Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 6 June, 2011

चकमकीत मारण्याचा डाव होता : रामदेव

नवी दिल्ली/हरिद्वार, द. ५ आपण आपले उपोषण हरिद्वार येथेच सुरु ठेवणार असून, आंदोलनाची पुढील दिशाही लवकरच ठरविण्यात येणार आहे, असे रामदेवबाबांनी आज रात्री उशिरा सांगितले. काल झालेल्या दिल्लीतील घटना या आपला खात्मा करण्यासाठी होत्या आणि आपल्या जिवाचे काही वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी आणि कॉंग्रेस पक्षाची राहील, असा इशारेवजा गौप्यस्ङ्गोट स्वामी रामदेवबाबा यांनी हरिद्वार येथे एका पत्रपरिषदेत केला आहे.
अतिशय शांततेच्या मार्गाने दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषण करीत असताना स्वामी रामदेवबाबा आणि त्यांच्या समर्थकांवर केंद्र सरकारने केलेला अमानवीय हल्ला संपूर्ण देशभरात टीकेचे लक्ष्य ठरला असून, शनिवारी मध्यरात्रीच्या या घटनेमुळे इंग्रजांच्या काळात घडलेले ‘जालियनवाला बाग’ हत्याकांड आणि इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणीचे स्मरण देशाला झाले आहे. अनेक निर्दोष महिला, बालके आणि वृद्ध झोपेत असताना त्यांच्यावर लाठ्यांनी केलेला प्रहार, अश्रूधुराचा मारा यामुळे जनमानस चांगलाच संतप्त झाला असून, पक्षभेद बाजुला सारत सर्वांनीच त्यावर कठोर प्रहार केला आहे.
दिल्लीतील घडामोडीनंतर भाजपा, बसपा, माकपा, भाकपा व डावे पक्ष, जदयू अशा सर्वांनी ही घटना लोकशाहीची हत्या करणारी असल्याची प्रतिक्रिया दिली असून, अण्णा हजारेंनी उद्याच्या लोकपाल मसुदा समितीच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आज हरिद्वार येथे परतल्यानंतर स्वामी रामदेवबाबा यांनी एका पत्रपरिषदेला संबोधित करताना दिल्लीतील आपबिती सांगितली, तेव्हा त्यांना अत्याचाराची गाथा वाचताना रडूच कोसळले. ते म्हणाले, केंद्र सरकारनेच माझ्यावर पत्रासाठी दबाव आणला होता. अन्यथा त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मला एका बैठकीत देण्यात आला होता. दिल्लीच्या रामलीला मैदानावर पोलिस ज्या इराद्याने आली होते, ते पाहता तेथे प्रेतांचा खच पडेल, अशीच त्यांची कृती होती. याचवेळी चकमकीत मला संपविण्याचा त्यांचा डाव होता. मी जर महिलांच्या वेशात लपून बसलो नसतो, तर मला ठारच मारण्यात आले असते. मी मृत्यूला घाबरत नाही. पण, असे मरणे मला मान्य नाही. माझ्या जिवाचे काही वाईट झाले, तर त्याला सोनिया गांधी आणि कॉंग्रेस पक्षच जबाबदार राहतील. लोक झोपले असताना त्यांच्यावर लाठ्यांनी प्रहार करायचे आणि गोळ्या झाडायच्या, यातून काय दिसून येते, असा प्रश्‍न वारंवार विचारताना रामदेवबाबांना अश्रू अनावर होत होते.
सोनिया आपल्या मातीत जन्मल्या नसल्या तरी त्या या देशाच्या स्नुषा आहेत, असे मी कालपर्यंत समजत होतो. पण, देशातील माता-भगिनींबद्दल त्यांच्या मनात कोणत्याही भावना नाहीत, हेच यातून दिसून येते. एका राष्ट्रभक्त संन्यासी व्यक्तीला ठग, हत्यारा, दहशतवादी असे संबोधले जात असेल तर ते अतिशय दुर्दैवी आहे. माझ्यासोबत कालपासून जनावरासारखा व्यवहार केला केला. याच नेत्यांचे ३०० कोटी विदेशात, काळा पैसा म्हणून पडून आहेत. मी माघार घेतलेली नाही. माझ्या शेवटच्या श्‍वासापर्यंत मी हा लढा देतच राहील, असेही रामदेवबाबांनी ठासून सांगितले.

No comments: