Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 16 May, 2009

गोव्यात कोण बाजी मारणार?

आज मतमोजणी, दुपारपर्यंत निकाल
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : गोव्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारसमोर विरोधी भाजपने जबरदस्त आव्हान निर्माण केल्याने या निकालाला विशेष महत्त्व आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांकडून विजय आपलाच असल्याचा दावा जरी केला जात असला तरी उद्या "हा सूर्य व हा जयंद्रथ' होणार आहे. उत्तरेतील मतमोजणी मिरामार येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयात तर दक्षिणेतील मतमोजणी गोविंद कारे कायदा महाविद्यालयात होईल. दुपारी १ वाजेपर्यंत गोव्यातील दोन्ही ठिकाणच्या नव्या खासदारांची घोषणा होईल, अशी अपेक्षा मुख्य निवडणूक अधिकारी अजित श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.
पंधराव्या लोकसभेसाठी एकूण पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या १६ रोजी होणार आहे. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीप्रधान देशाच्या या निवडणूक निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. गोव्यातही यंदा दोन्ही ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्याने निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल, अशी माहिती श्री. श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत दिली. उत्तरेत ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ख्रिस्तोफर फोन्सेको (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), जितेंद्र देशप्रभू (राष्ट्रवादी कॉंग्रेस), पांडुरंग राऊत (मगो) श्रीपाद नाईक (भाजप), उपेंद्र गावकर (शिवसेना) तसेच नरसिंह सूर्या साळगावकर व मार्था डिसोझा (अपक्ष) यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजपचे श्रीपाद नाईक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र देशप्रभू यांच्यातच खरी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट आहे. दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन (कॉंग्रेस), ऍड. नरेंद्र सावईकर (भाजप), ऍड. राजू मंगेशकर (भा.क.प), रोहिदास बोरकर ( सेव्ह गोवा फ्रंट) माथानी साल्ढाणा (युगोडेपा), जबाहर डायस, डेरीक डायस, फ्रान्सिस फर्नांडिस, मुल्ला सलीम, स्मिता साळुंखे आणि हमजा खान (अपक्ष) यांचा सहभाग आहे. याठिकाणी मात्र तिरंगी लढत अपेक्षित असून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासमोर भाजपचे ऍड. नरेंद्र सावईकर व युगोडेपाचे माथानी साल्ढाणा यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे.
मतमोजणीची सर्व व्यवस्था चोखपणे आखण्यात आली आहे. या काळात सुरक्षेच्याबाबतीतही कडेकोट व्यवस्था ठेवण्यात आली आहे. उत्तर गोव्यासाठी २८० तर दक्षिणेसाठी २७८ पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी केल्याने त्याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. निकालानंतर काढण्यात येणाऱ्या विजयी मिरवणुकांमुळे गोंधळ माजू नये यासाठीही पोलिसांची करडी नजर राहणार आहे. उत्तर गोव्यासाठी ९ मतमोजणी सभागृह तर दक्षिणेसाठी ७ सभागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या कामकाजाचे संपूर्ण छायाचित्रण करण्यात येईल. प्रत्येक मतदारसंघनिहाय मतमोजणी झाल्यानंतर केंद्राबाहेर असलेल्या फलकावर मतमोजणीचा आकडा दिला जाईल. त्याचबरोबर टप्याटप्यातील मतमोजणीची माहिती ध्वनीक्षेपकाव्दारे जाहीर केली जाईल. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही निकालाबाबतची माहिती टप्प्याटप्प्याने दिली जाईल. मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक विशेष नजर ठेवून असतील त्याचबरोबर अनेक सूक्ष्म निरीक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत मिळून १०,१९,९७७ मतदारांची नोंदणी निवडणूक आयोगाने केली होती त्यातील ५,४३,४६२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. उत्तरेतील ४,८६,७८९ मतदारांपैकी २,७५,०४६ मतदारांनी भाग घेतला तर दक्षिणेतील ५,३३,१८८ पैकी एकूण २,६८,४१६ मतदारांनी आपले मतदान केले आहे. हे मतदान कुणाच्या पारड्यात झाले आहे याचा सोक्षमोक्ष उद्या निकालानंतर स्पष्ट होईल.

आज भवितव्य नेत्यांचे व देशाचेही!

सर्वाधिक जागा कोणाला? राष्ट्रपतींची भूमिका महत्त्वाची
जोडतोडीच्या घडामोडींना जोर

नवी दिल्ली, दि. १५ : पंधराव्या लोकसभेसाठी गेल्या महिन्याभरापासून झालेल्या पाच टप्प्यातील मतदानाचे निकाल आज हाती येणार असून त्यासाठी देशभरात हजारो केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. या कामासाठी देशातील सुमारे ६० हजार कर्मचारी कार्यरत आहेत.
निवडणूक आयोगाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून सर्व मतमोजणी केंद्रांवर हे काम सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. देशभरात सुमारे ४२६० मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून तेथे ६० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आता निकालांसाठी टीव्हीवरील असंख्य वृत्तवाहिन्यांसह इंटरनेट आणि मोबाईलवरही सेवा उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाने निकालाची ताजी माहिती देण्यासाठी "डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट ईसीआयरिजल्टस् डॉट एनआयसी डॉट इन' ही विशेष वेबसाईट तयार ठेवली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल क्षणोक्षणी या वेबसाईटवर मिळू शकणार आहेत.
१५ व्या लोकसभेतील खासदारांच्या निवडीसाठी मतदानाची प्रक्रिया यावेळी पाच टप्प्यात घेण्यात आली. १६ एप्रिल ते १३ मे दरम्यान विविध राज्यांमध्ये मतदान पार पडले. पाच टप्पे मिळून देशात सरासरी ७१.३७ टक्के मतदान झाले. त्यासाठी ४६ राष्ट्रीय तसेच क्षेत्रीय पक्ष आणि अपक्षांसह ८०७० उमेदवारांनी आपले भाग्य अजमाविले आहे. एकूण ५४३ जागांसाठी हे मतदान घेण्यात आले.
निवडणूक आयोगाने यावेळी नवे सॉफ्टवेअर मदतीला घेतले आहे. याच्या सहाय्याने प्रत्येक मतमोजणी केंद्रातील ताजे निकाल आयोगाला कळू शकणार आहेत. हे निकाल आयोगाच्या वेबसाईटद्वारे जगभरात दिसू शकतील. शिवाय, प्रसार माध्यमांना माहिती देण्यासाठी आयोगाने स्वतंत्र व्यवस्थाही केली आहे. दिल्लीतील आयोगाच्या मुख्यालयासमोर मोठे फलक लावून त्यावर निकाल दिसू शकणार आहे.

यंदाही मुलींचा वरचष्मा, बारावीचा निकाल ८२.५५ टक्के

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च व एप्रिल महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात सलग दोन वर्षे दणका देत यंदाही मुलींनी बाजी मारली. बारावीचा एकूण निकाल ८२.५५ टक्के लागला आहे.
राज्यात विज्ञान शाखेत लियान हेलन डिमेलो (दामोदर विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय, कोंब मडगाव), वाणिज्य शाखेत कल्पक दर्शन राव वालावलकर (रामकृष्ण महादेव साळगावकर उच्च माध्यमिक विद्यालय, मडगाव), कला शाखेत आश्विनी शेखर प्रियोळकर (श्रीमती नेली आगियार उच्च माध्यमिक विद्यालय) तर व्यावसायिक शाखेत गार्गी प्रसाद कामत (पीपल्स उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तालुकावार पेडणे केंद्राचा निकाल सर्वांत जास्त म्हणजेच ९३.४३ टक्के लागला तर, फोंडा केंद्राचा सर्वांत कमी म्हणजे ५६.१३ टक्के निकाल लागल्याची माहिती यावेळी गोवा शालान्त मंडळाचे अध्यक्ष मेरव्हिन डिसोझा यांनी दिली.
बारावीचा निकाल २००७ साली ८०.३१ टक्के तर २००८ साली ७९. ३२ एवढा लागला होता. "एनसीईआरटी' अभ्यासक्रमामुळे यंदाच्या वर्षी निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली असल्याचे वैयक्तिक मत यावेळी श्री. डिसोझा यांनी व्यक्त केले. या वर्षी मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८२.१४ टक्के, तर मुलांचे प्रमाण ७४.३६ टक्के आहे. यामुळे मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारल्याचे दिसून आले. १३ केंद्रांतून घेतलेल्या या परीक्षेसाठी एकूण १२,११२ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९,९९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेचा निकाल ७४.६१ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८२.७९ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ८३.२७ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ८२.५३ टक्के लागला आहे.
होली ट्रिनीटी उच्च माध्यमिक विद्यालय, बाणावली (व्यावसायिक व कला), सेंट थॉमस हळदोणा (कला), ज्ञानप्रसारक उच्च माध्यमिक विद्यालय, अस्नोडा (कला), आवर लेडी ऑफ रोझरी, दोना पावला (वाणिज्य), श्री भूमिका माध्यमिक विद्यालय पर्ये (वाणिज्य), डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी (वाणिज्य), श्री दामोदर उच्च माध्यमिक विद्यालय मडगाव (विज्ञान), मुष्ठीफंड उच्च माध्यमिक विद्यालय (विज्ञान), फा. बासिलीयो आंद्रे मेमोरियल उच्च माध्यमिक विद्यालय (व्यावसायिक) यांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
दरम्यान, ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण पडलेल्या विद्यार्थ्याला पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळत असून त्यासंबंधीचा अर्ज करण्यासाठी गोवा शालान्त मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वार्षिक उत्पन्न ४.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या उमेदवाराला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. पदवीसाठी दहा हजार तर, पदव्युत्तर शिक्षणासाठी २० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असल्याची माहिती यावेळी शालान्त मंडळाच्या अध्यक्षांनी दिली.
उत्तर पत्रिकेच्या फोटो प्रतीसाठी शेवटची तारीख २६ मे तर फेरतपासणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १२ जून आहे. एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा २४ व २६ जून रोजी अनुक्रमे लेखी व प्रात्यक्षिक स्वरूपात घेतली जाणार आहे. म्हापसा व मडगाव अशा दोनच केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० जून, तर अतिरिक्त शुल्क भरून १२ जून पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कला शाखेत अश्र्विनी प्रियोळकर प्रथम

फोंडा, दि.१५ (प्रतिनिधी) : बारावीच्या परीक्षेत कला शाखेत ८८ टक्के गुण मिळविलेल्या मंगेशी येथील आश्र्विनी शेखर सिनाय प्रियोळकर हिला पत्रकारितेची आवड असून जर्नलिझम ऍण्ड मास कम्युनिकेशनमध्ये पदवी संपादन करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
आश्र्विनी हिला कला शाखेची आवड असल्याने तिने दहावीच्या परीक्षेत ७९ टक्के गुण मिळवूनसुद्धा कला शाखेत प्रवेश घेतला. भाषा अभ्यासाची आवड असल्याने आपण कला शाखा निवडली होती. फर्मागुडी येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या श्रीमती नेली आगियार उच्च माध्यमिक विद्यालयातून शिक्षण घेतले. दहावीपर्यंत शिक्षण तिने फोंड्याच्या आल्मेदा विद्यालयातून पूर्ण केले. परिश्रम, चिकाटी आणि नियमित अभ्यासामुळे यश प्राप्त करू शकले, असे सांगून आश्र्विनी हिने आपणाला लेखन, पत्रकारितेची आवड असल्याचे सांगितले. वृत्तपत्रांतून काही कविता सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहे. विद्यालयातील शिक्षिका गीता शास्त्री आणि पालकांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे यश संपादन करू शकले, असेही तिने सांगितले.
आश्र्विनी हिचे वडील शेखर यांचे म्हार्दोळ येथे दुकान आहे. तर तिची आई कामगार मंत्रालयात नोकरी करते. आश्र्विनी बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून यश संपादन करेल असा आत्मविश्र्वास होता. आम्ही कुठलीही गोष्ट करण्यासाठी तिच्यावर दबाव आणला नाही. तिला कला शाखेची आवड असल्याने त्या शाखेत प्रवेश घेण्यास परवानगी दिली, असे शेखर प्रियोळकर यांनी सांगितले. प्रियोळ येथील डॉ. प्रियोळकर यांची आश्र्विनी पुतणी आहे. शिक्षक, पालकांकडून आश्र्विनीचे अभिनंदन केले जात आहे.

रुचा उदय कामत
खडपाबांध फोंडा येथील रुचा उदय कामत हिला कला शाखेत ८७ टक्के गुण मिळाले आहे. कला शाखेत पदवी संपादन केल्यानंतर इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा मानस आहे, असे रुचा कामत हिने सांगितले. तिने बारावीचे शिक्षण फर्मागुडी येथील गोवा विद्याप्रसारक मंडळाच्या नेली आगियार उच्च माध्यमिक विद्यालयातून घेतले तर दहावीचे शिक्षण आल्मेदा विद्यालयातून पूर्ण केले. दहावीच्या परीक्षेत तिला ७५ टक्के गुण मिळाले होते. कला शाखेची आवड असल्याने तिने चांगले गुण मिळून सुद्धा या शाखेत प्रवेश घेतला. शिक्षक, पालकांच्या मार्गदर्शनामुळे यश संपादन करू शकले, असे तिने सांगितले. तिचे पालक बॅंकेत नोकरी करतात. कुठलीही गोष्ट तिच्यावर लादण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही. तिच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याची मोकळीक दिली आहे, असे तिच्या पालकांनी सांगितले.

सत्य लपवण्याचा प्रयत्न

शिरदोण टोळी हल्ला
ज्योनिटोच्या बहिणीचा दावा
नार्को चाचणीचा मागणी

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी) : शिरदोण येथे झालेल्या हल्ल्यातील सत्य बाहेर येऊ नये यासाठी पोलिस पूर्ण काळजी घेत असून त्यादिवशी काय घडले हे उघड होणार याच भीतीने ज्योनिटोसोबत असलेल्या दोघांची जबानी नोंद करून घेतली जात नसल्याचा आरोप आज ज्योनिटोची बहीण सिंथिया कार्दोज हिने केला आहे. आगशी पोलिस राजकीय दबावाखाली या प्रकरणाचा तपास करीत असल्याने सदर प्रकरण गुन्हा अन्वेषण विभाग किंवा "सीबीआय'कडे देण्याची मागणी तिने पणजीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली.
यावेळी तिच्यासोबत ज्योनिटोचा चुलत भाऊ ज्युडास फर्नांडिस व कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. मिरांडा, प्रकाश नाईक व त्याच्या अन्य साथीदारांनी मिळून ज्योनिटो याच्यावर हल्ला केला, त्यामुळे हे टोळीयुद्ध होऊ शकत नाही, असा दावा करून त्यानंतर ज्योनिटोने जे केले ते केवळ आत्मरक्षणासाठी केले, अशी भूमिका सिंथियाने घेतली आहे.
दि. १० मे रोजी ही घटना घडल्यानंतर ज्योनिटोसोबत असलेले डॉम्निक व महावीर यांची प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून जबानी नोंद करून घेण्यासाठी त्यांना आगशी पोलिस स्थानकावर बोलावून नेण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची साक्ष नोंदवून घेण्याचे सोडून त्यांना मारहाण केली आणि खुनाच्या गुन्ह्याखाली अटक केली, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हा हल्ला पूर्व नियोजित होता आणि तो मेरशी येथील आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांचा पुत्र रुदॉल्फ फर्नांडिस याच्या सांगण्यावरून झाला होता, असा दावा सिंथियाने केला आहे.
"हे सत्य उघड करण्यासाठी आणि त्यादिवशी नेमके काय झाले याची माहिती करून घेण्यासाठी पोलिसांनी आग्नेल फर्नांडिस, रुदॉल्फ फर्नांडिस, प्रकाश नाईक व भाऊ ज्योनिटो यांची नार्को चाचणी करावी' अशी मागणीही सिंथियाने केली आहे. या संदर्भात एक निवेदनही राज्यपाल एस. एस. सिद्धू, मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक यांना पाठवण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटल्या प्रमाणे, मेरशी पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच प्रकाश नाईक ऊर्फ "पको' यांनी ज्योनिटोचा खून करण्याचा कट रचला होता. प्रकाश नाईक हा रुदॉल्फाच्या मर्जीतला असल्यामुळे त्यादिवशी मिरांडा याच्या टोळीच्या साहाय्याने ज्योनिटोला संपवण्याचा त्याचा कट होता. प्रकाश नाईक हा मुख्य सूत्रधार असून त्याला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. तसेच ज्योनिटोला मारहाण केल्यानंतर त्याची माहिती प्रकाश नाईक याने कोणाला दिली होती, हे पडताळून पाहण्यासाठी त्याच्या मोबाईलवरून केलेले "कॉल डिटेल्स' तपासून पाहावे, अशी मागणी सिंथियाने केली आहे.
ज्योनिटो याला जिवंत मारणार असल्याची धमकी रुदॉल्फ याने काही दिवसांपूर्वी यतीन तिगडे याला दिली होती, असेही तिने सांगितले. रुदॉल्फ याने ज्योनिटो याला आपल्या टोळीत सहभागी होण्याची "ऑफर' दिली होती, ज्योनिटोने ती नाकारली होती. त्यामुळेच ज्योनिटो याला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा सिंथियाने यावेळी केला.

वेश्याव्यवसाय प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

पंचसदस्यासह अनेकांचा सहभाग
त्या बांगलादेशी मुलीला पळवण्याचा डाव?

पणजी, दि.१५ (प्रतिनिधी): पेडणे येथील तथाकथित वेश्या व्यवसाय प्रकरणात गुंतलेल्या टोळीच्या भानगडी नुकत्याच कुठे बाहेर पडत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. "गोवादूत'ने या विषयाचा पर्दाफाश केल्यानंतर येथे गरमगरम चर्चा सुरू झाली असून या टोळीची इतर अनेक प्रकरणे एकापाठोपाठ एक उघड होत चालली आहेत.
"आपलेच दात व आपलेच ओठ' या न्यायाने आत्तापर्यंत याविषयावर मूग गिळून गप्प बसलेल्या स्थानिकांनी आता आपले तोंड उघडण्यास सुरुवात केली आहे. या टोळीच्या भानगडींना काहीही पारावार राहिला नसल्याने ही टोळी एव्हानाच संपुष्टात आली नाही तर त्याचे परिणाम स्थानिकांनाही भोगावे लागणार असल्याने आता स्थानिकांकडूनच या टोळीच्या भानगडींचा पाढा वाचला जात आहे. खाकी दलालांच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या या टोळीत अनेक स्थानिक प्रतिष्ठित लोकांचा सहभाग असून काही पंचसदस्यही यात सामील असल्याची माहिती उघड झाली आहे. संतोष सावंत हा या भागात राजेश सावंत या नावानेच अधिक परिचित आहे, त्याच्याबरोबर आणखीनही काही पोलिस शिपाई यात गुंतले असून त्यांना वरिष्ठांचे अभय मिळत असल्याची गोष्ट पुढे आली आहे. या टोळीचा अंमलीपदार्थ व्यवहार व पोलिसांचे हप्ते गोळा करण्यातही सहभाग आहे. या टोळीचा पर्दाफाश झाल्यास पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली जाणार असल्याने पोलिसांकडूनच हे प्रकरण दाबून टाकण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे कळते.
म्हापसा पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी मुलीची रवानगी मेरशी येथील सुधारगृहात करण्यात आली असून ही मुलगी या संपूर्ण प्रकरणातील प्रमुख साक्षीदार आहे. आता तिलाच येथून गायब करून ती पळून गेल्याचे भासवण्याची शक्कल या टोळीतील काही सूत्रधारांनी लढवली आहे. पेडणे पोलिस स्थानकातील शिपाई संतोष सावंत हा वेश्या व्यवसायात गुंतल्याने त्याच्या निलंबनाचे आदेश उत्तर गोव्याचे अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी जारी केले खरे परंतु तो एकटा या प्रकरणी बळीचा बकरा ठरल्यास त्याच्याकडून इतरांच्या नावांचाही पर्दाफाश होण्याची भीती या टोळीतील अन्य साथीदारांना सध्या सतावत आहे. याप्रकरणातील अनेक संशयितांनी एव्हानाच अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या टोळीकडून या व्यवसायात काही स्थानिक महिलांनाही गुंतवल्याची चर्चा या भागात सुरू आहे.
दरम्यान, पेडण्यातील विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारशी संबंध असलेल्या एका बड्या नेत्याकडे या लोकांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी आर्जव सुरू केल्याचे वृत्त हाती आले आहे. या नेत्याने गृहमंत्री रवी नाईक यांची याप्रकरणी भेट घेतल्याची चर्चा येथे सुरू आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून आधीच टीकेचे लक्ष्य बनलेल्या गृहमंत्र्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवल्याने त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा पेडणेतील मांद्रे या गावातील असल्याचेही चर्चा इथे मोठ्याप्रमाणात सुरू आहे.

कवेश, अल्लाबक्षला तीन दिवसांचा रिमांड

मडगाव, दि. १५ (प्रतिनिधी): गेल्या आठवड्यात कुंकळ्ळी वेरोडा येथे झालेल्या मूर्तिभंजन प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी काल अटक केलेल्या कवेश गोसावी व अल्लाबक्ष या दोघांना आज कोर्टासमोर उभे करून अधिक चौकशीसाठी ३ दिवसांच्या रिमांडमध्ये घेतले.
उभयतांची एकमेकांशी असलेली दोस्ती व मूर्तिभंजन प्रकरणात त्यांचे असलेले संधान उघड करण्यासाठी हा रिमांड घेण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली. कुंकळ्ळीचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचा वेरोडा वा अन्य मूर्तिभंजन प्रकरणात किती हात आहे त्याचा तपास जारी आहे. ते परस्परांचे मित्र आहेत याचे पुरावे आहेत तसेच त्या दिवशी ते कुठे होते व काय करीत होते ते पडताळून पाहिले जात आहे.
दरम्यान, या घटनेतील मुख्य सूत्रधार अल्लाबक्षजवळ सापडलेल्या पासपोर्टवर अब्दुल गफूर असे आहे तर मतदान ओळखपत्रावर अल्लाबक्ष असे नाव आहे. पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन त्याचा तपास चालविला आहे. ही बनवेगिरी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्या विरुद्ध बनवेगिरीचा नवा गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिस करीत आहेत.

महानंदकडून नवीन माहिती नाही!

फोंडा सीरियल किलर प्रकरण
फोंडा, दि.१६ (प्रतिनिधी) : सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याची बेपत्ता झालेल्या युवतींच्या प्रकरणाशी काय संबंध आहे याची चौकशी सुरू असून त्याने अद्याप आणखी नवीन खुनाबाबत कबुली दिलेली नाही.
कु.योगिता खुशाली नाईक (नागझर कुर्टी), दर्शना तुकाराम नाईक (तरवळे शिरोडा), वासंती गावडे (वडाळवाडा मडकई), केसर रघु नाईक (मापा पंचवाडी), नयन गावकर (अमळाय पंचवाडी), सुनिता गावकर (बेतोडा), अंजनी गांवकर (निरंकाल), निर्मला घाडी (बेतकी खांडोळा), सुरत गावकर (माट्टी पंचवाडी) या नऊ युवतींच्या खुनाची कबुली आत्तापर्यंत संशयित आरोपी महानंद नाईक याने दिली आहे. मडगावची दीपाली ज्योतकर, दाभाळची गुलाबी गावकर, कुडका येथील सुशीला, सांगे येथील निर्मला या मुलींच्या प्रकरणातसुद्धा महानंद संशयाच्या घेऱ्यात आहे.
महानंद नाईक याने उघड केलेल्या खुनांबाबत सविस्तर माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. युवतीच्या बेपत्ता प्रकरणाची माहिती फोंडा पोलिसांनी मागितली आहे. पोलिसांना मिळणाऱ्या माहितीची चौकशी केली जात आहे. कुडका येथील सुशीला बेपत्ता प्रकरणी महानंद नाईक याची चौकशी केली जात आहे. दाभाळ येथील गुलाबी गावकर खून प्रकरणीसुद्धा चौकशी केली जात आहे. मात्र, महानंद नाईक याने अद्याप याप्रकरणी आपला हात असल्याची कबुली दिलेली नाही. महानंद हा कोणतीही माहिती देण्यास पुढे येत नाही. कुठल्याही प्रकरणासंबंधी प्रश्न विचारल्यास आपणास माहिती नसल्याचे सांगत आहे. फोंड्यात ह्याच काळात झालेल्या अन्य एका खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिस अधिकारी मग्न असल्याने महानंद नाईक याच्याकडे लक्ष केंद्रित करण्यात पोलिसांना वेळ मिळालेला नाही. तरीही त्याची चौकशी करण्याचे काम पोलिस अधिकाऱ्यांनी सुरूच ठेवले आहे. पोलिस उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील तपास करीत आहेत.

Friday, 15 May, 2009

मडगावातील टोळीचे काम?

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - मूर्ती मोडतोड प्रकरणात मडगाव येथील एक टोळी कार्यरत असून आपले मनसुबे यशस्वी करण्यासाठी ही टोळी कवेश याचा वापर करीत होती, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. कवेश याला बलात्कार प्रकरणात अटक झाली होती, त्यावेळी तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याचा या टोळीशी संपर्क आला. एक मूर्ती तोडण्यासाठी पाच हजार रुपये देण्याचे आमिष त्याला दाखवण्यात आले. त्यानंतर गोव्यातील मंदिरांची पाहणी करून त्यांचे मूर्तिभंजनाचे सत्र सुरू झाले. ही टोळी मडगाव येथील असली तरी, त्याची पाळेमुळे शेजारील राज्यात असल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
दरम्यान, या टोळीचा गोव्यातील हिंदू देवतांच्या मूर्तिभंजनामागचा हेतू काय होता हे कोडे सोडवण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. सहा महिन्यांपूर्वी कवेश याला अटक करण्यात आली होती, त्यावेळी त्याचा हुबळी येथील काही लोकांशी संपर्क असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. तसेच सध्या कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेल्या अल्लाबक्ष याच्याशी तो मध्यरात्री २ ते पहाटे ४ दरम्यान संपर्क साधत होता, अशी माहिती उपलब्ध असताना या टोळीला त्याचवेळी पोलिसांनी का अटक केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कवेश व अल्लाबक्ष यांना रीतसर अटक

मडगाव व कुंकळ्ळी, दि. १४ (प्रतिनिधी)ः गेल्या आठवड्यात कुंकळ्ळी वेरोडा येथे झालेल्या मूर्तिभंजन प्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी आज कवेश गोसावी व या घटनेमागील मुख्य सूत्रधार अल्लाबक्ष ऊर्फ साहिबा अल्लाबक्ष (वय३४) यांना रीतसर अटक केली. अल्लाबक्ष याला पोयराबांद - कुंकळ्ळी येथे ताब्यात घेण्यात आले होते. उद्या त्यांना कोर्टासमोर उभे करून अधिक चौकशीसाठी कोठडी घेतली जाणार आहे.
गेल्या आठवड्यातील या घटनेनंतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिस यंत्रणेवरील दबाव वाढतच होता, त्यातूनच पोलिसांनी काल कवेश गोसावी याला ताब्यात घेतले होते. तत्पूर्वी त्याला गुन्हा अन्वेषण विभागाच्या खास पथकाने मूर्ती भंजनप्रकरणीच अटक केले होते.
कुंकळ्ळीचे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचा वेरोडा व अन्य मूर्तिभंजन प्रकरणात किती हात आहे त्याचा तपास सुरू आहे. कवेशकडून मिळालेल्या माहितीवरून अल्लाबक्षला ताब्यात घेतलेले नसले तरी ते दोघेही "असा प्रकार करायला हवा' असे बोलताना एकाने ऐकले होते. या माहितीवरून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांना अल्लाबक्षजवळ एक पासपोर्ट आढळून आला असून त्याच्यावर अब्दुल गफार असे नाव आहे. सदर पासपोर्टवर कार्ले कट्टा, बंगळूर - कर्नाटक असा पत्ता असून ७-१२-२००१ रोजी तो जारी करण्यात आला होता. मंदिर व मूर्ती तोडफोड प्रकरणातील मुख्य संशयित कवेश गोसावी व अल्लाबक्ष यांनी आपण एकमेकांना ओळखत नसल्याचे सांगितले होते. परंतु, पोलिसांनी हिसका दाखवल्यावर अल्लाबक्ष याने आपण कवेशला ७ वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले. याविषयी मिळालेल्या माहितीनुसार अल्लाबक्ष याचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मूर्तिभंजन झालेल्या तळवडा येथील मंदिरापासून सुमारे २ किमी अंतरावर त्याची साइट आहे. मूर्ती तोडफोडीसाठी वापरलेली हत्यारे व इतर साहित्य अशा बांधकाम स्थळांवर आढळून येत असल्याने अल्लाबक्ष याचा या प्रकरणात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार कवेश सातत्याने अल्लाबक्षची पत्नी दिलायला हिच्या मोबाईलवर संपर्क साधत होता, असे उघड झाले आहे. दिलायला हिचे जुझेगाळ येथे घर असून अल्लाबक्ष गोमंत विद्यानिकेतनजवळ भाड्याच्या खोलीत राहत होता, अशी माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अल्लाबक्ष याची मडगाव येथील इस्पितळात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला कुंकळ्ळी येथे ठेवण्यात आले आहे. तर, कवेश याला मडगाव येथे ठेवण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक शांबा सावंत आणि निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बारावीचा निकाल आज

पणजी, दि. १४ - गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २००९ मध्ये घेतलेल्या बारावी इयत्तेचा निकाल उद्या १५ मे रोजी दुपारी ३.३० वाजता घोषित केला जाईल.
परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांची निकालपत्रे १६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात उपलब्ध असतील. बार्देश, तिसवाडी, पेडणे, डिचोली, सत्तरी व फोंडा तालुक्यातील निकालपत्रे मंडळाच्या पर्वरी येथील कार्यालयात तर काणकोण, केपे, सांगे, सासष्टी आणि मुरगाव तालुक्यातील निकाल दक्षिण शैक्षणिक विभाग, मडगाव येथे देण्यात उपलब्ध केला जाईल. खासगीरीत्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपले निकाल व उत्तीर्ण झाल्याचा दाखला मंडळाच्या कार्यालयातून न्यावा, असे कळवण्यात आले आहे.
निकाल पुढील वेबसाइट, एसएमएस आणि आयव्हीआरएस वर उपलब्ध असतील.
वेबसाइट ः www.go4result.com, www.ExamResults.net, www.rediff.com, results.sify.com, www.indiaresults.com, www.exametc.com, www.GoaEducation.net, www.schools9.com, www.goaresults.nic.in. एसएमएसद्वारे निकालासाठी ः GB 12 Space सर्व ऑपरेटर्स - ५७३३३, ५४५४५, ५६३८८, ५५८८८ तसेच व्होेडाफोन - ५६७३०, आयडिया - ५५४५६७८, रिलायन्स - ५६५०६, बीएसएनएल -५६५०५, एअरटेल -५३०३० या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकतात.
GOA12 Space < seat No > सर्व ऑपरेटर्स ५६७६७५०, ५२४२४, ५८८८८, ५६२६३ आणि IVRS वर निकालासाठी सर्व ऑपरेटर्स ५०५२४२४, १२५५५२४, ५०५१०१०१०, ५०५२८२८, ५४३२१७ तसेच व्होडाफोन -५६७३१, आयडिया -५५४५६७८, ५३०३००, रिलायन्स -५३०३०, ५३०३०३०३, ५३०३०१०१, बीएसएनएल - १२५५५६०, टाटा - १२९७१, एअरटेल -५४३२१७३, ५४३२१२२२२ वर संपर्क साधू शकतात, असे शालान्त मंडळाचे सचिव डी. आर. भगत यांनी कळवले आहे.
दरम्यान, बीएसएनएल तर्फे मोबाइल व लॅंडलाइनवरून निकालाची व्यवस्था करण्यात आली आहे. निकाल झाल्यानंतर १२५५५ किंवा १२५५५६० क्रमांक फिरवून निकाल मिळवता येईल. निकाल जाहीर होण्यापूर्वी नोंदणी करून निकाल मागितल्यास तो जाहीर झाल्यानंतर लगेच एसएमएसद्वारे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मोबाइलला प्रती मिनिट ५ रु. व लॅंडलाइन साठी प्रत्येकी २० सेकंदांच्या पल्स प्रमाणे भाडे आकारले जाईल. एसएमएस द्वारा निकालासाठी GB12 ROLL NO असा संदेश पाठवावा.

आणखी दोन प्रकरणी महानंदची चौकशी सुरू

फोंडा, दि.१४ (प्रतिनिधी) - कुडका आगशी येथील सुशीला ऊर्फ शशी तातू फातर्पेकर (३० वर्षे) या युवतीच्या बेपत्ता प्रकरणी सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच मडगाव येथून बेपत्ता असलेल्या दीपाली ज्योतकर हिची बहीणसुद्धा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, कुडका आगशी येथील सुशीला फातर्पेकर ही युवती २४ ऑक्टोबर ०७ पासून बेपत्ता आहे. ही युवती पणजी येथे कामाला होती. सुहास ऊर्फ शिवेश्वर गावडे या युवकाशी तिची ओळख व मैत्री झाली. सदर सुहास नामक युवकाने तिला आपल्या कुटुंबीयांना दाखवण्यासाठी घरातून येताना दागिने घालून येण्याची सूचना केली होती. संशयित महानंद नाईक याची युवतींना आपल्या जाळ्यात ओढण्याची पद्धत अशाच प्रकारची असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे, या बेपत्ता प्रकरणामध्ये त्याचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मडगाव येथील दीपाली ज्योतकर हिची एक बहीणसुद्धा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ज्यावेळी ज्योतकर यांच्या घराचे काम सुरू होते, त्याच वेळी ती बेपत्ता झाली होती. त्यानंतर आठ दिवसांनी दीपाली ज्योतकर बेपत्ता झाली, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
महानंद नाईक याने आत्तापर्यंत नऊ खुनांची कबुली दिली आहे. गुलाबी गावकर खून, मडगाव येथील दीपाली ज्योतकर, सांगे येथील निर्मला घाडी या युवतीच्या बेपत्ता प्रकरणांत संशयित महानंद नाईक याची चौकशी केली जात आहे. पोलिस उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. एल. पाटील तपास करत आहेत.

महानंदला फासावर चढवा


संतप्त नागरिकांचा फोंड्यात मोर्चा


फोंडा, दि.१४ (प्रतिनिधी) - "सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याला फासावर चढवा', "महानंद नाईक याचा निषेध असो', "महानंद नाईक याची पत्नी पूजा हिला अटक करा', "महानंद नाईक याची कसून चौकशी करा'. फोंडा व आसपासच्या नागरिकांनी आज (दि.१४) संध्याकाळी दिलेल्या जोरदार घोषणांनी क्रूरकर्मा महानंदच्या विरोधात जनतेच्या मनात असलेल्या तीव्र संतापाची प्रचिती आली.
तरवळे ग्रामस्थांनी सीरियल किलर महानंद नाईक याचा निषेध करण्यासाठी आणि पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी आयोजित केलेल्या मोर्चात हजारो लोकांनी भाग घेतला. यावेळी मोर्चात सहभागी लोकांनी महानंद नाईक याला फासावर चढवा, महानंदची पत्नी पूजा नाईक हिला अटक करा अशा घोषणा दिल्या. याप्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करणाऱ्या घोषणाही नागरिकांनी दिल्या. सीरियल किलर महानंद नाईक याच्या विरोधात लोकांत निर्माण झालेली चीड याद्वारे उघड झाली.
या मोर्चाला तिस्क फोंडा येथून सुरुवात करण्यात आली. फोंडा नगरपालिका, दादा वैद्य चौक, जुना बसस्थानक आदी भागातून हा मोर्चा फोंडा पोलिस स्थानकावर नेण्यात आला. पोलिस स्थानकासमोर पोलिसांनी मोर्चा अडवला, यानंतर मोर्चातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक शेराफीन डायस, निरीक्षक सी. एल. पाटील यांची भेट घेऊन महानंद नाईक प्रकरणासंबंधी चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने महानंद नाईक याची पत्नी पूजा नाईक हिला अटक करून तिची चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणासंबंधी आणखी काही माहिती तिच्याकडून मिळू शकेल, असे पोलिस अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. सीरियल किलर महानंद नाईक प्रकरणाचा पूर्ण छडा लागेपर्यंत फोंड्यात तपास कामात असलेल्या अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करू नये, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली.
महानंद नाईक याने केलेल्या युवतींच्या खुनाच्या प्रकरणाचे तपास काम प्राथमिक पातळीवर असून योग्य पद्धतीने आणि योग्य दिशेने सुरू आहे, असे पोलिस उपअधीक्षक शेराफीन डायस यांनी शिष्टमंडळाला सांगितले. महानंद नाईक याच्याकडून मिळणाऱ्या माहितीनुसार प्रकरणासंबंधी विविध पुरावे गोळा केले जात आहेत. तपास कामात कोणतेही कच्चे दुवे राहू नये म्हणून प्रयत्न सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वारंवार माहिती देऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात महानंद नाईक एकटाच गुंतलेला असल्याने गेली पंधरा वर्षे त्याचे हे कृत्य सुरू होते. याप्रकरणाच्या तपासात त्याची पत्नी किंवा अन्य कोणाचाही सहभाग आढळून आल्यास त्यालाही त्वरित अटक केली जाणार आहे, असे सांगण्यात आले. महानंद नाईक हा चलाख आहे. दोन ते तीन भेटीत युवतींना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम तो करत होता. एखाद्या युवतीसोबत कोणी ओळखीच्या व्यक्तीने पाहिले तर तो त्या युवतीशी पुन्हा संपर्क साधत नव्हता. तो नेहमी बसमधून प्रवास करत असे, त्याने फक्त निर्मला घाडी आणि तिच्या आईला वरच्या बाजारातून बसस्थानकावर आणून सोडले होते. महानंद कुठल्याही युवतीच्या घरी गेला नाही. बाजारात किंवा वाटेत युवतीला हाक मारत असे, दुसऱ्यावेळी तिच्याशी संभाषण करत असे आणि तिसऱ्या वेळी तिला आपल्यासोबत घेऊन जात असे. हाक मारूनसुद्धा त्याच्याकडे न पाहणाऱ्या युवतींच्या वाटेला तो कधी जात नसे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
या शिष्टमंडळात तरवळेचे पंच सदस्य फ्रान्सिस वाझ, माजी पंच सदस्य संदेश प्रभुदेसाई, प्रसाद शिरोडकर, विश्र्वास प्रभुदेसाई, तारा केरकर, माजी मंत्री विनय तेंडुलकर, हेमंत सामंत, ऍड. मनोहर आडपईकर, शिवसेनेचे उपराज्यप्रमुख नामदेव नाईक, दामू नाईक, दर्शना नाईकचे वडील तुकाराम नाईक, योगिताचे वडील, दीपालीची आई व इतरांचा समावेश होता. या मोर्चात तरवळे, शिरोडा, बोरी, कुर्टी, मडकई, बेतोडा, निरंकाल आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चात महिलांची संख्यासुद्धा लक्षणीय होती. तसेच महानंद नाईक याने पळवून नेऊन खून केलेल्या काही युवतींचे कुटुंबीयसुद्धा सहभागी झाले होते. ग्रामस्थांच्या वतीने उपअधीक्षक शेराफीन डायस, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. येथील पोलिस स्थानकासमोर महानंद नाईक याच्या प्रतिमेचे दहन करण्यात आल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

पोलिसांच्या आशीर्वादाने राज्यात वेश्याव्यवसाय!

- पेडणे भागात खळबळ
- निलंबित पोलिस शिपायाची
कसून चौकशीची मागणी

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) ः राज्यातील वेश्याव्यवसायात खाकी वर्दीतील दलालही मोठ्या प्रमाणात वावरत असल्याचे उघड झाल्याने खळबळ माजली आहे. पेडणे पोलिस स्थानकातील शिपाई संतोष सावंत हा वेश्या व्यवसायात गुंतल्याने त्याच्या निलंबनाचे आदेश उत्तर गोव्याचे अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी जारी केले खरे; तथापि संतोषची कसून चौकशी झाल्यास आणखीही खाकी दलालांचा पर्दाफाश होऊ शकतो, असा दावा पेडण्यातील स्थानिकांकडून केला जात आहे. पोलिसांच्या आशीर्वादाने वेश्याव्यवसाय करणारी मोठी टोळीच या भागात कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा अधिवेशनात कळंगुटचे आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी राज्यात खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा मुद्दा लावून धरला होता.
पोलिस शिपाई संतोष सावंत हा वेश्या व्यवसायात गुंतल्याची माहिती म्हापसा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीअंती प्राप्त झाली होती. म्हापसा पोलिसांनी टाकलेल्या एका छाप्यात ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी तरुणीकडून सावंत याचे नाव उघड झाले होते. याप्रकरणी अधीक्षक फर्नांडिस यांनी संतोषच्या निलंबनाचे आदेश तात्काळ जारी केले.
दरम्यान,संतोषला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आश्चर्य म्हणजे त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. मुळात संतोषबरोबर पोलिस स्थानकातील इतरही "खाकी दलाल' वेश्याव्यवसायात कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. काही खाजगी दलालांबरोबर हातमिळवणी करून पोलिस या व्यवसायात गुंतले असून या संपूर्ण प्रकरणाचा योग्य दिशेने तपास झाल्यास एक भली मोठी टोळीच कार्यरत असल्याचे उघडकीस येईल,अशी शक्यता पेडणे भागातील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
पेडण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती दिली. संतोष सावंत याच्याबरोबर आणखीनही काही लोक सहभागी असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान,संतोष सावंतचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती मिळाली असून त्याद्वारे या प्रकरणात गुंतलेल्यांचा मागोवा घेणे शक्य होणार आहे. या व्यवसायातून पोलिसांना भरपूर वरकमाई होते. त्यामुळे हे प्रकरण दाबून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसे झाल्यास संतोष सावंत हा बळीचा बकरा ठरेल,असे बोलले जात आहे. या प्रकरणाची कसून चौकशी झाल्यास अनेक धेंड्यांची नावे उघड होण्याचा संभव आहे. संतोष सावंत याला अटक करण्यास पोलिस जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याची टीकाही अनेकांनी केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्याने "खाकी दलालां'च्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने त्यांच्याकडून हे प्रकरण मिटवण्यासाठी मंत्र्यांचे दरवाजे ठोठावण्याचे काम सुरू असल्याचीही चर्चा पेडणे भागात सुरू आहे.

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग

नवी दिल्ली, दि. १४ ः लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर होणार असला तरी, संयुक्त पुरोगामी आघाडी (संपुआ) व राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) आत्तापासूनच मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. दोन्ही आघाड्यांच्या दिग्गज नेत्यांनी आत्तापासूनच "सेटिंग' सुरू केले आहे. कमी - जास्त जागा मिळाल्यास सरकार स्थापनेसाठी तारेवरची कसरत करावी लागू नये म्हणून कोणत्या पक्षाला कसे आपल्याकडे ओढावे, याचाच सध्या ही मुत्सद्दी मंडळी अंदाज घेत आहेत.
कुस्तीच्या आखाड्यात उतरल्यानंतर दोन मल्ल सुरुवातीला डाव टाकण्यापूर्वी जसा एकमेकांच्या शक्तीचा अंदाज घेतात, तसेच सध्या राजकीय वर्तुळातही सुरू आहे. कोणता पक्ष साधारणत: किती किमतीत मानेल, त्याचप्रमाणे जिंकून येण्याची शक्यता असलेल्या अपक्षांना कसे जाळ्यात ओढायचे, याची व्यूहरचना केली जात आहे.
विशेष बाब अशी की, विविध वाहिन्यांनी जारी केलेल्या जनमत चाचणीचा कौल बघता रालोआ व संपुआसह कोणालाही बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचे निष्कर्ष पुढे आले आहेत. म्हणूनच ही राजकीय डावपेच खेळण्याची वेळ असून रणनीतीची व्यवस्थित आखणी करण्याच्या उद्देशाने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची व कॉंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षनेते व राष्ट्रीय सरचिटणिसांची आपापल्या निवासस्थानी बैठक घेतली. अडवाणी यांनी तर वेळ दवडायचा नाही म्हणून अंतिम टप्प्याची निवडणूक संपून २४ तास होत नाही तोच भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांशी विचारविनिमय सुरू केला आहे.
तिकडे हैद्राबादेत तेलंगणा राष्ट्र समितीच्या (टीआरएस) चंद्रशेखर राव यांनी पक्षाच्या मुख्यालयात ठाण मांडले आहे. त्यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांना माझ्या संपर्कात राहा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणालाही बहुमत मिळणार नाही अन् त्रिशंकू परिस्थिती येणार याची जाणीव असल्यामुळे कॉंग्रेस आणि भाजपने जिंकून येण्याची शक्यता असलेले अपक्ष उमेदवार आणि लहान पक्ष आपल्या गळाला लागावेत म्हणून मन वळवण्यात तरबेज असलेल्या नेत्यांना कामाला लागा, असे आदेश दिले आहेत.

हालचालींना वेग
निवडणुकीच्या धामधुमीत सर्वच इकडे तिकडे विखुरल्यामुळे महिनाभर ओस पडलेली पक्षांची मुख्यालये पुन्हा गजबजू लागली आहेत. नेत्यांच्या हालचालींमधील गती वाढली आहे. निकालाच्या अंदाजाबाबत प्रतिस्पर्धी परस्परविरोधी दावे करीत असून, सत्तेच्या सिद्धांतांची समीकरणे रोजच बदलत आहेत. प्रत्येक घटना टिपण्यासाठी वाहिन्यांचे कॅमेरे व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजधानीत दाटी केली आहे.
नव्या सरकारच्या निर्मितीत कोणकोणते पक्ष सहभागी होतील, कोण बाहेरून समर्थन देतील, त्यांच्या अटी काय असतील याविषयी सध्या सर्वच अनिश्चित आहे. मात्र, ज्या तीन आघाड्या सरकार बनविण्याचा दावा करीत आहेत, त्यांपैकी कोणालाही संधी मिळाली तर देशात कोणते बदल होतील, त्यांचे धोरण कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
लुधियानातील महारॅलीनंतर रालोआचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जो पक्ष अडवाणी यांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा देईल त्याचे स्वागत करण्यास आम्ही तयार आहोत असे भाजप नेते व्यंकय्या नायडू म्हणाले. टीआरएसचा रालोआमध्ये प्रवेश ही त्याचीच सुरुवात म्हणता येईल. नायडू हे सध्या हैद्राबादमध्ये डेरेदाखल आहेत. दक्षिण आघाडीवर विजय मिळविता यावा म्हणून चंद्राबाबू नायडू व जयललितांना रालोआच्या गोटात खेचण्याकरिता त्यांचा खटाटोप सुरू आहे. तसेच संपुआ पुन्हा सत्तेवर येईल असा विश्वास कॉंग्रेस महासचिव दिग्गीराजांना वाटतोय. देशात भाजप व शिवसेना हे दोनच पक्ष जातीय असल्याचे कॉंग्रेसचे मत असून यांच्याशिवाय अन्य कोणत्याही पक्षावर धर्मांध किंवा जातीय असा आरोप आम्ही कधीच केला नाही. १६ तारखेपर्यंत नानाप्रकारचे अंदाज व्यक्त होतील. लोकशाहीत हे टाळता येणार नाही, असे दिग्विजयसिंग म्हणाले.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी मंगळवारी रात्री १० जनपथवर अगदी गुपचूप सोनियांना भेटले. पत्रकारांनी त्यांना बाहेर निघताना बघितल्यानंतर रुमालामागे तोंड लपवून माध्यमांशी न बोलता ते सटकले. असे असले तरी माजी पंतप्रधान व कुमारस्वामी यांचे वडील देवेगौडा यांनी आपला पक्ष तिसऱ्या आघाडीत असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
१९९६ व १९९८ मधील खंडित जनादेशासारखीच स्थिती पाचव्या फेरीच्या मतदानानंतर दृष्टिक्षेपात आहे. तिसऱ्या आघाडीच्या सरकारला कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा मिळेल अशी डाव्यांसह काहींना आशा आहे. म्हणूनच डाव्या पक्षांचे सूर सध्या वरच्या पट्टीतील दिसताहेत. अन् पडद्यामागील जोडतोडीच्या हालचालींनाही वेग वाढला आहे.

रालोआ २१८ वर जाईल!

विविध वाहिन्या आणि संस्थांनी निकालासंबंधी वेगवेगळे अंदाज व्यक्त केले असले तरी ते विश्वासार्ह नाहीत कारण ते शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविले गेलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते रवीशंकर प्रसाद यांनी आज व्यक्त केली. भाजपने केलेल्या पाहणीनुसार १६६ जागांवरील विजय निश्चित आहे, असे सांगून रालोआची संख्या २१८ वर जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष भाजपच ठरेल असे त्यांनी सांगितले. मोठा पक्ष आणि मोठी आघाडी आमचीच असल्याने अन्य पक्षांच्या मदतीने भाजप सरकार बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Thursday, 14 May, 2009

पश्चिम बंगाल, तामिळनाडूतील हिंसाचारात दोन ठार

अंतिम टप्प्यात ६२ टक्के मतदान
नवी दिल्ली, दि. १३ : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. यासोबतच लांबलचक निवडणूक प्रक्रियाही संपुष्टात आली. निवडणूक आयोगाने पाचव्या टप्प्यात ६२ टक्के मतदान झाल्याचे म्हटले आहे. आता सर्वांचे लक्ष १६ मे रोजी होऊ घातलेल्या मतमोजणीकडे लागले असून, जम्मू-काश्मीर वगळता उर्वरित ठिकाणी सुमारे ६० ते ७० टक्के मतदान झाल्याची माहितीही आयोगाने दिली. मतदानादरम्यान तुरळक हिंसाचाराच्या घटना वगळता उर्वरित निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. पश्चिम बंगाल व तामिळनाडूतील हिंसाचारात दोन जण ठार झाले.
मतदानाला सुरुवात झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी मतदान प्रक्रियेने अपेक्षेनुसार वेग घेतला नव्हता. असह्य उकाडा आणि सूर्य आग ओकत असल्यामुळे मतदार घराबाहेर पडणार नाहीत अशी सर्वत्र चर्चा होती. परंतु दुपारनंतर विविध राज्यांमध्ये मतदारांनी अगदी उत्साहात मतदान केले. अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विविध राज्यांमधील मतदानाच्या टक्केवारीवर एक नजर टाकली असता तामिळनाडूत ६० ते ६२, उत्तर प्रदेशात ५२, पुड्डुचेरीत ७५, पंजाबात ६० ते ६५, पश्चिम बंगालमध्ये ७०, उत्तराखंडमध्ये ५० ते ५५, हिमाचल प्रदेशात ५५ आणि जम्मू-काश्मिरात ४० ते ४५ टक्के मतदान झाले.
मतदान सुरू होण्यापूर्वी पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरापासून काही अंतरावर असलेल्या बालीगुडी गावात तृणमूल कॉंग्रेस व माकपा कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या भीषण संघर्षात एक जण ठार झाला. तामिळनाडूतील तीन विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक ठार, तर १३ जण जखमी झाले. डिंडिगुल तहसिलात विरोधी अण्णाद्रमुक आणि सत्तारूढ द्रमुक समर्थकांमध्ये झालेल्या वादाची परिणती संघर्षात झाली. अण्णाद्रमुक कार्यकर्त्यांनी भोसकल्यामुळे डीएमके कार्यकर्ते एस. थंगावेल यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. थंगावेल यांच्या हत्येनंतर डीएमके समर्थकांनी या भागात चांगलाच धुमाकूळ घातला व मोठ्या प्रमाणावर दगडफेकही केली. त्यामुळे डिंडिगुल तहसिलात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंजाबातही दोन पत्रकारांवर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. पंजाबातील सत्तारूढ शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी मोगा क्षेत्रातील दुनेका गावात खाजगी टीव्ही वाहिन्यांच्या दोन पत्रकारांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केले. पत्रकारांनी वाहनांमध्ये शस्त्रे घेऊन जात असलेल्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ चित्रण केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अंतिम टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, द्रमुकचे टी. आर. बालू, दयानिधी मारन, एम. के. अझागिरी, कॉंग्रेसचे मोहम्मद अझरूद्दीन, भाजपच्या मनेका गांधी आणि वरुण गांधी, मुख्तार अब्बास नकवी, एमडीएमकेचे वायको अन् सपाच्या जयाप्रदांचे भाग्य मशिनबंद झाले आहे.
... तर मंत्र्यांना मंदिरात "प्रवेशबंदी'

विविध हिंदू संघटनांना निर्वाणीचा इशारा


पणजी व हरमल, दि. १३ (वार्ताहर) ः हिंदू देवतांची मूर्तिभंजन करून जातीय तेढ माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अटक करण्यासाठी अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीने राज्य पोलिसांना दिलेली ४८ तासांची मुदत गुरुवारी संपुष्टात येत असून पुढील निर्णयासाठी उद्या सायंकाळी सर्व संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेतली जाणार आहे. समितीचे निमंत्रक राजेंद्र वेलिंगकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, जोपर्यंत मूर्तिभंजनाचा तपास लागत नाही तोपर्यंत कोणत्याच मंदिरात मंत्र्यांना भावी काळात प्रवेश करू देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा हिंदू जोडो अभियान व अन्य संघटनांनी दिला आहे.
बैठकीत तालुकास्तरावर नेमलेल्या मंदिर सुरक्षा समिती, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष, शिवसेना तसेच अन्य समविचारी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. काल हिंदू जोडो अभियान, मराठी राजभाषा प्रस्तापन समिती, अखिल गोवा मंदिर सुरक्षा समिती, दिव्य जागृती ट्रस्ट, हिंदू जनजागृती समितीने गृहमंत्री नाईक यांना २८ देवळांतील मूर्तिभंजनाचा तपास अजूनही न लागल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब राजीनामा देण्याची मागणी केली आहे. मूर्तिभंजनाला जबाबदार असलेल्या टोळीला गजाआड करण्यासाठी पोलिसांचे मनोबल वाढण्याचे सोडून हिंदूंकडेच संशयाने का पाहतात, असा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे.
लोकवस्तीपासून लांब असलेल्या मंदिरातील मूर्तींना ही टोळी लक्ष्य बनवत आहे. अशा मंदिरांभोवती पोलिसांनी गस्त वाढवून त्या त्या गावातील लोकांना विश्वासात घेतल्यास हे कृत्य करणाऱ्या टोळीला गजाआड करणे कठीण होणार नाही. तथापि, तसे न करता राजकीय व्यक्तींच्या आदेशानुसार पोलिस तपास करत असल्याची टीका श्री. वेलिंगकर यांनी केली.
दरम्यान, गोव्यात सध्या सुरू असलेल्या मंदिर तोडफोड प्रकरणी गोवा सरकार व गृहमंत्री यांनी काहीच हालचाल न केल्याने आत्तापर्यंत २८ देवळांतील मूर्तिभंजन प्रकरणांत अजून कोणालाही अटक झालेली नाही. गोव्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यानेच त्याचा फायदा उठवून हिंदूंच्या श्रद्धास्थानावर आघात करणे सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी त्वरित खुर्चीवरून पायउतार व्हावे, अशी मागणी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी मंदिर सुरक्षा समितीचे अध्यक्ष राजेंद्र वेलिंगकर, मराठी राजभाषा प्रसारक समितीचे रमेश नाईक, दिव्य जागृती संघाचे अध्यक्ष निवृत्त कॅप्टन दत्ताराम सावंत, हिंदू जनजागृती समितीचे अध्यक्ष जयेश थळी, हिंदू जोडो अभियानचे अध्यक्ष विजय तिनईकर, भाई पंडित, उपस्थित होते. या प्रसंगी सर्वांनी सरकाराचा निषेध करून गृहमंत्र्यांनी राजीनामा न दिल्यास हिंदू प्रेमी संघटना आंदोलन छेडतील असा इशारा दिला. गृहमंत्री व मुख्यमंत्री हिंदू असूनही मूर्ती तोडफोड प्रकरणे उघड्या डोळ्यांनी पाहत असून त्यावर काहीच प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत, अशी टीका यावेळी करण्यात आली.
-------------------------------------------------------------
कवेशचाच हात?
कुंकळ्ळी येथे १७ मूर्तींची मोडतोड होण्याच्या तीन दिवसांपूर्वी कवेश गोसावी व त्याचा अन्य एक मित्र बक्षी हे दोघे त्या परिसरातील एका मंदिरात देव दर्शनासाठी गेले होते. यावेळी कवेश हा मंदिरात बराच वेळ बसला होता तर बक्षी बाहेर निघून गेला होता. काही वेळाने बक्षी परतल्यावर दोघेही तेथून निघून गेले. यानंतर दोन दिवसांनी येथील मूर्तींची मोडतोड झाल्याची माहिती खास सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. प्राप्त माहितीनुसार आज दिवसभर गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक कवेश याला घेऊन अनेक ठिकाणी चौकशीसाठी फिरत होते.
-------------------------------------------------------------------
...तर त्यांना सल्ला दिला असता का?
मंदिर सुरक्षा समितीनेच पैसे एकत्र करून सर्व मंदिरात सुरक्षा रक्षक तैनात करावे आणि त्या त्या मंदिरांना सुरक्षा द्यावी, असा गृहमंत्री रवी नाईक यांनी दिलेला सल्ला निंदनीय आणि खेदजनक असल्याची प्रतिक्रिया राजेंद्र वेलिंगकर यांनी व्यक्त केली. हाच प्रकार चर्च किंवा मशिदीत घडला असता तर त्यांनी असा सल्ला ख्रिस्ती वा मुस्लिमांना दिला असता का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला असून गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे, असे आव्हान दिले आहे.

कोकण रेल्वे अधिकाऱ्यांची जबानी नोंद

रशियन तरुणीचे मृत्यू प्रकरण
पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) : रशियन तरुणी रेल्वेतून खाली पडून चाकांखाली आल्याने तिचा अपघाती मृत्यू झाल्याचा म्हापसा पोलिसांचा सिद्धांत कोकण रेल्वे महामंडळाने खोडून काढल्याने पोलिसांनी आता कोकण रेल्वेच्या प्रवक्त्यांनाच चौकशीसाठी पोलिस स्थानकावर बोलावले. दरम्यान, रशियन दूतावासाचे महासंचालक ऍलेक्झॅंडर मॅटिटीस्की यांनी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पत्र पाठवून या प्रकरणात प्रत्यक्ष लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
रेल्वेतून प्रवास करणारी व्यक्ती त्याच रेल्वेच्या चाकाखाली येणे शक्य नसल्याचा दावा कोकण रेल्वेचे प्रवक्ते बबन घाडगे यांनी दोन दिवसापूर्वी प्रसिद्धी माध्यमांकडे बोलताना केला होता. त्यानंतर पोलिसांना अपघाताचा सिद्धांत गुंडाळून खुनाची शक्यता नाकारता येत नाही, अशी भूमिका घेण्यास भाग पाडले होते.
यासंदर्भात बबन घाडगे यांना पोलिस स्थानकावर बोलावून त्यांची रीतसर जबानी नोंद करून घेतली जाणार असल्याचे उपविभागीय पोलिस उपअधीक्षक सेमी तावारीस यांनी सांगितले. जबानी देताना आपला सिद्धांत बदलण्यासाठी पोलिसांनी जोरदार प्रयत्न चालवले असले तरी आपण आपल्या वक्तव्याशी ठाम राहणार असल्याचे श्री. घाडगे यांनी सांगितले. मी माझ्या वक्तव्याशी ठाम आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या ठिकाणी ही तरुणी रेल्वेतून खाली पडून त्याच रेल्वेच्या चाकाखाली येणे शक्य नाही. खरे तर ती रुळापासून बाहेर फेकली गेली पाहिजे होती. मी एक अभियंता आहे त्यामुळे मी काय सांगतो त्याची मला पुरेपूर माहिती आहे, असे श्री. घाडगे म्हणाले. विशेष प्रसंगीच असे होऊ शकते की, खाली पडलेली व्यक्ती चाकाखाली येऊ शकते. रेल्वे बोगद्यातून जात असता एखादी व्यक्ती खाली पडली आणि तेथे समांतर असलेल्या रुळावरून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेने तिला धडक दिली तरच व्यक्ती रेल्वेखाली येऊ शकते. परंतु, रशियन तरुणीचा मृतदेह ज्या ठिकाणी मिळाला आहे, त्या ठिकाणी बोगदा नाही आणि समांतर रेल्वे मार्गही नाही, असे श्री. घाडगे म्हणाले.
श्री. घाडगे यांच्या भूमिकेशी रशियन दूतावासाने सहमती दर्शवली असून पोलिसांचा सिद्धांत पटत नसल्याचे मत ऍड. विक्रम वर्मा यांनी केले आहे.

आता मिकी पाशेकोंविरूद्ध आरोपपत्र दाखल होणार

पणजी, दि.१३ (प्रतिनिधी): माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यानंतर आता पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरुद्धही लवकरच आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे. वीज खात्याचे कनिष्ठ अभियंते कपिल नाटेकर यांना घरी बोलावून मारहाण केल्याप्रकरणी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे, असेही ऍड. रॉड्रिगीस म्हणाले. मिकी पाशेको यांच्याकडून विश्वजित राणे यांची पाठराखण होणे त्यामुळे स्वाभाविक आहे, असा टोला त्यांनी हाणला.
आज रायबंदर येथे आपल्या कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तात्काळ आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपपत्राची मुक्त व न्याय्य पद्धतीने चौकशी करण्यास मदत करावी, अशी मागणीही ऍड. रॉड्रिगीस यांनी केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुरुवातीस आरोग्यमंत्र्यांविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी जुने गोवे पोलिसांना तब्बल २२ दिवस लागले होते. आरोग्यमंत्री पोलिस तपासात हस्तक्षेप करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. एक सामान्य नागरिक या नात्याने आरोपपत्राला सामोरे जायचे असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, असेही ऍड. रॉड्रिगीस म्हणाले. या प्रकरणात काम पाहणाऱ्या सरकारी वकील विनी कुतिन्हो यांची भूमिका पक्षपाती आहे. आरोग्यमंत्र्यांच्या संरक्षणासाठीच त्यांनी प्रयत्न केला, दोघेही एकमेकांच्या संपर्कात तर होतीच शिवाय मोबाईलवरून त्यांची बोलणी झाल्याचा दावाही ऍड.रॉड्रिगीस यांनी केला.
आरोग्यमंत्र्यांना या प्रकरणांतून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी ७ मे रोजी ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी पोलिस अधिकारी व सरकारी वकिलांची गुप्त बैठक घेतली, यावेळी आरोग्यमंत्र्यांशीही संपर्क साधण्यात आला. सरकारी व पोलिस तपासात हा राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोपही ऍड. रॉड्रिगीस यांनी केला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पोचले नसते तर हे आरोपपत्रच दाखलच झाले नसते, असे सांगून त्यांनी न्यायालयाचे विशेष आभार व्यक्त केले. गोवा सरकारने गेल्या १४ फेब्रुवारी २००८ रोजी सरकारी वकील विनी कुतिन्हो यांना लोकहितार्थ निलंबित केले होते. परंतु, काही मंत्र्यांच्या दबावामुळे त्याच दिवशी संध्याकाळी हे आदेश स्थगित ठेवताना त्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आल्याच्या प्रकरणाचीही या निमित्ताने त्यांनी आठवण करून दिली. १४ डिसेंबर २००७ रोजी विश्वजित राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश उत्कर्ष व्ही. बाक्रे यांनी दिलेल्या निकालात आरोग्यमंत्र्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ५०६(२)अंतर्गत सबळ पुरावे असल्याचे नमूद करून विश्वजित राणे यांचा अर्ज फेटाळला होता, असेही ऍड. रॉड्रिगीस यावेळी म्हणाले.
दिगंबर कामत अमेरिका दौऱ्यावरून परतत असल्याने त्यांनी गोव्यात येताच आरोग्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत गांभीर्याने विचार करावा, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची निःपक्षपाती व कोणत्याही राजकीय दबावाशिवाय चौकशी व्हायची असेल तर आरोग्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग करावा अथवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचे मंत्रिपद काढून चौकशीला सामोरे जाण्यास भाग पाडावे, अशी जोरदार मागणीही त्यांनी यावेळी त्यांनी केली. सभापती प्रतापसिंह राणे यांनीही आपल्या मुलाच्या संरक्षणार्थ दिलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
-----------------------------------------------------------------------
आरोपपत्राचा मार्ग मोकळा
विश्वजित राणे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतर ऍड. आयरिश रॉड्रिगीस आता पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांना उच्च न्यायालयात खेचणार असल्याची माहिती मिळाली आहे. वीज खात्याचे कनिष्ठ अभियंते कपिल नाटेकर यांना घरी बोलावून मारहाण केल्याप्रकरणी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्याविरोधात कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी अलीकडेच प्रोसेक्यूशन संचालकांनी आरोपपत्र दाखल करण्यासंदर्भातील फाईल हातावेगळी केली असून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास हिरवा कंदील दिला आहे. कोलवा पोलिसांकडून याप्रकरणी तात्काळ आरोपपत्र दाखल झाले नाही तर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाद मागणार असल्याची माहिती ऍड. आयरिश यांनी यावेळी दिली.

गुलाबी गावकर खूनप्रकरणी महानंदची कसून चौकशी

फोंडा, दि.१३ (प्रतिनिधी): नऊ युवतींच्या खुनाची कबुली देणारा सीरियल किलर महानंद रामनाथ नाईक याची केरये खांडेपार येथे १९९४ साली करण्यात आलेल्या गुलाबी गावकर खून प्रकरणी चौकशी केली जाणार आहे. गुलाबी गावकर हिचा १९९४ साली केरये खांडेपार येथे दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचा तपास त्यावेळी केला होता. मात्र, संशयित आरोपीविषयी काही माहिती न मिळाल्याने या खुनाची फाईल बंद करण्यात आली होती.
गुलाबी गावकर हिच्या खून प्रकरणी एका व्यक्तीने आपल्या जबानीत दिलेले आरोपीचे वर्णन हे सीरियल किलर महानंद नाईक याच्याशी मिळते जुळते आहे. या खुनाच्या काळात महानंद नाईक हा वरचा बाजार फोंडा येथे मालवाहू रिक्षा चालवण्याचे काम करत होता. त्याच भागातील एका दुकानात गुलाबी गावकर कामाला होती. त्यामुळे महानंद नाईक याने गुलाबी गावकर हिला आपल्या जाळ्यात ओढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुलाबी गावकरसुद्धा घरातून येताना सोन्याचे दागिने घेऊन आली होती. महानंद नाईक याची युवतीचे खून करण्याची कार्यपद्धती गुलाबी गावकर खून प्रकरणाशी मिळती जुळती आहे. त्यामुळे गुलाबी गावकर खून प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचा निर्णय पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
फोंडा भागातील युवतींच्या खुनांची प्रकरणे बाहेर येऊन लागल्यानंतर गुलाबी गावकरसुद्धा घरातून जाताना सोन्याचे दागिने घेऊन गेल्याचे तिचा भावाच्या लक्षात आले. त्यामुळे गुलाबी गावकर हिच्या भावाने फोंडा पोलिसांशी संपर्क साधून या खून प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे.
योगिता खुशाली नाईक (नागझर कुर्टी), दर्शना तुकाराम नाईक (तरवळे शिरोडा), वासंती गावडे (वडाळवाडा मडकई), केसर रघु नाईक (मापा पंचवाडी), नयन गावकर (अमळाय पंचवाडी), सुनिता गावकर (बेतोडा), अंजनी गावकर (निरंकाल), निर्मला घाडी (बेतकी खांडोळा), सुरत गावकर (माट्टी पंचवाडी) या नऊ युवतींच्या खुनाची कबुली आत्तापर्यंत संशयित आरोपी महानंद नाईक याने दिली आहे. दीपाली ज्योतकर प्रकरणातसुद्धा महानंद संशयाच्या घेऱ्यात आहे.

तपास योग्य दिशेने
सीरियल किलर महानंद नाईक याने केलेल्या युवतींच्या खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे या भागातील लोकांनी संयम पाळून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांनी केले आहे. संशयित महानंद नाईक हा एकटाच खून करत होता. सदर प्रकरणात आत्तापर्यंत तो एकटाच असल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणात अन्य कोणाचाही समावेश असल्याचे आढळून आल्यास त्यालाही त्वरित अटक केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. महानंद नाईक हा एकटाच युवतींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेऊन त्यांचे खून करत असल्याने प्रकरण उघडकीस येण्यास वेळ लागला, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणासंबंधी लोकांकडे काही पुरावे असल्यास त्यांनी फोंडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. लोकांना या प्रकरणाच्या तपासाबाबत शंका असल्यास त्यांचे एक शिष्टमंडळ आपल्याकडे येऊन प्रकरणाच्या तपासाची माहिती घेऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

फोंड्यात आज मोर्चा
सीरियल किलर महानंद नाईक प्रकरणाचा निषेध आणि पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी गुरुवार १४ मे रोजी दुपारी २.३० वाजता फोंड्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शांततेत काढण्यात येणार असून तिस्क फोंडा येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे.

मोले बलात्कार प्रकरणी मुख्य संशयिताला अटक

फोंडा, दि.१३ (प्रतिनिधी) : मोले येथील एका अल्पवयीन युवतीवरील बलात्कार प्रकरणातील फरारी मुख्य संशयित शंकर रामा घोगलेकर (२३) याला अटक करण्यात कुळे पोलिसांना आज (दि.१३) यश आले आहे.
गेल्या १८ मार्च २००९ रात्री ही बलात्काराची घटना घडली होती. यावेळी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. तर शंकर घोगलेकर हा फरारी झाला होता. याप्रकरणी मोलेचे पंचसदस्य गौरीश गोपीनाथ पारकर (३१ वर्षे), विजय ऊर्फ विजू रोहिदास गावकर (२० वर्षे, नंद्रण मोले), सगुण जानू वरक (२० वर्षे, गवळीवाडा मोले) आणि उमेश उत्तम गावकर (२२ वर्षे, नंद्रण मोले) यांना यापूर्वी अटक करण्यात आलेली आहे.
शंकर घोगलेकर हा या बलात्कार प्रकरणातील प्रमुख संशयित आहे. सदर मुलीला घरातून उठवून शंकर याने प्रथम बाहेर नेले होते. या घटनेनंतर शंकर घोगलेकर सुमारे दीड महिने फरारी होता. त्याला ताब्यात घेण्यासाठी कुळे पोलिसांचे पथक अनेक वेळा कर्नाटक राज्यात जाऊन आले होते. सुरुवातीला त्याने नेलेली कार गाडी पोलिस पथकाला सापडली होती. मात्र, संशयित शंकर सापडू शकला नव्हता. संशयित आरोपीला पकडण्यासाठी कुळे पोलिसांच्या हालचाली सुरू होत्या. अखेर १३ मे ०९ रोजी शंकर घोगलेकर पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथील सरकारी इस्पितळात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

रालोआ २२५, संपुआ १८०? हिंदुस्थान समाचारचे निष्कर्ष

नवी दिल्ली, दि. १३ : लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यानंतर हिंदुस्थान समाचार वृत्त संस्थेने जारी केलेल्या सर्वेक्षणानुसार १५ व्या लोकसभेत भारतीय जनता पक्ष सर्वांत मोठा पक्ष असेल. हिंदुस्थान समाचारने केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपला १६० ते १७० आणि कॉंग्रेसला १२० ते १३० पर्यंत जागा मिळतील असा निष्कर्ष स्पष्ट झाला आहे.
याबरोबरच निवडणूकपूर्व युती केलेल्या भाजप आणि मित्रपक्षांना सर्वांत मोठी आघाडी म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या मित्रपक्षांना या अहवालानुसार ४५ ते ५५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २१० ते २२५ पर्यंत जागा मिळतील असा अंदाज आहे. या अहवालानुसार कॉंग्रेसचे मित्रपक्ष सपा, द्रमुक, राजद, लोजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना एकूण ५० ते ५२ जागा मिळतील, त्यामुळे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीला १७० ते १८० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. कॉंग्रेसच्या मित्रपक्षांमध्ये समाजवादी पार्टीला २६, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला ९, द्रविड मुन्नेत्र कळघ्घम ७, राष्ट्रीय जनता दलाला ५, लोकशाही जनता पार्टीला ३ तर तृणमूल कॉंग्रेसला अधिकाधिक १० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सर्वेक्षणानुसार आगामी सरकार स्थापनेमध्ये बसपा, अण्णाद्रमुक - पीएसके आणि तेलगू देसम पार्टीची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. परिणामतः ५१ जागा आगामी सरकारच्या स्थापनेत निर्णायक महत्त्व सिद्ध करतील. याशिवाय अतिरिक्त डाव्या आघाडीला २००४ मध्ये ६० जागा मिळाल्या होत्या. परंतु, यंदा त्यात घट होण्याची शक्यता आहे. डाव्या आघाडीला केरळ, प. बंगाल, त्रिपुरा इ. राज्यांत अंदाजे ३५ ते ४० पर्यंत जागा मिळण्याची शक्यता आहे. प. बंगाल आणि केरळ या दोन्ही ठिकाणी मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी डाव्या आघाडीच्या जागांच्या संख्येत घट होईल.
हिंदुस्थान समाचार समितीद्वारा निवडणुकी दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार अत्यंत आश्चर्यकारक तथ्ये आढळून आली आहेत. राज्यवार केलेल्या सर्वेक्षणानुसार अंदाजित आकडेवारी याप्रमाणे ः
उत्तर प्रदेशमध्ये मागच्या निवडणुकीच्या तुलनेत रालोआसह भाजपच्या जागांत दुप्पट वाढ होईल. बसपाला उत्तर प्रदेशात २० ते २२, सपाला २४ ते २६ आणि कॉंग्रेसला केवळ ५ ते ७ जागा मिळण्याचे अनुमान आहे. बिहारमध्ये जनता दल (यु.) १८, भाजप ११, राजद ५, लोजपा ३ आणि कॉंग्रेसला ०३ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
या अहवालानुसार दक्षिणेतील राज्यांमध्ये आश्चर्यकारकरीत्या भाजपने प्रवेश केला आहे. कर्नाटकात भाजपला २०, कॉंग्रेसला ६ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तामिळनाडूत भाजपला पहिल्यांदाच २, केरळमध्येही २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम आणि नागरकॉईल तसेच केरळमध्ये थिरूअनंतपुरम व कासरगोड या जागांवर भाजपने आपला दावा पक्का केला आहे. आंध्र प्रदेशात भाजप २, कॉंग्रेस २२, तेलगू देसम ९ तर तेलंगणा राष्ट्र समितीला ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता असून अण्णाद्रमुकला १४, पीएमके ६, द्रमुक ७, कॉंग्रेस ७ आणि भाजपला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीला १०, कॉंग्रेसला ८ आणि भाजपला २ जागा मिळणार असून अंदमान निकोबारची एकमेव जागा भाजपच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. ओरिसामध्ये बिजू जनता दल यंदाही आघाडीवर राहण्यात यशस्वी ठरेल. बिजू जनता दलाला ११, कॉंग्रेसला ३ आणि भाजपला ६ जागा मिळण्याचे अनुमान आहे.
महाराष्ट्रात कॉंग्रेसला ११, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ९, शिवसेनेला १२ तर भाजपला १३ जागा मिळतील. मध्यप्रदेशात भाजपला २२ तर कॉंग्रेसला ६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये यंदा भाजपच्या लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपला यावेळी १८, कॉंग्रेसला ८ जागांवर विजय मिळेल. राजस्थानमध्ये भाजपला १२, कॉंग्रेसला १३ जागा मिळतील. झारखंडमध्ये अप्रत्यक्षरीत्या भाजपच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून ८ जागांवर भाजप तर ३ जागांवर कॉंग्रेस विजयी होईल. छत्तीसगडमध्ये भाजपला १० आणि कॉंग्रेसला १ जागा मिळेल. आसाममध्ये भाजपला फायदा होईल. आसाम गण परिषदेशी असलेल्या युतीमुळे भाजपला ५ आणि आ. ग. परिषदेला ३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. कॉंग्रेसला आसाममध्ये ६ जागा मिळतील.
हरयाणात भाजपला २, कॉंग्रेसला ६ जागा मिळतील. दिल्लीत भाजप ३ आणि कॉंग्रेसला ४ जागा मिळतील. जम्मू - काश्मीर मध्ये कॉंग्रेसला २ आणि भाजपला १ जागा मिळण्याची आशा आहे. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल ८, भाजप ३, कॉंग्रेस २ तर हिमाचल प्रदेशात भाजप ३, कॉंग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये भाजपला ३, कॉंग्रेस १ व इतर पक्ष १ याशिवाय प. बंगालमध्ये सत्तारूढ डाव्या आघाडीला १४, कॉंग्रेसला ८, तृणमूल कॉंग्रेसला १० तर भाजपला २ जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यामध्ये २ पैकी प्रत्येकी एका जागेवर कॉंग्रेस आणि भाजप येईल.
हिंदुस्थान समाचार संवाद समितीच्या पत्रकारांनी आणि देशभरातील माहितीच्या माध्यमांतून ५ टप्प्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाचव्या टप्प्याच्या समाप्तीनंतर हिंदुस्थान समाचार संवाद समितीने हा निवडणूक विश्लेषण अहवाल १३ मे रोजी, बुधवारी संध्याकाळी प्रसिद्ध केला आहे.

Wednesday, 13 May, 2009

सुरत,निर्मलाच्या खुनाची महानंदची कबुली

खुनांची संख्या नऊवर
फोंडा सीरियल किलर प्रकरण
फोंडा, दि.१२ (प्रतिनिधी) : सीरियल किलर महानंद नाईक याने दोन दिवसांच्या मौनानंतर पुन्हा तोंड उघडले असून आणखी दोन युवतींच्या खुनाची कबुली दिली आहे. बेतकी खांडोळा येथील निर्मला घाडी (३४ वर्षे) आणि माट पंचवाडी येथील सुरत हरिश्चंद्र गावकर (३० वर्षे) यांचा खून केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित महानंद नाईक याने केलेल्या युवतींच्या खुनांची संख्या आता नऊ झाली असून आणखी चार प्रकरणामध्ये तो संशयाच्या घेऱ्यात आहे.
सात युवतींच्या खुनांची कबुली दिल्यानंतर गेले दोन दिवस संशयित महानंद याने मौन धारण केले होते. पोलिसांनी हिसका दाखवल्यानंतर त्याने आता पुन्हा बोलायला सुरुवात केली आहे. युवतींना लग्नाचे आमिष दाखवायचे, पळून लग्न करणार असल्याने त्यांना अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची सूचना द्यायची आणि त्यांचा अज्ञात स्थळी नेऊन खून करायचा, अशी त्याची एकूण पद्धत होती.
माट विझार पंचवाडी येथील सुरत गावकर ही युवती गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता आहे. यासंबंधी तिच्या कुटुंबीयांनी पोलिस स्थानकावर तक्रार दाखल केलेली नाही. संशयित महानंद नाईक याने सुरत गावकर हिचा खून केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी आता तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. सुरत गावकर ही युवती मापा पंचवाडी येथील एका घरात घरकामाला जात होती. कामाला जात असताना तिचा महानंदशी ओळख झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूरत घरातून जाताना चार सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, अंगठी, सोनसाखळी घेऊन गेली होती, अशी माहिती तिची आई सखू हरिश्चंद्र गावकर हिने दिली आहे. सखू गावकर यांच्या पतीचे चौदा वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिला सहा मुली आणि एक मुलगा असून सुरत ही तिची दुसऱ्या क्रमांकाची मुलगी होती. ती घरातून जाताना दागिने घेऊन गेल्याने कुठल्यातरी युवकाशी लग्न केले असावे असा संशय आल्याने आम्ही केवळ दोन दिवस चौकशी केली, पोलिस स्थानकावर तक्रार केली नाही, असेही तिने सांगितले.
संशयित महानंद नाईक याने सुरत हिचा सावर्डे येथे नेऊन खून केल्याची कबुली दिली आहे. सुरत हिला बोरी येथील श्री साईबाबा मंदिराजवळ बोलावल्यानंतर तेथून तिला घेऊन सावर्डे नेण्यात आले, असेही पोलिसांनी सांगितले. यासंबंधी सविस्तर माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे.
बेतकी येथील निर्मला घाडी हिला बोरी येथे नेऊन ठार केल्याचे संशयित महानंद नाईक याने पोलिसांना सांगितले आहे. निर्मला घाडी ही युवती २००७ पासून बेपत्ता आहे. महानंदने निर्मलाशी वरचा बाजार फोंडा येथे मैत्री केली. त्यानंतर केवळ दोन दिवसांनी निर्मला घाडी बेपत्ता झाली होती. संशयित महानंद नाईक याला निर्मला घाडी हिची आई प्रभावती घाडी हिने ओळखले आहे. याप्रकरणी सुद्धा सविस्तर माहिती मिळविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी. एल. पाटील व इतर अधिकारी तपास करत आहेत.

फोंड्यात कर्मचाऱ्याचा खून

फोंडा, दि.१२ (प्रतिनिधी): वरचा बाजार फोंडा येथे पी. पार्थसारथी कंपनीचा कर्मचारी धर्मलिंगन एम.(४३ वर्षे, मूळ - चेन्नई) याचा हात बांधून आणि गळा आवळून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
आज (दि.१२ मे) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. वरचा बाजार फोंडा येथील पी. पार्थसारथी या कंपनीच्या कार्यालय धर्मलिंगन एकटाच राहत होता. ११ मे०९ रोजी मध्यरात्री अज्ञाताने त्याचा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. धर्मलिंगन राहत असलेल्या जागेची एक चावी कंपनीच्या मालकाकडे होती तर एक चावी धर्मलिंगन याच्याकडे होती. १२ रोजी सकाळी कंपनीत काम करणारे अन्य कर्मचारी कामावर आले असता कंपनीचे कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. त्यांनी आतमध्ये असलेल्या धर्मलिंगन याला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनीच्या मालकाला माहिती देण्यात आली. कंपनीच्या मालकाने कार्यालयात येऊन आपल्याकडील चावीने दरवाजा उघडला. त्यावेळी आतमध्ये धर्मलिंगन मृतावस्थेत असल्याचे आढळून आले. त्यानंतर फोंडा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील, उपनिरीक्षक संजय दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी श्वानपथक आणून तपास केला. मात्र, खून करणाऱ्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. श्वान बाजाराजवळ बांधण्यात येणाऱ्या इमारतीपर्यंत जाऊन परत आले आणि तेथेच घुटमळत राहिले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी धर्मलिंगन यांच्याशी जवळीक असलेल्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

'सीआरझेड'प्रश्नी सरकारला २८ मेपर्यंत मुदत

पणजी,दि.१२(प्रतिनिधी): 'सीआरझेड' कायद्याअंतर्गत राज्यातील किनारी भागात वास्तव्य करणाऱ्या सुमारे साडेआठ हजार घरांवरील कारवाईची टांगती तलवार येत्या २८ मेपर्यंत दूर झाली नाही तर पुन्हा एकदा आंदोलन सक्रिय करावे लागणार,असा इशारा आज "गोंयच्या रापणकारांचो एकवट' व इतर किनारी संघटनांच्यावतीने देण्यात आला.
आज पणजी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आंदोलनाचे नेतृत्व करणारे माथानी साल्ढाणा यांनी दिली. यावेळी रापणकारांचो एकवट संघटनेचे नेते आग्नेल फर्नांडिस व सुधाकर जोशी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होईल किंवा केंद्रात कोणाचे सरकार सत्तेवर येईल या गोष्टी येथे नगण्य आहेत. या ५० हजार लोकांचे भवितव्य सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकार व प्रत्येक नेत्याची आहे, असेही ते यावेळी म्हणाले. येत्या १६ मे रोजी मतमोजणी होईल व त्यावेळी केंद्रात कोणाचे सरकार सत्तारुढ होईल हे देखील ठरणार आहे. केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर तात्काळ नव्या सरकारशी संपर्क साधून याविषयावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, असाही सल्ला यावेळी श्री. साल्ढाणा यांनी दिला. पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी याविषयी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह असल्याचे श्री. साल्ढाणा यावेळी म्हणाले. राज्य सरकारने आपली सर्व राजकीय, कायदेशीर ताकद पणाला लावून या लोकांची सुटका करण्याची गरज आहे. परंतु, त्या दृष्टीने काहीही होत नसल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली. मुळात हा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने त्याबाबत कायदेशीर तोडगा काढावा लागेल, असेही ते म्हणाले. दोना पावला येथील एका खाजगी हॉटेलवरील कारवाई टाळण्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे १४० वर्षांच्या कायद्यात दुरुस्ती केली जाते तर राज्यातील सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या साडेआठ हजार कुटुंबीयांना दिलासा देणे हे सरकारचे कर्तव्य ठरते, असेही यावेळी त्यांनी सुचवले. गोंयच्या रापणकारांचो एकवट संघटनेतर्फे हा विषय केवळ लोकप्रियता प्राप्त करण्यासाठी हाती घेण्यात आली नाही. यावर हजारो कुटुंबीयांचे भविष्य अवलंबून असल्याने याबाबतीत सर्व राजकीय मतभेद विसरून राजकीय नेत्यांनी एकत्र यावे, त्याला सामाजिक संघटनांचाही पाठिंबा घेण्याची गरज यावेळी श्री. साल्ढाणा यांनी व्यक्त केली.
यावेळी संघटनेतर्फे सरकारसमोर ठेवण्यात आलेल्या मागण्यांचाही पुनरुच्चार करण्यात आला. त्यात ३१ डिसेंबर २००७ पूर्वी किनारी भागात २०० मीटरच्या आत असलेली सर्व बांधकामे नियमित करणे, २०२१ प्रादेशिक आराखड्यातील २०० मीटर अंतरातील अविकसित क्षेत्राची जागा बांधकामांसाठी खुली करू नये, याठिकाणी यापूर्वी असलेल्या बांधकामांची नोंदणी करून त्यांना अभय देण्यात यावे, घटनेच्या ३७१ कलमानुसार गोव्याला विशेष राज्याचा दर्जा दिला जावा, आदी मागण्यांचा समावेश आहे.

संशयित वेटर पोलिसांच्या ताब्यात

रशियन तरुणीचे मृत्यू प्रकरण
पणजी, दि.१२ (प्रतिनिधी): रशियन तरुणी येलिना सुकानोवा हिच्या मृत्यू प्रकरणात म्हापसा पोलिसांनी काल पहाटे कळंगुट येथे सापळा रचून संशयित वेटरला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या दोन दिवसापासून पोलिस त्याच्या शोधात होते. ताब्यात घेण्यात आलेल्या वेटरचे नाव विनय हळदणकर ऊर्फ "व्हिनी' असून याविषयी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. त्याचप्रमाणे येलिनाला पहाटे थिवी रेल्वे स्थानकावर पोचवणारा टॅक्सी चालक वर्धमान सिमेपुरुषकर यालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तर, हिमाचल प्रदेश येथील वीर सिंग या वेटरचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक हिमाचल प्रदेश येथे पाठवण्यात आले आहे. याशिवाय अन्य दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
येलिना हिला विनय ऊर्फ "व्हिनी' याच्याबरोबर फिरताना अनेकांनी पाहिले होते. रेवोडा येथे कोकण रेल्वे मार्गावर येलिनाचा मृतदेह छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आला तेव्हापासून "व्हिनी' बेपत्ता होता. अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतल्यानंतर तो कळंगुट येथे एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस, बॉस्को जॉर्ज, निरीक्षक मंजुनाथ देसाई व अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अद्याप त्याच्याकडून कोणतीही महत्त्वाची माहिती उघड झालेली नाही.
विनय हळदणकर बागा येथे एका शॅकवर वेटर म्हणून नोकरीला आहे. यावेळी १९ वर्षीय येलिना सुकानोवा हिच्याशी त्याची मैत्री जमली होती. तसेच हॉटेल "सन सिटी' मधील वीर सिंग या वेरटचीही त्याच्याशी दाट मैत्री जमल्याने त्याला काही दिवसांपूर्वी हॉटेल व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले होते. तोही बेपत्ता असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहे.
मृत्यूच्या आदल्या दिवशी येलिना हॉटेलमधून बेपत्ता झाल्यानंतर त्याची पोलिस स्थानकावर तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी तिचा अन्य एका हॉटेलमध्ये शोध लागल्यानंतर तिने आपल्या "व्हिनी' त्रास देत असल्याची जबानी पोलिसांना दिली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे काहींचे मत आहे. "व्हिनी' याला अद्याप येलिना हिच्या मृत्यू प्रकरणात अटक झालेली नाही. परंतु, त्याविषयी त्याची चौकशी सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
येलिना ही मुंबईला निघण्यापूर्वी बागा येथे एका ठिकाणी सहा जणांच्या एका गटाबरोबर जेवायला बसली होती. त्यानंतर पहाटे ३.१५ वाजता ती एका टॅक्सीमधून थिवी रेल्वे स्थानकावर गेली. त्यानंतर थिवी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला होता. येलिनाचा मृत्यू हा अपघात असल्याचा दावा करण्याऐवजी पोलिसांनी याविषयी कसून तपास करण्याची मागणी रशियन दूतावासाचे वकील विक्रम वर्मा यांनी केली आहे.

Monday, 11 May, 2009

शिरदोन येथे टोळीयुद्धात एक ठार, तिघे गंभीर

पोलिसांचे अटकसत्र सुरू

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) शिरदोन बांबोळी येथील समुद्र किनाऱ्यावर आज सायंकाळी झालेल्या टोळीयुद्धात एक ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून इस्पितळाच्या बाहेर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. "ज्योनीटो' आणि "मिरांडा' यांच्यात गटांत हे टोळीयुद्ध झाल्याचे सांगण्यात येत असून रात्री उशिरापर्यंत आगशी पोलिसांनी दोन्ही टोळीतील अनेकांना ताब्यात घेतले होते. या टोळी युद्धात जुवारी नगर वास्को येथील संतोष कालेल (३६) हा मृत झाला. तर, ज्योनिटो कार्दोज (२२), मिरांडा डिसोझा (३६) व जॉनी फर्नांडिस (३५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. धारदार चाकूने मिरांडा याच्या पोटावर वार करून त्याच्या पोटातील आतड्या बाहेर काढल्याने रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती. भा.द.स ३०२ व ३०४ कलमानुसार दहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते तर, रात्रीपर्यंत अटकसत्र सुरू होते. मिरांडा हा रुदाल्फ फर्नांडिस याच्या टोळीशी निगडीत असल्याने हे "टोळीयुद्ध' अजून भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, ज्योनेटो कार्दोज याला ऍड. आयरिश रॉड्रीगीस हल्ला प्रकरणात पोलिसांनी अटक केले होते. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले होते. आजच्या घटनेची माहिती मिळताच पणजी विभागीय पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडे, आगशी पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक गुडलर यांनी धाव घेतली.
प्राप्त माहितीनुसार, रविवार असल्याने ज्योनिटो याची मोठी बहीण आणि तिचा परिवार शिरदोन येथे समुद्र किनाऱ्यावर "पिकनिक'साठी गेला होता. त्याच समुद्र किनाऱ्यावर मिरांडा डिसोझा, माजी सरपंच प्रकाश नाईक, जॉनी फर्नांडिस यांच्यासह दहा ते १५ जणांचा गट मौजमजा करण्यासाठी आला होता. सायंकाळी ४ च्या दरम्यान ज्योनेटो हा आपली बहीण व तिच्यासह असलेल्या अन्य लोकांना नेण्यासाठी वाहन घेऊन त्याठिकाणी आला होता. यावेळी काही अंतरावर बसलेल्या मिरांडा याने त्याला हाक मारून बोलावून घेतले. "तू मोटो दादा जाला रे, रुदाल्फ होच आमचो दादा' असे म्हणून त्या सर्वांनी ज्योनेटो याला मारहाण करण्यास सुरुवात केली, अशी माहिती तिची मोठी बहीण सिंथीया कार्दोज हिने दिली. हा हल्ला पूर्वनियोजितच होता आणी रुदाल्फ यानेच केला असल्याचा दावाही तिने केला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना सहकार्य केले नसल्याने हा राग काढण्यात येत असल्याचे सिंथीया "गोमेकॉ'च्या बाहेर पत्रकारांशी बोलताना म्हणाली.
पोलिसांच्या पाहणीत संतोष याच्या जांघेवर "गुप्ती'ने खुपसल्याची जखमी मिळाली असून अशाच प्रकारचा वार जॉनी याच्या छातीवरही आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र संतोष याचे मृत्यूचे कारण वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ज्योनीटो जखमी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना हवे असलेले अनेक तरुण त्याला भेटण्यासाठी इस्पितळात आले असता, पोलिसांच्या तावडीत ते आयतेच सापडले. यावेळी एका एकाला ताब्यात घेऊन त्यांची रवानगी आगशी पोलिस स्थानकावर करण्यात आली. याविषयीचा अधिक तपास आगशी पोलिस स्थानकाचे अतिरिक्त निरीक्षक गुरुदास गावडे करीत आहे.

नेमके कारण काय?
ऍड. आयरिश यांच्यावर हल्ला झाल्यानंतर "गुन्हेगारी दुनिये'त नावारूपाला आलेल्या ज्योनीटो याला आपल्या टोळीत काम करण्याची "ऑफर' रुदाल्फ याने दिली होती. ती त्याने फेटाळून लावली, म्हणूनच त्याचा ज्योनीटो याच्यावर राग होता. दोन दिवसांपूर्वी रुदाल्फ याने मला आणि ज्योनीटो याला जिवंत मारण्याचीही धमकी दिली होती, असा दावा ज्योनीटोच्या एका जवळच्या मित्राने केला आहे.

महानंदच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता

पतीच्या क्रुरकर्मात सहभाग?

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - महानंद नाईक याने केलेल्या खुनाची जंत्रीच उघडत असल्याने देशातील नावाजलेल्या "सीरियल किलर'च्या काळ्या यादीत महानंदचे नाव सामील झाले आहे. या प्रकरणास आता वेगळेच वळण प्राप्त होत असून, देशातील सर्वांत वाईट "सीरियल किलर' ठरलेल्या महानंदच्या पत्नीला या कामात मदत केल्याच्या संशयाखाली अटक केली जाण्याची दाट शक्यता आहे. सावज हेरून पतीपर्यंत पोहोचवण्याच्या कामी मदत केल्याच्या आरोपावरून तिला अटक होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.
महानंद (४०) याने आपण गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत आठ मुलींचा खून केल्याची कबुली दिली असून, काही मुलींवर बलात्कार केल्याची साक्षही दिली आहे. महानंद याच्या वासनेस बळी पडलेल्या बहुतांश मुली या त्याच्या पत्नीच्या मैत्रिणी असल्याचेही सिद्ध झाले आहे.
महानंद नाईक याने कबुली दिलेल्या पहिल्या खुनातील मृत मुलगी योगिता नाईकचे वडील खुशाली नाईक यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, महानंदची पत्नी पुजाच आमच्या घरी येऊन महानंदसाठी योगिताचा हात मागत होती. त्यावेळी ती महानंदची बायको असल्याचा संशयही आम्हाला आला नाही. खुशाली यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यादिवशी पुजाने योगिताला मागणी घातली अगदी त्याच्या दुसऱ्याच दिवशी महानंद याने नागझर कुर्ट्टी येथील त्यांच्या घराजवळ येऊन योगिताला आपल्यासोबत नेले होते. जानेवारी महिन्यापासून योगिता गायब असून, महानंदने आपण तिचा खून मोर्ले सत्तरी येथे नेऊन केल्याचा कबुलीजबाब दिला आहे. खुशाली यांच्या माहितीशी मिळतीजुळती माहिती महानंदच्या वासना व धनाच्या मोहास बळी पडलेल्या अन्य एका मुलीच्या पित्याने उपलब्ध केली आहे. मयत दर्शना नाईक हिचे वडील शंकर नाईक यांनी पुजाचाही आपली मुलगी दर्शनाच्या खुनात हात असल्याचे सांगितले आहे. दर्शनाचा खून १९९४ मध्ये झाला होता. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या बलात्कारित मुलीने महानंदच्या गुन्ह्यांचा पेटारा उघडला आहे, तिची महानंदशी ओळखही पुजानेच करून दिली होती.
महिलांसाठी कार्यरत असलेल्या आवडा व्हिएगस यांनी सांगितल्याप्रमाणे त्या दोघी शिरोड्यात एकत्र संगीत शिकत होत्या. पुजानेच आपल्या घरी महानंदशी बळी गेलेल्या मुलीची ओळख करून दिली होती. पोलिसांनी पुजाचीही जबानी घेऊन ती या खुनांमध्ये बरोबरीची साथीदार असण्याबाबत शहानिशा करावी, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. काम नसतानाही आपला नवरा नक्की कुठून इतका पैसा मिळवतो याची चौकशी तिने का केली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. माजी रिक्षा चालक असलेला महानंद गेली कित्येक वर्षे बेरोजगार आहे. या संशयित आरोपींना एक दीड वर्षांची मुलगीही आहे. या सर्व खुनात पुजाचाही सहभाग असावा असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार शनिवारी फोंडा पोलिस स्थानकात पुजाला अटक करण्यात यावी या मागणीसह स्थानिकांचा एक गट दाखल झाला होता. ५० जणांच्या या गटाने पोलिस उपअधीक्षक सेराफिन डायस यांची भेट घेऊन पुजाला अटक करण्याची मागणी केली.
दरम्यान, पुजाच्या या खुनात सहभागी असण्याबाबत पोलिसांनी अद्याप मौन बाळगले असून, त्यावर भाष्य करणे पोलिस अधिकारी टाळत आहेत. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. यापूर्वी पुजाने आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट करताना आपल्याला पतीच्या कृत्याबाबत काहीच कल्पना नसल्याचे म्हटले होते. त्याने जर हे भयानक कृत्य केले असेल तर त्याला थेट फाशीचीच शिक्षा देण्यात यावी असेही ती म्हणाली होती. तो एक मुंगीही मारू शकत नसल्याचेही तिने पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. तर महानंदने मात्र एका पाठोपाठ एका खुनाची कबुली देत सर्वसामान्यांचीच नव्हे तर पोलिसांचीही पुरती झोप उडवली आहे.

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मोर्चेकऱ्यांची जोरदार मागणी

कुंकळ्ळी मूर्तिविध्वंसप्रकरण

कुंकळी दि. १० (प्रतिनिधी) - २००४ पासून आजपर्यंत गोव्यात एकूण २८ मंदिरांतील देवमूर्तीचा विध्वंस झाला, मात्र आजपर्यंत एकाही प्रकरणाचा पोलिसांकडून यशस्वीरीत्या तपास झालेला नाही. हे आपल्या चिमुकल्या गोव्यातील पोलिस दलाला लांच्छनास्पद असून राज्याचे गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या रवी नाईक यांनी याची जबाबदारी स्वीकारून त्वरित ४८ तासांच्या आत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा,अशी मागणी आज मोर्चेकऱ्यांनी कुंकळ्ळी पोलिस स्थानकात निवेदन देण्यास आल्यावेळी केली. काल तलवडा-वेरोडा येथे झालेल्या मूर्ती तोडफोडीचा निषेध म्हणून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता कुंकळ्ळी टपाल कार्यालयाकडून सुरू झालेला मोर्चा ११.३० वाजता पोलिस स्थानकात पोहचला मात्र मंदिर तोडफोड व मूर्तीविध्वंससारखा संवेदनाशील विषय असूनही निवेदन स्वीकारण्यास पोलिस निरीक्षक व उपअधीक्षक दर्जाच्या व्यक्ती हजर असल्याचे पाहताच मोर्चेकऱ्यांनी व मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्यांनी त्यांच्याकडे निवेदन देण्यास साफ नकार देत अधीक्षकांनी निवेदन स्वीकारण्याचा आगृह धरला. साधारणतः ११.५० च्या दरम्यान अधीक्षक ऍलन डीसा यांनी कुंकळ्ळी पोलीस स्थानकात हजर राहून निवेदन स्वीकारले. यावेळी आमदार रमेश तवडकर , मंदिर समितीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीचे निमंत्रक राजू वेलिंगकर, विनायक चारी व विशाल देसाई हजर होते. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार रमेश तवडकर यांनी जिल्ह्याएवढ्याही नसलेल्या आपल्या गोव्यात दोन अधीक्षक असूनही एकाही मूर्ती विध्वंसप्रकरणी पोलिस खाते यशस्वीरीत्या शोध लावू शकले नसल्याबद्दल संताप व्यक्त केला, राजू वेलिंगकर यांनी हिंदू मंदिरावर आघात होत असूनही सरकार व पोलिस खाते ही बाब गांभीर्याने घेत नसल्यामुळेच मूर्तिभंजकांचे फावते, असे सांगून पोलिस खात्याने कुंकळ्ळीचे प्रकरण गांभीर्याने न घेतल्यास कदाचित उद्या जनता कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करील,असा इशारा दिला.यानंतर मोर्चेकऱ्यांना आश्वासन देताना अधीक्षक ऍलन डीसा यांनी कुंकळ्ळीचे हे प्रकरण गुन्हा अन्वेषण विभागाकडे न देता स्वतः आपण व निरीक्षक संदेश चोडणकर संयुक्तरीत्या हाताळणार असल्याचे सांगून शक्य तेवढ्या लवकर गुन्हेगार आपल्यासमोर आणू असे आश्वासन दिले. सदर मोर्चात खड्डे , बार्से बेनुर्डे, कुंकळ्ळी येथील असंख्य महिला व पुरुष मिळून सव्वाशेच्यावर उपस्थिती होती .

लुधियानात "रालोआ'च्या एकजुटीचे(सु)दर्शन

तेलंगण राष्ट्र समितीचा सहभाग

लुधियाना, दि. १० - राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आज पंजाबातील लुधियाना शहरात नवा इतिहास रचला. रालोआ निवडणुकीपूर्वीच अभेद्य आहे व नंतरही ती अभेद्य राहणार हे दाखवून देण्यासाठी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अवघ्या पाच दिवसाच्या कालावधीत आयोजित या महामेळाव्याला भाजप आणि शिरोमणी अकाली दलासह रालोआच्या अन्य घटक दलांनी आपली उपस्थिती दर्शवून कॉंग्रेस आणि तथाकथित तिसऱ्या-चौथ्या आघाडीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला रालोआच्या एकजुटीचे दर्शन घडविले. या महामेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर राव यांनी रालोआत सहभागी होण्याची केलेली घोषणा आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी एकत्र उपस्थिती सर्वांनाच सुखावून गेली.
रालोआचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी या महामेळाव्याचा "ऐतिहासिक' अशा शब्दात गौरव केला. तर, डॉ. चंद्रशेखर राव आणि नितीशकुमार या दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानांवर प्रखर टीका करताना डॉ. मनमोहनसिंग आणि कॉंग्रेस पक्षाने आमच्या राज्यातील जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. देशाचे आगामी पंतप्रधान हे लालकृष्ण अडवाणी हेच असतील, आणि केंद्रात सरकार स्थापण्यासाठी आपण आणखी मित्रांना सोबत आणू अशी सूचक घोषणा करून डॉ. चंद्रशेखर राव यांनी सर्वांना चकित केले. तर, बिहारमध्ये कोसी नदीला आलेल्या पुरामुळे हतबल झालेल्या बिहारमधील जनतेला पंतप्रधान आणि त्यांच्या कॉंग्रेस पक्षाने कोणतीच मदत न करून जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला. आपण रालोआसोबत आहोत आणि आमचे पंतप्रधान डॉ. लालकृष्ण अडवाणी हेच असतील अशी निसंदिग्ध ग्वाही देत कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांच्या विधानांना नितीशकुमार यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांनी याच व्यासपीठावर हातात हात घालून "हम एक है' चे प्रदर्शन घडविले. भाजपा आणि मित्र पक्षांच्या आठ राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीने महामेळाव्याला एक आगळा भारदस्तपणा प्राप्त झाला.

महानंदच्या कुटुंबाला हद्दपार करा

तरवळे ग्रामस्थांची मागणी

फोंडा, दि.१० (प्रतिनिधी) - संशयित आरोपी महानंद नाईक याने केलेले मुलीच्या खुनाचे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून या प्रकरणात महानंदच्या सोबत त्याची पत्नी पूजा गुंतलेली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी पुजाला सुध्दा अटक करून तिची कसून चौकशी करावी आणि महानंद नाईक याच्या कुटुंबीयांना गावातून हद्दपार करावे, अशी मागणी तरवळे ग्रामस्थांच्या आज (दि.१०) संध्याकाळी घेण्यात आलेल्या एका सभेत करण्यात आली आहे.
क्रूरकर्मा महानंद नाईक याने तरवळे शिरोडा गावाचे नाव बदनाम केले. अशा प्रकारचे क्रूर कृत्य करणाऱ्याला फासावर चढविले पाहिजे. या खून प्रकरणामध्ये महानंद नाईक याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे पोलीस यंत्रणेने याप्रकरणाचा कसून तपास करावा, अशी मागणी सभेत करण्यात आली आहे. तरवळे ग्रामस्थ फोंडा पोलीस स्टेशनवर मोर्चा आणून या प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती सभेत देण्यात आली.
महानंद नाईक याने मुलींच्या खून प्रकरणाची त्याची पत्नी पूजा आणि इतर कुटुंबीयांना माहिती असण्याची शक्यता लोकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रूरकर्मा महानंद याला साथ देणाऱ्या कुटुंबीयांना गावातून हद्दपार करण्याचा ठराव सभेत संमत करण्यात आला आहे. महानंद नाईक याची पत्नी पूजा नाईक हिचे वर्तन संशयास्पद असून तिला अटक करून तिची कसून तपासणी करावी, महानंद नाईक याला पोलिसांनी अटक केलेल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी पुढे येणाऱ्या लोकांची चौकशी करावी, महानंद नाईक याच्या घरी येणाऱ्या लोकांची चौकशी करावी. महानंद नाईक याने केलेल्या खून प्रकरणाच्या चौकशीसाठी खास अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या सभेत करण्यात आलेल्या आहे.
तरवळे शिरोडा येथील कु.अंगना शिरोडकर हिच्या खून प्रकरणाचा तपास पुन्हा करावा, अशी मागणी सभेत करण्यात आली आहे. कु. अंगना हिचा म्हापसा येथे अंगावर ऍसिड टाकून खून करण्यात आलेला आहे. या प्रकरणामध्ये महानंद नाईक याचा सहभाग असण्याची शक्यता सभेत व्यक्त करण्यात आली आहे.
यासभेत माजी सरपंच दीपक नाईक शिरोडकर, नागू कवळेकर, पंच फ्रांसिस वाज, उदय शिंदे, रत्नावती सावर्डेकर, मंगलदास शिरोडकर, महानंदने खून केलेल्या दर्शना नाईकचे वडील तुकाराम नाईक, माजी पंच सदस्य संदेश प्रभुदेसाई, येसो नाईक आदींची भाषणे झाली. या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, तरवळे, तिशे भागातील महिलांनी सुध्दा या खून प्रकरणाच्या विरोधात आवाज उठविण्याचा निर्धार केला आहे. स्थानिक महिलांची एक बैठक रविवारी घेण्यात आली. महानंद नाईकची पत्नी पूजा हिची चौकशी करण्याची मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे.
सात युवतींच्या खुनाची कबुली दिलेल्या महानंद नाईक याची चौकशी सुरू असून संशयित महानंद नाईक याने रविवारी कोणतीही नवीन माहिती उघड केलेली नाही, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महानंद नाईक याने आत्तापर्यंत माहिती दिलेल्या प्रकरणासंबंधी कागदपत्रे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल.पाटील तपास करीत आहेत.

ब्रह्मेशानंदाचार्यांचा उद्या शुभविवाह

पणजी, दि. १० - कुंडई येथील तपोभूमीचे पिठाधिश्वर प.पू.ब्रह्मेशानंदाचार्य यांचा शुभविवाह मंगळवारी १२ मे रोजी रात्री ८ वाजताच्या शुभमुहूर्तावर चि.का. ब्राह्मी (श्रीमती यशवंती शंकर मांद्रेकर यांची कन्या) हिच्याशी होणार आहे. हा सोहळा तपोभूमीत आयोजित करण्यात आला आहे. श्रीपदमनाभ शिष्य संप्रदाय व गुरुपिठाने यासाठी सर्व संस्था व भाविकाना निमंत्रित केले आहे.

Sunday, 10 May, 2009

कुंकळ्ळीत १९ मूर्तींची तोडफोड

लोक खवळले, आज पोलिस स्थानकावर मोर्चा

कुंकळ्ळी, दि. ९ (प्रतिनिधी) - कुंकळ्ळी वेरोडा तळवडे येथील रामनाथ देवस्थानातील वेताळ मूर्तीसह एकूण १९ लिंगांची अज्ञाताने घणाचे घाव घालून तोडफोड केली. त्यामुळे या भागातील लोक कमालीचे संतापले असून त्यांनी संशयित आरोपीला ताबडतोब जेरबंद करण्याची जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात उद्या रविवारी सकाळी ९ वाजता रामनाथ देवस्थान समितीतर्फे कुंकळ्ळी पोस्ट ऑफिसपासून कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्यात येणार आहे. भल्या पहाटे हे संतापजनक कृत्य झाले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
अतिप्राचीन गणल्या गेलेल्या या देवस्थानातील वेताळ मूर्तीवर २५ हून अधिक घणाचे घाव घालण्यात आले. खड्गहस्त, मस्तक, दोन्ही नेत्र, छाती, कंबर व पाय विच्छेदन केलेले आहेत. तसेच बाहेरील जल्मी, ब्रह्मो, पाचापुरूष या प्रमुख लिंगांसह एकूण १९ लिंगांची तोडफोड करण्यात आली आहे.
रामनाथ देवस्थानापुढील दीपस्तंभ व तुलसी वृंदावनाचीही या माथेफिरूने तोडफोड केली आहे. पिंपळपेडावरील जुना गणेश मुखवटा जवळील विहिरीत फेकला आहे. बेताळ मूर्तीचा मुखवटाही चेपवून बाहेर फेकलेला आढळला.
दरम्यान, तोडफोडीच्या घटनेची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर यांना समजताच त्यांनी त्वरित त्याबाबत कुंकळ्ळी पोलिसांना कळवले. त्यानंतर निरीक्षक संदेश चोडणकर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी मागील व या घटनेत साम्य असल्याचे आपणास जाणवले, असे सांगितले.
उपअधीक्षक शांबा सावंत व अधीक्षक ऍलन डिसा यांनी परिस्थिती जाणून घेतली. यावेळी दक्षिण गोव्याचे उपजिल्हाधिकारी महेश खोर्जुवेकर यांनी यावर आपण गांभीर्याने विचार करत असून लवकरच आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू, असे सांगितले.
मंदिर समितीचे अध्यक्ष प्रभाकर गावकर म्हणाले की, यापूर्वीच्या अशा घटनांमुळे
आम्ही मंदिराला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. तथापि, आमच्या या मागणीचा गांभीर्याने विचार केला नाही. हिंदूंच्याबाबतीत सरकारकडून उदासिनता दिसू येते अशी टीकाही त्यांनी केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव, उपजिल्हाधिकारी गोकुळदास नाईक, भाजपचे पदाधिकारी ऍड. नरेंद्र सावईकर, आमदार रमेश तवडकर, आमदार दामू नाईक, प्रकाश वेळीप यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारी १२ वाजता श्वानपथकास पाचारण करण्यात आले. मात्र कुत्रे मंदिराच्या आवारातच घुटमळत राहिले. त्यामुळे त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.
सरकारचा तीव्र निषेध
पुढील कृती ठरवण्यासाठी संध्याकाळी मंदिर समिती व गावकऱ्यांची बैठक घटनास्थळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मोठी उपस्थिती लाभली होती. यावेळी सरकारच्या उदासिनतेचा तीव्र निषेध करण्यात आला. तसेच कुंकळ्ळी पोलिस स्थानकावर मोर्चा नेण्याचे ठरवण्यात आले. या मोर्चात सुमारे दोन हजार लोक सामील होतील, असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.

पृथ्वीराज राणे खून प्रकरणी बापूसाहेब सावंत यांची साक्ष नोंद


सालेली प्रकरण


पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - गेल्या २००५ साली गाजलेल्या पृथ्वीराज कृष्णराव राणे हत्या प्रकरणी महत्त्वाचा साक्षीदार वाळपई येथील बापूसाहेब वामनराव सावंत यांची साक्ष काल ८ मे रोजी मुख्य सत्र व जिल्हा न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांनी नोंद केली. अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील ऍड. सुभाष सावंत देसाई यांनी सदर पंच साक्षीदाराची सविस्तर जबानी नोंदवून घेतली.
सत्र न्यायालयात शपथेवर दिलेल्या आपल्या निवेदनात बापूसाहेब यांनी सांगितले की, २८ डिसेंबर २००५ रोजी दुपारी १२.४५ च्या दरम्यान पृथ्वीराज राणे यांच्या सालेली येथील खडी मशीनजवळ त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळी साखळी येथील सचिन विनायक कारापूरकर हा युवक पंच म्हणून उपस्थित होता. वाळपईचे तत्कालीन पोलिस निरीक्षक ऍथनी मोन्सेरात यांनी विनंती केल्यावरून आपण साक्षीदार राहिल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी अधिक माहिती देताना सदर घटनास्थळी पृथ्वीराज यांचा मृतदेह पडला होता व तो लालू देसाई यांनी ओळखल्याचे ते म्हणाले. त्यांच्या समक्ष या ठिकाणाहून १६ वस्तू जप्त करून लिफाफ्यात सील करण्यात आल्या होत्या, त्यांची ओळखही यावेळी करून घेण्यात आली. वाळपईचे खास दंडाधिकारी जयतन टांकसाळी यांनी सहा आरोपींची ओळख परेड घेतल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. सरकारी वकील ऍड. देसाई यांनी तपासणी पूर्ण केल्यानंतर बचाव पक्षाला बापूसाहेबांची उलट तपासणी करण्याची मागणी सत्र न्यायालयाने नाकारली.
पुढील सुनावणी ३ जून रोजी होणार आहे. यावेळी घटनास्थळी हजर असलेले मशीनवरील कामगार सतीश आरळकर व अनिल देसाई यांना समन्स बजावण्याचा आदेश दिला आहे. या घटनेनंतर दोन्ही कामगार काम सोडून भीतीने निघून गेल्याचे समजते. दोघांनीही पृथ्वीराजला आरोपी मारहाण करताना प्रत्यक्ष पाहिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

तेलंगण राष्ट्र समिती "रालोआ'त

तिसरी आघाडी फुटली

आज लुधियाना येथे
अकाली-भाजप रॅली
चंद्रशेखर राव हजर राहणार

नवी दिल्ली, दि. ९ - तिसऱ्या आघाडीतील एक महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या टीआरएसने (तेलंगण राष्ट्र समिती) उद्या रविवारी लुधियानात शिरोमणी अकाली दल व भाजप यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी होण्याचे संकेत आज दिले आहेत. आमच्या पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव हे उद्या लुधियानात होणाऱ्या रालोआच्या या रॅलीत सहभागी होणार आहेत, असे टीआरएसचे नेते विनोद कुमार यांनी आज येथे पीटीआयशी बोलताना सांगितले.
लुधियाना येथे आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला आपण उपस्थित राहावे असे अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल यांनी दिलेले निमंत्रण आम्हाला प्राप्त झाले असून आमच्या पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी हे निमंत्रण स्वीकारलेले आहे, असे विनोदकुमार यांनी सांगितले.
रालोआच्या रॅलीला उपस्थित राहण्याचा चंद्रशेखर राव यांच्या या निर्णयाचा अर्थ ते रालोआत सामील होत आहेत असा घ्यावयाचा का, असे विचारले असता विनोदकुमार म्हणाले की, अद्याप तरी यासंदर्भात अधिकृतपणे कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही. १६ मेला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संसदीय पक्षाची बैठक होईल व त्यात याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाईल, असे ते पुढे म्हणाले. स्वतंत्र तेलंगाणा राज्याच्या निर्मितीला जो कोणी पाठिंबा देईल त्याला आपले समर्थन देण्याचे पक्षाने ठरविलेले आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. आम्ही जर सत्तेवर आलो तर स्वतंत्र तेलंगणा राज्य निर्माण करू , असे आश्वासन भाजपाने याआधीच दिलेले आहे, हे येथे उल्लेखनीय. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनीही तेलंगणा राज्याच्या निर्मितीला पाठिंबा दर्शविल्याने उद्याच्या लुधियाना येथील रालोेेेेेेआच्या रॅलीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारण्याचा निर्णय चंद्रशेखर राव यांनी घेतला आहे.
दिग्गजांची उपस्थिती
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी, भाजपध्यक्ष राजनाथसिंग, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाशासित राज्यांचे सर्व मुख्यमंत्री हजर राहणार आहेत. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, जदयुचे अध्यक्ष शरद यादव , भारतीय राष्ट्रीय लोकदलचे अध्यक्ष व हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला, अजितसिंग, आसाम गण परिषदेचे अध्यक्ष चंद्रमोहन पटवारी व शिवसेनेचे नेते मनोहर जोशी हजर राहणार असल्याचे सांगितले जाते. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदीही हजर राहणार आहेत. याशिवाय भाजपचे इतर नेते जसे जसवंतसिंग, व्यंकय्या नायडू, अरुण जेटली, सुषमा स्वराज व गोपीनाथ मुंडेही या रॅलीला उपस्थित राहणार आहेत.

नौदलाचे देखणे दीक्षांत संचलन

"आयएनएस मांडवी'चा गोव्याला निरोप, केरळात स्थलांतर

पणजी,दि.९ (प्रतिनिधी) - बेती वेरे येथील "आयएनएस मांडवी' नौदल प्रशिक्षण अकादमीच्या अखेरच्या प्रशिक्षणार्थी तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पार पडला आणि त्याचबरोबर या प्रशिक्षण अकादमीने गोव्याचा निरोप घेतला. गेल्या २३ वर्षांत ७८ नौदल तुकड्यांना प्रशिक्षण देणाऱ्या या अकादमीचे केरळ येथील एहिमला नौदल अकादमीच्या वास्तूत स्थलांतर झाले आहे.
"आयएनएस मांडवी' या भारतीय नौदल प्रशिक्षण अकादमीची स्थापना १९८६ साली झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत नौदलातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना व प्रामुख्याने नौदलाच्या बड्या जहाजांवर सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना तेथे प्रशिक्षण मिळाले आहे."आयएनएस मांडवी' नौदल प्रशिक्षण अकादमीत नौदल अधिकाऱ्यांना पूर्वप्राथमिक प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य गेली २३ वर्षे केले.येथे प्रशिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांना या नौदल तळाचा कधीही विसर पडणार नाही, असे उद्गार दीक्षांत सोहळ्यात बोलताना व्हाईस ऍडमिरल एस.के.दामले यांनी काढले.या अकादमीच्या शेवटच्या तुकडीच्या दीक्षांत समारंभाला उद्देशून ते बोलत होते. आज दीक्षांत समारंभात १०५ अधिकारी वर्गातील प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना नौदल सेवेत पदार्पण झाले आहे.
केरळ येथील नव्या प्रशिक्षण अकादमीचे गेल्या जानेवारी २००९ मध्ये पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्याहस्ते उद्घाटन झाले होते. गोव्याच्या ३०० एकर जमिनीतील अकादमीच्या तुलनेत केरळ येथील अकादमी २८०० एकर जमिनीत विस्तारलेली आहे. गोव्यात यापुढे या संस्थेचा वापर उच्च प्रशिक्षणासाठी केला जाईल,असे सांगून त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तयारी सुरू असल्याचेही ते म्हणाले. या ठिकाणी युद्ध प्रशिक्षण कॉलेज स्थापण्याचा विचार असून नौदलासाठी हे ठिकाण नेहमीच उच्च वैचारीक स्थळच राहणार आहे,असेही ते म्हणाले. दरम्यान,या सर्वांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करीपर्यंत कोचीन येथील नौदल पोलिस प्रशिक्षण केंद्र इथे हलविण्यात येईल,असेही श्री.दामले म्हणाले.
पाच पदक विजेत्यांचा गौरव
प्रशिक्षण काळात विशेष प्राविण्य दाखवलेल्या पाच विद्यार्थांचा यावेळी कमांडर श्री.दामले यांच्याहस्ते पदके प्रदान करून गौरव करण्यात आला. त्यात कॅप्टन मुरली कृष्णन,कॅप्टन जॉर्ज जिझो थांकाचन,कॅप्टन कमल धामिवल,सहाय्यक कमांडंट अभिषेक यादव व अरूणा भारव्दाज यांचा समावेश आहे.

महानंदच्या पत्नीची चौकशी करा

पोलिसांना पंचवाडीवासीयांचे निवेदन

फोंडा, दि. ९ (प्रतिनिधी) - "सीरियल कीलर' महानंद रामनाथ नाईक याने केलेल्या खून प्रकरणाची पोलिसांनी कसून तपासणी करून याप्रकरणी अन्य कोणी गुंतलेला असल्यास त्यालाही अटक करावी, अशी मागणी पंचवाडी ग्रामस्थांनी येथील पोलिस अधिकाऱ्यांकडे आज(दि.९) दुपारी केली आहे.
पंचवाडी पंचायत क्षेत्रातील बेपत्ता असलेल्या कु. नयन गावकर आणि कु.केसर नाईक यांचा महानंद नाईक याने खून केल्याची कबुली दिल्याने पंचवाडी गावात खळबळ माजली आहे. संशयित आरोपी महानंद नाईक याची पत्नी सौ. पूजा नाईक हिचा याप्रकरणात सहभाग असल्याची शक्यता लोकांकडून व्यक्त केली जात असून त्या अनुषंगानेही कसून चौकशी करावी, अशी मागणी पंचवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
पंचवाडीच्या सरपंच सौ. व्हिएना रॉड्रिगीस यांनी नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने पोलीस उपअधीक्षक शेराफीन डायस यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन सादर करण्यात आले आहे. गावातील कु. नयन आणि कु. केसर यांच्या बेपत्ता प्रकरणाचा छडा लावलेल्या फोंडा पोलिसांचे ग्रामस्थातर्फे अभिनंदन करण्यात आले असून या मुलींच्या खून प्रकरणांचा सर्व बाजूनी कसून तपास करण्याची मागणी निवेदनात केली आहे. तसेच संशयित आरोपी महानंद नाईक याची नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंग करावे, अशी मागणी केली आहे.
मुलींच्या खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून या प्रकरणात महानंद नाईक याच्या पत्नीचा सहभाग आढळल्यास तिलाही अटक केली जाईल, असे आश्वासन उपअधीक्षक श्री. डायस यांनी शिष्टमंडळाला दिले. यासंबंधी ग्रामस्थांकडे कोणत्याही प्रकारची माहिती असल्यास त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी, असेही आवाहन श्री. डायस यांनी केले.
महानंद नाईकला पत्नीची फूस असावी, असा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
शिष्टमंडळात उपसरपंच सौ.लता नाईक, पंच दिलीप गावकर, ज्योस ब्रांगाझा , राजेंद्र गावकर, अवधूत नाईक, अरविंद नाईक, एडविन रॉड्रिगीस, आलशिन डिकॉस्टा, सौ. प्रीता गावकर, व्हेला रॉड्रिगीस, श्रीमती सत्यवती गावकर, जीवन लांबोर आदींचा समावेश होता.

निर्मलाच्या आईचाही महानंदवरच संशय

फोंडा, दि.९ (प्रतिनिधी) - सात युवतीच्या खुनांची कबुली दिलेल्या सीरियल किलर महानंद नाईक (तरवळे शिरोडा) याची बेतकी येथील कु. निर्मला वसंत घाडी बेपत्ता प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे. फोंडा भागातील युवतीच्या खुनांची मालिका कुठवर जाते याकडे तमाम गोवेकरांचे लक्ष लागले आहे.
बेतकी येथील कु. निर्मला घाडी ही युवती घरातील सोन्याचे दागिने घेऊन २००७ सालापासून बेपत्ता आहे. सीरियल किलर महानंद नाईक याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर कु. निर्मलाची आई प्रभावती वसंत घाडी हिने फोंडा पोलिसांशी संपर्क साधून महानंद नाईक याने कु.निर्मला हिच्याशी वरचा बाजार फोंडा येथे ओळख करवून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. श्रीमती प्रभावती घाडी हिची तक्रार पोलिसांनी नोंद करून घेतली असून महानंद नाईक याच्या विरोधात कु. निर्मला हिचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता कु. निर्मला घाडी हिची आई श्रीमती प्रभावती घाडी हिने संशयित महानंद नाईक याला ओळखले असून त्याने वरचा बाजार फोंडा येथे मुलीशी मैत्री केली. त्यानंतर काही दिवस कु. निर्मला हिच्या संपर्कात होता. म्हार्दोळ येथे आपली फॅक्टरी असल्याची माहिती संशयित महानंद याने दिली होती, असेही तिचे म्हणणे आहे. याप्रकरणी फोंडा पोलिस कसून तपासकाम हाती घेतले आहे. प्रभावती घाडी हिने दिलेली माहितीवरून तपास केला जात आहे. अद्यापपर्यंत संशयित महानंद नाईक याने निर्मला बेपत्ता प्रकरणाची कबुली दिलेली नाही. आपण निर्मला हिला ओळखत नाही, तिच्याशी आपला कधी संपर्क आलाच नाही, अशी माहिती पोलिसांना देत आहे. मात्र, पोलिस अधिकारी याप्रकरणी गंभीरपणे चौकशीचे काम करीत आहेत.
निर्मला घाडी बेपत्ता प्रकरणाबरोबर कु. दीपाली ज्योतकर (मडगाव), गुलाबी गांवकर (दाभाळ), सूरत गांवकर (पंचवाडी), निर्मला आमोलकर (रिवण) याप्रकरणातही महानंद गुंतल्याचा संशय व्यक्त होत आहे.केरी फोंडा येथील एक युवतीदेखील दागिन्यांसह बेपत्ता झालेली आहे, अशी माहिती मिळाली आहे. या युवतीच्या कुटुंबीयांनी अद्याप येथील पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. उपअधीक्षक शेराफीन डायस यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सी.एल. पाटील, उपनिरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक संजय दळवी, उपनिरीक्षक लक्षी आमोणकर, उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर, उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक निखिल पालेकर, हेड कॉस्टेबल सोनू परब, सावळो नाईक आदी तपास करीत आहेत. पोलिस एक एक प्रकरण हाती घेऊन त्याचा सखोल तपास करीत आहेत.
दरम्यान, पोलिस महानिरीक्षक भीमसेन बस्सी यांनी आज संध्याकाळी फोंडा पोलिस स्टेशनला भेट देऊन गोव्याला हादरा देणाऱ्या मुलींच्या खून प्रकरणाचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.