Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 28 November, 2009

तीन हल्लेखोरांसह सहा जणांना अटक, सुपारी देऊन बिच्चूवर हल्ला

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): पणजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर गुंड बिच्चू याच्यावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या तिघा हल्लेखोरांना आज पणजी पोलिसांनी वास्को येथून ताब्यात घेतले, तर या हल्ल्यासाठी त्यांना मदत पुरवणाऱ्या अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे. या खुनी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार न्यायालयीन कोठडीत असलेला कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे असून त्यानेच बिच्चू याच्यावर हल्ला करण्यासाठी "सुपारी' दिली होती, अशी माहिती आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. रात्री उशिरा या हल्ल्यात वापरण्यात आलेली जीए ०३ टी ३००४ ही एव्हेंजर दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. तर, या प्रकरणात रमेश गिरप्पा दलवय (वय २४, मूळ बेळगाव येथे राहणारा), महमद मजीद रेहमान (२४, मूळ कोलकाता येथे राहणारा. सध्या मडगाव), संजय मधू लिंगूडकर (वय २३,नावेली मडगाव), प्रवीण सुरेश भातखंडे (वय १९, आसगाव, मूळ खानापूर), नदीम आयूब खान (वय २४, मडगाव, मूळ दिल्ली) व शाम विनय नाईक (२७, कंापाल पणजी) या सहा जणांना भा.द.स ३०७ व १२३ (ब) कलमाखाली अटक करण्यात आली आहे. तर, न्यायालयात अर्ज सादर करून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आश्पाक बेंग्रे याला या हल्ला प्रकरणात पोलिस कोठडीत घेण्यात येणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले.
बिच्चू याच्यावर हल्ला करण्यापूर्वी रमेश आणि मोहमद हे दोघे न्यायालयाच्या दारावर उभा असलेल्या आश्पाक बेंग्रे याच्याकडे बोलत होते. बिच्चू एका प्रकरणात न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांच्याकडे होती. त्याच्यावर हल्ला करायचा आणि त्यानंतर होणाऱ्या गोंधळाची संधी घेऊन फरार व्हायचे, असे दोन हेतू साध्य करणाच्या बेत बेंग्रे याचा होता. या हल्ल्यात वापरण्यात आलेली एव्हेंजर ही दुचाकी १ नोव्हेंबर रोजी हणजूण येथून प्रवीण भातखंडे यांनी चोरली होती. तर, सर्वांची एकाच ठिकाणी राहण्याची सोय शाम नाईक याने केली होती. त्यासाठी वास्को येथे शाम याने एक भाड्याची खोली घेतली होती. तेथूनच रमेश, महोमद, नदीम, प्रवीण संजय व शाम याला अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
खंडणी प्रकरणातून हल्ला...
एकेकाळी गुन्हेगारी जगात अधिकार गाजवणारा आश्पाक बेंग्रे तुरुंगात असल्याने त्याला का म्हणून खंडणी द्यायची, असा विचार करून त्याच्याच गॅंगमधे काम करणारा बिच्चू याने काही महिन्यांपासून वेगळी चूल थाटली होती. बेंग्रे कोठडीत असल्याने गुन्हेगारी जगतावर त्याची पकडही ढिली झाली होती. त्यामुळे बिच्चू याने बेंग्रे याला त्याचा हप्ता देण्याचे बंद केले होते. बिच्चू याने गुन्हेगारी जगतात आपली पकड मजबूत केलीच. त्यामुळे बिच्चू याच्यावर प्राणघातक हल्ला करणाचा कट रचण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा कट न्यायालयीन कोठडीतून रचण्यात आल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तुरुंगात असलेल्या संशयितांना किंवा आरोपींना कोण कोण भेटायला येतात यावर कडक लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे श्री. देशपांडे म्हणाले.
हल्लेखोर वास्कोतून 'ट्रिप्पल सीट' आले
बिच्चू याच्यावर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर वास्कोतून दुचाकीवरून ट्रीप्पल सीट आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे वास्को ते पणजीपर्यंत त्यांना कोणत्याही वाहतूक पोलिसाने अडवले नाही. येताना त्यांनी दोन चॉपर बॅगेतून आणले होते. दुचाकी संजय लिंगुडकर चालवत होता. तर, पहिला बिच्चूवर पहिला वार रमेश याने केला. हा वार बिच्चूने आपल्या हातावर झेलला तेव्हा रमेश याच्या हातातला चॉपर खाली पडला. हा चॉपर काढून रमेश याच्यावर हल्ला करण्यासाठी बिच्चू खाली वाकला असता दुसऱ्या चॉपरने त्याच्यावर वार करण्यात आला. हा वार त्याच्या डोक्यावर लागला. त्याबरोबर तो खाली कोसळला. तेव्हा पळून जात असताना एक चॉपर घटनास्थळी पडला. तर, दुसरा चॉपर रमेश याच्याकडून जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याविषयीचा पुढील तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करीत आहेत.
----------------------------------------------------------------------
तुरुंगात शिजला हल्ल्याचा कट...
न्यायालयीन कोठडीत असलेल्या आश्पाक बेंग्रे याने बिच्चू याच्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. त्यासाठी बेळगाव येथील रमेश आणि मूळ कोलकाता येथील मोहमद याची मदत घेण्याचा आली. बेंग्रे याचा उजवा हात समजला जाणारा शाम नाईक याने कट पूर्णत्वास नेण्यासाठी मदत केली असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
-----------------------------------------------------------------------
व्हिडिओ कॉन्फरसिंग सुनावणी हवी
सुपारी देऊन हल्ला करणे हे गोव्यात नवीन नाही. अनेक वर्षापासून हे चालत आले आहे. गरज आहे ती, अशा अट्टल गुन्हेगारावर लक्ष केंद्रित करण्याची, असे मत पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी व्यक्त केले. अंडरट्रायल असलेल्या संशयितांना न्यायालयात आणण्याची पद्धत बंद केली पाहिजे. प्रत्येक सुनावणीच्या वेळी या गुन्हेगारांना न्यायालयात आणावे लागते त्याचा गैरफायदा ते उठवतात. त्याचप्रमाणे, एका गुन्हेगाराला न्यायालयात आणण्यासाठी चार पोलिसांना पाठवावे लागते. हा अतिरिक्त बोजा पोलिसांवर पडतो. त्यामुळे तुरुंग ते न्यायालय अशी व्हिडिओ कॉंन्फरन्सिंगची सुविधा सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे यावेळी श्री. देशपांडे म्हणाले.

बनावट सोने तारण ठेवून बॅंकेला एकतीस लाखांना गंडा

म्हापसा येथे सोनाराला अटक
म्हापसा, दि. २७ (प्रतिनिधी): म्हापसा येथील फॅडरेल बॅंकेत बनावट सोने ठेवून, सुमारे एकतीस लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी स्थानिक सोनार संजय मधुसुदन शिरोडकर (३९) याला पोलिसांनी अटक केली. यासंबंधी बॅंकेचे व्यवस्थापक मार्थाचंद जॉर्ज यांनी तक्रार केल्यानंतर भा.दं.सं.च्या ४२० कलमाखाली शिरोडकर याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार ३१ ऑक्टोबर २००८ ते सप्टेंबर २००९ पर्यंत बोशान होम येथील फॅडरेल बॅंकेत उघडण्यात आलेल्या एकशे तीस खातेदारांनी त्याच इमारतीत राहाणारा संजय शिरोडकर याच्या मदतीने तारण म्हणून सोने ठेवून सुमारे सहासष्ट लाख,एकेचाळीस हजार सातशे रुपयांचे कर्ज घेतले. चार सप्टेंबर रोजी शिरोडकर पुन्हा चार बांगड्या घेऊन आला असता, कर्मचाऱ्यांना संशय आला व त्यांनी सोन्याची तपासणी केली असता, त्या बांगड्या बनावट असल्याचे आढळले. पूर्वीचे दागिने तपासले असता १३ लाख ७५ हजारांचे दागिने बनावट असल्याचे बॅंकेस आढळून आले.त्यामुळे बॅंकेने रीतसर तक्रार नोंदविली आहे.या प्रकरणाचा तपास निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ब्रॅडन डिसौझा, संदिप केसरकर पुढील तपास करीत आहेत.

उसगाव येथे जीपच्या धडकेने विद्यार्थी ठार

तिस्क-उसगाव, दि.२७ (प्रतिनिधी): घोडेगाळ पार उसगाव येथे आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास डिओे स्कूटर व टाटा मोबाईल जीप यांच्यात अपघात होऊन स्कूटर चालक १७ वर्षीय कॉलेज विद्यार्थी जागीच ठार झाला.मागे बसलेली १७ वर्षीय कॉलेज विद्यार्थिनी गंभीररीत्या जखमी झाली आहे.
आज दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास उसगावहून फोंड्याकडे जाणाऱ्या डिओ स्कूटर क्र. जीए ०५ सी ३९५० ला घोडेगाळ पार उसगाव येथे फोंड्याहून उसगावकडे येणाऱ्या निर्मला फार्मच्या टाटा मोबाईल जीप क्र. जीए ०२ व्ही ९५५५ ने जोरदार धडक दिली.जीपच्या धडकेने स्कूटर चालक नेस्टली ऊर्फ अथोनी बेलारफिनो परेरा (वय १७ वर्षे, रा. बांदोडा) जागीच ठार झाला.जीपने स्कूटरला ठोकर देऊन स्कूटर सुमारे ६० मीटर ओढत पुढे नेली. वाहनाच्या धडकेने स्कूटरचा फक्त सांगाडा राहिला. नंतर टाटा मोबाईल जीपने कुमयाच्या झाडाला धडक दिली. कुमयाच्या झाडाला धडक देऊन जीप रस्त्याच्या कडेला उलटली. त्या स्कूटरच्या मागे बसलेली कॉलेज विद्यार्थिनी रचना गावडे (वय १७ वर्षे, रा.बांदोडा) गंभीर जखमी झाली.
जीप चालकाला अचानक डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा गेला व जीपची ठोकर रस्त्याच्या कडेने जात असलेल्या डिओ स्कूटरला बसली.जीप चालकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सदर जीप कल्लभवाडा उसगाव येथील निर्मला फार्मच्या मालकीची आहे.त्या जीपच्या मागच्या बाजूस ऍसिड व अंड्याचे रिकामे ट्रे होते.सदर ऍसिड ओतल्याने तेथील स्थानिकांच्या डोळ्यात जळजळ निर्माण झाली.या अपघाताचा पंचनामा फोंडा पोलिसांनी केला.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी भेट दिली.

Friday, 27 November, 2009

कोर्टाबाहेरच गुंडावर प्राणघातक हल्ला भरदिवसा पणजीत थरारनाट्य

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत आपला मंत्रिपदाचा दशकपूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करीत असतानाच, नेमक्या त्याच दिवशी राजधानीत न्यायालयाजवळ हल्ला प्रकरण घडले आहे. आज दिवसाढवळ्या पणजी जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर जामिनावर सुटलेला गुंड मेहबूब मुल्ला ऊर्फ "बिच्चू' व त्याचा चुलत भाऊ रमजान मुल्ला या दोघांवर दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने प्राणघातक वार करून पलायन केले. यात बिच्चू याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून त्याला त्वरित उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. बिच्चू याच्या डोक्यावर आणि पाठीवर असे सुमारे सहा वार करण्यात आल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी रक्ताचे डाग पडले होते तसेच त्याठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या दुचाकीवर रक्ताचे शिंतोडे उसळले होते. आज दुपारी सुमारे २.३५ वाजता ही घटना घडली. २.३० वाजता न्यायालयाचे दुसरे सत्र सुरू होण्याची वेळ असल्याने न्यायाधीश तसेच वकिलांची न्यायालयात येण्याची लगबग सुरू होती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालयाच्या आवारात एकच गोंधळ माजला आणि सर्वांची धावपळ उडाली. पोलिसांनी पंचनामा करून दोघा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, पणजी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक तुषार लोटलीकर, रामनाथ कळंगुटकर यांनी भेट देऊ पाहणी केली. रात्री उशिरा दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
बिच्चू याच्या विरोधात न्यायालयात एका खटल्याची सुनावणी असल्याने त्याला हजर राहण्यासाठी तो न्यायालयात येत असताना न्यायालयाच्या बाजूलाच असलेल्या पणजी रेसिडेंन्सीच्या खाली बिच्चू आणि त्याच्या चुलत भावावर हल्ला करण्यात आला. एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला करून पळून जाण्याच्या घाईगडबडीत असताना दोघेही हल्लेखोर रेसिडेन्सीच्या समोर असलेल्या पेट्रोल पंपच्या समोर दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडले. त्याही परिस्थितीत त्यांनी दुचाकी घेऊन तेथून पळ काढला. यावेळी तेथे असलेल्या सर्वांनी त्यांना पळून जाताना पाहिले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ८ मीटरवर पडलेला एक चॉपरही जप्त केला आहे. हा हल्ला झाला त्यावेळी न्यायालयाच्या आवारात अन्य एका खटल्यात उपस्थित राहण्यासाठी आलेला कुविख्यात गुंड आश्पाक बेंग्रे उभा होता. त्याने थेट न्यायालयातच धूम ठोकली, अशी माहिती तेथे उपस्थित असलेल्या वकिलांनी दिली.
राज्यात वाढत्या गुन्हेगारीने आज पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगत चक्क न्यायालयाच्याच आवारात प्राणघातक हल्ला करून न्यायव्यवस्थेला आणि पोलिस यंत्रणेला एकप्रकारे आव्हान दिले आहे. हल्लेखोरांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. दोघेही हल्लेखोर चिंबल येथे राहणारे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार, मार्च २००७ साली बिच्चू व त्याच्या अन्य साथीदारांनी एका बारमध्ये ज्योकिम मोन्तेंरो याच्यावर बिअर आणि सोडाच्या बाटल्यांनी प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्या घटनेनंतर बिच्चू तसेच त्याचे अन्य साथीदार आसीफ अस्लम, शौकत शेख, शब्बीर गुजराती याच्या विरोधात जुने गोवे पोलिस स्थानकात ३०७ (प्राणघातक हल्ला) नुसार गुन्हा नोंद करून न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले होते. त्यानंतर न्यायालयात युक्तीवादाच्यावेळी हा हल्ला प्राणघातक नसून ज्योकीम मोन्तेरो केवळ गंभीर जखमी झाला होता, असा दावा करून ३०७ कलम न्यायालयातून रद्द करून घेण्यात आले होते. तसेच बिच्चू याला जामीनही मंजूर झाला होता. आज याच खटल्याची पुढील सुनावणी सुरू होती. त्यामुळे जामिनावर असलेला बिच्चू न्यायालयात हजर राहण्यासाठी आला होता.
------------------------------------------------------------------
हल्ला फिल्मी स्टाईलने...
इफ्फीनिमित्त पणजी शहरात कडेकोट सुरक्षा असतानाही खुलेआम फिल्मी स्टाईलने न्यायालयाजवळ खुनी हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गोवा पोलिसांबरोबर निमलष्करी दलाच्या तीन कंपन्या पणजी शहरात गस्त घालत असतानाही अशा प्रकारे खुनी हल्ला करण्याचे धाडस गुन्हेगार करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तडीपार...
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला बिच्चू याच्यावर विविध पोलिस स्थानकात सुमारे सहा गुन्हे दाखल आहेत. जुने गोवे पोलिस स्थानकात ३, पणजी पोलिस स्थानकात १, म्हापसा १ व मायणा कुडतरी येथे १ अशी माहिती मिळाली आहे. तसेच, अनेक अनैतिक कृत्यात त्याचा सहभाग असल्याने राज्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलिस खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला होता. गेल्या जानेवारी महिन्यात पाठवलेला हा प्रस्ताव अकरा महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात धूळ खात पडलेला आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालय व इस्पितळ तसेच मिरामार येथे भलत्याच मुलींकडे बोट दाखवून पर्यटकांकडून हजारो रुपये उकळण्याच्या धंद्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पणजी शहरात अशा प्रकारे पर्यटकांना लुटण्यासाठी तीन गट कार्यरत असून एका गटाने दुसऱ्या गटाचा प्रमुख असलेला बिच्चू याच्यावर हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

कसाबला फासावर चढवा, निषेध सभेत भाजयुमोची मागणी

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): भारताच्या आर्थिक राजधानीवर हल्ला करून शेकडो लोकांचे प्राण घेणारा दहशतवादी अजमल कसाब याला ताबडतोब फाशीवर लटकवण्याची मागणी करून कसाबच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याने आज निषेध दिन म्हणून पाळण्यात आला. यावेळी युवा मोर्चाचे नवनियुक्त अध्यक्ष रुपेश महात्मे बोलताना म्हणाले की, देशावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कुरवाळत बसण्याचे सोडून कॉंग्रेस सरकारने त्यांना फासावर लटकवावे.
पक्ष कार्यालयासमोर झालेल्या या निषेध सभेत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय हरमलकर म्हणाले, भारताच्या संसदेवर हल्ला करणारा अफजल गुरु याला फाशीची शिक्षा होऊनही कॉंग्रेस सरकार त्याची सेवा करण्यात मश्गूल आहे. बॉंम्ब स्फोट प्रकरणात नाहक गुंतवलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांची कोठडीत हाल सुरू केले आहेत तर, दहशतवादी कसाब याच्यावर एका वर्षात ३१ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या हिंदुस्थानात हिंदू सुरक्षित नाही. याला कॉंग्रेस सरकार कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. जोपर्यंत या देशात कॉंग्रेस सरकार सत्तेवर असणार तोपर्यंत दहशतवादी हल्ले करीत राहणार, असेही ते म्हणाले.
भारताने कोटी रुपये खर्च करून एक दहशतवादी पाळून ठेवला आहे. त्याच्या विरोधात या देशातील तरुण पेटून उठला पाहिजे, असे आवाहन यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. भारतावर सर्वांत मोठा झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवस हा सर्वत्र काळा दिन आणि निषेध दिवस म्हणून पाळला जात असल्याने गोव्याचे मुख्यमंत्री मात्र आपला सत्कार करून घेण्यात गर्क असल्याची टीका यावेळी श्री. सावंत यांनी केली.
यावेळी "कसाबला फांसी दो फांसी दो' अशा घोषणांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आसमंत दणाणून सोडले. सभेनंतर रस्त्यावर कसाबच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस पहारा ठेवण्यात आला होता.

हेरॉईनसह २१ लाखांचा माल कळंगुट येथे जप्त

पोलिसांचा छापा, एका संशयिताला अटक
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): कळंगुट खोबरावाडो येथे काल रात्री ९.३० च्या सुमारास कळंगुट पोलिसांनी दिलीप सीमेपुरुषकर या संशयिताच्या घरावर छापा टाकून १८ ग्रॅम हेरॉईन (किंमत २१ हजार ६००रु.), १२ ग्रॅम चरस (किंमत ७ हजार ५३०रु), १८५ ग्रॅम सोने, २० लाख ५ हजार ३०० रुपये व ८० हजार रुपयाचे विदेशी चलन असा सुमारे २१ लाखांचा माल जप्त केला. सीमेपुरुषकर हा अमली पदार्थांच्या व्यवहारांत असल्याच्या संशयावरून हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून सीमेपुरुषकर हा अमली पदार्थ तस्करीच्या व्यवहारांत गुंतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दोन वर्षांपूर्वी एका प्रकरणात त्याला अटकही झाली होती. सध्या पर्यटन मौसम सुरू झाल्याने आणि अमली पदार्थांची "मागणी' वाढल्याने या भागात अशा पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कळंगुटचे निरीक्षक नॉलास्को रापोझ यांनी आपल्या पोलिस फौजफाट्यासह हा छापा टाकला.
संशयिताच्या घरात एवढी मोठी रक्कम आणि अमली पदार्थ सापडल्याने त्याला अटक करून चौकशी सुरू झाली आहे. तसेच एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. ही रक्कम कुठून आली, याचे स्पष्टीकरणही त्याला देता आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अमली पदार्थांच्या विक्रीचे हे पैसे असावेत, असा दावा पोलिसांनी केला आहे.
या छाप्यात पोलिसांना सोन्याच्या पाच बांगड्या, १ मंगळसूत्र व कर्णफुलांची एक जोडी सापडली आहे. निरीक्षक रापोझ यांनी टाकलेल्या या छाप्यात पोलिस हवालदार गौरीश परब, पोलिस शिपाई सुभाष मालवणकर, लुईस परेरा व राजू शिरोडकर यांच्या समावेश होता. पुढील तपास निरीक्षक रापोझ करीत आहेत.
-----------------------------------------------------------------
अमली पदार्थाची तस्करी आणि विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्यासाठी खास स्थापलेल्या अमली पदार्थविरोधी पथकाच्या डोळ्यांदेखत अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी सुरू असल्याने अखेर कळंगुट पोलिसांनी छापा टाकून या भागात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाची विक्री होत असल्याचे उघड केले आहे. पर्यटन हंगाम सुरू झालेला असून या पथकातील पोलिसांना मात्र "इफ्फी'च्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

मगोच्या दोन्ही गटांमध्ये समेट

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी): इतिहासाचे केवळ स्मरण करून होत नाही तर, तशी कृतीही करावी लागते. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा एक चळवळ म्हणून सुरू झाला होता, असे सांगून पक्षात आतापर्यंत असलेले सर्व मतभेद मिटल्याची घोषणा आज माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी राऊत आणि ढवळीकर गट उपस्थित होते. श्रीमती काकोडकर यांच्या एका बाजूला ढवळीकर गट तर, दुसऱ्या बाजूला राऊत गट बसला होता.
पक्षातील या दोन्ही गटांनी एकामेकांच्या विरोधात न्यायालयात सादर केलेले खटलेही येत्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागे घेतले जाणार आहेत असे सांगून पक्षाची सध्या असलेली केंद्रीय समिती मे २०१० पर्यंत अस्तित्वात असणार असल्याचे श्रीमती काकोडकर यांनी सांगितले.
दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्याचे संपूर्ण श्रेय श्रीमती शशिकला काकोडकर यांना जात असल्याचे पक्षाचे अध्यक्ष पांडुरंग राऊत म्हणाले.

Thursday, 26 November, 2009

राष्ट्रपतींची 'सुखोई'तून चित्तथरारक भरारी

पुणे, दि. २५ (प्रतिनिधी): भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आज ध्वनीपेक्षाही अधिक गतीने जाणाऱ्या सुखोई ३० या लढाऊ विमानाच्या फेरफटक्यांचा अनुभव घेतला. हवेत पंचेचाळीस अंशातून उड्डाण करणारे हे संरक्षण दलात हवेतून हवेतील लक्ष्यावर किंवा हवेतून जमिनीवर क्षेपणास्त्राचा मारा करण्यासाठी वापरले जाते. अशा विमानातून चौऱ्याहत्तर वर्षीय राष्ट्रपतींनी चोवीस मिनिटांचा दौरा केला. पुण्यातील लोहगाव विमानतळावरून उड्डाण केल्यावर उत्तरेच्या दिशेने झेपावलेले हे फक्त दोन व्यक्तींनाच बसण्याची क्षमता असलेले विमान आळंदी, देहूवरुन राजगुरुनगरच्या आकाशक्षेत्रावरून पुढे गेले व उजवीकडे वळून शिरूर, उजनी धरण हा परिसर बघत बारामतीवरून भरारी घेत परतले. या मोहिमेत त्यांनी विमानाचे नियंत्रण, ते उजडीकडे वळवणे, डावीकडे वळविणे, खाली घेणे, वर घेणे या प्रक्रिया स्वत: केल्या. सुखोई विमान हे लढाऊ विमान असल्याने त्यानी विमानातच बसूनरडारवरून दूर अंतरावरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणे व हल्ला करण्याची यंत्रणा हाताळणे याचीही माहिती घेतली. सुखोई विमानातून उड्डाणाचा अनुभव घेणाऱ्या त्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरल्या. यापूर्वी जून २००६मध्ये साडेतीन वर्षापूर्वी त्यावेळचे राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी असेच सुखोईमधून उड्डाण केले होते. या स्वनातीत विमानातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
सुखोईतून भरारी मारण्याच्या महत्वाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींचे काल दुपारी पुण्याला आगमन झाले. आज त्यांच्या या भरारीची नियोजित वेळ साडेनऊ वाजता होती. पण त्यांच्या आरोग्यतपासणीतील बारकावे व वारंवार विमानतपासणी या प्रक्रियेमुळे हे उड्डाण सकाळी अकरा वाजता झाले. साडेनऊ वाजता राष्ट्रपतींचा ताफा लोहगाव विमानतळावर पोहोचला. त्यांना प्रथम वायुदलाच्या एका तुकडीने सलामी दिली. सुखोई ३०एम के आय हे विमान ताशी सव्वीसशे किमी वेगाने उडण्याच्या क्षमतेचे असल्याने व पहिल्या दहा सेकंदात ताशी अडीचसे किमीपासून ते ताशी आठशे किमी वेगाने वर जात असल्याने चौऱ्याहत्तर वर्षीय राष्ट्रपतींच्या प्रकृतीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून गुरुत्वाकर्षणाच्या प्रचंड दबावाचा प्रकृतीवर परिणाम होऊ नये, अशा परिणामाचा सूट घालण्यात आला. सर्वसाधारणपणे सहावारी साडी, डोक्यावरून पदर व त्या पदराचे एक टोक डाव्या हातात पकडलेले अशा शालीन चर्येतील राष्ट्रपतींनी जेंव्हा लष्करी पेहेरावाचा तो बुटोई सूट घातला व सेनादलाच्या जवानांशी हात हालवत सुखोई विमानात स्थानापन्न झाल्या. विंग कमंाडर एस साजन हे त्या विमानाचे चालक होते. राष्ट्रपतींचे वय लक्षात घेऊन आज विमान फक्त साडेसातशे किमी गतीने नेण्याचा व अन्यथा पन्नास हजार फुटावरून जाणाऱ्या या विमानाने फक्त आठ हजार फुटावरून जाण्याचा निर्णय हवाई दलाने घेतला होता.
राष्ट्रपती या देशाच्या तिन्ही सेनादलाच्या सर्वोच्च प्रमुख असतात, त्यामुळे त्यांच्या विमानाची तपासणी, त्यंाची तपासणी व अन्य यंत्रणंाची तपासणी ही प्रक्रिया वारंवार करण्यात येत होती. अकरा वाजता त्यांच्या विमानाने उड्डाण केल्यावर त्या सुखोईविमानाच्या दोन्ही बाजूने दोन सुखोई विमाने उडत होती. त्या विमानातील विंग कमांडर हे राष्ट्रपतींशी संवाद करू शकत होते, आता आपले विमान कोठे आहे, याची माहिती देत होते. तसेच लष्करी काटेकोरपणा व क्षेपणास्त्रे यांचीही माहिती देत होते. राष्ट्रपतींनी उड्डाण केल्यावर त्याच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला असलेल्या सुखोईविमानाच्या पायलटांकडे हात हलवूनही दाद दिली. राष्ट्रपती प्रतिभाताई या राष्ट्रीय पातळीवर टेनिस खेळलेल्या क्रीडापटू आहेत व त्या टेनिससूटमध्ये वावरल्याही आहेत. तरीही आजचा त्यांचा बुटोई सूटमधील पेहेराव हा नवीन होता.
अकरा वाजता उड्डाण केलेले त्यांचे सुखोई विमान अकरा वाजून चाळीस मिनिटांनी परत जमिनीवर टेकले व पुढे सहा मिनिटांनी ते टॅक्सी वे वरून परत मूळच्या जागेवर आले. वरीष्ठ वायूदल अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तेथे क्षेपणास्त्राच्या कांही बाबीबाबत माहिती दिली. त्या खाली आल्यावर त्यंानी पुन्हा यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांशी, पायलटांशी व कर्मचाऱ्यांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर लष्करी डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य तपासणीसाठी त्यांना विशेष दालनात नेले. कांही मिनिटे विश्रांती, नंतर तपासणी, थोडेसे पेयपान करून नंतर बारा वाजून पन्नास मिनिटांनी त्या वायुदलाच्या ऑफिसर्स मेसमध्ये प्रकारांना मुलाखत देण्यासाठी आल्या.
"जगातील एक मोठे उपखंड असलेल्या या मोठया देशातील लष्करी यंत्रणा किती सुसज्ज व अद्ययावत आहे, याचाच मी अनुभव घेतला, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रचंड वेगाने जाणाऱ्या लढाऊविमानातून भरारी हा मला व्यक्तीश: तर चांगला अनुभव होताच पण जबरदस्त क्षमता असलेल्या आपल्या वायुदलाच्या कामाचीही प्रचीती आली.
भारतीय महिला राष्ट्रपतींना हा अनुभव प्रथम मिळत आहे, त्यादृष्टीने आपण काय सांगाल व तरुण मुलींना काय सल्ला द्याल, याबाबत विचारता त्या म्हणाल्या, "भारतीय महिलांना कोणतेही क्षेत्र न हाताळण्यासारखे नाही, हे तरुण मुलींनी पुन्हा एकदा लक्षात ठेवावे. आज शेकडो मुली पायलट म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत. संरक्षणदलातही आहेत. सीमेवरही जाण्यासाठी तयार आहेत. त्यांनी अशा सुखोईसारख्या विमानाचे प्रत्यक्ष लढाईत चालन करावे का याबाबत तज्ञांची तुकडी अभ्यास करत आहेत. पण एक अनुभव मी संागते की, तरुण पिढीने भरारी घ्यावी, यासाठी विशाल आकाश त्यांची वाट बघते आहे.

गुंजीमळ प्रकल्पाला पर्यायी जागा देण्याबाबत एकमत

तोडग्यासाठी पर्रीकर यांचा पुढाकार
सांगे, दि. २५ (प्रतिनिधी): विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पुढाकार घेऊन बोलावलेल्या बैठकीत आज सांगे पालिका क्षेत्रातील गुंजीमळ येथील वादग्रस्त प्रकल्पावर तोडगा निघाला आहे. या बैठकीत पर्यायी जागेसंबंधी एकमत झाल्याने आता हा वाद मिटल्यात जमा असून त्या परिसरातील अशांत वातावरण निवळणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
आज पर्वरी येथे विधानसभा संकुलात श्री. पर्रीकर यांनी घेतलेल्या बैठकीला नगरविकास मंत्री ज्योकीम आलेमाव, सांगेचे आमदार वासुदेव मेंग गावकर, सांगेच्या नगराध्यक्ष हर्षा संभारी, नगरसेवक, सांगे भाजयुमोचे अध्यक्ष सुप्रज नाईक तारी, कचरा प्रकल्प विरोधी शिष्टमंडळ उपस्थित होते.
सांगे पालिकेच्या हिंदू स्मशानभूमीजवळ गुंजीमळ येथे प्रकल्प उभारण्यास मुगोळी, कामतीनाग, तारीपांटो, आमडई, बोंदुर्ले, कुमठामळ व मारांगण या सात गावच्या लोकांनी सुरवातीपासूनच विरोध केला होता. हा प्रकल्प इतरत्र हलविण्याबाबत आजच्या बैठकीत विचार करण्यात आला. नियोजित प्रकल्पाला पर्यायी जागा निवडण्यासंबंधी आजच्या बैठकीत चर्चा होऊन दुसऱ्या जागेबाबत एकमत झाले, असे सांगण्यात आले. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी माहिती आमदार गावकर यांनी दिली. याचप्रश्नी उपनगराध्यक्षांनी एका महिलेला धक्काबुक्की केल्याने सांगे परिसरात काल तंग वातावरण निर्माण झाले होते.

कचरा विल्हेवाट प्रकल्पाच्या विलंबाबद्दल पालिकांना दंड

मडगाव पालिकेला ५० हजार, अन्य पालिकांना प्रत्येकी २५ हजार
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): नऊ वर्षापासून सतत आदेशावर आदेश देऊनही पालिका कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यात कुचराई करीत असल्याने अखेर आज उच्च न्यायालयाने मडगाव पालिकेला ५० हजार रुपये तर, डिचोली आणि साखळी पालिका वगळता अन्य सर्व पालिकांना प्रत्येकी २५ हजार रुपये येत्या चार आठवड्यांत न्यायालयात जमा करण्याचे आदेश आज देण्यात आले. तसेच, यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली असून या तीन महिन्यांतही आदेशाचे पालन झाले नसल्यास ही हमीची रक्कम जप्त केली जाणार असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला.
त्याचप्रमाणे वाळपई पालिकेने कचरा प्रकल्पासाठी नक्की केलेली जागा आज न्यायालयाने रद्द करून दुसरी जागा पाहण्यासाठी पालिकेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समितीची स्थापना केली असून येत्या तीन आठवड्यात नव्या जागेचा शोध घेण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. तर, सांगे येथे कचरा प्रकल्प उभारण्यास नागरिकांचा तीव्र विरोध होत असल्याने सांगे पालिकेने सरळ एक प्रतिज्ञापत्र सादर करून आम्ही या प्रकल्पापासून हात वर करीत असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे हा प्रकल्प करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला सांगता येईल का, अशी विचारणा करून यात राज्य सरकारला लक्ष घालण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
"विरोध होत असल्याने तुम्ही या जबाबदारीपासून मोकळे होऊ शकत नाही. तुमच्या कडून हे काम होत नसल्यास सांगे येथे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, असे आम्ही समजू शकतो का'' अशाही प्रश्न यावेळी न्यायालयाने उपस्थित केला. तसेच "जमत नसल्यास राजीनामा द्या'असेही यावेळी सुचवण्यात आले."आम्ही कचरा प्रकल्पासाठी जागा निश्चित केली आहे. तसेच त्याच्या उभारणीसाठी निविदाही मागितली. परंतु, निविदा सादर करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. येथील पालिकेच्या मुख्य आयुक्तांना धमकीही देण्यात आली आहे. काही लोकांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे' असे सांगे पालिकेतर्फे युक्तिवाद करताना ऍड. सरेश लोटलीकर यांनी सांगितले.
कोणत्याही पालिकेला कचरा प्रकल्प उभारण्यास पैशांची अडचण आल्यास त्यांनी मुख्य सचिवांशी बैठक घ्यावी आणि त्यानंतर राज्य सरकारने त्यांना योग्य ती आर्थिक मदतही करावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे. डिचोली पालिकेने यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन केले असल्याने त्यांना आणि साखळी पालिकेने कचरा प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण केले असल्याने त्यांना ही हमीची रक्कम भरण्यापासून सूट देण्यात आली. मडगाव पालिकेने आतापर्यंत ५ टक्केही आदेशाचे पालन केले नसल्याचे यावेळी ऍड. नॉर्मा आल्वरिस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आम्ही जागेची पाहणी केली असून कचरा प्रकल्पाच्या उभारणीसाठी आर्थिक मदतीची मागणी सरकारकडे केली आहे. ती मिळताच निविदा मागवली जाणार असल्याचे यावेळी कुंकळ्ळी पालिकेने सांगितले.

'आल्दिया' गहाळ फाईल्ससंबंधी अहवालास एक महिना मुदत

उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश
पणजी, दि. १ (प्रतिनिधी): बांबोळी येथील वादग्रस्त "आल्दिया द गोवा' या प्रकल्पाच्या संपूर्ण आराखड्याच्या फाइल्स पंचायत व नगर नियोजन खात्यातून गायब झाल्याने त्याच्या शोध घेण्यासाठी सुरू केलेल्या पोलिस तपासाचा अंतिम अहवाल येत्या ४ आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सदर करण्याचे आदेश आज सरकारला देण्यात आले. दरम्यान, कमल परेरा यांनी खटल्यात आपल्याला मध्यस्थ करून घेण्यासाठी केलेला अर्ज दाखल करून घेण्यात आला. त्याचप्रमाणे याचिकादाराला याचिकेची एक प्रत त्यांना देण्याचेही आदेश दिला. मात्र परेरा यांच्याकडून कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर करण्यास याचिकादाराने हरकत घेतली. गेल्या सुनावणीच्यावेळी या प्रकल्पाच्या गायब झालेल्या काही फाइली कमल परेरा यांच्याकडे असल्याचा आरोप केला केला होता. सदर आरोप खोडून काढण्यासाठी परेरा यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. याविषयीची पुढील सुनावणी येत्या १४ जानेवारी २०१० रोजी ठेवण्यात आली आहे.
पंचायत, नगर नियोजन खाते, गट विकास अधिकारी कार्यालयातून अचानकपणे या प्रकल्पाच्या फायली गहाळ झाल्याने १ एप्रिल २००८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी हे प्रकरण "सीबीआय'कडे का सोपवले जाऊ नये, अशी विचारणा करून नोटीस बजावली होती. त्याचे तपासकाम सीबीआयकडे सोपवण्याला आपली कसलीच हरकत नसल्याचे उत्तर सरकारने न्यायालयाला दिले होते. त्यानंतर जुलै २००८ मध्ये पुन्हा हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता, प्रकल्पाच्या सागरी भरती रेषे पासून ५० ते १०० मीटरवर येणाऱ्या बांधकामाला स्थगिती देण्यात आली होती. तसेच पोलिस करीत असलेल्या तपासाचा अहवाल दर पंधरा दिवसांनी न्यायालयात सादर करण्याचे आदेशही तेव्हा देण्यात आले होते.
मात्र, या आदेशाचे पालन झाले नसल्याने कोणाच्या आदेशानंतर या गायब फाइलींचे तपास काम थांबवण्यात आले आहे, असा प्रश्न यावेळी ऍड. आल्वारीस यांनी उपस्थित केला. राज्य सरकारला या गायब फाइली विषयी काहीही पडलेले नाही. दर पंधरा दिवसांनी पोलिस तपासाची प्रगतीची माहिती देणारा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश असूनही केवळ एकच अहवाल सादर केला. त्यानंतर एकही अहवाल सादर झाला नाही, असे ऍड. आल्वारीस यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. गेल्या दोन वर्षापासून या फाइली सापडत नसल्याने हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवावे, अशी पुन्हा एकदा मागणी आज न्यायालयात करण्यात आली.
याचिकादार गायब झालेल्या फाइलींचा अहवाल हातात घेऊन तो सर्व्होच्च न्यायालयात जाण्यासाठी वापरे करणार असल्याचा दावा यावेळी आल्दिया द गोवातर्फे युक्तिवाद करणाऱ्या वकिलाने केला. त्यामुळे या न्यायालयाच्या वापर सर्व्होच्च न्यायालयात जाण्यासाठी करून घेण्यसाठीच या अहवालाच्या मागे याचिकादार लागलेला आहे, असेही त्यांनी आपल्या युक्तिवादात मांडले. सदर याचिका पॅट्रिशिया पिंटो यांनी "पीपल्स मूव्हमेंट फॉर सिव्हीक ऍक्शन'या बिगरसरकारी संघटनेतर्फे गोवा खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

पैसे तिघांकडून वसूल करण्यासाठी प्रतिज्ञापत्रे

शिरसई कोमुनिदाद गैरप्रकार प्रकरण
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या गैरप्रकारावरुन आग्नेल डिसोझा, निशीकेत परब आणि पांडुरंग परब या तिघांकडून पैसे वसूल करून घेण्यासाठी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिकादारांतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. येत्या काही दिवसानंतर कोमुनिदाद संस्थेची निवडणूक होणार असून यावेळी गोव्याशी कोणताही संबंध नसलेल्या सदस्यांना या निवडणुकीत भाग घेण्यास मज्जाव करावा, अशी मागणी यावेळी न्यायालयाकडे करण्यात आली. त्यावेळी "त्यांना मज्जाव करण्यासाठी न्यायालयाची गरज नसून तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा',अशी सूचना न्यायालयाने केली.
कोमुनिदादच्या निवडणुकीसाठी राज्याबाहेरील लोकांना आणून मतदान केले जात असल्याचे याचिकादाराच्या विकलाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे यापूर्वीच्या समितीने करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा केला असून त्यांची अद्याप बॅंक खात्याचे पास बुक नव्या समितीकडे दिलेला नाही. तसेच करोडो रुपयांची हिशेबही दाखवलेला नाही. त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडून वसून करून घेतले जावे, अशी याचना याचिकादाराने आपल्या प्रतिज्ञापत्रात केली आहे.
गेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने दोषी व्यक्तींकडून शिरसई कोमुनिदादीचे पैसे का वसूल केले नाहीत, प्रश्न कोमुनिदाद प्रशासनाला आणि राज्य सरकारला केला होता. तसेच या घोटाळ्याचा पोलिस तपास कुठपर्यंत पोचला आहे, याचा संपूर्ण अहवाल देण्याचाही आदेश दिला आहे.

Monday, 23 November, 2009

क्षुल्लक कारणावरून मयेत एकाचा खून

डिचोली, दि. २२ (प्रतिनिधी) - नरेश पुरुषोत्तम चोपडेकर याचा क्षुल्लक कारणाने वाद होऊन सुरा खुपसून खून केल्याप्रकरणी उल्हास आत्माराम कवठणकर (४६) तिखाजन मये याला डिचोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात डिचोली स्थानकाचे निरीक्षक हरिश मडकईकर यांनी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी ८.३० वाजता तिखाजन मये तिस्कावर मयत नरेश याची उल्हास याच्याशी क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीत बाजूला उभ्या असलेल्या गाडीतील सुरा घेऊन उल्हासने नरेशच्या पोटात सपासप वार केले. या झटापटीत नरेश खाली कोसळला. त्यानंतर त्याला डिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यासंदर्भात नरेशचा भाऊ रावजी चोपडेकर याने पोलिसात तक्रार दाखल केली.
नरेश हा कदंब महामंडळामध्ये कारकून म्हणून कामाला होता. त्याला नमिता (१४) आणि साहील (६) अशी दोन मुले आहेत. संशयित आरोपी खून करतेवेळी दारूच्या नशेत होता, अशी ग्रामस्थांत चर्चा आहे. नरेशचा मृतदेह बांबोळी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. खुनाचे नेमके कारण अद्यापर्यंत समजू शकलेले नाही.

आता खनिज वाहतूक समस्यांवर तोडग्यासाठी न्यायालयात याचिका

उसगाव बाजारकर मंडळाचा निर्णय

तिस्क-उसगाव,दि.२२ (प्रतिनिधी)- उसगाव वड येथील बाजारात खनिज माल वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव आज २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी झालेल्या उसगाव बाजारकर मंडळाच्या खास बैठकीत घेण्यात आला. ही बैठक उसगाव वड येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली.
उसगाव भागातून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खनिज माल वाहतूक करावी, रात्रीच्या वेळी पूर्णपणे खनिज माल वाहतूक बंद करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत खनिज माल वाहतूक बंद ठेवावी, टिपर ट्रकाच्या हौदाच्या समपातळीवर खनिज माल भरून वाहतूक करावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर करावी,असा ठराव यावेळी व्यापारी जिवबा फात्रेकर यांनी मांडला. त्या ठरावाला बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वाधिक व्यापाऱ्यांनी हात उंचावून अनुमोदन दिले. हा ठराव मंजूर झाल्याचे यावेळी बैठकीत जाहीर करण्यात आले. ३० नोव्हेंबर रोजी या संदर्भात याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी मुरा नाईक तसेच व्यापारी हरिश्चंद्र प्रभू व्यासपीठावर उपस्थित होते.
या ठरावावर चर्चा करण्यात आली. गावात उत्सवाच्या वेळीही खनिज माल वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी,असे यावेळी ठरले.
७ डिसेंबर २००८ रोजी सर्व संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना बाजारकर मंडळाने निवेदने सादर केली होती. परंतु त्यावर काहीच कारवाई होऊ शकली नाही. खनिज माती धुळीमुळे व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होते. परंतु, अद्यापपर्यंत व्यापाऱ्यांना कुणीच नुकसान भरपाई दिलेली नाही,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
प्रास्ताविक, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन बाजारकर मंडळाचे अध्यक्ष दिनेश देसाई यांनी केले.

जुने चित्रपटपोस्टर ठरले आकर्षण!


पणजीनगरी "इफ्फी'च्या दुनियेत


पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - ९६वर्षांचा भारतीय चित्रपटाचा इतिहास सांगणारे सुमारे ३५० "पोस्टर' ४० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.
१९१३ ते आत्तापर्यंतचे हे पोस्टर भारतीय चित्रपट पुरातत्त्व विभागाचे भरत जाधव यांनी उपलब्ध केले आहेत. ९६ वर्षापूर्वी बनलेला चित्रपट राजा हरिश्चंद्र (१९१३), त्यानंतर, कल्याणचा खजिना (१९२४) आणि सती सावित्री (१९२७) या चित्रपटांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपट रसिकांना जुन्या जमान्यात फेरफटका मारायची संधी लाभली आहे.
या पोस्टरची जपणूक करणे हे आमचे मुख्य काम आहे. त्यामुळे मूळ पोस्टर आणलेले नसून त्याच पद्धतीने हुबेहूब बनवलेले पोस्टर आणले आहेत. ते मूळ पोस्टर सांभाळून ठेवण्यासाठीच आम्ही ते सहसा बाहेर काढत नसल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. मात्र हे पोस्टर मूळ पोस्टरप्रमाणेच बनवले असल्याचेही ते म्हणाले.
श्री. जाधव यांच्या या पुरातत्त्व विभागातील काही पोस्टरना पारितोषिकेही मिळालेली आहेत. "मीरा' "गुंज उठी शहनाई' यांना ही पारितोषिके मिळाली आहेत. या पोस्टरमुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास समजण्यास फायदा होतो. कला विभागाचे विद्यार्थी आजही आमच्याकडे हे पोस्टर पाहून शिकण्यासाठी येतात,असे त्यांनी यावेळी सांगितले. या विभागात पोस्टर प्रमाणेच जुन्या चित्रपटांचे "रील'ही जपून ठेवण्याचे काम पाहिले जाते. यासाठी मृणाल सेन, श्याम बेनेगल हे परिश्रम घेत असल्याचे ते म्हणाले.

"इफ्फी'चा चंदेरी पडदा आज उघडणार..

तारेतारकांचे आगमन, आयोजकांची लगीनघाई, पणजी नगरी साज लेवून सज्ज

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - मस्त गुलाबी थंडी, मांडवीचा मोहरलेला तीर, तारेतारकांचे आगमन, झगमगलेली पणजी नगरी, आकर्षक विद्युत रोषणाई, आयोजकांची व प्रतिनिधींची लगीनघाई आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले गोवेकर अशा भारलेल्या वातावरणात उद्या सोमवारी कला अकादमीच्या भव्य वास्तूत "इफ्फी'चा "चंदेरी' पडदा दिमाखात उघडणार आहे.
चीनमध्ये किन आणि झाओ यांच्यातील रक्तरंजित संघर्षावर आधारीत "व्हिट" या चित्रपटाच्या सादरीकरणाने "४० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' "इफ्फी-०९' चा शुभारंभ होईल. संध्याकाळी ५.३० वाजता कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात हा उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला सदाबहार अभिनेत्री वहिदा रेहमान प्रमुख पाहुण्या या नात्याने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री दिगंबर कामत, राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अंबीका सोनी, केंद्रीय चित्रपट संचालनालयाचे संचालक एस. एम. खान हे मान्यवरही उपस्थित असतील.
या महोत्सवासाठी पणजी शहर नववधूसारखे नटले आहे. गोव्यातील हा सहावा महोत्सव होय. "इफ्फी'साठी कला अकादमी, आयनॉक्स व मॅकनिज पॅलेसचा परिसर झगमगून गेला आहे. या महोत्सवाला "चार चॉंद' लावण्यासाठी येणाऱ्या अतिमहनीय व्यक्तींना आणि सिनेतारकांची ने-आण करण्याकरिता आलिशान वाहनांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, आज सायंकाळी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हवेत फुगे सोडून हॉटेल फिदाल्गोच्या समोर इफ्फी बाजार महोत्सवाचे थाटत शुभारंभ केला. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, अभिनेते आणि इफ्फीचे सूत्रसंचालक कबीर बेदी, दिव्या दत्त उपस्थित होत्या. या शुभारंभानंतर पणजी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या "१८ जून' रस्त्यावरून एक फेरफटकाही या महनीय व्यक्तींनी मारला. पहिल्यांदाच हा महोत्सव व्यापाराशी जोडण्यात आला असून सुमारे ६४ व्यापाऱ्यांनी खरेदीवर ५ ते ५० टक्के सूट घोषित केली आहे. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना कुपन्स देण्यात येणार असून त्याद्वारे ही सूट ते घेऊ शकतात. त्यामुळे १८ जून रस्त्यावरील सर्व दुकाने आकर्षकरीत्या सजवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रामुख्याने पर्यटकांसाठी ती अनोखे आकर्षण ठरली आहेत.
देशाच्या विविध राज्यांबरोबरच विदेशी प्रतिनिधींचे आगमनही राजधानीत होऊ लागले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महोत्सवाची वातावरणनिर्मिती झाली आहे. मांडवी नदीचा काठ या प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी यजमानासारखा नटला आहे. महावीर बाल उद्यानात रंगीबेरंगी आणि तेवढीच मनोहारी सजावट करण्यात आली आहे. ती येणाऱ्याजाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे.
महोत्सवासाठी येणाऱ्या कलाकारांत आशा पारेख, सुनील शेट्टी, समीरा रेड्डी, स्वामी चटर्जी, शर्मिला टागोर, फरिदा जलाल, प्रेम चोप्रा अशा दिग्गजांचा समावेश आहे. याशिवाय अन्य मातब्बर कलाकारांची उपस्थितीही असेल असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
कडेकोट सुरक्षा
महोत्सवानिमित्ताने सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहे. महोत्सव परिसरात ठिकठिकाणी "क्लोज्ड सर्किट कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याखेरीज केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या तीन कंपन्या खास "इफ्फी' साठी तैनात करण्यात आल्या आहेत. जोडीला गोवा पोलिस खात्याच्या "आयआरबी'ची तुकड्या, साध्या वेशातील आयआरबीच्या महिला पोलिस आणि आयनॉक्सच्या प्रत्येक द्वारावर पोलिस तथा सुरक्षा रक्षक डोळ्यांत तेल घालून पहारा करत आहेत.
नाना-पर्रीकर गळाभेट
"इफ्फी' बाजार महोत्सवाच्या शुभारंभावेळी नाना पाटेकर हे सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बनले होते. आपल्या मोबाईलवर त्यांची एक झलक टिपण्यासाठी अनेकांनी आपले मोबाईल उंचावून धरले होते. मुख्यमंत्र्याबरोबर हवेत फुगे सोडल्यावर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना पाहताच एखादा दुरावलेला मित्र अनेक वर्षांनी भेटावा अशा आवेशात नानाने पर्रीकराना मिठी मारून आपला आनंद व्यक्त केला!

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आंदोलनाची दिशा ठरणार

कर्मचारी वेतनवाढीत भेदभाव

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - सरकारी सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल आज सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र संताप व्यक्त करून मुख्यमंत्र्याच्या भेटीनंतरच आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेतला. राष्ट्रपतींच्या गोवा दौऱ्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नसल्याने येत्या दोन दिवसांत ही भेट घेतली जाणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी सांगितले. पाटो पणजी येथे असलेल्या संघटनेच्या कार्यालयात सर्व तालुका अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक झाली.
सरकारच्या आदेशानुसार ५ हजार २०० रुपये असलेल्याची वेतनश्रेणी ९ हजार ३०० रुपये केली आहे. तर, २८०० रुपये असलेल्याची ५ हजार ५०० रुपये येवढी केली आहे. ही वाढ काही ठराविकच कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याचे कोणतेच कारणही सरकारने स्पष्ट केलेले नाही. वेतनश्रेणीत एवढी वाढ करण्याची सरकारची तयारी असल्यास ही वाढ सर्वांनाच दिली जावी, असे श्री. शेटकर म्हणाले. याची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री कामत यांच्याशी संपर्क साधला असला त्यांनी आपल्याला याविषयी काहीच माहिती नसल्याचा आव आणला, असेही श्री. शेटकर यांनी सांगितले. सरकारी कर्मचारी संघटनेची आज झालेल्या सर्व तालुका प्रमुखांच्या बैठकीत या भेदभावाबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

"व्यावसायिक कराद्वारे सामान्यांची फरफट'

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - व्यावसायिक कर राज्यात लागू करण्याबाबत सरकारच्या निर्णयाला सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत असून आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सरकारचा हा निर्णय अविचारी असल्याची टीका केली आहे.
राज्याचा महसूल वाढविण्यासाठी सरकारला अनेक उपाययोजना करता आल्या असत्या. कित्येक सधन लोक कर चुकवेगिरी करत आहेत. त्यांना हुडकून काढले असते तर महसुलास लागलेली गळती बंद झाली असती. तथापि, राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करून सामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचा आरोप पार्सेकर यांनी केला.
व्यावसायिक कर वसुलीसाठी सरकारने उचललेले पाऊल हे महागाईने भरडलेल्या जनतेचे कंबरडे मोडणारे ठरणार आहे. रिक्षावाले, टॅक्सीवाले, पायलट यांच्यावरदेखील हा कर भरण्याची पाळी येणार आहे. तसे झाले तर उपाशीपोटी राहाण्याची पाळी या गरिबांवर येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या कर प्रणालीच्या किचकट जाचातून सामान्य माणसाची फरफट होणार आहे.
सरकार एकीकडे आम आदमीच्या कल्याणाच्या बाता मारत आहे. मात्र नव्या कर प्रणालीचा विचार केल्यास सरकार त्यांचे कल्याण न करता उलट त्यांच्याचकडून बरेचसे हिरावून घेत आहे. महसूल वाढविण्यामागील ही उपाययोजना ठरूच शकत नाही. अबकारी कर, आयकर, मनोरंजन कर इत्यादी क्षेत्रातील महसूली गळती थोपवण्याबाबत सरकारने ठोस उपाय योजणे गरजेचे होते व आहे, असे त्यांनी सांगितले.
गोव्यासारख्या राज्यात मोठ्या प्रमाणात धनिक लोक नसल्याने नव्या व्यावसायिक कर वसुलीचा सर्वाधिक फटका सामान्यांनाच बसणार आहे, असे पार्सेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. सामान्य माणसाला कोणताही फटका बसणार नाही याची दक्षता सरकारने घेतली असती तर ते समर्थनीय ठरले असते. मुळात विविध करांची महसुली गळती थोपविण्याची उपाययोजना आखलेली नसतानाच नवा कर लागू करण्याचा अधिकारच सरकारला पोचत नसल्याचे त्यांनी सांगितले.
नवा व्यावसायिक कर लागू केल्यास तो आम आदमीवर झालेला अन्याय ठरेल असे सांगून हा अन्याय येथील जनता कदापिही सहन करणार नसल्याचे ते म्हणाले. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा व हा निर्णय स्थगित ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

Sunday, 22 November, 2009

सरकारी कर्मचारी बंडाच्या पवित्र्यात

दोन्ही संघटनांच्या आज बैठका
-वेतनश्रेणीतील तफावतीस सरकारकडूनच खतपाणी
-काही अधिकाऱ्यांकडून वित्त खात्याची दिशाभूल
-निवृत्त कर्मचाऱ्यांची चार महिन्यांची थकबाकी गायब
-राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची आज पणजीत बैठक
-निवृत्त सरकारी कर्मचारी संघटनेची आज मडगावात बैठक

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार फरक देताना चार महिन्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत घातलेला घोळ यामुळे या दोन्ही कर्मचारी संघटनांत कमालीचा असंतोष खदखदू लागला आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावतीचा मुद्दा पुन्हा एकदा चिघळला आहे. वित्त खात्याने अलीकडेच जारी केलेल्या एका आदेशाला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी त्यांनी सरकारचा निषेध करून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा धारण केला आहे. दुसरीकडे, निवृत्त सरकारी कर्मचारीही आपल्यावर अन्याय झाल्याचे सांगत आहेत. या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देताना ३६ महिन्यांची थकबाकी देण्याचे सरकारने मंजूर केले होते; परंतु आतापर्यंत केवळ ३२ महिन्यांचीच थकबाकी त्यांना मिळाली आहे. उर्वरित चार महिन्यांच्या थकबाकीबाबत ठोस स्पष्टीकरण सरकारकडून मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्यातही तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या तालुका समिती व कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक उद्या २२ रोजी बोलावण्यात आली आहे.या बैठकीत वित्त खात्याने अलीकडेच काही ठरावीक सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात केलेल्या वाढीबाबत आक्षेप घेतला आहे. वाढ द्यायचीच असेल तर ती सगळ्यांना द्या,असे सांगून केवळ काहीजणांवर मेहेरनजर करून त्यांना खास वागणूक देणे चुकीचे असल्याचे मत संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आले आहे. यातील कळीचा मुद्दा म्हणजे काही मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील सचिवालय कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनश्रेणी दिली होती. हा प्रकार नंतर सचिवालयाखेरीज अन्य काही खात्यांतही सुरू झाला. एकाच पदावर असलेल्या दोन वेगवेगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात तफावत कशी काय, असा सवाल त्यावेळी संघटनेने सरकारला केला होता. सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना ही वाढीव वेतनश्रेणी सरकारची खरी डोकेदुखी ठरली. कर्मचारी संघटनेने आंदोलन छेडून ही वाढीव वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगावेळी सर्वांनाच लागू करण्याची मागणी केली. या निर्णयामुळे सरकारी खजिन्यावर अतिरिक्त भार पडणार होता. तो सरकारला परवडणारा नसल्याने अखेर ही वाढीव वेतनश्रेणी मागे घेण्याचा व सहाव्या वेतन आयोगानुसार सर्वांना समान वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय घेणे सरकारला भाग पडले.
याच काळात सरकारने वेतनश्रेणीतील तफावतीबाबत अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव राजीव यंदुवंशी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली. या समितीने सादर केलेल्या अहवालावरूनच हा आदेश जारी करण्यात आल्याचेही त्यात म्हटले आहे. दरम्यान, या समितीत असलेले काही अधिकारीच या वाढीव वेतनश्रेणीचे लाभार्थी आहेत व त्यामुळेच त्यांनी आपल्या बाजूनेच हा अहवाल तयार केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
निवृत्त सरकारी कर्मचारीही नाराज
दरम्यान, राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देताना २००६ पासून तीन वर्षांच्या महागाई भत्ता व थकबाकी देण्याचे मंजूर केले होते पण प्रत्यक्षात ३२ महिन्यांचाच महागाई भत्ता व थकबाकी देण्यात आल्याची तक्रार माजी कर्मचारी पांडुरंग कळगुटकर यांनी केली आहे. त्यांनी यासंबंधी लेखा खात्याकडे लेखी तक्रारही केली आहे व लेखा खात्याने याबाबत चौकशी करण्याचे त्यांना पत्रही पाठवले होते.पण आता तीन महिने उलटले तरी अद्याप या प्रकरणाचे नेमके काय झाले याचा खुलासा मात्र देण्यात आला नाही,अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान,या गोष्टीची बहुतेक निवृत्ती कर्मचाऱ्यांना माहितीही नसेल,असा संशय श्री.कळगुटकर यांनी व्यक्त केला. तथापि, प्रत्यक्षात हिशेब केल्यानंतरच ही गोष्ट लक्षात येते. निवृत्त सरकारी कर्मचारी संघटनेची उद्या सर्वसाधारण बैठक उद्या २२ रोजी सकाळी मडगावातील ग्रेस चर्च हॉलमध्ये होणार आहे. त्यावेळी हा मुद्दा आपण उपस्थित करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

गोवा विद्यापीठात आता वैद्यकीय संशोधन पदव्युत्तर अभ्यासक्रम

पणजी, दि.२१(प्रतिनिधी): वैद्यकीय संशोधन क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज असल्याने या अभ्यासक्रमाला बरीच मागणी आहे. वैद्यकीय क्षेत्राचा होत असलेला विकास व त्यात नवनवीन औषधांची निर्मिती यामुळे या क्षेत्राला बराच वाव असून गोवा विद्यापीठाने सुरू केलेल्या या अभ्यासक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुढील वर्षापासून विद्यापीठात पदव्युत्तर व डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. दिलीप देवबागकर यांनी केली.
आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल, वैद्यकीय संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. देसाई, बायोइनोवेटच्या व्यवस्थापकीय संचालक गुलजीत चौधरी आदी हजर होते. गोवा विद्यापीठाने बायोइनोवेटच्या सहकार्याने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हा अभ्यासक्रम सुरू केला होता व त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे गोवा विद्यापीठाने हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करूनही हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना रोजगारही मिळाल्याची माहिती डॉ. देवबागकर यांनी दिली. दरम्यान, या अभ्यासक्रमाच्या शाखा बंगळूर व चेन्नई इथूनही सुरू आहेत. त्या भागातील विद्यार्थी हा अभ्यासक्रम गोवा विद्यापीठाच्या सहकार्याने पूर्ण करू शकतात. हा अभ्यासक्रम अधिकतर या व्यवसायात असलेले लोक करतात व त्यामुळे त्यांना मिळत असलेल्या वेळानुसारच या अभ्यासक्रमाचा वेळ ठरतो. दरम्यान, हा अभ्यासक्रम थेट ऑनलाईनही पूर्ण करण्याची सोय ठेवण्यात आली आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम स्वीकारल्यास त्यांना रोजगार मिळणे शक्य असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

व्यावसायिक कर हा भुर्दंडच : फ्रान्सिस डिसोझा

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): व्यावयासिक कर प्रणाली लागू करण्याचा घाट रचलेले राज्य सरकार आयकर दात्यांवर अधिक भुर्दंड लादत आहे, अशी जळजळीत प्रतिक्रीया म्हापशाचे आमदार फ्रान्सिस उर्फ बाबूश डिसोझा यांनी व्यक्त केली आहे. महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सामान्य जनतेला या करप्रणालीने जीवन जगणे असह्य होईल, असे मतही त्यांनी नोंदवले.
नव्या व्यावसायिक कर प्रणालीमुळे आता साधारणतः ज्यांचे मासिक उत्पन्न दहा ते पंधरा हजार रुपयांच्या घरात आहे त्यांना या जाचाला सामोरे जावे लागेल. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश होणार असून सहाव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देणारे सरकार दुसऱ्या बाजूने त्यांच्याकडून नव्या कर प्रणालीच्या माध्यमातून ते हिरावून घेणार असल्याचा आरोप डिसोझा यांनी केला.
राज्य सरकारचे वित्तीय व्यवस्थापन योग्य नसून सरकारने आधी वित्तीय व्यवस्थापन सुधारण्याचे काम केले पाहिजे, असे डिसोझा यांनी म्हटले. ते म्हणाले की, उत्पन्न आणि खर्च या गोष्टींचा सरकारने जर ताळमेळ घातला नाही तर सरकारच्या तिजोरीत नेहमीच खडखडाट राहील. अशा परिस्थितीत दरवेळी सरकार करांचे प्रमाण वाढवत राहाणार का, असा सवालही त्यांनी केला.
आयकर भरणाऱ्यांनादेखील हा व्यावसायिक कर लागू होणार असल्याने तो त्यांना अधिक भुर्दंड ठरेल. खरे तर वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत सरकारने सखोल अभ्यास करण्याची गरज होती. मात्र सरकारला त्याची गरज भासली नाही हे आम्हां गोमंतकीयांचे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले.
महागाईचा दर शून्यावर आणण्याच्या बाता सरकार मारत असले तरी प्रत्यक्षात तसे काही झालेले नाही असे ते म्हणाले. सरकार सध्या अस्तित्वात असलेल्या करप्रणालीचाच व्यवस्थितपणे अंमल करीत नसून त्याचा काटेकोर अंमल झाल्यास सरकारच्या महसूलात कितीतरी पटीने भर पडेल असे ते म्हणाले.
मूल्याधारीत कर (व्हॅट) ची सरकारने जरी अंमलबजावणी केली असली तरी कित्येक हॉटेल्स सरकारची फसवणूक करीत असून लाखो रुपयांचा कर चुकवत असल्याचे ते म्हणाले. या कराची वसूली जर व्यवस्थितरीत्या झाली तर नव्या कर प्रणालीची सरकारला गरजही भासणार नाही, असा दावा त्यांनी केला. सध्याची जी करप्रणाली आहे त्या आधारे करवसुलीसाठी सरकारने काही कडक उपाययोजना करायला हव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाकला हव्या असलेल्या कुख्यात दहशतवाद्याशीही हेडलीचे संबंध

मुंबई, दि. २१ : लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी डेव्हिड हेडलीचे पाकिस्तानातील बड्या लष्करी अधिकाऱ्यांसोबतच दहशतवादी संघटनांशीही नजिकचे संबंध असल्याचे उघड झाले आहे.
हेडलीचे, पाकिस्तानला हव्या असलेल्या अतिरेक्यांच्या यादीतील चौथ्या क्रमांकावर असलेल्या इलियास काश्मिरी या कुख्यात दहशतवाद्याशीही संबंध असल्याची माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली आहे.
काश्मिरी हलकत-उल-जिहाद-इस्लामी (हुजी) या दहशतवादी संघटनेसाठी आझाद काश्मीर तुकडीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. याच काश्मिरीने २००३ मध्ये पाकचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांच्यावरही हल्ला केला होता. त्यानंतर त्याने भारतीय सीमेवरही चांगलाच धुडगूस घातला. तत्पूर्वी १९९८ मध्ये काश्मिरीला भारतीय सुरक्षा दलाने अटक करून पूंछ येथील तुरुंगात ठेवले होते. परंतु, दोनच वर्षांत तो तुरुंगातून पाकमध्ये पसार झाला. २००३ मध्ये मुशर्रफ यांच्यावर हल्ला केल्यानंतर तो भूमिगत झाला होता. मात्र, २००८ मध्ये पाकिस्तानातील लाल मशिदीवर त्याने हल्ला केला. येथून पुन्हा त्याच्या रक्तपाती कारवाया सुरू झाल्या.
सप्टेंबर २००९ मध्ये अमेरिकन विमानांच्या ड्रोन हल्ल्यात काश्मिरी मारला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यावेळी हेडली व राणा यांनी एकमेकांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये या हल्ल्याचा संदर्भ आला होता. हुजीपासून फारकत घेत पाकच्या वायव्य सरहद्द प्रांतातील रमझाक भागात काश्मिरीने स्वत:चे ३१३ नामक युनिट सुरू केले होते.अत्यंत कडवा जिहादी असलेला काश्मिरीने लष्कर जे साध्य करू शकत नाही, त्यासाठी लढत असल्याचे हेडली व राणा यांचे मत होते.