Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 8 February, 2008

साखळी नगराध्यक्षपदी
विजयकुमार वेरेकर

साखळी, दि.7 (वार्ताहर) - साखळीच्या नगराध्यक्षपदी विजयकुमार वेरेकर यांची, तर उपनगराध्यक्षपदी आनंद गोपी नाईक यांची आज निवड झाली. काल दि. 6 रोजी विश्वजित राणे यांच्या बंगल्यावर बोलाविलेल्या बैठकीत विजयकुमार वेरेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
आज झालेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन्हीही पदांच्या एक एक अर्जाची निवडणूक अधिकारी या नात्याने उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांनी नावे वाचून दाखविली आणि सदर पदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. वेरेकर यांची नगराध्यपदी, तर नाईक यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी सोबत डिचोलीचे उपजिल्हाधिकारी अरविंद बुगडे, पाळीचे आमदार गुरुदास गावस, साखळीचे भानुदास नाईक उपस्थित होते. नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नूतन नगराध्यक्षांनी "स्वच्छ साखळी, सुंदर साखळी' बनविण्याचा, तसेच सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन विकासकामांचा संकल्प सोडला. यावेळी बाबा देसाई, रियाज शेख, सुनीता वेरेकर, दिलीप देसाई, यशवंत भाडकर, पूजा डांगी, सौ. नाईक व ब्रह्मानंद देसाई हे नूतन नगरसेवक उपस्थित होते.
फोंडा नगराध्यक्षपदी संजय नाईक
उपनगराध्यक्षपदी दीक्षा नाईक

फोंडा, दि. 7 (प्रतिनिधी)- फोंड्याच्या नगराध्यक्षपदी संजय माणू नाईक, तर उपनगराध्यक्षपदी सौ. दीक्षा दिलीप नाईक यांची आठ विरुद्ध पाच मतांनी आज दुपारी निवड करण्यात आली.
नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी आज सकाळी नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पणजीचे उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये होते. नगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेस समर्थक गटातर्फे संजय माणू नाईक, विरोधी गटातर्फे सौ. राधिका श्रीकांत नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उपनगराध्यक्षपदासाठी कॉंग्रेस समर्थक गटातर्फे सौ. दीक्षा नाईक, विरोधी गटातर्फे दिनकर मुंडये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. कॉंग्रेस पुरस्कृत संजय नाईक आणि सौ. दीक्षा नाईक यांना प्रत्येकी आठ मते मिळाली, तर विरोधी गटाच्या उमेदवार सौ. राधिका नाईक, दिनकर मुंडये यांना प्रत्येकी पाच मते मिळाली. या बैठकीला नगरसेवक प्रदीप नाईक, व्हिन्सेंट फर्नांडिस, सौ. दीक्षा नाईक, संजय नाईक, सौ.राधिका नाईक, शिवानंद सावंत, दिनकर मुंडये, किशोर नाईक, शैलेंद्र शिंक्रे, सौ. रूक्मा डांगी, व्यंकटेश नाईक, दामोदर नाईक, वंदना जोग उपस्थित होत्या. पालिका मुख्याधिकारी जयंत तारी हेही यावेळी उपस्थित होते. अपक्ष नगरसेवक व्हिन्सेंट फर्नांडिस, व्यंकटेश नाईक कॉंग्रेस समर्थक गटात सहभागी झाल्याने त्या गटाची संख्या आठ झाली आहे. कॉंग्रेस समर्थक गटात नगराध्यक्षपदावरून धुसफूस सुरू होती. त्यावर सर्वमान्य तोडगा म्हणून शेवटी नगराध्यक्षपदाची माळ संजय नाईक यांच्या गळ्यात पडली आहे.नूतन नगराध्यक्षांचे मनोगत
पालिकेच्या सर्व नगरसेवकांना विश्र्वासात घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे मनोगत नूतन अध्यक्ष संजय नाईक यांनी व्यक्त केले. फोंडा शहरात आमदार तथा गृहमंत्री रवी नाईक यांनी सुरू केलेली पार्किंग जागा विकास, रस्ता रुंदीकरण आदी कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. शहरात सुसज्ज बाजार संकुल उभारण्यासाठी आमदारांच्या साहाय्याने प्रयत्न केले जातील. पालिकेला भेडसावणारी कचरा समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. पालिकेच्या विविध प्रभागांतील मोकळ्या जागा विकसित करण्याकडे लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पालिकेचा कारभार सुटसुटीत करण्याकडे लक्ष दिले जाईल. लोकांची पालिका कार्यालयातील कामे वेळेवर पूर्ण व्हावीत, लोकांना पालिका कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
कार्निव्हल मिरवणुकीत राष्ट्रध्वज
उलटा लावल्याबाबत पोलिस तक्रार

पणजी, दि. 7 (प्रतिनिधी) - पणजी शहरात पर्यटन विकास महामंडळाने आयोजित केलेल्या कार्निव्हल मिरवणुकीत भारताच्या ध्वजाची अवहेलना करीत राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याबाबत पर्यटन खात्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. व्ही. डी. नाईक यांनी पणजी पोलिस स्थानकात ही तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी राष्ट्रीय प्रतीक अवमान प्रतिबंधक कायदा कलम 2 नुसार तक्रारीची नोंद करून घेतली आहे. चित्ररथावर उलट्या फडकावलेल्या ध्वजाचे छायाचित्र दैनिक "गोवादूत'नेच 3 फेब्रुवारीच्या अंकात पहिल्या पानावर प्रसिद्ध करून या प्रकाराला वाचा फोडली होती.
ब्राझील व भारताच्या संस्कृतीत, खाद्य पदार्थांत, राहणीमानात साम्य असल्याचा दावा करून पर्यटन विकास महामंडळाने "ब्राझ इंडिया' या नावाने हा कार्निव्हल आयोजित केला होता. यावेळी सरकारच्याच चित्ररथावर भारताचा राष्ट्रध्वज उलटा फडकावण्यात आल्याने काही देशप्रेमी नागरिकांनी मिरवणुकीच्या अर्ध्यावर आक्षेप घेऊन ध्वज व्यवस्थित लावण्याची मागणी केली होती. परंतु यावेळी ध्वज व्यवस्थित करून न लावला, तो पूर्णपणे काढूनच ठेवण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून सरकारी पातळीवर गोव्यात सर्रासपणे राष्ट्रध्वजाचा अपमान केला जात आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्यावेळी मनोरंजन संस्थेच्या इमारतीवर एका तारांनी बांधलेल्या लोखंडी पाइपला राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. त्यावेळी वाऱ्याने अनेक वेळा तो खालीही पडला होता. यावेळी काही पत्रकारांनी आक्षेप घेतल्यावर तो काढून ठेवण्यात आला. त्यानंतर जुन्या सचिवालयासमोर असलेल्या ध्वजस्तंभावर फाटका ध्वज चढवण्यात आला होता. "गोवादूत'ने वेळोवेळी या गैरप्रकारांना वाचा फोडली होती. शिक्षण खात्याच्या इमारतीवर उशिरापर्यंत राष्ट्रध्वज फडकण्याचा प्रकार घडला होता. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर रात्री 8 पर्यंत ध्वज फडकत होता. परंतु त्यावेळी कोणावरही कारवाई किंवा सरकारी पातळीवर साधी चौकशीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे पुन्हा पुन्हा भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान होण्याच्या प्रकारांचे कारण काय असावे, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

निवडणुकीत गैरप्रकार झाल्याची
निवडणूक आयुक्तांकडे तक्रार

पणजी, दि. 7 (प्रतिनिधी)- अलीकडेच पार पडलेल्या साखळी नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी व गैरकारभार झाल्याची तक्रार निवडणूक लढवलेल्या काही उमेदवारांनी गोवा राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा ताबा मिळवून मतपत्रिकेतील मते बदलण्यापर्यंत काही लोकांनी मजल मारल्याचा आरोप करून या घोटाळ्यात येथील एक युवा मंत्री व त्याचे कार्यकर्ते सामील असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या सर्व अधिकारी व पोलिसांना हाताशी धरून हे कृत्य करण्यात आले असून याप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे.
या निवडणुकीसाठी नेमण्यात आलेला मुख्य अधिकारी तथा प्रशासक हा विद्यमान राजकीय नेत्यांशी अत्यंत जवळचा संबंध ठेवणारा असल्याने त्यांची नेमणूक हा या प्रकरणी संशयाचा महत्त्वाचा मुद्दा ठरल्याचेही यावेळी सांगण्यात आले. याप्रकरणी नागरिकांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात मतपत्रिकेतील यादीत घोळ, ओळखपत्र सादरीकरणाची सक्ती शिथिल करण्यात आली, उमेदवारांना मतदानकेंद्राकडे हजर राहण्यास बंदी टाकण्यात आली , मतपेट्या सीलबंद केल्यानंतर निवडणूक एजंटांना सही करण्यापासून परावृत्त करण्यात आले, मतपेट्या घालून नेलेल्या पिशव्या सीलबंद करण्यात आल्या नाहीत, मतपेट्या कुठे ठेवल्या जातील याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती उमेदवारांना देण्यात आली नाही व या जागेसंबंधी अधिसूचनाही काढली नाही, मतपेट्या प्रत्यक्ष मोजणीवेळी खुल्या वाहनांतून आणल्या गेला, ज्याचा ताबा कोणाही अधिकृत अधिकाऱ्याकडे नव्हता, मतदान एजंटांना मतमोजणी एजंट न बनवण्याचा निर्णय कोणत्या आधारावर घेण्यात आला, मतमोजणीवेळी गडबड गोंधळाने कार्यभाग आटोपता घेतला, प्रत्यक्षात मतदानावेळी वापरात घेतलेली व नंतर मतपेटीत सापडलेली मतदानपत्रिका वेगळी असल्याचा दावा, मतमोजणीवेळी उमेदवारांकडून फेरमोजणी किंवा तपासणीची केलेली विनंती फेटाळण्यात आली, अशा अनेक गोष्टी या तक्रारीत नमूद करण्यात आल्या आहेत. ही निवडणूक पूर्णपणे "हायजॅक" करण्यात आल्याने ती रद्दबातल ठरवून त्याची सखोल चौकशी करावी,अशी मागणी या लोकांनी केली आहे.

Thursday, 7 February, 2008

राज्यात नवजात शिशूंची तपासणी सक्तीची
० १२ वर्षांच्या सेवेनंतर शिक्षकांना ज्येष्ठ वेतनश्रेणी
० निवृत्तीमुळे वंचित राहिलेल्या शिक्षकांना २ महागाई भत्ते
० सायबर एज संगणकांसाठी निविदा काढणार
० आपत्कालीन व्यवस्थापन निधी मदत १ लाख रुपयांवर
० गोमेकॉ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना मंजुरी
० सोनसोडो कचरा प्रकल्प पूर्णत्वास नेणार
० हवालदार (चालक) वेतनश्रेणी वाढीस मान्यता

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)- राज्यात यापुढे नवजात शिशूची जन्मानंतर सात दिवसांच्या आत स्क्रिनींग सक्तीची करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अर्भकाच्या निरोगीपणाचे निदान करण्यासाठी सरकारी इस्पितळात ही सोय उपलब्ध करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिली.
आज पर्वरी मंत्रालयात परिषदगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, गृहमंत्री रवी नाईक, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव व मुख्य सचिव जे. पी. सिंग उपस्थित होते.
सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अलीकडेच आरोग्य सल्लागार समितीबरोबर विदेश दौरा केला. दुबई, सिंगापूर आदी देशांत अशा प्रकारे नवजात अर्भकाची तपासणी करण्याची सक्ती असून गोव्यातही तो कायदा लागू करावा, अशी शिफारस या समितीने केली होती. शिशू जन्मल्यानंतर सात दिवसांच्या आत ही तपासणी करावे लागते. राज्यात प्रतिवर्ष १२,५०० नवजात शिशू जमेस धरल्यास वर्षाकाठी सरकारला सुमारे १ कोटी ८७ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे.
गृहमंत्री रवी नाईक यांनी हवालदार (चालक) यांची वेतन वाढीची प्रलंबित मागणी मंजूर करून घेतली. ३२०० ते ४९०० या वेतनश्रेणीत असलेल्या या पोलिस कर्मचाऱ्यांना आता ४ ते ६ हजार ही वेतनश्रेणी लागू होणार आहे. या निर्णयामुळे त्यांच्या पगारात किमान दीड हजार रुपयांची वाढ होणार असून ती २००१ पासून थकबाकीसह लागू केली जाणार आहे.
राज्यातील नेमणूक झालेल्या शिक्षकांना १२ वर्षांच्या सेवेनंतर ज्येष्ठ वेतनश्रेणी लावण्याची मागणी यावेळी मंत्रिमंडळाने मान्य करून घेतली आहे. ती ताबडतोब लागू करून घेताना निवृत्त झालेल्या शिक्षकांना हा लाभ मिळावा यासाठी दोन महागाई भत्ते देण्याचाही निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली. राज्य सरकार व केंद्र सरकार दरम्यान जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनर्निर्माण मिशनसंदर्भात सामंजस्य करार सही करण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या मिशनअंतर्गत केंद्र सरकारकडून निधी पुरवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सायबरएज योजनेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना संगणक मिळवून देण्यासाठी "एज्यूनेट" योजना राबवली जाणार आहे. निविदा काढण्यात आल्या असून सर्वांना लवकरच संगणक पुरवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या संगणकांसाठी अर्ज केलेल्या व पैसे भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ते देण्याचेही मान्य करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा राज्य आपत्कालीन व्यवस्थापन निधीद्वारे करण्यात येणाऱ्या सहाय्याची रक्कम ५० हजारांवरून एक लाख रुपयांवर नेण्यात आल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान, कृषीहानी आदींसाठी ही मदत केली जाते.
गोवा मेडिकल कॉलेजमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी कामगार नेते पुती गावकर यांच्या नेतृत्वाखाली पुकारलेला संपही यशस्वी झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मान्य करून घेतल्या असून या लोकांना मिळणारे सगळे भत्ते मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सोनसडा येथील नियोजित कचरा प्रकल्पाबाबत अनिश्चिततेची चर्चा असली तरी हा प्रकल्प कोणत्याही पद्धतीत पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मेल पाठवण्याची अनोखी तऱ्हा
ते पाकिस्तानमधील दहशतवाद्यांस सर्व माहिती पुरवण्यासाठी संगणकाचा वापर करीत होते, परंतु मेल्स पाठवण्यासाठी ते अनोखी पद्धत वापरत असत. कोणतीही माहिती पुरवायची असल्यास ते आपल्या "मेल आयडी' मध्ये संदेश टाइप करून तो ड्राफ्टमधे तसाच सोडून देत होते. त्यानंतर पाकिस्तानातील व्यक्ती त्यांचेच युजरनेम व पासवर्ड वापरून ती "मेल' उघडून वाचत असत.
दहशतवाद्यांची गोव्यात ३ वेळा टेहळणी

एकदा पणजीतील हॉटेलात वास्तव्य

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) ः हैदराबाद येथे पकडण्यात आलेले लष्कर ए तोयबाचे दहशतवादी गेल्या ३१ डिसेंबरला उत्तर गोव्यातील कळंगुट या गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यावर बॉम्बस्फोट घडवणार होते, त्यासाठी पूर्वतयारी म्हणून ते एकदा नव्हे, तर तीन वेळा गोव्यात येऊन गेले होते, अशी माहिती मिळाली आहे.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे दोघेही दहशतवादी पणजीतील एका हॉटेलमध्ये आपली कोणतीही तपशिलवार माहिती न देता एक रात्र राहून गेल्याचे उघड झाले आहे. गोव्यात बॉम्बस्फोटाचा कट आखण्यासाठी हे दोघेही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असे तीन वेळा गोव्यात आले. दोनवेळा चोरीच्या दुचाकीवरून गोव्यात आले. त्यावेळी त्यांनी सर्व समुद्रकिनाऱ्यांवर फिरून कटाची आखणी केली. तिसऱ्यावेळी ते बसमधून आले होते, त्यावेळी ते पणजीतील एका हॉटेलमध्ये उतरले होते. मोले चेक नाका सताड उघडा असल्याने आणि त्याठिकाणी पैसे घेऊन गाड्यांना प्रवेश देत असल्याने उघड झाल्याने चोरीच्या दुचाक्या वापरून दहशतवादीही बिनधास्तपणे गोव्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पाहणीनंतर त्यांनी ३१ डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी असल्याने त्यांनी त्या दिवसाची विस्फोट करण्यासाठी निवड केली होती. परंतु त्यासाठी लागणारे "आरडीएक्स' व पैसे उपलब्ध झाले नसल्याने कट अयशस्वी ठरला. परंतु त्यानंतरही त्यानी बेत रद्द केला नव्हता. रझिउद्दीन नासीर याने पाकिस्तानात लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेकडून बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतलेले असल्याने त्याने येथेच बॉम्ब बनवण्याची योजना आखली होती. त्यासाठी त्याने जानेवारी महिन्यात पुन्हा येऊन बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे रसायन उपलब्ध होते का, याची चाचपणी केली होती, परंतु तेही त्यांना न जमल्याने ते दावणगिरीला रवाना झाले. यावेळी दावणगिरीतून हुबळीकडे जाताना हेल्मेट न घातल्याने त्यांना वाहतूक पोलिसांनी हटकले आणि हे खतरनाक दहशतवादी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत दोन बनावट नंबरप्लेट व काही डॉलर सापडल्याने त्यांच्यावरील संशय बळावला.
मे २००६ मध्ये प्रशिक्षण पूर्ण करून नासीर हा नेपाळमार्गे भारतात आला होता. येथून थेट तो हैदराबाद येथे आला. आधी त्याने या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा बेत आखला होता. परंतु त्याला जास्त कोणाची साथ मिळाली नाही. त्यानंतर तो हुबळी येथे आला. येथे एका मित्राकडून असदुल्ला बाशा याची ओळख झाली. असदुल्ला बाशा हा हुबळी येथे आयुर्वेदिक महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत होता. याची मैत्री झाल्यानंतर त्यांनी सोबत काम करण्याचे ठरवले. येथेच त्याला बंदी घालण्यात आलेल्या "सिमी' संघटनेचे काही सदस्य मिळाले. या "सिमी' सदस्यांनी नासीर याला गोव्यात भरपूर विदेशी पर्यटक येत असल्याने त्याठिकाणी विस्फोट करण्याचा सल्ला दिला होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

पोलिसांनी हैदराबादेत पकडलेला संशयित दहशतवादी रझिउद्दीन नासीर ऊर्फ मोहमद घौस व त्याचा साथीदार असादुल्ला बाशा यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून गोव्याला दहशतवाद्यांकडून खराच धोका असल्याचे आज त्या अधिकाऱ्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले. या संशयित दहशतवाद्यांची उलटतपासणी करण्यासाठी गेलेले गोव्याचे पोलिस पथक आज गोव्यात परतले. याविषयी पोलिस महानिरीक्षक किशनकुमार यांना विचारले असता, पोलिस खात्याबरोबर सर्व हॉटेलचालकांनी व हॉटेलना परवाना देणाऱ्या खात्याने दक्ष राहण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. अन्यथा गोव्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
रवी नाईक यांचा इशारा
किनारी भागात मोठ्या प्रमाणात लोक येऊन भाड्याच्या खोलीत राहतात. त्याची कोणतीही माहिती न घेता येथील ग्रामस्थ त्यांना खोल्या उपलब्ध करून देतात. पोलिसांनी अनेक वेळा सांगूनही लोकांनी पोलिसांना पूर्ण माहिती न दिल्यास आणि सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यावेळी पोलिस सतावत असल्याचे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत, असे गृहमंत्री रवी नाईक यांनी आज सांगितले.

मोले येथे दुहेरी खून
हत्येनंतर डिझेल ओतून मृतदेह जाळले
फोंडा, दि. ६ (मोले व फोंडा प्रतिनिधी) - नंद्रण - मोले गावात जाणाऱ्या रस्त्यावर निर्जनस्थळी आज पहाटे चार ते पाच या वेळेत दुहेरी खुनाची एक घटना घडली असून एक पुरुष व एक महिला यांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
घटनास्थळी सापडलेले मृतदेह एखाद्या दांपत्याचे की अन्य कोणाचे हे स्पष्ट झालेले नसले, तरी पोलिस शोध घेत आहेत. हे दोन्ही खून नियोजनबद्धरीत्या करून जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नंद्रण गावापासून केवळ तीनशे ते चारशे मीटर अंतरावर हे दुहेरी खून प्रकरण घडले आहे. नंद्रण गावातील एक नागरिक आज सकाळी साडे सहाच्या सुमारास आपला टिप्पर ट्रक घेऊन मोले येथे जात असता वाटेत रस्त्यावर एक मृतदेह जळत असल्याचे पाहून माघारी फिरला. ट्रक मागे घेऊन तो परत गावात आला. याच वेळी नंद्रण गावातील महेश गोविंद गावकर व त्याचा साथीदार मोले येथे जाण्यासाठी निघाले होते. ट्रक मागे येत असल्याने त्यांनी ट्रक चालकाला परत येण्याचे कारण विचारले असता, त्याने रस्त्यावर मृतदेह जळत असल्याचे सांगितले. त्यानंतर महेश व त्याचा साथीदार आणखी काही जणांसह घटनास्थळाजवळ गेले. त्यांनी दुरून आजूबाजूला पाहणी केल्यानंतर महेश हा खुनाचा प्रकार असल्याची कल्पना आली. या घटनेची माहिती देण्यासाठी तो मोले पोलीस चौकीवर गेला. सकाळी ७.१५ वाजता मोले पोलिसांना यासंबंधी माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला असता आणखी एक मृतदेह असल्याचे आढळून आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुळेचे पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. फोंडा येथील विभागीय अधिकारी उपअधीक्षक महेश गावकर, फोंड्याचे पोलिस निरीक्षक मंजुनाथ देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली.
महिलेचा मृतदेह रस्त्यावर जाळण्यात आलेल्या स्थितीत होता. सकाळी ७ वाजता सुध्दा महिलेचा मृतदेह जळत होता, असे स्थानिकांनी सांगितले. तिचा दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून करण्यात आल्यानंतर तिच्या अंगावर डिझेल ओतून आग लावण्यात आल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. पुरुषाच्या पाठीवर सुऱ्याने वार करण्यात आला आहे, तसेच त्याचा गळा चिरण्यात आला आहे. खुन्याच्या हातातून निसटून पळ काढण्याचा प्रयत्न पुरुषाने केल्याचे एकंदर परिस्थितीवरून दिसत आहे. खुन्यांनी पुरुषाचा पाठलाग करून थोड्या अंतरावर रस्त्याच्या बाजूला झुडपात पकडून त्याच ठिकाणी त्याच्यावर सुऱ्याच्या साहाय्याने वार करून जखमी करून त्याच्यावर सुध्दा डिझेल ओतून त्याला आग लावली. डिझेल आणण्यासाठी वापरण्यात आलेला कॅन त्या मतृदेहाशेजारी जळालेल्या स्थितीत आढळून आला आहे. महिलेचा जाळण्यात आलेल्या ठिकाणापासून पुरुषाच्या मृतदेहापर्यंत सर्वत्र रक्त सांडलेले दिसून येत होते. घटनास्थळी रक्त मोठ्या प्रमाणात सांडले होते. खून करण्यात आलेल्यांच्या अंगावरील कपडे जळाले आहेत, तसेच मृतदेह जाळण्यात आल्यामुळे काळेठिक्कर पडले आहेत. पुरुषाचे एक चप्पल महिलेच्या मृतदेहाजवळ अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आले. एक चप्पल त्याच्या पायात होते, त्यामुळे तपासासाठी पोलिसांना एक धागा मिळाला आहे.
खून करणाऱ्यांनी आपल्या हाताचे ठसे मृतदेहावर मिळू नयेत यासाठी प्लास्टिकचे हातमोजे वापरले होते. घटनास्थळी तशा प्रकारचा एक हातमोजा सापडला आहे. हातमोजे एका कन्नड पेपरमध्ये बांधून आणण्यात आले होते. सदर पेपर मृतदेहाच्या शेजारी सापडला आहे. सुंभ, दोरीचे तुकडे, प्लास्टिक चप्पल, गुटखा पाकिटे घटनास्थळी आढळून आली आहेत.
त्या दोघांना खून करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाहून नंद्रण - मोले येथे वाहनातून आणण्यात आले असल्याचे एकंदर स्थितीवरून दिसून येत आहे. घटनास्थळी चार चाकी वाहनाच्या टायरचे पट्टे रस्त्याच्या बाजूच्या गवतावर आढळून आले आहेत. खून करणारे नंतर वाहनातून पळून गेले. या खुनाचा तपास करण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते.
उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक नीरज ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी राज्यात कोणी बेपत्ता आहेत का, याची माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. उपअक्षीक्षक महेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजुनाथ देसाई, कुळेचे निरीक्षक मनोज म्हार्दोळकर तपास करीत आहेत.
कोसंबी काळाच्याही पुढे गेलेले इतिहासकार - रोमिला थापर
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - दामोदर कोसंबी हे काळाच्याही पुढे गेलेले इतिहासतज्ज्ञ होते. प्राचिन इतिहासाचे अभ्यासक या नात्याने त्या काळातील राजे - महाराजे, व्यक्ती - विभूती, घटना एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी काळातील जाती व वर्णावर आधारित आधारीत समाजरचना, त्या त्या काळातील अर्थव्यवस्था, व्यापारउदिम याचा मार्क्सवादी विचारसरणीतून अभ्यास केला. या संशोधनात गणित, संख्याशास्त्र याचा प्रमुख्याने उपयोग केला. त्यामुळे त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये इतक्या वर्षांनंतरही मोठा फरक पडल्याचे दिसत नाही, असे गौरवोद्गार प्रसिध्द इतिहासतज्ज्ञ प्रा. रोमिला थापर यांनी आज येथे काढले. डी. डी. कोसंबी - विचारांचा महोत्सव या कला अकादमी येथे आयोजित व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या.
दामोदर कोसंबी यांनी इतिहासाकडे पाहताना त्या काळचा समाज आणि परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्राचीन काळातील ऐतिहासिक बदलांचा त्या काळच्या सामाजिक परिस्थितीवर पडलेला प्रभाव आणि त्यातून घडलेली बदलांची स्थित्यंतरे त्यांनी आपल्या इतिहास संशोधनातून दाखवून दिली. प्राचीन काळातील राज्यपध्दती, राजेशाही, सरंजामशाही, जाती व वर्ण यांच्यावर आधारित समाजरचना, व्यापार, महसूल व्यवस्था, कुटुंब पध्दती, ग्रामपध्दती अशा अनेक गोष्टींचा त्यांनी सामाजिक अर्थाने वेध घेतला. या अभ्यासातून त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि तर्क यांंना गणिताच्या आधारावर शास्त्राची जोड दिली. प्राचीन काळातील व्यापार - उदिम, त्यात काळानुरूप झालेले बदल, त्या त्या राजवटीतील चलन याचा त्यांनी केलेला अभ्यास फारच सखोल असून त्यांचे हे काम एकमेवाद्वितीय असल्याचे उद्गारही त्यांनी यावेळी काढले.
व्यासपीठावर या प्रसंगी महोत्सवाच्या निमंत्रक डॉ. मारीया आवरा कुटो, आयोजक तथा कला आणि संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, माहिती संचालक निखिल देसाई तसेच साहित्यिक दत्ता दामोदर नायक उपस्थित होते. डॉ. मारीया कुटो यांनी प्राचीन इतिहास संशोधनात डी. डी. कोसंबी यांचे योगदान या विषयाचे प्रास्ताविक केले, तर दत्ता नायक यांनी प्रा. थापर यांची ओळख करून दिली. सामाजिक क्षेत्र, शिक्षण, इतिहासाचे अभ्यासक, विद्यार्थी, नागरिक, पत्रकार यांची या प्रसंगी मोठी उपस्थिती होती.
चातुर्वर्ण्य पध्दती ही विविध कामांसाठी मनुष्यबळ पुरवणारी व्यवस्था होती, परंतु नंतर पुढे तिचे जातीय व्यवस्थेत रूपांतर झाले. कोसंबी यांनी ही सामाजिक संक्रमणावस्था अत्यंत समर्थपणे अभ्यासली असून तिला भक्कम अशा तार्किक आणि गणिती दाखल्यांचा आधार दिल्याचेही प्रा. थापर म्हणाल्या. नाण्यांचाही कोसंबी यांनी संशोधनासाठी प्रभावी वापर केला असून कोणते नाणे कोणत्या राजवटीतले हे त्याच्या वजन आणि स्वरूपावरून त्यांनी ठरवले आहे. त्यांचा हा अभ्यास फारच महत्वाचा आणि पुढील संशोधनाच्या दृष्टीनेही खूप महत्वाचा असल्याचे त्या म्हणाल्या.

Wednesday, 6 February, 2008

समन्वय समिती बैठकीतील निर्णय
० सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश
० नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते मुख्यमंत्र्यांकडे
० ज्योकीम आलेमाव यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता

० सा. बां. खाते राष्ट्रवादीकडे जाण्याचे संकेत
० नीळकंठ हळर्णकर यांना तिळारी पाटबंधारे विकास महामंडळाचे अध्यक्षपद
नार्वेकरांचे वित्त खाते; ज्योकीमचे मंत्रिपद जाणार
सुदिन मंत्रिमंडळात; नीळकंठना महामंडळ

पणजी,दि. ५ (प्रतिनिधी)- दिल्लीतील "फॉर्म्युल्या" ची अंमलबजावणी केल्यास आता गोव्यातील राजकीय "फॉर्म्युला" पुन्हा बिघडण्याची स्थिती कॉंग्रेस आघाडीत निर्माण झाली आहे. कॉंग्रेसचे निरीक्षक बी. हरिप्रसाद व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांचा मंत्रिमंडळातील समावेश व दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते काढून मुख्यमंत्र्यांकडे परत करण्याबरोबर खातेबदल करण्याबाबत शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीलायक माहिती आहे.
विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारच्या योग्य कार्यपद्धतीसाठी काही बदल करणे अपरिहार्य असून आघाडीतील वाद मिटल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कोणत्याही क्षणी होण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी यावेळी दिले. कॉंग्रेसचे निरीक्षक बी. हरिप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक आज दक्षिण गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलात पार पडली.
राष्ट्रवादीचे केंद्रीय नेते तथा केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल हे या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा खासदार फ्रान्सिस सार्दिन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मगोपचे आमदार सुदिन व दीपक ढवळीकर, राष्ट्रवादीचे नेते पर्यटनमंत्री मिकी पाशेको, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, आमदार नीळकंठ हळर्णकर यांची उपस्थिती या बैठकीला होती.
दिल्लीत मान्य केल्याप्रमाणे मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे यावेळी श्रेष्ठींनी मान्य केले आहे. दयानंद नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे देण्याबाबतही निर्णय झाल्याचे सूत्रांनी सांगितले. खातेवाटपातील बदल करण्याचाही निर्णय घेण्यात आला असला तरी हा बदल नक्की काय असेल याबाबत मात्र मौन पाळण्यात आले असून या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच सोपवण्यात आल्याने त्यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
दरम्यान, सुदिन ढवळीकर यांच्यासाठी मंत्रिपदाचा त्याग करण्यास कोणीही तयार नसल्याचे वृत्त आहे. सुदिन यांच्यासाठी ज्योकीम आलेमाव यांचा बळी घेतला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. यासंबंधी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. या तडजोडीप्रकरणी आता कोणत्याही बेशिस्तीस थारा दिला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत श्रेष्ठींनी दिल्याने ज्योकीम यांचा मंत्रिमंडळातील डच्चू जवळजवळ निश्चित झाल्याचे वृत्त आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते राष्ट्रवादीकडे येण्याचे संकेतही या बैठकीनंतर पक्षाच्या सूत्रांनी दिले. राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना मंत्रिपद देता येत नसले तरी त्यांची तिळारी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे. सुदिन ढवळीकर यांच्याकडे सा.बां.खाते न देता त्यांना शिक्षण खात्याची सोय केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सकाळपासून सुरू झालेल्या या बैठकीनंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला. संध्याकाळी मुख्यमंत्री कामत यांच्या सरकारी निवासस्थानी ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी हरिप्रसाद यांच्याशी चर्चा केली. यावेळी बाबूश यांच्या नियोजित कॉंग्रेस प्रवेश व 'आयटी हॅबिटेट' प्रकरणी बोलणी झाल्याचे संकेत आहेत.
"सेझ' विरोधी लढ्याचा आदर्श
जनतेच्या भावनांशी व अस्तित्वाशी खेळ करण्याचे धाडस केल्यास व जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहिल्यास कशा पद्धतीने बंड होऊ शकते हे गोमंतकीय लोकांनी "सेझ" रद्द करण्यास सरकारला भाग पाडून संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. अशा पद्धतीने गोव्याचा आदर्श राखून अन्यायाविरुद्ध व आपल्या सभोवताली घडणाऱ्या अमानवी कार्यपद्धतीबद्दल आवाज काढून बंड केल्यास ही परिस्थिती बदलणे अजिबात कठीण नाही, असे उद्गार पी.साईनाथ यांनी काढले.

चितांच्या प्रकाशात मेजवान्या
झोडू नका ः पी. साईनाथ

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः ""रोम जळत असताना फिडल वाजवणाऱ्या सम्राट निरो याच्यापेक्षा सभोवताली माणसांच्या चिता रचून त्यांच्या प्रकाशाने रात्री मेजवानी झोडणारे पाहुणे अधिक क्रूर होते. जीवनात कधीच अशा निरोचे पाहुणे बनू नका'' असा भावनिक सल्ला मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी येथे आज दिला.
कै. दामोदर कोसंबी शताब्दी महोत्सवाच्या "विचार उत्सव" व्याख्यान मालिकेत आज दैनिक "हिंदू'चे ग्रामीण पत्रकार व मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पी. साईनाथ यांचे "वाढती विषमता, मानवतेसमोरील धोका" या विषयावर व्याख्यान झाले.
जागतिकीकरणाच्या तालावर "इंडिया शायनिंग" चा झगमगाट आपल्या डोळ्यांना दीपवून टाकत आहे, तर दुसरीकडे याच झगमगाटामागे देशातील कित्येक लोक अजूनही केवळ जगण्यासाठी काळोखात चाचपडत आहेत. केवळ अन्नासाठी मोताद बनलेले लोक या देशात आहेत याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नसल्याचे ते म्हणाले. उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या मुलीचा लग्न सोहळा जगातील सर्वांत खर्चिक म्हणून वर्णिला जातो व येथे आपल्या मुलींना लग्न करण्याची ऐपत नसल्याने कित्येक शेतकरी पालक फासावर चढून देहत्याग करतात, हे भीषण चित्र अजूनही आपल्या संवेदनांना स्पर्शही कसे करीत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. रिलायन्सवाले अंबानी दर मिनिटाला ४० कोटी रुपये कमावत आहेत, तर दुसरीकडे देशातील २.४ दशलक्ष लोकांचे उत्पन्न दिवसाकाठी १७ रूपयांपेक्षाही कमी आहे, ही दुरावत जाणारी विषमता केवळ लोकशाहीच्या विद्ध्वंसाचीच नव्हे तर अमानवीपणाची बीजे रोवणारीच ठरेल, असा इशारा श्री. साईनाथ यांनी दिला.
देशात २.१ दशलक्ष बालमृत्यू होतात. सर्वांत श्रीमंत राज्य म्हणून मिरवणाऱ्या महाराष्ट्रात १९९५ पासून ३६ हजार शेतकरी केवळ परिस्थितीला शरण जाऊन फासावर लटकवून घेतात, या भयानक चित्राला देशाच्या विकासात अजिबात स्थान मिळत नाही हे दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. राज्याराज्यांतील पाण्यासाठीचे तंटे पाहता यापुढे देशात पाण्याचे खाजगीकरण होणार नाही, असे ठामपणे सांगता येणार नाही, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. गेल्या १५ वर्षांत ज्या प्रमाणात विषमता वाढत चालली आहे ती धोक्याची सूचनाच आहे. भुकेच्या यादीत आपला देश जगात ९४ वा, तर मानव विकासात १२८ क्रमांकावर आहे. शून्यातून पुन्हा उभे राहिलेले देशही आपल्या पुढे आहेत, हे कशाचे चित्र आहे, असा सवाल त्यांनी केला. केवळ रोजगारासाठी शहरी भागांकडे लोटणाऱ्या या लोकांसाठी रोजगारही नसल्याने ते केवळ घरगुती कामगार म्हणून राबत आहेत. जागतिकीकरणाआड भांडवालदारशाहीची सत्ता येण्याची ही चाहूल असल्याचे ते म्हणाले. देशासमोरील या भीषण परिस्थितीचे चित्र दाखवण्याचे सोडून एकीकडे विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वृत्तांकन करण्यासाठी केवळ ६ पत्रकार व मुंबई येथे आयोजित लॅक्मे फॅशन शो साठी ५१२ पत्रकारांची झुंबड लोटते ही परिस्थिती असल्याचेही ते म्हणाले. आपल्या सभोवती अशी परिस्थिती असताना ती पाहून आपले विचारवंत व सुशिक्षित लोक मुकाट्याने याकडे पाहत बसले आहेत हे असंवेदनशीलतेचे व अमानवतेचे लक्षण तर नव्हे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Tuesday, 5 February, 2008

समता, न्याय व लोकशाहीच्या
बळावरच विश्र्वशांती ः उपराष्ट्रपती

पणजी, दि. 4 (प्रतिनिधी)ः समता, न्याय व लोकशाहीच्या बळावरच विश्वशांती प्रस्थापित होणे शक्य आहे, असे उद्गार उपराष्ट्रपती महंमद हमीद अन्सारी यांनी काढले.
राज्य कला व सांस्कृतिक संचालनालय व कै. दामोदर धर्मांनंद कोसंबी शताब्दी स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "विचार उत्सव" व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल एस. सी. जमीर, मुख्यमंत्री दिगंबर कामत, कै. कोसंबी यांच्या कन्या डॉ. मीरा कोसंबी, शताब्दी महोत्सवाच्या अध्यक्ष डॉ. मारीया अरोरा कुतो आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. अन्सारी पुढे म्हणाले की, समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कै. दामोदर कोसंबी हे एक धडपडणारे क्रियाशील योद्धे होते. ""विश्वशांतीसाठी खऱ्या लोकशाहीची गरज असते व या लोकशाहीत कोणा एकाचे वर्चस्व न राहता सर्व समान असावे लागतील"" या विचारधारेने त्यांनी काम केले. इतिहासकार बाशम यांनी त्यांच्या मृत्युसमयी लिहिलेल्या श्रद्धांजली संदेशात "पुरातन भारत, गणितशास्त्र व शांततेचे रक्षण या तीन गोष्टींसाठी कै.कोसंबी यांनी प्रामाणिकपणे काम केले" अशा शब्दांत त्यांच्या कार्याची दखल घेतली होती. समाजात उद्भवणाऱ्या तंट्यांवर तिथल्यातिथे तोडगा काढून शांतता अबाधित ठेवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी विशेष अभ्यास चालवला होता. चांगुलपणामुळेच समाजात शांतता स्थापन करण्यास वाव असल्याची त्यांची मनोधारणा होती, असेही श्री. अन्सारी म्हणाले. देशाचे भविष्य ठरवण्यासाठी आत्ताच योग्य कृती करण्याची आवश्यकता आहे ती भविष्यात करता येणार नाही, असे सल्ला देत जगासमोरील अनेक ज्वलंत प्रश्नांवर श्री. अन्सारी यांनी प्रकाश टाकला. वाढत्या स्पर्धात्मक व व्यापार उद्योगाच्या रस्सीखेचीत देशांतर्गत रुंदावत जाणारी दरी व त्यात असमानतेच्या भावनेमुळे हिंसात्मकतेत झालेली वाढ हीच विश्वशांतीसमोरील सर्वांत मोठी अडचण ठरल्याचे ते म्हणाले.
राज्यपाल एस. सी. जमीर यांनी आपल्या भाषणात कै. कोसंबी यांच्यासारख्या महान व्यक्तीची आठवण करून ही व्याख्यानमाला सुरू केल्याबद्दल सरकारचे कौतुक केले. यावेळी उपराष्ट्रपतिपदाचा ताबा घेतल्यानंतर पहिल्यांदाच गोव्यात आलेल्या श्री. अन्सारी यांना गोव्याचे वैशिष्ट्य सांगताना या भूमीवर पाय ठेवलेला माणूस आपोआपच येथे रुळतो व इथला बनतो, अशी स्तुती श्री. जमीर यांनी केली.
डॉ. मीरा कोसंबी यांनी कै. दामोदर कोसंबी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांच्या स्मृतीने पुणे येथेही दर महिन्याला एक सार्वजनिक व्याख्यान आयोजित केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. श्रीमती कुतो यांनी आयोजन समितीच्या स्थापनेचा उद्देश विशद केला. यावेळी उपराष्ट्रपती, डॉ. मीरा कोसंबी यांना राज्याच्या वतीने समई प्रदान करण्यात आली. शेवटी कला व संस्कृती खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर यांनी आभार मानले.पाठ्यपुस्तकात धडे
कै. कोसंबी यांच्यासारखे विद्वान या गोमंतभूमीत जन्मले ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांचे विचार नव्या पिढीसमोर येण्यासाठी पाठ्यपुस्तकांत त्यांचे धडे घालण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्र्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले. कै.कोसंबी यांची वर्धा येथील समाधी अत्यंत दुर्लक्षीत स्थितीत असून या समाधीचे नूतनीकरण करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यासाठी लवकरच गोव्यातून एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक वर्धा येथे पाठवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
वेगनियंत्रक रद्द न केल्यास
15 पासून बस वाहतूक बंद

बस मालक संघटनेचा इशारा
पणजी, दि. 4 (प्रतिनिधी)ः येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत सरकारने लागू केलेले "वेगनियंत्रक' रद्द न केल्यास राज्यातील संपूर्ण बस वाहतूक बंद ठेवण्याचा इशारा आज अखिल गोवा बस मालक संघटनेने दिला.
त्याचप्रमाणे वेग नियंत्रक न बसवल्याने वाहतूक खात्याने 1 फेब्रुवारी पासून बंद ठेवण्यात आलेल्या बसेसना त्वरित परवाने देण्याचा मागणी करून यावेळी तसा ठराव घेण्यात आला. आज सकाळी पणजी येथे आयोजित केलेल्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. यावेळी सुमारे 50 पेक्षा जास्त बसमालक या बैठकीला उपस्थित होते.
कदंब महामंडळाच्या बसगाड्यांना हा नियम का लागू करण्यात आला नाही, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. बस, ट्रक यांच्या अतिवेगामुळे राज्यात किती अपघात झाले आहेत, ते सरकारने आधी उघड करावे, असे थेट आव्हान यावेळी सरकारला देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक, उपाध्यक्ष रॉनी फर्नांडिस, उत्तर गोवा अध्यक्ष पांडुरंग रामा नाईक, ओलाव ब्रागांझा व सुदेश कळंगुटकर उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष रजनीकांत नाईक म्हणाले की, आमचा व्यवसायच रस्त्यावरचा आहे. आम्ही सरकारला जास्त कर देतो. तरीही सरकारतर्फे आमचीच जास्त सतावणूक केली जाते. वेग नियंत्रक नियम लागू करण्यापूर्वी सरकारने आम्हाला विश्वासत घेतले नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला. वेग नियंत्रक यंत्रणा बसवण्यासाठी सुमारे 16 हजार रुपये खर्च येतो. एका महिन्यात तो मोडल्यास दुसऱ्यावेळी ही यंत्रणा बसवायला परवडणारे नसल्याचे श्री. नाईक म्हणाले. त्याचप्रमाणे ही यंत्रणा बसवल्यानंतर त्या ठिकाणी रस्ता वाहतूक अधिकारी "सील' ठोकणार आहे. ते "सील' काढण्यासाठी अधिकाऱ्याची परवानगी लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारच्या वेळी एखादी बस "गिअर बॉक्स' मोडल्याने बंद पडल्यास तीन दिवस बंद ठेवावी लागणार असल्याचे ते म्हणाले. शनिवार व रविवारच्या दिवशी वाहतूक कार्यालयाला सुट्टी असल्याने कोणीही अधिकारी उपलब्ध होणार नसल्याची अडचण त्यांनी यावेळी मांडली.
गोव्यात रस्त्यावर फिरणाऱ्या मंत्र्यांच्या आलिशान गाड्या, पल्सर मोटारसायकली यांवर आधी नियंत्रण ठेवा. पोलिसांनी तालांव देण्यापेक्षा या वाहनांच्या वेगमर्यादेवर लक्ष केंद्रित केल्यास अपघातांची संख्या कमी होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
दोन बसेसमध्ये स्पर्धा लागण्यास वाहतूकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नवीन बसला परवाना देऊ नये असा अहवाल दिलेला असताना उपजिल्हाधिकारी व मंत्री नवीन परवाने देत असल्याचा थेट आरोप यावेळी करण्यात आला. फक्त पाच मिनिटांच्या अवधीत दोन बसेस सुटत असल्याने त्यांच्यात ही जीवघेणी स्पर्धा लागत असल्याचे यावेळी श्री. नाईक म्हणाले.
कोडली खाणीवर कामगार - सुरक्षा रक्षकांत धुमश्र्चक्री
कित्येक जखमी; 19 जणांना अटक

काले, दि.4 (प्रतिनिधी)- गेल्या 10 डिसेंबरपासून कामगार संपावर असलेल्या सेझा गोवाच्या कोडली येथील खाणीवर आज संपकरी कामगार व कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांत जोरदार चकमक उडाली. दोन्ही गटांतील अनेक माणसे जखमी झाली . पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून 19 जणांना अटक केली व नंतर जामिनावर सोडले.त्यात 9 कामगार व 10 सुरक्षा कर्मचारी आहेत.
जबर जखमींना मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी कामगारांविरूध्द बेकायदा एकत्र येणे व गुंडगिरी करणे या कलमांखाली गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपकरी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून कंपनीने उलट नवीन नोकरभरती चालविल्याच्या निषेधार्थ कामगारांनी आज सकाळी 6.35 च्या सुमारास कंपनीतून सुरु असलेली अवजड मालवाहतूक रोखली व माल खाली उतरविण्यासाठी सक्ती केली, असे कंपनीतर्फे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नंतर कामगारांना घेऊन येणारी एक बस अडविण्याचाही प्रकार घडला. यावेळी कामगारांच्या हाती लाठ्या होत्या व त्यांनी बस चालकाला उतरविण्याचा प्रयत्न केला, पण सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून तो हाणून पाडला. यावेळी दोन्ही गटांत जोरदार धुमश्र्चक्री उडाली. त्यासाठी लाठ्या, काठ्या व दगडांचा मुक्त वापर झाला. जखमींना कुडचडे प्राथमिक आरोग्य केंद्रात व नंतर काहींना हॉस्पिसियोत दाखल केले गेले.
या प्रकरणी कामगार व खाणकंपनीची सुरक्षा संस्था यांनी परस्परांविरुध्द पोलिस तक्रारी नोंदविलेल्या आहेत. कामगारांतर्फे रिकार्डो मास्कारेन्यश तर सुरक्षा रक्षकांतर्फे राजेश ठाणेकर यांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत.
कामगारांच्या दाव्यानुसार सुरक्षा रक्षकांनी प्रथम कामगारांवर हल्ला केला. कंपनीने भाडोत्री गुंडांना हाताशी धरल्याचा आरोपही कामगारांनी केला असून 20 फेब्रुवारी पर्यंत गोव्याबाहेर बदली केलेल्या 5 कामगारांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलनाला उग्र रुप देण्याचा तसेच जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्याला सर्वथा कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशाराही कामगार नेते पुती गावकर यांनी दिला.

Monday, 4 February, 2008

मनाचे व्यवस्थापन जीवनात यश देतेः श्री श्री रविशंकर
मडगाव, दि. 3 (प्रतिनिधी)- मनाचे व्यवस्थापन जीवनात यश देत असते. माणूस संयमी बनून एकमेकांशी सलोख्याने वागू शकतो, असे श्री श्री रविशंकर यांनी फातोर्डा स्टेडियमच्या सराव मैदानावरील भरलेल्या आनंदोत्सवात सांगितले.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत आनंदोत्सवाचे आयोजन केले होते. त्या आनंदोत्सवात पाच हजार लोकांनी भाग घेतला. त्यावेळी श्री श्री रविशंकर यांनी योग्य व ध्यान श्वासोश्र्वासाचे महत्त्व विषद केले.
मन हे शरीरावर काबू ठेवते, पाण्यात मासळी आनंदाने विहार करते तसे माणसाला हवेची आवश्यकता असते. खोल श्वास घेऊन बाहेर सोडण्याच्या क्रियेमुळे माणसाचे जीवनात निरोगी राहते. उपासनेतून एकाग्रता निर्माण होते. नेहमी समाधानी, आनंदी राहिला, कितीही मोठ्या तणावातून मुक्तता मिळू शकते. भारतीय संस्कृती विशाल असून माणसावर योग्य संस्कार या संस्कृतीतून होत असतात, असे सांगून श्री श्री रविशंकर आपल्या प्रवचनात म्हणाले, माणूस हा नारळाप्रमाणे आहे नारळाचा बाहेरील काथा महत्त्वाचे काम करतो, तसे माणूस सहन शक्तीने वागतो.
यावेळी भजने गाऊन प्राणामय व योगाचे महत्त्व रविशंकर यांनी सांगितले. दोन तासपर्यंत उपस्थितांना त्यांनी खिळवून ठेवले. तत्पूर्वी गोव्याच्या पोप गायिका हेमा सरदेसाई यांनी गीते गाऊन उपस्थितांचे मनोरंजन केले व वातावरण तयार केले. आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. आर. एस. कामत, प्रवास नायक, डॉ. व्यंकटेश हेगडे व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या परिवाराने आयोजन केले.
दि. 4 रोजी सकाळी 10.30 वाजता बोर्डा येथील श्री श्री रविशंकर मॅनेजमेंट महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसमोर त्यांचे व्याख्यान होणार आहे, त्यानंतर दुपारी ते बेळगावला रवाना होतील.
पेट्रोल, डिझेल दरवाढीसंबंधी
आज मंत्रिमंडळाची बैठक

नवी दिल्ली, दि. 3 - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधनाचे भाव वाढल्याने देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढविण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी उद्या (सोमवारी) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही बैठक संध्याकाळी 4 वाजता होणार आहे, असे वृत्तसंस्थांच्या बातमीत म्हटले आहे.
पेट्रोल व डिझेलच्या दरात अल्प वाढ करण्यासही पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांचा विरोध असून, त्याऐवजी अबकारी करात कपात करण्याची सूचना त्यांनी केली आहे.
इंधनाच्या दरात वाढ करण्याचा अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा आग्रह आणि अबकारी करात कपात करण्याची देवरा यांची सूचना यापैकी मंत्रिमंडळ काय स्वीकारते, ते उद्याच्या बैठकीनंतर समजू शकेल. दरवाढीसंबंधी विचार करण्यासाठी मंत्री गटातील सातपैकी चार सदस्यांची गेल्या गुरुवारी बैठक झाली, त्यावेळी हा निर्णय मंत्रिमंडळाने घ्यावा, असे ठरविण्यात आले. पेट्रोलमध्ये 4 किंवा 2 रुपये आणि डिझेलमध्ये 2 किंवा 1 रुपया वाढ करावी, असे मत मंत्री गटाने व्यक्त केल्याचे समजते.
श्री.देवरा व श्री. मुखर्जी तसेच कृषी मंत्री शरद पवार व अर्थमंत्र्यांनी स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कोणतीही वाढ न करता अबकारी कर कमी करायचे ठरविले आहे.
कोसंबी जन्मशताब्दीसाठी
उपराष्ट्रपती आज गोव्यात

पणजी, दि. 3 (प्रतिनिधी) - डी.डी. कोसंबे जन्मशताब्दी उत्सव समितीतर्फे उद्या दुपारी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी गोव्यात दाखल होत आहेत. सोमवारी सायंकाळी 5 वाजता कला अकादमीत आयोजित करण्यात आलेल्या डी.डी. कोसंबे कल्पना उत्सवाचा शुभारंभ हमीद अन्सारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी राज्यपाल एस.सी.जमीर, मुख्यमंत्री दिगंबर कामत व सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. मिरा कोसंबे उपस्थित राहणार आहेत.
उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे यावेळी कला अकादमीच्या परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. आज उपराष्ट्रपती श्री. अन्सारी यांच्या सुरक्षेच्या ताफ्यातील "बुलेट प्रूफ' वाहन गोव्यात दाखल झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे खास सुरक्षा रक्षकांचे पथकही गोव्यात दाखल झाले आहे.
श्री. कोसंबे जन्मशताब्दी उत्सव दि. 7 फेब्रुवारीपर्यत चालणार असून यात वेगवेगळ्या विषयांवर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, डॉ. मिरा कोसंबे, मॅगसेसे पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध पत्रकार पी.साईनाथ, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार प्रा. रोमिल थापर व प्रख्यात संशोधक डॉ. विवेक मोंतेरो यांची व्याख्याने होणार आहेत. हा तीन दिवसीय समारोह सर्वांसाठी खुला असल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.
आरडीएक्स वेळीच न आल्याने गोवा बचावले!संशयिताकडून गौप्यस्फोट
पोलिस पथक कर्नाटककडे
गोवा गुप्तचर यंत्रणेचे अपयश उघड

पणजी, दि. 3 (प्रतिनिधी) - पाकिस्तानमधून येणारी स्फोटके (आरडीएक्स) वेळेत उपलब्ध झाले नसल्यानेच अकरा ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा बेत फसला. ही स्फोटांची मालिका करण्यासाठी गोव्यात आणि कर्नाटकात अशी अकरा स्थळे निश्चित करण्यात आली होती, अशी माहिती आज अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी मोहमद असीफ यांनी तपास पथकाला दिली. गोव्यात पाच ठिकाणी स्फोट करण्याचा कट त्यांनी आखला होता. असीफ हा कर्नाटकातील केआयएमएस महाविद्यालयात "एमबीबीएस' चे शिक्षण घेणारा विद्यार्थी असून त्याला अटक करताच त्याने अन्य दोन साथीदार विद्यार्थी बेपत्ता झाल्याची माहितीही पोलिसांना दिली आहे. बेपत्ता झालेले दोघेही विद्यार्थी त्याच महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
अकरा ठिकाणी हे स्फोट करण्यासाठी त्यांना पाकिस्तानातून 50 किलो "आरडीएक्स' येणार होते. परंतु ते नियोजित वेळी आले नसल्यानेच संपूर्ण बेत फसल्याचे पोलिसांनी सांगितले. हुबळीतील सिद्धारुढ मठ, रेल्वे स्थानक, ईस्कॉन मंदिर, विमानतळ व आयटी कंपन्यांच्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात येणार होते, तर गोव्यात पाच ठिकाणी हे स्फोट घडवले जाणार होते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यांना हा अयशस्वी ठरलेला कट आखण्यासाठी "इस्लामिक डेव्हलपमेंट कौन्सिल' कडून पैसे मिळत असल्याचीही माहिती असीफ याने चौकशीच्या वेळी उघड केली आहे. या प्रकरणातील अन्य दोघे संशयित राझिउद्दीन नासीर व असादुल्ला अबुबकार यांना आज बंगळूर पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या ताब्यात देण्यात आले. या तिघांचीही दिलेली माहिती पडताळून पाहण्यासाठी उद्या सोमवारी "नार्को' चाचणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Editorial

हे धिंडवडे थांबवा
कार्निव्हलचे यंदाचे आकर्षण ब्राझिलीयन नाच असेल, असा प्रचार केला गेल्याने पणजीचे रस्ते शनिवारी संध्याकाळी देशीपरदेशी नागरिकांनी भरून गेले असावेत, अशी आयोजकांची समजूत होण्याची शक्यता आहे पण दरवर्षीच कार्निव्हलची मिरवणूक पाहण्यासाठी सामान्य नागरिक पणजीच्या रस्त्यांवर जमा होतो कारण गेल्या काही वर्षांत बदलवले या उत्सवाचे स्वरूप लहानथोरांना आकर्षित करते. काही अटी घालून प्रवेश दिला गेल्याने कल्पक आणि सुंदर असे चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी होत असल्याने आपल्या कुटुंबासह राज्यातील सर्वच भागांतून नागरिक पणजीला धाव घेत असत. यंदा मात्र ब्राझिलयन नृत्याच्या नावाखाली अर्धनग्न तरुणींना चित्ररथांवर स्थान देऊन त्यांचे उघडेनागडे प्रदर्शन करण्यात आयोजकांनी धन्यता मानलेली दिसते. अशाच चित्ररथावर देशाचा ध्वज उलटा फडकावून जो अवमान करण्यात आला, त्याबद्दलही संबंधितांनी स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. राष्ट्रध्वजाबद्दल एवढी बेफिकिरी दाखविणारे माफीसही पात्र नाहीत. राजधानीच्या शहरात प्रमुख रस्त्यावर अशा प्रकारे उलटा ध्वज लावून चित्ररथ मिरवतो, हेच चित्र मुळी संतापजनक आहे. ब्राझिलीयन संस्कृतीचा उदो करणारा, वास्को द गामाचे कौतुक करणारा चित्ररथ या मिरवणुकीत सहभागी होऊ कसा दिला, हाच खरा प्रश्न आहे. आजही या गोमंतभूमीत पोर्तुगिजांचे गोडवे गाणारे, त्या राज्यकर्त्यांची प्रतीक्षा करणारे, त्यांच्या स्वागतासाठी आसुसलेले काही स्वाभिमानशून्य नागरिक या सर्व प्रकारांमागे आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याच मिरवणुकीत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वरूपात त्यांचीच अवहेलना करणारे सोंग बसवून जी चेष्टा चालली होती, ती जागृत नागरिकांनी बंद केली, यापासून तरी आयोजकांनी बोध घ्यावा. महात्मा गांधीजींचे नाव घेत, गांधीवादाचा पुरस्कार करीत असल्याची ढोंगबाजी करीत सत्तेवर आलेल्या कॉंग्रेस सरकारच्या कारकिर्दीतच असे प्रकार का घडतात, हे कोडे असले तरी गोमंतकीयांना यामागच्या भेकडांची कल्पना आली आहे. आणखी किती दिवस परदेशी संस्कृती आणि राज्यकर्त्यांचे गोडवे हे गाणार आहेत? पणजीतील रस्त्यांना त्यांची नावे देत आपली देशद्रोही वृत्ती दाखविणारे काहीजण या सर्व प्रकारांमागे आहेत, यात संशय नाही. गोव्यात केवळ भारतीय संस्कृतीच नाही तर पाश्चिमात्यांचा पगडा आपल्यावर आहे, असे भासविण्यासाठी चाललेले हे खटाटोप सध्या सरकारी खर्चाने चालले आहेत, हे अधिक निषेधार्ह आहे. कार्निव्हल या उत्सवाशी ख्रिस्ती धर्माचा संबंध नाही, असा जाहीर फतवा काढून बिशपांनी काही वर्षापूर्वीच कार्निव्हलमधून आपले अंग काढून घेतले होते, तोपर्यंत हा ख्रिस्ती उत्सव असल्याचे भासविले गेले. गेली काही वर्षे पर्यटनाच्या दृष्टीने हा उत्सव अनेक ठिकाणी आयोजित केला जात आहे, त्यास आक्षेप घेतला गेला नाही कारण मर्यादा पाळून मिरवणुका काढल्या गेल्या. लोकजीवनाचे दर्शन घडविण्याचे प्रयत्न त्यामधून केले गेले, पण यावर्षी त्याचे बदललले स्वरूप चिंताजनक असून नेमक्या कोणत्या दिशेने हा उत्सव चालला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.
गेल्या तीन दिवसांत तीन मुख्य कार्यक्रम गोव्यात झाले. यापैकी एक होता मडकईचा हिंदू जागृती मेळावा, दुसरा जुने गोवे येथील नरेंद्रभक्तांचा मेळावा आणि तिसरा...कार्निव्हल! या तीन उपक्रमांतील फरक सहज लक्षात यावा असे त्यांचे आयोजन होते. काही कथित धर्मनिरपेक्ष नागरिकांना हिंदू मेळावे संकुचित वृत्तीचे द्योतक वाटले असतील.तथापि देशाच्या घटनेने नागरिकांना दिलेल्या धर्मस्वातंत्र्यानेच असे मेळावे घेतले जाऊ शकतात. संघटना असणे आणि समाज जागृत असणे यासाठी जे पुढाकार घेतात, तेच या देशाचे राष्ट्रीयत्व टिकवून ठेवतात. धर्माभिमान आणि देशाभिमान यात कोणताच भेद न करता जागृती करण्यासाठी, देशद्रोह्यांच्या मनात धडकी निर्माण करणारी शक्ती दर्शविणारे असे कार्यक्रम ही आजची गरज ठरत आहे. समाजातील दुर्बल घटकांचा शोध घेऊन त्यांना मदत करण्याची नितांत आवश्यकता असल्याचा सूर मडकईच्या सभेत व्यक्त झाला. फर्मागुढी येथे होणाऱ्या कार्यक्रमाची जागा बदलली गेली तरी मडकईला असंख्य धर्माभिमान्यांनी उपस्थित राहून आपल्यातील चैतन्याचे दर्शन घडविले. उपद्रव निर्माण करणाऱ्यांना अद्दल घडविणे म्हणजे अधर्म नव्हे, असे अमृतवचन स्वामी ब्रह्मेशानंदाचार्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले. अशाच प्रकारे सध्याच्या स्वार्थी राजकारण्यांवर आसूड ओढत नाणीजधामाचे पीठाधीश स्वामी नरेंद्राचार्य यांनी हिंदूंच्या संघटनाशक्तीचे महत्त्व प्रतिपादन केले. एका बाजूला असे विचारमंथन होऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम चालू असताना, शनिवारी संध्याकाळी मात्र राजधानीत याच्या नेमक्या दिशेने जनतेला नेण्याचे काम कार्निव्हल नामक परदेशी उत्सवाच्या नावाखाली केले जात होते. या राज्यात दोन विचारप्रवाह वाहात असल्याचे चित्र दुर्दैवाने दिसत आहे. विचारस्वातंत्र्याच्या या लोकशाहीतही देशाचा विचार मागे पडता कामा नये, परदेशांची विशेषतः पोर्तुगीज राज्यकर्त्यांची या राज्यात होणारी प्रशंसा सहन केली जाणार नाही, असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आपल्या महान आणि अमर संस्कृतीची महती नजरेआड करीत चाललेले नखरे थांबविण्यासाठी आता जागृत नागरिकांनाच आसूड हाती घ्यावा लागेल, असे दिसते.

Sunday, 3 February, 2008

बनावट नोटांसह एकास अटक; तिघे फरार
पणजी, दि. २ (प्रतिनिधी)- गोव्यात रंगात आलेल्या कार्निव्हल महोत्सवाची संधी साधून बनावट नोटांचा फैलाव करण्याच्या इराद्याने बंगळूरहून चौघांची टोळी गोव्यात दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने सतर्क झालेल्या गोवा पोलिसांनी लगेच हालचाल करून त्यातील एकाला ताब्यात घेतले, तर त्याच्या अन्य साथिदारांचा कसून शोध घेतला जात आहे.
या पोलिसी कारवाईमुळे या दिवसांत गोव्यात मोठ्या प्रमाणात उघडकीस येत असलेल्या बनावट नोटांमागे सूत्रबद्ध योजना असल्याच्या संशयाला दुजोरा मिळाला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयावरून अटक केलेल्याचे नाव अनिल पठाण शेट्टी (५२) आहे.त्याच्याकडे १०० रु.च्या ४ व ५०० ची एक नोट मिळून एकूण ९०० रु. च्या बनावट नोटा मिळाल्या. त्याच्या सोबत दावणगिरी (कर्नाटक) असून कालच तो गोव्यात दाखल झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. गावरावाडा, कळंगुट येथील रायस बॉल ऑफ चायना या हॉटेलात उतरले होते. शेट्टी हा तेथेंच पोलिसांच्या हाती लागला, तर बाकीचे त्यापूर्वीच तेथून निसटले. त्यांचा कसून शोध जारी आहे. कळंगूटचे पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल परब यांनी हा छापा घातला.
या टोळीचे हात बऱ्याच लांबवर पोचलेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यात बड्या असामीही गुंतण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून लवकरच एकंदर प्रकार उघड होईल असा विश्र्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात बनावट नोटा उघडकीस येऊ लागल्याने पोलिसांनी लोकांना तसेच बॅंकांनाही नोटा काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन केले आहे. हल्लीच आयसीआयसीआय बॅंकेत मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सापडण्याच्या प्रकारामुळे हा मुद्दा चर्चेत असतानाच बंगळूरहून याच मोहिमेवर टोळी गोव्यात दाखल व्हावी हा निव्वळ योगायोग नाही असे जाणकारांचे मत आहे. या कारवाईत रामचंद्र राऊत, संतोष गोवेकर, सुरेश हळर्णकर यांनी सहभाग घेतला. उपनिरीक्षक राहुल परब अधिक तपास करीत आहे.
गोव्याच्या किनाऱ्यांवर बॉम्बस्फोट मालिकेचा कट
० चोरीच्या दुचाकींद्वारे स्फोटांचा डाव
० हैदराबादेत दोघांना अटक, "हुजी'शी संबंध
० चार किनाऱ्यांची टेहळणी केल्याचे उघड

हैदराबाद, दि. २ ः चोरीच्या मोटरसायकलींमध्ये स्फोटके पेरून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर बॉम्बस्फोट मालिका घडवून मोठ्या प्रमाणात प्राणहानी घडवण्याचा दहशतवाद्यांचा मोठा कट उघडकीस आला आहे. दावणगिरी पोलिसांनी यासंदर्भात रझिउद्दिन नासीर याला हैदराबाद येथून ताब्यात घेतले असून त्याने दिलेल्या माहितीतून या कटाचे धागेदोरे हाती आले आहेत. आपला हा कट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दहशतवाद्यांनी गोव्यातील काही किनाऱ्यांची टेहळणीही केली होती, असेही चौकशीत उघड झाले आहे.

गोव्यातील किनाऱ्यांवर फार मोठ्या संख्येने देशी व विशेषतः विदेशी पर्यटक येत असल्यामुळे "लष्कर ए तोयबा', "हरकत उल जिहादी अल इस्लामी' आदी दहशतवादी संघटनांची वक्रदृष्टी गोव्याकडे वळली आहे. त्यातूनच या कटाची आखणी हैदराबादेत करण्यात आली होती. मूळ कर्नाटकवासी असलेल्या नासीर व असादुद्दिन अबुबकर यांनी काही मोटारसायकली चोरल्या होत्या व गोव्यातील निवडक किनाऱ्यांच्या परिसरात त्या ठेवून बॉम्बस्फोटमालिका घडवून आणली जाणार होती.

अनेक राज्यांशी तार

हैदराबादेत अटक करण्यात आलेल्या नासिर याच्याकडून या घातपाताच्या कटाचा तपशील मिळवण्यासाठी गुप्तचर अधिकाऱ्यांनी कंबर कसली असून इतर अनेक राज्यांशी त्याची तार जुळलेली असल्याने जवळजवळ बारा राज्यांच्या पोलिस व गुप्तचर अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी केली जात आहे.
हैदराबादमध्ये गेल्या वर्षी २५ ऑगस्ट रोजी दोन स्फोट झाले होते. त्यात महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी ठार झाले होते. त्या स्फोटांनंतर लगेचच नासीर याने गोव्याला भेट दिली होती. आपल्या या गोवा भेटीत त्याने गोव्यातील काही ठिकाणांची घातपाती कारवाईच्या शक्यता आजमावण्यासाठी बारकाईने टेहळणी केली होती. गोव्यात स्फोटमालिका घडवून आणण्यासाठी ठिकाणे निवडण्याची जबाबदारी दहशतवाद्यांनी त्याच्यावर सोपवली होती.

पाकिस्तानात प्रशिक्षण

नासिर हा बावीस वर्षांचा युवक अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. शिक्षण अर्ध्यावर सोडून त्याने पाकिस्तानात "हुजी' कडून घातपाती कारवायांचे प्रशिक्षण घेतले. भारतात परतल्यावर त्याच्यावर गोव्याची मोहीम सोपवण्यात आली होती. गोव्यात किमान चार ठिकाणी आपण स्फोट घडवणार होतो, अशी कबुली नासिरने गुप्तचर अधिकाऱ्यांना दिली आहे.

दुचाकींचा वापर

बॉम्बस्फोट घडवण्यासाठी चार चाकी वाहनांचा वापर केला तर अशा बेवारस वाहनांचा नागरिकांना संशय येत असल्याने दहशतवाद्यांनी अलीकडे दुचाकी वाहनांचा वापर स्फोटांसाठी चालवला आहे. वाराणशी, लखनौ व गोरखपूर येथे जे स्फोट झाले, त्यात सायकलींना आयईडी (इंप्रोव्हाईज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हायसेस) जोडण्यात आल्याचे आढळून आले होते. गोव्यात मात्र सायकली प्रचलित नसल्याने मोटारसायकलींचा वापर केला जाणार होता.
दावणगिरी पोलिसांनी नासिर व त्याच्या अबुबकर या साथीदाराने मिळून चोरलेल्या अकरा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. नासिर व अबुबकरने मोटारसायकली चोरल्या, पण त्या न विकल्याने चौकशी अधिकारी बुचकळ्यात पडले. त्यातूनच या दहशतवादी कटाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पन्नास किलो स्फोटके

आपल्याला स्फोटके कोण पुरवणार होते याचा तपशील उघड करण्यास मात्र नासिर अजूनही तयार नाही. आपल्याला पन्नास किलो स्फोटके देण्यात येणार होती, एवढीच माहिती त्याने अद्याप उघड केली आहे.
दरम्यान, संभाव्य कटाचे गांभीर्य जाणल्याने गुप्तचर अधिकाऱ्यांची झोप उडाली असून त्यांनी कसून तपास चालवला आहे. शाहीद ऊर्फ बिलाल या कुख्यात दहशतवाद्याचे नासिरला पाठबळ होते, असे तपासात उघड झाले असून दोघांमधील संभाषणही अधिकाऱ्यांनी मिळवले आहे.

दाढदुखीमुळे पोलिसांच्या जाळ्यात


"सगळे काही ठरले आहे ' असे सांगून शाहीदनेच त्याला काठमांडूला जाण्यास सांगितले होते, असेही अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. मात्र, दाढदुखीवर उपचार करून घेण्यासाठी नासिर हा काठमांडूला न जाता हैदराबादेत थांबला आणि पोलिसांच्या तावडीत सापडला. नासिरच्या डोळ्यांतही दोष होता व ते तपासून घेण्याचा सल्ला त्याला डॉक्टरांनी दिला होता.

संभाषण ध्वनिमुद्रित

सीमेपार "हुजी'मार्फत दहशतवादी प्रशिक्षण सुरू असताना भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरील त्याचे संभाषण "टॅप' केले होते. नासिरचा चष्मा हरवला होता व त्यावाचून दिसत नसल्याने यापुढे दोन चष्मे जवळ बाळगीत जा, असे दूरध्वनीवर पलीकडली व्यक्ती त्याला सांगत होती. हे संभाषण गुप्तचर अधिकाऱ्यांनी ध्वनिमुद्रित केलेले आहे.
नासिर व अबुबकर यांच्या चौकशीसाठी गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी दावणगिरीत दाखल झाले असून गोवा पोलिसांनीही त्या दोघांची चौकशी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुप्तचर अधिकारी असादुल्ला अबुबकर व नासीर ऊर्फ महंमद घोस यांच्याबरोबरच महंमद आसीफ या कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या अंतिम वर्ष एमबीबीएसचा विद्यार्थ्याचीही चौकशी करीत आहेत. तिघांनाही प्रसारमाध्यमांचा डोळा चुकवण्यासाठी अज्ञात स्थळी चौकशीसाठी नेण्यात आले आहे.

पथके रवाना
दरम्यान, नासिरने दिलेल्या माहितीचा पडताळा करण्यासाठी दावणगिरी पोलिसांच्या एका पथकाने हैदराबाद, गोवा, हुबळी, मंगळूर व शिमोगा येथे भेट दिली असून दोन्ही संशयितांनी आपण त्या ठिकाणी वास्तव्य केले होते अशी माहिती दिलेली असल्याने तिच्या सत्यतेची चाचपणी केली आहे.
कार्निव्हलः गांधीजींची अवलेहना;
वास्को द गामाचा उदोउदो

पणजी,दि. २ (प्रतिनिधी)- पोर्तुगीजधार्जिण्या विकृत मनोवृत्तीची पडछाया आज राजधानी पणजीत झालेल्या सरकारी कार्निव्हल मिरवणुकीवर स्पष्टपणे दिसून आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे सोंग बनवलेला एक चित्ररथ जागृत नागरिकांच्या विरोधामुळे मिरवणुकीतून अर्ध्यावरून काढून घेणे आयोजकांना भाग पडले, तर गोमंतभूमीवर पोर्तुगीज राजवटीचा झेंडा फडकावणाऱ्या "वास्को- द - गामा" चे जल्लोषात स्वागत करणाऱ्या चित्ररथाने देशप्रेमी नागरिकांची मान शरमेने खाली घातली. एवढे पुरेसे नव्हते म्हणून की काय, ब्राझीलच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या चित्ररथावर भारतीय तिरंग्याचा सरळसरळ अपमान चालला होता.
महात्मा गांधींची अवहेलना करणाऱ्या व वास्को द गामाचा उदोउदो करणाऱ्या चित्ररथांना ज्या अधिकाऱ्याने परवानगी दिली, त्याचे नाव उघड करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी कार्निव्हल उत्सवाच्या चित्ररथ मिरवणुकीचे आज संध्याकाळी बावटा दाखवून उद्घाटन केले. यावेळी पर्यटनमंत्री मिकी पाशेको, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष श्याम सातर्डेकर, महापौर टोनी रॉड्रिगीस, यंदाचे "किंग मोमो" व्हेलेरियानो डिसिल्वा, ब्राझिलचे मुंबई दूतावासातील जनरल पावलो आंतोनियो परेरा पिंटो आदी हजर होते.
युवकांच्या एका गटाने आपल्या फियाट गाडीवर महात्मा गांधींच्या रूपात एकाला बसवून त्याच्या शेजारी बसलेल्या व पांढरी शुभ्र वस्त्रे लपेटलेल्या युवतीच्या हातात "गोमंतकीय शांत आहेत, पण मूर्ख नाहीत" असा संदेश देणारा फलक दिला होता.
मुख्य व्यासपीठावरून काही जागृत नागरिकांनी हा हिडीस चित्ररथ पाहिल्यानंतर आक्षेप घेतला. प्रसंगाचे गांभीर्य जाणून अधिकाऱ्यांनी त्या चित्ररथला मिरवणुकीतून बाजूस काढले.
"वास्को द गामा" गोव्याच्या भूमीवर स्वार होत असल्याचे सूचित करणारा चित्ररथही मिरवणुकीत होता. ब्राझिलीयन "सांबा" नृत्याचाही समावेश आजच्या मिरवणुकीत होता.
गोवा पर्यटन विकास महामंडळोन यंदा कार्निव्हलवर ब्राझिलीयन साज चढविण्याचा प्रयत्न का केला याचे कोडे मात्र गोमंतकीय नागरिकांना पडल्याचे दिसत होते.
ब्राझिलीयन कार्निव्हल हा नग्नता व अश्लीलतेबाबत खूप चर्चेत असतो, त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी जमलेल्या लोकांत युवा वर्गाची संख्या प्रकर्षाने जाणवत होती. गर्दीत काही मोजके विदेशी पर्यटक सोडल्यास देशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात हजेरी होती. या उत्सवातील नग्नतेसंबंधी अनेक सामाजिक संघटनांनी हरकती घेतल्याने यावेळी सरकारने त्यासंबंधी अनेक निर्बंध टाकले होते व त्या अटींमुळे काही तुरळक प्रकार वगळता अनेक कलाकारांनी आपला "ड्रेस कोड" कमी जास्त प्रमाणात सांभाळल्याचे मात्र दिसत होते.
कार्निव्हल चित्ररथ मिरवणुका उद्यापासून राज्यात इतर महत्त्वाच्या शहरांत होणार आहेत तर राजधानीत तीन दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार असून त्यात फॅशन शो, ऑर्केस्ट्रा, खेळ तियात्र आदींचा समावेश असेल.