Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 22 May, 2010

नेत्याचा 'तो' पुत्र कोण याचा पर्दाफाश 'लकी' करणार..!

तपास यंत्रणेसमोर बाका पेचप्रसंग
पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): गोव्यातील अमली पदार्थ व्यवसायात गुंतलेला राजकीय नेत्याचा "तो' पुत्र कोण याबद्दल अधिक संकेत "अटाला'ची माजी प्रेयसी लकी फार्महाऊस हिने "ई मेल'द्वारे दिलेल्या मुलाखतीत दिल्याने याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांसमोर बाका पेच निर्माण झाला आहे. या व्यवसायात गुंतलेली कोणतीही व्यक्ती असल्यास आणि त्याचे पुरावे मिळाल्यास आम्ही त्याची चौकशी करू, असे यापूर्वीच सीआयडी'चे उपअधीक्षक चंद्रकांत साळगावकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे "लकी' ची जबानी नोंद होताच "त्या' राजकीय पुत्राची चौकशी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
"मी केवळ त्याच्या मुलालाच भेटली आहे. तो प्रत्येक दिवशी आमच्या शिवोली येथील घरी अटाला याला भेटायला येत होता. सर्वजण त्याला ओळखतात,' असे लकी हिने एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे. आपल्याकडे असलेले पुरावे मिळवण्यासाठी गोवा पोलिस कोणतेच विशेष प्रयत्न करीत नसल्याचा आरोपही तिने केला आहे. या राजकीय पुत्रासंदर्भातील सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही तिने केला आहे.
"मी त्यांना येत्या ऑगस्ट महिन्यात जबाब नोंदवण्यासाठी गोव्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तथापि, पोलिसांनी मला त्वरित बोलावल्यास मी उद्याही येऊ शकते. अर्थात, मला माहिती आहे ते तसे करणार नाही' असेही तिने म्हटले आहे.
लकी या स्वीडिश तरुणीने संकेतस्थळावर ड्रग माफिया आणि पोलिसांचे असलेल्या गुप्त व्यवहाराचा भांडाफोड केला होता. त्यामुळे एका पोलिस निरीक्षकासह सहा पोलिसांवर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात अजूनही काही अडचणी येण्याची शक्यता असून गुन्हा अन्वेषण विभागाने एक पोलिस उपअधीक्षक आणि अन्य एका पोलिस उपनिरीक्षकाची जबानी नोंद करून घेतली आहे.

दोन अपघातांत दोघे मृत्युमुखी

फोंडा, दि.२१ (प्रतिनिधी): कुंडई औद्योगिक वसाहतीत गुरुवार २० मे रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास मोडलेले विजेचे खांब बदलण्याचे काम सुरू असताना घडलेल्या एका दुर्घटनेत वीज खात्याचा एक कामगार ठार आणि एक जखमी झाला आहे. देविदास गावडे असे मयत कामगाराचे नाव असून तो वेलिंग म्हार्दोळ येथील रहिवासी आहे. दरम्यान,अनमोड घाटात आज (दि.२१) संध्याकाळी सव्वा तीनच्या सुमारास कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकल चालक सुनील श्याम कुलकर्णी (२३, रा. तळावली नावेली मडगाव) या युवकाचा मृत्यू झाला.
कुंडई औद्योगिक वसाहतीत २० रोजी सकाळी एका ट्रकाने वीज खांबांना धडक दिल्याने अनेक खांब मोडले होते. एका खांबाच्या बाजूला ट्रक कलंडलेल्या स्थितीत होता. संध्याकाळच्या वेळी कलंडलेल्या ट्रकाच्या जवळील खांब बदलण्यात येत असताना सदर ट्रक दोरीच्या संपर्कात आल्याने रस्त्यावर आडवा झाला. यावेळी वीज खात्याचे दोघे कामगार ट्रकच्या खाली सापडले. त्यातील एकाला वाचविण्यात कुंडई येथील अग्निशामक दलाच्या जवानांना यश प्राप्त झाले आहे. देविदास चिरडला गेल्याने तो मरण पावला. याप्रकरणी फोंडा पोलिस तपास करीत आहेत. वीज खात्याच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
अनमोड घाटातील अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कार बेळगाव येथून गोव्यात येत होती. तर मोटरसायकल बेळगावच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या दोन्ही वाहनांत जोरदार धडक झाल्याने मोटरसायकलचा चालक सुनील हा गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून फोंडा येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असताना त्याचा वाटेत मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुळे पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गावस, हवालदार पाटील, शिपाई रघुनाथ गावंस यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

राजकीय नेत्याच्या मैत्रिणीची प्रकृती आणखीनच खालावली

नव्याने जबानीसाठी पोलिस अधिकारी मुंबईला रवाना
पणजी, मडगाव दि. २१ (प्रतिनिधी): ठाणे मुंबई येथील इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या दक्षिण गोव्यातील "त्या' राजकीय नेत्याच्या मैत्रिणीची तब्येत अधिक खालावली असून तिचे "यकृत' बदलावे लागणार असल्याची सूचना डॉक्टरांनी केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, त्या नेत्यानेही मुंबईला धाव घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर २७ वर्षीय तरुणीने कोलगेट समजून "रेटॉल' घेतल्याची जबानी यापूर्वी दिली असून तिची जबानी पुन्हा नोंद करून घेणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी अनुभवी पोलिस निरीक्षक राजू राऊत देसाई यांना तातडीने मुंबईला पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, त्या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने मायणा कुडतरी पोलिसांनी तिच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. सकाळी तोंड धुण्यासाठी चुकून कोलगेट समजून रेटॉल तोंडात घेतले तर, त्वरित उपचार घेण्यासाठी त्या तरुणीला इस्पितळात का नेण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सायंकाळीच हे विषप्राशन केले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची खासियत म्हणजे अद्याप कोणाकडून तक्रार आलेली नसताना पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा नोंदवला आहे. एखाद्या प्रकरणात पोलिस खाते इतके तत्पर होण्याची ही पहिलीच घटना मानली जाते! तिच्यावर अजूनही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यावर याप्रकरणी चौकशीसाठी ठाणे येथे गेलेले पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांना तेथे विशेष काही हाती लागलेले नव्हते. त्यानंतर ते परतले होते.
यापूर्वी ठाणे पोलिसांनी तेथील महिला न्यायदंडाधिकाऱ्यांकरवी सदर महिलेची जबानी नोंदवली आहे. तिने आपण कोलगेट समजून रेटॉल घेतल्याचे सांगितले होते.

अफझल गुरुबाबत आता गृहमंत्रालय निर्णय घेईल

केंद्राकडून टोलवाटोलवी सुरूच
नवी दिल्ली, दि. २१ : संसदेवरील हल्ल्याचा मुख्य आरोपी अफझल गुरू याच्या दयेच्या अर्जावर गृहमंत्रालयाला निर्णय घ्यायचा असल्याचे प्रतिपादन दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केले आहे.
गुरुच्या दयेच्या अर्जाबाबत दिल्ली सरकारकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत आहेत. त्यातच आज शीला दीक्षित म्हणाल्या की, आम्ही अफझल गुरूची फाईल नायब राज्यपालांकडे पाठविली होती. ते या फाईलवर आपला शेरा मारून गृहमंत्रालयाकडे पाठवतील. अखेरचा निर्णय गृहमंत्रालयालाच घ्यायचा आहे.

फ्रेंच ओपनसाठी सोमदेव पात्र..!

पॅरिस, दि. २१ : येथील रोलॅंड गॅरोसवर येत्या २३ पासून सुरू होत असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेसाठी भारताचा गुणवंत टेनिसपटू सोमदेव देवबर्मन पात्र ठरला आहे. एखादा भारतीय टेनिसपटू या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मुख्य "ड्रॉ'मध्ये खेळण्याचा शर्करायोग तब्बल तेरा वर्षांनंतर आला आहे. पात्रता सामन्यात सोमदेव याने ऍड्रियन मॅनारिनो या स्थानिक खेळाडूचे आव्हान ६-४, ६-१ असे सहजगत्या मोडून काढले ते एक तास व २५ मिनिटांत. पात्रता फेरीसाठी सोमदेव याला सहावे मानांकन देण्यात आले होते. यापूर्वी १९९७ मध्ये भारताचा हरहुन्नरी टेनिसपटू लिएँडर पेस हा मातीच्या कोर्टवर खेळवल्या जाणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर पेसने केवळ दुहेरीवरच आपले सारे लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे एकेरीतील मानांकन घसरले आहे.
गेल्या वर्षी सोमदेव याने आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवताना अमेरिकन खुल्या स्पर्धेतील मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याचा मान संपादन केला होता. एवढेच नव्हे तर त्याने विजयी सलामीसुद्धा दिली होती. मात्र पुढच्या फेरीत त्याचे आव्हान आटोपले होते. यंदा महिला विभागात सानिया मिर्झा खेळणार नाही. तथापि, सोमदेवच्या रूपाने भारतीय आव्हान फ्रेंच स्पर्धेत असेल हाच काय तो दिलासा.

Friday, 21 May, 2010

अयोध्यप्रश्नी सीबीआयची याचिका फेटाळली

केंद्र सरकारला जोरदार चपराक, अडवाणी, ठाकरेंसह २१ नेत्यांना दिलासा

लखनौ, दि. २० - अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्यासह २१ जणांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे खटले चालवण्यासाठी सीबीआयने दाखल केलेली पुनर्विचार याचिका आज अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने फेटाळून लावली. त्यामुळे प्रामुख्याने सीबीआयला जोरदार चपराक बसली असून अडवणींसह अन्य नेत्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी, बजरंग दलाचे नेते विनय कटियार, उमा भारती, विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी सिंहल आदी नेत्यांचाही त्यामध्ये समावेश होता. वास्तविक ४ मे २००१ रोजी खालच्या न्यायालयाने या २१ जणांविरुद्ध खटले समाप्त केले जावेत, असा आदेश दिला होता. मात्र सीबीआयने या आदेशाला अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळली गेल्यामुळे सीबीआयला आज जोरदार चपराक बसली.
सोळाव्या शतकात उभारण्यात आलेली बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त झाली होती. त्या घटनेला आता १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. जर बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमानच वाटतो, असे उद्गार तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते. जेव्हा ही मशीद पडली तेव्हा पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान होते.
आपल्या ४४ पानी निवाड्यात न्यायमूर्ती अलोककुमार सिंग यांनी म्हटले आहे की, खालच्या न्यायालयाने यासंदर्भात दिलेला निकाल पुरेसा स्पष्ट आहे. त्यात आम्हाला कोणत्याही स्वरूपाच्या त्रुटी आढळल्या नाहीत. अडवाणी आणि अन्य नेत्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे खटले चालवावेत, यासाठी कोणताही ठोस पुरावा सरकार पक्षाला तेव्हा सादर करता आला नव्हता. त्यामुळे या सर्व नेत्यांविरुद्धचे आरोप खालच्या न्यायालयाने रद्दबातल ठरवले होते.
भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या अन्य २६ छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांविरुद्ध सुरू असलेले खटले मात्र सुरूच राहणार आहेत.
सीबीआयची याचिका फेटाळण्यात आल्याच्या घटनेचे भारतीय जनता पक्षाने जोरदार स्वागत केले आहे. दरम्यान, सदर याचिका फेटाळण्यात आल्यानंतर त्यास आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाणार काय, याबद्दल सीबीआयकडून काहीही सांगण्यात आले नाही.

देवणामळ येथे गाडीच्या धडकेने विद्यार्थिनी ठार

खाण परिसरातील गाडीने घेतला बळी

कुडचडे, दि. २० (प्रतिनिधी) - देवणामळ-काले येथे आज संध्याकाळी ४.१५ च्या दरम्यान केए ३५-एम-३६४६ क्रमांकाच्या बोलरो गाडीने जोराने धडक दिल्याने दिव्या प्रकाश नाईक (११ वर्षे) ही दुसऱ्या इयत्तेत शिकणारी मुलगी जागीच ठार झाली.
कुडचडे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्याच्या एका बाजूने चालणाऱ्या लहान मुलीला भरधाव वेगाने धावणाऱ्या बोलेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने ती जागीच पडून ठार झाली. हीच गाडी पुढे जाऊन एका झाडाला धडकली. अपघातानंतरही ही गाडी पुढे निघाल्याने लोकांनी पाठलाग केला. सुमारे एक किलोमीटर अंतरावर ती गाडी रोखण्यात आली. त्या गाडीतील तिघांना लोकांनीच घटनास्थळी आणले.
खाणीवरील पाण्याचा टॅंकर बंद पडल्याने तंत्रज्ञासह बोलेरो गाडीतून त्या टॅंकरचा शोध घेतला जात होता. केवळ अडीज मीटर रुंदीच्या ग्रामीण भागातील रस्त्यावरून भरधाव वेगाने बोलेरो चालविली जात होती, असे पोलिसांनी सांगितले.
आज मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी दिव्याच्या वडीलांचे दोन वर्षांपूर्वीच देवणामळ-काले नदीत बुडून निधन झाले होते. कर्त्या पुरूषाचे छत्र हरपल्याने आई सुकांती मोलमजुरी करून आपला संसार चालवित होती. दिव्या ही घरातील सर्वांत मोठी मुलगी होती, तिच्या मागे दोन लहान भाऊ आहेत.
मुलीला धडक देऊन वेगाने गाडी गेली, त्यावेळी जो चालक गाडी चालवित होता, तो गाडी अडवली, त्यावेळी बाजूस बसला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दिव्या हिच्या आकस्मिक निधनाने काले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खाणीवरील वाहने अशा प्रकारे बळी घेत असूनही निष्क्रिय प्रशासन यंत्रणा मात्र स्तब्ध असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. कुडचडेचे पोलिस निरीक्षक भानुदास देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, संशयित चालक म्हणून रमेश मिराशी (२४) याला ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले.

"लैला'चा जोर ओसरला

हैदराबाद, दि. २० - बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या 'लैला' या चक्रीवादळाचा जोर थोडा ओसरला असून, ते आज आंध्रप्रदेशातील मछलीपट्टणम येथे किनारपट्टीवर धडकले तरी केवळ पावसाच्या धडकेवरच सारे निभावल्याने जनतेने निश्वास सोडला. खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीवरील सखल भागात राहणाऱ्या ४० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
'लैला' बंगालच्या उपसागरात स्थिरावले आहे. मात्र, आज ते किनारपट्टीला धडकेल, असे हवामान खात्याने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जमीनवरून समुद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग कमालीचा वाढल्यामुळे या चक्रीवादळाची गती संथ झाल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, सध्या त्याचा वेग ११५ किलोमीटर प्रतितास इतका असल्याने चक्रीवादळाचा धोका कमी झालेला नाही. या वेगामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ४० हजार नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलविले असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.
दरम्यान,''प्रशासनाला मदत करण्यासाठी लष्कराची पथके तैनात करण्यात आली असून, ती संकटाचा सामना करण्यास सज्ज आहेत,'' असे संरक्षणमंत्री ए.के. अँटनी यांनी सांगितले आहे.
या चक्रीवादळाचा मोठा फटका नेल्लोर, प्रकाशम, गुंटूर, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि पूर्व गोदावरी या जिल्ह्यांना मोठा फटका बसण्याचे अनुमान असून, येत्या ३६ तासांत या भागात जोरदार ते अतिजोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी रात्रभर या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी टेली कॉन्फरन्सद्वारे चर्चाही केली. पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांत जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करून ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसेच, मदत शिबीरांमध्येही औषधे आणि अन्नधान्याचा साठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

ओरिसा सज्ज
भुवनेश्वर - "लैला' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ओरिसाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आणि मदत पथकांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (ता.२०) सराव केला. चक्रीवादळामुळे ओरिसाच्या सागरी किनारपट्टीवरील जिल्ह्यांत पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार असला तरी राज्य सरकारने सर्वच जिल्हा प्रशासनांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत.
प्रादेशिक हवामान खात्याच्या अंदाजप्रमाणे, "लैला'च्या प्रभावामुळे राज्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवसांत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे.

नक्षल्यांविरूद्ध कठोर कारवाई करा : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, दि. २० - शस्त्रांच्या धाकावर समाजाला संपविण्याचे नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावत त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
"निष्पाप नागरिकांच्या हत्यांचे सत्र थांबविलेच पाहिजे आणि त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असे मोदी यांनी आज येथे योजना आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आज अलिगढ येथील एका कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातूनच सोडवता येऊ शकतो, असे म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मला भरकटलेल्या युवकांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता व त्या अनुषंगाने मी त्या प्रश्नाचे उत्तर दिले होते, असे मोदी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. या मुद्यावर सरकारने काय करावे याबाबत मला काहीही विचारण्यात आले नव्हते व मी काहीही उत्तर दिले नव्हते, असेही ते म्हणाले.
हिंसाचाराचा मार्ग अंगिकारलेल्या युवकांना आपण काय संदेश द्याल?, असे मला या कार्यक्रमात विचारण्यात आले होते. त्यावर उत्तर देताना "हिंसाचाराचा मार्ग अवलंबल्याने परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही अशी माझी त्यांना विनंती आहे', असे उत्तर मी दिले होते असे मोदी यांनी पुढे सांगितले. या युवकांनी शस्त्रास्त्रांचा त्याग करून घटनेच्या चौकटीत राहून योग्य व्यासपीठावर आपले मुद्दे उपस्थित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हे भरकटलेले युवक आमचेच आहे. त्यामुळे हिंसाचाराने कुठल्याही प्रश्नावर तोडगा निघू शकत नाही, हे त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी एका प्रवासी बसला स्फोट करून उडवून दिल्यानंतर, नक्षल्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याची मागणी भाजपा नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी राजधानीत एका पत्रकारपरिषदतेत केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या आजच्या विधानाला प्रसार माध्यमांनी ठळकपणे प्रसिद्धी दिल्यानंतर नरेंद्र मोदींनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

खवळलेल्या पर्वरीवासीयांची पाण्यासाठी पणजीत धडक

मुख्य अभियंत्यांना घेतले फैलावर

पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - पाच दिवसांपासून पाण्याचा एक थेंबही नळाला आला नसल्याने खवळलेल्या नागरिकांनी आज विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आल्तिनो येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंते श्री. चिमुलकर यांची भेट घेऊन त्यांना धारेवर धरले. तसेच, येत्या ३० मेपर्यंत पर्वरी भागात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास बांधकाम खात्यासमोर तसेच पर्वरी भागात पाणीपुरवठा विभागाचे काम पाहणाऱ्या अभियंत्यांच्या घरासमोर आंघोळ केली जाईल, असा इशारा पर्वरीवासीयांनी दिला आहे.
या इशाऱ्यानंतर येत्या ३० मेपर्यंत पाणीपुरवठा व्यवस्थित केला जाईल, असे आश्वासन श्री. चिमुलकर यांनी दिले. तसेच, तोपर्यंत जादा टॅंकर पाठवून पाणीपुरवठा केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे, पर्वरी येथे असलेल्या पाणीपुरवठा केंद्रात पूर्णवेळ साहाय्यक तसेच कनिष्ठ अभियंत्याची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून येथील लोकांना आंघोळीसाठी सोडाच पिण्यासाठीही पाणी उपलब्ध झालेले नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम खात्यावर ताशेरे ओढूनही बांधकाम खात्याने त्यावर कोणतीच उपाययोजना आखलेली नाही. आज आम्ही आमच्यावर ओढवलेली परिस्थिती कथन करण्यासाठी आलो आहोत. दुसऱ्यावेळी येथे येऊन आंघोळ करणार आणि तुम्हालाही घालणार, असा इशारा याप्रसंगी पर्रीकर यांनी मुख्य अभियंत्यास दिला.
व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याने यावेळी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिलांनी भाग घेतला होती. पर्वरी येथे पाणीपुरवठा केंद्रात साहाय्यक अभियंता उपलब्ध होत नसल्याने तसेच पाणी कधी येणार, याची माहिती मिळवण्यासाठी दूरध्वनी केल्यास तो उचलण्यासाठी कोणीही तेथे उपलब्ध नसतो. त्यामुळे आल्तिनो येथील मुख्यालयावर ही धडक दिली असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले.
नळ जोडणी देण्यासाठी साहाय्यक अभियंता मंत्र्याचे नाव सांगून २५ हजार रुपये मागणी करतो, असा आरोप पर्वरीवासीयांनी केला. तसेच "चर्चिल ब्रदर्स'चे फुटबॉलपटू पर्वरी येथे राहत असून त्यांना दर दिवशी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र लोकांनी टॅंकरची मागणी केल्यास आठवडाभर टॅंकर उपलब्ध होत नाही, अशी माहिती किशोर अस्नोडकर यांनी मुख्य अभियंत्यास दिली.
यावेळी मोठ्याप्रमाणात पोलिस फौजफाटा ठेवण्यात आला होता. पणजी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक देऊ बाणावलीकर, पणजी पोलिस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, आगशि पोलिस स्थानकाचे निरीक्षक विश्वेष कर्पे, जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक फ्रान्सिस्को कॉर्त व अन्य पोलिस उपस्थित होते.
.. सोमवारपर्यंत मुदत ः पर्रीकर
पर्वरी पठारावर नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे तेथे लक्षपूर्वक पाणीपुरवठा करावा लागतो. सध्या सरकारचे अर्धे मंत्रिमंडळ विदेशात असून जनतेकडे लक्ष देण्यासाठी कोणीच उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव हेही काही दिवसांपूर्वी विदेशात होते. वाढदिवस असल्याने ते गोव्यात आले आहे. येत्या सोमवारपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. तरीही बांधकाम खात्याने यावर योग्य तोडगा न काढल्यास कडक भूमिका घेतली जाणार असल्याचे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

Thursday, 20 May, 2010

गोमंतक मराठी अकादमीची घटना दुरुस्ती

अकादमीशी संबंधित सर्वांनी सूचना पाठवाव्यात : ऍड.खलप
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): गोमंतक मराठी अकादमीच्या घटना दुरुस्तीचे काम राज्य सरकारने राज्य कायदा आयोगाकडे सोपवले आहे व त्यासंदर्भात मराठी अकादमीशी संबंधित सर्व संस्था, व्यक्ती, कार्यकर्ता, आजी- माजी सदस्य व अकादमीचे हितचिंतक यांनी आपल्या सूचना आयोगाकडे पाठवाव्यात असे आवाहन आयोगाचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या राजभाषा संचालनालयाकडून अलीकडेच गोमंतक मराठी अकादमीच्या घटना दुरुस्तीबाबत शिफारस करण्याचा प्रस्ताव राज्य कायदा आयोगाकडे दिला आहे. मराठी अकादमीच्या घटनेवरून अनेकांच्या तक्रारी आहेत. केवळ काही ठरावीक लोकांनीच आपली "लॉबी' करून अकादमीवर सत्ता काबीज केल्याने अनेकांना इच्छा असूनही अकादमीचे सदस्य बनता येत नाही. यासंदर्भात राजभाषा संचालनालयाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊनच त्यांनी अकादमीच्या घटना दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. अकादमीची घटना, कायदे व नियम, अकादमीची कार्यपद्धती, मराठी भवनाचे अर्धवट काम, इमारतीचा विनावापर पडून असलेला भाग,कर्मचाऱ्यांचे वेतन व अकादमीची मालमत्ता व कर्ज या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात येणार आहे. अकादमीचे कार्य सर्वांपर्यंत पोचावे व सर्व संबंधितांना एकत्रित करून या संस्थेचा कार्यभार सांभाळावा यासाठीच हे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, यासंबंधीच्या सूचना ३१ मे २०१० पूर्वी कायदा आयोगाच्या पर्वरी येथील परायसो दी गोवा, पर्वरी येथील कार्यालयात किंवा आयोगाच्या ईमेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

ती 'व्यक्ती' कोण?

अबकारी घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने संभ्रम
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): पत्रादेवी चेकनाक्यावरील अबकारी खात्याच्या कारवाईत बेकायदा मद्यार्काची वाहतूक करणारा भला मोठा कंटेनर पकडल्यानंतर आता चौकशीची चक्रे विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या कथित बेकायदा मद्यार्क आयात घोटाळ्याकडे वळली आहेत. कंटेरनचा चालक अस्लम याने आपल्या जबानीत सांगितल्याप्रमाणे पत्रादेवी चेकनाक्यावर त्याला भेटण्यासाठी येणारी ती "व्यक्ती' कोण याचे कोडे आता अबकारी खात्याला पडले आहे. पुढील प्रवासाचे सर्व अडथळे दूर करून हे मद्यार्क निश्चितस्थळी पोहचवण्याची कामगिरी "ती' व्यक्ती पार पाडणार होती. त्यामुळे या प्रकरणात सदर "व्यक्ती' महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
कोट्यवधी रुपयांचा अबकारी कर चुकवून राज्यात लाखो लीटर बेकायदा मद्यार्काची आयात होत असल्याचा गंभीर आरोप मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत केला होता. या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची कागदपत्रेही त्यांनी सभागृहासमोर ठेवून हे प्रकरण आंतरराज्य स्वरूपाचे असल्याने ते "सीबीआय' कडे सोपवण्याची जोरदार मागणी केली होती. मात्र अबकारी खात्याचे मंत्री तथा मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मात्र या चौकशीबाबत विशेष उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यांची संभ्रम निर्माण करणारी भूमिका अनेकांसाठी आश्चर्यजनक ठरली आहे. या प्रकरणाची चौकशी वित्त सचिवांमार्फत करण्याची घोषणा कामत यांनी केली होती. मात्र ही चौकशी थंडावल्यातच जमा झाल्याचे चित्र दिसते. त्यामुळे कामत यांच्याकडून या प्रकरणावर पांघरूण घालण्याचेच प्रयत्न होत आहेत, अशी टीका विरोधकांकडून सुरू आहे. माजी अबकारी आयुक्त संदीप जॅकीस यांची मुख्यमंत्र्यांकडून होत असलेली पाठराखणही अनेकांना अचंबित करणारी ठरली आहे. संदीप जॅकीस यांनी याप्रकरणी वित्त सचिवांना दिलेल्या खुलाशात आपले हात झटकले आहेत. त्यामुळे जर या प्रकरणांत खरोखरच तथ्य नाही, असे जर त्यांना सांगायचे असेल तर मुख्यमंत्री कामत यांच्याकडून पर्रीकरांनी केलेले आरोप फेटाळून का लावले जात नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २१ जुलै २००८ रोजीपासून अबकारी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या संदीप जॅकीस यांच्या कारकिर्दीत बेकायदा मद्यनिमिर्ती किंवा मद्यसाठा पकडल्याची नोंद नाही. तिकडे इन्सुली, बांदा, सावंतवाडी पोलिस व अबकारी अधिकाऱ्यांनी गोव्यातून अन्यत्र नेला जाणारा बेकायदा मद्यसाठा अनेकदा पकडला. मात्र त्याचा थांगपत्ता गोव्याच्या अबकारी खात्याला लागला नाही, ही गोष्टीही संशय निर्माण करणारी ठरली आहे. केवळ अबकारी खात्याचा महसूल किती प्रमाणात वाढला याची आकडेवारी सादर करून या सर्व प्रकरणांवर पडदा टाकण्याचेच काम संदीप जॅकीस व मुख्यमंत्र्यांनी केले,असाही आरोप सुरू आहे.
अबकारी खात्याच्या कामाचा दांडगा अनुभव असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पी.एस.रेड्डी यांच्याकडे पुन्हा या खात्याची जबाबदारी बहाल केल्यानंतर गेल्या आठवडाभरात त्यांनी सुरू केलेल्या छापासत्रावरून राज्यात मोठ्याप्रमाणात मद्य उद्योगाबाबत बेकायदा व्यवहार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. अंतर्गत सर्व अबकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यानंतरच हा परिणाम दिसून आला. पत्रादेवी चेकनाक्यावरील साहाय्यक अबकारी निरीक्षक श्रीकांत वळवईकर यांना निलंबित करण्यात आले; तर अन्य निरीक्षकांना "कारणे दाखवा' नोटीस जारी करण्यात आली आहे. अबकारी चेकनाक्यावरील अधिकाऱ्यांशी साटेलोटे करूनच बेकायदा मद्यार्क राज्यात प्रवेश करू शकतो व त्यामुळे कालची घटना पाहता यापूर्वी पत्रादेवी चेकनाक्यावरील अधिकाऱ्यांची कसून चौकशी करणे गरजेचे बनले आहे. अबकारी आयुक्त ही चौकशी कितपत करू शकतात हा प्रश्न असून हे प्रकरण किमान स्थानिक पोलिसांकडे सोपवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री कामत यांनी मात्र पत्रादेवीची घटना हा निव्वळ योगायोग असल्याचे म्हटले आहे. गोव्यात बनावट मद्यनिमिर्तीची शक्यता त्यांनी फेटाळून लावताना केवळ वाहतुकीसाठी गोव्यातील मार्गांचा उपयोग होत असावा, असा तर्क व्यक्त केला आहे.
दरम्यान, वास्को अबकारी कार्यालयात सापडलेल्या दस्तऐवजानुसार पर्रीकरांनी केलेल्या आरोपांबाबतचे सर्व व्यवहार या कार्यालयातून झाले याचे पुरावे मिळूनही मुख्यमंत्री या प्रकरणाकडे डोळेझाक करतात यावरून त्यांच्या हेतूबाबतच संशय निर्माण झाल्याची टीका विरोधी भाजपने केली आहे. निदान आता तरी मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे किंवा "सीबीआय' कडे सोपवावे. मुख्यमंत्री ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळत आहेत त्यावरून या प्रकरणाच्या चौकशीबाबत तेआखडता हात का घेत आहेत, असाही सवाल भाजपने केला आहे.

नक्षल्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद

मिदनापूर, दि. १९ : नक्षलवाद्यांनी पाच राज्यात पुकारलेल्या ७२ तासांच्या बंदच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालच्या लालगढ येेथे नक्षल्यांनी केलेल्या आयईडीच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे(सीआरपीएफ) ४ जवान शहीद झाले आणि दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत.
हिंसेचा त्याग करून नक्षलवाद्यांनी सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी कालच केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे हे विशेष. सीआरपीएफच्या जवानांचे एक पथक गोलतोर मार्केट परिसरातील आपल्या कॅम्पमधून आजूबाजूच्या गावात गस्त घालण्यासाठी निघाले असता पश्चिम मिदनापूरच्या लालगढ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामगढ भागात आज सकाळी ११.३० च्या सुमारास हा स्फोट झाला.
नक्षल्यांनी केलेल्या या स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले आणि दोन जण जखमी झाले, अशी माहिती सीआरपीएफच्या पूर्वोत्तर भागाचे महानिरीक्षक एम. नागेस्वर राव यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. या स्फोटात सीआरपीएफचे तीन कॉन्स्टेबल आणि हे पथक ज्या वाहनातून प्रवास करत होते त्या वाहनाचा चालक जागीच ठार झाले . घटनेच्या ठिकाणी पाच फूट खोल खड्डा तयार झाला आहे आणि वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आराडी-पर्रा येथील घरात सापडली श्री गजाननाची मूर्ती

दर्शनासाठी मान्यवरांची व भक्तांची रीघ
म्हापसा, दि. १९ (प्रतिनिधी): आराडी - पर्रा, म्हापसा येथील जनार्दन चोडणकर यांच्या मालकीच्या घरात खोदकाम करताना सिंहासनावर आरूढ झालेली श्री गणपतीची मूर्ती सापडली असून तिच्या उजव्या हातात फरशी तर डाव्या हातात पाश आहे. दरम्यान, हे वृत्त समजताच म्हापसा व आसपासच्या परिसरातील लोकांनी प्रचंड संख्येने तिथे भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. श्रींचे दर्शन घेणाऱ्यांत मुख्यमंत्री दिगंबर कामत, आमदार दिलीप परुळेकर व दयानंद मांद्रेकर, पोलिस महानिरीक्षक सुंदरी नंदा यांचाही समावेश होता.
यासंदर्भात "गोवादूत'च्या प्रतिनिधीने श्री. चोडणकर यांच्या निवासस्थानी भेट दिली असता त्यांची मुलगी पूजा चोडणकर (१८) हिने दिलेली माहिती अशी ः "१६ वर्षांपूर्वी आराडी - पर्रा येथे माझ्या वडलांनी एका ख्रिश्चन कुटुंबाचे घर विकत घेतले. आम्ही या घरात राहत नाही, परंतु, वेळोवेळी येथे आमची ये - जा असते. या घरात बिऱ्हाडकरू राहत होते. गेली सहा वर्षे मला सतत स्वप्नात दृष्टांत होऊ लागले की, आराडी येथील घरात एक गणपतीची मूर्ती आहे तिचा शोध घे. सुरुवातीला माझ्या आईवडलांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र मला होणारे दृष्टांत वाढत गेल्याने शेवटी गेल्या चार वर्षांपासून घरात व घराबाहेर खोदकाम करून त्या मूर्तीचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. परंतु, यातून काहीही हाती लागले नसल्याने शेवटी रेडी येथील गणपतीला जाऊन विचारणा केली तसेच अन्य ठिकाणीही कौल लावला तेव्हा या घरात गणपतीची मूर्ती असल्याचा कौलप्रसाद मिळाला. तरीही सदर मूर्ती नक्की कुठे आहे ते मात्र आम्हांला कळू शकले नव्हते.
काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष गणपती बाप्पाच माझ्या स्वप्नात आले व मला येथून लवकरात लवकर बाहेर काढून माझी प्रतिष्ठापना करा, असे सांगू लागले. मी त्यांना त्यांचे ठिकाण विचारले असता त्यांनी स्वप्नातच मला जागा दाखवली. त्यांनी दाखवलेल्या जागेवर एक मीटर खोदल्यानंतर आम्हांला ही मूर्ती सापडली. काल दि. १८ रोजी आम्हांला ही मूर्ती सापडली; मात्र तेव्हा आम्ही याची वाच्यता कुठेही केली नाही. आज आम्ही मुख्यमंत्री तसेच अन्य नागरिकांना ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी येथे येऊन श्रींचे दर्शनही घेतले.'
दरम्यान, आज (दि. १९) सकाळी सदर गणपतीच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली असून या ठिकाणी गणपतीचे मंदिर उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे जनार्दन चोडणकर व सौ. सविता चोडणकर यांनी सांगितले. यासाठी "श्री विघ्नेश्वर गणपती विश्वस्त ट्रस्ट'ची निर्मितीही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, पर्रा येथे श्री गणपतीची मूर्ती प्रकट झाल्याचे वृत्त आसपासच्या परिसरात वाऱ्यासारखे पसरले. म्हापसा पोलिस स्थानकाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, मामलेदार, उपजिल्हाधिकारी, सरकारी कर्मचारी व भक्तांनी याठीकाणी एकच गर्दी केली. शिवोलीचे आमदार दयानंद मांद्रेकर, साळगावचे आमदार दिलीप परुळेकर, जिल्हा पंचायत सदस्य मायकल लोबो, पंच सदस्य यांनीही या ठिकाणी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले.
दरम्यान, सदर मूर्तीची तपासणी करून पुरातत्त्व खात्याने तिचा कालखंड शोधून काढावा, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रियाही या ठिकाणी ऐकायला मिळाल्या.

मेगा प्रकल्पविषयक धोरण जाहीर करण्याची वेळ : चर्चिल

बांधकाममंत्र्यांनी उचलली बड्या बिल्डरांची तळी
मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी): ओडली येथील मेगा प्रकल्पावरून अडचणीत आलेले बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मेगा प्रकल्पांबाबत गोवा सरकारने लवकरात लवकर आपले धोरण जाहीर करण्याची वेळ आलेली आहे व आपण मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी केली आहे, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न करतानाच बड्या बिल्डरांची तळी उचलून धरण्याचाही प्रयत्न केला.
ओडली येथील मेगा प्रकल्पासंदर्भात चर्चिल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला पाठविलेल्या रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करावयाच्या टिप्पणीवर आधारून नगर नियोजन खात्याने मुंबईतील एका बड्या बिल्डरला बांधकामासाठीचा अस्थायी परवाना दिला व त्या मेगा प्रकल्पाविरुद्ध स्थानिकांनी दंड थोपटल्यामुळे अडचणीत आलेल्या बांधकाम मंत्र्यांनी आज तातडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेतून एका प्रकारे बिल्डरांची तळीच उचलून धरली आहे.
त्यांच्या दाव्याप्रमाणे गोव्यात आज एक हजार बिल्डर आहेत व त्यांच्याकडे कामाला असलेल्यांची संख्या दोन लाखांवर आहे. त्यांच्या उपजीविकेचा हा प्रश्र्न आहे व म्हणून सरकारने मेगा प्रकल्पांबाबतचे धोरण त्वरित जाहीर करणे आवश्यक आहे. किनारपट्टी भागात आम्हांला किती मजली इमारती हव्या आहेत ते एकदा निश्चित झाले की बांधकाम करणाऱ्याच्या व त्यासाठी परवाना मागणाऱ्याच्या व तो देणाऱ्याच्या दृष्टीनेही ते सोयीस्कर ठरेल, असे ते म्हणाले.
ओडली येथील ज्या प्रकल्पाविरुद्ध सध्या रान उठविले जात आहे त्याबाबत ते म्हणाले की, पंचायतीत असताना ज्या लोकांनी या प्रकल्पाला परवाना दिला होता तेच लोक आता त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत. यावरून त्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच असावा असा आरोप त्यांनी केला. असे प्रकल्प आल्याशिवाय गोमंतकीय तरुणांना नोकऱ्या कशा मिळतील, असा सवाल त्यांनी केला. यावेळी मेगा प्रकल्पांत गोमंतकीयांना कसला रोजगार मिळणार, असा उलट प्रश्र्न पत्रकारांनी त्यांना केला असता मात्र ते निरुत्तर झाले.
लोकांचा या प्रकल्पाला जो विरोध आहे तो तेथे जाण्यासाठी पुरेसा रस्ता नसताना ७०० फ्लॅट बांधकामास दिलेल्या परवान्याविरुद्ध आहे. तत्कालीन सरपंच ओर्लांद डिसिल्वा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी दिलेला परवाना हा भूखंड निर्माण करण्यासाठी होता. पण संबंधितांनी ८० हजार चौ. मी.च्या या जागेत २०-२० हजार चौ. मी. चे भूखंड पाडले आहेत, जे सर्वसामान्यांना घेणे शक्य नाहीत. चर्चिल यांनी तिकडे जाणारा सध्याचा ५ मी. रुंदीचा चिंचोळा रस्ता १० मी. रुंद करण्यासाठी आवश्यक जमीन तातडीने संपादन करण्यास प्रस्ताव तयार करण्याची एक टिप्पणी बांधकाम खात्याला पाठवली व त्या टिप्पणीवर आधारून मुंबईतील एका बड्या बिल्डरला तेथे विकासकामे करण्यास नगर नियोजन खात्याने हंगामी परवानगी दिली. त्यानंतर स्थानिकांनी माहिती हक्क कायद्याखाली मिळविलेल्यात माहितीत हा सारा प्रकार उघडकीस आला.
पण यातही महत्त्वाची बाब म्हणजे, रस्ता रुंदीकरणासाठी जमीन संपादनासाठीची प्रक्रिया तर सोडाच, पण प्रस्ताव देखील तयार झालेला नाही की ते संपादन होण्याचीही शक्यता नाही. कारण तो रस्ता रुंद करावयाचा झाला तर असंख्य घरे व आवाराच्या भिंती पाडाव्या लागणार असून स्थानिक नेते मंडळीची मनोवृत्ती त्याला अनुकूल होण्याची शक्यता नाही. मात्र या एकंदर प्रकरणावरून राजकारणी मंडळींनी बिल्डरांची तळी उचलून धरण्याची मनोवृत्तीच स्पष्ट झाली आहे.

Wednesday, 19 May, 2010

कुंकळ्ळी येथे तरुणीची गोळ्या घालून हत्या

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): कुकंळ्ळी औद्योगिक वसाहतीजवळ घराच्या व्हरांड्यात उभी असलेल्या २३ वर्षीय विल्मा कुलासो या तरुणीचा बंदुकीतून गोळ्या झाडून खून करण्यात आला. बंदुकीतून झाडलेली गोळी तरुणीच्या छातीच्या आरपार गेल्याने तिचे घटनास्थळीच निधन झाले, अशी माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली.
आज रात्री सुमारे ८. २० च्या दरम्यान ही घटना घडली असून घटनेनंतर या भागात तणाव निर्माण झाला होता. या गोळाबारीनंतर हल्लेखोरांनी पलायन केले. हल्ला कशासाठी आणि कोणी केला, याची रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नव्हती.
या घटनेनंतर खुन्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कुकंळ्ळी भागात नाकाबंदी सुरू केली असल्याची माहिती मिळाली तसेच या घटनेनंतर दक्षिण गोव्यातील सर्व पोलिस स्थानकांवरील निरीक्षकांना घटनास्थळी बोलवण्यात आले होते.
अधिक माहितीनुसार विल्मा व तिचा लहान भाऊ तसेच तिची चुलत बहीण अशी भावंडे घरात होती. तर, आई शेजारच्या घरात गेली होती. यावेळी घराच्या दरवाजावर कोणीतरी थाप मारल्याने विल्मा हिने दरवाजा उघडला. बाहेर आल्यावर कोणीच नसल्याने तिने पुन्हा दरवाजा बंद केला. त्यावेळी पुन्हा कोणीतरी दरवाजावर थाप मारली. यामुळे ती बाहेर येऊन व्हरांड्यात उभी राहिली होती. त्याचवेळी कोणीतरी तिच्यावर गोळी झाडली, तो आवाज आम्ही ऐकला, अशी माहिती घरात असलेल्या भावंडाकडून पोलिसांना मिळाली आहे. बाहेर येण्यापूर्वीच गोळी झाडणारी व्यक्ती फरार झाली होती. विल्मा हिचे वडील विदेशात नोकरीला असतात.
मध्यरात्रीपर्यंत हल्लेखोराला ताब्यात घेण्याचा दावा पोलिसांना केला आहे. दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक ऍलन डिसा घटनास्थळी दाखल झाले होते. याविषयीचा अधिक तपास सुरू आहे.

२० लाखांचे बेकायदा मद्यार्क जप्त

- पत्रादेवी चेकनाक्यावर कारवाई
- पर्रीकरांच्या आरोपांना पुष्टी

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): गोव्यात राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्यार्काची आयात होत असल्याचा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचा आरोप आज अबकारी खात्याने केलेल्या कारवाईअंती खरा ठरला आहे. नवनियुक्त अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी सर्व सीमेवरील अबकारी तपासनाक्यांना कडक तपासणीचे आदेश दिले असतानाच आज पत्रादेवी तपासनाक्यावरील पथकाने महाराष्ट्रातून बेकायदेशीररीत्या मद्यार्काची वाहतूक करणारा भला मोठा कंटेनर भल्या पहाटे जप्त केला. सुमारे २० लाख रुपये किमतीचे मद्यार्क या कंटेनरमध्ये सापडल्याची माहिती असून काळ्या बाजारात याची किंमत ४५ ते ५० लाख रुपयांवर पोहचते. राज्य सरकारला सुमारे २५ लाख रुपयांचा कर चुकवून ही वाहतूक केली जात होती, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.
यासंबंधीची सविस्तर माहिती अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी संध्याकाळी पत्रकारांना दिली. आज सकाळी पत्रादेवी अबकारी तपासनाक्यावर एक भला मोठा कंटेनर गोव्याची सीमा ओलांडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले. जीजे - ६ - टीटी - ९१०३ या क्रमांकांच्या कंटेनरच्या हालचालींबाबत संशय निर्माण झाल्याने कंटेनरच्या चालकाकडे चौकशी केली असता पशू खाद्याची वाहतूक केली जात असल्याचे सांगण्यात आले. पशू खाद्याच्या वाहतुकीसाठी कंटेनरचा वापर करण्याच्या प्रकाराबाबत नवल वाटल्याने अबकारी निरीक्षकांनी कंटेनरची पाहणी केली व त्याचवेळी हा प्रकार उघडकीस आला. कंटेनरमध्ये सुमारे १०८ मद्यार्काने भरलेले बॅरेल्स आढळून आले. सुमारे वीस हजार लीटर मद्यार्काचे प्रमाण असण्याची प्राथमिक शक्यता श्री.रेड्डी यांनी वर्तविली असून त्याची बाजारातील अधिकृत किंमत २० लाख रुपये होते. काळ्या बाजारात मात्र हे मद्यार्क ४५ ते ५० लाख रुपयांपर्यंत विकले जाते. मद्यार्काचे प्रमाण पाहता सुमारे २५ लाख रुपये अबकारी कर या बेकायदा वाहतूकीव्दारे चुकवला जात होता, अशी माहितीही त्यांनी उघड केली. या मद्यार्काचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. कंटेनरच्या चालकाने आपले नाव अस्लम असे सांगितले असून तो आपली जबानी बदलत असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण बनल्याचेही श्री.रेड्डी यांनी सांगितले. आपल्याला हा कंटेनर गोव्याच्या सीमेपर्यंत आणण्यासाठी पाठीमागे केदार नामक एका व्यक्तीने मदत केली. गोव्याच्या सीमेवर अन्य एक व्यक्ती भेटेल व तो सर्व तपासनाक्यांचा अडथळा दूर करील, असे सांगण्यात आले होते, असेही अस्लम याने आपल्या जबानीत म्हटले आहे. प्राप्त कागदपत्रांनुसार हा माल इंदोर येथील "प्रकाश लोडींग कंपनी' कडे चढवण्यात आला व तो मडगाव येथे एस. एस. हिरेमठ नामक कारखान्यात उतरविण्यात येणार होता. अशा नावाचा मडगावात एकही मद्यनिमिर्ती कारखाना नाही, अशीही प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, पत्रादेवी व महाराष्ट्रातील इन्सूली तपासनाक्यावरून या कंटेनरबाबतची गेल्या दोन वर्षांतील सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून यामुळे पर्रीकरांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अबकारी घोटाळ्याला पुष्टी मिळाली आहे. या घोटाळ्याची कसून चौकशी केली जाईल, अशी माहिती देताना वास्को अबकारी कार्यालयातील संगणकावर मिळालेल्या संशयास्पद पत्रव्यवहारांचाही तपास सुरू आहे. पत्रादेवी अबकारी तपासनाक्यावर नव्यानेच नियुक्त केलेल्या पथकाचे श्री. रेड्डी यांनी कौतुक केले. या कारवाईत अबकारी निरीक्षक राजेश नाईक, अनंत नाईक यांच्यासह साहाय्यक निरीक्षक नितीन परब, रोहन गावकर, सुदन कांदे, अबकारी रक्षक देवेंद्र नाईक, रामा बगळी आदींनी चोख कामगिरी केली,असेही ते म्हणाले.
-----------------------------------------------------------------
हा निव्वळ योगायोग
अबकारी आयुक्तपदाची जबाबदारी पी. एस. रेड्डी यांनी स्वीकारावी व त्यांनी छापे टाकून बेकायदा मद्याचा साठा जप्त करावा हा निव्वळ योगायोग आहे, असे विचित्र वक्तव्य मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केले. राज्यात बनावट मद्यनिमिर्तीची शक्यता फेटाळून लावताना अशा पद्धतीच्या वाहतुकीसाठी गोव्यातील वाहतूक मार्गांचा केवळ वापर होत असावा,असेही वादग्रस्त विधान त्यांनी केले. बेकायदा मद्यसाठा जप्त केल्यानंतर संशयितांना ताब्यात घेण्यास किंवा कारवाई करण्यास अबकारी कायद्यात आवश्यक तरतूद नाही, ही गोष्ट लक्षात आणून दिली असता त्याबाबत सखोल अभ्यास करून विधीतज्ज्ञांचे साहाय्य घेऊन या कायद्याला आवश्यक दुरुस्ती सुचवण्याचे आदेश आपण अबकारी आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कंत्राटदारांचा निविदा प्रक्रियेवर बहिष्कार

सा. बां. खात्याकडून ३.६० कोटी रु.ची बिले अजूनही प्रलंबित
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): सार्वजनिक बांधकाम खात्याने कंत्राटदारांची सुमारे ३.६० कोटी रुपयांची बिले अजूनही प्रलंबित आहेत. ती त्वरित अदा करावीत या मागणीसाठी आज सुमारे २५ कंत्राटदारांनी "विभाग दोन'च्या कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. तसेच आजच्या निविदा प्रक्रियेवरही कंत्राटदारांनी बहिष्कार टाकला.
कोट्यवधी रुपयांची बिले न देताच खात्याने नव्याने निविदा काढल्याने त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय तिसवाडी तालुक्यातील कंत्राटदारांनी घेतल्याची माहिती उमेश धारवाडकर यांनी दिली.
याविषयी विभागाचे अभियंते पी. बी. शेर्दारकर यांना विचारले असता, ही बिले अदा करण्यासाठी सरकारने सध्या ७५ लाख रुपये उपलब्ध केले आहेत; मात्र ते पैसे कंत्राटदारांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सदर रक्कम परत पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले.
सुमारे ३.६० कोटी रुपयांची बिले अदा झालेली नसल्याने मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यास या कंत्राटदारांनी नकार दर्शवला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते केवळ पणजी विभागाकडेच जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धारवाडकर यांनी केला. पणजी विभागासाठी फक्त ४२४ कोटी रुपयेच उपलब्ध केले आहेत. तर, मडगाव शहरासाठी तब्बल २ हजार ४९८ कोटी रुपये निधी उपलब्ध केला आहे. तेथील विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांना वेळोवेळी त्यांची बिले अदा केली जातात. मग केवळ पणजी विभागातीलच कंत्राटदारांबाबत दुजाभाव का, असा सवाल कंत्राटदारांनी केला आहे.
या कंत्राटदारांची बिले थकवली गेल्याने त्यांच्यासमोर मोठीच अडचण निर्माण झाली आहे. रेती, सिमेंट, लोखंडाचा पुरवठा करणाऱ्यांचीही बिले थकीत असल्याने पुढील कामे हाती घेणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. विकासकामे केलेल्यांचे पैसे द्यायला सरकारकडे निधी नसेल तर अजूनही निविदा कशा काढल्या जातात, असाही प्रश्न यावेळी करण्यात आला. गेल्या सात महिन्यांपासून या कंत्राटदारांची बिले प्रलंबित आहेत.

बेकायदा डोंगरकापणी व भराव रोखण्यास खास भरारी पथक

जनतेच्या तक्रारींसाठी १०७७ क्रमांक
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): बेकायदा डोंगर कापणी व शेत जमिनीत भराव टाकण्याच्या प्रकारावर नजर ठेवण्यासाठी येत्या २४ मे पासून चोवीस तास भरारी पथक सेवा कार्यन्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी यासंबंधीच्या आपल्या तक्रारी १०७७ या टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात व त्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल. अधिसूचित वनक्षेत्र, खासगी वनक्षेत्र, मशागत केलेली शेतजमीन, खारफुटी क्षेत्र, पर्यावरणीय संवेदनशील विभाग आदी ठिकाणी कोणत्याही बांधकामास परवानगी दिली जाऊ नये, यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी बोलावलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पर्यावरणाचा ऱ्हास व विकासकामांच्या नावाखाली जैविक संवेदनशील क्षेत्रांवर होणारे आक्रमण याबाबत जाब विचारण्यासाठी काल सचिवालयात गेलेल्या बिगर सरकारी संस्थांचा मुख्यमंत्र्यांकडून झालेला अवमान व त्यानंतर पोलिसांशी त्यांची झालेली झटापट याचे तीव्र पडसाद आज राज्यभर उमटले. पर्यावरण संरक्षण व नीज गोंयकारांचे अस्तित्व याविषयावरून लढा देणाऱ्या या संस्थांशी पत्करलेले वैर परवडणारे नाही व त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील या भीतीनेच मुख्यमंत्री कामत यांनी आज तातडीची बैठक बोलावून या संस्थांनी सादर केलेल्या निवेदनातील अनेक मागण्यांची पूर्तता करून एकप्रकारे "डॅमेज कंट्रोल' करण्याची धडपड केली.
गेल्या महिन्यात नगर नियोजन मंडळाची बैठक झाली व ४ मे रोजी सरकारकडे काही महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत. या शिफारशींबाबत गेले दोन आठवडे मौन धारण करून बसलेल्या सरकारला कालच्या घटनेमुळे शिफारशींच्या अमलबजावणी आदेश जारी करणे भाग पडले. तालुका उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथकांत सर्वेक्षक, ड्राफ्टमन व पोलिस शिपाईचा समावेश असेल. तक्रार पोहचताच संबंधित ठिकाणी भेट देऊन कामाचा परवाना व इतर दाखले तपासण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला आहे. प्राथमिक पुराव्यांनुसार काम बंद करण्याचेही हक्क या पथकाला असतील. दरम्यान, "टोल फ्री' क्रमाकांवर आपल्या जिल्ह्यातील तक्रारीच नागरिकांनी कराव्यात अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याच्या प्रकारावर नजर ठेवण्यासाठी विकास आयुक्त व नियोजन खात्याच्या सचिवांखाली विशेष तज्ज्ञांची समितीही नेमण्यात आली आहे. वारसायादीतील बांधकामांची यादी तयार करण्यासाठी तसेच नगर नियोजन खात्यात दुरुस्ती सुचवण्यासाठीही समित्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.पंचायत व पालिकांनी आपल्या क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करण्याचे आदेशही जारी करण्यात येतील,अशी माहिती त्यांनी दिली.
---------------------------------------------------------------
- १०७७ क्रमांकावर भरारी पथक सोमवारपासून
- पर्यावरण संवेदनशील भागांतील बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी विशेष तज्ज्ञ समिती
- पंचायत व पालिकांनी आपल्या क्षेत्राचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे
- वारसायादीतील बांधकामे निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त
- नगर विकास कायद्यातील दुरुस्ती विषयक अभ्यास करण्यासाठी कायदा तज्ज्ञ समितीची नियुक्ती

बारावीचा निकाल ८२.५२ टक्के

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): गोवा शालान्त आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च महिन्यात घेतलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात सलग दोन वर्षे दणका देत यंदाही मुलींनी बाजी मारली. बारावीचा एकूण निकाल ८२.५२ टक्के लागला आहे.
राज्यात विज्ञान शाखेत यामिनी प्रमोद नाईक (ज्ञानप्रसारक मंडळ उच्च माध्यमिक विद्यालय, आजगाव), वाणिज्य शाखेत लुईस ऍन्थनी परेरा (मुष्टिफंड उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी), कला शाखेत क्रिशा फातिमा परेरा (डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी) तर व्यावसायिक शाखेत ऍश्ली ऍग्नेस फर्नांडिस ( फा. आग्नेल मल्टिपर्पज उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
बारावीचा निकाल २००७ साली ८०.३१ टक्के तर २००८ साली ७९. ३२ तर, २००९ साली ८२.५५ टक्के एवढा लागला होता. सरकारने मान्यता दिल्यास पुढच्या वर्षीपासून "ग्रेड' पद्धत सुरू केली जाणार असल्याची माहिती यावेळी श्री. डिसोझा यांनी दिली.
या वर्षी मुलींच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५१ टक्के, तर मुलांचे प्रमाण ४९ टक्के आहे. यामुळे मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारल्याचे दिसून आले. १३ केंद्रांतून घेतलेल्या या परीक्षेसाठी एकूण १२,४३८ विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता. त्यातील १२ हजार ३९९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर, १० हजार २३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
कला शाखेचा निकाल ७२.७२ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ८३.११ टक्के, विज्ञान शाखेचा निकाल ८४.३८ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ८९.११ टक्के लागला आहे.
सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, काणकोण (व्यावसायिक शाखेत), होली ट्रिनेटी उच्च माध्यमिक विद्यालय, बाणावली (व्यावसायिक), फा. आग्नेल मल्टिपर्पज उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी (व्यावसायिक), न्यू इंग्लिश उच्च माध्यमिक विद्यालय, मांद्रे (व्यावसायिक), श्री सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय, कवळे (वाणिज्य), अमेय विद्या प्रसारक मंडळ, कुर्ट्टी फोंडा (व्यावसायिक), डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालय, पणजी (वाणिज्य), यांचा शंभर टक्के निकाल लागला आहे.
हॉली ट्रिनेटी व डॉन बॉस्को उच्च माध्यमिक विद्यालयाचा सतत तिसऱ्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला असल्याची माहिती श्री. डिसोझा यांनी दिली.
दरम्यान, ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण पडलेल्या विद्यार्थ्याला पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळत असून त्यासंबंधीचा अर्ज करण्यासाठी गोवा शालान्त मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वार्षिक उत्पन्न ४.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या उमेदवाराला या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. पदवीसाठी दहा हजार तर, पदव्युत्तर शिक्षणासाठी २० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळत असल्याची माहिती देण्यात आली.
एका विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा २५ व २९ जून रोजी अनुक्रमे प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपात घेतली जाणार आहे. म्हापसा व मडगाव अशा दोनच केंद्रावर ही परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ८ जून, तर अतिरिक्त शुल्क भरून १४ जून पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
-----------------------------------------------------------
विज्ञान शाखेत राज्यात प्रथम आलेली यामिनी प्रमोद नाईक (आसगाव) हिने ६०० पैकी ५५७ गुण मिळवले आहेत.
कला शाखेतील क्रिशा फातिमा परेरा (पणजी) हिला ६०० पैकी ५३०,
वाणिज्य शाखेतील लुईस ऍन्थनी परेरा (पणजी) याने ६०० पैकी ५४८ आणि
व्यावसायिक शाखेतील ऍश्ली ऍग्नेस फर्नांडिस (पणजी) हिने ८०० पैकी ७२४ गुण मिळवले.
-------------------------------------------------------------
आर्यन स्टडी सर्कलचे यश
मडगाव येथील आर्यन क्लासेसमध्ये कोचिंग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आज लागलेल्या बारावीच्या परीक्षेत भरघोस यश मिळविले. याच क्लासेसतर्फे सीईटी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवून साईश कापडी, निरज बोरकर यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला होता.

६० टक्के खाणींची खोली भूजल पातळीखाली

दोन वर्षांसाठी परवाने रद्द
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): राज्यातील केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयातर्फे परवाना मिळालेल्या १२८ खाणींपैकी ६० टक्के खाणींची खोली भूजल पातळीपेक्षा खाली गेली आहे, अशी धक्कादायक माहिती मंत्रालयाच्या दक्षिण विभागाच्या संचालिका डॉ. एस. के. सुस्रला यांनी दिली. मंत्रालयाच्या नजरेस जेव्हा ही गोष्ट आली तेव्हा अशा खाणींचे परवाने दोन वर्षांसाठी रद्द करून त्यांना जल भूगर्भशास्त्र सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे आदेश जारी केल्याचीही माहिती त्यांनी उघड केली.
पर्यावरणप्रेमी व खाण कंपनी यांच्या संयुक्त चर्चासत्राचे आयोजन केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्रालयाच्या प्रतिनिधी या नात्याने डॉ. सुस्रला उपस्थित होत्या. खाण उद्योगाचा पर्यावरणावरील परिणाम या विषयावरील या चर्चासत्रात पर्यावरणप्रेमींकडून खाण उद्योगाकडून सुरू असलेल्या गैरकृत्यांबाबत व बेकायदा व्यवहारांबाबत कानाडोळा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.खाण उद्योगाचा राज्यातील विस्तार भयंकर स्वरूप प्राप्त करीत असल्याने गोव्याचा आर्थिक कणा समजला जाणारा हा उद्योगच राज्याच्या मुळावर येण्याची भीती व्यक्त होत असल्याचे यावेळी पर्यावरणवाद्यांनी ठासून सांगितले. खाण खाते व खाण उद्योजकांकडून ज्या पद्धतीने आपल्या कृतीचे समर्थन केले जाते त्यावरून आता त्यांनीच बेकायदा खाणींची व्याख्या करून द्यावी,असा टोलाच यावेळी फादर मेव्हरीक फर्नांडिस यांनी लगावला. खाणींना परवाना देण्यापुरतीच खाण खात्याला अधिकार आहेत उर्वरित व्यवहार विविध परवाने व प्रक्रियांवर अवलंबून असल्याची प्रतिक्रिया खाण खात्याच्या प्रतिनिधींकडून व्यक्त करण्यात आली. राज्य सरकारकडूनच कशा पद्धतीने बेकायदा खाण उद्योगाला प्रोत्साहन दिले जाते, याची अनेक उदाहरणे सादर करून पर्यावरणप्रेमींनी सरकारी प्रतिनिधींनाच चूप केले. सुमारे तीन तास चाललेल्या या चर्चासत्रात ऍड.क्लॉड आल्वारीस,रमेश गावस,प्रा.राजेंद्र केरकर,सॅबी फर्नांडिस आणी इतरांनी एकापेक्षा एक खाण प्रकरणांची यादीच सादर करून सरकारच्या बेजबाबदारपणाचा पर्दाफाशच केला. नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील खाणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झाल्या खऱ्या पण त्या पूर्ववत करण्याकडे मात्र खाण उद्योजकांनी दुर्लक्ष केले,अशीही टिका यावेळी ऍड. क्लॉड आल्वारीस यांनी केली. सामाजिक बांधीलकीच्या नावाने खाण उद्योजकांकडून हाती घेण्यात आलेले विविध उपक्रम हा केवळ दयाळूपणाचा भाव असल्याचा शेरा कार्मिन मिरांडा यांनी मारला. यावेळी गोवा मिनरल फाउंडेशनतर्फे खाण उद्योगावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामिनाथन श्रीधर यांनी यावेळी खाण उद्योजकांची बाजू मांडली.

मोलेत पेट्रोल पंपवर छापा

इंधनाचे नमुने जप्त, सीबीआयची कारवाई
पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाने आज मोले येथील "गोमंतक' पेट्रोल पंपवर छापा टाकून चाचणीसाठी पेट्रोल व डिझेलचे नमुने गोळा केले. या पेट्रोलपंपवर भेसळयुक्त डिझेल व पेट्रोल विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्याने आज सायंकाळी ५.३०च्या दरम्यान "सीबीआय'ने निरीक्षक ऋषीकुमार यांनी आपल्या पथकासह हा छापा टाकला. यावेळी जप्त करण्यात आलेले नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकण्यात आला होता. श्री. सरोदे नामक व्यक्तीचा हा पेट्रोलपंप असून त्यांची जबाब नोंद करून घेतली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सदर छाप्याच्या वेळी या पेट्रोलपंप वर आग लागल्यास सुरक्षेची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच नियमानुसार प्रत्येक पेट्रोलपंपाच्या परिसरात पिण्याचे पाणी आणि शौचालय असणे बंधनकारक असून तेही नसल्याचे उघड झाले आहे. रात्री उशिरापर्यंत या छाप्याची कारवाई सुरू होती.
काही दिवसापूर्वी "सीबीआय'ने वेर्णा परिसरात छापे टाकून पेट्रोल व डिझेलमध्ये भेसळ केली जात असल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. या घटनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याविषयीचा अधिक तपास "सीबीआय'चे निरीक्षक ऋषीकुमार करीत आहेत.

अर्जुन मुंडा होणार झारखंडचे मुख्यमंत्री

-२५ रोजी शपथविधी शक्य
-आळीपाळीने मुख्यमंत्रिपद

रांची, दि. १८ : गेल्या तीन आठवड्यांपासून झारखंडमध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थितरता लवकरच समाप्त होणार असून विधानसभेच्या उर्वरित काळासाठी आळीपाळीने मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या मुद्यावर भाजपा आणि झामुमोने आज अखेर मान्यता दिली आहे. तशी माहिती भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अर्जुन मुंडा व झामुमोचे प्रमुख शिबू सोरेन यांनी आज येथे एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
"उर्वरित काळासाठी २८-२८ महिने मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पहिल्या कार्यकाळात राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे', अशी घोषणा झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अर्जुन मुंडा यांनी आज येथे एका संयुक्त पत्रकारपरिषदेत केली.
आपण राजीनामा केव्हा देणार असे शिबू सोरेन यांना विचारले असता "लवकरच' असे उत्तर सोरेन यांनी दिले. मात्र, शिबू सोरेन यांचा राजीनामा आणि अर्जुन मुंडा यांचा शपथविधी २५ मे रोजी पार पडेल, असा दावा भाजप आणि एजेएसयूच्या नेत्यांनी केला आहे.
८२ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपा आणि झामुमोचे प्रत्येकी १८ सदस्य आहेत. याशिवाय या आघाडीला जदयुच्या दोन, ऑल झारखंड स्टुड्ंटस युनियनच्या (एजेएसयू) पाच आणि इतर दोन सदस्यांचा पाठिंबा आहे. आज पार पडलेल्या बैठकीला शिबू सोरेन, झामुमो विधिमंडळ पक्षाचे नेते हेमंत सोरेन, भाजपाच्या वरिष्ठ नेत्या करुणा शुक्ला, मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार अर्जुन मुंडा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री रघुवीर दास उपस्थित होते. या बैठकीत एजेएसयुचे प्रतिनिधित्व सुदेश महतो यांनी केले. भाजपाच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्याच्या हेमंत सोरेन यांच्या प्रस्तावाला विरोध करणारे टेकलाल महतो आणि हेमलाला मुरमू हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.
भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदावार अर्जुन मुंडा हे आदिवासी समाजातील असून, यापूर्वी दोन वेळा त्यांनी झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहेे. सध्या लोकसभेचे सदस्य आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले अर्जुन मुंडा १९९५ मध्ये सर्वप्रथम विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. बाबूलाल मरांडी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री राहिलेले अर्जुन मुंडा २००३ ते २००५ या कार्यकाळात पहिल्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री बनले. यानंतर मार्च २००६ ते सप्टेंबर २००६ या कार्यकाळातही ते राज्याचे मुख्यमंत्री होते. आता अर्जुन मुंडा तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत.

Tuesday, 18 May, 2010

नक्षल्यांनी भूसुरुंगाद्वारे बस उडवली, ४० ठार

छत्तीसगडमधील दंतेवाडा परिसर पन्हा हादरला

रायपूर, दि. १७ - छत्तीसगडमधील दंतेवाडा परिसर पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या हल्ल्याने हादरला आहे. दंतेवाडाहून सुकमाला जाणारी बस नक्षलवाद्यांनी आज भूसुरूंग पेरून उडवून दिली. या घटनेत पोलिस कर्मचाऱ्यांंसह सुमारे ४० जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हा हल्ला करून नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारला थेट आव्हानच दिले आहे.
गेल्या रविवारीच नक्षलवाद्यांनी ६ जणांची निर्घृण हत्या केली होती. त्या घटनेला ४८ तास उलटत नाहीत तोच आज दंतेवाडाहून सुकमा येथे जाणारी बस भूसुरूंग स्फोटाने नक्षलवाद्यांनी उडवून दिली. या बसमध्ये पोलिस, अधिकारी व सुरक्षा जवानांसह एकूण ४० ते ४५ प्रवासी होते. त्यामधील ४० जण ठार झाले.
जखमींना नजीकच्या इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पोलिस व सुरक्षा जवानांचाही समावेश आहे. यापूर्वी दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्याा तुकडीवर हल्ला चढवून त्यांना ठार केले होते. त्यानंतर नक्षलावाद्यांच्या विरोधात केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु तरीही नक्षलींनी आपल्या कारवाया सुरूच ठेवल्या असून, आजचा हल्ला हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे.
गेल्या महिन्यात जगदलपूर जवळील चिंतलनार जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखील पोलिस दलाचे ७८ जवान ठार झाले होते. त्यानंतरही या भागात नक्षली कारवाया सुरूच असून आज पुन्हा मोठा हल्ला करण्यात आला आहे. मृतांमध्ये पोलिसांच्या एका विशेष अधिकाऱ्याचाही समावेश आहे. हा स्फोट एवढा भीषण होता की, सदर बस हवेत उंच उडाली. त्यानंतर आतील पोलिसांच्या आर्त किंकाळ्यांनी सारा परिसर दणाणून गेला. घटनास्थळी अत्यंत विदारक दृश्य दिसत होते. सर्वत्र मानवी अवयव आणि रक्ताचा सडा पडला होता. केंद्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. जेथे स्फोट झाला त्या संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच नक्षलवाद्यांचा छडा लावण्यासाठी सारा परिसर पिंजून काढण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
अलीकडेच नक्षलवादाच्या मुद्यावरून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्यात तीव्र स्वरूपाचे मतभेद निर्माण झाले होते. हा प्रश्न मानवी दृष्टिकोनातून सोडवला जावा, असे मत दिग्विजयसिंग यांनी व्यक्त केले होते.
आता नक्षलवाद्यांनी नव्याने केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. कारण केंद्र सरकारने नक्षलवाद संपवण्याच्या घोषणा अलीकडच्या काळात वारंवार केल्या आहेत. त्यामुळे नक्षलवादी अशा प्रकारे आपले अस्तित्व दाखवून देण्याच्या इराद्याने चवताळले आहेत. साहजिकच आता त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्याची वेळ आल्याचा सूर देशपातळीवरून व्यक्त होत आहे.

धडक मोर्चाने सचिवालय दणाणले

पोलिस व आंदोलक यांच्यात उडाली जोरदार झटापट
पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - राज्यातील विविध गावांत बेकायदा डोंगरकापणी, खारफूटीची कत्तल, "सीआरझेड'चे उल्लंघन करून सर्रास बांधकामे होत असल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना भेटण्यासाठी पर्वरी सचिवालय परिसरात आलेल्या आंदोलनकर्त्यांत आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी झालेल्या झटापटीत खवळलेल्या एका महिलेने पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक देवेंद्र गाड यांच्या दोन्ही खाद्यांवरील सहा स्टार उपटून काढले. तर, तिला अडवण्यासाठी गेलेल्या एका महिला शिपायाच्या थोबाडीत लगावली. या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांपैकी २८ जणांना पर्वरी पोलिसांनी अटक करून नंतर सुटका केली. निरीक्षक देवेंद्र गाड यांनी त्या महिलेसह अन्य जमावावर सरकारी कर्मचाऱ्याला सेवा बजावण्यापासून अडवणूक केल्याने आणि बेकायदा जमाव केल्याचा आरोप ठेवून भा.दं.सं. १४०, १४३, १४५ व ३५३ कलमाखाली नोंद केला आहे. तर, ओलिंड परेरा या महिलेने निरीक्षक देवेंद्र गाड यांच्याविरुद्ध धक्काबुक्की आणि अंगावरील कपडे फाडल्याची तक्रार सादर केली आहे. दरम्यान, पोलिस स्थानकावर अटक केलेल्या आंदोलनकर्त्यांची विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी भेट घेऊन चर्चा केली.
पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रात तसेच "सीआरझेड' क्षेत्रात विकासकामांसाठी दिलेले सर्व परवाने त्वरित मागे घेतले जावेत, तसेच बेकायदा डोंगरकापणी रोखण्यासाठी त्वरित फिरते पथक स्थापन करण्याची मागणी घेऊन आज वेर्णा, सांकवाळ, कोलवा, बाणावली येथील नागरिकांनी पर्वरी येथील सचिवालयावर मोर्चा आणला होता. अशा प्रकारचा मोर्चा येणार असल्याची कोणतीही आगाऊ माहिती पोलिसांना मिळाली नसल्याने सचिवालयाच्या प्रवेशद्वारावर नेहमीचीच पोलिस कुमक होती. याचा फायदा घेऊन सुमारे ३० आंदोलनकर्ते विविध मार्गांतून सचिवालयात मुख्यमंत्र्यांच्या केबिनबाहेर पोहचले. यावेळी त्यांनी त्याच ठिकाणी ठाण मांडून मुख्यमंत्र्यांना बाहेर येण्याची मागणी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांपैकी पाच जणांना चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले, मात्र सर्वांनी तेथेच घोषणा देण्यास सुरुवात केल्याने पोलिसांनी त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावेळी कोणीही बाहेर जाण्यास तयार नसल्याने त्यांना अटक केली जाणार असल्याचा इशारा यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी अटकसत्र सुरू असताना आंदोलनकर्त्यांत आणि पोलिसांत झटापट झाल्याने आंदोलन अधिक चिघळले. अटक करून वाहनात लोकांना चढवताना एक महिला खाली कोसळल्याने संतापलेल्या महिलेने देवेंद्र गाड यांच्यावर हल्ला चढवला. यात देवेंद्र गाड याच्या गणवेशावरील "स्टार' ओढून काढण्यात आले. तसेच गणवेशही फाडण्यात आला. यावेळी तिला ताब्यात घेण्यासाठी महिला शिपाई पुढे सरसावल्या असता एका महिला पोलिस शिपायावर थोबाडीत लावण्यात आली तसेच त्यांच्याकडून लाठी हिसकावून तिच्याद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सर्व जमावाला अटक करून पर्वरी पोलिस स्थानकावर नेण्यात आले. नंतर त्यांना अटक करून सोडून देण्यात आले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलनकर्ते पर्वरी पोलिस स्थानकासमोर ठाण मांडून बसून होते.

म्हणे मतांची गरज नाही !
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आम्हाला पाच मिनिटे वेळ देण्याचेही टाळले. त्यांची आगाऊ वेळ न घेता आल्याने आम्हाला तेथून हाकलण्यात आले. निवडणुकीच्यावेळी मते मागायला आमच्या दारात आगाऊ वेळ घेऊन येतात का, असा प्रश्न श्री. कामत यांना केला असता "मला तुमच्या मतांची गरज नाही. तुमच्या मतांवर मी निवडून येत नाही' असे उत्तर दिल्याचे श्रीमती कारमीन मिरांडा आणि स्वाती केरकर यांनी सांगितले.

मडगाव स्फोटप्रकरणी आरोपपत्र दाखल

३० पानी कागदपत्रांत "सनातन'वर थेट ठपका नाही

मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात झालेला स्फोट व सांकवाळ येथे सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी सदर घटना घडल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी आज राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ११ जणांविरुद्ध येथील प्रधान सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात आरोपपत्र सादर केले.
एकूण ३० पानांच्या या आरोपपत्रासोबत पुराव्यादाखल चार हजारांवर कागदपत्रे जोडली असून त्यात २५० साक्षीदारांची नावे दिली आहेत. "एनआयए'चे अधीक्षक विजयन हे आज जातीने न्यायालयात हजर होते. या आरोपपत्राचे वैशिष्ट्य म्हणजे मडगाव स्फोटानंतर काही लोकांनी त्याच्याशी संबंध जोडून ज्या सनातन संस्थेविरुद्ध रान उठवले होते व तिच्यावर बंदी घालण्यासाठी सरकारवर दबाव आणला होता त्या सनातन संस्थेवर आरोपपत्रात कोठेही ठपका ठेवण्यात आलेला नाही. उलट ती सर्वस्वी कट्टरपंथी हिंदू संघटना असल्याचे म्हटले आहे. ११ पैकी जे सहा संशयित आरोपी आहेत ते या संस्थेचे सदस्य असून त्यांचा राबता सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात होता, असे नमूद केले आहे.
मडगाव स्फोटानंतर मृत्युमुखी पडलेले मालेगौडा पाटील व योगेश नाईक तसेच विनय तळेकर, विनायक पाटील, धनंजय अष्टेकर, दिलीप माणगावकर, जयप्रकाश अण्णा, रुद्रा पाटील, सारंग अंकलकर, प्रशांत अष्टेकर व प्रशांत जुवेकर यांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांपैकी मालेगौडा पाटील व योगेश हे हयात नाहीत. पाच जण अजून फरारी आहेत आणि उरलेले चौघे पोलिस कोठडीत आहेत.
आज हे आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे सकाळपासूनच सत्र न्यायालयाच्या आवारात माध्यमांच्या प्रतिनिधींनी तळ ठोकला होता. प्रत्यक्षात आरोपपत्राचा तपशील मिळेपर्यंत सायंकाळ उलटून गेली. आज आरोपींपैकी कोणालाही न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते.
खास सरकारी वकील फारीया यांनी नंतर दिलेल्या आरोपपत्रातील तपशिलानुसार मडगाव स्फोटाचा सूत्रधार म्हणून मालेगौडा पाटील व योगेश नाईक यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला आहे. त्यांनी या स्फोटाचा कट रामनाथी येथील सनातन आश्रमात शिजविला. त्यासाठी मालेगौडा व धनंजय अष्टेकर यांनी देशाच्या विविध भागांतून सामुग्री गोळा केली व त्यातून स्फोटके तयार करून ती वापरली. त्यांनी जीए०५ ए ७८०० या वाडी-तळावली येथील सुरेश नाईक याच्या मालकीच्या स्कूटरमधून ती दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावात आणली व "रिलायन्स प्लाझा'समोर ती ठेवली व तेथेच त्या स्फोटकांचा स्फोट झाला.
आरोपपत्रातील तपशिलानुसार स्फोट घडविण्यामागील उद्देश स्पष्ट होता. नरकासूर स्पर्धा आयोजित करून नरकासूराचा उदोउदो करणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे श्रीकृष्णाचे अवमूल्यन होते. म्हणून अशा स्पर्धांना विरोध करून दहशत फैलावणे व नरकासूर स्पर्धेचे आयोजक, सहभागी झालेले स्पर्धक आणि प्रेक्षक यांना इजा पोचवणे हा त्यामागील हेतू होता. या स्फोटाची पूर्वतयारी आरोपींनी फार आधी केली होती. त्यासाठी ऑगस्ट २००९ पर्यंत सारी सामुग्री विविध भागांतून गोळा केली होती, असे नमूद करताना सेकंड हॅंड मोबाईल, बॅटरी, टेप,घड्याळ,अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू , आयडी वगैरे मुंबई-कोल्हापूर येथून मिळवल्या होत्या. या वस्तू ज्यांच्याकडून मिळविल्या गेल्या त्याचे पुरावे कागदपत्रांच्या रूपात जोडले आहेत असे या आरोपपत्रात म्हटले आहे.
सनातन ही कट्टर हिंदुत्ववादाचा प्रसार करणारी संस्था असून या कट्टरवादाचे मार्शल प्रशिक्षण तिच्यातर्फे वाळपई येथील आश्रमात दिले जात होते. या आरोपपत्रांतील बहुतेक आरोपींनी ते तेथे जाऊन घेतलेले असले तरी या स्फोटात सदर संस्था गुंतल्याचा पुरावा मिळालेला नाही, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
मडगाव प्रकरणातील म्होरक्या गणला गेलेले मालेगौडा पाटील याने वाळपई तसेच अन्य भागात प्रशिक्षण घेतले. नंतर रामनाथी आश्रमातच सनातनचे प्रमुख श्री. आठवले यांच्या खोली शेजारच्या खोलीत त्यांच्या बैठका होत होत्या. त्यावरून तेथेच हे कारस्थान शिजले त्यावेळी मालेगौडाचा तब्बल दहा दिवस तेथे मुक्काम होता असे आरोपपत्रात म्हटले आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या १२० ब, १२१ अ,अ ११,१६,१८२०,३४,५,६ कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. सर्व आरोपांचे स्वरूप कट रचणे, इतरांच्या जीवितास हानी पोचविण्याचा प्रयत्न करणे असे आहेत. त्यात जातीय कलह माजवणे व दंगे माजवण्याच्या प्रयत्नांचा ठपका नाही.
दिवाळीच्या पूर्व संध्येला म्हणजेच १६ ऑक्टोबर २००९ रोजी रात्री हा स्फोट झाला होता. त्यात ठार झालेले उभयता सनातनचे सदस्य असल्याने या प्रकरणाशी त्या संस्थेचा संबंध जोडून काहींनी त्या संस्थेविरुद्ध काहूर माजवले होते. तथापि, तपास संस्थांनी चौकशीअंती त्या संस्थेविरुद्ध पुरावा नसल्याचे स्पष्ट करूनही ही मंडळी शांत झाली नव्हती. उलट संधी मिळेल तेव्हा ती सनातनचे नाव घेताना दिसत होती.
या प्रकरणाचा तपास प्रथम मडगाव पोलिसांनी केला व नंतर सरकारने ते प्रकरण खास तपास संस्थेकडे सोपवण्यात आले. नंतर केंद्राच्या निर्णयानुसार ते राष्ट्रीय तपास संस्थेकडे गेले व त्यांनी सात महिन्यांत आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी अटक केलेल्या चौघांच्या कोठडीतील १८० दिवसांची मुदत उद्या ं१८ मे रोजी संपत होती व त्यांना न्यायालयाने मुक्त करू नये म्हणून आज हे आरोपपत्र दाखल होणे आवश्यक होते.

"साऊथ गोवा डिस्टीलरीज'वर छापा

बनावट विदेशी मद्यनिर्मिती व्यवहाराचा पर्दाफाश

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - अबकारी खात्याने आज केलेल्या कारवाईत चांदोर येथील "साऊथ गोवा डिस्टीलरीज' या देशी मद्य उत्पादन कारखान्यावर छापा टाकून तेथे बनावट भारतीय बनावटीची विदेशी दारू तयार करण्याच्या व्यवहाराचा पर्दाफाश केला. या छाप्यात बनावट मद्याच्या बाटल्यांची दहा खोकी, चार फीलिंग मशिन्स, सुमारे शंभर लीटर अल्कोहोल व इतर साहित्य सील करण्यात आले आहे.
अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी यासंबंधी माहिती दिली. चांदोर येथील हा देशी दारूच्या उत्पादनाचा कारखाना आहे. तेथे फक्त काजू फेणी तयार करण्यास परवानगी आहे. या कारखान्यात मात्र भारतीय बनावटीची विदेशी दारू तयार केली जात होती."साऊथ गोवा डिस्टीलरीज' या नावाने "ब्लॅक ऍण्ड व्हाईट' व "लाईटहाऊस' अशी लेबले लावलेल्या व्हिस्कीच्या बाटल्या तेथे तयार केल्या जात होत्या. या बनावट दारूची दहा खोकी सील करण्यात आल्याची माहिती श्री. रेड्डी यांनी दिली. याठिकाणी सुमारे शंभर लीटर अल्कोहोल, चार फीलिंग मशिन्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारखाना लुएल फर्नांडिस नामक व्यक्तीचा आहे. कारखान्यातील एकूण साहित्याचा आढावा घेतला असता तेथे मोठ्या प्रमाणात दारूचे उत्पादन झाल्याचा संशय आहे. दरम्यान, तेथे तयार होत असलेल्या लेबलची व्हिस्की सहसा गोव्यात आढळत नसल्याने या दारूची तस्करी कर्नाटक किंवा महाराष्ट्रातील काही भागांत होणे शक्य आहे व त्या दृष्टीने तपास सुरू आहे,असेही श्री. रेड्डी म्हणाले.
दरम्यान, कोणतेही लेबल नसलेल्या बाटल्याही याठिकाणी सापडल्याने बनावट नावाने दारू उत्पादनाच्या संशयाला बळकटी मिळाली आहे.
रेड्डी यांनी तात्काळ रत्नागिरी व सिंधुदुर्ग पोलिस आणि अबकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून गोव्यातील सीमेवरून बेकायदा दारू तस्करीची किती प्रकरणे पकडली, त्यात कोणती वाहने, दारू किंवा व्यक्तींना अटक केली याचा तपशीलच मागवला आहे. या प्रकरणाचा थेट संबंध कथित अबकारी घोटाळ्याशी जरी शक्य नसला तरी मुळात या कारखान्याला अल्कोहोल कुठून मिळाले हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असे रेड्डी म्हणाले. या कारवाईसंबंधीची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनाही देण्यात आली आहे. त्यांनी अबकारी खात्यातील भानगडींचा सफाया करण्याची मोकळीक दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
"त्या' निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस
वास्को अबकारी कार्यालयातील तीन निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती अबकारी आयुक्त पी.एस.रेड्डी यांनी दिली. या कार्यालयातून कथित बेकायदा दारू आयात प्रकरणाचा पत्रव्यवहार कसा झाला व तो कोणी केला, याची माहिती मागवण्यात आली आहे. पत्रादेवी अबकारी तपास नाक्यावरील निरीक्षकालाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

पीर्ण-नादोडा खाणीचा पर्यावरण परवाना रद्द

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - पीर्ण- नादोडा येथील नियोजित खाणीचा पर्यावरण परवाना रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने घेतल्याने पीर्ण- नादोडा नागरिक कृती समितीचा खाण विरोधी लढा यशस्वी ठरला आहे. मंत्रालयाचे संचालक डॉ. एस. के. अगरवाल यांनी यासंबंधीचा आदेश जारी केल्याने सेझा गोवा खाण कंपनीला हा दणकाच ठरला आहे.
सेझा गोवा खाण कंपनीतर्फे बार्देश तालुक्यातील पीर्ण- नादोडा या निसर्गसंपन्न गावात खाण सुरू करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालयाकडून पर्यावरण परवाना मिळवण्यात आला होता. या खाण प्रकल्पाला दोन्ही गावातून तीव्र विरोध करण्यात आला होता. या नियोजित खाणीमुळे या दोन्ही गावांवर नैसर्गिक संकट ओढवेल व स्थानिकांचा पारंपरिक काजू बागायतीचा व्यवसाय हातातून जाईल, शिवाय पाण्याचे नैसर्गिक स्रोतही नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. या खाणीमुळे खनिज माती थेट शापोरा नदीत जाण्याचाही धोका स्थानिकांनी व्यक्त केला होता.दरम्यान, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या खाणीसंबंधी घेतलेल्या सार्वजनिक सुनावणीवेळी या खाण प्रकल्पाला कडाडून विरोध झाला होता, असा दावा करून कृती समितीने पर्यावरण परवान्याला आव्हान दिले होते. या सुनावणीवेळी उपस्थित असलेल्या तज्ज्ञ शिफारस समितीच्या सदस्यांनी स्थानिकांचा विरोध डावलून केंद्रीय मंत्रालयाला परवान्यासाठीची शिफारस केल्याचा ठपकाही समितीने ठेवला होता.
कृती समितीने उपस्थित केलेले सर्व मुद्दे खरे ठरल्याने अखेर मंत्रालयाने दिलेला पर्यावरण परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला व पीर्ण- नादोडा नागरिक कृती समितीचा लढा अखेर सार्थकी लागला.

"जीसीईटी'चा निकाल जाहीर

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) - गोवा तंत्र शिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या "जीसीईटी' परीक्षेचा निकाल केवळ तीन दिवसात जाहीर करण्याचा विक्रम या संचालनालयाने केला असून भौतिकशास्त्र, जैविकशास्त्र व संगणक विज्ञानाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थिनी जास्त गूण घेऊन गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्याचाही विक्रम संपुष्टात आणला आहे.
गेल्या वर्षीचा ६३ गुणांचा विक्रम मोडीत काढीत डिचोली येथील साईश कापडी याने भौतिकशास्त्रात ६७ गुण मिळवले आहेत. तर, यामिनी नाईक हिने जैविकशास्त्रात ७४ गूण मिळवून गेल्यावर्षीचा ७२ गुणांना मागे टाकले आहे. मात्र नाईक हिला रसायनशास्त्रातील ७३ गुणांचा विक्रम मोडता आला नाही. यात तिने ७१ गुण मिळवून रसायनशास्त्रात पहिला येण्याचा मान पटकावला.
संगणक विज्ञान विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थ्याने ६७ गूण मिळवले. तर, गणित विषयात मडगाव येथील निरज बोरकर याने ६९ गूण मिळवलेत. या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना www.dtegoa.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
दि. १२ ते १४ मे या दरम्यान राज्यातील दहा केंद्रातून ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार गुणवत्ता यादी बनवली जाणार आहे, अशी माहिती संचालनालयाचे अध्यक्ष विवेक कामत यांनी दिली.
त्याप्रमाणे, आज पासून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. मडगाव येथील रवींद्र भवन येथे दि. १७ ते २१ मे दरम्यान स्वीकारले जाणार आहे. तर, पर्वरी येथे दि. १७ ते २८ मे पर्यंत स्वीकारले जाणार असल्याची माहिती श्री. कामत यांनी यावेळी दिली.

"कोलगेट समजून रेटॉल घेतले'

"त्या' महिलेची पोलिस जबानी
मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यातील त्या राजकीय नेत्याच्या बहुचर्चित मैत्रिणीला ठाणे (मुंबई) येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले असून आता तिची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, तिला अद्याप अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचीही खबर आहे. तिने विषप्राशन केल्याच्या वृत्ताने खळबळ माजल्यानंतर या प्रकरणी तपासासाठी काल मुंबईला गेलेले मायणा कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी आज सदर नर्सिंग होममध्ये जाऊन तिची जबानी नोंदवली. आपण कोलगेट म्हणून चुकून रेटॉल टूथब्रशला लावले व दात घासले असे तिने आपल्या जबानीत सांगितल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या शनिवारी तिला तातडीने जरी मुंबईला नेले असले तरी तो आत्महत्येचा प्रयत्न असल्याने मोठ्या इस्पितळात तिला दाखल करून घेण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या व अखेर राजकीय वशिल्याने तिला ठाणे येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल केल्याची माहिती विशेष सूत्रांनी दिली. या एकंदर प्रकारामुळे राज्यात सदर बहुचर्चित राजकीय नेत्याच्या खाजगी जीवनाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. विष प्राशन केलेली सदर तरुणी विवाहित असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. तिचे सासरे बेताळभाटी येथे राहतात अशीही खबर आहे. पतीशी संबंधातील बेबनाव होऊन ती नवऱ्यापासून वेगळी राहते व त्यातून तिच्या पतीने यापूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केल्याचेही सांगण्यात येते. इतके सगळे झाले असताना तिने नेमके रेटॉल का घेतले हा प्रश्र्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. तिने पोलिसांना दिलेली जबानी पटणारी नसल्याने हे प्रकरण जवळजवळ मिटवण्यात आल्याचीही खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.

मृत्यूची अफवा की सत्य?
मुंबईत उपचार घेणारी सदर महिला मृत पावल्याची वार्ता संध्याकाळी राज्यात धडकल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. या वृत्ताच्या विश्वासार्हतेबाबत अनेकांशी संपर्क साधला असता अधिकृतपणे सांगण्याचे धाडस मात्र कुणीही केले नाही.ठाणे येथे एका खाजगी इस्पितळात ती उपचार घेत असल्याची माहिती मिळाल्याने तेथील पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनीही याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली.

Monday, 17 May, 2010

बसखाली चिरडून आगोंदची युवती ठार

कुंकळ्ळी, दि. १६ (प्रतिनिधी)- खड्डे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर आज सकाळी सव्वाअकरा वाजता झालेल्या बस अपघातात आगोंद येथील ललिता भोमकर (२८) ही युवती बसच्या मागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाली.
कुंकळ्ळी पोलिस स्थानकाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ललिता भोमकर ही युवती शिवकुमार गौडा याच्या जीए-०ए-८ बी-४९०६ या क्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलवरून केपेहून काणकोणला जात असताना पाडी येथे घोड्यांपायक मंदिराजवळ पोचली असता, रस्त्यावर सांडलेल्या मासळीच्या पाण्यामुळे दुचाकी घसरून पडली, त्यावेळी ललिता रस्त्यावर फेकली गेली. त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसच्या (क्र.केएल ३१-एफ ११११) मागील चाकाखाली ती सापडली व जागीच ठार झाली. शिवकुमार गौडा सुदैवाने रस्त्याच्या बाहेर फेकला गेल्यामुळे थोडक्यात बचावला, तो जखमी झाला आहे. शिवकुमार व ललिता ही दोघे आगोंद येथे राहाणारी आहेत.
कुंकळ्ळी पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक गौतम साळुंखे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा केला. युवतीचा मृतदेह विच्छेदनासाठी बांबोळी येथे गोमेकॉमध्ये पाठविण्यात आला आहे. बसचे चालक श्रीधर नारायण पाटकर व मोटारसायकल चालक गौडा यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास चालू आहे.

विषबाधा प्रकरणी चौकशीसाठी पोलिस अधिकारी मुंबईकडे

राजकीय नेत्याचे मैत्रीण प्रकरण

मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी) : दक्षिण गोव्यातील एका राजकीय नेत्याच्या मैत्रिणीने विष घेतल्यानंतर तिची प्रकृती खालावून तिला विमानाने मुंबईला हलविल्याच्या वृत्ताने आज पोलिस खात्यात खळबळ माजली व मायणा कुडतरी पोलिस स्टेशनचे निरीक्षक सिध्दांत शिरोडकर हे या प्रकरणी तपास करण्यासाठी आज येथून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मडगावात ज्या नामांकित इस्पितळात सदर महिलेला दाखल केले होते त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले होते. नंतर वैद्यकीय सल्ला झुगारून तिला मुंबईला नेण्यासाठी बळजबरीने इस्पितळातून बाहेर काढण्यात आल्याची नोंदही इस्पितळाच्या कागदपत्रांत करण्यात आली आहे. पोलिसांनी आज तेथे जाऊन त्या सर्व नोंदीची तपासणी केली व नंतर मुंबईला जाऊन तपास करण्याचा निर्णय घेतला असे सांगण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार सदर मैत्रीणही विवाहिता आहे. तिचे सासर बेताळभाटी येथे असून या संबंधांनंतर बेबनाव होऊन ती बोर्डा येथे राहते. या प्रकरणाने वैफल्यग्रस्त झालेल्या तिच्या पतीने यापूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केल्याचेही सांगण्यात येते. सदर राजकारणी मित्रासमवेत विदेशवारी करून परतल्यानंतर तिसऱ्याच दिवशी तिने रेटॉल का घेतले हा प्रश्र्न मात्र अजून अनुत्तरित आहे.

माजी पोलिस अधिकाऱ्याने लकीला संपवण्याची धमकी दिल्याचे उघड

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - अमली पदार्थविरोधी पथकाच्या माजी अधिकाऱ्याने इस्रायली ड्रग माफिया यावीन बेनिम ऊर्फ अटाला याच्यामार्फत स्वीडिश मॉडेल व्हिसलब्लोवर लकी फार्महाऊस (३३) हिला जिवंत मारण्याची धमकी दिली होती, असे उघड झाले आहे. दूरध्वनीवरून दिलेल्या या धमकीच्या संभाषणाची ध्वनिफितही "एका' पत्रकाराच्या हाती लागली आहे. या घटनेमुळे ड्रग पॅडलर, पोलिस आणि राजकीय व्यक्तींचे या व्यवसायात "साटेलोटे' असलेल्या प्रकरणाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. लकी हिने "यू ट्यूब'वर प्रसिद्ध केलेल्या "व्हिडिओ'मुळे सात पोलिसांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. त्यातच तिने एका राजकीय नेत्याच्या पुत्राचाही यात समावेश असल्याचे जाहीर केल्याने तिच्या जिवाला अधिकच धोका निर्माण झाला आहे.
तिने "यू ट्यूब'वर प्रसिद्ध केलेले व्हिडिओ काढण्यासाठी तिला ही धमकी दिली होती. ही धमकी तिचाच माजी प्रियकर "अटाला' याने दिली होती. असे या संभाषणातून उघड झाले आहे. ""आज मला "चीफ'ने दूरध्वनी केला होता. "चीफ' ने मला सांगितले की, तू आयुष्यातून संपलीस आता, समजले...आता तू यावर थोडा तरी विचार केला पाहिजेस ""यू बीच...'' असे अटाला याने तिला म्हटले. तरीही लकी ने "यू ट्यूब'वर हे वादग्रस्त व्हिडिओ प्रसिद्ध करून या पोलिस अधिकाऱ्यांना आणि ड्रग माफियाला अडचणीत आणले.
या "यू ट्यूब'वरील "अटाला'ने "चीफ' हा शब्द अमली पदार्थ विरोधी पथकाचा माजी निरीक्षक आशिष शिरोडकर याला उद्देशून वापरला होता. पणजीचा "चीफ' माझा मित्र आहे, तो "बिग चीफ' आहे, असे त्याने यापूर्वीच्या व्हिडिओवर म्हटले आहे.
धमकीच्या ध्वनिफितीत पुढे म्हटले आहे की ""आता तू अजून काही केले तर अडचणीत येणार...लकी...माझ्याकडे तुझा पत्ता आहे. माझ्याकडे सर्व काही आहे...तुला कळले असेल मी तुझे काय करीन ते...तुला आयुष्यातून उठवण्यासाठी मी लोकांना पैसे मोजणार...अशी धमकी त्याने तिला दिली आहे.
"लकी' या अत्यंत महत्त्वाच्या साक्षीदाराला देण्यात आलेल्या या धमकीमुळे माजी निरीक्षक शिरोडकर याला अशा प्रकारचे व्हिडिओ संकेतस्थळावर असल्याचे माहीत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अटाला याने त्याच्या वतीने तिला धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणात अडकलेले सात पोलिस आणि "अटाला' तुरुंगात आहेत.

मंगलकार्यांचा उडाला एकच बार!

पणजी, मडगाव, दि. १६ (प्रतिनिधी) : हिंदू पंचागानुसार अत्यंत शुभ अशा साडेतीन मुहूर्तांकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर राज्यात असंख्य मंगल कार्यांचा बार उडाला. चैत्रावर आलेल्या अधिकमासामुळे गेला महिनाभर मंगलकार्ये वर्ज्य असल्याने त्यानंतर आलेल्या आजच्या पहिल्या मुहूर्ताची संधी असंख्यांनी साधली व त्यामुळे आज सर्वत्र सनईचे मंगल सूर निनादले..
एका पाहणीनुसार ही कार्ये एवढ्या मोठ्या संख्येने झाली की, एकाच वेळी असलेल्या असंख्य कार्यामुळे निमंत्रितांचीही सर्व ठिकाणी उपस्थिती लावताना पुरती दमछाक उडाली. काहींनी घरांतील मंडळींची विभागणी केली व आमंत्रणांचा आदर राखला.
एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने मंगल कार्ये होण्याची ही पहिलीच वेळ होती व त्यामुळे वेगवेगळ्या कामांची कंत्राटे घेतलेल्यांनाही पळापळ करावी लागली.
आज दक्षिण गोव्यात एकही सभागृह रिकामे नव्हते. तीच गोष्ट पुरोहित, कॅटरर, स्वयंपाकी, छायाचित्रकार, बॅंडवाले व वाजंत्री, मंडपवाले यांची होती. तरीही काहींनी मिळणारी संधी सोडायची नाही असा निर्धार करून दोन-तीन कामे स्वीकारली व आपली माणसे विभागून व जीवापाड मेहनत घेऊन ती पारही पाडली.
सर्वत्र मंगलमय वातावरण असल्याचे दिसत होते. नियमित मार्गांवरील कित्येक बसगाड्या या मंगळ सोहळ्यांची भाडी घेऊन गेल्याने बहुतेक मार्गावरील बसेस बंद होत्या. त्यामुळे
बसेसवर अवलंबून विवाहसोहळ्यांसाठी बाहेर पडलेल्या मंडळींची गैरसोय झाली.
आज अक्षयतृतीया म्हणजेच सोनेखरेदीचा दिवस. मात्र मडगाव परिसरात या मंगलसोहळ्यांमुळे व त्यात रविवार आल्याने जवाहिऱ्यांची दुकाने बंदच होती. त्यामुळे सोन्या-चांदीची फारशी खरेदी झाली नाही. तथापि, पणजी, डिचोली, म्हापसा आदी ठिकाणी सोन्या-चांदीची दुकाने खुली ठेवण्यात आली होती. तेथे या दोन्ही धातूंची दणक्यात खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.

सीरियल्समध्ये महिलांचे अवास्तव चित्रण - रिमा

पणजी, दि. १६ (प्रतिनिधी) - सध्या विविध इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर सुरू असलेल्या अनेक "सीरियल्स'मध्ये बायका कटकारस्थाने रचतात, शिवाय त्या नखरेल दाखवल्या जातात; हे पूर्ण चुकीचे आणि अवास्तव आहे, अशी तीव्र नाराजी आज "तू तू मै मै' फेम प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांनी व्यक्त केली. त्या आज कला अकादमीच्या ब्लॅकबॉक्समध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतीत मिश्किल शैलीत बोलत होत्या. "तू तू मै मै' मालिकेतील माझ्या सासूच्या भूमिकेमुळे अनेक घरातील पुरुष "रिलॅक्स' झालेत, असे अनुभव ऐकायला मिळाले. एके दिवशी जगप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी मात्र सुनेला इतक्या मिठ्या मारून तिचे एवढे गालगुच्चे घ्यायलाच पाहिजेत काय, असा खोचक प्रश्नही मला विचारल्याचीही आठवण रिमा यांनी उपस्थित श्रोत्यांना सांगितली.
मी वयाच्या चौदाव्या वर्षी रंगभूमीवर प्रवेश केला. अनेक नाटके केली "सीरियल्स'मध्येही काम केले. मात्र याच क्षेत्रात करिअर करीन असे तेव्हा वाटले नव्हते. जेव्हा मला "मैने प्यार किया' हा चित्रपट मिळाला आणि तो तुफान गाजला तेव्हा या क्षेत्रात झोकून देण्याचा निर्णयावर मी ठाम झाले. युनियन बॅंकेत असलेल्या नोकरीवर पाणी सोडले आणि अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. सुरुवातीला या भव्य समुद्रात अनेक गंटागळ्या खाल्ल्यात. समुद्राचे खारे पाणी तोंडा नाकातही गेले, असे अनुभव त्यांनी कथन केले.
या मायानगरीत मला काही चांगली माणसेही भेटली. भक्ती कुलकर्णी, चंद्रकांत गोखले, विक्रम गोखले, निळू फुले, लालन सारंग, दामू केंकरे, सई परांजपे, जयंत दळवी, अमोल पालेकर पु ल. देशपांडे अशा दिग्गजांकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. सुरुवातीला नाटकाच्या तालीम आणि प्रयोगामुळे महाविद्यालयात जाणे जमत नव्हते. त्यामुळे मुक्त विद्यापीठातून महाविद्यालयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या दरम्यान नाटके सुरूच होती, असे त्यांनी सांगितले.
१९७८ नंतर छोट्या पडद्यावर प्रवेश केला, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. चित्रपटांच्या सतत चित्रीकरणामुळे घुसमट व्हायला लागली. त्यावेळी मी पुन्हा रंगमंचावर प्रवेश केला. गुजराती, इंग्रजी, हिंदी, मराठी अशा अनेक नाटकांत त्यांनी भूमिका बजावल्यात. "ती फुलराणी' हे माझे पहिले व्यावसायिक नाटक होते. या नाटकाचा संपूर्ण प्रवास म्हणजे माझे "सोनेरी दिवस' होते, असे त्यांनी नमूद केले.
गोव्यात आधी झापांच्या मंडपातील रंगमंचावर नाटके व्हायची. त्यावेळी रंगमंचावर अनेक किस्से घडायचे. एकादा तर एक नट रंगमंचाची फळी घसरून अर्धा खाली गेला होता. मात्र त्यावेळी प्रेक्षकांना ही एक नवीन "ट्रिक' असावी असे समजून लोकांनी टाळ्या पिटल्या अशी आठवण त्यांनी सांगितली. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांतही हास्याची लकेर उमटली. एकूणच ही दिलखुलास मुलाखत अत्यंत रंगतदार ठरली.

१०० दहशतवादी संघटनांवर बंदी

नवी दिल्ली, दि. १६ - अल्-कायदा, जैशे महंमद, खलिस्तान कमांडो फोर्स, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) यांच्यासह देशातून आणि परकीय भूमीवरून कारवाया करणाऱ्या १०० दहशतवादी संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर लगेचच सरकारने ही कारवाई केली आहे.
दहशतवादी कारवाया गुंतलेल्या संघटनांवर कारवाई करण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा आधार घेतला असला तरी, या संघटनांशी संबंधित संस्था अथवा व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर अडचण उद्भवल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी या संघटनांवर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंधक) कायद्यानुसार बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या कायद्यानुसार बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांमध्ये इंडोनेशियातील जिमाह इस्लामिया (बाली बॉंबस्फोटाशी संबंधित संघटना), लिबियातील इस्लामिक जिहाद ग्रुप, मोरोक्कन इस्लामिक कॉंबॅक्ट ग्रुप, इजिप्शियन इस्लामिक जिहाद, फिलिपाईन्समधील इंटरनॅशनल इस्लामिक रिलिफ ऑर्गनायझेशन आणि उझबेकिस्तानमधील इस्लामिक मूव्हमेंट या जागतिक स्तरावरील दहशतवादी संघटनांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवाद प्रतिबंध आदेश-२००७ नुसार या संघटनांवर बदी घालण्यात आली असून, त्यांचा समावेश बंदी घालण्यात आलेल्या संघटनांच्या सुधारित यादीत करण्यात आला आहे. या संघटनांची यादी लवकरच गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावरही जाहीर करण्यात येणार आहे. त्यात प्रथमच खलिस्तान झिंदाबाद फोर्स या खलिस्तानवादी दहशतवादी संघटनेचा समावेशही करण्यात आला आहे. त्याचबरोबर बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान कमांडो फोर्स, इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन यांचाही या यादीत समावेश आहे. लष्करे तय्यबा, जैशे महंमद, तेहरिके फुरकान, अल् बद्र, अल्-कायदा, हरकत उल् मुजाहिदीन, हरकत उल् अन्सार, हरकत उल जिहादी इस्लामी, हिज्बुल मुजाहिदीन, अल् उमर मुजाहिदीन, जम्मू-काश्मीर इस्लामिक फोर्स, उल्फा, एनडीएफबी, एलटीटीई, सिमी, दिनदार अंजुमन, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी-पीपल्स वॉर), माओवादी कम्युनिस्ट सेंटर आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या भारतातून कारवाया करणाऱ्या संघटनांचाही समावेश या यादीत करण्यात आला आहे.

सरपंचासह ६ जणांची नक्षलवाद्यांकडून हत्या

रायपूर, दि.१६ - राजनांदगाव जिल्ह्यातील तेरेगावमध्ये नक्षलवाद्यांनी आज (रविवार) गावच्या सरपंचासह सहा जणांची हत्या केली. मनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. हत्या करून संबंधितांचे मृतदेह गावाबाहेर फेकून दिले होते.
ग्रामस्थांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी तपासासाठी गेले होते. मात्र, तेथे काहीही आढळून आले नाही. सदर मृतदेह पूर्णत: ताब्यात घेतल्यानंतरच अधिक माहिती देता येईल, असे पोलिसांनी सांगितले.
राज्यातील राजनांदगाव जिल्हा नक्षलवाद्यांनी प्रभावित आहे. त्यामुळे या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या कारवाया वारंवार सुरू असतात. एक वर्षापूर्वी नक्षलवाद्यांनी पोलिस दलावर हल्ला केला होता, ज्यात पोलिस अधिक्षक विनोद कुमार चौबे यांच्यासह २९ पोलिस कर्मचारी शहीद झाले होते.

Sunday, 16 May, 2010

मद्यार्क घोटाळ्यातील अनेकांचे धाबे दणाणले

महत्त्वाची कागदपत्रे आणि संगणक जप्त
नवनियुक्त अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांचा दणका
पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी पर्दाफाश केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेकायदा मद्यार्क घोटाळ्याची सगळी सूत्रे वास्को येथील अबकारी कार्यालयातून फिरत होती. वास्को अबकारी कार्यालयाचे निरीक्षक वामन सापेरकर यांच्या कार्यालयीन संगणकावरून पंजाब, उत्तरप्रदेश, आसाम आदी राज्यांतून विविध कथित कंपन्यांच्या नावाखाली मद्यार्क आयातीचे अर्ज व इतर पत्रव्यवहार झाल्याची खात्रीलायक माहिती उघडकीस आली आहे. नवनियुक्त अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने केलेल्या कारवाईत सदर संगणक व इतर काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
प्राप्त माहितीनुसार पी. एस. रेड्डी यांनी खात्यातील सर्वच व्यवहारांवरील आपली पकड घट्ट करताना खात्याचा कारभार सुधारण्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. अबकारी आयुक्तपदाचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी लगेच अनेक अबकारी निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश जारी करून अनेकांची नव्या ठिकाणी रवानगी केली आहे. वास्को अबकारी कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या एका अबकारी निरीक्षकाला कार्यालयीन संगणकावर अनेक संशयास्पद व्यवहारांची माहिती सापडली. त्यांनी तात्काळ ही माहिती अबकारी आयुक्तांच्या नजरेस आणून दिल्यानंतर या सर्व माहितीचा थेट संबंध पर्रीकर यांनी पर्दाफाश केलेल्या बेकायदा मद्यार्क आयात घोटाळ्याशी जुळत असल्याचे दिसून आले आहे. संगणकावरील ही माहिती उघड झाल्याचे लक्षात येताच वास्को अबकारी निरीक्षक वामन सापेरकर यांना घामच फुटला. त्यांनी यासंबंधीची संपूर्ण माहिती देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. पर्रीकर यांनी विधानसभेत या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे सादर केली होती. मुरगाव- जुवारीनगरस्थित "इंडो आशा लंका' व "वास्को द गामा डिस्टीलरी' या कंपनीच्या नावाखाली बेकायदा मद्यार्क आयातीचा व्यवहार झाल्याचे या कागदपत्रांतून उघड झाले होते. मुळात या दोन्ही मद्य उत्पादन कंपन्या सध्या मंदावल्या आहेत व त्यांच्याकडून केवळ नाममात्र अबकारी कर गोळा होतो, अशी माहिती खुद्द सरकारने विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली होती. पर्रीकर यांनी मात्र पंजाब व इतर काही राज्यांतील अबकारी खात्यांकडून माहिती अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीनुसार या दोन्ही कंपनीच्या नावाखाली लाखो लिटर मद्यार्क राज्यात आयात केल्याची यादीच सादर करून सर्वांना चकित केले होते. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्यांच्या नावाखाली मद्यार्क आयात करण्यासाठी झालेल्या पत्रव्यवहारांचा तपशील वास्को कार्यालयातील संगणकावर सापडल्याने या घोटाळ्यात थेट अबकारी खात्याचे अधिकारीच गुंतले असण्याची शक्यता बळावली आहे. या घोटाळ्यात आंतरराज्य टोळीच कार्यरत असून त्यांचा हा छुपा व्यवहार अत्यंत नियोजनबद्ध रीतीने सुरू आहे, अशीही शक्यता खात्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
दरम्यान, या वादग्रस्त कंपनीच्या नावाखाली नेमके मद्यार्क आयात करण्यासाठीचे अर्ज कुणी केले. त्यांनी आयातीसंदर्भात बनावट परवाने मिळवले कसे व या आयातीसाठीचे कोट्यवधी रुपये नेमके कुणी अदा केले, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरकारचा कोट्यवधींचा कर बुडवून सर्रासपणे सुरू असलेल्या या व्यवहाराचे सूत्रधार कोण हे आता लवकरच उघड होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. अबकारी आयुक्त पी. एस. रेड्डी यांनी त्या दृष्टीने आपल्या हालचाली वेगवान केल्या असल्या तरी त्यांना सरकारकडून कितपत सहकार्य मिळते यावरच पुढील चौकशीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. या घटनेसंबंधी माहिती मिळवण्यासाठी श्री. रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते वैयक्तिक कामानिमित्त राज्याबाहेर गेल्याचे कळते.
गोव्यातून पत्रादेवी सीमेवरून मोठ्या प्रमाणात बेकायदा मद्य वाहतूक होत असल्याचे प्रकरण उघडकीस येताच श्री. रेड्डी यांनी पत्रादेवी अबकारी तपासनाक्याचे प्रभारी अबकारी उपनिरीक्षक श्रीकांत वळवईकर यांना तात्काळ निलंबित केले होते. पाठोपाठ वास्को अबकारी कार्यालयातील हा प्रकार उघडकीस आल्याने पुढील आठवड्यात आणखी काही अबकारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत या कारवाईसंबंधी कोणती भूमिका घेतात हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे.

वास्कोत फ्लॅट फोडून ५.७९ लाखांची चोरी

भरवस्तीत दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने खळबळ
वास्को, दि. १५ (प्रतिनिधी): वास्कोत काही काळापूर्वी झालेल्या चोरी प्रकरणांतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आलेले असतानाच आज दिवसाढवळ्या शहरातील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून ५ लाख ७९ हजारांची चोरी केल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
चोरी झालेल्या ऐवजात हिऱ्याची अंगठी, सोन्याचे सहा व हिऱ्याचे एक पेंडंट, आठ सोनसाखळ्या, सोन्याच्या सहा बांगड्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याखेरीज चोरट्यांनी रोख एक लाख रुपये लांबले.
वास्कोतील नामवंत व्यावसायिक नरेंद्र रजनी यांच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी तेथे हात मारला. पंचनाम्यासाठी तेथे आलेल्या ठसे तज्ज्ञांनाही कुठल्याच प्रकारचे पुरावे मिळाले नसल्याचे समजले आहे.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी १०.३० ते २.३० च्या सुमारास सदर चोरीचा प्रकार घडला. कपडे व्यवसायात प्रसिद्ध असलेले नरेंद्र मुकुंदराय रजनी व त्याचा भाऊ संजय रजनी (राः "पुष्पांजली बिल्डिंग' गोवा सहकार भंडाराच्या बाजूस) आज सकाळी घरातून निघाल्यानंतर पुन्हा दुपारी २.३० च्या सुमारास परतले. त्यांना त्यांच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटच्या गेटचे तसेच दरवाजाचे टाळे तोडण्यात आल्याचे दिसले. आपल्या घरात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी आत जाऊन पाहिले असता दोन बेडरुममधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
त्वरित वास्को पोलिसांना याबाबत त्यांनी माहिती दिली. पोलिसांनी तेथे पाहणी केली असता रजनी यांच्या घरातून सोन्याचे दागिने, इलेक्ट्रॉनिक सामान व एक लाखाची रोकड रक्कम मिळून एकूण ५ लाख ७९ हजाराची चोरी घडल्याचे यावेळी समजले. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाची मदत घेतली तरी त्याचा कोणताच फायदा झाला नाही.
नरेंद्र रजनी हे पत्नी, मुले, भाऊ व त्यांचा परिवार तसेच आईसोबत राहतात. सुट्टीच्या निमित्ताने नरेंद्र व त्यांचा भाऊ संजय यांच्या पत्नी व मुले काही दिवसापूर्वी बाहेरगावी गेल्या आहेत. काल त्यांची आई मुरडेश्वर येथे देवदर्शनासाठी गेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आज हा चोरीचा प्रकार घडल्याने अज्ञात चोरट्यांना याची माहिती कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे "पुष्पांजली बिल्डिंग शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. आसपास दाट लोकवस्ती असूनही दिवसाढवळ्या ही चोरी झाल्याने पोलिसांपुढे त्याद्वारे मोठेच आव्हान उभे ठाकले आहे.
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ४५४ व ३८० कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. निरीक्षक ब्राझ मिनेझीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जॉन डिसोझा तपास करत आहेत.

माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत कालवश

- जयपूर येथे आज अंत्यसंस्कार
- राजस्थानमध्ये तीन दिवसांचा राजकीय शोक
- गडकरी, अडवाणी अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार

जयपूर, दि. १५ : माजी उपराष्ट्रपती आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते भैरोसिंह शेखावत यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी येथे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
दोन दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी येथील सवाई मानसिंग इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण, नंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज सकाळी ११.१० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली, असे इस्पितळाचे अधीक्षक डॉ. नरपतसिंग यांनी सांगितले. शेखावत यांच्या पश्चात पत्नी सूरज कंवर, मुलगी रतन कंवर, जावई नरपतसिंह राजवी, तीन नातू आणि बराच मोठा आप्त आणि मित्रपरिवार आहे.
शेखावत यांना इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या छातीत आणि फुफ्फुसात संसगर्र् झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यानंतर त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. आज सकाळी शेखावत यांची प्रकृती आणखी खालावल्यानंतर त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. मात्र, औषधोपचारांना कुठलाही प्रतिसाद न देता सकाळी सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
भैरोसिंह शेखावत यांचे निधन झाल्याचे वृत्त पसरताच राजस्थान मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात येऊन शेखावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, राजस्थानमध्ये तीन दिवसांचा राजकीय शोक घोषित करण्यात आला. उद्या भैरोसिंह शेखावत यांच्या पार्थिवावर संपूर्ण राजकीय इतमामात जयपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
या तीन दिवसात सर्व सरकारी कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात येईल. त्यांच्या चाहत्यांना अंत्यदर्शन घेता यावे म्हणून शेखावत यांचे पार्थिव त्यांच्या सिव्हिल लाईन्स भागातील बंगल्यात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव शरीर येथील भाजपा कार्यालयात आणण्यात येईल आणि त्यानंतर चांदपोल मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
शेखावत यांच्या निधनाचे वृत्त कळताच भाजपा व विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व राज्यातील त्यांच्या हजारो चाहत्यांनी आपल्या या लाडक्या नेत्याचे अंत्यदर्शन घेतले. आपल्या पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत भैरोसिंह शेखावत "अजातशत्रू' म्हणून ओळखले जात आणि कुठलीही राजकीय अस्पृश्यता न पाळल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांचे मित्र होते. वाढते वय हा माझ्यासाठी अडथळा नाही, असे ते नेहमी म्हणत. वयाच्या ८३ व्या वर्षी पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरवर चढून त्यांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवली होती. राजकीय परिस्थिती अनुकूल नसतानाही त्यांनी २००७ मध्ये राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढविली होती. शेवटी विद्यमान राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
शेखावत यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९२३ रोजी सिकर जिल्ह्यातील खाचरीयावास गावात झाला होता. १९ ऑगस्ट २००२ रोजी भारताचे १२ वे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. शेखावत यांनी तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपदही भूषविले होते. १९७७, १९९० आणि १९९३ मध्ये राजस्थानमध्ये शेखावत यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार होते. १९७२ चा अपवाद वगळता त्यांनी राजस्थान विधानसभेसाठी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विजय संपादन केला होता.
-----------------------------------------------------------------
राष्ट्राची मोठी हानी : गडकरी
शेखावत यांच्या निधनाने भारताने मोठा नेता गमावला असून कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, या शब्दात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी शेखावत यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शेखावत हे भाजपाचे मोठे आधारस्तंंभ होते. भाजपाच्या आणि राष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे गडकरी यांनी सांगितले. गडकरी यांनी उद्यापासून सुरू होणारा आपला युरोप दौरा रद्द केला असून ते शेखावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि इतर वरिष्ठ नेतेही शेखावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहेत.

ललित मोदींचे 'महाकाय' उत्तर

बीसीसीआयला धाडला १५ हजार पानांचा दस्तऐवज
मुंबई, दि. १५ : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच "आयपीएल'चे निलंबित आयुक्त ललित मोदी यांनी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेल्या नोटिसीला अनुलक्षून आज (शनिवारी) "महाकाय' उत्तर दिले. आपल्यावरील पाच आरोपांबाबत तब्बल १५ हजार पानांचे उत्तर मोदींनी आपल्या वकिलांमार्फत मंडळास पाठवले आहे. त्यामुळे उत्तरोत्तर हा संघर्ष अधिक टोकदार होत जाणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
ललित मोदी यांनी मंडळाने दिलेल्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी मुदत संपल्यानंतर पाच दिवसांचा जादा अवधी मागितला होता. हा वाढीव कालावधीही शनिवारी पूर्ण झाल्यावर मोदी यांनी आपल्या वकीलांमार्फत मंडळाला उत्तर पाठवले. सहा मोठ्या खोक्यांमध्ये १५ हजार पानांचे उत्तर मोदींनी दिले आहे. ही खोकी एका ट्रॉलीवर ठेवण्यात आली आणि नंतर ती मंडळाकडे रवाना करण्यात आली. मंडळातर्फे बीसीसीआयचे प्रशासन अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी हे उत्तर स्वीकारले! मोदींनी आपल्यावरील पाच आरोपांबाबत यामध्ये उत्तर दिले आहे.
आपल्यावरील प्रत्येक आरोपाचा तपशीलवार खुलासा करतान मोदी यांनी सोबत गर्व्हनिंग कौन्सिलच्या दिग्गजांविरोधात आरोपपत्र तयार करून बंड पुकारले आहे. मोदींकडून लवकरच हे आरोप सार्वजनिक करण्यात येणार आहे. मोदी यांनी दिवस- रात्र एक करून आपल्यावरील आरोपांचे उत्तर दिले आहे. त्यासाठी त्यांनी दिग्गज वकिलांची मदत घेतली. सध्या आयपीएलचे आयुक्त म्हणून चिरायू अमीन यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच बीसीसीआयनेही तूर्त या उत्तराबाबत मौन पाळणेच पसंत केले आहे. आता या १५ हजार पानांचा अभ्यास करून पुढील सोपस्कार पार पाडणे ही बीसीसीआयसाठी डोकेदुखीच ठरणार आहे.

थायलंडमध्ये सत्तासंघर्ष तीव्र; १६ निदर्शक ठार

बॅंकॉक, दि. १५ : थायलंडमध्ये सरकार विरोधात उभे राहिलेले "रेड शर्ट' आंदोलक आणि लष्कर यांच्यात उडालेल्या संघर्षात १६ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
राजधानी असलेल्या बॅंकॉक शहरात आंदोलकांची निदर्शने सुरू असताना लष्कराने रॅलीच्या ठिकाणाला घेरले. आंदोलकांना पळण्याची संधी मिळू नये यासाठी भोवतालच्या परिसरातील सगळ्या रस्त्यांवर अडथळे उभे करण्यात आले. चोख बंदोबस्त केल्यावर लष्कराने आंदोलकांना लक्ष्य करून गोळीबार केला. या गोळीबारात १६ नागरिक ठार आणि १२५पेक्षा जास्त जखमी झाले. जखमींपैकी अनेकजण विदेशी आहेत.
सध्या सगळ्या जखमींवर उपचार सुरू आहेत. लष्कराने बॅंकॉकमध्ये प्रमुख रस्त्यांवर चौकी-पहारे बसवले आहेत. नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची आणि वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
थायलंडचे पंतप्रधान अभिजीत वेजाजीवा यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आता हे आंदोलन कमालीचे तीव्र झाले आहे. पंतप्रधानांनी मात्र लष्कराच्या मदतीने आंदोलन चिरडण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तसेच सरकार समर्थक यलो शर्ट आंदोलकांनी रेड शर्टवाल्यांना जोरदार आव्हान दिले आहे. त्यामुळेच सध्या थायलंडमध्ये अराजकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मंत्र्याच्या मैत्रिणीने विष घेतल्याची चर्चा

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): दक्षिण गोव्यातील एका मंत्र्याच्या मैत्रिणीने अचानक विष घेतल्याने तिला तात्काळ मुंबईत उपचारासाठी नेण्यात आल्याची जोरदार चर्चा राजधानीत पसरल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. सदर मंत्री आज (शनिवारी) पणजीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु वैद्यकीय कारणास्तव त्यांना तात्काळ मुंबईत जावे लागल्याची माहिती तेथे देण्यात आली. सदर मंत्री आपल्या मैत्रिणीला उपचारासाठी मुंबईत घेऊन गेल्याची खबर सर्वत्र पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मंत्री आपल्या कौटुंबिक वादामुळे काही काळापूर्वी वादात सापडले होते. आता या नव्या प्रकरणांबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्या मंत्र्यांच्या पत्नीकडून विष घेण्यात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने काही पत्रकारांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावर सदर मंत्र्याने आपला मित्र आजारी असल्याने त्याची विचारपूस करण्यासाठी आपण मुंबईत गेल्याचे सांगितले.
उपचार घेत असलेला मित्र नसून सदर मंत्र्यांची खास मैत्रीण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी या मैत्रिणीला घेऊन तो मंत्री विदेशात फिरण्यासाठी गेला होता, असे सांगितले जात आहे. विदेशातून परतल्यानंतर दोघांत वाद निर्माण झाल्याने तिने विष घेतले व त्यातून हा प्रकार घडला, असे बोलले जात आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनाक्रमाबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी रात्री उशिरापर्यंत त्यावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.