• बंदमुळे जनजीवन विस्कळीत • समर्थकांच्या मतदारसंघांतही बंद
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी): मातृभाषेची सक्ती करणारे प्राथमिक शिक्षण धोरण बदलून राजकीय दबावाखाली इंग्रजी माध्यमाला मंजुरी देण्याच्या राज्य सरकारच्या आत्मघातकी निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचाने पुकारलेल्या ‘गोवा बंद’ला आज राज्यभरातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. गोमंतकीयांनी स्वयंस्फूर्तीने या बंदात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने काही क्षुल्लक घटना वगळता बंद शांततापूर्ण वातावरणात पार पडला. राज्यातील ९० टक्के व्यवहार पूर्णपणे ठप्प राहिल्याने बंद मोडून काढण्याची भाषा करणार्या सरकारची चांगलीच फजिती झाली. या बंदच्या यशामुळे शिक्षण धोरणासंबंधीचा जनक्षोभ तीव्रपणे समोर आल्याने सरकारची झोपच उडाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांसह, शिक्षणमंत्री तसेच इंग्रजीचे समर्थन करणार्या नेत्यांच्या मतदारसंघातही बंदला भरीव प्रतिसाद मिळाल्याने सरकारला चांगलीच चपराक मिळाली आहे.
भारतीय भाषा सुरक्षा मंचाने पुकारलेल्या आजच्या बंदाला राज्यातील विविध भागांतील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तथा शैक्षणिक संस्थांनी जोरदारपणे पाठिंबा दर्शवला. विविध बाजारपेठेतील व्यापारी, वाहतूकदार, पेट्रोलपंप मालक, खाजगी आस्थापने आदींनी स्वमर्जीने या बंदमध्ये सहभाग घेतल्याने संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले. भाजपने आपली संपूर्ण संघटनात्मक ताकद या बंदसाठी वापरली व त्यामुळे या बंदच्या आंदोलनात एक उत्साह दिसून आला. शिवसेनेचाही या बंदला सहभाग लाभला. सरकारचे घटक असलेल्या म. गो. व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी उघडपणे या आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रकार घडला. सरकारात राहून इंग्रजीच्या निर्णयाला आपला विरोध असल्याची भाषा करणारे म. गो., राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसचा एकही नेता उघडपणे रस्त्यावर उतरण्याचे धाडस करू शकला नाही. भाजपच्या सर्वंच आमदारांनी मात्र या आंदोलनात सक्रियपणे भाग घेऊन या विषयासंबंधी आपल्या एकनिष्ठपणाचे दर्शन जनतेला घडवले. म. गो.चे नेते ढवळीकरबंधू हे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी राज्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. या बंदमधून जनतेची मानसिकता स्पष्टपणे उघड झाल्याने सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी म. गो.चे अध्यक्ष आमदार दीपक ढवळीकर यांनी फोनवरून बोलताना केली. राज्यात काही ठिकाणी पोलिसांकडून भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्याचे प्रकारही घडले. पोलिस संरक्षणाखाली कदंब बसेस सुरू करण्याचा आटापिटा सरकारने जरूर केला परंतु प्रवासीच नसल्याने या बसेसही बंद ठेवण्याची पाळी सरकारवर गुदरली.
आज पहाटेपासूनच बंदमुळे राज्यात नीरव शांतता पसरली होती. बंदाच्या जोडीला पावसानेही जोरदार हजेरी लावल्याने सगळेच व्यवहार ठप्प झाले. राज्यातील प्रमुख बाजारपेठा व्यापार्यांनी स्वयंखुशीने बंद ठेवल्या. खाजगी बस मालकांनी बंदला पूर्ण पाठिंबा दर्शवल्याने प्रवासी मार्गावर तुरळक कदंब बसेस धावताना दिसत होत्या. एकूण २५ कदंब बसगाड्यांवर दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे. एका ठिकाणी बसचालक किरकोळ जखमी होण्याचा प्रकार घडला. काणकोण येथे आमदार रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात आल्याने काही वेळ वाहतुकीचा खोळंबा उडाला. परराज्यांतील प्रवासी वाहतुकीबाबत यापूर्वीच खबरदारी घेण्यात आल्याने या गाड्याच पाठवण्यात आल्या नसल्याची माहिती देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सामसूम
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मडगाव मतदारसंघात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील तीनही बाजारपेठा बंद राहिल्या. मडगाव कदंब बसस्थानकावरही शुकशुकाट पसरला होता. मडगावची ही परिस्थिती कामत यांच्यासाठी चांगलीच चपराक ठरली. फातोर्ड्याचे आमदार दामोदर नाईक यांच्यासह विविध भाषाप्रेमींनी इथे ठाण मांडले होते. मडगावसह शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा ताळगाव मतदारसंघही थंड पडला होता. आग्नेल फर्नांडिस यांच्या कळंगुट मतदारसंघात तसेच व्हीक्टोरिया फर्नांडिस यांच्या सांताक्रुझ मतदारसंघातही लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपला व्यवहार बंद ठेवून आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनाच धक्का दिला. राज्यातील सर्व प्रमुख शहरांत बंद शंभर टक्के यशस्वी झाला. सासष्टी भागातही या बंदला मिळालेला प्रतिसाद चर्चेचा विषय बनला आहे.
उत्तर गोव्यात हा बंद शंभर टक्के यशस्वी ठरला. आज सकाळी शिवोली- चोपडे पूल बंद ठेवण्यात आल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे, जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर तसेच राष्ट्रवादीच्या नेत्या संगीता परब यांनी याठिकाणच्या आंदोलनात भाग घेतला. डिचोली येथे उपेंद्र गावकर यांना पोलिसांनी अटक केली. मडगावात एक कदंब व दोन खाजगी बसेसवर दगडफेक करण्याचे प्रकार घडले. पेडणे, पालये व हरमल येथे पाच कदंब बसेस पंक्चर करण्याचा प्रकार घडला. आज शाळेचा पहिला दिवस असला तरी बहुतांश ठिकाणी शाळा व्यवस्थापनाने शाळा बंद ठेवून या बंदला पाठिंबा दर्शवला. काही कॉन्वेंट शाळांनी शाळा सुरू ठेवल्या खर्या परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी लाभल्याने त्या लवकर सोडण्यात आल्या. विविध ठिकाणी बसस्थानकांवर बहुतांश पर्यटक खोळंबून उरल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. बहुतांश हॉटेल तथा भोजनालय बंद असल्याने पर्यटकांची बरीच गैरसोय झाली. सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पर्रीकरांचा ताळगावात फेरफटका
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पणजीत फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी खुद्द ताळगावातही भेट दिली. ताळगावातील लोकांनी या बंदला दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांना त्यांच्या चुकीच्या निर्णयाची जाणीव करून देणारीच ही घटना घडल्याचेही ते म्हणाले.
Tuesday, 7 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment