Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 3 January, 2009

गळा दाबून बाळाचा खून केला; आईवडील दोषी

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): सहा दिवसांच्या कोवळ्या मुलीचा मातापित्यानेच
गळा दाबून खून करून पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली शांताराम रायकर गावकर व सौ. शशिकला शांताराम रायकर गावकर यांना आज बाल न्यायालयाने दोषी ठरवले. त्यांना येत्या सोमवारी म्हणजे ५ जानेवारी रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
सहा दिवसाच्या कोवळ्या मुलीचा गळा आवळून खून केल्याने आणि "डीएनए' चाचणीत त्या मुलीचे खुनी आईवडीलच असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आले.
खुनाची घटना ९ नोव्हेंबर २००६ रोजी सांगे येथे घडली होती. जिने त्या मुलीला जन्म दिला होता, तिच्याच भावाने ही तक्रार सांगे पोलिस स्थानकावर दाखल केली होती. त्यानंतर संशयितांवर भा.द.स ३०२ व बाल कायद्याच्या कलम ८ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. तसेच खुनानंतर मृताला पुरून पुरावे नष्ट केल्याने भा.दं.स.च्या कलम २०१ नुसार गुन्हा नोंदवला होता. "आमचे लग्न कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध झाल्याने आमच्यावर ही खोटी तक्रार दाखल केली आहे. मुलीचा मृत्यू नैसर्गिकच झाला आहे' असा बचाव आरोपींनी केला.
१४ सप्टेंबर ०६ रोजी रामनगर येथे शांताराम व शशिकला यांचे एका मंदिरात लग्न झाले होते. नंतर ते आपल्या घरी गेले असता तेव्हा शशिकला सात महिन्यांची गरोदर होती. याचवेळी तिने आपला नवरा बघत नाही. त्रास करतो, अशी तक्रार आमच्याकडे केली होती, असे सुरेश शंकर मिराशी याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गरोदर असतानाच तिचे लग्न झाल्याचेही म्हटले आहे. आरोपी शांताराम हा सांगे येथील एका फार्म हाऊसमधे नोकरीला होता. ३ नोव्हेंबर रोजी शशिकला प्रसववेदना सुरू झाल्याने तिला कुडचडे येथील सरकारी इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर तिला मडगाव येथील हॉस्पिसीयो इस्पितळात दाखल करण्यात आले. मग त्याच दिवशी येथून तिला गोमेकॉत हलवण्यात आले. त्या रात्री १०.२५ वाजता तिने एका मुलीला जन्म दिला.
काही दिवसात या फार्म हाऊसच्या मालकिणीने जन्मलेल्या मुलीविषयी विचारपूस केली असता, ती वारल्याचे शांताराम याने सांगितले. या नंतर शशिकला हिच्या माहेरची लोक आल्यानंतर त्यांनी त्या जन्माला आलेल्या बाळाविषयी विचारपूस केली. तेव्हा त्यांना संशय आल्याने सुरेश मिराशी याने याविषयीची पोलिस तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास सांगे पोलिस स्थानकाचे तेव्हाचे निरीक्षक रमेश गावकर यांनी केला होता. सरकारी वकील म्हणून पूनम भरणे यांनी तर, आरोपीच्या वतीने ऍड. महेश आमोणकर यांनी बाजू मांडली.

दोना पावला अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी

पणजी, दि. २ (प्रतिनिधी): नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात अपघाताच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली असून आज सकाळी बांबोळी दोना पावला रस्त्यावर वायंगिणी येथे झालेल्या ट्रक आणि दुचाकी यांच्यातील अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाले. तपन मंडल (२४) व राजेश पंडित (२६) अशी त्यांची नावे असून दोघांनाही उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
आज सकाळी १० च्या सुमारास तपन व राजेश दुचाकी जीए ०७ डी ४७०१ वरून बांबोळीहून दोना पावलाच्या दिशेने चालले होते. ट्रक क्रमांक जीए ०३ टी ६५४५ दोना पावलाहून बांबोळीच्या दिशेने जात होता. यावेळी वायंगीणी येथे एका वळणावर दोन्ही वाहनांची टक्कर झाली. त्यात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. मागे बसलेला तरुण फेकला गेला.
दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे इस्पितळातील सूत्रांनी सांगितले.
अपघाताचा पंचनामा हवालदार दुर्गाकुमार नावती यांनी केला व तेच तपास करीत आहेत.

म्हादई : भाजपला ऐनवेळी निमंत्रण, बैठकीला उपस्थित राहण्यास असमर्थ

पणजी, दि.२ (प्रतिनिधी): पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हादईप्रश्नावर चर्चेसाठी येत्या ५ जानेवारीला बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण भारतीय जनता पक्षाला शेवटच्या क्षणी देण्यात आल्याने या बैठकीस आपल्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे पत्रकारांना दिली.
आपण आपल्या सहकारी भाजप आमदारांसह फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या गोवा विधानसभा अधिवेशनाच्या तयारीत मग्न आहोत. सुमारे ६०० प्रश्न तयार करून ते मांडण्याचे काम अतिशय जिकिरीचे आहे.त्या कामात आपण व्यस्त आहोत, असे ते म्हणाले. दिल्लीत होणाऱ्या बैठकीची माहिती देणारे पत्र आपल्याला आजच मिळाले. म्हादईसंबंधी गेल्या चार वर्षांत घडलेल्या एकंदर कामाची माहिती आपल्याला दिलेलीच नाही किंवा सध्याच्या त्या ठिकाणच्या प्रगतीची श्वेतपत्रिकाही न देण्यात आल्याने त्या बैठकीला का म्हणून जायचे, असा प्रश्न पर्रीकर यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाय गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे हा वाद सोडवण्यासाठी लवाद स्थापन करण्याची मागणी केली आहे.आता बैठक घेऊन काहीच निष्पन्न होणार नसल्याचे मतही पर्रीकर यांनी व्यक्त केले.

Friday, 2 January, 2009

राज्यात ५ ठार : नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी अपघात

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांना मृत्यू आला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. पाचपैकी चार जणांचा वाहन अपघातात तर काणकोण येथे एकाचा अंगावर मातीची भिंत कोसळून मृत्यू झाला. तसेच राज्याच्या अन्य भागांत किरकोळ अपघात झाल्याची नोंद संबंधित पोलिस स्थानकात झाली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे सर्व अपघात अतिउत्साह व बेदरकारपणे वाहने हाकल्यामुळे झाले आहेत.
काल रात्री पेठे म्हापसा येथे झालेल्या स्विफ्ट वाहनाच्या भीषण अपघातात श्रीहर्ष दिवेकर (२७. राहणारा पर्वरी) व मेलबर्ट पिंटो (२६. राहणारा करासवाडा) हे जागीच ठार झाले. नववर्षाच्या स्वागतासाठी मित्रांनी आयोजिलेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठी हे दोघे मित्र जात होते. पेठे येथे एका वळणार पोहोचले असता चालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने जीए ०७ सी ३९८१ स्विफ्ट या वाहनाची रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या एका झाडाला जोरदार धडक बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की वाहनातील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
तसेच पहाटे ३ च्या सुमारास पणजीत "एनआयओ' चौक दोना पावला येथे आल्तो आणि टेंपो यांच्यात झालेल्या अपघातात भाटले पणजी येथील ख्रिस्तोफर जॉर्ज पिरिस याचा मृत्यू झाला. दोना पावला येथील हॉटेल सिदाद द गोवातील पार्टीत सहभागी होऊन ख्रिस्तोफर हा भाटले येथील आपल्या घरी परतत होता. यावेळी "एनआयओ'च्या चौकात पोचल्यावर समोरून येणाऱ्या टेंपोला त्याची जोरदार धडक बसली. जखमी अवस्थेत त्याला इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. ही माहिती पणजी पोलिसांनी दिली.
शेळी कोणकोण येथे रात्री १२.३० वाजता "महामार्ग १७ 'वर उभ्या असलेल्या गाईला धडक दिल्याने पाळोळे येथील दुचाकी चालक पॉली कार्दोज (३३) हा ठार झाला, तर दुचाकीचा मागे बसलेला संजय बांदेकर हा जखमी झाला. त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. रात्री मयत पॉली कार्दोज व संजय हा ऍक्टीव्हा स्कूटरवरून (जीए ०८ सी ०८२३) वरून पाळोळेहून कोणकोणच्या दिशेने चालले होते. यावेळी रस्त्यावर असलेल्या गाईला धडक बसल्याने हा अपघात झाला. पॉली याचा मृतदेह गोमॅकोच्या शवागरात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आमोणा काणकोण येथील आनंद गोविंद वेळीप यांच्या अंगावर मातीची काल भिंत कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याविषयीचा तपास काणकोण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक श्री. भगत करीत आहे.

पणजीतील त्रस्त गाडेवाले आज पर्रीकरांना भेटणार

पणजी, दि.१ (प्रतिनिधी) : पणजीतील गाडेवाल्यांच्या स्थलांतराचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे. त्यामुळे आता गाडेवाल्यांनी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची उद्या शुक्रवारी भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडायचे ठरवले आहे.
या स्थलांतरामुळे पारंपरिक पद्धतीने उभा केलेला व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असून महापालिकेची ही कृती पोटावर लाथ मारण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया गाडेवाल्यांनी व्यक्त केल्या आहेत.
पर्रीकर यांच्याशी चर्चेनंतरच गाडेवाले पुढील कृती ठरवणार आहेत.
पणजी शहरात विविध ठिकाणी कित्येक वर्षांपासून छोटामोठा व्यवसाय करणारे सुमारे ८८ गाडे हटवण्याची मोहीम पणजी महापालिकेने सुरू केली आहे. या सर्व गाडेवाल्यांना नव्या बाजार संकुलाच्या पहिल्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात येणार आहे. मुळात गाडे स्थलांतर केले याचा अर्थ त्यांचे पुनर्वसन केले असा अजिबात होत नाही.जोपर्यंत या गाडेवाल्यांकडे ग्राहक फिरकणार नाही तोपर्यंत काहीही व्यवसाय होणार नाही. येथील सिने नॅशनलसमोर असलेले बहुतेक गाडे हे "ऑमलेटपाव' व "चिकन'ची विक्री करतात.या गाडेवाल्यांचा तेथे जम बसला असून त्यांचे गिऱ्हाईकही ठरून गेले आहे. आता नव्या बाजार संकुलात पहिल्या मजल्यावर हा व्यवसाय करणे शक्य आहे काय,असा सवाल त्यांनी केला आहे.केवळ दुकान मिळाले म्हणून पोट चालणार नाही तर व्यवसाय चालायला पाहिजे. शहरातील सर्व गाडेवाल्यांना एकत्रित जागा देऊन त्यांना तेथे व्यवसाय करायला लावणे हे कितपत योग्य आहे,असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान,महापालिका मात्र आपल्या निर्णयाशी ठाम आहे. या गाडे स्थलांतराचा विषय यापूर्वीच ठरला होता अशी माहिती देण्यात आली.काही गाडे यापूर्वीच हटवण्यात आल्याचे सांगून त्यापैकी अनेकांनी स्थलांतराला तयारी दर्शवल्याचेही महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे. सर्व गाडेधारकांना तळमजल्यावर सामावून घेणे शक्य नाही.मुळात हे सर्व गाडे छोट्यामोठ्या वस्तू विक्रीसाठी उभे करण्यात आले होते.आता यातील अनेक गाड्यांचा वापर कोणत्या व्यवसायासाठी होतो,हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी लगेच स्थलांतराची तयारी दर्शवून नव्या दुकानांचा ताबा घेण्यातच त्यांचे हित आहे असे पालिकेतील संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे.

नागरी सेवा अधिकाऱ्यांचे सरकारविरोधातच बंड! ९ जानेवारीपर्यंत मुदत; अन्यथा सामूहिक रजेवर जाणार

पणजी, दि.१ (प्रतिनिधी) : गोवा नागरी सेवा अधिकारी संघटनेने आता आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारशीच दोन हात करण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेतर्फे सरकारला सादर करण्यात आलेल्या मागण्यां येत्या ९ जानेवारीपूर्वी पूर्ण झाल्या नाहीत तर सामूहिक रजेवर जाण्याचा इशाराच त्यांनी आज सरकारला सादर केलेल्या निवेदनात दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष तथा उत्तर गोवा जिल्हाधिकारी मिहीर वर्धन यांच्या नेतृत्वाखाली आज महत्त्वाची बैठक पणजी येथे झाली. सरकारला सादर केलेल्या मागण्यांवर कारवाई करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने आता बंडाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही,अशी भूमिका घेत सरकारला या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संघटनेच्या कार्यकारी मंडळ सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार संघटनेतर्फे एकूण तीन मागण्या सरकारसमोर ठेवल्या असून केवळ वित्त खात्याकडे या मागण्या अजून अडकून राहिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
संघटनेच्या कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगाचा चुकीच्या पद्धतीने निष्कर्ष काढून कमी करण्यात आल्याने संघटनेकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या कपातीचा फटका प्रशासनातील सुमारे ६० ते ६५ अधिकाऱ्यांवर पडल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान,सरकारातील काही मंत्री आपल्या मर्जीनुसार निर्णय घेतात असा ठपका ठेवून नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या जागी बाहेरच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून या अधिकाऱ्यांवर अन्याय केला जातो,असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. यात कदंब महामंडळचे व्यवस्थापकीय संचालकपद, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक,अर्थसंकल्प संयुक्त सचिव आदी पदांचा समावेश आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळावरून एल्विस गोम्स यांची बदली करून त्यांच्याजागी आता पशुसंवर्धन खात्याचे माजी उपसंचालक डॉ. बी. ब्रागांझा यांची नेमणूक करण्यात आल्याने बराच गोंधळ निर्माण झाला आहे. मुळात हे पद नागरी सेवा अधिकाऱ्यांसाठी असताना पर्यटनमंत्री मिकी पाशेको यांनी आपल्या मर्जीनुसार डॉ. ब्रागांझा यांची नेमणूक केल्याची खात्रीलायक माहिती यावेळी संघटनेच्या सूत्रांनी दिली. नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या जागेवर नेमण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांना तात्काळ माघारी बोलावून तेथे नागरी सेवा अधिकाऱ्यांची नेमणूक करावी,अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. विविध खात्यात निर्माण करण्यात आलेल्या नागरी सेवा पदांचा दर्जा एकतर कमी किंवा वाढवून या पदांवर तात्पुरती नेमणूक करण्यात येते. या पद्धतीमुळे या पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती मिळत नाही व हंगामी पद्धतीवर ही जबाबदारी स्वीकारावी लागते व यामुळे या अधिकाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. दरम्यान,याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री दिगंबर कामत, मुख्य सचिव जे. पी. सिंग व वित्त सचिव उदीप्त रे यांना सादर करण्यात आले आहे.

ब्रॉडबॅंडप्रकरणी केंद्रीय दक्षता आयोगाचे दरवाजे ठोठावणार, दयानंद नार्वेकर यांचा सरकारला इशारा

पणजी, दि. १ (प्रतिनिधी) : पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेली "गोवा ब्रॉडबॅण्ड योजना' हा घोटाळा असून सरकारने यासंबंधी "युनायटेड टेलिकम्युनिकेश लिमिटेड'(युटीएल) कंपनीशी केलेला सामंजस्य करार तात्काळ रद्द करावा, अन्यथा यासंबंधी केंद्रीय दक्षता आयोगाकडे दाद मागण्याचा इशारा माजी वित्तमंत्री दयानंद नार्वेकर यांनी दिला आहे. त्यामुळे नववर्षाच्या आरंभीच सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.
माहिती व तंत्रज्ञानमंत्री असताना ऍड. नार्वेकर यांनीच ६ नोव्हेंबर २००६ साली यासंबंधीचा सामंजस्य करार "युटीएल'कंपनीशी केला होता. "इ-गव्हर्नस'च्या नावाने या प्रकल्पाचा मोठा गाजावाजा करून पंतप्रधानांहस्ते या योजनेचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश करून हा महाघोटाळा असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. मुळातच हा करार करताना सरकारने कोणत्याही तांत्रिक बाबींचा अभ्यास केला नाही, असे सांगून पर्रीकर यांनी तांत्रिक दृष्टीने ते सिद्धही करून दाखवले होते.
आता नार्वेकर यांनीच या योजनेचा "घोटाळा' असा उल्लेख केल्याने या योजनेव्दारे नेमके कुणाचे उखळ पांढरे होणार होते, याबाबत मात्र सरकारी पातळीवर चर्वितचर्वण सुरू आहे.
विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सुरुवातीपासूनच "ब्रॉडबॅण्ड' हा "फ्रॉडबॅण्ड'असल्याचा आरोप केला होता. राज्य विधानसभेत या घोटाळ्यावरून सरकारला चांगलेच कैचीत पकडल्यानंतर या योजनेवर फेरविचार करण्याचे ठरले. सुमारे ४६६.२८ कोटी रुपयांचा एकूण दहा वर्षांसाठी खर्च राज्य सरकारला या योजनेवर करावा लागणार होता. तो अखेर पर्रीकर यांच्या मध्यस्थीमुळे कमी करून २१८.२३ कोटी रुपयांवर आणण्यात आला व या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनीही संमती दिली. सरकारने सुरुवातीला एकही पैसा खर्च केला जाणार नाही,असे सांगून लोकांची दिशाभूल केली होती परंतु या योजनेवर दहा वर्षांसाठी सुमारे ४६६.२८ कोटी रुपये खर्च होणार होते हे पर्रीकरांनी केलेल्या आरोपानंतरच उघडकीस आले होते. विधानसभेत पर्रीकर यांनी या "ब्रॉडबॅण्ड'चे अक्षरक्षः बॅण्ड बजावले होते. दरम्यान, नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्यात कंपनी अपयशी ठरल्याचे निमित्त साधून माजीमंत्री नार्वेकर यांनी या कंपनीला हा करार रद्द का करण्यात येऊ नये,अशी नोटीसही पाठवली होती. या दरम्यान, कंपनीतर्फे नव्याने वाटाघाटी सुरू करण्यात आला व या योजनेचा एकूण खर्च २१८.२३ कोटींवर आणून नव्याने करार करण्याचे ठरले होते. आता नार्वेकर यांनी या योजनेवरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याने ही योजना पुन्हा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारने कंपनीशी केलेल्या नव्या तडजोडीनुसार आता ४१४ कनेक्शन देण्यात येणार आहेत. त्यात १८९ पंचायतींचा समावेश आहे. अतिरिक्त जोडणीसाठी अतिरिक्त रक्कम आकारली जाणार आहे. दरम्यान, एका खात्याअंतर्गत किंवा इमारतीअंतर्गत विविध विभागांना जोडण्याचा अधिकार राज्य सरकारने राखीव ठेवला आहे, जेणेकरून अतिरिक्त ७६१ कार्यालयांचा त्यात समावेश करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, शेकडो रुपयांचा व्यवहार असलेल्या या योजनेसाठी काही नेते तथा अधिकाऱ्यांकडून शेवटपर्यंत तडजोडीवेळीही भानगडींचे सत्र सत्र सुरू होते. पूर्वीच्या ४६६.२८ कोटी रुपयांवरून हा खर्च २१८.२३ कोटींवर आणला खरा; परंतु त्यावेळीही मंत्रिमंडळ बैठकीत गोलमाल करण्याचे प्रयत्न झाले होते,अशी माहिती खुद्द एका मंत्र्यांने दिली होती. प्रस्तावातील खर्च २१८.२३ कोटींवर आणण्याचे ठरवण्यात आले असले तरी पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील सरकारला गरज भासल्यास अतिरिक्त सेवेची मागणी करता येईल व त्यासाठी अतिरिक्त २४३.६४ कोटी रुपये कंपनीला देण्याची वाट मोकळी करण्याचा डाव काही सतर्क नेत्यांनी त्यावेळी हाणून पाडला होता.

आसामातील स्फोटांत ५ ठार, ५१ जखमी

नवी दिल्ली, दि. १ : आसामातील गुवाहाटी येथे गजबजलेल्या भागांत आज (गुरुवारी) तीन शक्तिशाली बॉंबस्फोट होऊन त्यात पाच जण जागीच ठार, तर अन्य ५१ जण जखमी झाले. त्यातील एक स्फोट तर केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम हे गुवाहाटीत दाखल होण्याच्या बेतात असतानाच झाला.
आसामचे पोलिस महासंचालक जी. एम. श्रीवास्तव यांनी सांगितले की, या स्फोटांसाठी वापरण्यात आलेली स्फोटके कमी क्षमतेची होती. या स्फोटांमागे उल्फा (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम) या संघटनेच्या अतिरेक्यांचा हात असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे. बिरूबारी भागात पहिला धमाका झाला. त्यात तीन जण जखमी झाले. पाठोपाठ भूतनाथ येथे दुसरा धमाका झाला. तेथे एका सायकलवर स्फोटके पेरण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तेथूनच श्री. चिदंबरम यांच्या गाड्यांचा ताफा जाणार होता. पाठोपाठ भांगागढ येथे तिसरा धमाका झाला. तेथेच "बिग बझार' हे मोठे साखळी दुकान आहे. हा भाग सातत्याने गजबजलेला असतो. जखमींना गुवाहाटी वैद्यकीय इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी स्फोट झालेल्या भागाची नाकेबंदी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग उद्या शुक्रवारी आसामला भेट देतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी दिली. येत्या ३ रोजी शिलॉंग येथे इंडियन सायन्स कॉंग्रेसला पंतप्रधान संबोधित करणार आहेत. यापूर्वी ३० ऑक्टोबर २००८ रोजी गुवाहाटीत झालेल्या भीषण बॉंबस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार, तर ८८ जण जखमी झाले होते हे वाचकांना आठवत असेलच.

पाकला दहशतवादी राष्ट्र घोषित करा : मागणी

टोरोंटो, दि. १ : मुंबईवरील बॉम्बस्फोटातील पाकिस्तानचा सहभाग, त्यावर पाकिस्तान सरकारची संशयास्पद भूमिका आणि भारताविरुद्ध घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानाला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी कॅनडातील भारतीय वंशाच्या व्यापारी नेत्यांनी केली आहे.
मूळ भारतीय असलेले कॅनडातील व्यापारी नेते हेमंत शाह म्हणाले की, दहशतवादाविरोधातील कारवाई भारताने आक्रमकरित्या करायला हवी. दहशतवाद्यांना आश्रय आणि त्यांची प्रशिक्षण शिबिरे यासोबतच सीमेपलिकडून होणाऱ्या अतिरेकी कारवाया संपविण्यासाठी भारताने पाकिस्तानवर आणखी दबाव आणायला हवा.
भारतात बुधवारपासून लागू करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी कायद्याचे स्वागतही शाह यांनी केले. शाह विनिपेग चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत. दहशतवादी संघटनांना समर्थन देऊन आणि त्यांच्याविरोधात कोणतीही न करून पाकिस्तान एखाद्या दहशतवादी राष्ट्रासारखे वागत आहे. अतिरेकी संघटनांनी पाकिस्तानमध्ये आपले एक सत्ताकेंद्र स्थापन केले आहे, असेही शाह यांनी सांगितले.
शांती आणि सुरक्षेसाठी धोका ठरलेल्या पाकिस्तानविरुद्ध विश्वव्यापी आर्थिक प्रतिबंध लावण्याची मागणी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर करायला हवी, असेही शाह म्हणाले.

Thursday, 1 January, 2009

मुंबई हल्ला प्रकरण पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम : प्रणव

- कारवाईचे 'नाटक' वठवले
- संभ्रम निर्मितीचा प्रयत्न
- वक्तव्यांत एकवाक्यता नाही

नवी दिल्ली, दि. ३१ : मुंबई हल्ल्यांसंदर्भात भारताने सादर केलेल्या पुराव्यांबाबत त्या देशाकडून अधिकृतपणे अद्याप आम्हाला कोणतीही माहिती न मिळाल्याचा स्पष्ट खुलासा परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केला. त्यामुळे याप्रकरणी पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम असल्याचे व तो देश भारताच्या संयमाची "परीक्षा' घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही याबाबत अंतर्गत चौकशी पूर्ण केल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे.गेल्या गुरुवारी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडे पाकिस्तानातील अंतर्गत चौकशीचा तपशील त्यांना सादर करण्यात आल्याचा दावा कुरेशी यांनी केला आहे. मात्र, त्यात अजिबात तथ्य नसल्याचा जाहीर खुलासा मुखर्जी यांनी केल्यामुळे पाकिस्तानची दुटप्पी नीती नव्याने उजेडात आली आहे.
या मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी, राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी हेही दिशाभूल करणारी विधाने करत आहेत.
त्याचबरोबर पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाहिद शमसुल हसन यांनी तर मुंबईवरील हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजलाच नव्हता, तो अन्य कोठे तरी रचला गेला असावा, असे धक्कादायक विधान करून आणखी गोंधळ उडवून दिला आहे. त्यावर गिलानी यांनी, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्याचा अधिकारच हसन यांना नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सातत्याने या महत्त्वाच्या मुद्यावर वेगवेगळी वक्तव्ये करून भारताच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा डाव पाकिस्तानने टाकल्याचे दिसून येते. प्रणव मुखर्जी यांच्या स्पष्ट निवेदनामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या कटामागे आयएसआय या पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संघटनेचा हात असल्याचे उजेडात येऊ नये यादृष्टीनेच पाकिस्तानची नव्याने धडपड सुरू झाली आहे. मुंबईवरील हल्ल्यांसंदर्भात भारताने पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे सादर केले आहेत. त्यानंतर संबंधित अतिरेक्यांची धरपकड करण्यात आल्याचे नाटक काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने बेमालुमपणे वठवले होते. तसेच तपासकामी भारतीय तपास यंत्रणांचे सहकार्य घेण्याचे व भारताला साहाय्य करण्याचा साळसुद आव पाकिस्तानने आणला होता. कारण त्या काळात पाकवर युरोपीय देश आणि अमेरिकेकडून प्रचंड दबाव आणण्यात आला होता. तथापि, या दबावाचा पिळ किंचित ढिला झाल्यानंतर पाकिस्तानची गाडी पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून येते. या महत्त्वाच्या मुद्यावर पाकिस्तानचे तळ्यातमळ्यात सुरू झाले आहे. मुखर्जी यांनी संतप्त सुरात केलेले निवेदन म्हणजे त्याचेच निदर्शक ठरले आहे.

मुंबई हल्ला प्रकरण पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम: प्रणव

-कारवाईचे "नाटक' वठवले
-संभ्रम निर्मितीचा प्रयत्न
-वक्तव्यांत एकवाक्यता नाही

नवी दिल्ली, दि. ३१ : मुंबई हल्ल्यांसंदर्भात भारताने सादर केलेल्या पुराव्यांबाबत त्या देशाकडून अधिकृतपणे अद्याप आम्हाला कोणतीही माहिती न मिळाल्याचा स्पष्ट खुलासा परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केला. त्यामुळे याप्रकरणी पाकिस्तानची खुमखुमी अजूनही कायम असल्याचे व तो देश भारताच्या संयमाची "परीक्षा' घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आम्ही याबाबत अंतर्गत चौकशी पूर्ण केल्याचे प्रतिपादन पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे.गेल्या गुरुवारी गृहमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडे पाकिस्तानातील अंतर्गत चौकशीचा तपशील त्यांना सादर करण्यात आल्याचा दावा कुरेशी यांनी केला आहे. मात्र, त्यात अजिबात तथ्य नसल्याचा जाहीर खुलासा मुखर्जी यांनी केल्यामुळे पाकिस्तानची दुटप्पी नीती नव्याने उजेडात आली आहे.
या मुद्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रझा गिलानी, राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी हेही दिशाभूल करणारी विधाने करत आहेत.
त्याचबरोबर पाकिस्तानचे ब्रिटनमधील उच्चायुक्त वाहिद शमसुल हसन यांनी तर मुंबईवरील हल्ल्याचा कट पाकिस्तानात शिजलाच नव्हता, तो अन्य कोठे तरी रचला गेला असावा, असे धक्कादायक विधान करून आणखी गोंधळ उडवून दिला आहे. त्यावर गिलानी यांनी, अशा स्वरूपाचे वक्तव्य करण्याचा अधिकारच हसन यांना नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच सातत्याने या महत्त्वाच्या मुद्यावर वेगवेगळी वक्तव्ये करून भारताच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा डाव पाकिस्तानने टाकल्याचे दिसून येते. प्रणव मुखर्जी यांच्या स्पष्ट निवेदनामुळे यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या कटामागे आयएसआय या पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर संघटनेचा हात असल्याचे उजेडात येऊ नये यादृष्टीनेच पाकिस्तानची नव्याने धडपड सुरू झाली आहे. मुंबईवरील हल्ल्यांसंदर्भात भारताने पाकिस्तानकडे पुरेसे पुरावे सादर केले आहेत. त्यानंतर संबंधित अतिरेक्यांची धरपकड करण्यात आल्याचे नाटक काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने बेमालुमपणे वठवले होते. तसेच तपासकामी भारतीय तपास यंत्रणांचे सहकार्य घेण्याचे व भारताला साहाय्य करण्याचा साळसुद आव पाकिस्तानने आणला होता. कारण त्या काळात पाकवर युरोपीय देश आणि अमेरिकेकडून प्रचंड दबाव आणण्यात आला होता. तथापि, या दबावाचा पिळ किंचित ढिला झाल्यानंतर पाकिस्तानची गाडी पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून येते. या महत्त्वाच्या मुद्यावर पाकिस्तानचे तळ्यातमळ्यात सुरू झाले आहे. मुखर्जी यांनी संतप्त सुरात केलेले निवेदन म्हणजे त्याचेच निदर्शक ठरले आहे.

वेतन आयोगामुळे सरकारपुढे महासंकट, निम्मा भार उचलण्याविषयी केंद्राला पत्र

पणजी, दि.३१(प्रतिनिधी): सहावा वेतन आयोग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केल्याने राज्याची आर्थिक घडी वेगाने विस्कटत चालली आहे. याप्रकरणी अलीकडेच दिल्लीत सर्व राज्य वित्तमंत्र्यांची बैठक झाली असता आयोगाचा ५० टक्के आर्थिक भार केंद्र सरकारने उचलावा,असा प्रस्ताव तयार करण्यात आला असून गोवा सरकारकडूनही तसा प्रस्ताव केंद्राला पाठवला जाईल,असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी दिले आहेत.
राज्य सरकारने लागू केलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सरकारी तिजोरीवर सुमारे ८०० कोटी रुपयांचा भार पडला आहे. आर्थिक मंदी व दहशतवादाच्या सावटामुळे खाण आणि पर्यटन उद्योगाला घसरण लागल्याने राज्याचा आर्थिक स्त्रोत्रच मंदावले आहेत. हा खर्च भरून काढायचा तर त्याचा बोजा सामान्य जनतेवर कराच्या रूपाने लादावा लागेल. त्यामुळे या मुद्यावरून आता केंद्राकडे धाव घेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राज्यातील सुमारे अठ्ठेचाळीस हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळाला आहे. सहावा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी वर्षाकाठी सुमारे ८२५ कोटी, तर निवृत्तिवेतनापोटी वर्षाकाठी १७५ कोटी रुपये खर्च होता. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वर्षाकाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल. हा आयोग एप्रिल २००६ पासून लागू होणार असल्याने थकबाकीपोटी आणखी ५०० कोटी रुपयांची गरज भासणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने ही सर्व थकबाकी सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा करण्याचे तत्त्वतः ठरवले आहे. हे पैसे किमान तीन वर्षे वापरण्यास बंदीही घातली आहे. या अर्थसंकल्पामुळे सध्या महिन्याकाठी सुमारे २५ कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडला आहे.
...नोकर भरती सुरूच
राज्य वित्त खात्याने सरकारला नवीन नोकर भरती करण्यास मज्जाव केला असताना सरकारकडून मात्र मोठ्या प्रमाणात नोकर भरती सुरू आहे.एकीकडे सरकारने निवृत्तीमर्यादा ५८ वरून ६० केली आहे व दुसरीकडे नोकरभरतीही जोरात सुरू आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीचा ताळमेळ पूर्णपणे बिघडला आहे. वित्त खात्याकडून होणाऱ्या सूचना कचरापेटीत टाकल्या जात असल्याची खंत व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नोकरभरतीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य खात्यातच म्हापसा व इतर ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या इस्पितळांसाठी सुमारे सहाशेहून जास्त कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. या व्यतिरिक्त शिक्षण खाते,वीज खाते,भारतीय राखीव बटालियन यांच्यासह सुमारे ५८३ रोजगारपूर्व प्रशिक्षणार्थींनाही सेवेत नियमित करण्यात येणार असल्याने हा आर्थिक डोलारा कसा सांभाळायचा असा गंभार प्रश्न या खात्यांतील अधिकाऱ्यांना पडला आहे.

युवक अतिरेकी नसल्याचे निष्पन्न आज न्यायालयात उभे करणार

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): वास्कोतील नौदल मुख्यालयाच्या परिसरात संशयावरून ताब्यात
घेतलेला सफिकूल इस्लाम हा अतिरेकी नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून तो अल्पवयीन असल्यामुळे त्याची रवानगी "अपना घर'मध्ये करण्यात आली आहे. उद्या गुरुवारी त्याला बाल न्यायालयासमोर उभे करण्यात येईल.
मोठ्या भावाला सैन्यात नोकरी देत असल्याचे सांगून तीस हजार रुपयात फसवल्याचा "बदला' सफीकूल इस्लाम याला घ्यायचा होता. मात्र, दहावीत नापास होण्याची भीती असल्याने घर सोडून त्याने दिल्ली गाठली. दिल्लीत नोकरी मिळाली तीही दिल्ली-लाहोरला जाणाऱ्या बसस्थानकाच्या ठिकाणी असलेल्या एका चहाच्या टपरीवर. रोज पाकिस्तानला जाणारे बसेस सफिकूल पाहात होता. त्यावेळी अनेक वेळा त्याने आपल्या मित्रांना "मला पाकिस्तानात जायचे आहे, दहशतवादी बनायचे आहे' असे सांगितले होते. याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाल्यावर त्याला चौकशीसाठी ताब्यातही घेण्यात आले. कसून चौकशी झाल्यानंतर दिल्लीत त्याचे मन रमेनासे झाले. त्यामुळे दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटल्याचे नाट्य रचूनच गोवा गाठला. येथे आल्यावर पोलिसांच्या तावडीत सापडणार, याचीही पूर्वकल्पना त्याला होती. मात्र, दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटून आल्याच्या आशेने नोकरी मिळेल या आशेने त्याने हे नाट्य रचल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत उघड झाले आहे. सफिकूल याने दिलेली माहिती हेच सत्य समजून पोलिसांनी त्याची रवानगी "अपना घर' मध्ये केली आहे. त्याच्या जन्म दाखल्यावरुन तो सतरा वर्षाचा असल्याचे सिद्ध झाल्याने उद्या सकाळी त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे "एटीएस' प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी सांगितले.
यापूर्वी पोलिसांनी संशयिताचे नावे रफीकूल असल्याचे सांगितले होते. परंतु, आसाम पोलिसांच्या माहितीनुसार रफिकुल हे त्याच्या मोठ्या भावाचे नाव असून याचे सफिकूल असल्याची माहिती मिळाली आहे. सफिकूल याची आई प्राथमिक शिक्षिका असून वडील शिंपीकाम करतात. गोव्यात येण्यापूर्वी सफिकूल जमनाबाजार येथे एका चहाच्या टपरीवर कामाला होता. तेथेच असताना तो दहशतवादी बनण्याची स्वप्ने पाहात होता. नेमका याच काळात पोलिसांच्या हाती लागल्याने गोवा गाठण्याचे स्वप्न उराशी बाळगले. गोव्यात येण्यापूर्वी नाट्याची सर्व तयारी त्याने केली होती. दिल्लीत असताना तो रोज हिंदीतून प्रसिद्ध होणारे "पंजाब केसरी' हे दैनिक वाचत होता. त्यातून त्याला दहशतवाद्यांच्या हल्ल्याची माहिती मिळत होती. त्यातील काही दहशतवाद्याची नावे त्याने आपल्या नाट्यात वापरली. आपल्याच हाताने हिंदीतून पत्रे लिहिली. त्यात त्याने आपले नाव "साजील खान' असे लिहिले आणि एका दहशतवाद्याने पाठवलेल्या पत्राप्रमाणे त्यात मजकूर लिहिला. त्या पत्रात लिहिल्याप्रमाणे "साजील खान अब तुम काश्मीर से भाग नही सकते. इस से पहिले तुमने पांच बार भागनेकी कोशिश की' असे त्याने लिहिले होते. या पत्रातील हस्ताक्षर आणि सफिकूल याचे हस्ताक्षर पोलिसांनी तपासले असून दोन्ही हस्ताक्षर एकच असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती श्री. देशपांडे यांनी दिली.
गोव्यात येताना सफिकूल दीड हजार रुपये बरोबर घेऊन आला होता. येताना वाटेतच त्याने लोखंडी साखळी विकत घेतली. त्यानंतर तेलाचा डबाही घेतला. त्याच रात्री त्याने नौदलाची मोठी इमारत पाहून तेथेच आपले नाट्य साकारण्याचे ठरवले. त्यानुसार आधीच बरोबर आणलेली लोखंडी साखळी त्याने आपल्या हातात गुंडाळली. तोंडात कपडा कोंबून घेतला आणि डोक्यावर कनटोपी घालून संरक्षण भिंतीवरून आत उडी टाकली. यावेळी तेथील कुत्रे भुंकायला लागल्याने तेथे असलेल्या नौदलाच्या पोलिसांनी पाहिले आणि तो पोलिस तावडीत सापडला.

Wednesday, 31 December, 2008

संशयास्पद स्थितीतील सात ट्रॉलर्स ताब्यात कळंगुट समुद्रात किनारारक्षक दलाची कारवाई

पणजी, दि. ३१ (प्रतिनिधी): सारा गोवा नव्यवर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतानाच आज रात्री शिवोली आणि कळंगुट समुद्रात किनारारक्षक दलाने संशयास्पद स्थितीत फिरणारे सात ट्रॉलर ताब्यात घेतले आहेत. या ट्रॉलरमधील व्यक्तींकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याचे उघड होताच त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन ट्रॉलरही जप्त करण्यात आले आहेत. रात्री उशिरा हे सर्व ट्रॉलर व त्यातील व्यक्तींना वास्को येथील हार्बर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हे ट्रॉलर गोव्यातील नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. तसेच त्या ट्रॉलरमधे असलेल्या व्यक्तींकडे कोणतेही ओळखपत्र तसेच ट्रॉलरविषयक कागदपत्रे नसल्याचीही माहिती मिळाली. याविषयी अधिक माहितीसाठी एटीएस प्रमुख आत्माराम देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संशयास्पद ट्रॉलर ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. तसेच हे ट्रॉलर कोणाच्या मालकीचे आणि ते गोव्यात कोठून आले याविषयीची चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Tuesday, 30 December, 2008

'गोलमाल' पाहिला व गोवा गाठला संशयित आसामी तरुणाची कहाणी

- गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही
- नोकरीच्या शोधापायी गोव्यात दाखल झाला

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): 'गोलमाल' चित्रपट पाहिला आणि गोवा गाठला. नोकरी मिळेल या इराद्याने हातपाय बांधल्याचे नाट्य रचले आणि जेथे आलो ते नौदलाचे मुख्यालय आहे, याची पुसटशीही कल्पना मला नव्हती. माझी ही कहाणी ऐकून तरी मला कोणी नोकरी देईल, अशी अपेक्षा होती, असे संशयित रफिक ऊल इस्लाम याने पोलिसांना सांगितले आहे. त्याने दिलेल्या माहितीची दिल्लीत पडताळणी केल्यावर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे पोलिसांना आढळले आहे. त्यामुळे अखेर त्याच्या या कहाणीवर पोलिसांनी विश्वास ठेवला आहे.
रफिक ने पोलिसांना पुरवलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी दिल्ली येथे गेलेले स्पेशल सेलचे पोलिस निरीक्षक राम आसरे व मुरगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक सागर एकोसकर परवा सकाळी गोव्यात पोचणार आहेत. "एटीएस'प्रमुख आत्माराम देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार "दहावी नापास होण्याची शक्यता असल्याने रफिक याने आसाममधील धुब्री जिल्हा सोडला आणि गुवाहाटीला जाण्यासाठी तो घरातून बाहेर पडला. मात्र गुवाहाटीला न जाता त्याने थेट दिल्ली गाठली. दिल्लीत एका चहाच्या टपरीवर काही काळ नोकरी केली. त्यानंतर बुफेपार्टीला मदतीसाठी तो जाऊ लागला. या नोकरीत त्याला पोटापुरते पैसे मिळत होते. गोव्यात भरपूर संधी आहे आणि गोव्याला जाण्यास दिल्लीतून थेट रेल्वेही आहे'' याची माहिती होताच त्याने गोव्यात येण्याचा बेत आखला.
गोव्यात येऊन नोकरी करण्याची प्रेरणा त्याला अजय देवगणचा कॉमेडी चित्रपट "गोलमाल'द्वारे मिळाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. गोवा म्हणजे वास्को द गामा, येवढेच त्याला माहिती होते. त्यामुळे "संपतक्रांती' या रेल्वेतून मडगाव येथे उतरलेला रफिक नोकरी न शोधता वास्कोत दाखल झाला. दिवसभर शहरात फिरला. नोकरी मिळाली नाही. बोगदा वास्को येथे नौदलाच्या भव्य इमारतीला हॉटेल समजून आणि त्याची उंच संरक्षण भिंत पाहून येथे नोकरी मिळवण्यासाठी हे नाट्य त्याने रचले आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांची अवस्था मात्र या एकूण प्रकरणात "डोंगर पोखरून हाती आला उंदीर' अशी झाली आहे. अर्थात, रफिकच्या या नाट्यामुळे काही काळ वास्कोवासीयांचे आणि पोलिसांच्या काळजाचे काही ठोके चुकले होते यात शंका नाही.

हटवलेल्या गाडेवाल्यांचे भवितव्य आज ठरणार, महापालिका बैठकीत नगरसेवक हमरीतुमरीवर

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): शहरातील हटवलेल्या बेकायदा गाडेवाल्यांचे पुर्नवसन आणि नव्या बाजार संकुलात मधोमध बसलेले भाजी विक्रेत्यांचा प्रश्न आज महापालिकेच्या बैठकीत बराच रंगला. सत्ताधारी आणि विरोधक या प्रश्नावरुन "अरेतुरे'वर उतरल्यानेअखेर गाडेवाल्यांच्या प्रश्नावर उद्या मंगळवारी सकाळी ११.३० वाजता खास बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामुळे उद्या या गाडेवाल्यांच्या भवितव्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजी विक्रेत्यांना "लॉटरी'द्वारे (सोडत) जागेचे वाटप करण्यात महापालिकेला यश आले. या भाजी विक्रेत्यांनी आपली जागा अद्याप ताब्यात घेतली नसली तरी, आज सायंकाळी पालिकेच्या बैठकीत त्यांनी या सोडती काढल्या.
रायबंदर पणजी येथील श्री. शेटये यांचा बेकायदा गाडा पालिकेने हटवल्याने पणजी शहरातील बेकायदा गाड्यांवर कारवाई केली जावी, अशी याचना करणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल झाली होती. त्यावेळी शहरातील ११ बेकायदा गाडे हटवण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यातील आठ गाडे पालिकेने हटवले होते. त्यांचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेऊन नव्या बाजार संकुलाच्या पहिल्या मजल्यावर त्यांना जागा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र तेथे जाण्यास हे गाडेधारक तयार नसल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात १८० गाडे बेकायदा असल्याचा दावा याचिकादाराने केला आहे. उद्या खास होणाऱ्या या बैठकीत या गाडेवाल्यांच्या पुर्नवसानावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
बाजार संकुलातील ६० पैकी ४९ भीजी विक्रेत्यांना आज जागेसाठी लॉटरी काढली. यावेळी २१ भाजीविक्रेते उपस्थित नव्हते. या भाजीविक्रेत्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून बाजार संकुलाची तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांचे त्याठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याचे महापौर टोनी रॉड्रिगीस यांनी सांगितले.

'सनबर्न'वर मेहेरनजर, राजकीय दबावाचा कहर; पोलिस अधिकारी चवताळले

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): एकीकडे सुरक्षेच्या कारणावरून किनाऱ्यांवरील खुल्या पार्ट्यांवर बंदी घालण्याचा आदेश जारी झाला असताना कांदोळी येथे होणाऱ्या "सनबर्न' संगीत महोत्सवाला दिलेल्या परवानगीमुळे आता पोलिस विरुद्ध सरकार असे व्दंद्व सुरू झाले आहे. पोलिसांनी काल मध्यरात्री ही पार्टी बंद करण्याची घटना घडल्यानंतर आज अखेरचा दिवस असल्याने आयोजकांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एक लाख रुपये अनामत ठेव ठेवून सरकारकडून पुन्हा एकदा परवानगी मिळवल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काल मध्यरात्री सरकारने या पार्टी आयोजनासाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने व या महोत्सवात कर्णकर्कश संगीताचा आवाज होत असल्याने कळंगुट पोलिसांनी ही पार्टी बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. आज आयोजकांनी पुन्हा एकदा आपला राजकीय दबाव वापरून पुन्हा एकदा परवानगी मिळवली व पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही पार्टी आयोजित केली. सरकार एकीकडे सुरक्षेचा अवडंबर करून सामान्य व्यावसायिकांना पिडते तर दुसरीकडे बड्या उद्योजकांना मात्र आपणच तयार केलेल्या कायद्यात रीतसर पळवाट शोधून देते, त्यामुळे या परिसरात कलामीची नाराजी पसरली आहे. पोलिसांनी सुरुवातीपासूनच या महोत्सवाला आक्षेप घेतला होता परंतु सत्ताधारी पक्षातील एका आमदाराने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवर दबाव आणून पोलिसांना आपला अहवाल बदलण्यास भाग पाडले व महोत्सवाला परवानगी मिळवली.
दरम्यान, या पार्टीच्या आयोजकांवर कळंगूट पोलिस स्थानकात रीतसर पोलिस गुन्हा दाखल करून आज पोलिसांनी सरकारलाच कोंडीत पकडले. या पार्टीचे आयोजक लेंडोन आल्वीस (रा. दोना पावला) याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली. फौजदारी गुन्हा १७६ व ध्वनिप्रदूषण कायदा १९९८ कलम ३ आणि ४ नुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुरक्षेच्या अभावी या "सनबर्न' ला पार्टी आयोजन करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असा अहवाल कळंगुट पोलिस स्थानकाने देऊनही या पार्टीच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली होती. तसेच या पार्टीच्या आयोजनाला परवानगी मिळवण्यासाठी कळंगुटच्या आमदारांनी आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली होती, अशी माहिती मिळाली आहे.
गोव्यात नाताळ व नव्या वर्षाच्या काळात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने कोणत्याही खुल्या जागेवर पार्टीचे आयोजन केले जाऊ नये, अशा फतवाच सरकारी यंत्रणेने काढला आहे. त्यामुळे या वर्षी अनेक वार्षिक पार्ट्यांचे आयोजन झाली नाही. मात्र सर्व नियम धाब्यावर बसून आणि गृहखात्याने आपल्याच नियमांना फाटा देऊन २५ डिसेंबर ते २९ दरम्यान या पार्टीच्या आयोजनाला परवानगी दिली होती. परवा रात्री ही पार्टी सुरू असताना मध्यरात्री १.१५ च्या दरम्यान संगीताच्या आवाजाची पातळी ६७.२ ते ८९.३ डेसिबल्स असल्याचे आढळल्याने ती बंद पाडण्यात आली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने याविषयीचा अहवाल सादर केला होता. रात्रीच्या पार्ट्यांत आवाजाची क्षमता केवळ "५५ डेसिबल्स'पर्यंत ठेवता येतो व तीसुद्धा रात्री १० पर्यंत, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. या विषयाचा अधिक तपास म्हापसा उपविभागीय पोलिस उपअधीक्षक गुंडू नाईक करीत आहेत. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी ही पार्टी बंद केल्याचे आपल्याला ठाऊक आहे; परंतु पुढे काय झाले याची माहिती नसल्याचे सांगितले. कळंगुटचे निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी तर चक्क या पार्टीबाबत पोलिसांनी नकार देण्याचा अहवाल सादर केल्याचे सांगून परवानगी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल उचलला जात नव्हता.

सासूच्या खूनप्रकरणी जावयाला जन्मठेप

मडगाव, दि. २९(प्रतिनिधी): दारुच्या नशेत स्वतःच्या सासूचा चिरा घालून खून करणाऱ्या मुळ नागपूर येथील इंद्रजीत गोडबोले याला येथील अतिरिक्त सत्रन्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी जन्मठेपेचे शिक्षा सुनावली आहे.
त्याखेरीज दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सक्तमजुरी भोगावी, असेही आदेशात म्हटले आहे. आरोपीने दंड भरल्यास त्यातील पाच हजार रुपये मयताची मुलगी तसेच आरोपीची पत्नी सुमित्रा हिला द्यावेत असेही निकालपत्रात म्हटले आहे. ही घटना २२ ऑगस्ट २००६ रोजी कुंकळ्ळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. पत्नी सुप्रिया ही दारुसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरुन तिच्याशी भांडण होऊन मध्यस्थीसाठी आलेल्या सासूच्या अंगावर त्याने चिरा घालून तो ओटीपोटीवर पडून ती तत्काळ गतप्राण झाली नंतर कुंकळ्ळी पोलिस स्टेशनवरील निरीक्षक सिध्दांत शिवरेकर यांनी तपास करुन आरोपीस मंगळूर येथून अटक करुन ९१ पानी आरोपपत्र कोर्टात दाखल केले होते. या खटल्यात आरोपीच्या दोन अल्पवयीन नुलींची साक्ष महत्त्वाची ठरली व ती ग्राह्य धरून कोर्टाने आरोपीला दोषी मानले. आरोपी गोडबोले हा मूळ नागपूरचा असून मयत चौलव्वा राठोड ही गदग कर्नाटक येथील होती. आरोपी कोलवा येथील हॉटेलात सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होतो. सरकारच्या वतीने या खटल्यात भानुदास गावकर यांनी काम पाहिले.

भोसलेंच्या वैयक्तिक मालमत्तेची चौकशी करा : सुदेश कळंगुटकर

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी): वाहतूक खात्याच्या विविध ठिकाणी साहाय्यक संचालकपदी असताना अशोक भोसले यांनी केलेल्या कथित भानगडींविरोधात आपण गेली तीन वर्षे लढत आहोत. तीन वर्षांच्या या अथक लढ्यानंतर पहिल्यांदाच प्रशासनाने त्याची दखल घेतल्याचे समाधान व्यक्त करून भोसले यांनी केलेल्या भानगडींच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेचीही कसून चौकशी करण्याची मागणी अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे उत्तर गोवा अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी केली आहे.
वाहतूक खात्याचे उपसंचालक अशोक भोसले यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीच्या आधारे गुन्हा विभागाने त्याची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी या विभागाच्या निरीक्षक सुनिता सावंत चौकशी करीत आहेत. फोंडा पोलिस स्थानकावरही "जय दामोदर संघटने' चे अध्यक्ष महेश नायक यांनी केलेल्या तक्रारीनुसार प्रथम चौकशी अहवाल नोंद करून घेण्यात आला आहे. सामान्य नागरिकांच्या हाती मिळालेल्या माहिती हक्क कायद्यामुळे भोसले यांच्या भानगडींचा पर्दाफाश होण्यास मदत झाली. आपण वाहतूक संचालक तथा दक्षता खात्याकडे सर्व पुराव्यांसह कागदपत्रे सादर केली असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,अशी मागणी कळंगुटकर यांनी केली.
गेल्या २१ सप्टेंबर २००७ रोजी केलेल्या लेखी तक्रारीबाबतही काहीही कारवाई केली नसल्याने आपण पुन्हा एकदा ३ ऑक्टोबर २००८ रोजी तक्रार दाखल केली व त्यानंतर काही प्रमाणात कृती सुरू झाल्याचेही ते म्हणाले.
कायदा हा सर्वांसाठी समान असतो, परंतु त्यांनी मात्र स्वतःच्यास्वार्थासाठी कायद्यालाच फाटा देऊन सरकारचे नुकसान केल्याचा ठपकाही कळंगुटकर यांनी ठेवला आहे. दरम्यान, याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार वाहतूक उपसंचालक भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केलेले अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे उत्तर गोवा अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांच्याविरोधात त्यांनी पणजी न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे; तर फोंडा पोलिस स्थानकात तक्रार केलेले "जय दामोदर' संघटनेचे अध्यक्ष महेश नायक यांनी आपल्या केबिनमध्ये घुसून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधातही भोसले यांनी मडगाव पोलिस स्थानकात तक्रार नोंद आहे व महेश नायक यांची जामिनावर सुटका झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान,यासंबंधी मिळालेल्या अधिक माहितीनुसार श्री.कळंगुटकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन वाहतूक खात्याचे तत्कालीन संचालक पी. श्रीनिवास रेड्डी यांनी त्यांना २८ ऑक्टोबर २००८ रोजी शिस्तभंग कारवाईसंबंधी "कारणे दाखवा' नोटीस जारी केली होती. साहाय्यक संचालकपदी असताना जीए-०१-झेड-७२२२ व जीए-०१-झेड-७२२६ या वाहनांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता नोंदणी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.याबरोबर पणजी येथे साहाय्यक संचालकपदी असताना शिवाजीराव देसाई यांच्यानावे जीए-०१-टी-७५०० ही गाडी अर्धवट पत्ता व नोटरीकडे नोंदणी न केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे नोंदणी केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला असताना त्याच व्यक्तीच्या नावे जीडीव्हाय-४४४४ हे वाहनही त्याच पद्धतीने नोंदणी केल्याचेही या नोटीशीत म्हटले आहे.
राज्य वाहतूक प्राधिकरणावर ठपका
याप्रकरणी अशोक भोसले यांनी कारणे दाखवा नोटिशीला ३ ऑक्टोबर २००८ रोजी दिलेल्या खुलाशात अनधिकृत वाहन नोंदणीचा आरोप फेटाळून लावला. जीए-०१-झेड-७२२२ व जीए-०१-झेड-७२२६ ही वाहनांना "ऑल इंडिया टूरीस्ट परमीट' राज्य वाहतूक प्राधिकरणातर्फे संमत करण्यात आले होते. सदर वाहने केंद्रीय मोटर वाहन कायदा १९८९ च्या अंतर्गत नियम १२८ ची पूर्तता न करताच नोंदणीसाठी पाठवण्यात आली होती व या नोंदणी कागदावर आपण तसे नमूद केल्याचेही त्यांनी या खुलाशात म्हटले आहे. राज्य वाहतूक प्राधिकरणाला ही वाहने नोंदणी करण्यास नकार देता आला असता त्यामुळे मुळातच राज्य वाहतूक प्राधिकरणाकडून योग्यपद्धतीने या नियमाचे पालन होत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला.शिवाजीराव पाटील हे आपले नातेवाईक आहेत व ते आल्तीनो येथे आपल्याच घरी राहत होते त्यामुळे त्यांचा पत्ता आपल्या घरचा होता,असेही भोसले म्हणाले. त्यांनी पत्त्यासंबंधी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे स्टॅंप पेपर हे कोल्हापूर येथून आणले होते व तिथे ते नोटरीकडे नोंद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.जीडीव्हाय-४४४४ या वाहन नोंदणीसाठी शिवाजीराव पाटील यांनी मगनलाल सदनचा दिलेला पत्ताही आपलाच पूर्वीचा पत्ता असल्याचे त्यांनी उघड केले आहे. सुदेश कळंगुटकर यांच्याविरोधात आपण बदनामीचा खटला दाखल केला आहे, त्यामुळे आपण हा खटला मागे घ्यावा यासाठी आपल्यावर दबाव घालण्यासाठीच असल्या खोट्या तक्रारी दाखल केल्याचा आरोपही भोसले यांनी आपल्या खुलाशात केला आहे.
निलंबित करा अन्यथा पुरावे नष्ट होतील: महेश नायक
अशोक भोसले यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे,अन्यथा ते सर्व पुरावे नष्ट करण्याचा धोका असल्याचे महेश नायक यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यांना निलंबित करण्यास अजूनही दिरंगाई होत असल्याचा निषेध करून सरकार चौकशीचे केवळ नाटक तर करीत नाही ना,असा सवलाही त्यांनी उपस्थित केला.

Monday, 29 December, 2008

काश्मीर दोलायमान

नॅशनल कॉन्फरन्स सर्वांत मोठा पक्ष, कॉंग्रेसला तडाखा
श्रीनगर, दि. २८ - जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून तेथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. ८७ जागा असलेल्या सभागृहात ओमार अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सने सर्वाधिक म्हणजे २८ जागा मिळवून मुसंडी मारली आहे. त्यापाठोपाठ मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने २१, कॉंग्रेसने १७, तर भारतीय जनता पक्षाने आश्चर्यकारकरीत्या तब्बल अकरा जागांवर आपला हक्क सांगितला आहे. सात टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत ६१ टक्के मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत कॉंग्रेसला जोरदार तडाखा बसला आहे. २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्या पक्षाला २० जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच मेहबूबा मुफ्ती यांच्या "पीडीपी'ला २००२ मधील निवडणुकीच्या तुलनेत पाच जागांचा फायदा झाला आहे. त्यामुळे आम्ही किमान समान कार्यक्रमाच्या आधारे आमच्याशी चर्चेसाठी येणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ किंवा त्यांच्याशी न जमल्यास विरोधात बसू, असे मेहबूबा यांनी स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत नऊ जागा अपक्ष उमेदवारांनी पटकावल्या असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला केवळ एकमेव जागेवर समाधान मानावे लागले आहे. याआधीच्या विधानसभेत त्यांच्या नावापुढे दोन जागा लागल्या होत्या. जम्मूत तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जणू दिवाळीच साजरी केली. त्यांनी ठिकठिकाणी लाडू वाटून मतदारांचे तोंड गोड करण्याचा सपाटा लावला होता. दरम्यान, कॉंग्रेससारख्या समविचारी पक्षांशी सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा होऊ शकते, असे संकेत ओमार अब्दुल्ला यांनी दिले आहेत. गेल्या वेळी कॉंग्रेसने पीडीपीशी सत्तेबाबत समझोता करून सरकार स्थापन केले होते. त्यानुसार पहिली तीन वर्षे पीडीपीने मुख्यमंत्रिपद उपभोगले. मात्र गुलाम नबी आझाद यांच्याकडे हे पद येताच अंतिम टप्प्यात अमरनाथ प्रकरणाचे भांडवल करून पीडीपीने कॉंग्रेसचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर तेथे निवडणुका घेण्यात आल्या. विशेष म्हणजे गेल्या विधानसभेतही नॅशनल कॉन्फरन्सला नेमक्या २८ जागा मिळाल्या होत्या.
जम्मूत फुलले "कमळ'
जम्मूत फुललेले "कमळ' हाच या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. जम्मूमध्ये अमरनाथच्या मुद्यावरून झालेल्या जोरदार आंदोलनामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाले व त्याचा मोठाच फायदा भाजपला झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या विधानसभेत या राष्ट्रीय पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते. या अनपेक्षित मुसंडीमुळे आज नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयातही उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

आईने दोन मुलींसह पेटवून घेतले

माता व धाकटी मुलगी मृत्युमुखी

- थोरली मुलगी होरपळली
- मोप येथील दुर्दैवी घटना
- पेडणे परिसरावर शोककळा


मोरजी, दि. २८ (प्रतिनिधी) - गावठणवाडा मोप पेडणे येथील सौ. विद्या वासुदेव नाईक (वय ४०) व त्यांच्या दोन मुली मेघा नाईक (९), मयुरी नाईक (१५) या तिघींनी काल रात्री साडेबाराच्या सुमारास अंगावर केरोसीन ओतून घेऊन पेटवून घेतले. यात विद्या नाईक व त्यांची धाकटी मुलगी मेघा यांचा मृत्यू झाला; तर थोरली मुलगी मयुरी २५ टक्के भाजल्याने ती वाचली. तिच्यावर गोवा मेडिकल कॉलेज, बांबोळी येथे उपचार सुरू आहेत. या घटनेमागील कारण अद्याप समजलेले नाही.
पेडणे पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हे प्रकरण आत्महत्त्येचे असल्याचे सांगण्यात आले. तथापि, ज्या मातेने दोन्ही मुलीच्या अंगावर केरोसीन ओतून व स्वतःलाही पेटवून दिले व ती मरण पावली यामुळे खुनाचा गुन्हा कुणावर नोंदवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मेघाचा मृत्यू झाला तर विद्या नाईक ९० टक्के भाजल्याने त्यांना तशाच अवस्थेत बांबोळी येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नाईक कुटुंबीय हे एकत्रित आहे. विद्याचे पती वासुदेव कामानिमित्त मुंबई येथे तयार कपड्यांच्या कारखान्यात कामाला असतात.
गॅलन व आगपेटी जप्त
घटनास्थळी पोलिसांना केरोसीनचा डबा व काड्यापेटी सापडली. पंचनामा करून हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात विद्या नाईक यांची मोठी भावजय (जाऊ) अरूणा नाईक यांनी सांगितले की, घरात आजपर्यंत कधीच कुठल्याच प्रकारचा कलह तंटा निर्माण झाला नाही.
विद्या मनमिळावू स्वभावाची होती. तिने असा दुर्देवी निर्णय का घ्यावा, याचे आश्चर्य वाटते.
मुंबईला नवऱ्याबरोबर काही वाद झाला असेल याची आपल्याला कल्पना नाही. तथापि, विद्या मुंबईहून आल्यानंतर तिने तशाप्रकारचे कधीही भाष्य केले नव्हते.
दरम्यान घरातील मंडळींनी हा प्रकार रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडला असल्याचे सांगितले आहे. विद्या आपल्या दोन मुलींसोबत स्वतंत्र खोलीत झोपली होती. इतर मंडळी व सासू मधल्या हॉलमध्ये झोपली होती. त्यावेळी मोठी मुलगी मयुरी अर्धवट जळालेल्या अवस्थेत धावत हॉलमध्ये आली व किंचाळत होती. घरच्या मंडळींनी तिच्या अंगावर पाणी मारण्याचा प्रयत्न केला व आग विझवली. मात्र विद्याने जळताना तोंडातून ब्रसुद्धा काढला नाही, तर मेघाचे जागीच निधन झाले.
रात्री घटना घडल्यानंतर तिघींनाही बांबोळी येथे पाठवण्यात आले. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाचे वाहन कुणीतरी त्यांना घराला आग लावल्याची माहिती दिल्याने तेथे दाखल झाले. लगेच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपनिरीक्षक सचिन नार्वेकर तपास करत आहेत.
मोप या भागातील काही नागरिकांशी संपर्क साधला असता हा प्रकार निदान नाईक कुटुंबीयांच्या घरात तरी निदान घडायला नको होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. नाईक कुटुंबातील ३० सदस्य गुण्यागोविंदाने नांदत असताना त्यांच्यावर असा बाका प्रसंग यावा यामुळे गावाला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. दोघींच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
भांडण नाही - सासू
विद्या नाईक यांची सासू शीतल रामा नाईक यांनी आपल्या सुनेविषयी सांगितले की, विद्याचा नवरा मुंबईला कामानिमित्त त्याच ठिकाणी वास्तव्य करून राहतो. विद्या नाईक व त्यांच्या मुली ह्या चांगल्या स्वभावाच्या. घरात कधीच करकर किंवा दगदग नव्हती. हल्ली सासू सुनांचे पटत नाही. मात्र आपल्या सुना गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
नवऱ्याची नोकरी सुटली
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विद्याचे पती वासुदेव नाईक हे मुंबई येथे कामाला होते त्यांची नोकरी गेली. कदाचित या कारणाने तिने टोकाचा निर्णय कदाचित घेतला असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गावचे माजी उपसरपंच प्रमोद परब व जयप्रकाश परब यांनी या कुटुंबाविषयी माहिती देताना सांगितले की, नाईक कुटुंब हे "हॅपी फॅमिली' म्हणून परिचित आहे. अशा कुटुंबावर बाका प्रसंग यावा यासारखे दुसरे दुर्देव नाही. विद्या वासुदेव नाईक यांनी हा प्रकार केला त्या रात्री पुरुष मंडळी जत्रेला गेली होती. ही संधी साधून विद्याने टोकाचा निर्णय घेतला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आईविना मयुरी पोरकी
विद्या नाईक ही दोन महिने मुंबईला राहून आठ दिवसांपूर्वी मोप येथे आली होती. मेघा इयत्ता चौथीच्या वर्गात मोप येथील शाळेत शिक्षण घेत होती, तर त्यांची मोठी मुलगी मयुरी ही तोरसे हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्यामुळे ती आपल्या काकीसोबत मोप येथे घरात होती. आता मयुरीला आईविनाच उर्वरित आयुष्यभर वाटचाल करावी लागणार आहे.

"सनबर्न'वर अखेर कारवाईचा बडगा

कर्णकर्कश आवाजामुळे "नाईट पार्टी' प्रशासनाने रोखली
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी) - प्रचंड राजकीय दबाव वापरून तसेच सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू करण्यात आलेली "सनबर्न'ची नाईट पार्टी अखेर आज रात्री अखेर प्रशासनाकडून बंद पाडण्यात आली.
काल मध्यरात्री १.१५ वाजता कर्णकर्कश आवाजाची पातळी ओलांडल्याने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. त्यामुळे आज रात्री पार्टी सुरू होताच ८.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या मुहूर्तावर पार्टी सुरू करण्यात आली होती. "सनबर्न' ही आशियाखंडात पार्टीचे आयोजन करणारे सर्वांत मोठे आस्थापन असून दि. २६ डिसेंबर पासून त्यांनी कांदोळी येथे या पार्टीचे आयोजन केले होते. उद्या २९ डिसेंबर रोजी त्यांचा शेवटचा दिवस होता. तथापि, "या पार्टीच्या आयोजनावर बंदी घातल्याने उद्याची पार्टी होणार नाही' असे उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी स्वप्निल नाईक यांनी सांगितले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते त्या परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळातील काही अधिकारी वर्ग राहत असून काल मध्यरात्री त्यांना या कर्णकर्कश संगीताचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी या आवाजाची पातळी यंत्राद्वारे मोजून त्याबाबतचा अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त केला होता.
या आस्थापनाला परवानगी देण्यासाठी गेल्या काही दिवसांत बरेच राजकारण झाले होते. पार्टीचे आयोजन करण्यात परवानगी मिळणार न मिळणार अशी स्थिती असताना अखेर त्यांना परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे काही राजकारणी बरेच नाराजही झाले होते. कळंगुटच्या आमदारांनी मात्र या पार्टीला परवानगी मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते.

पैसे घेऊन मत न विकण्याचा संकल्प

डिचोलीत विराट हिंदू धर्मजागृती सभा


टाळ्यांच्या गजरात या धर्मसभेत संमत झालेले संकल्प असे ः
मी ढोंगी हिंदुत्ववाद्यांना माझे मत देणार नाही.
मी हिंदुत्वासाठी कार्य करणाऱ्यालाच माझे मत देणार.
मी नववर्ष फक्त गुढीपाडव्यालाच साजरे करेन.
मी देवतांचे चित्र असलेले कपडे वापरणार नाही.


डिचोली, दि. २८ (प्रतिनिधी) -मी पैसे घेऊन माझे बहुमूल्य मत विकणार नाही यासह अनेक महत्त्वपूर्ण संकल्प करून, हिंदू जनजागृती समितीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज मैदान डिचोली येथे आयोजित हिंदू धर्मजागृती सभा आज हजारो हिंदूभिमान्यांच्या उपस्थितीत पार पडली. या धर्मसभेला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंदाचार्य महाराज, प्राचार्य सुभाष वेलींगकर, गोव्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक संगम बोरकर, धर्मशक्ती सेना, मदन सावंत, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समितीचे संघटक जयेश थळी आदी मान्यवर उपस्थित होते.
गिरजय प्रभूदेसाई, शुभांगी गावडे यांनी स्वागत केले. वेदमंत्रपठणाने दीपप्रज्वलन करून हिंदू धर्मसभेचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. वक्त्यांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांचे व विदेशातील साधकांचे स्वागत तसेच "सनातन प्रभात'चे अभिजात नाडकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. नाडकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सदाशिव धोंड्यांनी हिंदू जनजागृती समितीची ओळख करून दिली व धर्मकार्याचा आढावा घेतला.
ब्रह्मेशानंद स्वामी यांनी आशीर्वचनात सांगितले, की आज आपल्या हिंदू समाजाचे संतुलन बिघडविण्याचे षडयंत्र रचले जात आहे. धर्माबद्दल तिरस्कार अधर्मी, शिक्षणाद्वारे विकृतीकरण होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन महत्त्वपूर्ण असून, आपल्या संस्कृतीचे, धर्माचे रक्षण करण्यासाठी साऱ्यांनी कटिबद्ध झाले पाहिजे. आपली मठ, मंदिरे ही शक्तिकेंद्र बनून भावी पिढीच्या रक्षणासाठी सज्ज व्हावीत यासाठी तरूणांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली पाहिजे. आपल्या मुलांना धर्माचे शिक्षण द्या. भगवंत हा सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही त्याची लेकरे आहोत. एकमेकांवर प्रेम करा, चांगल्या गुणांची कदर करा व धर्माचे रक्षण केले तरच धर्म आपले रक्षण करील हे लक्षात ठेवून धर्माचरण करून भावी पिढी, भावी गोमंतक शांत व सुंदर बनवा.
सुभाष वेलिंगकर याप्रसंगी म्हणाले, आपला विशाल आणि विस्तृत असा हिंदू समाज आज डायनासोरप्रमाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. डायनासोर हा प्राणी अजस्त्र असला तरी संवेदनाशून्य असल्यामुळे नष्ट झाला. हिंदूंवर ज्या तीन शक्ती केंद्रातून संस्कार झाले पाहिजेत ती घर, शाळा, मंदिर आज संस्कार संवेदनक्षमता हरवून बसली आहेत. वैफल्यग्रस्त, संस्कारहिन विकृत प्रवाह घराघरांत पोहचल्यामुळे पाश्चिमात्यांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. भ्रष्टाचारी व स्वार्थांध कॉंग्रेस सरकार हिंदू दहशतवाद नावाचे नवे षडयंत्र पुढे आणत मुसलमानांचे लागूंलचालन करत आहे. निद्रिस्त संवेदनाहीन हिंदू आताच जागा झाला नाही तर नामशेष होईल.अन्याय सहन करू नका व हिंदू समाजाच्या राष्ट्राच्या उत्थानासाठी कार्यरत राहा.
साध्वी प्रज्ञासिंगाची अमानवीय चौकशी अफजल गुरूला मात्र फाशीची शिक्षा होऊनही फाशी देण्यात येत नाही हे या देशाचे दुर्दैव आहे.

संगम बोरकर, मदन सावंत, जयेश थळी यांचीही या धर्मसभेत भाषणे झाली.

मेगा प्रकल्प समर्थक विरोधकांत चकमक

मडगाव, दि. २८(प्रतिनिधी)ः दवंडे येथे मेगा प्रकल्प समर्थक व विरोधकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान परस्परांना धमकी देण्यात झाल्यानंतर मडगाव पोलिसांनी आज रात्री दोन्ही गटातील मिळून ५ जणांना ताब्यात घेतले. त्यांना उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले जाणार आहे.
दोन गटांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी उभय गटात बाचाबाची झाली असता एका गटातील म्होरक्याने दुसऱ्या गटाला धमकी दिली. यावेळी दुसऱ्या गटातील लोकांनी पोलिस स्थानकावर दाखल होऊन धमकी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. परंतु, पोलिस आपली मागणी गांभीर्याने घेत नसल्याचे पाहून त्यांनी तेथे जाऊन धडा शिकविण्याच्या इशारा दिला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व प्रतिस्पर्धी गटातील नेत्यांना पाचारण करून त्यांनाही प्रतिबंधात्मक अटक केली. याविषयीचा अधिक तपास सुरू आहे.

Sunday, 28 December, 2008

सुरक्षेचे अवडंबर नको पर्रीकर

अन्यथा राज्याच्या अर्थव्यवस्थेला फटका
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी)- गोव्यावर दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेने मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडून सुरू असलेली असमंजस वक्तव्ये व सुरक्षेच्या निमित्ताने ठिकठिकाणी सुरू असलेली अनियंत्रित तपासणी यामुळे गोव्यातील नागरिक तथा पर्यटकांमध्ये विनाकारण भीती निर्माण झाली आहे. गोव्यातील पर्यटन उद्योगाचा महत्त्वाचा काळ असलेल्या नाताळ व नववर्षांच्या मौसमात सरकारकडून अविचारी पद्धतीने परिस्थिती हाताळली जात असल्याने त्याचे दूरगामी परिणाम राज्याच्या अर्थकारणांवर होणार असल्याचा धोका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.
आज येथे पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक हजर होते.गोव्यात दहशतवादी हल्ला होणार असल्याचे स्पष्ट संकेत किंवा स्पष्ट कोणतीही माहिती उपलब्ध नाही, केवळ मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सतर्कतेचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.काही महिन्यांपूर्वी गोव्याला "सिमी' किंवा इंडियन मुजाहीद्दीन पासून धोका असल्याचे आपण सांगितले होते तेव्हा मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी त्यास नकार देण्यास अजिबात वेळ लावला नाही . त्याउलट आता मुंबईवरील हल्ल्यांनंतर खडबडून जागे झालेले सरकार मुंडी उडवलेल्या कोंबड्याप्रमाणे फडफडत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
मनुष्यहानी हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य नाही. देशाचे किंवा राज्याचे आर्थिक कंबरडे मोडणे हादेखील त्यांचा प्रमुख उद्देश आहे. मुंबईत हॉटेल ताज व नरीमन हाऊसवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी लगेच दुरुस्ती करून २१ डिसेंबर रोजी पुन्हा ही हॉटेल्स सुरू केली व दहशतवादी हल्ल्याचा अर्थकारणावर काहीही परिणाम होऊ शकला नाही असा संदेश पोहचवला.मात्र गोव्यात नेमकी परिस्थिती वेगळी आहे. येथे केवळ भीतीपोटी राज्याचे अर्थकारणच बिघडवले जात असून सर्व व्यवहार बंद करून दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाण्याची ही पद्धत आपल्याला परवडणारी आहे काय, असा सवालही पर्रीकरांनी केला.
गृह खात्याने योजलेल्या सुरक्षा उपायांबाबत कोणतीही तक्रार नाही. तथापि, ही सुरक्षा लोक किंवा पर्यटकांसाठी जाचक ठरू नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. गोव्यावर "फियादीन' किंवा आत्मघाती हल्ला करण्याचे प्रयोजन असल्यास तो रोखणे खूपच कठीण आहे, त्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम व सतर्क असण्याची गरज आहे,असेही पर्रीकर म्हणाले. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी वक्तव्ये करताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे विदेशी व देशी पर्यटकांनी गोव्यात येण्याचे आपले मनसुबे रद्द केले,असेही त्यांनी सांगितले.राज्यात खुल्या किनारी पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला परंतु विविध बड्या हॉटेल्सना परवानगी दिली यात तफावत कशी काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पणजीतील मांडवी नदीत उभ्या असलेल्या कॅसिनो जहाजांना कोणती सुरक्षा पुरवण्यात आली आहे,असा सवाल करून सुरक्षेबाबत व्यावहारिक विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल हे गोव्यात केवळ नाताळाची सुट्टी साजरा करण्यासाठी आले होते. या भेटीत त्यांनी गोव्यातील सुरक्षेचा घेतलेल्या आढाव्याला अर्थच नव्हता, अशी टीका पर्रीकर यांनी केली.

सागरी अणुहल्ल्याची पाकिस्तानला चिंता

दिल्ली, दि. २७ - चीन व दक्षिण कोरियाकडून मिळविलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या बळावर पाक कितीही तोरा मिरवित असला तरी समुद्रातून अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम धनुष्य आणि सुपरसोनिक वेगाने मार्गातील अडथळ्यांना हुलकावणी देत लक्ष्यावर अचूक मारा करणारे भारताचे क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसचे पाककडे कोणतेही उत्तर नाही.
पाक उत्तर व मध्य भारतावर हल्ला करण्यास सक्षम आहे. मात्र दक्षिणेपर्यंत मजल मारण्याची त्याची क्षमता नाही. तेथेच फारच कमी क्षेत्रफळ असलेल्या पाकिस्तानच्या कोणत्याही ठिकाणांवर भारत अगदी सहज क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो.
सध्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांऐवजी अत्यंत वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अधिक प्रभावी ठरतील, असे मत रणनितीकारांनी व्यक्त केले आहे. भारताकडे असलेले ब्राह्मोस सुपरसोनिक वेगाने हल्ला करते. तेथेच पाककडे बाबर हे सुपरसोनिक वेगवाने मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. असे असले तरी ब्राह्मोसला रोखण्याचे सामर्थ्य पाककडे नाही. ब्राह्मोस क्षेपणास्त्रे जून महिन्यातच लष्कराच्या स्वाधीन करण्यात आलीत. आता नौदलाच्या आयएनएस राजपूतवरही ते तैनात आहे. याशिवाय सुखोई ३० व आयएल-३८ या लढाऊ विमानांवर तैनात करण्यासाठी चाचण्या सुरू आहेत.
भारत समुद्रातून पाकवर अण्वस्त्र हल्ला करू शकतो. हीच पाकपुढे सर्वात मोठी चिंता आहे. मागच्या वर्षी आयएनएस सुभद्रा व आयएनएस सुवर्णा लढाऊ जहाजांवर धनुष क्षेपणास्त्र प्रणाली बसविण्यात आली. ५०० कि.मी.मारक क्षमता असलेले धनुष अगदी सहज ५०० कि.ग्रॅ.वजनाचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. आम्ही समुद्रातून सर्वप्रकारचे हल्ले करण्यास सक्षम आहोत अशी दर्पोक्ती पाकने काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र तज्ज्ञांना यात फारसा दम वाटत नाही. प्रत्यक्षात पाककडे अशी प्रणालीच नाही. वायुसेनेबद्दल विचार केल्यास पाक येथेही भारताच्या बराच मागे आहे.
भारत-पाक क्षेपणास्त्र क्षमता तुलना
भारत पाक
पृथ्वी -१ , क्षमता १५० कि.मी. एम-११, क्षमता २८० कि.मी.
पृथ्वी -२ , क्षमता २५० कि.मी. हत्फ-१, क्षमता १०० कि.मी.
अग्नी -१ , क्षमता ७०० कि.मी. शाहीन-१, क्षमता ७५० कि.मी.
अग्नी -२ , क्षमता २००० कि.मी. शाहीन -२, क्षमता २००० कि.मी.
अग्नी -३ , क्षमता ३००० कि.मी. घोरी-१, क्षमता १३०० कि.मी.
ब्रह्मोस(सुपरसोनिक)क्षमता २९० कि.मी. बाबर (सुपरसोनिक) ७०० कि.मी.
धनुष , मारक क्षमता ५०० कि.मी.
(समुद्रावरून जमिनीवर)
.............
भारत-पाकने तणाव कमी करावा : चीन
वृत्तसंस्था
इस्लामाबाद, २७ डिसेंबर
दक्षिण आशियात शांती व स्थैर्य कायम करण्यासाठी भारत व पाकने तणाव कमी करावा असे आवाहन चीनचे विदेशमंत्री यांग जिएची यांनी केले आहे.
भारत व पाकने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाला कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी तसेच दहशतवादाविरुद्ध संयुक्तपणे कारवाई करायला हवी असे मत जिएची यांनी पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महेमूद कुरेशी यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना व्यक्त केल्याचे वृत्त दैनिक "द न्यूज'ने दिले आहे.
पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव १२६७ नुसार कारवाई करीत असून मुंबईवरील हल्लाप्रकरणी संयुक्त चौकशीकरिताही तयार असल्याचे आश्वासन कुरेशी यांनी चीनला दिले आहे.
............
भारत व पाकने संयम राखावा : अमेरिका
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, २७ डिसेंबर
मुंबईवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आपल्यावर हल्ला चढविणार या चिंतेने पाकिस्तान त्रस्त असून त्यांनी पूर्वेकडील सीमेवर हजारो सैनिक तैनात केले आहेत. पाकची स्थिती बघता दक्षिण आशियातील शेजारी देशांनी संयम राखावा असे आवाहन अमेरिकेने केले आहे.
भारत व पाकदरम्यान सध्या तणाव तसेच युद्धसदृश स्थितीही निर्माण झाली आहे. म्हणूनच अमेरिकन अधिकारी दोन्ही देशांसोबत संपर्क ठेवून असल्याची माहिती व्हाईट हाऊसचे प्रवक्ते गोर्डन जानड्रो यांनी दिली आहे.
दोन्ही शेजारी देशांनी मुंबईवरील हल्ल्याच्या चौकशीत एकमेकांना मदत करावी व दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी एकत्र यावे असे आम्ही वारंवार सांगत आहोत. उभय देशांमध्ये आणखी तणाव वाढेल असे काहीच घडू नये म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही ते म्हणाले.
पाकने पूर्वेकडील सीमेवर हजारो सैनिक तैनात केले असतानाच भारताने त्यांच्या नागरिकांना पाकमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. सद्यस्थितीतीत भारतीयांनी पाकमध्ये जाणे सुरक्षित नाही. २००१ नंतर सध्या उभय देशांदरम्यान सर्वाधिक तणावपूर्ण वातावरण आहे. २००१ मध्ये काश्मिरी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. त्यावेळी भारताने पाकमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबावर या हल्ल्याचा आरोप केला होता. मुंबईवरील हल्ल्यासाठीही लष्करलाच भारताने जबाबदार धरताना पाक कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचा आरोप केला आहे. तेथेच पाकने हा आरोप नेहमीप्रमाणेच यावेळीही फेटाळून लावला आहे. अशा आरोप प्रत्यारोपांमुळेच तणाव वाढत असल्याची प्रतिक्रिया गोर्डन यांनी दिली आहे.

"ऊठ गोंयकारा'चे प्रवक्तेपद ऍड. आयरिश यांनी सोडले

पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - सामाजिक कार्यकर्तेआयरिश रॉड्रिगीस यांनी आज "ऊठ गोंयकारा' या संघटनेच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. या संघटनेतर्फे हाती घेण्यात आलेले माहिती तंत्रज्ञान सचिव आर. पी. पाल भ्रष्टाचार प्रकरण, शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात बनावट शैक्षणिक पात्रता प्रतिज्ञापत्र प्रकरण, तसेच विविध विषयांचे भवितव्य आता संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी ठरवावे, असे सांगून आपण याबाबत आता न्यायालयात संघटनेचे प्रतिनिधित्व करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या १३ ऑक्टोबर रोजी पणजीत प्राणघातक हल्ला झाल्यानंतर घडलेल्या उलथापालथी व त्यानंतर जर्मन अल्पवयीन मुलीवराल अत्याचाराचे गाजलेले प्रकरण, त्यातून तिच्या तक्रारदार आईनेच तक्रार मागे घेण्याचा प्रकार यानंतर काही काळ अज्ञातवासात गेलेले ऍड.आयरिश आज पत्रकारांसमोर आले. त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो समर्थकही यावेळी हजर होते. "ऊठ गोंयकारा' या संघटनेच्या प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मोकळे करण्याची मागणी आपण यापूर्वीच केली होती. नव्या तरुण नेतृत्वाला ही संधी मिळावी, यासाठी आपण या पदाचा त्याग करीत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांनी संघटनेकडून करण्यात आलेल्या वक्तव्यांबाबतही नाराजी व्यक्त करून आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोपही त्यांनी केला. आपल्या नावाचा वापर करून निनावी फोन करणे तसेच आपल्या नावावर बदनामीकारक पत्रके छापून त्याचे वितरण करणे असे प्रकारही सुरू असल्याचे ते म्हणाले. आपल्या या मुद्याला आणखी बळकटी देण्यासाठी त्यांनी मंत्री चर्चिल आलेमाव यांची कन्या वालंका हिची बदनामी करणारे ऍड. रॉड्रिगीस यांच्या नावाचे एक पत्रक सादर केले. संघटनेचे निमंत्रक अमोल नावेलकर व प्रजल साखरदांडे यांनी गेल्या दोन महिन्यांत आपल्याविरोधात बदनामीकारक वक्तव्ये केल्याचा आरोपही त्यांनी केला.
आपण हाती घेतलेल्या अनेक विषयांच्या प्रामाणिकपणावरच शंका उपस्थित केल्यानेही ते दुखावले आहेत.आपल्यासह प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे सूत्रधार मुख्यमंत्री असल्याचा आरोप आपण कधीच केला नाही, केवळ मुख्यमंत्र्यांनी या कटाला हिरवा कंदील दाखवला, असे आपण म्हणालो होतो, असाही खुलासा त्यांनी केला. बाबूश यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतचा मुद्दा क्षुल्लक असल्याचे साखरदांडे यांचे म्हणणे आहे. हा मुद्दा क्षुल्लक होता तर त्यांनी आपल्याला तसे सांगावयास हवे होते. या मुद्यावरून घेतलेल्या पत्रकार परिषदा व पोलिस तक्रार यावेळी साखरदांडे खुद्द आपल्यासोबत होते, याचा त्यांना विसर पडला की काय, असा सवालही आयरिश यांनी केला.
आपण गेल्या ३० वर्षांपासून समाजिक कार्यात आहोत. हे विषय हाती घेताना आपण वैयक्तिक स्वार्थ किंवा लाचारी पत्करली नाही. आपल्यावरील हल्ल्यानंतर उपचाराचे बिल ५४ हजार रुपये झाले व ते पैसे आपण स्वतः अदा केले, असेही आयरिश यांनी स्पष्ट केले. या हल्ल्याच्या निषेधार्थ पणजी आझाद मैदानावर आयोजित केलेल्या सभेवेळी जमा केलेल्या आर्थिक मदतीतून हे बिल फेडण्यात आलेले नाही, असाही खुलासा करून त्या पैशांबाबत आयोजकांनाच विचारा, असे स्पष्टीकरण त्यांनी केले.
राज्याचे ऍडव्होकेट जनरल यांच्याविरोधात अतिरिक्त शुल्क आकारल्याप्रकरणी त्यांनी वैयक्तिकरीत्या आपल्याविरोधात दाखल केलेली दोन प्रकरणे व आरोग्यमंत्री विश्वजित राणे धमकी प्रकरण यांचा सामना करण्यास आपण समर्थ आहोत. आता उर्वरित प्रकरणांचा पाठपुरावा संघटनेने करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वरून ५८ करणे, ऍड.जनरल यांनी सरकारी तिजोरीतून मिळवलेले अतिरिक्त शुल्क, स्कार्लेट कीलिंग मृत्युप्रकरणी तिची आई फियोना हिच्याकडून झालेल्या दुर्लक्ष प्रकरण, माजी सचिव आर.पी.पाल व त्यांची पत्नी यांचे कथित भ्रष्टाचार प्रकरण व शिक्षणमंत्री बाबूश यांचे बनावट शैक्षणिक प्रतिज्ञापत्र आदी विषयांचे भवितव्य संघटनेने ठरवावे व आपण ही प्रकरणे पुढे नेणार नाही, असा खुलासा त्यांनी केला.

कर्नाटक पोटनिवडणुकीत ७० टक्के मतदान

कारवार मतदारसंघामध्ये ६० टक्के
बंगळुरू, दि. २७ (प्रतिनिधी) - कर्नाटकात एकूण आठ मतदारसंघांसाठी आज झालेल्या पोटनिवडणुकीत जवळपास ७० टक्के मतदान झाले. येडियुराप्पा यांच्या मंत्रिमंडळातील चार मंत्री तसेच त्यांच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या तिघांचे भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून आहे. हुक्केरी, देवदुर्ग, कारवार, तुरूवेकेरे, आराभावी, मुधुगिरी, दोड्डाबल्लापूर तसेच माड्डूर या मतदारसंघांमध्ये ही निवडणूक पार पडली. दरम्यान गोव्याच्या शेजारी असलेल्या कारवार मतदारसंघात जवळपास ६० टक्के मतदान झाल्याचे आमच्या कारवार प्रतिनिधीने कळविले आहे.
एकूण ७३ उमेदवार यावेळी निवडणूक रिंगणात होते. यात काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणून आलेले व नंतर भाजपात जाण्यासाठी आमदारकीचा राजीनामा दिलेले तीन तर देवेगौडांच्या जनता दल (निधर्मी) च्या तिकीटावर निवडून येऊनही भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आमदारकी सोडलेल्या चार जणांचा समावेश आहे. त्यांच्या राजीनाम्यांमुळे मतदारसंघातील जागा रिकामी झाल्या होत्या. तर माड्डूर मतदारसंघाचे आमदार एम. एस. सिध्दराजू यांच्या निधनामुळे ती जागा रिकामी झाली होती. माड्डूरमध्ये सिध्दराजू यांची पत्नी निवडणूक लढवत आहे. आमदारकीचे राजीनामे दिलेले आनंद असनोटीकर (कारवार), उमेश कट्टी (हुक्केरी), भालचंद्र झारकीहोळी (आराभावी) व के. शिवण्णागौडा नाईक (देवदुर्ग) हे देवेगौडा मंत्रीमंडळात मंत्री बनले होते. कॉंग्रेस खासदार आर. एल. जलाप्पा यांचे पुत्र जे. नरसिंहस्वामी यांनी आमदारकी व कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. ते दोड्डाबल्लापूरमधून निवडणूक लढवत होते तर भाजपसाठी कॉंग्रेसची आमदारकी सोडलेले डी. सी. थामण्णा माड्डूरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात होते. मधुगिरी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी अनिता जनता दल (निधर्मी) तर्फे निवडणूक रिंगणात होत्या. भाजपमध्ये प्रवेश केलेले जनता दल (निधर्मी) चे माजी आमदार सी. सी. चेन्नीगप्पा यांचे त्यांच्यापुढे कडवे आव्हान होते. दरम्यान, हे निवडणूक निकाल जर अपेक्षेसारखे लागले तर सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचा बहुमताचा प्रश्न निकालात निघू शकतो.

"गोमेकॉ' डॉक्टरांना वेतन आयोगाचा लाभ

नियोजित संप मागे
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी) - गोवा मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांना सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याचे लेखी आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिल्याने येत्या सोमवारी २९ पासून सुरू होणारा संप मागे घेण्याचा निर्णय या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे घेण्यात आला आहे.
गोमेकॉतील या डॉक्टरांना सहाव्या वेतन आयोगाला लाभ देण्यात आला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती व हा लाभ लागू करण्याची मागणी केली होती. यासंबंधी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्यांना तोंडी आश्वासन दिले होते परंतु या महिन्याच्या पगारात हा लाभ देण्यात आला नसल्याने त्यांनी २९ पासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. यावेळी आरोग्यमंत्री राणे यांनी त्यांना लेखी आश्वासन दिले असून नोव्हेंबर व डिसेंबरचा लाभ पुढील पगारात देण्याचेही आश्वासन दिल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे.

वाहतूक उपसंचालक भोसलेंची गुन्हा विभागामार्फतचौकशी

बनावट कागदपत्रांआधारे वाहने नोंदणीचा ठपका
पणजी, दि. २४ (प्रतिनिधी) - रस्ता वाहतूक खात्याचे उपसंचालक अशोक भोसले यांनी साहाय्यक संचालकपदी कामावर असताना अनेक वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याप्रकरणी आज अखेर गुन्हा विभागाने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे. अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेचे उत्तर गोवा अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून याप्रकरणाचा पाठपुरावा चालवला होता. मडगाव येथील "जय दामोदर संघटने' चे अध्यक्ष महेश नायक यांनीही भोसले यांच्याविरोधात गैरकारभाराची तक्रार फोंडा पोलिसांत दाखल केली आहे. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या ४७१ व ४२० कलमांतर्गत प्रथम चौकशी अहवालात गुन्हा नोंदवण्यात आल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
सुदेश कळंगुटकर यांनी याप्रकरणी रस्ता वाहतूक संचालक व दक्षता खात्याकडे दाखल केलेल्या तक्रारीत अशोक भोसले यांनी म्हापसा, फोंडा आदी ठिकाणी रस्ता वाहतूक कार्यालयात साहाय्यक संचालकपदी असताना अनेक वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचे उघडकीस आले आहे. याच काळात त्यांनी विविध वाहनांना कर थकबाकीतही मोठ्या प्रमाणात संशयास्पद सूट दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात गेल्या ३ ऑक्टोबर २००८ रोजी वाहतूक खात्याचे तत्कालीन संचालक श्री. रेड्डी यांनी त्यांना "कारणे दाखवा' नोटीस जारी केली होती. या नोटिशीला भोसले यांनी २८ ऑक्टोबर रोजी उत्तर दिले. तथापि तेे समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरल्याची माहिती खास सूत्रांनी दिली. दरम्यान, भोसले यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश जारी होण्याच्या पार्श्वभूमीवर खुद्द वाहतूक संचालक श्री.रेड्डी यांचीच बदली झाल्याने सरकारकडूनच भोसले यांची पाठराखण सुरू असल्याचा संशयही बळवला आहे.
दरम्यान, जय दामोदर संघटनेचे महेश नायक यांनी यापूर्वी या खात्यातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे दक्षता खात्याकडे सुपूर्द केली आहेत व खास करून श्री.भोसले यांनी केलेले गैरप्रकार त्यांनी संसदीय समितीसमोरही सादर केले होते. त्यावेळी त्यांना यासंबंधी दक्षता खात्याकडे ही प्रकरणे सुपूर्द करण्याची सूचना करण्यात आली होती. ही प्रकरणे दक्षता खात्याकडे सध्या धूळ खात पडली असताना आता नायक यांनी थेट पोलिस तक्रार करून पुन्हा खळबळ माजवली आहे.
उपसंचालक भोसले यांनी फोंडा कार्यालयात असताना अनेक बनावट पत्त्यांवर लोकांची वाहने नोंद केल्याचा आरोप त्यांच्याविरोधातील तक्रारीत करण्यात आला आहे. नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले हे ०९-०५-१९९३ ते ३१-०१-१९९५, ०३-०८-१९९८ ते १८-०९-१९९८ व २७-०६-२००५ ते ०८-०३-२००७ या काळात फोंडा रस्ता वाहतूक कार्यालयात सेवेत होते.या काळात त्यांनी मोटर वाहतूक कायद्याचे उल्लंघन करून तसेच विक्री फॉर्म २१ वर वाहन खरेदीदाराचा पूर्ण पत्ता न घेताच वाहने नोंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राज्यात गुन्हेगारी प्रकरणांसाठी अशा प्रकारच्या वाहनांचा वापर केला जात असल्याने वाहन मालकाची संपूर्ण माहिती खात्याकडे उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे नायक म्हणाले. या तक्रारीसोबत नायक यांनी विविध वाहनांचे क्रमांक दिले पोलिसांना सुपूर्द केले असून या वाहनांची नोंदणी करताना निष्काळजीपणा केल्याचा ठपकाही या तक्रारीत ठेवण्यात आला आहे. या तक्रारीची चौकशी तात्काळ करण्यात यावी ,अशी मागणीही त्यांनी केली आहे.