Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 21 November 2009

व्यावसायिक कर खपवून घेणार नाही

भाजपचा निर्वाणीचा इशारा
पक्षाच्या विधिमंडळ बैठकीनंतर आमदार दामोदर नाईक यांची माहिती

पणजी, दि.२० (प्रतिनिधी): सरकारची रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी आपल्या वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे सोडून विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकार थेट "आम आदमी'च्या खिशालाच हात घालायला पुढे सरसावले आहे. महागाईमुळे आधीच भरडलेल्या सर्वसामान्य जनतेला व्यावसायिक कराच्या नावाने लुबाडण्याचा सरकारचा डाव भाजप अजिबात खपवून घेणार नाही. व्यावसायिक कर लादण्याच्या निर्णयाचा फेरविचार झाला नाही तर भाजप सर्वशक्तीनिशी रस्त्यावर उतरेल, असा इशारा भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी दिला.
भाजप विधिमंडळ गटाची बैठक आज इथे पार पडली. या बैठकीत राज्यासमोरील विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार दामोदर नाईक यांनी यासंबंधीची माहिती दिली. यावेळी विधिमंडळ उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा, आमदार महादेव नाईक, दयानंद मांद्रेकर, वासुदेव मेंग गावकर, अनंत शेट आदी हजर होते.
राज्य सरकारच्या मूळ प्रस्तावानुसार पाच हजार रुपये प्रतिमहिना पगार घेणारी प्रत्येक व्यक्ती या जाचक कराच्या कचाट्यात सापडणार आहे. डॉक्टर, इंजिनिअर्स, सल्लागार, पत्रकार, बॅंक कर्मचारी, दुकानदार, छोटे व्यावसायिक, विक्रेते व सरकारी कर्मचारीही या कराच्या कचाट्यात अडकणार आहे. प्रतिमहिना किमान दीडशे रुपये कर आकारण्याची सरकारची ही कृती म्हणजे सामान्य जनतेला गृहीत धरण्याचाच प्रकार आहे. वेळोवेळी जनतेला रस्त्यावर येण्यास हे सरकार भाग पाडते, त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाचा फेरविचार करून ही कल्पना कचरापेटीत टाका, अन्यथा भाजप या निर्णयाला तीव्र विरोध करेल, असेही यावेळी श्री. नाईक म्हणाले. सुमारे ३ ते ४ लाख लोक प्रत्यक्षपणे या कराच्या कचाट्यात सापडणार आहेत. यामुळे जनतेने सरकारचा हा डाव हाणून पाडणेच योग्य आहे, असेही श्री.नाईक यांनी यावेळी सूचित केले. आज प्रत्येक पगारदार व्यक्ती केंद्र सरकारने ठरवल्याप्रमाणे आयकर भरत असतो. प्रत्येकाच्या उत्पन्नावर हा कर निश्चित केलेला असल्याने त्याची कार्यवाही सुरळीतपणे सुरू आहे. आता राज्य सरकारने केवळ आपली तिजोरी भरण्यासाठी म्हणून जो वेगळा व्यावसायिक कर लोकांच्या माथी मारण्याचा खेळ सुरू केला आहे तो अत्यंत निषेधार्थ असून त्याला भाजप सडेतोड उत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला. विविध गोष्टींवर होणारा वायफळ खर्च आटोक्यात आणला तर अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेला भरडण्याची गरजच भासणार नाही, असेही आमदार श्री. नाईक म्हणाले.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी अर्ज केलेल्यांना सध्या ताटकळत राहावे लागते. या योजनेचा सरकारने पूर्णपणे बट्ट्याबोळ चालवला असून त्यामुळे खऱ्या गरजवंतांना त्याचा लाभच मिळेनासा झाला आहे, सरकारने ताबडतोब याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महागाईवरही सरकारचे काहीही नियंत्रण नाही. नागरी पुरवठा खाते किंवा अन्य यंत्रणांमार्फत सर्वसामान्य जनतेला ठरावीक जीवनावश्यक वस्तू कमी दराने उपलब्ध करून देण्याची एखादी योजना राबवण्याची गरज होती; पण त्याकडे या सरकारचे अजिबात लक्ष नाही, अशी टीकाही यावेळी आमदार दामोदर नाईक यांनी केली.

उपेक्षित सरकारी कर्मचारी खवळले

संघटनेकडून तीव्र नाराजी
पणजी,दि.२० (प्रतिनिधी): राज्य प्रशासनातील सचिवालय कर्मचाऱ्यांना दिलेली वाढ तशीच कायम ठेवत लेखा खात्यातील अधिकारी व सर्व सरकारी कार्यालयांतील मुख्य कारकूनपदांना वेतन वाढ देण्याच्या वित्त खात्याच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी संघटनेत तीव्र असंतोष पसरला आहे. केवळ काही ठरावीक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देऊन बहुतांश कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा हा निर्णय असमर्थनीय असून याबाबत लवकरच मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना निवेदन सादर करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मंगलदास शेटकर यांनी दिली.
सरकारी कर्मचारी संघटनेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या आदेशाबाबत चर्चा करण्यात आली. केवळ काही ठरावीक लोकांवर मेहरनजर करणारा हा आदेश जाणीवपूर्वक तफावत निर्माण करणारा ठरला आहे. राज्य सरकारने उर्वरित सर्वांनाच ही वाढ लागू करून त्यांनाही याचा लाभ द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना राज्य सरकारने सर्वांना वाढीव वेतन लागू करण्यास असमर्थता दर्शवली होती व त्यामुळे काही ठरावीक कर्मचाऱ्यांना दिलेली वाढही रद्द करण्याचे ठरवले होते. आता या नव्या आदेशाद्वारे पुन्हा एकदा काही ठरावीक लोकांना वाढ देऊन तफावत निर्माण केल्याची टीका यावेळी संघटनेने केली आहे.
दरम्यान, वित्त खात्याच्या अवर सचिव वसंती पर्वतकर यांनी गेल्या ११ नोव्हेंबर २००९ रोजी काढलेल्या एका आदेशाद्वारे काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचे सुचवले आहे. त्यात प्रामुख्याने सचिवालयातील वरिष्ठ साहाय्यक व कायदा साहाय्यकांना लागू असलेली ९३००-३४८०० ही सुधारीत वेतनश्रेणी आता सचिवालयाबाहेरील सर्व खात्यातील मुख्य कारकूनपदांना (हेडक्लार्क)लागू करण्यात येणार आहे. १ जानेवारी २००६ नंतर निवृत्त झालेल्या मुख्य कारकूनपदांवर असलेल्यांना त्यांच्या निवृत्तिवेतनात हा लाभ देण्याचेही या आदेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. सचिवालयातील विभाग अधिकारी व अधीक्षकांना लागू असलेली हीच वेतनश्रेणी आता सर्व खात्यांतील अधीक्षकांना लागू होईल. दरम्यान, लेखा खात्यातील लेखनिक व साहाय्यक लेखाधिकाऱ्यांची वेतनश्रेणी वाढवून ती ५०००-८००० वरून आता ९३००-३४८०० करण्यात आली आहे. लेखाधिकारी व उप लेखा संचालकांना ८०००-१३५०० वरून १५६०० ते ३९१०० वर नेण्यात आले आहे.
दरम्यान, याविषयी रविवार दि. २२ रोजी सर्व तालुका समित्यांची बैठक बोलावण्यात आली असून त्यावेळी हा विषय सर्वांना पटवून देण्यात येणार आहे. या बैठकीत पुढील कृतीची दिशा ठरवण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

विक्रमी पावसामुळेच काणकोणात पूरस्थिती

समुद्रविज्ञान संस्थेचा अहवाल सादर
पणजी, दि.२०(प्रतिनिधी): काणकोण तालुक्यावर २ ऑक्टोबर रोजी ओढवलेली पुराची घटना ही अनाकलनीय अशीच होती. केवळ सात तासांत काणकोणात विक्रमी पावसाची नोंद झाल्याने पाणी साठवण्याची क्षमता संपली व तळपण नदीचे पात्रही क्षमतेपेक्षा विस्तारल्याने तालुक्यात पूर आला, अशी माहिती राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे अध्यक्ष तथा काणकोण पुरासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या समितीचे प्रमुख डॉ.सतीश शेट्ये यांनी दिली.
आज आल्तिनो येथील मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारी निवासस्थानी श्री. शेट्ये यांनी आपला अहवाल मुख्यमंत्री कामत यांना सोपवला. यावेळी समितीचे इतर सदस्य जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंते श्री. नाडकर्णी, अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन, हवामान खात्याचे प्रमुख के. व्ही. सिंग तथा सदस्य सचिव मायकल डिसोझा उपस्थित होते. या अहवालात या घटनेची शास्त्रोक्त पद्धतीने चिकित्सा करून विविध विषय ठेवण्यात आले आहेत. अशा प्रकारची आपत्ती भविष्यात टाळण्यासाठी काही सूचनाही या समितीने केल्या असून त्याद्वारे राज्य सरकारला आपत्ती व्यवस्थापनासंबंधी धोरण ठरवता येणे शक्य असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात वनीकरण करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तळपण नदीच्या पात्रातील गाळ उसपण्याची गरज असल्याचे स्पष्ट करताना डोंगरावरील माती नदीत वाहून जाऊ नये यासाठी झाडे लावण्याचा एक चांगला उपाय त्यांनी सांगितला.
दरम्यान, काही ठिकाणी खाणींमुळे डोंगरावर झालेल्या अतिक्रमणाचा विषयही गंभीर असल्याचे ते म्हणाले. काणकोणसारखी परिस्थिती भविष्यात कुठेही उद्भवू शकते, त्यामुळे सगळीकडेच आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री कामत यांनी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे या अहवालासाठी आभार मानले व या अहवालाचा अभ्यास करून पुढील उपाययोजनांचे नियोजन करण्यात येईल, असे सांगितले.

दयानंद योजनेचा फेरआढावा घेण्यासाठी समिती स्थापन

पणजी, दि.२० (प्रतिनिधी): दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याने या योजनेचा फेरआढावा घेण्यासाठी माजी वित्तमंत्री तथा हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आठ दिवसांत आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठक मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी आज पार पडली. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. सनातन संस्थेचा मडगाव स्फोटातील सहभाग निश्चित झाल्याने या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी काही आमदारांनी केली तर दाबोळी विस्तारीकरणाचे काम लवकरात लवकर हाती घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही आज बैठकीत घेण्यात आला.
यावेळी कॉंग्रेस विधिमंडळ गटाचे प्रवक्ते तथा उपसभापती माविन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी खात्याकडे अर्जांचा खच पडला आहे. या योजनेसाठी खरोखरच पात्र असलेले लोकही या योजनेपासून वंचित राहत आहेत. काही सधन लोकही या योजनेचा लाभ घेत असल्याने त्यांना हुडकून काढून त्यांची ही मदत बंद करण्याची गरज असल्याचे या बैठकीत अनेकांनी सुचवले. दरम्यान, या योजनेचा फेरआढावा घेण्यासाठी ऍड. नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीत उपसभापती माविन गुदिन्हो व आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा समावेश आहे.
"सनातन संस्था' समाजात दुही माजवून राज्याची शांतता व सर्वधर्म समभाव बिघडवण्याचे काम करीत असल्याने या संस्थेवर बंदी घालणेच योग्य असल्याचे मत अनेक आमदारांनी व्यक्त केले. यावेळी गृहमंत्री रवी नाईक यांनी विशेष पोलिस पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीची माहिती उपस्थित आमदारांना दिली. ही चौकशी योग्य मार्गाने सुरू आहे व त्यामुळे या कटात सहभागी असलेले गुन्हेगार लवकरच जनतेसमोर येतील, असे ते म्हणाले. पोलिस चौकशीबाबत आमदारांनी समाधान व्यक्त करून याप्रकरणाचा तपास कायदेशीर मार्गानेच व्हावा, अशी सूचना केली. दाबोळी विमानतळ विस्तारीकरणाच्या मुद्यावरून पक्षाला तोंडघशी पडावे लागल्याने अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली. दाबोळी विस्तारीकरणाचा शिलान्यास कार्यक्रम झालेला असताना या कामाची निविदाच रद्द होणे ही शरमेची गोष्ट ठरली आहे. दरम्यान, या कामाला चालना मिळवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला, तसेच नौदलाकडून या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठीही प्रयत्न करण्याचे यावेळी ठरवण्यात आले.

आयबीएनच्या कार्यालयात संतप्त शिवसैनिकांचा राडा

मुंबई, दि. २० : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध निंदनीय भाषा वापरल्याचा आरोप करत काही शिवसैनिकांनी आज आयबीएनच्या मराठी वृत्तवाहिनीच्या मुंबई आणि पुण्यातील कार्यालयावर हल्ला केला. मुंबई कार्यालयावरील हल्ला शिवसैनिकांनी केला असल्याचे आयबीएनने म्हटले आहे तर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या हा उत्स्फूर्त हल्ला असल्याचे वक्तव्य करताना या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या घटनेची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
आज संध्याकाळी ४ च्या सुमारास आयबीएन कार्यालयाची हल्लेखोरांनी तोडफोड केली. सुरुवातीला विक्रोळी येथील कार्यालयात १०-१५ शिवसैनिक घुसले. त्यानंतर त्यांनी प्रवेशद्वाराची मोडतोड केली, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी कॉम्प्यूटर, टीव्ही, आणि तेथील अत्याधुनिक साहित्याची तोडफोड केली, तसेच काचांचा खच पाडला. आयबीएनचे संपादक निखिल वागळे यांनाही मारहाण करण्यात आली. सुमारे पाऊण तास शिवसैनिक हैदोस घातला होते.
दरम्यान, मुंबईतील ऑफिसवरील हल्ल्याची चर्चा सुरू असताना पुण्यातील ऑफिसवरही हल्ला करण्यात आला. यावेळी ८ ते १० शिवसैनिकांनी ओबी व्हॅनची मोडतोड केली. तसेच सिंहगड रस्त्यावरील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या ऑफिसवरही दगडफेक करण्यात आली. या प्रकरणात काही शिवसैनिकांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विषयी अपशब्द शिवसैनिक सहन करणार नाहीत, बाळासाहेबांचा अपमान हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा अपमान आहे. बाळासाहेबांविषयी मागील काही दिवसांपासून आयबीएन लोकमत वाहिनीवरील वापरली जाणारी भाषा ही निंदनीय आहे, हा हल्ला उत्स्फूर्त असल्याचेही राऊत यांनी सांगितले.बाळासाहेब समाजकारणाचे दीपस्तंभ आहेत महाराष्ट्र त्यांच्या समोर झुकतो. ज्यांनी हल्ला केला ते शिवसैनिक आहेत हे आम्ही नाकारणार नसल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Friday, 20 November 2009


सर्व मुले समान आहेत, प्रत्येकाला सारखीच संधी मिळाली पाहिजे, त्यांच्यावरील अत्याचार थांबले पाहिजेत, असा संदेश देत "स्कॅन'तर्फे पणजीत काढण्यात आलेली मुलांची मिरवणूक (छायाः सचिन आंबडोस्कर)

बॅंकेतून ९.७८ लाखांची उचल

२००७ च्या बनावट चेकप्रकरणी
बॅंक कर्मचाऱ्यासह तिघांना अटक

मडगाव, दि.१९ (प्रतिनिधी): बेताळभाटी येथील बडोदा बॅंकेतून डिसेंबर २००७ मध्ये एका खातेदाराच्या खात्यातून बनावट सहीचे धनादेश वापरून उचल करण्यात आलेल्या ९.७८ लाखांच्या रकमेप्रकरणी कोलवा पोलिसांनी एकूण तिघांना शिताफीने अटक केलेली असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिलेली आहे. या तिघांतील एकटा हा सदर बॅंकेचाच कर्मचारी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे कायतान ऊर्फ फ्रांसिस गाब्रियाल इस्तेव्स-मूळ दामोन-राय पण सध्या मुक्काम मुंबई,बॅंक कर्मचारी वसंत अशोक केणी ऊर्फ विकी-मूळ कोळसर-पैंगिण पण सध्या मुक्काम शरीवाडो-मडगाव व आगुस्तीन शाणू जॉन सिल्वेरा -एल मॉंत जवळ, वास्को व सध्या मुक्काम माडेल कुडतरी अशी आहेत. या सर्वांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. केणी व कायतान यांना न्यायालयासमोर उभे करून अधिक तपासासाठी ५ दिवसांच्या पोलिस रिमांडवर घेण्यात आले आहे तर तिसऱ्याला उद्या कोर्टात उभे केले जाणार आहे.
याप्रकरणी सेनावली वेर्णा येथील रोमिरो गॉमीश डिमेलो यांनी २७-०२-२००८ रोजी पोलिसांत तक्रार केली होती. त्याचे बडोदा बॅंकेच्या बेताळभाटी शाखेत खाते होते . कोणीतरी आपल्या सहीची नक्कल करून एक चेक आयसीआयसीआयच्या मडगाव बॅंकेत सादर केला व ९.७८ लाखांची रक्कम उचलली असे त्या तक्रारीत म्हटले होते. त्यावेळी हे प्रकरण बरेच गाजले होते.कोलवा पोलिसांनी त्या प्रकरणाची नोंदही केली होती.पण पोलिस तपासात कोणताच धागा दोरा मिळाला नव्हता.
नंतर पोलिस अधिक्षकांनी या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक रवी देसाई यांच्याकडे सोपविला. त्यांचा तपास चालू असतानाच त्यांना बॅंकेतील कोणीतरी या प्रकरणात सामील असल्याचा संशय आला होता व त्या दिशेने तपास सुरु असतानाच कायतान बाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी मुंबईतील धोबी तलाव पोलिसांच्या मदतीने अटक करून त्याला गेल्या सोमवारी गोव्यात आणले. त्याचे साथीदार सावध होतील यास्तव ही माहिती गोपनीय ठेवली गेली. त्याच्यापाशीं सेंट्रल बॅंकेची दोन बचत खातेपुस्तके,एक पासपोर्ट, एक मतदान कार्ड व एक काळ्या रंगाचा नोक ीया सेल फोन सापडला.
पोलिसांनी त्याची जी तपासणी चालविली त्यात त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यात बॅंक कर्मचारी वसंत केणी ऊर्फ विकी हा सामील असल्याचे व तोच कर्ताकरविता असल्याची माहिती दिली. केणी हा त्यावेळी बॅंकेच्या बेताळभाटी शाखेत होता. तक्रारदार रोमिरो हा नव्या चेकबुक नेण्यासाठी स्लीप घेऊन आला तेव्हा सदर केणी यांनी तो चेकबूक त्याला देण्यापूर्वी त्यातील क्र. ५०६४०८ चा चेक काढून घेतला व नंतर तो चेक आगुस्तीन सिल्वेरा याच्या स्वाधीन केला व त्याच चेकाच्या साह्याने त्यांनी ती रक्कम उकळली.
सिल्वेरा याने दिलेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर वसंत केणी याला दुसऱ्याच दिवशी म्हणजे परवा १७ नोव्हेंबर रोजी बडोदा बॅंकेच्या नेत्रावळी-सांगे येथील शाखेतून ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडे सदर कायतान याच्या नावे असलेले एटीएम डेबीट कार्ड सापडले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील तिसरा आरोपी आगुस्तीन झेवियर सिल्वेरा याला आज माडेल- कुडतरी येथून ताब्यात घेण्यात आले.
पोलिस तपासात बाहेर आलेल्या माहितीनुसार केणी हाच या प्रकरणातील सूत्रधार आहे. त्याने रोमिरोच्या चेकबुकांतील एक चेक काढून घेतल्यावर बॅंकेच्या दस्तावेजांतील रोमिरो याच्या स्वाक्षरीचे मोबाइलवर फोटो घेतले व आगुस्तीनच्या मदतीने त्या सहीची नक्कल संगणकाच्या आधारे सदर चेकवर उतरविली. सदर चेक कायतान याच्या नावावर करून ही रक्कम आयसीआयसीच्या मडगाव शाखेंत स्थलांतरीत करून नंतर एटीएम कार्डव्दारा उचलली गेली.
आपल्या खात्यांतील ९.७८ लाखांची रक्कम उचलली गेल्याचे लक्षात आल्यावर रोमिरो याने पोलिसात तक्रार नोंदविली. आज अटक केलेल्या आगुस्तीन याने कायतान व वसंत यांनी आपला संगणकाव्दारा सहीची नक्कल घेण्यासाठी फक्त वापर करून घेतला व त्या बदली आपणाला नोकिया मोबाईल व १५ हजार रु. दिले तर उरलेली सारी रक्कम आपसांत वांटून घेतली अशी कबुली दिली. पोलिसांनी आगुस्तीनकडून मोबाईल व विविध नोटांच्या स्वरुपातील रक्कम जप्त केली आहे.
या प्रकरणी पोलिस उपनिरिक्षक रवी देसाई,पोलिस शिपाईअजित परब,रोहन नाईक व धनंजय देसाई यांनी कामगिरी पार पाडली.

व्यावसायिक शिक्षकांचे वेतन आता अडीचपट

सर्वशिक्षा अभियान शिक्षकांना
पाच महिन्यांची मुदतवाढ

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): विविध सरकारी आणि सरकारी अनुदानित विद्यालयात कंत्राटपद्धतीवर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकाच्या वेतनात भरमसाट वाढ करण्याच्या निर्णयाबरोबरच सर्व शिक्षा अभियानाच्या "पेरा रेमिडीयल'शिक्षकांना पाच महिन्याच्या कालावधीसाठी नेमणुका करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. व्यावसायिक शिक्षकांसाठी आजची मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची ठरली असून असून पदवीधर शिक्षकांचे वेतन ४ हजार वरून १० हजार रुपये केले आहे. तर, पदव्युत्तर शिक्षकांचे ५ हजारांवरून ११ हजार ७५० रुपयापर्यंत वेतनात वाढ करण्यात आल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संपूर्ण राज्यास सुमारे १४६ शिक्षक व्यावसायिक विषयाचे शिक्षण देण्याचे काम करीत असून यातील ३५ शिक्षक सरकारी विद्यालयात तर, १११ शिक्षक सरकारी अनुदानित विद्यालयात नोकरी करीत आहेत. यातील पदवीधर झालेले ८४ शिक्षक आहेत, तर पदव्युत्तर झालेले ६२ व्यावसायिक शिक्षक कंत्राट पद्धतीवर विद्यादान करीत असल्याचे श्री. कामत यांनी सांगितले.
या शिक्षकांच्या वेतनात वाढ केल्याने सरकारी तिजोरीवर दर वर्षाला ८३.९५ लाख रुपये अतिरिक्त बोजा पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण खात्याचा मंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर बाबूश मोन्सेरात यांनी शिक्षकांच्या सर्व मागण्याकडे लक्ष पुरवले जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याचप्रमाणे खास करून वेतन श्रेणीत दुरुस्ती करण्याची हमी शिक्षकांना दिली होती.
गेल्या सप्टेंबर महिन्यापासून संपुष्टात आलेले कंत्राट संपल्याने त्याचे पुन्हा नूतनीकरण करण्याची मागणी घेऊन झटत असलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या ३३७ शिक्षकांचे कंत्राट पुढील पाच महिन्यांसाठी पुन्हा नूतनीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आपल्या मागणीसाठी या शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेवर मोर्चा काढला होता तर, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांची भेटच घेऊन चर्चा केली होती.
याआधी केंद्र सरकारच्या योजनेनुसार या योजनेचा ७५ टक्के आर्थिक बोजा केंद्र सरकार उचलत होते तर, २५ टक्के या शिक्षकांच्या वेतनाचा खर्च उचलत असे. मात्र ही योजना आता केंद्र सरकारने बंद केल्याने या शिक्षकांचे कंत्राट रद्द झाले होते. परंतु, आता पुढील पाच महिन्यांसाठीच या शिक्षकांची कंत्राट पद्धतीवर नेमणुक केली असून त्यांना वेतन देण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असे यावेळी श्री. कामत यांनी सांगितले. शिक्षण खात्यातील सूत्रानुसार ६ हजार रुपयांपर्यंत वेतनही दिले जाणार आहे. मात्र या शिक्षकांना नियमित न करण्याचा सरकारने ठरवले आहे. यातील अनेकांकडे योग्य पदवी नसल्याने त्यांना शिक्षकी सेवेत घेता येणार नसल्याचे सांगितले. या योजनेतर्फे मागासलेल्या विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके आणि रेनकोट दिले जात असत,आता हे सर्व सामान्य विद्यार्थ्यांनाही दिले जाणार असल्याचे श्री. कामत यांनी सांगितले.

मृत खलाशांबद्दल सरकार संवेदनाहीन

वेधशाळेच्या अंदाजाची
मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): "वेधशाळेने कधी पाऊस आणि कधी ऊन पडणार, याचा अचूक अंदाज व्यक्त केला आहे का,' असा उलट सवाल करून "फयान' वादळात मृत्युमुखी पडलेल्या खलाशांचे आपल्याला कसलेही सोयरसुतक नसल्याचे आज सरकारने दाखवून दिले.
चक्रीवादळामुळे गोव्यातील मच्छीमार ट्रॉलरवरील ६८ खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. त्यांची कोणतीच ठोस माहिती सरकारकडे उपलब्ध नाही. या चक्रीवादळाची कसलीही पूर्वकल्पना दिली नसल्याने पणजी वेधशाळा प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी नुकतीच केली होती. मात्र ही शक्यता मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया व्यक्त करून फेटाळून लावली.
"वेधशाळेने कधी अचूक अंदाज व्यक्त केल्याचे आमच्या माहितीत नाही. तसेच खोल समुद्रात जाणाऱ्या या मच्छिमारांकडे संपर्क साधण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. मच्छीमार जवळच होते, त्यांना ट्रॉलर मालकांनी मोबाईलवर संपर्क साधून माघारी फिरण्याचा संदेश दिला. मात्र काही खोल समुद्रात होते, त्यांना ही माहिती मिळाली नाही,' असे कामत म्हणाले. या ६८ खलाशांचा शोध घेण्याचे कामही थांबवण्यात आले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खोल समुद्रात बुडालेल्या या खलाशांचा शोध घेणे अत्यंत कठीण असल्याची माहिती त्यांनी दिली.

दोषी व्यक्तींकडून पैसे वसूल करण्यात दिरंगाई

शिरसई कोमुनिदादप्रकरणी
हायकोर्टाकडून कानउघाडणी

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): पोलिस तक्रार दाखल करण्यात आल्यानंतरही दोषी व्यक्तींकडून शिरसई कोमुनिदादीचे पैसे का वसून केले नाहीत, असा प्रश्न करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे असे आम्ही समजायचे का,असा संतप्त सवाल करून पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला आहे, याचा अहवाल सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सरकारला दिला.
शिरसई कोमुनिदादमध्ये झालेल्या गैरप्रकारांवरुन आग्नेल डिसोझा, निशीकेत परब आणि पांडुरंग परब या तिघांविरुद्ध पोलिस तक्रार करण्याचे आदेश यापूर्वी गोवा खंडपीठाने दिले होते. या तिघांकडून अद्याप पैसे का वसूल करण्यात आले नाहीत, असा प्रश्न न्यायालयाने विचारताच, त्यांची जामिनावर सुटका झाली त्यामुळे आम्हाला कोणतीही जप्ती आणता आली नाही,अशी माहिती देण्यात आली. मग, तुम्ही त्यांच्या जामिनाला आव्हान का दिले नाही,असा प्रश्न न्यायालयाने केला. या घटनेची पोलिसांतर्फे सुरू असलेल्या तपासकामाची सर्व माहिती न्यायालयात सादर करण्याचे आदेश यावेळी खंडपीठाने दिले. तसेच यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या तपासाचा अहवाल पोलिसांना द्या आणि त्याच्यावरून तपास करण्यास सांगा, अशी सूचनाही सरकारला करण्यात आली.
शिरसई कोमुनिदादमधे झालेल्या करोडो रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्या तपास कामाचा अहवाल न्यायालयाने मागितला होता, परंतु तो अद्याप न्यायालयाला देण्यात आलेला नाही. आज त्या विषयाची पुन्हा न्यायालयाने विचारणा केली असता, हा अहवाल सादर करण्यासाठी वेळ मागून घेण्यात आला.
मागच्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात या तिन्ही व्यक्तींनी करोडो रुपयांचा घोटाळा केल्याचे स्पष्ट करून अनेक वर्षे पैशांची नोंदही ठेवण्यात आली नसल्याचे म्हटले होते. येत्या जानेवारी महिन्यात कोमुनिदाद संस्थेची निवडणूक होणार असून यापूर्वीच्या समितीने पैशांच्या नोंदी केलेल्या नाहीत. तसेच कोमुनिदादच्या खात्यात एक रुपयाही नाही, अशी माहिती यावेळी याचिकदारांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. यापूर्वीच्या समितीने त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही किती पैसे बॅंकेतून काढले आहेत, असा प्रश्न न्यायालयाने केला.

Thursday, 19 November 2009

कॅसिनो भेटीच्या तुलनेची चर्चकडून निंदा

'महासंचालकाचे निवेदन धक्कादायक'
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): चर्च, मंदिरांची कॅसिनोकडे तुलना केल्याने वादग्रस्त ठरलेले पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांचे हे वक्तव्य "ईश्वरनिंदनीय' आणि 'धक्कादायक'या शब्दांत रोमन कॅथलिक चर्चच्या प्रवक्त्याने तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांचे कॅसिनोवर जाणे हे लोक ज्याप्रकारे चर्च आणि मंदिरात जातात, त्याचप्रमाणे आहे. त्यामुळे त्याची कोणतीही चौकशी होणार नसून ते समर्थनीय असल्याचे वक्तव्य श्री. बस्सी यांनी आपल्या सात अधिकाऱ्यांची पाठराखण करताना केले होते. पोलिस महासंचालकाच्या या वक्तव्यावरून तीव्र पडसाद उमटले असून विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी केली आहे. तर, शिवसेना, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, मंदिर सुरक्षा समितीने या वक्तव्याचा निषेध केला आहे.
"कायदा आणि सुव्यवस्थेचे पालकत्व असलेल्या एवढ्या मोठ्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तोंडून अशा प्रकाराचे वक्तव्य होत असल्याने आम्हाला धक्का बसला आहे'असे चर्चचे प्रवक्ते फ्रान्सिस्को काल्देरा यांनी म्हटले आहे.
ईश्वरनिंदा करणारी व्यक्तीच कॅसिनोची तुलना चर्च आणि मंदिरांशी करू शकते.त्यांना धर्म आणि कॅसिनो यामधील फरक माहिती नसावा, असेही त्यांनी पुढे म्हटले.
पोलिस अधिकारी कॅसिनोवर पार्टी करण्यासाठी गेलेल्या घटनेचे ते समर्थन करताना श्री. बस्सी यांनी धार्मिक स्थळांची तुलना कॅसिनोशी केली होती.
दि. १२ नोव्हेंबर रोजी रात्री सात पोलिस वरिष्ठ अधिकारी रॉयल कॅसिनोवर गेले होते. त्याचवेळी कॅसिनो व्यवस्थापने पत्रकारांना कॅसिनो जहाजाची माहिती करून देण्यासाठी सर्व पत्रकारांना आमंत्रित केले होते. यावेळी त्या जहाजाच्या इंजिनापासून त्याठिकाणी कशा पद्धतीने जुगार खेळला जातो, याचीही माहिती करून दिली होती. हे सुरू असतानाच त्याठिकाणी या अधिकाऱ्याचा गट दाखल झाला होता. हे पोलिस अधिकारी "ऑफ ड्युटी'वर कॅसिनोवर गेले होते, असा दावा करून पोलिस महासंचालकांनी त्यांना "क्लीन चीट' दिली आहे.

हणजूण येथे तरुणाचा खून

म्हापसा, दि. १८ (प्रतिनिधी): डिमेलोवाडा- हणजूण येथे आज दुपारी शुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर भर रस्त्यावर सागर साळगावकर (३४) याच्यावर पितापुत्राने चाकूने वार करून खून केला. या घटनेनंतर संप्रीत मालवणकर (२२) याला हणजूण पोलिसांनी अटक केली तर, त्याचे वडील चंद्रकांत मालवणकर यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना इस्पितळात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबद्दलची तक्रार मयत सागर याचा भाऊ लक्ष्मण साळगावकर यांनी हणजूण पोलिस स्थानकात सादर केली असून भा. दं. स कलमा ३०२ नुसार संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आज दुपारी १२.३० वाजता स्टारको हॉटेलजवळ तिठ्यावर दुपारी सागर व साळगावकर पितापुत्र यांच्या दरम्यान जोरदार बाचाबाची झाली, संशयित चंद्रकांत बाबाजी मालवणकर व त्याचा मुलगा संप्रीत यांनी सागर साळगावकर याच्यावर हल्ला चढविला. यावेळी सागर याचा जांघेत चाकू खुपसल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जांघेत सुरा खुपसण्यात आल्याने सागर रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर पडला. यावेळी तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली, तथापि वाटेवरच त्याचे निधन झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना पोलिस ठाण्यापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावर घडली असली तरी संध्याकाळी सात वाजता पंचनामा करण्यात आला, याबद्दल या भागात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याविषयीचा अधिक तपास हणजूण पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रमेश गावकर करीत आहे.

संसदेत महागाई, मधु कोडा, माओवादी हिंसेचे मुद्दे ऐरणीवर

हिवाळी अधिवेशन आजपासून
नवी दिल्ली, दि. १८ : मधु कोडापासून तर टेलिकॉम घोटाळ्यापर्यंतचे अनेक विषय कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी तयार असताना महागाईसारख्या काही मुद्यांवर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला घेरण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यतांच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
सुमारे एक महिनाभर चालणारे हे अधिवेशन विरोधी पक्षांसाठी अनेक मुद्यांवर सरकारला चिमटे काढण्यासाठी पोषक ठरले आहे. माओवादी हिंसाचाराच्या मुद्यावर डावे पक्ष आणि तृणमूल अडचणीत असताना ऊस उत्पादकांचा प्रश्नही ऐरणीवर आहे. या अधिवेशनात लिबरहान आयोगाचा अहवाल सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुद्यावरून संपुआ आणि भाजपादरम्यान शाब्दिक चकमकीही उडणार असे दिसत आहे.
लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यांनीच आपल्या मृदू आवाजात हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिले आहे. भारतीय जनता पार्टीने ऊस उत्पादन नियंत्रण सुधारणा आदेशावर पहिल्याच दिवशी स्थगन प्रस्ताव आणण्याचे ठरविले आहे. याशिवाय श्रीलंकेतील तामिळांचा प्रश्न, वातावरणातील बदल, चीनच्या संदर्भातील परराष्ट्र धोरण हे मुद्देही विरोधी पक्ष उपस्थित करणार आहे.
डावे पक्ष सरकारला महागाईसह सार्वजनिक कंपन्यांचे निर्गुंतवणुकीकरण, कामगार संघटनांच्या अधिकारांवर गदा, कृषी धोरणविषयक मुद्यांवर सरकारला जाब विचारणार असल्याचे भाकप नेते गुरुदास दासगुप्ता यांनी सांगितले.
मात्र, संसद अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काही दिवसात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अनुपस्थित राहणार आहेत. कारण २१ नोव्हेंबरपासून ते आठवडाभरासाठी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पुन्हा ६ डिसेंबरपासून दोन दिवस तर रशियाला जाणार आहेत.

ट्रकने ठोकरल्याने एक ठार वेर्णा येथे वारंवार अपघात

वास्को, दि. १८ (प्रतिनिधी): आपल्या दुचाकीवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या हरगोविंद सिंग (३५) या तरुणाला समोरून येणाऱ्या ट्रकने कुठ्ठाळी येथे जबर धडक दिली. त्याचवेळी उलटलेल्या या ट्रकखाली सापडल्याने तो जागीच ठार झाला. दगड घेऊन येत असलेल्या सदर ट्रकने सांत्रात, कुठ्ठाळी येथे हरगोविंद सिंग याच्या मोटरसायकलला धडक दिल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडाला धडक देऊन नंतर तो येथे उलटला.
आज दुपारी १.२५ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. कुठ्ठाळी येथे राहणारा हरगोविंद सिंग हा तरुण आपल्या "टीव्हीएस स्पेक्ट्रा' या मोटरसायकलवरून (क्रः यूपी-७८- एयुव्ह-३०८५) ठाणे, कुठ्ठाळी ते तावडीनावता, कुठ्ठाळी येथे जाण्यासाठी महामार्गावरील रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना वेर्णा मार्गाने पणजीच्या दिशेने महामार्गावरून दगड घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्रः जीए ०३ टी ३७०७) त्यास यावेळी जबर धडक दिली. सदर अपघातामुळे सिंग हा इसम आपल्या मोटरसायकलवरून फेकला गेला तसेच मोटरसायकलला धडक देऊन ट्रकने महामार्गाच्या बाजूला असलेल्या मोठ्या झाडाला यावेळी धडक देऊन नंतर तो येथे उलटला. वेर्णा पोलिसांच्या माहितीनुसार अपघात करून उलटलेल्या ट्रकखाली हरगोविंद सिंग सापडला. अपघातात उलटलेल्या ट्रकखाली सापडलेले हरगोविंद सिंग तसेच ट्रकच्या केबिनमध्ये सापडलेल्या ट्रकचालक डेव्हिड मुत्तू (वय ६५, रा.नुवे) व क्लीनर अँथनी स्वामी (वय ३४, रा. नुवे) यांना त्वरित बाहेर काढण्यात आले. हरगोविंद सिंग याचा तेेथेच मृत्यू झाल्याचे आढळून आले. वेर्णा पोलिसांनी यावेळी त्वरित अपघातस्थळावरून जखमींना त्वरित उपचारासाठी बांबोळीच्या गो.मे.कॉ इस्पितळात पाठवून दिले तसेच अपघाताचा पंचनामा करून उलटलेला ट्रक व सिंग याची चक्काचूर झालेली मोटरसायकल येथून हटविली.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच सांत्रात या भागामध्ये चारचाकी व स्कूटर यांच्यामध्ये अपघात होऊन आगुस्तीन व इनासीन हे दांपत्य मरण पोचले होते व आज पुन्हा येथे हा भीषण अपघात होऊन हरगोविंद सिंग या इसमाचे निधन झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असून प्रशासनाकडून येथे गतिरोधक का घालण्यात येत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वेर्णा पोलिसांच्या माहितीनुसार ट्रकचालक व क्लीनर यांची अवस्था गंभीर असून ते मुळचे तामिळनाडू येथील असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आज झालेल्या अपघातात मरण पोचलेल्या हरगोविंद सिंग याचा मृतदेह हॉस्पिसीयोच्या शवागृहात ठेवण्यात आला आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजन प्रभूदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिषेक गोम्स पुढील तपास करीत आहेत.

Wednesday, 18 November 2009

पोलिस महासंचालकांना तात्काळ हटवा : पर्रीकर

'कॅसिनोभेटीची पाठराखण धक्कादायक'
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): पोलिस खात्यातील अत्युच्च पदावर असलेले पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी आपल्या खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या कॅसिनोवरील भेटीची पाठराखण करण्यासाठी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक आहे. हे वक्तव्य जर त्यांनी पूर्ण जबाबदारीने केले असेल तर तो राज्यातील जनतेचा अपमान आहे.अशा व्यक्तीला या पदावर राहण्याचा कोणताच अधिकार नसून राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांची तात्काळ इतरत्र रवानगी करावी,अशी जोरदार मागणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज इथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पर्रीकर यांनी पोलिस महासंचालक श्री.बस्सी यांच्या वक्तव्याची चांगलीच हजेरी घेतली. "लोक ज्याप्रमाणे आपल्या इच्छेनुसार मंदिर, चर्च किंवा रेस्टॉरंटमध्ये जातात तसेच हे सात पोलिस अधिकारी कॅसिनोंवर गेले होते' हे वक्तव्य पोलिस महासंचालकांना अजिबात शोभत नाही. कॅसिनोंवर जाणे हे चुकीचे नाही एवढेच जर त्यांना स्पष्ट करावयाचे होते तर त्यासाठी असे बेजबाबदार वक्तव्य करण्याची अजिबात गरज नव्हती.याविषयी वक्तव्य करताना पहिल्यांदा त्यांनी या पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटीची शहानिशा करून त्यानंतरच वक्तव्य करणे योग्य ठरले असते. सरकारी अधिकाऱ्यांना व विशेष करून पोलिस अधिकाऱ्यांना सरकारी सेवेत रुजू झाल्यानंतर काही शिस्तीची बंधने पाळावी लागतात. सरकारची प्रतिमा डागाळणारी किंवा सरकारी पदांची प्रतिष्ठा शाबूत ठेवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी स्वतः ठरावीक शिस्त बाळगणे गरजेचे असते.कॅसिनोवरील जुगार हा सर्वसामान्य पगारदार नोकरदारांना परवडणारा खेळ नसतो, त्यामुळे याठिकाणी हे अधिकारी नेमके कसे पोहचले होते व ते का गेले होते याचे स्पष्टीकरण महासंचालकांनी देण्याची गरज आहे. हे अधिकारी तिथे जुगार खेळले नाहीत हे सांगताना त्याला "सीसीटीव्ही' च्या प्रमाणाची जोड दिली असती तर ते अधिक स्पष्ट झाले असते. राज्यात सुरू असलेले कॅसिनो हे बेकायदा आहे या वक्तव्याशी आपण ठाम असल्याचे सांगून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानेच आपण गप्प आहोत,असेही पर्रीकर म्हणाले. कॅसिनो कायदेशीर असल्याचे ते म्हणतात. काही देशात वेश्याव्यवसायही कायदेशीर आहे, अशावेळी त्यांचे पोलिस अधिकारी जर अशा भागात फिरत असतील तर त्याचेही ते समर्थन करतील काय,असा सवाल पर्रीकर यांनी केला. पोलिस महासंचालकांनी योग्य पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करूनच त्याबाबत स्पष्टीकरण देणे योग्य होते.कॅसिनोंवर जाणे म्हणजे मंदिरात जाणे असे जर त्यांना वाटते तर गुन्हेगार म्हणजे मंदिरातील देव आहेत, असे तर त्यांना म्हणायचे नाही ना, असा खोचक सवालही पर्रीकरांनी केला.

मालगाडीत स्फोटामुळे तेलाचे १६ टॅंकर खाक

..हजारो लीटर तेल स्वाहा
..कोट्यवधींचे नुकसान
..उल्फाचा हात असल्याचा संशय
..राजधानीसह अनेक गाड्यांना विलंब

गुवाहाटी, दि. १७ : आसाममध्ये उल्फा बंडखोरांनी घडवून आणलेल्या स्फोटात तेलाचे टॅंकर घेऊन जाणाऱ्या मालगाडीचे १२ टॅंकर्स पेटले आणि ४ रूळावरून घसरल्याने प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. प्रत्येक टॅंकरमध्ये ७० हजार लीटर डिझेल होते. आगीत हे हजारो लीटर तेल स्वाहा झाले असून, त्यामुळे कोट्यवधींची हानी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे रेल्वे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे.
ही घटना आसामच्या जोरहाट जिल्ह्यात घडली. येथील मोेेरयानीनजीक उल्फाच्या बंडखोरांनी स्फोट घडवून आणला. या परिसरातून जात असलेल्या रेल्वेच्या तेल टॅंकरला लक्ष्य बनविण्यात आले होते. तेेलाचे टॅंकर घेऊन येत असलेली ही गाडी नुमालीगड रिफायनरीतून आली होती. ती उत्तरप्रदेशच्या दिशेने जात असताना मोरयानीनजीक हा प्रकार घडला. रेल्वेच्या चालकाने स्फोटाचा आवाज ऐकला. त्याने बाहेर डोकावून पाहताच मागील काही टॅंकसमधून धूर निघताना दिसला. काही टॅंकर्स जळत होते तर काही रूळावरून घसरले होते. त्याने प्रसंगावधान राखून गाडी थांबविली आणि लगेचच रेल्वे प्रशासनाच्या मदतीने इंजिनपासून टॅंकर्स वेगळे करण्यात आले. या स्फोटानंतर लागलेल्या आगीत सुमारे १२ टॅंकर्स जळाले. प्रत्येक टॅंकरमध्ये ७० हजार हजार लीटर तेल असल्याने ते बराच वेळपयर्र्त जळत होते. अन्य टॅंकर्सना लगेचच त्यापासून वेगळे करण्यात आले. चार टॅकर्स रूळावरून घसरले. एकूण ५१ टॅंकर्स असणाऱ्या या मालगाडीचा गार्ड आणि चालक सुरक्षित आहेत.
आगीचे उग्र स्वरूप लक्षात घेता लगेचच लष्कर, पोलिस, अग्निशमन दलासह आजूबाजूच्या परिसरातील बचाव दल तात्काळ कामाला लागले. जयपूरमध्ये ज्याप्रमाणे तेल टाक्यांना आग लागली होती आणि संपूर्ण इंधन जळून गेल्याशिवाय आग विझविणे शक्य नव्हते, त्याप्रमाणेच या गाडीच्या जळणाऱ्या टॅंकर्समधील इंधन संपण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाहीय.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
या घटनेमुळे आसाममधील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून, राजधानीसह अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत. रेल्वे मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरू आहेत. पण, एकूण ३०० मीटरहून अधिक लांब रेल्वेमार्ग या घटनेमुळे उद्ध्वस्त झाला आहे. आगीमुळे परिसरात प्रचंड उष्णता पसरली आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम प्रभावित झाले आहे. ही आग विझण्यासाठी आणखी सात ते आठ तास लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्सप्रेसला सिमोेलूगुडी येथे थांबविण्यात आले असून त्यातील प्रवाशांना मोरयानीपर्यंत रस्ते मार्गाने आणण्याची व्यवस्था केली आहे. तेथून ते दुसऱ्या राजधानीने दिल्लीपर्यंत पोहोचू शकणार आहेत. काही गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले असून अमृतसरला जाणारी दिब्रुगड-अमृतसर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. सर्व लोकलही रद्द करण्यात आल्याचे ईशान्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

राजदत्त यांना 'गदिमा' पुरस्कार

पुणे, दि. १७: ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर यांच्या स्मृती निमित्ताने देण्यात येणारा यंदाचा ३२ वा 'गदिमा पुरस्कार' ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांना तर, गदिमांच्या पत्नी विद्याताई माडगुळकर यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारा 'गृहिणी सखी सचिव पुरस्कार' विद्या अभिषेकी यांना जाहीर झाला. येत्या १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक येथे संध्याकाळी पाच वाजता पुरस्कार समारंभ होणार आहे.
गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची माहिती दिली. दहा हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे गदिमा पुरस्काराचे स्वरूप असून गृहिणी सखी सचिव पुरस्काराचे पाच हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप आहे.
गदिमांचा स्नेह निर्व्याजपणे जपणाऱ्या त्यांच्या स्नेह्यास 'गदिमा स्नेहबंध पुरस्कारा'ने गौरवण्यात येते. यंदाचा स्नेहबंध पुरस्कार राज्याच्या विधानसभेचे माजी सभापती मधुकर चौधरी यांना देण्यात येणार असून नव्या उभारीच्या प्रतिभावंतांना देण्यात येणारा 'चैत्रबन पुरस्कार' छत्रपती शिवाजी महाराज छोट्या पडद्यावर साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. तसेच, शालान्त परीक्षेत मराठीत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक 'गदिमा पारितोषिक' देऊन करण्यात येते, यंदा कोल्हापुरच्या उषाराजे हायस्कूलची विद्याथिर्नी तेजश्री पाटील हिच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणार आहे.

दाबोळी विमानतळाची विस्तार निविदाच रद्द!

दाबोळी विमानतळ विस्तारीकरणाचा मोठा गाजावाजा करून सरकारने शिलान्यास कार्यक्रम पार पाडला पण आपल्या माहितीनुसार ही निविदाच रद्दबातल ठरल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला.राज्यातील पायाभूत सुविधांची अत्यंत दयनीय स्थिती बनली आहे. मोपा विमानतळ प्रकल्प रखडत असताना दाबोळीच्या विस्ताराबाबत केंद्रातील व राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकार केवळ बोळवण करीत असल्याचा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला.
केंद्रीय विमानवाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याहस्ते राज्य सरकारने दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरणाचा शिल्यान्यास केला होता. मुळात निविदेला मान्यता मिळण्यापूर्वीच हा कार्यक्रम करण्यात आला होता व आता ही निविदा कालबाह्य ठरल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात एकमेव विमानतळ असलेल्या दाबोळीवर ताण वाढल्याने हे विस्तारीकरण तात्काळ हाती घेण्याची गरज होती. मुळात या विस्तारीकरणाला भाजप प्रदेशाध्यक्ष तथा माजी केंद्रीय विमानवाहतूक राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मान्यता दिली होती.आपण मुख्यमंत्री असताना या विस्तारीकरणाची जागा उपलब्ध करून दिल्याचा दावाही पर्रीकर यांनी केला. जुवारी नदीवरील कमकुवत पुलाच्या ठिकाणी नवीन पुल बांधण्याची कुवत नसलेल्या सरकारकडून सागरी सेतूच्या घोषणा केल्या जाणे हे हास्यास्पद असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.सागरी सेतूच्या एकूण संकल्पनेबाबतच संशय निर्माण करण्यासारखी परिस्थिती असल्याची माहिती त्यांनी दिली. दाबोळी,मोपा व जुवारी पुलाबाबत भाजपचे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक हे लोकसभेत आवाज उठवतील व आपणही याबाबत पाठपुरावा करणार असेही ते म्हणाले.

Tuesday, 17 November 2009

चर्च व देवळात जाण्याइतकेच पोलिसांचे कॅसिनोत जाणे समर्थनीय

महासंचालकांनी तोडले तारे
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): "आपल्या इच्छेनुसार ज्याप्रमाणे लोक मंदिर, चर्च आणि रेस्टॉरंटमध्ये जातात, त्याचप्रमाणे चार पोलिस अधीक्षक, दोन उपअधीक्षक आणि एक निरीक्षक कॅसिनोवर पार्टी करण्यासाठी गेले होते. त्यात काहीही गैर नाही'' असे स्पष्टीकरण आज पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. कॅसिनोत जाऊन मौजमजा केल्यानंतर वादग्रस्त ठरलेले पोलिस खात्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना "क्लीन चीट' देताना श्री. बस्सी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे. गोव्यात दाखल झालेल्या कॅसिनोंना जोरदार विरोध होत असतानाच पोलिस खात्याचे प्रमुख कॅसिनोची तुलना धार्मिक स्थळांशी करत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
""कामावर नसताना कोणताही पोलिस अधिकारी कॅसिनोवर गेला म्हणून काय झाले? अनेक लोक मंदिर, चर्चमध्ये जातात तसेच तेही गेले होते. राज्यात तरंगत्या कॅसिनोवर जाण्यास बंदी नाही त्यामुळे मी कोणावर कारवाई करू शकत नाही'', असे श्री. बस्सी यांनी सांगितले. या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यताही त्यांनी यावेळी फेटाळून लावली. सात पैकी एक पोलिस अधिकारी त्यादिवशी ड्युटीवर होता का, असा प्रश्न केला असता मात्र श्री. बस्सी यांनी त्यावर ठोस उत्तर देण्याचे टाळले.
गृहमंत्री रवी नाईक यांनी या घटनेनंतर कोणतीही कारवाई करण्याचे आदेश दिलेले नाही. त्यांचे वक्तव्य माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने प्रसिद्ध केले आहे, असा आरोपही यावेळी श्री. बस्सी यांनी केला. परंतु, गृहमंत्री नाईक यांनी गेल्या शनिवारी एका वृत्त वाहिनीवर मुलाखत देताना स्पष्टपणे, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कॅसिनोवर जाण्याच्या घटनेच्या चौकशीचा अहवाल देण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत, असे म्हटले होते. गृहमंत्री नाईक आणि पोलिस महासंचालकांच्या वक्तव्यांमध्ये तफावत आढळून येत असल्याने नेमके कोणाचे वक्तव्य खरे आहे, यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
""ते पोलिस अधिकारी नेहमी कॅसिनोवर जात नाही. तसेच गेल्या गुरुवारी ते कॅसिनोवर गेले होते, त्यावेळी ते जुगार खेळले नव्हते'' असे स्पष्टीकरण त्या सात अधिकाऱ्यांकडून मिळाल्याचे श्री. बस्सी यांनी सांगितले.

...तर प्रतिदिन दंड

न्यायालयाची पालिकांना तंबी
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): किनारपट्टी क्षेत्रातील कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याने न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त करून पंचायत आणि पालिकांना बरेच खडसावले. आत्तापर्यंत न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे किती प्रमाणात पालन केले आहे, याची पाहणी करून येत्या शुक्रवार पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेत. पंचायतीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचे आढळून आल्यास त्यांनी यापूर्वी दंडाची रक्कम म्हणून न्यायालयात जमा केलेले २५ हजार रुपये जप्त केले जाणार आहे. इतकेच नव्हे तर त्यानंतर आदेशाचे पालन होईपर्यंत दर दिवसाप्रमाणे दंड ठोठावला जाणार असल्याचीही ताकीद गोवा खंडपीठाने दिली.
त्याचप्रमाणे, कचरा विल्हेवाट उभारण्यासाठी कधीपर्यंत जागा ताब्यात घेणार आणि यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे कधीपर्यंत पालन केले जाणार, याचे प्रतिज्ञापूर्वक उत्तर देण्याचे आदेश म्हापसा व वाळपई नगरपालिकेला देण्यात आले. याविषयीची पुढील सुनावणी येत्या दि. २५ नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, किती पंचायतींकडे कचरा विल्हेवाटीसाठी कायमस्वरूपी जागा आहे, ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी बांधकाम केले आहे का, याची तपशीलवार माहिती आज राज्यसरकारने न्यायालयात सादर केली. ""दरवेळी तुम्ही न्यायालयात उभे राहून "चालढकल' करतात. वेळोवेळी अर्ज सादर करून मुदत मागून घेतात. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन मात्र तुमच्याकडून होत नाही'' अशा शब्दात न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
किनारपट्टी क्षेत्रात येणाऱ्या २६ पंचायतींपैकी अनेकांकडे जागा उपलब्ध आहे. तर काहींना स्थानिकांकडून विरोध होत असल्याने अद्याप जागा मिळालेली नाही. काही पंचायतींना ग्रामसभेत विरोध होत असल्याची माहिती यावेळी सरकारने न्यायालयाला दिली. ११ नगरपालिकांकडे जागा आहे तर, काही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र म्हापसा आणि वाळपई पालिकेने काहीही केलेले नसल्याचे यावेळी ऍमेक्युस क्यूरी नॉर्मा आल्वारीस यांनी सांगितले. या पालिकांना जागा ताब्यात घेण्यासाठी दि. ८ एप्रिल ०९ पासून सहा महिन्याची मुदत देण्यात आली होती. ती मुदत संपूनही त्यांनी जागा ताब्यात घेतली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच काही पंचायतींनी गाव मोठे असल्याने प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यास नकार दिला आहे. महिन्यातून एकदा तरी प्लॅस्टिकचा कचरा उभारण्याची सूचना या पंचायतींना करण्यात आली होती.
"आम्ही जागेसाठी पाहणी केली आहे. परंतु, ती जागा वनखात्याच्या क्षेत्रात येत असल्याने त्यांनी आक्षेप घेतला आहे. वन खात्याकडून ना हरकत दाखल मिळत नाही त्यामुळे जागेचा प्रश्न सुटलेला नाही'', असे यावेळी वाळपई पालिकेतर्फे युक्तिवाद करताना ऍड. पडियार यांनी सांगितले. काणकोण पालिकेचाही असाच प्रश्न असून त्यांचीही जागा वन खात्यात येत असल्याने त्याठिकाणी प्रकल्प उभारण्यास वन खाते दर महिना १८ हजार रुपये भाडे मागत असल्याची माहिती ऍड. आल्वारीस यांनी दिली.

'युवा कॉंग्रेस'चा धुडगूस मात्र तक्रारीची दखल नाही

सरकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ, धमकी
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष संकल्प आमोणकर व इतर पाच ते सहा जणांच्या टोळीने आपल्या कार्यालयात घुसून आपल्याला धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केल्याची तक्रार गोवा पर्यटन विकास महामंडळाचे हॉटेल व विपणन उप सरव्यवस्थापक संजय चोडणेकर यांनी पणजी पोलिस स्थानकात दिली आहे. दि. ११ नोव्हेंबर रोजी तक्रार सादर करूनही पणजी पोलिसांनी ती अद्याप नोंद केलेली नाही, अशी माहिती उघडकीस आली आहे.
यासंबंधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोवा पर्यटन विकास महामंडळाचे उप सरव्यवस्थापक श्री. चोडणेकर यांना वागातोर येथे महामंडळाच्या जागेत बेकायदा गाडे उभे केल्याची तक्रार मिळाली होती. त्यांनी प्रत्यक्ष या जागेची पाहणी केली व हे गाडे खरोखरच महामंडळाच्या जागेत उभे केल्याचे निश्चित करून येथील एकूण पाच गाडे हटवले. या कारवाईची माहिती दुपारी २.३० वाजता खात्यातील वरिष्ठांना देण्यात आली. त्याच दिवशी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संकल्प आमोणकर व त्याचे साथीदार कार्यालयात घुसले व त्यांनी हे गाडे हटवण्याचे अधिकार कुणी दिले असे म्हणून दमदाटी करायला सुरुवात केली, असे श्री.चोडणेकर म्हणाले. आपण त्यांना यासंबंधी उत्तर देणार तोच जनार्दन भंडारी हे आपल्या अंगावर धावून आले व त्यांनी आपल्या समोरील सर्व फाईल्स भिरकावल्या, अशी माहितीही श्री.चोडणेकर यांनी या तक्रारीत दिली आहे. कार्यालयात मोठमोठ्याने शिवीगाळ करून हंगामा करताना ते आपल्यावर हल्ला करण्याच्याच बेतात होते, असेही त्यांनी म्हटले आहे. यावेळी संकल्प आमोणकर याने मूठ आपटून आपल्या समोरील टेबलाची काच फोडली व आपण केलेल्या कारवाईला आव्हान देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
बेकायदा आपल्या कार्यालयात घुसून या टोळीने केलेले वर्तन व धमकी हा निंदनीय व अतिशय गंभीर असा प्रकार असून एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे हे वर्तन करणे गुन्हा ठरते व पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
चौकशी सुरू आहे
सरकारी अधिकाऱ्याशी गैरवर्तन करण्याची ही तक्रार करून पाच दिवस उलटले तरी अद्याप पणजी पोलिसांनी ती तक्रार नोंद करून घेतली नाही. याप्रकरणी निरीक्षक संदेश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला असता, चौकशी सुरू आहे पण तक्रार नोंद केली नाही, असे ते म्हणाले.
कोण चोडणेकर ठाऊक नाही
आपल्याविरोधात तक्रार करणारी चोडणेकर ही व्यक्ती कोण आहे हे आपल्याला अजिबात माहिती नाही व या प्रकाराबद्दलही काहीही माहिती नाही. कुणीतरी विनाकारण आपल्या बदनामीसाठी हे करीत असल्याचे संकल्प आमोणकर यांनी यावेळी सांगितले.

दोन अपघातांत मुरगावात तीन ठार

जोडप्याचा समावेश
वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): सुसाट वेगाने "ओव्हरटेक' करण्याच्या प्रयत्नात असलेल्या क्वालीसने स्कूटरला धडक दिल्याने पैरेभाट, वेर्णा येथील इनासीन रिबेलो (३७) व तिचा नवरा आगुस्तीन रिबेलो यांचा मृत्यू झाला. शिवोली येथील २३ वर्षीय जॅक्सन परेरा हा तरुण क्वालीस घेऊन पणजीहून मडगावच्या दिशेने जात असताना दुपारी १.१५ च्या सुमारास कुठ्ठाळी येथे हा अपघात घडला. दरम्यान, दुचाकीवरून जात असताना ताबा सुटून जमिनीवर पडल्याने बोगदा, वास्को येथील विश्वनाथ गजानन होबळे या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्वालीस (जीए ०१ आर ३६६२) सांत्रे, कुठ्ठाळी येथील लोटो बारसमोर पोचली असता चालकाने समोरच्या गाडीला "ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला (जीडीएच ५०१९) गाडीची जबर धडक बसली. सदर अपघातामुळे स्कूटरवर असलेले आगुस्तीन व इनासीन हे दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले. इनासीन ही जागीच ठार झाली तर जखमी आगुस्तीन यास प्रथम उपचारासाठी बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून मयत इनासीन हिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिला. दरम्यान गंभीररीत्या जखमी झालेल्या आगुस्तीनचा इस्पितळात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या अपघातात क्वालीसचालक जॅक्सन जखमी झालेला असून त्याच्यावर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचार सुरू आहे. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजन प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशांत गावस पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, या अपघातामुळे पैरेभाट भागात दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. मयत आगुस्तीन व इनासीन यांना दोन मुले असून यात सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. यामुळे या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

वास्को, दि. १६ (प्रतिनिधी): आपल्या दुचाकीवरून जात असताना ताबा सुटून जमिनीवर पडल्याने बोगदा, वास्को येथील विश्वनाथ गजानन होबळे या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. काल (दि १५) संध्याकाळी सदर अपघात घडल्यानंतर जखमी विश्वनाथ यास उपचारासाठी इस्पितळात दाखल केला असता आज त्याचा मृत्यू झाला.
मुरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल (दि १५) संध्याकाळी ६.२० च्या सुमारास सदर अपघात घडला. बोगदा, सडा येथील गणेश मंदिरासमोर राहणारा विश्वनाथ होबळे "पॅशन' दुचाकीवरून (जीए ०६ सी ६५१३) सडा येथील अँटार्टिक सेंटरच्या दिशेने जात असता कबरस्तानाजवळ त्याचा वाहनावरील ताबा सुटला. सुमारे पाच ते दहा मीटर फरफटत गेल्यामुळे त्याला गंभीर दुखापती झाल्या, त्याला त्वरित चिखली येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची अवस्था गंभीर असल्याने त्याला बांबोळीच्या गोमेकॉत हालवण्यात आले. गोमेकॉत उपचार घेत असता आज (दि १६) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याचे निधन झाले. मुरगाव पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सांताक्रुझ येथे भावाचा खून

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाच्या डोक्यावर कुदळीच्या साह्याने वार करून खून केल्याची घटना सान्ताक्रुज पणजी येथे काल रात्री घडली. या हल्ल्यात ईश्वर गावस (४०) याचा मृत्यू झाला असून धाकटा भाऊ श्याम गावस (३०) याला जुने गोवे पोलिसांनी अटक केली आहे.
काल रात्री दोघा भावात कडाक्याचे भांडण झाल्यानंतर श्याम याने कुदळीने ईश्वर याच्या डोक्यावर जोरदार वार केला. यावेळी जखमी अवस्थेत त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास जुने गोवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक आशिष शिरोडकर करीत आहेत.

तिकीट घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): मडगाव येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकीट घोटाळ्यात माजी क्रीडामंत्री दयानंद नार्वेकर दोषी असल्याचा पेंडसे अहवाल कॉंग्रेस सरकारने फेटाळून लावल्याने त्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल झाली आहे. यात माजी क्रीडामंत्री दयानंद नार्वेकर, राज्य सरकार, गोवा क्रीडा प्राधिकरण, गोवा क्रिकेट संघटनेला प्रतिवादी करण्यात आले आहेत.
एप्रिल २००१ मध्ये झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्यावेळी तिकीट घोटाळा झाल्यानंतर भाजप सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती एम. एल.पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला होता. या आयोगाने या घोटाळ्यातील सर्व संशयित दोषी असल्याचे स्पष्ट करून त्यांना गोवा क्रिकेट संघटनेची पुन्हा निवडणूक लढवण्यास मज्जाव करावा, असे म्हटले होते. गोव्यात स्थापन झालेल्या कॉंग्रेस सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा आयोग फेटाळून लावण्यात आला होता. त्यावेळी क्रीडामंत्रीपदी दयानंद नार्वेकर होते, असा दावा याचिकादाराने आपल्या याचिकेत केला आहे.
एकदा विधानसभेत आयोगातील शिफारशींची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर ते मागे घेत येत नाही, असा दावाही याचिकादाराने आपल्या याचिकेत केला आहे. या याचिकेची दखल घेऊन गोवा खंडपीठाने सदर याचिका दाखल करून घेतली.

पत्रकारिता वस्तुस्थितीपासून दुरावलीय: पी. साईनाथ

मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी): जनसंपर्क व वस्तुस्थिती यामध्ये फार मोठी दरी निर्माण झालेली आहे. वृत्तपत्रे ही एकतर उद्योगपती किंवा राजकारणी यांच्या हाती जाण्याची सुरू झालेली प्रक्रिया याचे कारण आहे, भारतीय लोकशाहीचा तोच खरा धोका आहे, असे परखड विचार मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी आज येथे काढले. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित समारंभात "भारतीय पत्रकारितेतील बदलते स्वरूप' या विषयावर बीजभाषण करताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. वृत्तपत्रे हा शेवटी लोकमंच आहे याचा विसर पडू देऊ नका. लोकांच्या भावनांचे, आशा आकांक्षांचे प्रतिबिंब त्यात उमटायला हवे, त्या जागांवर कोणाचेही अतिक्रमण होता कामा नये, लोकहित हेच सर्वश्रेष्ठ राहिले पाहिजे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
माहिती खात्याने गोवा संपादक संघ, गोवा श्रमिक पत्रकार संघटना व गोवा छायाचित्र पत्रकार संघटना यांच्या सहकार्याने येथील रवींद्र भवनात आयोजित या समारंभाला व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, माहिती व प्रसिद्धी सचिव नरेंद्रकुमार, माहिती संचालक मिनीन पिरीस, गोवा सरकारचे वृत्तपत्र सल्लागार विष्णू सूर्या वाघ, संपादक संघाचे अध्यक्ष आश्र्विन तोंबट, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कामत, सरचिटणीस सुदेश आर्लेकर व छायाचित्रपत्रकार संघटनेचे अध्यक्ष बेर्नाबे सापेको उपस्थित होते.
आपल्या भाषणात साईनाथ यांनी स्वातंत्र्यपूर्वकालीन पत्रकारिता व आत्ताची पत्रकारिता यामधील फरक सविस्तरपणे मांडला. सध्याच्या पत्रकारितेत माहिती व तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे गुणांबरोबरच दोषही आले आहेत. पत्रकारितेचा एकंदर चेहरामोहराच बदलत असताना त्यात दुटप्पीपणा शिरल्याचेही त्यांनी नमूद केले. झपाट्याने बदलत असलेल्या या प्रक्रियेत पत्रकार संघटना देखील शिल्लक राहिलेल्या नाहीत, पत्रकारिता क्षेत्रात आता रुजत असलेली कंत्राटी पद्धत हा पत्रकारितेवर पडलेला सर्वांत मोठा घाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
काहींना पत्रकारिता हा व्यापार-उद्योग असल्याचे वाटते, ते तसा दावाही करतात. तथापि, त्यांचा तो दावा बिनबुडाचा आहे, असे मत ठामपणे मांडताना वृत्तपत्र हा उद्योग असेल, व्यापार असेल पण पत्रकारिता हा कसाच व्यापार-उद्योग असू शकत नाही, असे ते म्हणाले.
गेल्या १५-२० वर्षांत पत्रकार वस्तुस्थितीपासून दूर जाऊ लागले आहेत, असे स्पष्ट करताना साईनाथ यांनी सांगितले की, लोकशाहीसाठी ही धोकादायक बाब आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. अमुक प्रसिद्ध करा हे सांगण्याऐवजी अमुक प्रसिद्ध करू नका असे पत्रकारांना बजावणारी प्रवृत्ती वाढत आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता वस्तुस्थितीला पारखी होत आहे, हीच खरी चिंतेची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
हल्लीच्या काळात सामाजिक प्रश्र्नांपासून वृत्तपत्रे कशी दुरावत चालली आहेत, त्यात व्यापारावर कसा भर दिला जात आहे ते त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. या व्यापारीकरणाच्या जमान्यात शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार आदी क्षेत्रांकडे वृत्तपत्रे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. देशाची ७० टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात आहे पण तेथील समस्या अपवादात्मक स्थितीतच प्रसिद्ध होणे ही बाब खचितच भूषणावह नाही. वृत्तपत्र क्षेत्राचे झपाट्याने होत असलेले व्यापारीकरण हेच त्याचे कारण आहे, असे ते म्हणाले.
'पेड न्यूज' शरमेची बाब
हल्लीच्या निवडणुकांत प्रचलित झालेल्या व लोकशाहीसाठी सर्वांत चिंतेच्या ठरलेल्या "पेड न्यूज'चा प्रश्र्न त्यांनी आपल्या भाषणात हिरिरीने मांडला. ही पद्धत अशीच सुरू राहिली तर वृत्तपत्रीय विश्र्वासार्हताच संपुष्टात येईल, असा इशारा त्यांनी दिला. निवडणुकांत एखाद्या पक्षाला किंवा उमेदवाराला अनुकूल बातम्या प्रसिद्ध करणे व जाहिरातीप्रमाणे त्याची किंमत वसूल करणे ही प्रथा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब आदी राज्यांतील निवडणुकांत सुरू झालेली असून ती झपाट्याने पसरत चालली आहे. त्यातून शेकडो कोटींचा व्यवहार झालेला असून एकप्रकारे हा दुहेरी भ्रष्टाचार आहे कारण जाहिरातस्वरूप या बातम्यांबाबत कोणतीच पावती मिळत नाही. यामुळे उमेदवार ह खर्च आपल्या निवडणूक खर्चांतही दाखवू शकत नसल्याने निवडणूक आचारसंहितेच्या भंगात हे प्रकरण मोडते. यामुळे यासंदर्भात आता निवडणूक आयोगानेच कृती करणे आवश्यक ठरते, असे सांगून पत्रकारितेसाठी ही सर्वांत शरमेची बाब आहे, असे त्यांनी नमूद केले. हे प्रकरण सुमारे ४०० कोटींवर पोचलेले असून अप्रत्यक्षपणे तो संघटित खंडणीचाच प्रकार ठरतो, असे त्यांनी सांगितले.
वृत्तपत्र उद्योग हा आता बव्हंशी राजकारणी व धनदांडगे यांच्या हाती गेल्याचे व त्यामुळे यात अनेक अनिष्ट प्रवृत्ती शिरल्याचे त्यांनी सांगितले. राजकारण हा बिनभांडवली व अल्पावधीत कोट्यधीश होण्याचा मार्ग बनलेला आहे, असे सांगताना निवडणुकीत उभा राहून निवडून आलेला, मंत्री झालेला, केंद्रात मंत्री झालेला राजकारणी यांच्या संपत्तीत कशी शेकडो पटींनी वाढ होत जाते ते त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केले. लोकशाहीचा चौथा स्तंभ त्याविरुद्ध काहीच करू शकत नाही का? याबद्दल पी. साईनाथ यांनी खंत व्यक्त केली.
पत्रकारितेवर मोठी जबाबदारी
या बदललेल्या परिस्थितीत आपली विश्र्वासार्हता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी पत्रकारितेवर आल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी देशासमोरील ज्वलंत समस्येवर परखड टिप्पणी हवी आहे. ती करावयाची झाली तर समर्पित वृत्ती हवी, पण तीच कुठे दिसत नाही. जागतिक मंदीपूर्वी महाराष्ट्रात २० लाख लोकांना गमावाव्या लागलेल्या नोकऱ्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युनोविकास कार्यक्रमात भारताची झालेली पीछेहाट सारख्या प्रश्र्नांवर आवाज उठविण्यात पत्रकारिता का कमी पडली त्याचे विश्र्लेषण होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Monday, 16 November 2009

६८ जण बेपत्ता असल्याने अन्य खलाशीही धास्तावले!

खलाशांअभावी मच्छीमारी मंदावली

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) - समुद्रात "फियान' चक्रीवादळाचे पाहिलेले तांडव, बुडालेल्या बोटी आणि वादळाच्या पाचव्या दिवशीही ६८ खलाशी बेपत्ताच असल्याने अनेक खलाशी सध्या समुद्रात जाण्याच्या मनःस्थितीत नाहीत. आज पाचव्या दिवशीही अनेक जण मच्छीमारीसाठी समुद्रात जाण्यास ट्रॉलरवर चढले नाहीत. याचा परिणाम मच्छीमारीवर झाला आहे.
आपले सहकारी बेपत्ता असल्याने अन्य खलाशी अद्याप भीतीच्या छायेखाली असल्याचे मांडवी मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष मिनीन आफोन्सो यांनी सांगितले. मात्र, आज पहाटे १५ ट्रॉलर समुद्रात गेले तर, २५ ट्रॉलर उद्या किंवा परवा मच्छीमारीसाठी जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांनी दिली. चक्रीवादळ झाले त्यावेळी समुद्रात असलेल्या खलाशांनी प्रत्यक्ष या वादळाचा अनुभव घेतला आहे. जे या वादळाच्या तडाख्यातून वाचले आहेत, त्यांनी आपल्याच बोटीवरील आपले साथीदार बुडून दिसेनासे झाल्याचे पाहिले आहे. ती भीती त्यांच्या मनात अजुनीही घर करून आहे. त्यामुळे कोणीही बोटीवर जाण्यास तयार होत नाहीत आणि आम्हीही त्यासाठी हट्ट धरलेला नाही, असे आफोन्सो यांनी सांगितले.
वादळानंतर समुद्रात बेपत्ता झालेल्या खालाशांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले नाही. यातील अनेकांची वाचण्याची शक्यता आता कमीच दिसायला लागली आहे. जे देवगड किंवा मालवणच्या बंदरावर सुखरूप पोचले होते, त्यांच्याशी आमचा संपर्क झाला आहे. मात्र या ६८ जणांशी पाच दिवसानंतरही कोणताच संपर्क झालेला नाही, असे श्री. आफोन्सो यांनी सांगितले.
वादळानंतर सर्व वर्तमानपत्रातून आणि वृत्त वाहिनीवर मोठ्या प्रमाणात खलाशी बेपत्ता असल्याचे वृत्त सर्वत्र पसरल्याने कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यातील त्यांचे कुटुंबीयांनी गोव्यात धाव घेतली आहे. तर, जेटीवरील अनेक खलाशी घरी जाण्याचा मनःस्थितीत आहे. यातील बरेचसे खलाशी आपल्या गावात निघून गेले आहेत. त्यामुळे मच्छीमारीसाठी ट्रॉलर समुद्रात सोडणेही ट्रॉलरच्या मालकांना कठीण झाले आहे. सध्या मालिम जेटीवरील ट्रॉलरच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

स्थलांतरितांच्या सर्वेक्षणासाठी बेताळभाटी ग्रामसभेची समिती

मडगाव, दि.१५ (प्रतिनिधी) - बेताळभाटी पंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेत एकूण सारी चचार्‌र झाली ती पंचायतकक्षेत वाढलेल्या परप्रांतीयांच्या संख्या व समस्येवर व अखेर संपूर्ण पंचायत कक्षेचे सर्वेक्षण करून किती परप्रांतीयांचे वास्तव्य आहे ते शोधून काढण्यासाठी एक १४ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मायकल फर्नांडिस हे होते. पंचायत कक्षेत भाड्याने दिलेली घरे व त्यात राहणारे भाडेकरू, तेथील वातावरण, भाडेकरूंसाठी उपलब्ध केलेल्या मूलभूत सोयी या सर्वांची पाहणी करून सदर समितीला येत्या १३ डिसेंबरच्या ग्रामसभेपूर्वी तो पंचायतीस सादर करावा लागणार आहे.
पंचायत कक्षेतील बेकायदा बांधकामावरही सभेत खडाजंगी झाली व येत्या ग्रामसभेपूर्वीं तमाम बेकायदा बांधकामावर कारवाई केली जावी व अहवाल सादर करावा असा निर्णय आजच्या सभेने घेतला. पंचायत कक्षेत नोंद झालेले गुन्हे व पोलिस तपास यावरही चर्चा झाली.
मेगा प्रकल्पांचाही प्रश्र्न चर्चेस आला असता मेगा प्रकल्पांच्या फायली प्रथम ग्रामसभेत सादर करून मंजूर कराव्यात व नंतर पुढील सोपस्कार पार पाडावेत असा निर्णय सभेने घेतला. यावेळी सरपंच मायकल यांनी पंचायतीने अजून एकाही मेगा प्रकल्पाला वास्तव्याचा दाखला दिलेला नसल्याचे सांगितले.
सभेने बालहक्करक्षण कायद्यावर एक अभ्यास समिती स्थापन केली. ती समिती या कायद्याखालील गुन्ह्यांचा अभ्यास करील. ग्रामसभा चालू असताना अकस्मात वीज गेली व साधारण २० मिनिटे काळोखांतच काम चालले. यावेळी वीजमंत्र्यांच्या नावे गदारोळ माजविला तर काहींनी आगामी ग्रामसभेत वीजमंत्र्यांना पाचारण केले जावे अशी मागणी उपस्थितांनी केली. वीजमंत्र्यांनी अन्य भागात भूमिगत वीज केबल टाकल्या पण बेताळभाटी अजून त्यापासून वंचित असल्याने तेथे ही योजना राबवावी अशी मागणी सदस्यांनी केली.

कळंगुट येथे इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जखमी

पणजी व म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) - नाईकावाडो कळंगुट येथे आज दुपारी नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगार जखमी झाले. जखमींना त्वरित डॉ. धारवाडकर क्लिनिकमध्येे हलवण्यात आले. जखमीमध्ये अमोल राय (३०), जीतू राय (२४), संगप्पा नालबड (३०), शर्नम लक्ष्मण हाडपड (४०) व मनोज कुमार यांचा समावेश आहे. यातील किरकोळ जखमीना उपचार करून घरी पाठवण्यात आले. तर, गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेला जबाबदार धरून कंत्राटदार तन्मय खोलकर व सुपरव्हायझर उमेश गावस यांच्याविरोधात भा.दं.सं. ३३७ फौजदारी गुन्हा ३४ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रात्री उशिरा दोघांनाही अटक करून वैयक्तिक हमीवर सुटका केली असल्याची माहिती कळंगुट पोलिसांनी दिली. पालासो प्रॉपर्टीज प्रा. लिमिटेडतर्फे हे बांधकाम केले जात होते, अशी माहिती मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार आज सकाळपासून नाईकावाडो येथील सर्व्हे क्रमांक १४५/२मध्ये रिता स्टुडिओ आणि बी एल के अर्पाटमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील मागच्या बाजूला स्लॅब घालताना ही दुर्घटना घडली. यात स्लॅब घालण्याचे काम करणारे कामगार जखमी झाले. घटनेनंतर स्लॅब घालण्याच्या कामाला किती कामगार लागले होते, याची अधिकृत माहिती दिली जात नव्हती. सायंकाळी उशिरापर्यंत पडलेला स्लॅब काढण्याचे काम सुरू होते. याविषयीची अधिक तपास कळंगुट पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिष गावस करीत आहेत.

मुलायमसिंग विश्वासघातकी

कल्याणसिंग यांचे टीकास्त्र
राजबीरचा सपाचा राजीनामा

लखनौ, दि. १५ - मुलायमसिंग यादव यांच्याकडून मानहानी झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांचे डोळे आता उघडले आहेत. मुलायमसिंग हे "विश्वासघातकी' आहेत, असे सांगून कल्याणसिंग यांनी भाजपत परतण्याचे संकेत दिले आहेत तसेच कल्याणसिंग यांचा मुलगा राजबीरसिंगने समाजवादी पार्टीचा राजीनामा दिला आहे.
""मुलायमसिंग हे विश्वासघातकी आहेत. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोेटनिवडणुकीत झालेला सपाचा दारुण पराभव पचविण्याचीही ताकद त्यांच्यात नाही. पराभवाचे खापर त्यांनी माझ्या माथी फोडले आहे. माझ्या जीवनात मी अनेक चुका केल्या आहेत. मुलायमसिंग यांच्याशी दोस्ती स्वीकारणे ही त्यातीलच एक मोठी चूक आहे,'' असे कल्याणसिंग म्हणाले. काल मुलायमसिंग यांनी कल्याणसिंग कधीच सपात नव्हते व पुढेही राहणार नाहीत असे घोषित केल्यानंतर कल्याणसिंग आज येथे पत्रकारांशी बोलत होते.
आता आपल्या पुढील योजना काय, आपण पुन्हा भाजपात जाणार का असे विचारले असता कल्याण सिंग उत्तरले की, सर्व पर्याय खुले आहेत. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, मी संघाचा स्वयंसेवक होतो व आताही आहे.
मुलायमसिंग व सपाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी दिल्ली व लखनौ या दोन्ही ठिकाणी माझी भेट घेऊन आपण सपात यावे अशी विनंती केली; परंतु त्यांचा हा प्रस्ताव मी अमान्य केला असा दावा कल्याणसिंग यांनी केला.
नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीत सपाचा जो पराभव झाला त्यासाठी मुलायमसिंग यांनी माझ्यावर खापर फोडले आहे. कल्याणसिंगांमुळेच मुस्लिम मतदार सपापासून दूर गेले असा दावा मुलायमसिंग यांनी केला आहे. परंतु त्यांना मी विचारू इच्छितो की, मग ४० टक्के मतदारांनी फिरोझाबादमध्ये सपाला का मते दिली नाहीत. त्याचबरोबर इतर मागासवर्गीय, ब्राम्हण, ठाकूर, निषाद व इतर जातीच्या लोकांनीही सपाला का मतदान केले नाही. मुलायमसिंग हे ना हिंदूंचे आहेत ना मुसलमानांचे, ना मागासवर्गीयांचे; ते केवळ मतलबी आहेत. स्वार्थ साधण्यासाठी ते कोणालाही धोका देऊ शकतात, असे कल्याणसिंग यांनी सांगितले. आपला पराभव का झाला हे मुलायमसिंग यांनी आत्मचिंतानाद्वारे जाणून घ्यावे.
कल्याणसिंग पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजबीरही होता. यावेळी बोलताना राजबीरने आरोप केला की, मुलायमसिंग यांनी माझ्या वडिलांच्या भावना दुखावल्या आहेत. कालच्या त्यांच्या वक्तव्याने आपण फार दुखावलो गेलो. माझ्या वडिलांवर त्यांनी ज्याप्रकारे आरोप केले त्यामुळे आपण व्यथित झालो व ज्या पक्षात माझ्या वडिलांचा तसेच कार्यकर्त्यांचा अपमान होत असेल त्या पक्षात राहण्यात काहीच अर्थ नाही, सबब मी सपाचा राजीनामा देणेच उचित समजलो.
भाजपाला दुर्बल करण्यासाठी मुलायमसिंग यांनी माझे सहकार्य घेतले. परंतु आता मला याचा पश्चाताप होत आहे, असे कल्याणसिंग म्हणाले. भाजपात परतण्यासंदर्भात विचारले असता त्यावर थेट उत्तर न देता सांगितले की, पर्याय खुले आहेत. मी भाजपात जाईन वा न जाईन परंतु भाजपा मजबूत करण्यासाठी काम करत राहीन.

राहुल भटला "क्लीन चिट' नाही

नवी दिल्ली,दि. १५ - भारतावर हल्ला करण्याची योजना बाळगून असणारा अमेरिकी अतिरेकी डेव्हिड हेडलीची चौकशी सुरूच असून त्या प्रकरणी कोणालाही, अगदी राहुल भटलाही क्लीन चिट देण्यात आलेली नाही, असा खुलासा केंद्रीय गृहसचिव जी.के.पिल्लई यांनी केला आहे.
पिल्लई म्हणाले की, हेडलीविषयी चौकशी सुरूच आहे. त्याने भारताविरुद्धच्या कारस्थानांची कबुली देणे ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी सुरूच आहे. जोवर ही चौकशी पूर्ण होत नाही तोवर या प्रकरणी संशयित असणाऱ्या कोणालाही क्लीन चिट दिली जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून डेव्हिड हेडलीला अमेरिकेच्या एफबीआयने मागील महिन्यात अटक केली होती. गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरदरम्यान तो भारतातच होता आणि हल्ल्याच्या पाच दिवस आधी मुंबईतही आला होता, हे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याचे या हल्ल्याशी असणाऱ्या संबंधाचे धागे शोधण्याचे काम सध्या पोलिस करीत आहेत.
ही चौकशी सुरू असतानाच महेश भट्ट यांचा मुलगा राहुल आणि हेडलीचे संबंध असल्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. भारतातून लष्कर-ए-तोयबाशी संपर्क साधताना आपल्या ई-मेलमध्ये हेडलीने "राहुल' या कोडवर्डचा वापर केला होता. तो राहुल मीच असल्याची कबुली स्वत: राहुल भट्टने दिली आहे. त्यामुळे त्याच्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, राहुलने आपली बाजू स्वत:च स्पष्ट केली. ब्रीच कॅण्डीच्या जिममध्ये आपली हेडलीशी ओळख झाल्याचे त्याने सांगितले होते. पण, तो तोयबा किंवा अन्य अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याची आपल्याला कल्पना नव्हती, असेही स्पष्ट केले. त्याच्या सत्यतेविषयी खात्री पटल्याने पोलिसांनी त्याला क्लीन चिट दिल्याची चर्चा होती. पण, या वृत्ताचा पिल्लई यांनी इन्कार केला आहे.