Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 25 December 2010

भाजपच्या कांदेविक्रीस तडाखेबंद प्रतिसाद..

नऊ टन कांदा फक्त दोन तासांत संपलासुद्धा!

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
देशभरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आणलेल्या व पणजी बाजारात ७८ रु. प्रति किलो भावाने विकल्या जाणार्‍या कांद्याची आज दि. २४ रोजी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चातर्फे फक्त ३० रु. किलो दराने विक्री करण्यात आली तेव्हा या योजनेला तडाखेबंद प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. या योजनेचा फायदा घेण्यासाठी पणजी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
येथील भाजप कार्यालयासमोर विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष सौ. कुंदा चोडणकर, पणजीच्या नगरसेविका दीक्षा माईणकर, ज्योती मसुरकर, पणजी महिला मोर्चा प्रमुख प्रीती शेट्ये, नीना नाईक, प्रशीला कुकळकर, शुभा धोंड, माजी महापौर अशोक नाईक यांच्यासह पणजी महिला मोर्चा व राज्य महिला मोर्चाच्या सदस्य तथा कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या वेळी दोन किलो, पाच किलो अशा स्वरूपात नऊ टन कांद्याची विक्री करण्यात आली.
पर्रीकरांनी काढले सरकारचे वाभाडे
वारंवार महागाई वाढवून सरकार लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहे. गोवा सरकार अस्थिर व भ्रष्टाचारी असल्याने त्याचे सर्वसामान्यांच्या प्राथमिक व दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष होत आहे. फलोद्यान महामंडळातर्फे लोकांना स्वस्त दरात कांदा उपलब्ध करणे सरकारला सहज शक्य असताना सरकार कोणतीही हालचाल न करता फक्त कुठे भ्रष्टाचार करता येतो का याकडे लक्ष ठेवून आहे, अशी टोलेबाजी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी याप्रसंगी केली.
वाहतूक खर्च, पॅकिंग खर्च व इतर कपात याची मिळून सुमारे प्रति किलो पाच रुपये नुकसान स्वीकारून ही विक्री करण्यात येत आहे. भाजप हा लोकांची काळजी घेणारा पक्ष आहे. म्हणूनच पक्षाने हे पाऊल उचलले आहे, असे ते म्हणाले.
..तर महागाई झालीच नसती ः कुंदा चोडणकर
जर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असते तर महागाईचा असा कडेलोट झालाच नसता, असे प्रतिपादन याप्रसंगी प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. कुंदा चोडणकर यांनी केले. भाजपच्या कारकिर्दीत सर्वसामान्यांच्या गरजेच्या व दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरावर नेहमीच नियंत्रण ठेवण्यात आले होते. आम आदमीच्या नावाचा जप करणारे विद्यमान सरकार हे फक्त स्वहितात दंग असून त्यांना लोकांच्या प्रश्‍नांची जरासुद्धा काळजी नाही. महिला मोर्चातर्फे यापूर्वीही अल्प दरात पामतेल व नारळ उपलब्ध करून देण्यात आले होते याचीही सौ. चोडणकर यांनी यावेळी आठवण करून दिली. एकूणच भाजपच्या या अभिनव योजनेबद्दल लोकांनी समाधान व्यक्त केले आणि विद्यमान सरकारच्या अकार्यक्षमतेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

मिकींना मंत्रिपद नाकारले तर त्याचे गंभीर परिणाम!

बाणावली - नुवेतील मिकीसमर्थक बनले आक्रमक

मडगाव, दि. २४ (प्रतिनिधी)
आमदार मिकी पाशेको यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याविरुद्ध मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी अवलंबलेल्या वेळकाढूपणाचा जोरदार निषेध करत बाणावली आणि नुवे मतदारसंघांतील मिकीसमर्थकांनी आज प्रथमच उघड पवित्रा घेऊन कॉंग्रेसने युतीचा धर्म पाळावा व मिकींचा मंत्रिमंडळात समावेश करावा, असे निक्षून बजावले.
आपल्या प्रतिनिधीला दूषणे देणार्‍यांवर कठोर टीका करताना संबंधितांनी आधी स्वतःचे चेहरे आरशात पाहावे व नंतरच इतरांवर चिखलफेक करावी असा सल्ला मिकीसमर्थकांनी दिला. मिकींवरील नाहक आरोप म्हणजे आम्हा तमाम मतदारांचा अपमान आहे, असेही या समर्थकांनी कॉंग्रेसला सुनावले.
बाणावली - नुवे मतदारसंघ नागरिक समितीच्या झेंड्याखाली घेतलेल्या या पत्रपरिषदेला ऍड. बायलान रॉड्रिगीस, जिल्हा पंचायत सदस्य नेली रॉड्रिगीस, डॉमनिक गावकर, विल्फ्रेड डिसा, बेताळभाटी सरपंच मिंगेल परेरा, माजोर्डा सरपंच व्हिजिटीना डिसिल्वा, पंच कॅटरिना डिसोझा, नुवेच्या पंच फिला डीसा, जॉय कॉस्ता आदी मंडळी उपस्थित होती.
मिकींचा मंत्रिमंडळातील प्रवेश रोखण्यासाठी पुढे सरसावलेल्या कॉंग्रेसमधील गटाला व प्रामुख्याने मंत्री चर्चिल आलेमाव व बाबूूश मोन्सेरात यांच्यावर उपस्थितांनी टीकेचा भडिमार केला. मिकींना अपमानास्पद विशेषणे बहाल करण्याचा अधिकार त्यंाना आहे का, असा सवाल याप्रसंगी करण्यात आला. मिकींविरोधात षडयंत्र रचण्यात आले; पण अजूनही त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झालेले नाही. ते दोषी ठरलेले नाहीत. मात्र सध्या मंत्रिमंडळात असेलेले अनेक जण ‘कॉफेपोसा’खाली दोन दोन महिने आग्वाद जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यांच्यावर तिरंगा पायाखाली तुडवल्याचा आरोप झाला आहे, इतरांवर पोलिस स्टेशनवर हल्ला केला यासारखे गंभीर आहेत. एका मंत्र्याच्या पुत्रावर तर रशियन अल्पवयीनावर बलात्कार केल्याचाही आरोप आहे. हे लोक कोणत्या तोंडाने मिकींवर ठपका ठेवायला निघाले आहेत, असा सवाल याप्रसंगी करण्यात आला.
मिकी यांनी बेताळभाटीत गेल्या वर्षी व यंदा जो मेळावा भरविला त्यामुळे कॉंग्रेसचे नेते बिथरले आहेत. त्याच्या मनांत भय निर्माण झाले आहे. सत्ता नसताना जर हा माणूस इतके लोक जमवूं शकतो तर उद्या सत्ता मिळाल्यावर तो काय करेल या भीतीतूनच ही सारी मंडळी एकत्र आली आहेत. त्यांनी मिकींविरुद्ध दबावतंत्र सुरू केले आहे. मिकींना मंत्रिपद नाकारता येणार नाही. ते नाकारले तर त्याचे परिणाम कॉंग्रेसला भोगावे लागतील, असा इशारा याप्रसंगी देण्यात आला. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनेनुसार मिकींना मंत्रिपद दिले नाही तर भविष्यातील कृती काय हे नंतर जाहीर केले जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. बाणावली व नुवे मतदारसंघातील पंचायत सरपंच, पंच तसेच अन्य मंडळी यावेळी मोठ्या संख्येने हजर होती. त्यात काही बिगर सरकारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांचाही समावेश होता.

अखेर कलमाडींच्या निवासस्थानांवर सीबीआयचे छापे

-आठ तासपर्यंत चालली कारवाई
-स्वीय सहायकाच्या घराचीही झडती


नवी दिल्ली/पुणे, दि. २४
राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी हाती घेण्यात आलेल्या योजनांचे कंत्राट देताना मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या नवी दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील निवासस्थाने आणि कार्यालये अशा एकूण सहा ठिकाणांवर सीबीआयच्या पथकाने आज छापे टाकले.
सीबीआयच्या ४० अधिकार्‍यांच्या पथकाने आज पहाटे एकाचवेळी कलमाडी यांच्या निवासस्थानांवर धाडी टाकल्या. आयोजन समितीच्या तीन अधिकार्‍यांना अटक केल्यानंतर चौकशी आणखी पुढे नेण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज हे छापे टाकण्यात आले. राष्ट्रकुल घोटाळा उघडकीस आल्यानंतर या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कलमाडी यांच्यावर आज प्रथमच सीबीआयने धाडी टाकल्या. आज सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेले हे धाडसत्र सुमारे आठ तासपर्यंत चालले.
सीबीआय अधिकार्‍यांनी आज कलमाडी यांच्या पुण्यातील कर्वे रोड भागातील निवासस्थान, खडकवासला परिसरातील ङ्गार्म हाऊस, कार शो रूम आणि पेट्रोल पंपावरही धाडी टाकून झाडाझडती घेतली. याशिवाय कलमाडी यांचा स्वीय सहायक मनोज भुरे याच्या पुण्यातील निवासस्थानाचीही सीबीआय अधिकार्‍यांनी झडती घेतली. या धाडसत्राला प्रारंभ झाल्यानंतर लगेचच सीबीआय अधिकार्‍यांनी कलमाडी यांचे निकटवर्ती शेखर यांना सीबीआय मुख्यालयात बोलावून घेतले आणि त्यांची सखोल चौकशी केली. कलमाडी यांच्या मुंबईच्या वरळी येथील निवासस्थानीदेखील सीबीआयचे अधिकारी जाऊन धडकले आणि त्याठिकाणीदेखील त्यांनी आपली कारवाई केली.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या क्वीन्स बॅटनच्या लंडन येथे झालेल्या कार्यक्रमासाठी व्हिडिओ लावण्याचे कंत्राट वाढीव दरात लंडन येथील एका कंपनीला दिल्याच्या आरोपांप्रकरणी तपासणी करण्यासाठी आज या धाडी टाकण्यात आल्या. या धाडसत्रानंतर अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, त्यांची तपासणी करण्याचे काम सध्या सुरू आहे, असे सीबीआयच्या प्रवक्त्या बिनीता ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना दिली. धाडसत्रादरम्यान संगणक आणि लॅपटॉपमधून जप्त करण्यात आलेल्या माहितीचा न्याय सहायक प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुरेश कलमाडी यांना अधिक चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात बोलावले जाऊ शकते, असेही ठाकूर यांनी सांगितले.

एकट्याने कुठलाही निर्णय घेतलेला नाही : कलमाडी
सीबीआयने आज टाकलेल्या धाडीनंतरही सुरेश कलमाडी यांचा हेकेखोरपणा अजूनही कायमच असून, आरोप सिद्ध होईपर्यंत मी पूर्णपणे निर्दोष आहे, असे सुरेश कलमाडी यांनी सीबीआच्या आठ तासांच्या छापेमारीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रकुल स्पर्धा आयोजना संदर्भात मी व्यक्तीगत स्तरावर कुठलाही निर्णय घेतलेला नसून, सर्व निर्णय आयोजन समितीच्या कार्यकारी मंडळाने सामूहिकरित्या घेतलेले आहेत, असे सांगत कलमाडी यांनी आपला बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सरकारने आयोजन समितीसाठी १५०० कोटींचे अंदाजपत्रक निश्‍चित केले होते. ही रक्कम एकूण अंदाजपत्रकाच्या ङ्गक्त चार ते पाच टक्के एवढीच आहे. याशिवाय स्पर्धेसाठी आम्ही वेगवेगळ्या मार्गाने ७०० कोटींचा महसूल गोळा केला होता, असेही कलमाडी यांनी सांगितले.
काही प्रसार माध्यमे मला दोषी ठरविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कलमाडी यांनी यावेळी केला. सीबीआय अधिकार्‍यांना आम्ही आज सर्वतोपरी सहकार्य केले आणि यापुढच्या तपासातही करीत राहू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नार्वेकरांविरुद्ध म्हापसा पोलिसांत गुन्हा नोंद

मुलाच्या जन्मदाखल्यात फेरफार!
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
खोटी माहिती देऊन मुलाच्या जन्मदाखल्यात फेरफार केल्याची पोलिस तक्रार माजीमंत्री तथा गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दयानंद नार्वेकर यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. डॉ. शेखर साळकर यांनी ही तक्रार केली असून पोलिसांनी ऍड. नार्वेकर यांच्यासह त्यांची पत्नी सौ. सुषमा नार्वेकर, मुलगा गणेशराज ऊर्फ अनिश, बार्देश तालुक्याचे कार्यकारी न्यायदंडाधिकारी पी आर. बोरकर आणि म्हापसा पालिकेचे जन्ममृत्यू नोंदणी अधिकारी यांच्याविरोधात ‘भा.द.सं’च्या ४५५, ४६७, ४६८ कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. गेल्या महिन्यात सादर केलेल्या या तक्रारीची आज नोंद करून घेण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍड. नार्वेकर यांनी आपला मुलगा गणेशराज याला क्रिकेटमध्ये विशिष्ट वयोगटातील सामन्यांत खेळवणे शक्य व्हावे यासाठी त्याची जन्मतारीख बदलली आहे. तसेच, जन्माचे ठिकाणही बदलले आहे. हे फेरफार करण्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्रावर खोटी शपथ घेऊन ही माहिती दिल्याचे डॉ. साळकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गणेशराज याची जन्मतारीख २८ फेब्रुवारी १९९३ अशी असून त्याचा जन्म पर्वरी येथील चोडणकर नर्सिंग होममध्ये झाला होता. मात्र ही जन्मतारीख बदलून ती १ सप्टेंबर १९९३ करण्यात आली. तसेच, जन्म म्हापसा येथे झाला असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली. हे प्रतिज्ञापत्र म्हापसा पालिकेच्या जन्ममृत्यू नोंदणी अधिकार्‍याने आणि बार्देश तालुक्याचे कार्यकारी न्यादंडाधिकार्‍याने ग्राह्य धरून त्यांना जन्मदाखल बदलून दिला. हा जन्मदाखला त्यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यालयात सादर केल्याचे तक्रारीत पुढे म्हटले आहे.
प्राथमिक चौकशीत यात तथ्य आढळून आल्याने म्हापसा पोलिसांनी तक्रारीत नमूद केलेल्या सर्व संशयितावर गुन्हा नोंदवला आहे. संशयितांची चौकशी केली केली जाणार असल्याचे म्हापसा पोलिसांनी सांगितले. याविषयीचा अधिक तपास म्हापसा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेश कुमार करीत आहेत.

ए. राजांची आठ तास झाडाझडती

ही तर जनतेच्या डोळ्यात धूळङ्गेक
भाजपाध्यक्ष नितीन गडकरींचा आरोप
‘बड्या धेंड्यांनाही पकडा’
वृत्त पान १० वर


नवी दिल्ली, दि. २४
सध्या संपूर्ण देशभर गाजत असलेल्या २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा तपास करत असलेल्या सीबीआयने आज याप्रकरणी माजी केंद्रीय दळणवळणमंत्री ए. राजा यांची तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ झाडाझडती घेतली.
स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने सीपीसीच्या कलम १६० अंतर्गत नोटीस बजावल्यानंतर ए. राजा आज सकाळी १०.३० वाजता चौकशीसाठी सीबीआय मुख्यालयात दाखल झाले. एकीकृत सेवा परवाने वाटपासंबंधी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीविषयी ए. राजा यांची आज चौकशी करण्यात आली आणि ही प्रक्रिया यापुढेही सुरूच राहील, असे सीबीआयच्या डीआयजी आणि प्रवक्त्या बिनीता ठाकूर यांनी याबाबत पत्रकारांना माहिती देताना सांगितलेे. कार्पोरेट लॉबिस्ट नीरा राडिया यांच्याशी झालेल्या संभाषणाविषयीदेखील राजांची आज चौकशी करण्यात आली. दूरसंचार क्षेत्रातील काही खास कंपन्यांचा ङ्गायदा करून देण्यासंबंधीचे हे संभाषण आहे, अशी माहिती सीबीआय सूत्रांनी दिली आहे.
२-जी स्पेक्ट्रमच्या परवाना वाटपात झालेल्या प्रचंड घोटाळ्यामुळे सरकारचा सुमारे १.७६ लाख कोटींचा महसूल बुडाला असल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवल्यानंतर १४ नोव्हेंबरला ए. राजा यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. स्पेक्ट्रम वाटपासाठी निर्धारित तारीख पुढे ढकलण्याच्या मुद्यावरही ए. राजा यांची आज चौकशी करण्यात आली. २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासासंबंधीचा आपला सद्यस्थिती अहवाल येत्या १० ङ्गेब्रुवारीपर्यंत न्यायालयात सादर करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला दिले आहेत.

ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात कडेकोट सुरक्षाव्यवस्था

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
ख्रिसमस (नाताळ) आणि नववर्षाच्या तोंडावर मुंबईत ‘लष्कर ए तोयबा’चे चौघे दहशतवादी घुसल्याच्या वृत्तामुळे खबरदारी म्हणून गोव्यात सुरक्षेबरोबरच किनारी भागातही गस्त वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, नौदल आणि तटरक्षक दलाला अत्यंत दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांनी दिली.
नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात विविध ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम आणि मेजवान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी निमलष्करी दलाच्या चार कंपन्या तैनात केल्या जाणार आहेत. ही माहिती पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली. दहशतवादी हल्ल्याचा धोका नसला तरी सुरक्षेत वाढ करण्याची सूचना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याचे श्री. देशपांडे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवप्रसंगी सुरक्षेसाठी गोव्यात आलेले केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या गोव्यात असून त्या नववर्षाच्या आगमनापर्यंत गोव्यात असणार आहेत. आजपासूनच त्यांना विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच, किनारी भागातही शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले आहेत.
ख्रिसमस सणावेळी घातपात घडवून आणण्यासाठी चौघे दहशतवादी मुंबईत दाखल झाल्याची माहिती तेथील पोलिसांनी जाहीर केली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यातही मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. किनारी भागात पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी सावधगिरी बाळगली जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
बानी बसू यांना अकादमी पुरस्कार
नवी दिल्ली, दि.२४
प्रसिद्ध लेखिका, कवयित्री आणि समीक्षक बानी बसू यांना त्यांच्या ‘ खानामीहीरेरे धीपी ’ या कादंबरीसाठी यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मातृप्रधान संस्कृती ते पितृप्रधान समाज, हा प्रवास उलगडून दाखवणा-या या कादंबरीनं समीक्षकांचं आणि साहित्यप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं होतं.
विनायक सेन यांना जन्मठेप
रायपूर, दि. २४
देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, प्रक्षोभक वक्तव्यं करणे तसंच प्रतिबंधित माओवादी संघटनेला मदत केल्याप्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते डॉ. विनायक सेन यांना रायपूर कोर्टाने दोषी ठरवले असून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यांच्यासह नक्षलवादी विचारांचे प्रचारक नारायण संन्याल आणि कोलकात्याचे उद्योगपती पियुष गुहा यांनाही याच गुन्ह्यांखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
डॉ. चित्रा नाईक यांचे देहावसान
पुणे, दि.२४
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. चित्रा नाईक (वय ९२) यांचे आज वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले.
श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वंचितांचा विकास हे ध्येय ठेवून डॉ. नाईक कार्यरत होत्या. तसेच, शिक्षण आणि विकास हा त्यांचा चिंतनाचा विषय होता.

Friday, 24 December 2010

भाजपतर्फे आज कांदाविक्री फक्त ३० रु. किलो दराने

पणजी, शिरोड्यासह
फातोर्ड्यात कांदाविक्री
पणजी ः दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत भाजप कार्यालय, नावेलकर आर्केड, डॉ. आत्माराम बोरकर रोड.
शिरोडा ः दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत शिरोडा बाजार.
फातोर्डा ः दुपारी ४ ते संध्याकाळी ६ या वेळेत अमूल आईस्क्रीम पार्लर, मल्टिपर्पज हायस्कूल, बोर्डा.

पणजी, दि. २३
गोव्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारला उघडे पाडण्यासाठी आणि प्रामुख्याने सामान्य जनतेला दिलासा मिळावा याकरता भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने केवळ तीस रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. त्यानुसार उद्या २४ डिसेंबर रोजी पणजी, शिरोडा व फातोर्डा मतदारसंघांत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर कांदा विकण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ पणजी, शिरोडा व फातोर्डा मतदारसंघातील सर्व जनतेने उठवावा, असे आवाहन भाजपच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष सौ. कुंदा चोडणकर यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेचे हाल होऊ लागले आहेत. कांद्यासारखी वस्तू दुर्मीळ झाल्यामुळे खायचे काय, असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. मात्र गोव्यातील विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने फलोत्पादन खात्याअंतर्गत रास्त दरात कांदे उपलब्ध करण्याची फक्त घोषणाबाजीच चालवली आहे. प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झालेली नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अशीच प्रचंड भाववाढ झाली होती. ती शंभर दिवसांत कमी करण्याचे आश्‍वासन कॉंग्रेसने दिले होते. मात्र, दिवसेंदिवस महागाईच्या झळा वाढतच चालल्या आहेत. भाजपने त्याविरोधात देशव्यापी आंदोलन केले होते. एवढेच नव्हे तर भाजपने गोमंतकीयांना नारळ आणि पामतेल या वस्तू स्वस्त दरात विकल्या होत्या. त्यानंतर कोठे सरकारला जाग आली व आम आदमीस या वस्तू रास्त दरात विकणे भाग पडले होते. आतादेखील केंद्र व राज्यातील सरकार दलालांची भर करण्यातच धन्यता मानत असल्याचे संतापजनक चित्र दिसून येते. त्यामुळेच ठोस कृती करून भाजपने या सरकारला धडा शिकवण्याचा चंग बांधला आहे.

कामत सरकारला दीर्घ रजेवर पाठवणेच योग्य

भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.पार्सेकर यांचा टोला

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)
मुक्तिदिन सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करताना राज्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असायला हवी होती, पण आघाडी सरकारातीलच एक घटक आपल्याच सरकारला धमकी देत सुटला आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत एकतर दिल्लीवारी किंवा मंदिरवारीत व्यस्त आहेत. या सरकारला सामान्य जनता विटली आहे व त्यामुळे या सरकारला दीर्घ रजेवर पाठवणेच योग्य ठरेल, असा सणसणीत टोला भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आज येथे पत्रपरिषदेत लगावला. प्रा. पार्सेकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून कॉंग्रेस आघाडी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. भाजप प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर हेही यावेळी हजर होते.
प्रा. पार्सेकर म्हणाले, आघाडी सरकारचा घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांना वगळून मिकी पाशेको यांची वर्णी लावण्यावरून जे तांडव सुरू आहे ते पाहता या सरकारने सुवर्णमहोत्सवी वर्षारंभीच राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे. राजकीय अस्थिरता, ठप्प प्रशासन, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ आदींमुळे त्रस्त बनलेल्या सामान्य लोकांबद्दल या सरकारला ना खंत ना खेद. एकीकडे कॉंग्रेसचा दहा नेत्यांचा गट सरकार पाडण्याची धमकी देतो तर दुसरीकडे मुख्यमंत्री मुरली वाजवण्यात गर्क आहेत, हे चित्रच जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणारे ठरले आहे.
मिकी यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच हे राजकीय नाट्य घडवून आणले असल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यातून मुख्यमंत्र्यांचा ढोंगीपणा उघड झाल्याचा गंभीर आरोप प्रा.पार्सेकर यांनी केला. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश करावा अथवा करू नये याचा पूर्णाधिकार मुख्यमंत्र्यांना असतो.अशावेळी श्रेष्ठींकडे बोट दाखवून मुख्यमंत्री वेळ मारून नेत आहेत. गोमंतकीय जनतेने हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना दिला आहे; पण ते या जनाधाराचा अनादर करीत असल्याचा ठपकाही प्रा. पार्सेकर यांनी ठेवला.
सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे दोनशे कोटी रुपये मागितले होते व ते मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले होते. हे पैसे कुठे गेले याचा कोणताही हिशेब सरकारकडे नाही. हे सरकार वाहतूकदारांच्या परवाना शुल्कांत भरमसाट वाढ करून त्यांच्या पोटावर का लाथ मारत आहे,असा खडा सवालही प्रा.पार्सेकर यांनी केला. मुख्यमंत्री मंदिरवार्‍या करतात खरे; पण मंदिरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे याकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. खुद्द मडगाव परिसरातील मंदिरांत बहुतांश चोर्‍या झाल्या आहेत, हेही प्रा.पार्सेकर यांनी पत्रकारांच्या निदर्शनाला आणून दिले.
जुझे व नीळकंठ यांना वगळून मिकींना मंत्रिमंडळात घेण्याचा विषय हा राष्ट्रवादीचा अंतर्गत मामला आहे व त्यात भाजपला काडीचाही रस नाही, असे प्रा.पार्सेकर म्हणाले.

राजकीय नाट्याचा फैसला आता नाताळनंतरच होणार

राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर कॉंग्रेस श्रेष्ठींची दिरंगाई

पणजी, दि.२३(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचे नेते मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशास विरोध दर्शवण्यासाठी काल संध्याकाळी कॉंग्रेस नेत्यांनी सरकार पाडण्याची धमकी दिल्यानंतर आज सकाळपासूनच राजकीय घडामोडी तीव्र बनल्या. मुख्यमंत्री दिगंबर कामत व सरकारातील नाराज गटाचे नेतृत्व करणारे चर्चिल आलेमाव यांनी राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची स्वतंत्र भेट घेतली. उभयतांनी राज्यपालांना राजकीय परिस्थितीची जाणीव करून दिल्याची खबर आहे. याप्रकरणी पक्षाचे प्रभारी तथा राष्ट्रीय सरचिटणीस बी. के. हरिप्रसाद यांनाही या घडामोडींची कल्पना दिली असता आधी नाताळ साजरा करा, मगच काय ते पाहू, असा सल्ला देत त्यांनीही राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर वेळकाढू धोरण अवलंबल्याने हा गुंता तात्काळ सुटण्याची शक्यता मावळली आहे.
मिकी पाशेको यांना विरोध दर्शवण्यासाठी कॉंग्रेसचा गट सक्रिय बनल्यानंतर आज सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सकाळी ११ वाजता राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्यांनी याविषयावर चर्चा केल्याची खबर आहे. राजभवनातून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांना मात्र डावलले.
नंतर सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आपण राज्यपालांना नाताळाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो, असे सांगून त्यांनीही मुख्य विषयाला बगल दिली. कॉंग्रेसमधील मिकी विरोधी गटाने आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या निवासस्थानावर भेट घेतली व त्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. या गटाने व्यक्त केलेली भावना आपण श्रेष्ठींपर्यंत पोहचवणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणाची संपूर्ण माहिती हरिप्रसाद यांच्यापर्यंत पोहचवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. काही पत्रकारांनी हरिप्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता नाताळ साजरा केल्यानंतरच आपण गोव्यात येऊ व मगच याविषयी तोडगा काढू, अशी भूमिका त्यांनी घेतली. मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशावरून कॉंग्रेस श्रेष्ठींनीही सावध भूमिका घेतली आहे. याप्रकरणी वेळकाढू धोरण अवलंबून राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुढील व्यूहरचना काय असेल याकडे कॉंग्रेसचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादीच्या आदेशाचे पालन व्हावे
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रेष्ठींकडून जो आदेश मिळाला आहे त्याचे तात्काळ पालन व्हावे, अशी इच्छा प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी व्यक्त केली. याप्रकरणी तोडगा निघेल असा आशावाद व्यक्त करून कॉंग्रेसमध्ये निर्माण झालेली बंडखोरी हा त्यांचा अंतर्गत मामला आहे व त्यात राष्ट्रवादीला अजिबात रस नाही, असा टोलाही त्यांनी हाणला. शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या आदेशाची कल्पना मुख्यमंत्री कामत यांनी बी.के.हरिप्रसाद यांना दिली आहे व त्यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींशी विचारविनिमय करून पुढील निर्णय कळवण्याचा संदेश त्यांना दिल्याचेही प्रा.सिरसाट म्हणाले. राष्ट्रवादी श्रेष्ठींच्या आदेशांचे पालन होत नसेल तर या पक्षापुढे अन्य पर्याय खुले आहेत व त्याबाबत श्रेष्ठी काय तो निर्णय घेतील,असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात आणखी एका घोटाळ्यात नारायण राणे?

पुणे, दि. २३
महाराष्ट्रात आता आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. यात राज्याचे महसूल मंत्री नारायण राणे यांचे नाव पुढे आले असून, त्यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन कोट्यवधीची जमीन बिल्डरांच्या घशात ओतल्याचे चौकशीत उघड झाले आहे. पुण्यातील तब्बल एक हजार कोटींची जमीन केवळ दोन कोटींमध्ये बिल्डरला दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ही जमीन वनजमीन असून, पर्यावरण मंत्रालयाला अंधारात ठेऊन हा व्यवहार करण्यात आला आहे. तब्बल ३० एकरांची ही जमीन केवळ दोन कोटींमध्ये विकण्यात आली आहे. राणे यांनी मात्र ही जमीन संबंधित शेतकर्‍याला दिली होती, त्याच्या विक्रीशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
. २००७ मध्ये नागरिक चेतना मंच या बिगरसरकारी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात यासंबंधात याचिका सादर केली होती. सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय उच्चस्तरीय समितीतर्ङ्गीिींेींर्शे केलेल्या चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, १९९८ मध्ये जिल्हाधिकार्‍यांनी पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जागेपैकी ३ एकर जागा जिल्हाधिकार्‍यांनी पुनर्वसनासाठी चव्हाण या शेतकरी कुटुंबाला दिली. १९९४ साली आश्‍चर्यकारकरित्या याच कुटुंबाला आणखी ३० एकर जमीन शेतीसाठी देण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्तांनी दिला. ही सारी जागा चव्हाण कुटुंबीयांनी रिची रिच को ऑपरेटीव्ह सोसायटीला २ कोटी रुपयांना विकली. हा व्यवहार सरकारी संमतीशिवाय पूर्ण करणे अशक्य असल्याचे मत चौकशी समितीने व्यक्त केले आहे. केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय हा व्यवहार तत्कालिन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाल्याचे उघड झाले आहे.

सनबर्न पार्टीबाबत पोलिसांचे ‘मौन’

पणजी, दि. २३ (प्रतिनिधी)
‘बहुचर्चित’ सनबर्न पार्टीच्या आयोजनाबाबत आज (गुरुवारी) पोलिस खात्याने आपली बाजू गृह खात्याकडे स्पष्ट केली आहे. त्यामुळे रात्री उशिरा सनबर्न पार्टीला परवानगी मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु, कोणीही या माहितीला दुजोरा दिला नाही. त्याचप्रमाणे, पोलिसांनी आपल्या निवेदनात नेमके काय म्हटले आहे, हे सांगण्यास उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी नकार दिला. काय स्थिती आहे, हे आम्ही सदर निवेदनात स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री रवी नाईक यांनी या पार्टीला परवानगी दिली नसल्याचे काल स्पष्ट केले होते. तर, आयोजकांनी पार्टीला परवानगी मिळाल्याला दावा केला आहे. त्यामुळे गृहखाते आणि पार्टीचे आयोजकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. येत्या २७ ते २९ डिसेंबर या दरम्यान ही पार्टी कांदोळी येथे समुद्र किनार्‍यावर होणार आहे. कांदोळीवासीयांनी मात्र या पार्टीला कडाडून विरोध दर्शवला आहे.
के. करुणाकरन यांचे निधन
थिरुवअनंतपुरम, दि. २३
केरळचे मुख्यमंत्रिपद चारवेळा भूषविणारे कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के. करुणाकरन यांचे आज सायंकाळी ५.३० वाजता येथील एका खाजगी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ९३ वर्षांचे होते.
एन. डी. तिवारींची
पैतृत्व चाचणी करा!
दिल्ली हायकोर्टाचे आदेश
नवी दिल्ली, दि. २३
कॉंगे्रसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी हेच आपले वडील आहेत, असा दावा करणार्‍या एका तरुणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तिवारी यांची पैतृत्व चाचणी करण्यात यावी, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आज दिला. आपली पैतृत्व चाचणी करण्यात येऊ नये, ही तिवारी यांची विनंती न्यायालयाने यावेळी ङ्गेटाळून लावली.
‘पैतृत्व चाचणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तिवारी यांनी आपल्या रक्ताचे नमुने द्यायलाच हवे,’ असे न्यायमूर्ती एस. रवींद्रन भट्ट यांच्या एकलपीठाने स्पष्ट केले आहे.
‘आपल्यावर पैतृत्व चाचणीसाठी कुणीही दबाव आणू शकत नाही,’ हा तिवारी यांचा युक्तिवाद न्यायालयाने ङ्गेटाळून लावला. ‘आपले वडील कोण?’ हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक मुलाला किंवा मुलीला आहे, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
हे योग्य नव्हे!
‘‘समाजाने एखाद्या मुलाला ‘बास्टर्ड’ म्हणणे हे योग्य नाही आणि ही बाब त्या मुलाच्याही हितात नाही,’’ असे दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

कांद्यापाठोपाठ आता टोमॅटो रडवू लागला!

‘संपुआ’ सरकारविरोधात संतापाची तीव्र लाट
मुंबई, दि. २३
कांद्याने रडवल्यानंतर आता त्याची जागा टोमॅटोने घेतली आहे.
कारण, आजच्या घटकेला या लालबुंद भाजीसाठी किलोमागे येथील बाजारात किमान साठ रुपये मोजावे लागत आहेत आणि हे भाव लगेच कमी होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या नेतृतवाखालील केंद्रातील ‘संपुआ’ सरकारविरोधात जनतेत संतापाची तीव्र लाट उसळली आहे.
गेल्या आठवड्यात कांद्याने सगळ्यांचाच वांदा केला. भाकरीसोबत कांदा खाणार्‍या गरिबांपासून ते पावभाजी, वडा-पावसोबत तोंडी लावायला कांदा घेणार्‍या मध्यमवर्गीयांपर्यंत सगळ्यांनाच कांद्याचे भाव पाहून ङ्गिट् आली. या भाववाढीवरून प्रचंड गदारोळ झाल्यावर आता टोमॅटो मध्यमवर्गीयांवर रुसला आहे.
टोमॅटोचे नवीन पीक बाजारात येण्यास काही आठवडे तरी लागतील. पावसामुळे आधीचे पीक ङ्गुकट गेले आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत जाण्याची चिन्हं आहेत, असं व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. टोमॅटोचे पीक ङ्गक्त महाराष्ट्रातच होत नाही. शेजारील कर्नाटक, गुजरात, पंजाब या राज्यांत यंदा टोमॅटोचं समाधानकारक पीक आल्याचे शेतकरी सांगतात.
शेतकरी हेही सांगतात की, जेव्हा ग्राहकएका किलोमागे साठ रुपये मोजत असतो तेव्हा दलाल मात्र शेतकर्‍याला किलोमागे अवघे पाच ते सात रूपये देत असतो. अर्थात कांदा उत्पादक शेतकरीही हीच व्यथा मांडतात. आमच्या हातावर किलोमागे जेमतेम तीन ते सात रुपये टेकवतात आणि बाजारात हा कांदा अव्वाच्या सव्वा भावाने विकतात.
जेव्हा कांदा उत्पादन भरपूर असते तेव्हा दलाल भाव पाडून आमच्याकडून माल घेतात आणि जेव्हा उत्पादन कमी होते, तेव्हाही दलाल सांगतील तोच भाव आम्ही स्वीकारतो. कारण कांदा नाशवंत असल्यामुळे आणि आमच्याकडे त्याचा साठा करण्याची सोय नसल्यामुळे आम्ही नेहमीच घाट्यात असतो असे शेतकरी सांगतो.
यंदा अवकाळी पावसामुळे भाज्या खराब झाल्या आहेत, असे सांगून दलाल भरमसाठ भावाने या भाज्या विकत आहेत. प्रत्यक्षात कांद्यासारखे पदार्थ दलाल आणि व्यापारी साठवून ठेवून कृत्रिम टंचाई निर्माण करत आहेत, असा बळिराजाचा आरोप आहे.

ज्ञानेश्‍वर नाडकर्णी यांचे पुण्यात निधन

पुणे, दि. २३
प्रसिद्ध समीक्षक, नाट्य अभ्यासक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे गुरुवारी दुपारी पुण्यात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. इंग्रजी तसेच मराठी नाटके, समीक्षा असा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्यामागे पत्नी शालिनी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने साहित्यिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.

Thursday, 23 December 2010

दिवसभरात काय घडले..

- शरद पवारांनी, मिकींनी मंत्रिपद देण्याचा
आदेश मुख्यमंत्री कामत यांना दिले.
- मुख्यमंत्र्यांनी दिल्लीहून आल्यावर
लगेच याविषयी माहिती दिली.
- त्यानंतर चर्चिल आलेमाव यांनी दिला
सरकार खाली खेचण्याचा इशारा
- सरकारविरोधात दहा आमदार
एकवटल्याने मुख्यमंत्री पेचात.


मिकींना मंत्री कराल तर सरकार खाली खेचणार

चर्चिलसह दहा आमदारांच्या गटाची धमकी


पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा व पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना मंत्रिपदावरून हटवून मिकी पाशेको यांची वर्णी मंत्रिमंडळात लावण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारातून बाहेर पडू, अशी थेट धमकीच सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस मंत्री व आमदारांच्या एका गटाने दिली. त्यामुळे गोव्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष आणखी टोकदार बनला आहे.
आजच दिल्लीहून गोव्यात परतलेले मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनी मिकी पाशेको यांची वर्णी मंत्रिमंडळात लावण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर लगेच या गटाने बैठक घेऊन पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. कॉंग्रेस गटाचा हा इशारा म्हणजे अप्रत्यक्ष राष्ट्रवादीचे श्रेष्ठी शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांनाच आव्हान देण्याचा प्रकार ठरला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मंत्रिपद फेरफार प्रकरणी चर्चेसाठी दिल्लीत गेलेले मुख्यमंत्री दिगंबर कामत आज दुपारी गोव्यात परतले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी आपल्याशी संपर्क साधून मिकी पाशेको यांची वर्णी लावण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. या विषयी कॉंग्रेस श्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेणार, असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. दिगंबर कामत यांची कॉंग्रेस श्रेष्ठींशी दिल्लीत भेट झाली नसल्याचेच यावरून स्पष्ट झाले. कॉंग्रेसचे सरचिटणीस तथा गोवा प्रभारी बी. के. हरिप्रसाद यांनीही या प्रकरणात विशेष रस न घेण्याचे तंत्र अवलंबिल्याने मुख्यमंत्री एकाकी पडले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री कामत हेच स्वतः मिकींच्या समावेशाला राजी नसल्याचीही खबर आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी केलेल्या या सूचनेची माहिती मिळताच मंत्री चर्चिल आलेमाव यांनी कॉंग्रेसचे मंत्री व आमदारांची बैठक पणजीतील एका तारांकित हॉटेलात बोलवली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या गटाची भूमिका मांडली. याप्रसंगी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, पंचायतमंत्री बाबू आजगावकर, जलस्त्रोत्रमंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस, आमदार आग्नेल फर्नांडिस, पांडुरंग मडकईकर, बाबू कवळेकर, फ्रान्सिस सिल्वेरा, रेजिनाल्ड लॉरेन्स हजर होते. आमदार प्रताप गावस यांचाही या गटाला पाठिंबा असल्याचा दावा चर्चिल यांनी केला. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या भूमिकेबाबत मात्र कुणीही दावा केला नाही.
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. आता अनेक गुन्हेगारी प्रकरणांत पोलिस तथा ‘सीबीआय’ चौकशी सुरू असलेले मिकी पाशेको कसे काय चालतात, असा सवाल चर्चिल यांनी आपल्याच श्रेष्ठींना केला आहे. गोव्याचे प्रभारी बी.के.हरिप्रसाद यांनी तात्काळ गोव्यात येऊन याविषयी तोडगा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांच्यावर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. आता मिकी पाशेको यांची चौकशी सुरू असताना त्यांना मंत्रिपदावर बसवणे कितपत योग्य ठरेल, असे बाबू आजगांवकर म्हणाले. यापुढे निवडणुकीसाठी जनतेसमोर जावे लागणार असून जनतेला कोणत्या तोंडाने सामोरे जाणार, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भ्रष्टाचारी व गुन्हेगारांना मंत्रिपदे नको, हे कॉंग्रेसचे धोरण आहे व त्या धोरणानुसारच मिकी पाशेको मंत्रिमंडळात नको, असे चर्चिल म्हणाले.
दरम्यान, बाबूश मोन्सेरात यांची पोलिस चौकशी, एका घरात एकापेक्षा अधिक मंत्रिपदे, अनुसूचित जमातीच्या एकमेव आमदार पांडुरंग मडकईकर यांच्यावरील अन्याय आदी प्रकार कॉंग्रेसच्या धोरणात बसतात काय, असा सवाल पत्रकारांनी करताच मात्र चर्चिल यांची बोलतीच बंद पडली. त्यांनी मग केवळ मिकी पाशेको प्रकरणीच बोलण्याचाच हट्ट धरला. ‘जी-७’ गटात मिकींबरोबर असलेले बाबूश मोन्सेरात अचानक त्यांच्यावर कसे काय फिरले, असे पत्रकारांनी विचारताच आता आपण कॉंग्रेसच्या भूमिकेशी बांधील असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस नेत्यांच्या भावना दिल्लीत पोहोचवणार
मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्यावरून कॉंग्रेसचे मंत्री व आमदारांनी व्यक्त केलेली भावना दिल्लीत कॉंग्रेस श्रेष्ठींपर्यंत पोहचवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी या घटनाक्रमामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा केला आहे. हा विषय सामंजस्याने सोडवला जाईल,असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
नाट्याचे दिग्दर्शक मुख्यमंत्रीच!
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार तथा वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळात वर्णी लावा,असे स्पष्ट आदेश दिले असताना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आढेवेढे घेण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. ते स्वतः मिकींच्या समावेशास राजी नाहीत व त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरूनच कॉंग्रेस गटाने ही धमकी दिल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सूत्रांनी केला.राष्ट्रवादीतर्फे मंत्रिमंडळात कुणाचा समावेश करावा अथवा करू नये हा या पक्षाचा सर्वाधिकार आहे. त्यामुळे त्यात कॉंग्रेसला हस्तक्षेप करण्याची गरजच नाही. मिकी पाशेको यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचे पालुपद लावून आपण धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ असल्याचा आव आणणारे कॉंग्रेस नेते भ्रष्टाचारात कसे बुडाले आहेत, हे समस्त गोमंतकीयांना ठाऊक आहे, अशी मल्लिनाथी एका पदाधिकार्‍याने केली. दक्षिणेतील एका कॉंग्रेस नेत्याने तर ‘गोलमाला’तून मिळणारा पैसे मोजण्यासाठी ‘मशीन’ खरेदी केल्याचा जबरदस्त ठोसा राष्ट्रवादीच्या या पदाधिकार्‍याने लगावला.

हॉटेल नीलम द ग्रेडची आज सुनावणी

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावलेल्या कळंगुट येथील हॉटेल ‘नीलम दे ग्रेंड’ ची सुनावणी उद्या २३ रोजी सकाळी ११ वाजता मंडळाच्या कार्यालयात होणार आहे. या सुनावणीनंतरच या हॉटेलचा व्यवहार पुढे चालू राहणार की स्थगित ठेवला जाणार हे स्पष्ट होईल. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या मालकीचे हे हॉटेल असल्याने या नोटिशीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार नाईकवाडा कळंगुट येथील नेजिना नॉर्टन यांनी केलेल्या तक्रारीवरून प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणी केली असता या हॉटेलकडून जलप्रदूषण व नियंत्रण कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे पाहणीत आढळले. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसून ते उघड्यावर सोडले जात असल्याचा प्रकारही या निमित्ताने उघड झाले आहे. या प्रकारामुळे जलप्रदूषण होत असून ते कायद्याचे उल्लंघन ठरत असल्याचा ठपकाही मंडळाने ठेवला आहे.
या प्रकरणामुळे या हॉटेलचे भवितव्य उद्याच्या सुनावणीनंतर स्पष्ट होईल.

माहिती आयोगाकडून राज्यपालांनाच नोटीस

प्रत्यक्ष हजर राहण्याची सूचना!

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी)
माहिती हक्क कायद्यातील तरतुदीनुसार माहितीलानकार देणारे गोव्याचे राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांना माहिती आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली असून येत्या ४ जानेवारी रोजी आयोगाच्या कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहण्याची सूचनाही त्यांना करण्यात आली आहे.
सदर नोटिशीकडे दुर्लक्ष करून गैरहजर राहिल्यास त्यांच्या अनुपस्थितीत या याचिकेवर सुनावणी घेतली जाणार असल्याचे माहिती आयोगाच्या अवर सचिव तथा निबंधक मीना एच. नाईक यांनी या नोटिशीत नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. ४ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता होणार्‍या या सुनावणीवेळी राज्यपालांचे विशेष सचिव डॉ. एन. राधाकृष्णन यांनाही हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
आपण जनतेचे अधिकारक्षेत्र नसल्याचे नमूद करीत आपले कार्यालय माहिती हक्क कायद्याच्या अखत्यारीत येत नसल्याचा दावा केल्यामुळे राज्यपाल डॉ. सिद्धू यांना ऍड. आयरिश रॉड्रिगीस यांनी गेल्या आठवड्यात कायदेशीर नोटीस बजावली होती. त्याचप्रमाणे, माहिती आयोगाकडे याचिका सादर केली होती.
कायद्याच्या कलम २ (एच)(ए) नुसार राज्यपालांचे कार्यालय हे सनदशीर पद असून जनतेचे अधिकारक्षेत्र या व्याख्येखाली येत असल्याचा दावा ऍड. आयरिश यांनी राज्य माहिती आयोगासमोर केलेल्या याचिकेत केला आहे. तसेच, राज्यपालांनी माहिती नाकारण्यामागे कोणतेही ठोस कारण नसून त्यामागे अप्रामाणिक हेतू असल्याचाही दावा ऍड. आयरिश यांनी केला आहे.
गेल्या महिन्यात २९ नोव्हेंबर रोजी ऍड. आयरिश यांनी आपण गोव्याचे ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांच्या विरोधात सादर केलेल्या तक्रारीवर राजभवनाकडून कोणती कारवाई केली गेली, याची तपशीलवार माहिती राज्यपालांकडे माहिती हक्क कायद्याखाली मागितली होती. ती माहिती देण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने सध्या ते कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

२० जाने.पर्यंत ‘सेझ’ रद्द करा

सेझविरोधी मंचचा अंतिम इशारा

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बेकायदाठरवलेले ‘सेझ’ येत्या २० जानेवारी २०११ पर्यंत रद्द करण्याचा अंतिम आणि निर्वाणीचा इशारा आज सेझविरोधी मंचाने केंद्र सरकारला दिला. त्याचप्रमाणे, या सेझ कंपन्यांना बेकायदा भूखंड उपलब्ध करून देणार्‍या राजकीय नेत्यांची आणि अधिकार्‍यांची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी मंचचे निमंत्रक तथा माजी पर्यटनमंत्री माथानी साल्ढाना यांनी केली आहे. ते आज पणजीत घेतलेल्या पत्रपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांच्याबरोबर व्ही. ए. कामत व डॉ. धुमे उपस्थित होते.
येत्या २० जानेवारीपर्यंत तीनही ‘सेझ’ रद्द न केल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला केंद्र सरकाराला भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा श्री. साल्ढाना यांनी दिला. राज्य सरकारने ज्या सेझ कंपन्यांना हे भूखंड दिले होते त्यासर्व कंपन्यांना सरकारने काळ्या यादीत टाकावे. त्यांना गोव्यात कोणत्याही व्यवसायाची परवानगी सरकारने देऊ नये. कारण, या कंपन्यांनी सर्व कायदे धाब्यावर बसवून ‘सेझ’ भूखंड बळकावल्याचे सिद्ध झाले आहेत, असा दावा माथानी यांनी केला.
‘सेझ’ प्रकल्प बेकायदा ठरवतानाच या कंपन्यांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे दुसर्‍या नावाने या कंपन्या पुन्हा गोव्यात आपला व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी राज्य सरकारही त्यांना पुन्हा मदत करणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हे भूखंड त्वरित पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी माथानी यांनी केली.
लोकांना नको असलेली कोणतीही गोष्ट त्या राज्यातील लोकांवर लादू शकत असे सांगणार्‍या केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी तीनही सेझ प्रकल्प रद्द करावे. सरकार सध्या या प्रकरणी मूग गिळून गप्प बसले आहे. लोक शांत झाल्यावर पुन्हा मागील दाराने या सेझ कंपन्यांना परवानग्या दिल्या जातील. गेल्या काही प्रकरणांत राज्य सरकारने अशीच पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारे या सहा सेझ कंपन्यांना सरकारने पुन्हा मागील दाराने प्रवेश करू दिल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असे माथानी म्हणाले.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची अशीही अक्षम्य परवड

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी)
ख्रिसमस आणि नववर्ष याच महिन्यात येत असल्याने सरकारी कर्मचार्‍याबरोबर निवृत्त कर्मचार्‍यांनाही आज वेतन देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार सेवत असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांना आज वेतन मिळाले. मात्र, निवृत्त झालेले कर्मचार्‍यांना पणजीत येऊन रिकाम्या हाताने परत जावे लागले. यावेळी त्यांच्या तोंडावर केवळ या कॉंग्रेस सरकारच्या विरोधातील संताप आणि पणजीत येण्यासाठी लागलेल्या त्रासाच्या छटा दिसत होत्या.
सरकारला दिलेली शब्द पाळत येत नाही तर, त्यांनी गप्पच राहावे. खोटी घोषणाबाजी करून लोकांना निदान त्रास तरी करू नये, अशा शब्दांत आपला राग निवृत्त कर्मचारी व सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी खजिनदार एल एल. वाडगी यांनी व्यक्त केला. सरकारने जाहीर पत्रक काढून या कर्मचार्‍यांना आज वेतन दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे काही निवृत्त कर्मचारी तर आपल्या थकलेल्या पत्नीचा आधार घेत पणजीला आले होते. यावेळी वेतन घेण्यासाठी बँकेत शिरले असता त्यांना त्यांचे वेतन आज झालेच नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना वेतन न घेता माघारी फिरावे लागले.

बॉलेरोच्या धडकेने महिला जागीच ठार

दहा वर्षीय चिमुरडा आता कोणाला आई म्हणणार?

वास्को, दि. २२ (प्रतिनिधी)
आपल्या दहा वर्षाच्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून कामावर निघाली असताना दाबोळी जंक्शनसमोर ‘बॉलेरो’ जीपनेे मागून धडक दिल्यामुळे रजनी राज ग्रोवर (वय ४५ रा. कुठ्ठाळी) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात घडला.
अपघात घडल्याचे चालकाला समजताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या गाडीसोबत अपघातात सापडलेली दुचाकी अडकून राहिल्याने सुमारे एक किलोमीटरवर पाहोेचल्यानंतर चालकाने गाडी तेथेच सोडली आणि पोबारा केला. सदर महिलेने आपल्या दहा वर्षाच्या मुलाला ‘महिंद्र रॉडियो’ दुचाकीवरून (क्रः जीए ०८ एल ७७०५) ‘नेव्हल चिल्ड्रन्स स्कूल’ (दाबोळी विमानतळासमोर) मध्ये पोहोचविल्यानंतर ती कामावर जाण्यासाठी येथून निघाली. रजनी जेव्हा दाबोळी जंक्शनसमोर पोहोेचली तेव्हा मागून तिला ‘बॉलेरो’
(क्रः जीए ०६ टी १०५०) जीपने जबर धडक दिली. त्यामुळे ती रस्त्यावर फेकली गेली आणि तेथेच ती मरण पावली.
अपघात घडल्याचे बॉलेरो चालकाला समजताच त्याने गाडीसह तेथून पलायनाचा प्रयत्न केला. मात्र सदर दुचाकी त्याच्या जीपमध्ये अडकून पडली. अखेर नेव्हल स्टोअर डेपोसमोर पोचल्यानंतर जीप बंद पडली. त्यामुळे चालकाने सदर गाडी तेथेच उभी करून पळ काढल्याची माहिती वास्को पोलीसांनी दिली.
गंभीर जखमी झालेल्या महिलेबाबत १०८ रुग्णवाहिकेला माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन तिची तपासणी केली असता ती मरण पावल्याचे घोषित केले. वास्को पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉ इस्पितळात पाठवण्यात आला.
अपघात करून ङ्गरारी झालेल्या चालकाबाबत अजून पोलिसांना माहिती मिळालेली नाही. मात्र जीपच्या मालकाबाबत माहिती मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
रजनी व तिच्या पतीचा वेर्णा येथे ‘ग्रुवमार्क एन्टरप्राईज’ नावाचा व्यवसाय असून आपल्या मुलाला शाळेत सोडल्यानंतर ती तेथे जात असल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत रजनीचा पती सध्या कामासाठी श्रीलंकेला गेल्याची माहिती उपनिरीक्षक जॉन ङ्गर्नांडिस यांनी दिली.
जीपचालकाविरुद्ध भा.द.स २७९ व ३०४ (अ) कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेली जीप भरधाव होती, अशी माहिती तेथील उपस्थितांनी दिली. याप्रकरणी लोकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जॉन ङ्गर्नांडिस तपास करीत आहेत.

‘जेपीसी’चा सामना करा किंवा राजीनामा द्या!

रालोआच्या रॅलीत पंतप्रधानांवर जोरदार हल्ला
२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची जबाबदारी झटकता येणार नाही
सोनिया गांधींवरही सडकून प्रहार


नवी दिल्ली, दि. २२
२-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्ङ्गतच(जेपीसी) चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आजच्या भ्रष्टाचारविरोधी रॅलीत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार प्रहार करण्यात आला. या घोटाळ्यातून पंतप्रधानांना स्वत:चा बचाव करता येणार नाही, असे स्पष्ट करताना जेपीसी चौकशीचा सामना करण्याचे धाडस पंतप्रधानांमध्ये नसेल तर त्यांनी राजीनामा यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राजधानी दिल्लीतील रामलिला मैदानात या रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला संबोधित करताना राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांनी स्पष्ट केले की, पंतप्रधानांनी २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती गठित करायलाच हवी. ही समिती गठित करण्याचे धाडस जर आपणात नसेल तर नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला हवा. भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही पंतप्रधानांना जेपीसीपुढे हजर होण्याचे आव्हान दिले.
या घोटाळ्याची लोकलेखा समितीमार्ङ्गत चौकशी करण्याची पंतप्रधानांची भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. २-जी स्पेक्ट्रम २००८ च्या बाजारभावापेक्षा कमी दरात का विकण्यात आले, या मागची सत्यता केवळ जेपीसी चौकशीतूनच बाहेर येऊ शकते, असेही जेटली यांनी सांगितले.
आपल्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही, लोकलेखा समितीपुढे हजर होण्याची आपली तयारी आहे, पण, जेपीसी गठित करणार नाही, या पंतप्रधानांच्या वक्तव्यातच घोटाळा किती मोठा आहे, याची जाणीव होते, असा आरोपही जेटली यांनी केला.
या रॅलीला संबोधित करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी पंतप्रधानांसोबतच कॉंगे्रस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरही सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, आतापर्यंत विविध घोटाळ्यांच्या चौकशीसाठी जेपीसी नियुक्त करण्यात आली आहे. यातील दोन घोटाळे कॉंगे्रसच्याच कारकीर्दीतील होते. मग, आता जेपीसीचा सामना करण्याचे धाडस पंतप्रधान का दाखवत नाहीत? नीरा राडिया यांच्या टेपमुळे सरकार, संसद, न्यायपालिका आणि मीडिया यांचा या घोटाळ्यातील सहभागाचा पर्दाङ्गाश केला आहे. आम्ही जो प्रश्‍न उपस्थित केलेला आहे त्याचे उत्तर ना पंतप्रधानांकडे आहे आणि ना सर्वोच्च न्यायालयाकडे! २-जी स्पेक्ट्रम वाटपात काहीच गैरप्रकार झाले नाही, असे जर सरकारचे म्हणणे आहे, तर मग सत्यता बाहेर आणण्यासाठी जेपीसी गठित का केली जात नाही? असा सवालही स्वराज यांनी केला.
या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी जेपीसी का नाही, असा सवाल मी पंतप्रधान आणि कॉंगे्रस अध्यक्षांना करू इच्छिते. त्यांनी या प्रश्‍नाचे सत्य उत्तर द्यावे, असेही स्वराज म्हणाल्या.
पंतप्रधानांवर हल्ला चढविताना अडवाणी म्हणाले की, जेपीसीपुढे हजर होण्याचे धाडस पंतप्रधानांनी दाखवायलाच हवे. या प्रकरणी शपथपत्र दाखल करा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने खुद्द पंतप्रधानांना केली आहे. देशाच्या इतिहासातील कदाचित अशा प्रकारची ही पहिलीच घटना असावी. त्यांना जे काही सांगायचे आहे ते त्यांनी केवळ जेपीसीपुढेच सांगावे.
यावेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा उपस्थित केला. या क्रीडा स्पर्धांसाठीचे अवाजवी बजेट तयार करण्यात आले असता त्याला अर्थमंत्री, मंत्रिगट आणि स्वत: पंतप्रधानांनी मंजुरी दिली होती. या भ्रष्टाचारात कॉंगे्रसचे बहुतेक सर्वच मंत्री सामील आहेत. या अनुषंगाने भ्रष्टाचाराविरोधात कडक कारवाई करण्याची भाषा करण्याचा नैतिक अधिकार कॉंगे्रस पक्षाला नाही, अशी परखड टीका गडकरी यांनी केली.
‘पृथ्वी-२’ ची चाचणी यशस्वी
बालासोर, दि. २२
जमिनीवरू न जमिनीवर तब्बल ३५० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या अण्वस्त्रवाहू ‘पृथ्वी-२’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज ओरिसातील बालासोर येथे घेण्यात आली.

‘राष्ट्रकुल’च्या फाईल्स गहाळ
नवी दिल्ली, दि. २२
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याच्या चौकशीत उपयुक्त ठरू शकणार्‍या काही महत्त्वाच्या ङ्गाईल्स गहाळ झाल्या असल्याची धक्कादायक माहिती आज उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास करीत असलेल्या सीबीआयच्या हातात या ङ्गाईल्स लागू नये, यासाठी त्या नष्ट करण्यात आल्या असाव्यात किंवा लपविण्यात आल्या असाव्यात, अशी सीबीआयला शंका असून, यामागचे सत्य बाहेर आणण्यासाठी सीबीआय सखोल चौकशी करणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

जपानला भूकंपाचा जबरदस्त धक्का
टोकयोे, दि. २२
जपानला आज सकाळी भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. रिश्टरवर त्याची तीव्रता ७.४ इतकी नोंदविण्यात आली. यानंतर दक्षिण किनार्‍यावर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपानंतर ४० मिनिटांपर्यंत एक ङ्गूट उंचीच्या लाटा उसळत होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून चिची आणि शेजारच्या हाहा बेटावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Wednesday, 22 December 2010

आणखी ३ आठवडे तरी कांदा रडवणारच!

नवी दिल्ली, दि. २१ : चिरला जात असताना सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणणारा कांदा आता वेगळ्याच तर्‍हेने सर्वांना रडवणार आहे. ७० ते ८० रुपये प्रतिकिलो एवढ्या भावाने कांदा विकला जात असल्याने सर्वसामान्य माणसाला तो विकत घेण्याचा विचारही सोडून द्यावा लागत आहे. सरकारने मात्र आज म्हटले आहे की, येत्या दोन-तीन आठवड्यांत कांद्याच्या किमती खाली येतील. कांद्याचे भाव किती खाली येतील? सर्वसामान्य माणसाला कांदा खरेदी करण्याइतपत त्या असतील की नाही? याबाबत मात्र सरकारने कोणताही खुलासा केलेला नाही.
कांदा आयात करण्याची तातडीची कोणतीही योजना नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. असे असले तरी पाकिस्तानातून उत्तर भारतातील बाजारात कांद्याचे काही ट्रक येत आहेत. कालच १५ ते २० ट्रक कांदा वाघा सीमा ओलांडून भारतीय हद्दीत आल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्या देत होत्या. महाराष्ट्रातील नाशिकजवळील कांदा बाजारात कांद्याच्या ठोक बाजारातच कांद्याला ७० रुपये एवढा भाव मिळत असल्याचे वृत्त असल्याने हा कांदा दिल्लीसारख्या बाजारात विकला जाईल त्यावेळी त्याची किंमत ही १०० रुपये झालेली असेल, असे काहींचे म्हणणे आहे.
कांद्याचे हे चढे भाव आणखी दोन-तीन आठवडे तरी तसेच राहतील व त्यानंतरच कांद्याच्या भावात थोडाङ्गार उतार येईल, असे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आज दिल्लीच्या तसेच देशातील इतर प्रमुख शहरांच्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ७० ते ८० रुपये किलो असा आहे. काही दिवसांपूर्वीचा कांद्याचा हा भाव ३० ते ३५ रुपये किलो असा होता. कांद्याचा प्रमुख उत्पादक असलेल्या नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अकाली पावसाने कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. येत्या दोन-तीन आठवड्यांत उत्तरप्रदेश, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांतूनही कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या किमती खाली येण्यास प्रारंभ होईल, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले. कांद्याच्या किमती एवढ्या का भडकल्या आहेत, अशी विचारणा पत्रकारांनी केली असता पवार बोलत होते. कांद्याच्या या वाढत्या भावाकडे बघता केंद्र सरकार कांदा आयात करणार का, असे विचारले असता पवार म्हणाले, आजतरी कांदा आयात करण्याची कोणतीही योजना वा प्रस्ताव नाही.
पाकिस्तानचा कांदा
दरम्यान, उत्तर भारतातील काही व्यापार्‍यांनी पाकिस्तानमधून कांदा आयात करण्यास प्रारंभ केला आहे. पाकिस्तानमधून येणार्‍या कांद्याच्या किमती १८ ते २० रुपये किलोेे आहेत. असे असले तरी पाकिस्तानमधून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कांदा मोठ्या प्रमाणात भारतात निर्यात होऊ लागल्याने पाकिस्तानमध्येही कांद्याचे भाव २५ ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यात १५ जानेवारीपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच निर्यात होणार्‍या कांद्याचे भावही दुप्पट करण्यात आलेले आहेत. यामुळेही देशांतर्गत कांद्याच्या किमती कमी होण्यास मदत होईल.
गॅस सिलिंडर, डिझेलच्या दरवाढीसाठीही सज्ज व्हा!
पुढील आठवड्यात निर्णयाची शक्यता
एकीकडे कांद्याचे दर गगनाला भिडलेले असताना आणि काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे दरही वाढवण्यात आल्यानंतर आता डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीची वेळ आली आहे. याविषयीचा निर्णय संबंधित मंत्रिगटाच्या पुढील आठवड्यात होणार्‍या बैठकीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव एस. सुंदरेशन यांनी आज बैठकीविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, इंधनविषयक मंत्रिगटाची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नुकतेच पेट्रोलचे दर वाढविण्यात आले आहेत. पण, अजूनही तेल कंपन्यांना डिझेल आणि सिलिंडरच्या विक्रीतून तोटा सहन करावाच लागतो आहे. त्यामुळे यांच्या किमतीही वाढविण्याबाबत त्यांची वारंवार मागणी होत आहे. सध्याच त्याविषयी निर्णय होईल की नाही, हे सांगता येत नाही. आगामी मंत्रिगटाच्या बैठकीतच यावर विचार होईल, असे सांगून सुंदरेशन यांनी दरवाढीविषयी बोलणे टाळले.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वातील मंत्रिगटाची बैठक २२ डिसेंबर रोजी होणार होती. पण, काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली.

दिल्लीतच बसून सरकार चालवा भाजपची मुख्यमंत्र्यांवर तोफ

पणजी, दि. २१ (पत्रक): प्रत्येक बारीकसारीक गोष्टीसाठी दिल्लीकडे धावणार्‍या मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तिथेच बसून सरकार चालवावे, असा औपरोधिक सल्ला भारतीय जनता पक्षाने दिला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय शिमग्याविषयी चर्चा करून हा वाद सोडवण्यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांचे पक्षश्रेष्ठी भेटत नाहीत आणि हतबल असलेले मुख्यमंत्री स्वतः कोणता निर्णयही घेऊ शकत नाहीत, अशी निर्नायकी अवस्था सध्या राज्यात उद्भवल्याची टीका भाजपचे प्रदेश सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी केली आहे.
गोवा मुक्तिदिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करताना एका बाजूला गोव्यातील तमाम जनता हर्षोल्हासित होऊन हा अनोखा उत्सव साजरा करत होती, तर दुसर्‍या बाजूने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्लज्जपणाचा कळस ठरलेला राजकीय शिमगा सुरू होता. या सरकारला गोमंतकीयांच्या भावनांचे आणि त्यांच्या सुख दुःखांचे कोणतेही सोयर सुतक लागून राहिलेले नाही हेच या घटनेवरून सिद्ध होते, असेही श्री. पर्वतकर यांनी म्हटले आहे.
अनेक बेगडी योजनांच्या घोषणा करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी मुक्तिदिन सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पदार्पणालाच जागोजागी आंदोलन करत असलेल्या कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नांकडेही लक्ष देण्यासाठी वेळ काढावा, असा सल्ला भाजपने दिला आहे. बदली कदंब बस चालक अन्याय असह्य झाल्यामुळे आमरण उपोषणालाच बसले होते. वारंवार दिल्लीच्या वार्‍या करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी या सामान्य नागरिकांवर आपल्या जिवावर उदार होण्याची पाळी का आली याचाही थोडा विचार करून पाहावा. मुख्यमंत्री वेळोवेळी अनेक आकर्षक घोषणा करण्यात वाकबगार आहेत. पण त्या घोषणांचे पुढे काय होते हे त्यांचे त्यांनाच आठवत नसते, असा टोला पर्वतकर यांनी हाणला आहे.
आम्ही गोव्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असलो तरी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी गोव्याची मुक्ती दिल्लीस्थित कॉंग्रेस श्रेष्ठींकडे गहाण टाकली आहे व त्यामुळेच अगदीच बारीकसारीक गोष्टींसाठीही त्यांना श्रेष्ठींकडेच पदर पसरावा लागतो, अशी जहाल टीका भाजपने केली आहे. एका मुक्त राज्याचे आपण मुख्यमंत्री आहोत व आपल्या राज्यासाठी हितकारक असलेले निर्णय आपल्यालाच घ्यावयाचे आहेत, हेच राज्याचे मुख्यमंत्री विसरले आहेत हे गोमंतकीयांचे दुर्दैव नाही काय, असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे.

‘सनबर्न’ पार्टीला अद्याप गृहखात्याचा परवाना नाही

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): कांदोळी समुद्रकिनार्‍यावर होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ पार्टीच्या आयोजनाला अद्याप गृहखात्याने परवानगी दिलेली नाही, अशी माहिती गृहमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी दिली. दि. २७ ते २९ डिसेंबर या दरम्यान या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.
‘‘माझ्यापर्यंत अद्याप या विषयीची कोणतीही फाईल आलेली नाही. त्यामुळे गृहखात्याच्या परवानगीशिवाय या पार्टीचे आयोजनच होऊ शकत नाही. समुद्रकिनार्‍यांवर होणार्‍या प्रत्येक पार्टीच्या आयोजनासाठी गृहखात्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे’’, असे श्री. नाईक यांनी सांगितले.
या ‘सनबर्न’ पार्टीच्या आयोजकांनी पोलिस खात्याकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही, असे पोलिस खात्याचे पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांनीही स्पष्ट केले. ‘आयोजकांनी त्यांना परवानगी मिळाली आहे, अशा भ्रमात राहू नये; कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे परवानगी मिळेल, असे त्यांना वाटत असावे. मात्र पोलिस खात्याने त्यांना या पार्टीच्या आयोजनासाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. तरीही ही पार्टी झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू’,, असेही श्री. बस्सी म्हणाले.
दोनच दिवसांपूर्वी कांदोळी नागरिक मंचाने या पार्टीच्या आयोजनाला प्रखर विरोध केला होता. तसेच, या पार्टीच्या आयोजनासाठी गृहखात्याने परवानगी देऊ नये, अशी मागणीही केली आहे. या मागणीला रेईस मागूस नागरिक समिती व नेरुल नागरिक कृती समितीने पाठिंबा दिला आहे.
या पार्टीत मद्यधुंद होऊन धांगडधिंगाणा घातला जातो. तसेच, अमली पदार्थाचे सेवनही मोठ्या प्रमाणात करून सलग तीन दिवस अश्‍लील नृत्य केले जाते. यामुळे कांदोळी गावाचे नाव बदनाम होत आहे. गेल्या वर्षी नेहा बहुगुणा या तरुणीचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे या पार्टीच्या आयोजनाला स्थानिकांचा विरोध असल्याचे कांदोळी नागरिक मंचाचे निमंत्रक तुकाराम नाईक स्पष्ट केले आहे.
दरम्यान, तीन दिवस चालणार्‍या पार्टीला अजून परवानाच मिळालेला नसला तरी सदर पार्टीत सहभागी होण्यासाठी शेकडो तरुण तरुणींनी संकेतस्थळावर तिकिटे आरक्षित केली आहेत. तसेच, देशातील प्रसिद्ध ‘डीजे’ही या पार्टीत भाग घेणार आहेत. त्यामुळे परवानगी नसताना सदर पार्टी होते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

गोव्यात एकही ड्रग माफिया नाही!

गृहमंत्र्यांच्या दाव्याने उपस्थित पडले चाट
"गोव्यात एकही ड्रग माफिया नाही. असल्यास तुम्ही दाखवून द्या, आम्ही त्याच्यावर त्वरित कारवाई करतो!" - इति: रवी नाईक
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): "गोव्यात एकही ड्रग माफिया नाही. असल्यास तुम्ही दाखवून द्या, आम्ही त्याच्यावर त्वरित कारवाई करतो!" राज्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी आज समस्त गोवेकरांना असे धडधडीत आव्हान दिले आणि यावेळी इथे उपस्थित असलेल्या सर्वांनीच तोंडात बोटे घातली. गेल्या वेळी अशाच प्रकारचे ‘विनोदी’ वक्तव्य करताना गोव्यात अमली पदार्थच नसल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला होता आणि पोलिस खात्याने त्याच रात्री लाखो रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला होता. यामुळे ड्रग माफियांचे पोलिस अधिकार्‍यांशी असलेले साटेलोटेही उघडकीस आले होते.
मंगळवारी आल्तिनो येथील राखीव पोलिस दलाच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गृहमंत्र्यांनी वरील हास्यास्पद वक्तव्य केले. यावेळी पोलिस खात्याचे महासंचालक भीमसेन बस्सी व अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारीही उपस्थित होते. राज्यात दर दिवशी अमली पदार्थाची तस्करी व विक्रीची प्रकरणे उघड होत असताना गृहमंत्र्यांनी असे छातीठोक विधान केल्याने यावेळी उपस्थित असलेल्या पत्रकारांना हसावे की रडावे असा प्रश्‍न पडल्यावाचून राहिला नाही.
काही आमदार विधानसभेत विनाकारण पोलिसांवर आरोप करून त्यांच्या नीतिधैर्याचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहेत, असाही आरोप श्री. नाईक यांनी यावेळी केला. मात्र हा आरोप करताना, काही महिन्यांपूर्वीच पोलिस आणि ड्रग्ज माफियांचे अभद्र साटेलोटे उघडकीस आले होते आणि त्यानंतर पाच पोलिसांवर निलंबित होण्याची पाळी येऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला होता, हे गृहमंत्री इतक्यातच कसे काय विसरले, असे प्रश्‍नचिन्हही उपस्थितांच्या चेहर्‍यावर झळकले.
‘‘गोव्यात एकही ड्रग माफिया नाही. मी स्वतः पोलिस अधिकार्‍यांसह रात्रीच्या वेळी किनार्‍यांवर फेरफटका मारून पाहणी केली आहे. या ड्रग माफियांची येथे पाळेमुळे रुजणार नाही यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व काळजी घेतो आहोत’’, असेही श्री. नाईक यांनी पुढे नमूद केले.
दरम्यान, गृहमंत्री रवी नाईक यांचा मुलगा रॉय नाईक याचे ड्रग माफियांशी घनिष्ठ संबंध असल्याचे आरोप ‘अटाला’ या इस्रायली ड्रग माफियाची मैत्रीण लकी फार्महाऊस हिने केला होता. परंतु, अद्याप तिचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केलेला नाही. त्याचप्रमाणे, २००८ साली हणजूण येथे खून झालेल्या स्कार्लेट किलिंगची आई फियोना हिनेही रॉय नाईक याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने गेल्या विधानसभा अधिवेशनात हे प्रकरण अतिशय तडफेने लावून धरले होते व या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी केली होती. मात्र याप्रकरणी पाच पोलिसांना तडकाफडकी निलंबित करणार्‍या गृहखात्याने या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या होत्या. या सर्व प्रकरणांतील धूर अजूनही निघत असताना गृहमंत्री राज्यात ड्रग माफियाच नाही, असे विधान करून आपण अनभिज्ञ असल्याचा आव आणत आहेत की, गोमंतकीयांची फसवणूक करत आहेत, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ‘‘आम्ही ड्रग व्यवसायाचा कणा मोडलेला आहे. अमली पदार्थाविरोधात सरू केलेली ही मोहीम अधिकच तीव्र करू’’, असे गृहमंत्र्यांनी शेवटी सांगितले.

अनुजा प्रभुदेसाई यांचे निलंबन मागे

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांचे निलंबन आज मागे घेऊन औद्योगिक तंटा लवादाच्या अध्यक्षपदी त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना निलंबित केले होते.
मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या निलंबनाचा निर्णय आज मागे घेतला. त्यांच्या चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. येत्या २६ डिसेंबरला त्या नव्या पदाचाताबा स्वीकारतील. या लवादाच्या अध्यक्षपदी असलेले न्या. देशपांडे यांच्याकडे उत्तर जिल्हा न्यायालयाचा आणि बाल न्यायालयाचा ताबा सोपवण्यात आला आहे.

जुझेंना वाचवण्यासाठी हळर्णकरांचा बळी!

मिकींना शह देण्यासाठी कॉंग्रेसची नियोजित खेळी
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): मुरगाव पालिका निवडणूक प्रचारावेळी महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी माजी पर्यटनमंत्री तथा बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांच्यावर हात उगारल्याच्या घटनेची गंभीर दखल राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतली होती. मुरगावमधील या घटनेनंतर कॉंग्रेसमधील मिकी विरोधकांशी जुझे यांनी जमवलेले सूत श्रेष्ठींच्या कानावर पोहोचल्यानेच त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे निश्‍चित झाले होते, अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. मात्र जुझे यांना या गंडांतरातून वाचवण्यासाठीच कॉंग्रेसने पक्षाचे सरचिटणीस विजय सरदेसाई यांना म्होरक्या बनवून पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना बळीचा बकरा बनवले, अशी जोरदार चर्चा सध्या राष्ट्रवादीत सुरू आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी पक्षाचे मंत्री जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांना राजीनामा सादर करण्याचे आदेश देऊन ४८ तास उलटले तरीही उभयतांनी अद्याप या आदेशाचे पालन केलेले नाही. मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी जुझे फिलिप डिसोझा यांचे मंत्रिपद काढून घेण्याचे ठरले आहे; पण या कटात नीळकंठ हळर्णकर यांनाही हकनाक गोवून कॉंग्रेसच्या एका गटाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला खिंडार पाडण्याची व्यूहरचना आखल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, नीळकंठ हळर्णकर यांनी जुझे फिलिप डिसोझा यांची साथ सोडावी, असा संदेश पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. मात्र हा प्रकार म्हणजे जुझे फिलिप डिसोझा यांचा विश्‍वासघात ठरेल व त्यामुळे आता माघार नाही, असा पवित्रा नीळकंठ हळर्णकर यांनी घेतल्याने ते या कटात सर्वस्वी फसले गेल्याची भावना राष्ट्रवादीच्या गोटात पसरली आहे.
दक्षिण गोव्यात कॉंग्रेसचे सरचिटणीस विजय सरदेसाई हे पक्षांतर्गत राजकारणाचे मुख्य सूत्रधार बनण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या दोन्ही मंत्र्यांना गुप्त बैठकीचे आमंत्रणदेऊन त्यांना पाचारण केले खरे; परंतु या बैठकीची छायाचित्रे व वृत्त पत्रकारांमार्फत सर्वत्र पसरवून कॉंग्रेसच्या या गटाने जुझे फिलिप यांच्यासह नीळकंठ हळर्णकर यांनाही या कटात पद्धतशीरपणे गोवले. मिकी पाशेको यांना विरोध करण्यासाठी पक्षाचे दोन्ही मंत्री एकत्र आहेत असाच आभास या राजकीय नाट्यातून तयार करण्याचा हा मुत्सद्दी डाव आखला गेला, अशीही खात्रीलायक माहिती समोर आली आहे. नीळकंठ हळर्णकर हे राजकारणात नवखे आहेत व त्यामुळे नियोजित पद्धतीने त्यांना या कटात ओढून कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीला शह देण्याचीच खेळी रचली गेली, अशी राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांची भावना बनली आहे.

सहा लाखांचा ऐवज फातोर्ड्यात पळवला

मडगाव, दि. २१ (प्रतिनिधी): मडगाव - फातोर्डा येथे काल रात्री चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून अंदाजे सहा लाखांचा ऐवज लुटला. त्यात रोख ५० हजार व साडेपाच लाखांच्या दागिन्यांचा समावेश आहे. सदर फ्लॅट विनोद आमोणकर यांचा आहे. काल दत्तजयंतीनिमित्त संबंधित कुटुंब फ्लॅट बंद करून बाहेरगावी गेले होते. आज सकाळी परत आल्यावर त्यांना चोरीचा हा प्रकार कळून आला.

Tuesday, 21 December 2010

म्हापशात आगीचे तांडव!

बाजारातील १६ दुकाने खाक; दीड कोटींचे नुकसान
म्हापसा, दि. २० (प्रतिनिधी)
म्हापसा मार्केटमध्ये सोमवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे लागलेल्या आगीत शकुंतला पुतळ्याजवळील १६ दुकाने जळून खाक झाली तर पाच दुकानांना बरीच झळ पोहोचली आहे. आगीत या एकवीस दुकानांचे मिळून अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती म्हापसा पोलिसांनी दिली.
रात्री गस्तीवर असणार्‍या पोलिसांना म्हापसा मार्केटमधील शकुंतला पुतळ्याजवळील डांगी ऑप्टिशियन दुकानासमोर आग लागल्याचे समजताच त्यांनी ताबडतोब म्हापसा पोलिस स्थानकाला वर्दी दिली. तेथून अग्निशामक दलाला कळवण्यात आले. अग्निशामक दलाचा बंब त्वरेने मार्केटमध्ये पोहोचलाही; परंतु अगदीच अरुंद असलेल्या रस्त्यांमुळे प्रत्यक्ष आग लागलेल्या ठिकाणी पोहोचण्यास त्यांना बरीच कसरत करावी लागली. बाजारात रस्त्यावर बसून विक्री करणार्‍यांंचे पेटारे, खाटा व अन्य सामान मध्येच असल्यामुळे हा बंब शकुंतला पुतळ्याजवळ ठेवावा लागला. दरम्यान, यावेळी आगीने असा काही रुद्रावतार धारण केला होता की, केवळ म्हापसा अग्निशामक दलाचा बंब ती विझवण्यासाठी अपुरा पडला असता. त्यामुळे पणजी, डिचोली, पेडणे, रेवोडा या ठिकाणाहूनही बंबांना पाचारण करण्यात आले. परंतु, आगीच्या ठिकाणी हे बंब थेट पोहोचू शकत नसल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला विलंब लागला व त्यामुळे नुकसानीचा आकडाही वाढला. तरीही दलाने कसोशीने प्रयत्न करून अन्य दुकानांना आगीपासून वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, डांगी चष्म्याच्या दुकानासमोरील झाडाच्या खाली असलेल्या दुकानात शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली. या दुकानाच्या वरच्या बाजूला आडोशासाठी मेणकापड बांधण्यात आले होते. शॉर्ट सर्किट होताच या मेणकापडाने लगेचच पेट घेतला आणि आग सर्वत्र पसरली. या ठिकाणी अधिकतर रेडीमेड कपडे, प्लॅस्टिक चप्पल व फळ विक्रेत्यांची दुकाने आहेत. रेडीमेड कपड्यांच्या दुकानांत ही आग झपाट्याने पसरली व त्यात ती दुकाने पूर्णपणे खाक झाली. नाताळाचा सण तोंडावर आलेला असल्याने येथील दुकानदारांनी आपल्या दुकानांत माल भरून ठेवला होता. मात्र आगीने तो भस्मसात केला. दरम्यान, विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांना ही घटना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. म्हापशाचे आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा, नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, मुख्याधिकारी मधुरा नाईक, नगरसेवक गुरुदास वायंगणकर, रुपेश कामत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्र सिरसाट, उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर, मामलेदार शंखवाळकर माजी उपनगराध्यक्ष ऑस्कर डिसोझा यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या आगीत समीर ताहीर, शुभलक्ष्मी बोंद्रे, गजानन आरोलकर, दामोदर तिवरेकर, महेश धारगळकर, रवींद्र कामत, गुरुदास गडेकर, संजीव कुडतरकर, मुनीज बादशहा, उदय वेंगुर्लेकर, जयप्रकाश कामत, पांडुरंग राऊळ, अहमद मुल्ला, अकबर नारंगी, नदाब नारंगी, राजू कुडतरकर, शेख शमरुद्दीन, नूर लतीफ, अंकुश पार्सेकर, अब्दुल शेख, नजीर नारंगी यांच्या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या आगीत ज्या दुकानदारांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारकडून त्वरित मदत मिळावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. सरकारनेही या दुर्घटनेची दखल घेऊन नुकसानग्रस्त दुकानदारांना तातडीने मदत करावी, अशी मागणी येथे भेट दिल्यानंतर आमदार ऍड. फ्रान्सिस डिसोझा यांनी व्यक्त केली.
या संदर्भात नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, सदर दुकाने हटवून त्यांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार पालिकेने चालवला होता व या बाबतीत दुकानदारांशी बोलणीही केली होती. पण दुकानदारांनीच नाताळाच्या सणानंतर आपण दुकाने खाली करू असे सांगितले होते. ही दुकाने हटवण्यासाठी त्यांना १५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती, असेही त्या म्हणाल्या. ऐन सणाच्या काळात घडलेली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे, अशी खेदजनक प्रतिक्रिया नगराध्यक्ष कांदोळकर यांनी व्यक्त केली.

ज्येष्ठ साहित्यिक सुभाष भेंडे निवर्तले

मुंबई, दि. २० (वृत्तसंस्था)
ज्येष्ठ साहित्यिक, अर्थतज्ज्ञ व कराड येथे झालेल्या ७६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुभाष भेंडे यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.
वांद्रे येथील साहित्य सहवासातील निवासस्थानीच आज पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने गुरुनानक इस्पितळात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉ. सुभाष भेंडे हे मूळचे गोव्याचे. १४ ऑक्टोबर १९३६ रोजी त्यांचा जन्म झाला. विनोदी लेखनाबरोबरच गंभीर लेखनावरही त्यांचे प्रभुत्व होते. गोवा मुक्तीनंतरच्या काळात जे अनेक लेखक-कवी पुढे आले त्यात डॉ. सुभाष भेंडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. गोमंतकीय साहित्यावरील रोमँटिसिझमचा प्रभाव पुसणार्‍यांपैकीच ते एक होते. प्रादेशिकतेच्या मर्यादेत न राहता त्यांनी केलेल्या कादंबरी लेखनातील आशयात लक्षणीय विविधता आढळते. २००३ साली कराड येथे झालेल्या ७६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
विनोदी लिखाणाबरोबरच त्यांनी अर्थशास्त्रासारख्या किचकट विषयातही तेवढ्याच समर्थपणे लेखणी चालविली. अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळविलेल्या सुभाष भेंेडे यांचे अर्थशास्त्रातील गुरू होते स्व. धनंंजयराव गाडगीळ.
डॉ. सुभाष भेंडे यांची साहित्य संपदा : साहित्य संस्कृती, किनारा, पितळी दरवाजा, निवडक गंभीर आणि गमतीदार, प्रा. धनंजयराव गाडगीळ : व्यक्ती व कर्तृत्व, हास-परिहास, उद्ध्वस्त, नेपोलियननंतर तुम्हीच, जोगीण, अंधारवाटा, पैलतीर, हसवेगिरी, द्राक्ष आणि रुद्राक्ष, स्मितकथा, मार्ग सुखाचा आदी.

‘संधी मिळालीच तर श्रेष्ठींशी बोलू’

मिकींच्या समावेशास मुख्यमंत्रीही अनुत्सुक
पणजी, दि. २० (प्रतिनिधी)
‘‘दिल्लीत राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशन संध्याकाळी उशिरा संपले व त्यामुळे गोव्यातील राजकीय गुंत्याबद्दल चर्चा करण्याची संधीच मिळाली नाही. बघू! संधी मिळालीच तर या बाबतीत श्रेष्ठींशी बोलू’’, अशा शब्दांत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावरून प्रदेश कॉंग्रेस तथा खुद्द मुख्यमंत्री कामत हे मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशास अनुकूल नाहीत हेच यावरून अखेर स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस श्रेष्ठींनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पत्र पाठवून जुझे फिलिप डिसोझा यांना वगळून मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांनाही आपापल्या मंत्रिपदाचे राजीनामे देण्याची सूचना केली आहे. दरम्यान, या उभयतांनी हा आदेश न जुमानता थेट श्रेष्ठींनाच आव्हान दिले आहे. कॉंग्रेस मंत्री व आमदारांनीही या दोघांना मंत्रिमंडळातून वगळण्यास हरकत घेतली आहे. मिकी पाशेको हे उपद्रवी असल्याने त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास अनेकांनी विरोध दर्शवल्याने मुख्यमंत्री कामत यांच्यासमोर गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या विषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले आहेत. दिल्लीत कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे आज सूप वाजले; मात्र गोव्यातील नित्याच्याच बनलेल्या या घटनेकडे कुणाचेही लक्ष गेले नाही. मुख्यमंत्री कामत यांच्यासाठीही ही गोष्ट श्रेष्ठींसमोर नेणे कठीणच बनले आहे व त्यामुळे त्यांनीही घाई न करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
आपण आजच गोवा सदनात पोहोचलो. कॉंग्रेसचे अधिवेशन इथून २० किलोमीटर अंतरावर होते व त्यामुळे आज कुणाचीच भेट घेणे शक्य झाले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी एका पत्रकाराकडे बोलताना सांगितले. श्रेष्ठींची कधी भेट घेणार असा सवाल केला असता, ‘‘बघू, जसा वेळ मिळतो त्याप्रमाणे ठरवू’’, असे म्हणून त्यांनी या विषयाला जास्त महत्त्व देत नसल्याचाच आविर्भाव घेतला. मुख्यमंत्री या विषयी बी. के. हरिप्रसाद तथा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्याशी चर्चा करणार आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर तसेच अन्य काही मंत्री व आमदारही दिल्लीत डेरेदाखल झाले आहेत व त्यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेण्याचीच मागणी लावून धरण्याचे ठरवले आहे, अशीही खबर मिळाली आहे.
उद्यापर्यंत फैसला होणार
मिकी पाशेको यांची मंत्रिमंडळातील वर्णी ही काळ्या दगडावरची रेघ आहे व कॉंग्रेसकडून कितीही धडपड केली गेली तरी शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांचा आदेश मुख्यमंत्री कामत यांना मान्य करावाच लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीतील मिकी समर्थक पदाधिकार्‍यांनी दिली. मिकी पाशेको यांना टाळण्याचा प्रयत्न झाला तर प्रसंगी आघाडीतून फारकत घेण्याचीही तयारी पक्षाने ठेवली आहे, असेही त्यांनी सांगितले. २२ पर्यंत हा गुंता नक्कीच सोडवला जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला कामगारांच्या आंदोलनांची सलामी

- कदंब चालक आमरण उपोषणावर
- तंत्रनिकेतन कर्मचार्‍यांचे धरणे,
- मलेरिया सर्वेक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात


पणजी, दि. २० (प्रतिनिधी)
काल दि. १९ डिसेंबर रोजी गोव्याने आपल्या मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण केले असून हे वर्ष विविध कार्यक्रमांनिशी साजरे करण्याचा सरकारचा मनोदय आहे. मात्र आम आदमीच्या या राज्यात सध्या कामगार वर्गावर जबरदस्त गंडांतर आल्याने त्यांनी गोवा मुक्तीच्या या सुवर्णमहोत्सवाला आंदोलनांनीच सलामी दिली आहे. सोमवार दि. २० रोजी कदंब महामंडळाच्या बदली चालकांनी आमरण उपोषण पुकारले आहे, सरकारी तंत्रनिकेतनच्या कर्मचार्‍यांनी धरणे धरले आहे तर मलेरिया सर्वेक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात असून त्यांचे आंदोलन कुठल्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे.

बदली कदंब बस चालकांचे
आमरण उपोषण सुरू

कदंब महामंडळात बदली चालक म्हणून रोजंदारीवर गेल्या पंधरा वर्षांपासून काम करणारे व सेवेत कायम करण्याचे लेखी आश्‍वासन देऊनही ते पाळले न गेल्याने सुमारे ६८ बस चालकांनी सोमवारपासून पणजी कदंब स्थानकावर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे उद्या दि. २१ रोजी येथे साजर्‍या होणार असलेल्या कदंबच्या वर्धापनदिन सोहळ्यावर त्याची गडद छाया पडली आहे.
पाच वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांना कराराप्रमाणे कायम करावे व उर्वरितांना २९७ रुपयांची रोजंदारी लागू करावी या मागण्यांसाठी हे कर्मचारी गेली अनेक वर्षे झगडत असून यासंदर्भात कामगार न्यायालयात अनेक सुनावण्या होऊनही त्यांची मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे आंदोलनांचीच भाषा समजणार्‍या सरकारला जाग आणण्यासाठी त्यांनी शेवटी आमरण उपोषणाचे पाऊल उचलले आहे. या बस चालकांच्या आंदोलनाला कदंबच्या अन्य सर्व चालकांनी पाठिंबा दिला आहे. या उपोषणामुळे पणजी - मडगाव व पणजी - वास्को मार्गावरील शटल सेवेवर बराच परिणाम झाला आहे.
दरम्यान, ज्या बस चालकांनी दीर्घ काळ सेवा बजावली आहे त्यांना सेवेत कायम केले जाणार आहे. यासंबंधी सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून चालकांनी उपोषण मागे घेऊन कामावर रुजू व्हावे, असे आवाहन कदंबचे व्यवस्थापकीय संचालक वेनासियो फुर्तादो यांनी केले आहे.

तंत्रनिकेतन कर्मचार्‍यांचे बेमुदत धरणे
दरम्यान, पणजी येथील सरकारी तंत्रनिकेतनात गेली दहा वर्षे सेवेत असलेले सुरक्षा रक्षक व स्वच्छता कामगारांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात आले नसल्याने हे काम उपाशी पडले असून सोमवारी आल्तिनो येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर त्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या कंत्राटाची ‘फाईल’ नेमकी कुठे आहे याचा शोध घेऊन आम्ही दमलो आहोत व त्यामुळेच आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया या कामगारांनी दिली आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पणजी सरकारी तंत्रनिकेतनात ७ सुरक्षा रक्षक व ९ स्वच्छता कामगार कंत्राटी पद्धतीवर गेली दहा वर्षे काम करत आहेत. २००१ साली या कामगारांना गोवा कंत्राटी कामगार सोसायटीमार्फत नेमण्यात आले होते. २००७ साली या कामगारांची थेट कंत्राटी पद्धतीवरच तंत्रनिकेतनामार्फत नेमणूक करण्यात आली. दरवर्षी या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात येते. परंतु, यंदा मात्र कंत्राट नूतनीकरण करण्यात आले नसल्याने हे कामगार उपाशी पडले आहेत. याबाबत प्रत्येक अधिकारी टोलवाटोलवी करीत आहे व कंत्राटाच्या नूतनीकरणाचे नेमके काय झाले, याची माहिती कुणीही द्यायला तयार नाही, अशी तक्रार या कामगारांनी केली आहे. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडेही कैफियत मांडली. परंतु, त्यांनी ही ‘फाईल’ सचिवालयात असल्याचे सांगितले. सचिवालयात गेल्यास तिथे शिक्षण खात्याचे सचिव १५ दिवस रजेवर असल्याचे सांगण्यात आले.
हे सर्व कामगार आपापल्या कुटुंबाचा आधार असल्याने त्यांच्यासमोर या परिस्थितीमुळे बिकट संकट उभे राहिले आहे. ‘आयटक’चे नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी या कामगारांना आपला पाठिंबा जाहीर केला असून त्यांचा विषय सरकार दरबारी नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मलेरिया सर्वेक्षक आंदोलनाच्या पवित्र्यात

मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गेल्या एप्रिल महिन्यात सेवेत नियमित करण्याचे दिलेले आश्‍वासन अजूनही अपूर्णच राहिले असल्याची जाणीव आरोग्य खात्यातील मलेरिया सर्वेक्षक कंत्राटी कामगारांनी करून दिली असून या बाबतीत त्वरित निर्णय न झाल्यास त्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
वीज खात्यातील मदतनिसांच्या पगारात ४ हजारांवरून ५७४० रुपये वाढ करण्याचा निर्णय झाला ही चांगली गोष्ट आहे. मात्र गेली दहा ते पंधरा वर्षे आरोग्य खात्यात सेवा बजावणार्‍या मलेरिया सर्वेक्षकांनी सरकारचे असे कोणते घोडे मारले आहे की, त्यांना केवळ ३५०० हजार रुपयांवर राबवले जात आहे, असा संतप्त सवाल यावेळी या कामगारांनी केला. गेल्या एप्रिल महिन्यात अचानक कामावरून काढून टाकल्यानंतर उपोषणाला बसलेल्या या कामगारांना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पुन्हा सेवेत घेतले. यावेळी त्यांना वाढीव वेतन व सेवेत नियमित करण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले होते. मात्र या कर्मचार्‍यांना पूर्वी जे ४ हजार रुपये मिळत होते ते आता साडेतीन हजार रुपये करण्यात आले आहेत. वाढत्या महागाईला अनुसरून एरवी कामगारांचा पगार वाढतो; पण इथे मात्र हा उलटा न्याय कसा, असा सवालही या कामगारांनी केला आहे.
आरोग्य खात्यात सध्या मलेरिया सर्वेक्षक म्हणून एकूण ६० कामगार कंत्राटी पद्धतीवर कामावर आहेत.अलीकडेच आरोग्य खात्यातर्फे जाहिरात देऊन २८ पदांची घोषणा केली होती. कंत्राटी कामगारांना वगळून आपल्या मर्जीतील कामगारांची भरती करण्यासाठीच ही जाहिरात दिल्याची टीका या कामगारांनी केली आहे. येत्या महिन्यात या कामगारांचे कंत्राट संपणार आहे व त्यावेळी पुन्हा या कामगारांच्या पोटावर लाथ मारली जाण्याची शक्यता असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

Monday, 20 December 2010

सेवा हाच मानवधर्म माना - श्रीपाद वडेर स्वामी


म्हार्दोळ महालसा संस्थानात अयुतचंडी महोत्सव


पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
सेवा हाच मानवधर्म मानून प्रत्येकाने आपले कार्य करत राहिले पाहिजे. कर्म करताना फळाची अपेक्षा धरू नये. मात्र आपल्या देवावर श्रद्धा ठेवावी. देवावरील श्रद्धा व भक्ती आपल्याला देवतांच्या अनुग्रहास पात्र ठरविते असे आशीर्वचनपर उद्गार श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाचे स्वामी परमपूज्य श्रीमद् विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजींनी म्हार्दोळ येथे काढले.
म्हार्दोळच्या श्री महालसा संस्थानात मंदिर पुनर्स्थापनेला ४५० वर्षे होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या ७ नोव्हेंबरपासून अयुतचंडी महायागाचे आयोजन करण्यात आले होते. या यागाच्या आज झालेल्या समारोपाच्या सोहळ्यात स्वामीजी आशीर्वचनपर मार्गदर्शन करत होते. यावेळी कैवल्य मठाधीश श्रीमद् शिवानंदतीर्थ स्वामीजीही उपस्थित होते. तसेच व्यासपीठावर मुख्यमंत्री दिगंबर कामत, पर्तगाळी जीवोत्तम मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, महालसा संस्थानचे अध्यक्ष विनोद कामत तसेच अन्य मान्यवर आसनस्थ होते. या कार्यक्रमाला मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, सचिव राजीव वर्मा, डॉ. एम. मुदास्सिर उपस्थित होते.
गोमंतक ही पुण्यभूमी आहे. इथल्या मंदिरांमुळे तिला देवभूमी ही संज्ञाही प्राप्त झाली आहे. मंदिरातील देवावर आपण नेहमी श्रद्धा, निष्ठा व भक्ती ठेवून देवाला शरण गेले पाहिजे असे स्वामीजींनी पुढे सांगितले. देवाची भक्ती केल्याने आपले मन सात्त्विक बनते. सात्त्विक मनच आपल्याला जीवनात सुख, शांती व समाधान प्राप्त करून देते असे सांगून स्वामीजींनी श्री महालसा देवी सर्व भक्तांना सद्वासना, सद्बुद्धी व सद्प्रेरणा देवो अशी प्रार्थना केली.
कैवल्य मठाधीश श्रीमद् शिवानंदतीर्थ स्वामीजींनी देवतांच्या कृपेस आपण पात्र ठरण्यासाठी आधी त्याला शरण जायला हवे असे आपल्या आशीर्वचनात सांगितले. गोव्यात मठ आहेत तसेच त्या मठांचे अधिपतीही आहेत. अनेकांचे कुलदैवत हे गोव्यात आहे. त्यामुळे व्यवसायानिमित्त परराज्यात स्थायिक झालेले अनेकजण आपले कुलदैवत व कुलगुरूंच्या भेटीसाठी येथे येतात. तसेच गोव्यातील भक्तगण तर नेहमीच आपले दैवत व कुलगुरूंच्या भेटी घेत असतात. ही श्रद्धा व भक्ती अशीच राहिली पाहिजे असे स्वामीजी म्हणाले.
श्री महालसा संस्थानाने चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त महायागाचे श्रद्धापूर्वक आयोजन करून तो यशस्वी केला. तसेच या यागामुळे सर्व भक्तांना निश्‍चितच फलप्राप्ती मिळेल असे सांगून संस्थान समितीने संस्थानाच्या अभिवृद्धीचा जो संकल्प केला आहे त्याला सुयश चिंतिले.
या चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्यांनी ज्यांनी एक लाख रुपये व त्यावर आपले आर्थिक योगदान देऊन उत्सवास हातभार लावला त्या दात्यांचा याप्रसंगी स्वामीजींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच पुरोहित मदन भटजी, मंडप उभारणीसाठी, संस्थानाचे संकेतस्थळ तयार करणे, अभिवृद्धीचा आराखडा तयार केलेले वास्तुविशारद, स्मरणिका तयार करण्याकामी व हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या काही जणांचा तसेच ज्येष्ठ महाजन, संस्थानाचे माजी अध्यक्ष आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
स्वामीजींच्या आज्ञेने मुख्यमंत्री कामत यांनी देवस्थानच्या स्मरणिकेचे प्रकाशन तर मठ समितीचे अध्यक्ष धेंपे यांनी संस्थानाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ केला.यावेळी मुख्यमंत्री कामत व श्री. धेंपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्या स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव संपन्न झाला त्या उभय स्वामीजींना यावेळी महालसा देवीची प्रतिकृती असलेली सुवर्ण प्रतिमा भेट देण्यात आली. प्रारंभी उभय स्वामीजींच्या पाद्यपूजेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थानचे अध्यक्ष विनोद कामत यांनी सपत्नीक प. पू. विद्याधिराज स्वामी व खजिनदार सुवर्ण शेणवी नेवरेकर यांनी सपत्नीक कैवल्य मठाधीशांची पाद्यपूजा केली.
प्रारंभी अध्यक्ष श्री. कामत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राधाकांत पै काणे व मदन भटजींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. संस्थानचे गजानन पै वैद्य यांनी आभार व्यक्त केले. विशाल पै काकोडे यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.

‘गोवादूत’चा सत्कार
या चतुर्थ शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची माहिती देणारा वीस पानी खास विशेषांक ‘गोवादूत’ने आज प्रकाशित करून तो महालसा संस्थानात उपलब्ध केला होता. गोवादूतच्या या कार्याचीही यावेळी जाहीर प्रशंसा करण्यात आली. हा विशेषांक प्रकाशित करून ‘गोवादूत’नेही उत्सवास जी प्रसिद्धी दिली त्याबद्दल ‘गोवादूत’चाही यावेळी स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘गोवादूत’चे संचालक सागर अग्नी व ज्योती धोंड यांनी हा सत्कार स्वीकारला.

मिकींच्या विरोधासाठी कॉंग्रेस करणार दिल्लीत शक्तिप्रदर्शन

• राजकीय पेच कायम

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्यावरून सरकारात बरीच धुसङ्गुस सुरू झाली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी हा गुंता सोडवण्यासाठी आता थेट दिल्लीश्‍वराचाच धावा केला आहे. उद्या २० रोजी मुख्यमंत्र्यांसह कॉंग्रेसचे इतर मंत्री व आमदारांचा लवाजमाच दिल्लीला प्रयाण करीत आहे. मिकी पाशेको यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे कॉंग्रेससाठी आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याचा प्रकार ठरेल व त्यामुळे दिल्लीतील राष्ट्रवादी श्रेष्ठींना या निर्णयापासून परावृत्त करण्याची अट कॉंग्रेस श्रेष्ठींकडे घातली जाण्याची शक्यता आहे.
राज्य विधानसभेत २० आमदार असलेल्या कॉंग्रेसची सध्या आघाडीमुळे झालेली गच्छंती अजूनही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कॉंग्रेसची पुरती दमछाक केली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा महसूलमंत्री जुझे ङ्गिलिप डिसोझा यांना वगळून मिकी पाशेको यांची वर्णी लावण्याचे स्पष्ट निर्देश राष्ट्रवादी श्रेष्ठींनी मुख्यमंत्री कामत यांना दिले आहेत, परंतु या निर्णयाला कुणीच अनुकूल नाहीत. खुद्द जुझे ङ्गिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांनी कॉंग्रेस नेत्यांकडे सुत जुळवून आपल्याच पक्षश्रेष्ठींना आव्हान दिल्याने हा विषय बराच चिघळत चालला आहे. आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे देण्याचा राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षांच्या आदेशाला या उभयतांनी वाटाण्याच्या अक्षताच लावल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी प्रकाश बिनसाळे यांनी येऊन त्यासंबंधी मुख्यमंत्री कामत यांना पत्र सुपूर्द केले आहे व त्यात जुझे ङ्गिलिप डिसोझा यांना वगळून मिकी पाशेको यांची वर्णी लावण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने मुख्यमंत्र्यांची परिस्थिती दोलायमान बनली आहे.
दरम्यान, नादिया तोरादो या युवतीच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादात अडकलेले मिकी पाशेको यांच्यावरील पोलिस कारवाईमुळे त्यांनी थेट कॉंग्रेस नेत्यांनाच आव्हान दिले आहे. मिकी पाशेको हे कॉंग्रेससाठी भविष्यात डोकेदुखीच ठरतील. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सासष्टीत मिकी पाशेको यांचा वावरही पक्षासाठी धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत मिकी यांच्या हातात परत मंत्रिपदाची सूत्रे सोपवणे जिकिरीचेच ठरेल. या सर्व गोष्टींची कल्पना पक्षश्रेष्ठींना देण्याचेच स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी ठरवले आहे. मिकी पाशेको यांच्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या श्रेष्ठींनी चालवलेले ‘लॉबींग’ ही कॉंग्रेसची मानहानी करण्याची राजनीती असू शकते असेही कॉंग्रेस गोटात बोलले जात आहे.
दिल्लीत सध्या अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे महाअधिवेशन सुरू आहे व त्यामुळे मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी दिल्लीत शक्तिप्रदर्शन करून आपल्या श्रेष्ठींवर दबाव टाकण्याचाही प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल हे मिकी पाशेको यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत व त्यामुळे आता कॉंग्रेस श्रेष्ठींकडून त्यांची कोणत्या पद्धतीने समजूत काढली जाते यावरूनच पुढील कृती ठरणार आहे. जुझे ङ्गिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर यांनी प्रसंगी वेगळा गट स्थापन करून आपल्याच पक्षाला दणका देण्याचीही व्यूहरचना आखली आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या भरवशावर खुद्द आपल्याच श्रेष्ठींकडे दोन हात करण्याचे ते कितपत धाडस करू शकतील हे देखील आता लवकरच स्पष्ट होणार आहे. मिकी पाशेको हे मात्र निर्धास्त असून उशिरा का होईना पण आपले मंत्रिमंडळातील स्थान आता पक्के आहे, असे ते आपल्या समर्थकांना सांगत असल्याचीही खबर मिळाली आहे.
ःःःःःःःःःःः
जुझेंना वगळल्यास गंभीर परिणाम
वास्को, (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते डॉ. प्रफुल्ल हेदे आमदार मिकी पाशेको यांचे एजंट असून त्यांच्या सांगण्यावरून ते मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना मंत्रिपदावरून हटवण्याचे पत्र त्यांनी आणले आहे. मंत्री डिसोझा यांना मंत्रीपदावरून काढल्यास त्याचे गंभीर परीणापरिणाम होतील असा इशारा आज संध्याकाळी वास्कोत आयोजित केलेल्या जाहीर सभेत वास्को राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गट समितीच्या सदस्यांनी दिला.
गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या राजकीय घडामोडींना वेगवेगळ्या प्रकारचा रंग येत असल्याचे दिसून येत आहेत. मुरगाव पालिकेच्या इमारतीसमोर आज संध्याकाळी जुझे फिलिप डिसोझा यांना पाठिंबा दर्शवणारी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुरगावचे नगरसेवक प्रेमानंद नानोस्कर, नगरसेविका तथा माजी उपनगराध्यक्षा लविना डिसोझा, नगरसेविका लेंदीज, नगरसेविका ङ्गियोला रेगो, नगरसेवक जेरी ङ्गर्नांडिस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ग्रेगरी ङ्गर्नांडिस, प्रशांत बांदेकर व इतर मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांनी यावेळी जर महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास पक्षाने जबरदस्ती केल्यास आम्ही डिसोेझांबरोबर राहू. असे सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जर डिसोझा यांचा घात केल्यास आम्ही त्यांना पाठिंबा देऊन ते इतर कुठल्याही अन्य पक्षाबरोबर जुळल्यास आम्ही त्यांच्या बरोबर जाऊन त्यांनाच विजयी करू असेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, वास्को राष्ट्रवादी युवा समितीचे प्रमुख ग्रेगरी ङ्गर्नांडिस यांनी मिकी यांच्या दबावामुळे डिसोझा यांना मंत्रिपदाचा राजीनामा मागण्यात येत असल्याचे सांगितले. पाशेकोंविरुद्ध सहा गुन्हे असल्याची माहिती ङ्गर्नांडिस यांनी यावेळी देऊन डिसोझा हे जनतेच्या हितासाठी कामे करणारा आमदार असल्याचे ते म्हणाले. आज झालेल्या सदर पाठिंबा बैठकीच्या वेळी दोन ठराव मांडण्यात आलेले आहेत. तसेच ह्या जाहीर सभेत इतर मान्यवरांकडून डॉ. हेदे यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून डिसोझा यांना मंत्रिपदावरून काढल्यास याचा परिणाम गंभीर होणार असल्याचा इशारा त्यांनी लि.

कॉंगे्रसचा हिंदूद्वेष पुन्हा उघड

- एकाही घोटाळ्याचा उल्लेख नाही
- मुकुल वासनिकांना मारहाण
- सोनियांचा कार्यकाळ पाच वर्षांचा

नवी दिल्ली, दि. १९
कॉंगे्रसच्या ८३ व्या महाअधिवेशनाला आजपासून राजधानी दिल्लीजवळील बुराडी या गावात प्रारंभ झाला. स्वत:च्या अध्यक्षपदाची कारकीर्द तीन वर्षांवरून पाच वर्षांपर्यंत वाढविणारी घटना दुरुस्ती मंजूर करून घेताना कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अल्पसंख्यक आणि बहुसंख्यक जातीयवाद दोन्ही देशांसाठी घातक असल्याचे मत व्यक्त करून पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्यावरून निर्माण झालेल्या वादाला तोंड ङ्गोडले आहे. २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा आणि आदर्श सोसायटीचा घोटाळा यासारख्या मोठ्या घोटाळ्यांमध्ये कॉंगे्रस पक्षच अडकला असतानाही ‘भ्रष्टाचाराला या देशात मुळीच स्थान नाही आणि भ्रष्टाचार आम्ही कदापि खपवून घेणार नाही,’ असे सोनिया गांधी यांनी जाहीरपणे सांगितले, तर त्यांच्याच उपस्थितीत दिग्विजयसिंग यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोंडसुख घेत हिंदूत्ववादी संघटना देशाला घातक असल्याची टीका केली.
धर्माच्या नावाखाली होणारा कुठलाही दहशतवाद कॉंगे्रसला मान्य नाही, दहशतवादाचे हे दोन्ही स्वरूप एकसारखेच आहेत, असे सोनिया गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. विकिलिक्स केबलला कॉंगे्रस नेते राहुल गांधी यांनी हिंदू दहशतवाद हा लष्क­र­- ए- तोयबापेक्षाही घातक आहे, असे वादग्रस्त उद्गार काढून देशभरात वाद निर्माण केला होता. यातून पुत्र राहुलचा बचाव करण्याचाच सोनिया गांधी यांचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. त्याचवेळी सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादावर केवळ चिंता व्यक्त केली.
या वर्षात २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, राष्ट्रकुल घोटाळा आणि आदर्श सोसायटीचा घोटाळा यासारखे तीन मोठे घोटाळे घडले असताना आणि राष्ट्रकुल घोटाळ्यामुळे देशाची जगभरात बदनामी झाली असताना सोनियांनी आपल्या भाषणात मात्र या घोटाळ्याचा साधा उल्लेखही केला नाही. भ्रष्टाचार निपटण्यासाठी आपल्या सरकारकडे पाच सूत्री कार्यक्रम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कॉंग्रेस अधिवेशनात
कार्यकर्त्यांनाच बदडले
नवी दिल्ली, दि. १९ ः कॉंगे्रस पक्षाच्या ८३ व्या अधिवेशनात आज या पक्षाचा खरा चेहरा समोर आला. बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या पक्षाच्या दारुण पराभवासाठी कॉंगे्रसचे प्रभारी मुकुल वासनिक हेच पूर्णत: जबाबदार असल्याचा आरोप बिहारमधील नेते व कार्यकर्त्यार्ंंनी करून त्यांच्याशी झोंबाझोंबी केली. यावेळी बिहारी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
कॉंगे्रसच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून येथे सुरुवात झाली. या अधिवेशनासाठी सर्वच राज्यातून कॉंगे्रसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे दाखल झाले आहेत. बिहारमधूनही कॉंगे्रसचे नेते आणि कार्यकर्ते येथे आलेत. मुकुल वासनिकांना पाहताच त्यांच्या संतापाचा पारा वर चढला. वासनिक यांचे स्वार्थी धोरणच बिहार निवडणुकीत कॉंगे्रसच्या दारुण पराभवासाठी कारणीभूत ठरले. वासनिक यांनी प्रामाणिक आणि निष्ठावंतांना डावलून आपल्या मर्जीतील लोकांना तिकीट विकले, असा आरोप या कार्यकर्ते व नेत्यांनी केला.
अधिवेशनाच्या व्यासपीठावर वासनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा नीट करीत असताना बिहार नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वासनिकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वासनिकांना तात्काळ पक्षातून हाकलण्याची मागणी केली. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने अधिवेशनातील सर्वांचेच लक्ष या गोंधळाकडे वेधले गेले. सेवादलाच्या काही पदाधिकार्‍यांनी बिहारी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
बिहारचे नेते, कार्यकर्त्यांची वासनिकविरोधी घोषणाबाजी सुरू असतानाच अधिवेशनाच्या एका ठिकाणाहून वासनिक समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू झाली. यामुळे अधिवशनस्थळातील वातावरण चांगलेच तापले होते. अलिकडेच झालेल्या बिहार निवडणुकीत कॉंगे्रसला केवळ चार जागा मिळाल्या, अनेकांना हजारापेक्षा कमी मते मिळाली. याचा अर्थ काय, असा संतप्त सवाल बिहारी नेते व कार्यकर्त्यांनी केला.
बिहारींच्या घोषणा सुरूच असताना पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणार्‍या बिहारी कार्यकर्त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामुळे सभास्थळी एकच धावपळ निर्माण झाली. यानंतर काही वरिष्ठ नेत्यांनी येऊन गोंधळ घालणार्‍या कार्यकर्त्यांची समजूत घातली आणि स्थिती निवळली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या गोंधळाने मात्र महात्मा गांधीजींच्या शांतता आणि प्रेम या मार्गावर वाटचाल करण्याचा दावा करणार्‍या कॉंगे्रस पक्षाचा खरा चेहरा जनतेपुढे उघड झाला आहे.
दिग्विजयसिंगांची बेताल बडबड सुरूच
नवी दिल्ली, दि. १९ ः एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना खरा धोका हिंदू दहशतवाद्यांकडूनच होता, अशी बेताल बडबड करणारे कॉंगे्रसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी आपली बडबड सुरूच ठेवताना आज थेट भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध गरळ ओकली आहे. भाजप आणि संघाचे वागणे जर्मनचा हुकूमशाह हिटलरसारखेच आहे, अशी ङ्गुत्कार त्यांनी काढली.
हिटलरने यहुदींना लक्ष्य बनवून आपल्या कारवायांना राष्ट्रवादाचे नाव दिले होते. त्याचप्रमाणे संघ आणि भाजपदेशातील मुस्लिमांना लक्ष्य बनवून आपल्या कारवायांना राष्ट्रवादाचे नाव देत आहेत, असे अकलेचे तारे दिग्विजयसिंग यांनी कॉंगे्रस महाअधिवेशात तोडले. भाजप आणि संघाची संकुचित विचारधारा हे आज देशापुढील सर्वात मोठे आव्हान आहे. संघ परिवाराचे लोक देशात हिंसा आणि जातीय द्वेष पसरवित आहेत. तिथेच कॉंगे्रस पक्षाची वाटचाल महात्मा गांधी यांच्या शांतता आणि प्रेम या सिद्धांतावर आधारित आहे.
संघाच्या बाल शाखांमधून हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचे शिक्षण दिले जाते. न्यायपालिका, प्रशासन आणि देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांमध्ये भाजपा आणि संघाच्या लोकांचा शिरकाव झालेला आहे. याचे जिवंत उदाहरण मालेगाव स्ङ्गोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांना झालेली अटक आहे.
भाजपाविषयी आपले विषारी मत व्यक्त करताना ते म्हणाले, लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेमुळेच देशातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. भाजपा आणि संघाच्या लोकांनी अयोध्येत बाबरी मशिदीचा विध्वंस केला. हा देशाच्या प्रतिष्ठेवर बसलेला सर्वात मोठा डाग आहे, तो मिटविण्याचे प्रयत्न कॉंगे्रस पक्ष करीत आहे, अशीही गरळ त्यांनी ओकली.

सन २०१२ पर्यंत राज्यात शंभर टक्के साक्षरता व वीजजोडणी

मुक्तिदिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी)
सन २०१२ पर्यंत शंभर टक्के साक्षरता आणि संपूर्ण राज्यात शंभर टक्के वीजजोडणी करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली. ते आज मुक्तिदनाच्या सुवर्ण जयंती दिनानिमित्त कांपाल परेड मैदानावर मानवंदना स्वीकारल्यानंतर राज्याला उद्देशून बोलत होते. ‘गोयंकारपण’ आणि पर्यावरण सांभाळत विकास करण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, विविध खात्याचे मंत्री व उत्तर गोवा खासदार श्रीपाद नाईक उपस्थित होते.
राज्यात १०० टक्के वीजपुरवठा करण्याची योजना यापूर्वीच सरकारने सुरू केली असून ज्या भागात वीजपुरवठा करणे शक्य नाही तेथे लोकांना सौरऊर्जेवर चालणार्‍या यंत्राचा पुरवठा केला जाणार असल्याचे श्री. कामत यांनी सांगितले. लहान मुले बेघर राहू नये यासाठी ‘माय स्विट होम’ ही योजना यावेळी जाहीर करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिकांना मळणारे मानधन आता ५ हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच, सरकारी नोकरीपासून वंचित राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना यावर्षा पर्यंत नोकरी दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पोलिस विकास सोसायटीला १ कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच, होम गार्ड आणि अग्निशमन दलाच्या सोसायटीला प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचेही श्री. कामत यांनी पुढे सांगितले.
यावेळी पोलिस अधीक्षक विश्राम बोरकर, सुरक्षा विभागाचे पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस व गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांना मुख्यमंत्रिपदक देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या ३६ व्यक्तींचा आणि ४ विशेष व्यक्तीचा तसेच एका सामाजिक संस्थेच्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढून त्यांना गौरविण्यात आले. शेवटी ४ हजार विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

सचिन कसोटीत शतकी अर्धशतक

विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये शतकांचे अर्धशतक पूर्ण करून आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. हा पराक्रम करणारा तो जगातला पहिला ङ्गलंदाज ठरला आहे. सेंच्युरिअन येथील सुपर स्पोर्ट पार्कवर दक्षिण आङ्गि्रकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सचिनने हा पराक्रम नोंदवला. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके करणार्‍या सचिनने आज रविवारी कसोटीत शतकांचे अर्धशतक करुन नवा विक्रम केला. एकदिवसीय सामन्यात सचिनची ४६ शतके झाली असून आणखी चार शतकानंतर तो एकदिवसीय सामन्यातही शतकांचे अर्धशतक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले शतकांचे शतक साकारेल. आङ्गि्रकेविरुद्ध डाव सावरण्यासाधी सावध पवित्रा घेणार्‍या आपल्या सचिनने १९७ चेंडूत शतक पूर्ण केले. कोट्यवधी भारतीयांसाठी एक दैवत झालेल्या आपल्या सचिनने वयाच्या ३७व्या वर्षी हा पराक्रम करत खेळामध्ये वय हे बंधन असू शकत नाही, हे पुन्हा एकदा दाखवून दिले.
कसोटी क्रिकेटमध्ये यंदा तेरा कसोटीत १ हजार ५३२ धावा करणार्‍या सचिनची धावांची भूक अद्याप शमलेली नाही. प्रत्येक डावात सरासरी ८५ धावा करणारे सचिन नावाचे रन मशिन टीम इंडियासाठी अजूनही वेगाने कार्यरत आहे. दक्षिण आङ्गि्रकेविरुद्ध सचिनने कसोटीत सात शतके आणि पाच अर्धशतके केली आहेत. त्याने कसोटीत १४ हजार ५०० धावांचा (५० शतके आणि ५९ अर्धशतके) टप्पा ओलांडला आहे.

Sunday, 19 December 2010

जमिनीच्या मालकीहक्कातून पारोडा येथे गोळीबार

मायलेक गंभीर; संशयिताला अटक; बंदूक जप्त
मडगाव, दि. १८(प्रतिनिधी): जमिनीच्या वादावरून आज पारोडा येथे एकाने केलेल्या बंदुकीच्या गोळीबारांत मायलेक गंभीर जखमी झाल्याने त्यांना बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आईची प्रकृती चिंताजनक असल्याचे इस्पितळातील सूत्रांनी सांगितले.
मायणा कुडतरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी अँथनी त्रावासो (७०) याला अटक करून त्याच्याकडील बारा बोअरची बंदूक जप्त केली आहे.
माहितीनुसार, पारोडा येथे राहणारे त्रावासो व शेजारील चव्हाण कुटुंबात घराबाहेरील मोकळ्या जागेच्या मालकीवरून अधून मधून वाद होत असत. आज चव्हाण कुटुंबाने हा वाद सुरू असतानाच त्या जागेत पडवीचे बांधकाम सुरू केले त्याला अँथनी याने हरकत घेतली; पण या विरोधाला न जुमानता त्यांनी काम सुरूच ठेवले. या प्रकाराने संतप्त झालेल्या अँथनीने घरातून बारा बोअरची बंदूक आणली व मायलेकीवर गोळ्या झाडल्या.
यात छाया चव्हाण (२८) हिच्या जांघेला गोळी लागून ती गंभीर जखमी झाली तर तिची मुलगी पूजा हिलाही एक गोळी लागली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच मायणा कुडतरीचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर तेथे दाखल झाले. खबर मिळताच पोलिस अधीक्षक ऍलन डिसा व पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी तेथे धाव घेतली.
पोलिसांनीच जखमींना प्रथम हॉस्पिसियू इस्पितळात दाखल केले व त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गोमेकॉत हालविण्यात आले. पोलिसांनी अँथनी याला अटक केली असून सदर बंदूक जप्त केली आहे. तिच्या परवान्याबाबत तपास सुरू आहे. सर्वत्र गोवा मुक्तीदनाच्या सुवर्णमहोत्सवाची धामधूम सुरू असताना घडलेल्या या घटनेने पोलिसांची बरीच धावपळ उडाली.

‘मोळी’ हवी की स्थिर सरकार : पर्रीकर

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): गोवा आपला मुक्तिदिन सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना राजकीय पातळीवर जो तमाशा सुरू आहे, तो गोमंतकीयांसाठी एक दृष्टांतच ठरणारा आहे. विद्यमान आघाडी सरकारातील गोंधळ पाहिला तर पन्नास वर्षांच्या उंबरठ्यावर गोव्याचे राजकीय भवितव्य काय आहे याची दारुण अवस्था पाहायला मिळते, अशी परखड प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत पर्रीकर यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणी आपली कोणतीही भूमिका नसून हा आघाडीचा अंतर्गत मामला असल्याचे स्पष्ट केले. कोणताही ताळमेळ व विचारांची बैठक नसलेले लोक एकत्र आल्याचा हा परिणाम असल्याचा टोलाही त्यांनी हाणला. आघाडीचे घटक एकमेकांबरोबर आनंदाने नांदू शकत नाहीत, त्याचेच दर्शन या प्रकरणातून घडते. आता भविष्यात अशा ‘मोटली’ला (मोळी) निवडून द्यायचे की स्थिर व विकासाभिमुख सरकार देणार्‍या भाजपला मत द्यायचे याचा निर्णय जनतेलाच घ्यायचा आहे, असेही ते म्हणाले.
केवळ सत्तेसाठी एकत्र जमलेले हे घटक एकत्र नांदूच शकत नाहीत याचा प्रत्यय अनेक प्रकरणांतून आला आहे. आघाडीच्या एका नेत्याने आपल्याला फोन करून रात्री आठ वाजता शपथविधी सोहळ्याला आमंत्रण दिल्याचेही पर्रीकरांनी यावेळी उघड केले.

जुझेंना वगळा, मिकींची वर्णी लावा!

मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासमोर पेचप्रसंग
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): बाणावलीचे आमदार मिकी पाशेको यांची मंत्रिपदी वर्णी लावण्यासाठी जुझे फिलिप डिसोझा यांचा पत्ता कट होणार हे आत्ता निश्‍चित झाले आहे. त्यासंबंधीचा आदेश देणारे पत्रच आज राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश बिनसाळे व प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सुपूर्द केले. दरम्यान, मुख्यमंत्री कामत यांनी मात्र त्याबाबत सावध पवित्रा घेतला आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच या आदेशाची कार्यवाही करू, असे सांगून त्यांनी हा निर्णय तात्पुरता थोपवून धरला आहे.
आज दिवसभरात राजकीय घडामोडींना बराच वेग प्राप्त झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांना आपल्या पदाचे राजीनामा देण्याचे पत्र पाठवून दिले आहे. दरम्यान, श्रेष्ठींचा आदेश मानण्यास उभय मंत्र्यांनी स्पष्ट नकार दिल्याने आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी प्रकाश बिनसाळे गोव्यात दाखल झाले. प्रा. सिरसाट यांच्या सहीनिशी एक नवे पत्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना आज देण्यात आले. त्यात जुझे फिलिप डिसोझा यांना वगळून मिकी पाशेको यांची वर्णी मंत्रिपदी लावण्याचे स्पष्ट आदेश दिल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. आपण कॉंग्रेस श्रेष्ठींशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, मिकी पाशेको यांच्या मंत्रिमंडळ समावेशास मंत्रिमंडळातील बहुतांश कॉंग्रेस मंत्र्यांनी आक्षेप घेतला आहे. या मंत्र्यांनी मुख्यमंत्री कामत यांनाही याची माहिती दिली असून ती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवण्यात आली आहे. जुझे फिलिप डिसोझा व नीळकंठ हळर्णकर हे एकत्र असून त्यांनी आपल्याला अद्याप कोणतेही पत्र मिळाले नाही, असा पवित्रा घेतला आहे. या संपूर्ण घडामोडीत मुख्यमंत्री कामत यांची मात्र विचित्र परिस्थिती बनली आहे. मिकी पाशेको यांचा मंत्रिमंडळ समावेश सरकारच्या स्थिरतेलाच धोका ठरू शकतो, असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री कामत यांनी दिल्लीत पोचवल्याने त्याबाबत राष्ट्रीय स्तरावरच तोडगा काढावा, असेही त्यांनी सुचवल्याची खबर आहे.
पाशेकोंचे शपथविधीसाठी आमंत्रण
{‘H$s पाशेको यांनी आपल्या समर्थकांना रात्री ८ वाजता राजभवनावर शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले आणि प्रत्यक्षात त्यांच्या समर्थकांनी खरोखरच तिथे हजेरी लावली. राजभवनाच्या मुख्य गेटसमोरील सुरक्षा रक्षकांनी शपथविधी सोहळ्याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे सांगून या समर्थकांना परतवून लावले.
...तर राष्ट्रवादीशी फारकत घ्यावी लागेल
पाशेको यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यास कॉंग्रेस पक्षातील बहुतांश मंत्री व आमदारांनी हरकत घेतली आहे. हा निर्णय लादण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी श्रेष्ठींकडून झाला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडीतून वगळण्यात यावे, असा सुरही उमटला आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीला आघाडीतून वगळल्यास सरकारच्या स्थिरतेलाच धोका पोचू शकतो. एवढेच नाही तर राष्ट्रवादीला वगळल्यास कॉंग्रेसच्या दोन आमदारांना मंत्रिपदे मिळू शकतात व सरकारही अधिक मजबूत होऊ शकते. आता सरकार टिकवायचे की मिकी पाशेको यांना मंत्रिमंडळात प्रवेश देऊन अस्थिर बनवायचे हे श्रेष्ठींनीच ठरवावे, असा संदेश मुख्यमंत्री कामत यांनी दिल्लीत पोचवून हा चेंडू श्रेष्ठींच्या दरबारातच टोलवल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

मशालींच्या तेजाने उजळली गोमंतभूमी

पणजी, दि.१८(प्रतिनिधी): गोवा मुक्तीदिन सुवर्णमहोत्सवाला आज इथे मोठ्या दिमाखात आरंभ झाला. संध्याकाळी तीन विविध ठिकाणांहून निघालेल्या मशाल मिरवणुकीने पणजी शहर लखलखीत प्रकाशाने उजळून निघाले. ‘भारत मात की जय’, ‘जय हिंद’च्या घोषणांनी अवघी राजधानी दुमदुमली. तिन्ही मशाल मिरवणुकांचे आझाद मैदानावर मीलन होताच राष्ट्रभक्ती व राष्ट्राभिमानाने ओतप्रोत असेच वातावरण पसरले. हुतात्मा स्मारकाला वंदन करून उपस्थितांनी गोवा मुक्तीलढ्यात प्राणार्पण केलेल्यांना शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
आज मुक्तीदिन सुवर्णमहोत्सवी उद्घाटन सोहळा आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला होता. कला अकादमी, डॉ. बाबासाहेब आंबेेडकर उद्यान व आल्तिनो येथील जॉगर्स पार्क येथून तीन भव्य मशाल मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांत मोठ्या प्रमाणात शालेय, विद्यालयीन, महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतला. कला अकादमीकडील मिरवणुकीत मुख्यमंत्री दिगंबर कामत, कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, पणजी महापौर कॅरोलिना पो, अन्य नगरसेवक, स्वातंत्र्यसैनिक व नागरिक हजर होते. भाजपतर्फे आयोजित केलेल्या मशाल मिरवणुकीचे नेतृत्व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर तसेच भाजप समर्थक नगरसेवकांनी केले होते. या तिन्ही मिरवणुकांची सांगता आझाद मैदानावर झाली. या ठिकाणी समाज कल्याणमंत्री सुदिन ढवळीकर, सांताक्रुझच्या आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, वरिष्ठ सरकारी अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक व नागरिक हजर होते. यावेळी उपस्थितांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. मुख्यमंत्री कामत व अन्य मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्राभिमान हाच देशाचा पायाः नागेश करमली
कोणताही देश राष्ट्राभिमानावरच आपले भवितव्य घडवत असतो व त्यामुळे राष्ट्राभिमान बाळगा,असे आवाहन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांनी केले. गोवा मुक्तीलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांनी गोवा हे पूर्ण राज्य पाहायला मिळालेच पण त्याहीपेक्षा मुक्तीलढ्याच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणे हे परमभाग्य असल्याचे ते म्हणाले.
स्वातंत्र्याचा लाभ प्रत्येकाला मिळावाः मुख्यमंत्री
राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेव्हा स्वातंत्र्यांचा लाभ मिळेल तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालो, असे समजावे लागेल, असे मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले. या राज्याच्या मुक्तीसाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता पूर्णपणे आपले आयुष्य झोकून दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांमुळेच आपल्याला हा दिवस पाहायला मिळतो, असे ते म्हणाले.
इतिहास विसरू नकाः मनोहर पर्रीकर
आपल्याला खर्‍या अर्थाने राष्ट्राचा विकास व प्रगती करायची असेल तर इतिहास अजिबात विसरता कामा नये, असे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर म्हणाले. या सुवर्णमहोत्सवानिमित्त आपल्याला सिंहावलोकन करावे लागेल व आपण गेल्या पन्नास वर्षांत नेमके कुठे पोचलो आहोत हे पाहणे उचित ठरेल, असे ते म्हणाले. गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीने आगामी काळ महत्त्वाचा ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
दिशाहीन व निरुत्साही आयोजन
गोवा मुक्तीदिन सुवर्णमहोत्सवाच्या सरकारी आयोजनात अजिबात प्राण नव्हता हे मात्र प्रकर्षाने जाणवत होते. एरवी यशस्वी कार्यक्रम आयोजनाची ख्याती प्राप्त केलेल्या कला आणि संस्कृती खात्याकडे शेवटच्या क्षणी ही जबाबदारी सोपवण्यात आल्यानेही काही प्रमाणात गोंधळ उडाला. व्यासपीठावरील छोटासा बॅनर, तसेच आझाद मैदानावरील काळोख, संगीत बँडकडून देशभक्तिपर गीतांऐवजी इंग्रजी गीतांचे सादरीकरण आदी अनेक गोष्टी नागरिकांना खटकत होत्या. या कार्यक्रमाला एकाही मंत्र्याची हजेरी लाभली नाहीच; पण त्यात मशाल मिरवणुकीची सांगता होताच जमविण्यात आलेले विद्यार्थीही परत निघाल्याने खुच्यार्र् रिकाम्या राहिलेल्या दिसत होत्या. भाजपतर्फे आयोजित मशाल मिरवणुकीतील विद्यार्थी व पणजीतील काही नागरिक उपस्थित होते म्हणून काही प्रमाणात लाज राखली गेली. सुदिन ढवळीकर, व्हिक्टोरिया फर्नांडिस, पांडुरंग मडकईकर व मुख्यमंत्री कामत मात्र यावेळी हजर होते.

रक्ताच्या थेंबातून इतिहासाची निर्मिती

बाबासाहेब पुरंदरे व प्रभाकर सिनारींचे अनुभवकथन
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): देशहित समोर ठेवून निःस्वार्थीपणे कार्य करणार्‍या कर्मवीरांच्या घाम व रक्ताच्या थेंबांतूनच इतिहासाची निर्मिती होते. प्रभाकर सिनारी यांचे कार्य एका निधड्या छातीच्या गौरवशाली स्वातंत्र्यवीराचे आहे. त्यांचा सशस्त्र लढा चित्रपट व माहितीपटांतून लोकापुढे येणे गरजेचे आहे. गोवा सरकारने तसा प्रयत्न का केला नाही, अशी खंत इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज येथे बोलताना व्यक्त केली. केरी सत्तरी येथील स्वामी विवेकानंद इतिहास संशोधक मंडळातर्फे गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून गोवा दमण व दीव स्वातंत्र्य लढ्यात ५२ वर्षांपूर्वी बरोबरीने काम केलेले बाबासाहेब पुरंदरे व प्रभाकर सिनारी यांच्या अनुभव कथनाचा तथा प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम राज्य वस्तू संग्रहालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. या प्रसंगी श्री. सिनारी व प्रकट मुलाखत घेणारे प्रा. भूषण भावे व्यासपीठावर उपस्थित होते. दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांची ५२ वर्षांनी एकत्रित भेट झाल्यानंतर दोघांनीही गोवा मुक्तिलढ्याच्या स्मृतींना उजाळा दिला व अनेक प्रसंगाबद्दल सविस्तर माहिती दिली.
\u2355?शिवचरित्राकडे वळण्याबाबत बोलताना श्री. पुरंदरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी राजांच्या घराण्याचे व आपल्या घराण्याचे जवळचे सबंध होते. त्यांचे वडील शहाजी राजे व आई जिजाई यांनी लिहिलेली पत्रे आपल्या बालपणी आपणास घरी मिळाली, त्यांच्या अभ्यास करताना शिवछत्रपतींवरील पुस्तके वाचत गेलो. आपल्या लढाऊ व देशप्रेमी मनाने शिवचरित्राचा बारकाईने अभ्यास सुरू केला. गोवा मुक्तिलढ्यातील सहभागाबद्दल बोलताना बाबासाहेब म्हणाले की, नगर हवेली सशस्त्र लढ्यात आपण प्रभाकर सिनारींच्या नेतृत्वाखाली भाग घेतला. गोव्याच्या सीमेवरील अनेक गावात स्वातंत्र्यसैनिकांसोबत भ्रमंती केली. यावेळी सिनारींचे धैर्य व शौर्य आपल्या मनावर कायमचे ठसा उमटवून गेल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा मुक्तीच्या वेडानेच सशस्त्र लढा उभारला : सिनारी
पारतंत्र्यात असताना अवती भोवती पोर्तुगीजांकडून केले जाणारे अत्याचार पाहून मन पेटून उठले व लोहियांच्या मुक्तिलढ्याच्या रणशिंगाने त्यात चेतना जागवली. गोवा स्वतंत्र केल्याशिवाय सहजपणे प्राण सोडायचा नाही या एकाच निर्धाराने अनेक वेळा पोर्तुगीजांच्या तावडीतून निसटलो. किल्ल्यावरून उड्या मारल्या, तळ्यात रात्री काढल्या, घर, संसार, शिक्षण याकडे दुर्लक्ष करून अनेक यातना सहन केल्या, गोळ्या झेलल्या, असे निधड्या छातीच्या सिनारी यांनी सांगितले.
या वेळी गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी दिनाच्या पूर्वसंध्येला युवकांना संदेश देताना बाबासाहेब म्हणाले की, निराश होऊ नका आहे, ज्या विभागात काम करता ते नेकीने करा, देशभक्तीचा विसर न पडता व्यसन, भ्रष्टाचार, दुराचार न करता सत्कर्म करीत बेचैनीत जगा व चैनीत मरून अमर व्हा!
तर प्रभाकर सिनारी यांनी स्वातंत्र्यात जगायला मिळणे हे भाग्य असून स्वातंत्र्य सांभाळण्यासाठी सतर्क राहा, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवून देशहित साधण्यास युवकांनी सहभाग दाखवावा असे आवाहन केले.
या प्रसंगी बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते श्री. सिनारी यांचा तर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कांता घाटवळ यांच्या हस्ते श्री. पुरंदरे यांचा गौरव करण्यात आला. स्वागत विवेकानंद इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष वरद सबनीस यांनी केले. ओळख सुधीर सबनीस यांनी केली तर सूत्रनिवेदन प्रा. पौर्णिमा केरकर यांनी केले. स्नेहा सुतार हिने ईशस्तवन सादर केले. सचिन मदगे यांनी आभार व्यक्त केले.

भाजयुमोची १२ जाने.पासून ‘राष्ट्रीय एकता यात्रा’

नवी दिल्ली, दि. १८ : भारतीय जनता युवा मोर्चा १२ जानेवारीपासून १५ दिवसांची ‘राष्ट्रीय एकता यात्रा’ प्रारंंंंंंभ करीत असून ११ राज्यांचा प्रवास करून ही यात्रा अखेर २६ जानेवारी रोजी श्रीनगर येथील लालचौकात पोचेल व तेथे तिरंगा ङ्गडकवील. या यात्रेदरम्यान दहशतवाद व भ्रष्टाचाराच्या मुद्यासह अनेक मुद्यांवर केंद्रातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.
भाजयुमोचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ११ जानेेवारी २०११ ला म्हणजे स्वामी विवेेकानंद यांच्या जन्मदिनी ‘राष्ट्रीय एकता यात्रे’ला कोलकाता येेेथून प्रारंभ होईल आणि शेवट २६ जानेवारी रोजी श्रीनगरमधील लालचौकात भारताचा तिरंगा ङ्गडकावून होईल.

मोदींनी डागली राहुलवर तोफ
मुंबई, दि. १८ : भारतातील नेतेच जर अमेरिकेला हिंदू दहशतवादी जास्त घातक असल्याचे सांगत असतील तर, पाकिस्तानबाबत अमेरिका एवढी मवाळ का? याचे उत्तर आपल्याला कळले असेलच. अशा शेलक्या भाषेत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर तोङ्ग डागली.
कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी अमेरिकन राजदूतांकडे केलेले वक्तव्य नुकतेच विकिलिक्सने उघड केले. त्यात राहुल यांनी लष्कर-ए-तोयबापेक्षा हिंदू दहशतवादी हे देशासाठी अधिक घातक असल्याचे म्हटले आहे. या विधानानंतर विरोधकांनी राहुल यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू केला.
जगातील सर्व देशांनी पाकिस्तान हा दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश असल्याचे मान्य केले आहे. तेथे दहशतवाद हाही एक मोठा उद्योग आहे. अशा पाकिस्तानच्या बाजूने कायमच अमेरिका बोलते, यामागे असे नेते कारणीभूत असतात अशी पुष्टीही यावेळी मोदी यांनी जोडली. या सार्‍या भाषणांमध्ये त्यांनी राहुल गांधी यांचे थेट नाव घेणे मात्र कौशल्याने टाळले.
तसेच हिंदुत्ववादी नेत्या उमा भारती यांनीही राहुल यांच्यावर टीका केली आहे. राहुल यांचे हे वक्तव्य बेजबाबदार असून संपूर्ण कॉंग्रेस पक्षच बेजबाबदारपणे वागत आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. देशाला लष्कर-ए-तोयबापासून सर्वाधिक धोका असून राहुल गांधींनी समजूतदारपणे वक्तव्य करावे, असा सल्लाही भारती यांनी दिला.