रालोआचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले
नवी दिल्ली, दि. ६ : योगगुरू बाबा रामदेव यांचे आंदोलन दडपण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची भेट घेतली. केंद्रातील संपुआ सरकारने लोकस्वातंत्र्यांची गळचेपी केली असल्याचा आरोप करून, काळा पैसा आणि पोलिसी दडपशाहीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रपतींना सादर केले.
भाजप सांसदीय पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील रालोआच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात सुरू असलेले बाबा रामदेव यांचे शांततापूर्ण आंदोलन दडपण्यासाठी सरकारने बळाचा वापर का केला, त्यांच्या शेकडो अनुयायांना अमानूषपणे मारहाण का करण्यात आली, यावर आम्हाला सरकारकडून स्पष्टीकरण हवे असून, यासाठीच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आम्ही करीत असल्याचे रालोआने या निवेदनात म्हटले आहे.
विदेशी बँकांमध्ये जमा असलेला भारतीयांचा काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करण्यासाठी याच अधिवेशनात एक ठराव पारित करण्याचीही विरोधकांची इच्छा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
राष्ट्रपतींचे आश्वासन
या निवेदनाचा काळजीपूर्वक अभ्यास करण्यात येईल आणि पुढील कारवाईसाठी ते सरकारकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रपतींनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे राष्ट्रपती भवनाच्या प्रवक्त्याने सांगितले.
राष्ट्रपती भवनातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. अडवाणी म्हणाले की, देशातील पैसा विदेशात नेणार्या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे अधिकार अंमलबजावणी संस्थांना देण्यासाठी सरकारने कायदा तयार करण्याची गरज आहे. बाबा रामदेव तसेच अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील सिव्हील सोसायटीनेही हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे. संपुआ सरकारची दुसरी कारकीर्द सुरू झाल्यानंतर विदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याचे आश्वासन स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच दिले होते. या सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली. पण, सरकारने अद्याप या दिशेने कुठलेच पाऊल उचलले नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य जनतेच्या संतापाचा भडका उडालेला आहे. जागोजागी सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, असे अडवाणी यांनी सांगितले.
रामदेव बाबा यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सरकारचा उद्देश स्पष्ट झालेला आहे. विदेशातील काळा पैसा परत आणण्याची आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याची या सरकारची इच्छा नसून उलट, गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असलेल्या रक्षण करण्याची या सरकारची इच्छा असल्याचेच यावरून दिसून येते.
रालोआच्या शिष्टमंडळात अडवाणी यांच्यासोबत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, शिरोमणी अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल, शिवसेनेचे खासदार भरतकुमार राऊत आणि जदयुचे खासदार राम सुंदर दास यांचा समावेश होता.
Tuesday, 7 June 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment