निर्णय चुकीचाच याची प्रचिती आणून द्या : काकोडकर
पणजी, दि. ४ (प्रतिनिधी): भारतीय संस्कृती व देशी भाषा यांच्याप्रति स्वाभिमान असलेल्या प्रत्येक गोमंतकीयाने ६ रोजीच्या बंदात स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे व इंग्रजी माध्यमाच्या निर्णयाला कडाडून विरोध करून कामत सरकारला आपल्या चुकीच्या निर्णयाची प्रचिती आणून द्यावी, असे आवाहन भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर यांनी केले. सरकारच्या या निर्णयाला विरोध करणार्या प्रत्येक आमदाराने रस्त्यावर उतरून आपली प्रामाणिकता सिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीमती काकोडकर बोलत होत्या. यावेळी प्रा. सुभाष वेलिंगकर, नरेंद्र आजगावकर, पुंडलीक नाईक, भिकू पै आंगले, अरविंद भाटीकर, नागेश करमली, फादर माऊझिन आताइस आदी मान्यवर हजर होते. ६ जून रोजी पुकारण्यात आलेला बंद हा जनतेचा निर्णय आहे व जनताच हा बंद यशस्वी करून सरकारला उघडे पाडणार, असा विश्वास श्रीमती काकोडकर यांनी व्यक्त केला.
विरोधी आमदाराने रस्त्यावर उतरावे
कॉंग्रेसचे काही आमदार, मगो व राष्ट्रवादीनेही या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी जाहीररीत्या या आंदोलनात सहभागी होऊन आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी अन्यथा त्यांचा या प्रकरणी दुटप्पीपणा उघड होईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. भाजप, शिवसेना तसेच भारत स्वाभिमान व अन्य सुमारे अडीचशे संस्थांनी या बंदाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. गोवा बंद मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने जाणीवपूर्वक ६ रोजीच शाळा सुरू करण्याचा निर्धार केला आहे. पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्याचा विचार करून स्वतःहून आपल्या पाल्यांना या दिवशी शाळेत न पाठवता या बंदाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन विनंती श्रीमती काकोडकर यांनी केले.
इंग्रजी माध्यमाच्या निर्णयासंबंधी सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. इंग्रजीशिवाय पर्यायच नाही, इंग्रजीशिवाय विद्यार्थ्यांची प्रगतीच होऊ शकत नाही, असा आभास निर्माण करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांत अनेक उच्चशिक्षितांचा समावेश आहे. या उच्चशिक्षितांपैकी अनेकांनी देशी भाषेतूनच प्राथमिक शिक्षण घेतले आहे व त्यामुळे अशा अपप्रचाराला अजिबात बळी पडू नका, असेही श्रीमती काकोडकर म्हणाल्या. मातृभाषेचे प्राथमिक शिक्षणातील महत्त्व पटवून देण्यासाठी मंच यापुढे राज्यव्यापी जागृती मेळावे भरवणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना मराठी चित्रपट महोत्सवावेळी उपस्थित प्रेक्षकांनी दिलेली चपराक सत्य परिस्थितीची जाणीव करून देण्यास पूरक ठरली आहे. निदान आता तरी त्यांनी सत्याची बूज राखावी व हा निर्णय रद्द करावा, असे आवाहन पुंडलीक नाईक यांनी केले. मातृभाषेतून शिक्षण मिळाले तरच विद्यार्थ्यांत नीतिमूल्यांचे संस्कार पेरता येतील. दिल्लीत बैठक झाली त्यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या निमंत्रक तथा माजी मुख्यमंत्री या नात्याने दिगंबर कामत यांनी थेट ताईंशी संपर्क साधायला हवा होता, असेही ते म्हणाले.
पोलिसांकडून दबावाचे प्रयत्न
गोवा बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून डिचोली व पर्वरी भागांतील काही ठिकाणी कार्यकर्त्यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. या कृतीकरवी लोकांनी या बंदात सहभागी होऊ नये, असाच प्रयत्न सुरू असल्याची टीका प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली. मातृभाषेची ओढ असलेल्या कार्यकर्त्यांवर या दबावाचा अजिबात परिणाम होणार नाही व त्यामुळे हा बंद मोडून काढण्याची सरकारची स्वप्ने धुळीस मिळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी भिकू पै आंगले, अरविंद भाटीकर, नागेश करमली आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
Sunday, 5 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment