Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 16 October, 2010

राष्ट्रकुलमधील भ्रष्टाचार चौकशीला तोंड फुटले

भाजपने दंड थोपटले
नवी दिल्ली, दि. १५ : राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप वाजल्यानंतर या स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीला ताबडतोब तोंड फुटले असून आता भारतीय जनता पक्षाने या आयोजनातील गैरव्यवहार, दिरंगाई आणि ढिसाळपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आयोजन समितीचे प्रमुख सुरेश कलमाडींच्या कंपूविरुद्ध दंड थोपटले आहेत.
भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले की, राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप वाजले. आतापर्यंत या स्पर्धा सुरळीत होणे हा मुद्दा देशाच्या प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे आम्ही काहीच बोललो नाही. आता जनतेचे न्यायालय सुरू झाले आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे जनतेने अभिनंदन केले आणि कलमाडींच्या कंपूची खिल्ली उडविली. आता येथून कलमाडी आणि आयोजन समितीला उत्तरे द्यायची आहेत. या खेळाच्या आयोजनात झालेला भ्रष्टाचार, ढिसाळपणा आणि तयारीतील दिरंगाई या सर्व मुद्यांना आम्ही जोरकसपणे उचलून धरणार आहोत.
यापूर्वीही भाजपने हा मुद्दा संसदेत आणि संसदेबाहेरही उचलला होता. पण, स्पर्धा सुरू होताच वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी हा महोत्सव यशस्वी होताना आपल्याला पाहायचा आहे, असे म्हटले होते. त्यामुळे यातील कोणत्याही नकारात्मक मुद्यांविषयी जाहीर चर्चा न करण्याचा अघोषित नियम आम्ही पाळला. देशाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा असल्याने आम्ही हे पथ्य पाळले. पण, आता दसऱ्यानंतर भाजप या सर्व मुद्यांना उचलणार असून केंद्र, दिल्ली सरकार आणि आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना या सर्व मुद्यांचे स्पष्टीकरण मागितले जाईल, असेही जावडेकर म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या चौकशीला सुरूवात
राष्ट्रकुल स्पर्धेच्या काल पार पडलेल्या शानदार समारोप समारंभानंतर लगेचच या स्पर्धेच्या तयारीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीला महालेखाप्रबंधकांनी (कॅग) आज (शुक्रवारी) सुरूवात केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या योजनांसंबंधीच्या आर्थिक विवरणांची तपासणी करण्यासाठी कॅगतर्फे आज वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(सीपीडब्ल्यूडी) सी. पी. मुखर्जी स्टेडियमस्थित कार्यालयात पाठविण्यात आले होते. या योजना पूर्ण करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा, ठेकेदारांना कामाचे देण्यात आलेले पैसे आणि खेळाडूंसाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या व्यवहारांचे अंकेक्षण कॅगतर्फे करण्यात येणार आहे.
"राष्ट्रकुलच्या व्यवहारांच्या चौकशीला आम्ही सीपीडब्ल्यूडीच्या मुखर्जी स्टेडियममधील कार्यालयापासून आज सुरूवात केली आहे. आता खेळाडूंनी सर्व स्टेडियम रिकामे केले असल्याने या सर्व स्टेडियमच्या तपासणीसाठी टप्प्याटप्प्याने तपास अधिकाऱ्यांना पाठविण्यात येतील', असे कॅगच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज येथे सांगितले. स्पर्धेवर करण्यात आलेल्या खर्चाच्या अंकेक्षणाला कॅगने ऑगस्ट महिन्यातच सुरूवात केली होती. मात्र, स्पर्धा जवळ आल्यामुळे अधिकाऱ्यांना स्टेडियम परिसरात जाण्यास परवानगी नसल्याने हे काम सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थांबवण्यात आले होते. या स्पर्धेसाठीचे सगळ्यात मोठे स्टेडियम असलेल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे निरीक्षण होणे बाकी आहे आणि लवकरच याठिकाणीही अधिकारी पाठविण्यात येतील. या स्पर्धेच्या व्यवहारांसंबंधीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या अखेरीस सरकारला सादर केला जाण्याची शक्यता आहे आणि हा अहवाल फेब्रुवारी महिन्यात अंदाजपत्रकीय अधिवेशनादरम्यान संसदेत मांडण्यात येईल.
सत्य बाहेर यावेच : कॉंग्रेस
राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीत झालेल्या तथाकथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. पक्ष या नात्याने कॉंग्रेसचा या स्पर्धेच्या तयारीशी कुठलाही संबंंध नाही. त्यामुळे या सर्व व्यवहारांची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशीच आमची भूमिका आहे, असेही तिवारी यांनी सांगितले. केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. एम. कृष्णा यांनीदेखील राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीतील भ्रष्टाचाराची सरकार सखोल चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.
----------------------------------------------------------------
कलमाडींना दूर ठेवले!
विशेष म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक विजेत्यांना नवी दिल्लीत शुक्रवारी एका दिमाखदार सोहळ्यात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते गौरवण्यात आले; मात्र या कार्यक्रमापासून राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजन समितीचे सर्वेसर्वा सुरेश कलमाडी यांना दूर ठेवण्यात आले होते! एवढेच नव्हे तर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम. कृष्णा यांनीसुद्धा या स्पर्धेतील सर्व गैरव्यवहारांची कसून चौकशी केली जाईल, असा निर्वाळा दिला आहे!

बेकायदा खाणींवर आता उपग्रहाद्वारे नजर ठेवणार

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): राज्यातील बेकायदा खाणींवर आता उपग्रहाद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. सर्व निर्बंध धाब्यावर बसवून गोव्यात फोफावत असलेल्या खनिज उत्खननाची उपग्रहाद्वारे छायाचित्र घेण्यासंदर्भात एक विशेष योजना हाती घेण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या भारतीय खाण ब्यूरोने घेतला आहे.
३१ मार्च २०११मध्ये या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती आज अधिकृत सूत्राने दिली. या उपग्रहाद्वारे कोणत्या ठिकाणी खाण सुरू आहे आणि कुठे उत्खनन केले जाते, याची त्वरित माहिती मिळणार आहे. त्यामुळे बेकायदा खनिज उत्खनन करण्याच्या प्रकारांना चाप बसणार असल्याचा दावाही या सूत्राने केला आहे. "गुगल'वर ज्याप्रकारे एखाद्या परिसराचा संपूर्ण नकाशा पाहिला जाऊ शकतो, त्याच धर्तीवर आता खनिज क्षेत्रावरही नजर ठेवली जाणार आहे.
राज्यातील बेकायदा खनिज उत्खननाच्या विषयावरून गेल्या विधानसभा अधिवेशनात विरोधी भाजपने सरकारच्या विरोधात रान उठवले होते. राज्यात बेकायदा खाण व्यवहाराने उच्छाद मांडला असून राजकीय वरदहस्ताने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचाच गैरवापर होत असल्याचा गौप्यस्फोट यावेळी करण्यात आला होता. या बेकायदा खनिज उत्खननामुळे राज्याला करोडो रुपयांचा तोटा सोसावा लागत असल्याचाही दावाही करण्यात आला होता. देशातील लोह खनिज निर्यातीपैकी ६० टक्के निर्यात ही गोव्यातून होते. गेल्या २००९ साली ५२ दशलक्ष टन लोह खनिज गोव्यातून निर्यात करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.
गोव्यात सुरू असलेल्या या बेकायदा खाणींवरून केंद्रीय खाण मंत्रालयानेही राज्य सरकाराला बरेच फटकारले होते. बेकायदा खाणींचा उच्छाद रोखण्यासाठी राज्य सरकारकडून नेमके काय केले जाईल याचा कृती आराखडा सादर करण्याबरोबर या बेकायदा खाणींवर कोणती कारवाई केली, याचाही प्रत्येक महिन्याला अहवाल सादर करण्याचे आदेशही केंद्रीय खाणमंत्री बी. के. हंडीक यांनी दिले होते. परंतु, त्यावर कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाची मागणी वाढल्याने बेकायदा खाणींना ऊत आला आहे. केंद्रीय मंत्रालयाकडे बेकायदा खाणींबाबत अनेक तक्रारी नोंद झाल्याने आता केंद्र सरकारनेच उपग्रहाद्वारे या खाणीवर नजर ठेवण्याचे काम हाती घेतले आहे.
राज्याचे खाण खाते हे गेली कित्येक वर्षे दिगंबर कामत यांच्याकडे आहे. विधानसभा अधिवेशनात दरवेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्याकडून पुराव्यांसहित या खात्यातील भ्रष्टाचार व गैरकारभाराचा पर्दाफाश झाला आहे. परंतु, सरकारकडून या बाबतीत कोणतीही कारवाई होत नसल्याने या बेकायदा खाण व्यवसायाला अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री कामत यांचाच वरदहस्त लाभलेला आहे, अशीही जाहीर टीका आता होऊ लागली आहे.

स्थानिक चोरांची टोळी कळंगुटमध्ये गजाआड

वाहनांच्या काचा फोडून चोरी करण्यात हातखंडा
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): वाहनाच्या काचा फोडून आतील वस्तू ऐवज करणाऱ्या एका स्थानिक टोळीला कळंगुट पोलिसांनी गजाआड केले असून त्याच्याकडून ४ लॅपटॉप, २ कॅमेरा, ३ मोबाईल व १ आयपॉड हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या रोहन साळगावकर (माडेलवाडा, सांगोल्डा) याला अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून सुमारे २ लाख ४ हजार रुपयांचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणात अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
अधिक माहितीनुसार दि. २४ रोजी बागा - कळंगुट येथे तेजा कामत यांच्या वाहनातून एक मोबाईल व पैशांची पर्स चोरीला गेली होती. वाहनाची काच फोडून ही चोरी करण्यात आली होती. याची तक्रार कळंगुट पोलिस स्थानकात नोंद झाल्यानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली व त्यात एका संशयित तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रोहन साळगावकर याच्या घरावर छापा टाकला असता चोरलेला मोबाईल तसेच, घरात चार लॅपटॉप पोलिसांना आढळून आले. याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने त्याला अटक करून चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने व त्याच्या अन्य साथीदारांनी अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.
हणजूण येथून हजर खोजा याचाही चोरीला गेलेला लॅपटॉप पोलिसांना या टोळीकडे सापडला आहे. परंतु, अन्य दोन लॅपटॉप कोणाचे आहेत, याची माहिती पोलिसांना अद्याप मिळालेली नाही. अटक करण्यात आलेला रोहन हा अट्टल गुन्हेगार असून दोन महिन्यांपूर्वीच तो सडा तुरुंगांतून बाहेर आला आहे. यापूर्वी चोरीच्या प्रकरणात त्याने मेरशीच्या अपना घरमध्येही सहा महिने शिक्षा भोगली आहे, अशी माहिती कळंगुट पोलिसांनी दिली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांच्या "एलआयबी' पथकाने या टोळीला पकडण्यात यश मिळवले. यात पोलिस शिपाई विनय श्रीवास्तव, वामन नाईक व संतोष वेंगुर्लेकर यांनी सहभाग घेतला. या विषयीचा अधिक तपास कळंगुट पोलिस स्थानकाचे हवालदार सूर्यकांत शेटये करीत आहेत.

न्यायालय निबंधकांना बेकायदा पोलिस संरक्षण

उपमहानिरीक्षकांकडे आयरिश यांची तक्रार
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निबंधक आय. के. जैन यांच्या निवासस्थानाला बेकायदा पोलिस संरक्षण पुरविल्याच्या विरोधात ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.
पाटो पणजी येथील सरकारी वसाहतीत राहत असलेल्या निबंधक जैन यांच्या निवासस्थानाला गेले सहा महिने बेकायदेशीररीत्या ४ पोलिस कॉन्स्टेबल व १ हेड कॉन्स्टेबलांचे संरक्षण पुरविण्यात आल्याचा दावा ऍड. रॉड्रिगीस यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
निबंधक जैन यांच्या सुरक्षेसाठी पुरविण्यात आलेल्या पोलिसांना तेथून त्वरित हालवण्याची मागणीही ऍड. रॉड्रिगीस यांनी उपमहानिरीक्षक यादव यांच्याकडे केली आहे. तसेच, पोलिस संरक्षण कसे व कोणत्या आधारावर पुरविण्यात आले याची चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निबंधकांसारख्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानेच कायद्याचे उल्लंघन करावे ही अतिशय दुर्दैवी बाब असल्याचे मत ऍड. रॉड्रिगीस यांनी व्यक्त केले आहे. जैन यांना पुरविण्यात आलेल्या बेकायदा पोलिस संरक्षणावर झालेला खर्च त्यांच्याकडूनच वसूल करून घ्यावा, अशी मागणीही ऍड. रॉड्रिगीस यांनी केली आहे.
नियम तथा प्रक्रियेनुसार ज्या व्यक्तीच्या जीविताला धोका असेल अशाच व्यक्तीला पोलिस संरक्षण पुरविता येते. परंतु, सदर सुरक्षेसाठी गोवा सरकारच्या सुरक्षा परीक्षण मंडळाची मान्यता असते, याकडेही ऍड. रॉड्रिगीस यांनी लक्ष वेधले आहे.

टाटा समूह ठरला सर्वांत मोठे दाता

हार्वर्ड बिझनेस स्कूलला ५ कोटी डॉलर्सची देणगी
बोस्टन, दि. १५ : जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूल या शैक्षणिक संस्थेला भारतातील टाटा समूहाने ५० दशलक्ष अर्थात ५ कोटी डॉलर्सची प्रचंड मोठी देणगी दिली आहे. संस्थेच्या १०२ वर्षांच्या इतिहासात ही सर्वांत मोठी देणगी ठरली असून सर्वांत मोठे दानदाते म्हणून भारतीय टाटा समूहाने मान पटकाविला आहे.
या देणगीतून हार्वर्डच्या वतीने शैक्षणिक संकुलात नव्या इमारतीचे तसेच नव्या वसतिगृहाचे बांधकाम केले जाणार आहे. ५ कोटी डॉलर्स अर्थात २२५ कोटी रुपयांची ही देणगी टाटा कंपनी, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, टाटा शिक्षण आणि विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच महिन्द्रा ऍण्ड महिन्द्रा समूहाचे उपाध्यक्ष आनंद महिन्द्रा यांनी आपल्या मातोश्री इंदिरा महिन्द्रा यांच्या स्मरणार्थ हार्वर्ड विद्यापीठाला १ कोटी डॉलर्सची देणगी दिली होती.

मोदींचे गुजरात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम!

फोर्ब्सने उठवली पसंतीची मोहोर
चेन्नई, अहमदाबाद, बंगलोर
ही वेगवान विकासाची शहरे

वॉशिंग्टन, दि. १५ : भारतातील गुजरात हे राज्य फार मोठी बाजारपेठ असून व्यापारासाठी अतिशय अनुकूल असल्याची पावती फोर्ब्सने आपल्या अहवालात दिली आहे. तसेच जगात सर्वाधिक वेगाने विकास होणाऱ्या शहरांमध्ये भारतातील अहमदाबाद, चेन्नई आणि बंगलोर या तीन प्रमुख शहरांचा उल्लेख असल्याचेही म्हटले आहे.
विविध क्षेत्रातील चढ-उतारांचा विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यास करून अहवाल जाहीर करणाऱ्या फोर्ब्स या मासिकाने आत्तापर्यंत बरेच निष्कर्ष समोर आणले. त्यांनी व्यापार, उद्योग आणि विकास याबाबत अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे. त्यात गुजरात हे भारतातील सर्वाधिक उद्यमशील आणि उद्योगासाठी अनुकूल राज्य असल्याचे म्हटले आहे. भारत आणि आशिया क्षेत्रातील फार मोठी बाजारपेठ या राज्यात असल्याचेही फोर्ब्सचे म्हणणे आहे. या दशकामध्ये न्यूयॉर्क, मुंबई या शहरांचा मोठा विकास झाला आहे. न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, हॉंगकॉंग आणि टोकियो या ग्लोबल शहरांचे अनुकरण चीनमधील चांगकिंग, चिलीमधील सनाटीयागो, टेक्सासमधील ऑस्टीन या शहरांनी सुरू केले आहे. चीनमधील छोट्या शहरांचा विकास आणि तेथील वाहतूक व्यवस्थेमुळे अंतर्गत व्यवसायावर परिणाम होत आहे.
भारतात विकास आराखडा नाही
भारतातील काही शहरांमध्ये विकासाचा आराखडा नसल्यामुळे त्यांना विकास करताना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे फोर्ब्सचे म्हणणे आहे.
भारतातील बंगलोर, अहमदाबाद आणि चेन्नई या शहरांचा मोठा विकास होत आहे. इतर शहरे उद्योग व्यवसाय, सॉफ्टवेअर आणि मनोरंजन या क्षेत्रात आघाडीवर आहेत. आशिया खंडात भारत आणि चीनमध्ये मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे तेथे तयार होणाऱ्या वस्तूंना चांगली किंमत मिळत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Friday, 15 October, 2010

पुन्हा येडियुराप्पाच जिंकले!

विधानसभेत विश्वास प्रस्ताव पारित
आता लक्ष सोमवारच्या निर्णयाकडे

बंगलोर, दि. १४ : देशाच्या इतिहासात प्रथमच चार दिवसांच्या कालावधीत दोन वेळा विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्याचा प्रकार कर्नाटकमध्ये घडला. पण, या दोन्ही वेळी विश्वास मत जिंकून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील येडियुराप्पा सरकारने आपले बहुमत सिद्ध केले आणि बंडखोरांसह विरोधी पक्षांना सपशेल तोंडघशी पाडले. असे असले तरी येत्या सोमवारी १६ अपात्र आमदारांविषयी उच्च न्यायालयातून येणाऱ्या निर्णयावर सरकारचे पुढील भवितव्य अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
आज सलग दुसऱ्यांदा येडियुराप्पांना विधानसभेत विश्वास मताला सामोरे जावे लागले. पण, त्यांनी व्यक्त केलेल्या आत्मविश्वासानुसार आजचाही दिवस त्यांच्याच नावे लिहिला गेला. आज सभागृहाचे कामकाज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सुरू झाले. तेव्हा लगेचच मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी विश्वास मताचा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवला. आज विधानसभेत २०६ सदस्य उपस्थित होते. त्यात सत्ताधारी भाजपला १०६ मते मिळाली, तर १०० जणांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. सत्ताधारी पक्षाला मतदान करण्यात भाजपच्या १०५ आमदारांसह एका अपक्ष आमदाराचा समावेश होता. विश्वास मताच्या विरोधात कॉंग्रेसचे ७३ आणि जद(एस)च्या २७ आमदारांनी मतदान केले. सोमवारी सरकारच्या विरोधात मतदान करणाऱ्या एका अपक्ष आमदाराने आज सरकारच्या बाजूने मतदान केले, हे विशेष. भाजपचे मानप्पा वज्जल आणि जद(एस)चे एम. सी. अश्वथ हे दोघेही अनुपस्थित राहिले. येडियुराप्पा सरकारने विश्वासमत जिंकताक्षणीच अध्यक्ष के. पी. बोपय्या यांनी विधानसभा अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्याची घोषणा केली.
दरम्यान, आज येडियुराप्पांना विश्वासमत मिळाले असले तरी अंतिम निर्णय सोमवारीच होणार आहे. कारण १६ अपात्र आमदारांच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालय सोमवारीच सुनावणी करणार आहे. त्याच दिवशी त्यांच्या अपात्रतेच्या निर्णयासोबतच सरकारच्या भवितव्याबाबतही काही संकेत मिळू शकणार आहेत.
राज्यपालांची भेट घेतली
मागील सोमवारपासून मुख्यमंत्री आपल्याला भेटलेलेच नाहीत, अशी राज्यपाल भारद्वाज यांची तक्रार दूर करीत येडियुराप्पांनी विश्वास मत मिळविल्यानंतर लगेचच त्यांची भेट घेतली. मागील सोमवारी येडियुराप्पांनी प्रचंड गदारोळात विश्वास मत मिळविले होते. त्यावेळी विधानसभेत बराच गोंधळही झाला होता. मार्शलवर हल्ले झाले, पोलिसांना सभागृहात पाचारण करावे लागले होते. यावेळी मात्र येडियुराप्पांनी पोलिसांना सभागृहाबाहेर तैनात राहण्यास सांगितले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भाजप गोटात जल्लोष
दोनच दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी गुजरात महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसला सपशेल धूळ चारल्यामुळे भाजप गोटात अपूर्व उत्साह पसरला होता. आज कर्नाटकातील भाजप सरकार उलथून पाडण्याचे विरोधी पक्ष आणि राज्यपालांचे प्रयत्न हाणून पाडीत येडियुराप्पांनी पुन्हा एकदा विश्वास मत जिंकल्याने भाजपच्या गोटात तुफान जल्लोषाचे वातावरण होते. दिल्लीसह संपूर्ण देशातील भाजप कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा हा विजय जल्लोषात साजरा केला.

विधासभाध्यक्षांनी भाजपने विश्वासमत जिंकल्याचे जाहीर करताच सत्ताधारी सदस्यांनी जल्लोष करीत निकालाचे स्वागत केले. सर्व मंत्री येडियुराप्पांजवळ आले आणि त्यांचे अभिनंदन केले. एकमेकांचे तोंड गोड करून आनंद साजरा करण्यात आला.
तरीही आमचाच विजय निश्चित : भाजप
येडियुराप्पांच्या आजच्या विश्वास मताच्या विजयावर सोमवारच्या उच्च न्यायालयाच्या निकालाचे सावट कायम असल्याचे बोलले जात असतानाच भारतीय जनता पक्षाने, कोर्टाकडून अपक्ष आमदारांना मतदानाची परवानगी मिळाली तरी आम्हीच विजयी ठरू, असा विश्वास व्यक्त केला आहे. सोबतच राज्यपाल भारद्वाज हे कॉंग्रेसचे एजंट म्हणून काम करीत असल्याच्या आरोपाचाही पुनरुच्चार केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी म्हणाले की, आम्ही पुन्हा सत्तेत आलो. हा क्षण कर्नाटक आणि भाजपसाठीही ऐतिहासिक आहे. १६ जणांना अपात्र ठरविल्यानंतर सभागृहाची सदस्यसंख्या २०८ उरली आहे. त्यांपैकी भाजप सरकारला १०६ मते मिळाली आहेत. म्हणजेच त्यांनी १०४ चा "जादूई' आकडा पार केला आहे. आता अपात्र आमदारांपैकी अपक्षांना हायकोर्टाने सोमवारी मतदानाची परवानगी दिली तरीही राज्यात भाजपचे बहुमत सिद्धच असल्याचे रूडी यांनी स्पष्ट केले.
सोबतच कॉंग्रेसचे एजंट म्हणून राज्यात काम करणाऱ्या राज्यपाल भारद्वाज यांना केंद्राने परत बोलवावे, ही मागणीही रूडी यांनी केली.

राष्ट्रकुलचे सूप वाजले!

यजमान भारताला पदकतक्त्यात दुसरा क्रमांक
नवी दिल्ली, दि. १४ : कोसळलेली बांधकामे, आकंठ भ्रष्टाचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी यांमुळे "गाजलेल्या' एकोणीसाव्या राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप आज येथे वाजले. दिल्लीवासीयांना या संपूर्ण स्पर्धेच्या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यामुळे त्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. आतषबाजी, रंगाची उधळण आणि कला - संस्कृतीचे दर्शन घडवणारा सोहळा अनुभवत
या स्पर्धेची सांगता झाली. ज्वाला - आश्विनी आणि सायना नेहवाल यांनी बजावलेली सुवर्णमयी कामगिरी क्रीडाप्रेमींना मोठाच दिलासा देऊन गेली. त्यामुळे पदकतक्त्यात यजमान भारताने दुसरा क्रमांक पटकावला.
गुरुवारी हॉकीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेला दारुण पराभव भारताच्या जिव्हारी लागला. १९८२ च्या एशियाडमध्ये असाच लाजिरवाणा पराभव आपल्या संघाला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून स्वीकारावा लागला होता. मात्र त्यानंतर आठच दिवसांनी भारताने पाकिस्तानला जबरदस्त दणका दिला होता.
ज्वाला - अश्विनी आणि सायना नेहवाल यांनी अप्रतिम कामगिरी करत जिंकलेल्या सुवर्णपदकांनी भारताला या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून दिला. त्यामुळे गेले बारा दिवस सुरू असलेला या सोहळ्याच्या शेवट भारतासाठी मैदानावरही गोडच झाला. या शेवटानंतर सुरुवात झाली ती सांगता सोहळ्याला. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तो रंगला आणि २०१० च्या या राष्ट्रकुलचे अखेर सूप वाजले.
कडेकोट बंदोबस्त आणि हाऊसफुल्ल गर्दीच्या या सोहळ्यासाठी साऱ्या दिल्लीचे रस्ते आज नेहरू स्टेडियमच्या दिशेने वळले होते. लष्करी वाद्यवृंदाने संचलन केल्यानंतर सोहळ्याची सुरुवात झाली. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्यासह अनेक मंडळी या सोहळ्या उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे उपस्थित होते.
भारताने राष्ट्रकुलमध्ये ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ ब्रॉंझ अशी तब्बल १०१ पदके जिंकली आणि आधीचा आपला ३० सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम मोडला.

खोटारडे सरकार, भित्रे मुख्यमंत्री

गोवा बचाव अभियानची जहाल टीका
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): विद्यमान मुख्यमंत्री दिगंबर कामत हे जनतेला केवळ आश्वासने देत आहेत; ती पाळण्याची तसदी ते कधीच घेत नाहीत नाहीत. जनहिताचा एकही निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमताच नाही. हे सरकार खोटारडे असून मुख्यमंत्री भित्रे आहेत, अशी जहाल टीका आज गोवा बचाव अभियानने केली.
पणजी येथील आझाद मैदानावर अभियानातर्फे २०२१ प्रादेशिक आराखडा रद्द करणे, या आराखड्याअंतर्गत चाललेल्या बांधकामांना स्थगिती देणे, लोकांनी सुचवलेल्या सीआरझेड कायद्याला मान्यता देणे, सहापदरी रस्त्याचा प्रस्ताव नाकारणे आदी मागण्यांवर सरकार वेळकाढू धोरणाचा अवलंब करत असल्याचा निषेध करण्यासाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सरकारवर भरपूर तोंडसुख घेतले.
लोकविरोधी कारवाया करून बेकायदा खाणी व कॅसिनोंना उत्तेजन देऊन गोव्याच्या निसर्गाचा सत्यानाश करण्यास पुढे सरसावलेले विद्यमान कॉंग्रेस सरकार हे नालायक आहे, अशा बोचऱ्या शब्दांत आज आंदोलकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या जाहीर सभेनंतर ठरलेल्या कार्यक्रमानुसार आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर धडक देण्यासाठी निघताच उपस्थित पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. तरीही आंदोलनकर्त्यांनी चर्च स्क्वेअरपर्यंत मोर्चा नेलाच. मात्र तेथे पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यानंतर केवळ पंधराजणांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊ देण्यात आले. गोवा बचाव अभियानच्या निमंत्रक सबिना मार्टीन्स, अरविंद भाटीकर, डॉ.क्लाऊड आल्वारीस व प्रजल साखरदांडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्याचे विशेष कार्याधिकारी श्री. वेर्लेकर यांना निवेदन सादर केले व अभियानच्या मागण्यांवर पंधरा दिवसांत निर्णय घेण्याची मागणी केली. नपेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी देण्यात आला.
तत्पूर्वी, आझाद मैदानावरील सभेत आनंद मडगावकर, सबिना मार्टीन्स, अरविंद भाटीकर, डॉ. क्लाऊड आल्वारीस आदींची भाषणे झाली.

नोलास्को रापोझ यांना नोटीस

ध्वनिप्रदूषणाची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): ध्वनिप्रदूषण होत असल्याच्या अनेकदा तक्रारी करूनही कळंगुट पोलिस त्याची दखल घेऊन कारवाई करीत नसल्याने सदर पोलिस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांना नोटीस बजावण्यात आली असून येत्या २० ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले. त्याचप्रमाणे, आज बजावण्यात आलेल्या नोटिशीवर दि. २० रोजी स्पष्टीकरणही देण्यासही सांगितले आहे.
"सिटीझन कमिटी ऑन नॉईस पोल्यूशन'ने आज न्यायालयात अर्ज सादर करून सदर प्रकार खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली. हा प्रकार दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवरही सुरू असल्याचे यावेळी या समितीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दि. १८ ऑगस्ट, २६ सप्टेंबर अशा तारखांचा दाखला देत या दिवशी पोलिस स्थानकात ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्याचे यावेळी न्यायालयाला सांगण्यात आले. परंतु, पोलिसांनी या तक्रारींची अजिबात दखल घेतली नाही व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, असे समितीने सांगितले.
नागरिकांनी तक्रार केली आणि त्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही, असे एक तरी उदाहरण दाखवा, असे खंडपीठाने जेव्हा अर्जदाराला सांगितले तेव्हा अर्जदाराने न्यायालयासमोर चक्क "एफआयआर'च ठेवले. त्याची दखल घेत या तक्रारीवर येत्या १० दिवसांत तपासकाम पूर्ण करून आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही यावेळी खडंपीठाने दिले. तसेच, येत्या एका महिन्यात दक्षिण गोव्यात अशा किती घटना घडलेल्या आहेत आणि त्यावर कोणती कारवाई झालेली आहे, याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दक्षिण गोवा न्यायदंडाधिकाऱ्यांना देण्यात आला.
किनाऱ्यांवर पार्ट्यांचे आयोजन करून रात्री अपरात्री त्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावले जाते. याचा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यावर अंकुश ठेवण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक ठिकाणी समितीही स्थापन करण्यात आली आहे. मात्र त्या समितीकडून केलेल्या तक्रारींना अनुसरून कोणतीही कारवाई होत नसल्याचे गेल्या अनेक प्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे.

हुश्श... किमान एक तास पर्वरीला पाणी मिळणारच

सरकारकडून उच्च न्यायालयाला आश्वासन
पणजी, दि. १४ (प्रतिनिधी): पर्वरी भागात दरदिवशी किमान एक तास पाणीपुरवठा केला जाणार असून त्या ठिकाणी लोकांच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी चार अधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे आज राज्य सरकारने न्यायालयात हमीपत्र सादर केल्याने याविषयीची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निकालात काढली.
त्याचप्रमाणे, पाणीपुरवठा होणाऱ्या मुख्य जलवाहिनीतून कोणालाही नळ जोडणी देऊ नये, असा आदेश यावेळी खंडपीठाने सरकाराला दिला. तसेच, पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक दर पंधरवड्याने लोकांना ठळकपणे दिसेल अशा ठिकाणी लावले जावे, अशीही सूचना न्यायालयाने यावेळी सरकारला केली आहे. या सर्व सूचनांचे पालन करणार असल्याचे सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर यापूर्वी खंडपीठाने दिलेले अंतरिम आदेश रद्दबातल करण्यात यावे, अशी विनंती सरकारने केली. त्याला न्यायालयाने मंजुरी दिली.
पर्वरीत सणासुदीच्या दिवशीही पाणीपुरवठा होत नसल्याने याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली होती. या ठिकाणी योग्य पाणीपुरवठा होत नसून मोठमोठ्या बांधकाम प्रकल्पांना मात्र अवैधरीत्या नळजोडणी दिली असल्याचा एक लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्याची दखल घेत गोवा खंडपीठाने ती जनहित याचिका म्हणून नोंद करून घेतली होती व पाणीपुरवठा खात्याला नोटीस बजावली होती. तर, न्यायालयाची बाजू पाहण्यासाठी अमेक्युस क्युरी म्हणून ऍड. नॉर्मा आल्वारीस यांनी नेमणूक करण्यात आली होती.
यावेळी ऍड. आल्वारीस यांनी अनेक सूचना केल्या होत्या. त्यांचाही समावेश या आदेशात करण्यात आला आहे. पाण्याविषयीची कोणतीही तक्रार असल्यास त्याकडे लक्ष पुरवून ती सोडवण्याची जबाबदारी सरकारने नेमलेल्या या चार अधिकाऱ्यांवर असणार आहे. तसेच, न्यायालयाला उत्तर देण्यासही हे अधिकारी बांधील असणार आहेत.
न्यायालयाच्या या आदेशानंतर काही प्रमाणात पर्वरीवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास पर्वरीवासीयांनी व्यक्त केला आहे.

'जिवंतपणीच आम्ही मृत्यू अनुभवला'

चिलीमध्ये खाणीत अडकलेल्या सर्व कामगारांना जीवदान
कोपियाको (चिली), दि. १४ : कोपियापो - चिलीतील उत्तरेस असलेल्या आटाकामा प्रांतातील सोने आणि तांब्याच्या खाणीत गेल्या दोन महिन्यांपासून अडकलेल्या ३३ कामगारांना बाहेर काढण्यात आज (गुरुवार) सकाळी यश आले. बुधवारपासून खाणीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आज अखेर लुईस ऊरझुआ या ५४ वर्षीय कामगाराला सुरक्षितरीत्या खाणीतून बाहेर काढून ही मोहीम फत्ते झाली. "जिवंतपणीच आम्ही मृत्यू अनुभवला', अशी प्रतिक्रिया यापैकी बहुतांश कामगारांनी व्यक्त केली तेव्हा सारे वातावरण भावविभोर बनले होते...
चिलीच्या नौदलाने तयार केलेल्या एका खास यंत्राच्या (कॅप्सूल) साहाय्याने या लोकांना वाचविण्यात आले. हे यंत्र ५४ सेंटिमीटर रुंद असून खाणीमध्ये ६२२ मीटर खोलीपर्यंत ते सोडण्यात आले आहे. या यंत्रातून खाणीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. काल पहाटे फ्लोरेन्सियो ऍव्होलास या ३१ वर्षीय कामगाराला सर्वप्रथम खाणीबाहेर काढण्यात आले तेव्हा तेथे उपस्थितांनी प्रचंड जल्लोषात त्याचे स्वागत केले होते.
जसजसे एकेका कामगाराला बाहेर काढले जात होते तसतसे खाणीबाहेर उभ्या असलेल्या त्याच्या नातेवाईकाचे डोळे आनंदाश्रूंनी वाहात असल्याचे दृश्य दिसून आले. जगातील सर्वच प्रसारमाध्यमांनी आपली पथके केवळ या अभूतपूर्व मोहिमेच्या संकलनासाठी पाठवली होती. या कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया हा जणू चिलीमधील महोत्सवच ठरला. त्यासाठी शाळांना खास सुट्टी देण्यात आली होती. परस्परांमध्ये एरवी कितीही वाद असला तरी जेव्हा मोठे संकट येते तेव्हा आपसूकच "आम्ही सारे एक' असा विचार मनात घोळू लागतो. चिलीत त्याचे वास्तव दर्शन घडले. या कामगारांपैकी अनेकांना दातांचा प्रादुर्भाव झाला असून त्यांना त्वचारोग झाले असावेत, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठीच खाणीतून बाहेर काढल्यानंतर त्यांची रवानगी तातडीने खास रुग्णालयात करण्यात येत होती. जगण्याची आशाच आम्ही सोडून दिली होती, जिवंतपणीच आम्ही साक्षात मृत्यू अनुभवला, अशी प्रतिक्रिया यातील अनेक कामगारांनी व्यक्त केली. अर्थात, याचे सारे श्रेय दिले पाहिजे ते या कामगारांच्या तीव्र इच्छाशक्तीला आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला!

Thursday, 14 October, 2010

येडियुराप्पांची आज सत्त्वपरीक्षा!

अपात्र उमेदवारांना मतदानाचा हक्क नाही
बंगलोर, दि. १३ : कर्नाटक विधानसभेत उद्या (दि. १४) सकाळी ११ वाजता कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात येडियुराप्पा सरकार विश्वास ठराव मांडणार आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये दुसऱ्यांदा एखादे सरकार विश्वास ठरावाला सामोरे जाण्याची भारतीय इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, उद्याच्या मतदान प्रक्रियेत भाग घेऊ द्यावा ही अपात्र ठरविण्यात आलेल्या पाच अपक्ष आमदारांची मागणी कर्नाटक उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
अपात्र ठरविण्यात आलेल्या १६ आमदारांच्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालय सोमवारी फैसला सुनावणार असल्याने उद्याच्या विश्वास ठरावाच्या वेळी हे सोळाही जण मतदानात भाग घेऊ शकणार नाहीत. तथापि, विश्वास मताचे भवितव्य हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहील, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
आम्हांला उद्या मतदान करू द्यावे, आमची मते सीलबंद लिफाफ्यात ठेवावीत, यानंतर आम्ही जर विधानसभा सभापतींविरुद्धच्या याचिकेत विजयी झालो, तर आमची मते मोजणीसाठी ग्राह्य ठरवावीत, अशी मागणी अपात्र ठरविण्यात आलेल्या पाच अपक्ष आमदारांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली होती. मात्र, त्यांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.
न्यायालयाच्या या निर्णयावर ज्येष्ठ विधिज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, १६ आमदारांना अपात्र ठरविण्याच्या सभापतींच्या निर्णयाला जर न्यायालय योग्य ठरविणार असेल तर सभागृहातील गणितावर कोणताही फरक पडणार नाही. परंतु, जर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला फिरविले तर सरकारला पुन्हा एकदा नव्याने विश्वास ठरावाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
कर्नाटक विधानसभेत एकूण २२४ सदस्य असून, रविवारी विधानसभा अध्यक्ष बोपय्या यांनी भाजपचे ११ आणि पाच अपक्ष आमदारांना अपात्र ठरविले होते.
भाजप आमदारांसाठी व्हीप जारी
दरम्यान, उद्या विश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी भाजपच्या सर्व आमदारांनी उपस्थित राहावे असा पक्षादेश (व्हीप) पक्षाच्या प्रतोदांनी जारी केला आहे.
२२४ सदस्यसंख्येच्या राज्य विधानसभेत विधानसभाध्यक्षांसह भाजपचे आता १०६ आमदार आहेत. मुख्यमंत्र्यांकडून उद्या मांडल्या जाणाऱ्या विश्वास ठरावावरील मतदानात अपात्र १६ आमदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा विश्वास ठराव पुन्हा एकदा जिंकतील, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.
कर्नाटकच्या राज्यपालांना हटवा
भाजपची पंतप्रधानांकडे मागणी

नवी दिल्ली, दि. १३ : कर्नाटकप्रश्नी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची आज भेट घेतली. "आकस ठेवून भेदभावाची कारवाई करणारे कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांना तात्काळ माघारी बोलवा,' अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात पक्षाच्या एका शिष्टमंडळाने पंतप्रधानांची आज भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले.
"कर्नाटक विधानसभेत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मांडलेल्या विश्वास ठरावावर मतदान घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी केंद्राकडे कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली. त्यांची ही कृती आकसपूर्ण, भेदभावाची आहे,' असे भाजपने पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधानांना भेटायला गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळात अडवाणी यांच्यासमवेत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली, ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् देखील उपस्थित होते.
""पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम् या दोन्ही नेत्यांची आम्ही आज भेट घेतली व त्यांना कर्नाटक प्रकरणी सविस्तर निवेदन सादर केले. कर्नाटकच्या राज्यपालांनी केलेल्या आकसपूर्ण शिफारशींवरच आम्ही ही भेट घेतली. राज्यपालांना तात्काळ माघारी बोलवा, अशी मागणी आम्ही यावेळी केली,''असे अरुण जेटली यांनी नंतर एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

भारताकडून कांगारूंचा 'व्हाईट वॉश'

बॅंगलोर, दि. १२ : कधीकाळी जागतिक क्रिकेटवर अनिर्बंध सत्ता गाजवणाऱ्या मग्रूर कांगारूंना आज बॅंगलोर कसोटीत चारी मुंड्या चीत करून टीम इंडियाने सध्या कसोटी क्रिकेटचे आपणच "बेताज बादशहा' असल्याचा डंका पुन्हा एकदा दशदिशांना घुमविला. सचिन तेंडुलकरने नाथन हॉरित्झला पॅडल स्वीपचा फटका मारून दोन धावा पूर्ण केल्या आणि तब्बल ३१ वर्षांनी भारताकडून पुन्हा एकदा "व्हाईट वॉश' पत्करण्याची नामुष्की कांगारूंवर ओढवली. अलीकडच्या काळातील ऑस्ट्रेलियाचा हा सर्वांत मानहानिकारक पराभव ठरला आहे.
वीरेंद्र सेहवाग लवकर बाद झाल्यानंतर नवोदित मुरली विजय आणि पदार्पणवीर चेतेश्वर पुजारा यांनी केलेली अर्धशतकी भागीदारी आणि नंतर मास्टर ब्लास्टरने ठोकलेले अर्धशतक याच्या बळावर कांगारूंनी ठेवलेले २०७ धावांचे लक्ष्य चौथा डाव आणि पाचवा दिवस असतानाही भारताने लीलया सर केले.
दरम्यान, सबंध मालिकेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या सचिनला सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असले तरी त्याने मात्र या विजयाचे श्रेय संपूर्ण संघालाच दिले. नवोदित आणि बुजुर्ग खेळाडूंनी केलेल्या सांघिक कामगिरी मुळेच हा अविस्मरणीय विजय साकार झाल्याचे तो म्हणाला.
मोहालीतील पहिल्या कसोटीत व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि ईशांत शर्मा यांनी निर्णायक भागीदारी करून ऑस्ट्रेलियाच्या दाढेतील विजय खेचून आणला होता. आज मात्र टीम इंडियाने कांगारूंना कुठलीही संधी न देता सात गडी राखून आरामात विजय मिळवला व मालिका २-० अशी खिशात टाकली.

पैंगीण बाजारात भीषण अपघात

ट्रकची सहा दुकानांना धडक, एकास चिरडले
काणकोण, दि. १३ (प्रतिनिधी): पैंगीण बाजारात आज (दि. १३) रात्री झालेल्या एका भीषण अपघातात एका ट्रकने सहा दुकानांना धडक दिली तर एकाला जागीच चिरडले. ट्रकचालक फरार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्र. टीएन ३३ जेडी ९७०१ कारवारच्या दिशेने जात असता पैंगीण बाजारात रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या एकूण ६ दुकानांना त्याने जबरदस्त धडक दिली. यात सर्वप्रथम धडक बसलेल्या दुकानाचे मालक उल्हास पैंगीणकर (५०) आपले दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होते. त्यांना या ट्रकाने जागीच चिरडले. तसेच पुढे जाऊन सदर ट्रक अन्य पाच दुकानांना धडकला. दरम्यान, उल्हास पैंगीणकर यांना अतिशय गंभीर अवस्थेत काणकोण इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. यावेळी इस्पितळात मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे या भागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उल्हास पैंगीणकर हे वर्तमानपत्रांचे विक्रेते असून त्यांचे बाजारातील दुकान प्रसिद्ध आहे. या परिसरात ते सर्वांच्या परिचयाचे होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वर असलेल्या पैंगीण बाजारात रस्त्याच्या कडेला हा अपघात घडला तेव्हा आणखी ३ ते ४ माणसे रस्त्याच्या कडेला उभी होती. मात्र, वाहन येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून आपापला जीव वाचवला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सदर ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमा झाले. पैंगीणकर यांची गंभीर स्थिती पाहून संतापलेल्या लोकांनी राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला व ट्रकचालकाला अटक करण्याची मागणी केली. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला व दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने वाहने अडकून पडली होती. काणकोण पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी संतप्त जमावाला शांत राहण्याचे आवाहन करून चालकाला अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच लोकांनी रस्ता मोकळा करून दिला. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांत या ठिकाणी सात अपघात घडले आहेत.

११ पालिकांच्या १३४ प्रभागांतून ४९४ उमेदवार रिंगणात

पणजी, दि.१३ (प्रतिनिधी): राज्यातील नगरपालिकांसाठी दि. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ११ पालिकांच्या १३४ प्रभागांतून एकूण ५९४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. वाळपई व मुरगाव नगरपालिकांत प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे तर पेडणे येथील ९ प्रभागात अनुसूचित जमातीचा उमेदवारच नसल्याने व अन्य कुणीही उमेदवारी दाखल न केल्याने तेथे निवडणूकच होणार नाही.
फोंडा व साखळी पालिकांचा कार्यकाळ अजून संपला नसल्याने राज्यातील १३ नगरपालिकांपैकी ११ पालिकांसाठी दि. ३१ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. आज या सर्व उमेदवारांना चिन्हांचे वाटप नावांच्या आद्याक्षराप्रमाणे करण्यात आले. विमान, कपाट, बाहुली, बॉल, कॅमेरा, कार, पाकीट, दार आदी चिन्हांचा यात समावेश आहे. अनेक ठिकाणी समझोते झाल्याने संघर्षमय लढती टळल्या आहेत तर अनेक ठिकाणी संघर्षमय अशा दुरंगी लढती होणार आहेत. रात्री उशिरापर्यंत चिन्हांचे वाटप सुरू होते.

पालिका ग्राह्य अर्ज माघार शिल्लक
पेडणे ५१ ८ ४३
डिचोली ५७ १५ ४२
म्हापसा ७७ २३ ५४
वाळपई ४९ ११ ३८
सांगे ५२ १५ ३७
काणकोण ४२ १० ३२
केपे ३७ १ ३६
कुडचडे/काकोडा ८२ २३ ५९
मडगाव १२४ २७ ९७
कुंकळ्ळी ५४ ८ ४६
मुरगाव १४१ ३१ ११०

मोपापीडितांनी केली अनोखी निदर्शने

शेतकऱ्यांनी भीक मागून केला सरकारचा निषेध
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): हातात सरकारविरोधी फलक...डोळ्यांत सरकारच्या विरोधात प्रचंड राग...आणि केवळ पैशांचीच भाषा समजणाऱ्या भ्रष्ट कॉंग्रेस सरकारला पैसे चारता यावेत म्हणून समोर एक रुमाल आणि कटोरा ठेवून मोपा विमानतळ पीडित शेतकरी समितीने अक्षरशः भीक मागून प्रस्तावित मोपा विमानतळाच्या विरोधात आज आझाद मैदानासमोर निदर्शने केली.
""या मोपा विमानतळातून सरकारला केवळ पैसेच कमवायचे आहे ना! मग, ते त्यांना आम्ही भीक मागून देऊ'', असे सांगत ""प्राण गेला तरी आम्ही आमच्या शेतजमिनी सरकारला बळकावू देणार नाही, असा निर्वाणीचा इशाराही समितीचे सचिव संदीप कांबळी यांनी यावेळी दिला.
मोपा विमानतळ केंद्र सरकार बांधणार की एखादी खाजगी कंपनी हे अद्याप सरकारने स्पष्ट केलेले नाही. मात्र, या निमित्ताने राज्य सरकार शेतकऱ्यांच्या लागवडीखालील जमिनी बळजबरीने ताब्यात घेऊ पाहत आहे. खाजगी कंपनीकडून भरभक्कम पैसे आकारून ही जमीन त्यांना लाटण्याचा विचारही सरकारने चालवला आहे. सरकारला यात किती पैशांचा मलिदा मिळणार आहे ते त्यांनी जाहीर करावे. आम्ही भीक मागून तेवढी रक्कम सरकारला देऊ, असा सणसणीत टोलाही या समितीचे सचिव संदीप कांबळी यांनी यावेळी लगावला. सरकारला ही रक्कम देण्यासाठी मोपा विमानतळ पीडित शेतकरी समितीने भीक मागून पैसे जमवायला सुरुवात केली असून आम्ही राज्यातील प्रत्येक शहरात जाऊन भीक मागणार आणि तेवढी रक्कम सरकारला देणार, असे श्री. कांबळी यांनी यावेळी सांगितले.
आज सकाळी या समितीचे पदाधिकारी व पीडित शेतकरी पणजी येथील आझाद मैदानाच्या कडेला सरकारच्या विरोधात निदर्शने करायला बसले होते. याची माहिती मिळताच शहरातील सर्व पत्रकारांनी त्यांच्याकडे धाव घेतली. तसेच, पोलिसांनीही त्या ठिकाणी पहारा ठेवला. दुपारी १ वाजेपर्यंत हे शेतकरी या ठिकाणी होते.
यावेळी बोलताना समितीचे अध्यक्ष हनुमंत आरोसकर म्हणाले की, शेतकऱ्यांना संपवण्याचा सरकारचा डाव आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी पाच रुपये एवढ्या कवडीमोल दराने बळकावून ती जमीन खाजगी कंपन्यांना विकण्याचा सरकार विचार करीत आहे.विमानतळ न बांधता या ठिकाणी खाण उद्योग सुरू करण्याचाही सरकारचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आमच्या मागणीसाठी आम्ही कोणत्याही थराला जायला तयार आहोत. विकासाला आमचा कोणताही विरोध नाही. परंतु, शेतकऱ्यांचा जमिनी गिळंकृत करून झालेला विकास आम्हांला अजिबात मान्य नाही. सरकारने विमानतळाच्या नावाने ८९ लाख चौरस मीटर शेतजमीन ताब्यात घेतली आहे. तर, रस्ता बनवण्यासाठी ९ लाख चौरस मीटर जमीन घेतली आहे, अशी माहिती श्री. आरोसकर यांनी यावेळी दिली.
केंद्र सरकारच्या नियमानुसार कोणत्याही दोन विमानतळांमध्ये १५० किलोमीटरचे अंतर असणे गरजेचे आहे. मात्र मोपा विमानतळ आणि दाबोळी विमानतळामध्ये केवळ ७० किलोमीटरचे अंतर आहे. तसेच, कोकणात चिपी येथे होऊ घातलेला विमानतळही मोपापासून ७० किलोमीटरवर असल्याचे श्री. आरोसकर यांनी सांगितले.

भर न्यायालयातच आत्महत्येचा प्रयत्न

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): कोठडीत वाढ करण्यासाठी बालन्यायालयात हजर करण्यात आलेला संशयित आरोपी समीर शेख (२४) याने न्यायाधीशांसमोरच आपल्या गळ्यावर "ब्लेड'ने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे न्यायालयातच एकच गोंधळ उडाला.
रक्तबंबाळ अवस्थेत जखमी समीर याला उपचारासाठी "गोमेकॉ' इस्पितळात दाखल करण्यात आले. याबाबतची तक्रार म्हापसा पोलिस स्थानकाचा पोलिस शिपाई संजय पेडणेकर याने पणजी पोलिस स्थानकात नोंदवली आहे. पोलिसांनी संशयित समीरविरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या समीरकडे "ब्लेड' कुठून आले, हा प्रश्न सध्या उपस्थित झाल आहे. समीरला गेल्या महिन्यात म्हापसा पोलिसांनी मुंबईतून अटक करून गोव्यात आणले होत. आपल्या नातेवाइकाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून समीर याने त्या मुलासह मुंबईत पळ काढला होता. घाटकोपर येथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळीही त्याने पोलिसांना चकमा देऊन पळ काढला होता. मात्र, पुन्हा त्याला ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले होते.
न्यायालयात कोठडीत असलेल्या समीरच्या कोठडीची मुदत संपल्याने आज दुपारी त्याच्या कोठडीत वाढ करण्यासाठी पाटो पणजी येथे त्याला बालन्यायालयात आणले होते. यावेळी पोलिसांनी त्याला न्यायाधीशाच्या समोर उभे केले असता खिशातून आणलेले ब्लेड काढून त्याने आपल्या गळ्यावर वार केला. यात त्याला खोलवर जखम झाल्याने गळ्याला चार टाके पडल्याचे पोलिसांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस करीत आहेत.

Wednesday, 13 October, 2010

मोदींकडून कॉंग्रेसचा पुन्हा धुव्वा!

सहाही महापालिकांवर फडकला भाजपचा झेंडा
अहमदाबाद, दि. १२ : मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासकार्यावर पहिल्या पसंतीची मोहोर उठवताना, गुजरात महापालिका निवडणुकांत मतदारांनी भाजपला भरभरून कौल दिला आणि कॉंग्रेसला पुन्हा सपशेल नाकारले. राजकोट, भावनगर व जामनगरसहित सहाही महापालिकांवर भाजपने आपला झेंडा पुन्हा एकदा दिमाखात फडकविला आणि कॉंग्रेसला दारुण पराभवाचा सामना करण्यास भाग पाडले.
६९ सदस्यांच्या राजकोट महानगरपालिकेत भाजपने ५८ जागी विजय संपादन केला असून कॉंग्रेसच्या खाती केवळ ११ जागा पडल्या आहेत. कॉंगे्रसला येथे एक जागा जास्तीची मिळाली आहे. २००५ साली झालेल्या निवडणुकीत कॉंगे्रसला १० जागा मिळाल्या होत्या तर आता ११ जागा मिळाल्या आहेत. विजयी उमेदवारांमध्ये भाजप महापौर संध्याबेन व्यास यांचा समावेश आहे.
जामनगर महानगरपालिका निवडणुकीत ५७ पैकी ३५ जागी विजय मिळवून भाजपने बहुमत प्राप्त केले आहे. विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस पक्षाला अवघ्या १६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. येथे बसप व सपाला एक जागा प्राप्त झाली आहे. याआधी म्हणजे नोव्हेंबर २००५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला ४० तर कॉंगे्रसला १० जागा मिळाल्या होत्या.
भावनगर महानगरपालिकेतील ५१ जागांपैकी भाजपला ४१ जागा मिळाल्या आहेत तर कॉंगे्रसला १० जागीच विजय प्राप्त करता आला आहे. आत्तापर्यंत या महानगर पालिकेत भाजपजवळ ३९ जागा होत्या. त्यात आणखी दोन जागांची भर पडली. याशिवाय बडोद्यात भाजपला २७ जागी यश संपादन करता आले तर कॉंगे्रसच्या खात्यात केवळ ३ जागा गेल्या आहेत. राजधानी अहमदाबादेत भाजपने शानदार प्रदर्शन करीत ४८ जागी विजय नोंदविला आहे तर कॉंगे्रसला मात्र १५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
सुरत महानगरपालिकेत भाजपला ३२ जागा मिळाल्या आहेत. कॉंगे्रसच्या पदरात अवघ्या चार जागा पडल्या आहेत.
रविवारी गुजरातमधील अहमदाबाद, सुरत, राजकोट, बडोदा, जामनगर व भावनगर या सहा महानगरपालिकांसाठी मतदान झाले. या सहाही महानगरपालिकांमधील ५५८ जागांसाठी एकूण २१०० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. आज सकाळी अत्यंत कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणी प्रारंभ झाल्यापासून भाजपने सहाही महानगरपालिकांच्या निवडणुकीत आगेकूच जारी ठेवली होती ती शेवटपर्यंत कायम ठेवली.
सोहराबुद्दीन प्रकरणात गुजरातचे माजी गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर या घटनेचा या मनपा निवडणुकीवर प्रतिकूल परिणाम दिसून येईल व भाजपला चांगलाच दणका बसेल, असे विरोधकांंचे मत होते मात्र त्यांचे हे मांडे त्यांच्या मनातच राहिले. पुन्हा एकदा लोकांनी भाजप उमेदवारांना भरघोस मतदान करून विजयी केले आहे.
----------------------------------------------------------
भाजपमध्ये उत्साहाची लाट
कॉंग्रेस "सीबीआय'चा कसा गैरवापर करीत आहे, हेच मतदारांच्या या कौलावरून दिसून आले. भाजप उमेदवारांच्या विजयाचा सर्वत्र जल्लोष करण्यात आला. विजयी उमेदवारांच्या मिरवणुका मोठ्या दिमाखात वाजतगाजत काढण्यात आल्या. सर्वत्र फटाके फुटत होते, गुलाल उधळला जात होता. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील वरिष्ठ भाजप नेत्यांनी तसेच केंद्रीय नेतृत्वानेही या विजयाचे स्वागत करून उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

येडियुरप्पांनी आव्हान स्वीकारले!

उद्या पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करणार
नवी दिल्ली दि. १२ : कर्नाटकचे राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी "बहुमत पुन्हा सिद्ध करा' असे दिलेले आदेशवजा आव्हान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वीकारले असून गुरुवार दि. १४ रोजी ते पुन्हा एकदा आपले बहुमत सिद्ध करणार आहेत. सध्या ते आपल्या समर्थक आमदारांसोबत दिल्लीत आहेत.
कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाला आज नवीनच कलाटणी मिळाली. राज्यपालांनी काल कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केंद्राला केली होती. मात्र आज त्यांनी अचानक आपला पवित्रा बदलताना येडियुरप्पा सरकारला पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. येडियुरप्पांनी राज्यपालांच्या या आदेशावर नाराजी व्यक्त केली असली तरी हे आव्हान स्वीकारून उद्या दि. १४ रोजी ते सभागृहात पुन्हा बहुमत सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत.
दरम्यान, कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी ज्या १६ बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे त्या प्रकरणाची सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत म्हणजे १८ ऑक्टोबरपयर्र्ंत स्थगित केली आहे. याचाच अर्थ न्यायालयानेही या बंडखोर आमदारांना कोणताही दिलासा दिलेला नाही.
११ बंडखोर भाजप आमदारांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर व न्या. एन. कुमार यांच्या खंडपीठाने या आमदारांच्या याचिकेवरील निर्णय सोमवारपर्यंत स्थगित ठेवला आहे.
११ बंडखोर भाजप आमदारांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद संपला असला तरी पाच अपक्ष आमदारांतर्फे करण्यात येत असलेला युक्तिवाद अद्याप सुरू आहे. या पाच अपक्ष आमदारांनाही विधानसभाध्यक्ष बोपय्या यांनी काल अपात्र ठरविले होते. विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाला या १६ बंडखोर आमदारांनी दोन वेगवेगळ्या याचिकांद्वारे आव्हान दिलेले आहे. त्यांपैकी भाजपच्या ११ बंडखोर आमदारांतर्फे करण्यात आलेला युक्तिवाद आज संपला. ११ भाजप आमदारांच्या वतीने बाजू मांडताना वकिलांनी असे सांगितले की, या ११ जणांनी भाजप पक्ष सोडलेला नसल्याने त्यांना अपात्र ठरविता येणार नाही. पाच अपक्ष आमदारांच्या वतीने त्यांच्या वकिलानेही अशीच भूमिका मांडली. मात्र न्यायालयाने सध्या सभापतींच्या निर्णयात कोणताही हस्तक्षेप करण्याचे टाळताना १८ ऑक्टोबरपर्यंत सुनावणी स्थगित केली.
-------------------------------------------------------------------
राज्यपालांची कृती घटनाविरोधी : कुमारस्वामी
दरम्यान, कर्नाटकातील भाजप सरकार अस्थिर करण्यात कॉंग्रेसबरोबरच मोलाची भूमिका वठवणाऱ्या एच. डी. कुमारस्वामी यांनी राज्यपालांवर टीकेची झोड उठवताना त्यांनी येडियुरप्पा सरकारला बहुमत सिद्ध करण्याची आणखी एक संधी देणे हे पूर्णपणे घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. राज्यपालांनी भाजप सरकार तात्काळ बरखास्त करावयास हवे होते. मात्र त्यांनी आधी केंद्राला तशी शिफारस करून नंतर येडियुरप्पांना दुसरी संधी देणे हे घटनेत बसणारे नाही असे ते म्हणाले.

रोजगाराच्या नावाखाली विश्वजितकडून फसवणूक : पर्रीकर

भाजपतर्फे वाळपईत कोपरा बैठकांचा धडाका
वाळपई, दि. १२ (प्रतिनिधी): विश्वजित राणे यांनी रोजगाराच्या नावाखाली युवकांची घोर फसवणूक चालवली असून ते केवळ विकासाच्या बाता मारत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केला. भाजपतर्फे वाळपईतील पोटनिवडणुकीसाठी धावे येथे घेतलेल्या कोपरा बैठकीत श्री. पर्रीकर बोलत होते. सदर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे गावागावांत कोपरा बैठकांचा धडाका सुरू आहे. काल नगरगाव पंचायतीतील धावे, बांबर, खोतोडे, शेळप, ब्रह्मकरमळी या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या.
विश्वजित राणे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी १६०० पेक्षा अधिक लोकांना रोजगार दिला आहे. परंतु, वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. सदर नोकऱ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून त्यांनी अनेकांना हंगामी तत्त्वावर सेवेत भरती करून घेतले आहे. जर विश्वजित यांनी युवकांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या असतील तर आजही सदर युवक कंत्राटाची मुदत वाढवून घेण्यासाठी पणजीत हेलपाटे का घालतात, असा सवाल यावेळी पर्रीकर यांनी केला. यातील कित्येक युवकांना तीन ते चार महिने पगारच मिळत नाही. त्यांना फक्त आशेवर ठेवले जाते. खाणींना आमचा ठाम विरोध असून नगरगाव - सावर्डेत कोणत्याही परिस्थितीत खाण सुरू करू देणार नाही, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
वाळपईत १२० खाटांचे इस्पितळ सुरू करण्याची खरोखरच गरज होती का? इथे अगोदर नर्स तसेच डॉक्टरांची सोय करावी. विश्वजित यांच्या डोक्यात सध्या सर्वत्र "पीपीपी' प्रकल्पच सुरू करण्याचे विचार सुरू आहेत. मात्र त्या तत्त्वावर वाळपईत कोणत्याही परिस्थितीत इस्पितळ सुरू करू देणार नाही असेही पर्रीकर म्हणाले. श्री. राणे हे केवळ पैशांच्या जोरावर राजकीय खेळ करत आहेत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या दत्ताराम बर्वे, ऍड. नरेंद्र सावईकर, संतोष हळदणकर, विश्वास सतरकर यांनीही विचार मांडले. बाळा गावकर यांनी सूत्रसंचालन केले. किशोर भावे यांनी आभार मानले. मिलिंद गाडगीळ, विष्णू गावकर, दामोदर जोशी, रमेश जोशी, संजय केळकर आदी कार्यकर्ते या बैठकांना उपस्थित होते.

नगरपालिका अर्जांची छाननी अपूर्णावस्थेत

वाळपईतून बाप्तिस्त डायस बिनविरोध
पणजी, दि.१२ (प्रतिनिधी): राज्यातील ११ नगरपालिकांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या निवडणुकांसाठी भरलेल्या एकूण १०६२ अर्जांपैकी अनेक पालिकांतील अर्जांची छाननी आज पूर्ण होऊ शकली नाही.
गोवा राज्य निवडणूक आयोगाचे सचिव एस. वाय. परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ पालिकांच्या १३७ प्रभागांसाठी भरलेल्या एकूण १०६२ अर्जांपैकी अनेकांचे अर्ज आज आवश्यक कागदपत्रांअभावी फेटाळण्यात आले तर ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त प्रभागांतून अर्ज भरले होते त्यातील अनेकांचे अर्ज आज फेटाळले गेले. दरम्यान, वाळपईच्या राखीव ३ प्रभागातून बाप्तिस्त डायस हे बिनविरोध निवडून आले आहेत.
जुन्ता हाउस येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून उशिरा मिळालेल्या व आमच्या ठिकठिकाणच्या प्रतिनिधींनी रात्री उशिरा दिलेल्या माहितीप्रमाणे ग्राह्य धरलेल्या उमेदवारी अर्जांची संख्या पुढील प्रमाणे आहे ः वाळपई ४७ , पेडणे ५२, म्हापसा ५८, सांगे ५२, डिचोली ५७, कुंकळ्ळी ५४, मडगाव १२३, मुरगाव १५९, कुडचडे- काकोडा ८२, काणकोण व केपे या नगरपालिका क्षेत्रांतील अर्जांची छाननी आज पूर्ण होऊ शकली नाही.
वरील उमेदवारी अर्जांत अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त प्रभागातून अर्ज दाखल केले आहेत तसेच अनेकजण उमेदवारी मागे घेऊ शकतात. त्यामुळे नगरपालिकेच्या अंतिम उमेदवारीचे चित्र उद्या दि. १३ रोजीच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दि. १३ हा उमेदवारी मागे घेण्याचा दिवस आहे.

नेपाळमधूनही होते गोव्यात तरुणींची तस्करी

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी): गोव्यातील काही ब्युटी पार्लरमध्ये अनैतिक व्यवसाय करण्यासाठी पूर्वांचलातून तरुणींची तस्करी होत असल्याची वृत्ते प्रसिद्ध होत असतानाच आता मांडवी नदीत असलेल्या कॅसिनोंत नोकऱ्या देत असल्याचे सांगून नेपाळमधील तरुणींचीही गोव्यात तस्करी केली जात असल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. यामुळे गोवा हे पर्यटन व्यवसायाबरोबरच वेश्याव्यवसायाचेही केंद्र बनत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, या तरुणींच्या तस्करी प्रकरणात नेपाळी पोलिसांनी एका मोठ्या टोळीला अटक केली आहे. या टोळीने गोव्यातील कॅसिनोंसाठी ११ तरुणींची तस्करी केल्याचा दावा काठमांडू पोलिसांनी केला आहे. नेपाळमधील तरुणींना फसवून गोव्यात आणले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दहा जणांना अटकही करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, कांदोळी येथे छापा टाकून अटक करण्यात आलेल्या "लोटस' या ब्युटी पार्लरची मालकीण शांता ऊर्फ महालक्ष्मी मिश्रा हिला ताब्यात घेण्याची तयारी मिझोराम पोलिसांनी चालवली आहे. या प्रकरणात मिझोराम पोलिसांनी आणखी एका महिलेला अटक केली आहे. वनलालरुती ऊर्फ वली रामहलून असे या महिलेचे नाव असून तिने मिझोराम येथील एका अल्पवयीन मुलीसह तीन तरुणी शांता मिश्रा हिच्या ताब्यात दिल्या होत्या. या तरुणींना तीन ब्युटी पार्लरमध्ये कामाला ठेवून त्यांच्याकडून अनैतिक कृत्ये करून घेतले जात असल्याचा आरोप शांती हिच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शांती मिश्रा हीच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा दावा मिझोराम पोलिसांनी केला आहे. येत्या काही दिवसांत न्यायालयात अर्ज करून शांती मिश्रा हिचा ताबाही मिझोराम पोलिस मिळवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या प्रकरणात गुंतलेल्या ऍलेक्स नामक तरुणाच्याही शोधात गोवा पोलिस असून काल त्याच्या शोधासाठी हणजूण येथील एका ब्युटी पार्लरवर छापा टाकण्यात आला. याच तरुणाने त्या तरुणींना मिझोराम येथून आणून शांती हिच्या ताब्यात दिल्या होत्या, अशीही माहिती मिळाली आहे. दि. ४ सप्टेंबर २०१० रोजी या तरुणींना गोव्यात आणले होते, असेही तपासात उघड झाले आहे.
ब्युटी पार्लरमध्ये येणाऱ्या पुरुष ग्राहकांना मसाज करण्यास विरोध केल्यास या तरुणींना मारहाण केली जात होती, असा जबाब पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणींनी दिला आहे. लोटस ब्युटी पार्लरची मालकीण शांती आम्हांला मारहाण करीत होती, असे त्यांनी आपल्या जबानीत म्हटले आहे.

फोंडा नगराध्यक्षांची गच्छंती

अविश्वास ठराव ७-० असा संमत
फोंडा, दि. १२ (प्रतिनिधी): येथील फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्र्वास ठराव सात विरुद्ध शून्य मतांनी आज (दि. १२) दुपारी संमत करण्यात आला. त्यामुळे आता पालिकेला पाचव्या नगराध्यक्षांचे वेध लागले असून नगराध्यक्षपदाचे प्रमुख दावेदार नगरसेवक किशोर नाईक हे आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
या पालिकेच्या सत्ताधारी गटातील सहा नगरसेवकांनी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्र्वास ठरावाच्या नोटिशीवर चर्चा करण्यासाठी आज सकाळी पालिका मंडळाची खास बैठक घेण्यात आली. या बैठकीला सरकारी अधिकारी म्हणून कुंकळ्ळी पालिकेचे मुख्याधिकारी शिवाजी बी. देसाई उपस्थित होते. बैठकीला अविश्र्वास ठरावाची नोटीस दिलेले किशोर नाईक, शैलेंद्र शिंक्रे, संजय नाईक, दिनकर मुंडये, व्यंकटेश नाईक, सौ. राधिका नायक, ऍड. वंदना जोग हे सात नगरसेवक उपस्थित होते. अविश्र्वास ठरावावर सही केलेल्या नगरसेविका सौ. दीक्षा नाईक ह्या मात्र गैरहजर होत्या. तसेच नगराध्यक्ष प्रदीप नाईक, उपनगराध्यक्ष व्हिन्सेंट फर्नांडिस, दामोदर नाईक, शिवानंद सावंत, सौ. रुक्मी डांगी या बैठकीला अनुपस्थित होत्या.
प्रशासकीय कामकाज आणि विकासकामांबाबत नगराध्यक्ष नगरसेवकांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप नोटिशीमध्ये करण्यात आला होता. या बैठकीला नगराध्यक्ष श्री. नाईक उपस्थित नसल्याने ठरावावर चर्चा होऊ शकली नाही तर केवळ मतदान घेण्यात आले. सत्ताधारी गटातील नाराज नगरसेवकांना विरोधी गटातील दोन नगरसेवकांचेही पाठबळ लाभले आहे. नगराध्यक्षांविरुद्ध अविश्र्वास ठराव संमत झाल्याने सत्ताधारी गटातील धुसफुस मिटविण्यासाठी आमदार तथा गृहमंत्री रवी नाईक यांनी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या कारभारावर नाराज असलेले काही नगरसेवक हे गृहमंत्री रवी नाईक यांचे खंदे समर्थक आहेत.
गेले पाच महिने नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी गृहमंत्री रवी नाईक यांच्यामुळे प्राप्त झाली. या काळात पालिका क्षेत्राचा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. कचरा व इतर समस्यांना सोडविण्यास प्राधान्य दिले. आपले चांगल्या प्रकारे करीत असलेले कार्य काही असंतुष्ट नगरसेवकांच्या पचनी न पडल्याने त्यांनी आपल्या विरोधात अविश्र्वास ठराव दाखल केला, असा आरोप नगराध्यक्ष श्री. नाईक यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केला. गेल्या महिन्यापासून पालिकेकडे कचरा विल्हेवाटीसाठी जागा नव्हती. तरी आपण पालिका क्षेत्रातील कचरा दररोज उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम केले आहे, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.

Tuesday, 12 October, 2010

येडियुरप्पांकडून बहुमत सिद्ध

मात्र पेचप्रसंग कायम - राज्यपालांची राष्ट्रपती राजवटीची शिफारस
अपात्र उमेदवारांकडून सभागृहात तोडफोड
भाजप आमदार राष्ट्रपतींसमोर परेड करणार

बंगलोर, दि. ११ : "त्या' बंडखोर आमदारांवर काल सभापतींनी अपात्रतेचा बडगा उगारल्यानंतर आज झालेल्या विश्वासदर्शक ठरावावेळी अभूतपूर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेत येडियुरप्पा सरकारने आपले बहुमत सिद्ध केले. तथापि, भाजप सरकारवरचे संकट अद्याप टळले नसून राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल केंद्र सरकारला पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारच्या विशेष गटाची आज रात्री बैठक होणार असून उद्या दि. १२ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरच या प्रकरणी अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
सोमवारी सकाळी आवाजी मतदान होऊन येडियुरप्पा सरकारने आपले बहुमत सिद्ध केले. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानाची ही कार्यवाही सकाळी १० वा. सुरू झाली. मुख्यमंत्र्यांनी एका ओळीचा विश्वासदर्शक ठराव सभागृहासमोर ठेवला जो सभापतींनी आवाजी मतदानाने संमत केला. यावेळी सभागृहात उपस्थित कॉंग्रेस आणि निधर्मी जनता दल (निजद) आमदारांनी जबरदस्त हंगामा करत या प्रक्रियेला विरोध केला. तत्पूर्वी, काल अपात्र ठरविण्यात आलेले १६ बंडखोर आमदार रेटारेटी करत सभागृहात घुसले. त्यांनी सभागृहात असलेल्या काचा फोडून टाकल्या आणि बंदोबस्तासाठी असलेल्या मार्शलांवरही हल्ला चढवला. त्यामुळे परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना पाचारण केले गेले. पोलिसांनी विधानसभा परिसरात येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, बहुमत सिद्ध झाल्यानंतर सभापती के. जी. बोपय्या यांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित केले.
रविवारी रात्री उशिरा कर्नाटक विधानसभेचे सभापती के. जी. बोपय्या यांनी राज्यपालांच्या आदेशाला न जुमानता त्या बंडखोर १६ आमदारांना विधानभेच्या कामकाजातून अपात्र घोषित केले होते. अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांत भाजपचे ११ आणि ५ अपक्ष आमदारांचा समावेश होता. तथापि, सोमवारी सकाळी अपात्र आमदार जबरदस्तीने सभागृहात घुसले व त्यांनी सभागृहात तोडफोड करायला सुरुवात केली. सदर आमदारांनी मार्शलांवरही हल्ला चढवला. यात एक मार्शल जखमी झाला. त्यानंतर विधानसभेच्या मुख्य द्वारावर टाळे ठोकण्यात आले.
दरम्यान, १६ आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या २२४ वरून २०८ अशी झाली होती. यात भाजपचे १०६, कॉंग्रेसचे ७३ आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांचे २८ आमदार आहेत.
राज्यात राष्ट्रपती राजवटीची
राज्यपालांकडून शिफारस

बंगलोर, दि. ११ ः कर्नाटकचे राज्यपाल एच. आर. भारद्वाज यांनी कर्नाटक विधानसभेत आज भाजप सरकारने जिंकलेल्या विश्वासदर्शक ठरावावरील आपला अहवाल केंद्र सरकारला पाठवला असून त्यात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी शिफारस केली आहे. येडियुरप्पा सरकारने जिंकलेला हा ठराव पूर्णपणे घटनाविरोधी असल्याचेही त्यांनी या अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, केंद्रीय कायदा मंत्री विराप्पा मोईली यांनीही राज्यपालांचेच समर्थन केले असून कर्नाटक विधानसभेचे सभापती के. जी. बोपय्या यांनी घटनेचे सर्वस्वी उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
कर्नाटक विधानसभेत आज विश्वासदर्शक ठरावावेळी गदारोळ झाला होता. या गदारोळातच बी. ए. येडियुरप्पा यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. परंतु, राज्यपालांनी केंद्राला पाठवलेल्या अहवालामुळे कर्नाटकमधील भाजप सरकारवरील संकट अजूनही दूर झाले नसल्याचे मानण्यात येत आहे. राज्यपाल भारद्वाज यांनी काल सभापती बोपय्या यांना विश्वासदर्शक ठरावावरील कार्यवाही पूर्ण होईपर्यंत एकाही आमदाराला अपात्र घोषित करू नये असा आदेश दिला होता. परंतु, सभापतींनी या आदेशाला न जुमानता रविवारी रात्री उशिरा १६ बंडखोर आमदारांना विधानसभेच्या कामकाजातून अपात्र ठरवले होते.
येडियुरप्पा सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यपालांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल केंद्राला पाठवला आहे. विद्यमान सरकारला बरखास्त करून कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस त्यांनी या अहवालात केली आहे. त्यांनी म्हटले आहे की येडियुरप्पा सरकारच्या विरोधात १२० आमदार असून त्यांनी बहुमत गमावले आहे. राज्यपालांच्या या अहवालावर केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार असून त्यानंतर मंत्रिमंडळाचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवला जाणार आहे व अंतिम निर्णय राष्ट्रपती प्रतिभा पाटील घेणार आहेत.
अपात्र उमेदवार उच्च न्यायालयात
विधानसभा कामकाजातून अपात्र ठरवण्यात आलेल्या त्या १६ बंडखोर आमदारांनी सभापतींच्या आदेशावर स्थगिती आणण्याची मागणी करत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मुख्य न्यायमूर्ती जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील बेंचसमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
भाजपचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
कर्नाटकात येडियुरप्पा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर कॉंग्रेसकडून सुरू झालेल्या टीकेचा खरपूस समाचार घेताना भाजपने कॉंग्रेसवर प्रखर हल्ला चढवला आहे. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांच्याकडून गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटक सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत होता. त्यासाठी भाजपच्या अनेक आमदारांना मोठमोठ्या रकमांसहित अन्य अनेक प्रलोभने दाखविली गेली, असल्याचा आरोप त्यांनी केला.
कर्नाटकचे राज्यपाल कॉंग्रेसचे एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप भाजपचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केला व राज्यपालांना त्वरित माघारी बोलावण्याची मागणी केली. राज्यपालांकडून लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
कॉंग्रेसबरोबर जाणार नाही : कुमारस्वामी
कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करून कर्नाटकमधील भाजप सरकार अस्थिर करण्यात मोलाची भूमिका बजावणारे निधर्मी जनता दल (निजद)चे प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी आता या सर्व प्रकरणाला वेगळीच कलाटणी देताना कॉंग्रेसबरोबर पर्यायी सरकार बनवण्याचा आपला कोणताही विचार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे येन केन प्रकारेण कर्नाटकाची सत्ता हस्तगत करण्याच्या कॉंग्रेसला मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे.
केवळ २७ आमदार हाताशी असलेल्या "निजद'ने कॉंग्रेसशी हातमिळवणी करून पर्यायी सरकार स्थापन करण्याचा विचार करावा हे अगदीच बाळबोध व अपरिपक्वतेचे होईल असे ते म्हणाले. येडियुरप्पा सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आणि राज्यपाल एच. आर भारद्वाज यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्यानंतर कुमारस्वामी यांनी लगेचच आपला हा पवित्रा जाहीर केला. कॉंग्रेसचे नाव न घेता ते म्हणाले की, जो पक्ष सरकार स्थापन करू शकतो त्या पक्षाने असा कुठलाही प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला नाही, असे ते म्हणाले.

भीतीपोटीच विश्वजित यांची कोलांटी

भाजपचा आरोग्यमंत्र्यांवर तुफान हल्लाबोल
वाळपई, दि. १ (प्रतिनिधी): वाळपई भागांत सुरू असलेल्या व सुरू होणार असलेल्या खाणींना विश्वजित राणे यांचाच आशीर्वाद असून सत्तरीचे अस्तित्वच नष्ट करू पाहणाऱ्या या खाणीसंदर्भात विश्वजित राणे यांनी कधी तळ्यात तर कधी मळ्यात अशी भूमिका घेत लोकांच्या भावनांशी खेळ चालवला आहे. लोकांचा खाणींना असलेला विरोध लक्षात घेऊन त्यांनी आता कोलांटी उडी घेतली असल्याचा घणाघाती आरोप माजी आमदार नरहरी हळदणकर यांनी केला. आज वाळपई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संध्याकाळी ६ वाजता वाळपई येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेतून भाजपने विश्वजित राणेंच्या धरसोड भूमिकेवर तुफान हल्लाबोल केला. यावेळी नरहरी हळदणकर यांच्यासोबत भाजपचे सचिव प्रा. गोविंद पर्वतकर, उल्हास अस्नोडकर, वासुदेव परब, मंडळ अध्यक्ष नारायण परब आदी मान्यवर उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वीच आपल्या दोना पावला येथील बंगल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विश्वजित राणेंनी लोकांनाच खाणी हव्या असल्याचा दावा केला होता व या खाणींमुळेच सत्तरीतील लोकांची भरभराट होत असल्याचे म्हटले होते. परंतु, आता मात्र ते वृत्तपत्रांतून खाणींच्या बाबतीत आपण लोकांबरोबरच आहोत असा पवित्रा घेत आहेत. आपल्या खाणधोरणासंदर्भात लोकांच्या मनात असंतोषअसल्याचे त्यांना उमगले असून केवळ भीतीपोटीच आता ते खाणींना विरोध असल्याचे भासवत आहेत. मात्र एकदा ही पोटनिवडणूक पार पडली की येथे खाणी सुरू करण्यास त्यांच्याकडूनच प्रयत्न होणार यात शंका नसल्याचे श्री. हळदणकर यांनी पुढे सांगितले.
ज्या दिशेने वारा वाहतो त्या दिशेने सूप धरण्याचे तंत्र सध्या विश्वजित राणे यांनी अंगीकारले आहे असे यावेळी सांगून श्री. हळदणकर म्हणाले की येथील लोकांना खाणी नकोच आहेत. मात्र लोकांचा विरोध आहे म्हणून खाणींना आपलाही विरोध असल्याचे विश्वजित भासवत आहेत. आपल्या स्वार्थासाठी येथील जनतेला गृहीत धरून वर्तमानपत्रांतून प्रसिद्धी मिळवण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. आपण कित्येक कोटींची विकासकामे येथे केली आहेत असे सांगणाऱ्या विश्वजित राणेंनी या विकासकामांची यादी सादर करावी असे आव्हानही यावेळी श्री. हळदणकर यांनी दिले व केवळ पाट्या लावण्याखेरीज त्यांच्याकडून कोणतेही कार्य झाले नसल्याची टीका केली.
दरम्यान, यावेळी बोलताना प्रा. गोविंद पर्तवतकर म्हणाले की, साट्रे या गावातील पूल भाजपच्या काळात झाला. केवळ जोडरस्ता राहिला होता. मात्र हे काम विश्वजित राणे यांनी मुद्दामहून मार्गी लावले नाही. आपल्या पायाशी आलात तरच या पुलाचे काम पूर्ण होईल, अशी धमकी त्यांनी साट्रेवासीयांना दिली, असा आरोपही श्री. पर्वतकर यांनी केला.
वाळपई येथील इस्पितळ "पीपीपी' तत्त्वावर सुरू करण्याचा त्यांचा डाव आहे. लोकांच्या पैशांतून उभे राहिलेले हे इस्पितळ सरकारीच राहिले पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी ते विदेशी कंपनीला देण्याचा विश्वजित राणे यांनी घातलेला घाट येथील नागरिक कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत असेही यावेळी श्री. पर्वतकर यांनी सांगितले. आपण पणजीत राहून ही निवडणूक जिंकू शकतो अशा वल्गना करणारे विश्वजित आज पत्नीसोबत वाळपई मतदारसंघात प्रचार करत आहेत, त्यांनी प्रत्येक पंचायतीत पैशांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे, मंडळांना लाखो रुपये वाटले जात आहेत, या सर्वांची चौकशी होणे आवश्यक असल्याचेही श्री. पर्वतकर यांनी यावेळी सांगितले.

दंडाच्या भीतीने 'त्या'ने घेतली थेट मांडवीत उडी

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): मद्यधुंद अवस्थेत वाहन हाकणाऱ्या टेंपो चालकाच्या मागे 'आरटीओ' लागल्यामुळे घाबरलेल्या या चालकाने चक्क मांडवी नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा अजब प्रकार आज घडला. मात्र, मरीन पोलिसांनी वाचवल्यानंतर त्याची रवानगी थेट पोलिस कोठडीत झाली.
'पोलिसांनी पकडले असते तर, ८ हजार रुपयांचा दंड भरावा लागला असता. तो कोण भरणार? त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणी नदीत उडी घेतली', अशी मासलेवाईक प्रतिक्रिया नंतर या मद्यधुंद चालकाने व्यक्त केली. यावेळीही त्याच्यावर असलेला दारूचा अंमल स्पष्टपणे दिसत होता. दरम्यान, जीवदान मिळालेल्या सुनील कुमार शर्मा (३०) या चालकाच्या विरुद्ध पर्वरी पोलिसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भा. दं. सं. २७९, ३०९ व वाहतूक नियम कायदा १७९ कलमांनुसार गुन्हा नोंद केला आहे. तसेच, नदीत उडी घेण्यापूर्वी मांडवी पुलावर उभी करून ठेवलेला टेंपोही पोलिसांनी जप्त केला आहे.
अधिक माहितीनुसार, सुनील शर्मा हा मुंबईतून गोव्यात टेंपो घेऊन आला होता. बरीच दारू ढोसून तो पुन्हा मुंबईला निघाला असता आगशी बाजारात त्याने जीए ०९ सी ७९१५ या ऍक्टिव्हा दुचाकीला धडक दिली. दुचाकीला धडक बसल्यामुळे तो घाबरला व वाहन न थांबवता त्याने ते सुसाट वेगाने हाकण्यास सुरुवात केली. परंतु, या घटनेवर "आरटीओ'ची नजर पडल्याने त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. "आरटीओ' मागे लागल्याने "आता आपल्याला हजारो रुपयांचा दंड भरावा लागणार पण आत्महत्या केली तर दंड भरण्याचा प्रश्नच येणार नाही', असा विचार करतच सुनील मांडवी पुलावर येऊन ठेपला. पूल संपताच त्याने पर्वरीच्या दिशेने रस्त्याच्या कडेला टेंपो उभा केला आणि पळत येऊन थेट मांडवी नदीतच उडी घेतली. हे दृश्य लोकांनी पाहताच त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. याविषयीची सूचना मरीन पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी बोटीने त्याची शोधाशोध सुरू केली. त्याला लगेच पाण्यातून वर काढण्यास मरीन पोलिसांनी यश आल्याने दंडाच्या भीतीने जीवनयात्रा संपवायला निघालेल्या सुनीलला जीवदान मिळाले. मात्र त्याची रवानगी झाली ती पोलिस कोठडीतच!
रात्री उशिरा त्याची मद्याच्या धुंद उतरल्यानंतर आपल्याला घरी जायचे आहे, असा हट्ट त्याने पोलिसांकडे धरला होता. याविषयीचा अधिक तपास पर्वरी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक श्री. गडेकर करीत आहे.

..तर पुन्हा लढा उभारणार!

स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा इशारा
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी): येत्या १९ डिसेंबरपर्यंत पालिका उद्यानाला देण्यात आलेले "गार्सिया द ऑर्त' हे पोर्तुगीज नाव हटवण्याबरोबरच शहरातील रस्त्यांना देण्यात आलेली नावे न बदल्यास महापालिकेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचा रोखठोक इशारा आज स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष नागेश करमली यांनी दिला. यापुढे कोणत्याही रस्त्याला वा उद्यानाला पोर्तुगिजांची नावे देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही श्री. करमली यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या महापौर कारोलिना पो या पोर्तुगालच्याच दौऱ्यावर गेल्याची माहिती मिळाली आहे.
गोव्यातून पोर्तुगिजांची जुलमी राजवट उलथून टाकणाऱ्या गोव्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी पुन्हा एकदा स्वतंत्र गोव्यात पोर्तुगिजांची नावे हटण्यासाठी लढा उभारावा लागत असल्याने महापालिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आज सकाळी स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या एका शिष्टमंडळाने महापौरांचा ताबा सांभाळणारे उपमहापौर यतीन पारेख यांची भेट घेऊन "गार्सिया द ऑर्त' हे नाव बदलण्याचे आणि अशोकस्तंभाचे सुशोभीकरण करण्याची मागणी केली. पोर्तुगीज नावे बदलण्याचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठवल्याचे सांगत येत्या काही दिवसांत आशोकस्तंभाचे सुशोभीकरण करण्याचे आश्वासन श्री. पारेख यांनी यावेळी दिले. या शिष्टमंडळात कांता गोपी घाटवळ, श्यामसुंदर नागवेकर, चंद्रकांत पेडणेकर, श्यामसुंदर कळंगुटकर, विश्वासराव देसाई व पांडुरंग कुंकळ्येकर या स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश होता.
लक्षावधी रुपये खर्च करून पणजी महापालिकेने नगरपालिका उद्यानाचे नूतनीकरण केले. परंतु, असे करताना राष्ट्राचा मानदंड असलेल्या त्या उद्यानातील अशोकस्तंभाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबद्दल संघटनेने उपमहापौरांची भेट घेऊन तीव्र संताप व्यक्त केला. अशोकस्तंभाचे सुशोभीकरण करण्याचे काम त्वरित हाती घेण्याचे आश्वासन देत परवा सकाळी पालिकेचे आर्किटेक्चर रवी प्रभुगावकर आणि स्वातंत्र्यसैनिक संघटनेबरोबर बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती श्री. पारेख यांनी दिली. या बैठकीत नियमानुसार स्तंभाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. परंतु, रस्त्यांची आणि उद्यानाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारने पाठवण्यात आला असून सरकारने त्यावर अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मनोरंजन संस्थेत लाखोंचा घोटाळा

चित्रपट महासंघाचा ढळढळीत आरोप
पणजी, दि. ११ (सांस्कृतिक प्रतिनिधी): गोवा मनोरंजन संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील लघुपट स्पर्धा आणि "टी - २०' च्या नावाखाली प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. मुख्य अधिकारी मनोज श्रीवास्तव यांनी लघुपट स्पर्धेसाठी केवळ १८ लाख रुपये खर्च येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र ७५ लाख रुपये मंजूर करून घेतल्याचे उघडकीस आले असून उरलेले ५७ लाख कुणासाठी, असा सवाल आज चित्रपट महासंघाने उपस्थित केला.
आज पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत चित्रपट महासंघाने २०१० च्या चित्रपट महोत्सवातून लघुपट स्पर्धा आणी "टी - २०' त्वरित रद्द करण्याची मागणी केली व या संदर्भात मुख्यमंत्र्याचा निवेदनही देण्यात आले असल्याचे आर्नाल्ड डीकॉस्टा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत मिलिंद म्हाडगुत, डॉ. प्रमोद साळगावकर, लक्ष्मीकांत शेटगावकर व ज्ञानेश्वर गोवेकर उपस्थित होते.
मनोरंजन संस्थेचे मुख्य अधिकारी मनोज श्रीवास्तव हे पत्रकारांना खोटी माहिती देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत. २००८ च्या चित्रपट महोत्सवातील लघुपट स्पर्धेसाठी ७५, ६३, २५६ एवढा निधी खर्च झाल्याचे सांगून त्यांनी तो मिळवला. मात्र आता ते केवळ १८ लाख रुपयेच खर्च झाल्याचे सांगतात. माहिती हक्क कायद्याखाली मिळालेल्या माहितीतून हा घोटाळा उघडकीस आला असल्याचे आर्नाल्ड डीकॉस्टा यांनी सांगितले.
मनोरंजन संस्थेत विविध मार्गातून अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचेच यातून सिद्ध होते असा दावाही त्यांनी यावेळी केला.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणाऱ्या लघुपट स्पर्धेसाठी आणि "टी - २०' वर होणारा ३० ते ४० लाख रुपयांचा खर्च हा वायफळ असून प्रत्यक्षात गोमंतकीयांना त्याचा काहीच फायदा होत नाही. गोवा सरकारच्या पैशातून आपली व आपल्या मर्जीतील लोकांची तिजोरी भरण्याचाच हा प्रकार असल्याचा आरोप यावेळी करण्याच आला.
लघुपट स्पर्धा आणी "टी - २०' यांवर मोठ्या प्रमाणात होणारा खर्च निरुपयोगी असून गोमंतकीयांना खऱ्या अर्थाने चित्रपट महोत्सवाचा फायदा करून द्यायचा असेल हा वायफळ खर्च रोखून तो वर्षभर चित्रपट निर्मितीसाठी लागणाऱ्या विविध गोष्टींवर किंवा कार्यशाळा आयोजित करण्याकरिता उपयोगात आणावा असे प्रतिपादन यावेळी लक्ष्मीकांत शेटगांवकर यांनी केले.
या संदर्भातील गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिल्यानंतर त्यांनी दि. १३ रोजी केंद्र सरकारशी करार करण्यापूर्वी याबाबतीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. तसेच चित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात येणाऱ्या समितीत दोन सदस्य हे चित्रपट महासंघाचे असावेत या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचे मिलिंद म्हाडगुत यांनी सांगितले.

Monday, 11 October, 2010

सभापती-राज्यपाल संघर्ष अटळ

कर्नाटकात आज विश्वासदर्शक ठराव, राजकीय हालचाली टिपेला
बंगलोर, दि. १० : कर्नाटकातील भाजप सरकारच्या उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी सभापतींच्या कामकाजात चालविलेल्या हस्तक्षेपामुळे सध्या राज्यपाल हंसराज भारद्वाज व सभापती के. जी. बोपय्या यांच्यातील वाद चांगलाच भडकला आहे. उद्या विश्वासदर्शक ठरावाचे कामकाज संपल्याशिवाय बंडखोरांविरोधातील अपात्रता याचिकेवरील कोणताही निवाडा सभापतींनी देऊ नये किंबहुना कोणत्याही बंडखोराला अपात्र घोषित करू नये, अशी सूचना राज्यपालांकडून आल्यानंतर हा आपल्या कामकाजातील थेट हस्तक्षेप असल्याचे सांगून सभापती बोपय्या यांनी राज्यपालांवर जोरदार पलटवार केला. परिणामी कर्नाटकातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
उद्या विश्वासदर्शक ठराव येणार असून गोव्यातून बळपूर्वक उचलून नेलेले आमदार चेन्नईमार्गे बंगलोरला दाखल होणार आहेत. मात्र त्यापूर्वी आज सभापती के. जी. बोपय्या बंडखोर आमदारांविरोधातील अपात्रता याचिकांवर सुनावणीही सुरू केली. तथापि, निवाडा मात्र त्यांनी उद्या सकाळपर्यंत राखून ठेवला आहे. नेमक्या या पार्श्वभूमीवर राज्यपाल भारद्वाज यांनी ही "वादग्रस्त' सूचना केली होती.
अपात्रता याचिका तसेच सभापतींच्या अखत्यारीतील कोणत्याही कामकाजात राज्यपालांनी हस्तक्षेप करता कामा नये, असा स्पष्ट निवाडा रामेश्वर दयाळ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिल्याचे सांगून राज्यपालांची ही कृती म्हणजे त्या आदेशाचा भंग आहे, असे प्रतिपादन सभापतींनी केले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षानेही राज्यपालांच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली आहे. सरकार अस्थिरतेच्या कामात राज्यपाल थेट भाग घेत असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. सरकार अस्थिर करण्याच्या कामगिरीतील सक्रिय भागीदार असलेल्या राज्यपालांना ताबडतोब माघारी बोलवा, अशी मागणीही भाजपने केंद्राकडे लावून धरली आहे. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून विश्वासदर्शक ठरावाच्या कामकाजाला आरंभ होणार आहे. त्यापूर्वी काही काळ आधी सभापती बोपय्या हे अपात्रता याचिकांवरील आपला निवाडा घोषित करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राजधानी बंगलोरमध्ये आज सकाळपासून राजकीय घडामोडींना विलक्षण वेग आला होता. बंडखोर आमदार भाजपच्या हाती लागणार नाहीत याची पुरेपूर दक्षता निधर्मी जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी घेतली असून त्यांना याकामी स्थानिक कॉंग्रेस नेत्यांकडून मोठेच सहकार्य लाभले आहे. मात्र असे असले तरी विश्वासदर्शक ठराव जिंकणारच, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व सरकारातील ज्येष्ठ मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

गोव्यात पूर्वांचलातून तरुणींची तस्करी

अनेक 'ब्युटी' पार्लर्स बनले गैरकृत्यांचे अड्डे
पणजी, दि. १० (प्रतिनिधी): राज्यामध्ये गैरकृत्यांत गुंतलेल्या "ब्युटीपार्लर्स'साठी पूर्वांचलातून मोठ्या प्रमाणात तरुणींची तस्करी ("ह्युमन ट्रॅफिकिंग') करण्यात आली असल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. पणजी, पर्वरी, कळंगुट, हणजूण, फोंडा तसेच मडगाव आदी भागांतील अनेक ब्युटीपार्लर्सना पूर्वांचलमधून मुली पुरवण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तरुणींची तस्करी करण्याच्या प्रकारात गुंतलेल्या सहा जणांना अटक केल्यानंतर ही माहिती उघडकीस आली आहे. नहीम खान, रशीद खान, महंमद खलीद, नवाब सलमानी, आसिफ खान व शांता मिश्रा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आज सकाळी त्यांना न्यायाधीशांसमोर उभे करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
काल रात्री कांदोळी येथील "लोटस्' या पार्लरवर छापा टाकून अकरा तरुणींची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणात वरील सहा संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर महिलांची तस्करी करण्यात गुंतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या टोळीकडून गोव्यात गैरकृत्ये करणाऱ्या ब्युटीपार्लर्सना मुली पुरवल्या जात होत्या, अशीही माहिती उघडकीस आली आहे.
पूर्वांचलातील तरुणींना गोव्यात नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून त्यांना ब्युटीपार्लरमध्ये पुरुषांना "मसाज' करण्यासाठी ठेवले जात असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पर्यटन मोसमात अशा ब्युटीपार्लर्सना तेजी येत असल्याने मोठ्या संख्येने नागालॅंड, आसाम, मिझोराम, नेपाळ या ठिकाणच्या तरुणींना फसवून गोव्यात आणले जाते. त्यानंतर ब्युटीपार्लर चालवणाऱ्या व्यक्तींकडे या तरुणींचा लिलाव करून त्यांना त्याठिकाणी नोकरीला ठेवले जाते. या पार्लरमध्ये गैरकृत्ये चालत असल्याने गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्या तरुण पर्यटकांचा ओघ अशा पार्लरकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पर्यटन मोसमाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी हा छापा टाकून तरुणींना ताब्यात घेतल्याने खळबळ माजली आहे. अशा ब्युटी पार्लरमध्ये ग्राहक आणण्यासाठी "एजंट'ची नेमणूकही केली जाते. हे एजंट समुद्रकिनाऱ्यांवर, बसस्थानकांवर फिरून बाहेरून येणाऱ्या तरुण पर्यटकांच्या शोधात असतात. तसेच, काही ब्युटीपार्लर्सना पोलिसांचा "आशीर्वाद' लाभल्याचीही माहिती मिळाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अनधिकृत असे ब्युटी पार्लर्स सुरू असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अनेक फ्लॅटमध्येही तरुणी ठेवून तेथे गैरकृत्ये केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांना याची माहिती असूनही कारवाई होत नाही. कांदोळी येथे पोलिसांनी काल कारवाई करून अकरा जणांना ताब्यात घेतले हे केवळ हिमनगाचे टोक असून शेकडो तरुणींची अशा ब्युटी पार्लर्ससाठी पुर्वांचलातून तस्करी झाली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलिसांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

'कॅसिनोंना बिठ्ठोण परिसरात आणल्यास सरकारशी संघर्ष'

बिठ्ठोणवासीयांचे कॅसिनोंविरोधात रणशिंग
पणजी, दि.१० (प्रतिनिधी): कॅसिनोंमुळे गोमंतकीयावर वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे गोव्यात कॅसिनोंची गरजच नाही. आपल्या मतदारसंघात कॅसिनोंचे स्थलांतर करण्याचा सरकारने प्रयत्न केल्यास मतदारसंघातील लोकांच्या हितासाठी सरकारशी आपण संघर्ष करायला मागेपुढे पाहणार नाही, असा जळजळीत इशारा आज माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आज बिठ्ठोण येथे बोलताना दिला.
पणजीतील काही कॅसिनो बिठ्ठोण व पेन्ह द फ्रान्स परिसरात स्थलांतरीत करण्याच्या सरकारच्या इराद्याला विरोध करण्यासाठी आज हळदोणा मतदारसंघातील नागरिकांनी बिठ्ठोण येथील सापेंद्र सभागृहात कॅसिनोविरोधी सभेचे आयोजन केले होते. या सभेत ऍड. नार्वेकर बोलत होते.
हळदोणा गट कॉंग्रेस व कॅसिनोविरोधी नागरिक समितीने आयोजिलेल्या या सभेत व्यासपीठावर हळदोणा कॉंग्रेस अध्यक्ष मायरा कोरिया, जिल्हा पंचायत सदस्य गुपेश नाईक, कुंदा बागकर, हळदोणे सरपंच दिलीप हळदणकर, साल्वादोर द मुंद सरपंच वेरेनिका अल्बुकर्क, पेन्ह द फ्रान्सच्या उपसरपंच रेश्मा आमोणकर, पंच उमेश फडते, सुकूरच्या पंच प्रतिमा नार्वेकर , देविदास सुर्लीकर, गजानन हळर्णकर, झेवियर फोन्सेका उपस्थित होते.
ऍड. नार्वेकर म्हणाले की, कांदोळीत रिव्हर प्रिन्सेस फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसाच धोका मांडवीत असलेल्या जुन्या कॅसिनो बोटी फुटण्याचा असून बिठ्ठोण परिसरात कॅसिनो नकोच. आपण आपल्या मतदारांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेण्याचे ठरवले आहे.
यावेळी हळदोणा कॉंग्रेसच्या अध्यक्षा मायरा कोरिया यांनी कॅसिनोविरोधी ठराव मांडला असता उपस्थितांनी हात उंचावून तो संमत करण्यात आला.

'मेरी गो राऊंड'ला विरोधासाठी बैठकीत तणाव व बाचाबाची

सावर्डे, दि. १० (प्रतिनिधी): शेळवण येथील प्रस्तावित "मेरी गो राऊंड' प्रकल्पाला विरोध करण्यासाठी दोन गटांनी आज सातेरी सभागृहात एकाच वेळी बैठक बोलावल्याने प्रचंड तणाव निर्माण होऊन प्रकरण हातघाईवर येणार अशी चिन्हे दिसू लागली. मात्र कुडचडेचे पोलिस निरीक्षक भानुदास देसाई यांनी वेळीच मध्यस्थी केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
शेळवण येथे खनिज मालाची चढ-उतार करण्यासाठी "मेरी गो राऊंड' हा प्रकल्प केंद्र सरकार उभारणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपासून मोठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या संभाव्य प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला होता. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गावकऱ्यांनी दाद मागितली तेव्हा गावकऱ्यांच्या बाजूने निवाडा झाला. त्यास आता केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या दोन गटांपैकी एका गटाचे नेतृत्व माजी आमदार रामराव देसाई करत असून दुसऱ्या गटाचे नेते बाबल देसाई हे आहेत. आज जेव्हा सातेरी सभागृहात सभा सुरू झाली तेव्हा स्थानिक पंचांनी शेल्डेचे जिल्हा पंचायत सभासद रुझारियो फर्नांडिस, सरपंच टोनी फर्नांडिस व रामराव देसाई यांना व्यासपीठावर पाचारण केले. त्यावेळी शेळवण लोकसंघटनेने रामराव देसाई यांना व्यासपीठावर बोलावण्यास आक्षेप घेतला. त्यावरून दोन्ही गटांत बाचाबाची सुरू झाली. प्रकरण हातघाईवर येण्याची चिन्हे दिसू लागली. त्याचवेळी स्थानिक पोलिस निरीक्षक भानुदास देसाई यांनी मध्यस्थी केली व दोन्ही गटांना शांत केले. अखेर रामराव देसाई आणि त्यांच्या समर्थकांनी तेथून निघून जाणे पसंत केले. मग शेळवण लोकसंघटनेची बैठक तेथे शांततेत पार पडली. बाबल देसाई, शंकर देसाई, अंकुश देसाई, मारियान मास्करान्हेस यांची याप्रसंगी भाषणे झाली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रामराव देसाई यांनी सांगितले की, २००६ साली सदर मेरी गो राऊंड प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. त्याविरोधात आपण स्थानिक गावकऱ्यांच्या सहकार्याने आवाज उठवला. केंद्र सरकारच्या प्रकल्पासाठी राज्य सरकार जमीन संपादन करू शकत नाही या तांत्रिक मुद्यावरून सदर खटल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठात आमच्या बाजूने लागला. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. मुळातच हा प्रकल्प आम्हा गोवेकरांना नकोच आहे. त्यामुळे स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून हा प्रकल्प गोव्यासाठी नको असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करायला लावले तर विनाखर्च या खटल्याचा निकाल आमच्या बाजूने लागू शकतो.
खरे म्हणजे एकाच ध्येयासाठी आमचा लढा सुरू आहे. मात्र दुसऱ्या गटाने सर्व गावकऱ्यांना व पंचायत मंडळाला विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल साशंक आहोत, असेही रामराव देसाई यांनी नमूद केले.

मडगाव पालिका निवडणुकीच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी

मडगाव दि. १० (प्रतिनिधी): मडगाव नगरपालिका निवडणुकीसंदर्भात येथील सदोष प्रभाग रचना व सदोष आरक्षणास आक्षेप घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात येथील तिघा नागरिकांनी गुदरलेल्या याचिकेवर उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे.
लॉरेल आब्रांचिस, क्रेडोन मिदेरा व सोकोर डिसोझा यांच्यावतीने ऍड. निगेल द कॉस्ता यांनी दाखल केलेल्या या निवडणूक याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत मडगाव नगरपालिका निवडणुकीस स्थगिती द्यावी ही विनंती न्यायालयाने मान्य केलेली नाही. मात्र तरीही याचिकेतील मुद्द्यावर वस्तुस्थिती स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश प्रतिवादींना दिलेला असल्याने या याचिकेस महत्त्व प्राप्त झालेले आहे.
सदर याचिकेची एक खासगी नोटीस मुख्यमंत्री दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय सरदेसाई यांना बजावण्याची सूचनाही न्यायालयाने केली आहे.
मडगाव नगरपालिकेसंदर्भात अधिसूचित केलेली निवडणूक व निवडणूक कार्यक्रम बेकायदा, अन्यायकारक असल्याचा दावा करून त्यासाठी सदर अध्यादेश रद्दबातल करावा तसेच गोवा नगरपालिका कायदा १९६८ व गोवा नगरपालिका (निवडणूक) नियम १९६९ ची पूर्णतः अंमलबजावणी करून त्यानंतर मडगाव नगरपालिकेच्या निवडणुका घेण्याचा आदेश प्रतिवादीस द्यावा अशी विनंती त्यांनी याचिकेत केली होती.
दरम्यान, गोव्यातील नगरपालिका निवडणुकीसंदर्भातील गैरप्रकार व लोकांच्या समस्यांबाबत गोळा केलेल्या सह्यांचे निवेदन घेऊन क्रेडॉन मिदेरा हे लवकरच दिल्लीला जाऊन ते केंद्रीय अधिकाऱ्यांना सादर करणार आहेत.
दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा उद्या अंतिम दिवस असून एकंदरीत रोख पाहता उद्या किमान आणखी ५० अर्ज दाखल होतील अशी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत मडगावातील २० प्रभागांतून ५३ अर्ज दाखल झालेले आहेत. यावेळचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या आठवड्यात येथील मुस्लिमांनी केलेल्या घोषणेप्रमाणे सुमारे २५ मुस्लीम रिंगणात उतरलेले असून क्र.२०, १९, १८, १७, १६ येथे त्यांचे प्राबल्य आहे.

सोमदेवने भारताला दिले २९वे सुवर्ण

नवी दिल्ली, दि. १० : भारताचा टेनिस स्टार सोमदेव देववर्ननने पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ग्रेग जोन्सचा ६-४, ६-२ असा सहज पराभव करत राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्ण मिळवून दिले. विश्वविजेत्या सुशीलकुमारने आज राष्ट्रकुल स्पर्धांमधील कुस्तीच्या आखाड्यातही भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. ६६ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात त्यानं द. आफ्रिकेचा पहेलवान हेन्रीक बार्नेसला आरामात चीतपट केलं आणि सुवर्णपदकावर नाव कोरलें. त्यामुळे भारताच्या खात्यात २८ सुवर्णपदकं जमा झाली आहेत. तिरंदाजी रिकर्व्हच्या (वैयक्तिक ) महिला गटात दीपिका कुमारीनं ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. तिच्या पावलावर पाऊल ठेवत, पुरुष गटात राहुल बॅनर्जीनं अचूक "तीर मारला ' आणि भारताला २७ वे सुवर्णपदक मिळवून दिले. हरप्रीत सिंग, दीपिका कुमारी आणि राहुल बॅनर्जी यांनी सुखद धक्के दिल्यानंतर सगळ्यांच्या नजरा सुशीलकुमारकडे लागून राहिल्या होत्या. ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक आणि नंतर विश्वविजेतपदावर नाव कोरणाऱ्या या पहेलवानालाही सुवर्णपदकच खुणावत होते. त्यामुळे आपल्या चाहत्यांना जराही निराश न करता, सुशीलकुमारने दणक्यात खेळ हल्ला आणि प्रतिस्पर्ध्यांला चारीमुंड्या चीत केलं. हेन्रीक त्यांच्यापुढे साफ निष्प्रभ ठरला. त्याला एक गुणही मिळवता आला नाही.
आजच्या या सुवर्ण पंचमीमुळे भारताने पदकतालिकेत इंग्लंडला मागे टाकत पुन्हा दुसरा क्रमांक पटकावला आहे. २९ सुवर्ण, २२ रौप्य आणि २२ कांस्य अशी एकूण ६९ पदके भारताने जिंकली आहेत.

Sunday, 10 October, 2010

आमदारांना विमानात विनातिकीट प्रवेश!

दाबोळीतील नाट्य, सुरक्षानियम धाब्यावर
वास्को, दि. ९ (प्रतिनिधी): कसलीही अधिकृत कागदपत्रे नसताना, विमानातून जाण्यासाठी तिकीट नसताना आज दुपारी दाबोळी विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेने कर्नाटकातील त्या १४ आमदारांपैकी १२ जणांना आत प्रवेश दिल्याने येथील तसेच केंद्र सरकार कशा प्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी सुरक्षेची पण धज्जा उडवू शकते हे दिसून आल्याने त्याविरुद्ध आवाज उठवीत गोवा भाजप नेत्यांनी येथील सुरक्षा यंत्रणेविरोधात तक्रार दाखल केली आहे. "जेडीयु' पक्षाबरोबरच कॉंग्रेस पक्षही कर्नाटकचे सरकार अस्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा आरोप गोव्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर व कर्नाटकातील काही भाजप नेत्यांनी आज येथे केला.
आज दुपारी तीन वाजल्यापासून दाबोळी विमानतळावर हळूहळू करून वाढलेली पोलिस संख्या तसेच इतर सुरक्षा यंत्रणेची मोठ्या प्रमाणात वाढलेली लगबग पाहून प्रवाशांत सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले. दाबोळी विमानतळावर ही सुरक्षा कुठल्याच प्रकारच्या आपत्तीमुळे नसल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रवाशांना हायसे वाटले.
जेडीयु व कॉंग्रेसच्या नेत्यांनी गोव्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या १४ आमदारांपैकी १२ जणांना कर्नाटकला नेण्यासाठी हे पोलिस तैनात केल्याचे लक्षात येताच लोकांतही त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. अनेकांनी यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला. दुपारी तीनच्या सुमारास कर्नाटकातील जेडीयु पक्षाचे खासदार चल्लूराय स्वामी, आमदार जमीर अहमद व इतर नेत्यांनी दक्षिण गोव्याच्या तारांकित हॉटेलात असलेल्या त्या १४ आमदारांपैकी १२ जणांना दाबोळी विमानतळावर आणले. त्यांच्याकडे कुठलीच अधिकृत कागदपत्रे नव्हती. विमानतळावरून जाण्यासाठी तिकीट नसताना त्यांना विमानतळाच्या आत प्रवेश देऊन तेथील सुरक्षेच्या नियमांचे उलंघन केल्याचे गोव्याचे भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर, पर्रीकर व इतर नेत्यांना कळताच त्यांनी दाबोळी विमानतळावर त्वरित दाखल होऊन याबाबत येथील सुरक्षा यंत्रणेला जाब विचारला. मात्र त्यांना याबाबत ठोस उत्तर मिळाले नाही, असे
भाजप खासदार (कर्नाटक) रमेश कट्टी यांनी सांगितले. काल रात्री त्या १४ आमदारांशी आमची चर्चा झाली असल्याची माहिती रमेश यांनी दिली. त्यांनी भाजपला पुन्हा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजताच आज जेडीयु व कॉंग्रेस नेत्यांनी त्यांचे बळाच्या जोरावर अपहरण केले, असा आरोप रमेश यांनी केला.
मात्र कॉंग्रेस व जेडीयु यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे सरकार या सर्वांना पुरून उरेल, असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला.
दरम्यान आज झालेल्या विमानतळावरील मालिकेबाबत माहीती घेण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी पर्रीकर यांच्याशी संपर्क साधला. जेडीयु आणि कॉंग्रेसच्या नेत्यांना गोव्यात दाखल झालेले ते १४ आमदार पुन्हा भाजपला समर्थन देणार असल्याची कुणकुण लागताच त्यांनी आज काही आमदारांचे अपहरण केले, असा आरोप पर्रीकर यांनी केला. काहींना धाकदपटशा दाखवण्यात आल्याचा आरोपही पर्रीकरांनी केला.
सदर १२ आमदारांकडे अधिकृत कागदपत्रे नसताना सुरक्षा व्यवस्थापनाने नियमांचे उल्लंघन करीत देशाच्या सुरक्षेला एके प्रकारे धोक्यात घातल्याचा दावा पर्रीकर यांनी केला. याबाबत आम्ही तक्रार नोंदविल्याची माहिती त्यांनी दिली. यातील २ आमदार भाजपसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. काल रात्री आपण त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपण भाजपसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. पण, कॉंग्रेस व जेडीयुने आज बळजबरीने त्यांना हॉटेलमधून उचलून नेले. कर्नाटकातून गोव्यात आलेल्या आमदारांपैकी काही जणांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार आम्ही पोलिसात दिली असता त्यांनी याबाबत चौकशी न करता तेही या कामात गुंतल्याचे पर्रीकर यांनी सांगून "अटाला' सारख्या गुन्हेगाराला पळवण्यास कारणीभूत असलेल्या पोलिसांकडून आणखी काय अपेक्षा करणार, असा प्रश्न त्यांनी केला.
त्या १२ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या दृष्टीने कॉंग्रेस व जेडीयुचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही पर्रीकर यांनी केला.
एका आमदाराला तर जबरदस्तीने मद्य पाजण्यात आल्याचे पर्रीकर यांनी सांगितले. तो शुद्धीत नसून अशा माणसालाही विमानातून नेणे बेकायदा असल्याचे ते म्हणाले. राजकीय स्वार्थासाठी देशाची सुरक्षा धोक्यात घातल्याने भाजप याविरुद्ध जोरदार आवाज उठवणार असल्याचे पर्रीकर यांनी शेवटी सांगितले.

'त्या' १३ आमदारांचे बळपूर्वक 'अपहरण'

कर्नाटकातील सत्तानाट्याला वेगळेच वळण
आमदार अपहरणामागे कॉंग्रेस व 'जेडीयु': भाजपचा स्पष्ट आरोप

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): कर्नाटकातील राजकीय संकटानंतर गोेव्यात आश्रयासाठी आलेल्या १४ पैकी १३ आमदारांचे आज गोवा पोलिसांच्या मदतीने कुमारस्वामी यांच्या लोकांनी येथील ताज एक्झॉटिका या पंचतारांकित हॉटेलांतून अपहरण करून त्यांना दाबोळी विमानतळावर नेलेे. ज्या वेगाने हे सारे नाट्य घडले ते पाहता हा पूर्वनियोजित कट असल्याचे आणि दिल्लीतूनच हा कट शिजल्याचा आरोप विरोधी भाजपने केला आहे. आमदारांच्या एका गटाचे अशाप्रकारे अपहरण करण्याचा अशा प्रकारची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जाते. या अपहरणामागे कॉंग्रेस आणि जेडीयु असून याकामी सरकारी यंत्रणेचा पुरेपूर वापर करण्यात आल्याचा आरोप आज गोव्यातील स्थानिक नेते तसेच कर्नाटकातील प्रमुख नेते तसेच केंद्रीय भाजप नेत्यांनी केला आहे. दरम्यान, कॉंग्रेस आणि जेडीयुने कितीही कारवाया केल्या तरी सोमवारचा विश्वासदर्शक ठराव आम्ही जिंकणारच, असा ठाम विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्यक्त केला आहे.
७ ऑक्टोबर रोजी गोव्यात दाखल झालेल्या ९ भाजप व ५ अपक्ष आमदारांची नाराजी दूर करण्याच्या कामात स्थानिक भाजप नेते तसेच कर्नाटकातून गोव्यात दाखल झालेले काही नेते आज सलग तिसऱ्या दिवशीही व्यस्त होते. दुपारी ते हॉटेलच्या फाटकापाशी पत्रकारांना भेटणार होते. त्यामुळे पत्रकार भाजप नेत्यांची वाट पाहत तेथेच थांबले होते. दरम्यान बोलणी जवळपास पूर्ण झाली असून दुपारचे भोजन करून बंगलोरकडे निघतानाच पत्रकारांची भेट घेतली जाईल असा संदेश आला. त्यानुसार दुपारी साधारण २.३० वा. पत्रकार तयारीत होते, इतक्यात हॉटेलच्या लॉबीत काही तरी गडबड सुरू असून काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पोलिसांच्या मदतीने कर्नाटकातील आमदारांना पकडून वाहनांमध्ये कोंबल्याची बातमी कोणीतरी आणली आणि पत्रकारांमध्ये एकच गोंधळ उडाला. तोपर्यंत आगेमागे सशस्त्र पोलिस असलेल्या गाड्यांचा ताफा फाटकाच्या दिशेने येताना दिसला.
एकूण सहा गाड्या फाटकापाशी येऊन थांबल्या. सर्वांत पुढे दोन पोलिस वाहने, मध्ये बस त्यानंतर एक आलिशान कार व नंतर पुन्हा दोन पोलिस गाड्या असा हा ताफा होता. त्या गाड्या येऊन थांबताच फाटकाबाहेरील पोलिस व अधिकारीही सक्रिय झाले व त्यांनी पत्रकारांना तसेच इतरांना बाजूला सारून त्या वाहनांना वाट करून दिली. वाहनांचा तो ताफा तशाच सुसाट वेगाने विमानतळाच्या दिशेने निघून गेला. हा सारा प्रकार दोन मिनिटांच्या आत घडला व त्यामुळे नेमके काय घडले हे कोणाला कळले नाही.
असंतुष्ट आमदारांसोबत हॉटेलात असलेले कर्नाटकातील एक मंत्री रेणुकाचार्य मात्र कसेबसे मागे राहिले. झालेल्या प्रकाराबद्दल अत्यंत संतप्त शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करताना, हा चक्क गुंडगिरीचा प्रकार असून सरकारच्या मदतीने आमदारांचे अपहरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्व आमदारांकडील बोलणी संपून ते आज दुपारी बंगलोरला परतणार होते व त्यासाठी विमानही तयार होते. सर्वजण जेवून परतत असतानाच जमीर अहमद गुंजानी व कुमारस्वामी यांच्या हॉटेलमध्ये तयार असलेल्या गुंडांनी सर्व आमदारांना अक्षरशः उचलून गाड्यांत कोंबले व तेथे असलेल्या पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने त्यांना याकामी सक्रिय मदत केली, असे त्यांनी सांगितले. एकंदर प्रकार ज्या पद्धतीने घडला आणि पोलिसांनी अपहरणाच्या कामात ज्या प्रकारे सक्रिय भाग घेतला यावरून यामागे कॉंग्रेस सरकारच आहे याबद्दल शंकाच नसल्याचेही ते म्हणाले.
हा सारा प्रकार घडला तेव्हा हॉटेलमध्ये खासदार श्रीपाद नाईक व गोव्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर हेही उपस्थित होते. मात्र इतक्या झटपट सर्व काही घडले की, कोणाला काहीच करता आले नाही. नंतर श्रीपाद नाईक यांनी बाहेर पत्रकारांशी बोलताना कर्नाटकातील भाजप सरकार खाली खेचण्यासाठी अवलंबिलेल्या या रणनीतीचा निषेध केला व त्याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील असा इशारा दिला. गोव्यातील पोलिस दल ज्या पद्धतीने या एकंदर प्रकरणात वावरले त्यावरून केंद्र सरकारचाही त्याला आशीर्वाद असावा असेही त्यांनी बोलून दाखवले.
आणखी एका वृत्तानुसार, गेले दोन दिवस चालू असलेली असंतुष्टांबरोबरील बोलणी नेतृत्वबदलाच्या मुद्यावर अडून राहिली होती. असंतुष्टांच्या बाकी सर्व मागण्या मान्य झाल्या होत्या पण नेतृत्वबदलाच्या मुद्यावर सर्व बोलणी फिसकटल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वजण जेवणाच्या तयारीत असताना हॉटेल लॉबीत त्यांना काही धटींगणांनी उचलले. कुमारस्वामीचे ते हस्तक होते अशी चर्चा नंतर सुरू होती. काल बंगलोरला जाण्याचा बहाणा केलेल्या कुमारस्वामी यांनी गोव्यातच मुक्काम ठोकून हे सारे कारस्थान रचले असावे असा कयास आहे. कर्नाटक भाजपतील हा सारा असंतोष वास्तविक रेणुकाचार्य यांनी सुरू केला होता. त्याचा वणवा भडकत ८ वर गेला व त्याची परिणती आजच्या अपहरणात झाली. शेवटी रेणुकाचार्य मात्र भाजपकडेच राहिले हे विशेष.

दिवसभरात तब्बल ३०२ अर्ज दाखल

मडगावात ५०, तर काणकोणात फक्त १; सोमवारी शेवटचा दिवस
पणजी, दि.९ (प्रतिनिधी): राज्यातील फोंडा व साखळी वगळता उर्वरीत ११ नगरपालिकांतील १३७ प्रभागांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी होणार असलेल्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी दाखल करावयाच्या सहाव्या दिवशी तब्बल ३०२ अर्ज दाखल करण्यात आले. हा गेल्या सहा दिवसांतील विक्रम आहे. सर्वांत जास्त अर्ज मडगाव या मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातील पालिकेत; तर सर्वांत कमी काणकोण पालिकेत फक्त १ अर्ज दाखल करण्यात आला. सोमवार हा दिवस उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दि. ११ रोजी उमेदवारी भरणाऱ्यांची संख्या मोठी असणार आहे. काल दि. ८ रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर २३७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. आज शनिवार असूनही ही संख्या ३०२ वर पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सोमवारी शेवटच्या दिवशी ही संख्या मोठी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजची अर्जवारी अशी ः पेडणे २७, म्हापसा ४१,डिचोली ३५,वाळपई १४,मडगाव ५०, कुकळी १८, मुरगाव ४४, सांगे ३२, केपे १२,कुडचडे - काकोडा २८ व काणकोण १. एकूण ३०२.

जिवे मारण्याची धमकी प्रकरणी विश्वजित राणेंविरोधात आयरिश सुप्रीम कोर्टात

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): जिवे मारण्याची धमकी प्रकरणात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावरील आरोपपत्र रद्दबातल ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निवाड्याला ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी आज "स्पेशल लिव्ह पीटीशन' म्हणजेच विशेष अनुमती याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सदर याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठासमोर येत्या आठवड्यात सुनावणीस येण्याची शक्यता आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६ कलमानुसार नोंदविलेला गुन्हा (जिवे मारण्याची धमकी) अदखलपात्र असल्याच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एस. ओक व एफ. एम. रीस यांनी विश्वजित राणे यांच्यावरील आरोपपत्र रद्दबातल ठरवले होते.
५०६ हे कलम गोवा सरकारला एका अधिसूचनेद्वारे दखलपात्र करण्याचा अधिकार नसल्याचा निवाडा उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला असून सदर निवाड्याला ऍड. रॉड्रिगीस यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
३१ जुलै २००७मध्ये ऍड. आयरिश यांना जिवे मारण्याच्या धमकी प्रकरणात विश्वजित राणे यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६अंतर्गत जुने गोवे पोलिस स्थानकाने ७३ पानी आरोपपत्र दाखल केले होते. जुने गोवे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण ९ साक्षीदारांची नावे नोंदवली होती. यात श्री. राणे यांच्या पत्नी दिव्या राणे यांच्याही नावाचा समावेश आहे.
१९७३ साली आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे वडील प्रतापसिंह राणे हे कायदामंत्री असताना कलम ५०६ हे एका अधिसूचनेद्वारे दखलपात्र करण्यात आले होते. व त्यानंतर शेकडो व्यक्तींवर सदर कलमाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत. आरोग्यमंत्री राणे यांच्यावर कलम ५०६ अंतर्गत आरोपपत्र दाखल केल्यानंतर गोवा सरकारने अचानक सदर कलम अदखलपात्र करण्याचा पवित्र घेतला.

बोनसच न मिळाल्याने 'कदंब' कर्मचारी संतप्त

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना यंदा चतुर्थीचा "बोनस' मिळाला नसल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला आहे. कदंब महामंडळाची स्थापना झाल्यापासून या कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. केवळ याच वर्षी हा बोनस देण्यात आलेला नाही, अशी माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. याविषयी कदंब महामंडळाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना विचारले असता "कदंब महामंडळ पूर्णपणे डबघाईला आल्यामुळे आम्ही या कर्मचाऱ्यांना बोनस देऊ शकत नाही. कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी दाखवल्यास पुढे विचार केला जाऊ शकतो,' असे त्यांनी सांगितले. बोनस द्यायचा झाल्यास सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचेही ते म्हणाले.
कदंब महामंडळात सुमारे २ हजार कर्मचारी आहेत. दरवर्षी त्यांना चतुर्थीला त्यांच्या वेतनानुसार १० हजार रुपयांपेक्षा जास्त बोनस दिला जातो. मात्र यावेळी कोणतेही कारण न देता चतुर्थीला देण्यात येणारा बोनस दिला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. महामंडळाच्या ताफ्यात ३९८ बस गाड्या आहेत. त्यात अजून नव्या बस गाड्या घेतल्या जात आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बोनसकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे या कामगारांचे म्हणणे आहे.
दुसऱ्या बाजूने कदंब महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचाऱ्यांना बोनस देणे शक्य नसल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.
यंदा बोनस मिळणार नाही, याची माहितीही आम्ही कामगारांना दिली होती, असे दीपक ढवळीकर म्हणाले. कामगार योग्य पद्धतीने काम करीत नाही. त्यांचे कामाकडे लक्ष नसते. त्यामुळे कदंब महामंडळ तोट्यात गेल्याचेही ते म्हणाले. वेळेवर न येणे, बस सोडण्याच्या वेळा चुकवणे, नादुरुस्त झालेल्या बसगाड्याची दुरुस्ती वेळेवर न करणे, अशा तक्रारी श्री. ढवळीकर यांनी सांगितल्या. मात्र गेल्या एका महिन्यात कामगारांचा चांगला प्रतिसाद आहे. तो असाच सुरू राहिल्यास सरकारकडून निधी उपलब्ध करून या कामगारांना डिसेंबर महिन्यात बोनस देण्याचा विचार केला जाईल, असे सांगण्यास ते विसरले नाहीत.

तब्बल २४ सुवर्णपदकांची 'लूट'

मेलबर्न स्पर्धेपेक्षाही यजमानांची झकास कामगिरी
नवी दिल्ली, दि. ९ : राजधानीत सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान भारताने आज आपल्या सुवर्णपदकांची संख्या २४ वर नेऊन देशवासीयांना सुखद धक्का देताना गेल्या वेळच्या मेलबर्न राष्ट्रकुल स्पर्धेतील २२ सुवर्णपदकांचा टप्पा ओलांडला. योगेश्वर दत्त आणि नरसिंह यादव यांनी कुस्तीमध्ये झकास कामगिरी बजावून भारताची सुवर्णपदकांची संख्या २४ वर पोहचवली. दरम्यान, शूटिंगमध्ये गगन नारंगने एकूण चार सुवर्णपदके जिंकून स्पर्धेवर आपला आगळा ठसा उमटवला आहे.
६० किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत योगेश्वर दत्तने कॅनडाच्या जेम्स मॅकनीला दणका देऊन सुवर्णपदकावर आपले नाव कोरले; तर नरसिंह यादव ७४ किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत कॅनडाच्याच इव्हान मॅकडोनाल्डला धूळ चारली.
त्याआधी, नेमबाजीत तुफानी कामगिरी करणाऱ्या गगन नारंगने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स स्पर्धा जिंकून भारताच्या खात्यात २२ वे सुवर्णपदक जमा केले. या स्पर्धेत त्याने जिंकलेले हे चौथे सुवर्णपदक.
सकाळी २५ मीटर सेंटर फायर पिस्तुल प्रकारात विजय कुमार आणि हरप्रीत सिंग या जोडीने सुवर्णपदक जिंकले. तसेच १० मीटर एअर रायफल प्रकारात कविता यादव आणि सुमा शिरुर या महिलांच्या जोडीने ब्रॉंझ जिकले. भारताने २० मीटर चालण्याच्या स्पर्धेतही अप्रतिम कामगिरी केली. हरमिंदर सिंगने २० किमी चालण्याच्या स्पर्धेचं अंतर १ तास , २३ मिनिटं आणि २७ सेकंदात पार करत ब्रॉंझ पटकावले.
या बहारदार कामगिरीमुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या ५५ झाली आहे. त्यात २४ सुवर्ण, १६ रौप्य आणि १५ ब्रॉंझ पदकांचा समावेश आहे.