Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 15 August, 2009

मांगिरीष मंदिरातून मूर्तीची चोरी


कुठ्ठाळी परिसरात तीव्र संताप

सोन्यांच्या ऐवजासह लाखाची लूटवास्को, दि. १४ (प्रतिनिधी)- राज्यात मूर्तिभंजन प्रकरणांची संख्या वाढत असतानाच आता थेट मूर्ती चोरून नेण्याची घटना घडली आहे. व्होळांत, कुठ्ठाळी येथील श्री मांगिरीष मंदिरातून अज्ञातांनी देवाची (पालखीतील) मूर्ती व सोन्याचे ऐवज मिळून सुमारे एका लाखाची मालमत्ता लंपास केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री सदर घटना घडली. व्होळांत, कुठ्ठाळी येथे असलेल्या मांगिरीष कुशस्थ ग्रामस्थ संस्थान मंदिराच्या बाजूच्या दरवाजाचे कुलूप अज्ञातांनी तोडून आत असलेली श्री देव मांगिरीषाची पालखीत घालण्यात येणारी चांदीची मूर्ती तसेच मंदिरामध्ये ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या ऐवजासह पोबारा केला.
यात कर्णफुले, सोनसाखळी आदींचा समावेश आहे. आज सकाळी सदर घटनेची माहिती येथील ग्रामस्थांना मिळताच येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. देवस्थानचे खजिनदार दिलीप बांदोडकर यांनी मंदिरामध्ये झालेल्या चोरीबाबत वेर्णा पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन श्वानपथक व ठसेतज्ज्ञांच्या मदतीने पंचनामा केला.
अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख पाच हजार आठशे रुपयांची मालमत्ता या मंदिरातून लंपास केल्याची माहिती वेर्णा पोलिसांनी दिली. चोरट्यांबाबत अद्याप कोणतीच माहिती उपलब्ध झालेली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. मुरगाव तालुक्यातील वास्को व आसपासच्या परिसरात गेल्या काही काळापासून चोरीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असतानाच आता वेर्णा भागातही यात प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे. या महिन्यातील हे तिसरे चोरीचे प्रकरण येथे नोंद करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी येथील पोलिसांकडून कडक गस्त घालण्यात येत असताना सुद्धा भर रस्त्यांवरील ठिकाणी चोऱ्या कशा प्रकारे होत आहेत, असा प्रश्न उपस्थित होते आहे. मुरगाव तालुक्यातील जनतेमध्ये सध्या असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रसन्ना भगत पुढील तपास करीत आहेत.

सहा खाणींना काम बंद नोटीस


प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत पर्यावरणमंत्र्याची कार्यवाही


पणजी,दि.१४ (प्रतिनिधी)- पर्यावरणमंत्री आलेक्स सिकेरा यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत अभयारण्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहा खाण कंपन्यांना काम बंद करण्याचे आदेश गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत जारी केले आहेत.
विधानसभेत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी यासंबंधी पर्यावरणमंत्र्यांना वेठीस धरल्याने सात दिवसांत संबंधित खाण कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन श्री. सिकेरा यांनी दिले होते. काल प्रदूषण नियंत्रण मंडळाने यासंबंधी तात्काळ कारवाई करीत सांगे, केपे व सत्तरी तालुक्यातील एकूण सहा खाण कंपन्यांना तात्काळ नोटीस पाठवून काम बंद करण्याचे आदेश जारी केले. अभयारण्य क्षेत्रात खाण सुरू करण्यासंबंधीची परवानगी मिळवल्यानंतर हे आदेश मागे घेण्याचेही नोटिशीत म्हटले आहे,अशीही माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान,विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी बेकायदा खाणींविरोधात सभागृहात टीका करताना अभयारण्य क्षेत्रातही खाणी सुरू असल्याचा आरोप केला होता. यावेळी वनमंत्री फिलीप नेरी रॉड्रिगीस यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईमुळे तथाकथित खाणी अभयारण्य क्षेत्रात सुरू असल्याचे उघड झाल्याने फिलीप नेरी यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येते आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर खाण खात्याकडून सदर सहाही खाण कंपनीचे करार रद्द केल्याचीही खात्रीलायक माहिती उघड झाली आहे.
राज्यात काही खाण कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यवहार सुरू असून एकीकडे वनक्षेत्राची हानी होते आहे तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा महसूलही बुडवला जात आहे. खाण खाते मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे असल्याने त्यांनी येत्या सहा महिन्यात सर्व बेकायदा खाणी बंद करण्याचे आश्वासनही दिले आहे.

"फीडर' बोटींवरील बंदी मागे घेण्याचा खटाटोप

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी)- बंदर कप्तान खात्याकडून ना हरकत दाखला कालबाह्य ठरलेल्या चार कॅसिनो जहाजांना ग्राहकांची ने आण करणाऱ्या "फीडर' बोटींवर बंदी टाकण्यात आल्याने सरकाराअंतर्गत सध्या मतभेद निर्माण झाले आहेत. हा बंदी आदेश उठवण्यासाठी बंदर कप्तानांवर दबाव टाकण्यात येत असून यासंबंधी मुख्य सचिव, बंदर कप्तान यांची संयुक्त बैठक बोलावून हा आदेश मागे घेण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात बंदर कप्तान खात्याकडून ना हरकत दाखला कालबाह्य ठरल्याने एकूण चार कॅसिनो जहाजांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावण्यात आल्यानंतरही या चारही कॅसिनो जहाजांकडून व्यवहार सुरू ठेवण्यात आल्याने या कॅसिनोंना ग्राहक पुरवणाऱ्या "फीडर' बोटींच्या वाहतुकीवर बंदी टाकण्याचे आदेश बंदर कप्तान खात्याकडून जारी करण्यात आले होते. या आदेशामुळे या कॅसिनोंचा व्यवहाराच ठप्प पडला. त्यांनी लगेच आपले राजकीय वजन वापरून ही बंदी उठवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव, बंदर कप्तान यांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी बैठकही घेतल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. या बैठकीत नेमका कोणता निर्णय झाला याबाबत मात्र कुणीच बोलायला तयार नाही. मुख्य सचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मोबाईलच उचलत नाहीत,अशीच परिस्थिती होती.
बंदर कप्तान खात्याचे मंत्री मिकी पाशेको यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कॅसिनोबाबत कडक धोरण अवलंबिले आहे. पर्यटनमंत्र्यांचे ही भूमिका आता सरकारसाठीच डोकेदुखी बनली आहे.काही कॅसिनो मालकांचे संबंध थेट दिल्लीपर्यंत असून दिल्लीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही सरकारवर दबाव टाकला जात असल्याचीही खबर राजकीय वर्तुळात पसरली आहे.सभागृहात विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातीलही अनेक नेत्यांचा कॅसिनोला विरोध आहे तरीही कॅसिनोच्या विरोधात कारवाई करण्यास सरकार धजत नाही, याचे नेमके कारण दिल्लीचा दबाव असल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे.

स्वाईन फ्लूचा कहर सुरूच

बळीसंख्या २४
रायपुरात गेला पहिला बळी

पुणे/रायपूर, दि. १४ - स्वाईन फ्लूने महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावित झालेल्या पुणे येथील पंधराव्या आणि रायपूरमधील पहिल्या बळीने देशभरातील फ्लू बळींची संख्या आज २४ वर पोहोचली आहे.
आज पुण्यात ७० वर्षीय पारूबाई शिंदे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यांच्यात या आजाराची सर्व लक्षणे आढळून आली होती. त्यांच्या मृत्यूने आज पुण्यातील एकूण बळींची संख्या १५ वर पोहोचली आहे.
याशिवाय आज छत्तीसगडमध्येही फ्लूचा शिरकाव झाल्याचे सिद्ध झाले. येथील १८ वर्षीय सीताराम वर्मा याचे या फ्लूने निधन जाले. मूळचा तो भिलईचा राहणारा होता. न्यूमोनिया आणि घशातील इन्फेक्शनमुळे त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या घशातील द्रवाची तपासणी करण्यात आली. त्याचे नमुने दिल्लीला पाठविण्यात आले. त्यातील अहवालात त्याला स्वाईन फ्लू झाल्याची पुष्टी करण्यात आली. तो नुकताच पुण्याहून परतला होता.
पुण्यासह देशात नाशिक, मुंबई, बंगलोर, अहमदाबाद, बडोदा, चेन्नई, रायपूर आणि तिरुवनन्तपुरम येथे स्वाईन फ्लूचे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. देशात स्वाईन फ्लूची बळीसंख्या दररोज वाढतच असल्याने केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची योजना आखली आहे. त्याची अंमलबजावणीही आजपासून सुरू झाली असून त्यात रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे कशी शोधायची, त्याचे निदान कसे करायचे, उपचार आणि दक्षता याविषयीची माहिती समाविष्ट राहणार आहे.
प्रयोगशाळेतील तपासणीचा मुख्य उद्देश
केंद्र सरकारने फ्लूसंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देशभरातील प्रयोगशाळांमध्ये शास्त्रीय पद्धतीने याची तपासणी व्हावी, हा असल्याचे समजते. देशातील खाजगी प्रयोगशाळांना स्वाईन फ्लूच्या तपासणीचे अधिकार देतानाच सरकारने तेथे किमान दोन तज्ज्ञ असावेत, असा आग्रह धरला आहे. रुग्णालयातून एखाद्या संशयिताचे रक्ताचे नमुने घेऊन जाताना कोेणती खबरदारी घ्यावी, मास्क कसा वापरावा यासह सर्वच बाबींची माहिती दिली जाणार आहे.

औदुंबर पेडणेकरचा "तो' जामीन ग्राह्य

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - अल्पवयीन मोलकरणीवरील शारीरिक अत्याचार प्रकरणात बाल न्यायालयाने औदुंबर पेडणेकर याच्या विरोधात दिलेला आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरवला तर त्याची पत्नी मीनाक्षी पेडणेकर हिला जामीन मंजूर करण्यात आला. यामुळे पेडणेकर याला यापूर्वी मिळालेला जामीन ग्राह्य धरला जाणार आहे. परंतु, या प्रकरणातील आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याला पुन्हा जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश गोवा खंडपीठाने दिले आहेत.
पोलिसांनी पिडीत मुलगी अनुसूचित जमातीतील असल्याचा दावा केलेला असला तरी, त्याविषयीचे कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे सादर करू शकले नाही. त्याप्रमाणे मुलीच्या आजोबांनी पोलिस तक्रार केली नसल्याचीही दखल न्यायालयाने घेतली. सरकारपक्षाने या सुनावणीवेळी या खटल्याला अधिक मजबुती देण्यासाठी कोणतेही अधिक पुरावे सादर केले नसल्याचेही न्यायालयाने आपल्या आदेशात यावेळी नमूद केले. त्याचप्रमाणे, गेल्या सात दिवसांपासून मीनाक्षी ही पोलिस स्थानकात हजेरी लावून तपास कामात पोलिसांना सहकार्य करीत असल्याने तिला अटक करू नये, हा युक्तिवाद ग्राह्य धरून तिचा अटकपूर्व जामीन अर्ज मान्य करण्यात आला.
दि. १ ऑगस्ट ०९ रोजी बाल न्यायालयाने औदुंबर पेडणेकर याला मिळालेला जामीन रद्द ठरवून पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संशयित पेडणेकर याने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. त्याचप्रमाणे मीनाक्षी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज बाल न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर तिनेही गोवा खंडपीठात धाव घेतली होती.
सरकारी पक्ष सदर पिडीत मुलगी अनुसूचित जमातीतील असल्याचे सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याचे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले."स्कॅन' या संस्थेने मुलीवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

स्वातंत्र्यदिनानिमित्त तपासणीमुळे शहरात खोळंबा तर सीमेवर ओस

पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) - राज्याच्या सीमेवर असलेल्या पोलिस नाक्याची फाटके सताड उघडी ठेवली जात असून शहरात मात्र पोलिसांना गाड्या अडवून जोरदार तपासणी मोहीम सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या आधी गेल्या दोन दिवसापासून ही तपासणी सुरू झाली असून काल रात्रीही अनेक ठिकाणी वाहने अडवून वाहनांची तपासणी करण्यात आली. पणजी पाटो पुलावर आणि मांडवी पुलावर वाहने अडवली जात असल्याने वाहनांची प्रचंड कोंडी होत असल्याने अनेकांनी नापसंती व्यक्ती केली आहे. या विषयावरून काही पत्रकारांनी आज सीमेवरील चेक नाक्यांची पाहणी केली असता त्यांना त्याठिकाणी असलेले पोलिस टीव्हीवरील कार्यक्रमांचा आस्वाद घेत असल्याचे आढळून आले. पलीकडच्या राज्यातून गोव्यात कोणती वाहने येतात, त्यात कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती नाहीत ना, याची तपासणीही करण्याची तसदी या पोलिसांकडून घेतली जात नसल्याचे यामुळे उघड झाले आहे. परंतु, शहरात असलेल्या विविध वाहनचालकांना वेठीस धरून त्यांची तपासणी केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सीमा भाग आणि शहरातील तपासणी यातील विरोधाभास पाहता अशा प्रकारची ही तपासणी केवळ लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी केली जात आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडायला लागला आहे.

Friday, 14 August, 2009

स्वाईन फ्लूने कर्नाटकात महिला दगावली, देशात बळीसंख्या २१

पुणे/बंगलोर, दि. १३ : स्वाईन फ्लूचा फैलाव आता अन्य राज्यातही पसरू लागला असून, आज या आजाराने कर्नाटकात शिरकाव केला आहे. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलोर शहरात आज या आजाराने एक महिला दगावली आहे. पुण्यातही या आजाराने सर्वाधिक १२ जणांचे बळी घेतले असल्यामुळे देशातील एकूण बळीसंख्या २१ पर्यंत पोहोचली आहे. कोलकाता येथेही चार जणांना स्वाईन फ्लू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
कर्नाटकमधील पहिला बळी ठरलेली महिला एक शिक्षिका असून या २६ वर्षीय शिक्षिकेचे नाव रूपा असल्याचे समजते. बंगलोरच्या सेंट फिलोमेना हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले होते. ७ ऑगस्ट रोजी न्यूमोनियाच्या उपचारासाठी तिला दाखल करण्यात आले. पण, नंतर स्वाईन फ्लूची पुष्टी झाली. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचीही तक्रार होती. आयटी हब म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बंगलोरमध्ये या पहिल्या मृत्यूनंतर रूपा शिक्षिका असणाऱ्या शाळेत आणि अन्य ठिकाणी स्वाईन फ्लूची चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
देशात स्वाईन फ्लूचा सर्वाधिक प्रकोप महाराष्ट्रात दिसून आला असून पुण्यात आज आणखी दोन बळी गेले. त्यात ७५ वर्षीय महिला भारती गोयल आणि ३७ वर्षीय अर्चना कोल्हे यांचा समावेश आहे. रांजणगावच्या अर्चनाला पुण्यातील श्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी १७ ऑगस्टला तिची स्वाईन फ्लूची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुण्यात आणण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु, आज सायंकाळी पावणे चारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. अर्चनाच्या मृत्यूनंतर पुण्यातील बळीसंख्या वाढून १२, तर महाराष्ट्रातील ही संख्या १६ झाली आहे.
भारती गोयल यांना रात्री दोन वाजता ससूनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण, सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्यांनी प्राणज्योत मालवली. श्रीमती गोयल यांना दम्याचा त्रास होता. त्या येरवड्याच्या राहणाऱ्या होत्या.
तसेच, ऋत्विक कांबळे या ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यूदेखील स्वाईन फ्लूनेच झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. त्याला काल रात्री ससूनमधून सह्याद्री मुनोत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्रीच तो दगावला. पण, त्याचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे तो स्वाईन फ्लूने दगावल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

गोव्यात उपाययोजना सुरू

केंद्रीय आरोग्य सचिवांनी घेतला आढावा
तातडीने स्कॅनर पुरवण्याची मुख्यमंत्र्यांकडून मागणी
दक्षिण गोव्यात १३ रुग्ण, मडगावात ४ ?

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): देशाप्रमाणेच गोव्यातही स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढत चालले असून, दक्षिण गोव्यात या रोगाचे १३ रुग्ण असल्याचे आज स्पष्ट झाले. यात बहुतांश विदेशी नागरिक असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य खात्याचे संयुक्त सचिव सुभाष कुंठिया यांनी राज्याला भेट देऊन आज उच्चस्तरीय बैठकीत येथील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी राज्याला तातडीने स्कॅनर व मास्क पुरविण्याची मागणी त्यांच्याशी केली.
केंद्रीय आरोग्य खात्याच्या संयुक्त सचिवांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्याशी चर्चा करून येथील स्थिती जाणून घेतली. त्यांनी चिखली, मोले तसेच बांबोळी येथील इस्पितळांना भेट दिली व एकंदरीत व्यवस्थेचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव श्री. कुंठिया यांनी यावेळी इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले.
स्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांसाठी चिखली व बांबोळी येथे सुरू करण्यात आलेले खास विभाग अपुरे पडत असल्याने प्रत्येक जिल्हा इस्पितळ व आरोग्य केंद्रात नियंत्रण कक्ष सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री कामत यांनी यावेळी केली. याशिवाय प्रमुख इस्पितळात खास विभाग सुरू करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, स्वाईन फ्लूवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री कामत यांनी केले आहे.
स्वाईन फ्लूचा धोका रोखण्यासाठी गोव्याच्या सीमेवर खास तपासणी नाके उभारण्यात आले असून मोले, कुळे, सुर्ला व पत्रादेवी तसेच रेल्वेस्टेशनवर प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे. पत्रादेवी येथे आज ३० बसगाड्यांमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली. डॉक्टरांच्या खास पथकाने या प्रवाशांना आज तपासले.
दक्षिण गोव्यात १३ रुग्ण ः मडगावात ४ ?
मडगाव, (प्रतिनिधी)ः स्वाईन फ्लूची बाधा गोव्यात नेमकी किती जणांना झाली आहे याचा नेमका आकडा सरकारकडे नसला तरी येथील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण गोव्यात १३ रुग्ण फ्लूबाधित आहेत व त्यातील बहुतेक विदेशी नागरिक आहेत. मडगावात चौघांना बाधा झाल्याचे वृत्त आहे.
मडगाव सापडलेले चार रुग्ण हे हॉंगकॉंगहून गोव्यात आले होते. त्यांना उपचारासाठी चिखली येथील कुटीर आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी मोतीडोंगरावरील टी.बी. हॉस्पिटलमध्ये एक कक्ष स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी ठेवण्यात येईल असे सांगितलेले असले तरी तो सुसज्ज करण्यासाठी आणखी किमान दहा दिवसाचा अवधी लागणार आहे. त्या हॉस्पिटलच्या चारही बाजूने झाडा झुडपांचे जंगल झालेले आहे. शिवाय ती इमारतही मोडकळीस आलेली असून वरचे छप्पर केव्हा कोसळेल हे सांगता येत नाही. टी. बी. रुग्णालयाचे डॉ. तनेजा हे तयारी करीत आहेत.
कोकण रेल्वे स्टेशनवरील टॅक्सी चालकांनी मास्कचा वापर सुरू केला आहे. गोव्यात मास्कचा तुटवडा असून आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांकडे त्यांचा मुबलक पुरवठा कधी होईल याची माहिती उपलब्ध नाही. मात्र आके येथील खासगी दुकानात मास्क विकण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सध्या पुणे, मुंबई, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेशातून मोठ्या प्रमाणात कामगाराचा लोंढा रेल्वेने येत आहे व मडगाव परिसरात राहण्यासाठी धडपडताना दिसत आहे. हा लोंढा रोखण्यासाठी सरकारकडून अद्याप तरी कोणतेच उपाय घेतलेले दिसत नाहीत.
-------------------------------------------------------
शिक्षण खात्याने आज सर्व शाळांना परिपत्रक पाठवून २१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट सुट्टी देण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात गणेश चतुर्थीची सुट्टी २२ पासून सुरू होणार होती. विद्यार्थी अथवा शिक्षकांना जर तापाचा त्रास जाणवू लागला तर दहा दिवस दाखला न देता घरी राहण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे.

दर्शना नाईक खूनप्रकरणी महानंदविरुद्ध आरोपपत्र

फोंडा, दि.१३ (प्रतिनिधी): तरवळे शिरोडा येथील दर्शना तुकाराम नाईक हिच्या खून प्रकरणी क्रूरकर्मा महानंद रामनाथ नाईक याच्याविरोधात फोंडा पोलिसांनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयात आज (दि.१३) आरोपपत्र दाखल केले आहे. या खून प्रकरणात काझीवाडा फोंडा येथील सराफ उल्हास रिवणकर यालाही सहआरोपी करण्यात आला आहे.
क्रूरकर्मा महानंद नाईक याच्याविरोधात खून प्रकरणात दाखल करण्यात आलेले हे दुसरे आरोपपत्र आहे. दर्शना नाईक हिचा १९९४ साली खून करण्यात आला होता. तरवळे येथील दर्शना नाईक हिला बांबोळी येथे नेऊन तिचा खून केल्याचा आरोप क्रूरकर्मा महानंद नाईक याच्यावर ठेवण्यात आला आहे. क्रूरकर्मा महानंद नाईक याच्या शेजारीच दर्शना हिचे घर आहे. महानंदविरुद्ध सुमारे साडे तीनशे पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. पन्नास साक्षीदारांच्या जबान्या त्यात नोंदविण्यात आलेल्या आहेत. या खून प्रकरणाचा तपास निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक पेडणेकर यांनी केला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करा

भाजप वैद्यकीय विभागाचे निमंत्रक डॉ.शेखर साळकर यांचे आवाहन

सरकारने अजूनही कंबर कसण्याची गरज

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): स्वाईन फ्लूबाबत गोव्यात अद्याप चिंताजनक परिस्थिती उद्भवली नसली तरी गणेश चतुर्थीच्या काळात ही साथ अधिकाधिक फोफावण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची नितांत गरज आहे. यंदा गणेश चतुर्थीचा उत्सव लोकांनी घरात राहूनच साजरा करणे उचित ठरेल. सार्वजनिक आरोग्यासंदर्भात हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो, त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करून श्री गणेशाकडे या रोगाचे संकट टाळण्याची प्रार्थना करावी. जनतेने जास्तीत जास्त गर्दीत जाणे टाळावे व आरोग्याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय विभागाचे निमंत्रक डॉ. शेखर साळकर यांनी केले.
आज पणजी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. साळकर यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडून स्वाईन फ्लूबाबत उपाययोजना आखल्या जात आहेत पण मनुष्यबळाची कमतरता ही मोठी अडचण सरकारला भेडसावत आहे. सरकारने ताबडतोब सर्व संबंधितांची एक संयुक्त बैठक बोलवावी व सर्वांना विश्वासात घेऊन नियोजित पद्धतीने या साथीचा मुकाबला करावा. राजकीय पातळीवरही सर्व पक्षीय बैठक बोलावून जनतेत जास्तीत जास्त जागरूकता व काळजी घेण्याबाबत जनतेला आवाहन करावे, असेही डॉ. साळकर म्हणाले. राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना या साथीबाबत अवगत करणे गरजेचे आहे. या विषयाला धार्मिक किंवा इतर कोणताही राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असे आवाहन डॉ. साळकर यांनी केले.
या प्रकरणी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा विषय चर्चेला घेतला आहे. भाजपकडून त्यांच्या समर्थक गणेशोत्सव मंडळांकडे बोलणी करून त्यांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जाणार आहे, असेही डॉ. साळकर म्हणाले. सरकारने स्वाईन फ्लूबाबत उपाययोजना आखल्या असल्या तरी हा कार्यक्रम अत्यंत नियोजित पद्धतीने राबवण्याची गरज आहे. ही परिस्थिती आटोक्याबाहेर गेल्यास ती हाताळणे सरकारला जड जाईल. स्वाईन फ्लू रुग्णांची तपासणी केवळ गोमेकॉ व चिखली इस्पितळात होते. संशयितांचे नमुने गोळा करून पुणे येथे पाठवले जातात व तिथून दोन ते तीन दिवसांनी त्याचा अहवाल येतो. पुणे येथे यापूर्वीच परिस्थिती गंभीर बनल्याने चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळेवरही कामाचा बोजा वाढेल. खाजगी डॉक्टर या रुग्णांवर उपचार करू शकत नाही. या साथीबाबत औषधे केवळ सरकारकडे उपलब्ध आहेत. स्क्रिनींग मशीनसाठी राज्य सरकारने केंद्राला पत्र पाठवले आहे पण ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सरकारने तात्काळ ही मशीन्स खरेदी करून महामार्गाच्या सीमेवर, रेल्वे व विमानतळ आदी महत्त्वाच्या ठिकाणी ती तैनात करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
शैक्षणिक संस्थांना २१ पासून चतुर्थीची सुट्टी जाहीर करून सरकारने नेमके काय साध्य केले, असा सवाल करून सर्व मॉल, मल्टीप्लेक्स तसेच गर्दी होणारी सर्व ठिकाणे बंद ठेवण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली. या जंतूंचा फैलाव टाळण्यासाठी किमान आठ दिवस सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवावीत, असेही आवाहन यावेळी करण्यात आले. या जंतूंपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त मास्क बाजारात उपलब्ध नाहीत तसेच या मास्कचे दरही वाढवण्यात आले आहेत. सरकारने तात्काळ हे मास्क उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. या जंतूंचा प्रादुर्भाव किमान सहा महिने राहणार असून त्याबाबत सतर्कता व काळजी घेतली तरच त्याचा प्रसार थांबू शकेल, अन्यथा परिस्थिती आटोक्यात येणे कठीण होऊन जाईल, असा इशाराही डॉ. साळकर यांनी दिला.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबई व पुण्याहून हजारो लोक राज्यात दाखल होणार आहेत, त्यामुळे त्यांची तपासणी व आवश्यक उपचाराची सोय उपलब्ध करावी लागेल. काही बड्या खाजगी इस्पितळांशी चर्चा करून त्यांची उपचारासाठी मदत घेण्याबाबतही विचार झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. सरकारने सध्याच्या परिस्थितीत उर्वरित सर्व विषयांना तात्पुरता पूर्णविराम देऊन या भयंकर संभावित संकटावरच आपले लक्ष्य केंद्रित करण्याची गरज आहे. सांगे येथे चिकूनगुनीया रुग्णांची संख्या वाढत आहे पण त्याबाबत तोडगा काढण्यातही आरोग्य खाते अद्याप यशस्वी झाले नाही. गोव्यात ऑक्टोबर महिन्यापासून पर्यटन मौसम सुरू होतो. राज्य सरकार या साथीचा कोणत्या प्रकारे सामना करेल त्यावरच पर्यटन मौसमाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. राज्याचे आरोग्य व आर्थिक भवितव्य सांभाळण्याचे आव्हान सरकारसमोर आहे, याची आठवणही डॉ. साळकर यांनी यावेळी करून दिली.

सीमांवर कडक तपासणी

पणजी,दि.१३(प्रतिनिधी): दाबोळी विमानतळावर १७६ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची स्वाईन फ्लू संदर्भात तपासणी करण्यात आली. आत्तापर्यंत एकूण १६३९० प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. आज एकूण तीन प्रवाशांच्या लाळेचा नमुना घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. धारगळ चेक नाक्यावर एकूण ४४ वाहनातून आलेल्या १३२० प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मोले नाक्यावर १५२ वाहनांतून आलेल्या १३१२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. चिखली येथील कॉटेज इस्पितळात एका रुग्णाला पाठविण्यात आले आहे.

स्वाईन फ्लू रोखण्यासाठी...

तुळशीची पाने परिणामकारक
आयुर्वेदिक डॉक्टरांनी बहुगुणी तुळशीची पाने स्वाईन फ्लूवर परिणामकारक ठरू शकतात, असा दावा करताना हे स्पष्ट केले आहे की, २० ते २५ पाने दिवसा दोन वेळा उपाशी पोटी खाल्यास प्रतिकारशक्ती वाढते, त्याचप्रमाणे स्वाईन फ्लू बाधित रुग्णाला लवकर बरे वाटण्यास ती साहाय्यभूत ठरतात.
--------------------------------------------------------
स्वाईन फ्लूचे विषाणू हे संसर्गजन्य आहेत का, असा प्रश्न विचारला जात असला तरी विषाणू पसरण्याचे प्रमाण किती आहे, याला अद्याप निश्चित उत्तर नाही. स्वाईन फ्लू या तापाची लक्षणे साध्या तापासारखीच असतात. त्यामध्ये शरीराचे उष्णतामान वाढणे, खोकला येणे, गळा आतून सुजणे, अंग दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजणे अथवा अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. काही जणांना ओकारी अथवा शौचास होण्याचे प्रकारही घडतात, त्यामुळे अनर्थ घडू शकतो. एखाद्याला जुनाट विकार असल्यास स्वाईन फ्लूचा परिणाम अधिक जाणवतो.
मुलांमध्ये अधिक वेगाने श्वासोच्छवास होत असल्यास अथवा श्वास घेताना अडथळा जाणवत असल्यास, कातडीचा रंग निळसर अथवा तपकिरी झाल्यास, पातळ पदार्थ कमी प्रमाणात प्यायल्यास, सतत ओकारी होत असल्यास अथवा लवकर न उठल्यास किंवा संवाद कमी झाल्यास, ताप येऊन गेल्यानंतर पुन्हा ताप व खोकला येत असल्यास ती स्वाईन फ्लूची प्राथमिक लक्षणे मानावी लागतील व त्यांच्यावर तातडीने उपचार होणे आवश्यक ठरते.
वयस्कर व्यक्तींमध्ये-
श्वास घेताना त्रास जाणवल्यास, छातीत अथवा पोटात दुखू लागल्यास, घेरी आल्यासारखे वाटल्यास, सतत ओकारी येऊ लागल्यास अथवा ताप येऊन गेल्यानंतर पुन्हा ताप व खोकला येऊ लागल्यास ही स्वाईन फ्लूची लक्षणे समजून उपचार करणे आवश्यक आहे.
सामान्य ताप ज्याप्रमाणे पसरतो, त्याप्रमाणे स्वाईन फ्लूचे विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात. खोकला अथवा शिंका येण्याने ते लवकर पसरतात. जेथे विषाणू आहेत, तेथे स्पर्श झाल्यास किंवा नाक अथवा तोंडातून हे विषाणू लवकर पसरतात. ज्यांना स्वाईन फ्लूची बाधा झाली आहे, त्यांना याबद्दल कल्पना यायला विलंब झाला तरी तेथून हे विषाणू इतरांमध्ये लवकर प्रवेश करतात.
स्वाईन फ्लू रोखण्यासाठी कोणतीही लस सध्या उपलब्ध नाही. खबरदारीचे उपाय म्हणून हे करता येईलः-
खोकला अथवा शिंक येत असताना, नाक व तोंड कागदाने (टिश्यू)े झाका. वापरल्यावर तो कागद कचऱ्यात टाका. आपले हात पाणी व साबणाने धुवा, विशेषतः खोकला अथवा शिंका आल्यावर हे कराच.
आपले डोळे, नाक व तोंडाला हात लावणे टाळा. अशा प्रकारे विषाणू लवकर पसरतात.
आजारी माणसांशी संपर्क टाळा.
गर्दीत मिसळणे शक्यतो टाळा.

घरात अधिकाधिक हवा खेळेल यासाठी खिडक्या, दारे उघडी ठेवा.
पुरेशी झोप घ्यावी, सकस आहार घ्यावा आणि तरतरीतपणा असावा.
या तापावर निश्चितपणे औधोपचार होऊ शकतात. तोडासा जरी संशय वाटला तरी तापावरील गोळ्या परिणामकारक ठरतात, अर्थात डॉक्टरी सल्ल्यानेच त्या घ्याव्यात.
स्वाईन फ्लू झालेल्याशी संपर्क येऊ न देणे हा खबरदारीचा पहिला उपाय आहे. मास्क केवळ आजारी माणसांशी संपर्क येणाऱ्यांनीच वापरणे अधिक श्रेयस्कर.

स्वाईन फ्लूची राष्ट्रीय महामार्गावर तपासणी

पेडणे, दि. १३ (प्रतिनिधी): स्वाईन फ्लूचे देशात अनेक ठिकाणी बळी जात असल्याने त्याचा फैलाव गोव्यात न होण्यासाठी सावधगिरीची उपाययोजना म्हणून आज दि. १३ रोजी पहाटेपासून धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर मुंबई, पुणे येथून बसगाड्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत होती. धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर तपासणी केंद्र उघडले असून तेथे आज पहाटेपासूनच प्रवाशांच्या तपासणीस सुरुवात करण्यात आली.
पुणे, मुंबईहून आलेल्या प्रवाशांची तपासणी डॉ. शाम काणकोणकर, परिचारिका प्रिया नाईक, डॉ. राजू नाईक, दामू राऊळ व थॉमस डिसोझा यांनी केली. एकूण ३० बसगाड्यांची तपासणी करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. श्याम काणकोणकर म्हणाले, हा आजार संसर्गाद्वारे एकापासून दुसऱ्याला होतो. हा आजार डुकरांपासून होतो. सुरुवातीला याची लागण झालेल्या डुकराला खोकला, वारंवार शिंका येतात. त्यातून जंतू तयार होतात व ते माणसाच्या श्वासोच्छवासाद्वारे शरीरात जातात. नंतर त्या व्यक्तीला खोकला येणे, नाकातून पाणी येणे, श्वास घ्यायला जड जाणे, ताप येणे, डोळे लालबुंद होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. या आजारावर देशात तसेच राज्यात जोपर्यंत नियंत्रण येत नाही तोपर्यंत प्राथमिक तपासणी केंद्र धारगळ येथे सुरू राहणार आहे. तेथे प्रवाशांची तपासणी व त्यांना रोगाविषयी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
राज्यात असा स्वाईन फ्लू बाधीत रुग्ण सापडला तर त्यासाठी बांबोळी येथे खास स्वाईन फ्लू कक्ष उघडण्यात आला आहे. तसेच चिखली कॉटेज हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाईल असे डॉ. काणकोणकर यांनी प्रवाशांना मार्गदर्शन करताना सांगितले. पत्रादेवी, मोले, कुळे, सुर्ला या नाक्यांवर प्रवाशांची तपासणी केली जात असल्याचे डॉ. काणकोणकर म्हणाले. धारगळचे सरपंच भूषण नाईक हे पहाटेपासून बस प्रवाशांना व डॉक्टरांना मदत करीत होते.

मंगेशीत १६ रोजी संगीत सभा

फोंडा, दि.१३ (प्रतिनिधी) : सम्राट क्लब कपिलेश्र्वरी, श्री मंगेश देवस्थान मंगेशी, मांगिरीश युथ क्लब आणि कला व संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार १६ ऑगस्ट ०९ रोजी मंगेशी येथील मांगिरीश मठ संकुलात सहाव्या सम्राट संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष सतीश पिळगांवकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी श्री मंगेश देवस्थान कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रशांत नाडकर्णी, सम्राट क्लब कपिलेश्र्वरीचे अध्यक्ष संजय फोंडेकर, मांगिरीश क्लबचे अध्यक्ष राजू मंगेशकर, पंच सदस्य दामोदर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
गोमंतकीय युवा कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी, गोव्याबाहेरील कलाकारांच्या कलेचा आस्वाद रसिकांना देण्यासाठी सम्राट क्लबतर्फे संगीत सभेचे आयोजन गेल्या काही वर्षापासून केले जात आहे. आत्तापर्यंत उसगाव, माशेल, साखळी, बांदोडा, म्हार्दोळ या ठिकाणी सभा घेण्यात आलेल्या आहेत. मंगेशी येथील संगीत सभेचे उद्घाटन सकाळी १० वाजता प्रियोळचे आमदार दीपक ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी काशिनाथ मणेरीकर, श्रीमती सुमती कोठंबीकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सकाळी १०.४५ वाजता सौ. प्रचला आमोणकर यांचा शास्त्रीय गायन होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता बेळगाव येथील श्रीधर कुलकर्णी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. संध्याकाळी ३.३० वाजता विविध हा सुगम संगीत, तबला सोलो, व्हायोलीन वादनाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी ४.१० वाजता गौरीश तळवलकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. संध्याकाळी ५ वाजता मुंबई येथील योगेश हंसवाडकर यांचे शास्त्रीय गायन, संध्याकाळी ६.४५ वाजता सदानंद आमोणकर यांचे सतार वादन होणार आहे. रात्री ८ वाजता पुणे येथील सौ. मंजिरी आलेगांवकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यांना हार्मोनिअमवर सुभाष फातर्पेकर, विठ्ठल खांडोळकर, तबल्यावर दयेश कोसंबे, चंद्रकांत गडकर साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन सुबोध ढवळीकर व सिद्धी उपाध्ये करणार आहेत.

Wednesday, 12 August, 2009

"हाय सिक्युरिटी नंबर प्लेट'चा निर्णय सात दिवसांत मागे घ्या


अन्यथा रस्त्यावर उतरू - पर्रीकर

ही तर सर्वसामान्यांची लूटमारपणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- राज्य सरकारने "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' सक्तीबाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक आहेच; परंतु त्याहीपलीकडे सर्वसामान्य जनतेच्या पैशांची सुरू असलेली ही लूटमार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. येत्या सात दिवसांत सरकारने हा जाचक निर्णय मागे घेतला नाही तर भाजपही पूर्ण शक्तीनिशी रस्त्यावर उतरेल, असा कडक इशारा त्यांनी दिला.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभेत पर्रीकर यांनी यासंबंधी उपस्थित केलेल्या काही आक्षेपार्ह गोष्टींची दखल घेऊन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या निर्णयाबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. परंतु, त्याबाबत अद्याप काहीच झालेले नसल्याने हा हक्कभंग ठरतो, असेही श्री. पर्रीकर म्हणाले. मोटर वाहतूक कायद्याच्या नियम ७७ (३)१ नुसार टॅक्सी नोंदणीसाठी दोन ओळीतील नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. "शिमनीत उच' या कंपनीकडून मात्र केवळ एका ओळीतील नंबर प्लेटच तयार करण्यात येते. त्यामुळे वाहतूक खात्याने सध्या टूरीस्ट टॅक्सींची नोंदणी स्थगित ठेवली आहे. कायद्याप्रमाणे नंबर प्लेट तयार करण्यास या कंपनीकडून असमर्थता दर्शवण्यात आल्याने आपोआपच ही कंपनी कायद्याची पूर्तता करण्यास अपयशी ठरते. यामुळे टॅक्सी वाहनांसाठी कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या नंबर प्लेट बेकायदा ठरत असल्याचा ठपका श्री. पर्रीकर यांनी ठेवला. कायद्याप्रमाणे तांत्रिक आवश्यकतेची पूर्तता करण्यात ही कंपनी अपयशी ठरल्याचेही ते म्हणाले. सरकारच्या या निर्णयाबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली असून न्यायालयाने ती मान्य करून घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने हा निर्णय घेतल्याचे वाहतूकमंत्री सांगतात, तर मग ही याचिका न्यायालयाने कशी स्वीकारली याचे स्पष्टीकरण वाहतूकमंत्री देतील काय, असा सवालही श्री. पर्रीकर यांनी केला.
"शिमनीत उच' या कंपनीकडून सुरुवातीला हे कंत्राट मिळवण्यासाठी देण्यात आलेल्या निविदेत नितीन शहा हे संचालक असल्याचे नमूद करण्यात आले होते. या दरम्यान, केंद्र सरकारने १२ जून २००६ रोजी अधिसूचना जारी केली. या अधिसूचनेत हे कंत्राट मिळवलेल्या कंपनीत गुन्हेगारी प्रकरणी दोषी आढळलेली किंवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा व अन्य सुरक्षा विषयक प्रकरणी सहभागी असलेल्या संचालक मंडळाबाबत तपासणी करून कागदपत्रांची फेरतपासणी करून निर्णय घेण्याचे कळवले होते. या अधिसूचनेनुसार वाहतूक खात्याने नव्याने कंपनीकडून माहिती मिळवली. पूर्वीची माहिती व नव्याने देण्यात आलेली माहिती यात तफावत आढळल्याने अखेर तत्कालीन वाहतूक संचालक मिहीर वर्धन यांनी १३ नोव्हेंबर २००६ रोजी एका आदेशाद्वारे "शिमनीत उच' कंपनीची निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीकडून सरकारला माहिती देताना अनेक गोष्टी लपवण्यात आल्याचेच यावरून सिद्ध झाले होते, याची आठवणही श्री. पर्रीकर यांनी यावेळी करून दिली.
हा एकूण प्रकारच म्हणजे एक बडा घोटाळा असल्याचा आरोप श्री. पर्रीकर यांनी यावेळी केला. सर्वसामान्य जनतेला विनाकारण भुर्दंड घालणारा हा निर्णय कदापि मान्य केला जाणार नाही. प्रत्यक्षात ग्राहकाकडून आकारण्यात येणाऱ्या पैशांतून ५ टक्के रक्कम कंपनी सरकारला देणार आहे, याचा अर्थ काय? असा खडा सवाल करून हा तर जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचाच प्रकार झाला, असेही ते म्हणाले.
तांत्रिक आव्हान स्वीकारतो
या कंपनीकडून अशा प्रकारच्या बनावट नंबर प्लेट तयार करणे अशक्य असल्याचे भासवले जाते. परंतु, अशा नंबर प्लेट तयार करणे सहज शक्य होईल, असेही श्री. पर्रीकर म्हणाले. कंपनीला हवे असले तर हे त्यांच्या नंबर प्लेट प्रमाणे हुबेहूब दिसणाऱ्या नंबर प्लेट तयार करण्याचे तांत्रिक आव्हान स्वीकारण्यास आपण तयार आहोत, असे आवाहनही श्री. पर्रीकर यांनी केले. या कंपनीची पार्श्वभूमी संघटित गुन्हेगारी प्रकरणी सामील असलेल्या लोकांशी संबंधित आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी शेवटी केली.

आम आदमीला महागाईची भेट?


पर्रीकर यांचा तीक्ष्ण सवाल

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- देशात महागाईने उच्चांक गाठला असताना सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून कोणतीच पावले उचलली जात नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केली. केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला चतुर्थीच्या काळात शंभर दिवस पूर्ण होणार आहेत, त्यामुळे या शंभर दिवसांत हे सरकार "आम आदमी'चे कंबरडे मोडून टाकणारी महागाई भेट देणार आहे, असा टोला पर्रीकर यांनी हाणला.
आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. भारतीय जनता पक्षातर्फे महागाईविरोधात देशव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. गोव्यातही कॉंग्रेस सरकारच्या नाकर्तेपणाचा पर्दाफाश केला जाईल, असेही पर्रीकर यावेळी म्हणाले. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत असताना सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. गणेश चतुर्थी तोंडावर असून या महागाईमुळे सर्व सामान्य जनता भरडून जाणार आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्याचे सोडून सरकारातील मंत्री कचरा व्यवस्थापन महामंडळ स्थापन करण्यावरून भांडत आहेत, हे जनतेचे दुर्दैव असल्याचा टोलाही श्री. पर्रीकर यांनी हाणला. तूरडाळ, भाजी, साखर आदी अत्यावश्यक वस्तूंचे दरच सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर जात असून या सरकारकडून जनतेच्या पोटावर लाथ मारण्याचाच प्रकार सुरू आहे, अशीही टीका पर्रीकर यांनी केली.
गोवा प्रदेश भाजपतर्फे येत्या काही दिवसांत महागाई विरोधात जोरदार आंदोलन छेडले जाणार आहे. या सरकारने सर्व सामान्य जनतेचे कसे काय हाल चालवले आहेत हे या आंदोलनातून स्पष्ट केले जाणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

पेडणेकर प्रकरणी आता उद्या सुनावणी

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार प्रकरणी बाल न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्यासाठी औदुंबर पेडणेकर याने कोल्हापूर येथील नोटरीद्वारे केलेल्या याचिकेवर आज सरकारी वकील कार्लुस फरेरा यांनी आक्षेप घेतल्याने नव्याने याचिका दाखल करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. ए. ब्रिटो यांनी अर्जदाराला दिले. सदर आव्हान याचिकेबरोबर जोडण्यात आलेली प्रतिज्ञापत्रे नव्याने सादर करण्यासाठी उद्या बुधवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. याविषयीची पुढील सुनावणी गुरुवारी ठेवण्यात आली आहे.
या आव्हान याचिकेवर काल अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर आज निकाल जाहीर करण्यासाठी सुनावणी ठेवण्यात आली होती. यावेळी सरकारी वकिलाने त्या याचिकेवरच आक्षेप घेतल्याने नव्याने याचिका सादर करण्याचे आदेश देण्यात आले. बाल न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अत्यंत अमानुषपणे शारीरिक अत्याचार केल्याचे सिद्ध झाल्यानंतर जामीन मिळालेला औदुंबर पेडणेकर याचा जामीन रद्द करून पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर औदुंबर व त्याची पत्नी मीनाक्षी फरार झाली होती. यानंतर चार दिवसांनी संशयित पेडणेकर याने कोल्हापूर येथील एका नोटरीद्वारे गोवा खंडपीठात बाल न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सादर केली होती. या याचिकेच्या सुनावणी वेळी न्यायालयाने औदुंबर व मीनाक्षी या दोघांना सोमवारपर्यंत पर्वरी पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.

पंचायतराज दुरुस्ती विधेयक रद्द न केल्यास राज्यव्यापी आंदोलन

१५ ऑगस्टच्या ग्रामसभांत ठराव घेण्याचे आवाहन

पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळवून देण्यासाठी बहाल केलेले अधिकार आता कॉंग्रेस पक्षाच्या सरकारकडूनच हिरावून घेतले जाणे हा खरोखरच दैवदुर्विलास आहे. गोवा पंचायतीराज कायद्यात अलीकडेच करण्यात आलेली दुरुस्ती हा पंचायत मंडळावर दाखवलेला अविश्वास असून येत्या ३० दिवसांच्या ही दुरुस्ती रद्द करण्यात आली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. येत्या १५ ऑगस्ट रोजी विविध पंचायतींच्या ग्रामसभांमध्ये या दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ठराव घेऊन तो सरकारला पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.
गोवा पंचायत लोकशाही फोरमतर्फे आज पर्वरी येथील आझाद भवन सभागृहात खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे निमंत्रक वीरेंद्र शिरोडकर, फोरमचे अध्यक्ष जोसेफ सिक्वेरा तसेच सॉर्टर डिसोझा आदी हजर होते. गोवा सरकारने अधिवेशनात गोवा पंचायतीराज कायद्यात दुरुस्ती करून पंचायत सचिवांना दिलेले अतिरिक्त अधिकार हे पंचायत मंडळावर घाला घालणारेच ठरणार आहेत. स्थानिक स्वायत्त संस्थांवर अतिक्रमण करण्याचाच हा भाग आहे, असा आरोप करून ही सरकारची एकाधिकारशाही आहे, अशी टीका यावेळी सॉर्टर यांनी केली.
दरम्यान, सुरुवातीस पंचायतमंत्री बाबू आजगावकर यांनी हे दुरुस्ती विधेयक सभागृहात मांडल्यानंतर ते चिकित्सा समितीकडे पाठवण्यात आले होते. चिकित्सा समितीवर विरोधी भाजपचेही आमदार होते. पण चिकित्सा समितीने अखेर या दुरुस्तीला मान्यता कशी काय दिली, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. पंचायत मंडळांकडून विविध प्रकल्प अडवले जातात, असा आरोप होतो. गावचे हित हे केवळ पंचायत मंडळच अधिक प्रामाणिकपणे पाहू शकते. एखादा प्रकल्प उभारण्यासाठी सर्व सरकारी खात्यांना पैसे चारून दाखले मिळवले म्हणजे पंचायत मंडळाने ना हरकत दाखला देणे बंधनकारक करणे हा कुठला न्याय, अशीही टीका यावेळी करण्यात आली. ही दुरुस्ती केवळ पंचायत मंडळाला अंधारात ठेवून बाहेरच्या बाहेर बड्या प्रकल्पांना परवाने मिळवून देण्यासाठीच असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.
दरम्यान, ही दुरुस्ती विधेयक राज्यपालांच्या संमतीने विधानसभेत सादर करण्यात आल्याने त्यांना यासंबंधी निवेदन सादर केले जाणार आहे. येत्या ३० दिवसांच्या आत ही दुरुस्ती रद्द करण्यात आली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यंदा शतकातील सर्वांत मोठा दुष्काळ : प्रणव

नवी दिल्ली, दि. ११ ः यंदा भारतात शतकातील सर्वांत मोठा दुष्काळ पडला असून, देशाचा आर्थिक विकास दर जेमतेम सहा टक्के राहण्याची शक्यता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी वर्तविली आहे.
आयकर विभागाच्या सर्व मुख्य आयुक्तांसह संचालकांच्या वार्षिक कार्यक्रमात ते बोलत होते. मुखर्जी म्हणाले की, देशातील तब्बल १६१ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडल्यामुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. देशाचा विकास २००९-१० या वर्षात सात टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण, अनेक भागात पडलेला दुष्काळ आणि अपुरा पाऊस यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात घसरण होणार असल्याचा अंदाज आहे.
ही स्थिती गंभीर आणि चिंताजनक आहे. यापूर्वीच्या शतकात १९८७ मध्ये असा दुष्काळ पडला होता. त्यावेळी आपण अक्षरश: रेल्वेच्या माध्यमातून पाणी ठिकठिकाणी पोचवले होते. गुरांना चारा पोचवला होता. यंदा प्रतिकूल हवामानामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांची समस्या आणखी बिकट झाली आहे. नियोजित पेरणीपेक्षा २० टक्के पेरणी कमी झाली आहे.
यावर्षी जून महिन्यात अतिशय कमी पाऊस पडला आहे. हे प्रमाण मागील ८३ वर्षांच्या जून महिन्यातील पावसाच्या प्रमाणापेक्षाही कमी आहे. आत्तापर्यंत अपेक्षेपेक्षा २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २००४ च्या उन्हाळ्यात शेतीतून देशाला जेवढे उत्पन्न मिळाले, त्यापेक्षा तब्बल १२ टक्के कमी उत्पन्न पावसाळ्यात मिळण्याची शक्यता असल्याचेही मुखर्जी म्हणाले.
असे असले तरी देशातील लोकांनी या परिस्थितीमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. दुष्काळाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करीत असून, योग्य त्या समन्वयाने प्रभावी योजना राबविली जाईल, असे आश्वासनही अर्थमंत्र्यांनी दिले.

Tuesday, 11 August, 2009

शाळांना चतुर्थीची लवकर सुट्टी


(स्वाइन फ्लूची धास्ती)


मडगाव, दि. ११ (प्रतिनिधी): जगभरात सध्या स्वाइन फ्लूने थैमान घातले असून भारतातही या रोगाने आत्तापर्यंत सहा बळी घेतले आहेत. याबाबत केंद्र सरकारने पावले उचलली असून गोवा सरकारनेही पूर्ण दक्षता घेतली आहे. या रोगाचा गोव्याला कोणताही त्रास होऊ नये यासाठी सरकारने आवश्यक ती खबरदारी घेतली असल्याची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आज दिली. याच अनुषंगाने शाळांना गणेश चतुर्थीसाठी दोन दिवस अगोदरच सुट्टी देण्याचा विचार आहे, असे संकेतही मुख्यमंत्री कामत यांनी दिले आहे. येथील जिल्हाधिकारी इमारतीतील मंत्र्यांच्या दालनामध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, जिल्हाधिकारी जी. पी. नाईक, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. राजनंदा देसाई, हॉस्पिसीयोचे वैद्यकीय अधीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली एका कृती दलाची स्थापना केलेली असून ते दररोज राज्यातील स्वाइन फ्लू विषयक परिस्थितीचा आढावा घेत आहेत. याशिवाय उत्तर व दक्षिण गोव्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी पथक स्थापन केलेले आहे, असेही त्यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यातील स्वाइन फ्लूविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील पावले उचलण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दक्षिण गोव्यात पोळे येथील तपासणी नाक्यावर व पत्रादेवी नाक्यावर मुंबई व पुण्यातून येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांची तुकडी तैनात केलेली आहे. त्याचप्रमाणे दाबोळी विमानतळावर विमानातून येणारे विदेशातील प्रवासी तसेच मुंबई पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येईल. पुणे - मुंबईत गोव्यातील लोक मोठ्या संख्येने आहेत. कित्येकजण नोकरीसाठी तर काही शिक्षणासाठी तिथे आहेत, त्या सर्वांवर सरकारचे लक्ष आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्य सचिव दररोज स्वाइन फ्लूसंबंधीच्या माहितीचा आढावा घेतील व त्यानुसार खबरदारीचे उपाय घेतले जातील. दक्षिण गोव्यात चिखली येथील कुटीर रुग्णालयात तपासणी कक्ष उघडण्यात आला आहे. आता मोतीडोंगर येथील टी.बी. हॉस्पिटलच्या इमारतीतील एक खोली सुसज्ज करण्याचा आदेश दिलेला आहे, तेथे हा कक्ष उघडण्यात येईल. आंतरराज्य बसस्थानक, कोकण रेल्वे स्टेशन येथेही बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे फिरते पथक ठेवण्यात येणार आहे. गोव्याबाहेर विशेषत: पुणे-मुंबईत स्वाइन फ्लूचा फैलाव झालेला असताना कोकण रेल्वे स्टेशनवर कोणतीच काळजी घेतली जात नाही याकडे लक्ष वेधले असता लवकरच तेथेही डॉक्टराचे फिरते पथक ठेवण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दाबोळी विमानतळावर आजवर जवळजवळ १०० हून अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली. गणेश चतुर्थी जवळ आली असल्याने राज्यात काळजी घेण्यासाठी शाळांना दोन ते तीन दिवस अगोदर सुट्टी देण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. गोव्यात स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी पावले टाकली जातील, असे आश्र्वासन त्यांनी दिले.
सांगे, रिवण, कुडचडे येथील चिकुनगुनीया आटोक्यात आला असून अजूनही तेथे डॉक्टराकडून तपासणी सुरू आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास सर्व लोकांची पुन्हा तपासणी करण्यात येईल. किनारी भागात केटामाइन या गुंगीच्या औषधाची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न औषध प्रशासन निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याशिवाय मुदत संपल्यानंतर विकल्या जाणाऱ्या औषधांवर नजर ठेवण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हॉस्पिसीयो हॉस्पिटलात अत्यावश्यक डॉक्टर व परिचारिकांची भरती केलेली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी भरती करण्यात येईल. दवंडे येथे जिल्हा हॉस्पिटलच्या बांधकामाचीही आपण पाहणी केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आज दाबोळी विमानतळावर २०१ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची स्वाइन फ्लूसंदर्भात तपासणी करण्यात आला. आत्तापर्यंत एकूण १६१५१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. आज दोघा प्रवाशांच्या लाळेचा नमुना घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली.

ते पोलिस शिपाई निलंबित

पणजी, दि. १० (प्रतिनिधी) ः दोना पावला येथे असलेल्या चान्सिस कॅसिनोत घोटाळा केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोन्ही पोलिस शिपायांना उत्तर गोवा पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी निलंबित करण्याचे आदेश जारी केले. प्राथमिक चौकशीत ते दोषी असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनानंतर त्यांची खात्याअंतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे यावेळी पोलिस अधीक्षक आत्माराम देशपांडे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपूर्वी चान्सिस या कॅसिनोत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार कॅसिनो मालकाने पणजी पोलिस स्थानकात केली होती. त्यानंतर पोलिसांना मारुती या तरुणाला अटक केली होती. त्याची चौकशी केली असता त्याने आपल्याबरोबर अन्य दोन पोलिस शिपाई असल्याची माहिती उघड केली होती. यानंतर पोलिसांना या दोन्ही पोलिसांना अटक केली होती. याविषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर करत आहेत.

धावे खाण सुनावणी रद्द

वाळपई, दि. १० (प्रतिनिधी)ः धावे येथील नियोजित खाण प्रकल्पासंदर्भात उद्या ११ ऑगस्ट रोजी तेथील शांतादुर्गा सभागृहात आयोजित खाणमालकांची सार्वजनिक सुनावणी रद्द करण्यात आली आहे. या खाणीला व सार्वजनिक सुनावणीला तीव्र विरोध करताना सुनावणी होऊच देणार नाही अशी आक्रमक भूमिका नगरगाव पंचायतीच्या नागरिकांनी घेतली होती. यामुळे सुनावणी रद्द करण्याची पाळी सरकारवर आली.
यापूर्वी १९९८ साली धावे गावात खाण सुरू करण्याचा प्रयत्न धावे गावात खाण सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी नगरगाव पंचायतक्षेत्रातील नागरिकांनी एकजूट दाखवून खाण मालकांचा डाव हाणून पाडला होता. आज संध्याकाळी ६.३० वाजता पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्याने नगरगाव पंचायतीत उद्याची सुनावणी रद्द करण्यात आल्याची नोटीस लावली. यावेळी गोवादूतचे प्रतिनिधी व पंच बाबलो गावकर उपस्थित होते. सदर व्यक्तीने सुनावणी रद्द झाल्याचे सांगितले आणि ही वार्ता वाऱ्यासारखी गावभर पसरली व गावात एकच जल्लोष व्यक्त झाला.
धावे गावातील नागरिकांना गृहीत धरण्याचा प्रयत्न सरकारने करू नये अन्यथा सरकारला पुन्हा पेचात टाकले जाईल, अशी प्रतिक्रिया पंच श्री. गावकर यांनी यावेळी व्यक्त केली. धावेवासीयांचा हा ऐतिहासिक विजय असल्याचे ते म्हणाले. लक्ष्मण केळकर यांनी यावेळी सांगितले की, सरकार नेहमी बेकायदा खाण मालकांना प्रोत्साहन देत असल्याने त्यांना जाग्यावर आणण्यासाठी दक्षता आयोगाकडे तक्रार करावी लागते. रमेश जोशी यांनी धावेवासीयांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. खाण मालकांनी या गावातच नव्हे तर सत्तरी तालुक्यात पाऊल ठेवू नये याची खबरदारी घ्यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला. लाडू हरवळकर यांनी धावेवासीयांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे विजय संपादन करण्यात आल्याचे सांगितले. अशोक जोशी यांनी लोकशाही लढ्यामुळेच विजय मिळाल्याचे सांगितले. उदय वझे पोलिस तक्रार करतेवेळी आपल्यावर दबाव असल्याचे सांगून नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले.

गुंगीच्या औषधाची बेकायदा विक्री


अन्न व औषध प्रशासनाचे
औषधालयांवर छापे

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)- गोव्यातील किनारी भागात "केटामायन' या गुंगीच्या औषधाची मोठ्या प्रमाणात बेकायदा विक्री होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर आज अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांनी तात्काळ उत्तर गोव्यातील पाच औषधालयांवर छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात या औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे. कळंगुट येथील "लाइफ केअर मेडी सेंटर' या औषधालयाचा परवाना स्थगित करण्यात आला असून अन्य औषधालयांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
आज आरोग्य खाते संचालनालयातील परिषदगृहात बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे संचालक प्रमोद जैन, उपसंचालक सलीम वेलजी, आरोग्य संचालिका डॉ. राजनंदा देसाई, मुख्य सचिव संजीव श्रीवास्तव, आरोग्य अवर सचिव दत्ताराम देसाई व डीन डॉ. जिंदाल आदी हजर होते. या औषधाचा वापर अमलीपदार्थ सेवनाप्रमाणे गुंगी येण्यासाठी केला जातो, त्याचे विदेशी पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते, असेही श्री. राणे म्हणाले. या प्रकरणी अनेक पालकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या असून या भागातील युवा पिढीही या औषधाला बळी पडत आहे, असेही ते म्हणाले. विशेष करून कळंगुट, कांदोळी, शिवोली, साळगाव आदी भागांत औषधालयांकडून या औषधाची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी या भागातील सर्व औषधालयांची तपासणी सुरू केली आहे, अशीही माहिती देण्यात आली. दरम्यान, हे औषध केवळ गुंगी देणाऱ्या डॉक्टरांकडून वापरले जाते. हे औषध पुरवणाऱ्या कंपनीकडे संपर्क साधून गोव्यात आत्तापर्यंत किती साठा पाठवला याची तपशीलवार माहिती मिळवली जाणार आहे, असेही आरोग्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, खात्याने आज केलेल्या कारवाईत साजरो मेडिकल स्टोअर्स, वॉलसन ऍण्ड वॉलसन मेडिकल्स, श्री शांतादुर्गा मेडिकल स्टोअर्स आदींवर छापे टाकून प्रथम दर्शनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. हे औषध शीतपेयाबरोबर घेतले जाते व त्यामुळे गुंगी येते. या भागात सुरू असलेल्या रेव्ह पार्ट्यांतही या औषधाचा सर्रासपणे वापर होतो, अशीही माहिती मिळाल्याचे आरोग्यमंत्री राणे म्हणाले.
बडी टोळीच कार्यरत
या एकूण प्रकरणात एक बडी टोळीच कार्यरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून त्या दृष्टीने चौकशी सुरू असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. गोव्यातीलच एका बड्या व्यक्तीची बंगळूर येथे फॅक्टरी असून तिथूनच हे औषध आणले जात असल्याचा सुगावा लागला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. जनतेच्या जीविताशी खेळ करण्याचा हा प्रकार अजिबात सहन केला जाणार नसून गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही श्री. राणे म्हणाले. दरम्यान, नॉर्मन आझावेदो यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून २००४ साली असाच एक गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. परवाना नसताना या औषधाची विक्री करणाऱ्या सर्व औषधालयांवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगून प्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

आता सर्व मदार श्री देव नारोबावरच...


मातोंडकर व गडेकर कुटुंबीयांची दृढ श्रद्धा

मांद्रे बेकायदा" रिवा रिसॉर्ट' प्रकरण

पणजी,दि. १० (प्रतिनिधी)- "" मांद्रे जुनसवाडा येथील जागृत देवस्थान श्री देव नारोबा यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. कोणही कितीही प्रयत्न केले तरी या मूळ जागेतून आम्हाला विस्थापित करण्याचा प्रयत्न कदापि शक्य होणार नाही.'' तथाकथित रिवा रिसॉर्टचे बांधकाम सुरू असलेल्या जागेत पूर्वापार वास्तव्य करणाऱ्या मातोंडकर व गडेकर या गरीब कुळांनी आता श्री देव नारोबा या राखणदारावरच सर्व मदार ठेवली आहे. गेल्या दीड वर्षांपासून बिनबोभाट सुरू असलेल्या या भव्य बेकायदा बांधकामाचा विषय अचानक विधानसभेत उपस्थित होतो काय आणि या बांधकामावर कारवाई होते काय ही सगळी नारोबाचीच लीला अशी दृढ भावना या कुटुंबीयांची बनली आहे.
मांद्रे जुनसवाडा येथील वादग्रस्त रिवा रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचा विषय दिवसेंदिवस तापत आहे. मांद्रे पंचायतीच्या अकराही पंचसदस्यांनी या बेकायदा बांधकामाला पाठीशी घातले आहे, असा थेट आरोप आता येथील ग्रामस्थच करत आहेत. गावातील स्थानिकांचे हित जपण्याचे सोडून किनाऱ्याला टेकून अशा बड्या बेकायदा बांधकामांना परवानगी देणाऱ्या पंचायतीला स्थानिकांना देशोधडीला लावायचे आहे काय, असा खडा सवालही उपस्थित केला जात आहे. या तथाकथित जागेत तीन गरीब कुळांची घरे आहेत. या बिचाऱ्या कुळांची घरे "सीआरझेड' कक्षेत येत असल्याची सांगून ती सरकारकडून पाडली जातील, त्यामुळे ती खाली करा व तुम्हाला इतरत्र दुसरी घरे बांधून देतो, असे आमिष दाखवून त्यांना हुसकावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते. ही घरे १९९१ च्या पूर्वीपासून येथे आहेत. याच गोष्टीचा आधार घेऊन हे बांधकाम कायदेशीर करण्याची शक्कल या लोकांनी बांधली होती, अशी माहितीही आता उघड झाली आहे. या गरीब कुळांना कुणाचाही आधार नाही, त्यातच घरात दोन लहान अपंग मुलेही आहेत. अशा परिस्थितीत या कुळांना येथून हाकलून लावण्याचे प्रयत्न झाल्याने स्थानिकांचा पारा अधिकच चढला आहे. मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी हा विषय विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी तात्काळ या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले. यामुळे या कुटुंबीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या ही जमीन विकत घेतलेल्या मालकाने ही संपूर्ण जागा व्यापली आहे व या घरांच्या सभोवताली बांधकाम साहित्या टाकून त्यांना अडथळा निर्माण केला आहे. मांद्रे जुनसवाडा येथील मुख्य रस्त्याला टेकून संपूर्ण जागा कुंपण घालून अडवण्यात आली आहे. या कुंपणाचा विषय गेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित केल्यानंतर ४८ तासांत ते कुंपण हटवण्याची घोषणा पंचायतीने केली होती ; पण आत्तापर्यंत या कुंपणाला हातही लावलेला नाही. या एकूण प्रकरणी ग्रामस्थांकडून पंचसदस्यांबाबत संशयाचे वातावरण पसरले आहे.
१६ रोजीची ग्रामसभा वादळी होणार
१६ ऑगस्ट रोजी मांद्रे पंचायतीची ग्रामसभा बोलावण्यात आली आहे. या ग्रामसभेत या बेकायदा बांधकामाचा विषय बराच गाजण्याची शक्यता आहे. या विषयावरून गावातील स्थानिकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंचायत मंडळाला या बेकायदा बांधकामाबाबत लोकांना जाब द्यावा लागेल, तशी मागणी या ग्रामसभेत केली जाईल, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, गोवा किनारी व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे मांद्रे पंचायतीला पाठवण्यात आलेल्या "कारणे दाखवा' नोटिशीबाबत खुलासा करण्यावरून पंचायतीचे धाबे दणाणले आहेत. काल रात्रीपासून पंचायत सदस्यांची बैठक सुरू होती, अशीही माहिती मिळाली आहे. या बांधकामाबाबतची सर्व कागदपत्रे घेऊन येण्याचेही आदेश या नोटिशीत देण्यात आले आहेत. उच्च न्यायालयात "सीआरझेड' प्रकरणी सुनावणी सुरू असतानाही मांद्रे पंचायतीकडून करण्यात आलेली हयगय हा न्यायालयाचा अवमान ठरतो, त्यामुळे मांद्रे पंचायत कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

मद्याच्या अंमलाखाली दंगामस्ती केल्याचा हवालदाराविरुद्ध आरोप

पतीला पोलिस निरीक्षकाकडून
मारहाण झाल्याची पत्नीची तक्रार

कुडचडे, दि. १० (प्रतिनिधी) ः कुडचडे पोलिस स्थानकातील हवालदार शिवा कृष्णा काळे याच्याविरुद्ध कुडचडे पोलिस स्थानकात भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्याच्या अंमलाखाली पोलिस स्थानकात दंगामस्ती केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. ही माहिती केप्याचे पोलिस उपअधीक्षक रोहिदास पत्रे यांनी दिली. सदर हवालदार मद्याच्या अंमलाखाली होता असे स्पष्टपणे नमूद केलेला वैद्यकीय अहवाल आला आहे. दरम्यान, आपल्या पतीला पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांच्याकडून मारहाण करण्यात आली, अशी तक्रार सौ. शुभांगी शिवा काळे यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांकडे नोंदवली आहे. सध्या काळे यांच्यावर मडगावातील हॉस्पिसियू इस्पितळात उपचार सुरू असून तेथून डिस्चार्ज मिळताच पोलिस त्यांना ताब्यात घेणार आहेत.
काल मध्यरात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली. मद्याच्या आहारी गेलेल्या या हवालदाराला निरीक्षक राजू राऊत देसाई यांनी हटकले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्वतःवरील नियंत्रण गमावून बसल्याने सदर हवालदार खाली कोसळला आणि त्याला दुखापत झाली, असा खुलासा पोलिस सूत्रांनी केला आहे. मात्र, सौ. शुभांगी काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून श्री. काळे यांची तब्येत बरी नसल्याने सांग्यातील डॉ. वैद्य यांच्याकडे ते उपचार घेत आहेत. औषधी गोळी घेतल्याने त्यांचा डोळा लागला असता या कारणास्तव त्यांना एवढी मारहाण होणे लज्जास्पद आहे. याविषयीच्या तक्रारीच्या प्रती त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, मानवाधिकार आयोग आदींकडे पाठवल्या आहेत. काळे यांना मुख्यमंत्रीपदक प्राप्त झाले असून गेल्या २५ वर्षांपासून ते पोलिस सेवेत आहेत.
कुडचड्याचे पोलिस निरीक्षक नीलेश राणे रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार काल म्हणजे रविवारीच राऊत देसाई यांनी स्वीकारला आहे.

मध्यान्ह आहारातून ६ विद्यार्थ्यांना बाधा


वास्कोतील सलग दुसरी घटना
अन्न व औषध विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा

वास्को, दि. १० (प्रतिनिधी)ः दोन दिवसापूर्वीच मध्यान्ह आहारातून मुरगाव तालुक्यातील १८ विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याची घटना ताजी असताना आज गांधीनगर येथील सरकारी कन्नडा विद्यालयामधील ६ विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने येथील त्यांना चिखलीच्या कुटीर रुग्णालयात नेण्याची पाळी आली. या विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहार घेतल्यावर त्रास झालेला असला तरी अन्नातून विषबाधा झालेली नसल्याचा प्राथमिक अंदाज येथील चिकित्सकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. सदर खाद्यपदार्थ तपासणीसाठी अन्न व औषध विभागात पाठवण्यात आले असून अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
गोवा सरकारने सुरू केलेल्या मध्यान्ह आहाराच्या योजने अंतर्गत शनिवारी सडा येथील युवक संघ विद्यालयात पावभाजी खाल्ल्याने १८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. या प्रकारामुळे मुरगाव तालुक्यातील पालक तसेच जनतेतून सरकारबाबत संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच आज दुपारी गांधीनगर वास्को येथील सरकारी शाळेतील सहा विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहाराच्या सेवनानंतरच पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना त्वरित चिखली कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परशुराम हडपल (वय १०, इयत्ता चौथी), धरेश बिजूर (वय १०, इयत्ता चौथी), सुनील मदार (वय ११, इयत्ता चौथी), पूनम हरिजन (इयत्ता चौथी), संगीता चव्हाण व अश्विनी हडपल यांना त्रास होऊ लागल्याने शाळेच्या कर्मचाऱ्यांनी प्रथम मुरगाव तालुका साहाय्यक भाग शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर त्या विद्यार्थ्यांना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना चिखलीच्या कुटीर रुग्णालयात घेऊन आलेल्या हनुमंता नावी या शिक्षकाने "गोवादूत'शी बोलताना सांगितले की, आज सकाळी मध्यान्ह आहार दिल्यानंतर चाळीस विद्यार्थ्यांपैकी सहा जणांना पोटात त्रास होऊ लागला. यांपैकी दोघांना उलट्या झाल्याने त्यांना उपचारासाठी इस्पितळात आणल्याची माहिती त्यांनी दिली. गौरी गणेश नामक संस्थेकडून सदर शाळेला मध्यान्ह आहार पुरवण्यात येत असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
मध्यान्ह आहारामुळे विषबाधा झालेली नसल्याचा संशय इस्पितळाचे अधिकारी (मेडिकल ऑफिसर) सुहास गायतोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त करताना सदर विद्यार्थ्यांच्या आजारी पडण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे सांगितले.
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध विभागाच्या अधिकारी श्रीमती आयवा फर्नांडिस, राजेंद्र नाईक व फ्लाविया डिसोझा यांनी या वेळी इस्पितळात आपली उपस्थिती लावून आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांशी वार्तालाप करून माहिती मिळवून घेतली. त्याच प्रमाणे त्यांनी या वेळी येथील चिकित्सकांकडून माहिती घेताना मध्यान्ह आहारातून देण्यात आलेले खाद्यपदार्थ तपासणीसाठी आपल्या ताब्यात घेतले. याबाबत त्वरित अहवाल मिळेल, अशी माहिती अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. दरम्यान, उपचारानंतर सहाही विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे आहे.

शनिवारी मध्यान्ह आहारातून विषबाधा होण्याची घटना घडल्यानंतर आज शिक्षण खात्याचे साहाय्यक संचालक एस. के. तळकर व मुरगावच्या साहाय्यक भाग शिक्षण अधिकारी अनुराधा सरदेसाई तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांनी येथील दहा वेगवेगळ्या शाळांना भेट देऊन त्यांना देण्यात येत असलेल्या मध्यान्ह आहाराची तपासणी केली. याबाबत सौ. सरदेसाई यांच्याशी संपर्क केला असता तपासणीच्या वेळी सर्व शाळेमध्ये येणारा आहार चांगला असल्याचे सांगून अशा प्रकारे वारंवार तपासणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. गांधीनगर येथील घटनेविषयी विचारले असता सदर घटनेबाबत शिक्षण खात्याचे उपसंचालक जी. पी. भट यांनी चिखलीच्या कुटीर रुग्णालयाच्या अधिकाऱ्याला संपर्क करून माहिती मिळवली असता त्यांना विषबाधा झाली नसून अन्य कारणामुळे ती आजारी पडल्याचे समजल्याचे त्यांनी सौ. सरदेसाई यांनी सांगितले. सदर खाद्यपदार्थाचे नमुने अन्न व औषध विभागात पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

स्वाइन फ्लू रोखण्यासाठी सरकार सज्जलोकांच्या मते मात्र
शासकीय प्रयत्न अपुरे


पणजी, दि. १०(प्रतिनिधी)ः राज्यात स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी खबरदारी घेण्याचा विश्वास व्यक्त करताना मोठ्या प्रमाणावर जागृतीचे काम हाती घेतल्याची माहिती आज आरोग्य सचिव संजीव श्रीवास्तव यांनी दिली. परंतु, देशातील इतर भागांत ज्या गतीने ही साथ पसरत आहे, त्यामानाने राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे असल्याची भावना लोकांत पसरत आहे.
आज पणजी येथे बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्य संचालिका डॉ.राजनंदा देसाई, डीन डॉ. जिंदाल, आरोग्य अवर सचिव दत्ताराम देसाई आदी हजर होते. दिल्ली येथे या प्रकरणी सर्व राज्यांच्या सचिवांची बैठक घेण्यात आली व त्यात या साथीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आल्याचे ते म्हणाले. गोव्यात चिखली इस्पितळ खास राखीव ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातही विशेष १५ खाटांचा विभाग तयार करण्यात आला आहे. गोव्यात आत्तापर्यंत स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याची एकूण ११ प्रकरणे निश्चित झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विमानतळावर तपासणी सुरू आहेच परंतु आता टूर ऑपरेटर तथा राज्यांअंतर्गत वाहतुकीवरही लक्ष देणे गरजेचे बनले आहे. टूर ऑपरेटर्सना विश्वासात घेऊन या साथीबाबत माहिती देण्यासाठी पत्रके वाटण्याचीही तयारी खात्याने केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणे शक्य नाही, त्यामुळे जागृती महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. खाजगी इस्पितळांतही अशा रुग्णांवर उपचाराची सोय करण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सध्या गोव्याकडे चाचणी करण्यासाठी यंत्रणा नसल्याने नमुने दिल्ली येथे पाठवण्यात येतात. या यंत्रणेसाठी ५० ते ६० लाख रुपये खर्च येतो त्यामुळे त्यासंबंधी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. उर्वरित राज्यांप्रमाणे शाळांना सुट्टी दिली नाही कारण त्यामुळे अधिक गोंधळ निर्माण होईल व लोकांत भीतीचे वातावरण पसरेल, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
राज्य सरकारने दोन्ही जिल्ह्यांत तज्ज्ञ डॉक्टरांची शीघ्र प्रतिसाद पथके स्थापन केली आहेत. एखाद्या व्यक्तीला तीव्र ताप, गळा सुकणे, खोकला, श्वासोच्छ्वासास त्रास, उलट्या व हगवण आदी लक्षणे आढळून आल्यास त्याचे नमुने दिल्ली येथे पाठवले जातात, त्याचा चाचणी अहवाल दोन ते तीन दिवसांत मिळतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ गोमेकॉत दाखल होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. दरम्यान, गरज भासली तर अतिरिक्त १५ केंद्रे स्थापन करण्याची तयारी सरकारने केली आहे. दरम्यान, सध्या विमानतळावर थर्मल स्कॅनर्सची सोय करण्यासाठी केंद्रीय आरोग्य व विमान वाहतूक मंत्रालयाकडे मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनालाही सतर्क करण्यात आले असून पंचायत पातळीपासून जागृतीचे कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
-----
आज दोघांचे नमुने पाठवले
ब्राझीलमार्गे दुबई येथून आलेली २७ वर्षीय महिला ५ ऑगस्ट रोजी गोव्यात आली होती. तिच्या तसेच अन्य एका ४१ वर्षीय पुरुषाच्या थुंकीचे नमुने घेण्यात आल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
----

Monday, 10 August, 2009

गोव्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या अकरा

गोमेकॉत खास विभाग

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - राज्यात स्वाईन फ्ल्यूचे चार नवीन रुग्ण आढळून आले असून, त्यात एका कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आरोग्याधिकाऱ्यांनी गोवा वैद्यकीय इस्पितळात एक विशेष विभाग सुरू केला आहे. वराह ज्वराच्या राज्यातील एकूण रुग्णांमध्ये या चौघांची भर पडल्याने गोव्यात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या आता अकरावर पोहोचली आहे.
तपासणीत वराहज्वराची लागण झाल्याचे सिद्ध झालेले सदर कुटुंब हॉंगकॉंगमधून आणि अन्य एक व्यक्ती दुबई येथून गोव्यात दाखल झाली आहे. काल रात्री दाखल झालेल्या या चारही जणांना वराहज्वराची लागण झाली असल्याचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिझीसीस, नवी दिल्ली आणि राज्यातील स्वाईन फ्ल्यू मोहिमेची देखरेख करणारे नोडल अधिकारी डॉ. जुझे डिसा यांनी सांगितले आहे.डॉ. डिसा यांनी दिलेल्या माहितीनुसार या चारही रुग्णांबाबत अधिकृत निदान जरी एनआयसीडी दिल्लीकडून यायचा असला, तरी सध्या या रुग्णांना उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या वराहज्वर विभागात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान आरोग्य विभागाद्वारे सोमवारी आपत्कालीन व्यवस्थापन बैठक घेतली जाणार आहे. ज्यात गोव्यात दाखल होणाऱ्या वराहज्वरग्रस्त रुग्णांसाठी विविध उपाययोजनांवर चर्चा होणार आहे. खास करून गणेश चतुर्थीच्या काळात देशाच्या विविध भागातून आणि विदेशातून गोव्यात दाखल होणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने खास उपाययोजना करण्यावर या बैठकीत ऊहापोह केला जाणार आहे. नाताळासह गणेश चतुर्थी हा गोव्यातील महत्त्वपूर्ण सण असून, त्या दरम्यान देशाच्या विविध भागात कामानिमित्त स्थलांतरित झालेले मूळ गोमंतकीय आपापल्या गावी येतात. त्या अनुषंगाने खासगी बस चालक यांना विश्वासात घेऊन स्वाईन फ्ल्यूबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, तसेच बसस्थानक आणि अन्य व्यस्त ठिकाणांवरही वराहज्वर व त्याच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असल्याचे डॉ. जुझे डिसा यांनी सांगितले आहे.

स्वाईन फ्लूने घेतला देशात चौथा बळी

अहमदाबाद, दि. ९ - अटलांटा येथून गुजरातमध्ये आलेल्या एका अनिवासी भारतीयाचा आज स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याने आता देशातील या आजाराने दगावणाऱ्यांची संख्या चार झाली आहे.
प्रवीण पटेल असे या अनिवासी भारतीयाचे नाव आहे. स्थानिक सरकारी रुग्णालयात यांचे निधन झाले. पटेल हे दहा दिवसांपूर्वी अटलांटा येथे होते. विमानतळावर त्यांची तपासणी झाली असता त्यांच्यात स्वाईन फ्लूची लक्षणे आढळली. त्यांना लगेचच स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केले तेव्हाच त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. उपचारादरम्यानच ती अधिकच खालावली आणि त्यांचा अखेर मृत्यू झाला. त्याची पत्नी अजूनही रुग्णालयात दाखल असून उपचाराला योग्य प्रतिसाद देत असल्याचे समजते.
या मृत्यूने आता देशातील स्वाईन फ्लूच्या बळींची संख्या चारवर पोहोचली आहे. उर्वरित तीन जण महाराष्ट्रात दगावले. त्यात १४ वर्षीय विद्यार्थीनी रिदा शेख, ४२ वर्षीय शिक्षक संजय कोकरे आणि ५३ वर्षीय फाहमिदा पानवाला यांचा समावेश आहे.

आझाद यांनी माफी मागावी

रिदाच्या कुटुंबाची मागणी
पुणे, दि. ९ - स्वाइन फ्लूचा देशातील पहिला बळी ठरलेल्या रिदा शेखला तीन हॉस्पिटलमध्ये हलवल्यामुळे किमान ८० लोकांना स्वाइन फ्लूची लागण झाली असणार, असे विधान करणाऱ्या केंदीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांच्यावर रिदाचे कुटुंबीय भडकले असून आझाद यांनी माफी मागावी किंवा पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी रविवारी घरी पत्रकार परिषद घेऊन केली. अन्यथा पंतप्रधानांची भेट घेऊन ही मागणी त्यांच्या कानावर घालण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.
सेंट ऍन्स शाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या रिदाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निदान वेळेत न होऊ शकल्याने सोमवारी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला होता. प्रायव्हेट फीजिशियन ते जहांगीर हॉस्पिटल या दरम्यान तिला तीन हॉस्पिटल्समधून हलवण्यात आले होते. त्यामुळे अनेकांना स्वाइन फ्लूची लागण झाली असणार, असे विधान आझाद यांनी केले होते. यावर तीव्र आक्षेप घेत उलट सरकारी यंत्रणेच्या हलगजीर्मुळे आणि डॉक्टरांच्या स्वाइन फ्लूबाबतच्या अज्ञानामुळे रिदाला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. रिदाचा बळी गेल्यामुळेच स्वाइन फ्लूचा धोका सरकारच्या लक्षात आला आणि यंत्रणा जागी झाली. रिदाने देशासाठी आपला जीव दिला असेच म्हणावे लागेल. तिच्या मृत्यूनंतर अनेकांनी स्वाइन फ्लू टेस्ट करून घेतली, ते पॉझिटिव्हही आले आणि बचावले, असे रिदाच्या काकी आयेशा यांनी बोलून दाखवले.
जहांगीर आणि रुबी हॉस्पिटलविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, मात्र त्याबाबत चौकशी पूर्ण झाल्याशिवाय गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे पोलिस आयुक्तांचे म्हणणे आहे. या चौकशीसाठी दिरंगाई का होत आहे, हेही समजत नसल्याचे आयेशा म्हणाल्या. राज्याच्या आरोग्य खात्याच्या कामकाजावरही त्यांनी ताशेरे ओढले. जहांगीर, रुबी आणि आरोग्य खात्यामध्ये संगनमत असल्यानेच चौकशीस दिरंगाई होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

आज पेडणेकर यांच्या जामीनअर्जावर सुनावणी

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - बाल न्यायालयाने जामीन अर्ज रद्द केल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतलेल्या औदुंबर पेडणेकर आणि त्याची पत्नी मिनाक्षी यांच्या अटकपूर्व जामीनअर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. गेल्या शुक्रवारी पेडणेकर दांपत्यांना गोवा खंडपीठाने पर्वरी पोलिस स्थानकात सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. तसेच त्यांच्या आव्हान याचिकेवरील युक्तिवाद सोमवारपर्यंत स्थगित ठेवण्यात आले होते. उद्या सकाळी १०.३० वाजता यावर पुन्हा युक्तिवाद होणार आहे.
अल्पवयीन मुलीवर गंभीर स्वरूपाचे शारीरिक अत्याचार केल्याचे बाल न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील संशयित आरोपी औदुंबर पेडणेकर याला दिलेला जामीन रद्दबातल ठरवला होता. त्याबरोबर याप्रकरणात पर्वरी पोलिसांना हवी असलेला संशयित श्री. पेडणेकर, मिनाक्षी व त्याची मेहुणी रेखा वाघेला फरार झाली होती. त्यांच्या शोधासाठी पर्वरी पोलिसांनी मोहीम हाती घेतल्यानंतर कोल्हापूर येथून एका नोटरीद्वारे मुंबई उच्च न्यायालयात बाल न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने पेडणेकर व त्याच्या पत्नीला बाल न्यायालयाच्या आदेशानुसार त्वरित पोलिस स्थानकात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. उद्या या आव्हान याचिकेवर कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दोन विद्यार्थी अद्याप अस्वस्थच

मध्यान्ह आहार विषबाधा प्रकरण

वास्को, दि. ०९ (प्रतिनिधी)- सरकारच्या योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या मध्यान्ह आहाराचे सेवन करून मुरगाव, सडा येथे असलेल्या १८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना काल उघडकीस आली असून या पैकी दोघा विद्यार्थ्यांची स्थिती अद्याप अस्वस्थ आहे, असे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. सरस्वती महिला मंडळातर्फे काल देण्यात आलेली पावभाजी खाल्यानंतर युवक संघ विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांना इस्पितळात दाखल करून उपचारानंतर संध्याकाळी घरी पाठवण्यात आले होते, तथापि आज त्यापैकी जोतंम्मा दीवार या विद्यार्थिनीला पुन्हा इस्पितळात नेण्यात आले. रोहित नाईक हाही अद्याप पूर्ववत ठीक झालेला नाही. तालुक्यात अन्य शाळांमध्येही निकृष्ट दर्जाचा आहार देण्यात येत असल्याचा तक्रारी आहेत.
काल सकाळी सडा येथील युवकसंघ विद्यालयाने त्यांना मध्यान्ह आहाराच्या योजनेंतर्गत मिळालेले खाणे (पाव भाजी) पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना वाटल्यानंतर १८ जणांना या आहाराची विषबाधा झाल्याने त्यांना चिखलीच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. खराब आहारामुळे हा प्रकार घडल्याचे उघडकीस येताच शिक्षण खात्याने त्वरित कारवाई करीत या विद्यालयाला मध्यान्ह आहार पोचवणाऱ्या सरस्वती महिला मंडळ संस्थेचा परवाना रद्द करून संस्थाप्रमुख ऊर्मीला साळगावकर यांच्या हातात याबाबत पत्र सोपविले. गोवा सरकारची ही योजना विद्यार्थ्यांनाच धोकादायक ठरत असल्याची चर्चा सध्या राज्यभर पसरत असून संबंधित खात्याने सदर गोष्टीवर लक्ष ठेवून या योजनेत सुधारणा करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे. काल घडलेल्या घटनेबाबत तपासणी करण्यासाठी आज मुरगाव पोलिस स्थानकावर अन्न व औषध विभागाची अधिकारी श्रीमती आयवा फर्नांडिस यांनी हजेरी लावून पोलिसांकडून माहिती मिळवल्याचे सूत्रांनी सांगितले. युवकसंघ विद्यालयाच्या कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संपर्क साधून माहिती घेतल्याचे सांगितले. विषबाधेमुळे आजारी पडलेल्या १८ विद्यार्थ्यांपैकी जोतम्मा दीवार व रोहित नाईक यांची तब्येत अजून सुधारली नसल्याची (पोटात त्रास) माहिती विद्यालयाच्या सूत्रांनी दिली. आज संध्याकाळी पुन्हा एकदा जोतम्मा हिला चिखलीच्या कुटीर रुग्णालयात दाखल करून उपचार केल्यानंतर घरी पाठवण्यात आल्याचे सांगितले. मुरगाव पोलिसांनी आज सदर प्रकाराबाबत कारवाई करीत वेगवेगळ्या जबान्या नोंद केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नरेंद्र मामल यांनी दिली. पावभाजी खाऊन विषबाधा झाली आहे, त्याच्या बाबत अन्न व औषध विभागाकडून मंगळवारपर्यंत अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सरस्वती महिला मंडळातर्फे देण्यात आलेल्या आहारामुळे युवकसंघ विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना काल सकाळी घडल्यानंतर मुरगाव तालुक्यातील वेगवेगळ्या विद्यालयातून आहाराबाबत वाईट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाल्या आहेत. सडा येथेच असलेल्या सुुशेेनाश्रम नावाच्या विद्यालयाला काल दिलेला आहारही खराब होता, अशी माहिती येथील एका शिक्षकाने देऊन त्याचे सेवन केल्यामुळे १० ते १२ विद्यार्थ्यांना याचा काही प्रमाणात त्रास झाल्याचे सांगितले. सदर विद्यालयाला अन्य एका संस्थेकडून आहार मिळत असल्याची माहिती शिक्षकाने दिली असून सरस्वती महिला मंडळ व त्या संस्थेचे संबंध असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्या शिक्षण खात्याचे अधिकारी मुरगाव तालुक्यातील मध्यान्ह आहाराची प्रत्यक्षात तपासणी (सर्व शाळांमध्ये) करण्यासाठी येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली असून निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर ते कारवाई करतील,अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

भाववाढीने गाठला २८ वर्षातील उच्चांक

साखर आणखी महागणार

नवी दिल्ली, दि. ९ - जागतिक बाजारपेठेतील तेजीच्या बातम्या आणि साखरेचा साठा कमी होणे यासोबतच सणांमुळे मागणी वाढणे या सर्व कारणांमुळे साखरेच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे वृत्त आहे.
दिल्लीच्या थोक बाजारात शनिवार ८ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात साखर प्रचंड तेजीत होती. बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किंमतीने गेल्या २८ वर्षातील उच्चांक गाठला आहे. घरगुती उत्पादनातही कमी आल्याने भारतीय बाजारांवरही परिणाम दिसून आला. सध्या देशात सणासुदीचे दिवस आहे. त्यामुळे साखरेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेही या तेजीला बळ मिळाले.
सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी खुल्या बाजारात साखरेचा कोटा साडे सोळा लाख टन इतका वाढविला. पण, त्याचाही फारसा परिणाम झाला नाही. मागणी वाढल्याने हा अतिरिक्त कोेेटाही कमी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मध्यम प्रतीच्या साखरेचा भाव २७००-२७५० रुपये होता तो २७५०-२८५० इतका वाढला. सेकंड ग्रेेेडची साखर जी २५४५-२६४५ रुपये प्रति क्विंटल होती ती २७४०-२८४० पर्यंत वाढली. अर्थात, या सर्व किंमती दिल्लीच्या घाऊक बाजारातील आहेत. संपूर्ण देशात साखरेच्या भाव याच्याच आसपास दिसून आला.

Sunday, 9 August, 2009

धावे खाण आंदोलनास लागले नाट्यमय वळण

संभाव्य खाणमालकीणी विरोधात वाळपईत पोलिसात तक्रार दाखल
वाळपई दि.८ (प्रतिनिधी) - सत्तरी तालुक्यातील धावे खाणविरोधी आंदोलनाला नाट्यमय वळण लागले असून नियोजित खाणीच्या मालकीण ऍना बर्ता रेगो दी फर्नांडिस यांच्याविरोधात नागरिकांच्या वतीने उदय विष्णू वझे यांनी आज फौजदारी स्वरूपाची पोलिस तक्रार वाळपई पोलिस स्थानकात दाखल केली. यावेळी त्यांच्यासोबत ऍड. शिवाजी देसाई, पंच बाबलो गावकर, रमेश जोशी, भास्कर गाडगीळ, दामोदर जोशी, लक्ष्मण केळकर आदींची उपस्थिती होती.
यासंदर्भात तक्रारदार वझे यांनी सांगितले, नियोजित खाण मालकीणीने ११ ऑगस्टला धावे येथे होणाऱ्या सार्वजनिक सुनावणीच्या पार्श्वभूमीवर खाणीच्या लीज नूतनीकरणासाठी नगरगाव पंचायतीत तथा प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर संबधित सरकारी कार्यालयात पर्यावरणीय परिणाम अहवाल आणि खाण व्यवस्थापन अहवाल सादर केला आहे. हा अहवाल "मिनरल इंजिनियरिंग सर्व्हिसेस बेळ्ळारी' या संस्थेने संबंधित खाण मालकाशी संगनमत करून कोणत्याही पुराव्याच्या आधाराशिवाय तयार केला आहे. या अहवालात नगरगाव पंचायत क्षेत्रात खाण व मासेमारी हे मुख्य व्यवसाय दाखवण्यात आले आहेत. तसेच बफर झोनच्या १० किलोमीटर परिक्षेत्रात ४९ गावे असून या गावातील लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २२७४६ दाखवण्यात आली आहे. ही माहिती चुकीची असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
सरकारकडून मायनिंग लीज मिळवण्यासाठी बनावट दस्ताऐवज सरकारला सादर करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न ठरला आहे.
संबंधित खाण मालकिणीने १० ऑगस्टपूर्वी खाण कार्यालयाकडे सादर केलेला नियोजित खाणीच्या लीज नूतनीकरणाचा अर्ज तात्काळ मागे घ्यावा; अन्यथा सरकारने सदर खाण मालकीणीला अटक करावी, अशी मागणी लक्ष्मण केळकर यांनी केली आहे.
याप्रसंगी पंच गावकर म्हणाले, आम्ही कायदेशीर मार्गाने हा खाणविरोधी लढा द्यायचे ठरवले आहे. येत्या ११ रोजी होणाऱ्या सार्वजनिक सुनावणीच्या पार्श्वभूमीवर
नागरिकांना त्रास झाल्यास त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील.
प्राप्त माहितीनुसार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही दिवसांपूर्वी सदर अहवाल सदोष असल्यासंदर्भात संबंधित खाण मालकीणीला नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता सरकार यासंदर्भात कोणती भूमिका घेते याकडे धावेवासीयांचे लक्ष लागले आहे. येथील लोक संभाव्य खाणीच्या शक्यतेने संतप्त झाले असून त्यांनी कोणत्याही स्थितीत धावे भागात खाण होऊ नये यासाठी कंबर कसली आहे.

दक्षता आयोगकडेही तक्रार
दरम्यान, याच प्रकरणासंदर्भात धावेतील ग्रामस्थांनी आज फॅक्सव्दारे राज्याच्या दक्षता आयोगाकडेही तक्रार केली आहे. नियोजित खाणीचे मायनिंग लीज हे २१ /११/२००७ रोजी संपल्यानंतर दि.२२/११/२००७ रोजी संबंधित खाण मालकीणीने नियोजित खाणीच्या नूतनीकरणाचा अर्ज सरकारकडे दाखल केला. अर्ज सादर करण्यासाठी मायनिंग कन्सेशन रुल १९६० नुसार मायनिंग लीज समाप्तीच्या १२ महिने अगोदर अर्ज करावा लागतो. तथापि, सदर मालकीणीने तसे केले नसल्याने या संदर्भात राज्य प्रदूषण नियंत्रणमंडळ व खाण खाते यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्ती ८ दिवसांत रद्द करा


अखिल गोवा खाजगी बस वाहतूक संघटनेचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील आश्वासनाबाबत कंपनी अनभिज्ञ

या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी
करावा लागणारा खर्च खालीलप्रमाणे

दुचाकी -६१६.३३
तीनचाकी -७२८.३९
चार चाकी, हलकी वाहने -१३४४.७२
अवजड वाहने -१४००.७५पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी "हाय सिक्युरिटी नंबर प्लेट' बसवण्याची सक्ती करणारा निर्णय येत्या ८ दिवसांत रद्द न केल्यास संपूर्ण सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प करणार, असा स्पष्ट इशारा अखिल गोवा खाजगी बस वाहतूक मालक संघटनेतर्फे देण्यात आला आहे. सरकारचा हा निर्णय जाचक आहेच ; परंतु त्याद्वारे सरकार नेमका कोणता हेतू साध्य करू पाहते याबाबतही संशय निर्माण होत आहे. ही सक्ती अजिबात सहन करून घेतली जाणार नाही, असेही संघटनेने म्हटले आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर गोवा खाजगी बस वाहतूक मालक संघटनेचे अध्यक्ष सुदेश कळंगुटकर यांनी ही माहिती दिली. यावेळी संघटनेचे सचिव सुदीप ताम्हणकर, दक्षिण गोवा संघटनेचे अध्यक्ष मान्यूएल रॉड्रिगीस, गुरूदास कांबळी आदी उपस्थित होते. संघटनेच्या या निर्णयाला टेंपो मालक संघटना, ट्रक मालक संघटना, टूरीस्ट टॅक्सी संघटना आदींनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे. सरकार हा अन्यायकारक निर्णय मागे घेत नसेल तर त्याविरोधातीलील आंदोलनात सर्व वाहतूक संघटना सहभागी होतील, असेही श्री. कळंगुटकर म्हणाले.
गोव्यात बसगाड्या चोरीस जाण्याचा प्रकार अद्याप घडला नाही. येथे प्रत्येकाचे वाहन एकमेकांना परिचित आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही सक्ती करण्यात येत असेल तर आधी देशातील उर्वरित सर्व मोठ्या राज्यांत ती लागू होऊ द्या. आपले राज्य छोटे असल्याने येथे सर्वांत शेवटी सक्ती लागू करणे शक्य आहे, असा सल्लाही यावेळी श्री. कळंगुटकर यांनी दिला. या नंबर प्लेटना "सॅन्सर' असल्याने वाहन कुठेही गेले तरी त्याचा पत्ता लगेच लागू शकेल. सरकारकडून सध्या स्मार्ट कार्ड चालक परवाना देण्यात येतो. या स्मार्ट कार्डला "चीप' असून सदर व्यक्तीची संपूर्ण माहिती त्यात असते. आता या स्मार्ट कार्डचा कितपत वापर होतो? हे सरकारने आधी स्पष्ट करावे, असा सवाल मान्यूएल रॉड्रिगीस यांनी केला. बनावट नंबर प्लेट लावल्या तर स्थानिक वाहतूक पोलिसांकडे ते तपासण्याची कोणती यंत्रणा आहे? असा सवाल करून सरकार अजूनही या गोष्टीबाबत पारदर्शक नाही, असा ठपकाही यावेळी ठेवण्यात आला. या नंबर प्लेटसाठी वाहन मालकांना पैसे मोजावे लागणार आहे. वाहतूक व्यवसायात स्पर्धा असते व त्यामुळे वैमनस्यही आपोआप येते. या नंबर प्लेट तोडून टाकल्या तर त्याचा भुर्दंड वाहन मालकाला पडेल, यामुळे ही योजना लोकांना कितपत परवडेल याचाही विचार व्हावा, असेही यावेळी श्री. रॉड्रिगीस म्हणाले.
अन्यथा आत्महत्या करणे भाग पडेल
वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या इशाऱ्यावरून "आरटीओ'कडून बस मालक संघटनेच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात सतावणूक सुरू आहे. गोव्यात सुमारे ४ हजार खाजगी बस मालक आहेत, यातील ९० टक्के गोमंतकीय आहेत. या व्यवसायात असलेल्या बसमालकांवरील कर्जाचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक खात्याकडून अवैध पद्धतीने परवाने देणे सुरू आहेत. या व्यवसायात स्पर्धा वाढली आहे व त्यामुळे व्यवसाय होत नाहीच पण एकमेकांशी वैर वाढत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला तर महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे बस मालकांनाही मांडवीत उडी घेऊन आत्महत्या करणे भाग पडेल, असे श्री. कळंगुटकर म्हणाले. वाहतुकीत शिस्त आणण्याचे सोडून केवळ "तालांव' देण्यातच हे अधिकारी धन्यता मानतात. मांडवी पुलाजवळ लपून राहून "तालांव' देण्याचे प्रकार होत असल्याने अनेक वेळा पुलावर अपघात होण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत. खाजगी बस वाहतूकदारांत शिस्त आणण्यासाठी तपासणी, गणवेशाची सक्ती, तिकीट सक्ती आदींबाबत कडक धोरण अवलंबिण्याचे कळवूनही काहीही झाले नाही, असेही ते म्हणाले.

-------------

मुख्यमंत्र्यांच्या फेरविचाराबाबत
"शिमनित उच' अनभिज्ञराज्यातील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी "हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' नावाची नवीन क्रमांक पट्टी बसवण्यासाठी "शिमनित उच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीला दिलेल्या कंत्राटाबाबत फेरविचार करण्याबाबत मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विधानसभेत दिलेल्या आश्वासनाबाबत कंपनीतर्फेच अनभिज्ञता व्यक्त करण्यात आली. कंपनीने कायदेशीर कंत्राट मिळवले आहे व या कंत्राटात काहीही घोटाळा नाही, असे स्पष्ट करून कार्यक्रमाचे उद्घाटन होऊन प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली.
आज पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत कंपनीचे विपणन व्यवस्थापक गिरीश कराडकर यांनी ही माहिती दिली. यावेळी सरव्यवस्थापक अरीफ खान, संचालक नवीन शहा आदी हजर होते. राज्यातील सर्व "आरटीओ' कार्यालयात या नंबर प्लेट बसवण्याची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना हे कंत्राट पूर्णपणे पारदर्शक आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. कंपनीचे माजी संचालक नितीश शहा यांचा कंपनीशी आता काहीही संबंध नाही व त्यांनी १० फेब्रुवारी २००५ रोजी भागधारक व संचालकपदाचाही राजीनामा दिला आहे.
"हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' ही केंद्रीय मोटर वाहतूक कायद्याच्या कलम ६० अंतर्गत असून या कायद्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी ५ मे २००९ रोजी दिलेल्या निकालात येत्या तीन महिन्यात ही पद्धत सर्वत्र लागू करण्याचे आदेश दिले आहेत व त्या अनुषंगानेच गोवा सरकारने हा निर्णय घेतल्याचे यावेळी श्री. कराडकर यांनी सांगितले.
हा प्रकल्प सुरुवातीला मेघालय राज्यात राबवण्यात आला आहे. या प्रकल्पाबाबत विविध स्तरावर बिगर सरकारी संघटना व इतर अनेकांनी विरोध करून विविध न्यायालयातही खटले दाखल केले होते परंतु हे सर्व खटले न्यायालयाने वेळोवेळी फेटाळून लावले आहेत. कोणतीही अपात्र किंवा कुवत नसलेली कंपनी हे कंत्राट मिळवू शकत नाही, अशा प्रकारच्या अटी या निविदेत घालण्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाने २७ ऑक्टोबर २००६ रोजी दिलेल्या निकालात या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना चपराक दिली आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली. या निकालात म्हटल्याप्रमाणे बिगर सरकारी संस्था किंवा अन्य संघटनांच्या दबावाला बळी पडून राज्य सरकार सुरक्षेच्या बाबतीत हयगय करू शकत नाही. कोणत्याही संघटना किंवा इतर संस्थांना सामान्य लोकांना वेठीस धरण्याचा अधिकार नाही असेही या निकालात म्हटल्याचेही त्यांनी सांगितले. हा प्रकल्प हा निव्वळ जनतेच्या हितासाठी तसेच सुरक्षेसाठी असून त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कदंब कर्मचाऱ्यांचा संप अखेर प्रलंबित

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी)- वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याबाबत स्पष्ट आश्वासन दिले देताना केवळ काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही अवधी लागणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे महामंडळ कर्मचारी संघटनेने सोमवार दि. १० ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय सध्या प्रलंबित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी ही माहिती दिली. यावेळी कदंब महामंडळ चालक व इतर कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्योकिम फर्नांडिस, कामगार नेते ऍड. सुहास नाईक व गजानन नाईक उपस्थित होते. कामगार व रोजगार आयुक्त व्ही. बी. एन. रायकर यांनी केलेल्या हस्तक्षेप बैठकीत महामंडळातर्फे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. नाईक व कार्मिक व्यवस्थापक टी. के. पावसे यांनी ही माहिती दिल्याचे श्री.फोन्सेका यांनी यावेळी सांगितले. या संपाच्या पार्श्वभूमीवर कामगार आयुक्तांनी ७ ऑगस्ट रोजी कर्मचारी संघटना व महामंडळ व्यवस्थापन यांची संयुक्त बैठक बोलावली होती, त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले. कदंब महामंडळाने गेल्या ६ मार्च २००९ रोजी लेखी आश्वासन देऊनही कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात हयगय केल्याने संघटनेतर्फे १० ऑगस्टपासून संपावर जाण्याची नोटीस देण्यात आली होती. ६ ऑगस्ट रोजी यासंबंधी पर्वरी सचिवालयात बैठक झाली व त्यात वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी कदंब महामंडळ कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आश्वासन आपण विधानसभेत दिल्याची माहिती दिली. महामंडळ कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय स्थगित ठेवावा,असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले होते. दरम्यान, केवळ काही प्रशासकीय प्रक्रियेमुळे प्रत्यक्षात या शिफारशी लागू करण्यास थोडा वेळ लागणार असून कामगारांनी तोपर्यंत कळ सोसावी, असेही सांगण्यात आले.
वाहतूकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हा संप प्रलंबित करण्यात आला आहे. यासंबंधी पुढील बैठक येत्या १३ ऑगस्ट रोजी कामगार आयुक्तांसमोर होणार असून त्यात अंतिम निर्णय होईल, असा विश्वास श्री. फोन्सेका यांनी व्यक्त केला.

कॅसिनोला गंडा घातल्याप्रकरणी दोघा पोलिसांसह सहा अटकेत

पणजी,दि. ७ (प्रतिनिधी)- दोनापावला येथील "चान्सीस कॅसिनो'ला कर्मचारी व ग्राहकांनी संगनमताने १.३३ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ६ जमांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यात दोन पोलिस शिपायांचाही समावेश आहे. अलीकडेच विधानसभा अधिवेशनात विविध गुन्हेगारी प्रकरणांत पोलिसांचा हात असल्यावरून विरोधकांनी गृहमंत्री रवी नाईक यांच्यावर टीकेची झोड उडालेली असताना आता या प्रकारामुळे त्यात अधिक भर पडली आहे.
पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांनी यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार दोनापावला येथील "चान्सीस कॅसिनो'चे मालक डॉ. ब्रिटो यांनी यासंबंधी पणजी पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन पणजी पोलिसांनी तात्काळ केलेल्या कारवाईत या सहाही जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यात पवन जयसिंग (स्लॉट ऑपरेटर), इम्तियाज मोहम्मद (स्लॉट ऑपरेटर), सांतान मोंतेरो (सुपरवायझर), मारुती बनीक (ग्राहक), विनोद छप्पन (पोलिस शिपाई, पणजी) व नितीन गावकर (पोलिस शिपाई, जुने गोवे) यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वांनी मिळून संगनमत केले होते.
पोलिस शिपाई व ग्राहक कॅसिनोवर खेळत होते व प्रत्यक्ष पैशांबाबत संगनमत करून कॅसिनो मालकाला फसवत होते, अशी माहिती देण्यात आली. कॅसिनोतील कर्मचारी व ग्राहक यांनी आपापसात संगनमत करून पैसे लुटण्याचा हा प्रकार दोन तीन वेळा झाला व त्यानंतरच ही गोष्ट लक्षात आली, त्यानंतर तक्रार केल्याचे डॉ. ब्रिटो यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, अटक केलेले सहाही संशयित सध्या पोलिस कोठडीत असून निरीक्षक संदेश चोडणकर अधिक चौकशी करीत आहेत.

एटीएम गंडाप्रकरणी सहा जणांना कोठडी

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) - "एटीएम' आणि "क्रेडिट कार्ड' चोरून लोकांचे लाखो रुपये हडप करणाऱ्या टोळीचा मुंबईतीलही अनेक प्रकरणांत सहभाग असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. या सहा तरुणांना पोलिसांनी १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळवली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
पणजी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत मुंबई येथील सहा तरुणांना या प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडून साडेचार लाख रुपये रोख, एक लॅपटॉप, सीडी रायटर, स्वॅपींग मशीन तसेच विविध बॅंकांची ४२ "एटीएम' आणि "क्रेडिट कार्ड' जप्त केली होती. दोन दिवसांपूर्वीच ही टोळी गोव्यात दाखल झाली होती,अशीही माहिती उघड झाली. त्यांनी ही कार्डे वापरून पणजीतील दुकानात मोठी खरेदी केली, तसेच कॅसिनोंमध्येही क्रेडिट कार्ड वापरून लाखो रुपयांचा जुगार खेळल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात अनिल चौरासीया, हुकूम सिंग, राहुल शेट्टी, विक्रम सिंग, वरुण अगरवाल व भुपेंद्र शुक्ला यांना अटक केली आहे व हे सर्व मुंबई येथे राहणारे आहेत. या प्रकरणी पोलिस निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त तपास करीत आहेत.

मांद्रे "रिवा रिसॉर्ट' प्रकरणी उपजिल्हाधिकारी गोत्यात

पणजी, दि. ८ (प्रतिनिधी)ः पेडणेचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांच्या कार्यपद्धतीबाबत विधानसभा अधिवेशनात पेडण्याचे आमदार दयानंद सोपटे व मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी उघडपणे टीका केली होती. या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता मांद्रे येथील तथाकथित "रिवा रिसॉर्ट'चे बांधकाम गेली दीड वर्षे "सीआरझेड' विभागात सुरू असताना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई झालेली नसल्याने ते गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याप्रकरणी अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ अंतर्गत गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे मांद्रे पंचायतीला नोटीस बजावण्यात आली आहे. यात १४ ऑगस्टपर्यंत सदर बांधकामाबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे बांधकाम का पाडण्यात येऊ नये,असेही या नोटिशीत म्हटले आहे. मांद्रे जुनसवाडा येथील सर्वे क्रमांक २७३/३ अंतर्गत हे बांधकाम गेले दीड वर्ष सुरू आहे. मांद्रे समुद्रापासून केवळ शंभर मीटर अंतरावर असलेले हे बांधकाम विकासबाह्य विभागात येते व तिथे कोणतेही बांधकाम हाती घेण्यास कायद्याने बंदी आहे. सरकारी आकडेवारीनुसार, "सीआरझेड' कायद्यावरून सध्या राज्यभरात सुमारे अडीच हजार बांधकामांवर उच्च न्यायालयाची टांगती तलवार लटकत आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी किनारी भागातील पंचायतींना धारेवर धरूनही मांद्रे पंचायतीकडून या बड्या बांधकामाबाबत झालेला कानाडोळा त्यांना महागात पडण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. मांद्रे पंचायतीची या प्रकरणी कृती ही उच्च न्यायालयाचा अवमान ठरत असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या १-२०-२००४-सीएस/१८९८ दिनांक १ नोव्हेंबर २००६ रोजीच्या परिपत्रकानुसार उपजिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना सीआरझेड विभागातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार बहाल करण्यात आले आहे. अशी बांधकामे सीआरझेड विभागात उभी राहू नयेत, हा या परिपत्रकामागचा हेतू आहे. मांद्रे जुनसवाडा येथील या बांधकामाबाबत वृत्तपत्रातून अनेकवेळा आवाज उठवूनही तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबत तक्रारीही दाखल झाल्या असताना या बांधकामावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकरही कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. येत्या १६ ऑगस्ट रोजी मांद्रे पंचायतीची ग्रामसभा होणार आहे व या विषयावरून पंचायत मंडळाला जाब विचारण्याची तयारी येथील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार या बांधकामाबाबत मोठ्या प्रमाणात छुपा व्यवहार झाल्याचा आरोप येथील स्थानिकांकडून केला जात आहे. अशा प्रकारची इतरही अनेक बांधकामे या भागात सुरू असून या प्रकारामुळे त्यांचेही धाबे दणाणले आहे. उपजिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी स्वेच्छा दखल घेण्याची गरज आहे ; परंतु कोणीतरी कायदेशीर तक्रार करावी व मगच कारवाई करावी अशी पद्धत रूढ बनली असून या बांधकाम मालक व तक्रारदाराचे वैर तयार करण्याचे प्रकार सुरू आहेत. या बांधकामाबाबत पंचायत मंडळाला जाब द्यावाच लागेल, असा हेका येथील काही नागरिकांनी ठेवल्याने ग्रामसभेत या विषयावरून खडाजंगी माजण्याची शक्यता आहे.