Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday 12 June, 2010

कणकवलीजवळ गोव्याच्या बसला

भीषण अपघात; ६ जण जागीच ठार

-राऊळ पतीपत्नी मुलासह ठार
-३२ जखमींमध्ये गोव्याचे चौघे


सावंतवाडी, दि. ११ (प्रतिनिधी) - मुंबई- गोवा महामार्गावर गुरूवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास कणकवलीजवळील साळीस्ते येथील अवघड वळणावर लक्झरी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात वेर्ले (सावंतवाडी) येथील राऊळ कुटुंबातील तिघांसह सहा जण जागीच ठार झाले असून ३२ जण जखमी झाले आहेत. त्यात बस चालकासह गोव्याच्या चौघांचा समावेश आहे.
सागर गंगाराम सोनावणे (१९, रा. आम्रपाली जि.ठाणे), बाबूराव हरी पालव (४५, इन्सुली), प्रथमेश जगन्नाथ खोर्जुवेकर (२०, साईलवाडा, सावंतवाडी), तसेच वेर्ले येथील सुनील वासुदेव राऊळ (४० ), पत्नी सुषमा सुनील राऊळ (३५) व मुलगा हर्षद सुनील राऊळ (१०) हे सहा जण अपघातात जागीच ठार झाले.
जखमींपैकी बारा जण गंभीर आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ओरोस येथे हलवण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी डायना लक्झरी बस (जी.ए.०७.एफ.०२७३) साळीस्ते येथील वळणावर आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटून सव्वा अकराच्या सुमारास झाडाला आदळून अपघात झाला. जोरदार झाडावर बसलेल्या धडकेने गाडीतील प्रवाशांनी किंकाळ्या ठोकल्या. घटनास्थळी प्रचंड हलकल्लोळ निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच जखमींना मदत कार्य करण्यासाठी स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेतली.
बसचा चालक झेवियर जॉन पॉल (४०, हडफडे, गोवा), आशिक अली (१८, गोवा), नीलेश वायंगणकर(३८, गोवा), मनी रेड्डी (३२, पणजी), जस्मीन कौर (४८, जबलपूर), मनिष रमाकांत परब(३४ रा. मळगाव), शुभदा बाबूराव पालव (४६, इन्सुली, सध्या मुंबई), ऑगस्टिन डिकॉस्टा (४८,कुर्ला मुबई), अन्नपूर्णा आमरे (५५, उभादांडा, वेंगुर्ले), गल्लीसिंग कृपालसिंग (३८, रा. जबलपूर), हरिष बाबूराव पालव (२२, मालाड, मुंबई), संदेश विष्णू शिरोडकर(१९, मळगाव), हासिम मलिक (४८, उत्तर प्रदेश), संजयकुमार यादव (३०, दहिसर), नौशाद अंदारी (२५, उत्तर प्रदेश), मोहम्मद निजामुद्दीन अदारी (२९, बिहार), शाहरूख खान (१६, मुंबई), सुष्मिता बाबूराव पालव (१५, मालाड), मीना रेवंडकर (३३, विरार), ऋतिक रामचंद्र ठेंबे (१३, पुणे), धीरेन रयंतीलाल पिराना (३६, बोरवली), आशिष हुसेन शेख (७, नेरूर, मुंबई), सुहेश कथ्थप( ३०, उत्तर प्रदेश), सुप्रिया सुर्यकांत तळकर (४३ पार्ले), सिद्धेश सुर्यकांत तळकर (९ पार्ले), शहाजान हुसेन शेख (७ नेरूर मुंबई), विशाल गुप्ता (२२, बिहार), राजन यशवंत देसाई २५, ओझरम), वनिता अजय सावंत (३४ सांताक्लॉज), पवनकुमार चिंतामणी निशार (३२ बिहार), दत्तजीत कृपालसिंग (५१, जबलपूर) आदी जखमींपैकी १२ गंभीर जखमींना ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती लक्झरीचा चालक झेवियर जॉन पॉल याने कणकवली पोलिसांना दिली आहे. त्यानंतर कणकवली पोलिसांचे पथक मदत कार्यासाठी धावून गेले. स्थानिकांच्या साहाय्याने खिडकीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची नोंद पोलिसांत झाली आहे.

फुटबॉलचा महाकुंभ दिमाखात सुरू

नेत्रदीपक उद्घाटन सोहळा

जोहान्सबर्ग, दि. ११ - खेळांचा राजा समजल्या जाणाऱ्या विश्वचषक फुटबॉलचा महाकुंभ आजपासून दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या जोहान्सबर्ग सिटी स्टेडियमवर सायंकाळी आयोजित नेत्रदीपक सोहळ्याने प्रारंभ झाला. ९४ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत हजारो कलावंतांनी रंगारंग कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कार्यक्रमाची आखणी करणाऱ्या चमूच्या कल्पकतेने हा सोहळा अधिकच उठावदार आणि बहारदार झाला. दक्षिण आफिकेतील परंपरागत आदिवासी नृत्यापासून सध्याच्या आधुनिकतेचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. स्टेडियममध्ये उभारलेल्या प्रचंड मोठ्या स्क्रीनवर द. आफ्रिकेचा विकास, वनसंपत्ती, वन्यप्राणी, जंगले यांचेही दर्शन घडविणाऱ्या दृश्यांनी दक्षिण आफिकेची ओळख अधोरेखित करण्यात आली. परंपरागत वेशभूषा धारण केलेल्या शेकडो महिला आणि पुरुषांच्या आदिवासी गीताच्या तालावरील मोहक नृत्यानेच सोहळ्याचा प्रारंभ झाला. स्टेडियमच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या भल्यामोठ्या वर्तुळाकार व्यासपीठावर देशातील नामवंत गायकांची गीते कार्यक्रमात नवा उत्साह निर्माण करीत होती. शेकडो कलावंतांनी निर्माण केलेले ३२ देशांचे ध्वज आणि त्यांची नावे, फिफाचा लोगो तयार करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शेवटी सहा विमानांचे स्टेडियमवरून उड्डाण करण्यात आले. सुमारे ४० मिनिटे हा सोहळा चालला. स्टेडियम यावेळी खच्चून भरले होते आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून उत्साह ओसंडत होता. संपूर्ण दक्षिण आफ्रिकेने टीव्हीवर हा सोहळा बघितला.
फुटबॉलचा महाकुंभ द. आफ्रिकेत आयोजित होणे हा केवळ त्या देशासाठीच नव्हे, तर संपूर्ण आफ्रिका खंडासाठी उत्सवाचा विषय असल्याचे फिफा विश्वचषक आयोजन समितीचे प्रमुख डॅनी जॉर्डन यांनी म्हटले आहे. या आयोजनाच्या निमित्ताने संपूर्ण जगाने दक्षिण आफ्रिकन देशांकडे सकारात्मक नजरेने पहावे, अशी माझी विनंती असल्याचे जॉर्डन म्हणाले. आम्हाला या विश्वचषकाचे यजमानपद मिळविण्यासाठी तब्बल १६ वर्षे वाट पहावी लागली याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मिकींच्या निवासातून हार्ड डिस्क, फायली जप्त

कोलवा पोलिस व गुन्हा अन्वेषणाची संयुक्त कारवाई

मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी) - नादिया मृत्यू प्रकरण उपस्थित झाल्यापासून कोलवा पोलिसांनी आज प्रथमच कडक पावले उचलताना माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्या बेताळभाटी येथील घरावर छापा टाकला व तेथील त्यांच्या कार्यालयातून संगणक हार्ड डिस्क व काही महत्त्वाच्या फायली ताब्यात घेतल्या. यावेळी गुन्हा अन्वेषणाचे अधिकारीही उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केलेली असली तरी स्वतः वेर्णेकर यांनी मात्र हा छापा गुन्हा अन्वेषणाने टाकलेला असून आपण फक्त त्यांना संरक्षण देण्यासाठी गेलो होतो असे सांगितले. यापूर्वी गुन्हा अन्वेषण विभागाने गेल्या आठवड्यात असाच छापा टाकून तेथे झडती घेतली होती. फायलींमध्ये काही आक्षेपार्ह सापडले की काय ते सांगण्यास पोलिस सूत्रांनी नकार दिला व तपासकाम चालू असल्याचे सांगितले.
मिकी पाशेको यांचा विदेशांत नोकऱ्या देण्याचा व्यवसाय होता व बेताळभाटची येथील निवासस्थान हेच त्यांचे मुख्य कार्यालय होते व त्यामुळे तेथील मोबाईल, लॅपटॉप व अन्य आक्षेपार्ह कागदपत्रे यापूर्वीच गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतली असल्याने कोलवा पोलिसांनी आज वेगळा छापा का टाकला त्याबाबत उलटसुलट चर्चा आज येथे चालू होती.
एका सूत्रानुसार काल सायंकाळी मिकी समर्थकांनी घेतलेल्या सभेत "मिकींना बोट लावून दाखवाच' असे जे आव्हान दिले गेले होते त्याला उत्तर म्हणून हा छापा टाकला गेला असून भविष्यांतील कारवाईचे हे संकेत आहेत. आज सवेराच्या अध्यक्ष तारा केरकर यांनीही कालच्या सभेतील भाषणांचा समाचार घेताना पोलिसांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही,असा सवाल केला होता. मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रवृत्तींची नांगी ठेचण्याची सूचना पोलिस यंत्रणेला दिली गेली आहे.

पेडणे पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी "पथका'तर्फे होणार

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - पेडणे पोलिस अमली पदार्थाचा व्यवहार करीत असलेल्या ड्रगविक्रेत्यांकडून हप्ता घेत असल्याची तक्रार आमच्यापर्यंत आली असून आम्ही त्याबद्दल अमली पदार्थ विरोधी पथकामार्फत चौकशी करणार असल्याचे आज पोलिस मुख्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सुमारे ४ महिन्यांपूर्वी या तक्रारी सादर झालेल्या आहेत. सुरुवातीला या तक्रारीवर गुन्हा अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरू केली होती. परंतु, त्याचा अद्याप अहवाल आमच्यापर्यंत आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अजित उमर्ये, व अन्य दोघा पोलिस शिपायांवर ही तक्रार सादर झाली आहे. या पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी नक्कीच केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
"ड्रग पेडलर' यांना संरक्षण देऊन त्याबदल्यात त्यांच्याकडून हप्ता घेणे हे अत्यंत घृणास्पद काम आहे. यापुढे हे कदापि सहन केले जाणार नसल्याचे ते म्हणाले. यापूर्वी अशाच एका प्रकरणात गुंतलेल्या एक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पाच पोलिस शिपायांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या पुढे अशा प्रकरणाच्या कृत्यात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या पोलिस अधिकाऱ्यांच्या तक्रारी गृहखात्याकडेही करण्यात आलेल्या असून त्यावर कारवाई होऊ नये यासाठी सरकारी अधिकाऱ्यांवर कोण दबाव आणतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच महिन्यांपासून या तक्रारीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे हप्ता गोळा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना गृहखाते संरक्षण देत असल्याचे उघड होत आहे. हे अधिकारी कोणासाठी हे हप्ते गोळा करतात, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

देशात दुसरे कंदहार होणार?

कसाबच्या सुटकेसाठी विमान अपहरणाची शक्यता

विमानतळांच्या सुरक्षेत वाढ


मुंबई, दि. ११ - मुंबई हल्ल्यातील अतिरेकी महम्मद अजमल कसाब याच्या सुटकेसाठी अतिरेकी संघटना विमान अपहरणाचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती मिळाल्याने विमानतळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
ब्युरो ऑफ सिव्हील ऍव्हिएशन आणि सीआयएसएफकडून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव दयाळ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कसाबला मागील महिन्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तो भारतीय तुरुंगात राहणे आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच त्याची सुटका करण्याचा ते प्रयत्न करतील. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई विमानतळाहून प्रवासी विमानाच्या अपहरणाचा कट आखला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी काश्मिरातील अतिरेकी कारवायांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मौलाना मसूद अजहरच्या सुटकेसाठी अतिरेक्यांनी कंदहार विमान अपहरण केले होते. त्याची मोठी किंमत भारताला मोजावी लागली होती.
आता कसाबच्या सुटकेसाठीही असा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे ब्युरो ऑफ सिव्हील ऍव्हिएशन आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांनी ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली आहे.

गुजरात विमानतळावर सतर्कतेचा इशारा
सुरक्षा व्यवस्थेत वाढ

अहमदाबाद - केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा मिळाल्यामुळे येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अतिरेकी हल्ल्याची भीती व्यक्त करणारा सतर्कतेचा इशारा प्राप्त झाल्यामुळे आम्ही कोणताही धोका न पत्करता विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. विमानतळावरील प्रवाशांची व त्यांच्या सामानांची तपासणी केली जात आहे. याशिवाय संशयास्पद स्थितीत आढळून येणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी व तपासणी केली जात आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेला सतर्कतेचा इशारा हा नियमित बाब आहे. तसेही देशातील सर्वच विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. मंत्रालयाकडून इशारा प्राप्त झाल्यानंतर या व्यवस्थेचा आढावा घेतला जात असतो आणि गरज पडल्यास त्यात वाढ केली जात व्यवस्था आणखी बळकट केली जात असते, असेही हा अधिकारी म्हणाला.

दिवाकर पागी जामिनावर मुक्त

काणकोण, दि. ११ (प्रतिनिधी) - अमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर गेले दीड वर्षे तुरुंगात असलेले काणकोणचे माजी नगराध्यक्ष दिवाकर पागी यांना आज न्यायालयाने जामिनमुक्त केले. काणकोणचे नगराध्यक्ष श्यामसुंदर देसाई व अन्य नगरसेवकांनी त्यांची पाळोळे निवासस्थानी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
आज दुपारपासून समाजातील विविध क्षेत्रांमधील लोकांनी पागी यांची भेट घेतली. पागी यांच्याबरोबर अन्य तिघांनाही आज जामिनावर मुक्त करण्यात आले.

बेकायदा मद्यार्क प्रकरणात प्रकाश ट्रेडिंगने हात झटकले

पशुखाद्याशी कंपनीचा संबंधच नसल्याचा खुलासा

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी) - पत्रादेवी चेकनाक्यावर पकडण्यात आलेल्या बेकायदा मद्यार्क प्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूरस्थित प्रकाश ट्रेडिंग कंपनीने हात झटकले आहेत. आपल्या कंपनीचा पशुखाद्याशी संबंधच नाही व त्यामुळे आपल्या कंपनीकडून कथित कंटेनरमधून पशुखाद्य पाठवण्याची कागदपत्रे बनावट असल्याचा खुलासा कंपनीचे मालक प्रकाशचंद्र जैन यांनी केला आहे.
अबकारी खात्याकडून पत्रादेवी चेकनाक्यावर पकडण्यात आलेल्या बेकायदा मद्यार्क प्रकरणी या कंपनीला "कारणे दाखवा' नोटीस जारी करण्यात आली होती. सदर कंटेनरमधून पशुखाद्याची वाहतूक होत असल्याचे भासवून पिंपातून बेकायदा मद्यार्क राज्यात आणला जात होता.कंटेनर चालकाकडून जप्त केलेल्या कागदपत्रांनुसार या कंटेनरमधून प्रकाश ट्रेडिंग कंपनीकडून पशुखाद्याचा हा माल मडगाव येथे हिरेमठ यांच्या दुकानात पाठवण्यात येत असल्याचे भासवण्यात आले होते.
श्री.जैन यांनी आपल्या खुलाशात या एकूण प्रकरणी आपल्या कंपनीचे नाव बदनाम करण्यासाठीच अज्ञातांनी हा प्रकार केला असावा, अशी शक्यता वर्तविली आहे. गुरुकृपा रोडलाईन्स नामक वाहतूक कंपनीशीही आपल्या कंपनीचा व्यवहार झाला नाही,असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, सदर कंपनीचे मालक व मडगाव येथील हिरेमठ आस्थापनांच्या मालकांना प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी अबकारी आयुक्त पी.एस. रेड्डी यांनी नोटिसा जारी केल्या होत्या. ही सुनावणी १५ रोजी होणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे बेकायदा मद्यार्क पकडण्यात आले होते. त्यातही हा माल मडगाव येथे हिरेमठ आस्थापनात पाठवण्यात येत असल्याचे खात्याच्या लक्षात आले आहे.
हे एवढे मोठे प्रकरण पोलिसांकडे का सोपवण्यात येत नाही,असा सवाल विचारला जात आहे. अबकारी खात्याला मात्र पोलिसांवर विश्वास नसून पोलिसांकडून अशा प्रकरणांत गुन्हेगारांशी साटेलोटे करून प्रकरण मिटवण्याचेच जास्त प्रयत्न होण्याची शक्यता आहे. अबकारी आयुक्त श्री.रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली चौकशी सुरू असून या घटकेला पोलिसांकडे चौकशी देण्याची गरज नाही, असे सांगितले.

Friday 11 June, 2010

मिकींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मडगाव, दि. १० (प्रतिनिधी) - गेले पंचवीस दिवस गोव्यात गाजत असलेल्या नादिया तोरादो मृत्युप्रकरणी माजी मंत्री मिकी पाशेको यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज आज येथील सत्र न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांनी आज फेटाळून लावला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे माजी पर्यटनमंत्र्यांना उच्च न्यालयात धाव घेणे वा गुन्हा अन्वेषण विभागासमोर शरण येणे, असे दोनच पर्याय शिल्लक राहिले आहेत.
काल अटकपूर्व जामीन अर्जावरील युक्तीवादावेळी सरकारी वकिलांनी जे गंभीर स्वरुपाचे मुद्दे व एकंदरित घटनाक्रम उभा केला होता, त्या पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयाने आज हा निवाडा दिला.
न्या.देशपांडे यांनी मिकींचा अर्ज फेटाळताना दिलेल्या १८ पानी निकालपत्रात सरकारी वकिलांनी उपस्थित केलेल्या त्या प्रमुख अशा मुद्यांचाच परामर्ष घेतलेला आहे.
१) तपासपथकाने जे पुरावे जमविले आहेत त्यावरून मयताने मुंबईत खास दंडाधिकाऱ्यांसमोर आपण चुकीने विष प्राशन केले असे जे निवेदन केले होते ती शक्यता खोटी ठरते, कारण तसे असते तर १५ मे रोजी सकाळी ९ वाजता चुकीने विष घेतलेल्याला कोणी दुपारी ३ वाजेपर्यंत घरी ठेवत नाहीत, खरोखरच जर मयताने टूथपेस्ट समजून चुकीने रेटॉल ब्रशाला लावून दात घासले असते तर सदर महिलेने वा त्याच्या कुटुंबियांनी लगेच डॉक्टरांशी संपर्क साधला असता वा हॉस्पितळात दाखल केले असते.
२) १५ रोजी दुपारी ३ वाजता अपोलोतील डॉक्टरांना तिच्या आईने व खुद्द तिने जी माहिती दिली त्यावरून रेटॉल चुकून घेतलेले नाही हे स्पष्ट होते.
३)मयताच्या शरीरावर ज्या दुखापती आढळल्या त्यावरून तिला ते बळजबरीने दिले गेले असावे वा तिला ते घ्यायला भाग पाडले असावे या संशयाला पुष्टी मिळते.
४) या सर्व संशयाचे निराकरण फक्त विशिष्ट तपासातूनच शक्य आहे अन्यथा नाही. अर्जदार सदर घटना घडली त्याच्या आदल्या रात्री तसेच तिला इस्पितळात दाखल करतेवेळीही तिच्यासमवेत होता. गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीच्या वेळी त्याने या संशयाचे व्यवस्थित निराकरण केलेले नाही .
या सर्व बाबी व गुप्तचर विभागाने जमा केलेली माहिती व वस्तुस्थिती आणि गुन्ह्याचे गंभीर स्वरुप पाहून न्यायाधीशांनी अर्जदाराची विनंती अमान्य केली.
आपल्या निकालपत्रात न्यायाधीशांनी अर्जदाराचे वकील मोहीत मेहता यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करताना कोणते कलम लावावयाचे याबाबत तपास संस्थांमध्ये गोंधळ होता असा जो मुद्दा उपस्थित केला होता तो येथे लागू होत नाही, असे स्पष्ट केले व सांगितले की गुन्ह्याचे स्वरुप काय व तपासासाठी पोलिसांना खरोखरच कोठडीची गरज आहे की काय ते पडताळून पाहणे आवश्यक असते.
एकंदर कागदपत्रांचा व चेन्नई येथील इस्पितळातून आलेला शवचिकित्सा अहवाल यांचा अभ्यास करता मयताने १५ रोजी सकाळी ९ वाजता रेटॉलची संपूर्ण ट्यूब घेतली, या मयताच्या आईने सर्वप्रथम दिलेल्या जबानीला पुष्टी मिळते व नंतर अपोलोत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीही त्याला दुजोरा दिला. त्यामुळे मयताने मुंबईत खास न्यायदंडाधिकाऱ्यासमोर "आपण चुकीने टूथपेस्ट म्हणून रेटॉल लावले' अशी दिलेली जबानी ही कोणत्या तरी दडपणाखाली दिलेली असावी असा जो संशय सरकारपक्षाच्या वकिलांनी उपस्थित केला तो विचार करायला लावणारा आहे असे सांगून तिचे अर्जदाराकडील संबंध व त्यावेळी तो ज्या स्थानावर आहे ते पहाता ती जबानी दखल घेण्यायोग्य नाही, हा मुद्दा न्यायालयाने मान्य केला आहे.
निकालपत्रात चेन्नईतील इस्पितळाने सादर केलेल्या शवचिकित्साअहवालाचा खास निर्देश करून, त्यात मयताच्या अंगावरील जखमांचा जो निर्देश केलेला आहे, त्यावरून मयताच्या घरची मंडळी सत्यपरिस्थिती सांगत नाही असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सदर जखमा इस्पितळातील उपचारांच्या नाहीत तसेच अर्जदार आदल्या रात्री तिच्याबरोबर होता व त्यानेच संपूर्ण रेटॉल तिला घ्यायला भाग पाडले असे शाबीत करणारी जी माहिती तपास पथकांनी गोळा केली, तिचा संपूर्ण तपास व्हायला हवा व त्यासाठी अर्जदार चौकशीसाठी हवा ही तपासपथकाची मागणी योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
मयताच्या पतीने यापूर्वी वेगवेगळ्या प्रकरणात अर्जदाराविरुध्द दिलेल्या विविध जबान्यांवरून अर्जदाराची एकंदर पार्श्र्वभूमी स्पष्ट होत आहे, अर्जदार व मयत यांच्यातील नातेसंबंध या प्रकरणाच्या संबंधाने उघड होण्याची जी गरज प्रतिपक्षाच्या वकिलांनी प्रतिपादिली ती उचलून धरताना घटनेच्या आदल्या रात्री उभयतांदरम्यान जे काय घडले ते अर्जदारालाच माहित आहे, कारण मयताचे नातेवाईक तसेच साक्षीदार वेगवेगळी माहिती देत आहेत व म्हणून सत्य समोर येणे, कपडे व अन्य पुरावे नष्ट करणे, कॉल तपशिल व अन्य सामुग्री मिळविणे यासाठी कोठडी हवी आहे, या मागणीशी न्यायालय सहमत झाले.
सरकारपक्षाकडून केले गेलेले आरोप गंभीर स्वरुपाचे व संशय वाढविणारे आहेत व म्हणून या तपासाच्या निमित्ताने आपला विनाकारण छळवाद आरंभलेला आहे या अर्जदाराच्या कांगाव्याला काहीच अर्थ नाही असे नमूद केले आहे. तसेच मयताचे कुटुंबीय सत्यस्थिती का लपवू पहातात, असा सवाल निकालपत्रात करून गुरुूबक्ष सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा या प्रकरणात लागू होत नाही, असे स्पष्ट केले आहे.
अर्जदाराने सरकारात वरचे स्थान भूषविलेले आहे, तो विधानसभा सदस्य आहे व म्हणून त्याला मोकळे राहू दिले तर तो पुरावे नष्ट करणे शक्य असल्याची भीती यथायोग्य असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
कालच्या प्रमाणे आजही सत्र न्यायालयात निकाल ऐकण्यासाठी पत्रकारांबरोबरच वकिल व इतरांनी गर्दी केली होती. तसेच न्यायालय आवारात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सीबीआय चौकशीची मिकीसमर्थकांची मागणी

मडगाव, दि. १० (प्रतिनिधी) - नादियाप्रकरणी वादग्रस्त ठरलेले माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांच्या समर्थकांचा एक मेळावा आज सायंकाळी त्यांच्या बेताळभाटी येथील निवासस्थानामागील मोकळ्या जागेत होऊन त्यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचा व या बिकटप्रसंगी त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कृतीबद्दल नापसंती व्यक्त केली गेली व म्हणूनच ध्वनिवर्धक वगैरे वगळून त्यांचे समर्थक सायंकाळी एकत्र जमले. त्यात बाणावली व लोटली मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य,पंचायत सदस्य व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
नादिया ही मिकींची मैत्रीण होती व तिला बिकट परिस्थितीत मदत करण्यापुरताच त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे. पण त्यांच्या राजकीय शत्रूंनी एकत्र येऊन त्यांच्याविरुध्द हे कुभांड रचल्याचे व त्यांना राजकीय दृष्टीने संपविण्याचा कट रचल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यांचा राजकीय छळ चालू आहे व तो अधिक काळ चालवू दिला जाणार नाही व तो असाच चालू राहिला तर त्याविरुध्द रस्त्यावर येऊ, असा इशाराही दिला.
"बायलांचो एकवट'च्या अध्यक्ष आवडा व्हिएगश यांनी केलेले आरोप फेटाळताना त्या सध्या काही राजकीय नेत्यांच्या तालावर नाचत आहेत व ते राजकीय नेते परप्रांतीयांना घेऊन आहेत, असा आरेाप करून आवडा यांनी प्रथम आपले घर स्वच्छ करावे व नंतर इतरांना सल्ले द्यावेत असेही त्यांना बजावण्यात आले.

"खबऱ्या'चा खून ड्रग व्यवहारातून!

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) ः हरमल येथील पोलिस खबऱ्या सनी याचा खून हा ड्रग व्यवसायातून झाल्याचे उघडकीस आले आहे. या खून प्रकरणातील मुख्य संशयित नवलेश लुडू नाईक हा अद्याप गायब असल्याची माहिती पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित मंगेश खोर्जे याला आज न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
मंगेश याने मयत सनी याच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी थोबाडीत लावली असली तरी, नवलेश याने त्याला त्या रात्री जबर मारहाण केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. सनी याला मृत्यूच्या पंधरा दिवसापूर्वीही मारहाण करण्यात आली होती. नवलेश यांनी सनी याला कोणत्या कारणावरून मारहाण केली होती, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लिंडन आता सहआरोपी

उच्च न्यायालयात धाव

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - नादिया मृत्युप्रकरणातील मुख्य संशयित माजी मंत्री मिकी पाशेको यांचा विशेष कार्यालय अधिकारी लिंडन मोन्तेरो हा या प्रकरणात सहआरोपी असल्याचे उघड केले. तसेच त्याच्याही विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोणत्या कलमाखाली लिंडन याच्यावर गुन्हा नोंद केला हे सांगण्यास मात्र नकार देण्यात आला. त्याचप्रमाणे, या प्रकरणातील संशयितांना पुरावे नष्ट केल्याने भा.द.स २०१ हे कलम आज जोडण्यात आले आहे. यापूर्वी ३०४ कलम लावण्यात आले आहे. मूळ तक्रार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात असली तरी तपासाअंती मिकी पाशेको व लिंडन यांच्याविरुद्ध पुरावे हाती लागल्यानेच त्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आल्याचे पोलिस प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले.
लिंडन तसेच मिकी पाशेको यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने ते दोघे पोलिसांना कधी शरण येणार आहेत, याची आम्ही वाट पाहणार आहोत. ते स्वतःहून न आल्यास आम्ही त्यांना आहे तेथून अटक करणार आहोत. पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले. मिकी यांच्याविरुद्ध "लूक आउट' नोटीस जारी केली आहे. तसेच, सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऍलर्ट देण्यात आला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी दोन वेळा त्याच्या घरांवर छापेही टाकण्यात आले आहेत. लिंडन याच्याबद्दल बोलताना श्री. देशपांडे म्हणाले की, लिंडन याची या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका होती ते आरोपपत्रात उघडकीस येणार आहे.
दोघा मोलकरणीचा शोध सुरू...
नादिया हिच्या घरात तिघी मोलकरणी कामाला येत होत्या. त्यातील एकीची जबानी नोंद करून घेण्यात आली आहे. तर, दोघींचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेतला जात असल्याचे श्री. देशपांडे यांनी सांगितले. पहिल्या मोलकरणीच्या जबानीवरून पोलिसांना अत्यंत महत्त्वाची माहिती हाती आली होती. मृत्यू पूर्वी नादियाचे कपडे व पाच बॅगा भरलेली तिची कागदपत्रे जाळण्यात आल्याचे तिच्या जबानीतून उघडकीस आले होते.
लिंडनची आव्हान याचिका
लिंडन याचा अटकपूर्व जामीनअर्ज काल दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर आज दुपारी त्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिस मला अटक करू पाहत असल्याचे या आव्हान याचिकेत म्हटले आहे. सदर आव्हान याचिका उद्या सकाळी १०.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीला येणार आहे.
सोनियालाही ताब्यात घेऊ...
नादियाची आई सोनिया हिचा या प्रकरणात सहभाग असल्याचे उघड होताच तिलाही ताब्यात घेऊ, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. अद्याप तिच्या कुटुंबीयाचा या प्रकरणात कोणताच सहभाग असल्याचे उघडकीस आलेले नाही, असे म्हणून पोलिसांनी त्यांना "क्लीन चिट' दिली आहे.
आम्ही काय करू..!
खोदून खोदून विचारल्याशिवाय कोणताही माहिती बाहेर येत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा नादियाचा कुंटुबीयाना प्रश्न करावे लागतात. यात त्यांना त्यांचा छळ होत असल्याचे वाटत असल्यास आम्ही काय करू शकतो, असे श्री. देशपांडे म्हणाले. काही दिवसांपूर्वी सोनिया हिने पोलिस छळ करीत असल्याचा आरोप करून राज्य महिला आयोगाकडे तक्रार सादर केला आहे.

मोपा विमानतळाला अखेर केंद्राची मान्यता

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २९ मार्च २००० साली घेतलेला व त्यानंतर कॉंग्रेस सरकारने स्थगित ठेवलेला मोपा विमानतळ प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाला विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळाने अखेर आज मान्यता दिली. मोपा येथे हरित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारला जाणार असून त्याला जागतिक दर्जा बहाल करण्याचेही ठरले आहे. हा विमानतळ बांधा, वापरा व परत करा अशा "बूट' पद्धतीवर बांधण्यात येणार आहे.
गेली दहा वर्षे कॉंग्रेस सरकारने ही मंजुरी स्थगित ठेवल्याने हा प्रकल्प रखडला. आता नव्याने मोपा विमानतळाला मंजुरी देऊन त्याचे श्रेय उपटण्याची धडपड कॉंग्रेसने चालवली असली तरीही उशिरा का होईना पण केंद्राच्या या निर्णयाचे स्वागतच करावे लागेल. किमान आतातरी या कामाला गती प्राप्त होईल, अशी आशा भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, मोपा विमानतळाला मान्यता देताना सध्याचा दाबोळी विमानतळ कायम राहील, असेही यावेळी केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दाबोळी विमानतळ व्यापारी कामकाजासाठी वापरला जाईल, असे सांगून यापूर्वी दाबोळी विमानतळ बंद करण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय रद्दबातल ठरवण्यात आला. गोव्यातील एकमेव दाबोळी विमानतळावरील वाढत्या रहदारीची समस्या मोपा विमानतळामुळे सुटेल. या विमानतळाव्दारे राज्याचा समतोल विकास सरकारने साधावा, असेही केंद्रीय मंत्रिमंडळाने राज्याला सुचवले आहे. या विमानतळासाठी जागतिक पातळीवरील निविदा मागवण्यात येणार असून गोवा हे पर्यटनराज्य असल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचा व मुख्य आकर्षण ठरणारा असा हा विमानतळ विकसीत केला जाणार आहे.
पेडणेच नव्हे संपूर्ण राज्यासाठी वरदान
मोपा विमानतळ हा केवळ पेडणेच नव्हे तर संपूर्ण गोव्यासाठी वरदान ठरणार आहे.या विमानतळामुळे पर्यटन उद्योगाला नवी भरारी प्राप्त होईल. विकासापासून वंचित राहिलेला पेडणेतील किनारी भाग विकसीत होईलच परंतु औद्योगिकदृष्ट्याही या भागाचा कायापालट होण्याची शक्यता आहे,असे मत प्रा.पार्सेकर म्हणाले.आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे थेट गोव्याचा संबंध इतर देशांशी होणार असल्याने इथे विविध उद्योग स्थापन करण्यासाठीही स्पर्धा लागेल. या भागातील बेरोजगारांना रोजगार व उद्योगाच्याही संधी प्राप्त होणार असून पेडणे तालुक्यासाठी विमानतळाच्या नावाने सुवर्णसंधीच प्राप्त होणार आहे,असेही प्रा. पार्सेकर म्हणाले.

पेडणे पोलिस अधिकाऱ्यांचे ड्रग माफियाशी गंभीर साटेलोटे

तक्रारींना कचऱ्याची टोपली?

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस अधिकाऱ्यांचे ड्रग माफियांशी साटेलोटे असल्याचे उघडकीस आलेले असतानाच पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई व उपनिरीक्षकासह दोन पोलिस शिपाई ड्रगविक्रेत्यांकडून हप्ता घेत असल्याची तक्रार मुख्य सचिव तसेच गृहखात्याकडे करण्यात आली आहे. तसेच याची एक प्रत दक्षता विभागालाही देण्यात आली असून अद्याप त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलेले नाही. या पोलिस अधिकाऱ्यांनी या तक्रारीवर तपास होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यापर्यंत धाव घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. निरीक्षक उत्तम राऊत देसाई, उपनिरीक्षक अजित उमर्ये, पोलिस शिपाई दीपक कुडव, अभय पालयेकर व दयानंद परब हे बनावट ड्रग प्रकरणात फसविण्याच्या धमक्या देऊन हप्ता गोळा करीत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. तसेच, या अधिकाऱ्यांनी पेडणे रेल्वे स्थानकावर १४ लाख रुपयांचा चरस पकडून दुसऱ्या बाजूने पाच कोटी रुपयांचा कोकेन सुखरूपपणे आतमध्ये येण्यास मदत केली असल्याचाही आरोप तक्रारदाराने केला आहे.
सदर तक्रारदाराने आपले नाव गुपित ठेवण्याची मागणी मुख्य सचिव तसेच गृहखात्याला केली आहे. त्याचप्रकारे हरमल येथील रमेश पै यांनीही एक तक्रार निरीक्षक उत्तम राऊत यांच्या विरोधात केली आहे. फेब्रुवारी महिन्यात करण्यात आलेल्या या तक्रारीवर गृहखात्याने त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ड्रगविक्रेत्यांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांना गृहखातेच संरक्षण देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
हरमल येथील एका व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीत हे पोलिस अधिकारी स्थानिक ड्रगविक्रेत्यांना हाताशी धरून ड्रग व्यवसाय करीत असल्याचा आरोप केला आहे. पेडणे पोलिस स्थानकातील उपनिरीक्षक अजित उमर्ये याचे हरमल किनारपट्टीवर ड्रग व्यवसाय करणाऱ्या ड्रग माफियांशी व विक्रेत्यांशी घनिष्ठ संबंध आहेत. हा उपनिरीक्षक पोलिस शिपाई दीपक कुडव यांच्यामार्फत स्थानिक व नेपाली पेडलर कडून हप्ता गोळा करतो. काही महिन्यापूर्वी पेडणे पोलिसांनी हरमल येथून एका ड्रग माफियाने दिलेल्या माहितीवरून १४ लाख रुपयांचा चरस पेडणे रेल्वेस्थानकावर जप्त केला होता. हा चरस मुद्दाम त्याने पकडून दिला असून त्यासाठी त्याने त्याच पोलिसांच्या मदतीने ५ कोटी रुपयांचा "कोकेन' सुखरूपपणे आतमध्ये आणला, असे यात तक्रारीत म्हटले आहे. हा उपनिरीक्षकाच्या मदतीने "कोकेन' मोरजी किनाऱ्यावर नेण्यात आला होता, असेही नमूद केले आहे.
हेच उपनिरीक्षक अमली पदार्थ विरोधी पथकात असलेला अभय पालयेकर व दयानंद परब यांच्यामार्फत आम्हाला धमक्या देतो. आम्ही आमच्या कपड्याच्या दुकानातून ड्रगची विक्री न केल्यास खोट्या तक्रारीत फसवू, अशा धमक्या देऊन हप्ता गोळा करीत असल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे.
दि. १४ जानेवारी २०१० रोजी ही तक्रार मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव व केंद्रीय गुन्हा अन्वेषण (सीबीआय) तसेच दक्षता खात्याकडे करण्यात आली आहे.

दोन ट्रक आणि दुचाकी खाक

बेफाम खनिज वाहतूक

पाळी, दि. १० (वार्ताहर)- पावसाळ्यापूर्वी खनिज माल वाहतुकीच्या अधिकाधिक खेपा मारून शक्य तेवढा नफा कमावण्याच्या इराद्याने बेफाम वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांची आज (दि. १०) समोरासमोर टक्कर झाल्याने त्यात एका ट्रकाची इंधन टाकी फुटून डिझेल जमिनीवर सांडून लागलेल्या आगीत दोन्ही ट्रक पूर्णपणे जळून खाक होण्याबरोबरच या मार्गावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वारावरही आपली दुचाकी जळत असताना हतबलपणे पाहण्याची पाळी आली. जखमी अवस्थेतील सदर दुचाकीस्वाराला बांबोळी येथे जावे लागले.
सविस्तर माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सेझा गोवा कंपनीच्या खाण मातीची वाहतूक करणारा ट्रक क्र. जी ए ०९ यू १३०३ सुर्ला - तारमाथा येथे माल खाली करून सावर्डेला जात असता सावर्डेहून सुर्ला येथे खनिज माती घेऊन येत असलेल्या ट्रक क्र. जीए०९ यू ७५३१ या ट्रकाशी त्याची समोरासमोर टक्कर झाली. याच वेळी तारमाथा येथील शिवदत्त भिकू शेट वेरेकर (३०) आपली यामाहा दुचाकी क्र. जी ए ०४ ए २८४३ घेऊन जात असता या अपघातात सापडला व त्यात त्याच्या डोक्याला मार लागला.
दरम्यान, दोन्ही ट्रकांची टक्कर झाल्याबरोबर एका वाहनाच्या टाकीतून वाहणाऱ्या डिझेलने लगेचच पेट घेतल्याने भडकलेल्या आगीत तिन्ही वाहने जळून खाक झाली. अपघातानंतर दोन्ही टिपर चालकांनी तेथून काढता पाय घेतल्याने चालकांची नावे मात्र समजू शकली नाहीत. सदर दोन्ही ट्रक सावर्डे भागातील असल्याची माहिती मिळाली असून याच वर्षी सदर वाहने खरेदी केली होती.
अपघाताची माहिती मिळताच डिचोली पोलिस स्थानकाचे श्री. वाझ साखळी पोलिस चौकीचे हवालदार हरिश्चंद्र परब यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जळत असलेली वाहने व्हील लोडरच्या साह्याने बाजूला करून खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा फवारा करून मारून आग आटोक्यात आणली.

अबकारी घोटाळ्यावरून मुख्यमंत्री अडचणीत!

"सीबीआय' चौकशी न झाल्यास
भाजप न्यायालयात जाणार


पणजी, दि. १० (प्रतिनिधी)- कथित अबकारी घोटाळा प्रकरणाच्या चौकशीकडे सरकार पूर्णपणे कानाडोळा करीत आहे. विरोधी भाजपने आता या घोटाळ्याचा तपशील राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू यांना सादर करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात सापडलेले मुख्यमंत्री दिगंबर कामत अडचणीत येण्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी माहिती हक्क कायद्याव्दारे या घोटाळ्यासंबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे मिळवली आहेत. कोट्यवधी रुपयांच्या सरकारी महसुलाची लूट मारण्याच्या या प्रकाराकडे राज्यपालांकडूनही जर गंभीर दखल घेतली गेली नाही तर प्रसंगी हा विषय न्यायालयात नेण्याचीही जोरदार तयारी भाजपने चालवली आहे.
राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांवर अनेक आरोप होत असतानाच आता अबकारी खात्यातील कथित घोटाळ्यावरून मुख्यमंत्री दिगंबर कामतही अडचणीत सापडले आहेत. कोट्यवधींचा सरकारी महसूल बुडवण्याच्या या प्रकाराचे सबळ पुरावे सादर करूनही कामत ज्या पद्धतीने या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे त्यांच्यावरील संशयाचे ढग अधिकच गडद होऊ लागले आहेत. पर्रीकर यांनीही आता या प्रकरणाचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवण्याचा निश्चय केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी माजी अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांनी कार्यालयातील फॅक्स मशीनचा गैरवापर झाल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकांत केली होती. या फॅक्स मशीनव्दारे किती फॅक्स पाठवण्यात आले व किती फॅक्स अबकारी खात्याकडे पोहचले तसेच खरोखरच या फॅक्सचा वापर झाला की अन्य ठिकाणाहून या नंबरचा गैरवापर झाला याचा अहवाल "बीएसएनएल' कंपनीकडे मागवण्यात आल्याची माहिती निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिली. हा अहवाल मिळाल्यानंतरच तपासाची पुढील दिशा ठरेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अबकारी खात्यातील या कथित घोटाळ्याप्रकरणी पोलिसांत दाखल झालेल्या या तक्रारीला आता महिना उलटला तरी पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर "बीएसएनएल' अहवालाची वाट पाहत आहेत ही न पटण्यासारखी गोष्ट असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. पोलिस खरोखरच याप्रकरणी गंभीर असते तर दोन दिवसांत हा तपशील मिळू शकला असता. अबकारी कार्यालयातील फॅक्स मशीनच्या गैरवापराचा छडा लावण्याचे हे साधे प्रकरणही पोलिसांना हाताळता येत नसेल तर हे अधिकारी मोठमोठ्या गुन्ह्यांचा तपास कसा लावतील, असा टोलाही यावेळी हाणण्यात आला.
दरम्यान, माजी अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांनी २१ ऑगस्ट २००८ रोजी या पदाचा ताबा घेतल्यानंतर अबकारी चेकनाक्यावर एकदाही बेकायदा मद्यार्क पकडण्याचे प्रकरण घडले नाही. एरवी प्रत्येक चेकनाक्यावरील कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांत बदली करणे अनिवार्य आहे, पण संदीप जॅकीस यांच्या काळात अनेकांना त्याच ठिकाणी ठेवण्यात आल्याचीही खबर आहे. पर्रीकरांनी एवढे गंभीर आरोप करूनही जॅकीस यांना सरकारकडून संरक्षण मिळाल्याने हा एकूण घोटाळा एक नियोजित कटकारस्थान असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. पर्रीकर यांनी या प्रकरणाचा आक्रमक पद्धतीने पाठपुरावा केल्याने संदीप जॅकीस यांची या पदावरून बदली करण्यात आली खरी परंतु त्यांना व्यावसायिक कर आयुक्तपदी नियुक्त करून एकार्थाने कामत यांनी बढतीच दिल्यानेही त्यांच्यावरचा संशय बळावला आहे.
नवनियुक्त अबकारी आयुक्त पी.एस.रेड्डी यांनी ताबा घेतल्यानंतर धडाक्यात छापा सत्र सुरू करून अनेक ठिकाणी बेकायदा दारू साठा जप्त केला.वास्को कार्यालयात छापा टाकून त्यांनी तेथील संगणक तथा इतर साहित्य जप्त केले असून कथीत घोटाळ्याचा व्यवहार तिथूनच झाल्याचेही उघड झाले आहे. एवढे करूनही या प्रकरणाची चौकशी पोलिस खात्याकडे सोपवण्यात येत नसल्याने सरकार उघडपणे हा घोटाळा पाठीशी घालीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.पी. एस. रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी सुरू आहे, असे सांगून पुढे काहीही बोलण्यास नकार दिला. दरम्यान, भाजप या घोटाळ्यासंबंधीचा तपशील पुढील आठवड्यात राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू यांना सादर करणार आहे व हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवण्यास त्यांनी सरकारला आदेश जारी करावेत, अशीही मागणी केली जाईल.

फुटबॉल महासंग्राम आजपासून

जोहान्सबर्ग, दि. १० दक्षिण आफ्रिकेच्या यजमानपदाखाली उद्या शुक्रवार ११ जूनपासून सुरू होणाऱ्या जगातील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ३२ संघ सहभागी झाले असून त्यांच्यात ६४ सामने खेळले जाणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिको या दोन संघात होणाऱ्या लढतीने भलेही या स्पर्धेचा प्रत्यक्ष प्रारंभ होणार असला तरी शानदान उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेचा थाटात शुभारंभ केला जाणार आहे. संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत या स्पर्धेच्या आयोजनामुळे उत्साही वातावरण असून प्रत्येकाच्या तोंडी स्पर्धेचाच विषय आहे.
जोहान्सबर्ग हे या स्पर्धेचे प्रमुख स्थान असले तरी दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर पूर्व भागात असलेल्या पोलोकवानेपासून ते दक्षिण पश्चिमेत असलेल्या केपटाऊनपर्यंत विविध शहरांमधील दहा आकर्षक मैदानांवर स्पर्धेतील सामने खेळले जाणार आहेत. एकूण ६४ सामन्यांमध्ये प्राथमिक फेरीच्या ४८ साखळी सामन्यांचा समावेश असून उर्वरित सामने बाद पद्धतीने खेळले जाणार आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना ११ जुलै रोजी सॉकर सिटीत खेळला जाणार आहे. स्पर्धेत सहभागी ३२ संघांची प्रत्येकी चारप्रमाणे आठ गटांत विभागणी करण्यात आली आहे आणि प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. बाद फेरीत उपांत्यपूर्व, उपांत्य, तिसऱ्या स्थानाचा आणि अंतिम सामन्यांचा समावेश आहे.

Thursday 10 June, 2010

मिकींसाठी पोलिस कोठडीची मागणी

अटकपूर्व जामिनावरील निवाडा आज अपेक्षित
मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी): नादिया तोरादो मृत्यूप्रकरणी मिकी पाशेको व नादियाची आई श्रीमती सोनिया हे पोलिसांना परस्परविरोधी माहिती सांगत असल्याचे स्पष्ट झाल्याने नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता मिकी यांची पोलिस कोठडीत चौकशी करण्याची मागणी सरकार पक्षाने केली आहे. यासंबंधीचे युक्तिवाद आज येथील न्यायालयात पूर्ण झाल्यानंतर मिकी यांच्या अटकपूर्व जामिनावरील निवाडा उद्या (गुरुवारी) दुपारपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.
नादियाने विष घेण्याच्या काही तासापूर्वी पर्यटन मंत्री असलेले मिकी पाशेको तिच्यासोबत होते. त्यांनी एकत्र जेवण घेतले होते. मिकी यांनीच गुन्हे अन्वेषण विभागाला हा जबाब दिला आहे. त्याच्या नेमकी उलट माहिती नादियाची आई सोनिया पोलिसांना सांगत आहे. नादियाने विषप्राशन केल्यानंतर सर्वांनी मिळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खाटीवरील चादर, त्यावेळी तिने घातलेले कपडे, तिची काही महत्त्वाची कागदपत्रे जाळण्यात आली. तिचा मोबाईल आणि लॅपटॉपही गायब करण्यात आला आहे. त्यामुळे मिकी यांना पोलिस कोठडीत घेऊन चौकशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यास्तव त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावावा, असा जोरदार युक्तिवाद सरकारतर्फे ऍड. सरोजिनी सार्दिन यांनी केला. युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्या. व्ही. बी. देशपांडे यांनी अर्जावरील निवाडा उद्या दुपारपर्यंत राखून ठेवला आहे.
या प्रकरणात सीआयडीने मुख्य संशयित बनविलेले मिकी पाशेको यांच्याविरुद्धचे पाश आणखी आवळले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकार पक्षाने मांडलेली बाजू पाहिली तर सीआयडीने जय्यत तयारी केल्याचे दिसून आले. सारा घटनाक्रम व त्यातील गुंतागुंत स्पष्ट करून ती सोडविण्यासाठी मुख्य संशयित कोठडीतील चौकशीसाठी का हवा हे ऍड. सरोजिनी सार्दिन यांनी पंचेचाळीस मिनिटांच्या युक्तिवादात विविध मुद्दे मांडून न्यायालयाच्या मनावर ठसवले.
नादियाने ज्या दिवशी रेटॉल घेतले त्याच्या आदल्या रात्री मिकी व ती एकत्र होते. त्यावेळी उभयतांत नेमके काय घडले की त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले ते उघड करण्यासाठी मिकी यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याची मागणी केली. दि. १४ मे ते नादियाच्या मृत्युपर्यंत मिकी सतत तिच्यासमवेत होते. त्यामुळे नादियाने रेटॉल का घेतले यासह अन्य तपशील मिकी हेच उघड करू शकतात, असे ऍड. सार्दिन यांनी स्पष्ट केले.
मयताची आई व नातेवाइकांकडून चौकशी अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती मिळालेली नाही. ती माहिती मिकींकडून मिळणे शक्य आहे, त्यांचे नादियाशी असलेले संबंध, नादियाच्या उपचारांवर झालेला खर्च, तिच्या वस्तूंची लावली गेलेली विल्हेवाट, जप्त केलेल्या वस्तू, बेपत्ता केले गेलेले मोबाईल, लॅपटॉप व रेटॉल ट्यूब या सर्वांची माहिती मिकीच अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील. मिकींच्या चौकशीशिवाय वस्तुस्थिती स्पष्ट होणार नाही, असे ऍड. सार्दिन यांनी नमूद केले.
मिकी हे केवळ एकदाच चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले. त्यात त्यांनी १४ रोजी रात्री आपण नादियासोबत होतो याची कबुली दिली होती. मात्र हीच बाब मयताची आई नाकारते हे कसले गौडबंगाल आहे, असा सवाल सरकारी वकिलांनी केला.
मयताची मुंबईत घेतली गेलेली मृत्यूपूर्व जबानी विश्र्वासार्ह नाही. कारण ती घेताना तेथे पोलिस तसेच मिकी उपस्थित होते. त्यामुळे नादियाने ती जबानी दडपणाखाली दिली असावी, अशी शक्यता आहे. कोलगेट समजून रेटॉलने दात ब्रश केले हे पटणारे नाही. कारण नेहमीची पेस्ट नाही हे कळताच कोणीही दोन मिनिटेसुद्धा ब्रश करणार नाही. शिवाय वैद्यकीय अहवालानुसार संपूर्ण रेटॉल ट्यूब तिच्या पोटात गेली होती.
नादियाच्या शरीरावरील जखमेच्या चौदा खुणा, तिचे मिकींसोबत झालेले फोनवरील संभाषण, विष घेतल्यावर आधी अपोलो व नंतर मुंबईला हलवताच नादियाच्या घराची झालेली साफसफाई व खाटीवरील बेडशीट उशा व अन्य कपडे नाहीसे करण्याचा झालेला प्रकार, तिच्या आईचे व भाऊ यांचे मौन, त्यांना अज्ञात स्त्रोतांकडून मिळालेली लाखोंची आर्थिक मदत या सर्व गोष्टी संशयाला बळकटी देणाऱ्या आहेत. त्याबाबत अधिक चैाकशी आवश्यक असल्याचे युक्तिवादात सांगण्यात आले.
मिकीच्या वकिलांनी जो वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला होता तो खोडून काढताना दुसऱ्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेणाऱ्याला वैयक्तिक स्वातंत्र्यावर हक्क सांगता येत नाही, असे त्यांना ठणकावले व यासंदर्भात दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निवाड्याचे उदाहरण दिले.
तत्पूर्वी मिकींच्या बाजूने युक्तिवाद करताना त्यांनी दिल्लीहून आणलेल्या वकिलांनी व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मुद्दा परत परत उगाळला. या प्रकरणाशी आपल्या अशिलाचा संबंध नसताना तपास यंत्रणा त्यांना सतावत आहेत. त्यांचा तपास पूर्वग्रहदूषित आहे. या प्रकरणात वेगवेगळी कलमे लावण्याच्या पद्धतीवरूनच ते सिद्ध होत आहे. मयताने इस्पितळात दिलेली जबानी तसेच मुंबईत दंडाधिकाऱ्या समोर दिलेली मृत्युपूर्व जबानी सर्व घटना उघड करीत असताना तपासयंत्रणा करीत असलेले आरेाप विशिष्ट हेतूने आपल्या अशिलाची बदनामी करण्यासाठी आहेत, असा दावा त्यांनी केला.
आपल्या अशिलाची या एकंदर प्रकरणात नेमकी भूमिका वा कृती कोणती तेही तपास यंत्रणा उघड करीत नाहीत याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आपल्या अशिलाचे समाजातील स्थान व चौकशीत त्याने दिलेले सहकार्य पाहिले तर त्याला कोठडीत घेऊन चौकशी करण्याची गरजच नाही. यासंदर्भात विविध न्यायालयीन निवाड्यांचा हवाला त्यांनी दिला.
या प्रकरणात आपले अशील गुंतले असल्याचे सांगणारा एक तरी साक्षीदार आहे का? आपल्या अशिलाकडून नेमका कोणता तपास करावयाचा आहे, असे सवाल त्यांनी केले. मयताच्या अंगावरील जखमांबाबत जो बाऊ केला जात आहे त्याचा खुलासा उत्तरीय तपासणी अहवालांतून झाल्याचे सांगून वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावले जाऊ नये, अशी विनंती त्यांनी केली.
------------------------------------------------------------------
न्यायालयात प्रचंड गर्दी
या प्रकरणाची सुनावणी दुपारी २-४० वाजता सुरू होऊन ती ४-१० वाजता संपली. सुनावणीवेळी उभय पक्षांकडून केला जाणारा युक्तिवाद ऐकण्यासाठी न्यायालय खचाखच भरले होते. सीआयडीच्या तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुनिता सावंत व उपअधीक्षक मोहन नाईक न्यायालयात जातीने हजर होते. सावंत यांनी या प्रकरणातील अनेक फायली सोबत आणल्या होत्या.

लिंडनचा जामीन अर्ज फेटाळला

सीआयडीने पाश आणखी आवळल्याचे स्पष्ट
मडगाव दि. ९ (प्रतिनिधी): सध्या गोव्यात राजकीय वादळ उठवलेल्या नादिया तोरादो मृत्युप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाला (सीआयडी) चौकशीसाठी हवे असलेले माजी मंत्री मिकी पाशेको यांचे विशेष कार्याधिकारी लिंडन मोंतेरो यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे या प्रकरणी उभयतांविरुद्धचे पाश आणखी आवळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सीआयडीने यापूर्वीच मिकी पाशेको हे या प्रकरणातील मुख्य संशयित असल्याचे व अर्जदार हे त्यांचे उजवे हात असल्याने या प्रकरणातील पुरावे नष्ट करू शकतात. तसेच या प्रकरणी चौकशीसाठी पाचारण करूनही ते चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर झालेले नाहीत, असे प्रतिपादून त्यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोेध केला होता. तसेच या गंभीर प्रकरणात अर्जदाराला पोलिस कोठडीत ठेवून माहिती मिळविणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला होता. ते मुद्दे ग्राह्य मानून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी तो जामीन अर्ज फेटाळून लावला.
काल लिंडन मोंतेरो यांच्यावतीने ऍड. अमित पालेकर यांनी, तर सरकारच्यावतीने ऍड. सरोजिनी सार्दिन यांनी युक्तिवाद केला होता. त्यांनी लिंडन व नादिया प्रकरणातील मुख्य संशयित मिकी यांचे परस्परांकडील संबंध कोर्टात उघड केले व लिंडन यांना बाहेर राहू दिल्यास या प्रकरणातील पुरावे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली. नादियाच्या कुटुंबीयाशी त्याचे जवळचे नाते असल्याने त्याच्या कोठडीतील चौकशीतून महत्त्वाची माहिती बाहेर येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नादियाने ज्या स्थितीत आपल्या जिवाचा शेवट करून घेतला त्याचा उलगडा करावयाचा असेल तर ही चौकशी गरजेची आहे. तिला कोणत्या स्थितीत गोव्यातून मुंबई व तेथून चेन्नईत नेले गेले, हॉस्पिटलांतील बिलांची फेड, वाहतूक सुविधा मिळवून देणे याचा तपास करण्यासाठी लिंडनची चौकशी आवश्यक आहे हा मुद्दा न्यायालयाने ग्राह्य ठरविला.
या संबंधीची माहिती घेण्यासाठीच लिंडन यांना समन्स पाठविले होते. तथापि, त्यांनी ते न स्वीकारताच परत पाठविले. त्यामुळे आवश्यक माहिती मिळू शकली नाही. शवचिकित्सा अहवालातील माहितीनुसार नादियाच्या अंगावर जखमा व ओरखडे आहे. त्यामुळे संशय बळावलेला असून तिला विष पाजण्यात आले की काय असा जो संशय निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी पोलिस कोठडीशिवाय निःपक्षपाती चौकशी करणे शक्य नाही. त्यामुळे हा मुद्दा ग्राह्य धरून अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी निवाड्यात म्हटले आहे. नंतर मोंतेरो यांचे वकील अमित पालेकर यांना प्रतिक्रिया विचारली असता निवाड्याची प्रत मिळाल्यानंतरच यावर काही सांगता येईल, असे ते म्हणाले.
आज सकाळी निवाड्याच्या वेळी कोर्टाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व निरीक्षक संतोष देसाई स्वतः जातीने हजर होते.

जागतिक प्रसारमाध्यमांचा भारत सरकारवर ठपका

लंडन/न्यूयॉर्क, दि. ९ : भोपाळ वायुदुर्घटना ही जगाच्या औद्यागिक इतिहासातील सगळ्यात भीषण अपघात होता, असे सांगत याप्रकरणी भारत सरकारने घेतलेली भूमिका संभ्रम निर्माण करणारी होती, अशी टीका जागतिक प्रसारमाध्यमांनी केली आहे.
या अपघातानंतर सुमारे पाव शतकानंतर आलेल्या न्यायालयाच्या निर्णयात दोषींना ठोठावण्यात आलेली शिक्षा अपुरी आहे. या निर्णयामुळे अपघातातील पीडितांची एकप्रकारे थट्टा केली असून, यासाठी भारत सरकार आणि तिथली न्यायव्यवस्था पूर्णपणे जबाबदार आहे, असे या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. सध्या संसदेसमोर विचारार्थ असलेल्या अणुदेयका विधेयकाबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी विदेशी कंपन्या आणि सरकारांना आकर्षित करण्यासाठी अपघातानंतर निश्चित करावयाच्या देयतेच्या मुद्याकडे या विधेयकात दुर्लक्ष करण्यात आले आहे, असेही पुढे म्हटले आहे.
घटनास्थळाची साफसफाई करण्यास नकार देणाऱ्या डाऊ केमिकल्स या बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनीच्या निर्णयावर, तसेच युनियन कार्बाईडचा तत्कालिन प्रमुख वॉरेन ऍण्डरसन याचे प्रत्यार्पण करण्याच्या भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्याच्या अमेरिकन प्रशासनाच्या निर्णयावर जगातल्या आघाडीच्या अनेक वृत्तपत्रांनी जोरदार टीका केली आहे. २००८ मध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या नागरी अणुकरारानुसार एखादा अपघात झाल्यास देण्यात येणारी नुकसान भरपाई ही अपघाताचे घटनास्थळ साफ करण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षाही कमी आहे, असे ब्रिटनच्या "द टाईम्स' या वृत्तपत्राने म्हटले आहे. नुकसान भरपाईबाबत प्रत्येक कंपनीचे निश्चित धोरण असले पाहिजे. मात्र, याबाबत भारताने केलेली मागणी खूपच कमी आहे, असेही वृत्तात पुढे म्हटले आहे.
याप्रकरणाचा निकाल लागण्यासाठी एवढा कालवधी लागल्याबद्दल टाईम्सने आश्चर्य व्यक्त केले आहे. चुकीचे व्यवस्थापनच या अपघातास कारणीभूत असल्याचे स्पष्टपणे दिसत असतानाही आरोपींवर फक्त निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला. तसेच १९९९ मध्ये युनियन कार्बाईडच्या व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या डाऊ केमिकल्स या कंपनीने घटनास्थळाची साफसफाई करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता, असेही टाईम्सच्या वृत्तात पुढे म्हटले आहे.

सीबीआय चौकशीची मागणी

नादियाच्या आईची उच्च न्यायालयात धाव
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): गुन्हा अन्वेषण विभाग आपल्याला माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांच्याविरुद्ध जबरदस्तीने जबाब द्यायला लावत असल्याचा दावा करून हे प्रकरण केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले जावे व त्याची निःपक्षपाती चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका नादियाची आई सोनिया तोरादो हिने गोवा उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केली आहे.
पोलिस तपासाच्या नावावर "सीआयडी' पोलिस आम्हांला धमक्या देत आहेत. अप्रत्यक्षरीत्या आमचा मानसिक तसेच शारीरिक छळ करीत आहेत. तसेच माजी मंत्री पाशेको यांच्याविरुद्ध वक्तव्य करण्यासाठी दबाव टाकत आहेत, असा आरोप याचिकादाराने आपल्या याचिकेत केला आहे. मिकी पाशेको यांच्याविरुद्ध जबाब न दिल्यास आम्हाला या प्रकरणात गोवणार असल्याची धमकी गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक मंगलदास देसाई हे दूरध्वनीवरून देत असल्याचा दावा सोनिया हिने केला आहे.
"या प्रकारावरून पोलिस या प्रकरणाचा तपास निःपक्षपाती पणे करू शकत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे न्याय देण्यासाठी हे प्रकरण "सीबीआय'कडे सोपवले जावे' असे याचिकेत पुढे म्हटले आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही पूर्णपणे पोलिस तपासाला सहकार्य करीत आहोत. मात्र पोलिसांनी छळ करण्याची जी पद्धत अवलंबली आहे ती पूर्णपणे अमानवी असल्याचे तिने म्हटले आहे. ज्यादिवशी नादियाचा मृत्यू झाला त्या रात्री पोलिस दोन पोलिस निरीक्षक बंदूकधारी पोलिसांबरोबर येऊन त्यांनी घरात येऊन शोधाशोध केली. त्यावेळी पोलिसांनी आम्हांला गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याच्या धमक्या देण्यास सुरुवात केली,असेही म्हटले आहे.

'खबऱ्या'चा खून झाल्याचे उघड

पणजी व पेडणे, दि. ९ (प्रतिनिधी): हरमल येथील परशुराम टेकडीवर जाणाऱ्या पायवाटेवर मृतावस्थेत सापडलेल्या त्या तरुणाची ओळख पटली असून शवचिकित्सा अहवालात त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पेडणे पोलिसांनी आज रात्री येथील तिघा स्थानिक व्यक्तींच्या विरोधात ३०२ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. प्रसिद्धी माध्यमांनी या प्रकरणाला वाचा फोडल्याने अखेर पेडणे पोलिसांना हा खुनाचा गुन्हा नोंद करण्यास भाग पाडले. मयत तरुणाचे नाव सनी ऊर्फ संदीप असे असून तो मूळ उत्तर प्रदेश येथे राहणारा असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणावरून आज सायंकाळी पोलिसांनी मंगेश खोर्जे (४९) या संशयिताला ताब्यात घेतले असून पोलिस अजून दोघांच्या शोधात आहेत. येत्या काही तासात अटक करण्यात येईल असा दावा पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी केला. मयत सनी याची मान मोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. तसेच, त्याच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचेही आढळून आले आहे. सुरुवातीला पेडणे पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली होती.
मयत सनी हा मागच्या पर्यटक हंगामाच्या सुरुवातीपासून विदेशी नागरिकांच्या सोबत असायचा व कोळंब डोंगरमाथ्यावर एक सुप्रसिद्ध पुरातन वटवृक्षाचे झाड आहे, त्याठिकाणी तो काही विदेशी नागरिकांसोबत राहायचा. अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्यांना त्याठिकाणी नेऊन त्यांच्यासोबतच रानात राहत असे, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दि. ७ जून रोजी मंगेश खोर्जे याच्या गाड्यावर चोरी झाली होती. त्या चोरीचा संशय सनी याच्यावर व्यक्ती करून मंगेश याने त्याला जबर मारहाण केली होती. तसेच सनीनेच आपल्या गाड्यावर चोरी केली असल्याची माहिती त्याने लुडू नाईक याच्या मुलाला दिली होती. त्यानंतर त्याच्या मुलानेही त्याला मारहाण केली होती, अशी माहिती निरीक्षक राऊत देसाई यांनी दिली. सध्या संशयित गावातून गायब झाले असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, येथील काही स्थानिक नागरिकांनी आपली नावे प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की, त्यानेे स्थानिक व्यापाऱ्यांना अनेक टोप्या घातल्या आहेत. उसने पैसे मागून पुढच्या वेळेला देतो असे सांगून फसवत होता. काही शॅक्स हॉटेल रेस्टॉरण्टमध्ये जाऊन जेवण जेवायचा, थोडे पैसे द्यायचा थोडे द्यायचा नाही व दुसऱ्या वेळेला त्या हॉटेलात यायचा नाही हा त्याचा नित्य दिनक्रम होता.
रात्री काही स्थानिक नागरिकांना पोलिस स्टेशनवर आणून या खुनाविषयी काही धागेदोरे मिळतात की काय याची चाचपणी केली जात होती. पेडणे पोलिस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताराम राऊत तपास करीत आहेत.
-------------------------------------------------------------
तो माझा खबऱ्या नव्हता...
सनी हा ड्रगमाफियांशी संबंधित होता तसेच तो ड्रगविषयी माहिती पोलिसांना पुरवत असे, त्यामुळे तो पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आजपर्यंत एकदाही त्याने पोलिसांना ड्रगविषयी माहिती पुरवली नाही, तो माझा खबऱ्या नव्हता, असा दावा निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी केला. उलट त्याने अनेक वेळा आपल्याकडून उसने पैसेही मागून नेल्याचे सांगितले.

तोतया 'सीआयडी'ना अटक

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस अधिकारी असल्याचे सांगून गोव्यातील लोकांना लुटणाऱ्या दोन तोतयांना गुन्हा अन्वेषण विभागाने काल सायंकाळी म्हापसा येथे सापळा रचून ताब्यात घेतले. अटक केलेल्या व्यक्तींची नावे मोहमद शकील व हित्तगिरी अशी असल्याची माहिती देण्यात आली असून दोघेही कोल्हापूर इचलकरंजी येथे राहणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करून सात दिवसांची पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे.
या दोघांनी तोतया पोलिसांनी अनेकांना पोलिस अधिकारी असल्याचे भासवून टोप्या घातल्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच या दोन तोतया पोलिसांना अटक केल्याची माहिती गोव्यातील व महाराष्ट्रातील विविध पोलिस स्थानकांना देण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दोघा तरुणांनी सावंतवाडी येथून एक भाड्याने दुचाकी घेऊन गोव्यात प्रवेश केला. यावेळी त्यांनी गोव्यातील काही श्रीमंत लोकांचे निरीक्षण करून त्यांचे घर गाठले. "सीबीआय' अधिकारी असल्याचे बनावट कार्ड दाखवून तुम्ही एवढी वाहने, बंगला कोणत्या पैशांनी घेतला आहे, असे प्रश्न केले जायचे. तसेच तुम्हाला अटक करून दिल्ली येथे नेले जाईल, अशीही धमकी दिली जात होता. दोन दिवसांपूर्वी शापोरा येथे राहणारा नीलेश शेटकर याला अशाच पद्धतीने धमकी देण्यात आली होती, तसेच त्याच्याकडे पाच लाख रुपये देण्याची मागणी केली होती. यावेळी त्याला संशय आल्याने त्याने याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाला दिली. पोलिसांनी काल सापळा रचून पाच लाख रुपये नेण्यासाठी त्या दोघा भामट्यांना म्हापसा येथील नवतारा हॉटेलच्या समोर बोलावण्यात आले. यावेळी दोघे तोतया पोलिस दुचाकीवरून आले असता त्यांना आधीच दबा धरून बसलेल्या "सीआयडी' पथकाने ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे असलेली बनावट ओळखपत्रे व काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.
या छाप्यात पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त, निरीक्षक रुपेंद्र शेटगावकर, उपनिरीक्षक निनाद देऊलकर यांच्यासह पोलिस शिपाई गिरी नाईक, दत्ता नाईक, श्री. शेटये, सर्वेश कांदोळकर यांनी भाग घेतला. अधिक तपास केला जात आहे.

'त्या' दलितबांधवांची उपेक्षा थांबवा : शंभू भाऊ बांदेकर

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): पेडणे पालिका क्षेत्रातील सुर्बानवाड्यावरील दलितबांधवांची विहीर दुरुस्ती व गणेशविसर्जन तळीच्या कामावरून जी काही हेळसांड सुरू आहे त्याची गंभीर दखल दलित संघटनेतर्फे घेण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर यांनी हा प्रकार मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नजरेस आणून दिला असून त्याबाबत तात्काळ तोडगा काढावा,अशी विनंती केली आहे.
राज्यातील अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकमेव पेडणे मतदारसंघातीलच दलितबांधवांची सतावणूक सुरू आहे. सुदैवाने पेडणेचे पालकमंत्री तथा अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकमेव धारगळ मतदारसंघाचे आमदार बाबू आजगावकर हे राज्याचे पंचायतमंत्री आहेत. बाबू आजगावकर मंत्री असूनही गेले कित्येक महिने सुर्बानवाड्यावरील दलितबांधवांच्या विहीर दुरुस्तीच्या या विषयावर तोडगा निघत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. पेडणे पालिका व देवस्थान समितीच्या वादात या दलितबांधवांची फरफट सुरू आहे.विधानसभेत पेडणेचे आमदार दयानंद सोपटे यांनी हा विषय उपस्थित केल्यानंतर पालिकामंत्री ज्योकीम आलेमाव यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. आता महिने उलटले तरी अद्याप यावर तोडगा निघत नाही.बाबू आजगावकर यांच्याकडूनही याविषयीचा पाठपुरावा केला जात नसल्याने दलितांच्या नेत्याकडूनच दलितांकडे दुर्लक्ष होत असल्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे, अशी या लोकांची नाराजी आहे.
दरम्यान, बाबू आजगावकर यांच्याकडून जरी दुर्लक्ष होत असले तरी पेडणेचे माजी आमदार तथा माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर यांनी या दलितबांधवांचा आवाज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न केले आहेत.
दरम्यान,कॉंग्रेस पक्षाचे कार्यकारिणी सदस्य असलेले शंभू भाऊ बांदेकर यांनी यापूर्वीही ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिली होती पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.एकाबाजूने सरकार तीन वर्ष पूर्ण केल्याचा सोहळा साजरा करीत असताना दुसऱ्या बाजूला दलितबांधवांची या सरकारकडून पिण्याच्या पाण्यासाठी अशी उपेक्षा होणे ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे श्री.बांदेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.नगरपालिका व देवस्थान समिती यांच्यात समेट घडवून दलितांच्या या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा,अशी विनंती श्री.बांदेकर यांनी केली आहे.

तिने हातोहात बाळ पळवले अन...!

वास्को, दि. ०९ (प्रतिनिधी): आपण एकाच गावातील असल्याचा बहाणा करून भारती पोतुगीरी (वय २४) नावाच्या महिलेने बायणा येथे राहणाऱ्या कसव्वा चलवादी या महिलेच्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून त्यास कोलार (कर्नाटक) पाठविल्याचे वास्को पोलिसांना समजताच पोलिसांनी त्वरित कारवाई करून बाळाला सुखरूपरित्या आणून आईच्या स्वाधीन केले. बाजारात भेटलेल्या भारती या महिलेने कसव्वा हिच्याशी काही वेळ गप्पागोष्टी करतेवेळी तिचा बाळ आपल्या हातात घेतला. नंतर तो अन्य एका इसमाकडे दिला व क्षणार्धात त्याचे अपहरण केले. सदर गोष्ट कसव्वाच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला असता लोकांनी पोलिसांना पाचारण केले.
बायणा-वास्को येथे राहणारी २८ वर्षीय कसव्वा चलवाडी नावाची महिला ६ जून रोजी दुपारी आपल्या दोन वर्षाच्या मुलीला व दहा महिन्यांच्या बाळाला (नावः मुत्तू) घेऊन बाजारात आली असता तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. या प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलिस उपअधीक्षक महेश गावकर यांच्याशी आज संपर्क साधला असता अपहरण करण्यात आलेल्या बाळाला आज सुखरूपरित्या आणण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणी एकूण तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. गावकर यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे बायणा येथे राहणारी कसव्वा ही महिला दि ६ रोजी दुपारी बाजारात खरेदी केल्यानंतर आपल्या दोन वर्षाच्या मुलीला व दहा महिन्यांच्या मुलाला घेऊन उसाचा रस पिण्यासाठी टी.बी.कुन्हा चौकासमोर गेली असता येथे तिला एक अज्ञात महिला आढळली. यानंतर सदर अज्ञात महिलेने कसव्वाशी गप्पा सुरू करून आपण दोघीही एकाच गावच्या असल्याचे तिला पटवून तिच्याशी मैत्री केली व स्वतःचे नाव भारती असल्याचे यावेळी तिला सांगितले. नंतर भारतीने कसव्वाशी असलेल्या बाळाशी काही वेळ खेळण्यास सुरू करून त्याला खायला देण्याच्या कारणावरून आपल्याकडे घेतला व अन्य एका इसमाकडे त्याला दिला. कसव्वाने याबाबत तिला विचारले असता तो आपल्या ओळखीचा असल्याचे सांगून कुठल्याच प्रकारची भीती नसल्याची खात्री करून दिली. भारतीने बाळाला अज्ञात इसमाकडे दिल्यानंतर सदर इसम येथून गायब झाल्याचे कसव्वाच्या लक्षात येताच तिने भारतीला याबाबत विचारले असता आपण तुला ओळखत नसल्याचा बहाणा तिने केला. आपल्या बाळाचे अपहरण करण्यात आल्याचे कसव्वाला समजताच तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. भर बाजारात दोन महिलांमध्ये वाद होत असल्याचे येथील लोकांच्या नजरेस येताच त्यांनी वास्को पोलिसांना कळविले. चौकशीअंती अपहरण केल्यानंतर परशुराम या संशयिताने कर्नाटक राज्यात कोलार या गावात (वास्कोहून सुमारे ४०० किलोमीटर) त्या बाळाला नेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपनिरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली एक खास पथकाने तेथे जाऊन सदर बाळाची सुटका केली. अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेले तीनही संशयित नातेवाईक असल्याचे उघड झाले आहे. वास्को पोलिस स्थानकाचे निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

Wednesday 9 June, 2010

भाजपच्या शिष्टमंडळाकडून सरकारच्या भ्रष्टाचाराची जंत्रीच राज्यपालांना सादर

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- विद्यमान कॉंग्रेस आघाडी सरकारने गेल्या तीन वर्षांच्या काळात केलेल्या अनेक भ्रष्टाचार प्रकरणांची जंत्रीच आज भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल डॉ. एस. एस.सिद्धू यांच्यासमोर ठेवली. राज्याची तिजोरी लुटण्याचे काम या सरकारने सुरू ठेवले आहे. सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ आपली तुंबडी भरण्यातच हे सरकार व्यस्त असून जनतेच्या पैशांवर महोत्सव साजरे केले जात आहेत. अस्थायी समिती व पुढील विधानसभा अधिवेशनाची संधी साधून सरकारला जेरीस आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न होईल. एवढे करूनही दोषींवर कारवाई झाली नाही तर प्रसंगी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यास भाजप कमी राहणार नाही, असा खणखणीत इशारा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने आज राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात भाजप विधिमंडळ गटाचे उपनेते ऍड. फ्रान्सिस डिसोझा, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर, विधिमंडळ प्रवक्ते दामोदर नाईक, प्रदेश सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर व प्रा.गोविंद पर्वतकर आदींचा
समावेश होता. सुमारे पाऊण तास झालेल्या बैठकीत या शिष्टमंडळाने सरकारच्या भ्रष्टाचार प्रकरणांची मालिकाच राज्यपालांसमोर सादर केली. जनतेच्या पैशांची अमर्याद उधळपट्टी सुरू असताना घटनेचे रक्षक या नात्याने राज्यपालांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. या गंभीर प्रकरणांची दखल राज्यपालांनी घेतली असून सखोल चौकशी करण्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला दिले. ही माहिती पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मिकी कसे गायब झाले?
राज्याचा एक मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देऊन गायब होतो याचे नेमके कारण काय? पोलिसांनी अद्याप मिकी पाशेको यांच्याविरोधात एकही गुन्हा नोंद केलेला नसताना ते गायब होण्यामागचे नेमके कारण काय, असा सवालही पर्रीकर यांनी केला.
अबकारी घोटाळा ः चौकशी ठप्पच
अबकारी घोटाळा विधानसभेत उघड करूनही त्याची चौकशी होत नाही. जम्मू काश्मीरच्या गुन्हे विभागाने चौकशी सुरू केल्यानंतर गोव्यातील अबकारी आयुक्तांकडून कार्यालयातील फॅक्सचा गैरवापर व बनावट सह्यांची तक्रार पोलिसांत नोंद केली, पण त्याबाबत पुढे काहीच झाले नाही. नव्या अबकारी आयुक्तांनी ताबा घेतल्यानंतर घातलेल्या छाप्यात लाखो लीटर्स मद्यार्क सापडले. वास्को कार्यालयातील छाप्यात घोटाळ्याचे पुरावेही सापडले. मात्र त्याबाबत फौजदारी चौकशीचा मागमूसही नाही. सुमारे शंभर कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात सरकारातील नेत्यांचे लागेबांधे आहेत व त्यांना संरक्षण देण्यासाठीच हे प्रकरण दडपले जात आहे, असा सनसनाटी आरोप पर्रीकर यांनी केला.
नंबरप्लेटमागील गौडबंगाल
नंबरप्लेटचा घोटाळा उघड केल्यानंतर खुद्द मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालात अनेक गैरप्रकार उघडकीस आणूनही हे कंत्राट रद्द केले जात नाही. कमी दरांत उच्च सुरक्षा नंबरप्लेट उपलब्ध होत असताना जादा दर आकारणारे कंत्राट जनहितार्थ रद्द करण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला, पण गोव्यात मात्र राज्य सरकारने ४६९ रुपयांची नंबरप्लेट १२०० रुपयांना वाहन चालकांच्या गळी उतरवण्याचा डाव आखला आहे. या कंत्राटात हात धुऊन घेतलेले नेते व वरिष्ठ अधिकारी कोण,असा प्रश्न पर्रीकरांनी केला.
राज्यातील खनिज निर्यातीपैकी २० टक्के महसूल गळती विरोधकांनी उघड केली; पण त्याबद्दल सरकारला ना खंत ना खेद. ड्रग व पोलिस साटेलोटे प्रकरणी झालेल्या पोलिस चौकशीवर उच्च न्यायालयानेच ताशेरे ओढले आहे. पोलिसांना गुंगारा देऊन अनेक दिवस बेपत्ता असलेल्या संजय परब या पोलिस शिपायाला आठ दिवसांत जामीन मिळतो यावरून या प्रकरणात "फिक्सिंग' झाल्याचाच संशय येतो, अशी शक्यता पर्रीकरांनी व्यक्त केली. या प्रकरणांत वरिष्ठ पोलिस गुंतल्याने योग्य पोलिस चौकशी होत नाही आणि राजकीय नेत्यांच्या सहभागामुळे सरकारही बेफिकीर आहे.
भ्रष्टाचाराला रान मोकळेच
भ्रष्टाचाराला रान मोकळे ठेवण्यासाठीच लोकायुक्त विधेयक रखडत ठेवले जात आहे. सरकारातील मंत्रीच एकमेकांच्या उरावर बसले आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या भानगडी पुढील आठवड्यात लेखी स्वरूपातच राज्यपालांना पुराव्यांसह सादर केल्या जातील, असेही पर्रीकर म्हणाले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत केवळ कला व संस्कृती खात्याचा लवाजमा वापरून राज्यकारभाराचा देखावा करीत असल्याचा ठपकाही पर्रीकर यांनी ठेवला. "गोमंत विभूषण' हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाला बहाल करताना मुख्यमंत्री वगळता एकही मंत्री व आमदार सोहळ्याला हजर राहत नाहीत यावरूनच सरकारच्या बेशिस्तीचे व बेफिकीरीचे दर्शन घडते, असा चिमटा पर्रीकरांनी काढला.
राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आहे, याचे भान न ठेवता कॉंग्रेसच्या व्यासपीठावर आघाडीतील इतर घटकांवर दोषारोप करण्याचे व स्वबळावर लढण्याचे इरादे व्यक्त केले जातात यातून कॉंग्रेस पक्ष सत्तेसाठी कसा हपापला आहे याचेच दर्शन होते, असा टोलाही पर्रीकरांनी लगावला.

मिकी मुख्य संशयित

०गुन्हा अन्वेषणाचा न्यायालयात दावा
०नादिया प्रकरणी ३०२ कलमाखाली गुन्हा
०मिकींचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
०लिंडनच्या जामिनावर आज निर्णय


मडगाव, दि. ८ (प्रतिनिधी) : गेले काही दिवस गाजत असलेल्या नादिया मृत्युप्रकरणाने आज अकस्मात कलाटणी घेताना तपासपथकांनी हे प्रकरण भा. दं. सं. च्या ३०४ कलमाखाली (आत्महत्येस प्रवृत्त करणे) नोंदवून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविला तसेच या प्रकरणात नुकताच मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले मिकी पाशेको हेच मुख्य संशयित असल्याचा दावा केला आहे.
दुसरीकडे संशयाच्या घेऱ्यात सापडून गेल्या शनिवारपासून भूमिगत झालेले मिकी पाशेको यांनी पलायनाच्या सर्व वाटा बंद झालेल्या पाहून अखेर आज दुपारी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर उद्या दुपारी युक्तिवाद होणार आहेत. तिसरीकडे काल असाच अर्ज दाखल केलेले त्यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) लिंडन मोंतेरो यांच्या अर्जावर आज युक्तिवाद पूर्ण झाले व उद्या सकाळी निवाडा दिला जाणार आहे.
तपासयंत्रणांनी या प्रकरणाची नोंद भा. दं. सं.च्या कलम ३०४ खाली (आत्महत्येस प्रवृत्त करणे) करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविल्याचे आज न्यायालयात स्पष्ट केलेले असले तरी पोलिस निरीक्षक सुनिता सावंत यांनी तपासकाम अजूनही प्रगतीपथावर असून पुरावे हाती लागल्यास ३०२ खाली (खुनाचा प्रयत्न) गुन्हा नोंदविण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या निवेदनात मयताच्या अंगावर ज्या अकरा जखमा होत्या, त्यातील दोन जखमा धारदार शस्त्रामुळे असल्याचा निष्कर्ष निघाला आहे व त्यामुळे प्रसंग आला तर कलम ३०२ मध्ये रूपांतरित होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मिकीचे ओएसडी लिंडन यांच्या जामीन अर्जावर आज सकाळी न्या. देशपांडे यांच्या
समोर युक्तिवाद सुरू झाले तेव्हा सरकारच्यावतीने एक निवेदन न्यायालयात सादर करण्यात आले. त्यात आतापर्यंत पुढे आलेल्या माहिती व पुराव्यांना अनुसरून हे प्रकरण ३०४ कलमाखाली नोंदले गेलेले आहे असे सांगण्यात आले. मयताच्या हातापायावर आढळून आलेल्या जखमा, तिचा नाहीसा करण्यात आलेला भ्रमणध्वनी, लॅपटॉप , नष्ट केलेला पासपोर्ट यांचे एकंदर रहस्य उलगडावयाचे असेल तर लिंडन यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या प्रकरणात लिंडन यांची भूमिका महत्त्वाची आहे, नादियावर विविध इस्पितळांत झालेले उपचार, विमान प्रवास यातील खर्चाची बाब लिंडन यांनीच हाताळलेली आहे, असा दावा करून त्याला जामीन मिळाला तर तो साक्षीदारांवर दडपण आणून तपासकामात व्यत्यय आणण्याचे काम करील, असाही युक्तिवाद करण्यात आला.
लिंडन यांच्यावतीने ऍड. अमित पालेकर यांनी युक्तिवाद करताना नादिया प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभाग आपणाला नाहक अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे, प्रत्यक्षात आपण पर्यटनमंत्र्यांचा ओएसडी होतो व त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आपला कोणताच संबंध नाही, यास्तव आपणास दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
आजचे हे दोन्ही अर्ज न्या. देशपांडे यांच्यासमोर गेले व त्यांनी एकंदर प्रकरण अत्यंत गांभीर्याने हाताळताना अनेकवेळा वकिली युक्तिवादात हस्तक्षेप करून स्वतः काही सवाल केले. नादियाचा अजून सापडू न शकलेला मोबाईल, लॅपटॉप हे मुद्देही त्यांनी नोंद करून घेतलेले दिसले.
मिकी अटकपूर्व जामिनासाठी
मिकी यांच्या वतीने दिल्लीहून खास गोव्यात दाखल झालेले वकील जितेंदर कुमार व ध्रुवकपूर यांनी अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज आज दुपारी सादर केला तेव्हा न्यायालय परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी एकच गर्दी केली होती.
मिकी यांनी आपल्या अर्जात नादिया ही आपली कौटुंबिक मित्र होती व आपणाला या प्रकरणात राजकीय हेतूने गोवण्यात आल्याचा व आपली प्रतिमा बदनाम करण्याचा हेतू त्यामागे असल्याचा दावा केला आहे. सदर तरुणीने दंडाधिकाऱ्यांसमोर सुस्पष्ट जबानी दिलेली आहे, आपण आजवरच्या तपासात संपूर्ण सहकार्य केले आहे एवढेच नव्हे तर गुन्हा अन्वेषण विभागाने तर तब्बल नऊ तास आपली चौकशी केलेली असून आपणाला या प्रकरणात अडकवण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा संशय असून त्यासाठी अटक करून आपली पुरती बदनामी केली जाण्याची भीती व्यक्त करून त्यासाठी दिलासा मिळावा अशी विनंती केली गेली आहे. त्यांच्या अर्जावर उद्या युक्तिवाद होणार आहेत.

नीळकंठ हर्ळणकर यांना मंत्रिपदाची शपथ

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना अखेर आज संध्याकाळी मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल डॉ.एस.एस.सिद्धू यांनी त्यांना मंत्रिपद व गोपनीयतेची शपथ दिली.या शपथविधी सोहळ्याला जी-७ गटातील नेते प्रामुख्याने हजर होते पण बहुसंख्य कॉंग्रेस मंत्री व आमदारांनी गैरहजर राहून अप्रत्यक्षपणे आपली नाराजी प्रकट केली.
मिकी पाशेको यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेले हे पद मिळवण्यासाठी कॉंग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांत चुरस निर्माण झाली होती. आघाडी धर्मानुसार हे पद राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे आहे व त्यामुळे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचीच वर्णी लावण्यावर दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी शिक्कामोर्तब केले. नीळकंठ हळर्णकर यांच्या रूपाने बार्देश तालुक्याला मंत्रिमंडळात स्थान प्राप्त झाले आहे.दरम्यान, त्यांना अद्याप खाते देण्यात आले नाही.आपल्याला कुठलेही खाते दिले तरी त्याचा वापर सामान्य जनतेच्या सेवेसाठी करीन, असे श्री.हळर्णकर म्हणाले. राजकारणात अनेकवेळा अपयशाला सामोरे जाऊन यशाची पायरी चढलो आहे व त्यामुळे पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश करून मंत्रिपद मिळणे हा आपल्या असंख्य कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे उद्गार त्यांनी काढले. राजकारणात आपण कधीच मंत्रिपदाच्या मागे धावलो नाही.आमदार या नात्याने राष्ट्रवादीचे नेते व इतर मंत्र्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य केले व त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील अनेक विकासकामे मार्गी लागली,अशी माहिती त्यांनी दिली. या दोन वर्षांत आपल्या मंत्रिपदाचा लोकांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त वापर करेन,असेही ते म्हणाले.
दरम्यान, या सोहळ्याला मुख्यमंत्री दिगंबर कामत, गृहमंत्री रवी नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लोरेन्सो, प्रताप गांवस आदी हजर होते.बहुसंख्य कॉंग्रेस आमदार व मंत्री यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती.विरोधी भाजपतर्फे विधिमंडळ उपनेते फ्रान्सिस डिसोझा यांनी हजेरी लावली होती. हळर्णकर यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी यावेळी राजभवनवर गर्दी केली होती. श्री.हळर्णकर यांच्या पत्नी व तीन मुलीही या सोहळ्याला हजर होत्या. मुख्यमंत्री कामत यांच्या पत्नी आशा कामत याही उपस्थित होत्या.

सहकार संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र मुळे यांची फेरनिवड

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - गोवा राज्य सहकारी संघाच्या अध्यक्षपदी रामचंद्र नाईक मुळे यांची बिनविरोध फेरनिवड झाली, तर उपाध्यक्षपदी उमेश बी. शिरोडकर हे निवडून आले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या निवडणुकीत १२ संचालकांची निवड झाली आहे. यातील दहा संचालक बिनविरोध, तर दोघे प्रतिस्पर्ध्यांना हरवून निवडून आले आहेत. हे संचालक मंडळ पाच वर्षासाठी कार्यरत असणार असल्याची माहिती यावेळी नवनियुक्त अध्यक्ष श्री. मुळे यांनी दिली.
गोवा राज्य सहकारी संघातर्फे विविध सहकारी संस्था, सहकारी बॅंकांचे संचालक, प्रतिनिधी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. तसेच, सहकार क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांना प्रकल्पांना भेट देण्यासाठी राज्याबाहेर अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाते, असे यावेळी श्री. मुळे यांनी सांगितले. येत्या काही महिन्यांत स्वतंत्र प्रशिक्षण केंद्राची इमारत बांधण्याचा विचार असून ते काम हाती घेतले जाणार असल्याचे ते म्हणाले. सरकारकडून काही दिवसांपूर्वी एक मिनिबस संघाला मिळालेली आहे. सहकार क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींची माहिती करून देण्यासाठी मासिकही काढले जात आहे. येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील विविध कार्यकारी संस्थांचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. काही वर्षापूर्वी १८३ संस्था सुरू होत्या. मात्र त्याकडे विशेष लक्ष पुरवले नसल्याचे त्या बंद झाल्या. त्या पुन्हा कार्यरत करून सहकारी चळवळ ग्राम स्तरावर पोचवली जाणार असल्याचे ते म्हणाले.
सरकारने सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे तसेच सहकार क्षेत्राचे ज्ञान देणारे एखादे महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी यावेळी उपाध्यक्ष उमेश शिरोडकर यांनी केली. संचालक मंडळावर राजू कृष्णा नाईक, प्रभाकर के. गावस, सखा नंदा मळीक, विजयकांत विठोबा गावकर, विजयकुमार शंकरराव पाटील, नारायण व्ही. मांद्रेकर, डॉ. दत्ता हरी भट, दामोदर बेतू नाईक, श्रीकांत पी. नाईक व रवींद्र ओवंदेकर हे निवडून आले आहेत.

मडकई अपघातात दुचाकीचालक ठार

फोंडा, दि. ८ (प्रतिनिधी) - मडकई औद्योगिक वसाहतीत आज रात्री ८.१५ वाजता झालेल्या एका अपघातात वेलिंग -म्हार्दोळ येथील देवेंद्र शांताराम नावेलकर ( ४१) यांचे जागीच निधन झाले. मालवाहू ट्क क्रमांक एमएच-०९-एल-६५१३ हा वसाहतीतून बाहेर येत असताना, मोटारसायकल क्रमांक जीए-०१-डब्ल्यू-१५३८ ची टक्कर झाली, यावेळी मोटारसायकलचालक नावेलकर ठार झाले. तेथे जमलेल्या लोकांनी ट्रक रोखून धरला व पोलिसांना पाचारण केले. वेळीच पोलिस आल्याने ट्रकाची हानी टळली.

कसाबसाठी दोन वकील

मुंबई, दि. ८ - २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याला उच्च न्यायालयात खटला लढविण्यासाठी दोन वकील पुरविण्यात आले आहेत.
कसाबने आपल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान देण्यासोबतच चांगल्या वकिलांचीही मागणी केली होती. ती त्याची मागणी मान्य करीत मुंबई उच्च न्यायालयाने आज त्याला दोन वकील दिले. त्यात अमीन सोलकर आणि फरहाना यांचा समावेश आहेत. उच्च न्यायालयात त्याचा खटला हे दोघे पाहणार आहेत.
कसाबला ६ मे रोजी विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्याच्या खटल्याचे काम आता उपरोक्त दोन वकील पाहतील. राज्य विधि सेवा प्राधिकरणाचे प्रमुख आणि मुख्य न्यायमूर्ती जे.एन.पटेल यांनी या दोघांची कसाबचे वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

Tuesday 8 June, 2010

मिकींचा शोध जारीच

अद्याप गुन्हा नोंद नाही!

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांनी आज तिसऱ्या दिवशीही गुन्हा अन्वेषण विभागाला गुंगारा दिला. पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी राज्याच्या सीमांवर कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. परंतु, मिकी यांच्या विरोधात अद्याप कोणताच गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. काही दिवसांमागे पोलिस ड्रग माफिया प्रकरणात आपल्याच पोलिस शिपायाला शोधून काढण्यास गुन्हा अन्वेषण विभागाला शक्य झाले नव्हते. अशा परिस्थितीत पोलिसांना एका वजनदार माजी मंत्र्याला शोधून काढण्यात यश मिळणार का, असाच प्रश्न सध्या गोवेकरांना पडलेला आहे. शेवटी त्या पोलिस शिपायाने तब्बल ५८ दिवसांनी न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यामुळे मिकी पाशेको कोणत्या न्यायालयात हजर होतील, याकडे पोलिसांचे लक्ष आहे.
आज दिवसभरात मिकी पाशेको पणजी येथील एका अतिमहनीय व्यक्तीच्या घरी लपून बसल्याचे बोलले जात होते. काहींनी तर ते एका ट्रकातून कारवारला निघून गेल्याचे सांगायला सुरुवात केली होती. मिकी गायब झाल्याने सध्या राजकीय वर्तुळात गरमागरम चर्चा सुरू झाली आहे.
नादियाचे मूळ यकृत गायब?
मयत नादिया हिच्या मूळ यकृताबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. चेन्नई येथील डॉक्टरांनी केलेल्या शवचिकित्सा अहवालात नादियाच्या यकृताबद्दल कोणतीही टिप्पणी केलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे नादियाचा मृत्यू विषप्राशन केल्याने झाल्याचे स्पष्ट करणे पोलिसांना कठीण होणार आहे. मृत्यूनंतर नादियाचा मृतदेह गोव्यात आणण्यात आला. त्यावेळी गोव्यातील डॉक्टरांच्या एका पथकाने मृतदेहाची दुसऱ्यांदा शवचिकित्सा केली होती. त्यावेळी तिच्या शरीरात कोणते यकृत होते, याबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. नादियाचा मृत्यू यकृत बदल्यानंतर झाला होता. त्यामुळे तिच्या मूळ यकृताचे काय झाले, याबद्दल कोणालाच सध्या माहिती नाही. या यकृताचा अहवाल पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. तिच्या शरीरावर ११ खुणा सापडल्याचे पहिल्या शवचिकित्सा अहवालात स्पष्ट केले आहे. परंतु, या खुणा ओरबाडल्याच्या की रक्त गोठल्याच्या आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. यकृत निकामी झाल्यानंतर शरीरातील शिरांतून वाहणारे रक्त आपला मार्ग बदलून कुठेही जाऊन थांबते व त्याठिकाणी रक्त गोठल्याच्या खुणा दिसून येतात, अशी माहिती एका डॉक्टरने दिली. तसेच, नादियाची "डीएनए' चाचणीही करण्यात आली नसल्याची माहिती खास सूत्रांकडून मिळाली आहे. नादियाची "डीएनए' चाचणी केली असता त्याच्या आधारे मूळ यकृताचा शोध घेणे सोपे झाले असते, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

उपनिरीक्षकासह पाच पोलिस सशर्त जामिनावर मुक्त

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - भ्रष्टाचार आणि अमली पदार्थ माफियाशी साटेलोटे उघडकीस आल्यानंतर सेवेतून निलंबित करून अटक करण्यात आलेल्या एका उपनिरीक्षकासह पाच पोलिस शिपायांना आज अमलीपदार्थ विरोधी न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्त केले. गेल्या आठवड्यात याच प्रकरणात अटक झालेला निरीक्षक आशिष शिरोडकर याची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जामिनावर सुटका केली होती. न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाली नसल्याने त्यांना नेमक्या कोणत्या अटीवर जामीन मिळाला हे सांगता येणार नसल्याचे पोलिस खात्याचे प्रवक्ते तथा पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले.
न्यायालयाने दुपारी हा आदेश देताच सायंकाळी सहा वाजता न्यायालयीन कोठडीत असलेले उपनिरीक्षक पूनाजी गावस, साईश पोकळे, संदीप परब ऊर्फ "कामिण', हुसेन शेख, रामचंद्र काणकोणकर ऊर्फ "बिल्डर' व संजय परब ऊर्फ "भट' यांना तुरुंगातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. संजय परब हा गेल्या पंधरा दिवसापूर्वी पोलिसांना शरण आला होता. तर, अन्य पोलिस शिपायांना १९ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
गोवा खंडपीठाने "सीआयडी'ने केलेल्या तपासकामावर ताशेरे ओढले होते. खंडपीठाच्या याच आदेशाच्या आधारावर आज अमलीपदार्थ विरोधी न्यायालयाने अन्य सहा जणांचीही जामिनावर सुटका केली. दोन महिन्यांपासून या प्रकरणात "सीआयडी'ने महत्त्वाचे कोणतेच पुरावे किंवा जबान्या नोंद करून घेतल्या नसल्याने संशयितांना जामीन मिळण्यास मदत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वेळी सीआयडीच्या या तपासकामावर उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. अटक करण्यात आलेले पोलिस हे हणजूण येथील एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवणावर ताव मारत होते. त्यांचे बिल "अटाला' हा आपल्या सायबर कॅफेवर कामाला असलेल्या मुलाला पाठवून ते फेडत होता, असा दावा गुन्हा अन्वेषण विभागाने केला होता.
अटालाच्या सांगण्यावरून जो मुलगा येऊन ते बिल फेडत असल्याची जबानी मात्र पोलिसांनी नोंद करून घेतली नाही. त्यामुळे या माहितीला कोणताही आधार मिळत नसल्याचा शेरा न्यायालयाने मारला होता. तपासकामात अनेक त्रुटी ठेवल्याने संशयितांना जामीन मंजूर झाल्याने आता पोलिस मुख्यालय यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

आठ दोषींना फक्त दोन वर्षांची शिक्षा

भोपाळ वायुदुर्घटना

लगेच जामिनावर सुटकाही

भोपाळ, दि. ७ - तब्बल २६ वर्षांपूर्वी जगातील सर्वाधिक भयंकर औद्योगिक दुर्घटना म्हणून ओळखल्या गेलेल्या भोपाळ वायुदुर्घटनेच्या खटल्याचा आज निकाल लागून त्यात स्थानिक न्यायालयाने युनियन कार्बाईड कंपनीचे अध्यक्ष केशव महिंद्रा व इतर सात जणांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर न्यायालयाने युनियन कार्बाइडच्या कंपन्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड व इतर दोषींवर प्रत्येकी एक-एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. यानंतर लगेचच या सर्वांची २५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटकाही केली. या सर्वांवर सीबीआयने कलम ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
२ व ३ डिसेंबर १९८४ च्या मध्यरात्री भोपाळ शहराच्या हद्दीत असलेल्या युनियन कार्बाईडच्या प्रकल्पातून विषारी वायू गळती होऊन त्यात काही तासाच्या आतच १५ हजारावर लोक मृत्युमुखी पडले होते, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले. तेव्हापासून या वायूगळतीला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वॉरेन अँडरसन अद्याप फरारीच असल्याने भोपाळ वायुपीडितांना अजूनही न्याय न मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

अटकपूर्व जामिनासाठी लेंडन यांची धाव

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : नादिया मृत्युप्रकरणी संशयाच्या घेऱ्यात सापडलेले मिकी पाशेको हे अटकपूर्व जामिनासाठी येथील न्यायालयात येतील, असा कयास व्यक्त केला जात असताना प्रत्यक्षात त्यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) लेंडन मोंतेरो यांनी आज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यामुळे सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत.
लेंडन मोंतेरो यांच्या या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. लेंडन यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी अर्ज सादर केला आहे. अर्जाचा तपशील मिळू शकलेला नाही पण नादिया प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभाग आपणाला नाहक अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्यक्षात आपण पर्यटनमंत्र्यांचा ओएसडी होतो व त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी आपला कोणताच संबंध नाही यास्तव आपणास दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
लेंडन यांना परवा शनिवारीच गुन्हा अन्वेषण विभागाकडून तपासासाठी पाचारण केले गेले असता त्यांनी समन्स घेऊन आलेल्यांकडे आपला त्या प्रकरणाशी काही संबंध नाही असे सांगून आपणाला कशाला बोलावले आहे, अशी विचारणा केली होती व ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते, तेव्हाच ते अटकपूर्व जामिनासाठी जातील, असा कयास केला गेला होता.
लेंडन हे जरी मिकींचे ओएसडी असले तरी ते एक बडे प्रस्थ मानले जात होते.त्यामुळेच पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्षपदी मिकींनी त्यांची वर्णी लावली होते. त्यांच्या अत्यंत विश्र्वासातील व्यक्ती म्हणून त्यांची गणना होत होती, म्हणून गुन्हा अन्वेषण विभागाने चौकशीसाठी पाचारण केलेल्या मिकींपाठोपाठ त्यांचा क्रम लागत होता. त्यांनी तोंड उघडले तर नादिया प्रकरणाचे कोडे सहजपणे उलगडेल, असा तपास अधिकाऱ्यांना विश्र्वास आहे.

व्यावसायिक शिक्षणासाठी खास आर्थिक साहाय्य योजना

तीनवर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्रांची घोषणा

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - व्यावसायिक शिक्षण स्पर्धा परीक्षांत गोमंतकीय विद्यार्थ्यांनी मारलेली बाजी स्फूर्तिदायक आहे. यापुढे आयआयटी, एमटेक, आयआयएम व बिट्स पिलानी आदी प्रतिष्ठित व्यावसायिक शिक्षण संस्थांत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण खात्यामार्फत खास आर्थिक साहाय्य करण्याची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली. पारंपरिक गोमंतकीय व्यावसायिकांच्या पुनरुज्जीवनासाठी मदतीचा हात दिला जाईल व अर्थसंकल्पात घोषित केलेली ही योजना महिन्याअखेरीस कार्यन्वित होईल, असेही ते म्हणाले.
राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सरकारच्या कार्याचे प्रगतिपुस्तक व "लघुपट' प्रकाशन सोहळा आज मॅकनिज पॅलेस सभागृहात पार पडला. "गोल्डन ग्लो' या सरकारच्या तीन वर्षांच्या काळातील कामगिरीचा आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याहस्ते करण्यात आले. "गोवा मार्चीस ऑन' या धर्मानंद वेर्णेकर यांनी माहिती व प्रसिद्धी खात्याच्या साहाय्याने तयार केलेल्या गोव्याच्या मार्गक्रमणाविषयी खास माहिती देणाऱ्या लघुपटाचेही प्रकाशन यावेळी झाले. या सोहळ्याला गृहमंत्री रवी नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा, मगोचे आमदार दीपक ढवळीकर, मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, माहिती व प्रसिद्धी खात्याचे सचिव तथा विकास आयुक्त नरेंद्र कुमार, सरकारचे प्रसिद्धी आणि प्रसारमाध्यम सल्लागार विष्णू सुर्या वाघ व माहिती खात्याचे संचालक मिनीन पेरीस हजर होते.
आपल्या शैक्षणिक कुवतीवर पुढे आलेल्या विद्यार्थ्यांना केवळ पैशांअभावी प्रतिष्ठित व्यावसायिक शैक्षणिक संस्थांत शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागू नये यासाठी ही खास योजना तयार केली आहे. या योजनेअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क, कॅन्टीन व इतर खर्चापोटी ४ हजार, लॅपटॉप व इतर साहित्य खरेदीसाठी ७५ हजार व पुस्तके खरेदीसाठी १५ हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य मिळेल. विद्यार्थी गोव्यात जन्मलेला असावा व १५ वर्षे त्याचे गोव्यात वास्तव्य असावे, अशी अट असून विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न साडेचार लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, असेही कामत म्हणाले. गोव्यातील पारंपरिक व्यावसायिकांना मदतीचा हात देण्यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेली आर्थिक साहाय्यतेची योजना या महिन्याअखेरीस कार्यन्वित होईल. प्रादेशिक आराखडा २०२१ अंतर्गत पेडणे व काणकोण तालुक्याचे आराखडे या महिन्याच्या अखेरीस उघड होतील व पुढील दोन महिन्यांच्या काळात संपूर्ण आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहितीही कामत यांनी दिली. आपण कधीच न्यूनगंड धरला नाही. जनतेला हवे आहे तेच आपण केले आहे व करीत आहे. प्रसंगी जनतेच्या मागणीचा आदर राखून विशेष आर्थिक क्षेत्र रद्द करण्यासारखे कणखर निर्णयही आपण घेतले, असे कामत म्हणाले. शैक्षणिक स्तरावर समुपदेशनाची व्यवस्था केली जाणार आहे, असेही त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी उद्घाटन केलेल्या गोवा ब्रॉडबॅण्ड योजना पूर्णत्वास आली आहे. पुढील महिन्यापासून आपण मडगावहून थेट सर्व तालुका मामलेदारांशी संवाद साधणार असल्याचे सांगून या योजनेअंतर्गत नागरिकांना सेवा देण्यासंबंधीची आखणी सुरू असल्याचे ते म्हणाले. श्रीमती सोनिया गांधी यांच्याहस्ते पायाभरणी झालेल्या दोनापावला येथील राजीव गांधी आयटी हॅबिटेट प्रकल्पासंबंधी महामंडळाचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी प्रयत्न सुरू केल्याचेही ते म्हणाले. लोकांचा जास्तीत जास्त सहभाग असलेल्या खात्यांच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न नुकतेच कुठे यशस्वी ठरत असल्याचेही ते म्हणाले.
सुरुवातीला मिनीन पेरीस यांनी स्वागत केले. विष्णू वाघ यांनी प्रास्ताविक केले. मुख्य सचिव संजय श्रीवास्तव व विकास आयुक्त नरेंद्र कुमार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या शेवटी "गोवा मार्चिस ऑन' या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

आणि पूजाचा मृतदेह विहिरीत सापडला!

म्हापसा, दि. ७ (प्रतिनिधी) - कर्नाटकमध्ये आपल्या गावी गेलेला म्हापशाचा एक भाजीविक्रेता आज शाळा सुरू होणार असल्याने उसकई येथे परतला खरा, पण दुर्दैवाने त्याला आपली छोटी मुलगी (साडेचार वर्षे) आज गमवावी लागली. पुजा या साडेचार वर्षीय मुलीचा मृतदेह पाहण्याची वेळ त्याच्यावर आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेखर पवार आज सकाळी साडेसहा वाजता गावाहून आपली पत्नी रेणुका व दोन मुलींसह उसकईला परतला. त्यानंतर साडेआठच्या सुमारास त्याने पत्नी व मुलींसह बस्तोडा येथील होली क्रॉस हायस्कूलमध्ये जाऊन प्रवेशाचे सोपस्कार केले व कुटुंबास घरी पाठविले. उसकईला परत आल्यावर प्रवासामुळे दमलेली पत्नी व मुले झोपी गेली. दुपारी ज्यावेळी शेखर म्हापशाहून घरी आला, त्यावेळी त्याला पूजा कुठे दिसली नाही. सर्वांनी तिची शोधाशोध केली पण ती न सापडल्याने अखेर त्यांनी म्हापसा पोलिस ठाण्यावर तक्रार नोंदविली. पुन्हा शोध जारी केल्यावर घरापासून सुमारे दीडशे मीटर अंतरावरील विहिरीत दुर्दैवी पुजाचा मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेमुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिस उपनिरीक्षक नितीन हळर्णकर यांनी घटनेचा पंचनामा केला व पुजाचा मृतदेह बांबोळी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला.

Monday 7 June, 2010

मिकी अद्याप बेपत्ताच...!

आज अटकपूर्व जामिनासाठी अर्ज?

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - नादिया तोरादो हिच्या संशयास्पद झालेल्या मृत्युप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाला दुसऱ्या दिवशी येतो म्हणून सांगून गेलेले माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको आजही जबाब नोंदवण्यासाठी फिरकले नाही. मिकी दोन दिवस गायब झाल्याने पोलिसांच्या तपासकामाला खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, पोलिसांना हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी हवे असलेले पुरावेही नष्ट होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
काल एकाएकी मिकी पाशेको आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भूमिगत झाले होते. तेव्हापासून त्यांचा पोलिस शोध घेण्याचा प्रयत्न करीत असून अद्याप त्यांचा माग लागला नसल्याचे "सीआयडी' सूत्रांनी सांगितले. काल "सीआयडी' कार्यालयात ते फिरकले नसल्याने आज सकाळी जबाब नोंदवण्यासाठी ते हजर राहणार असल्याची वावटळ उडवण्यात आली होती. आजही ते हजर राहिले नसल्याने त्याच्या निकटवर्तीही आता ते आपल्या वकिलांच्या पथकासह उद्या दुपारपर्यंत गुन्हा अन्वेषण विभागात हजर होणार असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. तसेच, अटकपूर्व जामिनासाठीही मिकी अर्ज करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज सकाळपासून या प्रकरणाच्या तपास अधिकारी सुनीता सावंत यांनी "सवेरा' या महिला संघटनेच्या अध्यक्ष तारा केरकर व "बालयांचो एकवट'च्या आवडा व्हियेगस यांच्या जबान्या नोंदवून घेतल्या. तसेच मयत नादियाची आई सोनिया व दोघा भावांनाही आज गुन्हा अन्वेषण विभागात पाचारण करण्यात आले होते. नादियाची आई सोनिया हिला या प्रकरणाची अनेक गुपिते माहिती असल्याचा "सीआयडी'ला पक्का संशय असल्याने तिने सध्या पोलिस आपला छळ करीत असल्याची भूमिका घेतली आहे. मात्र पोलिसांनी कोणत्याही "आरोपां'कडे लक्ष न देता या प्रकरणात दोषी व्यक्तीचा भांडाफोड करण्यासाठी पुराव्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे. दुपारी ४ वाजता गुन्हा अन्वेषण विभागाचे एक पथक सोनिया व नादियाच्या दोघा भावांना सोबत घेऊन काही पुरावे गोळा करण्यासाठी गेले होते. परंतु, नेमके त्यांच्या हाती काय लागले हे कळू शकले नाही. या प्रकरणात नादियाच्या घरी काम करणारी मोलकरणीचीही जबानी नोंद करून घेतली जाणार आहे.
आत्महत्या की खून...
नादियाने चुकून रेटॉल घेतले की तिला ते कोणी घेण्यास भाग पाडले, या दृष्टीने सध्या पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. रेटॉल घेण्याच्या आदल्या रात्री नादिया मिकी पाशेको याच्याबरोबर जेवायला बाहेर गेली होती, अशी माहिती उघडकीस आली आहे. यावेळी काय घडले. त्यानंतर ती घरी परतल्यावर पोट बिघडल्याने झोपली होती, अशीही माहिती उघडकीस आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने दात घासण्याची पेस्ट समजून रेटॉल घेतले होते. त्याच्या तब्बल तीन तासानंतर तिला दवाखान्यात हालवण्यात आले. तिला वैद्यकीय उपचार देण्यास एवढा उशीर का लावला, असाही प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांना त्याविषयी नादियाच्या आईशी चौकशी सुरू केली आहे. तसेच, नादियाने विष घेतल्याची माहिती मिळाल्यावर ती माहिती पोलिसांपासून का लपवण्यात आली, त्यासाठी तिच्यावर कोणाचा दबाव होता, याचाही तपास लावला जात आहे.
बायका नाचवणारे लोकप्रतिनिधी नकोत ः तारा केरकर
आम्हाला पहिल्या दिवसांपासून या प्रकरणात मिकी पाशेको यांचा हात असल्याची संशय होता. परंतु, आम्ही त्यांचे नाव उघडपणे घेतले नव्हते. आता त्यानेच या प्रकरणाचा दाखला देत राजीनामा देऊन आपल्या सहभागाला पुष्टी दिली आहे. एक लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा गैरवापर करून बायका नाचवतो हे अत्यंत निषेधार्थ आहे, अशी टीका "सवेरा' या महिला संघटनेच्या तारा केरकर यांनी केला. "सीआयडी'ने तुमची चौकशी का केली असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, आम्हाला या प्रकरणाची माहिती कुठून व कशी मिळाली याबद्दल त्यांना जाणून घ्यायचे होते व त्या दिशेने त्यांनी माझा जबाब नोंदवून घेतला असल्याचे सौ. केरकर यांनी सांगितले. सुमारे पाच तास तारा केरकर यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. दुपारचे जेवणही त्यांना "सीआयडी'च्याच कार्यालयात देण्यात आले.

मेकॅनिकची चौकशी...
नादिया नेहमी आपले वाहन ज्या गॅरेजमध्ये नेत होती व तिचे वाहन जो मेकॅनिक दुरुस्त करीत होता, त्याचीही आज चौकशी करण्यात आली. "त्या' मेकॅनिकला घेऊन मायणा कुडतरी पोलिस आज दुपारी गुन्हा अन्वेषण विभागात हजर झाले होते. यावेळी त्या मेकॅनिकला बरोबर घेऊन या प्रकरणाच्या तपास अधिकारी निरीक्षक सुनीता सावंत, उपअधीक्षक मोहन नाईक हे अधिक तपासासाठी पोलिस वाहनाने निघून गेले.

नीळकंठ हळर्णकर यांना हिरवा कंदील
मिकी पाशेको यांनी राजीनामा देताच मंत्रिपदासाठी पुढे आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांचा नावाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या नावाबद्दल "ना हरकत दाखला' दिला असून आता केवळ कॉंग्रेस "हायकमांड'च्या दाखल्याची वाट पाहिली जात आहे. तो उद्या सकाळपर्यंत मिळणार असल्याचे सांगितले जात असून उद्या सायंकाळी राजभवनावर नीळकंठ हळर्णकर मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत परिस्थिती पाहिल्यास हळर्णकर यांना पर्यटन खातेच मिळणार असल्याचे बोलले जात आहे. खाते बदल केल्यास पुन्हा एकदा मंत्रिमंडळात कलह माजण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री खातेबदल करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र काही जणांनी पर्यटन खाते आपल्या गळी पाडून घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

पेट्रोल-डिझेल दरवाढीची "भडकावू' बैठक आज

-स्वयंपाकाचा गॅस २५ ते ५०,
पेट्रोल साडेतीन रुपयांनी महाग?


नवी दिल्ली, दि. ६ - तेल कंपन्यांना होणारे नुकसान काही अंशी भरून काढण्यासाठी सर्वसामान्यांवर इंधन दरवाढीचा प्रचंड बोझा टाकण्याचा निर्णय घेणारी मंत्रिस्तरीय समितीची बैठक उद्या सोमवारी होत आहे. पेट्रोल, डिझेलसोबतच केरोसीन आणि स्वयंपाकाचा गॅसही महागणार असल्याची शक्यता या बैठकीच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली जात आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वातील एक मंत्रिगट या इंधन दरवाढीचा निर्णय घेणार आहे. यासंदर्भातील किरीट पारेख समितीच्या शिफारशींवरही बैठकीत चर्चा होणार आहे. आयातीत भावापेक्षा कमी दरात इंधन विकणे फार काळपर्यंत सहन केले जाऊ शकत नाही. जर दरवाढ केली नाही तर सरकारला या सर्व इंधनांच्या आयातीतून होणारे ७२ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. त्यातही यापूर्वी या दरवाढीतून केरोसीन आणि गॅस सिलेंडरला वगळण्यात आले होते. पण, आता त्यांचीही भाववाढ अपरिहार्य मानली जात आहे.
प्रस्तावित दरवाढीमध्ये पेट्रोल ३.३५ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. सध्या राजधानी दिल्लीत पेट्रोल ४७.९३ रुपये प्रति लीटर इतक्या किमतीत मिळत आहे. त्यात तेल कंपन्यांना दिवसाला १४.८१ कोटी रुपये इतके नुकसान सहन करावे लागत आहे. सध्या डिझेल ३८.१० रुपये किमतीत मिळत आहे. त्यामुळे कंपन्यांना दररोज ६२.९६ कोटी रुपये इतके नुकसान सहन करावे लागत आहे. त्यात ३.४९ रुपयांची भाववाढ प्रस्तावित आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोेलियम आणि भारत पेट्रोलियम यांना सध्या दरदिवशी सुमारे २०३ कोटी रुपयाचे नुकसान या इंधनाच्या विक्रीमागे सहन करावे लागत आहे.
अर्थात, पारेख समितीने केरोसीनमध्ये ६ रुपये प्रति लीटर आणि एलपीजी गॅसमध्ये १०० रुपये इतकी दरवाढ सुचविली आहे. ही शिफारस आपल्याला मान्य नसल्याचे मंत्रिगटाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे केरोसीन आणि गॅस सिलेंडरची दरवाढ यापेक्षा कमी राहील, अशी आशा केली जात आहे. पण, त्यातही दरवाढीचा भडका उडणे नक्कीच मानले जात आहे. सिलेंडरची दरवाढ २५ ते ५० रुपयांची राहू शकते.
प्रणव मुखर्जी यांच्यासह या मंत्रिगटात पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा, कृषिमंत्री शरद पवार, रसायने आणि खते मंत्री एम. के. अलागिरी, रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, रस्ते वाहतूक मंत्री कमलनाथ आणि योजना आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालिया यांचा समावेश आहे. या मंत्रिगटाचा निर्णय अंतिम राहणार आहे.

नादियाची आई सोनिया ठरणार महत्त्वाचा दुवा?

वास्तव लपवत असल्याचा सीआयडीला संशय

मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी) : नादिया तोरादो प्रकरणाने सध्या संपूर्ण गोवा ढवळून निघालेला असताना व राष्ट्रीय माध्यमांनीदेखील हे प्रकरण उचलून धरले असल्याने सर्वांचेच लक्ष यासंदर्भातील तपासाकडे लागले आहे. आज रविवार असल्याने जरी तपासात विशेष प्रगती झालेली नसली तरी गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) आता मयत नादियाच्या आई श्रीमती सोनिया यांच्यावरच सारे लक्ष केंद्रित केलेले आहे. संपूर्ण प्रकरणाच्या त्या साक्षीदार आहेत व त्याच वस्तुस्थिती लपवून ठेवत आहेत, अशी खात्री असल्याने त्यांच्याकडून सत्य वदवून घेण्यावर तपास अधिकाऱ्यांचा भर राहील, असे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार दुबईहून परतल्यापासून नादिया व मिकी यांचे संबंध बिघडले होते. नादिया पुनःपुन्हा आत्महत्येची धमकी देत होती. उभयतांकडून तिची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू होता; पण ती कोणाचाही ऐकायला तयार नव्हती. मात्र उभयतांचे नेमके कोणत्या कारणावरून बिनसले होते ते अजून स्पष्ट झालेले नाही. नादियाकडे काम करणाऱ्या मोलकरीणींनी दिलेल्या जबानीत उभयतांचे कडाक्याचे भांडण झाल्याचे सांगितलेले असले तरी त्यामागील कारणांबाबत ती अनभिज्ञ असल्याचे दिसून आल्याने या भांडणाच्या कारणांबाबत तपासयंत्रणेलाही उत्कंठा लागली आहे.
सूत्रांना मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रत्येकवेळी सोनिया या मिकींची बाजू घेत होत्या व त्यांतून मायलेकीतही वाद होत होता. नादियाने रेटॉल हे उंदीर मारण्याचे विष घेतले त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी रात्री तिने अगोदर मिकी यांना व नंतर आपल्या आईला आत्महत्येची धमकी दिली होती. त्या दोघांनी आपल्या आयुष्याची वाट लावली अशी तक्रार ती हल्ली करीत असल्याने त्यांनी तिची आत्महत्येची धमकी गांभीर्याने घेतली नाही. नंतर तिने घराबाहेर असलेल्या गाडीत जाऊन ती आतून" लॉक' केली व रेटॉल घेतले. त्यामुळे बराच वेळपर्यंत ते कुणालाच कळले नाही. ती गाडीत बसून आहे, दार उघडत नाही व प्रतिसाद देत नाही हा प्रकार लक्षात आल्यावर तिच्या आईने मिकींना बोलावले. त्यांनी येऊन बराच वेळपर्यंत खटपट केली; पण दार उघडता येत नाही हे पाहून गाडीच्या काचा फोडून नादियाला बाहेर काढून घरात नेले. तेथे तिला शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्नांत तिने कित्येक उलट्या केल्या.
तिला गाडीतून उचलून बाहेर आणताना तिच्या अंगावर ओरखडे पडल्याचेही दिसून आले आहे. तपास यंत्रणांना जरी ही सारी माहिती मिळालेली असली तरी सदर गाडी नाहीशी करण्यात आली आहे. आता तपास यंत्रणा सध्या शिकारी कुत्र्यांप्रमाणे गाडीचा माग काढत आहेत. या एकंदर पार्श्र्वभूमीमुळेच तिला अपोलो व्हिक्टरमध्ये दाखल करण्यास विलंब झाला, असा निष्कर्ष आता काढला जात आहे.
सोनिया यांनी जर तपासयंत्रणांना सहकार्य केले तर या प्रकरणाचा गुंता सुटेल, असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र त्यांनी जर मिकींची पाठराखण करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले तर ही जोडगोळी गोत्यात येईल, असा कयास व्यक्त केला जात आहे. ह्या प्रकरणातील त्या महत्त्वाचा दुवा ठरणार असल्याने सीआयडी सध्या त्यांच्यावर सक्त नजर ठेवून आहे.

शशांक मनोहरांमुळे शरद पवारांची कोंडी

नवी दिल्ली - प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या चेंडूवर झकास फटका मारावा आणि धाव घेत असताना आपल्याच साथीदाराचा पाय अडकून धावबाद व्हावे, असाच प्रकार केंद्रीय कृषिमंत्री व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबतीत घडला आहे. "आयपीएल'च्या पुणे संघासाठी बोली लावणाऱ्या सिटी कॉपोर्रेशनमध्ये आपल्या कुटुंबीयांचे शेअर्स असले तरी ती बोली कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी वैयक्तिक पातळीवर लावली होती, असा दावा करणाऱ्या पवारांना बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनीच अडचणीत आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे."या बोलीसाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये सिटी कॉर्पोरेशनचीच माहिती असून त्यात देशपांडेंची वैयक्तिक माहिती नव्हती,' असा खुलासा मनोहर यांनी केला.
सिटी कॉर्पोरेशन कंपनीत खुद्द पवार, त्यांची पत्नी प्रतिभा आणि कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या १०० टक्के मालकी असलेल्या दोन कंपन्यांचे १६ टक्के शेअर असल्याचे वृत्त 'टाइम्स'ने प्रसिद्ध करताच गुरुवारी एकच खळबळ उडाली. पवार कुटुंबीयांकडून शुक्रवारी खुलासेही करण्यात आले. परंतु, पुणे टीम बोलीशी आयपीएलचे विद्यमान अध्यक्ष चिरायू अमीन यांचाही संबंध असल्याचे सांगून माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी शुक्रवारी नवे वादळ उठवले. मोदी यांच्या तुफानी वक्तव्यांना तोंड देण्यासाठी मनोहर शनिवारी पूर्ण ताकदीने उतरले. चिरायू अमीन यांचा पुणे टीमच्या बोलाशी काडीमात्र संबंध नसून मोदी बीसीसीआयची प्रतिमा डागाळणारे चुकीचे आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेत पवारांविषयीच्या 'गुगली' प्रश्नांना उत्तरे देताना मात्र मनोहर त्रिफळाचीत झाले. पुणे टीमच्या बोलीसाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये सिटी कॉर्पोरेशनची माहिती असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडेंची वैयक्तिक माहिती त्यात नव्हती. देशपांडेची ही वैयक्तिक बोली असती तर पुरेशा माहितीअभावी ती फेटाळली गेली असती, असे विधान मनोहर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केले. त्यामुळे 'ही बोली देशपांडे यांची वैयक्तिक बोली होती', असे सांगणारे पवार अडचणीत आले असून मनोहर यांनी कळत-नकळत पवारांचा दावा खोटा पाडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिवसेनेला हवीय पवारांची "विकेट'
रायगड ः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या वक्तव्यामुळे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार चांगलेच अडचणीत आले असतानाच शिवसेनेलाही आता पवारांची "विकेट' हवी आहे. "आयपीएल'मध्ये (इंडियन प्रीमियर लीग) बोली लावणाऱ्यांमध्ये पवार कुटुंबीयांचाही सहभाग असल्याचे पुरावे उघड झाल्याने, शरद पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी तोफ शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज रायगडावरून डागली!
आयपीएल घोटाळ्यामध्ये नेहमीच संशयाची सुई शरद पवारांच्या दिशेने राहिली होती. त्यामुळे आता पवारांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी त्यांचा राजीनामा घेऊन आपल्या मंत्र्याची चौकशी करण्याची हिंमत दाखवली पाहिजे. जे निकष शशी थरूर यांच्यासाठी लावण्यात आले तेच निकष पवारांसाठीही लावायला हवेत, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आज येथे पत्रकारांशी बोेलताना केली.

दाबोळी अपघातात दोघे तरुण जागीच ठार

वास्को, दि. ६ (प्रतिनिधी)- भरवेगाने दुचाकीवरून तिघेजण दाबोळी विमानतळाच्या दिशेने येत असताना वाहनावरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खडकाळ भागात जाऊन धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात महम्मद मुस्तकीन (२५) हा बिहारमधील तरुण व महम्मद कलीन (२०) हा उत्तर प्रदेशातील तरुण असे दोघे जण आज जागीच ठार झाले तर एकाची प्रकृती अतिशय गंभीर आहे. आज संध्याकाळी वेर्णा - दाबोळी महामार्गावर घडलेल्या अपघातात मरण पावलेले दोनही तरुण सांकवाळ औद्योगिक वसाहतीत काम करणारे असल्याची माहिती उपलब्ध झालेली असून तिसराही त्यांच्यासोबत नोकरीस होता.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी ४.३० च्या सुमारास सदर अपघात घडला. वेर्णा महामार्गावरून तिघेही"बजाज डिस्कव्हर' दुचाकीवरून (क्रः एमएच ०२ बीसी ६८५२) दाबोळी विमानतळाच्या बाजूने भर वेगात येत असताना ते "गेट गारमेंट' आस्थापनासमोरील वळणावर पोचले असता अचानक त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते रस्त्याच्या बाहेर असलेल्या खडकाळ भागात आपटले. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेले तीनही युवक यावेळी रस्त्यावर फेकले गेले. तसेच सदर अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. वेर्णा पोलिसांना सदर अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन रस्त्यावर पडलेल्या तीनही युवकांना इस्पितळात दाखल केले (दोघांना मडगावच्या हॉस्पिसियोत तर एकाला बांबोळीच्या गो.मे.कॉ.मध्ये) असता मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळात नेण्यात आलेल्या दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याचे तेथे घोषित करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महम्मद रिझवान याची प्रकृती अतिशय गंभीर आहे.
वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुशांत गावस पुढील तपास करीत आहेत.

आयफा'त "थ्री इडियट्स'ची धूम

कोलंबो, दि. ६ - यंदाच्या "आयफा' पुरस्कार वितरण सोहोळ्यात सतत "ऑल इज वेल'ची धून वाजत होती. कारण हे गाणे असणाऱ्या "थ्री इडियट्स' या चित्रपटाने विविध गटांतील १७ पुरस्कार पटकावित संपूर्ण सोहोळाच जणू आपल्या खिशात टाकला.
इंडियन इंटरनॅशनल फिल्म ऍकेडमी अर्थात आयफा सोहोळ्याचे यंदा अकरावे वर्ष होते. या सोहोळ्यासाठी श्रीलंकेतील कोलंबो हे ठिकाण निवडण्यात आले. अनेक तामिळ संघटनांनी त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्याने अनेक मोठे कलावंत अनुपस्थित होते. आयफाचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असणारा अमिताभ बच्चन, शाहरूख खान, कमल हसन, मणिरत्नम यांच्यासह अनेक तारे-तारकांनी यंदाच्या सोहोळ्याकडे पाठ फिरविली.
या कार्यक्रमात जवळपास सर्वच पुरस्कारांमध्ये आमीर खान अभिनीत "थ्री इडियट्स'ने माहौेल केेला. मुख्य १३ श्रेणीपैकी १२ पुरस्कारांसाठी त्यांना नामांकने मिळाली होती. त्यापैकी ८ पुरस्कार या चित्रपटाने पटकाविले. सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक (राजकुमार हिराणी), सर्वोत्कृष्ट कथा (अभिजात जोशी, विधू विनोद चोप्रा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (करिना कपूर ), सहायक अभिनेता (शर्मन जोशी) खलनायक (बोमन इराणी), पार्श्वगायक (शान - बहती हवा सा था वो), गीतकार (स्वानंद किरकिरे), नवोदित अभिनेता (ओमी वैद्य) या पुरस्कारांचा समावेश होता.
याशिवाय सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री दिव्या दत्ता (दिल्ली ६), विनोदी अभिनेता संजय दत्त (ऑल द बेस्ट), संगीतकार प्रीतम (लव आज कल), पार्श्वगायिका कविता सेठ (इकतारा- वेक अप सीड), नवोदित अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (अलादीन) आणि माही गिल (देव डी), नवोदित अभिनेता जॅकी भगनानी (कल किसने देखा) हे सर्व विजेते ठरले.
जे. ओमप्रकाश, झीनतचा सत्कार
अनेक उत्तमोत्तम चित्रपट देणारे जे. ओमप्रकाश आणि बॉलिवूडमधील पहिली ग्लॅमरस अभिनेत्री ठरलेली झीनत अमान यांना आयफाने विशेष जीवन गौरवने सन्मानित केले.

Sunday 6 June, 2010

अखेर मिकी यांचा राजीनामा

नादिया मृत्यूप्रकरण भोवले,
पोलिसांना गुंगारा देऊन मिकी 'बेपत्ता',
रिक्त मंत्रिपदासाठी जबरदस्त रस्सीखेच

पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): लोटली येथील नादिया तोरादो या महिलेच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी काल गुन्हे अन्वेषण विभागाकडून तब्बल आठ तास चौकशीला सामोरे गेलेले पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आज अचानकपणे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. आज सकाळी १० वाजता सीआयडीसमोर पुन्हा जबानीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते, मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांनी पाठ फिरवल्याने पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. राज्यातील सर्व पोलिस स्थानकांना तशी सूचना देण्यात आली आहे. मिकी यांचे अधिकृत राजीनामापत्र आपल्याला मिळाले व ते राज्यपाल डॉ. एस. एस. सिद्धू यांना पाठवले असता त्यांनी ते तात्काळ स्वीकारल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर मिकी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले मंत्रिपद कोणाला मिळणार यावरून विविध नेत्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे.
लोटली येथील नादिया मृत्यूप्रकरणी मिकी यांच्याभोवती संशयाचे ढग अधिक गडद होऊ लागले आहेत. सीआयडीकडून काल आठ तासांची जबानी घेतल्यानंतर बिथरलेले मिकी आज जबानीसाठी पुन्हा पाचारण करूनही रात्री उशिरापर्यंत गैरहजर राहिले. त्यामुळे पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली. दरम्यान, दुपारी त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सादर केला. कामत यांनी तो राज्यपालांकडे पाठवला असता तो तात्काळ मंजूर करण्यात आला. मिकी यांची चौकशी अजून पूर्ण व्हायची आहे. म्हणून ते पोलिसांना हवे आहेत. ते गैरहजर राहिल्याने राज्यातील सर्व पोलिस स्थानकांना सतर्क करण्यात आले आहे. त्यांचा शोध घेण्याचे आदेश जारी केल्याची माहिती पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी दिली.
दाबोळी विमानतळावरही पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त लावण्यात आला होता. याठिकाणी ते गोव्याबाहेर जाण्यासाठी आल्यास तिथेच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते, अशीही माहिती मिळाली आहे.
मिकी यांच्या अटकेच्या शक्यतेबाबत मात्र देशपांडे यांनी काहीही सांगण्याचे नाकारले. मिकी यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसांसमोर हजर होतील,असे संकेत मिळत होते. मिकी यांचे वकील विक्रम वर्मा यांनीही आपला मोबाईल बंद ठेवल्याने त्यांची पुढील कृती काय असेल, हे समजू शकले नाही.मिकी पाशेको यांचे मंत्रिपद राष्ट्रवादीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना मिळणार काय, असा सवाल कामत यांना केला असता त्यांनी याबाबतचा निर्णय दोन्ही पक्षाचे श्रेष्ठी घेतील, असे सांगितले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांनी मात्र हे पद आघाडीच्या धर्मानुसार राष्ट्रवादीकडेच राहणार असून नीळकंठ हळर्णकर यांची मंत्रिपदी नेमणूक होईल, असा आशावाद व्यक्त केला.
या संपूर्ण घटनाक्रमाचा अहवाल संध्याकाळपर्यंत तयार करून दिल्लीत पाठवून देणार असल्याने नव्या मंत्रिपदाचा शपथविधी येत्या दोन दिवसांत होईल, असेही संकेत कामत यांनी दिले. मिकी यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशा प्रसंगी त्यांनी राजीनामा देणेच योग्य होते,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.आपण काल रात्री यासंबंधी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती,असेही त्यांनी सांगितले.
मिकी पाशेको यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी होत्या. महिलांबाबत त्यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्येही श्रेष्ठींनी गंभीरतेने घेतली होती. यावेळी मात्र मर्यादेचे उल्लंघन झाल्याने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश श्रेष्ठींनी दिले,असे श्री. देशप्रभू यांनी दिल्लीहून सांगितले.
दरम्यान, नादियाचा पती विन्स्टन बार्रेटो, नादियाची आई सोनिया व तिचे भाऊ सीआयडीपुढे सकाळीच हजर झाले होते. कालच्या चौकशीनंतर आपल्याला याप्रकरणात गोवले जाणार याची चाहूल लागल्यानेच मिकी "बेपत्ता' झाल्याची खबर आहे. मिकी यांना अटक होईल याचे सूतोवाच पोलिसांकडून कालच केले गेले होते. त्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यापलीकडे त्यांच्याकडे पर्याय नव्हता. हे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच ते बेपत्ता झाल्याचे सांगितले जात आहे. तथापि, त्यामुळे ते आणखी अडचणीत येण्याची जास्त शक्यता आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटानेही त्यांची साथ सोडल्याची खबर आहे. मिकी यांच्या राजीनाम्यामुळे सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही, असे आघाडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. नीळकंठ हळर्णकर यांना वगळून हे पद कॉंग्रेसला देण्याचा प्रयत्न झाला तरच गोंधळ होण्याचा संभव आहे. कामत यांनाही हा गोंधळ नको असल्याने हे पद राष्ट्रवादीला मिळावे, अशी त्यांची मनोधारणा आहे.
अन्य कलंकितांनाही घरी पाठवा : भाजप
केवळ एका मिकींनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने सरकारची प्रतिमा स्वच्छ होणार नाही. विविध घोटाळ्यात अडकलेले इतरही मंत्री या सरकारात आहेत. त्यांनाही घरी पाठवा, अशी आक्रमक प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली. ड्रग माफिया प्रकरण, बेकायदा खाणी, अबकारी घोटाळा, भूखंड माफिया अशा अनेक भानगडींनी अर्धेअधिक मंत्रिमंडळ गुंतले आहे. म्हणून मिकींना अर्धचंद्र देऊन हे सरकार "पवित्र' झाले असे समजण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
भाजपने यापूर्वीच याप्रकरणी मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा किंवा त्यांना डच्चू द्यावा, अशी मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी व्हावी व दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, ही मागणी कायम आहे, असे भाजपचे प्रवक्ते राजेंद्र आर्लेकर म्हणाले.
खातेपालटाची शक्यता
मिकी यांच्या राजीनाम्यामुळे आता खातेपालटाच्या मागणीला जोर प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिकी यांचे मंत्रिपद नीळकंठ हळर्णकर यांना द्यायचे झाल्यास त्यांच्याकडे पर्यटन खाते देण्याची शक्यता कमी असल्याने हे खाते अन्य कुणाकडे जाण्याची शक्यता आहे. नीळकंठ हळर्णकर यांनी मात्र आपण श्रेष्ठी काय निर्णय घेतील, त्याच्याशी बांधील असू असे स्पष्ट करून आपल्याला अमुक खात्याचीच गरज आहे असे नाही, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे प्रदेश नेते श्रेष्ठींशी चर्चा करूनच काय तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्षात अस्वस्थता
दरम्यान, मिकी पाशेको यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेस पक्षातही अस्वस्थता पसरली आहे. मिकी पाशेको यांचे मंत्रिपद कॉंग्रेसकडे राहावे यासाठी काही नेते कामत यांच्यावर दबाव टाकण्याच्या तयारीत आहेत. कुंभारजुव्याचे आमदार पांडुरंग मडकईकर व माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर हे रांगेत आहेत. तसेच उपसभापती माविन गुदिन्हो हेदेखील मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. परिणामी हे पद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता धुसर दिसत आहे.हळर्णकर हे पहिल्यांदाच निवडून आल्याने त्यांना एखादे महत्त्वाचे महामंडळ देऊन हे मंत्रिपद कॉंग्रेसकडे ठेवण्यासाठी काही नेत्यांनी व्यूहरचना आखली आहे. मुख्यमंत्री कामत हे मात्र या निर्णयाला अनुकूल नाहीत, असे कळते. पर्यटन खाते मिळवण्यासाठीही सध्याच्या काही मंत्र्यांत चुरस लागण्याचा संभव आहे. त्यामुळे सरकारच्या तीन वर्षांच्या पूर्ततेच्या मुहुर्तावर पुन्हा एकदा कामत यांना हा घटनाक्रम डोकेदुखी ठरण्याचीच दाट शक्यता आहे.
मंत्रिपद राष्ट्रवादीकडेच राहील
मिकी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा सादर करून पक्षशिस्तीचे पालन केले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. कार्मो पेगादो यांनी दिली. पोलिस या प्रकरणी तपास करीतच आहेच त्यामुळे सत्य उजेडात येणार आहे. प्रदेश राष्ट्रवादी या संपूर्ण प्रकरणी सातत्याने श्रेष्ठींच्या संपर्कात आहे व श्रेष्ठींनीच राजीनामा देण्याचा सल्ला मिकी पाशेको यांना दिला,असेही त्यांनी उघड केले. मिकी यांच्याकडील मंत्रिपद राष्ट्रवादीकडेच राहील यात शंका नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची निवडणूकपूर्वी आघाडी आहे व दोन्ही पक्ष आघाडीचा धर्म पाळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

खाजगी बस वाहतुकीसंदर्भात चर्चेसाठी १३ ला खास बैठक

बस मालक संघटनेचा स्वागतार्ह निर्णय
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी): राज्यातील खाजगी प्रवासी बस वाहतुकीविरोधात अनेकांकडून केल्या जाणाऱ्या वाढत्या तक्रारींची दखल घेण्याचे अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेने ठरवले आहे. त्या अनुषंगाने खाजगी बस मालक, प्रवासी, विद्यार्थी, वाहतूक खात्याचे अधिकारी व वाहतुकीसंबंधी जनजागृती करणाऱ्या विविध संस्था यांची संयुक्त बैठक येत्या १३ रोजी सकाळी १० वाजता टी. बी. कुन्हा सभागृहात बोलावण्यात आली आहे.
खाजगी प्रवासी बस वाहतुकीसंबंधी सखोल चर्चा व्हावी व यातून या तक्रारींचे निवारण करण्यासाठी निश्चित उपाययोजना आखता याव्यात हाच हा बैठकीमागचा हेतू असल्याचे मत संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात सरकारी कदंब महामंडळाबरोबर खाजगी प्रवासी बस व्यवसाय हा सार्वजनिक वाहतुकीचे मुख्य साधन आहे.कदंब महामंडळाच्या अनेक मर्यादा असल्या तरी राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक वाहतूक सेवेची मोठी जबाबदारी खाजगी प्रवासी वाहतुकीवर आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीविरोधात जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. प्रवाशांना कोंबून नेणे, विद्यार्थ्यांना अर्धे तिकीट नाकारणे, बेफाम वाहने हाकणे, वाहकांकडून प्रवाशांशी उद्धट भाषा करणे, गणवेष न वापरणे, तिकीट न देणे, कमी पैसे आकारणे, सुट्या पैशांवरून प्रवाशांची हुज्जत घालणे, कर्णकर्कश संगीत वाजवणे आदी तक्रारींचा समावेश आहे. दरम्यान, या तक्रारींचे निवारण करून खाजगी प्रवासी बस व्यवसाय लोकाभिमुख करणे हा बस मालक संघटनेचा उद्देश आहे. प्रवासी हेच बस मालकांचे दैवत आहे व त्यांना समाधान देणे हे प्रत्येक प्रवासी बस व्यावसायिकाचे कर्तव्य आहे, या विचारानेच हा व्यवसाय सुरू असल्याचे ताम्हणकर म्हणाले. दरम्यान, यापूर्वी संघटनेच्यावतीने अशा तक्रारींवर उपाययोजना आखण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण वाहतूक खात्याकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने हा तिढा कायम आहे.
विविध तक्रारींवर कायमचा तोडगा निघावा यासाठीच ही बैठक बोलावली आहे. जेणेकरून सर्व घटक एकत्र बसून यावर तोडगा काढतील. "मार्ग' संस्थेचे गुरूनाथ केळेकर, "गोवा कॅन'चे रोलॅंड मार्टिन्स, बस प्रवासी संघटनेचे नेते, नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था व वाहतूक खात्याचे अधिकारी या बैठकीस हजर राहणार आहेत. खाजगी प्रवासी वाहतुकीबाबत आपले विचार व सूचना या सर्व घटकांनी मांडाव्यात, असे आवाहन ताम्हणकर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ९२२५९०५६७९ या मोबाईलवर संपर्क साधावा.