Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 25 April 2009

स्वात खोऱ्यात तालिबानने पाकिस्तानी लष्कराला रोखले

पाकिस्तानात अगदी मोकाटपणे दहशतवादी कारवाया करून लोकांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानचे धाडस आता असे काही वाढले असून त्यांनी पाक लष्करालाच आता आव्हान देणे सुरू केले आहे. स्वात खोऱ्यात तालिबानी अतिरेक्यांनी लष्कराच्या गाड्या अडविल्या. तसेच कयानी यांनी दिलेल्या "अल्टीमेटम'चाही त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. अगदी बिनधोकपणे अतिरेक्यांच्या कारवाया सुरूच आहेत.
तालिबानी अतिरेक्यांनी पाकिस्तानी लष्करालाच स्वात खोऱ्यात रोखले असून त्यांची शस्त्रे व गाड्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. लष्करी जवानांनाही त्यांनी ओलीस ठेवल्याची माहिती लष्करी सूत्रांनी दिली आहे.

मंत्री विश्वजित राणे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याचा आदेश

मोबाईलवरून धमकीप्रकरण
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिलेल्या माहितीनुसार आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शर्मीला पाटील यांनी जुने गोवे पोलिसांना दिले.
समाजकार्यकर्ते तथा वकील आयरिश रॉड्रिगीस यांना "मोबाईल'वरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची पोलिस तक्रार त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मंत्री राणे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करत असल्याचे सांगून अचानक त्या प्रकरणाच्या तपासाची फाईलच बंद केली होती. ही बाब ऍड. रॉड्रीगीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. गेल्यावेळी दोन्ही बाजूचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला होता. न्यायालयाला आश्वासन देऊन त्याची पूर्तता न करणे ही गंभीर बाब असल्याने त्याची त्वरित पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आलेत.
दि. २३ सप्टेंबर ०८ रोजी सरकारी वकील व्हिनी कुतिन्हो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात युक्तिवाद करताना धमकी प्रकरणात आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती गोवा खंडपीठाला दिली होती. त्यावेळी न्यायालयात जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडे उपस्थित होते. तरीही, अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नसून तपासाच बंद करण्यात आल्याची युक्तिवाद ऍड. रॉड्रिगीस यांनी केला होता. यावेळी डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशनच्या सल्ल्यानंतर या प्रकरणाचा तपास बंद करण्यात आल्याची भूमिका निरीक्षक गावडे यांनी घेतली होती. त्यांच्या या वागणुकीमुळे श्री. गावडे यांच्या विरोधात अवमान याचिकाही सादर करण्यात आली आहे.
राजकीय दबावापोटी आरोग्यमंत्री विश्र्वजित राणे यांच्या विरोधातील तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या जुने गोवे पोलिसांना या प्रकरणात न्यायालयीन हस्तक्षेपाची चाहूल लागताच तब्बल २२ दिवसांनंतर ही तक्रार नोंदवून घेतली होती.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्नीच्या मोबाईलवरून आपल्याला जिवानिशी मारण्याची धमकी दिल्याचे ऍड. आयरिश रॉड्रिगिस यांचे म्हणणे आहे. त्यांनी याप्रकरणी दि. ३१ जुलै रोजी जुने गोवे पोलिसांशी संपर्क साधला, मात्र तक्रार दाखल करून घेण्यात पोलिसांनी टाळाटाळ चालवली होती. त्यानंतर मंत्री राणे यांच्या विरोधात भा.दं.सं ५०६(२) कलमानुसार गुन्हा दाखल करून घेण्यात आला.
दि. ३१ जुलै ०७ सकाळी ८.१५ वाजता निनावी दूरध्वनीवरून "धीस इज विश्वजित राणे, बी कॅअरफुल, आय व्हील गॅट यू शूट" अशी धमकी देण्यात आली होती. यानंतर अँड. रोड्रीगीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निनावी दूरध्वनी विश्वजित राणे यांनी केल्याचा दावा करून खळबळ माजवली होती.
त्यानंतर काही दिवसांनी दि. ३१ जुलै रोजी आलेला धमकीचा कॉल हा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची पत्नी दिव्या राणे यांच्या मोबाईलवरूनच आला होता, अशी माहिती उघडकीस आली होती. यासंबंधीचे पुरावेही रॉड्रिगिस यांनी "आयडिया सेल्युलर' कंपनीकडून मिळवले होते.

बाये-सुर्ला केंद्रावर २७ रोजी फेरमतदान

पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीसाठी काल २३ रोजी झालेल्या मतदानावेळी उत्तर गोव्यातील साखळी या नव्या मतदारसंघात बाये सुर्ला या १८ क्रमांकाच्या मतदानकेंद्रावरील मतदानयंत्रात बिघाड झाल्याने या मतदानकेंद्रावर फेरमतदान घेण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम ५८(२) यानुसार हे फेरमतदान येत्या २७ एप्रिल रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल. गोव्यात एखाद्या मतदानकेंद्रावर तांत्रिक किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव फेरमतदान घेण्याची ही पहिलीच घटना आहे.
याप्रकरणी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी अजित श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार साखळी मतदारसंघातील १८ क्रमांकाच्या बाये सुर्ला मतदानकेंद्रावर मतदान झाल्यानंतर मतदानयंत्रावरील बेरीज व प्रत्यक्षात निवडणूक अधिकाऱ्यांकडे असलेली आकडेवारी यात मोठ्या प्रमाणात तफावत जाणवली. या मतदान केंद्रावर एकूण ८१० मतदारांची नोंद आहे. मतदानयंत्राव्दारे मतदान केले जात असले तरी प्रत्यक्षात प्रत्येक मतदानकेंद्रावर एकूण मतदान किती झाले याची नोंद निवडणूक अधिकाऱ्यांकडेही असते. मतदान संपल्यानंतर मतदानयंत्राला सील ठोकताना प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांकडील बेरीज मतदानयंत्रावरील बेरजेशी जुळवली जाते व नंतरच मतदानयंत्र सील केले जाते. सुर्ला येथील या मतदानकेंद्रावरील यंत्राव्दारे मात्र भलतेच आकडे मिळत असल्याने ही गोष्ट ताबडतोब मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या नजरेस आणून देण्यात आली. आज याप्रकरणी अभ्यास केल्यानंतर या मतदानकेंद्रावर फेरमतदान घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला.

एप्रिलक्रांतिनिमित्ताने पोर्तुगीजप्रेम उफाळले!

आयोजक व विरोधक आमनेसामने वाद चिघळणार?
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) : 'इन्स्टिट्यूट कामोईश'संस्थेतर्फे "एप्रिलक्रांती' या महोत्सवाचे आयोजन करताना आपल्याला अंधारात ठेवल्याची भूमिका घेऊन गोवा विद्यापीठाने हात झटकले आहेत तर , आम्ही पोलिस संरक्षणात हा महोत्सव साजरा करणारच, असे आज आयोजकांनी निदर्शने करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीला सांगितले. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज सकाळी स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, दिव्य जागृती समितीचे निवृत्त कॅप्टन दत्ताराम सावंत, हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी, सदाशिव धोंड व सौ. राजश्री गडेकर यांनी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. देवबागकर यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाविषयाची आम्हाला अधिक काहीच माहीत नसल्याचे सांगितले. राजबंदी न्याय आंदोलन समितीने गोवा विद्यापीठाच्या या कारभाराचा निषेध नोंदवला आहे.
दरम्यान, सायंकाळी हॉटेल "गोयचिन'च्या समोर असलेल्या इमारतीत सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम सुरू झाला. यावेळी हिंदू जनजागृती व शिवसेनेने याठिकाणी पोर्तुगीजधार्जिण्या गोवा विद्यापाठीच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन निषेध नोंदविला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस पहारा ठेवण्यात आला होता. कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यास पोलिसांतर्फे मज्जाव करण्यात आल्याने समितीच्या दोन सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांची भेट घेतली.
समितीचे निमंत्रक जयेश थळी व शिवसेनेचे श्रीकृष्ण वेळुस्कर यांनी या कार्यक्रमाचे आयोजक तथा गोवा विद्यापीठाच्या पोर्तुगीज भाषा विभागाचे प्रमुख प्रा. डॉल्फिन कोरिया डास्लिवा यांची भेट घेऊन निषेध नोंदविला तसेच हा कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम बंद पाडणार नसल्याचे सांगून प्रा. डास्लिवा यांनी थेट आव्हानच दिले. दि. २४ ते २६ पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला पोलिस संरक्षण दिले जाणार आहे.
राजबंदी न्याय आंदोलन समिती
'स्टॉकहोम सिंड्रोम' या मानसिक रोगाने ग्रस्त असलेले काही गोमंतकीय पोर्तुगीज राजवटीचा उदो उदो करताना दिसतात. पोर्तुगीज राजवट खऱ्या अर्थाने सक्तीचे धर्मांतर, गरिबीचे समर्थन व भयानक दडपशाही या साठीच प्रसिद्ध असून सुद्धा हे घडत असल्याने ही दुःखाची बाब असल्याचे मत राजबंदी न्याय आंदोलन समितीचे निमंत्रक प्रा. दत्ता भि.नाईक यांनी व्यक्त केले आहे. गुणवाढ प्रकरण, रॅगिंग आणि विद्यार्थिनींशी असभ्य व्यवहार यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा विद्यापीठाने हा उद्योग करून आपली लोकप्रियता अधिकच घसरवलेली असल्याचेही प्रा. नाईक यांनी म्हटले आहे. तसेच देशभक्त शक्तींना गुलामगिरीचे उदात्तीकरण करणाऱ्या या उपक्रमास विरोध करण्याचे आव्हानही त्यांनी केले आहे.

वास्को नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव संमत

वास्को, दि. २४ (प्रतिनिधी) : मुरगावचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव ११ विरुद्ध ८ मतांनी संमत झाला असून त्यामुळे त्यांना खुर्ची रिकामी करावी लागली आहे.
आज दुपारी ३.३० वाजता पालिका सभागृहात याबाबत चर्चेसाठी बोलवलेल्या खास बैठकीला एकूण २० पैकी १९ नगरसेवक उपस्थित होते. निर्वाचन अधिकारी दीपक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस मुख्याधिकारी एस. नाईक उपस्थित होते. बैठक सुरू होताच
कालुर्स आल्मेदा, चित्रा गावस, शांती मांद्रेकर, रोहिणी परब, राजेश घोणसेकर, किशोरी हळदणकर, नितीन चोपडेकर व शेखर खडपकर आदी सदस्यांनी नगराध्यक्षांवर विविध आरोपांचा भडिमार केला. त्यामुळेच नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर अविश्वासाच्या विरोधात काशिनाथ यादव व इतर नगरसेवकांनी नगराध्यक्ष हे सुसंस्कृत असल्याचे सांगतानाच त्यांच्याविरोधातील सर्व आरोप फेटाळून लावले. नंतर नगराध्यक्षांनी आपण येथील जनतेच्या विकासासाठी अनेक कामे केल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले.
नंतर अविश्वासाबाबत मतदानास प्रारंभ झाला. विरोधी गटाने तेव्हा हात वर करून अविश्वास ठरावासंदर्भात निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. मात्र नेहमीप्रमाणे मतदान होईल, असे निर्वाचन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. त्यानंतर १९ पैकी ११ नगरसेवकांनी मतदानात भाग घेतला व अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. मतदान आटोपताच निर्वाचन अधिकारी श्री. देसाई यांनी क्रितेश गावकर यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याचे जाहीर केले.
आता नवीन नगराध्यक्ष कोण, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली असून विरोधी गटातील सैफुल्ला खान याचे नाव आघाडीवर आहे.
उपनगराध्यक्ष सौ. चित्रा गावस यांच्यावर यापूर्वीच अविश्वास ठराव संमत झाला आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदाची खुर्चीही सध्या खाली असून उद्या शनिवारी या निवडीबाबत पालिकेची बैठक बोलवण्यात आली आहे. सौ. गावस यांनाच पुन्हा एकदा ही खुर्ची लाभणार अशी वदंता आहे.

कसाबचे नेमके वय शोधण्यासाठी चाचणी

मुंबई, दि. २४ : मुंबई हल्ल्याप्रकरणी पकडण्यात आलेला एकमेव अतिरेकी मोहम्मद अजमल आमीर कसाब याचे वय गुन्ह्याचे वेळी १८ किंवा त्यापेक्षा कमी होते का, याचा छडा लावण्यासाठी न्यायाधीशांनी त्याच्या विविध चाचण्या घेण्यास सरकारला परवानगी दिली आहे.
कसाबविरुद्ध विशेष न्यायालयात मुंबई हल्ल्याप्रकरणी आता खटल्याची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वी, त्याचे नेमके वय काय, याचा छडा लावला पाहिजे, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती. गुन्ह्याच्या वेळी कसाबचे नेमके वय किती होते, ते जर १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर त्याचा खटला बालन्यायालयाकडे पाठवावा लागेल, असेही ऍड. निकम यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.
त्यानुसार आज न्यायाधीश एम.एल.ताहिलीयानी यांनी कसाबच्या संदर्भात त्याचे वय जाणून घेण्यासाठी आवश्यक त्या चाचण्यांची परवानगी दिली. त्याचे वय माहिती करून घेण्यासाठी कसाबच्या हाडांची आणि दातांची चाचणी होणार आहे. या चाचणीचा अहवाल २८ एप्रिलपर्यंत सादर करायचा आहे.

Friday, 24 April 2009

उत्तर गोव्यात ६०.; दक्षिणेत५० टक्के मतदान

श्रीपाद नाईक व सावईकरांना विजयाची खात्री
सार्दिन व देशप्रभूही आशावादी

मतमोजणी १६ मे रोजी


पणजी, दि. २३ (प्रतिनिधी) - लोकसभेसाठी आज राज्यातील उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही मतदारसंघांसाठी झालेल्या मतदानात ५४.७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यात ५९.७६ तर दक्षिण गोव्यात ५०.१३टक्के मतदान झाले अशी माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी के.बी.सुरजुसे यांनी दिली. दोन्ही मतदारसंघातील मतदानाला लोकांनी दिलेला प्रतिसाद व एकूण मतदानाची घसरलेली टक्केवारी पाहता विजय आपल्याच उमेदवारांचा होईल,असा दावा भाजप, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख राजकीय पक्षांनी केला आहे. उत्तरेत खासदार श्रीपाद नाईक यांना राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र देशप्रभू टक्कर देणार आहेत तर दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे भवितव्य अधांतरी बनल्याचे वातावरण पसरले आहे. दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे.
१५ व्या लोकसभेसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत गोव्यातील उत्तर व दक्षिण अशा दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान झाले. सकाळी ७ वाजता सुरू झालेले हे मतदान संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहिले. काही ठिकाणी ५ वाजल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागल्याने या मतदारांची मतदान ओळखपत्रे एकत्र करून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यास परवानगी देण्यात आली. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गोवा पोलिसांनी अत्यंत चोख पद्धतीने पार पाडली. राज्यात मतदानावेळी एकही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही,असे श्री.सुरजुसे म्हणाले. दक्षिण गोव्यात दोघा व्यक्तींना मतदानाला रांगेत उभे असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू आल्याचे प्रकार घडले. या घटनेबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला कोणत्याही प्रकारची कुणीही माहिती दिली नाही,असे सांगून एकूण मतदान शांततेत पार पडले असेही श्री.सुरजुसे म्हणाले.
गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत मिळून १०,१९,९७७ मतदारांची नोंदणी निवडणूक आयोगाने केली होती त्यातील ५,४३,४६२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.उत्तरेतील ४,८६,७८९ मतदारांपैकी २,७५,०४६ मतदारांनी भाग घेतला तर दक्षिणेतील ५,३३,१८८ पैकी एकूण २,६८,४१६ मतदारांनी आपले मतदान केले. गेल्या २००४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदान ५८.७७ टक्के झाले होते. त्यात उत्तरेत ५९.२९ तर दक्षिणेत ५५.२१ टक्के मतदानाची नोंद झाली होती.आज झालेल्या मतदानात उत्तरेत सर्वांत जास्त पेडणे मतदारसंघात ६८.८१ टक्के मतदान झाले तर सर्वांत कमी ताळगाव मतदारसंघात ४२.६८ टक्के मतदानांची नोंद झाली. दक्षिणेत सर्वांत जास्त सांगे मतदारसंघात ५९.९४ तर सर्वांत कमी बाणावली मतदारसंघात ३८.५६ टक्के मतदानाची नोंद झाली.
नेत्यांची प्रतिक्रिया
उत्तर गोव्याचे खासदार तथा भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांनी आपल्या विजयाबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.मतदारांची दिशाभूल करण्याचे तसेच नकारात्मक प्रचाराचा आधार घेऊन मतदारांना संभ्रमात टाकण्याचे बरेच प्रयत्न झाले परंतु त्यांना मतदार अजिबात भुलले नाहीत व त्यांनी निर्धाराने आपल्या पाठींशी राहण्याचे ठरवल्याने आपली हॅट्रीक निश्चित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. गोव्यातील दोन्ही मतदारसंघांत यावेळी भाजपचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनी केलेले कार्य जनतेसमोर आहे, तर दक्षिण गोव्यात निष्क्रिय कॉंग्रेस उमेदवाराला पाडण्यासाठी जनता उच्चशिक्षित आणि तळमळीचे कार्यकर्ते असलेल्या सावईकरांनाच विजयी करील, असे पर्रीकर यांनी सांगितले. दोन्ही मतदारसंघातील टक्केवारी हेच दर्शविते,असे ते पुढे म्हणाले.
देशप्रभू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यावेळी मतदारांनी सुज्ञपणे आपला कौल दिला आहे व खऱ्या अर्थाने लायक उमेदवारालाच त्यांनी आपला पाठिंबा दिल्याचे ते म्हणाले. मगो पक्षाचे उमेदवार पांडुरंग राऊत यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने मगोत पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली.दक्षिणेत सार्दिन यांनी आपल्या विजयाबाबत सुरू असलेल्या शंकाकुशंका निकालानंतर फोल ठरणार असा दावा केला तर ऍड.सावईकर यांनी दक्षिण गोव्यातील जनतेने यावेळी निश्चितच बदलासाठी मतदान केल्याने काही फरकाने का असेना पण आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे.

देशभरात दुसऱ्या टप्प्यात सरासरी ५५ टक्के मतदान

नवी दिल्ली, दि. २३ - पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या तुलनेत देशात आज झालेल्या लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान समाधानकारक झाले असल्याची माहिती उपनिवडणूक आयुक्त बालकृष्णन यांनी आज येथे दिली. हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता देशात सर्वत्र अतिशय शांततेत आणि सुरळीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. देशभरात आज सरासरी ५५ टक्के मतदान झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. १२ राज्य व केंद्र शासीत प्रदेशातील १४० लोकसभा मतदार संघांमध्ये आज दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्यात आले. झारखंड आणि बिहारमधील नक्षलवादी हल्ल्याच्या घटनामुळे या दुसऱ्या टप्प्यातील मतदानालाही हिंसाचाराचे गालबोट लागलेच.
१६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळी नक्षलवादी हल्ल्यामध्ये बिहार, झारखंड आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये १८ जण मृत्युमुखी पडले होते. यात ५ मतदान अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले.
राहुल गांधी यांनी गांधी घराण्याचा परंपरागत मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आपला बारामती मतदार संघ मुलगी सुप्रिया सुर्वेसाठी सोडून स्वत: माढा मतदार संघाची निवड केली आहे. सुषमा स्वराज मध्य प्रदेशातील विदिशामधून तर रामविलास पासवान बिहारच्या हाजीपूर मतदार संघातून उभे आहेत.
तसेच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री कमल नाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून आपले भाग्य आजमावीत आहेत. याशिवाय अखिलेश प्रसाद सिंग (पूर्व चम्पारण, बिहार), रघुवंश प्रसाद सिंग (वैशाली, बिहार) आणि रघुनाथ झा (वाल्मीकिनगर, बिहार) हे नावाजलेले उमेदवारही दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत एकूण २,०४१ उमेदवार निवडणूक लढवीत असून यात १२१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. राज्यांचा विचार करता दुसऱ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २०, आसाममधील ११, बिहारमधील १३, गोवामधील २, जम्मू-काश्मीरमधील १, कर्नाटकातील १७, मध्य प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील २५, ओरिसातील ११, त्रिपुरातील २, उत्तर प्रदेशातील १७ आणि झारखंडमधील ८ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

वरूण गांधी स्टार प्रचारक

उत्तर प्रदेशात २६ रोजी सभा
लखनौ, दि. २३ - पिलीभीत येथील भाजपाचे उमेदवार वरुण गांधी यांना पक्षाने स्टार प्रचारक म्हणून २६ रोजी उत्तरप्रदेशात जाहीर सभेसाठी पाठविण्याचे ठरविले आहे.
पिलीभीत येथून वरुण गांधी यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आता ते स्वत:च्या निवडणूक क्षेत्राव्यतिरिक्त उत्तरप्रदेशात भाजपाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत. दोन आठवड्यांसाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना पॅरोलवर सोडले आहे. त्या काळात ते उत्तरप्रदेशात प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. गेल्या काही दिवसातील घडामोडींमुळे वरुणविषयीच्या बातम्या किंवा त्यांचे वक्तव्य या सर्वांविषयी जनसामान्यांना प्रचंड उत्सुकता जाणवू लागली आहे. त्यातूनच वरुणने कारागृहाबाहेर आल्यानंतर पिलीभीत येथे घेतलेल्या सभेत अतिशय भावनिक भाषण केल्याने उत्तरप्रदेशात त्याच्या जाहीर सभा घेण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. सर्वसामान्यांना त्याच्याविषयी वाटत असलेल्या आपुलकीमुळे पक्षाने वरुणला स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट केले आहे.
२६ एप्रिल रोजी त्यांच्या एकूण चार जाहीर सभा होणार आहेत. वरुणची ही पहिलीच लोकसभा निवडणूक असून त्यांच्याविरोधात कॉंग्रेसने पी.एम.सिंग यांना मैदानात उतरविले आहे.

मतदान केंद्रातच दोघांना मृत्यू

मडगावः मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी आलेल्या दोघांना मतदान केंद्रातच मृत्यू आला. येथील प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये रुझार दौराद या मतदाराला कळा येऊ लागल्या व नंतर त्याला तेथेच हृदयविकाराने मृत्यू आला. नुवे येथे असाच आणखी एक प्रकार घडला. तेथे मारीया (६०) नामक महिलेला असाच मृत्यू आला पोलिसांनी नंतर पंचनामा केला व मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवले. मतदान प्रक्रियेत या प्रकारामुळे किंचित व्यत्यय आला तरी त्याचा मतदानावर परिणाम झाला नाही.

दोन निवडणूक अधिकाऱ्यांचा ओरिसात उष्माघातामुळे मृत्यू

भुवनेश्वर, दि. २३ - ओरिसामध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू असताना उष्माघातामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर अन्य दोन अधिकारी आजारी पडल्याचे वृत्त आहे.
मयूरभंज आणि किओंझार जिल्ह्यात अनुक्रमे पवित्र मोहन मुदुली आणि सोमनाथ मोहंती या अधिकाऱ्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. यापैकी मोहंती यांचा काल रात्रीच मृत्यू झाल्याचे समजते. मुदुली यांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मयूरभंजचे जिल्हाधिकारी सुरेेश वशिष्ठ यांनी सांगितले. या दोन अधिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे ओरिसात उष्माघातामुळे दगावणाऱ्यांची संख्या ३० वर पोहोचली आहे.
अन्य दोन अधिकारी आजारी झाल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पंतप्रधानांचे सपत्नीक मतदान
गुवाहाटी, दि.२३ ः पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांनी आज गुवाहाटी संसदीय क्षेत्रात लोकसभेसाठी मतदान केले.
सकाळी ११ वाजताच्या सुमारास पंतप्रधान आपल्या पत्नीसह गोपीनाथ बोरदोलई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथून ते हेलिकॉप्टरने खानपारासाठी रवाना झाले. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांनी दिसपूर येथील राजकीय उच्च विद्यालयात मतदान केले. आसाममधून राज्यसभेचे सदस्य असणाऱ्या मनमोहन सिंग यांची मतदारसंख्या ७२६ आणि त्यांच्या पत्नीची मतदारसंख्या ७२७ होती. मतदान केल्यानंतर ते पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले. यापूर्वी त्यांनी २००४ आणि २००६ च्या निवडणुकीत मात्र आसाममध्ये येऊन मतदान केले नव्हते.

Thursday, 23 April 2009

उत्तरेत दुरंगी तर दक्षिणेत तिंरगी लढत

आज मतदान
पणजी, दि.२२ (प्रतिनिधी) : पंधराव्या लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका उद्या २३ रोजी होत आहेत. या टप्प्यात गोव्याचा समावेश असून उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघांसाठी उद्या सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल. दोन्ही जिल्ह्यांत मतदारांना खुल्या व निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने आवश्यक उपाययोजना केली आहे.
यंदा निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यास केंद्राने नकार दिला असला तरी सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. राज्यात दोन्ही ठिकाणी १४४ कलम लागू करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रे कर्मचाऱ्यांसह मतदान यंत्रणेने सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.
उत्तरेत ७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात ख्रिस्तोफर फोन्सेको (भारतीय कम्युनिस्ट पार्टी), जितेंद्र देशप्रभू (राष्ट्रवादी कॉंग्रेस), पांडुरंग राऊत (मगो) श्रीपाद नाईक (भाजप), उपेंद्र गावकर (शिवसेना) तसेच नरसिंह सुर्या साळगावकर व मार्था डिसोझा (अपक्ष) यांचा समावेश आहे. दरम्यान, उत्तर गोव्यात भाजपचे श्रीपाद नाईक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र देशप्रभू यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. दक्षिण गोव्यात फ्रान्सिस सार्दिन (कॉंग्रेस), ऍड. नरेंद्र सावईकर (भाजप),ऍड. राजू मंगेशकर (भा.क.प), रोहीदास बोरकर ( सेव्ह गोवा फ्रंट) माथानी साल्ढाणा (युगोडेपा), जबाहर डायस, डेरीक डायस,फ्रान्सिस फर्नांडिस ,मुल्ला सलीम, स्मिता साळुंखे आणि हमजा खान (अपक्ष) यांचा सहभाग आहे. दक्षिणेत कॉंग्रेसचे सार्दिन, भाजपचे ऍड.नरेंद्र सावईकर व युगोडेपाचे माथानी साल्ढाणा यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
गोव्यात एकूण १०,२०,७९४ पात्र मतदार आहेत. उत्तर गोव्यात ४,८६,९८३ तर दक्षिणेत ५,३३,८११ मतदारांची नोंदणी झाली आहे. उत्तर गोव्यासाठी ६७९ तर दक्षिणेसाठी ६६० मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघ प्रत्येक वीस विधानसभा मतदारसंघांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. उत्तर गोव्यात मांद्रे, पेडणे (राखीव अनुसूचित जाती) डिचोली ,थिवी ,म्हापसा ,शिवोली ,साळगाव ,कळंगुट, पर्वरी, हळदोणा, पणजी ,ताळगांव ,सांताकु्रज ,सांताआद्रें, कुंभारजुवा,मये, साखळी , वाळपई ,आणि प्रियोळ या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात फोंडा,शिरोडा, मडकई,मुरगाव,वास्को, दाबोळी, कुठ्ठाळी, नुवे , कुडतरी ,फातोर्डा, मडगाव, बाणावली, नावेली, कुंकळ्ळी, वेळ्ळी, केपे ,कुडचडे, सावर्डे ,सांगे आणि काणकोण यांचा समावेश आहे .
गोव्यात पोर्तुगीजांची राजवट असल्याने सुरुवातीस १९५२ आणि १९५७ साली झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत या राज्याचा सहभाग नव्हता. १९६१ साली गोवा मुक्त झाल्यानंतर १९६२ साली राष्ट्रीय पातळीवरील लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्याची संधी या राज्याला मिळाली. गोव्यात पहिल्याच वेळी पीटर आल्वारीस यांची उत्तर तर मुकुंद शिंक्रे यांची दक्षिण गोवा मतदारसंघांसाठी निवड झाली होती. गोव्यात आत्तापर्यंत झालेल्या १२ लोकसभा निवडणुकीत गोव्यातील जनतेने निवडून दिलेल्या खासदारांत उत्तर गोव्यातून पीटर आल्वारीस(१९६३), जनार्दन शिंक्रे(१९६७), पुरुषोत्तम काकोडकर (१९७१), अमृत कांसार (१९७७), संयोगिता राणे (१९८०), शांताराम नाईक (१९८४), गोपाळ मयेंकर (१९८९), हरिष झांट्ये (१९९१),रमाकांत खलप(१९९६), रवी एस. नाईक(१९९८), श्रीपाद नाईक (१९९९), श्रीपाद नाईक (२००४) दक्षिण गोवा मतदारसंघात मुकुंद शिंक्रे (१९६३), इराज्मो डी सिक्वेरा (१९७६), एदुआर्द फालेरो (१९७१), एदुआर्द फालेरो (१९७७ ते १९९१), चर्चिल आलेमाव (१९९६), फ्रान्सिस सार्दिन (१९९८), रमाकांत आंगले (१९९९), चर्चिल आलेमाव (२००४) आणि २००७ साली झालेल्या पोटनिवडणुकीतसार्दिन यांची निवड झाली.उत्तरेत सतत दोन वेळा निवडून येण्याचा मान भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांना प्राप्त झाला आहे व ते यंदा हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. दक्षिणेत एदुआर्द फालेरो यांनी सतत पाच वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यांना केंद्रात कॉंग्रेस सरकारात मंत्रिपदही प्राप्त झाले होते.बाकी मगोतर्फे निवडून आलेले ऍड.रमाकांत खलप हे केंद्रीय कायदामंत्री बनले व श्रीपाद नाईक यांनाही केंद्रात भाजप सरकारात राज्यमंत्रिपद प्राप्त होण्याचा मान मिळाला. आतापर्यंतच्या निकालांवर नजर टाकल्यास उत्तर गोवा हा सुरुवातीस मगो व आता भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. दक्षिण गोव्यात कॉंग्रेसचा जोर असला तरी यावेळी तेथील वातावरण खूपच बदलल्याचे चित्र दिसून येते.
सर्वांत मोठ्या लोकशाहीची सर्वांत मोठी निवडणूक
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत देश सध्या निवडणुकीला सामोरे जात आहे. पंधराव्या लोकसभेची स्थापना करण्यासाठी गेल्या १६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. एकूण १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील १२४ मतदारसंघांसाठी यावेळी मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या २३ रोजी होईल. यात एकूण १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेश मिळून १४१ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होईल. उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानात गोव्याचा समावेश असून उत्तर व दक्षिण गोवा अशा दोन्ही मतदारसंघांसाठी उद्या मतदान होईल. यानंतर ३० एप्रिल, ७ व १३ मे असे उर्वरित तीन टप्पे पार पडणार असून १६ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
विद्यमान लोकसभा निवडणूक अनेक कारणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सारे जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली आले असताना आपल्या देशाला आता त्याची झळ लागणे सुरू झाले आहे. दहशतवादाचा विखार झपाट्याने फैलावत चालला आहे. देश महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत असताना विविध समस्या या मार्गात अडथळा ठरत आहेत. बेरोजगारी,गरिबी,आरोग्य सुविधांचा अभाव व पायाभूत सुविधांची कमतरता यामुळे विकासाची गती मंदावत चालल्याने आपला देश अजूनही विकसित देशांच्या यादीपासून दूरच राहिला आहे. या स्थितीत देशाला पुढे नेण्यासाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. राजकीय दूरदृष्टी असलेले व विविध समस्यांचे निराकरण करून देशाला एक वेगळी दिशा प्राप्त करून देणारे सरकार हवे आहे.
यावेळच्या सार्वत्रिक निवडणुकीत ७१ कोटी पात्र मतदारांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे मतदानासाठी एकूण ८.३ लाख मतदानकेंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. १४ व्या लोकसभेची अंतिम मुदत १ जून २००९ रोजी संपते, त्यामुळे २ जून २००९ पर्यंत १५ वी लोकसभा प्रस्थापित होणे गरजेचे आहे. यंदा पहिल्यांदाच छायाचित्रांकित मतदारयाद्यांचा वापर केला जाणार आहे. या निवडणुकीत ६ प्रमुख राष्ट्रीय पक्ष, ३६ प्रादेशिक पक्ष, १७३ नोंदणीकृत(अमान्यप्राप्त) व अनेक अपक्ष रिंगणात आहेत.कॉंग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी व भाजपकृत राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्यात सत्तास्थापनेसाठी चुरस आहे. डाव्यांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडीही स्थापन करण्यात आली आहे.

राहुल, पवार, स्वराज व पासवान प्रमुख उमेदवार

१४१ मतदारसंघांत आज मतदान
दुसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा शांत झाल्या असून कॉंग्रेसचे युवराज व राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान या दिग्गज नेत्यांच्या भाग्याचा निर्णय या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर मशीनबंद होणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशात २६५ जागांच्या निवडणुका पूर्ण झालेल्या असतील. म्हणजे ५४५ सदस्य संख्या असलेल्या सभागृहातील बहुमतासाठी लागणाऱ्या जादूई आकड्यासाठी सात जागांची निवडणुकीत झालेली नसेल. अँग्लो-इंडियन समुदायातून दोन जणांची नामनियुक्ती करण्यात येत असल्यामुळे लोकसभेच्या ५४३ जागांसाठीच ही पाच टप्प्यात निवडणूक होत आहे.
राहुल गांधी यांनी गांधी घराण्याचा परंपरागत मतदार संघ असलेल्या उत्तर प्रदेशच्या अमेठीमधून पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आपला बारामती मतदारसंघ मुलगी सुप्रिया सुळे हिच्यासाठी सोडून स्वत: माढा मतदार संघाची निवड केली आहे. सुषमा स्वराज मध्य प्रदेशातील विदिशामधून तर रामविलास पासवान बिहारच्या हाजीपूर मतदार संघातून उभे आहेत.
तसेच केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री कमल नाथ हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून आपले भाग्य अजमावीत आहेत. याशिवाय अखिलेश प्रसाद सिंग (पूर्व चम्पारण, बिहार), रघुवंश प्रसाद सिंग (वैशाली, बिहार) आणि रघुनाथ झा (वाल्मिकीनगर, बिहार) हे नावाजलेले उमेदवारही दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत एकूण २,०४१ उमेदवार निवडणूक लढवत असून यात १२१ महिला उमेदवारांचा समावेश आहे. राज्यांचा विचार करता दुसऱ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २०, आसाममधील ११, बिहारमधील १३, गोव्यामधील २, जम्मू-काश्मीरमधील १, कर्नाटकातील १७, मध्य प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील २५, मणिपूरमधील १, ओरिसातील ११, त्रिपुरातील २, उत्तर प्रदेशातील १७ आणि झारखंडमधील ८ लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.

भाजप कार्यकर्त्यांना आगशीत मारहाण

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) : लोकसभेच्या मतदानाला काही तास शिल्लक असताना दांडीवाडो आगशी येथे भारतीय जनता पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना स्थानिक आमदार आलेक्स सिल्वेरा यांचे बंधू बॅनी सिल्वेरा व त्याच्या साथीदाराने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची तक्रार आगशी पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली असून संशयितांना त्वरित अटक करण्याची मागणी आगशी भाजप मंडळाने केली आहे. या घटनेची माहिती मिळताच उत्तर गोव्याचे उमेदवार तथा पक्षाध्यक्ष श्रीपाद नाईक व सरचिटणीस गोविंद पर्वतकर घटनास्थळी दाखल झाले.
भाजपचे कार्यकर्ते मिनिन आफान्सो व मारियन मिनेझीस हे मतदारांना कार्डे वाटप करीत होते. यावेळी कॉंग्रेस आमदाराचे बंधू बॅनी सिल्वेरा व रॉनस्टन रॉड्रिगीस त्याठिकाणी आले व त्यांनी शिवीगाळ करून भाजप कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. आमदार बंधूच्या या दादागिरीमुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आगशी पोलिस स्थानकावर जाऊन संशयितांना त्वरित अटक करण्याची मागणी केली. त्यांच्या डोळ्यांना जखमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉंग्रेस उमेदवारांचा पराभव समोर दिसायला लागल्याने आणि ख्रिश्चन समाजातून भाजपला भरघोस पाठिंबा मिळत असल्याने सैरभैर झालेले कॉंग्रेसचे कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करीत असल्याची टीका यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी केली. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

'गुज'ची निवडणूक ३० एप्रिल रोजी

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) : गोवा श्रमिक पत्रकार संघटनेची ("गुज') निवडणूक येत्या ३० एप्रिल रोजी होणार असून अध्यक्षपदासाठी 'द हिंदू' चे प्रतिनिधी प्रकाश कामत व "तरुण भारत'चे मुख्य प्रतिनिधी सागर जावडेकर यांनी अर्ज सादर केले आहेत. सदर निवडणुकीसाठी सकाळी ८ ते १२ यादरम्यान मतदान होणार आहे.
कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदासाठी प्रीतेश देसाई, सुदेश आर्लेकर, विठ्ठलदास हेगडे, सागर जावडेकर, नंदेश कांबळी, सोयरू कोमरपंत, सोमनाथ मैत्री, सदगुरू पाटील, लीना पेडणेकर, सुहासिनी प्रभुगावकर, औदुंबर शिंदे, सुरेश वडावडेकर, प्रशांत वेरेकर, आणि संजू वेरेकर यांनी अर्ज सादर भरले आहेत. सर्वांचे अर्ज ग्राह्य ठरले असून २४ एप्रिल रोजी दुपारी १२ पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ही माहिती निर्वाचन अधिकारी फ्लावियन डायस यांनी दिली.

पोर्तुगीज एप्रिलक्रांतीचा वर्धापनदिन उद्यापासून, स्वातंत्र्यसैनिक चवताळले

पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) : पोर्तुगीजांना गोव्यातून पिटाळून लावल्याच्या घटनेला ३७ वर्षे संपली तरी पोर्तुगीज संस्कृतीचा उदोउदो करण्याचा करंटेपणा अजूनही येथे सुरूच आहे. त्यांच्या जोखडातून गोव्याला मुक्ती मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला व सालाझारशाहीचे फटके सहन केले. या पार्श्वभूमीवर,गोवा विद्यापीठातील पोर्तुगीज भाषा विभाग व "इन्स्टीटुटो कामोइस' यांच्या संयुक्त विद्यमाने पस्तीसाव्या पोर्तुगीज एप्रिलक्रांतीचा वर्धापनदिन महोत्सव साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यातील स्वातंत्रसैनिक अक्षरशः चवताळले आहेत.
२४ ते २६ एप्रिल असे तीन दिवस हा महोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात माहितीपट, चित्रपट व व्याख्यानाचा समावेश आहे. त्यामुळे स्वातंत्रसैनिकांनी या महोत्सवाला तीव्र हरकत घेतली आहे. या महोत्सवाचे गोव्यासाठी कोणतेही महत्त्व नसताना पोर्तुगीजांचे गोडवे गाणारा हा महोत्सव विद्यापीठाच्या सहकार्याने साजरा करण्यामागील प्रयोजन काय, असा खडा सवाल स्वातंत्र्यसैनिकांनी केला आहे.याबाबत विद्यापीठाला खडसावून जाब विचारण्याचा निर्धार ज्येष्ठ स्वातंत्रसैनिक नागेश करमली यांनी केला आहे.
गोवा मुक्तीदिनाच्या कार्यक्रमाला हजर राहणे उचित न समजणारे तथाकथित पोर्तुगिजधार्जीणे लोक अशा महोत्सवात मात्र उजळ माथ्याने मिरवतात.पोर्तुगिजांनी गोमंतकीयांवर कसे भयानक अत्याचार केले व येथील लोकांचा कसा छळ केला याची जाणीव केवळ स्वातंत्रसैनिकांना व गोव्याचा मुक्तीलढा इतिहास माहीत असणाऱ्यांना कळेल.गोव्यात राहून अजूनही पोर्तुगिजांचे समर्थन करणारी पिढी इथे आहे व या पिढीला सरकारकडून सहकार्य मिळणे म्हणजे स्वातंत्रसैनिकांच्या त्यागावर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचेही श्री.करमली म्हणाले. मुळात एप्रिल क्रांतीमुळे पोर्तुगालात हुकूमशाहीचा अस्त होऊन लोकशाही प्रस्थापित झाली. सालाझारशाहीचा अस्त याच क्रांतीमुळे झाला.
पोर्तुगालमध्ये झालेल्या या क्रांतीचा वर्धापनदिन गोव्यात साजरा का म्हणून करावा व या महोत्सव साजरा करणाच्या कार्यक्रमांत गोवा विद्यापीठाने आपले सहकार्य का म्हणून द्यावे,असा सवाल यावेळी श्री.करमली यांनी केला.गोवा विद्यापीठाकडून आपले राष्ट्रीयदिन किती प्रमाणात साजरे केले जातात, याचा हिशेब द्यावा,असाही टोला त्यांनी यावेळी हाणला.राज्यातील पोर्तुगिजधार्जीण्या संस्थांकडून हे कार्यक्रम साजरे करण्यास कोणतीही हरकत घेण्याचे कारण नाही परंतु सरकारने त्यात सहभागी व्हावे हे अत्यंत आक्षेपार्ह असून हा स्वातंत्रसैनिकांचा व पर्यायाने स्वाभिमानी गोमंतकीयांचा अपमान आहे,असेही श्री.करमली म्हणाले.
देशात ब्रिटिश राणीचा वाढदिवस साजरा केला जातो का, फ्रेंच क्रांतीचे गोडवे भारतात गायले जातात का,असे एकामागोमाग एक सवाल करून श्री.करमली यांनी मग गोव्यातच पोर्तुगिजांचा उदोउदो का केला जातो,असा बिनतोड सवाल विचारला.ही क्रांती लिस्बन येथे २५ एप्रिल १९७४ साली झाली होती. यासंदर्भात काही पत्रकारांनी विद्यापीठ सूत्रांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी यात पोर्तुगीज उदात्तीकरणाचा भाग नसून पोर्तुगिजभाषा विभागाचा हा वार्षिक कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले.

Wednesday, 22 April 2009

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवू भाजपचा व्यापक आराखडा घोषित

बंगळूर, दि. २१ : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत पायाभूत सुविधांसंबंधीचे पक्षाचे व्यापक धोरण जाहीर केले. एक शक्तिशाली आणि प्रगत देश बनविण्याचे उद्दिष्ट ठेवून भाजपने हा आराखडा जाहीर केला आहे. २१ वे शतक हे भारताचे शतक ठरावे यासाठी जागतिक दर्जाच्या भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा पुरविण्याचा उद्देश यामागे आहे, असे यावेळी अडवाणी यांनी जाहीर केले.
वाजपेयी यांच्या राजवटीत राष्ट्रीय महामार्ग योजना व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यासारख्या भव्यदिव्य योजना भाजपने मार्गी लावून या देशाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले होते. अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता हा नवा आराखडा जाहीर करण्यात येत असल्याचे अडवाणी यांनी सांगितले. देशाच्या पहिल्या ५० वर्षात दरवर्षी ११ किलोमीटर या सरासरीने महामार्गाचे काम चालले होते. १९९८ ते २००४ या भाजपप्रणीत रालोआ सरकारच्या राजवटीत हा दर ११ किलोमीटर प्रतिदिन असा झाला. सध्या संपुआच्या कारकिर्दीत दिवसाला ५ किलोमीटर अशी घसरण झाली आहे. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यास दरदिवशी २० किलोमीटर असे महामार्गाचे काम सुरू ठेवू, अशी ग्वाही या नव्या आराखड्यात देण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे कॉंग्रेसचे राज्य असूनही पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. सुशासन, विकास आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर भाजपप्रणीत रालोआ सरकार सत्तेवर येईल, असे आश्वासन अडवाणी यांनी दिले. पायाभूत सुविधांसाठी ८० टक्के सार्वजनिक गुंतवणूक हवी, असे भाजपचे मत आहे. देशाच्या विकासात खाजगी क्षेत्राच्या सहभागाचीही गरज आहे, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या समन्वयातून देशात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याची योजना भाजपजवळ आहे, असे अडवाणी यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक हाताला काम, प्रत्येक शेतीला पाणी तसेच पिण्याचे पाणी त्याचप्रमाणे वीजपुरवठा करताना प्रत्येक घर व उद्योग यांना २४ तास पुरवठा केला जाईल, यासाठी भाजपने यासंबंधीचा आराखडाच आज जाहीर केला.१०० दिवसांत ही योजना मार्गी लावू अशी घोषणा करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक शहर व गावात पक्के रस्ते बांधण्याची योजना आहे. २०१४ पर्यंत प्रधानमंत्री सडक योजना पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे, बंदरे, जहाजबांधणी,नागरी विमानवाहतूक,दूरदळणवळण, माहिती तंत्रज्ञान,ग्रामीण व कृषी पायाभूत सुविधा आदींबाबत तपशीलवार आराखडा भाजपने तयार केला असून रालोआ सरकार सत्तेवर आल्यास त्याची अंमलबजावणी युद्धस्तरावर केली जाणार आहे, अशी ग्वाही अडवाणी यांनी यावेळी दिली.

गोव्याच्या दोन्ही जागा भाजपलाच मिळणार

पर्रीकर यांना ठाम विश्वास
पणजी, दि.२१ (प्रतिनिधी) : गोवा पूर्णतः भाजपमय झाला असून यंदा लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकणार असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. उत्तरेत श्रीपाद नाईक प्रचंड बहुमताने विजयी होतील ,तर दक्षिणेत ऍड.नरेंद्र सावईकर हेही चांगल्या फरकाने बाजी मारतील,असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. "वोटबॅंके' च्या नावाखाली आतापर्यंत राज्यातील अल्पसंख्याकांना गृहीत धरून त्यांची कॉंग्रेसने फसवणूक केली. तथापि, यावेळी हे मतदार कॉंग्रेसला चांगलाच धडा शिकवण्याच्या मूडमध्ये असल्याचे प्रचारकाळात दिसून आले. भाजपसाठी ही सर्वात मोठी व निर्णायक बाजू ठरेल, असेही पर्रीकरांनी नमूद केले.
आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप सरचिटणीस गोविंद पर्वतकर हजर होते.केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेच्या नावाखाली बोलबोला केला जातो खरा; परंतु या निवडणुकीतही पैशांचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर त्यांना रोखता आला नाही, अशी टीका पर्रीकर यांनी केली.
आपल्या स्वार्थासाठी भाजपशी कधी ना कधी जवळीक साधलेले कॉंग्रेस नेते आता मतदारांमध्ये भाजपबाबत भीतीचे वातावरण पसरवत आहेत. कॉंग्रेस पक्षात एकमेव निष्ठावंत म्हणून राहिलेले जीतेंद्र देशप्रभू यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास लावून त्यांनी बाटवले, असा टोला त्यांनी हाणला. स्विस बॅंकेतील २५ हजार कोटी रुपये परत देशात आणण्याबाबत कॉंग्रेसचे राष्ट्रीय नेते गप्प का,असा सवालही पर्रीकर यांनी केला."खावे त्याला खवखवे'या उक्तीप्रमाणे कॉंग्रेस नेत्यांची स्थिती झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले.
भाजपने प्रचारकाळात महागाई,सुरक्षा व बिघडत चाललेली आर्थिक स्थिती हे विषय मतदारांपर्यंत नेले.दरवाढ हा विषय प्रत्येकाला लागू पडत असल्याने सामान्य लोकांचे या सरकारने कसे कंबरडे मोडले याची प्रचिती लोकांना आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या काळात अनेक अत्यावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यात साखर,तूरडाळ,खाद्यतेल आदींचा समावेश आहे. सुरक्षेच्या बाबतीत देशाची अवस्था अत्यंत बिकट आहे.मतदान केंद्रांवर नक्षलवाद्यांकडून दिवसाढवळ्या हल्ले होतात याचा अर्थ काय,असा सवालही पर्रीकर यांनी केला.
सार्दिन यांना घरी बसवा
आपण जनतेला भेटणार नाही. जनतेची कामे असतील तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्याकडे यावे,असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या सार्दिन यांच्यावर येथील लोक संतापले आहेत. खासदार या नात्याने लोकांकडे जाणार नाहीत तर आता प्रचारासाठी ते का फिरतात? आपल्या निवडणूक कार्यालयात बसून त्यांनी प्रचार करावा,असे खुद्द त्यांचेच सहकारी उघडपणे बोलतात.सार्दिन यांची कदाचित खासदारकीमुळे दमछाक झाली आहे व अशावेळी त्यांना आता मतदारांनी आराम देणेच योग्य असल्याचे पर्रीकर म्हणाले.ऍड.नरेंद्र सावईकर यांनी दक्षिण गोव्यातील बहुसंख्य मतदारांशी संपर्क साधला आहे व त्यांना भरीव प्रतिसाद मिळाला आहे.या मतदारसंघात ९० टक्के कार्डांचे वाटपही झाले असून यावेळी भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा चंगच या लोकांनी बांधल्याचे ते म्हणाले.
श्रीपाद नाईक रेकॉर्ड मोडणार
उत्तर गोव्यात खासदार श्रीपाद नाईक यांची हॅटट्रिक निश्चित आहे.गतनिवडणुकीत त्यांना मिळालेल्या मतसंख्येत वाढ होईल. ही जागा भाजपलाच मिळणार आहे.भाजप केंद्रात सत्तेवर आल्यास वचननाम्याची अंमलबजावणी करेल,असे त्यांनी सांगितले.

सार्दिन, देशप्रभूंचा विजय निश्चित : दिगंबर कामत

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यात कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन व उत्तर गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार जीतेंद्र देशप्रभू यांचा विजय निश्चित असल्याचा दावा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केला आहे. सार्दिन यांना पन्नास हजार, तर देशप्रभू यांना पंचवीस हजारांचे मताधिक्क्य मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज पणजीत झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर, खासदार तथा दक्षिण गोव्याचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन, उत्तरेतील राष्ट्रवादीचे उमेदवार जीतेंद्र देशप्रभू, महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा आदी हजर होते. प्रचारकाळात दक्षिण गोव्यातील कानाकोपऱ्यात फिरलो असता सर्वत्र कॉंग्रेसचाच नारा गुंजत आहे. लोकांना पुन्हा डॉ.मनमोहनसिंग हेच पंतप्रधान हवे आहेत. दक्षिण गोव्यात विरोधकांनी कॉंग्रेसमधील अंतर्गत मतभेदांचा कितीही सवतासुभा उभा केला तरी ही जागा कॉंग्रेसलाच मिळेल, असा विश्वास कामत यांनी व्यक्त केला.या निवडणुकीच्या निमित्ताने विविध ग्रामीण भागांत प्रत्यक्ष भेट देण्याची संधी मिळाली व यानिमित्ताने या लोकांच्या समस्या जाणून घेतल्याचेही ते म्हणाले. सांगे तालुक्यातील आमडईवासीयांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता, त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या जाणून घेतली व त्यांना मतदानात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
दक्षिण गोव्यात प्रचारात आपल्याबरोबर कोण होते किंवा कोण नव्हते याचा आपण फारसा विचार करत नाही. सार्दिन यांचा विजय हेच आपले उद्दिष्ट असून ते साध्य होणार,असा दावाही त्यांनी केला.
गेल्या वीस महिन्यात राज्य सरकारने केलेल्या कार्याचा आलेख या प्रचारावेळी लोकांसमोर ठेवला. उत्तरेत देशप्रभूंचाच विजय
उत्तर गोव्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते व कार्यकर्त्यांनी पूर्णपणे देशप्रभू यांच्यासाठी झोकून दिल्याचे मुख्यमंत्री कामत म्हणाले.गेल्यावेळी सत्तरी,डिचोली,पेडणे,तिसवाडी आदी भागांत भाजपला मताधिक्य मिळाले होते या सर्व तालुक्यांवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला ताबा मिळवल्याचे ते म्हणाले.
माझे कार्य लोकांसमोर
खासदार या नात्याने आपण केलेले कार्य लोकांसमोर आहे व लोक आपल्या कार्याबाबत खूष आहेत,असा दावा सार्दिन यांनी केला.या भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडूनही चांगला पाठिंबा मिळत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.
हे तर दोन शेजाऱ्यांचे भांडण
आलेमाव बंधू व मिकी यांच्यातील भांडण हे दोन शेजाऱ्यातील भांडणासारखे आहे, त्यामुळे आलेमाव बंधूंवर शिस्तभंग कारवाई करण्याची आवश्यकता नाही,असे मत प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले. चर्चिल यांनी काहीही वक्तव्य केले तरी ते कॉंग्रेससाठीच काम करीत असून राज्यात सर्वत्र कॉंग्रेसचा "जय हो कॉंग्रेस'नारा सुरू असल्याचे ते म्हणाले.

सार्दिनला अपात्र ठरवा 'युगोडेपा'ची मागणी

सोनियांना दिलेली कृष्णमूर्ती वादग्रस्त ठरण्याची शक्यता
मडगाव, दि. २१ (प्रतिनिधी) : गेल्या आठवड्यात फातोर्डा मैदानावर झालेल्या प्रचारसभेदरम्यान कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींना दिलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या कास्यमूर्तीबाबत "युनायटेड गोवन डेमोक्रॅटिक पार्टीने ("युगोडेपा'ने) निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून ही मूर्ती कॉंग्रेसच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मूर्तीबरोबरच कॉंग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांनी कोलवा येथील अवर लेडी ऑफ मेरसेस चर्चला दिलेले झेरॉक्स यंत्र व लॅपटॉप हे तेथील कॅथॉलिक मतदारांना प्रलोभित करणारे असल्यानेे त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवा अशी मागणी तक्रारीद्वारे केली आहे .
"युगोडेपा'चे सरचिटणीस ऍड. राधाराव ग्रासियश यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, त्या मूर्तीची किंमत सुमारे २० लाख रु.असल्याने तो खर्च सार्दिन यांच्या निवडणूक खर्चांत अंतर्भूत करण्याची विनंती आपण या तक्रारींत केली आहे. मुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष यांनी या प्रचारसभेत ही मूर्ती सोनिया गांधींना देऊन एक प्रकारे हिंदू धर्मीय मतदारांच्या भावनांना हात घालून त्यांना मतांसाठी आवाहन केले आहे. त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये उमेदवार सार्दिन उभे होते हेही त्यांनी तक्रारीबरोबर छायाचित्र जोडून निदर्शनास आणून दिले आहे. अन्यथा राजकीय सभेत भगवान कृष्णाला आणण्याचा दुसरा कोणता हेतू असू शकतो, असा सवाल केला आहे.
तसेच सादिर्र्न यांनी कोलवा येथील अवर लेडी ऑफ मेरसीस चर्चला दिलेला लॅपटॉप व झेरॉक्स यंत्र दीड लाख रु. किंमतीचे असल्याचे तेथील फादर दिएगो फर्नांडिस यांनी १९ रोजींच्या प्रार्थनेवेळी जाहीर केले आहे.
निवडणूकीच्या जाहीरनाम्याप्रमाणे एका उमेदवाराला १५ लाख रु. पर्यंत खर्च करण्याची मुभा आहे व त्यावरून यापूर्वीच सार्दिन यांनी खर्चाची मर्यादा ओलांडल्याने तसेच त्यांनी मतांसाठी धार्मिक भावनांना साद घालून लोकप्रतिनिधीत्व कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे त्यांना निवडणूक लढवण्यापासून अपात्र ठरवावे आणि कॉंग्रेसची मान्यता काढून घ्यावी अशी मागणी युगोडेपाने केली आहे.

Tuesday, 21 April 2009

स्विस बॅंकांतील पैशांबाबत कॉंग्रेस गप्प का?

भाजप कृतिदलाचे सदस्य एस. गुरुमूर्ती यांचा सवाल

नवी दिल्ली, दि. २० - भारतीयांचा अमाप पैसा विदेशातील विविध बॅंकांत असून या मुद्यावर कॉंग्रेसने सध्या मौन बाळगले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या कित्येक वर्षांपासून सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसच्या नेत्यांचा बहुतेक पैसा या विदेशी बॅंकांत असल्याने त्यांच्याकडून या विषयी सकारात्मक पाऊल उचलले जाणे शक्यच नाही, शिवाय बोफोर्स प्रकरणातील सूत्रधार ओटाव्हियो क्वात्रोची यांची गोठवलेली खाती पुन्हा कार्यान्वित करण्यामागे कॉंग्रेस अध्यक्षांचा हात आहे, अशी सडेतोड प्रतिक्रिया एस. गुरुमूर्ती यांनी व्यक्त केली आहे.
भारतीयांचा विदेशातील पैसा परत आणण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी एका खास कृतिदलाची स्थापना केली आहे. यात चार्टर्ड अकाउंटंट तथा स्वदेशी जागरण मंचाचे सदस्य एस. गुरुमूर्ती यांच्यासह गुप्तचर खात्याचे अजित कुमार दोवल, इंडियन इन्स्टिट्यूट बंगळुरूचे डॉ. आर. वैद्यनाथन, भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार ऍड. महेश जेठमलानी यांचा समावेश आहे. या कृतिदलाने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे.
भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांतील नागरिकांचे काळे धन या बॅंकांमध्ये जमा करण्यात आले आहे. तेथील बॅंकांमध्ये खाते असलेल्यांची माहिती अगदी गुप्त ठेवण्यात येत असल्याने व तेथील कायदेही (विशेष करून स्वित्झर्लंडमध्ये) अनुकूल असल्याने अमाप संपत्तीचा अंदाज घेणे कठीण बनते, अशी माहिती त्यांनी दिली आहे. तेथील १९८६ पासून या विषयावर संशोधन करणाऱ्या एस. गुरुमूर्ती यांना गांधी घराण्यातील सदस्यांची हेरगिरी करण्याच्या संशयाखाली अटक करण्यात आली होती. तेथील कायद्यानुसार खातेधारकांची माहिती देण्यावर निर्बंध आहेत, त्यामुळे कोणीही आपली बेहिशेबी संपत्ती येथे जमा करू शकतो.
परंतु, आर्थिक मंदीनंतर पश्चिमेतील देशांना या गुप्त खात्यांमुळे चटके बसू लागले आणि त्यांनी यावर निर्बंध लादण्यास सुरुवात केली. तेथील अर्थव्यवस्था कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी ही पावले उचलली आहेत. परंतु, भारताला याच्या दोन दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. येथील अर्थव्यवस्थेला कमजोर करण्याबरोबरच संपत्ती लपवण्याच्या उद्देशाने हा पैसा विदेशात गुंतवला जात आहे, यामुळेच भाजपने सध्या हा मुद्दा उचलून धरला आहे. याशिवाय जर्मनीमधील नुकत्याच घडलेल्या घटनेनेही या विषयाला महत्त्व प्राप्त करून दिले आहे. जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी लिशेनस्टेन येथील एलजीटी नामक बॅंकमधील अधिकाऱ्यांना लाच देऊन तेथील सुमारे १५०० खातेधारकांची नावे असलेली सीडी मिळवली. यात ५००-६०० जर्मन नागरिक असल्याचे त्यांना आढळून आले. जर्मनीने या अधिकाऱ्यांवर कारवाई तर केलीच पण इतर देशांनाही ही सीडी मोफत देण्याची घोषणा करून टाकली. बहुतेक देशांनी या सीडीची मागणी केली पण भारताने मात्र गप्प राहणे पसंत केले.
लिशेनस्टेन येथून स्वित्झर्लंडमधील बॅंकांत पैसे जमा होत असल्याने जर्मनीने हा मुद्दा जी-२० देशांच्या परिषदेत उचलून धरला व त्या देशाचे अनुदान रोखण्याची मागणी केली.
यावेळी भारताने या मुद्यावर आपले मत मांडावे अशी मागणी लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याशी केली होती. परंतु, यावेळीही पंतप्रधान गप्प राहिल्याने कॉंग्रेसच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करताना अडवाणी यांनी या विषयाला निवडणुकीचा मुद्दा बनवला.
एका अभ्यासानुसार २००१ सालानंतर पैसा गुप्तपणे गुंतवण्यात येत असल्याने सुरक्षेवर परिणाम होत असल्याची भीती अमेरिकेला सतावू लागली. हा पैसा दहशतवादासाठी वापरला जाण्याची शक्यता नाकारणे धोकादायक मानले गेले. या अभ्यासानुसार या ठेवींची रक्कम ११.५ ट्रिलीयन डॉलर्स (एकापुढे १८ शून्ये) असून यात दरवर्षी १ ट्रिलीयन डॉलर्सची भर पडत आहे. यातील ५०० अब्ज डॉलर्स विकसनशील देशांतून चोरट्या मार्गाने या बॅंकांत जमा केले जातात. कॉंग्रेसने सध्या एकूण रक्कम किती असेल या मुद्यावरून राजकारण करण्यास सुरुवात केली असली तरी येथील पैसा तेथे जात आहे, हा मुद्दा निर्विवाद आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची आवश्यकता असल्याने भाजपने व्यक्त केली आहे.
कॉंग्रेसने या मुद्यावर गप्प राहण्यामागची कारणे एस. गुरुमूर्ती यांनी स्पष्ट केली आहेत. गेल्या ५० वर्षांत कॉंग्रेस नेत्यांजवळ अमाप संपत्ती जमा झालेली असणार. सोनिया गांधी यांनी याविषयी मौन धरणे पसंत केले आहे कारण बोफोर्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार क्वात्रोची व कॉंग्रेस अध्यक्ष यांच्यात दाट मैत्री आहे. क्वात्रोचीला याच बॅंकांच्या माध्यमातून लाच दिली गेली होती, याचेही पुरावे आहेत. केंद्रीय गुप्तचर खात्याने याचा तपास लावून हे खाते गोठवले होते. क्वात्रोचीला आधी देश सोडून जाण्याची संधी देण्यात आली आणि नंतर हे खाते पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. यामागे कॉंग्रेस अध्यक्षांची हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असल्याने त्यांच्याकडून या विषयी गंभीर पाऊल उचलले जाण्याची शक्यता कमीच आहे, असेही एस. गुरुमूर्ती यांनी म्हटले आहे. याशिवाय आजपर्यंत या प्रकरणात कॉंग्रेसच्या निकटवर्तीयांनाच अटक करण्यात आली असून गांधी घराण्याशी संबंधित व्यक्तींची नावेच बोफोर्सशी जोडली गेली आहेत.
कृतिदलातर्फे याविषयी जनजागृती करण्यात येणार असून गुजरातमध्ये यासंबंधी सर्वेक्षण करण्यात आले होते. यातील २५ टक्के रक्कम जरी परत आणण्यात यश आले तर देशाची आर्थिक स्थिती पूर्णपणे बदलून जाईल. हा भारताचा पैसा असल्याने त्याचा वापर विकासासाठी करण्याची ग्वाही भाजपने दिली आहे. याचा उपयोग विमानतळ आदी कामांसाठी न करता शाळा, ग्रामीण भागातील रस्ते, गरिबी हटवण्यासारख्या सामाजिक विकासकामांसाठी करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे.

... ते पैसा परत कसे आणतील?
बोफोर्स घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार ओटाव्हियो क्वात्रोची यांचा विदेशी बॅंकांतील काळा पैसा जप्त करण्यात आला होता. परंतु, तत्कालीन कॉंग्रेस सरकारने हा पैसा परत नेण्याची सवलत दिली. यामुळे कॉंग्रेसकडून विदेशातील काळा पैसा भारतात आणला जाईलच याची शाश्वती नाही, अशी जोरदार टीका भाजपने केली आहे. विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याची ग्वाही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी केल्याने कॉंग्रेसने त्यांच्यावर निवडणुकीदरम्यान हा मुद्दा उचलल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करताना अरुण शौरी यांनी सांगितले की, अडवाणी यांनी एप्रिल २००८ मध्ये हा विषय पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यापुढे लेखी स्वरूपात मांडला होता. त्यावेळी सरकारने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. जर्मन सरकारपाशी तेथील बॅंकांत काळे धन ठेवणाऱ्या भारतीयांची नावे होती. परंतु, भारतीय अर्थमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने भारतीय राजदूताला पत्र पाठवून नावे उघड न करण्याची ताकीद दिली होती. जागतिक मंदीच्या काळात अमेरिका, इंग्लंड आदी देश आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी विदेशातील पैसा परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत तर भारताने असा प्रयत्न का करू नये,असा सवाल शौरी यांनी उपस्थित केला आहे.

...........

फोंडा अपघातात युवकाचा मृत्यू

फोंडा, दि.२० (प्रतिनिधी) - येथील कदंब बसस्थानकाजवळील उतरणीवर आज सकाळी ९.१५च्या सुमारास मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात दीपेंद्र रजनिकांत तारी (१९, खाजन पाळी) या युवकाचे निधन झाले.
यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, दीपेंद्र हा फर्मागुडी येथील आय.टी. आयमध्ये शिक्षण घेत होता. आज (दि.२०) सकाळी सव्वानऊच्या सुमारास फर्मागुडी येथून आपल्या मित्रासोबत फोंड्याला येत असताना फर्मागुडी येथून कदंब बसस्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका वळणावर त्यांची मोटरसायकल घसरून अपघात झाला. यात दीपेंद्र गंभीर जखमी झाला. तर त्याचा मित्र सिद्धार्थ शिरोडकर (गावठण खांडेपार) हा सुखरूप बचावला. जखमी दीपेंद्र याचे उपचार सुरू असताना निधन झाले. दीपेंद्रच्या अपघाती निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर जबरदस्त आघात झाला आहे. त्याच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
दीपेंद्र हा अभ्यासात हुशार होता. अभ्यासाबरोबर गावातील सांस्कृतिक क्षेत्रातही अभिनयाची त्याला आवड होती. त्याच्या अपघाती निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. फोंड्याचे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर तपास करीत आहेत. सिद्धार्थ शिरोडकर याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हिंमत असेल तर राजीनामे द्याच

चर्चिल बंधूंना मिकी यांचे आव्हान

बाणावलीत रंगला राजकीय नाट्याचा दुसरा अंक

मडगाव, दि. २० (प्रतिनिधी) - हिंमत असेल तर चर्चिल व ज्योकिम या आलेमाव बंधूंनी आमदारकीचे राजीनामे द्यावेत. त्यांच्याशिवायही आम्ही सरकार चालवू शकतो, असे जोरदार आव्हान देऊन पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज बाणावली येथील जाहीर सभेत चर्चिल बंधू विरुद्ध कॉंग्रेस यांच्यातील वादात आणखी तेल ओतण्याचेच काम केले आहे. या कलगीतुऱ्यामुळे दक्षिण गोव्यातील कॉंग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांची अवस्था कमालीची बिकट झाली आहे.
काल मांडोप नावेली येथे आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत चर्चिल व ज्योकिम यांनी अपात्रता प्रकरणावरून आकांडतांडव केले होते. त्याला आलेमाव बंधूंचे परंपरागत प्रतिस्पर्धी पाशेको यांनी त्याच भाषेत उत्तर दिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांच्या उपस्थितीत मिकींनी हे आव्हान दिल्याने उभय नेते स्तंभित झाले.
आपल्या मंत्रिमंडळांतील व आपल्याच पक्षाच्या दोघा मंत्र्यांवर मित्रपक्षाचा मंत्री जाहीर टीका करताना ती मुकाट्याने ऐकण्याखेरीज त्यांच्याकडे पर्यायच उरला नाही. काल याच भाषेत चर्चिल व ज्योकिम यांनी मिकी व पर्यायाने गोव्यातील स्थानिक पक्षनेत्यांना जोरदार आव्हान दिले होते. तेव्हादेखील मुख्यमंत्री कामत व प्रदेशाध्यक्ष शिरोडकर यांना मौन पाळून ती टीका ऐकावी लागली होती.
बाणावली या मिकी यांच्या मतदारसंघातील गावात आयोजित या सभेला चांगली उपस्थिती होती व त्यात प्रामुख्याने मिकींचे कार्यकर्ते व समर्थक होते हे मिकींच्या वाक्यावाक्याला पडणाऱ्या टाळ्यांवरून दिसून येत होते. काल असेच वातावरण मांडोप सभेत होते. चर्चिल बंधूंनी सरकार पाडण्याबाबत दिलेले आव्हान आपण स्वीकारत असल्याचे मिकी यांनी जाहीर केले.
चर्चिल बंधूंनी उगाच वल्गना करू नयेत. भाजप सरकारही आपणच घडवले व पाडले आणि नंतर कॉंग्रेस सरकारही आपणच घडवले असा दावा करताना त्यामुळेच या लोकांना मंत्रिपदें मिळाली. आता हिंमत असेल तर सरकार पाडूनच दाखवा. सर्वांना घरी बसविण्याची वल्गना करणाऱ्या या चर्चिल बंधूंना अपात्र ठरवून घरी बसवल्यानंतरच आपण नेमको कोण आहोत हे त्यांना त्यांना कळून चुकेल, असे मिकी म्हणाले.
या सभेत मुख्यमंत्री, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष व कॉंग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचीही भाषणे झाली. कालच्या मांडोप नावेली येथील व आजच्या बाणावली सभेतील वाक्युध्दाचा अन्य मतदारसंघांतील कॉंग्रेस मतदानावर तर परिणाम होणार नाही ना या चिंतेने कॉंग्रेस नेत्यांचे चेहरे काळवंडल्याचे चित्र दिसून आले.
मांडोप नावेली सभेचे ठळक वृत्त आज सर्वच दैनिकांनी प्रसिध्द केल्यानंतर, कॉंग्रेस नेते पक्षांत आलबेल असल्याचा जो देखावा करत होते त्याचे पुरते वस्त्रहरण झाले. परिणामी सुभाष शिरोडकर व सार्दिन यांना घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन कालच्या सभेबाबत स्पष्टीकरण करावे लागले. तथापि, बुडत्याचा पाय खोलात या उक्तीनुसार ते आणखीनच अडचणीत आले.

नावेली सभेनंतर दक्षिणेत कॉंग्रेस गलितगात्र!

पणजी, दि.२० (प्रतिनिधी) - दक्षिण गोव्यात कॉंग्रेसतर्फे नावेली येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत घडलेला प्रकार कॉंग्रेससाठी हानिकारक ठरला आहे. प्रत्यक्ष मतदानाला केवळ तीन दिवस बाकी असताना पक्षातील अंतर्गत हेवेदावे व शहकाटशहाचे जाहीर प्रदर्शनच या सभेत घडल्याने नेते व कार्यकर्त्यांत तीव्र निराशा पसरली आहे. उत्तर गोव्यात भाजपचे खासदार श्रीपाद नाईक यांची हॅट्रीकच्या दिशेने वाटचाल सुरू असताना केवळ अंतर्गत राजकीय डावपेचांमुळे दक्षिण गोव्याचा बालेकिल्लाही हातातून निसटण्याची परिस्थिती कॉंग्रेसवर ओढवल्याने कॉंग्रेस गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे सारा पक्षच गलितगात्र बनला आहे.
केंद्रातील कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारच्या घटकांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची साथ सोडून स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रीय पातळीवर कॉंग्रेस तोंडघशी पडली आहे. कॉंग्रेसकडून डॉ.मनमोहनसिंग यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आवाहन मतदारांना केले जात असले तरी संपुआ च्या विविध नेत्यांचेही या पदावर लक्ष आहे व त्यांनी जाहीरपणे आपली इच्छा व्यक्त केली आहे. खुद्द संपुआचे घटक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ.मनमोहनसिंग हे फक्त कॉंग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत संपुआचे नव्हेत,असे म्हणून कॉंग्रेसची हवाच काढून घेतली आहे. भाजपप्रणीत रालोआ सध्याच्या परिस्थितीत प्रचारात आघाडीवर असून लोकसभेत भाजप हाच सर्वांत मोठा पक्ष बनेल,असा विविध राजकीय समीक्षकांचा अंदाज आहे. गोव्यातही नेमकी तीच परिस्थिती आहे. राज्यातील दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस आघाडी सरकारातील अंतर्गत लढाई व सरकारचे विविध वादग्रस्त निर्णय यामुळे कॉंग्रेसचे पारंपरिक मतदारही विटले असून त्यांनी नव्या पर्यायाचा शोध चालवल्याची चाहूल स्पष्टपणे दिसत आहे.
दरम्यान, केंद्रात सत्तांतर घडल्यास गोव्यातही सत्तापालट होईल याची चाहूल लागल्याने येथील काही सत्ताधारी नेत्यांनी आपले डावपेच सुरू केले आहेत.उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने देशप्रभू यांच्यासाठी सरकारला पाठिंबा देणारे सर्व घटक एकत्र आले आहेत व त्यांनी कॉंग्रेसच्या संघटनात्मक रचनेलाच सुरुंग लावण्याचे प्रयत्न चालवले आहेत. विश्वजित राणे यांनी स्वबळावर जितेंद्र देशप्रभू यांना विजयी करण्याचा चंग बांधला असून संपूर्ण उत्तर गोव्यावर आपला प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी अत्यंत शिस्तबद्धतेने आखणी सुरू केली आहे. दक्षिण गोव्याची जबाबदारी कॉंग्रेसवर आहे व मुख्यमंत्री दिगंबर कामत हे दक्षिणेतील असल्याने ही जागा मिळवणे ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठा बनली आहे. दरम्यान, सार्दिन यांच्यासाठी दक्षिणेतील कॉंग्रेस नेतेच सक्रियपणे प्रचारात उतरले नाहीत,अशीच परिस्थिती पसरली आहे. ही जागा गमावल्यास त्याचा ठपका मुख्यमंत्री कामत यांच्यावर येणार असल्याने सरकारातील काही नाराज घटकांनी मुख्यमंत्र्यांना वेठीस धरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचीही चर्चा आहे. विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारातील एक महत्त्वाचा घटक सध्या यात सक्रिय बनला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात नेतृत्व बदलाचा विचारही या गोटात सुरू आहे.दक्षिण गोव्यातील अल्पसंख्याक ख्रिस्ती मतदार ही आपली मक्तेदारी असल्याच्या आविर्भावात असलेल्या कॉंग्रेसला हा समाजच यंदा चांगलाच दणका देण्याची शक्यता आहे. या मतदारांना युगोडेपाचे उमेदवार माथानी साल्ढाणा यांचा चांगला पर्याय मिळाला आहे तसेच पहिल्यांदाच या समाजातील लोक उघडपणे भाजपचे गुणगान गात असल्याचेही दिसत असल्याने यंदा दक्षिणेचा निकाल क्रांतिकारक ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.
चर्च धर्मगुरूंना साकडे
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आर्चबिशपने विविध चर्चसंस्थांत प्रार्थनासभांचे आयोजन करण्याचे आवाहन केले आहे.या प्रार्थनासंभाच्या अनुषंगाने काही कॉंग्रेस नेत्यांनी धर्मगुरूंना साकडे घालून ख्रिस्ती मतदारांना कॉंग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करण्याची विनंती केल्याची एकच चर्चा सध्या पसरली आहे. दरम्यान,राज्यातील कॉंग्रेस सरकारने घेतलेल्या काही वादग्रस्त निर्णयांच्या विरोधात उभे राहिलेल्या आंदोलनात चर्चसंस्थेने आघाडी घेतल्याने तसेच अनेक धर्मगुरूंनीही या आंदोलनात सक्रियपणे भाग घेतल्याने उघडपणे कॉंग्रेसची बाजू घेणे शक्य नसल्याचे त्यांना सुनावल्याची खबर मिळाली आहे. दरम्यान,या प्रार्थनासभांत धार्मिक पक्ष व जातीयवादी पक्षांपासून सावध राहण्याचे आवाहन करून या हाच मुद्दा मतदारांच्या मनावर बिंबवण्याचाही विचार सुरू आहे,अशीही माहिती मिळाली आहे.

आज संध्याकाळी जाहीर प्रचार संपणार

शुक्रवारी मतदानासाठी चोख बंदोबस्त

पणजी, दि.२० (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीसाठीच्या निमित्ताने सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची रणधुमाळी उद्या २१ रोजी संध्याकाळी ५ वाजता संपेल. उद्या संध्याकाळी ५ वाजल्यापासून राज्यात भा.दं.सं चे १४४ कलम लागू करण्याचे आदेश दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले असून हे कलम २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेपर्यंत लागू राहणार अशी माहिती उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी के.एस.सिंग यांनी दिली.
गोव्यात येत्या २३ रोजी लोकसभेसाठी मतदान होईल. निवडणूक आयोगाने मतदानासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्राकडे निमलष्करी दलाची मागणी करण्याबाबत पाठवलेल्या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने आता ही संपूर्ण जबाबदारी गोवा पोलिसांवर आली आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी पोलिस संरक्षणाची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यासाठी एक अधीक्षक,१२ उपअधीक्षक,१२ निरीक्षक,६० उपनिरीक्षक,४३ साहाय्यक उपनिरीक्षक,३६९ पुरुष व महिला हवालदार,१२११ शिपाई व १४८ गृहरक्षक असल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी यापूर्वीच पोलिसांना आदेश दिले होते परंतु आता ही संख्या वाढवावी लागणार असल्याने ते आदेश उद्यापर्यंत जारी केले जातील,असेही यावेळी त्यांनी सांगितले.यंदा विविध अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर खास निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली जाईल तसेच काही महत्त्वाच्या केंद्रांवर व्हिडिओ कॅमेरांची सोय करण्यात आल्याने निदान याठिकाणी पोलिसांची अतिरिक्त प्रमाणात गरज भासणार नाही,असे श्री.सिंग म्हणाले.
उत्तर गोव्यात एकूण ३७६ मतदान केंद्रे आहेत त्यातील १३२ मतदानकेंद्रे अतिसंवेदनशील असल्याचे ते म्हणाले.दोन्ही जिल्हातील प्रत्येक मतदान केंद्र संबंधित मुख्यालयाशी जोडले गेले आहे. मतदानावेळी कोणतीही अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास तसेच मतदानाबाबतची माहिती मुख्यालयाकडे ठरावीक तासांत पोहचेल,असेही ते म्हणाले. दरम्यान, मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना एक दिवस अगोदर मतदान केंद्राचा ताबा घ्यावा लागेल व त्यासाठी त्यांची राहण्याची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
उत्तर गोव्यात मतदान शांत व मुक्त वातावरणात पार पडावे यासाठी विविध अशा ६३ समाजकंटक तथा गुन्हेगारी प्रकरणांत गुंतलेल्यांना नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती अधीक्षक टोनी फर्नांडिस यांनी दिली. या सर्वांना ताकीद देण्यात येणार असून त्यांच्याकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रसंगी त्यांना ताब्यात घेण्याची तयारीही ठेवल्याचे यावेळी सांगण्यात आले. मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून लोकशाहीतील आपला हा महत्त्वाचा हक्क बजावावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
राज्यात उद्या २१ पासून संध्याकाळी ५ वाजल्यापासून ते २३ तारखेपर्यंत रात्री ९ वाजेपर्यंत १४४ कलम लागू राहणार आहे.या काळात पाच किंवा त्यापेक्षा अधिक माणसांनी जमाव करणे,मिरवणुका,मोर्चा काढणे यावर बंदी राहील.निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीने धावणारी प्रचाराची वाहने धावणार नाहीत.२३ एप्रिल रोजी सकाळी ६ ते रात्रौ ९ वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरातील हॉटेल,खानावळी,बार,चहाची दुकाने व इतर आस्थापने बंद राहतील,असेही या आदेशात म्हटले आहे.

Monday, 20 April 2009

अपात्र करूनच दाखवा - चर्चिल

नावेली सभेत कॉंग्रेस नेत्यांना घरचा अहेर

..चर्चिलचे कार्यकर्ते अनुपस्थित
..प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांची पंचाईत
..फ्रांसिस सार्दिनवर थेट टीका
..ज्योकीमकडूनही शरसंधान


मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी) : कॉंग्रेसने आज सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमांव यांच्या नावेली मतदार संघातील ब्लास्को एक्झ्युक्युटीव्ह सेंटर मांडोप येथे आयोजित दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक प्रचारसभेत चर्चिल, जोकिम आदींनी सत्ताधारी पक्षाला घरचाच अहेर दिला तर तेथील मतदारांनीच केवळ नव्हे तर पक्ष कार्यकर्त्यांनीही या सभेपासून अलिप्त राहून सासष्टीतील मतदारसंघ हे आपली खासगी मालमत्ता समजणाऱ्यांना एक प्रकारे वस्तुस्थितीची जाणीव करून दिली व त्यामुळे या सभेला उपस्थित असलेले प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांची अगदी केविलवाणी परिस्थिती झाली. अखेर त्यांनी गोव्याचे प्रश्र्न केवळ कॉंग्रेस पक्षच सोडवू शकतो हे मतदारांनी लक्षात ठेवावे असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
शिरोडकरांव्यतिरिक्त चर्चिल आलेमांव, जोकिम आलेमांव,उमेदवार फ्रांसिस सार्दिन, पर्यटक टॅक्सी संघटनेचे आलेक्स, बिशूट व इतरांची भाषणे झाली. मात्र कॉंग्रेसने नावेलीकर आपणामागे आहेत हे दाखवून देण्याच्या प्रयत्नात हात दाखून अवलक्षण करून घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
चर्चिल यांनी आपल्या भाषणात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व दिल्लीतील अन्य नेते सोडल्यास तमाम स्थानिक नेते व पक्षाचे अक्षरशः वाभाडे काढले . या लोकांना दिलेले वचन, करार यांचे काहीच सोयरसूतक नाही असे सांगताना वालंका उमेदवारी प्रकरणाचा शीण काढला. गेल्या वेळच्या वचनाप्रमाणे जर वालंकाला उमेदवारी दिली असती तर दक्षिण गोव्यात कॉंग्रेसला एकदेखील सभा घेैण्याची गरज नव्हती असे त्यांनी छातीठोकपणे सांगितले. त्यांनी आपल्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला व लोकांच्या इच्छेनुरुपच आपण वागल्याचे सांगितले. आपण अपात्रतेला भीत नाही असे सांगताना हिंमत असेल तर आपणाला अपात्र करूनच दाखवा असे आव्हान त्यांनी दिले. आपणाला घरी बसावे लागले तरी पर्वा नाही पण सर्वांना घरी बसवेन असा इशारा त्यांनी दिले. कॉंग्रेसने दोनदा आपणाला राजकारण करायला लावले आता तिसऱ्यांदा ते करायला भाग पाडू नका असा सल्लाही त्यांनी दिला. कॉंग्रेस नेस्तनाबूद करायची असेल तर उद्याच आपणाला घरा बसवा व परिणाम काय होतात ते पहा, अशी गर्भित धमकी त्यांनी दिली व पक्षाध्यक्षांसह सारेच अवाक झाले. त्यांनी आपले भूतपूर्व प्रतिस्पर्धी लुईझिन यांची ढोंगी माणूस अशी संभावना केली.
प्रचारासाठी अन्यत्र जावयाचे असल्याने सार्दिन हे अगोदर बोलावयास उभे राहिले व बोलताना त्यांनी आपण मतदारांच्या भेटीस येत नसल्याबद्दल होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना बोलण्याच्या ओघात यावेळी सुध्दा निवडून आल्यावर आपण मतदारांना भेटण्याची प्रथा घालणार नाही. कोणाचे काही काम असेल तर त्यांनी आपणास भेटायला यावे असे सांगितले. त्यावरून विवाद निर्माण झाला व नंतर चर्चिल यांनी आपल्या भाषणात लोकप्रतिनिधीला असे बोलणे शोभत नाही, लोकप्रतिनिधी हा खऱ्या अर्थाने लोकसेवक असतो असे स्पष्ट केले, कदाचित कोणत्या तरी तणावातून सार्दिन यांच्या तोंडून ते वाक्य गेलेले असू शकते तरी शिरोडकर यांनी त्यांना ते वाक्य मागे घेण्यास लावावे असे सांगितले. नंतर शिरोडकर यांनी सार्दिनकडून अशी चूक पुन्हा होणार नाही अशी ग्वाही दिली.
अपात्रता याचिकेचे शिल्पकार लुईझिन
नगरविकास मंत्री जोकिम आलेमांव यांनी पांढरे कपडे घातले म्हणून कॉंग्रेसवाला होत नाही असा टोमणा नाव न घेता लुईझिन फालेरो यांना मारला व त्यांच्यामुळेच चर्चिलवर विविध प्रसंग ओढवल्याचे सांगितले. त्याच्यावर दाखल झालेल्या अपात्रता याचिकेचे शिल्पकार तेच असल्याचे सांगून टाकले. कॉंग्रेसला जर चर्चिलचा एवढा पुळका आहे तर या याचिकेमागील मित्रपक्षावर कारवाई कां झालेली नाही असा सवाल त्यांनी केला . पक्षाच्या या वृत्तीमुळे येथील लोक दुखावलेले आहेत व ते त्याच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणत आहेत असे सांगितले. हिंमत असेल तर चर्चिलच्या स्थानाला वा खात्याला हात लावून दाखवा, त्याचक्षणी आपला राजीनामा सादर केला जाईल असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी कुंकळ्ळीचे आपले प्रतिस्पर्धी जोर्सन फर्नांडिस व मिकी यांच्यावरही टीका केली व त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच वेळ असल्याचे सांगितले.
सभेतील एकंदर रागरंग पाहून स्तंभित झालेल्या सुभाष शिरोडकर यांनी या निवडणुकीत चर्चिल व वालंका यांच्यावर अन्याय झाल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य केले व भविष्यात तिला न्याय दिला जाईल असे आश्र्वासन दिले. पण उंदराच्या रागाने घराला आग लावण्याचा आततायीपणा करू नका अशी विनंती केली. चर्चिल यांना अपात्रतेची भीती नाही असा दिलासा देण्याचा प्रयत्नही त्यांनी केला व सीआरझेडप्रकरणी संबंधितांना कायद्याने संरक्षण मिळवून दिले जाईल असे सांगितले. पर्यटक टॅक्सी वाल्यांच्या समस्यांवर १५ मे पर्यंत निर्णय घेण्याचे आश्र्वासन दिले.कॉंग्रेस हा विकास , प्रगती व बहुजन समाज यांचा पक्ष आहे तो वचनाचा पक्का व १२९० वर्षांची परंपरा असलेला पक्ष असून त्याच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की उत्तर गोवा भाजपने काबीज केला आहे दक्षिणेत कॉंग्रेसची मदार आहे ती सासष्टीवर तिला तडा देऊ नका, ती सांभाळा अशी विनवणीही त्यांनी केली. या सेंटरमधील अर्ध्याअधिक खुर्च्या रिकाम्या होत्या.


"पर्यटक टॅक्सीवाले भाजपसोबत'
कॉंग्रेस सभेतील हवाच गेली
पर्यटक टॅक्सी संघटनेचे नेते आलेक्स यांचे भाषणही कॉंग्रेससाठी आज महागच पडले. त्यांनी आपल्या सडेतोड भाषणात आपण व आपली संघटना पूर्वींपासून चर्चिलबरोबर असतानाही टॅक्सीवाल्यांच्या १४ कलमी मागण्यांतील एकही मागणी सरकारला मान्य करता आलेली नाही म्हणूनच या निवडणुकीत पर्यटक टॅक्सीवाले भाजपबरोबर गेल्याचे सांगितले व कॉंग्रेसच्या सभेतील हवाच काढून घेतली. टॅक्सीवालेच सरकारला सर्वाधिक कर भरत असूनही सरकार त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे ही परिस्थिती अशीच राहिली तर टॅक्सीवाले आपली वाहने आणून मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांच्या घरासमोर ठेवतील व स्वतः अमली द्रव्य विकायला बाहेर पडतील,असा इशारा दिला.

मडकईकरांसाठी कोणाचा बळी जाणार?

कॉंग्रेस मंत्र्यांमध्ये वाढती अस्वस्थता

पणजी, दि. १९ (प्रतिनिधी) - कुंभारजुवेचे आमदार तथा माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांना विद्यमान मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळवून देण्यासाठी लोकसभेच्या निकालानंतर अर्थात १६ मे नंतर प्रयत्न करणार असल्याच्या आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या घोषणेमुळे सध्या कॉंग्रेस गोटात एकच खळबळ उडाली आहे. मडकईकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी एका मंत्र्याला जागा खाली करावी लागेल असा विश्वजित यांच्या घोषणेचा अर्थ असल्याने मंत्रिपदावरून डच्चू कोणाला दिला जाईल हा सध्या काही मंत्र्यांच्या अस्वस्थतेचा विषय बनला आहे. त्यातच चर्चिल आलेमाव त्यांच्याविरुद्धची अपात्रता याचिका सभापतीसमोर असल्याने हे चर्चिल यांच्यावरील गंडांतराचे तर संकेत नाही ना, अशी चर्चा सध्या राजकीय गोटात सुरू आहे.
कुंभारजुवेचे आमदार तथा विधानसभेतील अनुसूचित जमातीचे प्रतिनिधित्व करणारे एकमेव मंत्री असलेले पांडुरंग मडकईकर यांना मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पदावरून खाली उतरवून मगोचे सुदिन ढवळीकर यांची मंत्रिपदावर वर्णी लावली होती. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून आलेल्या दबावाखालीच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला होता अशी माहिती खुद्द सरकार पक्षातील काही नेत्यांनीच त्यावेळी दिली होती. आता त्याच विश्वजित राणे यांच्याकडून मडकईकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचे वचन जुनेगोवे येथे झालेल्या मडकईकर यांच्या कार्यकर्ता मेळाव्यात देण्यात आले आहे. मुख्यमंत्री कामत यांनी मडकईकर यांचा विश्वासघात केला अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांची बनली आहे. कॉंग्रेस श्रेष्ठींनीही मडकईकर यांना मंत्रिमंडळ फेरप्रवेशाची हमी दिली होती परंतु ती सुध्दा पूर्ण केली गेली नाही. ही जबाबदारी आता विश्वजित यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मडकईकर यांना पुन्हा मंत्रिपदावर आरूढ करण्यात यश मिळवल्यास मडकईकर यांना आपल्या नियंत्रणात ठेवता येईल तसेच अनुसूचित जमातीची सहानुभूतीही आपल्याकडे वळवता येईल असे हे गणित आहे. मडकईकर यांचा मंत्रिमंडळ फेरप्रवेश ही विश्वजित राणे यांची राजकीय खेळी भविष्यात स्वतःचे घोडे पुढे दामटण्यासाठीच असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
उत्तर गोव्यात कॉंग्रेसला सुरुंग
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उत्तर गोव्याची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पारड्यात पाडून घेण्यात यश मिळाल्यानंतर आता या जिल्ह्यातील वीसही मतदारसंघात कॉंग्रेसच्या संघटनात्मक ताकदीला सुरुंग लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान,देशप्रभू यांच्यासाठी कॉंग्रेस नेते सक्रियपणे प्रचार करीत नसल्याची गोष्ट लक्षात आल्यानंतर विश्वजित राणे यांनी आपल्या गटातील इतर सहकाऱ्यांबरोबर देशप्रभू यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे. उत्तर गोव्यात देशप्रभू यांना निवडून आणून आपली राजकीय ताकद दिल्लीत सिद्ध करण्याचा चंगच सध्या विश्वजित राणे यांनी बांधला आहे. उत्तर गोव्यात कॉंग्रेसचा प्रभाव असलेल्या काही मतदारसंघांवर सरकारातील बिगर कॉंग्रेस नेत्यांनी आपली नजर वळवली असून कॉंग्रेसचे "हात' हे चिन्हच हद्दपार करून कॉंग्रेस मतदारांना आपल्याकडे वळवण्याची लोकसभेच्या निमित्ताने चांगलीच संधी मिळाल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. या संधीचा यथायोग्य वापर करून पुढील राजकीय डावपेचांची तयारी सध्या या नेत्यांनी चालवली आहे. विश्वजित राणे यांनी सत्तरी आपला प्रभाव प्रस्थापित केला आहे. डिचोली तालुक्यावर प्रभाव टाकण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही. आता पेडण्यात घुसण्याचा प्रयत्नही त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चालवला आहे. मांद्रे मतदारसंघातून माजीमंत्री संगीता परब यांना विधानसभेची उमेदवारी देण्याची घोषणा करून त्यांनी सुरुवात केली होती. आता देशप्रभूंच्या निमित्ताने पेडण्याची स्वप्नेही ते पाहू लागले आहेत. मडकईकरांना प्रयत्न केल्यास तिसवाडीत आपल्याला पाय रोवण्यास मिळेल असाही त्यांचा अंदाज आहे. मात्र त्यांची ही खेळी ऐन लोकसभा निवडणुकीत उलटण्याची दाट शक्यता आहे. मडकईकर हे कोणाच्या अधीन होण्याची शक्यता नसल्याने आपले ईप्सित साध्य करण्यासाठी ते विश्वजितची मदत घेऊ शकतील परंतु विश्वजित यांच्या इशाऱ्यावर ते नाचतील याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, ही लोकसभा निवडणूक गोव्यातील केवळ दोन जागांसाठी लढवली जात असली तरी या निमित्ताने काही नेत्यांनी आपल्या राजकीय भवितव्याचा विस्तार करण्याचे डावपेच आखल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.

अहिल्या रांगणेकर यांचे देहावसान

मुंबई, दि. १९ः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या अहिल्याताई रांगणेकर यांचे आज सकाळी माटुंगा येथील निवासस्थानी ह्रुदयविकाराने निधन झाले.
त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांचा अंत्यसंस्कार उद्या सोमवारी दुपारी दादरच्या स्मशानभूमीत होणार आहे.
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या अहिहल्याताई स्वराज्यात सामान्य जनतेच्या प्रश्नांवर सतत संघर्षरत राहिल्या. आदिवासी, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, अनाथ मुले आदींच्या समस्यांना त्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडली आणि या लोकांना न्याय मिळवून दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांनी भाग घेतला.
महागाईच्या विरोधात महिलांचा मुंबईतील मंत्रालयावर लाटणे मोर्चा नेण्याच्या अभिनव आंदोलनात मृणालताई गोरे यांच्यासोबत त्या आघाडीवर होत्या. तसेच, आणिबाणीच्या विरुद्ध झालेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनातही त्या हिरिरीने सहभागी झाल्या होत्या.
आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत अहल्याताई मुंबईतून लोकसभेत निवडून गेल्या होत्या. त्यांनी विधानसभेत ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागाचे प्रतिनिधित्वही केले होते. मुंबई महानगरपालिकेच्या त्या २१ वर्षे नगरसेविका होत्या.
मुळातच समाजकार्याची आवड असलेल्या अहिल्याताईंचा अनेकानेक सामाजिक संस्थांशी घनिष्ठ संबंध होता. कॉम्रेड बी. टी. रणदिवे यांच्या भगिनी असलेल्या अहिल्याताईंचे पती कॉम्रेड रांगणेकर हेही कम्युनिस्ट चळवळीत होते. त्यांचे गतवर्षीच निधन झाले.

वायंगिणी किनारा अखेर झाला खुला!

पणजी, दि.१९ (प्रतिनिधी)- दोनापावला येथील वायंगिणी समुद्र किनारा हा इतर किनाऱ्यांप्रमाणेच सुदंर व पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. आत्तापर्यंत "सिदाद दी गोवा'या हॉटेलच्या ताब्यात असलेला हा किनारा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सार्वजनिक मालमत्ता असल्याचे उघड झाल्याने "गोवा बचाव अभियान' संघटनेकडून अनोखी सहल या किनाऱ्यावर आयोजित करून हा किनारा सर्वांसाठी खुला झाल्याचा संदेश सर्वत्र पोहचवला आहे. एका अनोख्या पद्धतीने आयोजित केलेल्या या सहलीला अनेक समाजकार्यकर्त्यांनी भरघोस प्रतिसाद दिला व सहल हा प्रकारही आंदोलनाचा एक भाग बनू शकतो याची प्रचिती या निमित्ताने आली.
दोनापावला येथे सार्वजनिक वापरासाठी निश्चित केलेल्या जागेवर हॉटेल "सिदाद दी गोवा'कडून अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे बांधकाम ताबडतोब पाडण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाची अंमलबजावणी २० एप्रिल २००९ पर्यंत राज्य सरकारला करावयाची होती, परंतु राज्य सरकारने मात्र भूसंपादन कायद्यात दुरुस्ती करून वटहुकूम जारी केला व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश बासनात गुंडाळून टाकला. एखाद्या बड्या हॉटेल मालकाचे हीत जपण्यासाठी सरकारकडून अनधिकृत बांधकामाला संरक्षण देताना खुद्द कायदाच बदलू शकतो, हेच याप्रकारावरून सिद्ध झाल्याने या विषयावरून "गोवा बचाव अभियान' संघटनेतर्फे सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. हा वटहुकूम विधानसभेत सरकारने बहुमताच्या जोरावर मान्य करून घेतला तो दिवस काळादिन' म्हणूनही पाळण्यात आला. मुळात सरकारला या हॉटेल मालकाचे हित जपायचे होते तर याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना वटहुकूम का जारी करण्यात आला नाही,असा सवाल आनंद मडगावकर यांनी केला. सरकारच्या या वटहुकमामुळे वायंगिणी किनारा पुन्हा एकदा या हॉटेल मालकाची खाजगी मालमत्ता बनेल काय, हे मात्र माहीत नाही असे सांगून सार्वजनिक मालमत्ता आपल्या ताब्यात ठेवून तिथे जनतेला निर्बंध घालण्याचा हा प्रकारच निराळा असल्याचे ते म्हणाले. वायंगिणी किनाऱ्यावर आता लोकांनी व पर्यटकांनी मोठ्या संख्येत यावे व या किनाऱ्याची मजा लुटावी,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, या सहलीनिमित्त विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. "सॅटर्डे इव्हनींग क्विझ क्लब'तर्फे प्रश्नमंजूषा स्पर्धा, आंतोनियो कॉस्ता यांच्यातर्फे चित्रकला कार्यशाळा, "द मस्टर्ड सीड कंपनी'तर्फे नाट्य कार्यशाळा तसेच संगीत, विविध मनोरंजनपर खेळ आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोवा बचाव अभियानाच्या उपनिमंत्रक सॅबीना मार्टीन्स, क्लॉड आल्वारीस, प्रजल साखरदांडे,आनंद मडगावकर, जॉन्सन फर्नांडिस, मिंगेल फर्नांडिस, प्रविण सबनीस, रिबोनी शहा आदी हजर होते. सहलीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात खाजगी वेशात पोलिस फिरत असल्याचेही दिसत होते.

Sunday, 19 April 2009

मुख्यमंत्री कामत सतराव्या स्थानावर

"इंडिया टुडे'चे सर्वेक्षण; नरेंद्र मोदी अव्वलस्थानी

पणजी, दि. १८ (विशेष प्रतिनिधी)- व्वा ! गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी सर्वेक्षणात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. आनंद आणि समाधान वाटले ना! अहो, पण जरा आपला श्वास रोखून धरा. त्यांनी वरून नव्हे तर खालून दुसरा क्रमांक पटकावला आहे! १८ राज्यांच्या यादीत "इंडिया टुडे' समूहाच्या सर्वेक्षणात आपल्या मुख्यमंत्र्यांना १७वा क्रमांक मिळाला आहे. लोकशाहीत लोकांना त्यांच्या कुवतीनुसार सरकार मिळते हे खरे आहे. तथापि, यावेळी सरकारचे गुणांकन हे एखाद्या खाजगी, निमसरकारी संस्थेने किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने पुरस्कृत केलेल्या संघटनेने केलेले नसून ते "इंडिया टुडे'सारख्या निष्पक्षपाती व वस्तुनिष्ठ पत्रकारितेसाठी लोकांच्या मनात आदर निर्माण केलेल्या नियतकालिकाने केले आहे.
"इंडिया टुडे'च्या "एसी निल्सन-ऑर्ग-मार्ग मूड'च्या १५व्या राष्ट्रीय सर्वेक्षणाने प्रत्येक गोमंतकीयांला अकार्यक्षम सरकार निवडीसाठी किंबहुना अकार्यक्षमतेसाठी जबाबदार अशा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकार निवडल्याबद्दल सणसणीत चपराक लगावली आहे. या सर्वेक्षणासाठी १९ राज्यांच्या ९८ लोकसभा मतदारसंघातील गावे व शहरातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांची मते विचारात घेण्यात आली आहेत. कार्यक्षमता आणि केवळ कार्यक्षमता हा सर्व मुख्यमंत्र्यांच्या परीक्षणाचा निकष होता तेथे दिगंबर कामत यांना १७वे स्थान मिळाले आहे.
"इंडिया टुडे'च्या उत्तम कार्य करणाऱ्या सर्वेक्षण निकालात पहिल्या क्रमांकांवर दुसरे तिसरे कोणी नसून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आहेत. त्यांचे विरोधक आणि प्रमुख दूरचित्रवाहिन्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकूनही मोदी प्रथम स्थानावर आहेत. गुजरातमध्ये विविध आघाड्यांवर केलेल्या विकासाच्या बळावर मोदींनी आपल्या प्रतिस्पर्धी मुख्यमंत्र्यावर मात केली आहे. मोदींना राष्ट्रीय पातळीवर पहिले स्थान प्राप्त झाले आहे. सतत तीनवेळा मुख्यमंत्री बनलेल्या दिल्लीच्या शीला दीक्षित यांना दुसरे स्थान मिळाले आहे. दिल्लीचा चेहरामोहरा बदलून टाकताना त्यांनी सरकारच्या रूपाने जनतेला दिलासा दिला आहे. त्यामुळे खरोखरच त्या गुणवत्तेस पात्र आहेत.
अविकसित अशा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील विकासगती कायम राखण्यासाठी विविध आघाड्यांवर लढा देत या सर्वेक्षणात तिसरे स्थान पटाकवले आहे आणि ज्या गोव्यात दरडोई उत्पन्न सर्वांत जास्त आहे, जो शांतताप्रिय आहे आणि ज्या गोव्याची जनता आदरातीथ्यशील आहे त्या गोव्याच्या "आम आदमी'चे मुख्यमंत्री मात्र कार्यक्षमतेत असमर्थ ठरले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या या असमाधानकारक कार्याने त्यांना अत्यंत जवळपास तळाचे स्थान दिले असून गोमंतकीयांसाठी ही शरमेची बाब आहे. त्याला तशीच कारणेही आहेत. काही वर्षांपूर्वी म्हणजे मे २००३ मध्ये असेच सर्वेक्षण "इंडिया टुडे'ने केले होते. त्यात गोवा पायाभूत सुविधा, कायदा व सुव्यवस्था, गुंतवणूक संधी, आरोग्य व शैक्षणिक सुविधांच्या जोरावर गोवा सर्वोत्कृष्ट राज्य ठरले होते. शांतताप्रिय गोवा हा इतर राज्यांसाठी आदर्श ठरला होता. याचे श्रेय आयआयटीयन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना देण्यात आले होते. सामाजिक, पायाभूत सुविधा व आर्थिक विकासाच्या एका नव्या उंचीवर गोव्याला नेणारे ते एक कुशल नियोजक. त्यावेळी या सर्वेक्षणाच्या वेगवेगळ्या निकषांवर गोवा राष्ट्रीय सरासरीत आघाडीवर राहिला होता. पर्रीकरांची तीच विकासगती पुढे कायम राहिली असती तर गोवा आजही देशातील सर्वोत्कृष्ट राज्यांच्या यादीत राहिला असता.
बोलक्या प्रतिक्रिया
पर्रीकर यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्वेक्षणात राज्याच्या विकासाची गती विचारात घेण्यात आली होती. असा वेगवान विकास राज्याने यापूर्वी कधीच अनुभवला नव्हता. रस्ते, पूल, पाणी पुरवठा योजना, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना, अतिरिक्त वीज विक्री इत्यादी गोष्टी त्यांनी झपाट्याने पूर्ण केल्याचे त्यांचे विरोधकही मान्य करतात. त्यांच्या या योजनांच्या अंमलबजावणीने राज्याचा महसूल कमालीचा वाढला होता.
इंडिया टुडे ने केलेल्या २००५ सालच्या तिसऱ्या सर्वेक्षणातही (२००४ वर्षीच्या आकडेवारीवर) गोवा चांगले राज्य म्हणून गणले गेले होते. पर्रीकर सरकार पाडल्यानंतरचा जरी हा काळ असला तरी २००० - २००४ दरम्यान राबविलेल्या विविध विकासाभिमुख योजनांचा प्रभाव या सर्वेक्षणात दिसून आला होता. त्यामुळेच पर्रीकर सरकार सत्तेवरून गेल्यानंतरही राज्याने काही काळ आपला प्रथम क्रमांक कायम राखला होता. कृषी, ग्राहक व्यापार, औद्योगिक, आरोग्य, शिक्षण, कायदा व सुव्यवस्था, अर्थसंकल्प, प्रगती इत्यादी क्षेत्रांवर आधारित हे सर्वेक्षण होते.
२००६ सालच्या चौथ्या सर्वेक्षणात गोवा शैक्षणिक अर्थसंकल्प आणि प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात जरी प्रथम क्रमांकावर असला तरी एकंदर प्रगतीच्या आधारावर त्याला दुसरे स्थान प्राप्त झाले होते. मुलभूत सुविधांच्या क्षेत्रात गोवा दुसऱ्या क्रमांकावर, कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रात पाचव्या, कृषी आघाडीवर तिसऱ्या व गुंतवणकीसाठीच्या पोषक वातावरण निर्मितीत तो चौथ्या स्थानावर होता. यावेळी कॉंग्रेस पक्ष राज्यात सत्तेवर होता. त्यानंतर मात्र गोव्याची प्रगतीच्या क्षेत्रात अधोगती सुरू झाली. मुख्यमंत्रिपदासाठी असंख्य दावेदार, पक्षांतर्गत मतभेद, काही कॉग्रेस आमदार व मंत्र्यांची एकमेकांचे पाय ओढण्याची प्रवृत्ती, दिगंबर कामत यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न यातून तंटे मिटविण्यासाठी नेत्यांच्या सुरू झालेल्या गोवा ते दिल्ली अशा वाऱ्यांमुळे गोव्याच्या प्रगतीचा वेग खुंटला गेला.
तथापि यंदाच्या इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात प्रगतीच्या शिडीवर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना तळाचे स्थान मिळाल्याचे वाचून गोमंतकीयांना धक्काच बसला. गोमंतकीय ज्यांना स्वतःला गोवेकर म्हणवून घेण्यात जो एक आनंद वाटायचा त्यांना हे रूचलेले नाही. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष नितीन कुंकळकर म्हणाले की, एकेकाळच्या प्रगतशील राज्याचे मुख्यमंत्री सतराव्या स्थानावर फेकले जातात हे अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या तीन चार वर्षात गोव्यात कोणताच विकास होत नाही हे जे मी सांगत होतो ते या सर्वेक्षणाने सिद्ध झाले आहे. सध्या गोवा विकासाच्या क्षेत्रात मागे राहिला असून राजकारण्यांना त्याची जाणिवच नाही. या अधोगतीसाठी आम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. विकासाच्या बाबतीत राज्याचे राजकीय नेतृत्व सपशेल अपयशी ठरल्याचे सांगून बिहारने तिसरा क्रमांक पटकावल्याचे आपल्या कानी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी तर असे म्हणेन की, आता बिहार गोवा होतोय आणि गोव्याचे रूपांतर बिहारमध्ये होतोय. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रामाणिक असून तुम्ही त्यांच्याकडून काही करून घेऊ शकता. गोव्याचा विकास साधण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे सोडून सरकारने केवळ प्रसिध्दी पत्रके काढण्याशिवाय जे काही करत नाही अशा कागदी वाघांना नको तेवढे महत्व दिल्याचे ते म्हणाले. उर्वरित कार्यकाळात तरी आपले मुख्यमंत्री चांगले काम करतील अशी अपेक्षा बाळगूया असे सांगून नपेक्षा गोव्याची स्थिती अधिकच बिकट होईल असे ते म्हणाले.
आणखी मात्र.
सामाजिक कार्यकर्ती आणि पर्यावरणवादी पॅट्रिशिया पिंटो म्हणाल्या की, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सतरावा क्रमांक मिळणे हे चांगले लक्षण नव्हे. गोवा खरेतर पहिल्या पाचांत असायला हवा होता. सरकार कचरा विल्हेवाट, विकासाभिमुख योजनाव्दारे गोव्याची अर्थव्यवस्था सुधारणे या सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे सोडून कॅसिनोसारख्या विषयांना अधिक महत्त्व देत आहे.
पारंपरिक मच्छिमार व रेंदेरांच्या हितासाठी झटणारे माथानी साल्ढाणा म्हणाले की, दिगंबर कामत यांना सर्वेक्षणाच्या क्रमवारित मिळालेल्या १७ व्या स्थानामुळे आपल्याला कोणताही धक्का बसलेला नाही. ते अपेक्षितच होते. आमच्या मुखमंत्र्यांना शेवटून दुसरा क्रमांक ही गोमंतकीयांसाठी लज्जेची बाब आहे. कॉंग्रेस सरकार तिजोरीची लूटमार करण्यात व्यस्त आहे. गोव्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. कसल्याच पध्दतीचे नियोजन नाही. मात्र सरकार सर्व प्रकारचे गैरकारभार करणाऱ्या श्रीमंताचे चोचले पुरविण्यात व्यग्र आहे. सध्याच्या कॉंग्रेस राजवटीतील लोकांच्या संतापात भर पडत चालली आहे.
कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका म्हणाले की, मोदींना देण्यात आलेला प्रथम व गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या सतराव्या क्रमांकाबाबत आपण सहमत नाही. कामत यांचे स्थान कितवे असावे ते मला माहीत नाही; पण त्यांनी चांगले काम केले नाही हे खरे असून ते सर्वांनाच माहीत आहे. कामत यांना चांगले कार्य करण्याच्या कितीतरी संधी होत्या; परंतु त्या संधींचा त्यांनी सदुपयोग केला नाही. त्यांच्याकडे करारीपणा नाही. कॉंग्रेस पक्ष सध्या दयनीय अवस्थेत आहे. "कोणूच सारको ना. कोण रेड्या फाटल्यान धावता जाल्यार कोण घोड्या फाटल्यान धांवता' असे ते म्हणाले.
"बायलांचो एकवट'च्या आवडा व्हिएगस म्हणाल्या की, गेल्या चार पाच वर्षांत गोव्यात टिकाव धरू शकणारा विकास झाला नाही. विकास घडवून आणण्याची मंत्रीमंडळाची एकत्रित जबाबदारी आहे यात दुमत नाही. परंतु, त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा कप्तान कसा काम करतो त्यावरही बरेच काही असते. इथे गोव्यात राज्याचा विकास करण्यापेक्षा आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याला अधिक महत्त्व असते. ज्यावेळी अस्तित्वाची लढाई सुरू असते त्यावेळी मुख्यमंत्री काम तरी कसे करतील? अत्यंत खालचे स्थान मिळाल्याचे मला दुःख वाटते. विद्यमान स्थितीचा आढावा घेणे गरजेचे असून नपेक्षा गोव्याची ही अधोगती अशीच पुढे चालू राहील.
घोषणाबाजी आणि धर्मनिरपेक्षतेचे आपले पत्ते वापरूनही अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत बहुतेक आपली सत्ता असलेल्या राज्यातही कॉंग्रेसला जनतेत आपली छाप पाडण्याचे जमले नाही तो पक्ष गोव्यातही फारसा प्रभाव पाडू शकला नाही. ज्या राज्यात कॉंग्रेस सत्तेत होता त्या राज्यातील त्यांचा जम पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात फारसे प्रभावी काम करण्यात या पक्षाला आलेले अपयश हे त्यामागचे कारण असू शकते. एखादी संघटना किंवा संस्थेचे यश हे तिच्या ठरविलेल्या कामावर विसंबून असते. राज्याची प्रगती ही सत्तेची गाडी हाकणाऱ्या नेतृत्वाच्या हाती असते. त्यामुळेच एखाद्या राज्याचे दर्जेदार किंवा दर्जाहीन कार्य हे त्या मुख्यमंत्र्यांच्या कामावरून पडताळण्यात येते. मंत्रिमंडळाची ती सामूहीक जबाबदारी असते यात शंका नाही; पण सरकारच्या बऱ्या किंवा वाईट कामासाठी मुख्यमंत्रीच जबाबदार असतात. सरकारचे यशापयश हे सचोटी, प्रामाणिकपणा, दूरदृष्टी, राजकीय करारीपणा, कामाची गती, राज्याच्या विकासाचा अडसर व या विकासाच्या आड येणाऱ्यांना बाजूला करण्याची क्षमता यावर अवलंबून असते. तसेच त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे जनतेच्या नजरेतून मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाची असलेली स्वच्छ प्रतिमा यावर ते अवलंबून असते.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना सतरावा क्रमांक देणारे इंडिया टुडेचे सर्वेक्षण विचार करायला लावणारे असून आगामी काळात राज्यापुढे काय वाढून ठेवले असेल त्याची झलक व संकेत देणारे आहे.

भ्रष्ट कारभारा विरोधात मतदान करा


फोंड्यातील जाहीर सभेत पर्रीकरांकडून कॉंग्रेसचे वाभाडे


फोंडा, दि.१८ (प्रतिनिधी) - भ्रष्ट, दिशाहीन आणि स्वार्थी कारभाराविरोधात मतदान करून कॉंग्रेसला धडा शिकवा, असे आवाहन विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी आज संध्याकाळी येथे केले. सिल्वानगर येथील वैश्य सेवा संघाच्या मैदानावर आयोजित प्रचंड जाहीर सभेत विरोधी पक्षनेते श्री. पर्रीकर बोलत होते.
या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा उमेदवार नरेंद्र सावईकर, फातोर्डाचे आमदार दामू नाईक, शिरोड्याचे आमदार महादेव नाईक, मुरगावचे आमदार मिलिंद नाईक, सांग्याचे आमदार वासुदेव गावकर, काणकोणचे आमदार विजय पै खोत, पैंगीणचे आमदार रमेश तवडकर, माजी आमदार राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार प्रकाश वेळीप, प्रा. गोविंद पर्वतकर, फोंड्याचे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, उपनगराध्यक्ष अँड. वंदना जोग, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. मुक्ता नाईक, प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, रूपेश महात्मे, दत्ता खोलकर, मनोहर आडपईकर, उमेश नाईक, फोंडा गटाध्यक्ष उदय डांगी आदी मान्यवर उपस्थित होते.
दक्षिण गोवा मतदारसंघातून निवडून आल्यावर लोकांबरोबर राहून विकासाची गंगा मतदारसंघात आणू, सामान्य लोकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असे नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. कॉंग्रेसचे खासदार मतदारसंघात विकासकामे राबवण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे यावेळी परिवर्तन करून लोकांनी सेवा करण्याची एक संधी द्यावी, असे आवाहन सावईकर यांनी केले.
भाजपला दक्षिण गोव्यात मिळणारा पाठिंबा पाहून कॉंग्रेसच्या नेत्याच्या पायाखालील वाळू घसरू लागल्याने त्यांनी बेछूट आरोप सुरू केले आहेत. केंद्र सरकारने एका अध्यादेशाद्वारे प्रचारासाठी टपालाचा वापर करण्याची मान्यता देण्यात आली आहे. या योजनेखाली आपण प्रचारासाठी खात्याकडे शुल्क जमा करून प्रचार केला, असे स्पष्टीकरण सावईकर यांनी केले.
येत्या २३ एप्रिल ०९ रोजी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून येऊन १९९९ ची पुनरावृत्ती होणार आहे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. दक्षिण गोव्यातील उमेदवार नरेंद्र सावईकर हे सुशिक्षित असून गेले कित्येक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मतदारांकडून सावईकर यांना भरघोस पाठिंबा लाभत आहे, असे श्री. नाईक म्हणाले की, भाजप राजकीय क्षेत्राकडे एक मिशन म्हणून पाहत आहे. पैसा जोडण्याचा धंदा नव्हे. अटलबिहारी यांचे सरकार केंद्रात असताना अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आले होते. टेलिफोन, गॅस सिलिंडर सर्व सामान्य लोकांना तात्काळ मिळावा म्हणून प्रयत्न करण्यात आले. गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला विकास कुणी विसरू शकत नाही. भाजपने कर्तव्य भावनेने काम केले. आज देशाची स्थिती पुन्हा एकदा बिकट बनलेली आहे. पाण्यासारखी मूलभूत सुविधा सरकार जनतेला उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरले आहे. महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावत आहे. गोव्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणे ऐकून अंगावर काटा उभा राहतो. देशातील जनता सुरक्षित नाही. "पोटा' कायदा रद्द करण्यात आला. त्याच्या बदल्यात दुसरा कायदा तयार करण्यात आला नाही. त्यामुळे देशात भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थिती भाजप हा एक पर्याय असून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याची ताकद पक्षाच्या सक्षम नेत्यामध्ये आहे, असेही श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
भाजपचे नेते श्री. पर्रीकर यांच्या राजवटीत गोव्याचा दूरदृष्टीने विकास साधण्यात आला. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या सोयीच्या योजना तयार करण्यात आल्या. आजच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, सेझ, कॅसिनो, सीआरझेड सारख्या असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत. ह्याकडे प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मतदारांनी गतस्मृतींना उजाळा द्यायला हवा. पर्रीकर यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकास कामांचा आढावा घेऊन आपल्या प्रभावी मत शक्तीचा चांगले सरकार स्थापन करण्यासाठी वापर केला पाहिजे, असे दामू नाईक यांनी सांगितले.
आमदार विजय पै खोत यांनी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या विचारसरणीची कार्यकर्त्यांना आठवण करून देऊन त्या विचारसरणीनुसार पक्षाच्या विजयासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. आमदार महादेव नाईक, आमदार महादेव नाईक, आमदार रमेश तवडकर, प्रकाश वेळीप, राजेंद्र आर्लेकर यांची भाषणे झाली. या सभेला माजी मुख्यमंत्री श्रीमती शशिकलाताई काकोडकर, सुभाष वेलिंगकर आदींची उपस्थिती लाभली. उदय डांगी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन माजी मंत्री विनय तेंडुलकर यांनी केले. पार्किंगची व्यवस्था चोख असल्याने सभेच्या ठिकाणी गैरसोय झाली नाही. सभेत भाजपच्या जयजयकाराने मैदान दणाणून गेले.

विमानातीलबिघाडामुळे मोदी पोहोचले नाहीत
या सभेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. मात्र, सोलापूर महाराष्ट्र येथील प्रचार सभेतून गोव्यात येत असताना विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने श्री. मोदी फोंड्यात पोहोचू शकले नाहीत. ही माहिती विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी आपल्या भाषणात दिली. भाजपची लोकसभा निवडणुकीची विजयी सभा याच मैदानावर आयोजित करून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना सभेला आणण्यात येईल, असे पर्रीकर यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजराने सारा परिसर दणाणून टाकला.

राजेश पाटील याला जन्मठेप

साना शेख खून प्रकरण

मडगाव, दि. १८ ( प्रतिनिधी) - साना शेख या २० वर्षीय तरुणाच्या खूनप्रकरणी समीरवाडी - सांगली येथील राजेश पाटील ऊर्फ राजेश मराठे याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिवाय ५०००रु. दंड व तो न भरल्यास आणखी दोन महिन्यांची साधी कैद असा निवाडा देण्यात आला. ही घटना १ नोव्हेंबर २००५ रोजी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात घडली होती.
आरोपीच्या आईला व बहिणीला साना शेख शिवीगाळ करत होता. त्याचा वचपा काढण्यासाठी १ नोव्हेंबर २००५ रोजी राजेश पाटील ताळसा झर - आके येथे राहणाऱ्या साना शेख याच्यापाशी गेला व फुटलेली बाटली गळ्यात खुपसून त्याचा खून केला. मडगाव पोलिसांनी त्याला अटक करून आरोपपत्र दाखल केले होते.

बोगदेश्वर मंदिर पाडण्याच्या नोटिशीमुळे वास्कोत तणाव

वास्को, दि. १८ (प्रतिनिधी)- येथील बोगदा (भरत लाइनजवळ)गेल्या कित्येक वर्षांपासून असलेल्या श्री बोगदेश्वर देवस्थानच्या नूतनीकरणास आक्षेप घेत एमपीटीने बांधकाम पाडण्याची नोटिस जारी केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. उद्या रविवारपासून या देवस्थानचा उत्सव सुरू होत असून एमपीटीतर्फे सोमवारी कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेता येथील स्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मंदिराशिवाय येथील काही घरांनाही नोटिस जारी करण्यात आली आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार १९३४ पासून येथे असलेल्या श्री बोगदेश्वर देवस्थानच्या समितीने गेल्या १५-२० वर्षांपूर्वी मंदिराच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले होते. परंतु, आर्थिक समस्या निर्माण झाल्याने ते काम तात्पुरते थांबवण्यात आले होते. आता निधी उपलब्ध झाल्याने नूतनीकरण पुन्हा हाती घेण्यात आले असून रविवारपासून उत्सवही सुरू होणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात "वाढावळ' होणार आहे. बोगदा भागाचा "राखणकार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराचे बांधकाम पाडण्याची नोटिस देण्यात आल्याने स्थानिक चवताळले आहेत. आज संध्याकाळी देवस्थान समितीने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी देवळात बैठक आयोजित केली होती. यावेळी अखिल गोवा मंदिर सुरक्षा समितीचे राजेंद्र वेलिंगकर, देवळाच्या समितीचे अध्यक्ष केशव खवणेकर, उपाध्यक्ष संजय सातार्डेकर तसेच शेकडोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.
एमपीटीच्या कृतीचा जोरदार निषेध करताना देवळाला अजिबात हात लावू दिला जाणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. एमपीटीने सध्या या ठिकाणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा जवान तैनात केले असून उत्सवानिमित्त साफसफाई करण्यासाठी गेलेल्या समितीच्या सदस्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.
या मंदिराच्या समितीची नोंदणी झालेली असून त्यांच्यापाशी आवश्यक कागदपत्रेही आहेत. रखडलेले नूतनीकरणाचे काम आता पुन्हा हाती घेण्यात आले असता त्यावर आक्षेप घेणारी नोटिस जारी करण्यात आली आहे. यामुळे येथे संतापाची लाट उसळली असून मंदिर सुरक्षा समितीचा स्थानिकांना पूर्णपणे पाठिंबा असेल, असे राजेंद्र वेलिंगकर यांनी गोवादूतशी बोलताना सांगितले. देवस्थानला अजिबात धक्का लागू दिला जाणार नाही, गरज पडल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हा प्रकार म्हणजे हिंदुत्वावर हल्लाच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. बजरंग दलाचे जयेश नाईक यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, या घटनेचे वास्को शहराच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटले आहे.

अडवाणींकडून वरुणला संयम पाळण्याचा सल्ला

नवी दिल्ली, दि. १८ ः वरुण गांधी यांनी शनिवारी सकाळी दिल्लीत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. ही भेट अडवाणींच्या निवासस्थानी झाली. अडवाणींशी झालेल्या चर्चेच्या वेळी वरुण गांधी यांनी पक्षाचे आभार व्यक्त केले; तर अडवाणींनी वरुणला भाषण करताना संयम पाळण्याची सूचना केली.
पिलिभीत मतदारसंघात चिथावणी देणारे भाषण केल्याचा आरोप ठेवून उत्तर प्रदेश सरकारने रासुकाखाली जेलमध्ये टाकले त्यावेळी भाजपने वरुण गांधी यांना पाठिंबा दिला होता. निवडणूक आयोगाने सूचना करुनही पक्षाने वरुण यांना उमेदवारी देण्याचा आपला निर्णय बदलला नव्हता.
वरुण २१ रोजी अर्ज भरणार
चिथावणी देणारे भाषण करणार नसल्याचे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतर वरुण गांधी यांची दोन आठवड्यांसाठी पॅरोलवर सुटका झाली आहे. ते भाजपचे पिलिभीत मतदारसंघातील उमेदवार म्हणून २१ एप्रिलला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची शक्यता असल्याचे समजते.