचा घाटही या लोकांनी घातला आहे.
पेडणे केरी येथील श्री देव आजोबा हे अत्यंत कडक व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. अडीअडचणीत व संकटात सापडलेल्या भक्ताला सुरक्षा देण्याचे व भक्ताला भयमुक्त करण्याची कीर्ती या देवस्थानाची आहे. आता श्री देव आजोबाच्या या प्रसिद्धीचा गैरवापर करून येथील लोकांत भीती पसरवण्याचे कृत्य काही जुगारवाले करीत आहेत. तालुक्यात जुगारविरोधी चळवळीचा गाजावाजा सुरू आहे व केरी येथील जत्रोत्सवात जुगार बंद होणार असे वातावरण तयार झाले असताना श्री देव आजोबाला केळीचे घड अर्पण करून जुगाराला विरोध करून उत्सवात आडकाठी आणू पाहणाऱ्यांना धडा शिकवा, असे गाऱ्हाणे घालण्यात आल्याची खबर सर्वत्र पसरवण्यात आली. जुगाराला विरोध करणे म्हणजे प्रत्यक्ष देवकार्यात विघ्न आणणे असा संबंध लावून या गैरप्रकाराची पाठराखण करण्याचे सर्रास प्रकार सुरू आहेत व दुर्दैव म्हणजे खुद्द पेडणे पोलिसही याप्रकरणी जुगारवाल्यांना साथ देत आहेत.
दरम्यान, अशा भीतीला अजिबात भीक न घालण्याचा निर्धार जुगारविरोधी चळवळीतील युवकांनी केला आहे. देव हा नेहमी चांगल्या गोष्टीलाच साथ देतो व जुगाराच्या या भस्मासुराला भस्म करून टाकण्याचे काम हा देवच करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अशा भूलथापांना व अपप्रचाराला लोकांनी अजिबात बळी पडू नये, असे आवाहन युवा कार्यकर्त्यांनी केले आहे.
दरम्यान, जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांनिमित्त चालणाऱ्या जुगाराविरोधात दै."गोवादूत' ने चालवलेल्या जनचळवळीला पेडणेत सर्वत्र जोरदार पाठिंबा मिळत आहे. विद्यमान सरकारातील एका बड्या राजकीय नेत्याला हाताशी धरून पेडणे पोलिसांकरवी या जुगाराला अभय मिळवण्यात जुगारवाल्यांनी यश मिळवले असले तरी या प्रकाराबाबत येथील लोकांत तीव्र चीड व्यक्त होत आहे. आणि त्यामुळेच राज्यातील हिंदू धर्मगुरूंनी उघडपणे धार्मिक उत्सवांनिमित्त आयोजित होणाऱ्या जुगाराविरोधात आता उघड भूमिका घेण्याची मागणी जुगारविरोधकांनी केली आहे.

... आणि उत्तम राऊत देसाईंचा
जुगाराला हिरवा कंदील
पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई हे तालुक्यात जुगाराविरोधात निर्माण झालेल्या वातावरणामुळे केरी येथील जत्रोत्सवात जुगाराला मान्यता देण्यास अनुकूल नव्हते. एकीकडे जुगाराचे प्रस्थ तर दुसरीकडे हरमल येथील अल्पवयीन रशियन मुलीवर झालेला लैंगिक छळ प्रकरण यामुळे ते बरेच अस्वस्थ होते. ते केरी येथील देवस्थानात भेट देण्यासाठी गेले असता त्यांनी तिथे आपल्याला हरमल प्रकरणातून सही सलामत सोडवण्याची प्रार्थना देव आजोबापाशी केली व तात्काळ त्यावेळीच त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईत संशयितांना पकडल्याची सुवार्ता दिली. आपली ही इच्छा पूर्ण झाल्याने त्यांनी लगेच केरी देवस्थानच्या लोकांना जत्रोत्सवात बिनधास्तपणे जुगार सुरू करण्याची अधिकृत मान्यताच देऊन टाकली, अशीही चर्चा सध्या सर्वत्र पसरली आहे.

Monday 1 February, 2010

बस्तोडा परिसरात दोन गटांत मारामारी; तिघे जण जखमी

म्हापसा, दि. २८ (प्रतिनिधी): जिवंत मारण्याची सुपारी घेतलेल्या संशयितांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या बेलीवीस्तावाडा येथील दोन गटांत मारामारी होण्याची घटना काल रात्री घडली असून यात तीन व्यक्ती जखमी झाल्या असल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार २७ रोजी रात्री बलोविस्तावाडा येथे राहणारा पवन होबळे याने आपल्याला जिवंत मारण्याची सुपारी घेतली असल्याचा संशय बेलोविस्तावाडा येथे राहणारा उमेश नाईक याला आल्याने तो आपला भाऊ रवींद्र नाईक व कोलंडराज नायडू हे तिघे पवन याच्या घरी गेले. यावेळी दोन्ही गटांत झालेल्या बाचाबाचीनंतर भांडण जुंपले व हातघाईवर प्रकार आला. यात पवन होबळ, प्रीती होबळे, प्रितेश होबळे व प्रकाश राठोड हे जखमी झाले. या विषयीची तक्रार कळंगुट पोलिस स्थानकात नोंद झाल्यानंतर उपनिरीक्षक गौरीश परब याने जखमीला कांदोळी येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी पाठवून घरी पाठवले आणि संशयित उमेश, रवींद्र आणि कोलंडराज यांना अटक केली. यानंतर रात्री उशिरा पवन होबळेच्या गटाने सुमारे १५ ते २० गुंड आणून दुसऱ्या गटातील सुमारे ५ ते ७ जणांना घरात जाऊन दांडा आणि लोखंडी सळयांनी अन्नमा गौडा, सुशील नायडू, मोहनी नायडू, लक्ष्मी नाईक व रेखा नाईक यांना मारहाण करून जखमी केले,अशी तक्रार पोलिस स्थानकांवर नोंद झाली आहे.
स्थानिक सरपंच नीळकंठ नाईक म्हापसेकर यांनी जखमी अन्नामा गौडा, मिराली नाईक व आरक्या नायडू या महिलांना १०८ मधून उपचारासाठी बांबोळी येथे पाठविले तर इतर जखमींना कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार सादर केली. या वादामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला असून राजकीय वादातून हे भांडण जुंपले असल्याचा संशय व्यक्त केली जात आहे.

वाढत्या झोपडपट्ट्यांविरुद्ध चिंबलवासीय आक्रमक

-झोपडपट्ट्यांचा प्रश्नाला
ग्रामसभेत बगल
- शाळा बांधकाम अर्धवट,
उर्दू उच्च माध्यमिक जोरात
- झाडांची बेसुमार कत्तल,
पंचायतीकडून दखल नाही


पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - चिंबल भागात परप्रांतीयांचे लोंढे येत असून सध्याच्या इंदिरानगराव्यतिरिक्त अन्य दोन ठिकाणी "मिनी इंदिरानगर' अस्तित्वात येत असल्याचा आरोप करून त्याची चौकशी करण्याची मागणी चिंबल ग्रामसेवा कला व संस्कृती मंचाने केली आहे. तसेच, या उभ्या होत असलेल्या झोपडपट्ट्यांना पंचायतीने परवानगी दिलेली नसताना कोणाच्या आशीर्वादाने या झोपड्या उभा राहत आहेत, असा सवाल आज झालेल्या ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला. परंतु, या प्रश्नाला बगल देण्यात आल्याची माहिती मंचाचे अध्यक्ष रोनाल्ड कार्वाल्होे यांनी दिली. ग्रामपंचायत बैठकीनंतर ते बोलत होते.
गावातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी धड प्राथमिक विद्यालय नाही. मात्र, येथे उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय सुरू झाले आहे. मुलांना खेळण्यासाठी क्रीडा मैदान नाही आणि पंचायत मोठमोठ्या प्रकल्पांना परवानगी देत आहे. या प्रकल्पासाठी गावातील वनराईची कत्तल करण्यात येत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. इंदिरानगर येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शेकडो घरे उभी राहिली आहे. त्यामुळे त्याठिकाणी असलेली पाण्याची टाकी प्रदूषित झाली असल्याचा दावा त्यांनी केली. आता गवळेभाट येथील सांताबार्बर विद्यालयाच्या ठिकाणी आणि मिलेट्री कॅम्पच्या परिसरात अशी दोन ठिकाणा मिनी इंदिरानगर उभी राहत आहेत. ही लोक कुठून येतात त्यांनी कोण येथे घेऊन येतो यांची कोणालाही माहिती मिळत नाही. याकडे पंचायतीचेही लक्ष नाही, अशी टीका मंचाचे सचिव तुकाराम कुंकळकर यांनी केली.
गेल्या तीन वर्षापासून शाळेचे काम सुरू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण होत नाही. दरवेळी सरपंच हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगतात. जोपर्यंत ही शाळा पूर्णपणे उभी राहत नाही, तोवर कोणताही मोठा प्रकल्प येथे व्हायला देणार नसल्याचा निर्णय मंचाने घेतला असल्याचे ते म्हणाले. गेल्या काही दिवसात ज्याप्रकारे गावात झाडांची कत्तल झाली आहे, त्यावर पंचायतीने कोणताही कारवाई केली आहे, याचेही उत्तर मंचाच्या सदस्यांनी आज झालेल्या ग्रामसभेत मागितले. परंतु, त्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. पंचायत चालढकलपणा करीत असल्याने येत्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली जाणार असल्याचे यावेळी श्री. कार्वाल्होे यांनी सांगितले.

सरकार पंचवाडीवासीयांच्या जिवावर उठले आहे काय?

विजर खाजन बंदर विरोधी ग्रामस्थांचा सवाल

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी)- केवळ खाण उद्योजकांचे चोचले पुरवण्यासाठी शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी गावच्या नैसर्गिक संपत्तीवर व या भागातील लोकांच्या उदरनिवार्हाच्या साधनांवर "बुलडोझर' फिरवून सरकार या गावातील लोकांना देशोधडीला लावायला पुढे सरसावले आहे काय, असा संतप्त सवाल पंचवाडीवासीयांनी केला आहे. जनहिताच्या नावाखाली सुमारे ५ लाख ५४ हजार चौरसमीटर जागा संपादन करून खाण मालकांना आपल्या खनिजाची वाहतूक करण्याची वाट मोकळी करून देण्याचा हा कुटील डाव निषेधार्ह आहे. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार पंचवाडीवासीयांच्या जिवावरच उठले आहे काय,असा सवाल संतप्त पंचवाडीवासीयांनी केला आहे.
एकीकडे राज्य सरकारकडून नियोजित कोडली ते पंचवाडी दरम्यानचा खनिज वाहतुकीसाठीचा रस्ता व विजर खाजन बंदर उभारण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे पंचवाडीवासीय मात्र या आपल्या गावच्या अस्तित्व रक्षणासाठी आक्रमक बनत चालले आहे. नियोजित खनिज वाहतूक व बंदर याव्दारे लोकांना ट्रक खरेदी करून दिले जातील व यामुळे गावातील काही लोकांना रोजगारही मिळेल,असे गाजर पुढे करून गावातील लोकांना या प्रकल्पांच्या बाजूने खेचण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सेझा गोवा खाण कंपनीकडून गावातीलच काही लोकांना हाताशी धरण्यात आले आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या लोकांत फूट घालून त्यांची एकजूट कमकुवत करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.या फसव्या प्रचाराला बळी पडले तर भविष्यात पंचवाडी गाव हा खनिज वाहतुकीमुळे हिरव्याचा लाल होईल व येथील ग्रामस्थ आपल्या पुढील पिढीला खाण्यासाठी धूळ घालील,अशी प्रतिक्रियाही आंदोलक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
पंचवाडीवासीयांना आता शिरोडा मतदारसंघातील इतर भागातील लोकांचाही पाठिंबा मिळत आहे. पंचवाडीच्या पॅरीश चर्चचे फादर लॉरेन्स रॉड्रीगिस व श्री सातेरी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ.सोनू कामत यांचा पूर्ण पाठिंबा ग्रामस्थांना असून त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या ग्रामस्थांचा हुरूप अधिक वाढला आहे.
पंचवाडी गावच्या रक्षणासाठी गावातील सर्व धर्माच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे लढा उभारून या प्रकल्पांना प्राणपणाने विरोध करण्याचा निर्धारच केला आहे. सरकार जर लोकांचा विरोध डावलून आपल्या भूमिकेशी ठाम राहण्याचे ठरवत असेल तर गावातील शांतता बिघडेल व सेझा गोवा खाण कंपनीचे समर्थक व नियोजित प्रकल्पाला विरोध करणारे आंदोलक यांच्यात भांडणे होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गावात कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांनी वेळीच या प्रकरणाची दखल घेऊन सरकारला जाब विचारावा व नियोजित प्रकल्प हा कोणत्या पद्धतीने येथील स्थानिक लोकांचे हित जपणारा आहे याचा खुलासा मागवावा, अशीही मागणी या लोकांनी केली आहे. सरकारने वेळीच माघार घेतली नाही तर पुढील परिणामांना पूर्णपणे ते जबाबदार ठरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

वास्कोत जुगारी अड्ड्यांना ऊत

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी)- वास्को शहरात सध्या विविध ठिकाणी जुगारी क्लबांना (अड्ड्यांना) ऊत आला आहे व त्यात दिवसाढवळ्या जुगाराचे पट रंगत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. राज्यात विविध ठिकाणी जत्रोत्सवातील व इतर धार्मिक उत्सवांतील जुगाराविरोधात "गोवादूत'ने जनजागृती चळवळ उभारल्यानंतर आता पोलिसांना या अनिष्ट प्रथेविरोधात जोरदार कारवाई करणे भाग पडले आहे.
वास्को शहरात जत्रोत्सव किंवा धार्मिक उत्सवांना जुगार चालत नसला तरी इथे कायमस्वरूपी जुगारी अड्ड्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या जुगारी अड्ड्यांवर पोलिसांची तमा न बाळगता बिनधास्तपणे जुगाराचे डाव खेळले जातात व त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस मात्र पोलिसांत अजिबात दिसत नाही. वास्को शहर, मंगोरहील, वाडे, बायणा, नवेवाडे अशा वेगवेगळ्या ठिकाणी मिळून सुमारे आठ मुख्य जुगाराचे अड्डे चालतात. या अड्ड्यांवर चोवीस तास जुगार चालतो, अशी खास माहिती प्राप्त झाली आहे. या जुगारी अड्ड्यांचे हप्ते पोलिसांना नियमित पोहचतात व त्याचबरोबर काही राजकीय नेत्यांचाही आश्रय या अड्ड्यांना मिळत असल्याने हे अड्डे सध्या तेजीत सुरू आहेत.
"गोवादूत'ने जुगाराविरोधात सुरू केलेल्या चळवळीची गंभीर दखल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली आहे व सर्व संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना जुगाराविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.
वास्को पोलिसांनी काल दुपारी एका मटका अड्ड्यावर छापा टाकला व सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पोलिसांकडून आपलीच पाठ थोपटण्याचा प्रकार होत असला तरी उर्वरित ठिकाणी मात्र सर्रासपणे जुगार सुरू असल्याने पोलिस आपलेच हसे करून घेत असल्याची प्रतिक्रिया येथील लोकांनी दिली आहे. खुद्द वास्को शहरात तीन जुगाराचे अड्डे चालतात. पैकी एक क्लब पोलिस स्थानकापासून १०० मीटराच्या अंतरावर आहे तर दुसरा पोलिस स्थानकापासून २०० मीटराच्या अंतरावर आहे,अशी माहिती काही स्थानिकांनी दिली. तिसरा अड्डा तर पोलिस हद्दीच्या हाकेच्या अंतरावर असून पोलिस मात्र या अड्ड्यांना सरकारची मान्यता मिळाल्याच्या थाटातच वावरत असतात. नवेवाडे येथील शेवटचा बसथांबा, मंगोरहील येथील सुलभ शौचालयासमोर, तसेच बायणा, वाडे व चिखली या भागातही जुगाराचे छोटेमोठे अड्डे चालतात.
वास्को शहरातील या अड्ड्यांवर रमी, (सिंडीकेट), फ्लॅश (तीन पाने), अंदर बाहर असे विविध प्रकार खेळले जातात व त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते,अशीही माहिती मिळाली आहे. आता राज्यात सर्वत्र जुगाराविरोधात वातावरण निर्मिती सुरू असताना हे अड्डे बंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले असून वास्को पोलिस या जुगाराचा कसा बंदोबस्त लावतात, याची उत्सुकता येथील नागरिकांना लागून राहिलेली आहे.

भाजप नेते राजीव प्रताप रूडी "इंडिगो' एअरलाईन्सचे पायलट

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी) - माजी विमान वाहतूक मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव प्रताप रूडी हे दिल्लीस्थित इंडिगो या एअरलाईन्समध्ये सहवैमानिक म्हणून ४ फेब्रुवारीपासून रुजू होत आहेत. रूडी यांनी अमेरिकेच्या फेडरल ऍव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन या संस्थेची अधिमान्यता असलेल्या मियामी येथील सीम सेंटर या विमान उड्डाण प्रशिक्षण केंद्राकडून व्यावसायिक पायलटचा परवाना मिळवला असून हा परवाना कायम राहण्यासाठी त्यांनी ही मानद (ऑनररी) स्वरूपाची नोकरी स्वीकारली आहे. तेथे एअरबस ए ३२० वर ते "को पायलट 'असतील.
ही नवीन जबाबदारी स्वीकारली असली तरी आपण पूर्वीसारखेच राजकारणात सक्रिय असू. राजकारण हे आपले पहिले प्रेम असून त्यासाठी आपण आयुष्याची २० वर्षे दिली आहेत, त्यामुळे राजकारण सोडण्याचा प्रश्नच नाही. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यासाठी आपणास परवानगी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. रूडी हे व्यावसायिक विमान चालविणारे देशातले पहिले विमान वाहतूक मंत्री असून यापूर्वी केवळ माजी पंतप्रधान राजीव गांधी हेच एकमेव व्यावसायिक पायलट होते. T=bharatiya+janatइंडिगो एअरलाईन्सचे अध्यक्ष आदित्य घोष यांनी रूडी यांच्या पायलट म्हणून रुजू होण्याच्या या बातमीला दुजोरा दिला आहे. रूडी यांनी आत्तापर्यंत मुंबई - दिल्ली मार्गावर पाचवेळा पायलट म्हणून ये जा केलेली आहे.
रूडी हे वकील असून मगध विद्यापीठाचे ते प्रपाठकही आहेत. सप्टेंबर २००१ ते मे २००३ या काळात अटलबिहारी वाजपेयींच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारात ते व्यापार व उद्योग मंत्री तसेच २४ मे २००३ ते २१ मे २००४ या कालावधीत ते विमान वाहतूक मंत्री होते. आपल्या खात्याची पुरती जाण आणि अभ्यास असलेला मंत्री अशी त्यांची ख्याती होती.

पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या निवडणुकीसाठी!

भाजपचा गंभीर आरोप

पणजी, दि. ३१, (प्रतिनिधी) - जिल्हा पंचायत निवडणूक अधिसूचना जारी होण्याआधी आपल्या मर्जीतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आपल्या सोयीच्या पोलिस स्थानकात व कार्यक्षेत्रात घडवून आणण्यासाठी, कॉंग्रेस आमदारांनी राजकीय दबाव वापरून तसा निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडले आहे, ही लोकशाहीची क्रूर थट्टाच आहे.अशा बदल्या ताबडतोब थांबवण्यात याव्यात, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रा. गोविंंद पर्वतकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
सात जानेवारी रोजी जिल्हा पंचायत निवडणुकांची अधिसूचना जारी करण्यात आली व नंतर २० जानेवारी रोजी उत्तर गोव्यातल्या दोन व दक्षिण गोव्यातल्या चार जागांविषयी बदल करण्यासाठीची दुरुस्ती अधिसूचना जारी करण्यात आली. हे बदल कोणाच्या सोयीसाठी व कोणा राजकीय दबावानुसार झाले ते त्या त्या ठिकाणच्या जनतेला माहीत आहेच,असे पर्वतकर यांनी म्हटले आहे.
अधिसूचना जाहीर झाल्यावर अनेक कॉंग्रेस आमदारांनी आपापल्या सोईनुसार मतदारसंघात बदल घडवून आणण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली. पण तेथे सर्वांचेच दबावतंत्र उपयोगात न आल्याने आता आपल्या सोईच्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या आपणास हव्या त्या जागेत करण्याचे षड्यंत्र रचण्यात आलेले आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्या प्रकरणात लक्ष घालून या बदल्या प्रत्यक्षात होऊ देऊ नये अशी भाजपची आग्रही मागणी आहे. लोकशाहीची थोडीतरी लाज असेल तर सरकारने या पोलिस अधिकाऱ्यांच्या ठरलेल्या बदल्या ताबडतोब रद्द कराव्यात, अशी मागणी भाजपने केली आहे.

Sunday 31 January, 2010

बेरोजगारांना लाखोंचा गंडा

काणकोण, दि. ३० (प्रतिनिधी) - सासष्टी, काणकोण व बंगलोरमधील बेरोजगार युवकांना न्यूझीलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी बंगलोरच्या जोडप्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पॉल डेव्हिड इझरेल (बंगलोर - वय ४१) व त्याची चेन्नईतील साथीदार महिला एस. तंजम (वय ४६) अशी या दोघांची नावे आहेत.
काणकोण भागातील २५, सासष्टीतील ८ तर बंगलोरमधील तिघा बेरोजगारांना या दोघांनी प्रत्येकी २५ ते ३० हजार रुपयांना टोपी घातल्याचे उघड झाले आहे. फसवल्या गेलेल्या युवकांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करताच काल रात्री १०.२५ च्या सुमारास या दोघांना एका रिसॉर्टमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यूझीलंडमध्ये नोकरी देण्याची बतावणी हे दोघे करत होते. आपल्याला विविध कार्यालयांमध्ये जमा करण्यासाठी आणखी रकमेची मागणी डेव्हिड याने केली. त्यासाठी तो आपल्या महिला साथीदारासह पाळोळे येथे आला होता. त्याचवेळी या युवकांचा त्याच्याबद्दलचा संशय बळावला. त्यांनी ताबडतोब काणकोण पोलिसांत तक्रार नोंदवली. एवढेच नव्हे बंगलोरस्थित एक डॉक्टर व औषधालयाचा चालक (फार्मासिस्ट) यांनीही त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. एकूण २८ तक्रारी या भामट्यांविरुद्ध नोंदवण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे पाळोळे येथील एका रिसॉर्टच्या परप्रांतीय व्यवस्थापकालाही या दोघांकडून असाच भयंकर अनुभव आला. दोन महिन्यांपूर्वी तुमचे काम होईल, असा शब्द या व्यवस्थापकाला सदर जोडप्याकडून देण्यात आला होता. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. क्युबेक कौन्सिल ऑफ ख्रिश्चन चॅरिटी, क्युबेक कॅनडा ही संस्था गरिबांना न्यूझीलंडमध्ये नोकऱ्या उपलब्ध करते, अशी बतावणी या जोडप्याने केली. त्यासाठी संबंधित युवकांकडे त्यांनी आणखी दहा हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम जमा करण्यासाठी ते काणकोणात आले असतानाच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. उपनिरीक्षक टेरेन डिकॉस्टा याप्रकरणी तपास करत आहेत.

"त्या' दुर्दैवी मुलीच्या आईने मुख्य संशयिताला ओळखले

पेडणे दि. ३० (प्रतिनिधी) - लैंगिक अत्याचार झालेल्या नऊ वर्षीय रशियन मुलीच्या आईने पेडणे पोलिस स्थानकात मुख्य संशयित अमन भारद्वाज याला ओळखले असून नंतर न्यायालयात त्याची ओळखपरेड होणार आहे. या प्रकरणातील सहआरोपी अनिल रघुवंशी याला २९ रोजी पेडणे न्यायालयात हजर केले असता त्यास ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. भारद्वाज याला उशिरा न्यायालयात हजर करून रिमांड घेण्यात येणार आहे. ही माहिती पेडण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिली.
२६ रोजी हरमल कोळंब समुद्र किनारी भागात एका ९ वर्षीय रशियन बालिकेवर अत्याचार झाले होते. यातील मुख्य आरोपी अमन भारद्वाज (मुळचा उत्तर प्रदेशातील) तेव्हापासून फरारी होता. त्याला पेडणे पोलिसांनी २९ रोजी मुंबई चेंबूर येथे अटक केली व ३० रोजी सकाळी पेडणे पोलिस स्थानकात आणण्यात आले.
त्यानंतर उत्तर गोवा पोलीस अधिक्षक बास्को जॅार्ज, उपअधीक्षकसॅमी तावारीस व पोलिस निरीक्षक सॅमी तावारिस यांनी उत्तम राऊत देसाई यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी त्या रशियन बालिकेची आई पेडणे पोलिस स्थानकात आली आणि तिने मुख्य संशयिताला ओळखले. नंतर तिने बॉस्को जॉर्ज यांच्याशी चर्चा केली.
दरम्यान, बेळगाव, मुंबई, उत्तर प्रदेश पोलिस व सामाजिक संस्थांनी केलेल्या सहकार्यामुळेच गोवा पोलिसांना मुख्य संशयितास अटक करणे शक्य झाल्याचे श्री. जॉर्ज यांनी सांगितले.
अशी झाली अटक
उत्तम राऊत देसाई यांनी सांगितले की, उपनिरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली देवराज कारबार्डेकर व रघुनंदन आसोलकर हे पथक खाजगी जीप घेऊन बेळगावात गेले. कारण अमन हा बेळगावी असल्याची माहिती मिळाली होती. तेथून मग तो पुण्याला गेल्याचे कळले. तेथे तो चेंबूर मुंबई येथे असल्याची माहिती
उत्तम राऊत देसाई यांना मिळताच पेडणे पोलिसांना त्यांनी
मुंबईला रवाना केले आणि तेथे संशयित आरोपीला अटक करण्यात आली.
अमन हा देऊळवाडा धारगळ येथे भाड्याच्या खोलीत भावासह राहात होता. हा प्रकार घडल्यानंतर तो मोबाईलद्वारे सतत आपल्या भावाच्या संपर्कात होता. त्याच्या फोनची माहिती घरमालक घेत असे. त्यामुळे बसल्या जागी पोलिसांना हा सारा तपशील उपलब्ध होत गेला आणि त्यांचे काम सोपे झाले.
अमन याला आज वैद्यकीय चाचणीसाठी बांबोळी येथे गोमेकॉमध्ये पाठवण्यात आले. तेथे त्याची त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, स्थानिक पत्रकारांनी बॉस्को जॉर्ज यांच्याशी सपंर्क साधला असता, त्या बालिकेवर अत्याचार झाले असून सत्य उजेडात येईल आणि आरोपींवर कारवाई करण्यासाठी पुरावे सादर केले जातील, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणातील मुख्य संशयित अमन भारद्वाज याने हरमल किनाऱ्यावर ती रशियन मुलगी एकटीच समुद्रात आंघोळ करत असल्याचे पाहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यानच्या काळात त्याने तेथून पळ काढला. त्याचवेळी तिच्या आईला अनिल रघुवंशी याने बोलण्यात गुंगवत ठेवले होते. तथापि, या नादात आपल्या मुलीवर लक्ष ठेवण्याचे भानही त्या डॉक्टर असलेल्या महिलेला उरले नाही.

जुगाराला आश्रय दिल्याप्रकरणी पेडणे पोलिसांचा जाहीर निषेध

उत्तम राऊत देसाई पेडणेवासीयांच्या नजरेतून उतरले!


पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- पेडणे तालुक्यात जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांनिमित्त सार्वजनिक ठिकाणी खुलेआम सुरू असलेल्या जुगाराविरोधात नुकतेच कुठे लोक एकवटत असताना जनतेचे रक्षक असलेल्या पोलिसांनी थेट जुगारवाल्यांची साथ देत या चळवळीला खो घातला. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा या भागातून कडाडून निषेध केला जात आहे.
कार्यक्षम पोलिस अधिकारी म्हणून परिचित असलेले उत्तम राऊत देसाई यांनी जनतेचा रोष पत्करून जुगारवाल्यांसमोर घातलेले लोटांगण ही अत्यंत दुर्दैवी घटना ठरली असून या भागातील जनतेच्या नजरेतून ते पूर्णपणे उतरले आहेत, अशा प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. हरमल येथे एका रशियन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी फरारी संशयीतांना पकडण्यात यश मिळवल्याने पेडणे पोलिसांच्या कामाचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे जुगारावरून मात्र पेडणे पोलिसांची पूर्ण नाचक्की झाली आहे.
जुगार बेकायदा आहे; तरीही त्यास सामाजिक अधिष्ठान प्राप्त करून देत विविध ठिकाणी आयोजित जत्रोत्सव व इतर धार्मिक उत्सवांत त्याचा बिनधास्तपणे बाजार मांडला जातो. या जुगारातून देवस्थान समितीला हजारो रुपयांची देणगी मिळते, असे कारण पुढे करून या अनिष्ट प्रकाराची पाठराखण केली जाते. पोलिसही या जुगारवाल्यांकडून हप्ते वसूल करतात व देवस्थान समित्यांचे नाव पुढे करून आपले उखळ पांढरे करून घेतात. या जुगारामुळे युवा पिढी व विशेष करून दिवसाला काबाडकष्ट करून संसार चालवणारे लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. या जुगाराचे प्रस्थ एवढे वाढले की त्यामुळे धार्मिक उत्सवांची व देवस्थान परिसराची पवित्रताही नष्ट झाली आहे. जुगार खेळला जात असल्याने तिथे मद्यसेवन व इतर व्यसनांचाही आपोआप समावेश होतो. साहजिकच लोक अशा उत्सवांना जाणेही टाळतात,असाही अनुभव आहे.
"गोवादूत' ने या सार्वत्रिक जुगाराविरोधात जनतेत जागृती करण्यासाठी चळवळ सुरू केली व त्याला सर्वत्र जोरदार पाठिंबा प्राप्त झाला. जुगाराविरोधात उघडपणे बोलणे टाळणारे लोकही पुढे सरसावले व हा प्रकार बंद व्हायला हवा असे बेडरपणे मत मांडू लागले. "मांद्रे सिटिझन फोरम' च्या नेतृत्वाखाली येथील नव्या दमाच्या तरुणांनी हा विषय हातात घेतला व त्याबाबत त्यांच्याकडून सामाजिक जागृती सुरू आहे. मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर व माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांना निवेदन सादर करून त्यांचाही पाठिंबा मिळवण्यात आला. पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी व उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनीही हा जुगार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांनी संबंधित पोलिस अधीक्षकांना अशा जुगारावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही जारी केले.
उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी तर जनतेने या जुगाराविरोधात पुढे यावे, पोलिस त्यांना पूर्ण सहकार्य करतील, असा विश्वासही व्यक्त केला. प्रत्यक्षात पेडणे पोलिसांची भूमिका पूर्ण जनविरोधी ठरली. जनचळवळीचा धाक नुकताच कुठे तयार होत असताना पोलिसांनीच या जुगारवाल्यांना अभय दिले. मोरजी व केरी येथील जत्रोत्सवात बेफामपणे जुगाराचा बाजार मांडून जुगारविरोधी चळवळीची हवाच काढून घेण्याचा अश्लाघ्य प्रकार घडला. पोलिसांनी जनतेला साथ देण्याचे सोडून आता खुद्द गुन्हेगारांनाच साथ देण्याचे ठरवल्याने या प्रकाराची सरकारने त्वरित गंभीर दखल घेण्याची गरज आहे, अशी मागणी या भागातील लोकांनी केली आहे.
कॅसिनो पचला तिथे जुगाराचे काय !
जनतेची स्मरणशक्ती अल्प असते, असे म्हटले जाते परंतु काही गोष्टी मात्र जनतेच्या कायम स्मपणात राहतात. काही काळापूर्वी पोलिस खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या कॅसिनो भेटीवरून बरेच वादळ उठले होते. खात्यातील काही अधिकारी कॅसिनोवर पार्टीत दंग असल्याचे पत्रकारांच्या निदर्शनास आले होते. या कृतीचा सर्वत्र निषेध होत असताना या अधिकाऱ्यांना चार खडे बोल सुनवायचे सोडून पोलिस महासंचालकांनी त्यांची पाठराखण केली व त्याही पलीकडे जाऊन त्यांच्या कॅसिनो भेटीची तुलना मंदिरात जाण्याशी करून या वादात अधिकच भर घातली.
कॅसिनोवर गेलेल्या अधिकाऱ्यांत पेडणेचे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई हेदेखील होते. पेडणे पोलिस स्थानकाचा ताबा सध्या त्यांच्याकडे आहे, त्यामुळे या भागात जुगाराला उघडपणे मिळणाऱ्या आश्रयाला ते जबाबदार ठरतात. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची खास मर्जी असलेल्या उत्तम राऊत देसाई यांच्या या भूमिकेचेही कदाचित वरिष्ठ अधिकारी समर्थन करत असतील, अन्यथा उघडपणे जुगाराला अभय देण्याचे धाडस त्यांनी केले नसते, अशी शक्यता आता लोक व्यक्त करीत आहेत.

म्हादई बचाव लढ्यात जोशपूर्ण योगदान द्या

डिचोलीतील युवा महोत्सवात नगराध्यक्षांची हाक

डिचोली- चंद्रकांत केणी नगर, दि. ३० (प्रतिनिधी) - कला आणि संस्कृतीच्या उत्थानासाठी युवा महोत्सवातून होणारे कला संस्कृतीचे दर्शन, पाश्चात्य संस्कृतीचे अतिक्रमण रोखण्याचे कार्य याबरोबरच आता युवावर्गाने म्हादई बचाव लढ्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष सतीश गावकर यांनी पंधराव्या युवा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर डिचोली येथे केले.
कोकणी भाषा मंडळ, इनोव्हेटर्स आणि भतग्राम परिवार डिचोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोवा युवा महोत्सवाचे आज येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर चंद्रकांत केणी नगरात एम. बॉयर व्यासपीठावर शानदार उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार राजेश पाटणेकर, सन्माननीय अतिथी आमदार अनंत शेट, कार्याध्यक्ष सूरज कोमरपंत, इनोव्हेटर्सचे झाकी शेख, महोत्सवाचे प्रमुख संयोजक डॉ. शेखर साळकर, कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत नाईक, विद्याधर राऊत, सराफिन कोता आदी मान्यवर उपस्थित होते.
शणै गोयबाब यांची जन्मभूमी असलेल्या डिचोली नगरीतून युवा वर्ग आज गोव्यातील समस्या सोडविण्यासाठी हिरीरीने पुढे येत असून म्हादई बचाव लढ्यात डिचोलीचा युवा वर्ग सक्रिय योगदान देईल व म्हादईच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहील असे आश्वासन सतीश गावकर यांनी टाळ्यांच्या गजरात दिले.
आपल्या स्वागतपर भाषणात पाटणेकर म्हणाले, डिचोली ही कलाकारांची खाण आहे. भजनसम्राट कै. मनोहर शिरगावकर, अजित कडकडे, वामन वर्दे वालावलीकर यांच्यासारख्यानी ही पुण्यभूमी कला साहित्याच्या क्षेत्रात समृद्ध केली असून युवा महोत्सव या भूमीत होत असल्याबद्दल आपण आयोजकांचे आभार मानतो.
जीवनातील आनंद निर्भयपणे लुटा. मात्र मौजमजा करताना दारू, धूम्रपान यापासून दूर राहा. आपल्या जन्मदात्यांची मान खाली जाणार नाही याची काळजी घ्या असे प्रतिपादन डॉ. शेखर साळकर यांनी केले. कोणतेही काम हलके नसते. आपणच त्याला उच्च दर्जा द्यायचा असतो असे सांगून त्यांनी युवावर्गाला शुभेच्छा दिल्या.
गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडविण्याचे काम सध्या विघटनवादी शक्ती करीत असून त्यांच्या कारवाया थोपवण्याचे आव्हान युवा वर्गाने पेलावे असे कार्याध्यक्ष सूरज कोमरपंत म्हणाले. म्हादई बचावसाठी युवकांनी पुढे यावे असे कळकळीचे आवाहन प्रशांत नाईक यांनी केले.
आमदार अनंत शेट म्हणाले, डिचोली हे सांस्कृतिक केंद्र असून युवकांनी आव्हाने पेलताना संस्कृतीची कास धरली पाहिजे. युवकांच्या सुप्त कला गुणांना वाव देणाऱ्या युवा महोत्सवातून कलेची ज्योत अखंड तेवत राहो असे ते म्हणाले.
येथील कदंब बसस्थानकापासून आबा नाटेकर मंचावरून घोडेमोडणी पथकाने मिरवणुकीद्वारे ज्योत मैदानावर आणली. दीप प्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीशांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. मंगलदास भट व अन्वेषा सिंगबाळ यांनी सूत्रनिवेदन केले. विद्याधर राऊत यांनी आभार मानले.

दोन लाख खारफुटी नष्ट करण्याचा डाव

विजर खाजन बंदराला पंचवाडीकरांचा ठाम विरोध
अखेरपर्यंत लढा देण्याचा निर्धार


पणजी, दि. ३० (प्रतिनिधी)- "सेझा गोवा'च्या कोडली खाणीवरील खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी पंचवाडी गावातून जाणाऱ्या नियोजित रस्त्यासाठी सुमारे दोन लाख चौरसमीटर जागेतील जुवारी नदीच्या किनारी वसलेली खारफुटी (मॅग्रोव्हज) वनस्पती नष्ट करण्याचे कुटील कारस्थान सध्या रचले जात असून त्याला विरोध करण्यासाठी पंचवाडीच्या ग्रामस्थांनी सध्या जोरदार संघर्षाची तयारी चालविली आहे. एका खाण कंपनीचे हित राखून स्वतःचे उखळ पांढरे करू पाहणाऱ्या काहींनी पंचवाडीसारख्या निसर्गसंपन्न गावावरच खनिज प्रदूषणाच्या माध्यमातून नांगर फिरवण्याचा काही लोकांचा डाव आहे व तो अजिबात यशस्वी होऊ दिला जाणार नाही. अखेरच्या श्वासापर्यंत या संकटाशी आम्ही लढा देऊ असा ठाम निर्धार पंचवाडीवासियांनी केला आहे. गावातून रस्ता नेऊ दिला जाणार नाहीच परंतु एकाही खारफुटीला हात लावू देणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या संतप्त भावना "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केल्या.
आतापर्यंत खाणीच्या विळख्यातून चार हात दूर राहिलेल्या शिरोडा मतदारसंघातील पंचवाडी गावावर सध्या नियोजित खनिज रस्ता व खनिज हाताळणी बंदर प्रकल्पाचे अरिष्ट ओढवले आहे. या गावातील गरीब शेतकरीबंधू व कष्टकरी वर्गाच्या अज्ञानाचा फायदा उठवून, गावातील काही लोकांना ट्रक व्यवसाय व रोजगाराचे आमिष दाखवून या प्रकल्पाच्या बाजूने जनमत तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू आहेत.
राज्याच्या महसूल खात्याने या प्रकल्पासाठी सुमारे ५ लाख ५४ हजार चौरसमीटर जागा संपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. याप्रकरणी ५३ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. आता जमिनीच्या बदल्यात या पैशांचे गाजर लोकांपुढे करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयास सुरू आहेत. या गावात बहुतेक शेतकरी व कष्टकरी समाज राहतो. या लोकांना सहजपणे पैशांचे आमिष दाखवणे शक्य असल्याने त्यांची दिशाभूल करण्याचेही घाटत आहे. या नियोजित प्रकल्पातून आपला वैयक्तिक स्वार्थ साधू पाहणाऱ्या काही लोकांना पुढे करून गावातील लोकांच्या एकजूट भंग करण्याचे प्रकार सुरू आहेत.
दरम्यान, याप्रकरणी सेंट ऍथनी पेरीश चर्चचे फादर व पंचवाडी येथील श्री सातेरी भगवती देवस्थान समिती यांनी पुढाकार घेऊन पंचवाडी गावचे जपण्यासाठी संघर्ष करण्याचे ठरविले आहे. गेल्या डिसेंबरात या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सुमारे दोन हजार लोकांच्या सह्यांचे निवेदन राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांना सादर करून त्यांचेही लक्ष याकडे वेधण्यात आले आहे.
पंचवाडी निसर्गसंपन्न आणि शेतीप्रधान गाव आहे. या भागात म्हैसाळ धरण असल्याने त्याचा पुरेपूर लाभ येथील शेतकरी कृषी उत्पादनासाठी घेतात. सुमारे २०० हेक्टर जागा ही ओलिताखाली येते. बहुतेक खाजन शेतीत लोक वर्षातून दोनदा पिके घेतात, काजू, आंबा, माड, बागायती, शेती आदीव्दारे कृषी उत्पन्न घेऊन येथील लोक आपला उदरनिर्वाह करतात. मात्र विजर खाजन येथे येऊ घातलेला खनिज हाताळणी बंदर प्रकल्प हा प्रत्यक्ष शेतीच्या अवघ्या काही अंतरावर उभारला जात असल्याने या प्रकल्पामुळे शेतीची नासाडी अटळ असल्याचे नाझारेथ गुदिन्हो व क्रिस्टो डिकॉस्टा यांनी गोवादूतशी बोलताना सांगितले. एकदा का या गावात खनिजाची वाहतूक सुरू झाली व विविध ठिकाणी खनिजाची साठवणूक झाली की, पंचवाडीत धुळीचे व खनिज मातीचे साम्राज्य पसरेल ही काळ्या दगडावरची रेष आहे. आपल्या स्वतःच्या गावाचा ऱ्हास उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ पंचवाडीवासीयांवर येणार असल्याने त्या भीतीपोटीच त्यांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून काही आपमतलबी लोक आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी सदर कंपनीच्या मदतीने सध्या दादागिरी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तोडा व फोडा ही नीती वापरून व राजकीय संगनमताने शिरोड्यातील पंचवाडी गावचा गळा घोटण्यासाठी पुढे सरसावलेल्या या स्वार्थांधांची अजिबात गय केली झाणार नाही. राज्य सरकारने वेळीच हस्तक्षेप करून पंचवाडीतील नियोजित रस्ता व बंदर प्रकल्पाचा विचार सोडला नाही तर पंचवाडी ग्रामस्थांना आपल्या गावच्या रक्षणासाठी लढा उभारावा लागेल व त्याच्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. तसे निवेदनही त्यांनी विविध खात्यांना सादर केले आहे. शिरोड्याचे आमदार महादेव नाईक यांनी आपला पूर्ण पाठिंबा पंचवाडीवासीयांना व्यक्त केला आहे. त्यांच्या या लढ्यात आपण अग्रेसर राहणार असल्याचेही ते म्हणाले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय आपण उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.