Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 9 June 2011

आरोग्य खात्याने मागितली न्यायालयाची बिनशर्त माफी

चार वर्षे पूर्ण झाल्यादिनीच सरकार नामुष्की
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ सुरू करण्यास अपयश आल्याने आरोग्य खात्याने आज न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. तसेच, येत्या १५ ऑगस्टला किंवा त्याही पूर्वी जिल्हा इस्पितळ सुरू केले जाणार असल्याची लेखी हमी खात्याचे सचिव राजीव वर्मा यांनी दिली. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या सरकारला आज चार वर्षे पूर्ण होत असलेल्या पार्श्‍वभूमीवर सरकारवर न्यायालयाची लेखी माफी मागण्याची पाळी आली.
आदेश देऊनही इस्पितळ अजून का सुरू करण्यात आले नाही, याची लेखी माहिती द्या, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दात सुनावल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत आरोग्य सचिवांनी बिनशर्त माफी मागितली. तसेच, इस्पितळ सुरू करण्यास आत्तापर्यंत कोणकोणती पावले उचलण्यात आली आहे याचीही माहिती दिली जाणार असल्याचे सांगितले. न्यायालयाने सदर हमीपत्र स्वीकारल्यानंतर याविषयावरील सुनावणी येत्या १६ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. आरोग्य खात्याचे सचिव राजीव वर्मा आज प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहिले होते. यावेळी त्यांच्याबरोबर आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. राजनंदा देसाई याही उपस्थित होत्या.
दि. ३ फेब्रुवारी २०११ पर्यंत जिल्हा इस्पितळ सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले होते. परंतु, हे इस्पितळ सुरू करण्यास सरकारला अपयश आले. त्यानंतर सरकारने पुन्हा ३० मेपर्यंत इस्पितळ सुरू केले जाणार असल्याचे आश्‍वासन न्यायालयाला दिले. त्या तारखेलाही सरकारला इस्पितळ सुरू करणे शक्य झाले नसल्याने खंडपीठाने आरोग्य खात्याला कडक शब्दात खडसावले.
‘तुम्ही १५ ऑगस्ट २०११ ची तारीख दिली आहे. त्यापूर्वीच तुमची गोव्यातून बदली होणार नाही ना?’ असा प्रश्‍न न्यायमूर्तींनी केला. त्यावर ‘आपली बदली झाली तरी इस्पितळाचा शुभारंभ होत नाही तोवर आपण गोवा सोडणार नाही’ असे तोंडी आश्‍वासन श्री. वर्मा यांनी खंडपीठाला दिले. सकाळी सदर याचिका सुनावणीस आली असता ऍडव्होकेट जनरल सुबोध कंटक यांनी सोमवारपर्यंत वेळ देण्याची विनंती केली. परंतु, न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळून लावत इस्पितळ सुरू कधी करणार याची तारीख हमीपत्रावर द्या, असा आदेश दिला. अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका सादर केली जाईल, असे सुनावले. यानंतर दुपारी १२ पर्यंत तडकाफडकी हमीपत्र सादर करण्यात आले.
सध्या आझिलो इस्पितळातील काही कर्मचार्‍यांना येत्या आठवड्यापर्यंत जिल्हा इस्पितळात पाठवले जाणार आहे. तसेच, यंत्रणाही हलवली जाणार असल्याचे यावेळी सांगितले. रेडीयंट लाइफ केर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्कात असल्याची माहिती यावेळी सरकारने न्यायालयाला दिली.

No comments: