Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 20 February, 2010

कामत हटाव मोहीम अधिक तीव्र

प्रतापसिंग राणेंच्या पर्यायाला पसंती
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): दिगंबर कामत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविण्यासाठी कंबर कसलेल्या सरकारातील बंडखोर गटाने मुख्यमंत्री हटाव मोहीम आता सर्व पातळ्यांवरून राबवण्याचा चंगच बांधला आहे. मुख्यमंत्री कामत यांना राज्य मंत्रिमंडळात होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत चालल्याने कामत यांनी दिल्लीतील एका लॉबीचा आश्रय घेण्याचे जोरदार प्रयत्न चालविले आहेत. या गोष्टींचा सुगावा लागलेल्या बंडखोर गटानेही आता थेट दिल्लीतच दबाव वाढविण्याचे निश्चित केल्याने कामत यांची पंचाईत होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे सभापती प्रतापसिंग राणे यांच्या नावाला हळहळू सगळ्याच बाजूने होकार मिळू लागल्याने कामत गटाचे धाबे चांगलेच दणाणले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मुख्यमंत्री कामत यांना खरे तर आधीपासूनच मंत्रिमंडळात अनेकांचा विरोध होता. ज्या मार्गाने ते आले आणि इतरांना मागे खेचून मुख्यमंत्रिपदावर स्थानापन्न झाले तेव्हापासून कामत यांच्या विरुद्ध सरकारात असंतोष होता. किमान दोन वेळा तो अत्यंत तीव्र स्वरूपात प्रकट झाल्याने त्यांचे सरकार जवळजवळ पडलेच होते. त्या दोन्ही वेळा नाही म्हटले तरी सभापती प्रतापसिंग राणे यांनी कामत यांना मदत केली होती. परंतु सध्या आमदार, पक्षजन, युतीचे घटक आणि जनताच नव्हे तर खुद्द सभापतीच या सरकारच्या बेबंदशाहीला इतके कंटाळले आहेत की, कामत यांनी पूर्वीची ती सहानुभूतीही घालवली आहे. श्रीयुत राणे हे अनेक वर्षे गोव्याचे मुख्यमंत्री होते. मात्र जेव्हा जेव्हा राज्याच्या हिताचा प्रश्न आला तेव्हा तेव्हा त्यांनी कोणतीही तडजोड केली नव्हती. आज कामत सरकार हे केवळ तडजोडीचे आणि मिळेल ती संधी पदरात पाडून घेणारे सरकार ठरले असल्याने राज्यात केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक स्तरावरही ठिकठिकाणी प्रचंड असंतोष दिसू लागला आहे. यात खाणी सारख्या विषयामुळे तर कामत सरकार पुरते बदनाम झाले आहे. या क्षेत्रात घुसलेले दोन चार मंत्री वगळता कोणालाच या सरकारबद्दल सहानुभूती उरलेली नाही. परिणामी कामत हटाव मोहिमेला सर्व आघाड्यांवरून पाठिंबाच मिळत आहे.
गोव्यात सुरू असलेल्या विरोधी मोहिमेमुळे त्रस्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांना आपल्या बाजूने "मॅनेज' केले असले तरी विरोधी मोहिमेत सक्रिय असलेले आमदार, मंत्र्यांना पाणी नेमके कोठे मुरते आहे याची अचूक कल्पना आल्याने त्याला मात देण्यासाठी त्यांनीही आपले डावपेच तीव्र केले आहेत. अशावेळी प्रतापसिंग राणे यांच्या नावाला सहमती मिळवण्यात हा गट यशस्वी झाला असून कॉंग्रेस, राट्रवादी आणि म. गो. असे मिळून किमान पंधरा ते सतरा जणांचा गट आज राणेंचे नेतृत्व मानण्यास तयार झाला आहे. अशावेळी काही ठरावीक माध्यमांतून बातम्या पसरवून दिगंबर कामत हे कसे सक्षम आहेत आणि त्यांना पाठिंबा किती भक्कम आहे हे पटवून देण्याचा लंगडा प्रयत्न त्यांच्या निकटवर्तीयांनी चालविल्याचे सध्या दिसत आहे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच असल्याचे व कामत यांचे आसन चांगलेच डळमळीत झाल्याचे खुद्द कॉंग्रेस वर्तुळातील मान्यवरांचे म्हणणे आहे. अशा वेळी दबाव वाढत गेला तर नेतृत्व बदलाला पर्याय राहणार नाही, किंबहुना राणे हा पर्याय म्हणून पुढे आल्यास हा पर्याय ठोकरणे कॉंग्रेस श्रेष्ठींनाही शक्य होणार नसल्याचे सध्या राजकीय वर्तुळात मानले जाते.
मुख्यमंत्री कामत नुकतेच दिल्लीहून परतले आहेत व केंद्रीय मंत्री जतीन प्रसाद यांच्या लग्न समारंभासाठी आपण गेलो होतो असे कारण त्यांनी पुढे केले आहे. प्रत्यक्षात मात्र आपले आसन वाचवणे हाच सध्या एककलमी कार्यक्रम बनवलेल्या कामत यांच्या दिल्ली भेटीमागील खरे कारण कोणते हे त्यांचे अवघेच समर्थक आणि मोठ्या संख्येने असलेले विरोधक जाणून आहेत. अशावेळी कामत हटाव मोहीम तीव्र होऊन त्याचे जोरदार पडसाद गोव्याच्या राजकीय क्षेत्रात उमटणे शक्य आहे.

'मिग-२९ के' लढाऊ विमानांमुळे नौदल अधिक शक्तिशालीः ऍन्टनी

वास्को, दि. १९ (प्रतिनिधी): आज भारतीय नौदलात 'मिग-२९ के' ही लढाऊ विमाने सामील झाल्याने भारतीय नौदल अधिक शक्तिशाली बनले आहे. भारत सरकारकडून सर्व सुरक्षा दलांना पुरवण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांमुळे येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाताना आपला देश मागे पडणार नसल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री श्री ए.के ऍन्टनी यांनी केले.
आज सकाळी दाबोळी येथे असलेल्या आय.एन.एस हंसा या नौदलाच्या तळावर चार मिग - २९के या लढाऊ विमानांच्या राष्ट्रार्पण समारंभाला संरक्षण मंत्री श्री ऍन्टनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत रशियाचे उद्योग व व्यापार मंत्री व्हिक्टर ख्रितेंको व उपमंत्री डेनिस मेनतुरो,गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, रशियाचे दूत अलेक्झांडर काडाकिन, भारतीय नौदलाचे कर्मचारी प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा, गोवा विधानसभेचे सभापती प्रतापसिंग राणे, महसूल मंत्री जुझे फिलीप डिसोझा, गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री श्री ऍन्टनी यांनी आजचा दिवस भारतीय नौदलासाठी एक सुवर्णदिन असल्याचे सांगून गेल्या कित्येक काळापासून प्रतीक्षेत असलेली नौदलाची मागणी आज पूर्ण झाल्याचे ते यावेळी म्हणाले. रशिया सरकारने या लढाऊ विमानांसाठी आमच्याशी केलेल्या सहकार्याबाबत श्री ऍन्टनी यांनी त्यांचे यावेळी आभार मानून येणाऱ्या काळातही त्यांच्याकडून अशा प्रकारे सहकार्य मिळणार असल्याची आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, या समारंभाच्या वेळी नौदलात असलेल्या सी - हॅरियर, इल्युशन - ३८, चेतक हेलिकॉप्टर, किरण व डोनियर अशा विमानांबरोबर मिळून मिग - २९के या विमानांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हवाई कसरती सादर करून आपल्या क्षमतेचे सादरीकरण केले. आज भारतीय नौदलात सामील करण्यात आलेली ही मिग - २९के विमाने उडवण्यासाठी भारतीय नौदलाच्या दहा वैमानिकांना रशिया देशात खास प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी आत्तापर्यंत पर्यंत मिग - २९के विमाने चारशे तास चालवलेली आहे (प्रत्येकाने चाळीस तास). सदर विमानांना हाताळण्यात येणाऱ्या पथकाला "ब्लॅक पॅंन्थर' या नावाने ओळखण्यात येणार असून त्यांना आज संरक्षण मंत्री तसेच इतर उपस्थित मान्यवरांकडून यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर मिग विमाने नौदलात असलेल्या सी - हॅरियर या विमानांपेक्षा साठ ते सत्तर टक्के जास्त सुरक्षित असून ती उडवण्यासाठीही सोपी असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. आज झालेल्या सदर समारंभाच्या वेळी भारतीय नौदलाचे कर्मचारी प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा यांनी आपल्या स्वागतपर भाषणाच्या वेळी भारतीय नौदलाने आज या मिग - २९के लढाऊ विमानांना आपल्या ताफ्यात सामील करून आणखीन एक उंच पाऊल घेतल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संरक्षण मंत्री ऍन्टनी हे वायू सेनेच्या खास विमानाने येथे येऊन कार्यक्रमानंतर ते पुन्हा येथून रवाना झाले.
------------------------------------------------------------------------
'त्या'स्फोटांबद्दल दिलगिरी
पत्रकार परिषदेत बोलताना संरक्षण मंत्री श्री. ऍन्टनी यांनी मिग २९ के या विमानांमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण तसेच उत्तर गोव्याच्या लोकांना त्रास सोसावा लागल्याने आपण गोमंतकीय लोकांची माफी मागत असल्याचे यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रथम दक्षिण तर नंतर उत्तर गोव्यात मोठ्या स्फोटांचे आवाज आल्याने येथील जनता मोठ्या प्रमाणात भयभीत झाली होती. हा कसला धमाका आहे याबाबत नंतर तपासणी करण्यात आली असता मिग - २९के या विमानांचा हा आवाज असल्याचे यावेळी उघडकीस आल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.

'मिग-२९ के' लढाऊ विमानांमुळे नौदल अधिक शक्तिशालीः ऍन्टनी

वास्को, दि. १९ (प्रतिनिधी): आज भारतीय नौदलात 'मिग-२९ के' ही लढाऊ विमाने सामील झाल्याने भारतीय नौदल अधिक शक्तिशाली बनले आहे. भारत सरकारकडून सर्व सुरक्षा दलांना पुरवण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांमुळे येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला सामोरे जाताना आपला देश मागे पडणार नसल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री श्री ए.के ऍन्टनी यांनी केले.
आज सकाळी दाबोळी येथे असलेल्या आय.एन.एस हंसा या नौदलाच्या तळावर चार मिग - २९के या लढाऊ विमानांच्या राष्ट्रार्पण समारंभाला संरक्षण मंत्री श्री ऍन्टनी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत रशियाचे उद्योग व व्यापार मंत्री व्हिक्टर ख्रितेंको व उपमंत्री डेनिस मेनतुरो,गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत, रशियाचे दूत अलेक्झांडर काडाकिन, भारतीय नौदलाचे कर्मचारी प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा, गोवा विधानसभेचे सभापती प्रतापसिंग राणे, महसूल मंत्री जुझे फिलीप डिसोझा, गोवा नौदलाचे ध्वजाधिकारी सुधीर पिल्ले व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
संरक्षण मंत्री श्री ऍन्टनी यांनी आजचा दिवस भारतीय नौदलासाठी एक सुवर्णदिन असल्याचे सांगून गेल्या कित्येक काळापासून प्रतीक्षेत असलेली नौदलाची मागणी आज पूर्ण झाल्याचे ते यावेळी म्हणाले. रशिया सरकारने या लढाऊ विमानांसाठी आमच्याशी केलेल्या सहकार्याबाबत श्री ऍन्टनी यांनी त्यांचे यावेळी आभार मानून येणाऱ्या काळातही त्यांच्याकडून अशा प्रकारे सहकार्य मिळणार असल्याची आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, या समारंभाच्या वेळी नौदलात असलेल्या सी - हॅरियर, इल्युशन - ३८, चेतक हेलिकॉप्टर, किरण व डोनियर अशा विमानांबरोबर मिळून मिग - २९के या विमानांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हवाई कसरती सादर करून आपल्या क्षमतेचे सादरीकरण केले. आज भारतीय नौदलात सामील करण्यात आलेली ही मिग - २९के विमाने उडवण्यासाठी भारतीय नौदलाच्या दहा वैमानिकांना रशिया देशात खास प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांनी आत्तापर्यंत पर्यंत मिग - २९के विमाने चारशे तास चालवलेली आहे (प्रत्येकाने चाळीस तास). सदर विमानांना हाताळण्यात येणाऱ्या पथकाला "ब्लॅक पॅंन्थर' या नावाने ओळखण्यात येणार असून त्यांना आज संरक्षण मंत्री तसेच इतर उपस्थित मान्यवरांकडून यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.
सदर मिग विमाने नौदलात असलेल्या सी - हॅरियर या विमानांपेक्षा साठ ते सत्तर टक्के जास्त सुरक्षित असून ती उडवण्यासाठीही सोपी असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. आज झालेल्या सदर समारंभाच्या वेळी भारतीय नौदलाचे कर्मचारी प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा यांनी आपल्या स्वागतपर भाषणाच्या वेळी भारतीय नौदलाने आज या मिग - २९के लढाऊ विमानांना आपल्या ताफ्यात सामील करून आणखीन एक उंच पाऊल घेतल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावण्यासाठी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास संरक्षण मंत्री ऍन्टनी हे वायू सेनेच्या खास विमानाने येथे येऊन कार्यक्रमानंतर ते पुन्हा येथून रवाना झाले.
------------------------------------------------------------------------
'त्या'स्फोटांबद्दल दिलगिरी
पत्रकार परिषदेत बोलताना संरक्षण मंत्री श्री. ऍन्टनी यांनी मिग २९ के या विमानांमुळे गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण तसेच उत्तर गोव्याच्या लोकांना त्रास सोसावा लागल्याने आपण गोमंतकीय लोकांची माफी मागत असल्याचे यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रथम दक्षिण तर नंतर उत्तर गोव्यात मोठ्या स्फोटांचे आवाज आल्याने येथील जनता मोठ्या प्रमाणात भयभीत झाली होती. हा कसला धमाका आहे याबाबत नंतर तपासणी करण्यात आली असता मिग - २९के या विमानांचा हा आवाज असल्याचे यावेळी उघडकीस आल्याने सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या. ----------------------------------------

विदेशींच्या दादागिरीविरोधात मोरजीवासीय एकवटले

२१ रोजी ग्रामसभा गाजणार
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): पेडणे तालुक्यातील किनारी भागांत खास करून मोरजी गावात विदेशी नागरिकांच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय मोरजीवासियांनी घेतला आहे. आत्तापर्यंत या दादागिरीबाबत स्थानिकांनी सामंजस्य भूमिका घेतली, पण रोहीदास शेटगांवकर या टॅक्सी चालकावर हल्ला चढवून त्याचा जीव घेण्यापर्यंत या लोकांची मजल पोहचल्याने स्थानिक युवकांनीही आता विदेशींना आपला हिसका दाखवण्याची जय्यत तयारी चालवली आहे. परवा २१ रोजी मोरजी पंचायतीची ग्रामसभा होणार असून त्यावेळी याविषयावरून गरमागरम चर्चा होणार आहे.
मोरजी गावात मोठ्या प्रमाणात विदेशी लोकांची वर्दळ वाढली आहे. विशेष करून रशियन लोकांनी या गावच्या किनारी भागावर पूर्णपणे आपले वर्चस्व मिळवल्याने मोरजी किनाऱ्यावर जाण्यासाठी शोधून वाट सापडत नाही,अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील काही स्थानिक शॅक्स मालकांनी पर्यटन खात्याकडून मिळवलेला हा पारंपरिक व्यवसाय रशियन लोकांना चालवण्यासाठी दिल्याने या व्यवसायावरही त्यांनी कब्जा मिळवला आहे. मोरजी गावातील स्थानिक युवकांना टॅक्सी व्यवसाय व इतर बारीक सारीक रोजगार प्राप्त झाल्याने त्यांच्याकडूनही आत्तापर्यंत विदेशी नागरिकांच्या मुजोरपणाकडे कानाडोळा केला. आता मात्र परिस्थिती आटोक्याबाहेर गेली असून या विदेशी नागरिकांकडून थेट स्थानिकांना आव्हान देण्याचेच प्रकार सुरू झाले आहेत. पोलिस व इतर प्रशासकीय यंत्रणेला पैशांच्या जोरावर विकत घेऊन हे लोक स्थानिकांचीच सतावणूक करीत असल्याने मोरजी गावातील काही स्थानिक युवकांनी हा विषय गंभीरपणे घेतला आहे.
येत्या २१ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत विदेशी नागरिकांच्या वाढत्या कारवायांबाबत गरमागरम चर्चा होणार आहे. मोरजीचे सरपंच रत्नाकर शेटगांवकर यांनी विदेशी नागरिकांना शॅक्स चालवण्यास विरोध करण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.मोरजीचो एकवट संघटनेचे नेते वसंत शेटगांवकर यांनीही हा विषय गंभीर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.रोहीदास शेटगांवकर याच्या कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळवून देण्याबाबतही ग्रामपंचायतीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, इथे विदेशी नागरिकांना त्रास दिल्यास रोजगाराला मुकावे लागेल,अशी भिती पसरवली जात आहे. मोरजी गावात अनेक युवक टॅक्सी व्यवसायात आहेत, त्यामुळे पर्यटनाला झळ पोहचल्यास व्यवसायावर परिणाम होईल,असाही धोका दाखवला जात आहे. मोरजीत पर्यटकांना येण्यास कुणाचाही विरोध नाही पण इथे वास्तव्य करून व व्यवसाय करून स्थानिकांनाच दादागिरी दाखवणे हा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही. मोरजीवासिय जेवढे शांत तेवढेच आक्रमकही आहेत व तशी वेळ आली तर मोरजीवासिय आपला इंगा दाखवण्यास अजिबात मागे राहणार नाहीत,असा इशाराही काही स्थानिक युवकांनी दिला आहे.

पाच जणांच्या टोळीकडून नऊ मोटरसायकल जप्त

फोंडा, दि.१९ (प्रतिनिधी): येथील फोंडा पोलिसांनी दुचाकी वाहने चोरणाऱ्या एका टोळीचा छडा लावला आहे. या टोळीतील पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून नऊ दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्पाक ऊर्फ आशू जिद्दिमणी (२०), सलिम ऊर्फ सनी महमद शेरीफ शेख (२०), शफी मुझावर (३०), इक्बाल खुरेशी (३४) आणि राहुल सिंह (३०) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणातील सर्व संशयित परराज्यातील रहिवासी असून गेल्या वर्षभरापासून माशेल - खांडोळा, जुना गोवा या भागात भाड्याने राहत आहेत.
फोंडा, पणजी, मडगाव, ओल्ड गोवा आदी भागात ही टोळी कार्यरत होती. या टोळीचे मुख्य केंद्र माशेल खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयाजवळील गॅरेज आहे. या टोळीने चोरलेल्या वाहनांची माहिती मिळविण्याचे काम सुरू असून चोरण्यात आलेल्या गाड्यांना बनावट क्रमांक लावून त्यांची विक्री केली जात होती. किंवा दुचाकी वाहनांचे सुट्टे भाग करून सुट्ट्या भागांची विक्री केली जात होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
या टोळक्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या गाड्यात हिरो होंडा, पल्सर, ऍक्टीव्हा आदी गाड्यांचा समावेश आहे. दुचाकी वाहन चोरल्यानंतर बनावट क्रमांक लावून खांडोळा माशेल येथील गॅरेजमध्ये आणून त्या दुचाकीचे दुरुस्ती करून आणि बनावट क्रमांक लावून तिची विक्री केली जात होती. ह्या टोळीने आत्तापर्यंत किती गाड्याची चोरी आणि विक्री केली आहे, याची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.
माशेल भागात गेल्या काही महिन्यापासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलिसांनी चोऱ्यांना आळा घालण्यासाठी गस्त घालण्याचे काम सुरू केले होते. तसेच संशयास्पद स्थितीत वावरणाऱ्यांना पोलीस स्टेशनवर आणून त्यांची चौकशी केली जात होती. सलिम याला सुरुवातीला चौकशीसाठी आणण्यात आला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर आश्पाक याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आला. त्यानंतर इक्बाल याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ह्या चौकशीच्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास करून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा छडा लावण्यास यश मिळवून नऊ वाहने ताब्यात घेतली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, साहाय्यक उपनिरीक्षक आर.जी. शिंदे, हवालदार किशोर नाईक, शिपाई पंकज वळवईकर, अरविंद गावंस, महेश परब, अजय मोर्जे यांनी तपास केला.

महागाई रोखा अन्यथा सत्ता सोडा

भाजपाचा २१ एप्रिलला संसदेला घेराव
१ मार्चपासून हस्ताक्षर अभियान राबविणार

कुशाभाऊ ठाकरे परिसर (इंदूर), दि.१९ : आकाशाला भिडलेली आणि सर्वसामान्य माणसाचे जिणे हराम करणारी महागाई थांबवा अन्यथा सत्ता सोडा, असा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला असून, २१ एप्रिल रोजी दिल्लीत संसदेला घेराव करणार असल्याची घोषणाही केली.
महागाईवर केंद्रित आर्थिक प्रस्तावाला अनुमोदन देताना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी आज भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली.
ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मांडलेल्या आर्थिक प्रस्तावाला पाठिंबा देतानाच सुषमा स्वराज यांनी कॉंग्रेसप्रणित संपुआ सरकारवर जोरदार प्रहार केला.
कॉंग्रेसने वाढविलेल्या महागाईच्या ओझ्याखाली सामान्य माणूस दबला असून, सामान्य माणसाच्या पोटाची लढाई लढण्याचा संकल्प करून येथून जा, असे आवाहन सुषमा स्वराज यांनी केले.
महागाईविरोधी लढ्याला गती देण्यासाठी आणि दिल्लीचे तख्त हलविण्यासाठी १ मार्चपासून देशभर "हस्ताक्षर अभियान' राबविण्याचीही भाजपाची योजना असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितले. प्रत्येक कार्यकर्त्याला काम आणि प्रत्येक कामासाठी कार्यकर्ता हवा असल्याने, सर्व कार्यकर्त्यांनी या हस्ताक्षर अभियानात सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात, असे आवाहनही सुषमा स्वराज यांनी केले.
आपले पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे "अर्थतज्ज्ञ' असल्याचे सांगितले जाते. पण, त्यांचे अर्थतज्ज्ञ असणे हेच महागाई वाढण्याचे प्रमुख कारण आहे. विकास दर वाढला असल्याचे ते जगभर सांगत असतात. पण, महागाईच्या ओझ्याखाली गरीब, सर्वसामान्य माणूस मरतो आहे, याकडे ते दुर्लक्ष करतात, ही बाब गंभीर असल्याचे सांगत सुषमा स्वराज यांनी खास आपल्या शैलीत केंद्र सरकारवर आसूड ओढले.
गुजरात आणि मध्यप्रदेश या भाजपाशासित राज्यांमध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांना दोन-तीन रुपये किलो दराने धान्य दिले जात असल्याकडे लक्ष वेधतानाच, "गुजरात हे विकासाचे मॉडेल आहे,' तर मध्यप्रदेश हे "संवेदनशील'तेचे मॉडेल आहे, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
देशात महागाई कशी वाढली, त्याबाबतच्या आकडेवारीची पोल आपण २२ पासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खोलू आणि भ्रष्टाचारासोबतच महागाईचा मार खात असलेल्या जनतेचा आवाज बुलंद करू, असेही स्वराज यांनी सांगितले.
साखर कडू झाली, डाळ गरिबाच्या ताटातून गायब झाली, आता कांदा खाताना नव्हे, तर कांदा खरेदी करतानाच सामान्य माणसाच्या डोळ्यांतून पाणी येत आहे. असे असताना "आम आदमी'बाबत बोलण्याचा अधिकार कॉंग्रेसला राहिलेला नाही. "आम आदमी'च्या हिताचा विचार केवळ भाजपाच करू शकते. अटलजी पंतप्रधान असताना रालोआच्या सत्ताकाळात आम्ही हे कृतीने सिद्ध केले आहे, याकडे सुषमा स्वराज यांनी लक्ष वेधले. महागाईचा फटका महिलांनाच कसा बसतो, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
गरिबाच्या तोंडचा घास पळविण्याचे पाप कॉंग्रेसने केले आहे. महागाईचे स्वत:च केलेले सर्व विक्रम कॉंग्रेसने तोडले आहेत. "दाम बढाओ, गरिबों का धान्य कोटा घटाओ,' हे कॉंग्रेसचे धोरण झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
सुषमा स्वराज भाषणाला उभ्या राहताच राजमाता सिंधिया सभागृहात उपस्थित राष्ट्रीय परिषद सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या भाषणातील जोशामुळेही सभागृहात चैतन्य निर्माण झाले होते.
"महंगाई को रोक न सके, वह सरकार निकम्मी है,
जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है...
या सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले होते.

Friday, 19 February, 2010

राम मंदिरच्या जागेवरील दावा मुस्लिमांनी सोडावा

भाजपाध्यक्षाचे आवाहन
इंदूर, दि. १८ (प्रतिनिधी): राम मंदिर हा भाजपचा आत्मा आहे. त्यापासून आम्ही ढळलेलो नाही. सर्वांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याची आमची भूमिका आहे. अल्पसंख्य समुदायाला माझी विनंती आहे की, त्यांनी राममंदिराची जी जागा आहे, ती मंदिराच्या निर्माणासाठी द्यावी. आम्ही मशिदीसाठी पर्यायी जागा देऊ, एवढेच नव्हे तर मशीद बांधूनही देऊ, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत सांगितले.
आतापावेतो भारतातील ग्रामीण व्यवस्थेची विकासाची आणि कृषीची जी पध्दतशीर दुर्दशा कॉंग्रेस पक्षाने केली आहे, ती संपविण्यासाठी महात्मा गांधी आणि पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना अभिप्रेत असलेला ग्रामोदय उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी गाव चलो चा मंत्र अमलात आणवला पाहिजे, असे भावपूर्ण आवाहन नितीन गडकरी यांनी आज केले. भाजपच्या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षपदाची औपचारिक सूत्रे हाती घेतल्यानंतर ते कुशाभाऊ टाकरे परिसरातील राजमाता सिंधिया सभागृहात पाच हजारावर अधिक प्रतिनिधींना संबोधित करीत होते.
ग्रामीण भागातील खरी क्षमता कॉंग्रेसला कधी कळलीच नाही, त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने सरकारी धोरणांची फेरआखणी करणे जरूरी झाले आहे. शेतीसाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हायलापाहिजे. तसेच, ग्रामीण भागातील उद्योजक उभे होऊन मूल्यवर्धित कृषी प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. शहरी भाग आणि ग्रामीण भाग यातील विद्युत पुरवठ्याबाबत जो भेदभाव केला जातो, तो संपुष्टात आला पाहिजे, असेही त्यांनी विद्यामान संपुआ सरकारला ठणकावून सांगितले.
आपल्या तपशीलवार भाषणात त्यांनी जवळजवळ ६५ मुद्यांना स्पर्श करून भाजपची प्रतिमा उजळून निघावी यासाठी विविध मुद्दे विचारार्थ समोर ठेवले. केंद्र शासनाने ७३ वी आणि ७४ वी जी घटना दुरुस्ती केली आहे, त्यातून पंचायतराज संस्थांना खरा प्राण मिळालेला नाही, असे सांगून ते म्हणाले, केंद्रीय कर महसुलाचा किमान दहा टक्के भाग हा सरळ ग्रामपंचायती आणि महापालिका यांना देण्यात आला पाहिजे. अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनाही लोकशाहीवादी मार्गाने त्यांना समाविष्ट करत अंमलात आणल्या गेल्या पाहिजेत. मी आपल्यासमोर ग्रामीण अर्थ०यवस्थेच्या प्रगतीची क्षमता असलयाचे कुठलेही पुस्तकी ज्ञान पाजळत नाही. तर मी प्रत्यक्ष अनुभवातून या बाबी शिकलो आहे. ग्रामीण भागातील पर्यटन, वन्य भागातील पर्यटन याला जर अग्रक्रमाने चांगले रस्ते पुरविले, चांगली हॉटेलं उभारलीत तर निश्चितपणे या क्षेत्रालाही चांगले दिवस येऊ शकतात.
भारताच्या विकासाचे पर्यायी मॉडेल हे गाव चलोच असले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, चांगले रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, जागतिक दर्जाची टेलिफोन यंत्रणा व आयटीच्या सर्व सोईसुविधा या भागात असल्या पाहिजेत. सतत वीज पुरवठा व्हावा, अनेक प्रीकुलिंग प्लाण्टस उभारले जावेत आणि यातूनच भारताचे आधुनिक खेडी उभी राहतील आणि शहरी भागातील माणसांनाही ग्रामीण भागाकडे जावेसे वाटू लागेल, असे वातावरण निर्माण होऊ शकते.
२१ व्या शतकाकडे जाण्याची ही भाजपाची नवीन दृष्टी कार्यकर्त्यांनी समजून घेतली पाहिजे. आपल्या भाषणाच्या प्रारंभी कार्यकर्ताधिष्ठित पक्ष म्हणून कार्यकर्त्यांचे त्यांनी अत्यंत उत्साहाने स्वागत केले. १९८० साली मुंबईला भाजपाची स्थापना झाली, त्यावेळी कार्यकर्ता म्हणून मी जेवढा उत्साह अनुभवला होता, तेवढाच उत्साह मला आजही कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. एका सामान्य कार्यकर्त्यावर अध्यक्षपदाची जबाबदार आली आहे, याने माझा अभिमानाने उर भरून येतो. मी अध्यक्ष होणे हा कार्यकर्त्यांचाच एक सन्मान आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय तसेच, अटलबिहारी वाजपेयी , लाकृष्ण अडवाणीआणि राजनाथसिंग यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी अटलजींच्या प्रकृतीसाठी सर्वासह ईश्वराची प्रार्थना केली.
राष्ट्र पहिले, पक्ष नंतर आणि व्यक्ती सर्वात शेवटी असाआपला क्रम असला पाहिजे, असे आवर्जुन सांगत ते म्हणाले, आम्ही सगळ्यानी प्रयत्न केला तर जो तात्पुरता माघारीचा भाव आम्हाला अनुभवायला मिळाला होता, तो संपून जाऊ शकतो. हे करत असतानाच त्यांनी भाजपाच्या कार्यविस्ताराचा विस्ताराने आढावा घेतला.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आणि प्रश्नांचा तपशीलवार आढावा घेऊन त्यांनी कॉंग्रेस पक्षाला असेआवाहन केले की प्रत्येक महत्वाच्या विषयावर समान राष्ट्रीय भूमिका आपण स्वीकारली पाहिजे, असे कळकळीचे आवाहन करून ते म्हणाले, आतापर्यंत ज्या ज्या वेळी असा राष्ट्रीय महत्वाचा विषय आला, त्यावेळी कॉंग्रेसने ना कधी चर्चा केली ना विरोधकांचे सहकार्य मागितले. अमेरिकेशी अणुशक्तीविषयक करार करताना किंवा कोपनहेगन परिषदेच्या वेळी आपण एकच राष्ट्रीय भूमिका घेऊ शकलो नाही. ही स्थिती टाळली पाहिजे.
जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न हा आमच्यासाठी त्यागाचा आणि समर्पणाचे प्रतीक आहे असे ठासून सांगत गडकरी म्हणाले, राष्ट्रीय एकात्मतेच्या खऱ्या भावनेसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपले बलिदान केले आहे. मात्र, जम्मू काश्मीरच्या विषयात संपुआ सरकार चुकीच्या दिशेने जात आहे आणि त्याचे संपूर्ण देशावर धोकादायक परिणाम होऊ शकतात. जम्मू आणि काश्मीर तसेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे या भारताच्या भूमिकेपासून आम्ही ढळावे म्हणून बाह्य दबावही येत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेस यांच्या संयुक्त सरकारने पाक विघटनवाद्यांना पत्करून घेण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. जर कॉंग्रेसने असेच बोटचेपे धोरण घेतले तर १९४७ साली आम्ही जी चूक केली त्यासारखी भयानक आणि देश विघटनकारी घटना होईल अशी मला भीती आहे. फुटीरवाद्यांना आम्ही अशा पद्धतीने काश्मिरात समाविष्ट करून घेणार नाही आणि काश्मीर हा भारताचाच भाग राहील यासाठी आम्ही आमच्या प्राणांची आहुती द्यायलाही सज्ज आहोत.
कॉंग्रेस पक्षाने मतपेटीचे जे राजकारण अधिक गतिमान केले आहे, त्यामुळे भारताची अंतर्गत सुरक्षा धोक्यात आली आहे, असा गंभीर इशारा देऊन गडकरी म्हणाले, देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा या बाबीकडे राजकीय हितसंबंधाच्या दृष्टीने न बघता राष्ट्रीय दृष्टिकोनातून बघितले पाहिजे. ज्यावेळी रालोआचे सरकार होते, त्यावेळी आम्ही हा दृष्टिकोन बाळगला होता. आपल्या देशाच्या भोवती सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते बघता आपली शस्त्रसज्जता कुठल्याही परिस्थिीतीत अजिबात कमी होऊ नये ही बाबही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित करून सांगितली. आज जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद या दोनचा मोठा धोका आपल्या अंतर्गत सुरक्षेला आहे असे सांगून पुण्यात नुकत्याच झलेल्या जर्मन बेकरीतील बॉम्बस्फोटाचा त्यांनी उल्लेख केला. काही कॉंग्रेस नेत्यांनी त्याला राजकीय तीर्थयात्रेचे रूप दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून ते म्हणाले, ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी २६ ११ ला आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांच्याही पावन स्मृतीचा अपमान केला जात आहे. आणि त्याचवेळेला आपले राजनयिक प्रतिनिधी मात्र पाकशी चर्चा करायला उतावीळ झाले आहेत. पाकिस्तान आज आंतरराष्टीय जिहादी आतंकवादाचा मुख्यालय म्हणून विकसित होत आहे. कुठलंही वैचारिक सुसंगती नाही, विचारांची स्पष्टता नाही आणि ठामपणाही नाही असे गोंधळाचे चित्रआहे. पुण्यातील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तर असे स्पष्ट मत आहे की, दहशतवाद आणि पाकशी चर्चा या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालू शकत नाहीत. पाकिस्तानबाबत आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात भारताने रालोआ सरकारच्या काळात जे धोरण स्वीकारले होते, तेदेखील या कॉंग्रेस सरकारने सोडून दिले आहे. असे सांगून आपल्या अल्पकालीन मताच्या फायद्यासाठी कॉंग्रेस पक्ष आतंकवादाचा धोकाही आता विसरू लागलेला दिसत आहे. कॉंग्रेसचे काही ज्येष्ठ नेते आता जाहीरपणे असे म्हणू लागले आहेत की ज्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकारी मारला गेला आहे, अशी बाटला हाऊसची चकमक ही बनावट आहे. तर दुसरीकडे अफजल गुरूला कधी फाशी दिली जाईल हे अजूनही कोणाला कळत नाही. या दोन्ही बाबी कॉंग्रेसच्या मतपेटीच्या राजकारणाच्या प्रतीकच मानाव्या लागतील. याच मतांच्या राजकारणासाठी कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट हे शिक्षणात आणि नोकऱ्यांत धर्मावर आधारित आरक्षणे देऊ बघत आहे. मुसलमानांमध्ये शिक्षणाचा विस्तार होऊन त्या मस्लिम बांधवांचाही सामाजिक, आर्थिक विकास झाला पाहिजे याच्या प्रत्येक प्रयतनाला आमचा पाठिंबा आहे. आतापावेतो कॉंग्रेस पक्षाने आपल्या स्वत:च्या राजकीय हितासाठी म्हणून मुस्लिम समाजाचे शोषणच केले आहे. दलित ख्रिश्चनांनाही आरक्षण देणे ही बाब देखील अशीच आहे.
ईशान्य भारत आणि नक्षलवादी आव्हाने, बांगलादेशातून होणारी घुसखोरी आणि या हिंसाचारासमोर कॉंग्रेसने टेकलेले गुडघे याचा आढावा गडकरी यांनी आपल्या तपशीलवार भाषणात घेतला.

'उमदा वैमानिक गमावला...'

विंग कमांडर ओस्वाल्ड यांना आज अखेरचा निरोप
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): पश्चिम बंगालमधील हाशिमारा येथे मंगळवारी "मिग २७' या लढाऊ विमानाला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेले गोमंतकीय सुपुत्र विंग कमांडर ओस्वाल्ड दी आब्रू यांच्यावर उद्या (शुक्रवारी) दुपारी ४.३० वाजता सान्तिनेज दफनभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. "गोव्याबरोबरच देशाने एक उमदा अधिकारी गमावला', अशा प्रतिक्रिया ओस्वाल्ड यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त होत आहेत.
ओस्वाल्ड हे मुळचे चोडणचे. गेल्या काही वर्षांपासून पश्चिम बंगालमधे स्थायिक झाले होते. त्यांचा मृतदेह बुधवारी रात्री गोव्यात शासकीय इतमामात आणण्यात आला आहे. ३९ वर्षीय विंग कमांडर ओस्वाल्ड यांना हाशिमारा येथील सैन्य तळावर सलामी देण्यात आली. नंतर कुटुंबीयांसोबत त्यांचा मृतदेह एका विशेष विमानाने गोव्यात पाठविण्यात आला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबरच स्क्वाड्रन लीडर श्रीजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळही त्यांच्यासोबत होते. त्यांचा मृतदेह सायंकाळी ७ वाजता गोव्यात पोहोचेल अशी आशा होती. मात्र तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्यांचा मृतदेह घेऊन येणारे विमान अलाहाबाद आणि नागपूरमध्ये उतरवावे लागले. ओस्वाल्ड यांच्या मृतदेहासह त्यांचे कुटुंबीय व सैन्य शिष्टमंडळ रात्री साडेदहाच्या सुमारास गोव्यात दाखल झाले. ओस्वाल्ड यांचा चुलतभाऊ डिऑन मिनेझीस यांच्यासह त्यांचे अन्य नातेवाइक व अनेकांची विमानतळावर उपस्थिती होती. अश्रुपूर्ण नयनांनी दिवंगत ओस्वाल्ड यांचे अंत्यदर्शन त्यांनी घेतले. विंग कमांडर ओस्वाल्ड यांचा मृतदेह आयएनएचएस जीवंथीच्या शवागरात ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत हा मृतदेह याच ठिकाणी ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांतील अपघातांमुळे चिंतेचा विषय बनलेली "मिग- २७' लढाऊ विमानाचा ताजा बळी ते ठरले. त्यामुळे केवळ गोव्याचाच नव्हे तर देशांतर्गत सुरक्षेचा विचार करता, ही चिंतेची बाब बनली आहे. ज्यांनी देशासाठी प्राण पणाला लावायचे त्यांना शत्रू पक्षाकडून नव्हे तर आपल्या सुरक्षा साधनांकडूनच धोका असणे ही बाब केवळ दुर्दैवी नसून, चिंताजनकही आहे.
पश्चिम बंगालमधील हाशिमाराजवळ मंगळवारी भारतीय हवाई दलाचे मिग-२७ विमान कोसळून झालेल्या अपघातात ओस्वाल्ड मृत्युमुखी पडले. हवाई तळावरून विमानाने दुपारी सव्वादोनच्या सुमारास उड्डाण केले. विमान कोसळण्याच्या काही मिनिटे अगोदर इंजिनाला आग लागल्याची माहिती ओस्वाल्ड यांनी हवाई तळाला दिली होती. हवाई दलाच्या शिलॉंग येथील पूर्व विभाग मुख्यालयाने या अपघाताची चौकशीचे आदेश दिले आहेत.

कुळे पोलिसांकडून समितीची सतावणूक

जेम्स आल्मेदा मृत्युप्रकरण आणि खनिज वाहतुकीच्या विरोधात आवाज उठवत असलेल्या कुळे नागरिक समिती सदस्यांना पोलिसांमार्फत सतावण्याचे सत्र सुरू करण्यात आले आहे. पिंपळमळ येथे राहणारे नागरिक समितीचे सचिव ज्योकिम डिकॉस्टा यांना आज कुळे पोलिसांनी अन्य एका ज्योकिम नावाच्या व्यक्तीचे पाणी बिल देऊन त्यावरील ११ हजार २०० रुपयांची रक्कम येत्या दहा दिवसांत भरण्याची धमकीच दिली आहे. अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांना बजावण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिक समितीचे सचिव ज्योकीम डिकॉस्टा हे पिंपळमळ येथे राहतात. तर, अन्य एक ज्योकिम नामक व्यक्ती मेटावाडा येथे राहते. या व्यक्तीने सुमारे ११ हजार रुपयांचे पाण्याचे बिल भरले नसल्याने ते बिल पिंपळमळ येथे राहणाऱ्या ज्योकिम यांच्या नावे खपवण्याचा घाट कुळे पोलिसांनी घातला आहे. सदर पाणी बिलावर ज्योकिम यांच्या नावासह रा. मेटावाटा, घर क्रमांक ४२४ स्पष्टपणे दिसत असूनही पोलिसांनी पिंपळमळ येथे राहणाऱ्या ज्योकिमला यांना बिल भरण्याचा आदेश देऊन धमकावल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कुळे पोलिसांनी नागरिक समितीच्या सदस्यांनी सतावण्याची "सुपारी' घेतील आहे का, असा खडा सवालही नागरिक समितीने केला आहे. यापुढे कोणत्याही प्रकारे नागरिक समितीच्या सदस्यांवर अत्याचार झाल्यास आणि त्यांची सतावणूक केल्यास ती सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा समितीने दिला आहे.

म्हार्दोळ अपघातात प्रियोळची महिला ठार

म्हार्दोळ, दि.१८ (वार्ताहर) : आकार म्हार्दोळ येथे बगल रस्त्यावर आज (दि.१८) सकाळी सव्वा आठच्या सुमारास डिओ स्कूटर (जीए ०५ सी ५९४४) आणि ट्रॉली ट्रक (जीए ०२ व्ही ६८००) यांच्यात झालेल्या अपघातात स्कूटरवर मागे बसलेली महिला ठार झाली. तर स्कूटर चालक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर बांबोळी येथील सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
सौ. वनिता रत्नाकर गावडे (२८ वर्षे) असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. सौ. दीक्षिता दिलीप गावडे (३५) ही गंभीर जखमी झाली आहे. "त्या' दोघी सख्या जाऊ असून गाळवाडा प्रियोळ येथील रहिवासी आहेत. "त्या' डिओ स्कूटरने प्रियोळ येथून कुंडईला जात असताना आकार म्हार्दोळ येथे मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात डिओ स्कूटरला अपघात झाला. स्कूटरवरील दोघीही रस्त्यावर कोसळल्या. सौ. वनिता गावडे ही ट्रकच्या चाकाखाली सापडली. फोंडा पोलिस स्टेशनचे हवालदार पांडुरंग गावडे यांनी पंचनामा केला. निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

खारफुटीच्या रक्षणासाठी न्यायालयात जाण्याची तयारी

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): पंचवाडी येथील नियोजित विजर खाजन बंदर प्रकल्पाच्या निमित्ताने येथील धनदाट खारफुटी नष्ट करण्याचा डाव कदापि खपवून घेतला जाणार नाही. खारफुटीच्या नासाडीला उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे. इथे मात्र खुद्द राज्य सरकार एका खाजगी कंपनीच्या हितासाठी ही खारफुटी नष्ट करू पाहत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याची जोरदार तयारी पंचवाडी बचाव समितीने चालवली आहे.
गोव्यातील खारफुटीबाबत विशेष अभ्यास केलेले वैज्ञानिक तथा पर्यावरणतज्ज्ञ डॉ.नंदकुमार कामत यांची भेट घेणार असल्याची माहिती पंचवाडी बचाव समितीचे निमंत्रक क्रिस्टो डिकॉस्ता यांनी दिली. खारफुटीच्या संरक्षणार्थ "मुंबई एन्वार्यमेंटल ऍक्शन ग्रुप' ने अलीकडेच उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे, त्यामुळे पंचवाडीच्या खारफुटीबाबत या संस्थेकडूनही सल्ला मागितला जाईल, असेही ते म्हणाले. पंचवाडी गाव हा पूर्णपणे हरित पट्टा आहे. म्हैसाळ धरणामुळे सुमारे २०० हेक्टर जमीन ओलीत क्षेत्राखाली आहे. या परिस्थीतीत या गावात खनिजाचे संकट आणून हा गाव नष्ट करण्याचे षड्यंत्र सरकारकडून सुरू आहे, अशी टिकाही करून राज्यातील पर्यावरणप्रेमी तथा खाण विरोधी कार्यकर्त्यांनी पंचवाडी बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांना हा लढा पुढे नेण्यास मार्गदर्शन करावे व सेझा गोवा व राज्य सरकारचा दबाव झुगारून पंचवाडी गावचे रक्षण करण्याच्या या लढ्याला साथ द्यावी, असे आवाहनही समितीने केले आहे.
पंचवाडीवासियांना मुर्ख समजू नये!
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार कोडली ते पंचवाडी खनिज रस्त्यासाठी सुमारे ५,५४,७२० चौरसमीटर जागा संपादन करण्याची जाहीर केले होते.मुळात भूसंपादनाचा जारी केलेल्या आदेशात मात्र केवळ ३,९३,३११ चौरसमीटर जागाच संपादन केली आहे.कोडली,म्हैसाळ व कामरखंड गावातील जागा वगळण्यात आली आहे, याचे नेमके कारण काय,असा सवाल समितीने केला आहे. केवळ पंचवाडीची जागा कवडीमोल दराने सेझा गोवा कंपनीसाठी संपादन करून सरकार पंचवाडीवासियांच्या डोळ्यांत धूळ फेकीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुळात सरकारने पंचवाडीसाठी जारी केलेल्या दराप्रमाणे किमान दर शंभर रुपये अधिसूचित झाला आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे इथे सुमारे दीड ते दोन हजार रुपये चौरसमीटर असा दर आकारला जातो. सरकारने मात्र ही जागा क्षुल्लक दराने संपादन केली आहे.सरकारी दरांप्रमाणे भातशेतीसाठी ५ रुपये प्रती चौरसमीटर, त्यात अडीच रुपये मालक व अडीच रुपये कुळाला मिळतील. इतर जमिनीसाठी सरसकट २० रुपये प्रतीचौरसमीटर दर देण्याचे ठरले आहे. दरम्यान, जर हा नियोजित रस्ता कोडली ते पंचवाडीपर्यंत आहे तर मग कोडली ते कामरखंडपर्यंतची जागा संपादीत का केली नाही,असाही सवाल समितीने केला आहे. या भागातील काही लोकांनी जाणीवपूर्वक सरकारवर दबाव आणून ही जागा संपादीत करण्यास मज्जाव केल्याचाही संशय व्यक्त होत आहे. हा प्रकल्प पूर्णपणे खाजगी असून त्यात सार्वजनिक हित अजिबात नाही, त्यामुळे या लोकांच्या जमिनीला बाजारभावाने दर आकारण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची खबर मिळाली आहे.

प.उदयराज गोडबोले यांचे निधन

पुणे, दि. १८ : संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित उदयराज गोडबोले यांचे आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
ते ८४ वर्षांचे होते. गोडबोले यांनी लावणी भुलली अभंगाला, बैजू, देवमाणूस यांच्यासह अनेक पारंपरिक संगीत नाटकांमध्ये भूमिका केली होती. संगीत सौभद्रमध्ये त्यांनी केलेली नारदाची भूमिका विशेष गाजली होती. नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना बालगंधर्व पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
त्यांच्या निधनाबद्दल नाट्य तसेच संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

निर्मल पांडे यांचे निधन

मुंबई, दि. १८ : अभिनेता निमर्र्ल पांडे यांचे आज (गुरुवार) दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. निर्मल पांडे यांनी सुरवातीला नाटक व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले. १९९४ मध्ये शेखर कपूर यांच्या "बॅंडिट क्वीन' या चित्रपटाद्वारे त्यांची चित्रपटातील कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर "दायरा' (१९९६), गॉडमदर (१९९९), ट्रेन टू पाकिस्तान व इस रात की सुबह नही या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
'दायरा' चित्रपटातील भूमिकेसाठी निर्मल पांडे यांना फ्रांसमध्ये पुरस्कार मिळाला होता.

Thursday, 18 February, 2010

न्या. अनुजा प्रभुदेसाईंचे निलंबन मागे घ्या

शेकडो वकिलांच्या बैठकीत एकमुखी ठराव अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गोवा राज्य औद्योगिक तंटा लवादाच्या न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांचे निलंबन हा अत्यंत दुर्दैवी व अन्यायकारक निर्णय आहे. श्रीमती प्रभुदेसाई यांच्या विरोधातील कारवाई ही न्यायप्रक्रियेला धरून अजिबात झालेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्यायाधीशपदी त्यांची वर्णी लागेल या भीतीनेच काही आपमतलबी लोकांनी त्यांच्या विरोधात रचलेला हा कट असण्याची दाट शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी या एकूण प्रकरणाचा फेरआढावा घेऊन हे निलंबन तात्काळ मागे घ्यावे व त्यांच्यावरील निराधार आरोप रद्द होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठातील न्यायाधीशांची निवडप्रक्रिया स्थगित ठेवण्यात यावी, असा एकमुखी ठराव अखिल गोवा वकील संघटनेतर्फे घेण्यात आला.
आज पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात राज्यभरातील वकिलांच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा ठराव घेण्यात आला. सुमारे पाचशेंहून अधिक वकिलांची उपस्थिती व त्यात बहुतांश वरिष्ठ वकिलांची हजेरी यामुळे या बैठकीला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. एका न्यायाधीशांवर झालेल्या अन्यायाविरोधात अशा पद्धतीने एकजुटीने दंड थोपटण्याची ही गोमंतकीय वकिलांची पहिलीच वेळ आहे, अशी प्रतिक्रियाही यावेळी काही वरिष्ठ वकिलांनी व्यक्त केली.
श्रीमती प्रभुदेसाई यांची न्यायदानाच्या पवित्र कार्यातील प्रतिमा ही अत्यंत निःस्पृह आणि प्रामाणिकपणाची राहिलेली आहे. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले आरोप व त्यांना आपली बाजू मांडण्याची संधीही न देता त्यांच्यावर केलेली शिस्तभंगाची कारवाई हा एकूण घटनाक्रमच संशयाच्या घेऱ्यात सापडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायाधीश निवडप्रक्रिया सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर व या निवडप्रक्रियेत श्रीमती प्रभुदेसाई आघाडीवर असताना ही घिसाडघाईने झालेली कारवाई अनेक शंकाकुशंका उपस्थित करते, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी या संपूर्ण प्रकरणाचा फेरआढावा घ्यावा, असे आवाहनही यावेळी वकिलांनी केले.
सुरुवातीला ऍड. मारियो पिंटो यांनी या बैठकीचे प्रयोजन विशद केले व बैठकीसमोर ठराव ठेवल्याची घोषणा केली. यावेळी उपस्थित अनेक वकिलांनी या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त करण्याची परवानगी मागितली. वरिष्ठ वकील ऍड. आल्बानो व्हिएगश यांनी सुरुवातीलाच व्यासपीठावर हजेरी लावून आपले मत व्यक्त करण्याचा हट्ट धरला. उच्च न्यायालयाचा हा आदेश म्हणजे एका न्यायाधीशांवरच नव्हे तर संपूर्ण न्यायप्रक्रियेवरच तलवार फिरवण्याचा प्रकार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. एखाद्यावर आरोप ठेवताना त्याची बाजू ऐकून घेणे हा नैसर्गिक न्यायाचा नियम मानला जातो, पण इथे खुद्द न्यायालयाकडून एखाद्या न्यायाधीशांवरच कारवाई करताना त्यांना त्यांची बाजू मांडण्यांचीही संधी न देणे ही कृती न्यायप्रक्रियेला शोभणारी नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. न्यायप्रक्रियेत अशा प्रकारचा कारभार सुरू झाला तर आपल्याला वकिली पेशाचे काळे कोट फेकून द्यावे लागतील व या व्यवसायावरच पाणी सोडावे लागेल, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
दक्षिण गोवा वकील संघटनेचे ऍड. आनाक्लेत व्हिएगश यांनीही अत्यंत परखडपणे या सर्व प्रकारावर भाष्य केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठावर एखाद्या गोमंतकीय न्यायाधीशांची निवड होत असताना अशा प्रकारच्या घटना घडणे हा आता नित्यक्रमच बनला आहे. न्या. प्रभुदेसाई यांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदावर होणारी नियुक्ती रोखण्यासाठीच हे कटकारस्थान रचले असावे, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यांना निलंबित करण्यासारखे एकही कारण या आरोपपत्रांत नाही. त्यामुळे त्यांचे निलंबन तात्काळ रद्द करून त्यांची पूर्वपदावर वर्णी लावावी व उच्च न्यायाधीशांच्या बढतीचा मार्गही मोकळा व्हावा, असे ते म्हणाले.
ऍड. राधाराव ग्राशिएश यांनीही या निलंबन प्रकरणामुळे पुन्हा एकदा न्यायप्रक्रियेवरील विश्वास संशयाच्या घेऱ्यात सापडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. न्यायप्रक्रिया ही संगणकावर नव्हे तर प्रत्यक्ष माणुसकीवर अवलंबून असते. न्या. प्रभुदेसाई यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे अत्यंत खोडसाळपणाचे व निराधार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांचा शुद्ध हेतू ठळकपणे स्पष्ट होतो, त्यामुळे हा अन्याय सहन करून घेणे अजिबात परवडणारे नाही. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वकिलांनी एकसंध राहणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. ऍड. ए. ओ. मेंडीस यांनी आपली भूमिका मांडताना न्या. प्रभुदेसाई यांचे निलंबन हा उघडपणे झालेला अन्याय आहे व अशा अन्यायासमोर अजिबात झुकणार नाही, असे स्पष्ट केले. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवू असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, या बैठकीवेळी गोवा वकील संघटनेतर्फे एक शिष्टमंडळ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणासंदर्भात चर्चा करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दक्षिण गोवा वकील संघटनेतर्फे एक वेगळी समिती स्थापन करून या समितीतर्फे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
----------------------------------------------------------------------
अनोखी पुष्पगुच्छ भेट
या बैठकीवेळी व्यासपीठावर एक पुष्पगुच्छ ठेवण्यात आला होता. या बैठकीला उपस्थित राहिलेल्या गोव्यातील समस्त वकीलवर्गाचा न्या. अनुजा प्रभुदेसाई यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधातील लढ्याला पूर्ण पाठिंबा आहे व हा पाठिंबा या पुष्पगुच्छाच्या रूपाने त्यांच्यापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले.

कॉंग्रेस राजवटीत दहशतवाद वाढला: नितीन गडकरी यांचा आरोप

कुशाभाऊ ठाकरे नगर (इंदूर), दि. १७ (प्रतिनिधी): कॉंग्रेसच्या कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देण्यासारख्या अनेक घटना घडल्याचा आरोप भाजपने केला असून पुणे बॉंबस्फोटामुळे दहशतवादी सहज असले हल्ले घडवून आणू शकतात हे सिद्ध झाले आहे, असे असताना सरकार केवळ मतांचे राजकारण करीत असल्याचा आरोप आज भाजपचे नूतन अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज येथे केला. गडकरी यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानशी संबंध, दहशतवाद, नक्षलवाद आणि महागाई या मुद्यांवर आपले मत प्रदर्शित केले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत लालकृष्ण अडवानी, माजी अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षात "नवतीचे राज्य' आल्याचे सांगून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांनाही त्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले.
पक्षातील नाराज नेत्यांना फैलावर घेताना ते म्हणाले, की कुठल्याही नेत्याने एक बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावी, की आदर आणि सन्मान मागून मिळत नाही तर तो दुसऱ्याला दिल्यानेच मिळतो. हे पटवून देताना त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेतील "छोटे काम से कोई बडा नही होता, टुटे मन से कोई बडा नही होता' या ओळीही उदघृत केल्या.
पक्षातील बंडखोर नेत्यांना खडसावताना त्यांनी सांगितले, की सामान्य कार्यकर्त्याला पक्षाकडून कसलीही अपेक्षा नसते त्यामुळे तो कधीही बंडखोरीचा झेंडा उभारत नाही. मात्र ज्याला पक्षाने सर्व काही देऊन मोठे केले तोच पक्षाच्या विरोधात जाणे चुकीचे आहे.
शिवसेनेसोबत युती कायम
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपचे काही बाबतीत मतभेद असले तरीही त्याचा कुठलाही परिणाम युतीवर होणार नसून दोन्ही पक्षांची युती कायम राहील, असे भाजपने आज स्पष्ट केले.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्ष प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी याबाबत पत्रकारांना सांगितले, की भारतभूमी सर्व भारतीयांची आहे अशी भाजपची भूमिका आहे. अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही ही भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना याबाबत त्यांची वेगळी भूमिका मांडत असली तरीही त्याचा युतीवर कुठलाही परिणाम होणार नाही.
रालोआकडे आघाडीचे सरकार चालवण्याचा मोठा अनुभव आहे. २६ पक्षांसोबत आम्ही सरकार यशस्वी रित्या चालवून दाखवले आहे. या सर्व पक्षांशी आमचे तत्वतः अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. मात्र सरकारवर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. शिवसेनेसोबत आमचा २५ वर्षांचा घरोबा आहे आणि तो कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने काश्मीरवरील नियंत्रण गमावलेः गडकरी
केंद्रातील कॉंग्रेस सरकार अमेरिकेच्या दबावाखाली येऊन पाकिस्तानशी चर्चा करत असून घाई गडबडीत अनेक चुकीचे निर्णय घेतले जात आहेत. सरकारच्या या चुकीच्या निर्णयांमुळे काश्मीरवरून आपले नियंत्रण सुटत चालले असल्याचा धोक्याचा इशारा नितिन गडकरी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिला. बंद दरवाज्याआड झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांनी बैठकीबाबतची माहिती पत्रकारांना दिली.
-----------------------------------------------------------------
'आता तरुणाईचे राज्य'
भारतीय जनता पक्षाच्या कार्यपध्दतीत आता तरुणांचे राज्य आले असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनीही ही बाब ध्यानात घ्यावी. दुसऱ्याची रेषा लहान करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल हे पाहणे कधीही चांगले, असे परखड मत श्री. गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

कुळे ग्रामसभा : तणावाची शक्यता

खनिजप्रश्नी कुळे ग्रामसभेत
गदारोळ होण्याची शक्यता

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): भर कुळे बाजारातून खनिज मालाची वाहतूक करण्यात दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवून काही आपमतलबी व्यक्तींनी कुळेत पुन्हा एकदा खनिज वाहतूक सुरू करण्याची जोरदार तयारी चालवली असून येत्या ग्रामसभेत या विषयावरून मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २१ फेब्रुवारी रोजी ही ग्रामसभा घेण्याचे ठरवण्यात आले असून त्यात रेल्वे यार्डात खनिज मालाचा चढ उतार करण्याचा ठराव मांडण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे कुळेवासीयांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला असून ग्रामसभेपुढील सदर विषय त्वरित रद्द करावा, अशी जोरदार मागणी कुळे नागरिक समितीने केली आहे. त्याचप्रमाणे, ही खनिज वाहतूक पुन्हा सुरू झाल्यास कुळे बाजार ओस पडून पर्यटन व्यवसायावरही त्याचा गंभीर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
सध्या दूधसागर या पर्यटनस्थळी जाण्यासाठी कुळे गावात आंतरराष्ट्रीय पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने येथील तरुणांना व्यवसायाचे नवे क्षेत्र निर्माण झाले आहे. खनिज व्यवसायामुळे या पर्यटन व्यवसायावर परिणाम झाल्यास अनेक तरुण बेरोजगार होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. खनिज वाहतूक सुरू करू पाहणाऱ्या लोकांनी काही पंच सदस्यांना हाताशी धरून हा ठराव संमत करण्याचा डाव आखला आहे. मात्र, त्याला जोरदार विरोध करण्यासाठी नागरिक समितीनेही कंबर कसली आहे. जोपर्यंत कुळे रेल्वे यार्डमधून बगल रस्ता होत नाही, तोवर येथून खनिज वाहतूक करण्यास विरोध केला जाणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
दि. १५ नोव्हेंबर २००९ मध्ये दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्वांसमक्ष खनिज वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला होता. रेल्वे यार्डात उतरवल्या जाणाऱ्या खनिज मालाची वाहतूक बगल रस्त्यातून केली जावी, यावर सगळ्यांचे एकमत झाले होते. या बैठकीत स्थानिक ठेकेदार, पालक शिक्षक संघ, पंचायत मंडळ, नागरिक समिती तसेच ही खनिज वाहतूक सुरू करू पाहणारे खनिज कंपनीचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यावेळी या तोडग्याला सर्वांनी होकार दर्शविला होता. परंतु, आता मात्र त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धाब्यावर बसवून थेट बाजारातूनच खनिज वाहतूक करण्याचा घाट या लोकांनी घातला आहे, असा आरोप नागरिक समितीने केला आहे. हे लोक ग्रामस्थांच्या भावनांना किंमत देत नाहीत ते सोडाच; आता जिल्हाधिकाऱ्यांच्याही आदेशाला धाब्यावर बसवत असल्याची टीका समितीने केली आहे.
दरम्यान, सध्या राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून या निवडणुकीत कुळे पंचायतीचे दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सदर प्रकरणामुळे या दोन्ही उमेदवारांच्या निवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना खनिज माल हाताळणीसारखा विषय ग्रामसभेत घेतला जाऊ शकतो का, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पेडणे आणि शिरदोण अपघातांत दोघे ठार

पेडणे आणि पणजी दि. १७ (प्रतिनिधी): आज दि. १७ रोजी उत्तर आणि दक्षिण गोव्यात घडलेल्या दोन विविध अपघातांत दोघांना मृत्यू आला. पेडणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. १७वरील पोरस्कडे - वारखंड जंक्शन येथे आज संध्याकाळी ४ वाजता महाराष्ट्रातील रुग्णवाहिकेने दुचाकी वाहनाला धडक दिल्याने खाजने येथील आगोस्तिन फर्नांडिस हा दुचाकी वाहन चालक ठार झाला तर शिरदोण आगशी येथील उतरणीवर झालेल्या एका विचित्र अपघातात टेंपोचालक मंदार बगळे (२२, रा. पणजी) याचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेत असताना मृत्यू झाला.
पोरस्कडे अपघात
पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाड - महाराष्ट्र येथील एम एच ०६ जे ८२५९ ही रुग्णवाहिका पोरस्कडे पेडणे मार्गे महाराष्ट्रात जात होती. त्या वाहनासमोरून ऍक्टिवा क्र. जीए ०३ ई १६६९ या दुचाकीने आगोस्तिन फर्नांडिस जात होता. पोरस्कडे - वारखंड जंक्शनवर सदर रुग्णवाहिकेने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात आगोस्तिन रस्त्यावर फेकला गेला व त्याच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्याला १०८ वाहनाने तुये येथील शासकीय आरोग्यकेंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठवण्यात आला. उद्या दि. १८ रोजी सदर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
सदर अपघाताचा पंचनामा हवालदार दत्ताराम ऊर्फ दादा परब यांनी केला असून रुग्णवाहिकेचा चालक हर्षल शांताराम वालन (रा. महाड) याला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताराम राऊत करत आहेत.
शिरदोण अपघात
आज पहाटे सुमारे ४.३० वाजता रस्त्यावर गाय आडवी आल्याने झालेल्या विचित्र अपघातात आल्तिनो - पणजी येथील टेंपोचालक मंदार बगळे याचा गोमेकॉत उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची माहिती आगशी पोलिसांनी दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
सविस्तर माहितीनुसार, मडगावच्या दिशेने जीए ०६ ए ८१९७ ही स्कॉडा कार भरधाव वेगाने जात होती तर विरुद्ध दिशेने जीए ०१ टी ९५७२ या क्रमांकाचा टेंपो मडगावहून पणजीला येत होता. यावेळी शिरदोण येथील उतरणीवर अचानक एक गाय मध्ये आली असता स्कॉडा कारने तिला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, त्या धडकेने ती गाय फेकली गेली व समोरून येणाऱ्या टेंपोवर जाऊन धडकली. यात टेंपोचालकाचा गाडीवरील ताबा गेल्याने त्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाला जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला त्वरित बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले. परंतु, उपचार घेत असता आज सकाळी त्याचे निधन झाले.
आगशी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक श्यामराव चव्हाण यांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याविषयीचा अधिक तपास ते करीत आहेत.

हरिप्रसाद-राणे भेटीमुळे नेतृत्व बदलाला पुन्हा जोर

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): राज्यातील कॉंग्रेस पक्षांतर्गत बंडखोर गटाने नेतृत्व बदलाच्या मागणीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे व त्यामुळे आता पक्षश्रेष्ठींचीही पंचाईत झाली आहे. काल संध्याकाळी अचानकपणे गोवा भेटीवर आलेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनी रात्री उशिरापर्यंत पक्षाच्या आमदारांशी चर्चा केली. आज सकाळी त्यांनी खुद्द सभापती प्रतापसिंग राणे यांच्या आल्तिनो बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली व सुमारे पंधरा ते वीस मिनिटे प्रदीर्घ चर्चा केली. हरिप्रसाद दुपारी दिल्लीला रवाना झाल्यानंतर संध्याकाळी उशिरा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही दिल्लीला पाचारण करण्यात आल्याने राजकीय हालचालींना पुन्हा एकदा वेग प्राप्त झाला आहे.
कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद हे काल संध्याकाळी अचानक गोव्यात दाखल झाले. त्यांच्या या भेटीबाबत पक्षाकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली. काल ते थेट दोनापावला येथील एका हॉटेलात दाखल झाल्यानंतर तिथे त्यांनी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यात प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, आमदार आग्नेल फर्नांडिस आदींचा समावेश होता. बंडखोर गटाने नेतृत्व बदलावरून पक्षश्रेष्ठींना ठरावीक मुदत दिली होती व त्यामुळेच या विषयावर चर्चा करण्यासाठी हरिप्रसाद दाखल झाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेअंतीही बंडखोरांनी आपली मागणी कायम ठेवली आहे, अशीही खबर आहे.
बंडखोर गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी सभापती प्रतापसिंग राणे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. राणे यांनीही यावेळी उघडपणे नकार न देता पक्षश्रेष्ठींचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सूचित केले होते व त्यामुळे पक्षश्रेष्ठींही अडचणीत सापडले आहेत. आज दुपारी हरिप्रसाद यांनी स्वतःहून प्रतापसिंग राणे यांची त्यांच्या आल्तिनो येथील बंगल्यावर भेट घेतली व त्यांच्याशी या विषयावर सखोल चर्चा केली. या चर्चेत नेमके काय ठरले, हे जरी सांगण्यास त्यांनी नकार दिला असता तरी नेतृत्व बदलाचा अजिबात विचार नाही व तो विषयच नाही, असे सांगून हरिप्रसाद यांनी पुन्हा एकदा या विषयावर पडदा टाकला आहे. येत्या आठवड्यात याप्रकरणी पक्षश्रेष्ठींची नेमकी काय भूमिका आहे हे स्पष्ट होणार असल्याने अनेक नेते त्याकडे लक्ष ठेवून आहेत.

'एजी' एकाच दिवशी गोवा आणि दिल्लीतही?

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): गोवा सरकारने नियुक्त केलेले ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी एकाच दिवशी गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आणि दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केल्याचा दावा करून सरकारी तिजोरीतून पैसे उकळल्याचा भांडाफोड आज ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर केला. आज त्यांची उलटतपासणी सुरू झाली असता ऍड. रॉड्रिगीस यांनी, ऍडव्होकेट जनरल सर्वोच्च न्यायालयात ज्या दिवशी आपण उपस्थित असल्याचा दावा करीत आहेत त्या दिवशी त्यांनी गोव्यातील खंडपीठात युक्तिवाद केल्याचे पुरावे सादर करून न्यायालयात एकच खळबळ माजवून दिली. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
ऍड. सुबोध कंटक हे न्यायालयात शपथ घेऊनही खोटे बोलत असल्याने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ऍड. रॉड्रिगीस यांनी केली. गेल्यावेळी ऍड. कंटक यांनी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहिलेल्या सुनावणींची यादी सादर केली होती. त्यात दि. ३० जानेवारी २००६ रोजी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी ते हजर राहिल्याचीही नोंद करण्यात आली होती. ऍड. रॉड्रिगीस यांनी आज माहिती हक्क कायद्याखाली मिळवलेला लिखित पुरावा न्यायालयात सादर केला. त्यात ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी त्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात १२ खटल्यांत बाजू मांडल्याबद्दल गोवा सरकारकडून ९६ हजार रुपये वसूल केले आहेत, असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
"ऍडव्होकेट जनरल एकाच दिवशी पणजी येथील गोवा खंडपीठात आणि दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात असूच शकत नाहीत', असा दावा ऍड. रॉड्रिगीस यांनी न्यायालयासमोर केला.
ऍड. रॉड्रिगीस यांनी ऍड. कंटक यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एडगर फर्नांडिस यांच्यासमोर आज २ तास कसून उलट तपासणी घेतली. पुढील उलट तपासणी दि. ३ मार्च रोजी सकाळी १० वाजता ठेवण्यात आली आहे.

खारफुट नष्ट करण्याचा डाव

खंडपीठात जनहित याचिका दाखल करणार
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी): पंचवाडीतील नियोजित खनिज रस्ता व विजर खाजन बंदर प्रकल्पामुळे या भागात मोठ्या प्रमाणात असलेली मौल्यवान खारफुट (मॅंग्रोव्हस) वनसंपदा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच ही गंभीर बाब जनहित याचिकेद्वारे गोवा खंडपीठाच्या निदर्शनाला आणून देण्याचे पंचवाडी बचाव समितीने ठरवले आहे.
विजर खाजन येथे खनिज साठवण (डंपिंग) व बंदर प्रकल्पासाठी सुमारे दोन लाख चौरस मीटर जागा संपादण्यात आली आहे. हा भाग खारफुटीने पूर्ण व्यापलेला आहे. त्यामुळे या खारफुटीची कत्तल म्हणजे वनसंरक्षण कायद्याचा भंग व उच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान ठरतो. साहजिकच सरकार कायदा धाब्यावर बसवू शकते काय, असा खडा सवाल पंचवाडी बचाव समितीने उपस्थित केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पंचवाडी गावातील जुवारी नदीकिनारी मोठ्या प्रमाणात खारफुट अस्तित्वात आहे. नियोजित सेझा गोवा खाण कंपनीच्या बंदर प्रकल्पामुळे या संपूर्ण परिसरात लाखो चौरस मीटर जागेत खनिजाची साठवणूक केली जाईल. तेथून हा खनिज माल जुवारीच्या पात्राजवळील बंदर प्रकल्पावरून थेट बार्जेसमध्ये भरला जाणार आहे. सुमारे दोन लाख चौरस मीटर जागेत उभारल्या जाणाऱ्या या बंदर प्रकल्पामुळे या भागात खनिजाची वाहतूक तथा साठवणूक केली जाणार आहे. त्यामुळे या खारफुटींवर संक्रांत येणे अटळ बनले आहे. खारफुट नष्ट झाली तर त्याचे विपरीत नैसर्गिक परिणाम पंचवाडी गावाला भोगावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नियोजित प्रकल्प पंचवाडी गावच्या मुळावर येण्याचाच जास्त धोका असल्याची माहिती क्रिस्टो डिकॉस्ता यांनी दिली.
खारफुटीच्या नासाडीला मनाई
खारफुटीच्या जंगलांची नासाडी करण्यास किंवा या परिसरात वनेतर काम करण्यास उच्च न्यायालयाने ९ ऑक्टोबर २००५ रोजी मनाई करणारा आदेश दिला आहे. अलीकडेच २७ जानेवारी रोजी न्यायालयाने अशाच प्रकारचा आदेश महाराष्ट्राच्या संपूर्ण किनाऱ्यावर खारफुटीच्या भागात इतर कोणतेही काम न करण्याबाबत दिला आहे. गोव्यातील खारफुटीच्या नासाडीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेही वेळोवेळी राज्य सरकारला ठणकावले आहे. असे असतानाही एका खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी खारफुटीच्या जंगलाची कत्तल करण्यास पुढे सरसावलेले राज्य सरकार पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंचवाडी बचाव समितीने यासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला मागवला असून नियोजित खनिज प्रकल्पामुळे होणाऱ्या खारफुटीच्या नासाडीचा विषय उच्च न्यायालयाच्या नजरेस आणून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कागदोपत्री सोपस्कार सुरू झाले असून लवकरच जनहित याचिका सादर करण्याचेही निश्चित झाले आहे.

सुरक्षित गोव्यात असुरक्षित नेते!

४३४ पोलिस पुरवतात नेते,अधिकाऱ्यांना कवच
पणजी, दि. १७ (किशोर नाईक गावकर): गोवा हे पूर्णपणे सुरक्षित ठिकाण समजले जाते. दहशतवाद, नक्षलवाद व धार्मिक वाद नसलेले देशातील एकमेव राज्य अशी या राज्याची स्तुतीही दस्तूरखुद्द मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अलीकडेच एका समारंभात केली होती. या सुरक्षित राज्यात आपले नेते व वरिष्ठ अधिकारी मात्र असुरक्षिततेच्या सावटाखाली वावरत असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.
राज्यात वाढत्या गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावण्यात अपयशी ठरलेल्या पोलिस खात्याकडून मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण पुढे केले जाते, पण इथे मात्र एकूण पोलिस बळाच्या दहा टक्के बळ हे केवळ आपल्या नेत्यांना व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुरक्षा कवच देण्यातच खर्ची पडते आहे, हे आता उघड झाले आहे. राज्य पोलिस दलाकडे सुमारे ४५०० जणांचे मनुष्यबळ आहे व त्यातील एकूण ४३४ पोलिस हे आपले राजकीय नेते, अधिकारी व इतरांचे रक्षण करीत आहेत. माजी राज्यपाल एस. सी. जमीर यांच्या जिवाला धोका होता त्यामुळे त्यांना खास "झेड प्लस' सुरक्षा देण्यात आली होती; पण विद्यमान राज्यपाल एस. एस. सिद्धू हे देखील सुरक्षित नाहीत, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जमीर यांची "झेड प्लस' सुरक्षा त्यांनाही कायम ठेवण्यात आली आहे. सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची एक कंपनी व गोवा पोलिस मिळून एकूण १४४ पोलिस त्यांच्या संरक्षणासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री दिगंबर कामत हे "द मोस्ट एक्सेसिबल सीएम' म्हणून परिचित आहेत. पण त्यांनाही "झेड प्लस' सुरक्षा देण्यात आली असून सुमारे ७१ पोलिस त्यांच्यासाठी तैनात केले आहेत. या व्यतिरिक्त सभापती प्रतापसिंग राणे हे देखील "झेड प्लस'च्या यादीत आहेत व त्यांना सुमारे ५० पोलिस सुरक्षा कवच पुरवतात, अशीही अधिकृत माहिती उपलब्ध झाली आहे. गृहमंत्री रवी नाईक यांना "झेड' सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे व त्यांच्यासाठी २७ पोलिस तैनात आहेत तर "वाय' सुरक्षा कवच असूनही सुमारे २१ पोलिसांचे सुरक्षा कवच पुरवलेले आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे एकमेव अपवादात्मक मंत्री ठरले आहेत.
या व्यतिरिक्त उपसभापती मावीन गुदिन्हो(७), पंचायतमंत्री बाबू आजगांवकर(५), महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा(९), सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव(७), वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर (६), पर्यटनमंत्री मिकी पाशेको (५), नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव (५), वीजमंत्री आलेक्स सिकेरा (६), वनमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस (५), खासदार श्रीपाद नाईक (६) विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर (७) मुख्य सचिव संजय श्रीवास्तव (७), वन व खाण सचिव राजीव यदुवंशी (७), खासदार फ्रान्सिस सार्दिन (२), माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो (५), आमदार दयानंद नार्वेकर (६), आमदार फ्रान्सिस सिल्वेरा (२), आमदार आग्नेलो फर्नांडिस (२), आमदार पांडुरंग मडकईकर (७), आमदार नीळकंठ हळर्णकर (२), माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा (४), ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक (७), पत्रकार राजन नारायण (२) आदींचा समावेश आहे.
प्राप्त माहितीनुसार, एका राज्यपालांच्या सुरक्षेवरच दिवसाला १८ ते २० लाख रुपये खर्च येतो व उर्वरित नेत्यांच्या सुरक्षेसाठी १० लाख रुपये प्रतिदिन खर्च होत असल्याची माहितीही देण्यात आली.
राज्य सरकारच्या सुरक्षा आढावा समितीकडून याबाबत निर्णय घेतला जातो. ही समिती वर्षातून एकदा बैठक घेते व सुरक्षेबाबत आढावा घेते, अशी माहिती सुरक्षा विभागाचे अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी दिली. या समितीवर पोलिस उपमहानिरीक्षक, गृह खात्याचे विशेष सचिव, गुप्तचर विभागाचे अधीक्षक, दोन्ही जिल्हा अधीक्षक, विशेष शाखा अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक व केंद्रीय गुप्तचर विभागाचे प्रतिनिधी असतात. काही वेळा खास नेते, अधिकारिवर्गाकडून या समितीकडे सुरक्षेसाठी अर्ज सादर केला जातो व त्याबाबत निर्णय घेतला जातो. काही वेळा गुप्तचर यंत्रणांकडून एखाद्या नेत्याच्या जीविताला धोका आहे, अशी खबर मिळाली तर त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात येते, अशीही माहिती देण्यात आली. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनाही सुरक्षा प्रदान करण्यात आली असली तरी त्यांनी मात्र ही सुरक्षा स्वीकारलेली नाही, अशी माहितीही मिळाली आहे.

Wednesday, 17 February, 2010

रशियन पर्यटकाने हल्ला केलेल्या 'त्या' टॅक्सीचालकाचे निधन

पेडणे, दि. १६ (प्रतिनिधी): विठ्ठलदासवाडा - मोरजी येथे कॉस्ता नामक रशियन नागरिकाकडून दि. ११ रोजी जबर मारहाण करण्यात आलेल्या मरडीवाडा - मोरजी येथील रोहिदास ऊर्फ रवी आत्माराम शेटगावकर या टॅक्सीचालकाचे आज दि. १६ रोजी सकाळी ७. १५ वा. बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असता निधन झाले. संध्याकाळी ४ वाजता त्याच्या पार्थिवावर स्थानिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, भाऊ, भावजया, पुतण्या असा मोठा परिवार आहे.
याप्रकरणी मारहाण करणाऱ्या कॉन्सांतिन अलेक्झांडर मोरोझोली ऊर्फ कॉस्ता या रशियन नागरिकावर भादंसंच्या कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दि. १२ रोजी कॉस्ता याला पेडणे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली कलम ३०७ अन्वये अटक केली होती आणि त्याला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत घेण्यात आले होते. उद्या दि. १७ रोजी त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभा करून पोलिस त्याच्या कोठडीत वाढ करून घेण्याची शक्यता आहे.
विठ्ठलदास - मोरजी येथे दि. ११ रोजी रात्री ११ वाजता पर्यटकांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या रवी याच्या नाकावर किरकोळ वादावादीतून आश्वे येथे एक रेस्टॉरंट चालवत असलेल्या कॉस्ता नामक रशियन पर्यटकाने जबरदस्त ठोसा लगावला होता. त्या धक्क्याने रवी रस्त्यावर पडला होता व त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर रवी याला गोमेकॉत दाखल करण्यात आले होते व तेथे त्याच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करून त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. परंतु, तो उपचारांना साथ देत नव्हता. शेवटी आज सकाळी ७.१५ वा. त्याची प्राणज्योत मालवली.
मोरजीवर शोककळा
दरम्यान, आज सकाळी मोरजी गावात रवी शेटगावकर याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी लोकांची व नातेवाइकांची रीघ लागली. यात मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी शिक्षणमंत्री संगीता परब, जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष राजन घाटे, मोरजी सरपंच अर्जुन शेटगावकर, मांद्रेचे पंच राघोबा गावडे, हरमलचे पंच मधुकर ठाकूर, मोरजीचो एकवट संघटनेचे अध्यक्ष वसंत शेटगावकर व हजारो नागरिकांचा समावेश होता. अडल्या - नडलेल्यांना सदैव मदत करणारा व मनमिळाऊ स्वभावाचा असलेल्या रवी याच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांतच नव्हे तर सर्व मोरजी गावावरच शोककळा पसरली होती.
मुले अनाथ
रवी शेटगावकर यांचा मोठा मुलगा मांद्रे येथील खलप विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत असून संदेश हा मधला मुलगा इयत्ता सातवीत पीटर आल्वारीस हायस्कुलात शिकत आहे. सर्वांत लहान मुलगा सूरज हा पर्वरी येथील संजय स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. वडिलांच्या अकाली जाण्याने ही मुले अनाथ झाली आहेत.
तालुक्यात तीव्र पडसाद
दरम्यान, या घटनेमुळे मोरजी परिसरातच नव्हे तर पेडण्यातील सबंध किनारपट्टी भागांत तीव्र पडसाद उमटले असून मोरजी सरपंच अर्जुन शेटगावकर व मोरजीचो एकवटचे अध्यक्ष आबा शेटगावकर यांनी यापुढे विदेशी नागरिकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा दिला आहे. पर्यटकांनी आपली मर्यादा सांभाळून राहावे व पर्यटनाचा आनंद लुटावा असे त्यांनी सुचविले आहे. राष्ट्रवादीचे नेते राजन घाटे यांनी, एका रशियन पर्यटकाने एका स्थानिकाचा खून केला, हा विषय अतिशय गंभीर असून याचा राष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा केला जावा यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगून बेकायदा व्यवसाय करणाऱ्या विदेशी नागरिकांविरुद्ध पुन्हा एकदा उठाव करण्यात येईल असे सांगितले.
दरम्यान, स्थानिकांनी या मारहाणीत कॉस्ता व्यतिरिक्त आणखी चार विदेशी नागरिकांचा हात असल्याची माहिती देऊन पोलिसांनी त्यांनाही त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे.

भयंकर आवाजाने पेडणेही हादरले

'मिग'विमानाच्या कवायतीचा परिणाम
हरमल, पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): काणकोण भागातील किनारी पट्ट्यात गेल्या १० रोजी भयाण व कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटसदृश आवाजामुळे निर्माण झालेल्या भीतीग्रस्त वातावरणाचे पडसाद अजूनही दूर झाले नसताना आज पेडणे तालुक्यातील मांद्रे, मोरजी व हरमल भागातही हाच प्रकार घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या भयानक आवाजाची तीव्रता इतकी भयंकर होती की त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या लोकांच्या घरातील वस्तूही खाली पडल्या. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यानंतर याविषयावर बेफिकीर असलेल्या राज्य सरकारलाही या घटनेचा शोध घेणे भाग पडले. अखेर चौकशीअंती हा प्रकार नौदलात दाखल झालेल्या मिग लढाऊ विमानांच्या प्रात्यक्षिकाचा परिणाम होता हे उघड झाले व त्यानंतरच लोकांचा जीव भांड्यात पडला.
हरमल समुद्रात आज दुपारी सुमारे १२.३० वाजता अचानक कानठळ्या बसवणारा भयानक आवाज निर्माण झाला. या आवाजाची तीव्रता इतकी भयंकर होती की त्यामुळे एकवेळ संपूर्ण पेडणे तालुक्यातच धरणीकंप झाला की काय,अशी भीती पसरली. वाघ कोळंब भागातील किनाऱ्यावर साधारणतः ३०० मीटर अंतरावर एक जहाज बराच वेळ उभे होते. हा आवाज झाल्यानंतर अचानक हे जहाज वेगाने जाताना दिसले व त्यामुळे स्थानिकांच्या मनात एकच धडकी भरली. हा आवाज मोरजी,मांद्रे, चोपडे, केरी, तेरेखोल व कोरगावपर्यंतच्या लोकांना ऐकू आला,अशीही खबर प्राप्त झाली आहे. केरी तेरेखोलच्या पल्याड महाराष्ट्राच्या सीमाभागात रेडी उषा इस्पात कंपनी आहे. कदाचित तिथे मोठा स्फोट झाला असावा,असा अंदाज लोकांनी लावला. या घटनेची वार्ता सुसाट वाऱ्यासारखी तालुकाभर पसरल्यानंतर अनेकांनी कोळंब किनाऱ्यावर गर्दी केल्याचीही माहिती देण्यात आली. कोळंब किनाऱ्यावर समुद्रात उभ्या असलेल्या जहाजाचाच या स्फोटाच्या आवाजाशी संबंध लावण्यात आल्याने त्यामुळे चर्चेला उधाण आले होते.हा आवाज झाल्यानंतर काही क्षणापूर्ती नेमके काय घडले याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता व त्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला,अशी माहिती स्थानिक व्यावसायिक सुरेश बर्डे यांनी दिली. या आवाजामुळे धरणीकंप झाल्याचा आभास निर्माण झाला व त्यामुळे भूकंप झाल्याचाही अंदाज काही लोकांनी काढल्याचे प्रवीण वायंगणकर या युवकाने सांगितले. समुद्रात स्फोट झाला असे वाटत असले तरी पाण्याच्या प्रवाहात किंवा पातळीवर काहीही परिणाम जाणवत नव्हता, त्यामुळे हा आवाज नेमका कशाचा हेच कळेनासे झाले,असे संजय मयेकर यांनी सांगितले. बाकी आज दिवसभर हीच चर्चा तालुक्यात सुरू होती.
मीग लढाऊ विमानाच्या कवायती
काणकोण भागातील समुद्रकिनाऱ्यावर व आज बार्देश तथा पेडणे तालुक्यातील किनारपट्टी भागात लोकांनी अनुभवलेला स्फोटांचा आवाज हा नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या नव्या मीग लढाऊ विमानांच्या सरावावेळी निर्माण झालेला आवाज होता,असे स्पष्टीकरण नौदलाने राज्य सरकारकडे केल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली आहे.१० रोजी काणकोण येथे तीन वेळा मोठ्ठा आवाज झाल्याने लोकांत भीतीचे वातावरण पसरले होते. हा आवाज नेमका कशाचा होता, याबाबत कुणालाच काहीच माहिती मिळाली नाहीच व सरकारकडूनही अधिकृत काहीही माहिती देण्यात आली नसल्याने ते गुपितच राहिले होते.आज बार्देश तालुक्यातील हणजूण व पेडणेतील मोरजी,मांद्रे व हरमल भागात अशाच प्रकारचा स्फोटांचा आवाज झाल्याने लोकांत अधिकच भिती पसरली होती. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी यासंबंधी नौदलाकडे विचारणा केली असता त्यांनी हा आवाज मीग लढाऊ विमानांचा असल्याचे स्पष्ट केले आहे,असे सरकारने कळवले आहे.
शांतारान नाईकांचा निषेध
नौदलाकडून झालेल्या बेफिकीर वृत्तीचा राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी कडक शब्दांत निषेध केला. काणकोण येथील घटनेला पाच दिवस पूर्ण होऊनही व या वृत्ताबाबत सर्वत्र खळबळ उडूनही नौदलाने पाळलेले मौन ही राज्य प्रशासनाची थट्टा करण्याचाच प्रकार आहे व त्याबाबत आपण केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाकडे निषेध नोंदवणार असल्याचे ते म्हणाले.
अशा प्रयोगांवेळी जनतेला अवगत करणे गरजेचे आहे, अन्यथा या घटनेतून लोकांत गैरसमज व भीती पसरल्यास त्याचे परिणाम भयानक होऊ शकतात,असेही श्री.नाईक म्हणाले. नौदलाने अशा प्रकारचे प्रयोग हे खोल समुद्रात करावेत जेणेकरून राज्यातील किनारी भागातील लोकांना त्याचा त्रास होणार नाही,अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

किशोरी आमोणकर यांना रत्न पुरस्कार

नवी दिल्ली, दि. १६ ः संगीत नाटक अकादमीने आज जाहीर केलेल्या प्रतिष्ठेच्या अकादमी रत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम गायिका किशोरी आमोणकर यांचा समावेश आहे.अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये लालगुडी जयरामन, डॉ.श्रीराम लागू, यामिनी कृष्णमूर्ती, कमलेशदत्त त्रिपाठी, पं. जसराज यांचा समावेश आहे. रत्न पुरस्कार तथा अकादमीची फेलोशिप ही आतापर्यंत फक्त ३२ कलाकारांना मिळाली आहे.

भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून इंदूरमध्ये

इंदूर, दि. १६ : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उद्यापासून सुरुवात होत आहे. या बैठकीसाठी देशभराीतल पक्षाचे नेते येत आहेत. सलग दोन लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि नितीन गडकरी यांच्या रूपाने पक्षाला मिळालेले एक तरुण व धडाडीचे नेतृत्व या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागलेले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उद्यापासून प्रारंभ होईल, तर राष्ट्रीय परिषदेची बैठक १८ आणि १९ फेब्रुवारीला होईल. या बैठकीत नितीन गडकरी यांच्या पक्षाध्यक्षपदी झालेल्या निवडीला मंजुरी देण्याची औपचारिकता पूर्ण केली जाणार असून भाजपाला एक सशक्त व प्रभावी संघटना बनविण्यासाठी व रालोआला अधिक बळकट करण्यासाठी पक्षाचे धोरण कसे असायला पाहिजे, यावर विचारमंथन करण्याची संधी नेत्यांना या बैठकीत दिल्या जाण्याची शक्यता आहे.
मे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला होता. या पराभवानंतर पक्ष नेतृवात बदल करून नितीन गडकरी या विकासाने झपाटलेल्या नेत्याकडे पक्षाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली. सुषमा स्वराज यांची लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी, तर अरुण जेटली यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करून पक्षाला एक तरुण चेहरा देण्यात आला होता. या घडामोडींनंतर होणारी राष्ट्रीय परिषदेची ही पहिलीच बैठक आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महागाई, अंतर्गत सुरक्षा, दहशतवादी हल्ले यासारख्या मोठ्या समस्यांवरही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.

मंगळसूत्र चोरीप्रकरणी गोमेकॉला प्रतीक्षा पोलिस अहवालाची

अंतर्गत कारवाईची हालचाल नाहीच!
पणजी, दि. १६ (प्रतिनिधी): गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात घुसून रुग्णांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याच्या प्रकाराचे कोणतेही गांभीर्य अद्याप इस्पितळ प्रशासनाला नसल्याचे उघड झाले आहे. "आम्ही पोलिसांकडून येणाऱ्या अहवालाची वाट पाहत आहोत' असे आज इस्पितळाचे अधीक्षक डॉ. राजन कुंकळकर यांनी सांगितले.
तर, "पोलिसांच्या अहवालाची इस्पितळाच्या अधीक्षकानी वाट पाहण्याचा प्रश्नच येत नाही,असे आगशी पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेश कर्पे यांनी सांगितले. मंगळसूत्र चोरीला गेल्याची तक्रार आल्यानुसार आम्ही केवळ चोरीचाच तपास करीत आहोत. परंतु, इस्पितळाच्या सुरक्षा रक्षकांकडून आणि वॉर्डमध्ये असलेल्या परिचारिकांकडून झालेल्या हलगर्जीवर कारवाई ही इस्पितळाच्या प्रशासनाला करावी लागणार असल्याचे ते म्हणाले. गोमेकॉच्या अधीक्षकांनी घटनेच्या तीन दिवसानंतरही कोणावरच कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही चोरी करणारे डॉक्टर हे खरे होते की तोतया, याबद्दलच्या शंका लोकांच्या मनात अद्याप कायम आहेत.
दरम्यान, महिला रुग्णांच्या गळ्यातील मंगळसूत्राशी चोरी झाली त्यादिवशी त्या वॉर्डमध्ये असलेल्या परिचारिकेची आणि "वॉर्डबॉय'ची जबानी पोलिसांनी नोंद करून घेतली आहे. चोरी पहाटे ४.१५ च्या दरम्यान झाली असल्याचे व आपण त्यावेळी रुग्णांना द्यायची औषध देऊन झोपी गेले होते,असे त्या परिचारिकेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे अद्याप पोलिसांना कोणतेही धागेदोरे सापडलेले नाहीत. याविषयीचा अधिक तपास निरीक्षक विश्वेश कर्पे करीत आहेत.

लक्ष्मण, धोनी शतकी धमाका भारताला ३४७ धावांची आघाडी

कोलकाता, दि. १६ : तंत्रशुद्ध फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणपाठोपाठ कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ठोकलेले नाबाद शतक, या दोघांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या नाबाद द्विशतकी भागीदारीच्या जोरावर यजमान भारताने पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर ३४७ धावांची आघाडी घेताना येथे सुरू असलेल्या दुसऱ्या व अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात आपले वर्चस्व ठेवले. सामन्याचे दोन दिवस बाकी असल्यामुळे यजमान संघाचे सध्या तरी विजयाचे पारडे जड आहे.
अपुऱ्या प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात बिनबाद ६ धावा केल्या. त्या वेळी कर्णधार ग्रीम स्मिथ ५ आणि पहिल्या डावातील शतकवीर अल्विरो पीटरसन १ धावांवर खेळत होते. पहिल्या कसोटीत भारताला डावाने हरविणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला आता डावाचा पराभव टाळण्यासाठी आणखी ३४१ धावा करावयाच्या आहेत. त्या अगोदर दक्षिण आफ्रिकेच्या २९६ धावसंख्येला चोख उत्तर देताना भारताने ६ बाद ६४३ वर डाव घोषित करताना पहिल्या डावात ३४७ अशी भक्कम आघाडी घेतली होती. दोन दिवस शिल्लक असल्यामुळे पाहुण्यांसमोर मोेठे आव्हान आहे. फलंदाजांनी आपली जबाबदारी चोख बजावली. आता भारताची पूर्ण आशा गोलंदाजांवर आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे वीरेंद सेहवाग (१६५) आणि सचिन तेंडुलकर (१०६) हे हीरो ठरले होते, तर तिसरा दिवस लक्ष्मणच्या १५ व्या आणि महेंद्रसिंग धोनीच्या चौथ्या कसोटी शतकाने गाजला. एकाच डावात चार खेळाडूंनी शतके झळकविण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. या अगोदर बांगलादेशविरुद्ध भारताच्या वसीम जाफर, दिनेश कार्तिक, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर या पहिल्या चारही फलंदाजांनी शतके नोंदविली होती. दक्षिण आफ्रिकेच्या निष्प्रभ गोलंदाजीचा आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत भारताने धावांचा डोंगर रचला. या दोन्ही शतकवीरांना सुरुवातीलाच जीवदान मिळाले होते. ढगाळ वातावरण बघता धोनीने १० ते १२ षटकांचा खेळ शिल्लक असताना भारताचा डाव घोषित केला. अखेर पंचांना अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला.

लक्ष्मण-धोनीची तिसरी सर्वोच्च भागीदारी
भारताने डाव घोषित केला तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मण १६ चौकारांच्या मदतीने १४३ आणि धोनी १३२ धावांवर नाबाद होते. धोनीचे १२ चौकार व ३ षटकार होते. या दोघांनी सातव्या गड्यासाठी नाबाद २५९ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताची ही सातव्या गड्यासाठी झालेली सर्वोच्च आणि जागतिक कसोटी क्रिकेटमधील तिसरी सर्वश्रेष्ठ भागीदारी ठरली. ३४७ धावांची विश्वविक्रमी भागीदारी वेस्ट इंडीजचे ऍटकिन्सन-डेपजिया यांच्या नावावर आहे. त्यांनी १४ मे १९५५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिजटाऊन येथे भागीदारी केली होती. त्यानंतर वकार हसन आणि इम्तियाज अहमद या पाकिस्तानच्या जोडीने २६ ऑक्टोबर १९५५ मध्ये लाहोर येथे न्यूझीलंडविरुद्ध ३०८ धावांची भागीदारी केली होती. या अगोदर भारताने दुसऱ्या दिवसअखेरच्या ५ बाद ३४२ वरून पहिला डाव पुढे सुरू केला. तेव्हा लक्ष्मण ९ आणि नाईट वॉचमन म्हणून उतरलेला अमित मिश्रा १ धावांवर खेळत होते. मिश्राने २८ धावांचे योगदान देताना लक्ष्मणला दुसऱ्या टोकाने सुरेख साथ दिली. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी ४८ धावा जोडल्या असताना मोकेलने कॅलिस करवी मिश्राला बाद केले आणि दक्षिण आफ्रिकेला पहिली सफलता मिळवून दिली होती. त्यानंतर मात्र लक्ष्मण आणि धोनी यांनी फटकेबाजी करीत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. अर्थात या दोघांना क्षेत्ररक्षकांनीही चांगली साथ दिली.

दक्षिण आफ्रिका पहिला डाव : सर्वबाद २९६
भारत पहिला डाव(५ बाद ३६६वरुन) ः व्हीव्हीएस लक्ष्मण नाबाद १४३, अमित मिश्रा झे. कॅलिस गो मॉर्नी मॉर्कल २८, महेंद्रसिंग धोनी नाबाद १३२
एकूण: ६४३/६ (१५३.०) धावगती : ४.२० अवांतर : ३६ (बाइज ः ६, वाइड ः१३, नो बॉल ः ८, लेग बाइज ः ९)
गडी बाद होण्याचा क्रम : ६-३८४(८७.४)
गोलंदाजी ः डेल स्टेन ३०/५/११५/१, मॉर्नी मॉर्कल २६/३/११५/२, वॅन पार्नेल २०/१/१०३/०, जॅक कॅलिस १२/१/४०/०, पॉल हॅरिस ५०/५/१८२/१,
जीन पॉल ड्युमिनी १५/०/७३/१
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव ः ग्रॅमी स्मिथ नाबाद ५, अल्विरो पीटरसन नाबाद १,
एकूण: ६/० (०.५) धावगती : ७.२० अवांतर : ० (बाइज - ०, वाइड - ०, नो बॉल - ०, लेग बाइज - ०)
गोलंदाजी ः झहीर खान ०.५/०/ ६/०

Tuesday, 16 February, 2010

विश्वचरित्रकोशकार श्रीराम कामत निवर्तले

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): गोमंतकातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, विश्वचरित्रकार, कवी कालिदास पुरस्कार विजेते श्रीराम पांडुरंग कामत यांचे आज सकाळी साडेसातच्या सुमारास बेळगाव येथील केएलई इस्पितळात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव आज गोव्यात आणल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता सांतइनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी यावेळी खास उपस्थिती लावून त्यांचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित पुत्र ज्ञानेश व महेश, स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्याने बेळगाव येथील केएलई इस्पितळात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांचा अंत झाला. दुपारी तीन वाजता त्यांचे पार्थिव पर्वरी येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर तसेच साहित्य,कला आदी क्षेत्रांतील विविध मान्यवरांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली वाहिली. संध्याकाळी ५ वाजता सांतइनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्यांत साहित्यिक रवींद्र घवी, स्वातंत्र्यसेनानी नागेश करमली, पद्मश्री सुरेश आमोणकर, मुख्यमंत्र्यांचे वृत्तपत्र सल्लागार सुरेश वाळवे, पत्रकार सागर जावडेकर, कला अकादमीचे सदस्य सचिव डॉ. पांडुरंग फळदेसाई, गोमंत विद्या निकेतनचे सचिव जनार्दन वेर्लेकर आदी मान्यवरांचा समावेश होता.
१७ मे १९३४ रोजी अस्नोडा येथे जन्मलेले श्रीराम कामत एम. ए. (मराठी - इंग्रजी) झाले होते. महाविद्यालयीन काळात त्यांनी नाट्यलेखन, ग्रंथ समीक्षा तसेच वृत्तपत्र स्तंभलेखन केले. कला, साहित्य, राजकारणास वाहिलेले "मांडवी' हे मासिक त्यांनी अस्नोडा येथूनच सुरू करून १९६२ ते १९७० पर्यंत त्याचे संपादन केले. गोमंतकासारख्या सुंदर भूमीत उण्यापुऱ्या तीन तपांच्या, ७४० क्षेत्रांतील, २३७ तज्ज्ञांच्या कष्टातून, विश्वचरित्रकोश हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प झपाट्याने आकाराला येत होता. त्याचे प्रमुख संपादक म्हणून ते काम पाहत होते. एकूण ६ खंडांच्या या विश्वचरित्र कोशातील पाच खंड प्रकाशित झाले आहेत. सहावा निम्म्याहून अधिक पूर्ण झाला होता व त्याचे प्रकाशन यावर्षी होणार होते. केप्यात २००२ मध्ये भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात विश्वचरित्रकोशकार म्हणून सुवर्णपदक व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. पर्वरी लायन्स क्लबतर्फे विश्वचरित्रकोशकार म्हणून त्यांना गौरवण्यात आले होते. पुणे मराठी ग्रंथालयातर्फे २९ ऑक्टोबर २००२ रोजी वर्धापनदिन पुरस्कार, गुरुकुल प्रतिष्ठान - पुणेतर्फे सत्कार, गोमंतक सेवा संघ - विलेपार्ले मुंबईतर्फे फोंडा गोवा येथे सत्कार, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठान सोलापूरतर्फे सन्मान व पुरस्कार, गोवा सरकारचा २००६ सालचा गुणगौरव पुरस्कार, डॉ. पद्मिनी भांडारकर, नागपूर यांचा वैयक्तिक पुरस्कार, लक्ष्मीदास बोरकर पत्रकारिता पुरस्कार, अस्नोडा ग्रामविकास सेवा संघ पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरीतर्फे डॉ. श्रीधर केतकर कोशवाङमय स्मृती पुरस्कार, कृष्णदास शामा पुरस्कार, बार्देशकर गौड सारस्वत ब्राह्मण समाजातर्फे बार्देशकर ज्ञातीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या व्यक्तीस देण्यात येणारा सुमतीबाई रा. शिरोडकर पुरस्कार आणि नुकताच कोकण मराठी परिषदेतर्फे देण्यात आलेला कवी कालिदास पुरस्कार, असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना लाभले होते. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सव्विसाव्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. विश्वचरित्रकोशातील नोंदींव्यतिरिक्त विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांतूनही त्यांनी लेखन केले आहे.

द. गोवा वकिलांचे शिष्टमंडळ मुख्य न्यायाधीशांना भेटणार

पणजीत १७ रोजी भव्य बैठक
न्या. अनुजा प्रभुदेसाई निलंबन प्रकरण

मडगाव, दि. १५ (प्रतिनिधी): औद्योगिक तंटा लवादाच्या न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांच्या निलंबनासंदर्भात वकीलवर्गामध्ये पसरलेल्या तीव्र असंतोषाचे पडसाद आज येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयातील बाररूममध्ये झालेल्या दक्षिण गोवा वकील संघटनेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत उमटले. या प्रकरणी मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे निलंबन मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्याचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.
संघटनेचे अध्यक्ष ऍड. ज्योकिम डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस दक्षिण गोव्यातील झाडून सर्व वकील उपस्थित राहिले होते. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यावर ज्या पद्धतीने आरोपपत्र दाखल केले गेले व नंतर त्यांना ज्याप्रकारे निलंबित केले गेले त्याबद्दल सदर बैठकीत एकमताने संमत केलेल्या ठरावात तीव्र नापसंती व नाराजी व्यक्त केली गेली. संघटनेने एकमताने संमत केलेल्या काही अवघ्याच ठरावांमध्ये आजच्या या ठरावाचा समावेश होत असल्याचे नंतर "गोवादूत'शी बोलताना काही वकिलांनी सांगितले.
न्या. श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांनी त्यांच्या कारकिर्दीत अतिशय कार्यक्षमपणे आणि प्रामाणिक व शिस्तबद्ध रीतीने न्यायदानाचे काम केले, असे मत बहुतेक सदस्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांचे निलंबन हे अनुचित, अयोग्य तसेच पूर्णतः असमर्थनीय असून ते "सहेतुक' असल्याचे मतही यावेळी व्यक्त झाले. न्यायालयीन प्रक्रियेत कोणाही न्यायाधीशांविरुद्ध प्रशासकीय कारवाई करता येत नाही, असे मत वकील संघटनेने यावेळी व्यक्त केले.
या प्रकरणी दक्षिण गोवा वकील संघटनेचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्य न्यायाधीशांची भेट घेऊन न्यायालयीन अधिकाऱ्यास न्याय देण्याची मागणी करणार आहेत. तसा ठराव सदर बैठकीत संमत करण्यात आला. मुख्य न्यायाधीशांनी हे निलंबन मागे घ्यावे व श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांची त्यांच्या पूर्वीच्याच पदावर फेरनियुक्ती करावी, अशी मागणीही या ठरावात करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी चर्चा करण्यासाठी संपूर्ण गोव्यातील वकिलांची एक बैठक बुधवार दि. १७ रोजी सायंकाळी पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात बोलावण्यात आली आहे. निलंबित न्यायाधीशांना न्याय मिळेपर्यंत योजावयाच्या कृतींबाबत त्यात निर्णय घेतला जाईल.
या प्रकरणामुळे गोव्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालयाच्या मागणीला पुन्हा जोर देणे संघटनेला भाग पडणार असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले. गोव्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ विस्तारित केल्यापासून ही मागणी तशीच पडून आहे. न्या. प्रभुदेसाई यांच्यावरील कारवाई ही गोमंतकीयांच्या खच्चीकरणाचा प्रयत्न असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले.

भामईत खनिज वाहतूक रोखली

दळवी विद्यालयाचे विद्यार्थी व पालक शेवटी रस्त्यावर उतरले
ट्रक मालकांकडून महिलांना धक्काबुक्कीचा प्रयत्न.
पोलिस आले... पण आंदोलन संपल्यानंतर!
मामलेदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे.

तिस्क उसगाव, दि. १५ (प्रतिनिधी): खनिज मातीच्या वाहतुकीमुळे होत असलेल्या धूळ प्रदूषणाने त्रस्त झालेल्या भामई - पाळी येथील श्रीमती ताराबाई दळवी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी आज सकाळी विद्यालयासमोर क्षमतेपेक्षा अधिक खनिज मालाची वाहतूक करणारे टिपर ट्रक रोखून धरले. त्यांनी शांततेच्या मार्गाने सुरू केलेले हे "रास्ता रोको' आंदोलन टिपर ट्रक मालकांनी उधळून लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला व पालकवर्गात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांशी बाचाबाची करून त्यांना धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी सर्व प्रकारची वाहतूक रोखून धरून वाहतूक कोंडी केली. यावेळी पालकांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे रस्त्यावर हे सर्व महाभारत घडत असताना अनुचित प्रकार रोखण्यासाठी शेवटपर्यंत डिचोली किंवा पणजीहून पोलिस फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला नाही; तर उपस्थित भामई पोलिस चौकीच्या तीन पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. दुपारी आंदोलन मागे घेतल्यानंतर डिचोली पोलिस भामई - पाळी येथे दाखल झाले.
या भागात खनिज मालाच्या अनिर्बंध वाहतुकीमुळे त्रस्त झालेल्या व यासंबंधी संबंधितांकडे अनेकदा तक्रारी करूनही आजपर्यंत पदरी निराशाच पडलेल्या श्रीमती ताराबाई दळवी माध्यमिक विद्यालयाच्या पालक व विद्यार्थ्यांनी शेवटी आपला आवाज संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे ठरवले. त्यानुसार आज सकाळी ९ वाजल्यापासून त्यांनी खनिज मालवाहू टिपर ट्रक रोखून धरले.
"खनिज मातीच्या वाहतुकीमुळे निर्माण होत असलेल्या धूळ प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढा; सदर विद्यालयाच्या परिसरात रोज साचत असलेली खनिज मातीची धूळ दररोज झाडून काढली पाहिजे; तसेच पाण्याचा फवारा मारून रस्ता स्वच्छ करायला हवा; विद्यालय परिसरातून टिपर ट्रक सावकाशीने हाकले गेले पाहिजेत. रस्त्याचे रुंदीकरण होणे आवश्यक आहे; विद्यालय परिसरात टिपर ट्रकांच्या कर्कश हॉर्नमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भग्न होते, त्यामुळे विद्यालय परिसरात हॉर्न वाजविण्यावर बंदी घालायला हवी; विद्यालयासमोरील रस्त्यावर होत असलेल्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली गेली पाहिजे', अशा स्वरूपाच्या मागण्या आज पालकांनी केल्या. धूळ प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला असून ते वारंवार आजारी पडू लागले आहेत, अशी पालकांची चिंतावजा तक्रार होती.
त्यावेळी भामई भागातील तीन ट्रक मालकांनी पालकांशी भांडण उरकून काढले व पालकवर्गातील महिलांना धक्काबुक्की करण्याचाही अयशस्वी प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे. ट्रक मालकांनी रस्त्यावरून होत असलेली सर्वच वाहतूक अडवून धरली. त्यामुळे इथे वाहतूक कोंडी झाली.
वातावरण तापत असलेले पाहून शेवटी स्थानिकांनी दूरध्वनीवरून फोंडा, पणजी व डिचोली पोलिसांशी संपर्क साधला आणि भामई येथे सुरू असलेल्या "रास्ता रोको' आंदोलनाची व व पालक व ट्रक मालक यांच्यातील संघर्षाची माहिती दिली. तथापि, दीड तास झाला तरी पोलीस फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झालाच नाही. केवळ भामई पोलीस चौकीचे दोन पोलिस व एक गृहरक्षक घटनास्थळी आले. परंतु, त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. ट्रक मालक महिला पालकांना मारहाण करण्याची भाषा करीत होते. वाहतुकीची एक खेप चुकल्याचे तुणतुणे वाजवत होते. पालक मात्र शांतपणे, "आम्ही खनिज माल वाहतुकीच्या विरोधात नाही; परंतु, ही खनिज माल वाहतूक मार्गदर्शक नियमांचे पालन करून व्हायला हवी; खनिज माल रस्त्यावर सांडून धूळ प्रदूषण होता कामा नये; या धूळ प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, असे त्यांना सांगत होते.
दरम्यान, यावेळी उसगाव भागातील ट्रक मालकही या ठिकाणी दाखल झाले व त्यांनीही स्थानिक ट्रकमालकांचीच तळी उचलून धरून पालकांशी संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला.
सकाळी १०.३५ वाजता पाळी मतदारसंघाचे आमदार प्रताप गावस व डिचोलीचे मामलेदार प्रमोद भट आंदोलनस्थळी दाखल झाले. वातावरणातील तणाव पाहून प्रमोद भट यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्वरित पोलिसांची कुमक पाठविण्याचा आदेश दिला. त्यांनी धूळ प्रदूषणाच्या या समस्येसंदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल असे आश्वासन, यावेळी आंदोलनकर्त्या पालकांना दिले व वाहतूक सुरळीत करण्यात आली.
त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता ताराबाई दळवी माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात पालक शिक्षक समितीसोबत डिचोली मामलेदारांनी बैठक घेतली. यावेळी पाळी मतदारसंघाचे आमदार प्रताप गावस, दळवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिवाकर दळवी, मुख्याध्यापक व्यंकटेश कुलकर्णी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामा नाईक, तसेच डॉ. प्रमोद सावंत, लक्ष्मीकांत परब, प्रेमानंद चावडीकर, रघुवीर आसोलकर, श्री. भोसले व पालक शिक्षक संघाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
क्षमतेपेक्षा जादा ढिगारे करून केली जाणारी खनिज माल वाहतूक बंद करायला हवी. या खनिज माल वाहतुकीवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. रस्त्यावर सांडलेली खनिज माती पाण्याचे फवारे मारून दररोज साफ करणे गरजेचे आहे, असे यावेळी बोलताना आमदार प्रताप गावस म्हणाले.
पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामा नाईक यांनी यावेळी धूळ प्रदूषणासंदर्भात यापूर्वी संबंधितांशी केलेल्या पत्रव्यवहारांची कागदोपत्री माहिती मामलेदार प्रमोद भट यांना दिली व धूळ प्रदूषणाची समस्या न सुटल्यास या विद्यालयाला पुढे विद्यार्थी मिळणे कठीण होईल, असे सांगितले. ही समस्या न सुटल्यास पालकांना त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल, असे यावेळी काही पालक म्हणाले. नियमांची पायमल्ली करून खनिज माल वाहतूक करणाऱ्या टिपर ट्रकांवर वाहतूक कायदा नियमांनुसार कठोर कारवाई केल्यास ते वठणीवर येतील असेही मत यावेळी व्यक्त केले गेले.
दरम्यान, आज सायंकाळी या भागातील धूळ प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी डिचोली मामलेदार कार्यालयात विविध खनिज आस्थापनांचे पदाधिकारी, श्रीमती ताराबाई दळवी विद्यालयाच्या पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रामा नाईक, पाळी मतदारसंघाचे आमदार प्रताप गावस यांना मामलेदार प्रमोद भट यांनी खास बैठकीसाठी बोलावले होते. बैठकीतील अंतिम निर्णय समजू शकला नाही.

नागरिक समितीने घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट

कुळे, दि. १५ (प्रतिनिधी): येथील जेम्स आल्मेदा मृत्युप्रकरणी पोलिस आणि प्रशासकीय पातळीवर चालढकल सुरू असल्याने कुळे नागरिक समितीने आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली. जेम्सचा मृत्यू नेमका कसा झाला हे स्पष्ट होण्याआधीच काहींनी संशयास्पदरीत्या त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची लेखी मागणी नागरिक समितीने कुळे पोलिस, केपे विभागीय दंडाधिकारी तसेच तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडेही केली होती. मात्र, संबंधित अधिकारणींकडून या तक्रारींची गंभीर दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना सांगितले.
जेम्स आल्मेदा याचा २३ जानेवारी रोजी पहाटे संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यानंतर त्याच दिवशी सकाळी त्याचा दफनविधी पार पाडण्यात आला. नागरिक समितीला या मृत्यूबद्दल संशय असून पोलिसांकडे तशी रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र ज्यांच्यावर संशय आहे त्या लोकांविरुद्ध तक्रार दाखल करा, असे सांगून याप्रकरणी स्वतः होऊन तक्रार दाखल करून घेण्यापासून पोलिस आपली जबाबदारी झटकू पाहत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पर्रीकर यांना सांगितले. यावेळी, याप्रकरणी आपण लक्ष घालू, असे आश्वासन पर्रीकर यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही फाईल आपणाकडे पोहोचली नसल्याचे त्यांनी सांगितले. जेम्स मृत्युप्रकरणी अद्याप कोणीही एका विशिष्ट व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली नसल्याने ती पोलिस केस ठरू शकत नसल्याचा अजब पवित्रा त्यांनी घेतला.
मात्र, या संदर्भात नागरिक समितीशी संपर्क साधला असता, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी पोलिसांनीच तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जेम्सच्या मृतदेहाची संशयास्पदरीत्या विल्हेवाट लावल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाबाबतच संशय व्यक्त करणारी तक्रार नागरिक समितीने कुळे पोलिसांत दिली आहे. त्याची प्रतही समितीजवळ आहे. पोलिसांनाही या प्रकरणाची पुरती जाण आहे. मात्र जर ते वेड पांघरून पेडगावला जाणार असतील तर आता न्यायालयीन लढाई हाच पर्याय राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

ब्रह्मेशानंद स्वामींचा वाढदिवस २२ रोजी


पणजी, दि. १५ : कुंडई तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराजांचा २९ वा वाढदिवस "जन्माष्टमी महोत्सव' येत्या सोमवारी २२ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र तपोभूमी येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे.
जन्माष्टमी महोत्सवात सकाळी सद्गुरू पादुका पूजन झाल्यानंतर १०.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ करतील. मग तपोभूमीवरील गुरुबंधू व भगिनी रक्तदान करणार असून त्यानंतर स्वामीजींच्या हस्ते अनाथ मुलांना दानधर्म केला जाणार आहे.
त्याच दिवशी संध्याकाळी ठीक ६.३० वाजता दिव्य देवस्थान गौरव समारंभ हा गोमंतकातील ऐतिहासिक सोहळा पार पडेल. त्यानिमित्त विविध देवस्थानच्या प्रतिनिधींचा स्वामीजींच्या हस्ते भव्य सत्कार केला जाणार आहे. तसेच स्वामीजींच्या हस्ते प.पू. श्री परमात्मानंद सरस्वती स्वामीजी (महासचिव, हिंदू धर्म आचार्य सभा राजकोट), मा. किसनलालजी सारडा (संचालक, गुरुगंगेश्वरानंद वेद विद्यालय नासिक), मा. रोहित फळगावकर (संशोधक पुरात देवस्थान) व सुहास करकल, संचालक गोवा ३६५ गोवा न्यूज चॅनेल या मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची उपस्थिती लाभणार आहे. प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींचे आशीर्वचन झाल्यानंतर आरती, सद्गुरू पादुका दर्शन व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होईल. सर्व भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तपोभूमीतर्फे करण्यात आले आहे.

कस्तुरी नारायण देसाई यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार


पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): साहित्य अकादमीचा कोकणी भाषेतील अनुवादासाठी देण्यात येणारा पुरस्कार डॉ. कस्तुरी नारायण देसाई यांना जाहीर झाला आहे. महाश्वेतादेवी यांची बंगाली कादंबरी त्यांनी "अधिकार अरण्याचो' या शीर्षकाखाली कोकणीत अनुवादित केली आहे.
साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. अकादमीचे अध्यक्ष सुनील गंगोपाध्याय हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत भारतातील चोवीस भाषांतील पुरस्कारही निश्चित करण्यात आले.
मराठीत वीणा आलासे यांनी बंगाली भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या "तीन आत्मकथा' या साहित्यकृतीला पुरस्कार प्राप्त झाला आहे. हिंदीत भालचंद्र जयशेट्टी यांच्या तर कन्नड भाषेत डी. एल. श्रीनाथ यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
पन्नास हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या ऑगस्टमध्ये होणार असलेल्या साहित्य अकादमीच्या एका खास सोहळ्यात विजेत्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

Monday, 15 February, 2010

हेडलीनेच केली जर्मन बेकरीची निवड

चिदंबरम यांनी व्यक्त केली शक्यता
मृतांमध्ये दोन परदेशी नागरिक


पुणे, दि. १४ - अमेरिकेत सापडलेला पाकिस्तानी अतिरेकी डेव्हीड हेडली याने गेल्या वर्षी पुणे परिसराला जी भेट दिली, त्यातूनच काल स्फोट झालेली जर्मन बेकरी ही जागा स्फोटासाठी निश्र्चित करण्यात आली, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे, असे केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम् यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले. पुण्यातील दौऱ्यात हेडली हा जर्मन बेकरीजवळील ओश्रो आश्रमात थांबला होता, असेही त्यांनी सांगितले. हा स्फोट म्हणजे गुप्तचर संघटनेचे अपयश असल्याचा आरोप गृहमंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांपैकी दोन जण, तसेच जखमींपैकी अकरा जण परदेशी नागरिक आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या ६० जणांवर शहरातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत.
जखमी नागरिकांमध्ये इराणचे पाच, नेपाळचे दोन, तैवान आणि येमेन या देशांचे प्रत्येकी एक व सुदानचे दोन अशा एकूण ११ परदेशी नागरिकांचा समावेश आहे, त्यांपैकी एक महिला आहे.
काल रात्री सव्वासातच्या सुमारास येथे स्फोट झाल्यावर अपरात्री अडीच वाजता श्री चिदंबरम् हे चेन्नईवरून विशेष विमानाने पुण्याला आले. पाच वाजता त्यांनी घटनास्थळाला भेट दिली. नंतर ससून हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल, रूबी हॉल, इन्लॅक बुधराणी हॉस्पिटलला भेट दिली. महाराष्ट्र पोलिस, केंद्रीय पातळीवरील गुन्हे अन्वेषण दल, सैन्याचे गुन्हे तपासणी दल यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, पुणे जिल्हा संपर्क मंत्री अजित पवार व खा. सुरेश कलमाडी हे होते.
केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले, कोरेगाव पार्क या भागात रजनीश आश्रम आहे व ज्यु समाजाचे प्रार्थना स्थळ असलेले छाबडा हाऊसही आहे. या भागाखेरीज शहरातील लाल देऊळ म्हणून जे ज्यु पंथियांचे केंद्र आहे, त्याला लक्ष्य करून पुण्यात अतिरेकी हल्ला होऊ शकतो, अशी माहिती आम्हाला पूर्वीच गुप्तचर विभागाकडून मिळाली होती व त्याप्रमाणे या सर्वच ठिकाणी पहाराही होता. अर्थात या भागात सर्वत्र प्रत्येकाच्या तपासाची यंत्रणा उभी करणे अशक्य असते. जर्मन बेकरीत कोणी अज्ञात इसमाने ही बॅग आणून ठेवली व एका वेटरने मागचा पुढचा विचार न करता ती उघडली. त्यातून हा स्फोट झाला. त्या वेटरने जर अपेक्षेनुसार पोलिसांना माहिती दिली असती तर त्वरित तपास झाला असता. त्या भागातील जर्मन बेकरी या भागातील तरुण मंडळींची संध्याकाळी जमायची जागा आहे. त्या तीनशे चौरस फुटाच्या जागेत त्यावेळी सत्तरपेक्षा अधिक लोक होते. जेव्हा स्फोट झाला तेव्हाही त्या परिसरात गर्दी होती. तो स्फोट तर मोठा होताच व तेथे प्रचंड गर्दी असल्याने त्याचा परिणामही मोठा झाला. ज्या टेबलवर ती बॅग ठेवली होती, त्या टेबलावर बसलेले पाचही जण ठार झाले असावेत, असा अंदाज आहे. हा तपास एटीएसला देण्यात आला असून राज्य पोलिस, सेना पोलिस व संबंधित सर्व गुन्हे तपासणी यंत्रणा त्यांना मदत करणार आहेत, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत
महाराष्ट्रायचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याप्रसंगी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली. तपासाला गती मिळावी म्हणून राज्यातील सर्व पोलिस यंत्रणा कार्यान्वित झाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जखमींमध्ये ११ परदेशी
बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नऊ जणांपैकी दोन जण, तसेच जखमींपैकी अकरा जण परदेशी नागरिक आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या ६० जणांवर शहरातील विविध रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत.
जखमी नागरिकांमध्ये इराणचे पाच, नेपाळचे दोन, तैवान आणि येमेन या देशांचे प्रत्येकी एक व सुदानचे दोन अशा एकूण ११ परदेशी नागरिकांचा समावेश आहे, त्यांपैकी एक महिला आहे.
आरंभी दाखल झालेल्या जखमींपैकी १९ रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. सध्या विविध रुग्णालयांत ४३ नागरिक उपचार घेत आहेत. त्यात ३० पुरुष व ११ महिलांचा समावेश आहे.
बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या ९ असून, त्यामध्ये ४ पुरुष व ५ स्त्रियांचा समावेश आहे. मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत- अंकीक धार (वय २३), शिल्पा गोयंका (वय ३०), बिनिता गदानी (वय २२), पी. सिंधुरी (वय २२), आनंदी धार (वय १९), शंकर नाथू पानसरे (वय ४६), इटलीची नादिया (३७), इराणाचा सईद अब्दुल हनी व गोकुल नेपाळी. मृतांमधील गोकुळी नेपाळी हा जयंत बेकरीतला वेटर असून तो नेपाळचा नागरिक होता.

म्हापशातील अपघातात दोघे दुचाकीचालक ठार

म्हापसा, दि. १४ (प्रतिनिधी)- काणका म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिरापाशी पहाटे अडीचच्या सुमारास दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनचालक मरण पावले. प्रीतेश पुंडलिक नाईक (वय १९ रा. अन्साभाट) व उमेश पार्सेकर (वय २४ रा. धुळेर) अशी मृतांची नावे आहेत.
काणका येथील महादेव मंदिराजवळ जीए ०३ एफ २३८२या क्रमांकाची मोटरसायकल आणि जीए ०३ बी ८७९५ या क्रमांकाची ऍक्टिव्हा स्कूटर यांची जोरदार टक्कर झाली. ही टक्कर एवढी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचे चालक त्यात जबर जखमी झाले. आरंभी त्यांना येथील आझिलो इस्पितळात नेण्यात आले. तथापि, त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना तातडीने बांबोळी येथे गोमेकॉ इस्पितळात हलवण्यात आले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर त्यांना मृत्यूने गाठलेच. त्यामुळे या दोन्ही तरुणांच्या कुटुंबांवर संकट कोसळले आहे. अपघाताचा पंचनामा पोलिस उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांनी केला व तेच पुढील तपास करत आहेत.
वेगाला प्रतिबंध घाला
दरम्यान, तुफानी वेगाने प्रामुख्याने युवा वाहन चालक वाहने हाकतात असा सार्वत्रिक अनुभव असून वाहतूक पोलिसांनी अशा वाहन चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. केवळ म्हापसाच नव्हे तर पणजीतील आल्तिनो भागात तर काही युवक उतारावरून कसरत करतच आपल्या दुचाकी हाकताना दिसतात. कोणाचे तरी लक्ष वेधणे हाच त्यांचा त्यामागील उद्देश असतो. मात्र, ही कसरत अखेरचीच ठरू शकते. त्यामुळे अशा "मजनू'फेम मंडळींना आवरण्याची गरज असल्याचे मत लोकांतून व्यक्त होत आहे.

पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेवर आता कुळेवासीयांचे लक्ष केंद्रित

कुळे दि. १४ (प्रतिनिधी) - येथील जेम्स आल्मेदा मृत्यू प्रकरणी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक जॉर्ज बॉस्को यांच्या कारवाईकडे आता कुळेवासीयांचे लक्ष लागून राहिले असून संपूर्ण कुळे गावात आजही या प्रकरणी जोरदार चर्चा सुरू होती. खास करून कुळे पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीपासूनच दाखवलेल्या शिथिलतेमुळेच हे प्रकरण कारण नसताना इतके दिवस लांबल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
जेम्सचा मृत्यू नेमका कसा झाला आणि त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना गैरपद्धतींचा अवलंब करून संबंधितांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न का केला? ज्यांनी जेम्सचा मृतदेह घाईघाईत दफन करण्याचा प्रयत्न केला त्या गैरकृत्यात संबंधितांना पाठिंबा देणाऱ्यांवरही पोलिस कारवाई करणार की नाही? कारण ज्यांनी संशयास्पद रीतीने जेम्सच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली ते याप्रकरणी जितके जबाबदार आहेत तितकेच त्यांना खोटे सर्टिफिकेट देऊन मदत करणारा पंचायत सचिव आणि तो कथित डॉक्टरही तेवढाच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शेरा ("रिमार्क') मारून पाठवलेली फाईल कदाचित उद्या (सोमवारी) उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना मिळण्याची शक्यता असून त्यानंतर चौकशीला वेग येईल, अशी अपेक्षा आहे. तथापि कुळेवासीयांमध्ये याप्रकरणी अस्वस्थता वाढतच चालली असून पोलिस अधीक्षक नेमकी कोणती भूमिका घेतात यावर ते अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, दुसऱ्याबाजूने गरज पडल्यास न्यायालयात धाव घेण्याची तयारीही कुळे नागरिक समितीने ठेवली असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकवार स्पष्ट केले. कुळे पोलिसांनी कायद्याने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे पूर्ण दुर्लक्ष करून संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालवला असल्याच्या आरोपाचा पुनरूच्चार नागरिक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज केला.

गावडोंगरी श्रीस्थळ देवस्थान निवडणुकीत वादंग, मारामारी

-दोन गटांच्या परस्परविरोधी तक्रारी
- समितीचे अध्यक्ष गंभीर जखमी
-आता निवडणूक २१ रोजी होणार


काणकोण, दि. १४ (प्रतिनिधी)- दोन गटांतील बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने गावडोंगरी श्रीस्थळ येथील मल्लिकार्जून देवस्थान समितीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. देवस्थान समितीच्या अध्यक्षांना काही महाजनांकडून मारहाण केल्याची तर महाजनांना समिती पदाधिकाऱ्यांकडून शिवीगाळ केल्याची व हातघाई केल्याच्या आशयाची परस्पर विरोधी तक्रार नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती काणकोण पोलिस स्थानकातून देण्यात आली.
आज (दि.१४) सकाळी देवस्थान समिती निवडण्यासाठी देवस्थानची बैठक देवस्थानच्या सभागृहात सुहास देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मामलेदार कार्यालयातून सुभाष भट यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यापूर्वी झालेल्या बैठकीत एकूण नऊ महाजनांना अध्यक्षांनी काही कारणावरून निलंबित केले होते. त्यामुळे या विषयावरून या सभेत वादंग होणार हे अपेक्षित होते. आज ठरलेली निवडणूक पुढे ढकलत असून ती येत्या रविवारी २१ फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल. तत्पूर्वी मंगळवार १६ रोजी मामलेदार कार्यालयात समिती पदाधिकारी व नऊ निलंबित सदस्यांची १०.३० वा. बैठक आयोजित करण्यात आल्याचे निरीक्षक भट यांनी सांगताच जे काही सभेचे इतिवृत्त आहे ते वाचून दाखवा अशी महाजनांनी मागणी केली. तसेच वरील प्रकाराला विरोध करतानाच सभेचे कामकाज सुरू न करताच निवडणूक कशी स्थगित केली जाते असा सवाल समितीचे अध्यक्ष अमरनाथ देसाई यांना करण्यात आला.
येथे निर्माण होणारा तणाव पाहून उपस्थित पोलिस निरीक्षकांनी जिल्हाधिकारी, मामलेदार यांच्याशी संपर्क केला व निरीक्षक भट यांना इतिवृत्त वाचून दाखवण्यास सांगितले. मात्र ही प्रथा नसल्याचे सांगत अधिकाऱ्याने इतिवृत्त वाचून दाखवण्यास नकार दिला असे पोलिस निरीक्षक हळर्णकर यांनी गोवादूतला सांगितले.
त्यानंतर उपस्थित महाजन व समिती पदाधिकाऱ्यांंमधील तणाव वाढला. महाजनांमधून काहींनी खुर्च्या फेकल्या असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर डॉ. दिवाकर वेळीप, निरीक्षक हळर्णकर यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनीही हे प्रकरण संयमपूर्वक हाताळल्याचे उपस्थितांनी सांगितले. या दरम्यान समिती अध्यक्ष श्री. देसाई यांच्या डोक्याला इजा झाली. त्यांच्यावर काणकोण येथे इस्पितळात उपचार करून त्यांना संध्याकाळी घरी जाऊ देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
देवस्थानच्या अशोक वेळीप, रमेश गावकर, सुरेश गावकर, उदय गावकर, गणेश गावकर, सुदेश गावकर, कुष्टा गावकर, गणेश गावकर, वसंत गावकर (सरपंच), प्रवीण देसाई, धिल्लन गावकर, या महाजनांनी आपल्याला आज मारहाण केल्याची तक्रार काणकोण पोलिसांत दिली आहे. तर महाजनांविरुद्ध देवालय समिती काम करत असल्याने तणाव निर्माण झाला आहे. महाजनांच्या प्रश्नांना बगल देत निवडणूक प्रक्रिया टाळण्यात आली व नंतर शिवीगाळ, हातघाई केली अशा आशयाची तक्रार अमरनाथ नाईक, अर्जुन गावकर, यशवंत देसाई यांच्याविरुद्ध महाजनांनी मामलेदार व काणकोण पोलिसांत दिली आहे. महाजनांच्या वतीने ८२ सदस्यांनी हस्ताक्षर केले आहे. दोन्ही गटांना संयम पाळण्याचे सांगत सोमवारी काणकोण पोलिस स्थानकावर चौकशीसाठी हजर राहण्याचे दोन्ही गटांना सांगण्यात आले आहे.
दरम्यान, देवस्थानचे एक महाजन सुहास देसाई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून आज (दि.१४) रोजी कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयशी ठरलेल्या मामलेदार व पोलिस निरीक्षक यांची त्वरित बदली करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, या अधिकाऱ्यांमार्फत केलेल्या चौकशीनेे आपल्याला न्याय मिळू शकणार नाही.

हणजूण "ज्युईश सेंटर'वर आता अहोरात्र पोलिस पहारा

पुणे बॉंबस्फोटानंतर गोवा पोलिसही सतर्क

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - पुण्यात काल जर्मन बेकरीत घडलेल्या बॉंबस्फोटात ज्यू लोकांनाच लक्ष्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने गोवा पोलिसांनी हणजूण किनाऱ्यापासून २० किलोमीटरवर असलेल्या ज्युंच्या प्रार्थनागृहाला (ज्युईश सेंटर) अहोरात्र कडक सुरक्षा कवच पुरवले आहे. त्याचबरोबर गोव्यात सुरू असलेल्या कार्निव्हल मिरवणुकांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. ही माहिती पोलिस उपमहानिरीक्षक रवींद्र यादव यांनी आज येथे दिली.
पुण्यातील "छाबडा हाउस' या ज्युंच्या प्रार्थनास्थळाला तर २४ तास कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. काल सायंकाळी पुण्यातील जर्मन बेकरीत बॉंबस्फोट झाल्याचे समजताच दक्षिण गोवा पोलिस अधिकाऱ्यांनी हणजूण येथील "छाबडा हाऊस त्वरित गाठले. तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला व तिथल्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली. तेथे यापुढे अहोरात्र पोलिसांचा जागता पहारा ठेवण्यात आल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.
चार दिवसांच्या कार्निव्हल महोत्सवाला पणजीत शनिवारी सुरुवात झाली. गोव्यात सध्या हाय अलर्ट असून, राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. सुरक्षा व्यवस्थेत कुठल्याही प्रकारची दिरंगाई केली जात नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हणजूणातील ज्युईश सेंटर हे इस्रायली पर्यटकांचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. कडवा दहशतवादी डेव्हिड हेडली याने त्याला अमेरिकेच्या "एफबीआय'कडून शिकागो येथे अटक होण्याअगोदर भारतातील पाच शहरांमधील ज्यू धर्मस्थळांवरील हल्ल्यांचा नियोजनबद्ध कट रचला होता, अशी माहिती यापूर्वीच उजेडात आली असून, त्यात या ठिकाणाचाही समावेश आहे.
मुंबईतील कफ परेड येथील इस्रायली हवाई वाहतूक कंपनीच्या कार्यालयासह इतरही ज्यू स्थळांची त्याने पाहणी केल्याचे एफबीआय व अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. इतकेच नव्हे तर या आधी जेथे जेथे तो गेला तेथे तेथे तो ज्युईश सेंटर परिसरातच राहिला होता. गोव्यातील आठवड्याभराच्या वास्तव्याही हेडली या छाबड हाउसच्या जवळपास होता. दिल्लीतून हेडली राजस्थानातील पुष्कर येथे गेला. तेथील हॉटेलात मुक्काम करण्यापूर्वी त्याने ज्यू धर्मस्थळासमोरील खोलीचा आग्रह धरला होता. आपण ज्यू असल्याने या पवित्र जागेचे दृश्य डोळ्यांसमोर असावे, असे कारण त्याने तेव्हा दिले होते. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही हेडलीने ज्यू धर्मस्थळासमोरील खोलीचाच आग्रह धरल्याचे सांगितले आहे. तिथे तीन दिवस मुक्काम केल्यानंतर तो गोव्यात आला होता. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या हणजुण गावातील एका गेस्ट हाउसमध्ये तो राहिला. परकीय पर्यटक हेच त्याचे लक्ष्य असावे असे गृहीत धरले जात असतानाच नंतर केलेल्या तपासातून त्याने ही जागा त्या भागात असणाऱ्या ज्यू धर्मस्थळाची टेहळणी करण्यासाठी निवडल्याचे निष्पन्न झाले होते.
गोवा विधानसभेत बोलताना राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी पाकिस्तानातील दहशतवादी गोव्यातही दहशत निर्माण करण्याची योजना आखत असल्याचे म्हटले होते. पर्यटकांच्या आवडीचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेला गोवा गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे.

Sunday, 14 February, 2010

बॉंबस्फोटांनी पुणे हादरले
१० ठार, ४० जखमी; २६।११ नंतरचे पहिले घातपाती कृत्य मृतांत तिघे परदेशी

पुणे, दि. १३ - मुंबईत २६।११ रोजी झालेल्या भयंकर बॉंबस्फोटांच्या आठवणी ताज्या असतानाच येथील उच्चभ्रू मंडळींची वस्ती असलेल्या कोरेगाव पार्क भागातील प्रसिद्ध "जर्मन बेकरी'मध्ये आज (शनिवारी) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास भयंकर बॉंबस्फोट होऊन १० जण ठार, तर सुमारे ४० ते ५० जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता जबरदस्तअसून हा घातपात असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाकडून ("एटीएस') देण्यात आली. विविध वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटामागे "इंडियन मुजाहिद्दीन'चा हात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जखमींमध्ये एका सुदानीसह अनेक परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
सदर स्फोट सिलिंडरचा असल्याचे सांगण्यात आरंभी सांगितले जात होते. तथापि, स्फोटाची तीव्रता आणि स्फोटासाठी वापरलेल्या साहित्याची पाहणी केल्यानंतर हा बॉंबस्फोटअसल्याचे "एटीएस'तर्फे स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय गृहसचिव जी. के. पिल्ले यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रथमदर्शनी हा बॉंबस्फोट असून यामागे कोणती संघटना आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र सोनावणे यांनी सांगितले. जेथे स्फोट झाला तेथील दृश्य पाहून अंगावर शहारे आणणारेच होते. मृतांचे अवयव विखुरले होते, जखमींच्या विव्हळण्याच्या आवाजामुळे पोलिसांचे काळीजही पिळवटून गेले.
स्फोटाचा आवाज सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जर्मन बेकरीचा त्यात चक्काचूर झाला. कोरेगाव पार्क परिसराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील तीन दुकानांना याचा मोठाच फटका बसल्याचे सांगण्यात आले.
घटनास्थळी एटीएस आणि पोलिस पथक पोहचले आहेत. जखमी आणि मृतांना जखमींना ससून आणि खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे अनेक बंब आणि रुग्णवाहिन्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. दिल्लीहून राष्ट्रीय अन्वेषण विभाग आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक पुण्याला रवाना झाले आहे.
मुंबईतील २६/११ बॉंबस्फोटांचा मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडली येथील ज्या भागातील हॉटेलात उतरला होता तेथून हा परिसर जवळच आहे. त्यामुळे या भीषण घटनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. पुण्यातील या अत्यंत आलिशान भागातच ज्यू धर्मीयांचे केंद्र आणि रजनीश यांचा ओशो आश्रम आहे.
मुंबई, पुण्यात हाय अलर्ट
दरम्यान, पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई , पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी सुरक्षिततेसाठी नाकाबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर लगेचच मुंबईमध्येही अलर्ट घोषित करण्यात आला आहे. महत्त्वाच्या स्टेशनांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सुरुवातीला सिलिंडरचा स्फोट झाल्याचा संशय होता. मात्र एटीएसने बॉंबस्फोट झाल्याचे सांगताच पुण्यासह मुंबई व नाशकातही अलर्ट जाहीर करण्यात आला आहे
वाहतुकीचा बट्ट्याबोळ
कार्निव्हलची मिरवणूक मोठ्या झोकात काढण्यात आली खरी, तथापि, पणजी शहरात त्यामुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ उडाला. पाटो पूल परिसरात वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे कुर्मगतीने वाहतूक पुढे सरकत होती. वाहतूक पोलिसांचे त्यावर कसलेच नियंत्रण नसल्याचे संतापजनक चित्र दिसून आले. त्यामुळे अनेकांना चरफडत आपल्या वाहनांतच बसून राहावे लागले. अखेर जेव्हा ही मिरवणूक संपली तेव्हा कोठे वाहतुकीची कोंडी संपुष्टात आली.
पणजीत "किंग मोमोची' राजवट सुरू
रंगारंग कार्निव्हलमध्ये ९० चित्ररथांचा सहभाग

पणजी, दि.१३ (सांस्कृतिक प्रतिनिधी)- "खा प्या आणि मजा करा,' असा संदेश देत पणजी शहरात आज "किंग मोमो'ने आपल्या चार दिवसीय राजवटीस प्रारंभ केला व त्याचबरोबर रंगारंग कार्निव्हलला सुरुवात झाली. पाटो पूल येथून सायंकाळी ४ वाजता पर्यटक मंत्री मिकी पाशेको यांनी झेंडा दाखवून चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात झाली. चित्ररथ पाहण्यास असंख्य लोकांनी मांडवीच्या तीरावर गर्दी केली होती. अनेक इमारती, झाडांवर चढून लोकांनी मिरवणुकीचा आनंद लुटला. ९० हून अधिक चित्ररथांचा सहभाग असलेल्या या चित्ररथ मिरवणुकीत विदेशी ललना नृत्यात दंग असलेल्या जास्त प्रमाणात दिसत होत्या. काही चित्ररथ वगळता विविध उत्पादकांच्या जाहिरातींच्या चित्ररथांचा भरणा अधिक होता. दणदणीत संगीत आणि नृत्ये यामुळे वातावरण प्रफुल्लीत झाले होते. मात्र पाटो पूल ते कलाअकादमीपर्यंतच्या मिरवणुकीमुळे वाहतुकीचा पूर्ण खेळखंडोबा झाल्याने घरी परतण्यासाठी कदंब बसस्थानकाकडे जाणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. वाहनांची तर जबरदस्त कोंडी झाली होती. त्यात अनेक वाहने अडकून पडल्यामुळे प्रामुख्याने लहान मुलांची खूपच गैरसोय झाली. गोव्यात १५४० साली पोर्तुगीजांनी या उत्सवाला आरंभ केला. आता तर त्याला व्यावसायिक स्वरूप आले आहे. शिवाय कार्निव्हलच्या माध्यमातून पर्यटकांनाही गोव्याकडे आकर्षित केले जात आहे.