Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 7 May, 2011

पहिली ते आठवीपर्यंत आता सारेच पास...!

शिक्षण खात्याचा निर्णय
निकालात बदल करावा लागणार
दहावीच्या निकालावर परिणाम शक्य

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला असून त्यासंबंधीचे परिपत्रक सर्व शैक्षणिक संस्थांना पाठवण्यात आले आहे. या परिपत्रकामुळे निकालात बदल करून नापास विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा द्राविडी प्राणायाम आता शैक्षणिक संस्थांना करावा लागणार आहे.
नव्या शिक्षण हक्क कायद्यात अशी तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीची अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर होता, पण त्याबाबत निर्णय घेतला गेला नव्हता. आता विशेष परिपत्रक जारी करून त्याची कार्यवाही करण्याचे आदेश सर्व संस्थांना देण्यात आले असून यासंबंधी काटेकोर अंमलबजावणीचे बंधनही त्यांच्यावर राहील, असेही यावेळी सांगण्यात आले. या निर्णयामुळे आता या कायद्याची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र राज्यापाठोपाठ गोवा हे दुसरे राज्य ठरणार आहे. २००९ पासून कार्यन्वित झालेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या कलम १६ मध्ये ही तरतूद करण्यात आली आहे. पहिली ते आठवीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे व त्यामुळेच विद्यार्थ्यांना नापास करू नये, असेही सांगण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता दहावीच्या निकालावरही बराच परिणाम होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा यासाठी काही शैक्षणिक संस्थांकडून शिक्षणात कच्चे असलेल्या विद्यार्थ्यांना आठवीत नापास करण्याचे प्रकार घडत होते. यापुढे असले प्रकार घडणार नाहीत व त्याचा परिणाम दहावीच्या निकालावर होईल, असे बोलले जात आहे.

फलोत्पादन महामंडळात ८.४० लाखांचा घोटाळा

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
फलोत्पादन महामंडळात ८.४० लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार पणजी पोलिस स्थानकात करण्यात आली आहे. महामंडळाच्या भाजी विक्री केंद्रांवर जाऊन पैसे गोळा करण्याचे काम पाहणारा कंत्राटदार अंबरीश एन. गावकर यांच्या विरोधात ही तक्रार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश तेंडुलकर यांनीचदाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी १४२, ४०३ व ४०९ कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे.
अधिक माहितीनुसार, राज्यात विविध ठिकाणी असलेल्या भाजी विक्री केंद्रांतून गोळा केलेले हे लाखो रुपये महामंडळाकडे पोचलेच नसल्याचा दावा श्री. तेंडुलकर यांनी तक्रारीत केला आहे. हे पैसे आणण्याचे काम अंबरीश गावकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. मात्र, ६ ते १८ एप्रिल या दरम्यानचे सुमारे ८ लाख ४० हजार रुपये महामंडळाकडे पोचलेलेच नाहीत. केंद्रांवर भाजी विक्री केल्यानंतर जमलेले पैसे हे महामंडळात जमा करणे बंधनकारक होते. त्यातून संबंधित केंद्रांवर किती भाजीविक्री झाली हे ठरवून त्यानुसार त्यांना पैसे दिले जातात. मात्र, या भाजी विक्रेत्यांचे पैसेच महामंडळाकडे पोचले नसल्याची माहिती पणजी पोलिसांनी दिली.
संशयित श्री. गावकर हे बाराजण, सत्तरी येथे राहणारे असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या विषयीचा अधिक तपास पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक रमेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

राष्ट्रवादीच्या खांद्यावर मिकींचे ओझे..

आमदारकीचा राजीनामा देण्याचे आवाहन
पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बाणावलीचे आमदार मिकी पाशेको हे पक्षासाठी आता न पेलणारे ओझे बनले आहेत. पक्षाचे एक जबाबदार आमदार असूनही पक्षावर उघडपणे टीका करण्याची त्यांची पद्धत पक्षशिस्तीचे उल्लंघन ठरत असल्याने त्यांनी तात्काळ पक्ष सदस्यत्व व आमदारपदाचा राजीनामा देणेच योग्य ठरेल, असे माहितीवजा आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केले आहे.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक इथे झाली. या बैठकीत विविध विषयांवर गरमागरम चर्चा करण्यात आली. पक्षाची भूमिका जाणून न घेताच मिकी पाशेको यांनी माध्यमप्रश्‍नी उघडपणे एकतर्फी भूमिका घेतली; तसेच नवा पक्ष स्थापन करण्याचेही विधान करून त्यांनी उघडपणे आपल्याच पक्षाला आव्हान दिल्याने त्यांना आता पक्षात राहण्याचा कोणताच अधिकार राहत नाही, असेही ट्रॉजन डिमेलो म्हणाले. पणजी महापालिका निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढे काढून नंतर कच खाण्याच्या प्रकारामुळे पक्षाची बरीच नाचक्की झाल्याचा आरोप सरचिटणीस ऍड. अविनाश भोसले यांनी केला. राष्ट्रवादीच्या पॅनलचे अध्यक्ष बनूनही त्यांनी निवडणुकीत पक्षाचा प्रचार केलाच नाही, असा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला.
दरम्यान, अवघड जागीचे दुखणे बनलेल्या मिकी पाशेको यांनी राजीनामा देण्यापेक्षा त्यांना पक्षातून बडतर्फ का केले जात नाही, असा सवाल केला असता तसे केल्यास ते असंलग्न आमदार म्हणून राहतील व ते पक्षाला अधिक मारक ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

युवा उद्योजकाचे असेही ‘उद्योग’

तेरेखोल प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
तेरेखोल गावाचे अस्तित्वच संपवू पाहणार्‍या ‘लीडिंग हॉटेल्स’च्या कथित गोल्फ कोर्स प्रकल्पामागचे खरे सूत्रधार पेडणेचे युवा उद्योजक म्हणवून घेणारे व अलीकडे विविध उपक्रमांचा धडाका लावलेले माजी मंत्री संगीता परब यांचे पुत्र सचिन परब हेच आहेत, असा सनसनाटी आरोप तेरेखोलवासीयांनी केला आहे. तेरेखोलात हॉटेल प्रकल्प उभा राहणार असल्याचे सांगून आता हळूच ‘गोल्फ कोर्स’ प्रकल्प पुढे रेटला जात असल्याने या गौडबंगालाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी सेंट अँथनी कूळ व मुंडकार संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
तेरेखोल गावच्या कथित जमीन व्यवहारांतील एकेका प्रकरणाचा पडदा आता बाजूला होत असून त्यामुळे या प्रकरणातील एकूणच गोलमाल समोर यायला लागला आहे. मुळातच तेरेखोलातील जमीनमालकाने सदर कंपनीकडे केलेला जमीन विक्री व्यवहार हा कूळ व मुंडकार कायद्याची उघडपणे पायमल्ली करणारा ठरला आहे. तेरेखोल गावातील अनेक कुटुंबीयांना कूळ व मुंडकारी अधिकार प्राप्त झाले आहेत. असे असताना ही जमिनीची परस्पर विक्री कशी काय करण्यात आली, असा सवाल उपस्थित झाला आहे. या गावातील अनेक लोकांना कूळ व मुंडकार कायद्याखाली सनदा प्राप्त झालेल्या आहेत. एकचौदाच्या उतार्‍यावर त्यांची नावे तेवढी येणे बाकी आहे. एकूण ४० प्रकरणी कुळांना अधिकार देण्याबाबतच्या ‘फॉर्म-२’ अंतर्गत नोटिसाही जमीनदाराला पाठवण्यात आलेल्या आहेत. १९९४ साली याबाबतची सुनावणी घेऊन या लोकांना अधिकार बहाल करण्यात आले होते. आता ही जमीन कूळ व मुंडकारांच्या हातात येण्याची वेळ आली असतानाच या गरीब लोकांच्या अज्ञानाचा लाभ उठवून हा जमीन विक्रीचा व्यवहार करण्यात आला, असाही आरोप या लोकांनी केला आहे. कुळांचे अधिकार देण्याच्या सुनावणीवेळी तिथे न फिरकलेले जमीनदार आता अचानक मामलेदारांनी दिलेल्या आदेशांना आव्हान देतात, यावरूनच कुठे तरी पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणातील मुख्य गोम अशी की, या गावातील अनेक कुटुंबे ही मुंबई किंवा इतर ठिकाणी स्थायिक झालेली आहेत व अशा लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडून जमिनी विकत घेण्यात आल्या आहेत. या गावात वास्तव्य करणार्‍या लोकांनी मात्र आपल्या जमिनी देण्यास स्पष्ट नकार दिल्यानेच हे घोडे अडले आहे. कधीकाळी कूळ व मुंडकार असल्याचा दावा करणार्‍या काही लोकांनी स्वतःहून आपला या जमिनीशी काहीही संबंध नसल्याची प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत व या जमिनीचा ताबा ‘लीडिंग हॉटेल्स’ कडे दिला आहे, असेही आता उघड झाले आहे.
तेरेखोल गावाचा समावेश केरी पंचायतीत होतो. तेरेखोलवासीयांचा या प्रकल्पाला विरोध होत असल्याने सचिन परब यांनी केरी गावातील काही लोकांना हाताशी धरून या हॉटेल प्रकल्पाला पाठिंबा मिळवून देण्याचेही बरेच ‘उद्योग’ यापूर्वी केले आहेत. या हॉटेल प्रकल्पाबाबत आराखडा सादर करण्याची वारंवार मागणी करूनही त्याबाबत लोकांना काहीही माहिती देण्यात आली नाही, असेही आता येथील लोक उघडपणे बोलू लागले आहेत. काही पत्रकारांना हाताशी धरून व त्यांच्यासाठी पंचतारांकित हॉटेलांत मेजवान्या आयोजित करून तेरेखोलवासीयांचा विरोध मोडून काढण्याचेही बरेच प्रयत्न झाल्याची माहिती आता समोर आली आहे.
महसूल खात्यावरही संशयाचे सुई
महसूल खाते हे सध्या राष्ट्रवादीचे नेते जुझे फिलिप डिसोझा यांच्याकडे आहे. संगीता परब या राष्ट्रवादीच्या नेत्या असल्याने या हॉटेलच्या जमीन व्यवहारात महसूल खात्याचा वापर करण्यात आल्याचा संशयही आता बळावला आहे. गेली कित्येक वर्षे पेडणेचे मामलेदार व उपजिल्हाधिकारी कार्यालयांत अनेक कूळ व मुंडकार प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा वेळी तेरेखोलातील प्रकरणे मात्र तात्काळ निकालात काढण्यात येतात यामागचे नेमके गुपित काय, असाही प्रश्‍न आता लोक उपस्थित करीत आहेत.
डॉ. विलींचाही खटाटोप
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांनीही तेरेखोलात ख्रिस्ती धर्मगुरूंना हाताशी धरून तेथील लोकांनी आपल्या जमिनी या हॉटेलसाठी द्याव्यात म्हणून प्रयत्न चालवला होता, असाही एक प्रकार समोर आला आहे. तेरेखोलवासीयांनी मात्र त्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने त्यांनी हळूच या प्रकरणातून आपली सुटका करून घेतल्याचे सांगण्यात येते. या एकूण व्यवहारांत राजकीय स्तरापासून वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांची एक मतलबी मालिकाच गुंफली गेली आहे व त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

बायणात पाचटनांपैकी एक टन तांदूळ गायब


बायणात नागरी पुरवठा खात्याचा छापा


वास्को, दि. ६ (प्रतिनिधी)
बायणा - वास्को येथील ‘पी. डिमेलो एजीएल कंझ्युमर सोसायटी’च्या स्वस्त धान्याच्या दुकानात आलेल्या तांदळाच्या साठ्यापैकी काही तांदूळ परस्पर विकण्यात आल्याच्या तक्रारीवरून आज संध्याकाळी नागरी पुरवठा खात्याने येथे छापा टाकला. त्यात काल दि. ५ रोजी पाठवण्यात आलेल्या पाच टन तांदळाच्या साठ्यातील एक टन साठा गायब असल्याचे उघडकीस आले व त्यानुसार निरीक्षकांनी अहवाल तयार केला आहे.
आज संध्याकाळी बायणा येथील खाप्रेश्‍वर मंदिरासमोर असलेल्या सदर दुकानावर नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक दत्तेश साखरदांडे यांनी हा छापा टाकला. रेशनकार्ड धारकांसाठी येत असलेल्या साठ्यातील काही तांदूळ परस्पर विकला जात असल्याची माहिती मुरगाव मामलेदारांना मिळताच त्यांनी या प्रकरणी आपल्याला छापा टाकण्याचे आदेश दिल्याचे श्री. साखरदांडे यांनी सांगितले. त्यानुसार येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात आलेल्या पाच टन तांदळांपैकी एक टन तांदूळसाठा गायब झाल्याचे निदर्शनास आल्याची माहितीही त्यांनी दिली. सदर दुकानात काल तांदळाची १०३ पोती आली होती; पैकी आज केवळ ८१ पोती तांदूळच सापडला, असेही ते म्हणाले. या छाप्यादरम्यान दुकानाचे सचिव कृष्णा फडते यांची जबानी नोंद करण्यात आली असून विक्री नोंदणी वही जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, वास्कोतील विविध भागांत धान्याची कमतरता भासत असून तिथेही असेच प्रकार सुरू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खात्याने ही छापा मोहीम सुरूच ठेवावी, अशी मागणी होत आहे.

तीनअपघातांत तिघांचा मृत्यू

तीन अपघात, तिघे ठार

मडगाव, दि. ६ (प्रतिनिधी)
राज्यात काल रात्रीपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत तिघे ठार झाले. यांतील दोन अपघात मडगाव परिसरात तर एक वास्कोत झाला. मडगावातील पहिला अपघात फातोर्डा येथे दामोदर लिंगाजवळील जंक्शनवर घडला व त्यात जेसन ब्रागांझा हा ४१ वर्षीय बुलेटस्वार जागीच मरण पावला.
जेसन जे. जे. कॉस्ता इस्पितळाजवळ राहणारा असून दुपारी ३च्या सुमारास त्या रस्त्यावरून वेगात येत असताना त्याची मोटरसायकल मारुती सर्व्हिसेसच्या आवार भिंतीवर धडकली व डोके जमिनीला आदळून तो जागीच मरण पावला. मडगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठविला.
दुसरा अपघात रासय - लोटली येथील गोवन कॅरियर शिप कंपनीत झाला. तेथे वेल्डिंगचे काम करणारा प्रमोद निशाद हा २३ वर्षीय तरुण विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला व इस्पितळात नेत असताना वाटेतच मरण पावला. मायणा - कुडतरी पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला.
दरम्यान, आज सकाळी वास्को पोलिसांनी दाबोळी एनएसडी रस्त्याच्या बाजूला पडलेल्या नाग्या नामक इसमाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो काल मध्यरात्री ट्रकखाली सापडून ठार झाला असावा असा अंदाज आहे. होस्पेट, कर्नाटक येथील नाग्या इथे उभा करून ठेवलेल्या एका ट्रकखाली झोपल्याचा अंदाज असून सदर ट्रक त्याच्यावरून गेला असता त्यात तो ठार झाला असावा. सदर ठिकाणी एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच वास्को पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक चौकशीअंती दाबोळी येथील आलेक्स मायकल याच्या ट्रकवर ‘क्लीनर’ म्हणून तो काम करायचा, असे पोलिसांना समजले.

न्या. अनुजा प्रभुदेसाई यांना ‘क्लीन चीट’

पणजी, दि. ६ (प्रतिनिधी)
न्यायाधीश श्रीमती अनुजा प्रभुदेसाई यांना ‘क्लीन चीट’ देऊन त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले आहे. याविषयीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी काढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीड वर्षापूर्वी श्रीमती प्रभुदेसाई यांच्यावर ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले होते. दरम्यान, त्यांचे निलंबन मागे घेतल्याने ‘हा सत्याचा विजय होय’, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. सुसंस्कृत, मितभाषी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनुजा प्रभुदेसाईंची न्यायदान करताना मात्र कर्तव्यकठोर भूमिका असते, अशी ख्याती आहे. काही काळ त्यांनी राज्याच्या कायदा विभागाचे सचिवपदही सांभाळले होते.

‘पीपीपी’ च्या नावानं कुणाचं चांगभलं?

किशोर नाईक गांवकर

पणजी, दि. ६
धारगळ येथील नियोजित क्रीडानगरी हा प्रकल्प राष्ट्रीय क्रीडास्पर्धेचाच एक भाग आहे. राष्ट्रीय क्रीडास्पर्धा गोव्यात आयोजित होणे ही अभिमानाची गोष्ट आहे व राज्याच्या सन्मानार्थ काही शेतकर्‍यांनी आपल्या जमिनीचा त्याग करण्याची तयारीही दर्शवली आहे परंतु ओलीत क्षेत्राची ही जमीन ‘पीपीपी’साठी देण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दर्शवत सरकारला चांगलेच सुनावले आहे. ‘सोने’ पिकवता येणे शक्य असलेली जमीन ‘पीपीपी’च्या नावानं कुणाचे चांगभलं करण्यासाठी लाटली जात आहे, असा सवालही या शेतकर्‍यांनी केला आहे.
धारगळ येथे होऊ घातलेल्या क्रीडानगरी प्रकल्पात ऍथलेटिक्स स्टेडियम, हॉकी स्टेडियम, एक्वेस्टीरीयन कोर्स, रायफल शूटिंग रेंज, खो-खो स्टेडियम, आर्चरी रेंज व बेसबॉल स्टेडियम आदींचा समावेश असेल. या सर्व सुविधांचा देखरेखीचा खर्चच वर्षाकाठी १० ते ११ कोटी रुपयांचा असेल, असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे. आता हा खर्च उचलण्यासाठी म्हणून सरकारने क्रीडानगरीच्याच जवळ ‘पीपीपी’ तत्त्वावर सुमारे ५०० कोटी रुपयांचे प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे. त्यात प्रशिक्षण अकादमी, बहुउद्देशीय स्टेडियम, अम्यूझमेंट पार्क, फूड कोर्ट, कन्व्हेन्शन सेंटर व प्रदर्शन केंद्र, बॉलिंग ऍली व गेम्स आर्केड व शॉपिंग मॉल आदींचा समावेश असेल. क्रीडानगरी एकवेळ समजून घेता येईल, पण या सुविधांसाठी उत्पादक जमीन संपादन करण्यामागचा सरकारचा हेतू मात्र स्पष्ट होत नाही, असेही या शेतकर्‍यांनी म्हटले आहे.
‘स्टूप कन्सल्टंट प्रा. लि.’ या दिल्लीस्थित कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या प्रकल्प अहवालातील अनेक गोष्टी अजूनही लपूनच राहिलेल्या आहेत. या कंपनीकडून धारगळ येथील या जमिनीचे मूल्य २ हजार रुपये प्रतिचौरस मीटर ठरवण्यात आले आहे. राज्य सरकारने ‘पीपीपी‘ तत्त्वावर पायाभूत सुविधांसाठी त्यांना एक हजार रुपये प्रतिचौरस मीटर दराने ही जमीन देण्याचे मान्य केले. जमीन दरात मिळालेली सूट भरून काढण्यासाठी या कंपनीकडून पायाभूत सुविधांसाठीचा प्राथमिक खर्च उचलावा जावा व तो खर्च कालांतराने व्यवसायातून मिळवावा, असे ठरले आहे. दोन हजार रुपये प्रती चौरस मीटर दराची ही जमीन शेतकर्‍यांकडून फक्त ५५ रुपये व कुळांना २५ रुपये प्रतिचौरस मीटर दराने घेतली जात आहे. हा प्रकार म्हणजे अक्षरशः शेतकर्‍यांची फसवणूक आहे व ती का म्हणून त्यांनी सहन करावी, असाही प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.
एका ठरावीक काळानंतर ‘पीपीपी’ च्या सर्व सुविधा सरकारच्या ताब्यात येणार असे सांगितले जाते. परंतु, ‘पीपीपी’चा अभ्यास केल्यास अद्याप अशा पद्धतीचा एकही प्रकल्प सरकारच्या ताब्यात आल्याचे ऐकिवात नाही, असेही शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. ‘पीपीपी’साठी जमीनच हवी असेल तर पर्यायी जमिनीची माहितीही शेतकर्‍यांनी उपजिल्हाधिकार्‍यांना सुनावणीवेळी दिली होती. पडीक व अनुत्पादक असलेली ही जमीन राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेस्थानकालाही जवळ होती. पण या गोष्टीकडे पूर्णपणे कानाडोळा करण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे व तिळारी प्रकल्पासाठी याच शेतकर्‍यांची जमीन गेली आहे. त्यामुळे सरकारने त्यागाचे बोल निदान आम्हांला तरी ऐकवू नयेत, असेही हे शेतकरी म्हणतात.
राष्ट्रीय क्रीडास्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सध्याच्या सुविधांत सुधारणा घडवून आणण्याचे ठरले होते. पण त्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. धारगळ येथे उभारण्यात येणार्‍या बहुतांश सुविधा म्हापसा पेडे येथे उभारणे सहज शक्य होते. पण तिथे जागा असूनही बॉक्सिंग, ज्युडो व कराटे आदी प्रकार ठेवले आहेत. सत्तरी तालुक्यात तर एकही प्रकल्प नाही. तर मग पेडण्यापासून कितीतरीच दूर अंतरावर असलेल्या शिरोडा गावात सुविधा कशा काय उभारल्या जातात, असा सवाल करून क्रीडानगरी किंवा राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या तयारीपेक्षा ‘पीपीपी’कडेच सरकारचे अधिक लक्ष लागून राहिल्याने संशयाला अधिकच बळकटी मिळाली आहे.

Thursday, 5 May, 2011

माध्यमप्रश्‍नी २० मेपर्यंत सर्वमान्य तोडगा काढू - ब्रार

दिल्लीतील बैठकीत निर्णय होणार


पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
प्राथमिक माध्यमाच्या विषयाचे गांभीर्य ओळखूनच कॉंग्रेस श्रेष्ठींनी आपल्याला गोव्यात पाठवले आहे. या विषयी कॉंग्रेसचे नेते, ‘फोर्स’ संघटनेचे पदाधिकारी तथा शिक्षणतज्ज्ञांची मते जाणून घेतली गेली आहेत. पुढील आठवड्यात दिल्लीत केंद्रीय मानव संसाधनमंत्री कपील सिब्बल व अल्पसंख्याक मंत्री सलमान खुर्शिद यांच्याशी बैठकीत चर्चा केल्यानंतर २० मेपर्यंत हा विषय निकालात काढू, असा विश्‍वास कॉंग्रेसचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी व्यक्त केला.
आज इथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. ब्रार बोलत होते. या प्रसंगी पक्षाचे केंद्रीय सचिव सुधाकर रेड्डी, मुख्यमंत्री दिगंबर कामत व प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर हजर होते. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाविषयी निर्माण झालेला पेचप्रसंग हा अत्यंत संवेदनशील आहे. विविध घटकांकडून या संबंधीची पत्रे कॉंग्रेस श्रेष्ठींकडे दाखल झाली आहेत. शिक्षणतज्ज्ञांची मतेही अजमावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी कोकणी व मराठी तसेच इंग्रजीची मागणी करणार्‍यांचे समाधान होईल, असाच सर्वमान्य निर्णय घेतला जाणार आहे. मातृभाषेबद्दल कॉंग्रेसला नेहमीच आदर आहे व त्यात गोव्यातील कोकणी व मराठीसंबंधीच्या इतिहासाचीही दखल कॉंग्रेसने घेतली आहे. या परिस्थितीचा राजकीय लाभ उठवण्यासाठी विरोधक सज्ज झाले असले तरी त्यांचा डाव अजिबात साध्य होऊ दिला जाणार नाही, असेही श्री. ब्रार म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री तथा अनिवासी भारतीय आयुक्त एदुआर्द फालेरो यांनी माधव कामत अहवाल आपल्याकडे सादर केला आहे. दिल्लीतील बैठकीत हा अहवाल प्रामुख्याने चर्चेसाठी ठेवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फेही आपल्याला निवेदन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण हक्क कायद्याच्या अनुषंगानेच हा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. या विषयावरून सरकारात किंवा कॉंग्रेस पक्षात फूट पडल्याचा इन्कार करीत यापुढे नेत्यांनी थेट प्रसारमाध्यमांकडे जाण्याला त्यांनी हरकत घेतली. प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांना प्रसारमाध्यमांकडे बोलण्याचा अधिकार असेल व पक्षाची अधिकृत भूमिका तेच स्पष्ट करतील, असेही स्पष्टीकरणही श्री. ब्रार यांनी केले.
गत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने प्राथमिक शिक्षण धोरणांत कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. याबाबत श्री. ब्रार यांना विचारले असता त्यांनी मात्र सरकारने सभागृहात या प्रकरणी आपली भूमिका ‘जैसे थे’ असल्याचे म्हटल्याचा दावा केला. विविध ठिकाणांहून पालकांनी केलेल्या आग्रहामुळेच आता या विषयावरून चर्चा केली जात असून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार श्रेष्ठींकडेच दिल्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले.
मगो अध्यक्षांची भेट घेतली
विद्यमान कॉंग्रेस आघाडीचा घटक असलेल्या मगो पक्षाची भूमिकाही आपण जाणून घेतली, असे सांगतानाच मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याकडे याबाबत चर्चा केल्याची माहिती श्री. ब्रार यांनी दिली.

दोरजी खांडू यांचा मृतदेह सापडला

कुटुंबीय सदस्यांनी ओळख पटविली


इटानगर/नवी दिल्ली, दि. ४
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू आणि अन्य चौघांसह उड्डाणघेणार्‍या हेलिकॉप्टरचे अवशेष आज सापडले असून, या अवशेषांच्या बाजूलाच मुख्यमंत्री खांडू यांच्यासह अन्य चौघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले आहेत. पर्वतीय भागात एका पहाडाला धडक बसल्यानंतर हेलिकॉप्टरला अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, कुटुंबीय सदस्यांनी खांडू यांच्या मृतदेहाची ओळख पटविली आहे.
पवन हंसच्या युरो बी-८ या हेलिकॉप्टरमधून दोरजी खांडू आणि इतर चार जणांनी गेल्या शनिवारी तवांगहून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क तुटला होता. खांडू यांच्यासोबतच अपघातात ठार झालेल्यांमध्ये वैमानिक कॅप्टन जे. एस. बब्बर, कॅप्टन टी. एस. मामिक, खांडू यांचे सुरक्षा अधिकारी व्ही. चोड्डाक आणि वाय. लामू तसेच तवांगच्या आमदाराची बहीण सेवांग धोंदूप यांचा समावेश आहे.
या घटनेची माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले की, अतिशय वाईट बातमी आज कानावर आली आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष केला आणि लोबोथांग या भागात आढळून आले आहेत. हेलिकॉप्टरच्या अवशेषांजवळ काही लोकांचे मृतदेह आढळून आले आहेत. हे मृतदेह खांडू आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य चार जणांचे असण्याचीच शक्यता जास्त आहे. खांडू यांच्या मृत्यूची शासकीय स्तरावरून अद्याप घोषणा करण्यात आली नाही. तथापि, ईशान्य भागाच्या विकासासाठी असलेले केंद्रीय मंत्री बी. के. हांडिक यांनी सांगितले की, खांडू यांच्या नातेवाइकांनी मृतदेहाची ओळख पटविलेली असून, तो मृतदेह खांडू यांचाच असल्याची पुष्टी केली आहे. आज सकाळी जवळच राहणारे काही नागरिक पर्वतीय भागात आले असता त्यांना हेलिकॉप्टरचे अवशेष दिसून आले. त्यांनी लगेच माहिती कक्षाला कळविले. त्यांनी दोन मृतदेहांची ओळख पटविली असून, अन्य तिघांचे मृतदेह ओळख पटण्याच्या पलीकडे जळाले आहेत, असे हांडिक म्हणाले.

बाबूश, नार्वेकरांना श्रेष्ठींकडून चंपी

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
विदेशी चलन तस्करी प्रकरणी कस्टम्सच्या कचाट्यात सापडलेले शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात व सत्ताधारी पक्षाचे घटक असूनही सरकारवर टीका करणारे हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर या दोघांनाही श्रेष्ठींनी चांगलीच चंपी दिली आहे. आज इथे पत्रकार परिषदेत बोलताना जगमितसिंग ब्रार यांनी केलेल्या खुलाशाअंती ही माहिती उघड झाली.
विदेशी चलन तस्करी प्रकरणात अडकलेल्या शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपली सारी कागदपत्रे कॉंग्रेस श्रेष्ठींसमोर सादर केली. विदेशात जाताना किती प्रमाणात चलन न्यावे याबाबत अनभिज्ञ असल्यानेच आपल्याकडून ही चूक घडली, अशी कबुली त्यांनी श्रेष्ठींसमोर दिल्याचे श्री. ब्रार म्हणाले. एका जबाबदार मंत्र्यांकडून अशा पद्धतीच्या चुका घडल्यास पक्षाची प्रतिमा मलीन होते व यापुढे असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ताकीद त्यांना श्रेष्ठींनी दिल्याचेही ते म्हणाले. बाबूश यांनी प्रांजळपणे आपली चूक मान्य केल्याने, यापुढे अशी चूक होणार नसल्याची हमी दिल्याने व ही त्यांची पहिलीच चूक असल्याने त्यांना माफ केले, असेही ते म्हणाले.
नार्वेकरांचेही कान उपटले
हळदोण्याचे आमदार तथा माजी वित्तमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर हे विधानसभेत व जाहीर कार्यक्रमांत आपल्याच सरकारवर टीका करीत असल्याच्या तक्रारी श्रेष्ठींकडे पोचल्याने त्याचीही गंभीर दखल श्रेष्ठींनी घेतली आहे. विधानसभेत ऍड. नार्वेकर यांच्याकडून प्रामुख्याने मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना लक्ष्य बनवण्याचा प्रकार घडला आहे. सरकारच्या इतर मंत्र्यांवरही त्यांनी आरोप केले आहेत. सरकारातील एक ज्येष्ठ नेताच जर अशी टीका करायला लागला तर जनतेत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. ऍड. नार्वेकर यांना आपल्या वागण्यात बदल करण्याची ताकीद देण्यात आली आहे. आपल्याच सरकारला बदनाम करण्याचा हा प्रकार यापुढे अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असेही नार्वेकरांना बजावण्यात आले असून झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी खंत व्यक्त केल्याचा गौप्यस्फोटही श्री. ब्रार यांनी केला.

कुटुंबातील दोघांना तिकीट नाही, पण...

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी न देण्याचे धोरण कॉंग्रेसने सर्वत्र राबवले आहे व गोव्यातही त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असे स्पष्ट संकेत जगमितसिंग ब्रार यांनी आज दिले. मात्र, काही ठिकाणी प्रबळ उमेदवार मिळणे अशक्य होते व अशा वेळी एखादप्रसंगी एकाच कुटुंबातील अन्य सदस्याला तिकीट देण्याचा पर्याय राहतो; पण त्याबाबतचा अंतिम निर्णय हा श्रेष्ठींकडूनच घेतला जातो, असे म्हणून त्यांनी या बाबतच्या पळवाटेचीही तजवीज करून ठेवली.
कॉंग्रेस पक्षातील अनेक नेत्यांकडून सध्या आपल्या कुटुंबातील सदस्यांना विविध मतदारसंघांत ‘प्रोजेक्ट’ करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. या प्रकाराबाबत आज पत्रकारांनी श्री. ब्रार यांना छेडले असता तेही काही प्रमाणात गडबडले. एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवारी देण्यास कॉंग्रेसची हरकत आहे व हे धोरण सर्वत्र राबवले जाते, असे ते म्हणाले. काही ठिकाणी पक्षाला एकही प्रबळ उमेदवार सापडत नाही व अशा वेळी एखाद्या नेत्याच्या कुटुंबातील अन्य सदस्याला उमेदवारी देणे भाग पडते. पण याबाबतचा अंतिम निर्णय श्रेष्ठींकडूनच घेतला जातो व तो केवळ अपवादात्मक असतो, असे म्हणून त्यांनी आपली सुटका करून घेतली.

शिक्षण धोरणात बदल नको!

इंग्रजी शाळांना अनुदानही नको - कोकणी भाषा मंडळाचे निवेदन

मडगाव, दि. (प्रतिनिधी)
कोकणी भाषा मंडळाच्या एका शिष्टमंडळाने शैक्षणिक माध्यमाच्या वादप्रकरणी आज जगमितसिंग ब्रार यांची भेट घेऊन गोव्याने १९८९-९० मध्ये स्वीकारलेले शैक्षणिक धोरणच यापुढेही चालू ठेवावे, त्यात कोणताच बदल करू नये तसेच कोणाच्याही दडपणाला बळी पडून इंग्रजी शाळांना अनुदान देण्याच्या फंदात पडू नये, अशी विनंती करणारे एक निवेदन त्यांना सादर केले.
सदर शिष्टमंडळात प्रशांत नाईक यांच्यासोबत कोकणी अकादमीचे अध्यक्ष एन. शिवदास, माजी आमदार उदय भेंब्रे, फादर माऊझियो आताईद, फादर जैमी कुतिन्हो, नागेश करमली यांचा समावेश होता. आज येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत श्री. नाईक यांनी ही माहिती दिली. गोव्यात पूर्वीपासून हेच धोरण पाळले जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच असावे अशी तरतूद आहे व नागालँड वगळता संपूर्ण देशभर त्याची अंमलबजावणी चालू आहे. त्यामुळे गोव्यात जी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी मागणी केली जात आहे ती अयोग्य आहे व म्हणून ती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाऊ नये, तसेच इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान दिले जाऊ नये. ज्या कोणाला तरीही आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवावे असे वाटत असेल त्यांनी त्यांना स्वखर्चाने पाठवावे असेही श्री. ब्रार यांना सांगण्यात आले.
गोव्यात इंग्रजी माध्यमाला परवानगी दिली तर ज्या राज्यांत कॉंग्रेस सरकार आहे तेथे चुकीचा संदेश जाईल व तेथेही ही मागणी जोर धरेल व त्याचा परिणाम पक्षाच्या भवितव्यावर होईल हेही त्यांच्या लक्षात आणून देण्यात आले. उदय भेंब्रे यांनी प्रश्‍नावर सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल अभ्यासून त्यात राजकारण न आणता निर्णय घ्यावा असा सल्ला दिला.

‘क्लब पॅराडिसो’ जमीनदोस्त!

पणजी व म्हापसा, दि. ४ (प्रतिनिधी)
हणजूण समुद्रकिनार्‍यावरील प्रसिद्ध ‘पॅराडिसो’ नाइट क्लबचे बांधकाम न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबी मशीनच्या साह्याने आज सकाळी पाडले.
‘सीआरझेड’चे उल्लंघन करून नंदन कुडचडकर यांनी हणजूण समुद्रालगत असलेल्या टोकाला पॅराडिसो नाइट क्लबचे बांधकाम केले होते. सदर बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून झाल्याचे उघडकीस आल्याने त्यांना या संदर्भात नोटीस पाठवून सदर बांधकाम पाडण्याची सूचनाही करण्यात आली होती. परंतु, त्या नोटिशीला श्री. कुडचडकर यांनी कोणताही दाद दिली नसल्याने त्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पर्यटन खात्याने याचिका सादर केली होती.
या याचिकेच्या सुनावणीनंतर न्यायालयाने दि. १४ डिसेंबर २०१०मध्ये बेकायदेशीररीत्या उभारलेले सदर बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता तब्बल चार महिन्यानंतर आज किनारपट्टी नियमन प्राधिकरणाने कारवाई करून हे बांधकाम पाडले. हणजूण येथे सर्वे क्रमांक २१२/६ व २१२/७मध्ये या क्लबचे बांधकाम केले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मामलेदार गौरीश शंखवाळकर, सह मामलेदार अंजू केरकर, तलाठी गुरुदास मांद्रेकर व सचिव यावेळी उपस्थित होते.

‘ऑपरेशन सागर कवच’ सुरू

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
महाराष्ट्राला जोडून असलेली गोव्याची किनारपट्टी किती सुरक्षित आहे हे पाहण्यासाठी आज सकाळपासून ‘ऑपरेशन सागर कवच’ या ‘मॉकड्रिल’ला सुरुवात झाली आहे. यावेळी जुने गोवे येथील बॅसेलिका बॉर्न जीझस चर्चमध्ये बनावट दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले. चर्चच्या पहिल्या गेटमधून सदर व्यक्ती आतमध्ये जाण्यास यशस्वी ठरली. मात्र, प्रत्यक्ष झडती असलेल्या ठिकाणी त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. मडगाव येथेही अशाच प्रकारच्या एका बनावट दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
आज सकाळपासूनच संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी संशयास्पद वाटणार्‍या वाहनांना अडवून त्यांचीही चौकशी केली जात होती. या ‘मॉकड्रिल’मध्ये भारतीय नौदल, तटरक्षक दल, गोवा पोलिस, किनारपट्टी पोलिस, अग्निशमन दल, जकात खाते, एमपीटी, मच्छीमार खाते व ‘सीएसएफआय’ तुकडी आदी सहभागी झाले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत या सर्व यंत्रणांमध्ये कशा प्रकारे समन्वय साधला जातो, हे पाहण्यासाठी अशा प्रकारची कसोटी घेतली जाते, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. या मॉकड्रिलमध्ये कोणत्या यंत्रणेने कशा प्रकारे कामगिरी बजावली किंवा कोणत्या त्रुटी राहिल्या याचा संपूर्ण अहवाल केंद्रीय गृहखात्याला पाठवून दिला जाणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
आज सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेले हे मॉकड्रिल उद्या सायंकाळपर्यंत सुरू राहणार आहे. यात संपूर्ण पोलिस खाते सहभागी झाले आहे. यावेळी राज्यातील पोलिस स्थानके, पोलिस नियंत्रण कक्ष आणि गस्तीवर असलेले पोलिस यांच्यात कशा पद्धतीने समन्वय साधला जातो, हेही पाहिले जाणार असल्याचे श्री. गावस यांनी सांगितले.
दरम्यान, नाकाबंदीमुळे अनेक ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. काय चालले आहे, याची माहिती मिळाली नसल्याने काही ठिकाणी लोकांनी पोलिसांशी वादही घातला. तर, अनेकांनी अल कायदा या दहशतवादी संघटनेचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन याला मारल्याने सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असा कयास लावला.

बेकायदा खाणींविरोधात पीएसीपाठोपाठ प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आता बाह्या सरसावल्या..

३४ खाणींना नोटिसा

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी)
लोक लेखा समितीने बेकायदा खाणींची गंभीर दखल घेतली असतानाच आता गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळानेही आपल्या अखत्यारीत येणार्‍या अधिकाराचा वापर करून बेकायदा खाणींवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मंडळाने राज्यभरातील ३४ खाणींना जल व वायू कायद्याअंतर्गत मुख्य वन्यजीव वॉर्डनचा परवाना सादर करण्याच्या नोटिसा जारी केल्या आहेत.
राज्यात बेकायदा खाणींचा उच्छाद सुरू असून या त्याने निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीमुळे स्थानिक लोकांचा उठाव सुरू झाला आहे. बेकायदा खाणींमुळेच खनिज वाहतुकीची समस्या बिकट बनली असून या खाणींवर निर्बंध लादले तरच ही परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य आहे, याची जाणीव आता राज्य सरकारला झाली आहे. खाणी सुरू करण्यास केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयातर्फे पर्यावरणीय परवाना दिला जात असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जल व वायू परवाना मिळवणे खाणींसाठी सक्तीचे आहे. पर्यावरणीय परवान्यात अनेक अटी घालून दिलेल्या असतात व त्यात वन संरक्षण कायदा तथा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत विविध परवाने मिळवणे खाणींसाठी बंधनकारक असते. पण, राज्यातील बहुतांश खाण कंपन्यांकडून त्याची पूर्तता झाली नसल्याचे आता समोर आले आहे. काही खाण कंपन्यांनी हा परवानाच मिळवलेला नाही तर काही खाणींचे परवाने कालबाह्य झाल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नजरेस आले आहे. गेल्या एका महिन्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशा ३४ खाणींना नोटिसा पाठवून त्यांना ६० दिवसांत हे परवाने सादर करण्यास सांगितले आहे. हे परवाने सादर न केल्यास संबंधित खाणींचे काम बंद करण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळाला आहे, हे विशेष!
लोक लेखा समितीकडून या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोक लेखा समितीच्या तावडीत सापडू नये यासाठी आपल्या अधिकारात येणार्‍या शस्त्राचा वापर करून बेकायदा खाणींवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यांपैकी सांगे-२२, सत्तरी-५, डिचोली-३, फोंडा-१, केपे-३ आदी खाणींचा समावेश आहे.

क्रीडानगरीचे भूसंपादन अन्यायकारक

तिढा क्रीडानगरीचा,
लढा तिखट स्वाभिमानाचा


किशोर नाईक गांवकर

पणजी, दि. ४
पेडण्याचे भूमिपुत्र हे तिखट स्वाभिमानी आहेत व त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानाला कुणीही आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये, असे विधान काही काळापूर्वी विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केले होते. धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीसाठी येथील शेतकर्‍यांचा विरोध डावलून सरकारने ज्या पद्धतीने भूसंपादनाची प्रक्रिया पार पाडली तो प्रकार म्हणजे येथील शेतकर्‍यांच्या स्वाभिमानावरचाच घाला ठरल्याने या भूसंपादनाला उच्च न्यायालयात आव्हान देऊन या लोकांनी आपल्या तिखट स्वाभिमानाची पहिली झलक आता सरकारला दाखवली आहे.
पेडणे तालुक्यात धारगळ येथे होऊ घातलेल्या क्रीडानगरीसाठीच्या ९,३७,४६६ चौरस मीटर जमिनीचे संपादन अत्यंत घिसाडघाईने केले गेले आहे. या भूसंपादन प्रक्रियेत शेतकर्‍यांना नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवण्यात आल्याने ते ताबडतोब रद्द करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेत केली आहे. या याचिकेवरील तातडीच्या कलमाखाली घेतलेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याने सरकारला पहिला दणका मिळाला आहे. या प्रकरणी पुढील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी घेतली जाणार असून तोपर्यंत या जमिनीचा ताबा घेण्यास न्यायालयाने सरकारला मज्जाव केला आहे. दरम्यान, येथील भूमिपुत्रांच्या या पवित्र्यामुळे क्रीडानगरीच्या भूसंपादनाबाबत शेतकर्‍यांचा विरोध निवळल्याचा सरकारचा भ्रम अखेर सपशेल खोटा ठरला आहे. येथील उच्चशिक्षित तथा प्रगत शेतकर्‍यांनी विविध तज्ज्ञांच्या मदतीने ही याचिका तयार केली असून या याचिकेमुळे सरकार उघडे पडण्याचीच जास्त शक्यता आहे. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने भूसंपादनाबाबत दिलेले विविध निवाडे तसेच केंद्रीय कृषी तथा नागरी व्यवहार मंत्रालयाने राज्य सरकारांना वेळोवेळी केलेल्या निर्देशांचे पुरावेच जोडण्यात आले असून लोकांचा विरोध डावलून व कायद्यांना फाटा देऊन सरकारकडून करण्यात येणार्‍या भूसंपादन प्रक्रियेचा भांडाफोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
क्रीडानगरीसाठी नेमण्यात आलेले भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांनी भूसंपादन कायद्याच्या कलम ५ (अ) अंतर्गत शेतकर्‍यांनी सादर केलेल्या हरकतीच्या अर्जांवर सुनावणी घेतली नसल्याचा ठपकाही या याचिकेत ठेवला आहे. या अर्जांव्दारे शेतकर्‍यांनी या भूसंपादनाबाबत कृषितज्ज्ञ तथा पर्यावरणवाद्यांची मते जाणून घेण्याची विनंती सरकारला केली होती. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ प्रा. राजेंद्र केरकर, कृषितज्ज्ञ तथा कृषी खात्याचे माजी संचालक पी. के. देसाई व प्रगत शेतकरी तथा भूगर्भतज्ज्ञ मिंगेल ब्रागांझा यांची मते नोंद करण्याची विनंती त्यांनी केली होती. ही विनंती उपजिल्हाधिकार्‍यांनी धुडकावून लावून या शेतकर्‍यांना नैसर्गिक न्यायापासून वंचित ठेवले, असे या याचिकेत म्हटले आहे.
‘गोंयच्या शेतकर्‍यांचो एकवट’ यांनी गोव्यातील शेतजमिनींचे संरक्षण करून गोवा वाचवण्याचे एक निवेदन पंतप्रधान कार्यालयाला काही काळापूर्वी पाठवले होते. या निवेदनाची गंभीर दखल पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी तथा सहकार मंत्रालयाला केले होते. या निवेदनावरून मंत्रालयाच्या ‘नॅचरल रिसोर्सिस मॅनेजमेंट डिव्हिजन’ कडून १० सप्टेंबर २००९ रोजी गोव्याच्या मुख्य सचिवांना एक आदेश जारी करण्यात आला होता. या आदेशात उत्पादक शेतजमीन औद्योगिकीकरण किंवा नागरीकरणासाठी वापरण्यास मज्जाव करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. एखाद्या प्रकल्पासाठी उत्पादक शेतजमीन वापरण्यास दिली असेल तर या जमिनीजवळील नापीक जमिनीला उत्पादक दर्जा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना आखण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही प्रक्रिया नियोजनबद्ध व ठरावीक काळात पूर्ण व्हायलाच हवी, असेही बजावण्यात आले होते. केंद्र सरकारने घोषित केलेल्या राष्ट्रीय कृषी धोरण-२००७ मध्येही नापीक जमीन सुपीक करण्याबरोबर उत्पादक जमिनीचा वापर बिगरशेती प्रकल्पांसाठी करण्यात येऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्य सचिवांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा आदेश ५ नोव्हेंबर २००९ रोजी महसूल खाते व दोन्ही जिल्हाधिकार्‍यांना जारी केल्याचेही या याचिकेत म्हटले आहे. या सर्व गोष्टींचे उल्लंघन करून उपजिल्हाधिकार्‍यांनी भूसंपादन कायद्याच्या कलम ५ (अ) चा अहवाल तयार केला, असाही ठपका या याचिकेत ठेवला आहे.

Wednesday, 4 May, 2011

क्रीडानगरी भूसंपादनाला न्यायालयाकडून मज्जाव!


‘‘जूनपर्यंत हस्तक्षेप नको’’


पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
धारगळ येथील नियोजित क्रीडानगरीसाठीची जमीन ताब्यात घेण्यास उच्च न्यायालयाने आज मज्जाव करून सरकारला जबर धक्का दिला आहे. शेतकर्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील तातडीच्या कलमाखाली घेतलेल्या सुनावणीत यासंबंधीची पुढील सुनावणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे मान्य करून तोपर्यंत या जमिनीचा ताबा शेतकर्‍यांकडेच राहील, असेही न्यायालयाने बजावले आहे.
धारगळ येथे होऊ घातलेल्या क्रीडानगरी प्रकल्पाच्या भूसंपादनाला आव्हान देणारी याचिका काल २ रोजी वीस शेतकर्‍यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. उच्च न्यायालयाने हा अर्ज दाखल करून घेत आज तातडीच्या कलमाखाली सुनावणी घेतली. सरकारने या जमिनीचा ताबा घेतल्याचा दावा न्यायालयात केला. मात्र, त्याला हरकत घेत न्यायालयाने यासंबंधीची सुनावणी पुढील जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे निश्‍चित केले. तोपर्यंत या जमिनीत हस्तक्षेप करू नये, असेही सरकारला बजावण्यात आले आहे. न्यायालयात या भूसंपादनाला आव्हान देणार्‍या शेतकर्‍यांत १४ शेतकरी विर्नोडा येथील आहेत तर उर्वरित शेतकरी दाडाचीवाडी - धारगळ येथील आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे ९ लाख ४० हजार चौरसमीटर जागा संपादन केली जात आहे. या भागांतील शेतकर्‍यांनी पूर्वीपासूनच या भूसंपादनाला विरोध केला होता. सुरुवातीला या शेतकर्‍यांनी या भूसंपादनाला आव्हान करणारे अर्ज पेडणे उपजिल्हाधिकार्‍यांकडे दाखल केले होते. पेडण्याचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मिरजकर यांनी मात्र भूसंपादनाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन सरकारने ताब्यात घेतल्याचे या शेतकर्‍यांना काल कळवले होते. संबंधित शेतकर्‍यांनी आपले धनादेश उपजिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त करावे, असा संदेशही त्यांना देण्यात आला होता.
दरम्यान, या भूसंपादनाला आव्हान देण्याची पूर्वतयारी शेतकर्‍यांनी केली होती व त्यानुसारच काल २ रोजी त्यासंबंधीची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. गोव्यात २०१४ साली होणार्‍या नियोजित राष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी धारगळ येथे अद्ययावत पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहेत. या क्रीडास्पर्धांच्या नियोजनाच्या तयारीत सरकार यापूर्वीच मागे पडले असताना आता मुख्य क्रीडानगरीचे भूसंपादनच कायद्याच्या कचाट्यात सापडल्याने सरकारची डोकेदुखी आणखीनच वाढणार आहे.

पीएसीच्या आदेशांमुळे खाण खात्याची भंबेरी

आठवड्यात पंधरा हजार ट्रकांच्या नोंदणीचे आव्हान

सहा खाण कंपन्यांना नोटिसा


पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
लोक लेखा समिती (पीएसी)कडून बेकायदा खाणी व बेदरकार खनिज वाहतुकीसंबंधी सरकारला जारी करण्यात आलेल्या आदेशांच्या पूर्ततेवरून खाण खात्याची अक्षरशः भंबेरी उडाली आहे. ‘पीएसी’चे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्यासमोर या आदेशांची तात्काळ कार्यवाही करू, अशी हमी खाण खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली खरी; परंतु, हा आदेश अमलात आणण्यासाठी खात्याकडे आवश्यक मनुष्यबळ व निश्‍चित अशी योजनाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘पीएसी’च्या २ रोजी झालेल्या बैठकीत खाण खात्याला बेकायदा खाणींवर कडक कारवाई करण्याबरोबरच बेदरकार व बेशिस्त खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे स्पष्ट निर्देश जारी करण्यात आले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी १० मे पासून सुरू करण्याचेही ठरले आहे. या निर्देशानुसार खनिज ट्रकांची नोंदणी खाण खात्याकडे करणे बंधनकारक आहे. पण अद्याप कुणीही खनिज वाहतूकदार पुढे आले नसल्याने खात्याची झोपच उडाली आहे. त्यामुळे खनिज ट्रकांच्या नोंदणीसाठी कोणती प्रक्रिया अवलंबावी यावरून खाण खाते संभ्रमात सापडले आहे. एका आठवड्यात सुमारे १५ हजार खनिज ट्रकांची नोंदणी कशी करणार, हा कूट प्रश्‍न खात्यासमोर उभा ठाकला आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ खात्याकडे उपलब्ध नसल्याने नेमके काय करावे, या चिंतेत अधिकारी सापडले आहेत. वाहतूक खात्याने मात्र खनिज वाहतूकदारांसाठी तयार करण्यात आलेल्या अटींबाबत जाहिरात प्रसिद्ध करून आपली जबाबदारी झटकली आहे. मुळातच खनिज वाहतुकीसंबंधीचा हा आदेश खाण खात्यानेच जारी केल्याने त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी या खात्याची राहणार आहे. या निर्देशांच्या अंमलबजावणीत अपयशी ठरल्यास तो ‘पीएसी’चा अवमान ठरेल या भीतीने खाण अधिकार्‍यांची पाचावर धारण बसली आहे.
सहा खाण कंपन्यांना नोटिसा
विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या सहा खाण कंपन्यांकडून केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाने पर्यावरण परवान्यात घालून दिलेल्या खनिज उत्खनन निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे उघड झाल्याने त्याबाबत या खाण कंपन्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. खनिज उत्खननाच्या प्रमाणापेक्षा जास्त खनिजाची निर्यात या कंपन्यांकडून झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून या मालाचा हिशेब सादर करा, असेही या कंपन्यांना बजावण्यात आले आहे. दरम्यान, या नोटिशीचा खुलासा १० मेपर्यंत खाण खात्याकडे पोहोचणे गरजेचे आहे; अन्यथा या सर्व खाण कंपन्यांचे पर्यावरणीय परवाने रद्द करण्याची शिफारस केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडे केली जाईल, अशी माहिती खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर यांनी दिली. या सहा खाण कंपन्यांत स्व. जयराम नेवगी (टीसी-५९/५१), मेसर्स व्ही. एस. धेंपो ऍण्ड कंपनी प्रा. ली. (टीसी-३५/५२), मेसर्स सोसायदाद तिंबलो इरमांव लि. एसएफआय (टीसी-८८/५२), मेसर्स व्ही. एम. साळगावकर ऍण्ड ब्रदर्स (टीसी-८६/५३), मेसर्स व्ही. एस. धेंपो ऍण्ड कंपनी प्रा. लि. (टीसी-२१/५४ व ०५/५४) व मेसर्स सेझा गोवा लि. (टीसी-०६/५५) यांचा समावेश आहे.
तीन तालुक्यांत ७४ खाणी
वन खात्याकडून ‘पीएसी’ला दिलेल्या माहितीत सत्तरी, केपे व सांगे तालुक्यात मिळून एकूण ७४ खाणी सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, सत्तरीत १५, केपेत ८ व सांगे तालुक्यात तब्बल ५१ खाणी सुरू आहेत. या सर्व खाणींना केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडून पर्यावरणीय परवाना देण्यात आला असला तरी यांपैकी ४८ खाणींनी परवान्यातील वन्यजीव व वन संरक्षण कायद्यांच्या घालून दिलेल्या अटींची पूर्तता केली नसल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. वन्यजीव कायद्यांतील तरतुदीनुसार काही खाणींना राष्ट्रीय वन्यजीव मंडळ (एनबीडब्ल्यूएल), मुख्य वन्यजीव वॉर्डन (सीडब्ल्यूएलडब्ल्यू) व वन्यजीव संरक्षण कायदा (डब्ल्यूपीए) या अंतर्गत काही अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. मात्र, त्यांची पूर्तता न करताच अनेक खाणींकडून बेकायदा खनिज उत्खनन सुरू आहे. या खाण कंपन्यांकडून सरकारला ‘रॉयल्टी’ अदा केली जात असली तरी हा व्यवहार कायदेशीर ठरत नाही, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल ‘पीएसी’कडून घेण्यात आली आहे.

बोगदा येथील १३ बांधकामे जमीनदोस्त

वास्को, दि. ३ (प्रतिनिधी)
दीड वर्षापूर्वी बोगदा येथील सरकारी जागेत बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या १३ पत्र्यांच्या बांधकामांवर मुरगाव नगरपालिकेने कारवाई करून त्यांना जमीनदोस्त केले. ‘कारगवाल ऍण्ड कंपनी’ ह्या कंत्राटदार आस्थापनाने सदर बेकायदा बांधकामे उभारली होती व येथे ४०० कामगारांना ठेवले होते. २४ तासांत सदर बांधकामे हटवण्याचे आदेश पालिकेने जारी केले होते.
सदर ठिकाणी शौचालयाची तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने या भागातील रहिवाशांना असह्य दुर्गंधी सहन करावी लागत होती. याप्रकरणी मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी नगरपालिकेला अवगत करून सर्वेक्षण करण्यास भाग पाडल्यानंतर पालिकेने आज ही बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. बोगदा येथील मुरगाव पोलिस स्थानकाच्या मागे असलेल्या सुमारे चार हजार चौरस मीटर सरकारी जागेत ही बांधकामे उभारण्यात आली होती. कारवाईदरम्यान कडक पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता व पालिकेचे अधिकारीही जातीने उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, दीड वर्षापूर्वी सरकारी जागेत उभारलेल्या या बांधकामांना पालिकेची तसेच इतर कुठल्याच प्रकारची कायदेशीर परवानगी नव्हती. अंदाजे ४०० बिगर गोमंतकीय कामगार येथे वास्तव्य करून होते. मात्र अन्य सुविधांच्या अभावामुळे येथे गलिच्छ वातावरण निर्माण झाले होते. मुरगाव बंदराच्या एका धक्क्याचे काम करण्यासाठी कंत्राटदाराने या कामगारांना आणल्याचे समजते. या प्रकाराबाबत पालिकेला अनेकदा कळवण्यात आले होते. दरम्यान, तरीही कारवाई होत नसल्याने आमदार मिलिंद नाईक यांनी पुढाकार घेऊन शेवटी हा प्रश्‍न धसास लावला.
आजच्या कारवाईत नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता विशांत नाईक, जे. मिस्किता व रामचंद्र हरजी उपस्थित होते. तसेच पालिकेचे दोन निरीक्षक व मुरगावच्या पोलिस पथकांनी बंदोबस्त ठेवला होता.

वेर्ला -काणकाचे पंचसदस्य अपात्र

पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
वेर्ला - काणकाचे पंचसदस्य संतोष मोरजकर यांना आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अपात्र घोषित केले. पत्नीने बांधकामासाठी मागितलेल्या ना हरकत दाखल्याला मंजुरी देण्याच्या बैठकीत स्वतः मोरजकर हेच उपस्थित असल्याचे न्यायालयाने नेमलेल्या आयुक्तांच्या अहवालात सिद्ध झाल्यानंतर आज त्यांना अपात्र ठरवल्याचा निवाडा खंडपीठाने दिला. या विषयीची याचिका मोहन दाबाळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली होती.
संतोष मोरजकर यांची पत्नी श्‍वेता मोरजकर यांनी बांधकामासाठी ना हरकत दाखला मिळवण्यासाठी पंचायतीत अर्ज केला होता. या अर्जाला मंजुरी देण्यासाठी पंचायतीत घेण्यात आलेल्या बैठकीला संतोष मोरजकर उपस्थित होते, असा दावा करून मोहन दाबाळे यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिका सुनावणीस आली असता खंडपीठाने याची चौकशी करण्यासाठी आयुक्तांची नेमणूक केली होती. तर, आयुक्तांना येणारा खर्चही अर्धा याचिकादार तसेच, अर्धा खर्च प्रतिवादीकडून घेण्यात आला होता. ही चौकशी सुरू असताना प्रतिवादी संतोष मोरजकर यांनी आपल्या वकिलाला कोणतीही कल्पना न देता वेर्ला काणका पंचायतीचे अन्य पंचसदस्य तसेच सरपंच कशी गैरकृत्ये करतात यासंबंधीचे एक पत्र न्यायाधीशांना पाठवले होते. सदर प्रकरणावर सुनावणी सुरू असताना आणि आपल्या वकिलाला विश्‍वासात न घेता थेट न्यायाधीशांना पत्र लिहिल्याची दखल घेत न्यायालयाने श्री. मोरजकर यांच्याविरुद्ध अवमान याचिका सादर केली होती. परंतु, यावेळी त्यांनी न्यायालयाची माफी मागितल्यानंतर सदर याचिका मागे घेण्यात आली होती. परंतु, आयुक्तांच्या चौकशीत ना हरकत दाखल्याला मंजुरी देणार्‍या बैठकीत ते स्वतः उपस्थित असल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्याचे आदेश खंडपीठाने दिले.

माध्यमप्रश्‍नी आज ब्रार यांचे भाष्य

कॉंग्रेसमधील दबावगट आक्रमक
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
राज्यात प्राथमिक माध्यमावरून निर्माण झालेल्या स्फोटक परिस्थितीवर तात्काळ तोडगा निघावा, अशी कॉंग्रेस श्रेष्ठींची इच्छा आहे. याबाबत सर्वांना विश्‍वासात घेऊन व भारतीय घटना तसेच निधर्मीवादाला कुठेच बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेऊनच अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी दिली.उद्या ४ रोजी श्री. ब्रार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यावेळी ते याबाबत भाष्य करणार असल्याचे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले.
मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण देणार्‍या संस्थांनाच सरकारी अनुदान देण्याचे सरकारी धोरण असताना त्यात बदल करून इंग्रजी माध्यमाच्या संस्थांनाही हे अनुदान लागू करावे या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी आपला दबावगट तयार केला आहे. गेल्या विधानसभेत सरकारने ही मागणी फेटाळून लावली होती. आता सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजीप्रेमी मंत्री व आमदारांनी स्वतंत्र गट तयार करून श्रेष्ठींवर दबाव घालण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री. ब्रार गोव्यात दाखल झाले आहेत. यासंबंधी चर्चा करण्यासाठी कॉंग्रेसचे निरीक्षक सुधाकर रेड्डी यांचेही आगमन होणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली. आज दोनापावला येथील एका पंचतारांकित हॉटेलात श्री. ब्रार यांनी यासंबंधी विविध नेत्यांची भेट घेऊन त्यांची मते अजमावून घेतली. चर्चिल यांनी काल २ रोजी आपल्या सरकारी बंगल्यावर बैठक बोलावली होती व या बैठकीला उपस्थित १२ नेत्यांपैकी ८ नेत्यांनी सही केलेले निवेदन आज श्री. ब्रार यांना सादर करण्यात आले. सध्याच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान अपरिहार्य आहे व त्यामुळे बहुतांश पालकांना इंग्रजी भाषेतून आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण देण्याची इच्छा आहे. अशावेळी इंग्रजी माध्यमाच्या संस्थांना अनुदानापासून परावृत्त करणे योग्य नाही, अशी भूमिका या नेत्यांनी श्री. ब्रार यांच्यासमोर सादर केली आहे. दरम्यान, या विषयावरून काही नेत्यांनी बंड करण्याचीही अप्रत्यक्ष धमकी श्रेष्ठींना दिल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. इंग्रजीसाठी या नेत्यांकडून सरकारवर दबाव टाकला जात असतानाच भारतीय भाषा सुरक्षा मंचतर्फे या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला आहे.
आज सकाळी सर्वांत प्रथम मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी श्री. ब्रार यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. या चर्चेत त्यांनी या प्रश्‍नाबाबत श्री. ब्रार यांना अवगत केल्याचे कळते. मुख्यमंत्र्यांनंतर कॉंग्रेसच्या विविध आमदार तथा पदाधिकार्‍यांनीही श्री. ब्रार यांची भेट घेऊन आपले मत त्यांच्यासमोर प्रकट केले. श्री. ब्रार यांची भेट घेतलेल्यांत चर्चिल आलेमाव, ज्योकीम आलेमाव, माविन गुदिन्हो, व्हिक्टोरिया फर्नांडिस, आग्नेल फर्नांडिस, पांडुरंग मडकईकर आदींचा समावेश आहे. राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड डिसोझा व राज्य कायदा आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनीही श्री. ब्रार यांची भेट घेतली. दरम्यान, इंग्रजीच्या मागणीसाठी सक्रिय बनलेल्या ‘फोर्स’ संघटनेचे सचिव सावियो लोपीस यांनीही श्री. ब्रार यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले.
चर्चिलवर आयकर छाप्याची चर्चा
दरम्यान, आज संध्याकाळी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांच्या निवासस्थानावर आयकर खात्याचा छापा पडल्याची वार्ता सर्वत्र पसरल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. या चर्चेबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता ही केवळ अफवा असल्याचे कळले. चर्चिल यांच्या विरोधकांनी जाणीवपूर्वक ही अफवा पसरवल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नदीत बुडून मुलाचा मृत्यू

वाळपई, दि. ३ (प्रतिनिधी)
देऊळवाडा - मोर्ले येथील तुषार तुळशीदास गावकर या नऊ वर्षीय मुलाचा ठाणे - सत्तरी येथे नदीत बुडाल्याने दुर्दैवी अंत झाला.
तिसरीत शिकणारा तुषार सुट्टीत आठ दिवसांपूर्वी ठाणे येथे आपल्या मावशीकडे आला होता. त्याचे आजोळही तिथेच आहे. तो आपल्या मावसभावांसोबत देसाईवाडा ठाणे येथे नदीवर आंघोळीसाठी गेला असता तिथे बुडाला. त्या दोघांनी प्रथम त्याची शोधाशोध केली व नंतर आरडाओरड करून घर गाठले. आसपासच्या मजुरांनी तुषारला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक चंद्रकांत नाईक यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिला.
तुषारचे आईवडील डोंगर भागात काजू गोळा करायला गेले असल्याने त्यांच्याशी त्वरित संपर्क होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तुळशीदास यांना दोन मुली व तुषार हा एकुलता एक मुलगा होता. काळाने त्याच्यावरच घाला घातल्याने या कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.

विचित्र अपघातात
वेळगेत महिला ठार

डिचोली, दि. ३ (प्रतिनिधी)
वेळगे येथे काल २ रोजी तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात दिपाली बंड्या नाईक (२२) ही मूळ बैलूर व सध्या वेळगे येथे राहत असलेली विवाहित महिला जागीच ठार झाली तर तिचा एका वर्षाचा अर्जुन हा मुलगा जखमी झाला.
सविस्तर माहितीनुसार, जीए ०४ टी २७५० व जीए ०१ व्ही ३०२३ या बसेस फोंड्याहून डिचोलीच्या दिशेने येत होत्या. याच वेळी जीए ०५ टी ३७९९ हा ट्रक सुर्लाहून फोंड्याला जात असताना त्याची पुढील बसला त्याची धडक बसली. त्या धडकेने ती बस जाऊन दुसर्‍या बसला जाऊन आपटली. यात पुढील बसमध्ये चढत असलेली दिपाली त्याच बसच्या चाकाखाली सापडली व जागीच ठार झाला. तिच्या काखेत असलेला तिचा एक वर्षीय मुलगा दूर फेकला गेला. तो जखमी झाल्याने त्याला बांबोळीला उपचारांसाठी नेण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे समजते. उपनिरीक्षक तुकाराम वाळके यांनी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आला.

बनावट चहा पाकिटांच्या गोदामावर उसगावात छापा

पावणेचार लाखांची पाकिटे जप्त
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी)
‘रुबी’ आणि ‘सोना’ कंपन्यांची नावे असलेल्या बनावट चहा पाकिटांच्या उसगावातील गोदामावर आज अन्न व औषधी खात्याच्या निरीक्षकांनी छापा टाकून ३ लाख ७६ हजार रुपये किमतीची चहाची पाकिटे जप्त केली. पाकिटांतील चहा पावडरही बनावट असल्याचा दावा खात्यातर्फे करण्यात आला आहे. त्याची चाचणी करण्यासाठी सदर चहा पावडरचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती खात्याचे संचालक सलीम वेलजी यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, शिमोगा कर्नाटक येथील मोहम्मद ऊर्फ अहमद हा गेल्या काही महिन्यापासून ‘व्हीआरएल’ या ट्रान्सपोर्ट कंपनीतून फोंड्यात चहा पावडर पाठवत होता. उसगाव येथे असलेल्या या गोदामात ‘रुबी’ कोलकाता कंपनी व ‘सोना’ चहा कंपनी, आसाम असा पत्ता असलेल्या चहा पाकिटात ही पावडर भरली जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर आज छापा टाकून खात्याने बनावट ‘रुबी’ कंपनीची प्रत्येकी ५ किलोची १८ पाकिटे तर सोना कंपनीची प्रत्येकी ५ किलोची ५२० पाकिटे जप्त केली. या सर्वांची किंमत बाजारात ३ लाख ७६ हजार रुपये होत असल्याची माहिती श्री. वेलजी यांनी दिली. सदर छापा अन्न व औषधी खात्याचे निरीक्षक राजाराम पाटील, आबेल रॉड्रिगीस व श्रद्धा कुटकर यांनी टाकला.
दरम्यान, सदर गोदामाला टाळे ठोकण्यात आले असून या चहा पावडरच्या नमुन्याचा चाचणी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जगदीश खेबुडकर यांचे देहावसान

कोल्हापूर, दि. ३(प्रतिनिधी)
भक्तिपर गाणी असोत की लावणी... आपल्या प्रतिभेच्या जोरावर या दोन्ही काव्यप्रकारांना एकाच वेळी समर्थपणे हाताळणारे, मराठी चित्रपटसृष्टीला अनेक अजरामर गीतांची देणगी देणारे ज्येष्ठ गीतकार जगदीश खेबुडकर यांचे आज कोल्हापूर येथे खाजगी इस्पितळात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होेते.
काही दिवसांपूर्वी श्‍वास घेण्यास त्रास होत आहे, अशी तक्रार त्यांनी केल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रारंभी त्यांनी वैद्यकीय उपचारांना चांगला प्रतिसादही दिला. परंतु, नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर किडणी निकामी झाल्याने आज दुपारी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. उद्या बुधवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे.
प्रतिभावंत गीतकार असलेले जगदीश खेबुडकर यांना ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत पुरस्कार मिळालेला आहे. शिक्षक असलेले खेबुडकर तसे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सुधीर ङ्गडके, पं. भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासून ते थेट अलीकडच्या सोनू निगमपर्यंत अशा ३६ गायक व ३६ गायिकांनी त्यांची गाणी लिहिली आहेत. किरकोळ शरीरयष्टी असलेल्या व ‘नाना’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या जगदीश खेबुडकरांनी आपली पहिली कविता १९४८ मध्ये लिहिली. १९५६ रोजी त्यांचे पहिले गीत आकाशवाणीवरून प्रक्षेपित झाले. १९६० मध्ये त्यांचे पहिले चित्रगीत प्रेक्षकांसमोर आले. हे गीत म्हणजे ‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’ ही लावणी होती. अलीकडेच त्यांनी लिहिलेले ‘मोरया, मोरया...’ हे गीत अजय-अतुलने संगीतबद्ध केले आहे.
व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे आदींबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. आयुष्याचा सूर्य मावळत असताना त्यांच्या लेखणीतून मात्र कविता, लावण्या, अभंग रचले जात होते. त्यांनी आत्तापर्यंत ३२५ चित्रपटांसाठी अडीच हजार चित्रगीते लिहिली आहेत. साडेतीन हजार कविता, २५ पटकथा, ५० लघुकथा, पाच नाटके, चार दूरदर्शन मालिका, चार टेलीङ्गिल्म्स एवढी भारदस्त साहित्य संपदा किरकोळ शरीरयष्टी असलेल्या खेबुडकरांच्या खाती आहे.
‘गणगवळण’ या चित्रपटासाठी त्यांनी सर्वाधिक म्हणजे १९ गीते लिहिली. ‘दुर्गा आली घरा’ या चित्रपटात त्यांचे १६ मिनिटांचे गीत आहे.

जाहल्या मुक्या भावना..

- प्रवीण दवणे

प्रतिभावान गीतकार जगदीश खेबुडकर यांचे जाणे सार्‍यांसाठीच चटका लावणारे आहे. आधीच्या पिढीप्रमाणेच याही पिढीतील गीतकार, संगीतकार आणि रसिकांवर पुत्रवत प्रेम करणारी एक मोठी व्यक्ती गेल्याचे दु:ख आज होत आहे. त्यांच्या आणि माझ्या वेळोवेळी अनेक भेटी झाल्या होत्या. त्यावेळी ते माझ्या लेखन प्रवासाविषयी आवर्जून चौकशी करत. प्रयत्नांना दाद देत. हा मनाचा मोठेपणा सध्या कमी प्रमाणात पहायला मिळतो. माडगुळकरांच्या परंपरेतील समकालीन लिखाण करुनसुध्दा नव्या पिढीला आवडणारी अवीट गोडीची गाणीतितक्याच ताकदीने लिहिली. ‘आराम हराम आहे’ या चित्रपटात ग. दि. माडगुळकर आणि जगदीश खेबुडकर या दोघांचीही गाणी होती. त्यातील ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ हे गाणे खेबुडकरांचे पण ते ऐकताना माडगुळकरांचे आहे असेच वाटत असे. त्यावेळी साहित्य क्षेत्राला माडगुळकरांसारख्या कल्पतरुची सावली होती. त्यांच्या तोडीचे लिखाण करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नव्हती.
खेबुडकरांच्या गीतांना अस्सल मराठी मातीचा सुंगध लाभला होता. कोल्हापूरचे असल्यामुळे तेथील रंगेलपणा, शृंगार या बाबी त्यांच्या काव्यातून प्रकट होत. त्यांनी गीतरचनेचे शिखर गाठले होते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यांची सर्वच गाणी अवीट गोडीची होती. पण त्यातल्या त्यात ‘पिंजरा’ या चित्रपटातील ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ हे गाणे मला सर्वाधिक आवडते. पेशाने शिक्षक असुनही खेबुडकरांनी लावणीतील शृंगाराचा तोल सांभाळला होता. तो कधी ढळू दिला नाही. खेबुडकरांनी मराठी चित्रसृष्टीचे वैभव जतन करण्याचा सतत प्रयत्न केला.
अगदी अलीकडे म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या ठाण्यातील साहित्य संमेलनात खेबुडकरांची भेट झाली होती. त्यावेळी ते भरभरून बोलले होते. कमालीची विनम्रता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अर्थात इतके विपुल लेखन करूनही आपल्याला कवितेच्या परंपरेतील मानले जात नाही याची त्यांना खंत होती. त्यांनी मराठी चित्रसृष्टीच्या वैभवात मोलाचीभर घातली. मात्र स्वत: वैभव उपभोगणे झालेच नाही. अखेरपर्यंत त्यांनी स्वभावातील आणि आणि वागण्याबोलण्यातील साधेपणा जपला होता. कोणालाही नकार देण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यामुळे अगदी नौख्या संगीतकारांसाठीही त्यांनी गीत लेखन केले. सिध्दहस्त बाण्याचे गीतकार म्हणूनही खेबुडकरांचा उल्लेख करावा लागेल. कोरा कागद जणू त्यांच्या निमंत्रणाची वाटच पाहत असायचा. एकदा खेबुडकरांनी पेन उचलले की त्या कागदावर भराभर ओळी लिहिल्या जायच्या. त्यात थांबणे नव्हते. त्यांनी अनेक गीते एकाच बैठकीत लिहून पूर्ण केली. ङ्गक्त ते गीत लिहिण्यापूर्वी त्याचा आशय, चित्रपटातील प्रसंग आणि चित्रपटाची कथा याबाबी लक्षात घेत. काही क्षण विचार करत आणि मग लिहायला सुरूवात व्हायची.
जगदीश खेबुडकरांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली होती. पण त्यांच्या लेखणीला वयाचा स्पर्श कधीच झाला नाही. सध्या अलीकडेच त्यांनी अजय-अतुल या युवा संगीतकारासाठी ‘मोरया मोरया’ हे गाणे लिहिले. या गीत तरुण वर्गात किती लोकप्रिय झाले आहे याची सार्‍यांनाच कल्पना आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटातील ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ हे गीत सोनू निगमसाठी लिहिले. वय वाढले तरी सृजनशक्ती तरुण ठेवणे वाटते तेवढे सोपे काम नाही. अशा महनीय व्यक्तीचे आशिर्वाद आम्हा मंडळींच्या पाठीशी सदैव असणार आहेत. गीतलेखन क्षेत्रात इतकी भरीव कामगिरी केल्याबद्दल खेबुडकरांना पद्मभूषण किताब मिळायला हवा होता. अशी मोठी व्यक्ती गेल्यानंतर खूप कौतुक होते पण ते ‘याची देही याचि डोळा’ पाहण्यातील समाधान काही औरच असते. त्यामुळे खेबुडकर मोठ्या सन्मानापासून दूर राहिले याची खंत त्यांच्यावर प्रेम करणार्‍या सार्‍यांनाच वाटणे साहजिक आहे. मात्र, खेबुडकरांना रसिकांचे उदंड प्रेम मिळाले यात शंका नाही.
जगदीश खेबुडकर हे गीत लेखनाच्या कुटुंबाचे पितृछत्र होते. ते आज हरपले आहे. त्यांच्या गीतात जी विविधता होती तशा स्वरुपाची गीते ङ्गार थोड्यांनी लिहिली असतील. भावगीत असो वा भक्तीगीत, लावणी असो वा प्रेमगीत, त्या-त्या गीतांमधून भावना नेमक्या व्यक्त होत. सोपे आणि काळजाला भिडणारे शब्द हे सुध्दा खेबुडकरांच्या गीतांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्यांची गाणी खेड्या-पाड्यातूनही आवडीने गायली जात. अगदी अशिक्षित, अल्पशिक्षित लोकही त्यांच्या गाण्यात बेधुंद होत. त्यांच्या गाण्यातील शब्दरचना अतिशय प्रभावी होती. ‘देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा’ या गीताचे शब्द तर सुभाषित ठरावेत असे आहेत. खेबुडकर एक सिध्दहस्त कवी होते. ते मला नेहमी ‘कवीराज’ या नावाने हाक मारायचे. एवढ्या मोठ्या व्यक्तीने अशा प्रकारे हाक मारणे हा अनुभवच वेगळा होता. ‘मी कसला गीतकार, मी तर सामान्य माणूस’ हे त्यांचे शब्द ऐकले की विनम्रतेची साक्षात प्रचिती यायची. सध्याच्या काळात अशी विनम्रता पहायला मिळणे कठीण आहे.
खेबुडकरांची जवळपास सारीच गाणी घराघरात आवडीने ऐकली आणि गायली जात आहेत. यापुढेही या गीतांची लोकप्रियता कायम राहणार आहे. या सर्जनशील गीतकाराला विनम्र आदरांजली.

Tuesday, 3 May, 2011

अखेर लादेनचा खातमा!!

पाक भूमीवर अमेरिकेची कारवाई - अवघ्या ४० मिनिटांत लादेन ठार

इस्लामाबाद/वॉशिंग्टन, दि. २
संपूर्ण जगाला ‘जिवंत किंवा मृत’ हवा असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी संघटना अल-कायदाचा नेता ओसामा बिन लादेन आज अमेरिकेने पाकिस्तानात केलेल्या विशेष कारवाईत मारला गेला. गेल्या दहा वर्षांपासून त्याच्या मागावर असलेल्या अमेरिकेने तो सापडल्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत त्याचा खातमा केला. विशेष म्हणजे, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेपासून जवळच असलेल्या एबटाबाद येथील पाकच्या लष्करी अकादमीच्या परिसरात लादेन गेल्या काही वर्षांपासून राजरोसपणे वास्तव्य करीत होता. लादेनसोबतच त्याचा मुलगा आणि अन्य दोघे जणही ठार झाले. लादेनच्या मृतदेहाला जमीनही मिळू शकली नाही. त्याचा मृतदेह समुद्रात इस्लामिक पद्धतीने दङ्गन करण्यात आला. दरम्यान, लादेन ठार झाल्याचे जाहीर करण्यात येताच अमेरिका आणि अन्य देशांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
?गाणिस्ता?धून पलायन केल्यानंतर लादेनने इस्लामाबादजवळील एबटाबाद या गावाजवळील शेतात आपला भव्य आशियाना उभारला होता. ही ाहिती ङ्ग?ळताच अमेरिकेने त्याला ठार मारण्याची खास रणनीती तयार केली. गेल्या सात महिन्यांपासून ?ेरिकन ौजांनी त्यासाठी रंगीत तालीम सुरू केली होती असे ?जते. तयारी पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २९ एप्रिल रोजी ‘किल ओसामा’ अशा स्वरूपाच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
रविवारी मध्यरात्री अमेरिकेचे विशेष कमांडो लादेनच्या हवेलीच्या कंपाऊंडमध्ये उतरले. तेथील सुरक्षारक्षकांनी केलेला प्रतिकार ोडून काढत त्यांनी लादेनला ङ्गरङ्गटत बाहेर आणले आणि गोळ्या घातल्या. या हल्ल्यात लादेनचा मुलगा, एक महिला आणि त्याचा एक अंगरक्षकही ठार झाला. तथापि, अल-कायदा ‘नंबर दोन’चा नेता असलेला अयमाल अल जवाहिरी याचाही ठार झालेल्यांमध्ये समावेश आहे काय, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. लादेनला ठार मारण्यात आल्यानंतर काही वेळातच त्याच्या दोन बायका आणि चार मुलांना अमेरिकन कमांडोंनी अटक केली.

बेकायदा खाणींवर ‘पीएसी’चा बडगा!

• कडक निर्देश जारी • १० मेपासून अंमलबजावणी

पणजी, दि. २ (प्रतिनिधी)
राज्यातील बेकायदा खाणी व बेदरकार खनिज वाहतुकीवर लगाम आणण्यासाठी लोकलेखा समितीने कडक निर्देश जारी केले आहेत. पहिल्या टप्प्यात सांगे व केपे भागांतील बेकायदा खाणी बंद करून व खनिज वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी खास कृती आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी १० मेपासून सुरू होईल. २० मेपर्यंत पूर्तता अहवाल समितीला सादर करण्याचेही आदेश जारी करण्यात आले असून २५ मे रोजी याप्रकरणी लोकलेखा समिती आपला अहवाल तयार करेल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिली.
आज पर्वरी विधानसभा संकुलात लोकलेखा समितीची महत्त्वाची बैठक झाली. विरोधी पक्षनेते श्री. पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आमदार फ्रान्सिस डिसोझा, दामोदर नाईक, दीपक ढवळीकर, विक्टोरिया फर्नांडिस यांच्यासह मुख्य सचिव संजय श्रीवास्तव, खाण खात्याचे संचालक अरविंद लोलयेकर, वाहतूक संचालक अरुण देसाई, उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी, उत्तर व दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक आदी हजर होते. महालेखापालांनी आपल्या अहवालात खाण खात्यातील ‘रॉयल्टी’त आढळलेल्या तफावतीवर कडक ताशेरे ओढले आहेत. या अहवालाचा आधार घेऊन समितीने संपूर्ण खाण खात्याच्या कारभाराचाच आढावा घेतला. खाण तथा वनखात्याकडून मिळवलेल्या माहितीनुसार अनेक ठिकाणी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या परवान्याशिवाय खाणी सुरू असल्याचे आढळून आले आहे. मंत्रालयाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता न करता अतिरिक्त खनिज उत्खनन करून कोट्यवधी रुपयांच्या खनिजाची निर्यात झाल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. वनखात्यातर्फे दिलेल्या माहितीत सुमारे ५० ते ६० खाणींकडून वन्यजीव अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. यापैकी सुमारे २१ खाणींकडे संबंधित परवानेच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तरी तालुक्यातील गवाणे या बेकायदा खाणीतून सुमारे ७ लाख टन खनिजाचे बेकायदा उत्खनन झाल्याचेही आढळून आले आहे.
पहिल्या टप्प्यात केवळ सत्तरी, केपे व सांगे भागांतील खाणींची माहिती मागितली असता त्यात सुमारे १६ खाणींकडून आवश्यक अटींची पूर्तता झाली नसल्याचे समोर आले आहे. या खाणी कायदेशीरपणाच्या आवरणाखाली बेकायदा व्यवहार करीत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. सरकारला रॉयल्टी व वार्षिक रिटर्न्स भरले जात असले तरी आवश्यक अटींची पूर्तता होत नाही. पर्यावरण मंत्रालयाकडून खनिज उत्खननासंबंधी लादलेले निर्बंधही पायदळी तुडवले जात आहेत. या अतिरिक्त खनिज उत्खननामुळेच खनिज वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. विविध ठिकाणी एकूण ७५० दशलक्ष खनिज साठा जमविण्यात आला आहे. एकूण ३२० खनिज साठ्यांची नोंद सरकार दरबारी असून त्यांपैकी ३० टक्के खनिज साठा हा महसूल व वनक्षेत्रात साठवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.
खनिज वाहतुकीसाठी घातलेल्या अटी
- खनिज वाहतूक सकाळी ८ ते ४ पर्यंतच सुरू राहील. दुपारी १२.३० ते २ पर्यंत हा दीड तास जेवणासाठी असेल.
- खाणीवरून बाहेर पडणार्‍या ट्रकांसाठी ट्रान्सीट व वजन काटा पास सक्तीचा असेल. हे पास पोलिस,वाहतूक खात्यातर्फे दिले जातील. ते नसलेले ट्रक जप्त करण्यात येतील.
- प्रत्येक ट्रकाने १०.५ मेट्रिक टन क्षमतेचे बंधन पाळावे.अतिरिक्त खनिज वाहतुकीसाठी तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित करण्यात येईल.
- प्रत्येक खनिज ट्रक खाण खात्याकडे नोंद करणे सक्तीचे असून ट्रक क्रमांक, मालकाचा फोन नंबर, चालक परवाना व त्याचा पत्ता खात्याकडे नोंदवणे सक्तीचे.
- खाण खात्याचा परवाना नसलेल्या ट्रकांना खनिज वाहतूक करण्यावर बंदी, तसे आढळल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित.
- प्रत्येक आठवड्यात खनिज लीजधारकांना ट्रान्सीट परवाना खाण खात्याकडून प्राप्त करण्याची सुविधा असेल.
- प्रत्येक लीजधारकाला खनिज वाहतुकीच्या प्रमाणाचा प्रतिमहिना अहवाल सादर करणे सक्तीचे. वापराविना ट्रान्सीट पासच्या नूतनीकरणाची सोय.
- खनिज वाहतूक परवान्यासाठी वाहतूक खात्याला खाण खात्याच्या ना हरकत दाखला सक्तीचा.
-प्रत्येक खनिज ट्रक चालकाला आरोग्य प्रमाणपत्र सक्तीचे व त्यावर वाहतूक खात्याची मान्यता.
-रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत रिकाम्या खनिज ट्रकांच्या रहदारीवर निर्बंध
- रविवार व सार्वजनिक सुट्टीदिवशी खनिज वाहतूक बंद
- या सर्व अटींच्या पूर्ततेची जबाबदारी लीजधारक व त्यांच्या एजंटची असेल व त्याचे उल्लंघन झाल्यास लीज परवाना रद्द करण्याचा खाण खात्याला अधिकार.

बेपत्ता असल्याची तक्रार

चावडी, दि. २ (वार्ताहर)
काटेबाग तळपण पैंगीण येथून विल्मा रॉबर्ट बार्रेटो (३५) ही विवाहीत महिला रविवार दि. २४ एप्रिलपासून काटेबागहून बेपत्ता असल्याची तक्रार तिची सासू व्हिसेंत बार्रेटा यांनी काणकोण पोलिस स्थानकात केली आहे. सदर महिलेने निळ्या रंगाचा चुडीदार परिधान केला असून उंची ५.४ सेमी आहे. अशी माहिती काणकोण पोलिसांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक तेर्रान डिकॉस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण सावंत करीत आहेत.या संदर्भात माहिती मिळाल्यास काणकोण पोलिस स्थानक (०८३२-२६३३३५७) येथे संपर्क साधावा.

नरेंद्र रायकर यांचे निधन
चावडी, दि. २ (वार्ताहर)
काणकोण पणसुले येथील सोन्याचे कारागीर नरेंद्र रायकर (७२) यांचे सांगली महाराष्ट्र येथे निधन झाले. नातीच्या लग्नानिमित्त रायकर हे सांगलीला गेले असता तेथे ते आजारी पडले. इस्पितळात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. आज २ मे रोजी काणकोण पणसुले येथे त्यांचा मृतदेह पोहोचल्यानंतर अंतिम संस्कार करण्यात येतील असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्यामागे पत्नी, विवाहीत कन्या व मुलगा असा परिवार आहे.

पार्वती गावकर यांचे निधन
चावडी, दि. २ (वार्ताहर)
येडा - खोतिगाव येथील पार्वती मोनो गावकर (८५) यांचे आज २ मे रोजी येडा येथे निधन झाले. ३ मे रोजी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील. त्यांच्यामागे पुत्र, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

साईश्रद्धा क्लबचा शनिवारी वर्धापनदिन

पणजी, दि. २
साईश्रद्धा क्रीडा व सांस्कृतिक क्लब, घाटेश्‍वर नगर, खोर्ली म्हापसाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त ७ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता १५ वर्षांखालील आणि १५ ते २० वर्षांमधील युवकांसाठी प्रश्‍नमंजूषा व एकपात्री अभिनय स्पर्धा तर ८ मे रोजी अखिल गोवा संगीत स्पर्धा केवळ प्रथम ३० स्पर्धकांसाठी आयोजित केली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस रु. ५०००, द्वितीय रु. ३००० व तृतीय रु. २००० दिले जाईल. अधिक माहितीसाठी सुहास (९४२११५०२३७), सिद्धार्थ (९७६२६६३७५७) किंवा क्लबच्या अध्यक्षांना ९८८१३१८१४८ वर संपर्क साधावा.

गोवा लेखा कॅडरची १२ रोजी आमसभा
पणजी, दि. २
लेखा संचालनालयातील गोवा लेखा कॅडर अधिकारी संघाची आमसभा संचालनालयाच्या प्रशिक्षण सभागृहात गुरुवार दि. १२ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता आयोजित केली आहे. यावेळी नवीन कार्यकारी समितीची निवड केली जाईल.

पणजीत आजपासून आर्ट ऑफ लिव्हिंग

पणजी, दि.२ (प्रतिनिधी)
श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य जोरात चालू असून उद्या दि.३ रोजी पणजी येथील टीबी कुन्हा सभागृहात आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग वर्ग सुरू होत आहेत. दि.३ ते ८ मे दरम्यान दररोज संध्याकाळी ६.३० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत हे वर्ग चालणार आहेत. शारीरिक आरामाबरोबरच मानसिक आनंद देणारे हे वर्ग असून या वर्गात दाखल होऊन आनंदप्राप्ती करून घेण्याची संधी पणजीवासीयांना लाभली आहे. अधिक माहितीसाठी नीला नावेलकर (९८२२१०४४२१) किंवा श्रद्धा परब (९४२३३०७८०९) यांच्याशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे.

म्हापसा नगराध्यक्षांवरील अविश्‍वास ठराव बारगळला

म्हापसा, दि. २ (प्रतिनिधी)
म्हापसा पालिका मंडळाच्या विरोधी गटाने नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्यावर दाखल केलेला अविश्‍वास ठराव नगरसेविका रूपा भक्ता यांनी ऐनवेळी विरोधी गटाला आपला पाठिंबा दर्शविल्याने सात विरूद्ध शून्य मतांनी बारगळला.
अविश्‍वास ठरावावर सही करणारे ऍड. सुभाष नार्वेकर, उपनगराध्यक्ष विजेता नाईक, मायकल कारस्को, रुही पत्रे, रूपा भक्ता, आशिष शिरोडकर, दीपक म्हाडेश्री, सुभाष कळंगुटकर हे आठही नगरसेवक उपस्थित होते. तर सुधीर कांदोळकर यांच्या गटातील एकमेव नगरसेवक संदीप फळारी उपस्थित होते.
अविश्‍वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेले उपजिल्हाधिकारी दशरथ रेडकर अध्यक्षस्थानी होते. त्यांना सहकार्य देण्यासाठी पालिका मुख्याधिकारी हनुमंत तोरस्कर होते.
यावेळी ऍड. नार्वेकर यांनी नगराध्यक्ष कांदोळकर यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी सांगितले की, विरोधी गटाने आठ नगरसेवकांचा एक गट स्थापन केला असून पालिका मंडळ आम्ही चालवू शकतो असा दावा केला. यावेळी श्री. फळारी यांनी श्री. नार्वेकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. म्हापशाच्या विकासासाठी येणार्‍या सरकारी अनुदानापैकी प्रत्येक प्रभागासाठी पाच पाच लाख रुपये देण्याचा तरतूद केली आहे तर प्रत्येक नगरसेवकाला विकासासाठी प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कचरा प्रश्‍नावर वाटाघाटी चालू आहेत. बेकायदा कामांवर नियंत्रण ठेवण्याचे काम मुख्याधिकार्‍यांचे आहे. त्यांना तशी संपूर्ण स्वायत्तता दिलेली आहे. ऍड. नार्वेकर यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून हे आरोप श्री. फळारी यांनी धुडकावून लावले. सभेचे अध्यक्ष श्री. रेडकर यांनी मतदानाची सूचना केली. त्यावेळी श्रीमती भक्ता यांनी आपण मतदानात भाग घेणार नसल्याचे जाहीर केले. यावेळी आपण तटस्थ राहणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे ठरावाच्या बाजूने सात मते पडल्याने हा ठराव बारगळला.
यावेळी बोलताना श्रीमती भक्ता यांनी सांगितले की, नगराध्यक्ष श्री. कांदोळकर यांना कामासाठी फक्त पाच महिन्यांचा अवधी मिळाला असून तो अवधी वाढावा म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी श्री. कांदोळकर यांनी भक्ता यांचे आभार मानले.
दरम्यान, पालिकेत संगीतखुर्चीचा खेळ सुरू होऊन विकास मागे पडू नये म्हणून विद्यमान नगराध्यक्षांनाच कार्यरत ठेवावे याकडे आमचा कल होता अशी प्रतिक्रिया म्हापसा कॉंग्रेस ब्लॉक कमिटीने दिली आहे.

फ्रान्सिस डिसोझा यांचा फोटो घेणे
प्रामाणिकपणा हाच लोकशाहीचा आधार
काही नेत्यांना पैशांचा एवढा माज चढला आहे की त्यांना आपण पैशांच्या बळावर कुणालाही विकत घेऊ शकतो, असेच वाटते. प्रत्येक व्यक्ती ही अप्रामाणिक किंवा विकली जाऊ शकत नाही. या समाजात अजूनही काही प्रामाणिक माणसे आहेत व त्यांच्यामुळेच आपली लोकशाही टिकून आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया म्हापशाचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनी व्यक्त केली. म्हापसा पालिकेतील काही नगरसेवकांना पैशांचे आमिष दाखवून आपल्या बाजूने ओढण्याचे प्रयत्न झाले. पण पालिकेतील काही प्रामाणिक नगरसेवकांनी आपल्या कृतीद्वारे हा डाव उधळून लावला. नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्याविरोधातील अविश्‍वास ठराव बारगळला व अखेर प्रामाणिकपणाचाच विजय झाला, असेही ते म्हणाले.

Monday, 2 May, 2011

डॉ. जोशी हेच पुन्हा लोकलेखाचे अध्यक्ष

नवी दिल्ली, दि. २९
‘टू जी स्पेक्ट्रम’ घोटाळ्याबाबत प्राथमिक अहवालावरून प्रचंड वाद झाल्यानंतरही भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी (७७) पुन्हा एकदा संसदेच्या लोकलेखा(‘पब्लिक अकाऊंटस् कमिटी’)समितीचे अध्यक्ष बनले आहेत.
शनिवारी या समितीची मुदत संपली. नियमानुसार नव्या समितीसाठी मुख्य विरोधी पक्ष या नात्याने भाजपने जोशी यांचेच नाव अध्यक्षपदासाठी सुचवले. अखेर सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर लोकसभाध्यक्ष मीराकुमार यांनी डॉ. मुरलीमनोहर जोशी यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले. ही समिती संसदेशी संबंधित सर्व व्यवहारांची तपासणी करू शकते. डॉ. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती आजपासून (रविवार) कार्यरत झाली आहे. या समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.
मागच्या गुरुवारी (२८ एप्रिल) डॉ. जोशी यांनी समितीपुढे टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबत प्राथमिक अहवाल सादर केला होता. यात दूरसंचारमंत्री ए. राजा यांना दोषी ठरवण्यात आले होते. घोटाळ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केल्याप्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि घोटाळ्याची माहिती लपवण्याची धडपड केल्याप्रकरणी त्यावेळचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. मात्र समितीमध्ये असलेल्या कॉंग्रेसच्या सात, द्रविड मुन्नेत्र कळघमच्या (डीएमके) दोन आणि समाजवादी पक्ष तसेच बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रत्येकी एका खासदाराने अहवालाबाबत आक्षेप घेत, गोंधळ घातला होता. बहुमताच्या जोरावर त्यांनी अहवाल ङ्गेटाळला होता. या घटनेनंतर जोशी यांनी समितीची बैठक सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि खासदारांनी हंगामी अध्यक्षांची निवड केली होती. अखेर आज समितीची मुदत संपली आणि जोशी यांची पुन्हा एकदा लोकलेखाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
नियुक्तीनंतर आनंद व्यक्त करतानाच आपण सादर केलेला प्राथमिक अहवाल स्वीकारण्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार लोकसभाध्यक्षांकडे राखीव असल्याचे डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी सांगितले.

तिलारी धरणग्रस्तांनी गोव्याचे पाणी अडवले

आमदार केसरकरांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित
सावंतवाडी, दि. १ (प्रतिनिधी)
महाराष्ट्र - गोवा राज्याच्या संयुक्त करारातून होणार्‍या तिलारी जलसिंचन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्‍नावर गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची १५ ते २० मे दरम्यान भेट घेण्याचे आश्‍वासन मिळाल्याने आजचे गोव्याचे पाणी बंद आंदोलन स्थगित करण्यात आले. तिलारी बेरोजगार संघर्ष समितीने हे आंदोलन छेडले होते. सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी हे आश्‍वासन आंदोलकांना आज (दि.१) दुपारी दिले. त्यानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र आंदोलकांनी तत्पूर्वी आज गोव्याकडे जाणारे सुमारे ९५ टक्के पाणी अडविले.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी या धरण प्रकल्पातील ७३ टक्के पाणीवाटा हा गोवा राज्याचा असून महाराष्ट्राचा उर्वरित २७ टक्के वाटा आहे. या धरणग्रस्त तरुणांना शासकीय सेवेत सामावून घेण्यास गोवा राज्यशासन चालढकल करीत असल्याच्या निषेधार्थ आज जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र स्थापना दिनी तिलारी धरणग्रस्त संघर्ष समितीने तिलारीचे गोव्यात जाणारे पाणी अडविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळपासून धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत गावस, सचिव संजय नाईक, यांच्यासह सुमारे ३०० धरणग्रस्त युवक युवतींनी कोनाळकट्टा या मुख्य कालव्यापाशी जमा झाले होते. त्यांनी यावेळी गोव्याकडे येणार सुमारे ९५ टक्के पाणी अडवले.
दुपारी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याशी महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करत १५ ते २० मे पर्यंत हा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

..खरे तर ह्या सुवर्णपर्‍याच

अनाथ मुलांचीमांडवीत अनाम प्रेमतर्फे जलसफर
• ऍड. सतीश सोनक
पणजी, दि. १
‘गळ्यात साखळी सोन्याची, ही पोरी कोणाची?’ २९ चिमुरड्या मुली शांतादुर्गा जलनौकेवर रिंगणात उत्साहाने नाचत हे गाणे म्हणत होत्या. ‘आवय बी बेवडा आणि बापूस बी बेवडा’ या ओळी पण त्यांच्या ओठावर होत्या पण कुणाच्याच गळ्यात सोन्याची साखळी नव्हती आणि कुणालाच त्यांच्या आईबापांचा पत्ता नव्हता. तरीही हे आपल्या आयुष्याचे थीम सॉंग आहे असे वाटून त्या तल्लीन झाल्या होत्या. ४ वर्षांची नलिता, ५ वर्षांची मंजू, ६ वर्षाची उत्कर्षापासून १६, १७ वषार्ंच्या आरती, अश्‍विना आणि इंदूपर्यंत किती म्हणून नावे सांगायची आणि कशासाठी? यातील कुठलेही नाव त्यांच्या आई-बाबांनी प्रेमाने दिले नव्हते. कारण त्या सार्‍या अनाथ होत्या. प्रसंग होता, मांडवीच्या पात्रात ‘अनाम प्रेम’ने आयोजित केलेल्या जलसफरीचा.
नालासापोरा या मुंबईच्या उपनगरात ‘सारडा शिशू निकेतन’ ही बिगर सरकारी संस्था अनाथ चिमुकल्या मुलींना सांभाळते. या संस्थेची प्रेरणा आहे स्वामी विवेकानंद. ही संस्था व उपेक्षितांच्या पाठीवर आईच्या ममतेने हात फिरवू इच्छिणारी. या आणि अनाम प्रेम या लोकचळवळीच्या संयुक्त विद्यमाने या मुली गोवा भेटीवर आल्या.
ज्या आई बापांमध्ये आपल्या सोन्यासारख्या मुलींना पोसण्याचा दम नाही त्यांच्यापासून ताटातूट झालेली ही देवाघरची फूले शिशू निकेतनच्या परडीत उमलतात. गोव्याची ओंजळ सुगंधित करण्याच्या सद्हेतूने गोवा विकास पर्यटन महामंडळाने शांतादुर्गा ही जलनौका सवलतीच्या दरात अनाम प्रेमच्या दिमतीस दिली आणि चिमुकल्यांच्या आयुष्यात हसरे क्षण फुलण्याची जादू घडली.
दरवर्षी १ मे रोजी असा उपक्रम करण्याची परंपरा अनाम प्रेम सातत्याने पाळत आहे. ज्यांच्या काळजात कळवळा आणि दुसर्‍यांना हात देण्याची प्रेरणा आहे तेच या जलसफरीत सहभागी होतात. यांचे बालहट्ट पुरे करण्यासाठी फार मोठ्या संपत्तीची गरज नाही. त्या काही चंद्र तारे मागत नाहीत तर केवळ तुमची माझी आपुलकी मागतात. तुम्ही त्यांच्याकडे साधे हसून पाहिलात तर तेवढ्याने त्यांच्या जीवनात आनंदाची भरती येते. मांडवीच्या तीरावरील अविस्मरणीय जलसफर म्हणजे या अनुभूतीचे प्रात्यक्षिक होते. आतल्याआत कुढत जगणार्‍या या चिमुकल्यांना खेळत बागडत बोलते करण्याचे पुण्यकर्म अनाम प्रेमच्या खात्यावर निश्‍चितच जमा होईल.
या जलसफरीत जे मिळाले त्याची मोजदाद हजारो कोटीच्या काळ्याधनात होणार नाही. चिमुरड्यांच्या डोळ्यातील हरवलेले स्वप्नांचे पक्षी शोधण्याच्या कामाचे पैशांत मूल्यमापन शक्य नाही. या उपक्रमामुळे आयुष्याला एक वेगळाच स्पेक्ट्रम मिळाला आणि हरवलेली माणुसकी शोधण्याची विवेकबुद्धी मिळाली. या पोरक्या पोरींच्या आयुष्यात त्यांना जे सोसावे लागले असेल त्यापुढे आपली मोठ्यातील मोठी दुःखे काहीच नाहीत. याचा साक्षात्कार झाला. ही जलसफर म्हणजे डोळे उघडणारा प्रवास होता. त्यात एकमेकांचे कौतुक करणार्‍या छोट्या मुलींचा टाळ्यांचा कडकडाट हे विश्‍वातील सर्वात मधुर संगीत होते.
या कार्यक्रमात स्वच्छंद मस्ती आणि उत्साहाची धूम होती आणि तरीही सारा कारभार शिस्तबद्ध. आपल्या घरच्या बिघडलेल्या कार्ट्यांनी या चिमुरड्यांचा आदर्श ठेवावा असे कुणालाही वाटेल.
गोव्यात त्यांना कार्यक्रम आयोजित करणार्‍या चिंतामणी सामंत सारखी देव माणसे भेटली. त्यांच्या पर्वरीतील सिद्धिविनायक या छोटेखानी घरात या मुलींनी हृदयाचे मोठेपण अनुभवले. मुंबईतील प्रभादेवीत खरोखर सिद्धिविनायक आहे की नाही हे मला माहीत नाही पण पर्वरीतील सिद्धिविनायक घर मला कुठल्याही मंदिरापेक्षा पवित्र वाटते कारण हे घर अनाथांना घरपण देते.
बोलता बोलता श्री. सामंत सहजच बोलून गेले ‘या मुलींनी आपल्या आपुलकीस प्रतिसाद देऊन भारताचे चांगले नागरिक व्हावे’. एक सामान्य नागरिक असे स्वतः पलीकडे जाऊन असामान्य स्वप्न पाहू शकतो म्हणून तर भविष्याचे व्हिजन गोमंतकीयंाच्या डोळ्यांत तेवत राहिले आहे. सामंतांनी आपले स्वप्न सांगितले आणि ते ऐकताना माझ्या डोळ्यांत खळाळून पाणी आले.
अनाथ भारतीय मुलींतील ९५ टक्के मुली अशिक्षित असून हालअपेष्टा हा त्यांचा गुरू आहे. मांडवीत जलसफर करताना या आकडेवारीची लाट माझ्या मनावर धडक देत होती.
या जलसफरीचे निमंत्रण मी एका मित्राच्या छोट्या मुलाला दिले. त्याने विचारले, ‘तुम्ही माझ्या बाबांना माझ्यासोबत येऊ द्याल ना?’ जड जिभेने हो म्हणताना माझ्या डोळ्यांसमोर आई बाप माहीत नसलेल्या त्या छोट्या २९ पाहुण्या तरळत होत्या.
माझी आई एक कविता गायची. त्यात बाण लागून जखमी झालेल्या घायाळ पक्षिणीचे वर्णन होते. आपल्या शेवटच्या क्षणी मृत्यू जवळ आल्यावर ती पक्षीण आपल्या पिल्लांना म्हणते
‘तुम्हा अजी अंतीचा कवळ एक मी आणिला
करू जतन या पुढे प्रभू पिता अनाथा सदा...!’
मी प्रभू पित्यांना कधी पाहीले नाही. पण मी या जलसफरीत चिंतामणी व सौ. मीरा सामंत, श्रीमती सुमन सामंत, श्री. लाड, अरुण स्वार, प्रशांत भाट, सुरेश देसाई, अनिल देसाई, सौ. सुनंदा देसाई, किशोर मयेकर, मीरा मयेकर, अरुण राणे, अविनाश भोसले, संजय व श्रीकांत बर्वे आणि श्री व सौ. खेडेकर, यांना अनाथ बालिकांना घास भरविताना पाहिले.
डॉल्फिन पाहून विस्मयाने थक्क झालेल्या पोरक्या पोरींचे आनंदाचे चित्कार ऐकताना नौकेजवळ खनिज माती म्हणजे पर्यायाने देश विकण्यास नेणार्‍या बार्जचा घरघराट सुरू झाला. बालपिढीच्या भवितव्याशी जुगार खेळणारे कॅसिनो अंगावर चाल करून आले. वाईट याचे वाटते की ही सर्व आपल्याच देशातील आपल्या माणसांची करणी आहे.
एकीकडे देव माणसे आणि समोरच देश विकणारे.
टागोरांसारखी पांढरी शुभ्र लांबलचक दाढी आणि बाबा आमटेसारखे करूणेने भरलेले मन असलेले एक देवदूत या प्रवासात होते. त्यांनी प्रत्येक बालिकेला आर्जवे करून कपड्यांच्या दुकानातच नेले व हवे ते कपडे घेऊन दिले. हेच खरे पितृत्व, हेच खरे भारतीयत्व. जलसफरीतील प्रत्येक बालिका ही भारतमातेचे रूप होती हे जाणवले अन् लक्षात आले की ही पोर कुणाची? हा प्रश्‍न विचारायची गरज आता शिल्लक राहिली नाही. कुठल्याही पेज थ्रीवर या जलसफरीचा उल्लेख राहिलेला नसेल पण मनाच्या प्रत्येक पानावर तो फडफडत राहील.
भारत मातेच्या हातातील प्राणप्रिय तिरंग्यासारख्या या चिमुकल्या अनाथ मुलांसाठी काहीतरी करायलाच हवे. मला आलेला एक एसएमएस मी जपून ठेवला आहे. त्यात लिहिले आहे ‘आय ऍम फायटिंग बॅक माय टीअर्स अँड हेल्पलेसनेस’.

पोलिस निरीक्षकासमोरच सिप्रियानोला भीषण मारहाण

पोलिस तक्रार प्राधिकरणाचा अहवाल
पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
पोलिस तक्रार प्राधिकरणाच्या अहवालामुळे पोलिस कोठडीत मृत झालेल्या सिप्रियानो खून प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. पणजी पोलिस स्थानकात निरीक्षकाच्या कार्यालयाला लागून असलेल्या खोलीत सिप्रियानो याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यानंतर त्याला मरेपर्यंत मारताना तत्कालीन निरीक्षक संदेश चोडणकर त्याठिकाणी उभे थांबून पाहत होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे पोलिस खात्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणात निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक राधेश रामनाथकर, दोन हवालदार व पोलिस शिपाई निलंबित झाले आहेत. या सर्व संशयतावर खुनाचा गुन्हा नोंद होऊनही अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सदर अहवाल माजी न्यायाधीश तथा पोलिस तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष युरीक डिसिल्वा यांनी तयार केला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील एका संशयित पोलिस हवालदार संदीप शिरवईकर यांनी पोलिस प्राधिकरणाच्या सुनावणीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर करून स्थगिती मिळवली आहे. तर, ही स्थगिती उठवण्यासाठी ऊठ गोयकारा संघटनेचे ऍड. जतिन नाईक यांनी न्यायालयात आव्हान याचिका सादर करणार असल्याचे जाहीर केले आहे. सिप्रियानो याला पोलिस स्थानकात आठ पोलिस मरेपर्यंत मारहाण करताना त्याठिकाणी निरीक्षक संदेश चोडणकर उभे राहून पाहत होते, याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. दि. १४ मार्च २०११ रोजी पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे रीतसर तक्रार करण्यात आली होती. पणजी पोलिस स्थानकातील काही पोलिसांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली होती. तपासाअंती आठ पोलिस अधिकारी दोषी आढळले आहेत.
अहवालात नमूद केल्यानुसार निलंबित पोलिस निरीक्षक चोडणकर व उपनिरीक्षक विजय चोडणकर हे दोघे सिप्रियानोच्या तोंडातून फेस येईपर्यंत लाथा मारीत होते. वैद्यकीय अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण त्याच्या डोक्याला झालेल्या जखमेमुळे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हवालदार संदीप शिरवईकर हे सिप्रियानोला बुक्क्यांनी मारत होते. तसेच, त्याचे केस ओढत होते. जीपमधून त्याला ओढत आणून निरीक्षकाच्या बाजूच्या खोलीत घेऊन गेले. तेथेही त्याला बेल्टने मारहाण केली. सिप्रियानो याला अटक करण्यासाठी विश्राम गावकर हे पोलिस हवालदार शिरवईकर यांच्याबरोबर गेले होते. त्यामुळे सिप्रियानो याला जीपमधून फरफटत ओढत नेऊन त्याला मरेपर्यंत मारहाण करण्यात श्री. गावकरही तेवढेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

आगोंद धवळखाजन येथे एक बुडाला, तिघांना वाचवले

काणकोण, दि. १ (प्रतिनिधी)
आगोंद येथील समुद्रकिनार्‍यावर सहलीसाठी आलेल्या पर्वरी येथील अमित अर्जुन रेडकर (२४) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. पर्वरी येथील सहा व डिचोली येथील दोघेजण सहलीसाठी आगोंद धवळखाजन येथे फिरण्यास आले होते. .यावेळी ही घटना घडली. यावेळी इतर तिघांना वाचवण्यात यश आले. आज सकाळी ११ च्या सुमारास पर्वरीतील अमित रेडकर, सिद्धेश रेडकर (१३), श्रुती नाटेकर (१७), मैथिली नाटेकर (२४), प्रियांका केरकर (२४), साईश नाटेकर (१३) व डिचोलीतील ऐश्‍वर्या राणे (२५) व ऋचा राणे (२४) अशा आठ जणांचा एक गट धवळखाजन येथे एका पर्यटन कुटिरात उतरला. संध्याकाळी ४ वा. ऋचा व ऐश्‍वर्या या घरी परतल्या, तर नाटेकर व रेडकर मागे थांबले. त्यापैकी सिद्धेश, प्रियांका, मैथिली व अमित आंघोळीसाठी पाण्यात उतरले. यावेळी चौघेही पाण्यात बुडू लागल्याने त्यांनी वाचवण्यासाठी आरडाओरड केली. यावेळी प्रदीप पागी व आल्केश पागी या स्थानिकांनी व जीवरक्षकांनी त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र अमित हा १० ते १५ मिनिटे पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी इतर तिघांना वाचवण्यात यश मिळाले. अग्निशामक दलाचे जवान व १०८ रुग्णवाहिकेने अमित याला काणकोण इस्पितळात आणले मात्र डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले.

इंजिनिअरिंग परीक्षेमध्ये पेपरफुटीमुळे गोंधळ

मडगाव, दि. १ (प्रतिनिधी)
अखिल भारतीय स्तरावरील इंजिनियरींग प्रवेशासाठींच्या आज झालेल्या परीक्षांची एक प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे या परीक्षांना आज प्रत्येकी दोन तास विलंब झाला. त्यामुळे सायंकाळचा पेपर तर तब्बल साडेसातपर्यंत चालला. या प्रकारामुळे परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यंवर प्रचंड मानसिक ताण आला तर एक पेपर चक्क पुढे ढकलला गेला.
गोव्यात मडगाव, वास्को व पणजी अशी त्याची तीन केंद्रे असून कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र व गोवा या चार राज्यातील विद्यार्थ्यांसाठी येथे सोय केलेली होती. त्यात तीस टक्के विद्यार्थी गोव्यातील होते. मिळालेल्या माहितीनुसार मडगाव केंद्रातील या परीक्षा सां जुझे आरियाल येथील एका नावाजलेल्या खासगी शाळेत पार पडल्या. सकाळी १० वा. व्हावयाचा पेपर दुपारी १२ वाजता सुरु झाला व तो ३ वाजता संपला तर सायंकाळचा पेपर ४.३० वाजता सुरु झाला तो ७.३० वाजता संपला.
आर्किटेक्चरल प्रवेशासाठीचा वेगळा पेपर त्यामुळे पुढे ढकलला गेला असे समजते.

कारने धडक दिल्याने रायबंदर येथे वृद्ध ठार

पणजी, दि. १ (प्रतिनिधी)
सापेर रायबंदर येथे आज सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या संभाजी गावकर (५१) व योगानंद आर्सेकर या दोघांना स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. यावेळी जखमी अवस्थेत दोघांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता संभाजी यांचे निधन झाले. तर, योगानंद यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जुने गोवे पोलिसांनी दिली. या अपघाताला कारणीभूत ठरलेला कारचालक सचिन चव्हाण याला पोलिसांनी अटक करून जामिनावर सोडून दिले.
अधिक माहितीनुसार संभाजी व योगानंद हे दोघे वृद्ध आज सकाळी ५.३० वाजता सापेर येथे मॉर्निग वॉकला गेले होते. यावेळी स्फिट कार (एमएच ३१ टीई ७३३१) ही पणजी येथून फोंडाच्या दिशेने जात होती. यावेळी रस्त्यावर जाणार्‍या या दोघांना धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना इस्पितळात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून वाहन चालकाला अटक केली व जामिनावर सोडून दिले. याविषयीचा अधिक तपास जुने गोवे पोलिस करीत आहेत.

खांडू यांचा ठावठिकाणा नाही

उलटसुलट बातम्यांमुळे गोंधळ

इटानगर, दि. १
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू शनिवारी सकाळी तवांगहून हेलिकॉप्टरने इटानगरला येत असताना बेपत्ता झाले असून अजूनही त्यांचा शोध सुरूच आहे. यासंदर्भात उलटसुलट बातम्या दिल्या जात असल्यामुळे गोंधळजनक स्थिती निर्माण झाली होती. मुख्यमंत्री अथवा त्यांचे हेलिकॉप्टर यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. मुख्यमंत्र्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलेल्या पथकांच्या कामात प्रतिकूल हवामानाचा व्यत्यय आला आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत चारजण शनिवारी हेलिकॉप्टरने प्रवास करून इटानगर येथे येणार होते. मात्र सकाळी ९.५६ वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील २० मिनिटांतच हेलिकॉप्टरचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. तेव्हापासून आतापर्यंत मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी आणि हेलिकॉप्टर यांचा पत्ता लागलेला नाही. २४०० सैनिक, भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे १५० जवान आणि तीन हेलिकॉप्टर्सच्या मदतीने तवांग आणि तेंगाच्या पर्वतीय परिसरात शोध मोहीम सुरू आहे. भूतान सरकारनेही स्वतःच्या सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू केली आहे. घनदाट जंगल आणि प्रतिकूल हवामानामुळे शोध मोहिमेत वारंवार अडथळे येत आहेत.
हवाई दलाची दोन सुखोई-३० विमाने विशेष रडारच्या मदतीने घनदाट जंगलाचा कोपरा न कोपरा तपासत आहेत. लष्कराची दोन चेतक हेलिकॉप्टर आणि हवाई दलाचे एक एमआय-१७ हेलिकॉप्टर यांनी जंगल परिसरात वारंवार घिरट्या घालून शोध आरंभला आहे. मात्र अद्याप त्यांच्या या प्रयत्नांना यश आलेले नाही. ही माहिती सरकारी प्रवक्त्याने दिली.
इस्रोची मदत घेणार
गायब झालेल्या हेलिकॉप्टरचा कसून शोध सुरू असून, आता शोधासाठी इस्त्रोची मदत घेण्यात येणार आहे. या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते अरुणाचल प्रदेशातील तवांग या भागाजवळ, परंतु भूतानच्या हद्दीत उतरवावे लागले, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून सुरवातीस सांगण्यात आले; मात्र ही माहिती चुकीची असल्याचे शनिवारी सायंकाळी स्पष्ट करण्यात आले. हेलिकॉप्टर अजूनही बेपत्ता असल्याचे केंद्रीय गृहसचिव गोपाल के. पिल्ले यांनी सांगितले. खंडू यांच्या शोधासाठी इस्त्रोची मदत घेण्यात येणार असून, त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर कोणत्या परिस्थितीत आहे याची माहिती मिळणार असल्याचे पिल्ले यांनी सांगितले. मुख्यमंत्री खांडू यांच्यासोबत तवांगचे आमदार त्सेवांग धोंडूप यांची बहीण येशी लामू, सुरक्षारक्षक येशी चोड्डक असे दोघे जण, तसेच हेलिकॉप्टरमधील कर्मचारी कॅप्टन जे. एस. बब्बर व कॅप्टन के. एस. मलिक आहेत.
एकाच इंजिनचे हेलिकॉप्टर
पवनहंसच्या ज्या हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री दोरजी खांडू हे तवांगहून इटानगरला येत होते त्या हेलिकॉप्टरला केवळ एकच इंजिन आहे. अशी जुनाट झालेली हेलिकॉप्टर्स प्रामुख्याने ईशान्येकडील राज्यांना उपलब्ध करून दिल्यामुळे मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

म्हायमोळे वास्कोत ४.५० लाखांची चोरी

वास्को, दि. १ (प्रतिनिधी)
घरात कोणीही नसल्याची संधी साधत म्हायमोळे, वास्को येथील श्रीराम शेट्ये यांच्या फ्लॅटच्या मुख्य दरवाजाची कडी तोडत चोरट्यांनी सोन्याचे ऐवज व रोख रक्कम मिळून चार लाख पन्नास हजाराची मालमत्ता लंपास केली. काल (दि. ३०) रात्री ७ ते आज सकाळी ८ च्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला. काल श्री. शेट्ये यांची पत्नी मुलासह माहेरी तर श्रीराम हे मित्राकडे राहण्यास गेले. सकाळी ते फ्लॅटवर येऊन पाहतात तेव्हा हा प्रकार त्यांना दिसला. वास्को पोलिसांना याबाबत त्यांनी माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली अशता बेडरूममधील दोन कपाटे फोडून आतील सामान लंपास केल्याचे समजले. यात दोन सोन्याचे तोडे, दोन जोडी सोन्याच्या बांगड्या, सोन्याची सरफळी, चार सोन्याच्या अंगठ्या तसेच इतर सोन्याचे ऐवज व चार हजारांची रोख रक्कम मिळून एकूण ४ लाख ५० हजारांच्या मालमत्तेचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाबाबत कुठल्याच प्रकारचा शोध लागू शकला नाही. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला असून निरीक्षक ब्राज मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जॉन फर्नांडिस तपास करीत आहेत.

Sunday, 1 May, 2011

तिलारी धरणग्रस्त आज पाणी अडवणारच!

अटकाव केल्यास कालव्यातच जलसमाधी घेण्याचा इशारा
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांतील सरकारांनी तिलारी धरणग्रस्तांचा अक्षरशः ‘फुटबॉल’ केला आहे. महाराष्ट्र सरकार कराराप्रमाणे धरणग्रस्तांना आपण नोकर्‍या दिल्याचे सांगत असून गोव्याचे मुख्यमंत्री या कराराबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे या दोन सरकारांत कोंडी झालेल्या तिलारी धरणग्रस्तांनी आता आक्रमक पवित्रा घेण्याचा ठाम निर्धार केला असून दोन्ही सरकारला निवेदने दिल्याप्रमाणे उद्या दि. १ मे रोजी कालव्याचे पाणी अडवणारच, असे प्रतिपाादन तिलारी धरणग्रस्त संघर्ष समितीचे सचिव संजय नाईक यांनी केले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी परवा तिलारी धरणग्रस्तांबाबत बोलताना, आपणास एखादा करार झाल्याचे ठाऊकच नाही; तिलारी धरणग्रस्त गेली २० वर्षे कुठे होते, अशी वक्तव्ये केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यांबद्दल संजय नाईक यांनी खेद व्यक्त केला असून दीड महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी कराराप्रमाणे नोकर्‍या देण्याचे आश्‍वासन संघर्ष समितीला दिले होते, अशी माहिती दिली. आता करार झाल्याचे माहीत नाही, असे म्हणून मुख्यमंत्री कामत सर्वांचीच दिशाभूल करत असल्याचे ते म्हणाले.
सविस्तर वृत्तानुसार, तिलारी धरणाचे ७३ टक्के पाणी गोव्याला मिळणार असल्याने गोव्याने ७३ टक्के धरणग्रस्तांना नोकर्‍या द्याव्यात असा करार १९९० साली दोन्ही सरकारांत झाला होता. मात्र गोव्याचे मुख्यमंत्री या कराराबाबत आपण अनभिज्ञ आहोत असे सांगत आहेत तर जलस्रोत मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीज हे मात्र असा करार झालाय हे मान्य करून नोकर्‍या देण्याबाबत विचार करू, अशी सारवासारव करत आहेत. दुसर्‍या बाजूने आपण धरणग्रस्तांना करारानुसार २७ टक्के नोकर्‍या दिल्याचे सांगून महाराष्ट्र सरकार या प्रकरणी आपली जबाबदारी संपल्याचे सांगत आहे. गेली २० वर्षे हे लोक गोवा सरकारने आपल्याला नोकर्‍या द्याव्यात म्हणून प्रयत्न करत आहेत.
आज पाणी अडवणारच!
दरम्यान, अनेक निवेदने देऊनही नोकर्‍या देण्याबाबत गोवा सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याने तिलारी संघर्ष समितीने उद्या १ मे या महाराष्ट्र राज्यदिनी गोव्याला मिळणारे पाणी अडवण्याचा निर्धार केला असून या आंदोलनात अटकाव करण्याचा प्रयत्न झाल्यास कालव्यात जलसमाधी घेण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. त्यांच्या या पवित्र्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अण्णा हजारे ७ रोजी गोव्यात

भ्रष्टाचाराविरोधात आसूड उगारणार!
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): देश पातळीवर भ्रष्टाचाराविरोधात खणखणीत आवाज उठवलेले राळेगणसिद्धीचे ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय अण्णा हजारे हे येत्या ७ मे रोजी गोव्यात येणार आहेत. त्याच दिवशी आझाद मैदानावर संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी मॅगासेसे पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल आणि स्वामी अग्निवेश यांचीही खास उपस्थिती असेल. या सभेचे आयोजन ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ने केले आहे.
सदर जाहीर सभेत जन लोकपाल विधेयकाचे समर्थन, गोव्याच्या संदर्भात लोकायुक्त विधेयकाविषयक मार्गदर्शन आणि पंचायतराज व ग्रामसभांचे लोकशाहीत योगदान या विषयी प्रबोधन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ७ मे रोजी मडगाव, वास्को येथेही अशाच स्वरूपाचे कार्यक्रम होणार आहेत. त्यांचा तपशील नंतर जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
सध्या अण्णा हजारे गुडघेदुखीने त्रस्त आहेत. त्यांच्यावर पुण्यातील संचेती इस्पितळात उपचार सुरू आहेत. असे असूनही गोव्याला भेट देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी गोवा सज्ज होत असून या भेटीत ते भ्रष्टाचारावर कसा आसूड उगारतात या विषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या या जाहीर सभेला नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला अण्णांनी आपल्या उपोषणाच्या माध्यमातून धडकी भरवल्याची घटना ताजीच आहे. केवळ त्यांच्या या कृतीमुळेच आता लोकपाल विधेयकाचा मुद्दा तडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशाच्या इतर भागांप्रमाणेच गोव्यातही सध्या भ्रष्टाचाराने प्रचंड थैमान घातले आहे. तो रोखण्यासाठी अण्णा हजारे कोणता संदेश देतात हे ऐकण्याची उत्सुकता गोमंतकीयांना लागून राहिली आहे.

मगोची फरफट राष्ट्रवादीच्या पथ्यावर?

यावेळी जादा जागांवर दावा करणार
पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): मगो पक्षाची संघटनात्मक फरफट सुरू असतानाच त्याचा लाभ उठवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आता पुढे सरसावला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुरेंद्र सिरसाट यांनी आपल्या वैयक्तिक राजकीय संबंधांचा उपयोग पक्षासाठी करून देण्याची व्यूहरचना आखली आहे. विविध ठिकाणी दुर्लक्षित राहिलेल्या मगो कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करून पक्षाचा विस्तार चाळीसही मतदारसंघांत करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गेल्या वेळापेक्षा जादा जागांवर दावा करण्याचा विचार चालवला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला सहा जागा आल्या होत्या. यावेळी मात्र या जागा वाढवून घेण्यासाठी त्यांनी राज्यातील बिगर कॉंग्रेस मतदारसंघांकडे आपले लक्ष्य केंद्रित केले आहे. बिगर कॉंग्रेस मतदारसंघांत पक्ष प्रबळ उमेदवारांच्या शोधात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. प्रा. सुरेंद्र सिरसाट यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी सध्या सर्व मतदारसंघांत गट समित्या स्थापन करण्याचे काम जोरात सुरू असल्याचे सांगितले. उत्तर गोव्यातील बहुतांश गट समित्यांची स्थापना करण्यात आली असून दक्षिण गोव्याचे काम सुरू आहे. पुढील आठवड्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंबंधीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली जाईल, असेही प्रा. सिरसाट म्हणाले.
थिवी, बाणावली, वास्को, म्हापसा, शिवोली व साळगाव हे मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्यात आले होते. उत्तर गोव्यात पर्वरी हा नवा मतदारसंघ तयार झाल्याने राष्ट्रवादी निश्‍चितच या मतदारसंघावर दावा करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षाचे आमदार मिकी पाशेको यांनी नुवे मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. नुवे मतदारसंघासह बाणावली मतदारसंघाचा दावाही ते सोडणार नसल्याचे त्यांनी ठासून सांगितल्याने तो देखील कळीचा मुद्दा ठरणार आहे.
कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी आमदारांची कोंडी
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा विद्यमान आघाडीचा महत्त्वाचा घटक असला तरी या पक्षाची ताकद वाढता कामा नये यासाठी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादीच्या आमदारांची जबर कोंडी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मिकी पाशेको यांच्यावर एकापाठोपाठ एक गुन्हेगारी प्रकरणे दाखल केली जात आहेत. महसूलमंत्री जुझे फिलिप डिसोझा यांची मुरगांव पालिकेच्या माध्यमाने दमछाक करण्याचा सपाटा लावला आहे. पर्यटनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या मागेही ससेमिरा लावण्याचे घाटत असल्याची खबर आहे. कांदोळी समुद्रकिनार्‍यावरील रिव्हर प्रिन्सेस जहाज हटविण्याचे काम सुरू झाले आहे. या जहाजाबाबतचे सर्व निर्णय राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घेतले जातात. परंतु या निर्णयांची कार्यवाही मात्र पर्यटन खात्यामार्फत केली जाते. खुद्द या प्राधिकरणावर पर्यटनमंत्र्यांना स्थान नाही. प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयांना मान्यता देण्याचे काम त्यांच्याकडून करवून घेत असल्याचेही कळते. रिव्हर प्रिन्सेसच्या भंगारावरून निर्माण झालेला वाद कळीचा मुद्दा बनल्याचीही खबर आहे. भंगारासाठी निविदेव्दारे प्रस्ताव मागवण्याच्या नीळकंठ हळर्णकर यांच्या मागणीला फाटा देऊन हे कंत्राट अरीहंत कंपनीलाच देण्याचा निर्णय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडून घेण्यात आला. आता रिव्हर प्रिन्सेसच्या सर्व व्यवहारांना उत्तर देण्याचे उत्तरदायित्व मात्र पर्यटनमंत्री या नात्याने त्यांच्याकडे राहणार असल्याने ते काहीसे नाराज बनल्याचेही कळते.

अरुणाचलचे मुख्यमंत्री सुखरूप

बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर भूतानमध्ये उतरले
इटानगर, दि. ३० : अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना घेऊन तवांग येथून इटानगरकडे निघालेले हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची भीती सुदैवाने खोटी ठरली आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे सुखरूप असून हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते भूतानमध्ये उतरविण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.
तवांग येथून आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास खांडू यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला व या हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क तुटला. मात्र, त्यानंतर हेलिकॉप्टर तवांगच्या जवळच परंतु, भूतानच्या भूमीवर उतरवण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले. पवनहंस हेलिकॉप्टरच्या बी-३ जातीच्या या हेलिकॉप्टरमध्ये खांडू यांच्याव्यतिरिक्त दोन प्रवासी आणि चालक दलाचे दोन सदस्य होते. खांडू यांचे हेलिकॉप्टर दोपोरिजो येथे उतरवण्यात आले, अशी माहिती कोलकातास्थित संरक्षण खात्याच्या सूत्राने दिली. खांडू यांच्यासोबत लामू या त्यांच्या नातेवाईक, त्यांचे सुरक्षा अधिकारी छोडक, कॅप्टन बब्बर व कॅप्टन माणिक हे चालक दलाचे सदस्य होते.

‘पीएसी’ अहवाल सभापतींना सादर

नवी दिल्ली, दि. ३० : २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासाचा मसुदा अहवाल कॉंग्रेस, द्रमुक, सपा व बसपा सदस्यांनी ङ्गेटाळून लावल्यामुळे जराही विचलित न होता लोकलेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आपला मसुदा अहवाल लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांच्याकडे सादर केला. डॉ. जोशी यांचा पीएसीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज संपत आहे, हे विशेष.
डॉ. जोशी यांनी एका पत्रासह हा मसुदा अहवाल अधिकार्‍यांच्या माध्यमातून मीरा कुमार यांच्या कार्यालयाकडे पाठविला असल्याचे लोकसभेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. पीएसीच्या सोमवारी झालेल्या वादळी बैठकीत पंतप्रधान कार्यालय आणि तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांच्यावर ताशेरे ओढणारा हा अहवाल बहुमताच्या जोरावर ङ्गेटाळून लावण्यात आला होता. आपण ही बैठक तहकूब केल्याचा दावा डॉ. जोशी यांनी केला होता, तर याउलट डॉ. जोशी बाहेर निघून गेल्याने सैङ्गुद्दीन सोझ यांची पीएसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे कॉंग्रेस सदस्यांचे म्हणणे आहे.
अहवाल संसदेत मांडला जावा : डॉ. जोशी
दरम्यान, पीएसीचा अहवाल ङ्गेटाळून लावण्यात आला असल्याचा संपुआ सदस्यांचा दावा डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी खोडून काढला असून, लोकसभेच्या सभापती मीरा कुमार हा अहवाल स्वीकारून तो संसदेत सादर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. समितीच्या ११ सदस्यांनी हा अहवाल ङ्गेटाळला असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आणि घटनाबाह्य आहे, असे डॉ. जोशी अहवाल सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
घटनेने अधिकार दिलेल्या पीएसीसारख्या समितीच्या कारभारात अडथळे आणण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे, असा आरोप डॉ. जोशी यांनी यावेळी केला आणि या समितीने एखाद्या पक्षाच्या धोरणानुसार कार्य करावे अशी अपेक्षा आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला. समितीपुढे साक्ष देणार्‍या साक्षीदारांना सत्तारूढ सदस्यांनी कुठल्याही प्रश्‍नाचे उत्तर देण्यास मनाई केली होती, असा गौप्यस्ङ्गोटही डॉ. जोशी यांनी यावेळी केला. समितीनेच साक्षीदारांना साक्ष देण्यास मनाई केल्यास प्रश्‍नोत्तरास काही अर्थच उरत नाही. त्यामुळे पीएसीच्या सदस्यांनी ज्या प्रकारचे वर्तन केले ते अत्यंत दुर्दैवी आहे, असेही ते पुढे म्हणाले.

राज्यसभेसाठी खलप उत्सुक

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): राज्यसभेसाठी आपली निवड झाली तर आपल्याला ते निश्‍चितच आवडेल. परंतु, त्यासाठी कॉंग्रेस श्रेष्ठी व स्थानिक नेत्यांची पसंती मिळणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया राज्य कायदा आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केली. सर्वसंमतीने तसा प्रस्ताव सादर झाला तर आपण तो निश्‍चितच स्वीकारू, असेही ते म्हणाले.
गोव्यातील एकमेव राज्यसभा खासदारपदाची मुदत ३० जून २०११ रोजी संपत आहे. खासदार शांताराम नाईक यांच्याकडे असलेल्या या पदासाठी कॉंग्रेस पक्षातील अनेक नेते उत्सुक आहेत. पण अजून दोन महिन्यांचा अवधी असल्याने त्याबाबत कुणीही उघड भूमिका घेत नसल्याचेच दिसून येते. खासदार शांताराम नाईक हे आपली पुन्हा एकदा या पदासाठी वर्णी लागावी यासाठी प्रयत्नरत आहेत. सभापती प्रतापसिंग राणे यांनाही या पदाची ‘ऑफर’ कॉंग्रेस श्रेष्ठींकडून मिळण्याची शक्यता कॉंग्रेस सूत्रांकडून वर्तवली जाते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडूनही आपले महत्त्व वाढवले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या विधानसभेतील संख्याबळ कॉंग्रेस- २०, भाजप-१४, मगो-२ व अपक्ष-१ असे आहे. या परिस्थितीत कॉंग्रेससमोर आव्हान उभे करण्यासाठी भाजपकडून आघाडीतील इतर घटकांच्या सहकार्याने सामंजस्य उमेदवार पुढे केला जाण्याचाही संभव आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी राज्यसभेच्या जागेबाबत योग्य वेळी आपला पत्ता उघड करणार असल्याचे सांगितले.

डॉ. प्रमोद सावंत आयुर्वेद कौन्सिलवर

पणजी, दि. ३० (प्रतिनिधी): गोव्यात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या सेंट्रल कौन्सिल ऑफ आयुर्वेदच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत. राज्य आरोग्य संचालनालयाच्या कांपाल पणजी येथील मुख्यालयात घेण्यात आलेल्या या निवडणुकीत गोव्यातील २९७ आयुर्वेद डॉक्टरांनी भाग घेतला. यात डॉ. प्रमोद सावंत यांना १८९ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. महेश वेर्लेकर यांना १०८ मते प्राप्त झाली.
सेंट्रल कौन्सिल ऑफ आयुर्वेद ही संघटना देशातील आयुर्वेद डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करत असून गोव्यातील एकमेव जागेसाठी ही निवडणूक पहिल्यांदाच घेण्यात आली. त्यात डॉ. सावंत यांनी बाजी मारली
‘‘भोंदू डॉक्टरांवर कारवाई करणार’’
गोव्यात आयुर्वेदाच्या कायदेशीर पदव्या न घेताच रुग्णांवर उपचार करणार्‍या भोंदू डॉक्टरांवर कारवाई करण्यावर आपण सर्वप्रथम भर देणार आहोत. तसेच गोव्यातील आयुर्वेद डॉक्टरांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याबरोबरच त्यांना केंद्रीय मदत मिळवून देणे, गोवा सरकारचे आयुर्वेद डॉक्टरांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करून त्या सोडवणे, राज्यात आयुर्वेद केंद्र स्थापन व्हावे यासाठी प्रयत्न करणे व शिरोडा येथील आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद पदव्युत्तर शिक्षणाची सोय व्हावी यासाठी पावले उचलणे आदी कामे आपण प्राधान्यक्रमाने करणार असल्याचे डॉ. प्रमोद सावंत यांनी निवडून आल्यानंतर सांगितले. आपणास निवडून देणार्‍या सर्वांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

गोल्फ कोर्स ठरणार तेरेखोलसाठी वरदान!

प्रकल्पासाठी कंपनीची निवड
पणजी,द. ३० (प्रतिनिधी): गोवा मुक्त होऊन पन्नास वर्षे उलटली तरीही विकासापासून पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेल्या पेडणे तालुक्यातील तेरेखोल गावाचा चेहरामोहराच बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा गोल्फ कोर्स प्रकल्प या गावात उभारला जाणार असून त्यासाठी ‘लीडिंग हॉटेल्स प्रा. ली.’ कंपनीची निवड करण्यात आली आहे.
पर्यटन खात्याचे संचालक स्वप्निल नाईक यांनी ही माहिती दिली. या नियोजित गोल्फ कोर्ससाठी काही दिवसांपूर्वी खात्यातर्फे जागतिक इच्छा प्रस्ताव मागवण्यात आले होते. हे प्रस्ताव खोलण्यात आले असून त्यात लीडिंग हॉटेल्स प्रा.लि. कंपनीची निवड करण्यात आली. या स्पर्धेत डीएलएफ व ऑक्सफर्ड प्रॉपर्टीज कंपन्यांचाही समावेश होता. निवड झालेल्या कंपनीला विस्तृत प्रस्ताव सादर करण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल व त्याचे व्यवस्थापन या क्षेत्रातील एका नामांकित समूहाच्या मदतीने केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
तेरेखोल हा गाव गोव्याचाच एक भाग असूनही तो तेरेखोल नदीमुळे पैलतीरी वसलेला आहे. केरी व पालये येथून फेरीबोटीच्या मदतीने या गावात जाण्याची सोय आहे. बहुतांश ख्रिस्ती बांधव वास्तव्य करीत असलेल्या या गावाला वीज महाराष्ट्र राज्यातून देण्यात आली आहे. गोवा मुक्ती लढ्याचा साक्षीदार असलेला तेरेखोल किल्लाही या गावात असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या गावाचा विकास करण्यास मोठा वाव आहे. हा गाव खर्‍या अर्थाने गोव्याला जोडण्यासाठी इथे पुलाची गरज असल्याची मागणी मांद्रेचे आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सातत्याने लावून धरली होती. यंदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही मागणी सरकारने मान्यही केली आहे. या गावात एक मोठा हॉटेल प्रकल्प उभारला जात असून त्यावरून गेल्या काही काळापासून हा गाव बराच चर्चेत आहे. या संपूर्ण गावाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचे सरकारने ठरवले आहे. पेडणेच्या प्रादेशिक आराखड्यात तेरेखोल येथे नियोजित गोल्फ कोर्ससाठीची जागा दाखवण्यात आली आहे. एकूण १५० एकर जमिनीत हा गोल्फ कोर्स उभारण्यात येणार असून उर्वरित ५० एकर जागा संबंधित सुविधांसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला एकही पैसा खर्च करण्याची गरज नसून तो ‘पीपीपी’ तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्याकडे वळतील, असा विश्‍वासही पर्यटन खात्याने व्यक्त केला आहे.