Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 11 June, 2011

सुशिला फातर्पेकर खूनप्रकरणी महानंद नाईक याला जन्मठेप

पणजी, दि. १० : मालेभाट कुडका तिसवाडी येथील कु. सुशिला फातर्पेकर (३२) हिच्या खूनप्रकरणी फोंड्यातील सीरियल कीलर महानंद नाईक याला उत्तर गोव्याच्या जिल्हा व सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी दोषी ठरवत आज जन्मठेप सुनावली. ज्येष्ठ सरकारी वकील सुभाष देसाई यांनी या प्रकरणी सर्व साक्षीदारांच्या जबान्या नोंदवून घेतल्या होत्या. तर अंतिम युक्तिवाद पी. पी. टी. एस. सार्दीन यांनी केला होता.
सुशिला ही दोनापावल येथील मणिपाल इस्पितळात कामत कर होती. ऑक्टोबर २००७ मध्ये तिचा संपर्क महानंद याच्याशी आला. याच दरम्यान महानंद याने आपल्या एक महिन्याच्या बालिकेला या इस्पितळात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी महानंद याने सुशिला हिला लग्नाचे आमिष दाखवत आपले नाव सुहास गावडे असल्याचे सांगितले. २४ ऑक्टोबर २००७ रोजी सुशिला अंगावर दागिने घालून कामाला म्हणून बाहेर गेली ती घरी परतलीच नाही. महानंद याने तिचा ताळगाव येथील गोवा विद्यापीठाच्या मागे जंगलात दुपट्ट्याने गळा आवळून निर्घृण खून केला. तिच्या अंगावरील दागिने लंपास करून ते काझीवाडा फोंड्यातील एका सोनाराला विकले.
याप्रकरणी आगशी पोलिस निरीक्षक विश्‍वेश कर्पे यांनी तपासकाम करत २४ मे २००९ रोजी त्या जंगलातील मानवी हाडे जप्त केली. महानंदने सुशिलाला मोबाईल क्रमांक लिहून दिला होता. ते हस्ताक्षरही आरोपीचे असल्याचे नंतर सिद्ध झाले होते.
या खटल्यात सरकारी वकील ऍड. देसाई यांनी मणिपाल इस्पितळाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विशाल सावंत तसेच खास न्यायदंडाधिकारी मारिया मास्कारेन्हस यांचीही साक्ष घेतली होती. महानंदने दिलेल्या कबुलीजबाबात सुशिलाचा आपण खून केल्याचे निवेदन दिले होते.
आरोपीला भा.द.स. कलम ३६४ (अपहरण करणे), ३०२ (खून करणे), ३९२ (जबरी चोरी करणे), २०१ (पुरावा नष्ट करणे) या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेबरोबरच अतिरिक्त शिक्षा ठोठावण्यात आली आहे. महानंद याला जन्मठेप होण्याचे हे एकमेव प्रकरण असून अजून अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. निरीक्षक श्री. कर्पे यांचे नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहेत.

No comments: