Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 27 September, 2008

विद्यापीठ विद्यार्थी मंडळ अचानकपणे रद्दबातल

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाची निवडणूक नुकतीच झाली, निकाल झाला, विजयोत्सवही साजरा करण्यात आला. मात्र आज अचानकपणे निवडणूक प्रक्रियाच बेकायदा ठरवून लोकशाही पद्धतीने विजयी झालेले भाजपप्रणीत विद्यार्थी मंडळच विद्यापीठाने रद्दबातल ठरवले. त्याचबरोबर विद्यापीठ विद्यार्थी मंडळाचे संचालक डॉ. बाळकृष्ण कानोळकर यांना मंडळाच्या संचालक पदावरून हटवण्यात आल्याचा आदेश सायंकाळी उशिरा जारी झाला. विद्यापीठाची ही कृती म्हणजे सरकारच्या राजकीय हस्तक्षेपाचा कळस असल्याचा आरोप भाजपप्रणीत विद्यार्थी विभागाने केला आहे. तसेच आंदोलनाद्वारे या निर्णयाला कडाडून विरोध केला जाईलच आणि वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याचा झणझणीत इशाराही भाजपप्रणीत विद्यार्थी विभागाने दिला आहे.
"आपण विद्यापीठातील वरिष्ठांकडून मान्यता घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचललेले नाही' असे डॉ. कानोळकर यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले.
मंडळाच्या संचालकांनी नियमानुसार निवडणूक घेतली नसल्याचे चौकशीत आढळून आले. त्यामुळे मंडळ रद्द ठरवून निवडणूक नव्याने घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मात्र विद्यापीठाच्या या कृतीमुळे विद्यार्थी विभागात कमालीचा असंतोष पसरलेला आहे. सदर मंडळाची निवडणूक नव्याने घेतली जाणार असून लगेच तारीख जाहीर केली जाणार असल्याचेही विद्यापीठाने म्हटले आहे.
२३ सप्टेंबर रोजी कॉंग्रेस पक्षाच्या विद्यार्थी विभागातर्फे सादर झालेली उमेदवारीचे अर्ज वेळेनंतर सादर झाल्याने आणि त्यातील काही अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी भरले आहेत, हे स्पष्ट होत नसल्याने विद्यापीठाने ते २४ रोजी फेटाळून लावले होते. दि. २३ रोजी कॉंग्रेस विद्यार्थी विभागाचे अर्ज उशिरा दाखल झाल्याने विरोधी गटाने त्यास आक्षेप घेऊन तक्रार दाखल केली होती. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवशी कॉंग्रेसप्रणित विद्यार्थी विभागाने विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहिले होते. या सर्व तक्रारींवर दि. २३ रोजी रात्री उशिरापर्यंत कुलसचिवांच्या दालनात चर्चा सुरू होती. त्यावेळी तेथे मंडळाचे माजी संचालक रामदास करमली, प्रा. एन. एस. भट व कुलसचिव तसेच डॉ. कानोळकर उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २४ रोजी दोन्ही विभागाच्या प्रमुखांना बोलावून अर्जांची छाननी करा आणि पुढचा निर्णय घ्या, असे आदेश कुलसचिव डॉ. सांगोडकर यांनी मंडळाचे अध्यक्ष डॉ. कानोळकर यांना दिले होते, अशी माहिती डॉ. कानोळकर यांनी दिली. त्यानुसारच त्यादिवशी अर्जाची चाचणी करून पुढील निवडणूक घेतलेली आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर २५ सप्टेंबर रोजी झालेली निवडणूक विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी समीर मांद्रेकर हे व त्यासह त्यांचे सर्वच उमेदवार या निवडणूक विजयी झाले होते.
भाजयुमो विद्यार्थी विभाग
कॉंग्रेस राजवटीत भाजयुमो विद्यार्थी विभागाचा झालेला दणदणीत विजय कॉंग्रेस पक्ष पचवू शकले नसल्यानेच कॉंग्रेसने अशा प्रकारेच घाणेरडे राजकारण करण्यास सुरुवात केली असल्याचा जोरदार आरोप आज सायंकाळी विद्यार्थी विभागाचे सहनिमंत्रक सिद्धेश नाईक यांनी केला. तसेच या "आम आदमी'च्या सरकारने विद्यार्थ्यांच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू नये, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही श्री. नाईक यांनी दिली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत शिरलेल्या पक्षीय राजकारणाचा "अभाविप'ने निषेध केला आहे. लोकशाही पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका रद्द ठरवण्याचा घाट विद्यापीठाने घातल्याचा आरोप अभाविपचे सहमंत्री रोहन मयेकर यांनी केला.
"हे घाणेरडे राजकारण'
या निवडणुकीच्या कामकाजात सरकारकडून झालेला हस्तक्षेप हे घाणेरडे राजकारण असून विद्यापीठाने त्यास बळी पडणे हे तर त्याहून दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.

धारवाड पूल उडवण्याचा अतिरेक्यांचा कट उजेडात

सापडलेले पाच बॉंब पोलिसांकडून निकामी
धारवाड, दि. २६ - धारवाड जिल्ह्यातील सिंगनहळ्ळी पुलाजवळ एकूण पाच बॉंब सापडल्याने कर्नाटकात खळबळ माजली आहे. हा पूल उडवण्याचा व या भागात भीतीचे वातावरण पसरविण्याचा अतिरेक्यांचा कट असावा, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हे बॉंब निकामी केले. हा भाग बेळगाव तसेच गोव्याला जवळ असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामागे "सिमी'चा हात असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सापडलेल्या बॉम्बपैकी एकाला सिलिंडर जोडण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. सुमारे ५०० मीटर लांबीची तार जोडल्याचे दिसून आले. अन्य बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेट वापरण्यात आले असावे असा अंदाज आहे. हे बॉम्ब सेलफोनने उडविण्याचा बेत होता, अशी माहिती उजेडात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा पूल कॅसलरॉकपासून जवळ असून, याच भागात अतिरेक्यांनी देशातील काही भागांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला होता. या कटात "सिमी'चा हात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
गोव्यात केंद्रीय राखीव दल दाखल
दरम्यान, आज धारवाडमध्ये सापडलेले ५ जिवंत बॉंब व त्यातील एकाचा वापर गोवा- कारवार दरम्यानचा संपर्क खंडित करण्यासाठी आखला गेलेला बेत या पार्श्र्वभूमीवर केंद्रीय राखीव दलाची एक प्लॅटून आज (शुक्रवारी) मडगावात दाखल झाली असून ती दक्षिण गोव्यातच तैनात केली जाणार आहे. धारवाडमध्ये सापडलेले पाचही बॉंब हे टाईमबॅंाब व जिवंत स्थितीत सापडले आहेत. उपलब्ध माहितीनुसार त्यातील एकाचा वापर गोवा व कारवार दरम्यानचा रस्ता संपर्क तोडण्यासाठी केला जाणार होता. तेथील संपूर्ण पोलिस यंत्रणाच या माहितीने हादरली असून त्यांनी गोवा पोलिसांना या संदर्भात कमालीचे सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गोवा-कर्नाटक दरम्यानच्या सीमेवरील तपासणी कडक करण्यात आली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केंद्राकडे केलेल्या मागणीनुसार केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक प्लॅटून सायंकाळी दाखल झाली. आगामी सण व उत्सव काळातील बंदोबस्तासाठी हे दल मागितलेले असले तरी तूर्त ते दहशतवादविरोधी उपाययोजनेसाठी वापरले जाईल. मडगाव शहर व मडगाव रेल्वे स्टेशन येथे हे दल तैनात केले जाणार आहे.

धारवाड पूल उडवण्याचा अतिरेक्यांचा कट उजेडात

सापडलेले पाच बॉंब पोलिसांकडून निकामी
धारवाड, दि. २६ - धारवाड जिल्ह्यातील सिंगनहळ्ळी पुलाजवळ एकूण पाच बॉंब सापडल्याने कर्नाटकात खळबळ माजली आहे. हा पूल उडवण्याचा व या भागात भीतीचे वातावरण पसरविण्याचा अतिरेक्यांचा कट असावा, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी हे बॉंब निकामी केले. हा भाग बेळगाव तसेच गोव्याला जवळ असल्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे. यामागे "सिमी'चा हात असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सापडलेल्या बॉम्बपैकी एकाला सिलिंडर जोडण्यात आल्याचे पोलिसांना आढळून आले. सुमारे ५०० मीटर लांबीची तार जोडल्याचे दिसून आले. अन्य बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेट वापरण्यात आले असावे असा अंदाज आहे. हे बॉम्ब सेलफोनने उडविण्याचा बेत होता, अशी माहिती उजेडात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हा पूल कॅसलरॉकपासून जवळ असून, याच भागात अतिरेक्यांनी देशातील काही भागांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट रचला होता. या कटात "सिमी'चा हात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
गोव्यात केंद्रीय राखीव दल दाखल
दरम्यान, आज धारवाडमध्ये सापडलेले ५ जिवंत बॉंब व त्यातील एकाचा वापर गोवा- कारवार दरम्यानचा संपर्क खंडित करण्यासाठी आखला गेलेला बेत या पार्श्र्वभूमीवर केंद्रीय राखीव दलाची एक प्लॅटून आज (शुक्रवारी) मडगावात दाखल झाली असून ती दक्षिण गोव्यातच तैनात केली जाणार आहे. धारवाडमध्ये सापडलेले पाचही बॉंब हे टाईमबॅंाब व जिवंत स्थितीत सापडले आहेत. उपलब्ध माहितीनुसार त्यातील एकाचा वापर गोवा व कारवार दरम्यानचा रस्ता संपर्क तोडण्यासाठी केला जाणार होता. तेथील संपूर्ण पोलिस यंत्रणाच या माहितीने हादरली असून त्यांनी गोवा पोलिसांना या संदर्भात कमालीचे सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच गोवा-कर्नाटक दरम्यानच्या सीमेवरील तपासणी कडक करण्यात आली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केंद्राकडे केलेल्या मागणीनुसार केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक प्लॅटून सायंकाळी दाखल झाली. आगामी सण व उत्सव काळातील बंदोबस्तासाठी हे दल मागितलेले असले तरी तूर्त ते दहशतवादविरोधी उपाययोजनेसाठी वापरले जाईल. मडगाव शहर व मडगाव रेल्वे स्टेशन येथे हे दल तैनात केले जाणार आहे.

भामट्यांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

माशेल चोरीचा छडा शक्य
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - माशेल येथे गेल्या बुधवारी दिवसाढवळ्या सराफाच्या दुकानावर दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेल्या टोळीचा म्होरक्या मानसीयो डायस (मेरशी) व सायरन रॉड्रिगीस (चिंबल) यांना फोंडा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक दीपक पेडणेकर यांनी आज पहाटे मुंबई येथे आपल्या पथकासह छापा टाकून अटक केली. मानसीयो याला इस्पितळातून ताब्यात घेण्यात आले तर, सायरन याला मालाड येथील एका गल्लीत आपल्या प्रेयसीबरोबर असताना अटक केली. या टोळीचे अन्य साथीदार नरेश (म्हापसा), डॉमनिक (चिंचणी) व पप्पू (ताळगाव) हे फरार झाले. ही टोळी हाती लागल्याने गेल्या काही महिन्यांपासून वाहने अडवून लूटमार झालेल्या गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता निर्माण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी माशेल येथे या टोळीने सराफाचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सराफाच्या धाडसामुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरवा होता. त्यावेळी दुकानातून पळून जात असताना मानसीयो याच्या हाताला दरवाजाची फुटलेली काच लागल्याने त्याच्या हाताची नस कापली होती. त्या स्थितीत या टोळीतील भामटे "गेट्स' या खाजगी वाहनाने गोव्याच्या सीमा ओलांडून मुंबई फरार झाले होते. मुंबई येथील एका इस्पितळात मानसीयो याच्या हातावर शस्रक्रिया करण्यात आली असून फोंडा पोलिस त्याला घेऊन गोव्याकडे येण्यास रवाना झाले आहे.
उपनिरीक्षक पेडणेकर याच्या मार्गदर्शनाखाली घातलेल्या छाप्यात फोंडा पोलिस स्थानकाचे हनुमंत बोरकर, विजेश नाईक, मोहन हळर्णकर, सत्यजीत पेडणेकर व जुने गोवे पोलिस स्थानकाचा नितीन गावकर यांनी सहभाग घेतला.

सहाव्या वेतन आयोगाच्या कार्यवाहीमुळे आर्थिक नियोजनाचे तीनतेरा - पर्रीकर

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या आर्थिक नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. या परिस्थितीत सहाव्या वेतन आयोगाच्या कार्यवाहीमुळे राज्यावर भीषण आर्थिक आपत्ती ओढवण्याची शक्यता असून हे सरकार गोव्याला कर्जाच्या खाईत लोटत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी केला.
आज पणजी येथे भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत पर्रीकर बोलत होते. भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यावेळी उपस्थित होते. भाजप विधिमंडळ गटाची बैठक आज पर्वरी येथे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या दालनात झाली. यावेळी सहाव्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींत कोणताही बदल न करता किंवा त्यात फेरफार न करता केंद्र सरकारने लागू केल्याप्रमाणे तो जशास तसा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करावा असा ठराव संमत करण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करणे क्रमप्राप्त आहे; परंतु त्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज होती. या आयोगाच्या अंमलबजावणीबाबत एवढे दिवस झोपी गेलेले सरकार आता पैसा कसा उभारावा यासाठी म्हणे आर्थिक सल्लागार नेमणार आहे,असा टोला हाणून सरकारी कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू केल्यावर सरकारवर आर्थिक बोजा पडेल,असा जो आव मुख्यमंत्री आणत आहेत त्याला सर्वस्वी ते स्वतः व त्यांचे सहकारी जबाबदार असल्याची घणाघाती टीका पर्रीकर यांनी केली.
कॉंग्रेसच्या गेल्या तीन वर्षांच्या राजवटीत केवळ राजकीय व आर्थिक स्वार्थापोटी बेबंद नोकर भरती करण्यात आली. एकीकडे निवृत्तीवय वाढवून दुसरीकडे प्रमाणाबाहेर नोकर भरती करून या सरकारने तिजोरीवर वर्षाकाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा टाकला आहे अशी टीकाही पर्रीकर यांनी केली.
विविध सरकारी कर्मचाऱ्यांचा आकडा सुमारे ५८ हजारांच्या घरात पोहचल्याने सरकारचे कंबरडे मोडण्याचीच जास्त शक्यता आहे. आतापर्यंत केवळ खोटारडेपणा करून जनतेची दिशाभूल करण्यातच धन्यता मानणारे हे सरकार हा पैसा कसा उभारणार हे सांगण्यास राजी नसल्याचे पर्रीकर म्हणाले.
सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी कर्ज घेणार नाही असे मुख्यमंत्री सांगतात; परंतु उद्या विकासकामांसाठी कर्ज घेणे भाग पडणार आहे. अन्यथा राज्याचा विकासच खुंटेल, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. या आयोगाचा निवृत्तिवेतनावरील बोजाही सुमारे ३२ कोटी रुपयांनी वाढणार आहे.महागाईमुळे सरकारी उत्पन्नात झालेली वाढ ही सरकारची प्रगती असा आभास निर्माण करणे हा मूर्खपणाच असल्याचेही पर्रीकर म्हणाले.
सरकारने विविध ठिकाणी जमीन विक्रीचे जाहीर केलेल्या दरांमुळे उत्पन्न वाढले असे सांगितले जात असले तरी उद्या सरकारकडून भूसंपादन करतानाही हे दर लागू होणार असल्याने त्याचा उलट परिणाम सरकारच्या खर्चावरही होणार आहे,हे ध्यानी घेणे गरजेचे आहे.मोपा विमानतळासाठी भूसंपादन करतानाच याचा अनुभव सरकारला येणार आहे,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गोव्याचा आर्थिक कणा समजला जाणारा पर्यटन व खाण व्यवसायाला मंदी आल्याने त्याचा परिणाम गोव्याच्या आर्थिक स्थितीवर होणार असल्याचेही पर्रीकर म्हणाले.
ब्राडबॅंड हा घोटाळाच
ब्रॉडबॅंड सेवा हा घोटाळा असल्याचा आपण यापूर्वीच सांगितले होते ते आता उघड झाले आहे. सध्याच्या कराराप्रमाणे ही योजना जशास तशी लागू झाली तर सरकारला येत्या दहा वर्षांसाठी सुमारे ४६६ कोटी रुपये कंपनीला द्यावे लागतील. गोव्याला ही सेवा गरजेची आहे यात वादच नाही. मात्र त्यासाठी कोणत्या पद्धतीने पैसा खर्चावा यास मर्यादा हवी. या घोटाळ्याला तत्कालीन माहिती तंत्रज्ञानमंत्री दयानंद नार्वेकर जबाबदार असल्याचा पुनर्उच्चारही पर्रीकर यांनी केला.

बलात्कार प्रकरणी नराधमास जन्मठेप

पणजी, दि. २६ (प्रतिनिधी)- आपल्याच अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्षे बलात्कार केल्याप्रकरणी आज बाल न्यायालयाने दोषी आरोपीला जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास त्याच्या कारावासात ३ वर्षांनी वाढ केली जावी आणि दंडाची रक्कम जमा झाल्यास त्यातील पन्नास हजार रुपये पीडित मुलीच्या व पन्नास हजार रुपये पिडीत मुलीने जन्म दिलेल्या मुलीच्या नावे बॅंकेत जमा करावेत, असे आदेशात म्हटले आहे. आरोपीने कुटुंबव्यवस्थेस काळिमा फासणारे कृत्य केले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा देणे योग्य असल्याचे निकालपत्रात म्हटले आहे. ३ ऑक्टोबर ०७ रोजी पीडित मुलीने एका मुलीला जन्म दिला होता.
१५ सप्टेंबर रोजी बाल न्यायालयाने त्या नराधमाला या प्रकरणात दोषी ठरवले होते. ५ ऑगस्ट ०७ रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याबाबतची तक्रार मायणा कुडतरी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. २००५ आरोपीची पत्नी त्याला सोडून गेल्याने तो आपल्या मुलीबरोबर राहत होता. मटका घेण्याचा काम करणारा हा नराधम रात्री भरपूर झोकून येऊन आपल्यावर अत्याचार करत होता, अशी जबानी त्या मुलीने न्यायालयात दिली. मायणा कुडतरी पोलिस स्थानकात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास मायणा कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक एच. मडकईकर यांनी केला होता. पीडित मुलीच्या वतीने सरकारी वकील पौर्णिमा भरणे यांनी बाजू मांडली.

भ्रष्टाचारात गोवा अव्वल!

"ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल'चे सर्वेक्षण
पणजी, दि. २६ (प्रतिनिधी) - "इंडिया टूडे' व "आयबीएन७' या प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्वेक्षणाअंती गोवा हे अग्रेसर राज्य असल्याचे ढोल पिटले जात असतानाच देशात गोव्यामध्येच भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे "बीमारू राज्ये' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिहार व उत्तर प्रदेशचा समावेश याच गटात करण्यात आला आहे.
"ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया' आणि "सेंटर फॉर मीडिया स्टडिज' या दिल्लीस्थित संस्थांनी संयुक्तरीत्या हाती घेतलेला आपला तिसरा वार्षिक भ्रष्टाचार सर्वेक्षण अहवाल २००७ - २००८ परवाच प्रसिद्ध केला आहे. त्यांनी केलेल्या गटवार सर्वेक्षणातील अखेरच्या चौथ्या गटात "अलार्मिंग करप्शन' अर्थात कमालीचे भ्रष्टाचारी राज्य या गटात बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बरोबरीने गोवा राज्याचा समावेश झाला आहे. गोव्यात प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराबाबत आतापर्यंत केवळ बोलले जात होते; परंतु हा भ्रष्टाचार धोकादायक स्थितीत पोहचल्याचे या सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणाचा निकाल हा केवळ एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने या माहितीला व्यापक प्रसिद्धी मिळू शकली नाही. नोव्हेंबर २००७ ते जानेवारी २००८ या काळात देशातील दारिद्र्यरेषेखालील २२,७२८ कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन ही माहिती गोळा करण्यात आली. २८ राज्ये आणि चंदीगढ, पॉंडिचेरी व दिल्ली येथे हे सर्वेक्षण करण्यात आले. पोलिस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, वीज, जलपुरवठा, वन, गृहनिर्माण, मुद्रांक नोंदणी, शिक्षण, सार्वजनिक अन्न वितरण सेवा (रेशन), ग्रामीण रोजगार निर्मिती, बॅंकिंग आदी विविध क्षेत्रांत शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचवल्या जातात की नाही, याबद्दल या सर्वेक्षणात प्रश्नावली विचारण्यात आली होती. या सर्वेक्षणाअंती मिळालेल्या माहितीनुसार भारतातील सर्वांत भ्रष्ट खाते हा "बहुमान' पोलिस खात्याने पटकावला आहे.
भ्रष्टाचाराच्या कमी अधिक प्रमाणावरून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना चार गटात विभागण्यात आले. "मॉडरेट करप्शन' म्हणजे माफक भ्रष्टाचार या गटात दहा राज्ये व चंडीगढ यांचा समावेश होतो. या राज्यांत महाराष्ट्रही आहे. दुसरा गट "हाय करप्शन' म्हणजे अधिक भ्रष्टाचार यात सात राज्ये असून त्यात दिल्ली व गुजरात आदी राज्यांचा समावेश आहे. तिसरा गट "व्हेरी हाय करप्शन' असा असून त्यात पाच राज्यांचा समावेश असून कर्नाटकचा समावेश या गटात झाला आहे. अखेरचा चौथा गट "अलार्मिंग करप्शन' म्हणजे धोकादर्शक वा भयंकर भ्रष्टाचार माजलेले राज्य असा होता. या गटात बोकाळलेला भ्रष्टाचार हा अर्थात सुधारण्याच्या पलीकडे गेलेला असून इथे भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचेच या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. या गटात बिहार आणि उत्तर प्रदेशच्या जोडीस गोवा विराजमान झाला आहे. दरम्यान, गोव्यातील विविध सरकारी खात्यांत बोकाळलेला भ्रष्टाचार भीषण बनला असून विविध कामांसाठी पैसे चारणे किंवा हात ओले करणे ही जणू पद्धतच बनली असल्याचे या सर्वेक्षणाद्वारे उघड झाले आहे.
दरम्यान, "इंडिया टूडे' "आयबीन ७' या दोन्ही प्रसारमाध्यमे कंपनींनी केलेल्या सर्वेक्षणात गोवा एक अग्रेसर राज्य असल्याचा निकाल जाहीर झाला असला तरी हे अग्रेसर राज्य बनवण्यासाठी विविध विकासकामांत किंवा इतर सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा फर्दाफाश "ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया' आणि "सेंटर फॉर मिडिया स्टडिज' या संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे झाला आहे.

Friday, 26 September, 2008

नरेंद्र मोदी यांना 'क्लीन चिट'

गुजरात दंगल
"साबरमती'तील अग्निकांड पूर्वनियोजित
रझ्झाक व सईद पानवालाने रचला अग्निकांडाचा कट
नानावटी आयोगाचा अहवाल विधानसभेत सादर

नवी दिल्ली, दि.२५ : गुजरातमधील २००२ सालच्या दंगलीची चौकशी करणाऱ्या नानावटी आयोगाचा अहवाल राज्य विधानसभेत आज ठेवण्यात आला. या अहवालात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. ""गोधरा येथे घडलेले अग्निकांड पूर्वनियोजित होते. या अग्निकांडानंतर गुजरातमध्ये अनेक ठिकाणी दंगली उसळल्या होत्या. मात्र, या दंगलींमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा कोणताही सहभाग नव्हता,''असे नानावटी आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. नानावटी आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडताच मोदींना क्लीन चिट मिळताच कॉंग्रेसने सभागृहातून सभात्याग केला. गुजरात दंगलींवर न्यायमूर्ती नानावटी यांच्या नेतृत्वातील दोन सदस्यीय चौकशी आयोगाने सादर केलेला हा पहिला भाग होता.
""गोधरा येथे २००२ साली साबरमती एक्सप्रेसला लागलेली आग हा पूर्वनियोजित कट होता. गोधरामधून जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेसमध्ये आग लावण्याचा कट रझ्झाक आणि सईद पानवाला यांनी रचला होता. या दोघांनीच साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यासाठी १४० लिटर पेट्रोल खरेदी केले होते. पूर्वनियोजित कटांतर्गत साबरमती एक्सप्रेसला आग लावण्याच्या अवघ्या २० मिनिटांपूर्वीच गोधरा स्थानकापूर्वी समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केली होती,''असेही नानावटी आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. साबरमती एक्सप्रेसला लावलेल्या आगीमध्ये ५९ रामसेवकांचा भाजून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगलीचे लोण पसरले होते. या दंगलींमध्ये अनेक लोकांचा प्राण गेला होता व कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचेही नुकसान झाले होते. गुजरात दंगलीच्या प्रकरणी जवळपास १ हजार लोकांच्या साक्षी घेतल्यानंतर व या संपूर्ण प्रकरणाची बारकाईने चौकशी केल्यानंतर मुख्यमंत्री मोदी यांचा या दंगलीमध्ये कोणताही सहभाग नसल्याचे नानावटी आयोगाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
""गुजरात दंगली भडकावण्यामागे मुख्यमंत्री मोदी वा त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा सहभाग नव्हता. उसळलेल्या दंगली गोधरा कांडाची संतप्त प्रतिक्रिया होती. या दंगली चिघळण्यात गुजरात पोलिसांचीही कोणतीही भूमिका नव्हती. साक्षी घेताना नानावटी आयोगाकडे जवळपास ८० हजार शपथपत्र दाखल झाले होते. यामध्ये सर्वांनी आपापली बाजू मांडली होती.

बागा समुद्रामध्ये ३ विद्यार्थी बुडाले दोघांचे मृतदेह मिळाले

म्हापसा, दि. २५ (प्रतिनिधी): गेल्या दोन दिवसांपासून कळंगुट-बागा समुद्रात तिघे विद्यार्थी बुडाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह हाती लागले असून अन्य एकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
वेर्णा येथील इंजिनीअरींग कॉलेजचे सहा विद्यार्थी आज कॉलेजला सुट्टी असल्याने बागा येथे समुद्रस्नानासाठी दुपारी एकच्या सुमारास उतरले होते. त्यातील विवेकानंद साळगावकर हा वीस वर्षीय विद्यार्थी गटांगळ्या खाऊ लागला. त्याने मदतीसाठी हाका मारण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याला किनाऱ्यावरील कोणीही वाचवू शकले नाहीत. त्याचा शोध सुरू आहे. तो सां जुझे द आरियाल (कुडतरी) येथील रहिवासी आहे. सध्या पर्यटक येण्यास सुरुवात झाल्याने गोव्यातील बहुतांश किनारे गजबजू लागले आहेत. मात्र त्याचबरोबर पुरेशी दक्षता न घेतल्यामुळे समुद्रात बुडून मरणाऱ्यांची संख्यादेखील वाढत चालली आहे.
तमीळनाडूतील कोईम्बतूर येथील इंजिनीअरींग कॉलेजच्या चाळीस विद्यार्थ्यांचा गट सहलीसाठी २३ सप्टेंबर रोजी गोव्यात आला होता. त्यातील काहीजण समुद्रस्नानासाठी बागा किनाऱ्यावर उतरले असता त्यातील अनिशकुमार व पी. अरूण बालाजी पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना सागराच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यापैकी अनिशकुमार याचा मृतदेह त्याच दिवशी सापडला. तसेच पी. अरूण बालाजी (वय २०) याचा मृतदेह आज (गुरुवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास बागा किनाऱ्यावर आढळून आला.

इंडियन मुजाहिदीनची अडवाणी यांना धमकी


नवी दिल्ली, दि.१५ : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांची २८ सप्टेंबर रोजी गुवाहाटी येथे रॅली होईल, त्यावेळी त्याठिकाणी घातपात करू, अशी धमकी इंडियन मुजाहिदीन या संघटनेने दिली आहे. धमकीचा ई मेल मेघालयची राजधानी शिलॉंग येथून आला आहे.
ई मेलमध्ये आणखी काही मजकूर आहे काय, याची माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, धमकीचा ई मेल आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांच्या सुरक्षेत वाढ केली जावी आणि गुवाहाटी येथे ज्याठिकाणी सभा होणार आहे, त्या ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे.
भारतात लोकशाही आहे आणि सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे अडवाणी यांची सभा होईलच आणि सुरक्षेची जबाबदारी सरकारची राहील, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.

वेतन आयोग तत्त्वतः लागू : सरकारी कर्मचाऱ्याचा किमान पगार ९९८४ रु.

- नोव्हेंबर २००८ पासून शिफारशी लागू होणार
- सप्टेंबर व ऑक्टोबरची थकबाकी रोख देणार
- सरकारी तिजोरीवर ७०० कोटींचा जादाभार
- अर्थतज्ज्ञांकडून शिफारशींचा अभ्यास होणार
- विविध योजनांतील पैशांची बचत,खर्चास कात्री
- एप्रिल २००६ पासूनच्या थकबाकीचे ५०० कोटी
- कसे द्यायचे याबाबत अजून ठोस निर्णय नाही
- वेतनातील तफावतीबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन
- विकासास कात्री शक्य; करांचा बोजा वाढू शकतो

पणजी, दि.२५ (प्रतिनिधी) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी येत्या नोव्हेंबर २००८ पासून लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या आयोगाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेवर अतिरिक्त करांचा बोजा लादला जाण्याची दाट शक्यता असून विविध विकासकामांनाही कात्री लावणे भाग पडणार असल्याचे स्पष्ट संकेत सरकारकडून मिळाले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या पर्वरी येथे झालेल्या दीर्घकाळ बैठकीत आज अखेर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे अठ्ठेचाळीस हजार सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असून त्यांच्यासाठी ही दिवाळीची भेटच ठरली आहे. पणजी येथे मॅकनिझ पॅलेस परिषदगृहात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री कामत यांनी ही माहिती दिली. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे या शिफारशी सप्टेंबर महिन्यापासून लागू केल्याने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याची थकबाकी कर्मचाऱ्यांना रोख देण्याचे सरकारने ठरवले आहे. ही थकबाकी कधी द्यायची याबाबत मात्र काहीही ठरलेले नाही. आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारी तिजोरीवर सुमारे ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे; परंतु एवढी रक्कम कशी उभारणार याबाबत सरकारकडे कोणतेही निश्चित धोरण नाही. त्यासाठी खास आर्थिक सल्लागार नेमण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नामांकित अर्थतज्ज्ञांकडून या संपूर्ण आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करून एका महिन्यात सरकारला अहवाल सादर करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या आयोगाविषयी कसलीच तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात नसल्याने त्यामुळे मार्च ०८ पर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपये अतिरिक्त सरकारला उभारावे लागणार आहेत. विविध सरकारी योजनांतील पैशांची बचत करून किंवा अतिरिक्त खर्चाला कात्री लावून मार्च २००८ पर्यंत सुमारे ७५ कोटी रुपये उभारले जाणार असल्याचे मुख्य सचिव जे. पी. सिंग यांनी सांगितले. त्याचबरोबर सदर सल्लागार मंडळाला कर आकारणीबाबतही शिफारशी करण्याचे सरकारने आदेश दिल्याने त्यामुळे या आयोगाचे बोजा सामान्य जनतेच्या डोक्यावरच पडणार आहे. या खर्चासाठी कर्ज घेणार काय, असा सवाल केला असता त्याबाबत स्पष्टीकरण करण्यास मुख्यमंत्री कामत यांनी नकार दिला. सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा आयोग लागू करणे अनिवार्य आहे. त्यामुळे तो पैसा कसा उभारायचा याचा निर्णय घेण्यास सरकार समर्थ आहे,असे सांगून त्यांनी या विषयाला बगल दिली.
सध्याच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी वर्षाकाठी सुमारे ८२५ कोटी, तर निवृत्तिवेतनापोटी वर्षाकाठी १७५ कोटी रुपये खर्च केले जातात. त्यात आता दरवर्षी अतिरिक्त ३०० कोटी रुपयांची भर पडणार आहे. प्रत्येक महिन्याकाठी अतिरिक्त २५ कोटी रुपये खर्च येणार आहे. हा आयोग एप्रिल २००६ पासून लागू होणार असल्याने थकबाकीपोटीचे ५०० कोटी रुपये कसे द्यायचे याबाबतही अद्याप काहीही ठरले नाही. ही सर्व थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करून हे पैसे किमान तीन वर्षे वापरण्यास बंदी घालण्याचा सरकारचा विचार होता परंतु त्याबाबत कोणताही निश्चित निर्णय झाला नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सरकारी वेतनातील तफावतीबाबतही मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे टाळले. हा आयोग लागू झाल्यानंतर सर्वांत तळातील सरकारी कर्मचाऱ्याला किमान ९९८४ रुपये पगार मिळणार आहे. घरभाडे भत्ता १५ टक्क्यांवरून २० टक्के वाढणार आहे. "सीसीए' रद्द करून प्रवासी व महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ प्रत्येक वर्षी १ जुलै रोजी देण्याचेही ठरले आहे.

भाजप विद्यार्थी विभागाला पुन्हा दणदणीत विजयश्री


पणजी, दि. २५ (प्रतिनिधी): गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या आज झालेल्या सदस्यपद निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत विद्यार्थी विभागाने कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी विभागावर २२ विरुद्ध शून्य असा दणदणीत विजय प्राप्त केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ ते पणजीतील भाजप मुख्यालयापर्यंत मिरवणूक काढून विजयोउत्सव साजरा केला.
कॉंग्रेसकडून या निवडणुकीत उमेदवारांवर दबाव टाकण्यासाठी उघडपणे सरकारी यंत्रणेचा वापर करण्यात आला; तरीही, गोव्यातील विद्यार्थी भाजपच्या मागे खंबीरपणे उभे असून भविष्यातील विजयाची ही युवाशक्तीने दिलेली पावती असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.
कॉंग्रेसने विद्यार्थ्यांना दाखवलेले पैशांचे आमिष तसेच पोलिस यंत्रणेला वापरून केलेल्या दादागिरीला विद्यार्थी बळी पडले नसल्याने सांगून श्री. पर्रीकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळावर विजय प्राप्त झाल्यानंतर ते आज दुपारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष समीर दयानंद मांद्रेकर, सचिव किशोर नाईक, विद्यार्थिनी प्रतिनिधी स्नेहा गावस मंडळाचे सदस्य साईनाथ कासकर, किरण फातर्पेकर, आश्विन लोटलीकर, कौतुक रायकर, विठ्ठलकांत फळदेसाई व धीरज देसाई. भाजयुमोचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, सरचिटणीस रुपेश महात्मे, आत्माराम बर्वे तसेच अन्य विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी काळात विद्यार्थ्याच्या हिताचे विविधकार्यक्रम हाती घेतले जाणार असून या मंडळातर्फे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना भाजपचा पाठिंबा आणि सहकार्य असेल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यंदा स्वतःचे पॅनेल न उतरवण्यामागील कारणे आपल्याला माहीत नाहीत. ते त्यांचे काम करत आहेत. मात्र त्यांच्याशी या विद्यार्थी विभागाचा कोणताही थेट संबंध नाही, असे श्री. पर्रीकरांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
मडगाव परिसरातील विद्यापीठ प्रतिनिधींचे शंभर टक्के मतदान हे भाजपयुमो विद्यार्थी विभागाच्या पॅनेलला झाल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. भाजपने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचा विद्यार्थ्यांना विसर पडलेला नाही, असेही श्री. पर्रीकर यांनी सांगितले.
या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने युती करून पॅनेल उरवले होते, तर त्यांच्या विरोधात भाजयुमोच्या विद्यार्थी विभागाचे पॅनेल उतरले होते. संपूर्ण गोव्यातील महाविद्यालयांतून ३७ विद्यार्थी प्रतिनिधींचे अर्ज विद्यापीठात पोचले होते. काल विद्यापीठात झालेल्या अर्ज छाननीवेळी कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी विभागाच्या पॅनेलमधील एक सोडल्यास आठ अर्ज रद्द ठरल्याने भाजप विद्यार्थी विभागाचा विजय स्पष्ट झाला होता. आज दुपारी झालेल्या मतदानात विरोधी गटाने भाग न घेतल्याने २२ विरुद्ध शून्य असा विजय प्राप्त झाला.
विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधीसाठी भाजप विद्यार्थी विभागाने म्हापसा येथे खास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाने पोलिस यंत्रणेचा वापर करून भाजप विद्यार्थी विभागाच्या गटात असलेल्या प्रतिनिधींना फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे पर्रीकर यांनी निदर्शनाला आणून दिले. मंडळाच्या अध्यक्षपदी निवडून आणल्याने तसेच पक्षाच्या सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल नवनिर्वाचित मंडळाचे अध्यक्ष मांद्रेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
------------------------------------------------
आशिष शिरोडकरांकडून अभिनंदन
दरम्यान, भाजपप्रणीत विद्यार्थी विभागाने कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी विभागाचा धुव्वा उडवून विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत विद्यापीठावर आपला झेंडा रोवल्याबद्दल भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी या मंडळाचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीचे संचालक डॉ. बी. बी. कानोळकर यांनी कुठल्याही दबावास बळी न पडता बजावलेल्या चोख कामगिरीमुळे एक चांगला संदेश गोमंतकीयामध्ये पोहोचू शकतो. तसेच भारतीय लोकशाहीवर असलेला लोकांचा विश्वासही त्यामुळे दृढतर होईल, असे आशिष शिरोडकर यांनी म्हटले आहे.

Thursday, 25 September, 2008

खैरलांजी हत्याकांडप्रकरणी सहा जणांना फाशी, दोघांना जन्मठेप

फाशी: सकरु बिंजेवार, शत्रुघ्न धांदे, विश्वनाथ धांदे, रामु धांदे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर
जन्मठेप: गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांदे
दोषमुक्त: महिपाल धांदे, धर्मपाल धांदे आणि पुरुषोत्तम तितरमारे


भंडारा, दि.२४ : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या खैरलांजी प्रकरणात आज सहा जणांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दोघांना जन्मठेप देण्यात आली आहे. न्या. स. शि. दास यांनी हा निकाल दिला. या निकालाचे दलित समाजातील नेत्यांनी स्वागत केले असून, बचाव पक्षाने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी हा राज्यातील सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचे सांगितले. ज्या कुटुंबाचे हे हत्याकांड घडले, त्या भैयालाल भोतमांगे यानेही या निकालावर आपण समाधानी असल्याचे म्हटले आहे.
या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे सुरेखा भोतमांगेच्या मारेकऱ्यांना जन्मठेप तर प्रियंका, रोशन आणि सुधीर यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहेे. या प्रकरणाचे पडसाद राज्य विधिमंडळ आणि संसदेपर्यंत उमटले होते. संपूर्ण राज्यात सुद्धा या हत्याकांडाचे तीव्र पडसाद उमटले होते.
सुरेखा भोतमांगे हत्या प्रकरणी सर्वच्या सर्व आठही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तिच्या अपत्यांच्या खुनाबद्दल इतर सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली, त्यात सकरु बिंजेवार, शत्रुघ्न धांदे, विश्वनाथ धांदे, रामु धांदे, जगदीश मंडलेकर, प्रभाकर मंडलेकर यांचा समावेश असून, गोपाल बिंजेवार आणि शिशुपाल धांदे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.
गोपाल बिंजेवार हा मुलगा जन्मठेपेची शिक्षा भोगणार असून, त्याचे वडील सकरु फाशीची शिक्षा भोगणार आहेत. विश्वनाथ धांदे याला फाशी झाली असून, त्याच्या दोन मुलांपैकी एक शत्रुघ्न हा फाशीची, तर शिशुपाल हा जन्मठेपेची शिक्षा भोगणार आहेत. जगदीश आणि प्रभाकर मंडलेकर काका-पुतणे दोघेही फाशीची शिक्षा भोगणार आहेत.
विशेष न्यायालयाने सीआरपीसीच्या २३५ (२) कलमाचा वापर करीत भादंविच्या ३०२ कलमान्वये सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड केला आहे. प्रियंका, रोशन, सुधीरच्या हत्येप्रकरणी एकूण सहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून, दोन आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. शिवाय दोन हजार रुपयांचा दंड केला आहे. हा दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे. भादंविच्या १४८ आणि १४९ कलमान्वये तीन वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व आरोपींना भादंविच्या २०१ कलमान्वये सुद्धा दोषी धरण्यात आले होते. पण, त्यांना ३०२ कलमान्वये शिक्षा झालेली असल्याने या कलमान्वये होणाऱ्या शिक्षेचे विलीनीकरण ३०२ मध्येच करण्यात आले आहे.
या सर्व आरोपींना गेल्याच सोमवारी भादंविच्या ३५४, ४४९ या कलमातून (ऍट्रॉसिटी) मुक्त करण्यात आले होते. महिपाल धांदे, धर्मपाल धांदे आणि पुरुषोत्तम तितरमारे यांना दोषमुक्त करण्यात आले होते. आजच्या आदेशात हे तिघे अन्य कुठल्याही गुन्ह्यात आरोपी नसतील, तर त्यांना कारागृहातून तात्काळ मुक्त करण्यात यावे, असे सांगण्यात आले आहे. या सर्व शिक्षा सलग राहणार आहेत. या प्रकरणात जे कपडे, शस्त्र जप्त करण्यात आले होते, ते नष्ट करण्यात यावे. जप्त करण्यात आलेले बैल आणि बैलगाडी ज्यांचे आहेत, त्यांना परत करण्यात यावेत. जप्त करण्यात आलेले मोबाईल हॅंडसेट भैयालाल भोतमांगे यांना देण्यात यावेत, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात सहा जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली असल्याने हे प्रकरण शिक्षानिश्चितीसाठी उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात यावे, असेही त्यात म्हटले आहे. या प्रकरणात अखेर निकाल लागल्याने संपूर्ण राज्याने सुटकेचा श्वास टाकला आहे. या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. सुदीप जयस्वाल, ऍड. नीरज खांदेवाले यांनी, तर विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले. भैयालाल भोतमांगे यांच्यातर्फे ऍड. योगेश मंडपे यांनी काम पाहिले.

मुंबईतील बॉम्बस्फोटाचा कट उधळला पाच संशयित अतिरेक्यांना मुंबईत अटक

मुंबई, दि.२४ : मुंबई, दिल्ली, बंगलोर आणि अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटाचे नियोजन करून ते घडवून आणलेल्या ५ संशयित अतिरेक्यांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी आज मोठया शस्त्रसाठयासह अटक केली. दिल्ली साखळी बॉम्बस्फोटानंतर अतिरेक्यांंचे लक्ष्य मुंबई होते. परंतु, त्यापूर्वीच पोलिसांना अतिरेक्यांंना पकडण्यात यश आल्याने बॉम्बस्फोटाचा कट उधळला गेला आहे.
अफजल मुतालीब उस्मानी, मोहम्मद सादिक इसार अहमद शेख, मोहम्मद आरीफ बदर शेख, मोहम्मद झाकीर शेख आणि मोहम्मद अन्सार शेख अशी पकडलेल्या अतिरेक्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून स्फोटकांचा मोठा साठाही हस्तगत करण्यात आला आहे.
या पाचजणांचा मुंबईतील रेल्वे बॉम्बस्फोट मालिकेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे २००५ पासून या अतिरेक्यांनी देशात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत. त्याचे प्रशिक्षण त्यांनी परदेशात घेतले आहे. २००५ मध्ये वाराणासी येथे झालेला स्फोट, समझोता एक्सप्रेसमधील बॉम्बस्फोट, संकटमोचन मंदिरासमोरील स्फोट, गोरखपूर तसेच काशी विश्वेश्र्वर येथे झालेल्या स्फोटाशी या अतिरेक्यांचा सबंध असल्याची माहिती पोलिस सहआयुक्त राकेश मारिया यांनी दिली.
या ५ जणांना महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठविण्यात आली आहे. अतिरेक्यांकडून आणखी धक्कादायक माहिती पुढे येणार असून अतिरेक्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यात यश मिळेल, असा विश्वास मारिया यांनी व्यक्त केला आहे. अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी देशभरातील तपास यंत्रणा हातात हात घालून काम करीत आहेत. आम्हाला मिळालेली माहिती अन्य राज्यातील तपास यंत्रणांना दिली जात आहे. तसेच त्यांच्याकडून मिळालेली माहिती अन्य राज्यांच्या तपास यंत्रणांना दिली जात आहे. मिळालेल्या माहितीचा पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे मिळालेले यश सांघिक आहे. असे मुंबईचे पोलिस आयक्त हसन गफूर म्हणाले. तसेच मुंबईतील गणेशोत्सवात दिवसरात्र काम केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल गफूर यांनी गौरोद्गार काढले आहेत.
रोशन खानचा शोध सुरू
सादिक आणि आरिफ यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांचा तिसरा साथीदार रोशन खान यालीस मागावर आहेत. सिमीचे अंग असलेल्या इंडियन मुजाहीदीन या संघटनेच्या थिंक टॅंग ग्रुपमध्ये या तिघांचा समावेश होता. रोशन खानने पाकीस्तानातून बॉम्बस्फोटाचे प्रशिक्षण घेतले आहे. तो मुळचा कर्नाटक येथील असून हैद्राबाद, दिल्ली, गुजरात येथील बॉम्बस्फोटाशी त्याचा सबंध आहे. मुंबईसह देशभरातील तपास यंत्रणांचे मुख्य लक्ष असलेल्या अब्दुल सुभान कुरेशी उर्फ तौकीर हा रोशनच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांना ५ लाखाचे इनाम
अतिरेक्यांना पकडणाऱ्या मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी ५ लाखाचे इनाम घोषित केले आहे.

'कालिका ज्वेलर्स'वरील दरोड्याचा प्रयत्न फसला माशेलमधील घटना; मालकाचे प्रसंगावधान


माशेल दि. २४ (प्रतिनिधी) : येथील हमरस्त्यानजीक "हिराश्री' अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावरील नीलेश शिरोडकर (रा. करमळी) यांच्या मालकीच्या "कालिका ज्वेलर्स' या सराफी दुकानावर आज (दि. २४) सकाळी साडेअकराच्या सुमारास ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात दरोडेखोरांकडून दरोडा घालण्याचा प्रयत्न श्री शिरोडकर यांच्या प्रसंगावधानामुळे उधळला गेला.
सकाळी नित्याप्रमाणे श्री. शिरोडकर दुकानात आले तेव्हा समोरील रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती दुकानाकडे पाहून मोबाईलवर बोलत असल्याचे त्यांनी पाहिले. काही वेळाने एक सफेद इंडिका गाडी (क्र. ९९८९ - पूर्ण क्रमांकाची नोंद नाही) दुकानाच्या बाजूला उभी करून चौघेजण दुकानात शिरले. त्यांनी श्री. शिरोडकरशीे दागिन्यांविषयी कोकणीतून बोलणे सुरू केले.
अचानक त्या चौघातील एकाने श्री. शिरोडकर यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पटकन खाली बसले व मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला; पण बाहेरून प्रतिसाद न मिळाल्याने हाताशी असलेले नाव कोरण्याचे जड मशीन दुकानासमोरील दर्शनी काचेच्या दरावर फेकून मारले. त्यामुळे त्या दरवाजाची काच फुटून मोठा आवाज झाला. त्याबरोबर बाहेरून जाणाऱ्या लोकांचे लक्ष दुकानाकडे गेले. परिणामी दरोडेखोर गोंधळले. ते गोंधळल्याचे पाहून श्री. शिरोडकर यांनी आपल्या हाती दांडा घेऊन त्यांना मारायचा प्रयत्न केला असता एक दरोडेखोर पायऱ्यावरून खाली फुटलेल्या काचांवर पडून जखमी झाला. त्याला काचा लागल्याने रक्त वाहू लागले. तसेच त्यांच्या हाती असलेली नऊ इंच लांब सुराही तिथेच पडला. या स्थितीत त्या चौघांनी समोर उभ्या केलेल्या गाडीतून बेतकीच्या बाजूने पळ काढला.
सदर चारही युवक काल (दि. २३) संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान चोरीच्याच उद्देशाने दुकानात आले होते. मात्र दुकानात गिऱ्हाईके असल्याने त्यांचा तो प्रयत्न फसला असावा असे श्री. शिरोडकर यांनी सांगितले.
दरम्यान, काही मिनिटांत माशेलहून पोलिस कंट्रोल मोबाईल व्हॅन जाताना दुकानासमोर उपस्थित जमावाने अडवून त्यांना दरोड्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने ही घटना फोंडा पोलिस स्थानकाला कळवली. दुकानावर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची बातमी माशेल परिसरात पसरताच श्री. शिरोडकर यांचे मित्र तसेच इतर शेकडो ग्रामस्थ दुकानासमोर जमले.
यावेळी खासदार श्रीपाद नाईक आपला खांडोळा महाविद्यालयातील कार्यक्रम उरकून परतत असताना वाटेत गर्दी दिसल्यामुळे त्यांनी थांबून चौकशी केली. यावेळी उपस्थित जमावाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असलेल्या माशेलात पोलिस स्थानकाची नितांत गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तशी विनंती त्यांनी खासदार नाईक यांना केली. पुढील तपास फोंडा पोलिस करीत आहेत. घटनेचा पंचनामा फोंडा पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई आणि श्री. पेडणेकर यांनी केला.

याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांपैकी एकाला "कालिका ज्वेलर्स'चे मालक नीलेश शिरोडकर यांनी ओळखल्याची माहिती मिळाली आहे.

भाजप विद्यार्थी पॅनेलचे विद्यापीठावर वर्चस्व


भाजप विद्यार्थी विभागाचे विजेते: किशोर कृष्णा नाईक, समीर दयानंद मांद्रेकर व कु. स्नेहा सुरेश गावस. (छाया: प्रीतेश देसाई)

हा युवाशक्तीचा विजय: पर्रीकर
लोकशाही मार्गाने या निवडणुकीत उतरलेल्या युवाशक्तीचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.

अध्यक्ष, सचिव व विद्यार्थिनी प्रतिनिधी बिनविरोध
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : कॉंग्रेस विद्यार्थी विभागाचे ९ अर्ज छाननीवेळीच बाहेर पडल्याने आज भाजप विद्यार्थी विभागाचे अध्यक्ष समीर दयानंद मांद्रेकर, सचिव किशोर कृष्णा नाईक व विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधीपदी कु. स्नेहा सुरेश गावस यांची बिनविरोध निवड झाली. या विजयाने भारतीय जनता पक्षप्रणीत विद्यार्थी विभागाने कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी विभागाचा धुव्वा उडवून विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत विद्यापीठावर आपला झेंडा रोवला.
या अर्जांच्या चाचणीवेळी कॉंग्रेस विद्यार्थी विभागाच्या पॅनलमधील केवळ श्रीपाद नारायण आंबेकर यांचा अर्ज ग्राह्य धरल्याने उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता गोवा विद्यापीठात मंडळ सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे.
वरील विद्यार्थ्यांसह साईनाथ कासकर, किरण फातर्पेकर, आश्विन लोटलीकर, कौतुक रायकर, विठ्ठलकांत फळदेसाई व धीरज देसाई यांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.
वेळ होऊन गेल्याने आणि नेमके कोणत्या पदासाठी अर्ज भरलेले आहेत, हे स्पष्ट होत नसल्याची कारणे देऊन कॉंग्रेसप्रणीत विद्यार्थी विभागाच्या पॅनेलमधील नऊ अर्ज आज विद्यापीठाने रद्द ठरवल्याची माहिती विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.
अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आज अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला होती. त्यावेळी भाजप विद्यार्थी विभागाने अध्यक्ष, सचिव व विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी भरलेले डमी अर्ज मागे घेतले. तर कॉंग्रेस विद्यार्थी विभागाच्या पॅनेलमधील एक सोडल्यास सर्व अर्ज बाद ठरले. छाननी पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी विद्यार्थी मंडळ संचालक डॉ. बी. जी. कानोळकर यांनी ग्राह्य धरण्यात आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधीची यादी सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आली.
गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक घडामोडींना जोर आला होता. दोन्ही बाजूंच्या गटाने प्रतिनिधींची शिबिरे लागली होती. मात्र ३७ पैकी २१ प्रतिनिधी आपल्याकडे असल्याचा दावा भाजप विद्यार्थी विभागाने केला होता. त्यामुळे निवडणूक झाली असल्यासही आमचाच विजय निश्चित होता, असा दावा "भाजपयुमो'चे सरचिटणीस रुपेश महात्मे यांनी आज केला.

बाबूश हल्लाप्रकरणी चौकशीस 'सीबीआय'कडून मान्यता

पणजी, दि.२४ (प्रतिनिधी) : ताळगावचे आमदार तथा विद्यमान शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांकडून पणजी पोलिस स्थानकावर झालेला हल्लाबोल व त्याची परिणती म्हणून पोलिसांनी केलेली बाबूश यांच्या बंगल्याची मोडतोड, त्यांच्यासह पत्नी जेनिफर मोन्सेरात, मुलगा अमित मोन्सेरात, पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस यांना झालेली जबर मारहाण आणि अटक या रणकंदनाच्या चौकशीला केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभाग(सीबीआय)ने मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज ही माहिती पत्रपरिषदेत दिली. गोव्याला छोट्या राज्यांच्या गटात मिळालेले पहिल्या क्रमाकांचे बक्षीस स्वीकारण्यासाठी दिल्लीत गेलेल्या मुख्यमंत्र्यांना "सीबीआय'कडून ही माहिती देण्यात आली. या संपूर्ण घटनेची चौकशी "सीबीआय'मार्फत होणार असल्याने सत्य उजेडात येईल,असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
गेल्या १९ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. मोन्सेरात यांच्या समर्थकाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कारवाई करीत नाहीत तसेच गुन्हेगारांना अटक करीत नाही म्हणून ताळगाव मतदारसंघातील बाबुश समर्थक लोकांनी भव्य मोर्चा पणजी पोलिस स्थानकावर नेला होता. तेव्हा दिलेल्या मुदतीत पोलिसांनी कारवाई केली नसल्याने अचानक पोलिस स्थानकावर दगडांचा वर्षाव करून तेथील काही वाहनांची तोडफोड व जाळपोळही करण्यात आली होती. या हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी तथा शिपाई जखमी झाल्याने त्यांना इस्पितळांत दाखल करावे लागले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी पोलिसांनी बाबूश यांच्यावरच प्रतिहल्ला केला होता. मिरामार येथील त्यांच्या अलिशान बंगल्याची पूर्ण मोडतोड करण्यात आली होती. त्यानंतर ताळगाव येथील त्यांच्या घरात घुसून त्यांचे पुत्र अमित मोन्सेरात यांना मारहाण करण्यात आली व त्याला पोलिस स्थानकांत आणण्यात आले. अमित मोन्सेरात यांची विचारपूस करण्यासाठी आलेले बाबूश, त्यांची पत्नी जेनिफर व पणजीचे महापौर टोनी रॉड्रिगीस या तिघांनाही पोलिसांनी बेदम मारहाण करून त्यांना पोलिस कोठडीत डांबले होते. आमदार,जिल्हा पंचायत सदस्य व महापौर अशा तिघाही लोकप्रतिनिधींना बेदम मारहाण केली जाण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना. पोलिसांनी ही कारवाई तत्कालीन अधीक्षक नीरज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. त्यावेळी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक व उपअधीक्षक मोहन नाईक यांना याप्रकरणी बदली करण्यात आली होती.
ही घटना घडली तेव्हा बाबूश मंत्री नव्हते. आता विद्यमान सरकारात ते मंत्री असल्याने "सीबीआय'चौकशीचे महत्त्व अधिक वाढणार आहे.बाबूश यांनी या प्रकरणी तत्कालीन वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यावर आरोप करून त्यांच्या आदेशावरूनच पोलिसांनी ही कृती केल्याचा ठपका ठेवला होता. आता या प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने होते व त्यातून काय निष्पन्न होणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

'केशव सेवा साधना'कडे निधी सुपूर्द


बिहार पूरग्रस्तांसाठी हेडगेवार शिक्षण संस्थेने जमविलेल्या निधीचा धनादेश केशव सेवा साधना समितीचे गोवा राज्य प्रमुख लक्ष्मण बेहरे यांच्याकडे सुपूर्द करताना हेडगेवार संस्थेचे व्यवस्थापक सुभाष देसाई. सोबत गोवादूतचे सहसंपादक गंगाराम म्हांबरे, संपादक राजेंद्र देसाई, मुख्याध्यापक विलास सतरकर. (छाया: सुनील नाईक)

हेडगेवार विद्यालयाच्या मुलांनी जमविले
बिहार पूरग्रस्तांसाठी ६१ हजार रुपये

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : संकटात सापडलेल्या देशवासीयांबद्दल कळकळ वाटून त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी धडपडणे हाच खरा राष्ट्रवाद आहे. डॉ. हेडगेवार विद्यालयाने बिहार पूरग्रस्तांसाठी जनतेकडून मोठा निधी एकत्र करून आपली राष्ट्रवादी वृत्तीच दाखवून दिली असून, हे बालनागरिक अभिनंदनास पात्र आहेत, अशा शब्दांत "गोवादूत'चे संपादक राजेंद्र देसाई यांनी मळा येथील डॉ. के.ब. हेडगेवार विद्यालयातील मुलांचे कौतुक केले. या विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विभागांतर्फे बिहार पूरग्रस्तांसाठी ६१ हजार रुपयांचा धनादेश आज "केशव सेवा साधना'चे गोवा प्रमुख लक्ष्मण (नाना) बेहरे यांना सुपूर्द करण्यात आला. हेडगेवार विद्यालयाचे व्यवस्थापक सुभाष देसाई यांनी हा धनादेश श्री. बेहरे यांना दिला.
निधी सुपूर्द करण्याच्या या कार्यक्रमाला राजेंद्र देसाई, लक्ष्मण बेहरे यांच्यासह मुख्याध्यापक विलास सतरकर व "गोवादूत'चे सहसंपादक गंगाराम म्हांबरे व्यासपीठावर उपस्थित होते.
केशव सेवा साधनातर्फे गोव्यात चालू असलेल्या सेवाकार्याचा आढावा श्री. बेहरे यांनी आपल्या भाषणात घेतला. यापूर्वी ज्यावेळी देशातील कोणत्याही भागात संकट आले, त्यावेळी केशव सेवा साधनेने आपदग्रस्तांना मदत केली आहे. गोव्यात जमविलेल्या निधीने गुजरातमध्ये एका शाळेचे बांधकामही करण्यात आले होते, अशी माहिती देऊन आताचा हा निधी बिहारातील पूरग्रस्तांसाठी आणि तेथील शैक्षणिक उद्देशासाठीच वापरला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विलास सतरकर व सुभाष देसाई यांचेही भाषण झाले. मुलांमध्ये सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासाठी या वयातच अशा उपक्रमाची गरज असल्याचे सांगून, समाजानेही उर्वरित देशाच्या समस्या या आपल्याच समस्या असल्याचे मानून मदत करावी, असे आवाहन देसाई यांनी केले. मुलांनी असंख्य घरांना भेटी देऊन हा निधी गोळा केल्याचे श्री. सतरकर यांनी सांगितले.
सर्वेश्वर भैरली यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रसाद उमर्ये यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास सर्व मुले, काही पालक व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

Wednesday, 24 September, 2008

खाजगी बसमालकांना आणखी भाडेवाढ हवी 'कदंब'कडूनही नाराजीचा सूर

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): राज्य सरकारच्या वाहतूक प्राधिकरणाने १५ टक्के तिकीटदरवाढीचा घेतलेला निर्णय कदंब महामंडळ तसेच खाजगी बसमालकांनाही रुचलेला दिसत नाही. सरकारचा हा निर्णय मुकाट्याने मान्य करून घेण्याची नामुष्की कदंब महामंडळावर ओढवणार असली तरी खाजगी बस संघटनेत मात्र या निर्णयावरून तीव्र नाराजी पसरली आहे. सरकारने यासंदर्भात गांभीर्याने विचार करून या निर्णयाचा फेरविचार करावा; अन्यथा येत्या १ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी संप पुकारू असा इशारा उत्तर गोवा खाजगी बसमालक संघटनेने दिला आहे.
राज्य वाहतूक प्राधिकरण समितीने परवा झालेल्या बैठकीत प्रवासी बस तिकीटवाढीवर चर्चा करून १५ टक्के वाढ देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. खाजगी बसमालक तथा कदंब महामंडळाने किमान २५ टक्के दरवाढीची मागणी केली होती. यापूर्वी पहिल्या तीन किलोमीटरसाठी ४ रुपये आकारले जात होते आता पहिल्या पाच किलोमीटरसाठी ५ रुपये आकारले जाणार आहेत. तसेच पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ५ पैसे वाढ होणार आहे. त्यामुळे पुढील एका किलोमीटरसाठी एकूण ४५ पैसे वाढ होणार असल्याची माहिती वाहतूक संचालक एस. पी. रेड्डी यांनी दिली. मोटरसायकल पायलटांसाठी सुरुवातीस किमान पाच किलोमीटरसाठी १० रुपये भाडे होते व आता पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ३.५० रुपये वाढ देण्याचे ठरले आहे. टॅक्सी,रिक्षा आदींबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. गोव्यात टॅक्सी व रिक्षाचालक आपल्या मर्जीप्रमाणे दर आकारत असल्याने जर ते मीटरचा वापर करण्यास राजी असतील तर त्यांना दरवाढ देणे शक्य आहे, त्यामुळे त्यांच्या चर्चा करून यासंबंधी तोडगा काढला जाईल,असेही सांगण्यात आले.
"कदंब'चे सरव्यवस्थापक एस. व्ही. नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान पहिल्या पाच किलोमीटरसाठी ५ रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १० पैसे वाढ देण्याची मागणी केली होती. शटल बससेवेसाठी प्रत्येक किलोमीटरमागे ७५ पैसे वाढ देण्याची मागणी त्यांनी केली होती. तथापि,सामान्यांना जादा फटका बसणार नाही,याची काळजी घेत सरकारने केवळ १५ टक्के वाढ देण्याचे मान्य केले.
दरम्यान,राज्य वाहतूक प्राधिकरणाने हा निर्णय घेतला असला तरी तो उद्या (बुधवारी) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार असून सरकार त्यावर अंतिम निर्णय घेणार आहे.

करंझाळे किनाऱ्यावर ट्रॉलर्सकडून मासेमारी 'रापणकारांचो एकवट'ची तक्रार

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी): करंझाळे किनाऱ्यावर गेले दहा दिवस मच्छीमार खात्याच्या नाकावर टिच्चून ट्रॉलर्सवाल्यांकडून मासेमारी सुरू असल्याची तक्रार "गोंयच्या रापणकारांचो एकवट'या संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
संघटनेचे सरचिटणीस माथानी साल्ढाणा यांनी यासंबंधी मच्छीमार संचालकांना पत्र लिहिले आहे.ट्रॉलर्सकडून खोल समुद्रात मासेमारी करणे अपेक्षित असताना करंझाळे किनाऱ्यावर मासेमारी केली जात असल्याने त्यामुळे पारंपरिक रापणकारांच्या व्यवसायावर गदा आल्याचे त्यांनी सांगितले. मुळातच गेल्या काही महिन्यांपूर्वी तेथे एक जहाज रुतल्याने रापणकारांना मासेमारी करणे शक्य झाले नव्हते. परिणामी तेव्हा त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आता व्यवसाय मासेमारी सुरू होतानाच ट्रॉलर्सवाल्यांकडून अतिक्रमण होत असल्याने छोट्या व्यावसायिकांनी नेमके काय करावे, हे सरकारनेच सांगावे असा संतप्त सवाल माथानी यांनी विचारला आहे. येत्या चोवीस तासांत जर तेथून ट्रॉलर्स हटवले गेले नाही तर आपल्या अस्तित्वासाठी या रापणकारांना स्वतःहून कृती करावी लागेल व होणाऱ्या परिणामांना मच्छीमार खाते जबाबदार राहील,असा इशारा देण्यात आला आहे. यासंबंधीची माहिती पणजी पोलिस स्थानक तथा ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मंत्रिमंडळाची आज बैठक

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द झाल्याने ती उद्या २४ रोजी संध्याकाळी ४ वाजता होणार आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत काल दिल्लीला गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
उद्याच्या बैठकीत सहाव्या वेतन आयोगाबाबत शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याने या बैठकीकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावाही या बैठकीत घेण्यात येणार आहे.

आज न्यूयॉर्क येथे झरदारी-मनमोहनसिंग भेट

न्यूयॉर्क, दि. २३ : भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांची उद्या येथे भेट घेणार असून या दोन नेत्यांमध्ये दहशतवादासह अनेक मुद्यांवर चर्चा होणार आहे.
दोन वर्षांच्या कालखंडानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेला मनमोहनसिंग संबोधित करणार आहेत. याच काळात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश, चीन व ब्रिटनचे पंतप्रधान अनुक्रमे वेन जिआबाओ व गॉर्डन ब्राऊन यांचीही भेट घेणार आहेत. या नेत्यांबरोबर होणाऱ्या बैठकीतही आंतरराष्ट्रीय, विभागीय व द्विपक्षीय मुद्यांवरही चर्चा होणार आहे.
युनोच्या आमसभेत यावेळी दहशतवाद व सुरक्षा परिषदेचा विस्तार यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. युनोच्या या ६२व्या आमसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मनमोहनसिंग जगातील प्रमुख नेत्यांची जी भेट घेणार आहेत त्यालाही एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. अणुइंधन व तंत्रज्ञान क्षेत्रात व्यापार करण्यासाठी अणुइंधन व तंत्रज्ञान गटाने भारताला विशेष सूट दिल्यानंतर लगेचच या भेटी होत आहेत, हे येथे उल्लेखनीय. पोखरण येथील पहिल्या भूमिगत अणुचाचणीनंतर भारताला अणुइंधन पुरवठा करण्याचे निर्बंध टाकण्यात आले होते. ३४ वर्षांनंतर हे निर्बंध उठविण्यात आलेले आहेत.
पंतप्रधान काल सोमवारी पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले. चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ यांच्याबरोबर चर्चा करून ते नेत्यांच्या भेटीगाठींना प्रारंभ करतील. त्यानंतर ते जागतिक बॅंकेचे अध्यक्ष रॉबर्ट जिओलिक यांची भेट घेतील. गुरुवारी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बुश यांची वॉशिंग्टनस्थित त्यांच्याच ओव्हल कार्यालयात भेट घेतील. त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसच्या ओल्ड फॅमिली डायनिंग कक्षात रात्रीच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले आहे. ही भेट भारत-अमेरिका यांच्यात झालेल्या नागरी अणु ऊर्जा कराराला अमेरिकन कॉंगे्रसकडून मंजुरी मिळण्यासंंदर्भात अद्यापही अनिश्चितता कायम असताना होत आहे.
यानंतर पंतप्रधान मनमोहनसिंग पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांची भेट घेतील. या बैठकीत भारत सीमेपलीकडून होणारी अतिरेक्यांची घुसखोरी, संघर्षबंदीचे वारंवार होेणारे उल्लंघन हे मुद्दे प्रामुख्याने मांडणार आहे. या बैठकीपूर्वी सीमेपलीकडून होणाऱ्या अतिरेक्यांच्या तसेच इतर घुसखोरीला रोखण्यासाठी पाकिस्तान काय उपाययोजना आखणार आहे, याची माहिती देण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे चीनचे पंतप्रधान वेन जिआबाओ यांच्याबरोबर पंतप्रधान मनमोहनसिंग यांची जी चर्चा होणार आहे, त्यात भारत-चीन सीमावादावरही चर्चा होईल.

जहाल अतिरेक्याला पाकिस्तानात अटक

इस्लामाबाद, दि. २३ : पाकिस्तानच्या सुरक्षा संस्थांनी अल कैदाचा नंबर दोनचा नेता अयमन अल-जवाहिरी यांचा जवळचा सहकारी गुजरानवाला याला गुजरानवाला येथे अटक केली असून, त्याला मॅरिएट हॉटेलवरील आत्मघाती हल्लाप्रकरणी चौकशीसाठी लगेचच इस्लामाबाद येथे नेण्यात आले आहे.
समा टीव्ही चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार मुरसालिन नावाच्या व्यक्तीला रविवारी गुजरानवाला येथील मशिदीतून अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी तो जमशेद नावाने राहात होता. शियाविरोधी बंडखोर संघटना लष्कर-ए-जांघवी या बंदी घालण्यात आलेेेेेेल्या संघटनेचा मुरसालिन हा महत्त्वाचा नेता आहे. मुरसालिनच्या अटकेसाठी पाकिस्तान सरकारने पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
-----------------------------------------------------------
आजमगढमध्ये छापे : बॅंक अकाऊंट, महत्त्वपूर्ण कागदपत्रे सापडली
आजमगढ, दि.२३ : दिल्लीतील बॉम्बस्फोटांसंदर्भात दिल्ली पोलिस व उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने आज सकाळी आजमगढ जिल्ह्यातील संजारपूर गावातील विविध घरांवर छापे टाकून तपासणी केली असता अनेक सीडी व महत्त्वपूर्ण कागदपत्रे हाती लागली आहेत. काही संशयित अतिरेक्यांच्या बॅंक खात्यांचाही शोध लागल्याचे समजते. दिल्ली स्फोटांसंदर्भात अनेक लोकांना अटक करण्यात आली असून या लोकांची कसून चौकशी केली असता त्यातून जी माहिती प्राप्त झाली त्याच्या आधारे आज सकाळी संजारपूर गावात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या दोन अतिरेक्यांना दिल्ली पोलिस आपल्यासोबत घेऊन आले व शहरातील प्रख्यात डॉ. जावेद यांच्या घरावर छापा टाकला. त्यांच्या घराची तपासणी केली. डॉ. जावेद यांचीही चौकशी केली व नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी डॉ. जावेद यांचा मुलगा असदुल्लाह याचा दिल्ली पोलिस शोध घेत आहेत. याशिवाय आरिफ, खालिद, सलमान व साजिद या फरार आरोपींचाही शोध घराघरातून घेतला जात आहे. संजारपूर शहरात पोलिसांची तसेच एटीएसची कारवाई सुरू होती त्यावेळी गावात प्रचंड बंदोबस्त होता. घरांच्या तपासणीच्या वेळी गावातील लोकांना दूर ठेवण्यात आले होते. या फरार अतिरेक्यांचे नातेवाईक, मित्र यांच्या हालचालींवर पोलिस नजर ठेवून असून सर्व माहिती जमवीत आहेत.
दिल्ली बॉम्बस्फोट मालिकेनंतर दिल्लीत उडालेल्या चकमकीत ठार झालेला आतिफ हा अतिरेकी संजारपूर गावचा राहणारा आहे. या चकमकीत व नंतर पकडण्यात आलेल्या त्याच्या सहकाऱ्यांच्या चौकशीनंतर संजारपूर गावात या स्फोटाशी संबंधित अन्य लोकांच्या अटकेसाठी व त्यांच्या घरांच्या तपासणीसाठी ही तपासणी मोहीम सुरू आहे.
तीन कोटी रुपयांचा व्यवहार
दिल्ली चकमकीत ठार झालेला अतिरेकी आतिफच्या बॅंक खात्यांची तपासणी केली असता असे दिसून आले की, गेल्या सहा महिन्यांत आतिफच्या बॅंक खात्यातून जवळपास तीन कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. याच संदर्भात एटीएस व दिल्ली पोलिस पवई क्षेत्रातील एका बॅंक खात्याची चौकशी तर करीत आहेतच सोबत त्या त्या बॅंकांच्या अधिकाऱ्यांकडूनही माहिती गोळा करीत आहेत. आतिफच्या नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे.

Tuesday, 23 September, 2008


समर्थ गडावरील २१ दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता हजारों लोकांच्या साक्षीने मंगळवारी झाली त्यावेळी विसर्जनासाठी निघालेली मंगलमूर्ती. (छाया : शांतम रेगे)

विसर्जनासाठी निघालेली बोक-द-व्हाक, पणजी येथील सार्वजनिक गणेश मूर्ती

Monday, 22 September, 2008

पाक बॉम्बस्फोटप्रकरणी तीन संशयितांना अटक

इस्लामाबाद, दि.२२ - पाकिस्तानातील मेरियट या पंचतारांकित हॉटेलमधील बॉम्बस्फोट प्रकरणी आज पोलिसांनी पंजाब प्रांतातील खारियन शहरातून तीन संशयितांना अटक केली.
खारियन येथील जामिया मशिदीचे इमाम कारी मोहम्मद अली यांचाही अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. अर्थात, याविषयीचे वृत्त "द डॉन' या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिले आहे. पाकी गृहमंत्रालयातर्फे याची पुष्टी करण्यात आलेली नाही.
२० सप्टेंबर रोजी इस्लामाबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आलेल्या स्फोटात सुमारे एक हजार किलो स्फोटके वापरण्यात आली होती. आणखीही काही स्फोटकांचा साठा याच शहराच्या आसपास असल्याची माहिती पाकी पोलिसांना मिळाली आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सैफला घेऊन पोलिस उडपीत; तपास सुरू

नवी दिल्ली, दि.२२ - दिल्ली बॉम्बस्फोटमालिकेसंदर्भात पकडण्यात आलेल्या सैफ या अतिरेक्याला बरोबर घेऊन दिल्ली पोलिस कर्नाटकात पोहोचली आहे. तर तिकडे जयपूर व अहमदाबाद येथील बॉम्बस्फोट मालिकेतील एक प्रमुख आरोपी मुफ्ती अबु बशीर उर्फ बशर याला काल रात्री जयपूर येथे आणण्यात आले.
कर्नाटक पोलिस तसेच गुप्तचर संस्थांच्या मदतीने दिल्ली पोलिस कर्नाटकमधील उडुपी शहरात यासंदर्भात चौकशी करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरेक्यांनी बॉम्ब बनविण्यासाठी बॉल बेअरिंग व इतर सामान येथूनच खरेदी केले होेते. यानंतर पोलिस पथक धारवाडला रवाना होणार आहे. याआधीही अतिरेक्यांनी धारवाडच्या आसपासच्या प्रदेशात प्रशिक्षण शिबिरे घेतली होती, हे येथे उल्लेखनीय.
उत्तर प्रदेशातही चौकशी जारी
दिल्लीतील जामियानगर येथे झालेल्या चकमकीनंतर अटक करण्यात आलेल्या सैफ व जिशान यांना बरोबर घेऊन पोलिस गेले आहेत. या दोन अतिरेक्यांकडून फार महत्त्वाची माहिती मिळण्याची आशा पोलिसांना आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातही पोलिस बॉम्बस्फोटासंदर्भात चौकशी करीत आहेत. मध्यपूर्वेतून प्राप्त होणारा पैसा उत्तर प्रदेशच्या मार्गाने हवालाच्या मार्फत अतिरेक्यांना प्राप्त होत असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
बशीरला जयपूरला आणले
दरम्यान, जयपूर व अहमदाबाद बॉम्बस्फोटमालिकेतील एक प्रमुख आरोपी मुफ्ती अबु बशीर उर्फ बशर याला काल रविवारी उशिरा रात्री जयपूरला आणण्यात आले. विशेष कार्यवाही गटाच्या पथकाने बशीरला काल दिल्लीहून जयपूरला आणण्यात आले. १३ मे रोजी जयपूर शहरात घडवून आणण्यात आलेल्या बॉम्बस्फोट मालिकेसंदर्भात चौकशी करण्यासाठी तसेच पुढील कार्यवाहीसाठी बशीरला जयपूरला आणण्यात आलेले आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. १३ मेच्या बॉम्बस्फोट मालिकेत ६८ लोक ठार झाले होते तर अनेक लोक जखमी झाले होते. बशीरला गुजरात पोलिसांनी उत्तर प्रदेशात अटक केली होती व त्याची चौकशी केली असता जयपूर बॉम्बस्फोट मालिकेतही त्याचा हात असल्याचे आढळून आले होते. दरम्यान, दिल्ली बॉम्बस्फोटांसंदर्भात दिल्ली पोलिसांनी बशीरला दिल्लीला आणले होते.

बाबूशना सांगावे लागणार "त्या' प्रतिज्ञापत्राचे गुपित

पणजी, दि.२२ (प्रतिनिधी) - बनावट शैक्षणिक प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप झाल्यानंतर योग्य वेळी खुलासा करू अशी भूमिका घेणाऱ्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना मात्र आता या प्रतिज्ञापत्राचे गुपित खुले करावेच लागणार आहे.
"ऊठ गोंयकारा'संघटनेचे प्रवक्ते ऍड.आयरिश रॉड्रिगीस यांनी केलेल्या तक्रारीवरून तिसवाडीचे निवडणूक अधिकारी साबाजी शेटये यांनी मोन्सेरात यांना १५ दिवसांची कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.शैक्षणिक पात्रतेबाबत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई का केली जाऊ नये,असे या नोटिशीत बजावण्यात आले आहे.मोन्सेरात यांनी ताळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवताना वांद्रे मुंबई येथील सेंट तेरेझा हायस्कूलमध्ये दहावी परीक्षा दिल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. विधानसभा सचिवांना दिलेल्या माहितीत तर चक्क व्दितीय वर्ष कला शाखेपर्यंत शिक्षण झाल्याची माहिती देण्यात आल्याचा आरोप ऍड .रॉड्रिगीस यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
दरम्यान,पणजीचे मुख्य न्यायदंडाधिकारी क्रिस्तीयानो फर्नांडिस हे ऍड.रॉड्रिगीस यांनी केलेल्या फौजदारी तक्रारीबाबत २५ रोजी सुनावणी घेणार आहेत. गेल्या ११ सप्टेंबर रोजी शिक्षणमंत्र्यांविरोधात पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली होती. त्यानंतर निरीक्षक कोर्त यांनी दिलेल्या पत्रानुसार याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे धाव घेण्यात आली होती. दरम्यान, आपल्या शैक्षणिक पात्रतेबाबत योग्य वेळी आपण पुरावे सादर करू, असे मोन्सेरात यांनी यापूर्वी जाहीर केल्याने ते निवडणूक अधिकाऱ्यांच्या या नोटिशीला काय उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पोलिसांच्या कामकाजात राजकीय हस्तक्षेप नको

"अल कायदा'चीही गोव्यावर नजर - पर्रीकर
पणजी, दि.२२ (प्रतिनिधी) - पोलिस खात्यात होणारा अतिहस्तक्षेप व गुन्हेगारांना अभय देण्यासाठी सत्ताधारी नेत्यांकडून येणारे दडपण यामुळे पोलिस अधिकारी अत्यंत दबावाखाली वावरत आहेत. तसेच "सिमी'नंतर आता अल- कायदा या दहशतवादी संघटनेचेही गोव्याला लक्ष्य बनवण्याचे डावपेच उघड झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची ही संभ्रमावस्था गोमंतकीयांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चिंताजनक असल्याची टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली.
आज पणजी येथे भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते. देशात दहशतवादी हल्ले होत असताना या दहशतवादी संघटनांच्या "हिटलिस्ट'वर कळंगुटसारखे किनारी भाग असल्याचे यापूर्वी आपण जाहीर केले होते. पोलिस खात्याकडून मात्र यासंबंधी अद्याप काहीही विशेष उपाययोजना आखण्यात आली नाही. बारीकसारीक प्रकरणी पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मडगाव येथील तलवारींचा साठा सापडल्याप्रकरणी तर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडूनच पोलिसांवर दबाव आणण्यात आला होता, असा आरोप पर्रीकर यांनी केला.
दरम्यान,सध्या गोवा विद्यापीठाच्या निवडणुकांची तारीख जवळ येत आहे. मुख्यमंत्री कामत यांच्या दबावाखाली भाजपसमर्थक काही विद्यार्थी नेत्यांचे अपहरण करण्याचा डाव खुद्द पोलिसांकडून आखला जात असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. कॉंग्रेसच्या एका राजकीय नेत्याचे पुत्र तर बेकायदा खाणीसंदर्भात पोलिसांनाच दमदाटी करीत असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. पोलिसांच्या कामात होणारा हा हस्तक्षेप तात्काळ थांबवा, असे आवाहन करून जनतेच्या सुरक्षेबाबत अजिबात हयगय करू नका,असा सल्लाही पर्रीकरांनी दिला.

संपूर्ण गोव्यात "रेड अलर्ट' जारी

रेल्वे, बसस्थानकांवर कडक सुरक्षा; लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन
पणजी, दि. २२ (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीत अटक केलेल्या अतिरेक्यांनी गोव्यातील स्फोटांचा उघड केलेला कट, गुप्तचर यंत्रणा व केंद्रीय गृह मंत्रालयाकडूनही गोव्याला कमालीच्या सावधगिरीच्या सूचना मिळाल्यानंतर संपूर्ण गोव्यात आज "रेड ऍलर्ट' जारी करण्यात आला. रेल्वे व बसस्थानक तसेच विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक व सतर्क करण्यात आली आहे. चर्च, मंदिरे, मशीद व गुरूव्दारासारख्या धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनांनाही खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेसंबंधी आवश्यक पावले उचलण्याचे आदेश गृह खात्याच्या निर्देशानंतर पोलिसांनी दिले आहेत. दरम्यान, या रेड ऍलर्टमुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी पोलिस तत्पर असावेत या हेतूनेच रेड ऍलर्टचा सराव केला जात असल्याची सारवासारव पोलिस महासंचालक ब्रजेंद्रसिंग ब्रार यांनी गृहमंत्री रवी नाईक यांच्या उपस्थितीत संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
काल दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्यांनी गोव्यातील आपला घातपात घडवून आणण्याचा कट उघड केला होता. त्याआधी शुक्रवारी जयपूरहून निघालेली मरूसागर एक्सप्रेस सोमवारपर्यंत उडविण्याची अतिरेक्यांनी धमकी दिल्यानंतर काल गोव्यात स्फोट घडविण्यासाठी केरळहून रेल्वेतून स्फोटके किंवा अतिरेकी गोव्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या एकंदर घडामोडींत गोव्याला कमालीची सतर्कता बाळगण्याच्या सूूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर कालपासूनच महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळांवर, रेल्वेस्थानकावर व विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. आज सकाळी गृह मंत्र्यांनी पोलिस खात्याकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर लगेचच दुपारी पोलिस महासंचालकांनी "रेड ऍलर्ट'चा आदेश जारी केला आणि पोलिसांची धावपळ सुरू झाली.
त्यांच्या या आदेशानंतर गोव्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची त्यातील व्यक्तींसह सीमा नाक्यांवर कसून तपासणी चालू झाली आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीही सुरू करण्यात आली असून संशयित व्यक्तीची सखोल चौकशी करण्याच्या सूचना सीमा नाक्यावरील पोलिस स्थानकांसह इतर पोलिस स्थानकांच्या प्रमुखांना आणि नाकाबंदी व गस्तीवरील पोलिसांना करण्यात आल्या आहेत. बसस्थानक तसेच बाजार परिसर व सार्वजनिक ठिकाणी साध्या वेषातील पोलिस टेहळणीच्या मोहिमेवर पाठवण्यात आले आहेत. शिवाय काही साध्या वेशातील पोलिसांना ठिकठिकाणी फेरफटका मारून स्थितीचा आढावा घेण्यास बजावण्यात आले आहे.
गोवा हे पर्यटन स्थळ असल्याने येथील किनारे, मंदिर, चर्चेस इत्यादी धार्मिक स्थळांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मोक्याची ही ठिकाणे अतिरेकी आपले लक्ष्य ठरविण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा धार्मिक स्थळांच्या ठिकाणी योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. चर्च धर्मगुरू व मंदिरांच्या पुजाऱ्यांनाही तेथे येणाऱ्या पर्यटकांवर बारीक नजर ठेवण्याची व प्रत्येक पर्यटकांची कसून छाननी करण्याच्या सूचना केल्या आहेत. मंदिर व चर्चेसमध्ये क्लोज्ड टीव्ही सर्किट कॅमेरे बसविण्यास सांगण्यात आले असून प्रवेशव्दारावर मेटल डिटेक्टर बसविण्याचे व प्रशिक्षित खाजगी सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी संबंधित व्यवस्थापनाला केले आहे.
कळंगुट, कांदोळी, कोलवा, पाळोळे, हरमलसारखे किनारी भाग हे पर्यटकांच्या गर्दीचे असल्याने बॉंबस्फोटाच्या कटात या जागा हिटलिस्टवर असण्याची शक्यता गृहीत धरून किनारी भागातील पोलिसांनाही अधिक दक्ष राहाण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय या भागात समाज विघातक कारवाया होत असल्यास त्यांच्या माहितीचीही जमवाजमव करण्यास त्यांना बजावले आहे. चित्रपटगृहे, प्रेक्षागृह, नृत्यमंच, डिस्कोथेक, मनोरंजन क्लबांनाही सुरक्षा उपाय होती घेण्यास पोलिसांनी सांगितले आहे. सांतइनेज येथील पुरातत्व खात्याचे जिल्हा पर्यवेक्षकांना संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहाण्याचा सूचना करण्यास पोलिसांनी सांगितले असून आवारात कोणतीही बेवारस वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना त्याची माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत.
जलसफरीवर निघणाऱ्या नौका, कॅसिनो बोटी, बेती येथील गुरूद्वारा, कला अकादमी, पर्यटन खाते आदींनाही सतर्क करण्यात आले आहे. बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावण्यासाठी प्राथमिक स्तरावर आवश्यक ती खबरदारी घेण्यास त्यांना सांगितले आहे.
रेल्वेतून स्फोटके किंवा अतिरेकी गोव्यात येण्याची माहिती मिळाल्याने रेल्वे गाड्यांची सरसकट तपासणी आजपासून होती घेण्यात आली आली आहे. बॉंब निकामी करणारे पथक व पोलिस श्वानपथक रेल्वेगाड्यांच्या तपासाच्या कामात व्यग्र आहे. नागरिकांना एखादी संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास त्वरीत १०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.
गोवा पोलिसांकडे बॉंब निकामी करणारे केवळ एकमेव पथक आहे. सध्या हे पथक रेल्वे गाड्यांच्या तपासात गुंतल्याने पोलिसांची कुचंबणा झाली आहे. "तहान लागल्यावर विहीर खोदावी' त्यानुसार पोलिस खात्याने आपल्या ताफ्यात आणखी दोन बॉंम्ब निकामी करणाऱ्या पथकांची भर घालण्यासाठी आता हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच दहशतवादविरोधी गुन्हे हाताळण्यासाठी विशेष पथकही तयार केले जाणार आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष शाखेचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांच्यावर या पथकाच्या स्थापनेची जबाबदारी सोपविण्यात आली असून हे पथक विविध राज्यातील दहशतवादी घटनांची इत्यंभूत माहिती ठेवेल. देशपांडे यांना त्यासाठी मुंबई, दिल्ली अशी ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठविण्यातही आले होते. मात्र त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. अतिरेकी कारवायांच्या शक्यतेने गोवा पोलिसांची झोप उडाल्यानंतर हा कक्ष स्थापन करण्यासाठी आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
योग्य ती खबरदारी घेतलीय - रवी
दिल्लीत अटक केलेल्या अतिरेक्यांनी गोव्यात स्फोट घडविण्याच्या उघड केलेल्या कटाची कोणतीही माहिती अद्यापही गोवा सरकारला आलेली नाही. गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आल्यामुळे केवळ खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्वत्र सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री रवी नाईक यांनी केले आहे. गोवा ही देवदेवतांची भूमी आहे. आजवर देवदेवतांच्या आशीर्वादाने गोवा हा तसा शांत राहीला असून ही शांतता कायमची टिकवून ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. गोव्यात "सीमी' च्या कारवाया सुरू असल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला.

खाण उद्योगाबाबत सावधगिरी बाळगा

"प्रादेशिक आराखडा २०२१' चा मसुदा सरकारला सादर
पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) - "प्रादेशिक आराखडा २०११' च्या विरोधात उभ्या राहीलेल्या व्यापक जनआंदोलनामुळे हा आराखडा रद्द करण्याची सरकारवर नामुष्की ओढवली होती. त्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना, वास्तुरचनाकार चार्ल्स कुरैया यांच्या अध्यक्षतेखाली 'प्रादेशिक आराखडा - २०२१" साठी निवडलेल्या कृती दलाने आपला अहवाल आज राज्य सरकारला सादर केला. खाण उद्योगाबाबत सरकारने अतिशय सावध भूमिका घेण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली असून उद्योग, कृषी, पर्यटन, बांधकामे व विकासात लोकांचा सहभाग याबाबतही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री कामत यांनी ४ ऑक्टोबर २००७ रोजी विशेष कृती दलाची स्थापना करून राज्यासाठी २०२१ चा नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. श्री. कुरैया, प्रा.एड्गर रिबेरो, राहुल देशपांडे, डिन डिक्रुझ, दत्ता नायक,ब्लेझ कॉस्ता बीर, डॉ.ऑस्कर रिबेलो हे कृती दलाचे इतर सदस्य आहेत. आराखडा तयार करताना विविध सरकारी खाती,बिगर सरकारी संस्था,नागरीक मंच,संशोधन संस्था आदी सर्वांची मते विचारात घेतली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पणजी येथे मॅकनिझ पॅलेस परिषदगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कृती दलाचे अन्य पदाधिकारी प्रा.रिबेरो तसेच कृती दलाचे सदस्य सचिव तथा निमंत्रक राजीव यदुवंशी आदी उपस्थित होते. कृती दलाने तयार केलेला हा मसुदा नगर व नियोजन खात्याच्या संचालक मंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर तो जनतेच्या सूचना व हरकतींसाठी तीन महिने खुला करण्यात येणार असून जास्तीतजास्त लोकांनी आपल्या सूचना मांडून ही प्रक्रिया पूर्ण करावी,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
या निमित्ताने राज्यातील प्रत्येक गावातील सर्व्हे क्रमांकाचा आढावा या मसुद्यात घेण्यात आला आहे. जिल्हा, तालुका, पालिका व पंचायत पातळीवर या मसुद्याचा तज्ज्ञांकडून आढावा घेण्यात येणार असून आता लोकांना सर्व्हे क्रमांकावरून ती जागा नक्की कोणत्या विभागात येते हे कळू शकेल,असेही ते म्हणाले.
या आराखड्यात राज्याच्या संपूर्ण भागाची इको-१ व इको-२ अशी विभागणी केली असून इको-१ भागांत पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यात एकूण भूभागापैकी ५४.०६ टक्के भाग असून त्याला कोणत्याही पद्धतीने हात लावता येणार नाही,अशी शिफारस करण्यात आली आहे. इको -२ मध्ये २६.२९ टक्के भाग असून त्यात शेती,वन,ओलिताखालील जमीन,मिठागरे तथा वारसास्थळे आदींचा समावेश आहे. या विभागात अत्यावश्यक असल्यास काही किरकोळ बदल करण्याची परवानगी असेल. गोव्याच्या अस्तित्वाला कोणताही धक्का न लागता येथे विकासालाही चालना मिळावी, हा त्यामागचा हेतू असल्याचे मसुद्याची वैशिष्ट्ये पत्रकारांसमोर मांडताना श्री. कुरैया यांनी सांगितले. विशेष म्हणजे आराखड्यात खाणींबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला राज्य सरकारला देण्यात आला आहे.
"हेरिटेज लॅण्डस्केप'(वारसा भूभाग)
राज्यातील एकूण १२ ठिकाणांची निवड वारसा भूभागात करण्यात आली आहे व त्यांना या आराखड्यात कायद्याव्दारे खास सरंक्षण पुरवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या भागांत चंद्रनाथ पर्वत, काब द राम किल्ला, आग्वाद किल्ला, करमळी तलाव, मोरजी, गालजीबाग,जुना पाटो पुल, वागातोर किल्ला,बागा डोंगर,कुळेली डोंगर,कुंभारजुवे गुहा, चोडण येथील खारफुटीची झाडे आदींचा समावेश आहे.
दळणवळणाचा विस्तार
गोव्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक सक्षम बनवण्याची गरज आहे. येथील रस्त्यांची योग्य पद्धतीने रचना होणे गरजेची आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग १७ ला जोडून विविध तालुक्यातील दुर्लक्षित भागांना जोडणारा वेगळा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ४(अ)अंतर्गत सुचवण्यात आला आहे. या मार्गामुळे विविध शहरांवरील ताण कमी होणार आहे. कोकण व दक्षिण-पूर्व रेल्वेने विस्ताराला चालना दिल्यास उत्तरेत सावंतवाडी ते कारवारपर्यंत प्रवाशांसाठी खास शहरी रेल्वेचा वापर करता येणे शक्य आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळही कमी होईल. गोव्याला लाभलेल्या जलमार्गाचाही प्रवासी वाहतुकीसाठी वापर करण्याची सूचना आराखड्यात आहे.
मोपा विमानतळाचे नियोजन
"प्रादेशिक आराखडा २०२१'च्या मसुद्यात मोपा विमानतळाच्या अनुषंगाने या भागाच्या विकासाची आखणी करण्यात आली आहे. मोपासह दाबोळी विमानतळालाही या मसुद्यात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
विकास केंद्रांची निर्मिती
कृती दलाने या आराखड्यात काही विकासात्मक केंद्राचे नियोजन केले आहे. राज्यात कोणतीही गुंतवणूक किंवा उद्योग यायचे असतील तर त्यासाठी या विकास केंद्रांचा प्रामुख्याने विचार व्हावा हा त्यामागील उद्देश असेल. पेडणे,सांगे,फोंडा,केपे आदी भागांत खास विकास केंद्रांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. गोव्यात कोणतेही उद्योग किंवा इतर व्यवसाय सुरू व्हायचे असतील तर त्यांना फक्त याच ठिकाणी आपले उद्योग स्थापन करणे गरजेचे असेल. या ठिकाणी त्यांना आवश्यक सर्व सुविधा तथा इतर गोष्टी पुरवणे सोपे होणार आहे. फिल्म सिटी,आरोग्य पर्यटन,क्रुझ टर्मिनल,गोल्फ कोर्स,स्फोर्टस सिटी आदी प्रकल्प या ठिकाणी उभारण्याची सोय असेल.
स्थलांतरीतांचे संकट
गोव्यात वाढत्या स्थलांतरीतांचे संकट कायम राहणार आहे,त्यासाठी गोव्यातील स्थानिकांना रोजगार मिळवून देणारे उद्योग उभारणे गरजेचे आहे. येथील युवकांच्या कौशल्याला वाव मिळणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन मिळाल्यास स्थलांतरीतांची संख्या कमी होणार अन्यथा हा आकडा अधिकाधिक वाढत जाणार असे सुचवण्यात आले आहे.

इस्लामाबाद हॉटेलातील मृतांची संख्या ६०

इस्लामाबाद, दि. २१ - येथील पंचतारांकित मेरियट हॉटेलमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यांची संख्या ६० वर गेली असून, जखमींची संख्या २०० असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या स्फोटप्रकरणी माहिती देणाऱ्यास पाक सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
दशहतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना, पंतप्रधान गिलानी यांनी दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. अमेरिका आणि भारतानेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

गोव्यातही स्फोट घडवण्याचा कट

दिल्लीमध्ये अटकेतील अतिरेक्यांनी उघड केलेली माहिती

नेत्रावती एक्सप्रेसलाही सुरक्षा कवच


पणजी, दि. २१ (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीत कालच्या चकमकीत पकडलेल्या अतिरेक्यांनी गोव्यात बॉंम्बस्फोट घडविण्याचा आमचा इरादा होता, असे चौकशीत उघड करून त्यांचे इतर साथीदार काम फत्ते करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती दिल्ली पोलिसांना दिल्यानंतर गृह मंत्रालयाने राज्यांना कमालीची सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रामुख्याने गोव्यातील त्यांचा कट उघड झाल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेत्रावती व मरूसागर या गाड्या केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आदी राज्यांतून जात असल्याने गोव्यासह या राज्यांनाही सुरक्षचे जाळे मजबूत करा, असे सांगण्यात आले आहे.
गोव्यात अतिरेक्यांकडून घातपात घडवून आणण्याची शक्यता असल्याचा संदेश कर्नाटक गृह मंत्रालयाकडून मिळाल्याने राज्यात कमालीची सावधगिरी बाळगण्यात आली आहे. सर्वत्र चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. विमानतळ, रेल्वे स्थानके व इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे. सर्वच पातळ्यांवर कडक तपासणी करण्यात येत आहे. मरूसागर एक्सप्रेसवर हल्ला करण्याच्या दहशतवाद्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर आज (रविवारी) एर्नाकुलमहून जयपूरला जाण्यासाठी निघालेल्या "२९७७ अप' गाडीमागे पुन्हा तपासाचा सिलसिला सुरू झाला. घातपात घडवण्यासाठी अतिरेकी किंवा स्फोटके नेत्रावती एक्सप्रेसमधून गोव्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने "६३४६ अप' गाडीचीही प्रत्येक स्थानकावर तपासणी केली जात आहे. ही गाडी नेहमीच्या वेळापत्रकानुसार पहाटे ४ वाजून ३७ मिनिटांनी कारवार तर त्यानंतर ४.५८ ला काणकोण, ५.५० ला मडगाव, ६.२९ ला करमळी व ७.०१ मिनिटांनी थिवीला पोहोचते. मात्र तपासाच्या गराड्यात ती अडकल्याने तिचे नियोजित वेळापत्रक बिघडले आहे. कोकण रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी सुमारे पाऊण तास उशिराने धावत आहे. गोव्यात वरील चारही स्थानकावर ही गाडी थांबते. त्यामुळे या स्थानकांवर तिची तपासणी होणार असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्रिवेंद्रम ते कुर्ला दरम्यान नेत्रावती तब्बल ४३ स्थानकांवर थांबते. गोव्यातील बेत ऐनवेळी बदलून अतिरेकी अन्य स्थानकांवर उतरण्याची किंवा स्फोटके आणली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व स्थानकांवर नेत्रावतीची तपासणी होईल.
शुक्रवारी जयपूरहून एर्नाकुलमला निघालेली मरूसागर एक्सप्रेस तेथून परतीच्या प्रवासासाठी केरळहून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी जयपूरला जाण्यासाठी रवाना झाली. ही गाडी सोमवारपर्यंत उडविण्याची धमकी अतिरेक्यांनी दिली होती. नियोजित वेळीच जरी ही गाडी सुटली असली तरी तपासणीमुळे तिचे वेळापत्रक कोलमडले आहे. ही गाडी गोव्यात केवळ मडगाव व थिवी या दोनच स्थानकांवर थांबा घेते, तर एर्नाकुलम ते जयपूर प्रवासात ती एकूण २७ स्थानकांवर थांबते.

शिरगावचा लढा आता अस्तित्वासाठी

खाणी पोखरतायत डोंगराला आणि गावकऱ्यांनाही
पणजी, दि. २१ (विशेष प्रतिनिधी) - शिरगावची शेतजमीन नापीक बनली आहे, भर पावसात सुकली आहे शिरगावची आयुर्वेदिक औषधी झर. विहिरीतील पाणी तळाला गेले आहे. शेतजमीन एवढी टणक बनली आहे आहे की, पावसाळा असूनही त्यावरून कोणीही सहज चालून जाऊ शकेल! यावर कळस म्हणजे शिरगाव-मुळगाव हा रस्ताच गायब झाला आहे! या विनाशाला कारणीभूत ठरला आहे तो तेथे हातपाय पसरत चाललेला खाणव्यवसाय. कोणताही धरबंध नाही, खनिजासाठी किती खोलवर पोखरत जावे यावर मर्यादा नाही.अशा स्थितीत हा गाव वाचेल का, त्याचे अस्तित्व राहील का, असा प्रश्न आज तेथील जागरूक लोक डोळ्यांत पाणी आणून विचारत आहेत. डोंगराच्या स्वरूपात असलेले "शिर'तर कापले गेलेच आहे, आता "गाव'तरी राहील का, अशी चिंता शिरगावचे रहिवासी व्यक्त करीत आहेत.
शिरगावचे नाव घेतले की आठवत असते तेथील जागृत देवता श्रीलईराई.आता शिरगावची ही ओळख मागे पडत चालली आहे. याचा अर्थ देवी लईराईचा महिमा कमी झाला असा नाही तर खाण व्यवसायाने हा गाव अक्षरशः गिळंकृत केला आहे. त्यामुळे तेथील मोजक्या जागरूक मंडळींनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आपला गाव वाचविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. तेथील नेमकी समस्या काय आहे, ते समजून घेण्यासाठी "गोवादूत'च्या खास पथकाने शिरगावला भेट दिली. तेथे दिसले ते असहाय्यपणे आपल्या समस्या मांडणारे रहिवासी. एकाकीपणे खाण आणि सरकारशी लढा देत आपले आणि गावाचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपडणारे जीव! जर आताच आम्ही या संकटाशी दोन हात करण्याचे प्रयत्न केले नाहीत तर पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही, अशी कैफियत त्यातील एकाने मांडली तेव्हा त्याच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. खोलवर गेलेल्या खाणीत साचलेले पाणी खाण कंपन्या उपसून गावाला असलेला कथित धोका दूर करण्याचा आभास निर्माण करीत आहेत. प्रत्यक्षात हे पाणी गावच्या भूपातळीखाली आहे. ते उपसल्याने गावातील तळी, विहिरी आणि नाल्यांचे पाणी त्या दिशेला वळले आहे, याकडे लक्ष देण्याची कोणाचीच तयारी नाही. खाणीतील पाणी उपसून ते थेट भूमिगत वाहिन्यांद्वारे नदीत सोडले जात आहे. ही पाण्याची पातळी कमी झाली की गावातील विहिरीही सुकायला लागतात. कधीही न आटलेली आयुर्वेदिक पाण्यासाठी प्रसिद्ध असलेली झर गेले काही महिने भर पावसात कोरडी पडली आहे. बाजूचे माड "शिर'च नष्ट झाल्याने निश्चल आणि निराकार बनले आहेत. ही सारी विदारक कहाणी ऐकून व पाहून कोणाचेही डोके सणसणून जावे. तेथील "कासवाचे पेडाकडील तळे'ही सुकले आहे. सुमारे ४० ते ५० मीटर खोल खोदलेल्या खाणीत साचलेले पाणी पावसाचे नसून, ते गावातील झऱ्यांचे आहे, या गावकऱ्यांच्या दाव्यात बरेच तथ्य असल्याचे तेथे प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर दिसून येते. गावातील अनेक झरे आटले आहेत, पाण्याचे स्रोत सुकले आहेत. विहिरींतील पाण्याची पातळी खाली गेली आहे. असे असताना खाणीत साचलेले पाणी उपसण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा खटाटोप का चालला आहे, या प्रश्नालाही गावकऱ्यांकडे उत्तर आहे. हे पाणी गावासाठी धोका उत्पन्न करीत नाही; पण खाण व्यवसायात मात्र व्यत्यय निर्माण करते आहे.त्यासाठी गरज नसताना ते उपसून गावाला वेठीस धरून वाया घालविले जात आहे! खाणी खोलवर खोदण्यात आल्या असताना बाजूला असलेल्या कठड्याच्या ठिकाणीही खनिज शोधले जात आहे. तेथेही ट्रकांची ये-जा सुरू आहे. हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरील लोणी चाटण्यासारखाच, म्हटला पाहिजे.
शिरगाव ते मुळगावच्या रस्त्याची कथा तर अजबच! हा रस्ता तेथे होता हे सांगूनही खरे वाटणार नाही. कारण तेथेच आज खाण सुरू असून पाण्याचे प्रचंड तळे निर्माण झाले आहे. त्यात रस्ता कधीच गायब झाला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याला याची माहिती नसेल असे कसे म्हणायचे? रहदारीचा रस्ता अशा प्रकारे गडप व्हावा आणि सरकारी यंत्रणेला त्याचा पत्ताही नसावा, हे शक्य आहे काय? एरवी रस्त्याचा एखादा दगड जरी हलवला तरी सामान्य माणसाला वेगळ्या अर्थाने सरकारकडून रस्त्यावर आणले जाते; पण येथे तर खाणीने अख्खा रस्ताच गिळंकृत करूनही कोणावरच कारवाई नाही. अस्नोड्याजवळच्या या खाणीजवळ मोठे तळे निर्माण झाले आहे. त्याजवळच नाला आहे, "पोय'आहे. तेथेही येथील पाणी घुसते आहे. नदीनाले केवळ दूषित होत आहे असे नाही तर तेथे पाण्याबरोबर मातीही वाहत जात असल्याने ते काही महिन्यांनी बुजले तर आश्चर्य वाटायला नको. खाणींनी शिरगाववर आणलेले संकट कसे दूर होऊ शकेल?
शिरगावचे लोक म्हणतात की, खाणमालकांनी आता आम्हाला पोखरणे बंद करावे! माती मिळावी म्हणून गावाला ते किती खोलवर खोदणार आहेत? त्यासाठी कोणतेच नियम-कायदे नाहीत का? यावर कोणाचेच नियंत्रण नाही का? मन मानेल तसे डोंगर कापायला, बिनकामाची माती माथ्यावर टाकायला संमती कोण देतो? ही माती गावावर कोसळली तर? पाणी साचून बनलेल्या तळ्याचा कठडाही आता का पोखरला जात आहे? मात्र पाण्यामुळे तळ्याचा बांध फुटून पाणी खाली गावात घुसण्याची भीती घालून वास्तवाचा विपर्यास केला जात असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच, शिरगावचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. जेथे पाणी नाही, आरोग्य नाही अथवा शेतजमीन सुपीक नाही, तो कसला गाव म्हणायचा? याच तीन बाबी तर कोणत्याही गावाची लक्षणे आहेत. तीच जेथे नाहीत, त्या शिरगावचे भवितव्य काय? याचे उत्तर कोण देऊ शकेल?

अभिषेकी संगीत संमेलनात रंगले कलेचे वारकरी!

पणजी, दि. २१ (सांस्कृतिक प्रतिनिधी) - पणजीत कला अकादमीतील पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव या दोन दिवशीय स्वरयज्ञाची किराणा घराण्याच्या गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने आज सांगता झाली. तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान व कला अकादमी यांनी आयोजित केलेल्या या कला महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील १६ दिग्गज गायक व वादकांनी सहभाग घेतला होता.
आजच्या पहिल्या सत्राची सुरुवात रेवती कामत, नीला भागवत,अजित कडकडे यांच्या गायनाने व रविंद्र च्यारी यांच्या सतार वादनाने झाली. कडकडे यांनी आपल्या गायकीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. दुसऱ्या सत्रात महेश काळे, पं. कमलाकर नाईक, डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन झाले तर शीतल कोलवाळकर व कावेरी आगाशे यांनी कथ्थक नृत्य सादर करून उपस्थितांची वाहव्वा मिळविली.
२००१ सालापासून अमेरिकेत राहूनही अभिषेकी बुवांकडून घेतलेले संगीत शिक्षण स्वतःमध्ये जपून त्याचा देश विदेशात प्रसार करणारे महेश काळे यांनी आपल्या गायनाने अभिषेकीबुवांच्या भावविश्व गायनाचे दर्शन घडविले. यावेळी ते म्हणाले की, अभिषेकीबुवांनी शिकवलेले संगीत बुवांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गाणे आणि श्रोत्यांना ते आवडणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. बुवांनी तयार केलेली गाणी कुणीही गायिली तरी ती सुंदरच वाटणार असे अभिमानपूर्वक त्यांनी नमूद केले. त्यांनी गायिलेल्या "अभीर गुलाल उधळीत रंग' अभंगाला श्रोत्यांनी डोक्यावर घेतले.
पं. जितेंद्र अभिषेकी हे एक गुणी कलाकार होते. अशा कलाकाराच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या संमेलनात आपली सेवा रुजू झालीच पाहिजे असे डॉ. प्रभा अत्रे विनम्रपणे म्हणाल्या. म्हणूनच या संमेलनात सहभागी होण्यास आपल्याला आनंद होत असल्याचे त्या म्हणाल्या.
समारोपाच्या सत्रात पं. अभिषेकीबुवांचे सुपुत्र शौनक अभिषेकी म्हणाले की, या संमेलनात बाबांचे अस्तित्व जाणवते. बाबांनी गोव्यावर मनापासून प्रेम केले होते. आणि आपल्या मायभूमीवर प्रेम करायला आम्हालाही शिकविले. म्हणूनच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या या संमेलनाला उदंड प्रतिसाद लाभतो आणि तो असाच सदोदित मिळत रहावा अशी त्यांनी सदिच्छा व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, संताप्रमाणेच कलाकारही अथक तपश्चर्या करीत असतो आणि म्हणूनच तो नावरुपाला येतो. गोव्याच्या या भूमीत होणाऱ्या या संमेलनात कलेचे वारकरी यावेत आणि आषाढी एकादशीप्रमाणे हे संमेलन गजबजून जावे.
कार्यक्रमाच्या आजच्या पहिल्या सत्रात पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या जन्मदिनाप्रीत्यर्थ त्यांच्या प्रतिमेला अजित कडकडे व त्यांच्या अन्य शिष्यांनी पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन डॉ.अजय वैद्य यांनी ओघवत्या शैलीत केले तर कला अकादमीचे कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ. गोविंद काळे यांनी ऋणनिर्देश केला.

इस्लामाबाद हॉटेलातील मृतांची संख्या ६०

इस्लामाबाद, दि. २१ - येथील पंचतारांकित मेरियट हॉटेलमध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत्यांची संख्या ६० वर गेली असून, जखमींची संख्या २०० असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या स्फोटप्रकरणी माहिती देणाऱ्यास पाक सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
दशहतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना, पंतप्रधान गिलानी यांनी दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. अमेरिका आणि भारतानेही या हल्ल्याचा निषेध केला आहे.

विद्यार्थी प्रतिनिधी पळविण्यासाठी कॉंग्रेसकडून पोलिसांचा वापर

भाजयुमोचा गंभीर आरोप
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) - गोवा विद्यापीठात विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी विभागाचा विजय निश्चित असल्याने चलबिचल झालेल्या कॉंग्रेस पक्षाने भाजपच्या विद्यार्थी विभागाकडे असलेल्या विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधींचे अपहरण करण्याची सुपारी म्हापशाचे पोलिस निरीक्षक सी.एल.पाटील यांना दिल्याचा आरोप आज "भाजयुमो'चे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी केला. ही सुपारी दक्षिण गोव्यातील कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ राजकीय व्यक्तीने दिल्याचे ते पुढे म्हणाले. एकूण ४० विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधींपैकी, २१ प्रतिनिधी आपल्याकडे असल्याचा दावा भाजप विद्यार्थी विभागाने केला आहे.
दि. २४ सप्टेंबर रोजी विद्यापीठात विद्यार्थी मंडळाची निवडणूक होणार असल्याने या निवडणुकीत भाजपयुमोचा विद्यार्थी विभाग आणि कॉंग्रेस पक्षाशी सलग्न असलेली एनएसयुआय रिंगणात उतरलेली आहे. गोव्यातील विद्यार्थ्यासमोर असलेले प्रश्न आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काय जबाबदारी असते, याचे प्रशिक्षण देण्यासाठी विद्यार्थी विभागाने म्हापसा येथील आत्माराम हॉटेलमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला उपस्थित राहण्यासाठी काही प्रतिनिधींनी आजच याठिकाणी उपस्थिती लावली. याची माहिती मिळताच कॉंग्रेसच्या नेत्यांनी या प्रतिनिधींना उचलण्यासाठी राजकीय दबाव वापरून थेट म्हापसा पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांशी संपर्क साधला. त्यामुळे सायंकाळी ५ च्या दरम्यान निरीक्षक पाटील आपल्या काही शिपायांना घेऊन या हॉटेलवर पोचले. दोघे तरुण बेपत्ता असल्याने आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी आलो आहोत, असे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ज्या दोघा तरुणांना ते शोधत होते, त्यांना भेटण्यासाठी त्यांना देण्यात आले. यावेळी त्या दोघा प्रतिनिधींना आम्ही बेपत्ता नसून घरी सांगूनच या शिबिराला आलो आहोत, असे त्यांना लेखी लिहून दिले, त्यामुळे ते माघारी फिरले. मात्र यात कॉंग्रेसचे समाधान झाले नाही. त्यामुळे एनएसयुआयचे निमंत्रक सुनील कवठणकर व केपे पालिकेचे दयेश नामक नगरसेवक पोलिस स्थानकावर हजर झाले. यावेळी निरीक्षक पाटील यांना त्या विद्यार्थ्यांना दूरध्वनी करून पोलिस स्थानकावर तुमचे पालक आल्याचे सांगितले. परंतु, यावेळी खातरजमा करण्यासाठी ते पोलिस स्थानकावर आले असता, त्याठिकाणी पालक नसून कॉंग्रेसचे सुनील व दयेश बसल्याचे आढळून आले. त्यामुळे कॉग्रेस पक्ष पोलिस यंत्रणा वापरून विद्यार्थ्यांना धमकावण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप श्री. शिरोडकर यांनी केला आहे. पोलिसांनी विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू नये, तो हस्तक्षेप विद्यार्थी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी आणखी तीन जण अटकेत

नवी दिल्ली, दि.२१ - दिल्ली बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी आज आणखी तीन जणांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
याबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तीन अतिरेक्यांची नावे झिया-उर्र-रहमान, शकील आणि शाकीब अशी आहेत. या तिघांनाही आज दक्षिण दिल्लीतून अटक करण्यात आली. यापैकी झिया आणि शकील हे २६ जुलैच्या अहमदाबाद स्फोट मालिकेच्या कटात सहभागी होते. या स्फोटात ५५ लोक दगावले होते.
यापूर्वी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. आजच्या अटकेनंतर स्फोट प्रकरणी पोलिसांच्या हाती लागलेल्या अतिरेक्यांची संख्या पाच झाली आहे.
विध्वंसक प्रवृत्ती
अहमदाबाद, दिल्ली आदी ठिकाणी स्फोट घडवून आणणाऱ्यांपैकी आतिफ हा मुख्यत्वेकरून अहमदाबाद स्फोटाचा मास्टरमार्टंड होता. झिया याने सेंट्रल पार्कमध्ये बॉम्ब ठेवला होता तर शकीलने करोलबाग येथे बॉम्ब ठेवला होता. झिया आणि शकील यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. शकील हा एम.ए.चा विद्यार्थी होता तर शाकीब हा एम.बी.ए.चा विद्यार्थी होता. दिल्लीत त्यांना नेहरू प्लेस येथेही स्फोट घडवून आणायचा होता. मुळातच त्यांना सातत्याने देशात कुठेतरी अशा घातपाती कारवाया सुरूच राहाव्या, असे वाटत होते. देशात बॉम्बस्फोट झाल्यानंतर सर्व जग हळहळत असताना हे विध्वंसक लोक याचा आनंद साजरा करीत असत. यावरून त्यांची प्रवृत्ती किती भयंकर होती, हे लक्षात येते.

Sunday, 21 September, 2008

कायद्यांची माहिती आता संकेतस्थळावर
देशातील पहिले इ-कायदा ग्रंथालय; बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाला बहुमान

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - देशातील पहिली आयटी /इ- कायदा वाचनालय योजना राबवण्याचा मान "बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा'ने मिळवला आहे. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील परिषदगृहात या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेव्दारे आता विविध कायद्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
आज झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी, देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऍड.राजेंद्र रघुवंशी, महाराष्ट्र आणि गोवा बार काऊ न्सिलचे अध्यक्ष राजीव पाटील, उपाध्यक्ष जयंत वैभव, सदस्य आंतोनियो लोबो, गोव्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक, गोवा उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. जयंत मुळगावकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री कामत यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाल. याप्रसंगी ते म्हणाले, "महाराष्ट्र व गोवा बार काऊन्सिल'ची गेल्या कित्येक वर्षांची स्वतंत्र कार्यालयाची मागणी पूर्ण करण्यात येणार असून उच्च न्यायालयासमोरील इमारतीचा ताबा पुढील महिन्यात त्यांना देण्यात येणार आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर कायदा क्षेत्रातही करून सामान्य नागरिकांना तात्काळ व जलद न्याय मिळण्यास मदत करावी.
न्यायमूर्ती श्री. धर्माधिकारी यांनी, सामान्य याचिकादारांना न्याय मिळवून देण्यात वकिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. जयंत वैभव यांनी या इ-कायदा वाचनालयाची माहिती देताना त्याचा लाभ महाराष्ट्र व गोवा मिळून एकूण ३८० बार संघटनांना होणार असल्याचे सांगितले. या योजनेअंतर्गत एकूण ७ "सॉफ्टवेअर'चा वापर करण्यात आला आहे. त्यात "एआयआर'कडून १९५० नंतरचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निवाडे, १९७५ नंतरचे उच्च न्यायालयाचे निवाडे व १९६५ नंतरचे फौजदारी निवाडे उपलब्ध होतील."बीसीआर'तर्फे १९०१ पासूनचे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्व निवाडे उपलब्ध होतील. मुंबई उच्च न्यायालयातील निवाडे सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती यावेळी मिळणार आहे तसेच १९५० नंतरचे मुंबई उच्च न्यायालयाचे फौजदारी निवाडे पाहायला मिळणार आहेत तसेच महाराष्ट्राचे सर्व स्थानिक कायदेही एका सिडीच्या रूपांत उपलब्ध होणार असेही यावेळी श्री.वैभव यांनी सांगितले. या संकेतस्थळावर ४१ कायद्यांच्या संकेतस्थळांचा समावेश असून इंटरनेटच्या माध्यमाने त्याचे सर्फिंग करणे शक्य होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत गोव्यातील एकूण १२ बार संघटनांना संगणक व इतर आवश्यक सामान पुरवण्यात येणार असून त्यांनी येत्या ३० सप्टेंबरपूर्वी ही यंत्रणा आपापल्या कार्यालयात कार्यन्वित करावी, असे आवाहनही करण्यात आले.
रघुवंशी यांनी देशातील सर्व कायदा महाविद्यालयांसाठी संगणक शिक्षण सक्तीचे केले जाईल, अशी घोषणा केली. विविध सत्र न्यायालयांची अवस्था अत्यंत बिकट असून न्यायालयीन क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री कामत यांच्या हस्ते सर्व तालुका बार काऊन्सिलकडे वाचनालय सामग्री वितरित करण्यात आली.ऍडव्होकेट सुबोध कंटक यांनी आपले विचार मांडले. ऍड.सचिन देसाई यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. मुळगावकर यांनी आभार प्रकट केले.
लाखभराचे दागिने
मडगावात लंपास

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी) - आठवडाभराच्या विश्रांतीनंतर चोरट्यांनी काल दिवसाढवळ्या मडगावातील एका घरातून लाखभराचा ऐवज पळवून पोलिसांना हिसका दाखवला.
बोर्डा मडगाव येथील पिया फर्नांडिस यांच्या घरातून चोरट्यांनी २ सोनसाखळ्या , ४ कर्णफुले, दोन अंगठ्या ,मंगळसूत्र व इतर वस्तू मिळून साधारण लाखभराचा ऐवज पळविला. काल सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिस उपनिरिक्षक नीलेश धायमोडकर यांनी पंचनामा केला.
पिया या पेशाने वकील आहेत. काल दुपारी घराबाहेर पडल्या. त्यानंतर
दुपारी २-३० वाजता घरी आलेल्या कुटुंबातील सदस्याला घराचा दरवाजा उघडा पाहून संशय आला. त्याने आत जाऊन पाहिले असता कपाट उघडे व आतील दागिने नाहीसे झाल्याचे त्याला दिसले. त्यावरून चोरीचा अंदाज आला. हे काम माहितगाराचे असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास सुरू आहे.
दिल्ली स्फोट मालिका
सैफ, झीशानचा घातपातामध्ये हात
गुन्ह्याची कबुली दिल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा
चौदा दिवसांची पोलिस कोठडी
सैफने पेरला होता रीगल सिनेमाजवळ बॉम्ब

राजधानी दिल्लीतील जामिया नगर भागामध्ये शुक्रवारी अतिरेक्यांशी उडालेल्या चकमकीनंतर सैफ आणि झीशान नामक दोन संशयित अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही दिल्लीतील स्फोट मालिकेमध्ये आपला हात असल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी गुन्हा कबूल केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तीस हजारी न्यायालयाने या दोघांचीही चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. कॅनॉट प्लेस भागातील रीगल सिनेमाजवळ स्फोटके पेरणारा अतिरेकी सैफ हाच होता, असेही तपासातून समोर आले असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
""दिल्लीत नुकत्याच झालेल्या स्फोट मालिकेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आतिफचा झीशान हा निकटचा सहकारी आहे. त्याला काल रात्री एका वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमधून पोलिसांनी अटक केली. झीशान हा अतिरेक्यांच्या वतीने त्यांची भूमिका मांडण्याच्या हेतूने वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये जात असल्याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही त्याला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतलेले आहे. या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. दिल्लीत दोन ठिकाणी स्फोटके पेरल्याची कबुली त्यांनी दिलेली आहे''अशी माहिती एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
"दिल्लीतील जामियानगर भागात अतिरेक्यांशी काल मोठी चकमक उडाली होती. या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले होते, तर दोन अतिरेकी पळून गेले होते. या पळालेल्या दोन अतिरेक्यांपैकीच एक हा झीशान आहे काय,' असा प्रश्न केला असता पोलिस अधिकारी म्हणाला की, मी आताच याक्षणी याविषयी जास्त खोलातील माहिती देऊ शकणार नाही. पळून गेलेल्या दोन अतिरेक्यांपैकीच एक कदाचित तो असूही शकतो. अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या संशयिताचे नाव मोहम्मद सैफ असे आहे. या दोघांचीही कसून चौकशी केली जाणार आहे.
""दिल्ली स्फोट मालिकेत आपला हात असल्याच्या गुन्ह्याची कबुली सैफने दिलेली आहे. कॅनॉट प्लेसमधील रीगल सिनेमाजवळ सैफनेच स्फोटके पेरली होती. मात्र, या स्फोटकांविषयीची तात्काळ माहिती मिळताच ती निकामी करण्यात आली होती. दोन-दोनच्या गटांमध्ये जाऊन दिल्लीत वेगवेगळ्या स्थानी स्फोटक पेरण्यात आली होती,''असाही दावा दिल्ली पोलिसांनी केलेला आहे.
...........

सैफ, आतिफ, साजीद तिघेही उच्चभ्रू कुटुंबातील
"सैफ दिल्लीला कॉम्प्युटर शिकायला गेला होता'
सपा नेते असलेल्या वडिलांचा दावा

नवी दिल्ली, २०
""मी जेव्हा माझ्या मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला त्याचा मोबाईल बंद असल्याचे कळले. तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काही तरी निश्चित गडबड झाली असावी; अन्यथा त्याचा फोन बंद राहिलाच नसता, असे विचार माझ्या मनात आलेत. सैफ हा दिल्लीला कॉम्प्युटर शिकण्यासाठी गेला होता. इंग्लिश शिकण्याचा अभ्यासक्रमही त्याने लावलेला होता''असा दावा सपा नेते शादाब अहमद यांनी व्यक्त केला आहे. शादाब अहमद हे आझमगढच्या संजरपूरमधील सराई मीर येथील समाजवादी पार्टीचे उपाध्यक्ष आहेत. दिल्लीतील जामिया नगर भागामध्ये उडालेल्या चकमकीत जखमी झालेल्या व नंतर अटक करण्यात आलेल्या मोहम्मद सैफचे ते वडील आहेत. या चकमकीत सैफचा "रूम पार्टनर' असलेला आतिफ हा अतिरेकी मारला गेला होता. या चकमकीत आतिफसोबत मारल्या गेलेल्या आणखी एका अतिरेक्याचे नाव साजीद असे होते. साजीद हा देखील संजरपूरचाच रहिवासी होता. हे तिघेही एकमेकांचे चांगले मित्र होते व विशेष म्हणजे, हे तिघेही उच्चभ्रू कुटुंबातील होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
""सैफ हा सपा नेत्याचा मुलगा आहे. साजीद हा भदोहीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा पुतण्या होता, तर आतिफचे वडील हे मूळचे महाराष्ट्रातील भिवंडीचे आहेत. त्यांचा हातमागाचा व्यवसाय आहे. म्हणजे हे तिघेही उच्चभ्रू कुटुंबातील होते. गेल्या दोन वर्षांपासून ते दिल्लीत राहात होते,''अशी माहिती उत्तरप्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस)पोलिस उपमहानिरीक्षक राजीव कृष्ण यांनी दिली.
सपा नेते शादाब अहमद यांनी आपल्या मुलाला अटक झाली असल्याची माहिती टीव्हीवरून मिळाली. वास्तविक, उत्तरप्रदेश गृहमंत्रालय, पोलिस महासंचालक मुख्यालय, उत्तरप्रदेश दहशतवादविरोधी पथक आणि आझमगढ पोलिस या सर्वांनी "आम्हाला दिल्ली पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही,'असेे म्हटले आहे.
""दिल्लीत चकमक झाल्याची माहिती मिळताच व यामध्ये उत्तरप्रदेशातील अतिरेक्यांचा सहभाग असल्याचे कळताच आम्ही तात्काळ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाशी संपर्क साधला होता. मात्र, सपा नेते असलेल्या सैफच्या वडिलांनी "आपला मुलगा कॉम्प्युटर शिकण्यासाठी दिल्लीला गेला होता. मात्र, तेथे त्याने त्याऐवजी इंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम लावला. आपण त्याच्याशी कालच फोनवरून गुरुवारीच बोललो होतो,' असा दावा केला,''अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बृजलाल यांनी दिली
अहमद यांचा पोलिसांवर आरोप
""पोलिस फक्त शिकलेल्या मुलांनाच लक्ष्य बनवित आहेत. माझ्या मुलाने परीक्षेला प्रायव्हेट बसून पूर्वांचल विद्यापीठातून एम. ए. ची पदवी घेतली होती. तो पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेला होता. आतिफ आणि साजीद या दोघांनाही मी चांगल्यारितीने ओळखत होतो. ते दोघेही शाळेपासूनचे मित्र होते. माझी दोन मुले सौदी अरेबियामध्ये स्थायिक झालेली आहेत, तर अन्य एक मुलगा लखनौमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे,'' असे अहमद यांनी सांगितले.
"मरूसागर'ची गोव्यात कसून तपासणी
खास सुरक्षेसह गाडी एर्नाकुलमला रवाना

पणजी, दि. २० (विशेष प्रतिनिधी) - अतिरेक्यांकडून बॉंबने उडवून देण्याची धमकी मिळालेली जयपूर एर्नाकुलम ही "मरूसागर एक्सप्रेस' आज सायंकाळी तब्बल दोन तास उशीरा गोव्यात दाखल झाली. थिवी रेलस्थानकावर दाखल होताच गोव्यातील सुरक्षा यंत्रणांनी गाडीचा ताबा घेत तिची कसून तपासणी केली. पुढे मडगाव स्थानकावरही सुरक्षा यंत्रणांनी तिची पुन्हा झडती घेतली. यावेळी बॉंब निकामी पथक तसेच श्वानपथकाचाही वापर करण्यात आला. या मोहिमेत असंख्य सुरक्षाकर्मींनी भाग घेतला. मडगावहून कारवारकडे जाण्यासाठी नंतर गोवा पोलिसांकडून तिला विशेष सुरक्षा कवचही पुरवण्यात आले.
मरूसागर एक्सप्रेस बॉम्बने उडवून देण्याच्या अतिरेक्यांनी दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जयपूरहून निघालेल्या २९७७ डाऊन या गाडीची कडेकोट विविध स्थानकांवर तपासणी करण्यात आली गेली. ही तपासणी सदर गाडी शेवटच्या स्थानकावर (एर्नाकुलम) पोचेपर्यंत सुरूच राहाणार आहे. परिणामी या गाडीचे नियोजित वेळापत्रक कोलमडले असून ती सुमारे दोन तास विलंबाने धावत आहे. अतिरेक्यांच्या धमकीमुळे ही गाडी नियोजित स्थानकावर पोहोचेपर्यंत तिला कायम कडक सुरक्षा कवच पुरवले जाणार आहे.
आज या गाडीची सकाळी महाराष्ट्रात वसई व पनवेल या स्थानकांवर तर तेथून पुढे वीर आणि रत्नागिरी स्थानकावर तपासणी झाली. तत्पूर्वी सकाळी ५ वाजता पोचणाऱ्या या गाडीने आज सकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी पनवेल स्थानक गाठले व सुरक्षा यंत्रणेने हिरवा कंदील दाखविल्यानंतर तिने ६ वाजून ५ मिनिटांनी पवनेल स्थानक सोडले.
पनवेल रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीच्या तपासणीसाठी पोलिस, राखीव पोलिस दलाचे जवान, अधिकारी मिळून सुमारे पंचावन्न सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मरूसागरची तपासणी केली. त्यानंतर राखीव पोलिस दलाचा एक अधिकारी व त्यांच्या नेतृत्वाखालील ९ अन्य सुरक्षा रक्षकांनी या गाडीला चिपळूण पर्यंत सुरक्षा कवच पुरविले. तेथून पुढे चिपळूणच्या पोलिसांनी या गाडीला सुरक्षा पुरवली. पोलिस संरक्षणातच ही गाडी गोव्यात दाखल झाली.
गोव्यात थिवी तसेच मडगाव स्थानकांवर बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वानपथक काल रात्रीपासूनच डेरेदाखल झाले होते. थिवीला ही गाडी केवळ दोन मिनिटे थांबा घेते. तथापि, तेथे तिची कसून तपासणी झाली. तेथून उत्तर गोवा पोलिसांच्या संरक्षणात ती मडगाव स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिरा अर्थात दुपारी ३.३० वाजता दाखल झाली. त्यानंतर पुन्हा या गाडीची तपासणी झाली. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता गाडीला मडगाव स्थानक गाठण्यास विलंब झाल्याची माहिती त्यांनी दिली.
या गाडीच्या प्रत्येक डब्याची श्वानपथकाच्या साहाय्याने कसून तपासणी केली जात आहे. मडगाव स्थानकावर गाडीच्या तपासणीसाठी मडगाव शहर पोलिसांबरोबच पणजी, मायणा कुडतरी, रेल्वे पोलिस व राखीव पोलिस दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तब्बल वीस पंचवीस मिनिटे तपासणी केल्यावर गाडी पुढच्या मार्गाला लागली.
कर्नाटकातील पहिले स्थानक गाठेपर्यंत गाडीला गोवा पोलिसांकडून सुरक्षाकवच पुरविण्यात आले होते. कर्नाटक पोलिसांनी गाडीची तपासणी त्यांच्या हद्दीत सुरू केल्यावर व त्यांचा एस्कॉर्ट या गाडीला पुढच्या प्रवासासाठी लाभल्यावर गोव्याचे पथक माघारी परतले. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीने संध्याकाळी ५ च्या दरम्यान कारवार गाठले होते.
दरम्यान, गोव्यात रेल्वे स्थानकावर सुरक्षा यंत्रणांनी कमालीची दक्षता बाळगली आहे. मरूसागर उडविण्याची धमकी दिली असली तरी इतर गाड्यांबाबतही जोखीम न पत्करता कडेकोट सुरक्षा येथील रेल्वे स्थानकांवर ठेवण्यात आली आहे. विविध गाड्यांमधून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या सामानाचीही कसून तपासणी केली जात आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. २९७७ डाऊन हीच गाडी २९७८ अप बनून उद्या (रविवारी) एर्नाकुलमहून जयपूरला जाण्यासाठी निघेल. त्यावेळीही पुन्हा या गाडीची अशीच कसून तपासणी केली जाणार आहे.
मेगा प्रकल्पविरोधात
कवळ्यातही वणवा
खवळलेल्या जमावाने काम बंद पाडले
फोंडा, दि. २० (प्रतिनिधी) - कवळे पंचायत क्षेत्रातील ढवळी येथे एका कंपनीतर्फे मोठा निवासी प्रकल्प उभारण्याच्या कामाला आज (दि.२०) दुपारी प्रारंभ केल्याने लोकांत खळबळ माजली आहे. शनिवार या सरकारी सुट्टीच्या दिवशीचे निमित्त साधून पोकलीनच्या साहाय्याने खोदकामास सुरुवात झाल्यानंतर संतप्त जमावाने ते काम बंद पाडले. या प्रकल्पाबाबत आम्हाला सविस्तर माहिती द्या व नंतरच काम हाती घ्या, असे लोकांनी संबंधितांना खडसावले.
ढवळी येथील हजारो चौरस मीटर जागा एका कंपनीने विकत घेतली आहे. तेथे निवासी प्रकल्प उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. त्या जागेभोवती पत्र्यांचे कुंपण उभारण्यात आले आहे. ढवळी भागात साधनसुविधा न वाढविता मोठा प्रकल्प उभा राहिल्यास स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल, अशी माहिती स्थानिकांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
या प्रकल्पाला सरकारी मान्यता घेण्यात आल्याची माहिती स्थानिकांना देण्यात आली आहे. सदर प्रकल्पाला सरकारी यंत्रणा, पंचायत यांनी मान्यता दिली असेल तर तेथे आवश्यक फलक, बांधकामाचा कच्चा आराखडा का लावण्यात आला नाही , असा प्रश्न स्थानिकांनी संबंधितांना केला. या प्रश्नांना संबंधित मंडळी समर्पक उत्तर देऊ शकली नाहीत. तसेच शनिवार या सुट्टीच्या दिवशी कामाला सुरुवात करण्यात आल्याने लोकांनी त्यांना धारेवर धरले. त्यानंतर लोकांनी, पोकलीनच्या साहाय्याने सुरू केलेले काम बंद करण्याची सूचना केली. स्थानिक पंच सत्वशिला नाईक यांना घटनास्थळी बोलावून घेऊन स्थानिकांनी प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांना सदर प्रकल्पाची सविस्तर माहिती देऊन पुढील कृती करावी अन्यथा लोकांना प्रकल्पाबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. सदर ठिकाणी खोदकाम करण्यासाठी आणण्यात आलेल्या पोकलीनला नोंदणी क्रमांक नसल्याने स्थानिकांनी त्यास आक्षेप घेतला होता. सदर पोकलीन कंपनीतीलच असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी कवळे पंचायत, नगरनियोजन व इतरांना निवेदने सादर करण्याची तयारी स्थानिकांनी सुरू केली आहे.