Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 6 June, 2009

खाण ट्रकचालकांपुढे "आरटीओ'ही हतबल

वाहतूक संचालकांची अस्थायी समितीसमोर कैफियत

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांवर कारवाई करण्यास गेल्यास ते "आरटीओ'च्या वाहनांवर आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक करून मारहाण करतात, अशी माहिती आज वाहतूक खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक आणि पंचायत खात्याच्या संसदीय अस्थायी समितीच्या बैठकीत दिली. आमदार बाबू कवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मये मतदारसंघाचे आमदार अनंत शेट, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक तसेच फातोर्ड्याचे आमदार दामू नाईक आणि संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. श्री. लोलयेकर यांच्या या माहितीवरुन वाहतूक खाते या ट्रकमालक व चालकांसमोर हतबल झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजप नेते डॉ. प्रमोद सावंत यांनी पाळी परिसरात निष्काळजीपणे खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांमुळे सामान्य दुचाकी वाहनचालकांचे बळी जात असल्याने या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली. या प्रश्नावर उत्तर देताना संचालक लोलयेकर म्हणाले, या ट्रकचालकांवर कारवाई करणे ही डोकेदुखी झाली आहे. काही दिवसांपूर्वी वाहतूक खात्याच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली तर, चार "आरटीओ'ना दीडशे ट्रकचालक मारहाण करण्यास आले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या ट्रकचालकांवर पोलिसही कारवाई करीत नसल्याचे ते म्हणाले. श्री. लोलयेकर यांच्या या उत्तरामुळे खनिज वाहतूक होणाऱ्या परिसरात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे स्पष्ट होत आहे.
पाळी भागात गेल्या सात महिन्यांत १९० अपघात झाले आहे, तर सहा महिन्यांत सहा जणांचे प्राण गेले आहेत. रस्ता अरुंद असल्याने भरधाव येणारे ट्रक दुचाक्यांना धडक देतात, त्यामुळे कोणतीही चूक नसताना दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागतात. दिवसांतून ५ ते ६ वेळा रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी त्याठिकाणी पोलिसही उपस्थित नसतात. खनिज मालाचे ट्रक तासंनतास रस्त्याच्या बाजूला उभे करून ठेवले जातात. रस्त्याची एकदम दुर्दशा झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यावर दुचाकीवरून प्रवास करून त्याचा अनुभव घ्यावा, असेही डॉ. सावंत यावेळी म्हणाले.
वाहतूक विषयावर बोलताना माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्वीस म्हणाले की, गोव्यात सार्वजनिक वाहतूक अत्यंत कमकुवत आहे. रस्ते अरुंद आहे. सा. बां. खात्याने दर पाच वर्षांनी कोणत्याही आदेशाची प्रतीक्षा न करता प्रत्येक रस्त्याची दुरुस्ती करुन तो हॉटमिक्स करावा, अशी सूचना यावेळी त्यांनी केली. दर पाच पाच वर्षांनी रस्त्याचे दुरुस्ती काम करण्यास खात्याकडे एवढा निधी नसून ते करण्यासाठी किमान पाचशे कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे यावेळी खात्याचे मुख्य अभियंते वाच्यासुंदर यांनी सांगितले. रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम सुरूच असून याला लोक विरोध करीत असल्याचे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. लोकांनी सहकार्य केल्यास रस्त्याचे रुदींकरण करणे सोपे होईल,असे ते म्हणाले.
फोंडा येथे बसस्थानक उभारण्यासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत तर, साखळी येथे असलेला बसस्थानक गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्याचा मुद्दा यावेळी सागर जावडेकर यांनी मांडला. फोंड्यातील बसस्थानकाचा तसा उपयोगही होत नाही. परंतु, त्यावर करोडो रुपये खर्च झाले आहेत. शिरोडा येथे भव्य बसस्थानक उभारण्यात आला मात्र ते वापराविना तसाच पडलेला आहे. बसस्थानक बांधण्यासंदर्भात सरकारने धोरण स्पष्ट करावे, असे श्री. जावडेकर म्हणाले.

गोव्यात फिल्म इंस्टिट्यूट स्थापना व्हावे - नाना पाटेकर

मडगाव, दि. ५ - गोव्यात चांगले कलाकार आहेत, येथील वातावरणही चित्रपटसृष्टीला पोषक आहे, स्थानिक कलाकारांना वाव देण्याकरिता गोव्यात फिल्म इंस्टिट्यूट स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नामवंत चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे केले.येथील रवींद्र भवनात आयोजित नारायण बांदेकर गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पाटेकर यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सरकार राज्यात फिल्म इंस्टिट्यूटच्या स्थापनेसाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी, मिलिंद सोमण,नीना कुलकर्णी, मकरंद अनासपुरे हे प्रसिद्ध मराठी कलाकार तसेच सभापती प्रतापसिंग राणे, उद्योगपती नारायण बांदेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत. या क्षेत्रात अनेक तरुण व गुणी कलाकार पुढे येताना दिसतात. त्यांना मोठे भवितव्य आहे.त्यांना अधिक वाव देण्यासाठी यापुढे असाच मराठी चित्रपट महोत्सव चालू राहणे आवश्यक आहे. सरकारने पुरस्कर्ता होऊन अशा उपक्रमाला राजाश्रय देण्याची गरज आहे, असे नाना पाटेकर यांनी पुढे म्हणाले.
गोव्यात आता केवळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवच होत नाहीत, तर प्रादेशिक चित्रपट महोत्सवही यशस्वी होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या प्रदेशात चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक ते वातावरण तयार होत असल्याचे नमूद केले. नव्या पिढीत चित्रपट, कला याविषयी मोठे आकर्षण असून, या क्षेत्रात भवितव्य घडविण्यासाठी फिल्म इंस्टिट्यूट स्थापन करण्यास सरकार पुढाकार घेईल, राजेंद्र तालक, ज्योती कुंकळकर असे कलाकार चित्रपट निर्मितीत असल्याने चित्रपट क्षेत्राच्या विकासासाठी त्यांचीही मदत होऊ शकेल, असे ते म्हणाले. सोनाली कुलकर्णी व मकरंद अनासपुरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मराठी चित्रपट सृष्टीचा आढावा या कार्यक्रमांतर्गत घेण्यात आला, त्यात जुन्या काळापासून आजवरच्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांचे सादरीकरण करण्यात आले. ही गाणी प्रसिद्ध गायक प्रवीण गावकर व सहकाऱ्यांनी सादर केली. राजेश पेडणेकर यांनी त्यावर केलेल्या अभिनयाला खुद्द नाना पाटेकर यांनीही दिलखुलास दाद दिली.

भिकारी प्रकरणी तिघे पोलिस दोषी

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - शॅल्टोन नामक भिकाऱ्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन टाकल्याप्रकरणी पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस हवालदार, पोलिस शिपाई व वाहन चालक दोषी आढळले असून पोलिस महानिरीक्षक त्यांच्यावर शिस्तभंगाची योग्य कारवाई करणार असल्याची माहिती आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी पत्रकारांना दिली.
उपअधीक्षक शांबा सावंत यांनी केलेल्या तपासात भिकाऱ्याला घेऊन गेलेल्या त्या पोलिस नियंत्रण कक्षाच्या वाहनात असलेले पोलिस हवालदार पी. म्हामल, पोलिस शिपाई एस. कुडणेकर व वाहन चालक आर आर. तांबसे हे तिघे दोषी आढळून आले आहेत. पोलिस खात्याला न शोभणारे असे या पोलिसांनी कार्य केले असून यापुढे पुन्हा अशा घटना घडू नयेत, त्यासाठी सर्व पोलिस स्थानकासाठी परिपत्रक जारी करण्यात आल्याची माहिती यावेळी श्री. देशपांडे यांनी दिली. यापुढे अशा घटना हाताळताना पूर्ण काळजी घेण्याचीही सल्ला पोलिसांना देण्यात आला आहे. पोलिस नियंत्रण कक्षात असलेल्या पोलिसांनी मानवी दृष्टिकोनातून आपली ड्यूटी केली पाहिजे. तत्पर सेवा देण्यासाठी आणि अडचणीत सापडलेल्यांना आधार देण्यासाठी या सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. आधीच दुःखात असलेल्या आणि आजारी असलेल्या भिकाऱ्यांना अशी वागणूक मिळाल्यास ते योग्य होणार नसल्याचे मत यावेळी श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले.
पोलिस चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, त्या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता पणजी बाजारातून पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी आला की, एका व्हाईन शॉपच्या समोर एक भिकारी असून तो उपद्रव करतो. या दूरध्वनीची दखल घेऊन बाजाराच्या जवळ असलेल्या नियंत्रण कक्षाच्या पोलिस वाहनाला माहिती देण्यात आली तसेच १०८ रुग्णसेविकेला त्याठिकाणी जाण्याची सूचना करण्यात आली. सर्वांत आधी त्याठिकाणी १०८ रुग्ण सेवा वाहन पोचले. त्याच्यापाठोपाठ पोलिस वाहन गेले. यावेळी १०८ वाहनातील सेविकेने त्या भिकाऱ्याच्या आरोग्याची तपासणी केली. त्याला कोणताही आजार नसल्याचे उघड झाल्याने त्यांनी आम्ही त्याला इस्पितळात नेत नसल्याचे सांगितले. तसेच याच भिकाऱ्याला यापूर्वी १०८ वाहनाने अनेकवेळा इस्पितळात दाखल केल्याचे त्या रुग्णसेवा वाहनाच्या चालकाने पोलिसांनी सांगितले आणि ते निघून गेले. त्यानंतर तो दुकान मालक त्या भिकाऱ्याला घेऊन जाण्यासाठी पोलिसांच्या मागे लागल्याने त्याला पोलिसांनी आपल्या जीपमधे घेतले आणि कदंब बसस्थानकाच्या दिशेने घेऊन गेले. यावेळी त्या भिकाऱ्याने कंापाल येथे एका गल्लीत आपला ओळखीची व्यक्ती राहत असल्याने त्याठिकाणी नेऊन सोडण्याची विनंती केली. त्यामुळे कंापाल येथे त्याला सोडण्यात आल्याचे आपल्या बचावासाठी त्या पोलिस शिपायांनी चौकशी अधिकाऱ्याला दिली. परंतु, त्या भिकाऱ्याला कंापाल येथे सोडण्यात आल्याची माहिती त्याचवेळी बिनतारी संदेशाद्वारे नियंत्रण कक्षाला देण्यात आली नसल्याने आणि त्यांच्या जबानीत तफावत आढळून आल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
हा एका भिकाऱ्याचा प्रश्न नसून शहरात उपद्रव करणाऱ्या अन्य भिकाऱ्यांचे काय करायचे, हा मोठा प्रश्न असून त्यासाठी कायद्यात योग्य बदल करण्याची गरज असल्याचे मत यावेळी श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले. शहरात येणारे ९९.९९ टक्के भिकारी हे बिगर गोमंतकीय आहे. यातील सर्वच भिकारी हे परिस्थितीने बनवलेले नसून त्यात काही व्यावसायिक भिकारी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे ते म्हणाले. भिकारी प्रतिबंधक कायदा अपुरा पडत असून त्यात बदल करण्याची गरज आहे. तसेच या भिकाऱ्यांची योग्य व्यवस्था करण्यासाठी समाज कल्याण खात्याने याची दखल घ्यावी, असेही श्री. देशपांडे म्हणाले.

"कमिशन'नसल्यानेच चर्चिल यांचा विकास प्रकल्पांना विरोध

जितेंद्र देशप्रभू यांचा घणाघाती आरोप

पणजी, दि.५ (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ व सहापदरी महामार्ग हे दोन्ही बडे प्रकल्प केंद्र सरकारतर्फे उभारण्यात येणार आहेत. तेव्हा अशा प्रकल्पांतून १५ टक्के कमिशन मिळण्याची शक्यता नसल्यानेच सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव हे या विकासात्मक प्रकल्पांना खो घालीत असल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र देशप्रभू यांनी केला.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. देशप्रभू यांनी चर्चिल आलेमाव यांच्यावर शरसंधानच केले.चर्चिल यांना गोव्याच्या भवितव्याचे किंवा विकासाचे काहीही पडून गेलेले नाही ते केवळ वैयक्तिक व आपल्या कुटुंबीयांच्या उद्धाराचाच विचार करतात.गोव्याचा विकासाचा ठेका त्यांना देण्यात आला नसून त्यांच्याकडून विकासाला होत असलेल्या विरोधामुळे गोव्याचे मोठे नुकसान होत असल्याची टीकाही यावेळी श्री.देशप्रभू यांनी केली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी याप्रकरणी जनतेला स्पष्टीकरण देण्याची गरज आहे,अशी मागणीही त्यांनी केली. खुद्द सरकारातील मंत्र्यांकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याने जनतेचा गैरसमज होणे स्वाभाविक आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकासात्मक धोरणाची घोषणा करावी,अशी मागणीही यावेळी श्री.देशप्रभू यांनी केली.
आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळाच्या कामाला चालना मिळवून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.या विमानतळामुळे गोव्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे तसेच स्थानिकांना छोटे उद्योग व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.खुद्द पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने मोपा विमानतळाला हिरवा कंदील दाखवला असताना चर्चिल यांच्याकडून विरोध केला जाणे हे दुर्दैव असल्याचेही ते यावेळी म्हणाले. केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी मोपा विमानतळासह दाबोळी विमानतळही कायम राहणार असल्याचे यापूर्वीच घोषित केले आहे. दाबोळी विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडून तीनशे कोटी रुपये मंजूर करून या कामाची पायाभरणीही केली आहे,असे असून देखील चर्चिल यांच्याकडून अशी बेजबाबदार वक्तव्ये केली जाणे ही गोव्याच्या हिताविरुद्ध असल्याचा टोलाही यावेळी श्री.देशप्रभू यांनी हाणला. मोपा विमानतळाचे काम हे "बांधा,वापरा व परत करा' (बूट) पद्धतीवर होईल तसेच सहापदरी महामार्गाचे कामही सार्वजनिक, खाजगी भागीदारी (पीपीपी) पद्धतीवर होईल,त्यामुळे राज्य सरकारला या दोन्ही बड्या प्रकल्पांच्या बांधकामात काहीही भूमिका नसल्याने अशा बड्या प्रकल्पांवर १५ टक्के कमिशन उकळण्याचे मनसुबे धुळीस मिळत असल्यानेच त्यांचा तोल गेला आहे व ते काहीही बरळत असल्याचा आरोपही यावेळी श्री.देशप्रभू यांनी केला.
सहापदरी महामार्गाबाबत जनतेची दिशाभूल
सहापदरी महामार्गाबाबत चर्चिल आलेमाव जनतेची दिशाभूल करीत असल्याची टीकाही श्री.देशप्रभू यांनी केली. या महामार्गासंबंधी केंद्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर या महामार्गासाठी सुमारे ८०० बांधकामावर कारवाई करण्याचे सुचवण्यात आले आहे. यापैकी केवळ २२७ बांधकामे ही कायदेशीर असून बहुतांश बांधकामे ही पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची माहिती श्री.देशप्रभू यांनी दिली आहे.या बेकायदेशीर बांधकामांत गाडे,धार्मिक स्थळे व महामार्गालगत राहणाऱ्या लोकांनी केलेले अतिक्रमणांचा समावेश आहे.चर्चिल या महामार्गाला विरोध करून या बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी श्री.देशप्रभू यांनी केला.महामार्गालगतच्या अशा बेकायदेशीर बांधकामांमुळेच रस्ता अपघात होतात,अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. महामार्गाचा हा प्रकल्प सुमारे साडेतीनशे कोटींचा आहे. एवढ्या बड्या रकमेच्या या प्रकल्पातून त्यांना काहीही मिळणार नाही तसेच या महामार्गावर टोल आखण्याचा अधिकारही केंद्राकडे राहणार असल्याने त्यांना या टोलाचे कंत्राट आपल्या कुटुंबीयांना देण्याची संधीही मिळणार नाही,असा टोलाही यावेळी श्री.देशप्रभू यांनी हाणला आहे.कर्नाटकातील कारवार,सुपा व हल्याळ भाग गोव्याला जोडण्याबाबतचे वक्तव्य हे हास्यास्पद असल्याचे सांगून या भागांत खाण कंत्राट तर त्यांनी घेतले नाही ना,अशीही खिल्लीही श्री.देशप्रभू यांनी उडवली आहे.

आणखी एका संशयिताच्या जामिनावर आज सुनावणी

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी) - पेडणे येथील कथित वेश्या व्यवसाय प्रकरणातील अन्य एक संशयित नेताजी परब ऊर्फ प्रभूदेसाई याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या ६ रोजी सुनावणी होणार आहे. उद्या या सुनावणीला तो न्यायालयात हजर राहण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. नेताजी याचा अर्ज फेटाळला गेल्यास त्याला अटक होईल व या प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश होईल या भीतीनेच सध्या या प्रकरणांत गुंतलेल्यांची गाळण उडाली आहे.
पोलिसांनी सध्या पेडणे येथील हे तथाकथित प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. विशेष करून स्थानिक मुली तसेच खुद्द महिला पोलिसांना फसवून त्यांचे अश्लील "क्लिपींग्स' काढण्यात आल्याची माहितीही उघड झाली आहे.विशेष विभागाचे अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी या टोळीला बळी पडलेल्या पिडीत महिलांनी व महिला पोलिसांनी आपली कैफियत वरिष्ठ पोलिसांकडे मांडावी,असे आवाहन करून त्यांना पूर्ण संरक्षण देण्याची हमीही दिली आहे.राजेश सावंत या निलंबित पोलिस शिपायाला सहा दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर काल जामीन मंजूर करण्यात आला.राजेश सावंत यानेच नेताजी परब ऊर्फ प्रभूदेसाई याचे नाव उघड केले होते.राजेश सावंत याच्या जबानीत पोलिसांनी या प्रकरणी अनेकांची माहिती मिळवली असून त्यांच्याविरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचे काम पेडणे पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिली आहे. नेताजी परब याच्याकडे यासंबंधी अधिक माहिती मिळू शकेल,असे सांगून या टोळीचा भांडाफोड लवकरच होईल,असाही विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान,जुगारी अड्डे चालवण्यासाठी गुन्हा विभागाचे हफ्ते गोळा करणाऱ्या सदर म्होरक्या सरपंचांची माहितीही पोलिस मिळवत आहेत. पेडणे भागातून मोठ्या प्रमाणात हफ्ते पणजीत गुन्हा विभागाला पोहचत असल्याच्या वृत्तामुळे राजधानीतही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. गुन्हा विभागावर उघडपणे झालेल्या या टीकेमुळे या विभागातील काही अधिकारीही बिथरले असून त्यांनीही सावध भूमिका घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळवली आहे. गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडे यासंबंधी एका शिष्टमंडळाने चर्चा केल्याचीही खबर आहे. रवी नाईक यांनी मात्र या शिष्टमंडळाला थेट परतवून लावून या प्रकरणांत पोलिसांना चौकशीचे पूर्ण स्वतंत्र देण्यात आल्याचे सांगितले आहे. पोलिस महासंचालकांना यासंबंधी माहिती मिळवण्याचे आदेश देण्यात आल्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी सांगितल्याने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. पेडणे भागांत जुगारी अड्डे चालवण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ते मिळत असल्याचे वृत्त पसरल्याने व यासंबंधी येथील स्थानिक जनताही अवगत आहे, त्यामुळे आपली बदनामी टाळण्यासाठी पोलिसांनी काही लोकांवर कारवाई करण्याची तयारीही दर्शवल्याची खबर मिळाली आहे.

Thursday 4 June, 2009

सीरियल किलर प्रकरणाचा तपास पाटील यांच्याकडेच

फोंडा व मडगावात अतिरिक्त निरीक्षक

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याला फाशीपर्यंत नेण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी हे प्रकरण आता पूर्णपणे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी दुसऱ्या निरीक्षकाची नेमणूक करण्यात येणार असल्याची घोषणा आज गृहमंत्री रवी नाईक यांनी केली. ते आज आल्तिनो येथील सरकारी निवासात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज उपस्थित होते. त्याचप्रमाणे मडगाव भागात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने त्याही पोलिस स्थानकात दोन पोलिस निरीक्षक नेमण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यावेळी म्हणाले. एकाच पोलिस स्थानकात दोन पोलिस निरीक्षक नेमण्याची ही गोव्यातील पहिलीच घटना ठरणार आहे.
महानंद याची नार्को चाचणी करावी की नाही, याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमधे चर्चा सुरू असून त्यावर पोलिस महासंचालक निर्णय घेतील. या खुनाची मालिका अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर सर्व खुनांचे एकच आरोपपत्र दाखल करावे की वेगवेगळे याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे श्री. नाईक म्हणाले.
दिवसेंदिवस महानंदचे प्रकरण वाढत असल्याने त्याच्याविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे पोलिसांचे काम सुरू आहे. सी. एल. पाटील या प्रकरणाच्या तपासात गुंतल्याने येथील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.
मोर्चा तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी पोलिसांना जादा अधिकार देण्याचा विचार सुरू असून त्याविषयीचे येत्या विधानसभा अधिवेशनात गोवा पोलिस कायदा विधेयक सादर करणार असल्याची माहिती यावेळी श्री. नाईक यांनी दिली. याविषयीची येत्या दि. १६ जून रोजी चिकित्सा समितीची बैठक होणार असून त्यात या विधेयकावर चर्चा करून नेमके कोणते अधिकार पोलिसांना द्यावे यावर निर्णय घेतला जाणार आहे. नवीन बदल करण्यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्र पोलिस कायदा नजरेसमोर ठेवून हे विधेयक बनवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

कोण, कुठली ही पूजा?
महानंदची पत्नी पूजा नाईक हिच्याविषयी गृहमंत्री रवी नाईक यांना विचारले असता कोण...? कोण ही पूजा...? असा प्रति प्रश्न करून ""हा...ती का, जुने गोव्याला कुठे तरी नोकरीला असते ती...'' तिच्या विषयी मला काहीच माहिती नसल्याचे सांगून गृहमंत्र्यांनी कानावर हात ठेवले. तिच्याबद्दल तुम्हांला पोलिस महासंचालक आणि पोलिस निरीक्षकच अधिक माहिती देऊ शकतील, असे म्हणून श्री. नाईक यांनी तिच्याविषयी अधिक काहीही बोलण्यास नकार दर्शविला. पूजा नाईक ही कॉंग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याच्या सतत संपर्कात असल्याची जोरदार चर्चा असल्याचे त्यांना विचारले असता असे कार्यकर्ते अनेक असतात पण, कोण कसा आहे, हे काही कळत नाही ना...आणि ती काही माझ्या मतदारसंघातील नाही, असे श्री. नाईक म्हणाले.
पूजा नाईकची वागणूक संशयास्पद असल्याने आणि दीपाली जोतकरच्या आईने आपल्या मुलीच्या खून प्रकरणात पूजा नाईक हिची चौकशी करण्याची मागणी केलेली असताना पोलिस तिची चौकशी का करीत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पूजा नाईक ही वेगवेगळी नावे धारण करुन वावरत होती, अशी माहितीही उघडकीस आली आहे. पूजा नाईक हीच रेश्मा देसाई, पूजा कामत अशा नावाने आपला परिचय करुन देत होती. पूजा अशी बनावट नावे धारण करुन का वावरत होती, असा प्रश्न उपस्थित झाला असून याचीही पोलिसांनी चौकशी करण्याची अत्यंत गरज आहे.

आणखी पर्यटकच नको, मोपाही नको - चर्चिल

द्रुतगती महामार्गला पर्यायी प्रस्ताव

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - गोव्यात सध्याच्याच परिस्थितीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप आहे त्यामुळे ही संख्या आणखीन वाढवण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांनी तीव्र विरोध केला आहे. पर्यटकांची संख्या आणखीन वाढवायची गरज नाही, त्यामुळे गोव्याला अतिरिक्त मोपा विमानतळाचीही गरज नाही, असा दावा करून त्यांनी पुन्हा एकदा मोपा विरोधाचेही टुणटुणे वाजवले.
आज पर्वरी येथे आपल्या दालनात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. गोव्यात पर्यटन उद्योग फोफावतो आहे हे खरे जरी असले तरी त्याचा लाभ मात्र गोमंतकीयांना फारच कमी होतो, असे ते म्हणाले. वाढत्या पर्यटकांमुळे येथे निर्माण होणाऱ्या विविध समस्या पाहिल्या तर राज्याच्या भवितव्याबाबत चिंता वाटते, अशीही खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. सध्या दाबोळी विमानतळाकडून जेवढ्या पर्यटकांची सोय होते तेवढी बस्स झाली. मोपा विमानतळ बांधून आणखीन पर्यटकांना गोव्यात येण्याची सोय अजिबात नको, असे विधानही त्यांनी यावेळी केले. सध्या गोव्याला भेट देत असलेल्या पर्यटकांमुळेच एवढा ताण पडतो तर भविष्यात ही संख्या वाढली तर गोव्याचे काय होईल, असे सांगून त्यांनी आपल्या या विधानाचे समर्थनही केले.
चौपदरी महामार्गासाठी नवा प्रस्ताव
केंद्र सरकारने तयार केलेल्या द्रुतगती महामार्गाच्या प्रस्तावामुळे अनेकांना स्थलांतरित करण्याची वेळ येणार असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यायी प्रस्ताव तयार केला आहे. या नव्या प्रस्तावानुसार पत्रादेवी ते पोळे रस्त्याचे चौपदरीकरण व काही ठिकाणी सहापदरीकरण करण्यात येणार असून त्यात केवळ ३० ते ४० बांधकामे हटवावी लागणार आहेत, अशी माहिती चर्चिल आलेमाव यांनी दिली. येत्या १५ दिवसांत आपण मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह दिल्लीला जाणार असून त्यावेळी हा प्रस्ताव केंद्राला सादर केला जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. हा प्रकल्प "बूट' पद्धतीवर राबवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्गाचे काम हे रस्ता वाहतूक व महामार्ग प्राधिकरणाकडून केले जाते परंतु गोव्याच्या हिताच्या दृष्टीने हा प्रस्ताव खास स्थानिक सा.बां.खाते अभियंत्यांनी तयार केल्याचेही ते म्हणाले. या महामार्गाबाबत विविध ठिकाणी बैठकांचेही आयोजन करण्यात आले होते,असे सांगून केंद्र सरकारचा प्रस्ताव लागू केल्यास गोव्यात क्रांती होईल,असा टोलाही त्यांनी हाणला.

भिकारी प्रकरण पोलिसांना शेकणार!

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) - पोलिस नियंत्रण कक्षाच्या पोलिसांनी भिकाऱ्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नेऊन टाकल्याच्या प्रकरणाला आता गंभीर स्वरूप प्राप्त झाले असून या घटनेची सखोल चौकशी करून उद्या सकाळी दि.५ जून रोजी संपूर्ण अहवाल सादर करण्याचा आदेश आज पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिला.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार पोलिस नियंत्रण कक्षाचे पोलिस उपअधीक्षक शांबा सावंत यांना देण्यात आले असून उद्या सकाळी अहवाल आपल्यापर्यंत पोचल्यावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले. तर, पोलिसांमुळे चर्चेत आलेला भिकारी शॅल्टोन याने आज अनेक दिवसानंतर थंड पाण्याने आंघोळ केली. कांपाल येथे असलेल्या एका संघटनेने त्याच्या राहण्याची व्यवस्था केली असून त्याला पोटभर जेवण आणि अंगावर घालण्यासाठी चांगले कपडेही देण्यात आले आहेत. शॅल्टोन याला कचऱ्याची पेटी दाखवणाऱ्या घटनेची चौकशी सूरू झाली असून त्यारात्री पणजी पोलिस स्थानकात ड्युटीवर असलेल्या दहा पोलिस शिपायांची तसेच पोलिस नियंत्रण कक्षाच्या शहरात गस्त घालणाऱ्या पोलिस वाहनात असलेल्या पोलिसांचीही जबानी नोंद करुन घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
प्राप्त माहितीनुसार त्यादिवशी रात्री पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून एका व्यक्तीने हॉटेलच्या समोर भिकारी असल्याची माहिती दिली होती. ही माहिती टिपून घेणाऱ्या पोलिसाने ती माहिती गस्त घालणाऱ्या पोलिस वाहनाला दिली. त्यांनी त्या भिकाऱ्याला वाहनात घेतले मात्र तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला यावर गूढ निर्माण झाले आहे. याचा उलगडा उद्याच्या अहवालात होण्याची शक्यता आहे.

मुस्लिम देशांशी संबंध सुधारणार - ओबामा

काहिरा, दि.४ - अमेरिका आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये असलेले संशयाचे आणि वादाचे चक्र आता संपवायला हवे. अमेरिकेचे मुस्लिम राष्ट्रांसोबत असलेले संबंध सुधारले जावेत, असे आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.
मध्य पूर्व देशांच्या दौऱ्यावर असलेले ओबामा इजिप्तची राजधानी काहिरा येेथे असताना त्यांनी दिलेल्या आपल्या महत्त्वपूर्ण भाषणात त्यांनी वरील आवाहन केले. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूंमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे, हे मान्य करून ओबामा म्हणाले की, दोन्ही बाजूंनी एकमेकांचा सन्मान करायला हवा. दोन्ही देशांचे संबंध पुन्हा सुरळीत होण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे.
काहिरा विद्यापीठातील आपल्या या संबोधनात ओबामा यांनी मुस्लिम देशांसोबतच्या अमेरिकेच्या संंबंधावरच जास्त जोर दिला.
मी येथे अमेरिका आणि मुस्लिम राष्ट्रांमध्ये एक नवीन शुभारंभ करण्यासाठी आलो आहे. हा शुभारंभ आपसातील हित आणि एकदुसऱ्याच्या सन्मानावर आधारित राहणार आहे, असेही ते म्हणाले.
हिंसक कट्टरपंथीयांनी भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंमध्ये जे संशयाचे आणि वादाचे चक्र सुरू झाले आहे ते आता थांबवायला हवे, असेही ओबामा म्हणाले. माझ्या एका भाषणाने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले हे चक्र थांबणार नाही, अविश्वासाचे वातावरण निवळणार नाही, असेही त्यांनी मान्य केले.
ज्या गोष्टी आधी बंद खोलीत केल्या जात होत्या त्या आता दोन्ही बाजूंनी खुलेपणाने करायला काहीच हरकत नाही. इस्लाम नेहमीच अमेरिकेसोबत जुळलेला आहे, असेही ओबामा म्हणाले.
जे आमच्या देशात येतात त्यांच्यासाठी तेथील संधीचे स्वप्न भंग झाले आहे, असे समजू नये. अमेरिकेत येऊन आपले स्वप्न साकारणाऱ्यांमध्ये ७० लाख मुसलमानांचा समावेश असतो, अशी माहितीही ओबामा यांनी दिली.
इराक आणि अफगाणिस्तानचा उल्लेख करून ते आपल्या भाषणात म्हणाले की, या दोन्ही देशांत स्थायी लष्करी तळ ठोकण्याचा अमेरिकेचा अजीबात विचार नाही. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये हिंसक कट्टरपंथीय नाही, असा विश्वास जेव्हा निर्माण होईल तेव्हा आम्ही स्वत:च आनंदाने तेथील आमच्या सर्व सैनिकांना परत बोलावून घेऊ. या कट्टरपंथीयांचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त अमेरिकी लोकांना मारण्याचाच आहे. आज या भागातील परिस्थिती हाताबाहेर गेली असल्यामुळेच तेथे अमेरिकेचे लष्कर तैनात करण्यात आले आहे, असेही ओबामा यांनी सांगितले.

महिला आरक्षण विधेयक तातडीने संमत करणार

नवी दिल्ली, दि. ४ - पंधराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर गुरुवारी प्रथमच संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनात पारंपरिक पद्धतीने राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे अभिभाषण झाले. यात संपुआ सरकारने केलेली कामे व येत्या १०० दिवसांच्या आत केंद्र सरकारद्वारे उचलल्या जाणाऱ्या पावलांवर कटाक्ष टाकण्यात आला. त्याचप्रमाणे पुढील पाच वर्षांत सरकारद्वारे राबविली जाणारी धोरणे व कार्यक्रमांची रूपरेषाही मांडण्यात आली. संसद आणि विधानसभेत महिलांसाठी ३३ टक्के व पंचायती अन् महानगर पालिकांमध्ये ५० टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी महिला आरक्षण विधेयक लवकरात लवकर संमत करून घेण्याच्या दृष्टीने सरकार येत्या १०० दिवसांमध्येच प्रभावी पावले उचलेल, अशी ग्वाही प्रतिभा पाटील यांनी दिली.
अभिभाषणाच्या वेळी दोन्ही सभागृहातील बहुतेक सदस्य व केंद्रीय कक्षात उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, लोकसभा सभापती मीरा कुमार, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, संपुआ प्रमुख सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली उपस्थित होते.
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी "१०० डेज मिशन' याआधीच घोषित केले आहे. या मिशनअंतर्गत सरकार कोणती पावले उचलणार, याचा तपशील पाटील यांनी यावेळी सांगितला. सुमारे ५५ मिनिटे चाललेल्या अभिभाषणात राष्ट्राध्यक्षांनी बहुतेक सर्व महत्त्वपूर्ण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांचा उल्लेख केला.
अभिभाषणादरम्यान पाटील यांनी अनेकदा "माझे सरकार' शब्दाचा वापर केला. त्यांनी मोकळ्या आवाजात सामान्यापेक्षाही जरा जास्त गती ठेवत हिंदीतून अभिभाषण दिले. यादरम्यान पाटील यांनी श्रीलंका व तेथील तामिळांबाबत चर्चा सुरू केल्यानंतर एमडीएमकेचे सदस्य ए. गणेशमूर्ती आपल्या जागेवर उभे राहून काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करू लागले. याच कालावधीत अभिभाषणाच्या स्वागतार्थ सदस्यांनी टाळ्या वाजविल्यामुळे एमडीएमके खासदाराचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही. विशेष बाब अशी की, सभागृहातील वातावरण उत्साहवर्धक राहिले.
येत्या पाच वर्षांत देशातील प्रत्येक महिलेला साक्षर बनविण्यासाठी राष्ट्रीय साक्षरता अभियानाची पुनर्रचना केली जाईल असे पाटील यांनी सांगितले. अभिभाषणात महिलांच्या सबलीकरणावर विशेष जोर देण्यात आल्याचे दिसून आले. २००१ मध्ये देशात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५४ टक्केच होते. परंतु, राष्ट्रीय साक्षरता अभियान प्रभावीपणे राबविल्यानंतर यात मोठया प्रमाणात वाढ होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढविण्याच्या दृष्टीने त्यांना आरक्षण दिले जाईल. यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितपणे प्रयत्न करतील. सोबतच महिला सक्षमीकरणासाठी एका राष्ट्रीय मिशनची स्थापना केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक मंदीमुळे चालू आर्थिक वर्षात विकास दर साधारण राहू शकतो. त्यामुळे दमदार व्यवस्थापनाद्वारे आर्थिक विकास दर वाढविण्याला आम्ही प्राधान्य देऊ. यासाठी उद्योगांचा विकास, उत्पादन आणि निर्यात वाढीवर लक्ष, लघु व मध्यम आकाराचे उद्योग आणि गृहनिर्माण यासारख्या पायाभूत उद्योगांकडे विशेष लक्ष दिले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
अभिभाषण संपल्यानंतर उप-राष्ट्रपती अन्सारी यांनी भाषणाच्या इंग्रची प्रतीचे पहिले व अंतिम पान वाचले. उर्वरित भाग वाचला असल्याचे समजण्यात आले.
मुख्य मुद्दे :
१. १०० दिवसांच्या आत महिला आरक्षण विधेयक
२. ५ वर्षांत झोपडपट्टीरहीत भारत
३. विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी कारवाई
४. अंतर्गत सुरक्षा व जातीय सद्भाव कायम राखणार
५. खाद्यान्न सुरक्षा कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ३ रुपये दराने २५ कि.ग्रॅ.तांदूळ किंवा गहू देणार ६. कृषी रोजगार व उत्पादन आणि सेवा क्षेत्रात आर्थिक विकास वाढविणार
७. रोजगार, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण संरचना, शहर नूतनीकरण कार्यक्रमांची नव्याने आखणी, खाद्यान्न सुरक्षा व कौशल्य विकास कार्यक्रमांना सुरुवात
८. महिला, युवक, मुले, अन्य मागास वर्ग, अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), अल्पसंख्यांक व ज्येष्ठांच्या कल्याणासाठी संघटित कृती आणि सुदृढ समाज व्यवस्थेवर जोर देणार
९. नोकऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण वाढविण्यासाठी संघटित प्रयत्न
१०. चांगल्या समन्वयासाठी महिला केंद्रीत कार्यक्रम मिशन म्हणून राबविण्याची योजना
११. नद्यांच्या स्वच्छता मोहिमसाठी ऐच्छिक राष्ट्रीय युवा संघटनेची स्थापना, गंगा नदीपासून सुरुवात
१२. पंचायत सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी मागास क्षेत्र अनुदान निधीवर विशेष लक्ष
१३. बिन लष्करी माहिती जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक धोरणाची आखणी
१४. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणणार. जबाबदारी ठरविण्यासाठी सामाजिक लेखा परीक्षण
१५. जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थान मोहिमेला गती देण्यासाठी व्यावसायिक व तांत्रिक समित्यांची स्थापना
१६. न्याय यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी ६ महिन्यांत नवी योजना
१७. शासकीय व्यवस्थेत सुधारणा
१८. राजकोषाचे विवेकपूर्ण व्यवस्थापन
१९. ऊर्जा सुरक्षेसोबतच पर्यावरणाचे संरक्षण
२०. जगासोबत रचनात्मक आणि सृजनशील ताळमेळ
२१. सर्वच क्षेत्रात आधुनिकीकरणाला प्राधान्य
२२. उद्योग आणि विकासात्मक नव्या विचारसरणीचे संवर्धन

"विद्युतभवना'चा सहावा मजला महापालिका पाडणार

बेकायदा बांधकामाबद्दल स्पष्टीकरण मागविले

पणजी, दि.३ (प्रतिनिधी) - पणजी महापालिकेकडून खाजगी बेकायदा बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा जारी करण्याचे प्रकार घडतच असतात, परंतु खुद्द सरकारी इमारतीलाच बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी करून सात दिवसांच्या आत खुलासा न केल्यास हे बांधकाम पाडण्याचा इशाराच देण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.
येथील फेरीबोट धक्क्यासमोर असलेल्या "विद्युतभवन' इमारतीचा नव्याने बांधण्यात आलेला सहावा मजला हा पूर्णपणे बेकायदा असल्याची तक्रार व्ही..ए..कामत व इतरांनी महापालिकेकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन महापालिका निरीक्षक तथा अभियंत्याच्या एका पाहणी पथकाने विद्युत भवन इमारतीच्या या सहाव्या मजल्याची पाहणी केली. या पाहणीत या इमारतीवरील पूर्ण सहावा मजलाच बेकायदा असल्याचे उघड झाले आहे. या मजल्याच्या बांधकामाबाबत महापालिकेकडून कोणताही परवाना अथवा ना हरकत दाखला घेण्यात आला नाही,अशी माहितीही उघड झाली आहे. महापालिका विशेष पाहणी पथकाने आपला अहवाल सादर करून या बांधकामाला आक्षेप घेतल्याने याप्रकरणी महापालिका आयुक्त मेल्वीन वाझ यांनी तात्काळ विद्युत भवनातील मुख्य कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केल्याची माहिती मिळाली आहे.
महापालिका आयुक्तांनी २७ मे रोजी पाठवलेल्या या कारणे दाखवा नोटिशीत महापालिकेच्या मान्यतेविना विद्युत भवन इमारतीच्या सहाव्या मजल्याचे बांधकाम केल्याची माहिती उघड केली आहे. सदर बांधकाम महापालिका कायदा, २००२ च्या कलम २६९ अंतर्गत बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी खुलासा करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली असून अन्यथा कलम २६९ अंतर्गत हे बांधकाम पाडण्याचे आदेश का जारी करण्यात येऊ नये,असा इशाराही देण्यात आला आहे.
यासंबंधी विद्युत खात्याचे मुख्य अभियंता निर्मल ब्रागांझा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणामुळे आता महापालिका विरुद्ध वीज खाते असे व्दंद्व रंगणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निःपक्षपातीपणाची मीराकुमार यांची ग्वाही

एकमताने सभापतिपदी निवड

नवी दिल्ली, दि. ३ - लोकसभा सभागृहाचा गौरव आणि सभागृहातील सदस्यांचा सन्मान राखताना माझ्याकडून कोणाचेही मन दुखविले जाणार नाही. आपले काम करीत असताना मी कोणालाही तक्रारीची संधी देणार नाही. विरोधी पक्षांसोबत कोणताही पक्षपात करणार नाही, तर सत्तापक्षाला कोणत्याही तक्रारीची संधी देणार नाही, असे प्रतिपादन नवनियुक्त लोकसभा सभापती मीरा कुमार यांनी आज येथे केले.
सभागृहाने एकमताने निवड केल्यानंतर आपला कार्यभार स्वीकारल्यावर बोलताना मीरा कुमार म्हणाल्या की, आज जे झाले ते अभूतपूर्व आहे. या सभागृहाने ५७ वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज एका महिलेला सभापतिपदावर बसण्याचा निर्णय घेऊन इतिहास घडविला आहे, एक उज्ज्वल विक्रम प्रस्थापित केला आहे. आपण मला जो सन्मान दिला, त्याचा मी विनम्रतापूर्वक स्वीकार करते.
आज आम्हाला जे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे, त्याला आम्ही स्वातंत्र्य म्हणू शकत नाही. ते केवळ एक राजकीय स्वातंत्र्य आहे, असे सांगून मीरा कुमार म्हणाल्या की, आम्ही अद्याप मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावू शकलो नाहीत, गरिबीच्या समस्येवर तोडगा काढू शकलो नाही, त्यांना अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा पुरवू शकलो नाहीत, सर्व प्रकारच्या शोषणातून त्यांची मुक्तता करू शकलो नाही, त्यांच्या चौफेर विकासाच्या संधी त्यांना उपलब्ध करून देऊ शकलो नाही. जोपर्यंत हे सर्व त्यांना दिले जात नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण स्वातंत्र्याचा आनंद घेता येणार नाही.
सरकारने लवकरात लवकर आपल्या आश्वासनांची पूर्तता करायला हवी. युवक उतावीळ होतील, अशा कोणत्याही संधी त्यांना द्यायला नकोत. आजच्या युवा वर्गाला आपल्या मताची किंमत समजली आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर निघून मतदान केले आहे, हे आपल्याला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे या युवा भारताच्या आकांक्षांची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळाले नाही तर ते उतावळे होतात आणि कोणतेही कृत्य करू शकतात. त्यामुळे त्यांना अशी संधीच दिली जाऊ नये, असे आग्रही प्रतिपादनही मीरा कुमार केले.
जनतेला आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आम्ही चांगले शासन करू शकतो, अशी जनतेची अपेक्षा आहे. भलेही आम्ही सत्तापक्षात असो की विरोधी. आम्हाला जनतेला चांगले शासन द्यायचे आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील चांगले सरकार देण्यासाठी सभागृहातील सर्वच सदस्यांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
सभागृहाच्या गौरवमयी परंपरेनुसार आपण मला पूर्ण सहकार्य करा, जेणेकरून आपण माझ्यावर टाकलेली घटनात्मक जबाबदारी मी पार पाडू शकेल, असे आवाहनही त्यांनी सभागृहातील सर्व जुन्या व नव्या सदस्यांना संबोधून केले. सभागृहातील सर्वच वर्गांकडे माझे समान लक्ष राहील. विरोधी पक्ष व सत्ता पक्ष यांना मी समान वागणूक देईल, असे आश्वासनही मीरा कुमार यांनी सभागृहाला दिले.
सभागृहाचे यशस्वी माजी सभापती गणेश वासुदेव मावळंकरांपासून ते सोमनाथ चॅटर्जीपर्यंत या सर्वांच्या आदर्शांची मला जाणीव आहे. या साऱ्यांनी सभापतिपदाचा गौरव कायम राखला आहे, असे सांगून मीरा कुमार म्हणाल्या की, तसाच प्रयत्न मी करीन.
जनतेपासून स्वत: दूर ठेवले तर खासदारांचे अस्तित्वच राहात नाही. आपल्या मतदारांना आपल्यापासून काय अपेक्षा आहेत, हे आपण जाणले पाहिजे. त्यांच्या गरजा, त्यांच्या मागण्या खासदारांनी सभागृहापुढे मांडव्यात अशी या जनतेची अपेक्षा आहे, असेही त्या म्हणाल्या. सभागृहाच्या कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्यांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आम्ही चर्चा व वादविवाद अवश्य करू शकतो. एखाद्या मुद्याबाबत असहमतीही दर्शवू शकतो. मात्र, त्यासाठी आक्रमक धोरण न ठेवता शालीन पद्धतीचा वापर करावा आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळे निर्माण करू नये.
संसदेचे कामकाज ठप्प पाडले जावे, असे या देशातील जनतेला अजीबात वाटत नाही. त्यामुळे सदस्यांनी जनतेचा अपेक्षाभंग होईल, असे कोणतेही वर्तन करू नये, असे आवाहनही देशाच्या पहिल्या महिला सभापतींनी सभागृहातील सदस्यांना केले.

अरुण जेटली राज्यसभेचे विरोधी पक्षनेते

नवी दिल्ली, दि.३ - भाजप नेते अरुण जेटली यांची राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एच. एस. अहलुवालिया यांची राज्यसभेचे उपनेते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
सुषमा स्वराज यांची लोकसभेच्या उपनेत्या म्हणून निवड झाली आहे. भाजपच्या सांसदीय मंडळाने आज या नियुक्त्या घोषित केल्या. यापूर्वी राज्यसभेचे विरोधी पक्षनेेते असलेले जसवंतसिंग हे दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित झाले आहेत. आधी अरुण जेटली यांनी या पदासाठी नकार दिला होता. आपण सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करीत असल्याने आपणास हे पद देऊ नये, असे कारण त्यांनी दिले होते. पण, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याच नावाचा आग्रह धरल्याने शेवटी त्यांनी हे पद स्वीकारण्यास संमती दिली.

"क्रीडानगरी'बाबत कृषी खाते अंधारात!

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - हजारो झाडांची कत्तल आणि शेती जमीन बुजवून शेतकऱ्यांना भिकेला लावणारी धारगळ येथे क्रीडा नगरी उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देताना कृषी खात्याला विश्वासात घेण्यात आले नसल्याचा गौप्यस्फोट आज खात्याचे संचालक सतीश तेंडुलकर यांनी केला. धारगळ येथील ११ हजार चौरस मीटर जमिनीवर ही क्रीडानगरी उभारण्यात येत असल्याने आज कृषी खाते अस्थायी समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. पणजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर याच्या अध्यक्षतेखाली खाली झालेल्या या बैठकीला धारगळ परिसरातली शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडवडिलांनी टिकवून ठेवलेली शेती आणि काजू बागायती नष्ट करून त्या जमिनीवर क्रीडा नगरी उभारण्याची भाषा करणारे क्रीडा मंत्री बाबू आजगावकर हे वृक्षारोपण करण्याची भाषा करीत आहे. श्री. आजगावकर यांनी आता पर्यंत किती झाडे लावली आहेत ते आधी सांगावे, असा संतप्त सवाल यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकऱ्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी कृषी खात्याची स्थापना करण्यात आली आहे. परंतु, कृषी खातेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून क्रीडा नगरीच्या मागे असल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अथक प्रयत्नानंतर तिळारी धरणाचे पाणी येथील शेतीसाठी वापरण्यासाठी करोडे रुपये खर्च करून कालवा खोदण्यात आला आहे. या पाण्यातून येथील शेती टिकवण्यात आली असून क्रीडा मंत्री ही शेतीच नष्ट करण्यास पुढे आल्याने त्यांचा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री आजगावकर यांच्या विरोधात जोरदार भूमिका घेतली तसेच त्याच्या या क्रीडा नगरीलाही तीव्र विरोध दर्शविला.
मानशीचा बांध फुटून खाजन शेतीची नुकसानी होत असल्याने त्याची वेळोवेळी डागडुजी करण्याची जबाबदारी कूळ संघटनेकडे सोपवण्यात आल्याची माहिती यावेळी संचालक तेंडुलकर यांनी दिली. मानस फुटून पाणी शेतात येत असल्याने हजारो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागते. त्यामुळे यावेळी या प्रश्नाकडे शेतकऱ्यांनी लक्ष वेधले. त्यावेळी श्री. तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण दिले. परंतु, कूळ संघटना या प्रश्न हाताळण्यास कमी पडत असल्याने याकडे कृषी खात्यानेच लक्ष पुरवण्याची सूचना समितीची अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावेळी केली.
बेडकांची शिकार करणाऱ्यावर आणि हॉटेलमध्ये त्याचे पदार्थ विक्री करणाऱ्या हॉटेलवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी वन खात्याचे मुख्य वनपाल शशीकूमार यांनी सांगितले. राज्यात मोठ्या प्रमाणात बेडकांची शिकार केली जात असल्याने त्याच्याविरोधात कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे यावेळी श्री. कुमार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे वनखात्याकडे पणजीतील कोणत्या हॉटेलमध्ये "जंपिग चिकन' दिले जाते, याची यादी असून त्या हॉटेलवर अचानक छापा टाकून कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अहवालानंतर कारवाईचे वनमंत्र्यांचे संकेत

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - केरी सत्तरी येथे वाघाच्या हत्येचे महत्त्वाचे पुरावे वन खात्याने मिळवले असून या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. वनमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल येत्या शुक्रवारपर्यंत आपल्याला सादर करण्याचे आदेश वन खात्याला दिले आहेत. हा अहवाल सरकारसमोर ठेवल्यानंतर पुढील कृतीबाबत निर्णय घेतला जाईल,अशी माहिती त्यांनी "गोवादूत'शीे बोलताना दिली.
वन खात्याचे उपविभागीय वनाधिकारी सुभाष हेन्रीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केरी सत्तरी येथे झालेल्या पट्टेरी वाघाच्या हत्येचे महत्त्वाचे पुरावे मिळवले आहेत. याप्रकरणी चौकशी अहवाल वनमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांना सुपूर्द करण्यात आला. हा अहवाल अपूर्ण असल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती देणारा अहवाल येत्या शुक्रवारपर्यंत सादर करा,असे आदेश आपण वनखात्याला दिल्याचे मंत्री श्री. नेरी म्हणाले. केरी गावातील एका काजू वनात जळालेल्या जागेत वाघाच्या पायाचा पंजा व हाडे सापडली आहेत. ही जागा केरी गावातील माजीकवाड्यापासून केवळ ३ किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान, केरी येथील गणेश माजिक याच्या मालकीच्या काजू वनात हे अवशेष सापडल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. याठिकाणी वाघाची कवटी व इतर महत्त्वाच्या अवयवांचे अवशेष सापडले नसले तरी या जागेच्या जवळच वाघाचे सात दात व रक्त सांडलेली काही पाने सापडली आहेत. हे सर्व अवशेष भारतीय वन्यजीव संस्था,डेहराडून येथे पाठवण्यात आले आहेत व तेथील अहवालानंतरच हे अवयव वाघाचे आहेत की काय,हे स्पष्ट होणार असल्याची माहिती वनखात्याने दिली.
वाघाची हत्या करणे हा वन्य संरक्षण कायद्याअंतर्गत मोठा गुन्हा आहेच वरून पुरावे नष्ट करणे हा त्याहूनही गंभीर गुन्हा आहे,अशी माहिती श्री.हेन्रीक यांनी दिली. याप्रकरणी वन खात्याकडून यापूर्वी अंकुश रामा माजिक,गोपाळ माजिक व भीवा ऊर्फ पिंटू गावस यांना अटक केली होती व नंतर त्यांना सोडण्यातही आले.

Wednesday 3 June, 2009

लोकसभेच्या सभापतिपदी मीराकुमार बिनविरोध

उपसभापतिपदी भाजपचे करिया मुंडा

नवी दिल्ली, दि. २ - सत्तापक्ष आणि विरोधी पक्ष या दोन प्रमुख पक्षांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर पंधराव्या लोकसभेच्या सभापतिपदी महिला सदस्य विराजमान होण्याच्या ऐतिहासिक घटनेचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा सभापतिपदासाठी मीरा कुमार यांनी आज अर्ज दाखल केला असून, अर्ज सादर करण्याची वेळ संपली तेव्हा त्यांचा या पदासाठी एकमेव अर्ज सादर झाला होता, त्यामुळे त्यांची निवड अविरोध झाली असली तरी, त्याची अधिकृत घोषणा मात्र उद्या बुधवारी केली जाणार आहे.झारखंडमधील आदिवासी नेते करिया मुंडा यांचे नाव लोकसभेचे नवे उपसभापती म्हणून भाजपने आज निश्चित केले आहे. सत्तारूढ पक्षाकडून या पदाचा प्रस्ताव सादर करण्यात आल्यानंतर भाजपने संसदीय मंडळाची बैठक आयोजित करून हा निर्णय घेतला आहे. परंपरेनुसार उपसभापतिपद हे प्रमुख विरोधी पक्षाला दिले जात असते, त्यानुसारच सत्तारूढ कॉंग्रेस पक्षाने लोकसभा सभापतींच्या नावाची मंजुरी घेऊन प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपसमोर या उपसभापतिपदाचा प्रस्ताव ठेवला होता.
लोकसभेतील सत्तापक्ष नेते प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील एका शिष्टमंडळाने मीरा कुमार यांचा अर्ज आज लोकसभा सरचिटणीस पीडीटी आचार्य यांच्याकडे सादर केला. निर्धारित कार्यक्रमानुसार या पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. दरम्यान, मुदतीपर्यंत एकमेव अर्ज आल्यामुळे मीरा कुमार यांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली असली तरी निर्धारित कार्यक्रमानुसार त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा मात्र उद्या बुधवारी केली जाणार आहे.
आज प्रणव मुखर्जी यांनी मीरा कुमार यांच्या उमेदवारीसाठी अर्जांचे १३ संच सादर केले. यातील एका अर्जात विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी हे अनुमोदक आणि सुषमा स्वराज या सूचक आहेत. याशिवाय संपुआतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनीही एका अर्जावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याशिवाय समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव व शैलेेंद्रसिंग यादव, बिजदचे अर्जुन चरण सेठी व भर्तृहरी महाताब, तसेच लालूप्रसाद यादव, फारुख अब्दुल्ला आणि ई. अहमद या विविध पक्षांच्या नेत्यांनी वेगवेगळ्या अर्जांवर सह्या केल्या आहेत. त्यामुळे मीरा कुमार लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात पवार, अब्दुल्ला यांच्यासह टी. आर. बालू, पी. के. बन्सल, व्ही. नारायणस्वामी आदी नेत्यांचा समावेश होता.
आम्ही मीरा कुमार यांच्या उमेदवारीसाठी १३ अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका अर्जावर संपुआ प्रमुख सोनिया गांधी आणि माझी स्वत:ची अनुमोदक-सूचक म्हणून स्वाक्षरी आहे. तसेच एका अर्जावर विरोध पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांचीही स्वाक्षरी आहे, असे प्रणव मुखर्जी यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
महिलांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे मत प्रसन्नमुद्रा असलेल्या मीरा कुमार यांनी व्यक्त केले.
कॉंग्रेस पक्षाने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचा पाठिंबा मिळवून मीरा कुमार यांच्याबाबतचा निर्णय रविवारी घेतला त्यावेळी यंदाच्या लोकसभेला महिला सभापती मिळणार हे निश्चित झाले होते. आज केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे आणि त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा उद्या बुधवारी होणार आहे. मीरा कुमार यांच्या नावावर कॉंग्रेस पक्षाने शिक्कामोर्तब केल्यानंतर रविवारी मीरा कुमार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील जल संसाधन मंत्री पदाचा आपला राजीनामा पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे सादर केला होता आणि तो त्यांनी राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांच्याकडे पाठविल्यानंतर मंजूर करण्यात आला होता. ६४ वर्षीय मीरा कुमार या दिवंगत बाबू जगजीवन राम यांच्या कन्या आहेत.
करिया मुंडा उपसभापती
खासदार म्हणून सहा वेळा निवडून आलेेले अनुभवी करिया मुंडा यांच्या नावाने नामांकन पत्र सादर करण्याचा निर्णय भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती भाजपचे सरचिटणीस अरुण जेटली यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. मुंडा सर्वप्रथम मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले होते. त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्येही ते मंत्री होते. ७२ वर्षीय मुंडा आधी बिहार राज्यात आणि नंतर वेगळ्या झारखंड राज्यातही आमदार होते.
आदिवासी समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपाने मुंडा यांना लोकसभेचे उपसभापती बनविण्याचा निर्णय घेतला काय, असे विचारले असता जेटली म्हणाले की, मुंडा हे आदिवासी समुदायाचे आहेत, हे खरे आहे. तसेच या पदाची निवड करताना विचारात घेण्यात आलेला अनुभव त्यांच्याकडे असल्यामुळेच त्यांची ही निवड करण्यात आली आहे.
लोकसभेचे उपसभापतिपद हा आदिवासी समुदायाचा सन्मान असून, त्यामुळे समुदायात एक चांगला संदेश जाईल, असे आपल्या या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना करिया मुंडा म्हणाले.
भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत लोकसभा उपसभापतिपदासाठी त्यांचे नाव निश्चित करण्यात आल्यानंतर आणि तशी घोषणा झाल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना मुंडा म्हणाले की, माझ्या या निवडीमुळे आदिवासी समुदायामध्ये आनंद पसरला आहे. ही नियुक्ती करून भाजपाने आदिवासी समुदायाला न्याय दिला आहे.
कॉंग्रेसने लोकसभा सभापतिपदासाठी मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कोमोर्तब केले आहे. त्या निर्णयाचेही मुंडा यांनी स्वागत केले आहे. एकूण लोकसंख्येत महिलांची संख्या अर्धी आहे. आतापर्यंत अध्यक्षपद केवळ पुरुषांना दिले जात होते. यंदा एका महिलेकडे हे अध्यक्षपद देण्याचा जो निर्णय घेण्यात आला आहे तो कौतुकास्पद आहे, असेही मुंडा म्हणाले.
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि जमशेदपूरचे भाजपाचे खासदार अर्जुन मुंडा यांनीही करिया मुंडा यांच्या नामांकनाबद्दल त्यांचे अभिनंदन करून निर्णयाचे स्वागत केले आहे. करिया मुंडा यांना या पदाचा मान देऊन भाजपाने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भाजपा सर्वांकडे समान लक्ष देते, असे अर्जुन मुंडा म्हणाले.

पदवी परीक्षांचा निकाल सरासरी ८९ टक्के

पणजी, दि. २ (प्रतिनिधी) - एप्रिल महिन्यात गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाचा निकाल आज घोषित करण्यात आला असून वाणिज्य शाखेचा ८८. ९९, कला शाखेचा ८६.८३, विज्ञान शाखेचा ८८.४७ तर बीसीए शाखेचा ९४.०५ टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत चारही शाखांतील ४, ५६८ विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ५४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे पदवी परीक्षांचा निकाल सरासरी ८९ टक्के आहे. वाणिज्य, कला व विज्ञान शाखेत विशेष श्रेणीत उत्तीर्ण होण्यात मुलींनी बाजी मारली तर, केवळ बीसीए शाखेत मुलांनी बाजी मारली आहे.
गेल्या वर्षी म्हणजे २००८ साली वाणिज्य शाखेचा ८६.२२ , कला शाखेचा ८५.१८, विज्ञान शाखेचा ८८.६२, बीसीए शाखेचा ८८.७५ टक्के निकाल लागला होता तर, २००७ साली वाणिज्य शाखेचा ९०.६८, कला ८१.२५, विज्ञान ८०.६८ तर बीसीए शाखेचा ९५.५२ टक्के निकाल लागला होता.
यंदा वाणिज्य शाखेत २ हजार २१८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील ९४ विशेष श्रेणीत, ५३० प्रथम, ८८४ द्वितीय श्रेणीत तर ४६६ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेत १ हजार २२६ विद्यार्थी बसले होते. त्यात ७७ विशेष श्रेणीत, २४६ प्रथम, ४५७ द्वितीय श्रेणीत तर २८४ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
विज्ञान शाखेत ७२० विद्यार्थी बसले होत. त्यात १९७ विशेष श्रेणीत, २६८ प्रथम, १५५ द्वितीय श्रेणीत तर १७ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले.
बीसीए शाखेत ५९ विशेष श्रेणीत, १०८ प्रथम, १३३ द्वितीय श्रेणीत तर ६४ सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले, अशी माहिती विद्यापीठ परीक्षा विभागाचे प्रमुख जी जे. एस. तळावलीकर यांनी दिली.

जुन्या जमान्यात...!
एका बाजूला तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे ढोल बडविले जात असताना, अनेक सरकारी खाती व शैक्षणिक संस्थांच्या संकेतस्थळांचे उद्घाटन होत असताना गोवा विद्यापीठाने वृत्तपत्रांना मात्र पदवी परीक्षांचे निकाल जुन्या पद्धतीने कागदोपत्री पाठविले. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही पूर्ण निकाल उपलब्ध नसल्याने नव्या तंंत्रज्ञानाने चालणाऱ्या वृत्तपत्रांची बरीच गैरसोय झाली.

पणजीतील खूनप्रकरणी आरोपीस जन्मठेप

पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- येथील महालक्ष्मी मंदिराजवळ "वत्सल' इमारतीत राहणाऱ्या गुलजार लक्ष्मीदास राजाबली (५८) यांच्या डोक्यावर दंडुक्याने प्रहार करून खून केल्याप्रकरणी आरोपी रामनाथ ऊर्फ समीर वेरेकर याला आज जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ५ जून २००६ साली दुपारच्या वेळी आरोपी समीर याने बेसबॉल बॅटने साहाय्याने मयत गुलझार याच्या डोक्यावर वार केला होता. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या खटल्यात ३२ जणांची साक्ष न्यायालयाने नोंदवून घेतली.
खून करण्यासाठी वापरण्यात आलेली बॅट पोलिसांनी जप्त केली होते. त्याचप्रमाणे हल्ला करताना आरोपीने परिधान केलेले आणि रक्ताने माखलेले कपडेही पोलिसांनी जप्त केले होते. गुलझार याला ठार केल्यानंतर आरोपीने गुलझार यांच्या मुलीला हाक मारून तिच्या वडिलांना ठार केल्याचे ओरडून सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी त्याला घटनास्थळावरून पळ काढताना पाहिले होते. गुलझार याचा मुलगा ईद्रीश व मुलगी फऱ्हान यांनी आरोपीला हल्ला करून बॅट घेऊन आल्तिनोच्या दिशेने पळ काढताना पाहिल्याचे न्यायालयात सांगितले. त्याचप्रमाणे अन्य एका साक्षीदाराने "गुलझार यांना आपण मारणार असल्याचे आरोपीने आपल्याला सांगितले होते' असे न्यायालयात सांगितले. त्याची साक्ष न्यायालयाने ग्राह्य धरली.
समीर वेरेकर या युवकाने गुलजार यांच्या नकळत त्यांची मुलगी फऱ्हान हिच्याशी दोन वर्षापूर्वी नोंदणी पद्धतीने लग्न केले होते. याविषयीची माहिती गुलजार यांना मिळताच त्यांनी या विवाहाला प्रखर विरोध दर्शवून त्या युवकाबरोबर असलेले संबंध तोडण्यास सांगितले. घरच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे नोंदणी रद्द करण्यासाठी मुलीतर्फे सिव्हिल न्यायालयात जानेवारी २००६ मध्ये अर्जही गुलझार यांनी केला होता. त्यामुळेच त्याचा काटा काढण्यासाठी आरोपीने त्याला ठार केल्याचा दावा यावेळी सरकारी वकील पूनम भरणे यांनी केला. गुलझार हे दामोदर मंगलजी कंपनीत काम करीत होते. खून करून फरार झालेल्या
समीरला त्यावेळी पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक महेश गावकर व उपनिरीक्षक बॅं्रडन डिसोझा यांनी आरोबा पेडणे येथून अटक केली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन निरीक्षक महेश गावकर यांनी केला होता.

ट्रकचालकाचा संशयास्पद मृत्यू

शिरगाव खाणीवरील घटना

डिचोली, दि. २ (प्रतिनिधी)- शिरगाव पैरा येथील चौगुले खाणीवर आज सकाळी १० च्या दरम्यान ट्रकातील खनिज माल उतरवत असताना ट्रक उलटल्याने मनोहर वायंगणकर (५८) या ट्रकचालकाचे निधन झाले. चालक वायगणकर याला मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी, शवचिकित्सेनंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. एका महिन्यात या खाणीवर घडलेला हा दुसरा अपघात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी खाणीवरून ट्रक कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला होता, अशी माहिती मिळाली आहे.
अधिक माहितीनुसार, मनोहर हे हडफडे येथील ट्रकचालक ट्रकातील खनिज माल उतरवत असताना ट्रकाच्या मागील बाजूच्या फळीला माल अडकला. त्यामुळे सदर ट्रक पुढून उचलला गेला. नंतर ट्रक पुन्हा जमिनीवर आदळल्यानंतर भीतीने चालक वायंगणकर यांना ह्रदयविकाराचा झटका आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. उपचारासाठी नेत असताना त्यांचे वाटेत निधन झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. याविषयाची पोलिस तक्रार डिचोली पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली असून नेमका अपघात कसा झाला याचा पोलिस तपास करीत आहे.

मजबूत खटल्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न

फोंडा, दि. २ (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याने कबुली दिलेल्या १६ खून प्रकरणांचा तपास सुरू असून महानंद विरोधात मजबूत खटला उभा करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
महानंदाने आपल्या जबानीत उघड केलेल्या जागेत सापडलेल्या मानवी हाडांची आधुनिक पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्या युवतींची हाडे सापडली. त्या युवतींच्या कुटुंबीयांची "डीएनए' चाचणी घेतली जाणार आहे. एका युवतीच्या कुटुंबीयांचे डीएनए तपासणीसाठी रक्त ताब्यात घेऊन "ते' तपासणीसाठी हैदराबाद येथील न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना राय, बांबोळी आणि केरये खांडेपार येथे मानवी हाडे सापडली आहेत. राय आणि बांबोळी येथे खड्डा खोदून मानवी हाडे ताब्यात घेण्यात आली आहेत. राय येथे निरंकाल येथील कु. अंजनी गांवकर हिचा खून केल्याची कबुली दिली आहे. बांबोळी येथे कुडका येथील कु. सुशीला फातर्पेकर हिचा खून केल्याची कबुली दिली आहे. केरये खांडेपार येथे सापडलेली हाडे कुणाची हे स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तपास सुरू आहे. सत्तरी येथे खून करण्यात आलेल्या योगिता नाईक हिच्या मृतदेहाची ओळख न पटल्याने वाळपई पोलिसांनी त्याची विल्हेवाट लावली होती. या मृतदेहाचा "व्हिसेरा' राखून ठेवण्यात आला होता. तो व्हिसेरा, हाडे हस्तगत करून तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठविण्यात आलेली आहेत.
येथील पोलिसांनी विविध खून प्रकरणांशी संबंधित घटनांच्या तपासकामावर भर दिला आहे. खटल्यासाठी आवश्यक पुरावे, माहिती गोळा केली जात आहे. या प्रकरणी उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, संजय दळवी, लक्षी आमोणकर, सचिन पन्हाळकर, सचिन लोकरे, तुकाराम चव्हाण, निखिल पालेकर तपास करीत आहेत.
जनजागृतीसाठी खास बैठक
दरम्यान, फोंड्यातील समविचारी महिलांची बैठक खडपाबांध फोंडा येथील महिला प्रशिक्षण केंद्रात नुकतीच घेण्यात आली. गोव्यात होणाऱ्या महिलांवरील अत्याचार, बळी या विषयासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. सध्या गोव्यात गाजत असलेल्या महानंद नाईक खून सत्राच्या पार्श्वभूमीवर यापुढे अशा घटनांना मुलींनी बळी पडू नये याची खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे लक्षात आले. या गुन्ह्याची पाळेमुळे अगदी खोलावर रुजल्यामुळे समाजाच्या तळागळापर्यत जागृती निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी फोंडा तालुक्यात एक "महिला शक्ती संघटना' स्थापन करण्याची विचार पुढे आला आहे.
समाजाची मानसिकता बदलण्यासाठी ही एक चळवळ असून या चळवळीत फोंडा तालुक्यातील सर्व महिला मंडळे, स्वयं साहाय्य गट, महिला पंच, सरपंच यांनी सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. महिला मंडळ, स्वयंसेवा गट यातील किमान दोन तरी महिलांनी या संघटनेत सामील व्हावेत तरच आपल्या मुलींना आपण महानंदपासून वाचवू, कारण यापुढे अनेक महानंद निर्माण होती. त्यासाठी आपण आधीच सावध असले पाहिजे. ही महिला शक्ती संघटना राजकारणापासून दूर, विनामूल्य, सेवाभावी वृत्तीने कार्य करणार आहे. यासंबंधीची पुढील बैठक घेण्याआधी १५ जून ०९ पूर्वी २३१९५५३ या क्रमांकावर संपर्क साधून महिलांनी नावनोंदणी करावी. त्यानंतर पुढील रूपरेषा ठरविता येईल, असे कळवण्यात आले आहे.

'फरारी' नेताजी परब जयपूरहून परतणार!

पणजी, पेडणे, दि.२ (प्रतिनिधी) - नेताजी परब ऊर्फ प्रभुदेसाई हा फरारी नसून तो जयपूर येथे कामानिमित्त गेला आहे. येत्या दोन दिवसांत तो गावी परतेल, असे स्पष्टीकरण त्याचे वडील संजय प्रभुदेसाई यांनी केले. याप्रकरणी पोलिस विनाकारण तो फरारी असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नेताजी हा या प्रकरणातील अन्य एक महत्त्वाचा साक्षीदार असल्याने त्याला ताब्यात घेतल्यानंतरच या टोळीतील महाभागांचा पर्दाफाश होईल, असा दावा पेडणेचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी केल्याने आता पेडणे येथील तथाकथित वेश्या व्यवसाय प्रकरणाच्या चौकशीला जोर प्राप्त झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी सध्या पेडणे पोलिसांच्या ताब्यात असलेला निलंबित पोलिस शिपाई राजेश सावंत याच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या ३ रोजी संपत असल्याने त्याचे पुढे काय होणार,याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे. याप्रकरणी दै."गोवादूत'ने पाठपुरावा केल्याने या प्रकरणाशी संबंध असलेल्यांचे सध्या बरेच धाबे दणाणले असून त्यांनी हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्याची खबर मिळाली आहे. यासंबंधी अलीकडेच त्यांनी गृहमंत्री रवी नाईक यांचीही भेट घेतल्याची माहिती उपलब्ध झाली असून श्री.नाईक यांनी त्यांना परतवून लावल्याचीही जोरदार चर्चा सध्या या भागात सुरू आहे. राजेश सावंत याच्याकडून आल्टोकार व २५ हजार रोख जप्त करण्यातही पोलिसांनी यश मिळवले. राजेश सावंत याने नेताजी प्रभुदेसाई याचे नाव सांगितल्याने पोलिस सध्या त्याच्या मागावर आहेत. नेताजी याला ताब्यात घेतल्यास अनेकांच्या नावांचा पर्दाफाश होणार असल्याने पोलिसही त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणात गुंतलेले काही लोक एव्हानाच परराज्यात परागंदा झाल्याचे वृत्त आहे तर याप्रकरणाशी संबंध असल्याचा संशय असलेल्या काही लोकांकडून सध्या राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजवणे सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मोबाईल क्लिप्समुळे खळबळ
दरम्यान,पेडणे भागांत जुगाराच्या अनुषंगाने सुरू असलेल्या या वेश्याव्यवसायातून येथील स्थानिक मुलींच्या मोबाईलवरील अश्लील क्लिप्स सध्या पेडणे भागांत फिरत असून यातही याच तथाकथित टोळीचा हात असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या तसेच इतर काही मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा उपभोग घेऊन त्यांच्या अश्लील मोबाईल क्लिप्स टिपल्याचा प्रकारही घडल्याची माहिती मिळाली आहे. हे क्लिप्स सध्या पेडणे तथा इतरही काही वितरित होत आहेत. या प्रकरणांत पोलिसांचा सहभाग असल्याने हे क्लिप्स सुरुवातीला पोलिसांकडेच फिरत होते,अशीही खबर आहे. दरम्यान,पोलिस खात्यातील काही नव्या पोलिस मुलींनाही या टोळीतील पोलिसांनी गुंतवल्याची नवी माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास पोलिस खात्यात सुरू असलेल्या या भानगडींचा पर्दाफाश होऊन पोलिस खात्याची बेअब्रू अटळ आहे,असेही आता उघडपणे बोलले जात आहे.
एवढे करूनही जुगार पुन्हा सुरू
पेडणेतील या तथाकथित वेश्याव्यवसाय प्रकरणाचे मूळ हे जुगार असल्याचे उघड असताना व सध्या हे प्रकरण ताजे असताना आता नव्याने जुगार सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मांद्रे येथे एका ठिकाणी काल रात्री हा जुगार सुरू करण्यात आल्याची खबर काही नागरिकांनी दिली आहे. या जुगाराला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक खेळायला आल्याचीही खबर आहे. पोलिसांचे हप्ते ठरवूनच हा जुगार सुरू करण्यात आल्याची खबर मिळाली असून पोलिस व गुन्हा विभागाला या जुगाराचे मोठे हप्ते पोहचतात,अशीही खबर आहे.
"गोवादूत'च्या धाडसाचे कौतुक

पेडणे येथील तथाकथित वेश्या व्यवसाय व वाढत्या जुगाराबाबत दै."गोवादूत'ने चालवलेल्या पाठपुराव्याचे या भागातील अनेक नागरिकांनी फोन करून कौतुक केले.या प्रकरणाची व्याप्ती ही फोंडा येथील महानंद नाईक प्रकरणाएवढीच मोठी आहे,असेही या लोकांनी सांगितले. या प्रकरणांबाबत प्रत्यक्ष स्थानिक लोक उघडपणे बोलत नसले तरी हा प्रकार पूर्णपणे सत्य असून "गोवादूत' ने हा विषय लावून धरावा,असे सांगत योग्य वेळ येताच नागरिकही या टोळीचा भांडाफोड करतील,असेही ते म्हणाले. मुळात या प्रकरणांत पोलिसच भागीदार असल्याने स्थानिकांना माहिती असूनही ते देण्याचे धाडस कुणालाही होत नाही,अशी माहिती एका नागरिकाने दिली. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत असल्याचे भासवत असले तरी हे प्रकरण दडपून टाकण्याचेच प्रयत्न जास्त होत आहेत. या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र यंत्रणेमार्फत करण्यात यावी, अशी मागणी करून या टोळीचा पर्दाफाश होणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी अनेकांनी सांगितले.

मुंबई हल्ल्यामागील सूत्रधार हाफिज सईदची निर्दोष मुक्तता

लाहोर, दि. २ - मागील वर्षी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार तसेच जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईदला लाहोर उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्याच्यासोबत त्याचा साथीदार नझीर अहमदलाही सोडण्यात आले आहे. जगभरातून दबाव आल्यानंतर पाकिस्तानने आपल्या देशातील काही संशयितांना अटक केली होती. मागील वर्षाच्या १२ डिसेंबरपासून सईदला त्याच्या घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
पाकिस्तान सरकारने सईदविरुद्ध दिलेले पुरावे अपुरे होते आणि त्यातून मुंबई हल्ल्यामागे सईदचा हात होता, हे स्पष्ट होत नाही, असे म्हणत लाहोर उच्च न्यायालयाने सईद व त्याचा सहकारी नझीरला ताबडतोब मुक्त करण्याचे आदेश दिले. सईदची कैद ही राज्यघटना व देशाच्या कायद्याच्या चौक टीत बसत नसल्याचेही न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटल्याचे सईदचे वकील ए. के. डोगर यांनी सांगितले. दरम्यान, सईदच्या सुटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतल्याचे ताजे वृत्त आहे.
लाहोर उच्च न्यायालयाच्या तीन जणांच्या खंडपीठाने हाफिज सईदचे वकील डोगर यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. सईदविरोधात कुठलेही ठोस पुरावे पाकिस्तान सरकारने दिलेले नाहीत तसेच भारताकडूनही काही ठोस माहिती आलेली नाही. त्यामुळे सईद व नझीर यांना बंदिवासात ठेवणे गैर आहे. त्यांना तात्काळ सोडण्यात यावे, अशी मागणी डोगर यांनी न्यायालयासमोर केली होती.
लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा एक भाग म्हणूनच "जमात-उद-दावा' ही संघटना काम करत होती. मुंबईवरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रने या संघटनेवर बंदी घातली होती. संयुक्त राष्ट्रच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननेही जमात-उद-दावाच्या नेत्यांची धरपकड केली होती व जमातचा प्रमुख सईदला नजरकैदेत ठेवले होते.
हाफिज सईदची सुटका दुर्दैवी : कृष्णा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार हाफिज सईद याच्या सुटकेवर भारताने आज तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत म्हटले आहे की, सईदची सुटका ही दुर्भाग्यपूर्ण बाब आहे. या निकालामुळे पाकिस्तानने पुन्हा आपले रंग दाखवावयास सुरुवात केली आहे.
लाहोर उच्च न्यायालयाच्या या निर्णयावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, यामुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित जी चौकशी पाकिस्तानने सुरू केली आहे, त्यावरच आता आम्हाला शंका येऊ लागली आहे. दहशतवाद्यांविरोधातही पाकिस्तानने जी कारवाई सुरू केली आहे त्यावरही कृष्णा यांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे.
याआधी सईदच्या सुटकेवर गृहमंत्री पी. चिदम्बरम् यांनीही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, याचाच अर्थ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याकडे पाकिस्तान अद्यापही गांभीर्याने बघत नाही. हाफिज सईद याला न्यायालयाने नजरकैदेतून मुक्त केले असले तरी त्याचा मुंबई हल्ल्यावरील चौकशीवर कोणताही परिणाम होणार नाही. चौकशी सुरूच राहील. या सर्व घटनाक्रमाकडे बघता पाकिस्तान दहशतवादाप्रति अद्यापही गंभीर नाही, दिलेल्या वचनांचा पाकिस्तान भंग करीत आहे, हेच यावरून दिसून येते.

Tuesday 2 June, 2009

लोकसभेचे उपसभापतिपद श्रीपाद यांच्या नावाची शिफारस

पणजी, दि.१ (प्रतिनिधी)- गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून सतत तीन वेळा निवडून येऊन हॅट्ट्रिक साधलेले खासदार श्रीपाद नाईक यांच्या नावाची शिफारस लोकसभा उपसभापतिपदासाठी करण्याचा विचार राष्ट्रीय भाजपने चालवला आहे. श्रीपाद नाईक यांच्याबरोबर करिआ मुंडा या आदिवासी खासदाराच्या नावाचीही चर्चा असून या संदर्भात उद्या २ तारखेला भाजप संसदीय मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत श्रीपाद किंवा मुंडा यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
कॉंग्रेस पक्षाकडून लोकसभा सभापतिपदासाठी दलित महिला खासदार मीराकुमार यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. भाजपकडूनही या अनुषंगाने उपसभापतिपदासाठी आदिवासी किंवा इतर मागासवर्गीय गटातील खासदाराची शिफारस करून कॉंग्रेसच्या या निवडीला तसेच उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी गटातर्फे खुंटी लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुंडा तर इतर मागासवर्गीय गटातर्फे श्रीपाद नाईक यांचे नाव पुढे आले. गेल्या शनिवारी कॉंग्रेस सरकारने उपसभापतिपद प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला देण्याचा निर्णय घोषित केला होता. यापूर्वी भाजपतर्फे ज्येष्ठ भाजप नेत्या तथा इंदोरच्या खासदार सुमित्रा महाजन यांच्या नावाची शिफारस करण्याचा विचार होता; परंतु कॉंग्रेसतर्फे मीराकुमार यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने भाजपने आपला निर्णय मागे घेतला. दोन्ही पदांवर महिलांची निवड होणे योग्य होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी लालकृष्ण अडवाणी यांचीच निवड होणार असून उपनेतेपदी सुषमा स्वराज यांची निवड होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, श्रीपाद नाईक यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालखंडात केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवले होते. गोव्यातील उत्तर गोवा मतदारसंघातून सतत तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. लोकसभा उपसभापतिपदासाठी त्यांची निवड झाल्यास गोव्याच्या दृष्टीने हा मोठा बहुमान ठरणार आहे. त्यादृष्टीने उद्याच्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अचानक कोसळलेल्या पावसाने विविध अपघातात १० जखमी

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - छत्री व रेनकोट न घेताच बाहेर पडलेल्या लोकांची आज पूर्वमान्सूनने बरीच धांदल उडवली. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी लोक अडकून पडले. त्याचप्रमाणे रस्ते चिखलमय झाल्याने अनेक किरकोळ अपघातही घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या पावसामुळे मात्र उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना थोडा दिलासा मिळाला. राज्यात अद्याप मान्सून सक्रिय झाला नसून हा पूर्वमान्सून असल्याचे यावेळी पणजी वेधशाळेचे के. व्ही. सिंग यांनी सांगितले. आज दिवसभरात ५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती श्री. सिंग यांनी दिली. आज दिवसभर पावसाने ठिकठिकाणी राज्याला झोडपून काढले. या धुवाधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. येत्या काही दिवसात मान्सून सक्रिय होणार असला तरी, पणजी महापालिकेची मान्सूनपूर्व कामे मात्र अद्याप सुरू आहेत.
बाणस्तारी आणि मेरशी येथे झालेल्या अपघातात १० जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाणस्तारी पुलानजीक ट्रॅक्स क्रमांक जीए ०१ एन ११५७ रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने जीपमधील ९ प्रवासी जखमी झाले, तर मेरशी सर्कल येथे ट्रक, ऍक्टिवा व इंडिका कार या तीन वाहनांत झालेल्या अपघातात मेरशी येथील लुसी डायस जखमी झाल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. हा विचित्र अपघात ट्रक क्रमांक केए ३७-४४३५, ऍक्टिवा क्र. जीए ०७ बी ०४८७ व टाटा इंडिका क्र. जीए ०७ सी २६४७ यांच्यात झाला.

तो म्होरक्या कोण? पेडणे भागात चर्चेला उधाण

वेशाव्यवसाय प्रकरणाशी संबंध नाही - सरपंच कोनाडकर

पणजी व पेडणे, दि. १ (प्रतिनिधी) - पेडणे येथील कथित वेश्या व्यवसाय प्रकरणाचा पाठपुरावा दै."गोवादूत' ने चालवल्याने या प्रकरणांत गुंतलेल्या संशयितांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. या एकूण प्रकरणाताल एक म्होरक्या पेडणे परिसरातील एक सरपंच असल्याची माहिती उघड झाल्याने या भागातील विविध पंचायतींच्या सरपंचांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा म्होरक्या सरपंच कोण हे पोलिसांनी लवकरात लवकर उघड करावे,अशी जोरदार मागणी त्यांच्याकडून होत आहे. हे सुरू असतानाच दुसरीकडे मांद्रेचे सरपंच महेश कोनाडकर यांनी वेश्याव्यवसाय प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचा खुलासा आज एका पत्रकार परिषदेत केला. या संदर्भात कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान पेडणे पोलिसांनीही या प्रकरणाच्या चौकशीला गती देताना सदर प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या निलंबित पोलिस शिपाई राजेश सावंत याच्याकडून आल्टो कार व २५ हजार रोख रक्कम जप्त केली आहे. शिपाई राजेश सावंत याला वेश्या व्यवसायात गुंतल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणातील अन्य एक संशयित नेताजी परब हा अद्यापही फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी या प्रकरणाची चौकशी प्राधान्यतेवर केली जात असल्याची माहिती दिली. या प्रकरणात लवकरच आणखी काही लोकांना ताब्यात घेतले जाईल, असेही ते म्हणाले. संशयितांविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याने आणखी काही लोकांचा पर्दाफाश होणार असल्याचे ते म्हणाले.
राजेश सावंत याला अटक झाल्याने त्याच्या साथीदारांची मात्र पाचावर धारण बसली असून हे लोक परागंदा झाल्याची चर्चा या भागात सुरू आहे. मुळात या सर्व गैरव्यवहार व अनैतिक धंद्यांची माहिती पोलिसांना होती व त्यांच्या आश्रयानेच हे प्रकार सुरू होते. या सर्व गैरव्यवहारांचे हप्ते गोळा करण्याचे काम या प्रकरणातील सदर म्होरक्या करीत असल्याचेही काही स्थानिकांनी उघड केले आहे. या सर्व प्रकरणी मूग गिळून गप्प राहण्यासाठी स्थानिक गुप्तचरांना वाटा हाच म्होरक्या देत होता व त्याचे हप्ते पणजीतील वरिष्ठांपर्यंत पोचत होते,अशीही आता उघड चर्चा सुरू इथे सुरू आहे. या लोकांचे हफ्ते स्थानिक पोलिसांना मिळत असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणे कठीण असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
पेडणे जुगाराचे केंद्रस्थान
पेडणे भागांत पोलिसांच्या आश्रयाने मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असून हा भाग जुगाराचे केंद्रस्थान असल्याची माहिती लपून राहिलेली नाही. शेजारी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात लोक जुगार खेळण्यासाठी इथे येतात व त्यांच्या सोयीसाठीच जुगाराच्या अनुषंगाने वेश्याव्यवसाय सुरू आहे, अशीही माहिती मिळाली आहे. या ठिकाणी चालणाऱ्या मोठ्या जुगारावर वेश्यांचा सौदा केला जातो. परराज्यातून जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या एखाद्या गिऱ्हाईकाकडून २५ हजारांची मोठी खेळी झाल्यास त्याला वेश्या "ऑफर' देण्याची पद्धतही या जुगारी अड्ड्यांवर सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी या भागातील अनेक महत्वाचे जुगारी अड्डे बंद करण्यात आले होते परंतू आता हे अड्डे पूर्ववत सुरू करण्यासाठी या टोळ्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशीही विश्वसनीय माहिती आहे.
निःपक्ष चौकशीची सरपंचांची मागणी
या प्रकरणातील म्होरक्या हा सरपंच असल्याचे वृत्त पसरल्याने आता लोक या भागातील सगळ्याच सरपंचांकडे संशयाच्या नजरेने पाहतील, अशी खंत या भागातील अनेक सरपंचांनी केली. धारगळचे सरपंच भूषण नाईक, तोर्सेचे माजी सरपंच सुर्यकांत तोरसकर व पंच राघोबा गावडे यांनी या प्रकरणी पेडणे पोलिसांनी खऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करून संशयाचे हे वातावरण मोकळे करावे,अशी मागणी केली आहे. या वेश्या प्रकरणात पेडणे तालुक्यातील एकही विद्यमान सरपंच गुंतलेला नाही, असा निर्वाळा धारगळचे सरपंच भूषण नाईक यांनी दिला; तर सरपंचांवर विनाकारण अंगुलीनिर्देश केल्यास हा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा सुर्यकांत तोरसकर यांनी दिला.

२५ लाखांना गंडा घालणाऱ्या राजस्थानी व्यापाऱ्यास अटक

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी) : मडगावातील इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व्यापाऱ्यांना साधारणपणे २५ लाखांना गंडा घालणाऱ्या महेंद्रकुमार दबे (४१) या मूळ राजस्थानी व्यापाऱ्याला आज मडगाव पोलिसांनी अटक केली व त्यानंतरच त्याचा भांडाफोड झाला.
दबे याचे आके येथील पांडव कपेलपाशी इलेक्ट्रिकल वस्तूचे दुकान आहे. तो वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडून माल खरेदी करत असे व त्यांना पुढील तारीख टाकून धनादेश देत असे. गेली काही वर्षें त्याचा असा व्यवहार सुरू होता. याच प्रकारे त्याने मालभाट येथील महालक्ष्मी इलेक्ट्रिकल यांच्याकडून माल नेला होता व त्यांना दिलेला १.९० लाखांचा धनादेश मुदत संपल्यावर बॅंकेत जमा केला असता खात्यात पैसे नसल्याचे कारण सांगून परत आला. सदर दबे हाही भेटण्याचे टाळू लागल्यावर महालक्ष्मी दुकानाचे मालक हेमराज चौधरी यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली .
पोलिस तक्रारीची कुणकुण लागताच आरोपी काल रात्री आपल्या येथील दुकानातील सामानाची विल्हेवाट लावून पळून जाण्याच्या प्रयत्नात जुने गोवे येथे पोहोचला असताना चौधरी यांनी तेथे जाऊन त्याला पकडले व मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस येताच दबे याने अशाप्रकारे धनादेश दिलेले व्यापारी जागे झाले व त्यांनी बॅंकेत जाऊन चौकशी केली असता त्याच्या खात्यात खडखडाट असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनीही पोलिस स्टेशनवर धाव घेतली. दवे याने एकूण २५ लाखांना विविध व्यापाऱ्यांना गंडा घातल्याचे आढळून आले आहे. आरोपीस मडगाव पोलिसांनी अटक केली आहे.

"आर्यन'चे हिरे चमकले..


अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा


पणजी, दि. १ (प्रतिनिधी) - राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांत यंदाही गोव्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादले आहे."आयआयटीजेईई',"एआयईईई', आणि "बीटसेट' अशा विविध प्रवेश परीक्षांत गोव्यातील विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. यात "आर्यन स्टडी सर्कल' च्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी दिली.
आज पणजी येथे बोलावल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते."आर्यन स्टडी सर्कल'तर्फे या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांसाठी योग्य ते मार्गदर्शन दिले जाते. सुरुवातीला प्रवेश देताना बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाते व विद्यार्थ्यांची खास मुलाखत घेऊन त्यांच्यातील कमतरता हेरली जाते.पुढे प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कमतरतेवर मात करण्यास मदत केली जाते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. गेल्या चार वर्षांत गोव्यातील विद्यार्थी "आयआयटी' प्रवेश परीक्षांत विशेष चमक दाखवत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
गेल्या वर्षी एकूण १० विद्यार्थी "आयआयटी'प्रवेश परीक्षेत यशस्वी ठरले होते व त्यातील आठ विद्यार्थी आर्यन स्टडी सेंटरचे होते.यावर्षी हा आकडा वाढून एकूण १३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत यशस्वी ठरले आहेत. त्यातील १२ विद्यार्थी आर्यन स्टडी सेंटरचे आहेत,असेही ते म्हणाले. एकूण ४४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती व त्यातील ३० विद्यार्थी निवडले गेले. या ४४ विद्यार्थ्यांतील ४२ विद्यार्थी आर्यन स्टडी सेंटरचे होते. अनीष तांबसे हा यादीत पहिला आल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.त्यात दर्शन वारीयर, भूषण बोरकर, रोहित गिरी, अभिषेक एगल, अपूर्वा वेर्लेकर, एन्रीच ब्राझ, इशान जोशी, प्रणव वैद्य, शान आकेरकर, परम आलवेणकर,सोहील वेलजी यांचा समावेश आहे.
या यादीत अपूर्वा बोरकर या गुणवत्ता यादीतील एकमेव मुलीचाही समावेश आहे. अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी गोव्यासाठी २५ ते ३० जागा असतात.यावेळी एकूण २५ विद्यार्थी यशस्वी ठरले व त्यातील २२ विद्यार्थी आर्यन स्टडी सेंटरचे होते,असे ते म्हणाले.
यापूर्वी वैद्यकीय क्षेत्राकडे वळणारे विद्यार्थी मोठ्याप्रमाणात अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळत आहेत.वैद्यकीय क्षेत्रात अभ्यासक्रमाची कालमर्यादा मोठी असते व त्यात प्रत्यक्षात प्राप्तीचा मार्गही उशिरा सापडतो; परंतु अभियांत्रिकी क्षेत्रात मात्र एकदा अभ्यासक्रम संपला की लगेच नोकरी मिळते व प्राप्ती सुरू होते, हे एक कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्यन स्टडी सेंटर ही संस्था २००४ साली स्थापन करण्यात आली. या संस्थेची पहिली तुकडी २००६ साली निवडण्यात आली. या संस्थेकडे अकरावी व बारावीचे धरून एकूण ३०० विद्यार्थी सध्या प्रवेश परीक्षेचे शिक्षण घेत आहेत. दिवसाला सहा तास प्रशिक्षण व सुट्टीच्या दिवसांत १२ तास प्रशिक्षण या संस्थेतर्फे देण्यात येते. मुळात शालान्त परीक्षेचा निकाल होण्यापूर्वीच या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो,अशी माहिती श्री. प्रभुदेसाई यांनी दिली.

Monday 1 June, 2009

एअर फ्रान्सचे विमान बेपत्ता

सर्व २२८ प्रवाशांच्या मृत्यूची शक्यता

पॅरिस, दि. १ - एअर फ्रान्सचे ब्राझिलच्या रिओ द जानेरो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलेले २२८ प्रवासी घेऊन पॅरिसला निघालेले एएफ - ४४७ हे विमान सुमारे २०० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे रडारवरून बेपत्ता झाले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ते दुपारी १२.४० वाजता पॅरिस विमानतळावर पोहोचणे अपेक्षित होते.अटलांटिक समुद्रात जोरदार चक्रीवादळात सापडून त्याला अपघात झाला असावा असा अंदाज असून विमानातील सर्व प्रवासी मरण पावले असावेत अशी भीती व्यक्त होत आहे.
ब्राझिलच्या नोरोन्हा बेटांच्या आसपास ३५० किलोमीटरच्या समुद्रात ते कोसळले असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने मदत तसेच शोधपथकांनी सकाळपासून जोरदार शोधमोहिम हाती घेतली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सर्कोझी यांनी विमान बेपत्ता झाल्यामुळे तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ब्राझिलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एअर फ्रान्सचे हे विमान समुद्रावरून उडत असताना खूप दूर गेल्यानंतर ते बेपत्ता झाले. परिणामी दक्षिण अमेरिका तसेच दक्षिण अमेरिकेची लष्करी विमानांनी दोन्ही बाजूंनी समुद्रात जोरदार शोध मोहीम हाती घेतली आहे. "कदाचित ती एक भीषण हवाई दुर्घटना ठरण्याची शक्यता आहे असे मत एअर फ्रान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीअर हेन्री यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. रडारवरून बेपत्ता होण्यापूर्वी विमानाने इलेक्ट्रिकल बिघाडासंबंधीचा स्वयंचलित स्वरूपाचा आपत्कालीन संदेश पाठवला होता. कदाचित चक्रीवादळात सापडलेल्या विमानाच्या वैमानिकांना धोक्याचा संदेश पाठविण्यासही पुरेशी संधी मिळाली नसावी असा अंदाज आहे.
एअर फ्रान्सचे एएफ ४४७ या मूळ ३३० - बोईंग जेट जातीचे विमान भारतीय वेळेनुसार रविवारी सायंकाळी ७ वाजता ब्राझिलच्या रियो द जानेर विमानतळावरून रविवारी सायंकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार) निघाले होते व पॅरीसच्या चार्लस डी गॉल विमानतळावर ते सोमवारी उतरणे अपेक्षित होते. विमानात एकूण २१६ प्रवासी होते. यात ७ मुले, एक बालक व १२ विमान कर्मचाऱ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे वैमानिक खूपच अनुभवी होता. फ्रान्स सरकारातील ज्येष्ठ मंत्री जीन - लुईस बोर्लु यांनी विमान अपहरणाची शक्यता फेटाळून लावली आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचे बोर्लु म्हणाले. बेपत्ता विमानाच्या शोधार्थ ब्राझिलच्या ईशान्येकडे असलेल्या फर्नांडो दी नोरोन्हा बेटावरून काही विमानांनी उड्डाण केले असल्याचे प्रवक्ते हेन्री विल्सन यांनी सांगितले.
गोठलेल्या नजरा, थिजलेली ह्रदये
या विमानातील प्रवाशांचे नातेवाइक सुन्न झाले आहेत. फ्रान्समधील चार्ल्स द गॉल विमानतळावर ते सुन्नपणे बसल्याचे दृश्य कोणाच्याही काळजाला पिळ पडेल, असेच करुण दिसत होते. विविध वृत्त वाहिन्यांवरून याबाबत सातत्याने माहिती दिली जात होती. आता ब्लॅक बॉक्सचा छडा लागल्यानंतर ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा छडा लागू शकेल. कारण ब्लॅकबॉक्समध्ये, प्रत्यक्ष दुर्घटनाघडण्याच्या काही क्षण अगोदर वैमानिक व त्याचा साथीदार यांच्यातील बोलणे ध्वनिमुद्रित केलेले असते.
goToPage(2);

Sunday 31 May, 2009

हळदोण्यातून लांबवले तीस लाखांचे दागिने

मित्राच्या मदतीने पुतण्याचा काकाला हिसका
दोन्ही संशयितांना अटक
दागिने आणि हिरे जप्त

हरमल, दि. ३० (प्रतिनिधी)- कारोना हळदोणे येथून पुतण्याने आपल्या मित्राच्या मदतीने काकाचे सुमारे तीस लाख रुपयांचे दागिने व हिरे लांबवल्याची घटना घडली असून यासंदर्भात सुरेश नरोत्तम रायकर यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आज तक्रारीनंतर तातडीने कारवाई करून सुरेश यांचा पुतण्या योगेश उर्फ नरोत्तम रायकर व त्याचा मित्र योगेश गडेकर यांना अटक करून त्यांच्याकडून हिरे आणि दागिने जप्त केले आहेत.
सुरेश रायकर हे मुंबईला राहतात. ते पत्नीसह गोव्यात एका धार्मिक कार्यक्रमासाठी २३ मे रोजी आले होते. येताना त्यांनी सोबत सुटकेसमधून हिरे व दागिने आणले होते. हे दागिने व हिरे त्यांनी घरातील कपाटात ठेवले होते. दोनच दिवसांपूर्वी एक मुंज होती. दरम्यानच्या काळात एक बिल देण्यासाठी त्यांनी सुटकेसमधील चेकबुक काढले व नंतर सुटकेस तशीच आत ठेवून दिली. मग मुंज आटोपून आल्यानंतर सुरेश व त्यांचे बंधू नंदकुमार रायकर घरी परतले. त्यांना घराचे दरवाजे सताड उघडे दिसले तेव्हा त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.
त्याचवेळी सुरेश रायकर यांच्या लक्षात आले की, घरात काहीतरी गडबड झाली आहे. त्यांनी लगेच कपाटाची तपासणी केली असता दागिन्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी तातडीने म्हापसा पोलिसात यासंदर्भात चोरीची तक्रार नोंदवली. दरम्यानच्या काळात नरोत्तम हा शिक्षणासाठी हैदराबादमध्ये असलेला त्यांचा पुतण्या व त्याचा मित्र योगेश गडेकर यांनी संगनमताने ती सुटकेस लंपास केली. त्यांनी दागिने आणि हिरे लपवून ठेवले. हे काम एखाद्या माहितगाराचेच असावे असा संशय पोलिसांना आला. त्यास अनुसरून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता आपणच सदर बॅग घरापासून जवळच असलेल्या झुडपात लपवून ठेवल्याची कबुली त्यांनी दिली. हे सर्व दागिने व हिरे पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केले आहेत. हे दागिने घरी आणले जाणार आहेत याची कुणकुण आधीच या दोघा संशयितांना लागली होती, अशी माहिती पोलिस चौकशीत निष्पन्न झाली आहे. दोन्ही संशयितांना उद्या न्यायालयापुढे उभे करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून आणखी काही माहिती मिळते काय यादृष्टीने पोलिसांनी तपासाची दिशा केंद्रित केली आहे. याप्रकरणी म्हापशाचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश पडवळकर, अर्जुन गावस, सतीश नाईक, प्रताप गावस, रामा नाईक, बाळा नाईक, दिनेश साटेलकर, सुशांत कोरगावकर यांनी ही कारवाई केली.

पेडणे वेश्याव्यवसाय प्रकरणदेखील गंभीर

मात्र, चौकशीबद्दल नागरिकांत संभ्रम

पणजी, दि.३० (प्रतिनिधी)- पेडणे येथील कथित वेश्या व्यवसाय प्रकरणाची व्याप्ती ही फोंड्यातील महानंद प्रकरणासारखीच मोठी आहे. महानंदने भोळ्या मुलींना प्रेमपाशात ओढून त्यांच्याकडील सोन्याच्या वस्तू लुटल्या व त्यांना निर्दयपणे मारून टाकले. त्याउलट पेडण्यात मात्र झटपट पैसा कमवण्याचे लालूच दाखवून गरीब घराण्यातील मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे नीच कृत्य घडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे पेडणे भागातच घडलेल्या व खुद्द पेडणे पोलिस स्थानकातील काही लोकांचा समावेश असल्याचा संशय असलेल्या या प्रकरणाची चौकशी पेडणे पोलिसांकडून केली जाणे याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यात सध्या विविध मसाज पार्लरवर छापे टाकण्याचे सत्र सुरू असून बहुतेक पार्लर हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनल्याचे उघड झाले आहे. म्हापसा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी अशाच एका प्रकरणी टाकलेल्या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या एका मुलीने पेडणे पोलिस स्थानकावर काम करणाऱ्या पोलिस शिपायाचे नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या या अनैतिक धंद्यात पोलिसांचाही सहभाग असल्याचे या गोष्टीवरून सिद्ध झाले आहे. मोबाईलवरून संपर्क साधून गिऱ्हाइकाला मुली पुरवणे व त्याच्या बदल्यात हजारो रुपयांची कमाई करणे हा या टोळीचा धंदा. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी खुद्द पोलिसांनाच भागीदार करण्यात आले आहे. या भागातील विविध बेकायदा व अनैतिक धंद्यांचे हप्ते गोळा करणे व या ते पैसे वरिष्ठांपर्यंत पोहोचवणे आदी प्रकार उघड झाले आहेत. या टोळीचा त्वरित खातमा केला नाही तर त्याचे गंभीर परिणाम समाजावर ओढवू शकतात. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पेडणे पोलिस स्थानकावर शिपाई म्हणून सेवेत असलेला राजेश सावंत याला अटक करून सहा दिवसांची कोठडी मिळवण्यात पोलिसांनी यश मिळवले खरे; परंतु या संपूर्ण प्रकरणाचे केंद्रबिंदू असलेल्या पेडणे पोलिस स्थानिकाकडूनच या प्रकरणाची चौकशी किती प्रामाणिकपणे होईल, याबाबत शंका उपस्थित झाली आहे. राजेश सावंत याला निलंबित केल्यानंतर सुमारे पंधरा दिवस तो गायब होता. मात्र त्याचा शोध लावण्यासाठी पेडणे पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले नाहीत. या पंधरा दिवसांत हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्याचीही उघड चर्चा सुरू आहे. या प्रकरणांत आणखी काही पोलिसांचा सहभाग आहे तसेच पेडणे भागातील अनेक पंच तथा काही सरपंचांचाही यात हात असल्याची माहिती मिळाली आहे.
राजेश सावंतच्या अटकेमुळे या लोकांचे धाबे दणाणले असून तेही सध्या गायब झाल्याची चर्चा या भागात सुरू आहे. या प्रकरणातील आणखी एक प्रमुख संशयित नेताजी परब याच्या मागावर सध्या पोलिस असून त्याला ताब्यात घेतल्यास या टोळीची जंत्रीच पुढे येईल, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या प्रकरणात बडी धेंडे गुंतली असून लोकांना त्याबाबत माहिती आहे. मात्र त्याची उघड
वाच्यता केली जात नाही.या प्रकरणाचा छडा लागलाच पाहिजे,अशी या लोकांची इच्छा असून अन्यथा ही कीड समाजात पसरल्यास त्याचे गंभीर परिणाम भविष्यात जाणवतील हे उघडच आहे.
बेपर्वाई नको
फोंड्यात महानंद नाईकने आतापर्यंत सोळा मुलींच्या खुनाची कबुली दिली आहे. त्यापैकी एका मुलीच्या बाबतीत जरी पोलिसांनी कसून चौकशी केली असती तरी त्यातील काहींचा जीव वाचला असता.फोंडा पोलिस स्थानकाचे तत्कालीन निरीक्षक मंजुनाथ देसाई यांच्या कारकिर्दीतच अकरा मुलींचा खून झाला ही गोष्टही या निमित्ताने उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी या पेडणे वेश्याप्रकरणाकडेही तेवढ्याच गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,असे लोकांचे म्हणणे आहे. अन्यथा गरीब घरांतील मुली या अनैतिक व्यवसायात ढकलल्या जाऊ शकतात,असा सूर व्यक्त केला जात आहे.

एम. बॉयर यांचे देहावसान

अभिजात तियात्र कला पर्वाचा अस्त

मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी) - गोमंतकीय तियात्राला लोकमान्यता मिळवून देण्याबरोबरच गेले अर्धशतक या लोककलेवर साम्राज्य गाजवणारे अभिजात गोमंतकीय तियात्रिस्त एम. बॉयर यांचे आज राय या त्यांच्या गावी प्रदीर्घ आजारानंतर देहावसान झाले व अस्सल गोमंतकीय तियात्रकलेतील एक पर्व संपले.
त्यांचे खरे नाव मानुएल सांतान आगियार. निधनसमयी ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मारीया व ५ पुत्र असा परिवार आहे. त्यांचे पुत्र विदेशांत असून त्यांच्या परतण्यावर एम. बॉयर यांच्या अंत्यसंस्काराची तारीख पक्की होणार आहे.
बॉयर यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३० रोजी फोंडा येथे झाला.बालपणातच त्यांच्यातील तियात्राचे अंगभूत गुण दिसून येत होते. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे संगीतबद्ध करून सादर केले त्यावेळी त्यांची जी मुक्त प्रशंसा झाली तिनेच त्यांच्या तियात्र जीवनाचा पाया घातला गेला असे मानतात. शालेय जीवनात त्यांना शाळेच्या कडक निर्बंधांमुळे आपल्या आवडीला मुरड घालावी लागली. तथापि, त्यातून त्यांनी नवी युक्ती काढली व एम.टेलर या नावाने एका ठिकाणी काम केले. मात्र प्राचार्यांनी त्यांना रंगेहात पकडले व समजही दिली. अर्थात, त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही व नंतर ते एम. बॉयर याच नावाने रंगमंचावर आले.
"रिणकारी' हे त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षीं लिहून रंगमंचावर आणलेले पहिले तियात्र. नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.स्वतःच्या बुध्दीमत्तेच्या जोरावर त्यांनी २५ वर खेळ तियात्र स्वतः लिहून, निर्मिती, निर्देशक, संगीत दिग्दर्शक व कलाकार अशा विविध रुपांतून रंगमंचावर आणले. एकूण ५०० वर तियात्रांतून कामे केली. हजारावर गाण्यांना संगीत दिले व स्वतः ती म्हटली. भारतांतील प्रमुख शहरांबरोबरच विदेशातील अनेक प्रमुख शहरांतही त्यांनी तियात्र सादर केले. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे तियात्रकलेला कित्येक नवे कलाकार मिळू शकले.
तियात्र हे फक्त मनोरंजनाचे साधन असूं नये तर समाज शिक्षण व जागृतीसाठीचे साधन म्हणून त्याचा वापर व्हावा अशी त्यांची धारणा होती. त्याच उद्देशाने त्यांनी नैतिकता, शांतत व सलोखा या मुद्यांवर भर देऊन "एकूच रोस्तो',"चिंतना जाली सोपनां',"संसार सुदरलो , "भुरगी आनी भांगर' ,"आदीं तें आतां हे','घर दुखी गांव सुखी' , "मोग काजार , डायवोर्स' सारख्या तियात्रांची निर्मिती केली.
गोमंतकीय कोकणी तियाश्रासाठी त्यांनी दिलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल वेळोवेळी विविध स्तरांवर घेतलेली आहे.गोवा मुक्तीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग हस्ते त्यांचा सत्कार झाला होता.त्यापूर्वी राज्य सांस्कृतिक पुरस्कार, मॅन ऑफ द इयर, अमिताभ बच्चन यांच्या हस्ते "गोवा पोस्ट' पुरस्कार, राष्ट्रपतींहस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार, गुलाब, गोवा हिंदू असोसिएशन, कुळागर प्रकाशन, आयटक, सम्राट क्लब असे पुरस्कारही त्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. कुवेतमध्ये झालेल्या सत्काराची व दिल्या गेलेल्या पुरस्काराची आठवण ते वरचेवर काढत असत.

गुलाबीला दगडाने ठेचून मारले

महानंदकडून सोळाव्या खुनाची कबुली
फोंडा, दि.३० (प्रतिनिधी) - सीरियल किलर महानंद नाईक याने दाभाळ येथील गुलाबी गावकर हिचा केरये खांडेपार येथे १९९४ साली खून केल्याची कबुली दिली असून महानंदने केलेल्या खुनांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे.
गुलाबी गावकर हिचा केरये खांडेपार येथे निर्जनस्थळी जुलै १९९४ मध्ये दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी फोंडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला होता. मात्र, खून प्रकरणाचा छडा न झाल्याने अखेर फाईल बंद करण्यात आली होती.
महानंदचा गुलाबी गावकरच्या खून प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. त्यामुळे फोंडा पोलिसांनी गुलाबीच्या खून प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यासंदर्भात एका व्यक्तीने दिलेल्या आपल्या जबानीत केलेले आरोपीचे वर्णन हे महानंदशी मिळतेजुळते असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महानंदचा या प्रकरणात सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
१९९४ साली महानंद हा वरचा बाजार फोंडा येथे मालवाहू रिक्षा चालवत होता. वरचा बाजार फोंडा येथे एका दुकानात गुलाबी कामाला होती. त्यावेळी महानंदने तिच्याशी मैत्री करून तिला नवे दुकान देण्याचे आमिष दाखविले. गुलाबी "त्या' दिवशी घरातून सोन्याचे दागिने घेऊन आली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांचा महानंद याच्यावर संशय होता. तिच्या कुटुंबीयांचा हा संशय अखेर खरा ठरला आहे.
महानंदने ३० मे २००९ रोजी सकाळी फोंडा पोलिसांना गुलाबीचा खून करण्यात आलेली जागा दाखविली. गुलाबीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला.
गुलाबीचा गळा आवळून खून करताना झालेल्या झटापटीत ती महानंदच्या हातातून सुटली आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागली. त्यामुळे महानंदने तिला पकडून जमिनीवर पाडले व तिच्या डोक्यावर मोठा दगड घालून तिचा खून केला. गुलाबी हिचा खून २९ जुलै १९९४ रोजी झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी ३० जुलै १९९४ रोजी गुलाबीचा मृतदेह पोलिसांना केरये खांडेपार येथे आढळून आला. महानंदने दिलेल्या गुलाबीच्या खुनाची माहितीची पोलिसांनी पडताळणी केली असून सदर माहिती जुन्या मिळतीशी मिळतीजुळती आहे. गुलाबीच्या खुनाची फाईल पुन्हा उघडण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी दिली. महानंदने सुरुवातीच्या काळात जे खून केले त्यात या खुनाचा समावेश आहे. तिने तेव्हा साडी नेसली होती. त्यानंतर ज्यांचा खून करायचा असेल अशा युवतींना चुडीदार घालून या, अशी सूचना महानंद करीत होता.
"त्या' युवतीची ओळख पटली
दरम्यान, महानंदने कुंकळ्ये म्हार्दोळ येथे डोंगरावर नेऊन खून केलेल्या युवतीचे नाव शकुंतला कवठणकर (हातुर्ली मये) असे आहे. ही युवती २००५ सालापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे. फोंडा भागात फिरून तयार कपडे विकण्याचे काम ती करीत होती. याप्रकरणी उपअधीक्षक डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. एल. पाटील तपास करत आहेत.

देशासाठी जगण्याची प्रेरणा संघातून मिळते - मदनदासजी

रा. स्व. संघ शिबिराचा समारोप
हरमल, दि. ३० (वार्ताहर) - देशासाठी, समाजासाठी जगायचे ही खूणगाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरातून तयार होते. संघाच्या शिबिरातून स्वतःचा विकास होतोच त्याचप्रमाणे समाजासाठी व देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना संघाच्या शिबिरातून उत्पन्न होते, असे उद्गार संघाचे अखिल भारतीय प्रचारक प्रमुख मदनदासजी यांनी रा. स्व. संघाच्या कोकण प्रांत संघशिक्षा वर्ग प्रथम वर्षाच्या समारोप प्रसंगी पर्वरी येथे आज (दि.३०) काढले.
यावेळी व्यासपीठावर डॉ. सुरज काणेकर (पतंजली योग समिती, गोवा राज्य प्रभारी), सुभाष वेलिंगकर (विभाग संघचालक), श्यामराव देसाई (वर्गाधिकारी) उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना संघाच्या शिबिरातून सेवा करण्याचा अनुभव येतो. समाजातील प्रश्नांविषयी जागृकता निर्माण केली जाते. राष्ट्रीय एकता टिकली पाहिजे, राष्ट्रवाद प्रबळ झाला पाहिजे आणि हे काम सर्वांचे आहे. शिबिरातून संघाचे शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे. देशासाठी ध्येयवाद देणे हे संघाचे काम आहे, असे मदनदासजी यांनी सांगितले.
डॉ. काणेकर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना, प्रत्येकात आत्मविश्वास निर्माण झाल्यास पाच वर्षात देश प्रबळ होईल असे सांगितले.
सुरुवातीला शिबिरार्थींनी संचलन केले. त्यानंतर आसने, लेजीम, नियुद्ध, पदविन्यास, दंड यांची प्रात्यक्षिके करून दाखवली.
परिचय व प्रास्ताविक श्रीपाद जोशी (वर्ग कार्यवाह) यांनी केले. या शिबिरात १६५ संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा समारोप संघ प्रार्थनेने झाला.

प्रा. मयेकरांचे जीवन सोन्याच्या पिंपळासारखे

स्वामी प्रज्ञानंद यांचे प्रतिपादन; सद्भाव ग्रंथाचे थाटात प्रकाशन
पणजी, दि.३०(प्रतिनिधी) - प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माउलीच्या भेटीचा दिव्य अनुभव हा प्रा.गोपाळराव मयेकरांच्या व्याख्यानांतून अनुभवयास मिळतो. हे "संपन्न' व्यक्तिमत्त्व सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.ते जीवनात राजहंसासारखे जगले.आपल्या जगण्यात मूल्यांची प्रतिष्ठा राखून व नेहमीच सत्याच्या शोधार्थ त्यांनी साधना केलेले आयुष्य म्हणजे जणू सोन्याच्या पिंपळासारखे चैतन्यदायी व सळसळणारे असल्याने भावी पिढीसाठी ते नेहमीच स्फूर्तिदायी ठरेल, असे प्रतिपादन संत साहित्याचे थोर अभ्यासक प्रा.मधुकर कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी केले.
कला अकादमीच्या ब्लॅक बॉक्समध्ये प्राचार्य गोपाळराव मयेकर अमृतमहोत्सवी सद्भाव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी अमृतमहोत्सवमूर्ती प्रा.गोपाळराव मयेकर,सौ.उषाताई मयेकर, ग्रंथाचे संपादक परेश प्रभू, ग्रंथाची सजावट केलेले गोवा कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर आदी हजर होते.स्वामी प्रज्ञानंद यांच्या हस्ते "सोन्याचा पिंपळ' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर तथा प्रा.मयेकर यांचे अनेक हितचिंतक उपस्थित होते.
स्वामी प्रज्ञानंद पुढे म्हणाले की गौरव ग्रंथ कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ या ग्रंथाने दिला आहे. प्रा. मयेकर यांच्या संजीवक विचारधारा आणि आनंदमय भावलहरींनी संपन्न असाच हा सद्भाव ग्रंथ झाला आहे. आज माणूस हिंसक बनत चालला आहे.माणुसकी,प्रेम,कर्तव्य याचा झपाट्याने ऱ्हास होत चालला आहे. विज्ञानाच्या या युगात आता जास्तीत जास्त लोक धर्म व अध्यात्माकडे वळत आहे..ईश्वर निष्ठेशिवाय तरणोपाय नाही,हेच सिद्ध होते आहे.
प्रा.मयेकर यांनी मनोगतात आपल्या जीवनप्रवासात वेळोवळी प्रेरणा व आपल्या सुखदुखःत साथ दिलेल्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. आपला जीवन प्रवास हा जणू शिवधनुष्यच होता परंतु या ग्रंथामुळे मात्र हा शिवधनुष्य इंद्रधनुष्य बनला,अशा शब्दांत त्यांनी या अनोख्या ग्रंथाची वाखाणणी केली. लोकप्रंशसा ही अजिबात वाईट नाही,असे म्हणून लोकांच्या या प्रेमामुळे जीवनात काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा मिळते.आपण अध्यात्माकडे वळलो असलो तरी प्रपंचाकडे मात्र आपण अजिबात दुर्लक्ष केले नाही,असेही त्यांनी प्रांजळपणे मान्य केले.सुरुवातीच्या काळात कामगार चळवळीच्या वातावरणात गेल्याने राजकारणात प्रवेश केला,असे सांगून गोव्याचे भाग्यविधाते स्व.भाऊसाहेब बांदोडकर यांनी राजकीय प्रवेश घडवून आपल्याला नावारूपाला आणले,असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपली वाणी व स्मरणशक्ती जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत समाजाला चांगलं देण्यासाठी झटत राहीन,असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी सुरुवातीला संपादक मंडळाचे सदस्य प्रा.अनिल सामंत यांनी ग्रंथाबाबत प्रास्ताविक केले.
परेश प्रभू यांनी ग्रंथ रचनेबाबत आढावा घेतला.प्रा.मयेकर यांचे विद्यार्थी असलेले व खास देवगड इथून या कार्यक्रमाला हजर राहिलेले कवी प्रमोद जोशी यांनी प्रा.मयेकर यांच्यावर भावनांनी ओथंबलेली कविता सादर केली तेव्हा सारे वातावरण भावुक बनले. .प्रा.प्रवीण गांवकर यांनी प्रा.मयेकरांच्या शब्दांतील कवितांना स्वरबद्ध करून या कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांना विष्णू शिरोडकर यांनी संवादिनीवर साथ केली. नितीन कोरगावकर यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात "आर्ट सर्कल' देवगड निर्मित "स्वरांजली' हा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.